Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

अतिक्रमणांविरोधातील दंडात जबर वाढ

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
नो-पार्किंगच्या ठिकाणी, पदपथांवर वाहने उभी करणे... रस्त्यांवर अतिक्रमण केलेले स्टॉल... दुकानाच्या बाहेर फूटपाथवरील अतिक्रमण ... अशाप्रकारे अतिक्रमण करणाऱ्यांवर दंडाची कारवाई करण्याबरोबच अतिक्रमण केलेल्या वस्तू जप्त करण्यासाठी आकारण्यात येणाऱ्या दंडात जबर वाढ करण्याचा निर्णय स्थायी समितीने घेतला आहे. स्थायी समितीने बेशिस्तांवर दंडात्मक कारवाई करण्याच्या प्रस्ताव मंजूर केला. त्यावर सर्वसाधारण सभेत अंतिम निर्णय होणार आहे.
अतिक्रमण करणाऱ्या दुचाकींसाठी पाच हजार रुपये, कार/जीपसाठी १५ हजार रुपये, तीन आसनी रिक्षांसाठी १० हजार रुपये आणि अवजड वाहनांसाठी ३५ हजार रुपये दंड आकारण्याचा प्रस्ताव स्थायी समितीसमोर ठेण्यात आला होता. पालिकेकडून वाहतुकीस अडथळा ठरणाऱ्या अतिक्रमणांवर कारवाई करण्यात येते. ही कारवाई मुंबई प्रांतिक अधिनियम १९४९ च्या कलम २३१ अन्वये असून, त्यामध्ये रस्त्यावरील सर्व प्रकारची अतिक्रमणे, वाहनांचा समावेश आहे. महा​पालिका प्रशासनाने दिलेला प्रस्ताव स्थायी समितीने मंजूर केला असल्याची माहिती स्थायी समितीचे अध्यक्ष मुरलीधर मोहोळ यांनी दिली.
या पार्श्वभूमीवर वाहतूक पोलिसांनी पदपथांवर वाहने उभी करणाऱ्यांना मुंबई प्रांतिक अधिनियम १९४९ या कायद्यातील तरतुदींचा आधार घेऊन रोखण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे बेशिस्तपणे वागणाऱ्यांना जबर दंड भरावा लागणार आहे. प्रचलित पद्धतीनुसार दुचाकींसाठी एक हजार रुपये, कार/जीपसाठी पाच हजार रुपये, रिक्षांसाठी पंधराशे रुपये आणि अवजड वाहनांसाठी पाच हजार रुपये दंडाची तरतूद आहे. स्थायी समितीने बेशिस्त वाहनचालकांबरोबरच अतिक्रमण करणाऱ्या व्यावसायिकांनाही धडा शिकवण्यासाठी दंडाच्या रकमेत भरमसाठ वाढ मान्य केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


शहरात औषधटंचाई

$
0
0

जीएसटीच्या पार्श्वभूमीवर घाऊक विक्रेत्यांनी थांबवली खरेदी

म. टा. प्रतिनिधी, पुणे

येत्या एक जुलैपासून जीएसटी लागू होत असल्याने शहरातील घाऊक औषध विक्रेत्यांनी कंपन्यांकडून खरेदी थांबविली आहे. त्यामुळे काही प्रमाणात औषधांचा तुटवडा होण्यास सुरुवात झाली आहे. त्याचा फारसा फटका बसणार नसला तरी १० जुलैपर्यंत औषधांची खरेदी अशाचप्रकारे कमी-जास्त राहणार असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले.
नव्या कररचनेमुळे औषध खरेदी करावी अथवा नाही या ​विषयी विक्रेत्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. त्यामुळे औषध विक्रेत्यांनी हात आखडता घेतला आहे. सर्व प्रकारच्या औषधांवर ०, ५, १२ आणि १८ टक्के कर लागू होणार आहे. या पार्श्वभूमीवर औषधांच्या किमती वाढणार अथवा नाही, याची विक्रेत्यांना स्पष्ट कल्पना नाही. सद्य परिस्थितीत छापील किमतीनुसार विक्री होईल.
सौंदर्य प्रसाधनांचा समावेश चैनीच्या वस्तूंमध्ये करण्यात आल्याने त्यावरील कर १३.५ टक्क्यांवरून २८ टक्के होणार आहे. रक्तदाब, हृदयविकार, मधुमेह, अॅन्टीबायोटिक्स, ताप, सर्दी, खोकला याबरोबर अन्य औषधांवर १२ टक्के कर लागू होणार आहे. कॅन्सरवरील औषधांवर पाच टक्के कर द्यावा लागणार आहे. जीएसटीमधील बदलांचे स्वरूप लक्षात येत नसल्याने औषध खरेदी-विक्रीत तोटा होऊ नये यासाठीच खरेदी थांबविण्यात आली आहे. तसेच, औषधांना विशिष्ट कोड (एचएसएन) क्रमांक देण्यासाठी अनेक कंपन्यांनी डेपो बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. कम्प्युटरद्वारा हा कोड टाकण्यात येईल, अशी माहिती सूत्रांनी दिली.

जीएसटी..एका दृष्टिक्षेपात
अॅलोपॅथीच्या औषधांवरील कर ६ टक्क्यांववरून १२ टक्के
सौंदर्यप्रसाधनांवर २८ टक्के कर
आयुर्वेद औषधांवरील कर ६ टक्क्यांवरून १२ टक्के
इन्सुलिनवरील कर ५ टक्के (पूर्वी ६ टक्के)
रक्तदाब, हृदयविकार, मधुमेह, अँटिबायोटिक्स, ताप, सर्दी, खोकला आणि अन्य विकारांवरील औषधांवर १२ टक्के कर.
कॅन्सरवरील औषधांवर ५ टक्के कर.

जीएसटीची अंमलबजावणी होणार असल्याने औषधांच्या किमती वाढतील अथवा नाही, या विषयी काहीच स्पष्टता नाही. भविष्यातील नुकसान टळावे, यासाठी विक्रेते कमी प्रमाणात औषधखरेदी करीत आहेत. त्यामुळे तुटवडा भासत आहे.
विजय चंगेडिया, सचिव, केमिस्ट असोसिएशन ऑफ पुणे डिस्ट्रीक्ट

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

योग: कर्मसु कौशलम्

$
0
0

जागतिक योगदिनानिमित्त शहरभर शिबिरांचे, कार्यक्रमांचे आयोजन

म. टा. प्रतिनिधी, पुणे

मन आणि आरोग्य निरोगी आणि उत्साही राहण्यासाठी आवश्यक असलेल्या योगाचा प्रसार आणि प्रचार करण्यासाठी शहराच्या विविध भागांत बुधवारी आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा करण्यात आला. सरकारी कार्यालयांपासून ते कॉर्पोरेट कंपन्या, शैक्षणिक संस्थांसह लहान-मोठे उद्योजक, चिमुकल्यांपासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्वांनीच वेळात वेळ काढून योगासनांसह प्राणायामांचे धडे गिरवून निरोगी आरोग्याचा संकल्प केला. दरम्यान, शहरातील विविध उपक्रमांमध्ये हजेरी लावून पुणेकरांनी योगसाधनेचे महत्त्व जाणून घेतले.
आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त शहरात शैक्षणिक संस्था, संघटना आणि प्रशिक्षकांनी योग शिबिरांचे आयोजन केले होते. पुणेकरांनीही उत्स्फूर्त प्रतिसाद देऊन त्यामध्ये सहभाग नोंदवला. महापालिकेच्या शिक्षण विभागाच्या वतीने योग दिनानिमित्त वीर नेताजी पालकर प्राथमिक शाळेत योगदिनाचे आयोजन करण्यात आले होते. याच वेळी पालिकेच्या सर्व माध्यमांच्या प्राथमिक, माध्यमिक शाळांमध्ये सकाळी योगदिन साजरा करण्यात आला. मुख्य कार्यक्रमाला शिक्षण उपसंचालक दिनकर टेमकर, प्रशासकीय अधिकारी दीपक माळी, राजेंद्र ढुमणे, माणिक देवकर तसेच इतर पदाधिकारी, क्रीडा अधिकारी, मुख्याध्यापक, शिक्षक सहभागी झाल होते. शिक्षण मंडळातर्फे योग दिनाच्या कार्यक्रमाची पर्वतयारी म्हणून मागील आठवड्यात सर्व शाळेतील शिक्षकांसाठी योगप्रशिक्षणवर्गाचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये साडेतीनशेहून अधिक शिक्षकांना योग प्रशिक्षण देण्यात आले.
सरहद शाळेमध्ये योग दिन उत्साहात साजरा करण्यात आला. ‘सहज योग’चे समिती सदस्य रामेंद्र बोहर यांनी उपस्थितांना योग आणि ध्यानधारणेचे महत्त्व समजावून सांगितले. मुलांनी या वेळी सूर्यनमस्कार आणि योगासने केली. पुणे सहज योगच्या समिती सदस्य सुनीता धुमाळ आणि ज्योती सणस यांनी मुलांकडून ध्यानधारणेचा सराव करून घेतला. मुख्याध्यापिका कविता वानखेडे या वेळी उपस्थित होत्या. पल्लवी कदम यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि ज्योती पाटील यांनी उपस्थितांचे आभार मानले.
कॅम्प एज्युकेशन सोसायटीच्या हायस्कूल, ज्युनियर कॉलेज आणि व्यावसायिक अभ्यासक्रम विभागाच्या वतीने योग दिन साजरा करण्यात आला. या वेळी विद्यार्थ्यांनी आसनांची प्रात्यक्षिके सादर केली. संस्थेचे कार्याध्यक्ष वालचंद संचेती यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविण्यात आला. यावेळी प्राचार्या कल्पना मूळगावकर, उपप्राचार्या दुर्गा देशमुख, पर्यवेक्षिका एस. एस. साळुंखे तसेच इतर पदाधिकारी उपस्थित होते.
भारतीय किसान परिवार आणि अमनोरा टाऊनशिपच्या संयुक्त विद्यमाने हडपसर येथे योग दिवस साजरा करण्यात आला. पवार पब्लिक स्कूलचे विद्यार्थी आणि अमनोरा टाउनशिपमध्ये राहणारे अडीच हजारांहून अधिक नागरिक सहभागी झाले होते. ब्रह्मकुमारी मेडिटेशन सेंटरतर्फे धकाधकीच्या जीवनात ध्यानधारणेचे महत्त्व आणि त्याचे फायदे या विषयी मार्गदर्शन करण्यात आले. योगाचे महत्त्व, प्रचार आणि प्रसार करण्याच्या उद्देशाने हा कार्यक्रम घेण्यात आल्याचे भारतीय किसान परिवाराच्या वीरा लिंगम, रघू चौधरी आणि श्रीनिवास देशमुख यांनी सांगितले. कार्यक्रमाला उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे, सोनल जोशी, सुनील तरटे, डॉ. आशिष गोखले आदी उपस्थित होते.
पतंजली योग समिती आणि कोथरूड संस्कृती प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने योग शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. डी. पी. रस्त्यावर झालेल्या कार्यक्रमाचे खासदार अनिल शिरोळे यांच्या हस्ते उद् घाटन करण्यात आले. शिबिरामध्ये आमदार मेधा कुलकर्णी, महापौर मुक्ता टिळक, स्थायी समितीचे अध्यक्ष मुरलीधर मोहोळ, पतंजली समितीचे बापू पडळकर, रामकुमार राठी, स्थानिक नगरसेवक आदी मान्यवर आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
शरीर, मन आणि बुद्धीची एकात्मता साधण्यासाठी आणि आरोग्य चांगले राहण्यासाठी योगाभ्यास अतिशय महत्त्वाचा आहे. योगसाधनेमुळे शारीरिक आणि मानसिक आजारांना दूर ठेवणे शक्य होते, असे मत योगाचार्य मारुती पाडेकर यांनी दिला. डॉ. विश्‍वनाथ कराड एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीतर्फे कोथरूड येथील माईर्स एमआयटीच्या प्रांगणात योगदिन उत्साहात साजरा करण्यात आला. या वेळी पाडेकर यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाला जपान येथील ‘इंडियन रिजन ऑफ शार्प कॉर्पोरेशन’चे मुख्य कार्यकारी अधिकारी टोमियो इसोगाई, कॅलिग्राफर कझुको बारिसिक, प्रसिद्ध पर्यावरणतज्ज्ञ डॉ. राजेंद्र शेंडे आणि पतंजली योग समितीचे प्रमुख बापू पाडळकर उपस्थित होते. या वेळी एमआयटीचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. विश्वनाथ कराड, राहुल कराड यांसह माईर्स एमआयटी शिक्षणसंस्था समूहातील प्राचार्य, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी योगासने केली. शेंडे म्हणाले, ‘वैज्ञानिकदृष्ट्या योगासनांचे खूपच महत्त्व आहे. त्यामुळेच आज जगातील वैज्ञानिकांनी योगसाधनेचा केवळ स्वीकारच नव्हे, तर स्वागत केले आहे. त्यामुळे जगातील सर्व मानव समाज योगाभ्यास करून आपले आरोग्य उत्तम राखू शकेल.’ कराड यांनीही मनोगत व्यक्त केले.
सरकारी कार्यालयातही ‘योग’
विभागीय आयुक्त कार्यालय आणि जिल्हाधिकारी कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने अल्पबचत संकुलात योग प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी सामान्य प्रशासन विभागाचे तहसीलदार बालाजी सोमवंशी, जिल्हा क्रीडा अधिकारी विजय संतान, पतंजली योग समितीचे प्रांत प्रभारी बापू पाडळकर, सहयोग शिबिराचे एस. बी. कुलकर्णी आदी उपस्थित होते. आंतरराष्ट्रीय खेळाडूंनी उपस्थितांना योगासनांची प्रात्यक्षिके करून दाखवली. पतंजली आणि जिल्हा क्रीडा प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी योगासनांचा सराव केला.
महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटन एज्युकेशन सोसायटीतर्फे आझम कॅम्पसमध्ये ‘आंतरराष्ट्रीय योग दिवस’ साजरा करण्यात आला. शाळा आणि महाविद्यालयातील सहाशेहून अधिक विद्यार्थी, विद्यार्थिनी त्यात सहभागी झाले होते. आझम स्पोर्ट्स अकादमीचे संचालक गुलजार शेख, मजीद सय्यद, शबनम पीरजादे, दानिश सय्यद यांनी कार्यक्रमाचे संयोजन केले. एम. ए. रंगूनवाला इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट अँड रिसर्चचे विद्यार्थीही या उपक्रमात सहभागी झाले होते. संस्थेचे अध्यक्ष डॉ. पी. ए. इनामदार या वेळी उपस्थित होते.
गोयल गंगा इंटरनॅशनल स्कूल येथे योगासनांच्या आंतरशालेय स्पर्धा पार पडल्या. यामध्ये अक्षरा इंटरनॅशनल, गोयल गंगा इंटरनॅशनल स्कूल, विद्यानंद स्कूल, साधू वासवानी स्कूल यांसह अकरा शाळांमधील विद्यार्थी सहभागी झाले होते. मुलांच्या गटात अक्षरा इंटरनॅशनलने आणि मुलींच्या गटात साधू वासवानी स्कूलने प्रथम क्रमांक पटकावला. गोयल गंगा फाउंडेशनचे विश्वस्त जयप्रकाश गोयल, शाळेच्या विश्वस्त सोनू गुप्ता, मुख्याध्यापिका भारती भागवानी यांच्यासह शिक्षक, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. योग गुरु दिगंबर कदम ,संगीता महाबोले,प्रिया कदम, अपूर्वा सावंत, आदित्य शेडकर यांनी आठशेहून अधिक मुलांना ध्यानधारणा, प्राणायामाचे धडे दिले. नियमित आणि योग्य योग साधनेमुळे शारीरिक क्षमता वाढते, मानसिक स्थिरता, व्याधीविरहीत शरीर, व्यक्तिमत्त्व विकास, मानसिक संतुलन, सकारात्मक दृष्टिकोन, उत्साह वाढतो. अनुभवी योगशिक्षकाच्या मार्गदर्शनानुसार नियमित योगसाधना करणे हिताचे आहे, असा सल्ला गोयल यांनी दिला.
पी. जोग कॉलेज ऑफ सायन्स अॅन्ड कॉमर्सतर्फे मयूर कॉलनीत योग दिन उत्साहात साजरा करण्यात आला. संस्थेच्या अध्यक्षा सुरेखा जोग यांच्या ‘आरोग्य आणि शांततेसाठी योग’ या संकल्पनेतून कार्यक्रमाचे आयोजन करण्यात केले आले होते. या वेळी योग तज्ज्ञांनी विद्यार्थ्यांकडून प्राथमिक योगासने, प्राणायाम, सूर्यनमस्कार, कपालभाती अशा प्रकारची आसने करून दाखविली. योगाचे महत्त्व सर्व विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविणे, तसेच शारीरिक तंदुरुस्ती, लवचिकता आणि तणाव व्यवस्थापनासाठी योगासनांचा फायदा होतो, असे मत संस्थेचे उपाध्यक्ष डॉ. अमोल जोग यांनी व्यक्त केले. योगाभ्यास केल्यास विद्यार्थ्यांची एकाग्रता वाढण्यास मदत होईल, असे मत संस्थेचे सचिव पुष्कर जोग यांनी व्यक्त केली. महाविद्यालयाच्या व्यवस्थापिका जयमाला पुरंदरे यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले होते.
सासवड येथील वाघीरे महाविद्यालयात पुणे ते पंढरपूर दिंडीसाठी निघालेल्या वारकऱ्यांसाठी विशेष कार्यक्रम आयोजित कऱण्यात आला होता. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ राष्ट्रीय सेवा योजना आणि वाघीरे कॉलेजच्या राष्ट्रीय सेवा योजना आणि जिमखाना विभागाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कार्यक्रमात प्रा. रूपेश थोपटे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. कॉलेजचे प्राचार्य डॉ. नितीन घोरपडे, उपप्राचार्य डॉ. सतिश बोंगाणे, प्रा. माया हुंबरे, दिनेश जाधव तसेच इतर पदाधिकारी उपस्थित होते. थोपटे यांनी योगाच्या विविध प्रकारांमधून शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्याची जोपासना कशी होते याविषयी माहिती दिली. दिंडी सोहळयासाठी मुक्कामी असलेल्या वारकऱ्यांकडून शिथिलीकरणाचे व्यायाम, दीर्घ श्वसनाचा सराव करून घेतला. वारकऱ्यांचाही या उपक्रमाला उत्तम प्रतिसाद मिळाला. यामध्ये दिंडीमधील वारकरी, कॉलेजचे विद्यार्थी, स्वयंसेवक असे सहाशेहून अधिक विद्यार्थी यात सहभागी झाले होते.
वाघोली येथील रायसोनी शिक्षण समूहातर्फे विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. संस्थेचे इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी कॉलेज तसेच आर्टस्, कॉमर्स अँड सायन्स कॉलेजचे विद्यार्थी आणि शिक्षक यात सहभागी झाले होते. इंडियन स्कूल ऑफ योगाचे प्रशिक्षक नीलेश यादव आणि शरद देशपांडे यांनी उपस्थितांना योगासनांची माहिती दिली. विविध योग आसने आणि त्यांचे फायदे समजावून सांगितले. सूर्यनमस्कार हा बारा आसनांचा एकत्रित व्यायामप्रकार आहे. दररोज सकाळी सूर्योदयासमयी योगासने केल्यास दिवसाची सुरुवात प्रसन्न आणि आणि शरीर निरोगी राहण्यासही मदत होते, असे डॉ. आर. डी. खराडकर यांनी सांगितले. रायसोनी समूहचे विश्वस्त संचालक अजित टाटिया, डॉ. आर. डी. खराडकर, डॉ. जे. बी. संकपाळ, डॉ. मुरलीधर शिंदे तसेच इतर मान्यवर उपस्थित होते. शारीरिक शिक्षक संचालक संतोष मोटे, अमितकुमार वाघ आणि नितीन चौधरी यांनी संयोजन केले.
हडपसर येथील बालगोकुलम् संस्थेतर्फे सिझन्स मॉलमध्ये सामूहिक सूर्य नमस्कार आणि योगासनांचे सादरीकरण करण्यात आले. या वेळी वय वर्षे ६ ते १५ वयोगटातील शंभरहून अधिक मुलांनी योगासने सादर केली. शास्त्रीय संगीताच्या तालावर मुलांनी योगासनांबरोबरच सूर्य, तारे, स्वस्तिक अशा रचना सादर केल्या. अवघड समजल्या जाणाऱ्या गेले महिनाभर पंचवीसहून अधिक स्वयंसेवक मुलांचा सराव करून घेत होते. कार्यक्रमासाठी प्रवीण लंगरे, मंगेश जोशी आणि संतोष कुलकर्णी यांनी परिश्रम घेतले. अंकुर उमडेकर यांनी सूत्रसंचालन केले. गेल्या दोन वर्षांपासून पुणे शहरात बालगोकुलमच्या २७ शाखा कार्यरत आहेत.
महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटन एज्युकेशन सोसायटीच्या इन्स्टिटयुट ऑफ फार्मसी डिप्लोमा आणि अल्लाना कॉलेज ऑफ फार्मसीमध्ये योग शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. योगतज्ञ आनंदाचार्य पोनागंती यांनी मार्गदर्शन केले. कॉलेजचे प्राचार्य डॉ. व्ही. एन. जगताप, डॉ. किरण भिसे, प्रा. मनोज जोगराणा या वेळी उपस्थित होते. विद्यार्थी, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी योगशिबिरामध्ये सहभागी झाले होते. पोनागंती यांनी उपस्थितांना योगासनाच्या विविध पद्धतींचे प्रात्यक्षिक दाखविले. प्राणायामाचे महत्त्व आणि त्याचे प्रकार सादर केले. जोगराणा यांनी अष्टांगयोगाबद्दल माहिती दिली.
लष्कराच्या पुण्यातील संस्थांतर्फे आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यात आला. पुणे कँन्टॉन्मेंटमधील मिल्खासिंग क्रीडा संकुलात झालेल्या या कार्यक्रमामध्ये अधिकारी, सैनिक आणि त्यांचे कुटुंबीय सहभागी झाले होते. निरोगी आणि तणावमुक्त आरोग्यासाठी योगासने आवश्यक असून, लष्कराने योग विद्येला त्यांच्या प्रशिक्षणात सामावून घेतले आहे. सैनिकांचे मानसिक आरोग्य राखण्यासाठी आणि ताण हलका करण्यासाठी योगासनांचा उपयोग होते, असे मत उपस्थितांनी व्यक्त केले. क्रीडा विभागातील सैनिकांनी या वेळी विविध योगासनांची प्रात्याक्षिके करून दाखविली.
डॉ. डी. वाय. पाटील आयुर्वेद महाविद्यालय आणि संशोधन केंद्रातर्फे आयोजित केलेल्या कार्यक्रमात डॉ. संजय मचे यांनी योगाभ्यास घेतला. याच वेळी प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयाच्या पिंपरी शाखेच्या संचालिका बीके मंजुषादीदी यांनी ध्यान सत्र घेतले. या सकाळच्या सत्रात डॉ. डी. वाय पाटील आयुर्वेद कॉलेज, पब्लिक स्कूलचे अध्यापक, विद्यार्थी, कर्मचारी तसेच ब्रह्माकुमारीस सेंटरचे सदस्य उपस्थित होते. कार्यक्रमाच्या दुसऱ्या सत्रात ‘योग व नैराश्य’ या विषयी राष्ट्रीय परिसंवाद कार्यक्रम घेण्यात आला. डॉ. डी. वाय पाटील विद्यापीठाचे कुलगुरू डॉ पी. एन राजदान यांच्या हस्ते परिसंवादाचे उदघाटन झाले. ‘आज योगाभ्यासाची गोडी विद्यार्थ्यांमध्ये वाढत आहे ही फार कौतुकाची बाब आहे. स्वतःच्या आरोग्यासाठी सर्वानीच योगशास्त्राकडे कल वाढवावा,’ असे मत डॉ. राजदान यांनी व्यक्त केले. कॉलेजच्या उपप्राचार्या डॉ. मेधा कुलकर्णी, कुलसचिव दिलीप मोहिते, वैद्यकीय क्षेत्रातील अध्यापक आणि विद्यार्थी उपस्थित होते. उत्साह व नैराश्य यात समतोल साधूनच मानसिक स्वास्थ्य सुधारू शकतो, असे मत प्रख्यात योग विशारद डॉ संप्रसाद विनोद व्यक्त केले. योगासनाद्वारे मन प्रसन्न करण्याचे उपाय त्यांनी सांगितले. मानसिक ताण आणि तणावमुक्तीचे उपाय’ या विषयी मानसोपचार तज्ज्ञ डॉ. मानसी शहा यांनी मार्गदर्शन केले. ‘मानसोपचार व नैराश्य’ या विषयी मानसोपचार तज्ज्ञ डॉ. नीलेश नाफडे यांनी संवाद साधला. मेधा कुलकर्णी, डॉ. उर्मिला शिर्के, डॉ. योगेश शिंदे, डॉ. संतोष कांबळे, डॉ ज्योत्स्ना यादव आणि विद्यार्थ्यांनी कार्यक्रमाचे संयोजने केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गावांच्या समावेशाबाबत चालढकल

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

महापालिका हद्दीलगतच्या ३४ गावांच्या पालिकेतील समावेशाचा निर्णय घेण्याबाबत राज्य सरकारकडून चालढकल सुरूच असून, आता टप्प्याटप्प्याने गावांचा समावेश करण्याबाबत सरकारी स्तरावर चाचपणी केली जाणार आहे. त्यामुळे, येत्या महिनाअखेरीस कोर्टासमोर सरकार भूमिका स्पष्ट करेपर्यंत गावांचा समावेश अधांतरी राहणार असल्याची चिन्हे आहेत.

शहरालगतच्या गावांच्या समावेशाबद्दल सरकार ‘सकारात्मक’ असल्याचे प्रतिज्ञापत्र नुकतेच मुंबई हायकोर्टासमोर दाखल करण्यात आले होते. तरीही, गावांबाबत अंतिम निर्णय घेण्यात येत नसल्याने कोर्टाने सरकारला तीन आठवड्यांत निर्णय घेण्याची सक्त ताकीद दिली होती. त्या अनुशंगाने, मुंबईत पालकमंत्री गिरीश बापट यांच्या अध्यक्षतेखाली गावांच्या समावेशाबाबत आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीला पुण्याच्या आमदारांसह वेगवेगळ्या विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. तरीही, या बैठकीतही सरकारला कोणत्याही ठोस निर्णयापर्यंत पोहोचता आले नाही.

सर्व गावांचा पालिकेत समावेश झाल्यास, संबंधित भागांतील पायाभूत सुविधांसाठी पुरेसा निधी उपलब्ध होण्यात अडचणी निर्माण होण्याची भीती दोनच दिवसांपूर्वी पालकमंत्री बापट यांनी व्यक्त केली होती. बुधवारच्या बैठकीत काही अधिकाऱ्यांनी पुन्हा तीच भूमिका कायम ठेवली. तसेच, गावांचा समावेश झाल्यास पालिकेवर नेमका किती आर्थिक भार पडेल, याचा आराखडा सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या. एकाचवेळी ३४ गावे घेतल्याने पालिकेवरील बोजा वाढण्याची शक्यता असल्याने टप्प्याटप्प्याने गावांचा समावेश करण्याचा पर्याय मांडण्यात आला. मोजक्याच गावांचा समावेश करून उर्वरित गावे घेतलीच नाहीत, तर स्थानिक ग्रामस्थांमध्ये नाराजी पसरण्याची शक्यता वर्तविण्यात आली. त्यामुळे, गावांच्या समावेशाबाबतचा कृती आराखडा सरकारने तयार करावा, अशी मागणी केली गेली. गावांच्या समावेशाबाबत भारतीय जनता पक्षामध्ये दोन गट पडले आहेत. हडपसर, खडकवासला आणि वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघातील आमदारांनी गावांचा समावेश व्हावा, यासाठी सातत्याने आग्रह धरला आहे.

त्वरित निर्णय आवश्यक

शहरालगतच्या गावांचा महापालिकेत समावेश व्हावा, ही पूर्वीपासून भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेची भूमिका आहे. राज्यात युती सरकार असताना गावांच्या समावेशाचा निर्णय घेऊन सतत आग्रही भूमिका मांडण्यात येत होती. आता बदलत्या परिस्थितीत मात्र भाजपचे सरकार गावांच्या समावेशाबाबत चालढकल करीत आहे. या समावेशाला आणखी विलंब झाल्यास तेथील नागरिक विकासापासून वंचित राहून सुविधांचा बोजवारा उडण्याची भीती आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

हल्ली कर्जमाफी करा म्हणण्याची फॅशन: नायडू

$
0
0

म. टा. प्रतिनिधी । पुणे

'कर्जमाफी करण्यास काहीच हरकत नाही. पण तो अंतिम उपाय नाही. अशा उपायाचा विचार केवळ संकटाच्या क्षणी केला पाहिजे. मात्र, हल्ली कर्ज घेतली की ते माफ करा असं म्हणण्याची फॅशनच आली आहे,' असं वक्तव्य केंद्रीय नगरविकासमंत्री व्यंकय्या नायडू यांनी आज केलं. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या पार्श्वभूमीवर नायडू यांनी केलेल्या या वक्तव्यामुळं वाद होण्याची चिन्हं आहेत.

पुणे महापालिकेतर्फे उभारण्यात आलेल्या २०० कोटींच्या कर्जरोख्यांची नोंदणी करण्यासाठी मुंबई शेअर बाजारात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. 'मोफत देण्याचा जमाना आता गेला आहे. निवडणुकीपूर्वी टीव्ही, मिक्सर, मंगळसूत्र देण्याची घोषणा केली जाते. मात्र, ते केवळ एक लॉलीपॉप दिल्यासारखं असतं,' असं त्यांनी सांगितलं. 'शहरांतील पायाभूत सेवा-सुविधा प्रकल्पांसाठी कर्ज घेतले जाते. आपण भारतीय आहोत. स्वावलंबी आहोत. आपण कर्ज मोफत घेत नाही,' असा चिमटाही त्यांनी काढला. यावेळी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व स्टेट बँक ऑफ इंडियाच्या अध्यक्षा अरुंधती भट्टाचार्य याही उपस्थित होत्या.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रिक्षा परवान्यांसाठी अर्ज स्वीकृती सुरू

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
केंद्र सरकारने रिक्षा परवान्यांवरील बंदी उठविल्यानंतर प्रादेशिक परिवहन कार्यालयाने (आरटीओ) परवान्यांसाठी अर्ज स्वीकारण्यास सुरुवात केली आहे. रिक्षा लायसन्सधारक (बॅच) उमेदवारांनी परवान्यासाठी अर्ज करावेत, असे आवाहन आरटीओ प्रशासनाने केले आहे.

केंद्र सरकारने वीस वर्षांपूर्वी रिक्षा आणि टॅक्सी यांच्या संख्येवर मर्यादा आणण्यासाठी पुण्यासह मुंबई, ठाणे, नागपूर, सोलापूर, नाशिक आणि औरंगाबाद या शहरांमध्ये परवाना वाटपावर बंदी घातली होती. आता ती उठवली असून मागेल त्याला परवाना देण्यात येणार आहे. या परवान्यासाठी पात्र आणि इच्छुक असलेल्या उमेदवारांनी आरटीओकडे अर्ज करायचे आहेत. अर्जासोबत परवाना, बॅच, राहण्याचा पुरावा, नामनिर्देश प्रमाणपत्र, चारित्र पडताळणी अहवाल, स्वयंघोषणापत्र, रहिवासी दाखला, तीन फोटो आणि शाळा सोडल्याचा दाखल आदी कागदपत्रे दाखल करावीत. अर्जदारास परवाना शुल्क म्हणून एक हजार रुपये आणि त्यानंतर अतिरिक्त परवाना शुल्क म्हणून दहा हजार रुपये भरावे लागणार आहेत, असे आवाहन उपप्रादेशिक परिवहन अधिकारी संजय राऊत यांनी केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘अंध विद्यार्थिनीला पूर्ण सहकार्य राहील’

$
0
0

कुलगुरू डॉ. करमळकर यांचे आश्वासन

म. टा. प्रतिनिधी, पुणे
‘सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात राज्यशास्त्र विभागात पीएचडी करणाऱ्या अंध विद्यार्थिनीला विद्यापीठात भविष्यात कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ देणार नाही. तिला तिची पीएचडी करण्यासाठी विद्यापीठ प्रशासनाचे पूर्ण सहकार्य राहील,’ असे आश्वासन विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांनी गुरूवारी दिले.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील राज्यशास्त्र विभागाच्या मनमानी कारभाराला आणि मानसिक छळाला कंटाळून पीएचडी करणाऱ्या अंध विद्यार्थिनीने सोमवारी कुलसचिव कार्यालयात उडी मारून आत्महत्येचा प्रयत्न केला होता. या प्रकाराबाबत विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांनी आज गुरुवारी विद्यापीठात बैठक घेतली. या बैठकीला डॉ. करमळकर, कुलसचिव डॉ. अरविंद शाळिग्राम, विभागप्रमुख हर्ष जगझाप, विद्यार्थिनी आणि तिचे आई, वडील व भाऊ उपस्थित होते. राज्यशास्त्र विभागामध्ये संबंधित विद्यार्थिनी गेल्या अडीच वर्षांपासून पीएचडी करत आहे. विद्यार्थिनीला विद्यापीठ अनुदान आयोगाकडून राजीव गांधी फेलोशिप मिळते. ही फेलोशिप घेण्यासाठी विभागप्रमुखांची सहीद्वारे मान्यता घ्यावी लागते, तसेच विभागाकडून संबंधित मान्यतेची माहिती यूजीसीला द्यावी लागते. मात्र, विभागप्रमुख मान्यता देण्यास मुद्दामहून टाळाटाळ करतात आणि विभागातील प्राध्यापक देखील मानसिक छळ करतात, असा आरोप विद्यार्थिनीने केला होता.

दरम्यान, गुरुवारी झालेल्या बैठकीत डॉ. करमळकर यांनी जगझाप आणि विद्यार्थिनीची बाजू ऐकून घेतली. या वेळी विद्यार्थिनीने तिला भेडसावणाऱ्या समस्या, राज्यशास्त्र विभाग, आजी व माजी विभागप्रमुखांकडून आपल्याबोसत घडणाऱ्या गोष्टींची माहिती डॉ. करमळकर यांना दिली. तसेच, विभाग आणि विभागप्रमुखांवर विविध आरोप केले. जगझाप यांनी देखील आपली बाजू डॉ. करमळकर यांच्याकडे मांडली.

डॉ. करमळकर यांनी दोन्हींची बाजू ऐकल्यानंतर डॉ. शाळिग्राम यांच्याशी चर्चा केली आणि अंतिम निर्णय राखून ठेवला आहे. याबाबत डॉ. करमळकर म्हणाले, ‘डॉ. जगझाप आणि विद्यार्थिनी अशा दोघांची बाजू ऐकून घेतली. त्याबाबतचा अंतिम डॉ. शाळिग्राम यांच्याशी चर्चा करून घेऊ. मात्र, यापुढे राज्यशास्त्र विभागात पीएचडी करणाऱ्या अंध विद्यार्थिनीला कोणत्याच प्रकारचा त्रास होऊ देणार नाही. तिला पीएचडी करण्यासाठी विद्यापीठ प्रशासन आणि राज्यशास्त्र विभागाचे सहकार्य राहील.’ दरम्यान, राज्यशास्त्र विभागाकडून भविष्यात त्रास होणार नाही, असे विद्यापीठाने लेखी स्वरूपात द्यावे, अशी मागणी विद्यार्थिनीने केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रिंगरोडच्या बाजूला चार एफएसआय

$
0
0

टीपी स्कीमच्या माध्यमातून केला जाणार विकास

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत मान्यता

म. टा. प्रतिनिधी, पुणे

पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणातर्फे (पीएमआरडीए) १२९ किमीच्या रिंगरोडचा विकास नगररचना योजनेच्या (टीपी स्कीम) माध्यमातून केला जाणार असून, त्यासाठी रिंगरोडच्या दोन्ही बाजूस पाचशे मीटरपर्यंत चार चटई क्षेत्र निर्देशांक (एफएसआय) देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. रिंगरोडसाठी तब्बल १७ हजार कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित असून, त्यासाठी राज्य सरकारही काही वाटा उचलणार आहे.

पीएमआरडीएचे अध्यक्ष मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी घेण्यात आलेल्या बैठकीत ‘टीपी स्कीम’द्वारे रिंगरोडचा विकास करण्यास मंजुरी देण्यात आली. रिंगरोडच्या बाजूला पुरेशा प्रमाणात नागरी वस्ती-औद्योगिक आस्थापने आणि इतर व्यावसायिक जागा निर्माण होण्यासाठी रिंगरोडच्या दोन्ही बाजूस चार एफएसआय देण्याचा महत्त्वाचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. प्रिमियम एफएसआय आणि टीपी स्कीममधून प्राधिकरणाला प्राप्त होणाऱ्या जमिनींची विक्री आणि भाडेतत्त्वावर देऊन खर्चाची उभारणी केली जाणार आहे. तसेच, सुरुवातीच्या टप्प्यात लागणाऱ्या बीज भांडवलाचा निधी राज्य सरकार आणि प्राधिकरणामार्फत उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे निश्चित केले गेले.

रिंगरोडच्या प्रकल्पाचा सविस्तर प्रकल्प अहवालाचे (डीपीआर) काम नुकतेच आयआयसी-मोनार्क आणि आयआयआयई यांच्याकडून करण्यात येणार आहे. संपूर्ण रिंगरोडसाठी एक हजार ४३० हेक्टर जागेची आवश्यकता भासणार आहे. या जमिनी नगररचना योजनेच्या माध्यमातून संपादित करण्यात येणार असून, टीपी स्कीम तयार करण्यासाठी सल्लागारांची नियुक्ती केली गेली आहे.

टीपी स्कीममधील पाचशे हेक्टर जागा आर्थिक दुर्बल घटकांसाठी राखीव ठेवण्यात येणार आहे. त्याद्वारे, सुमारे दोन लाखांहून अधिक घरे या घटकांसाठी उपलब्ध होऊ शकतील, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

या बैठकीला पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट, महापौर मुक्ता टिळक, पिंपरी-चिंचवडचे महापौर नितीन काळजे, नगरविकास विभागाचे प्रधान सचिव डॉ. नितीन करीर, विभागीय आयुक्त चंद्रकांत दळवी, पोलिस आयुक्त रश्मी शुक्ला, महापालिका आयुक्त कुणाल कुमार; तसेच पीएमआरडीएचे आयुक्त किरण गित्ते उपस्थित होते.

मेट्रोसाठी देखील प्रस्ताव

शहरात महाराष्ट्र मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनतर्फे (महामेट्रो) राबविण्यात येणाऱ्या मेट्रोसाठी पुरेशी प्रवासीसंख्या उपलब्ध होण्यासाठी मेट्रो मार्गिकांच्या दोन्ही बाजूस पाचशे मीटरपर्यंत चार एफएसआय देण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला आहे. केंद्र सरकारनेही ट्रान्झिट ओरिएंटेड डेव्हलपमेंट (टीओडी) झोनला चालना देण्याचा निर्णय घेतला असून, पीएमआरडीएचा रिंगरोड त्या अंतर्गत येऊ शकतो. त्यामुळे, वाढीव एफएसआय देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
...
अहमदाबाद शहराभोवतीच्या रिंगरोडसाठी नऊ हजार हेक्टरवर टीपी स्कीम राबविण्यात आली होती. पुण्याच्या रिंगरोडसाठी १० हजार हेक्टर जागेवर टीपी स्कीम राबविण्याचा प्रस्ताव आहे.
- किरण गित्ते, आयुक्त, पीएमआरडीए

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


पीएमआरडीए करणार सर्वंकष वाहतूक आराखडा

$
0
0

सहा महिन्यांत आराखडा पूर्ण करण्याचे उद्दिष्ट

म. टा. प्रतिनिधी, पुणे
पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (पीएमआरडीए) हद्दीत विविध वाहतूक साधनांचा भविष्यातील वापर कशाप्रकारे होईल, याचे नियोजन करण्यासाठी सर्वंकष वाहतूक आराखडा (मोबिलिटी प्लॅन) तयार करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पुणे व पिंपरी-चिंचवड महापालिकांसह राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, राज्य रस्ते विकास महामंडळ, राज्य परिवहन महामंडळ आणि इतर संबंधित घटकांशी समन्वय साधून हा आराखडा तयार करण्याचे उद्दिष्ट पीएमआरडीएने निश्चित केले आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या ‘पीएमआरडीए’च्या बैठकीत हा आराखडा तयार करण्यास मान्यता देण्यात आली. त्यामुळे, मेट्रो प्रकल्पाच्या विस्तारापासून ते रस्ते-उड्डाणपूल आणि इतर वाहतूक साधनांचा भविष्यातील वापर कशाप्रकारे राहील, याचा ‘रोडमॅप’ निश्चित करणे पीएमआरडीएला शक्य होणार आहे. पुढील सहा महिन्यांमध्ये हा आराखडा तयार करण्यात येणार असल्याची माहिती पीएमआरडीचे आयुक्त किरण गित्ते यांनी दिली.

पीएमआरडीएची कार्यकक्षा सुमारे सात हजार स्क्वेअर किमीची आहे. पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील वाहतूक समस्या सोडविण्यासाठी पीएमआरडीएकडून रिंगरोड विकसित केला जाणार आहेच. त्याशिवाय, जलद आणि सुरक्षित वाहतुकीसाठी इतर कोणकोणत्या पर्यायांचा विचार शक्य आहे, याचा आढावा आराखड्यातून घेतला जाणार आहे.

पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिकांनी यापूर्वीच वाहतूक आराखडा तयार केला आहे. त्यामुळे, त्यांच्या आराखड्याचा संदर्भ घेत महामार्ग प्राधिकरण, रस्ते विकास महामंडळ, परिवहन महामंडळ सार्वजनिक बांधकाम विभाग, प्रादेशिक परिवहन प्राधिकरण अशा सर्वांच्या सहकार्यातून पीएमआरडीएचा आराखडा तयार करण्यात येणार आहे.

रिंगरोड होणार दोन टप्प्यांत

पीएमआरडीएकडून विकसित करण्यात येणाऱ्या रिंगरोडचे काम दोन टप्प्यांत केले जाणार आहे. पहिल्या टप्प्यात दोन अधिक दोन असे चार पदरी रस्त्याचे बांधकाम, ३.७५ किमीचे बोगद्याचे काम, सहा मोठे पूल यासह टाऊनशीपमधील मोठ्या रस्त्यांचे बांधकाम, जमीन सपाटीकरण, पाणीपुरवठा व पथ दिव्यांची कामे करण्याचे नियोजिन आहे. तर, दुसऱ्या टप्प्यात चार अधिक चार असे आठ पदरी रस्त्याचे बांधकाम, दोन्ही बाजूस सायकल ट्रॅक व पादचारी मार्ग, विना मोटार वाहतुकीच्या सुविधा (एनएमटी), आठ उड्डाण पूल, तीन रेल्वे उड्डाण पूल आणि टाउनशीपमधील अंतर्गत रस्त्याची कामे व टाउनशीप मधील मुलभूत पायाभूत सुविधांची कामे करण्यात येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले. दोन्ही टप्प्यांची कामे पुढील सात वर्षांत पूर्ण करण्याचे प्रस्तावित आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

​ नगरसेवकांची मोशी येथे कार्यशाळा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पिंपरी
‘भोसरी विधानसभा मतदार संघातील प्रलंबित विकासकामे मार्गी लावण्यासाठी प्रभावीपणे कामाला लागा. भारतीय जनता पक्षाचे विकासाचे व्हिजन लोकांपर्यंत पोहचले पाहिजे. तरच पक्षावरील विश्वास दृढ होईल,’ अशा सूचना आमदार महेश लांडगे यांनी समर्थक नगरसेवकांना दिल्या आहेत.
मोशी येथे आमदार लांडगे यांच्या समर्थक नगरसेवकांची बैठक घेण्यात आली. या वेळी ते बोलत होते. बैठकीला सुमारे २५ नगरसेवक उपस्थित होते. त्यांनी महापालिकेत काम करताना येणाऱ्या अडचणींचा पाढा आमदार लांडगे यांच्यासमोर वाचला. लांडगे म्हणाले, ‘महापालिकेत सत्ता मिळून तीन महिने झाले. बजेटही मंजूर झाले आहे. आता कामाला लागले पाहिजे. भाजपचे काम लोकांना समजले पाहिजे. जनतेने विश्वासाने आपल्याला निवडून दिले आहे. याची जाणीव प्रत्येक नगरसेवकाने ठेवावी. आपल्या प्रभागातील कोणकोणत्या विकासकामांसाठी बजेटमध्ये तरतूद केली. या कामांची सद्यःस्थिती काय आहे? प्रकल्प हाती घेत असताना स्थानिक लोकांची भूमिका काय आहे? प्रशासकीय यंत्रणा कोणत्या प्रकारे काम करीत आहे? याबाबत पाठपुरावा करावा. एखादा अधिकारी विकासकामांत दिरंगाई करीत असेल, तर मी स्वत: महापालिका आयुक्त आणि संबंधित अधिकाऱ्यांची बैठक घेईल.

दिले शिस्तीचे धडे
आमदार लांडगे यांनी आक्रमक शैलीत नगरसेवकांना शिस्तीचे धडे दिले. पालिका सभागृहात बोलताना अभ्यास करूनच बोलले पाहिजे. चर्चेत सहभागी झाले पाहिजे. त्यासाठी सर्व विभागाच्या अधिकाऱ्यांकडून प्रकल्पाची माहिती समजून घ्या. सभागृहात प्रभागाचे प्रतिनिधीत्व करताना कमी पडणार नाही, याची काळजी घ्यावी, अशा सूचना लांडगे यांनी दिल्या. राज्यात मध्यावधी निवडणुकीचे ढग गडद आहेत. राज्यात आणि महापालिकेत सत्तेत असल्याचे भान ठेवा. विकासकामे करून घेण्याची जबाबदारी आपली आहे, असेही लांडगे यांनी स्पष्ट केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वडिलांनी केले मुलावर वार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पिंपरी
सोसायटी मेटेन्सचे पैसे भरण्याच्या वादातून वडिलांनी मुलावर वार केले. चिखली येथे नुकतीच ही घटना घडली असून, या प्रकरणी वडिलांना अटक करण्यात आली आहे.
विजय हनुमंतप्पा फलमारी (वय ५०, रा. न्यू कोहिनूर सोसायटी, चिखली) असे अटक केलेल्या वडिलांचे नाव आहे; तर मुलगा हरिश याच्यावर महापालिकेच्या वायसीएम हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विजय यांनी घरगुती वादातून मुलगा हरिश (२२) याच्यावर चाकूने वार केले. निगडी पोलिस तपास करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

एका आठवड्यात तीनवेळा हृदय प्रत्यारोपण

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

आपल्या जवळच्या प्रिय व्यक्तींना जीवदान देण्यासाठी अवयवांची शोधाशोध केली जाते; परंतु, एकाच आठवड्यात रुबी हॉस्पिटलमध्ये तीनदा हृदय प्रत्यारोपणाचे ऑपरेशन यशस्वी झाल्याने जीवदान मिळाले. तसेच, अनेक पेशंटना यकृत, मूत्रपिंड मिळाल्याने जगण्याची संधी मिळाली.

गेल्या आठवड्यात रुबी हॉस्पिटलमध्ये १६ ते ३९ या वयातील तीन पेशंटवर हृदय प्रत्यारोपणाचे ऑपरेशन यशस्वी करण्यात आले. या तिन्ही पेशंटना कार्डियोमायोपॅथी नावाचा हृदयविकाराचा आजार झाला होता. त्यांच्या हृदयाची क्षमता पूर्णतः कार्यान्वित नव्हती. त्यामुळे त्या तिघांना प्रत्यारोपण करण्याशिवाय पर्याय नव्हता. हॉस्पिटलने त्या दोघा व्यक्तींना हृदय प्रत्यारोपणाचा सल्ला दिला. त्यावेळी हृदयासाठी शोधाशोध सुरू होती. सुदैवाने हॉस्पिटलमध्ये दोन ब्रेनडेड पेशंट असल्याचे आढळले. हे दोन्ही ब्रेनडेड पेशंट तरुण होते. बांधकामाच्या टिकाणावरून खाली पडल्याने त्यांचा अपघात झाला होता. त्यात ते ब्रेनडेड झाल्याने त्यांच्या नातेवाइकांचे समुपदेशन करण्यात आले. अवयवदानासंदर्भात त्यांना माहिती देण्यात आली. त्यामुळे दोन गरजू पेशंटना ब्रेनडेड पेशंटमुळे दोन हृदय सहज उपलब्ध झाले. आणखी एका हृदयाची आवश्यकता असल्याने तिसरे हृदय दुसऱ्या एका हॉस्पिटलमधील ‘ब्रेनडेड’ पेशंटच्या माध्यमातून उपलब्ध झाले.

‘तीनही पेशंटना हृदय प्रत्यारोपण ऑपरेशन हे गुंतागुंत न होता यशस्वी झाले. तरुण ब्रेनडेड पेशंटमुळे हृदयाबरोबर यकृत, मूत्रपिंड देखील मिळाले. त्यामुळे त्या पेशंटना जीवदान मिळाले. अनेक पेशंटना जगण्याची संधी मिळाली आहे. ही आनंददायी घटना आहे,’ असे प्रत्यारोपण विभागाचे प्रमुख डॉ. जगदीश हिरेमठ यांनी सांगितले.
वैद्यकीय संचालक डॉ. संजय पठारे म्हणाले, ‘पेशंट आणि त्यांच्या नातेवाइकांच्या आम्ही संपर्कात असतो. अवयव दान करणारे दाते हॉस्पिटलमध्ये होते. त्यामुळे हृदय, दोन ​मूत्रपिंड आणि यकृताचे प्रत्यारोपणाचे ऑपरेशन एका वेळी करू शकलो. सांघिक कौशल्य, प्रशिक्षित डॉक्टरांचे ज्ञान आणि समन्वया​मुळे मोठे ऑपरेशन करणे शक्य झाले.’ डॉ. हिरेमठ, हृदयविकार तज्ज्ञ आणि कॅथलॅबचे संचालक डॉ. सी.एन. मखले, न्यूरो ट्रामा विभागाचे प्रमुख डॉ. कपिल झिरपे, डॉ. नीता मुन्शी, हृदय शल्यविशारद डॉ. मनोज दुराईराज, डॉ. आशिष खानिजो, डॉ. कौशिक सेठ, डॉ. बिकास साहू, डॉ. अभिजित लोढा, डॉ. गायत्री पंडित, डॉ. अभिजित शिवणकर, सामाजिक वैद्यकीय कार्यकर्ता सुरेखा जोशी यांच्या पथकाने प्रत्यारोपणासाठी विशेष परिश्रम घेतले.

अत्यंत गुंतागुंतीच्या हृदय प्रत्यारोपणाचे ऑपरेशन कमी वेळात करणे हे आव्हानात्मक आणि ताण येणारे होते. प्रत्यारोपणासाठी हृदय उपलब्ध झाले आणि त्याचे हृदय गरजू पेशंटशी मिळतेजुळते होते. त्यावेळी गरजू पेशंटला जीवदान देणे हे आमचे कर्तव्य आहे.
- डॉ. जगदीश हिरेमठ, हृदय प्रत्यारोपण विभाग प्रमुख, रुबी हॉल क्लिनिक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पाससाठी ‘आधार’ची सक्ती नाही

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, पुणे
‘पुणे महानगर परिवहन महामंडळाचा (पीएमपी) बस पास काढण्यासाठी प्रवाशांना सरसकट आधार कार्ड सादर करण्याची आवश्यकता नाही,’ असे स्पष्टीकरण पीएमपीचे वाहतूक व्यवस्थापक सुनील गवळी यांनी दिले आहे. एखाद्या व्यक्तीने सादर केलेल्या अन्य ओळखपत्राबाबत पीएमपी कर्मचाऱ्यास शंका उत्पन्न झाल्यास आधार कार्ड सादर करावे लागेल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
पीएमपी पास केंद्रावर दैनंदिन पास, आठवडे पास किंवा मासिक काढणाऱ्या प्रवाशांकडून पास केंद्रावरील कर्मचारी आधार कार्ड सक्तीने मागत होते. आधार कार्डशिवाय मासिक पास न दिल्याच्या काही तक्रारी प्रवाशांनी केल्या होत्या. तसेच, पीएमपी हद्दीतील आधार कार्ड असलेल्यांनाच पास दिला जात होता. या केंद्रांवर ‘मटा’ प्रतिनिधीने चौकशी केली असता, एक जूनपासून आधार कार्ड सक्ती करण्यात आल्याचे सांगण्यात आले होते. याबाबतचे वृत्त ‘मटा’मध्ये प्रसिद्ध करून या विषयाला वाचा फोडण्यात आली होती. त्यानंतर पीएमपी प्रवासी मंचानेही या निर्णयाला विरोध दर्शविला होता. त्यानंतर वाहतूक व्यवस्थापक गवळी यांच्याकडे चौकशी केली असता, त्यांनी आधार कार्ड सक्ती नसल्याचे सांगितले.
‘पीएमपीचे पास अहस्तांतरणीय असतात. मात्र, पास एका व्यक्तीच्या नावाचा आणि प्रत्यक्ष त्याचा वापर दुसरीच व्यक्ती करीत आहे. पासच्या वैधता तारखेवर खाडाखोड केलेली आहे, असे अनेक गैरप्रकार सातत्याने समोर आले आहेत. त्यामुळे शंकास्पद व्यक्तींकडे आधार कार्डची मागणी करा, अशा सूचना पास केंद्रांना देण्यात आल्या आहेत. त्यामुळे सरसकट सर्वांना आधार कार्ड सक्ती करण्याची आवश्यकता नाही,’ असे गवळी यांनी सांगितले. पीएमपी बस पास काढणाऱ्यांची संख्या प्रचंड आहे. त्यामुळे या निर्णयामुळे अनेकांवर परिणाम झाला होता. अद्यापही आधार कार्ड नसलेल्यांची संख्या जास्त आहे. त्यामुळे आता सक्ती नसल्याचे स्पष्ट झाल्याने त्यांची गैरसोय टळणार आहे.

अडवणूक केल्यास तक्रार करा
पाससाठी आधार सक्ती नसतानाही, प्रवाशांची अडवणूक करणाऱ्यांची तक्रार पीएमपीच्या हेल्पलाइनवर (०२० २४५४५४५४), तसेच पीएमपी इ-कनेक्ट मोबाइल अॅप्लिकेशनद्वारे करावी. यामध्ये संबंधित पास केंद्राचे नाव, घटनेचा कालावधी व शक्य असल्याचे कर्मचाऱ्याचे नाव नमूद करावे, असे आवाहन प्रवाशांना करण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘प्रकल्पांची व्यवहार्यता महत्त्वाची’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
स्थानिक स्वराज्य संस्थांना यापूर्वी विकासासाठी निधी दिला म्हणजे चॅरिटी दिल्यासारखे होते. त्या प्रकल्पांमध्ये व्यवहार्यता आहे की नाही, हे पाहण्यात येत नव्हते. आता प्रकल्पांची व्यावहारिकता तपासली जाते. महानगरपालिकांच्या सेवा सुधारल्या, त्यात पारदर्शकता आली की नोकरीच्या संधी वाढतात. त्यामुळे नागरिक आणि गुंतवणुकदार यांच्यासाठी ही ‘विन विन सिच्युएशन’ असल्याचे मत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले.
पुणे महानगरपालिकेने पाणी पुरवठा योजनेसाठी घेतलेल्या कर्जरोख्यांच्या नोंदणीचा कार्यक्रम मुंबई शेअर बाजारामध्ये पार पडला. या प्रसंगी फडणवीस बोलत होते. ‘म्युनिसिपल बॉण्ड मार्केट’ ही प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची संकल्पना पुणे महापालिकेने प्रत्यक्षात आणली आहे. शहरांच्या पायाभूत सुविधांच्या विकासासाठी कर्जरोख्यांच्या माध्यमातून निधी उभारला जाणार आहे. त्याचा पाया पुणे महापालिकेने रचला आहे. देशातील सर्वोत्तम शहर म्हणून पुण्याचा नावलौकीक राहील, असा विश्वास फडणवीस यांनी व्यक्त केला.
जगभरात पाहिले तर महापालिकेच्या सेवा सुधारल्या तर त्या ठिकाणी नोकरीच्या संधी निर्माण होतात. त्यामुळे नागरिकांचा फायदा होतो. योग्य प्रकल्प, नियोजन, पारदर्शकता याच्या जोरावर महापालिकांचा विकास शक्य आहे. पुणे शहरात घनकचऱ्यावर मोठ्या प्रक्रिया करण्यात येत असून पुढील दोन ते तीन वर्षांत घनकचऱ्याच्या वर्गीकरणाचा प्रकल्प पूर्ण होईल. शहरातील सांडपाण्याचा प्रत्येक थेंबावर प्रक्रिया केली जाईल. मेट्रो आणि सार्वजनिक दळणवळण व्यवस्था अधिक सक्षम होणार आहेत. समान पाणीपुरवठा योजनेमुळे नागरिकांना मुबलक पाणी मिळेल. फायबर नेटवर्कचे जाळे निर्माण करण्यात येत असून पुण्याची ओळख ही देशातील सर्वोत्तम शहर अशी असेल, असा विश्वास फडणवीस यांनी या वेळी व्यक्त केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नागरी पुनरुत्थानाची ही नांदी ठरेल

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
पुणे महानगरपालिकेने समान पाणीपुरवठा योजनेसाठी कर्जरोखे काढण्यासाठी शेअर बाजारामध्ये घंटा वाजवून झालेला निनाद हा देशातील नागरी पुनरुत्थानाच्या नांदीचा आवाज ठरेल, असा विश्वास केंद्रीय मंत्री व्यंकय्या नायडू यांनी व्यक्त केला. ‘शहरे ही इंजिन आहेत. महानगरपालिकांनी नागरिकांचे जीवनमान उंचावण्यासाठी विकासाचे प्रकल्प हाती घ्यावेत,’ असे आवाहनही त्यांनी केले.
मुंबईत शेअर्स बाजारामध्ये कर्जरोखे नोंदणीचा शुभारंभ नायडू यांच्या हस्ते झाला. या प्रसंगी केंद्रीय वित्त राज्यमंत्री अर्जुनराम मेघवाल, पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट, सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे, पुण्याच्या महापौर मुक्ता टिळक, ‘सेबी’चे अध्यक्ष अजय त्यागी, राज्याचे मुख्य सचिव सुमीत मलिक, स्टेट बँकेच्या अध्यक्षा अरुंधती भट्टाचार्य, मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव प्रवीण परदेशी, स्थायी समितीचे अध्यक्ष मुरलीधर मोहोळ, सभागृह नेते श्रीनाथ भिमाले, महापालिका आयुक्त कुणाल कुमार आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.
शेअर्स बाजारामधील इंटरनॅशनल कन्व्हेंशन सेंटरमध्ये बरोबर ९.१५ मिनिटांनी घंटा वाजवून कर्जरोख्यांची नोंदणी झाली. त्यानंतर नायडू बोलत होते. ‘मी देशात सर्वत्र फिरतो आहे. एक प्रकारचे उत्साहाचे वातावरण आहे. सर्वत्र ‘मिशन मोडी’चा जोरदार प्रसार होत आहे. मोडी म्हणजे नरेंद्र मोदी नसून ‘मेकिंग ऑफ डेव्हलमेंट इन इंडिया’ असा असून हे पारदर्शक विकासाचे मॉडेल आहे’, असे ते म्हणाले.
देशातील ५२ टक्के जनता ही शहरांमध्ये राहते. देशाच्या विकासदरात ६५ टक्के भाग हा शहरांचा आहे आणि यापुढे तो वाढत जाणार आहे. त्यामुळे शहरांचा विकास गरजेचा बनला आहे. नागरी विकासाची आव्हानरूपी संधी आपल्यासमोर आहे. नागरिकांच्या राहणीमानाचा दर्जा सुधारावा लागणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शहरांच्या विकासासाठी मार्गदर्शक सूचना केल्या असून त्यात शहरेही आर्थिकदृष्ट्या सक्षम बनली पाहिजेत, अशी अपेक्षा आहे, असे नायडू म्हणाले.
पालकमंत्री बापट यांनी पुण्याचे विविध प्रश्न सोडवण्यासाठी नायडू यांनी मोलाची मदत केली असल्याचे सांगत त्यांना पुण्यात सत्कार समारंभासाठी आमंत्रण दिले. पुण्याचे शहरीकरण हे ५५ टक्क्यांपर्यंत पोहोचले असल्याने पाणी, ड्रेनेज, वीज, वाहतूक या समस्या डोकेदुखी बनल्या आहे. समान पाणीपुरवठा योजनेसाठी कर्जरोखे काढण्यात आल्याने पुणेकर समाधानी असून ही योजना यशस्वी होईल, असा विश्वास या वेळी व्यक्त केला. महापौर टिळक यांनी कार्यक्रमाचे प्रास्तविक केले. त्या म्हणाल्या, विकासासाठी कर्जरोखे घेण्याची आजची ही घटना राखेतून फिनिक्स भरारी घेण्यासारखी आहे. पंतप्रधान मोदींच्या सूचनेला पुणे महानगरपालिकेने साथ देत कर्जरोखे काढण्याचा निर्णय घेतला असून पुणे शहराला शुद्ध व समान पाणीपुरवठा करता येणार आहे. स्थायी समितीचे अध्यक्ष मोहोळ यांनी सर्वांचे आभार मानले.

... ही तर विन विन सिच्युएशन
स्टेट बँकेच्या अध्यक्षा अरुंधती भट्टाचार्य म्हणाल्या, ‘एक पाऊल मानवाचे ही मानव समुदायासाठी मोठी झेप असते, असे नील आर्मस्ट्राँग म्हणाला होता. त्याने १९६९ साली चंद्रावर पहिल्यांदा पाऊल ठेवले होते. ती घटना आणि आजची घटना यांचे एक वेगळेच महत्त्व आहे. भांडवली बाजाराचा आवाका आणि पुणे महापालिकेने काढलेले २०० कोटींचे कर्जरोखे हे अत्यंत कमी असले, तरी महापालिकांनी प्रकल्पांसाठी निधी कसा गोळा करावा, यासाठी ते मार्गदर्शक ठरणार आहेत. यामुळे पालिकेची क्षमता सुदृढ होणार असून गुंतवणुकीच्याही संधी निर्माण होणार होतील. ही ‘विन विन सिच्युएशन’ आहे.’

वित्तमंत्री जेटलींचा ​व्हिडिओ संदेश
या कार्यक्रमासाठी केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी ‘व्हिडिओ’ मेसेज पाठवला होता. त्यात त्यांनी पुणेकर, पुणे महापालिकेच्या महापौर आणि आयुक्त यांचे अभिनंदन केले. पायाभूत सुविधा सुधारण्यासाठी देशातील किमान दहा शहरांनी कर्जरोखे उभारावेत, या मोदींच्या आवाहनाला प्रतिसाद देत पुण्याने नवा इतिहास रचला आहे. इतर महापालिकांनीही त्या मार्गावर वाटचाल करावी, अशी सूचना त्यांनी केली.

हे वर्ष आर्थिक सुधारणेचे
गेल्या वर्षीच्या अखेरीस नोटाबंदीचा निर्णय जाहीर झाला. या वर्षीच्या सुरुवातीलाच डिजिटल व्यवहारांवर भर देण्यात आल्याने ९१ लाख नवे करदाते निर्माण झाले. रेल्वे अंदाजपत्रक मुख्य अंदाजपत्रकाशी जोडले आहे. त्यानंतर एक जुलैपासून ‘जीएसटी’ लागू होणार आहे. शेअरनिर्देशांक ३१ हजारांवर स्थिरावला आहे आणि त्यानंतर आता पुणे महानगरपालिकेने कर्जरोखे उभारत विकासाची एक नवी दिशा दाखवली आहे. देशाच्या इतिहासात २०१७ हे आर्थिक सुधारणांचे वर्ष ठरणार असल्याचे केंद्रीय अर्थ राज्यमंत्री अर्जुन मेघवाल यांनी सांगितले.

हा तर ऐतिहासिक क्षण
कर्जरोख्यांसाठी ऑनलाइन बोलीची प्रक्रिया पूर्ण होताना सहा पट मागणी नोंदवण्यात आली. त्यामुळे हा ऐतिहासिक क्षण होता. पुणे शहराला २४ तास पाणीपुरवठा करण्याबरोबरच ‘डिजिटल सिटी’ बनविण्यासाठी लागणाऱ्या फायबर ऑप्टिकल केबल डक्टच्या कामासाठी खर्च केला जाणार आहे. मुख्यमंत्री, ‘सेबी’, नगरविकास विभाग, ‘एसबीआय’, ‘आयसीआयसीआय’, ‘बँक ऑफ महाराष्ट्र’ यांच्यासह सर्व गुंतवणूकदारांचे आयुक्त कुणाल कुमार यांनी आभार मानले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


नागरिकांचा सहभाग राहिला नावापुरताच

$
0
0

पुणे : स्मार्ट सिटी प्रकल्पामध्ये नागरिकांच्या सहभागाला सर्वाधिक महत्त्व असल्याचा दावा केला गेला असला, तरी पुणेकरांनी सुचविलेले ‘वाहतूक आणि दळणवळण’ व ‘पाणीपुरवठा’ हे दोन महत्त्वाचे प्रश्न अजूनही अनुत्तरित आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत शुभारंभ झालेल्या वाहतूक आणि पाण्याशी संबंधित योजनांना गेल्या वर्षभरात ‘पुणे स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन’ने (पीएससीडीसी) हात लावलेला नाही.
शहरातील कोणत्या महत्त्वाच्या समस्या सोडवण्यासाठी स्मार्ट सिटीतील योजना तयार केल्या जाव्यात, याचा आढावा नागरिकांकडून घेण्यात यावा, अशा सूचना केंद्र सरकारने केल्या होत्या. त्यानुसार, पुणे महापालिकेने नागरिकांची मते जाणून घेतली. गेल्या अनेक वर्षांपासून वाहतुकीच्या कोंडीने त्रासल्याने नागरिकांनी वाहतूक हीच प्रमुख समस्या असून, ती प्राधान्याने सोडवण्यासाठी पावले उचलली जावीत, अशी अपेक्षा व्यक्त केली. वाहतुकीपाठोपाठ शहरातील पाणीपुरवठ्याच्या प्रश्न मिटवण्यासाठी ठोस उपाययोजना केल्या जाव्यात, असेही नागरिकांनी सुचविले. स्मार्ट सिटीसाठी निश्चित केलेल्या निकषांनुसार जाहीर करण्यात आलेल्या आराखड्यात वाहतूक आणि पाणीपुरवठा योजनांचा समावेश होता.
गेल्या वर्षी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत झालेल्या कार्यक्रमात शहरातील १४ योजनांचा शुभारंभ करण्यात आला. यामध्ये वाहतुकीशी संबंधित पाच ते सहा योजनांचा समावेश होता. पुणे महानगर परिवहन महामंडळाशी (पीएमपी) संबंधित असलेल्या योजनांमध्ये तंत्रज्ञानाचा अवलंब केला जाणार होता. तसेच, नागरिकांना प्रवासासाठी ‘कॅशलेस कार्ड’ देण्याची योजना होती. दुर्दैवाने वाहतुकीशी संबंधित एकही योजना पूर्णत्त्वास गेलेली नाही. पंतप्रधानांच्या उपस्थितीत झालेल्या कार्यक्रमात पाणीपुरवठ्याशी संबंधित एकाही योजनेचा समावेश नव्हता. त्यामुळे नागरिकांनी प्राधान्यक्रम ठरवून दिला असतानाही, त्यांनी सुचविलेल्या योजनांकडे ‘पीएससीडीसी’ने दुर्लक्ष केल्याचे दिसून येत आहे.
वाहतूक आणि पाणीपुरवठ्यासह कचरा निर्मूलनाकडेही लक्ष देणे गरजेचे असल्याचे मत नागरिकांनी मांडले होते. परंतु, गेल्या वर्षभरात ‘स्मार्ट सिटी’कडे वाटचाल करणाऱ्या शहरात कचऱ्याच्या समस्येने गंभीर रूप धारण केले होते. अखेर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मध्यस्थीने हा प्रश्न तात्पुरत्या स्वरूपात मिटला असला, तरी कचऱ्याची समस्या दूर करण्यासाठी स्मार्ट सिटी कंपनीने कोणती योजना मांडल्याचे चित्र दिसून आले नाही.

...तर कर्जरोख्यांची गरज नव्हती
स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत केंद्र सरकारकडून पाचशे कोटी, तर राज्य सरकारकडून २५० कोटी रुपयांचा निधी मिळणार आहे. तर, महापालिकेला अडीचशे कोटी खर्च करावे लागणार आहेत. या हजार कोटी रुपयांच्या निधीतून संपूर्ण शहरासाठी (पॅन सिटी) एकच समान पाणीपुरवठ्याची (२४ बाय ७) योजना राबवली असती, तर कर्जरोखे उभारण्याची गरज पडली नसती, याकडे विरोधी पक्षांनी लक्ष वेधले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भंडारा उधळून पालखीचे स्वागत

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सासवड
संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माउलींच्या पालखी सोहळ्याचे खंडेरायाच्या जेजुरी नगरीत भंडारा उधळून स्वागत करण्यात आले. पालखीने जेजुरीत प्रवेश करताच, लांबूनच लाडक्या खंडेरायाचा गडकोट पाहून वारकऱ्यांच्या आनंदाला उधाण आले. वारकरी टाळ-मृदंगाच्या तालावर आनंदाने नाचत खंडोबाची पारंपरिक गीते व मल्हारी वारी म्हणताना दिसत होते.
या वेळी जेजुरीच्या नगराध्यक्षा वीणा सोनवणे, उपाध्यक्ष गणेश निकुडे, सर्व नगरसेवक, माजी नगराध्यक्ष दिलीप बारभाई, मार्तंड देवस्थानचे प्रमुख विश्वस्त अॅड. वसंत नाझीरकर, विश्वस्त डॉ. प्रसाद खंडागळे, अॅड. दशरथ घोरपडे, सुधीर गोडसे, संदीप घोणे, अॅड. किशोर म्हस्के, प्रभारी मुख्याधिकारी विनोद जळक आदी उपस्थित होते. या वेळी पालखीवर भंडाऱ्याची उधळण करून मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले. सायंकाळी साडेपाच वाजता सोहळा पालखीतळावर पोहोचला. तेथे आरती करण्यात आली. त्यानंतर विश्वस्त मंडळ व अधिकाऱ्यांमध्ये झालेल्या बैठकीच्यावेळी सोहळाप्रमुख अभय टिळक, प्रमुख विश्वस्त डॉ. अजित कुलकर्णी, विश्वस्त योगेश देसाई, प्रांत संजय असवले, तहसीलदार सचिन गिरी, उपविभागीय पोलिस अधिकारी अशोक भरते, नगराध्यक्षा, खंडोबा देवस्थानचे विश्वस्त आदी उपस्थित होते. या वेळी पालखी तळाच्या जागेबाबत प्रांत संजय असवले यांनी सध्याची जागा लोणारी समाज संघटनेची असून त्यांचेकडून ही जागा कायमस्वरूपी घेण्यासाठी प्रयत्न चालू असल्याचे सांगितले.
सासवडमधून गुरुवारी सकाळी सहा वाजता पालखीने जेजुरीकडे प्रस्थान ठेवले होते. वाटेत बोरावके मळ्यात सकाळची न्याहारी व यमाई शिवरीत भोजन उरकून पालखीने सायंकाळी साडेपाच वाजता जेजुरी नगरीत प्रवेश केला. सायंकाळी सहा वाजता पालखी कोळविहीरे रस्त्यावरील नवीन पालखीतळावर पोहोचली. सासवड ते जेजुरी हा १७ किलोमीटरचा टप्पा पार करून वारकरी बांधव जेजुरीत पोहोचले. खंडोबाच्या दर्शनाच्या ओढीने त्यांचा थकवा कुठल्याकुठे निघुन गेला. जेजुरीतील छत्री मंदिर, चिंचेची बाग, लवथळेश्वर औद्योगिक वसाहत, रेल्वे स्टेशन आदी ठिकाणी तंबू उभारून वारकरी दिंड्या उतरल्या. सर्व भागांमध्ये पालिकेतर्फे पुरेसा पाणीपुरवठा करण्यात आला. गावामध्ये विविध संस्था, मंडळांच्या वतीने वारकरी बांधवांसाठी भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती.

वारकऱ्यांनी घेतले खंडेरायाचे दर्शन
संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माउलींच्या पालखी सोहळ्याबरोबर आलेल्या हजारो वारकरी बांधवांनी खंडोबा गडावर देवाचे दर्शन घेतले. पहाटेपासून खंडोबाच्या दर्शनासाठी मोठी रांग लागली होती. दुपारी सारा गड वारकऱ्यांच्या आगमनाने फुलून गेला. गडावर ‘येळकोट येळकोट जयमल्हार’ असा जयघोष सुरू होता. वारकरी बांधवांसाठी देवस्थानने मुख्य चौकांमध्ये दोन मोठ्या स्क्रीन लावून दर्शनाची व्यवस्था केली होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तुकोबारायांचा वरवंडला गजर

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, दौंड
जगतगुरू संत तुकाराम महाराजांची पालखी गुरुवारी वरवंड येथे विठ्ठल रुख्मिणी मंदिराच्या प्रांगणात विसावली. शुक्रवारी सकाळी महामार्गावरचा तीन दिवसांचा प्रवास संपवून रोटी घाटाची वळणे पार करत पालखी सोहळा बारामती तालुक्यातील उंडवडी गावाकडे प्रस्थान ठेवेल. गुरुवारी सकाळी पालखीने ग्रामप्रदक्षिणा घातल्यानंतर यवत येथील ग्रामदैवत काळभैरवनाथ मंदिरातील मुक्कामावरून पालखी सोहळा पुढील वरवंड मुक्कामाकडे चालू लागला. यवत गावाच्या ग्रामस्थांनी व भाविकांनी पालखी सोहळ्याबरोबर भांडगावपर्यंत पायी वाटचाल केली.
भांडगाव येथे दिवसाचा पहिला विसावा घेण्याकरिता पालखी सोहळा विठ्ठल मंदिरात दहा ते एक वाजेपर्यंत थांबला. तुकाराम महाराजांच्या पादुका असलेली पालखी खांद्यावर नेण्यात आली. प्रथेप्रमाणे पादुका पूजन व आरती स्थानिकांच्या हस्ते करण्यात आली. येथे दुपारच्या भोजनासाठी परंपरेप्रमाणे पिठलं भाकरीची सोय करण्यात आली होती. भांडगावच्या पुढे वाखारी व चौफुला येथे केडगाव व सुपे परिसरातील भाविकांची दर्शनासाठी रीघ लागली होती. दुसऱ्या विसाव्यासाठी पालखी चौफुला येथे तासभर थांबली होती. येथेही पंचक्रोशीतील नागरिकांनी दर्शन घेतले.
महामार्गाच्या दुतर्फा दर्शनासाठी पंचक्रोशीतील ग्रामस्थांच्या रांगा लागल्या होत्या. अनेक व्यक्ती ,संस्था व मंडळांनी यथाशक्ती वारकऱ्यांची सेवा केली. महामार्गावर मनमोहक रांगोळ्या काढून सोहळ्याचे स्वागत केले. पावणेसातच्या सुमारास पालखी वरवंड येथे पोहोचली. पालखीचे स्वागत करण्यासाठी वरवंड परिसरातील ग्रामस्थ व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मुक्कामाची गावे राहिली स्वच्छ

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, दौंड
‘माउली तुम्ही स्वछतागृहाचा वापर करा’, या पुण्याच्या सेवा सहयोग फाउंडेशनच्या स्वयंसेवकांच्या नम्र आग्रहाचा मान ठेवल्याने जगतगुरू तुकाराम महाराज पालखी सोहळ्याच्या प्रस्थानानंतर लोणी काळभोर व यवत ही मुक्कामाची गावे स्वच्छ राहिली. रोगराई व दुर्गंधी पसरण्यावर बराचसा अटकाव आला.
मुक्कामाच्या गावी पालखी सोहळ्याच्या आगमनाची उत्कंठा असते. तो संपूर्ण दिवस आनंदात व भक्तिमय वातावरणात जातो. मात्र, उघड्यावर शौच केल्याने व वारीकाळात प्लास्टिकच्या बाटल्या, कप, पत्रावळ्या आदींचा मोठ्या प्रमाणात वापर झाल्याने या सगळ्या टाकाऊ वस्तूंचा खच मुक्कामाच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात तसाच पडून राहतो. परिणामी रोगराईला आमंत्रण मिळत असते. या सगळ्याचा अभ्यास करून अलोट आनंदाची वारी निर्मल वारी होण्यासाठी माजी खासदार प्रदीप रावत व देहू संस्थानचे माजी अध्यक्ष शिवाजी मोरे यांच्या संकल्पनेतून निर्मल वारीच्या संकल्पनेचा जन्म झाला.
सुरवातीची तीन वर्षे लोणी काळभोर व यवत गावात प्रायोगिक तत्त्वावर निर्मल वारीची योजना राबवण्यात आली. स्वयंसेवकांची मदत घेऊन दोन गावांत स्वच्छतेचा प्रयोग यशस्वी करून दाखविण्यात आला. त्यानंतर ज्ञानेश्वर माउलींच्या आळंदी ते पंढरपूर या दिंडी मार्गावर १४ मुक्कामाच्या ठिकाणी व जगतगुरू तुकाराम महाराजांच्या देहू ते पंढरपूर या दिंडी मार्गावर १७ ठिकाणी सेवा सहयोग फाउंडेशनने स्वयंसेवकांच्या मदतीने वारी वारी निर्मल वारीचा नारा यशस्वी करून दाखवला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

म्युझिक थेरपी वर्ग येत्या १ जुलैपासून

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

मानसिक, शारीरिक विकारांवर म्युझिक थेरपीचा प्रभावीपणे वापर करता येणे शक्य आहे. या संदर्भात प्रसिद्ध सतारवादक पं. शशांक कट्टी यांनी सहा महिन्यांचा म्युझक थेरपी अभ्यासक्रम तयार केला असून, येत्या १ जुलैपासून त्याचे वर्ग सुरू होणार आहेत.
पुणे, मुंबई येथे संगीतोपचार प्रमाणपत्र अभ्यासक्रमाच्या १५ बॅच पूर्ण केल्यानंतर कट्टी त्यांच्या ‘सूरसंजीवन म्युझिक थेरपी ट्रस्ट’तर्फे संगीतोपचाराच्या प्रमाणपत्र अभ्यासक्रमाची नवीन बॅच १ जुलैपासून सुरू होत आहे. या अभ्यासक्रमाचे वर्ग शनिवारी आणि रविवारी भरविण्यात येणार आहेत. संगीत उपचाराचे शास्त्र आणि उपचारक संगीत या दोन्ही पद्धती शिकविल्या जाणार आहेत. भारतीय शास्त्रीय संगीत, आयुर्वेद यांची आधुनिक विज्ञानाशी सांगड घालणारा हा अभ्यासक्रम असून, विद्यार्थ्यांना संगीताद्वारे विविध मानसिक आणि शारीरिक विकारांवर केल्या जाणाऱ्या उपचारांविषयी मार्गदर्शन करण्यात येईल.
पुणे आणि मुंबई येथील तज्ज्ञ, डॉक्टर, संगीतकार या अभ्यासक्रमासाठी मार्गदर्शन करणार आहेत. अभ्यासक्रमाचा भाग म्हणून संगीतोपचारावर मोफत कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे. ३० जून रोजी सायंकाळी सहा वाजता ही कार्यशाळा होणार आहे. अभ्यासक्रमाचे वर्ग कर्नाटक संघ, सिद्धार्थ टॉवर्स, कोथरूड येथे होणार आहेत. अधिक माहितीसाठी ९८२००४६९२०, ९००४६७१०५५ या क्रमांकावर संपर्क साधावा तसेच www.sursanjeevan.com या वेबसाइटला भेट द्यावी असे आवाहन ट्रस्टतर्फे करण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images