Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

शिवाजी पुलावरून महिलेनी उडी मारली

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, पुणे
महापालिकेजवळील शिवाजी पुलावरून एका महिलेने बुधवारी सकाळी नदीपात्रात उडी मारल्याचा प्रकार घडला. या महिलेचा अग्निशमन दलाकडून दिवसभर शोध घेण्यात आला. मात्र, अद्याप महिलेचा शोध लागला नाही.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एका महिलेने शिवाजी पुलावरून नदीपात्रात उडी मारल्याचे बुधवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास काही नागरिकांनी पाहिले. त्यांनी तत्काळ पोलिस व अग्निशामक दलाला घटनेची माहिती दिली. शिवाजीनगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच, अग्निशमन दलाला बोलवण्यात आले. अग्निशमन दलाचे जवान आणि खासगी व्यक्तींनी महिलेचा दिवसभर शोध घेतला. मात्र, महिला मिळून आली नाही. अंधार पडल्यानंतर शोधकार्य थांबविण्यात आले. चार ते पाच व्यक्तींनी महिलेला उडी मारताना पाहिले आहे. ही फिरस्ती महिला असावी, असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


दहा हजारांची लाच घेताना फौजदाराला अटक

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, पुणे
गुन्ह्यात अटक न करण्यासाठी ओतूर पोलिस ठाण्याच्या फौजदाराला दहा हजार रुपयांची लाच घेताना बुधवारी अटक करण्यात आली.
बजरंग राणुसिंग बाडीवाले (वय ४९) असे अटक केलेल्याचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बाडीवाले हे ओतूर पोलिस ठाण्यात नेमणुकीला आहेत. तक्रारदार व त्यांच्या नातेवाइकांच्या विरोधात ओतूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्यावरून तक्रारदार व त्यांच्या नातेवाइकांच्या विरोधात केस करून अटक न करण्यासाठी बाडीवाले यांनी दहा हजार रुपयांची लाच मागितली. याबाबत तक्रारदार यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने तक्रारीची पडताळणी केली. त्यावेळी अटक न करण्यासाठी दहा हजार रुपयांची बाडीवाले याने लाच मागितल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार बुधवारी ओतूर पोलिस ठाण्यात सापळा रचण्यात आला. बाडीवाले यास दहा हजारांची लाच घेताना अटक करण्यात आली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

लष्करी पदकांवर पुण्याची मोहोर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

लष्करातर्फे प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर जाहीर करण्यात आलेल्या पदकांवर पुण्याची छाप पडली आहे.
लष्कराच्या दक्षिण क्षेत्राचे प्रमुख लेफ्टनंट जनरल पी. एम. हारिस आणि चीफ ऑफ स्टाफ लेफ्टनंट जनरल रेमंड नरोन्हा यांना परम विशिष्ट सेवा मेडल जाहीर झाले आहे. त्याचबरोबर राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीचे प्रमुख एअर मार्शल जे. एस. क्लेर यांना हवाई दलाचे अतिविशिष्ट सेवा मेडल जाहीर झाले आहे. मूळचे पुण्याचे आणि एनडीएचे माजी उपप्रमुख लेफ्टनंट जनरल अशोक आंब्रे यांना अतिविशिष्ट सेवा मेडल (बार) जाहीर झाले आहे. सध्या ते नऊ कोअरचे प्रमुख म्हणून कार्यरत आहेत. पुण्यातील मिलिटरी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीचे माजी संचालक एअर मार्शल पी. पी. खांडेकर यांना अतिविशिष्ट सेवा मेडल जाहीर झाले आहे. रिअर अॅडमिरल आणि केरळमधील नौदल अकादमीचे प्रमुख सुनील भोकरे यांना अतिविशिष्ट सेवा मेडल जाहीर झाले आहे.
नगर येथील आर्मर्ड कोअर सेंटर आणि स्कूलचे (एसीसी अँड एस) प्रमुख मेजर जनरल प्रवीण दीक्षित यांना सेना मेडल (डिस्टिंग्विश) जाहीर झाले आहे. औंध मिलिटरी स्टेशन येथील महार रेजिमेंटचे ब्रिगेडिअर अलोक चंद्रा यांना विशिष्ट सेवा मेडल तर, आर्मी स्पोर्टस इन्स्टिट्यूटच्या कर्नल परमजितसिंग चीमा यांना सेना मेडल (डिस्टिग्विंश) जाहीर झाले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आरोग्यसेवेचा यथोचित गौरव झाल्याची भावना

$
0
0

डॉ. सुहास मापुस्करांना मरणोत्तर पद्मश्री जाहीर

म. टा. प्रतिनिधी, पिंपरी

अस्वच्छता हेच आजार आणि रोगांचे मूळ स्थान असून, त्यावर मात करण्यासाठी निधीवाटप किंवा योजनांची घोषणा करून उपयोग नाही तर, योग्य अंमलबजावणी आवश्यक आहे. त्यासाठी लोकांच्या मानसिकतेत बदल करून मलप्रभा बायोगॅस संयंत्राचा प्रसार करणारे देहू येथील डॉ. सुहास विठ्ठल मापुस्कर यांना मरणोत्तर पद्मश्री सन्मान जाहीर झाला आहे. या माध्यमातून आरोग्यसेवेचा यथोचित गौरव झाल्याची भावना व्यक्त केली जात आहे.
संत तुकाराम महाराजांच्या अभंगवाणीने पवित्र झालेल्या देहूमध्ये १९५९मध्ये आल्यानंतर डॉ. मापुस्कर यांनी वैद्यकीय सेवेला प्रारंभ केला. महाराष्ट्रभर लौकिक असलेल्या या गावात त्या वेळी प्राथमिक आरोग्य केंद्र आणि एकही शौचालय नसल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यामुळे ते व्यथित झाले. गावांतील रुग्णांची तपासणी करताना बहुतांशी आजार अस्वच्छता आणि दूषित पाण्यामुळे होत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. स्वच्छतेचा वसा घेऊन त्यांना गावातील तत्कालान कारभाऱ्यांची मदत घेऊन अनेक मोहिमा राबविल्या. गावपातळीवर संडास बांधकाम समितीची स्थापना केली. प्रत्येकी चारशे रुपये देऊन गावात परदेशी डिझाइनची दहा शौचालये बांधली. परंतु, ती वर्षातच पडली. त्यानंतर त्यांनी संशोधनावर भर देत घरोघरी जाऊन स्वच्छतेचे महत्त्व पटवून दिले. कणकवली येथे अप्पासाहेब पटवर्धन यांनी संशोधन केलेल्या ‘सोपा संडास’ म्हणजेच सुलभ शौचालयांचा मॉडेल म्हणून वापर सुरू केल्याचे समजताच तेथे जाऊन प्रत्यक्ष पाहणी केली. एवढेच नव्हे तर सरकारच्या मदतीशिवाय ७० टक्के संडास बांधून ती सुरू करण्यात यश प्राप्त केले.
जनावरांचे शेण आणि मूत्राचा वापर करून अप्पासाहेबांनी ‘वॉटर जॅकेट’ पध्दतीचा बायोगॅस प्रकल्प तयार केला. त्यावर अधिक संशोधन करून डॉ. मापुस्कर यांनी ‘मलप्रभा बायोगॅस प्रकल्पा’चे डिझाइन विकसित केले. त्यात मानवी विष्ठेचा वापर करून गॅसची निर्मिती करणे शक्य आहे, हे सांगताना त्यांची दमछाक झाली खरी... परंतु, नंतर मात्र ग्रामस्थांनाही त्यांचे म्हणणे पटू लागले. त्यातून मोहिमेला यश मिळाले.
देहूतील प्रयोग यशस्वी झाल्यानंतर डॉ. मापुस्करांनी शासनाच्या अनेक समित्यांवर काम केले. त्याची दखल देशपातळीवरही घेण्यात आली. निःस्वार्थी भावनेने काम केल्यानंतर सरकारी यंत्रणेतील भ्रष्टाचारामुळे ते उद्विग्न होऊन समित्यांमधून बाहेर पडले. परंतु, गाव, राज्य आणि परराज्यांतही त्यांनी सामाजिक कार्य चालू ठेवले. त्याचा गौरवही झाला. त्यांना २००० मध्ये राज्य सरकारकडून स्वच्छता दूत आणि केंद्र सरकारतर्फे निर्मलग्राम पुरस्कार मिळाला. दारिद्ररेषेखालील लोकांनाच सरकारने अनुदान द्यावे, राजकीय हेतूने सरसकट रक्कम देऊ नये. स्वखर्चाने शौचालय बांधण्यास प्रवृत्त करावे, अशी डॉ. मापुस्कर यांची भावना होती. लोकांचे मतपरिवर्तन झाल्यावर त्यांना स्वच्छतेविषयी सांगावे लागणार नाही, असा त्यांचा दृढ विश्वास होता. प्रयत्नांत सातत्य ठेवल्यास निश्चितच यश येईल हे त्यांनी स्वानुभवातून सांगितले. गावागावांत स्वच्छता समिती बळकट करावी, आरोग्याचे महत्व पटवून देण्यासाठी त्यांना प्रोत्साहन द्यावे, संडास बांधकाम समित्यांची निर्मिती करावी, लोकसहभागातून संडास बांधून त्यांचा वापर करणे शक्य आहे. लोकसहभाग वाढविण्यावर आणि प्रबोधनावर अधिक खर्च करून देशातील आरोग्य सुकर करण्याचा प्रयत्न करावा, यासाठीही त्यांनी प्रयत्न केले होते. त्याची दखल केंद्र सरकारने घेऊन त्यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर केला.

माझ्या बाबांना पुरस्कार मिळाल्याची भावना आनंदाची आहे. त्यांनी आयुष्यात खूप परिश्रम केले. त्यांचे मूळ गाव वाकेड (ता. लांजा, जि. रत्नागिरी) असले तरी जन्म मुंबईचाच... तेथे प्राथमिक शिक्षण घेतल्यानंतर पुण्यात वैद्यकीय पदवी घेतली. १९५९ मध्ये देहूत आल्यापासून त्यांनी आरोग्यसेवेचे व्रत अंगिकारले. अप्पासाहेब पटवर्धन यांच्याकडून प्रेरणा घेऊन त्यांनी अनेक समाजोपयोगी उपक्रम राबविले. तेव्हापासून अखेरचा श्वास घेईपर्यंत (२१ ऑक्टोबर २०१५) ते कार्यरतच राहिले. त्यांच्या कार्याचा सरकारने केलेला गौरव निश्चितच नव्या पिढीला प्रेरणादायी ठरेल.
- डॉ. शिल्पा नारायणन् (डॉ. सुहास मापुस्कर यांच्या कन्या)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सेतू सुविधा केंद्रांची होणार झाडाझडती

$
0
0

गरजू नागरिकांची नियमबाह्य पद्धतीने लूट

म. टा. प्रतिनिधी, पुणे

नागरिकांना दाखले देण्यासाठी सुरू करण्यात आलेले ‘महा-ई-सेवा केंद्र’ आणि सेतू सुविधा केंद्रे हीच मोठी डोकेदुखी झाली असून, नियमबाह्य पद्धतीने शुल्क आकारणी करून नागरिकांची लूट करण्यात येत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या केंद्रांची तपासणी करून संबंधितांचे परवाने रद्द करण्यात येणार आहेत.
दाखले मिळवण्यासाठी ‘एक खिडकी’च्या ठिकाणी होणारी गर्दी टाळण्यासाठी सेतू सुविधा केंद्र आणि महा- ई-सेवा केंद्र शहरात सुरू करण्यात आली आहेत. त्यामागे नागरिकांना सरकारी कार्यालयांमध्ये घालावे लागणारे हेलपाटे कमी करण्याचा उद्देश आहे. मात्र, या केंद्रांमध्ये ठरवून दिलेल्या शुल्कापेक्षा जास्त शुल्क आकारणी करण्यात येत असल्याच्या तक्रारी नागरिकांकडून जिल्हा प्रशासनाकडे येऊ लागल्या आहेत. आगामी महापालिकांच्या निवडणुकीमध्ये उमेदवारांना ऑनलाइन अर्ज या केंद्रांमध्ये जाऊन भरता येणार आहेत. या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने या केंद्रांची तपासणी करण्याचा निर्णय घेतला आहे.
याबाबत अतिरिक्त जिल्हाधिकारी रमेश काळे म्हणाले, की ‘या केंद्रांमध्ये गैरप्रकार होत असल्याच्या तक्रारी आल्या आहेत. त्यामुळे त्यांची तपासणी केली जाणार आहे. तपासणीमध्ये दोषी आढळणाऱ्या केंद्रचालकांचे परवाने रद्द करण्यात येणार आहेत. शहरातील सेतू सुविधा केंद्र आणि महा-ई-सेवा केंद्रचालकांची २७ जानेवारी रोजी बैठक घेण्यात येणार आहे. त्यामध्ये याबाबतची पूर्वसूचना संबंधितांना दिली जाणार आहे.’
या केंद्रांच्या माध्यमातून विविध प्रकारची प्रमाणपत्रे आणि परवाने देण्यात येतात. त्यामध्ये सात-बाराचा उतारा, रहिवास प्रमाणपत्र, जात प्रमाणपत्र आदींचा समावेश आहे. त्यासाठी त्यांना रांगा लावायची गरज राहिलेली नाही; तसेच प्रमाणपत्र प्राप्त करण्यासाठी कार्यालयांमध्ये फेऱ्याही माराव्या लागत नाहीत. त्यामुळे नागरिकांच्या वेळेची बचत होऊ लागली आहे. मात्र, या केंद्रांमध्ये होणारे गैरप्रकार नागरिकांसाठी अडचणीचे ठरत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नायक गावडे यांना मरणोत्तर शौर्य चक्र

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

दहशतवाद्यांशी लढताना वीरगती प्राप्त झालेले मराठा लाइट इन्फंट्री व राष्ट्रीय रायफल्सचे नायक पांडुरंग महादेव गावडे यांना मरणोत्तर शौर्य चक्र जाहीर झाले आहे. गावडे मूळचे सिंधुदुर्गातील आंबोली या गावचे रहिवासी होते.

लष्करातर्फे शांतीकाळात दखविलेल्या अतुलनीय शौर्यासाठी शौर्य चक्र दिले जाते. जम्मू-काश्‍मीरमधील सीमावर्ती भागातील कुपवाडा जिल्ह्यात २१ मे २०१६ रोजी जैश ए महंमदच्या दहशतवाद्यांशी नऊ तास चाललेल्या चकमकीत भारतीय जवानांनी पाच दहशतवाद्यांचा खात्मा केला. या चकमकीत गावडे गंभीर जखमी झाले होते. रुग्णालयात उपचारादरम्यानच त्यांना वीरगती प्राप्त झाली.

अष्टपैलू व्यक्तिमत्व असलेले गावडे उत्तम नेमबाज (स्नायपर), रेडिओ ऑपरेटर होते तसेच कम्प्युटर आणि सर्व प्रकारचे रेडिओ संच हाताळण्यात कुशल होते. विविध क्रीडाप्रकारांमध्येही त्यांना गती होती. ते उत्तम हॉकी, बास्केटबॉल आणि फुटबॉलपटू होते. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी तालुक्यातील आंबोली-मुळवंदवाडी (ता. सावंतवाडी) येथील मूळ रहिवासी असलेले गावडे मराठा लाइट इन्फंट्रीमध्ये कार्यरत होते. काही वर्षांपूर्वी त्यांची नेमणूक जम्मू काश्मिरमध्ये अतिरेक्यांचा सामना करणाऱ्या ४१ राष्ट्रीय रायफल्समध्ये झाली होती. गावडे यांच्या पश्चात आई-वडील, पत्नी आणि दोन मुले असा परिवार आहे. गावडे यांना घरातूनच लष्करी सेवेचे बाळकडू मिळाले होते. त्यांचे दोन मोठे भाऊ सैन्यातच कार्यरत होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भाजप नगरसेवकावर फसवणुकीचा गुन्हा

$
0
0

पुणे : एकच फ्लॅट दोन व्यक्तींना विकून महिलेची तेवीस लाख रुपयांची फसवणूक केल्याच्या आरोपावरून भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक विष्णू नारायण हरिहर यांच्यासह दोघांवर खडक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या बाबत शारदा चंद्रकांत कानगे (वय ५०, रा. गुरुवार पेठ) यांनी तक्रार दिली आहे. त्यावरुन बालाजी असोसिएट्स प्रमोटर आणि बिल्डर्स, गुरुवार पेठ तसेच विष्णू नारायण हरिहर, (रा. गुरुवार पेठ), दिनेश वसंत भोसले यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कानके या महापालिकेत आरोग्य विभागात नोकरीस आहेत. विष्णू हरिहर आणि भोसले बालाजी असोसिएट्समध्ये भागीदार आहेत. त्यांनी गुरुवार पेठेत सीता नामदेव भवन उभारले आहे. कानगे यांनी या इमारतीमधील पाचव्या मजल्यावरचा २७ क्रमांकाचा फ्लॅट २३ लाख रुपयांना विकत घेतला. आरोपींनी मंजूर नकाशाप्रमाणे फ्लॅट क्रमांक २७ हा जुन्या मंजूर नकाशाप्रमाणे संजय वाडकर यांना २६ क्रमांकाने २००८ मध्ये नोंदणीकृत करारनाम्याने विक्री केला होता. कानगे यांना फ्लॅटचे करारपत्र २७ क्रमांकाचे दिले. मात्र, फ्लॅटचा ताबा देताना, त्यांनी टेरसवर पत्र्याची शेड मारून फ्लॅट तयार केला. त्याला आतून पीओपी मारून तो फ्लॅट सारखाच भासेल असा केला. मात्र, कानगे यांना हा प्रकार लक्षात आला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

​ पालिकेत उगारली विकासाची छडी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

विद्यार्थ्यांना ज्ञान देण्याबरोबरच ‍भावी पिढी घडवण्याची जबाबदारी असणाऱ्या शिक्षकांनी महापालिकेत लोकप्रतिनिधीच्या माध्यमातून शहराचा विकास करण्याची किमयाही केली आहे. पेशाने शिक्षक असणाऱ्या या विविध व्यक्तींनी विविध समितींमध्ये सदस्य तसेच स्थायी समितीचे अध्यक्ष म्हणूनही जबाबदारी पार पाडली आहे.
नागरिकांच्या पसंतीमुळेच महापालिकेमध्ये आतापर्यंत ज्योत्स्ना सरदेशपांडे, त्र्यंबक आपटे, गोविंदराव मालशे, अनुपमा लिमये, प्रभावती मटाले, मेधा कुलकर्णी, बापूराव कर्णे गुरुजी, अश्विनी कदम, पुष्पा कनोजिया, मीनल वैद्य आदी शिक्षकांनी लोकप्रतिनिधीची भूमिका वठवली आहे. त्यापैकी कर्णे गुरुजी, कदम, कनोजिया, कुलकर्णी आदी मंडळी विद्यमान नगरसेवक आहेत. शिक्षिका म्हणून काम करत असताना २००७मध्ये वॉर्ड क्रमांक ओबीसी महिला राखीव झाला. तेव्हा पती सामाजिक कार्यात असल्याने निवडणूक लढण्याची संधी मिळाली. शिक्षिका असल्याने मोठ्या प्रमाणात जनसंपर्क होता आणि या जनसंपर्कामुळेच निवडणुकीत विजयी होता आले. शहरात महिलांच्या सोयीसाठी स्वच्छतागृहांचा प्रश्न मी लावून धरला. स्थायी समितीची सभापती असताना स्मार्ट सिटी प्रकल्पाला मान्यता देण्यात आली. शहरातील पहिली ‘एमआरआय’ मशीन आमच्या प्रभागात बसविण्यात येणार आहे, असे कदम यांनी सांगितले.
‘मी शिक्षिका असल्याने राजकारणात येण्यासाठी फायदा झाला. निगडीतील मॉडर्न शाळेत सात वर्षे तर अहिल्यादेवी शाळेत सलग वीस वर्षे शिक्षक म्हणून काम केले. कुटुंबात सामाजिक कार्य करण्याबाबत सकारात्मक वातावरणात होते. त्यामुळे शिक्षकाचे काम करतानाच सामाजिक संस्थेमार्फत सामाजिक कार्य सुरु ठेवले. २०१२मध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने महापालिका निवडणुकीसाठी उमेदवार निवडण्यासाठी लेखी परीक्षा घेण्याचे ठरविले. ही परीक्षा देऊन चांगल्या गुणांनी उत्तीर्ण केली. त्यामुळे एका रुपये खर्च न करता पक्षाचे तिकीट मिळविले आणि निवडणूक जिंकली. पुणे शहरातील संपूर्ण नाल्यांचा अभ्यास करून ती उपाययोजना करण्याचे महापालिकेच्या निदर्शनास आणले. शहरात कर संकलन वाढीसाठी योजना राबविण्याची संकल्पना, ओपन जिम आणि मॉडेल स्कूलची कल्पना सर्वप्रथम प्रत्यक्षात आणली,’ असे कनोजिया म्हणाल्या.
महापालिकेच्या शाळेत २५ वर्षे काम केले. त्यासोबत १८ वर्षे विविध पदांवर शिक्षक संघटनेत काम केले. येरवडा परिसरात राहताना लोकांच्या समस्या आणि झोपडपट्टीतील गरिबांचे हाल पाहणे असह्य झाले. साधारण १९९३मध्ये त्या भागातील एक उमेदवार मी आणि माझ्या सहकाऱ्यांच्या पाठिंब्यामुळे निवडून आले. मात्र, त्यांनी आमचे प्रश्न न सोडविता आम्हालाच पिटाळून लावले. त्यावेळी निवडणुकीत उतरण्याचे ठरविले. त्यानंतर १९९७मध्ये निवडणुकीत लढली. मी राबविलेली सरकारची वाल्मिकी-आंबेडकर योजना संपूर्ण राज्याने स्वीकारली. त्यातून ८२० घरे बांधली. केंद्र सरकारच्या घरकुल योजनेतून ३५० घरे बांधण्यात आली. रस्ते, अभ्यासिका, इंग्रजी माध्यम शाळा, नाट्यगृह अशी कितीतरी कामे शिक्षकाचा गुण असल्याने आतापर्यंत करता आली, असे कर्णे गुरुजी यांनी सांगितले.

लहानपणापासून समाजकार्याची आवड होती. आणीबाणीच्या काळात जेलमध्ये होते. त्यानंतर अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या माध्यमातून कामाला सुरुवात केली. त्याचबरोबर आबासाहेब अत्रे प्रशालेत सलग २० वर्षे शिक्षिका म्हणून काम केले. विठ्ठलवाडीत रहायला आल्यानंतर सिंहगड परिसरातील समस्या जाणल्या. त्यानंतर २००२मध्ये निवडणुकीत विजयी झाल्यानंतर सिंहगड रस्ता रुंदीकरणाचे, अतिक्रमण विरोधात मोठी कारवाई आणि वडगाव येथे जलशुद्धीकरण प्रकल्प उभारणे आदी कामे मार्गी लावली. त्यामुळे शहरातील नागरिकांची सोय झाली.

अनुपमा लिमये

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


चारित्र्य पडताळणीला इच्छुकांचा प्रतिसाद

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

महापालिका निवडणुकीत चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्र मिळविण्यासाठी इच्छुक उमेदवारांनी गेल्या दोन दिवसांपासून पोलिस आयुक्तालयात मोठी गर्दी केली आहे. गेल्या दोन दिवसांत पडताळणी विभागाकडे इच्छुकांचे शेकडो अर्ज आले आहेत. प्रमाणपत्र मिळविण्यास उशीर होत असल्यामुळे काही इच्छुकांकडून गोंधळ घालण्यात येत असल्याने वरिष्ठ अधिकाऱ्यांना हस्तक्षेप करावा लागत आहे.
पुणे व पिंपरी-चिंचवड महापालिकेची निवडणूक फेब्रुवारी महिन्यात असल्याने राजकीय वातावरण तापले आहे. अनेक जण नगसेवकपदासाठी निवडणूक लढविण्यास इच्छुक आहेत. निवडणूक आयोगाकडे भरण्यासाठी लागणाऱ्या कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी सध्या सर्वांची गडबड सुरू आहे. महापालिका निवडणूक लढविण्यासाठी तुल्यबळ उमेदवारांना पक्षात घेतले जात आहे. त्यात काही गुन्हेगारी प्रवृत्तीचे उमेदवार असल्याने त्यांच्यावर टीकेची झोड उठत आहे. उमेदवारी अर्ज भरताना उमेदवारांना प्रतिज्ञापत्र सादर करावे लागते. त्यामध्ये त्यांच्यावर दाखल असलेल्या गुन्ह्यांची माहिती सादर करावी लागत असून, त्यासाठी पोलिसांकडून चारित्र्य पडताळणी करून घेण्यासाठी गेल्या दोन दिवसांपासून गर्दी होत आहे. दोन दिवसात शेकडो इच्छुकांनी अर्ज दाखल केले आहेत. लवकर प्रमाणपत्र मिळावे म्हणून काही जणांनी कर्मचाऱ्यांशी वाद घातला. त्यामुळे, विशेष शाखेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना धाव घ्यावी लागली. निवडणूक आयोगाकडे उमेदवारी अर्ज दाखल करताना गुन्ह्यांची अर्धवट माहिती दिली जाऊ नये, भविष्यात तक्रार होऊन पद धोक्यात येऊ नये, यासाठी प्रयत्न सुरू आहेत.
दरम्यान, या कामासाठी एकच टेबल असून इच्छुक उमेदवारांसह इतर कामांसाठीही नागरिकांची तेथेच गर्दी होत आहे, त्यामुळे निवडणुकीच्या कामासाठी स्वतंत्र व्यवस्था करावी, अशी मागणी भाजपचे संदीप खर्डेकर, सुनील पांडे यांनी केली आहे. याबाबत विशेष शाखेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले, की निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर इच्छुक उमेदवारांकडून चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्रासाठी अर्ज येत आहेत. तीन फेब्रुवारीपर्यंत उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत असल्याने सध्या ज्यांचे अर्ज आले आहेत, त्यांना सात दिवसात प्राधन्याने प्रमाणपत्र देण्याचा प्रयत्न केला जात आहे.

उमेदवारी अर्जामध्ये संबंधितांनी आपल्यावर काही गुन्ह्यांची नोंद असेल, तर त्याची माहिती देण्याचे बंधन आहे. त्यामुळे, पुन्हा स्वतंत्र चारित्र्य पडताळणी अहवाल अर्जासोबत जोडण्याची आवश्यकता नाही.
सतीश कुलकर्णी
उपायुक्त, निवडणूक विभाग, पुणे महापालिका

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पंधरा प्रभागांवरून आघाडीत बिघाडी?

$
0
0

अजित पवारांच्या उपस्थितीत आज निर्णय शक्य

म. टा. प्रतिनिधी, पुणे

महापालिकेच्या निवडणुकीला सामोरे जाण्यासाठी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आघाडी करण्याची चर्चा सुरु असून काही प्रभागातील जागांवर दोन्ही पक्षांचे एकमत झाले आहे. मात्र, महत्त्वाच्या १५ प्रभागांमध्ये कोणी, किती जागा लढवायच्या यावर एकमत होत नसल्याने आघाडीमध्ये बिघाडी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
बुधवारी झालेल्या आघाडीच्या बैठकीत दोन्ही पक्षांनी आपल्या भूमिकेवर ठाम राहणे पसंत केल्याने कोणताही निर्णय झाला नाही. त्यामुळे गुरुवारी राष्ट्रवादीचे नेते अजित पवार याबाबत बैठक घेऊन यावर निर्णय घेणार आहेत. पालिकेच्या निवडणुकीत भाजपला रोखण्यासाठी समविचारी पक्षाने एकत्र यावे, असे आवाहन दोन्ही पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांकडून करण्यात आले होते. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून पालिका निवडणुकीत काँग्रेस, राष्ट्रवादीने आघाडी करायची की नाही, याची चर्चा जोरदार सुरू आहे. आघाडीचा प्रस्ताव देताना काँग्रेसने राष्ट्रवादीकडे ७१ जागांची मागणी केली आहे. तर, राष्ट्रवादीने काँग्रेसला ४६ जागा देण्याची तयारी दाखविली आहे. यावर निर्णय घेण्यासाठी मंगळवारी रात्री दोन्ही पक्षांच्या स्थानिक नेत्यांची बैठक झाली. यामध्ये दोन्ही पक्षांची प्रभागनिहाय ताकद किती यावर चर्चा झाली. शहरातील ४१ प्रभागांपैकी १५ प्रभागांमधील जागांवर दोन्ही पक्षांनी दावा केला. त्यामुळे यामध्ये जागावाटपाचा निर्णय होऊ शकला नाही. बुधवारी देखील जागा वाटपावर निर्णय घेण्यासाठी दोन्ही पक्षांच्या शहराध्यक्षांची बैठक झाली, त्यामध्येही एकमत न झाल्याने ही चर्चा पूर्ण झाली नाही.
काँग्रेसमधून राष्ट्रवादीत प्रवेश केलेल्या नगरसेवकांच्या जागेवर राष्ट्रवादीने हक्क सांगितला आहे. या जागेवर काँग्रेसचे नगरसेवक निवडून आले होते, त्यामुळे या जागा काँग्रेसला द्याव्यात, अशी भूमिका काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांनी घेतली. परिणामी जागावाटपाचा तिढा अधिकच वाढत असल्याचे बोलले जात आहे. दोन्ही काँग्रेस आपल्या भूमिकांवर ठाम असल्याने जुळत आलेल्या आघाडीत बिघाडी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. निवडणुकीसाठी आघाडी करायची की नाही, याचा निर्णय आता अजित पवार घेणार आहेत. पवार गुरुवारी शहरात असल्याने त्यांनी याबाबत बैठक बोलाविली असून, या बैठकीनंतरच आघाडीचा निर्णय जाहीर केला जाईल, असे सूत्रांनी सांगितले.
घड्याळाच्या जागेवर; हाताचा डोळा
काँग्रेसबरोबर आघाडी करताना काही प्रभागातील जागांवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांचा दावा असेल, अशा प्रभागांची यादी यापूर्वीच पवार यांनी स्थानिक पदाधिकाऱ्यांकडे दिली आहे. मात्र, यातील अनेक जागांवर काँग्रेस दावा करत असल्याने त्यावर कोणताही निर्णय झाला नाही. यामध्ये प्रामुख्याने हडपसरमधील प्रभाग क्रमांक २२, २५, २६, २७ या प्रभागांचा समावेश आहे. तसेच प्रभाग क्रमांक ७, ८, १४, ३२, ३३, ३६, ३७, ३८ या प्रभागांचा समावेश असल्याचे सूत्रांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भाजपची शोधमोहीम आजही सुरू राहणार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

भारतीय जनता पक्षाकडून प्रभागातील संभाव्य उमेदवारांची चाचपणी करण्याची शोधमोहीम बुधवारीही पूर्ण होऊ शकली नाही. त्यामुळे, आता उर्वरित सर्व प्रभागांचा निर्णय आज, गुरुवारी होण्याची शक्यता आहे. भाजप-शिवसेना युतीचा फैसलाही गुरुवारीच जाहीर होणार असून, निवडणुकीचे नेमके चित्र स्पष्ट होण्याची शक्यता आहे.
शहरातील ४१ प्रभागांमध्ये भाजपकडून निवडणूक लढविण्यासाठी इच्छुकांची संख्या सर्वाधिक होती. साडेआठशे इच्छुकांनी त्यासाठी मुलाखतही दिली. अनेक प्रभागांमध्ये इच्छुकांची संख्या १० पेक्षा जास्त असल्याने त्यातील संभाव्य उमेदवारांच्या नावांची ‘शॉर्टलिस्ट’ तयार करण्याचे काम पक्षातर्फे मंगळवारपासून सुरू करण्यात आले. पहिल्या दिवशी सहा तासांहून अधिक काळ झालेल्या चर्चेत काही मोजक्याच प्रभागांवर चर्चा झाली. त्यातून, काही नावांची शिफारस प्रदेशाकडे करण्यात आल्याचे समजते. बुधवारी दुसऱ्या दिवशीही प्रभागांवर चर्चा सुरू राहिली. केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर आणि सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे यांचा अपवाद वगळता भाजपचे इतर सर्व पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. अनेक प्रभागांमध्ये अंतिम नावे तयार करताना, विविध पर्याय सुचवले जात होते. पालकमंत्री, आमदार आणि शहराध्यक्ष यांच्याकडून काही ठिकाणी वेगवेगळ्या नावांचा आग्रह धरला जात होता. त्यामुळे, काही नावांवर एकमत न झाल्यास अशा ठिकाणी आणखी काही नावांची शिफारस प्रदेशाकडे केली जाणार असल्याचे कळते. शहरातील निम्म्याच प्रभागांचे काम दोन दिवसांत पूर्ण झाले असून, गुरुवारी उर्वरित सर्व प्रभागांचा आढावा घेण्यात येणार आहे.

युतीबाबतही आज फैसला?
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी बुधवारी मुंबईत मातोश्रीवर पुण्यातील युतीबाबत बैठक घेतली. यामध्ये, युतीऐवजी स्वतंत्र लढण्याचा आग्रह धरण्यात आला. त्यामुळे, युतीचा अंतिम निर्णय गुरुवारीच जाहीर होण्याची दाट शक्यता आहे. भाजपने अजूनही शिवसेनेसोबत चर्चेची तयारी दाखवली असली, तरी शिवसेना युती करून लढण्याच्या मानसिकतेमध्ये नाही, असे दिसते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

युती तुटल्याचे अतीव दु:ख: पवारांची खोचक प्रतिक्रिया

$
0
0

मटा ऑनलाइन वृत्त। बारामती

'ज्यांनी आत्तापर्यंत एकत्र काम केले त्यांची युती तुटल्याचे ऐकून अतीव दु:ख झाले' अशा शब्दात सूचक स्मित करत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. शिवसेनेने पाठिंबा काढून घेतला तर आपण पाठिंबा देणार काय असा प्रश्न प्रसारमाध्यमांनी पवारांना विचारला. यावर 'आपण जर तरच्या प्रश्नाना उत्तरे देत नाही असे म्हणत ' त्यांना चर्चा करु द्या, निर्णय घेऊ द्या, त्यानंतर कुणी चर्चेला आल्यास विचार करू' असे उत्तर पवार यांनी दिले

दरम्यान, शरद पवार यांच्या प्रतिक्रियेनंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या इतर नेत्यांनीही आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. सरकारमधून बाहेर पडण्याची शिवसेनेत हिम्मत नाही असे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी केले आहे. तर शिवसेना हा दिखावा करत आहे, दिखावा करण्यापेक्षा शिवसेनेने सरकारमधून बाहेर पडावे असे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

समन्वय समित्या हव्यात

$
0
0

उपद्रवी पर्यटकांवर उपाय म्हणून ट्रेकिंग संस्थांचे मत

म. टा. प्रतिनिधी, पुणे

‘चढायला सहज-सोपे आणि वाहनांची सुविधा असलेले किल्ले सध्या तळीरामांसाठी हक्काचे ठिकाण बनले आहेत. रात्री रंगणाऱ्या पार्ट्या थांबवण्यासाठी संध्याकाळनंतर ट्रेकिंगला बंदी करणे हा पर्याय नाही; तर पोलिसांच्या सहकार्यातून पुरातत्त्व विभागाच्या कर्मचाऱ्यांनी गडावर नियमित गस्त घातली पाहिजे. उपद्रवी पर्यटकांना आवरण्यासाठी स्थानिक समन्वय समित्यांची स्थापना करावी,’ असे स्पष्ट मत सह्याद्रीच्या डोंगररांगांमध्ये नियमित ट्रेकिंग करणाऱ्या संस्थांच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केले आहे.

वेगवेगळ्या पार्ट्या आयोजित करणाऱ्या टूर कंपन्या सध्या नवीन ठिकाणांच्या शोधात असून, त्यांच्यासाठी पुणे परिसरातील किल्ले हे आकर्षक डेस्टिनेशन ठरले आहे. चढाईसाठी कमी त्रासदायक असलेल्या या गडांवर होणाऱ्या पार्ट्यांना पर्यटकांचा भरपूर प्रतिसाद मिळतो आहे. नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला विसापूर घडलेला गैरप्रकार असो किंवा शनिवारी रात्री दुर्गप्रेमींनी राजमाचीवर उधळून लावलेली पार्टी असो, पश्चिम महाराष्ट्रातील बहुतांश गडांवर वाढत असलेल्या या पार्ट्यांमुळे गडांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा पुढे आला आहे.

‘पुरातत्त्व विभागाचे कर्मचारी नेहमी अपुऱ्या मनुष्यबळाचे कारण सांगतात. गैरप्रकार थांबवण्यासाठी गडावर पुरातत्त्व विभागाचे कर्मचारी दिसत नाहीत, अशा वेळी दुर्गप्रेमी आक्रमक भूमिका घेतात. हे प्रकार रोखण्यासाठी प्रत्येक गडावर स्थानिक लोक, गिर्यारोहक, पोलिस आणि पुरातत्त्व विभागाचे कर्मचारी अशी समन्वयक समिती स्थापन झाली पाहिजे. अनेक स्वयंसेवक स्वेच्छेने या कार्यात सहभागी होतील आणि गडांवरील उपद्रवही रोखता येईल,’ असे गिरिप्रेमी संस्थेचे उमेश झिरपे यांनी सांगितले.

‘महाराष्ट्रात चारशेहून अधिक किल्ले आहेत. राजमाची, विसापूर, लोहगडासह पश्चिम महाराष्ट्रातील बहुतांश गडांवर पार्ट्यांचे प्रमाण वाढते आहे. त्यांच्यावर कोणाचेही नियंत्रण नाही. आम्ही ट्रेकिंगला जातो तेव्हा गडावर पुरातत्त्व विभागाचा एकही कर्मचारी नसतो. चढाईसाठी अवघड असलेल्या गडांवर गैरप्रकार कमी होतात. त्यामुळे पर्यटकांचा वावर जास्त असलेल्या किल्ल्यांवर लक्ष केंद्रित करून पुरातत्त्व विभागाच्या अधिकाऱ्यांनी पोलिसांच्या सहभागातून गस्त घातली पाहिजे. गावकऱ्यांमध्ये या गैरप्रकारांबद्दल जागृती केल्यास ते तातडीने पोलिसांशी संपर्क साधू शकतील,’ असे ट्रेकडी संस्थेचे पिनाकिन कर्वे यांनी सांगितले.

...........

पर्यटनाला हवी निर्बंधांची चौकट

‘गडावरील पर्यटकांचे वर्तन कसे असावे, या संदर्भात सरकारने नियमावली प्रसिद्ध करण्याची गरज आहे. गेल्या काही वर्षात किल्ल्यांवरील ‘नाइट कॅपिंग’ची मागणी वाढते आहे. गडावर तंबू टाकून पर्यटकांना मद्यपान आणि मांसाहारी जेवणाची मजा घ्यायची आहे. मुळातच कोणत्याही ऐतिहासिक वास्तूचा आदर राखणे हा संकेत आहे; पण त्याचे सातत्याने उल्लंघन होत असल्यास पर्यटकांच्या उपद्रवाला निर्बंधांची चौकट घातली पाहिजे. प्रत्येक किल्ल्यावर ठिकठिकाणी या नियमांचे फलक लावून जागृती करावी,’ असे मत श्री शिवदुर्ग संवर्धन संस्थेचे सदस्य सतीश मराठे यांनी व्यक्त केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘फडणीस इन्फ्रास्ट्रक्चर’ला ग्राहक मंचाचा दणका

$
0
0

तक्रारदाराचे पावणेदोन लाख सव्याज परत करण्याचा आदेश

म. टा. प्रतिनिधी, पुणे

पुण्यातील फडणीस इन्फ्रास्ट्रक्चर यांच्याकडे एका ज्येष्ठ नागरिकाने गुंतवलेली पावणेदोन लाख रुपयांची रक्कम त्यांना व्याजासह परत देण्याचा आदेश पुणे जिल्हा ग्राहक न्यायमंचाने दिला आहे. ग्राहक मंचाचे अध्यक्ष व्ही. पी. उत्पात, सदस्य ओंकार पाटील यांनी हा निकाल दिला.

संबंधित कंपनीकडे तक्रारदाराने गुंतवलेली रक्कम वारंवार पाठपुरावा करूनही त्यांना परत देण्यात आली नव्हती. या प्रकरणी सनतकुमार कुलकर्णी (रा. कात्रज) यांनी ग्राहक मंचाकडे ‘फडणीस इन्फ्रास्ट्रक्चर’विरुद्ध दावा दाखल केला होता. तक्रारदार कुलकर्णी ज्येष्ठ नागरिक आहेत. त्यांनी संबंधित कंपनीकडे ठेव म्हणून पावणेदोन लाख रुपये गुंतवले होते; मात्र मुदतीनंतर त्यांना ही रक्कम देण्यास कंपनीतर्फे टाळाटाळ करण्यात आली.

कंपनीने त्यांना व्याजसुद्धा वेळेवर दिले नाही. तसेच गुंतवलेली रक्कम परत करण्यास मुदतीनंतरही टाळाटाळ केली होती. विलंबित व्याजही देण्यास असमर्थता दर्शवण्यात आली होती. तक्रारदाराच्या पत्नीचे मोठे ऑपरेशन होते. त्यासाठी त्यांना पैशांची आवश्यकता होती. कंपनीने मूळ ठेव रक्कम तरी वैद्यकीय खर्च भागविण्यासाठी परत करावी, अशी मागणी तक्रारदाराने केली होती. कंपनीकडे त्यांनी लेखी विनंतीही केली होती; मात्र कंपनीकडून कोणताही प्रतिसाद देण्यात आला नाही. त्यानंतर तक्रारदाराने ग्राहक मंचाकडे दाद मागितली. त्यांच्यातर्फे अॅड. नूतन कुलकर्णी यांनी मंचापुढे बाजू मांडली. मंचाकडे दावा दाखल करण्यात आल्यानंतरही कंपनीतर्फे बाजू मांडण्यासाठी कोणीही हजर झाले नाही. मंचाने तक्रारदाराचे म्हणणे ऐकून निकाल दिला. कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक विनय फडणीस यांनी तक्रारदाराला गुंतवलेली रक्कम नोव्हेंबर २०१४पासून साडेबारा टक्के व्याजासह परत करावी. तसेच त्यांना झालेल्या मा​नसिक त्रासापोटी तीन हजार रुपये द्यावेत असा आदेश मंचाने दिला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कर्तृत्ववान मुलाला वडिलांनी पाठिंबा द्यावा

$
0
0

'यूपी'तील यादवीबद्दल शरद पवारांची टिप्पणी

म. टा. प्रतिनिधी, पुणे

‘आजकाल एकाच कुटुंबामधील चार जण विविध पक्षांचे प्रतिनिधित्व करत असतात. संधी मिळाली तर कोणी सोडत नाही. वडील आणि मुलांमध्ये संघर्ष दिसून येतो; पण मुलगा कर्तृत्ववान असेल, तर वडिलांनी त्यास पाठिंबा द्यायला हवा. सध्या जे बघायला मिळते आहे ते योग्य नाही,’ अशी टिप्पणी करून माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी उत्तर प्रदेशमधील मुलायमसिंह व अखिलेश यादव यांच्या वादावर नामोल्लेख टाळत टीका केली.

महाराष्ट्र साहित्य कला प्रसारिणी सभेतर्फे ज्येष्ठ विचारवंत स्व. रावसाहेब शिंदे यांच्या स्मृतिदिनानिमित्त ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. अनिल काकोडकर, ख्यातनाम कवी ना. धों. महानोर, माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांना ‘रावसाहेब शिंदे स्मृती पुरस्कार’ गुरुवारी पवार यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. डॉ. बाळासाहेब शेंडगे आणि रवींद्र डोमाळे यांना कार्यकर्ता पुरस्कार देण्यात आला. त्या वेळी पवार बोलत होते. आंतरराष्ट्रीय घडामोडींचे अभ्यासक डॉ. संदीप वासलेकर, पिंपरी येथील डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठाचे कुलपती डॉ. पी. डी. पाटील, ज्येष्ठ पत्रकार मधुकर भावे, सभेचे अध्यक्ष उद्धव कानडे, कार्याध्यक्ष सचिन इटकर व उपाध्यक्ष मनोहर कोलते या वेळी उपस्थित होते.

‘शिंदे परिवाराने ग्रामीण जनता आणि शेतीशी बांधिलकी जपली आहे. परंतु या कुटुंबाची शिक्षण, शेती, ग्रामीण अर्थव्यवस्था आणि पाणी व्यवस्थापन क्षेत्रातील योगदानाबाबत नोंद घेतली गेली नाही,’ अशी खंत पवार यांनी व्यक्त केली.

‘अण्णासाहेब असोत किंवा रावसाहेब, या दोघांनी महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील लोकांच्या प्रगतीसाठी मोठे योगदान दिले आहे. अण्णासाहेबांच्या निर्णयांमुळे ग्रामीण शेती अर्थव्यवस्था बळकट झाली. हरितक्रांतीत वैज्ञानिकांचे योगदान मोठे आहे. त्यांनी लावलेले शोध आणि शेतकऱ्यांनी घेतलेल्या कष्टांमुळेच हरितक्रांतीचे ध्येय साध्य झाले. या घटकांना सातत्याने प्रोत्साहन देण्याची भूमिका अण्णासाहेब आणि रावसाहेबांनी मांडली,’ असे गौरवोद्गार पवार यांनी काढले. काकोडकर, महानोर, थोरात यांनी मनोगत व्यक्त केले. अवधूत गांधी यांच्या संत नरसी मेहता यांच्या भजनाने कार्यक्रमास प्रारंभ झाला. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


डॉ. कुलकर्णी यांना रॉय राष्ट्रीय पुरस्कार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

प्रसिद्ध युरॉलॉजिस्ट डॉ. संजय कुलकर्णी यांना वैद्यकीय क्षेत्रात प्रतिष्ठेचा समजला जाणारा डॉ. बी. सी. रॉय राष्ट्रीय पुरस्कार २०१६ जाहीर झाला आहे. डॉ. कुलकर्णी यांना ‘टू रेकग्नाइज दी बेस्ट टॅलेंट्स इन एन्करेजिंग दी डेव्हलपमेंट ऑफ स्पेशालिटीज् इन डिफरंट ब्रांचेस इन मेडिसीन’ या विभागात हा पुरस्कार जाहीर झाला आहे. ‘मेडिकल कौन्सिल ऑफ इंडिया’तर्फे दिला जाणारा हा पुरस्कार येत्या एक जुलै रोजी ‘डॉक्टर्स डे’च्या औचित्याने डॉ. कुलकर्णी यांना राष्ट्रपतींच्या हस्ते प्रदान करण्यात येईल.

डॉ. संजय कुलकर्णी ​गेल्या तीन दशकांहून अधिक काळ या क्षेत्रात आहेत. जगभरातील युरोलॉजिकल तंत्रज्ञानाच्या विकासामध्ये डॉ. कुलकर्णी यांनी भरीव योगदान दिले असून, ​ते ​‘दी जेनायटो-युरिनरी रिकन्स्ट्रक्टिव्ह सोसायटी’चे पहिले भारतीय प्रेसिडेंट होते. डॉ. कुलकर्णी यांनी विकसित केलेली शस्त्रक्रिया ‘कुलकर्णीज् टेक्निक ऑफ युरेथ्रल रिकन्स्ट्रक्शन’ या नावाने ​​जगभरात ​ओळखली जाते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

टेमघर धरणदुरुस्तीचा प्रस्ताव प्रलंबितच

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

टेमघर धरणाची गळती होत असल्याने दुरुस्तीच्या कामासाठी पाठवण्यात आलेला सुमारे शंभर कोटी रुपयांचा प्रस्ताव अद्यापही राज्य सरकारकडे प्रलंबित आहे. त्यामुळे दुरुस्तीच्या कामाला सुरुवात होऊ शकलेली नाही. सध्या या धरणातील पाणीसाठा दुरुस्तीसाठी निम्मा कमी करण्यात आला आहे.

या धरणाची धोकादायक पद्धतीने गळती होत आहे. त्यामुळे दुरुस्तीच्या कामासाठी शंभर कोटी रुपयांचा प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठवण्यात आला आहे; मात्र त्यास अद्याप मंजुरी मिळालेली नाही.

याबाबत या धरणाचे प्रभारी कार्यकारी अभियंता नितीन सुपेकर म्हणाले, ‘दुरुस्तीच्या कामांचा प्रस्ताव पाठवण्यात आला आहे. या वर्षीपासून दुरुस्तीच्या कामास सुरुवात होईल. आगामी दोन वर्षांत ही कामे केली जाणार आहेत.’

टेमघर धरणाची क्षमता सुमारे पावणेचार टीएमसी असून, पाणीसाठ्यासाठी टेमघर हे महत्त्वाचे धरण आहे. या वर्षी मान्सून चांगला झाल्याने टेमघर, खडकवासला ही धरणे पूर्ण क्षमतेने भरली; पण पावसाळ्यामध्ये टेमघर धरणातून मोठ्या प्रमाणावर गळती होत असल्याचे निदर्शनास आले. हे धरण सुमारे सोळा वर्षांपूर्वी बांधण्यात आले आहे. त्यामुळे धरणाच्या कामाच्या दर्जाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या प्रकरणी या धरणाचे कंत्राट घेतलेल्या संबंधित कंपनीच्या अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल झाला आहे.

जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी या धरणाला भेट देऊन पाहणी केली होती. त्यानंतर धरण दुरुस्तीच्या सूचना देण्यात आल्या होत्या. त्यानुसार विविध टप्प्यांमध्ये शंभर कोटी रुपयांच्या कामाचा प्रस्ताव राज्य सरकारला पाठवण्यात आला आहे. या धरणाच्या दुरुस्तीसाठी त्यातील पाणीसाठा निम्मा कमी करण्यात आला आहे; मात्र दुरुस्तीच्या प्रस्तावाला अद्याप मान्यता मिळालेली नाही.

दरम्यान, टेमघर धरणाचे कार्यकारी अभियंतापद जून २०१६पासून रिक्त आहे. या पदाचा अतिरिक्त कार्यभार दोन वेळा बदलण्यात आला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आफ्रिकन धावपटूंमध्ये चुरस

$
0
0

एकतिसावी पुणे आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन रविवारी

म. टा. प्रतिनिधी, पुणे

भारतीय मॅरेथॉनची जन्मभूमी असलेल्या पुण्यात रविवारी एकतिसावी पुणे आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन होत असून, या मॅरेथॉनमध्ये शंभरहून अधिक परदेशी धावपटू कौशल्य पणाला लावणार आहेत. पुणे मॅरेथॉनवर आफ्रिकन धावपटूंचेच वर्चस्व राहिले असून, या वेळी केनियन, की इथिओपियन धावपटू बाजी मारणार, याबाबत औत्सुक्य वाढले आहे.

दर वर्षी डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात होणारी ही मॅरेथॉन या वेळी ‘नोटाबंदी’च्या निर्णयामुळे पुढे ढकलण्यात आली होती. ही मॅरेथॉन आता रविवारी होत आहे. २०००मध्ये ही स्पर्धा जानेवारीत झाली होती. त्यानंतर प्रथमच पुणे मॅरेथॉन जानेवारी महिन्यात होत आहे. या वेळी मार्गही बदलण्यात आला आहे. या वेळी खंडूजीबाबा चौकाऐवजी सारसबागेजवळील दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे कलादालनापासून मॅरेथॉनला प्रारंभ होणार आहे आणि तेथीलच सणस क्रीडांगणावर समारोप होणार आहे. पूर्ण मॅरेथॉनमध्ये केनियाच्या विल्यम किप्रोनो यिगॉनला अग्रमानांकन देण्यात आले आहे. त्याची दोन तास १० मिनिटे व २१ सेकंद ही वैयक्तिक सर्वोत्तम वेळ आहे. त्यापाठोपाठ हाबतामू तेसेमा (२ ता. १२ मि. १३ से.), अहमद शमिल वोर्कू (२ ता. १२ मि. १३ से.), केनइ इफा बालडा (२ ता. १२ मि. १३ से.), उर्गेसा केदीर फिगा, डेमा डाबा बिकिला, देरेजे तादेसे, सबोका लेमा, अबयोत गिर्मा, तेफेरी वोडाजो, तेफेरे यादेता, गुदेता तामराट श्फिरा, रेगे डेरसू (इथिओपिया), सिमन किप्रुगट किरुई, फ्रान्सिस किओको एन्झियोकी (केनिया) या आफ्रिकन धावपटूंची वैयक्तिक सर्वोत्तम वेळ दोन तास १५ मिनिटांपेक्षा कमी आहे. पूर्ण मॅरेथॉनला (४२.१९५ किमी) पहाटे साडेपाचला प्रारंभ होणार असल्याने, धावपटूंसाठी अनुकूल थंड हवामान असणार आहे. त्यामुळे या वेळी मॅरेथॉनमध्ये विक्रमी वेळ नोंदली जाणार का, याबाबत उत्सुकता आहे. २०१२मध्ये दोन तास १३ मिनिटे व तीन सेकंद वेळेचा विक्रम नोंदवत केनियाच्या ल्युका किप्केम्बोई चेलिमोने पुणे मॅरेथॉन जिंकली होती. तो विक्रम आतापर्यंत अबाधित आहे.

भारताची भिस्त आर्मी स्पोर्ट सेंटरच्या जी. बी. पटले, परमजित सिंग आणि खडकीच्या बॉम्बे इंजिनीअरिंग ग्रुपमधील किशोर गव्हाणे, अभिमन्यू पवार यांच्यावर असेल.

‘मॅरेथॉनमध्ये एकूण ३५ लाख रुपयांची पारितोषिके दिली जाणार आहेत. मॅरेथॉन तांत्रिकदृष्ट्या संपूर्ण अत्याधुनिक असणार आहे. ४२ किलोमीटर अंतरात पाच ठिकाणी कॅमेऱ्याद्वारे, ‘चिप’द्वारे वेळेची नोंदणी होणार आहे. तसेच, डॉ. राजेंद्र जगताप यांच्या नेतृत्वाखाली सातशे सदस्यांचे वैद्यकीय पथक काम पाहणार आहे. मॅरेथॉन मार्गावर वीस अॅम्ब्युलन्स असणार आहेत,’ अशी माहिती स्पर्धा संचालक प्रल्हाद सावंत यांनी दिली.

पुरुषांच्या अर्धमॅरेथॉनमध्ये इथिओपियाच्या वुबेट यितायाल अडामूला अग्रमानांकन देण्यात आले आहे. एक तास एक मिनिट व तीन सेकंद ही त्याची वैयक्तिक सर्वोत्तम वेळ आहे. त्यापाठोपाठ अॅडेम हारून हाजी (१ ता. ०१ मि. ०३), गॅफिए अॅबे रॉबसो, शिब्रु, तेस्फा (इथिओपिया), टम सेइफू (केनिया) या धावपटूंची वैयक्तिक सर्वोत्तम वेळ एक तास दोन मिनिटांपेक्षा कमी आहे. त्यामुळे या २१ किलोमीटर अंतराच्या शर्यतीत या धावपटूंपैकी कोणी की अन्य कोण बाजी मारणार, याबाबत उत्सुकता आहे.

महिलांच्या अर्धमॅरेथॉनमध्ये इथिओपियाच्याच फेकाडू येशितिला इशेतेला अग्रमानांकन देण्यात आले आहे. तिची एक तास एक मिनिट व ३२ सेकंद ही वैयक्तिक सर्वोत्तम वेळ आहे. तिला या शर्यतीत विजेतेपदाची प्रबळ दावेदार मानली जात आहे. त्यापाठोपाठ अयांतू इशेते (एक ता. १२ मि. १३ से.) , सेर्कालेम बेलेते, त्सेहीनेश त्सेल, त्स्गा डीगेन या इथिओपियन धावपटूंची सर्वोत्तम वैयक्तिक वेळ एक तास १३ मिनिटांपेक्षा कमी आहे. त्यामुळे या शर्यतीत कोण बाजी मारणार, याबाबत औत्सुक्य आहे.

केनियन धावपटूंचा दबदबा…

पुणे मॅरेथॉनमधील पुरुषांच्या ४२.१९५ किलोमीटर अंतराच्या शर्यतीत केनियन धावपटूंचेच वर्चस्व राहिले आहे. केनियाच्या धावपटूंनी आतापर्यंत बारा वेळा ही शर्यत जिंकली आहे. त्यापाठोपाठ भारतीय धावपटूंनी सहा वेळा या शर्यतीत बाजी मारली आहे; मात्र १९९७मध्ये अभय सिंगने पुणे मॅरेथॉन जिंकली होती. त्यानंतर मात्र एकाही भारतीय धावपटूला ४२.१९५ किलोमीटर अंतराची शर्यत जिंकता आलेली नाही. इथिओपियाच्या धावपटूंनी चार वेळा, तर स्वीडनच्या धावपटूंनी दोन वेळा ही मॅरेथॉन जिंकली आहे. तसेच, टांझानिया, ऑस्ट्रेलिया, रशिया, मोरोक्को, श्रीलंका आणि बेल्जियमच्या धावपटूंनी प्रत्येकी एकदा ही शर्यत जिंकली आहे.

.....................

असा असेल मार्ग…

सारसबागेजवळील दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे कलादालनापासून पूर्ण मॅरेथॉनला प्रारंभ होईल. धावपटू बाजीराव रोड-शनिवारवाडा-पुणे महापालिका-सिमला ऑफिस-पोलिस ग्राउंड चौकमार्गे साखर संकुलातून आत अॅग्रिकल्चर कॉलेजमधून मुख्य द्वारातून पुन्हा पोलिस ग्राउंड चौकात येतील. तेथून ते सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ-ब्रेमेन चौक-परिहार चौक-आयटीआय रोडमार्गे आयसर कॉलेजपर्यंत जातील. तेथून धावपटू डावीकडे बाणेर रोड-भारती विद्यापीठ इंग्लिश स्कूल-बालेवाडीमार्गे शिवछत्रपती क्रीडानगरीत जातील. तेथे एक फेरी मारून पुन्हा त्याच मार्गाने अॅग्रिकल्चर कॉलेज (पोलिस ग्राउंड चौक) आणि तेथून फर्ग्युसन रोडमार्गे डेक्कन-टिळक रोड मार्गे अभिनव चौकातून सणस क्रीडांगणावर या मॅरेथॉनचा समारोप होईल.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पहिल्या दिवशी एकही अर्ज नाही

$
0
0

उमेदवार अद्याप ‘वेटिंग’वर असल्याने नुसतीच लगबग सुरू

म. टा. प्रतिनिधी, पुणे

शहरातील एकाही राजकीय पक्षाने उमेदवारांची यादी अद्याप जाहीर केली नसल्याने महापालिकेच्या निवडणुकीसाठी अर्ज भरण्याच्या पहिल्या दिवशी एकही उमेदवारी अर्ज दाखल झाला नाही. उमेदवारी अर्ज ऑनलाइन स्वरूपात पहिल्यांदाच भरण्यात येणार असल्याने क्षेत्रीय कार्यालयांत त्याची माहिती घेण्यासाठी संभाव्य उमेदवार आणि त्यांच्या कार्यकर्त्यांची लगबग सुरू होती.

महापालिकेच्या निवडणुका पुढील महिन्यात होणार असल्या, तरी त्याची प्रत्यक्ष प्रक्रिया शुक्रवारपासून सुरू झाली. आगामी निवडणुकीसाठी ४१ प्रभाग निश्चित झाले असून, शहरातील १४ क्षेत्रीय कार्यालयांमध्ये अर्ज स्वीकारण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. उमेदवारी अर्ज भरण्यास शुक्रवारपासून सुरुवात झाली असली, तरी अद्याप शहरातील एकाही प्रमुख राजकीय पक्षाने आपले उमेदवार जाहीर केलेले नाहीत. भारतीय जनता पक्ष-शिवसेना यांची युती आणि राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांच्यातील आघाडीबाबत निव्वळ चर्चेच्या फेऱ्या सुरू होत्या. युती होणार नाही, असे गुरुवारी उशिरा स्पष्ट झाले असले, तरी आघाडीची भूमिका अजून गुलदस्त्यातच आहे. त्यामुळे या चारही पक्षांनी उमेदवारांचे पत्ते अद्याप मागे ठेवले आहेत. तसेच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनेही अजून एकही उमेदवार जाहीर केलेला नाही. पाचही पक्षांनी उमेदवारांना ‘वेटिंग’वर ठेवले असल्याने पहिल्या दिवशी संपूर्ण शहरातून राजकीय पक्षांकडून एकही उमेदवारी अर्ज दाखल झाला नाही.

महापालिकेच्या निवडणुकीसाठी यंदा प्रथमच ऑनलाइन स्वरूपात अर्ज दाखल करावा लागणार आहे. ही प्रक्रिया अनेक उमेदवारांसाठी नवीन असल्याने महापालिकेने गेल्या आठवड्यात सर्वांसाठी प्रशिक्षण कार्यक्रम घेतला होता. त्याशिवाय पालिकेच्या निवडणूक विभागाने सर्व क्षेत्रीय कार्यालयांमध्ये उमेदवारी अर्ज भरण्यासाठी मदत कक्ष स्थापन केला आहे. या मदत कक्षातून अर्ज भरण्याची प्रक्रिया समजून घेण्यासाठी राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांची आणि संभाव्य उमेदवारांची दिवसभर गर्दी असल्याचे चित्र पाहायला मिळाले. काही ठिकाणी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आवश्यक असलेली विविध प्रमाणपत्रे आणि ना हरकत दाखला प्राप्त करण्यासाठी धावपळ सुरू असल्याचे दिसून आले.

................

अमावास्येचा मुहूर्त टाळला

महापालिका निवडणूक लढवण्यासाठी अनेक इच्छुकांनी अनेक दिवसांपासून तयारी सुरू केली आहे. अर्ज भरण्याच्या पहिल्याच दिवशी अमावास्या असल्याने राजकीय पक्षांनी उमेदवारी यादी जाहीर करणे टाळलेच; पण अपक्ष म्हणून निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांनीही अर्ज दाखल करण्यासाठी शुक्रवारच्या मुहूर्ताचा पर्याय निवडला नसल्याचे दिसून आले.

.....................
शहरातील निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे शुक्रवारी एकही उमेदवारी अर्ज दाखल झाला नाही. काही ठिकाणी उमेदवारांकडून विविध कागदपत्रांच्या पूर्ततेबाबत चौकशी केली गेली. अर्ज भरण्यासाठी तीन फेब्रुवारीपर्यंत मुदत आहे.
- सतीश कुलकर्णी, उपायुक्त, निवडणूक विभाग, पुणे महापालिका


पिंपरी-चिंचवडमध्येही एकही अर्ज नाही

पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज स्वीकारण्याच्या शुक्रवारच्या पहिल्याच दिवशी एकही अर्ज प्राप्त झाला नाही. दरम्यान, रविवारी सुटीच्या दिवशीही सकाळी ११ ते दुपारी तीन वेळेत उमेदवारी अर्ज स्वीकारण्यात येतील, असे महापालिकेचे आयुक्त दिनेश वाघमारे यांनी स्पष्ट केले आहे. तीन फेब्रुवारीला दुपारी तीनपर्यंत उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत आहे.

यंदा प्रथमच ऑनलाइन पद्धतीने अर्ज भरण्याच्या आयोगाच्या सूचना असल्यामुळे अनेक उमेदवारांच्या मनामध्ये शंका आहेत. त्यांचे निरसन करण्यासाठी निवडणूक अधिकारी कार्यालयात हेल्प डेस्कची सोय करण्यात आली आहे. तरीही अर्ज बाद होणार नाही, याविषयी कमालीची दक्षता इच्छुकांकडून घेण्यात येत आहे.

निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार, शहरातील राजकीय पक्ष, पोलिस, निवडणूक निर्णय अधिकारी, निरीक्षक यांची आढावा बैठक संत तुकारामनगर येथील आचार्य अत्रे रंगमंदिरात झाली. आयुक्त वाघमारे यांच्यासह अतिरिक्त आयुक्त तानाजी शिंदे, सहायक पोलिस आयुक्त गणेश शिंदे या वेळी उपस्थित होते. उपस्थितांच्या शंकांचे निरसन या वेळी करण्यात आले. ऑनलाइन प्रत भरल्यानंतर त्याची छापील प्रत निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयात प्रत्यक्ष भरण्यात यावी, अशी सूचना करण्यात आली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

युती तुटल्याने वाढल्या इच्छुकांच्या अपेक्षा

$
0
0

आपल्यालाच फायदा होणार असल्याचे सर्व पक्षांच्या शहराध्यक्षांचे म्हणणे

म. टा. प्रतिनिधी, पिंपरी

महापालिकेच्या निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेची युती तुटल्याचे जाहीर झाल्याने शहरातील राजकारणाचे चित्र बदलून गेले आहे. वेगवेगळ्या फॉर्म्युल्यावरून झालेल्या चार बैठकांमुळे कोणत्या प्रभागात कोणाला उमेदवारी मिळणार यावरून इच्छुकांची धाकधूक वाढली होती. परंतु आता सर्वच इच्छुकांच्या अपेक्षा वाढल्या असून, आपल्यालाच याचा फायदा होणार असल्याचे सर्वच पक्षांच्या शहराध्यक्षांचे म्हणणे आहे.

युतीच्या बैठकांमध्ये कोणता प्रभाग कोणाला सोडायचा, ठराविक प्रभागातील किती जागा कोणत्या पक्षाला द्यायच्या, अशा चर्चा गेल्या चार बैठकांमध्ये रंगल्या होत्या. परंतु सुरुवातीच्या दोन बैठका सोडल्या, तर दोन्ही पक्षांच्या नेत्यांची देहबोली पाहता ‘युती होणार का,’ हा सवाल आपसातदेखील विचारला जात होता. ‘माझा वॉर्ड त्यांना का,’ असा सवाल काही इच्छुकांनी नेत्यांना केला होता. दुसरीकडे युतीच्या बैठकांबाबत राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस लक्ष ठेवून होते. युती तुटल्याचे जाहीर झाल्यावर अनेक इच्छुकांच्या अपेक्षा वाढल्या आहेत.

इच्छुक नेत्यांना भेटल्यावर ‘कामाला सुरुवात करा’ असे प्रत्येकालाच सांगितले जात होते; पण युती झाली तर आपली जागा मित्र पक्षाला जाते की काय, अशी धास्ती युतीमधील इच्छुकांना होती. शहराध्यक्ष आणि प्रदेश पातळीवरील राजकारण काही असो, आम्हाला तिकीट मिळेलच, अशी भावना इच्छुक बोलून दाखवत आहेत.

कोट

युती तुटल्याचे खरे तर दुःख होत आहे. यामुळे कार्यकर्त्यांचे नुकसान होणार आहे; मात्र पक्ष म्हणून भाजपला याचा नक्कीच फायदा होणार आहे. लोकसभा निवडणुकीत कार्यकर्ते एकत्र होते, सत्ता आणण्यासाठी ते झटले. आता त्यांची वेळ आली, तेव्हा युती तुटली आहे.

- लक्ष्मण जगताप, शहराध्यक्ष, भाजप

----

युती तुटल्यामुळे पक्षसंघटना बळकट होण्यासाठी मदत होणार आहे. आज सर्वच प्रभागात असलेली ताकद, हिंदुत्व या मुद्द्यांवर एकजूट होऊन त्वेषाने काम सुरू होईल. मागील दहा-पंधरा वर्षांतील शहरातील शिवसेनेची ताकद पाहता आमचीच सत्ता येणार आहे. तसेच पक्ष वाढणार असून, सर्व इच्छुकांना न्याय देता येईल.

- राहुल कलाटे, शहरप्रमुख, शिवसेना

----

अनधिकृत बांधकामे, शास्तीकर, नोटाबंदी, रेडझोन यांसारख्या अनेक प्रश्नांची उत्तरे आज युती सरकारकडे नाहीत. लोकांसमोर जाताना त्यांना काय उत्तर द्यायचे हा प्रश्न असल्याने युती तुटल्याचे नाटक केले जात आहे. लोकांची सहानुभूती मिळवण्यासाठी हे सर्व चालले आहे. युती तुटण्याचा फायदा-तोटा आम्हाला नक्कीच होणार नाही. हे सगळेच हस्यास्पद आहे. आम्ही काँग्रेसबरोबर आघाडीसाठी प्रयत्नशील आहोत.

- संजोग वाघेरे, शहराध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस

----

हे दोन्ही पक्ष लोकांची निव्वळ दिशाभूल करीत आहेत. युतीला दोन वर्षांत आलेले अपयश लोकांच्या लक्षात न येण्यासाठी ही खेळी आहे. ‘तू मारल्यासारखे कर, मी रडल्यासारखे करतो’ असे ते भासवत आहेत. शहरातील स्थानिक प्रश्नांसह अनेक प्रश्न त्यांना सोडवता आलेले नाहीत. परंतु त्याची फार चर्चा होऊ नये, यासाठीच हे केले जात आहे. आम्हाला त्याचे काही सोयर-सुतक नाही. राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर आघाडीची बोलणी सुरू आहेत.

- सचिन साठे, शहराध्यक्ष, काँग्रेस


......................


पाच नगरसेवक भाजपच्या वाटेवर

पिंपरी : पिंपरी-चिंचवडमधील शिवसेनेच्या तीन आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन अशा एकूण पाच नगरसेवकांनी शुक्रवारी त्यांच्या पदाचा राजीनामा महापालिकेचे आयुक्त दिनेश वाघमारे यांच्याकडे दिला. हे सर्व जण भारतीय जनता पक्षाच्या वाटेवर आहेत. शिवसेनेच्या नगरसेविका सीमा सावळे, आशा शेंडगे, संगीता भोंडवे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे बाळासाहेब तरस, माया बारणे यांनी नगरसेवक पदाचा राजीनामा दिला आहे. यापैकी सावळे आणि शेंडगे यांची यापूर्वीच शिवसेनेतून हकालपट्टी झाली आहे. बारणे यांचे पती संतोष बारणे यांनी दोन महिन्यांपूर्वीच भाजपमध्ये प्रवेश केला आहे. तरस आणि भोंडवे हेदेखील लवकरच भाजपमध्ये प्रवेश करतील, असे सांगण्यात आले. लवकरच भाजपच्या उमेदवारांची यादी जाहीर होणार असल्याने या नगरसेवकांनी राजीनामे देऊन उमेदवारीसाठी दावा केला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images