Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

टाउन प्लॅनिंग भुक्कड संस्था

0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

‘येणाऱ्या काळात पुण्याचे ‘व्हिजन’ तयार केले पाहिजे. पॅचवर्कमध्ये काम करून चालणार नाही. ‘सिंगापूर प्लॅनिंग ऑथॉरिटी’सारख्या एजन्सीकडून पुण्याचा विकास आराखडा तयार करून घेतला पाहिजे. आपल्याकडील ‘टाउन प्लॅनिंग’ विभाग (नगर रचना) काही कामाचा नाही. हे फुकटाला महाग आहेत. यासारखी भुक्कड संस्था मी पाहिलेली नाही,’ अशा तिखट शब्दांत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या खात्यावर जोरदार टीकास्त्र सोडले.

गडकरी म्हणाले, ‘अमेरिका, जर्मनी यांसारख्या परदेशांत गेलो असताना अनेक मराठी मुले भेटली. त्यातील बहुतेक मुले ही पुण्यातील होती, याचा मला अभिमान आहे. पुण्याच्या मुलांनी खूप नाव कमावले आहे. याच वेळी पुण्याचाही विकास मोठ्या प्रमाणात होत असताना येथील विकास आराखडा तयार केला पाहिजे. पॅचवर्कमध्ये काम करून चालणार नाही. त्यासाठी ‘सिंगापूर प्लॅनिंग अॅथॉरिटी’सारख्या एजन्सीकडून आराखडा तयार केला पाहिजे. त्यास मुख्यमंत्री नक्कीच परवानगी देतील. ‘टाउन प्लॅनिंग’सारखी यंत्रणा २०-२० वर्षे आराखडा तयार करीत नाही. यासारखी भुक्कड संस्था मी पाहिलेली नाही.’

गडकरी म्हणाले, ‘पुण्याच्या विकासासाठी आम्ही सगळे प्रयत्नशील आहोत. पुण्याच्या विमानतळासाठी अपूर्ण असलेली परवानगी लवकरच मिळवून देईल. मुख्यमंत्री फडणवीस आणि मी नागपूरचा असून सगळा निधी तिकडेच नेत असल्याची चर्चा आहे. पश्मिच महाराष्ट्रासाठी आम्ही तेवढेच प्रयत्न करीत असून या ठिकाणी एक लाख कोटी रुपये विकासावर खर्च करण्याचे नियोजन आहे.’

दरम्यान, रस्त्यांवरील ताण कमी करण्यासाठी आणि निर्यातीला चालना देण्यासाठी ‘ड्रायपोर्ट’ बांधण्याचा निर्णय घेतला आहे. राज्य सरकारला विनंती आहे, की त्यांनी नगर, सांगली, कोल्हापूर, पुणे या ठिकाणी जागा उपलब्ध करून दिली तर, त्या ठिकाणी आम्ही ‘ड्रायपोर्ट’ बांधण्यास तयार आहे. या ठिकाणी कंटेनरमध्ये माल भरून तो रेल्वे मार्गाने ‘जेएनपीटी’ला पाठवता येऊ शकेल, असे गडकरी यांनी सांगितले.

नागपूरपेक्षा पुण्याची मेट्रो सुंदर होणार

नागपूरच्या मेट्रोसाठी मी बारीक बारीक गोष्टींची काळजी घेतली आहे. या मेट्रोचे डिझाइन फ्रेंच, जर्मन आर्किटेक्ट यांनी तयार केले आहे. येथील एक स्टेशन वीस मजली आहे. पुण्याची मेट्रो हीच मंडळी करत आहेत. त्यामुळे नागपूर मेट्रोमध्ये राहिलेल्या त्रुटी पुण्यात दूर केल्या जातील. पर्यायाने पुण्याची मेट्रो नागपूरपेक्षाही सुंदर असेल, असे गडकरी म्हणाले.

जिल्हाधिकाऱ्यांचाही घेतला समाचार

येत्या पाच वर्षांत २५ लाख कोटी रुपयांची कामे करायची आहेत. आतापर्यंत सहा लाख कोटी रुपये दिले आहेत. विकासकामांसाठी पैसे कमी नाहीत. अधिकारी वेळेवर काम करीत नाहीत, ही खरी समस्या आहे. त्यांच्यामागे ‘डंडा’ देऊन मागे लागावे लागते, ही खरी परिस्थिती आहे. पुण्यातील भूसंपादनाकरिता १२०० कोटी रुपये येथील जिल्हाधिकाऱ्यांजवळ जमा आहे. हे पैसे बँकेत ठेवण्यात आले असून त्याचे व्याज घेण्यात येते. आता त्यांनी सांगितले, की नऊशे कोटी रुपये खर्च केले आहेत. भूसंपादन झाले, की कळंब, खेड, मंचर, आळेफाटा, नारायणगाव येथील बायपासचे काम सुरू करू. पैशांची काही कमी नाही.

गडकरी उवाच

- मुंबई-गोवा चौपदरीकरणारे काम सुरू, १८ हजार कोटी रुपये खर्च होणार.

- कात्रज-कोंढवा रस्त्याचे काम मार्गी लागणार. यासाठी ४५० कोटी रुपयांची तरतूद.

- पालखी मार्गांसाठी २१०० कोटी रुपयांची तरतूद, तीन महिन्यांत या कामांचे भूमिपूजन करणार.

- नगर, मुंबई, गोवा, रायगड यांना जोडणाऱ्या विविध १२ रस्त्यांची कामे लवकरच सुरू होणार.

- पुण्याच्या आजूबाजूचे १३ रेल्वे ओव्हर ब्रिजच्या कामांना ६०० कोटी रुपये मंजूर.


गडकरींच्या आश्वासनावर प्रश्नचिन्ह

‘सातारा महामार्गाची रखडलेली सर्व कामे कोणत्याही परिस्थितीत सहा महिन्यांत पूर्ण केली जातील,’ या केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी रविवारी दिलेल्या आश्वासनावरच प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. कारण, ‘रिलायन्स इन्फ्रा’ने ही कामे पूर्ण करण्यासाठी यापूर्वीच ३१ मार्च २०१८पर्यंत मुदतवाढ मागितली आहे.

दरम्यान,खंबाटकी घाटात नवीन बोगदा तयार करण्याची घोषणा गडकरी यांनी केली असून त्यासाठी एक हजार कोटी रुपये देणार असल्याचे त्यांनी जाहीर केले. ‘रिलायन्स इन्फ्रा’ने मागितलेली मुदतवाढ पाहता त्यांना येथून पुढे सात महिन्यांचा कालावधी काम करण्यासाठी लागणार आहे. वास्तविक, येथील कामाचा वेग पाहता रुंदीकरणासह दोन उड्डाणपूल आणि ११ भुयारी मार्गांची अपूर्ण कामे सहा महिन्यांत पूर्ण होणार का, यात शंका आहे. त्यामुळे पुणे-बेंगळुरू महामार्गाला लागलेला काळ डाग पुसण्यास गडकरींना यश मिळणार का, असा प्रश्नही उपस्थित झाला आहे.

सातारा महामार्गाचे रखडलेले काम हा काळा डाग असून, येत्या सहा महिन्यांत कोणत्याही परिस्थितीत ते काम पूर्ण केले जाईल, असे आश्वासन गडकरी यांनी चांदणी चौक येथील दुमजली उड्डाणपुलाच्या भूमिपूजनाच्या कार्यक्रमात रविवारी दिले. मात्र, वास्तवात सातारा महामार्गाच्या प्रलंबित कामांची परिस्थिती वेगळीच असल्याचे दिसून येते. देहू रस्ता ते सातारा या १४० किमी अंतरामध्ये दोन उड्डाणपूल, वाहनांसाठी पाच भूयारी मार्ग आणि पादचाऱ्यांसाठी सहा भुयारी मार्ग आदी कामे बाकी आहेत. या पैकी एक उड्डाणपूल व वाहनांच्या तीन भुयारी मार्गांचे काम फेब्रुवारी व मार्च २०१८ पर्यंत पूर्ण करण्याचे ध्येय आहे. तर, उर्वरित कामे ३१ डिसेंबर २०१७ पर्यंत पूर्ण होतील, अशी अपेक्षा राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या पुणे विभागीय कार्यालयाने व्यक्त केली आहे. ही सर्व माहिती खुद्द महामार्ग प्राधिकरणानेच माहितीच्या अधिकारात दिली आहे.

गडकरींकडूनही तारीख पे तारीख

देहूरोड ते सातारा या १४० किलोमीटरच्या राष्ट्रीय महामार्गाचे सहा पदरीकरणाचे काम ऑक्टोबर २०१०मध्ये सुरू झाले. ते ३१ मार्च २०१३पर्यंत पूर्ण होणे अपेक्षित होते. मात्र, या मुदतीत सहा पदरीकरणाचे ४० टक्के कामही पूर्ण झालेले नव्हते. त्यामुळे ठेकेदार कंपनीला ३१ डिसेंबर २०१५पर्यंत मुदतवाढ देण्यात आली. या वाढीव मुदतीतही कंपनीने ६० टक्क्यांपेक्षा अधिक काम पूर्ण केले नाही. त्यानंतर पुण्यातील लोकप्रतिनिधींसोबत गेल्या वर्षी दिल्ली येथे झालेल्या बैठकीत नितीन गडकरींकडे सातारा महामार्गाचा प्रश्न मांडण्यात आला होता. त्या वेळी त्यांनी ‘रिलायन्स इन्फ्रा’ला सहा महिन्यांची डेडलाइन दिली होती. या मुदतीत काम पूर्ण झाले नाही, तर ‘रिलायन्स इन्फ्रा’ काळ्या यादीत टाकण्याचा इशारा दिला होता. ती डेडलाइन उलटून काही महिने झाले. संबंधितांवर कारवाई झाली नाही, परंतु त्यांना पुन्हा नव्याने सहा महिन्यांची मुदतवाढ देण्यात आली आहे.

भाजपमध्येच श्रेयवादाचा ‘अंक’

चांदणी चौकातील उड्डाणपुलाच्या श्रेयवादाची सुंदोपसुंदी सुरू असतानाच त्यातील मानापमान नाट्याचा प्रत्यक्ष प्रयोग रविवारी थेट केंद्रीय मंत्री नितीन गडकरींच्याच उपस्थितीत रंगला. या उड्डाणपुलाचे श्रेय कोणाचे, यासाठी भारतीय जनता पक्ष (भाजप) आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये झालेल्या ‘फ्लेक्सयुद्धा’पेक्षा भाजपअंर्तगत झालेली फ्लेक्सबाजी पुणेकरांच्या चर्चेचा विषय ठरली होती. त्याचा प्रत्यय रविवारी पुणेकरांना आला.

अत्यंत वर्दळीच्या चांदणी चौकात उड्डाणपुलाची मागणी वारंवार होत होती. या पार्श्वभूमीवर तीन वर्षांपूर्वी महापालिकेतील तत्कालीन सत्ताधाऱ्यांनी सल्लागार नेमून अहवालही घेतला. मात्र, हे काम पुढे सरकू शकले नाही. सत्ताबदलानंतर गडकरी यांनी या कामाला गती देऊन त्याचे भूमिपूजन रविवारी सकाळी केले. या कार्यक्रमासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार उपस्थित राहिले असल्याने दोन पक्षांतील वादाची झलक ही केवळ ‘फ्लेक्स’बाजीवर दिसली. मात्र, श्रेयवादातून भाजपअंर्तगत असलेली ‘फ्लेक्स’बाजीची झलक खऱ्या अर्थाने रविवारी चर्चेचा विषय ठरली.

कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच निवेदक ​सुधीर गाडगीळ यांनी गडकरी यांचा सत्कार एकदाच होणार असल्याचे स्पष्ट केले होते. केंद्र सरकारचा कार्यक्रम असल्याने या कार्यक्रमाचे प्रास्तविक आणि आभार राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी केले. त्यामुळे स्थानिकांना बोलण्यास संधी मिळण्याचा प्रश्न नव्हताच. भाषणाची संधीही पाहुण्यांशिवाय स्थानिक आमदार, खासदारांनाच देण्याचे नियोजन करण्यात आले होते.

चांदणी चौक हा परिसर खडकवासला विधानसभा मतदारसंघात येत असल्याने आमदार भीमराव तापकीर यांना भाषणाची संधी मिळाली. ते व्यासपीठावर येत असतानाच झालेल्या ढोलवादनाने श्रेयवादाची चुणूक दिसली. तापकीर यांनी स्वतः व भाजपने या पुलासाठी कसे प्रयत्न केले, याचे दाखले देतानाच कोथरूडच्या आमदार मेधा कुलकर्णींचे नाव घेणे टाळले.

कुलकर्णी या स्थानिक आमदार नसल्याने त्यांना भाषणाची संधी मिळाली नाही. ‘प्रोटोकॉल’च्या नावाखाली चांदणी चौकासाठी सतत प्रयत्नशील राहून पाठपुरावा करणाऱ्या आमदार कुलकर्णी यांना जाणीवपूर्वक भाषणापासून दूर ठेवल्याचा आरोप त्यांच्या समर्थकांनी कार्यक्रमानंतर केला.

दरम्यान, कुलकर्णी यांनी ‘प्रोटोकॉल’ बाजूला ठेवून गडकरींचा पुणेरी पगडी घालून सत्कार केला. तापकीर यांनीही ही संधी सोडली नाही. कुलकर्णी यांच्यानंतर लगेचच त्यांनीही गडकरी यांना छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मृतिचिन्ह भेट देऊन त्यांचा सत्कार केला. हा सर्व प्रकार नगरसेवकांनी पाहिल्यावर तेही गडकरींच्या सत्कारासाठी पुढे धावले. भाजपच्या नगरसेवकांनीही पक्षातील प्रतिस्पर्धी नगरसेवकाने सत्कार केल्याचे पाहून तेथील पुष्पगुच्छ गडकरींच्या हातात देऊन फोटो काढण्याची संधी गमावली नाही. पालकमंत्र्यांसह अन्य वक्त्यांनीही मेधा कुलकर्णींना हे श्रेय देण्याचे टाळले. असा हा श्रेयवादाचा ‘अंक’ बावधन-कोथरूडकरांच्या चिरकाल स्मरणात राहिला नाही तरच नवल.

‘दोन महिन्यांत काम सुरू करणार’

मुंबई ‘आयआयटी’मधील तज्ज्ञांकडून या पुलाचे डिझाइन तयार करण्यात आले आहे. यासाठी १४ हेक्टर जागा महापालिका देणार असून त्यापैकी चार हेक्टर जागा त्यांच्या ताब्यात आहेत. येत्या तीन महिन्यांत उर्वरित सर्व जागा राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या ताब्यात देण्याचे आश्वासन दिले असून पुढील दोन महिन्यांत चांदणी चौकातील उड्डाणपुलाचे काम सुरू करण्यात येईल, असे नितीन गडकरी यांनी जाहीर केले.

पवार म्हणाले, ‘पुणे देशातील महत्त्वाचे औद्योगिक केंद्र बनले आहे. या शहराच्या आजूबाजूला ‘ऑटोक्लस्टर’ तयार झाले आहे. या ठिकाणी तयार होणाऱ्या वाह​नांची विक्री केवळ देशातच नव्हे, तर परदेशात होते आहे. या क्षेत्रात १५ हजारांहून अधिक इंजिनीअर्स, टेन्कोक्रॅट्स काम करतात. नव्याने विकसित होणारे रस्ते या शहराच्या विकासात भर घालणारा आहे.’

गडकरींबद्दल गौरवोद्गार काढताना पवार म्हणाले, ‘रस्ते हे विकासाच्या दृष्टीने महत्त्वाचे साधन असते. कमी खर्चात, मर्यादित वेळेत दळणवळणाची साधने उपलब्ध झाली, तर त्याचा फायदा विकासासाठी होतो. गडकरी यांनी या कामात मनापासून लक्ष घातले आहे आणि त्याचा मला आनंद आहे. त्यांनी आपल्या कर्तृत्वाचा ठसा हा महाराष्ट्रातच नव्हे, तर देशात उमटवला आहे, याचा आम्हा सगळ्यांना मनापासून आनंद आहे.’

चांदणी चौक उड्डाणपुलाच्या कार्यक्रमास खासदार अनिल शिरोळे, अमर साबळे, शिवाजीराव आढळराव, श्रीरंग बारणे, जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे, आमदार भीमराव तापकीर, माधुरी मिसाळ, बाळा भेगडे, मेधा कुलकर्णी, योगेश टिळेकर, जगदीश मुळीक, भाजपचे शहराध्यक्ष योगेश गोगावले, महापालिकेतील पदाधिकारी, नगरसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुधीर गाडगीळ यांनी केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


नद्या धोक्याच्या पातळीवर

0
0

म. टा. प्रतिनिधी, लोणावळा

गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे मावळासह लोणावळा व खंडाळ्यातील जनजीवन विस्कळित झाले आहे. लोणावळ्यात मागील ४८ तासांत २५३, तर पवना धरणाच्या पाणलोट क्षेत्रात २४ तासांत १४० मिमी पावसाची नोंद झाली आहे. संततधारेमुळे लोणावळा व मावळातील सर्व धरणे पूर्ण क्षमतेने भरली आहे. पवना व इंद्रायणी नद्या दुथडी भरून वाहू लागल्या असून, दोन्ही नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे. पवना धरणातून सुमारे ५९७० क्युसेक इतका पाण्याचा विसर्ग सोडण्यात आल्याने पवना नदीवरील शिवली गावचा पूल पाण्याखाली गेला आहे. यामुळे परिसरातील गावांचा संपर्क तुटला आहे.

पवना धरण पाणलोट क्षेत्रात कोसळत असलेल्या पावसामुळे शनिवारी रात्री धरणाच्या सहा दरवाजांद्वारे सांडव्यातून ४५७० क्युसेकने, तर पॉवर हाउसमधून १४०० असा एकूण ५९७० क्युसेक इतका पाण्याचा विसर्ग पवना नदीत सोडण्यात आला आहे. त्यामुळे पवना नदीवरील शिवली पूल पाण्याखाली गेला आहे. शिवली पुलावरून पाणी गेल्याने शिवली, भडवली, येलघोल धनगव्हाण, खडकवाडी व काटेवाडी या गावांचा पवनानगर येथे येण्याचा संपर्क तुटला आहे. त्यांना शिवली ते ब्राह्मणोली या मोठ्या पुलावरून पवनानगरकडे यावे लागते. या भागातून मोठ्या प्रमाणावर दुग्ध व्यवसाय करणारे नागरिक आहेत. त्यांना सकाळी दूध संकलन करण्यासाठी पवनानगर येथे यावे लागते. त्यामुळे त्यांना आता सकाळी ब्राह्मणोलीमार्गे अथवा कडधेमार्गी पवनानगर किंवा कामशेतला जावे लागत आहे.

लोणावळ्यात आज अखेरपर्यंत ४४८१ मिमी. (१७६.४२ इंच)पावसाची नोंद झाली असून, गेल्या वर्षी आजअखेरपर्यंत ३७२५ मिमी. तर वर्षातील पावसाळी मोसमात ४५८५ मिमी.(१८०.५१इंच) पावसाची नोंद झाली होती. रविवारी दिवसभर कोसळलेल्या पावसामुळे गेल्या वर्षाची पावसाची सरासरी ओलांडली आहे. सार्वजनिक गणेश उत्सव मंडळांनी भर पावसात देखील डेकोरेशन उभारणीची कामे सुरू ठेवली असून पुढील दोन चार दिवसांत डेकोरेशन भाविकांना पाहण्यासाठी खुले होतील

पिंपरी चिंचवडमध्ये पाण्याची पातळी वाढली

पिंपरी : पवना नदीपात्रात सोडलेल्या पाण्यामुळे पिंपरी-चिंचवड परिसरातही पाण्याची पातळी वाढली आहे. चिंचवड येथील मोरया गोसावी मंदिरात पुराचे पाणी शिरले आहे. तीन वर्षांपूर्वी शहरात पूरपरिस्थिती निर्माण झाली होती. त्या वेळी सांगवी, दापोडी, पिंपरी, चिंचवड येथील काही झोपड्या; तसेच इमारतींच्या तळमजल्यावर पुराचे पाणी शिरले होते. यंदादेखील पावसाचा जोर कायम आहे.

गणेशोत्सव सुरू असून, नागरिकांनी गणपती विसर्जन करताना पाण्यात उतरू नये, असे आवाहन अग्निशमनदलाकडून करण्यात आले आहे. शहरातील रावेत ते दापोडी आणि रावेत ते सांगवी दरम्यानच्या प्रत्येक नदीघाटावर महापालिकेने गणपती विसर्जनासाठी चोख तयारी केली आहे. प्रत्येक ठिकाणी प्रशासनाच्या कर्मच्याऱ्यांची, अग्निशमनदल, पोलिस, स्वयंसेवक यांची नेमणूक करण्यात आली आहे. या जवानांचे सहकार्य घेऊनच गणपती विसर्जन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

६५ कर्मचारी तैनात

शहरातील २६ घाटावर अग्निशामक दलाचे एकूण ६५ कर्मचारी तैनात करण्यात येत आहेत. यामध्ये घाटावर कमीत कमी दोन जास्तीत-जास्त चार कर्मचारी असणार आहेत. तसेच क्रीडा विभागाचे जीवन रक्षक, सुरक्षा विभागाचे कर्मचारी तसेच काही स्वयंसेवी संस्थाही या वेळी सुरक्षा यंत्रणेला सहकार्य करणार आहेत. या वेळी बोट, लाइफ जॅकेट, लाइफ रोप यांचाही वापर गरजेनुसार केला जाणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

राज्यात सात तासात तीन अपघातात १९ ठार

0
0

मटा ऑनलाइन वृत्त । पुणे

राज्यात गेल्या सात तासात दोन भीषण अपघात झाले. तीन वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या या भीषण अपघातात १९ प्रवाशी ठार झाले असून ४२ जण जखमी झाले आहेत. जखमींना जवळच्या रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. त्यापैकी काहींची प्रकृती चिंताजनक असल्याचं सुत्रांनी सांगितलं.

काल सायंकाळी ६.३० वाजता पहिला अपघात नाशिकच्या येवला – मनमाड रोडवर झाला. ट्रॅक्स, दुचाकी आणि एसटीबसने एकमेकांना धडक दिल्याने झालेल्या या तिहेरी अपघातात ८ जण ठार झाले तर १७ प्रवाशी जखमी झाले. ट्रॅक्स आणि दुचाकीची जोरदार धडक झाली. त्यामुळे ही ट्रॅक्स थेट एसटीवर जाऊन आदळली. या अत्यंत विचित्र अपघातात ४ जणांचा जागीच मृत्यू झाला. तर ३ जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. अपघातातील १७ जखमींवर जवळच्या रूग्णालयात उपचार सुरू आहेत.

नारायणगावजवळ ८ दगावले

दुसरा अपघात मध्यरात्री दीड वाजता पुणे- नाशिक नाशिक महामार्गावरील नारायणगावजवळ झाला. एसटीने रस्त्यावर उभ्या असलेल्या टेम्पोला धडक दिल्याने झालेल्या या अपघातात ९ प्रवासी दगावले तर १० जण जखमी झाले. जखमींना उपचारासाठी जवळील रुग्णालयात दाखल करण्यात आले. कांद्याने भरलेल्या टेम्पो पंक्चर झाल्यामुळे चालकाने टायर बदलण्यासाठी रोडच्या बाजूला टेम्पो लावला होता. पावसाचा जोर आधिक होता. त्यामुळे एस.टी चालकाला समोरील टेम्पो दिसला नाही आणि एस.टीने सरळ टेम्पोला धडक दिली. त्र्यंबकेश्वर-पुणे या एसटीला हा अपघात झाला. या अपघातात तीन महिला आणि चार पुरुष ठार झाले आहेत. तर मुंबई-गोवा महामार्गावर आज झालेल्या भीषण अपघातात २ ठार तर १५ जखमी झाले आहेत. खाजगी बस आणि कंटेनररची समोरासमोर धडक बसल्याने हा भीषण अपघात झाला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नागपूरचा टेकडी गणेश

0
0

अविनाश महालक्ष्मे

विदर्भाच्या अष्टविनायकातील पहिला समजला जातो, तो नागपूरचा टेकडी गणेश. नागपूरकरांचे हे आराध्य दैवत आहे. रेल्वे स्थानकाला लागून सीतबर्डी टेकडीवर हे गणेशाचे मंदिर आहे. त्यामुळे टेकडीचा गणपती म्हणूनच तो ओळखला जातो.

भोसले राजे आणि ब्रिटिशांची लढाई ज्या ठिकाणी झाली, त्याच ठिकाणी हे गणपतीचे मंदिर आहे. सुरुवातीला मंदिर छोटेसे होते, आता त्याचा विकास झाला आहे. मंदिराचे मुख्य प्रवेशद्वार पूर्वेला असले, तरी मूर्ती उत्तराभिमुख आहे. गणपतीच्या मूर्तीच्या पाठीमागील भिंतीला लागून एक शिवलिंग आहे. येथील वैशिष्ट्य म्हणजे शिवलिंगाच्या ठिकाणी नंदी बसवलेला दिसतो.

याच टेकडीवर दुसऱ्या भागात आणखी एक गणपती मंदिर आहे. तो फौजी गणपती म्हणून ओळखला जातो. शुक्रवार तलावाचे पाणी पूर्वी सीताबर्डी किल्ल्यापर्यंत होते. भोसले राजे नावेतून तेथे गणेश दर्शनासाठी येत, असे सांगितले जाते. येथील गणेशामूर्ती भोकरीच्या झाडाखाली उघड्यावर होती. या ठिकाणी पूर्वी मोठे मंदिर होते; परंतु नंतर ते उद्ध्वस्त झाले. त्याचे अवशेष आजही दिसतात. मंदिराच्या आसपास वड-पिंपळाची झाडे आहेत. ही मूर्ती उजव्या सोंडेची असून दोन पाय, चार हात, डोके, सोंड पूर्वी स्पष्ट दिसत असे. आता शेंदराच्या पुटांमुळे मूर्ती स्पष्ट दिसत नाही. या बैठ्या मूर्तीची उंची साडेचार फूट व रुंदी तीन फूट आहे. मूर्तीच्या मागे पिंपळाचे झाड आहे. त्याच्या मुळांमुळे मूर्ती मूळ जागेहून थोडी पुढे सरकली असावी, असा तर्क आहे.

कला, क्रीडा क्षेत्रातील नामवंत या मंदिरात दर्शनासाठी येतात. तिळी चतुर्थीला येथे भाविकांची मोठी गर्दी होते. मंदिराच्या विकासाचे काम हाती घेण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गणपतीपुळ्याचा स्वयंभू गणपती

0
0

पुणे : निसर्गसौंदर्याने नटलेल्या कोकणभूमीत समुद्राच्या किनारी गणपतीपुळे वसलेले आहे. येथील गणपतीची स्वयंभू मूर्ती डोंगराच्या कुशीतच वसलेली आहे. ही गणपतीची मूर्ती डोंगरच्या लगत असल्याने गणपतीला प्रदक्षिणा घालण्यासाठी संपूर्ण डोंगराला प्रदक्षिणा घातली जाते. साधारण एक किलोमीटर अंतराच्या या प्रदक्षिणेच्या वाटेवरून समुद्राचे विलोभनीय दर्शन घडते.
‘स्वयंभू पश्चिम दिग्वासी,
प्रकटला भक्त रक्षणासी
सन्मुख सागर समदृष्टी,
शोभतो हरित गिरी पृष्ठी’

अशा शब्दांत गणपतीपुळ्याच्या गणपतीचे वर्णन केले जाते. सकाळी चार वाजता मंदिरात पूजा केली जाते आणि त्यानंतर मंदिर भाविकांसाठी खुले होते. भाद्रपद शुद्ध प्रतिपदा (गणेश चतुर्थी) ते भाद्रपद शुद्ध पंचमी या काळात देवळात उत्सव साजरा केला जातो. याचप्रमाणे माघ शुद्ध प्रतिपदा ते माघ शुद्ध पंचमीपर्यंत उत्सव साजरा केला जातो. या दोन्ही उत्सवांमध्ये सनई, चौघडे आणि इतर वाद्यांच्या गजरात देवाची चांदीची मूर्ती पालखीत ठेवून पालखी प्रदक्षिणा होते. या वेळी पालखी प्रदक्षिणा मार्गावर चार दिशांना थांबवून आरती केली जाते. उत्सवकाळात देवाला पाटावर वस्त्र नेसवले जाते. उत्सवात गावकरी महिला उकडीचे एक हजार मोदक देवाला अर्पण करतात. देवळात दररोज कीर्तन असते आणि सहस्रावर्तने केली जातात.

गणपतीपुळे आणि निवेंडी, मालगुंड, नेवरे, भंडारपुळे या गावांमध्ये गणेशोत्सव काळात गणरायाची पार्थिव मूर्ती आणून गणेशोत्सव साजरा केला जात नाही. गणपतीपुळ्याचा गणपती हाच गावकऱ्यांचा गणपती असे मानले जाते.

त्यामुळे भाद्रपद शुद्ध चतुर्थी म्हणजे गणेश चतुर्थीला आजूबाजूच्या पंचक्रोशीतील सर्व ग्रामस्थांना पहाटे चार ते दुपारी साधारण १२ वाजेपर्यंत देवाच्या गाभाऱ्यात जाऊन गंधफूल वाहता येते. रोज दुपारी बारा वाजता आणि संध्याकाळी सात वाजता आरती होते. त्याशिवाय अंगारकी चतुर्थीला दर्शनासाठी मोठी गर्दी होते. दसरा, वर्ष प्रतिपदा आणि अक्षय तृतीयेला देवाची पालखी निघते. संपूर्ण चैत्र महिन्यात संध्याकाळी वसंत पूजा केली जाते. गेल्या काही वर्षांपासून देवळातच खिचडीचा महाप्रसाद दिला जातो.
देवळाची वैशिष्ट्यपूर्ण रचना
गणपती डोंगरातच असल्याने देवाचा गाभारा थोडासा खोल आहे. असे असले तरी रथसप्तमीला सूर्याची किरणे गणपतीच्या मूर्तीवर येतात. त्याशिवाय नवे मंदिर बांधण्यापूर्वी देवळाच्या गाभाऱ्यात समुद्राचे पाणी येत असे. आता नवे मंदिर बांधल्यावर बाहेरचा परिसर वाळूच्या पुळणीपेक्षा थोडा उंचीवर घेण्यात आला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गणेशाचे ‘श्वेतरूप’

0
0

मंदार लवाटे
वतांच्या मूर्तीनुसार त्यांची नावे, उपासना व त्याची मिळणारी फळे ही भिन्न भिन्न असतात. विष्णूच्या चार हातात शंख, चक्र, गदा, पद्म ही आयुधं असतात. या आयुधांचा क्रम बदलला की मूर्तीचे नाव व इतर गोष्टीही बदलतात. मूर्तीच नव्हे तर साधकाने कोणत्या उपासनेसाठी देवतेच्या कोणत्या स्वरूपाचे ध्यान करावे हे सुद्धा पूर्वसुरींनी सांगितले आहे. ज्यांना विद्या प्राप्तीची इच्छा आहे अशांनी गणपतीच्या कोणत्या स्वरूपाचे ध्यान करावे हे सहस्रानामामध्ये सांगितले आहे.
‘श्वेतः, श्वेतांबरधरः, श्वेतमाल्यविभूषण:, श्वेतातपत्ररुचिरः, श्वेतचामरविजीतः’ सहस्रनामातील या नावांची ध्यानस्थ अवस्थेत उपासना करावी, असे सांगण्यात आले आहे. ‘ज्याचा वर्ण शुभ्र धवल असून ज्याने शुभ्र वस्त्र परिधान केले आहे. हार व आभूषणे ही शुभ्रच आहेत. याबरोबर श्वेतछत्र धारण केल्याने तो अत्यंत सुंदर दिसत आहे. त्याची सेवाही शुभ्र चवऱ्या ढाळून केली जात आहे. असा या नामांचा अर्थ आहे. या स्वरूपाचे ध्यान विद्यार्थ्यांना अधिक लाभदायक ठरते. या श्वेत रूपास साजेशा मांदार पुष्प व पांढऱ्या दुर्वा या दोन श्वेत गोष्टी गणेशपूजेत वापरल्या जातात. त्या गणपतीस अत्यंत प्रिय आहेत.
मांदाराचे फुल आणि झाड हे रुई सारखेच असते. मांदाराची फुले फक्त पूर्ण पांढरी असतात. मांदारवृक्षाच्या मुळाशी एकवीस वर्षांनी गणपती साकार होतो अशी श्रद्धा आहे. अशा मूर्ती पुण्यात काही जणांकडे असून प्रसिद्ध कसबा गणपती मंदिरानजीकच मांदारगणेशाचे छोटे मंदिर आहे. मांदाराचे मूळ काढून त्याची मूर्ती उपसानेसाठी केली जाते. या श्वेतरूप सांगणाऱ्या श्लोकांबरोबरच गणपतीस ‘सर्वावयवसंपूर्णसर्वलक्षणलक्षितः सर्वभरणशोभाढ्य: सर्वशोभासमन्वितः असेही म्हटले आहे. अर्थात ज्याच्या शरीराचे सर्व अवयव सामुद्रिक शास्त्रानुसार सर्व शुभ लक्षणांनी परिपूर्ण आहेत. जो सर्व आभूषण व अलंकारांनी सुशोभित आहे. ज्याची अंगकांती लावण्यमय असल्याने तो विलोभनीय शोभायमान आहे.
००

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सोलापूरचा आजोबा गणपती

0
0

सूर्यकांत आसबे
सोलापुरातील गणेशोत्सवाला १०० वर्षांची परंपरा आहे. सोलापूरच्या आजोबा गणपतीला सुमारे १३२ वर्षांची तेजस्वी परंपरा आहे. धार्मिक कार्यक्रमांतून निर्माण होणारे बळ राष्ट्रीय चळवळीसाठी वापरावे आणि स्वातंत्र्याची चळवळ सामान्य जनतेपर्यंत पोहोचवून तरुणांना संघटित करण्यासाठी लोकमान्य टिळकांनी १८९४मध्ये गणेशोत्सवाला सार्वजनिक स्वरूप दिले. त्या आधी आठ वर्षे सोलापुरात १८८५ मध्ये शुक्रवार पेठेतील जुन्या पिढीतील मंडळींनी एकत्रित येऊन सार्वजनिक स्वरूपात आजोबा गणपतीची प्रतिष्ठापना केली होती. शुक्रवार पेठेतील जुन्या पिढीतील प्रमुख कार्यकर्ते महालिंगप्पा वजीरकर, मल्लिकार्जुनप्पा कावळे, मल्लिकार्जुनप्पा शेटे, संगणबसय्या नंदीमठ, देवबा मंठाळकर, देशमुख, गणेचारी, शिरगिरी, नंद्याळ, आवटे या विविध घराण्यांतील व्यक्तींनी एकत्रित येऊन १८८५ मध्ये सार्वजनिक आजोबा गणपतीची प्रतिष्ठापना केली.

आजोबा गणपतीची पहिली मूर्ती नीलप्पा उजळंबे, आडव्यप्पा माळगे, आवटे या मूर्तिकारांनी कामठ्या, रद्दीचा कागद, खळ, चिंचुक्याचे पीठ आणि कापड आदी वस्तू वापरून ही मूर्ती साकारली होती. आजोबा गणपती सुरुवातीला शुक्रवार पेठेतील शेटे यांच्या घरासमोर आणि त्यानंतर त्रिपुरंतकेश्वर मंदिरात बसवून तेथेच गणेशोत्सव साजरा करण्यात येत होता. नंतर उत्सव साजरा करण्यासाठी बसवेश्वर मंडळाची स्थापना करण्यात आली. सिद्रामप्पा फुलारी, पंचप्पा जिरगे, इरय्या स्वामी, अण्णाराव वजीरकर, हत्तुरे, नंदीमठ, ढवणे यांचा या मंडळामध्ये समावेश होता. श्री सिद्धेश्वर मंदिरात शिखराच्या कामासाठी केरळचे कलाकार आल्यानंतर आजोबा गणपतीची जुनी मूर्ती जीर्ण झाल्यामुळे त्यांच्याकडून सध्याची नवीन आकर्षक मूर्ती तयार करून घेण्यात आली आणि नंतर जुन्या मूर्तीचे टाकळी येथे भीमा नदीत विसर्जन करण्यात आले. माजी महापौर विश्वनाथ बनशेट्टी आणि गौरीशंकर फुलारी यांच्या नेतृत्वाखाली १९९४ मध्ये माणिक चौकाजवळ आजोबा गणपतीचे सुंदर मंदिर उभारण्यात आले. सध्या पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्याची मागणी होत आहे. मात्र, सुमारे १३२ वर्षापूर्वीच आजोबा गणपतीने या संकल्पनेची मुहूर्तमेढ रोवली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

देखाव्यांतून लोकप्रबोधन

0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
सार्वजनिक गणेशोत्सवाच्या देखाव्यातून यंदाही लोकप्रबोधनावर भर देण्यात आला आहे. धोकादायक ठिकाणी किंवा धोकादायक पद्धतीने ‘सेल्फी’ काढताना अनेकांना गेल्या वर्षभरात जीव गमवावा लागला आहे. त्यामुळे आपण नकळत ती चूक कशी करतो आणि आपण काय केले पाहिजे, या विषयावर भाष्य करणारे जिवंत देखाव्यांची यंदाच्या गणेशोत्सवावर छाप आहे. याबरोबरच पौराणिक व ऐतिहासिक विषयांवरील देखावे देखील भव्य स्वरूपात साकाराण्यात आले आहे.

कसबा पेठेतील फणी आळी मंडळाने जिवंत देखावा साकारला असून, छत्रपती शिवाजी महाराजांनी रांजे गावच्या पाटलाला केलेल्या शिक्षेची घटना मांडली आहे. कसबा पेठेतील जनार्दन पवळे संघाने ‘बाहुबली द कन्क्लुजन’ या चित्रपटातील रथाची प्रतिकृती साकारली आहे. बुधावर पेठेतील नाना हौद मित्र मंडळाने जिवंत देखावा साकारला असून, ‘धोकादायक पद्धतीने घेतले जाणारे सेल्फी’ या विषयावर प्रकाश टाकला आहे.

साईनाथ मंडळ ट्रस्टने दर वर्षीप्रमाणे यंदाही जिवंत देखावा साकारला आहे. यामध्ये त्यांनी सायबर क्राईम या विषयी जनजागृती केली आहे. कसबा पेठेतील नेहरू तरुण मंडळाने महोत्कट गणेश महल साकारला आहे. या मंडळाची मूर्ती आकर्षक आहे. सोमवार पेठ गोसावीपुरा मित्र मंडळाने जिवंत देखावा साकारला असून, ‘सोनू तुझा माझ्यावर भरोसा नाय का, सेल्फी, सोशल मीडिया, सैनिक’ या विषयावर भाष्य केले आहे. रवींद्र नाईक चौक मित्र मंडळाने धोकादायक सेल्फीचा विषय जिवंत देखाव्यातून मांडला आहे. गणेश पेठेतील डुल्या मारुती मित्र मंडळाने लायटिंगच्या मंदिराचा देखावा केला आहे. क्रांतिवीर राजगुरू मित्र मंडळाने काळानुसार समाज संस्कृतीत होत गेलेला बदल छायाचित्रांच्या माध्यमातून दाखविला आहे. मंगल मित्र मंडळाने आकर्षक विद्युत रोषणाई केली असून, गणेशाची मूर्तीही सुंदर आहे. सोमवार पेठेतील सूर्योदय मित्र मंडळाने यंदाही हालता देखावा केला असून, शिवाजी महाराजांना भवानी मातेचा साक्षात्कार हा भव्य देखावा साकारला आहे. कसबा पेठेतील नवग्रह मंडळाने बुद्ध मंदिराची प्रतिकृती साकारली आहे. श्रीराम अभिमन्यू मित्र मंडळाने ‘मुलगी वाचवा, मुलगी शिकवा’ या विषयावरील हालता देखावा केला आहे. ‘मुलींचे शिक्षण, प्रगतीचे लक्षण’ हा संदेश देणारा देखावा गणेश पेठेतील पोटसुळ्या मारुती मंडळाने केला आहे. या मंडळाची गणेश मूर्ती आकर्षक आहे. कसबा पेठेतील तरुण शिवगणेश मंडळाने हनुमानाची भक्ती हा देखावा साकारला आहे. दारूवाला पूल येथील विजय तरुण मंडळाने ज्वालासुराता वध हा हालता देखावा केला आहे. गावकोस मारुती मित्र मंडळाची मनमोहक आरास असून, गणेशाची मूर्ती सुंदर आहे. हर हर महादेव मंडळाने लायटिंगच्या फुलांमध्ये गणपती बाप्पा विराजमान केला आहे. पवळे चौकातील हुतात्मा भगतसिंग मंडळाने आदिवासी समाजातील क्रांतिकारक बिरसा मुंडा यांच्याविषयीचे माहितीफलक केले आहेत. या मंडळाची मूर्ती लक्ष वेधून घेते. श्री दत्त क्लब मित्र मंडळाची आरास आकर्षक आहे.

सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात लोकमान्य टिळक यांनी केली की भाऊ रंगारी यांनी केली, हा विषय सध्या पेटला आहे. मात्र, या विषयावरून वाद न घालता गणेशोत्सव सर्वांच्या भल्यासाठी आहे, असे सांगणारा देखावा सोन्या मारुती चौकातील नरेंद्र मंडळाने केला आहे. रास्ता पेठ श्री सार्वजनिक नायडू गणपती मंडळाने मंदिराची प्रतिकृती साकारली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


‘पीएमआरडीए’ घेणार ‘क्रेडिट रेटिंग’

0
0

रिंगरोडच्या कर्जउभारणीसाठी होणार उपयोग

म. टा. प्रतिनिधी, पुणे

पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (पीएमआरडीए) वित्तीय संस्थांकडून कर्ज उभारण्यासाठी ‘पत मानांकन’ (क्रेडिट रेटिंग) करून घेण्याचा निर्णय घेतला आहे. ‘पीएमआरडीए’तर्फे १२८ किलोमीटरचा रिंगरोड विकसित केला जाणार असून, त्यासाठी परदेशी वित्तीय संस्थांकडून कर्ज घेण्यापूर्वी क्रेडिट रेटिंग करून घेण्याचे निश्चित करण्यात आले आहे. ‘पीएमआरडीए’ने त्याची प्रक्रिया सुरू केली असून, पुढील दोन ते तीन महिन्यांत त्याचे प्राथमिक निष्कर्ष प्राप्त होण्याची शक्यता आहे.
केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने स्मार्ट सिटी आणि अमृत योजनेत निवड झालेल्या सर्व शहरांना क्रेडिट रेटिंग करून घेण्याची सूचना केली होती. पुणे महापालिकेला ‘एएप्लस’ असे रेटिंग मिळाले आहे. ‘पीएमआरडीए’च्या हद्दीत टीपी स्कीमच्या माध्यमातून रिंगरोडचा विकास केला जाणार आहे. रिंगरोडच्या विकासासाठी साडेसहा हजार कोटी रुपयांचे कर्ज घेण्याची तयारी पीएमआरडीए’कडून सुरू आहे. त्यासाठी, परदेशी वित्तीय संस्थांशी प्राथमिक चर्चा झाली असून, त्यांच्याकडून योग्य प्रतिसाद मिळावा, याकरिता क्रेडिट रेटिंग करून घेण्याचे सूतोवाच पीएमआरडीए’चे आयुक्त आणि विशेष कार्यकारी अधिकारी (सीईओ) किरण गित्ते यांनी केले.
क्रेडिट रेटिंगसाठी पीएमआरडीए’ने विविध वित्तीय कंपन्यांकडून प्रस्ताव मागवले आहेत. ‘सिक्युरिटीज अँड एक्सेंज बोर्ड ऑफ इंडिया’ने (सेबी) मान्यता दिलेल्या आठ वित्तीय कंपन्यांकडून आलेले प्रस्ताव स्वीकारण्यात येतील, असे स्पष्ट करण्यात आले आहे. यामध्ये, क्रिसिल, इंडिया रेटिंग अँड रिसर्च, आयसीआरए, क्रेडिट अॅनालिसिस अँड रिसर्च, ब्रिकवर्क रेटिंग, एसएमइ रेटिंग एजन्सी, इन्फोर्मेटिक्स व्हॅल्युएशन अँड रेटिंग्स आणि फिच रेटिंग्स या प्रमुख कंपन्यांचा समावेश आहे. यापैकी, क्रेडिट रेटिंगसाठी प्रस्ताव दाखल करणाऱ्या कंपन्यांमधून पात्र कंपनीची निवड केली जाणार आहे.

दर्जावर ठरणार कर्जाची सुलभता
‘पीएमआरडीए’ला पत मानांकनात चांगला दर्जा प्राप्त झाल्यास परदेशी वित्तीय संस्थांकडून कर्ज उभारण्याची प्रक्रिया अधिक सुलभ होऊ शकेल. ‘पीएमआरडीए’ कार्यान्वित झाल्यानंतर गेल्या दोन वर्षांमध्ये व्यवस्था निर्माण करण्यावर भर देण्यात आला. आता, विविध प्रकल्प आणि योजनांच्या अंमलबजावणीला सुरुवात केली जाणार असून, रिंगरोडचा विकास हा त्यातील मुख्य टप्पा असेल. विविध टीपी स्कीमच्या माध्यमातून उपलब्ध होणाऱ्या जागांचा लिलाव करून कर्जाचे हप्ते फेडण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

टीपी स्कीमसाठी सप्टेंबरपासून मोजणी
पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (पीएमआरडीए) नगरररचना योजनेसाठी (टीपी स्कीम) म्हाळुंगेमधील जमिनीच्या मोजणीस सप्टेंबरमध्ये सुरुवात होणार आहे. आज, मंगळवारी (२९ ऑगस्ट) ‘पीएमआरडीए’ आणि ग्रामस्थांमध्ये प्रस्तावित टीपी स्कीमबाबत महत्त्वाची बैठक होणार असून, त्यानंतर प्रत्यक्ष मोजणीचे कामकाज सुरू केले जाणार आहे.
हिंजवडीत सातत्याने वाढणारी वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी म्हाळुंगे-माण परिसरातून पर्यायी रस्ता विकसित केला जाणार आहे. हा रस्ता विकसित करण्यासाठी म्हाळुंगे परिसरात टीपी स्कीम राबविण्याचे नियोजन ‘पीएमआरडीए’ने केले आहे. त्याची माहिती ग्रामस्थांना होण्यासाठी नुकतीच कार्यशाळा घेण्यात आली होती. आता, म्हाळुंगे ग्रामस्थांसोबत गावात बैठक घेण्यात येणार आहे. या बैठकीत अधिक विस्तृत चर्चा होण्याची शक्यता असून, त्यानंतर प्रस्तावित हद्दीत नेमकी किती जमीन उपलब्ध आहे, याची मोजणी सुरू केली जाणार आहे. त्यासाठीचे आवश्यक शुल्क भूसंपादन विभागाकडे जमा करण्यात आल्याची माहिती ‘पीएमआरडीए’चे आयुक्त आणि विशेष कार्यकारी अधिकारी (सीईओ) किरण गित्ते यांनी दिली. जमिनीची मोजणी करण्यासाठी ग्रामस्थांनी सहमती दर्शवली असून, सप्टेंबरमध्ये ही प्रक्रिया सुरू होईल, असे संकेत त्यांनी दिले.
म्हाळुंगे परिसरातील सुमारे २९१ हेक्टर जागेवर टीपी स्कीम राबविण्याचा उद्देश ‘पीएमआरडीए’ने जाहीर केला आहे. त्यासाठी, तीन महिन्यांत प्रा-रूप आराखडा तयार करण्यात येणार असला, तरी तत्पूर्वी जमिनीची उपलब्धता, अस्तित्वातील रस्ते, संबंधित भागांतून वाहणारे नदी-नाले आणि विविध स्वरूपाच्या मिळकती, याची माहिती मिळविण्यासाठी ही मोजणी केली जाते. या मोजणीद्वारे एकूण क्षेत्र निश्चित झाल्यानंतर त्यानुसार टीपी स्कीमचे प्रा-रूप तयार केले जाते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बढाई समाज गणपती मंडळ

0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
रविवार पेठ परिसरात लाकडाच्या वस्तूंच्या व्यवसायासाठी प्रसिद्ध असणाऱ्या बढाई समाजाचे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ यंदा शतकोत्तर रौप्य महोत्सवी वर्ष साजरे करीत आहे. १२५ वर्षांपासून बढाई समाजाला एकत्र बांधून ठेवण्याचे काम या मंडळाने केले आहे. पारंपरिक पद्धतीने उत्सव साजरा करणारे मंडळ म्हणून या मंडळाचा नावलौकिक आहे.
स्वातंत्र्य चळवळीत योगदान देण्यासाठी लोकमान्य टिळकांनी काही विशिष्ट समाजांना गणेशोत्सव साजरा करण्याचे आवाहन केले. त्यातून बढाई समाजातील काही लोकांना एकत्र येऊन पुणे बढाई समाज ट्रस्टची स्थापना केली. मकना मनसाराम बढाई यांच्या मार्गदर्शनाखाली १८९३ साली सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करण्यात आला. लोकमान्य टिळक यांच्या हस्ते या गणपतीची प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली. त्या काळी व्यवसायाप्रमाणे समाज विखुरले होते. त्यांना एकत्र आणण्यासाठी म्हणून लोकमान्य टिळकांनी समाजाचा गणेशोत्सव करण्याची संकल्पना मांडली. त्यामुळे बढाई समाजाच्या गणेशोत्सवाला सार्वजनिक स्वरूप प्राप्त झाले. यंदा मंडळाने देखावा म्हणून गणेश महाल साकारला आहे. पूर्वी मंडळाची मूर्ती शाडू माती आणि कागदाच्या लगद्यापासून तयार केलेली पर्यावरणपूरक मूर्ती होती. १९९२ साली फायबरची मूर्ती करण्यात आली.
दर वर्षी गणेश चतुर्थीच्या दिवशी मंडळाच्या १२५ वर्ष जुन्या अशा लाकडी रथातून श्रींच्या मूर्तीची पारंपरिक पद्धतीने मिरवणूक काढण्यात येते. १२५ वर्षांची परंपरा असलेला लाकडी रथ बैलांच्या जोडीकडून ओढण्याची जुनी परंपरा मंडळाने आजही कायम राखली आहे.
यंदा शतकोत्तर रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त मंडळाने अनेक सांस्कृतिक तसेच सामाजिक उपक्रम हाती घेतले आहेत. बझाई समाजातील नागरिकांचा विकास करणे हे मंडळाचे मुख्य उद्दिष्ट आहे. त्यासाठी पुणे बढाई समाज ट्रस्टचे अध्यक्ष मदन बढाई, उपाध्यक्ष नंदकिशोर बढाई आणि सचिव संतोष बढाई हे पदाधिकारी प्रयत्न करीत आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली यंदा शतकोत्तर रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त विविध कार्यक्रम घेण्यात येणार आहेत. त्यामध्ये बढाई समाजातील गरजू विद्यार्थ्यांना अर्थित मदत, रक्तदान शिबिर, आरोग्य शिबिर, मूकबधिर विद्यार्थ्यांच्या हस्ते आरती व त्यांना मदत अशा अनेक उपक्रमांचा समावेश आहे. गणेशोत्सवासाठी मंडळाकडून कोणत्याही व्यक्तीकडून कोणत्याही प्रकारची वर्गणी घेतली जात नसून, सर्व खर्च ट्रस्टमार्फत करण्यात येत आहे. यंदाही ती परंपरा कायम ठेवलेली असून उत्सवाचा संपूर्ण खर्च ट्रस्टमार्फत करण्यात आला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बियाणे दुकानदाराला ३७ लाखांना गंडवले

0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

नऱ्हेगावातील दुकानदाराला बियाणे खरेदी करण्याच्या बहाण्याने ३७ लाख ५० हजार रुपयांना गंडा घातल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी सिंहगड रस्ता पोलिस ठाण्यात चौघांवर आयटी अॅक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या बाबत सुशील पाटोळे (वय ४८, रा. नऱ्हेगाव) यांनी तक्रार दिली आहे. त्यानुसार रिया बजाज आणि अन्य तिघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पाटोळे यांचा बियाणे खरेदी-विक्रीचा व्यवसाय आहे. आरोपींनी पाटोळे यांच्याशी संपर्क साधला. त्यांची ब्रिटनमध्ये बियाण्यांची कंपनी असल्याचे भासवून अॅबेरॉन जातीच्या बियाणे विक्रीमध्ये मोठा नफा असल्याचे सांगितले. या बियाण्यांचे महत्व सांगून त्याची माहिती व्हॉट्सअॅप, ईमेलद्वारे दिली. नमुने म्हणून पॅकेट पाठविले. त्याची तपासणी केल्यानंतर पाटोळे यांनी शंभर पिशव्या बियाणे खरेदीची ऑर्डर दिली. त्यासाठी त्यांनी मुंबईतील एका महिला एजंटकडे रोख रक्कम दिली. तसेच, काही रक्कम त्यांनी सांगितलेल्या बँकेच्या खात्यावर भरली.
पाटोळे यांना आरोपींनी फोन केला. बियाणे भारतात आले आहे. मात्र, ते सीमाशुल्क विभागाने पकडले असून, सोडविण्यासाठी पाच लाख रुपये भरायला सांगितले. त्या नुसार पाटोळे यांनी संबंधित खात्यावर पैसे भरले. त्यानंतर अशी विविध कारणे सांगून त्यांच्याकडून एकूण ३७ लाख ५० हजार रुपये घेतले. त्यानंतर आरोपींनी बियाणे पाठविले. पण, हे बियाणे बनावट असल्याचे लक्षात आले. त्यामुळे पाटोळे यांनी आरोपींशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. पण, त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. त्यामुळे त्यांनी पोलिसांकडे तक्रार अर्ज दिला होता. या अर्जाची चौकशी करून पोलिसांनी सिंहगड रस्ता पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

व्यासांचा लेखनिक गणेश

0
0

आनंद कानिटकर
महाभारत हे भारतातील महाकाव्य. महाभारतात वर्णन केलेले युद्ध कधी घडले असावे, यात संशोधकांत एकवाक्यता नाही. सध्या आपल्यासमोर असणारे महाभारत हे साधारणपणे इ. स. पूर्व दुसरे शतक ते इ. स. दुसरे शतक या काळात लिहिले गेले असावे. त्यात अर्थातच भारताच्या विविध भागात, काळानुरूप कथानकांची, उपकथानकांची भर पडत गेली होती.
या महाभारतात विनायकाचा उल्लेख आढळतो; पण तो प्राचीन साहित्यामध्ये उल्लेखलेल्या विघ्न आणणाऱ्या विनायकाचा. याशिवाय महाभारतात गणेश, गणपती, गणाधिप, गणकार इत्यादी नावे येतात; पण ती शंकराला उद्देशून वापरली आहेत. गणेशाचा उल्लेख येणारे महाभारतातील प्रसिद्ध कथानक म्हणजे व्यासांना महाभारत लिहिताना अनेक कल्पना सुचून ते एकही श्लोक लिहू शकत नव्हते. त्यावेळेस ब्रह्मदेवाने त्यांना गणेशाला लेखनिक म्हणून घेण्यास सुचवले. अशा रीतीने गणेश व्यासांचा लेखनिक म्हणून पुढे आला.
पुण्यातील भांडारकर प्राच्यविद्या संशोधन मंदिराने १९३०-४० च्या दशकात भारतातील विविध भाषांतून लिहिलेल्या महाभारताच्या हस्तलिखितांचा चिकित्सक अभ्यास करून महाभारताची संशोधित आवृत्ती तयार केली. या अभ्यासातून पुढे आलेल्या उदाहरणांवरून महाभारताचा लेखनिक म्हणून गणेशाची झालेली नेमणूक हे कथानक महाभारतात नंतरच्या काळात समाविष्ट करण्यात आलेले होते. या संशोधनादरम्यान अभ्यासलेल्या काही हस्तलिखित प्रतींमध्ये विशेषतः दक्षिण भारतातील महाभारताच्या हस्तलिखित प्रतींमध्ये गणेशाचे हे कथानक येत नाही. काही हस्तलिखित प्रतींमध्ये ते नंतरच्या काळात समाविष्ट केलेले असावे, असे त्या कथानकाच्या श्लोकांमध्ये केलेल्या खुणेवरून किंवा हस्तलिखितात त्या कथानकाशेजारच्या समासात केलेल्या नोंदींवरून लक्षात येते.
महाभारताच्या परंपरेनुसार व्यासांनी त्यांच्या पाच शिष्यांना महाभारत ऐकवले होते. या पाच शिष्यांनी महाभारताच्या त्यांच्या पाच आवृत्या सांगायला सुरुवात केली. यातील वैशंपायन या शिष्याने जनमेजय राजाला महाभारत सांगितले. त्याप्रसंगी उपस्थित असलेल्या सौतीने या एकदा ऐकलेल्या पठणावरून स्वतःच्या आठवणीनुसार नंतर महाभारत सांगायला सुरुवात केली. यात अर्थातच प्रत्येकाच्या स्मरणानुसार महाभारताची आवृत्ती घडत गेली. सुरुवातीला मौखिक परंपरेने सांगितल्या जाणाऱ्या महाभारताची सुमारे दोन हजार वर्षांपूर्वी लिखित आवृत्ती तयार झाली.
महाभारताचा लेखनिक गणेश होता, ही नोंद पहिल्यांदा इ. स. नवव्या शतकात राजशेखर याने लिहिलेल्या ‘बालभारत’ या नाटकाच्या सुरुवातीला आढळते. या नाटकाच्या पहिल्या प्रवेशात व्यास आणि वाल्मिकी एकमेकांना भेटतात आणि एकमेकांच्या लिखाणाबद्दल चौकशी करतात. तेव्हा व्यास वाल्मिकींना सांगतात, की ‘महाभारताच्या लिखाणाचे अवघड काम त्यांनी शिरावर घेतले आहे. शिवपुत्र गणेश त्यांना लेखनिक म्हणून लाभला असल्यामुळे ते काम सुरळीत चालू आहे.’

इ. स. अकराव्या शतकात अल्बेरुनी हा मध्य आशियातील प्रवासी भारतात आलेला होता. अल्बेरूनी याने नोंद केल्याप्रमाणे महाभारताच्या लिखाणात व्यासांना गणेशाने मदत केल्याचे त्याला सांगण्यात आले होते. त्याच काळात क्षेमेंद्र याने लिहिलेल्या महाभारतावर आधारित ‘भारतमंजिरी’ या काव्यात गणेशाचे हे कथानक येत नाही.

कालच्या लेखात पहिल्याप्रमाणे उत्तरकोकणातील शिलाहारांच्या ताम्रपटात कार्य सिद्धीस नेण्यासाठी शंकराच्या आधी गणेशाचे स्तवन केलेले आढळते. त्याचप्रमाणे कदाचित महाभारताच्या लिखाणाला सुरुवात करताना अनेक कल्पना सुचून व्यासांच्या लिखाणात अडथळा निर्माण झालेला होता. त्या अडचणीतून त्यांना सोडवण्यासाठी गणेशाने लेखनिक म्हणून साहाय्य केले आणि त्यांचे महाभारत लेखनाचे कार्य गणेशामुळे पार पडले, हे दर्शवण्यासाठीच ‘व्यासांचा लेखनिक गणेश’ हे मिथक जन्मास आले. इ. स. पाचव्या शतकानंतर गणेशाचा स्वतंत्र देवता म्हणून प्रवास होताना, तो बुद्धीची देवता म्हणून प्रसिद्ध होण्यास या मिथकाचा मोठा हातभार लागला असावा.

(लेखक भारतीय विद्येचे अभ्यासक आहेत.)
०००

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘अन्नसुरक्षे’चा लाभ वंचितांपासून दूरच

0
0

‘सिफर’च्या अहवालातील निष्कर्ष

म. टा. प्रतिनिधी, पुणे

वंचित समुदायापर्यंत अन्नसुरक्षा योजनेची माहिती किंवा प्रत्यक्ष लाभ पोहचावा असे अधिकारी किंवा पुरवठादार या दोघांनाही वाटत नाही. वस्ती पातळीवरील महिलांना रेशनद्वारे मिळणाऱ्या धान्याबाबत कोठे तक्रार करायची याची माहिती नसते. योजनेची जनजागृती केली जात नाही, असा निष्कर्ष ‘सेंटर फॉर अॅडव्होकसी अँड रिसर्च’(​​सिफर) तर्फे केलेल्या सर्वेक्षणात समोर आला आहे.
‘सिफर’चे राज्य समन्वयक आनंद बाखडे यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. ‘सिफर’तर्फे करण्यात आलेल्या सर्वेक्षणाच्या निष्कर्षाचा अहवाल लवकरच अन्न व औषध प्रशासनाला देण्यात येणार आहे. रेशन दुकानातील धान्याचे नमुने दुकाने ठेवणे आवश्यक असते. मात्र, दुकानदाराकडून देण्यात आलेल्या धान्यामध्ये भेसळ केल्याचा अनुभव अनेकदा येतो. राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्याची अंमलबजावणी राज्यात २०१५ला झाली. झाली. या कायद्यांतर्गत रेशन मिळण्यासाठी वार्षिक एक लाख रुपयांची अट रद्द करून शहरी भागासाठी वार्षिक ५९ हजार रुपयांवर आणण्यात आली. आधार कार्ड अनिवार्य करण्यात आले. रेशन लाभार्थींच्या सहभागातून अन्नसुरक्षा योजनेचे रिपोर्ट कार्ड तयार करण्यात आले. या रिपोर्ट कार्डमध्ये एकूण २१ प्रश्न विचारण्यात आले होते. त्यातून समोर आलेल्या वस्तुस्थितीची माहितीही देण्यात आली.
रेशन कार्डवरील धान्य त्याच महिन्यात घ्यावे लागते. अन्यथा ते बुडते असा अनुभव आहे. या योजनेची माहिती कार्यालयात उपलब्ध नसते. अर्ज करण्यासाठी फेऱ्या माराव्या लागतात. आधार कार्ड वेळेत देऊनही रेशन मिळत नाही. रेशनकार्डासाठी अर्ज केल्यानंतर ते मिळण्यासाठी एक वर्ष लागते, असे असे दुकानदार सांगतात. या योजनेची वस्ती पातळीवर महिलांना माहिती व्हावी म्हणून जनजागृती करण्यात आलेली नाही, अशा प्रकारचे निष्कर्ष अहवालातून समोर आल्याची माहिती देण्यात आली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘तेर पॉलिसी’तर्फे ऑलिम्पियाड स्पर्धा

0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

शालेय विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरण आणि हवामान बदलाबाबत जागृती व्हावी, या उद्देशाने तेर पॉलिसी सेंटरतर्फे ‘तेर ऑलिम्पियाड’ ही ऑनलाइन स्पर्धा घेण्यात येते. यंदाच्या स्पर्धेसाठी देशभरातून आतापर्यंत दोन हजार जणांनी नोंदणी केली आहे. पहिली फेरी अजून सुरू असून, विद्यार्थ्यांना नोंदणी करता येणार आहे.
‘स्पर्धेचे हे तिसरे वर्ष आहे. या स्पर्धेतील यशस्वी विद्यार्थ्यांना लॅपटॉप, कॅल्क्युलेटर, टॅब्स यासारखी पारितोषिके देण्यात येतील,’ अशी माहिती ‘तेर पॉलिसी सेंटर’च्या अध्यक्ष विनिता आपटे यांनी दिली. ही स्पर्धा इयत्ता पाचवी ते बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी खुली असून, पाचवी ते नववी आणि दहावी ते बारावी अशा दोन स्तरांमध्ये घेतली जाते. या स्पर्धेत विचारले जाणारे सर्व प्रश्न हे पर्यावरणीय विषयांवर आधारित असून, मराठी आणि इंग्लिशसह हिंदी आणि बंगाली भाषेतून परीक्षा देता येईल. स्पर्धेची पहिली फेरी १५ सप्टेंबरपर्यंत चालणार आहे. पहिल्या फेरीत उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी दुसरी फेरी एक नोव्हेंबर ते १५ नोव्हेंबरदरम्यान घेतली जाईल. बहुपर्यायी स्वरूपाचे प्रश्न या परीक्षेत विचारले जातात. परीक्षेसाठी कोणतेही शुल्क नाही. http://terregreenolympiad.com/ या वेबसाइटवर परीक्षा ऑनलाइन देता येईल.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘अर्ली चाइल्डहूड’ परिषदेचे आयोजन

0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

मुलांचे संगोपन आणि आदर्श शिक्षणपद्धतीविषयी मार्गदर्शन करण्यासाठी ‘अर्ली चाइल्डहूड असोसिएशन‘च्या वतीने ‘पुणे इंटरनॅशनल अर्ली चाइल्डहूड एज्युकेशन’ परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. येत्या २ सप्टेंबराला हॉटेल ग्रँड शेरेटन येथे ही परिषद होणार आहे.
‘महाराष्ट्र टाइम्स’ या परिषदेचा मीडिया पार्टनर आहे. बालवाड्या, शिक्षण क्षेत्रात काम करणाऱ्या संस्था, पालक आणि कॉर्पोरेट क्षेत्राला एकत्र आणण्यासाठी ‘अर्ली चाइल्डहूड असोसिएशन’ कार्यरत आहे. पोद्दार एज्युकेशनल नेटवर्कच्या अध्यक्षा स्वाती वत्स यांनी २०११मध्ये असोसिएशनची स्थापना केली. संस्थेचे सहा हजारांहून अधिक सभासद असून, शिक्षण क्षेत्रातील नव्या बदलांवर आधारीत उपक्रम संस्थेतर्फे आयोजित करण्यात येतात. असोसिएशनतर्फे गेल्या वर्षी ‘लीडरशीप अँड ग्लोबल प्रॅक्टिसेस इन अर्ली चाइल्डहूड एज्युकेशन’ या विषय़ावर परिषद आयोजित करण्यात आली होती. त्याच धर्तीवर आता दुसरी परिषद आयोजित करण्यात आली आहे.
पुढील आठवड्यात होणाऱ्या ‘पुणे इंटरनॅशनल अर्ली चाइल्डहूड एज्युकेशन’ या परिषदेमध्ये विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे मान्यवर उपस्थितांना मार्गदर्शन करणार आहेत. ‘मदर गूज टाइम’च्या आंतरराष्ट्रीय व्याख्यात्या लेसली फाल्कोनर, मंजुश्री पाटील आणि स्वाती वत्स यांसह तज्ज्ञ व्यक्ती मार्गदर्शन करणार आहेत. शिक्षण क्षेत्रातील नामवंत व्यक्ती परिषदेत उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे विविध शैक्षणिक संस्था चालक, स्वयंसेवी संस्थांच्या प्रतिनिधींना एकमेकांशी थेट संवाद साधण्याची संधी मिळणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


आशिया व्यापलेले दैवत

0
0

गणपतीच्या संस्कृतीचा अभ्यास, संशोधन आवश्यक; ढवळीकरांचे मत

म. टा. प्रतिनिधी, पुणे

‘भारतीय कला आणि संस्कृती आशिया खंडात सर्वदूर पोहोचली आहे. आशिया खंडातील अनेक देशांमध्ये गणपतीची मंदिरे आहेत. या परंपरेचा अभ्यास आणि संशोधन करणे गरजेचे असताना आपण काहीच करत नाही. आपल्याला संस्कृती अभ्यासाची जराही चाड असेल तर, हा अभ्यास हाती घ्यायला हवा,‘ असे सडेतोड मत ज्येष्ठ पुरातत्वशास्त्रज्ञ डॉ. म. के. ढवळीकर यांनी सोमवारी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले.
भांडारकर प्राच्यविद्या संशोधन मंदिर संस्थेतर्फे गणेशोत्सवानिमित्त आयोजित उपक्रमांची माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. संस्थेचे डॉ. श्रीकांत बहुलकर, भूपाल पटवर्धन या वेळी उपस्थित होते. गणेश या देवतेची निर्मिती, दोन हजार वर्षांतील विविध टप्पे, संस्कृतीबदल, गणेशाची बदललेली रूपे आणि गणपतीचा प्रसार अशी इतिहास व संस्कृती भान वाढविणारी माहिती ढवळीकर यांनी दिली.
‘काबूल नदीच्या खोऱ्यात राहणाऱ्या हस्तिक जमातीचे हत्ती हे कुलचिन्ह होते. अलेक्झांडर भारतात आला तेव्हा (इ.स.पूर्व ३२६) त्यानेही हत्तीची पूजा केली होती. इसवी सन पूर्व ५०मध्ये ग्रीक साम्राज्यातील हर्म्युसच्या राजाच्या नाण्यावर हत्तीचे चित्र दिसते. इंडो-ग्रीक राजांनी त्याला मानवी रूप दिले,‘ अशी माहिती उपस्थितांनी दिली.
‘गणपती हा एकमेव देव संपूर्ण आशियामध्ये पसरलेला आहे. कुषाणकाळात (इस १०-३००) गणेशाच्या मूर्ती कोरण्यात आल्या. गुप्त काळात (इस ३००-६००) त्याला देवत्व प्राप्त झाले. हिंदू आणि बौद्धधर्मीय जेथे गेले तेथे गणेश मूर्ती सापडतात. गणपतीच्या पूजेला नवव्या शतकात सुरुवात झाली. आम्हाला कार्यात यश मिळू दे, काही विघ्न येऊ नये, असा त्यामागील अर्थ होता,’ याकडे ढवळीकर यांनी लक्ष वेधले. ढवळीकर म्हणाले, ‘अफगणिस्तानातील बेगराम येथे सर्वांत प्राचीन मूर्ती आहेत. देशातील पहिली मूर्ती मथुरेतील कर्झन संग्रहालयात असून, ती दुसऱ्या शतकातील आहे. चीनमध्ये कुहान प्रांतात इ.स. ५२६ मधील एक मूर्ती आहे. गणपती हा पेशव्यांचे कुलदैवत असल्याने अलीकडील काळात मोठा प्रसार झाला.’

गणपतीच्या दुर्मिळ रुपांचे प्रदर्शन
भांडारकर संस्थेत गणेशोत्सवानिमित्त आयोजित प्रदर्शनात गणपतीची चाळीस छायाचित्रे पहायला मिळणार आहेत. आशिया खंडातील विविध देशांमधील गणेशमूर्तींची छायाचित्रे प्रदर्शनात असतील. डॉ. म. के. ढवळीकर यांच्या व्यक्तिगत संग्रहातील ही चित्रे असून, छायाचित्रांसह माहितीचे फलक, गणपतीचे स्थान असलेले नकाशे पाहता येतील. प्रदर्शनाचे उद्घाटन आज, मंगळवारी दुपारी चार वाजता जिल्हाधिकारी सौरभ राव यांच्या हस्ते होणार आहे. स्थानिक आमदार विजय काळे तसेच आमदार मेधा कुलकर्णी या वेळी उपस्थित राहणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सहभागी होण्यासाठी आज अखेरची संधी

0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

लाडक्या गणरायाचे घराघरात आणि सार्वजनिक मंडळांमध्ये आगमन झाले आहे. गणपतीबाप्पाचा हा आनंदसोहळा आणखी रंगतदार करण्यासाठी ‘महाराष्ट्र टाइम्स’तर्फे यंदाही ‘उत्सवमूर्ती सन्मान’ हा अनोखा उपक्रम राबविण्यात येणार आहे. या उपक्रमात सहभागी होण्यासाठी नावनोंदणी करण्याची आज, मंगळवारी अखेरची संधी आहे.
सार्वजनिक मंडळे दर वर्षी उत्सवाची शान वाढवतात. म्हणूनच, सार्वजनिक गणेश मंडळांना व्यापक व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासह त्यांच्या प्रयत्नांना प्रोत्साहन देण्यासाठी उत्सवमूर्ती सन्मान हा उपक्रम आयोजित केला आहे. यंदा या उपक्रमाचे तिसरे वर्ष आहे. सर्वोत्तम गणेशमूर्ती, इको-फ्रेंडली गणेशमूर्ती, सर्वोत्तम मंडळ आणि सर्वाधिक भेट दिले जाणारे मंडळ अशा विविध गटांमध्ये स्पर्धा होणार आहे. इच्छुक मंडळांनी सहभागासाठी ‘मटा’च्या गोपाळकृष्ण गोखले रस्त्यावरील कार्यालयात येऊन, प्रवेश अर्ज भरून नावनोंदणी करावी.
अधिक माहितीसाठी संपर्क ८७९६१८१८३६ या क्रमांकावर संपर्क साधावा. गणेश मंडळांना www.mtganeshutsav.com या वेबसाइटवरून उत्सवमूर्ती सन्मान स्पर्धेसाठीचे अर्ज डाउनलोड करून घेता येतील. इन्स्टाग्रामवर #mtganeshutsav येथेही फोटो अपलोड करू शकता.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आर्थिक विघ्ने झाली दूर

0
0

‘स्पॉन्सर’मुळे मंडळांचा भार हलका; कमानींवरही भर

म. टा. प्रतिनिधी, पुणे

गणेशोत्सवाचे अर्थकारण दिवसेंदिवस बदलत असून, वर्गणी गोळा करण्यासाठी गल्लीबोळात फिरण्याऐवजी ‘स्पॉन्सर’ मिळवून सर्व खर्च करण्याचा गणेश मंडळांचा कल वाढत आहे. यंदाच्या गणेशोत्सवात नोटाबंदी आणि जीएसटीमुळे ‘स्पॉन्सर’ मिळविण्यात विघ्न येईल, असा अंदाज बांधण्यात आला होता; मात्र, विघ्नहर्ता गणरायाने हे विघ्न दूर केल्याने गणेश मंडळांचा आर्थिक भार कमी झाला आहे. शिवाय पालिकेच्या निवडणुकांनंतर आता स्थानिक नेत्यांकडूनही ‘व्होट बँक’ पक्की करण्यासाठी हातभार लावण्यात आल्यामुळे गणेश मंडळांची सजावट आणि दैनंदिन खर्चाची विवंचना दूर झाली आहे.
केंद्र सरकारने नोटाबंदी आणि जीएसटी हे महत्त्वपूर्ण निर्णय घेतल्याने गणेश मंडळांना स्पॉन्सर मिळतील की नाही, अशी चिंता वाटत होती. मात्र, शहरातील प्रमुख मंडळांना स्पॉन्सरची कमतरता भासली नसल्याचे दिसून येत आहे. अनेक मोठ्या मंडळांसमोरील रस्ते कंपन्यांच्या जाहिरात कमानींनी व्यापले आहेत. मात्र, त्या तुलनेत लहान मंडळांना वर्गणी मिळविण्यासाठी पायपीट करण्याची वेळ आली. जाहिरातबाजीत मोबाइल कंपन्यांनी आघाडी घेतली आहे. त्या पाठोपाठ सराफी दुकानांच्या जाहिराती मोठ्या प्रमाणात झळकताना दिसत आहेत. बांधकाम व्यावसायामध्ये सध्या मंदीची लाट असल्याने त्यांच्या जाहिराती नजरेसही पडत नाहीत.
वर्गणी आणि देणगीच्या माध्यमातून जमा होणारे भांडवल तुटपंजे असल्याने आर्थिक खर्च भागविण्यासाठी मंडळांनी कमानींशिवाय अहवाल आणि आकर्षक स्मरणिका तयार करून त्याद्वारे निधी गोळा करण्यावरही भर दिला आहे. स्थानिक दुकानदारांबरोबरच बँका, कंपन्या यांच्या जाहिराती मिळवून खर्चाचा भार हलका करण्यात येत आहे. पूर्वी वर्गणी गोळा करण्यासाठी गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांना गल्लीबोळात फिरत राहावे लागत असे. हे चित्र यंदाच्या उत्सवात कमी प्रमाणात दिसून येत आले. सध्याचे युग हे मार्केटिंगचे असल्याने मंडळांकडून त्यावर भर दिला जातो. मंडळांकडून करण्यात येणाऱ्या समाजहिताच्या उपक्रमांची माहिती लोकांपर्यंत पोहोचविण्यात येत आहे. ती माहिती पाहूनही देणगी मिळविण्यात येत आहे. काही मंडळे नवसाला पावणारा गणपती अशी जाहिरात करून त्याद्वारे ​मिळणाऱ्या उत्पन्नातून दैनंदिन खर्च भागवित आहेत.
पालिकेची निवडणूक यंदा पार पडल्यामुळे स्थानिक नेतेमंडळींनी यंदा ‘व्होट बँक’ पक्की करण्यावर भर दिला आहे. त्यांच्याकडून देण्यात येणाऱ्या मदतीमुळे अनेक मंडळांना दैनं​दिन खर्च भागविणे सोपे झाले आहे. गेल्यावर्षीच्या गणेशोत्सावात राजकारणी मंडळींनी तिकीट मिळण्याचा भरवसा नसल्याने फारसा हात ढिला केला नव्हता. मात्र, यंदाच्या गणेशोत्सवात निवडून आलेले आणि थोडक्यात पराभव झालेले सर्वच जण मतदारांच्या मनात घर पक्के करण्यासाठी सढळ हाताने मदत करत आहेत. त्यामुळे देखावे, मिरवणूक आदींचा खर्च भागविण्यासाठी मंडळांना फारसे कष्ट घ्यावे लागत नसल्याचे चित्र आहे.

बौद्धिकांचा यंदा अभाव
पूर्वी गणेशोत्सवात स्थानिक कलावंतांच्या कलागुणांना वाव मिळत असे. मनोरंजनाचे कार्यक्रम, व्याख्यानमाला भरविल्या जात असत. हे चित्र यंदाच्या गणेशोत्सवात फारसे दिसत नाही. त्याऐवजी स्पॉन्सर मिळवून आकर्षक सजावट करण्याकडे कल आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आजपासून होणार रस्तेवाहतुकीत बदल

0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

गणेशोत्सवामध्ये साधारणपणे पाचव्या दिवसापासून देखावे पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी होते. या पार्श्वभूमीवर शहराच्या मध्यवस्तीतील रस्ते वाहतुकीत आज, मंगळवारपासून बदल करण्यात आला आहे. शिवाजी रस्ता आणि अप्पा बळवंत चौक ते बुधवार चौक या दरम्यानचा रस्ता सायंकाळी पाच वाजतापासून रात्री गर्दी संपेपर्यंत बंद राहणार आहे. विसर्जनाच्या दिवसापर्यंत हा बदल कायम राहणार आहे.
गणेशोत्सवास प्रारंभ होऊन जवळपास सर्वच गणेश मंडळांचे देखावे नागरिकांसाठी खुले झाले आहेत. त्यामुळे आता देखावे पाहण्यासाठी गणपतीचे दर्शने घेण्यासाठी नागरिक घराबाहेर पडतील. शहरातील मुख्यत्वे मानाच पाच गणपती श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती आणि अखिल मंडई गणपती उत्सव मंडळ या ठिकाणी दर्शनासाठी मोठ्या प्रमाणावर रांगा लागलेल्या असतात. त्याबरोबरच आसपासच्या पेठांमध्येही देखावे पाहण्यासाठी गर्दी होते. मात्र, या गर्दीमुळे शिवाजी रस्ता, बाजीराव रस्ता व लक्ष्मी रस्ता या रस्त्यांवरील वाहतुकीवर परिणाम होतो. त्यामुळे या भागातील रस्ते गर्दीच्या वेळेत रस्ते बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. लक्ष्मी रस्त्याकडून बेलबाग चौकातून शिवाजी रस्त्याने स्वारगेटकडे जाणाऱ्या वाहनांना बंदी असणार आहे. पाचव्या, सातव्या आणि नवव्या दिवशी विसर्जनस्थळी पार्किंग व्यवस्था करण्यात आली आहे.

पर्यायी रस्ते
- शिवाजीनगरवरून स्वारगेटकडे जाणाऱ्या वाहनांनी जंगली महाराज रस्ता-टिळक रस्ता मार्गे जावे.
- शिवाजीनगरवरून चारचाकी वाहनांना जूना बाजार-मालधक्का मार्गे नेहरू रस्त्याने सेव्हन लव्हज हॉटेल चौक येथून स्वारगेटकडे जाता येईल.
- अप्पा बळवंत चौकातून बुधावर चौकाकडे जाणाऱ्या वाहनांनी बाजीराव रस्त्याने शनिवारवाड्या वळसा घेऊन जिजामाता चौकातून फडके हौद चौक मार्गे जावे.
- लक्ष्मी रस्त्यावरून स्वारगेटकडे जाणाऱ्या वाहनांनी हमजेखान चौकातून डावीकडे वळून महाराणाप्रताप रस्त्याने जावे.

पार्किंगची ठिकाणे
- विमलाबाई गरवारे कॉलेज, कर्वे रस्ता
- पुलाचीवाडी, नदीपात्र
- दारुवाला पूल ते खडीचे मैदान, सोमवार पेठ
- काँग्रेस भवन ते मनपा भवन
- व्होल्गा चौक (लक्ष्मीनारायण थिएटर) ते मित्र मंडळ चौक
- कुंभारवेस ते गाडगी‍ळ पुतळा
- टिळक पूल ते भिडे पूल (नदीपात्र)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पिंपरी शहरात प्रथमच जीएसबी गणेशोत्सव

0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

फुलांची आकर्षक सजावट...फुलांचा दरवळणारा सुवास... अवीट गोडीची भजने..भजनांच्या जोडीला मंत्रजागर अशा पवित्र आणि भक्तिमय वातावरणाचा दररोज अनुभव पिंपरी चिंचवडकर घेत आहेत. निमित्त आहे, गौड सारस्वत ब्राह्मण समाजातर्फे आयोजित पहिल्यावाहिल्या गणेशोत्सवाचे...
पिंपरी चिंचवड महापालिकेच्या रंगास्वामी पेरूमल सभागृहात या गणेशोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.जीएसबी समाज कोकण किनारपट्टी ते केरळ किनारपट्टीलगत वसलेला समाज असून, त्यामध्ये व्यावसायिकांची संख्या मोठी आहे. या समाजात विविध समृद्ध परंपरा आणि प्रथा आहेत. मुंबईच्या जीएसबी मंडळाचा गणेशोत्सव जगप्रसिद्ध आहे. लाखो गणेशभक्त या गणेशोत्सवाला भेट देतात.
पुण्यामध्येही या समाजातील नागरिकांची संख्या मोठी आहे. पुण्यात बाबू राव यांच्या नेतृत्वाखाली विविध उपक्रम राबविण्यात येतात. यंदा प्रथमच पुण्यातही गणेशोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला. हा गणेशोत्सव पाच दिवस साजरा करण्यात येणार आहे. ‘ उत्सवादरम्यान गणा होम, रंग पूजा, मुदा गणपती सेवा असे विशेष जीएसबी रितीरिवाज अनुभवता येणार आहेत. एडागुंजी वेदमूर्ती मंजुनाथ विठ्ठल भट यांच्या मार्गदर्शनाखाली दैनंदिन पूजाअर्चा करण्यात येत आहे. भजनसेवेत पं. भीमसेन जोशी यांचे शिष्य पं. उपेंद्र भट यांच्यासह अनेक कलाकारांचा समावेश आहे. सर्व भक्तांसाठी नाश्ता, प्रसादाचीही सोय करण्यात आली आहे,’ अशी माहिती भारतीय हवामानशास्त्र विभागातील वरिष्ठ अधिकारी डॉ. डी. एस. पै यांनी दिली.
यंदाच्या गणेशोत्सवाची जबाबदारी जीएसबी सभेच्या पुण्याच्या नवनियुक्त कार्यकारिणीने पेलली आहे. प्रकाश ल. किणी सभेचे अध्यक्ष तर, रामदास आर. पै सचिव म्हणून काम पाहात आहेत. त्यांना अनंत शेणॉय, सासंग पै, वसंत शेणॉय यांची मदत होत आहे. या पुढे दर वर्षी हा उत्सव साजरा करण्याचा निर्णय समितीने घेतला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images