Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

‘प्रथम बुक्स’ला गुगलची मदत

$
0
0

गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी दोन वर्षांत निधीची घोषणा

म. टा. प्रतिनिधी, पुणे

‘सगळ्यांसाठी गुणवत्तापूर्ण शिक्षण’ ही कल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी, देशातील चार संस्थांना मिळून येत्या दोन वर्षांत ८४ लाख डॉलर्स निधी देण्याची घोषणा गूगलने केली आहे. ‘शिक्षणसाहित्य आणि माहिती यांची उपलब्धता ही गूगल मूल्यव्यवस्थेच्या केंद्रस्थानी आहे,’ असे प्रतिपादन गूगल शिक्षण विभागाचे प्रमुख ब्रिजिट हॉयर गोसलिंक यांनी केले.
‘गुगलकडून आर्थिक मदत मिळणाऱ्या देशातील चार संस्थांमध्ये प्रथम बुक्सचा समावेश आहे. जगातील सर्वांत अवघड प्रश्न सोडवण्यासाठी ज्यांनी माहिती आणि आकडेवारी यांच्या आधारे मूलगामी स्वरूपाचा नवा आणि कल्पक उपक्रम सुरू केला आहे, अशा संस्थांची निवड या कार्यक्रमांतर्गत करण्यात आली आहे. स्टोरीविव्हर हे प्रथम बुक्सचे खुले डिजिटल व्यासपीठ असून, मुलांसाठी गोष्टींचा मोठा खजिना येथे उपलब्ध आहे. या उपक्रमासाठी प्रथम बुक्सची निवड करण्यात आली आहे,‘ अशी माहिती प्रथम बुक्सच्या संपादक संध्या टाकसाळे यांनी दिली.
यातील सोपी साधने म्हणजे एम्बेडेड टूल्स वापरून गोष्टी वाचता येतात, अनुवादित करता येतात, लिहिता येतात आणि मूळ गोष्टी नव्या रूपात आणता येतात. सुरुवातीला २४ भाषांमध्ये ८०० गोष्टी या व्यासपीठावर उपलब्ध होत्या आणि केवळ १८ महिन्यांच्या कालावधीमध्ये ही संख्या ६७ भाषा आणि ३१०० गोष्टींवर पोहोचली आहे. सर्व मिळून, दहा लाख वेळा या गोष्टी वाचल्या गेल्या असून एक लाख वेळा डाउनलोड झाल्या आहेत. गुगलकडून मिळणाऱ्या निधीमुळे प्रथम बुक्सला प्रचंड मोठ्या प्रमाणात नवे वाचन साहित्य बाल-वाचकांना ‘स्टोरीविव्हर’वर उपलब्ध करून देता येणार आहे, असेही टांकसाळे म्हणाल्या.
प्रथम बुक्सच्या अध्यक्ष सुझान सिंग म्हणाल्या, की ‘मुलांना आपल्या मातृभाषेतून वाचनसाहित्य मोठ्या प्रमाणात उपलब्ध व्हावे, यासाठी एक मोठी ताकद म्हणून तंत्रज्ञानाचा वापर प्रथम बुक्स करत आहे. सामाजिक प्रकाशन म्हणून एक नवेच प्रारूप स्टोरीविव्हरद्वारे पुढे आले आहे. यामध्ये कॉपीराइट-मुक्त खुल्या आशयाची ताकद आहे. साक्षरतेसाठी हे महत्वाचे पाऊल आहे. त्यासाठीच विविध भाषांमध्ये वाचन साहित्याचा खजिना सर्व मुलांसाठी उपलब्ध करून देणे, तो सुद्धा जागतिक पातळीवर, हे स्टोरीविव्हरचे उद्दिष्ट्य आहे.'

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


पुण्यातील विद्यार्थ्यांची रजत कमळावर मोहोर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा विद्यार्थी प्रांतिक देशमुख याच्या ‘मातीतली कुस्ती‘ या लघुपटाला राष्ट्रीय पुरस्कारांमध्ये रजत कमळ जाहीर झाले आहे. फिल्मफेअर आणि राष्ट्रीय पुरस्कार मिळविणारा ‘मातीतली कुस्ती’ हा देशातील पहिलाच लघुपट ठरला आहे.
राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा शुक्रवारी झाली. यामध्ये सर्वोत्तम शोध आणि साहस लघुपट विभागात प्रांतिकच्या लघुपटाला रजत कमळ जाहीर झाले. निर्माता आणि दिग्दर्शकाला प्रत्येकी ५० हजार रुपये, असे पारितोषिकाचे स्वरूप आहे.
प्रांतिक मूळचा यवतमाळचा असून, उच्च शिक्षणासाठी पुण्यात आला आहे. बेंगळुरू येथून मास मीडियाची पदवी घेतल्यानंतर त्याने सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात याच विषयाच्या पदव्युत्तर पदवीसाठी प्रवेश घेतला. शैक्षणिक प्रकल्प म्हणून केलेल्या लघुपटाला फिल्मफेअरनंतर राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाल्याने विद्यापीठाच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे.
‘कुस्ती महाराष्ट्रातील पारंपरिक खेळ संपत चालला असून, ऑलिम्पिकमध्ये रेसलिंगला स्थान मिळत आहे. पुण्यातील २३४ वर्षे जुन्या चिंचेच्या तालमीत पूर्वी शेकडो पैलवान असायचे. आता मात्र ही संख्या २०पर्यंत रोडावली आहे. कुस्तीची व्यथा सांगणारा हा लघुपट आहे. कुस्ती आपला पारंपरिक खेळ असल्याने तो टिकला पाहिजे,’ प्रांतिक भावूक होऊन सांगत होता. ‘बारा मिनिटांचा हा लघुपट गेल्या वर्षी मेमध्ये चिंचेच्या तालमीत पूर्ण केला. फिल्मफेअरसाठी १४०० लघुपटातून त्याची निवड झाली आणि आता राष्ट्रीय पुरस्कार मिळत असल्याने भारावून गेलो आहे,’ अशी भावना त्याने व्यक्त केली.
राष्ट्रीय पुरस्कार मिळेल, असे वाटत नव्हते. घोषणा झाली तेव्हा आश्चर्यचकित झालो. राष्ट्रपतींच्या हस्ते होणाऱ्या सन्मानाचा आनंद वेगळाच आहे. हे यश सांघिक असून, घरातील सर्वांना खूप आनंद झाला आहे, असेही प्रांतिक म्हणाला.

‘एफटीआयआय’चेही यश
राष्ट्रीय चित्रपट व दूरचित्रवाणी संस्थेने (एफटीआयआय) राष्ट्रीय पुरस्कारांमध्ये यश मिळवले आहे. ’कल्पवृक्ष’ या लघुपटाने छायाचित्रणासाठीचे रजत कमळ पटकावून बाजी मारली आहे. लघुपटासाठी छायाचित्रण अभ्यासक्रमाचा विद्यार्थी अलपेश नागर याने छायाचित्रण केले होते. त्याच्या छायाचित्रणासाठी रजत कमळ, ५० हजार रुपये रोख आणि प्रशस्तीपत्रक प्रदान करण्यात येणार आहे. एका मुलीच्या संघर्षावर आधारित या लघुपटाचे दिग्दर्शन अभिजित खुमान यांनी केले आहे. दिल्लीमध्ये ३ मे रोजी राष्ट्रपतींच्या हस्ते पारितोषिक वितरण समारंभ होणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वडिलांनी मारल्यामुळे विद्यार्थिनीची आत्महत्या

$
0
0

कॉलेजच्या इमारतीवरून उडी मारली

म. टा. प्रतिनिधी, पिंपरी

लॅपटॉप दुरुस्तीसाठी मावशीकडून पैसे घेतल्यामुळे वडिलांनी मारहाण केली. यातून आलेल्या नैराश्यातून फार्मसीच्या तिसऱ्या वर्षाला शिकणाऱ्या विद्यार्थिनीने कॉलेजच्या छतावरून उडी मारून आत्महत्या केली. मोहननगर येथील रसिकलाल माणीकचंद धारिवाल फार्मसी विद्यालयात शुक्रवारी दुपारी एकच्या सुमारास हा धक्कादायक प्रकार घडला.

शीतल गोपळ जाधव (वय २०, रा. पवारनगर, जुनी सांगवी) असे आत्महत्या केलेल्या विद्यार्थीनीचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शीतल फार्मसीच्या तिसऱ्या वर्षात शिकत होती. तीन महिन्यांपूर्वी तिला लॅपटॉप घेतला होता. तो खराब झाल्याने दुरुस्तीसाठी तिने मावशीकडून दहा हजार रुपये घेतले होते. हे वडिलांना समजल्याने, मला न विचारता का पैसे घेतले, असा जाब विचारत त्यांनी तिला बेदम मारहाण केली होती. तसेच तिचा व तिच्या भावाचा मोबाइल तिच्या वडिलांनी काढून घेतला होता. दोन दिवसांपासून घरात यामुळे वाद सुरू होते. यामुळे शीतल नैराश्यात होती.

शुक्रवारी सकाळी कॉलेजात शीतल दोन लेक्चरला वर्गात बसली होती. त्यावेळेस तिच्या हातावर मारहाणीचे वळ होते. तिच्या मैत्रिणींनी हे वळ कसले असे विचारल्यावर तिने घडलेला प्रकार सांगितला. त्यानंतर तिसऱ्या लेक्चरला ती वर्गात नव्हती. दुपारी एकच्या सुमारास अचानक जोरात आवाज झाला म्हणून वर्गातील विद्यार्थ्यांनी बाहेर धाव घेतली. तेव्हा शीतल रक्ताच्या थारोळ्यात पडली होती. तिने इमारतीच्या चौथ्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली.

शीतलचा भाऊ पुण्यातील फर्ग्युसन कॉलेजात शिकतो, तर आई-वडील हातगाडीवर भाजी विक्रीचा व्यवसाय करतात. याप्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद पिंपरी पोलिस ठाण्यात करण्यात आली असून, फौजदार हरिदास बोचरे तपास करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कर्वेनगर उड्डाणपूल १५ जूनपर्यंत पूर्ण करू

$
0
0

पालिका आयुक्तांचे आश्वासन; महापौरांसह केली पाहणी

म. टा. प्रतिनिधी, पुणे

अनेक वर्षांपासून रखडलेल्या कर्वेनगर चौकातील उड्डाणपुलाचे काम पंधरा जून अखेरपर्यंत पूर्ण केले जाईल, असे आश्वासन पालिका आयुक्त कुणाल कुमार यांनी दिले.
कर्वेनगर चौकातील उड्डाणपूल, खराडी ते वारजे दरम्यानचा शंभर फूट डीपी रोड तसेच वारजे जलशुद्धीकरण केंद्रातून केला जाणारा पाणीपुरवठा या कामांची पाहणी शनिवारी आयुक्तांच्या उपस्थितीत महापौर मुक्ता टिळक, स्थानिक नगरसेवक सुशील मेंगडे, वृषाली चौधरी, राजाभाऊ बराटे आणि मंजुश्री खर्डेकर यांनी केली. कर्वेनगर भागातील अनेक प्रश्न रखडले आहेत. भालेराव उद्यान, जावळकर उद्यानांची अवस्था दयनीय झाली असून, नदीपात्रात सर्रास भराव टाकला जातो. नदीपात्रात वाढणारी अतिक्रमणे आदी प्रश्नांबाबत चर्चा करण्यासाठी स्थानिक नगरसेवकांनी महापौर, आयुक्तांच्या उपस्थितीत बैठक घेतली. पालिकेतील विविध खात्यांचे विभागप्रमुखही या वेळी उपस्थित होते.
कर्वेनगर येथील उड्डाणपुलाचे काम १५ जूनपर्यंत पूर्ण करून तो खुला करण्यात येईल. तसेच, या भागातील पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी वारजे जलशुद्धीकरण केंद्राचे काम पूर्ण करुन येथील नवीन टाकीमधून वारजे, कर्वेनगरमध्ये मोठ्या दाबाने पाणीपुरवठा केला जाईल. याबरोबरच रखडलेला शंभर फूट डीपी रस्ता, उद्यानांची दूरवस्था, राजाराम पूल ते हिंगणे स्त्री शिक्षण संस्था या ६० फूट पानंद रस्त्याचे रुंदीकरण ही आदी कामे लवकरच मार्गी लावण्यात येतील, अशी ग्वाही आयुक्तांनी दिली. या भागातील प्रलंबित प्रश्न जोपर्यंत सुटणार नाहीत, तोपर्यंत सतत पाठपुरावा करणार असल्याचे मेंगडे म्हणाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सुट्टीच्या दिवशीही करभरणा शक्य

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

मिळकतदारांना सवलतीच्या दरात मिळकत कर भरता यावा, यासाठी ३१ मे पर्यंत दर शनिवारी आणि रविवारी तसेच सुट्टीच्या दिवशीही मिळकतकर भरणा केंद्रे सुरू ठेवण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती (१४ एप्रिल) आणि महाराष्ट्र दिनाचा (१ मे) अपवाद वगळता अन्य सर्व दिवस सकाळी दहा ते दुपारी दोन या वेळेत ही केंद्रे सुरू राहणार आहेत. मिळकतदारांना मिळकतीच्या बिलांचे वाटप पालिकेच्या करआकारणी आणि करसंकलन विभागातर्फे करण्यास सुरुवात केली आहे. जे मिळकतधारक १ एप्रिल ते ३१ मे दरम्यान मिळकतकर भरतील, त्यांना पाच ते दहा टक्के सवलत दिली जाते. यंदाही सवलत दिली जाणार आहे. पहिल्या आठवड्यामध्येच पालिकेच्या तिजोरीत ४० ते ४५ कोटी रुपयांचा महसूल जमा झाला आहे. पालिकेच्या १५ क्षेत्रीय कार्यालयाबरोबरच मुख्य इमारतीमध्ये तसेच काही बँकांबरोबर करार करून ही सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे.
सुट्टीच्या दिवशी सकाळी दहा ते दुपारी दोन दरम्यान कर भरता येणार आहे. ही सर्व केंद्रे या वेळेत सुरू ठेवण्याचे आदेश दिल्याचे करसंकलन आणि करआकारणी विभागाचे प्रमुख उपायुक्त सुहास मापारी यांनी सांगितले. नागरिकांना सुविधा केंद्र तसेच ऑनलाइन पद्धतीने क्रेडीट तसेच डेबिट कार्डाद्वारे कर भरता येणार आहे. या शिवाय ‘भीम’ अॅपद्वारेही कराची रक्कम भरता येणार आहे.

मोबाइलवर बिल पाहता येणार
पालिकेकडे ज्या मिळकतदारांनी मोबाइलची नोंदणी केली असेल, तर पालिकेच्या वेबसाइटवर जाऊन मोबाइल क्रमांक टाकून भरणा रक्कम तसेच बिल पाहता येणार आहे. नागरिकांनी मोबाइल क्रमांक टाकताच पालिकेकडे नोंदणी केलेल्या क्रमांकावर वन टाइम पासवर्ड (ओटीपी) मिळेल. तो नोंदवल्यानंतर सध्याचे बिल, थकबाकी आदी माहिती मिळणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बापटांच्या निषेधार्थ राष्ट्रवादीची निदर्शने

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

शहरातील महिला, विद्यार्थिनी तसेच युवतींवरील वाढत्या अत्याचाराच्या निषेधार्थ शनिवारी पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने पालकमंत्री गिरीश बापट यांच्या कसबा पेठेतील कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले.
पालिकेतील विरोधी पक्षनेते चेतन तुपे, राष्ट्रवादी काँग्रेसच्या शहराध्यक्षा रुपाली चाकणकर, नगरसेविका लक्ष्मी आंदेकर, प्रिया गदादे, महेंद्र पठारे, युवकचे अध्यक्ष राकेश कामठे, मनाली भिलारे, प्रदीप गायकवाड, शशिकला कुंभार, औदुंबर खुने-पाटील, रजनी पाचंगे, भोलासिंग अरोरा यांच्यासह पक्षाचे प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते या वेळी उपस्थित होते. शहरातील वाढत्या महिला अत्याचाराकडे बापट, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दुर्लक्ष करत असल्याचा आरोप करून त्यांच्या निषेधाच्या घोषणा देण्यात आल्या.
‘शहरासह संपूर्ण राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेची स्थिती अत्यंत गंभीर झाली आहे. मात्र, भाजप सरकारला याकडे लक्ष देण्यास वेळ नाही. गेल्या आठवड्यात आमदाराच्या मुलीवरही हल्ला झाला आहे. गेल्या काही दिवसात महिलांची सुरक्षितता धोक्यात आली आहे. सरकारने महिलांच्या सुरक्षिततेची हमी द्यावी अन्यथा घरी जावे,’ या शब्दांत आंदोलकांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
शहरात अनेक महिला, मुली‌ शिक्षणानिमित्त येतात. त्यांच्या सुरक्षिततेची जबाबदारी पालकमंत्र्यांवर आहे. मात्र, त्याची जाणीव पालकमंत्र्यांसह भाजपच्या एकाही नेत्याला नसल्याची टीका या वेळी करण्यात आली. महिलांच्या सुरक्षिततेबाबत योग्य ती खबरदारी न घेतल्यास भविष्यकाळात अधिक तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही देण्यात आला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तोट्यातील २७ मार्ग बंद केल्याचा आरोप

$
0
0

अभ्यासाविना निर्णयाचा ‘पीएमपी मंचा’चा दावा

म. टा. प्रतिनिधी, पुणे

पुणे महानगर परिवहन महामंडळाने तोट्यातील मार्ग असल्याचे कारण देऊन कोणतीही पूर्वसूचना न देता २७ मार्गांवरील ३८ बस बंद केल्याचा आरोप पीएमपी प्रवासी मंचाने केला आहे. हे मार्ग बंद करताना कोणताही अभ्यास करण्यात आलेला नाही. पीएमपीची सेवा नफ्यासाठी नसून, प्रवाशांच्या सेवेसाठी असल्याने पीएमपीने प्रवासीकेंद्रीत विचार करावा, अशी मागणीही मंचातर्फे करण्यात आली आहे.
पीएमपीने गेल्या आठवड्यात पुणे आणि पिंपरी चिंचवडमधील २७ मार्गांवरील ३८ बसची सेवा बंद केली. या मार्गांवरील फेऱ्यांचे उत्पन्न कमी झाल्याने पीएमपीचे अध्यक्ष तुकाराम मुंढे यांच्या आदेशाने हे मार्ग बंद करण्यात आल्याचे मंचाचे अध्यक्ष जुगल राठी यांनी म्हटले आहे.
बंद केलेल्या मार्गांतील बहुतांश मार्ग शहराच्या मध्यवर्ती भागातील आहेत. स्वारगेट, महात्मा फुले मंडई, डेक्कन, पुणे स्टेशन, शनिवारवाडा अशा मध्यवर्ती ठिकाणांहून सुटणाऱ्या फेऱ्यांचाही त्यात समावेश आहे. शहराच्या मध्यवर्ती भागात मोठ्या संख्येने नागरिक येतात. त्यांची गर्दी टाळण्यासाठी अनेक नागरिक पीएमपीला प्राधान्य देतात. मात्र, मार्ग बंद केल्याने मध्यवर्ती भागात वाहनांची गर्दी मोठ्या प्रमाणात वाढण्याची भीती राठी यांनी व्यक्त केली.
पीएमपी बसला प्रतिकिलोमीटर सरासरी ५५ रुपयांचे उत्पन्न मिळते. मात्र, बंद केलेल्या मार्गांवर धावणाऱ्या बसचे सरासरी उत्पन्न प्रतिकिलोमीटर १२ ते ४२ रुपये होते. कमी उत्पन्नामुळे हे मार्ग तोट्यात सुरू होते. त्यामुळे हे मार्ग बंद केल्याचे पीएमपीतील सूत्रांनी सांगितले. या संदर्भात पीएमपीएलचे अध्यक्ष तुकाराम मुंढे यांच्याशी चर्चा करणार असल्याचेही राठी यांनी स्पष्ट केले.

बंद केलेले मार्ग
स्वारगेट-महंमदवाडी, शनिपार-पांडवनगर, गुजरात कॉलनी-पिंपळे गुरव, स्वारगेट-महंमदवाडी-कृष्णानगर, महात्मा फुले मंडई-पटवर्धनबाग, पालिका-ईशान नगरी, कोथरूड डेपो-महात्मा फुले मंडई, स्वारगेट-पद्मावती-फुरसुंगी, गुजरात कॉलनी-पुणे स्थानक, डेक्कन जिमखाना-विद्यानगर, पुणे स्थानक-महंमदवाडी, पुणे स्थानक-हडपसर, निगडी-साळुंखे विहार, पिंपरी-देहूगाव, वाकड पूल-हिंजवडी फेज ३, स्वारगेट-निगडी, स्वारगेट-धायरी, कोथरूड डेपो-हडपसर, साळुंखे विहार-खेड शिवापूर, सुखसागरनगर-संगमवाडी, भेकराईनगर-स्वारगेट, विश्रांतवाडी-आझादनगर, पुणे स्थानक-कृष्णानगर, महात्मा फुले मंडई-सुतारवाडी, शनिवारवाडा-घुलेनगर, विश्रांतवाडी-आळंदी, पालिका-मुंढवा.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रस्तेखोदाईवरून प्रशासनाचे नमते

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

शहरात वायफाय सेवा उपलब्ध करण्यासाठी ‘एल अँड टी’ कंपनीला मोफत रस्ते खोदाईची मान्यता दिल्याने झालेल्या वादंगाच्या पार्श्वभूमीवर पालिका प्रशासनाला स्थायी समितीची मान्यता घेण्याची उपरती झाली आहे.
पदाधिकाऱ्यांना विश्वासात न घेताच घेतलेल्या या निर्णयामुळे प्रशासनावर टीका होऊ लागल्याने आता हा प्रस्ताव स्थायी समितीसमोर मांडून मान्यता घेण्याचा विचार सुरू आहे. येत्या मंगळवारी (११ एप्रिल) समितीच्या बैठकीत हा विषय आयत्यावेळेस आणून मान्यता घेतली जाण्याची शक्यता आहे.
शहरात वायफायची सुविधा उपलब्ध करण्यासाठी पालिकेने ‘एल अँड टी’ कंपनीला मोफत रस्ते खोदाई करण्याची मान्यता दिली आहे. त्यामुळे पालिकेला ८.६४ कोटी रुपयांच्या महसुलावर पाणी सोडावे लागणार आहे. तसेच, खोदलेले रस्ते दुरुस्त करण्यासाठी अतिरिक्त दोन ते अडीच कोटींचा भुर्दंडही सहन करावा लागणार आहे. मोफत रस्ते खोदाईमुळे पालिकेचे नुकसान होणार असतानाही स्थायी समितीला न विचारता परस्पर निर्णय केल्याने पालिकेच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. याबाबतचे वृत्त माध्यमांनी प्रसिद्ध केल्यानंतर स्वयंसेवी संस्थांनी, सत्ताधारी भाजपच्या आणि शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली होती. सेनेने तर पालिका आयुक्तांनी सविस्तर खुलासा न केल्यास आंदोलनाचा इशाराही दिला आहे.
स्थायी समितीच्या कार्यपत्रिकेवर हा विषय आणल्यास उलटसुलट चर्चा होण्याची शक्यता असल्याने आयत्यावेळेस समितीच्या बैठकीत हा विषय मांडून मंजुरी मिळविण्यात येण्याची शक्यता आहे. या प्रकारामुळे प्रशासनाचा मनमानी कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


मार्ग सुसूत्रीकरणासाठी समितीची नेमणूक

$
0
0

पीएमपीची आवश्यकता, प्रवासी संख्येचा अभ्यास करणार

म. टा. प्रतिनिधी, पुणे

पुणे महानगर परिवहन महामंडळातर्फे शहर आणि ग्रामीण हद्दीत मिळूत ३७४ मार्गांवर सेवा दिली जाते. त्यापैकी कोणत्या मार्गावर किती बसची आवश्यकता आहे, या मार्गावरील प्रवासी संख्या किती, कोणत्या वेळी अधिक मागणी असते, आदींचा अभ्यास करून मार्गांचे सुसूत्रीकरण करण्यासाठी पीएमपी प्रशासनाने समिती स्थापन करण्याचा आदेश दिला आहे.
पीएमपीच्या ताफ्यातील सरासरी १५०० बस प्रत्यक्ष रस्त्यावर धावतात. सद्यस्थितीत मात्र, शहराची गरज दुपटीने वाढली आहे. त्यामुळे उपलब्ध बसमध्ये चांगली सेवा देण्यासाठी गरजेनुसार बस सोडण्याची गरज आहे. सध्या काही मार्गांवर गाड्यांच्या फेऱ्या जास्त, तर काही मार्गांवर कमी फेऱ्या होत असल्याचे वास्तव आहे. या पार्श्वभूमीवर पीएमपीचे अध्यक्ष तुकाराम मुंढे यांनी समिती स्थापन करण्याचा आदेश दिला आहे. या समितीने महिनाअखेरपर्यंत प्रत्येक मार्गाचा अभ्यास करून प्रवासी संख्या, गर्दीच्या वेळा, गाड्यांच्या फेऱ्या आदींची माहिती संकलित करायची आहे. त्यानुसार गरजेपेक्षा जास्त फेऱ्या रद्द करून आवश्यक तेथे फेऱ्या वाढवाव्यात, हे करताना प्रवाशांना केंद्रस्थानी ठेवावे, आदी सूचनाही मुंढे यांनी दिल्या आहेत.
बंद बसच्या दुरुस्तीसाठी पीएमपी प्रशासनाने नुकताच एक कोटींचा निधी दिला आहे. त्यानुसार पीएमपीच्या वर्कशॉपमध्ये बंद गाड्यांच्या दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले आहेत. त्या अंतर्गत पीएमपीच्या कात्रज आणि हडपसर डेपोतील दोन बंद गाड्या दुरुस्त करण्यात आल्या आहेत. या गाड्या चार ते पाच दिवसांत धावणार आहेत. एका गाडीसाठी ७० ते ७५ हजार रुपये खर्च आला आहे. या गाड्यांची तपासणी करून सर्व्हिसिंग, गाडीची चासी, बैठक व्यवस्थेचे हाती घेण्यात येणार आहे.

पीएमपी अधिकारी निलंबित
पीएमपीच्या वर्कशॉपमधील वाहनांचे सुटे भाग वेळेत न मिळाल्याने बंद बसची दुरुस्ती रखडली आहे. या पार्श्वभूमीवर मुंढे यांनी स्टोअर मॅनेजर चंद्रशेखर कदम यांना निलंबित केले. त्यांचा पदभार वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे सोपविण्यात आला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

एकाच कुटुंबाने साकारले महाभारत

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

आजोबांपासून ते छोट्या नातवापर्यंत... आजीपासून ते नातीपर्यंत... एकाच परिवारातील कलाकारांनी रंगमंचावर महाभारताच्या विविध छटा साकारल्या आणि रसिकांना तृप्त केले. निमित्त होते आंध्र असोसिएशनतर्फे गणेश कला क्रीडा मंच येथे आयोजित तेलगू भाषिकांच्या मेळाव्याचे...

मेळाव्यात शनिवारी सुरभी कुटुंबातील साठ कलाकारांनी महाभारतातील विविध प्रसंग जिवंत केले आणि रसिकांची भरभरून दाद मिळवली. शाळेत जाणाऱ्या चिमुकल्यापासून ते अगदी आजोबांपर्यंत सर्वच जण विविध भूमिका साकारत होते. या सर्वांनी ‘मायाबाजार’ हे नाटक सादर करून, महाभारतातील मायावी प्रसंग उलगडले. कृष्ण, बलराम, कर्ण, भीम, अभिमन्यू या पात्रांनी रसिकांचे विशेष लक्ष वेधले. बहारदार नेपथ्य, डोळे दिपवून टाकणारी प्रकाशयोजना, तेलगू संगीत आणि कलाकारांचा अभिनय यांमुळे नाटक उठावदार झाले.

तेलंगणच्या विधानसभेचे अध्यक्ष मधुसूदन आचारी, मल्लिकार्जुन रेड्डी, जलसंधारण मंत्री राम शिंदे तेलगू चित्रपट अभिनेते तनिकेल्ला भरानी, पी. आर. मोहन, पी. हरिकृष्णा आदी या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. सुरभी परिवाराचे प्रमुख नागेश्वरा राव यांनी या नाटकाची निर्मिती केली आहे. आतापर्यंत नाटकाचे भोपाळ, म्हैसूर, ओडिशा, दिल्ली, नेपाळ, बेंगळुरू येथे प्रयोग झाले आहेत. अमेरिकेतही नाटकाचे सादरीकरण करण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘सीएम’कडे तक्रार करणार

$
0
0

खासदारांचा इशारा; विद्यापीठ चौक वृक्षतोडीचा वाद पेटणार

म. टा. प्रतिनिधी, पुणे

आचार्य आनंदऋषिजी चौकातील (सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ चौक) झाडे तोडण्याचा वाद आता पेटण्याची शक्यता आहे. चौकातील वाहतुकीची कोंडी फोडण्यासाठी संपूर्ण सोपस्कार पूर्ण करून झाडे तोडल्याचा दावा पालिकेने केला आहे. पालिकेच्या दाव्याला आक्षेप घेऊन पर्यावरणप्रेमींनी शुक्रवारी रात्रभर झाडांभोवतीच बस्तान मांडले. त्यातच खासदार अनिल शिरोळे यांनी पर्यावरणप्रेमींची भेट घेऊन अनेक वृक्ष तोडण्याची गरज नसल्याचा दावा करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तक्रार करण्याचा इशारा दिला.
गणेशखिंड रस्त्याच्या रुंदीकरणासाठी विद्यापीठाच्या परिसरातील १०६ झाडे तोडण्याचा मूळ प्रस्ताव मागील वर्षी मांडण्यात आला होता. त्यावेळीही पर्यावरणप्रेमींनी विरोध केला होता. त्यामुळे सुनावणी घेण्यात आली. त्यानंतर, केवळ ३५ झाडे तोडण्यास मान्यता देण्यात आली. वृक्ष प्राधिकरण समितीनेही मान्यता दिल्याने पालिकेने शुक्रवारी सकाळी झाडे तोडण्यास सुरुवात केली. पर्यावरणप्रेमींनी याला विरोध करून रस्त्यावरच ठिय्या मांडला. शुक्रवारी रात्रभर तसेच शनिवारी दिवसभर या झाडांभोवती ठाण मांडले. त्यामुळे पालिकेला झाडे तोडता आली नाहीत.
या चौकात उड्डाणपूल होऊनही औंधमार्गे येणाऱ्या वाहनचालकांना खूप वेळ थांबावे लागते. या रस्त्यावर बीआरटीचे काम सुरू झाले आहे. त्यामुळे रस्तारुंदीसाठी सर्व परवानग्या घेतल्यानंतरच झाडे तोडली जात असल्याचे पालिकेतील अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. दरम्यान, शिरोळे यांनी घटनास्थळी पर्यावरणप्रेमींची भेट घेऊन अधिकाऱ्यांशी चर्चा केली. ‘रस्ता रुंदीकरणासाठी झाडे तोडण्याला आपला विरोध आहे. झाडे न तोडताही वाहतुकीची कोंडी सुटू शकते,’ असा दावा त्यांनी केला. चुकीच्या पद्धतीने झाडे तोडण्याचा निर्णय घेतल्याने आयुक्त कुणाल कुमार यांना पत्र पाठविणार असून, मुख्यमंत्र्यांकडेही तक्रार करणार असल्याचे ते म्हणाले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पारदर्शक कारभार करण्याचा निर्णय घेतला आहे. पालिकेने देखील या चौकातील झाडे तोडण्याचा प्रस्ताव पारदर्शक पद्धतीने लोकांसमोर मांडला पाहिजे.
अनिल शिरोळे, खासदार

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नॅचरल आइस्क्रीम शिकण्याची संधी

$
0
0

कल्चर क्लब सदस्यांना मिळणार सवलत

म. टा. प्रतिनिधी, पुणे

आइस्क्रीम हा आबालवृध्दांच्या आवडीचा पदार्थ... त्यामुळे घरी असो किंवा बाहेर प्रत्येक सेलिब्रेशनमध्ये आईस्क्रीमने मानाचे स्थान पटकावले आहे. सध्या नॅचरल आइस्क्रीम हा प्रकार लोकप्रिय झाला आहे. आइस्क्रीमही आरोग्यदायी असावे, हा त्यामागचा विचार. नैसर्गिक पद्धतीने घरच्या घरी आइस्क्रीम कसे तयार करायच, हे शिकण्याची संधी खाद्यप्रेमींना मिळणार आहे.
‘महाराष्ट्र टाइम्स’ कल्चर क्लबतर्फे येत्या शुक्रवारी (ता. १४) ‘आइस्क्री मेकिंग वर्कशॉप’चे आयोजन केले आहे. नर्मदा हॉल, प्रभात रस्ता, गल्ली क्रमांक १५ येथे दुपारी दोन वाजता वर्कशॉप होणार आहे. खायला चविष्ट, नैसर्गिक पद्धतीने फळांपासून बनलेले, कोणत्याही प्रकारचे प्रिझर्वेटिव्ह आणि स्टेबिलायझर न वापरता आइस्क्रीम तयार करण्याची प्रक्रिया कार्यशाळेत शिकविण्यात येणार आहे. या शिवाय कोणत्याही मशिनचा वापर न करता तयार करता येतील असे आइस्क्रीमचे प्रकारही शिकविण्यात येणार आहे. यात टेंडर कोकोनट, बटरस्कॉच, मोका, संत्रा-मंत्रा, टुटी फ्रुटी, फालुदा, कुकीज आणि मिंट, चॉकलेट ब्राउनी आदी प्रकारांचा समावेश आहे.
ताज्या फळांचा वापर करून आइस्क्रीम मुलांसाठी कसे आरोग्यदायी ठरतील, आदीच्या टीप्सही मिळणार आहेत. त्यामुळे हे प्रकार शिकून घेणे गृहिणींसाठी फायद्याचे ठरणार आहे. ही कार्यशाळा सशुल्क असून, ‘मटा’ कल्चर क्लबच्या सदस्यांना विशेष सवलत दिली जाणार आहे. कार्यशाळेच्या अधिक माहिती आणि नावनोंदणीसाठी संपर्क : ९६५७०३२६०९

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

फुलराणी जतनासाठी आवश्यक प्रयत्न करू

$
0
0

महापौरांचे आश्वासन; चिमुकल्यांसह केली सैर

म. टा. प्रतिनिधी, पुणे

‘पेशवे उद्यान आणि चिमुकल्यांची आवडती फुलराणी हे पुण्याचे वैभव आहे. त्याचे जतन करणे गरजेचे असून, त्यासाठी योग्य ते सर्व प्रयत्न पालिकेकडून केले जातील,’ असे आश्वासन महापौर मुक्ता टिळक यांनी शनिवारी दिले. पेशवे उद्यान आणि फुलराणीच्या समस्यांमध्ये जातीने लक्ष घालावे, अशा सूचनाही त्यांनी स्थानिक नगरसेवकांना दिल्या.
निमित्त होते फुलराणीच्या एकसष्ठाव्या वाढदिवसानिमित्त पेशवे उद्यानात आयोजित केलेल्या कार्यक्रमाचे... फुलराणीची सैर करण्यासाठी आलेल्या चिमुकल्यांसह महापौरांनी केक कापून फुलराणीचा वाढदिवस साजरा केला. स्थानिक नगरसेवक धीरज घाटे, स्मिता वस्ते, सरस्वती शेडगे, माधुरी सहस्त्रबुद्धे, फुलराणीच्या उद्घाटक सुगंधा शिरवळकर, उद्यान अधीक्षक अशोक घोरपडे, संवाद संस्थेचे सुनील महाजन आणि निकिता मोघे आदी या वेळी उपस्थित होते. कार्यक्रमावेळी महापौरांनीही फुलराणीच्या आठवणी जागवल्या. लहानपणी केलेल्या फुलराणीच्या सफरीचे अनुभव त्यांनी उपस्थितांना सांगितले. चिमुकल्यांसह फुलराणीची सैरही केली.
‘पेशवे उद्यान आणि फुलराणीला लहान असल्यापासून अनुभवत आलो आहोत. हे उद्यान पुण्याच्या वैभवात भर टाकणारे आहे. हा वारसा जपणे अत्यंत गरजेचे आहे. त्यासाठी पालिकेद्वारे सर्व आवश्यक प्रयत्न करण्यात येतील. फुलराणीला भेट देण्यासाठी शहरातील बच्चेकंपनीने मोठ्या संख्येने यावे, यासाठी सुधारणा करण्याच्या सूचना नगरसेवकांना देण्यात आल्या आहेत,’ असे टिळक यांनी सांगितले. ‘पेशवे उद्यानाची वेळ वाढवण्यासाठी सकारात्मक निर्णय घेऊ,’ असे आश्वासनही त्यांनी दिले. ‘केवळ पेशवे उद्यानच नाही तर पुण्यातील सर्व उद्याने अद्ययावत आणि पर्यावरणपूरक करण्याचा प्रयत्न पालिका करेल. त्यासाठी पुण्यात कार्यरत असणाऱ्या पर्यावरणप्रेमी संस्था आणि व्यक्तींचे मार्गदर्शन घेण्यात येईल,’ याकडे टिळक यांनी लक्ष वेधले.
१९५६मध्ये फुलराणी सुरू झाली तेव्हा तिचे उद्घाटन केलेल्या सुगंधा शिरवळकर यांनीही पेशवे उद्यानाच्या आठवणींना उजाळा दिला. चिमुकल्यांनीही फुलराणीची मनसोक्त सैर करून झुकझुकगाडीचा थरार अनुभवला. महाजन यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.

पेशवे उद्यान आणि फुलराणीला लहान असल्यापासून आपण अनुभवत आलो आहोत. हे उद्यान पुण्याच्या वैभवात भर टाकणारे आहे. हा वारसा जपणे अत्यंत गरजेचे आहे. त्यासाठी पालिकेद्वारे आवश्यक प्रयत्न करण्यात येतील. फुलराणीला भेट देण्यासाठी शहरातील बच्चेकंपनीने मोठ्या संख्येने यावे, यासाठी सुधारणा करण्याच्या सूचना नगरसेवकांना देण्यात आल्या आहेत.
मुक्ता टिळक , महापौर

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अवयवदात्यांच्या कुटुंबांचा रूबी हॉलतर्फे सन्मान

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

जागतिक अवयवदाता दिनाच्या निमित्ताने रुबी हॉल क्लिनिकतर्फे १२ एप्रिलला अवयवदानाच्या जागृतीसाठी पदयात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. ही पदयात्रा सकाळी साडेआठ वाजता डेक्कन जिमखान्यापासून टिळक स्मारक मंदिरापर्यंत निघणार आहे. त्यानंतर रुबी हॉल क्लिनिकमध्ये आयोजित समारंभात अवयवदात्यांच्या कुटुंबीयांचा आणि अवयव स्वीकारणाऱ्यांचा सत्कार केला जाईल.
कार्यक्रमाला महापौर मुक्ता टिळक, पोलिस आयुक्त रश्मी शुक्ला, रुबी हॉल क्लिनिकचे मुख्य कार्यकारी अधिकारी बोमी भोट, व्यवस्थापकीय विश्वस्त डॉ. परवेज ग्रँट उपस्थित राहणार आहेत.
वैद्यकीय समाजसेविका आणि प्रत्यारोपण समन्वयक सुरेखा जोशी म्हणाल्या,‘अवयवदान कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी आम्ही अवयवदात्यांवर अवलंबून आहोत. या विषयावर जागृती निर्माण करण्याची गरज लक्षात घेऊनच पदयात्रा आणि अवयवदात्यांच्या कुटूंबीयांच्या सत्काराचे आयोजन केले आहे.’ रुबी हॉल क्लिनिकचे वैद्यकीय सेवा संचालक डॉ. संजय पठारे म्हणाले, की ‘गेल्या काही वर्षांत अवयवदात्यांमुळे अनेकांचे प्राण वाचले आहेत. त्यामुळे जीवनरक्षक प्रत्यारोपणाची तीव्र प्रतीक्षा संपुष्टात आणण्याची चळवळ आम्ही हाती आहे. दातृत्वाच्या या वारशाने तिला प्रोत्साहन मिळत आहे. अवयवदान करणारे आणि त्यांच्या कुटुंबांच्या धाडसी निर्णयामुळे आम्हाला प्रेरणा मिळत आहे. त्यांना धन्यवाद देण्यासाठी आणि त्यांचा गौरव करण्यासाठी आम्ही अनेक उपक्रम केले आहेत. अवयवांसाठी प्रतीक्षा यादीत असणाऱ्यांना अवयवदात्यांकडून मिळणारी भेट अनमोल आहे. म्हणूनच अवयवदात्यांना आदरांजली वाहून त्यांच्या उदारतेचा रुबी हॉलतर्फे सन्मान करण्यात येत आहे.’

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

राज्यात खरेदी; अन्यत्र नोंदणी

$
0
0

कर चुकविण्यासाठी वाहनमालकांची नामी शक्कल; आरटीओ कारवाई करणार

म. टा. प्रतिनिधी, पुणे

प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडे ‍(आरटीओ) नोंदणी असलेला एकच क्रमांक एकापेक्षा अधिक वाहनांना वापरणे, तसेच, कराची टक्केवारी कमी असलेल्या अन्य राज्यांमध्ये वाहनाची नोंदणी करून महाराष्ट्रात वापर केला जात असल्याचे उघडकीस आले आहे. नवीन वाहन खरेदी केल्यानंतर करबुडवण्यासाठी किंवा कमी करभरणा करण्यासाठी काही व्यावसायिकांकडून वरीलप्रमाणे नामी शक्कल लढविली जात असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर आरटीओ प्रशासन तपासाची मोहीम तीव्र करणार आहे.
शहरात एकाच क्रमांकाचे दोन ट्रक आढळून आले. परराज्यात नोंदविलेल्या एका कारचा दंडासहित संपूर्ण थकित कर ६६ लाख रुपये असल्याचे तपासात निष्पन्न झाले. या दोन्ही घटनांमुळे आरटीओमध्ये खळबळ उडाली आहे. एका ट्रकचा नोंदणी क्रमांक दुसऱ्या ट्रकला वापरल्याने वार्षिक पासिंगचा खर्च, अन्य प्रकारचे कर, इन्शुरन्सची रक्कम आदींचा खर्च वाचतो. तसेच, आरटीओ किंवा वाहतूक पोलिस ट्रकची कागदपत्रे तपासतात, तेव्हा सर्व कर भरलेल्या गाडीची कागदपत्रे दाखविल्यानंतर कारवाई होत नाही. कागदपत्रांसह गाड्यांचे चासी क्रमांक तपासले, तर ही फसवणूक उघडकीस येईल. मात्र, आरटीओकडून बव्हंशी केवळ कागदपत्रांचीच तपासणी केली जाते. त्यामुळेच संबंधित ट्रकचालकांचे इतके दिवस फावले होते. शुक्रवारी दोन्ही ट्रक सोबत होते, त्यामुळे नंबर प्लेटवरून हा प्रकार उघडकीस आला. या प्रकारावरून असे आणखी प्रकार उघडकीला येण्याची शक्यता आहे. त्यामुळे आगामी काळात वाहनांची तपासणी आणखी कडक होणार आहे, असे आरटीओच्या एका अधिकाऱ्याने सांगितले.
वाहन खरेदीनंतर राज्याच्या तुलनेत कमी कर असणाऱ्या राज्यांमध्ये नोंदणी करण्यावर काहींचा भर आहे. परराज्यात नोंदणी केलेली, परंतु कायमच महाराष्ट्रात वापरली जाणारी अशी कित्येक वाहने शहरात आढळून येत आहेत. वास्तविक, परराज्यात नोंदणी केलेले वाहन पुण्यात किंवा राज्यात कोठेही वापरायचे झाल्यास, १२ महिन्यांनंतर त्या वाहनाची पुण्यात पुन्हा नोंदणी करणे बंधनकारक असते.

उघडकीला आलेल्या दोन्ही प्रकारांबाबत आगामी काळात आरटीओने तीव्र कारवाई करावी. तसेच, वाहनांची तपासणी करताना कागदपत्रांसह चासी क्रमांकही तपासावा.
एकनाथ ढोले, जिल्हाध्यक्ष, महाराष्ट्र वाहतूक सेना

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


सामाजिक भान असणारे शिक्षक कमी

$
0
0

ज्येष्ठ साहित्यिक द. मा. मिरासदार यांची खंत

म. टा. प्रतिनिधी, पुणे

‘शिक्षक होणे हे केवळ नोकरी किंवा व्रत नाही. शिक्षक होण्यासाठी सामाजिक भान असावे लागते. दुर्दैवाने प्रेमळ, सहानुभूतीने वागणारे आणि सामाजिक भान असलेले शिक्षक आज कमी संख्येने पाहायला मिळतात,’ अशी खंत ज्येष्ठ साहित्यिक द. मा. मिरासदार यांनी व्यक्त केले.
दिलीपराज प्रकाशनतर्फे प्रा. द. के. बर्वे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त एस. एम. जोशी सभागृहामध्ये विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्या वेळी मिरासदार बोलत होते. प्राचार्य डॉ. वेदकुमार वेदालंकार या वेळी अध्यक्षस्थानी होते. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस, महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, लेखक दिलीप बर्वे आणि ज्येष्ठ साहित्यिक डॉ. अश्विनी धोंगडे व्यासपीठावर उपस्थित होते.
मिरासदार यांनी मनोगतामध्ये बर्वे यांच्याबरोबर शिक्षक म्हणून काम करताना आलेले अनुभव कथन केले. बर्वे यांच्या लिखाणाची वैशिष्ट्ये सबनीस यांनी मनोगतातून उलगडली. बर्वे आणि श्री. ना. पेंडसे यांच्या लिखाणातील तौलनिक अभ्यास त्यांनी या वेळी उपस्थितांसमोर मांडला. ‘आज आपण अनुभवत असलेली भारतीय कुटुंब व्यवस्था बेचिराख होण्याची अवस्था बर्वे यांनी चाळीस वर्षांपूर्वी त्यांच्या लिखाणातून मांडली होती. बर्वे यांनी पुरोगामी विचारांची कास धरली असली तरी, ते सात्विक, सर्जनशील आणि वास्तववादी लेखक होते. बर्वे यांचे साहित्य उपेक्षित राहिले. ज्या प्रमाणात त्यांच्या साहित्याची मिमांसा आणि समीक्षा व्हायला हवी होती ती झाली नाही,’ असे सबनीस म्हणाले.
आज समाजात माणसापासून माणूस दुरावत असून मित्रत्वाची भावना कमी होत आहे. समाज एकसंध राहण्यासाठी, वैचारिक, सामाजिक प्रगतीसाठी सगळ्यांनी आपण एकत्र राहण्याची गरज आहे, असे मत व्यक्त करून वेदालंकार यांनीही बर्वे यांच्याबरोबर असलेल्या मैत्रीचे किस्से सांगितले. साहित्य क्षेत्राला सध्या प्रतिसाद शून्यता आणि पोटदुखीच्या आजाराने ग्रासले आहे, असे सांगून मिलिंद जोशी यांनी बर्वे यांच्या काळापासून ते अलीकडे काही वर्षात साहित्य क्षेत्रात झालेल्या बदलांचा धावता आढावा मनोगतामध्ये घेतला.
कार्यक्रमाच्या पूर्वार्धात प्रा. द. के. बर्वे लिखित ‘पुट्टी’, ‘पोकळी’, ‘पंचवेडी’ या तीन कादंबऱ्यांचे पुनर्प्रकाशन करण्यात आले. बर्वे यांच्यास्मृतिप्रीत्यर्थ केलेल्या स्मरणिकेचे प्रकाशन पाहुण्यांच्या हस्ते झाले. तसेच, वेगवेगळ्या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या बर्वे यांच्या दहा माजी विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. दिलीपराज प्रकाशनचे व्यवस्थापकीय संचालक राजीव बर्वे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘किशोर’चे सर्व अंक वेबसाइटवर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळाकडून (बालभारती) प्रकाशित होणाऱ्या किशोर मासिकाच्या गेल्या ४६ वर्षांच्या अंकांमधील सुमारे तीस हजार पानांच्या डिजिटायझेशनची प्रक्रिया वेगाने सुरू आहे. येत्या दोन महिन्यांत ‘किशोर’चे हे सर्व अंक ‘बालभारती’च्या वेबसाइटवर वाचकांना मिळतील. त्यामुळे हा अमूल्य खजिना नव्या स्वरूपात वाचायला मिळणार आहे.

पाठ्यपुस्तकाबरोबर इतर पूरक साहित्य विद्यार्थ्यांना उपलब्ध व्हावे म्हणून पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जयंतीच्या दिवशी म्हणजे १४ नोव्हेंबर १९७१ रोजी बालभारतीने ८ ते १४ वर्षे वयोगटातील मुलांसाठी ‘किशोर’ हे मासिक सुरू केले होते. सध्या किशोर मासिकाचा खप हा महिन्याला ६५ हजार प्रती एवढा आहे. ‘किशोर’ने मागील अनेक पिढ्यांवर वाचनाचे, ज्ञान-विज्ञानाचे आणि मूल्यांचे संस्कार केले आहेत. अनेक कवी, लेखक, चित्रकार आणि विविध क्षेत्रांत उत्तम काम करणारी मंडळी या मासिकाने घडवली आहेत. हा सर्व अमूल्य ठेवा जुन्या आणि नवीन पिढीसाठी उपलब्ध व्हावा म्हणून ‘बालभारती’ने सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त आजपर्यंतचे सर्व किशोर अंक डिजिटलाइज करण्याचा निर्णय घेतला. बालभारतीच्या www.ebalbharati.in या वेबसाइटवर विनामूल्य उपलब्ध होणार आहेत.

किशोर अंकांच्या डिजिटायझेशनचे हे काम बुकगंगाचे संचालक मंदार जोगळेकर कुठलाही मोबदला न घेता करीत असल्याची माहिती मासिकाचे संपादक किरण केंद्रे यांनी दिली आहे. ‘बालभारती’चे संचालक डॉ. सुनील मगर यांच्या कल्पनेतून हा प्रकल्प आकारास येत आहे. केंद्रे म्हणाले, ‘गेल्या ४६ वर्षांत किशोर मासिकाने अनेक पिढ्यांवर वाचनाचे, ज्ञान-विज्ञानाचे व मूल्यांचे संस्कार केले आहेत. अनेक नामवंत लेखक, कवी, चित्रकार यांनी किशोरसाठी योगदान दिले आहे. जुन्या अंकांची वाचकांकडून सातत्याने मागणी होत होती. डिजिटायझेशनच्या निमित्ताने हा सर्व दुर्मिळ खजिना ऑनलाइन विनामूल्य उपलब्ध होणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

खुनाच्या गुन्ह्यातील आरोपींचे पलायन

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

खुनाच्या गुन्ह्यात अटक केलेल्या आरोपींनी खडकी पोलिस ठाण्याच्या कोठडीतून पलायन केल्याची घटना रविवारी पहाटे घडली. या प्रकरणी खडकी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सिराज कुरेशी (वय ४०, रा. सुरती मोहल्ला), सनी विजय अ‍ॅँडी (वय २५, रा. आनंद पार्क धानोरी रोड, विश्रांतवाडी ) अशी पळून गेलेल्यांची नावे आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खडकी परिसरातील तरुण योगीराज खंडाळे याचा ३१ मार्च रोजी पूर्ववैमनस्यातून १२ जणांनी तलवार, कोयता व चॉपरच्या साह्याने खून केला होता. या प्रकरणी सात जणांना अटक करण्यात आली होती, तर सहा अल्पवयीन मुलांना ताब्यात घेण्यात आले होते. अटक केलेल्या आरोपींना कोर्टाने १० एप्रिलपर्यंत पोलिस कोठडी सुनावली होती. सातही आरोपींना खडकी पोलिसांनी कोठडीत ठेवले होते. यातील कुरेशी व अँडी याला तपासकामी बाहेर नेलेले असल्याने त्याला रात्री आल्यानंतर कोठडीच्या बाहेरील मोकळ्या पॅसेजमध्ये ठेवण्यात आले होते. सिराज कुरेशी याला जुलाब होत असल्याने त्यालाही या पॅसेजमध्ये ठेवण्यात आले होते. त्या वेळी कोठडीवर ठेवण्यात आलेले गार्ड पोलिस कर्मचारी काही वेळ आराम करण्यासाठी गेले.

पहाटे साडेतीनच्या सुमारास पोलिस कर्मचाऱ्यांनी कोठडीची पाहणी केली. त्या वेळी कुरेशी आणि अँडी हे दोघेही त्यांना दिसले नाहीत. त्या वेळी त्यांना पॅसेजमधील शौचालयाशेजारी असलेल्या लोखंडी ग्रिलचा गज कापलेला व तारेची जाळी उचकटलेली दिसली. ही माहिती समजातच या दोघांना शोधण्यासाठी खडकी पोलिसांची पथके पाठविण्यात आली. त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे, असे पोलिसांनी सांगितले.

लोहियानगरमध्ये दोन गटांत मारामारी

लोहियानगर येथील शिवराय चौकात पूर्ववैमनस्यातून दोन गटांमध्ये जोरदार मारामारी झाल्याची घटना शुक्रवारी रात्री घडली. या प्रकरणी परस्परविरोधी तक्रारी देण्यात आल्या असून चौघांना अटक करण्यात आली आहे.

याबाबत आकाश कोळी (लोहियानगर) याने दिलेल्या तक्रारीवरून सात जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर, निखिल थोरात (वय २०, रा. लोहियानगर) याने दिलेल्या तक्रारीवरून सात जणांवर गुन्हा दाखल करून चौघांना अटक केली आहे. दोन गटांतील भांडणात कोयता, गावठी पिस्तुलाचा धाक दाखविण्यात आला. या भांडणामुळे परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले होते. या प्रकरणी खडक पोलिस अधिक तपास करत आहेत.

कार्यालयाची तोडफोडप्रकरणी गुन्हा

मार्केट यार्डातील महाफार्म्स् महाप्रॉड्युसर्स कंपनीच्या कार्यालयाची तोडफोड केल्याप्रकरणी युवक काँग्रेसच्या आठ ते नऊ जणांवर स्वारगेट पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत कुणाल बसेट (वय २४, रा. गांजवे चौक, नवी पेठ) यांनी तक्रार दिली आहे. त्यावरून हनुमंत पवार व इतरांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उस्मानाबाद येथील शेतकऱ्यांची तूर खरेदी करून पन्नास लाख रुपये थकवल्याचा आरोप करून युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी शनिवारी मार्केट यार्डातील महाफार्म्स् महाप्रॉड्युसर्स कंपनीच्या कार्यालयात गोंधळ घातला. कंपनीच्या कार्यालयातील खुर्च्यांची तोडफोड करून कर्मचाऱ्यांना धक्काबुक्की केली. शासनाच्या मालमत्तेचे नुकसान केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी स्वारगेट पोलिस तपास करीत आहेत.

आमिष दाखवून फसवणूक

आंबेजोगाई बायपास रोडवरील पेट्रोल पंपाची डीलरशिप देतो म्हणून एक लाख साठ हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी सहकारनगर पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत कैलास कांबळे (वय ३९, रा. धनकवडी) यांनी तक्रार दिली आहे. त्यावरून श्रीकांत शिर्के यांनी तक्रार दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कांबळे यांनी श्रीकांत शिर्के याने बीड जिल्ह्यातील आंबेजोगाई बायपास येथे पेट्रोलची डीलरशिप देतो असे सांगून पैसे मागितले. त्यानंतर त्यांच्याकडून एक लाख ६० हजार रुपये घेतले. त्यानंतर त्यांना कोणतीही डिलरशीप मिळवून दिली नाही. त्यांचे पैसेही परत दिले नाहीत. त्यामुळे फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी सहकारनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला.

रेल्वेत दरोड्याच्या तयारीतील टोळी अटक

पुणे रेल्वे स्थानकाच्या घोरपडी यार्ड येथे एका एक्स्प्रेसवर सशस्त्र दरोड्याच्या तयारीत असणाऱ्या चौघांना लोहमार्ग पोलिसांनी अटक केली. त्यांचा एक साथीदार अंधाराचा फायदा घेऊन पळून गेला आहे. त्यांच्याकडून पोलिसांनी लोखंडी विळ्यासारखे हत्यार, लोखंडी कटावणी मिरची पूड, जप्त केली आहेत.

दीपक रमेश गोसावी (वय १९, रा. वाघारी ता. जामनेर जि. जळगाव), नागेश रामप्पा बंडगर (वय ३०, रा. हडके चाळ लोणी काळभोर), आकाश आंधळे (वय १९, रा. जवळका ता. सिंदखेड जि. बुलढाणा), किरण दिलीप कणसे (वय १९, रा. जिये कटापूर ता. कोरेगाव जि. सातारा) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. तर, त्यांचा साथीदार अब्दुल हा अंधाराचा फायदा घेऊन पळून गेला आहे.

लोहमार्ग पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक संजय सातव यांच्या पथकाला दरोड्याच्या तयारीत असलेल्या आरोपींची माहिती मिळाली. त्यानुसार सहायक निरीक्षक मंगेश जगताप यांच्या पथकाने सापळा रचून ही कारवाई केली. यातील नागेश बंडगर हा पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याच्यावर पुणे रेल्वे स्थानक पोलिस ठाण्यात तीन व बंडगार्डन पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल आहे.

लाच घेताना पकडले

हडपसर पोलिस ठाण्याच्या हवालदाराला कार अपघाताच्या नोंदीचा जबाब व स्टेशन डायरीच्या नोंदींचा उतारा देण्यासाठी दीड हजार रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडण्यात आले. या प्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यानुसार हडपसर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

रमेश जनार्दन काळे (वय ५०, रा. माळवाडी, हडपसर) असे अटक केलेल्याचे हवालदाराचे नाव आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार हे कारचालक आहेत. त्यांच्या कारचा अपघात झाला होता. या अपघाताच्या नोंदीचे जबाब व स्टेशन डायरीच्या नोंदीचा उतारा देण्यासाठी त्यांना रमेश काळे याने दीड हजारांची लाच मागितली. त्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने तक्रारीची पडताळणी केली. त्या वेळी त्याने लाच मागितल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून काळे याला तक्रारदाराकडून लाच लाच स्वीकारताना हडपसर पोलिस ठाण्यात रंगेहात पकडले.

रात्री घरी जाणाऱ्यांना लुटले

रात्री कामावरून घरी जाणाऱ्यांना रस्त्यात अडवून लुटण्याच्या घटना सुरूच आहेत. कोथरूड येथे शुक्रवारी पहाटे व बिबवेवाडीत रात्री साडेअकराला दुचाकीवरून आलेल्या चोरांनी घरी जाणाऱ्यांना लुटले. या प्रकरणी अलंकार व बिबवेवाडी पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

याबाबत नितीन गायकवाड (वय २७) यांनी तक्रार दिली आहे. त्यानुसार बिबवेवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गायकवाड हे बिबवेवाडीतील पवनानगर परिसरातून शुक्रवारी रात्री साडेअकराच्या सुमारास जात होते. त्या वेळी चोरांनी गायकवाड यांना अडविले. त्यांच्या खिशातील रोख वीस हजार रुपये आणि मोबाइल असा एकूण २१ हजार रुपयांचा माल जबरदस्तीने हिसकावून नेला.

कोथरूड येथील प्रशांत दाते (वय ५४) यांनी दिलेल्या तक्रारीवरून चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दाते हे कामावरून शुक्रवारी पहाटे दीडच्या सुमारास घरी निघाले होते. त्या वेळी कॅनॉल रोडवरील गोसावी वस्ती येथे चार अनोखळी व्यक्तींनी त्यांना अडविले. त्यांना कोयत्याचा धाक दाखवून त्याच्याकडून रोख बाराशे, मोबाइल असा ५८ हजारांचा ऐवज चोरून नेला. या प्रकरणी अलंकार पोलिस तपास करत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

एटीएम पुन्हा ‘कॅशलेस’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

एटीएममध्ये पैसे नसण्याची समस्या अजूनही सुटलेली नाही. रविवारीही बहुसंख्य पुणेकरांना एटीएममधून रिकाम्या हातानेच परतावे लागले. तर, सुरू असलेल्या एटीएमबाहेर थोड्या फार प्रमाणात रांगा लागल्याचेही चित्र होते.

एप्रिल महिन्याच्या सुरुवातीपासूनच एटीएमचे अर्थकारण बिघडलेले आहे. बहुसंख्य एटीएम पैशाविना बंद आहेत. तर, अनेक एटीएममधील रोकड काही वेळातच संपुष्टात येत आहे. काही एटीएममध्ये फक्त दोन हजार रुपयांच्या तर काही एटीएममध्ये फक्त १०० रुपयांच्याच नोटा उपलब्ध आहेत. बंद असलेल्या एटीएममध्ये खासगी बँकांच्या एटीएमची संख्या लक्षणीय आहे. आपले खाते असलेल्या बँकेचे एटीएम बंद असल्याने खातेदार त्रस्त झाले आहेत. अशा खातेदारांना दुसऱ्या बँकेचे कार्यान्वित एटीएम शोधावे लागत आहे. त्यातही इतर बँकांच्या एटीएममध्ये मर्यादेपेक्षा अधिक व्यवहार केल्यास अधिक शुल्क भरावे लागणार असल्यानेही खातेदार अडचणीत सापडले आहेत. त्यातच रविवारी बँकांना साप्ताहिक सुटी असल्याने खातेदारांच्या अडचणीत वाढ झाली.

दरम्यान, एटीएममध्ये सध्या कोऱ्या किंवा अगदी नव्यासारख्या नोटाच भराव्या लागतात. या नोटांची काही प्रमाणात कमतरता असल्याने एटीएम बंद ठेवावी लागत आहेत, असे सूत्रांनी सांगितले. मात्र, सोमवारी दुपारपर्यंत एटीएममध्ये रोकड उपलब्ध होण्याची शक्यता आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ज्येष्ठांच्या पेन्शनचे झाले काय?

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

राष्ट्रवादी काँग्रेसकडून सत्तेच्या काळात घोषणा केलेल्या ज्येष्ठ नागरिकांसाठी पेन्शन योजनेचे काय झाले, असा सवाल ज्येष्ठ नागरिक माननीयांना विचारू लागले आहेत. शहरभरातून तब्बल २० हजार ज्येष्ठ नागरिकांनी हे अर्ज भरून दिले आहेत. पालिकेच्या नागरवस्ती विकास योजना विभागात या अर्जांचे गठ्ठे धूळखात पडले असून त्याबाबत काय निर्णय होणार अशी विचारणाही ज्येष्ठ नागरिकांकडून होत आहे.

ज्येष्ठ नागरिकांना प्रतिमहिना एक हजार रुपयांची मदत व्हावी, यासाठी ही योजना जाहीर करण्यात आली होती. स्थायी समितीच्या माजी अध्यक्षा अश्विनी कदम यांनी २०१६-१७ च्या बजेटमध्ये महिला, ज्येष्ठ नागरिक, मुलांसाठी विविध योजना मांडल्या. कदम यांनी ज्येष्ठ नागरिकांसाठी पेन्शन योजना, विकलांग मुलांसाठी अर्थसाह्य योजना आणि महिला सक्षमीकरणासाठी विविध योजना जाहीर केल्या होत्या.

त्यानंतर प्रत्येक नगरसेवकांच्या कार्यालयात ज्येष्ठ नागरिकांनी गर्दी करून पेन्शन योजनेसाठी अर्जही भरून दिले आहेत. नगरसेवकांनी त्यांच्या कार्यालयात साचलेले गठ्ठे नागरवस्ती विकास योजना विभागात आणून दिले असले, तरी त्याचे पुढे नक्की काय करायचे, असा प्रश्न पालिका प्रशासनाला पडला आहे.

ज्येष्ठ नागरिक नगरसेवकांच्या कार्यालयात जाऊन त्या अर्जांचे काय झाले, याची विचारणा करत आहेत. नागरवस्ती कार्यालयात पुरसे मनुष्यबळ नसल्याने या अर्जांची माहिती अपडेट करणे, ज्येष्ठ नागरिकांचे नाव, पत्ता, वय याची खातरजमा करणे, त्यांच्याकडून कागदपत्रे जमा करून घेणे ही कामे होत नाहीत. आचारसंहिता जाहीर होईपर्यंत या योजनेचे अर्ज स्वीकारण्याचे धोरण प्रशासनाने ​स्वीकारले होते. त्यानुसार अर्ज दाखल झाले आहेत. मात्र, या अर्जांची छानणी करून त्यावर निर्णय घेणे अपेक्षित आहे. पालिका आयुक्तांनी आपल्या बजेटमध्ये या योजनेसाठी आर्थिक तरतूद केलेली आहे.

महिला बालकल्याण समितीतमध्ये मी आहे. हा विषय या समितीच्या अखत्यारित येत आहे. प्रशासनाने अर्ज भरून घेतले आहेत. मात्र, त्यावर कुठलीही कार्यवाही झालेली नाही. मुख्य सभेत हा विषय मांडणार आहे. तसेच, महिला बालकल्याण समितीच्या बैठकीतही यावर चर्चा केली जाईल.

आश्विनी कदम, नगरसेविका

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images