Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

विस्मृतीतील वृत्तपत्रे सापडली

$
0
0

राज्यातील १९०८ ते १९३०मधील मराठी वृत्तपत्रांचे अंक प्रकाशात
Tweet : @AdityaMT
पुणे : स्वातंत्र्यपूर्वकाळातील १९०८ ते १९३० या कालखंडात महाराष्ट्रातील जनतेमध्ये स्वातंत्र्याविषयी जनजागृती करणाऱ्या काही स्थानिक वृत्तपत्रांचे विस्मृतीत गेलेले अंक प्रकाशात आले असून, मराठी पत्रकारितेच्या अभ्यासासाठी हे अंक उपयुक्त ठरणार आहेत. स्वातंत्र्यसंग्रामाच्या वार्ता गावोगावी पोहोचवणारी ही वृत्तपत्रे कालांतराने लोप पावली. इतिहासातही त्याचे दाखले आढळत नाहीत. या दुर्मिळ मराठी वृत्तपत्रांचे अंक इतिहास अभ्यासक मंदार लवाटे यांनी प्रकाशात आणले आहेत.

स्वातंत्र्यपूर्व काळात देशाच्या स्वातंत्र्यासाठी पत्रकारितेच्या माध्यमातून आवाज उठवणाऱ्या असंख्य वृत्तपत्रांनी समाजाला एकत्र आणण्याचे कार्य केले. त्यामध्ये विसाव्या शतकाच्या सुरुवातीला महाराष्ट्राच्या विविध भागातूनही काही मराठी वृत्तपत्रांनी सरकारविरोधात आवाज उठवला. स्वातंत्र्यसंग्रामाच्या वार्ता पोहोचवण्याची प्रमुख कामगिरी बजावणारी ही वृत्तपत्रे कालांतराने लोप पावली. इतिहासांच्या दाखल्यांमध्ये त्यांचा संदर्भही आढळत नाही. १९०८ ते १९३० या कालखंडामध्ये राज्यात सुरू झालेल्या काही वर्तमानपत्रांचे दुर्मिळ अंक इतिहास अभ्यासक मंदार लवाटे यांना त्यांच्या स्नेह्यांकडे असणाऱ्या संग्रहाद्वारे मिळाले आहेत. त्या वृत्तपत्रांमधील भाषा, लेखनाची शैली, विषयाची मांडणी अशा सर्व गोष्टींमुळे स्वातंत्र्यपूर्व काळातील स्थानिक पत्रकारिता उलगडण्यास मदत होणार आहे.

या दुर्मिळ वृत्तपत्रांमध्ये पुण्यातून निघणाऱ्या ‘वंदेमातरम’, ‘राजकारण’, ‘विजयीमराठा’,‘भाला’, मुंबईत सुरू करण्यात आलेल्या ‘प्रताप’ (१९२९), ‘संदेश’ (१९१६), ‘लोकशाही’ (१९२१) , ‘मौज’ (१९२३), ‘सचित्र चाबुकस्वार’ (१९२६), तर ‘युगांतर’ (खामगाव, १९२६) , ‘स्वराज्य’ (सोलापूर, १९०८) ‘महाराष्ट्र’ (नागपूर, १९३०), ‘समर्थ’ (सातारा व कोल्हापूर, १९२८) या वर्तमानपत्रांचे काही अंक सापडले आहेत. हे अंक अत्यंत दुर्मिळ असून, या वृत्तपत्रांचा कुठेही उल्लेख नाही. शिवाय पत्रकारीतेच्या इतिहासातही या वृत्तपत्रांची नावे आढळत नाहीत. ही वृत्तपत्रे सुरू झाल्यानंतर पुढे किती काळ ती सुरू होती, याबाबत देखील कोणतीही माहिती उपलब्ध नसल्याने वृत्तपत्रांचे हे अंक इतिहासातील दुर्मिळ ठेवा म्हणून जतन करणे गरजेचे आहे.

लवाटे यांना मिळालेल्या वृत्तपत्रांच्या अंकांपैकी ‘वंदेमातरम’ हे वृत्तपत्र ५ जानेवारी १९०८ रोजी सुरू झाले. तत्कालीन वर्तमानपत्रांप्रमाणे हे वर्तमानपत्र आठवड्यातून एकदाच रविवारी प्रसिद्ध केले जात होते. या वृत्तपत्राच्या पहिल्या अंकामध्ये वृत्तपत्र सुरू करण्यामागची भूमिका विषद करण्यात आली होती. सुदैवाने तो पहिलाच अंक लवाटे यांना मिळाला आहे. कलकत्त्यामध्ये बिपीनचंद्र पाल यांनी सुरू केलेल्या ‘न्यू इंडिया’ या वृत्तपत्रापासून प्रेरणा घेऊन पुण्यात ‘वंदे मातरम’ सुरू करण्यात आले होते. वृत्तपत्राच्या पहिल्या अंकामध्ये ‘वंदे मातरम’ हे गीतही छापण्यात आले आहे. २८ सेमी x ४८ सेमी आकाराचे हे वृत्तपत्र होते. हरी रघुनाथ भागवत यांनी शनिवार पेठेत असलेल्या महादेव कवडे यांच्या शारदा छापखान्यात छापून घेतले, अशी माहिती या अंकातून प्राप्त झाली आहे. या वृत्तपत्राचे सात अंक लवाटे यांनी मिळवले आहेत. पुण्यातूनच निघणारे ‘राजकारण’ हे वृत्तपत्रही अनेक वर्ष सुरू होते. लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांचे निधन झाल्यानंतर त्यांच्याबद्दलचा विस्तृत लेख या वृत्तपत्रात प्रसिद्ध करण्यात आला होता. त्यामध्ये टिळकांच्या कार्याचे वर्णन करण्यात आले होते. प्रसिद्ध कवी केशवसुत यांचे बंधू सीताराम केशव दामले यांनी या वृत्तपत्राची सुरुवात केली होती.

काही मोजकी वृत्तपत्रे सोडली तर स्वातंत्र्यपूर्व काळात मराठी भाषेतून प्रसिद्ध होणाऱ्या असंख्य वृत्तपत्रांसंबंधित कोणतीही माहिती उपलब्ध नाही. त्यामुळे, पत्रकारितेच्या इतिहासाच्या खुणा सांगणाऱ्या या दुर्मिळ वृत्तपत्रांवर संशोधन होणे गरजेचे आहे. त्यातूनच स्थानिक पत्रकारितेची तत्कालीन परिस्थिती आणि तत्कालीन समाजातील वृत्तपत्रांचे महत्त्व अधोरेखित व्हायला मदत होणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


घरफोड्या करणारे बंटी-बबली अटकेत

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, पुणे
बंद फ्लॅट हेरून घरफोड्या करणाऱ्या बंटी-बबलीसह त्यांच्या साथीदाराला गुन्हे शाखेच्या युनिट एकने अटक केली आहे. त्यांच्याकडून घरफोडीचे सात व सोनसाखळी चोरीचे तीन असे दहा गुन्हे उघडकीस आणत पाच लाख ८३ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
आकाश हेमराज परदेशी (वय २५, रा. येरवडा), अनिल काशिनाथ लष्करे (२८, रा. वडारवस्ती, विश्रांतवाडी) व उषा राम कांबळे (२५, रा. येरवडा) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. सोलापूरवरून पुण्यात येऊन शहरात दिवसा व मध्यरात्री घरफोड्या करत होते. या तिघांवर पूर्वीचे गुन्हे दाखल आहे. परदेशीवर २७, अनिलवर आठ व उषावर सोळा गुन्हे दाखल आहेत, अशी माहिती गुन्हे शाखेचे उपायुक्त पंकज डहाणे व सहायक आयुक्त सुरेश भोसले यांनी पत्रकार परिषदेत दिली.
शहरात गेल्या काही दिवसांपासून घरफोड्या करणाऱ्या चोरट्यांनी धुमाकूळ घातला असल्यामुळे वरिष्ठांनी शहरात पेट्रोलिंग वाढवून सराईतांचा माग काढण्याचे आदेश दिले होते. त्यावेळी गुन्हे शाखा युनिट एकचे पोलिस गजानन सोनुने व अशोक माने यांना बातमीदारामार्फत माहिती मिळाली, की शहरात दिवसा व रात्री घरफोड्या करणारा सराईत गुन्हेगार आकाश परदेशी हा येरवडा येथील साईबाबा मंदिराजवळ उभा आहे. त्यानुसार पोलिस निरीक्षक नितीन भोसले पाटील, उपनिरीक्षक दिनेश पाटील, हर्षल कदम यांच्या पथकाने सापळा रचून आकाशला ताब्यात घेतले. त्याच्याकडे चौकशी केल्यानंतर त्याने उषा कांबळे व अनिल लष्करे यांच्यासोबत शहरात घरफोड्या केल्याची माहिती दिली.
पोलिसांनी उषा कांबळे व अनिल लष्करे याला ताब्यात घेतले. त्यांच्याकडे कसून चौकशी केल्यानंतर त्यांनी शहरात घरफोड्या केल्याचे सांगितले. आकाश आणि अनिल याने सोनसाखळीचे तीन गुन्हे केले आहेत. तर, उषा तसेच अनिल व आकाश या तिघांनी मिळून सात घरफोडीचे गुन्हे केल्याचे तपासात समोर आले आहे. विमानतळ, विश्रांतवाडी, निगडी, विश्रामबाग पोलिस ठाण्यांच्या हद्दीत त्यांनी हे गुन्हे केले आहेत. तिघेही मूळचे पुण्यातीलच आहेत. आकाश याचे आठवीपर्यंत शिक्षण झाले आहे; तर उषा व अनिलचे शिक्षण चौथीपर्यंत झाले आहे. या कारवाईत गजानन सोनुने, अशोक माने, प्रकाश लोखंडे, राजू पवार, राजाराम सुर्वे, कैलास गिरी, विजयसिंग वसावे, प्रशांत गायकवाड, मोहन येलपले, मेहबुब मोकाशी, रिजवान जिनेडी, उमेश काटे, सुरेंद्र आढाव, सुधाकर माने, तुषार खडके, श्रीकांत वाघवले, इरफान मोमीन, इम्रान शेख यांच्या पथकाने सहभाग घेतला.

जामिनावर सुटल्यानंतर पुन्हा गुन्हे
आकाश व उषा हे मित्र आहेत. या बंटी-बबली भारती विद्यापीठ पोलिसांनी घरफोड्या केल्याप्रकरणी पूर्वी अटक केली होती. त्यानंतर ते डिसेंबर महिन्यात जामिनावर सुटले. त्यांनी पुन्हा घरफोड्या करण्यास सुरुवात केली. ते सोलापूर येथे राहण्यास गेले. सोलापूरवरून येऊन ते शहरात घरफोड्या करत होते. शहरात टेहाळणी करून बंद असलेले फ्लॅट हेरत होते. उषा पदराखाली कटावणी लपवून घेऊन घरफोड्या करत असे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ऑस्ट्रेलियासाठी ऑनलाइन व्हिसा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

‘ऑस्ट्रेलियाला पर्यटनासाठी भेट देणाऱ्यांमध्ये देशातील इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रातील सर्वाधिक पर्यटक आहेत. गेल्या पाच वर्षांमध्ये पर्यटकांची वाढती संख्या लक्षात घेऊन भारतीय नागरिकांना तातडीने ‘ऑनलाइन व्हिसा' देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे पर्यटकांना एका क्लिकवर व्हिसा मिळत आहे.’ अशी माहिती ‘टुरिझम ऑस्ट्रेलिया'चे भारतातील व्यवस्थापक निशांत काशीकर यांनी शुक्रवारी दिली. एका पंचतारांकित हॉटेलमध्ये ऑस्ट्रेलियाच्या पर्यटन मंत्रालयाकडून आयोजित केलेल्या पंधराव्या ‘इंडिया ट्रॅव्हल मिशन’चे उद‍्घाटन ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू मायकल क्लार्कच्या हस्ते नुकतेच झाले. या वेळी ‘टुरिझम ऑस्ट्रेलिया’चे दक्षिण आशियाचे व्यवस्थापक ब्रेन्ट अँडरसन व इतर पदाधिकारी उपस्थित होते.

काशीकर म्हणाले, ‘भारताच्या ‘अतुल्य भारत’ अभियानासारखे ऑस्ट्रेलिया देशाचे ‘टुरिझम ऑस्ट्रेलिया’ हे अभियान आहे. या अभियानाचे यंदाचे ५० वे वर्ष आहे. भारतीय नागरिकांना देशात पर्यटनासाठी आकर्षित करण्यासाठी ‘इंडिया ट्रॅव्हल मिशन २०१७’चे आयोजन पुण्यात केले. याचे उद‍्घाटन ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू मायकल क्लार्कच्या हस्ते करण्यात आले. यामध्ये देशभरातील नामांकित ट्रॅव्हल एजन्सीच्या प्रतिनिधींशी ऑस्ट्रेलियाच्या पर्यटन विभागाचे पदाधिकारी चर्चा करणार आहेत. देशातील अन्य राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रातून पर्यटन आणि शिक्षणासाठी सर्वाधिक पर्यटक येतात. गेल्या सात वर्षांत दोन लाख ७७ हजार पर्यटकांनी भेट दिली. एकूण पर्यटकांच्या टक्केवारीमध्ये २८ टक्के महाराष्ट्रातील आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातील नागरिकांना सर्व सोयीसुविधा देऊन पर्यटनासाठी आवाहन करण्याचे आमचे ध्येय आहे.’

विमान प्रवासही रास्त दरात

‘भारत आणि ऑस्ट्रेलिया या दोन देशांमध्ये मैत्रीपूर्ण संबंध प्रस्थापित होत आहे. त्यामुळे विविध क्षेत्रांमध्ये व्यवसायवृद्धी होत आहे. भारतातील सुमारे ७६ हजार विद्यार्थी ऑस्ट्रेलियात शिकत आहे. दिवसेंदिवस ही संख्या वाढत आहे. दोन्ही देशांना हवाई सेवेने जोडण्यासाठी ऑस्ट्रेलिया प्रयत्न करत आहे. त्यासाठी सरकारी आणि खासगी विमान कंपन्यांशी करार करण्यात येत आहेत. पर्यटकांना ऑस्ट्रेलियाला ये-जा करण्यासाठी सुविधा निर्माण होण्यासाठी विमान कंपन्या आकर्षक दरात तिकीट सेवा पुरवित आहे,’ असे निशांत काशीकर यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गणेशोत्सव सोलापूरमध्ये सुरू झाला का ?

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

‘गणपती बाप्पा हा सर्वांसाठी टॉनिक आहे. त्यामुळे गणेशोत्सवाचे जनक कोण, या वादात पडण्यापेक्षा हा उत्सव अधिक लोकाभिमुख आणि सामाजिक बांधिलकी जपणारा कसा होईल, हे प्रत्येकाने पाहिले पाहिजे. सोलापूरमधील आजोबा गणपतीला १३० वर्षे पूर्ण झाली आहेत; मग गणेशोत्सव सोलापूरमध्ये सुरू झाला, असे म्हणायचे का,’ असा सवाल श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टचे अध्यक्ष अशोक गोडसे यांनी सोमवारी उपस्थित केला.

सार्वजनिक गणेशोत्सवाचे जनक कोण, यावरून सध्या वाद सुरू आहे. भाऊसाहेब रंगारी यांनीच सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात केली. गणेशोत्सवाचे यंदाचे १२६ वे वर्ष आहे, हे सांगण्यासाठी भाऊसाहेब रंगारी गणपती मंडळातर्फे उपोषण करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर पत्रकारांनी गोडसे यांना विचारले असता ते म्हणाले, ‘भाऊसाहेब रंगारी यांच्याविषयी आम्हाला आदर आहे. आमच्या अहवालात त्यांचे नाव अग्रस्थानीच ठेवले आहे. त्यांच्या मंडळाचे कार्यकर्ते उपोषणाला बसले आहेत, याची आम्हाला माहिती नाही. हा वाद मिटला पाहिजे. ’

‘१८९१ साली भाऊसाहेब रंगारी, खासगीवाले यांच्यासह काहींनी गणेशोत्सव सुरू केला असला तरी तो त्यांच्या पातळीवर होता. पुढच्या वर्षी मात्र अधिक लोकांनी सहभाग नोंदवत वर्गणीतून गणेशोत्सव साजरा केला. त्यामुळे १८९२ सालीच मोठ्या प्रमाणात सार्वजनिक गणेशोत्सव सुरू झाला,’ याकडे गोडसे यांनी लक्ष वेधले.
गोडसे म्हणाले, ‘सरदार खासगीवाले यांना ग्वाल्हेर येथील गणेशोत्सव पाहिल्यानंतर आपल्याकडेही असा उत्सव साजरा केला पाहिजे असे वाटले. पुण्यात आल्यानंतर त्यांनी भाऊसाहेब रंगारी यांच्याशी चर्चा केली. कर्मठ पुण्यात गणेशोत्सव रस्त्यावर कसा साजरा करायचा, लोक काय म्हणतील, असे प्रश्न पडल्याने ते लोकमान्य टिळकांशी चर्चा करण्यासाठी गायकवाड वाड्यात गेले. तेव्हा त्या बैठकीला घोटवडेकर, तरोडे व दंताळे ही मंडळी देखील उपस्थित होती. त्यावर्षी पाच लोकांनी आपल्या पातळीवर स्वखर्चाने गणेशोत्सव साजरा करायचे ठरले. त्या गणेशोत्सवाचे स्वरूप सार्वजनिक नव्हते. पुढच्या वर्षी म्हणजे १८९२ साली अधिक लोकांनी सहभाग नोंदवत वर्गणीतून गणेशोत्सव साजरा केला. त्यामुळे १८९२ सालीच मोठ्या प्रमाणात सार्वजनिक गणेशोत्सव सुरू झाला.’

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

परिवर्तनासाठी एकत्रित प्रयत्न हवेत

$
0
0

ज्येष्ठ संशोधक प्रा. अनिल गुप्ता यांचे मत

म. टा. प्रतिनिधी, पुणे

‘आपल्या देशात सामाजिक परिवर्तन क्षेत्रात महिलांची संख्या भरपूर आहे. मात्र, तरीही सामाजिक जीवनात त्यांना अनेक सांस्कृतिक व पारंपरिक अडचणींचा सामना करावा लागतो, ही सद्यस्थिती आहे. यावर मात करण्यासाठी महिला परिवर्तनवाद्यांची संख्या वाढविण्यासाठी एकत्रित प्रयत्न करणे गरजेचे आहे,’ असे मत हनीबी नेटवर्कचे संस्थापक व ज्येष्ठ संशोधक प्रा. अनिल गुप्ता यांनी व्यक्त केले.

पुणे इंटरनॅशनल सेंटरच्या (पीआयसी) वतीने आयोजित सामाजिक परिवर्तन मंच या कार्यक्रमात प्रा. गुप्ता बोलत होते. ‘पीआयसी’चे अध्यक्ष डॉ. रघुनाथ माशेलकर, उपाध्यक्ष डॉ. विजय केळकर, ‘पीआयसी’चे मानद संचालक प्रशांत गिरबाने उपस्थित होते. या वेळी मान्यवरांच्या हस्ते प्रा. गुप्ता लिखित ‘ग्रासरूट्स इनोव्हेश्न माइंड्स ऑन मार्जिन आर नॉट मार्जिनल माइंड्स’ या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. प्रा. गुप्ता म्हणाले, ‘सामाजिक परिवर्तन क्षेत्रात महिलांची संख्या कमी असण्याची दोन प्रमुख कारणे आहेत. त्यापैकी एक म्हणजे त्यांना सांस्कृतिक रीतीने प्रतिकूल परिस्थितीचा सामना करावा लागतो. याबरोबरच पारंपारिक पिढीजात व्यवसायांपासून त्यांना दूर ठेवले जाते आणि ज्यामुळे नवीन काही तरी परिवर्तन करण्याची संधीच त्यांना मिळत नाही. महिलांसाठी हे क्षेत्र नाही, त्यांना या क्षेक्षात काम करायला जमणार नाही अशा प्रकारची मानसिकताच समाजात आहे. लहान मुले ही सामाजिक परिवर्तनाचे प्रवर्तक असून त्यांना योग्य पद्धतीने प्रशिक्षित केले तर ते मोठा बदल घडवून आणू शकतात.’
डॉ माशेलकर म्हणाले, ‘आपल्या देशात सामाजिक परिवर्तनासाठी या सर्वांनी एकत्र येत काम करणे गरजेचे आहे.’

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

प्रतीक्षा ‘हाउसफुल’ची

$
0
0

नाट्यगृहातील कार्यक्रमांना तिकीट दरांचा फटका

म. टा. प्रतिनिधी, पुणे
जीएसटीचा भुर्दंड नको म्हणून नाटकांच्या तिकिटांचे दर दोनशे व अडीचशे करण्यात येतील, असे नाट्यनिर्मात्यांनी दिलेले आश्वासन विंगेतच राहिले आहे. काही नाटकांच्या तिकिटांचे दर दोनशे व अडीचशे झाले असले तरी बहुतांशी नाटकांचे तिकीट तीनशे रुपये आहे. लावण्यांच्या कार्यक्रमांचे तिकीट दर पाचशे व सहाशे रुपये कायम आहे. नोटाबंदी आणि जीएसटी निर्णयांच्या फटक्यातून नाटक, चित्रपट आणि लावणी या कला अद्यापही सावरलेल्या नाहीत. ‘जीएसटी’नंतर नाटक, चित्रपट किंवा लावणी प्रयोगाला हाउसफुलचा फलक लागलेला नाही. चढ्या तिकीटदरांमुळे तिकीट खिडकीवर शांतताच आहे.
देशात वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) लागू झाल्यानंतर नाट्य, चित्रपट व इतर कलाक्षेत्रावर ओढावलेली आर्थिक संक्रांत कायम आहे. नाटकांना तसेच सादरीकरण असणाऱ्या कार्यक्रमांना १८ टक्के जीएसटी लागू करण्यात आल्याने तिकिटांचे दर वाढले आहेत. अडीचशे रुपयापर्यंतच्या तिकिटांना सवलत देण्यात आली असून, त्यापुढील तिकिटांवर जीएसटी लागू आहे. ‘जीएसटी’तून सुटका करून घेण्यासाठी नाटकांचे तिकीट दोनशे व अडीचशे असे करण्याचे आवाहन नाट्य निर्माता संघाने निर्मात्यांना केले होते; पण या आवाहनाला काही निर्मात्यांनीच प्रतिसाद दिल्याने बहुतांशी नाटके व लावण्यांच्या कार्यक्रमाचे तिकीट दर पूर्वीप्रमाणेच राहिले आहेत. निमशहरी आणि ग्रामीण भागात तिकीट दर पाचशेच्या पुढेच आहे.
गेल्या दोन-तीन दिवसातील बालगंधर्व रंगमंदिरातील परिस्थिती जाणून घेतली असता कलाव्यवहार ठप्प झाल्याचे दिसून आले. लावणी कार्यक्रम सुरू व्हायला एक तास शिल्लक असताना आठशे-नऊशे तिकिटांपैकी केवळ वीस ते पंचवीस तिकिटे विकली गेल्याचे दिसू आले.
याबाबत माहिती देताना बालगंधर्व रंगमंदिर येथील तिकीट खिडकीवरील कर्मचारी राजू भुवड म्हणाले, ‘नोटाबंदी, जीएसटी या निर्णयांनंतर कलाक्षेत्राला मोठा फटका बसला आहे. प्रेक्षक येत नसल्याने ७० टक्के तोटा सहन करावा लागत आहे. काही नाटकांचे तिकीट दोनशे व अडीचशे असे आहे तर काही नाटकांचे तिकीट तीनशे व पाचशे आहे. लावणी कार्यक्रमांचे तिकीट पाचशे व सहाशे असे आहे. तिकीट पूर्वीप्रमाणे ठेवले किंवा ते कमी केले तरी नोटाबंदी व ‘जीएसटी’नंतर तिकीट महागल्याने प्रेक्षकांची वर्दळ कमी झाली आहे.’
00

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सुरेल स्वरयात्रने रसिक तृप्त

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
‘एक वार पंखावरूनी’, ‘विकत घेतला श्याम’, ‘तुझे रूप चित्ती राहो’, ‘नवीन आज चंद्रमा’, ‘कधी बहर कधी शिशिर’, ‘का रे दुरावा’, ‘का रे अबोला’ यांसारख्या गीतांनी भावसंगीताचा सुवर्णकाळ जिवंत केला. संगीतकार सुधीर फडके यांनी संगीतबद्ध केलेली आणि गायलेली एकाहून एक अप्रतिम गाणी रसिकांना आनंद देऊन गेली. चित्रपट गीतांसोबतच गीतरामायणातील गीतांचे सादरीकरण झाल्याने रसिकांना सूरमयी स्वरयात्रा अनुभविण्याची संधी मिळाली.
गीत बहार, पुणे संस्थेतर्फे हिराबाग येथील ज्योत्स्ना भोळे सभागृहात ज्येष्ठ संगीतकार व गायक सुधीर फडके यांनी स्वरबद्ध केलेल्या आणि गायलेल्या गाण्यांची ‘सुरेल स्वरयात्रा, तुझे गीत गाण्यासाठी’ या मैफलीचे आयोजन करण्यात आले होते. गायिका शुभांगी मुळे आणि गिरीश पंचवाडकर यांनी मैफल सजवली.
मैफलीची सुरुवात ‘प्रभात समयो पातळा’ या सुरेल गीताने झाली. त्यानंतर सादर झालेल्या ‘तोच चंद्रमा नभात’, ‘दिस जातील दिस येतील’ या गाण्यांनी रसिकांना जुन्या काळाची सफर घडवली. ‘घन निळा’, ‘त्या पलीकडे या कातरवेळी’, ‘एक धागा सुखाचा’, या गीतांना रसिकांनी दाद दिली. ‘जीवलगा कधी रे येशील तू’, ‘तुझे गीत गाण्यासाठी’, ‘ज्योती कलश छलके’, ‘धुंदी कळ्यांना’ या गाण्यांना रसिकांची विशेष पसंती मिळाली. गीतरामायणातील ‘राम जन्मला’, ‘स्वयंवर’, ‘मज आणुनी’, ‘सेतु बांधारे सागरी’ या गीतांनी बाबूजींच्या आठवणी ताज्या केल्या. जयंत साने (हार्मोनिअम), मोहन पारसनीस (तबला), मिहीर भडकमकर (सिंथेसायझर),
हेमंत पोटफोडे (तालवाद्य) यांनी साथसंगत केली. नीना भेडसगावकर यांनी निवेदन केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विसर्ग थांबविला

$
0
0

सोमवारी पावसाने विश्रांती घेतल्याने प्रशासनाचा निर्णय

म. टा. प्रतिनिधी, पुणे

संततधारेमुळे पानशेत धरण शंभर टक्के भरल्यानंतर वरसगाव, खडकवासला, भामा आसखेड, भाटघर आणि नीरा देवघर ही धरणेही काठोकाठ भरली गेली आहेत. पानशेत धरणातून खडकवासला धरणात रविवारी रात्री सुमारे एक हजार क्युसेक्स पाणी सोडण्यात आले. मात्र, पावसाने काही काळ विश्रांती घेतल्यामुळे खडकवासला धरणातून मुठा नदीत पाणी विसर्ग करण्याची वेळ आली नाही. पवना धरणातून मुळा नदीत सुमारे एक हजार ५०० क्युसेक्स पाण्याचा विसर्ग करण्यात आला; पण पावसाचा जोर कमी झाल्यामुळे शंभर टक्के भरलेल्या जिल्ह्यातील अन्य धरणांमधील विसर्ग थांबविण्यात आला आहे.
गेले दोन दिवस सुरू असलेल्या पावसामुळे धरणांची पाणीपातळी वाढली आहे. पानशेत धरण रविवारीच शंभर टक्के भरले आहे. या धरणाच्या परिसरात दिवसभरात सुमारे ४८ मिलीमीटर पाऊस पडल्याने धरणाची पातळी आणखी वाढली. त्यामुळे या धरणातून रविवारी रात्रीपासून सकाळपर्यंत सुमारे एक हजार क्युसेक्स पाणी सोडण्यात आले.
वरसगाव धरणाच्या परिसरातही सुमारे ५१ मिलीमीटर पाऊस पडल्याने हे धरणामध्ये ११.२१ टीएमसी पाणीसाठा झाला आहे. खडकवासला धरण क्षेत्रात सुमारे ६० मिलीमीटर पावसाची नोंद झाली. त्यामुळे या धरणात १.६९ टीएमसी पाणीसाठा आहे.
टेमघर धरणात पाणी साठविण्यात येत नसले, तरी १.५० टीएमसी पाणीसाठा आहे. या धरणातून सुमारे ४०० क्युसेक्स पाणी सोडण्यात आले. याबाबत पाटबंधारे खात्याच्या खडकवासला विभागाचे कार्यकारी अभियंता पांडुरंग शेलार म्हणाले, ‘पानशेत धरणातून खडकवासाला धरणात रात्रभर सुमारे एक हजार क्युसेक्स पाणी सोडण्यात आले. मात्र, पावसाचे प्रमाण कमी झाल्याने खडकवासलातून पाण्याचा विसर्ग करण्यात आला नाही.
पवना धरण शंभर टक्के भरले असल्याने या धरणातून मुळा नदीत दिवसभरात सुमारे एक हजार ५०० क्युसेक्स पाणी सोडण्यात आले.’

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


ग्रामपंचायतीच्या अधिकारांवर गदा ?

$
0
0

जिल्हा परिषदेतही केंद्रीकरण?

म. टा. प्रतिनिधी, पुणे

ग्रामपंचायतींची आर्थिक सूची आणि देयके यात जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाचा थेट हस्तक्षेप करण्याचा प्रस्ताव पंचायत विभागाकडे आला आहे. ग्रामपंचायतींना असलेल्या अधिकारांवर गदा आणणाऱ्या या प्रस्तावावर अनुकूल अभिप्राय नोंदविण्यासाठी पंचायत विभागावर दबाव आणला जात असल्याची वस्तुस्थिती समोर आली आहे. यामुळे जिल्हा परिषदेच्या वर्तुळात या प्रस्तावासंदर्भात चर्चेला उधाण आले आहे.

ग्रामपंचायत अधिनियमन आणि जिल्हा परिषद, पंचायत समिती अधिनियमात प्रत्येक संस्थेचे स्वतंत्र आणि स्वायत्त अधिकार आहेत. त्यांची आर्थिक रुची देखील स्वतंत्रपणे अधोरेखित करण्यात आली आहे. ग्रामपंचायतींना वित्त आयोग, मुद्रांक शुल्काचा थेट निधी मिळतो. तसेच स्वनिधीदेखील आहे. त्यांना या निधीतून विकासकामे करण्याचा अधिकार आहे. कोणती कामे करावी आणि करू नये यासंदर्भात सरकारने काही नियमावली निश्चित केली आहे. तरीही दक्षिण बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंतांनी ग्रामपंचायतीचे एमबी तपासणे, बिले करणे, त्यांची मान्यता या गोष्टी बांधकाम खात्यामार्फत व्हाव्यात, लाखो रुपयांची कामे ग्रामपंचायतींच्या अधिकारात करतात. परंतु, ग्रामपंचायतींना असलेल्या या सर्व अधिकारांवर नियंत्रण ठेवण्यासाठीच हा प्रस्ताव आणल्याचे त्यात म्हटले आहे. बिलांची मान्यता ही बाब जिल्हा परिषदेच्या अखत्यारित आली तर संपूर्ण फाइलची मंजुरी आणि लेखा यांचा थेट संबंध आल्यास ग्रामपंचायतीचे स्वायत्त अधिकारच घेण्याचा हा प्रयोग आहे.

ग्रामपंचायतीच्या स्वनिधीचा जिल्हा परिषदेशी संबंध नसताना एकप्रकारे तो नियंत्रित करून बिलांच्या मान्यतेचे अधिकार घेणे नियमबाह्य आहे. पंचायत विभागाकडे अभिप्रायासाठी हा प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. त्याला अनुकूल अभिप्राय मिळावा यासाठी एक वरिष्ठ अधिकारी आणि बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंत्यांनी पुढाकार घेतल्याचे सांगण्यात येते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गणेशोत्सवात नागरिकांचा ५० कोटींचा विमा

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, पुणे
गणेशोत्सवादरम्यान पुणे शहर, पिंपरी-चिंचवड तसेच कॅम्प या परिसरात असणाऱ्या नागरिकांसाठी श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टतर्फे ५० कोटींचा विमा उतरविण्यात आला आहे. दहशतवादी हल्ला अथवा काही दुर्घटना घडल्यास विम्याचे सुरक्षाकवच मिळणार आहे. तसेच, दुर्घटना घडूच नये, यासाठी दगडूशेठ गणपती, मजूर अड्डा, बाबू गेनू गणपती, दगडूशेठ दत्तमंदिर, सिटीपोस्ट या परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येत आहेत. या परिसरावर १५० कॅमेऱ्यांद्वारे पोलिस यंत्रणेसोबत ट्रस्टची २५० लोकांची खासगी सुरक्षाव्यवस्था लक्ष ठेवणार आहे.
श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टचे यंदा शतकोत्तर रौप्यमहोत्सवी (१२५) वर्ष आहे. आगामी गणेशोत्सव विघ्न हरण करणारा असावा, यासाठी ट्रस्टतर्फे खबरदारी घेण्यात आली आहे. ट्रस्टचे अध्यक्ष अशोक गोडसे यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत सुरक्षा व्यवस्थेची माहिती दिली. माणिक चव्हाण, हेमंत रासने, सुनील रासने, महेश सूर्यवंशी, डॉ. बाळासाहेब परांजपे, प्रकाश चव्हाण हे पदाधिकारी उपस्थित होते.
‘गणेशोत्सवात सुरक्षेच्या कारणास्तव देखाव्याच्या परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येत आहेत. याशिवाय मंदिर परिसरात कायमस्वरुपी असलेल्या कॅमेऱ्यांच्या सहाय्याने लक्ष ठेवता येणार आहे. ५० कोटींच्या विम्यामध्ये जखमी व्यक्तींसाठी प्रत्येकी ५० हजार रुपये; तर मृत व्यक्तींसाठी दोन लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे,’ असे गोडसे यांनी सांगितले.

श्री ब्रह्मणस्पती मंदिराची प्रतिकृती
दगडूशेठ हलवाई गणपती यंदा श्री ब्रह्मणस्पती मंदिराची प्रतिकृती असलेल्या मंदिरामध्ये विराजमान होणार आहे. ॠग्वेदामध्ये आणि मुद्गल पुराणात गणेशाचा ब्रह्मणस्पती म्हणून प्रथम उल्लेख करण्यात आला आहे. नागर, द्रविड आणि वेसर शैलीतील मंदिरांप्रमाणे गाणपत्य शैलीचे आगळेवेगळे मंदिर यंदा साकारण्यात येत आहे. हे मंदिर ९० फूट उंचीचे आहे. गोलाकार घुमटाखाली साकारलेला तब्बल ३६ फुटी नयनरम्य गाभारा हे वैशिष्टय असणार आहे. १ लाख २५ हजार मोतिया रंगाच्या दिव्यांनी हे मंदिर उजळून निघणार आहे. मंदिरावरील विद्युतरोषणाईचे उद्घाटन २५ ऑगस्ट रोजी सायंकाळी ७ वाजता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे. डेक्कन कॉलेजचे डॉ. श्रीकांत प्रधान आणि स्वानंद पुंड महाराज यांनी मुद्गल पुराणातून ब्रह्मणस्पतीविषयी माहिती दिली आहे. शिल्पकार विवेक खटावकर यांनी मंदिराचे काम, वाईकर बंधू यांनी विद्युतरोषणाईचे काम आणि काळे मांडववाले यांनी मांडवव्यवस्था पाहिली आहे. गणरायासाठी सोन्याचा साडेनऊ किलोचा मुकुट तयार करण्यात आला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महामेट्रोला २१ लाख दंड

$
0
0


पिंपरी-चिंचवडच्या हद्दीत विनापरवाना उत्खननाबद्दल कारवाई

म. टा. प्रतिनिधी, पुणे
पुणे मेट्रो प्रकल्पासाठी पिंपरी चिंचवड महापालिकेच्या हद्दीत पिंपरी वाघेरे येथे विनापरवाना जास्त उत्खनन केल्याप्रकरणी जिल्हा प्रशासनाने महाराष्ट्र मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनला (महामेट्रो) सुमारे २० लाख ९८ हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. हा दंड येत्या दहा दिवसांत जमा न केल्यास कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

पिंपरी-चिंचवड ते रेंजहिल्स या सुमारे १०.७५ किलोमीटर लांबीच्या मेट्रो मार्गात पिलर उभारण्यासाठी खोदाई करण्यात आली आहे. याबाबत आलेल्या तक्रारीवरून अप्पर तहसीलदार गीतांजली शिर्के यांनी पाहणी केली. त्यामध्ये अवैधरित्या उत्खनन झाल्याचे आढळून आले. त्यामुळे महामेट्रोने सुमारे २० लाख ९८ हजार १२५ रुपयांचा दंड भरण्याचा आदेश काढण्यात आला आहे.

महामेट्रोकडून सुमारे ७०१.६५५ ब्रास माती आणि मुरुमाचे उत्खनन ​जास्त झाल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे महामेट्रोला रॉयल्टीसह चालू बाजार भावाच्या पाचपट दंड आकारण्यात आला आहे.

खराळवाडी परिसर येथे एक पिलर उभारण्यात आला आहे; तसेच नाशिक फाटा येथील आयसीसी डीजीटीपी बिल्डिंग परिसर आणि वल्लभनगर एसटी स्टँड परिसरात उभारलेल्या पिलरसाठी खोदाई करण्यात आली आहे. ही खोदाई अवैध करण्यात आली आहे. पाहणीमध्ये माती आणि मुरुमाचे उत्खनन जास्त झाल्याचे निदर्शनास आल्याचे अहवालात स्पष्ट केले आहे.
...
महामेट्रोने दंडाची रक्कम दहा दिवसांत भरण्याचे आदेश देण्यात आले आहेत. मुदतीत रक्कम न भरल्यास महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६मध्ये असलेल्या तरतुदीनुसार संबंधित रक्कम वसूल केली जाणार आहे.
- राजेंद्र मुठे, निवासी उपजिल्हाधिकारी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अमित कल्याणी यांच्यावर गुन्हा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पिंपरी
पंधरा कोटींच्या व्यवहारातून कंपनीतील वरिष्ठ लेखापाल नीलेश गायकवाड यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी कल्याणी फोर्ज कंपनीचे संचालक अमित कल्याणी यांच्यावर चाकण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चाकण मधील आळंदी फाट्याजवळ असलेल्या ‘हॉटेल गंधर्व’मधील स्वच्छतागृहात गायकवाड यांनी रविवारी (२० ऑगस्ट) विषारी औषध पिऊन आत्महत्या केली होती. त्यांनी आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीवरून कल्याणी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंढवा येथील कल्याणी फोर्ज कंपनीचे वरिष्ठ लेखापाल नीलेश अशोक गायकवाड (३२, रा. कोंढवा, पुणे) यांनी चाकण येथील ‘हॉटेल गंधर्व’मधील एक खोली शुक्रवारपासून (१८ ऑगस्ट) आरक्षित केली होती. तेथे राहण्यास आल्यावर गायकवाड यांनी दोन दिवसांपासून खोली आतून बंद करून घेतली होती. रविवारी (२० ऑगस्ट) नीलेश यांनी हॉटेलमधील स्वच्छतागृहात विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केल्याचे आढळून आले. गायकवाड कुटुंबीयांनी घटनास्थळी येऊन नीलेश यांचा मृतदेह व त्यांच्या हस्ताक्षरात असलेली सुसाइड नोट पहिली.

नीलेश गायकवाड यांचे भाऊ मनोज अशोक गायकवाड (वय ३६) यांनी चाकण पोलिसांत दिलेल्या फिर्यादीनुसार, नीलेश गायकवाड अकाउंटंट म्हणून कल्याणी फोर्ज (मुंढवा, पुणे) या कंपनीत नोकरीस होते. या कंपनीचे मालक अमित कल्याणी (रा. पुणे) यांना नीलेश यांनी बाहेरून घेतलेले १५ कोटी रुपये दिले होते. त्या १५ कोटी रुपयांपैकी त्यांनी ११ कोटी ५० लाख रुपये नीलेश यांना परत दिलेले होते. मात्र उर्वरित रक्कम व कमिशन, असे एकूण ४ कोटी १० लाख रुपये कल्याणी यांचेकडून येणे बाकी होते. ही रक्कम देण्यासाठी अमित कल्याणी यांनी वेळोवेळी टाळाटाळ केली. मनोज गायकवाड यांच्या फिर्यादीनुसार अमित कल्याणी यांच्यावर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

राज ठाकरे यांचा ‘व्हिजन प्लॅन’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

गेल्या आठवड्यात कार्यकर्त्यांशी संवाद साधल्यानंतर भविष्यातील पुणे शहरासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आज, मंगळवारी महापौर आणि महापालिका आयुक्तांसमोर ‘मन की बात’ सादर करणार आहेत. मनसेच्या ‘व्हिजन प्लॅन’च्या सादरीकरणात सत्ताधारी भारतीय जनता पक्षाने उत्सुकता दाखवली असून, पालकमंत्री गिरीश बापट त्यासाठी उपस्थित राहण्याची चिन्हे आहेत.

महापालिकेच्या फेब्रुवारीमध्ये झालेल्या निवडणुकीत मनसेचा दारूण पराभव झाला. सध्या पालिकेत पक्षाचे दोनच नगरसेवक असले, तरी वाढत्या पुण्याच्या योग्य नियोजनासाठी मनसेचा प्लॅन तयार आहे. पालिका निवडणुकांनंतर ठाकरे यांनी नुकत्याच केलेल्या शहराच्या दौऱ्यात अनेक पदाधिकाऱ्यांशी/कार्यकर्त्यांशी संवाद साधला. त्यामध्ये, पक्ष संघटनेवर बरीच चर्चा झाली असली, तरी शहराच्या दृष्टीने महत्त्वाच्या विषयांवर अनेकांनी मांडणी केली. त्यानुसार, महापौर मुक्ता टिळक आणि आयुक्त कुणाल कुमार यांच्यासमोर राज ठाकरे सविस्तर सादरीकरण करणार आहेत. महापालिकेच्या घोले रस्त्यावरील कलादालनामध्ये मंगळवारी सकाळी हे सादरीकरण केले जाणार आहे. या सादरीकरणासाठी पालकमंत्री गिरीश बापट देखील उपस्थित राहणार असल्याचे समजते.

पुण्यामध्ये गेल्या तीन वर्षांमध्ये भाजपला लक्षणीय यश मिळाले आहे. खासदार, आठ आमदार यांच्यापाठोपाठ नुकत्याच झालेल्या निवडणुकीत पक्षाने प्रथमच महापालिकेवर झेंडा रोवला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्मार्ट सिटी प्रकल्पाची अंमलबजावणी शहरात सुरू असली, तरी त्यामध्ये अपेक्षित प्रगती झालेली नाही. कचऱ्यापासून ते वाहतुकीपर्यंत आणि पाणीपुरवठ्यापासून ते नदी प्रदूषणापर्यंत शहराच्या अनेक समस्या अजून कायम असून या संदर्भातील ‘व्हिजन प्लॅन’ मनसे अध्यक्षांकडून महापौर, आयुक्तांसमोर सादर केला जाण्याची शक्यता आहे. यामध्ये, शहरातील काही महत्त्वाच्या विषयांवर प्राधान्याने चर्चा होण्याचा अंदाज आहे.

महापालिकेच्या २०१२च्या निवडणुकीनंतर मनसेने नाशिकमध्ये सत्ता स्थापन केली होती. नाशिकमध्ये अनेक विकासकामांना गती देत, गोदावरी नदीकाठच्या विकासाला प्राधान्य देण्यात आले होते. त्यामध्ये, महापालिकेवर कोणताही बोजा न टाकता कंपन्यांच्या कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटीच्या (सीएसआर) माध्यमातून खर्च करण्यात आला होता. याच मॉडेलचा उपयोग पुण्यात करण्याच्या दृष्टीने काही उपाय ठाकरे यांच्याकडून सुचविले जाण्याची शक्यता आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अपहरण झालेल्या चिमुरडीची सुटका

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
पाच महिन्यांच्या बाळाचे अपहरण करून तिरुपतीला पळून जाण्याच्या तयारीत असलेल्या नातेवाईक महिलेला विश्रांतवाडी पोलिसांनी लोहमार्ग पोलिसांच्या मदतीने सोलापूर येथून अटक केली. अपहरण केलेल्या चिमुकल्या बाळाला त्याच्या आईच्या ताब्यात देण्यात आले आहे.

रत्ना मरोळ (वय ३५, रा. आंध्र प्रदेश) असे अटक केलेल्या महिलेचे नाव आहे. याप्ररकरी अमृता आखाडे (वय २०, रा. धानोरी) यांनी तक्रार दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी रत्ना ही अमृताची मावशी आहे. अमृताच्या पतीसोबत रत्नाचा वाद होता. त्यामुळे तिने शुक्रवारी पहाटे साडेपाच वाजण्याच्या सुमारास सर्व झोपेत असताना अमृताच्या पाच महिन्यांच्या मुलीचे अपहरण केले. अमृताने रत्नाला फोन करून संपर्क करण्याचा प्रयत्न केला. मात्र, आरोपी रत्नाने कोणताही प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे घाबरलेल्या अमृता आणि तिच्या कुटुंबीयांनी विश्रांतवाडी पोलिसांकडे धाव घेतली. विश्रांतवाडी पोलिस ठाण्यातील वरिष्ठ पोलिस निरीक्षक संगीता पाटील यांच्या नेतृत्वाखाली उपनिरीक्षक अभिजीत चौगुले यांच्या पथकाने रत्नाचा शोध सुरू केला. तिच्या मोबाइल लोकेशननुसार तपास केला असता ती लोणावळा येथे असल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर रात्री साडेआठ वाजता तिच्या मोबाइलचे लोकेशन खडकी येथे असल्याची आढळले. त्यामुळे ती आंध्र प्रदेशतील तिच्या मूळगावी जात असावी, असा संशय पोलिसांना आला. त्यांनी पुणे, सोलापूर रेल्वे पोलिसांना आरोपी महिला आणि तिच्याजवळ असलेल्या लहान मुलीचे फोटो व्हॉट्सअॅपद्वारे पाठवले. पोलिसांनी रेल्वेमध्ये तिचा शोध घेण्यास सुरुवात केली. चेन्नई एक्सप्रेसमध्ये रात्री बारा वाजता सोलापूर रेल्वे स्टेशन येथे आरोपी रत्ना आणि पाच महिन्यांच्या मुलीस ताब्यात घेण्यात आले. त्यानंतर मुलीला तिच्या आईच्या ताब्यात देण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

स्वच्छतागृहे पाडण्याचा घाट

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
शहरातील स्वच्छतागृहांच्या अपुऱ्या संख्येवरून कोर्टाने कान टोचल्यानंतरही सत्ताधारी भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक अस्तित्वातील स्वच्छतागृहे पाडावीत, यासाठी प्रयत्नशील आहेत. महिला व बाल कल्याण समितीकडे चार ठिकाणची स्वच्छतागृहे पाडण्याचे प्रस्ताव भाजपच्या सभासदांनी दिले आहेत.

शहरात सार्वजनिक स्वच्छतागृहांची संख्या अपुरी असल्याने नागरिकांची मोठी गैरसोय होते. लोकसंख्येच्या तुलनेत उपलब्ध स्वच्छतागृहांच्या संख्येविषयी कोर्टानेही पालिका प्रशासनाला सुनावले आहे. सर्वसाधारण सभेतही स्वच्छतागृहांच्या अपुऱ्या संख्येवरुन भाजपसह इतर सर्वच पक्षांच्या सभासदांनी प्रशासनाचे वाभाडे काढले आहेत. त्यामुळे शहरातील स्वच्छतागृहांची संख्या वाढविण्यासाठी प्रशासन प्रयत्नशील आहे. भाजपचे काही सभासद मात्र ही स्वच्छतागृहे पाडून टाकावीत, यासाठी जोरदार प्रयत्नशील आहेत. दोन महिन्यांपूर्वीच स्वच्छतागृह पाडून त्यावर समाजमंदिरे, व्यायामशाळा व उद्याने उभारण्याचे प्रस्ताव नगरसेवकांकडून महिला बालकल्याण समितीपुढे मंजुरीसाठी ठेवण्यात आले होते.

समितीच्या बुधवारी होत असलेल्या बैठकीतही चार स्वच्छतागृहे पाडण्याचे प्रस्ताव आले आहेत. यापैकी तीन प्रस्ताव हडपसरच्या प्रभाग क्र. २३चे नगरसेवक मारुती तुपे यांनी दिले आहेत. त्यामध्ये हडपसरगाव येथील स. नं. ८४ मनपा शाळा क्र. ३२जवळील सार्वजनिक मुतारी, उन्नती सोसायटी, उन्नतीनगर येथील शौचालय आणि बंटर शाळा क्र. १००मागील शौचालय पाडण्याची मागणी केली आहे. प्रभाग क्र. १८ येथील मक्का मशिदीच्या जवळील सोसायटीनजिकचे स्वच्छतागृह पाडण्याचा प्रस्ताव भाजप नगरसेवक सम्राट थोरात व उमेश गायकवाड यांनी दिला आहे.

मटा भूमिका

आधी नवी स्वच्छतागृहे उभारा

नारायण पेठेतील माती गणपती येथील स्वच्छतागृह पालिकेने यापूर्वीच पाडून टाकले आहे. तर फरासखाना पोलिस स्टेशनच्या मागे आणि श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीच्या जवळ असलेले जुने स्वच्छतागृह पाडून टाकण्याचा प्रस्ताव महिला बाल कल्याण समितीच्या बैठकीत मान्य झाला आहे. गणेशोत्सवात या भागात मोठी गर्दी होते. त्यामुळे नागरिकांना येथे स्वच्छतागृहाची गरज आहे. त्यामुळे नवे स्वच्छतागृह आधी उभारण्यात यावे आणि नंतरच जुने स्वच्छतागृह पाडले पाहिजे. देशभरात स्वच्छ भारत मिशनची अंमलबजावणी सुरू असून स्वच्छतागृहे उभारण्याची मोहीम हाती घेण्यात आली आहे. अशा काळात उपलब्ध असणारी स्वच्छतागृहे पाडण्याऐवजी ती स्वच्छ ठेवून नागरिकांना त्याचा सुलभ वापर होईल, याकडे महापालिकेने आणि माननीयांनीही लक्ष देण्याची गरज आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


जगप्रसिद्ध लोणार सरोवर आटू लागले

$
0
0

मयुरेश प्रभुणे, पुणे

लोणार सरोवरावरील संकटे थांबण्याची चिन्हे नाहीत. लोणार सरोवराच्या पाण्याने गेल्या १५ वर्षांतील सर्वात कमी पातळी गाठली असून, सरोवराला येऊन मिळणारे पाचपैकी दोन प्रमुख नैसर्गिक झरे बंद पडल्यामुळे लोणारच्या अभयारण्यातील वन्यजीवन धोक्यात आले आहे. लोणारच्या झऱ्यांचा स्रोत असणाऱ्या भूजलाचा बेकायदा उपसा सुरू असल्यामुळे ही स्थिती उद्भवल्याचे समोर येत आहे.

पुण्यातील सेंटर फॉर सिटिझन सायन्स (सीसीएस) या संस्थेने नुकत्याच केलेल्या पाहणीतून ही बाब उघड झाली. उपग्रहीय छायाचित्रे आणि प्रत्यक्ष सर्वेक्षणाद्वारे केलेल्या पाहणीतून २०१४च्या तुलनेत लोणार सरोवराचे पाणी पसरट भागात तब्बल शंभर मीटरने मागे गेले आहे. गेल्या दोन वर्षांत कमी पाऊस झाल्यामुळे ही स्थिती निर्माण झाल्याचे स्थानिकांकडून सांगण्यात येत असले तरी, प्रत्यक्ष पावसाच्या आकडेवारीवरून वेगळीच बाब सामोर आली आहे. २००१ ते २०१६ या कालावधीत लोणारच्या पावसात कोणताही बदल झालेला नसल्याचे राज्य सरकारच्या पावसाच्या आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे. गेल्या सोळा वर्षांपैकी २००३ मध्ये ४८४ मिलीमीटर, तर २००४ मध्ये ४७३.७ मिलीमीटर हा सर्वात कमी पाऊस लोणारमध्ये नोंदला गेला होता. मात्र, त्या दोन्ही वर्षी लोणार सरोवराचे पाणी सर्वोच्च पातळीवर होते. गेल्या तीन वर्षांत लोणारमध्ये ५१० मिलीमीटर (२०१४), ५४६ मिलीमीटर (२०१५) आणि ६६७ मिलीमीटर (२०१६) पावसाची नोंद झाली असून, लोणारच्या सरासरी पावसापेक्षा हा पाऊस जास्त आहे. तरीही लोणार सरोवराचे पाणी सर्वांत कमी पातळीवर पोचले आहे.

लोणार विवरापासून ५०० मीटरच्या परिसरात बांधकामांवर बंदी की नाही यावी याविषयी उच्च न्यायालयात प्रकरण सुरू असतानाही गेल्या तीन वर्षांत या परिसरात नव्याने बांधकामे झाली. त्याचसोबत बेकायदा बोअरवेलही घेतल्या गेल्या. या बोअरवेलद्वारे लोणार सरोवराला मिळणाऱ्या नैसर्गिक झऱ्यांच्या स्रोताचा थेट उपसा सुरू केल्यामुळे लोणार सरोवराचे दोन प्रमुख झरे कोरडे पडले आहेत, असा आरोप स्थानिक पर्यावरणप्रेमींनी केला आहे. सरोवराला मिळणारे दोन महत्त्वाचे जलस्रोत बंद पडल्याचे आणि सरोवराचे पाणी आटल्याचे थेट परिणामही दिसू लागले आहेत. ‘सीसीएस’ने केलेल्या पाहणीनुसार झऱ्यांच्या काठाने आणि सरोवराच्या किनाऱ्यावर असणारे वैशिष्ट्यपूर्ण गवत नाहीसे झाले आहे.

बेकायदा बांधकाम?

लोणार संवर्धनासाठी उच्च न्यायालयाच्या सहकार्यासाठी बुलडाण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली स्थानिक समितीची नेमणूक करण्यात आली. या समितीतील एका सदस्याच्या कुटुंबीयांनीच लोणार विवराच्या काठावर हॉटेल सुरू केल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. केंद्र सरकारच्या इको सेन्सिटिव्ह झोन नुसार विवरापासून शंभर मीटरच्या परिसरात कोणतेही बांधकाम करण्यास बंदी असतानाही हे हॉटेल बांधण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बेकायदा फलक रडारवर

$
0
0

दुकानांचे नियमबाह्य फलक हटविण्याचे पालिका आयुक्तांचे आदेश

म. टा. प्रतिनिधी, पुणे
शहरातील व्यावसायिकांनी आपल्या दुकानाच्या बाहेर नियम डावलून लावलेल्या नामफलकांवर तातडीने कारवाई करण्याचे आदेश महापालिका आयुक्त कुणाल कुमार यांनी दिले आहेत. पंधरा क्षेत्रीय आयुक्तांना हे आदेश देण्यात आले आहेत. बहुतांश दुकानांच्या बाहेर नामफलक लावताना अनेक व्यावसायिकांनी नियमांचे उल्लंघन केल्याने आयुक्त कुमार यांनी हे आदेश काढले आहेत.

आपल्या व्यवसायाच्या माहितीसाठी लावण्यात येणाऱ्या नामफलकांची परवानगी देण्याचे अधिकार क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीनुसार संबधित क्षेत्रीय कार्यालयाच्या सहायक आयुक्तांना देण्यात आले आहेत. दुकानदारांना स्वत:च्या व्यवसायाची माहिती देण्यासाठी करण्यात येणाऱ्या जाहिरातीमध्ये आकाशचिन्हाचा वापर

करायचा असेल आणि ही जागा मालकीची, भाडेतत्त्वावर घेतलेली असेल, तर किरकोळ जाहिरातीसाठी आयुक्तांची मान्यता घेण्याची गरज नाही. तसेच त्याचे शुल्कही भरण्याची गरज नसल्याचे राज्य सरकारचे परिपत्रक आहे. मात्र, याचा योग्य तो अर्थ पालिकेच्या क्षेत्रीय आयुक्तांनी न लावल्याने नियम डावलून अनेक दुकानदारांनी उंच आणि मोठ्या आकाराचे जाहिरात फलक लावले असल्याच्या तक्रारी नागरिकांकडून, तसेच विविध स्तरातून पालिकेकडे करण्यात आल्या आहेत. याची शहानिशा केल्यानंतर यामध्ये तथ्य असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे बेकायदा आणि चुकीच्या पद्धतीने लावण्यात आलेल्या दुकानांच्या नामफलकांवर तातडीने कारवाई करावी, असे आदेश आयुक्तांनी पंधरा क्षेत्रीय कार्यालयांना दिले आहेत.

व्यावसायिकांनी आपल्या दुकानाच्या बाहेर दुकानाच्या लांबी एवढाच लांब फलक लावता येणार आहे. तसेच त्याची उंची तीन मीटरपेक्षा उंच असता कामा नये. अशा पद्धतीचा एकच फलक दुकानाच्या दर्शनी भागात विनाशुल्क लावण्याची परवानगी असणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘सेट’ परीक्षार्थ्यांचा आंदोलनाचा इशारा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
‘सेट परीक्षेच्या ओएमआर शीटमध्ये अपूर्ण माहिती भरणाऱ्या परीक्षार्थ्यांचे निकाल लागून त्यांचे गुण जाहीर होतात. मात्र, आमच्याकडून माहिती भरण्यात खाडाखोड झाल्यास तांत्रिक कारण दाखवून आम्हाला निकालात अपात्र ठरविण्यात येते. त्यामुळे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या सेट प्रशासनाने परीक्षार्थ्यांना एकसारखा न्याय देऊन त्वरित तोडगा काढवा. अन्यथा आजपासून तीव्र आंदोलनाला सुरूवात करण्यात येईल,’ असा इशारा राज्यभरातून आलेल्या सेट परीक्षार्थ्यांनी दिला आहे.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडे जबाबदारी असणाऱ्या सेट परीक्षेचा निकाल काही दिवसांपूर्वी जाहीर झाला. परीक्षार्थ्यांना उत्तरपत्रिका म्हणून ओएमआर शीट देण्यात आल्या होत्या. त्यावर बैठक क्रमांक, प्रश्नसंच संकेतांक आदी माहिती उत्तरपत्रिकेवरील वर्तुळाला शाईने गडद करून भरायची होती. मात्र, काही परीक्षार्थ्यांनी ही प्रक्रिया परीक्षेच्या घाईगडबडीत व्यवस्थित पार पाडली नाही. तसेच, परीक्षा केंद्रावरील पर्यवेक्षकांकडून परीक्षार्थ्यांना सूचना न देण्यात आल्याने माहिती भरताना क्षुल्लक चुका झाल्या. त्यामुळे या निकालात सुमारे अडीच हजार परीक्षार्थ्यांना निकालात तांत्रिक चुका झाल्याचे कारण पुढे करत अपात्र ठरविण्यात आले आहे. तसेच, त्यांना निकालात शून्य गुण दिले असल्याचे परीक्षार्थ्यांनी सांगितले.

मात्र, त्याच वेळी काही परीक्षार्थ्यांनी ओएमआर शीटवर भरायची माहितीच अपूर्ण भरली आहे. काहींनी स्वत:चे नाव टाकण्यापासून चुका केल्या आहेत. तर, काहींनी अपात्र परीक्षार्थ्यांनी केलेल्या चुकांची पुनरावृत्ती केली आहे. मात्र, अशा परीक्षार्थ्यांचे निकाल जाहीर झाले आहेत. विद्यापीठाने परीक्षार्थ्यांबाबत योग्य त्वरित निर्णय घ्यावा. अन्यथा आंदोलनाला सुरुवात करण्यात येईल, असा इशारा परीक्षार्थ्यांनी दिला आहे. जनता दल युनाएटेडचे प्रदेश सरचिटणीस कुलदीप आंबेकर आणि राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसने शहराध्यक्ष ऋषी परदेशी परीक्षार्थ्यांना पाठींबा दिला आहे.

‘नेट’बाबत वेगळा न्याय

‘नेट’च्या परीक्षेत अशा चुका झाल्यास त्यावर योग्य ती कारवाई करून निकाल जाहीर करण्यात येतो. मात्र, सेट प्रशासन याबाबत निर्णय घेण्यात दिरंगाई करत आहे. विद्यापीठ प्रशासनाकडून विद्यापीठ अनुदान आयोगाकडे (यूजीसी) संबंधित प्रकारावर मार्गदर्शन मागविले आहे, असे उत्तर देण्यात येत आहे, असे विद्यार्थ्यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

हुबळी-कुर्ला एक्स्प्रेसवर दरड कोसळली

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, लोणावळा

खंडाळा घाटमाथा परिसरात गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे खंडाळा घाटातील मंकी हिल ते ठाकूरवाडी दरम्यान सोमवारी पहाटे हुबळी-कुर्ला एक्स्प्रेसवर दरड कोसळली. या अपघातात चार प्रवासी जखमी झाले आहेत. मोटरमनच्या प्रसंगावधानाने या दुर्घटनेत जीवितहानी झाली नाही. या घटनेची माहिती रेल्वे प्रशासनाला कळविल्यानंतर अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी मदतकार्य सुरू केले.

शिवप्रसाद मल्लप्पा हिरेमठ व हुसैनसाहब बेलोकी (दोघेही रा. भांडुप, मुंबई) आणि महंमद असिफ (रा. हुबळी) अशी जखमी प्रवाशांची नावे आहेत. त्यांच्यावर कर्जत येथील रेल्वे दवाखान्यात प्राथमिक उपचार करण्यात आले. त्यानंतर त्यांना कल्याण येथील रेल्वेच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले गेले. जखमींपैकी तीन जणांची प्रकृती गंभीर असून, एक जण किरकोळ जखमी झाला आहे. लोकमान्य टिळक कुर्ला-हुबळी एक्स्प्रेस सोमवारी पहाटे मुंबईकडे जात होती. त्या वेळी गाडी मंकी हिल ते ठाकूरवाडी दरम्यान लोहमार्ग किमी क्रमांक ११६/४५ जवळील एक बोगदा पार करीत असताना डोंगरावरून सैल झालेले दोन मोठे दगड एक्स्प्रेसच्या ‘एस-४’ या बोगीवर कोसळले. रेल्वे मार्गातील दगड बाजूला केल्यानंतर गाडी रवाना झाली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

येळकोट... येळकोट!

$
0
0

जेजुरीत सोमवती यात्रेनिमित्त भाविकांची गर्दी

म. टा. वृत्तसेवा, जेजुरी
सदानंदाचा येळकोट, येळकोट येळकोट जय मल्हार! असा जयघोष करीत आणि भंडाऱ्याची उधळण करीत सोमवती यात्रेनिमित्त सुमारे तीन लाख भाविकांनी जेजुरीगडावर खंडेरायाचे दर्शन घेत कुलधर्म-कुलाचार केला. रविवारपासूनच भाविकांनी जेजुरीत गर्दी केली होती.

सोमवारी गडावर दर्शनासाठी भाविकांची मोठी रांग होती. दुपारी एक वाजता प्रमुख वतनदार इनामदार पेशवे यांनी आदेश दिल्यानंतर उत्सवमूर्तींसह पालखी सोहळ्याने गडावरून प्रस्थान ठेवले. व्यवस्थापनाकडून बंदुकीच्या फैरी झाडून सोहळ्याला सलामी देण्यात आली. या वेळी पालखी सोहळ्यासाठी गडावर मुख्य विश्वस्त अॅड. वसंत नाझीरकर, डॉ. प्रसाद खंडागळे, संदीप घोणे, सुधीर गोडसे, अॅड. दशरथ घोरपडे, तहसीलदार सचिन गिरी आदी उपस्थित होते. पालखी सोहळ्यासमोर मानाचा पंचकल्यानी अश्व, छत्रचामरे-अब्दागिरी, घडशी समाज बांधवांचा सनईचा मंगलमय सूर निनादत होता. जेजुरीकर मानकरी-खांदेकरी पुजारीवर्गासमवेत पालखी सोहळा गडप्रदक्षिणा करून पायरी मार्गाने मल्हारगौतमेश्वर-छत्रीमंदिर येथे स्थिरावत धालेवाडी मार्गे कऱ्हा स्नानासाठी मार्गस्थ झाला. सायंकाळी पाच वाजता कऱ्हा नदी किनारी खंडोबा-म्हाळसा उत्सवमूर्तींना विधिवत अभिषेक घालून स्नान घालण्यात आले. या वेळी हजारो भाविकांनी उत्सव-मूर्तींबरोबर स्नानाची पर्वणी लुटली.

जेजुरी व परिसरामध्ये पावसाने दोन दिवस हजेरी लावली असली, तरी खंडोबा देवाला जेथे स्नान घातले जाते ते नदीपात्र अद्याप कोरडे असल्याने प्रशासनाने टँकरच्या पाण्याची सोय केली होती.

महिलांनी चोरट्याला पकडले

श्री खंडोबा देवाचा पालखी सोहळा दुपारी तीन वाजता छत्रीच्या देवळावर आला असता तेथे गर्दीत उभ्या असलेल्या विद्या चिंतामण वरळीकर (रा. वरळी, कोळीवाडा, मुंबई) या महिलेच्या मागे उभे राहून गळ्यातील सोन्याची साखळी दाताने तोडत असताना एका चोरट्याला महिलांनी पकडले व भरपूर चोप दिला. मात्र गर्दीचा फायदा घेऊन चोरटा पळून जाण्यात यशस्वी ठरला. महिलांच्या धाडसामुळे विद्या वरळीकर यांना त्यांची पंचवीस हजारांची साखळी परत मिळाली. यात्रेत अनेक भाविकांचे दागिने, पैसे चोरीला जाण्याचे प्रकार घडले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 75772 articles
Browse latest View live


Latest Images