Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

घड्याळ, कमळात ‘काँटे की टक्कर’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

पुणे आणि पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेसाठी झालेल्या मतदानानंतर राष्ट्रवादी काँग्रेस आणि भारतीय जनता पक्षात (भाजप) काँटे की टक्कर असल्याचा अहवाल राज्य गुप्तवार्ता विभागाने दिला आहे. भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जागांच फारसा फरक राहणार नसला तरी, भाजपमधील अंतर्गत खदखद मतपेटीत कशी उतरणार याविषयी यंत्रणा साशंक आहे.
प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांमध्ये आणि जुन्या कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचा सूर आळवला गेला. त्याचा फटका भाजपला बसेल, असे यंत्रणेच्या अहवालात नमूद करण्यात आले आहे. या नाराजीचा फटका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या टिळक रोडवरील सभेलाही जाणवला. या नाराजीमुळे पर्वती आणि कसबा मतदार संघातील काही प्रभागांमधील समीकरणे बिघडण्याची शक्यता आहे. पुण्यातील काही विधानसभा मतदार संघात राष्ट्रवादी तर अन्यत्र भाजप बाजी मारेल, असा पोलिसांचा दावा आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप या दोन्ही पक्षांना ६० ते ६५ दरम्यान जागा मिळतील, असा पोलिसांचा कयास आहे. त्याखालोखाल काँग्रेस, शिवसेना आणि मनसेला जागा मिळतील. पालिकेत सत्ता कोणाची येईल, याबाबत पोलिस खात्री देत नाहीत. मात्र, भाजपला एकहाती सत्ता मिळणार नसल्याचे नमूद करण्यात आले आहे.
काँग्रेस आणि मनसेच्या घटलेल्या जागा भाजपच्या पारड्यात जातील. सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसला ‘अँटी इन्कम्बन्सी’चा काही प्रमाणात फटका बसणार असला, तरी मतविभागणीचा फायदा मिळेल, असे पोलिसांचे म्हणणे आहे. शिवसेना आणि काँग्रेस १० ते २० जागांच्या दरम्यान राहतील. शिवसेना काही ठिकाणी आघाडीवर असून, तेथे भाजपला फटका बसण्याची शक्यता आहे. मोदी लाटेनंतर निवडणुकीचे विश्लेषण करताना पोलिसांची दमछाक झाली आहे. ‘एमआयएम’ला जागा मिळणार नाहीत, असा पोलिसांचा अंदाज असून, मनसे सात ते आठ जागा मिळवेल असा दावा करण्यात आला आहे.

संघाची नाराजी भोवणार?
संघ परिवार तसेच इतर ​हिंदुत्ववादी संघटना काही ठिकाणीच सक्रिय होत्या. त्याचा फटका भाजपला बसण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. भाजपच्या तिकीट वाटपानंतर अंतर्गत त धुसफूस वाढली. पक्षाच्या कार्यालयाच्या दारात झालेले आंदोलन, शहराध्यक्षांच्या पोस्टर्सला काळे फासणे, मुख्यमंत्र्याची सभा रद्द होणे या घटनांमुळे भाजपची प्रतिमा मलीन झाल्याने विरोधी पक्षांना फायदा होण्याचे संकेत पोलिसांनी गोपनीय अहवालात दिले आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


​ नेदरलँडमध्ये भरली ‘माझी शाळा’

$
0
0

परदेशस्थ लहानग्यांची मराठीची भूक भागविणार

Chaitrali.Chandorkar@timesgroup.com
Tweet : @chaitralicMT

पुणे : राज्यातील मराठी शाळा बंद पडण्याच्या मार्गावर असताना परदेशात राहणाऱ्या लहान मुलांची मातृभाषेशी, संस्कृतीशी जोडलेली आपली नाळ तुटू नये यासाठी अॅमस्टरडॅममध्ये मराठी शाळेची मुहूर्तमेढ रोवण्यात आली आहे.
‘महाराष्ट्र मंडळ नेदरलँडस’तर्फे शिवजयंतीच्या मुहूर्तावर ‘माझी शाळा’ शाळेची सुरुवात करण्यात आली. या शाळेमध्ये मुलांवर मराठी भाषेशिवाय मराठमोळ्या परंपरांचे संस्कारही करण्यात येणार आहेत. ‘महाराष्ट्र मंडळ नेदरलँड्स’तर्फे वर्षभर विविध सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात येतात. सध्या तिथे दीडशे मराठी कुटुंबे वास्तव्यास आहेत. मंडळाच्या उपक्रमांचे महत्त्व मुलांना कळावे, मराठी वातावरणापासून दूर राहणाऱ्या या पिढीच्या मनात मातृभाषा रूजावी, या उद्देशाने शाळेची निर्मिती करण्यात आली आहे.
‘विशेष म्हणजे मंडळातील उत्साही कार्यकर्तेच शिक्षकांची भूमिका बजावणार आहेत. शाळा दर रविवारी भरणार असून, मुलांना मराठी बोलायला, वाचायला आणि लिहायला शिकविण्यात येणार आहे. मुलांचे उच्चार स्पष्ट व्हावेत यासाठी त्यांच्याकडून पारंपरिक श्लोक, गाणी, पाढे पाठ करून घेणार आहोत,’ अशी माहिती समन्वयक पूर्वा कोरडे यांनी दिली.
शाळेची सुरुवात शिवजयंतीदिनी झाल्यामुळे पहिल्या दिवशी अमर आणि जयश्री वाडेकर यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची गोष्ट सांगितली. सरस्वती पूजन आणि डॉ. अलकानंद राव यांच्या श्लोकपठणाने शाळेचा पहिला वर्ग भरला. पहिल्या दिवशी वीस मुले सहभागी झाली होती. प्रांजली कुलकर्णी यांनी मुलांना मराठीतील आकडे आणि स्वर यांची जुजबी ओळख करून दिली, असेही कोरडे म्हणाल्या.
मुलांना मराठी शिकविण्यासाठी पालकांकडून सातत्याने विचारणा करण्यात येत होती. यातूनच शाळेचा विचार पुढे आला आणि निशिकांत चौधरी यांनी नियोजन केले. मराठी शाळेमुळे मुलांना उन्हाळ्याच्या सुट्टीत मायदेशात गेल्यावर आजी आजोबांशी बोलताना त्याचा नक्कीच फायदा होणार आहे, असे पराग आकरे आणि संजय कदम यांनी सांगितले.

महाराष्ट्र मंडळाचा ‘महाकट्टा’
सामाजिक समस्यांवर चर्चा करण्यासाठी मंडळाने गेल्या महिन्यापासून महाकट्टा सुरू केला आहे. पहिल्या कट्ट्यावर ‘घर विकत घेताना’ या विषयावर आम्ही चर्चा केली होती. विशेष म्हणजे या भागातील सर्व भारतीय कुटुंबे सहभागी झाली होती. पुढील महिन्यात ‘घराची सुरक्षितता’ हा विषय निवडला आहे. गेल्या काही वर्षात तेथील भारतीय घरांमधील चोऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. भारतीय महिला उत्तम प्रतीचे (कॅरेट) सोन्याचे दागिने वापरतात, हे सर्वज्ञात आहे. तेथील नागरिक साधारणतः बारा अथवा चौदा कॅरेटचे दागिने वापरतात, त्यामुळे चोर भारतीय घरांवर पाळत ठेवून सोने आणि इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या चोऱ्या करतात. या वर मार्ग काढण्यासाठी आगामी कट्ट्यावर स्थानिक पोलिसांना मार्गदर्शनासाठी बोलावले आहे, अशी माहिती संजय कदम यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

राजकीय ज्वरासह उकाड्यातही वाढ

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

निवडणुकांच्या निकालाच्या प्रतीक्षेत असणाऱ्या राज्यावर राजकीय ज्वर चढलेला असताना पुण्यासह राज्यातील उकाडा आणखी तीव्र होऊ लागला आहे. त्यामुळे पुणेकरांना उन्हाच्या चटक्यासोबतच घामांच्या धारांचाही सामना करावा लागत आहे. आगामी दोन दिवसात परिस्थिती अशीच राहणार असल्याचे भाकित हवामान विभागाने वर्तविले आहे.
राज्यातील निवडणुकांसाठी मतदान होऊन एक दिवस लोटला आहे. आज, गुरुवारी मतमोजणी होणार आहे. त्यामुळे राज्यावरील राजकीय ज्वर कायम आहे. त्याचवेळी तापमानही वाढू लागल्याने झळा राज्याला सहन कराव्या लागत आहेत. पुण्यात बुधवारी ३५.९ अंश सेल्सिअस कमाल, तर १३ अंश किमान तापमानाची नोंद झाली. हे कमाल तापमान सरासरीपेक्षा ३.६ अंश सेल्सिअसने अधिक होते. लोहगाव येथे ३७.४ अंश सेल्सिअस कमाल तर, १६.२ अंश सेल्सिअस किमान तापमान नोंदले गेले. राज्यातील सर्वाधिक तापमानाची नोंद सोलापूर येथे (३८.५ अंश सेल्सिअस) झाली.
मकर संक्रमणानंतर संपूर्ण देशात तापमानात वाढ व्हायला सुरुवात झाली आहे. उत्तरेकडील राज्यातही तापमानात वाढ होत आहे. त्यामुळे राज्यातही आता थंडी गायब झाल्याचे चित्र आहे. राज्यात सर्वत्र तापमान वाढू लागले आहे. राज्यात बहुतांश ठिकाणी कमाल तापमानात सरासरीपेक्षा तीन ते पाच अंशांनी वाढ झाली आहे. बुधवारी अहमदनगर येथे ३४.४, जळगाव येथे ३३.८, कोल्हापूर येथे ३६.७, महाबळेश्वर येथे ३१.५, मालेगाव येथे ३७, सांगली येथे ३८, सातारा येथे ३७.२, सोलापूर येथे ३८.५, मुंबई येथे २८, उस्मानाबाद येथे ३६.९, औरंगाबाद येथे ३६.७, परभणी येथे ३६.२, अकोला येथे ३५.६ तर नागपूर येथे ३६.२ अंश सेल्सिअस इतक्या कमाल तापमानाची नोंद झाली. पुढील दोन दिवस उकाडा कायम राहणार असला, तरी तापमानात किंचित घट होण्याची शक्यता देखील हवामान विभागाने वर्तविली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महाशिवरात्रीसाठी भीमाशंकर सज्ज

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

देशातील बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेले श्री क्षेत्र भीमाशंकर महाशिवरात्रीच्या उत्सवासाठी सज्ज झाले आहे. गेल्या अनेक वर्षांपासून मंदिर परिसरात महाशिवरात्रीची यात्रा आयोजित करण्यात येत असून, यंदाही भाविकांच्या स्वागतासाठी मंदिर सज्ज झाले आहे.
सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्ये हिरव्यागार जंगलात वसलेल्या या मंदिरात महाशिवरात्रीची यात्रा मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. उद्या, शुक्रवारी (२४ फेब्रुवारी) महाशिवरात्रीच्या पार्श्वभूमीवर यात्रेला सुरुवातही झाली आहे. यात्रेनिमित्त देवस्थानतर्फे एसटीच्या जादा गाड्या, आरोग्य सुविधा, दर्शनबारी, पाणीपुरवठा अशा अनेक सुविधांची तयारी करण्यात आली आहे. महाशिवरात्रीच्या पहाटे शिवलिंगाचे दर्शन महत्वाचे मानले जात असल्याने नागरिक दोन दिवस आधीच भीमाशंकरमध्ये मुक्कामी येतात.
त्यामुळे भक्तनिवास आणि इतर काही नागरिकांनी भाविकांची राहण्याची व्यवस्था केली आहे. यात्रेला पोलिस विभागाकडून जादा पोलिस बंदोबस्त मिळणार नसल्याने देवस्थानच्या सुरक्षारक्षकांवर आणि होमगार्डवर ताण येणार आहे. मंदिराच्या सजावटीसाठी देवस्थानाने जय्यत तयारी केली आहे. मंदिराचे बॅरिकेटिंग, सजावट, रंगरंगोटी, स्वच्छता अशी कामे अंतिम टप्प्यात आली आहेत. एसटीच्या गाड्यांबरोबरच मिनी बसचीही व्यवस्था करण्यात आली आहे.
..
यंदाही बाजाराचे आकर्षण
भीमाशंकर येथे शिवलिंगाच्या दर्शनाबरोबरच पारंपरिक बाजार भरतो. या यात्रेत अजूनही जुन्या पध्दतीनेच व्यवहार चालतात. मध, कडधान्य, औषधी वनस्पती यांची खरेदी-विक्री येथे होते. या बाजारात खरेदी करण्यासाठी कोकणातूनही लोक येत असतात. कोकणातील लोक त्यांच्याकडील वस्तू देऊन घाटावरील मसाला आणि इतर वस्तू नेतात. यंदा हा बाजार भरला असून, कोकण कड्याजवळ दुकाने उभारण्यात आली आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

राज्यात टीबीचे ११० पेशंट

$
0
0

क्षयरोग तपासणी मोहिमेत आठ लाख जणांची तपासणी

म. टा. प्रतिनिधी, पुणे

क्षयरोगाची (टीबी) लक्षणे असणारे मात्र आजाराचे निदान न झालेले असे ११० पेशंट पुण्यासह राज्यात आढळून आले आहेत. एकूण पेशंटांमध्ये पुण्यातील दहा आणि पिंपरी चिंचवडमधील आठ पेशंटचा समावेश आहे.
सोळा ते तीस जानेवारीदरम्यान पाच महापालिका कार्यक्षेत्रात ही शोधमोहीम राबविण्यात आली. ‘मोहिमेंतर्गत राज्यात सात लाख ८० हजार जणांची तपासणी करण्यात आली. त्यांना टीबीची लागण झाली आहे की नाही याची खात्री कऱण्यात आली. त्यामध्ये मुंबई, पुणे, पिंपरी चिंचवड, ठाणे, भिवंडी निझामपूर या पालिकांचा समावेश असून, येथे ११० पेशंट आढळून आले. पुण्यामध्ये १ लाख ६० हजार जणांची तपासणी करण्यात आली. झोपडपट्टीतील नागरिकांना तपासणीत प्राधान्य देण्यात आले. टीबीचा संसर्ग रोखण्यासाठी आरोग्य खात्याने मोहीम राबविली. उपचार उपलब्ध करून संबंधितांचा आजार बरा करणे, हा मोहिमेचा उद्देश होता,’ अशी माहिती आरोग्य खात्याचे राज्य क्षयरोग नियंत्रण अधिकारी डॉ. संजीव कांबळे यांनी दिली.
टीबीच्या पेशंटचे निदान करून त्यांना वेळोवेळी उपचार मिळावेत, यासाठी निदान करणे गरजेचे होते. अनेक पेशंट हॉस्पिटलपर्यंत गेले; पण सामाजिक न्यूनगंड अथवा भीतीपोटी चाचण्या न करताच परतले. टीबीच्या आजाराचे निदान झाले नसले तरी, अनेक पेशंटमध्ये लक्षणे आढळली. या मोहिमेंतर्गत टीबीची लक्षणे असलेल्या पेशंटचा प्रामुख्याने शोध घेण्यात आला. संशयित व्यक्तींच्या थुंकीचे नमुने तपासणीसाठी घेण्यात आले. ज्या संशयितांच्या थुंकीमध्ये काहीही आढळले नाही अशांचे छातीचे एक्स रे, तसेच अन्य चाचण्या करण्यात आल्या. त्यातही काहीही न आढळल्याने पुढील विशेष चाचण्या करण्यात आल्या, असेही आरोग्य खात्यातील अधिकाऱ्यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

घरफोड्या करणारी नेपाळी टोळी अटकेत

$
0
0

सहा किलो चांदी, ६५ तोळे सोने जप्त

म. टा. प्रतिनिधी, पुणे

सुरक्षारक्षकाचे काम करून शेजारच्या सोसायट्यांमध्ये घरफोड्या करणाऱ्या सहा जणांच्या नेपाळी टोळीला चतुःश्रृंगी पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून बाणेर, बालेवाडीतील परिसरातील पाच घरफोडीचे गुन्हे उघडकीस आणण्यात यश आले आहे. त्यांच्याकडून सहा किलो चांदी आणि ६५ तोळे सोने असा २३ लाख २२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
दीपक उर्फ गुरू रंगनाथ जोशी (वय ३३, नालासोपारा, जि. पालघर), सागर देवराज ख्याती (वय ३३, कामगार नगर, पिंपरी), पदमबहादूर लच्छीबहादूर शाही (वय ४३, रा. खांडेवस्ती भोसरी) जगत कालू शाही (वय ३५, रा. कस्पटे वस्ती, वाकड), जनक गोरख शाही (वय ४०, रा.मल्हारनगर, काळेवाडी) आणि गगन उर्फ काल्या कोपुरे कामी (वय २७, रा.शिवनेरी पार्क, बालेवाडी, सर्व. मूळ नेपाळ), अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. तर, त्यांच्याकडून सोने घेणाऱ्या निरापद सुदर्शन दास (वय ५४, रा. पालघर) व एकेंद्र प्रसाद नाथ (वय ३७ ) यांनाही अटक करण्यात आली आहे.
पुण्यात वेगवेगळ्या परिसरात राहून सुरक्षारक्षकाचे काम करणारे हे आरोपी घरफोड्या करीत असल्याचे समोर आले आहे. यातील तिघे कुटुंबासह राहतात. गगन हा टोळीचा मुख्य सूत्रधार आहे, अशी माहिती पोलिस उपायुक्त गणेश शिंदे, सहायक आयुक्त वैशाली जाधव-माने यांनी पत्रकार परिषदेत दिली.
चतु:श्रृंगी पोलिस हद्दीमध्ये पेट्रोलिंग करत होते. त्यावेळी कर्मचारी प्रवीण पाटील यांना पाच ते सहा व्यक्ती बाणेर परिसरातील माऊली पेट्रोल पंपावर दरोडा टाकण्याच्या तयारीत असल्याची माहिती समजली. त्यानुसार वरिष्ठ निरीक्षक दयानंद ढोमे, सहायक निरीक्षक संदेश केंजळे, प्रमोद क्षीरसागर यांच्या पथकाने आरोपींना सापळा रचून अटक केली. त्यांच्याकडे तपास केला असता या टोळीने बाणेर, बालेवाडी परिसरातील फ्लॅट आणि रो हाउसमध्ये घरफोडी केल्याचे निष्पन्न झाले. त्यांनी गुन्ह्यात चोरलेला ऐवज विक्री केला होता. तो पोलिसांनी हस्तगत केला आहे. त्यांच्याकडे अधिक तपास सुरू आहे.

बंद फ्लॅट हेरून चोरी
पुण्यातील वेगवेगळ्या परिसरातील सोसायट्यांमध्ये आरोपी सुरक्षारक्षक म्हणून काम करत होते. त्यावेळी प्रत्येकजण आपापल्या परिसरातील सोसायट्यांची माहिती घेऊन त्यातील बंद फ्लॅट हेरत असत. त्यानंतर रात्री घरफोडी करत होते. सहा जणांपैकी काही जण सोसायटीजवळ लक्ष ठेवत तर, काही मुख्य रस्त्यावर थांबत होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

लाखोंच्या बिलातून ग्राहकाला दिलासा

$
0
0

तक्रार खर्चापोटी भरपाई देण्याचा महावितरणला आदेश

म. टा. प्रतिनिधी, पुणे

राज्य वीज वितरण कंपनीच्या वीजबिलातील रक्कम अधिक असल्यामुळे ग्राहक मंचाकडे दाद मागितलेल्या ग्राहकाला ग्राहक न्याय मंचाने दिलासा दिला आहे. ग्राहकाच्या वीज बिलाची योग्य पडताळणी करण्यात यावी, तसेच तक्रारीचा खर्च म्हणून तीन हजार रुपये देण्याचे आदेश मंचाने दिले.
अतिरिक्त जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंचाचे अध्यक्ष एम. के. वालचाळे, सदस्य शुभांगी दुनाखे, एस. के. पाचरणे यांनी हा निकाल दिला. या प्रकरणी पांडुरंग बन्सी गाडे, ड्रायव्हर कॉलनी, हनुमाननगर, थेरगाव यांनी राज्य वीज वितरण कंपनीचे उपकार्यकारी अभियंता, सांगवी यांच्याविरुद्ध दावा दाखल केला होता.
गाडे मजुरी करुन कुटूंबाचा उदरनिर्वाह चालवतात. त्यांनी घरगुती वापरासाठी वीज मीटर बसवला आहे. ऑक्टोबर २०१५ मध्ये त्यांना अचानक दहा लाख रुपयांचे बिल देण्यात आले. त्यानंतर चार नोव्हेंबर २०१५ रोजी त्यांचा विद्युत पुरवठा खंडित करण्यात आला. आपल्याला बेकायदा आणि अंदाजे वीज बिल देण्यात आले आहे. योग्य पडताळणी करून योग्य बिल दिल्यास आपण ते भरण्यास तयार आहोत, असेही त्यांनी मंचाकडे दाखल केलेल्या दाव्यात नमूद केले होते.
महावितरणतर्फे लेखी जबाब सादर करुन तक्रार मान्य नसल्याचे स्पष्ट करण्यात आले. तक्रारदाराकडे एकूण १३ खोल्या असून, त्यांच्या मागणीनुसारच दोन विद्युत जोड देण्यात आलेले आहेत. १८ जून २०१५ रोजी नवीन जोड देण्यात आले. तक्रारदाराच्या मीटरला कव्हर असल्यामुळे रिडींग घेण्यास अडचण येत होती. कव्हर बाजूला करुन पाहिले असता ८६,५६९ युनिट वीज वापर झाल्याचे दिसून आले. तक्रारदाराला नोटीस पाठवूनही त्यांनी रक्कम भरली नाही. तक्रारदाराकडे आठ ते नऊ भाडेकरु वीज वापरत आहेत. वारंवार कळवूनही बिल भरले नाही म्हणून पुरवठा खंडित करण्यात आल्याचे महावितरणतर्फे सांगण्यात आले.
दोन्ही बाजूचे म्हणणे ऐकून घेऊन मंचाने महावितरणने ऑक्टोबर २०१५ च्या वीज बिलाची योग्य पडताळणी करून द्यावी, असा आदेश ग्राहक मंचाने दिला. तक्रारदाराला तक्रारीचा खर्च म्हणून तीन हजार रुपये द्यावेत, असेही मंचाने बजावले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महापौर जगताप, नाना भानगिरे विजयी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

कोंढवा-वानवडी क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीतील वानवडी, रामटेकडी-सय्यदनगर आणि महंमदवाडी कौसरबाग या तिन्ही प्रभागांमध्ये अटीतटीच्या लढती पाहायला मिळाल्या. या तीन प्रभागांतील ११ जागांपैकी पाच जागांवर राष्ट्रवादी काँग्रेसने बाजी मारली असून भारतीय जनता पक्ष तीन आणि शिवसेना दोन जागांवर विजयी झाली आहे. यामध्ये नाना भानगिरे अवघ्या ६७ मतांनी विजयी झाले. तर, प्रशांत जगताप, त्यांच्या मातोश्री रत्नप्रभा जगताप हे मोठ्या मताधिक्याने विजयी झाले.

महापालिकेसाठी यंदा प्रथमच चार उमेदवारांचा प्रभाग करण्यात आला होता. या रचनेत पक्षाला मतदान केले जाण्याची शक्यता वर्तविली जात होती. मात्र, या क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीतील तिन्ही प्रभागांमध्ये मोठ्या प्रमाणावर ‘क्रॉस वोटिंग’ झाल्याचे दिसून आले. रामटेकडी-सय्यदगर (प्र. क्र. २४) या प्रभागातून गट अ मधून अपक्ष उमेदवार अशोक कांबळे विजयी झाले. तर, ब आणि क गटातून अनुक्रमे राष्ट्रवादी पुरस्कृत रुक्साना इनामदार आणि राष्ट्रवादीचे विद्यमान नगरसेवक आनंद अलकुंटे विजयी झाले. या प्रभागात ‘गट क’मध्ये राष्ट्रवादीच्याच फारूक इनामदार यांनी बंडखोरी केली होती. अलकुंटे यांना ११ हजार ३०५ मते मिळाली. इनामदार दुसऱ्या स्थानावर राहिले, त्यांना नऊ हजार ६४४ मते मिळाली. गट अ मध्ये अत्यंत चुरशीची लढत पाहायला मिळाली. चौथ्या फेरीपर्यंत काँग्रेसचे खंडू लोंढे आघाडीवर होते. मात्र, पाचव्या फेरीत अनपेक्षितपणे अपक्ष अशोक कांबळे यांनी विजयी आघाडी घेतली. ब गटातून राष्ट्रवादी पुरस्कृत रुक्साना इनामदार यांचा विजयी अवघ्या १७३ मतांनी विजयी झाल्या. त्यांना सात हजार ३०८ मते मिळाली. तर सारिका शिंदे यांना सात हजार १३५ मते मिळाली.

वानवडी (प्र. २५) प्रभागात अ व ब गटात भाजपचे धनराज घोगरे व कालिंदा पुंडे विजयी झाले. त्यांना अनुक्रमे आठ हजार ६८७ व १० हजार १११ मते मिळाली. त्यांच्या विरोधात काँग्रेसचे साहिल केदारी व राष्ट्रवादीच्या कांचन जाधव यांना अनुक्रमे सात हजार २२१ व आठ हजार १५४ मते मिळाली. महापौर प्रशांत जगताप आणि त्यांच्या मातोश्री रत्नप्रभा जगताप यांना अनुक्रमे १३ हजार ६८५ व ११ हजार ०७४ मते मिळाली.

महंमदवाडी-कौसरबाग प्रभागात ब गटात शिवसेनेचे नाना भानगिरे व भाजपचे जीवन जाधव यांच्यात अतिशय अतितटीचा सामना झाला. भानगिरे पहिल्या फेरीत पिछाडीवर होते. मात्र, दुसऱ्या फेरीत त्यांनी जाधव यांना मागे टाकले. मात्र, शेवटच्या फेरीपर्यंत त्यांचे मताधिक्य ३० ते ७० च्या दरम्यान खाली-वर जात होते. भानगिरे यांना अवघ्या ६७ मतांनी विजय झाला. या गटात भानगिरे यांना आठ हजार ३२३, जाधव यांना आठ हजार २५६ आणि फारूक इनामदार यांना आठ हजार १४० मते मिळाली. तसेच, अ गटातून शिवसेनेच्या प्राची आल्हाट, क गटातून भाजपचे संजय घुले आणि ड गटातून राष्ट्रवादीच्या नंदा लोणकर विजयी झाल्या.


इनामदारांना आठ आणि नऊ हजार मते

राष्ट्रवादीकडून विद्यमान नगरेसवक फारूक इनामदार यांना महंमदवाडी-कौसरबाग प्रभागातून अधिकृत उमेदवारी होती. तर, इनामदार यांनी रामटेकडी-सय्यदनगर प्रभागात राष्ट्रवादीच्या उमेदवाराविरोधात बंडखोरी केली होती. इनामदार यांना दोन्ही प्रभागात अनुक्रमे आठ हजार १४० आणि नऊ हजार ६४४ मते मिळाली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


बारामती राष्ट्रवादीचाच बालेकिल्ला

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, बारामती

बारामती तालुक्यामध्ये जिल्हा परिषदेच्या सहा, तर पंचायत समितीच्या सर्व बारा जागांवर विजय मिळवून बारामती हा राष्ट्रवादी काँग्रेसचाच बालेकिल्ला असल्याचे पुन्हा सिद्ध झाले. भाजपसह इतर पक्ष या ठिकाणी चारीमुंड्या चीत झाले.

बारामती तालुक्यातील जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निकालावर संपूर्ण महाराष्ट्राचे नव्हे, देशाचे लक्ष लागले होते. गेल्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसला झेडपीच्या एका जागेवर, तर पंचायत समितीच्या चार जागांवर पराभव स्वीकारावा लागला होता. मात्र, पुन्हा पराभवाचा सामना करावा लागू नये, म्हणून अजित पवार यांनी बारामती तालुक्यात दोन दिवस तळ ठोकला होता. नाराज पदाधिकाऱ्यांना पवार यांनी आपले राजकीय कौशल्य वापरून आपलेसे केले.

दुसरीकडे, भारतीय जनता पक्षाला मात्र बंडखोरांचा सर्वाधिक फटका बसला आहे. मित्रपक्षांना विचारात न घेता ही निवडणूक लढविल्याने हक्काची ‘मतपेढी’ असणारा जिरायत भाग भाजपच्या हातातून गेला. जिरायत भागात भाजपच्या उपध्यक्षाविषयी असणारी नाराजी भाजपला महागात पडली असल्याचे चित्र आलेल्या निकालावरून स्पष्ट झाले आहे.

जिल्हा परिषदेचे विजयी उमेदवार

सुपे-मेडद : भरत मल्हारी खैरे

माळेगाव-पणदरे : रोहिणी रवीराज तावरे

वडगाव निंबाळकर-मोरगाव : विश्वासराव नारायण देवकाते

करंजे पूल-निबूत : प्रमोद भगवानराव काकडे

सांगवी-डोर्लेवाडी : मीनाक्षी किरण तावरे

शिर्सूफळ-गुणवडी : रोहित राजेंद्र पवार

पंचायत समितीचे विजयी उमेदवार

सुपा : नीता संजय बारवकर

मेडद : शारदा राजेंद्र खराडे

गुणवडी : भारत यशवंत गावडे

शिर्सूफळ : लिलाबाई अशोक गावडे

माळेगाव बु. : संजय पंडित भोसले

मोरगाव : राहुल दत्त्तात्रय भापकर

निबूत : नीता नारायण फरांदे

सांगवी : अबोली रतनकुमार भोसले

पणदरे : रोहित बळवंतराव कोकरे

डोर्लेवाडी : राहुल विठ्ठल झारगड

करंजे पूल : मेनका नवनाथ मगर

वडगाव निबांळकर : प्रदीप तुकाराम धापटे



पुरंदरमध्ये शिवसेना विजयी

सासवड : अत्यंत चुरशीच्या झालेल्या जिल्हा परिषदेच्या ४ गटांपैकी ३ ठिकाणी, तर पंचायत समितीच्या ८ पैकी ६ जागा जिंकून शिवसेनेने पुरंदर तालुक्यात एकतर्फी विजय मिळवला आहे. भाजप, मनसे, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षांना या ठिकाणी धक्का बसला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसची अंतर्गत बंडाळी व गटबाजी याचा फायदा सेनेला व काही ठिकाणी काँग्रेसला झाला. जिल्ह्यात लक्षवेधी ठरलेल्या बेलसर-माळशिरस गटात राष्ट्रवादी काँग्रेसचे ताकदवान नेते सुदाम इंगळे यांचा पराभव जिव्हारी लागणारा ठरणार आहे.

जिल्हा परिषदेतील विजयी उमेदवार

१) दिवे-गराडे गट : झेंडे ज्योती राजाराम, शिवसेना, विजयी; पराभूत जगदाळे स्वाती निलेश, मनसे.

२) बेलसर-माळशिरस गट : दत्तात्रय मारुती झुरंगे, काँग्रेस, विजयी; पराभूत सुदाम कोंडिबा इंगळे, राष्ट्रवादी

३) वीर-भिवडी गट : दिलीप सोपान यादव, शिवसेना, विजयी; पराभूत पिनू शेठ काकडे, काँग्रेस

४) कोळविहीरे-नीरा गट : पवार शालिनी शिवाजी, शिवसेना विजयी; पराभूत काकडे तेजश्री विराज, राष्ट्रवादी काँग्रेस

पंचायत समिती निवडून आलेले उमेदवार

दिवे गण : जाधव रमेश एकनाथ, शिवसेना

गराडे गण : काळे दत्तात्रय शंकर, शिवसेना

माळशिरस गण : यादव सोनाली कुलदीप, काँग्रेस

बेलसर गण : कोलते सुनीता बाळासाहेब, काँग्रेस

भिवडी गण : लोळे नलिनी हरिभाऊ, शिवसेना

वीर गण : जाधव अर्चना समीर, शिवसेना

कोळविहीरे गण : म्हस्के अतुल रमेश, शिवसेना

नीरा-शिवतक्रार गण : माने गोरखनाथ बाबूराव, शिवसेना


मतमोजणी केंद्रावरील घडामोडी

मतमोजणी केंद्रावर प्रसारमाध्यमांना माहिती देण्यासाठी कोणतीही यंत्रणा न ठेवल्याने नाराजी

निवडणुकीत १२ जागा असताना केवळ एकाच संगणकावर काम ठेवल्याने कर्मचाऱ्यांची तारांबळ

बैठक-चहापान व्यवस्था व बाहेरील समर्थकांना ऐकू येईल अशी ध्वनिक्षेपक यंत्रणा नसल्याने बाहेर गोंधळ

शेवटच्या सहा फेऱ्यांची मोजणी सुरू असताना पोलिस बंदोबस्त भेदून सर्व पक्षांचे समर्थक हातात झेंडे घेऊन मतमोजणी केंद्रात घुसल्याने गोंधळ

शिवसेनेने पुरंदर पंचायत समितीवर ८ पैकी ६ जागा जिंकून भगवा फडकावल्याने सेनेच्या कार्यकर्त्यांचा जल्लोष

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘सीएम’चे वेलकम; अजितदादांना ‘गुडबाय`

$
0
0

Sunil. Landage@timesgroup.com

पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेचा निवडणूक निकाल पाहता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आश्वासक कारभाराचे शहरवासीयांनी `वेलकम` केले असून, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या एकहाती सत्तेला `गुडबाय` केले आहे. देश, राज्य आणि महापालिकेतही भाजपची लाट असल्याचे सिद्ध करीत स्थानिक नेतृत्त्वावर प्रथमच इतक्या मोठ्या प्रमाणावर विश्वास दाखविण्यात आला आहे.

शहराचा इतिहास लक्षात घेता १९८६ पासून आजतागायत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचीच सत्ता राहिली होती. या निवडणुकीच्या निमित्ताने प्रथमच बारामतीकरांची हुकुमत संपुष्टात आली आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांच्या आश्वासक कारभारासाठी सत्तेच्या पायघड्या घालण्यात आल्या असून, विकासाचा दावा करणाऱ्या माजी उपमुख्यमंत्री अजितदादांच्या कारभाराला हद्दपार करण्यात आले आहे. यापुढील काळात आमदार लक्ष्मण जगताप आणि महेश लांडगे ही राम-लक्ष्मणाची जोडी कारभार पाहणार असून, त्यांना खासदार अमर साबळे आणि आझम पानसरे यांचे मार्गदर्शन लाभणार आहे. विशेष म्हणजे साबळे वगळता कारभाराची सूत्रे हाती घेणारी ही सर्व मंडळी अजितदादांच्याच तालमीत तयार झाली आहेत. आता त्यांच्याच मदतीने मुख्यमंत्र्यांनी अजितदादांना धोबीपछाड केले आहे.

निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी काँग्रेसला खिंडार पाडण्यात भाजपला यश आले. सर्वप्रथम आमदार महेश लांडगे यांना गोटात सामावून घेऊन मुख्यमंत्र्यांनी भाजपची ताकद वाढविली. त्यापाठोपाठ २५ हून अधिक नगरसेवक आणि काही महत्त्वाच्या पदाधिकाऱ्यांनाही पक्षात घेऊन उमेदवारी दिली. त्यामुळे पक्षाचे संख्याबळ तीनहून थेट ७८ पर्यंत पोहचले. शिवाय सत्तेचे दरवाजेही खुले झाले. या माध्यमातून पालिकेचा पारदर्शक कारभार पाहण्यासाठी शहरवासीय उत्सुक आहेत. अनधिकृत बांधकामे, शास्तीकर, आरक्षणांचा विकास आणि रेडझोन या प्रश्नांबाबत प्रशासन सकारात्मक निर्णय घेईल, शी अपेक्षा व्यक्त होत आहे.

महापालिकेच्या निवडणुकीत भाजपने पारदर्शक जाहीरनाम्यात `आपले पिंपरी-चिंचवड-स्मार्ट पिंपरी-चिंचवड` या घोषणेसह पालिकेतील हजारो कोटी रुपयांची अखंडित भ्रष्टाचार मालिका उध्वस्त करण्याचा निश्चय केला होता. बहुमताने कमळ फुलविण्याची साद घातली होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

'पारदर्शक' सभेच्या भागातही कमळालाच साथ

$
0
0

पुणे: शहराच्या मध्यवस्तीत भारतीय जनता पक्षाचा वरचष्मा कायम असल्याचे महापालिका निवडणुकांनी पुन्हा सिद्ध केले आहे. शनिवार-नारायण, सदाशिव पेठ, नवी पेठ-पर्वती यासह रास्ता-रविवार पेठेमध्ये १२ पैकी भाजपचे नऊ नगरसेवक निवडून आले आहेत. या प्रभागाच्या हद्दीत झालेली मुख्यमंत्र्यांची सभा रद्द होऊनही मतदारांनी भाजपवरच पूर्ण विश्वास दाखवल्याचे स्पष्ट झाले आहे.

या प्रभागात भाजपने काही धक्कादायक निर्णय घेऊन चार ते पाच विद्यमान नगरसेवकांचे तिकीट कापले होते. त्यामुळे, पक्षांतर्गत नाराजीचा तसेच, शिवसेनेशी युती नसल्याने त्याचा फटका बसेल, अशी शक्यता वर्तवली जात होती. मात्र, सर्व शंका दूर सारून भाजपने बहुतेक जागांवर दणदणीत विजय मिळवला. पूर्व भागात आंदेकर कुटुंबीयांनी वर्चस्व कायम ठेवले. तर, रास्ता पेठ-रविवार पेठ भागातून विशाल धनवडे यांनी भाजपच्या अरविंद कोठारी यांचा पराभव केला. शनिवार-सदाशिव पेठेमध्ये मनसेच्या विद्यमान नगरसेविका रूपाली पाटील यांचा भाजपच्या गायत्री खडके-सूर्यवंशी यांनी साडेअकरा हजार मतांनी पराभव केला. भाजपच्या मुक्ता टिळक यांनी राष्ट्रवादीच्या विद्या पोकळे यांचा तब्बल २३ हजार मतांनी पराभव केला.

शिवसेनेचे गटनेते पराभूत

नवी पेठ-पर्वती (प्रभाग २९) भागातून शिवसेनेचे गटनेते अशोक हरणावळ यांचा धक्कादायक पराभव झाला. इथून राष्ट्रवादीचे विद्यमान नगरसेवक विनायक हणमघर सुद्धा पराभूत झाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ओघवत्या वाणीत उलगडला शिवकाल

$
0
0

पं. हृदयनाथ मंगेशकर, शिवशाहिरांनी केले मंत्रमुग्ध

म. टा. प्रतिनिधी, पुणे

आपल्या अमोघ वाणीतून ते शिवकाल उलगडत होते, तर ते संगीत आणि गाण्यातून साडेतीनशे वर्षांपूर्वीचा काळ जिवंत करत होते. ही जोडगोळी म्हणजे शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे आणि ज्येष्ठ संगीतकार पं. ह्रदयनाथ मंगेशकर होय... छत्रपती शिवरायांच्या महान कार्याचा गौरव वक्तृत्व आणि संगीतातून झाला आणि रोमांचक शिवकालाचे अनेक पैलू उलगडत गेले...
छत्रपती श्री शिवाजी महाराजांचे सरसेनापती प्रतापराव गुजर यांच्या ३४२ व्या पुण्यतिथीनिमित्त दीनानाथ हॉस्पिटलमध्ये दीनायन कलापर्व अंतर्गत ‘वेडात मराठे वीर दौडले सात’ हा कार्यक्रम शुक्रवारी सादर झाला. कार्यक्रमात पं. हृदयनाथ मंगेशकर यांनी संगीतातून, तर शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी आपल्या अमोघ वाणीतून छत्रपती शिवरायांच्या आयुष्यातील अनेक प्रसंग रोमांचक पद्धतीने सादर केले.
‘इकडे सिध्दी जौहर, तिथे अफझलखान, पलिकडे मुलूखमैदान’ यामधून शिवरायांच्या जन्मापूर्वीची प्रतिकूल परिस्थिती, ‘गुणी बाळ असा जागसी का रे वाया, नीज रे नीज शिवराया’ यामधून शिवजन्मोत्सवाचा आनंद, तर ‘हे हिंदू शक्ती तम प्रभो शिवाजी राजा’ या गीतातून शिवरायांच्या महान कार्याचा गौरव करण्यात आला.
पुरंदरे यांनी आपल्या ओघवत्या वाणीतून छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मापूर्वीची परिस्थिती उलगडून दाखविली. त्यानंतर शिवरायांचा शिवनेरीवर झालेला जन्म, राजमाता जिजाऊ यांचे शिवरायांवरील संस्कार, स्वराज्य निर्माण करण्यासाठी रायरेश्वरावर घेतलेली शपथ, पहिला गड जिंकून स्वराज्यावर चढविलेले तोरण, शिवकालातील अतिशय कठीण प्रसंग पुरंदरे यांनी उलगडले.
‘अपराधीचा प्रहर संपेना, तीळ उसंत नाही जीवाला’,‘ वेडात मराठे वीर दौडले सात’ आदी गाण्यांनी मंगेशकर आणि कलाकारांनी सादर केली. स्वतः मंगेशकर, विभावरी जोशी, शैलेश वरखडे यांनी आपल्या गायकीने रसिकांना मंत्रमुग्ध केले. राजेंद्र दूरकर, विशाल गंडुतवार, विवेक परांजपे यांनी साथसंगत केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘कमळा’च्या लाटेवर ‘आरपीआय’ स्वार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

महापालिका निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचे कमळ चिन्ह घेऊन निवडणूक लढण्याचा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाने (आरपीआय) घेतलेला निर्णय चांगलाच फायदेशीर ठरला आहे. ‘आरपीआय’ने लढविलेल्या ९ जागांपैकी सात जागांवर कमळ चिन्हाचा उपयोग करण्यात आला. त्यापैकी पाच जागांवर ‘कमळ’ फुलले आहे. उर्वरित दोन ठिकाणी चिन्ह न मिळाल्याचा फटकाही पक्षाला बसला आहे.
महापालिकेच्या निवडणुकीसाठी भाजप आणि आरपीआयमध्ये युती झाल्याने भाजपने दहा जागा आरपीआयला सोडल्या. त्यातील एक अर्ज बाद झाल्याने नऊ जागांवर पक्षाने निवडणूक लढवली. त्यापैकी दोन उमेदवारांना एबी फॉर्म उशिरा मिळाल्याने वेगवेगळ्या चिन्हावर निवडणूक लढवावी लागली. त्यातील नवी पेठ, पर्वती या प्रभाग क्रमांक २९ मध्ये भाजपचे डमी उमेदवार सरस्वती शेंडगे यांनी आयत्यावेळी उमेदवारी अर्ज मागे न घेतल्याने त्यांना कमळ चिन्ह मिळाले. पालकमंत्री गिरीश बापट आणि शहराध्यक्ष योगेश गोगावले यांनी पत्रकार परिषद घेऊन या प्रभागातील आरपीआयच्या उमेदवार सत्यभामा साठे याच आमच्या अधिकृत उमेदवार असतील असे स्पष्ट केले. मात्र, या प्रभागातील भाजपच्या पॅनलने साठे यांना मिळालेल्या ‘करवत’ चिन्हाचा प्रचार न करता शेंडगे यांचा प्रचार सुरु ठेवला. यामुळे साठे यांना स्वतंत्र प्रचार करावा लागला. परिणामी करवत चिन्ह घेऊन लढणाऱ्या साठे यांना पराभव स्वीकारावा लागला. या प्रभागातून भाजपचे सर्व उमेदवार निवडून आले.
भाजपच्या चिन्हावर निवडणूक लढविणाऱ्या आरपीआयच्या उमेदवारांना तसेच पक्षाच्या शहराध्यक्षांना राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय सामाजिक न्यायराज्यमंत्री रामदास आठवले यांनी बडतर्फ केले. निवडणुकीनंतर याविषयी निर्णय घेतला जाईल, अशी भूमिका घेऊन संबंधित उमेदवारांनी कमळ चिन्हावर निवडणूक लढविली. त्यामुळे या निवडणुकीत आरपीआयचे पाच उमेदवार निवडून आले. पालिकेत सत्ता स्थापनेनंतर भाजप आरपीआयच्या उमेदवारांचा स्वतंत्र गट स्थापन करण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर ‘कमळ’ चिन्ह घेऊन निवडणूक लढविणाऱ्या आरपीआयचे अस्तित्व कायम राहणार असल्याचे पदाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

आंबेडकरांना अभिवादन
आरपीआयच्या विजयी उमेदवारांनी शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एकत्र जमून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला. पक्षाचे शहराध्यक्ष महेंद्र कांबळे यांनी पेढे वाटून सर्व उमेदवारांचे कौतुक केले. या वेळी बाळासाहेब जानराव, वसंत बनसोडे, परशुराम वाडेकर, महेंद्र शिंदे, आसित गांगुर्डे उपस्थित होते.
...

विजयी उमेदवाराचे नाव
डॉ. सिद्धार्थ धेंडे फुलेनगर, नागपूर चाळ, प्रभाग २
फरजाना शेख फुलेनगर, नागपूरचाळ प्रभाग २
सोनाली लांडगे पुणे विद्यापीठ, वाकडेवाडी प्रभाग ७
सुनीता वाडेकर औंध, बोपोडी, प्रभाग ८
नवनाथ कांबळे कोरेगावपार्क, घोरपडी प्रभाग २१

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

९७ नव्या चेहऱ्यांना संधी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

पुणे महानगरपालिकेच्या १६२ जागांसाठी अतिशय चुरशीने झालेल्या निवडणुकीत विविध राजकीय पक्षांचे मिळून ९७ नवीन चेहरे प्रथमच सभागृहात पाऊल ठेवणार आहेत.
निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या शंभरपैकी ५५ विद्यमान नगरसेवकांना पुन्हा सभागृहात जाण्याची संधी मिळाली असून, दहा माजी नगरसेवकांना ‘ब्रेक’नंतर पुणेकरांनी पालिकेत प्रतिनिधीत्व करण्याची संधी दिली आहे.
महापालिकेच्या १६२ जागांसाठी झालेल्या निवडणुकीचे निकाल गुरुवारी जाहीर झाले. या निवडणुकीत आश्चर्यकारक निकालांची नोंद झाली आहे. त्यामध्ये अनेक विद्यमान नगरसेवकांना घरी बसण्याची वेळ आली असून, पत्ता कट झालेल्यांमध्ये विद्यमान उपमहापौर, स्थायी समितीचे अध्यक्ष, सभागृह नेते, माजी महापौर, तसेच गटनेते यांचा समावेश आहे. या शिवाय अनेक विद्यमान नगरसेवकांची सेवाही पुणेकरांनी खंडित केली आहे. ४१ प्रभागातील १६२ जागांसाठी राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, भारतीय जनता पक्ष, शिवसेना, मनसे, आरपीआय, अपक्ष यांच्यासह १०९० उमेदवार रिंगणात होते. निवडून आलेल्या नव्या चेहऱ्यांपैकी बहुसंख्ये चेहरे भारतीय जनता पक्षाचे आहेत. एकूण ९७ नव्या चेहऱ्यांमध्ये भाजपचे ७१, शिवसेनेचे पाच, राष्ट्रवादी काँग्रेसचे १६, काँग्रेस, मनसे आणि एमआयएमचा प्रत्येकी एक आणि दोन अपक्षांचा समावेश आहे.
यापूर्वी नगरसेवक म्हणून कार्यरत असणाऱ्या दहा जणांवर जनतेने पुन्हा विश्वास दाखवला आहे. त्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन, भाजपचे चार, काँग्रेसचे एक आणि शिवसेनेच्या तिघांचा समावेश आहे.

नव्या समीकरणांचा समावेश
शहरातील ४१ प्रभागांपैकी सहा प्रभागांतील चारही गटातील उमेदवार पूर्णपणे नवे आहेत. अनेक प्रभागांमध्ये तीन नवीन आणि एक जुना लोकप्रतिनिधी असे समीकरण आहे. केवळ एकाच प्रभागामध्ये चारही जुन्या नगरसेवकांना पुन्हा संधी मिळाली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

राष्ट्रवादी काँग्रेसचा नव्या गड्याचा शोध

$
0
0

पराभवामुळे वंदना चव्हाण यांचा राजीनामा

म. टा. प्रतिनिधी, पुणे

राष्ट्रवादी काँग्रेसच्या शहराध्यक्षा खासदार अॅड. वंदना चव्हाण यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. हा राजीनामा पक्षाने स्वीकारला नसला तरी, आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टिने शहराध्यक्षपदाच्या नव्या चेहऱ्याचा शोध सुरु झाला आहे.
गेल्या दहा वर्षांपासून महापालिकेत असणारी राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता भारतीय जनता पक्षाने उधळून लावून विक्रमी बहुमत मिळवले आहे. पक्षाच्या दारूण पराभवाची जबाबदारी स्वीकारून श्रीमती चव्हाण यांनी पदाचा राजीनामा पक्षाध्यक्षांकडे सोपवला. चव्हाण यांच्या शहराध्यक्षपदाला पक्षातील अनेक पदाधिकाऱ्यांनी यापूर्वी विरोध केला होता. मात्र, त्याकडे दुर्लक्ष करून शरद पवार यांनी चव्हाण यांनाच कायम ठेवले. महापालिकेच्या निवडणुकीत पक्षाचा दारुण पराभव पाहता चव्हाण यांनी दिलेला राजीनामा स्वीकारला जाण्याची शक्यता आहे. या पदासाठीच्या योग्य व्यक्तीचा शोध घेण्यास सुरुवात करण्यात आली आहे.
केंद्र आणि राज्य सरकार बरोबरच महापालिकेत सत्तेत आलेल्या भाजपच्या रणनीतीला तोड देऊ शकेल आणि पक्षाचा संघटनात्मक पाया विस्तारू शकेल अशा पदाधिकाऱ्याचा विचार राष्ट्रवादीकडून होण्याची शक्यता आहे. त्यामध्ये प्रामुख्याने माजी उपमहापौर आणि ज्येष्ठ नगरसेवक दीपक मानकर, माजी महापौर प्रशांत जगताप, माजी सभागृह नेते सुभाष जगताप यांच्याबरोबर काही ज्येष्ठ पदाधिकाऱ्यांची नावे चर्चेत आहेत.

विरोधी पक्षनेतेपदी कोण?
गेली अनेक वर्षे महापालिकेत सत्ताधारी असलेली राष्ट्रवादी काँग्रेस यंदा सत्तेपासून दूर गेली. महापालिकेत भाजपला निर्विवाद वर्चस्व मिळाल्याने पालिकेत प्रमुख विरोधी पक्ष म्हणून आता राष्ट्रवादी काँग्रेसला जबाबदारी पार पाडावी लागेल. मित्र पक्ष असलेल्या काँग्रेस आणि इतर पक्षांबरोबर समन्वय ठेवून भाजपच्या चुकीच्या निर्णयांवर बोट ठेवण्यासाठी तरुण चेहरा पुढे येण्याची शक्यता आहे. त्यामध्ये माजी स्थायी समिती अध्यक्ष आणि तिसऱ्यांदा विजयी झालेले विशाल तांबे, शहर सुधारणा समितीचे माजी अध्यक्ष चेतन तुपे, सुनील टिंगरे यांच्या नावाचा विचार होण्याची शक्यता आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


किरकोळ मतांनी डब्बा गुल

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

महापालिका निवडणुकीत अनेक लढती या उत्कंठा वाढवणाऱ्या ठरल्या. अवघ्या ६७ मतांपासून दोन हजार मतांच्या फरकाने ३३ नगरसेवक निवडून आले आहेत. या उत्कठांवर्धक लढतींचा सर्वाधिक फटका भारतीय जनता पक्षाला बसला असून, त्यांचे १६ उमेदवार सपशेल आपटले आहेत. मात्र, उत्कंठावर्धक लढतींमध्ये भाजपच्या १३ उमेदवारांची सरशी झाली आहे.
भाजपच्या लाटेत अनेक पक्षांचे उमेदवार पालापाचोळ्यासारखे उडाले. केवळ पाचशे मतांच्या फरकाने चौदा उमेदवारांना घरी बसण्याची वेळ आली. त्यामध्ये सर्वाधिक सहा भाजपचे, पाच राष्ट्रवादी काँग्रेसचे तर, काँग्रेस, शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या एका उमेदवाराचा समावेश आहे. त्याचवेळी ५०० मतांच्या फरकाने निवडून आलेल्या उमेदवारांमध्ये सर्वाधिक म्हणजेच आठ उमेदवार भाजपचे आहेत. त्याखालोखाल शिवसेना (३), राष्ट्रवादी (२) आणि मनसेच्या एका उमेदवाराचा समावेश आहे. शिवसेनचे प्रमोद उर्फ नाना भानगिरे अवघ्या ६७ मतांनी विजयी झाले आहेत. त्यांनी भाजपच्या जीवन जाधव यांचा पराभव केला.
बाणेर येथे अशीच ‘हेविवेट’ लढत पुणेकरांना पाहण्यास मिळाली. राष्ट्रवादी काँग्रेसचे बाबूराव चांदेरे केवळ १२८ मतांनी विजयी झाले. चांदेरे यांनी भाजपच्या राहुल कोकाटेंचा पराभव केला. आमदार योगेश टिळेकर यांच्या मातोश्री रंजना टिळेकर ३३४ मतांनी विजयी झाल्या. मनसेचे उमेदवार आणि नगरसेवक वसंत मोरे यांची दक्षिण पुण्यातील लढतही गाजली. भाजपच्या अभिजित कदम यांचा त्यांनी अवघ्या २८३ मतांनी पराभव केला.
महापालिकेतील निवडणुका अनेक ठिकाणी पंचरंगी झाल्यामुळे तेथील चुरस वाढल्याचे दिसून आले. उपनगरांमधील लढतींमध्ये चुरस मोठ्या प्रमाणात पाहावयास मिळाली. पैसा, गुंडगिरी, भेटवस्तूंचे वाटप जोरदार झाले. निकालाअखेर भाजपच्या लाटेत अनेकांची स्वप्नेही धुळीला मिळाल्याचे दृश्य मतमोजणी केंद्रामध्ये दिसले.

पाचशे मतांनी पडलेले उमेदवार

पक्ष संख्या

भाजप ०६

राष्ट्रवादी काँग्रेस ०५

काँग्रेस ०१

शिवसेना ०१

मनसे ०१

...............

हजार मतांनी पडलेले उमेदवार

पक्ष संख्या

भाजप ०६

राष्ट्रवादी काँग्रेस ०१

शिवसेना ०१

........

हजार ते दोन हजाराने पडलेले उमेदवार

पक्ष संख्या

भाजप ०४

राष्ट्रवादी काँग्रेस ०५

शिवसेना ०१

अपक्ष ०१

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आजपासून दोन दिवस पुण्यात ऑटो एक्स्पो

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

वाहन खरेदीचे सर्व पर्याय एका ठिकाणी उपलब्ध करून देण्यासाठी ‘महाराष्ट्र टाइम्स’तर्फे शनिवारपासून (ता. २५) दोन दिवसीय ऑटो एक्स्पोचे आयोजन करण्यात आले आहे.
गेले वर्ष वाहनविक्रीसाठी संमिश्रच ठरले. या पार्श्वभूमीवर नव्या वर्षात अनेक कंपन्यांनी आपली नवी उत्पादने सादर केली आहेत. त्यामुळे वेगवेगळ्या शोरूममध्ये जाऊन वाहनांची पाहणी करण्यापेक्षा सर्वच वाहन कंपन्यांचे विविध पर्याय ‘मटा ऑटो एक्स्पो’मध्ये एकाच छताखाली पाहण्याची संधी उपलब्ध होणार आहे.
हॅचबॅक, सेदान, कॉम्पॅक्ट सेदान, एसयूव्ही आदी श्रेणीतील विविध कंपन्यांच्या कार जवळून पाहता येणार आहेत. या शिवाय वाहन खरेदीच्या वेगवेगळ्या स्कीम्स, ऑन दी स्पॉट गिफ्ट्स आदींचे एक्स्पोमध्ये प्रमुख आकर्षण आहे. म्हात्रे पुलाजवळील डी. पी. रोडवरील सिद्धी गार्डन येथे आज, शनिवारी अकरा वाजता प्रदर्शनाला सुरुवात होणार असून, आज आणि उद्या (रविवारी) सकाळी अकरा ते सायंकाळी सात या वेळेत प्रदर्शन सर्वांसाठी विनामूल्य खुले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

निम्म्याहून अधिक नगरसेविकांची एंट्री

$
0
0

भाजपच्या तिकिटावर ५४ महिला सभागृहात

म. टा. प्रतिनिधी, पुणे

पुणे महानगरपालिकेमध्ये यंदाही महिलांचा वरचष्मा राहणार आहे. गुरुवारी लागलेल्या निकालात एकूण १६२ नवनिर्वाचित नगरसेवकांपैकी ८४ महिला नगरसेवक निवडून आल्या आहेत.
राजकारणात महिलांचा सक्रिय सहभाग असावा म्हणून ५० टक्के आरक्षणाची तरतूद करण्यात आली. मात्र, आरक्षणाचा आकडा ओलांडून त्यापेक्षा अधिक महिला नगरसेवकांनी सभागृहात पाऊल ठेवले आहे. सर्वसाधारण गटातून दोन महिला तर अनुसूचित जाती गटातून एक महिला पुरुष प्रतिस्पर्ध्याला पराभूत करून विजयी झाल्या आहेत. निवडणुकीत निवडून आलेल्या पुरुष नगरसेवकांची संख्या ७८वर पोहोचली आहे. निवडून आलेल्या महिला नगरसेविकांमध्ये भाजपाच्या ५४, राष्ट्रवादीच्या १९, काँग्रेसच्या ४, शिवसेनेच्या ४, अपक्ष दोन, एमआयएमच्या एकचा समावेश आहे. भाजपाच्या निवडून आलेल्या ५४ नगरसेविकांमध्ये दहा विद्यमान तर, एका माजी नगरसेविकेचा समावेश आहे. यातील दोन विद्यमान नगरसेविकांनी काँग्रेसमधून भाजपामध्ये प्रवेश केला होता.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या १९ महिला नगरसेविका निवडून आलेल्या आहेत. त्यामध्ये आठ विद्यमान नगरसेविकांचा समावेश असून, त्यापैकी दोघींनी महापौरपदही भूषविले आहे. तर एक महिला नगरसेविका स्थायी समितीची माजी अध्यक्षही आहे.
काँग्रेसचा दणकून पराभव झाला असला तरी, त्यांच्या चार नगरसेविका निवडून आल्या आहेत. शिवसेनेच्याही चार नगरसेविकांना निवडून येण्यात यश आले आहे. अश्विनी लांडगे यांच्या रुपाने एमआयएम पक्षाने महानगरपालिकेत खाते उघडले आहे. आजपर्यंत कुटूंबांची जबाबदारी सक्षमपणे सांभाळणाऱ्या महिलांच्या हाती पुणेकरांनी विकासाची दोरी दिली असून, त्या विश्वासाला कशा पात्र ठरतात हे नजीकच्या काळात स्पष्ट होईल.

महापालिकेतील नगरसेविकांचे बलाबल
भाजपा - ५४
राष्ट्रवादी - १९
काँग्रेस - ४
​शिवसेना - ४
अपक्ष - २
एमआयएम - १
एकूण - ८४

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अजित पवार आता ‘कारभारी’ जिल्हा परिषदेचे

$
0
0

म. टा. विशेष प्रतिनिधी, पुणे

गेली दहा वर्षे पुण्याचे कारभारीपद भूषविलेल्या अजित पवार यांना पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिकेच्या निकालांनी चांगलाच धक्का दिला आहे. पवार यांच्या संपूर्ण राजकीय कारकिर्दीमध्ये राज्य सरकार तसेच पुणे व पिंपरी चिंचवड महानगरपालिका यामध्ये सत्ता नसल्याची वेळ त्यांच्यावर पहिल्यांदाच आली असून आता फक्त पुणे जिल्हा परिषदेचे कारभारीपद त्यांच्याकडे राहिले आहे.

ज्येष्ठ नेते शरद पवार यांचे राजकीय वारसदार म्हणून अजित पवार यांच्याकडे पाहिले जाते. नव्वदच्या दशकामध्ये पवार यांनी जिल्हा बॅँकेच्या संचालकपदापासून आपल्या राजकारणाची सुरूवात केली. त्यानंतर लगेचच पुणे जिल्हा सहकारी मध्यवर्ती बॅँकेचे अध्यक्षपद त्यांच्याकडे आले. जिल्हा बॅँकेचे अध्यक्षपद भूषविणारे ते सर्वांत तरुण नेते होते. त्यानंतर पवार यांनी मागे वळून पाहिले नाही. सन १९९१च्या निवडणुकीमध्ये त्यांनी लोकसभेची निवडणूक लढवून बारामतीमधून विजय मिळविला होता. मात्र त्यानंतर शरद पवार यांनी दिल्लीच्या राजकारणात जाण्याचा निर्णय घेतला आणि अजित पवार हे राज्याच्या राजकारणामध्ये रमले. पहिल्यापासून पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेमध्ये त्यांनी रस घेतला होता. त्यांच्या समवयस्क नेत्यांसोबत त्यांनी त्या वेळेस पिंपरी चिंचवड पालिकेची सूत्रे असलेल्या प्रा. रामकृष्ण मोरे यांना शह देऊन स्वतःचा भक्कम गट तयार केला होता. त्या वेळेपासून आजपर्यंत पिंपरी चिंचवड वरील त्यांची सत्ता कायम राहिली.

सन १९९४मध्ये राज्यात शिवसेना व भाजपचे सरकार आले तेव्हा अजित पवार यांना विरोधी बाकावर बसावे लागले. पण तो त्यांच्या उमेदीचा काळ होता. त्याचवेळेस पुण्याची जिल्हा परिषद आणि जिल्हा बॅँक तसेच पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची सत्तासूत्रेही त्यांच्याकडे आली होती. शरद पवार यांच्याकडेही कोणी गेले तर स्थानिक कामासाठी ते अजित पवारांना भेटा असे सांगण्याची ती वेळ होती. त्यानंतर १९९८मध्ये राष्ट्रवादी कॉँग्रेसची स्थापना झाल्यानंतर अजित पवार यांना संघटनेमध्येही महत्त्व मिळाले. त्याचा उपयोग त्यांनी राज्यातील आपला संपर्क वाढविण्यासाठी केला. हळुहळू त्यांचा प्रभाव वाढला व पिंपरी-चिंचवड पाठोपाठ पुणे महापालिकेमध्येही त्यांनी तत्कालीन खासदार सुरेश कलमाडी यांना आव्हान देण्यास सुरुवात केली होती. सन २००७च्या निवडणुकीमध्ये शरद पवार यांनी ‘कलमाडी यांना हटवून पुण्याचा कारभारी बदला’ अशी हाक जाहीर प्रचारात दिली आणि पुण्याने कारभारीपद अजित पवार यांच्याकडे सोपविले. त्यानंतर कॉँग्रेसला बरोबर घ्यायचे नाही, या हट्टापोटी त्यांनी शिवसेना-भाजपसोबत आघाडी करून पुणे पॅटर्न राबवित आपली सत्ता कायम राखली. त्यानंतर पुन्हा कॉँग्रेसला बरोबर घेऊन त्यांनी महापालिकेमध्ये सत्ता मिळविली होती.

सन २०१२च्या निवडणुकीनंतर त्यांच्याकडे पुणे महापालिकेची एकहाती सत्ता होती. पण त्याच काळात उपमुख्यमंत्रिपदाची जबाबदारीही त्यांच्यावर आल्याने ते पुणे आणि पिंपरी चिंचवडकडे हवे तसे लक्ष देऊ शकले नाहीत. पक्षावरील त्यांची पकड सुटत गेली व या दोन्ही महापालिकांमध्ये त्यांना आव्हान दिले जाऊ लागले. पिंपरी-चिंचवड पालिकेमध्ये लक्ष्मण जगताप या त्यांच्या एकेकाळच्या विश्वासू सहकाऱ्याने भाजपचा रस्ता धरणे हा त्यांना मोठा धक्का होता. त्यानंतर सन २०१४च्या विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपने जोरदार मुसंडी मारली. या पुढे पवार बारामतीचे आमदार आणि जिल्हा परिषदेचे कारभारी म्हणून कार्यरत राहतील. त्याचप्रमाणे राष्ट्रवादी कॉँग्रेसची फेरबांधणी करण्याचे आव्हान त्यांना पेलावे लागणार आहे. ते हे आव्हान कसे पेलतात याकडेच आता पुण्याचे आणि राज्याचे लक्ष राहणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बागवेंविरोधात नाराजी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
महापालिकेच्या निवडणुकीत काँग्रेसची वाताहात होण्यास पक्षाचे शहराध्यक्ष रमेश बागवे जबाबदार असून निवडणुकीत प्रचार आणि रणनीती आखण्यामध्ये बागवे कमी पडल्याने पक्षाच्या उमेदवारांना पराभव स्वीकारावा लागल्याची तक्रार काँग्रेस कार्यकर्त्यांकडून करण्यात आली आहे. त्याबाबतचा अहवाल काही उमेदवारांनी प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्याकडे पाठविला आहे.
निवडणुकीच्या काळात पक्षाच्या सर्व उमेदवारांची जबाबदारी पक्षाने शहराध्यक्ष म्हणून बागवे यांच्यावर टाकलेली असतानाही याकडे दुर्लक्ष करत आपला मुलगा अविनाश बागवे यांना निवडून आणण्यासाठी ते प्रयत्न करत होते, अशी टीका या उमेदवारांनी केली आहे. ‘भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना या जातीयवादी पक्षांना पालिकेत सत्ता स्थापन करण्यापासून दूर ठेवण्यासाठी काँग्रेसने राष्ट्रवादीबरोबर आघाडी करून काही जागा एकत्र लढविण्याचा निर्णय घेतला होता. मात्र उमेदवारांच्या प्रचारार्थ शहराध्यक्ष म्हणून बागवे यांनी आपले कर्तव्य पार पाडले नाही. परिणामी निवडणुकीत उमेदवारांना पाठबळ मिळाले नाही,’ अशी टीका पक्षाच्या नाराज गोटातून करण्यात आली आहे. खासदार सुरेश कलमाडी यांच्यानंतर शहर काँग्रेसला नेतृत्व न मिळाल्याने पक्ष तळाला जात असल्याचे समोर आले आहे.
पूर्वीचे शहराध्यक्ष अभय छाजेड यांनी राजीनामा दिल्यानंतर पक्षश्रेष्ठींनी बागवे यांच्यावर या पदाची जबाबदारी टाकली. मात्र त्यानंतरच्या काळात काँग्रेस भवनात अनेक वाद झडले. तसेच निवडणुकीचे निकाल पाहता बागवे यांनी स्वतःचे घर राखण्याव्यतिरिक्त इतर कोणतीही काम‌गिरी केलेली नाही, असे या अहवालात म्हटले आहे. निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाली, की समाजातील विविध घटकांचे, समाजांचे मेळावे काँग्रेसकडून घेतले जातात, मात्र यंदा अशा पद्धतीचा एकही मेळावा घेण्यात आलेला नसल्याचे कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे. स्टार प्रचारकांची वेळ निश्चित करून त्यांना शहरात बोलवावे, असे प्रदेश काँग्रेसकडून कळविण्यात आले होते. मात्र याकडेही दुर्लक्ष केल्याने निवडणुकीत पक्षाच्या उमेदवारांना अपयश आले असल्याची टीका केली जात आहे.
निवडणुकीच्या काळात शहर शाखेकडून कोणतेही साह्य न मिळाल्याने अनेक उमेदवारांना पराभवाला सामोरे जावे लागल्याचा अहवाल प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्याकडे पाठविण्यात आला आहे. शहराध्यक्षांवर कारवाई करावी, अशी मागणी या अहवालामध्ये केल्याची चर्चा आहे.

राजीनाम्याची मागणी
पालिका निवडणुकीत राष्ट्रवादीला मिळालेल्या अपयशाची जबाबदारी स्वीकारत शहराध्यक्षा खासदार वंदना चव्हाण यांनी निकाल जाहीर झाल्यानंतर लगेच आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. पालिका निवडणुकीत काँग्रेसच्या सभासदांची संख्या २९ वरून ९ वर आली आहे. त्यामुळे बागवे यांनीही राजीनामा द्यावा, अशी मागणी नाराज गोटातून सुरू झाली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images