Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

पालेभाज्यासह टोमॅटो, फ्लॉवर, गावरान कैरी स्वस्त

0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

वाढत्या उन्हाबरोबर ढगाळ वातावरणामुळे फळभाज्यांसह पालेभाज्यांचे उत्पादन लवकर हाती आले आहे. त्यामुळे मार्केट यार्डात त्याची आवक वाढली. आवक वाढल्याने पालेभाज्यांसह टोमॅटो, फ्लॉवर, गावरान कैरी स्वस्त झाली आहे. तर बटाटा, हिरवी मिरची, सिमला मिरचीसह गाजराच्या दरात थोडीशी वाढ झाली आहे.

गेल्या काही दिवसांत सर्वत्र ढगाळ वातावरण होते. त्यामुळे फळभाज्यांचे उत्पादन लवकर हाती आले. त्यामुळे मार्केट यार्डात रविवारी १७० ते १८० ट्रक फळभाज्यांची आवक झाली आहे. काही भाज्यांची आवक वाढल्याने त्या स्वस्त झाल्या आहेत. तर, काही भाज्यांचे दर वधारले आहेत. हिमाचल प्रदेशमधून ३ ट्रक मटारची आवक झाली. मटारची आवक घटत आहे. इंदूरमधून २ टेम्पो गाजराची आवक झाली आहे. गुजरात, कर्नाटकातून ५ ते ६ ट्रक कोबीची आवक, गुजरात, कर्नाटक आणि ओरिसामधून हिरव्या मिरचीची १० ते १२ टेम्पोची आवक झाली आहे. आंध्र प्रदेश, तमिळनाडूतून ५ ते ६ टेम्पो शेवग्याची, तर तोतापुरी कैरीची ७ ते ८ टेम्पोची आवक झाली.

सातारी आल्याची १२०० ते १४०० पोती, टॉमेटोची साडेपाच ते सहा हजार पेटी आवक झाली. हिरव्या मिरचीची ४ ते ५ टेम्पो, सिमला मिरचीची ८ ते १० टेम्पोची आवक झाली. फ्लॅावर २० ते २२ टेम्पो आवक झाली असून यामध्ये वाढ आहे. कोबी १० ते १२ टेम्पो, शेवगा ४ ते ५ टेम्पो तसेच गाजर ५ ते ६ टेम्पो आवक झाली. उन्हाळी भुईमूग शेंगाची मार्केट यार्डात आवक होण्यास सुरुवात झाली असून पहिल्याच आठवड्यात १२५ पोत्यांची आवक झाली आहे. त्याबरोबर गावरान कैरीची१४ ते १५ टेम्पोची आवक झाली आहे. तोतापुरीच्या तुलनेत गावरान कैरीची आवक वाढल्याने दर उतरले आहेत. चिंचेची २० ते २५ पोती आवक झाली.

कांद्याची आवक कमी झाली असून शंभर ट्रक आवक झाली आहे. आग्रा, इंदूर, नाशिक, तळेगावातून बटाट्याची ७० ते ७५ ट्रक आवक झाली. मध्य प्रदेश आणि गुजरातमधून लसणाची साडेपाच ते सहा हजार गोणींची आवक झाली.

गौरी जातीच्या ५० ते ६० हजार कोथिंबिरीच्या गड्ड्यांची आवक झाली आहे. एकूण अडीच लाख कोथिंबिरींची आवक झाली आहे. सव्वा लाख मेथीच्या गड्ड्यांची आवक झाली आहे. एकूणच, पालेभाज्यांची आवक वाढल्याने त्याच्या दरात घसरण झाली आहे. त्यामुळे सामान्यांना दिलासा मिळाला आहे.

फळांचे दर ‘जैसे थे’

लिंबाची आवक वाढत आहे. हिरव्या; तसेच पिवळ्या रंगाच्या लिंबाचे प्रमाण अधिक आहे. लिंबांची तीन ते चार हजार गोणींची आवक झाली आहे. डाळिंबाची ६० ते ७० टन आवक झाली. संत्रा, मोसंबीची आवक घटली आहे. मोसंबीची ४० टन, तर संत्र्याची अवघी ४ टन एवढी आवक झाली आहे. कलिंगड, खरबुजाची अनुक्रमे ३० ते ३५ टेम्पो; तसेच २५ ते ३० टेम्पोची आवक झाली आहे. सफरचंदाची ४०० ते ५०० पेटींची आवक झाली आहे. चिक्कूची ५०० गोणींची आवक झाली असून पेरुची १०० क्रेट आहे.

झेंडू, गुलछडी, आस्टरची फुले स्वस्त

फुलांची आवक वाढल्याने झेंडूसह आस्टर, गुलछडीच्या फुलांचे दर उतरले आहेत. तर लगीनसराईमुळे कार्नेशियन, जर्बेरा, मोगरा यांच्या दरात वाढ झाली आहे. मोगऱ्याला एका किलोसाठी १५० ते ४०० रुपये तर कार्नेशियनच्या फुलांना १५० ते २०० रुपये असा दर मिळाला आहे.

मासळी तेजीत, अंडी महागली

गणेश पेठेतील मासळी बाजारात मासळीची आवक घटली आहे. त्यामुळे मासळीचे दर तेजीत आहेत. खाडीसह नदीतील मासळीची आवक वाढली असून खोल समुद्रातील मासळीची आवक घटली आहे. आंध्र प्रदेशातून १२ ते १३ टन एवढी मासळीची आवक झाली. खोल समुद्रातील मासळीची ८ टन आवक झाली आहे. खाडीच्या मासळीची ४०० ते ५०० किलो तर नदीच्या मासळीची ५०० ते ६०० किलोची आवक झाली आहे.

गावरान; तसेच इंग्लिंश अंड्याचे दरदेखील वाढले आहे. पंधरा दिवसांपूर्वी प्लॅस्टिक अंड्याचा प्रकार उघडकीस आला होता. मात्र, त्याबाबत गैरसमज असल्याने अंड्याच्या किंमतीत घसरण झाली होती. उत्पादन खर्चापेक्षा कमी दराने अंड्याची विक्री झाली होती. परंतु, गैरसमज दूर झाल्याने पुन्हा अंड्याचे भाव वाढले आहे. इंग्लिंश अंड्याच्या शेकड्यामागे ८० रुपये, तर गावरान अंड्यामागे २० ते ३० रुपयांनी वाढ झाली आहे.

आंबा सिडनीला निर्यात

रत्नागिरी हापूस आंब्याला ऑस्ट्रोलिया सरकारने निर्यातीसाठी परवानगी दिली. त्यामुळे देशातून ऑस्ट्रोलियाला आंबा निर्यातीचा मार्ग मोकळा झाला. पुरंदर तालुक्यातील जेजुरी येथील आंबा उत्पादक उन्मेष बारभाई यांनी मुंबईतील निर्यातदार वसंत सहानी यांच्या माध्यमातून ऑस्ट्रेलियातील सिडनीला आंबा पाठविला. तेथील भारतीय आंबा विक्रेत्यांनी आंब्याचे स्वागत केले. जेजुरीच्या बारभाई यांना पुन्हा १० कंटेनर्सची आंब्याची मागणी केली आहे. ऑस्ट्रेलियातील भारतीय नागरिक रत्नागिरी हापूसची मागणी करीत होते. अखेर ६० ते ७० वर्षानंतर रत्नागिरी हापूसची चव ऑस्ट्रेलियामध्ये त्यांना चाखायला मिळणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


‘स्वच्छ भारत’वरून जुंपली

0
0

म. टा. प्रतिनिधी, पिंपरी

केंद्र सरकारच्या स्वच्छ भारत अभियानात महाराष्ट्रात प्रथम क्रमांक पटकाविणाऱ्या पिंपरी-चिंचवडचा पुरता ‘कचरा’ झाला आहे. नवव्या क्रमांकावरून थेट ७२ क्रमांकाचे रेटिंग यंदा शहराला मिळाले असून, सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये यावरून आरोप-प्रत्यारोप घडू लागले आहेत. वास्तविक शहराच्या स्वच्छतेकडे प्रशासनाने कडक पावले उचलण्याची गरज निर्माण झाली असून, नवनियुक्त महापालिका आयुक्तांसमोर हे मोठे आव्हान निर्माण झाले आहे.
चालू वर्षाच्या सर्वेक्षण अहवालात पिंपरी-चिंचवड स्वच्छ भारत अभियानाच्या ‘टॉप १०’ मधून बाहेर पडल्याचे दिल्लीत प्रसिद्ध झालेल्या अहवालातून उघड झाले. जेव्हा शहराला ९ क्रमांक मिळाला होता, तेव्हा या स्पर्धेत ७५ शहरांचा समावेश होता. यंदाच्या स्पर्धेत ५०० शहरांना सामावून घेतल्यावर पिंपरी-चिंचवड थेट ७२ व्या क्रमांकावर फेकले गेले.
एकीकडे शहराचे देशातील रेटिंग घसरत असताना महापालिका शहरातील कचरा गोळा करण्यासाठी लाखो रुपये खर्च करताना दिसत आहे.
कचरा वर्गीकरण असो वा कचरा उचलण्याचे काम असो, महापालिकेकडून या खर्चात दिवसेंदिवस वाढ केली जात आहे. नववा क्रमांक मिळाला तेव्हा केंद्रातील एक पथकाने शहराचा सर्व्हे केला होता. नागरिकांसह केंद्र सरकारचे नगरविकास मंत्रालय आणि भारत गुणवत्ता परिषद यांच्या पथकातर्फे ‘स्वच्छ भारत’ मोहिमेचे सर्वेक्षण करण्यात आले होते. परंतु, यंदा नागरिकांना देखील यात सामावून घेण्यात आले होते. त्यामुळेच शहरातील स्वच्छतेची खरी परिस्थिती उघड झाल्याचे देखील बोलले जात आहे. त्यामुळे महापालिका आयुक्त श्रावण हार्डीकर यांच्या समोर आता विविध प्रश्नांबरोबर स्वच्छतेचा प्रश्न देखील उभा ठाकला आहे.

शहराध्यक्ष काय म्हणतात ?
‘आहे ते तरी टिकवा’
भाजप नवीन काही करू शकत नाही, किमान आम्ही मिळवून दिलेले मानांकन टिकविण्याचे काम तरी या मंडळीने केले पाहिजे. लाटेत निवडून आलेल्या भाजपच्या नगरसेवकांचा प्रशासनावर अंकूश नाही. शहरात सर्वत्र कचरा असतो. केवळ स्वच्छता नाही तर टपऱ्या, घाण वाढत आहे. अजित पवार आणि राष्ट्रवादीने केलेल्या कामाचे श्रेय घेण्याचे काम करत आहेत. केवळ भ्रष्टाचार-भ्रष्टाचार म्हणत भुई थोपटण्याऐवजी शहराचा लौकिक टिकविणे गरजेचे आहे. आम्ही विरोधाला विरोध म्हणून राजकारण करणार नाही. शहराच्या विकासात प्रशासनाला आणि नवनियुक्त आयुक्तांना कायमच मदत करू. शहरातील अनेक प्रश्न आ वासून उभे राहिले आहेत. केवळ मुख्यमंत्री आणि शहराध्यक्ष, आमदार-नेत्यांचा कौतुक सोहळा करून शहराचा विकास होत नसतो.
- योगेश बहल, शहराध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस.

‘राष्ट्रवादीमुळेच मानांकन घसरले’
येत्या पाच-सात महिन्यात घसरलेले मानांकन सुधारण्यावर भर देणार आहोत. गेल्या चार-सहा महिन्यांपूर्वीच्या सर्व्हेवरून हे मानांकन ठरविण्यात आले आहे. त्यावेळेस राष्ट्रवादीची शहरात सत्ता होती. तर यापूर्वी शहराला मिळालेले मानांकन हे स्पर्धेत कमी शहर असल्याने मिळाले होते. शहर वाढताच खरी परिस्थिती सर्वांसमोर आली आहे. वास्तविक राष्ट्रवादीच्या काळात मानांकन घसरले आहे. शहराचा नावलौकिक सुधारण्यावर भर देण्यात येत आहे. स्वच्छ भारत अभियानात महाराष्ट्रात प्रथम क्रमांक शहराला मिळवून देण्यासाठी आत्तापासूनच आवश्यक उपाययोजना करण्यास सुरवात करण्यात आली आहे.
- आमदार लक्ष्मण जगताप, भाजप शहराध्यक्ष

‘पदाधिकारी-प्रशसनाच्या समन्वयाचा अभाव’
केंद्र सरकारने केलेल्या मानांकनातून सत्ताधारी भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्यांचा आणि प्रशासनातील अधिकाऱ्यांमधील समन्वयाचा अभाव यातून उघड झाला आहे. या रेटिंगमुळे खरेतर केंद्र सरकारने शहरातील पदाधिकाऱ्यांचे पितळ उघड केले आहे. महिनाभरात शहरातील कचरा आणि स्वच्छता, जलपर्णी हे प्रश्न मार्गी लागले नाही; तर पावसाळ्यात शहरातील आरोग्याचा मोठा प्रश्न उभा राहू शकतो.
- राहुल कलाटे, शहरप्रमुख, शिवसेना

‘भाजप सत्तेत येताच शहराची अधोगती’
भाजप सत्तेत आल्यावर शहराच्या अधोगतीकडे वाटचाल होण्याचे हे पहिले पाऊल आहे. अच्छे दिन तर सोडाच, किमान शहराचे आहे ते दिन तरी या मंडळींनी टिकवून ठेवले तरी खूप झाले.
- सचिन साठे, शहराध्यक्ष, काँग्रेस.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भूखंड देण्याच्या आमिषाने कोट्यवधींची फसवणूक

0
0

म. टा. प्रतिनिधी, पिंपरी
लकी ड्रॉ स्कीम तयार करून यामध्ये मोकळा प्लॉट देण्याचे आमिष दाखवून ७५ जणांची कोट्यवधींची फसवणूक केल्याची घटना निगडी परिसरात उघडकीस आली आहे. फेब्रुवारी २०१५ ते मे २०१७ या कालावधीत घडली आहे. तब्बल एक कोटी दोन लाख ८८ हजारांची फसवणूक झाल्याचे उघड झाले असून, निरजा
निरजा इन्फ्रास्ट्रक्चर प्रा. लि. च्या संचालकाला या प्रकरणी अटक करण्यात आली आहे.
सतिश देविदास झोंड (वय ३९, रा. पार्क स्ट्रीट सोसायटी, वाकड) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या नागरिकाचे नाव आहे. या प्रकरणी पार्वती रेवणसिद्ध चौधरी (६१, रा. समर्थ नगर, निगडी प्राधिकरण) यांनी निगडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. चौधरी यांच्यासह अन्य ७५ जणांची फसवणूक झाली आहे.
वरिष्ठ निरीक्षक विजय पळसुले यांनी दिलेल्या माहितीनुसार, निरजा इन्फास्ट्रक्चर प्रा. ली. या कंपनीच्या नावाखाली झोंड हा खरेदी-विक्रीचा व्यवसाय करत होता. त्याने चौधरी आणि इतर ७५ जणांना खेड तालुक्यातील येनवे बुद्रुक येथे नमो सिटी व साई लिला सिटी या नावाने मोकळे प्लॉट देण्याचे आमिष दाखवले. त्यासाठी त्याने प्रत्येकाकाडून सोळा लाख ५२ हजार रुपयांची रक्कम घेऊन त्यांच्या पावत्या देखील दिल्या होत्या. लकी ड्रॉ स्कीम तयार करून मोकळे प्लॉट देण्याचे कबूल केले होते. परंतु प्लॉट न दिल्याने सर्वांनी पैशांची मागणी केली. पैशांच्या बदल्यात त्याने धनादेश दिले होते; परंतु ते बँकेत न वटल्याने चौधरी यांनी निगडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. झोंडेने चौधरी यांच्यासह इतर ७४ जणांची एक कोटी २ लाख ८८ हजार रुपयांची फसवणूक केली. झोंड याने महाराष्ट्रातील ५०० लोकांना फसवले असल्याचे चौधरी यांनी दिलेल्या फिर्यादित म्हटले आहे. या प्रकरणी निगडी पोलिस तपास करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

हृदयाला भिडणारी आलापी गायकी

0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

सहजसुंदर आलापी, ताना यांच्या आविष्काराने रसिक रविवारी मंत्रमुग्ध झाले. निमित्त होते किराणा घराण्याचे गायक पं. संगमेश्वर गुरव यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ कलानुभव चॅरिटेबल ट्रस्टतर्फे आयोजित कलानुभव संगीत महोत्सवाचे आणि गायिका होत्या देवकी पंडित.

देवकी पंडित यांना ज्येष्ठ वात्रटिकाकार रामदास फुटाणे यांच्या हस्ते ‘पं. संगमेश्वर गुरव स्मृती पुरस्कार’ या वेळी देण्यात आला. सचिन इटकर, पं. कैवल्यकुमार गुरव, भारती बऱ्हाटे या वे‍ळी उपस्थित होते. पंडित यांनी राग भीमपलासने आपल्या गायनाला सुरुवात केली. विलंबित त्रितालमध्ये रागविस्तार केला. ‘रेहेज रेहेज गर डालुंगी हरवा’ ही अध्धा त्रितालातील पं. बबनराव हळदणकर यांची बंदिश गाऊन पंडित यांनी सुरेल आनंदाची पेरणी केली. ‘मै तो सावरे रंगराज’ या भजनाने त्यांनी आपल्या गायनाचा समारोप केला.

महोत्सवाची सांगता पं. कैवल्यकुमार यांच्या गायनाने झाली. राग शुद्धकल्याण गाऊन त्यांनी रसिकांना मंत्रमुग्ध केले. प्रशांत पांडव (तबला), सुयोग कुंडलकर (संवादिनी), गौरी बोधनकर, आदित्य जोशी व चारुदत्त दामले (तानपुरा) यांनी सुरेख साथसंगत केली. आनंद देशमुख यांनी निवेदन केले.

आरती ठाकूर-कुंडलकर यांना युवा पुरस्कार

महोत्सवाच्या पहिल्या दिवशी, शनिवारी नवोदित गायिका आरती ठाकूर-कुंडलकर यांचे गायन झाले. राग मधुवंतीमध्ये विलंबित एक तालात ‘ए माये तेरो लाल मानत नाही’ ही रचना सादर केली. त्यानंतर द्रुत एकताल आणि द्रुत तीनतालामध्ये तराना सादर केला. पं. रामाश्रय झा यांच्या सुमिरन करो... या त्यांनी सादर केलेल्या बंदिशीने उपस्थितांची वाह वाह मिळविली. मीनलता जोशी व समृद्धी खटावकर (तानपुरा व गायन) यांनी त्यांना साथसंगत केली. कुंडलकर यांना पं संगमेश्वर गुरव युवा पुरस्कार प्रदान करण्यात आला. उत्तरार्धात पं. उल्हास कशाळकर यांचे भरजरी गायन झाले. ग्वाल्हेर, जयपूर आणि आग्रा या तिन्ही घराण्यांचा मिश्रणातून बनलेल्या स्वत:च्या खास गायकीने त्यांनी रसिकांना मंत्रमुग्ध केले. त्यांना तबल्यावर पं. सुरेश तळवलकर, संवादिनीवर श्रीराम हसबनीस, तानपुरा व गायनसाथ सौरभ नाईक आणि शशांक मक्तेदार यांनी केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘ईव्हीएम’ची छेडछाड झाली का?

0
0

म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई

निवडणुकांमध्ये भाजपला मिळालेल्या यशाच्या पार्श्वभूमीवर, इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशिनद्वारे (ईव्हीएम) निवडणुका पारदर्शक होत नसल्याचा आरोप देशभरातील विरोधी पक्षांकडून होत असतानाच २०१४मधील पुण्याच्या पर्वती विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीतील एका बुथवरील मतदानाच्या ‘ईव्हीएम’बाबत मुंबई उच्च न्यायालयाने चौकशीचे निर्देश दिले आहेत. १८५ क्रमांकाच्या बुथवरील ‘ईव्हीएम’मध्ये फेरफार झाला का, याची चौकशी करून अहवाल देण्याचे निर्देश उच्च न्यायालयाने हैदराबात फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरीला (एफएसएल) दिले आहेत.

या निवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार अभय छाजेड हे भाजपच्या माधुरी मिसाळ यांच्याकडून पराभूत झाले होते. १५ ऑक्टोबर २०१४ रोजी मतदान झाले होते, तर १९ ऑक्टोबर २०१४ रोजी मतमोजणी झाली होती. छाजेड यांनी अॅड. प्रभाकर जाधव यांच्यामार्फत निवडणूक याचिका करून मिसाळ यांच्या निवडणुकीला आव्हान दिले आहे. त्यात त्यांनी एक अर्ज केला होता. त्यावरील सुनावणीअंती न्या. मृदुला भाटकर यांनी पुणे जिल्हाधिकाऱ्यांना हे निर्देश दिले.

बुथ क्रमांक १८५ व २४२मध्ये ज्यांनी मतदान केले, अशा ८९ जणांनी आपल्याला मतदान केल्याचे प्रतिज्ञापत्रावर लिहून दिले आहे. मात्र, ‘ईव्हीएम’च्या मतमोजणीत या ठिकाणी आपल्याला ७९च मते आहेत. यावरून उपकरणाशी छेडछाड झाली असल्याचे दिसत असून याची चौकशी व्हावी, अशी विनंती छाजेड यांनी केली होती. यासंदर्भात त्यांनी तांत्रिक तपशीलही सादर केला. न्यायमूर्तींनी पुढची सुनावणी २० जूनला ठेवली आहे.

या प्रश्नांच्या आधारे अपेक्षित अहवाल

- इन्फ्रारेड/ब्लू-टूथ किंवा तत्सम तंत्रज्ञानाने ‘ईव्हीएम’शी संपर्क साधणारी कोणतीही यंत्रणा अथवा इलेक्ट्रॉनिक भाग ‘ईव्हीएम’ उपकरणाच्या आत असते का?

- संबंधित ‘इव्हीएम’ उपकरणांच्या वन-टाइम पासवर्डशी छेडछाड झाली का?

- संबंधित ‘इव्हीएम’च्या ओटीपी कोड्सचे हॅश व्हॅल्यू ‌किंवा मेटाडाटा तेच आहेत, की वेगळे ?

- ‘ईव्हीएम’च्या ‘कंट्रोल युनिट’मधील डेटा १९ ऑक्टोबर २०१४ रोजी निवडणूक अधिकाऱ्याने जाहीर केलेल्या निकालाप्रमाणेच निकाल दाखवत आहे का?

- मतदान व मतमोजणीच्या कालावधीदरम्यान ‘ईव्हीएम’ व त्यातील तपशील यात कोणत्याही प्रकारे हस्तक्षेप झाल्याचे दिसते का?

-‘ईव्हीएम’शी अंतर्गत अथवा बाह्य स्वरूपाच्या रिमोट उपकरणाने किंवा अन्य कोणत्या मार्गाने छेडछाड किंवा हस्तक्षेप झाल्याचे दिसते का?

- संबंधित उमेदवाराच्या बाजूने मतांची नोंद झाली नाही किंवा अन्य उमेदवाराच्या बाजूने नोंद झाली, असे ईव्हीएम उपकरणांच्या तपासणीतून दिसते का? तसे असेल, तर त्याची कारणे काय?

- अशा प्रकारे किती मतदान झाले आणि ते कोणाच्या बाजूने, हे शोधणे शक्य आहे का?

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अपघातामुळे वाहतूक कोंडी

0
0

म. टा. प्रतिनिधी पिंपरी/लोणावळा

जेजुरी येथे देवदर्शन करून मुंबईकडे परतणाऱ्या कुटुंबातील पाच जणांचा पुणे-मुंबई एक्स्प्रेस वेवर अपघातात मृत्यू झाला. या अपघातामुळे रविवारी एक्स्प्रेस-वेवर दोन तास वाहतूक कोंडी झाली.

या अपघाताची माहिती मिळताच आयआरबीचे कर्मचारी व रस्ते विकास महामंडळाचे देवदूत आपत्कालीन पथक व वडगाव महामार्ग पोलिस आणि कामशेत पोलिस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी कारमधील जखमींना तत्काळ उपचारांसाठी निगडी व सोमाटणे फाटा येथील हॉस्पिटलमध्ये रवाना केले. कारचा चालक हा कारमध्ये अडकला होता. त्याला ‘देवदूत’च्या पथकाने ४५ मिनिटांच्या अथक परिश्रमानंतर बाहेर काढले. आयआरबीच्या कर्मचाऱ्यांनी मार्गावर सांडलेल्या ऑइलवर माती टाकून मार्ग स्वच्छ केला. अपघातामुळे मुंबईकडे जाणारी वाहतूक दोन तास विस्कळित झाल्याने या मार्गावर वाहनांच्या तीन ते चार किलोमीटर लांब रांगा लागल्या होत्या. अपघातग्रस्त वाहने बोगद्यातून बाहेर काढल्यानंतर वाहतूक सुरळीतपणे सुरू करण्यात आली.

मावशींकडून ओमचा सांभाळ

देशमुख आणि पाटील कुटुंबीयांवर काळाने घाला घातला. यामध्ये दोन वर्षांचा चिमुरडा ओम देशमुख हा वाचला. त्याच्या पायाला फ्रॅक्चर झाले आहे. जखमींना निगडी लोकमान्य हॉस्पिटलमध्ये आणल्यानंतर उपचारादरम्यान चार जणांचा मृत्यू झाला होता; तर ओम याच्या आई-वडिलांवर कामशेत येथील हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. त्यामुळे त्या चिमुरड्याकडे बघायलादेखील कोणी नव्हते. त्यामुळे लोकमान्य हॉस्पिटलमधील डॉक्टरांनी ओमला मावशींकडे सोपविले. दुपारी साडेतीन वाजल्यापासून सायंकाळी उशिरापर्यंत त्याच त्याचा सांभाळ करीत होत्या.

सकाळी अंड्यांचा सडा

रविवारी सकाळी कामशेत बोगदा व ताजे पेट्रोलपंपाजवळ अंड्याची वाहतूक करणारा टेम्पो मार्गावर उभ्या असलेल्या क्रेनवर मागून जोरात आदळल्याने मुंबईकडे जाणारी वाहतूक दोन तास ठप्प झाली होती. मोठ्या प्रमाणात अंडी आणि अंड्याचे ट्रे मार्गावर विखुरल्याने मार्गावर अंड्यांचा सडा पसरला होता. यामुळे मुंबईकडे जाणारी वाहतूक वाहतूक पूर्णपणे रोखली गेली. यामुळे यामार्गावरील वाहतूक सोमाटणे येथून जुन्या राष्ट्रीय मार्गावरून वळविण्यात आली होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चित्रपट साक्षरता प्र‌शिक्षण महाग

0
0

‘एफटीआयआय’कडून भरमसाठ शुल्कवाढ

Chintamani.Patki
@timesgroup.com

Tweet : @chintamanipMT

पुणे : चित्रपट कशासाठी पाहिला जातो...मनोरंजनासाठीच ना? चित्रपट साक्षरता ही काय भानगड आहे, असे अनेकांना वाटेल. त्यात पुन्हा हजारो रुपये भरून हवीय कशाला ही साक्षरता, अशीही काहींची प्रतिक्रिया असेल. त्याचे कारण म्हणजे फिल्म इन्स्टिट्यूने चित्रपट साक्षरता अभ्यासक्रमांसाठी वाढवलेले भरमसाठ शुल्क. फिल्म इन्स्टिट्यूटने मे महिन्यात होणाऱ्या अभ्यासक्रमांचे शुल्क भरमसाठ वाढवून चित्रपट समजून घेण्याची आस्था असलेल्या चित्रपट आस्वादकांना चांगलाच दणका दिला आहे. हजारो रुपये भरून साक्षर होताना राहायचे कुठे आणि खायचे काय, अशा विवंचनेत हे आस्वादक अडकले आहेत.

चित्रपट साक्षर वगैरे होण्याची गरज मुळातच कमी लोकांना वाटते. त्यात पुन्हा असंख्य अडचणी असतील, तर लोक केवळ मनोरंजनासाठीच चित्रपट पाहतील; पण आस्वादाकडे ते वळणार नाही. ‘बाहुबली’सारखे चित्रपट तुफान गर्दी खेचत असताना चित्रपट साक्षरता मात्र नावालाच आहे. चित्रपट हा केवळ मनोरंजनासाठी असतो, असा विचार असल्याने चित्रपट साक्षर होण्यासाठी प्रयत्न करणाऱ्यांची संख्या मर्यादितच राहिली आहे. त्यातच चित्रपट साक्षर करणाऱ्या अभ्यासक्रमांचे शुल्क भरमसाठ वाढल्याने ही संख्या आणखीन रोडावत चालली आहे. फिल्म इन्स्टिट्यूटतर्फे मे महिन्याच्या सुट्टीत विविध अभ्यासक्रम घेण्यात येत असून भरमसाठ शुल्क आणि पुन्हा अनिवासी अभ्यासक्रम यामुळे चित्रपट समजून घेणाऱ्यांची पंचाईत झाली आहे.

राष्ट्रीय चित्रपट व दूरचित्रवाणी संस्था (एफटीआयआय) आणि राष्ट्रीय चित्रपट संग्रहालय यांच्यातर्फे ८ मे ते ३ जून या कालावधीत चित्रपट रसास्वाद अभ्यासक्रम घेण्यात येणार आहे. ‘एफटीआयआय’तर्फे दरवर्षी हा एक महिन्याचा अभ्यासक्रम घेतला जातो. उद्यापासून सुरू होणाऱ्या अभ्यासक्रमासाठी देशभरातून केवळ ८६ आस्वादकांनी प्रवेश घेतला आहे. त्यातील काहीजण श्रीलंका वगैरे देशातीलही आहेत. अभ्यासक्रमाचे शुल्क १५ हजार असून राहण्यासाठी वेगळे सहा हजार, तसेच वातानुकूलित सेवेसाठी नऊ हजार असे शुल्क आकारण्यात आले आहे. या अभ्यासक्रमासाठी वसतिगृह सुविधा बंद करण्याचा निर्णय ‘एफटीआयआय’ने घेतला होता; पण हा निर्णय रद्द करावा लागला आहे. शुल्क भरले तरी जेवायची सोय त्यामध्ये नाही. घरगुती किंवा खिशाला झळ बसणार नाही, अशी खाण्याजोगी ठिकाणे जवळपास नाहीत, असे काही आस्वादकांनी सांगितले.

चित्रपटप्रेमींमध्ये नाराजी

‘एफटीआयआय’ने इतरही अभ्यासक्रमांचे शुल्क भरमसाठ वाढवून ठेवले आहे. दिल्ली येथे ११ ते १४ मे दरम्यान घेण्यात येणाऱ्या रसास्वाद शिबिरासाठी अडीच हजार रुपये, मुंबई येथे सोमय्या कॉलेजबरोबर ३ ते ३० मे दरम्यान घेण्यात येणाऱ्या शिबिरासाठी १६ हजार, १३ ते २७ मे दरम्यान होणाऱ्या लहान मुलांच्या अभिनय कार्यशाळेसाठी १५ हजार; तसेच ३ जून ते २४ नोव्हेंबर दरम्यान होणाऱ्या लेखन अभ्यासक्रमासाठी ९० हजार, असे शुल्क असल्याने चित्रपटप्रेमींमध्ये नाराजी पसरली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘रेरा’चा फायदा बांधकाम व्यावसायिकांनाच

0
0

सजग नागरिक मंचच्या चर्चासत्रात तज्ज्ञांचे मत

म. टा. प्रतिनिधी, पुणे
‘रिअल इस्टेट रेग्युलेशन अॅथॉरिटी’ (रेरा) कायदा ग्राहकांना संरक्षण देणारा आहे. मात्र, ग्राहकांनी त्याचा अभ्यास करणे आवश्यक आहे. नागरिक सजग असतील, तरच या कायद्याचा योग्य परिणाम दिसून येईल, असे मत ‘रेरा’विषयी आयोजित चर्चासत्रात व्यक्त झाले. तसेच राज्याने बनविलेल्या ‘रेरा’च्या नियमावलीमुळे बांधकाम व्यावसायिकांचाच फायदा होईल, असेही या वेळी सांगण्यात आले.

सजग नागरिक मंचातर्फे रेराविषयी चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये माहिती अधिकार कार्यकर्ते विजय कुंभार, अॅड. हेमंत भोपटकर, विश्वेश्वर बँकेचे सीईओ चिंतामणी वैजापूरकर, सीए बाबासाहेब माने सहभागी झाले होते. मंचाचे विवेक वेलणकर यांनी प्रास्ताविक केले. जुगल राठी यांनी आभार मानले.

‘ग्राहक हाच या कायद्याचा आत्मा आहे. मोठी रक्कम मोजून घर घेणाऱ्या ग्राहकांनी जबाबदार सेवा मिळावी, यासाठी हा कायदा करण्यात आला आहे. पूर्वीपासून ग्राहकांच्या संरक्षणासाठी कायदे असले, तरी ‘रेरा’द्वारे प्रकल्पाची नोंदणीच रद्द करण्याची ताकद ग्राहकांना मिळाली आहे. ‘रेरा’च्या माध्यमातून ग्राहकांना ताकद मिळाली असली, तरी ग्राहकांनी ‘रेरा’ कायद्याचा अभ्यास करणे आवश्यक आहे. चीफ प्रमोटर, विकसक, बिल्डर, पुनर्विकासक व रिअल इस्टेट एजंट अशा सर्वांवरच जबाबदारी निश्चित करण्यात आली आहे. ‘रेरा’नुसार बांधकाम व्यावसायिकांना संपूर्ण प्रकल्प गहाण ठेवता येणार नाही. त्यामुळे अॅग्रिमेंट झालेल्या फ्लॅटवर कोणताही बोजा चढविता येणार नाही,’ असे अॅड. भोपटकर म्हणाले.

‘रेरा’ हा नियमन करणारा कायदा आहे. त्यामध्ये जबाबदाऱ्या निश्चित करण्यात आल्या आहेत. परंतु, काही आवश्यक प्रमाणपत्रे तज्ज्ञांकडून घ्यावी लागणार आहेत. त्यासाठी बांधकाम व्यावसायिकच पैसे देणार आहेत. त्यामुळे या प्रमाणपत्रांची वस्तुनिष्ठता पडताळणे आवश्यक ठरेल. नागरिक सजग असतील, तर ‘रेरा’चा खऱ्या अर्थाने फायदा होईल,’ असे माने म्हणाले.

‘रेरा लागू झाला असला, तरी अनेक प्रश्न अजूनही अनुत्तरित आहेत. प्रामाणिक बांधकाम व्यावसायिकांवर या कायद्याचा परिणाम होणार नाही. मात्र, पैसे आणि जमिनीच्या बळावर मनमानी व्यवसाय करणारे टिकू शकणार नाहीत. घरखरेदी करताना ग्राहकांनी सर्व कागदपत्रांची योग्य पडताळणी करणे आवश्यक आहे. बँकांनाही बांधकाम प्रकल्पांना कर्ज देण्यापूर्वी पडताळणीसाठी ‘रेरा’अंतर्गत नोंदणी व अन्य माहिती उपयुक्त ठरेल,’ असे वैजापूरकर म्हणाले.

‘रेरा कायद्याचा केंद्रबिंदू हा ग्राहक असला, तरी राज्य सरकारने केलेल्या नियमावलीनुसार ग्राहक हा केंद्रबिंदू राहिलेला नाही. राज्याच्या तरतुदी केंद्राच्या कायद्यापेक्षा वेगळ्या आहेत. त्यामुळे ग्राहकांचा कमी आणि बांधकाम व्यावसायिकांचा अधिक फायदा होणार आहे. ‘रेरा’चे कामकाजही इंग्रजीतून चालले आहे,’ असे कुंभार म्हणाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


प्रयोगशाळांतील सेवांचे खासगीकरण

0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
‘सीटी स्कॅन’, ‘एमआरआय’नंतर आता राज्याच्या आरोग्य विभागाने प्रयोगशाळांतील रक्ताच्या विविध चाचण्यांची तपासणी करण्याची जबाबदारी एका खासगी संस्थेवर दिली आहे. एकूणच प्रयोगशाळांचे खासगीकरण करण्याकडे आरोग्य विभागाने पाऊल टाकले असून त्याद्वारे गरीब पेशंटना डॉक्टरांनी सांगितलेल्या विविध चाचण्या तपासून दिल्या जाणार आहेत.

राज्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रापासून ते जिल्हा स्तरावरील जिल्हा हॉस्पिटल, मनोरुग्णालये, महिला हॉस्पिटलपर्यंतच्या पेशंटच्या चाचण्यांचे निदान होणार आहे. त्यासाठी ‘महालॅब’ ही संकल्पना उदयास आली आहे. आरोग्य विभागाने स्वतंत्र परिपरत्रक काढून त्याचे आदेश जिल्हा हॉस्पिटलसह सर्व आरोग्य यंत्रणेला दिले आहेत. यामुळे आरोग्य विभागांच्या सेवांचे खासगीकरण होत असल्याचे स्पष्ट होत आहे.

केंद्र आणि राज्य सरकारच्या सूचनेनुसार राज्य सरकारने एका खासगी संस्थेला प्रयोगाशाळातील विविध प्रकारच्या सुमारे ११९ चाचण्यांचे निदान करण्याचे काम दिले आहे. त्यासाठी पाच वर्षांचा करार करण्यात आला आहे. ही संस्था प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालय, उप जिल्हा रुग्णालय, जिल्हा रुग्णालय, महिलांचे रुग्णालय, जनरल हॉस्पिटलमधील सर्व पेशंटचे रक्तासह लघवी, तसेच अन्य प्रकारचे नमुने संकलित करणार आहे. नमुने संकलनासाठी आरोग्य विभागाने रुग्णालय अथवा आरोग्य केंद्राच्या त्या त्या भागात जागा उपलब्ध करून द्यावी. नमुने संकलित केल्यानंतर या संस्थेकडून पेशंटला पावती दिली जाईल. त्यावर पेशंटचा आयडी क्रमांकसह चाचणी उल्लेख केलेला असेल.

या सर्व चाचण्यांचे अहवाल संबंधित खासगी संस्थेकडून संबंधित आरोग्य यंत्रणेच्या ई-मेलवर पाठविले जातील. ई-मेलद्वारे तीन तासांच्या आत अहवाल प्राप्त करून दिले जातील. त्याची माहिती नोडल ऑफिसरला संदेशद्वारे कळविले जाईल. ‘महालॅब’ या खासगी संस्थेच्या नावानेच त्याचे अहवाल उपलब्ध केले जाणार आहेत. प्राथमिक आरोग्य केंद्रापासून ते जिल्हा हॉस्पिटलपर्यंतच्या केंद्रातून विविध नमुना संकलनाच्या वेळा निश्चित करण्यात आल्या आहेत. मात्र, अतिदक्षता विभागातील पेशंटसाठी ही सेवा २४ तास सुरू राहणार असल्याचे देखील परिपत्रकात स्पष्ट केले आहे.

चाचण्या मोफत की सशुल्क?

काही वर्षांपूर्वी राज्याच्या आरोग्य खात्याने जिल्हा रुग्णालयांमध्ये ‘एमआरआय’, ‘सीटी स्कॅन’च्या सुविधेचे खासगीकरण केले होते. त्यानंतर सुविधा देणाऱ्या कंपनीकडून पेशंटना मोफत तपासण्या करून देताना हेलपाटे मारावे लागले होते. त्याबाबत अनेक पेशंटच्या तक्रारी होत्या. आता प्रयोगशाळांचे खासगीकरणे केले जात आहे. या पार्श्वभूमीवर खासगी संस्थेच्या प्रयोगशाळांमधून केल्या जाणाऱ्या चाचण्या सर्व वर्गांसाठी मोफत आहेत का, कोणत्या वर्गातील पेशंटना या सुविधा मोफत मिळणार आहेत हे मात्र आरोग्य विभागाने, तसेच संबंधित खासगी संस्थेने स्पष्ट केलेले नाही.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

यंदा ‘नीट’चा ‘कट ऑफ’ ५०० गुणांवर?

0
0

‘नीट’मध्ये बायोलॉजीत अभ्यासक्रमाबाहेरचे प्रश्न

म. टा. प्रतिनिधी, पुणे
देशातील सरकारी वैद्यकीय कॉलेजांमध्ये ‘एमबीबीएस’ला प्रवेश मिळविण्यासाठी यंदा नॅशनल एलिजिबिलिटी कम एन्ट्रन्स टेस्ट अर्थात ‘नीट’चा कट ऑफ हा खुल्या प्रवर्गासाठी ५०० गुणांपेक्षा अधिक राहण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली.

देशातील; तसेच राज्यातील वैद्यकीय कॉलेजांमध्ये पदवी अभ्यासक्रमांच्या प्रथम वर्ष प्रवेशांसाठी यंदा ‘नीट’चा स्कोअर ग्राह्य धरण्यात येणार आहे. केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाद्वारे (सीबीएसई) घेण्यात येणारी ‘नीट’ ही परीक्षा रविवारी पुण्यासह देशातील एकूण १०४ परीक्षा केंद्रांवर आयोजिण्यात आली होती. पुण्यातून सुमारे ५० हजार विद्यार्थी परीक्षेला बसले असण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

‘परीक्षेत निगेटिव्ह मार्किंग असल्याने ज्या विद्यार्थ्यांनी हमखास उत्तरे माहिती असणारे प्रश्न सोडवले, त्यांना उत्तम गुण मिळू शकतील. परीक्षेचा कट ऑफ ५०० गुणांचा राहण्याची शक्यता आहे,’ असे डिपर फाउंडेशनचे हरीश बुटले यांनी सांगितले, तर ‘यापूर्वी ‘नीट’ देणाऱ्या विद्यार्थ्यांना ही परीक्षा सोपी गेली,’ असे मत आयआयटीयन्स प्रशिक्षण केंद्राचे दुर्गेश मंगेशकर यांनी नोंदवले.

बायोलॉजीत बाहेरचे प्रश्न?

दरम्यान, महत्त्वाच्या बायोलॉजी विषयात चार ते पाच प्रश्न अभ्यासक्रमाबाहेरचे असल्याचा दावा विद्यार्थ्यांनी केला, तर अनेक विद्यार्थ्यांना फिजिक्सचा पेपर कठीण गेला. ही परीक्षा एकूण ७२० गुणांची असते. यामध्ये ३६० गुण हे बायोलॉजीला, तर फिजिक्स आणि केमेस्ट्री या विषयांना प्रत्येकी १८० गुण असतात. ‘फिजिक्स विषयावर अवघड प्रश्न आले. या प्रश्नांची संख्यादेखील मोठी होती,’ असे चोक्सी कॉलेजचा विद्यार्थी रितिक पाटील याने सांगितले. ‘बायोलॉजी विषयाला सर्वाधिक गुण आहे. या विषयात चार ते पाच प्रश्न अभ्यासक्रमाबाहेरचे होते. या प्रश्नांना सुमारे २० ते ३० गुण होते. त्यामुळे या प्रश्नांचे गुण विद्यार्थ्यांना गमवावे लागणार आहेत,’ असे सोलापूरच्या ए. डी. कॉलेजच्या सौरभ कुलकर्णी याने सांगितले. ‘बायोलॉजीमध्ये काही प्रश्न अभ्यासक्रमाच्या बाहेरचे होते,’ असे सुकृत विप्रदास यानेही सांगितले. ‘एकंदरीत परीक्षा कठीण; पण वेगळा अनुभव देणारी होती,’ असे सृष्टी घाडगे आणि समीक्षा गायकवाड यांनी सांगितले.

परीक्षेला उशीराने म्हणजेच सकाळी साडेनऊनंतर केंद्रांवर पोहोचणाऱ्या विद्यार्थ्यांना परीक्षेला मुकावे लागले. त्यामुळे काही केंद्रांवर गोंधळ निर्माण झाला. परीक्षेचा निकाल आठ जून रोजी ‘सीबीएसई’च्या वेबसाइटवर जाहीर करण्यात येणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अखेर मुख्यमंत्री मदतीला धावले

0
0

पुण्याच्या कचराप्रश्नी बैठक घेऊन तोडगा

म. टा. प्रतिनिधी, पुणे
भारतीय जनता पक्षाच्या (भाजप) स्थानिक नेतृत्वांना पुण्यातील कचरा कोंडी फोडण्यात आलेले अपयश पाहून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे पुणेकरांच्या मदतीला धावले आणि रविवारी कचऱ्याच्या प्रश्नावर तोडगा काढला. कचरा प्रश्नावर गेले २३ दिवस आंदोलन सुरू होते. आठ आमदार, १०१ नगरसेवक आणि दोन खासदार एवढे प्रचंड बहुमत असतानाही ग्रामस्थांनी केवळ फडणवीसांवरच विश्वास दाखवला.

कचरा डेपोला लाग लागल्यानंतर उरळी देवाची आणि फुरसुंगी येथील ग्रामस्थांनी कचरा डेपोंमध्ये कचरा टाकण्यास विरोध दर्शवत आंदोलन सुरू केले. गेली २३ दिवस ग्रामस्थांचे आंदोलन सुरू होते. या दरम्यान, पालकमंत्री गिरीश बापट, महापौर मुक्ता टिळक परदेश दौऱ्यावर गेल्यामुळे कचराकोंडीत भर पडली. विरोधकांच्या हातात आयतेच कोलीत सापडल्याने या परदेश दौऱ्यांविरोधात जोरदार आंदोलनेही झाली.

महापालिकेतील सभागृह नेते श्रीनाथ भिमाले, स्थायी समितीचे अध्यक्ष मुरलीधर मोहोळ, तसेच गेली तीन दिवस महापालिका आयुक्त कुणाल कुमार सातत्याने ग्रामस्थांशी चर्चा करत होते. राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी केलेली शिष्टाई सफल झाली नव्हती. अखेर, खासदार सुप्रिया सुळे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी शनिवारी केलेल्या संपर्कानंतर ही कोंडी फुटण्याच्या चर्चेसाठी सुरुवात झाली. फडणवीस यांनी सुळे यांना रविवारी सकाळी चर्चेसाठी वर्षा या निवासस्थानी बोलावले होते.

खासदार सुळे, ​पालिकेतील विरोधी पक्षनेते चेतन तुपे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी फडणवीस यांची भेट घेऊन त्यांना कचराकोंडी आणि ग्रामस्थांच्या मागण्यांची माहिती दिली. फडणवीस हे रविवारी पुणे दौऱ्यावर येत असल्याने कचरा कोंडी फोडण्यासदंर्भात झटपट निर्णय घेण्यात आले. या दरम्यान, फडणवीस यांना पुणे पोलिसांच्या विशेष शाखेकडून कचराकोंडी संदर्भातील संपूर्ण माहिती देण्यात येत होती.

मुख्यमंत्र्यांनी तत्काळ ग्रामस्थांशी चर्चा करण्याचा निर्णय घेतल्यानंतर त्याची माहिती शिवतारे, सुळे तसेच ग्रामस्थांना देण्यात आली. महापालिकेतील सर्वपक्षीय नेते, महापालिकेतील अधिकारी, तसेच खासदार या बैठकीला उपस्थित झाले. सभागृह नेते भिमाले यांनी ग्रामस्थांची सोय पाहून, तसेच आपल्या प्रभागातील क्षेत्रीय कार्यालयाची निवड केली आणि बिबवेवाडी क्षेत्रीय कार्यालयात या बैठकीचे आयोजन केले. मुख्यमंत्री फडणवीस यांनी ग्रामस्थांशी थेट चर्चा करून त्यांचे प्रश्न समजावून घेतले आणि त्यांना कुठलाही आडपडदा न ठेवता त्यांच्या प्रश्नांबाबत सडेतोड भूमिका मांडली.

खासदार सुळे यांनी या बैठकीत ग्रामस्थांना आंदोलन स्थगित करण्याचे आवाहन केले. मुख्यमंत्री वेळ काढून बैठकीला उपस्थित आहेत, त्यांच्या पदाचा, त्यांनी केलेल्या सूचनेचा मान ठेवावा, अशी विनंती केली. त्यानंतर दोन्ही गावच्या ग्रामस्थांनी हे आंदोलन स्थगित करण्यात येत असल्याचे जाहीर केले.

बैठकीत काय ठरले?

पुण्याचा कचरा प्रश्न कायमचा सोडवण्यासाठी, तसेच पुढील ३० ते ४० वर्षांचा विचार करून त्यावर तोडगा काढण्यासाठी बृहत आराखडा तयार करण्यात येणार आहे. या आराखड्यात कचरा विकेंद्रीत पद्धतीने कसा जिरवता येईल, यावर भर असणार आहे. त्यासाठी प्रगत तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येईल. हा आराखडा एक महिन्यात तयार होईल. आराखडा तयार झाल्यानंतर पुन्हा बैठक बोलावून त्यावर चर्चा होईल. या बैठकीत पुढील दिशा ठरेल.

देखरेख समिती

कचरा प्रश्न सोडवण्यासाठी सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी, ग्रामस्थ, महापालिकेतील अधिकारी, राज्य सरकारमधील अधिकारी यांची एक देखरेख समिती स्थापन करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले. आराखडा तयार झाल्यानंतर या देखरेख समितीमार्फत तो राबवण्याचा प्रयत्न करण्यात येईल. या वेळी ग्रामस्थांनी यापूर्वी केलेल्या समितीने बैठका घेतल्या नसल्याचे मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणले. मुख्यमंत्र्यांनी यावर उपस्थितांना तोडगा सांगितला. ही समिती स्थापन करताना त्याच्या घटनेमध्ये कुठल्याही चार सदस्यांनी बैठकीची मागणी केली, तर ती घेण्यात यावी, अशी तरतूद करण्याचे आश्वासन दिले. मुख्यमंत्र्यांच्या या निर्णयामुळे बैठक बोलावण्याच्या समिती अध्यक्षांच्या निर्णयाला झटका देण्यात आला आहे.

मुख्यमंत्र्यांनी मानले ग्रामस्थांचे आभार

पुणे हे सर्वांचे आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावरील एक महत्त्वाचे शहर असून कचरा प्रश्नामुळे या शहराची इभ्रत कमी होते आहे. आपण सर्व पुण्याचे नागरिक आहोत. गेल्या काळात काही अडचणी राहिल्या असतील, तर त्या आपण सोडवू. या प्रश्नात राजकारण करायचे नाही. हा राजकारणापलिकडचा विषय आहे. हा प्रश्न सोडवण्यासाठी लागणारी राजकीय इच्छाशक्ती तयार करण्याची जबाबदारी मी घेतो आहे. महिनाभरात कचरा प्रश्न सोडवण्यासाठीचा आराखडा तयार होऊन त्याचे पुढील टप्पे कसे असतील ते स्पष्ट होईल. दोन्ही गावच्या ग्रामस्थांचा मी आभारी आहे, अशी भावना फडणवीस यांनी या वेळी मांडली.

बैठकीला उपस्थित पदाधिकारी

महापौर मुक्ता टिळक, जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे, दिलीप कांबळे, खासदर सुप्रिया सुळे, खासदार अनिल शिरोळे, वंदना चव्हाण, आमदार माधुरी मिसाळ, विजय काळे, जगदीश मुळीक, सभागृह नेते श्रीनाथ भिमाले, स्थायी समिती अध्यक्ष मुरलीधर मोहोळ, विरोधी पक्षनेते चेतन तुपे, काँग्रेस गटनेते अरविंद शिंदे, शिवसेना गटनेते संजय भोसले, विभागीय आयुक्त चंद्रकांत दळवी, महापालिका आयुक्त कुणाल कुमार, नगरसेवक विशाल तांबे, राजेंद्र शिळीमकर, सुनील कांबळे आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अपंगांसाठीचे धोरण ‘अर्धवट’

0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
राज्याचे अपंगांसाठीचे धोरण निश्चित करताना अपंग कल्याण कृती आराखडा २००१ आणि शाळा संहिता १९९७ पायाभूत मानण्यात आले आहे. परंतु, हे दोन्ही कालबाह्य झाले आहेत. त्यामुळे धोरण निश्चिती करताना कालसुसंगत बाबींचा अंतर्भाव करण्याची गरज आहे. तसेच, हे धोरण अर्धवट असून, सर्व २१ प्रकारच्या प्रवर्गातील अपंगांना या धोरणात समावेश झालेला नाही, अशी टीका केली जात आहे.

राज्य सरकारने नुकताच अपंग कल्याण धोरणाचा मसुदा जाहीर केला आहे. त्यावर २३ मेपर्यंत हरकती व सूचना मागविल्या आहेत. हा मसुदा जाहीर होताच, अपंगांच्या क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्ती व संघटनांकडून विविध प्रतिक्रिया प्राप्त होत आहेत. राज्य सरकारने धोरणाचा मसुदा जाहीर करण्यास विलंब केला आहे. मात्र, तरीही ते धोरण परिपूर्ण नाही. राज्यातील बहुतांश अपंग पूर्वीप्रमाणेच या धोरणापासून वंचित राहतील, असे मत संयुक्त अपंग हक्क सुरक्षा समितीचे अध्यक्ष हरिदास शिंदे यांनी व्यक्त केले. अतितीव्र अपंग महिलांच्या पुनर्वसनासाठी कोणतीही विशेष तरतूद नाही. मूक-बधिरांसाठी दुभाषकांची नेमणूक केली पाहिजे. रोजगाराबाबत धोरणात स्पष्ट उल्लेख नाही, असे अपंग क्षेत्रातील सामाजिक कार्यकर्ते रामदास म्हात्रे यांनी सांगितले.

संघटनांच्या हरकती

- अपंगांच्या विशेष शाळांसाठी अर्थसंकल्पातील तरतूद शिक्षण विभागातून करण्यात यावी.
- नवीन कायद्यानुसार सर्व २१ प्रवर्गातील अपंग व्यक्तींच्या समांतर पुनर्वसनाची हमी द्यावी.
- अपंग पुनर्वसनविषयक कायदे व कल्याणकारी योजनांची अंमलबजावणी, विशेष शाळा-कर्मशाळा, नियंत्रण आणि न्यायाधिकरण आदी बाबींचे विकेंद्रीकरण करावे.
- राज्य सरकारने अपंग कल्याण धोरण ठरविताना ‘कृती आराखडा २००१’चा उपयोग केला आहे. मात्र, हा कृती आराखडाच कालबाह्य झालेला आहे. त्यामुळे नवीन कालसुसंगत बाबींचा त्यामध्ये समावेश करावा.

धोरणाबाबत सूचना

- सरकारच्या सर्व विभागातील अपंग सुविधांच्या लाभासाठी जातीची अट काढून टाकावी.
- कर्णबधीर, मूकबधीर अपंगांसाठी सार्वजनिक ठिकाणी दुभाषक असावेत.
- अपंग कल्याणकारी योजनांचे काळानुरूप पुनर्विलोकन करणे, यामध्ये प्रवर्गनिहाय गरज विचारात घेऊन व्यक्तिगत व सामुहिक योजनांचा समावेश करावा.
- प्रतिबंधात्मक उपाययोजनेसाठी किशोरवयीन मुलींना रुबेला लसीकरण करावे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सिंचनाअभावी शेतकरी आत्महत्या

0
0

नितीन गडकरी यांचे प्रतिपादन; जनकल्याण समितीला पुरस्कार

म. टा. प्रतिनिधी, पुणे
‘महाराष्ट्रात सिंचनाचे प्रमाण अत्यल्प म्हणजेच १८.२ टक्के आहे. ते प्रमाण ५० टक्के होईपर्यंत शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबणार नाहीत,’ असे मत केंद्रीय रस्ते व वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी रविवारी व्यक्त केले.

डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या समारंभात गडकरी यांच्या हस्ते सोसायटीचा ‘प्रथम अध्यक्ष राजर्षी शाहू छत्रपती पुरस्कार’ राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या जनकल्याण समितीला प्रदान करण्यात आला. समितीचे अध्यक्ष रवींद्र साताळकर आणि कार्यवाह शैलेंद्र बोरकर यांनी स्वीकारला. महापौर मुक्ता टिळक, सोसायटीचे अध्यक्ष शाहू छत्रपती, सोसायटीच्या परिषद व नियामक मंडळाचे अध्यक्ष शरद कुंटे, सोसायटीचे कार्यवाह प्रा. आनंद भिडे उपस्थित होते.

गडकरी म्हणाले, ‘संपूर्ण देशात पाण्याचा प्रश्न गंभीर नाही. पाण्याचा प्रश्न हा महाराष्ट्र, कर्नाटक, तेलंगण, आंध्र प्रदेश, मध्य प्रदेश, छत्तीसगड, गुजरात, ओडिशा, राजस्थान यासारख्या ११ राज्यांमध्ये आहे. मात्र, हा प्रश्न जटील असल्यानेच देशातील मोठा प्रश्न आहे. सिंचनाची क्षमता वाढवून हा प्रश्न आपण सोडवू शकतो. मात्र, राज्यांमध्ये सिंचनाच्याबाबतीत निर्णय घेण्याचे अधिकार हे राज्य सरकारचे असतात. त्यामुळे केंद्र सरकारला त्यात हस्तक्षेप करता येत नाही. महाराष्ट्रात सुमारे एक लाख कोटी रुपयांचे बंद पडलेले सिंचनाचे प्रकल्प आहेत. हे प्रकल्प रखडल्याने ते पूर्णच होऊ शकले नाही. त्यामुळे या प्रकल्पांचा फायदाच महाराष्ट्राला होऊ शकला नाही. पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश या राज्यांमध्ये सिंचनाचे प्रमाण भरपूर आहे. या राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रात सिंचनाचे प्रमाण १८.२ टक्के आहे. त्यामुळे सिंचनामध्ये महाराष्ट्राचा क्रमांक हा शेवटून दुसरा लागतो. शेतकऱ्यांच्या आत्महत्येचे मूळ हे पाण्याशी संबंधित आहे. महाराष्ट्रात सिंचनाचे प्रमाण ५० टक्के होईपर्यंत शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबणार नाहीत.’

शाहू छत्रपती म्हणाले, ‘ शेतकऱ्यांना पाणी मिळत नाही. त्यामुळे ते आत्महत्या करतात, हे खरे आहे. मात्र, त्यासोबतच नापिकी, कर्जबाजारीपणा हे देखील मुद्दे महत्त्वाचे आहे. देशात पाण्याच्या प्रश्नाकडे सुरुवातीपासून लक्ष देण्यात आले नाही. त्यामुळेच पाण्याचा प्रश्न गंभीर आहे. जनकल्याण समितीने हा प्रश्न सोडविण्यासाठी उल्लेखनीय काम केल्याने त्यांना हा पुरस्कार प्रदान करताना विशेष आनंद होत आहे.’

दरम्यान, ‘नागपूर मेट्रोचे काम जसे जलद गतीने सुरू आहे, तसेच काम पुणे मेट्रोचे जलद गतीने होण्यासाठी नितीन गडकरी यांनी लक्ष घालावे,’ अशी मागणी शाहू छत्रपती यांनी केली. ‘जनकल्याण समितीने ग्रामीण भागात जलसंधारणाची सुमारे ६ कोटी रुपयांची कामे लोकवर्गणीतून केली आहेत. या कामांमुळे तेथील भागाचा कायापालट झाला आहे. सोसायटीने समितीच्या कामांची दखल घेऊन हा पुरस्कार दिल्याने विशेष आनंद होत आहे. यापुढेही समिती अशीच कामे करत राहील,’ असे साताळकर यांनी सांगितले.

१११ नद्या जोडणार

‘देशात पाण्याची समस्या सोडविण्यासाठी आणि जलवाहतूक वाढविण्यासाठी केंद्र सरकारचे प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी भविष्यात १११ नद्या जोडण्यात येतील. दहा नद्या जोडण्याची कार्यवाही सुरू झाली असून त्यात राज्यातील दोन नद्या आहे. भविष्यात पाण्याहून उडणारी लहान विमाने आणि धावणाऱ्या बस सुरू करण्यात येणार आहेत. त्यासाठी पाण्यावर धावणारी परदेशातून आणलेली एक बस मुंबईच्या पोर्टवर उभी आहे. परदेशातून आणलेल्या बसला २०० टक्के कर लागतो, तर जहाजाला ४० टक्के कर लागतो. त्यामुळे नेमक्या कोणत्या कराची आकारणी करावी या विचारात कस्टम विभाग आहे. त्यामुळे दोन महिन्यांपासून ही बस विभागात पडून आहे,’ अशी माहिती गडकरी यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नगरसेवकांना धाकात ठेवा

0
0

नितीन गडकरी यांचा महापौरांना सल्ला

म. टा. प्रतिनिधी, पुणे
‘नागपूरमध्ये आम्ही विरोधात जाणाऱ्या कोणत्याही नगरसेवकाचे ऐकून घेत नाही. आम्ही सांगतो, आमचा फोटो लावून तुम्ही निवडून आलात. आम्ही हात काढून घेतला की तुम्ही पडणार. त्यामुळे हे नगरसेवक कामात आडवे येत नाहीत. आता पुण्यातील नगरसेवकांनाही तुम्ही असेच सांगा,’ अशा शब्दांत केंद्रीय रस्ते व वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी महापौर मुक्ता टिळक यांना नगरसेवकांना धाकात ठेवण्याचा रविवारी सल्ला दिला.

पुण्यात एका पुरस्कार वितरण समारंभामध्ये आले असता गडकरी बोलत होते. नागपूरमध्ये ८० टक्के भागात २४ तास पाणी पुरवठा केला जातो, हे सांगत असताना गडकरी यांनी पुणे आणि नागपूरच्या परिस्थितीचा आढावा घेतला.

गडकरी म्हणाले, ‘ नेहमीच पुणे आणि नागपूर असा वाद होतो. केंद्र सरकार पुणे आणि नागपूरमध्ये कोणताही भेदभाव करत नाही. मात्र, जेव्हा लातूरला रेल्वेने पाणी पुरवठा होत होता, तेव्हा नागपूरच्या झोपडपट्टीत २४ तास पाणीपुरवठा सुरू होता. नागपूरला नेते आणि विद्वान कमी असल्यामुळे वाद कमी होतात. त्यामुळे एकदा म्हटले की ठरते. मात्र, पुण्यात अशी परिस्थिती नाही.

प्रत्येक विषयात वाद असतात. नागपूरमध्ये जेव्हा २४ तास पाणी पुरवठा करण्याचा विचार सुरू होता तेव्हा काही नगरसेवक गडबड करायला लागले. त्या नगरसेवकांना सांगितले की, ‘गडबड केली तर पुढच्या वेळी तिकीट कापेल, हे याद राखा.’ मग, सर्वच नगरसेवकांनी सहकार्य केले आणि देशातील पहिला २४ तास पाणी पुरवठा प्रकल्प नागपूरमध्ये यशस्वीरित्या झाला. आता पुण्यातही तुम्हाला नगरसेवकांना असेच काहीसे सांगावे लागेल. नेत्यांनी खंबिर भूमिका घेतली की सर्व प्रश्न सुटतात.’

‘लाँग टर्म’ काम करा…

‘राजकारणी व्हायचे असेल, तर पाच वर्षांपुरते राजकारण करू नका. पाच वर्षांचे राजकारण करणाऱ्यांना दर निवडणुकीच्या वेळी निवडून येण्यासाठी प्रचार करावा लागतो. राजकारणात ‘लाँग टर्म’ समाजसेवेचे व्रत ठेऊन काम केल्यास निवडणुकीत प्रचार करण्याची गरज भासणार नाही. स्वत: मी हे अनुभवले आहे,’ असे गडकरी यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अखेर कचराकोंडी फुटली

0
0

कायमच्या तोडग्यासाठी महिन्यात बृहत आराखडा

म. टा. प्रतिनिधी, पुणे
पुणे शहरात गेली २३ दिवस सुरू असलेली कचराकोंडी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उरळी देवाची आणि फुरसुंगी येथील ग्रामस्थांबरोबर केलेल्या चर्चेनंतर रविवारी फुटली. येत्या एक महिन्यांच्या कालावधीत कचरा प्रश्नावर कायमचा तोडगा काढण्यासाठी बृहत आराखडा तयार करण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला. हा आराखडा तयार झाल्यानंतर त्यावर चर्चा करण्यात येणार आहे. दरम्यान, उरळी देवाची आणि फुरसंगी येथील ग्रामस्थांनी आंदोलन स्थगित केल्यानंतर येथील कचरा डेपोमध्ये कचरा टाकण्यास सुरूवात झाली.

उरळी देवाची येथील कचरा डेपोला आग लागल्यानंतर दोन्ही गावातील ग्रामस्थांनी कचरा डेपोंमध्ये कचरा टाकण्यास मनाई केली होती. ग्रामस्थांनी गेली २३ दिवस हे आंदोलन सुरू ठेवले होते. ग्रामस्थ, विरोधकांच्या आंदोलनांमुळे पुण्याचा कचरा प्रश्न दिवसेंदिवस पेटत होता. अखेर मुख्यमंत्री फडणवीस यांनी रविवारी ग्रामस्थ, तसेच सर्वपक्षीयांशी चर्चा करून कचराकोंडी फोडली.

पुणे शहरातील कचरा विकेंद्रित पद्धतीने जास्तीत जास्त कसा जिरवला जाऊ शकतो, यासाठी एक बृहत आराखडा येत्या एक महिन्यांत तयार करायचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामध्ये कचरा जिरवण्यासाठी नवीन तंत्रज्ञानाचा वापर, भराव क्षेत्रातील कॅपिंगचा अंतर्भाव असणार आहे. पुढील ३० ते ४० वर्षांतील कचऱ्याचे नियोजन या आराखड्यात अपेक्षित आहे. ‘ग्रामस्थांनी एक महिन्यांचा कालावधी द्यावा; त्यानंतर हा आराखडा सर्वांसमोर ठेवून आणि त्यावर चर्चा करून आणि पुढील निर्णय घेऊ,’ असे आवाहन मुख्यमंत्री फडणवीस यांनी ग्रामस्थांना केले होते.

फडणवीस यांनी केलेल्या आवाहनाला दोन्ही गावांतील ग्रामस्थांनी प्रतिसाद देऊन आंदोलन स्थगित करण्याचा निर्णय घेतला. कचरा डेपोत कचरा टाकण्याचे कधीपासून थांबवणार, यावर फडणवीस यांनी स्पष्ट भूमिका मांडली. आराखडा तयार केल्यानंतर कचऱ्याचा प्रश्न कधी आणि कसा मार्गी लागणार हे स्पष्ट होईल. या वेळी काही तरी कालावधी सांगून खोटे बोलणे योग्य नाही. मात्र, हा प्रश्न शक्य तितक्या लवकर मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करू, असे आश्वासन फडणवीस यांनी दिले. या दोन्ही गावांचा पिण्याच्या पाण्याचा, दवाखान्याचा तसेच विकासकामांचे प्रश्न प्रलंबित आहे. हे प्रश्न सोडवण्यासाठी एक कालमर्यादा निश्चित करून ते सोडवू, असे फडणवीस यांनी ग्रामस्थांना सांगितले.

‘कॅपिंग झालेल्या जमिनी परत द्या’

भराव भूमीचे कॅपिंग केलेल्या जमिनी आम्हाला परत करा, अशी ग्रामस्थांची मागणी होती. मात्र, सर्वोच्च न्यायालयाच्या एका निर्णयामुळे अधिग्रहण केलेल्या जमिनी परत देता येत नाही. मात्र, त्या जमिनीतील काही भाग कसा देता येईल, याबाबत राज्य सरकार मार्ग काढेल, असे फडणवीस यांनी ग्रामस्थांना आश्वासित केले.

नोकऱ्या कायमस्वरूपी होणार?

उरळी देवाची आणि फुरसुंगी या गावातील नागरिकांना महापालिकेत तात्पुरत्या स्वरूपात नोकरीत घेण्यात आले आहे. या ग्रामस्थांना कायमस्वरूपी नोकरीत सामावून घेण्याची मागणी होती. मुख्यमंत्री फडणवीस यांनी या ग्रामस्थांना कायमस्वरूपी नोकरीत घेण्याचे आश्वासन या बैठकीत दिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


एक्स्प्रेस-वेवर अपघात; पाच ठार

0
0

म. टा. प्रतिनिधी पिंपरी/लोणावळा
जेजुरी येथे देवदर्शन करून मुंबईकडे परतणाऱ्या कुटुंबातील पाच जणांचा पुणे-मुंबई एक्स्प्रेस वेवर अपघातात मृत्यू झाला. पाच जणांवर निगडी लोकमान्य आणि सोमाटणे फाटा येथील हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. कामशेत बोगद्यात कार आणि खासगी कंपनीच्या व्होल्व्हो बसमध्ये रविवारी (७ मे) दुपारी हा अपघात झाला.

दत्तात्रेय देशमुख (६३), भामिनी दत्तात्रेय देशमुख (६०), राखी नीलेश पाटील (४०), श्रद्धा पाटील (१९, सर्व रा. विरार, मुंबई) व कारचालक दीपक (पूर्ण नाव, पत्ता उपलब्ध नाही) अशी अपघातात मृत्यू झालेल्यांची नावे आहेत. जखमींमध्ये रूपेश देशमुख (३४), संजना पाटील (१५), राहुल दत्तात्रेय देशमुख (३४), रूपाली राहुल देशमुख (२८) व ओम राहुल देशमुख (दोन वर्षे) यांचा समावेश आहे. राहुल आणि रूपाली देशमुख या दोघांवर कामशेत येथील हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. तर अन्य तिघांवर लोकमान्य निगडी येथे उपचार सुरू आहेत.

पोलिस आणि हॉस्पिटल प्रशासनाकडून मिळालेल्या माहितीनुसार, देशमुख व पाटील हे एकाच परिवारातील सर्व सदस्य आहेत. जेजुरी येथे देवदर्शनासाठी होंडा मोबिलिओ कारमधून (एमएच ४८ एस ८६४६) ही दोन्ही कुटुंबे पुण्याला आली होती. तेथून परतत असताना हा अपघात झाला. घरी परतत असताना पुणे-मुंबई एक्स्प्रेस-वेवरील कामशेत बोगद्यात खासगी नीता व्होल्व्हो या कंपनीच्या लक्झरी बसचे (एमएच ०४ जी ५९६०) ऑइल मार्गावर सांडले होते आणि बसने पेट घेतला होता. यामुळे बोगद्यातील दिवे गेले होते. या दरम्यान पुण्याहून भरधाव येणारी कार मार्गावर सांडलेल्या ऑइलवरून निसटल्याने बसला मागून धडकली. यामध्ये दीपक या कारचालकाचा जागीच मृत्यू झाला; तर उपचारादरम्यान चौघांचा निगडी लोकमान्य हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यान मृत्यू झाला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

प्रतीक्षा....शिडकावा अन् हुलकावणी

0
0

पुणे : दिवसभर जाणवणारा कमालीचा उकाडा... त्यामुळे जाणवणारी अस्वस्थता... सायंकाळी दाटून आलेले आभाळ... हवेत पहिल्या पावसानंतरचा ओल्या मातीचा सुगंधी दरवळ यामुळे पुणेकरांना जोरदार पावसाची प्रतीक्षा होती. प्रत्यक्षात मात्र, काही उपनगरे वगळता पावसाने हुलकावणीच दिली. पाषाण, औंध परिसरात हलका पाऊस झाला, तर येरवड्यात गारांसह झालेल्या पावसात भिजण्याचा आनंद नागरिकांनी लुटला.

गेले काही दिवस कमालीच्या उकाड्याला वैतागलेल्या पुणेकरांना दमदार पावसाची प्रतीक्षा होती. मात्र, शहराच्या काही उपनगरात झालेल्या हलक्या शिडकाव्याव्यतिरिक्त मध्यवर्ती भागाला पावसाने हुलकावणीच दिली. पुढील दोन दिवसात पुण्यात हवामान ढगाळ राहण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

पुण्यालगतच्या शिरूर, बारामती, पारनेर आदी गावांमध्येही रविवारी जोरदार पावसाने हजेरी लावली. राज्यात सातारा, सोलापूर, पंढरपूर, नगर, यवतमाळ आदी ठिकाणीही जोरदार पाऊस झाला. हवामान विभागाकडील नोंदीनुसार सायंकाळी साडेपाचपर्यंत सातारा येथे तीन मिलिमीटर पावसाची नोंद झाली.

येरवडा, लोहगाव, धानोरीसह शहराच्या पूर्व भागात अनेक ठिकाणी सायंकाळी सहाच्या सुमारास वादळी वाऱ्यांसह गारांचा पाऊस झाला. सुमारे अर्धा तास हा पाऊस झाला. लोहगांव, धानोरी भागात जोरदार वाऱ्यांमुळे काही घरांचे पत्रे उडाले. गारांसह झालेल्या या पावसामुळे नागरिकांची असह्य उकाड्यातून काही काळ सुटका झाली. याच वेळी पाषाण, औंध, विद्यापीठ परिसरातही दहा पंधरा मिनिटे पावसाने हजेरी लावली. तर मध्यवर्ती भागात पावसाचे काही थेंब पडले. मात्र, पावसाने भिजलेल्या ओल्या मातीचा सुगंध अवघ्या शहरात दरवळत होता.

दोन दिवसांत पावसाची शक्यता

पुढील दोन दिवस राज्यात काही ठिकाणी पावसाची शक्यता असल्याचा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने (आयएमडी) वर्तविला आहे. यामध्ये सोमवारी दक्षिण मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे. तर ११ व १२ मे रोजी मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

काकडेंची कन्येच्या विवाहावर कोट्यवधींची उधळण

0
0

मटा ऑनलाइन वृत्त । पुणे

कन्येच्या विवाह सोहळ्यावर कोट्यवधींची उधळण करणं भाजप खासदार संजय काकडे यांना चांगलंच भोवलं आहे. या अफाट खर्चावर सर्वच स्तरातून टीका झाल्यानंतर काकडे यांनी लगेचच सारवासारव करत गरीब विद्यार्थ्यांसाठी आपण १ कोटी रूपये खर्च करणार असल्याचं सांगितलं.

खासदार संजय काकडे यांची कन्या कोमल आणि राज्याचे सहकारमंत्री सुभाष देशमुख यांचे चिरंजीव रोहन यांचा शाही विवाह पुण्यातील म्हालुंगे बालेवाडीच्या शिवछत्रपती क्रीडा संकुलात पार पडला. या सोहळ्याला राज्याचं अर्ध्याहून अर्ध मंत्रीमंडळ उपस्थित होते. स्वत: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सपत्नीक उपस्थित होते. खासदार काकडे यांच्या कंपनीने न्यूकोपरे गावातील नागरिकांचं पुनर्वसन रखडवलं आहे. त्यामुळे काही दिवसांपूर्वी ग्रामस्थांनी आंदोलनही केलं होतं. मात्र त्यानंतरही काकडेंनी त्यांचं पुनर्वसन केलं नव्हतं. यापार्श्वभूमीवर काकडे यांनी मुलीच्या लग्नावर कोट्यवधींची उधळण केल्यानं नागरिकांमध्ये संताप पसरला होता. त्यामुळे या शाही विवाह सोहळ्यावर टीकेची झोडही उठली होती.

त्यामुळे काकडे यांनी तातडीने सारवा सारव केली. राज्यातील गरजू मुलांना आपण तब्बल एक कोटींची मदत करणार आहोत. यासाठी १०० विद्यार्थ्यांची निवड केली जाणार असून त्यांना प्रत्येकी एक लाख रुपयांपर्यंतची मदत मिळू शकणार आहे, असं स्पष्टीकरण काकडे यांनी दिलं आहे. जिल्हाधिकाऱ्यांकडे धनादेश सुपूर्द केल्याचा दावाही त्यांनी केला आहे. न्यूकोपरे गावातील रहिवाशांचं पुनर्वसन झालेलं नसतानाही काकडे मुलीच्या लग्नात कोट्यवधींची उधळपट्टी करत असल्याने टीका झाली होती. विद्यार्थ्यांना आर्थिक मदत करुन एक प्रकारे काकडेंनी या प्रकरणावर पांघरुण घालण्याचा प्रयत्न केल्याचं म्हटलं जात आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पुजारी खटला: आरोप सिद्ध, दोषींना उद्या शिक्षा

0
0

मटा ऑनलाइन वृत्त । पुणे

सॉफ्टवेअर इंजिनीअर नयना पुजारी हत्येप्रकरणी तब्बल सात वर्षानंतर आरोपींविरोधात बलात्कार आणि हत्येचे आरोप सिद्ध झाले आहेत. विशेष न्यायाधीश एल. एल. येनकर यांच्या कोर्टाने हा निकाल दिला असून उद्या मंगळवारी या आरोपींविरोधात शिक्षा सुनावली जाणार आहे. तर या खटल्यातील माफीच्या साक्षीदाराची सुटका करण्यात आली आहे.

सिनिक्रॉन कंपनीत सॉफ्टवेअर इंजिनीअर म्हणून काम करत असलेल्या नयना पुजारी हिचे अपहरण करून आरोपींनी तिच्यावर सामूहिक बलात्कार केला होता. त्यानंतर तिचा खून केला होता. या प्रकरणी योगेश अशोक राऊत (वय२४, रा. गोळेगाव, ता. खेड), राजेश पांडुरंग चौधरी (वय २३, गोळेगाव, ता. खेड), महेश बाळासाहेब ठाकूर ( वय २४, रा. सोळू, ता. खेड ), विश्वास हिंदुराव कदम (वय २६, रा. दिघीगांव, मूळ गाव ‍भुरकवडी, ता. खटाव, जि. सातारा ) या चौघांवर या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणात राजेश चौधरी हा आरोपी माफीचा साक्षीदार झाला होता. या तिन्ही आरोपींविरोधात आज न्यायालयात हत्या, बलात्कार, अपहरण आणि चोरीचे आरोप सिद्ध झाले. या तिन्ही आरोपींविरोधात आरोप सिद्ध झाल्याने उद्या मंगळवारी त्यांच्याविरोधात शिक्षा सुनावली जाणार असल्याचं न्यायालयाने स्पष्ट केलं. तर आरोपींना फाशीची शिक्षा ठोठावण्याची मागणी पुजारी कुटुंबियांनी केली आहे.

पुजारी खून खटल्याचे कामकाज पाहण्यासाठी राज्य सरकारतर्फे विशेष सरकारी वकील म्हणून अॅड. हर्षद निंबाळकर यांची नियुक्ती करण्यात आली होती. गेली सात वर्षे या खटल्याची सुनावणी सुरू आहे. आतापर्यंत या खटल्याची सुनावणी चार न्यायाधीशांपुढे झाली आहे. सरकार पक्षातर्फे या खटल्यात ३७ साक्षीदार तपासण्यात आले आहेत. तर, बचाव पक्षातर्फे १३ साक्षीदार तपासण्यात आले आहेत. बचाव पक्षातर्फे अॅड. बी. ए. आलूर आरोपींची बाजू मांडली.

या खटल्यातील आरोपी राजेश चौधरीने माफीचा साक्षीदार होण्याची तयारी दर्शविल्यानंतर त्याचा प्रथमवर्ग न्यायदंडाधिकांऱ्यापुढे जबाब नोंदविण्यात आला होता. बचाव पक्षातर्फे त्यावर हायकोर्टात हरकत घेण्यात आली होती. मात्र, हायकोर्टाच्या आदेशानंतर चौधरी माफीचा साक्षीदार होण्यावर शिक्कामोर्तब झाले. सरकारी पक्षातर्फे कोर्टात या खटल्यामध्ये भक्कम पुरावा सादर करण्यात आला आहे, अशी माहिती अॅड. हर्षद निंबाळकर यांनी दिली.

या खटल्यात परिस्थितीजन्य पुरावा आहे. आरोपींचा गुन्हा करण्याचा उद्देश, हेतू सिद्ध होत आहे. माफीचा साक्षीदार राजेश चौधरीने नयना पुजारी आणि आरोपींना शेवटचे पाहिले होते. या खटल्यात वैद्यकीय पुरावा भक्कम आहे. खटल्यातील दोन आरोपींनी त्यांच्या मित्रांकडे गुन्हा केल्याची कबुली दिली होती. पुजारी हिचे दागिने, घड्याळ आरोपींकडून जप्त करण्यात आले. आरोपींकडून जप्त करण्यात आलेल्या कपड्यांवर नयना पुजारीच्या रक्तगटाचे रक्त आढळले. आरोपींच्या कपड्यावर हे रक्त कसे याचे स्पष्टीकरण बचाव पक्षाला देता आले नव्हते. या खटल्यातील माफीच्या साक्षीदाराने दिलेली साक्ष आणि सरकार पक्षातर्फे सादर करण्यात आलेले परिस्थितीजन्य पुरावे एकमेकांना पूरक आहेत, असे अॅड. निंबाळकर यांनी स्पष्ट केले होते..

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

उंदराने वायर कुरतडली, शॉक लागून महिलेचा मृत्यू

0
0

म. टा. प्रतिनिधी, पिंपरी

पाण्याची मोटर चालू करताना वायर वर पाय पडल्याने विजेचा शॉक बसून महिलेचा मृत्यू झाला. भोसरी येथे सकाळी साडे नऊच्या सुमारास ही घटना घडली.

सिंपल अनुपकुमार शुक्ला (२५, हनुमाननगर-भगतनगर, भोसरी) असे मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे. शुक्ला यांनी पाणी भरण्यासाठी सकाळी साडेनऊ वाजता मोटर चालू केली. मोटरची वायर उंदराने कुरतडलेली होती. त्या वायरवर पाय पडल्याने शुक्ला यांना विजेचा धक्का बसला. यानंतर त्यांना तातडीने पिंपरी महापालिकेच्या वायसीएम हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान शुक्ला यांचा मृत्यू झाला. यासंबंधी भोसरी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images