Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

प्रशासनाच्या कारभाराला ‘मगर’मिठी

$
0
0

पिंपरी : महापालिकेच्या बहिणाबाई चौधरी सर्पोद्यानातून मगरीची पिल्ले चोरीला गेल्याचे प्रकरण ताजे असतानाच काही दिवसांपूर्वी येथून दोन अजगर चोरीला गेले. त्यामुळे केंद्र सरकारच्या ‘झू ऑथॉरिटी ऑफ इंडिया’ आणि राज्य सरकारच्या उद्यानाशी संबंधित विभाग नेमका काय करीत आहे, असा सवाल आता उपस्थित केला जात आहे.

पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप (पीपीपी) तत्त्वावर हे उद्यान चालविण्यास देण्याचा घाट काही जण घालू इच्छितात असेही बोलले जाते. हे करण्याकरिता महापालिका प्रशासन हे उद्यान चालवू शकत नाही असे दाखवून देणे गरजेचे आहे. त्यामुळेदेखील काही जणांकडून येथील चोरी घडवून आणली जात असल्याचे येथील अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. पण, यात कितपत तथ्य आहे, हे कुणी स्पष्टपणे सांगू शकत नाहीत. पाळीव प्राणी चोरीला जाण्याच्या घटना शहरात घडत असतात. बऱ्याचदा त्याबाबत पोलिसांपर्यंत प्रकरण जाते. परंतु, सहा-सात फुटी अजगर, मगर अवघ्या काही तासांत चोरीला जातातच कसे, हा प्रश्न आहे. सापाला पकडणे सामान्य माणसाला शक्य नाही. त्यामुळे येथील महाकाय अजगर, मगरीची पिल्ले चोरण्यात प्रशिक्षित व्यक्तींचाच हात असल्याचा संशय पोलिसांना येऊ लागला आहे.

दुसरीकडे येथील वन्यजीव सांभाळण्यात कमालीचा बेजाबदारपणा दर्शविणाऱ्या प्रशासनाने येथे परदेशी वन्यजीव आणण्याची तयारी चालविली आहे. काही पदाधिकाऱ्यांनादेखील मुंबई आणि पुण्यातील उद्यानांच्या धर्तीवर परदेशी वन्यजीव पिंपरी-चिंचवडच्या संत बहिणीबाई चौधरी सर्पोद्यानात आणावेत असे वाटते. काही महिन्यांपूर्वी येथून मगरीची पिल्ले चोरीला गेली, तेव्हा देखील महापालिका प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर ताशेरे ओढण्यात आले. तत्कालीन महापालिका आयुक्तांनी त्यावर समिती नेमली. त्याचा अहवाल आला, त्यात कारवाईचे संकेत देण्यात आले. मात्र परिस्थिती आजही जैसे-थेच आहे. उद्यानाशी संबंधित अधिकाऱ्यांच्या अंतर्गत राजकारणातून देखील वन्यजीवांची चोरी घडवून आणली जात असल्याचे बोलले जाते.

वन्यजीवांचे अवयव, सापाची कात, विष यांच्या तस्करीचे प्रकारदेखील जिल्ह्यात यापूर्वी उघड झाले आहेत. त्यामुळे येथील चोरीच्या घटनांमागे तस्करीचा तर प्रकार नाही ना, हे पण तपासणे गरजेचे आहे. प्रशासनावर पकड नसलेल्या किंबहुना याबाबत काडीमात्र आस्था नसलेल्या राजकीय पक्षांच्या पदाधिकारी उद्यानाला आता भेटू देऊ लागले आहेत. ‘उद्यानाची पाहणी केली आणि अधिकाऱ्यांना सक्त सूचना दिल्या’ असे, सांगणारे फोटो हे महाभाग सोशल नेटवर्किंग साइटवर शेअर करून आपली तत्परता सिद्ध करण्याचा केविलवाणा प्रयत्न करत आहेत. पण, यातून मूळ प्रश्नाला बगल देण्याचा प्रयत्न सर्वांनी चालविल्याचे दिसून येत आहे.

महापालिकेचे आयुक्त याबाबत चौकशीचे आदेश दिल्याचे सांगून वेळ तर मारून नेत नाहीत ना अशी शंका आता नागरिकांना येऊ लागली आहे. उद्यानाला बदनाम करण्यासाठी एखाद्याने भर लोकवस्तीत वन्यजीवांना सोडले, तर काय अनर्थ होईल, याचाही विचार होण्याची गरज आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


शिवसेना जनतेसाठी सत्तेत

$
0
0

युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरेंचा शिवसैनिकांसोबत संवाद

म. टा. प्रतिनिधी, पुणे
‘शिवसेना स्वतःसाठी नाही, तर जनतेसाठी सत्तेमध्ये आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी अन्यायाविरोधात लढण्यासाठी शिवसेनेची स्थापना केली. त्यामुळे शिवसेनेचा खासदारापासून शिवसैनिकापर्यंत सर्वांनी अन्यायाच्या विरोधात उभे राहिले पाहिजे. महिलांचे प्रश्न, शिक्षण, कर्जमाफीचा प्रश्न सोडविण्यासाठी शिवसैनिकांनी उभे रहावे,’ असे आवाहन युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी रविवारी केले.

सिंहगड रस्त्यावरील पुष्पक मंगल कार्यालय येथे शिवसेना-युवासेनेच्या पदाधिकाऱ्यांचा मेळावा आयोजिण्यात आला होता. या वेळी ते बोलत होते. उपनेते शशिकांत सुतार, उपनेत्या आमदार डॉ. नीलम गोऱ्हे, जिल्हासंपर्क प्रमुख उदय सामंत, शहर प्रमुख विनायक निम्हण, जिल्हाप्रमुख दत्तात्रेय टेमघरे, आमदार सुरेश गोरे, महापालिकेतील गटनेते संजय भोसले, राम गावडे, जिल्हा उपप्रमुख रमेश कोंडे, समन्वयक श्याम देशपांडे, शहर शिवसेना अधिकारी अ‍ॅड. योगेश मोकाटे व किरण साळी, महिला आघाडीच्या सहसंपर्क प्रमुख निर्मला केंढे आदी या वेळी उपस्थित होते.

‘आपली लढाई मोठी आहे. येत्या २०१९च्या निवडणुकांमध्ये ३०पेक्षा जास्त खासदार आणि राज्यात स्वबळावर सत्ता आणायची आहे. शिवसैनिकांनी जोश, उत्साह कायम असेल तर, निवडणुकीमध्ये शंभर टक्के भगवा फडकेल. आपण सत्तेमध्ये आहोत, पण जनतेसाठी. सरकार किंवा अन्य कोणाकडूनही जनतेवर अन्याय होत असेल, तर त्या विरोधात लढण्यासाठी आपण तयार रहायचे आहे. आपण जे काम करत आहोत, त्याचे डॉक्युमेंटेशन करा,’ असेही ठाकरे यांनी सांगितले. ‘पुण्यातील विद्यापीठाच्या ठिकाणी विद्यार्थ्यांना चांगली क्लासरूम, कँन्टीन, स्वच्छतागृहे आहेत की नाही याचा आढावा घेतला पाहिजे, असेही ते या वेळी म्हणाले.

‘तर चित्र वेगळे दिसेल…’

‘एकजूट दाखविली, तर पुण्यात शिवसेनेचे चित्र वेगळे दिसेल,’ असे वक्तव्य करून संपर्कप्रमुख उदय सामंत यांनी शहर शिवसेनेतील गटबाजीबाबत आदित्य ठाकरे यांच्यासमोर कबुली दिली. ही गटबाजी आता कायमची झाली आहे. ती थोपविण्यासाठी पक्ष नेतृत्वानेही फारसे प्रयत्न केल्याचे दिसून आले नाही. आता आदित्य ठाकरे यांच्या माध्यमातून पुण्यात लक्ष घातले जाणार आहे. त्यासाठी ते स्वतः दोन ते तीन महिन्यांतून एकदा पुण्यात शिवसैनिकांच्या भेटीला येणार असल्याचे या मेळाव्यात स्पष्ट झाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नीरा देवघर धरण १०० टक्के भरले

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, भोर
भोर तालुक्यातील नीरा देवघर धरण शुक्रवारी रात्री बारा वाजण्याच्या सुमारास शंभर टक्के भरल्यामुळे तीन सांडव्यातून २००० क्यूसेक, तर पॉवर हाउसमधून ७०० क्यूसेक वेगाने पाणी सोडण्यात येत आहे. या धरणाची पाणी साठवण क्षमता १२.९१ टीएमसी इतकी आहे. एकूण पाणी साठा ३३७.४१ दशलक्ष घनमीटर असून उपयुक्त पाणी साठा ३३२.१५ दशलक्ष घनमीटर एवढी आहे. धरणक्षेत्रात गेले दोन दिवस पावसाचे प्रमाण अधिक आहे. रविवारअखेरपर्यंत १७७२ मिमी पाऊस पडल्याची नोंद झाली आहे. गेल्या वर्षी हे धरण ५ आणि १८ ऑगस्ट असे दोन वेळा ओव्हर फ्लो झाले होते. गेल्या वर्षी एकूण २ हजार ३७० मिमी एवढा विक्रमी पाऊस झाला होता. धरण पूर्ण क्षमतेने भरल्यामुळे आजूबाजूच्या गावातील नागरिकांना प्रशासनाने सावधगिरीचा इशारा दिला आहे.

भाटघर धरण ९६ टक्के भरले आहे. या धरणाची पाणी साठवण क्षमता २४ टीएमसी इतकी आहे. एकूण पाणी साठा ६४३.२४ दशलक्ष घनमीटर असून उपयुक्त पाणी साठा ६३६.१६ दशलक्ष घनमीटर एवढा आहे. रविवार अखेरपर्यंत ४९९ मिमी पाऊस पडल्याची नोंद झाली आहे. गेल्या वर्षी हे धरण १० व १८ ऑगस्टला दोन वेळा ओव्हर फ्लो झाले होते. गेल्या वर्षी ९७० मिमी पाऊस झाला होता. या दोन्ही धरणातील पाण्याचा उपयोग प्रामुख्याने सोलापूर जिल्ह्यातील दुष्काळी भागातील शेतीच्या पाण्यासाठी केला जातो.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अज्ञात रोगामुळे जनावरे दगावली

$
0
0

भोर : तालुक्यातील अतिदुर्गम भागातील गुहिणीमध्ये गेल्या पंधरा दिवसांपासून ४० जनावरे अज्ञात रोगाने दगावली आहेत. त्यामध्ये गाय, म्हैस, बैल, वासरांचा समावेश आहे. त्यामुळे शेतकरी वर्गात चिंतेचे वातारण आहे. या आजारामुळे जनावरे पडून राहतात. त्यांना खाण्याची इच्छा राहत नाही. जनावराचे पाठीमागचे दोन्ही पाय लुळे पडतात आणि दोन दिवसांनंतर त्याचा मृत्यू होतो.

पशुगणणेनुसार गावात २१२ जनावरे आहेत. दोन दिवसांपूर्वी शिरवळ (ता. पा. खंडाळा) येथील क्रांतिसिंह नाना पाटील पशुवैद्यकीय महाविद्यालयातील डॉ. अजित माळी यांच्या मार्गदर्शनाखाली तीन वैद्यकीय तज्ज्ञांचे पथक गावात आले होते. तीन जनांवरांवर उपचार केले, तसेच जनावरांच्या रक्ताचे व लाळेचे नमुने घेऊन प्रयोगशाळेत पाठवले. पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. सचिन देशपांडे म्हणाले, ‘गुहिणी गाव घाटमाथ्यावर अतिपावसाच्या भागांत आहे. तेथील गवत पौष्टीक नसते, जनावरांच्या आहारात कॅलशियम, फॉस्फरचाही अभाव असतो. त्यामुळे जनावरे दगावण्याची शक्यता आहे.’ करंदी येथील पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. एस. एस. मांगडे यांनी गावांतील जनावरांवर उपचार सुरू केले आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भाजपच्या लाभासाठी बदल

$
0
0

बाजार समिती निवडणुकीसंदर्भात अजित पवारांचा आरोप

म. टा. प्रतिनिधी, बारामती
‘तज्ज्ञ संचालक, संचालक प्रशासक या गोंडस नावाखाली भाजप कार्यकर्त्यांना सत्तेत सामावून घेण्याच्या हेतूने राज्य सरकारने कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणूक प्रक्रियेत आमूलाग्र बदल करण्याचा निर्णय घाईने घेतला आहे,’ असा आरोप माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केला आहे.

‘बाजार समित्यांवर वर्चस्वासाठी भाजपचा खटाटोप आहेच. मात्र, त्यामागे खरे कारण वेगळेच आहे. सहकार पणनमंत्री सुभाष देशमुख सोलापूरमधून निवडून आले आहेत. मात्र, तेथील बाजार समिती दिलीप माने गटाकडे आहे. माने यांना प्रचलित पद्धतीने पराभूत करून बाजार समिती निवडणूक देशमुख यांना जिंकता येत नाही. प्रचलित पद्धतीने निवडणुका झाल्यास देशमुखांचा तेथे टिकाव लागत नाही. म्हणूनच बाजार समितीच्या निवडणूक प्रक्रियेत सरकारने बदल केला आहे. त्यामुळे सर्व शेतकऱ्यांना बाजार समिती निवडणुकीत मतदानाचा हक्क दिला आहे,’ असा आरोप अजित पवार यांनी केला. बारामती कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये नव्याने सुरू करण्यात आलेल्या ई-लिलाव पद्धतीच्या उद‍्घाटन प्रसंगी ते बोलत होते.

‘पूर्वी कृषी उत्पन्न बाजार समितीवर काम करण्यासाठी तालुक्यातील वेगवेगळ्या संस्थांचे प्रतिनिधी, व्यापारी, हमाल मापाडी, तसेच मागास वर्गातील प्रतिनिधींना संधी मिळत असे. मात्र, बाजार समितीच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीसाठी तालुक्यातील प्रत्येक शेतकऱ्याला मतदानाचा हक्क बहाल केल्याने ही निवडणूक आमदारकीसारखीच होईल. संचालक मंडळाच्या निवडणुकांचा येणारा कोट्यवधींचा खर्च करण्याची कुवत राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या आवाक्यात नाही, याचा विचार सरकारने केला नाही. भाजपतील कार्यकर्ते सामावून घेण्यासाठी सरकारने तज्ज्ञ संचालक बाजार समितीत नेमण्याची संकल्पना पुढे आणली आहे,’ असे पवार म्हणाले.

‘शेतकऱ्यांच्या मालाला योग्य दर मिळावा, त्यांच्या मालाची लवकर मोजणी होऊन त्यांना मोबदला त्वरित मिळावा, तसेच कामात पारदर्शकता यावी या हेतूने बाजार समितीने अत्याधुनिक तंत्रज्ञानाची कास धरली आहे ही जमेची बाजू आहे. मार्केटयार्डमध्ये विक्रीच्या ठिकाणी लिलावाची रीतसर माहिती पाहण्यासाठी मोठ्या स्क्रीन लावण्यात आल्या आहेत. मुख्य प्रवेशद्वारावर शेतमालाची संगणकीकृत नोंदणी केल्यावर शेतकऱ्यांच्या मोबाइलवर तत्काळ माहितीसुद्धा पुरविली जाते. बाजार समितीतील कुठल्याही स्क्रीनवर शेतकऱ्यांच्या मालाला मिळणारा भाव बघण्याची व्यवस्था आहे. बाहेरील शेतीमालाचे भाव शेतकऱ्यांना या ठिकाणी पाहवयास मिळणार आहे. मात्र, शेती मालाचे ग्रेडिंग करावे लागणार आहे. यामुळे दर्जेदार मालाला अधिक भाव शेतकऱ्यांना मिळणार आहे,’ असे पवार यांनी सांगितले.

‘हात जोडून विनंती’

‘पुणे जिल्हा सहकारी मध्यवर्ती सहकारी बँक ७० कोटी रुपये नफ्यात आहे. मात्र, काही घोटाळे झाले नसते, तर नफा ९० कोटींच्या घरात गेला असता,’ असे अजित पवार म्हणाले. ‘राष्ट्रवादीच्या ताब्यातील संस्थांवर काम करणाऱ्या पदाधिकाऱ्यांनी जबाबदारीचे भान ठेवावे. सोमेश्वर घोटाळ्यात जिल्हा बँकेच्या अधिकारी असो अथवा कर्मचारी एकाही दोषीला मी पाठीशी घालणार नाही, असे सांगतानाच भ्रष्टाचार करू नका, अशी विनंतीही त्यांनी केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

प्रेयसीने घडवला सराईताचा खून

$
0
0

साडेतीन वर्षानंतर फुटली खुनाला वाचा

म. टा. प्रतिनिधी, पुणे
घरफोडी व वाहन चोरीमधील सराईताच्या साडेतीन वर्षापूर्वी झालेल्या खुनाचा छडा लावण्यात गुन्हे शाखेच्या पोलिसांना यश आले आहे. घरफोडीतील आरोपींकडे त्यांच्या फरार साथीदारांबद्दल पोलिसांनी तपास केला. त्या वेळी त्यांनी साडेतीन वर्षापूर्वी मयताच्या प्रेयसीच्या सांगवण्यावरून त्याचा खून केल्याची कबुली दिली. याप्रकरणी तिघांना अटक केली असून दोघांचा शोध सुरू आहे.

हरप्रितसिंह तेजसिंग गिल उर्फ हरप्रिसिंग जग्गासिंग निज्जर (वय २७, रा. कोंढवा, मूळ पंजाब) असे खून झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी अजय डॅनियल गिल (वय २३, रा. कोंढवा बुद्रुक, मूळ पंजाब), सुमित सतीश मुदलीयार (वय २७, रा. आंबेगाव पठार, कात्रज), रिटा उर्फ मॅग्डलीन डेंझील डिसुझा (वय ४८, रा. सिद्धेश्वर पेठ, सोलापूर) यांना अटक करण्यात आली आहे. तर, सर्फराज इस्माइल शेख उर्फ सैफी (वय २९, रा. निगडी ओटा स्कीम, मूळ उत्तर प्रदेश), नेल्सन सुरेश गायकवाड या दोघांचा शोध सुरू आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हरप्रित, अजय, सर्फराज, रिटा हे घरफोडी व वाहन चोरीतील सराईत गुन्हेगार आहेत. त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात गुन्हे दाखल आहेत. या आरोपींना त्यांच्या साथीदारांसह २३ घरफोडीच्या गुन्ह्यांत अटक करण्यात आली होती. पण, हरप्रित हा या गुन्ह्यात फरार होता. सर्व आरोपी जामीनावर आल्यानंतर त्यांनी पुन्हा घरफोड्या सुरू केल्याची माहिती गुन्हे शाखा युनिट पाचला मिळाली. त्यानुसार त्यांनी अजय, सुमित आणि रिटा यांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून हडपसर येथील एक घरफोडी उघडकीस आली. त्यांचा फरार साथीदार हरप्रितबद्दल अजय याच्याकडे चौकशी करत असताना घाबरून त्याने त्याचा खून केल्याची माहिती दिली. तसेच, रिटाच्या सांगण्यावरून खून केला असून मृतदेह कात्रजच्या घाटात टाकून दिल्याचे सांगितले. मृतदेह टाकलेल्या ठिकाणी जाऊन पाहणी केली असता त्या ठिकाणी मानवी कवटी आढळून आली. हा मृतदेह कोणालाही न दिल्यामुळे हा प्रकार समोर आलेला नव्हता.

असा केला खून

हरप्रितची आई २०००मध्ये पुण्यात राहण्यास आली होती. तिची रिटा सोबत ओळख झाली. रिटाने तिला स्वतःच्या घरी कामाला ठेवले. हरप्रितला एसटीडी बुथवर कामाला ठेवले. त्यानंतर हरप्रितची आई एका व्यापाऱ्यासोबत राहू लागली. डिसुझा हिचा पती देखील परदेशात असल्यामुळे तिचे हरप्रितसोबत सूत जुळले. दोघे सोबत राहू लागले. पण, नंतर हरप्रित हा तिच्या दोन मुलींवर डोळा ठेऊ लागला. त्यांच्यावर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न करत होता. हे रिटाला मान्य नव्हते. त्यामुळे तिने हरप्रितचा साथीदार अजयला त्याच्या विरोधात भडकविले. त्याचा खून करण्याची अजयला सुपारी दिली. २८ एप्रिल २०१४ रोजी हरप्रितला खूप दारू पाजली. आरोपींच्या मदतीने त्याचा घरात खून करून मृतदेह कात्रजच्या घाटात टाकून दिला होता.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बस थांब्याचे कट्ट्यात रूपांतर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
बसचा मार्गच बदलल्याने निरूपयोगी, अडगळ बनलेल्या आणि म्हणूनच कचऱ्याच्या साम्राज्यात रुपांतरित झालेल्या बसथांब्याला आर्किटेक्चरच्या विद्यार्थिनींनी नवे रूप दिले आहे. त्यामुळे आता हा स्वच्छ, प्रसन्न बसथांबा नागरिकांच्या अल्पविरामाचे केंद्र बनले आहे.

कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या डॉ. भानूबेन नानावटी कॉलेज ऑफ आर्किटेक्चरच्या (बीएनसीए) ३५ विद्यार्थिनी आणि त्यांच्या प्राध्यापकांनी ही किमया साधली आहे. प्रसिद्ध व्यंगचित्रकार चारूहास पंडित यांच्या हस्ते नुकतेच या कट्ट्याचे उद्घाटन झाले.

कोथरूडच्या सहजानंद सोसायटीत गोपीनाथनगर रोड हा बसथांबा काही दिवसांपूर्वी मार्ग बदलल्याने बंद पडला. त्यानंतर या बसथांब्याचा गैरकामांसाठी वापर होऊ लागला. तेथे कचरा जमू लागला, मद्यपींनी या जागेचा वापर सुरू केला. त्यानंत ऋतुजा बडवे हिच्या नेतृत्वाखाली शलाका संचेती, पर्णवी हबडे, विनिता मंडोले अशा बीएनसीएच्या ३५ विद्यार्थिनींच्या गटाने ‘नॅशनल असोसिएशन ऑफ स्टुडंटस ऑफ आर्किटेक्चर’ या स्पर्धेसाठी या बसथांब्याचे परिवर्तन करण्यास १५ ऑगस्ट रोजी सुरुवात केली. पाहता पाहता त्यांनी या बसथांब्याचे परिवर्तन घडवले.

‘बसथांबा ही थांबण्याची जागा असल्याने त्याचे संवादात्मक जागेत रूपांतर करण्याची संकल्पना होती. या जागेत आता नागरिकांना एकमेकांशी संवाद साधता येईल. आयुष्यातील काही क्षणांचा आनंद घेता येईल,’ असे ऋतुजा हिने सांगितले.

‘अडगळ ठरलेल्या बसथांब्याचे या विद्यार्थिनींनी एका सुंदर अल्पविरामाच्या जागेत रूपांतर केले आहे. त्याचा समाजाला फायदा होत आहे,’ असे बीएनसीएचे प्राचार्य डॉ. अनुराग कश्यप यांनी सांगितले. ‘शहरातील अन्य अडीचशे निकामी बसथांब्यांचा कायापालट करणे शक्य आहे. लोकसहभागातून असे उपक्रम यशस्वी होऊ शकतील,’ असा विश्वास प्रा. महेश बांगड यांनी व्यक्त केला.

परिसरातील नागरिक श्रीकांत महाजन व त्यांचा मुलगा सनील, सहभागी विद्यार्थिनींचे पालक यांनी या उपक्रमात सहभाग घेतला. बीएनसीएचे प्राचार्य डॉ. कश्यप, शिक्षणविभाग प्रमुख महेश बांगड, डॉ. शुभदा कमलापूरकर, डॉ. चेतन सहस्रबुध्दे, प्रा. राहुल चुटके यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. या उपक्रमासाठी आलेला खर्च बीएनसीएच्या विद्यार्थिनी, प्राध्यापक आणि आसपासच्या नागरिकांनी केला. स्थानिक नगरसेविका अल्पना वरपे यांनी स्वच्छतेसाठी सहकार्य केले.

असे झाले परिवर्तन

जेव्हा विद्यार्थिनींनी या बसथांब्याचे परिवर्तन करण्यास सुरुवात केली त्या वेळी, हा बसथांबा पूर्णपणे विखुरलेला होता. विद्यार्थिनींनी त्यामध्ये आता बसण्यासाठी बैठका, मुक्त वाचनालय, फुले-झाडांच्या कुंड्या या सुविधांचा समावेश केला आहे. लहान मुलांकरिता फळा बसविण्यात आला आहे. त्यासोबतच दुसऱ्या बाजूस व्यंग्यचित्र लावण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विचित्र अपघातात १७ जण जखमी

$
0
0

भोर : पुणे-सातारा महामार्गावर एक मालमोटार, कार, एसटी बस, दोन दुचाकी यांच्या विचित्र अपघातात १७ जण जखमी झाले असून दोघे जण गंभीर जखमी आहेत. सर्व जखमींवर खेड शिवापूर येथील खासगी रुग्णालयांत उपचार सुरू आहेत. रविवारी दुपारी सव्वाच्या सुमारास ससेवाडीजवळ ओम कंपनीसमोर हा अपघात झाला.

अपघातात कार आणि मालमोटारीचे नुकसान अधिक झाले आहे. क्रेन वेळेत उपलब्ध झाली नसल्याने अपघातग्रस्त वाहने हटविण्यास विलंब झाला. त्यामुळे तीन तास वाहतूक ठप्प होऊन रस्त्याच्या दोन्ही बाजूस सुमारे दोन किमी वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. अपघातामध्ये कारमधील भारती सतीश शिवरकर (वय ६२, रा. रास्ता पेठ, पुणे), तसेच दुचाकीच्या मागे बसलेला किरण तानाजी खटाव (वय २५, रा. नऱ्हे, पुणे) हे गंभीर जखमी झाले आहेत. अपघातातील सर्व वाहने साताऱ्याच्या दिशेने जात होती. उड्डाणपुलाच्या उतारावर मालमोटार चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. त्यामुळे मालमोटार पुढे असलेल्या कारवर धडकली. ही कार पुढील एसटी बसवर आदळली. त्यानंतर एसटीने दुचाकीला उडवले. अपघातग्रस्त मालमोटार आणि एसटी उतारावरून जोरदार पुढे पुलाच्या बाजूला पडल्या.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


आता नव्या टोइंग मशिन

$
0
0

वाहनांचे नुकसान टाळण्यासाठी वाहतूक पोलिसांचा प्रयत्न

पुणे : नो-पार्किंगमध्ये लावलेल्या दुचाकीचे हँडल लॉक असल्याने त्या कशाही पद्धतीने उचलून नेल्या जातात...चारचाकी वाहने उचलून नेताना गाडीचे नुकसान झाले… अशा तक्रारी करण्याची संधी नागरिकांना आता यापुढे मिळणार नाही.

शहराच्या विविध भागात नो-पार्किंगमध्ये उभी केलेली वाहने उचलण्यासाठी वाहतूक पोलिस विभागाकडून प्रायोगिक तत्त्वावर ‘ऑटोमॅटिक टोइंग मशिन’चा अवलंब केला जाणार आहे. यामध्ये शास्त्रशुद्ध पद्धतीने वाहनाचे कुठलेही नुकसान होऊ न देता वाहने उचलण्यात येणार आहेत. वाहतूक विभाग ही सेवा ‘आउटसोर्स’ करणार असून, चारचाकी वाहनांसाठी १० क्रेन आणि २५ टेम्पो कार्यान्वित करण्याचा प्रशासनाचा विचार आहे.

सध्या नो-पार्किंगमध्ये लावलेली दुचाकी वाहने उचलण्यासाठी वाहतूक पोलिसांकडून मनुष्यबळाचा वापर केला जातो. तर, चारचाकी वाहने लावण्यासाठी क्रेनचा वापर केला जातो. क्रेनद्वारे चारचाकी वाहन उचलताना वाहनाच्या पुढील बाजून दोरीच्या सहाय्याने बांधले जाते. मात्र, ही पद्धत अशास्त्रीय असून त्यामुळे वाहनाचे नुकसान होण्याची शक्यता असते किंवा नुकसान होतेच, असा आरोप वाहन मालकांकडून केला जातो. त्यामुळे ऑटोमॅटिक टोइंग मशिनद्वारे अशी वाहने वाहतूक विभागात हलविली जाणार आहेत. ऑटोमॅटिक टोइंग मशिनकरीता लवकरच टेंडर प्रक्रिया राबविली जाणार असल्याची माहिती वाहतूक पोलिस उपायुक्त अशोक मोराळे यांनी दिली.

मुंबईमध्ये वाहतूक पोलिस विभागाने या तंत्रज्ञानाचा अवलंब केला आहे. तेथे त्याचा चांगला परिणाम दिसून येत आहे. त्या पार्श्वभूमीवर पुण्यातही त्याची अंमलबजावणी करण्याचा निर्णय फार पूर्वी घेण्यात आला होता. डॉ. प्रवीण मुंढे हे वाहतूक उपायुक्त असताना, सर्वप्रथम याची कल्पना मांडण्यात आली होती. त्यानंतर कल्पना बारावकर यांची वाहतूक उपायुक्तपदी नेमणूक झाली. त्यांच्या तीन महिन्यांच्या कार्यकाळातही याबाबतची चर्चा झाली. आता मोराळे यांच्या नेमणुकीनंतर या चर्चेला पूर्णविराम मिळणार आहे. वाहतूक पोलिसांकडून याबाबतची टेंडर प्रक्रिया लवकरच पूर्ण केली जाणार आहे.

असे काम करते मशिन…

दुचाकी वाहनांच्या मागील व पुढील बाजूस दोरी अडकवून क्रेनच्या मदतीने उचलली जातात. यामध्ये ड्रायव्हरसह एक जण गाडीला दोर व्यवस्थित अडकविण्यासाठी आणि एक जण गाडी टेम्पोमध्ये व्यवस्थित ठिकाणी लावण्यासाठी असे तीन जण पुरेसे ठरतात. चारचाकी वाहन उचलून नेण्यासाठी वाहनाच्या मागील बाजूस चारचाकीचे पुढचे टायर घट्ट बसतील, असे यंत्र लावले जाते. त्याद्वारे चारचाकी वाहनाची पुढील बाजू वर उचलली जाते. तर, मागील बाजूच्या दोन्ही चाकांना प्रत्येकी दोन चाके लावली जातात. त्यामुळे ती गाडी मागील बाजून देखील थोड्याप्रमाणात उचलली जाते. यामध्ये वाहनांचे नुकसान होण्याची शक्यता नगण्य असते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

लवासातील बांधकामे मास्टर प्लॅनविनाच

$
0
0

राज्य सरकारच्या हिल स्टेशन धोरणाचा भंग

म. टा. प्रतिनिधी, पुणे
हिल स्टेशन धोरणानुसार आवश्यक असलेला बृहत आराखडा (मास्टर प्लॅन) तयार न करताच लवासामधील अनेक बांधकामे झाल्याचा प्राथमिक निष्कर्ष पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (पीएमआरडीए) सर्वेक्षणातून समोर आला आहे. लवासामधील बांधकामांचा सविस्तर अहवाल तीन महिन्यांत सादर करण्यात येणार आहे.

लवासाचा विशेष नियोजन प्राधिकरणाचा दर्जा राज्य सरकारने मे महिन्यात काढून घेतला. त्यानंतर, लवासात आतापर्यंत झालेल्या सर्व कामांची तपासणी करण्याचे संकेत पीएमआरडीएचे आयुक्त किरण गित्ते यांनी दिले होते. त्यानुसार, सुरुवातीच्या टप्प्यात पीएमआरडीएने घेतलेल्या प्राथमिक आढाव्यामध्ये लवासा कॉर्पोरेशनने हिल स्टेशन धोरणाचा भंग केल्याचे स्पष्ट झाले आहे. ‘राज्य सरकारने एखाद्या भागाला हिल स्टेशनचा दर्जा दिल्यानंतर त्याचा मास्टर प्लॅन तयार करावा लागतो. लवासाला २००१मध्ये मंजुरी मिळाली, तरीही त्यांनी मास्टर प्लॅन तयार केला नव्हता. त्यामागील कारणांचा शोध घेण्यात येणार असून, त्याचा अहवाल सरकारला सादर केला जाणार आहे,’ अशी माहिती किरण गित्ते यांनी दिली.

विधानसभेमध्ये खडकवासल्याचे आमदार भीमराव तापकीर यांनी लवासातील अनियमित बांधकामांबद्दल प्रश्न उपस्थित केला होता. त्या वेळी पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी सुरुवातीला लवासात कोणतेही अनधिकृत बांधकाम झाले नसल्याचा दावा केला होता.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

राष्ट्रकूट, शिलाहारकालीन गणेश

$
0
0

आनंद कानिटकर
राष्ट्रकूटांच्या काळात म्हणजे इ.स. आठवे ते इ. स. दहावे शतक या काळात गणपतीचे महत्व वाढू लागले असल्याचे विविध साधनांवरून स्पष्ट होते. या काळात वेरूळ येथे निर्माण झालेल्या राष्ट्रकूटांच्या शैव लेण्यांतून आपल्याला गणेशाचे दर्शन होते. जगप्रसिद्ध कैलास लेण्यामधील यज्ञशाळा या नावाने ओळखल्या जाणाऱ्या छोट्याशा लेण्यात आपल्याला सप्तमातृकांसह गणेशाचे दर्शन होते. कैलास लेण्यात स्वतंत्र पूजेसाठी असणाऱ्या गणेशाच्या चतुर्भुजमूर्तीदेखील आढळतात. यातील गणेशाची एक मूर्ती जवळजवळ चार फूट उंच असून तिच्या एकेका हातात परशू, अक्षमाला, मुळा आणि मोदकपात्र घेतले आहे. या गणेशाची सोंड मोदकपात्रात ठेवलेल्या मोदकांवर विसावली आहे. या मूर्तीखेरीज कैलास लेण्यातील मुख्य मंदिराच्या भिंतीच्या बाह्यभागावरही देवाकोष्ठांमध्ये गणेशमूर्ती कोरलेल्या आहेत.

नांदेड जिल्ह्यातील कंधार येथे सापडलेल्या राष्ट्रकूट राजाच्या शिलालेखात कंधार नगराच्या एका बाजूला यक्षद्वार होते, तर दुसऱ्या बाजूला मंडलसिद्धीविनायकद्वार होते, असा उल्लेख आढळतो. याच शिलालेखात पुढे मंडलसिद्धीविनायकाच्या मंदिराचाही उल्लेख आहे. यावरून प्राचीन कंधार नगराच्या प्रवेशद्वारापाशी सिद्धीविनायकाचे मंदिर होते आणि ते प्रवेशद्वार विनायकाच्या नावाने ओळखले जात होते, हे स्पष्ट होते.

सुरुवातीला राष्ट्रकूटांचे मांडलिक असणाऱ्या आणि नंतर स्वतंत्र झालेल्या शिलाहारांच्या काळात (इ. स. नववे ते इ. स. तेरावे शतक) आपल्याला विनायकाचे अनेक उल्लेख आढळतात. शिलाहार राजांच्या काळात गणपतीचे मंदिर उभारल्याचा पुरावा नसला, तरी त्यांच्या एका शिलालेखात शिवपंचायतन मंदिराचा उल्लेख येतो. या शिवपंचायतन मंदिरामध्ये मध्यभागी शंकराचे मंदिर असते, तर त्याच्या चारही बाजूला पार्वती, विष्णू, सूर्य आणि गणपती यांची छोटेखानी मंदिरे असतात. शैव, वैष्णव, शाक्त, सौर आणि गाणपत्य या पाचही पंथांमध्ये एकोपा निर्माण करण्यासाठी आदी शंकराचार्यांनी (इ. स. आठवे शतक) या पंचायतन पूजेची सुरुवात करून दिल्याचे म्हटले जाते.

याशिवाय नमूद करण्यासारखी बाब म्हणजे उत्तर कोकणातील शिलाहार राजांच्या ताम्रपटांची सुरुवात गणपतीला नमन करून झालेली आहे. सर्व कार्यांत लाभणाऱ्या आणि वाटेत येणाऱ्या विघ्नांचा नाश करण्याऱ्या गणपतीला आमचे नमन असो, अशा अर्थाचे श्लोक या ताम्रपटांतून येतात. काही वेळेला केवळ गणनायक, विनायक, लंबोदर यांना नमन असो, असा उल्लेख आढळतो. गणेशाला केलेल्या वंदनानंतरच शिवस्तुतीचे श्लोक या ताम्रपटांतून येतात. याशिवाय एका ताम्रपटात गणेशाला मोदक प्रिय असल्याचेही म्हटले आहे. शिलाहारकाळातच लिहिलेल्या अपरार्कटीका या ग्रंथात उंदीर हे गणेशाचे वाहन असल्याचा उल्लेख आढळतो.

शिलाहारांच्या काळात इ.स. १०६० मध्ये निर्माण झालेल्या अंबरनाथ येथील भूमिज शिवमंदिराच्या बाह्यभागावर नृत्यगणेश कोरलेला आहे. याच मंदिराच्या अंतराळातील भागात शक्तिसह असलेला गणपती कोरला आहे. या मंदिराच्या आवारात सापडलेल्या भग्न अवशेषांमध्ये मंदिराच्या खांबावर असणाऱ्या हस्तावर गणेशाचे अंकन केलेले आढळते. या काळापासून आढळणाऱ्या विविध मंदिरांमध्ये विशेषतः शिवमंदिरामध्ये आपल्यला गणेशाचा समावेश झालेला दिसून येतो.

(लेखक भारतीयविद्येचे अभ्यासक आहेत.)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शनिवारवाडा महोत्सव रद्द

$
0
0

महापालिकेचा निर्णय
म. टा. प्रतिनिधी, पुणे
महापालिकेच्या वतीने गणेशोत्सवाच्या काळात पुणेकरांच्या मनोरंजनासाठी आयोजित केला जाणारा शनिवारवाडा महोत्सव यंदाच्या वर्षी न घेण्याचा निर्णय पालिकेत सत्ताधारी असलेल्या भारतीय जनता पक्षाने घेतला आहे. त्यामुळे यंदाच्या शतकोत्तर रौप्य महोत्सवी वर्षात नागरिकांना विविध सांस्कृतिक कार्यक्रमांना मुकावे लागणार आहे. हा महोत्सव रद्द करण्यामागचे नक्की कारण काय? याचे ठोस असे स्पष्टीकरण मात्र कोणीही दिलेले नाही.
गणेशोत्सवाच्या काळात गेल्या अनेक वर्षापासून महापालिकेच्या वतीने शनिवारवाडा महोत्सवाचे आयोजन केले जाते. पुणे गणेशोत्सवाची हा महोत्सव एक आगळीवेगळी ओळख बनला आहे. पालिकेच्या वतीने घेतल्या जाणाऱ्या या महोत्सवांतर्गत शास्त्रीय संगीत, मराठी नाटके, गोंधळ, लावणी याबरोबर संगीत रजनी, प्रसिद्ध कलाकारांबरोबर संवाद, महाराष्ट्राची लोकधारा, मराठी तारका, सुगम संगीत अशा कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. सर्वसाधारण तीन ते चार दिवस हा महोत्सव चालतो. गणेशोत्सवाच्या काळात होणाऱ्या या महोत्सवासाठी शहरातील नव्हे तर जिल्ह्यातील रसिक मोठ्या संख्येने हजेरी लावतात. शनिवारवाड्यावर हे सर्व कार्यक्रम होत असल्याने सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी मिळत होती.
..
विरोधकही गप्प
शनिवारवाडा महोत्सवासाठी पालिकेच्या अर्थसंकल्पात विशेष तरतूद देखील केली जाते. प्रत्येक वर्षी या महोत्सवासाठी अर्थसंकल्पात २० लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला जातो. तसेच, या महोत्सवात साहित्य-संगीत-नाट्य क्षेत्रात योगदान देणाऱ्या कलाकारांचा सत्कारही पालिकेच्या वतीने केला जातो. चालू वर्षाच्या (२०१७ १८) अर्थसंकल्पात शनिवारवाडा महोत्सवासाठी २० लाख रुपयांची तरतूद देखील करण्यात आली आहे. यंदाच्या वर्षी पाच हजार ढोल ताशांचे वादन, तीन हजार शाडू मातीच्या गणेश मूर्ती तयार करणे, दुचाकी रॅली असे उपक्रम घेण्यात आल्याने हा महोत्सव रद्द करण्याचा निर्णय सत्ताधारी भाजपने घेतला असल्याची चर्चा पालिकेत सुरू आहे. गणेशोत्सवात गेली अनेक वर्षापासून होत असलेला हा शनिवारवाडा महोत्सव यंदाच्या वर्षी का घेतला जात नाही, याबाबत पालिकेत विरोधी पक्ष म्हणून काम करणारे काँग्रेस, राष्ट्रवादी यांच्यासह शिवसेना, मनसेचे नगरसेवक एक चकार शब्दही उच्चारत नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
00

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ध्यानधारणेसाठी ‘नित्यरूपे’

$
0
0

गणेश सहस्रनामात गणेशाच्या अनेक रूपांचे वर्णन करण्यात आले आहे. काही रूपांची नित्यनियमाने उपासना करण्याची माहितीही यामध्ये आहे. श्रीगणेशाचे ध्यान करण्यासाठी काही रूपांची नावे सहस्रनामामध्ये आहेत. बाप्पाची ही ध्यानरूपे नित्य ध्यानधारणा करण्यासाठी अतिशय उपयुक्त आहेत.
गजश्रेष्ठाचे मुख असलेल्या, इंद्राप्रमाणे मुकुटात तुरा असलेल्या, अरुणाप्रमाणे तांबूस कांती असलेल्या, तीन नेत्रांनी सुशोभित असलेल्या, आपल्या मांडीवर बसलेल्या व हातात कमळ धारण केलेल्या प्रिय सिद्धी लक्ष्मीने नित्य प्रेमाने आलिंगन दिलेल्या गणेशाच्या या ध्यानरूपाचे वर्णन करण्यात आले आहे. त्याच्या दशभुजांमध्ये पक्व फळ, गदा, धनुष्य, त्रिशूल, चक्र, रक्तकमल, पाश, नीलकमल, धान्यमंजिरी व आपलाच भग्न दात आहे. गणेशाने सोंडेमध्ये रत्नमय कलश धारण केलेला आहे. अशा गणेशरूपाचे ध्यान करावे, असे शास्त्रात सांगितले आहे. गंडस्थळाच्या टोकापासून गळणाऱ्या मदरसाच्या प्रवाहाचे प्राशन करण्याविषयी ज्यांचे मन अत्यंत उत्सुक झाले आहे, अशा भुंग्यांना कानाच्या फटकाऱ्यांनी वारंवार निवारण करणाऱ्या, मदरसाने व्याकूळ झालेल्या माणके जडविलेला मुकुट धारण करणाऱ्या आणि सर्व अलंकारांनी सुशोभित असे हे गणेशरूप आहे. पुण्यामध्ये दहा हाताच्या आणि मांडीवर देवी असलेल्या दोन मूर्ती असून, त्यातील एक मूर्ती कोथरूड येथील दशभुजा गणपती तर दुसरी फडके हौद चौकानजीक सरदार हरिपंत फडके यांच्या वाड्यातील मंदिरात आहे. आता येथे वाडा नाही मात्र मंदिर आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

खडकवासला भरले

$
0
0

रविवारी दिवसभरात चार हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग
म. टा. प्रतिनिधी, पुणे
शहराला पाणीपुरवठा करणारे खडकवासला धरण शंभर टक्के भरले असून, रविवारी पहाटे चारपासून दिवसभरात सुमारे चार हजार २८० क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात आला. या धरणक्षेत्रात पावसाचा जोर कमी झाल्यामुळे सोमवारी कमी विसर्ग केला जाणार आहे. पवना धरण क्षेत्रात दिवसभरात सुमारे १८४ मिलिमीटर पाऊस पडल्यामुळे पवनातून मुळा नदीत सुमारे सहा हजार क्युसेक विसर्ग करण्यात आला.
शहर आणि जिल्ह्याला पाणीपुरवठा करणाऱ्या प्रमुख धरणांपैकी पानशेत आणि खडकवासला ही शंभर टक्के भरली आहेत. वरसगाव हे सुमारे ९३ टक्के भरले गेले आहे. टेमघरमध्ये पाणी साठविण्यात येत नसले, तरी हे धरण सुमारे ४४ टक्के भरले आहे. खडकवासला धरण भरल्यामुळे पहाटे चार वाजल्यापासून पाण्याचा विसर्ग करण्यात आला. या धरणाचे पाच गेट उघडण्यात आल्याने मुठा नदीपात्र पाण्याचे भरले आहे.
याबाबत खडकवासला धरणाचे कार्यकारी अभियंता पांडुरंग शेलार म्हणाले, ‘खडकवासला धरणातून दिवसभरात सुमारे चार हजार २८० क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात आला. धरण परिसरात पावसाचा जोर कमी झाला आहे. त्यामुळे सोमवारी कमी प्रमाणात विसर्ग केला जाणार आहे.’
पवनातून सहा हजार क्युसेक विसर्ग
पवना धरण क्षेत्रात पावसाचा जोर कायम आहे. दिवसभरात सुमारे १८४ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. त्यामुळे पवना धरणातून मुळा नदीत सुमारे सहा हजार क्युक्सेक पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे. सोमवारीही या धरणातून विसर्ग सुरू राहणार आहे.
भामा-आसखेड, वडिवळे भरले
जिल्ह्यातील पानशेत, पवना, नीरा देवघर, चासकमान, डिंभे, कळमोडी, कासारसाई, आंद्रा ही आठ धरणे यापूर्वी शंभर टक्के भरली होती. आता खडकवासला, भामा-आसखेड आणि वडिवळे ही धरणे शंभर टक्के भरली असल्याचे जलसंपदा विभागाकडून सांगण्यात आले.
उजनीत ७६ टक्के पाणीसाठा
उजनी धरणाची पाणीपातळी वाढत चालली असून, सुमारे ७६ टक्के धरण भरले आहे. सध्या या धरणात उपयुक्त पाणीसाठा ४०.३८ टीएमसी झाला आहे. या धरणातून दिवभरात डाव्या कालव्याद्वारे सुमारे ९०० क्युसेक पाणी सोडण्यात आले.
...
धरण - पाणीसाठा (टीएमसी) - टक्के

पानशेत १०.६५ - १००

पवना ८.५१ - १००

खडकवासला १.९७ - १००

भामा आसखेड ७.६६ - १००

कळमोडी १.५१ - १००

चासकमान ७.५७ - १००

आंद्रा २.९२ - १००

डिंभे १२.३३ - १००

कासारसाई ०.५७ - १००

नीरा देवघर ११.७३ - १००

वडिवळे १.०७ - १००

टेमघर १.६१ - ४४

वरसगाव ११.९३ - ९३

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पुण्याने जगाला मोठ्या व्यक्ती दिल्या

$
0
0

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी पुण्याविषयीचे गौरवोद्गगार
म. टा. प्रतिनिधी, पुणे
‘पुणे हे विद्वानांचे शहर आहे. एखाद्या व्यक्तीला पुरस्कार मिळाल्याने काहींचे मोठेपण लक्षात येते. काहींच्या मोठेपणामुळे पुरस्काराची उंची वाढते असे मत व्यक्त करीत जगात प्रत्येक क्षेत्रात मोठ्या व्यक्ती या सर्वाधिक पुण्याने दिले आहेत,’ अशा शब्दांत गौरवोद्गार केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी काढले.
त्रिदल पुणेच्या पुण्यभूषण फाउंडेशनचा पुण्यभूषण पुरस्कार ज्येष्ठ अस्थिरोग तज्ज्ञ डॉ. के. एच. संचेती यांना गडकरी यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. त्या वेळी ते बोलत होते. एक लाख रुपये, पगडी, स्मृतिचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप होते. व्यासपीठावर महापौर मुक्ता टिळक, पालकमंत्री गिरीश बापट, निवड समितीचे डॉ. रघुनाथ माशेलकर आदी उपस्थित होते. या वेळी वसंत प्रसादे, मधुकर ताम्हसकर, निर बहादूर गुरुंग, रामदास मोरे, अनिल लामखाडे,श्रीनिवास आचार्य या स्वातंत्र्यसैनिकांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सिक्कीमचे राज्यपाल श्रीविनिवास पाटील होते.
‘माणसाचे मोठेपण त्याच्या जवळ गेल्यानंतर कळते. समाजातील कर्तृत्ववान माणसांचा पुरस्काराने गौरव केला जातो. पुरस्काराच्या माध्यमातून समाजापर्यंत कर्तृत्ववान माणसाचे कार्य लोकापर्यंत पोहोचते. त्यातून अनेकांना आपणही त्यांच्यासारखे काम करावे, अशी इच्छा निर्माण होते. हीच खरी पुरस्काराची उपलब्धी असते. पुरस्कार हे समाजजीवनाचे अलंकार आहेत,’ असे मत केंद्रीय वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केले.
‘पुणे हे विद्वानांचे शहर आहे. अमेरिका, जर्मन या देशांमध्ये फिरलो. पण सर्वाधिक तरुण पुण्यात पाहिले आहेत. पुणे तिथे काय उणे असे म्हटले जाते. पुरस्कार मिळाल्याने काहींचे मोठेपण लक्षात येते. काहींच्या मोठेपणामुळे पुरस्कारामुळे पुरस्कारांची उंची वाढते. विद्वान माणसाने विद्वानांची पुरस्कारासाठी निवड करणे ही मोठी बाब आहे. डॉ. संचेती केवळ हे चांगले डॉक्टर नाहीत तर चांगली व्यक्ती आहे,’ अशा शब्दांत संचेती यांच्या संदर्भात त्यांनी कौतुकोद्वगार काढले. या वेळी बापट, पाटील यांची भाषणे झाली. फाउंडेशनचे डॉ. सतीश देसाई यांनी प्रास्तविक केले. सुरेश धर्मावत यांनी आभार मानले.
...
पुणेरी फटकेबाजी...

प्रास्ताविक करताना ‘गिरीश बापट यांना आता दिल्लीत घेऊन जा,’ अशी विनंती सतीश देसाई यांनी केली. त्याला प्रतिउत्तर देताना गिरीश बापट यांनी पुणेरी फटकेबाजी करीत कार्यक्रमात रंगत आणली. ‘माझ्या दिल्लीत जाण्याची यांना काय एवढी घाई आहे कोणास ठाऊक? माझ्या दिल्लीत जाण्याने कसब्याची जागा मोकळी होईल असे वाटते,’ अशा शब्दांत उत्तर दिले. ‘नितीनजी, आम्ही विविध पक्षात असलो, तरी सर्व एकमेकांमध्ये राहतो. भेटतो. गप्पा मारतो तरीही आम्ही असे पुणेकर आहोत,’ अशी टिपण्णी करायला ते विसरले नाहीत. ‘कालपर्यंत दगडूशेठच्या मंदिरात आमच्याबरोबर रात्री बसणारे श्रीनिवास पाटील सिक्कीमला कधी गेले, आणि राज्यपाल होऊन आले कळलेच नाही. राज्यपाल सिक्कीमचे पण वास्तव्य अनेकदा पुण्यातच असते,’ अशी कोपरखळी मारताच उपस्थितांमध्ये खसखस पिकली. देसाई यांनी संचेती यांचा ‘गोडबोले’ असा उल्लेख केला. त्याचा संदर्भ देऊन ‘पुणेकर असूनही ते ‘गोडबोले’ आहेत हे विशेष. पुणे हे विद्वानांचे शहर असून दुसऱ्या विद्वानांचे कौतुक करतात,’ अशी कोपरखळी गडकरी यांनी मारली. बापटांच्या कोपरखळीला पाटील यांनी उत्तर देत कार्यक्रमांची उंची वाढविण्याचा प्रयत्न केला. ‘बापट म्हणाले म्हणजे पटणारच’ असे त्यांनी सांगताच उपस्थितांमध्ये हास्याची कारंजी उडाली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


गणेशोत्सव उत्साहात सुरू

$
0
0

महाराष्ट्र मंडळ लंडन
सुशील रापटवार
गणरायाप्रती असलेली श्रद्धा, प्रेम सातासमुद्रापार गेल्यावरही आटत नाही, उलट उत्कटता वाढत जाते... याच भावनेतून लंडनमधील महाराष्ट्र मंडळाने १९९१ मध्ये पहिल्यांदा गणेशोत्सव साजरा करण्याचा निर्णय घेतला. सुरुवातीला छोटेसे रोपटे असलेल्या या मंडळाच्या उत्सवाला आता वृक्षाचे स्वरूप आले असून गेल्या २६ वर्षांपासून गणेश चतुर्थीपासून ते विसर्जनापर्यंत संपूर्ण महोत्सव मंडळात साजरा केला जातो.
या वर्षी देखील उत्सवाला उत्साहात सुरुवात झाली आहे. लंडनमधील महाराष्ट्र मंडळाला ऐतिहासिक महत्त्व आहे. गोलमेज परिषदेसाठी न. चि. केळकर लंडनमध्ये गेले असताना त्यांनी मराठी बांधवांचे एखादे मंडळ तिथे असले पाहिजे, अशी इच्छा व्यक्त केली होती. त्यानंतर १९३२मध्ये महाराष्ट्र मंडळ लंडनची स्थापना झाली. याच वर्षी मंडळाने ८५ वर्षे पूर्ण केली असून नुकतेच मराठी संमेलनही घेण्यात आले होते. मंडळाने १९८९मध्ये स्वतः वास्तू घेतली आणि वर्षभरात गणेशोत्सव सुरू करण्याची चर्चा सुरू झाली. मंडळाचे तत्कालीन अध्यक्ष सुधाकर खुर्जेकर यांनी गणेशोत्सवाचा विषय मांडला. अनेक बंधने असताना या उत्सवात सातत्य ठेवणे जमेल का, असा ही विचार पुढे आला होता. पण गणराया प्रती असलेल्या आत्मियतेतून १९९१मध्ये महाराष्ट्र मंडळाने पहिल्यांदा गणपतीची प्रतिष्ठापना केली. पहिल्या वर्षी गणपती मूर्ती लंडनमध्ये आणायची कशी हा सगळ्यांसमोर प्रश्न होता. त्या वेळी तेथेच वास्तव्यास असलेले कुमार तळपदे यांनी मूर्ती घरीच बनविण्यासाठी पुढाकार घेतला आणि आजही दरवर्षी त्यांनी बनवलेली मूर्तीच विराजमान होतात. उपक्रमाच्या पहिल्या वर्षापासून डॉ. विजया कानेगावकर, डॉ. गोविंद कानेगावकर, श्रीराम काळे आणि सन्मती काळे हे सक्रिय सभासद आहेत. कार्यक्रमांच्या नियोजनामध्ये त्यांचा महत्त्वाचा वाटा असतो. आमच्या मंडळाचे वैशिष्ट्य म्हणजे गणेश चतुर्थी पासून विसर्जनापर्यंत मग ते दहा दिवस असोत, की बारा दिवस आम्ही संपूर्ण उत्सव साजरा करतो. सगळे जण आपापल्या नोकरीच्या वेळांमधून आवर्जून वेळ काढून उत्सवात सहभागी होतात. एक दिवस अथर्वशीर्षाचे सहस्रावर्तन, महाप्रसादाचा असतो. अलीकडे आम्ही या भागातील प्रशासकीय अधिकारी, लोकप्रतिनिधीनाही आमंत्रण देण्यास सुरुवात केली असून, ही मंडळी आवर्जून उत्सव अनुभवण्यासाठी येत आहेत. आता येथील भारतीयांच्या अनेक घरांमध्ये गणपती बसवले जात असले तरी लोक मंडळाच्या उत्सवात आवर्जून सहभागी होतात. गणेशोत्सव म्हणजे आमच्यासाठी स्नेहमेळावा, आनंदोत्सव असतो.
...
सर्व भारतीयांचा उत्सवात सहभाग
उत्सवामध्ये मराठी बांधवांबरोबरच तेलुगु, गुजरातींसह भारतातून लंडनमध्ये स्थायिक झालेली सर्व मंडळी हजेरी लावतात. उत्सव काळात रोज आरती, सुट्टीच्या दिवशी लहान मुलांसाठी ‘बाल दरबार’ हा त्यांच्या कलागुणांना प्रोत्साहन देणारा कार्यक्रम होतो. तसेच मोठ्यांसाठी महाराष्ट्राची लोकधारा आणि इतर कार्यक्रम आयोजित केले जातात.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मद्रासी गणपती

$
0
0

आराध्य

पेशव्यांचे सरदार रास्ते यांच्या दिवाणाला ‘मी झाडाखाली आहे,’ असा दृष्टांत झाला होता. त्या दृष्टांतानुसार ही गणेश मूर्ती सापडली. पूर्वी हे मंदिर कौलारू होते. नंतरच्या काळात श्री हरिहर भजन समाजाकडे मंदिराची देखरेख सोपविण्यात आली आणि त्या नंतर त्यांनी येथे दक्षिणात्य प्रकारचे पक्के मंदिर उभे केले. हे मंदिर रास्ता पेठेत केईएम हॉस्पिटलच्या जवळ आहे.
गणेश मूर्ती पाषाणी असून शेंदूरचर्चित आहे. मूर्तीची उंची सुमारे तीन फूट आहे. मूर्तीचा काही भाग जमिनीच्या खाली असल्यामुळे ती बैठी असल्यासारखे वाटते. मूर्तीच्या पाठीमागे चांदीची प्रभावळ आहे. गणेशाच्या वरच्या हातात फूल आणि पाश धारण केलेले आहेत. खालच्या डाव्या हातावर सोंड वळलेली दिसते आणि उजवा हात अभय देणारा आहे. हे मंदिर दक्षिणात्य पद्धतीने बांधले असल्याने गोपूर आहे. गणपतीच्या मूर्तीबरोबरच बालाजी, पद्मावती, मारुती, कार्तिकस्वामी, छोटे दगडी शिवलिंग, पार्वती, नवग्रह अशा देवतांच्या मूर्तींचे दर्शन घेता येते. या मंदिराचे वैशिट्य म्हणजे येथे शिवलिंगासहित सर्वच मूर्तींना वस्त्रे नेसवली जातात. या गणेशाची पूजा दाक्षिणात्य पद्धतीने केली जाते.
‘महाराष्ट्र टाइम्स’ मीडिया पार्टनर असलेल्या मल्हार प्रॉडकशन्स निर्मित ‘आराध्य अर्थात ओळखीच्या गणेश मंदिरांचा अनोळखी इतिहास’ या वेब मालिकेचा हा भाग..


मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

श्री कसबा गणपती

$
0
0

पुण्यातील मानाच्या पहिल्या श्री कसबा गणपती मंडळाचे यंदा शतकोत्तर रौप्यमहोत्सवी वर्ष आहे. पुण्याचे ग्रामदैवत म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासूनच कसबा गणपती प्रसिद्ध आहे. या गणपती मंदिराच्या जवळील लाल महालामध्येच शिवरायांचे बालपण गेले आहे. लोकमान्य टिळक यांनी उत्सवाला सुरुवात केल्यानंतर ग्रामदैवत म्हणून कसबा गणपतीलाच अग्रस्थान दिले. गेल्या १२५ वर्षांच्या काळात कसबा गणपती मंडळाने सातत्याने या बदलत जाणाऱ्या उत्सवाचे नेतृत्व केले आहे. अगदी दोन वर्षांपूर्वीच्या भीषण दुष्काळामध्ये पारंपरिक स्वरूपात नदीत गणेशमूर्ती विसर्जन करण्याऐवजी हौदात विसर्जन करण्याचा निर्णय सर्वप्रथम कसबा गणपती मंडळानेच घेतला होता आणि त्यानंतर इतर मानाच्या मंडळांसह बहुतेक मंडळांनी त्याचे अनुकरण केले.
मानाचा गणपती असूनही पारपंरिक पद्धतीने आणि अतिशय कोणताही डामडौल-भपका याशिवाय साधेपणाने उत्सव साजरे करणारे मंडळ म्हणून कसबा गणपतीची ख्याती आहे. वेगळ्या स्वरूपाचा देखावा-सजावट न करता साधी आणि नेटकी सजावट हे मंडळाचे अनेक वर्षांपासूनचे वैशिष्ट्य आहे. यंदा शतकोत्तर रौप्यमहोत्सवानिमित्त कसबा गणपती मंदिराची प्रतिकृती उभारण्यात आली आहे. अनेक मंडळांकडून गणेश उत्सवाव्यतिरिक्त वर्षभर विविध उपक्रम/कार्यक्रम घेण्यात येतात. श्री कसबा गणपती मंडळ या सर्वांपासून दूर आहे. चैत्र शुद्ध प्रतिपदा अर्थात गुढीपाडव्याच्या दिवशी केवळ मंडळाकडून साखर वाटप केले जाते. त्याऐवजी, सामाजिक उपक्रमांवर मंडळ भर देत आले आहे. यंदाही नगर जिल्ह्यातील खंडोबावाडी हे गाव मंडळाने दत्तक घेतले असून, ग्रामस्थांसाठी पाण्याची टाकी बांधून देण्याप्रमाणेच त्यांच्या घरापर्यंत पाणी पोहोचावे, यासाठी इतर सर्व व्यवस्था निर्माण करण्यात आली आहे.
पहिल्यापासूनच वेगळ्या आणि नावीन्यपूर्ण उपक्रमांचा शुभारंभ कसबा गणपती मंडळाने केला आहे. उत्सवाच्या आयोजनामध्ये आणि एकूणच सर्व प्रक्रियेमध्ये महिलांचा सहभाग वाढवण्यासाठी मंडळाने उत्सवात महिला दिवस असा अनोखा उपक्रम सुरू केला. या दिवशी उत्सवाची सकाळी सहापासून ते रात्रीपर्यंत उत्सवाची संपूर्ण जबाबदारी महिलांकडे असते. सनई वादनापासून ते पूजा-आरती आणि सर्वांच्या स्वागताची जबाबदारी महिलांकडे दिली जाते. उत्सवामध्ये महिलांना योग्य स्थान देण्यात पुढाकार घेतल्यानंतर विश्वस्तांमध्येही दोन महिलांना स्थान देण्यात आले आहे.
...
शिस्तबद्ध मिरवणुकीची परंपरा
पुण्यनगरीच्या महापौरांनी मानाच्या पहिल्या श्री कसबा गणपती मंडळाची पूजा आणि आरती केल्यानंतर विसर्जन मिरवणुकीला सुरुवात होते. या विसर्जन मिरवणुकीमध्ये पालखीत विराजमान झालेली ‘श्रीं’ची मूर्ती कोणत्या चौकात किती वाजता येणार आहे, याचे वेळापत्रक मंडळाकडून दर वर्षी जाहीर केले जाते आणि आजतागायत ही वेळ अचूक पाळण्याचे श्रेय मंडळाला दिलेच पाहिजे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सोशल मीडिया ‘बाप्पा’मय

$
0
0

पूजा, आरती लाइव्ह; देखाव्यांच्या व्हिडिओंवर ‘लाइक्स’चा पाऊस
म. टा. प्रतिनिधी, पुणे
घरोघरी होणारी गणपतीची पूजा, आरती फेसबुकवरून लाइव्ह होत असून, त्याला मोठ्या संख्येने लाइक्स आणि शेअर्सही मिळत आहेत. इतकेच नव्हे तर मंडळांपुढे सादर होणारे जिवंत किंवा हलते देखावे आणि आकर्षक विद्युत रोषणाई किंवा थुईथुई नाचणारी कारंजीही लाइव्ह पोस्ट किंवा व्हिडिओंच्या माध्यमातून जगभरातून दाद मिळवत आहेत.
यंदाच्या वर्षी गणेशोत्सव सोशल मीडियावरही मोठ्या प्रमाणावर झळकत आहे. दर्जेदार कॅमेराची सोय असलेले मोबाइल हँडसेट्स, मोबाइल इंटरनेटचे पॅक स्वस्त होऊन मिळणारा अनलिमिटेड किंवा दररोज एक-दोन जीबी डेटा मिळत असल्यामुळे यंदा गणेशोत्सव सोशल मीडियावर अधिक मोठ्या प्रमाणावर झळकताना दिसत आहे.
फेसबुकपासून इंस्टाग्रामपर्यंत अनेकांनी आपल्या घरगुती बाप्पाचे छायाचित्र अपलोड करत नेटिझन्सना ‘ऑनलाइन बाप्पा’चे दर्शन घडविण्यास पसंती दिली आहे. व्हॉट्स अॅपचे डीपी आणि स्टेट्सही बाप्पामय झाले आहेत. बाप्पांसोबतचे सेल्फी आणि ग्रुफ्फीही आवर्जून टाकण्यात येत आहेत. गणरायासाठी केलेल्या खास आरास आणि सजावटीचे फोटो आणि व्हिडिओ व्हॉट्स अॅपच्या ग्रुपबरोबरच फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्रामवरही शेअर होत आहेत.
सध्याच्या व्यग्र दिनक्रमाच्या जमान्यात अनेकांना इच्छा असूनही घरी किंवा मूळ गावी गणेशोत्सवासाठी जाता येत नाही. मात्र, ही कमतरता सोशल मीडियाने भरून काढली आहे. अगदी तळकोकणातल्या, विदर्भातल्या घरातली आरतीही फेसबुकवरून किंवा स्काइपवरून लाइव्ह होत आहे. त्यामुळे देशापरदेशातल्या नातेवाइकांनाही आपल्या घरच्या गणरायाचे दर्शन घेण्याबरोबरच आरतीत सहभागी झाल्याचे समाधानही मिळत आहे. गणेशोत्सवासाठी असलेल्या खास पाककृती (उदा. उकडीचे मोदक) फेसबुक लाइव्ह किंवा व्हिडिओंच्या माध्यमातून शेअर होत असून, त्याला प्रचंड प्रतिसादही मिळत आहे.
सार्वजनिक मंडळेही ‘अॅक्टिव्ह’
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनीही तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करण्यास सुरुवात केली आहे. जिवंत देखावे किंवा हलते देखावे सादर करणाऱ्या मंडळांनी या देखाव्याचे व्हिडिओ शेअर केले आहेत. आकर्षक विद्युत रोषणाई किंवा कारंजीही सोशल नेटवर्कवर झळकत आहेत. मानाचे पाच गणपती किंवा इतर गणपतींचे दर्शन घेतानाच तेथील बाप्पाचे किंवा सजावटीचे फोटो, सेल्फीही आवर्जून सोशल मीडियावर टाकण्यात येत आहेत. त्याला विविध टॅग्जची जोडही दिली जात आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गणेशोत्सवासाठी ‘फाइंड गणेशा’ अॅप

$
0
0

एका क्लिकवर मिरवणूक आणि मंडळांचे लोकेशन; स्वच्छतागृहे आणि उपहारगृहांचीही माहिती
म. टा. प्रतिनिधी, पुणे
मध्यवस्तीतील मानाचे गणपती आणि प्रमुख मंडळांच्या मिरवणुकांची संपूर्ण माहिती आणि लोकेशन्स परगावाहून आणि उपनगरांमधून येणाऱ्या गणेश भक्तांना आता एका क्लिकवर उपलब्ध होणार आहे. इंकपिक्सल्स या स्टार्टअपच्या माध्यमातून काही तरुणांनी एकत्र येऊन ‘फाइंड गणेशा’ या अॅपची निर्मिती केली आहे. या अॅपद्वारे मध्यवस्तीतील गणपतींच्या मिरवणुकांचे लोकेशन्स, मिरवणुक मार्गाचा नकाशा, मंडळाचे लोकेशन आणि त्याचा नकाशे भक्तांना उपलब्ध होणार आहेत.
परगावाहून आणि उपनगरांमधून मध्यवस्तीतील मिरवणुका पाहण्यासाठी येणाऱ्या गणेशभक्तांसाठी प्रामुख्याने हे अॅप तयार करण्यात आले आहे. मानाच्या गणपतीच्या मिरवणुकांच्या वेळा, तसेच त्यांच्या मिरवणूक मार्गाचा नकाशा या अॅपमध्ये उपलब्ध करण्यात आला आहे. विसर्जन मिरवणूक सुरू झाल्यानंतर त्याचे लाइव्ह ट्रँकिंग केले जाणार असून, प्रत्येक मिनिटाला मिरवणूक नेमकी कुठे आहे हे या अॅपद्वारे कळू शकणार आहे. मराठी, हिंदी आणि इंग्रजी या तीनही भाषांमध्ये ही सेवा उपलब्ध केल्याने सर्व भाषिकांना या अॅपचा चांगला उपयोग होणार आहे. अँड्रॉइड धारकांसाठी हे अॅप प्ले स्टोअरवर मोफत उपलब्ध करण्यात आले आहे.
फाइंड गणेशा अॅपमध्ये मानाच्या गणपतींसह दगडूशेठ हलवाई गणपती, अखिल मंडई गणपती, बाबू गेनू, भाऊसाहेब रंगारी, जिलब्या मारुती मंडळ अशा प्रसिद्ध गणपतींचे लोकेशन्स आणि नकाशे देण्यात आले आहेत. या मिरवणुकांचे सर्व अपडेट्स अॅपद्वारे उपलब्ध होणार आहेत. गणेस मंडळांबरोबरच शहरातील प्रसिद्ध ढोल पथकांची माहितीही यामध्ये देण्यात आली आहे. मध्यवस्तीत उपलब्ध असणारी प्रसिद्ध हॉटेल्स आणि खाण्याच्या स्टॉल्सच्या माहितीचा खवय्यांना उपयोग होणार आहे.
मिरवणुकांच्या माहितीसह फाइंड गणेशामध्ये काही तातडीच्या सेवांची लोकेशन्स देण्यात आली आहेत. मध्यवस्तीतील स्वच्छतागृहांची माहिती नकाशांसह देण्यात आली आहे. या परिसरातील हॉस्पिटलची संपूर्ण माहिती उपलब्ध केली आहे. याशिवाय पोलिसांशी संपर्क साधण्यासाठी काही तातडीचे क्रमांक, जवळपासच्या सर्व पोलिस चौक्यांची लोकेशन्स अॅपमध्ये आहेत. एखादा अनुचित प्रकार टाळण्यासाठी या अॅपचा वापर भक्तांना करता येणार आहे. त्यामुळे, गणेशभक्तांना तातडीच्या सेवांची माहितीही मिळू शकणार आहे. गणेशोत्सवाच्या मिरवणुकांमध्ये सहभागी होणाऱ्या परगावातील हजारो भक्तांसाठी हे अॅप उपयुक्त ठरणार आहे.
--------------------
प्रसिद्ध गणपती मंडळांच्या मिरवणुकांचे मार्ग सामान्य लोकांना कळावेत, या उद्देशाने या अॅपची निर्मिती करण्यात आली आहे. खाण्यापिण्यापासून स्वच्छतागृहांपर्यंतची सर्व माहिती अॅपमध्ये देण्यात आली आहे. मिरवणुकांचे लाइव्ह ट्रॅकिंग होणार असल्याने मिरवणुक कोणत्या भागात आहे, याच्या प्रत्येक मिनीटाचे अपडेट्स गणेशभक्तांना मिळणार आहेत.
- शुभम शर्मा, फाइंड गणेशा अॅपचा निर्माता

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images