Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

​मुलीने गिळला सेल

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पिंपरी
दीड वर्षांच्या चिमुकलीने घरात खेळत असताना टीव्ही रिमोटमधील सेल गिळल्याची घटना पिंपरीत घडली. शहरातील गेल्या काही महिन्यांमधील ही तिसरी घटना आहे. क्रांती पवार असे या मुलीचे नाव असून तिच्यावर खासगी हॉस्पिटलमध्ये दुर्बिणीने शस्त्रक्रिया करण्यात आली. मंगळवारी (२४ जानेवारी) सकाळी पिंपरीत ही घटना घडली. काही दिवसांपूर्वी एका मुलाने सेल गिळला आणि तो पोटात फुटल्याची घटना घडली होती. तिन्ही घटनांमध्ये मुलांनी टीव्ही रिमोटमधील सेल गिळले आहेत. त्यामुळे पालकांनी खबरदारी घ्यावी, असे आवाहन डॉक्टरांनी केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


ट्रक-दुचाकीच्या अपघातात डॉक्टर ठार

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, पुणे
कात्रज-देहूरोड बायपासवर ‘एचईएमआरएल’जवळ ट्रकच्या अपघातात वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या ३० वर्षीय डॉक्टरचा मृत्यू झाला. हा अपघात मंगळवारी सकाळी घडला. ट्रकने दुचाकीला चिरडल्याने हा अपघात झाला असून, या प्रकरणी हिंजवडी पोलिस ठाण्यात अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महाजन हे डॉक्टर असून, ते वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या शेवटच्या वर्षात शिकत होते.
अक्षय अशोक महाजन (रा. नऱ्हे, मुलांचे होस्टेल) असे अपघातात ठार झालेल्या तरुणाचे नाव आहे. हा अपघात मंगळवारी सकाळी सव्वा अकराच्या सुमारास घडल्याचे हिंजवडी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अरुण वायकर यांनी सांगितले. महाजन हे वाकडच्या दिशेने जात होते. या वेळी बायपासवरून वेगात आलेल्या ट्रकने महाजनांना चिरडले, त्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. हिंजवडी पोलिसांनी ट्रकचालक बिरेंद्र सत्तान सिंघ (वय ५५, रा. बिहार) याला अटक केली आहे.
महाजन यांच्या मित्राने सांगितल्यानुसार, त्यांची बहीण वाकडे येथे राहते. आपल्या बहिणीला भेटण्यासाठी ते वाकडला जात होते. त्यांच्या पदव्युत्तर वैद्यकीय परीक्षेचा निकाल पुढील आठवड्यात जाहीर होणार आहे. महाजन यांनी शिक्षण पूर्ण झाल्यानंतर व्यवसायासाठी चांगला प्लॅन केला होता. महाजन हे मुळचे परभणी येथील असून, सध्या ते औरंगाबाद येथे स्थायिक झाले आहेत. पदुव्यत्तर शिक्षणासाठी ते पुण्यात आले होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पुतळा फोडला तेव्हा प्रेक्षक कुठे होते?

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

‘नाटकाचा इतिहास हा सांस्कृतिक इतिहास आहे. तो जतन केला नसल्याने पुतळे फोडण्याचे गुंडगिरीचे धाडस अंगी येते,’ असा हल्लाबोल ज्येष्ठ अभिनेते अमोल पालेकर यांनी मंगळवारी केला. ‘मराठी माणूस हा नाटकवेडा आहे,’ असे म्हटले जाते. ‘पण मला प्रश्न पडतो की नाटकाला मारक घटना घडतात तेव्हा प्रेक्षक कुठे असतात ? गडकरींचा पुतळा फोडला तेव्हा प्रेक्षक, लोक निषेधाला का उभे राहिले नाहीत. मग मराठी माणूस नाट्यवेडा असे बिरूद का लावायचे ?’ असा संतप्त सवाल करत पालेकर यांनी खडे बोल सुनावले.

रंगभूमीवरील कारकिर्दीला पन्नास वर्षे पूर्ण झाल्याबद्दल ज्येष्ठ रंगकर्मी, अभिनेत्री लालन सारंग यांचा नाट्य परिषदेच्या कोथरूड शाखेतर्फे पालेकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. ज्येष्ठ अभिनेत्री वंदना गुप्ते, ज्येष्ठ समीक्षक डॉ. वि. भा देशपांडे, अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे प्रमुख कार्यवाह दीपक करंजीकर, राकेश सारंग, कोथरूड शाखेचे अध्यक्ष सुनील महाजन, समीर हंपी, सत्यशील धांडेकर, दीपक गुप्ते आदी उपस्थित होते.

‘सेन्सॉरशीप विरोधातील लढा एकट्या अमोल पालेकर किंवा एका कलाकाराचा नसतो. सेन्सॉरशीप किंवा संस्कृती रक्षकांना विरोधा करायला फक्त १५-२० कलाकारच रस्त्यावर का येतात ? गडकरींचा अपमान, नाट्यसंस्कृतीवर हल्ला होतो, तो का सहन केला जातो ?’ असा परखड सवाल करत ‘लढाईसाठी प्रेक्षक खंबीरपणे उभा राहिले तरच ती खऱ्या अर्थाने कलाकारांना मानवंदना ठरते,’ यावर पालेकर यांनी बोट ठेवले. ‘सखाराम बाइंडरमधील लालन सारंग आणि निळू फुले यांचा अभिनय हा वस्तुपाठ आहे,’ असे गौरवोद्वगार त्यांनी काढले. उत्तरार्धात अजित भुरे यांनी सारंग यांची मुलाखत घेतली.

‘... ते सध्याचे कलाकार भोगू शकत नाहीत’

‘लालन सारंग या रंगभूमीवरील झाशीची राणी आहेत. त्यांच्याकडून आत्मविश्वास, निडरपणा, बेडरपणा घ्यायला हवा. सध्या जे काही घडत आहे, त्या पार्श्वभूमीवर हे आवश्यक आहे,’ याकडे वंदना गुप्ते यांनी लक्ष वेधले. ‘आम्ही जे भोगले ते सध्याचे कलाकार सोसू शकत नाहीत. कमलाकर सारंग यांच्यामुळे मी रंगभूमीकडे वळले,’ अशी भावना लालन सारंग यांनी व्यक्त केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शुल्कवाढीविरोधात ३१ ला चक्का जाम

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
केंद्र सरकारच्या आदेशानुसार परिवहन विभागाने केलेल्या शुल्कवाढीविरोधात ३१ जानेवारीला राज्यव्यापी चक्का जाम आंदोलन करण्याचा इशारा प्रवासी व मालवाहतूकदार संघटना संयुक्त कृती समितीने दिला आहे. येत्या सोमवारी (३० जानेवारी) मध्यरात्री बारानंतर रिक्षा, टॅक्सी, स्कूल व्हॅन, ट्रक, टॅम्पो, बस अशी प्रवासी व मालवाहतुकीची वाहने बंद ठेवण्यात येणार आहे.
परिवहन विभागाने २९ डिसेंबरला आरटीओ शुल्कात भरमसाठ वाढ केली आहे. शुल्कवाढ करताना केंद्राने वाहतूक संघटनांना विश्वासात घेतले नाही. केंद्राने केलेली शुल्कवाढ जिझिया करच आहे. त्यामुळे शुल्कवाढी विरोधातील धोरण ठरविण्यासाठी रिक्षा पंचायचीचे अध्यक्ष डॉ. बाबा आढाव यांच्या अध्यक्षतेखाली वाहतूक संघटनांची बैठक घेण्यात आली. या बैठकीत चक्का जामचा निर्णय झाला. चक्का जामच्या दिवशी प्रत्येक शहरात मोर्चे काढण्यात येणार आहे. तसेच, राज्यातील ५२ प्रादेशिक परिवहन कार्यालयांमधील (आरटीओ) कामावर आरटीओ प्रतिनिधी बहिष्कार टाकणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सिंहांचे ‘दर्शन’ फेब्रुवारीत

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

राजीव गांधी प्राणी संग्रहालयामध्ये दाखल झालेली तेजस आणि सुबी ही आशियाई सिंहाची जोडी सध्या ‘अंडर ऑब्झर्व्हेशन’ असून पुढील महिन्यात ही जोडी पुणेकरांना दर्शन देणार आहे. एवढेच नव्हे; तर प्राणीप्रेमींना या सिंहांना एक दिवसांपासून ते एक महिन्यांपर्यंतच्या कालावधीसाठी दत्तक घेण्याची संधी मिळणार आहे.

गुजरातमधील सक्करबाग प्राणीसंग्रहालयाकडे तीन वर्षे पाठपुरावा केल्यानंतर राजीव गांधी प्राणी संग्रहालयाला आशियाई सिंहाची जोडी मिळाली आहे. आम्ही २५ डिसेंबरला रात्री अडीच वाजता सिंहांना वाहनाने घेऊन आलो. प्रवासादरम्यान सिंहाला किरकोळ जखमा झाल्या आहेत. तसेच नवीन जागेत आल्यामुळे त्यांच्यावर प्रवासाचा ताण आल्याने सध्या त्यांना पशुवैद्यकीय चिकीत्सकांच्या देखरेखीखाली ठेवण्यात आले आहे. हे दोघेही सहा वर्षांचे आहेत. सिंहासाठी खंदक उभारणीची प्रक्रिया सुरू झाली असून सुरुवातीचा काही काळ वाघांच्या दोन खंदकापैकी पांढऱ्या वाघांच्या खंदकामध्ये त्यांना ठेवण्यात येणार आहे, अशी माहिती महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त राजेंद्र जगताप आणि संग्रहालयाचे संचालक राजकुमार जाधव यांनी पत्रकार परिषदेत दिली.

राजीव गांधी प्राणी संग्रहालयाचा आगामी वीस वर्षांचा विकास आराखडा तयार करण्यात आला असून केंद्रीय प्राणी संग्रहालय प्राधिकरणाची मंजुरी मिळाली आहे. सध्या संग्रहालयामध्ये ४०५ प्राणी असून यांसह आशियाई सिंह, शेकरू, जंगल कॅट, लेपर्ड कॅट, रस्टी स्पॉटेड कॅट या सस्तन प्राण्यांचा समावेश होणार आहे. यासाठी खंदक उभारणीची कामे सुरू आहेत, असे जगताप यांनी सांगितले.

दत्तक योजनेला उत्तम प्रतिसाद

सर्वसामान्य नागरिकांमध्ये वन्यप्राण्यांविषयी जागृती निर्माण करण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या दत्तक प्राणी योजनेला पुणेकरांचा उत्तम प्रतिसाद मिळतो आहे. वाढदिवसासह विविध औचित्य शोधून नागरिक वाघ, बिबट्या, हत्तींसह इतर लहान प्राण्यांना दत्तक घेत आहेत. यामध्ये वाघ आणि सिंहाला सर्वाधिक मागणी आहे. गेल्या पाच वर्षांत दत्तक प्राणी योजनेतून २७ लाख रुपयांचा निधी उपलब्ध झाला आहे. मात्र, कॉर्पोरेट कंपन्या अद्याप या योजनेत सहभागी झालेल्या नाहीत, असे राजकुमार जाधव यांनी सांगितले.

अठरा लाख पर्यटक

पुण्यातील सर्वाधिक लोकप्रिय ठिकाणांमध्ये राजीव गांधी प्राणी संग्रहालयाचा समावेश होतो. उद्यानाला दर वर्षी १८ लाख पर्यटक भेट देत असून दर वर्षी संख्या वाढते आहे. प्रवेश शुल्कातून साडे तीन कोटी रुपयांचे उत्पन्न मिळते. यातील १ कोटी २५ लाख रुपये जनावरांच्या जेवणासाठी खर्च होतो. एकट्या वाघाला दरमहा २० ते २५ हजार रुपये खर्च होतो; तर हत्तीच्या जेवणासाठी दरमहा ४५ हजार रुपये लागतात. याशिवाय इतर खर्च भागविण्यासाठी या उत्पन्नाचा उपयोग केला जातो, असे जाधव यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘ती’ व्यक्ती नसल्याने आघाडीला आम्ही तयार

$
0
0

अजित पवार यांचे सूचक वक्तव्य

म. टा. प्रतिनिधी, पुणे

‘काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या समविचारी पक्षांनी पालिका निवडणूक एकत्र लढावी, अशी आमची पूर्वीपासून भूमिका आहे. शहरात यापूर्वी काँग्रेसचे नेतृत्त्व असलेल्या व्यक्तिला आमचा विरोध होता. आता ती व्यक्ती राजकारणातून बाजूला गेली आहे. त्यामुळे आघाडी करण्यास आमची हरकत नाही,’ असे सूचक वक्तव्य माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंगळवारी केले. आघाडीबाबत येत्या दोन दिवसांत निर्णय घ्यावा, अशा सूचना दोन्ही पक्षांच्या नेत्यांना दिल्याची माहितीही त्यांनी दिली.
महापालिका निवडणुकीसाठी शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या शहर कार्यालयाचे उद्घाटन केल्यानंतर पवार पत्रकारांशी बोलत होते. महापालिका निवडणुकीसाठी समविचारी पक्षांनी एकत्र यावे, अशी भूमिका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी मांडली आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष आणि माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनीही आघाडी करण्याबाबत भाष्य केले आहे. याचा सकारात्मक विचार दोन्ही पक्षांकडून केला जात असून, दोन दिवसात निर्णय घेतला जाईल, असे पवार यांनी सांगितले.
महापालिकेच्या निवडणुका दोन्ही पक्षांनी याआधी स्वबळावर लढविल्या आहेत. यापूर्वी या दोन्ही पक्षामध्ये समविचाराची भावना नव्हती का, याच निवडणुकीत मग आघाडीसाठी प्रयत्न करून निवडणूक लढविण्याचा विचार का केला जात आहे, असे प्रश्न पवार यांना विचारले असता, ते म्हणाले, ‘यापूर्वीच्या निवडणुकीत काँग्रेसने ज्यांच्याकडे नेतृत्त्व दिले होते; त्यांचा आघाडीला विरोध होता. या नेतृत्त्वाच्या विरोधात शरद पवार यांनी पुणेकरांना भाकरी फिरवा असे आवाहन केले होते. याला प्रतिसाद देऊन पुणेकरांनी पालिकेत सर्वाधिक जागांवर राष्ट्रवादीला विजयी केले होते.’

‘वॉररूम’ नव्हे ‘कंट्रोल रूम’

पालिकेच्या निवडणुकीत चार सदस्यांचा प्रभाग असल्याने अधिकाधिक मतदारांपर्य‍ंत पोहचण्यासाठी पक्षाकडून विशेष प्रयत्न केले जात आहेत. सध्याचे दिवस सोशल मीडिययाचे असल्याने या माध्यमातून मतदारांपर्यंत पोहचण्यासाठी अनेक पक्षांनी ‘वॉर रूम’ सुरु केली आहे. पण आम्ही वॉररूम न म्हणता ‘कंट्रोल रूम’ म्हणू. तिच्या माध्यमातून सर्व प्रभागांमधील उमेदवारांना मदत केली जाणार आहे. त्याची जबाबदारी पक्षात कार्यरत युवक आणि युवतींवर टाकण्यात आल्याचेही पवार म्हणाले.
...
‘भाजपवासी झालेले परतण्याच्या मार्गावर’

राष्ट्रवादी काँग्रेस सोडून भारतीय जनता पक्षामध्ये (भाजप) गेलेल्या अनेकांना पश्चाताप होत असून, काही जण पुन्हा राष्ट्रवादीमध्ये येण्यासाठी इच्छुक असल्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंगळवारी सांगितले. महापालिका निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादीच्या अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. याचा फटका पालिका निवडणुकीत पक्षाला बसेल का, आदी प्रश्न पवार यांना विचारले असता, ‘राष्ट्रवादी सोडून भाजपमध्ये गेलेल्यांना आता पश्चाताप झाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात कुटूंब म्हणून वागणूक मिळते; मात्र भाजपमध्ये वेगळीच वागणूक मिळते. या पक्षात शहराध्यक्ष, आमदार, खासदार याबरोबरच मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्ष असे वेगळे गट असल्याने पक्षांतर करून मोठी कुंचबणा होत असल्याची तक्रार या कार्यकर्त्यांकडून केली जात आहे.’
पक्षांतर केलेले अनेकजण पुन्हा राष्ट्रवादीत येण्याच्या तयारीत असून, सोमवारी पिंपरी-‌‌चिंचवडमध्ये काही जणांना पक्षात पुन्हा प्रवेश देण्यात आला. मंगळवारी पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्ष कार्यालयाच्या उद्घाटन समारंभातही पक्ष सोडून गेलेल्या कार्यकर्त्यांना पुन्हा पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश देण्यात आला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सुनील गायकवाड राष्ट्रवादीत दाखल

$
0
0

म. टा. प्र‌तिनिधी‌, पुणे

महापालिकेचे माजी उपमहापौर आणि काँग्रेसचे विद्यमान नगरसेवक सुनील उर्फ बंडू गायकवाड यांनी मंगळवारी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या कार्यक्रमात गायकवाड यांच्या समर्थकांसह मनसे तसेच इतर पक्षातील कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला.
महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एका पक्षातून दुसऱ्या पक्षात प्रवेश करणाऱ्या पदाधिकाऱ्यांची संख्या वाढत आहे. मुंढवा भागातून काँग्रेसच्या तिकिटावर २०१२ च्या महापालिका निवडणुकीत विजयी झालेल्या गायकवाड यांनी उपमहापौरपदही भूषवले होते. राष्ट्रवादी काँग्रेसच्या शहर कार्यालयाच्या उद्घाटन कार्यक्रमात त्यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली. या वेळी राष्ट्रवादीच्या शहराध्यक्षा खासदार वंदना चव्हाण, महापौर प्रशांत जगताप, आमदार अनिल भोसले, जयदेव गायकवाड, बाळासाहेब बोडके, अंकुश काकडे, रवींद्र माळवदकर यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते.
गायकवाड यांच्यासह इतर पक्षातील पदाधिकारी तसेच कार्यकर्त्यांनी पक्षामध्ये प्रवेश केल्याने पालिका निवडणुकीसाठी राष्ट्रवादीची ताकद वाढली असून, याचा निश्चित फायदा निवडणुकीत होईल असा विश्वास पवार यांनी व्यक्त केला. बागवान समाजचे अध्यक्ष अब्दुल बागवान, कोंढवा शिवसेना शाखा प्रमुख इम्रान शेख, सामाजिक कार्यकर्ते नवाज नागरिया, इम्तियाझ शेख, अन्वर मेमन, इब्राहिम शेख, राऊत कुरेशी आणि अय्याज खान, मेहबुब मनियार, रहेमत पटाइत यांनीही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

युतीचा फैसला आज ‘मातोश्री’वर होणार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

महापालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेदरम्यान युतीचा निर्णय अद्याप अनिर्णित असताना, त्याबाबत आज, बुधवारी थेट मातोश्रीवरच बैठक होणार आहे. शिवसेनेचे शहरातील प्रमुख पदाधिकारी या बैठकीला उपस्थित राहणार असल्याने युतीची पुढील दिशा स्पष्ट होण्याची चिन्हे आहेत.
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची जयंती आणि सामनाचा वर्धापनदिनानिमित्त मुंबईतील कार्यक्रमात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी युतीबाबत २६ जानेवारीला सविस्तर बोलेन असे जाहीर केले. तसेच, मुंबईत सर्व जागांवर उमेदवार लढविण्याची तयारी शिवसेनेने केली आहे. या पार्श्वभूमीवर, पुण्यातील युतीचे काय होणार अशी विचारणा केली जात होती. भाजप-शिवसेनेमध्ये आत्तापर्यंत दोन बैठका झाल्या असल्या, तरी अद्याप त्यातून सर्वमान्य तोडगा निघालेला नाही. त्यामुळे, युतीविषयीची ही अनिश्चितता दूर करण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पुण्यातील पदाधिकाऱ्यांना थेट मातोश्रीवर येण्याचेच फर्मान सोडले आहे. आज, बुधवारी (२५ जानेवारी) दुपारी मातोश्रीवर पुण्याच्या युतीबाबत अंतिम निर्णय होण्याची शक्यता आहे.
पुणे महापालिकेत एकूण ४१ प्रभागातून १६२ नगरसेवक निवडले जाणार आहेत. भाजपने युतीसाठी दिलेल्या फॉर्मुल्याप्रमाणे सेनेला ४० जागा सोडण्याची तयारी दर्शविली आहे. गेल्या महापालिका निवडणुकीमध्ये (२०१२) भाजप-सेनेने युती करून निवडणूक लढवली होती. त्यावेळी भाजपने ९०, तर शिवसेनेने ६२ जागा लढविल्या होत्या. त्या तुलनेत यंदा सेनेला खूपच कमी जागा देण्याचा प्रस्ताव भाजपकडून मांडला जात असल्याने शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना तो मान्य नाही. त्यामुळे, शिवसेनेने यंदा अधिक जागांची मागणी केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


डॉक्टरांनाही सापडली महापालिकेची ‘नस’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

रुग्णांच्या आजाराचे निदान करताना संपूर्ण शहराच्या राजकारणाचा अर्क बनलेल्या काही डॉक्टरांनी महापालिकेचे सभागृह गाजविले आहे. नगरसेवक, स्थायी समितीचे सदस्य आणि उपमहापौर अशी पदे या डॉक्टरांनी भूषविली आहेत. शहरातील स्वच्छता आणि आरोग्यसेवा या विषयांवर काम करताना त्यांनी आपल्या ज्ञानाचा उपयोग पुण्याला करून दिला आहे.
महापालिकेच्या राजकारणात उडी मारणाऱ्यांपैकी काहींना राजकारणाचा वारसा मिळाला, तर काहींना समाजकारणाला सत्तेची जोड देण्यासाठी राजकारणात उतरावे लागले. व्यवसायामुळे नागरिकांशी दैनंदिन संपर्क येत असल्याने नगरसेवकपदाची संधी मिळाली. डॉ. शंकरराव तोडकर, डॉ. सतीश देसाई, डॉ. पूजा यादव, डॉ. सिद्धार्थ धेंडे, डॉ. रमेश शहा, डॉ. श्रीनिवास देशपांडे, डॉ. विठ्ठल नेऊळगावकर, डॉ. बी. डी. भुजबळ यासारख्या डॉक्टरांनी राजकीय आखाड्याचे ‘निदान’ केले. सध्या डॉ. तोडकर राजकारणात सक्रिय नाहीत. डॉ. देसाई पक्षाच्या विविध पदांची जबाबदारी सांभाळत आहेत. डॉ. सिद्धार्थ धेंडे पुन्हा रिंगणात उतरण्याच्या तयारीत आहेत. डॉ. तोडकर, डॉ. देसाई यांनी नगरसेवकपदापासून ते क्रीडा समितीचे अध्यक्ष आणि नंतर उपमहापौर पदापर्यंत मजली मारली. डॉ. धेंडे यांनी स्थायी समितीचे सदस्य म्हणून जबाबदारी पार पाडली.
‘सोमवार पेठ, मंगळवार पेठेत प्रॅक्टिस करीत असताना त्या ठिकाणच्या झोपडपट्टीवासीय, गरीब जनतेचा सातत्याने संपर्क येत होता. त्यामुळे प्रत्येकाशी जवळीकीचे संबंध असल्याने पुढेच हेच पेशंट माझे मतदार झाले. परिणामी निवडणूक लढणे सोपे झाले. १९७४ साली पहिल्यांदा निवडून आलो आणि १९९२ पर्यंत सभागृहात काम करण्याची संधी मिळाली. १९८१ ते १९८२ मध्ये उपमहापौरपदाची माळ गळ्यात पडली. देशाला स्वातंत्र्य मिळण्यापूर्वी सोमवार, मंगळवार पेठेत ख्रिश्चनांचे हॉस्पिटल होते. तेच हॉस्पिटल स्वातंत्र्यानंतर ताब्यात घेतले. पुढे कमला नेहरू हॉस्पिटल म्हणून उभारणी करण्यात आपला वाटा आहे. नागरिकांना मोफत आरोग्य सेवा मिळाव्यात यासाठी सातत्याने प्रयत्न केले,’ असे माजी उपमहापौर डॉ. शंकरराव तोडकर सांगतात. सध्या राजकारणापासून दूर असलेले डॉ. तोडकर आयुर्वेदाचे सर्जन आहेत.
‘डोळ्यांचा डॉक्टर म्हणून काम करताना ‘दृष्टी’च्या आजाराचे निदान करीत होतो. त्यावेळी अनेक पेशंटसह त्यांच्या कुटुंबीयांशी आपले जिव्हाळ्याचे संबंध प्रस्थापित झाले होते. पुढे राजकीय विचारसरणी पटल्याने राजकारणात आलो. तेव्हा याच पेशंटनी मला मदत केली. महापालिकेत क्रीडा समिती अस्तित्वात नव्हती. मी खोखोपटू असल्याने महापालिकेच्या कायद्यात बदल करून क्रीडा समिती स्थापन केली; तसेच चांगल्या आरोग्य सेवा देण्याबाबत आपण आग्रही होतो,’ अशी आठवण माजी उपमहापौर डॉ. सतीश देसाई यांनी बोलून दाखविली.
नगरसेवक डॉ. सिद्धार्थ धेंडे म्हणाले, ‘महापालिकेच्या माध्यमातून ‌दिल्या जाणाऱ्या आरोग्याच्या सुविधांमध्ये सुधारणा करण्याची मोठी संधी नगरसेवक पदामुळे मिळाली. आराेग्य सेवेचे खासगीकरण केले जात आहे. उपचार महाग होत असताना पालिकेच्या आरोग्य सेवांचे खासगीकरण होता कामा नये यासाठी सातत्याने प्रयत्न केले; तसेच पुणेकरांना आरोग्यसेवेचा लाभ मिळावा यासाठी शहरी गरीब योजनेंतर्गत एक लाखाचा निधी देण्यात यावा ही योजना आपण मांडली. वैद्यकीय ज्ञानाचा राजकारणात पुणेकरांना चांगली आरोग्यसेवा देण्यासाठी निश्चितच फायदा झाला.’

राजकीय विचारांचा व्यवसायात कधी प्रवेश करू दिला नाही. माझे अनेक पेशंट जनसेवा संघाचे होते. त्यांनीदेखील आपल्याला राजकीय जीवनात मदत केली. व्य‌क्तिगत मैत्री आणि व्यवसाय वेगळा ठेवला. राजकारणात वैद्यकीय ज्ञानामुळे डॉक्टरांचे प्रश्न किंवा अन्य वैद्यकीय समस्या सोडविण्यासाठी फायदा झाला. त्याशिवाय नागरिकांना मोफत आरोग्यसेवा देण्यासाठी पुढाकारही घेतला.
डॉ. सतीश देसाई, माजी उपमहापौर

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बापटांचे बौद्धिक अन् पदाधिकाऱ्यांचा हिरमोड

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पिंपरी

‘समुद्रातून बाहेर पडलेल्या थेंबाचे सूर्यप्रकाशामुळे बाष्पीभवन होते आणि त्याचे अस्तित्व नष्ट होते. चिमणीच्या चोचीतील थेंब आग विझवायला पुरेसा नसतो हे तिला माहीत असूनही ती अविरत कष्ट करते. वातावरण खराब करू नका.. ही आपली संस्कृती नाही, येणाऱ्या प्रत्येकावर माझे प्रेम आहेच असे नाही,’ अशा शाब्दिक कोट्या करून पालकमंत्री गिरीश बापट यांनी भाजपच्या जुन्या कार्यकर्त्यांचे आणि निष्ठावंतांचे बौद्धिक घेतले.
पिंपरी-चिंचवड शहर भाजपमधील वाद विकोपाला गेल्यानंतर बापट यांनी सोमाटणे फाटा येथील फार्म हाउसवर पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. परंतु, ही बैठक अपयशी ठरल्याची चर्चा आहे. बैठकीनंतरही पदाधिकाऱ्यांचा हिरमोड झाल्याची कुजबूज सुरू झाली आहे. सत्तांतर करण्यासाठी भाजपतर्फे राष्ट्रवादी काँग्रेस आणि अन्य पक्षातील पदाधिकाऱ्यांना आपलेसे करण्यात येत आहे. पक्षांतर केल्यानंतर आमदार होऊन शहराध्यक्ष झालेल्या लक्ष्मण जगताप यांच्या पाठोपाठ अपक्ष आमदार महेश लांडगे भाजपवासी झाले. राष्ट्रवादीला जोरदार धक्का देऊन आझम पानसरे यांना भाजपमध्ये प्रवेश दिल्याने सर्वच अवाक झाले आहेत. पक्षाची ताकद वाढावी आणि राष्ट्रवादी काँग्रेस कडून सत्ता काबीज करावी म्हणून प्रदेशपातळीवरून जोरदार प्रयत्न होत आहेत. मात्र, या घडामोडी सुरू असताना पक्षात जुना-नवीन असा वाद उफाळून आल्याने नेत्यांची पंचाईत झाली आहे.
गेल्या दीड वर्षांपासून सुरू झालेल्या कुरबुरी वाढत जाऊन कोअर कमिटीच्या बैठकीत प्रदेश पदाधिकाऱ्यांमध्ये सोमवारी चांगलीच जुंपली. त्यातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्याकडे तक्रारी करण्यात आल्या. त्यामुळे नियोजित बैठकीत बदल करून बापट यांनी संभाव्य राडा टाळण्यासाठी शहराबाहेर नाराज झालेल्या जुन्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. मनातील खदखद बोलून दाखविण्यासाठी अनेकजण या वेळी उत्सुक होते. मात्र, खासदार अमर साबळे, प्रदेश सचिव उमा खापरे यांनाच मनोगत व्यक्त करण्यास सांगून बापट यांनी बैठकीचा ताबा घेतला.

पालकमंत्र्यांची ‘चाय पे चर्चा’

ऐन निवडणुकीच्या तोंडावर उफाळून आलेला वाद पक्षाला महागात पडू शकतो हे नेते जाणतात. एकंदरीत ही परिस्थिती ओळखून पालकमंत्री गिरीश बापट यांनी बैठकीचे नियोजन केले होते. परंतु, कोअर कमिटीच्या बैठकीतच हमरातुमरी झाल्याने शहराबाहेर बैठक बोलाविण्यात आली. रात्री बैठक असल्याने जेवण करूनच परतायचे, असा काहींचा समज होता. परंतु, बापट यांनी बैठक चहावरच उरकली. त्यामुळे बापट यांची ‘चाय पे चर्चा’ अशी टिप्पणी पदाधिकाऱ्यांनी केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नावांची शिफारस प्रदेशस्तरावर

$
0
0

युतीचा निर्णय होण्यापूर्वी भाजपचे एक पाऊल पुढे

म. टा. प्रतिनिधी, पुणे

भारतीय जनता पक्षाच्या सर्व प्रभागांतील इच्छुकांमधून संभाव्य उमेदवारांची यादी अंतिम करण्यासाठी मंगळवारी सुमारे सहा तासांहून अधिक काळ ‘उमेदवार निवड मंडळा’ची (पार्लमेंटरी बोर्ड) महत्त्वाची बैठक पुण्यात झाली. या बैठकीतून काही प्रभागातील नावांची शिफारस प्रदेश स्तरावर करण्यात आल्याचे समजते.
महापालिका निवडणुकीसाठी येत्या शुक्रवारपासून (२७ जानेवारी) अर्ज भरण्यास सुरुवात होणार आहे. निवडणूक स्वबळावर लढायची की शिवसेनेसोबत युती करून हे अद्याप स्पष्ट झाले नसले, तरी प्रभागातील इच्छुकांमधून उमेदवारांची साधारणतः अंतिम नावे काय असू शकतात याचा आढावा घेण्यासाठी भाजपच्या निवड मंडळाची महत्त्वाची बैठक सोमवारी झाली. रात्री उशिरापर्यंत सुरू असलेल्या या बैठकीला केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांच्यासह शहरातील सर्व प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. शहरातील प्रत्येक प्रभाग आणि प्रभागातील आरक्षणे आणि खुल्या गटांच्या जागांवरून संभाव्य उमेदवार कोण असतील, यावर बराच खल झाला. पक्षाचे विद्यमान नगरसेवक, माजी नगरसेवक, इच्छुक पदाधिकारी-कार्यकर्ते आणि पक्षात नव्याने स्थान देण्यात आलेले बाहेरचे नगरसेवक/पदाधिकारी यांच्यापैकी सर्वांत सक्षम कोण असेल, याची चाचपणी करण्यात आली. त्यानुसार, काही ठिकाणी उमेदवारांची संभाव्य यादीही तयार झाली असल्याचे समजते.
शहरातील काही प्रभागांमध्ये एकमत झाले नाही. त्या ठिकाणी आमदार आणि पदाधिकाऱ्यांनी वेगवेगळ्या नावांचा आग्रह धरला. त्यामुळे, अशा ठिकाणी संभाव्य नावे निश्चित करण्याऐवजी त्याचा निर्णय प्रदेशावर सोपविण्याचा निर्णय घेण्यात आल्याचेही कळते. अशा नावांची सविस्तर यादी प्रदेशाकडे पाठविण्यात येणार असून, तेथूनच संबंधित जागांविषयी अंतिम निर्णय घेतला जाईल, अशी शक्यता आहे.
भाजपसोबत युतीचा निर्णय अंतिम व्हायचा असतानाच, शिवसेनेनेही मुंबईतील सर्व जागांवर उमेदवार कोण असतील हे निश्चित केल्याने भाजपनेही शहरातील संभाव्य उमेदवारांची यादी ठरविण्यात काहीच गैर नाही, असा दावा केला जात आहे.

सुधारित यादीही तयार
भारतीय जनता पक्षाच्या निवड मंडळाची ही बैठक संपेपर्यंत युतीचे चित्र स्पष्ट झालेले नव्हते. त्यामुळे, केवळ आपल्या पक्षातील संभाव्य उमेदवारांची यादी पक्षाने तयार केली आहे. शिवसेनेसोबत युतीचा निर्णय निश्चित झाल्यास त्यामध्ये स्वाभाविकच काही बदल होण्याची अपेक्षा आहे. अशावेळी युतीसाठी कोणते प्रभाग सोडावे लागतील, याचा आढावा घेऊन अशा प्रभागांतील सुधारित यादीही पक्षाने तयार ठेवली असल्याचे सांगण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

​ भिऊ नकोस; पण ‘सर्व्हे’त रहा...

$
0
0

भाजपच्या इच्छुकांना नेत्यांचा ‘कानमंत्र’

म. टा. प्रतिनिधी, पुणे

उमेदवारीसाठी तीव्र रस्सीखेच आणि युतीबाबतची टांगती तलवार, अशा चिंतेत असलेल्या इच्छुकांनी वरिष्ठ नेत्यांच्या गाठीभेटी घेण्यास सुरुवात केली आहे. ‘तुमच्यासाठी मी प्रयत्न करतोच; पण सर्व्हेमध्ये तुमचे नाव येईल, याची काळजी घ्या,’ असे भरघोस आश्वासन त्यांच्या पदरी पडत आहे. त्यामुळे हा कथित सर्व्हे हा भाजपच्या इच्छुकांमध्ये परवलीचा शब्द बनला आहे.
निवडणुकीत उमेदवारी मिळवून यंदा महापालिकेची पायरी चढण्याचा निर्धार करून अनेक इच्छुक यंदा रिंगणात उतरले आहेत. भारतीय जनता पक्षाकडे यंदा इच्छुकांची संख्या प्रचंड आहे. त्यामुळे उमेदवारीसाठी स्पर्धाही तीव्र झाली आहे. मात्र, गेल्या काही दिवसांत भाजप आणि शिवसेनेच्या युतीची चर्चा झाल्यामुळे आपली लढण्याची संधी मिळणार की हुकणार असा संभ्रम इच्छुकांमध्ये निर्माण झाला आहे. त्याबरोबरच स्वबळावर लढले, तरी आपल्याला उमेदवारी मिळणार की नाही, हेसुद्धा अनेकांना स्पष्ट झालेले नाही. उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया दोन दिवसांत सुरू होत असतानाही पक्षाने आपली झाकली मूठ न उघडल्याने अनेकजण हैराण झाले आहेत.
एखाद्या प्रभागात उमेदवाराच्या नावावर एकमत होत नसल्यास त्याचा निर्णय प्रदेश पातळीवर जाणार, अशी चर्चा आहे. त्यामुळे या हैराण झालेल्या इच्छुकांनी आमदार-खासदार आणि पक्षाच्या स्थानिक नेत्यांबरोबरच प्रदेशातील वरिष्ठ नेत्यांच्याही भेटीगाठींना सुरुवात केली आहे. अशा काही इच्छुकांनी प्रदेशातील नेत्यांशी संपर्क साधला, तेव्हा त्यांच्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन त्यांना देण्यात आले. मात्र, हे आश्वासन देतानाच ‘सर्व्हेत तुमचे नाव येऊ द्या,’ असाही कानमंत्र त्यांना देण्यात येत आहे. अनेक इच्छुकांनी आपल्याला अनुकूल अशा सर्व्हेच्या फाइलही नेत्यांकडे सादर केल्या आहेत. पण, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वतीने प्रत्येक प्रभागात सर्व्हे करण्यात येत आहे. त्यामध्ये आघाडीवर असलेल्यांनाच उमेदवारी मिळणार आहे, अशा चर्चांना ऊत आला आहे. मात्र, या सर्व्हेत रहायचे, म्हणजे नेमके काय करायचे हे अनेक इच्छुकांच्या लक्षात आलेले नाही. काहीजणांनी प्रभागात आपल्या नावासाठी वातावरण निर्मिती करण्याचा मार्ग अनुसरला आहे. तर काहीजण मातृसंस्थेच्या मंडळींच्याही भेटीगाठी घेऊन ‘माझे नाव लक्षात असू द्या,’ अशी विनंती करीत आहेत. त्यामुळेच ‘सर्व्हे’ हा सध्या भाजपच्या इच्छुकांमध्ये परवलीचा शब्द बनला आहे.

आश्वासन की कात्रजचा घाट?
अशा प्रकारचा सर्व्हे नेमके कोण करीत आहे आणि त्यामध्ये कोणाची मते ग्राह्य धरण्यात येणार आहेत, याबाबत वेगवेगळ्या चर्चा असल्या तरी नेमकी माहिती कोणालाही मिळालेली नाही. तसेच सर्व्हेतील मेरिटवरच उमेदवारी मिळेल, असे नेत्यांकडून सांगण्यात येत असले, तरी अखेरच्या टप्प्यातील चर्चेत नवनवी नावे पुढे येऊ लागली आहेत. त्यामुळे खरेच असा काही सर्व्हे ग्राह्य धरण्यात येणार आहे, की इच्छुकांचा ससेमिरा चुकविण्यासाठी आणि उमेदवारी न मिळाल्यास सांत्वनाचा भाग म्हणून नेत्यांनी ही शक्कल लढविली, याचाही उलगडा झालेला नाही.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

एकाच वेळी अवकाशात सोडणार १०३ उपग्रह

$
0
0

मयुरेश प्रभुणे, पुणे

भारतातर्फे अवकाश तंत्रज्ञान क्षेत्रात लवकरच एक जागतिक विक्रम केला जाणार आहे. फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यात भारतीय अवकाश संशोधन संस्थेतर्फे (इस्रो) एकाच वेळी तब्बल १०३ उपग्रहांचे प्रक्षेपण करण्यात येणार असून, त्यातील शंभर उपग्रह विदेशी असणार आहेत. इस्रोच्या भरवशाच्या ध्रुवीय उपग्रह प्रक्षेपकाद्वारे (पीएसएलव्ही सी ३७) हा विक्रम साधला जाणार आहे.

या आधी एप्रिल २००८ मध्ये इस्रोने एकाच वेळी दहा, तर जून २०१६ मध्ये एकावेळी २० उपग्रहांचे प्रक्षेपण केले होते. एकाच उड्डाणातून सर्वाधिक ३७ उपग्रह प्रक्षेपित करण्याचा विक्रम रशियाच्या नावावर असून, नासातर्फे एका उड्डाणातून २९ उपग्रह अवकाशात पाठवण्यात आले आहेत. इस्रोतर्फे पीएसएलव्ही सी ३७ या उड्डाणातून प्रक्षेपित केले जाणारे शंभर मायक्रो उपग्रह इस्राइल, कझाकिस्तान, नेदरलँड, स्वित्झर्लंड आणि अमेरीका या देशांचे असून, त्यांचे एकत्रित वजन सुमारे ५०० किलो असेल. या व्यतिरिक्त भारताचा कार्टोसॅट २ (७३० किलो), तसेच आयएनएस १ए आणि आयएनएस १बी (दोन्ही मिळून ३० किलो) हे तीन उपग्रहही अवकाशात पाठवण्यात येणार आहेत.

एका उड्डाणातून अनेक उपग्रहांचे प्रक्षेपण करण्याचे तंत्र क्लिष्ट असून, उपग्रहांना अवकाशात मुक्त करताना ते एकमेकांना धडकणार नाहीत अशा प्रकारे त्यांच्या मुक्ततेची वेळ आणि ठिकाण निश्चित करावे लागते. इस्रोमधील वरीष्ठ सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘शंभर विदेशी उपग्रह हे आकाराने लहान आणि वजनाने कमी असून त्यांना मायक्रो सॅटेलाईट म्हटले जाते. या उपग्रहांना पाचशे किलोमीटरच्या उंचीवर टप्प्याटप्प्याने मुक्त करण्यात येणार असून, त्या सर्व उपग्रहांचा संवेग, मुक्त होतानाचा कोन, दिशा आणि ठिकाण वेगळे असणार आहे. या उंचीवर प्रक्षेपकाला पृथ्वीभोवती एक फेरी पूर्ण करण्यासाठी दीड तासांचा कालावधी लागतो. त्यामुळे सर्व उपग्रह कक्षेत पाठवण्यासाठी आमच्याकडे पुरेसा कालावधी उपलब्ध आहे.’

श्रीहरीकोटाच्या सतीश धवन अवकाश केंद्रावरून फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यात पीएसएलव्ही सी ३७चे विक्रमी प्रक्षेपण होणार असल्याचे समजते. अधिक वजन वाहून नेऊ शकणाऱ्या पीएसएलव्हीच्या एक्सएल या श्रेणीद्वारे हे उड्डाण होईल. याच प्रक्षेपकाच्या साह्याने इस्रोने एकाच वेळी अनेक उपग्रहांचे याआधी प्रक्षेपण केले आहे. तसेच, भारताची चांद्रमोहीम आणि मंगळमोहीमही याच प्रक्षेपकाद्वारे यशस्वी झाली आहे.

अवकाशातील गर्दी वाढणार

एकाच वेळी १०३ उपग्रह अवकाशात प्रक्षेपित झाल्यामुळे अवकाशात कार्यरत असणाऱ्या उपग्रहांची संख्या एका दिवसात दहा टक्क्यांनी वाढणार आहे. सध्या सर्व देशांचे मिळून सुमारे ११०० उपग्रह कार्यरत आहेत. त्याचप्रमाणे इस्रोतर्फे आतापर्यंत ७९ विदेशी उपग्रहांचे प्रक्षेपण करण्यात आले आहे. पीएसएलव्ही सी ३७च्या एकाच प्रक्षेपणातून विदेशी उपग्रहांचे शतक साजरे होणार असल्यामुळे ती संख्याही १७९ वर पोचेल. एकाच उड्डाणातून अनेक उपग्रह प्रक्षेपित करणे अत्यंत किफायतशीर असून, यामुळे एका उपग्रहाच्या प्रक्षेपणाचा खर्च तुलनेने बराच कमी होतो. या प्रक्षेपणामुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत इस्रोचे स्थानही बळकट होणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शहीद पांडुरंग गावडे यांना शौर्य चक्र जाहीर

$
0
0

मटा ऑनलाइन वृत्त । नवी दिल्ली

दहशतवाद्यांशी लढताना वीरगती प्राप्त झालेले मराठा लाइट इन्फंट्री व "राष्ट्रीय रायफल्स‘चे नायक पांडुरंग महादेव गावडे यांना मरणोत्तर शौर्य चक्र जाहीर झाले आहे. लष्करातर्फे शांतीकाळात दखविलेल्या अतुलनीय शौर्यासाठी शौर्य चक्र दिले जाते.

जम्मू-काश्‍मीरमधील सीमावर्ती भागातील कुपवाडा जिल्ह्यात २१ मे २०१६ रोजी जैश ए महंमदच्या दहशतवाद्यांशी नऊ तास चकमक सुरू होती. या चकमकीत भारतीय जवानांनी पाच दहशतवाद्यांचा खात्मा केला होता. दहशतवाद्यांसोबत झालेल्या चकमकी दरम्यान गावडे गंभीर जखमी झाले होते. रूग्णालयात उपचार सुरू असताना त्यांचे निधन झाले.

अष्टपैलू व्यक्तिमत्व असलेले गावडे हे उत्तम नेमबाज (स्नायपर), रेडिओ ऑपरेटर होते तसेच कॉम्प्युटर आणि सर्व प्रकारचे रेडिओ संच हाताळण्यात कुशल होते. ते उत्तम हॉकी, बास्केटबॉल आणि फूटबॉलपटू होते. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी तालुक्यातील आंबोली-मुळवंदवाडी (ता. सावंतवाडी) येथील मूळ रहिवासी असलेले गावडे मराठा लाइट इन्फंट्रीमध्ये कार्यरत होते. काही वर्षांपूर्वी त्यांची नेमणूक जम्मू काश्मिरमध्ये अतिरेक्यांचा सामना करणाऱ्या ४१ राष्ट्रीय रायफल्समध्ये झाली होती. गावडे यांच्या पश्चात आई-वडील, पत्नी व दोन मुले असा परिवार आहे. गावडे यांना घरातूनच लष्करी सेवेचे बाळकडू मिळाले होते. त्यांचे दोन मोठे भाऊ सैन्यातच कार्यरत होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

निवडणुकांमुळे ‘एक्स्प्रेस वे’कडे दुर्लक्ष?

$
0
0

‘इंटेलिजंट सिस्टीम’ची योजना कागदावरच

म. टा. प्रतिनिधी, पुणे

राज्यात गेल्या काही महिन्यांत झालेल्या नगरपालिकांच्या आणि आता होऊ घातलेल्या जिल्हा परिषद व महापालिकांच्या निवडणुकांमुळे ‘पुणे-मुंबई एक्स्प्रेस वे’वरील अपघात रोखण्यासाठी प्रस्तावित असलेली ‘इंटेलिजंट ट्रॅफिक मॉनिटरिंग सिस्टीम’ कागदावरच राहिलेली आहे. मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली साडेसात महिन्यांपूर्वी झालेल्या बैठकीत ‘इंटेलिजंट सिस्टीम’चा निर्णय झाला होता; मात्र निवडणुकांच्या रणधुमाळीत त्याकडे दुर्लक्ष झाल्याचा आरोप केला जात आहे.

पनवेल येथे झालेल्या भीषण अपघातात १७ जणांना प्राण गमवावे लागल्यानंतर ‘एक्स्प्रेस वे’वर ‘इंटेलिजंट ट्रॅफिक मॉनिटरिंग सिस्टीम’ कार्यान्वित करण्याचा निर्णय दस्तुरखुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जून महिन्यात झालेल्या बैठकीत घेतला होता. ‘एक्स्प्रेस वे’वर करावयाच्या उपाययोजना निश्चित डेडलाइनमध्ये पूर्ण न झाल्यास मला पावले उचलावी लागतील, अशी तंबी फडणवीस यांनी बैठकीत संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना दिली होती; मात्र त्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीला सहा महिन्यांपेक्षा अधिक काळ उलटला आहे. तरीही अद्याप ‘इंटेलिजंट’बाबतचा निर्णय झालेला नाही.

‘एक्स्प्रेस वे’वर ड्रोनद्वारे चाचणी घेण्यात आली. सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या माध्यमातून चाचणी घेण्यात आली. दोन्ही चाचण्यांचा तुलनात्मक अभ्यास करून ‘सीसीटीव्ही’ कॅमेऱ्याच्या माध्यमातून ‘इंटेलिजंट’ प्रणाली कार्यान्वित करणे अधिक फायद्याचे ठरेल, असा निष्कर्ष त्यातून काढण्यात आला.

नोव्हेंबर महिन्यात ‘इंटेलिजंट’ प्रणालीची रूपरेषा निश्चित करण्यासाठी राज्य रस्ते विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालकांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन केली आहे. ‘इंटेलिजंट’बाबत प्रशासकीय पातळीवर हालचाल होत असल्याचे याद्वारे दिसून येते; मात्र ती हालचाल पुरेशी नाही. समिती स्थापन झाली, पण पुढे काय, हा प्रश्न अनुत्तरितच आहे.

दरम्यान, ‘एक्स्प्रेस वे’वर बायफ्रेन रोप बसवण्याचे काम सुरू आहे. दुसरीकडे, अपर पोलिस महानिरीक्षक (वाहतूक) आर. के. पद्मनाभन यांनी ‘एक्स्प्रेस वे’वरील वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी अनेक नवनवीन उपाययोजना राबवल्या. त्याचा सकारात्मक परिणामही दिसून आला; पण बेशिस्तीला पूर्णपणे चाप लावण्यासाठी तीव्र स्वरूपाची दंडात्मक कारवाई आवश्यक आहे. त्यासाठी तंत्रज्ञानावर आधारित यंत्रणा उभारण्याची प्रतीक्षा आहे.

............

‘ट्रॉमा केअर’ नाहीच...

‘एक्स्प्रेस वे’वर ओझर्डे येथे बांधून तयार असलेल्या ट्रॉमा केअर सेंटरमध्ये तातडीने सेवा सुरू करावी, अशा सूचनाही सात महिन्यांपूर्वी देण्यात आल्या आहेत. राज्य सरकार येथील ‘ट्रॉमा’ सेवा देण्यासाठी तत्पर आहे; पण सरकारला या संपूर्ण देशातच डॉक्टरांसह अन्य आवश्यक कर्मचारी मिळत नसल्याने हे सेंटर सुरू होत नसावे, अशी टीका आता केली जाऊ लागली आहे. कारण, संपूर्ण ट्रॉमा सेंटरची उभारणी फार पूर्वीच झालेली असतानाही तेथे सेवा सुरू होत नाही, यामागचे नेमके कारण ना प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे, ना लोकप्रतिनिधी सांगत आहेत. त्यामुळे या ‘ट्रॉमा’ सेंटरचे काम पूर्ण होऊनही उपयोग नाही.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


हौशीसाठी दुचाकी चोरणारा गजाआड

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

वाहने फिरवण्याची हौस भागवण्यासाठी शहरातील विविध भागांतून दुचाकी चोरणाऱ्या सराईताला खडक पोलिसांनी गजाआड केले. या संशयिताकडून चोरीच्या नऊ दुचाकी जप्त करून पावणेतीन लाख रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे.

प्रवीण ऊर्फ प्रशांत दिलीप जाधव (२१, रा. इनामके मळा, लोहियानगर) असे अटक केलेल्या संशयिताचे नाव आहे. जाधव हा रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. चोरी केलेल्या दुचाकींवर बनावट नंबर लावून तो शहरात फिरत असे. पोलिसांनी त्याला कोर्टात हजर केले असता त्याला २६ जानेवारीपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत, अशी माहिती उपायुक्त सुधीर हिरेमठ, वरिष्ठ निरीक्षक रघुनाथ जाधव यांनी दिली.

दुचाकीचोर जाधव शुक्रवार पेठेतील गगनगिरी नवरात्रौ मंदिर परिसरात येणार असल्याची माहिती पोलिसांना समजली होती. त्यानुसार फौजदार संजय गायकवाड यांच्या पथकाने त्याला सापळा रचून ताब्यात घेतले. त्याच्याकडे असलेल्या दुचाकीबाबत विचारणा केली असता ती चोरीची असल्याचे उघडकीस आले. ही दुचाकी त्याने सारसबागेजवळून चोरली असल्याचे तपासादरम्यान सांगितले.

पोलिसांनी त्याला पोलिसी खाक्या दाखवल्यानंतर त्याच्याकडून चोरीच्या नऊ दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. हिरो होंडा स्प्लेंडर, होंडा अॅक्टिव्हा, होंडा डिओ आणि सुझुकी अॅक्सिस अशा नऊ दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. त्याच्याविरुद्ध अलंकार, स्वारगेट, खडक, सिंहगड पोलिस ठाण्यात वाहनचोरीचे गुन्हे दाखल आहेत. पोलिस निरीक्षक (गुन्हे) संभाजी शिर्के, सहायक निरीक्षक व्ही. डी. केसकर, फौजदार संजय गायकवाड, कर्मचारी संतोष मते, बशीर शेख, बापू शिंदे, राकेश क्षीरसागर, रवी लोखंडे, संदीप कांबळे यांच्या पथकाने ही कारवाई केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विज्ञान शिक्षकांसाठी विशेष महोत्सव

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

विज्ञान शिकवण्याच्या पद्धतीत बदल घडवण्यासाठी ‘इंडो सायन्स एज्युकेशन ट्रस्ट’तर्फे राष्ट्रीय अंतराळ व विज्ञान महोत्सव आणि विज्ञान शिक्षक, मुख्याध्यापकांसाठी परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. हा महोत्सव २७ ते २९ जानेवारीदरम्यान हडपसरमधील एस. एम. जोशी कॉलेजमध्ये होणार आहे. परिषद साधना महाविद्यालयात पार पडेल. ट्रस्टचे अध्यक्ष संतोष पिसे, प्रशांत डोब्रियाल आणि शत्रुघ्न रणसुभे यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.

विज्ञानाच्या शिक्षकांना विज्ञानाकडे एका वेगळ्या दृष्टिकोनातून पाहण्याची सवय लावणे, वेगळा विचार करायला लावणे हा या परिषदेचा उद्देश आहे. साधनांची कमतरता आणि प्रात्यक्षिकाद्वारे विज्ञान शिकवण्याची अनिच्छा यामुळे देशात संशोधक वृत्तीला चालना मिळत नाही. त्यामुळेच या परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. या परिषदेत ‘इस्रो’चे माजी संचालक प्रमोद काळे, डॉ. सुरेश नाईक, डॉ. एम. सी. उत्तम, बी. आर. गुरुप्रसाद, डी. कमलेश जांगीड यांच्यासह उपग्रह बनवणारे सीओईपी व ‘आयआयटी, मुंबई’चे विद्यार्थी मार्गदर्शन करतील.

विद्यार्थ्यांसाठी पर्वणी

एस. एम. जोशी कॉलेजमध्ये होणाऱ्या राष्ट्रीय अंतराळ व विज्ञान महोत्सवांतर्गत विद्यार्थ्यांना ‘इस्रो’ची रॉकेट व उपग्रहांच्या प्रतिकृती पाहता येतील. यात अॅस्ट्रोसॅट आणि मंगलयानाच्या प्रतिकृतीचाही समावेश असेल. महाराष्ट्रातील ‘फुनसूक वांगडूं’नी तयार केलेली स्कूटर फ्लोअर मिलही येथे पाहता येईल.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

राम कदम कलागौरव पौडवाल यांना जाहीर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

ज्येष्ठ गायिका अनुराधा पौडवाल यांना शरद क्रीडा आणि सांस्कृतिक प्रतिष्ठानचा राम कदम कलागौरव पुरस्कार जाहीर झाला आहे. शाल, श्रीफळ स्मृतिचिन्ह आणि रुपये एक लाख रुपये असे या पुरस्काराचे स्वरूप असून, लवकरच जाहीर कार्यक्रमात पौडवाल यांचा गौरव करण्यात येणार आहे, अशी माहिती प्रतिष्ठानचे अध्यक्ष लक्ष्मीकांत खाबिया यांनी दिली.

अनुराधा पौडवाल यांनी तू मेरा जानू, नजर के सामने, दिल है के मानता नही, धक धक करने लगा अशा अनेक गाण्यांना आपला आवाज देऊन चित्रपटसृष्टीत एक वेगळी ओळख निर्माण केली. त्यांच्या ‘आशिकी’ चित्रपटातील सर्व गाण्यांनी त्यांना नव्वदीच्या दशकातील एक अग्रगण्य गायिका म्हणून ओळखले जाऊ लागले. चित्रपट गीतांबरोबरच त्यांनी भक्तिगीते आणि भजनांच्या गायनाने श्रोत्यांच्या मनात एक वेगळा ठसा उमटवला. पौडवाल यांनी हिंदी चित्रपटसृष्टीसह तमीळ, उडिया, नेपाळी या भाषांमधील चित्रपटांच्या गाण्यांसाठी पार्श्वगायन केले. १९८९ साली कळत-नकळत या मराठी चित्रपटात पौडवाल यांनी गायलेल्या ‘हे एक रेशमी’ या गाण्यासाठी त्यांना राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. पौडवाल यांचे अनेक अल्बम प्रसिद्ध आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नाट्य संमेलनात लोककलांना ‘व्यासपीठ’

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, पुणे
शेवटच्या घटका मोजत असणाऱ्या लोककला जपण्याचा प्रयत्न उस्मानाबाद येथे होणाऱ्या नाट्य संमेलनात होणार आहे. या कलांचा वारसा पुढच्या पिढीसाठी जतन व्हावा, यासाठी मराठवाडा परिसरासह ग्रामीण भागातील लोककलांची सूची तयार करण्यात येणार आहे. या सूचीच्या आधारे नाट्य संमेलनात लोककलांना ‘व्यासपीठ’ दिले जाणार आहे.
९७ वे अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलन उस्मानाबाद येथे ७ ते ९ एप्रिल या कालावधीत होणार आहे. मराठवाड्यातील ग्रामीण भागात विपुल लोककला दिसून येतात; पण आजच्या काळात लोककलांची परंपरा नष्ट होण्याचा धोका निर्माण झाला आहे. या लोककला जतन व्हाव्यात, त्या नव्या पिढीपर्यंत पोहोचाव्यात तसेच मोठे व्यासपीठ या कलांसाठी असावे, या विचारातून संमेलनात लोककलांना स्थान देण्यात येणार आहे.
लोककलांची परंपरा टिकावी तसेच त्यांचे सादरीकरण व्हावे, यासाठी लोककलांची सूची करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती नाट्य परिषदेच्या मध्यवर्ती शाखेचे प्रमुख कार्यवाह दीपक करंजीकर यांनी पत्रकारांना दिली. लोककला अभ्यासकांनी तसेच कलावंतानी यासाठी पुढाकार घेऊन माहिती द्यावी व या कामात सहभागी व्हावे, असे आवाहन त्यांनी केले. लोककलांचा संग्रह करण्याचे काम नाट्य परिषदेच्या उस्मानाबाद शाखेला देण्यात आले आहे.
पोवाडा, भारूड, जागरण-गोंधळ, वाघ्या-मुरळी, कलगी-तुरेवाले या कलांचे जनमानसावर गारूड होते. आता मनोरंजनाचे शेकडो पर्याय उपलब्ध झाल्याने समृद्ध लोककलांना उतरती कळा लागली आहे. केवळ कीर्तन आणि भारूडाला असलेले धार्मिक अधिष्ठान तसेच तमाशा, लावणी या शृंगारिक कलाप्रकारांचा असलेला स्वतंत्र चाहतावर्ग आज टिकून आहे. गोंधळ, भारूड, डोक्यावर समई घेऊन अभंग गात सादर होणारे थाळी नृत्य, गवळण, पोवाडा, वाघ्या-मुरळी या लोककलांचा समृद्ध वारसा मराठवाड्याला लाभला आहे. या लोककलांचा सूचीरूपात संग्रह करण्याच्या कामासाठी लवकरच समिती स्थापन केली जाणार असल्याचे नाट्य परिषदेच्या उस्मानाबाद शाखेचे अध्यक्ष व संमेलनाचे आयोजक विशाल शिंगाडे यांनी सांगितले.

एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात होणाऱ्या नाट्य संमेलनात रसिकांना उन्हाचा त्रास होऊ नये म्हणून कार्यक्रम संध्याकाळी घेण्याचा विचार सुरू आहे. दुपारची वेळ टाळून सकाळी अकरापर्यंत व नंतर सायंकाळी ४ ते रात्री १२ या वेळेत कार्यक्रम आयोजनासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी तयारी दर्शवली आहे. रात्री बारापर्यंत कार्यक्रमास परवानगी मिळावी, यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना पत्र देण्यात येणार आहे.

- दीपक करंजीकर, प्रमुख कार्यवाह,
नाट्य परिषद मध्यवर्ती शाखा

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मेट्रोचे २५ टक्के सर्वेक्षण पूर्ण

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, पुणे
महाराष्ट्र मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनतर्फे (महामेट्रो) शहरात सुरू असलेले पुणे मेट्रोच्या विविध सर्वेक्षणांचे २५ टक्के काम पूर्ण झाले असून, पिंपरी-चिंचवड ते रेंजहिल्सपर्यंतच्या १० किमीच्या मार्गाला सर्वोच्च प्राधान्य देण्यात येणार आहे. मेट्रोचे प्रत्यक्ष काम सुरू करण्याच्या दृष्टीने आवश्यक टेंडर-प्रक्रिया मार्चपूर्वी पूर्ण करण्याचेही महामेट्रोच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.
केंद्र सरकारने गेल्या महिन्यात पुणे मेट्रोला अंतिम मंजुरी दिल्यानंतर त्यासाठी आवश्यक असलेल्या महामेट्रो या स्वतंत्र कंपनीची स्थापना (एसपीव्ही) अवघ्या ४५ दिवसांत पूर्ण करण्यात आल्याचा दावा व्यवस्थापकीय संचालक ब्रिजेश दीक्षित यांनी केला. ही स्थापना पूर्ण होण्यापूर्वीच जिओ-टेक्निकल आणि टोपोग्राफी सर्वेक्षण सुरू झाले होते. आत्तापर्यंत या दोन्ही सर्वेक्षणांचे २५ टक्के काम पूर्ण झाले असून, पुढील सहा महिन्यांमध्ये उर्वरित कामाची पूर्तता होईल, असा विश्वास दीक्षित यांनी व्यक्त केला.
पिंपरी-चिंचवड ते स्वारगेट या पहिल्या मार्गावरील रेंजहिल्सपर्यंतच्या १० किमीच्या भागाचे काम वेगाने पूर्ण करणे शक्य असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे, शहरातील मेट्रोच्या कामांदरम्यान याच मार्गाला सर्वाधिक प्राधान्य देण्यात येईल. पुणे-मुंबई महामार्गावरील सध्याच्या बीआरटी मार्गावरील दुभाजकांवर मेट्रोसाठी खांब उभे राहतील, असे त्यांनी नमूद केले. त्यानंतर, वनाज ते शिवाजीनगर धान्य गोदामापर्यंतच्या मेट्रो मार्गाचे काम सुरू होईल. या दोन्ही मार्गाची टेंडर प्रक्रिया मार्चअखेरपर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे, असे त्यांनी सांगितले.
शहरातील पर्यावरणाबाबत पुणेकर सर्वाधिक जागरूक असल्याने पर्यावरणपूरक उपक्रम राबवण्याचा महामेट्रोचा प्रयत्न असेल, असे दीक्षित यांनी स्पष्ट केले. त्यासाठी, एकूण ऊर्जेच्या वापरापैकी ६५ टक्के सौरऊर्जा वापरली जाणार आहे. तसेच, पाण्याचा पुनर्वापर आणि पाण्यावर प्रक्रिया करणारे प्रकल्पही मेट्रोतर्फे उभारले जातील, असे त्यांनी नमूद केले.
मेट्रोसाठी आवश्यक भूसंपादन, वित्तीय पुरवठा आणि इतर अनुशांगिक बाबींसंदर्भातही चर्चा सुरू असून, सरकारी कार्यालये आणि खासगी कार्यालयांकडून घ्याव्या लागणाऱ्या जागेबाबत पत्रव्यवहार केला जात असल्याचे त्यांनी सांगितले.


एनजीटीसमोरील सुनावणी स्थगित
मेट्रोच्या नदीपात्रातील मार्गाला आक्षेप घेत त्याविरोधात राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणात (एनजीटी) याचिका दाखल झाली होती. एनजीटीने २५ जानेवारीपर्यंत त्याला स्थगिती दिली होती. त्याविरोधात, महापालिकेने सुप्रीम कोर्टात दाद मागून, एनजीटीच्या निर्णयाला स्थगिती मिळवली. त्यामुळे, महापालिकेच्या वकिलांनी सुप्रीम कोर्टाचे आदेश एनजीटीसमोर सादर केले. तरीही, सुनावणी घेण्याचा आग्रह याचिकाकर्त्यांनी धरला. सुप्रीम कोर्टातील याचिकेवर अंतिम निर्णय होत नाही, तोपर्यंत सुनावणी घेता येणार नाही, असे एनजीटीच्या न्यायमूर्तींनी स्पष्ट केले. त्यामुळे, सुप्रीम कोर्टाचा निकाल येईपर्यंत एनजीटीसमोर कुठलीच सुनावणी होणार नाही.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images