Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

आयुक्तांच्या बैठकीला अधिकारीच गैरहजर

$
0
0

वादाला नवे वळण लागण्याची शक्यता

म. टा. प्रतिनिधी, पुणे

समान पाणीपुरवठा योजनेसाठी टाकण्यात येणाऱ्या पाइपलाइनच्या कामामध्ये केबल डक्ट टाकण्यासाठीचे २२५ कोटी रुपयांचे काम एस्टिमेट कमिटीने फेटाळल्याने नाराज झालेल्या पालिका आयुक्त कुणाल कुमार यांनी शुक्रवारी पुन्हा बैठक घेऊन प्रस्ताव मार्गी लावण्याच्या सूचना प्रशासनाला केल्या. मात्र, बैठकीला प्रमुख अधिकाऱ्यांनीच दांडी मारल्याने ती रद्द करण्यात आली. या सर्व प्रकारामुळे पालिका आयुक्त आणि अधिकारी यांच्यातील वाद भडकण्याची शक्यता आहे.
शहरात राबविण्यात येणाऱ्या समान पाणीपुरवठा योजनेंतर्गत सुमारे १८०० किलोमीटर पाइपलाइनच्या कामासाठी १,७१८ कोटी रुपयांच्या चार निविदा काढण्यात आल्या. त्यापैकी केवळ एल अँड टी या कंपनीलाच काम मिळावे, अशा पद्धतीने अटी घातल्याचा आरोप विरोधी पक्षांकडून केला जात आहे. पाइपलाइनची कामे करतानाच २२५ कोटी रुपयांची डक्टची कामे करावीत, असा प्रस्ताव आयुक्तांनी निविदा उघडण्याच्या वेळेस एस्टिमेट कमिटीसमोर ठेवला होता. गुरुवारी एस्टिमेट कमिटीच्या बैठकीत पाइपलाइनच्या कामासाठी निविदा मागविल्यानंतर कामाचे एस्टिमेट करण्याचा निर्णय फेटाळून लावण्यात आला. त्यामुळे चिडलेल्या आयुक्तांनी एस्टिमेट कमिटीने पुन्हा बैठक घेऊन मंजुरी द्यावी, अशी सूचना अधिकाऱ्यांना केली. आयुक्तांच्या आदेशावरून शुक्रवारी दुपारी तीन वाजता कमिटीची बैठकही ठरली. परंतु, कमिटीचे मुख्य अधिकारीच काही कामानिमित्त बाहेर गेल्याने बैठकच होऊ शकली नाही. यावरून महापालिका वर्तुळात उलटसुलट चर्चा सुरु झाली आहे.

पालिकेने खर्च करण्यावर आयुक्त ठाम
डक्ट टाकण्यासाठीचा खर्च काही कंपन्या करण्यास तयार आहेत. मात्र, याकडे दुर्लक्ष करून आयुक्तांनी हा खर्च पालिकेने करावा असा अट्टहास कशासाठी हा प्रश्न विचारला. काही कंपन्यांनी स्वखर्चातून डक्ट बांधून त्यामध्ये एक स्लॉट पालिकेसाठी ठेवण्याची तयारी दर्शविली. एवढेच नव्हे तर पालिकेकडे जमा करावे लागणारे शुल्कही देण्याची तयारी दर्शविली. त्यानंतरही आयुक्त पालिकेकडून खर्च करण्यावर ठाम असल्याचे एका अधिकाऱ्याने सांगितले.

अट्टहास कोणासाठी?
विशिष्ट कंपनीला काम मिळावे, यासाठी पालिका आयुक्त प्रयत्नशील असल्याचे या सर्व प्रकारातून दिसून येत आहे. याची उलटसुलट चर्चा सुरू असल्याने ही निविदा प्रक्रिया तातडीने रद्द करावी, अशी मागणी शिवसेनेचे गटनेते संजय भोसले यांनी केली आहे. पालिकेने यापूर्वीच केबल टाकण्यासाठी डक्ट तयार केलेले असतानाही नक्की कोणाच्या हितासाठी हा अट्टहास करण्यात येत आहे, असे भोसले यांनी विचारले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


कलाकृती, वाचकांमध्ये कायमच भिंत

$
0
0

ज्येष्ठ लेखिका माधुरी पुरंदरे यांचे टीकास्त्र

म. टा. प्रतिनिधी, पुणे

‘कलाकार, समीक्षक जी भाषा बोलतात, त्याची वाचकांना, रसिकांना ओळख करून दिली जात नाही. कलाकृती आणि वाचक यांच्यामध्ये कायमच अदृश्य भिंत असते,’' असे टीकास्त्र ज्येष्ठ लेखिका माधुरी पुरंदरे यांनी शुक्रवारी सोडले.
केशवराव कोठावळे पारितोषिक ट्रस्टतर्फे ज्येष्ठ लेखक एस. डी. इनामदार यांना ‘रूपबंध : कला समीक्षा’ या ग्रंथासाठी पुरंदरे यांच्या हस्ते ‘केशवराव कोठावळे पारितोषिक’ देण्यात आले. त्यावेळी बोलताना पुरंदरे यांनी कला आणि आस्वादक यांच्यात असलेल्या दूरस्थ संबंधांवर नेमकेपणाने बोट ठेवले. या वेळी ट्रस्टचे प्रमुख अशोक कोठावळे व परीक्षक प्रा. प्रतिभा कणेकर उपस्थित होते.
‘ललित कलांचे परस्परांशी संबंध असतात, हे वाक्य सुविचाराप्रमाणे झाले आहे; पण कलांचे संबंध कसे असतात हे कोणी सांगत नसल्याने ते स्पष्ट होत नाहीत. इनामदार यांनी हेच नेमकेपणाने सांगून कलेचे पदर उलगडून दाखविले आहेत,‘ असे गौरवोद्वगार पुरंदरे यांनी काढले. ‘चित्र आणि साहित्य, शिल्प आणि कविता, लय आणि रेषा यांचा मिलाफ त्यांनी आपल्या पुस्तकातून दाखवला. कलाकृती समजून घेण्यासाठी ज्या वाटा चोखाळाव्या लागतात, त्या वाटांवर इनामदार आपल्याला नेतात. कला ही गांभीर्याने घेण्याचा विषय असल्याचे ते कायम ठसवतात’,’ असेही त्या म्हणाल्या.
‘दृष्यकलांची अवस्था फार चांगली नाही. समाजात कलेविषयी कमालीची उदासिनता आणि अनास्था दिसून येते. कला साक्षरता वाढण्यासाठी अशा ग्रंथांची गरज आहे. असे ग्रंथ वाचले गेले तर कलेची अभिजातता वाढेल तसेच कला साक्षरता व रसिकता वाढून सौंदर्य दृष्टी विकसित होईल. सौंदर्य शोध आणि आनंदबोध ही कला आस्वादाची दोन लक्षणे आहेत. मी पुस्तकातून वैश्विक कलाकृतींचा वेध घेण्याचा प्रयत्न केला आहे. पाश्चात्य देशांमधील प्रबोधन काळाचा कलात्मक इतिहास पुस्तकातून मांडला आहे,’ असे इनामदार म्हणाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कचऱ्यातून वीज, इंधनविटा

$
0
0

फुरसुंगीत प्रकल्प उभारणार; दीड वर्षांत कार्यान्वित होणार

म. टा. प्रतिनिधी, पुणे

फुरसंगी येथे मिश्र कचऱ्यावर प्रक्रिया करून त्याद्वारे वीज आणि इंधन विटा तयार करण्याचा प्रकल्प सुरू करण्याचा पालिका प्रशासनाचा प्रयत्न आहे. या प्रकल्पात सातशे टन कचऱ्यावर प्रक्रिया करण्यात येणार असून, तो सुरू होण्यासाठी दीड वर्षे लागणार आहेत. बांधा, वापरा आणि हस्तांतरित करा (बीओटी) या तत्त्वावर हा प्रकल्प उभारण्यात येणार आहे.
या प्रकल्पातून सहा मेगावॉट वीज निर्मिती होणे अपेक्षित आहे. प्रशासनाच्या अर्थसंकल्पात प्रकल्पासाठी तरतूद करण्यात आली आहे. सध्या सुरू निर्माण झालेल्या कचरा प्रश्नाला तोंड देण्यासाठी शहरातील छोटे-मोठे प्रकल्प सुरू करण्यात येत आहे. प्रभागातील कचरा प्रभागातच जिरवण्यासाठी पालिकेचे प्रयत्न सुरू आहेत. शहरात पाच ते ५० टन क्षमतेचे कचरा प्रकल्प उभारण्यात येत आहेत. मात्र, वीज निर्मितीच्या उद्देशाने साडेसातशे टन क्षमतेचा हा प्रकल्प उभारण्याचे काम सुरू आहे. सध्या प्राथमिक कामांचे नियोजन सुरू असून, साधारणत: नोव्हेंबर २०१८ मध्ये तो कार्यन्वित होईल, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.

बंद प्रकल्प सुरू करण्यावर भर
पेशवे पार्क येथील बंद अवस्थेत असलेला बायोगॅस प्रकल्प सुरू करण्यात आला आहे. सभागृह नेते श्रीनाथ भिमाले यांच्या हस्ते गुरुवारी या प्रकल्पाचे उद्घाटन करण्यात आले आहे. याप्रसंगी नगरसेविका सरस्वती शेंडगे, स्मिता वस्ते, नगरसेवक महेश लडकत, धीरज घाटे तसेच क्षेत्रीय अधिकारी अरुण खिलारी आदी उपस्थित होते. वेगा सेंटर येथील कचरा वर्गीकरण करण्यात येत असलेल्या शेडलाही उपस्थितांनी भेट दिली. या शेडमध्ये कचरा साठवण्यात येत असून या कचऱ्याचे वर्गीकरणही करण्यात येणार आहे.

विरोधकांची ग्रामस्थांशी चर्चा
विरोधी पक्षनेते चेतन तुपे तसेच काँग्रेसचे गटनेते अरविंद शिंदे यांनी शुक्रवारी उरुळी देवाची येथे ग्रामस्थांची भेट घेऊन कचरा प्रश्न सोडवण्यासंदर्भात चर्चा केली. सत्ताधारी चर्चेसाठी उपलब्ध नसल्याने आम्ही ग्रामस्थांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली तसेच आंदोलन थांबवावे अशी विनंती केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या आश्वासनाचे काय झाले, असा सवाल ग्रामस्थांकडून विचारण्यात येत आहे. त्यामुळे हा प्रश्न सोडवण्यासाठी भाजपच्या वरिष्ठ पातळीवरून प्रयत्न होणे गरजेचे आहे, असे तुपे म्हणाले.

पवारांनी साधला मुख्यमंत्र्यांशी संवाद
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना फोन करून पुणे शहरातील कचरा प्रश्नात लक्ष घालावे, अशी सूचना केली. पवार आणि फडणवीस यांच्यात कचरा प्रश्न सोडवण्याबाबत चर्चा झाली असून हा प्रश्न लवकर मार्गी लागेल, असा विश्वास फडणवीस यांनी व्यक्त केल्याचे समजते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

संरक्षण विभागाचा क्लिअरन्स गरजेचा

$
0
0

संरक्षण राज्यमंत्र्यांच्या उपस्थितीत दिल्लीत बैठक होणार

म. टा. प्रतिनिधी, पुणे

पुरंदर येथील नियोजित विमानतळाच्या सुमारे दोन हजार ३६७ हेक्टरवरील आराखड्याला केंद्रीय संरक्षण मंत्रालय आणि एअरपोर्ट अॅथॉरिटी ऑफ इंडियाच्या मुख्यालयाकडून ‘क्लिअरन्स’ घ्यावा लागणार आहे. याबाबत १५ मे रोजी दिल्लीत संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांच्या उपस्थितीत बैठक आयोजित करण्यात आली आहे.
पुरंदरमधील विमानतळाबाबत शुक्रवारी मुंबईत बैठक झाली. या बैठकीला जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे, जिल्हाधिकारी सौरभ राव उपस्थित होते. ‘पुण्यात सदर्न कमांड हे महत्त्वाचे ठिकाण आहे. त्यामुळे विमानतळाच्या कामाला सुरुवात करण्यापूर्वी संरक्षण मंत्रालय आणि एअरपोर्ट अॅथॉरिटी ऑफ इंडियाच्या मुख्यालयाकडून क्लिअरन्स मिळणे आवश्यक आहे. त्यामुळे याबाबत १५ मे रोजी भामरे यांच्याबरोबर बैठक होणार आहे,’ असे राव यांनी सांगितले.
विमानतळासाठीच्या भूसंपादनाची प्रक्रिया वर्षभरात पूर्ण करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. त्यासाठी सात उपजिल्हाधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात येणार आहे. सध्या दोन हजार ३६७ हेक्टर जमिनीचे सर्वेक्षण करण्यात आले आहे. त्यामध्ये सात गावठाणे येतात. ही गावठाणे वगळण्यात आली आहेत. मात्र, या प्रकल्पाच्या कामाला प्रारंभ करण्यापूर्वी संरक्षण मंत्रालयाची भूमिका महत्त्वाची असणार आहे. संरक्षण मंत्रलयाने अनुकूल अभिप्राय दिल्यानंतर पुढील प्रक्रिया करावी लागणार आहे.
विमानतळासाठी भूमी संपादन करताना चार पर्याय निश्चित करण्यात आले आहेत. जमिनीच्या नवीन कायद्याप्रमाणे होणाऱ्या मूल्यांकनानुसार आर्थिक मोबदला देणे, जमिनीला पर्यायी जमीन देणे, मगरपट्टा आणि नांदेड सिटीच्या धर्तीवर बाधित शेतकऱ्यांना भागधारक करून घेणे, आंध्र प्रदेशची राजधानी अमरावती; तसेच समृद्धी महामार्गावर राबवण्यात आलेल्या प्रयोगाप्रमाणे प्रकल्प कालावधी दरम्यान निर्वाहभत्ता देऊन प्रकल्पात भागीदारी देणे यांचा समावेश आह. मात्र, आता संरक्षण मंत्रालय आणि एअरपोर्ट अॅथॉरिटी ऑफ इंडियाची भूमिका महत्त्वपूर्ण ठरणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पर्यटनस्थळांसाठी ठोस निकष

$
0
0

राज्य सरकारने उचलली पावले; दर्जाहीनतेला बसणार चाप

Aditya.Tanawade@timesgroup.com
Tweet : @AdityaMT

पुणे : राज्यातील महत्वाच्या ठिकाणांना पर्यटन स्थळांचा दर्जा देण्यासाठी राज्य सरकारने ठोस निकष तयार केले आहेत. या निकषांनुसार पात्र ठरणाऱ्या ठिकाणांनाच पर्यटन स्थळाचा दर्जा बहाल करण्यात येणार आहे. या निर्णयामुळे दर्जा आणि क्षमता नसतानाही केवळ निधीच्या हव्यासापोटी पर्यटन स्थळाचा दर्जा मागणाऱ्या घटकांना चाप बसणार आहे.
राज्य सरकारने नुकत्याच काढलेल्या आदेशात पर्यटन स्थळांचे निकष जाहीर करण्यात आले आहेत. पर्यटन संचलनालयाने ‘ब’ वर्गात येणाऱ्या पर्यटनस्थळांसाठी निकष तयार केले आहेत. ‘अ’ वर्गवारीतील पर्यटनस्थळे राष्ट्रीय दर्जाची मानली जातात. या पर्यटन स्थळांसाठी राज्य सरकारने यापूर्वीच निकष तयार केले होते. त्यापाठोपाठ आता ‘ब’ वर्गामध्ये येणाऱ्या महत्वाच्या ठिकाणांनाही सरकारचे निकष पूर्ण करावे लागणार आहेत. त्यानंतरच त्यांना पर्यटनस्थळांचा दर्जा देण्यात येईल. ‘क’ दर्जाच्या पर्यटनस्थळांची निवड जिल्हापातळीवर होत असल्याने त्याची निवड करण्याचे अधिकार संबंधित जिल्हाधिकारी आणि पालकमंत्री यांच्यावर सोपवण्यात आले आहेत.
‘ब’ दर्जाच्या पर्यटनस्थळांसाठी सरकारने एकूण बारा निकष तयार केले आहेत. त्यामध्ये दर वर्षी येणाऱ्या पर्यटकांची संख्या, विदेशी पर्यटकांची पसंती, संबंधित ठिकाणाचा सांस्कृतिक, ऐतिहासिक वारसा आदींचा विचार केला जाणार आहे. संबंधित ठिकाणाला ‘ब’ वर्गाचा दर्जा मिळावा, यासाठी तेथील जिल्हाधिकाऱ्यांनी शिफारस करणे आवश्यक राहणार आहे. पर्यटन स्थळांवर असलेल्या मूलभूत सुविधांचाही आढावा पर्यटन विकास विभागाकडून घेण्यात येणार आहे. शिवाय प्रस्तावित पर्यटन स्थळाला दर वर्षी ५ लाख पर्यटकांनी भेट देणे आवश्यक असणार आहे.
केवळ एका वर्षाच्या पर्यटकांच्या संख्येवर वर्गवारी निश्चित न करता गेल्या तीन वर्षातील पर्यटकांची सरासरी संख्या विचारात घेण्यात यावी, असेही आदेश देण्यात आले आहेत. पर्यटन स्थळांबरोबर तीर्थक्षेत्रांच्या दर्जाबाबतीतही सरकारने नियमावली जाहीर केली आहे. त्यामध्ये संबंधित पर्यटन स्थळ तीर्थक्षेत्र असल्यास त्यास यथास्थिती ग्राम विकास विभाग किंवा नगर विकास विभागांकडून ‘ब किंवा क दर्जा दिलेला असावा. अशा प्रकारचा दर्जा देऊन तीन वर्षे पूर्ण झालेली असावीत, असेही आदेशात म्हटले आहे.
राज्यात अनेक वर्षांपासून राजकीय दबावामुळे आणि निधीच्या हव्यासापोटी अनेक सामान्य आणि प्रसिद्ध नसलेल्या तीर्थक्षेत्रांना पर्यटन स्थळांचा दर्जा देण्याचा घाट घालण्यात येत आहे. हीच बाब पर्यटनस्थळांबाबतीतही लागू होती. आता मात्र, राज्यातील सर्व प्रस्तावित पर्यटन स्थळांना पर्यटन संचलनालयाच्या सर्व निकषांची अंमलबजावणी पूर्ण करावी लागणार आहे. सरकारच्या या निर्णयामुळे पर्यटनस्थळाला दर्जा देण्याच्या प्रक्रियेत सुसूत्रता येण्याची चिन्हे दिसत आहेत.

अनेक वर्षे निकषच नाहीत
महत्वाच्या ठिकाणांना ‘ब’ दर्जाचे पर्यटन स्थळ म्हणून मान्यता मिळते. अशाप्रकारच्या पर्यटन स्थळांसाठी गेल्या अनेक वर्षांमध्ये कोणतेही निकष लागू करण्यात आले नाहीत. तशी नियमावली सरकारकडे कधी नव्हतीच, अशी माहिती पर्यटन विकास विभागाच्या अधिकाऱ्याने नाव न घेण्याच्या अटीवर दिली आहे. राष्ट्रीय दर्जा असलेल्या अ वर्गातील पर्यटनस्थळांसंदर्भात गेल्या वर्षी नियमावली तयार करण्यात आली. त्यापाठोपाठ आता ब वर्गासाठीही ही नियमावली तयार करण्यात आली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

टँकरची ट्रकला जोरदार धडक, तीन ठार

$
0
0

मटा ऑनलाइन वृत्त । पुणे

पुणे-सोलापूर महामार्गावर उरूळी कांचन येथे आज पहाटे ४ वाजता भीषण अपघात झाला. रस्त्यावर थांबलेल्या वाळूच्या ट्रकला पाठिमागून आलेल्या भरधाव टँकरने जोरदार धडक दिल्याने झालेल्या अपघातात तीनजण ठार झाले तर ६ जण जखमी झाले आहेत. जखमींपैकी एकाची प्रकृती चिंताजनक असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत.

वाळूच्या ट्रकचे टायर पंक्चर झाल्याने शैहफान व त्याचा भाऊ महेश यांनी रस्त्याच्याकडेला ट्रक उभा केला. त्यानंतर हे दोघेही टायरची पाहणी करत होते. इतक्यात पाठीमागून आलेल्या भरधाव टँकरने या ट्रकला जोरदार धडक दिली. त्यामुळे झालेल्या अपघातात अंकुश राजाभाऊ पंडीत, ट्रक चालक शैहफान दशरथ शेख आणि टँकर चालक एकनाथ विश्वनाथ बाचारे या तिघांचा मृत्यू झाला. तर टँकरमधील प्रवासी मेघराज नाथाराव हनवटे, राजू विश्वनाथ पंडीत, कांताबाई मरीबा उजगर, इंदु राजु पंडित जखमी झाले आहेत. सर्व जखमींना उपचारासाठी लोणी काळभोर येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान अपघात होताच सावध झालेल्या महेशने तात्काळ जागेवरून पळ काढल्याने तो या अपघातात बचावला. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा नोंदविला असून अधिक तपास करत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पाकिस्तानात साहित्यिक उपेक्षित

$
0
0

पुणे : ‘भारतात असहिष्णुता वाढल्याचे माझ्या कानावर आले आहे. असहिष्णुतेमुळे साहित्यिकांवर दबाव येतो. पाकिस्तानमध्ये साहित्य वाचणारेच मुळी कमी आहेत. त्यामुळे तिथे साहित्यिकांचा प्रभाव नाही. आम्ही साहित्यिक वगैरे आहोत हे कुणाला माहीतही नाही. कुणाला काही फरकच पडत नाही. दूरचित्रवाणी हेच प्रभाव टाकणारे माध्यम झाले आहे. पाकिस्तानातील साहित्य खूप मागासलेले आहे...’ अशा उद्विग्न भावनेने पाकिस्तानी लेखक, संपादक अजमल कमाल तेथील परिस्थितीवर कडाडून हल्ला चढवत होते.

शिक्षणाने अभियंता असणारे कमाल गेली २८ वर्षे कराची येथून ‘आज’ हे अनुवाद आणि कवितांना वाहिलेले त्रैमासिक चालवतात. कमाल यांनी हमीद दलवाईंच्या ‘इंधन’ कादंबरीचा अनुवाद उर्दू भाषेत केला असून, तो पाकिस्तानात प्रसिद्ध झाला आहे. फाळणीच्या वेळेस कमाल यांचे कुटुंब उत्तर प्रदेशातून पाकिस्तानातील कराची येथे स्थलांतरित झाले. त्यांच्या पत्नी गौरी पटवर्धन या चित्रपट दिग्दर्शक आणि मूळच्या पुणेकर व मराठी असून, त्यांनी आपले शिक्षण ‘एफटीआयआय’मधून घेतले आहे. कमाल यांच्या पुणे भेटीत ‘मटा’ने त्यांच्याशी पाकिस्तानातील विविध विषयांवर संवाद साधला असता त्यांनी कडाडून हल्ला चढवला.

बिघडलेल्या भारत-पाकिस्तान या देशांच्या संदर्भातील पहिलाच प्रश्न कमाल यांनी टोलविला. ‘मी या विषयावर काही बोलणार नाही. माझा विषय साहित्य आहे. मी राजकारणी किंवा नोकरशहा नाही. लोकांना काय वाटते हे लोकांना विचारा. ते माझे क्षेत्र नाही,’ असे सांगून त्यांनी अधिक भाष्य करण्याचे टाळले.

‘भारतात लेखक, पत्रकारांवर दबाव वाढत असताना पाकिस्तानातील चित्र काय,’ या प्रश्नावर ‘साहित्यिकांना काही त्रास झाला, तर त्याचा निषेध वगैरे पाकिस्तानात होत नाही. लोकांना साहित्याची जाण नाही. वृत्तपत्रांचे खप वाढत नाहीत. मुद्रित पत्रकारिता कमी झाली आहे... ’ कमाल हताशपणे बोलत होते.

‘लोकांच्या आर्थिक विषयावर कोणी बोलत नाही. समस्यांवर बोलण्याचे धाडस तिथे कोणी दाखवत नाही. भारतात असे अनेक पुरोगामी गट आहेत हे महत्त्वाचे आहेत,’ हे त्यांनी आवर्जून अधोरेखित केले.

भारतात साहित्य पुढे आहे. पाकिस्तानमध्ये उर्दू साहित्य मागे आहे. प्राथमिक शिक्षण उर्दूत होते. तरीही भाषेबद्दल सजगता नाही. एकत्र येणे, मोकळेपणाने चर्चा करणे, असे प्रकार तिथे खूप कमी जाणवतात. शिक्षण, व्यवसायाची भाषा उर्दू आहे. घरांमध्ये सिंधी, पंजाबी, बलोच अशा भाषा बोलल्या जात असल्या तरी तिसऱ्या पिढीच्या हातून या भाषाही गेल्या आहेत.

- अजमल कमाल, लेखक-संपादक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

डॉ. जगन्नाथ वाणी यांचे कॅनडात निधन

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

ज्येष्ठ संख्याशास्त्रज्ञ व राज्यभरातील सामाजिक संस्था व कार्यकर्त्यांचे आधारवड डॉ. जगन्नाथ वाणी (वय ८३) यांचे शनिवारी कॅनडा येथे दीर्घ आजाराने निधन झाले. त्यांना कॅनडाच्या 'ऑर्डर ऑफ कॅनडा' या सर्वोच्च नागरी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. पुण्यातील स्किझोफ्रेनिया अवेअरनेस असोसिएशनसह (सा) अनेक सामाजिक संस्थांशी ते निगडित होते.

भारतीय प्रमाणवेळेनुसार शनिवारी सकाळी १० वाजून २२ मिनिटांनी कॅलगरी (कॅनडा) येथील निवासस्थानी त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या मागे मुलगा श्रीराम, मुलगी वर्षा, स्नुषा प्रतिमा व साजन आणि डेलिया ही नातवंडे असा परिवार आहे. डॉ. वाणी यांच्या पार्थिवावर कॅलगरी येथेच अंत्यसंस्कार होणार आहेत. डॉ. वाणी हे गेल्या काही वर्षांपासून कॅन्सरशी झुंज देत होते.

धुळ्यात शालेय व पुण्यात महाविद्यालयीन शिक्षण घेतल्यानंतर त्यांनी उच्चशिक्षणासाठी कॅनडा गाठले. कॅनडामध्ये स्थायिक झाल्यानंतरही ते महाराष्ट्रातील कार्यकर्त्यांशी सातत्याने संपर्कात होते. पत्नीला झालेल्या स्किझोफ्रेनिया आजारामुळे त्यांनी या आजाराचा अभ्यास सुरू केला. गेली ४० वर्षे दरवर्षी मायदेशी येऊन विविध संस्थांचे कामकाज ते पाहत असत. मनोरूग्णांसाठी व उपेक्षितांसाठी त्यांनी कॅनडात व भारतातही अनेक उपक्रम राबवले. धुळे येथील का.स.वाणी राठी प्रगत अध्ययन संस्था, पुण्यातील स्किझोफ्रेनिया अवेअरनेस असोसिएशनची (सा), शारदा नेत्रालय, बधीर पुनर्वसन संस्था आदी संस्थांच्या उभारणीत त्यांचा मोलाचा वाटा होता. कॅनडात वेदान्त सोसायटी ऑफ कॅलगरी तसेच रागमाला या संस्थांची स्थापनाही त्यांनी केली. जागतिक संगीत अभ्यासक्रमही त्यांनी सुरू केला. महाराष्ट्रात काम करणाऱ्या विविध सामाजिक संस्था, संघटना व कार्यकर्त्यांनी आर्थिक बळ मिळावे यासाठी त्यांनी अविरत मेहनत घेतली. कॅनडामध्ये महाराष्ट्र सेवा समितीची स्थापना करत त्यांनी कॅनडासह अमेरिका व इतर देशातून त्यांनी प्रचंड आर्थिक मदत मिळवून दिली. आपण आर्थिक मदत केलेल्या संस्थांचा कारभार कसा चालू आहे, याकडे त्यांचे बारीक लक्ष असे. मानसिक आजाराविषयी जनजागृतीसाठी ‘देवराई, माहिती अधिकाराशी संबंधित ‘एक कप च्या' अशा काही चित्रपटांची व लघुपटांची निर्मिती त्यांनी केली. २०१२ मध्ये त्यांना ‘ऑर्डर ऑफ कॅनडा हा कॅनडाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार प्राप्त झाला होता. तसेच भारतात राष्ट्रपतींच्या हस्तेही त्यांचा गौरव झाला होता.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


अत्याचारप्रकरणी गु्न्हा दाखल

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
शिवाजीनगर येथील बालसुधारगृहात चार महिन्यांपासून सात वर्षांच्या मुलांवर लैंगिक अत्याचार सुरू असल्याचे बालकल्याण समितीच्या चौकशीत समोर आले आहे. या प्रकरणी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात तीन बालकांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्यांना ताब्यात घेण्यात आले आहे.
या प्रकरणी मच्छिंद्र सुतार (वय ३३, रा. केशवनगर) यांनी तक्रार दिली आहे. त्यानुसार मुलांवर बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिवाजीनगर बालसुधारगृहात रेल्वे स्थानक व इतर ठिकाणी मिळालेल्या सोळा वर्षांखालील मुलांना संरक्षणासाठी ठेवण्यात येते; तसेच अल्पवयीन गुन्हेगारांनाही या ठिकाणी ठेवले जाते. या ठिकाणी एकूण ७७ मुले आहेत. शिवाजीनगर बालसुधारगृहातील आवारात एक जानेवारी ते चार मे २०१७ दरम्यान लैंगिक अत्याचाराचा प्रकार घडल्याचा प्रकार गेल्या आठवड्यात समोर आला होता. त्यानंतर बालकल्याण समिती व पुणे जिल्हा बाल संरक्षण समितीने याकडून चौकशी सुरू करण्यात आली होती; तसेच पोलिसांनी लक्ष घालून मुलांकडे चौकशी सुरू केली होती. बालकल्याण समितीच्या अध्यक्षा अनिता विपत यांच्या अध्यक्षतेखाली चार सदस्यांची समिती स्थापन करून या घटनेची चौकशी सुरू होती.
पीडित चार मुलांकडे चौकशी केल्यानंतर त्यांनी घडलेल्या प्रकाराची समितीसमोर माहिती दिली. त्यानुसार समितीने शिवाजीनगर पोलिसांकडे तक्रार केली आहे. पोलिसांकडून बालसुधारगृहातील मुलांचे जबाब घेण्यास सुरुवात करण्यात आली असून, तीन ते चार मुलांचे जबाब घेण्यात आले आहेत. इतर मुलांचेही जबाब घेण्यात आले आहेत. लैंगिक शोषणाचे बळी ठरलेल्या मुलांचा वैद्यकीय चाचणी अहवाल अद्याप आलेला नसल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे. या गुन्ह्यात चोरीच्या गुन्ह्यातील एक १६ वर्षीय अल्पवयीन मुलगा असून इतर दोघे १५ व आठ वर्षांची मुले आहेत. या घटनेतील पीडित चारही मुलांचे वय सात वर्ष आहे. या प्रकरणी शिवाजीनगर पोलिस अधिक तपास करत आहेत.
शिवाजीनगर बालसुधारगृहात लैंगिक अत्याचाराचे प्रकरण समोर आल्यानंतर येथील प्रश्न ऐरणीवर आले आहेत. या ठिकाणाहून मुले पळून जाण्याच्या घटनांत मोठी वाढ झाली आहे. पंधरा दिवसांपूर्वी या ठिकाणाहून चोरीच्या गुन्ह्यातील तीन मुले पळून गेली होती. त्यापैकी एकाच मुलाचा शोध लागला आहे. दोघांचा अद्याप शोध लागलेला नाही. या घटनांना अधिकारी व कर्मचाऱ्यांचा बेजबाबदारपणा कारणीभूत असल्याचे सांगण्यात येत आहे. या ठिकाणी असे प्रकार सतत घडत आहेत. मात्र, अधिकाऱ्यांवर कोणतीही कारवाई केली जात नाही. दोन वर्षांपूर्वीही लैंगिक अत्याचाराची घटना घडली होती. त्या वेळी अधिकाऱ्यांचा बेजाबदारपणा समोर आला होता. तेव्हा काहीही कारवाई झालेली नव्हती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तरुण, तरुणीचा दिघीत मृत्यू

$
0
0


म. टा. प्रतिनिधी पिंपरी
दिघी येथे बंद खोलीत तरुण व तरुणीवर वार झाले असून, दोघांचाही रुग्णालयात उपचारा दरम्यान मृत्यू झाल्याची घटना शनिवारी (६ मे) दुपारी एकच्या सुमारास घडली. मात्र ही हत्या आहे, की आत्महत्या हे अद्याप स्पष्ट होऊ शकलेले नाही. सपना सुरेश बले (वय २५, रा. हडसर, जुन्नर) व पद्माकर साबळे (२४, रा. हडसर, जुन्नर), अशी मृतांची नावे असून, दोघेही विवाहित होते.
दिघी येथील आदर्शनगर भागात बंद खोलीत शनिवारी दुपारी सपना व पद्माकर यांची भांडणे सुरू होती. त्यांच्या भांडणाचा आवाज ऐकून आजुबाजूचे रहिवासी गोळा झाले. त्यांनी दरवाजा तोडला या वेळी नागरिकांना ते दोघेही जखमी अवस्थेत सापडले. त्या दोघांवार चाकूने वार झाले होते. ही घटना दुपारी एकच्या सुमारास उघडकीस आली. त्यांना रुग्णालयात नेले असता उपचारा दरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रथमदर्शनी हे प्रेमप्रकरण दिसून येत आहे. कारण दोघेही एकाच गावचे आहेत. त्यांची लहानपाणापासून ओळख होती, असेही समोर येत आहे. त्यानुसार खोलीत त्यांची भांडणे झाली असावीत व त्यातून एकतर त्यांनी एकमेकांवर वार केले असावेत किंवा स्वतःला तरी त्यांनी मारून घेतले असावे. मात्र, ही हत्या की आत्महत्या हे अजून स्पष्ट झालेले नाही. ते शवविच्छेदनानंतरच कळेल, असेही पोलिसांनी स्पष्ट केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पिंपरीत ‘स्वीकृत’साठी रस्सीखेच

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पिंपरी

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या स्वीकृत नगरसवेक पदासाठी सत्तारूढ भारतीय जनता पक्षाच्या इच्छुकांमध्ये जोरदार रस्सीखेच निर्माण झाली आहे. जुना-नवा असा कोणताही भेदभाव केला जाणार नसल्याचे पक्षाने स्पष्ट केल्यामुळे इच्छुक कार्यकर्त्यांनी स्थानिक नेत्यांच्या शिफारशीसाठी ‘लॉबिंग’ चालविले आहे.
महापालिकेत पाच स्वीकृत सदस्यपदांसाठी येत्या मंगळवारी (नऊ मे) उमेदवारी अर्ज भरायचे आहेत. सभागृहात भारतीय जनता पक्षाचे ७७, राष्ट्रवादी काँग्रेस ३६, शिवसेना नऊ, अपक्ष पाच, महाराष्ट्र नवनिर्माण सेना एक असे १२८ सदस्य आहेत. संख्याबळानुसार भाजपचे तीन आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोघांची स्वीकृत सदस्यपदी वर्णी लागू शकते. या गणितावर दोन्ही पक्षांमध्ये हालचाली चालू आहेत.


सत्तांतर झाल्यानंतर भाजपच्या जुन्या निष्ठावंत कार्यकर्त्यांच्या अपेक्षा उंचावल्या आहेत. उमेदवारी नाकारल्यामुळे आता तरी संधी मिळेल, अशी काहींची आंतरिक इच्छा आहे. त्यामुळे पक्षाचे संघटन सरचिटणीस माउली थोरात, मोरेश्वर शेडगे, उमा खापरे, सदाशिव खाडे, महेश कुलकर्णी यांची नावे चर्चेत आहेत. पक्षांतर करून भाजपमध्ये प्रवेश केलेले विजय फुगे, बाळासाहेब गव्हाणे, अमर मूलचंदानी, बाबू नायर, सारंग कामतेकर यांनीही स्थानिक नेत्यांकडे ‘फिल्डींग’ लावली आहे. प्रवीण नेवाळे, अमोल थोरात, शैला मोळक, निहाल पानसरे, योगेश लांडगे आदी तरुण कार्यकर्तेही संधीच्या प्रतीक्षेत आहेत.
स्थानिक पातळीवर पक्षाचे शहराध्यक्ष आमदार लक्ष्मण जगताप, खासदार अमर साबळे, आमदार महेश लांडगे, माजी महापौर आझम पानसरे यांच्या भूमिकेला महत्त्व प्राप्त झाले आहे. त्यामुळे त्यांच्या शिफारशीसाठी इच्छुकांमध्ये तीव्र चुरस निर्माण झाली आहे. प्रशासकीय पातळीवर अमोल देशपांडे प्रयत्नशील आहेत.


स्वीकृत सदस्य निवडीबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्याशी शहराध्यक्ष लक्ष्मण जगताप चर्चा करतील. त्यानंतर नावे जाहीर केली जातील. सोमवारी (आठ मे) रात्रीपर्यंत नावे निश्चित केली जातील. पक्षामध्ये जुना-नवा असा कोणताही निकष ठरलेला नाही. त्यामुळे विचार करून योग्य कार्यकर्त्याला संधी दिली जाईल.
- एकनाथ पवार (सत्तारूढ पक्षनेते)
पिंपरी-चिंचवड महापालिका

पालिका सभागृहातील जबाबदारी लक्षात घेता राष्ट्रवादी काँग्रेसने अनुभवी कार्यकर्त्याला संधी देण्याचे निश्चित केले आहे. यासंदर्भात माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी चर्चा झाली आहे. भाऊसाहेब भोईर, संजय वाबळे, संदीप पवार, नीलेश पांढरकर यांना उमेदवारी अर्ज भरण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यापैकी दोन नावे अंतिम क्षणी निश्चित केली जातील.
- संजोग वाघेरे-पाटील (शहराध्यक्ष)
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

स्मार्ट सिटींपेक्षा ‘हॅपी सिटीं’ची गरज जास्त

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

‘पीआयसी’तर्फे आयोजित व्याख्यानात पंतप्रधानांचे माजी सल्लागार सॅम पित्रोदा यांचे मत

‘देशाचा विकास करायचा म्हणजे शंभर स्मार्ट सिटींची निर्मिती करायची, ही काही आयडिया होऊ शकत नाही. त्यासाठी जागतिक कंपन्यांना तुम्ही काम करण्याची बिनशर्त परवानगी देता आणि त्यानंतर त्या कंपन्या वाट्टेल तशी कामे करतात, हे योग्य की अयोग्य याचा विचार तुम्हीच करा,’ असा सल्ला पंतप्रधानांचे माजी सल्लागार सॅम पित्रोदा यांनी शनिवारी दिला. देशात नागरिकांसाठी स्मार्ट सिटींपेक्षा ‘हॅपी सिटीं’ची अधिक आवश्यकता असल्याचे पित्रोदा यांनी सांगितले.

पुणे इंटरनॅशनल सेंटरतर्फे (पीआयसी) ‘इंटरनेट अँड फ्युचर वर्ल्ड ऑर्डर’ या विषयावर आयोजित व्याख्यानात पित्रोदा बोलत होते. नॅसकॉम फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. गणेश नटराजन, पीआयसीचे उपाध्यक्ष डॉ. विजय केळकर, मानद संचालक प्रशांत गिरबने आदी उपस्थित होते.

पित्रोदा म्हणाले, ‘शंभर स्मार्ट सिटींची निर्मिती करण्याच्या प्रक्रियेत जागतिक कंपन्या मोठी भूमिका बजावित आहेत. या कंपन्या देशात येऊन त्यांना हवी तशी कामे करणार आहेत. तुमच्या गरजा काय, तुम्हाला कोणत्या गोष्टी हव्यात, त्यात तुम्ही कोणते काम करणार, याचा विचार न करता त्यांच्याप्रमाणे काम करणार आहेत. त्यामुळे स्मार्ट सिटी योग्य की अयोग्य याचा विचार नागरिकांनी करायला पाहीजे. एवढंच काय, गेल्या दहा वर्षांत आपण देशातील नागरिकांसाठी फेसबुक, व्हॉट्सअॅप, ट्विटर अशी सोशल मीडियाची साधने भारतीय स्वरूपात आणू शकलो नाही आणि विकासाच्या मोठ्या गोष्टी करतो. जगात १९४७ मध्ये ट्रान्झिस्टरचा शोध लागला आणि त्यामुळे अद्भूत क्रांती झाली. या शोधामुळे रेडिओ, टीव्ही, स्मार्टफोन, कम्युनिकेशन सॉफ्टवेअर अशी कितीतरी साधने निर्माण झाली. गेल्या काही वर्षांमध्ये तंत्रज्ञानामुळे जग संपूर्ण बदलून गेले आहे. या तंत्रज्ञानाचा फायदा हा नागरिकांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी होण्याची आवश्यकता आहे. तंत्रज्ञान आणि इंटरनेटमुळे भारतीयांमध्ये जगाची पुनर्ररचा करण्याची ताकद व क्षमता आहे. मात्र, भारतीय जबादारी उचलायला तयारच होत नाहीत, ही शोकांतिका आहे.’

तंत्रज्ञान आणि इंटरनेटच्या उद्रेकामुळे आयटी क्षेत्रात ठराविक कामे करणाऱ्या सुमारे ७० टक्के नोकऱ्या जाणार असल्याचे डॉ. नटराजन यांनी सांगितले. गिरबने यांनी प्रास्ताविक केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

देशातील १०४ केंद्रांवर आज ‘नीट’ची परीक्षा

$
0
0

पुणे : देशातील वैद्यकीय कॉलेजांमध्ये पदवी अभ्यासक्रमाला प्रवेश घेण्यासाठी होणारी राष्ट्रीय पात्रता प्रवेश परीक्षा (नीट) रविवारी (सात मे) पुण्यासह देशातील एकूण १०४ परीक्षा केंद्रांवर होत आहे. या परीक्षेला देशभरातून ११ लाख ३५ हजार १०४ विद्यार्थी बसणार असल्याची माहिती ‘सीबीएसई’ने दिली. गेल्यावर्षी आठ लाख दोन हजार ५९४ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली

केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाद्वारे (सीबीएसई) घेण्यात येणारी नीट परीक्षा राज्यात पुण्यासह अमरावती, मुंबई, नागपूर, औरंगाबाद, नाशिक, ठाणे, नांदेड, सातारा, कोल्हापूर, नगर अशा एकूण अकरा परीक्षा केंद्रांवर ही परीक्षा होत आहे. पुण्यात सीबीएसई शाळांची निवड ही परीक्षा केंद्र म्हणून केली आहे. नीट परीक्षेच्या गुणवत्ता यादीद्वारे विद्यार्थ्यांना एमबीबीएस आणि बीडीएस अभ्यासक्रमाच्या प्रथम वर्षाला प्रवेश मिळतो. सकाळी १० वाजता परीक्षेला सुरुवात होणार असून, विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रात सकाळी साडेसातपासून प्रवेश देण्यात येणार आहे. सकाळी साडेनऊनंतर विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रांवर प्रवेश मिळणार नाही.
दरम्यान, परीक्षेला जाताना विद्यार्थ्यांना फिक्कट रंगाची जीन्स किंवा ट्राउजर आणि हाफ शर्ट घालायचा आहे. कुर्ता पायजामा, जोडे घालता येणार नाहीत. विद्यार्थिनींनी मंगळसूत्र, कानातले, बांगड्या आदी दागिने; तसेच मोठे बटण, ब्रोच, हाय हिलच्या सँडल घालू नयेत अशा सूचना देण्यात आल्या आहेत. विद्यार्थ्यांना वॉलेट, गॉगल्स, हॅण्डबॅग, पट्टा, टोपी, ब्रेसलेट घालता येणार नाही. विद्यार्थ्यांना परीक्षेला येताना स्लीपर किंवा सँडल घालायची आहे. आधार कार्ड किंवा सरकारचे छायाचित्र असलेले ओळखपत्र जवळ ठेवायचे आहे, अशा सूचना दिल्या आहेत.

यंदा पहिल्यांदाच ही परीक्षा मराठीसह इतर हिंदी, गुजराती, बंगाली, आसामी, तेलुगू, तमिळ या प्रादेशिक भाषांमध्ये होत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये उत्सुकता आहे. परीक्षेचा निकाल आठ जून रोजी सीबीएसईच्या वेबसाइटवर जाहीर करण्यात येणार आहे, असे सीबीएसईतर्फे सांगण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर अपघात; पाच ठार

$
0
0

मटा ऑनलाइन वृत्त । पुणे

मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर बस आणि कारचा अपघात झाला आहे. या अपघातात पाच जण ठार झाले असून पाच जण जखमी झाले आहेत. अपघातातील प्रवासी विरार येथील रहिवासी आहेत.

या अपघातामध्ये कार चालक दीपक याचा जागीच मृत्यू झाला. श्रद्धा पाटील (१९), भामिनी देशमुख (६०), दत्तात्रय देशमुख (६३), राखी पाटील (४०) यांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला. तर, रुपेश देशमुख (३४), संजना पाटील (१५) आणि ओम पाटील (२) हे जखमी झाले आहेत. दुपारच्या सुमारास कामशेत बोगद्याजवळ कार आणि बसचा अपघात झाला. रस्त्यावर ऑईल सांडल्यामुळे कार घसरली. कारने बसला मागून धडक दिल्याने हा अपघात झाला. अपघातामुळे पुण्याहून मुंबईच्या दिशेने येणाऱ्या मार्गावरील वाहतूक कोंडी झाली आहे. वाहतूक पूर्वपदावर आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.

रविवारी सकाळीदेखील मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे वर कामशेत बोगद्याजवळ ट्रक आणि क्रेनची धडक होऊन अपघात झाला होता.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पुण्याची कचरा कोंडी अखेर फुटली

$
0
0

मटा ऑनलाइन वृत्त । पुणे

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मध्यस्थीनंतर गेल्या २३ दिवसांपासून सुरु असलेली कचरा कोंडी अखेर फुटली. कचरा व्यवस्थापनाचे पुढील ३५ ते ४० वर्षांचे नियोजन करण्याच्या दृष्टीने एक महिन्याभरात ‘मास्टर प्लान’ तयार करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याशिवाय महापालिकेने नोकरी दिलेल्या देवाची उरुळी आणि फुरसुंगी येथील युवकांना सेवेत कायम करण्यासाठी विशेष बाब म्हणून निर्णय घेण्यात येईल, असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्यानंतर स्थानिक ग्रामस्थांनी आंदोलन स्थगित केल्याचे जाहीर केले.

कचऱ्याप्रश्नी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची बिबवेवाडी क्षेत्रीय कार्यालयात उरळी येथील ग्रामस्थ, पालिकेतील पदाधिकारी यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बिबवेवाडी क्षेत्रीय कार्यालयामध्ये सर्व पक्षीय लोकप्रतिनिधी आणि आंदोलनकर्त्या ग्रामस्थासोबत बैठक घेतली. या प्रसंगी महापौर मुक्ता टिळक, जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे, दिलीप कांबळे,खासदर सुप्रिया सुळे, खासदार अनिल शिरोळे, वंदना चव्हाण, माधुरी मिसाळ, विजय काळे, जगदीश मुळीक, सभागृह नेते श्रीनाथ भिमाले, स्थायी समिती अध्यक्ष मुरलीधर मोहोळ, विरोधी पक्षनेता चेतन तुपे, काँग्रेस गटनेते अरविंद शिंदे, शिवसेना गटनेते संजय भोसले, विभागीय आयुक्त चंद्रकांत दळवी, महापालिका आयुक्त कुणाल कुमार यांच्यासह आंदोलक ग्रामस्थ या बैठकीला उपस्थित होते. बैठकीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकारांना माहिती दिली. मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, की पुढील महिन्याभरात पुण्यात विकेंद्रित पद्धतीने कचरा प्रक्रिया प्रकल्प उभारण्याचा मास्टर प्लान तयार करण्यात येईल. यासाठी नविन तंत्रद्न्यानाची मदत घेण्यात येईल. देवाची उरुळी येथील कचरा कैपिंगचा प्लान तयार करण्यात येईल. या कामात राज्य शासनाही आवश्यक ती मदत करेन. कचऱ्याच्या समस्येवर लॉंग टर्म उपाय योजना केल्या जातील असे आश्वासन ग्रामस्थाना दिले आहे.

पुणे शहराचे डम्पिंग ग्राऊंड असलेले फुरसुंगी आणि उरळीतील गावातील ग्रामस्थांनी डम्पिंग विरोधात आंदोलनाचे हत्यार उपासले होते. परिणामी काही दिवसांपासून पुणे शहरात ठिकठिकाणी कचऱ्याचे ढिग जमा झाले होते. यामुळे पुणेकर नागरिक त्रस्त झाले होते. त्यातच पुण्याचे महापौर मुक्ता टिळक, पालक मंत्री गिरिश बापट हे परदेश दौऱ्यावर गेल्याने पुणेकरांनी टीकेची झोड उठवली होती. पुण्यातील कचरा फुरसुंगी-उरळी या गावाजवळच्या कचरा डेपोत टाकण्यात येतो. काही दिवसांपूर्वी फुरसुंगीच्या कचरा डेपोत आग लागली होती. आग अनेक दिवस धुमसत असल्यामुळे ग्रामस्थांना जगणं कठीण झाले होते. त्यामुळे पुन्हा ग्रामस्थांनी आंदोलनाचे पाऊल उचलले होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


देवसेनेचा मेक-अप पुणेकरांकडून

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

भारतीय चित्रपट क्षेत्राच्या कक्षा उंचावणाऱ्या ‘बाहुबली-२’ या चित्रपटाने अक्षरशः चित्रपट रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवले आहे. अजूनही बाहुबलीचा थरार अनुभवण्यासाठी चित्रपटगृहे तुडुंब भरून वाहत आहेत. या चित्रपटासाठी हजारो हातांची मेहनत कामी आली आहे. या हातांमध्ये चार हात पुण्याचेही आहेत. पुण्याच्या प्रताप बोराडे आणि डी. एन. इरकर या मराठमोळ्या जोडीने बाहुबली-२ या चित्रपटात ‘प्रोस्थेटिक’ मेकअपची कमाल साधली आहे. भल्लालदेवने बंदी केलेल्या देवसेनेचा भयावह वाटणारा ‘चेहरा’ या जोडीमुळे रसिकांसमोर आला आहे.

उडता पंजाब, बाजीराव मस्तानी अशा गाजलेल्या चित्रपटांमध्ये मेकअपची कमाल करून चित्रपटातील पात्रांवर अनोखा रंग चढवल्यानंतर बोराडे आणि इरकर ही जोडी नावारूपाला आली. त्यांनी आता बाहुबलीमध्ये आपली कला सादर करून मेकअप विश्वात एक नवा पायंडा रचला आहे. बाहुबलीच्या एकूण प्रक्रियेविषयी आणि तेथील आठवणींविषयी या जोडीशी ‘मटा’ने संवाद साधला.

बाहुबलीचे शूटिंग सुरू झाल्यानंतर बोराडे आणि इरकर यांना थेट हैदराबादमधील ‘रामोजी फिल्म सिटी’तून बोलावणे आले. लागलीच दोघेही तिथे दाखल झाले. देवसेनाचे बंदी असतानाचे जखमांनी जखडलेले पात्र मेकअपद्वारे साकार करण्याचे आव्हान या दोघांसमोर होते. त्यांनी सलग चार दिवस वेगवेगळ्या प्रयोगांनी देवसेनेचा मेकअप साकारला. परंतु, तो पसंतीस उतरत नव्हता. देवसेनेचे हे पात्र साकारण्यासाठी परदेशातूनही काही मेकअपमन आले होते. पण, त्यांच्यामधून बोराडे आणि इरकर यांची निवड झाली. बाहुबलीचे दिग्दर्शक एस. एस. राजामौली यांच्या पत्नी रमा राजामौली यांनी एका विशिष्ट पदार्थाच्या आधारे मेकअप करण्यास सांगितले. तेही आव्हान बोराडे आणि इरकर यांनी स्वीकारून वर्षानुवर्षे बंदीवासात असलेली देवसेना साकारली. ही भूमिका साकारणाऱ्या अनुष्का शेट्टीनेही या दोघांचे भरभरून कौतुक केले. तीन तास अनुष्का शेट्टीचा मेकअप चालायचा आणि तो उतरवायला दीड तास लागायचा. त्यामुळे, बाहुबली हा चित्रपट म्हणजे कलाकारांबरोबरच इतर सर्वांचीही एक प्रकारची परीक्षाच होती. देवसेनेच्या मेकअपबरोबरच बोराडे आणि इरकर यांनी युद्धाच्या प्रसंगातील ब्लड इफेक्ट्सदेखील साकारले आहेत.

‘जवळ जवळ दीड महिना बाहुबली-२ मधील देवसेना जखमी असतानाचे शूट सुरू होते. त्या वेळी दररोज त्याच प्रकारे मेकअप करायचा हे आव्हान आमच्यासमोर होते. त्यासाठी प्रचंड मेहनत करावी लागली. राजामौली हे अत्यंत शांत स्वभावाचे दिग्दर्शक आहे. शांत राहून कलाकारांकडून काम कसे करून घ्यायचे हे ते जाणतात. आमच्याकडूनही त्यांनी असेच काम करून घेतले. त्यांना हवे तसे देवसेनेचे पात्र साकारल्यानंतर त्यांनी आमचे मनापासून कौतुक केले,’ असे प्रताप बोराडे यांनी सांगितले. रामोजी फिल्म सिटीतील शूटिंगच्या सेटवरीलही काही रंजक आठवणी बोराडे यांनी ‘मटा’ला सांगितल्या. ‘राजामौली हे चित्रपटाची दृश्ये ‘व्हायरल’ होऊ नयेत, याची काटेकोरपणे काळजी घेत होते. आमची सिक्युरिटीद्वारे ओळख पटल्यानंतरच सेटवर सोडले जायचे. शिवाय, राजामौलींनी ज्या ठिकाणी मोबाइलला रेंज नाही, अशा ठिकाणी शूटिंगचा सेट लावला होता. कोणालाही सेटवर मोबाइल वापरण्याची परवानगी नव्हती. हजारो कलाकार या कलाकृतीसाठी निष्ठेने काम करीत होते,’ याकडे बोराडे यांनी लक्ष वेधले.

डी. एन. इरकर आणि प्रताप बोराडे या मराठमोळ्या जोडीमुळे बाहुबलीसारख्या भारतातील आजवरच्या सर्वांत यशस्वी चित्रपटाचे पुण्याशी नाते जोडले गेले आहे. त्यांनी प्रोस्थेटिक मेकअपच्या आधारे बाहुबलीच्या यशात खारीचा का होईना, पण वाटा उचलला आहे. त्यांच्या या कामगिरीमुळे राज्यभरातून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शिरूर, बारामतीत गारा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

शिरूर शहर आणि परिसरात सुमारे अर्धातास गारांसह वळवाचा पाऊस झाला. जोरदार वाऱ्याने काही ठिकाणी झाडाच्या फांद्या मोठ्या प्रमाणावर तुटल्या. शहराचा वीजपुरवठाही खंडित झाला. त्याचा फटका विवाह सोहळ्यांनाही बसला. बारामती शहरासह ग्रामीण भागातही सायंकाळी गारांसह पाऊस झाला. त्यामुळे अनेक ठिकाणी झाडांच्या फांद्या तुटल्या.

पाऊस कशामुळे?

उत्तर प्रदेश व लगतच्या परिसरावर वातावरणाच्या वरच्या थरात हवेची चक्राकार स्थिती आहे. तिथपासून कर्नाटकच्या उत्तर भागापर्यंत कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. हा पट्टा मध्य प्रदेशासह, विदर्भ आणि मराठवाड्यातून जात आहे. त्यामुळे हवामानातील बाष्पाचे प्रमाण वाढले आहे. त्यातच राज्यातील तापमानही वाढलेले असल्याने आर्द्रता वाढून राज्यात अनेक ठिकाणी पावसाने हजेरी लावली.

दरम्यान, रविवारी राज्यात सर्वाधिक तापमानाची नोंद अकोला येथे (४५.१ अंश सेल्सिअस) झाली. पुण्यात ३७.८ अंश सेल्सिअस कमाल आणि २५.९ अंश सेल्सिअस इतके किमान तापमान नोंदले गेले. किमान तापमान सरासरीपेक्षा चार अंशांनी अधिक असल्याने उकाड्याची तीव्रता अधिक जाणवत होती. जळगाव येथे ४३.६, नाशिक येथे ३७.४, सांगली येथे ३७.८, सातारा येथे ३९.५, सोलापूर येथे ४१.५, मुंबई येथे ३४.४, परभणी येथे ४४, औरंगाबाद येथे ४१, तर नागपूर येथे ४२.६ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शोषणमुक्त राज्याचे बाबासाहेबांचे स्वप्न

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अत्याचारमुक्त व शोषणमुक्त महाराष्ट्र निर्माण करायचा होता. मात्र, त्यांना अभिप्रेत असलेली सत्ता दुर्दैवाने आतापर्यंत निर्माण झालेली नाही,’ अशी खंत राज्याचे सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांनी रविवारी व्यक्त केली.

महाराष्ट्र ऑफिसर्स फोरमतर्फे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२६व्या जयंतीनिमित्त बालगंधर्व रंगमंदिर येथे ‘संविधान परिषदे’चे आयोजन करण्यात आले होते. या परिषदेचे उद्घाटन बडोले यांच्या हस्ते झाले. या वेळी ते बोलत होते. संस्थेचे संस्थापक इ. झेड. खोब्रागडे, सोलापूरचे भविष्य निर्वाह निधी कार्यालयाचे प्रादेशिक आयुक्त हेमंत तिरपुडे, ‘आत्मभान’ संघटनेचे अध्यक्ष सिद्धार्थ मोकळे, आरोग्य विभागाचे निवृत्त सहसंचालक डॉ. बी. पी. गायकवाड, ‘यशदा’चे प्रशासकीय अधिकारी बबन जोगदंड आदी या वेळी उपस्थित होते. बाबासाहेब मोठे होते, परंतु देशाने त्यांचा व्यापक विचार केला नाही. राज्यघटनेच्या निर्मितीला कित्येक वर्षे उलटली, तरी अजूनही राज्यघटना देशभरात पूर्णपणे पोचली नाही, असेही बडोले म्हणाले.

अनुसूचित जाती-जमातीला वैधानिक दर्जा देणे आणि बौद्धांना केंद्रात आरक्षण देण्यासह जातीच्या प्रमाणपत्रात बदल करण्याबाबत केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री खेवरचंद गेहलोत, राज्यमंत्री रामदास आठवले यांच्याशी चर्चा झाली आहे, असेही बडोले यांनी सांगितले.

अॅट्रॉसिटी कायद्याने सामाजिक तेढ निर्माण होत असल्याची चर्चा होते. मात्र, त्या विषयीचे पुरावे कोणी देत नाही. कायदे असूनही त्यांची अंमलबजावणी व्यवस्थित होत नाही, असे मोकळे म्हणाले. तर, राज्यघटनेची पूर्णपणे अंमलबजावणी झाली असती, तर सामाजिक न्याय विभागाची आवश्यकता राहिली नसती. चार्वाक, महावीर, बुद्धांपासून ते गाडगेमहाराज यांच्यापर्यंतची मूल्ये व तत्त्व आपल्यासाठी महत्त्वाची आहेत. आपला हाच वारसा राज्यघटनेमध्ये समाविष्ट आहे, असे तिकपुडे यांनी सांगितले. जोगदंड यांनी प्रास्ताविक केले. तर, सूत्रसंचालन दीपक म्हस्के यांनी केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

एसटीची वार्षिक सवलत योजना बंद

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

राज्य मार्ग परिवहन महामंडळाने प्रवाशांना आकर्षित करण्यासाठी तेरा वर्षांपूर्वी सुरू केलेली ‘वार्षिक सवलत कार्ड योजना’ बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे एसटीच्या पुणे विभागातील सुमारे आठ हजार लाभधारक प्रवाशांना आता संपूर्ण पैसे देऊन तिकीट घ्यावे लागणार आहे.

एसटीच्या प्रवाशांची संख्या वाढत नसून, गेल्या काही वर्षांत एसटी महामंडळाचा संचित तोटा सातत्याने वाढत गेला आहे. सद्यस्थितीत महामंडळाचा वार्षिक संचित तोटा १८०० कोटी रुपये आहे. त्यामुळे तोटा रोखण्यासाठी प्रवाशांची सवलत योजना रद्द करण्याचा निर्णय महामंडळाने घेतला, अशी माहिती एसटीतील सूत्रांनी दिली.

एसटी महामंडळाने २००३मध्ये प्रवासी संख्या वाढविण्याच्या उद्देशाने वार्षिक सवलत कार्ड योजना सुरू केली होती. या योजनेमध्ये एका वर्षासाठी दोनशे रुपये शुल्क आकारून सवलत कार्ड दिले जात होते. या कार्डद्वारे किमान १८ किमीपेक्षा अधिक प्रवास करणाऱ्या प्रवाशाला एकूण तिकिटाच्या रकमेवर १० टक्के सवलत दिली जात होती. या योजनेचा लाभ घेणाऱ्या प्रवाशांची संख्या अधिक होती. याद्वारे महामंडळाला एकरकमी उत्पन्न प्राप्त होत होते. मात्र, तिकीट सवलतीमुळे महामंडळाला नुकसान होत होते. त्यामुळे ही योजना बंद केली. दरम्यान, २२ एप्रिलपूर्वी या सुविधेअंतर्गत पास घेतलेल्या प्रवाशांना पासची मुदत संपेपर्यंत त्याचा लाभ घेता येणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चांगल्या धोरणांचेही प्रतिबिंब उमटावे

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

‘गेल्या तीन वर्षांपासून देशामधील नागरिक हे जात, पात, धर्म, पंथ या पलीकडे जाऊन मतदान करीत आहेत. त्यांना जातीवर आधारलेले सरकार नको असून प्रगतिपथावर नेणारे सरकार हवे आहे. त्यासाठीच सर्व धर्माच्या लोकांनी मोदींना निवडून दिले आहे,’ असे सांगून केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री प्रकाश जावडेकर यांनी रविवारी सरकारच्या तीन वर्षांच्या राजवटीचा पाढा वाचला. माध्यमांना सरकारवर टीका करण्याचे स्वातंत्र्य आहे. परंतु, सरकारच्या चांगल्या धोरणांचेही प्रतिबिंब माध्यमांमध्ये उमटले तरच, सामान्य जनता आणि माध्यमांची नाळ जुळेल, असेही त्यांनी सांगितले.

पुणे श्रमिक पत्रकार संघातर्फे पत्रकार संघाचे संस्थापक ज. स.करंदीकर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ ज. स. करंदीकर व्याख्यानामध्ये जावडेकर यांनी ‘बदलता भारत आणि प्रसारमाध्यमे’ या विषयावर आपले विचार मांडले. पत्रकार संघाचे अध्यक्ष गजेंद्र बढे व सरचिटणीस अजय कांबळे आदी या वेळी उपस्थित होते.

जावडेकर यांनी गेल्या तीन वर्षांमध्ये सरकारने राबवलेल्या योजनांचा आढावा घेतला. ते म्हणाले, ‘समाजाच्या प्रत्येक घटकाचा विकास करण्याचा प्रयत्न मोदींच्या नेतृत्वाखालील सरकारकडून केला जात आहे. लाल दिवा बंद करून सरकारने व्हीआयपी कल्चर बंद केले आहे. आरोग्याच्या क्षेत्रातही गरीब नागरिकांना फायदा व्हावा, यासाठी योजना आणल्या. प्रत्येक नागरिकासाठी सरकारने सुरू केलेल्या विमा योजनेचा लाभ मोठ्या प्रमाणावर नागरिक घेत आहेत. फसल विमा योजनेद्वारे शेतकऱ्यांचे उत्पादन पूर्णपणे सुरक्षित आहे. गरिबांच्या कल्याणाच्या अनेक योजना सरकार राबवत आहेत. सरकारच्या या चांगल्या उपक्रमांची सामान्य नागरिक दखल घेत आहेत. त्याचे परिणाम निवडणुकांमधून दिसत आहेत. माध्यमांनीही त्याची दखल घ्यावी तरच माध्यमे आणि नागरीक यांची नाळ जोडली जाईल.’

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images