Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

लाच मागितल्याप्रकरणी दोन पोलिसांना अटक

0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
हडपसर पोलिस ठाण्यातील दोन पोलिस कर्मचाऱ्यांनी अपघातात पकडलेली दुचाकी सोडण्यासाठी पाच हजार रुपयांची लाच मागितल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी दोन कर्मचाऱ्यांवर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने हडपसर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली आहे.
नारायण ज्ञानदेव गोरे (वय ४१, रा. रामटेकडी, हडपसर), जगदीश बाबसाहेब कोंढाळकर (४५, रा. तरवडे वस्ती, महंमदवाडी, हडपसर) अशी गुन्हा दाखल केलेल्या दोन पोलिसांची नावे आहेत. याबाबत २८ वर्षीय तरुणाने तक्रार दिली आहे. तक्रारदार यांच्या दुचाकीचा अपघात झाला होता. ही दुचाकी हडपसर पोलिसांनी जप्त केली होती. ही दुचाकी परत मिळविण्यासाठी तक्रारदार यांनी प्रयत्न सुरू केले होते. मात्र, गोरे व कोंढाळकर हे दोघे त्यांची आडवणूक करत होते. दुचाकी परत देण्यासाठी त्यांनी तक्रारदार यांच्याकडे पाच हजार रुपयांची मागणी केली. याबाबत त्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. या तक्रारीची पडताळणी केल्यानंतर दोघांनी लाच मागितल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर दोघांवर हडपसर पोलिस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम कलम सातनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या दोघांना अटक करण्यात आली असून, अधिक तपास पोलिस निरीक्षक जालिंदर तांदळे करत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


पिंपरी पोलिसांकडून २८ गुन्हे उघडकीस

0
0

म. टा. प्रतिनिधी, पिंपरी

पिंपरी आणि पुणे ग्रामीणच्या हद्दीत घरफोड्या आणि वाहन चोऱ्या करणाऱ्या दोन सराईत गुन्हेगारांसह चार अल्पवयीन मुलांना पिंपरी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडून २८ गुन्हे उघडकीस आले असून, १८ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. यामध्ये दुचाकी आणि सोन्या-चांदीच्या दागिन्यांचा समावेश आहे.

ज्ञानेश्वर दिगंबर मेरूकर (२२, रा. तळेगाव दाभाडे) असे अटक करण्यात आलेल्या सराईत गुन्हेगाराचे नाव आहे. अप्पर पोलिस आयुक्त शशिकांत शिंदे यांनी याबाबत पत्रकार परिषदेत माहिती दिली. या वेळी सहायक आयुक्त राम मांडुरके, वरिष्ठ निरीक्षक डॉ. विवेक मुगळीकर, मसाजी काळे उपस्थित होते.

मेरूकर याला पिंपरी गाव येथील पवनेश्वर टी स्टॉल येथून अटक करण्यात आली आहे. त्याच्याकडून पोलिसांनी ४१२ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने, ४०० ग्रॅम चांदीचे दागिने, ४ लॅपटॉप, २ कॅमेरे, मोत्याच्या व खड्यांच्या माळा असा एकूण १३ लाख ९१ हजार ५०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. मेरूकर याच्याकडून पिंपरी पोलिस ठाण्यात दाखल असलेले चार, वाकडचे चार, सांगवीचे तीन, भोसरीचे दोन, निगडी, देहूरोड, लोणावळा पोलिस ठाण्यात दाखल असलेले प्रत्येकी एक असे एकूण १६ गुन्हे उघडकीस आणण्यात पिंपरी पोलिसांना यश आले आहे.

पिंपरी पोलिसांनी केलेल्या दुसऱ्या कारवाईत तालिब रफिक बेग (४५, रा. परळी, बीड) याला अटक करण्यात आली आहे. बेग हा गाड्याच्या काचा फोडून तसेच नागरिकांना फसवून लुबाडत असल्याचे उघड झाले आहे. बेग याने पिंपरीत एक घरफोडी केल्याचे उघडकीस आले असून, त्याच्याकडून एकूण तीन गुन्ह्यातील ५५ हजार ७५० रुपये किमतीची रोकड जप्त करण्यात आली आहे. नोटांच्या बंडलातील ठराविक क्रमांकाची नोट हवी असल्याचे सांगून बेग हातचलाखीने नोटा काढून घेत असे. त्याने काही सरकारी, निमसरकारी कार्यालयात अशा प्रकारे लोकांना गंडा घातला आहे.

तिसऱ्या कारवाईत पिंपरी पोलिसांनी चार अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले आहे. या चौघा आरोपींचे वय दहा ते १५ या वयोगटातील आहे. या चौघांकडून चोरीच्या ३ लाख ८० हजार रुपये किमतीच्या १२ दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. मौजमजेसाठी हे गाड्या चोरत असल्याचे तपासात पुढे आले आहे. रिव्हर रोड येथून पिंपरी पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले आहे. पिंपरीमधून पाच, भोसरीमधून दोन, निगडी व सांगवीमधून प्रत्येकी एक दुचाकी या चौघांनी चोरल्या आहेत. तर तीन दुचाकी कुठून चोरल्या याची माहिती अद्याप कळू शकलेली नाही.

शहरातील घरफोडी आणि वाहन चोरीच्या गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी अप्पर आयुक्त शिंदे, उपायुक्त गणेश शिंदे, सहायक आयुक्त मांडुरके, डॉ. मुगळीकर, काळे आदींनी तपास पथकाला सूचना दिल्या आहेत. त्यानुसार परिसरात गस्त घालताना वरील गुन्ह्यांची उकल झाली आहे. सहायक निरीक्षक रामदास मुंढे, राजू ठुबल, फौजदार विठ्ठल बढे, हवालदार विवेकानंद सपकाळे, राजेंद्र भोसले, नागनाथ लकडे, शाकीर जिनेडी, जावेद पठाण, प्रभाकर खणसे, महादेव जावळे, संतोष दिघे, दादा धस, शैलेश मगर, उमेश वानखडे, रोहित पिंजकर, संतोष भालेराव आदींच्या वेगवेगळ्या तीन पथकांनी वरील कामगिरी केली आहे. तपास करणाऱ्या या तिन्ही पथकाला रोख बक्षीस जाहीर करण्यात आले आहे.


‘गुन्हेगाराला शोधता येणार’

पोलिसांनी ‘गुगल मॅप’वर सराईत गुन्हेगारांचे पत्ते फीड करण्याचे काम सुरू केले असून ते लवकरच पूर्ण होणार आहे. त्याचे नवीन अॅपही विकसित होणार आहे. त्यामुळे पोलिसांना एका क्लिकवर गुन्हेगाराला शोधणे सोपे जाणार आहे. त्यामुळे वाहनचोरी घरफोडी यासारख्या गुन्ह्यांचे प्रमाणही कमी होण्यास मदत होणार आहे.

- शशिकांत शिंदे, अप्पर पोलिस आयुक्त

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

निर्माल्य कलशांचेही ‘निर्माल्य’

0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

नदीचे प्रदूषण टाळण्यासाठी निर्माल्य पाण्यात टाकण्याऐवजी हौदात टाका, असे फलक महापालिकेने प्रत्येक पुलावर लावले असले तरी पुलांवरून कलश मात्र गायब झाले आहेत. श्रावण हा व्रतवैकल्यांचा महिना असल्याने घराघरात मोठ्या प्रमाण निर्माल्य तयार होत आहे. मात्र, कलश नसल्याने नागरिकांनी पुलावरच निर्माल्य टाकण्याचा पर्याय निवडला आहे.

पुण्यातील बहुतांश पुलांवर कलशाच्या जागेवर सध्या निर्माल्याचे ढीग पाहायला मिळत आहेत. काही ठिकाणी वाऱ्यामुळे यातील पिशव्या रस्त्यावर पसरत असून पादचारी मार्गावर निर्माल्य अस्ताव्यस्त पडलेले दिसते आहे. गणेशोत्सव अवघ्या दिवसावर आलेला असताना नदीपात्रात, अथवा पुलावंर एक कलश ठेवण्यात आलेला नाही.

नदी प्रदूषण टाळण्यासाठी नागरिकांनी नदीपात्रात निर्माल्य टाकू नये, यासाठी महापालिका, विविध स्वयंसेवी संस्था गेल्या पाच वर्षांपासून जनजागृती मोहीम राबवित आहेत. शाळा, कॉलेज स्तरावरही याबद्दल प्रबोधनपर उपक्रम राबविण्यात आल्याने पुणेकर सजग झाले आहेत. निर्माल्य टाकण्यासाठी महापालिकेतर्फे गेल्या दोन वर्षांपूर्वीपर्यंत सर्व पुलांवर आणि नदीच्या घाटांवर वर्षभर निर्माल्य कलश ठेवण्यात येत होते. अलीकडे गणेशोत्सवाचे दहा दिवस सोडल्यास कलश कोठेही बघायला मिळत नाहीत. महापालिकेच्या बजेटमध्ये दर वर्षी कलश खरेदीसाठी तरतूद केली जात असताना पंधरा दिवसात कलश गायब होत आहेत. मुख्यतः श्रावण, गणेशोत्सव आणि नवरात्रात या कलशांना सर्वाधिक मागणी असते. लोक आवर्जून निर्माल्य कलश शोधून वापरलेली फुले आणि पुजासाहित्य त्यामध्ये टाकतात. लोकांच्या वाढत्या प्रतिसादामुळे या काळात रोज कलश ओसंडून वाहताना दिसतात. सध्या कलश नसल्याने काही लोक निर्माल्य थेट नदीत फेकत आहेत. तर अनेक लोकांनी पुलांवर या पिशव्यांचा ढीग करण्याचा पर्याय निवडला आहे. एस. एम. जोशी पुलाचे नुकतेच नूतनीकरण झाले असताना असून सध्या पुलावर निर्माल्याच्या पिशव्यांनी पुलाचे सौंदर्य हरवले आहे. यशवंतराव चव्हाण पूल, बाबा भिडे पुलावरही हेच चित्र आहे. गणेसोत्सव अवघ्या आठ दिवसांवर आला असताना महापालिका नदीपात्र आणि पुलांवर कलशाची व्यवस्था का करीत नाही, असा प्रश्न विचाराला जातो आहे.

‘चार दिवसांत उपलब्‍ध’

गेल्या वर्षीचे कंटेनर कर्मचाऱ्यांनी दुसऱ्या कामासाठी वापरले आहेत. या वर्षी निर्माल्यासाठी पंधरा कंटेरनची व्यवस्था केली असून पुढील चार दिवसांत ते नागरिकांसाठी उपलब्ध होतील.

- सुरेश जगताप, सहआयुक्त, पुणे महापालिका


मटा भूमिका

रस्ते-पूल चकाचक; पण स्वच्छतेच्या नावाने ओरड अशी स्थिती नागरिकांच्या आरोग्यासाठीही धोकादायक ठरू शकते. पुढील आठवड्यात गणेशोत्सवास प्रारंभ होत असून मोठ्या प्रमाणात निर्माल्याचा प्रश्न निर्माण होणार आहे. शहर आणि परिसरात आधीच साथीच्या रोगांचा फैलाव वाढत आहे. अशा काळात पुणेकरांचे आरोग्य राखण्यासाठी योग्य काळजी घेणे आवश्यक आहे. पुणेकरांबरोबरच बाहेरगावाहूनही हजारो नागरिक या काळात पुण्यात येतात. यंदा गणेशोत्सवाचे १२५ वे वर्ष असून त्यानिमित्त शहराचे ब्रँडिंगही महापालिकेकडून करण्यात येत आहे. अशा काळात शहरात जागोजागी साठलेला कचरा दिसून येणे योग्य नाही.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ट्रेकर पद्मेशची प्रकृती गंभीर

0
0

पुणे : लेह परिसरातील स्टोक कांगरी या हिमशिखरावर १८ हजार फूट उंचीवर कोसळून अपघातग्रस्त झालेला वारजे येथील ट्रेकर पद्मेश पाटील (वय ३२) याची प्रकृती गंभीर; पण स्थिर आहे. पद्मेशवर सध्या चंडिगड येथील पीजीआय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
पद्मेश मित्रांसह ९ ऑगस्टला स्टोक कांगरीकडे रवाना झाला होता. स्टोक कांगरी हे ६१२३ मीटर उंचीचे लडाखमधील सर्वांत उंच शिखर आहे. या ट्रेकमधील ‘शोल्डर’ (१८ हजार फूट) या भागापर्यंत तो आला होता. तेथून तो खाली पडला. हवाई दलाकडून मदत मिळाल्यानंतर त्याला लेहमधील एसएनएम हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. मात्र, पुढील उपचारासाठी त्याला दिल्ली किंवा चंडिगडला आणणे गरजेचे होते. शुक्रवारी त्याला एअर अॅम्बुलन्सने चंडिगड येथे आणण्यात आले. सुरुवातीला त्याला हॉस्पिटलमधून फारशी मदत मिळाली नाही. त्यामुळे त्याचा भाऊ पंकज पाटील याने तातडीची मदत मिळावी, असा व्हिडिओदेखील सोशल मीडियावर टाकला होता. त्याच्या सोबत वारजे येथील नगरसेवक सचिन दोडके हेदेखील चंडिगडमध्ये आहेत. सध्या त्याला अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, पद्मेशच्या उपचार आणि प्रवासासाठीच्या सर्व खर्चाची जबाबदारी राज्य सरकार उचलणार असल्याचे मुख्यमंत्री जनसंपर्क कार्यालयातून कळविण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चौथऱ्याच्या दुरुस्तीचे आदेश

0
0

आर्थिक तरतुदीची मुरलीधर मोहोळ यांची माहिती

म. टा. प्रतिनिधी, पुणे
थोरले बाजीराव पेशवे यांच्या शनिवारवाड्यासमोरील पूर्णाकृती पुतळ्याच्या चौथऱ्याची दुरुस्ती करण्याचे काम पालिकेने तत्काळ हाती घेतले आहे. शुक्रवारी बाजीराव पेशवे यांच्या जयंतीदिनी पुतळ्याच्या चौथऱ्याच्या दुरवस्थेमु‍ळे पालिकेवर मोठ्या प्रमाणात टीका झाल्याने दुरुस्तीचा निर्णय घेण्यात आला.
थोरले बाजीराव पेशवे यांच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या चौथऱ्याच्या दुरुस्तीच्या सूचना देण्यात आल्या असून, दुरुस्तीचे काम तत्काळ सुरू करण्यात येणार आहे, अशी माहिती स्थायी समितीचे अध्यक्ष मुरलीधर मोहोळ यांनी दिली. मराठ्यांचे साम्राज्य उत्तरेत दिल्लीपर्यंत पोहोचविण्यात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या आणि अवघ्या ४० वर्षांच्या आयुष्यात एकाही लढाईत पराजित न झालेल्या बाजीरावांच्या पुतळ्याकडे लक्ष देण्यास पालिकेला वेळ नसल्याचे वृत्त ‘महाराष्ट्र टाइम्स’ने शुक्रवारी प्रसिद्ध केले होते.
दरम्यान, महापौर मुक्ता टिळक आणि मान्यवरांनी जयंतीनिमित्त बाजीराव पेशवे यांना अभिवादन केले. संदीप खर्डेकर, मंजुश्री खर्डेकर आदी या वेळी उपस्थित होते. जयंती असूनही पुतळा स्वच्छ करण्यात आला नव्हता, अशी टीका नागरिकांनी केली. त्यामुळे पांढरे कापड लावून पुतळा झाकण्याचा प्रयत्न केल्याची टीकाही त्यांनी केली. ऐतिहासिक शनिवारवाड्यासमोरील मोकळ्या जागेत थोरल्या बाजीरावांचा पुतळा उभारण्यात आला आहे. मात्र, सध्या या पुतळ्याच्या चौथऱ्याची मोठ्या प्रमाणात पडझड झाली आहे. छत्रपती शाहू महाराजांनी केलेल्या बाजीराव पेशव्यांच्या अतुलनीय पराक्रमाचे वर्णन करणारे फलकही जीर्ण झाले आहेत. बाजीरावांच्या पुतळ्याच्या उद्घाटनाच्या नामफलकाचीही दुरवस्था झाली आहे. ही सर्व दुरुस्ती तत्काळ करण्यात येणार आहे.

पुतळ्याची दुरुस्ती आणि सुशोभिकरण यासाठी आर्थिक तरतूद करण्यात आली आहे. या कामाची लवकरच सुरुवात करण्यात येणार आहे.
हेमंत रासने, नगरसेवक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

लग्नाच्या आमिषाने शिक्षिकेला फसवले

0
0

मॅट्रिमोनी साइटवरून झाली ओळख; १४ लाख हडपले

म. टा. प्रतिनिधी, पुणे

मॅट्रिमोनी वेबसाइटवरून ओळख झाल्यानंतर लग्नाची बोलणी करण्यासाठी येताना सीमाशुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी नव्वद हजार पौंड पकडल्याचा बनाव करून शिक्षिका आणि तिच्या आईची १४.२५ लाख रुपयांची फसवणूक केल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी समर्थ पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शिक्षिकेच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात व्यक्तींच्या विरोधात आयटी अॅक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार या सहकार खात्यातून निवृत्त झाल्या आहेत. त्यांची मुलगी (वय ३०) शिक्षिका आहे. तिच्या विवाहासाठी त्यांनी मॅट्रिमोनी साइटवर नोंदणी केली होती. मुलीचे प्रोफाइल आवडल्याने एका तरुणाने विवाहासाठी तयारी दर्शविली. आपण ब्रिटनमध्ये सिव्हील इंजिनियर असल्याचे त्याने सांगितले.
तरुणाशी ओळख झाल्यानंतर तरुणी १२ जून ते ३० जून दरम्यान व्हॉट्सअ‍ॅपवरून संपर्कात होती. भेटण्यासाठी आणि लग्नाची बोलाचाली करण्यासाठी आपण पुण्यात येणार असल्याचे आरोपीने त्यांना सांगितले. एके दिवशी आपण दिल्ली विमानतळावर आलो असून, आपल्याकडील ९० हजार पौंडाची रक्कम सीमाशुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी पकडल्याचा बनाव त्याने केला. जप्त केलेली रक्कम सोडविण्यासाठी दंड भरावा लागणार असल्याचेही त्याने तक्रारदारांना सांगितले. दंड भरण्यासाठी त्याने दोन बँकेची खाती दिली. त्यानुसार तक्रारदारांनी राजेशकुमार आणि रमेश अग्रवाल यांच्या बँक खात्यामध्ये १४.२५ लाख रुपये भरले. त्यानंतर त्या तरुणाशी संपर्क होऊ शकला नाही. त्या वेळी फसवणूक झाल्याचे तक्रारदारांच्या लक्षात आल्याने त्यांनी सायबर शाखेकडे तक्रार केली. सायबर शाखेच्या पोलिसांनी तपास करून गुन्हा दाखल करण्यासाठी समर्थ पोलिसांकडे पाठविला. त्यानुसार समर्थ पोलिस ठाण्यात आयटी अॅक्ट व फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस निरीक्षक (गुन्हे) सचिन चव्हाण तपास करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मनसे कार्यकर्त्यांनी केली ‘मन की बात’

0
0

राज ठाकरेंनी दिली बदलांची ग्वाही

म. टा. प्रतिनिधी, पुणे

गटबाजीमुळे पक्षाचे मोठे नुकसान झाले आहे..., पक्षाच्या नेत्यांच्या नाराजीचा फटका कार्यकर्त्यांना बसतो... पदाधिकाऱ्यांकडून दुर्लक्ष केले जाते... अशी गाऱ्हाणी शुक्रवारी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी पक्षाध्यक्ष राज ठाकरे यांच्यासमोर मांडली. त्यावर, ‘लवकरच तुम्हांला अपेक्षित बदल दिसतील’, अशी ग्वाही देण्यास ठाकरे विसरले नाहीत.
पालिकेच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकीत मनसेला दारूण पराभव स्वीकारावा लागला. पालिकेतील २९ नगरसेवकांची संख्या दोनवर पोहोचली. त्यामुळे, पक्ष संघटनेमध्ये बदल करण्याच्या दृष्टीने ठाकरे पुन्हा सज्ज झाले असून, त्यासाठी शहरातील पदाधिकाऱ्यांशी त्यांनी शुक्रवारी थेट संवाद साधला. कसबा, कॅन्टोन्मेंट, खडकवासला आणि वडगावशेरी अशा चार विधानसभा मतदारसंघातील विभागप्रमुख, शाखाप्रमुख, उपविभागप्रमुख या सर्वांशी ठाकरे यांनी चर्चा करून त्यांची मते जाणून घेतली. कार्यकर्त्यांना कोणताही आडपडदा न ठेवता, थेट बोलता यावे, यासाठी प्रमुख पदाधिकाऱ्यांनाही सभागृहाबाहेर थांबविण्यात आले होते.
पक्षाच्या पाठीमागे तरुणांची, महिलांची मोठी संख्या आहे; पण तरीही पक्षाला सातत्याने निवडणुकीत अपयश येत आहे. त्यामुळे, पक्षात कोणते बदल हवेत, काय करायला पाहिजे, अशी विचारणा ठाकरे यांनी कार्यकर्त्यांकडे केली. ‘पक्षाला गटबाजीने पोखरले आहे. वरिष्ठ आणि त्यांच्यासोबतचे पदाधिकारी असे स्वतंत्र गट कार्यरत आहेत. त्याचा फटका सर्वसामान्य कार्यकर्त्याला सहन करावा लागतो’, अशी खंत अनेकांनी व्यक्त केली. तसेच, पक्षाकडे ठोस कार्यक्रम नाही, असे मत मांडण्यात आले. कोणाचीही भीडभाड न ठेवता बोला, असा खास ‘ठाकरी’ शैलीतील विश्वास दाखवल्याने अनेक कार्यकर्त्यांनी पक्षातील अंतर्गत घडामोडी कथन केल्या. या वेळी प्रमोद पाटील, संदीप देशपांडे, अविनाश अभ्यंकर उपस्थित होते. आज, शनिवारी उर्वरित चार विधानसभा मतदार संघातील पदाधिकाऱ्यांशी ठाकरे संवाद साधणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘सीमाशुल्क’ने पकडले साडेचार किलो सोने

0
0

लोहगाव विमानतळावर चार प्रवासी अटकेत

म. टा. प्रतिनिधी, पुणे

लोहगाव विमानतळावर आखातातून तस्करी करुन आणलेले एक कोटी ३८ लाख रुपये किमतीचे साडेचार किलो सोने सीमाशुल्क विभागाने (कस्टम) शुक्रवारी पकडले. या प्रकरणी चौघांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून सोन्याची बिस्किटे, सोन्याच्या तारा आदी ऐवज जप्त करण्यात आला आहे.
रफतजहान शौकत अली, असिफ खान, महंमद अश्पाक महंमद कासीम, हुसेन सय्यद अहमद (चौघे रा. मुंबई) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. त्यांच्या विरुद्ध सीमाशुल्क कायदा १९६२ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.
सीमाशुल्क विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, अली, खान, कासीम, अहमद जेट एअरवेजच्या विमानाने अबुधाबीवरुन लोहगाव विमानतळावर उतरले. विमानतळावर उतरून ते घाईने निघाले. त्यामुळे सीमाशुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांना त्यांचा संशय आला. अधिकाऱ्यांनी त्यांना थांबण्याची सूचना केली. त्यांच्याकडील सामानाची पाहणी करण्यात आली असता सोन्याची बिस्किटे लपविल्याचे आढळले. तसेच, चौकशीत अबुधाबीवरून सोने आणल्याची कबुली दिली. त्यांच्याकडून एक कोटी ३८ लाख रुपयांचे साडेचार किलो सोने जप्त करण्यात आले.
सीमाशुल्क विभागाच्या भरत नवाळे, मनीष दुडपुरी आणि पथकाने ही कारवाई केली, अशी माहिती सीमाशुल्क विभागाचे उपायुक्त महेश पाटील यांनी दिली.

उत्पादन शुल्क’चा काळेवाडीत छापा
राज्य उत्पादन शुल्क विभागाने काळेवाडीतील घरावर छापा टाकून एक लाख ४० हजार रुपयांचा मद्याचा साठा जप्त केला. गोवा आणि अन्य भागांतून अवैध मार्गाने विदेशी मद्य आणून काळेवाडीत ठेवण्यात आला होता. त्यायाबाबतची माहिती मिळाल्यानंतर राज्य उत्पादन शुल्क विभागाने छापा टाकला. या प्रकरणी शशी जमुनादास हिराणी (वय ३५, रा. उल्हासनगर ठाणे) याच्यावर कारवाई करण्यात आली.
राज्य उत्पादन शुल्क खात्याच्या पुणे विभागाचे अधीक्षक मोहन वर्दे, उपअधीक्षक सुनील फुलपगार यांच्या मार्गदर्शनाखाली भरारी पथक क्रमांक एकचे उपायुक्त अर्जुन ओव्हाळ, उपनिरीक्षक तानाजी शिंदे, एम. व्ही. कदम, एस. वाय. दरेकर, एस. एस. कांबळे, एन. यू. जाधव यांनी ही कामगिरी केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


जीएसटी’ची मुदत २५ ऑगस्टपर्यंत

0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
‘जीएसटी’अंतर्गत ‘जीएसटीआर ३ बी’ हा पहिला रिटर्न सादर करण्यासाठी २५ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. यापूर्वी रिटर्न सादर करण्यासाठी तसेच, कर जमा करण्याची २० ऑगस्ट ही शेवटची तारीख होती. मात्र, जीएसटीएनच्या वेबसाइटवर प्रचंड हिट्स आल्याने ही वेबसाइट बंद पडली. त्यामुळे व्यावसायिकांना रिटर्न आणि कर जमा करता आला नाही. त्यामुळे सायंकाळी उशिरा रिटर्न सादर करण्यासाठी मुदतवाढ दिल्याचे जाहीर करण्यात आले.
‘जीएसटीआर ३ बी’ हा जुलै २०१७ या महिन्याचा हंगामी रिटर्न आहे. त्यामुळे ज्या व्यावसायिकांना दरमहा जीएसटी रिटर्न सादर करणे बंधनकारक आहे, त्यांना हा रिटर्न सादर करावाच लागेल.कंपोझिशन स्कीमअंतर्गत येणाऱ्या व्यावसायिकांना तिमाही रिटर्न भरायचे आहेत. त्यामुळे त्यांना ‘जीएसटीआर ३ बी’ सादर करावा लागणार नाही. २५ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ मिळाल्याने व्यावसायिकांना काहीसा दिलासा मिळाला आहे, असे करसल्लागार सुकृत देव यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

प्रथम येणाऱ्यास अकरावीला प्रवेश

0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरातील ज्युनियर कॉलेजांमध्ये अकरावीला प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांसाठी आज, रविवारपासून (२० ऑगस्ट) ‘प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य’ या तत्वानुसार प्रवेश देण्यात येणार आहे. त्यानुसार रिक्त जागा सायंकाळी ५ वाजता जाहीर होणार आहे. यामध्ये दहावी उत्तीर्ण झालेल्या; मात्र प्रवेश न मिळालेल्या, नाकारलेल्या, कॉलेज न मिळालेले आणि प्रवेश रद्द झालेले अशा सर्व प्रकारच्या विद्यार्थ्यांना प्रवेश मिळणार आहे. त्यासाठी विद्यार्थ्यांची विभागणी त्यांच्या गुणांनुसार तीन गटांत करण्यात येणार आहे.
केंद्रीय प्रवेश नियंत्रण समितीद्वारे पुणे व पिंपरी-चिंचवड शहरातील २६७ ज्युनियर कॉलेजांमध्ये सायन्स, कॉमर्स, आर्ट्स, बायोफोकल अकरावी प्रवेशासाठी ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येत आहे. या फेरीच्या चार नियमित आणि एक विशेष फेरी संपली आहे. मात्र, अद्याप अनेक विद्यार्थी प्रवेशापासून वंचित आहे. त्यामुळे समितीने विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी ‘प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य’ या तत्वानुसार प्रवेश प्रक्रिया राबविण्याचे ठरविले आहे. त्यानुसार फेरीला आज, रविवारीपासून सुरुवात होत आहे. दहावीला ८० ते १०० टक्के गुण मिळालेल्या विद्यार्थ्यांचा समावेश गट क्रमांक एकमध्ये तर ६० ते १०० टक्के गुण मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांचा समावेश गट क्रमांक दोनमध्ये केला आहे; तर उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांचा समावेश गट क्रमांक तीनमध्ये करण्यात आला आहे. ही फेरी २० ते ३० ऑगस्ट दरम्यान होणार आहे. विद्यार्थ्यांना अधिक माहिती pune.11thadmission.net या वेबसाइटवर मिळेल.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पाण्यासाठी राजकारण नको

0
0


म. टा. प्रतिनिधी, पिंपरी
‘पिंपरी-चिंचवडची वाढती लोकसंख्या विचारात घेता पिण्याच्या पाण्यासाठी राजकारण करू नये. भविष्याचा वेध घेऊन योजनांना गती द्यावी,’ अशी भूमिका महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत सर्वपक्षीय सदस्यांनी शनिवारी मांडली. या जिव्हाळ्याच्या प्रश्नाचे गांभीर्य ओळखून उपाययोजना करावी, अशी सूचना करण्यात आली.
महापौर नितीन काळजे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सर्वसाधारण सभेत पवना धरणातील पाणी आणि अनधिकृत नळजोड याबाबत ज्येष्ठ नगरसेवक भाऊसाहे भोईर यांनी प्रश्न विचारले होते. त्यावरील चर्चेत सर्वपक्षीय सदस्यांनी पाणीप्रश्नाबाबत राजकारण न करता शहरवासीयांचा विचार करून निर्णय घ्यावेत, अशी भूमिका स्पष्ट केली. पाणीगळती रोखावी, समान पाणीपुरवठ्याचे नियोजन करावे, आंद्रा आणि भामा-आसखेड प्रकल्प मार्गी लावावा, जलसमिती स्थापन करावी, आयुक्तांनी हर्डीकर स्ट्राइक करावा, अनधिकृत नळजोडधारकांवर कठोर कारवाई करावी आदी सूचना सदस्यांनी केल्या. या चर्चेमध्ये भोईर यांच्यासह सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार, सीमा सावळे, योगेश बहल, मंगला कदम, अजित गव्हाणे, दत्ता साने, सुजाता पालांडे, राहुल कलाटे, केशव घोळवे, स्वीनल म्हेत्रे, अभिषेक बारणे, तुषार हिंगे, नीता पाडाळे, अंबरनाथ कांबळे आदींनी भाग घेतला.
भोईर म्हणाले, ‘महापालिकेचे उत्पन्नाचे स्रोत कमी होत असताना मोठ्या खर्चाच्या सवयी मात्र वाढत आहेत. पवना थेट जलवाहिनी प्रकल्पासाठी जागा ताब्यात नसताना निविदेची घाई करण्यात आली. सुमारे ११२ कोटी रुपये खर्चाचे लोखंडी पाइप खरेदी करण्यात आले. त्याला गंज चढू लागला आहे. भविष्यात प्रकल्पाचा खर्च वाढण्याची शक्यता आहे. परंतु, या प्रश्नाकडे गांभीर्याने पाहिले जात नाही. चर्चा, आंदोलने होतात. मात्र, विषय तसाच प्रलंबित आहे. तो वेळीच मार्गी लागला पाहिजे. शहरात ३० टक्के पाण्याची गळती होती. तरीही नियोजनाकडे दुर्लक्ष होते, असे खेदाने नमूद करावेसे वाटते.’
पक्षनेते पवार म्हणाले, ‘पिंपरी-चिंचवडकरांना थेट पवना धरणातून पाणी हवे आहे; मात्र, ते रक्ताने माखलेले नसावे. वेळप्रसंगी मावळमधील शेतकऱ्यांच्या शंभर वेळा पाया पडू. मात्र, चर्चेनेच तोडगा काढला जाईल. पाण्यासाठी राजकारण न करता शहरवासीयांनी शुद्ध आणि पुरेसा पाणीपुरवठा देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.’

‘बाधितांच्या पाठीशी उभे राहणार’
सर्वपक्षीय नगरसेवकांनी रिंगरोड बाधितांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याचा निर्णय सर्वसाधारण सभेमध्ये घेतला. या संदर्भात महापालिकेतील प्रमुख पदाधिकारी आणि सर्व पक्षांचे गटनेते यांची समिती स्थापन करण्यात येणार असून, या समितीने प्रत्यक्ष स्थळाची पाहणी करून नागरिकांशी चर्चा केल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन तोडगा काढण्याचा प्रयत्न करणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले. या प्रश्नावर सर्वसाधारण सभेत सुमारे अडीच तास चर्चा झाली.
दरम्यान, रिंगरोड बाधित नागरिकांनी स्थापन केलेल्या घर बचाव संघर्ष समितीच्या शिष्टमंडळाने विजय पाटील यांच्या नेतृत्त्वाखाली गृह आणि नगरविकास राज्यमंत्री डॉ. रणजित पाटील यांची भेट घेऊन निवेदन सादर केले. तसेच, अनधिकृत घरे नियमित करण्याच्या प्रारूप नियमावलीबाबत सहा हजारांहून अधिक हरकती, सूचना दिल्या.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मराठी साहित्याची सूची देशभर कळणार

0
0

पुणे : मराठी साहित्यातील ग्रंथ संपदेची माहिती जगाला कळावी, या हेतूने कोलकाता येथील राष्ट्रीय संदर्भ ग्रंथालयाच्या मराठी विभागामार्फत २०१० ते २०१५ या काळातील पाच हजारांहून अधिक मराठी पुस्तकांची ग्रंथ सूची तयार करण्यात आली आहे. २०१६, २०१७ मध्ये प्रकाशित झालेल्या पुस्तकांची सूचीही विभागामार्फत लवकरच प्रसिद्ध करण्यात येणार असून, अनुवादक, प्रकाशक, साहित्यिक आणि वाचकांसाठी ही ग्रंथसूची मार्गदर्शक ठरणार आहे.
२०१० सालापासून संदर्भ ग्रंथालयाच्या मराठी विभागातर्फे मराठी ग्रंथसूची तयार करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. तेव्हापासून २०१५ सालापर्यंतच्या पाच हजारांहून अधिक ग्रंथांची नोंदणी राष्ट्रीय संदर्भ ग्रंथालयात झाली आहे. या सर्व ग्रंथांची माहिती देणारी विस्तृत सूची राज्याच्या ग्रंथालय संचालनालयातर्फे प्रसिद्धही करण्यात आली आहे. राष्ट्रीय संदर्भ ग्रंथालयातील मराठी विभागाच्या संपादिका वैष्णवी कुलकर्णी यांच्या प्रयत्नातून हा प्रकल्प साकारण्यात आला आहे.
मराठीतील साहित्यप्रकारांनुसार या ग्रंथसूचीचे विभाजन करण्यात आले आहे. त्यामध्ये ललित लेखन, कादंबरी, कथासंग्रह, काव्यसंग्रह, बालसाहित्य, अनुवादित साहित्य अशा साहित्यप्रकारांचा समावेश करण्यात आला आहे. सूचीमध्ये पुस्तकाची माहिती, प्रकाशक, लेखक, अनुवादक यांचीही माहिती देण्यात आली आहे. यापूर्वी केंद्रीय ग्रंथालयांतर्फे केवळ राष्ट्रीय ग्रंथसूची तयार करण्याचे काम सुरू होते. त्यामुळे, प्रादेशिक ग्रंथसंपदांची माहिती राष्ट्रीय ग्रंथसूचीतूनच मिळवावी लागत होती. या सूचीमध्ये देशातील १४ भाषांमधील ग्रंथांच्या नोंदी होत्या. मराठी भाषेतील साहित्याची वेगळी ग्रंथसूची असावी, अशी संकल्पना कुलकर्णी प्रत्यक्षात आणण्याचे ठरवले. राज्य सरकारच्या ग्रंथालय संचालनालयाकडून ही सूची प्रकाशित करण्याची जबाबदारी घेण्यात आली. ग्रंथालय संचालनालयाच्या वेबसाइटवर देखील ही सूची अपडेट करण्यात आली आहे. त्यामुळे, साहित्य प्रेमींना विषयवार साहित्य शोधण्यासाठी ही सूची उपयुक्त ठरणार आहे.
या संदर्भात केंद्रीय संदर्भ ग्रंथालयाच्या मराठी विभागाच्या संपादिका वैष्णवी कुलकर्णी म्हणाल्या, ‘मराठी साहित्याची वेगळी सूची साहित्यप्रेमींना उपलब्ध व्हावी, हा या प्रकल्पामागचा हेतू आहे. प्रकाशनाच्या संदर्भात तयार करण्यात आलेल्या कायद्यानुसार प्रत्येक प्रकाशकाला त्याने प्रकाशित केलेल्या पुस्तकाची नोंदणी केंद्रीय ग्रंथालयाकडे बंधनकारक आहे. ज्या प्रकाशकांनी ही नोंदणी केली आहे. त्या नोंदणीनुसार ग्रंथसूची तयार करण्यात आली आहे. प्रकाशकांनी राष्ट्रीय ग्रंथालयाकडे नोंदणी करावी, यासाठी जनजागृती करण्यात येत आहे. राज्यातील सर्व मराठी प्रकाशकांनी त्यांच्या पुस्तकांची नोंदणी केल्यास ग्रंथसूचीमध्ये मोठ्याप्रमाणावर साहित्याची माहिती उपलब्ध होईल, जगभरात मराठी ग्रंथसंपदा पोहोचण्यासाठीही या सूचीचा चांगला उपयोग होणार आहे.’

बालसाहित्याच्या सूचीचे आज प्रकाशन

वैष्णवी कुलकर्णी यांनी मराठी साहित्याच्या ग्रंथसूचीअंतर्गत बालसाहित्याची वेगळी सूची तयार केली आहे. २००१ ते २०१६ या कालखंडातील दीड हजार पुस्तकांची माहिती या सूचित देण्यात आली आहे. आज, (२० ऑगस्ट) पुण्यात केंद्रीय संदर्भ ग्रंथालयातर्फे व अखिल भारतीय प्रकाशक संघाच्या वतीने होणाऱ्या प्रकाशकांच्या मेळाव्यात बालसाहित्याच्या सूचीचे प्रकाशन करण्यात येणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पदापेक्षा पक्ष मोठा

0
0




म. टा. प्रतिनिधी, पिंपरी
‘मतदारांनी विश्वासाने पिंपरी-चिंचवड महापालिकेची सत्ता भारतीय जनता पक्षाच्या हाती सोपविली आहे. त्यामुळे पदापेक्षा पक्ष मोठा असल्याची जाणीव ठेवा,’ असा सल्ला पक्षाचे शहराध्यक्ष आमदार लक्ष्मण जगताप यांनी दिली.
बूथ विस्तारक योजनेचा आढावा घेण्यासाठी भाजपच्या शहर विभागातर्फे जिल्हा कार्यकारिणी बैठक घेण्यात आली. त्या वेळी ते बोलत होते. पक्षाचे पश्चिम महाराष्ट्र संघटनमंत्री रवी अनासपुरे, प्रदेश कार्यकारिणी सदस्य महेश कुलकर्णी, वसंत वाणी, राजेश पिल्ले, बाबू नायर, अमोल थोरात, महिला शहराध्यक्षा शैला मोळक, बूथ विस्तारासाठी प्रदेशाकडून भोसरी, पिंपरी आणि चिंचवड विधानसभा मतदारसंघनिहाय नियुक्त केलेले अनुक्रमे अशोक येनपुरे, शरद भोते, गोपाळ चिंतल या वेळी उपस्थित होते.
पक्षाने केंद्र आणि राज्यस्तरावर आजवर चांगली कामगिरी केली आहे, असा दावा करून जगताप म्हणाले, ‘मतदारांनी याच विश्वासावर पिंपरी-चिंचवड पालिकेची एकहाती सत्ता भाजपला दिली आहे. या मतदारांचा विश्वास सार्थ ठरविण्यासाठी सरकारने केलेल्या सर्व योजना सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचविण्याचे काम प्रत्येक कार्यकर्त्याने करावे. या शहरातून विक्रमी सदस्य नोंदणी झाली, त्याच पद्धतीने प्रदेशाने दिलेले बूथ विस्ताराचे काम सर्वांनी करावे. प्रत्येक बूथ सक्षम करावा. कोणत्याही पदापेक्षा पक्ष मोठा आहे, हीच भावना प्रत्येकाने जोपासणे महत्त्वाचे आहे. त्याचा फायदा पक्षाला आगामी निवडणुकीत नक्कीच होईल.’
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारने घेतलेल्या शेतकरी कर्जमुक्तीचा, छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेचा आणि मराठा मोर्चाची मागणी मान्य केली त्याबद्दल अभिनंदनाचा ठराव कुलकर्णी यांनी मांडला. त्यास सर्वांनी अनुमोदन दिले. देशाच्या स्वातंत्र्याचा हिरक महोत्सव २०२२ साजरा होणार आहे. गरिबी, भ्रष्टाचार, जातीयवाद, बेरोजगारी, अस्वच्छता यापासून आपला देश मुक्त झाला पाहिजे, असा निर्धार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला आहे. त्यास पाठिंबा देण्याचा निर्धार या वेळी व्यक्त करण्यात आला.
बैठकीत ‘नवा भारत संकल्प ते सिद्धी’ कार्यक्रमाच्या अनुषंगाने कार्यरत राहण्याचा निश्चय व्यक्त केला. त्याअंतर्गत स्वातंत्र्यसेनानी आणि हुताम्यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करणे, राष्ट्रगीतांची स्पर्धा आयोजित करणे, रक्तदान, स्वच्छता अभियान, मानवी साखळी, वृक्षारोपण, चित्रकला, प्रश्नमंजुषा या कार्यक्रमांचे प्रभाग स्तरावर आयोजित करण्याची सूचना अभियानचे संयोजक सदाशिव खाडे यांनी दिली. अनासपुरे यांनीही मार्गदर्शन केले. प्रास्ताविक सरचिटणीस प्रमोद निसळ यांनी केले.

‘वन बूथ टेन यूथ’ उपक्रम सुरू
विधानसभा, महापालिका आणि नगरपालिका निवडणुका स्वबळावर लढणाऱ्या भाजपने आता आगामी लोकसभा निवडणुका स्वबळावर लढण्यासाठी जोरदार तयारी चालू केली आहे. त्यासाठी ‘वन बूथ टेन यूथ’ उपक्रम सुरू केला असून, पिंपरी-चिंचवडमधील तेराशे मतदान केंद्रांवर प्रत्येकी दहा कार्यकर्त्यांची नियुक्ती करण्यात येणार आहे. त्याबाबत आमदार लक्ष्मण जगताप आणि महेश लांडगे यांनी नगरसेवकांची बैठकही घेतली आहे. पंडित दीनदयाळ उपाध्याय विस्तारक योजना नगरसेवकांनी गांभीर्याने घ्यावी आणि येत्या १५ दिवसांत प्रभागात बूथ गठीत करावेत, अशा सूचना केल्या आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कठीण समयी फिरवा ‘११२’

0
0

तत्काळ मदतीसाठी राज्यात नवी योजना राबविणार; महासंचालकांची माहिती

म. टा. प्रतिनिधी, पुणे

अडचणीच्या वेळी नागरिकांना घटनास्थळी तत्काळ मदत मिळावी, यासाठी राज्यात लवकरच ‘वन वन टू’ योजना राबविण्यात येणार आहे. योजनेंतर्गत मुख्य नियंत्रण कक्षाच्या ताफ्यात अधिकाधिक वाहने जोडण्यात येतील. जेणेकरून ११२ क्रमांकावर संबंधितांनी संपर्क साधला असता ती वाहने तत्काळ घटनास्थळी जाऊन मदत करतील. अडचणीत सापडलेल्यांना किमान वेळेत मदत करण्याचा प्रयत्न या माध्यमातून करण्यात येईल, अशी माहिती राज्याचे पोलिस महासंचालक सतीश माथूर यांनी शनिवारी दिली.
पुणे शहर वाहतूक पोलिसांसाठी बांधण्यात आलेल्या मध्यवर्ती वाहतूक व्यवस्थापन केंद्राचे उद्घाटन माथूर यांच्या हस्ते करण्यात आले. त्या वेळी ते बोलत होते. या प्रसंगी पोलिस आयुक्त रश्मी शुक्ला, सहआयुक्त रवींद्र कदम, फोक्सवॅगनच्या सुरक्षा विभागाचे देशातील प्रमुख टॉस्टर्न स्टार्क, रोटरी डिस्ट्रिक्ट ३१३१चे अभय गाडगीळ, वाहतूक शाखेचे उपायुक्त अशोक मोराळे आणि वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. फोक्सवॅगनने कॉर्पोरेट सोंशल रिस्पॉन्सिबिलिटी निधीतून दिलेल्या ५५ लाख रुपयांमध्ये वाहतूक व्यवस्थापन केंद्र उभारण्यात आले आहे.
‘अडचणीच्या काळात नागरिकांना तत्काळ मदत मिळावी म्हणून, केंद्र सरकारने वन वन टू योजनेची निर्मिती केली आहे. काही राज्यात ही योजना सुरू झाली आहे. राज्यात योजना राबविण्यास मंजुरी मिळाली आहे. त्या अंतर्गत सुसज्ज नियंत्रण कक्षाची स्थापना करण्यात येईल. या कक्षाशी दुचाकी, चारचाकी वाहने जोडण्यात येतील. अडचणीत सापडलेल्या व्यक्तीने ११२ क्रमांकावर मदत मागितल्यानंतर तत्काळ घटनास्थळी जाऊन मदत करण्यात येईल. शहरात किंवा ग्रामीण भागात मदतीसाठी प्रतिसाद देण्याचा वेळ कमी करण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे,’ अशी माहिती माथूर यांनी दिली.
वाहतूक शाखेचे अत्याधुनिक नियंत्रण कक्ष मुंबईनंतर पुण्यात सुरू झाले आहे. या ठिकाणच्या सीसीटीव्हीच्या मदतीने होणाऱ्या कारवाईमुळे नागरिकांमध्ये स्वयंशिस्त वाढीला लागेल. नागरिकांच्या खिशाला झळ बसली की त्यांच्याकडून आपोआप वाहतुकीच्या नियमांचे पालन होईल. त्यामुळे वाहतूक कोंडी कमी होऊन नागरिकांना वेळेत इच्छित स्थळी पोहोचता येईल. भविष्यात वाहतूक पोलिसांसाठीही अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करण्यात येईल. त्यामध्ये प्रथमच ‘ट्रॅफिक सिग्नल एंबेडेड सिस्टीम’ ही योजना स्मार्ट सिटीमध्ये राबविली जाणार आहे, असेही माथूर म्हणाले.

तंत्रज्ञानाच्या आधुनिकीकरणासाठी पैसे लागतात. वाहतूक विभागाने कारवाई केल्यानंतर तो पैसा सरकारी तिजोरीत न जाता त्यांचा गैरवापर होऊ शकतो. त्यामुळे वाहतूक पोलिसांनी पालिकेला सोबत घेऊन अशी कारवाई करावी. त्यातून प्राप्त झालेला निधी वाहतूक पोलिसांनी त्यांच्या विकासासाठी वापरावा.
सतीश माथूर,
पोलिस महासंचालक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शहीद फराटेंचे स्मारक महापालिका उभारणार

0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

दहशतवाद्यांबरोबर लढताना वीरमरण आलेले शहीद जवान सौरभ फराटे यांचे स्मारक उभारण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. पक्षनेत्यांच्या बैठकीत या विषयाला एकमताने मान्यता देण्यात आली असून, सर्वसाधारण सभेच्या मान्यतेनंतर काम सुरू होणार आहे. या स्मारकासाठी जागेचा शोध सुरू असून लवकरच जागा निश्चित होइल, असे महापौर मुक्ता टिळक यांनी सांगितले.
जम्मू काश्मिरमध्ये दहशतवाद्यांशी लढताना फराटे यांना वीरमरण आले. महापालिका निवडणुकीच्या आधी विविध पक्षांच्या नेत्यांनी फराटे यांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन सांत्वन केले. त्या वेळी फराटे यांचे स्मारक उभारण्याची घोषणा तत्कालीन महापौर प्रशांत जगताप यांनी केली होती. त्यानंतर आठ महिने झाले, तरी कार्यवाही झालेली नाही. पालिकेने शहीद जवान फराटे यांचे स्मारक उभारावे, त्यासाठी काँग्रेसचे शहर सरचिटणीस प्रशांत सुरसे आणि पल्लवी सुरसे यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने महापौरांची भेट घेतली. हडपसरमधील नगरसेवक मारुती तुपे, नंदकुमार अजोतीकर, नितीन गावडे, हरीश शेलार, सचिन नेत्रकर, श्रीकांत कळसकर या वेळी उपस्थित होते.
फराटे यांचे स्मारक उभारण्याचा प्रस्ताव पक्षनेत्यांच्या बैठकीत मान्य झाला, आता जागेचा शोध सुरू आहे. हडपसर किंवा फुरसुंगी येथे जागा निश्चित झाल्यानंतर तातडीने हे काम पूर्ण केले जाइल, असे आश्वासन महापौरांनी शिष्टमंडळाला दिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


कॅम्प परिसरातील रेस्टॉरंटला आग

0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

कॅम्प परिसरातील रेस्टॉरंटला शनिवारी पहाटे लागलेल्या आगीत पाठीमागील भाग जळून खाक झाला. रेस्टॉरंटमध्ये झोपलेल्या दोन कामगारांना अग्निशमन दलाच्या जवानांनी सुरक्षित बाहेर काढले. अग्निशमन दलाच्या जवानांनी वेळीच घटनास्थळी धाव घेऊन आग आटोक्यात आणल्याने मोठा अनर्थ टळला.
कॅम्प परिसरातील ईस्ट स्ट्रीट रस्त्यावर क्वालिटी रेस्टॉरंट आहे. रेस्टॉरंट शेजारी बीएसएनएलचे ऑफिस आणि कयानी बेकरी आहे. रेस्टॉरंटमध्ये आठ ते दहा कामगार कार्यरत आहेत. शनिवारी पहाटे चारच्या सुमारास रेस्टॉरंटच्या किचनमध्ये अचानक आग लागली. किचनमध्ये फ्रीज, वेगवेगळ्या मशिन्स आणि फर्निचर असल्याने आगीने रौद्र रुप धारण केले. नागरिकांनी तत्काळ अग्निशमन दलाला माहिती दिली. आगीची माहिती मिळताच सहा गाड्यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. तोपर्यंत आगीने रेस्टॉरंटला आणि शेजारच्या बीएसएनएलच्या खोलीला विळखा घातला. अग्निशमन दलाने पाण्याचा मारा करण्यास सुरुवात केली. त्याचवेळी रेस्टॉरंटमध्ये झोपलेल्या दोन कामगारांना सुखरूप बाहेर काढण्यात आले. आतील गॅस सिलिंडरही बाहेर काढण्यात आले. त्यामुळे मोठा अनर्थ टळला.
आगीमध्ये रेस्टॉरंटचा निम्मा भाग जळून खाक होऊन १५ ते २० लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. अर्धा ते पाऊण तासाच्या अथक प्रयत्नानंतर अग्निशमन दलाने आग आटोक्यात आणली. आग शॉर्टसर्किटमुळे लागल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘एक खिडकी’ नावालाच

0
0

विविध परवान्यांसाठी मंडळाच्या कार्यकर्त्यांची धावाधाव

म. टा. प्रतिनिधी, पुणे

गणेश मंडळांच्या विविध परवान्यांसाठी महापालिकेने सुरू केलेली एक खिडकी योजना नावापुरतीच असल्याचे दिसून आले आहे. योजना असूनही गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांना परवान्यांसाठी अनेक कार्यालयांचे उंबरठे झिजवावे लागत आहेत. दुसरीकडे ऑनलाइन योजनेतही त्रुटी असल्याने कार्यकर्ते हवालदिल झाले आहेत.
यंदा सार्वजनिक गणेशोत्सवाचे शतकोत्तर रौप्यमहोत्सवी वर्ष साजरे केले जात आहे. त्यानिमित्त जय्यत तयारी सुरू आहे. मंडळाच्या कार्यकर्त्यांना वाहतूक शाखा, क्षेत्रीय कार्यालय, धर्मादाय आयुक्त, पोलिस यांच्याशी संबंधित अनेक परवाने घ्यावे लागतात. त्यासाठी पालिकेने जवळपास महिनाभरापूर्वीच एक खिडकी योजना सुरू केली. पुणे पोलिसांतर्फेही ऑनलाइन परवाने देण्यासाठी वेबपोर्टल सुरू करण्यात आले. मात्र, परवाने मिळवण्याच्या दोन्ही पद्धतींमध्ये त्रुटी आढळून आल्याने गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांची धावपळ होत आहे. आजमितीला चार हजार मंडळांपैकी केवळ ३५० मंडळांनाच ऑनलाइन परवाने मिळाल्याचे सांगण्यात आले आहे .ऑनलाइन अर्ज भरला तरी परवाना घेण्यासाठी किंवा सही करण्यासाठी कार्यालयांमध्ये जावे लागत असल्याचे काही मंडळाच्या कार्यकर्त्यांनी सांगितले. त्यामुळे, ऑनलाइनपेक्षा ऑफलाइनच योजना बरी म्हणण्याची वेळ कार्यकर्त्यांवर आली आहे. कार्यकर्ते एक खिडकी योजनेचा शोध घेण्यासाठी पालिकेत गेले असता, तिथे अशी सुविधाच नसल्याच्या तक्रारी कार्यकर्त्यांनी केल्या आहेत.
नवीन मंडळांनी पालिकेत अनेक खेपा घातल्यानंतर सुरुवातीला फॉर्म घेण्यासाठी धर्मादाय आयुक्तालयात जा, असे सांगण्यात येते. त्यानंतर वाहतूक विभागाकडून अर्ज घ्यावा लागतो. तो अर्ज घेऊन क्षेत्रीय कार्यालयात मंडप, कमानी, आणि इतर माहितीसाठी वेगळा अर्ज करावा लागतो. ती प्रक्रिया पूर्ण झाली की शुल्क निश्चित केले जाते. शुल्क आकारणीचा अर्ज आणि वाहतूक विभागाचा अर्ज घेऊन शुल्क भरण्यासाठी अर्जांवर पालिकेच्या अधिकाऱ्यांची सही घ्यावी लागते. त्यानंतर बँकेत शुल्क भरायचे. शुल्क भरल्याची पावती घेऊन पुन्हा क्षेत्रीय कार्यालयात खेपा घालायच्या. क्षेत्रीय कार्यालयातून पास घेऊन परत वाहतूक विभागाकडे यायचे. वाहतूक विभागाची शहानिशा झाल्यानंतर स्थानिक पोलिस ठाण्यात पास जमा करायचा. त्यानंतर पोलिस ठाण्यात जाऊन परवाना मिळवायचा. अशी किचकट प्रक्रियेला कार्यकर्त्यांना सामोर जावे लागत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

खड्डेमुक्त राज्याचा ‘धर्मादाय’चा नारा

0
0

पुण्यातही खड्डे बुजविण्याचे मुख्य आयुक्त डिगे यांचे आदेश

म. टा. प्रतिनिधी, पुणे

राज्यातील बहुसंख्य रस्त्यांची खड्ड्यांनी चाळण केल्याने हजारो जणांचे जीव धोक्यात आले आहेत. या पार्श्वभूमीवर राज्याच्या मुख्य धर्मादाय आयुक्तांनी मुंबई, नाशिक, ठाण्यासह पुण्यातील गणेशमंडळांना गणेशोत्सवाच्या काळात खड्डे बुजविण्याच्या सूचना दिल्या आहेत. ‘खड्डे बुजवा आणि जीव वाचवा’ अशी मोहीम त्यांनी हाती घेतली आहे.
धर्मादाय आयुक्त शिवकुमार डिगे यांनी काही शहरांच्या गणेश मंडळांच्या प्रमुखांची नुकतीच मुंबईत बैठक आयोजित केली होती. या बैठकीत राज्यातील रस्त्यांवरील खड्डे बुजविण्याची मोहीम हाती घेऊन डिगे यांनी आपल्या कार्याचा श्रीगणेशा केला. पुण्यातही अभियान राबविण्याच्या सूचना डिगे यांनी दिल्या आहेत. ‘राज्याततील अनेक रस्त्यांवर खड्डे पडले आहेत. खड्ड्यांमुळे अनेकांनी जीव गमावले असल्याची धर्मादाय आयुक्तालयाने गंभीर दखल घेतली आहे. त्यामुळे मुंबई, ठाणे, नाशिक तसेच पुण्यातही खड्डे बुजविण्याच्या सूचना केल्या आहेत. शहरातील प्रत्येक गणेश मंडळाने परिसरातील सर्व खड्डे स्वतःच्या खर्चातून बुजवावेत,’ अशी सूचना डिगे यांनी केली आहे.

‘प्रबोधनावर भर द्या’
गणेश मंडळाच्या बैठकीत धर्मादाय आयुक्त शिवकुमार डिगे यांनी सामाजिक प्रबोधनावर भर देण्याचे आवाहन केले. सामाजिक प्रबोधनासाठी गणेश मंडळांनी व्याख्याने, तसेच वर्षभरात प्रत्येक गणेश मंडळाने रक्तदान शिबीर आयोजित करावे. प्रत्येक मंडळाने वृक्ष लागवड करावी, अशी सूचनाही त्यांनी केली.

आरास साहित्याने सजल्या बाजारपेठा

म. टा. प्रतिनिधी, पुणे

रंगबिरंगी मोत्यांची, खड्यांची, आरश्यांच्या सजावटीने लक्ष वेधणारी झुंबरे, असंख्य प्रकारातील फुलांची तोरणे, गणरायाला विराजमान होण्यासाठी आखीवरेखीव कलाकुसरीची आसने, लाइटवर चमकणारी समई, विविध प्रकारातील चक्रे, सुरेख नक्षीकाम केलेल्या कमानी मंडप आणि झिरमिळ्यांनी सजलेल्या बाजारपेठांमध्ये फिरणे हीच पुणेकरांसाठी पर्वणी ठरली आहे. आनंदोत्सवाची चाहूल घेऊन आलेल्या असंख्य प्रकारातील सजावट साहित्याने ग्राहकांना मोहिनी घातली आहे. गणरायाच्या स्वागतासाठी पुणेकरांनी शनिवारी खरेदीचा मुहूर्त साधला.

गणेशोत्सव हा कौटुंबिक उत्सव असल्याने घराघरांमध्ये गणरायाच्या जय्यत तयारीला सुरुवात झाली आहे. लाडक्या बाप्पाच्या आगमनासाठी केवळ आठवडा राहिल्याने मध्यवर्ती पुण्यातील रविवार पेठ, तुळशीबागेसह उपनगरातील बाजारपेठा सध्या सजावटीच्या असंख्य प्रकारांनी सजल्या आहेत. आरसे, कुंदन, मोती, मोठ्या आकारातील मण्यांचा वापर करून बनवलेली तोरणे, झुंबर आणि मोत्याच्या माळांच्या पडद्यांमधील अनेक नवीन प्रकार बाजारात दाखल झाले आहेत. मखमली वस्र, पडद्यांसह कमानी, आसने, लाइटवर लुकलुकणाऱ्या कमानींना मागणी वाढली आहे.
‘गेल्या काही वर्षांत ग्राहक अधिक चोखंदळ बनला असून, रेखीव नक्षीकाम असलेल्या सजावट साहित्याकडे कल वाढला आहे. लाइटवर चालणारे दिवे, कारंजे, छोटी मॉडेल, झुंबर आणि कमानींना मागणी वाढली आहे. थर्माकॉलच्या पारंपरिक सजावट साहित्याला पूर्वीसारखी मागणी राहिलेली नाही. पूर्वी थर्माकॉलच्या मंदिरांना खूप मागणी होती, यंदा ती घटली आहे,’ अशी माहिती सजावट साहित्य विक्रेते संदीप भोसले यांनी दिली.
येणारा ग्राहक घरगुती आणि मंडळाच्या गणपतीसाठी आरास खरेदी करण्याची इच्छा बाळगून असतो. घरगुती गणपतींसाठी कुंदन, आरसे, मोती आणि टिकल्यांचा वापर करून केलेल्या माळा, हार, मुकूट, कागदाच्या झिरमिळ्या, झुंबर आणि प्लास्टिकच्या फुलांच्या कमानींना अधिक मागणी आहे. सोसायटी, मंडळाच्या गणपतीसाठी मोठ्या आकारातील झुंबर, पडदे, कागदी आणि प्लास्टिकच्या फुलांच्या कमानींना मागणी आहे. एलईडी दिव्यांमधील रोषणाईच्या वस्तूंनाही ग्राहकांची पसंती मिळत आहे, असे चंदू थोरात यांनी सांगितले.
उत्सवानिमित्त विक्रेत्यांनी जीएसटीचे कारण देऊन सजावट साहित्याच्या किमतीत वाढ केली आहे. काही दुकानांमध्ये बारा टक्क्यांपासून अठ्ठावीस टक्क्यांपर्यंत कर आकारणी करण्यात येत आहे. त्यामुळे सजावट साहित्याच्या किमती वाढल्या आहेत. रेडिमेड कागदी गणेश मंदिरांच्या किमती साडेतीनशे रुपयांपासून तीन हजार रुपयांपर्यंत, तर फुलांच्या कमानी दोनशे रुपयांपासून चार हजार रुपयांपर्यंत आहेत. मुकूट, माळ आणि उपरणाच्या किमती वीस रुपयांपासून एक हजार रुपयांपर्यंत आहेत. आरसे, खडे आणि मोत्यांचा वापर जितका अधिक तितकी किमतीत भर पडत आहे.

ऑनलाइन विक्रीवरही भर
बाजारपेठांबरोबरच महिलांचे बचत गट, स्वयंसेवी संस्था, शैक्षणिक संस्थांनीही शहराच्या विविध भागात प्रदर्शने भरवून सजावट साहित्य उपलब्ध केले आहे. याशिवाय ऑनलाइन विक्री करणणऱ्या काही वेबसाइटवरही मखर, शोभिवंत वस्तू विक्रीसाठी ठेवण्यात आल्या आहेत.

डीजींनी घेतली आढावा बैठक

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पोलिस महासंचालक (डीजी) सतीश माथूर यांनी शनिवारी शिवाजीनगर पोलिस मुख्यालयात आढावा बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी उत्सवाच्या तयारीची माहिती घेऊन तो शांततेत पार पाडण्याच्या सूचना केल्या.
बैठकीला पुण्याच्या पोलिस आयुक्त रश्मी शुक्ला, सहआयुक्त रवींद्र कदम, कोल्हापूर व कोकण परिक्षेत्रातील अधीक्षक, सोलापूरचे पोलिस आयुक्त, पुण्यातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. बैठकीत डीजे आणि बंदोबस्ताच्या नियोजनावर चर्चा झाली. केंद्र सरकारकडून पोलिस दलाच्या आधुनिकीकरणासाठी आलेला निधी परत गेल्याचे नियंत्रक आणि महालेखापरीक्षक (कॅग) यांनी सादर केलेल्या अहवालात समोर आले. याबाबत माथूर म्हणाले, की अहवाल मागविला आहे. पोलिस दलाकडे जेवढा पैसा येतो, तो सर्व खर्च केला जातो. यापुढेही आलेला एकही पैसा शिल्लक ठेवला जाणार नाही. तसेच, पिंपरी चिंचवड आयुक्तालयाचा प्रस्ताव तयार करून सरकारकडे पाठविला असल्याचेही ते म्हणाले.

‘टिळकांचे योगदान विसरता येणार नाही’

‘लोकमान्य टिळक आणि भाऊसाहेब रंगारी यांच्या नावांवरून सुरू असलेला वाद म्हणजे मूर्खपणा आहे. गणेशोत्सवातील टिळकांचे योगदान विसरता येणार नाही,’ या शब्दांत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी वादावर भाष्य केले.
गणेशोत्सवाच्या शतकोत्तर रौप्यमहोत्सवी वर्षातच सार्वजनिक गणेशोत्सवाचे जनक कोण, या मुद्द्यावरून गेल्या काही दिवसांपासून शहरात वाद सुरू आहेत. त्यासंदर्भात विचारले असता, हे वाद म्हणजे मूर्खपणा असल्याची टिपण्णी ठाकरे यांनी केली. शहरात मनसेच्या विधानसभा मतदारसंघांमधील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी दोन दिवस त्यांनी संवाद साधला. या वेळी त्यांनी पत्रकारांशी अनौपचारिक गप्पा मारल्या. मनसेच्या वतीने लवकरच नव्या पदाधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात येणार आहे. शहरातील परिस्थिती जाणून घेऊन नव्या पदाधिकाऱ्यांची लवकरच नियुक्ती करण्यात येईल, असे ठाकरे यांनी सूचित केले.
‘पक्ष फेसबुकवर येणार’
सोशल मीडियाद्वारे भविष्यात कार्यकर्त्यांबरोबर संवाद साधला जाणार आहे. या शिवाय पुढील महिन्यात पक्षाचे फेसबुक पेज सुरू करण्यात येणार असून, त्यामध्ये व्यंगचित्रांनाही महत्त्वाचे स्थान देण्यात येणार आहे. या व्यंगचित्रांमधून भूमिका स्पष्ट करण्यास मदत होते, असे ठाकरे यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मुस्लिमांमध्ये वाढतेय ‘प्लॅनिंग’

0
0

Mustafa.Attar

@timesgroup.com

Tweet : @mustafaattarMT

पुणे : लोकसंख्या वाढण्यावर नियंत्रण मिळविण्यासाठी प्रयत्न होत असताना आता मुस्लिम समाजही यामध्ये मागे राहिला नाही. जनजागृती वाढल्यामुळे मुस्लिम समाजात कुटुंब नियोजन करण्याकडे ओढा अधिक वाढला असून, त्यासाठी गर्भनिरोधक साधनांचा वापर वाढल्याची माहिती पुढे आली आहे. गेल्या काही वर्षांत नसबंदी करून घेणाऱ्या मुस्लिमांचे प्रमाण दुप्पट झाले, तर गेल्या तीन वर्षांत गर्भनिरोधक साधनांचा वापर करण्याचे पुणे जिल्ह्यातील प्रमाण ६६ टक्क्यांनी वाढले आहे.

पुण्यासह महाराष्ट्राच्या काही प्रमुख जिल्ह्यांमध्ये कुटुंब नियोजनांसाठी नसबंदीबरोबर गर्भनिरोधक साधनांचा वापर वाढल्याचे प्रमाण आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे. रोशन वेलफेअर फाउंडेशनचे संचालक अस्लम जमादार यांनी राज्यातील विविध जिल्ह्यांतील आरोग्य विभागाकडून माहिती अधिकारात ही माहिती मागितली. त्यामध्ये मुस्लिम समाजाचा कुटुंब नियोजनाकडे ओढा असल्याची माहिती पुढे आली.

‘मुस्लिम समाजातून कुटुंब नियोजनाबद्दल जागृती व जिज्ञासा वाढली आहे. नसबंदी न करता प्रसूतीनंतर तांबी व गर्भनिरोधक साधने वापरण्याकडे कल वाढला आहे. फाउंडेशनने २००४ ते २०१४ या दरम्यान मुस्लिम स्त्रियांचे नसबंदीच्या प्रमाणाची माहिती मिळविली. त्यामध्ये ४.२६ वरून ८.४१ टक्क्यांपर्यंत हे प्रमाण वाढल्याचे माहिती अधिकारातून स्पष्ट झाले. तसेच २०१४ ते २०१६ या तीन वर्षात झपाट्याने वाढ झाल्याचे स्पष्ट झाले आहे. पुणे जिल्ह्यात या तीन वर्षांत ६६ टक्क्यांनी गर्भनिरोधक साधनांच्या वापराचे प्रमाण वाढले आहे. राज्यातही नसबंदीचे असणारे प्रमाण सरासरी प्रमाणापेक्षा समाधानकारक आहे. दहा टक्क्यांपर्यंत नसबंदीचे प्रमाण पोहोचेल,’ अशी माहिती रोशन वेलफेअर फाउंडेशनचे संचालक अस्लम जमादार यांनी ‘मटा’ला दिली.

मुस्लिम महिलांमध्ये प्रसूतिपूर्व तांबी बसविण्याचे जिल्ह्यांचे सरासरी प्रमाण ९२ टक्के तर महापालिका शहरांचे प्रमाण हे ९० टक्क्यांपर्यंत पोहोचले आहे. तसेच मुस्लिम समाजात एक किंवा दोन अपत्यानंतर नसबंदी करण्याचे प्रमाण संपूर्ण महाराष्ट्रात ६८ टक्के आहे. पुण्यात मुस्लिम समाजाचे नसंबंदीचे प्रमाण ७.३ टक्के असून, गर्भनिरोधक साधने वापरण्याचे प्रमाण ९२ टक्के आहे.

महाराष्ट्रात सर्वाधिक प्रमाण बीड जिल्ह्यांत असून नसबंदी करणाऱ्यांचे प्रमाण २९.५ टक्के तर गर्भनिरोधक साधने वापरण्याचे प्रमाण हे १०० टक्के आहे. सांगली, मिरज, कुपवाडा या भागात मुस्लिम समाजाची संख्या अधिक असूनही तेथे नसबंदीचे प्रमाण हे २१.८२ टक्के तर साधने वापरण्याचे प्रमाण हे ९१ टक्क्यांपर्यंत आहे, असेही जमादार यांनी सांगितले.

मुस्लिम महिला नसंबदी तसेच गर्भनिरोधक

साधनांच्या प्रमाणाची टक्केवारी

शहर/जिल्हा नसबंदी प्रमाण गर्भनिरोधक साधनांचे प्रमाण

पुणे ७.३ % ९२ %

बीड २९.६ % १०० %

अमरावती २८.२ % ७१ %

लातूर २४.९६ % १०० %

सांगली/मिरज/कुपवाड २१.८२% ९१ %

नांदेड १७.७५ % ७० %

अकोला १६.५४ % १०० %

कोल्हापूर ११.५८ % ८० %

कल्याण/डोंबिवली ११.४४ % ८६ %

मुस्लिम समाजात वाढलेली शिक्षणाबद्दलची जागृती, १ किंवा २ मुलांना जन्म देण्याचा विचार, मुलगा- मुलगी भेदभाव न करणे या कारणांमुळे कुटुंबनियोजनाच्या प्रमाणात वाढ झाली आहे. तसेच आधुनिक गर्भनिरोधक साधनांचा वापर करण्याकडे कलही वाढला आहे.

- अस्लम जमादार, संचालक रोशन वेलफेअर फाउंडेशन

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘टिळकांचे योगदान विसरता येणार नाही’

0
0

म, टा. प्रतिनिधी, पुणे

‘लोकमान्य टिळक आणि भाऊसाहेब रंगारी यांच्या नावांवरून सुरू असलेला वाद म्हणजे मूर्खपणा आहे. गणेशोत्सवातील टिळकांचे योगदान विसरता येणार नाही,’ या शब्दांत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी वादावर भाष्य केले.

गणेशोत्सवाच्या शतकोत्तर रौप्यमहोत्सवी वर्षातच सार्वजनिक गणेशोत्सवाचे जनक कोण, या मुद्द्यावरून गेल्या काही दिवसांपासून शहरात वाद सुरू आहेत. त्यासंदर्भात विचारले असता, हे वाद म्हणजे मूर्खपणा असल्याची टिपण्णी ठाकरे यांनी केली. शहरात मनसेच्या विधानसभा मतदारसंघांमधील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी दोन दिवस त्यांनी संवाद साधला. या वेळी त्यांनी पत्रकारांशी अनौपचारिक गप्पा मारल्या. मनसेच्या वतीने लवकरच नव्या पदाधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात येणार आहे. शहरातील परिस्थिती जाणून घेऊन नव्या पदाधिकाऱ्यांची लवकरच नियुक्ती करण्यात येईल, असे ठाकरे यांनी सूचित केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images