Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

...अन् मराठवाड्यातील दुष्काळ वाहून गेला!

$
0
0

मटा ऑनलाइन वृत्त । पुणे

गेल्या २४ तासांत झालेल्या धुव्वाधार पावसामुळे मराठवाड्यातील दुष्काळ वाहूनच गेला आहे. वरुणराजाच्या या कृपेमुळे बळीराजा सुखावला आहे, मात्र त्याचवेळी नांदेड, उस्मानाबादमधील अतिवृष्टीमुळे त्यांच्यापुढे नवं संकट उभं राहतं की काय, अशी भीतीही निर्माण झालीय.

विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रातील शेतकऱ्यालाही पावसाने दिलासा दिला आहे. तसंच, नगरमध्येही पावसाची संततधार सुरू आहे.

यंदाच्या पावसाळ्यात ७७ दिवसांपैकी केवळ २९ दिवसच पाऊस झाल्यानं मराठवाड्यावर दुष्काळाचे ढग दाटून आले होते. खरिपाची पिकं जळून गेली होती. आठवड्याभरात ३४ शेतकऱ्यांनी जीवन संपवलं होतं. बाकीचे चातकापेक्षाही आतुरतेनं पावसाची वाट बघत होते. निराशेचे ढग बाजूला होती, विघ्न सरेल अशी आशा त्यांना होती आणि ती खरीही ठरली. राज्यात मान्सून पुन्हा सक्रिय झाल्यानं काल सर्वत्र पावसाने हजेरी लावली आणि विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र चिंब झाला.

मराठवाड्यातील पावसाबद्दल सगळ्यांनाच काळजी लागून राहिली होती. पण ती २४ तासांत दूर झाली आहे. मराठवाड्यात पावसाचं धुमशान सुरू असून ७६ पैकी ४७ तालुक्यातील तब्बल १७१ मंडळांत अतिवृष्टी झाली आहे. नांदेड, बीड, लातूरला दमदार पाऊस पडतोय. नांदेडमध्ये विक्रमी १४४ मिमी पावसाची नोंद झालीय, तर उस्मानाबादमध्ये १५१ मिमी पाऊस पडलाय.

तीन जण वाहून गेले

पारवा (ता. पालम, जि. परभणी) येथील दोन मुली रविवारी सकाळी नाल्याच्या पाण्याचा अंदाज न आल्यामुळे वाहून गेल्या. या दोघींचे मृतदेह सापडले आहेत. दुसरी घटना बीड जिल्ह्यातील पाथरवाला बुद्रुक येथील असून येथील एक व्यक्ती पुरात वाहून गेली. मराठवाड्यातील आठही जिल्ह्यातील तब्बल १७० मंडळांमध्ये अतिवृष्टीची नोंद करण्यात आली आहे.


( नांदेड अपर जिल्हाधिकाऱ्यांच्या घराची अतिवृष्टीमुळे अशी अवस्था झालीय.)

पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांत शनिवारी संध्याकाळी सुरू झालेला पाऊस अजूनही थांबलेला नाही. पुण्यामध्ये रात्रभर संततधार पाऊस झाला. तिथे सकाळी साडेआठ पर्यंत २९ मिमी पावसाची नोंद झाली आहे. त्याशिवाय, महाबळेश्वर (६२ मिमी), सोलापूर (२७ मिमी) औरंगाबाद (४१ मिमी), नाशिक ३१ (मिमी), उदगीर (४५ मिमी), चंद्रपूर (४५ मिमी), बुलडाणा (३९ मिमी), यवतमाळ (३९ मिमी) आणि परभणीतही (४७ मिमी) पावसानं चांगली बॅटिंग केली आहे.


मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


दिवंगत लेखकाला तावडेंकडून शुभेच्छापत्र

$
0
0

मटा ऑनलाइन वृत्त । पुणे

पेपर तपासणीतील गोंधळामुळे अडचणीत सापडलेले राज्याचे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्याकडील सांस्कृतिक खात्यानेही विचित्र घोळ घातला आहे. गेल्या वर्षी निधन झालेले ज्येष्ठ साहित्यिक प्रा. रा. ग. जाधव यांना तावडेंनी वाढदिवसाच्या शुभेच्छा पाठवल्यात. त्यामुळे तावडे पुन्हा टीकेचे लक्ष्य झालेत.

रा. ग. जाधव यांचं २७ मे २०१६ रोजी निधन झालं होतं. त्यांच्या निधनानंतर राज्य सरकारतर्फे त्यांना श्रद्धांजलीही वाहण्यात आली होती. विनोद तावडेंनी शोकसंदेश पाठवला होता. परंतु, तावडेंना आणि त्यांच्या सांस्कृतिक खात्यालाही बहुधा या सगळ्याचा विसर पडला असावा. कारण, रा. ग. जाधव यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देणारं तावडेंच्या स्वाक्षरीचं पत्र पुण्यातील साधना ट्रस्टला पाठवण्यात आलंय. ते पाहून सगळेच अवाक् झालेत. सरकारी विभाग कधीकधी किती डोळे झाकून कामं करतात, याचाच हा नमुना असल्याचं बोललं जातंय.

नामसाधर्म्यामुळे गोंधळ

परभणीचे संघाचे कार्यकर्ते रमेश जाधव यांचा वाढदिवस त्याच दिवशी होता, केवळ नावातील साधर्म्यामुळे अनवधानाने साहित्यिक जाधव यांना ते पत्र गेले, त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करत आहोत, असे स्पष्टीकरण सांस्कृतिक मंत्री विनोद तावडे यांनी दिले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

'धर्माच्या आडून सत्ता राबवणाऱ्यांपासून देशाला वाचवा'

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

'जगात जिथे जिथे धर्म प्राबल्य आहे, अशा प्रत्येक ठिकाणी अन्याय, हिंसा, अत्याचार वास करून आहेत. आपला देश मात्र धर्मनिरपेक्ष लोकशाही व्यवस्थेमुळे वेगळा आहे, असे म्हटले जाते. आज हीच ओळख पुसट होत चालली आहे. जेव्हा समाजात विषवल्ली पसरू लागते, तेव्हा ती कुणालाच सोडत नाही, हे कायम लक्षात ठेवा. या विषवल्लीपासून स्वतःला, देशाला वेळीच वाचवूयात...' अशा शब्दांत प्रख्यात गीतकार जावेद अख्तर यांनी रविवारी देशातील परिस्थितीवर भाष्य करत नागरिकांना एक होण्याचे आवाहन केले. 'जिथे प्रश्न विचारायला मुभा नसेल, ती जागा, तो देश, ते वातावरण निकोप कसे म्हणता येईल,' असा सवाल करत 'धर्माच्या आडून सत्ता राबवू पाहणाऱ्यांपासून आपण स्वतःला वाचवायला हवे,' असे त्यांनी निक्षून सांगितले.

डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या खुनास रविवारी चार वर्षे झाली. त्यांचे मारेकरी अद्याप मोकाट असल्याच्या निषेधार्थ महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीतर्फे करण्यात आलेल्या 'जवाब दो' आंदोलनाच्या निमित्ताने झालेल्या कार्यक्रमात अख्तर बोलत होते. ज्येष्ठ अभिनेते डॉ. श्रीराम लागू, दाभोलकर यांच्या पत्नी शैला दाभोलकर, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या विद्या बाळ आणि साधनाचे संपादक विनोद शिरसाठ उपस्थित होते.



'जिथे प्रश्न विचारायला मुभा नसेल, ती जागा, तो देश, ते वातावरण निकोप कसे म्हणता येईल ? अशा ठिकाणी केवळ पाप-पुण्याच्या हिशेबात न अडकता लोक प्रबोधनाची आवश्यकता निर्माण होते,' याकडे अख्तर यांनी लक्ष वेधले. 'बुद्धिभेद झालेल्या लोकांच्या डोक्यात विज्ञानवाद पोहचू शकत नाही. परंपरांच्या आधीन गेलेले मेंदू समोर दिसणाऱ्या लखलखीत वैज्ञानिक सत्यालाही नाकारतात. एकीकडे चंद्रावर यान पाठवणारे आपण दुसरीकडे मात्र हजारो वर्षांपासून सुरू असणाऱ्या धार्मिक अंधश्रद्धांना जखडून असतो. ही विसंगत मानवी वर्तणूक म्हणजे बहूव्यक्तिमत्त्वाच्या मनोविकृतीपेक्षा वेगळी आहे का,' असा परखड सवाल अख्तर यांनी उपस्थित केला.

----------------

अनेकजण सत्याच्या शोधात प्रवाहाविरुद्ध आपली दिशा ठरवतात. चांगल्यासाठी ते जग बदलू पाहत असतात. डॉ नरेंद्र दाभोलकर हे अशीच एक व्यक्ती होते. जगाला एक नवा विचार त्यांनी देऊ पाहिला; पण आपल्या कर्मठ आणि परंपरांच्या जोखडात रमणाऱ्या समाजाने हे समजूनच घेतले नाही. नवा विचार हेच जगाच्या प्रगतीचे प्रमुख कारण राहिले आहे. मानवी उत्क्रांतीत नव्या विचारांचे स्थान महत्त्वाचे ठरले आहे. ईश्वरी संकेत किंवा मनःशांती वगैरे मिळते म्हणून अवैज्ञानिक किंवा अंधश्रद्धांना खतपाणी देणाऱ्या गोष्टींना भरीस पडणे, हे योग्य नाही. डोळे उघडून बुद्धीचा वापर करत याकडे पाहायला हवे. त्यातूनच सामाजिक मुक्तीचा मार्ग जातो.

-जावेद अख्तर, प्रख्यात गीतकार

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

'या देशात उद्विग्न होण्यापालीकडे दुसरे काय?'

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

'माजी उपराष्ट्रपतींना 'तुम्ही बेधडकपणे जिथे सुरक्षित वाटेल, तिथे जायला मोकळे आहात,' असे सांगितले जात असेल तर आपण या देशात उद्विग्न होण्यापालीकडे काही करू शकण्याची परिस्थिती नाही,' असे टीकास्त्र ज्येष्ठ अभिनेते व दिग्दर्शक अमोल पालेकर यांनी रविवारी सोडले. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीतर्फे आयोजित 'जवाब दो' आंदोलनाच्या व्यासपीठावर पालेकर बोलत होते.

'ज्या देशाचे पंतप्रधान वैज्ञानिकांच्या परिषदेत गणपती हे हेड ट्रान्सप्लांटचे उत्तम उदाहरण असल्याचे म्हणत असतील, अशा देशात वैज्ञानिक दृष्टिकोन कसा प्रसारित होऊ शकेल ? मुसलमान आणि ख्रिश्चन या धर्मांचे लोक मूळ भारतीय नसल्याने त्यांना या देशात अल्पसंख्याकांना दिल्या जाणाऱ्या कुठल्याही सुविधा मागण्याचा हक्क नाही, असे विधान करणारे राष्ट्रपती असतील, तर ते नागरिकांना घटनात्मक संरक्षण कसे देऊ शकतील ?...' असे सवाल करत पालेकर यांनी पंतप्रधान आणि राष्ट्रपतींवर टीकेची झोड उठवली. 'सरकार कुठल्याही रंगाचे असो, त्यापैकी कोणालाच सत्याला सामोरे जायची इच्छा नसते. त्यामुळे न्याय मिळेलच याची शाश्वती कितपत ठेवावी, हा आज प्रश्न आहे,' अशी खंत त्यांनी व्यक्त केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शांत‌िसेनेचे शौर्य प्रथमच शब्दबद्ध

$
0
0

निवृत्त लष्करी अधिकाऱ्यांचे प्रतिपादन; पळसोकर यांच्या पुस्तकाचे प्रकाशन

म. टा. प्रतिनिधी, पुणे
‘भारतीय शांत‌िसेनेने १९८७ ते १९८९ या काळामध्ये श्रीलंकेमध्ये केलेली कामगिरी स्वातंत्र्यानंतरची सर्वांत कठीण कारवाई होती. या कारवाईमध्ये भारतीय लष्कराने असीम शौर्य दाखविले, हे शौर्य ब्रिगेडियर आर. आर. पळसोकर यांच्या पुस्तकाच्या रूपाने प्रथमच शब्दबद्ध झाले आहे,’ असे प्रतिपादन लेफ्टनंट जनरल (निवृत्त) बी. टी. पंडित यांनी केले.

या कारवाईमध्ये ७, इन्फंट्री ब्रिगेडचे नेतृत्व केलेल्या ब्रिगेडियर (निवृत्त) आर. आर. पळसोकर यांच्या ‘अवर्स नॉट टू रिझन व्हाय’ या पुस्तकाचे रविवारी प्रकाशन झाले. गरवारे महाविद्यालयाच्या एव्ही सभागृहामध्ये झालेल्या कार्यक्रमात पंडित यांच्यासह ब्रिगेडियर (निवृत्त) एच. एस. कौरा, कर्नल आनंद भागवत, सुनिधी प्रकाशनाचे अविनाश काळे उपस्थित होते. पंडित म्हणाले, ‘श्रीलंकेतील कारवाई अतिशय कठीण होती आणि त्यातील पराक्रमाच्या अनेक कथा समोर आल्याच नाहीत. या पुस्तकातून या विस्मृतीत गेलेल्या अनुभवांना उजाळा मिळाला आहे. या कारवाई वेळी लष्कराच्या कामगिरीकडे दुर्लक्षच करण्यात आले. त्यामुळेच, कारवाईमध्ये नेतृत्व केलेल्या ब्रिगेडियर पळसोकर यांच्यासारख्या अधिकाऱ्याच्या मनामध्ये अस्वस्थता निर्माण होते. त्यांची ही अस्वस्थता अतिशय तटस्थपणे या पुस्तकातून समोर आली आहे.’ चीनबरोबरील १९६२चे युद्ध, श्रीलंकेतील कारवाई, कारगिल युद्ध अशा प्रत्येक वेळी खापर लष्कराच्याच डोक्यावर फोडण्यात आले. मात्र, त्याच्याशी संबंधित अन्य प्रशासकीय अधिकाऱ्यांना मात्र मानसन्मान मिळत गेले, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली. काश्मीर खोऱ्यातील लष्कराला विशेषाधिकार देणारा कायदा (अफ्स्पा) मागे घेण्याविषयी चर्चा होत आहे. मात्र, हा कायदा मागे घेतला, तर लष्कर पोलिसांपेक्षा दुर्बळ होईल, अशी भीतीही त्यांनी व्यक्त केली.

‘लिबरेशन टायगर्स ऑफ तमीळ ईलम’च्या (एलटीटीई) बालेकिल्ल्यामध्ये करण्यात आलेली ही कारवाई खूप कठीण होती. या कारवाईमध्ये भारतीय लष्कराकडील साधने अतिशय तुटपुंजी होती,’ याकडे कौरा यांनी लक्ष वेधले. या कारवाईमध्ये कौरा गंभीर जखमी झाले होते. त्या वेळी सैनिकांनी दाखविलेल्या धैर्याची आणि प्रसंगावधानाची आठवणही त्यांनी सांगितली.

‘एलटीटीई’च्या बालेकिल्ल्यामध्ये घनदाट जंगल होते. ‘एलटीटीई’चे अतिरेकी तुलनेने जास्त प्रशिक्षित होते आणि त्यांच्याकडील शस्त्रास्त्रेही आधुनिक होती. त्यामुळे, ही कारवाई कठीण होती,’ असे आनंद भागवत यांनी सांगितले. अविनाश काळे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. मंजिरी जावडेकर यांनी सूत्रसंचालन केले, तर विलोल पळसोकर यांनी आभार मानले.

सैनिक-अधिकाऱ्यातील नाते

या कारवाईमध्ये पळसोकर यांच्या नेतृत्वाखाली लढणारा कॅप्टन अरुण शंकर हा तरुण अधिकारी शहीद झाला. त्याच्या वडिलांनी पळसोकर यांना पत्र लिहिले आणि त्यामध्ये त्यांनी व्यक्त केलेल्या भावनांचा उल्लेख त्यांनी भाषणामध्ये केला. तसेच, ‘एलटीटीई’कडून गस्तीवर असणाऱ्या आणि पाहणी करणाऱ्या तुकड्यांना प्रामुख्याने लक्ष्य करण्यात येत होते. त्यामुळे, हाताखाली असणाऱ्या प्रत्येक सैनिकाच्या जीविताची जबाबदारी होती. तुलनेने १०० सैनिक असणाऱ्या एका कंपनीसाठी दोन-तीन बुलेटप्रुफ जॅकेट मिळत होते, अशी आठवणही त्यांनी सांगितली. हाच धागा पकडत, बी. टी. पंडित यांनी सैनिक-अधिकाऱ्यांमधील नाते पितापुत्रासारखे असते. तीच काळजी आणि झालेल्या हानीबद्दल खंत पुस्तकातून दिसत असल्याचे पंडित यांनी सांगितले.

‘शौर्य प्रथमच जगासमोर’

‘एलटीटीई’च्या बालेकिल्ल्यामध्ये पॅराकमांडोंबरोबर कर्नल आनंद भागवत यांच्या एका तुकडीचीही निवड करण्यात आली होती. मात्र, या कारवाई वेळी या तुकडीला पॅराकमांडोसारखे प्रशिक्षण नव्हते किंवा त्यांच्यासारखी उपकरणेही नव्हती. त्याही परिस्थितीमध्ये ही कारवाई यशस्वी झाली. या कारवाईचा पळसोकर यांच्या पुस्तकामध्ये उल्लेख असून, इतिहासामध्ये प्रथमच या शौर्याची दखल घेण्यात आल्याचे भागवत यांनी नमूद केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘वंदे मातरम’ला हरकत काय?

$
0
0

आमदार मेधा कुलकर्णी यांचा सवाल

म. टा. प्रतिनिधी, पुणे
‘देशात हिंदू आणि मुस्लिम नागरिकांचा ‘डीएनए’ एकच आहे. असे असूनही काही लोक ‘वंदे मातरम’ म्हणत नाही. आपल्या सर्वांचा देशभक्ती हा धर्म असल्यास ‘वंदे मातरम’ म्हणायला काय हरकत आहे,’ असा सवाल आमदार मेधा कुलकर्णी यांनी रविवारी उपस्थित केला. दरम्यान, या वेळी लोहगाव विमानतळाला बाजीराव पेशवे यांचे नाव देण्याची मागणी करण्यात आली.

थोरले बाजीराव पेशवे प्रतिष्ठानातर्फे श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे यांच्या ३१७व्या जयंतीनिमित्त ‘थोरले बाजीराव पेशवे पुरस्कार’ आमदार कुलकर्णी यांच्या हस्ते कॅप्टन दिलीप दोंदे (निवृत्त) यांना प्रदान करण्यात आला. प्रतिष्ठानचे अध्यक्ष एअरमार्शल भूषण गोखले (निवृत्त), पेशवे यांचे वंशज श्रीमंत उदयसिंह पेशवा, नवाब शादाब अली बहादूर पेशवा, रवींद्र प्रभुदेसाई, प्रतिष्ठानचे सचिव कुंदनकुमार साठे, उपाध्यक्ष अनिल गानू आदी उपस्थित होते.

कुलकर्णी म्हणाल्या, ‘देशाच्या इतिहासाचा वैज्ञानिक दृष्टिकोनातून अभ्यास केल्यानंतर सर्वांचा ‘डीएनए’ हा एकच असल्याचे समोर आले आहे. मग तो हिंदू असो वा मुस्लिम नागरिक. दोघांचाही डीएनए एकच आहे. तरीही, काही लोक वंदे मातरम म्हणत नाहीत, याचे वाईट वाटते. आपल्या देशात सर्वांचा देशभक्ती हा धर्म असल्यास वंदे मातरम म्हणायला काय हरकत आहे, असा प्रश्न निर्माण होतो. त्यामुळे मनात एकप्रकारे चीड निर्माण होते. बाजीराव पेशवे यांच्या जीवनावर संजय लीला भन्साळी यांनी चित्रपट काढला. त्या चित्रपटात बाजीरांवांच्या शौर्याची कथा कमी दाखविण्यात आली आणि त्यांच्या जीवनातील लहान गोष्टींना अधिक प्रमाणात दाखविण्यात आले. चित्रपटात ‘वाट लागली’ गाणे दाखविण्यात आले. या सर्व गोष्टींची निर्मिती होताना आपण गप्प होतो. या गोष्टींचा विरोध करण्यासाठी किती पेशवे रस्त्यावर उतरले अथवा किती पेशवे शनिवाड्यावर जमले होते, हे आपण पाहिले. त्यामुळे इथून पुढे बाजीराव पेशव्यांसारखे थोरपुरूष असो वा स्वांतत्र्यालढ्यासाठी बलिदान देणारे थोरपुरूष असो, त्यांचे विचार आमच्यात असून आपण वंशज असल्याचे दाखविले पाहिजे.’

पेशवा म्हणाले, ‘आपल्या देशात बाजीराव पेशव्यांसारख्या साहसी राजांचे आणि देशाच्या स्वातंत्र्यालढ्यात सहभागी झालेल्या थोरपुरूषांच्या वंशजांची सरकारकडून उपेक्षाच करण्यात आली आहे. मस्तानीसाहेबा यांचा योग्य इतिहास समोर आला नाही.’ दोंदे यांनी मनोगत व्यक्त केले. गोखले यांनी प्रास्ताविक केले. साठे यांनी आभार मानले.

‘विमानतळाला नाव द्यावे’

बाजीराव पेशवे यांचा पुतळा उभा रहायला ३० वर्षे लागली. त्यानंतर त्यांचे तिकीट यायला १० वर्षे लागली. त्यांचे तैलचित्र आजही कुठे दिसत नाही. त्यामुळे राज्याच्या विधानसभा आणि विधानपरिषदेत त्यांचे तैलचित्र सरकारने त्वरित लावावे. त्यांच्या सन्मानार्थ लोहगाव विमानतळाला बाजीराव पेशवे यांचे नाव द्यावे, अशी मागणी पेशवे यांचे वंशज श्रीमंत उदयसिंह पेशवा यांनी केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘सेट’ परीक्षार्थींना फटका

$
0
0

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून २५०० जण अपात्र

म. टा. प्रतिनिधी, पुणे
सेट परीक्षेच्या ओएमआर शीटवर बैठक क्रमांक शाईने गडद करताना झालेल्या चुकीमुळे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने सुमारे अडीच हजार परीक्षार्थ्यांना अपात्र ठरवले आहे. त्यामुळे विद्यापीठाने मूल्यमापन संगणकीय प्रणालीने न करता तपासनीसांद्वारे करण्यात यावे, अशी मागणी आता परीक्षार्थी करत आहेत. तसेच, परीक्षार्थ्यांचे भवितव्य धोक्यात आले असून विद्यापीठाने यावर त्वरित निर्णय घ्यावा, अशी मागणीही परीक्षार्थ्यांनी केली आहे.

परीक्षार्थ्यांना उत्तरपत्रिका म्हणून ओएमआर शीट देण्यात आल्या होत्या. त्यावर बैठक क्रमांक, प्रश्नसंच संकेतांक आदी माहिती उत्तरपत्रिकेवरील वर्तुळाला शाईने गडद करून भरायची होती. मात्र, काही परीक्षार्थ्यांकडून ही प्रक्रिया राहून गेल्याने, तसेच काहींकडून काही तांत्रिक चुका झाल्याने त्यांना विद्यापीठाने शून्य गुण दिले आहेत. यामुळे अडीच हजार परीक्षार्थी अपात्र ठरले आहेत. कोल्हापूर येथील परीक्षा केंद्रावरील सुमारे सहा हजार विद्यार्थ्यांना परीक्षेवेळी चुकीच्या उत्तरपत्रिका दिल्या होत्या. त्यांचे मूल्यमापन संगकीय प्रणालीद्वारे न करता व्यक्तीने केले आहे. त्या विद्यार्थ्यांचे निकाल जाहीर होत असतील, तर आमचेही गुण जाहीर करा अशी मागणी आता परीक्षार्थी करत आहेत.

योगेश ठाकूर म्हणाले, ‘ओएमआर शीटवर चूक झाली असेल, तर निकाल जाहीर करण्यात येत नाही. तरीही काही परीक्षार्थ्यांचे निकाल जाहीर करण्यात आले आहेत. त्यामुळे आमचे निकालही लवकर जाहीर करावेत. तसेच कोल्हापूर केंद्रावरील विद्यार्थ्यांना जो नियम वापरला, तोच नियम इतर विद्यार्थ्यांना वापरावा. आम्हाला तांत्रिक बाबी म्हणून अपात्र ठरविण्यात आले आहे.’ याबाबत जनता दल युनायटेडचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस कुलदीप आंबेकर म्हणाले, ‘विद्यापीठ प्रशासन वारंवार विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळत आहे. विद्यार्थ्यांकडून येणाऱ्या निवेदनाला केराची टोपली दाखवण्यात येत आहे. त्यामुळे विद्यापीठाने लवकरात लवकर या प्रश्नावर लक्ष घालावे.’ राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे शहराध्यक्ष ऋषी परदेशी यांनी परीक्षार्थ्यांबाबत त्वरित कारवाई करून त्यांना न्याय घेण्याची मागणी विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. अरविंद शाळीग्राम यांच्याकडे केली आहे.
...
सेटच्या परीक्षेत नेमका काय प्रकार घडला आहे, याबाबत माहिती घेत आहोत. माहिती तपासून त्यावर योग्य तो निर्णय घेण्यात येईल. या विषयासंदर्भात विद्यापीठ अनुदान आयोगाशी चर्चा करण्यात येईल.
- डॉ. अरविंद शाळीग्राम, कुलसचिव, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ज्येष्ठांच्या पाससाठी हवी ७५ टक्के सवलत

$
0
0

प्रवासी संघटनांकडून बस पास दरवाढीचा निषेध

म. टा. प्रतिनिधी, पुणे
पुणे महानगर परिवहन महामंडळाने ज्येष्ठ नागरिकांना दिल्या जाणाऱ्या सवलतीच्या पासमध्ये अचानक केलेली वाढ अन्यायकारक आहे. पीएमपी बसने प्रवास करणाऱ्यांमध्ये ज्येष्ठ नागरिकांची संख्या अधिक असून, ही वाढ त्यांच्यासाठी गैरसोयीची आहे. पीएमपीने ही दरवाढ मागे घेऊन ७५ टक्के सवलतीत ज्येष्ठ नागरिकांना पास द्यावेत, अशी मागणी ज्येष्ठ नागरिकांनी पीएमपी प्रवासी मेळाव्यात केली.

पीएमपी प्रवासी मंच आणि मध्यवर्ती ज्येष्ठ नागरिक संघटनेच्या वतीने म्हात्रे पुलाजवळील इंद्रधनुष्य सभागृहात पीएमपी प्रवासी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी मध्यवर्ती ज्येष्ठ नागरिक संघटनेचे सचिव पांडुरंग केसकर, मंचाचे अध्यक्ष जुगल राठी, विवेक वेलणकर, संजय शितोळे, सतीश चितळे आदी उपस्थित होते.

‘ज्येष्ठ नागरिकांसाठी पीएमपी हे प्रवासाचे सुरक्षित साधन आहे, परंतु ज्येष्ठ नागरिकांच्या बस पासमध्ये दरवाढ करून त्यांना विनाकारण मनस्ताप दिला जात आहेत. पुण्यातील १५० ज्येष्ठ नागरिक संघाकडून पास दरवाढीचा आम्ही निषेध करीत आहोत. झालेली वाढ थांबवीत ७५ टक्के सवलत ज्येष्ठ नागरिकांच्या पासमध्ये द्यावी,’ अशी मागणी केसकर यांनी केली. ‘पीएमपीकडून ज्येष्ठ नागरिकांच्या बस पासमध्ये ५६ टक्के अनावश्यक आणि जाचक दरवाढ करण्यात आली आहे. जिल्हा परिवहन विभागाच्या मान्यतेशिवाय ही दरवाढ करणे अयोग्य आहे,’ असे वेलणकर म्हणाले. तर, ‘बस पास वापरणारे ज्येष्ठ नागरिक अधिक आहेत, तरी देखील दरवाढ करण्यात आली आहे. त्यामुळे संस्थाचे, आणि नागरिकांचे म्हणणे ऐकून घ्यावे,’ असे आवाहन राठी यांनी केले.

पीएमपीकडे सर्वाधिक तक्रारी नोंदविणारे अनिल घुले, सु. वा. फडके, यतीश देवाडिगा, नीळकंठ मांढरे, रूपेश केसरकर, जयदीप साठे, विपुल पाटील, देवधर, वैभव कामथ, संतोष विसाळ दत्तानंद कुलकर्णी यांचा मोफत पास देऊन सन्मान करण्यात आला.’

माजी महापौरांचा आरोप

‘पीएमपीचा होणारा तोटा भरून काढण्यासाठी दोन्ही महापालिका भक्कम आहेत. तरीही, पीएमपीचा तोटा होतोय म्हणून प्रवाशांच्या खिशात हात घातला जात आहे. तसेच, पीएमपीच्या अधिकाऱ्यांची प्रतिमा चांगली ठेवण्यासाठी चुकीचे आकडे दाखवून पुणेकरांची दिशाभूल केली जात आहे,’ असा आरोप माजी महापौर आणि पीएमपीचे माजी संचालक प्रशांत जगताप यांनी पीएमपी प्रशासनावर केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


आणखी वीस टीपी स्कीम

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
म्हाळुंगे परिसरात पहिल्या नगररचना योजनेचा (टीपी स्कीम) इरादा जाहीर केल्यानंतर पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणातर्फे (पीएमआरडीए) रिंगरोडसाठी वीसहून अधिक टीपी स्कीम विकसित केल्या जाणार आहेत. पीएमआरडीएच्या हद्दीतील सुमारे ९ हजार हेक्टरहून अधिक जागा टीपी स्कीमद्वारे विकसित होऊ शकेल, असा दावा केला जात आहे.

पीएमआरडीएच्या हद्दीतील पहिल्या टीपी स्कीमची माहिती देण्यासाठी नुकतीच पीएमआरडीएने कार्यशाळा आयोजित केली होती. म्हाळुंगे परिसरातील २९१ हेक्टरवर होणाऱ्या या पहिल्या टीपी स्कीमचा प्रा-रूप आराखडा येत्या तीन महिन्यांत सादर केला जाणार आहे. या टीपी स्कीमप्रमाणेच पीएमआरडीएच्या हद्दीतील १२८ किमीच्या रिंगरोडचा विकास करण्यासाठी टीपी स्कीमचा आधार घेण्यात येणार आहे. त्याकरिता, पीएमआरडीएच्या वेगवेगळ्या भागांत साधारणतः वीसहून अधिक टीपी स्कीम नियोजित आहेत, अशी माहिती पीएमआरडीएचे आयुक्त आणि विशेष कार्यकारी अधिकारी (सीईओ) किरण गित्ते यांनी दिली.

हिंजवडीला जाणाऱ्या पर्यायी रस्त्याकरिता म्हाळुंगेची टीपी स्कीम प्राधान्याने पूर्ण करण्याचा प्रयत्न केला जाणार असल्याचे संकेत त्यांनी दिले. त्यानंतर, सातारा-सोलापूर रस्त्यावरील वाहतूक कोंडी कमी करण्याच्या दृष्टीने या भागातील रिंगरोडचा विकास सर्वप्रथम हाती घेण्यात येणार आहे. त्यासाठी, उरळी कांचन भागात टीपी स्कीमचे नियोजन करण्यासाठी चाचपणी सुरू असल्याचे सूतोवाच त्यांनी केले. याशिवाय, वाघोली, धायरी आणि इतर अविकसित भागांमध्ये टीपी स्कीमच्या माध्यमातून सर्वसमावेशक विकास साधण्याचा प्रयत्न असेल, असे त्यांनी स्पष्ट केले. या सर्व भागांतील तब्बल नऊ हजार हेक्टर जागा टीपी स्कीमद्वारे विकसित होऊ शकते, असा दावा त्यांनी केला.

प्रत्येक स्कीमसाठी स्वतंत्र नियम

एखाद्या शहराच्या किंवा प्राधिकरणाच्या विकास आराखड्यामध्ये (डीपी) आरक्षणे ताब्यात घेण्यासाठी, बांधकामांसाठी ठराविक नियम असतात. नगररचना योजनेमध्ये (टीपी स्कीम) असे बंधन नसते. एखाद्या टीपी स्कीमसाठी निश्चित केलेले नियम दुसऱ्या भागातील टीपी स्कीमसाठी लागू होतात, असे नाही. या टीपी स्कीमचा आकार आणि स्थानिक गरजा लक्षात घेऊन नवीन नियम तयार करता येतात. प्रत्येक टीपी स्कीमसाठी स्वतंत्र नियम असू शकतात, असे संकेत नगरविकास विभागाचे प्रधान सचिव नितीन करीर यांनी दिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नोंदणी विवाहासाठी ऑनलाइन यंत्रणा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
नोंदणी पद्धतीने होणाऱ्या विवाहाच्या ऑनलाइन नोटिसा पाठविण्यासाठी राज्याच्या नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाकडून विकसित केलेल्या सॉफ्टवेअरची चाचणी घेण्याचे काम सुरू असून, सप्टेंबर महिन्यापासून ही सुविधा सुरू होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांचा त्रास कमी होऊन एजंटपासून कायमची सुटका होणार आहे.

सद्यपरिस्थितीत विवाह नोंदणीच्या नोटिसा, नोंदणी आणि प्रमाणपत्र देणे ही प्रक्रिया ‘ऑफलाइन’ केली जाते. ही प्रक्रिया नागरिकांच्यादृष्टीने त्रासदायक आहे; तसेच एजंटांकडून आर्थिक लूट होत असल्याच्या तक्रारी नागरिकांकडून येत असतात. यावर कायमचा तोडगा काढण्यासाठी विवाह नोंदणी, नोटिसा आणि प्रमाणपत्र हे ‘ऑनलाइन’ देण्यासाठी सॉफ्टवेअर विकसित करण्यात आले आहे.

याबाबत राज्याचे नोंदणी महानिरीक्षक अनिल कवडे म्हणाले, ‘विभागाकडून विकसित करण्यात आलेल्या सॉफ्टवेअरची चाचणी घेण्याचे काम सध्या सुरू आहे. त्यानंतर सप्टेंबर महिन्यात ही सेवा सुरू होऊ शकेल.’

नोंदणी पद्धतीने करण्यात येणाऱ्या विवाहासाठी एक महिना अगोदर नोटीस द्यावी लागते. त्यासाठी विवाहेच्छुकांना विवाह नोंदणी कार्यालयात जावे लागते. आता नोंदणी आणि मुद्रांक शुल्क विभागाकडून ही नोटीस देण्यासाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्याची सुविधा केली जाणार आहे. सध्या नोंदणी पद्धतीने विवाह करण्यासाठी पुण्यात एक आणि मुंबईत दोन कार्यालये आहेत. अन्य ठिकाणी जिल्हा स्तरावर असलेल्या नोंदणी कार्यालयाच्या मुख्यालयामध्ये हे काम होते. एक महिना अगोदर नोटीस देण्याची प्रक्रिया करताना संबंधितांना त्रास सहन करावा लागतो. विवाह नोंदणी कार्यालयांमध्ये एजंटचा सुळसुळाट असतो. यातून कायमची सुटका करण्यासाठी ऑनलाइन सेवा सुरू करण्यात येणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कर्ज बुडवणाऱ्यांवर फौजदारी कारवाई हवी

$
0
0

स्टेट बँक एम्प्लॉइज फेडरेशनची मागणी

म. टा. प्रतिनिधी, पुणे
सरकार राष्ट्रीयीकृत बँकांच्या विलिनीकरणाचा अजेंडा राबवत आहे. त्याला बँक कर्मचाऱ्यांचा विरोध आहे. बँका व सरकार बड्या कर्जबुडव्यांना सवलती देत असताना सर्वसामान्य ठेवीदारांना वेठीस धरण्यात येत आहे. जाणीवपूर्वक कर्ज बुडविणाऱ्यांवर, तसेच अशा व्यक्तींना कर्ज मंजूर करणाऱ्यांवर फौजदारी कारवाई केली जावी,’ अशी मागणी महाराष्ट्र स्टेट बँक एम्प्लॉइज फेडरेशनचे सरचिटणीस देवीदास तुळजापूरकर यांनी पत्रकार परिषदेत केली.

पुणे जिल्हा बँक कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष दीपक पाटील, नंदकुमार चव्हाण, ललिता जोशी, शैलेश टिळेकर आदी या वेळी उपस्थित होते. ‘राष्ट्रीयीकृत बँकांचे खासगीकरण, विलिनीकरणाचा अजेंडा केंद्र सरकार रेटू पाहात आहे. बँकांचे कर्ज बुडविणाऱ्या बड्या कर्जदारांना विविध प्रकारच्या सवलती देण्याचा घाट घातला जात आहे. दुसरीकडे सर्वसामान्य बचत खातेदारांना मिळणाऱ्या तुटपुंज्या व्याजालाही कात्री लावण्यात आली आहे. हे निर्णय जनतेच्या विरोधात आहेत,’ असे तुळजापूरकर म्हणाले.

२२ ऑगस्ट रोजी संप

‘युनायटेड फोरम ऑफ बँक युनियनच्या नेतृत्वाखाली संघटित दहा लाख कर्मचारी २२ ऑगस्टला एक दिवसीय संपावर जाणार आहेत, तर १५ सप्टेंबरला दिल्ली येथे संसदेवर महामोर्चा काढण्यात येणार आहे. फेडरेशनतर्फे महाराष्ट्रातील १०० बड्या थकीत कर्जदारांची यादी जाहीर केली जाणार आहे. तसेच त्यांच्याविरोधात त्यांचे घर किंवा ऑफिससमोर सप्टेंबर महिन्यात आंदोलन करण्यात येईल,’ असेही तुळजापूरकर यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जिल्ह्यातील सात धरणे फुल्ल

$
0
0

संततधारेमुळे जलसाठा वाढला; पवना धरणातून विसर्ग

म. टा. प्रतिनिधी, पुणे
संततधारेमुळे जिल्ह्यातील पानशेत आणि पवना धरणांसह चासकमान, डिंभे, कळमोडी, कासारसाई आणि आंद्रा ही सात धरणे शंभर टक्के भरली असून, पवना धरणातून मुळा नदीमध्ये सुमारे १५०० क्युसेक्स पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे. पानशेत धरणातून रात्री खडकवासला धरणात पाणी सोडण्यास सुरुवात करण्यात आली असून, पावसाची स्थिती अशीच राहिल्यास खडकवासला धरणातून सोमवारी सकाळपासून मुठा नदीत विसर्ग सुरू केला जाणार आहे.

पावसाला शनिवारी सुरुवात झाल्यानंतर संपूर्ण रात्र आणि रविवारी दिवसभर सलग पाऊस झाल्याने जिल्ह्यातील धरणांची पातळी वाढली आहे. पानशेत धरण क्षेत्रात सुमारे १६ मिलिमीटर पाऊस पडला. या धरणात सुमारे १०.६५ टीएमसी पाणीसाठा झाल्याने हे धरण शंभर टक्के भरले गेले आहे. त्यामुळे या धरणातून खडकवासला धरणात पाणी सोडण्यास सुरुवात करण्यात आली. शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला धरणाची पातळी खालावली होती. मात्र, पानशेतमधील पाण्यामुळे आणि या परिसरात झालेल्या सुमारे १२ मिलिमीटर पावसामुळे या धरणाचीही पातळी वाढली आहे. हे धरण सुमारे ८१ टक्के भरले आहे.

वरसगाव परिसरात सुमारे १६ मिलिमीटर पाऊस पडला आहे. अद्याप या धरणाची पातळी पुरेशी वाढलेली नाही. या धरणात ११.०७ टीएमसी पाणीसाठा झाला असून, सुमारे ८७ टक्के धरण भरलेले आहे. टेमघर धरणात पाणी साठविण्यात येत नसले, तरी हे धरण सुमारे ४१ टक्के भरले आहे. या धरणातून सुमारे ४०० क्युसेक्स पाणी दिवसभरात सोडण्यात आले आहे. जिल्ह्यात सर्वाधिक पाऊस पवना धरण क्षेत्रात पडला. या धरणाच्या परिसरात सुमारे २२ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. या धरणामध्ये सुमारे ८.५१ टीएमसी पाणीसाठा झाल्याने हे धरणही शंभर टक्के भरले आहे. या धरणातून रविवारी दुपारनंतर विसर्ग करण्यास सुरुवात करण्यात आली.

खडकवासला धरणाचे अधीक्षक पांडुरंग शेलार म्हणाले, ‘पवना धरणातून दिवसभरात सुमारे १५०० क्युसेक्स पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे. खडकवासला धरण अद्याप पूर्णपणे भरले गेलेले नाही. पानशेत धरणातून खडकवासलामध्ये पाणी सोडण्यास रात्री सुरुवात करण्यात आली असून, या धरणाची पातळी वाढल्यास सोमवारी सकाळी मुठा नदीत पाण्याचा विसर्ग सुरू केला जाणार आहे.’

दरम्यान, जिल्ह्यातील अन्य धरणांपैकी डिंभे धरणही पूर्णपणे भरले गेले आहे. या धरण परिसरात ११ मिलिमीटर पाऊस पडला. या धरणातील उपयुक्त पाणीसाठा १२.४९ टीएमसी झाला आहे. कळमोडी धरण परिसरात सुमारे १६ मिलिमीटर पाऊस झाला असून, हे धरणही भरले आहे. या धरणाची पाणीसाठा क्षमता सुमारे दीड टीएमसी आहे. चासकमान धरणात सुमारे ७.५७ टीएमसी पाणीसाठा झाल्याने हे धरण शंभर टक्के भरले गेले आहे. आंद्रा धरण परिसरात सुमारे २१ मिलिमीटर पाऊस झाल्याने हे धरण पूर्णपणे भरले गेले आहे. या धरणात २.९२ टीएमसी पाणीसाठा झाला आहे. कासारसाई धरणाची क्षमता कमी आहे. या धरणात ०.५७ टीएमसी पाणीसाठा झाल्यामुळे हे धरण शंभर टक्के भरले आहे. या परिसरात सुमारे १६ मिलिमीटर पाऊस झाला.

​भाटघर धरणाच्या परिसरात तुलनेने कमी पाऊस झाला आहे. दिवसभरात सुमारे पाच मिलिमीटर पाऊस झाल्याने हे धरण सुमारे ९३ टक्के भरले आहे. सध्या या धरणात २१.८१ टीएमसी पाणीसाठा झाला आहे. नीरा देवघर धरणाच्या परिसरात १८ मिलिमीटर पाऊस झाल्याने या धरणाची पाणीपातळी वाढली आहे. हे धरण सुमारे ९७ टक्के भरले असून, सध्या ११.३२ टीएमसी पाणीसाठा आहे.

उजनीत ४३ टक्के पाणीसाठा

उजनी धरणाच्या परिसरात पावसाचा जोर तुलनेने कमी नाही. या परिसरात दिवसभरात सुमारे १५ मिलिमीटर पाऊस पडला आहे. त्यामुळे हे धरण सुमारे ४३ टक्के भरले आहे. या धरणात सध्या २२.९१ टीएमसी पाणीसाठा असल्याचे जलसंपदा विभागाकडून सांगण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पावसामुळे वाहतूक संथ

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
पावसाची रविवारी दिवसभर सुरू असलेली संततधार वाहतुकीवर प​रिणाम करणारी ठरली. वाहतूक संथ सुरू झाल्याने सायंकाळच्या सुमारास काही भागात वाहनांच्या रांगा लागल्याचे चित्र होते. रस्त्यांवर साचणारे पाणी वाहतूक संथ होण्यास कारणीभूत असल्याची प्रतिक्रिया वाहतूक पोलिसांनी व्यक्त केली.

मोठ्या विश्रांतीनंतर शनिवारी रात्रीपासून पावसाने कोसळण्यास सुरुवात केली असून रविवारी दिवसभर संततधार सुरू होती. सुटीचा दिवस असल्याने रस्त्यावरील वाहतूक तुलनेने कमी होती. मात्र, सायंकाळच्या वेळेस रस्त्यांवरील वाहने वाढल्यानंतर रांगा लागल्याचे ​चित्र होते. शहरातील अनेक रस्त्यांवर पाणी साचल्याने वाहतूक संथगतीने सुरू होती.

गेल्या पावसातही शहरातील वेगवेगळ्या रस्त्यांवर ४६ ठिकाणी पाणी साचण्याचे प्रकार घडले होते. महापालिका प्रशासनाने या ​ठिकाणी पडलेले खड्डे बुजवले असले तरी त्या ठिकाणी पाणी साचण्याचे प्रकार रविवारीही पाहवयास मिळाले. वाहतूक पोलिसांनी सायंकाळच्या सुमारास अनेक सिग्नल बंद करून चौकात उभे राहून वाहतूक नियमन केले. परिणामी वाहतूक कोंडीतून वाहन चालकांची सुटका होण्यास मदत झाली.

शहरात रविवारी पडलेली संततधार तसेच पुढील काही काळ पाऊस सुरू राहिला तर ओढ्या-नाल्यांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी येण्याची शक्यता आहे. पुन्हा एकदा ओढे-नाले तुंबले तर नालेसफाईचा विषय एरणीवर येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. महापालिका प्रशासनानेही याबाबत काळजी घेण्यास सुरूवात केली असून पावसाचे पाणी साचणार नाही, यासाठी कार्यवाही सुरू केली आहे. संततधारेमुळे रस्त्यावर खड्डे पडून वाहतूक संथगतीने चालते. त्यावर तत्काळ उपायोजना करण्यासाठी महापालिकेच्या मोबाइल व्हॅन कार्यरत करण्यात आल्या आहेत. खड्ड्यांची माहिती मिळताच मोबाइल व्हॅन त्या ठिकाणी पोहोचून खड्डे बुजवण्यात येत असल्याचे महापालिकेच्या वतीने सांगण्यात येत आहे.

शहरात ३८ ठिकाणी झाडे पडली

शहरात मध्यरात्रीपासून सुरू झालेल्या दमदार पावसामुळे विविध भागात ३८ झाडे व फांद्या पडल्याच्या घटना घडल्या. मात्र, यामध्ये जिवीत हानी तसेच नुकसान झालेले नाही. कर्वेनगर, कोथरूड, औंध, बोपोडी, कल्याणीनगर, येरवडा या भागांमध्ये घटना घडल्या आहेत. सुदैवाने यामध्ये कोणतीही जिवीत हानी झालेली नाही. अग्निशमन दलाकडून तत्काळ घटनास्थळी दाखल होऊन झाडे बाजूला करण्यात आली आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गणेशोत्सवाचे उपक्रम बालेवाडी स्टेडियममध्ये?

$
0
0

ढोल वादन, मूर्ती निर्मिती कार्यक्रमांवर पावसाचे सावट

म. टा. प्रतिनिधी, पुणे
सार्वजनिक गणेशोत्सवाच्या शतकोत्तर रौप्यमहोत्सवानिमित्त ढोल वाजविण्याचा तसेच गणपतीच्या शाडूच्या मूर्ती तयार करण्याचा ‘विश्वविक्रम’साठी सज्ज झालेल्या पुणे महापालिकेच्या या उपक्रमांवर पावसाची ‘अवकळा’ ओढावली आहे. हे दोन्ही उपक्रम बालेवाडी स्टेडिअममध्ये होण्याची दाट शक्यता निर्माण झाली असून महापालिकेला आज, सोमवारी या उपक्रमांच्या ठिकाणांबाबत अंतिम निर्णय घ्यावा लागणार आहे.

महापालिकेतर्फे सार्वजनिक गणेशोत्सवाच्या शतकोत्तर रौप्यमहोत्सवानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. संततधार पावसाचा रविवारी सकाळी झालेल्या ‘दुचाकी रॅली’ला फटका बसला. शाळांतील मुलांकडून एकाचवेळी सर्वाधिक शाडूच्या गणेशमूर्ती तयार करून विश्वविक्रम करण्याचा उपक्रम महापालिकेकडून घेण्यात आला आहे. हा उपक्रम सणस मैदानावर होणार होता आणि त्यास ‘गिनिज बुक’च्या अधिकाऱ्यांची समंती होती. मात्र, पावसाची शक्यता गृहीत धरून हे ठिकाण बदलण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

शाडूच्या गणेशमूर्ती तयार करण्याच्या उपक्रमाला महापालिका शाळांतील ​विद्यार्थी उपस्थित राहणार आहेत. पावसामध्ये या मूर्ती तयार करणे शक्य नाही. सणस मैदानावर मांडव घालण्याचा निर्णय घेतल्यास त्याला २७ लाख रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. तसेच, हा मांडव घालण्यास तत्काळ सुरुवात केली तरी तो २४ ऑगस्टपर्यंत होईल, याची काही शाश्वती नाही. या पार्श्वभूमीवर महापालिका पदाधिकाऱ्यांकडून सोमवारी सकाळी बालेवाडी स्टेडिअममधील बॅडमिंटन हॉलची पाहणी करण्यात येणार आहे. हे ठिकाण अंतिम करण्यात आले, तर ही माहिती तत्काळ ‘गिनिज बुक’शी संबंधित अधिकाऱ्यांना कळविण्यात येणार आहे, असे उच्चपदस्थ सूत्रांकडून सांगण्यात आले. महापालिकेच्या शिक्षण मंडळातील १८७ शाळांमधील तीन हजार विद्यार्थी एकाच वेळी शाडूच्या मूर्ती तयार करणार आहेत. महापालिकेला या विद्यार्थ्यांची ने-आण करण्याची जबाबदारी स्वीकारावी लागणार आहे.

तर वेळ बदलावी लागेल...

ढोल वाजवण्याचा उपक्रम २७ ऑगस्टला बालेवाडीच्या मैदानावर करण्यात येणार आहे. या उपक्रमावर पावसाचे सावट असले, तरी ढोल पथकांकडून वादन होण्याची शक्यता अधिक आहे. हा उपक्रम नियोजित सायंकाळी घेण्यात येणार आहे. पावसाची शक्यता गृहीत धरून तो दुपारी घेण्याचे संकेत देण्यात येत आहे. पाऊस पडला, तरी सायंकाळी उशिरापर्यंत वादकांकडून पाऊस थांबण्याची प्रतिक्षा केली जाऊ शकते. मात्र, सायंकाळी पावसाला सुरुवात झाली तर अडचणी वाढण्याची शक्यता असल्याने वेळ बदलण्यात यावी, अशी सूचना महापालिकेला करण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गणेश मंडळांसाठी उत्सवमूर्ती सन्मान

$
0
0

‘मटा’तर्फे आयोजन; आजपासून नावनोंदणी सुरू
म. टा. प्रतिनिधी, पुणे
विघ्नांचे सावट दूर करून मांगल्याचे वातावरण निर्माण करणाऱ्या विघ्नहर्ता गणरायाच्या उत्सवासाठी अवघी पुण्यनगरी सज्ज झाली आहे. लाडक्या गणपतीबाप्पाचा हा उत्सव आणखी रंगतदार करण्यासाठी ‘महाराष्ट्र टाइम्स’तर्फे यंदाही ‘उत्सवमूर्ती सन्मान’ हा अनोखा उपक्रम राबविण्यात येणार आहे.
सार्वजनिक गणेशोत्सवाची मुहूर्तमेढ पुण्यात रोवली गेली. सर्वांगसुंदर गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना, मांगल्यापूर्ण वातावरणात बाप्पाची पूजा, रंजक आणि प्रबोधन करणारे देखावे या माध्यमातून सार्वजनिक मंडळे दरवर्षी उत्सवाची शान वाढवतात. म्हणूनच, सार्वजनिक गणेश मंडळांना व्यापक व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासह त्यांच्या प्रयत्नांना प्रोत्साहन देण्यासाठी ‘महाराष्ट्र टाइम्स’ने गणेश मंडळांसाठी उत्सवमूर्ती सन्मान हा उपक्रम आयोजित केला आहे. यंदा या उपक्रमाचे तिसरे वर्ष आहे. गेल्या वर्षी झालेल्या स्पर्धेला मंडळांनी भरभरून प्रतिसाद दिला होता.
उत्सवमूर्ती सन्मानमध्ये सर्वोत्तम गणेशमूर्ती, इको-फ्रेंडली गणेशमूर्ती, सर्वोत्तम मंडळ आणि सर्वाधिक भेट दिले जाणारे मंडळ अशा विविध गटांमध्ये स्पर्धा होणार आहे. महाराष्ट्र टाइम्सतर्फे आयोजित या उपक्रमासाठी आज, सोमवारपासून नावनोंदणी सुरू करण्यात येणार आहे. इच्छूक मंडळांनी स्पर्धेतील सहभागासाठी ‘मटा’च्या गोपाळकृष्ण गोखले रस्त्यावरील (फर्ग्युसन कॉलेज रोड) कार्यालयात येऊन, प्रवेश अर्ज भरून नावनोंदणी करावी. अधिक माहितीसाठी संपर्क ८७९६१८१८३६ या क्रमांकावर संपर्क साधावा. गणेश मंडळांना www.mtganeshutsav.com या वेबसाइटवरून उत्सवमूर्ती सन्मान स्पर्धेसाठीचे अर्ज डाउनलोड करून घेता येतील.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


‘पुणे फेस्टिव्हल’ २५ ऑगस्टपासून

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

संगीत, नृत्य, कला, गायन, वादन, क्रीडा संस्कृती यांचा मिलाफ असलेला २९ वा पुणे फेस्टिव्हल २५ ऑगस्ट ते ५ सप्टेंबर दरम्यान गणेश कला क्रीडा रंगमंच येथे रंगणार आहे. ज्येष्ठ अभिनेते व खासदार शत्रुघ्न सिन्हा व दिग्दर्शक सुभाष घई यांच्या हस्ते एक सप्टेंबरला महोत्सवाचे उद्‍घाटन होणार आहे. महोत्सवाच्या निमित्ताने दिला जाणारा पुणे फेस्टिव्हल पुरस्कार यंदा अभिनेते शेखर सुमन, क्रिकेटपटू केदार जाधव, दिग्दर्शिका सुमित्रा भावे आणि आयटी तज्ज्ञ आनंद खांडेकर यांना प्रदान करण्यात येणार आहे.
एक सप्टेंबर रोजी सायंकाळी साडेचार वाजता फेस्टिव्हलचे उद्घाटन करण्यात येणार आहे. महापौर मुक्ता टिळक, राज्याचे पर्यटन मंत्री जयकुमार रावळ, पालकमंत्री गिरीश बापट, खासदार व ज्येष्ठ अभिनेत्री हेमामालिनी, उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे, अभिनेता विवेक ओबेरॉय, रति अग्निहोत्री, कार्तिक आर्यन, नेहा शर्मा आदी या वेळी उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती पुणे फेस्टिव्हलचे मुख्य संयोजक सुरेश कलमाडी यांनी पत्रकार परिषदेत दिली. काँग्रेसचे शहराध्यक्ष रमेश बागवे, डॉ.सतिश देसाई आदी या वेळी उपस्थित होते.
दर वर्षीप्रमाणे यंदाही महोत्सवात नृत्य, संगीत, नाट्य, आणि क्रीडा स्पर्धा होणार आहेत. त्यामध्ये ऑल इंडिया उर्दू मुशायरा, उगवते तारे, इंद्रधनू , शास्त्रीय संगीत, नृत्य, सुगमसंगीत, मराठी कवी संमेलन, हास्योत्सव, एकपात्री, महिला महोत्सव, पेंटिंग प्रदर्शन, मिस पुणे फेस्टिव्हल स्पर्धा, केरळ महोत्सव, मराठी नाटके अशा विविधरंगी सांस्कृतिक कार्यक्रमांचा आस्वाद पुणेकरांना घेण्यात येणार आहे. गणेश कला क्रिडा रंगमंच, यशवंतराव चव्हाण नाट्यगृह आणि बालगंधर्व रंगमंदिर येथे हे कार्यक्रम होणार आहेत. याशिवाय फेस्टिव्हलमध्ये गोल्फ, मल्लखांब, बॉक्सिंग, कुस्ती या खेळांच्या स्पर्धाही रंगणार आहेत.
गणेशोत्सवाच्या शतकोत्तर रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त उद्घाटन समारंभात मानाचा पहिला गणपती कसबा गणपती मंडळ, केसरी गणेशोत्सव, भाऊ रंगारी सार्वजनिक गणेशोत्सव आणि श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंडळांचा विशेष सन्मान करण्यात येणार आहे.
---------------------
उर्मीला मातोंडकर धरणार लावणीवर ठेका
पुणे फेस्टिव्हलच्या उद्घाटन सोहळ्यात प्रसिद्ध अभिनेत्री उर्मीला मातोंडकर लावणी सादर करणार आहे. उर्मीलासह पूजा सावंत, नेहा महाजन, तेजस्विनी लोणारी, वैशाली जाधव, वैष्णवी पाटील या अभिनेत्री लावणीवर थिरकणार आहेत. या वेळी अभिनेत्री मृण्मयी देशपांडे, राधा सागर आणि नकुल घाणेकर गणेश वंदना सादर करणार असून त्यानंतर भार्गवी चिरमुले, नंदेश उमप आणि अभ्यंग कुवळेकर यांच्या पोवाड्याचे सादरीकरण रंगणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वृक्षारोपण ​ कागदोपत्रीच

$
0
0

संतराम घुमटकर, बारामती

वनमहोत्सवांतर्गत एक ते सात जुलै दरम्यात बारामती तालुक्यात एक लाख ९९ हजार ६२५ वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट प्रशासनासमोर होते. मात्र, पुरेशी जनजागृती नसल्यामुळे लोकसहभाग वाढवण्यास प्रशासनास अपयश आले. वन विभाग, सामाजिक वनीकरण, सार्वजनिक बांधकाम, पंचायत समिती या विभागांनीही वृक्षारोपणाबाबत उदासीनता दाखवल्याने प्रशासनाने केवळ ‘कागदोपत्री वृक्षारोपण’ केले असल्याचे समोर आले आहे.
बारामती तालुक्यात वृक्ष लागवड करण्यासाठी खड्डे खोदाई, रोपांची वर्गवारी, प्रत्यक्ष झालेले वृक्षारोपण व शासकीय टेबलावरील कागदोपत्री वृक्षरोपण यामध्ये मोठी तफावत असल्याचे पाहणीतून दिसून आले आहे. मात्र याबाबत प्रशासकीय अधिकाऱ्यांनी बोलण्यास थेट नकार दिला आहे. वन व सामाजिक वनीकरण विभागांनी उदासीनता दाखवल्याने उद्दिष्टाप्रमाणे प्रत्यक्ष वृक्षारोपण होऊ शकले नसल्याची कबुलीही महसूल प्रशासनाने दिली आहे. लोकसहभाग व शासकीय कार्यालयांमध्ये आपसामध्ये समन्वयाचा अभाव असल्यामुळे उद्दिष्टपूर्ती करण्याचे अतोनात प्रयत्न प्रशासनाने करूनही हे उद्दिष्ट पूर्ण होऊ शकले नाही.
गत वर्षी शहर-ग्रामीण भागातील विविध सामाजिक संस्था, संघटनांना या मोहिमेत सहभागी करून घेण्यात आले. तसेच पर्यावरण (५ जून) दिनापासून वृक्षलागवड अभियानाच्या निमित्ताने शाळा, महाविद्यालय, निमशासकीय संस्थांमध्ये जनजागृती कार्यक्रम, रॅली, पथनाट्यांचे आयोजन करून लोकसहभाग वाढविण्यात आला होता. मात्र यावर्षी कोणताही लोकसहभाग दिसून आला नाही. सामाजिक वनीकरण व वन विभाग यांनी मुख्य करून नागरिकांमध्ये समन्वय साधून लोकसहभाग वाढविणे गरजेचे होते. मात्र त्यांनी याबाबत असा कोणताच प्रयत्न केला नसल्याचे गावातील नागरिकांनी स्पष्ट केले आहे. कोणताही लोकसहभाग नसतानाही वनविभागाने ६८ हजार, सार्वजनिक बांधकाम विभागाने ४५००, सामाजिक वनीकरण विभागाने ३५,४०० तर पंचायत समिती ४५,५०० ही वृक्ष लागवड केल्याचा दावा केला जात आहे. याबाबत स्थानिक नागरिक अनभिज्ञ आहेत. एक लाख ५३ हजार ४०० वृक्ष लागवड झाली कोठे, हा प्रश्न आजही अनुत्तरित राहिला आहे.


वन व सामाजिक वनीकरण विभागच वृक्षलागवडीबाबत उदासीन आहे. या विभागांनी पुढे येणे गरजेचे आहे. दोन दिवसांपासून पाऊस पडत आहे, पुन्हा दोन्ही विभागांनी वृक्ष लागवड मोहीम सुरू करावी. - हनुमंत पाटील, तहसीलदार, बारामती


बारामतीच्या जिरायत भागात वृक्ष लागवड अतिशय नगण्य प्रमाणात झाली. काही गावांत तर वृक्ष लागवड फक्त कागदावरच झाली आहे. - एकनाथ तरटे


गावात वृक्ष लागवड काही प्रमाणात झाली आहे; तर रोपे न मिळाल्याने काही भागांत खड्डे रिकामे आहेत. - सचिन जाधव

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पिस्तुलाच्या धाकाने दागिन्यांची चोरी

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, भोर
प्राप्तिकर अधिकारी असल्याचे सांगून पिस्तुलाचा धाक दाखवून चार चोरट्यांनी सोन्याचे दागिने, रोख रक्कम आणि मोबाइलसह दोन लाख ९६ हजार रुपयांचा ऐवज पळवून नेला आहे. सिनेस्टाइल चोरीचा हा प्रकार पुणे-सातारा महामार्गावरील खंबाटकी घाट ते भोर-महाड पंढरपूर मार्गावरील हिर्डोशी हद्दीत शनिवारी सायंकाळी घडला.
मीत शहा व त्यांची आई सोन्याचे दागिने घेऊन चारचाकी गाडीने पुण्यावरून निपाणीला निघाले होते. साडेसात वाजण्याच्या सुमारास त्यांची गाडी खंबाटकी घाटात आली असताना त्यांच्या गाडीला लाल दिव्याच्या चारचाकीने थांबविले. त्यांची गाडी थांबल्यानंतर ‘आम्ही प्राप्तिकर विभागाचे अधिकारी आहोत, आमच्याबरोबर पुण्याला चला’ असे सांगण्यात आले. त्यानंतर शहा व त्यांची आई, चालक यांना गाडीतील सामानासह आपल्या गाडीत घेतले. त्यांच्या गाडीची चावी काढून घेतली. त्यानंतर त्या तिघांना खंबाटकी घाटातून सातारा बाजूकडे नेले व गाडी पुन्हा पुण्याच्या दिशेने वळवली. शिंदेवाडीवरून वेगवेगळ्या रस्त्याने फिरवून भोरच्या दिशेने गाडी घेतली. ती भोरपासून पुढे हिर्डोशीपर्यंत नेली. चालकाला या मार्गावर त्यांनी सोडून दिले. हिर्डोशीला गेल्यावर मीत शहा आणि त्यांच्या आईला पिस्तुलाचा धाक दाखवून त्यांच्याजवळची दागिन्यांची पिशवी, रोख रक्कम, मोबाइल असा ऐवज त्या चोरट्यांनी घेतला व ते पसार झाले. हा सर्व प्रवास दोन तास सुरू होता. दरम्यान चालकाने त्याच्या मोबाइलवरून शहा यांच्या नातेवाइकांना हा प्रकार कळविला. भोरचे पोलिस निरीक्षक डी. के. हाके यांना मोबाइलवरून या प्रकाराची माहिती मिळाल्यानंतर ते घटनास्थळाकडे रवाना झाले. खंडाळा पोलिस स्थानकाचे उपनिरीक्षक एम. के. कदम पुढील तपास करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पाणीपुरवठ्यासाठी आंदोलन

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, हडपसर
महंमदवाडी कौसरबाग परिसरात मागील तीन महिन्यांपासून कमी दाबाने पाणी येत आहे, रात्रीच्या वेळेस पाणी सोडले जाते. यामुळे नागरिकांनी रात्रभर पाणीच भरावे का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. जोपर्यंत सुरळीत पाणीपुरवठा होऊन वेळेवर पाणी सोडले जात नाही, तोपर्यंत आम्ही गप्प बसणार नाही, असे सांगून शिवसेनेच्या वतीने लष्कर पाणीपुरवठा कार्यालयासमोर सोमवारी आंदोलन करण्यात आले.
प्रभाग क्र. २६ (महंमदवाडी, कौसरबाग) शिवसेनेचे नगरसेवक प्रमोद भानगिरे व नगरसेविका प्राची आल्हाट यांच्या नेतृत्वाखाली लष्कर पाणीपुरवठा येथे आंदोलन झाले. लष्कर पाणीपुरवठा विभागाकडून कमी दाबाने पाणीपुरवठा होते. ते ही रात्रीच्या वेळेस पाणी सोडले जाते. त्यामुळे नागरिकांना पाण्याची वाट बघत बसावे लागते. कमी दाबाने पाणी येत असल्याने पाणी भरण्यासाठी खूप वेळ लागतो. पुरवठा विभागाच्या ढिसाळ नियोजनामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. नगरसेवक प्रमोद भानगिरे व नगरसेविका प्राची आल्हाट यांनी स्थानिक नागरिकांना सोबत घेऊन लष्कर पाणीपुरवठा कार्यालयावर मोर्चा काढला. या वेळी नाना तरवडे, आशिष आल्हाट, दत्ता घुले, अभिजित बाबर, राहुल भुजबळ, आकाश भानगिरे, सुशील मिश्रा यांच्यासह महिला, ज्येष्ठ नागरिक आणि शिवसैनिक उपस्थित होते. आठ दिवसांच्या आत पाणीपुरवठा सुरळीत झाला नाही; तर यापुढचे आंदोलन तीव्र असेल, असा इशारा भानगिरे यांनी दिला. या वेळी लष्कर पाणीपुरवठा विभाग प्रमुख पौरा यांनी निवेदन स्वीकारले आणि पाणी सुरळीत सोडण्याचा
शब्द दिला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नदीचे प्रदूषण थांबविण्यासाठी अमोनियम बायकार्बोनेट देणार

$
0
0





म. टा. प्रतिनिधी‌, पुणे
गणेशोत्सवाच्या काळात विसर्जित केल्या जाणाऱ्या गणेशमूर्ती‍ंमुळे होणारे प्रदूषण थांबविण्यासाठी अधिकाधिक नागरिकांमध्ये जनजागृती करण्याचा निर्धार महापालिकेने केला आहे. विसर्जनासाठी येणाऱ्या बहुतांश गणेशमूर्ती या प्लास्टर ऑफ पॅरिसपासून तयार केलेल्या असल्याने त्यांचे विघटन होण्यास विलंब होते. रासायनिक रंगाचा वापर करून या मूर्ती तयार केल्या जात असल्याने नदीचे प्रदूषण होते. हे टाळण्यासाठी मूर्तींचे घरच्या घरी विसर्जन करता यावे, यासाठी पालिका अमोनियम बायकार्बोनेटची पावडर मोफत देणार असल्याची माहिती महापौर मुक्ता टिळक यांनी दिली.
सार्वजनिक गणेशोत्सवाचे यंदाचे वर्ष शतकोत्तर रौप्य महोत्सर्वी वर्ष आहे. पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्याचा प्रयत्न पालिकेच्या वतीने केला जाणार असून, यासाठी विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. नागरिकांना आपल्या घरच्या मूर्तीचे विसर्जन घरच्या घरी करता यावे, यासाठी गेल्या वर्षीपासून पालिकेने नागरिकांना अमोनियम बायकार्बोनेटची पावडर देण्यास सुरुवात केली आहे. गेल्या वर्षी १०० टन पावडरची खरेदी करण्यात आली होती. मात्र ,ज्याची जनजागृती पुरेशा प्रमाणात न झाल्याने काही अडचणी निर्माण झाल्या होत्या. मा‌त्र, यंदाच्या वर्षी पालिकेने सुरुवातीपासूनच याबाबत प्रयत्न सुरू केले आहेत. प्लास्टर ऑफ पॅरिसच्या गणेशमूर्तीच्या विसर्जनामुळे नदीचे पाणी प्रदूषित होऊ नये, यासाठी राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा (एनसीएल) आणि कमिन्स इंडिया यांनी वेगळी पद्धती विकसित केली आहे. त्यानुसार नागरिकांना मोफत अमोनियम बायोकार्बोनेटची‌ पावडर दिली जाणार असल्याचे महापौर टिळक यांनी सांगितले. एनसीएलच्या शुभांगी उंबरकर, अतुल महाजन, जनवाणीचे रवी पंडित, कमिन्सच्या सौजन्या वैगरू, अवंती कदम, पालिकेच्या अतिरिक्त आयुक्त प्रेरणा देशभ्रतार, सहपालिका आयुक्त सुरेश जगताप या वेळी उपस्थित होते.
गेल्या वर्षीचे १५ टन अमोनियम बायोकार्बोनेटची पावडर आणि यंदाच्या वर्षी नव्याने खरेदी करण्यात आलेली १०१ टन अशा ११६ टन पावडरचे वाटप नागरिकांना केले जाणार आहे. पालिकेच्या क्षेत्रीय कार्यालयांमध्ये तसेच मूर्ती विक्रेत्यांकडे ही पावडर दिली जाणार आहे. किती उंचीच्या मूर्तीला किती पावडरची आवश्यक आहे, याची माहिती देणारी पत्रके देखील पालिकेच्या वतीने वाटली जाणार असल्याचे महापौर टिळक यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images