Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

‘शाळाभेट म्हणजेच वर्गभेट’ उपक्रम

$
0
0


Harsh.Dudhe@timesgroup.com
@HarshDudheMT

पुणे : राज्यातील पर्यवेक्षीय अधिकारी हे ‘शाळाभेट’ म्हणजे शाळांना भेटी देऊन शाळांसोबतच कागदपत्रांचे ‘रेकॉर्ड’ तपासणे आणि आढळलेल्या त्रुटींवर तासन‍्तास शिक्षकांना भाषण देण्यापलीकडे फारसे काम करीत नाही. त्यामुळेच शिक्षण विभागाच्या ‘शाळाभेट’ कार्यक्रमाचा शाळांच्या शैक्षणिक गुणवत्ता वाढीमध्ये फारसा बदल झालेला नाही, असे प्राथमिक शिक्षक संचालक कार्यालयाच्या निदर्शनास आले आहे. यावर उपाय करण्यासाठी आणि पर्यवेक्षकांच्या मानसिकतेत बदल करण्यासाठी कार्यालयाने ‘शाळाभेट म्हणजेच वर्गभेट’ हा अनोखा उपक्रम राबविण्याचा निर्णय घेतला आहे.

राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील ५० टक्के प्राथमिक, २५ टक्के उच्च प्राथमिक आणि २० टक्के माध्यमिक शाळा जलद प्रगत शैक्षणिक कार्यक्रमांतर्गत प्रगत करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यानुसार या कार्यक्रमाच्या एका उपक्रमात पर्यवेक्षीय अधिकाऱ्यांना शाळाभेट ही संकल्पना पर्यवेक्षण व मार्गदर्शक या रुढ पारंपरिक कार्यपद्धतीच्या विरोधात राबविण्याची जबाबदारी होती. मात्र, पर्यवेक्षीय अधिकाऱ्यांनी ही संकल्पना शाळांचे ‘रेकॉर्ड’ तपासणे, शाळांटी तपासणी करणे आणि आढळलेल्या त्रुटींवर तासन‍्तास शिक्षकांना भाषण देणे या व्यतिरिक्त राबविली नाही. त्यामुळे राज्यात शाळांची शैक्षणिक गुणवत्तेत धीम्या गतीने वाढ होत आहे.
यावर उपाय म्हणून ‘शाळाभेट म्हणजेच वर्गभेट’ हा अनोखा उपक्रम राबविण्यात येणार आहे. या उपक्रमात अधिकाऱ्यांना प्रत्येक शिक्षकाशी भेटून वर्गातील विद्यार्थ्यांचा शैक्षणिक स्तर समजून घ्यायचा आहे. वर्गात गेल्यानंतर विद्यार्थ्यांमध्ये जाऊन मिसळायचे असून, वर्गात एखादी कृती सुरू असल्यास त्यामध्ये सहभागी व्हायचे आहे. तसेच, विद्यार्थ्यांशी अनौपचारिक गप्पांमध्ये सहभागी होऊन त्यांच्याशी संवाद साधायचा आहे. विद्यार्थ्यांमध्ये वाचनक्षमता किती प्रमाणात आहे, हे तपासायचे आहे. वर्गातील ज्या विद्यार्थ्यांना त्या अध्ययन स्तराची व्यवस्थित माहिती नाही, अशांना आपल्या कौशल्यांचा वापर करून त्यांना अपेक्षित शैक्षणिक स्तरावर जाण्यासाठी प्रेरीत करायचे आहे, अशा गोष्टींचा उपक्रमात समावेश करायचा आहे. दरम्यान, पर्यवेक्षीय अधिकाऱ्यांची वर्गभेट ही विद्यार्थी आणि शिक्षकांसाठी शिकण्याची संधी मिळाली पाहिजे, असे अधिकाऱ्यांना वागायचे आहे. तसेच, शिक्षकांच्या चांगल्या उपक्रमाचे सर्वांसमोर कौतुक करायचे आहे, अशा गोष्टींचा समावेश उपक्रमात आहे.
पर्यवेक्षीय अधिकाऱ्यांबरोबरच राज्यातील सर्व प्राथमिक शाळांच्या मुख्याध्यापकांना अशा प्रकारे वर्गभेट उपक्रम राबवायचा आहे. हा उपक्रम त्वरित राबविण्याचे आदेश राज्याचे प्राथमिक शिक्षण संचालक गोविंद नांदेडे यांनी राज्यातील शिक्षण उपसंचालक, सर्व शिक्षणाधिकारी, गटशिक्षणाधिकारी, प्रशासन अधिकारी, शिक्षण प्रमुख यांना दिले आहेत.

‘गुणवत्ता सुधारण्यात फायदा’

पर्यवेक्षीय अधिकाऱ्यांनी ‘शाळाभेट म्हणजेच वर्गभेट’ उपक्रमात शाळांचे ‘रेकॉर्ड’ तपासणीकडे कमी लक्ष द्यायचे आहे. अधिकाऱ्यांचा शाळेत किंवा वर्गात गेल्यानंतर कागदपत्रांची तपासणी करण्याकडे आणि शिक्षकांची झाडाझडती घेण्याकडे कल असू नये. तसेच, शिक्षकांना विद्यार्थ्यांसमोर सूचना देण्याची आवश्यकता नाही, अशा सूचना उपक्रमातून दिल्या आहेत. शिक्षकांना आणि विद्यार्थ्यांना ‘शाळाभेट म्हणजे वर्गभेट’ उपक्रमाचा फायदा होण्यासाठी चौकटीतून बाहेर निघून नवी नियमावली तयार केली आहे. याचा नक्की शैक्षणिक गुणवत्ता सुधारण्यात फायदा होईल, असे नांदेडे यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


आघाडी करायचीय; सन्मानाने चर्चा हवी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

राष्ट्रवादी काँग्रेसने आघाडी करायची की नाही याचा निर्णय घ्यावा आणि करायची असल्यास सन्मानाने चर्चा करण्याची मागणी काँग्रेसच्या नेत्यांकडून होत आहे. आघाडी करायची नसल्यास दोघांनाही आपले मार्ग स्वतंत्र आहेत, उगाच आघाडीचा गोंधळ घालण्यात अर्थ नाही, अशी भावना काँग्रेस नेते-कार्यकर्त्यांची आहे.
काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आघाडीवरून चर्चा झडत आहेत. आघाडी करायची असल्याचे दोघांकडून सांगण्यात येत असले तरी सन्मानपूर्वक चर्चा होत नसल्याची काँग्रेसचे म्हणणे आहे. शिवसेना-भाजपला रोखायचे असल्यास दोन्ही काँग्रेसला एकत्र येण्याशिवाय पर्याय नाही. दोन्ही काँग्रेस स्वतंत्ररित्या लढल्या तर त्याचा फटका दोघांनाही बसणार आहे. अशा परिस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसने आघाडीचा काय तो निर्णय घ्यावा आणि काँग्रेसशी सन्मानाने चर्चा करावी, अशी मागणी होते आहे.
काँग्रेसने आघाडी करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसला साधारण कसे सूत्र असावे, याची माहिती दिली होती. तर, राष्ट्रवादीने केलेल्या सर्व्हेच्या आधारे ११६ जागांचा दावा केला होता. दोन्ही बाजूंनी आघाडीची चर्चा होत असल्या तरी आघाडी कशी करावी, किती जागा दोघांनी घ्याव्यात, त्याला काय सूत्र असावे, याबाबत फारशी गांभीर्याने चर्चा झाली नव्हती. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसला आघाडी करायची आहे की नाही, याबाबत काँग्रेस नेत्यांमध्ये शंका उपस्थित झाली आहे. राष्ट्रवादीने आघाडी करायची की नाही, याचा निर्णय घ्यावा आणि काँग्रेसशी सन्मामाने चर्चा करावी, अशी मागणी काँग्रेस कार्यकर्त्यांची आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांची पक्षश्रेष्ठींची चर्चा करताना आघाडी करायची की नाही, याचा पहिला निर्णय घ्यावा, असे काँग्रेसचे म्हणणे आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मोहिनी देवकरांचा भाजपमध्ये प्रवेश

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका मोहिनी देवकर यांनी सोमवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. येत्या काही दिवसांत भाजपमध्ये आणखी काही प्रवेश होण्याची शक्यता आहे.
धनकवडी-चैतन्यनगर प्रभागात राष्ट्रवादीचे नगरसेवक विशाल तांबे यांच्यासह देवकर निवडून आल्या होत्या. सोमवारी भाजपमध्ये प्रवेश करण्यापूर्वी त्यांनी महापालिका आयुक्तांकडे नगरसेवकपदाचा राजीनामा दिला. मुख्यमंत्री फडणवीस खासगी कार्यक्रमानिमित्त शहरात असल्याने त्यांच्या उपस्थितीत देवकर यांचा पक्ष प्रवेश करण्यात आला. या वेळी, प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, पालकमंत्री गिरीश बापट, शहराध्यक्ष योगेश गोगावले यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते. राष्ट्रवादी काँग्रेसमधून स्थायी समितीचे माजी अध्यक्ष बापूराव कर्णे गुरुजी यांच्यासह दिनेश धाडवे यांच्यासह इतर पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यात आता देवकर यांची भर पडली असून, पुढील काही दिवसांत आणखी काही नगरसेवक भाजपच्या वाटेवर असल्याचे समजते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महायुतीतील तीन पक्ष पालिकेच्या रिंगणात

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

आगामी पुणे, पिंपरी-​चिंचवड महापालिका आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत भाजपकडून जागावाटपात अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्याने शिवसंग्राम, स्वाभिमानी पक्ष आणि राष्ट्रीय समाज पक्ष या तीन पक्षांनी एकत्रपणे लढण्याचा निर्णय घेतला आहे. पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांची येत्या २८ आणि २९ जानेवारीला बैठक होणार असून, त्यामध्ये व्यूहरचना ठरविण्यात येणार आहे.
राज्य सरकारमध्ये शिवसंग्राम, स्वाभिमानी पक्ष आणि राष्ट्रीय समाज पक्ष तिन्ही पक्ष सहभागी आहेत. मात्र, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत जागावाटपामध्ये तिघांनाही भाजपकडून योग्य प्रतिसाद मिळत नसल्याने त्यांनी ही भूमिका जाहीर केली आहे. स्वाभिमानी पक्षाचे प्रवक्ते योगेश पांडे, ​शिवसंग्रामचे शहराध्यक्ष भरत लगड, संपर्कप्रमुख तुषार काकडे आणि राष्ट्रीय समाज पक्षाचे शहराध्यक्ष देवेंद्र धायगुडे यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.
तिन्ही पक्षांनी आपापल्या जागांची यादी भाजपकडे दिली आहे. त्या यादीनुसार भाजप तिन्ही पक्षांना सोबत घेईल, अशी अपेक्षा आहे. मात्र, भाजपने योग्य सन्मान दिला नाही तर ​तिन्ही पक्ष एकजुटीने निवडणुकीच्या रिंगणार उतरणार असल्याचे या पदाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. पक्षाचे वरिष्ठ नेते २८ आणि २९ जानेवारी रोजी पुण्यात येणार आहेत. त्यामध्ये व्यूहरचना ठरविण्यात येणार आहे, असे या पदाधिकाऱ्यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

युतीसाठी डेडलाइन नाही

$
0
0

भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांचे सूचक वक्तव्य

म. टा. प्रतिनिधी, पुणे

भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना यांच्यात युतीसाठी कोणतीही डेडलाइन नाही; युती अखेरच्या क्षणापर्यंत होऊ शकते, असे सूचक वक्तव्य भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी सोमवारी केले. सामंजस्याने जागा वाटपावर तोडगा निघेल, तिथे युती होईल; अन्यथा आम्ही स्वबळावर लढू, असे संकेतही त्यांनी दिले. तसेच, राजकारणात प्रतीक्षा करायला लावणे म्हणजे एक प्रकारची फसवणूकच आहे, असा टोलाही त्यांनी शिवसेनेचे नाव न घेता लगावला.
भाजपच्या बैठकीसाठी पुण्यात आलेल्या दानवे यांनी पत्रकारांशी बोलताना, ‘युतीबाबत चर्चा सुरू असून, निश्चित निर्णय केव्हा होणार, हे सांगता येणार नाही,’असा खुलासा केला. युतीसाठी शिवसेनेने डेडलाइन दिली असून, मुंबईत युती झाली नाही तर राज्यात इतरत्रही होणार नाही, असा इशारा दिला आहे. त्यावर, आमच्यासाठी कोणतीही डेडलाइन नसून, अखेरच्या क्षणीही युतीचा निर्णय होऊ शकतो, असा दावा दानवे यांनी केला. मुंबईत युती झाली नाही, तरी इतर ठिकाणी दोन्ही पक्षांमध्ये सामंजस्याने जागा वाटपावर तोडगा निघाला तर युती करून लढण्यासाठी आम्ही सकारात्मक आहोत, असे त्यांनी स्पष्ट केले.
मुंबईमध्ये युतीसाठी भाजपने शिवसेनेला दिलेल्या प्रस्तावावर पक्ष अजूनही ठाम असून, त्यानंतर नव्याने कोणताही प्रस्ताव देण्यात आलेला नाही. शिवसेनेकडून आम्हांला प्रतीक्षा असून, त्याचा कालावधी वाढत गेल्यास त्याला फसवणूकच म्हणले जाईल, अशी पुष्टी त्यांनी जोडली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘इनकमिंग’बद्दल पुण्यात भाजपमध्ये नाराजी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
गेल्या काही दिवसांपासून भारतीय जनता पक्षामध्ये मोठ्या प्रमाणावर सुरू असलेल्या पक्ष प्रवेशाचे (इनकमिंग) तीव्र पडसाद सोमवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्यासह झालेल्या बैठकीत उमटले. दुसऱ्या पक्षातील नगरसेवक, पदाधिकाऱ्यांना प्रवेश देताना आपल्याला विश्वासात घेतले जात नसल्याचे गाऱ्हाणे पक्षाच्या आमदार आणि पदाधिकाऱ्यांनी थेट मुख्यमंत्र्यांसमोर मांडले. ‘मेरीट’वरच उमेदवारी देणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी या वेळी स्पष्ट केले.

एका खासगी कार्यक्रमानिमित्त फडणवीस सोमवारी पुण्यात होते. या कार्यक्रमानंतर, वडगावशेरी परिसरात त्यांनी, पालकमंत्री गिरीश बापट, सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे, शहराध्यक्ष योगेश गोगावले, खासदार अनिल शिरोळे, खासदार संजय काकडे यांच्यासह शहरातील सर्व आमदारांची आणि पक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली.

भाजपमध्ये गेल्या महिन्याभरामध्ये अनेकांना प्रवेश देण्यात आले. हे प्रवेश देताना पक्षातील पदाधिकाऱ्यांना किंवा जुन्या-जाणत्या कार्यकर्त्यांना विश्वासात घेतले गेले नाही. थेट प्रवेश देण्यात आल्यावरच त्याबाबतची माहिती समजत असल्याने कार्यकर्त्यांमध्येही नाराजी पसरत चालल्याची तक्रार फडणवीस यांच्याकडे करण्यात आली. पक्षात नव्याने आलेल्या सर्वांना उमेदवारी मिळाल्यास सामान्य कार्यकर्त्यांचे काय, अशी विचारणाही या वेळी करण्यात आली.

‘बाहेरील सक्षम नेत्यांना प्रवेश दिल्याने फायदा होत असल्याचे विधानसभा निवडणुकीत दिसले आहे. पालिका निवडणुकीतही त्याचे सकारात्मक चित्र दिसून येईल,’ असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला. ते म्हणाले, ‘एखाद्या व्यक्तीच्या मागे-मागे करणाऱ्या किंवा एखाद्या खासदार-आमदाराने शिफारस केलेल्यांनाच उमेदवारी दिली जाईल, असे नाही. त्या भागांतील संबंधित उमेदवाराच्या ‘मेरिट’वरच त्याला तिकीट दिले जाणार आहे.’

युतीबाबत सकारात्मकतेचा आदेश

भाजप-शिवसेनेच्या युतीबाबत पदाधिकाऱ्यांमध्ये दोन बैठका झाल्या असल्या, तरी त्यातून तोडगा निघालेला नाही. त्याचा आढावा घेत, शिवसेनेसोबत सहकार्याची भूमिका ठेवा, असा स्पष्ट आदेश मुख्यमंत्र्यांनी पदाधिकाऱ्यांना दिला. शिवसेनेसोबत सकारात्मक भूमिकेतून चर्चा करा आणि पुढील काही दिवसांत योग्य निर्णय घ्या, अशी पुस्तीही त्यांनी जोडली. यामुळे शिवसेनेसोबतची चर्चा पुन्हा ट्रॅकवर येण्याची शक्यता असून, येत्या दोन दिवसांत पुढील बैठक घेण्यात येणार असल्याचे संकेत दिले जात आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तांत्रिक कारणामुळे रखडली मतदारयादी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

मतदार यादीसाठीच्या सॉफ्टवेअरमधील त्रुटीमुळे महापालिका निवडणुकीची अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्यास दोन दिवसांचा उशीर झाल्याची कबुली पालिका आयुक्त कुणाल कुमार यांनी दिली. आज, मंगळवारपर्यंत अंतिम मतदार यादी तयार होऊन पालिकेच्या वेबसाइटवर टाकली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
पुढील महिन्यात २१ फेब्रुवारीला महापालिकेसाठी मतदान होणार आहे. निवडणुकीसाठी अंतिम मतदार यादी २१ जानेवारीला प्रसिद्ध होणार होती. मात्र, मतदारयादी प्रसिद्ध करण्यास विलंब होत असल्याच्या पार्श्वभूमीवर राजकीय पक्षांमध्ये चर्चांना ऊत आला होता. पालिकेने प्रसिद्ध केलेल्या मतदार यादीवर शहरातील विविध प्रभागातून ९०९ हरकती नोंदविण्यात आल्या होत्या. मतदार यादीवर नोंदविण्यात आलेल्या हरकती आणि सूचनांमुळे नव्याने मतदारनोंदणी अथवा नावे वगळण्यात येणार नव्हती. हद्दीतील बदल अथवा नाव पत्त्यांमधील चुका दुरुस्त केल्या जाणार होत्या.
विलंबाविषयी कुमार यांना विचारले असता, ते म्हणाले, की ‘विधानसभा निवडणुकीसाठी वापरण्यात आलेल्या मतदारयादीनुसार प्रभागनिहाय मतदारयाद्यांची विभागणी करण्यात आली आहे. त्यावरील हरकती आणि सूचनांनुसार बदल करून याद्या ऑनलाइनच निवडणूक आयोगाकडे पाठविण्यात आल्या. परंतु, निवडणूक आयोगाकडून परत याद्या मिळताना त्यातील बहुतांश त्रुटी तशाच राहिल्या. त्यांची तपासणी करून त्या पुन्हा आयोगाकडे पाठविण्यात आल्या. तेथून दुरूस्त होऊन आलेल्या याद्यांची तपासणी करून अंतिम याद्या तयार करण्यात येत आहेत. सोमवारपर्यंत २९ प्रभागांच्या याद्या अंतिम करण्यात आल्या आहेत. उर्वरीत याद्यांची तपासणी करून वेबसाइटवर टाकण्यात येतील. मंगळवारपर्यंत अंतिम याद्या तयार होतील.’ या वेळी पालिकेचे निवडणूक अधिकारी सतीश कुलकर्णी उपस्थित होते.

भरारी पथकांची नियुक्ती
निवडणूक काळात आचारसंहितेचा भंग होऊ नये, यासाठी आयोगाच्या सूचनेनुसार आवश्यक काळजी घेतली जात आहे. शहरातील विविध भागात फिरून उमेदवारांवर लक्ष ठेवण्यासाठी ४२ भरारी पथके नेमण्यात आली आहेत. पेड न्यूज तसेच इलेक्ट्रॉनिक्स माध्यमातून केल्या जाणाऱ्या जाहिराती तपासणीसाठी समिती नेमण्यात आल्याचे आयुक्तांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

माय लॉर्ड ते शहराचे प्रथम नागरिक

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

कोर्टात अशिलाच्या वतीने युक्तिवाद करता करता अनेक वकिलांनी थेट महापालिकेच्या सभागृहात प्रवेश करून पुणेकरांची बाजू मांडण्याची कामगिरी केली आहे. नियम आणि कायद्याच दांडगा अभ्यास आणि फर्ड्या वक्तृत्त्वाच्या जोरावर त्यांनी महापौरपदासह विविध पदे भूषवून शहराच्या राजकारणातही आघाडी घेतली आहे.

पुणे महापालिकेच्या निवडणुकीत अनेक कायदेतज्ज्ञांनी यापूर्वीही बाजी मारली आहे. नगरसेवक पदापासून सुरुवात करून महापौर-उपमहापौर पदासह ते अगदी स्थायी समितीच्या अध्यक्षपदापर्यंत मजलही मारली आहे. भाऊसाहेब चव्हाण, वंदना चव्हाण, अंकुश काकडे, चंद्रकांत छाजेड यांनी शहराचे प्रथम नागरिक होण्याचा मान मिळवला. एन. टी. निकम आणि प्रसन्न जगताप उपमहापौरपदी विराजमान झाले. अभय छाजेड, नीलेश निकम, संगिता देवकर आणि नीता परदेशी आदी पेशाने वकील असलेल्या मंडळींनी स्थायी समितीचे अध्यक्षपद भूषवून पालिकेच्या तिजोरीच्या किल्ल्याही सांभाळल्या आहेत.
लोकप्रतिनिधी म्हणून राजकारणात येणाऱ्या वकिलांना नागरिकांची पसंती असते. राजकीय क्षेत्रात येण्यापूर्वी कायदेविषयक क्षेत्रात कार्यरत या मंडळींनी प्रॅक्टिसच्या अनुभवाचा खूप फायदा झाल्याच्या प्रतिक्रिया नोंदविल्या. ‘राजकारणात येण्यापूर्वी आपण आठ वर्षे वकिलीच्या क्षेत्रात कार्यरत होतो. मी प्रामुख्याने फौजदारी स्वरुपाच्या केसेस चालविल्या आहेत. प्रत्येक गोष्टीचा बारकाईने अभ्यास करणे, नियम जाणून घेणे, संदर्भ समजावून घेणे, आपले म्हणणे प्रभावीपणे मांडणे, या कामांचा राजकीय जीवनात उपयोगे होतो. राज्यसभेत मांडण्यात येणाऱ्या विधेयकांच्या बाबतीत वकिलीच्या ज्ञानाचा फायदा होतो. जनतेने काही अवाजवी अपेक्षा केल्या, तर कायद्याचा अभ्यास असल्याने संबंधित मागणी कशी अयोग्य आहे, हे मी ठामपणे सांगू शकते,’ अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसच्या शहराध्यक्षा अॅड. वंदना चव्हाण यांनी नोंदवली.
‘कायद्याचा अभ्यास केल्यामुळे कायद्यातील तरतूद पटकन लक्षात येते. लोकांबरोबर संवाद साधताना त्याचा फायदा होतो. वकिलीच्या क्षेत्रातून राजकारणात येणाऱ्यांकडून अनेकांच्या अपेक्षा असतात. लोकप्रतिनिधी सुशिक्षित असेल तर, त्याच्या ज्ञानाचा फायदा सभागृहाला पर्यायाने शहराला होतो. वकिलीच्या क्षेत्रात आपण फार काळ काम केले नाही. मात्र, कायदेविषयक ज्ञानाचा राजकारणात फायदा झाला. प्रश्नोत्तरांमध्ये संबं​धित अधिकाऱ्यांना त्यांच्या चुका दाखविता आल्या. नियमांची माहिती असल्यामुळे आपली बाजू मांडणे सोपे गेले,’ असे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते अॅड. अंकुश काकडे यांनी नमूद केले.

कोट
पेशाने वकील असणाऱ्या राजकीय व्यक्तीला माहिती देताना अधिकारी टाळाटाळ करीत नाहीत. आपण पुण्यात, तसेच मुंबईत वकिली केली आहे. राजकीय क्षेत्रात वकिलीच्या ज्ञानाचा चांगला फायदा होतो. प्रशासनातील माहिती, कायद्याप्रमाणे काम चालते का, विविध प्रकारचे परवाने आणि परवानग्या देण्याचे नियम काय आहेत याची माहिती होते. चुकीची माहिती देणाऱ्यांना त्यांच्या चुका सहजतेने दाखवून देऊ शकतो. वकिलीच्या क्षेत्रातील अनुभवाचा मला राजकीय जीवनात खूपच फायदा झाला आहे.
अॅड. अभय छाजेड, माजी शहराध्यक्ष, काँग्रेस

सभागृहातील कायद्याचे अभ्यासक
खासदार वंदना चव्हाण, अंकुश काकडे, अभय छाजेड, चंद्रकांत छाजेड, एन. टी. निकम, नीलेश निकम, किशोर शिंदे, प्रसन्न जगताप, चंदू कदम, रुपाली ठोंबरे-पाटील, प्रकाश ढोरे, श्रीकांत शिरोळे, म. वि. अकोलकर, शांताराम जावडेकर,भगवान जाधव, म. की. काळभोर, सुरेश तौर, नंदू घाटे, संगीता देवकर, का. व्यं. जोशी, सुरेश भिरंगे, गो. प्र. भागवत, प्र. बा. जोग, वा. ब. गोगटे, शिवाजीराव ढुमे, ठकसेन पाडळे, आयुब शेख, अविनाश साळवे, भाऊसाहेब चव्हाण, ज्योती पवार आणि मुनाफ शेख.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


आमदारांच्या हट्टापायी इच्छुकांमध्ये दोन गट

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

शहरातील बऱ्याच प्रभागांमध्ये भारतीय जनता पक्षाचे इच्छुक एकत्र प्रचार करत असताना, हक्काच्या मतदारसंघातच आमदारांच्या अट्टाहासामुळे इच्छुकांमध्ये दोन गट पडले आहेत. एका गटाकडून पक्षाच्या योजना नागरिकांपर्यंत नेल्या जात असताना, दुसऱ्या गटाकडून केवळ आमदारांचा उदोउदो सुरू आहे. त्यामुळे, पक्षातच फूट पडल्याचे चित्र निर्माण झाले असून, मतदारांमध्ये संभ्रमावस्था वाढत चालली आहे.
गेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपला या मतदारसंघात जोरदार आघाडी मिळाली. त्यामुळे, पालिका निवडणुकीसाठी या विधानसभा मतदारसंघांत येणाऱ्या सर्वच प्रभागांतील इच्छुकांमध्ये जोरदार रस्सीखेच सुरू आहे. आजी-माजी नगरसेवकांसह पक्षाचे अनेक पदाधिकारी या भागांतून नशीब आजमावत आहेत. पक्षाने अंतिम निर्णय काहीही घेतला, तरी एकत्र प्रचार करायचे इच्छुकांनी ठरविले होते. त्यानुसार, सुमारे १५ ते १७ इच्छुकांनी गेल्या काही दिवसांपासून प्रभागाच्या विविध भागांत गाठी-भेटी, प्रचारफेऱ्या सुरू केल्या आहेत. एका बाजूला १५ इच्छुकांनी प्रचाराची दिशा ठरवली असताना, आमदारांच्या जवळच्या पाच-सहा जणांनी मात्र वेगळ्याच दिशेने प्रवास सुरू केला आहे. आमदारांचे अत्यंत विश्वासू म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या सर्वांनी आम्हांलाच उमेदवारी मिळणार असल्याच्या थाटात प्रचार सुरू केला आहे. त्यामुळे, एकाच प्रभागात भाजपच्या दोन वेगवेगळ्या गटांकडून मतदारांशी संपर्क सुरू असल्याने गोंधळ अधिकच वाढत चालला आहे. अनेक ठिकाणी स्थानिक मतदारांनीही भाजपमधील या दुफळीबद्दल नाराजी व्यक्त केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘बीट मार्शल’वर अॅपद्वारे नजर

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, पुणे
रस्त्यावर पोलिसांची उपस्थिती वाढल्यामुळे गुन्हेगारीवर नियंत्रण राहील, या हेतूने पुण्यात ‘बीट मार्शल’ नेमण्यात आले. पण, दुचाकीवरून फिरणाऱ्या बीट मार्शलकरून अडवणुकीचे अनेक प्रकार समोर आले. त्यांच्याबाबत वरिष्ठांकडे तक्रारी येत होत्या. त्यामुळे आता या बीट मार्शलवर लक्ष ठेवण्यासाठी ‘बीट मार्शल मॉनिटेरी अॅप’ तयार करण्यात आले आहे. बीट मार्शल दिवसभर कोठे फिरतात, किती वेळ कोठे थांबतात याची सर्व माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षकाला पोलिस ठाण्यात बसून समजणार आहे.
‘बीट मार्शल मॉनिटेअरी अ‍ॅप’ हे सध्या झोन एक आणि दोनमध्ये प्रायोगिक तत्वावर सुरू करण्यात आल्याची माहिती आर्थिक व सायबर गुन्हे शाखेचे पोलिस उपायुक्त दीपक साकोरे यांनी पत्रकार परिषदेत दिली. शहरात तीन-चार वर्षांपूर्वी मोठ्या प्रमाणात सोनसाखळी चोरीच्या घटना वाढल्या होत्या. त्यांच्यावर नियंत्रण आणण्यासाठी रस्त्यावर पोलिस फिरताना दिसले पाहिजेत, या दृष्टीने प्रत्येक पोलिस ठाण्यासाठी चार याप्रमाणे १६० बीट मार्शल नेमण्यात आले होते. तर महिलांच्या विरोधातील गुन्हे रोखण्यासाठी ३० महिलांचे दामिणी पथक तयार केले. एका दुचाकीवरून दोन बीट मार्शल पोलिस ठाण्याच्या सर्व भागांत गस्त घालत फिरतात. त्यामुळे चोरट्यांच्या हालचालीवर व इतर बेकायदेशीर प्रकारावर नियंत्रण आले होते. पण, गुन्हे रोखण्यासाठी चौकशीच्या निमित्ताने बीट मार्शलकडून वाहनचालकांना अडवून कागदपत्रांची पूर्तता नसल्यास अडवणुकीचे प्रकार सुरू झाले. त्याबाबत अनेक तक्रारीही आल्या होत्या. पण, या अॅपमुळे आता या गोष्टींवर आळा बसणार आहे.

अॅपद्वारे राहणार असे लक्ष
बीट मार्शलवर लक्ष ठेवण्यासाठी पुण्यातील ‘सॅपिअन्स एनॅलिटिक्स’ या कंपनीने ‘बीट मार्शल मॅनिटेअरी अ‍ॅप’ तयार केले आहे. हे अ‍ॅप प्रत्येक बीट मार्शलच्या मोबाइलवर डाउनलोड केले जाईल. त्याने मोबाइलमध्ये जीपीएस सुरू केल्यानंतर सकाळपासून संध्याकाळपर्यंत कुठे गेला, किती वेळ थांबला, त्याने किती थांबे घेतले याची माहिती पोलिस ठाण्याच्या वरिष्ठ निरीक्षकाला त्यांच्या मोबाइलवर मिळणार आहे. तसेच, सर्व बीट मार्शलच्या गस्तीचे मार्ग व थांबे हे शहराच्या नाकाशावर पाहणे शक्य होणार आहे. एखाद्या ठिकाणी मदतीची गरज असेल तर जो बीट मार्शल घटनास्थळापासून जवळ आहे, त्याला त्वरीत तिकडे जाण्याचे आदेश मोबाइलवरूनच देता येणार आहे. या सुविधेमुळे अधिकाऱ्यांना सर्व महत्त्वाच्या मार्गावर आवश्यकतेप्रमाणे बीट मार्शलची उपलब्धता वाढविणे शक्य होईल, असे साकोरे यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विद्यापीठाला ‘नॅक’ची शॉर्टकट भेट

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या एका विभागात दोन चारचाकी वाहनातून तीन उच्च शिक्षित अधिकारी रुबाबात उतरतात...अधिकारी पाहून प्राध्यापक-कर्मचारी त्यांना ‘सर..सर..’करत कॉन्फरन्स रूममध्ये घेऊन जातात... त्यानंतर विभागप्रमुख अधिकाऱ्यांना द्रुकश्राव्य माध्यमातून काही मिनिटे ‘प्रेझेन्टेशन’ देतात... ‘प्रेझेन्टेशन’ गडबडीत ऐकून अधिकारी प्राध्यापक-कर्मचारी बाहेर पडतात... पुन्हा गाडीत बसतात आणि दुसऱ्या विभागाकडे रवाना होतात... अधिकारी रवाना झाल्याचे पाहून प्राध्यापक-कर्मचारी सुटकेचा निश्वास टाकतात आणि वर्गातील विद्यार्थीही बाहेर पडतात... अशा प्रकारे विभागांची सविस्तर माहिती व पाहणी न करता तसेच विद्यार्थी, संशोधकांच्या शोधनिबंधांची माहिती न घेता ‘नॅक’ समितीच्या सदस्यांचा पहिल्या दिवसाचा दौरा पार पडला.

राष्ट्रीय मूल्यांकन आणि अधिस्वीकृती परिषदेतर्फे (नॅक) विद्यापीठाची शैक्षणिक गुणवत्ता, पायाभूत सुविधा, इमारती, विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या सोयीसुविधांची दर पाच वर्षांनी तपासणी केली जाते. ही तपासणी करण्यासाठी नॅकतर्फे समिती नेमण्यात येते. समितीच्या सदस्यांद्वारे विद्यापीठाची तपासणी करून विद्यापीठाला श्रेणी देण्यात येते. विद्यापीठात तपासणीसाठी नॅकची नऊ सदस्यीय समिती रविवारी संध्याकाळी आली. कुलगुरू डॉ. वासुदेव गाडे यांनी विद्यापीठाच्या माहितीचे समितीच्या सदस्यांना सोमवारी सकाळी ‘प्रेझेन्टेशन’ दिले. त्यानंतर समितीच्या सदस्यांनी प्रत्येकी तीनच्या समुहाने ‘ए’, ‘बी’ आणि ‘सी’ टीमने विद्यापीठातील विभागांना भेटी द्यायला सुरुवात केली.

यापैकी टीम ‘ए’ने दुपारी तीनच्या सुमारास सायन्स अॅन्ड टेक्नॉलॉजीला भेट दिली. त्यानंतर तेथील भेट संपल्यानंतर लगेच ही टीम स्टॅटिस्टिक्स विभागाला धावती भेट देऊन गणित विभागात येतात. गणित विभागात दुपारी ४ वाजून १० मिनिटांनी आल्यानंतर विभागप्रमुख कॉन्फरन्स रूममध्ये ‘प्रेझेन्टेशन’द्वारे माहिती देतात. मात्र, काही मिनिटे ‘प्रेझेन्टेशन’ ऐकल्यावर सदस्य विभागाची कोणत्याच प्रकारची पाहणी न करता तसेच विभागात विद्यार्थी, संशोधक, प्राध्यापकांनी मांडलेल्या ‘रिसर्च पेपर’ची माहिती न घेता ५ वाजून १० मिनिटांनी वाणिज्य विभागात जातात. वाणिज्य विभागात टीमच्या सदस्य भेट देऊन केवळ काही मिनिटे विभागप्रमुखांकडून ‘प्रेझेन्टेशन’द्वारे माहिती घेतली. यापैकी एका सदस्याने केवळ वरवर ग्रंथालय आणि रिसर्च पेपरची पाहणी केली. त्यानंतर विभागाची कोणत्याच प्रकारची माहिती व पाहणी न करता हे सदस्य ५ वाजून २८ मिनिटांनी इन्स्टिट्यूट ऑफ बायोइन्फॉरमॅटिक्स अँड बायोटेक्नॉलॉजी विभागात रवाना झाले. समितीच्या सदस्यांनी आपल्या विभागाची माहिती घ्यावी, विभागातील संगणक विभाग, ग्रंथालयाची आणि विद्यार्थ्यांच्या सोयीसुविधांची पाहणी करावी यासाठी प्राध्यापक व कर्मचारी यांची इच्छा होती. तशी तयारी देखील प्रत्येक विभागाने केली होती. मात्र, घाईचे कारण देत टीमने आपली तपासणी थोडक्यात उरकली. कमी वेळेअभावी अशाच प्रकारे टीम ‘बी’ आणि ‘सी’ने विभागाची पाहणी उरकल्याची शक्यता आहे.

तीन विभागांना भेट नाहीच
विद्यापीठातील इतर विभागांना भेटी देण्यासाठी अत्यंत कमी वेळ उरल्याने टीमच्या सदस्यांनी पर्यावरणशास्त्र, सूक्ष्मजीवशास्त्र, इन्फॉरमॅटिक्स या तीन विभागांना भेटीच दिल्या नाहीत. तर, या विभागाच्या विभागप्रमुखांना ऐनवेळी इन्स्टिट्यूट ऑफ बायोइन्फॉरमॅटिक्स अँड बायोटेक्नॉलॉजी विभागात बोलावून संबंधित विभागासोबत ‘प्रेझेन्टेशन’द्वारे माहिती घेतली. अशाप्रकारे या टीमच्या सदस्यांनी घाईत आणि ‘शॉर्टकट’ आपली तपासणी उरकली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

एक्स्प्रेसवेवर एसटीला अपघात, ५ जण गंभीर

$
0
0

म.टा. प्रतिनिधी, पुणे

मुंबई-पुणे एक्स्प्रेस-वेवर गहुंजे गावाजवळ किवळे येथे एसटीच्या एशियाड बसला सकाळी सव्वा नऊच्या सुमारास मोठा अपघात झाला. या बसमध्ये सुमारे ३५ ते ४० प्रवासी होते. त्यातील १३ जणांना मार बसला आहे. तर ५ जण गंभीर जखमी झाले आहेत.

बोरीवली-सातारा MH20-BL3626 ही बस मुंबईहून पुण्याला चालली होती. गहुंजे गावाजवळ ही बस आल्यावर बसचा वाहकाच्या बाजूचा पुढचा डावा टायर फुटला. यामुळे बस रस्त्यालगतचा लोखंडी कठडा तोडून सर्विस रस्त्यावर गेली. सकाळी साडेदहाच्या सुमारास ही घटना घडली.

अपघातावेळी बसमध्ये ३५ ते ४० प्रवासी होते. त्यातील १३ जणांना जबर मार बसला आहे. तर ५ प्रवासी गंभीर जखमी आहेत. जखमी प्रवाशांवर सध्या जवळच्याच विविध रुग्णालयात उपचार सुरू आहेत. देहूरोड आणि तळेगाव पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नयना पुजारी खटला; साक्षींचे काम पूर्ण

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

सॉफ्टवेअर इंजिनीअर नयना पुजारी खून खटल्यात बचाव पक्षातर्फे घेण्यात आलेल्या साक्षीदारांची साक्ष सोमवारी पूर्ण झाली. या खटल्याची पुढील सुनावणी तीन फेब्रुवारी रोजी होणार आहे. सरकार पक्षातर्फे या केसमध्ये अंतिम युक्तिवाद करण्यात येणार आहे. गेल्या सात वर्षांपासून कोर्टात सुरू असलेल्या या खटल्याची सुनावणी आता अंतिम टप्प्यात आहे.

विशेष न्यायाधीश एल. एल. येनकर यांच्या कोर्टात या खटल्याची सुनावणी सुरू आहे. सरकार पक्षातर्फे विशेष सरकारी वकील अॅड. हर्षद निंबाळकर, तर बचाव पक्षातर्फे अॅड. बी. ए. आलूर काम पाहत आहेत.

बचाव पक्षाला कोर्टाने २४ साक्षीदार तपासण्याची परवानगी दिली होती. त्यापैकी १३ साक्षीदारांची साक्ष नोंदवण्यात आली. साक्षीदारांमध्ये आरोपी योगेश राऊतची आई आणि भावाचा समावेश होता. आरोपींवर दोषनिश्चिती झाल्यानंतर सरकार पक्षातर्फे ३७ साक्षीदार तपासण्यात आले आहेत. या खटल्यात दोन्ही बाजूच्या साक्षीदारांची साक्ष आणि उलटतपासणी पूर्ण झाली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘झिंगाट’च्या चालीवर देवाची गाणी नकोत

$
0
0

अजय-अतुल यांचे आवाहन

म. टा. प्रतिनिधी, पुणे

‘जगभरात लोकप्रिय झालेल्या झिंगाट गाण्याने इतिहास रचला. परदेशात अनेक शहरांमध्ये हे गाणे लोकप्रिय आहे; मात्र आपल्याकडे ‘झिंगाट’च्या चालीवर देवाची गाणी तयार केली जातात, हे दुर्दैव आहे. त्यामुळे ‘झिंगाट’च्या चालीवर देवाची गाणी नकोत,’ असे आवाहन प्रसिद्ध संगीतकार अजय-अतुल यांनी केले.

सिम्बायोसिस विद्यापीठातर्फे आयोजित सिम्बायोसिस सांस्कृतिक महोत्सवाचे उद्घाटन अजय-अतुल यांच्या हस्ते करण्यात आले. त्या वेळी त्यांनी ही खंत व्यक्त केली. ‘सिम्बायोसिस’चे संस्थापक डॉ. शां. ब. मुजुमदार, प्रधान संचालिका डॉ. विद्या येरवडेकर, चित्रपट अभिनेते नीरज कबी आदी या वेळी उपस्थित होते. ‘सिम्बायोसिस’चे माजी विद्यार्थी असलेले अभिनेते नीरज कबी यांना सिम्बायोसिस सांस्कृतिक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

अजय म्हणाला, ‘‘झिंगाट’चे गाणे न्यूयॉर्क, पॅरिस, इटली, नेदरलँड मधील पबमध्ये आजही वाजवले जाते. तेथील लोकांना ते अत्यंत आवडले आहे. एका बड्या कंपनीने केलेल्या सर्वेक्षणानुसार ‘झिंगाट’चे गाणे जगातील १०० लोकप्रिय गाण्यांमध्ये आहे; मात्र आपल्याकडे त्याच चालीवर वेगवेगळी गाणी तयार होतात. ‘स्वच्छ भारत’अंतर्गत ग्रामीण भागात शौचालय बांधण्यासाठी केल्या जाणाऱ्या जनजागृतीसाठी त्या चालीवर गाणे तयार केले आहे. ते जनजागृतीसाठी आहे, म्हणून ठीक आहे; पण त्या चालीवर साईबाबांचे गाणे तयार झाले, हे चुकीचे आहे. त्या गाण्याचा तो पोत नाही. तरीही काही लोक अशी गाणी तयार करून देवतांचा अपमान करत आहेत.’ कार्यक्रमात रसिकांच्या आग्रहाखातर अजयने ‘माऊली माऊली’ गाणे सादर करून वातावरण भारावून टाकले.

‘सैराट चित्रपटानंतर जाहीर कार्यक्रमात जायची भीती वाटते. अर्थात आम्ही लोकांच्या जिवावर मोठे झाले आहोत; पण नुकतेच एका जाहीर कार्यक्रमामध्ये लोकांच्या गराड्यात चेंगराचेंगरीचे प्रकार झाले, गर्दीत मुलींशी असभ्य वर्तन केले गेले. या सगळ्या गोष्टी होऊ नयेत याची जास्त भीती आहे,’ असे अतुलने सांगितले. कार्यक्रमाच्या उत्तरार्धात त्यागराज खाडिलकर व दीपक देशपांडे यांच्या हास्यमैफलीचा कार्यक्रम रंगला.

.............

‘गांधींचे विचार संपवता येणार नाहीत’

‘महात्मा गांधी यांचे कार्य मोठे आहे. त्यांना कॅलेंडरवरून हटवून किंवा तसा प्रयत्न करून त्यांचे विचार संपवता येणार नाहीत. गांधीजी आणि चरखा याचे नाते, त्यांचा खादीबद्दलचा आग्रह सर्वांना माहिती आहे. ते नाते संपवता येणार नाही. खादीच्या प्रसाराबाबतीत गांधीजींची जागा कुणी घेऊ शकत नाही,’ असे सांगून अभिनेता नीरज जैन यांनी अप्रत्यक्षपणे पंतप्रधानांवर टीका केली. नीरज कबी यांनी श्याम बेनेगल यांच्या ‘संविधान’ या प्रसिद्ध मालिकेत महात्मा गांधीजींची भूमिका साकारली होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सिम्बायोसिस ठरले ‘मिक्स द प्ले’चे विजेते

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

शेक्सपिअरच्या ४००व्या जन्मदिनानिमित्त पुण्यातील ‘ब्रिटिश कौन्सिल’च्या वतीने ‘मिक्स द प्ले’ नावाची स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. विद्यार्थ्यांसाठी असलेल्या या स्पर्धेत ११ शाळांचा सहभाग होता. यात विद्यार्थ्यांना ‘रोमिओ ज्युलिएट’ हे नाटक ‘मिक्स’ करायला सांगण्यात आले. त्यात प्रभात रोडवरील सिम्बायोसिस सेकंडरी स्कूलचा प्रथम क्रमांक आला.

व्हिडिओच्या माध्यमात उपलब्ध असलेले ‘रोमिओ ज्युलिएट’ हे जगप्रसिद्ध आणि लोकप्रिय नाटक विद्यार्थ्यांना ‘मिक्स’ करायला सांगण्यात आले. सहभागींनी यातील दृश्यांची संगती आपापल्या पद्धतीने लावणे अपेक्षित होते. त्यात स्वतःच्या मनाने संगीताचाही परिणाम साधायचा होता. नववी ते बारावीमधील विद्यार्थ्यांसाठी आयोजित केलेल्या या स्पर्धेत ‘एमआयटी विश्वशांती गुरूकुल’ने द्वितीय, तर ‘आरआयएमएस इंटरनॅशनल स्कूल अँड ज्युनियर कॉलेज’ने तृतीय क्रमांक पटकावला. स्पर्धेदरम्यान विद्यार्थ्यांना फक्त एका तासात जास्तीत जास्त दृश्ये संगतवार लावायची होती. त्याचे स्पष्टीकरणही त्यांनी एका कागदावर लिहिणे अपेक्षित होते. स्पर्धेचे परीक्षण बर्टी अॅशले आणि हिनी सिद्दिकी या नाट्यसृष्टीशी संबंधित कलाकारांनी केले.

...................

आम्ही स्पर्धेसाठी नाटक वाचून आलो होतो; पण उपलब्ध कलाकारांमधून नाटक बसवायचे असावे, असे आम्हाला वाटले; मात्र व्हिडिओतून दृश्यांची संगती लावायची असल्याचे येथे आल्यावर कळले. त्यानुसार आम्ही तीन जणांत काम विभागून घेतले. मी आणि वेद रवादेने संगीत व दृश्याचे काम सांभाळले, तर तज्ञा चंदावरकरने सुसंगत स्पष्टीकरण लिहिले. उपलब्ध साउंड ट्रॅक्समधून दृश्यांसाठी उत्तम संगीत आम्ही निवडले.
- गौरीश गावडे, विजेता विद्यार्थी (सिम्बायोसिस सेकंडरी स्कूल)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


पुण्यात येणार ‘फोर के’

$
0
0

हॉलिवूडमधील अत्याधुनिक यंत्रणा ‘एनएफएआय’मध्ये

Chintamani.Patki@timesgroup.com

Tweet : @chintamanipMT

पुणे : दुर्मिळ चित्रपटांचे रसग्रहण करायचे असेल, तर राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयासारखे (एनएफएआय) दुसरे ठिकाण नाही. संग्रहालयामध्ये आता नवीन चित्रपटांच्या प्रदर्शनासाठी ‘डिजिटल सिनेमा प्रोजेक्टर’ (डीसीपी) ही यंत्रणा कार्यान्वित झाली आहे. त्यातच आता ‘फोर के’ ही हॉलिवूडमधील अत्याधुनिक यंत्रणा संग्रहालयात दाखल होणार असून, हॉलिवूडमधील चित्रपटगृहांसारखा आनंद संग्रहालयात चित्रपट पाहताना मिळू शकेल. भारतात सध्या सर्वत्र ‘टू के’ ही यंत्रणा कार्यान्वित असल्याने ‘फोर के’ यंत्रणा बसवणारे संग्रहालय हे देशातील पहिले चित्रपटगृह ठरण्याची शक्यता आहे.

‘एनएफएआय’च्या चित्रपटगृहात शंभर वर्षांपूर्वीच्या चित्रपटांना लागणारी सर्वांत जुनी अशी मौल्यवान यंत्रसामुग्री कार्यान्वित आहे. चित्रपट प्रदर्शनासाठी ३५ एमएम प्रोजेक्टर, तसेच ‘डीएलपी प्रोजेक्टर’ (डिजिटल लाइट प्रोसेसिंग) उपलब्ध आहेत. जुन्या काळच्या काही चित्रपटांसाठी प्रदर्शनासाठी लागणारे १६ एमएम आणि आठ एमएम क्षमतेचे प्रोजेक्टरदेखील या ठिकाणी आहेत. त्या माध्यमातून दुर्मिळ चित्रपटांचे प्रक्षेपण शक्य होते.

नवीन चित्रपटाचे प्रक्षेपण करायचे असल्यास चित्रपटगृहाप्रमाणे ते करता येत नाही. त्यासाठी ‘डीव्हीडी’च्या माध्यमाचा आधार घ्यावा लागतो. या माध्यमातून प्रक्षेपण केल्यास डिजिटल चित्राचा अनुभव येत नाही. डिजिटल चित्रपटांसाठी ‘डिजिटल सिनेमा प्रोजेक्टर’ (डीसीपी) ही यंत्रणा लागते. नवीन चित्रपटांच्या प्रक्षेपणाची, तसेच प्रदर्शनाआधीच्या विशेष खेळांची संख्या ‘एनएफएआय’मध्ये वाढल्याने डीसीपी यंत्रणा कार्यान्वित झाली आहे. यामुळे नुकताच प्रदर्शित झालेला चित्रपट संग्रहालयात पाहता येऊ शकणार आहे, तोही डॉल्बीच्या सहाय्याने. त्यामुळे ‘एनएफएआय’मध्ये चित्रपट पाहणे म्हणजे मल्टिप्लेक्सचा अनुभव ठरत असताना ‘फोर के’मुळे मल्टिप्लेक्सही मागे पडणार आहे.

‘संग्रहालयातील चित्रपटगृहाचा काही महिन्यांपूर्वीच कायापालट झाला आहे. नवीन आरामशीर खुर्च्या, मऊ कार्पेट आणि आवाजाच्या अधिक चांगल्या अनुभवासाठी ‘७.१’ या तंत्रज्ञानामुळे चित्रपटगृहात रसिकांना सुखद अनुभव मिळत आहे. मुख्य चित्रपटगृहात, तसेच कोथरूडमधील नवीन चित्रपटगृहात लवकरच ‘फोर के’ यंत्रणा बसवण्यात येणार आहे. छोट्या चित्रपटगृहात ‘टू के’ यंत्रणा असेल,’ अशी माहिती संग्रहालयाचे संचालक प्रकाश मगदूम यांनी ‘मटा’ला दिली. ‘सध्या संग्रहालयात बसवण्यात आलेल्या ‘डीसीपी’ला ‘टू के’ यंत्रणा जोडण्यात आली आहे. ‘फोर के’ यंत्रणा कार्यान्वित झाल्यानंतर येथीलच छोट्या चित्रपटगृहासाठी ‘टू के’ यंत्रणा कार्यान्वित होईल,’ असे त्यांनी स्पष्ट केले.

.............


देशात सर्वत्र ‘टू के’ ही यंत्रणा आहे. ‘टू के’मध्ये प्रत्येक सेकंदाला २४ फ्रेम असतात, तर ‘फोर के’मध्ये १२० फ्रेम असतात. जगात ‘फोर के’ ही यंत्रणा सर्वांत अत्याधुनिक मानली जाते. ‘फोर के’मधील चित्राचे रिझॉल्युशन ३८४० पिक्सेल × २१६० लाइन्स असे असते. ‘फोर के’ रिझॉल्युशनला ‘फोर के’ असे म्हटले जाते. यामध्ये चित्राचे रिझॉल्युशन चार हजार असते.
- उज्ज्वल निरगुडकर, तांत्रिक सल्लागार एनएफएआय व ‘सोसायटी ऑफ मोशन पिक्चर्स अँड टेलिव्हिजन इंजिनीअर्स’च्या भारताच्या विभागाचे अध्यक्ष

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

छत्रपतींचे नाव घेणारे राष्ट्रवादात दंग

$
0
0

राजकारणी राष्ट्रकारणाला महत्त्व देत नसल्याची रवी परांजपेंची खंत

म. टा. प्रतिनिधी, पुणे

‘छत्रपती शिवाजी महाराजांनी आयुष्यात कायमच राष्ट्रकारण केले; मात्र त्यांचे नाव घेणारे आज राष्ट्रवादात दंग झालेले आहेत. राष्ट्रवादापुढे राष्ट्रकारणालादेखील महत्त्व न देणारे राजकारणी सभोवताली दिसतात याची खंत वाटते,’ असे मत ज्येष्ठ चित्रकार रवी परांजपे यांनी सोमवारी व्यक्त केले.

ज्येष्ठ उद्योजक अरुण फिरोदिया यांच्या हस्ते श्री आदिशक्ती फाउंडेशनतर्फे आऊसाहेब पुरस्काराचे प्रदान करण्यात आले. त्या वेळी रवी परांजपे बोलत होते. यंदा आऊसाहेब पुरस्काराने रवींद्र नवलाखा यांच्या मातोश्री शांताबाई नवलाखा, प्रभाकर साळुंके यांच्या मातोश्री लक्ष्मीबाई साळुंके, विमल बऱ्हाटे, अंकुश आसबे यांच्या मातोश्री जनाबाई आसबे, योगेश वाके यांच्या मातोश्री शांता वाके आणि गौतम कांबळे यांच्या मातोश्री ताराबाई कांबळे यांना गौरवण्यात आले. तसेच, शिवदास निनाद पुरस्कार यंदा दादर येथील अप्पासाहेब परब यांना प्रदान केला. या वेळी महापौर प्रशांत जगताप, ज्येष्ठ अस्थिरोगतज्ज्ञ डॉ. के. एच. संचेती, ज्योतिषशास्त्रज्ञ डॉ. नरेंद्र सहस्रबुद्धे आदी उपस्थित होते.

‘इसवी सनपूर्व तेरा हजार वर्षांहून अधिक आधी मातीचा कलश, घट निर्माण केला गेला. त्यामागचे मूळ चिंतन म्हणजे कोणत्याही पोकळीला आकार दिला, की घट अर्थात अवकाश तयार होते आणि त्या अवकाशावर छत्र ठेवले की ते सुरक्षित अवकाश तयार होते. महाराजांनी असेच राष्ट्रअवकाश घडवले,’ असे परांजपे या वेळी म्हणाले.

‘स्वातंत्र्यलढ्यात जोवर भारतमातेचे स्त्रीरूपी चित्र समोर आले नव्हते, तोवर भारतीय स्वातंत्र्यलढ्याला खऱ्या अर्थाने धार, स्फुरण चढली नव्हती. कारण, आई म्हणजेच जीवन होय. आजही महाराष्ट्रात ‘श्यामची आई’ हे पुस्तकच सर्वांत अधिक वाचले जाते. आईने दिलेली प्रेरणा लढण्यास नेहमी बळ देते. म्हणून आईचे उपकार कधीही न फिटणारे असेच आहेत,’ असे फिरोदिया यांनी सांगितले. सुधीर गाडगीळ यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले, तर तेजस लडकत यांनी आभार मानले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

छत्रपतींचे स्मारक गिरगाव चौपाटीवर करा

$
0
0

ओबीसी संघर्ष समितीची मागणी

म. टा. प्रतिनिधी, पुणे

‘छत्रपती शिवाजी महाराजांचे अरबी समुद्रातील नियोजित भव्य स्मारक मुंबईतील गिरगाव चौपाटीवर करावे आणि वाचलेल्या पैशांतून मराठा समाजातील गरीब मुलामुलींच्या शिक्षणासाठी व आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांसाठी खर्च करावा,’ अशी मागणी ओबीसी संघर्ष समितीतर्फे करण्यात आली आहे.

समितीच्या राज्यस्तरीय एकदिवसीय परिषदेमध्ये ओबीसींच्या आरक्षणासंदर्भात चर्चा करण्यात आली. कायदेतज्ज्ञ अॅड. बी. एल. सगरकिल्लारीकर या परिषदेच्या अध्यक्षस्थानी होते. प्रसिद्ध विचारवंत चंद्रकांत बावकर, संजय सोनवणी, अॅड. महादेव आंधळे, प्रा. हरी नरके, प्रकाश तोडणकर, संदेश मयेकर, कमलाकर दरवडे, दामोदर तांडेल, सीए जे. डी. तांडेल, रामदास भुजबळ, मृणाल ढोले-पाटील, प्रा. शंकर महाजन, मंगेश ससाणे, चंद्रशेखर भुजबळ यांच्यासह ओबीसी वर्गातील विविध १८८ जाती संघटनांचे राज्यभरातील प्रतिनिधी या वेळी उपस्थित होते.

‘मराठा समाजाला आरक्षण देण्याऐवजी छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक समुद्रात न उभारता ते गिरगाव चौपाटीवर उभारावे. त्याने राज्य सरकारचा खर्च वाचेल. छत्रपती शिवाजी महाराज सर्वच मराठी माणसांचे आदर्श असून, त्यांच्या यशात सर्वसामान्य ओबीसींचाही सिंहाचा वाटा आहे. त्यांचे भव्य स्मारक व्हायलाच हवे; पण कोळी बांधवांची रोजीरोटी बुडवून व पर्यावरणाचे अपरिमित नुकसान करून शिवस्मारक समुद्रात उभारण्याचा निर्णय रयतद्रोही आहे. त्यामुळे हे नियोजित स्मारक मुंबईतच समुद्रकिनाऱ्यावर करावे. वाचलेल्या खर्चातून मराठा समाजातील गोरगरीब विद्यार्थ्यांना मदत करावी; पण मराठा समाजाचा ओबीसीमध्ये समावेश करू नये,’ अशी भूमिका समितीतर्फे मांडण्यात आली.

मराठा आरक्षणविषयक हायकोर्टातील याचिकेवर ४३५ ओबीसी जातींतर्फे ओबीसी हिताची बाजू प्रखरपणे मांडली जाईल, असा निर्णय या परिषदेत घेण्यात आला. सरकारने राज्य मागास वर्ग आयोगावर केलेल्या नियुक्त्या बेकायदेशीर असल्याने या सर्व नियुक्त्या तात्काळ रद्द करून नव्याने आयोगाची रचना करावी, अशी मागणी करून ‘आपल्या अस्तित्वाची लढाई असून, ओबीसींच्या ताटातील घास पळवणाऱ्यांना या निवडणुकीत धडा शिकवू’ असा निर्धार सर्वानुमते व्यक्त करण्यात आला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पुणे पोलिस दलातील नऊ जणांना राष्ट्रपती पदक

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
प्रजाकसत्ताक दिनानिमित्त राज्यातील ४२ पोलिस अधिकारी-कर्मचाऱ्यांना भरीव कामगिरीसाठी राष्ट्रपती पदक जाहीर झाले आहे. त्यात पुणे पोलिसांसह, राज्य गुन्हे अन्वेषण विभाग (सीआयडी), लाचलुचपत प्रतिबंधक विभाग (एसीबी), राज्य राखीव पोलिस दल, मोटार परिवहन, राज्य गुप्तवार्ता विभाग आणि पोलिस प्रशिक्षण केंद्रातील अधिकारी-कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.
पुणे पोलिस दलातील सहायक आयुक्त (०१), वरिष्ठ पोलिस निरीक्षक (०३), फौजदार (०१), सहायक फौजदार (०१), हवालदार (०३) अशा नऊ जणांना राष्ट्रपती पदक जाहीर झाले आहे. राज्यात उल्लेखनीय सेवेबद्दल तीन जणांना पदक जाहीर झाले आहे.

उल्लेखनीय सेवेबद्दलचे राष्ट्रपती पदक पुरस्कारार्थी :
व्ही. व्ही. लक्ष्मीनारायण (अप्पर पोलिस महासंचालक), महादेव श्रीपती गावडे, उपअधीक्षक चिपळून) आणि शिवप्पा इरप्पा मोरती (सहायक फौजदार, कोल्हापूर)

गुणवत्तापूर्ण सेवेबद्दलचे राष्ट्रपती पदक पुरस्कार्थी :
एम. बी. तांबडे, (अधीक्षक, कोल्हापूर), सुनील खळदकर (सहायक आयुक्त, वाहतूक शाखा, पुणे शहर), विजयसिंह गायकवाड (वरिष्ठ पोलिस निरीक्षक, भारती विद्यापीठ पोलिस ठाणे, पुणे), सीमा मेंहदळे (वरिष्ठ पोलिस निरीक्षक, महिला साह्य कक्ष, गुन्हे शाखा, पुणे), संजय नाईक-पाटील (वरिष्ठ पोलिस निरीक्षक, विमानतळ पोलिस ठाणे, पुणे), बाळासाहेब बबन भोर (फौजदार, पोलिस आयुक्त कार्यालय, पुणे), आजीनाथ दत्तात्रय वाकसे (सहायक फौजदार, गुन्हे शाखा, पुणे), पुनाजी पांडुरंग डोईजड (सहायक फौजदार, नानवीज पोलिस प्रशिक्षण केंद्र, पुणे), अशोक झगडे (सहायक फौजदार, पोलिस मुख्यालय, पुणे ग्रामीण), अरुण आत्माराम पोटे (सहायक फौजदार, नानवीज पोलिस प्रशिक्षण केंद्र, पुणे), विलास कोंडीबा घोगरे (हवालदार, सहकारनगर पोलिस ठाणे, पुणे), बळवंत दत्तात्रय यादव ( हवालदार, समर्थ पोलिस ठाणे), अशोक बजरंग कांबळे (हवालदार, विशेष शाखा).

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

​इंजेक्शन ‘एक्स्पायरी’विना

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
कॅम्पातील सरदार वल्लभभाई पटेल हॉस्पिटलमधील औषध भांडारात ‘डायक्लोफिनॅक सोडियम’ या वेदनाशामक इंजेक्शनवर चक्क ‘एक्स्पायरी डेट’चा (औषध वापरण्याची मुदत) उल्लेखच नसलेल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. औषध वापरण्याच्या मुदतीचा उल्लेख नसलेली सुमारे ५० इंजेक्शन येथे आढळली. मुदतबाह्य सलाइनचे प्रकरण ताजे असताना हे दुसरे प्रकरण समोर आल्याने औषधांच्या खरेदीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
पुणे कँटोन्मेंट बोर्डाच्या हॉस्पिटलच्या प्रशासकीय अधिकाऱ्यांनी याबाबत राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियानाच्या अधिकाऱ्यांना पत्र लिहून औषधसाठा नष्ट केला आहे. यापैकी काही इंजेक्शन पेशंटना देण्यात आली आहेत. या संदर्भात पेशंटकडून कोणतीही तक्रार करण्यात आली नसल्याचे सूत्रांनी सांगितले. मुदतबाह्य सलाइनच्या वापराचे प्रकरण ताजे असताना आता ‘एक्स्पायरी डेट’चा उल्लेख नसणारे इंजेक्शन सापडल्याने हॉस्पिटलच्या कारभारावर प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
‘एक्स्पायरी डेट’चा उल्लेख नसलेली ‘डायक्लोफिनॅक सोडियम’ची पन्नासपेक्षा अधिक इंजेक्शन आढळली आहेत. त्या इंजेक्शनवर उल्लेख नसल्याने आम्ही ती औषधे नष्ट केली. एका बॉक्समध्येच ही इंजेक्शन आढळली. अन्य काही इंजेक्शन आणि औषधांच्या बॉक्सवर एक्स्पायरीचा उल्लेख होता. ‘एनयूएचएम’च्या अधिकाऱ्यांशी याबाबत संपर्क साधला आहे,’ अशी माहिती सरदार वल्लभभाई पटेल हॉस्पिटलचे वैद्यकीय अधिकारी डॉ. एस. एम. महाजन यांनी दिली.
दरम्यान, आरोग्य खात्याचे संचालक डॉ. सतीश पवार म्हणाले, ‘एक्स्पायरी डेटचा उल्लेख नसलेले इंजेक्शन सापडल्याने त्याची माहिती अन्न व औषध प्रशासनाला देण्यात येईल. या प्रकरणाची संपूर्ण चौकशी झाल्यानंतर संबंधित कंपनीविरोधात कारवाई करण्यात येईल. दुय्यम दर्जाची औषधे उपलब्ध होत असल्याच्या तक्रारी अनेकदा प्राप्त झाल्या आहेत. परंतु, औषधाच्या लेबलवर ‘एक्स्पायरी डेट’चा उल्लेख नसल्याचा प्रकार हा दुर्मिळ आहे.’

‘एक्स्पायरी डेट’चा तारखेचा उल्लेख नसलेले इंजेक्शन आढळल्याची माहिती डॉक्टरांकडून मिळाली आहे. या संदर्भात आरोग्य खात्याच्या अधिकाऱ्यांच्या निदर्शनास ही बाब आणून देण्यात आली आहे. कदाचित कंपनीकडून ही प्रिंटिंगमधील चूक असावी. त्यामुळे आम्ही ही औषधे नष्ट केली आहेत.
- डॉ. डी. एन. यादव, मुख्य कार्यकारी अधिकारी, पुणे कँटोन्मेंट बोर्ड

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images