Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

चावडी वाचन ठरले शेतकऱ्यांसाठी वरदान

0
0

म. टा. वृत्तसेवा, बारामती
शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याचा विषय असलेल्या सात-बारा कागदपत्रातील चुका शोधून त्या तत्काळ दुरुस्त करण्यासाठी राज्य सरकारने ‘चावडी वाचना’चा अभिनव उपक्रम हाती घेतला आहे. बारामती तालुक्यात नुकत्याच झालेल्या चावडी वाचनात सात-बारा कागदपत्रातील तब्बल २५० त्रुटींची दुरुस्ती करण्यात आल्याने हा उपक्रम शेतकऱ्यांसाठी वरदान ठरला आहे.
​शेतकऱ्यांना सात-बाराच्या उताऱ्याबाबत सर्व माहिती मिळणे आवश्यक असते. यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्र दिनानिमित्त हा चावडी वाचनाचा कार्यक्रम हाती घेतला आहे. सरकारने सात-बारा दुरुस्ती आणि चावडी वाचन विशेष मोहीम सुरू केली आहे. यानुसार ऑनलाइन सात-बारा उतारा योग्य आहे का, हे तपासून पाहण्याची आणि काही फेरबदल असेल तर तो तातडीने करण्याची संधी शेतकऱ्यांना उपलब्ध झाली आहे. बारामती तालुक्यात सध्या ऑनलाइन सात-बारा उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. त्यातील त्रुटी दूर करण्यासाठी एडिट मोड्यूल म्हणजेच सात-बारा दुरुस्तीचे सॉफ्टवेअर उपलब्ध करून दिल्याने हे सर्व शक्य झाले आहे.
बारामती तालुक्यात एकूण ११७ गावांमध्ये ७७ हजार ७६० सात-बारा उतारे आहेत. त्यापैकी १६ गावांचे चावडी वाचन पूर्ण झाले आहे. यात सात-बारावर फेरफार नंबर नसणे, नावात दुरुस्ती, इतर हक्कातील दुरुस्ती आणि गटाचे क्षेत्र न जुळणे अशा त्रुटी होत्या. त्या तत्काळ दुरुस्ती करण्यात आल्या.


चावडी वाचनाचा कार्यक्रम तालुक्यातील सर्व गावांत १५ जुलैपर्यंत पूर्ण होईल. या कार्यक्रमामुळे शेतकऱ्यांचा वेळ व श्रम वाचत आहेत. तसेच प्रशासनाचीही चांगली प्रतिमा नागरिकांमध्ये पोहोचत आहे.
- हनुमंत पाटील, तहसीलदार

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


दहा लाखांची बॅग व्हॅनचालकाने केली परत

0
0

म. टा. प्रतिनिधी, येरवडा
भोसरी ते विश्रांतवाडी मारुती इको व्हॅनमधून प्रवास करीत असताना सोबत असलेली दहा लाख रुपयांची विसरलेली बॅग व्हॅनचालकाने प्रामाणिकपणे विश्रांतवाडी पोलिसांना आणून दिली. तसेच, अद्यापही माणुसकी जिवंत असल्याचे दाखवून दिले. पोलिसांनी खातरजमा केल्यानंतर दहा लाखांची बॅग परत केली. परंतु, हरवलेली बॅग शोधण्यासाठी मात्र काही वेळ पोलिसांची धावपळ उडाली होती.
येरवड्यातील कल्याणीनगर भागात राहणारे आशिष विजय भन्साळी (वय ४१,) हे कपड्यांचा व्यवसाय करतात. तसेच, कामानिमित्त भन्साळी शनिवारी भोसरीला गेले होते. सायंकाळी साडे पाच वाजता भोसरीहून घरी येण्यासाठी मारुती इको व्हॅन (एमएच १२, जीझेड २८१५) या शेयर गाडीत बसले.
विश्रांतवाडी बसस्टॉपजवळ भन्साळी व्हॅनमधून उतरले; मात्र सोबत असलेली दहा लाखांची बॅग व्हॅनमध्येच विसरले. विश्रांतवाडीला उतरून रिक्षाने घरी जात असताना येरवड्यात बॅग विसरल्याचे लक्षात आले. त्यामुळे लगेचच विश्रांतवाडी पोलिस ठाणे गाठून दहा लाखांची बॅग चोरीला गेल्याचे सांगितले.
एवढ्या मोठ्या रकमेची बॅग चोरीला गेल्याने विश्रांतवाडी तपास पथकाने परिसरातील सीसीटीव्हीचे फुटेज घेतले तसेच चौकशी सुरू केली. तब्बल दोन तासानंतर आपल्या व्हॅनमध्ये दहा लाखांची बॅग कोण्यातरी प्रवाशाने विसरल्याचे व्हॅनचालक अनिल नथुराम पवार (३६, वडारवस्ती, विश्रांतवाडी ) याला लक्षात आल्यावर त्यांनी बॅग पोलिसांच्या ताब्यात दिली.
पोलिसांनी बॅगमधील पैशांची खातरजमा केल्यानंतर आशिष भन्साळी यांना दहा लाखांची बॅग परत केली. एवढी मोठ्या रकमेची बॅग परत आणून दिल्याने पोलिसांनी अनिल पवार यांचा सत्कार केला.
वरिष्ठ पोलिस निरीक्षक कमलाकर ताकवले, उपनिरीक्षक विशाल मोहिते, सुनील खंडागळे, उत्तम कदम, सुभाष आव्हाड, विनायक मुधोळकर आणि प्रवीण भलचिम या वेळी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मान्सूनपूर्व पाऊस बरसण्याचे संकेत

0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

मान्सूनची केरळच्या दिशेने आगेकूच सुरू असतानाच येत्या दोन ते तीन दिवसांत राज्यात मान्सूनपूर्व पाऊस बरसण्याचे संकेत हवामान विभागाने दिले आहेत. येत्या दोन दिवसांत गोव्यासह राज्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे. पुण्यात दोन दिवस आकाश सामान्यतः ढगाळ राहणार असल्याचाही अंदाज आहे.
मान्सूनपूर्व पावसासाठी वातावरणात होत असलेल्या बदलांमुळे सध्या राज्यातील कमाल आणि किमान तापमानातील तफावत कमी झाल आहे. हवेतील दमटपणाही वाढला आहे. त्यामुळे पाऊस पडण्यासाठी पोषक वातावरण निर्माण झाले आहे.
राज्यात रविवारी कोकण, गोव्याच्या काही भागात कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय वाढ झाली. मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात सरासरीच्या तुलनेत कमाल तापमान वाढले होते. पुण्यात शनिवारच्या तुलनेत कमाल तापमानात घट झाली आणि रविवारी कमाल तापमान ३५. ८ अंश सेल्सिअस तर किमान तापमान २४.४ अंश सेल्सिअस नोंदविण्यात आले. सकाळपासूनच हवेत दमटपणा जाणवत होता. संध्याकाळनंतर आकाशात ढग दाटून आले आणि वाराही सुटला होता. पुढील दोन दिवस राज्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडणार असून पुण्यात आकाश सामान्यतः ढगाळ राहील, असा अंदाज वेधशाळेने वर्तविला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दुर्बिणीद्वारे गर्भाशय प्रत्यारोपण यशस्वी

0
0

अवयव स्वीकारणाऱ्या पेशंटची प्रकृती ठणठणीत

म. टा. प्रतिनिधी, पुणे

गर्भाशय प्रत्यारोपणाच्या शस्त्रक्रियेनंतर सोलापूर तसेच गुजरातमधील महिलेच्या शरिराने दात्याचे गर्भाशय स्वीकारले असून, कोणताही संसर्ग झालेला नाही. त्यामुळे दुर्बिणीद्वारे करण्यात आलेले प्रत्यारोपण यशस्वी ठरले आहे. त्यामुळे आता मातृत्त्वसुखापासून वंचित राहणाऱ्या अनेक मातांना आशेचे किरण निर्माण झाले आहेत.
देशातील पहिले गर्भाशय प्रत्यारोपण १८ मे रोजी गॅलेक्सी केअर हॉस्पिटलमध्ये करण्यात आले. प्रत्यारोपणानंतर संसर्ग होतो का, हे पाहणे महत्त्वाचे होते. संसर्गही झाला नाही आणि गर्भाशयातील रक्ताहिन्याही कार्यरत आहेत. तसेच, पेशंटच्या शरिराने दात्याचे गर्भाशय स्वीकारले असल्याचे चाचणीत निष्पन्न झाले आहे. त्यामुळे प्रत्यारोपणातील दोन्ही टप्पे पूर्ण केल्याने शस्त्रक्रिया यशस्वी झाली आहे, अशी माहिती गॅलेक्सी हॉस्पिटलचे वैद्यकीय संचालक आणि कॅन्सरतज्ज्ञ डॉ. शैलेश पुणतांबेकर आणि डॉ. मिलिंद तेलंग यांनी दिली. प्रत्यारोपणानंतर पेशंटच्या प्रकृतीसह कामगिरीची माहिती देण्यासाठी पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. त्या वेळी प्रत्यारोपणात सहभागी तज्ज्ञ डॉ. संजीव जाधव, डॉ. पंकज कुलकर्णी, डॉ. उदय फडके आदी उपस्थित होते.
प्रत्यारोपणानंतर दोन टप्पे पूर्ण झाले असून त्यामुळे पेशंट ठणठणीत आहे. आणखी २१ दिवसानंतर गर्भाशयाची बायोप्सी केली जाईल, असे डॉ. पुणतांबेकर म्हणाले.


काही डॉक्टरांनी गर्भाशयाच्या प्रत्यारोपणाची माहिती दिल्याने आम्ही हा पर्याय स्वीकारला. आता प्रत्यारोपण यशस्वी झाल्याने मला आणि माझ्या कुटुंबाचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे.
पहिल्या महिलेची प्रतिक्रिया (मूळ रा. सोलापूर)

आमच्या लग्नाला नऊ वर्षे झाली आहेत. त्या महिलेला पहिले मूल दगावले. त्यानंतर तीन गर्भपात झाले. त्यानंतर एका डॉक्टरांनी ह्युस्ट्रोस्कोपी करण्याचा सल्ला दिला. त्यासाठी पुण्यात आल्यानंतर गर्भाशयाच्या प्रत्यारोपणाचा पर्याय समोर आला. सरोगसी किंवा मूल दत्तक घेण्याचा निर्णयापेक्षा प्रत्यारोपण योग्य वाटले.
दुसऱ्या महिलेचा पती (मूळ रा. बडोदा)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नाराज अधिकारी ‘मॅट’मध्ये जाणार

0
0

दाद मागण्याची प्राथमिक चाचपणी सुरू

म. टा. प्रतिनिधी, पुणे

पालिकेतील काही अधिकाऱ्यांना ‘अभय’ देऊन, काहींच्या मुदतीपूर्वीच बदल्या करण्याच्या आयुक्तांच्या मनमानी निर्णयाविरोधात दुखावलेल्या अधिकाऱ्यांनी आता महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणाकडे (मॅट) दाद मागण्याची तयारी सुरू केली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांमधील कर्मचाऱ्यांना ‘मॅट’ लागू करण्याच्या मुंबई हायकोर्टाच्या सूचनांनुसार मॅटमध्ये जाण्याची प्राथमिक चाचपणी करण्यात येत आहे.
पालिका आयुक्त कुणाल कुमार यांनी प्रशासकीय कामकाजाच्या दृष्टिकोनातून पंधरा क्षेत्रीय कार्यालयांच्या सहायक आयुक्तांच्या कामाची पुनर्रचना केली. त्यातच तीन वर्षे पूर्ण होण्याआधीच क्षेत्रीय अधिकाऱ्यांच्या (सहायक आयुक्त) बदल्या करण्यात आल्या. त्यामुळे नाराज अधिकाऱ्यांनी राजकीय दबाव टाकून अवघ्या काही तासांमध्ये पुन्हा मनपसंत क्षेत्रीय कार्यालय पदरात पाडून घेण्याची किमया साधली. काही अधिकाऱ्यांची तीन वर्षे पूर्ण झाल्यानंतरही त्यांना संबंधित ठिकाणीच कायम ठेवण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त केले. गेल्या वर्षी पालिकेतील सहायक आयुक्तांच्या नव्या क्षेत्रीय कार्यालयात नियुक्त्या करण्यात आल्या होत्या. वर्ष ते सव्वा वर्षामध्येच पालिका आयुक्तांनी पुन्हा त्यातील काही अधिकाऱ्यांची नव्या ठिकाणी नियुक्ती केली आहे. तसेच, काही अधिकाऱ्यांची यापूर्वी काम केलेल्या ठिकाणी वर्णी लावण्यात आली आहे. त्यामुळे, पालिका आयुक्तांविरोधात अधिकाऱ्यांमध्ये प्रचंड नाराजी असून, आता त्याविरोधात मॅटमध्ये जाण्याची तयारी काही अधिकाऱ्यांनी सुरू केली आहे.

आयुक्तांचा मनमानी कारभार
सेवा ज्येष्ठतेनुसार सहायक आयुक्तांची पदोन्नती गेल्या अनेक महिन्यांपासून प्रलंबित आहे. त्याविरोधात, मुंबई हायकोर्टात याचिका दाखल करण्यात आली होती. त्यावेळी, सहा आठवड्यांमध्ये ज्येष्ठतेनुसार पदोन्नती देण्याचे आदेश कोर्टाने दिले होते. तरीही, कोर्टाच्या आदेशांचे उल्लंघन करून आयुक्तांचा कारभार सुरू असल्याची टीका केली जात आहे. पालिका आणि राज्य सरकारमधील सत्ताधारी भारतीय जनता पक्षाचे आयुक्तांवर कोणतेही नियंत्रणच नसल्याचा आरोप केला जात आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जगभरातून पुण्यात नोंदणी

0
0

गर्भाशय प्रत्यारोपणासाठी जगभरातूनही होतेय नोंदणी

म. टा. प्रतिनिधी, पुणे

गर्भाशय प्रत्यारोपणाचे तंत्र यशस्वी ठरल्यानंतर देशातून तसेच विदेशातील महिलांनी पुण्याकडे धाव घेतली असून, आतापर्यंत एकतीस महिलांनी गॅलेक्सी हॉस्पिटलकडे नोंदणी केली आहे.
देशातील पहिले गर्भाशय प्रत्यारोपण पुण्यातील गॅलेक्सी हॉस्पिटलमध्ये नुकतेच यशस्वी झाले. गर्भाशयाच्या पिशवीचा कॅन्सर होणे अथवा अन्य कारणास्तव गर्भाशय काढण्याची वेळ महिलांवर आल्याने त्यांना मूल जन्माला घालणे अशक्य होते. अशा महिलांना मूल जन्माला घालण्याची संधी गर्भाशय प्रत्यारोपणामुळे मिळाली आहे.
सोलापूरच्या एकवीस वर्षीय महिलेवर गर्भाशय प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया १८ मे रोजी पुण्यात करण्यात आली. ही शस्त्रक्रिया यशस्वी झाल्यानंतर लगेच दुसऱ्या दिवशी बडोदा येथील चोवीस वर्षीय महिलेचे गर्भाशय प्रत्यारोपण करण्यात आले. या पार्श्वभूमीवर तिसरे प्रत्यारोपण जूनच्या पहिल्या आठवड्यात करण्यात येणार आहे. या पार्श्वभूवर पुण्यात गर्भाशय प्रत्यारोपण करून घेण्यासाठी महिलांकडून मोठ्या प्रमाणावर चौकशी सुरू झाल्याचे तज्ज्ञांनी सांगितले. ‘पुण्यात देशातील पहिले गर्भाशय प्रत्यारोपण यशस्वी झाले. त्यामुळे राज्यातून तसेचे अन्य राज्यांतून आमच्याकडे दररोज विचारणा होत आहे. आतापर्यंत ४२ महिलांनी गर्भाशय प्रत्यारोपणासाठी नोंदणी केली आहे. त्यापैकी दोन महिला लंडन आणि आयर्लंड येथील आहेत. या महिलांच्या प्रत्यारोपणासाठीच्या कागदपत्रांसह कायदेशीर बाबी तपासल्या जाणार आहेत. त्यानंतर त्याबाबत निर्णय घेण्यात येईल,’ अशी माहिती गॅलेक्सी हॉस्पिटलचे वैद्यकीय संचालक आणि गर्भाशय प्रत्यारोपण तज्ज्ञ डॉ. शैलेश पुणतांबेकर यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मेट्रो स्टेशनसाठी लवकरच सर्वेक्षण

0
0

शिवाजीनगर-हिंजवडीसाठी ‘पीएमआरडीए’ घेणार पुढाकार

म. टा. प्रतिनिधी, पुणे

‘शिवाजीनगर ते हिंजवडी’ मेट्रो प्रकल्प राबवण्यासाठी नेमकी किती जागा लागणार आहे, सरकारी-खासगी जागेचे प्रमाण काय असेल, ही जागा कशा स्वरूपात मिळवावी लागेल, याचा आढावा घेण्यासाठी ‘पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणा’तर्फे (पीएमआरडीए) लवकरच या मार्गावरील जागांचे सर्वेक्षण केले जाणार आहे. येथील काही भाग विकसित असला, तरी मेट्रोच्या दृष्टीने कोणत्या जागांचा व्यावसायिकदृष्ट्या विकास करणे शक्य आहे, याची चाचपणी केली जाणार आहे.
‘पीएमआरडीए’तर्फे शिवाजीनगरते हिंजवडी दरम्यान २३ किमीचा मेट्रो मार्ग निर्माण केला जाणार आहे. शिवाजीनगर येथील धान्य गोदामापासून ते हिंजवडीतील मेगापोलिस सर्कलपर्यंतच्या या मार्गावर २३ स्टेशन असतील. सार्वजनिक-खासगी भागीदारीतून (पीपीपी) विकसित केल्या जाणाऱ्या या मेट्रोसाठी सध्या जागतिक स्तरावरून निविदा मागविण्यात आल्या आहेत. या निविदेची मुदत २२ जूनला संपणार असून, तत्पूर्वी मेट्रोसाठी लागणाऱ्या जागेचे सर्वेक्षण करण्याचा निर्णय ‘पीएमआरडीए’ने घेतला आहे. गणेशखिंड रस्ता, बाणेर रस्ता, बालेवाडी स्टेडियम, वाकड या मार्गे मेट्रो जाणार असल्याने स्टेशनसाठी कोणत्या जागा लागतील, यासाठी हे सर्वेक्षण केले जाणार आहे.
मेट्रोचा हा संपूर्ण मार्ग उन्नत (एलिव्हेटेड) स्वरूपाचा असल्याने त्यासाठी भूसंपादन करावे लागले नाही, तरी मेट्रो मार्गावर २३ स्टेशन असल्याने त्यासाठी ‘पीएमआरडीए’ला मोठ्या प्रमाणात जागा लागणार आहे. हिंजवडी परिसरातील स्टेशनसाठी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडे (एमआयडीसी) जागेची मागणी केली जाणार असून, काही स्टेशनसाठी पोलिसांच्या ताब्यातील जागा मेट्रोला ताब्यात घ्यावी लागणार आहे, असे संकेत ‘पीएमआरडीए’चे आयुक्त किरण गित्ते यांनी दिले. वेगवेगळ्या स्टेशनसाठी नेमकी किती सरकारी जागा घ्यावी लागेल; तसेच किती खासगी जागा संपादित करावी लागेल, हे सर्वेक्षणानंतर स्पष्ट होईल, असेही त्यांनी नमूद केले.

शिवाजीनगर ते हिंजवडी मेट्रो आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्यासाठी बहुतांश स्टेशनचा व्यावसायिक दृष्टीने विकास करणे गरजेचे आहे. त्यादृष्टीने, योग्य जागांचा शोध या सर्वेक्षणातून घेतला जाणार आहे.
किरण गित्ते, आयुक्त, पीएमआरडीए

भूमिपूजनाच्या आश्वासनाचे काय?
पालिका निवडणुकांच्या प्रचार सभेमध्ये शिवाजीनगर-हिंजवडी मेट्रो प्रकल्पाला गती देण्यात आली असून, त्याचे भूमिपूजन एप्रिलमध्ये केले जाणार असल्याचे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले होते. त्यादृष्टीने, पीएमआरडीएने निविदा मागवल्या असल्या, तरी त्याला आतापर्यंत तीनवेळा मुदतवाढ देण्यात आली आहे. आयटी क्षेत्रातील अनेक कर्मचाऱ्यांकडून शिवाजीनगर-हिंजवडी मेट्रोच्या प्रगतीबाबत सातत्याने विचारणा केली जात असून, त्याचे काम केव्हा सुरू होणार, याबाबत सर्वांनाच उत्सुकता आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कामे द्या; खर्च भागवू

0
0

‘बालचित्रवाणी’च्या कर्मचाऱ्यांची भावना; सरकारला आवाहन

म. टा. प्रतिनिधी, पुणे

‘तीस वर्षांपासून अधिक काळ आम्ही बालचित्रवाणीत काम करत आहोत. या कालावधीत सहा हजारांपेक्षा अधिक दर्जेदार कार्यक्रमांची निर्मिती केली. त्यामुळे आम्हाला अजून काम करण्याची इच्छा आहे. बालचित्रवाणीचा वर्षभराचा खर्च अडीच कोटी रुपये आहे. सरकारने आम्हाला त्यांच्याच विविध विभागांची ऑडिओ आणि व्हिडिओ स्वरूपातील कामे दिल्यास हा खर्च सहज निघून आर्थिक विवंचनेचा प्रश्न सुटेल. सरकारने ठरविल्यास हे सहज शक्य होईल,’ अशी मागणी ‘बालचित्रवाणी’चे कर्मचारी करीत आहेत.
राज्य शैक्षणिक तंत्रज्ञान संस्था अर्थात बालचित्रवाणी आर्थिक विवंचनेत असल्याचे आणि आधुनिक काळात बालचित्रवाणीची गरज संपल्याचे कारण पुढे करून शिक्षण विभागाने बालचित्रवाणीला टाळे ठोकण्याचा निर्णय घेतला आहे. बालचित्रवाणीच्या नियामक मंडळाच्या बैठकीत शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्या अध्यक्षतेखाली हा निर्णय घेण्यात आला. विशेष म्हणजे काही महिन्यांपूर्वीच बालचित्रवाणीला झळाळी देणार अशी घोषणा तावडे यांनी केली होती. त्यामुळे या घोषणेचा तावडे यांना विसर पडल्याचे दिसत असल्याची टिप्पणी कर्मचाऱ्यांनी केली.
बालचित्रवाणीला केंद्र सरकारच्या मनुष्यबळ विकास मंत्रालयाकडून एप्रिल २००३ पर्यंत अनुदान मिळत होते. या अनुदानातून बालचित्रवाणीत काम करणारे निर्मिती सहायक, कॅमेरामन, संकलक, वेशभूषाकर, तंत्रज्ञ आणि इतर कर्मचारी आदींचे वेतन भागवले जायचे. मात्र, अनुदान बंद झाल्याने कार्यक्रमाच्या उत्पन्नातून बालचित्रवाणीचा खर्च आणि कर्मचाऱ्यांचे वेतन भागविले जायचे. एप्रिल २०१४ मध्ये खर्च आणि पगार थांबवण्यात आला. त्यामुळे पगार मिळण्यासाठी कर्मचारी कोर्टात गेल्यावर राज्य सरकारला ३२ कर्मचाऱ्यांचे पगार देण्याचा आदेश दिला. या आदेशामुळे कर्मचाऱ्यांना थकीत वेतन मिळाले. मात्र, गेल्या आठ महिन्यांचा पगार अजून झालेला नाही. तसेच, शिक्षण विभागाने कर्मचाऱ्यांना नव्या नोकरीची शाश्वती न देता त्यांना आतापर्यंतचे आर्थिक लाभ घेण्यासाठी एक महिन्याची नोटीस दिली आहे. सरकारने खर्च भागविण्यासाठी आम्हाला कामे दिल्यास ती पूर्ण करून त्यांना नफा मिळवून देण्याचा देखील प्रयत्न करू. सरकारने अशा प्रकारचा निर्णय घेतल्यास बालचित्रवाणी वाचेल आणि सर्व प्रश्न सुटतील. त्यामुळे तावडे यांनी योग्य निर्णय असे मत अनेक कर्मचाऱ्यांनी ‘मटा’शी बोलताना व्यक्त केले.

दर्जेदार निर्मिती अजूनही शक्य
बालचित्रवाणीमध्ये ऑडिओ आणि व्हिडिओ रेकॉर्डिंग करण्यासाठी लागणारे अत्याधुनिक साहित्य आणि सुसज्ज यंत्रणा आहे. अत्याधुनिक कॅमेरे तसेच ध्वनियंत्रणा आहे. रेकॉर्डिंग पाहणे, ऐकणे आणि संकलनासाठी नामवंत कंपनीची नवी उपकरणे आहेत. तसेच, स्टुडिओमध्ये नव्याने वातानुकुलीत यंत्रणा लावण्यात आली आहे. त्यामुळे दर्जेदार कार्यक्रमांची निर्मिती बालचित्रवाणीत होऊ शकते, असे कर्मचाऱ्यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


राज्य कथा स्पर्धेत लोंढे, गांगुर्डे प्रथम

0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

साहित्य कला आणि संस्कृती मंडळातर्फे ३६ व्या वर्धापन दिनानिमित्त राज्यस्तरीय कथा स्पर्धा घेण्यात आली. गो. नी. दांडेकर राज्यस्तरीय कथा स्पर्धा आणि लोककवी मनमोहन नातू राज्यस्तरीय कविता स्पर्धेत अनुक्रमे स्वाती लोंढे (मुंबई) आणि माजी आमदार विश्वास गांगुर्डे (पुणे) यांनी प्रथम क्रमांक पटकावला.
कथा विभागात डॉ. विवेक वाकचौरे (संगमनेर) यांनी प्रथम, सुनंदा उमर्जी (पुणे) यांनी द्वितीय आणि रश्मी पटवर्धन (पुणे) यांनी तृतीय क्रमांकाचे पुरस्कार प्राप्त केले. विशेष नैपुण्य पुरस्काराने प्रा. दत्तात्रय थोरात (पुणे), संतोष पाटील (कोल्हापूर), संध्या कानेटकर (मुंबई), सुरेश सायकर (पुणे) यांना गौरविण्यात येणार आहे. कविता विभागात डॉ. विवेक वाकचौरे (संगमनेर), मीना कारंजेकर (पुणे), निशिकांत गुमास्ते (पुणे), गोविंद सागवडेकर (लोणावळा) यांनी द्वितीय व तृतीय क्रमांक प्राप्त केले. विशेष नैपुण्य पुरस्काराने दीप्ती असवडेकर (पुणे), डॉ. नंदा हरम (औंध), रामचंद्र आवटे (चाकण), सागर पाटील (कोल्हापूर), काशिनाथ महाजन (नाशिक) यांना गौरविण्यात येणार आहे. या शिवाय साहिल कदम (आष्टा, सांगली) या आठवीतील विद्यार्थ्याने बालकवी विशेष पुरस्कार प्राप्त केला आहे आहे.
स्पर्धेत सुमारे दोन हजार स्पर्धकांनी सहभाग घेतला. ज्येष्ठ साहित्यिकांच्या निवड समितीने घेतलेल्या निर्णयाप्रमाणे संस्थेचे मुख्य विश्वस्त अध्यक्ष अॅड. सहदेव मखामले यांनी पुरस्कारांची घोषणा केली. ज्येष्ठ साहित्यिक भारत सासणे यांच्या अध्यक्षतेखाली ३ जून रोजी सायंकाळी ५.३० वाजता तळेगाव दाभाडे येथील डॉ. राम मनोहर लोहिया समाजवादी विद्यापीठाच्या सभागृहात पारितोषिक वितरण समारंभ होणार आहे. नगराध्यक्षा चित्रा जगनाडे, संतोष भेगडे, महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्यवाह माधव राजगुरू व डॉ. मधुसूदन घाणेकर उपस्थित राहणार आहेत, असे संस्थेचे विश्वस्त कार्यवाह अर्जुन गायकवाड यांनी कळविले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तीस तोळे सोने घेऊन प्रियकर पसार

0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

रात्री नऊच्या सुमारास बॅग घेऊन जाणारी पत्नी पतीला दिसली..ती रात्री कोठे जाते आहे, हे पाहण्यासाठी पती तिच्या पाठीमागे गेला असता ती अंधारात लपून बसली...पतीने तिचा शोध घेतला; पण ती सापडली नाही..पतीने पोलिसांकडे पत्नी बेपत्ता झाल्याची तक्रार दिली...दोन दिवसानंतर पत्नी घरी परत आली.. ती प्रियकरासोबत काश्मीरला पळून जाणार होती; पण तिने दिलेले तीस तोळे सोने घेऊन प्रियकरच पसार झाला होता आणि त्याच वेळी घरातील सोनेही गायब झाल्याचे उघडकीस आले.

एखाद्या चित्रपटात शोभावा असा प्रकार लोहगाव येथे घडला. या प्रकरणी पत्नी संगीता काळभोर (नाव बदलले आहे.) (वय ३५) व तिचा प्रियकर भरत सरगर (वय ३०, रा. देवगाव सिद्धी, विमानतळ) या दोघांवर विमानतळ पोलिस ठाण्यात अपहाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी रूपालीचे पती अशोक काळभोर (नाव बदलले आहे.) (वय ४५, रा. लोहगाव) यांनी तक्रार दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अशोक व संगीता यांचा १२ वर्षांपूर्वी विवाह झाला होता. त्यांना चार मुले आहेत. अशोक हा खासगी नोकरी करतो, तर संगीता गृहिणी आहे. भरत सरगर हा मूळचा नगरचा आहे. तो निंबाळकर यांच्या घराशेजारी राहण्यास होता. संगीता व भरत यांचे चार वर्षांपासून प्रेमसंबंध होते. भरत तिच्याकडे लग्नाची मागणी करत होता. मात्र, संगीताचे लग्न झाल्या असल्याने ती लग्नास नकार देत होती.

दरम्यान, बुधवारी दुपारी दोघांचे व्हॉट्स अॅपवर बोलणे सुरू होते. त्या वेळी भरतने परत लग्नाची मागणी घातली; परंतु लग्न करायचे असल्यास आजच्या आज करावे लागेल, असे संगीताने सांगितले. त्यावर भरतने होकार दिला आणि रात्री नऊ वाजता घराजवळ भेटण्यास सांगितले.

तक्रारदार यांना बुधवारी रात्री नऊच्या सुमारास पत्नी बॅग भरून घाईने जाताना दिसली. काही घडले का, म्हणून तक्रारदार पत्नीच्या मागे गेले. त्या वेळी पत्नी अचानक अंधारात गायब झाली. त्यांनी इकडे-तिकडे पाहिले असता पत्नी दिसली नाही. त्यामुळे त्यांनी पोलिसांकडे बेपत्ताची दाखल केली; पण दोन दिवसांनी पत्नी अचानक घरी आली. त्यामुळे त्यांनी पत्नीला विश्वासात घेऊन चौकशी केली. त्या वेळी तिने सांगितलेल्या प्रकाराने त्यांना धक्काच बसला.


काश्मीरमध्ये पळून जाण्याचा बेत

भरत सरगर या तरुणाशी प्रेमसंबंध असल्याचे महिलेने सांगितले. दोघे जम्मू-काश्मीर येथे पळून जाणार होतो. घरातील तीस तोळे सोन्याच्या दागिन्यांची बॅग सरगर याला दिली होती. ती बॅग घेऊन तो निघून गेल्याचे तिने सांगितले. तक्रारदार यांनी घरातील कपाट तपासले असता आठ लाख चाळीस हजार रुपये किंमतीचे तीस तोळे दागिने कपाटात नसल्याचे दिसून आले. त्यांनी आरोपीचा शोध घेण्याचा प्रयत्न केला; पण तो सापडला नाही. याप्रकरणी त्यांनी विमानतळ पोलिसांकडे तक्रार दिल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी डी. जे. जाधव अधिक तपास करत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘हेडफोन चोरणे हा ‘सर्जनशील’ आविष्कार’

0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

‘तेजस’ या रेल्वेगाडीतून हेडफोन चोरून भारतीयांनी आपल्या सर्जनशीलतेचा आविष्कार घडवला आहे. अशा सर्जनशील लोकांमध्ये राहत असल्यामुळेच लिहायला जमते. लोक तोंडातील पानाची पिंक रस्त्यावर टाकून, रस्त्यातच लघवी करून पुढे जात आहेत आणि देश महासत्तेच्या दृष्टीने वाटचाल करत आहे,’ अशा शब्दांत लेखक-दिग्दर्शक किरण यज्ञोपवित यांनी रविवारी लोकांच्या दांभिकतेवर हल्ला चढवला. ‘सध्याचा काळ जपून बोलावे आणि ऐकून घ्यावे, असा आहे. फेसबुकवर अनेक लेखक निर्माण झाले आहेत,’ अशी टिप्पणीही त्यांनी केली.

थर्ड बेल एंटरटेन्मेंटतर्फे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. या वेळी यज्ञोपवित यांच्यासह श्रीरंग गोडबोले, दासू वैद्य, गुरू ठाकूर, वैभव जोशी, रोहिणी निनावे, मनस्विनी लता रवींद्र, विभावरी देशपांडे, दिलीप ठाकूर यांना ज्येष्ठ नाटककार चं. प्र. देशपांडे यांच्या हस्ते ‘कलातीर्थ पुरस्कार’ देण्यात आला. मिलिंद कुलकर्णी आणि धनश्री लेले यांना ‘भाऊ मराठे स्मृती पुरस्कार’ प्रदान करण्या आला. हर्षवर्धन पाठक, बंटी देशपांडे, प्रशांत पाटील, नीलेश लिमये, चैतन्य गोखले, सौरभ कापडे, अमृता माने, नक्षत्रा देवडिगा, आरजे सोनिया पाठक-चव्हाण, मिलिंद मटकर या पडद्यामागील कलाकारांचाही सत्कार करण्यात आला. आसावरी मराठे-पेंडसे, अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले, संस्थेचे प्रमुख स्वप्नील रास्ते, पुष्कर देशपांडे आदी या वेळी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या उत्तरार्धात ‘के दिल अभी भरा नही’ या नाटकातील कलाकारांनी रसिकांशी संवाद साधला. समीधा अवसरे आणि अमेय पांगारकर यांनी सूत्रसंचालन केले.

‘कर्णबधीर मुलांसाठी २६ लाख’

‘सर्व पुणेकर माझा कार्यक्रम ऐकू शकतात; पण माझे आई-वडील कर्णबधीर असल्याने ते ऐकू शकत नाहीत. कर्णबधिर मुलांसाठी काम करण्याची माझी पूर्वीपासून इच्छा होती. माझ्या कार्यक्रमाच्या माध्यमातून मी २६ लाख रुपये जमा केले आहेत. पुणेकरांनी दिलेला निधी कर्णबधीर मुलांसाठी वापरण्यात येणार आहे,' अशी भावना आरजे सोनाली हिने व्यक्त केली.
................

करमणूक क्षेत्राला दुय्यम मानले जाते; पण यातील कलाकृती नोबेल मिळणाऱ्या साहित्यकृतींपेक्षाही श्रेष्ठ असू शकते. माणसाला अस्वस्थ अवस्थेतून बाहेर काढण्याचे काम मनोरंजन करते. मनोरंजन आत्महत्या थांबवते. त्यामुळे मनोरंजनाला कमी समजण्याचे कारण नाही. मराठी प्रेक्षकांनी आता बोधपट, बांधिलकी सांगणारे आणि आजारांवरील चित्रपट या विषयांतून पुढे जावे. जागतिक प्रेक्षक समोर ठेवून चित्रपट तयार करायला हवेत.

- चं. प्र. देशपांडे, ज्येष्ठ नाटककार

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बारावीचा ऑनलाइन निकाल उद्या

0
0

मटा ऑनलाइन वृत्त । पुणे

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी, २०१७ मध्ये घेण्यात आलेल्या उच्च माध्यमिक अर्थात बारावी परीक्षेचा ऑनलाइन निकाल उद्या, ३० मे रोजी दुपारी १ वाजता जाहीर होणार आहे. मंडळाचे सचिव कृष्णकुमार पाटील यांनी आज ही घोषणा केली.

गेल्या वर्षी बारावीचा निकाल २५ मे रोजी जाहीर झाला होता. यंदा २५ मे उलटून गेल्यावरही निकालाची तारीख देखील जाहीर झाली नव्हती. बारावीची परीक्षा दिलेले सुमारे १५ लाख विद्यार्थी आणि त्यांचे पालक अक्षरशः चातकाप्रमाणे बोर्डाकडे डोळे आणि कान लावून बसले होते. व्हॉट्स अॅपवरून निकालाच्या वेगवेगळ्या तारखा फिरल्यानं संभ्रमाचं वातावरण निर्माण झालं होतं. परंतु, आज बोर्डाने याबाबत अधिकृत घोषणा करून तारखेचा गोंधळ मिटवला आहे.

बारावीच्या विद्यार्थ्यांना दुपारी १ वाजता शिक्षण मंडळाच्या वेबसाईटवर आपला निकाल पाहता येईल, अशी माहिती कृष्णकुमार पाटील यांनी दिली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘संघाचा हिंदुत्वाचा अजेंडा सेना राबवतेय’

0
0

मटा ऑनलाइन वृत्त । पुणे

‘राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा हिंदुत्वाचा अजेंडा आता शिवसेना राबवत असून, भाजपपेक्षाही हिंदूराष्ट्राची भाषा अधिक आक्रमणपणे शिवसेनाच बोलत आहे,’ अशी टीका रिक्षा पंचायतीचे अध्यक्ष डॉ. बाबा आढाव यांनी केली.

लोकवाङ्मय गृहातर्फे जयदेव डोळे लिखित ‘आरएसएस’ या पुस्तकाचे प्रकाशन पत्रकार निखिल वागळे यांच्या हस्ते झाले. यावेळी डॉ. बाबा आढाव बोलत होते. भालचंद्र कानगो, राष्ट्रसेवा दलाचे संजय गायकवाड, संयोजक लता भिसे उपस्थित होत्या.

आमचा आणि भाजपचा हिंदुत्त्वाचा अजेंडा एक समान असल्याचे शिवसेनेकडून सांगितले जात आहे. भाजपकडून इतका अपमान होऊनदेखील शिवसेना सत्तेत कायम आहे. संघामध्ये धोरणात्मक बदल होत असल्याचे सामान्य लोकांचे म्हणणे आहे, पण आम्ही बदलत नसून लोकांची आमच्याकडे पाहण्याची दृष्टी बदलत आहे, असे संघाचे म्हणणे असल्याचे आढाव यांनी सांगितले. समाजामध्ये विषमता वाढली असून त्याविरोधात आंदोलने सुरू आहेत. पंतप्रधान दुनियेतील दहशतवादासंबंधी बोलत आहेत, पण गल्लीतच दहशतवाद पोसला जातोय, अशी टीकाही आढाव यांनी केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मान्सून राज्यात २ ते ३ जूनला दाखल होणार

0
0

मटा ऑनलाइन वृत्त। पुणे

येत्या २४ तासांत मान्सून केरळमध्ये दाखल होत राज्यातही २ ते ३ जून दरम्यान पावसाचे आगमन होणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. केरळमध्ये पाऊस येण्यासाठीचे पुरक असे वातावरण तयार झाले आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार ही परिस्थिती पाहता उद्याच (३० मे) मान्सून केरळमध्ये दाखल होणार आहे.

पुढील २४ तासांत दक्षिण अरबी समुद्र, मालदीव-लक्षद्विप बेटे, केरळ, तामिळनाडूचा काही भाग आणि बंगालची खाडी अशा भागांमध्ये मान्सूनची वाटचाल होणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.

तीन दिवसांपूर्वी मान्सून श्रीलंकेत दाखल झाला होता. त्यानंतर मान्सून केरळमार्गे देशात आणि राज्यात दाखल होत आहे. दरम्यान वातावरणातील बदलाची चाहूल बळीराजाला लागली असून शेतीच्या कामाची लगबगही ठिकठिकाणी पाहायला मिळत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पुण्याची मुस्कान ICSE परीक्षेत देशात पहिली

0
0

मटा ऑनलाइन वृत्त । नवी दिल्ली, पुणे

आयसीएसई बोर्डाच्या निकालात दहावीमध्ये पुण्याच्या मुस्कान अब्दुल्ला पठाण हीने देशात पहिला क्रमांक पटकावला आहे. तर आयसीएसईच्या बारावीच्या निकालात मुंबईची रिशिता धारिवाल देशात दुसरी आली आहे. आज दुपारी तीन वाजता हे निकाल जाहीर झाले.

द काउंन्सिल फॉर इंडियन स्कूल सर्टिफिकेट एग्झामिनेशन बोर्ड (ICSE) आणि इंडियन स्कूल सर्टिफिकेट (ISC) ने घेलेल्या दहावी आणि बारावीचे निकाल आज जाहीर झाले. यात पुण्यातील हचिंग्स हायस्कूलमधील मुस्कान पठाण देशात पहिली आहे. मुस्कान आणि बेंगळुरूच्या सेंट पॉल इंग्लिश स्कूलमधील अश्विन राव या दोघींनाही ९९.४ टक्के गुण मिळाले. यामुळे त्यांना संयुक्तपणे पहिला क्रमांक देण्यात आला आहे.



बारावीत कोलकाताच्या हेरिटेज स्कूलमधील अनन्या मैती ९९.५० टक्के गुण मिळवत देशात पहिली आली. तर मुंबईची रिशिता धारिवाल, लखनऊची आयुषी श्रीवास्तव, कोलकात्याचा देवेश लखोटीया आणि गुडगावची किर्थना श्रीकांत हे चौघे संयुक्तपणे दुसऱ्या क्रमांकावर आहेत. या चौघांनाही परीक्षेत ९९.२५ टक्के मिळाले.

यंदा १२ वीत ९६.४७ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झालेत. गेल्या वर्षी ९६.४६ टक्के इतके विद्यार्थी झाले होते. आयसीएसई बोर्डाचे निकाल संकेतस्थळावर आणि एसएमएसद्वारे पाहता येणार आहेत. बोर्डाच्या www.cisce.org या संकेतस्थाळावर निकाल बघता येईल. एसएमएसद्वारे निकाल जाणून घेण्यासाठी सात अंकी युनिक आयडी कोड टाईप करुन ०९२४८०८२८८३ या क्रमांकावर एसएमएस पाठवा. अथवा http://cisce2017rprod090.azurewebsites.net/ वर लॉग इन करा.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


आमदार, खासदार उपलब्ध करणार निधी

0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
शहरातील कचराप्रश्नावर तोडगा काढण्यासाठी महापालिका प्रशासनाने तयार केलेल्या आराखड्यात सुचविलेल्या उपाययोजनांना प्राधान्य दिले जाणार आहे. पुढील चार ते पाच महिन्यांमध्ये काही प्रकल्प तसेच उपाययोजना करण्यासाठी सर्वसाधारण २० कोटी रुपयांचा निधी आवश्यक असून शहरातील आमदार, खासदारांनी आपल्या निधीतून ही रक्कम देण्याची तयारी दाखविली असल्याचे महापौर मुक्ता टिळक यांनी सांगितले.
पालिकेने तयार केलेल्या कचरा आराखड्याबाबत शहरातील सर्वपक्षीय आमदार, खासदार यांनी केलेल्या सूचना आणि उपाययोजना यांचा समावेश या आराखड्यात करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठविणार असल्याचे टिळक यांनी सांगितले. पालिकेने तयार केलेल्या आराखड्यात दीर्घकालीन तर काही अल्पकालीन उपाययोजना सुचविल्या आहेत. पुढील चार ते पाच महिन्यांत सुचविलेल्या अल्पकालीन उपायांसाठी २० कोटी रुपयांचा खर्च करावा लागणार आहे. हा निधी आमदार, खासदार निधीतून देण्याची तयारी लोकप्रतिनिधींनी दाखविली आहे.
दरम्यान, कचरा आराखड्याबाबत नागरिकांची मते समजून घेण्यासाठी ३०, ३१ मे आणि १ जून रोजी प्रत्यक्ष क्षेत्रीय कार्यालयांचा दौरा करणार असल्याचे महापौर टिळक यांनी सांगितले. या दौऱ्यात स्थानिक लोकप्रतिनिधी, स्वयंसेवी संस्थाचे प्रतिनिधी आणि स्थानिक नागरिकांबरोबर चर्चा केली जाणार आहे. या आराखड्यावर लोकप्रतिनिधी, नागरिक, स्वयंसेवी संस्थांकडून आलेल्या सूचना, अभिप्राय यावर चर्चा करून आराखड्यात समाविष्ट केल्या जातील, असेही त्यांनी सांगितले.

स्मार्ट पालिकेला मराठीचे वावडे
कचरा प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी पालिकेने सविस्तर अभ्यास करून तब्बल ७२ पानांचा आराखडा तयार केला आहे. या आराखड्याचा नागरिकांनी संपूर्ण अभ्यास करून त्यावर हरकती आणि सूचना द्याव्यात, यासाठी २ जूनपर्यंतची मुदत देण्यात आली आहे. पालिकेच्या punecorporation.org या वेबसाइटवर हा आराखडा टाकण्यात आला आहे. मात्र, हा आराखडा मराठी भाषेऐवजी केवळ इंग्रजी भाषेत टाकण्यात आला आहे. प्रशासनाने हा आराखडा मराठीत तयार केलेला असतानाही केवळ इंग्रजी भाषेत देण्याचा अट्टहास का? असा प्रश्न विचारला जात आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

खासगी हॉस्पिटलची औषध दुकाने खुलीच

0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
ऑनलाइन औषधविक्रीच्या विरोधात औषध विक्रेत्यांनी देशभर संप पुकारला असला, तरी खासगी हॉस्पिटलमधील औषध दुकाने २४ तास सुरूच ठेवण्याची व्यवस्था अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) केली आहे. त्यामुळे पेशंटना औषधे हवी असल्यास खासगी हॉस्पिटलच्या औषध दुकानांशी संपर्क साधण्यासाठी नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आले आहेत.
औषध विक्रेत्यांनी मंगळवारी संप पुकारला आहे. त्यामुळे पुणे शहर जिल्ह्यातील सुमारे सात हजार औषध दुकाने बंद राहणार आहेत. त्यामुळे पेशंटची गैरसोय होण्याची भीती असून ते टाळण्यासाठी एफडीएने पावले उचलली आहेत. त्याकरिता शहरासह जिल्ह्यातील विविध खासगी हॉस्पिटलची औषध दुकाने खुली ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत, अशी माहिती पुणे विभागाचे सहआयुक्त ए. एम. खडतरे यांनी दिली.
पुणे शहरातील भारती हॉस्पिटल, पूना, दीनानाथ मंगेशकर, सह्याद्री, कोलंबिया एशिया, रत्ना मेमोरियल, इनामदार, नोबेल, जहांगीर, रुबी, जोशी, मेडप्लस, अपोलो, केईएम, इनलॅक्स बुधाराणी, देवयानी, एमजेएम हॉस्पिटल अशा विविध सुमारे शंभर हॉस्पिटलमध्ये औषधे उपलब्ध करण्यात आली आहे. ही औषध दुकाने २४ तास सुरू राहणार आहेत. औषधांसाठी नागरिकांनी एफडीएच्या ०२० -२४४७०२७६ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन सहायक आयुक्त सुहास मोहिते यांनी केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शहर तहानलेले, प्रशासन सुस्तावलेले

0
0

विस्कळित पाणीपुरवठ्याबाबत आज तातडीची बैठक
म. टा. प्रतिनिधी, पिंपरी
शहरात पाणीकपात लागू केल्यानंतर विस्कळित झालेल्या पाणीपुरवठ्यामुळे पिंपरी - चिंचवड शहरवासीय तहानलेले असून, प्रशासन मात्र सुस्तावलेले आहे. या प्रश्नावर चर्चा करण्यासाठी महापौर नितीन काळजे यांनी मंगळवारी (३० मे) तातडीची बैठक आयोजित केली आहे.
शहरात वीस टक्के पाणीकपातीसाठी दिवसाआड पाणीपुरवठा करण्याच्या निर्णयाची अंमलबजावणी दोन मे रोजीपासून चालू आहे. त्याला जवळपास महिना होत आला तरी पाणीपुरवठा सुरळित झालेला नाही. नागरिक हवालदिल असून, त्यांच्या तक्रारींमध्ये वाढ होत आहे. अनेक सोसायट्यांना खासगी टँकरची मदत घ्यावी लागत आहे. अनेक ठिकाणी दामदुप्पट दराने पाणीखरेदी करावी लागत आहे. पवना धरणात पुरेसा पाणीसाठा असूनही आणि पुण्यात पाणीकपात नसताना पिंपरी-चिंचवडमध्ये पाणीकपातीची घाई कशासाठी? शहरवासिय तहानलेले असून, शहराबाहेर पाणीपुरवठा केला जातो? अशी प्रश्नांची सरबत्ती होऊ लागली आहे.
पाणीकपातीच्या निर्णयानंतरचा आढावा आणि प्रशासकीय कामगिरीवर होणारे आक्षेप लक्षात घेऊन महापौर काळजे यांनी आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्यासह पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक आयोजित केली आहे. पाणीपुरवठ्याचे वेळापत्रक एका आठवड्यात सुरळित होईल, असे आश्वासन आयुक्तांनी दिले होते. मात्र, विस्कळित पाणीपुरवठा अद्यापही सुरळित झाला नाही, याकडे बैठकीत लक्ष वेधले जाणार आहे.
शहरातील पाणीकपात रद्द करावी, दिवसाआड पाणीपुरवठ्याचा फेरविचार व्हावा, अशा मागण्या स्वयंसेवी संस्था आणि काही लोकप्रतिनिधींकडून होऊ लागल्या आहेत. त्यावरही बैठकीत विचारविनिमय केला जाणार आहे. पाणीपुरवठा व्यवस्थेतील त्रुटी दूर करून नागरिकांच्या अडचणी कमी व्हाव्यात, याबाबत उपाययोजना ठरविण्यात येणार आहेत.
आंबेडकर चौकात पाणी
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा चौकात २४ तास पिण्याच्या पाण्याची सोय करावी, अशी मागणी ‘एमआयएम’चे शहराध्यक्ष अकील मुजावर, धम्मराज साळवे, संतोष शिंदे यांनी केली आहे. या ठिकाणी डॉ. आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी अनुयायी येत असतात. परंतु, त्यांच्यासाठी पिण्याच्या पाण्याची सोय नाही. कुलर आहे पण त्यात पाणी नाही, याकडे मुजावर यांनी लक्ष वेधले असून, प्रशासनाने तातडीने सुधारणा करावी, अशी मागणी केली आहे.
....
महापौरांचे शिवसेनेला आव्हान
पिंपरी-चिंचवडकरांच्या पाणीप्रश्नाबात भारतीय जनता पक्ष आणि पदाधिकारी संवेदशनशीलपणे निर्णय घेत आहेत. ‘टँकरमालकांची लॉबी’ अथवा माझ्या मालकीचे किती टँकर आहेत? ही बाब शिवसेनेच्या माजी नगरसेविका सुलभा उबाळे यांनी सिद्ध करावी. शहरात माझ्या मालकीचा एक जरी व्यावसायिक टँकर सापडला, तर राजकारणातून संन्यास घेईन, असे आव्हान महापौर नितीन काळजे यांनी दिले आहे. शहरात टँकरलॉबी सक्रीय असून, त्याला खतपाणी घालण्यासाठीच महापौर काळजे आणि पालिका प्रशासनाने पाणीकपातीचा निर्णय घेतल्याचा आरोप उबाळे यांनी केला होता. महापौर काळजे यांचेसुद्धा काही भागांत टँकर सुरू असल्याचे म्हटले होते. त्याला प्रत्युत्तर देताना महापौरांनी शिवसेनेला आव्हान दिले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

माजी महिला नगरसेविकांतर्फेकृतज्ञता सोहळ्याचे आयोजन

0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
‘महाराष्ट्रात महिला धोरण अस्तित्वात आणण्याचा निर्णय घेणाऱ्या माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्या संसदीय कारकि‍र्दीस पन्नास वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त माजी महिला महापौर आणि नगरसेविकांतर्फे कृतज्ञता सोहळा आयोजित करण्यात आला आहे. येत्या १ जूनला बालगंधर्व रंग मंदिरात सकाळी दहा वाजता हा कार्यक्रम होणार आहे. माजी राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांच्या हस्ते पवार यांचा विशेष गौरव करण्यात येणार आहेत,’ अशी माहिती राष्ट्रवादी पक्षाच्या शहराध्यक्षा वंदना चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत दिली.
देशातील पहिले महिला धोरण महाराष्ट्रात राबवण्याचा निर्णय पवार यांनी घेतला होतो. या धोरणामुळे प्रशासकीय दृष्टीकोनातून अमूलाग्र बदल घडले. पवार यांच्या प्रेरणेतून स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांना ३० टक्के आरक्षणाचा मार्ग खुला झाला. राजकीय पटावर महिलांचा सहभाग वाढला. पुरोगामी महाराष्ट्राचा वारसा वृद्धिंगत करणाऱ्या पवार यांना पद्मविभूषण पुरस्कारानेही नुकतेच सन्मानित करण्यात आले आहे. या निमित्त महिलांकडून कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आम्ही हा कार्यक्रम आयोजित केला आहे. या वेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे विधीमंडळ पक्षनेते अजित पवार, पक्षाच्या महिला आघाडीच्या राष्ट्रीय अध्यक्षा फौजिया खान, खासदार सुप्रिया सुळे, महापौर मुक्ता टिळक उपस्थित राहणार आहेत, असे चव्हाण म्हणाल्या.
कार्यक्रमाच्या आयोजन कमल व्यवहारे, मंगला कदम, राजलक्ष्मी भोसले, वैशाली बनकर, चंचला कोंद्रे या माजी महापौरांसह पुणे शहर, जिल्हा, पिंपरी-चिंचवडच्या सर्व आजी माजी नगरसेविका सहभागी झाल्या आहेत, असे चव्हाण यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘फर्ग्युसोनियन्स’तर्फे गुणवंतांचा सत्कार

0
0

फर्ग्युसन गौरव आणि फर्ग्युसन अभिमान पुरस्कारांचे वितरण

म. टा. प्रतिनिधी, पुणे
‘केंद्र सरकारने १९६४ मध्ये डी. एस. कोठारी यांच्या अध्यक्षतेखाली शैक्षणिक धोरणासाठी समिती स्थापन केली होती. त्या समितीने माध्यमिकपासून पदवीपर्यंतच्या शिक्षणात सर्व धर्मांतील चांगल्या शिकवणींचा समावेश करण्याची सूचना केली होती. तेव्हा त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. मात्र, आता भारतासह जगभरात धर्म आणि धार्मिक तेढ अशी परिस्थिती पाहायला मिळते आहे. त्यामुळे आता देखील शैक्षणिक पातळीवर एकमेकांच्या धर्माची ओळख करून देण्याची गरज आहे,’ असे मत माजी केंद्रीय गृह सचिव डॉ. माधव गोडबोले यांनी सोमवारी व्यक्त केले.
फर्ग्युसन कॉलेजच्या ‘द फर्ग्युसोनियन्स’ या माजी विद्यार्थी संघटनेतर्फे दिल्या जाणाऱ्या ‘फर्ग्युसन गौरव’ आणि ‘फर्ग्युसन अभिमान’ पुरस्कारांचे वितरण सी. विद्यासागर राव यांच्या हस्ते झाले. या वेळी ते बोलत होते. विभागीय आयुक्त चंद्रकांत दळवी, एअर मार्शल (निवृत्त) भूषण गोखले, ‘द फर्ग्युसोनियन्स’ संस्थेचे अध्यक्ष यशवंत मेहेंदळे, प्रमुख पदाधिकारी अॅड. विजय सावंत, उपाध्यक्ष टी. बी. बहिरट आदी उपस्थित होते. डॉ. गोडबोले यांना ‘फर्ग्युसन गौरव’ पुरस्कार प्रदान करण्यात आला. उद्योगपती लीला पूनावाला, युरोलॉजिस्ट डॉ. सुरेश पाटणकर, शास्त्रीय गायक महेश काळे आणि सेकंड लेफ्टनंट स्वर्गीय ऋषी मल्होत्रा (मरणोत्तर) यांना फर्ग्युसन अभिमान पुरस्काराने गौरविण्यात आले. मेहेंदळे यांनाही या वेळी स्मृतिचिन्ह देऊन सन्मा‍नित करण्यात आले.
‘गतकाळात जगभरात झपाट्याने बदल होऊन, जागतिकीकरणामुळे जग एक खेड बनले आहे. मात्र, आता जागतिकीकरणाच्या विरुद्ध दिशेने प्रवास सुरू झाला आहे. त्यामुळे धार्मिक वाद वाढले आहेत. भारतही त्यास अपवाद नाही,’ असे डॉ. गोडबोले यांनी या वेळी सांगितले.

‘विद्यापीठे आणि उच्च शिक्षणाच्या क्षेत्रातील संस्थांनी सहिष्णुता, खुलेपणा आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे संरक्षण आणि संवर्धन केले पाहिजे. हिंसा, वर्चस्ववाद याला विद्यापीठ आणि संस्थांच्या परिसरात थारा असता कामा नये. शैक्षणिक संस्था आणि विद्यापीठात सर्व प्रकारच्या विचारांना खुले स्थान असायला हवे,’ असे मत सी. विद्यासागर राव यांनी व्यक्त केले. ज्योती देशपांडे सूत्रसंचालन यांनी केले. संस्थेचे सचिव यशवंत मोहोड यांनी आभार मानले.
..............
गुरुदक्षिणेसाठी माजी विद्यार्थ्यांना आवाहन

भारतात गुरुदक्षिणा देण्याची पद्धत आहे. आयआयटी, मुंबईच्या माजी विद्यार्थ्यांनी त्यांच्या शिक्षण संस्थेसाठी ३०० कोटींचा मदत निधी उभारला आहे. याप्रमाणेच फर्ग्युसन कॉलेजच्या, तसेच अन्य सर्वच शैक्षणिक संस्थांच्या माजी विद्यार्थ्यांनी मदत निधी उभा करून ‘गुरुकुल दक्षिणा’ ही संकल्पना रुजवावी. या निधीतून गरजू विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा खर्च भागवता येईल, अशी अपेक्षा सी. विद्यासागर राव यांनी व्यक्त केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images