Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

कमळावर जिंकले सतरा आयाराम

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
महापालिकेच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने इतर पक्षांतून आलेल्यांना उमेदवारी दिल्याचा आरोप होत असला, तरी पक्षाचे विद्यमान / ज्येष्ठ कार्यकर्ते आणि नव्या चेहऱ्यांनी एकूण जागांपैकी ८० टक्के जागा प्राप्त केल्या आहेत. तर, उर्वरित २० टक्के जागांवर (१७ जागा) इतर पक्षांतून ‘आयात’ केलेल्यांनी बाजी मारली आहे.
पुणे महापालिकेच्या निवडणुकीत भाजपला प्रथमच निर्विवाद बहुमत मिळाले. १६२ जागांपैकी ९८ जागा मिळवून भाजपने मुसंडी मारताना राष्ट्रवादीच्या कारभाऱ्यांना घरी पाठवले. निवडणूक जिंकण्यासाठी भाजपने अनेक गुंड प्रवृत्तीच्या व्यक्तींना पक्षात प्रवेश दिल्याचा आरोप केला जात होता. तसेच, भाजपकडे सक्षम पर्याय नसल्याने इतर पक्षांतील नगरसेवक-पदाधिकाऱ्यांना प्रवेश दिल्याची टीका केली गेली. निवडणुकीचा निकाल गुरुवारी जाहीर झाल्यानंतर भाजपच्या नवनिर्वाचित नगरसेवकांचे चित्र पुरेसे स्पष्ट झाले आहे. यामध्ये, पक्षाच्या अनुभवी (म्हणजे यापूर्वी किमान एक पूर्ण टर्म नगरसेवक असलेले) नगरसेवकांची संख्या साधारणतः २० टक्के आहे. भाजपचे गटनेते गणेश बीडकर यांचा अपवाद वगळता इतर सर्व विद्यमान नगरसेवक निवडून आले आहेत.
इतर पक्षांतून भाजपमध्ये प्रवेश दिलेल्या १७ जणांनी ‘कमळ’ चिन्हावर विजय प्राप्त केला आहे. यामध्येही, आठ विद्यमान नगरसेवकांना पुन्हा संधी मिळाली आहे. तर, उर्वरित लोकप्रतिनिधींमध्ये काही माजी नगरसेवक आणि काही पदाधिकाऱ्यांचा समावेश आहे. त्यामुळे, इतर पक्षांतून भाजपमध्ये येऊन निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींचे प्रमाण २० टक्क्यांपलीकडे नाही.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


नवीन कारखरेदी अन् आकर्षक कर्जयोजना

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
शनिवारची सुटी आणि हॅचबॅक, सेदान, कॉम्पॅक्ट सेदान, एसयूव्ही आदी श्रेणीतील विविध कंपन्यांच्या कार एकाच छताखाली परिवारासह पाहायची संधी... त्यातच स्पॉट बुकिंगवर मोठी सवलत, आकर्षक गिफ्ट्स आणि आकर्षक कर्जयोजनांची माहिती...असा दुग्धशर्करा योग शनिवारी ‘मटा ऑटो एक्स्पो’त जुळून आला. आज (रविवारी) हे प्रदर्शन सर्वांसाठी खुले असेल.
चारचाकी वाहन खरेदीचे सर्व पर्याय एका ठिकाणी उपलब्ध करून देण्यासाठी ‘महाराष्ट्र टाइम्स’तर्फे दोन दिवसीय ऑटो एक्स्पोचे आयोजन करण्यात आले आहे. या प्रदर्शनाचे उद्घाटन पुणे महापालिकेचे जनसंपर्क अधिकारी संजय मोरे यांच्या हस्ते झाले. मोरे यांच्याच हस्ते नुकतीच राष्ट्रीय स्तरावर सादर झालेली एक अत्याधुनिक कार पुण्यात पहिल्यांदाच या प्रदर्शनात सादर करण्यात आली. ही कार पाहण्यासाठीही गर्दी झाली होती.
या प्रदर्शनात विविध ब्रँडसच्या, विविध श्रेणीतल्या कार एकाच छताखाली मांडण्यात आल्या आहेत. शहरातील आघाडीचे कार वितरक या प्रदर्शनात सहभागी झाले आहेत. त्यांनी प्रदर्शनात कार बुक करणाऱ्या ग्राहकांसाठी खास गिफ्ट्स, आकर्षक सवलती आणि सुलभ कर्जयोजना सादर केल्या आहेत. तसेच टेस्ट ड्राइव्हचीही सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. शनिवारच्या सुटीची पर्वणी साधत अनेक पुणेकरांनी कुटुंबासह प्रदर्शनाला भेट देऊन आपल्या स्वप्नातल्या कारची निवड केली.
म्हात्रे पुलाजवळील डी. पी. रोडवरील सिद्धी गार्डन येथे भरलेले हे प्रदर्शन आज (रविवारी) सकाळी अकरा ते सायंकाळी सात या वेळेत सर्वांसाठी विनामूल्य खुले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कानमंत्र वाचनसंस्काराचा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

‘मुलांच्या भावविश्वाशी स्वतःला जोडायचे असेल, तर त्यांच्या विश्वात आपणही रमायला हवे आणि वाचनाचा संस्कार घरातूनच दिला, तरच नवीन पिढी वाचनाकडे वळते,’ असे सांगत अभिनेत्री मृणाल कुलकर्णी आणि विराजस कुलकर्णी या मायलेकांनी साहित्यविश्वाशी असलेले आपले दृढ नाते ‘मटा मैफल’च्या व्यासपीठावर उलगडले.

साहित्य, कला, संस्कृती रसिकांची उत्स्फूर्त दाद मिळविणाऱ्या ‘मटा मैफल’ला शनिवारी स. प. महाविद्यालयात उत्साहात सुरुवात झाली. घरातून झालेला वाचन संस्कार आयुष्याच्या वेगवेगळ्या टप्प्यावर कसा महत्त्वाचा आहे, याचा पट मृणाल आणि विराजस यांच्या गप्पांमधून उलगड गेला. मुले आपल्यापासून दुरावत जात असल्याची तक्रार करणाऱ्या पालकांना नव्या पिढीशी जवळीक साधण्याचा मार्ग पुस्तकांतून जात असल्याचा कानमंत्रही त्यांनी यावेळी दिला. ज्येष्ठ साहित्यिक गो. नी. दांडेकर यांच्यासारख्या आजोबांमुळे मिळालेली साहित्यिक पार्श्वभूमी, बालपणापासून उमगलेली साहित्याची अनुभूती आणि साहित्य संपन्नतेचे अभिनय क्षेत्रात उमटलेले सकारात्मक पडसाद अशा विविध मुद्द्यांवर ‘मटा मैफल’चा गप्पांचा कार्यक्रम उत्तरोत्तर रंगत गेला.

‘मटा मैफल’मध्ये आज

आज, रविवारी दिवसभर ‘मटा मैफल’ रंगणार आहे. स. प. महाविद्यालयातील रमाबाई सभागृहात, कवी कट्ट्यावर आणि वर्गखोल्यांत विविध कार्यक्रम होणार आहेत. सकाळी दहा वाजता वाचन संस्कृतीवर परिसंवाद होणार असून, त्यात ज्येष्ठ साहित्यिक भारत सासणे, डॉ. सदानंद बोरसे, डॉ. अश्विनी धोंगडे आणि मनोहर सोनवणे त्यात सहभागी होणार आहेत. सायंकाळी साडेपाच वाजता माध्यमांच्या भाषेवरील परिसंवादात अभिनेते गिरीश कुलकर्णी, समीरण वाळवेकर, विश्राम ढोले, सुनीला गोंधळेकर सहभागी होणार आहेत. दुपारी हिमांशू कुलकर्णी आणि प्रदीप निफाडकर कवितेचे रंग उलगडून दाखविणार आहेत. सायंकाळी सात वाजता आशुतोष जावडेकर ‘चेंजिंग प्रेम’ सादर करणार आहेत. सर्व कार्यक्रम सर्वांसाठी खुले आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मुलांची वाचनआवड जाणून घ्या

$
0
0

मोकळ्या चर्चेतून संवाद वाढेल, चळवळ विस्तारेल; मृणाल यांचा कानमंत्र

म. टा. प्रतिनिधी, पुणे

‘पालक आणि मुलांना जोडणारा दुवा म्हणजे वाचन. मुलांना पुस्तकांपर्यंत पोहोचविण्याची जबाबदारी पालकांची आहे, त्यांना वाचायला काय आवडते, हे जाणून घ्या, मोकळेपणाने चर्चा करा, यातून पालकांपासून दुरावलेली मुले सहज त्यांच्या जवळ येतील. कौटुंबिक संवाद वाढेल आणि वाचन चळवळही विस्तारेल,’ अशा शब्दांत प्रसिद्ध अभिनेत्री मृणाल कुलकर्णी यांनी वाचन चळवळ कशी वाढवावी, याचा कानमंत्रच शनिवारी दिला.
आजोबा, आई आणि वडिलांकडून लहानपणापासून झालेल्या वाचनसंस्कारांचा आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर कसा उपयोग झाला, वाचनातून समृद्ध झालेल्या भावविश्वाचा प्रवास त्यांनी ‘मटा मैफल’च्या निमित्ताने पुणेकरांसमोर उलगडला. ‘महाराष्ट्र टाइम्स’ च्या वतीने सर परशुरामभाऊ कॉलेजच्या आवारात आयोजित करण्यात आलेल्या ‘मटा मैफल’ या साहित्य सोहळ्याचे उद़्घाटन ज्येष्ठ लेखिका डॉ. वीणा देव, मृणाल कुलकर्णी आणि विराजस कुलकर्णी यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी स. प. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. दिलीप शेठ, 'महाराष्ट्र टाइम्स'च्या पुणे आवृत्तीचे निवासी संपादक पराग करंदीकर उपस्थित होते. तत्पूर्वी शरयू दाते हिने ‘विश्वाचे आर्त’ हा संत ज्ञानेश्वर महाराजांचा अभंग व ‘मी राधिका’ या गीताने रसिकांना मंत्रमुग्ध केले.
औपचारिक उद़्घाटन सत्रानंतर ‘मटा’चे विशेष प्रतिनिधी अभिजित थिटे यांनी मृणाल आणि विराजस कुलकर्णी यांच्याशी मारलेल्या गप्पांमधून आई-मुलाचे अनोखे नाते उलडले. लहानपणापासून साहित्याशी जुळलेल्या अनोख्या ऋणानुबंधाचे किस्से मृणाल यांनी या वेळी सांगितले. ‘माझ्या आयुष्यात साहित्याचा वाटा सर्वांत मोठा आहे. आजोबा गो. नी. दांडेकर आणि आई-वडिलांनी माझ्यावर केलेल्या वाचनाच्या संस्कारांमुळे मला त्यांच्याबद्दल अभिमान आहे. विराजसच्या संगोपन करतानाही मी हाच वारसा पुढे नेण्याचा प्रयत्न केला. त्याचा त्याला आज खूप फायदा होतो आहे,’ मृणाल सांगत होत्या.
‘भाषा हा संस्कार आहे, आपली मातृभाषा, राष्ट्रभाषा आणि जागतिक भाषेवर प्रभृत्व मिळविणे ही काळाची गरज आहे. टीव्हीवरील मालिकांमधून मुलांना भाषा शिकता येणार नाही. पालकांनी मुलांना साहित्याची ओळख करून देणे आवश्यक आहे. अर्थातच यासाठी पालकांनी पहिल्यांदा वाचन केले पाहिजे. मुलांच्या आवडी निवडी समजून घ्या, चर्चा करा नकळत संवाद वाढीस लागेल. अलीकडे मुले पालकांपासून दुरावत असल्याचे सातत्याने सांगितले जाते. वाचन हे पालक आणि मुलांना जोडणारा दुवा आहे,’ असा सल्ला मृणाल यांनी दिला.
‘मुलांनी काय वाचावे हे सांगतानाच, मुले जे वाचतात ते साहित्यही आवडीने वाचायचा प्रयत्न करा,’ असे मृणाल यांनी आवर्जून सांगितले. गो. नी. दांडेकर यांनी लिहिलेल्या कादंबऱ्यांचे अभिवाचन करताना आलेले अनुभवही, नव्याने रंगमंचावर दिग्दर्शक, लेखक म्हणून पदार्पण केलेल्या विराजस बरोबर काम करताना आलेल्या काही किस्से त्यांनी या वेळी शेअर केले. ‘ऐतिहासिक परंपरा असलेल्या एस. पी. कॉलेजने गेल्या शंभर वर्षांच्या प्रवासात अनेक कुटुंबे घडविली आहेत. कॉलेज विद्यार्थीनी आजही कॉलेजशी ऋणानुबंध जोडलेले आहे. मटा मैफलच्या निमित्ताने वीणा देव, मृणाल आणि विराजस कुलकर्णी या तीन पिढ्या पुन्हा एकदा कॉलेजमध्ये एकत्र आल्या आहेत,’ अशी भावना शेठ यांनी व्यक्त केली. सिद्धार्थ केळकर यांनी सूत्रसंचालन केले.

अलीकडे तरुण पिढी सोशल नेटवर्किंग साइटवरून, विविध माध्यमातून व्यक्त होत आहे. त्यांचे कौतुक झाले पाहिजे, त्यांना प्रोत्साहन देणे ही आपली सामाजिक जबाबदारी आहे. त्यांच्या या लिखाणातूनच नवीन लेखक पुढे येत राहतील.
मृणाल कुलकर्णी


‘माध्यम नव्हे वाचन महत्त्वाचे’
विराजस यानेही वाचन संस्कृतीचे महत्त्व अधोरेखित केले. प्रत्येक माणसाला आवडणारे वाचनाचे विषय भिन्न असू शकतात, पण त्याने सुरुवात करणे महत्त्वाचे असते. एकदा वाचनाला सुरुवात झाली की, अनेक दालने त्याला खुली होतात. या संस्काराला प्रोत्साहन देण्यासाठी पुस्तक हे पारंपरिक माध्यमच असायला हवे, असा नियम नाही. सोशल नेटवर्किंग साइट, ऑनलाइन पुस्तके या माध्यमांतून वाचनाला प्रोत्साहन मिळाले तर त्यात काहीच गैर नाही, असे मत विराजसने व्यक्त केले. घरात मराठी साहित्याची मोठी परंपरा असूनही हेच वाचले पाहिजे, अशी सक्ती कधी झाली नाही. हेही वाच असे सांगतिले गेले. त्यातूनच मी इंग्रजी साहित्याकडे वळालो. वाचनातून संस्कार झाल्यामुळेच इंग्रजी व हिंदी भाषेमध्ये नाटक करू शकतो. भाषेचा अडसर येत नाही, याकडे विराजसने लक्ष वेधले.

‘मैफल अशीच रंगावी’

मी वयाच्या सहाव्या वर्षापासून ‘मटा’ वाचते आहे. ‘मटा’ वाचलाच पाहिजे, अशी अप्पांची म्हणजेच गो. नी. दांडेकर यांनी सक्ती होती. तो ऋणानुबंध आजही कायम आहे. मटाने आयोजित केलेली ही मैफल वर्षानुवर्षे रंगत जायला हवी. तरुण पिढीला मराठी भाषेकडे वळविण्यासाठी प्रयत्न झाले पाहिजेत. त्यांना मराठी भाषेचा अभिमान वाटला पाहिजे, असे मत डॉ. वीणा देव यांनी व्यक्त केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वैचारिक खाद्य देणारी मैफल!

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

साहित्य संमेलने तर उदंड होतात, पण एक संमेलन वेगळे असते. ती असते शब्दांची मैफल. व्यासपीठावरून बोलणाऱ्याला अभिव्यक्त करता करता व्यासपीठासमोर बसणाऱ्यांची अभिरूची वाढवून त्यांना अभिव्यक्त करणारी...अशी ही शब्द-विचारांची मैफल अर्थात 'मटा मैफल'. ती रंगते तेव्हा संवादाचे साहित्य संमेलन सुरू होते. शब्दांनी, विचारांनी, संवादाने संपन्न करणारे संमेलन...असेच संमेलन शनिवारी 'मटा मैफली'च्या निमित्ताने सुरू झाले. अभिरूची वाढविणारे, अभिव्यक्त करणारे व विचारांचे खाद्य पुरवत संपन्न करणारे हे संमेलन अभिव्यक्त होऊ पाहणाऱ्या प्रत्येकासाठी आणि ती अभिव्यक्ती जाणून घेणाऱ्या प्रत्येकासाठी पर्वणीच. या पुढील दोन दिवस हे असेच संपन्नतेचे असतील.
शताब्दी साजरा केलेल्या स. प. महाविद्यालयाच्या प्रवेशद्वारातून प्रवेश करताच ऐतिहासिक इमारत भारावून टाकते. हा परिसर जर दिव्यांनी, शब्दफुलांच्या तोरणांनी, शिल्पाकृतींनी, पुस्तक आणि विचारांनी सजला असेल तर भारावून जाण्याची अनुभूती वाढतेच. ‘मटा मैफल’च्या निमित्ताने हाच अनुभव रसिकांनी शनिवारी साठवून घेतला.
प्रवेशद्वारापाशी दिव्यांची सजावट, शब्दफुलांचे तोरण, शिल्पाकृती, पुस्तके, रोषणाईने झळाळून निघालेले ज्ञानवृक्ष, असे भारावून टाकणारे वातावरण...सभागृहात विचारांची, साहित्याची मेजवानी...रसिकांची मांदियाळी, माय मराठीसाठी सजलेला हा सोहळा म्हणजे ‘मटा मैफल’. ‘महाराष्ट्र टाइम्स’ आयोजित या उपक्रमाला शनिवारी स.प. महाविद्यालयात उत्साहात सुरुवात झाली. ‘मटा मैफल’चे यंदाचे तिसरे वर्ष. २७ फेब्रुवारी या मराठी राजभाषा दिनाच्या निमित्ताने सजणारी ही मैफल यंदाही तोच उत्साह घेऊन दाखल झाली आहे.
दिव्यांनी रसिकांचे प्रवेशद्वारापाशीच स्वागत होत होते. शब्दफुलांची तोरणे आणि प्रसिद्ध शिल्पकार विवेक खटावकर यांचे खुले दालन आणि दालनातील विविध शिल्पे रसिकांचे लक्ष वेधून घेत होती. उपस्थित तरुण रसिकांनी सेल्फी घेण्याची ही संधी दडवली नाहीच. विविध कार्यक्रमांतून एक रम्य सायंकाळ साहित्य रसिकांनी अनुभवली.
साहित्य, कला, संस्कृती अशा मिलाफातून ही मैफल पुढील दोन दिवस भरगच्च कार्यक्रमातून रंगणार आहे. साहित्यिक कार्यक्रम, कवी कट्टा, परिसंवादाबरोबरच अभिवाचन, कविता वाचनासह विविध उपक्रम यामध्ये असतील. कार्यक्रम सर्वांसाठी खुले असून, वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या या साहित्यसोहळ्यात सभागृहाचे व्यासपीठ, कविकट्टा व भारावून टाकणार येथील सारा परिसर रसिकांची वाट पाहात आहेच.
...........
‘मटा मैफल’मध्ये आज

स. १० : परिसंवाद : काय वाचावे, कसे वाचावे

भारत सासणे, डॉ. सदानंद बोरसे, अश्विनी धोंगडे, मनोहर सोनवणे,

स. ११.३० ते १ : काव्यप्रवास : हिमांशू कुलकर्णी

दु. १ ते संध्या. ५ : कवीकट्टा

संध्या ५ ते ६ : कवितेचे रंग अनेक : प्रदीप निफाडकर

संध्या. ५.३० : परिसंवाद : माध्यमांची बदलती भाषा

गिरीश कुलकर्णी, समीरण वाळवेकर, सुनीला गोंधळेकर, विश्राम ढोले, गिरीश कुलकर्णी

संध्या. ७ : चेंजिंग प्रेम : सादरकर्ते आशुतोष जावडेकर

कार्यशाळा

स. ११ ते दु. १२ : गझल : संगीता जोशी

दु. १२.३० ते १.३० : स्क्रीप्ट लेखन : अभिजित पेंढारकर

दु. २ ते ३ : भाषा कार्यशाळा : प्रा. रेखा इनामदार-साने

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

​ अनुभवले ‘माँटुकले’ दिवस

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

निरागस भावविश्वाचे… अर्थातच पालक आणि मुलांचे नाते, लहान मुलांचे भावविश्व आणि त्यांनाही व्यक्त होण्यासाठी हवी असणारी जागा, खेळाशी जडलेले त्यांचे बंध, कुठलाही वाद किंवा भांडण मिटवण्याची उपजत समज, पटकन मैत्री करण्याची हातोटी अशा विविध संदेशांची गुंफण करत सादर झालेल्या ‘माँटुकले दिवस’ या अभिवाचनाने उपस्थितांना आठवणींमध्ये रमवत नकळत हळूवार दिवसांची सफर घडवली. ‘महाराष्ट्र टाइम्स’ आयोजित ‘मैफल’ या आगळ्या-वेगळ्या उपक्रमाच्या पहिल्या दिवसाची सांगता ‘स्वतःत दडलेले खोडकर, खेळकर आणि निरागस मूल शोधा आणि आनंदाने जगा’ असा संदेश देऊन झाली.
अभिवाचनाच्या या कट्ट्यावर चिन्मय संत, श्रुती अत्रे, चिन्मय पटवर्धन, भक्ती मेढेकर आणि निनाद गोरे या ‘कला मोहल्ला’च्या तरुणांनी अतिशय खुमासदार शैलीत माँटूच्या गोष्टींतून हा संदेश दिला. मनोविकास प्रकाशनतर्फे प्रकाशित ‘माँटुकले दिवस’ पुस्तकातील कथांनी उपस्थित प्रत्येकाला स्वतःचे आनंदाचे क्षण पुन्हा आठवण्याची जाणीवही दिली. लेखन संदेश कुलकर्णी तर, दिग्दर्शन नितीश पाटणकर यांचे आहे. युवकांच्या या तितक्याच उत्स्फूर्त सादरीकरणाला प्रत्येक अभिवाचनानंतर उपस्थितांनी टाळ्यांच्या गजरात दाद दिली.‘माँटू’च्या निरागस भावविश्वाशी जोडलेले मानवी मनाचे धागे या अभिवाचनाचा केंद्रबिंदू होते.
‘यडोशा’, ‘आउट ऑफ बॉक्स थिंकिंग’, ‘एंट्री अँड एक्झिट’, ‘फ्रेंडस्’, ‘शाम के पाँच’, ‘वाढदिवस’, ‘हसरा चेहरा’, ‘नवी खिडकी’, ‘सदय एक्स्प्रेस’, ‘अहं ब्रह्मास्मि’ आणि ‘झेन गुरू’ अशा अकरा कथांच्या सादरीकरणातून मानवी भावभावनांची सुंदर गुंफण सादर करण्यात आली. अभिवाचनाचा हा तिसरा प्रयोग ‘मटा’ मैफल या व्यासपीठावर सादर करण्याची संधी मिळणे हे कलावंत म्हणून एक प्रोत्साहन होते. ‘मटा’ हे युवकांचे हक्काचे व्यासपीठ आहे आणि त्यामुळेच हे सादरीकरण करताना छान वाटल्याची भावना या कलावंतांनी व्यक्त केली. आदित्य भगत याने कलाकारांचा परिचय करून दिला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

हरहुन्नरी कलाकारांना फेलोशिपची शाबासकी

$
0
0

तेंडुलकर-दुबे स्मृती पुरस्काराचे आज वितरण

म. टा. प्रतिनिधी, पुणे

समाजात आजूबाजूला घडणाऱ्या घटनांचे चित्र समाजाला नाटकांमधून दाखवण्याचा मानस असून, त्याद्वारे जनजागृती करण्यावर भर देणार आहे. प्रायोगिक नाटकांच्या चळवळीला अधिक उभारी द्यायची आहे, तसेच ग्रामीण भागात रंगभूमीचा प्रसार करण्यावर भर देणार असल्याचा निर्धार फॉयजा जलाली, भारवी, आशिष पाठोडे, अजित सिंग पालावत आणि शीना खालिद यांनी व्यक्त केला आहे. या तरुण कलाकारांना आज (२६ फेब्रुवारी) तेंडुलकर- दुबे स्मृती पुरस्काराने (विनोद दोशी फेलोशिप) सन्मानित करण्यात येणार आहे.
रंगभूमीच्या प्रसारासाठीचे कार्य लक्षात घेऊन त्यांना एक लाख रुपयांचा पुरस्कार देऊन गौरविले जाणार आहे. देशात घडणाऱ्या घटनांविषयी समाजामध्ये जनजागृती करण्याचा या कलाकारांचा प्रयत्न आहे. त्याविषयी ‘मटा’ने त्यांची भावना जाणून घेतली. ‘तेंडुलकर –दुबे पुरस्कारासारखा प्रतिष्ठेचा पुरस्कार मला कधी प्राप्त होईल, असा विचारही केला नव्हता. तो जाहीर झाल्यानंतर आपण अनेक दिवसांपासून करत असलेल्या कामाची कोणीतरी दखल घेत आहे, याची खात्री झाली. या पुरस्कारामुळे आणखी हुरूप आला असून, देशातील प्रायोगिक नाटकांची चळवळ वाढवायची आहे. त्यासाठी समाजमनाचा वेध घेण्यासाठी उत्सुक असल्याचे,’ अभिनेत्री आ​णि दिग्दर्शिका फॉयजा जलाली हीने सांगितले. अभिनेता आशिष पाठोडे म्हणाला की, ‘रंगभूमीची अवस्था सुधारण्यावर माझा अधिक भर असणार आहे. एकपात्री प्रयोगांची सध्या संख्या घटत चालली आहे. त्यासाठी अधिकाधिक एकपात्री प्रयोग करून या नाट्यप्रकाराला पुन्हा एकदा मानाचे स्थान मिळवून देण्याचा माझा प्रयत्न असेल. ग्रामीण भागामध्ये नाट्यचळवळ वाढावी, यासाठी अधिकाधिक प्रयोग ग्रामीण भागात करण्यावर भर राहील.’
‘गेल्या १६ वर्षांपासून रंगभूमीची सेवा करीत आहे. भारतात ज्या ज्या ठिकाणी नाटकांचे महोत्सव आयोजित केले जातात, त्या ठिकाणी नाटके पाहण्याचा आणि सादर करण्यावर माझा भर असतो. देशातील इतर प्रदेशांमध्ये रंगभूमीचा विकास कशापद्धतीने होत आहे, या उत्सुकतेपोटीच मी देशभर फिरत राहतो. भारतीय प्रायोगिक रंगभूमी विकसीत करण्यावर माझा भर असणार आहे,’ असे बेंगळुरू येथील कलाकार भारवी याने सांगितले. तेंडुलकर-दुबे पुरस्कारासारखे सन्मान मिळतात, तेव्हा जबाबदारी वाढते आणि आणखी झोकून काम करण्याची ऊर्जा मिळते, प्रायोगिक नाटकाचा विकास होणे गरजेचे असून, त्यासाठी नाट्यसंस्थांनी पुढाकार घेणे आवश्यक आहे. सध्या अभिषेक मजुमदार, मोहित टाकळकर या प्रायोगिक चळवळींमध्ये काम करणाऱ्या कलाकारांबरोबर काम करणार आहे, असे अजितसिंग पालावत यांनी सांगितले. ‘
ज्येष्ठ समीक्षक आणि नाट्य अभ्यासक श्रीमती पुष्पा भावे यांच्या हस्ते आज, रविवारी (२६ फेब्रुवारी) या पुरस्कारांचे वितरण करण्यात येणार आहे.

अनेक दिवसांपासून करत असलेल्या कामाची कोणीतरी दखल घेत आहे, याची खात्री झाली. या पुरस्कारामुळे आणखी हुरूप आला असून, देशातील प्रायोगिक नाटकांची चळवळ वाढवायची आहे. त्यासाठी समाजमनाचा वेध घेण्यासाठी उत्सुक आहे.
फॉयजा जलाली, दिग्दर्शिका आणि अभिनेत्री

रंगभूमीची अवस्था सुधारण्यावर माझा अधिक भर असणार आहे. एकपात्री प्रयोगांची सध्या संख्या घटत चालली आहे. त्यासाठी अधिकाधिक एकपात्री प्रयोग करून या नाट्यप्रकाराला पुन्हा एकदा मानाचे स्थान मिळवून देण्याचा माझा प्रयत्न असेल.
आशिष पाठोडे, एकपात्री कलाकार

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘सोशल मीडियामुळे भाषेचा पोत बदलला’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

‘सोशल मीडिया हे सर्वांत तरुण माध्यम आहे. इंटरनेट व सोशल मीडियामुळे भाषेचा पोत बदलला असून भाषेचा पोत आकुंचित होत आहे. त्यामुळे अभिव्यक्तीच्या छटाही बदलल्या आहेत. गेल्या काही वर्षांत विद्यार्थ्यांमधील भाषेचा स्तर खालावत चालला आहे. त्यामुळे भाषेतली अमूर्तता गायब होत आहे. नवीन माध्यमांमुळे जशी आव्हाने निर्माण झाली आहेत, तशा संधीही निर्माण झाल्या आहेत,’ असे प्रा. विश्राम ढोले यांनी सांगितले.

‘महाराष्ट्र टाइम्स’तर्फे आयोजित ‘मटा मैफल’ या उपक्रमाअंतर्गत ‘माध्यमांची बदलती भाषा’ या चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते, त्यात ते बोलत होते. या परिसंवादात त्यांच्यासह प्रसिद्ध अभिनेते गिरीश कुलकर्णी, सुनीला गोंधळेकर, ज्येष्ठ पत्रकार समीरण वाळवेकर आणि ‘महाराष्ट्र टाइम्सच्या’ पुणे आवृत्तीचे वरिष्ठ सहसंपादक श्रीधर लोणी सहभागी झाले होते.

‘माध्यमांमध्ये काम करताना वेळेचे गणित सांभाळावे लागते. अपुऱ्या किंवा हाती आलेल्या माहितीनुसार इतर संदर्भांशिवाय बातमी द्यावी लागते. त्यात चुका होऊ शकतात. शब्द निवड, व्याकरण आणि उच्चार या तिन्ही गोष्टींना अत्यंत महत्त्व आहे. माध्यमांमध्ये सध्या बोली भाषांचे महत्त्व कमी झाले असून ते वाढवणे आवश्यक आहे. तंत्रज्ञानाचा वापर स्वागतार्ह असला तरी त्यातल्या धोक्यांचीही जाणीव असली पाहिजे. रोबोट्सच्या माध्यमातून मुद्देसूद लिखाण करता आले तरी त्यात भावना, रंजकता किंवा सर्जनशीलतेचा समावेश नसेल. सांस्कृतिक क्षेत्राला मात्र, भाषेचे ठोकताळे लावण्यात येऊ नयेत,’ असे वाळवेकर म्हणाले.

‘भाषाशिक्षण हा विषय आपल्याकडे सर्वाधिक दुर्लक्षित राहिला आहे. समाज म्हणूनही आपण भाषेकडे दुर्लक्ष करत आलो आहोत. प्रमाण भाषेचा दुराग्रह न धरता योग्य अर्थ ध्वनित होणे आवश्यक आहे. लिखाणातील चुका टाळण्यासाठी सजगता, जागरूकता आवश्यक आहे. तंत्रज्ञानामुळे भाषेच्या वापराचे नियंत्रण सर्वसामान्यांच्या हाती गेले आहे,’ असे लोणी म्हणाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


पुण्यात नऊ जण ताब्यात

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

लष्कर भरतीच्या विविध पदांसाठी रविवारी होणाऱ्या लेखी परीक्षेचा पेपर फुटल्याप्रकरणी पोलिसांनी पुणे, नागपूर आणि गोव्यात रविवारी पहाटे छापे टाकले. पुण्यात हडपसर परिसरात पुणे व ठाणे पोलिसांनी एकत्रितपणे टाकलेल्या छाप्यात फुटलेल्या पेपरची माहिती घेताना ७९ विद्यार्थी आढळून आले. या प्रकरणी एका अॅकॅडमीचा संचालक, लष्करी जवान यांच्यासह नऊ जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या प्रकरणी ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात येणार आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुण्यासह नागपूर, गोवा येथे लष्करातील सोल्जर टेक्निकल, जनरल ड्युटी आणि लिपिक या तीन पदांसाठी रविवारी लेखी परीक्षा होणार होती. लष्कर भरतीच्या लेखी परीक्षेचा पेपर फुटल्याची माहिती ठाणे शहर गुन्हे शाखेला मिळाली होती. पुण्यातील हडपसर परिसरात विद्यार्थ्यांना हा पेपर दिला जाणार असल्याचे समजले. त्यानुसार ठाणे पोलिसांनी पुण्याच्या पोलिस आयुक्त रश्मी शुक्ला यांना ही माहिती दिली. ठाणे पोलिसांच्या दोन टीम, पुणे गुन्हे शाखा युनिट एक व हडपसर पोलिस यांनी मिळून रविवारी पहाटे दीडच्या सुमारास भेकराईनगर येथील संस्कार हॉलवर छापा टाकला. त्यावेळी त्या ठिकाणी ७९ मुले लष्कर भरतीच्या पेपरची माहिती घेत असल्याचे आढळून आले आहे. फलटण येथे राजे छत्रपती अॅकॅडमीचालविणारा धनाजी मोहन जाधव हा या विद्यार्थ्यांना या ठिकाणी घेऊन आल्याचे समोर आले आहे.

जाधव याला नागपूर येथून व्हॉट्स अॅपवरून पेपर मिळाला होता. भेकराईनगर येथील संस्कार हॉल येथे विद्यार्थ्यांना पेपरमधील प्रश्नांची माहिती देत असताना पोलिसांनी रविवारी पहाटे छापा टाकला. विद्यार्थ्यांजवळील पेपर व आज झालेल्या परीक्षेचा पेपर एकच असल्याचे आढळून आले आहे. छाप्याच्या वेळी या ठिकाणी ७९ विद्यार्थी होते. त्या सर्वांची नावे लिहून घेऊन त्यांना परीक्षेला पाठविण्यात आले होते. त्यानंतर त्यांना चौकशीसाठी बोलविण्यात आले आहे. लष्करभरती परीक्षा पेपरफुटीचे रॅकेट राज्यात असून पोलिसांनी गोवा, पुणे आणि नागपूर या ठिकाणी पहाटे ही कारवाई करून रॅकेट उघडकीस आणले. यामध्ये लष्करातील काही जणांचा सहभाग असण्याची शक्यता आहे. या प्रकरणी तपास सुरू असून अनेक धक्कादायक गोष्टी समोर येण्याची शक्यता आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘ईव्हीएम’ विरोधात सर्व पक्ष जाणार कोर्टात

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

पुणे महापालिकेच्या निवडणुकीत राजकीय स्वार्थासाठी मतदान यंत्रांमध्ये बदल करून मोठा घोटाळा करण्यात आल्याचा आरोप भारतीय जनता पक्ष वगळता सर्वपक्षीय उमेदवारांनी केला आहे. या महाघोटाळ्याविरोधात कोर्टात याचिका दाखल करण्याचा निर्णय रविवारी घेण्यात आला.

महापालिकेच्या निवडणुकीत पराभवाचा फटका सहन कराव्या लागलेल्या सर्वपक्षीय उमेदवारांनी रविवारी इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशिनमधील (ईव्हीएम) घोटाळ्याविरोधात निषेध सभा घेतली. या वेळी सभागृहनेते बंडू केमसे, स्थायी समिती अध्यक्ष बाळासाहेब बोडके, दत्ता बहिरट, रूपाली पाटील-ठोंबरे, सचिन भगत, धनंजय जाधव, विनायक हणमघर या पराभूत नगरसेवकांसह नीलेश निकम, नारायण चव्हाण, विजय मारटकर, गणेश भोकरे आणि माहिती अधिकार कार्यकर्ते विजय कुंभार उपस्थित होते.

प्रत्यक्ष मतदानाच्या दिवशी जाहीर करण्यात आलेली प्रभागनिहाय आकडेवारी आणि मतमोजणीच्या वेळी उमेदवारांना मिळालेली मते, यामध्ये मोठी तफावत आहे. तसेच, बूथनिहाय आकडेवारीमध्ये मोठा फरक दिसून येत असल्याने भाजपला मिळालेल्या यशाबद्दल मोठा संशय व्यक्त केला जात आहे. ईव्हीएममधील घोटाळ्याबाबत प्रत्येक जण कोर्टात लढण्यासाठी सज्ज झाला असून, दोनशे अर्ज दाखल केले जातील, असा दावा या वेळी करण्यात आला. राज्य निवडणूक आयोगाकडे फेरमतदानाची मागणी करण्यात आल्याचे दत्ता बहिरट यांनी सांगितले.

कोणाला मतदान केले, याची माहिती मिळणे, हा मतदारांचा अधिकार आहे. ईव्हीएमच्या माध्यमातून तशी मिळत नसेल, तर पुन्हा पूर्वीप्रमाणे ‘बॅलेट पेपर’वर मतदान घेतले गेले पाहिजे. देशातील लोकशाही वाचवण्यासाठी ईव्हीएमविरोधात मोठे आंदोलन उभारण्याची गरज आहे, अशी भूमिका रूपाली पाटील-ठोंबरे यांनी मांडली.

नागरिकांनी केलेले मतदान मतमोजणी यंत्रातून गायब झाले आहे. नागरिक प्रतिज्ञापत्रावर मतदान तुम्हालाच केले, असे सांगण्यास तयार आहेत. हा सर्व महाघोळाटा भाजपने घडवून आणला असल्याचा आरोप सचिन भगत यांनी केला. तर, सुप्रीम कोर्टाने मतदान कोणाला केले, याची प्रिंट मतदाराला द्यावी, असे निर्देश दिले असतानाही त्याकडे दुर्लक्ष केले जात असल्याकडे लक्ष वेधले.

या निषेध मेळाव्यात आलेल्या काही कम्प्युटर इंजिनीअर्सनी मतदान यंत्रांमध्ये अगदी सहज फेरफार करता येतात, हे सोदाहरण दाखवले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

खोटे दागिने देऊन ‘रांका’ची फसवणूक

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

हडपसर व कर्वे रोड येथील रांका ज्वेलर्स येथे खरेदी करण्यासाठी आलेल्या महिलांनी सोने म्हणून पिवळ्या रंगाच्या बांगड्या देऊन फसवणूक केल्याचे समोर आले आहे. हडपसर येथील घटनेत ९८ हजारांचे दागिने घेतल्याचे समोर आले आहे. तर, कर्वेरोड येथील दुकानात मात्र महिलेचा प्रयत्न फसला. या प्रकरणी डेक्कन व हडपसर पोलिस ठाण्यात दोन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

रांका ज्वेलर्सचे चंद्रकांत नांगरे (वय ४८, रा. खराडी) आणि प्रदीप पिंपळकर (वय ६०, रा. सुखसागरनगर) यांनी तक्रार दिली आहे. डेक्कन पोलिसांनी कमलादेवी सुरेंद्र चौरसिया हिच्याविरोधात; तर हडपसर पोलिसांनी दोन अनोळखी महिलांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नांगरे हे हडपसर येथील रांका ज्वेलर्समध्ये रोखपाल म्हणून नोकरीस आहेत. गुरुवारी सायंकाळी सहाच्या सुमारास शोरुममध्ये दोन महिला आल्या. जुने दागिने मोडायचे आहेत, असे त्यांनी नांगरे यांना सांगितले. त्यांच्याजवळील पिवळ्या रंगाच्या धातूच्या चार बांगड्या दाखविल्या. त्या बांगड्या देऊन त्या बदल्यात ९५ हजार सातशे रुपयांचे नवीन दागिने त्यांनी घेतले. तसेच मोडीत निघालेल्या दागिन्यांचे शिल्लक दोन हजार चारशे रुपये रोख रक्कमही त्या घेऊन गेल्या. मात्र, त्यांनी दिलेल्या बांगड्या या तांब्याच्या असल्याचे नंतर लक्षात आले. या महिलांनी तांब्याच्या बांगड्या खऱ्या असल्याचे भासवून तब्बल ९८ हजार रुपयांना गंडा घातल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी पोलिसांत तक्रार दिली आहे.

कर्वे रोड येथे गुरुवारी सायंकाळी आरोपी चौरसिया दुकानात आल्या. त्यांनी जुने दागिने देऊन नवीन खरेदी करायाचे असल्याचे सांगितले. पिवळ्या रंगाचे दागिने सोन्याचे असल्याचे भासवून नवीन दागिने खरेदीचा प्रयत्न केला. या प्रकरणी डेक्कन पोलिस तपास करत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सरकारी कार्यालयांचा ‘युनिकोड’ला ठेंगा

$
0
0

Chintamani.Patki

@timesgroup.com

Tweet : @chintamanipMT

पुणे : कम्प्युटर, मोबाइल, तसेच टॅब या साधनांवर सहज-सोप्या मराठीसाठी युनिकोडचा वापर वाढला असला तरी सरकारी कार्यालये जुनाट कारभारातून बाहेर आलेली नाहीत. आजही बहुसंख्य कार्यालयांचे काम अवघड अशा मराठीत चालू आहे. त्यामुळे एखादी फाइल पुढे पाठवताना फाँटचा प्रश्न निर्माण होतो आहे. युनिकोड वापरणे अनिवार्य या सरकारच्या आदेशाला सरकारी कार्यालयांनीच ठेंगा दाखवला आहे.

सरकारी कामकाजात मराठी वापर वाढावा, तसेच सोपी व सुस्पष्ट भाषा असावी, यासाठी युनिकोड ही संकेतप्रणाली वापरण्याचे सरकारचे धोरण आहे. सरकारी कार्यालयातील मराठी अवघड असल्याने ती सोपी करण्याबरोबरच आधुनिक करण्यासाठी हे धोरण आखण्यात आले होते. मात्र सरकारी कार्यालयांनी आपला जुनाट कारभार बदलेला दिसून येत नाही. राज्याची सर्व प्रमुख शिक्षण कार्यालये पुण्यात असून या सर्व कार्यालयांमध्ये जुन्या पद्धतीने काम केले जाते.

कम्प्युटरच्या पडद्यावर मराठी मजकूर दिसण्यासाठी, तसेच मजकूर मुद्रित करून घेण्यासाठी आवश्यक असणारे युनिकोड-आधारित मराठी फाँट संख्येने बरेच कमी प्रमाणात उपलब्ध आहेत. तसेच त्यातील बहुसंख्य फाँट महाराष्ट्र सरकारने मान्य केलेल्या वर्णमाला-वर्णलिपीविषयक शासन निर्णयात निकषांप्रमाणे नसल्यामुळे ४ ते ५ देखणे युनिकोड आधारित मराठी फाँट तयार करण्याचे काम सरकारची राज्य मराठी विकास संस्था करत आहे. हे फाँट नागरिकांना मोफत उपलब्ध करून देण्याचे काम संस्थेने हाती घेतले आहे. यापैकी दोन फाँटचे काम पूर्ण झाले असून ते संस्थेच्या वेबसाइटवर उपलब्ध आहेत. महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृत्यर्थ या दोन फाँटना ‘यशोमुद्रा’ आणि ‘यशोवेणू’ अशी नावे देण्यात आली आहेत. पुण्याच्या सीडॅक या संस्थेने ही निर्मिती केली आहे. महाराष्ट्र सरकारनेही कम्प्युटरवर मराठी भाषेचा वापर वाढावा यासाठी युनिकोड वापरून काम करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत.


मंत्रालयात सर्वत्र युनिकोड वापरली जात आहे. ती वापरात नसेल, तर भाषेत तांत्रिक चुका होतात. हे टाळण्यासाठी राज्यभरातील विविध सरकारी कार्यालयांमध्ये युनिकोडचे प्रशिक्षण देण्यात येत आहे.

- महेश कुलकर्णी, सहसंचालक, सीडॅक


युनिकोडच्या वापरासाठी कार्यशाळा घेण्यात येत आहेत. तसेच युनिकोडसाठी मराठी राजभाषा दिनाच्या निमित्ताने एक माहितीपट तयार केला असून तो सर्वांपर्यंत पोहचवत आहोत.

- डॉ. आनंद काटीकर, संचालक, राज्य मराठी विकास संस्था

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

प्रवाही असल्यामुळेच मराठी भाषेला जिवंतपणा...

$
0
0

‘मटा मैफल’मध्ये परिसंवादातील सूर

म. टा. प्रतिनिधी, पुणे

भाषा प्रवाही असल्याने ती सातत्याने बदलत असते, म्हणूनच ती जिवंत राहते. भाषेचे वेगाने विकेंद्रीकरण होत असून, तंत्रज्ञान त्यामध्ये मोलाची भूमिका बजावत आहे. त्याकडे सकारात्मक दृष्टीने पाहून बदलांना सामावून घेणे आवश्यक आहे, असे मत अभिनेते-दिग्दर्शक गिरीश कुलकर्णी यांनी रविवारी व्यक्त केले.

‘भाषेवर कायमच अभिजनांचे नियंत्रण राहिले आहे. अभिजन आणि शिक्षणव्यवस्थाही अभिजात भाषा ग्रामीण भागापर्यंत नेण्यात अपयशी ठरली आहे. तंत्रज्ञानात होणाऱ्या बदलांचा थेट परिणाम भाषांवरही होत आहे. आता वेगाने भाषेचे विकेंद्रीकरण होत असून ते स्वागतार्ह आहे. त्याकडे सकारात्मक दृष्टीने पाहण्याची गरज आहे. भाषेच्या ताकदीचा विविध प्रकारे वापर करता येतो. भाषा कशीही असो, ती अर्थवाही असली पाहिजे. त्यातून आशयाचे नुकसान न होता आपल्याला काय सांगायचे आहे, हे अचूक समजले पाहिजे,’ असे कुलकर्णी म्हणाले.

महाराष्ट्र टाइम्सतर्फे आयोजित ‘मटा मैफल’ या उपक्रमाअंतर्गत ‘माध्यमांची बदलती भाषा’ या चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. प्रसिद्ध अभिनेते गिरीश कुलकर्णी, सुनिला गोंधळेकर, माध्यमतज्ज्ञ प्रा. विश्राम ढोले, ज्येष्ठ पत्रकार समीरण वाळवेकर आणि महाराष्ट्र टाइम्सच्या पुणे आवृत्तीचे वरिष्ठ सहसंंपादक श्रीधर लोणी सहभागी झाले होते. सहायक वृत्तसंपादक श्रीपाद ब्रह्मे यांनी त्यांच्याशी संवाद साधला. बदलत चाललेली भाषा, तंत्रज्ञान व इंग्रजीमुळे तयार होत असलेले नवे शब्द, माध्यमांमधून होत असलेली अभिव्यक्ती आणि या सर्वांचा एकूण भाषा व्यवहारांवर होत असलेला परिणाम याबाबत परिसंवादात साधक बाधक चर्चा झाली.

‘भाषा हे प्रवाही माध्यम असल्याने त्यात बदल होणे आवश्यकच आहे, तरच भाषा टिकून राहते. विविध भाषांमधील शब्दांना आपल्या भाषेत सहभागी करून घेणे अपरिहार्य असून आहे,’ असे गोंधळेकर म्हणाल्या.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सरकारी कार्यालयांचा ‘युनिकोड’ला ठेंगा

$
0
0

मराठी टायपिंगसाठी अद्यापही जुन्या पद्धतीचाच होतोय वापर

Chintamani.Patki
@timesgroup.com

Tweet : @chintamanipMT


पुणे : कम्प्युटर, मोबाइल, तसेच टॅब या साधनांवर सहज-सोप्या मराठीसाठी युनिकोडचा वापर वाढला असला तरी सरकारी कार्यालये जुनाट कारभारातून बाहेर आलेली नाहीत. आजही बहुसंख्य कार्यालयांचे काम अवघड अशा मराठीत चालू आहे. त्यामुळे एखादी फाइल पुढे पाठवताना फाँटचा प्रश्न निर्माण होतो आहे. युनिकोड वापरणे अनिवार्य या सरकारच्या आदेशाला सरकारी कार्यालयांनीच ठेंगा दाखवला आहे.

सरकारी कामकाजात मराठी वापर वाढावा, तसेच सोपी व सुस्पष्ट भाषा असावी, यासाठी युनिकोड ही संकेतप्रणाली वापरण्याचे सरकारचे धोरण आहे. सरकारी कार्यालयातील मराठी अवघड असल्याने ती सोपी करण्याबरोबरच आधुनिक करण्यासाठी हे धोरण आखण्यात आले होते. मात्र सरकारी कार्यालयांनी आपला जुनाट कारभार बदलेला दिसून येत नाही. राज्याची सर्व प्रमुख शिक्षण कार्यालये पुण्यात असून या सर्व कार्यालयांमध्ये जुन्या पद्धतीने काम केले जाते.

कम्प्युटरच्या पडद्यावर मराठी मजकूर दिसण्यासाठी, तसेच मजकूर मुद्रित करून घेण्यासाठी आवश्यक असणारे युनिकोड-आधारित मराठी फाँट संख्येने बरेच कमी प्रमाणात उपलब्ध आहेत. तसेच त्यातील बहुसंख्य फाँट महाराष्ट्र सरकारने मान्य केलेल्या वर्णमाला-वर्णलिपीविषयक शासन निर्णयात निकषांप्रमाणे नसल्यामुळे ४ ते ५ देखणे युनिकोड आधारित मराठी फाँट तयार करण्याचे काम सरकारची राज्य मराठी विकास संस्था करत आहे. हे फाँट नागरिकांना मोफत उपलब्ध करून देण्याचे काम संस्थेने हाती घेतले आहे. यापैकी दोन फाँटचे काम पूर्ण झाले असून ते संस्थेच्या वेबसाइटवर उपलब्ध आहेत. महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृत्यर्थ या दोन फाँटना ‘यशोमुद्रा’ आणि ‘यशोवेणू’ अशी नावे देण्यात आली आहेत. पुण्याच्या सीडॅक या संस्थेने ही निर्मिती केली आहे. महाराष्ट्र सरकारनेही कम्प्युटरवर मराठी भाषेचा वापर वाढावा यासाठी युनिकोड वापरून काम करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत.

मंत्रालयात सर्वत्र युनिकोड वापरली जात आहे. ती वापरात नसेल, तर भाषेत तांत्रिक चुका होतात. हे टाळण्यासाठी राज्यभरातील विविध सरकारी कार्यालयांमध्ये युनिकोडचे प्रशिक्षण देण्यात येत आहे.
- महेश कुलकर्णी, सहसंचालक, सीडॅक

युनिकोडच्या वापरासाठी कार्यशाळा घेण्यात येत आहेत. तसेच युनिकोडसाठी मराठी राजभाषा दिनाच्या निमित्ताने एक माहितीपट तयार केला असून तो सर्वांपर्यंत पोहचवत आहोत.
- डॉ. आनंद काटीकर, संचालक, राज्य मराठी विकास संस्था

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आता शर्यत मंत्रिपदासाठी!

$
0
0



म. टा. प्रतिनिधी, पिंपरी
पिंपरी-चिंचवड महापालिकेत भारतीय जनता पक्षाने एकहाती सत्ता मिळविल्यानंतर यशाचे शिल्पकार म्हणून आमदार लक्ष्मण जगताप आणि महेश लांडगे यांना मंत्रिपदावर स्थान मिळणार का? या अनुषंगाने हालचालींना प्रारंभ झाला आहे. त्या माध्यमातून पक्षांतर्गत गटबाजीची बीजे रोवली जाण्याची भीती व्यक्त होत आहे.
महापालिकेच्या निवडणुकीत १२८ पैकी ७७ जागा जिंकून भाजपने एकहाती सत्ता मिळविली आहे. रणसंग्रामात राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला उद्ध्वस्त केल्यानंतर त्याचे शिलेदार म्हणून जगताप आणि लांडगे चमकले. त्यामुळे दोघांनाही मंत्रिपदाचे वेध लागले आहेत. दोघांचेही त्यांचे समर्थक आता एकत्र येऊ लागल्यानंतर पक्षांतर्गत गटबाजीही उदयास येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. अर्थात, त्याची कोणतीही जाहीर वाच्यता होणार नाही, याविषयी कमालीची खबरदारी घेण्यात येत आहे. या बाबी राजकारणात अपेक्षित असतातच, असे बोलले जात आहे.
महापालिकेच्या इतिहासात प्रथमच सत्ता हस्तगत करण्यास यश आल्यास शहराला ‘लाल दिवा’ मिळेल, अशी कमालीची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. त्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भूमिकेला महत्त्व प्राप्त झाले आहे. जास्त नगरसेवक निवडून आणणाऱ्याला मंत्रिपद दिले जाईल, असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिल्याची अफवादेखील पसरविण्यात येत आहे. अर्थात, ही बाब मुख्यमंत्र्यांच्याच अखत्यारित असल्यामुळे त्यांच्या निर्णयावर पुढील गोष्टी अवलंबून आहेत. परंतु, तूर्तास तरी जगताप आणि लांडगे यांच्या समर्थकांमध्ये रस्सीखेच चालू झाली आहे.
आमदार जगताप यांनी ५५ नगरसेवक निवडून आणल्याचा दावा केला जात आहे. तर, लांडगे यांच्या नेतृत्त्वाखाली भोसरी विधानसभा मतदारसंघात ४४ पैकी ३४ जागा भाजपने जिंकल्याचा दावा करण्यात येत आहे. त्यामुळे ‘भाऊं’ना आणि ‘दादां’ना लाल दिवा मिळणार, असे संदेश सोशल मीडियावरून व्हायरल होत आहेत. त्यात भर म्हणजे मावळमधून बाळा भेगडे यांनाही मंत्रिपद मिळण्याची अपेक्षा त्यांचे समर्थक व्यक्त करीत आहेत. मंत्रिमंडळाच्या दुसऱ्या विस्तारात भेगडे यांचे नाव जवळपास निश्चित झाले होते. परंतु, युतीच्या राजकीय गणितामुळे पुन्हा मागे पडले होते. ती संधी त्यांना या वेळी मिळू शकते, असे अंदाज व्यक्त होत आहेत. भेगडे यांनी पुणे जिल्ह्यातील लोणावळा, तळेगाव, आळंदी नगरपरिषदेवर भाजपचा झेंडा फडकवला. मावळ पंचायत समितीवरही भाजपचा झेंडा कायम ठेवण्यात यश मिळविले आहे, अशी अपेक्षा त्यांचे समर्थक व्यक्त करीत आहेत.

श्रेयाचे फळ काय?
महापालिकेत भाजपने इतिहास घडविला. त्याचे फळ काय मिळणार? अशी चर्चा आता रंगू लागली आहे. त्या अनुषंगाने पक्षाचे शहराध्यक्ष आमदार लक्ष्मण जगताप आणि आमदार महेश लांडगे यांच्या समर्थकांच्या बैठका चालू झाल्या आहेत. अर्थात, त्यामध्ये महापालिकेत प्रमुख पदांच्या वाटबाबतच्या चर्चेचाही समावेश आहे. महापौर, उपमहापौर यांसह स्थायी समितीच्या अध्यक्षपदासाठी विशेष चुरस निर्माण झाली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


दोन दिवसांचे अर्भक सापडले

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, पुणे
जनता वसाहत येथील कॅनॉलच्या वाहत्या पाण्यात दोन दिवसांचे स्त्री जातीचे अर्भक सोडून दिल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी दत्तवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जनता वसाहत येथे शनिवारी दुपारी कॅनॉलच्या पाण्यातून बाळ वाहत असल्याचे तेथे पोहत असलेल्या मुलांना दिसले. त्यांनी ते बाळ बाहेर काढून त्याची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळी येऊन अर्भक ताब्यात घेतले. ते अंदाजे दोन दिवसांचे स्त्री जातीचे असल्याचे स्पष्ट झाले. हे अर्भक अनैतिक संबंधातून जन्मास आले असून, त्याची विल्हेवाट लावण्यासाठी ते कॅनॉलमध्ये टाकून देणाऱ्यांचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी दत्तवाडी व सिंहगड रोड परिसरातील नर्सिंग होममध्ये गेल्या आठवड्यात मुलीला जन्म दिलेल्या महिलेची माहिती मागविली आहे. या अर्भकाच्या शरिराचा काही भाग डीएनए तपासणीसाठी घेण्यात आला आहे. या प्रकरणी उपनिरीक्षक ए. जी. डफळ हे तपास करत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सावत्र मुलींवर वडिलांकडून अत्याचार

$
0
0



म. टा. प्रतिनिधी, पिंपरी
वडिलांनीच आपल्या दोन सावत्र मुलींवर वर्षभर लैंगिक अत्याचार केला. तसेच, बहिणीच्या एका मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. रविवारी (२६ फेब्रुवारी) जुनी सांगवीत हा प्रकार उघडकीस आला आहे.
याप्रकरणी ३३ वर्षीय पित्यावर बलात्कार, विनयभंग आणि बाल लैंगिक अत्याचार प्रतिंबध कायदा (पास्को) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक करण्यात आली आहे. याबाबत त्याच्या ३२ वर्षीय पत्नीने सांगवी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीचे पहिले लग्न २००३ मध्ये झाले होते. तर, फिर्यादी महिलेचेही पहिले लग्न झाले आहे. त्यांना दोन मुली आहेत. त्यांचे पतीसोबत जमत नसल्याने त्या विभक्त राहत होत्या. आरोपी पती हा त्यांचा नातेवाइक आहे. त्यामुळे फिर्यादी महिलेच्या कुटुंबाने २०१० मध्ये त्याच्यासोबत त्यांचे लग्न लावून दिले होते.
आरोपी हा गेल्या एक वर्षांपासून त्याच्या १२ आणि १० वर्षांच्या दोन सावत्र मुलींवर वर्षभर वारंवार लैंगिक अत्याचार करत होता. पाठीमागे हा प्रकार उघडकीस आला होता. त्यानंतर आरोपीने माफी मागितली होती. त्यामुळे फिर्यादी महिलेने त्याच्याविरोधात पोलिसात तक्रार दिली नव्हती.
त्यानंतरही आरोपी मुलींवर लैंगिक अत्याचार करत होता. त्याने फिर्यादी महिलेच्या बहिणीच्या ९ वर्षांच्या मुलीवरही लैंगिक अत्याचार केला आहे. अखेर फिर्यादी महिलेने पोलिसांत धाव घेऊन त्याच्या विरोधात फिर्याद दिली. त्यानंतर रविवारी (२६ फेब्रुवारी) रात्री त्याला अटक करण्यात आली. सांगवी पोलिस तपास करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

निवडणुकीमध्ये यंत्रणांचा गैरवापर

$
0
0

केंद्र आणि राज्य सरकारच्या दबावाखाली प्रशासनाला हाताशी धरून महापालिका निवडणुका लढवल्या गेल्याने सर्व उपलब्ध यंत्रणांचा मोठ्या प्रमाणावर गैरवापर करण्यात आल्याचा आरोप महापौर प्रशांत जगताप यांनी सोमवारी केला. यामुळे लोकशाही संपुष्टात येण्याचा धोका असून, भविष्यात महापालिकेतील पाशवी बहुमताचा वापर करून भारतीय जनता पक्षाने सत्तेचा गैरवापर करू नये, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
महापालिका निवडणुकांमध्ये मतदारांनी दिलेला कौल आम्ही स्वीकारला असून, जबाबदार विरोधी पक्ष म्हणून पुणेकरांच्या हितासाठी कायम आवाज उठवू, असा दावा महापौर जगताप यांनी केला. मात्र, आजवरच्या सर्व निवडणुकांमध्ये यंदाच्या निवडणुकीत सरकारी यंत्रणेचा गैरवापर करून घेण्यात आल्याचे टीकास्त्र त्यांनी सोडले. निवडणुकीची सर्व जबाबदारी असलेल्या अधिकाऱ्यांच्या संगनमताने व्यवस्थेचा दुरुपयोग करण्यात आल्याचा ठपका त्यांनी ठेवला. प्रभागातील केंद्रनिहाय मतदार याद्या मतदानापूर्वी दोन दिवसही उपलब्ध झाल्या नव्हत्या. तसेच, अनेक ठिकाणी विधानसभेची अंतिम मतदार यादी आणि प्रत्यक्ष उपलब्ध करून देण्यात आलेल्या याद्यांमध्येही अनेक घोळ होते. त्यामुळे, अनेकांना मतदानापासून वंचित राहावे लागले, याकडे महापौरांनी लक्ष वेधले.
केंद्र आणि राज्य सरकारप्रमाणेच आता महापालिकेतील सत्ताही भाजपकडे असल्याने त्यांनी आता नागरिकांची फसवणूक करू नये. कोणत्याही अडचणी न सांगता, शहराच्या दृष्टीने आवश्यक असलेली विविध विकासकामे त्यांनी गतीने मार्गी लावावीत. परंतु, पाशवी बहुमताच्या जोरावर चुकीच्या आणि पुणेकरांच्या हिताविरोधातील निर्णय घेतले गेले, तर सभागृहात आणि रस्त्यावर उतरून आंदोलन केले जाईल, असा इशारा जगताप यांनी दिला.
गेल्या दोन-अडीच वर्षांमध्ये केंद्र आणि राज्य सरकारने शहरातील महत्त्वाचे प्रकल्प जाणीवपूर्वक अडवले. तरीही, राष्ट्रवादी काँग्रेसने पुणेकरांच्या कररूपातून उभ्या राहणाऱ्या निधीतून अनेक विकासकामे केली. आगामी दोन-चार महिन्यांत यातील बहुतेक कामे पूर्णत्त्वास जाणार असून, त्याचा नागरिकांना निश्चित लाभ होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
...............
कायदेशीर कारवाईचे संकेत
मतदान यंत्रांमध्ये घोटाळा झाल्याचा दावा करून भाजप वगळता इतर सर्वपक्षीय उमेदवारांनी त्याविरोधात दंड थोपटले आहेत. महापौर प्रशांत जगताप यांनी त्याविषयी थेट भाष्य करणे टाळले असले, तरी कायदेशीर तपासणी करून या संदर्भातील योग्य निर्णय घेतला जाईल, असे संकेत त्यांनी दिले.
..................
माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला एवढ्या मोठ्या पदाची संधी पक्षाने दिली. त्यामुळे, आगामी काळातही एखादी महत्त्वाची जबाबदारी दिली, तर ती आनंदाने स्वीकारीन.
- प्रशांत जगताप, महापौर

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

संवादातून उलगडलं ‘कवितेचं पान’

$
0
0

मधुराणी गोखले यांच्या काव्यवाचनाला उत्स्फूर्त दाद
म. टा. प्रतिनिधी, पुणे
कॉलेज विश्वात दडलेले प्रेम, कधी अलगद होते, तर कधी नकळत. विवाहाच्या बंधनाला छेद देत होणारे प्रेम वास्तवाची जाणीव करून देते, तर निसर्गावरील प्रेम निरागसतेचे प्रतीक...या आणि अशा प्रेमाच्या विविध रंगछटा कवितेच्या पानापानांतून उमटत असतात. त्याची श्राव्य अनुभूती काव्यरसिकांना मिळाली.
‘महाराष्ट्र टाइम्स’ने स. प. महाविद्यालयात आयोजित केलेल्या ‘कवितेचं पान’ या कार्यक्रमात मधुराणी गोखले आणि ‘महाराष्ट्र टाइम्स’चे स्पेशल करस्पाँडंट अभिजित थिटे यांनी प्रेमाच्या या छटा आणि प्रेमबंधाचे पदर रसिकांना उलगडून दाखविले. मधुराणी गोखले यांच्या सुश्राव्य काव्यवाचनाला अभिजित यांनी दिलेल्या साथीने कवितेचं पान क्षणाक्षणाला रंगत गेले.
‘मला तुझे मनोगत
मला कधी कळेल का?’
अशी सार्थ हाक घालत मधुराणी यांनी कार्यक्रमाला प्रारंभ केला. त्या वेळी ‘असे वाटते की, असे काही व्हावे’ या कवितेने कॉलेजच्या विश्वातले गुलबक्षी दिवस उपस्थितांच्या डोळ्यासमोर तरळून गेले.
कॉलेजच्या दिवसांची आठवण देणारी कवयित्री संजीवनी बोकील यांची ‘किती गुलबक्षी असतात ते दिवस. तुझ्या भेटीच्या आधीचा आणि नंतरचा’ ही कविता मधुराणी यांनी सादर केली.
कॉलेजचे प्रेम म्हटले की दिवंगत कवी मंगेश पाडगावकर यांची ‘प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं, तुमचं आणि आमचं सेम असतं’ ही कविता आलीच. मधुराणी यांनी खास ठेक्यात म्हटलेल्या या कवितेला उपस्थितांनी तेवढीच दिलखुलास दाद दिली.
प्रेम हे उत्कट असते, असे म्हटले जाते. त्यावर अभिजित यांनी खास शैलीत त्यावर भाष्य करीत ‘उत्कट प्रेमाचं काही खरं नसतं राव’ ही कविताही हशा पिकवून गेली.
प्रेमाचे वेगवेगळे पदर दाखविणारी​ कविश्रेष्ठ कुसुमाग्रज यांची
पुरे झाले चंद्रसूर्य
पुऱ्या झाल्या तारा
पुरे झाले नदीनाले
पुरे झाला वारा
मोरासारखा छाती काढून उभा रहा
जाळासारखा नजरेत नजर बांधून पहा
सांग तिला तुझ्या मिठीत
स्वर्ग आहे सारा
ही कविता मधुराणी यांनी सादर केली. त्यातील
‘प्रेम कर भिल्लासारखं
बाणावरती खोचलेलं
मातीमध्ये उगवूनसुद्धा
मेघापर्यंत पोचलेलं’
या काव्यपंक्तींना रसिकांनी मनमुराद दाद दिली.
प्रेमभावनेच्या अन्य कवितांची पेरणीही या कार्यक्रमात झाली. त्यापैकी कवी वैभव जोशी यांची
‘एक एक होकार दे,
फार काही नको,
फार काही नको,
फक्त नाही नको’
या गजल रचनेला रसिकांनी टाळ्यांनी प्रतिसाद दिला. त्याचवेळी अभिजित यांनी सादर केलेल्या केशवकुमार यांच्या ‘प्रेमाचा गुलकंद’ या कवितेने सभागृहास खसखस पिकली.
दुसऱ्याचे प्रेम बघवत नसलेल्यांच्या कवी मंगेश पाडगावकर यांनी
त्यानं प्रेम केलं
किंवा
तिनं प्रेम केलं, करू दे की... मला सांगा
तुमचं काय गेलं?
असे म्हणत संबंधितांच्या डोळ्यात अंजन घातले आहे. ही कविताही मधुराणी यांनी सादर केली. बा. भ. बोरकर यांची ‘सरीवर सरी आल्या गं, सचैल गोपी न्हाल्या गं’ या कवितेने रसिकांना ठेका धरायला लावला. नारायण सुर्वे यांची ‘तुझे गरम ओठ ओठावर टेकवलेस तेव्हा, तेव्हाही रात्र अशीच होती उभी’ ही कविता अंतर्मुख करून गेली. अशोक नायगावकर यांची ‘मी म्हणालो बायकोला, आजपासून प्रेयसी तू’ या कवितेने प्रेमातील वास्तवाची जाणीव करायला लावली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

संगीता पुराणिक, मंदाकिनी डावरे,गणेश चव्हाण यांना विजेतेपद

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
‘महाराष्ट्र टाइम्स’ने ‘मटा मैफल’ अंतर्गत आयोजिलेल्या गूढकथा, प्रेमकथा, लघुत्तम कथा स्पर्धेत अनुक्रमे संगीता पुराणिक, मंदाकिनी डावरे, गणेश चव्हाण यांनी पहिले पारितोषिक मिळवत स्पर्धेचे विजेतेपद पटकावले. कविता स्पर्धेत आरती देवगावकर यांनी बाजी मारत प्रथम क्रमांक पटकावला. विजेत्यांना ज्येष्ठ कादंबरीकार विश्वास पाटील यांच्या हस्ते पारितोषिके देऊन गौरविण्यात आले.
लघुकथा, लघुत्तम कथा आणि कविता स्पर्धेला मोठा प्रतिसाद मिळाला. सहाशेहून अधिक कथा व कविता पाठवल्या होत्या. प्रेम कथा, गूढकथा, लघुत्तम कथा आणि कविता अशा विभागांमध्ये ही स्पर्धा घेण्यात आली. गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या ‘मटा मैफलीत’ स्पर्धेसाठी निवड झालेल्या कवितांपैकी काही निवडक कविता सादर करण्याची संधीही नवोदित कवींना मिळाली. कवितांसाठी प्रसिद्ध गझलकार प्रदीप निफाडकर यांनी तर कथांसाठी प्राध्यापिका रूपाली शिंदे यांनी परिक्षणाची जबाबदारी सांभाळली.
रूपाली शिंदे म्हणाल्या, ‘ज्येष्ठांपासून ते तरुणांपर्यंत सर्व वयोगटातील नागरिकांनी स्पर्धेत सहभाग घेतला ही अत्यंत आनंदाची बाब आहे. प्रेमकथेसंदर्भात ज्या कथेत प्रेमाच्या जाणीवेबद्दलची विधायकता अधिक दिसली त्याचा अधिक गांभीर्याने विचार केला गेला. प्रेम हा संस्कृतीचा एक भाग आहे. संस्कृतीशी निगडीत प्रेमाची व्याख्या करणाऱ्या कथांचा विजेतेपदासाठी विचार झाला. गूढ कथेच्या बाबतीत कथाकारांवर सध्याच्या माध्यमांची सुरू असलेली दादागिरी अधिक जाणवली. बुद्धीच्या तर्काच्या पलिकडे असलेले गूढ ज्या कथांमध्ये मांडले होते. त्यांची निवड पारितोषिकांसाठी करण्यात आली आहे.’ ‘यंदा परिक्षणासाठी आलेल्या लघुत्तम कथा उत्कृष्ट होत्या. त्यातून पहिल्या तीन निवडताना कस लागला,’ असेही शिंदे यांनी सांगितले.
------------------
मी स्पर्धेचेच प्रॉडक्ट – विश्वास पाटील
‘१९७५ साली तरुणभारत दैनिकात वासंतिक कथालेखन स्पर्धा घेण्यात आली होती. त्या स्पर्धेत महाराष्ट्रात माझी कथा तिसरी आली आणि पहिल्यांदा मी लेखक म्हणून महाराष्ट्राला माहित झालो. मी ही स्पर्धेचेच प्रॉडक्ट आहे.’ असे सांगून विश्वास पाटील यांनी सभागृहात हशा पिकवला.
------------------
स्पर्धेचा सविस्तर निकाल
गूढकथा : प्रथम –संगीता पुराणिक, द्वितीय – जयंत विद्वांस, तृतीय – राजश्री राजवाडे – काळे, उत्तेजनार्थ- दिलीप कुलकर्णी, डॉ. अजित सिधये
प्रेमकथा : प्रथम – मंदाकिनी डावरे, द्वितीय - वीणा भागवत, तृतीय –दीपक मोडक उत्तेजनार्थ- कृतिका भट, माधुरी खेडकर
लघुत्तम कथा प्रथम – गणेश चव्हाण द्वितीय – आसावरी गोखले तृतीय – प्रमोद कुलकर्णी उत्तेजनार्थ- जयश्री केणे, नरेंद्रकुमार तळवलकर
कविता स्पर्धा - प्रथम – आरती देवगावकर, द्वितीय – संगीता झिंजुरके, तृतीय – संजय मरळ , उत्तेजनार्थ – डॉ. गौरी दामले, निशिकांत गुमास्ते
०००

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images