Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

एसटीवर ‘जय महाराष्ट्र’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
‘महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) प्रत्येक बसवर येत्या काळात ‘जय महाराष्ट्र’ असे लिहिले जाईल, अशी माहिती राज्याचे परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी शनिवारी दिली. तसेच, येत्या काळात एसटीची बांधणी करताना स्टीलच्या बस बांधणीला प्रोत्साहन दिले जाणार आहे, असेही रावते यांनी सांगितले.
एसटीच्या पुणे विभागीय कार्यालयातील सौर ऊर्जा प्रकल्पाचे उद्घाटन रावते यांच्या हस्ते झाले. परिवहन महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक रणजीतसिंह देओल, विभागीय नियंत्रक नितीन मैंद, विभागीय अभियंता राजेंद्र राठोड, कार्यकारी अभियंता सी. एच. जावळे आदी या वेळी उपस्थित होते. कर्नाटकमध्ये ‘जय महाराष्ट्र’ घोषणेवर बंदी घातल्यानंतर शिवसैनिकांनी कर्नाटकच्या एसटी बसवर ‘जय महाराष्ट्र’ लिहून विरोध दर्शविला होता. या पार्श्वभूमीवर आपल्या राज्यातील एसटीवर बसवर अभिमानाने जय महाराष्ट्र लिहिलेले दिसून येईल, असे रावते यांनी स्पष्ट केले.
स्टीलच्या बांधणीतील परिवर्तन बस प्रायोगिक तत्वावर पुणे-शिर्डी मार्गावर नुकतीच सुरू करण्यात आली आहे. एसटीच्या ताफ्यातील बसचे सरासरी आयुर्मान निश्चित असते. त्यानंतर ती बस सेवेतून बाद केली जाते. मात्र, त्या बसची चासी चांगल्या अवस्थेत असते. त्यामुळे एसटीचा भांडवली खर्च वाचविण्यासाठी त्याच चासीवर नव्याने स्टीलच्या माध्यमातून बांधणी केली जाणार आहे. प्रवाशांना चांगल्या सुविधा देणे आणि एसटी बसचे रूप पालटणे हा या मागील उद्देश आहे, असे रावते यांनी या वेळी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


माहिती पुस्तिकेबाबत गोंधळ कायम

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेच्या तिसऱ्या दिवशीदेखील काही शाळांमध्ये इयत्ता अकरावी प्रवेशाच्या माहितीपुस्तिका मिळाल्या नाहीत. काही शाळांनी तर परस्परच प्रवेश प्रक्रिया सोमवारपासून सुरू होणार असल्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे आता सोमवारीच विद्यार्थ्यांना माहिती पुस्तिका मिळणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. दरम्यान, ज्या विद्यार्थ्यांना पुस्तिका मिळाल्या त्यांनी ऑनलाइन अर्जातील भाग क्रमांक एक भरायला सुरुवात केली आहे.
केंद्रीय प्रवेश नियंत्रण समितीतर्फे पुणे-पिंपरी चिंचवड शहरातील ज्युनियर कॉलेजांमध्ये अकरावीला सायन्स, आर्टस्, कॉमर्स, एमसीव्हीसीत शाखेत विद्यार्थ्यांना प्रवेश मिळण्यासाठी अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येते. या प्रवेश प्रक्रियेद्वारे २६७ कॉलेजांमधील ९४ हजार ५८० जागांवर विद्यार्थ्यांना प्रवेश मिळणार आहे. प्रवेश प्रक्रियेची सुरुवात गुरुवारपासून झाली असली, तरी गुरुवारी शाळांमध्ये माहिती पुस्तिकाच पोहोचल्या नाहीत तसेच अर्ज भरण्याची ‘लिंक’देखील दिवसभर बंद होती. त्यामुळे त्या दिवशी विद्यार्थ्यांना अर्जच भरता आले नाहीत. दुसऱ्या दिवशी म्हणजेच शुक्रवारी अर्ज भरण्याची लिंक सुरू होती. मात्र, अनेक शाळांमध्ये माहिती पुस्तिकाच पोहोचल्या नाहीत. त्यामुळे माहिती पुस्तिका मिळविणे आणि अर्ज भरणे या दोन कामांसाठी विद्यार्थी व पालकांना त्रास सहन करावा लागला.
त्या तुलनेने शनिवारी माहिती पुस्तिका न मिळणाऱ्या शाळांची संख्या कमी होती. मात्र, माहिती पुस्तिकेमध्ये अर्ज भरण्यासाठी आवश्यक असणारा लॉग-इन आयडी आणि पासवर्ड असतो. त्यामुळे या पुस्तिका मिळाल्याशिवाय अर्ज भरण्याच्या प्रक्रियेला सुरुवातच करता येत नाही. आज, रविवारी शाळांना सुट्टी असल्याने विद्यार्थ्यांना माहिती पुस्तिका मिळणार नाहीत. या कारणाने विद्यार्थ्यांना आता सोमवारी २९ मे रोजी पुस्तिका खरेदी करून लॉग इन आयडी आणि पासवर्डच्या साह्याने अर्ज भरावा लागणार आहे. काही शाळांच्या प्रशासनाने तर माहिती पुस्तिका मिळत नसल्याचे कारण पुढे करत प्रवेश प्रक्रिया सोमवारपासून सुरू होईल, असेच जाहीर केले आहे. त्यामुळे सोमवारनंतरच प्रवेश प्रक्रियेला सुरळीतपणे सुरुवात होणार असल्याचे चित्र आहे. दरम्यान, झोन आणि मार्गदर्शन केंद्रांवर इतर बोर्डाच्या आणि बाहेरगावाहून येणाऱ्या विद्यार्थ्यांना माहिती पुस्तिका मिळत आहेत. तसेच, अर्जाचा भाग क्रमांक एकची अॅप्रुव्हलची प्रक्रिया सुरू आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नर्सची टवाळी थांबवा

$
0
0

आमदार नीलम गोऱ्हे यांचे आवाहन

म. टा. प्रतिनिधी, पुणे

‘नाटक, चित्रपटांमधून नर्सचे चुकीचे चित्रण केले जाते. या माध्यमांतून नर्सची होणारी टिंगलटवाळी रोखण्याची आवश्यकता असून, संबंधितांना चांगली अद्दल घडवायला हवी,’ असे मत शिवसेनेच्या आमदार डॉ. नीलम गोऱ्हे यांनी व्यक्त केले.
महाराष्ट्र जिल्हा परिषद नर्स संघटनेच्यावतीने परिचारिका दिन आणि जिल्हास्तरीय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी जिल्हा परिषदेचे बांधकाम आणि आरोग्य सभापती प्रवीण माने, आरोग्य उपसंचालक डॉ. हनुमान चव्हाण, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. भगवान पवार, शिवसेना जिल्हा संपर्कप्रमुख विजया शिंदे, महाराष्ट्र जिल्हा परिषद नर्सेस संघटनेच्या अध्यक्षा राजश्री सादीगले, सरचिटणीस रोहिणी आहेर आदी उपस्थित होते.
‘पेशंटची सुश्रृषा करणाऱ्या आऱोग्य सेविकांनी आपल्या आरोग्याकडे लक्ष द्यायला हवे. कामाच्या ठिकाणी त्रास होत असल्यास विशाखा समितीची मदत घ्यायला हवी. नर्सना २४ तास काम करावे लागते. त्यामुळे कामाचा ताण येतो. त्यांच्यासाठी व्यायामशाळा, वाचनालये, सांस्कृतिक केंद्रे पाहिजेत,’ असेही गोऱ्हे म्हणाल्या. या वेळी जिल्ह्यातील नर्सच्या सांस्कृतिक सभागृहासाठी त्यांनी पाच लाख रुपयांचा निधी जाहीर केला.
माने यांनी आरोग्य विभागाच्या कामगिरीचा आढावा घेतला. ‘येत्या दोन ते तीन महिन्यात ग्रामीण भागातील नागरिकांच्या आरोग्य तपासणीसाठी अद्ययावत मोबाइल व्हॅन घेण्यात येणार आहे. जिल्ह्यातील १४०० ग्रामपंचायतींच्या परिक्षेत्रात व्हॅनच्या माध्यमातून आरोग्य तपासणी केली जाणार आहे. डिजिटल प्राथमिक आरोग्य केंद्र, सोलर प्राथमिक आरोग्य केंद्र असे महत्त्वाकांक्षी उपक्रम ही हाती घेण्यात येणार आहे,’ असे माने म्हणाले.

हॉस्पिटलमध्ये विशाखा समिती
नर्सवर अत्याचार किंवा त्यांचे लैंगिक शोषण होऊ नये यासाठी प्रत्येक सरकारी हॉस्पिटलमध्ये विशाखा समिती स्थापन करण्यात यावी, अशा सूचना जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाला देण्यात आल्या आहेत. या समित्यांमध्ये जेष्ठ नर्स आणि स्थानिक सामाजिक संस्थांच्या प्रतिनिधींचा समावेश करावा, अशा मागण्या गोऱ्हे यांनी केल्या.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

राज्यात उभारणार गोदामांचे जाळे

$
0
0

मध्य प्रदेशच्या धर्तीवर मालासाठी अनुदानाचा प्रस्ताव

म. टा. प्रतिनिधी, पुणे

राज्यात धान्याचे उत्पादन वाढण्याची शक्यता असली तरी त्यांच्या साठवणुकीसाठी गोदामे पुरेशी नाहीत. त्यामुळे मध्य प्रदेशच्या धर्तीवर शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या शेतमालाच्या साठवणुकीसाठी अनुदान तत्वावर राज्यात प्रत्येक महसूल मंडळात गोदामे उभारण्याची योजना राबविण्यात येणार आहे. या निमित्ताने राज्यात गोदामांचे जाळे उभारण्यात जाईल.
राज्यातील २,०६५ महसूल मंडळात गोदामे उभारण्याचा प्रस्ताव आहे. त्याबाबत पणन, वखार महामंडळ, कृषी तसेच अन्य अधिकाऱ्यांच्या पथकाने येत्या जूनमध्ये मध्य प्रदेशचा दौरा करावा. दौऱ्यात गोदाम योजनेचा अभ्यास करून प्रस्ताव राज्य सरकारला सादर करावा, अशा सूचना पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. गोदामांच्या साठवणुकीच्या क्षमतेच्या आढावा बैठकीनंतर खोत यांनी ही माहिती दिली. ‘शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या शेतमाल साठवणुकीसाठी राज्यात पुरेशी गोदामे नाहीत. राज्यात अन्नधान्याचे उत्पादन वाढल्यास माल साठवणुकीसाठी गोदामे नसल्याने भाव घसरण्याची शक्यता आहे. त्या वेळी सरकार २५ टक्क्यांपेक्षा अधिक प्रमाणात शेतमाल खरेदी करू शकणार नाहीत. आतापर्यंत सरकारने १०० लाख टन तूर खरेदी केली असून, आणखी ८ ते १० लाख टन तूर खरेदी केली जाईल. सुमारे ६० ते ६५ टक्के तूर सरकारला खरेदी करावी लागेल. कापूस, सोयाबीनचे उत्पादन चांगले येईल. त्यामुळे साठवणुकीसाठी पुरेशी व्यवस्था असावी यासाठी २५० ते १ हजार टनाच्या क्षमतेच्या गोदामांची योजना राबविण्याचा आमचा विचार आहे,’ असे खोत म्हणाले.
राज्यात आजमितीला ७,१२६ गोदामे असून, त्यांची साठवण क्षमता ५७ लाख ९१ हजार ६५५ टन आहे. मात्र, उपलब्ध गोदामांपैकी २५ ते ३० टक्के गोदामे बंद आहेत. गोदाम उभारण्यासाठी ज्या शेतकरी उत्पादक कंपन्या पुढे येतील, त्यांना सरकार ७५ टक्के अनुदान देईल. उर्वरित कर्ज बँकांनी द्यावे. गोदाम योजनेत शेतमाल तारण कर्ज योजनेचा समावेश करावा. या गोदामांना पणन मंडळाने मान्यता द्यावी. त्यामुळे बँकेच्या कर्जाची सोय होऊ शकेल, असेही खोत म्हणाले.

गोदामांमध्ये मिळणार सुविधा
राज्यातील महसूल मंडळात गोदामांची योजना राबविल्याने त्यांची साठवणूक क्षमता सरकारला कळेल. गोदामांमध्ये शेतमालाचे ग्रेडिंग, पॅकिंग करण्यासाठी अद्ययावत यंत्रणा उपलब्ध करण्याचा विचार आहे. प्रत्येक शेतकऱ्याला त्याच्या घरापासून ५ ते ६ किलोमीटर अंतरात गोदाम उपलब्ध झाल्यास त्यांचा वेळ वाचेल. शेतकरी गट, बचत गटांनाही गोदाम योजना लागू केली जाईल, असेही मंत्रिमहोदयांनी स्पष्ट केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कापसाचे २५ वाण सदोष

$
0
0

कृ​षी विभागाकडून सतरा कंपन्यांना बजावल्या नोटिसा

म. टा. प्रतिनिधी, पुणे

कृषी विभागाने राज्यात प्रथमच खरीप हंगामापूर्वी कापसाच्या वाणांच्या तपासणीची मोहीम राबविली. त्यामध्ये १७ कंपन्यांचे २५ वाण सदोष आढळून आले असून, त्यावर बंदी घालण्यात आली आहे. तसेच कंपन्यांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत.
आतापर्यंत कृषी विभागाकडून खरीप हंगाम संपल्यानंतर साधारणतः डिसेंबर महिन्यात कापसाच्या वाणांची तपासणी करण्यात येत होती. मात्र, तोपर्यंत शेतकऱ्यांनी संबंधित सदोष वाण वापरल्यामुळे त्यांचे नुकसान होत असे. त्यामुळे यंदा हंगामापूर्वीच वाण तपासणीची मोहीम राज्यभर राबविण्यात आली. त्यामध्ये १७ कंपन्यांचे २५ वाण सदोष असल्याचे आढळले.
सदोष वाणांमध्ये ‘कीर्तीमान सीड’ या कंपनीचे चार वाण आहेत. या शिवाय ‘कावेरी सीड’ कंपनीचे तीन, श्रीराम बायोजेनेटिक्स, कृषिधन प्रायव्हेट लिमिटेड, सोलर अॅग्रोटेक यांच्या प्रत्येकी दोन वाणांचा समावेश आहे. याशिवाय तुलसी सीड, श्रीसत्य अॅग्री बायोटेक, विभा अॅग्रोटेक, नाथ बायोजीन, अजित सीड, श्रीराम अॅग्रो जेनेटिक्स, झायलेम सीड, नुजीवुडू सीड, सफल सीड, बायर बायो सायन्स, अंकुर सीड आणि सनग्रो या कंपन्याचे प्रत्येकी एक सदोष असल्याचे आढळले आहे.
सदोष वाणांमुळे गेल्या वर्षी अनेक शेतकऱ्यांचे नुकसान झाले होते. जालन्यातील २२३ शेतकऱ्यांना सुमारे ३६ लाख ८३ हजार रुपयांची नुकसानभरपाई द्यावी लागली होती. या पार्श्वभूमीवर कृषी विभागाने राज्यभर विविध वाणांची तपासणी केली. त्यामध्ये २५ वाण सदोष आढळून आले. संबंधित कंपन्यांना नोटिसा पाठविण्यात आल्या असून, पुढील कारवाई केली जाणार असल्याचे कृषी विभागाने नमूद केले.

कंपनी आणि बंदी घातलेले वाण

तुलसी सीड - तुलसी ११८,

श्रीसत्य अॅग्री बायोटेक - एसएससीएच ५५५

विभा अॅग्रोटेक - व्हीबीसीएच १५३३

नाथ बायोजीन - ड्रोन एनबीसी ११

अजित सीड - अजित १९९

श्रीराम अॅग्रो जेनेटिक्स - एसआरसीएच ४०२

कावेरी सीड - जाडू केसीएच १४ के ५९, केसीएच १८९ कॉट बँक, एटीएम केसीएच ३११

श्रीराम बायोजेनेटिक्स - एव्हरेस्ट ३११ - २, केडीसीएचएच ६४१

कृषिधन प्रायव्हेट लिमिटेड - केएसएल १०३१, केडीसीएचएच ६४७

झायलेम सीड - ७३ सी ५२

नुजीवुडू सीड - एनसीएच ९५४

सफल सीड - एसएसबी ९८

बायर बायो सायन्स - फस्ट क्लास एसपी ७१४९

अंकुर सीड - ३२४४

सनग्रो - व्हीआयसीएच ५

सोलर अॅग्रोटेक - सोलर ६६, सोलर ६०

कीर्तीमान सीड - केसीएचएच ९३२, केसीएचएच ८१५२, केसीएचएच ९०४, सरिता १०८

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सर्व गाड्यांत बायोटॉयलेट बसवा

$
0
0

हरित न्यायाधिकरणाचे रेल्वेला आदेश; २०१९पर्यंत दिली मुदत

म. टा. प्रतिनिधी, पुणे

रेल्वे रुळावर थेट पडणाऱ्या मानवी विष्ठेमुळे अनेक पर्यावरणीय समस्या निर्माण होत असून, नागरिकांच्या आरोग्यावरही त्याचा विपरित परिणाम होत आहे. या पार्श्वभूमीवर ३१ डिसेंबर २०१९पर्यंत सर्व रेल्वे गाड्यांमध्ये ‘बायो-टॉयलेट’ बसवावेत, असे आदेश राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाने (एनजीटी) नुकतेच रेल्वे मंत्रालयाला दिले.
रेल्वे गाड्यातील स्वच्छतागृहांची व्यवस्था पर्यावरणीयदृष्ट्या हानिकारक असल्याचा आक्षेप घेऊन ‘सहयोग ट्रस्ट’मधील कायदेविषयक शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाकडे याचिका दाखल केली होती. याचिकाकर्त्यांकडून अॅड. असीम सरोदे यांनी न्यायाधिकरणासमोर रेल्वे रूळांवरील अस्वच्छतेचे वास्तव मांडले.
देशातील सर्व रेल्वे गाड्यांमध्ये २०२१ ते २२ पर्यंत पर्यावरणपूरक स्वच्छतागृह बसविणार असल्याचे पत्र रेल्वे मंत्रालयाने पत्र न्यायाधिकरणाला दिले होते. मात्र, एवढ्या मोठ्या कालावधीवर याचिकाकर्त्यांनी आक्षेप घेतला. त्याची दखल घेऊन न्यायमूर्ती उमेश साळवी आणि प्रा. पी. सी. मिश्रा यांनी रेल्वे मंत्रालयाला ३१ डिसेंबर २०१९ पर्यंत सर्व रेल्वे गाड्यांमध्ये बायोटॉयलेट बसविण्याचे आदेश नुकतेच दिले, अशी माहिती अॅड. सरोदे यांनी दिली. देशातील अंदाजे ५५ हजार कोचमध्ये २.२० लाख बायोटॉयलेट बसविण्याची गरज आहे. गेल्या वर्षीपर्यंत केवळ ५४,१८८ बायोटॉयलेट बसविण्यात आली. पण, त्यावरच समाधान न मानता आगामी कालावधीत वर्षनिहाय काम पूर्ण कसे करणार असल्याचा अहवाल दाखवा, असेही न्यायाधिकरणाने रेल्वेला बजावले आहे. त्यामुळे रेल्वे बोर्डाने सविस्तर अहवाल सादर केला, असेही सरोदे म्हणाले.
‘कॅग’च्या अहवालानुसार देशातील रेल्वेच्या रूळांवर दररोज ३,९८० मेट्रिक टन मानवी विष्ठा साठते. रेल्वेमार्गांवर विविध ठिकाणी थांबलेल्या तसेच धावत्या गाड्यांमधून रूळांवर पडणारी ही घाण रूळांवरील प्रदूषणापुरती मर्यादित नसून, रेल्वेमार्गालगतच्या परिसरात राहणाऱ्या नागरिकांनाही त्याचा त्रास होत असल्याचे याचिकाकर्ते संजय जाधव यांनी सांगितले.

बायोटॉयलेट कशासाठी?
रेल्वे रूळांना गंज चढू नये आणि रूळ असणाऱ्या परि​सरात प्रदूषणाचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी देशभरातील सर्वच रेल्वे गाड्यांमध्ये २०१९पर्यंत बायोटॉयलेट बसविण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यापैकी येत्या ऑक्टोबरपर्यंत ४५,००० बायोटॉयलेट बसविण्याचे उद्दिष्ट रेल्वेने निर्धारित केले आहे. सद्यस्थितीत ९००पेक्षा गाड्यांमधील प्रत्येक कोचमध्ये किंवा सर्वच कोचमध्ये बायोटॉयलेट बसविण्यात आल्याचे रेल्वेतर्फे स्पष्ट करण्यात आले.

खर्च चार लाख रुपये
एक बायोटॉयलेट बसविण्याचा खर्च चार लाख रुपये येतो. प्रत्येक कोचमध्ये चार टॉयलेट बसवावी लागतील. याचाच अर्थ एका कोचमध्ये जर चार बायोटॉयलेट बसवायची असतील, तर सोळा लाख रुपयांचा खर्च येणार असल्याची माहिती रेल्वेतर्फे देण्यात आली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पुणे पोलिस ठरले स्मार्ट

$
0
0

महिला, सायबर सुरक्षेबद्दल दिल्लीत झाला गौरव

म. टा. प्रतिनिधी, पुणे

महिला व सायबर सुरक्षेसंदर्भात उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल पुणे पोलिसांना राष्ट्रीय स्तरावरील स्मार्ट पोलिसिंग पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज (फिक्की) यांच्या वतीने दिल्लीत आयोजित कार्यक्रमात पोलिसांचा सन्मान करण्यात आला.
पुणे पोलिसांच्या ‘बडीकॉप’ योजनेचाही विशेष गौरव करण्यात आला. पुण्याच्या पोलिस आयुक्त रश्मी शुक्ला यांनी हा पुरस्कार स्वीकारला. आधुनिकीकरण आणि तांत्रिकीकरणाच्या मदतीने अंतर्गत सुरक्षिततेसाठी केलेल्या योजनांसंदर्भात फिक्की आणि विवेकानंद इंटरनॅशनलच्या वतीने हा पुरस्कार देण्यात आला. पुरस्कारासाठी केंद्रीय पोलिस दल आणि राज्य पोलिस दलातील १३३ विभागांनी सहभाग घेतला होता. अशी माहिती पुरस्काराची माहिती पोलिस आयुक्त रश्मी शुक्ला आणि सहआयुक्त रवींद्र कदम यांनी पत्रकार परिषदेत दिली. या वेळी उपायुक्त पंकज डहाणे व सुधीर हिरेमठ उपस्थित होते.
‘पुणे पोलिसांकडून महिला सुरक्षिततेला प्राधान्य देण्यात येत आहे. बडीकॉप ही योजना उत्तम प्रकारे राबविण्यात येत आहे. सध्या चार पोलिस ठाण्यात सुरू केलेली योजना येत्या दोन महिन्यात सर्वच महिलांसाठी राबविण्यात येणार आहे. त्यामध्ये महाविद्यालयीन तरुणींनाही सहभागी करून घेतले जाणार आहे. सर्व महिलांसाठी सिटी सेफ ही योजना राबविण्यात येणार आहे. लॉस्ट अँड फाउंड, बीट मार्शल, टीनंट इन्फॉर्मेशन सिस्टीम, माय कम्प्लेंट आदी अॅपही बनविण्यात आली आहेत. त्यामुळे पुरस्कार मिळाल्याचेही शुक्ला यांनी नमूद केले.

‘दाखल गुन्ह्यांचे प्रमाण वाढले’
शहरात प्रतिदिन दोन ते तीन महिला अत्याचाराच्या तक्रारी दाखल होतात. मात्र, महिला अत्याचाराचे प्रकार वाढले नसून, केवळ गुन्हे दाखल होण्याचे प्रमाण वाढल्याचा श्रीमती शुक्ला यांनी दावा केला. महिला अत्याचाराच्या गुन्ह्यांची तत्काळ दखल घेऊन तपास करण्यात येतो. आरोपीवर दोषारोपपत्र दाखल करण्यात येते. तांत्रिक बलात्कार म्हणून त्या गुन्ह्याकडे दुर्लक्ष केले जात नाही, असा दावाही त्यांनी केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘मॉडर्न एज्युकेशन’चे संविधान गहाळ?

$
0
0

आरटीआय कार्यकर्ते विवेक वेलणकर यांचा दावा

म. टा. प्रतिनिधी, पुणे

पुण्यातील वाडिया कॉलेज आणि मुंबईच्या रुपारेल कॉलेजच्या ‘मॉडर्न एज्युकेशन सोसायटी’ची धर्मादाय आयुक्त कार्यालयातील संविधानाची प्रत गहाळ झाल्याचा आरोप माहिती अधिकार आणि सामाजिक कार्यकर्ते विवेक वेलणकर यांनी केला आहे. सामाजिक बांधिलकी म्हणून चालविल्या जाणाऱ्या या संस्थेची संविधानाची प्रत गहाळ होणे ही गंभीर बाब असल्याचे वेलणकर यांनी म्हटले आहे.
मॉडर्न एज्युकेशन सोसायटीची स्थापना १९३२मध्ये अपील सोसायटी अॅक्टनुसार झाली. संस्थेची नोंदणी १९५०मध्ये ट्रस्ट अॅक्टमार्फत करण्यात आली. या संस्थेला धर्मादाय आयुक्तालयाकडून नोंदणी प्रमाणपत्र देण्यात आले असून, ते सुरक्षित आहे. वेलणकर आणि त्यांच्या सहकारी अंजली दमानिया यांनी दोन महिन्यांपूर्वी धर्मादाय आयुक्तांकडे संस्थेच्या संविधानाच्या छायांकित प्रतीची माहितीच्या अधिकारात मागणी केली. मात्र, त्यांना देण्यास टाळाटाळ करण्यात आली. सर्वप्रथम संविधान प्रत सापडत नाही, असे उत्तर त्यांना देण्यात आले. त्यानंतर वेलणकर यांनी अपिलीय अधिकाऱ्यांकडे अर्ज केला. त्याच्या सुनावणीला संबंधित अधिकारी उपस्थितच राहिले नाहीत. ते पाहून संविधानाची प्रत गहाळ झाल्याचे स्पष्ट होते, असे वेलणकर म्हणाले.
या संस्थेंतर्गत पुणे आ​णि मुंबई येथे लाखो विद्यार्थ्यांनी शिक्षण घेतले आहे. या संस्थेच्या संविधानात नमूद केल्याप्रमाणे संस्थेतील शिक्षक हेच पदाधिकारी आणि सदस्य आहेत. तसेच, ही संस्था सामाजिक बांधिलकीवर चालविली जाते. मात्र, संविधान प्रतच गहाळ झाल्याने त्याचा गैरफायदा घेतला जाऊ शकतो, असे वेलणकर यांचे म्हणणे आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


व्याकरणाबद्दल अनास्था का

$
0
0

डॉ. यास्मिन शेख यांचा सवाल; जीवनगौरव प्रदान

म. टा. प्रतिनिधी, पुणे

‘व्याकरण म्हटले की अनेकांच्या कपाळावर आठ्या येतात. व्याकरणाला रूक्ष म्हटले जाते. खरेतर तो सुंदर विषय आहे. आपण बोलतो ती भाषा म्हणजे काय, याचा उलगडा व्याकरणामुळे होतो. तरी समाजात व्याकरणाबद्दल तिरस्कार, अनास्था का आहे,’ असा सवाल करून ज्येष्ठ व्याकरणतज्ज्ञ डॉ. यास्मिन शेख यांनी शनिवारी समाजाच्या निरक्षरतेवर बोट ठेवले. ‘शाळांमधून मराठीची विटंबना होत आहे. आई-वडील मुलांशी मोडक्या-तोडक्या भाषेत बोलतात. भाषेविषयी प्रेम निर्माण करण्याची जबाबदारी तुमचीच आहे ना,’ असे विचारून भाषाशास्त्राचा सुंदर वर्ग भरवला.

महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या १११ व्या वर्धापन दिनानिमित्त शेख यांना ज्येष्ठ विचारवंत पुष्पा भावे यांच्या हस्ते ‘मसाप जीवन गौरव पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. त्या वेळी पुरस्काराविषयी भावना व्यक्त करतानाच शेख यांनी आपल्या रसाळ वाणीत भाषाशास्त्राचा धडा दिला. डॉ. सु. प्र. कुलकर्णी यांना ‘भीमराव कुलकर्णी कार्यकर्ता पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. राजा फडणीस पुरस्कृत ‘मसाप उत्कृष्ट शाखा पुरस्कार’ चाळीसगावच्या शाखेला आणि रत्नाकर कुलकर्णी यांच्या स्मरणार्थ देण्यात येणारा ‘मसाप उत्कृष्ट कार्यकर्ता पुरस्कार’ मसापच्या माजी कार्यवाह नंदा सुर्वे आणि नंदकुमार सांवत यांना देण्यात आला. अमृतमहोत्सवी वर्षाकडे वाटचाल करणाऱ्या सोलापूरच्या शाखेचा सत्कार या वेळी करण्यात आला. विश्वस्त उल्हास पवार, डॉ. शिवाजीराव कदम, कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, प्रमुख कार्यवाह प्रकाश पायगुडे , कोषाध्यक्ष सुनीताराजे पवार आदी पदाधिकारी या वेळी उपस्थित होते. परिषदेचे अध्यक्ष डॉ. रावसाहेब कसबे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते.

‘व्याकरण हा माझ्या ध्यासाचा, आवडीचा आणि अभ्यासाचा विषय आहे. मी त्याची तज्ज्ञ नाही,’ अशी भावना व्यक्त करून शेख म्हणाल्या, की ‘भाषाविज्ञानाची जोड दिल्याशिवाय शास्त्रशुद्ध व्याकरण आणि भाषा शिकता येणार नाही. व्याकरणामुळेच भाषेच्या पोटात शिरता येते. व्याकरण हा अवघड विषय नाही. तो कसा शिकविला जातो, यावर ते अवलंबून आहे. भाषा आणि व्याकरण विभक्त करता येत नाहीत. भाषेमध्ये व्याकरण अनुश्चित असते. समोरचा बोलताना चुकतोय, हे आपल्याला कळते म्हणजे आपल्याला व्याकरण कळते, असा अर्थ होतो.’ उद्धव कानडे यांनी सूत्रसंचालन केले.

मराठीमध्ये इतर भाषांचा अतिरिक्त वापर होत असून भाषेचा चुराडा, चिरफाड करणे चालू आहे. भाषेच्या रक्षणासाठी तरुण पिढी पुढे यावी, असे प्रयत्न केले पाहिजेत. इतर भाषा सक्तीच्या झाल्या की आपल्याला मराठीची जाणीव होते.
डॉ. यास्मिन शेख

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘भाषा हा जगण्याचा श्वास’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

‘भाषा ही केवळ अभिमानाचा भाग नसून, ती जगण्याचा श्वास आहे. भाषा कोणाच्या गर्वाचे साधन नसून, ती माणूस आणि अधिक माणूस होण्याचे साधन आहे. राम गणेश गडकरींनी लिहिले ते त्या काळापुरते होते. आवेशाच्या भरात लोक इतिहास विसरतात. आज जे तलवारी उपसण्याचे प्रकार होत आहेत, ते योग्य नाहीत. अधिसत्ता तुमची भाषा, प्रतीके यांवर सत्ता गाजवण्याचा प्रयत्न करते. याचा विसर पडू न देता आपली प्रतिक्रिया प्रगल्भ देता आली पाहिजे. भाषा आणि व्याकरण राजकारणात गुंतली आहे,’ अशा शब्दांत ज्येष्ठ विचारवंत प्रा. पुष्पा भावे यांनी शनिवारी भाषा आणि त्यावरून होणाऱ्या राजकारणावर टीकेची झोड उठवली.
‘ज्ञानसंस्था वाटाव्यात अशा शेखबाईंसारख्या कमी व्यक्ती आसपास उरल्या आहेत,’ याकडे लक्ष वेधून भावे यांनी भाषेचे महत्त्व, राजकारण यावर प्रकाश टाकला. ‘भाषेचे एक चलन असते; पण तेच बाजूला राहते. व्याकरण शिकवायचे म्हणजे नियम शिकवायचे असे स्वरूप आले आहे. भाषा हे अभिव्यक्त होण्याचे साधन आहे. ज्याला भाषा येते तोच विचार करू शकतो,’ याकडे त्यांनी लक्ष वेधले.
भाषेचे प्रश्न टोकदार होत आहेत. भाषेचा सामाजिक इतिहास लक्षात घेतला जात नाही. विविध समुदायांना वाटते की आपली भाषा आणि अशिक्षित यांच्यामध्ये अंतर आहे. या गैरसमजातून वाद होतात. आधी भाषा वापरली जाते मग व्याकरण तयार होते. आधी साहित्य लिहिले जाते मग त्याला साहित्यशास्त्राचे रूप येते. सामुदायिक अस्मिता टोकदार होत आहे. उद्रेक करणाऱ्यांनी हे लक्षात घ्यावे की कलाकृती एका काळात होते. त्याला काही संदर्भ असतात. ते नाकारले तर आजचे काहीच उद्या टिकणार नाही, असेही श्रीमती भावे यांनी नमूद केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘एफयू कॉन्सर्ट’मध्ये कलाकारभेटीची संधी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

सध्याच्या तरुणाईचे आवडते कलाकार ‘लाइव्ह इन कॉन्सर्ट’च्या माध्यमातून चाहत्यांशी संवाद साधणार आहेत. ‘फ्रेंडशिप अनलिमिटेड’ या आगामी सिनेमातील अभिनेता आकाश ठोसर, अभिनेत्री संस्कृती बालगुडे, यांच्यासह चित्रपटाचे निर्माते-दिग्दर्शक महेश मांजरेकर, सत्या मांजरेकर चाहत्यांशी गप्पा मारणार आहेत. उद्या, सोमवारी (ता. २९)‘एफयू लाइव्ह इन कॉन्सर्ट’चे आयोजन करण्यात आलं आहे.
कोथरूड सिटीप्राइडमध्ये सायंकाळी सात ते नऊ या वेळेत गाणी, गप्पा आणि नृत्याची ही मैफल रंगणार आहे. ‘महाराष्ट्र टाइम्स कल्चर क्लब’ या उपक्रमाचा कल्चरल पार्टनर आहे. चित्रपटातील वैदेही परशुरामी, मेधा मांजरेकर, मयुरेश पेम, माधव देवचके, शुभन किरोदियन, टीव्हीवरचा लोकप्रिय कलाकार पवनदीप राजन, संगीत दिग्दर्शक विशाल मिश्रा आणि समीर सापतीसकर, रितू बर्मन, स्विमीनी वाडकर, प्रवीण भोसले, सिद्धेश आचरेकर, सचिन पाठक ही मंडळी सहभागी होणार आहेत. ‘मटा कल्चर क्लब’च्या सदस्यांना या कलाकारांना भेटण्याची आणि धमाल करण्याची संधी मिळणार आहे. हा कार्यक्रम सर्वांसाठी खुला असणार आहे. या कॉन्सर्टमध्ये धमाल खेळांचेही आयोजन करण्यात आले असून, विजेत्यांना कलाकारांसह सिनेमाच्या प्रीमियरला उपस्थित राहण्याची संधी मिळणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पीएफ कपातीचा प्रस्ताव फेटाळला

$
0
0

कर्मचारी संघटना, औद्योगिक कंपन्यांचा विरोध

म. टा. प्रतिनिधी, पुणे

कर्मचारी भविष्य निर्वाह निधीमधील (ईपीएफ) कर्मचारी व कंपन्यांकडून दिले जाणारे योगदान प्रत्येकी दोन टक्क्यांनी कमी करण्याचा निर्णय शनिवारी पुण्यात झालेल्या बैठकीत बहुमताने फेटाळून लावण्यात आला. सरकारच्या या प्रस्तावाला कर्मचारी संघटना, औद्योगिक कंपन्या आणि सरकारी प्रतिनिधींनीही जोरदार विरोध केल्याने हा प्रस्ताव बारगळला आहे. दरम्यान, याबाबतचा अंतिम निर्णय सरकारच घेईल, अशी भूमिका केंद्रीय कामगार मंत्र्यांनी मांडली आहे.

कर्मचारी भविष्यनिर्वाह निधी संघटनेचे (ईपीएफओ)चे संचालक मंडळ असलेल्या विश्वस्त समितीची बैठक केंद्रीय मंत्री बंडारू दत्तात्रय यांच्या अध्यक्षतेखाली शनिवारी पुण्यात पार पडली. यामध्ये या निर्णयाला बहुमताने विरोध करण्यात आला.

कर्मचारी आणि कंपनी किंवा मालक यांचे, महागाई भत्ता व मूळ वेतन मिळून होणाऱ्या एकूण मूळ वेतनातून दिले जाणारे योगदान कमी करण्याचा सरकारचा विचार होता. त्यामुळे कर्मचाऱ्यांकडे खर्च करण्यासाठी अधिक पैसा हाताशी राहील, त्याचवेळी कंपन्या किंवा मालक यांचे कर्मचाऱ्यांप्रती असणारे दायित्वही कमी होईल, असाही सरकारचा दावा होता. मात्र, हा प्रस्ताव उघड होताच कर्मचारी संघटनांनी त्याविरोधात दंड थोपटले होते. त्याचेच प्रतिबिंब शनिवारच्या बैठकीत दिसून आले.

चर्चेत कर्मचारी संघटनांच्या प्रतिनिधींबरोबरच उद्योगजगाच्या प्रतिनिधींनी व सरकारी प्रतिनिधींनीही या प्रस्तावाला विरोध केल्याने बंडारू दत्तात्रय व कामगार मंत्रालय सचिवांची चांगलीच पंचाईत झाली. वाढता विरोध पाहून त्यांना नरमाईचे धोरण स्वीकारावे लागले. अखेर बैठकीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत या प्रस्तावाला विरोध झाल्याचे दत्तात्रय यांनी जाहीर केले. याबाबतचा अंतिम निर्णय केंद्र सरकारच घेईल, असे बंडारू दत्तात्रय यांनी स्पष्ट केले.


सामाजिक सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य असल्याचा दावा सरकारकडून केला जातो. हा प्रस्ताव मान्य झाला असता, तर सध्या ईपीएफच्या माध्यमातून दिल्या जाणाऱ्या सामाजिक सुरक्षेचे प्रमाण ३१ टक्क्यांवरून २७ टक्क्यांवर आले असते.

- प्रभाकर बाणसुरे, सदस्य, ईपीएफओ विश्वस्त मंडळ

सरकारला ईपीएफ योजना इतर योजनांच्या समकक्ष आणायची होती, तर अन्य योजनांमधील योगदानाचे प्रमाण ईपीएफइतके वाढवायचे होते.

- ए. के. पद्मनाभन, उपाध्यक्ष, ‘सीटू’

सरकारची भूमिका कॉर्पोरेट क्षेत्राला धार्जिणी व कामगारांवर अन्याय करणारी असल्याने आम्ही त्याला विरोध केला.

- शंकर साहा, सरचिटणीस, आयट

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शहरात नालेसफाईची ६० टक्केच कामे पूर्ण

$
0
0

शहरात नालेसफाईची ६० टक्केच कामे पूर्ण

Prashant.Aher
@timesgroup.com
Tweet : @PrashantAherMT

पुणे : पावसाच्या आगमनाची चाहूल लागली असतानाच पालिका प्रशासनाकडून नालेसफाईच्या कामांना वेग आला आहे. नालेसफाईची कामे अंतिम टप्प्यात आली असल्याचा प्रशासनाचा दावा असला, तरी जेमतेम ६० टक्केच कामे झाली असून अर्थसंकल्पीय तरतूद उशिरा मिळाल्याने नालेसफाईच्या कामांमध्ये दिरंगाई झाली असल्याचे सांगण्यात येत आहे.
दरम्यान, प्रशासनाने कोथरूड, कात्रज, वडगाव शेरी, मार्केट यार्ड, धायरी आदी परिसरात कल्व्हटर्स बांधून पाणी रस्त्यांवर साचणार नाही, याचे नियोजन केले आहे. नाले तुंबल्याने सोसायट्यांमध्ये पाणी घुसण्याचे प्रकार घडणार नाहीत, यासाठी पालिका प्रशासनाने खबरदारीची पावले उचलली आहेत. मान्सूनच्या आगमनाला अवघे काही दिवस शिल्लक राहिले आहेत. महापौर मुक्ता टिळक यांनी नालेसफाईच्या कामांचा वारंवार आढावा घेऊन सद्यस्थितीची माहिती घेतली आहे.
नालेसफाईची कामे क्षेत्रीय कार्यालयांकडून सुरू आहेत. नालेसफाई आणि पावसाळी गटारे सफाईच्या घेण्यात आलेल्या आढाव्यांमध्ये ज्या ठिकाणी जास्त पाणी साठते, अशी १२५ ठिकाणे प्रशासनाने शोधली आहेत. गेल्या वर्षी पाणी साठणारी १५० ठिकाणे होती. यावर्षी ही ठिकाणे कमी झाल्याचा प्रशासनाचा दावा आहे. महापौर टिळक यांनी नालेसफाईच्या कामांत लक्ष घालून तातडीने दुरुस्तीची कामे करावीत, अशा सूचनाही खातेप्रमुखांना दिल्या आहेत. पालिका प्रशासनाने धोकादायक बांधकाम आणि ब्लू लाइनमधील घरांना नोटिसा दिल्या आहेत. चेंबरची दुरुस्ती, चुकीच्या पद्धतीने बसवलेले चेंबर खचून पडलेले खड्डे यांचीही दुरुस्ती करण्यासंदर्भात क्षेत्रीय आयुक्त आणि ज्युनियर इंजिनीयर यांच्याकडून कामे सुरू आहेत. नाल्यांमध्ये असलेला कचरा, गाळ आणि त्यावरील अतिक्रमण ही खरी सफाईपुढील
आव्हाने आहेत.
कर्वेनगर येथे नदीपात्रात मोठ्या प्रमाणात राडारोडा टाकण्यात येतो आहे. हा राडरोडा टाकण्यात आल्याने या ठिकाणी नदीपात्रातील पाण्याला त्याचा अडथळा होऊ शकतो. या प्रकरणी प्रशासनाने काही व्यक्तींना नोटिसाही बजावल्या आहेत. दरम्यान, कर्वेनगर येथील नालेसफाईची कामे ठेकेदारांना देण्यास उशीर झाल्याने कामे पूर्ण होण्यास आणखी काही कालावधी लागणार आहे. हडपसर परिसरातील नालेसफाईची कामे ५० ते ६० टक्के पूर्ण झाली असल्याचा दावा करण्यात येत आहे. या परिसरात नाल्यांवरील अतिक्रमण हा कळीचा मुद्दा बनला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रस्त्यांची दुरुस्ती वेळेपूर्वी अशक्यच

$
0
0

रस्त्यांची दुरुस्ती वेळेपूर्वी अशक्यच

Chaitanya.machale
@timesgroup.com
Tweet : @ChaitanyaMT

पुणे : पावसाळा सुरू होण्यापूर्वी शहरातील खोदलेल्या रस्त्यांची दुरुस्ती पूर्ण करण्याचे पालिका प्रशासनाने पाहिलेले स्वप्न अर्धवट राहण्याची शक्यता आहे. महापालिकेने मान्यता दिलेल्या रस्ते खोदाईपैकी सुमारे ७० ते ८० किलोमीटरची खोदाई अद्यापही पूर्ण झालेली नाही. पालिकेने यापूर्वी शहरातील विविध भागांत सुरू केलेली रस्ते खोदाईची कामे अपूर्ण असल्याने अनेक भागांत रस्त्यांची दुरवस्था झाली असून, वाहतुकीचे तीन तेरा वाजल्याचे चित्र सर्वत्र पहायला मिळत आहे.
शहरात विविध सेवा पुरविण्यासाठी अनेक खासगी कंपन्यांना पालिकेने शहरातील २२५ किलोमीटर लांबीचे रस्ते खोदाई करण्यास मान्यता दिली आहे. यापैकी केवळ दीडशे ते पावणेदोनशे किलोमीटरच्या रस्त्यांची खोदाई आजपर्यंत पूर्ण झाली असून, ३१ मे पर्यंत कंपन्यांना रस्त्यांची खोदाई करता येणार असल्याने पुढील दोन दिवसांत रात्रीचा दिवस करून अधिकाधिक खोदाई करण्याचा प्रयत्न या खासगी कंपन्यांकडून केला जाणार आहे. सेवा पुरविण्यासाठी खोदलेले रस्ते पूर्ववत करण्याचे काम पालिकेच्या पथ विभागाने हाती घेतले असले, तरी अजूनही बहुतांश भागातील रस्त्यांची कामे शिल्लक असल्याने पावसाळा सुरू होण्यापूर्वी ही सर्व कामे पूर्ण होणे अशक्य आहे. पावसाळा सुरू होण्यास अवघे काही दिवस शिल्लक असतानाही प्रशासनाच्या ‘कृपादृष्टी’मुळे रस्ते खोदाई सुरूच असल्याचे वारंवार समोर आले आहे. शहरातील नागरिकांना सेवा पुरविण्यासाठी आवश्यक असलेली केबल टाकण्यासाठी दरवर्षी खासगी कंपन्यांकडून रस्ते खोदाईचे प्रस्ताव महापालिकेच्या पथ विभागाकडे सादर करण्यात येतात. एमएनजीएल, महावितरणसह अन्य काही शासकीय संस्थांबरोबरच शहरात स्मार्ट सिटी योजनेंतर्गत मोफत वायफाय सुविधा पुरविण्यासाठी एल अॅण्ड टी कंपनीला रस्ते खोदाई करण्याची मान्यता पालिका प्रशासनाने दिली आहे.
सेवा पुरविण्यासाठी खोदाई करण्यात आलेल्या रस्त्यांपैकी शंभर किलोमीटर लांबीचे रस्ते हे ‘खोदाईमुक्त तंत्रज्ञाना’च्या माध्यमातून खोदण्यात आले आहेत. उर्वरित शंभर ते सव्वाशे किलोमीटर लांबीचे रस्ते मात्र जुन्या, पारंपरिक पद्धतीनेच खोदण्यात आले. यामध्ये मोफत वायफाय सेवा पुरविणाऱ्या एल अॅण्ड टी कंपनीने आपला मनमानी कारभार करत चुकीच्या पद्धतीने रस्ते खोदल्याने हे सर्व रस्ते दुरुस्त करण्याचे आव्हान महापालिकेच्या पथ विभागासमोर आहे. पावसाळा सुरू होण्यापूर्वी शहरातील खोदलेले रस्ते दुरुस्त केले जातील, असा दावा प्रशासनाने केला असला, तरी सध्या शहरात सर्वत्र जोरदार असलेली रस्ते खोदाई लक्षात घेता पावसाळा सुरू होण्यापूर्वी हे रस्ते दुरुस्त होणार का, असा प्रश्न नागरिकांकडून विचारला जात आहे.
जंगली महाराज रोड, म्हात्रे पूल ते राजाराम पूल या डीपी रस्त्याबरोबरच शहराचा मध्यवर्ती भाग असलेल्या रविवार पेठेतील बोहरी आळी येथील रस्त्यांचे काम गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे. मात्र, या सर्व कामांचा वेग लक्षात घेता पुढील काही दिवसांत ही कामे पूर्ण होणे अशक्य असून याचा जोरदार फटका नागरिकांना बसण्याची शक्यता आहे. ही कामे ठरवून दिलेल्या मुदतीत पूर्ण करावीत, यासाठी नागरिकांनी पालिकेकडे वारंवार पाठपुरावा करूनही पदरी निराशा पडत असल्याची तक्रार केली जात आहे. या रस्त्यांच्या अपूर्ण कामामुळे या तिन्ही रस्त्यांवर वाहनचालकांची तारांबळ उडून वाहतुकीचा खेळखंडोबा होत असल्याचे चित्र पहायला मिळत आहे.
आयुक्तांची कंपन्यांवर मेहरबानी शहरातील रस्ते खोदण्यासाठी पालिकेकडून खासगी कंपन्यांना ३० एप्रिलपर्यंत मुदत दिली जाते. त्यानंतर महिनाभरात म्हणजे ३१ मेपर्यंत खोदलेल्या रस्त्यांची दुरुस्ती पालिका प्रशासनाकडून केली जाते. मात्र, यंदा पालिका आयुक्त कुणाल कुमार यांनी रस्ते खोदण्यासाठी खासगी कंपन्यांना एक महिना मुदतवाढ दिल्याने ३१ मेपर्यंत रस्ते खोदाईच सुरू राहणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यातच काही कंपन्यांवर मेहरबानी करत आयुक्त कुमार यांनी रस्ते खोदाईचे शुल्क माफ केले असल्याने रस्ते दुरुस्तीचा संपूर्ण भुर्दंड पालिकेला उचलावा लागणार आहे. पालिका रस्ते दुरुस्ती करणार असल्याने खोदलेले रस्ते आहे तसेच ठेवण्याचा उद्योग या कंपन्यांकडून केला जात आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

यंदाचा पावसाळा विजेच्या दृष्टीने सुखद?

$
0
0

यंदाचा पावसाळा विजेच्या दृष्टीने सुखद?

Sujit.Tambade
@timesgroup.com
Tweet : @sujittambadeMT

पुणे : पावसाचे आगमन झाले की, रस्त्यावर पाणी साचण्याबरोबर नागरिकांना दरवेळी शॉक बसतो तो वीजपुरवठा खंडित होऊन तासन् तास अंधारात राहण्याचा. हा अनुभव लक्षात घेऊन महावितरणने यंदा उन्हाळ्यातच झाडांच्या फांद्या छाटण्यापासून ते वितरण रोहित्रांचे अर्थिंग तपासणे, भूमिगत केबल टाकणे, विजेचे खांब आणि तारा बदलणे आदी कामे पूर्ण केली आहेत. तरीही वीज खंडित झाली, तर प्रत्येक विभागात एक याप्रमाणे शहरात १२ फिरती पथके, तर ग्रामीण भागात पावसाचे प्रमाण जास्त असलेल्या मुळशी, लोणावळा आणि मावळ परिसरात विभागनिहाय प्रत्येकी दोन पथके नेमली आहेत. त्यामुळे यंदाचा पावसाळा विजेच्या दृष्टीने सुखद धक्का देणारा असण्याची शक्यता आहे.पावसाळ्यात वीजपुरवठा खंडित झाल्यावर महावितरणच्या कर्मचाऱ्यांपासून ते सामान्य माणसापर्यंत सगळ्यांची उडणारी त्रेधातिरपीट लक्षात घेऊन महावितरणने मे महिन्यात पावसाळापूर्व तयारीची कामे पूर्ण करण्याची मोहीम आखली होती. पुणे परिमंडळाचे मुख्य अभियंता रामराव मुंडे यांनी याबाबतचे नियोजन केले होते. त्यानुसार कोणती कामे प्राधान्याने करायची, याचा आराखडा तयार करण्यात आला होता. त्यानुसार बहुतांश कामे पूर्णत्वाकडे गेली आहेत.पावसाळ्यात वीजप्रवाह खंडित होण्यास झाडांच्या फांद्या कारणीभूत ठरत असतात. त्यामुळे पुणे आणि पिंपरी चिंचवड शहर; तसेच पुणे जिल्ह्याच्या परिसरातील प्रमुख मार्गांवरील फांद्या छाटण्याचे काम करण्यात आले आहे. ही कामे झाल्यानंतर तां‌त्रिक दुरुस्तीकडे लक्ष देण्यात आले. अनेकदा एखाद्या क्षुल्लक वाटणाऱ्या गोष्टीमुळे वीजप्रवाह खंडित होऊ शकतो. त्यामुळे त्या बाबींकडे विशेष लक्ष देण्यात आले. त्यानुसार तुटलेले पीन आणि डिस्क इन्सूलेटर्स बदलण्याची कामे करण्यात आली आहेत. वितरण रोहित्रांचे अर्थिंग तपासणे, ऑइल फिल्टरेशन, उपकेंद्रातील ब्रेकर्सची दुरुस्ती, बॅटरी चार्जिंग, फ्यूज बदलणे, भूमिगत केबल टाकणे, विजेचे खांब आणि तारांचे मजबुतीकरण, विजेचे खांब आणि तारा बदलणे किंवा झोल काढणे, जुन्या फिडर पिलरमध्ये इन्सूलेशन स्प्रे मारणे ही नित्यनियमाने करावी लागणारीही कामे करण्याकडे महावितरणने भर दिला आहे.पाऊस आल्यावर कोणत्या परिसरात पाणी साचते, याची माहिती महावितरणने घेऊन त्यानुसार पावसाचे पाणी साचणाऱ्या परिसरातील फिडर पिलरची जमिनीपासून उंची वाढविण्याची कामे करण्यात आली आहेत.पावसाळ्यात विजेच्या तारांवर आणि खांबांवर झाडे पडल्याने वीजपुरवठा खंडित होतो. त्यामुळे आवश्यक उपाययोजना करण्यासाठी सर्व विभागांतर्गत साधनसामग्रींनी सज्ज अशी फिरती पथके तयार ठेवण्यात येणार आहेत. महावितरणने केलेल्या या कामांमुळे यंदा वीजपुरवठा सुरळीत राहण्याची आशा बाळगायला हरकत नाही.

संपर्कासाठी महावितरणची सुविधा
•टोल फ्री क्रमांक १८००-२००-३४३५ किंवा १८००-२३३-३४३५ आणि १९१२
•हे तीन टोल फ्री क्रमांक २४ तास उपलब्ध
•वीजपुरवठा बंद किंवा देखभाल व दुरुस्तीच्या कालावधीची माहिती एसएमएसद्वारे मिळण्यासाठी वीजग्राहकांनी मोबाइल क्रमांकांची नोंदणी करावी
•त्यासाठी महावितरणच्या ९२२५५९२२५५ या क्रमांकावर बारा अंकी ग्राहक क्रमांक आणि वीजग्राहकाचा ई-मेल आयडी ही माहिती टाइप करून पाठवावी
•महावितरणच्या www.mahadiscom.in या वेबसाइटवरून किंवा महावितरण मोबाइल अॅपवरही मोबाइल क्रमांक नोंदणी करता येतील. पावसाळ्यात नागरिकांनी घ्यावयाची खबरदारी
•घरातील वीज पुरवठ्याला अर्थिंग करून घ्यावे
•घरातील स्वीच बोर्ड किंवा विजेच्या उपकरणांचा ओलाव्याशी संपर्क होणार नाही, याची दक्षता घ्यावी
•ओल्या कपड्यांवर इस्त्री करू नये
•घरात शॉर्टसर्किट झाल्यास मेनस्वीचवरून वीज पुरवठा बंद करावा
•विजेच्या खांबांना जनावरे बांधणे, दुचाकी टेकवून ठेवणे, तार बांधून कपडे वाळत घालणे असे प्रकार करू नयेत
•घरावर असलेल्या डिश किंवा अँटिना या विजेच्या तारांपासून दूर असाव्यात
•पावसाळ्यात झाडांच्या फांद्यांमुळे विजेच्या तारा तुटल्यास संबंधित तारांना किंवा लोंबकळणाऱ्या तारांना स्पर्श करू नये
•पत्र्याच्या घरात राहणाऱ्या नागरिकांनी अधिक खबरदारी घ्यावी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


कांदा, टोमॅटोसह मिरचीही महागली

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

उन्हाळ्यामुळे मार्केट यार्डातील तरकारी विभागात रविवारी फळभाज्यांची आवक कमी झाली. घटलेली आवक आणि वाढती मागणी यामुळे कांदा, टोमॅटो, हिरवी मिरचीच्या दरात वाढ झाली. त्याशिवाय कोबी वगळता कोणत्याही भाज्यांचे दर उतरले नाहीत. अन्य भाज्यांचे भाव स्थिर आहेत.

राज्यासह परराज्यातून मोठ्या प्रमाणावर फळभाज्यांची आवक होत असते; परंतु उन्हामुळे मार्केट यार्डात १४० ते १५० ट्रक एवढी आवक झाली आहे. हिमाचल प्रदेशातून ५०० गोणी मटारची आवक झाली आहे. गुजरात, आंध्र प्रदेश, कर्नाटकातून कोबीची १० ट्रकची आवक झाली. कर्नाटकातून तोतापुरी कैरी ५ ते ६ टेम्पो, आंध्र प्रदेश, तामिळनाडतून शेवगा ४ ते ५टेम्पो, इंदूरहून गाजराची १० टेम्पोची आवक झाली आहे. गुजरात आणि कर्नाटकातून ८ ते १० टेम्पो हिरवी मिरचीची आवक झाली.
स्थानिक भागातून सातारी आल्याची १४०० ते १५०० गोणींची आवक झाली. टोमॅटोची चार ते साडेचार हजार पेट्यांची आवक झाली. फ्लॉवरची १८ ते २० टेम्पो, तर कोबीची १० ते १२ टेम्पोची आवक झाली आहे. भुईमूग शेंगांची २०० ते २५० गोणींची आवक झाली आहे. तांबड्या भोपळ्याची १० ते १२ गोणींची आवक झाली. गावरान कैरीची ८ ते १० टेम्पोची आवक झाली. चिंचेची २५ ते ३० गोणींची आवक झाली.
कांद्याची पुणे विभागातून १०० ट्रक, तर इंदूर, आग्रा, आणि गुजरातहून बटाट्याची ६० ते ६५ ट्रक एवढी आवक झाली. मध्य प्रदेश, गुजरातमधून लसणाची साडेपाच ते सहा हजार गोण्यांची आवक झाली आहे. पालेभाज्यांची आवक घटली असून, त्यामुळे त्यांचे दर वाढले आहेत. कोथिंबीरची सव्वालाख गड्डी, तर मेथीची २० हजार गड्डीची आवक झाली आहे.
पवित्र रमजान महिन्याला सुरुवात झाल्याने बाजारात सर्वच फळांना मागणी वाढली आहे; परंतु उन्हाळ्यामुळे बाजारात फळांची आवक कमी असल्याने भावही वाढले आहेत. शहरात रमजानमुळे सर्वत्र इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात येते. त्याकरिता फळांना विशेष मागणी असते. म्हणून रमजान महिन्यात लिंबे, डाळिंब, कलिंगड, अननस, चिक्कू, खरबूज, पेरू, पपई अशा सर्वच फळांना मागणी आहे. त्यामुळे फळांच्या दरात महिनाभर वाढ राहील, असा अंदाज व्यापाऱ्यांनी वर्तविला आहे. केरळहून अननसाचे ५ ट्रक, मोसंबी ५० टन, संत्रा ३ टन, डाळिंबाची ४० ते ५० टन, पपई २० ते २५ टेम्पो, चिक्कूची ६०० गोणींची आवक झाली आहे. कलिंगडची २० ते २५ टेम्पो, खरबूज १० ते १२ टेम्पो, कर्नाटकहून आंब्याची चार ते पाच हजार पेटी इतकी आवक झाली. रत्नागिरी हापूसची १ ते २ हजार पेट्या, तर कर्नाटक हापूसची चार ते पाच हजार पेट्या आवक झाली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

हापूस आता पंधरा दिवसच

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

रत्नागिरी हापूस आंब्याचा हंगाम शेवटच्या टप्प्यात आला असून, आणखी १५ दिवस बाजारात हा आंबा उपलब्ध राहण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. मात्र, हापूस जाता जाता पुन्हा भाव खाण्याची शक्यता आहे.

सध्या रत्नागिरीच्या हापूस आंब्याच्या एका डझनाला २०० ते २५० रुपये असा दर मिळाला आहे. रत्नागिरी हापूसनंतर गुजरातहून केसर आणि हापूस आंब्याचा हंगाम लवकरच सुरू होईल. रत्नागिरी हापूस आंब्याची आता आवक घटत चालली आहे. रविवारी बाजारात १००० ते १२०० पेट्यांची आवक झाली, तर बाजारात २००० ते ३००० हजार तयार हापूस पेट्या उपलब्ध आहेत. त्यामुळे सध्या रत्नागिरी हापूस आंब्याचा तुटवडा जाणवत नाही. सध्या रत्नागिरी हापूसचे दर सामान्यांच्या आवाक्यात आले आहेत; परंतु येत्या ५ ते ६ दिवसांत कच्च्या हापूसची आवक पूर्ण थांबेल. बाजारात आणखी १० ते १५ दिवसच तयार आंबा उपलब्ध असेल. त्यामुळे अखरेच्या टप्प्यात हापूस आंब्याचे दर वाढतील, अशी शक्यता आंब्याचे व्यापारी अरविंद मोरे यांनी व्यक्त केली.

रत्नागिरीसह देवगड हापूस आंब्याची मोठी आवक बाजारात झाली होती. सुरुवातीला या आंब्याच्या एका डझनासाठी १००० ते १६०० रुपये दर होता. आता हे दर २०० ते २५० रुपयांपर्यंत कमी झाले आहेत. चांगला दर्जेदार आंबा सध्या बाजारात दाखल होत आहे. आंब्याला सध्या मागणी वाढली आहे. कोकणात पाऊस सुरू झाल्यास लवकर हंगाम संपण्याची शक्यताही
त्यांनी व्यक्त केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

संगणक अभियंता तरुणीची फसवणूक

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, पिंपरी
संगणक अभियंता तरुणीच्या हरवलेल्या एटीएम कार्डमधून अज्ञाताने एक लाख रुपये काढून घेऊन फसवणूक केली. ही घटना २३ ते २४ मे दरम्यान बावधन येथे घडली. या प्रकरणी मोनिकाकुमार सुरेशकुमार (वय २९, रा. बावधन) यांनी हिंजवडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
मोनिकाकुमार या संगणक अभियंता असून, हिंजवडी येथील एका खासगी कंपनीत त्या नोकरी करत आहेत. मोनिकाकुमार मंगळवारी एका कंपनीत मुलाखत देण्यासाठी बावधन येथील एका हॉटेलमध्ये गेल्या होत्या. त्या वेळी हॉटेलचे बिल त्यांनी ऑनलाइन भरले. परंतु, हॉटेलमधून जात असताना एटीएम कार्ड घेऊन जाण्याचे विसरल्या. त्यांच्या एटीएम कार्डचा वापर करून अज्ञाताने एक लाख रुपयांची रोकड एटीएममधून काढून घेतली आहे. याबाबत हॉटेलमधील कर्मचारी आपल्याला माहीत नसल्याचे सांगत असल्याचे, पोलिसांनी सांगितले. पुढील तपास हिंजवडी पोलिस तपास करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

राजकीय अस्पृश्यता वाढीस लागली

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पिंपरी
‘स्वातंत्र्यवीर सावरकर आयुष्यभर अस्पृश्यतेविरुद्ध लढले. आज मात्र राजकीय अस्पृश्यता वाढीस लागली आहे. ही राजकीय अस्पृश्यता आपल्याला भविष्यात बाजूला करण्याची गरज आहे. लढाई राजकीय असावी ती वैयक्तिक असू नये, हे काही जणांनी शिकण्याची गरज आहे,’ असे मत पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांनी व्यक्त केले.
पिंपरी-चिंचवड महापालिकेतील स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर आणि शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या तैलचित्र अनावरण सोहळा रविवारी (२८ मे) झाला, त्यावेळी बापट बोलत होते.
‘स्वातंत्र्यवीर सावरकरांनी आपल्या जीवनात विविध क्षेत्रांत संचार केला. क्रांतिकारक म्हणून सोन्यासारखे व्यक्तिमत्त्व आपल्याला भेटले. हिंदु धर्मातील रुढी, पंरपरांविरुद्ध ते लढले. स्वातंत्र्यवीर सावरकर आणि बाळासाहेब ठाकरे हे दोघेही हिंदुत्ववादी होते. पण, त्यांचे हिंदुत्व हे धार्मिक भावनेने नाही; तर राष्ट्रीयत्वाने भारलेले होते.’
‘आपले विचार समाजात रुजवताना बाळासाहेब यांना अनेक खस्ता खाव्या लागल्या आहेत. पत्रकार, व्यंगचित्रकार म्हणून स्वकर्तृत्वावर उदयाला आलेल्या बाळासाहेबांचे आज जगभरात नाव घेतले जात आहे,’ असे बापट म्हणाले. ‘स्वातंत्र्यवीर सावरकर आयुष्यभर अस्पृश्यतेविरुद्ध लढले. आज मात्र राजकीय अस्पृश्यता वाढीस लागली आहे. भविष्य काळात राजकीय अस्पृश्यता बाजूला करण्याची गरज आहे.’
‘आम्ही अनेक कार्यक्रमाला जातो. कोण कुठल्या पक्षाचा आहे, याचा विचार करत नसतो. लढाई विचारांची असू शकते ती व्यक्तिगत जीवनात कधीच असता कामा नये, हा आदर्श सावरकर आणि बाळासाहेबांनी आपल्याला दिला असून, तो अजूनही काही जणांनी शिकण्याची आवश्यकता आहे,’ असेही बापट म्हणाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

​ प्रत्येकाचे योगदान स्वीकारले पाहिजे

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पिंपरी
‘स्वातंत्र्यवीर सावरकरांचे देशासाठी खूप मोठे योगदान आहे. सावरकर खऱ्या अर्थाने या देशाला मिळालेले एक आदर्श पुरुष आहेत. परंतु, काही जणांना वाटते, की आपण सावरकरांना झाकू आणि ते झाकले जातील, असे कदापि होऊ शकत नाही. केंद्रात, राज्यात आणि महापालिकेत त्याच विचारांचे लोक सत्तेवर येणे हा सावरकरांच्या विचारांचा विजय आहे. सावरकरांना झाकण्याचा प्रयत्न करणाऱ्यांनी हे लक्षात ठेवले पाहिजे,’ असे मत राज्याचे सांस्कृतिक मंत्री विनोद तावडे यांनी केले. तसेच ‘राजकीय विचार वेगवेगळे असले तरी प्रत्येकाचे योगदान स्वीकारले पाहिजे,’ असेही ते म्हणाले.
परी-चिंचवड महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर आणि शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या तैलचित्राचे अनावरण तावडे यांच्या हस्ते रविवारी (२८ मे) झाले. त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महापौर नितीन काळजे होते. पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट, खासदार श्रीरंग बारणे, भाजप शहराध्यक्ष आमदार लक्ष्मण जगताप, महेश लांडगे, गौतम चाबूकस्वार, प्रांत संघचालक सुरेश जाधव, उपमहापौर शैलजा मोरे, सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार, स्थायी समिती सभापती सीमा सावळे, शिवसेनेचे गटनेते राहुल कलाटे, आयुक्त श्रावण हर्डीकर आदी उपस्थित होते.
‘स्वातंत्र्यवीर सावरकरांनी त्यांच्या आयुष्यात खूप भोगले आहे. सावरकरांच्या व्यक्तिमत्त्वाचा अभ्यास करताना अनेक पैलू अभ्यासायला मिळाले. त्यांची देशभक्ती, राष्ट्रभक्ती या गोष्टी पाठ झाल्या आहेत,’ असे सांगत तावडे म्हणाले, ‘समाजाची मानसिकता तयार करण्याचे काम सावरकरांनी त्यावेळी केले. सावरकरांचे बोलणे त्यावेळी समाजाला झेपत, रुजत होते का असा प्रश्न मला नेहमी पडायचा. याविषयी अनेक साहित्यिकांसोबत आपण चर्चा करत होतो. आपल्याला लोक स्वीकारणार नाहीत. ही मानसिकता ठेवून त्यांनी ही भूमिका मांडली असल्याचे आज जाणवत असून, सावरकरांचे असे अनेक पैलू आहेत. पुढचे १०० वर्षे पाहायचे आणि त्यासाठी समाजाला तयार करायचे, या पद्धतीने त्यांनी काम केले आहे.’

‘सावरकर खऱ्या अर्थाने या देशाला मिळालेले एक आदर्श पुरुष आहेत. दुर्देवाने त्यावेळी संसदेत त्यांचे तैलचित्र लावताना काही जणांनी त्यांच्यावर बहिष्कार टाकण्याचे काम केले असेल. परंतु, तुम्ही न गेल्याने सावरकरांनी केलेले कार्य लपून राहणार नाही. सावरकरांच्या गीतातील चार ओळी काढल्याने सावरकर लहान होत नाहीत; तर तुम्ही लहान होतात आणि यातून आपल्या मनाचा कोतेपणा दिसतो.’
‘या सभागृहामध्ये सावरकर, बाळासाहेब ठाकरे आणि राजीव गांधी यांचे तैलचित्र आहे. आज आपण क्रीडमंत्री आहोत म्हणून दिवंगत पंतप्रधान राजीव गांधी यांच्या जयंतीला दिल्या जाणाऱ्या युवा पुरस्काराची तारीख आपण बदलली नाही. त्यांचे युवकांसाठी मोठे योगदान आहे. ते आपण नाकारू शकत नाही. प्रत्येकाचे योगदान स्वीकारले पाहिजे. राजकीय लढाई राजकीय असते. सावरकर व बाळासाहेबांचे हिंदुत्वाचे विचार मान्य नसतील तर ते त्या प्लॅटफॉमवर खोडण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे,’ असे तावडे म्हणाले.
‘सावरकर आणि बाळासाहेबांचे तैलचित्र लावताना सभागृहातील सदस्यांना आनंद नक्कीच झाला असेल; पण आपल्या प्रत्येक शब्दावर या दोघांचे लक्ष राहणार आहे, हे नगरसेवकांनी लक्षात ठेवले पाहिजे. महापुरुषांचे, नेत्यांचे तैलचित्र लावण्यामागे नवीन पिढीने त्यातून प्रेरणा घेतली पाहिजे. पुढे दिशा दिली पाहिजे हाच उद्देश असतो,’ असेही तावडे म्हणाले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार यांनी केले. सहायक आयुक्त अण्णा बोदडे यांनी सूत्रसंचान केले. तर, महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी आभार मानले.

‘राजकीय कारकीर्दीतील सर्वोच्च आनंद’
‘पिंपरी-चिंचवड महापालिकेतील सभागृहात स्वा. विनायक दामोदर सावरकर आणि हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या तैलचित्राचे अनावरण माझ्या हस्ते करण्यात आले. हा माझ्या राजकीय कारकीर्दीतील सर्वोच्च आनंद आहे. देशात आणि राज्यात भाजपची सत्ता आली हा सावरकरांच्या विचारांचा विजय आहे,’ असे मत राज्याचे शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी या वेळी व्यक्त केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images