Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

विघ्नं दूर कर रे गणराया; मुख्यमंत्र्यांचं साकडं

0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
भक्तीमय वातावरणाने भारावलेल्या पुण्यनगरीतील मानाच्या गणपतींचे दर्शन घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी बाप्पा मोरयाचा जयघोष केला. राज्य आणि देशापुढील सर्व विघ्ने दूर करण्याचे साकडे गणरायाला घालून नवभारताची संकल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी सर्वांनी संघटित व्हावे, असे आवाहनही त्यांनी केले.

ग्रामदेवता कसबा गणपतीपासून फडणवीस यांनी सायंकाळी मानाच्या गणपतींच्या दर्शनास सुरुवात केली होती. महापौर मुक्ता टिळक, पालकमंत्री गिरीश बापट, राज्यमंत्री दिलीप कांबळे, खासदार अनिल शिरोळे, शहराध्यक्ष योगेश गोगावले, आमदार माधुरी मिसाळ, स्थायी समितीचे अध्यक्ष मुरलीधर मोहोळ, सभागृह नेते श्रीनाथ भिमाले आदी उपस्थित होते.

तांबडी जोगेश्वरी मंडळांच्या गणपतीचे दर्शन घेताना मुख्यमंत्र्यांना पाहण्यासाठी नागरिकांची झुंबड उडाली. त्यानंतर श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंडळाच्या रोषणाईचे त्यांनी उद्‌घाटन केले. या वेळी त्यांनी पुणेकरांना गणेशोत्सवाच्या शुभेच्छाही दिल्या. नगरसेवक हेमंत रासने, मंडळाचे अशोक गोडसे, महेश सूर्यवंशी, उल्हास भट आदी उपस्थित होते. या प्रसंगी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ‘श्रीं’ची आरती करण्यात आली.

देश आणि राज्यापुढील विघ्ने दूर करण्याची शक्ती सर्वांना द्यावी, अशी प्रार्थना गणपतीबाप्पाला केल्याचे फडणवीस म्हणाले. सार्वजनिक गणेशोत्सवाचे १२५ वर्ष साजरे करताना सांस्कृतिक नगरीतील मानाच्या गणपतींचे दर्शन घेण्याचा योग प्राप्त झाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील भ्रष्टाचार, दहशतवाद, जातिवाद मुक्त भारताची संकल्पना मांडली आहे. त्यासाठी सर्वांनी संघटित झाले पाहिजे. गणेशोत्सवाच्या शतकोत्तर रौप्य महोत्सवानिमित्त सर्व गणेशभक्तांनी या संकल्पनेत सहभागी व्हावे, असे आवाहनही त्यांनी केले. श्रीमंत दगडूशेठ गणपती मंडळाच्या रोषणाईच्या उद्घाटनानंतर मुख्यमंत्र्यांनी गुरुजी तालीम आणि तुळशीबाग आणि केसरीवाडा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या मानाच्या गणपतींचे दर्शन घेतले.

बापटांकडे स्नेहभोजन

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या धावत्या भेटीनंतर पालकमंत्री गिरीश बापट यांच्याकडे भोजन घेतले. गेल्या काही काळात शहर भाजपमध्ये सुरू असलेल्या राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर या स्नेहभोजनाची चर्चा पक्षात चांगलीच रंगली होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


चैतन्यमयी वातावरणात आले गणराय

0
0

पारंपरिक वाद्यांचा निनाद, बाप्पाच्या जयघोषात पुणेकरांचा मिरवणुकांमध्ये उस्फूर्त सहभाग

म. टा. प्रतिनिधी, पुणे
ढोल-ताशांचा नाद आसमंती भिडला तसा स्वागतासाठी हजर झालेला वरुणराजा, त्याच्या साथीने बेभान होऊन ढोल-ताशांचा गजर करणारी तरुणाई, सनई-चौघड्यांचे मंगलमयी सूर आणि धुप, उदबत्त्यांच्या मंद सुवासात हजारो फुलांची आरास केलेल्या रथात विराजमान झालेले बाप्पा.. अशा चैतन्यमय वातावरणात मानाच्या गणपतींची प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली. रिमझिम पावसातही उत्साह ढळू न देता पुणेकरांनी मिरवणुकांमध्ये उस्फूर्त सहभाग घेतला.

बाप्पाच्या आगमनासाठी काढण्यात आलेल्या भव्य मिरवणुकांमुळे सकाळपासूनच मध्यवस्तीतील परिसरात तरुणाईच्या उत्साहाला उधाण आले होते. मिरवणुकांमध्ये रंग भरणार बँड आणि ढोल-ताशा पथकांनी सुरेल ठेक्यांचे सादरीकरण करत पुणेकरांची मने जिंकली. मध्येच पावसाच्या हलक्या सरी कोसळत असतानाही ढोलाच्या ठेक्यांचा गोडवा मात्र कमी होत नव्हता. आसमंती घुमणाऱ्या या आवाजाने खऱ्या अर्थाने सार्वजनिक गणेशोत्सवाच्या शतकोत्तर रौप्य महोत्सवी वर्षाचा श्रीगणेशा झाला. मानाचे पाच गणपती आणि त्यांच्यासह श्रीमंत दगडूशेठ हलवाई, अखिल मंडई मंडळ, भासाहेब रंगारी, बाबू गेनू, जिलब्या मारुती या मंडळांनी भव्यदिव्य अशा मिरवणूक सोहळ्याचे आयोजन केले होते.

कसबा गणपती

मानाच्या पहिल्या कसबा गणपतीची चांदीच्या पालखीतून वाजतगाजत मिरवणूक सकाळी नऊ वाजता सुरू झाली. कसबा मंदिरापासून मिरवणूक लोखंडे तालीम येथे दाखल झाली. तेथून अप्पा बळवंत चौक, फरासखाना पोलिस ठाण्यासमोरून शिवाजी रस्त्याने मिरवणूक मंदिराकडे मार्गस्थ झाली. मिरवणुकीमध्ये देवळणकर बंधुंचे नगारावादन, शिवतेज, श्रीराम ही ढोल पथके, तसेच प्रभात बँड आदी वाद्यवृंद सहभागी झाले होते. यंदा पहिल्यांदाच नवीन मराठी शाळेच्या विद्यार्थ्यांचे पथक मिरवणुकीत सहभागी झाले होते. सकाळी साडेअकराच्या सुमारास सांगलीचे संभाजी भिडे गुरुजी यांच्या हस्ते श्रीं ची प्रतिष्ठापना करण्यात आली.

तांबडी जोगेश्वरी

मानाच्या दुसरा गणपती तांबडी जोगेश्वरी मंडळाची मिरवणूक सकाळी सव्वा दहाच्या सुमारास मंदार लॉज येथून सुरू झाली. यंदा मंडळाचे शतकोत्तर रौप्य महोत्सवी वर्ष असल्याने श्रींची मूर्ती चांदीच्या पालखीत विराजमान करण्यात आली होती. लोखंडे तालीम, कुंटे चौक, लक्ष्मी रस्त्यावरून गणपती चौक मार्गे जोगेश्वरी सभामंडपापर्यंत मिरवणूक काढण्यात आली होती. मिरवणुकीत आढाव बंधू यांचे नगारा वादन, न्यू गंधर्व ब्रास बँड आणि शिवमुद्रा, तसेच ताल ढोल-ताशा पथकांचे वादन झाले. उद्योजक समीर शाह यांच्या हस्ते ‘श्री’ची प्रतिष्ठापना दुपारी दीडच्या दरम्यान करण्यात आली.

गुरुजी तालीम

ढोल ताशांच्या गजरात मानाचा तिसरा गणपती गुरुजी तालीम मंडळाने श्रींची भव्य मिरवणूक काढली. सकाळी १० वाजता गणपती चौकातून मिरवणुकीला सुरुवात झाली. लिंबराज चौक, आप्पा बळवंत चौक, जोगेश्वरी चौक, बुधवार चौक, बेलबाग चौकामार्गे गणपती चौक असा मिरवणुकीचा मार्ग होता. नादब्रम्ह, गर्जना, शिवगर्जना आणि गुरुजी प्रतिष्ठान या ढोल पथकांनी मिरवणुकीत रंग भरले. आकर्षक अशा सुगंधी फुलांच्या रथात गणरायाची देखणी मूर्ती विराजमान झाली होती. मंडळाच्या श्रींची प्रतिष्ठापना दुपारी एकच्या सुमारास सुकेन शहा यांच्या हस्ते करण्यात आली.

तुळशीबाग गणपती

मानाच्या चौथ्या तुळशीबाग गणपती मंडळाची मिरवणुकही वाजतगाजत काढण्यात आली. गणपती चौक, नगरकर तालीम चौक, अप्पा बळवंत चौक, जोगेश्वरी मंदीर, बुधवार चौक, बेलबाग चौक, गणपती चौक मार्गे मिरवणूक सभामंडपात मिरवणुकीची सांगता झाली. मिरवणुकीमध्ये लोणकर बंधूंच्या नगारा वादनामुळे उत्साह भरला. नुमवि, नादब्रम्ह, श्री महादुर्गा आणि उगम या ढोल-ताशा पथकांनी सहभाग घेतला होता. जाई-जुई, झेंडू, आणि गुलछडीच्या फुलांनी सजविलेल्या रथातून श्रींची मिरवणूक काढण्यात आली. दुपारी साडेबाराच्या सुमारास डेक्कन महाविद्यालयाचे माजी कुलपती डॉ. गो. बं. देगलुकर यांच्या हस्ते श्रीं ची प्रतिष्ठापना करण्यात आली.

केसरीवाडा

मानाच्या पाचव्या केसरीवाडा गणेश मंडळाची मिरवणूक सकाळी नऊ वाजता गोखले यांच्या मूर्ती कार्यशाळेपासून ते केसरीवाड्यापर्यंत काढण्यात आली. या वेळी ढोल-ताशा, हलगी आणि तुतारीचा आवाज, तसेच बिडवे बंधू यांच्या सनई चौघडा वादनाने रंगत आणली. मिरवणुकीत श्रीराम ढोल पथक सहभागी झाले होते. डॉ. दीपक टिळक यांच्या हस्ते श्रींची प्रतिष्ठापना करण्यात आली.

श्रीमंत दगडूशेठ हलवाई

डोळ्यांचे पारणे फेडणारी श्रींची मूर्ती त्यावर चढवलेले सोन्याचे अलंकार, आकर्षक फुलांनी सजवलेल्या रथात विराजमान बाप्पा आणि कार्यकर्त्यांच्या जयघोष अशा मंगलदायी वातावरणात श्रीमंत दगडूशेठ हलवाई ट्रस्टच्या श्रींची मिरवणूक पार पडली. दगडूशेठ मंदिरापासून निघालेली मिरवणूक तांबडी जोगेश्वरी मंदिर, अप्पा बळवंत चौक, नगरकर तालीम चौक, शनिपार चौक, टिळक पुतळा मंडई मार्गे उत्सव मंडपात संपन्न झाली. मिरवणुकीमध्ये नगारा, मानिनी हे महिलांचे ढोल-ताशा पथक, दरबार बँड, प्रभात बँड सहभागी झाले होते. ब्रह्मणस्पती मंदिरातील प. पू. पीरयोगी श्री गणेशनाथ महाराज, गोरक्षनाथ मठ, त्र्यंबकेश्वर यांच्या हस्ते सकाळी १० वाजण्याच्या सुमारास विधीवत श्रींची प्राणप्रतिष्ठापना झाली.

भाऊसाहेब रंगारी

श्रीमंत भाऊसाहेब रंगारी मंडळाच्या श्रींची मिरवणूक सकाळी ८.४५ वाजता भाऊ रंगारी भवनापासून निघाली. १२६ वर्षे जुन्या अशा आकर्षक रथात श्रींची मूर्ती विराजमान झाली होती. फरासखाना, अप्पा बळवंत चौक, फुटका बुरूज मार्गे साडे अकराच्या सुमारास पुन्हा भवनात दाखल झाली. मिरवणुकीत खळदकर बंधूंचे चौघडा वादन व श्रीराम, सामर्थ्य, तालगर्जना अशी पथके सहभागी झाली होती. दुपारी बाराच्या सुमारास मंडळाच्या पदाधिकाऱ्यांच्या हस्ते श्रींची प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली.

अखिल मंडई मंडळ

अखिल मंडई मंडळाच्या शारदा गजाननाच्या मनमोहक श्रींच्या मूर्तीची भव्य मिरवणुक सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास सुरू झाली. आकर्षक आणि सुगंधित फुलांनी सजलवलेल्या रथात बाप्पांची स्वारी वाजतगाजत रामेश्वर चौकामार्गे टिळक पोलिस चौकी, गोटीराम भय्या चौक मार्गे पुन्हा मंडई येथील मंडपात आली. दुपारी साडे बाराच्या सुमारास आळंदी देवस्थानचे विश्वस्त अजित कुलकर्णी आणि त्यांच्या पत्नी गीता कुलकर्णी यांच्या हस्ते श्रींची प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली. मंडळाचे ट्रस्टी आणि कार्यकारी मंडळ या वादातून आम्हाला पोलिसांमार्फत श्रींच्या प्राणप्रतिष्ठापना सोहळ्यात सहभागी होऊ दिले नाही, त्यामुळे आम्ही मंडपाच्या बाहेरूनच गणरायाची पूजा केली, असे राजन काची यांनी सांगितले.

बाबूगेनू मंडळ

हुतात्मा बाबूगेनू मंडळाच्या श्रींच्या मिरवणुकीला सकाळी १० वाजता प्रारंभ झाला. महात्मा फुले मंडई, शनिपार चौक, लिंबराज महाराज चौक, अप्पा बळवंत चौक, दत्त मंदिर मार्गे मिरवणूक सभामंडपात दाखल झाली. रुद्रगर्जना, नादब्रह्म, शिवतेज ग्रुप, श्रीराम पथक ही पथके सहभागी झाली होती. माजी नगरसेवक शिवा मंत्री व उद्योजक सौरभ कुलकर्णी यांच्या हस्ते दुपारी एक वाजता श्रींच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दहावीच्या फेरपरीक्षेचा निकाल दोन दिवसांत?

0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाद्वारे इयत्ता दहावीच्या फेरपरीक्षेचा निकाल येत्या एक ते दोन दिवसांत जाहीर होण्याची शक्यता आहे. या विद्यार्थ्यांना प्रवेशाची संधी व्हावी, या उद्देशाने दहावीनंतर प्रथम वर्ष पदविका इंजिनीअरिंग अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी २८ ते २९ ऑगस्ट या कालावधीत प्रवेश फेरी घेण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे बारावीनंतर प्रथम वर्ष पदविका इंजिनीअरिंग अभ्यासक्रम, एचएससी थेट द्वितीय वर्ष पदविका अभियांत्रिकी अभ्यासक्रमाचे प्रवेश संस्थांवर होण्यासाठी प्रवेश फेरी होणार आहे.
सर्व व्यावसायिक अभ्यासक्रमांची प्रवेशप्रक्रिया पूर्ण झाली आहे. मात्र, अजूनही कॉलेजांमध्ये प्रवेशाच्या रिक्त जागा राहिल्या आहेत. या रिक्‍त जागांवर प्रवेश कॉलेज स्तरावर भरण्यासाठी राज्य सरकारने परवानगी द्यावी, असा प्रस्ताव तंत्रशिक्षण विभागाने पाठविला होता. त्यास सरकराने मुभा दिली असून, या सर्व अभ्यासक्रमांच्या प्रवेशप्रक्रिया राबविण्यात येत आहे. प्रथम वर्ष इंजिनीअरिंग, औषधनिर्माणशास्त्र, वास्तुशास्त्र, हॉटेल मॅनेजमेंट अँड केटरिंग टेक्नॉलॉजी या पदवी अभ्यासक्रमाच्या संस्थास्तरावरील रिक्त जागा भरण्यासाठी २८ ऑगस्टपर्यंत प्रवेशप्रक्रिया होणार आहे. एसएससी थेट द्वितीय वर्ष पदविका इंजिनीअरिंग अभ्यासक्रमाच्या प्रवेशाची फेरी २८ व २९ ऑगस्ट रोजी होईल. दहावी फेरपरीक्षेचा निकाल २८ ऑगस्ट रोजी जाहीर होण्याची शक्यता आहे. या विद्यार्थ्यांनाही प्रवेशासाठी अर्ज करता येणार आहे. ज्यांनी यापूर्वी अर्ज भरला आहे, पण काही कारणास्तव प्रवेश घेतला नाही. त्या विद्यार्थ्यांना अर्ज करण्याची संधी असल्याचे तंत्रशिक्षण विभागाने कळविले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रामटेकचा अठराभुज गणेश

0
0

स्लग ः विदर्भातील अष्टविनायक
--
रामटेकचा अठराभुज गणेश
--
उज्ज्वल भोयर
---
विदर्भातील अष्टविनायकांपैकी एक असलेला रामटेकचा अठराभुज गणेश हा भाविकांच्या श्रद्धेचे स्थान आहे. नवसाला पावणारा अशी श्रद्धा असल्याने गणेशोत्सवादरम्यान अवघ्या विदर्भातून भाविक दर्शनासाठी येतात. रामटेक येथील एका ब्राह्मणाला दृष्टांत देऊन आपण बाजूच्याच नदीत असल्याची माहिती दिली. स्थापना करा, असेही सांगितले. त्यानुसार शोध घेण्यात आला असता अठरा हात असलेली गणेश मूर्ती सापडली. ती स्थापन करण्यात आली, अशी आख्यायिका सांगितली जाते.
सोळाव्या शतकात राजे रघुजी भोसले यांनी या मंदिराचा जीर्णोद्धार केला. मंदिरात तीन गाभारे असून सर्व ठिकाणी गणेश मूर्ती आहेत. मध्यभागी महागणपतीची साडेपाच फूट उंच मूर्ती आहे. उजव्या बाजूला ऋद्धी-सिद्धी गणेश व डाव्या बाजूला अठरा भुजा असणारी गणेश मूर्ती आहे. भारतात ही मूर्ती दुर्मीळ असल्याची नोंद इतिहासात आहे. डोक्यावर केशसंभार असून तो नागांनी बांधलेला आहे. कंबरबंधातही नाग आहेत. या मूर्तीच्या प्रत्येक भुजांचे वेगळे महत्त्व आहे. एक भुजा अभय मुद्रेत असून दुसऱ्या हातात मोदक आहे. त्याच्या बाजूच्या हातामध्ये लेखणी असल्याने विद्यार्थ्यांनी या गणेशाची पूजा केली तर त्यांना याचा लाभ होतो, अशीही आख्यायिका आहे. इतर हातांमध्ये शस्त्र असून त्यात गदा, बाण, पाल, तोमर, मुदगल, उसळ, अंकुश, सूल, परिघ यांचा समावेश आहे.
मंदिराचे बांधकाम झाल्यानंतर अनेक वर्षे कुणीही याकडे लक्ष दिले नाही. त्यामुळे मंदिराच्या भिंती पडक्या स्थितीत होत्या. २० वर्षांपूर्वी अगस्थी मुनी आश्रमाचे महंत गोपालदास महाराज यांनी या मंदिराच्या संरक्षक भिंती तसेच इमारतीची डागडुजी केली होती; परंतु देखभाल होत नसल्याने परत याकडे दुर्लक्ष झाले होते. पाच वर्षांपूर्वी गावातील काही युवकांनी अठरा भुजा गणेश मंडळाची स्थापना करून या मंदिराची देखभाल करण्यास सुरुवात केली. तीन वर्षांपासून या मंदिराचे नूतनीकरण करण्यात येत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

त्रिगुणेश्वर मांदार गणपती

0
0

स्लग ः आराध्य
---
---
‘आराध्य’ ही मल्हार प्रॉडक्शनने निर्माण केलेली वेबसीरीज. या अंतर्गत ओळखीच्या गणेश मंदिरांचा फारसा माहीत नसलेला इतिहास मांडण्यात येणार आहे. मंदिरांचा इतिहास, वैशिष्ट्ये यांची माहिती देणारे हे खास सदर. ‘महाराष्ट्र टाइम्स’ या उपक्रमाचा ‘मीडिया पार्टनर’ आहे.
--
कसबा गणपती मंदिरात इस्लामपूरकर हे कीर्तन करत होते. त्या वेळी ‘समोरच्या घरात मांदार वृक्षात मी आहे,’ असा त्यांना दृष्टांत झाला. ते तेथे गेले, तेव्हा मांदार वृक्ष दुभंगला आणि मोठा आवाज होऊन गणेशाच्या तीन मूर्ती बाहेर आल्या. त्यामुळे याला त्रिगुणेश्वर मांदार असे नाव मिळाले. पांढऱ्या रुईच्या वृक्षाला मांदार वृक्ष म्हणतात. हे मंदिर कसबा पेठेत घर क्रमांक १४४ येथे आहे.
दृष्टांतानुसार सापडलेल्या तीन गणेश मूर्तींची मिळून एक मूर्ती बनवली गेली आहे. सुमारे २ फूट उंचीची ही गणेश मूर्ती चतुर्भुज आहे. दोन हात गुडघ्यावर, तर दोन हात खांद्यावर दिसतात. मूर्तीची सोंड लंबाकृती असून मांडीवर उपरणे परिधान केलेले दिसते. मन प्रसन्न करणारी अशी ही गणेश मूर्ती आहे. आजही दर गणेश चतुर्थीला कसबा गणपती मंदिरातून मांदार गणपतीला नैवेद्याचे ताट दिले जाते.

या भागाचा व्हिडिओ खालील लिंकवर गेल्यास पाहता येईल.
https://youtu.be/XBsbs_EiCLc

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सलग दुसऱ्यांदा ढोलवादन रद्द

0
0

आवश्यक परवानग्या न मिळाल्याने उपक्रम पुढे ढकलण्याची नामुष्टी

म. टा. प्रतिनिधी, पुणे

सार्वजनिक गणेशोत्सवाच्या शतकोत्तर रौप्य महोत्सवी वर्षाचे औचित्य साधून महापालिकेच्या वतीने आयोजित विश्वविक्रमी ढोलवादनाचा कार्यक्रम दुसऱ्यांदा पुढे ढकलण्यात आला आहे. उपक्रमासाठी आवश्यक परवानग्या न मिळाल्याचे कारण पालिकेतर्फे पुढे करण्यात आले आहे. पूर्वनियोजनानुसार रविवारी (२७ ऑगस्ट) हा कार्यक्रम आयोजिण्यात आला होता.
सार्वजनिक गणेशोत्सवाला यंदा १२५ वर्षे पूर्ण झाली. त्या निमित्त पालिकेच्या वतीने विविध उपक्रम राबविले जात आहेत. विद्यार्थ्यांकडून शाडू मातीची गणेश मूर्ती साकारणे, बाइक रॅली, पाच हजार ढोलांचे वादन आदींचा त्यात समावेश होता. ढोलवादनासाठी प्रारंभी एस. पी. कॉलेजच्या मैदानाचा विचार झाला. मात्र त्याला विरोध झाल्याने भोसलेनगर येथील कृषि महाविद्यालयाच्या मैदानाचा विचार सुरू झाला. मात्र, पोलिसांनी या दोन्ही जागांसाठी परवानगी नाकारल्याने बालेवाडी येथील श्री छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियममध्ये हा उपक्रम घेण्याचे ठरविण्यात आले. त्यासाठी आवश्यक असलेल्या परवानग्या काढण्यात आल्या होत्या. पोलिसांसह ढोलताशा महासंघाबरोबर चर्चा करुन ही जागा निश्चित करण्यात आली होती.
या कार्यक्रमाचे जोरदार नियोजन सुरू होते. ढोलांची नोंदणी करुन त्यांच्याकडून सरावही सुरू होता. या कार्यक्रमासाठी पालिकेच्या वतीने ४० लाख रुपये खर्चण्यात येणार होते. या पूर्वी कोल्हापूर येथे एकाच वेळी १६०० ढोल वादनाचा विक्रम करण्यात आला आहे. हा विक्रम मोडीत काढून नवीन विक्रम प्रस्थापित करण्याची तयारी प्रशासनाने केली होती. बालेवाडी येथे रविवारी सायंकाळी साडेचार वाजता केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते या उपक्रमाचे उद्घाटन होणार होते. मात्र, पा‌लिकेने जागा बदलल्याने त्यासाठीची तांत्रिक तयारी पूर्ण करण्यात अपयश आल्याने हा कार्यक्रम रद्द करून पुढे ढकलण्यात आल्याचे पालिकेच्या वतीने कळविण्यात‌ आले.

ढोलपथकांची होणार अडचण
गणेशोत्सवाला सुरुवात झाल्यानंतर पहिले दोन ते तीन दिवस ढोलताशा पथकांचे कोणत्याही गणेश मंडळासमोर वादन नसते. त्यामुळे पालिकेने केलेल्या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद देऊन अनेक पथकांनी विश्वविक्रमी उपक्रमात उपक्रमात सहभागी होण्याची तयारी दाखविली होती. मात्र, परवानगी न मिळाल्याने हा उपक्रम ३ सप्टेंबरला घेण्याचा विचार पालिकेने सुरू केला आहे. हा दिवस उत्सवातील दहावा दिवस असल्याने बहुतेक गणेश मंडळे ढोल पथकांचे स्थिरवादन ठेवतात. त्यामुळे आता पालिकेला विश्वविक्रम करण्यासाठी आवश्यक असलेले पाच हजार ढोल वादक मिळतील का? अशी शंका निर्माण झाली आहे.

ढोलवादनासाठी आवश्यक तांत्रिक परवानग्या न मिळाल्याने हा उपक्रम काही दिवस पुढे ढकलण्यात आला आहे. विश्वविक्रम करण्यासाठी गणेशोत्सवाच्या काळातच हा उपक्रम करण्याचा प्रयत्न राहील.
मुरलीधर मोहोळ, अध्यक्ष, स्थायी समिती

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दीड दिवसांच्या बाप्पाला निरोप

0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

सनईचे मंगल सूर आणि वाद्यांच्या गजरात आलेल्या गणरायाने पहिल्याच दिवशी घराघरातील वातावरणात चैतन्याचे रंग भरले. अनेकांच्या घरी परंपरेनुसार बाप्पाचा मुक्काम दीड दिवस असल्याने भाविकांनी शनिवारी दुपारनंतर गणरायाला भावपूर्ण निरोप देऊन ‘पुढच्या वर्षी लवकर या’ अशी विनवणी केली. शहराच्या विविध भागातील हौदांवर दुपारनंतर विसर्जनाला सुरुवात झाली.
पुण्यातील अनेक घरांमध्ये दीड दिवसाच्या गणपतीची परंपरा असल्याने शनिवारी दुपारनंतर मूर्तीची विधिवत पूजा, आऱती आणि नैवेद्य दाखवून दुपारी तीननंतर नागरिक घराबाहेर पडले. नदीचे घाट आणि महापालिकेने ठिकठिकाणी बांधलेल्या हौदांवर भाविक सहकुटुंब मूर्तीच्या विसर्जनासाठी आले होते. संध्याकाळी पाचनंतर गर्दी वाढायला सुरुवात झाली. मात्र, सातच्या दरम्यान आलेल्या पावसाने विसर्जनासाठी घराबाहेर पडलेल्या नागरिकांची धावपळ उडाली. पावसाचा जोर वाढल्याने नागरिक मूर्ती घेऊन नदीपात्राच्या आडोशाला थांबले होते.
नागरिकांनी नदीमध्ये मूर्ती विसर्जन करण्याऐवजी हौदात करा, असे आवाहन करणारे महापालिकेचे कर्मचारी आणि स्वयंसेवक नदी किनाऱ्यावर उभे होते. खडकवासला धऱणातून पाणी सोडले असल्याने नदीच्या प्रवाहाजवळ नागरिकांना जाण्यास परवानगी नव्हती. या वर्षी देखील हौदातील गणेश मूर्ती विसर्जनाला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. स्वच्छ आणि महापालिकेचे घनकचरा विभागाचे कर्मचारी निर्माल्य गोळा करण्यासाठी प्रत्येक ठिकाणी उभे होते. नागरिकांनी नदीमध्ये तसेच हौदात निर्माल्य टाकू नये, असे आवाहन करीत ते प्रत्येक मूर्तीला वाहिलेले हार, फुले आणि फळे नागरिकांकडून काढून घेत होते. नागरिकांचा या उपक्रमालाही सकारात्मक प्रतिसाद मिळाला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अथर्वशीर्ष पठणातून स्त्री शक्तीचा जागर

0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

ओम नमस्ते गणपतये... ओम गं गणपतये नम: ... मोरया, मोरया... च्या जयघोषात हजारो महिलांनी एकत्र येऊन अथर्वशीर्ष पठणातून स्त्री शक्तीचा जागर केला. पारंपरिक वेशात शनिवारी पहाटे चार वाजल्यापासून महिलांनी या उपक्रमासाठी हजेरी लावण्यास सुरुवात केली.
निमित्त होते, श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळाच्यावतीने ट्रस्टच्या शतकोत्तर रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त ऋषिपंचमीनिमित्त आयोजित केलेल्या अथर्वशीर्ष पठण सोहळ्याचे. या वेळी माजी राष्ट्रपती प्रतिभा पाटील, महापौर मुक्ता टिळक, ट्रस्टचे अध्यक्ष अशोक गोडसे, महेश सूर्यवंशी, सुनील रासने, अरुण भालेराव, शुभांगी भालेराव यांसह महिला कार्यकर्त्या मोठया संख्येने उपस्थित होत्या. गणपतीच्या उत्सव मंडपापासून ते नाना वाड्यापर्यंतच्या परिसरात महिलांनी अथर्वशीर्ष पठणासाठी गर्दी केली. या उपक्रमाचे यंदा ३१ वे वर्ष होते.
पाटील म्हणाल्या, ‘महिलांशिवाय कोणतेही कार्य पूर्ण होत नाही. स्वातंत्र्यासाठी देखील महिला पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून लढल्या आणि आपल्याला स्वातंत्र्य मिळाले. महिलांमध्ये असणारी शक्ती आपण ओळखलेली नाही, त्यामुळे महिलांना देखील समान अधिकार मिळायला हवे, असे म्हणतो. कोणत्याही समाजाचे व्यक्ती, कुटुंब आणि समाज हे घटक असतात. स्त्रीच्या सद्भावना घरातच राहण्यापेक्षा समाजात याव्या, तरच समाजात शांती निर्माण होईल, असेही त्यांनी सांगितले. मुक्ता टिळक यांनीही मनोगत व्यक्त केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


उड्डाणपुलाच्या श्रेयवादात राष्ट्रवादीचीही उडी

0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
चांदणी चौकातील उड्डाणपुलाच्या कामावरून भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांमध्ये सुरू असलेला चढाओढीत आता राष्ट्रवादी काँग्रेसनेही उडी घेतली आहे. या उड्डाणपुलासाठी माजी सभागृह नेते शंकर उर्फ बंडू केमसे यांनी विशेष प्रयत्न केल्याचा दावा करीत त्यांचे अभिनंदन करणारे फ्लेक्स या भागात लावण्यात आले आहे. त्यामुळे चांदणी चौक आणि बावधन परिसरात ‘फ्लेक्स वॉर’ सुरू झाले आहे.
चांदणी चौकातील वाहतुकीची कोंडी सोडविण्यासाठी या भागात उड्डाणपूल बांधला जाणार आहे. यासाठी सुमारे ४२० कोटी रुपये खर्च होणार आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या (एनएचएआय) वतीने हा पूल उभारला जाणार आहे. केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते आज (रविवारी) पुलाचे भूमिपूजन होणार असून राष्ट्रवादीचे नेते शरद पवारही या वेळी उपस्थित राहणार आहेत. या पुलाचे श्रेय नक्की कोणाला, यावरून सत्ताधारी भाजपच्या नेत्यांमध्ये वाद सुरू झाले आहेत. हे वाद आटोक्यात ठेवण्यासाठी फ्लेक्सवरही सेन्सॉरशिप आणून एकच पॅटर्न ठरविण्यात आला आहे.
चांदणी चौकात उड्डाणपूल व्हावा, यासाठी पालिकेत राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता असताना तरतूद करण्यात आली होती. नागरिकांच्या सोयीसाठी या चौकात उड्डाणपूल उभारण्याचा संकल्प पालिकेचे माजी गटनेते बंडू केमसे यांनी केला आणि त्याचा पाठपुरावा केला, अशा आशयाचे फ्लेक्स कोथरूड, एनडीए पाषाण रोडवर लावण्यात आले आहेत. त्यामुळे उड्डाणपुलाच्या कामाचे श्रेय घेण्यावरून राजकारण तापणार असल्याचे समोर आले आहे. हा उड्डाणपूल खडकवासला विधानसभा आणि बारामती लोकसभा मतदारसंघात येतो. त्यामुळे उड्डाणपुलाचे नियोजन आम्हीच केले, हे दाखविण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपच्या पदाधिकाऱ्यांमधील फ्लेक्स वॉर पेटण्याची शक्यता आहे.

या उड्डाणपुलासाठी पालिकेत सत्ता असताना राष्ट्रवादीने पुढाकार घेतला. त्याचे नियोजन, डिझाइन आम्ही केले. त्यासाठी दोन वर्षे पालिकेच्या बजेटमध्ये तरतूदही केली होती. या कामाला निधी मिळविण्यासाठी शरद पवार यांच्यामार्फत गडकरी यांची भेट घेऊन पाठपुरावा केल्यानेच निधी मंजूर झाला. आता सत्ता आल्याने श्रेयासाठी भाजपचा अट्टहास सुरू आहे. या कामासाठी २२० कोटी रुपयांचा अपेक्षित खर्च ४२० कोटींवर कसा गेला, याचा खुलासा झाला पाहिजे.
- शंकर केमसे, माजी सभागृह नेते, महापालिका

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

प्रवाशांना लुटणारा आरोपी अटकेत

0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

रेल्वेतील प्रवाशांना खजुरातून गुंगीचे औषध देऊन मौल्यवान वस्तू आणि पैसे चोरणाऱ्या सराईताला पुणे लोहमार्ग पोलिसांनी अटक केली. त्याच्याकडून दोन गुन्हे उघडकीस आणून अकरा हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
अरुण शिवचंद्र झा (५२, रा. उरळी कांचन, मूळ रा. बिहार) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. झा याच्यावर २००५ मध्ये भुसावळ लोहमार्ग पोलिस ठाण्यात अशाच प्रकारचे गुन्हे दाखल आहेत. लोहमार्ग पोलिसांकडून रेल्वेमध्ये प्रवाशांना लुटणाऱ्या चोरट्यांची माहिती काढण्यात येत होती. पुणे लोहमार्ग पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक संजय सातव यांना माहिती मिळाली की, गुंगीचे औषध असलेले खजूर देऊन प्रवाशांना लुटणारा सराईत गुन्हेगार अरुण झा पुणे रेल्वे स्थानकावर येणार आहे. त्यानुसार पुणे लोहमार्ग व रेल्वे सुरक्षा दलाच्या पोलिसांनी सापळा रचून त्याला अटक केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

लेण्याद्री गणपतीला सीसीटीव्हीचे कवच

0
0

म. टा. वृत्तसेवा, जुन्नर

अष्टविनायकांपैकी एक असणाऱ्या लेण्याद्रीच्या गिरीजात्मकाच्या दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांना आता सुरक्षेचे कवच प्राप्त झाले आहे. पुरातत्व विभागाच्या वतीने संपूर्ण पायरीमार्ग, तसेच गणेशमुर्तीची लेणी या सर्व परिसरात एकूण सीसीटीव्ही बसविण्यात आले आहेत.
त्यामुळे जवळपास ९०० यऱ्या चढून दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांना कोणतीही समस्या आली तर, सीसीटीव्ही फुटेजमुळे मदत उपलब्ध होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. लेण्याद्री गणपती लेणी परिसरात आहे.त्यामुळे हा भाग पुरातत्व खात्याच्या अखत्यारित असल्याने तेथे कोणतीही डागडुजी किंवा सुधारणा पुरातत्वीय निकषांशिवाय करता येत नाही. मात्र, सीसीटीव्ही बसविल्यामुळे गर्दीच्या वेळी येथील परिस्थितीवर नजर ठेवणे, सोपे झाले आहे, अशी प्रतिक्रिया पुरातत्व विभागाचे वरिष्ठ सर्वेक्षण सहायक बाबासाहेब जंगले यांनी ‘मटा’ला दिली.
एकंदरीत तीन कॅमेरे मंदिर लेणीच्या गाभाऱ्यात लावले असून, पायरी मार्गावर १० कॅमेरे लावण्यात आले आहेत. कॅमेरे बसविण्यासाठी साडेतीन लाख रुपयांचा खर्च करण्यात आला आहे. दिवसेंदिवस येथे पर्यटकांचा तसेच गणेशभक्तांचा राबता वाढत आहे. वर्षभरात जवळपास सात लाख गणेशभक्त येथे भेट देतात. त्यामुळे एकंदरितच हे ठिकाण धार्मिकतेच्या दृष्टीने महत्वाचे आहे.

माकडांचा असाही उपद्रव..
पायरीमार्गावर मोठ्या संख्येने माकडांचा उपद्रव होतो. खांबांवर लावलेले कॅमेरे बऱ्याचदा माकडांकडून हलवले जातात. त्यामुळे त्यांची दिशा बदलते. ही समस्या या प्रणालीसाठी अडचणीची ठरत आहे. त्यामुळे माकडांच्या समस्येवर काय उपाययोजना करायची, याचा प्रश्न मात्र अद्याप अनुत्तरीत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बालगुन्हेगारांचा टक्का वाढता

0
0

दीड वर्षांत तीन हजार मुले गुन्ह्यात सहभागी; पोलिस त्रस्त

Shrikrishna.Kolhe@timesgroup.com
Tweet : @shrikrishnaMT

पुणे : खेळण्या-बागडण्याच्या वयात हातात कोयते, तलवार घेऊन फिरणारी बालके. किरकोळ कारणावरून एकमेकांवर जीवघेणे हल्ले, मौजमजेसाठी दुचाकी चोऱ्या, मुलींची छेडछाड करणे असे चिंताजनक चित्र अल्पवयीन मुलांच्या बाबतीत सध्या शहरात दिसून येत आहे. गेल्या दीड वर्षांत सोळाशे गुन्ह्यांमध्ये तीन हजार अल्पवयीन मुलांना ताब्यात घेण्यात आले आहे. हल्ली गंभीर गुन्ह्यांमध्येही अल्पवयीन मुलांचा सहभाग वाढत असून तीच पोलिसांसमोरील सर्वांत मोठी डोकेदुखी ठरली आहे.
सांस्कृतिक राजधानी, शिक्षणाचे माहेरघर म्हणून पुण्याची ओळख आहे. पण, याच ठिकाणी गुन्हेगारीमध्ये बालकांचा सहभाग वाढत असल्याचे समोर आले आहे. खून, खुनाचा प्रयत्न, बलात्कार, गंभीर दुखापत, चोरी अशा गुन्ह्यांमध्ये अल्पवयीन मुलांचा कैक पटीने वाढला आहे. गेल्या वर्षी पुणे पोलिस आयुक्तालयाच्या हद्दतील अल्पवयीन मुलांनी वेगवेगळे प्रकारचे ६४७ गुन्हे केल्याचे समोर आले आहे. त्या प्रकरणी २२०० अल्पवयीनांना ताब्यात घेण्यात आले. यंदा जून अखेरपर्यंत अल्पवयीन मुलांनी ३६४ गुन्हे केले असून, त्यामध्ये सातशेपेक्षा जास्त मुलांचा सहभाग असल्याचे आढळून आले आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा खुनासारख्या गंभीर गुन्ह्यात अल्पवयीनांचा सहभाग वाढल्याचे दिसून आले आहे.
बदलती जीवनशैली आणि राहणीमानाचा स्तर उंचावल्यामुळे महागड्या वस्तूंचे आकर्षण मुलांमध्ये वाढत आहे. मौजमजेसाठी आणि मुलींवर इंप्रेशन मारण्यासाठी बाइक चोरणे, मोबाइल चोऱ्या आदी प्रकार वाढले आहेत. गुन्हेगारी टोळ्यांकडूनही लहान मुलांचा वापर करून घेतला जात आहे. भाई-दादाच्या आकर्षणापोटी मुले टोळ्यांकडे खेचली जात आहेत. या टोळ्यांना वरदहस्त असल्याने मुलांमधील गुन्हेगारीला प्रोत्साहन मिळत आहे. त्यामुळेच तलवारी, कोयते घेऊन कोणाचीही भीती न बाळगता ही मुले एकमेकांवर हल्ला करण्यास मागेपुढे पाहत नाहीत.
या बाबत एका वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले, की अल्पवयीन मुलांनी गुन्हा केल्यानंतर त्यांना अटक करता येत नाही. त्यांना विधिसंघर्ष बालक म्हणून बालन्यायालयात सादर केले जाते. त्यांना सुधारण्याची संधी दिली जाते. त्यासाठी त्यांना बालसुधारगृहात ठेवण्यात येते. पण, यातील काहीच मुले सुधारतात. बहुतांश मुले नंतर गुन्हेगारी प्रवृत्तीकडे आकर्षित होतात. त्यामुळे त्यांना गुन्हेगारीपासून रोखण्यासाठी विशेष प्रयत्न करण्याची गरज आहे. त्याबरोबरच पालकांनी देखील आपल्या मुलांकडे लक्ष देण्याची आवश्यकता आहे. आपली मुले कोठे जातात, त्यांचे मित्र कोण आहेत, ते कोणासोबत जास्त वेळ असतात, त्यांच्याकडे महागड्या वस्तू आढळल्यानंतर त्याची चौकशी करावी. पुण्यात दुचाकी चोरीमध्ये अनेक अल्पवयीन मुलांना अटक केल्यानंतर त्यांच्या पालकांना मुलांनी चोरी केल्याचे समजले. त्यामुळे पालकांनी सजग होऊन मुलांकडे लक्ष देण्याची गरज आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

'केंद्र सरकारला साथ देऊ'

0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

‘चीनची भारताबाबत भूमिका ही राष्ट्रीय समस्या आहे. त्यामुळे या समस्येकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. केंद्र सरकारने त्याबाबत एखादी भूमिका घेतल्यास सर्वांनी त्याला सुसंगत अशी साथ दिली पाहिजे आणि साथ देण्याची भूमिका घ्यायला मी तयार आहे’, अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केंद्र सरकारच्या चीनच्या भूमिकेबाबत पाठिंबा देण्याचा सल्ला शनिवारी दिला.

श्री शिवाजी मराठा सोसायटीच्या शताब्दी महोत्सवाच्या शुभारंभानिमित्त आयोजित समारंभात ज्येष्ठ समाजवादी नेते भाई वैद्य यांच्या हस्ते पवार यांचा त्यांच्या कार्यानिमित्त सत्कार करण्यात आला. या वेळी पवार बोलत होते. महापौर मुक्ता टिळक, पालकमंत्री गिरीश बापट, सोसायटीचे अध्यक्ष श्रीमंत छत्रपती शाहू महाराज, सोसायटीचे सचिव शशिकांत सुतार, स्थायी समितीचे अध्यक्ष मुरलीधर मोहोळ, सोसायटीचे उपाध्यक्ष माणिकराव सातव पाटील, सहसचिव राजेंद्र जगताप, खजिनदार जगदीश जेधे, नियामक मंडळाचे अध्यक्ष अॅड. भगवानराव साळुंखे, कारभारी मंडळाचे अध्यक्ष साहेबराव जाधव उपस्थित होते.

पवार म्हणाले, ‘नरसिंह राव सरकारमध्ये १९९१-९२ साली संरक्षण मंत्री असताना दोन्ही देशांच्या सीमेवर अशाच प्रकारचा तणाव होता. त्यावर तोडगा म्हणून दोन्ही देशांच्या शिष्टमंडळांनी सात दिवस बैठक घेऊन सीमेवरील सैन्य मागे घेण्याचा निर्णय झाला. मात्र, त्याचवेळी मला चीनच्या पंतप्रधानांना चीनमध्ये भेटण्याची संधी मिळाली. या भेटीत त्यांनी ‘चीनचे लक्ष केवळ जगात आर्थिक महासत्ता होण्याकडे असल्याने इतर देशांकडे आम्ही लक्ष देत नाही. चीन महासत्ता झाल्यानंतर आजूबाजूच्या देशांवर लक्ष केंद्रीत करणार’ असे त्यांनी सांगितले होते. आता २५ वर्षांनंतर चीन आर्थिक महासत्ता झाला असून चीनने भारतावर लक्ष केंद्रीत करायला सुरुवात केली आहे. ही आपल्या देशापुढे राष्ट्रीय समस्या आहे. त्यामुळे केंद्र सरकारने याबाबत एखादी भूमिका घेतल्यास आपण आपल्यातील वाद सोडून सरकारच्या निर्णयाला साथ दिली पाहिजे.’ दरम्यान, लोकसंख्या वाढल्याने शेतीवरील भार वाढत असून विकास कामांमुळे शेतजमीन कमी होते आहे. अशातच नैसर्गिक फटका शेतकऱ्यांना बसल्यास त्यांना नैराश्य येते. हे नैराश्य सहन करण्याची शक्ती नसल्याने ते आत्महत्या करीत आहेत, असेही पवार यांनी सांगितले.
‘शिक्षण संस्था चालविणाऱ्यांनी शिक्षणमहर्षी व्हावे; मात्र शिक्षण सम्राट होऊ नये. शरद पवारांचे कार्य उत्तुंग आहे. राजकारणात पन्नास वर्षे सतत अविरतपणे प्रभावी काम करणे, ही मोठी गोष्ट आहे. शरद पवारांची स्तुती करा अथवा त्यांच्यावर टीका करा, ते स्थिर असतात. विजय झाला अथवा पराजय झाला तरी पवार स्थिर आणि शांत असतात. त्यामुळेच ते लोकनेते आहेत. सत्तेत असताना पवारांचे जेवढे राजकीय अस्तित्व होते, तेवढेच अस्तित्व सत्तेत नसताना देखील आहे. शरद पवारांनी गेल्या पन्नास वर्षांमध्ये विविध क्षेत्रांमध्ये भरीव विकासकार्य केल्याने महाराष्ट्र त्यांच्या कार्यापुढे नतमस्तक आहे,’ असे बापट यांनी सांगितले. शाहू महाराज यांनी मनोगत व्यक्त केले. टिळक यांनी शताब्दी महोत्सवी वर्षानिमित्त सोसायटीला शुभेच्छा दिल्या. सुतार यांनी प्रास्ताविक करीत पवार यांच्या कार्याची माहिती दिली.

‘पवारांनी विरोधकांचे नेतृत्व करावे’

यशवंतराव चव्हाण यांच्यानंतर शरद पवार हेच महाराष्ट्रातील सर्वांत उत्तम प्रशासक आहेत, हे सांगताना ‘शूट अॅट साइट’ या खाक्याने काम करणाऱ्या एका मोठ्या राजकीय नेत्याचे नाव आपण जाणीवपूर्वक गाळले आहे. त्यामुळे पवार यांच्यासारख्या तोलामोलाच्या नेत्याने आता सर्व विरोधकांना एकत्र करून त्यांचे नेतृत्व करावे, हीच आम्हा सर्वांची इच्छा आहे, अशी अपेक्षा भाई वैद्य यांनी व्यक्त केली.

राजकारणात मी यांचे बोट धरले, या बोलायच्या भाषा असतात. राजकारणात कोणी कोणाचे बोट धरत नाही आणि धरले तरी ते कधी सोडायचे याची माहिती बोट पकडणाऱ्यांना असते.
- शरद पवार, माजी केंद्रीय कृषीमंत्री

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

स्मार्ट आरसी ‘कागदावरच’

0
0

वाहन नोंदणीचे स्मार्ट कार्ड चार महिन्यांनंतरही गायबच

म. टा. प्रतिनिधी, पुणे

राज्याच्या परिवहन विभागाने वाहन नोंदणी प्रमाणपत्र (आरसी) ‘पेपर’ऐवजी पुन्हा ‘स्मार्ट कार्ड’ स्वरूपात देण्याचा निर्णय घेतला खरा, परंतु चार महिन्यांनंतरही या निर्णयाची अंमलबजावणी झालेली नाही. त्यामुळे अद्यप ‘आरसी’ साध्या कागदावरच प्रिंट करून दिली जात आहे.
‘रोझ मार्टा’ कंपनीकडून राज्यातील आरटीओत नोंदणी होणाऱ्या वाहनांचे ‘आरसी’ दिले जात होते. मात्र, परिवहन विभागाने या कंपनीशी केलेला करार संपुष्ठात आल्यानंतर डिसेंबर २०१४ पासून वाहनधारकांना ‘पेपर आरसी’ देण्यात येत होती. परिवहन विभागाकडून स्वतः ‘पेपर आरसी’ची छपाई केली जात होती. मात्र, यामध्ये विभागाकडून वाहन धारकांना ‘आरसी’ देण्यास विलंब होत आहे. तसेच, मध्यंतरी ‘आरसी’ छपाईसाठी लागणारा कागद उपलब्ध होत नव्हता, त्यामुळे त्यामध्ये विलंब झाला होता. या परिस्थितीवर मात करण्यासाठी परिवहन विभागाने पुन्हा ‘स्मार्ट आरसी’ सुरू करण्याचा निर्णय घेतला होता. एप्रिल महिन्यात या संबंधीचा सरकारी निर्णय काढण्यात आला आहे. ‘आरसी’चे ‘स्मार्ट कार्ड’चे बनविण्याचे काम पुन्हा ‘रोझ मार्टा’ कंपनीला दिले असून, त्यासंबंधीचा करारही केला आहे. त्यानुसार मे महिन्यात ‘स्मार्ट आरसी’ सुरू होणे अपेक्षित होते.
साधारणतः पाच ते सहा महिन्यांपूर्वी राज्यभरातील प्रादेशिक परिवहन कार्यालयामध्ये आरसी देण्यास मोठ्या प्रमाणावर विलंब लागत होता. पुण्याच्या आरटीओने आरसी छपाईची विशेष मोहीम राबवून प्रलंबित आरसी छपाईचा निपटारा करून टाकला. मात्र, राज्यातील काही आरटीओंमध्ये अद्याप ‘आरसी’ छपाईची ‘झीरो पेंडन्सी’ नाही. त्यात ‘स्मार्ट कार्ड’ सुरू होण्यास विलंब लागत असल्याने नाराजीचा सूर व्यक्त केला जात आहे.

पेपर आरसी अव्यवहार्य
वाहनधारकाला वाहन चालविताना ‘आरसी’ सोबत बाळगावे लागते. मात्र, ‘पेपर आरसी’ कायम सोबत बाळगणे शक्य नसून, नाईलाजास्तव ते बाळगावे लागते, अशी सामान्य नागरिकांची भावना आहे. ‘पेपर आरसी’ दीर्घकाळ टिकविण्यासाठी त्यास ‘लॅमिनेशन’ करून ठेवावे लागेल. अन्यथा काही महिन्यातच ते फाटेल, अशी परिस्थिती आहे. त्यामुळे ‘स्मार्ट कार्ड आरसी’ तातडीने सुरू करावी, अशी मागणी केली जात आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

समाजाचा विचार करावा

0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
‘आपण सर्वच जण कुटुंबासाठी धडपडत असतो. प्रत्येक माणसाचे भले व्हावे असे आपल्याला वाटते. त्यासाठी कुटुंबापुरते मर्यादित न राहता प्रत्येकाने समाजाचाही विचार करण्याची गरज आहे,’ असे मत महापौर मुक्ता टिळक यांनी व्यक्त केले.
ऋषिपंचमीनिमित्त विश्व शांती केंद्र (आळंदी), डॉ. विश्वनाथ कराड एमआयटी डब्ल्यूपीयू आणि शारदा ज्ञानपीठ यांच्या वतीने चौदा ऋषितुल्य व्यक्तिमत्वांचा सत्कार सोहळा एमआयटीच्या ज्ञानेश्वर सभागृहात आयोजित करण्यात आला होता. त्या वेळी त्या बोलत होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी एमआयटी वर्ल्ड पीस युनिवर्सिटीचे अध्यक्ष प्रा. डॉ. विश्वनाथ कराड, सिम्बायोसिसचे संस्थापक अध्यक्ष डॉ. शां. ब. मुजुमदार, जम्मू- कश्मीर येथील प्रशासकीय अधिकारी सागर डोईफोडे, प्रा. राहुल विश्वनाथ कराड, पं. वसंत गाडगीळ आणि श्रीवर्धन गाडगीळ उपस्थित होते.
टिळक म्हणाल्या, ‘आज आपला देश तरुणांचा म्हणून ओळखला जातो. मात्र, याच तरुणाईस आज स्वत:च्या आई-वडिलांकडे पाहण्यासाठीही वेळ नाही. चंगळवादाच्या आहारी जाणाऱ्या या पिढीने खरेतर ऋषितुल्य व्यक्तींचा आदर्श डोळ्यांपुढे ठेवला पाहिजे.‘ डोईफोडे म्हणाले, ‘आपली संस्कृती ही सगळ्या संस्कृतींची सांगड घालणारी आहे. काश्मीरमध्ये काम करताना देखील आपल्या वेद-पुराणाचा संदर्भ लागतो. आज तेथील स्थिती पाहता आपण पुढाकार घेऊन पावले उचलणे आवश्यक आहे. आपल्याला त्यांच्याबद्दल वाटणारे प्रेम, आपुलकी, अत्मियता त्यांच्या पर्यंत पोचणे गरजेचे आहे. यातूनच राष्ट्रीय एकात्मता वाढेल.’
भारतीय संस्कृती, परंपरा आणि तत्त्वज्ञानाचे आगळे-वेगळे स्वरूप समोर आणणारा ऋषीपंचमीचा उत्सव आहे, असे मत कराड यांनी व्यक्त केले. मुजुमदार यांनीही उपक्रमाबद्दल गौरवोद्गार काढले. पं. वसंत गाडगीळ यांनी संस्कृतमध्ये प्रास्तविक केले. या वेळी योगी ज्ञाननाथ रानडे महाराज, रामकृष्ण गोविंद देशपांडे, प्राचार्य एच. एम. गणेशराव, प्राचार्य रामचंद्र नारायण पांडे, विज्ञानतपस्वी डॉ. गोविंद स्वरूप, नाट्यकला तपस्वी महर्षि श्रीकांत मोघे, वैद्यकसेवा तपस्वी शरद हरि भिडे, गोसेवा महर्षि पृथ्वीराज चुनीलाल बोथरा, नादब्रह्मतपस्वी प्रभाकर जोग, निर्मलादेवी पुरंदरे, तुळशीराम दा. कराड, वारकरी तपस्वी महादेव सावळा पाटील, योगसाधना तपस्वी अनंत कुकडे यांचा सत्कार करण्यात आला. व्यंगचित्रकार मंगेश तेंडुलकर यांनाही मरणोत्तर पुरस्कार जाहीर करण्यात आला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


न्यूझीलंडमधील जोशींचा देखणा बाप्पा

0
0

स्लग - देशोदेशीचा बाप्पा
---

म. टा. प्रतिनिधी, पुणे
परदेशात गणेशोत्सव साजरा करण्याची परंपरा काही नवीन नाही. गेल्या अनेक वर्षांपासून परदेशात थाटामाटात आणि भक्तीभावाने बाप्पाची सेवा केली जाते. न्यूझीलंडमध्ये स्थायिक असेलेले जोशी कुटुंबही मोठ्या थाटामाटात गणेशोत्सव साजरा करतात. जोशी कुटुंबीयांसाठी आणि त्यांचे आप्त, परिसरातील मित्र यांच्यासाठी गणेशोत्सव म्हणजे एक पर्वणीच असते.
गेल्या अनेक वर्षांपासून सोहन जोशी आणि ऋजुता जोशी हे दाम्पत्य न्यूझीलंडमध्ये स्थायिक आहेत. महाराष्ट्राच्या संस्कृतीचे संस्कार घेतलेले हे दाम्पत्य तिथे स्थायिक झाले तेव्हाच त्यांनी तिथे गणेशोत्सव साजरा करण्याचा निर्णय घेतला. त्याप्रमाणे भारतातून मूर्ती नेण्यापासून ते इतर सर्व गोष्टींची तयारी करण्यापर्यंतची जबाबदारी या दाम्पत्याने घेतली. गेले काही वर्षे हा सोहळा जोशींच्या न्यूझीलंडमधील घरात निर्विघ्नपणे पार पडत असून तेथील भारतीयही या सोहळ्यात मोठ्या उत्साहाने सहभागी होत आहेत.
गणेश चतुर्थीच्या दिवशी जोशी कुटुंबीयांनी विधिवत गणपती बाप्पाची प्राणप्रतिष्ठापना केली असून पाच दिवस हा उत्सव चालणार आहे. पाचव्या दिवशी घरातच गणपती बाप्पाचे विसर्जन केले जाणार आहे. गणेश चतुर्थीच्या दिवसापासून जोशी कुटुंबीयांकडे दररोज सकाळी आणि संध्याकाळी पाच आरत्या केल्या जातात. काही स्थानिक नागरिकही मोठ्या कुतूहलाने आरती करण्यासाठी सहभागी होतात. पाच दिवस दररोज जोशी कुटुंबीयांकडून वेगवेगळ्या पक्वान्नांचे बेत आखले जातात. भारतीय पदार्थांचा त्यामध्ये विशेष करून भरणा असतो. मित्रमंडळींसह दररोज गेट-टुगेदर केले जाते. जोशी कुटुंबीय साजरा करत असलेल्या या उत्सवाल आता वर्षागणिक मोठे स्वरूप प्राप्त होत चालले आहे. जोशींकडे बाप्पाच्या दर्शनासाठी येणाऱ्या भारतीयांची संख्या वाढत चालली आहे.
यासंदर्भात ऋजुता जोशी म्हणाल्या, ‘गणेशोत्सव म्हणजे आम्हाला वर्षभर उत्साह देऊन जाणारा सोहळा आहे. परदेशात असल्याने आम्ही भारतीय संस्कृतीला मुकतो. गणेशोत्सव साजरा करतोय तेव्हापासून आम्ही भारतातच आहोत, असे वाटते. पाच दिवस बाप्पाची सेवा करण्याची आम्हाला संधी मिळते. मित्रमंडळींसह आम्ही मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात पाचही दिवस साजरे करतो. वेगवेगळी पक्वान्नांचे बेत, सकाळी आणि संध्याकाळी केलेल्या आरत्या, टाळांचे आवाज न्यूझीलंडमध्येही चैतन्याचे वातावरण निर्माण करते. त्यामुळेच या उत्सवाची आम्ही आतुरतेने वाट पाहत असतो.
(समन्वय - आदित्य तानवडे)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शैव लेण्यांतील गणेशमूर्ती

0
0

पाऊ‍लखुणा
----
आनंद कानिटकर
---
गुप्तकाळानंतर इ. स. सहाव्या शतकात वराहमिहीर याने लिहिलेल्या ‘बृहत्संहिता’ या ग्रंथात गणपतीची मूर्ती कशी असावी याची माहिती पुढीलप्रमाणे दिली आहे.
प्रथमाधिपो गजमुखः प्रलंबजठरः कुठारधारी स्यात् ।
एकविषाणो बिभ्रन्मूलककंदं सुनीलदलकंदम् ।।
म्हणजे शिवाचा गणाधिपती हा गजमुख, एकदंत, विशाल उदराचा, हातात कुऱ्हाड आणि मुळा घेतलेला, असा दाखवावा. या वर्णनाशी जुळणाऱ्या म्हणजे हातात परशु आणि मुळा घेतलेल्या गणेशाच्या मूर्ती सुरुवातीच्या काळात मिळतात. या गणेशाच्या हातात मोदकपात्र दाखवावे असा उल्लेख मात्र बृहत्संहितेत येत नाही. याशिवाय नोंद करण्यासारखी गोष्ट म्हणजे विष्णू, शिव, ब्रह्मा, सूर्य, दुर्गा, बुद्ध, जिन, वरुण, कुबेर इ. देवतांच्या मूर्तीलक्षणानंतर सर्वांत शेवटी गणेशाचे मूर्तीलक्षण दिले आहे. त्यामुळे या काळात गणेश या इतर देवतांइतका लोकप्रिय झालेला नसावा; परंतु त्याला या मूर्तीलक्षणांमधून वगळण्यातही आलेले नाही.
गुप्त-वाकाटक काळानंतर इ. स. सहाव्या शतकात मध्य प्रदेश, महाराष्ट्रात उदयास आलेल्या कलचुरी राजांच्या काळात शैव लेण्यांची निर्मिती झाली. महाराष्ट्रात घारापुरी, ढोकेश्वर, औरंगाबाद, वेरूळ येथे आपल्याला ही इ. स. सहाव्या, सातव्या शतकात निर्माण झालेली शैव लेणी पाहायला मिळतात. यातील अनेक लेणी ही विशेषतः शैवपंथात इ. स. दुसऱ्या शतकात उदयाला आलेल्या पाशुपत पंथाशी संबंधित आहेत. या पाशुपत पंथाचा उद्‍गाता लकुलीश याचे शिल्प आपल्याला घारापुरी, मंडपेश्वर तसेच वेरूळ येथील लेण्यांत पाहावयास मिळते. या लेण्यांत कोरलेल्या शिल्पांचा विषय जरी शिवाशी संबंधित असला तरी शिवपरिवारातील देवता म्हणून अथवा स्वतंत्र पूज्य देवता म्हणून गणेशाला या लेण्यांतून स्थान मिळालेले आपल्याला दिसते.
घारापुरी येथील मुख्य लेण्याच्या पूर्वेकडे असलेल्या एका लेण्यात मातृकांच्या मूर्ती आहेत. या मातृकांसोबत गणेश आणि वीरभद्र यांचीही पूजा केली जात असल्यामुळे घारापुरी येथे गणेश आणि वीरभद्र यांच्याही मूर्ती कोरल्या आहेत. याशिवाय याच लेण्याच्या दक्षिणेकडील भिंतीत गणेशाची विशाल मूर्ती कोरलेली होती, परंतु आता ती बऱ्याच प्रमाणात खंडित झालेली आहे. याच गणेशमूर्तीच्या समोरच्या बाजूच्या भिंतीवर कार्तिकेयाची मूर्ती कोरलेली आहे. शिवाचे हे दोन पुत्र असल्यामुळे त्यांची पूजा करण्यासाठी या दोन्ही मूर्तींची योजना योजना येथे केलेली आहे.
याशिवाय घारापुरी येथील मुख्य लेण्यातील नटराज शिवाच्या मूर्तीसमूहात देखील इतर देवीदेवता गंधर्व यांच्या सोबत बालगणेशाची भासावी अशी एक छोटी गणेशमूर्ती कोरलेली आहे. गुप्तोत्तर काळातील ही गणेशमूर्ती असल्यामुळे ही मूर्ती अलंकारविहीन आहे. परंतु मूर्तीच्या उजव्या हातात परशु दाखविला आहे. या बालगणेशाचे गजमुख हे गुप्तकाळातील भितरगाव (मध्य प्रदेश) येथील मातीच्या गणेशमूर्तीची आठवण करून देणारे आहे.
वेरूळ येथील लेणे क्रमांक २२ या शैव लेण्यातील मंडपात गणपती, सरस्वती, पार्वती आणि कार्तिकेय एकत्र दाखवले आहेत. याशिवाय या लेण्यातील मुख्य चौकाजवळ असणाऱ्या एका छोट्या लेण्यात सप्तमातृका आणि गणेश, वीरभद्र एकत्र दाखवले आहेत. औरंगाबाद येथील इ. स. सहाव्या शतकातील शैव लेण्यातदेखील विशाल गणेशप्रतिमा आढळते. येथीलच एका चौरसाकृती लेण्यात सप्तमातृका, गणेश आणि बुद्ध यांच्या एकत्र प्रतिमा कोरून केलेली वैशिष्ट्यपूर्ण मूर्तीयोजना बघायला मिळते.
कुषाण काळात देवाचा सेनापती असलेल्या कार्तिकेयासोबत आणि कुबेरासोबत दाखवल्या जाणाऱ्या सप्तमातृका गुप्तकाळापासून गणेश आणि वीरभद्रासोबत दाखवल्या जाऊ लागल्या. यात कुबेर आणि गणेश या दोघांतील यक्ष म्हणून असलेले साम्य लक्षात घेतले पाहिजे.
‘पाशुपत सूत्र’ या ग्रंथाच्या टीकेमध्ये ‘जो साधक अष्टसिद्धी प्राप्त करतो, तो गणपती होतो’, असा उल्लेख आढळतो. गणेश हा शिवाच्या गणांचा अधिपती असल्यामुळे ते ‘गणपती’ पद मिळवण्यासाठी पाशुपत पंथातील साधक ह्या अष्टसिद्धी प्राप्त करू पाहतो. यामुळेच कार्तिकेयापेक्षा गणेशाला शैवपंथात महत्वाचे स्थान मिळाले असावे आणि त्याच्या मूर्ती शैव लेणी व मंदिरांमध्ये दिसू लागल्या असाव्यात.
(लेखक भारतीय विद्येचे अभ्यासक आहेत)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

डोकलामसारख्या घटना वाढणार

0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

'सीमेवरील परिस्थिती बदलण्याचा चीनचा प्रयत्न आहे. त्यामुळे सध्या तणावाची परिस्थिती आहे. चीनला लष्करी मार्गाबरोबरच, आर्थिक आणि राजकीय मार्गानेही उत्तर दिले जात आहे. मात्र, भविष्यात डोकलामसारखे प्रकार घडण्याची किंवा वाढण्याची शक्यता आहे. त्यासाठी लष्कराने कायम सुसज्ज असले पाहिजे,' असे मत लष्करप्रमुख जनरल बिपीन रावत यांनी शनिवारी व्यक्त केले.

लष्कराचे दक्षिण मुख्यालय आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या संरक्षण व सामरिकशास्त्र विभागातर्फे आयोजित जनरल बी. सी. जोशी स्मृती व्याख्यानात रावत बोलत होते. रावत यांनी 'इंडियाज चॅलेंजेस इन करंट जीओ-स्ट्रॅटेजिक कन्स्ट्रक्ट' या विषयावर आपले विचार मांडले. विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. डॉ. नितीन करमळकर, विभागप्रमुख प्रा. डॉ. विजय खरे या वेळी उपस्थित होते. 'भारतीय लष्कराने चीन लष्करासोबत झालेल्या ध्वज बैठकीत (फ्लॅग मिटिंग) चीनला १६ जून पूर्वी असलेल्या ठिकाणी परत जाण्यास सांगितले होते. मात्र, तसे झालेले नाही. दोन्ही देशांच्या लष्करी अधिकाऱ्यांमध्ये फ्लॅग मिटिंग होत असून त्यामध्ये आम्ही दोन्ही देशांनी १६ जून पूर्वी असलेल्या स्थितीत परत जाण्याची भूमिका मांडली आहे. मात्र, ते कसे केले जावे, याबाबत दोन्ही लष्करांमध्ये सहमती होऊ शकली नाही. त्यामुळे हा मुद्दा राजकीय आणि प्रशासकीय पद्धतीने सोडवला पाहिजे,' असे जनरल रावत यांनी सांगितले.

‘चीन राजकीय, आर्थिक आणि लष्करी माध्यमातून जगभरात आपला दबदबा वाढवू पाहत आहे. चीनच्या लष्कराने क्षमतावृद्धीवर, पायाभूत सुविधांच्या विकासावर भर दिला आहे. त्याचबरोबर स्पेस व नेटवर्क केंद्रीत युद्धपद्धतीमध्येही त्यांनी ताकद वाढवली असून त्यामुळे त्यांचे सामर्थ्य वाढले आहे,’ असे रावत यांनी स्पष्ट केले.

पुरोहित यांच्याबद्दल नो कमेंट्स

लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित यांच्याबाबत विचारले असता, जनरल रावत म्हणाले, कर्नल पुरोहित जामिनावर बाहेर आले आहेत. हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. त्यामुळे त्यावर अधिक बोलणे योग्य ठरणार नाही. लष्कराने पुरोहित यांची चौकशी (कोर्ट ऑफ एन्क्वायरी) केली आहे. त्याचा अहवाल कोर्टाला सादर करण्यात आला आहे, असेही रावत त्यांनी स्पष्ट केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नगर नियोजन खाते 'होपलेस' आणि 'भुक्कड'

0
0

मटा ऑनलाइन वृत्त । पुणे

पुण्याचे नियोजन करण्यासाठी २० वर्षे लावणारे नगर नियोजन खाते हे ‘होपलेस’ आहे. हे खाते फुकटाला महाग असून अशी ‘भुक्कड’ संस्था मी अद्याप पाहिली नाही”, अशा शब्दांत केंद्रीय वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी राज्यसरकारला घरचा आहेर दिला. नगर नियोजन खात्याऐवजी बाहेरची संस्था नेमा आणि पुण्याचा विकास करा, असा सल्लाही त्यांनी यावेळी दिला.

चांदणी चौकातील उड्डाणपुलाचे नितीन गडकरी यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले. याप्रसंगी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हेही उपस्थित होते. यावेळी गडकरी यांनी नगर नियोजन खात्यावर जोरदार टीका केली. यावेळी त्यांनी सिंगापूरच्या धर्तीवर नगर विकासाचे नियोजन व्हायला हवे अशी अपेक्षा व्यक्त केली. पुणे- सातारा रस्ता रूंदीकरणाचं काम रखडलं हा काळा डाग आहे. समस्या आहेत. पण त्या सोडवून सहा महिन्यात या रस्त्याचे काम पूर्ण करू, असं आश्वासनही त्यांनी दिलं.

डंडा घेऊन मागे लागवं लागतं

कामे करण्यासाठी पैसा ही समस्या नाही. अधिकारीच काम करत नाहीत, ही समस्या आहे, असं सांगतानाच डंडा घेऊन मागे लागल्याशिवाय अधिकारी काम करत नाहीत, असं गडकरी यांनी सांगताच एकच खसखस पिकली. वाहतूक समस्येच्या बाबतीत पुणे ज्वालामुखीच्या तोंडावर आहे. ही समस्या सोडवता येईल. मुळा-मुठा नदीत काम करायला सरकारने ना हरकत प्रमाणपत्र द्यावे, जलमार्ग आणि ड्रायपोर्ट बांधून वाहतूक सुरू करता येईल. त्यामुळे रस्त्यावरची वाहतूक कमी होईल, असं ते म्हणाले. पब्लिक ट्रान्स्पोर्ट ऑन इलेक्ट्रिसिटीशिवाय पुण्याला पर्याय नसल्याचंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं. यावेळी शरद पवार यांनी गडकरींची तोंडभरून स्तुती केली. गडकरींनी रस्ते विकासात राज्यातच नाही तर देशातही कर्तृत्वाचा ठसा उमटवला आहे, अशा शब्दात पवार यांनी गडकरींवर स्तुतीसुमने उधळली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

'मी बुलडोझर आहे, कुणाचंच ऐकत नाही!'

0
0

मटा ऑनलाइन वृत्त । पुणे

'मी बुलडोझर आहे. सरकारमध्ये कुणाचंच ऐकत नाही. येत्या वर्षभरात इलेक्ट्रिक बाईक, इलेक्ट्रिक बस आणि इतर वाहने बायोफ्युएलवर आणून भारत पेट्रोलियम आणि इंडियन ऑईलचा बँडबाजा वाजविणार आहे', असा निर्धार केंद्रीय रस्ते आणि वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केला.

धडाकेबाज निर्णय घेण्यासाठी ओळखले जाणारे नितीन गडकरी यांनी पुण्यातील दोन कार्यक्रमांमध्ये बेधडक भाषणं केली. चांदणी चौकातील उड्डाणपुलाचं भूमिपूजन त्यांच्या हस्ते झालं. तिथे त्यांनी नियोजन खात्यावर ताशेरे ओढले. हे खातं होपलेस आणि भुक्कड असल्याची चपराक लगावत त्यांनी राज्य सरकारला घरचा अहेर दिला.

त्यानंतर, मॉडर्न शैक्षणिक संस्थेच्या कार्यक्रमात त्यांनी पेट्रोलियम कंपन्यांना इशारा दिला. दिवसेंदिवस वाढत चाललेल्या इंधनाच्या किंमतींनी मध्यमवर्गीयांचा खिसा रिकामा होत असताना, गडकरींनी इलेक्ट्रिक बाइक आणि इलेक्ट्रिक बस आणण्याचा पुनरुच्चार केला. येत्या वर्षभरात हे काम पूर्ण करून भारत पेट्रोलियम आणि इंडियन ऑइलचा बँडबाजा वाजवणार असल्याचं त्यांनी ठामपणे सांगितलं, तेव्हा टाळ्यांचा गजर झाला.

आगामी काळात कॉर्पोरेट सेक्टरच्या लोकांना मेडिकल कॉलेज काढण्याची परवानगी देण्यात येईल. तसेच, चांगल्या शैक्षणिक संस्थांना जिल्हा रुग्णालयाच्या जागा देण्यात येईल, असंही गडकरींनी जाहीर केलं.

डॉ. संचेती यांना पुण्यभूषण प्रदान

त्रिदल पुणे या संस्थेच्या वतीने ज्येष्ठ अस्थीरोगतज्ञ डॉ. के.एच.संचेती यांना गडकरींच्या हस्ते पुण्यभूषण पुरस्काराने गौरविण्यात आलं. त्यावेळी व्यासपीठावर पालकमंत्री गिरीश बापट, राज्यपाल श्रीनिवास पाटील, महापौर मुक्ता टिळक, रघुनाथ माशेलकर आदी उपस्थित होते.

तीन पद्म पुरस्कार स्वीकारल्यानंतर पुण्याचा पुण्यभूषण पुरस्कार मिळाल्याने मोठा आनंद झाला आहे. पुरस्कारात कुटुंबाचा वाटा मोठा असल्याची भावना डॉ. संचेती यांनी व्यक्त केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images