Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

बसमधून मोफत प्रवास केव्हा?

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

शहराच्या सार्वजनिक वाहतुकीचा कणा असलेल्या पुणे महानगर परिवहन महामंडळाकडे (पीएमपी) अधिकाधिक नागरिकांनी आकर्षित व्हावे. त्यांनी खासगी वाहने न वापरता, सार्वजनिक वाहतूक सेवेचा वापर करावा, यासाठी महिन्याच्या शेवटच्या सोमवारी पीएमपीतून मोफत प्रवास देण्याच्या योजनेचा ठराव पुणे महानगरपालिकेने चार महिन्यांपूर्वी मान्य केला. पीएमपीचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक तुकाराम मुंढे त्या ठरावाची तत्परतेने अंमलबजावणी करणार का, असा प्रश्न माजी उपमहापौर आबा बागुल यांनी उपस्थित केला.

पीएमपीच्या अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक पदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर मुंढे यांनी नियमांचा व कारवाईचा धडाका लावला आहे. पीएमपीच्या सक्षमीकरणाला चालना देण्यासाठी त्यांनी कडक पावले उचलली आहेत. पीएमपीकडे अधिकाधिक प्रवाशांना आकर्षिक करण्यासाठी शेवटच्या सोमवारी मोफत प्रवास उफलब्ध करून देण्याचा महापालिकेने ठराव केला होता. त्यामुले मुंढे आता पुणेकरांना दिलासा देतात का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. विशेष म्हणजे पीएमपीला तोट्यातून वाचविण्यासाठी; तसेच या योजनेचा आर्थिक भार पडू नये, यासाठी सुमारे पावणेदोन कोटी रुपयेही महापालिका पीएमपी​ला देणार आहे, असे बागूल यांनी म्हटले आहे.

सार्वजनिक वाहतूक सेवेचा वापर अधिकाधिक वाढावा, त्याचबरोबर एक दिवस तरी प्रदूषण टळावे ​आणि इंधन बचतीलाही चालना मिळावी या उद्देशाने तत्कालीन उपमहापौर बागुल यांनी महिन्याच्या शेवटच्या सोमवारी पीएमपीतून पुणेकरांना मोफत प्रवासाबाबत ठराव दिला होता. स्थायी समितीसह मुख्यसभेनेही एकमताने संमत करून तो पीएमपीकडे पाठविला होता. मात्र, त्याची अंमलबजावणी अद्यापही झालेली नाही.

योजना राबवणे तूर्तास अशक्य

पीएमपीकडून पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिकांच्या हद्दीत सेवा दिली जाते. त्यामुळे या योजनेची अंमलबजावणी करण्यासाठी पुणे महापालिकेबरोबरच पिंपरी-चिंचवड महापालिकेकडूनही या योजनेसाठी हिरवा कंदील दाखविण्याची गरज आहे. मात्र, अद्याप पिंपरी-चिंचवड महापालिकेकडून मान्यता मिळालेली नाही. त्यामुळे ही योजना राबविणे तूर्तास शक्य नाही.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


मेट्रो मार्गिकांचे होणार मूल्यांकन

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

शहरातील ३१ किलोमीटर मेट्रोच्या दोन्ही मार्गांचे पर्यावरणीय अभ्यासाद्वारे मूल्यांकन (एन्व्हायर्नमेंटल इम्पॅक्ट असेसमेंट) करण्याचा निर्णय महाराष्ट्र मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनने (महामेट्रो) घेतला असून, त्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. साधारणतः सहा ते आठ महिन्यांमध्ये दोन्ही मार्गांसाठीचा सविस्तर पर्यावरणीय अहवाल तयार होण्याची चिन्हे आहेत.

शहरासाठी महत्त्वाच्या मेट्रो प्रकल्पाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते डिसेंबर अखेरीस भूमिपूजन झाले. त्यानंतर, मेट्रोच्या शहरातील दोन्ही मार्गांचे प्रत्यक्ष काम सुरू होण्यासाठी वेगवान हालचाली सुरू झाल्या आहेत. दोन्हा मार्गांची टेंडर प्रक्रिया सुरू असून, येत्या पावसाळी हंगामाला सुरुवात होण्यापूर्वी प्रत्यक्ष कामही सुरू झाले असेल. मेट्रोसारख्या महत्त्वाच्या प्रकल्पाची अंमलबजावणी करताना, पर्यावरण आणि इतर घटकांवर त्याचे वेगवेगळे परिणाम होण्याची शक्यता असते. त्यामुळे, अशा प्रकल्पांसाठी पर्यावरणीय अहवाल तयार करून घेतला जातो. पुणे मेट्रो प्रकल्पाची अंमलबजावणी करणाऱ्या ‘महामेट्रो’नेही संपूर्ण प्रकल्पासाठी हा अहवाल तयार करण्याचे निश्चित केले आहे.

मेट्रोचे प्रत्यक्ष काम सुरू झाल्यानंतर कोणी आक्षेप घेतल्यास, त्यात आणखी वेळ जाऊन प्रकल्पाला विलंब होण्याची भीती आहे. मेट्रोला विलंब झाल्यास प्रकल्पाचा खर्च वाढण्याची भीती आहे. तसेच, पुणेकरांनाही वाहतूक कोंडीतून मार्ग काढण्यासाठी आणखी प्रतीक्षा करावी लागेल. हे सर्व संभाव्य धोके टाळण्यासाठी पर्यावरणीय अहवालाची प्रक्रिया ‘महामेट्रो’ने सुरू केली आहे. पर्यावरणावर होणारे परिणाम कमीत कमी असावेत, याकरिता कोणत्या उपाययोजना करता येतील, याचाही आढावा याद्वारे घेतला जाणार आहे. हा अहवाल तयार करून घेण्याची प्रक्रिया नुकतीच सुरू करण्यात आल्याने आगामी चार ते सहा महिन्यांत सविस्तर अहवाल तयार होण्याची अपेक्षा आहे. त्यानुसार, महामेट्रोतर्फे आवश्यक उपाययोजना केल्या जाणार आहेत.

नदीपात्रातील कामाचाही अभ्यास

वनाज ते रामवाडी मार्गापैकी १.७ किमीचा मार्ग नदीपात्रातून जातो. मेट्रोच्या या मार्गाला पर्यावरणवाद्यांनी आक्षेप घेत, राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाकडे (एनजीटी) दाद मागितली होती. एनजीटीने दिलेल्या निर्णयाला सुप्रीम कोर्टाने स्थगिती दिली होती. ‘महामेट्रो’कडून या संपूर्ण मार्गाचाही पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून सविस्तर अभ्यास केला जाणार आहे. त्याचाही सविस्तर अहवाल तयार केला जाणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

उत्पादनपूर्व ‘टेस्टिंग’चा कायदा बदलण्याची मागणी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

काही ठराविक वाहनांच्या ‘फायरिंग’मुळे मोठ्या प्रमाणावर होणाऱ्या ध्वनी प्रदूषणाला आळा घालण्यासाठी वाहनाच्या उत्पादनपूर्व ‘टेस्टिंग’च्या कायद्यात बदल करण्याची मागणी ऑल इंडिया मोटार ट्रान्स्पोर्ट काँग्रेसने केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांना तसे निवेदन पाठवण्यात आले आहे.

वाहन विक्रीसाठी बाजारात आणण्यापूर्वी ‘ऑटोमोटिव्ह रीसर्च असोसिएशन ऑफ इंडिया’ (एआरएआय) कडून संबंधित वाहनाची तपासणी केली जाते. यामध्ये वाहनामधून निर्माण होणारा ध्वनी तपासला जातो. मात्र, तपासणीसाठी कायद्यानुसार ‘स्टेशनरी व्हेइकल’ तपासले जाते. त्यामध्ये केवळ वाहन सुरू केल्यानंतर (एक्सिलेटर वगळता) येणारा आवाज तपासला जातो. त्यामुळे रस्त्यावर ‘अॅक्सिलेटर’ दिल्यानंतर येणाऱ्या आवाजावर काही बंधने नाहीत. त्यामुळे या तपासणीच्या नियमांमध्ये केवळ ‘स्टेशनरी व्हेइकल’ तपासण्याचा नियम बदलून काळानुसार नियम करण्याची आवश्यकता आहे, ऑल इंडिया मोटार ट्रान्स्पोर्ट काँग्रेसचे सदस्य बाबा शिंदे यांनी पंतप्रधानांना पाठविलेल्या निवेदनात म्हटले आहे.

निवेदनात म्हटले आहे, ‘वाहनांचे कर्णकर्कश हॉर्न, मोठ्या आवाजाचे सायलेन्सर (फायरिंग) आणि इंजिनच्या आवाजामुळे मोठ्या प्रमाणावर ध्वनी प्रदूषण होते. काही ठराविक कंपन्यांच्या वाहनांचे ‘फायरिंग’ ही त्या वाहनांची ओळख बनली आहे. त्यामुळे त्या कंपनीच्या कोणत्याही गाड्यांपासून ध्वनिप्रदूषण जास्त होते. या गाड्यांच्या आवाजामुळे जवळपासचे नागरिक दचकतात, तसेच ज्येष्ठ नागरिकांना त्यांचा अधिक त्रास होतो. तरुणांमध्ये या गाड्यांची खूप क्रेझ आहे. तर, अनेक जण वाहनांचे सायलेंसर बदलून अधिक आवाज निर्माण करणारे ‘सायलेंसर’ बसवितात. याबाबत संबंधित कंपन्यांची आणि नागरिकांची मानसिकता बदलली पाहिजे. वाहननिर्मिती करताना कंपन्यांना त्या वाहनांचा आवाज कमी करणे शक्य आहे. मात्र, वाहनाची ओळख म्हणून आवाजाकडे पाहिले जात असल्याने तो कमी केला जात नाही. यामुळे कायद्यात बदल करणे हा एकमेव पर्याय असल्याने पंतप्रधानांकडून याबाबत निर्णय अपेक्षित आहे.’

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भेंडी, फ्लॉवर, कोबी, मटार महाग

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

वाढत्या उन्हामुळे फळभाज्यांसह पालेभाज्यांची आवक घटली आहे. त्यामुळे गेल्या आठवड्याप्रमाणे आवक सारखीच असल्याने फळभाज्यांचे दर महागले. भेंडी, फ्लॉवर, कोबी, गाजर, मटार, पावट्याचे दर वधारले आहेत. तर कोथिंबीर, मेथी थोडी महागडी झाली आहे.
मार्केट यार्डात १६० ते १७० ट्रक शेतमालाची रविवारी आवक झाली. परराज्यातील हिमाचल प्रदेशातून ३ ट्रक मटारची आवक झाली. गुजरात, कर्नाटकातून कोबीची ३ ते ४ ट्रक आवक झाली. कर्नाटकातून तोतापुरी कैरीची ५ते ६ टेम्पोची आवक झाली आहे. कर्नाटक, गुजरात, आंध्रप्रदेशातून १४ ते १५ टेम्पोची आवक झाली आहे. स्थानिक मालामध्ये सातारी आल्याची २२०० पोती, टोमॅटो साडेपाच हजार ते सहा हजार क्रेटची आवक झाली आहे. फ्लॉवरची १५ ते १६ टेम्पो, कोबीची १० ते १२ टेम्पोची आवक झाली आहे. चिंचेची ३० ते ३५ पोतीची आवक झाली आहे. मटारची पारनेरहून ३५० ते ४०० पोतींची आवक झाली आहे. शेवग्याची ४ ते ५ टेम्पो, गावरान कैरीची ८ ते १० टेम्पोची आवक झाली आहे.
पुणे विभागातून १५० ट्रक कांद्याची आवक झाली. आग्रा, इंदूर, नाशिक आणि तळेगाव येथून स्थानिक बटाट्याचे मिळून ५० ट्रकची आवक झाली आहे. मध्यप्रदेश आणि गुजरातमधून लसणाची पाच ते साडेपाच हजार गोण्यांची आवक झाली.
कोथिंबीरची सव्वालाख जुडीची तर मेथीची ३० हजार जुडीची आवक झाली आहे. आवक घटल्याने मेथी, कोथिंबीरच्या दरात वाढ झाली आहे. त्यामुळे खिशाला भुर्दंड पडत आहे. स्थानिक भागातून आवक अधिक प्रमाणात आल्याने आल्याचे दर उतरले आहेत.

डाळिंबे स्वस्त, लिंबे महाग
उन्हामुळे लिंबासह फळांची मागणी होत आहे. रसवंती गृहाबरोबर ज्यूस विक्रेत्यांकडूनदेखील फळांना मागणी होत आहे. डाळिंबाची ५० ते ६० टन आवक झाली असून त्यामुळे २० टक्के दर उतरले आहेत. चिक्कूची दोन हजार गोणींची आवक झाली आहे. मोसंबीची ५०, संत्र्यांची ३० टनांची आवक झाली आहे. कलिंगड, खरबूजाची अनुक्रमे ३० ते ३२ टेम्पो आणि ३० टेम्पोची आवक झाली आहे. द्राक्षांची ४५ ते ५० टनाची आवक झाली. कर्नाटक हापूसची आठ ते दहा हजार पेटींची आवक झाली आहे. तर, रत्नागिरी हापूस आंब्याचीसुद्धा १० हजार पेट्यांची आवक झाली आहे.

रामनवमीमुळे मासळीवर परिणाम
रामनवमीमुळे मासळीची आवक कमी होती. तसेच, हनुमान जयंती, पोर्णिमेमुळे मागणीत घट झाली आहे. त्यामुळे आवकेवर देखील परिणाम होण्याची शक्यता आहे. खोल समुद्रातील मासळीची ८ ते ९ टन आवक झाली आहे. खाडीची मासळीची २०० ते ३०० किलोची तर नदीच्या मासळीची ७०० ते ८०० किलोची आवक झाली आहे. इंग्लिश अंड्याच्या दरात शेकड्यामागे ४० ते ५० रुपयांनी घट झाली आहे.

बिजली, झेंडू, आस्टरला मागणी
हनुमान जयंतीमुळे बिजली, झेंडू, आस्टरला मागणी अधिक आहे. त्यामुळे फुलांचे दर स्थिर आहेत. गेल्या आठवड्यात फुलांच्या दरात १० ते २० टक्के घट झाली होती. आता मागणी वाढल्याने फुलांच्या दरात वाढ होण्याची शक्यता आहे. त्याशिवाय अक्षय तृतीयेला फुलांना अपेक्षित भाव मिळण्याची शक्यता आहे.

डाळींच्या दरात पुन्हा घसरण

गोदामामध्ये डाळींचा साठा मोठ्या प्रमाणात उपलब्ध झाल्याने आता डाळींचे दर उतरले आहेत. गेल्या काही आठवड्यात डाळींचे वाढलेले भाव पुन्हा खाली आले असून बेसन, भाजकी डाळ देखील स्वस्त झाली आहे. मार्केट यार्डातील भुसार विभागातील घाऊक बाजारात गहू, बाजरी, तांदूळ, खाद्यतेल, पोहे, साबुदाणा, शेंगदाणा, कडधान्ये, साखर, मिरची आदी वस्तूंचे भाव स्थिर राहिले आहेत.
घाऊक पुरवठादारांनी मोठ्या प्रमाणात डाळींची साठवणूक केली आहे. त्यामुळे गोदामे ‘फुल्ल’ झाली आहेत. परिणामी, तूर डाळ, हरभरा डाळ, मूग डाळ यांच्या दरात २०० ते ५०० रुपयांची घसरण झाली आहे. त्यामुळे डाळी उतरल्या आहेत. त्याशिवाय, मसूरडाळीच्या दरात १०० रुपयांची घसरण झाली आहे. सध्या मागणी कमी आणि पुरवठा अधिक असल्याने ही घसरण सुरू असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले.तमिळनाडूमध्ये सध्या ट्रकचालकांनी बंद पुकारला आहे. त्यामुळे तेथून माल येण्याची शक्यता कमी आहे. परिणामी, खोबरेल तेलाच्या दरात १५ किलोमागे २५ रुपयांनी वाढ झाली आहे. हरभरा डाळ स्वस्त झाल्याने बेसन, भाजकी डाळीच्या दरात ही घसरण झाली आहे. बेसनाच्या ५० किलोमागे ६० ते ७० रुपये दर उतरले आहेत. तर भाजकी डाळीच्या ४० किलोमागे ५० रुपयांची घसरण झाली आहे. त्याशिवाय, तामिळनाडूमध्ये गेल्या वर्षी पाऊस कमी झाल्याने नारळाचे उत्पादन कमी झाले आहे. नारळाची आवक कमी झाली आहे. मिरचीचा हंगाम संपत असल्याने चांगल्या मालाचा तुटवडा झाला आहे. हलक्या मालाची आवक अधिक आहे. तसेच, ज्वारीचा तुटवडा निर्माण झाल्याने त्याच्या क्विंटलमागे १०० रुपयांनी वाढ झाली आहे.


वस्तूंचे दर (क्विंटलमध्ये)

तूर डाळ ५८०० ते ६७००

हरभरा डाळ ७३०० ते ८०००

मूग डाळ ६८०० ते ७०००

मसूर डाळ ५५०० ते ५६००

मटकी डाळ ६०००

ज्वारी

गावरान ज्वारी मीडियम २४०० ते २६००

मीडियम बेस्ट २७०० ते २९००

गोल्ड २९००ते ३१००

एक्स्ट्रा गोल्ड ३२००ते ३५००

खाद्यतेल (१५ किलो)

खोबरेल तेल २१७५ ते २२००

बेसन (५० किलो) ३८०० ते ४१००

भाजकी डाळ (४० किलो) ३५५० ते ३८५०

नारळ (शेकडा) नवा माल १३०० ते १५००

पालखोल १३५० ते १४५०

मद्रास नारळ २४०० ते २८००

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सार्थक आणि श्रृतीचे मारेकरी मोकाट

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पिंपरी / लोणावळा
निघृणपणे हत्या झालेल्या सार्थक वाकचौरे आणि श्रुती डुंबरे यांच्या मारेकऱ्यांना पकडण्यात पुणे ग्रामीण पोलिसांना आठ दिवसानंतरही यश आलेले नाही. या दोघांच्या हत्येमागचा उद्देश काय, मारेकरी किती होते, ते कसे आले होते, ज्या ठिकाणी या दोघांचे विवस्त्र अवस्थेत मृतदेह आढळले त्याच ठिकाणी या दोघांना मारले का याची उत्तरे आठ दिवसानंतर देखील पुणे ग्रामीण पोलिसांकडे नाहीत. त्यामुळे अत्यंत संथगती सुरू असलेल्या या प्रकरणाच्या तपासावर आता सर्वचस्तरातून नाराजी व्यक्त होऊ लागली आहे.
लोणावळ्या जवळील कुसगाव बुद्रूक येथील सिंहगड कॉलेजमध्ये सार्थक व श्रुती हे शिकत होते. लोणावळ्या जवळील आयएनएस शिवाजी जवळील निर्जनस्थळी विवस्त्र अवस्थेत भुशी डॅमवरील डोंगर टेकडीवर एका निवडूंगाच्या झुडपात सार्थक व श्रुती यांचे मृतदेह सोमवारी दुपारी तीनच्या आढळले होते. या दुहेरी हत्येमुळे लोणावळ्यासह पुणे व नगर जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली होती.
सार्थक हा नगर जिल्ह्यातील राहणारा; तर श्रृती पुण्यातील जुन्नर तालुक्यातील. दोघेही सिंहगड कॉलेजमध्ये शिक्षण घेत होते. मृतदेह सापडलेले ठिकाण आणि कॉलेजपासूनचे हे अंतर आदी अन्य बाबींचा विचार देखील पोलिस तपासात होत आहे. तसेच, ऑनर किलिंगपासून ते प्रेमाचा त्रिकोण यासह विद्यार्थ्यांमधील वाद अशा विविध पैलूंचा विचार तपासात होत आहे. मात्र, आठवड्याभरानंतर देखील पोलिसांकडे या प्रकरणातील अनेक प्रश्नांची उत्तर नाहीत.
प्रकरणात आत्तापर्यंत सुमारे २०० ते २५० जणांची चौकशी पोलिसांकडून करण्यात आली आहे. यासाठी स्थानिक पोलिसांसह, गुन्हेशाखा, सायबर क्राइम आणि १२ अधिकाऱ्यांचा समावेश असलेली ८ पथक विविध शक्यता पडताळून पाहत आहेत. कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक विश्वास नांगरेपाटील यांनी घटनास्थळाची पाहणी करून तपासाबाबत काही सूचना केल्या होत्या. पोलिस अधीक्षक एम. सुवेझ हक, अप्पर अधीक्षक राजकुमार शिंदे, उपाधीक्षक ज्ञानेश्वर शिवथरे, गुन्हेशाखेचे प्रमुख राम जाधव हे घटनेनंतर लोणावळ्यात तळ ठोकून आहेत.
वरिष्ठ पातळीवर व मोठा फौजफाटा तपासकामी असताना पिलीस यंत्रणेला तपासात का यश येत नाही. यामागे नक्की कोणते कारण व कोणाचा दबाव आहे, असे अनेक प्रश्न नागरिक उपस्थित करत आहे. अनेक किचकट व गंभीर गुह्यांची तत्काळ उकल करणारी संपूर्ण यंत्रणा या दुहेरी हत्या प्रकरणामुळे पूर्णपणे हतबल झाल्याचे दिसून येत आहे. परंतु आम्ही या प्रकरणाचा तपास लावूच असा निर्धारही पोलिस वर्तवित आहेत.
दोन दिवसांपूर्वी सार्थक व श्रुतीच्या नातेवाइकांनी तपासासंदर्भात लोणावळा पोलिस ठाण्यात येवून वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट घेवून आरोपींना लवकर अटक करून कठोर शिक्षेची मागणी केली होती. दरम्यान, या प्रकरणाचा लवकर छडा लागला नाही तर युवासेनेच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, अशा इशाराही देण्यात आला आहे. तसेच घटनेनंतर ४ दिवस कॉलेज बंद ठेवण्यात आले होते.

अधिकाऱ्यांची हतबलता
तपासात पोलिसांनी कमालीची गुप्तता पाळली आहे. मारेकऱ्यांचा किंवा हे घडवून आणणाऱ्यांना प्रसिद्धी माध्यमांच्या बातम्यांमधून माहिती समजेल व ते पळून जातील असा काहीसा समज अधिकाऱ्यांचा झाला आहे. तपास युद्धपातळीवर सुरू असल्याचे लोणावळ्यात तळ ठोकून बसलेल्या अधिकाऱ्यांकडून सांगितले जात आहे. मात्र, अद्याप हाती काहीच लागले नसल्याचे सांगताना पोलिस अधिकाऱ्यांची हतबलता दिसून येत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ग्राहकांविना आंबा उत्पादक चिंतेत

$
0
0

ग्राहकांना नेमके हवे काय? व्यापाऱ्यांचा सवाल

म. टा. प्रतिनिधी, पुणे
गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदाच्या वर्षी आंबा स्वस्त आहे. आंब्याची सध्या कोकणातून मोठ्या प्रमाणात आवक होऊनही मार्केट यार्डातील फळ बाजारात आंबा खरेदीसाठी ग्राहक येत नसल्याने शेतकरी वर्ग चिंतेत आहे. ‘ग्राहकांना नेमके हवे तरी काय,’ असा सवाल आता शेतकरी व्यापाऱ्यांना विचारू लागले आहेत.

मार्केट यार्डात आंब्याचा हंगाम सुरू झाला आहे. रोज दोन ते तीन हजार पेट्यांची कोकणातून आवक होत आहे. मुंबईसह अन्य बाजार दर रविवारी बंद असल्याने कोकणचा राजा पुण्याकडे मोर्चा वळवितो. त्यामुळे पुण्यात रविवारी आंब्याची मोठी आवक होत आहे. पुढील आठवड्यात अक्षय्य तृतीयेचा सण देखील आहे. त्यामुळे आंब्याला मागणी होण्याची अपेक्षा व्यापारी व्यक्त करीत आहेत.

‘गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा आंब्याचा हंगाम चांगला आहे. पोषक हवामानामुळे आंब्याचा दर्जा चांगला आहे. चव चांगली आहे. त्याशिवाय उत्पादन मोठ्या प्रमाणात आले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. परंतु, कोकणातून मोठ्या प्रमाणात आंब्याची पुण्याच्या बाजारात आवक होऊनही ग्राहकांकडून फारशी मागणी होत नाही. त्यामुळे शेतकरी चिंतेत आहेत,’ असे आंब्याचे व्यापारी करण जाधव यांनी सांगितले.

मार्केट यार्डात रविवारी ८ ते १० हजार रत्नागिरी हापूस आंब्याची आवक झाली. त्याशिवाय कर्नाटकातून आठ हजारापर्यंतच्या पेट्यांची आवक झाली आहे. हापूसच्या कच्च्या आंब्यास एका डझनाला २५० ते ३०० रुपये दर मिळत आहे, तर तयार आंब्याला ४०० ते ५०० रुपये दर मिळाला आहे. ‘सध्या आंबा ग्राहकांच्या आवाक्यात आला आहे,’ असा दावा करून जाधव म्हणाले, ‘ग्राहकांकडून फारशी मागणी होत नसल्याने त्यांना नेमके काय हवे आहे, हे शेतकऱ्यांसह आम्हालाही कळायला मार्ग नाही.’

अक्षय्य तृतीयेला आंब्याला मोठी मागणी होण्याची अपेक्षा आहे. त्यावेळी आवक ही वाढेल. त्या वेळी आंब्याचे दर साधारण सामान्यांच्या आवाक्यात राहण्याची शक्यता अरविंद मोरे यांनी बोलून दाखविली.

हापूसच्या पेटीचे दर

रत्नागिरी हापूस (कच्चा) दर
४ ते ६ डझन : १००० ते १५०० रु.
६ ते १० डझन : १८०० ते २५०० रु.

रत्नागिरी हापूस (तयार ) दर
४ ते ६ डझन : १५०० ते २००० रु.
६ ते १० डझन : २००० ते ३००० रु.

अर्थकारण कोसळतेय...

गेल्या काही वर्षांपासून आंब्याच्या दरात चढ उतार सुरू आहेत. गेल्या वर्षी उत्पादन कमी असल्याने आंब्याचे भाव चढेच होते. आता आंब्याचे दर गेल्या वर्षीच्या तुलनेत स्वस्त झाल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे. गेल्या वर्षी कच्चा आंब्याच्या चार डझनासाठी २००० ते २५०० रुपये, तर सहा ते दहा डझनाच्या पेटीसाठी ४ ते साडेचार हजार रुपये होता. आता चार डझनाच्या पेटीमागे ५०० ते १००० रुपयांनी आंबा स्वस्त झाला आहे. तरीही त्याला मागणी नसल्याने आंब्याचे अर्थकारण कोसळण्याची भीती व्यापाऱ्यांना वाटू लागली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘वर्ल्ड क्लास’साठी तयारी सुरू

$
0
0

देशात जागतिक दर्जाची २० विद्यापीठे तयार करणार

म. टा. प्रतिनिधी, पुणे
‘देशात प्रत्येकी १० खासगी आणि १० सरकारी, अशा एकूण २० जागतिक विद्यापीठांची निर्मिती प्रक्रिया लवकर सुरू होणार आहे. त्यासाठी विद्यापीठांना ऑनलाइन अर्ज भरावे लागतील,’ अशी माहिती केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांनी रविवारी दिली.

सिम्बायोसिस आंतरराष्ट्रीय विद्यापीठ आणि असोसिएशन ऑफ इंडियन युनिव्हर्सिटिज (एआययू) यांच्यातर्फे आयोजित ‘उच्च शिक्षणाच्या आंतरराष्ट्रीयीकरणाचे बदलते स्वरूप’ या विषयावरील तीन दिवसीय आंतरराष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन जावडेकर यांच्या हस्ते झाले. त्या वेळी ते बोलत होते. ‘देशात विविध क्षेत्रांमध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक आली, तर परदेशातून उच्च आपल्या देशात शिक्षणासाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या वाढेल. शिक्षण क्षेत्रात नवकल्पनांची आवश्यकता आहे. या कल्पना जर प्रत्यक्षात आणल्या गेल्या, तर एका ‘न्यू इंडिया’चा उदय होणार आहे,’ असे जावडेकर म्हणाले.

विद्यापीठ अनुदान आयोगाचे (यूजीसी) सदस्य प्रा. व्ही. एस. चौहान, ‘यूजीसी’चे माजी अध्यक्ष वेद प्रकाश, राष्ट्रीय मूल्यांकन व अधिस्वीकृती परिषदेचे (नॅक) संचालक डी. पी. सिंग, ‘एआययू’चे अध्यक्ष प्रा. डी. एस. चौहान, सचिव प्रा. फुरकान कमर, युरोपच्या शिष्टमंडळाचे डॉ. सीसॅर ऑनेस्टिनी आदी या वेळी उपस्थित होते.

जावडेकर म्हणाले, ‘केंद्र सरकारने देशातील उच्च शिक्षणाला वाव देण्यासाठी आणि अधिकाधिक विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाची संधी मिळण्यासाठी ‘हायर एज्युकेशन फायनान्सिंग एजन्सी’ स्थापन केली असून, त्याद्वारे २० हजार कोटी रुपये उभारण्यात येतील. यासाठी कॅनरा बँकेचे सहकार्य घेण्यात आले आहे. देशाबाहेर रोजगारासाठी गेलेल्या उच्चशिक्षित विद्यार्थी आणि संशोधकांना पुन्हा भारतात आणण्याचे प्रयत्न सुरू असून, त्यांना देशातच सर्व सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्यात येईल. या कामासाठी ‘आयआयटी’, ‘आयआयएम’सारख्या संस्थांच्या प्रशासकीय मंडळांची मदत घेण्यात येईल.’

‘तपासणी करणाऱ्या ‘नॅक’च्या समितीवर बंधने घालण्यात येणार आहेत. समितीच्या सदस्यांकडून विद्यापीठ आणि कॉलेजांची तीन ते पाच दिवस होणारी तपासणी केवळ दोनच दिवसांत कोणताही बडेजाव व करता ‘साधेपणाने’ करावी लागेल. येत्या जुलै महिन्यापासून या प्रकियेला सुरुवात होईल. दर्जा ठरविण्यासाठी संबंधित कॉलेज व विद्यापीठांना श्रेणी देण्यात येतात. गेल्या काही वर्षांपासून या समितीकडून पारंपरिक पद्धतींचाच अधिक वापर करण्यात येत आहे. मात्र, आता यात बदल करण्याचे ठरविले आहे,’ असे प्रा. चौहान म्हणाले.

सिम्बायोसिस विद्यापीठाचे कुलपती डॉ. शां. ब. मुजुमदार आणि कुलगुरू डॉ. रजनी गुप्ते यांनीही मार्गदर्शन केले. डॉ. विद्या येरवडेकर यांनी प्रास्ताविक केले. प्रा. अनिता पाटणकर यांनी आभार मानले.

‘स्टार्टअप नोंदणीला उत्स्फूर्त प्रतिसाद’

‘देशात विविध क्षेत्रांत अधिकाधिक स्टार्टअप सुरू होण्यासाठी मनुष्यबळ विकास मंत्रालयाने विद्यापीठ आणि कॉलेजांच्या वसतिगृहाच्या पत्त्यावर स्टार्टअपची नोंदणी करण्याची सुविधा उपलब्ध केली. या सुविधेचा लाभ देशातील विद्यार्थ्यांनी घेतला असून, त्यांनी सुमारे ४०० स्टार्टअपची नोंदणी केली आहे; तसेच स्मार्ट इंडिया हॅकेथॉनमध्ये विविध मंत्रालयांना भेडसावणाऱ्या ६०० समस्यांवर इंजिनीअरिंगच्या विद्यार्थ्यांनी दोन हजार स्टार्टअप तयार केले,’ असे जावडेकर यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नवे कुलगुरू कोण?

$
0
0

आतापर्यंत ४५ अर्ज; सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात उत्सुकता

म. टा. प्रतिनिधी, पुणे
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या कुलगुरू निवडीसाठी स्थापन करण्यात आलेल्या शोध समितीकडे आतापर्यंत ४५ अर्ज प्रात झाले आहेत. दरम्यान, समितीकडे अर्ज करण्याचा आज, सोमवार (१० एप्रिल) हा शेवटचा दिवस आहे. त्यामुळे काही इच्छुक उमेदवार शोध समितीच्या कार्यालयात जाऊन अर्ज जमा करणार असल्याची शक्यता आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली. दरम्यान, विद्यापीठाचे नवे कुलगुरू कोण असतील, याचीच चर्चा सध्या विद्यापीठात रंगत आहे.

विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. वासुदेव गाडे यांचा कार्यकाळ १५ मे २०१७ रोजी पूर्ण होत आहे. त्यामुळे राज्यपाल व विद्यापीठाचे कुलपती सी. विद्यासागर राव यांनी विद्यापीठाच्या कुलगुरू पदासाठी योग्य व्यक्तीच्या नावांची शिफारस करण्यासाठी शोध समिती स्थापन केली आहे. ज्येष्ठ अणुशास्त्रज्ञ डॉ. अनिल काकोडकर हे समितीचे अध्यक्ष आहेत. सिडकोचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक भूषण गगराणी आणि जयपूर येथील मालवीय राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्थेचे संचालक प्रा. उदयकुमार आर. यरागट्टी हे समितीचे सदस्य आहेत. समितीकडे आतापर्यंत ४० ते ४५ अर्ज प्राप्त झाले आहे. दरम्यान, सोमवारी या अर्जांच्या संख्येत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. तसेच, काही उमेदवारांचे कुलगुरू पदासाठी नामनिर्देशन केले जाण्याची शक्यता आहे. प्राप्त अर्जांची व नामनिर्देशन पत्रांची छाननी करून आवश्यकता भासल्यास निवड यादीत नाव असलेल्या उमेदवारांना शोध समितीबरोबर संवाद करण्यासाठी बोलवण्यात येणार आहे.

विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. नरेंद्र जाधव, डॉ. रघुनाथ शेवगावकर यांनी कार्यकाल पूर्ण होण्यापूर्वीच कुलगुरू पदाचा राजीनामा दिला. त्यामुळे नवीन कुलगुरूंची नियुक्ती होईपर्यंत काही महिन्यांसाठी कुलगुरू पदाचा प्रभारी कार्यभार डॉ. अरुण अडसूळ व डॉ. संजय चहांदे यांच्याकडे देण्यात आला होता. मात्र , कुलगुरू शोध समितीकडून सर्व प्रक्रिया वेळेत केली जात असल्याने डॉ. वासुदेव गाडे यांचा कार्यकाल पूर्ण होण्यापूर्वीच नवीन कुलगुरूंच्या नियुक्तीची प्रक्रिया पूर्ण केली जाऊ शकते. परिणामी १५ मे रोजी विद्यापीठाला नवीन कुलगुरू मिळतील, अशी माहिती सूत्रांनी दिली.

विविध नावांची चर्चा

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. नरेंद्र कडू, विद्यापीठाचे परीक्षा नियंत्रक डॉ. अशोक चव्हाण, भौतिकशास्त्र विभागाच्या प्रमुख डॉ. अंजली क्षीरसागर, विद्यापीठातील रसायनशास्त्र विभागाचे डॉ. डी. डी. ढवळे, पर्यावरणशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. एन. आर. करमळकर, वनस्पतीशास्त्र विभागाचे सुभाष देवकुळे, विधी विभागाचे डॉ. दिलीप उके, शिक्षणशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. संजीव सोनवणे, मानववंशशास्त्र विभागाच्या डॉ. अंजली कुरणे यांनी कुलगुरू पदासाठी अर्ज केला असल्याचे बोलले जात आहे. तसेच, सिम्बायोसिस आंतरराष्ट्रीय विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. भूषण पटवर्धन यांच्या नावाचे कुलगुरू शोध समितीकडे नुकतेच नामनिर्देशन करण्यात आले आहे. त्यामुळे कुलगुरूपदी कोणाची वर्णी लागेल, हे सांगणे अवघड आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


रँकिंग प्रक्रियेत बदल

$
0
0

विद्यापीठांच्या गुणवत्तेबाबत प्रकाश जावडेकर यांची माहिती

म. टा. प्रतिनिधी, पुणे
‘केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाच्या नॅशनल इन्स्टिट्यूशनल रँकिंग फ्रेमवर्कमध्ये (एनआयआरएफ) कॉलेज व विद्यापीठांची गुणवत्तेनुसार क्रमवारी (रँकिंग) तयार करण्याच्या प्रक्रियेत येत्या वर्षापासून बदल करण्यात येईल. ‘एनआयआरएफ’च्या सुधारणेसाठी हे पाऊल उचलण्यात येईल,’ अशी माहिती केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांनी रविवारी पत्रकारांना दिली.

पुण्यात एका कार्यक्रमानिमित्त आले असता, त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ‘एनआयआरएफ’च्या रँकिंग प्रक्रियेत बड्या खासगी कंपन्यांनी विद्यापीठ आणि कॉलेजांना क्रमवारीत आघाडीचा क्रमांक मिळवून देण्यासाठी हस्तक्षेप केल्याचा आरोप होत आहे. त्याबाबत विचारले असता, जावडेकर म्हणाले, ‘एनआयआरएफच्या रँकिंग प्रकियेत सुधारणा करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी रँकिंग प्रक्रियेत पुढील वर्षापासून बदल करण्यात येईल. मात्र, खासगी कंपन्यांनी कुलगुरू आणि कॉलेजप्रमुखांना ई-मेल आणि मेसेज पाठवले ही माहिती खोटी आहे.’


दरम्यान, ‘एनआयआरएफ’च्या प्रक्रियेत कंपन्यांचा हस्तक्षेप टाळण्यासाठी; तसेच सुधारणेसाठी एकूणच प्रक्रियेत बदल करण्यात येत असल्याची माहिती प्रा. चौहान यांनीही दिली. ‘रँकिंग प्रक्रियेत आघाडीचा क्रमांक मिळविण्यासाठी कुलगुरू व कॉलेजप्रमुखांना ई-मेल आणि मेसेज पाठविण्यात आले. त्यासाठी आकर्षक आर्थिक पॅकेजचे आमिष दाखविण्यात आले,’ अशी माहिती एका कुलगुरूंनीच दिली होती.

‘नॅक’ची प्रक्रियाही बदलणार

‘कॉलेज आणि विद्यापीठ तपासणीची ‘नॅक’ची प्रक्रिया अधिक पारदर्शी होण्यासाठी येत्या काही दिवसांमध्ये या प्रक्रियेत बदल होणार आहेत. माहिती तंत्रज्ञानाचा (आयटी) अधिक वापर करून प्रक्रियेतील क्लिष्टपणा काढून टाकण्यात येईल; तसेच ‘नॅक’ला खोटी माहिती देणारी कॉलेजे आणि विद्यापीठांची मान्यतादेखील रद्द होणार आहे,’ अशी माहिती राष्ट्रीय मूल्यांकन आणि अधिस्वीकृती परिषदेच्या (नॅक) कार्यकारी समितीचे अध्यक्ष प्रा. व्ही. एस. चौहान यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पुणेकरांना ‘सिंहदर्शन’

$
0
0

‘तेजस’ आणि ‘सिब्बू’ला पाहण्यासाठी गर्दी

म. टा. प्रतिनिधी, पुणे

कात्रजचे प्राणीसंग्रहालय... सकाळची प्रसन्न वेळ… एका खास खंदकाबाहेर जमलेली आबालवृद्धांची गर्दी... सर्वांचीच उत्सुकता शिगेला पोहोचलेली अन् अचानक त्या खंदकातून ‘तेजस’ आणि ‘सिब्बू’ या सिंहांच्या जोडीची दमदार एंट्री होते… त्यांचा रुबाब पाहत उपस्थित पुणेकर अक्षरशः हरखून जातात.

गुजरात सरकार आणि वन विभागाकडे सतत तीन वर्षे केलेल्या पाठपुराव्यानंतर साडेतीन महिन्यांपूर्वी ही जोडी राजीव गांधी प्राणी संग्रहालयात दाखल झाली होती. ती पुण्यातील वातावरणात रुळल्यानंतर रविवारी पहिल्यांदाच पर्यटकांना पाहण्यासाठी सादर करण्यात आली. या वेळी पालिकेचे अतिरिक्त आयुक्त राजेंद्र जगताप, प्राणिसंग्रहालयाचे संचालक डॉ. राजकुमार जाधव, उपसंचालक डॉ. नवनाथ निघोट, पशुधन पर्यवेक्षक दीपक धुमाळ, मुख्य पशुपालक श्यामराव खुडे उपस्थित होते. या सिंहांच्या जोडीला उद्योजक केदार कासार यांनी एका वर्षासाठी दत्तक घेतले आहे. त्यासाठीचा धनादेशही त्यांनी संग्रहालयाकडे सुपूर्द केला.

सुमारे एका तपापूर्वी पेशवे पार्कमधील प्राणी संग्रहालयात सिंह पाहता यायचा. त्यानंतर पुणेकर सिंहदर्शनापासून वंचित होते. ही सिंहांची जोडी रविवारपासून खुली होणार असल्याने शहराच्या विविध भागातील नागरिकांनी संग्रहालयात मोठी गर्दी केली होती. सर्वांनाच सिंहदर्शनाची उत्सुकता होती. खंदकात दाखल झाल्यानंतर या सिंहांनीही परिस्थितीचा अंदाज घेत रूबाबात खंदकभर फेरी मारली. तेव्हा टाळ्यांचा गजर करत आणि कॅमेरांचा क्लिकक्लिकाट करत पुणेकरांनी त्यांचे स्वागत केले.

राजीव गांधी प्राणी संग्रहालयात इतर विविध पशु-पक्ष्यांबरोबरच प्रशस्त खंदकांमध्ये वावरणारे वाघ, बिबटे, हत्तीही पाहावयास मिळतात. एरवी पुस्तकात, टीव्हीवर किंवा सिनेमात दिसणाऱ्या या प्राण्यांना जवळून पाहण्यासाठी पुणेकरांची; तसेच पर्यटकांची मोठी गर्दी येथे कायमच असते. आता सिंहांची जोडीही पुणेकरांना पाहता येणार आहे. या संग्रहालयात वाघांच्या डरकाळीबरोबर सिंहगर्जनाही घुमणार आहे.

राज्यात प्रथमच

सध्या देशात केवळ गुजरातमध्येच आशियाई सिंह शिल्लक आहेत. गुजरातचा हा राज्यप्राणी आहे. त्यातील दोन सिंह सक्करबाग प्राणी संग्रहालयाने पुण्याला भेट दिले आहेत. त्यामुळे राज्यात प्रथमच आशियाई सिंह दाखल झाले आहेत. त्यांचे पुणेकरांना दर्शन घेता येणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

राजकीय वैमनस्यातून एकाचा निर्घृण खून

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पिंपरी

राजकीय पूर्ववैमनस्यातून सामाजिक कार्यकर्त्याचा डोक्यात पेव्हर ब्लॉक घालून खून करण्यात आला. पिंपरीमधील खराळवाडी येथे रविवारी रात्री सव्वा दहाच्या सुमारास ही घटना घडली. या प्रकरणी १२ जणांवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, माजी नगरसेवक सद्गुरु कदम यांच्यासह ८ जणांना पिंपरी पोलिसांनी मध्यरात्री अटक केली आहे.

सुहास बाबुराव हळदनकर (३५, रा. घरकुल चिखली) असे खून झालेल्या सामाजिक कार्यकर्त्याचे नाव आहे. सुहास याचा मित्र ऋषिकेश काटे (३५, रा. खराळवाडी) याने फिर्याद दिली आहे.

सुहास बरीच वर्षे खराळवाड़ी येथे राहत होता. महापालिकेच्या घरकुल योजनेत त्याला चिखली येथे घर मिळाले म्हणून तो चिखली येथे राहण्यास गेला होता. खराळवाड़ी भागातील स्वच्छ्ता आणि इतर कामासाठी सुहास हा पाठपुरावा करीत असे. तसेच या भागातील प्रश्नांसदर्भात त्याने अनेकदा फ्लेक्स लावले होते.

काटे यांनी दिलेल्या फिर्यादिनुसार, माजी नगरसेवक कैलास कदम यांच्या विरोधात फ्लेक्स का लावतो आणि त्यांच्या २ कार्यकर्त्यांची नोकरी घालवली असे म्हणत सुहास याला तिघानी धमकावले होते. रविवारी सुहास हा खराळवाड़ी येथे आला होता; तेव्हा त्याला काळ्या उर्फ़ संदीप कलापुरे, प्रतुल घाडगे, अभिजीत कलापुरे यांनी अडवले. यातून हाणामारी सुरू झाली. माजी नगरसेवक सद्गुरु कदम यांनी सुहास याच्या डोक्यात सिमेंट ब्लॉक मारला. त्यानंतर इतर आरोपींनी सुहास याच्या डोक्यात ब्लॉक मारले. यात त्याचा मृत्यू झाला. यानंतर परिसरात जमाव जमला होता, तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

राजकीय वाद

कैलास कदम आणि सद्गुरु कदम हे दोघे सख्खे भाऊ असून माजी नगरसेवक आहेत. नुकत्याच झालेल्या निवडणुकीत सद्गुरु कदम यांचा उमेदवारी अर्ज बाद ठरला होता. तर माजी विरोधी पक्षनेते कैलास कदम यांनी निवडणूक लढवली नव्हती. त्यांचे इतर सहकारी नगरसेवक पक्ष सोडून राष्ट्रवादी मध्ये गेले आणि निवडून आले आहेत. सुहास याला मारहाण करतानाचे सीसीटीव्ही फुटेज पोलिसांनी हस्तगत केले असून त्यात ४ जण सुहास याला मारताना दिसत आहेत. परंतु राजकीय वादातून इतर जणांना यात गोवल्याचे बोलले जात आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गायकवाड विमानाऐवजी रेल्वेने दिल्लीला रवाना

$
0
0

टाइम्स न्यूज नेटवर्क, पुणे

एअर इंडियासह इतर विमान कंपन्यांनी घातलेली विमानबंदी उठवल्यानंतरही उस्मानाबादचे शिवसेनेचे खासदार रवींद्र गायकवाड आज रेल्वेने दिल्लीला रवाना झाले. एअर इंडियाच्या अधिकाऱ्याला मारहाण केल्या प्रकरणी वादात आलेले गायकवाड हे मुंबई-दिल्ली राजधानी एक्स्प्रेसने दिल्लीला गेले.

मुंबई-दिल्ली राजधानी एक्स्प्रेसने गायकवाड दिल्लीत पोहोचले आहेत. राजधानी एक्स्प्रेस ही मुंबई सेंट्रलवरून सुटते आणि त्यानंतर बोरीवलीला तिचा थांबा आहे. पण राजधानी एक्स्प्रेसमध्ये गायकवाड नेमके कुठून चढले हे मात्र कळू शकलं नाही. पण ते राजधानी दिल्लीत मात्र दाखल झाले आहेत. संसदेचं अधिवेशन संपेपर्यंत ते दिल्लीतच असतील. काही दिवसांनंतर ते महाराष्ट्रात परततील, अशी माहिती गायकवाड यांचे निकटवर्तीय जितेंद्र शिंदे यांनी टाइम्स ऑफ इंडियाला दिली.

एअर इंडियाच्या अधिकाऱ्याला मारहाण केल्यानंतर विमान कंपन्यांनी गायकवाड यांच्यावर विमान प्रवासाला बंदी घातली होती. दोन दिवसांपूर्वीच गायकवाड यांच्यावरील विमानबंदी कंपन्यांनी हटवली. यानंतर गायकवाड हे शनिवारी राजधानी एक्स्प्रेसने मुंबईत दाखल झाले. त्यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेटही घेतली.

एअर इंडियाच्या ज्या विमानात अधिकाऱ्याला मारहाण झाली त्याच फ्लाइटने गायकवाड आज पुण्याहून दिल्लीला जाणार असल्याचं सांगण्यात येत होतं. पण गायकवाड हे विमानाने गेले नाहीत, अशी माहिती एअर इंडियाच्या प्रवक्त्याने दिली. पुणे विमानतळाच्या सूत्रांनीही याला दुजोरा दिला.

रवींद्र गायकवाड हे मुंबई-दिल्ली राजधानी एक्स्प्रेसने आज रवाना झाले. त्यांच्यासोबत आणखी चार ते पाच जण होते. यामुळे त्यांना रेल्वेने जावं लागलं. वादामुळे गायकवाड यांनी विमान प्रवास टाळलेला नाही. झालेला वाद संपुष्टात आला आहे. त्यावर पुन्हा चर्चा करण्यात काहीच अर्थ नाही, असं गायकवाड यांचे निकटवर्तीय जितेंद्र शिंदे यांनी सांगितलं.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

खडसेंविरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू

$
0
0

मटा ऑनलाइन वृत्त। पुणे

भोसरी एमआयडीसी येथील जमीन गैरव्यवहार प्रकरणी राज्याचे माजी महसूल मंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्याविरोधात गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानंतर खडसे यांच्यासह त्यांच्या पत्नी, जावई आणि इतर अज्ञातांविरूध्द गुन्हा दाखल होत आहे. त्यामुळे आता एकनाथ खडसे यांच्या अडचणीत आणखी वाढ होण्याची चिन्हं दिसत आहेत.

भोसरी येथील जमीन गैरव्यवहार प्रकरणाची अप्पर पोलिस महासंचालकाच्या देखरेखीखाली चौकशी करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने लाच लुचपत प्रतिबंधक विभागाला ८ मार्च २०१७ रोजी दिले होते. भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा कलम १३ (१) ड, (२), १५ आणि भादंवि १०९ नुसार खडसेंविरोधात गुन्हा दाखल करण्यात येत आहे.

मंत्रीपदाचा गैरवापर करून ४० कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीचा भूखंड केवळ पावणे चार कोटी रुपयांना खरेदी केल्याची तक्रार ३० मे २०१६ रोजी बांधकाम व्यावसायिक बांधकाम व्यावसायिक हेमंत गावंडे यांनी बंडगार्डन पोलीस ठाण्यात दाखल केली होती. या तक्रार अर्जालाच फिर्याद समजावी आणि प्रकरणाचा तपास करावा असे आदेश उच्च न्यायालयाने दिले आहेत. त्याप्रमाणे कारवाई केली जात असून गुन्हा दाखल होण्याचे काम पहाटे २ वाजेपर्यंत चालणार आहे अशी माहिती विश्‍वसनीय सुत्रांनी दिली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

राजकीय पूर्ववैमनस्यातून सामाजिक कार्यकर्त्याचा खून

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, पिंपरी
राजकीय पूर्ववैमनस्यातून सामाजिक कार्यकर्त्याच्या डोक्यात पेव्हिंग ब्लॉक मारून खून करण्यात आला. पिंपरीमधील खराळवाडी येथे रविवारी (९ एप्रिल) रात्री सव्वा दहाच्या सुमारास ही घटना घडली. या प्रकरणी १२ जणांवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, माजी नगरसेवक सद‍्गुरू कदम यांच्यासह ११ जणांना पिंपरी पोलिसांनी मध्यरात्री अटक केली आहे.
सुहास बाबूराव हळदनकर (वय ३५, रा. घरकुल, चिखली) असे खून झालेल्या सामाजिक कार्यकर्त्याचे नाव आहे. सुहास याचा मित्र हृषीकेश काटे (३५, रा. खराळवाडी) याने फिर्याद दिली आहे. तर माजी नगरसेवक सद‍्गुरू कदम (४५), काळ्या उर्फ संदीप कलापुरे (३०), प्रतुल घाडगे (३६), अभिजित कलापुरे (२८), दत्ता उर्फ फेट्या कलापुरे (२५), संतोष उर्फ मुंड्या आरबेकर (४०), प्रवीण कदम उर्फ झिंगऱ्या (२८), खंड्या उर्फ प्रवीण सावंत (२६), छोट्या पठाण (२८), संतोष उर्फ बाब्या कदम (२८), सतीश कदम (३१, सर्व रा. खराळवाडी, पिंपरी) यांना अटक करण्यात आली असून, गणेश जाधव याचा पोलिस शोध घेत आहेत. या सर्वांना मोरवाडी पिंपरी कोर्टात हजर करण्यात आले असता, आठ दिवसांच्या पोलिस कोठडीत ११ जणांची रवानगी करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुहास बरीच वर्षे खराळवाडी येथे राहत होता. महापालिकेच्या घरकुल योजनेत त्याला चिखली येथे घर मिळाले होते, त्यामुळे तो चिखली येथे राहण्यास गेला होता. खराळवाडी भागातील स्वच्छता आणि इतर कामासाठी सुहास हा पाठपुरावा करीत असे. तसेच या भागातील प्रश्नांसदर्भात त्याने अनेकदा फ्लेक्स लावले होते. तसेच सुरक्षारक्षक नेमून दिलेले काम न करता अन्यत्र दिवसभर काम करतात,ही बाब त्याने उघडकीस आणली होती. त्यातून काळ्या कलापुरे आणि अन्य एकाची नोकरी गेली होती.
काटे यांनी दिलेल्या फिर्यादिनुसार, माजी नगरसेवक कैलास कदम यांच्या विरोधात फ्लेक्स का लावतो आणि त्यांच्या दोन कार्यकर्त्यांची नोकरी का घालवली, यावरून सुहासला तिघांनी काही दिवसांपूर्वी धमकावले होते. रविवारी सुहास हा खराळवाडी येथे आला होता; तेव्हा त्याला काळ्या उर्फ संदीप कलापुरे, प्रतुल घाडगे, अभिजित कलापुरे यांनी अडवले. यातून हाणामारी सुरू झाली. माजी नगरसेवक सद‍्गुरू कदम यांनी सुहासच्या डोक्यात सिमेंट ब्लॉक मारला. त्यानंतर इतर आरोपींनी सुहास याच्या डोक्यात ब्लॉक मारले. यात गंभीर जखमी होऊन सुहासचा मृत्यू झाला. यानंतर परिसरात जमाव जमला होता, तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत अवघ्या काही तासांत सर्व आरोपींना अटक केली असून, पोलिसांनी माजी नगरसेवक कैलास कदम व सद‍्गुरू कदम यांच्या कार्यालयातील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले आहे.

राजकीय वाद नित्याचा
कैलास कदम आणि सद‍्गुरू कदम हे दोघे सख्खे भाऊ असून, काँग्रेस पक्षाच्या तिकिटावर २०१२ च्या निवडणुकीत नगरसेवक म्हणून निवडून आले होते. नुकत्याच झालेल्या निवडणुकीत प्रभाग क्रमांक ९ मध्ये सद‍्गुरू कदम यांचा उमेदवारी अर्ज बाद ठरला होता. तर माजी विरोधी पक्षनेते कैलास कदम यांनी निवडणूक लढवली नव्हती. त्यांचे इतर सहकारी नगरसेवक पक्ष सोडून राष्ट्रवादीमध्ये गेले आणि निवडून आले आहेत. कदम यांच्या बरोबर पॅनलमधून निवडून आलेल्या गीता मंचकर यांचे पती अॅड. सुशील मंचकर यांच्या कार्यकर्त्यांमध्ये आणि कदम यांच्या कार्यकर्त्यांमध्ये यापूर्वी अनेकदा हाणामाऱ्या झाल्या होत्या. शहरातील एका आयटूआर गृहप्रकल्पावरून देखील हाणामारी झाली होती. या वेळी या सर्वांना पोलिस कोठडी झाली होती. दरम्यान, सुहासला मारहाण करतानाचे सीसीटीव्ही फुटेज पोलिसांनी हस्तगत केले असून, त्यात ४ जण मारताना दिसत आहेत. परंतु, राजकीय वादातून इतर जणांना यात गोवल्याची चर्चा पोलिस वर्तुळात होती.

नागरिकांचा मूक मोर्चा
सुहास हळदणकर यांच्या खुनाच्या निषेधार्थ तसेच खून करणाऱ्या मास्टर माइंडला अटक करावी अशी मागणी करीत नागरिकांनी सोमवारी (१० एप्रिल) मूक मोर्चा काढला. तसेच, पोलिसांना निवेदन देण्यात आले. पोलिस प्रशासनाच्या वतीने सहायक आयुक्त राम मांडुरके यांनी निवेदन स्वीकारले. खराळवाडी-गांधीनगर परिसरातील मोठ्या संख्येने नागरिक या मोर्चात सामील झाले होते. खराळाई देवीच्या मंदिरापासून दुपारी चार वाजता सुरुवात झाली. चौदणी चौक, रेवाळे चौक मार्गे आंबेडकर चौकतून सुहास हळदणकर याच्या खरावाडीतील घराजवळ मोर्चाची सांगता करण्यात आली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बोपोडीमध्ये स्कूलबस पेटली

$
0
0


खडकी : बोपोडीच्या हॅरिसपुलावर दुपारी दीड ते पावणेदोनच्या सुमारास एका स्कूलबसने अचानक पेट घेतला.
प्रत्यक्षदर्शिंनी दिलेल्या माहितीनुसार, या स्कूलबसमध्ये काही विद्यार्थी बसले होते. गाडी पेटल्याचे लक्षात येताच या मुलांना उतरवण्यात आले. मात्र, पोलिसांकडे याबाबत कोणतीही माहिती उपलब्ध नाही. गाडी कोणती होती. गाडीत कोणी प्रवासी होते का नव्हते, याची खडकी पोलिसांकडे कोणतीही माहिती उपलब्ध नाही. त्यामुळे एका अज्ञात वाहनाने पेट घेतला असून, वाहनचालक पळून गेला असल्याची प्राथमिक नोंद पोलिसांनी केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


आयपीएलवर बेटिंग घेणारे चौघे अटकेत

$
0
0

जांभूळवाडी येथील फार्महाउसमधील प्रकार

म. टा. प्रतिनिधी, पुणे

‘आयपीएल’मधील मुंबई इंडियन्स आणि कोलकाता नाइट रायडर्स यांच्यातील सामन्यावर बेटिंग घेणाऱ्या टोळीतील चौघांना भारती विद्यापीठ पोलिसांनी अटक केली. जांभूळवाडी येथील तावरे फार्महाउसवर छापा टाकून ही कारवाई करण्यात आली. येथून पोलिसांनी ५८ हजार रुपयांचे बेटिंगचे साहित्यही जप्त केले.
राजेश कांतिभाई कक्कड (वय ३४, बालाजीनगर, धनकवडी), दत्तात्रय चंद्रकांत जगताप ( वय २८, रा. विद्यानगरी, धनकवडी), विजय मोहन तावरे (वय ४४, रा. नानापेठ) आणि संजय नटवरलाल शहा (वय ४७, रा. संभाजीनगर, पद्मावती ) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.
भारती विद्यापीठ पोलिस ठाण्याचे पोलिस हवालदार विनोद भंडलकर यांना माहिती मिळाली, की मुंबई-बेंगळुरू महामार्गालगत जांभूळवाडीतील तावरे फार्म हाउसमध्ये कक्कड त्याच्या साथीदारांसह आयपीएलमधील मुंबई इंडियन्स आणि कोलकाता नाइट रायडर्स क्रिकेट सामन्यावर बेटिंग घेत आहे. त्यानुसार वरिष्ठ पोलिस निरीक्षक विजयसिंह गायकवाड, उपनिरीक्षक उत्तम बुदगुडे, प्रदीप गुरव, गणेश सुतार, श्रीधर पाटील यांच्या पथकाने रविवारी रात्री तावरे फार्महाउसवर छापा टाकला. या छाप्यामध्ये राजेश कक्कड व दत्तात्रय जगताप आयपीएलच्या सामन्यावर मोबाइलवरुन सट्टा घेत असताना आढळले. त्यानंतर तेथून बेटिंगचे ५८, २०० रुपये किमतीचे साहित्य जप्त करण्यात आले. त्यानंतर तेथे आलेल्या विजय तावरे आणि संजय शहा यांनाही ताब्यात घेण्यात आले.
सामना सुरू असताना कॉमेंट्री करणारी व्यक्ती कक्कडच्या ओळखीची होती. त्यामुळे पाच एप्रिलपासून कक्कड, फार्म हाउसचा मालक विजय तावरे, चंद्रकांत जगताप, संजय शहा आणि आलोक पारेख आदींनी बेटिंग घेण्यास सुरुवात केली. शहाने बेटिंगसाठीचे साहित्य आणून दिले. त्यांनी प्रत्येकाने आपापल्या ओळखीच्या सट्टा खेळणाऱ्यांना आमंत्रित केले. कक्कडने तीन हजार रुपये कॉमेंट्री करणाऱ्याच्या खात्यात भरायला लावले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सराईत गुन्हेगाराने केला पित्याचा खून

$
0
0

पुणे : आई-वडिलांसोबत होत असलेल्या भांडणातून सराईत गुन्हेगार बजरंग वाघेरे याने पित्याच्या डोक्यात लोखंडी टिकाव घालून खून केल्याचा प्रकार समोर आला आहे. अकरा महिन्यांपूर्वी पित्याचा खून करून मृतदेह मुळा नदीच्या पुलाजवळ फेकून देण्यात आला होता. गुन्हे शाखेच्या संघटित गुन्हेगारी पथक (उत्तर) यांनी मृतदेहाची ओळख पटवून हा खुनाचा गुन्हा उघडकीस आणला.

रमेश रामचंद्र वाघेरे (वय ५५) असे खून झालेल्या पित्याचे नाव आहे. याप्रकरणी त्यांचा मुलगा सराईत गुन्हेगार बजरंग रमेश वाघेरे (वय २८, रा. गोलांडे बिल्डिंगसमोर, पिंपरीगाव) याला अटक करण्यात र्आली आहे. बजरंग याच्यावर दोन खुनांसह वेगवेगळ्या पोलिस ठाण्यात १८ गुन्हे दाखल आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बजरंग याचे त्याच्या आई-वडिलांसोबत पटत नव्हते. त्यामुळे ते पंधरा वर्षांपासून वेगवेगळे राहत होते. त्याच कारणावरून दोघांमध्ये वारंवार भांडणे होत होती. याच वादातून बजरंग याने १३ मे २०१६ रोजी घराजवळ सुरू असलेल्या बांधकाम साइटवरील लोखंडी टिकावाने डोक्यात वार करून गंभीर जखमी केले. बजरंगने त्याचा मित्र विशाल सुनील साळवे (वय १९, रा. पिंपळे सौदागर) याच्या दुचाकीवरून जखमी अवस्थेत मुळा नदीच्या पुलाजवळ घेऊन गेला. या ठिकाणी त्याने रमेश यांच्या डोक्यात दगड घालून खून केला. घनटनेनंतर मृतदेहाची ओळख पटली नसल्याने अनोळखी इसमाच्या नावे सांगवी पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा तपास करीत असताना शिपाई तेजस चोपडे यांना या गुन्ह्यातील आरोपीची माहिती मिळाली. त्यानुसार सहायक आयुक्त अरुण वालतुरे, पोलिस निरीक्षक मिलिंद गायकवाड यांच्या पथकाने सापळा रचून अटक केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ग्रामीण मुख्यालयात सीबीएसईची शाळा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

पोलिसांच्या मुलांना चांगले शिक्षण मिळण्यासाठी ग्रामीण पोलिस मुख्यालयात सीबीएसईची शाळा सुरू करण्यात येणार आहे. त्यासाठी पोलिस महासंचालक कार्यालयाची परवानगी मिळाली प्राप्त झाली आहे, अशी माहिती कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटील यांनी दिली.

पुणे ग्रामीण मुख्यालयात पोलिस व मंत्रालयीन कर्मचाऱ्यांच्या मुलांसाठी आयोजित रोजगार मेळाव्याचे उद्घाटन नांगरे पाटील यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. या प्रसंगी अभिनेते आदेश बांदेकर, पोलिस अधीक्षक सुवेझ हक, अतिरक्त अधीक्षक राजकुमार शिंदे, तानाजी चिखले आदी उपस्थित होते.

नांगरे पाटील म्हणाले, की ‘मुंबईतील पोलिस कर्मचाऱ्याचा मुलगा डॉन झाल्याची चर्चा होते. मात्र, चांगले शिक्षण घेऊन पोलिसांची मुले परदेशी गेली. त्यापैकी अनेक आयएएस, आयपीएस झाले आहेत. पोलिसांच्या मुलांने चांगेल शिक्षण मिळावे म्हणून ग्रामीण मुख्यालयातील तीन एकर जागेत सीबीएसईची शाळा सुरू होणार आहे. त्या संदर्भात एका नामांकित शिक्षण संस्थेशी बोलणी सुरू आहेत. ग्रामीण मुख्यालयात पोलिसांसाठी साडेतीनशे क्वार्टर्स उभारण्यात येत आहेत. पोलिस दलातील कर्मचाऱ्यांना नोकरी सोडून जाण्याची वेळ येऊ देणार नाही.’
रोजगार मेळाव्यात १५४ नामांकित कंपन्या सहभागी झाल्या होत्या. मेळाव्यासाठी पोलिस आणि मंत्रालयीन कर्मचाऱ्यांच्या ५१७ मुलांनी नावनोंदणी केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘भागवतांचे वक्तव्य गांभीर्याने घ्यावे’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

‘गोहत्याबंदीचा कायदा देशभरात लागू करावा, हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी केलेले वक्तव्य गांभीर्याने घेतले पाहिजे. त्यांचे हे विधान मोदी सरकारला अप्रत्यक्ष दिशा दाखविणारे आहे. भागवत यांच्या विधानामुळे भाजपशासित राज्यांमध्ये वातावरण निर्मितीचा अजेंडा सुरू झाला आहे,’ असे मत माजी खासदार प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केले.

‘हे वक्तव्य देशाच्या सार्वभौमत्त्वाला धोका असून, त्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा छुपा पाठिंबा आणि मूक संमती आहे,’ अशी टीकाही त्यांनी पत्रकार परिषदेत केली. आंबेडकर म्हणाले की, ‘देशभरात गोहत्याबंदी संदर्भात केली जाणारी विधाने भाजपप्रणित मतदारांना प्रभावित करण्याच्या रणनीतीचा भाग मानला जात होता. मात्र, भागवत यांनी केलेले विधान अधिक गांभीर्याने घेतले पाहिजे. त्यांचे विधान मोदी सरकारला अप्रत्यक्षपणे दिशा दाखविणारे आहे.’ ‘गोहत्या बंदीमुळे केवळ मुस्लिमांचे आर्थिक नुकसान होईल असे नाही, तर भाकड जनावरांची किंमत कमी झाल्याने शेतकऱ्यांचेही नुकसान होणार आहे,’ असेही त्यांनी नमूद केले.

शिवसेनेने भागवत यांना राष्ट्रपती करा, अशी मागणी केली आहे. या मागणीला आमचाही पाठिंबा आहे. मी स्वतः भागवत यांची भेट घेईन; तसेच इतर राजकीय पक्षांनीही पाठिंबा द्यावा असा उपरोधिक टोला आंबेडकर यांनी लगावला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भूखंड घोटाळा: एकनाथ खडसेंवर गुन्हा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

भोसरी येथील ‘एमआयडीसी’च्या कथित भूखंड घोटाळाप्रकरणी माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे, त्यांची पत्नी मंदाकिनी, जावई गिरीश दयाराम चौधरी यांच्यासह इतरांविरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने बंडगार्डन पोलिस ठाण्यात सोमवारी सायंकाळी गुन्हा दाखल केला. भोसरी ‘एमआयडीसी’मधील ३१ कोटींचा हा भूखंड अवघ्या पावणेचार कोटींना खडसे कुटुंबीयांना विकण्यात आल्याचा आरोप आहे.

याप्रकरणी हेमंत लक्ष्मण गावंडे (वय ३८, रा. निगडी प्राधिकरण) यांनी गेल्या वर्षी ३० मे रोजी पोलिसांत तक्रार दाखल केली होती. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यास पोलिसांनी असमर्थता दर्शवल्यानंतर गावंडे यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. या तक्रारीनुसार फौजदारी स्वरूपाचा गुन्हा दाखल होत नसल्याचा दावा पोलिसांनी न्यायालयात प्रतिज्ञापत्राद्वारे केला होता. त्यानंतर या तक्रारीचा तपास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने करण्याचे आदेश न्यायालयाने दिला होता. त्यानुसार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने खडसे यांच्याविरोधात बंडगार्डन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. खडसेंनी पदाचा गैरवापर केल्याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक कायदा कलम १३(१), १ (ड), (२), (१५) आणि भारतीय दंड संहिता कलम १०९ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती उच्चपदस्थ सूत्रांनी दिली.

''ही जमीन खरेदी करण्यासाठी खडसे कुटुंबीयांनी पैसे कोठून आणले, जमीनखरेदीमागे नेमका उद्देश काय होता, खडसे यांच्या दालनात झालेल्या बैठकीत ही जमीन संपादीत करण्याची प्रक्रिया लवकरात लवकर करावी, असे आदेश का देण्यात आले. केवळ तीन कोटी ७५ लाखांत कशी खरेदी करण्यात आली, या सगळ्या बाबींची चौकशी आता व्हावी.'' - हेमंत गावंडे, तक्रारदार

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images