Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

एसपी महाविद्यालयात महाआरतीसह शिवपालखी

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, पुणे
सर परशुरामभाऊ महाविद्यालयात सांस्कृतिक दिनाचे औचित्य साधून विद्यार्थिनींच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांची महाआरती करण्यात आली.
तसेच, महाविद्यालयात शिवपालखीही काढण्यात आली.
गेली २५ वर्षे महाविद्यालयात शिवाजी महाराजांची आरती करण्यात येते. यंदा सांस्कृतिक दिनानिमित्त महिलांना प्राधान्य ही संकल्पना समोर ठेवून विद्यार्थिनींच्या हस्ते महाआरती करण्यात आली. सहायक पोलिस आयुक्त भानुप्रताप बर्गे, महिला मृदुंगवादक नीलिमा भूमकर, प्राचार्य दिलीप शेठ, मिलिंद एकबोटे आदी या वेळी उपस्थित होते. श्रेया जगताप, मधुरा तांबे आणि प्राची भट या विद्यार्थिनींचा उल्लेखनीय कार्याबाबत सत्कार करण्यात आला. तसेच, सौरभ कर्डे यांचे ‘स्त्रीशक्ती संरक्षण’ या विषयावर व्याख्यान झाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


सराईत गुंडांची पुण्यात नाकाबंदी

$
0
0

निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पोलिसांची कारवाई

म. टा. प्रतिनिधी, पुणे
सराईत गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्याचा सपाटा लावण्यात येत असतानाच पोलिस ठाण्याच्या स्तरावर गुंडांची माहिती संकलित करण्यात येत आहे. महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी ‘सराईतां’च्या बंदोबस्तासाठी ‘नाकाबंदी’ सुरू केली आहे. शहरातील दहा गुन्हेगारी टोळ्यांवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी प्रतिबंधक अधिनियम (मोक्का) कायद्यानुसार कारवाई करत ६५ गुन्हेगारांना जेलमध्ये पाठवण्यात आले आहे.

गेल्या दोन वर्षांत शहरातील संघटित गुन्हेगारीमध्ये अचानक वाढ होत झाली होती. गुन्हेगारी टोळ्यांनी आपआपसातील वर्चस्वातून एकमेकांचे खून पाडण्यास सुरुवात केली होती. शहरात सुरू झालेल्या टोळीयुद्धाने शहराच्या कायदा सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण केले होते. पोलिसांनी एकापाठोपाठ ‘मोक्का’नुसार कारवाई करत ७५ गुन्हेगारांना जेरीस आणले. त्यातील ६५ गुन्हेगारांना जेलमध्ये डांबण्यात पोलिस यशस्वी झाले, तर इतर दहा जणांचा शोध सुरू आहे. सध्या पसार असलेले दहा गुन्हेगार हे पुणे सोडून गायब झाले आहेत.

त्यानंतर झोपडपट्टीतील दादांवर पोलिसांनी आपला मोर्चा वळवला. पोलिस आयुक्त रश्मी शुक्ला आणि पोलिस सहआयुक्त सुनील रामानंद यांनी गेल्यावर्षी ‘एमपीडीए’नुसार २५ सराईतांविरुद्ध स्थानबद्धतेची कारवाई केली. याशिवाय १२० गुन्हेगारांवर तडीपार कारवाई करण्यात आली आहे. प्रत्येक पोलिस ठाण्याने आपआपल्या हद्दीतील सराईतांची माहिती गोळा करण्यास सुरुवात केली आहे. ज्यांच्याविरुद्ध ‘एमपीडीए’ची कारवाई होऊ शकते, अशा सराईतांची यादी तयार करण्यात आली आहे. त्याशिवाय दोनपेक्षा अधिक गुन्हे केल्यास तडीपारीच्या कारवाईला सामोरे जावा लागत असल्याने अनेकांचे धाबे दणाणले आहेत.

गंभीर स्वरूपाचे गुन्हे करणाऱ्या सराईतांचे कंबरडे मोडण्यास पो​लिसांनी सुरुवात केली आहे. मात्र, त्याचवेळी मालमत्तेचे गुन्हे करणाऱ्या गुन्हेगारांवर कारवाई करण्यासाठी प्रभावी कारवाईची आवश्यकता आहे. सोनसाखळी चोरीचे गुन्हे घटले असताना वाहन चोरी आणि घरफोडीच्या गुन्ह्यांत वाढ होऊ लागली आहे. गुन्हेगारीचा बदलता ट्रेंड आणि पोलिसांकडून त्यासाठीचे प्रत्युत्तर हेच गुन्ह्यांसाठी प्रमुख प्रतिबंधक कारवाई ठरणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

राज्यातील ऊस गाळप यंदा घटले

$
0
0

हंगामात दोन महिन्यांत २५ कारखान्यांची धुराडी बंद

म. टा. प्रतिनिधी, पुणे
राज्यात गेल्या वर्षी पावसाने पाठ फिरवल्यामुळे यंदाच्या ऊस गाळपावर परिणाम झाला असून, १४७ साखर कारखान्यांमधून सुमारे २४५.१३ लाख टन ऊस गाळप होऊन सुमारे २५८ लाख क्विंटल साखरेचे उत्पादन झाले आहे. यंदाच्या गाळप हंगामाला सुरुवात झाल्यानंतर दोन महिन्यांतच २५ कारखान्यांची धुराडी बंद झाली आहेत. मागील हंगामात पावसाचे प्रमाण कमी झाल्याने यंदाच्या गाळप हंगामात सुमारे साडेचारशे लाख टन ऊस गाळपासाठी उपलब्ध झाला आहे. त्यामुळे तीन महिने गाळप हंगाम चालेल, असा अंदाज वर्तवण्यात येत आहेत.

उसाची उपलब्धता कमी असल्याने यावर्षी ८६ सहकारी आणि ६१ खासगी असे १४७ कारखाने सुरू झाले आहेत. गेल्यावर्षी ९३ सहकारी आणि ७४ खासगी असे १६७ साखर कारखाने सुरू झाले होते. उसाच्या कमतरतेमुळे काही कारखान्यांचा हंगाम पूर्ण होण्यास सुरुवात झाली आहे. त्यामध्ये पुणे विभागातील नऊ कारखान्यांचा समावेश आहे. नगरमधील सहा, औरंगाबाद येथील चार, नांदेड आणि अमरावती येथील प्रत्येकी तीन कारखान्यांची धुराडी बंद झाली असल्याचे साखर आयुक्तालयाकडून सांगण्यात आले.

आतापर्यंत पुणे विभागातील २८ सहकारी आणि २४ खासगी कारखान्यांतून ९५.११ लाख टन ऊस गाळप होऊन ९९.२० लाख क्विंटल साखर उत्पादित झाली आहे. सरासरी साखर उतारा १०.४३ टक्के आहे. कोल्हापूर विभागामधील ३७ कारखान्यांतून सुमारे ८६ लाख टन ऊस गाळप झाले असून, ९९.९२ लाख क्विंटल साखरेचे उत्पादन झाले आहे. साखरेचा उतारा ११.६१ टक्के आहे.

नगरमधील २३ कारखान्यांतून ३१.१४ लाख टन ऊस गाळपातून २९.१० लाख क्विंटल साखर उत्पादित झाली आहे. औरंगाबादमधील १७ कारखान्यांतून १७.४७ लाख टन ऊस गाळप झाले. त्यातून १४.८७ लाख क्विंटल साखर उत्पादित झाली आहे. नांदेड विभागातील ११ कारखान्यांतून १०.८५ लाख टन गाळपातून १०.६३ लाख क्विंटल साखर उत्पादित झाली आहे. अमरावतीतील तीन कारखान्यांतून २.४३ लाख टन गाळप झाले असून, २.३७ लाख क्विंटल साखर उत्पादित करण्यात आली आहे. नागपूरमधील चार कारखान्यांतून २.०७ लाख टन ऊस गाळप होऊन १.९२ लाख क्विंटल साखरेचे उत्पादन होऊ शकले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

उलगडणार जटायू-क्रौंच आणि गरूडाची कथा

$
0
0


Chintamani.Patki@timesgroup.com
.............
@chintamanipMT

पुणे : रामायण म्हटले की काही पात्र चटकन आपल्या डोळ्यासमोर येतात. त्यात जटायू हे नाव लहानपणापासून आपल्या मनावर कोरले गेले आहे. रामायणात जटायूबरोबर आणखी काही पक्षी येतात. त्यांची पुसटशी माहिती आपल्याला असते. पण ‘रामायणातील पक्षीजीवन’ असा खास शब्दप्रयोग केल्यास काही जाणकारांचे कुतूहल नक्कीच जागे होईल. कारण मुळातच ‘रामायणातील पक्षीजीवन’ हा संशोधनाचा विषय होऊ शकतो, हे नवीन आहे. तर असे हे रामायणातील पक्षीजीवन एका पुस्तकातून समोर येत आहे. डॉ. भारत भूषण यांचे हे संशोधन रामायणातील एका वेगळ्या भागाकडे कुतूहलतेने पाहण्याची दृष्टी देणारे ठरले आहे.
डॉ. भूषण हे यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन प्रबोधिनीतील (यशदा) पर्यावरण विभागाचे प्राध्यापक आहेत. रामायणामध्ये पक्षांची भूमिका महत्त्वाची आहे. डॉ. भूषण यांना हाच विषय महत्त्वाचा वाटला आणि त्यांनी या विषयावर चार वर्षांपूर्वी काम सुरू केले. त्यातूनच ‘बर्ड‍्स ऑफ रामायणा’ हे पुस्तक साकार झाले आहे. या पुस्तकात जटायू, संपाती, गरूड, काकभूषंदी व क्रौंच या पक्षांची माहिती, रामायणातील त्यांचे स्थान, पक्षीजीवन या विषयी उहापोह करण्यात आला आहे.
‘बर्ड‍्स ऑफ रामायणा’ पुस्तकातून पाच पक्षांची रामायणातील महत्त्वाची भूमिका मी मांडली आहे. रामायणातील कथांची जी माहिती समोर आहे, त्याआधारे संशोधन करून पक्षीजीवनाचा वेध घेण्याचा प्रयत्न केला आहे. २४० पानांचे हे पुस्तक विश्वकर्मातर्फे प्रसिद्ध होत आहे,’ अशी माहिती डॉ. भूषण यांनी ‘मटा’ला दिली.
‘रामायणामध्ये पक्षांचा उल्लेख येतो आणि त्यांची महत्त्वाची भूमिकाही समोर येते. या मोठ्या पक्षांना लाबंची नजर तसेच विविध विद्या प्राप्त होत्या. त्यांनी विविध मार्गाने रामाला मदत केली होती. रामायणात पक्षांच्या विविध कथा आहेत,’ असे सांगत ज्येष्ठ पुरातत्त्व संशोधक डॉ. गो. बं. देगलूरकर, डॉ. अंबरीश खरे व डॉ. शिवेंद्र काडगावकर यांनी रामायणातील पक्षीजीवनाला दुजोरा दिला.
रावण सीतेला पळवून नेत असताना जटायूने (गिधाड) प्रतिकार केला. त्यावेळी त्याचे पंख छाटण्यात आले व त्याचा मृत्यू झाला, ही कथा परिचित आहे. संपाती हा जटायूचा वृद्ध भाऊ असून त्यास चक्षूस्मृती विद्या प्राप्त होती. या विद्येमुळे त्याला बसल्या जागी दूरवरची दृष्टी प्राप्त होती. या आधारे त्याने रावणाने सीतेला कुठे पळवून नेले आहे, ही माहिती रामाला सांगितली होती. क्रौंच (सारस) पक्षाचे मिलन सुरू असताना एकाचा बाण लागल्याने पक्षी मरतो व दुसऱ्या पक्षाला त्याचा शोक अनावर होतो. या प्रसंगातून वाल्मिकींनी रामायणाची निर्मिती केली असे म्हणतात. तसेच पक्षी आहे असे वाटून दशरथाचा बाण एकाला लागतो व दशरथाला पत्नी विरहात मृत्यू असा शाप मिळतो, अशीही कथा जोडली जाते. गरूड हे विष्णूचे वाहन तसेच रामाला वाचविण्यासाठी गरूडाचे महत्त्व सांगितले जाते. रामायणात कावळ्याविषयी जास्त माहिती पुढे येत नाही; पण रामाला मदत करण्यासाठी कावळ्याने गरुडाशी चर्चा केली होती व मोठी मदत केली होती, असा संदर्भ दिला जातो. हा सारा पट पुस्तकातून अधिक तपशीलवार उलगडणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सावित्रीबाई फुले यांना अभिवादन

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त शहरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. सावित्रीबाईंच्या प्रतिमेस, पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून विविध संस्था, व्यक्तींनी त्यांना अभिवादन केले; तसेच रॅलीचेही आयोजन करण्यात आले होते.

अखिल भारतीय माळी समाज प्रबोधन व शिक्षण संस्थेच्यावतीने सारसबागेजवळील सावित्रीबाईंच्या पुतळ्यास संस्थेचे अध्यक्ष कृष्णकांत कुदळे यांच्याहस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. संस्थेचे कार्याध्यक्ष प्रा. दादा शिंदे, सरचिटणीस दिलीप राऊत, उपाध्यक्ष प्रशांत एकतपुरे, प्रा. एम. एम. फुले, विश्वस्त वा. स. धायरकर, ओबीसी महामंडळाचे माजी अध्यक्ष बापू भुजबळ, रवी सोनवणे, शिवराम जांभुळकर आदी उपस्थित होते.

पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्यावतीने सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस शहराध्यक्ष रमेश बागवे यांनी पुष्पहार अर्पण केला. या वेळी महिला अध्यक्षा सोनाली मारणे, अंजनी निम्हण, गीता तारू, जया पारख, रूपाली जंगम, चित्रा माळवे आदी उपस्थित होते. शहर काँग्रेसचे उपाध्यक्ष अजित दरेकर, रमेश अय्यर, सचिन आडेकर, संदीप मोरे, विकास खन्ना आदी उपस्थित होते.

पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या मागासवर्गीय सेलच्यावतीनेही उपाध्यक्षा समिता गवळी, मालन धिवार यांनी सावित्रीबाईंच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण केला. या वेळी मुकेश धिवार, ताई कसबे, सुनीता तावरे, पूनम तांबडे, आश्विनी कांबळे आदी उपस्थित होते. काँग्रेसच्या क्रीडा सेलच्यावतीने काँग्रेस भवन येथील सावित्रीबाईंच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला. डॉ. प्रशांत ठाकरे, अक्षय सोनावणे, रवींद्र गांधी, पुनमित तिवारी, रोहीत गुरव, अर्चना परदेशी आदी उपस्थित होते. शहर काँग्रेसच्या महिला काँग्रेसच्यावतीने सारसबागेतील सावित्रीबाईंच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला. त्यानंतर सारसबाग ते महात्मा फुले वाडा, गंजपेठ या दरम्यान रॅलीचे आयोजन करण्यात आले. अखिल भारतीय महिला काँग्रेसच्या सरचिटणीस कमल व्यवहारे यांनी पुष्पहार अर्पण केला. याप्रसंगी सोनाली मारणे, जयश्री पाटील, भारती कोंडे, बतुल अप्पा, शशिकला बोरकर, सुनीता भोसले, सीमा सावंत, डॉ. क्रांती हंबीर, स्वाती कथलकर, समिरा गवळी आदी उपस्थित होत्या. राष्ट्रीय मजदूर संघाचे कायदेविषयक सल्लागार अॅड. फैयाज शेख यांनी पुष्पहार अर्पण केला. या वेळी मनोहर गाडेकर, अनिल औटी, स्वप्नील कदम आदी उपस्थित होते.

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्यावतीने महापालिकेच्या शिक्षण मंडळातील सावित्रीबाईंच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला. सावित्रीबाईंना भारतरत्न देऊन सन्मानित करण्यात यावे, अशी मागणी शहर अध्यक्ष महेंद्र कांबळे आणि प्रदेश उपाध्यक्ष नवनाथ कांबळे यांनी केली. शिक्षण मंडळ सदस्य बाळासाहेब जानराव, परशुराम वाडेकर, अशोक कांबळे, आसित गांगुर्डे, महिपाल वाघमारे, अशोक शिरोळे आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पोटे हॉस्पिटल राहणार पालिकेकडेच

$
0
0

खासगी संस्थेला चालवण्यास देण्याचा प्रस्ताव फेटाळला
म. टा. प्रतिनिधी, पुणे
पद्मावती येथील महापालिकेच्या शंकरराव पोटे दवाखान्यातील एमआरआय, सोनोग्राफी तसेच एक्स रे मशीन दहा वर्षे मुदतीने खासगी संस्थेला चालविण्यास देण्याचा प्रस्ताव मंगळवारी स्थायी समितीच्या बैठकीत मतदान घेऊन फेटाळण्यात आला. पालिकेत सत्ताधारी असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसने हा विषय मान्य करावा, अशी भूमिका घेतली. मात्र, याला विरोध करत काँग्रेस, मनसे, भाजप आणि सेनेच्या सभासदांनी एकत्र येऊन हा प्रस्ताव मतदानाद्वारे फेटाळून लावला.
पोटे दवाखान्यात एमआरआय, सोनोग्राफी, तसेच एक्स रे मशिन डॉ. कदम डायग्नोस्टिक सेंटरला दहा वर्षे मुदतीने चालविण्यास देण्याचा ठराव महापालिकेच्या आरोग्य खात्याने मांडला होता. त्यात केंद्र सरकारच्या आरोग्य योजनांपेक्षा आठ टक्के कमी दराने शुल्क आकारण्यात येणार होते. वीज आणि पाण्याचा खर्च संबधित सेंटरने करायचा होता. तसेच महापालिकेचे सभासद, अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना मोफत चाचण्यांची सुविधा होती. याबरोबरच दरमहा ५० एमआरआय मोफत करण्याची सुविधा देण्याची तयारी दाखविली होती. माजी स्थायी समितीच्या अध्यक्षा अश्विनी कदम यांनी यासाठी पाठपुरावा केला होता. हा ठराव चर्चेला आल्यावर भाजपचे राजेंद्र शिळीमकर, रिपब्लिनकन पक्षाचे गटनेते डॉ. सिद्धार्थ धेंडे यांनी त्याला विरोध केला. महापालिकेच्या आरोग्य योजनांचे खासगीकरण करून व्यावसायिकांचे भले का करत आहे? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
या भूमिकेला भाजप, काँग्रेस, शिवसेना आणि मनसेच्या सभासदांनी पाठिंबा दिला. विरोध झाल्याने समितीचे अध्यक्ष बाळासाहेब बोडके यांनी मतदान पुकारले. त्यात ठरावाच्या विरोधात विरोधी पक्षांची सात मते आणि ठरावाच्या बाजूने राष्ट्रवादीची पाच मते पडली. विरोध झाल्याने हा विषय अमान्य करण्यात आल्याचे समितीचे अध्यक्ष बोडके यांनी सांगितले.
या बैठकीत लाल महालामधील विद्युत विषयक कामे करण्यासाठी ७५ लाख रुपयांच्या टेंडरला मंजुरी देण्यात आली. गार्डन वेस्ट कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी युनिटी ग्रीन सोल्युशनला प्रती टन २९९ टिफिंग फी देऊन तळजाई किंवा शिंदे वस्ती आदी परिसरात प्रक्रिया प्रकल्प उभारण्यास त्यांच्याशी करार करण्याचा ठराव बैठकीत मंजूर झाला. शहरातील पायाभूत सुविधांच्या आणि स्मार्ट सिटीतंर्गत प्रकल्पांसाठी तीन तज्ज्ञ व्यक्तिंची मदत घेण्याचा ठरावही बैठकीत मंजूर झाला. त्यासाठी पात्रता आणि मानधनही यावेळी निश्चित झाले.
....
केवळ राजकारणातून हा चांगला विषय फेटाळण्यात आला आहे. यापूर्वी महापालिकेच्या अनेक दवाखान्यातील सुविधा खासगी संस्थेला देण्यात आल्या आहेत. या भागातील वैद्यकीय मदत हवी असलेल्या गरीब नागरिकांचे फार मोठे नुकसान विरोध करणाऱ्या सदस्यांनी केले आहे.
- अश्विनी कदम, स्थायी समितीच्या माजी अध्यक्ष

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कीटकांमुळे पुणेकर हैराण

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
सकाळी थंडी आणि दुपारी तापमान वाढत असल्याने पुण्यामध्ये सध्या ‘अॅफिड स्वार्म’ हे छोटे किडे लाखोंच्या संख्येने दाखल झाले आहेत. गाडी चालवताना सतत डोळ्यात जाण्याऱ्या या किड्यांनी पुणेकरांना हैराण केले आहे. पण काळजी करू नका. हे किडे आरोग्यासाठी धोकादायक नाहीत. मात्र, पंधरा दिवस तरी या किड्यांचा पुण्यात मुक्काम राहणार आहे.
गेल्या दोन दिवसांपासून शहराच्या विविध भागात रस्त्यावर, रहिवासी क्षेत्रात, उद्यानांमध्ये दुपारी चिलटांच्या आकारांइतक्या छोट्या किड्यांचे थवे बघायला मिळत आहेत. कधी डोळ्यात, तर डोक्यावर घोंगावणारे हे किळसवाणे किडे नागरिकांना त्रासदायकय ठरत आहेत. शहरातील सध्याचे हवामाना या किड्यांसाठी पोषक असल्याने त्यांनी पुण्यात मुक्काम ठोकला आहे, असे अभ्यासकांनी सांगितले.
‘साधारणतः थंडीनंतर अॅफिड स्वार्म, कायरोनॉमस या किड्यांचा मिलनाचा काळ असतो. या काळापुरते या किड्यांना पंख येतात. एरवी हे कीटक झाडांवर असतात. पण गेल्या चार दिवसांपासून पुण्यात सकाळी थंडी, दुपारी तापमान वाढ आणि रात्री पुन्हा गारवा असे हवामान असल्याने या किड्यांना पोषक वातावरण मिळाले आहेत. त्यामुळे ते लाखोंच्या संख्येने रस्त्यावर आले आहेत,’ असे ज्येष्ठ कीटक अभ्यासक डॉ. हेमंत घाटे यांनी सांगितले.
‘सध्या शहरात आलेले कीटक हे अॅफिड स्वार्म आहेत. हे कीटक घातक नाहीत किंवा त्यांच्यामुळे मानवी आरोग्यास धोकादायक नाहीत. जानेवारी, फेब्रुवारी दरम्यान उष्णता वाढली की वेगवेगळ्या प्रकारचे अॅफिड बाहेर पडतात. अॅफिडमध्ये हजारो प्रकार असून ते लाखोंच्या संख्येने हवेत उडतात. पुढील पंधरा दिवस हे कीटक रस्त्यावर दिसतील. त्यानंतर नदीपात्रात वास्तव्यास असलेले कायरोनॉमस हे कीटक सक्रिय होतील. हिरव्या रंगाचे डास पुणेकरांना नदी किनाऱ्यावर पाहायला मिळतील. मात्र, हे कीटक अॅफिडसारखे रहदारीच्या रस्त्यांवर दिसणार नाहीत,’ असे घाटे यांनी सांगितले.
....................
जानेवारीत उष्णात वाढली की वेगवेगळ्या प्रकारचे ऑफिड बाहेर पडतात. सध्या दिसणारे ऑफिड स्वार्म धोकादायक नाहीत. पुढील पंधरा दिवस हे कीटक रस्त्यावर दिसतील. त्यानंतर नदीपात्रात वास्तव्यास असलेले कायरोनॉमस हे कीटक सक्रिय होतील. हिरव्या रंगाचे डास पुणेकरांना नदी किनाऱ्यावर पाहायला मिळतील.
- डॉ. हेमंत घाटे, ज्येष्ठ कीटक अभ्यासक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अंधेरे मै आणि कल्पवृक्ष ‘पिफ’मध्ये

$
0
0

एफटीआयआयचे विद्यार्थी आहेत सिनेमांचे दिग्दर्शक
म. टा. प्रतिनिधी, पुणे
पुणे फिल्म फाउंडेशन आणि महाराष्ट्र सरकार यांच्यातर्फे होणाऱ्या पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (पिफ) फिल्म इन्स्टिट्यूटच्या विद्यार्थ्यांच्या चित्रपटांची निवड झाली आहे. ‘अंधेरे मै’ आणि ‘कल्पवृक्ष’ हे दोन चित्रपट विजया सिंग व खुमान या एफटीआयआयच्या विद्यार्थ्यांनी दिग्दर्शित केले आहेत. ते यंदाच्या महोत्सवात पाहायला मिळतील.
१२ ते १९ जानेवारी दरम्यान होणाऱ्या ‘पिफ’मधील विविध स्पर्धात्मक विभागात निवड झालेल्या चित्रपटांच्या नावांची घोषणा महोत्सवाचे अध्यक्ष डॉ. जब्बार पटेल यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत केली. निवड समितीचे सदस्य अभिजित रणदिवे, पिफ बझारचे समन्वयक श्रीरंग गोडबोले, अखिल भारतीय चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले यावेळी उपस्थित होते.
जागतिक स्पर्धेत १४ चित्रपटांची निवड झाली आहे. ज्यामध्ये ‘लेडी ऑफ दी लेक’ या हौबम पबन कुमार दिग्दर्शित भारतीय चित्रपटाचाही समावेश आहे. विद्यार्थ्यांच्या स्पर्धेमध्ये लाइव्ह अॅक्शन व अॅनिमेशन असे दोन भाग असून यातील लाइव्ह अॅक्शन विभागात १३ तर अॅनिमेशन विभागात १६ चित्रपटांचा समावेश आहे. लाइव्ह अॅक्शन विभागात चार भारतीय चित्रपटांचा समावेश असून, त्यापैकी दोन ‘एफटीआयआय’च्या विद्यार्थ्यांचे चित्रपट आहेत. अॅनिमेशन विभागात सेंट झेविअर्स महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी दिग्दर्शित केलेला ‘टमलिंग स्ट्रीट’ व व्हिसलिंग वूड्स इंटरनॅशनलच्या दोन चित्रपटांचा समावेश आहे. या वर्षी कंट्री फोकस विभागात अर्जेंटिना व व्हिएतनाम या दोन देशांतील चित्रपट पाहता येणार आहेत. याबरोबरच रेट्रोस्पेक्टिव्ह विभागात आंद्रे वायदे आणि अपर्णा सेन यांचे चित्रपट पाहण्याची संधी रसिकांना मिळणार आहे.
डॉ. पटेल म्हणाले, ‘९५ देशांमधून तब्बल अकराशे चित्रपटांनी आपला सहभाग नोंदविला होता. समितीने २२५ अधिक चित्रपटांचा समावेश महोत्सावात केला आहे. फर्स्ट बॉर्न (चिली) या चित्रपटाचा इंटरनॅशनल प्रीमिअर तर व्हेअर ग्रो ओल्ड (ब्राझील/ पोर्तुगल), ल्युईस बाय दी शोअर (फ्रान्स), लिटील माउंटन बॉय (स्वित्झर्लंड) आणि देवभूमी (भारत) या चित्रपटांचा इंडियन प्रीमिअर होणार आहे.’
--------------
‘या वर्षी पिफ बझारच्या पॅव्हेलियनचे नामकरण दादासाहेब फाळके पॅव्हेलियन असे करण्यात आले आहे. ज्यामध्ये त्यांच्यावरील चित्रप्रदर्शन, हायलाइट्स, चित्रपट यांचा समावेश असणार आहे. पिफ बझार हे सर्वांसाठी खुले आणि विनामूल्य असेल. याशिवाय दिग्दर्शक, अभिनेते, लेखक व तंत्रज्ञ यांसाठी खास टेक्निकल लॅब कार्यशाळा होणार आहेत. कार्यशाळेत सहभागी होण्यासाठी www.imepl.net/pbworkshop या वेबसाइटवर नोंदणी करावी लागेल,’ असे श्रीरंग गोडबोले यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


पुणेकरांना दोनवेळा पाणी

$
0
0

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर घोषणा
म. टा. प्रतिनिधी, पुणे
ऐन निवडणुकीच्या तोंडावर नागरिकांना खुश करण्यासाठी लोकप्रिय निर्णयांचा सपाटा लावणाऱ्या भारतीय जनता पक्षाने दिवसातून दोनदा पाणीपुरवठा करण्याचे जाहीर करत पुणेकरांना आणखी दिलासा दिला आहे. महापालिकेच्या मागणीनुसार प्रतिदिन १३५० दशलक्ष लिटर (एमएलडी) पाणीपुरवठा करण्यास मंगळवारी कालवा समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. त्यामुळे, येत्या दोन-तीन दिवसांत पुणेकरांना पूर्वीसारखे दिवसातून दोन वेळा पाणी मिळणार आहे.
गेल्या वर्षी दुष्काळामुळे तीव्र पाणीटंचाईचा सामना केल्यांनतर यंदाच्या हंगामात समाधानकारक पाऊस झाला होता. त्यामुळे, पुणेकरांना पुन्हा दोनवेळा पाणी मिळावे, अशी मागणी केली जात होती. ऑक्टोबरमध्ये घेण्यात येणारी कालवा समितीची बैठक लांबणीवर टाकण्यात येत असल्याने विरोधकांनी पालकमंत्री गिरीश बापट यांच्याविरोधात दंड थोपटले होते. अखेर, मंगळवारी मुंबईत घेण्यात आलेल्या कालवा समितीच्या बैठकीत पुण्याला दिवसातून दोनदा पाणीपुरवठा करण्याचा निर्णय घेण्यात आला. पालकमंत्री बापट यांनी पुणेकरांना दोन वेळा पाणीपुरवठा करण्यासाठी आवश्यक पाणी उपलब्ध करून देण्यात येईल, असे जाहीर केले.
शहराला पाणीपुरवठा करणारी धरणे पूर्ण क्षमतेने भरल्यानंतर शहरात दिवसातून एकदा पाणीपुरवठा करण्यास सुरुवात झाली. संपूर्ण शहरात एकदा पाणीपुरवठा करायचा झाल्यास एक हजार २५० एमएलडी पाणी लागते. तर, दोनवेळा पाणीपुरवठा करायचा झाल्यास एक हजार ३५० एमएलडी पाण्याची आवश्यकता असते. त्यामुळे, शंभर एमएलडी पाणी वाढवून देण्याची मागणी महापौर प्रशांत जगताप, विरोधी पक्षनेते अरविंद शिंदे यांच्यासह स्वयंसेवी संस्थांच्या प्रतिनिधींनी केली होती.
कालवा समितीच्या मुंबईत घेण्यात आलेल्या बैठकीत पुण्यासाठी वाढीव पाणी मंजूर करतानाच, शेतीच्या पाण्यात कोणतीही कपात करण्यात आली नसल्याचे पालकमंत्री बापट यांनी स्पष्ट केले. येत्या एक-दोन दिवसांत दोनवेळा पाणीपुरवठा करण्यास सुरुवात होईल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. कालवा समितीच्या बैठकीला खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, आमदार राहुल कूल, शरद रणपिसे, सुरेश गोरे आणि पाटबंधारे विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
................
शहराचे आमदार, अधिकाऱ्यांची दांडी
कालवा समितीच्या या महत्त्वपूर्ण बैठकीसाठी जिल्ह्यातील खासदार-आमदार हजर असताना, शहरातील भाजपचा एकही आमदार या बैठकीसाठी उपस्थित नव्हता. तसेच, महापालिकेचे आयुक्त कुणाल कुमार आणि पाणीपुरवठा विभागातील इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांनीही कालवा समितीच्या बैठकीला दांडी मारली.
.............
धरणांतील उपलब्ध साठा : २१ टीएमसी
एकवेळ पाणीपुरवठ्यासाठी आवश्यक पाणी : १२५० एमएलडी
दोनवेळा पाणीपुरवठ्यासाठी आवश्यक पाणी : १३५० एमएलडी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ओला व सुका कचऱ्याचेकँटोन्मेंट करणार विलिगीकरण

$
0
0

हडपसरला घनकचरा प्रकल्पास सुरुवात
म. टा. प्रतिनिधी, पुणे
हडपसर येथील कँटोन्मेंट बोर्डाच्या जागेवरच कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी आणि मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करणे अशक्य असल्याने आता स्वतःच कचरा विलिगीकरण करण्याचा निर्णय पुणे कँटोन्मेंट बोर्डाने घेतला आहे. विलिगीकरणानंतर कचऱ्याचे मशिनद्वारे कटिंग केले जात असून त्याद्वारे खत निर्मिती करण्यात येणार आहे.
हडपसर येथील घनकचरा प्रकल्पांसंदर्भात गेल्या अनेक वर्षांपासून तक्रारी येत होत्या. त्या ठिकाणी घनकचरा प्रकल्प कार्यान्वित करण्यासंदर्भात प्रस्ताव होता. त्यासाठी सरंक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांनी गेल्या वर्षी हडपसर येथील घनकचरा प्रकल्पास भेट दिली होती. त्यानंतर तेथे प्रकल्प उभारण्यासाठी हालचाली सुरू झाल्या. प्रकल्पाच्या उभारणीसाठी गोव्यातील पणजीच्या धर्तीवर हा प्रकल्प उभारण्याची सूचना सरंक्षणमंत्र्यांनी बोर्डाच्या अधिकाऱ्यांसह पदाधिकाऱ्यांना दिल्या होत्या. पणजीच्या प्रकल्पाच्या धर्तीवर हडपसरला घनकचरा प्रकल्प उभारण्याचे प्रस्तावित होते. त्यानुसार पुणे कँटोन्मेंट बोर्डाची टीम पणजीला जाऊन आली.
‘पणजीसह दिल्ली येथे उभारलेल्या घनकचरा प्रकल्पाची आम्ही माहिती घेतली. त्या प्रकल्पाला भेट दिली. परंतु, तेथील अद्ययावत मशिनच्या साह्याने उभारलेला प्रकल्प हडपसरला उभारण्यासाठी निधीची गरज आहे. पणजीला दोनशे कोटी रुपयांचा खर्च आला होता. तेवढा निधी पुणे कँटोन्मेंट बोर्डाला उभा करणे अशक्य आहे. त्यामुळे पणजीच्या धर्तीवर प्रकल्प होणे अवघड आहे. हडपसर येथे दररोज ५० टन कचरा जमा होतो. पणजी येथे पाच टन कचरा जमा होतो. पुण्यात जमा होणाऱ्या कचऱ्याचे विलिगीकरण करण्यास आम्ही सुरुवात केली आहे. ओला व सुका कचरा वेगळा करण्यास सुरुवात झाली आहे. सुका कचऱ्यातून पुर्ननिर्मिती कऱण्याचा आमचा प्रयत्न आहे,’ अशी माहिती पुणे कँटोन्मेंट बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. डी. एन. यादव यांनी ‘मटा’ला दिली. दरम्यान, कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी आणखी दोन प्रकल्प उभारणीचा आमचा प्रयत्न आहे, असेही यादव यांनी सांगितले.
पणजी येथील प्रकल्प चांगला आहे. पण तो खर्चिक असल्याने येथे राबविणे अशक्य आहे. निधी उभारणे मोठे आव्हानात्मक काम आहे. सध्या हडपसर येथील घनकचरा प्रकल्पाचे काम प्राथमिक स्वरुपात आहे. सध्या हडपसर येथे घनकचरा प्रकल्पांतर्गत आलेला कचरा वेगळा करण्यात येत आहे. सुका कचरा एखाद्या कंपनीला देऊन त्यातून कोणत्याही वस्तूची पुनर्निमिती करणे शक्य आहे. त्यासाठी एखाद्या कंपनीशी करार करता येऊ शकेल. तसेच प्रकल्पांतर्गत लागणारी ड्राय मशिन खरेदीची प्रक्रिया त्वरित सुरू करण्यात आली आहे. तसेच ओला व सुका कचरा कटिंग मशिनद्वारे लहान तुकडे करून उर्वरीत कचऱ्यातून खत निर्मीती करण्यात येणार आहे, अशी माहिती कँटोन्मेंटतर्फे देण्यात आली.
०००
पणजीला असणाऱ्या घनकचरा प्रकल्पाच्या धर्तीवर प्रकल्प करणे पुणे कँटोन्मेंटमध्ये राबवणे अवघड आहे. कारण त्यासाठी लागणारा निधी कँटोन्मेंटद्वारे उभा करणे कठीण आहे. त्यामुळे पुण्यात जमा होणाऱ्या कचऱ्याचे विलिगीकरण करण्यास आम्ही सुरुवात केली आहे. ओला व सुका कचरा वेगळा करण्यास सुरुवात झाली आहे. सुका कचऱ्यातून पुर्ननिर्मिती करण्याचा आमचा प्रयत्न आहे.
- डॉ. डी. एन. यादव, मुख्य कार्यकारी अधिकारी, पुणे कँटोन्मेंट बोर्ड

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आरोप करता; पुरावेही द्या

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पिंपरी
‘पिंपरी-चिंचवडमध्ये केलेल्या विकासकामांच्या बाबतीत विरोधक केवळ आरोप करतात. त्यांनी पुरावेही द्यावेत,’ असे आव्हान माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंगळवारी दिले.
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने सांगवी येथे उभारलेल्या स्वर्गीय तानाजीराव शितोळे-सरकार शिवसृष्टी उद्यानातील ध्यानधारणा केंद्राच्या लोकार्पणप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी महापौर शकुंतला धराडे होत्या. राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे-पाटील, उपमहापौर प्रभाकर वाघेरे, पक्षनेत्या मंगला कदम, स्थानिक नगरसेवक अतुल शितोळे, सुषमा तनपुरे या वेळी उपस्थित होत्या.
‘निवडणुका आल्या की भ्रष्टाचाराचे आरोप होतात,’ असे नमूद करून पवार म्हणाले, ‘केंद्रात आणि राज्यात भारतीय जनता पक्षाची सत्ता आहे. त्यांनी भ्रष्टाचाराविषयी खुशाल चौकशी करावी; परंतु खोटे बोलून दिशाभूल करू नये. या शहराचा कारभार करताना किंवा पदांचे वाटप करताना कोणाकडून चिरिमिरी घेतल्याचे सिद्ध झाल्यास मी राजकीय संन्यास घेईल. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे लक्ष नागपूरकडे आहे. राज ठाकरे यांची अवस्था फारच वाईट झाली आहे. अशा परिस्थितीत विकासाचा ध्यास असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसला जनतेने पुन्हा साथ द्यावी.’
नोटाबंदीच्या प्रश्नावर टीका करताना ते म्हणाले, ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी खोटे बोलून वेळ मारून नेत आहेत. निर्णयानंतर ५५ दिवस उलटले तरी लोकांचे हाल संपलेले नाहीत. त्यांना त्यांच्या हक्काचे पैसे मिळत नाहीत. गेल्या दोन वर्षांत पंतप्रधान मोदींनी स्वतःच्या जाहिरातबाजीवर सुमारे अकराशे कोटी रुपये खर्च केले आहेत; परंतु परदेशांतून काळ्या पैशांची दमडीही आणली नाही. शेतकऱ्यांसाठी २० हजार कोटी रुपयांची मदत उपलब्ध केल्याचे जाहीर केले. मात्र, जिल्हा मध्यवर्ती बँकाच चालू नाहीत, तर ही मदत मिळणार कशी? याचे उत्तर त्यांनी द्यायला हवे. पंतप्रधान ‘मोदी एके मोदी’ पद्धतीने कारभार करीत असून, फकीर व्यक्तीला संसारी माणसांच्या वेदना काय समजणार?’
बारामती की भानामती जाहिरातबाजीचा उल्लेख करून पवार म्हणाले, ‘भारतीय जनता पक्षाच्या मुलाखती मूळचे बारामतीचे असलेले खासदारच घेत आहेत, ही बाब विरोधक विसरत आहेत.’
शहरातील विविध विकासकामांची भूमिपूजने आणि उद्घाटने पवार यांच्या हस्ते झाली. प्रास्ताविक नगरसेवक प्रशांत शितोळे यांनी केले. नगरसेविका सोनाली जम यांनी आभार मानले. अण्णा बोदडे यांनी सूत्रसंचालन केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘भाजपने डोक्यात हवा घालून घेऊ नये’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पिंपरी
पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीत सत्ता मिळवायची असेल, तर युतीच आवश्यक आहे. शहरात दलित समाजाची मोठी ताकद आहे. आरपीआयला पराभूत होणाऱ्या जागांवर उमेदवारी नको, शहरातील १६ प्रभागांत रिपब्लिकन पक्षाकडे सक्षम उमेदवार आहेत. भारतीय जनता पक्षाने ३० जागा आम्हाला सोडाव्यात अशी मागणी करताना आरपीआयच्या चंद्रकांता सोनकांबळे मित्रपक्ष ‘भाजपने डोक्यात हवा घालून घेऊ नये,’ असे आवाहनही मंगळवारी (३ जानेवारी) पत्रकार परिषदेत केले.
राष्ट्रवादीचे नेते भाजपात आले, म्हणजे सत्ता येईल असे होणार नाही. शिवसेना-आरपीआयसोबत आले तरच महापालिकेत सत्ता मिळवता येईल, असे स्पष्ट मत आरपीआयच्या नेत्या चंद्रकांता सोनकांबळे व्यक्त केले. या वेळी प्रदेशचे सचिव बाळासाहेब भागवत, शहराध्यक्ष सुधाकर वारभुवन, सरचिटणीस बाबा सरवदे, प्रणव ओव्हाळ, लक्ष्मण गायकवाड, अंकुश कानडी, अजीज शेख,
सम्राट जकाते, कमल कांबळे, लता लगाडे, लीलाबाई ठोसर, एम. पी. कांबळे, भाऊसाहेब रोकडे, के. एम. बुख्तर, विलास कांबळे, रमेश चिमुरकर, नवनाथ डांगे आदी उपस्थित होते.
सोनकांबळे म्हणाल्या, ‘पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीसाठी रिपब्लिकन पक्ष (आठवले गट) तयार आहे. महापालिकेच्या १६ प्रभागांत रिपब्लिकन पक्षाकडे सक्षम आणि आर्थिकदृष्ट्या तगडे उमेदवार आहेत. त्यामुळे आमची भाजपकडे ३० जागांची मागणी आहे.
त्यामध्ये राखीव जागांसह इतर मागासवर्ग आणि खुल्या जागांचाही समावेश आहे. केंद्रीय मंत्री रामदास आठवले आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात जागा वाटपाबाबत चर्चा होईल.’

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

लोहगड परिसरातून युवक बेपत्ता

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, लोणावळा
लोहगड किल्ला येथे मित्र मैत्रिणींसोबत फिरायला आलेला पुण्यातील नौरोजी वाडिया महाविद्यालयाचा विद्यार्थी राहुल श्रीमंत नरळे (वय २१, रा. केशवनगर, मुंढवा, पुणे) हा लोहगड किल्ला परिसरातून ३० डिसेंबर रोजी बेपत्ता झाला असल्याची तक्रार त्यांच्या मित्रांनी लोणावळा ग्रामीण पोलिस ठाण्यात दिली आहे.
लोणावळा ग्रामीणचे पोलिस उपनिरीक्षक बालाजी गायकवाड म्हणाले, ‘पुणे परिसरातील विविध महाविद्यालयांतील १५ युवक-युवतींचा एक ग्रुप ३० डिसेंबरला लोहगड किल्ल्यावर आला होता. यापैकी हरविलेला राहुल हा २९ डिसेंबर रोजी घरी आपण कॉलेजला जात असल्याचे घरात सांगून मित्रांसोबत लोहगडावर आला होता. ३० डिसेंबरला सकाळी लोकलने हे सर्व विद्यार्थी मळवली स्थानकावर उतरून लोहगडावर गेले.
अर्धा गड चढल्यानंतर त्यांना राहुल सोबत नसल्याचे जाणवल्याने त्यांनी परिसरात शोधाशोध केली. मात्र, राहुल न सापडल्याने त्यांनी लोणावळा ग्रामीण पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. या प्रकरणी लोणावळा येथील शिवदुर्ग मित्र ही रेस्क्यू टीम लोहगड किल्ला परिसरात राहुलचा शोध घेत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सोसायट्यांना एनओसी देण्याची सक्ती

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
सहकारी गृहनिर्माण संस्थेतील सभासदाने ‘ना हरकत प्रमाणपत्रा’ची मागणी केल्यास संस्थेवर हे प्रमाणपत्र देणे बंधनकारक असून, सभासदाला तातडीची गरज भासल्यास संस्थेच्या अध्यक्ष आणि सचिवांनी सात दिवसांच्या आत प्रमाणपत्र देण्याची सक्ती सहकार विभागाने केली आहे. संस्थेने प्रमाणपत्र देण्याचे टाळल्यास सहकार निबंधक यांनी आदेश दिल्यावर संस्थेला प्रमाणपत्र द्यावेच लागणार आहे.
‘गृहनिर्माण संस्थेतील सभासद हे सदनिकांची विक्री, गहाण ठेवणे, दुरुस्ती आणि अंतर्गत बदल करणे या विविध कारणांसाठी संस्थेकडे ‘ना हरकत प्रमाणपत्रा’ची मागणी करत असतात. मात्र, सभासदांना वेळेवर प्रमाणपत्र मिळत नाहीत. त्यातून अनेकदा मतभेद होतात. प्रमाणपत्र मिळण्यासाठी अडचणी दूर होण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला असून, याबाबतचे परिपत्रक जारी केले आहे,’ असे राज्याचे सहकार आयुक्त चंद्रकांत दळवी यांनी पत्रकारांना सांगितले.
ते म्हणाले, ‘प्रमाणपत्र हवे असल्यास सभासदाने कशासाठी प्रमाणपत्र पाहिजे, त्याचे कारण नमूद करून लेखी अर्ज संस्थेकडे सादर करावा आणि त्याची पोहोच घ्यावी. संस्थेने अर्ज स्वीकारला नाही किंवा पोहोच दिली नाही, तर रजिस्टर एडी अथवा स्पीड पोस्टाने अर्ज करण्याची मुभा सभासदाला देण्यात आली आहे. संस्थेने अर्ज प्राप्त झाल्याच्या दिनांकानंतर घेण्यात येणाऱ्या लगतच्या व्यवस्थापन समिती सभेपुढे अर्ज ठेवला पाहिजे. सभासदाने मात्र थकबाकी असल्यास अर्जाच्यावेळी संस्थेकडे भरणे आवश्यक असून, संस्थेने येणे रक्कम वसूल केल्यावरच प्रमाणपत्र दिले पाहिजे.’
‘आदर्श उप​विधीमध्ये सदनिका किंवा गाळा खरेदीसाठी एम्प्लॉयर, बँक, एलआयसी यांच्याकडून कर्ज घेण्यासाठी प्रमाणपत्र घेणे आवश्यक असणार नाही, अशा स्वरूपाची तरतूद आहे. तरीही सभासदांनी मागणी केल्यास प्रमाणपत्र देणे संस्थेवर बंधनकारक राहणार आहे. संबंधित यंत्रणेकडून विशिष्ट नमुन्यातच प्रमाणपत्र देण्याची मागणी केली जाते. त्यावेळी संस्थेने उपलब्ध कागदपत्रांच्या आधारे विशिष्ट नमुन्यात प्रमाणपत्र द्यावे. प्रमाणपत्र कसे असावे, याचा नमुना सहकार विभागाकडून तयार करण्यात आला आहे. त्या विशिष्ट नमुन्यातच प्रमाणपत्र दिले पाहिजे,’ असेही दळवी म्हणाले.
‘अनेकदा सभासदाने प्रमाणपत्रासाठी अर्ज केल्यावर नजिकच्या काळात काही कारणास्तव व्यवस्थापन समिती सभा होऊ शकत नसल्यास आणि सभासदाला तातडीची गरज असल्यास अर्ज प्राप्त झाल्यानंतर अध्यक्ष व सचिव यांच्या संयुक्त स्वाक्षरीने सात दिवसांच्या आत प्रमाणपत्र द्यावे. त्यानंतर व्यवस्थापन समितीच्या पुढील सभेत त्यास मान्यता घ्यावी,’ असे दळवी यांनी स्पष्ट केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

एफडीएकडून ८२ बेकऱ्यांना नोटिसा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
कोंढव्यातील बेकरीच्या आगीनंतर चुकीच्या गोष्टी उघडकीस आल्यानंतर पुण्यासह सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर जिल्ह्यांतील ८२ बेकऱ्यांना नोटीसा पाठविण्याची कारवाई अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) केली. स्वच्छता, कामगारांना राहण्यासाठी स्वतंत्र व्यवस्थेचा अभाव यासारख्या कारणास्तव नोटिसा पाठविण्यात आल्या आहेत.
कोंढव्यातील बेकरीला गेल्या आठवड्यात आग लागली. त्यानंतर विना परवाना बेकरीत खाद्यपदार्थांची विक्री सुरू असल्याचे आढळून आले. त्या संदर्भात बेकरीला एफडीएने नोटीस जारी केली आहे. तसेच खुलासा मागितला आहे. बेकरीला लागलेल्या आगीत सहा जणांचा होरपळून मृत्यू झाल्याने अन्य बेकऱ्यांची परिस्थिती काय आहे, याची माहिती घेण्याबरोबर बेकऱ्यांकडून नियमांचे पालन होते की नाही हे पाहण्यासाठीच बेकऱ्यांची तपासणीची मोहीम पुणे विभागात हाती घेण्यात आली होती. त्या मोहिमेदरम्यान गेल्या तीन दिवसांत केलेल्या तपासणीची माहिती एफडीएकडून देण्यात आली.
‘पुणे विभागातील पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर जिल्ह्यातील बेकऱ्यांची तपासणीची मोहीम १ जानेवारीपासून हाती घेण्यात आली. त्या मोहिमेंतर्गत गेल्या तीन दिवसांत ८२ बेकऱ्यांना नोटिसा देऊन त्यांच्यावर कारवाई करण्यात आली. ८२ पैकी पुणे जिल्ह्यात ५४ बेकऱ्या आहेत. जिल्ह्यात १३ बेकऱ्या विना परवाना व्यवसाय करीत असल्याचे आढळले. या १३ बेकऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. काही बेकऱ्यांमध्ये अस्वच्छता आढळली. त्याशिवाय ५४ पैकी १६ बेकऱ्यांमध्ये भट्टी असलेल्या ठिकाणीच कामगार राहत असल्याने त्या बेकऱ्यांनादेखील कामगारांच्या सोयी सुविधेचा अभाव असल्याने नोटीस देण्यात आली आहे,’ अशी माहिती एफडीएचे सहआयुक्त शिवाजी देसाई यांनी दिली.
पुणे विभागातील सांगली येथे ९, सातारा येथे ८ तर कोल्हापूर आणि सोलापूरला अनुक्रमे ६ आणि ५ बेकऱ्यांना नोटिसा देण्यात आल्या आहेत. विभागात सातारा आणि कोल्हापूर येथे प्रत्येकी दोन बेकऱ्यांमध्ये कर्मचारी भट्टीच्या शेजारीच राहत असल्याने विभागात २० बेकऱ्यांना कामगारांच्या सोयीसुविधेबाबत नोटिसा दिल्या आहेत. कायद्यानुसार बेकरीच्या पदार्थांचे उत्पादन केल्या जात असलेल्या ठिकाणी राहता येत नाही. त्यामुळे कामगारांसाठी स्वतंत्र राहण्याची व्यवस्था करण्याचे आदेश दिले आहेत. या सर्व बेकऱ्यांवर अन्न सुरक्षा मानदे कायद्याच्या अन्न सुरक्षेच्या दृष्टीने नियमांचे पालन केले गेले नाही म्हणून कारवाई करण्यात येणार आहे, असेही देसाई यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


राम गणेश गडकरींचा पुतळा हटविला

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

नाटककार राम गणेश गडकरी यांचा, संभाजी उद्यानात असलेल्या पुतळ्याची तोडफोड करून तो हटविल्याचा धक्कादायक प्रकार सोमवारी मध्यरात्री घडला. या प्रकरणी पोलिसांनी चार तरुणांना अटक केली आहे. हे चौघेही आपले कार्यकर्ते असल्याचे संभाजी ब्रिगेडने म्हटले आहे. राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक या क्षेत्रांत पुतळा हटविण्याच्या कृत्याचे पडसाद जोरात उमटले असून, मोठ्या प्रमाणावर त्याचा निषेध करण्यात आला आहे.

कवी, नाटककार आणि विनोदी लेखक म्हणून मराठी साहित्यात अग्रणी असलेल्या राम गणेश गडकरी (१८८५ ते १९१९) यांचा संभाजी उद्यानात पुतळा आहे. त्यांच्या ‘राजसंन्यास’ या नाटकात छत्रपती संभाजी महाराज यांची बदनामी करण्यात आल्याने त्यांचा पुतळा हटविल्याचे, अटकेतील तरुणांनी पोलिसांना सांगितले. प्रदीप भानुदास कणसे (वय २५, रा. आंबेगाव, नऱ्हे), हर्षवर्धन महादेव मगदूम (वय २३, रा. बालाजीनगर, धनकवडी), स्वप्नील सूर्यकांत काळे (वय २४, रा. चऱ्होली, वडमुखवाडी, आळंदी) आणि गणेश देविदास कारले (वय २६, रा. चांदूस, ता. खेड) ही त्यांची नावे आहेत.

पुणे महापालिकेचे उद्यान अधीक्षक अशोक घोरपडे यांनी या प्रकरणी तक्रार दिली असून, सार्वजनिक मालमत्तेचे विद्रूपीकरण आणि चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिस उपायुक्त सुधीर हिरेमठ यांनी दिली. सोमवारी मध्यरात्री एक वाजून ५० मिनिटांनी चार तरुणांनी हातोड्याने व कुऱ्हाडीचे घाव घालून गडकरी यांचा पुतळा खाली हौदामध्ये पाडला आणि उचलून घेऊन गेल्याचे ‘सीसीटीव्ही’त चित्रीत झाले आहे. या चौघांना डेक्कन पोलिसांनी मंगळवारी सायंकाळी ताब्यात घेतले. हा पुतळा नदीत टाकून दिल्याचे त्यांनी पोलिसांना सांगितले.

गडकरींच्या पुतळ्याचे अनावरण २३ जानेवारी १९६२ रोजी आचार्य अत्रे यांच्या हस्ते करण्यात आले होते. या पुतळ्यासमोरील प्रवेशद्वाराचे काम सध्या सुरू आहे. या उद्यानात रात्रपाळीला दोन सुरक्षारक्षक असतात. मंगळवारी सकाळी साडेसातच्या सुमारास गडकरी यांचा पुतळा नसल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पाहणी केल्यानंतर पुतळा नसल्याचे आढळून आले. त्यांनी उद्यान विभागाच्या अधिकाऱ्यांनादेखील माहिती दिली.

उद्यान विभाग अनभिज्ञ

राम गणेश गडकरी यांचा पुतळा हटविल्याची माहिती उद्यान विभागालाच नव्हती. या घटनेबद्दलची माहिती एका व्यक्तीने फेसबुकवर पाहिली. त्याने त्याबाबत डेक्कन पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक अजय कदम यांना दिली. त्यांनी पोलिसांना घटनास्थळी पाठविल्यानंतर पुतळा नसल्याचे स्पष्ट झाले.

संभाजी ब्रिगेडकडून कबुली

‘हा पुतळा हलवण्याबाबत महापालिकेकडे आठ वर्षांपासून पाठपुरावा सुरू आहे. मात्र, त्यावर कोणतीही कारवाई केली जात नसल्याने आम्ही पुतळा हलविला. पुतळा हटविणारे हर्षवर्धन मगदूम हे ब्रिगेडचे हवेली तालुका अध्यक्ष व प्रदीप कणसे हे सदस्य आहेत. यामध्ये कोणतेही राजकारण नाही. या कार्यकर्त्यांच्या पाठीमागे ब्रिगेड ठामपणे उभी आहे. या चौघांना पोलिसांकडे हजर करण्यात आले आहे,’ अशी माहिती संभाजी ब्रिगेडचे कार्याध्यक्ष संतोष शिंदे यांनी दिली.

व्हिडिओ व्हायरल

या घटनेनंतर स्वप्नील काळे, गणेश कारले या दोन तरुणांची व्हिडिओ क्लीप व्हॉट्स अॅपवर फिरते आहे. हा पुतळा काढून टाकल्याचे त्यांनी सांगितले आहे. आपण कोणत्या पक्षाचे नसल्याचे त्यांनी म्हटले आहे. तसेच, स्वाभीमानी संघटनेचे नीतेश राणे यांच्या भाषणातून प्रेरित होऊन हे कृत्य केले आहे; यात काही गैर केले असे वाटत नाही, असेही त्यांनी म्हटले आहे.

पुतळा पुन्हा बसविणार

गडकरी यांचा पुतळा हटविण्याच्या प्रकाराचा महापौर प्रशांत जगताप यांनी निषेध केला असून, हा पुतळा पुन्हा सन्मानपूर्वक बसविण्याचा आदेश त्यांनी महापालिका प्रशासनाला दिला. पुतळा बसविण्यासाठी काही दिवसांचा कालावधी लागणार असल्याने गडकरी यांचे तैलचित्र दोन दिवसांत बसवून येथे आवश्यक सुरक्षाव्यवस्था तैनात करण्याचा आदेशही त्यांनी दिला आहे




मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘डीपी’वर शिक्कामोर्तब

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

पुण्याच्या प्रलंबित विकास आराखड्यावर (डीपी) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी रात्री मान्यतेची मोहोर उमटवली असून, त्याची औपचारिक घोषणा आज, बुधवारी होण्याची दाट शक्यता आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून राज्य सरकारकडे मंजुरीच्या प्रतीक्षेत असलेल्या शहराच्या डीपीला मंजुरी मिळाल्याने विकास प्रक्रियेला गती मिळण्याची चिन्हे आहेत.

डीपीला लवकरच मान्यता देण्याचे संकेत फडणवीस यांनी गेल्या महिन्यातील पुणे दौऱ्यात दिले होते. येत्या काही दिवसांत, महापालिका निवडणुकीसाठीची आचारसंहिता जाहीर होण्याची शक्यता असल्याने त्याच्या आधी डीपीचा अंतिम निर्णय होण्याची शक्यता होती. त्यानुसार, मंगळवारी रात्री मुख्यमंत्र्यांनी डीपीवर स्वाक्षरी केल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली.

राज्य सरकारने मार्च २०१५मध्ये महापालिकेच्या ताब्यातून डीपी काढून घेतला. विभागीय आयुक्त एस. चोक्कलिंगम यांच्या अध्यक्षतेखाली नेमण्यात आलेल्या त्रिसदस्यीय समितीने डीपीचा सविस्तर अहवाल गेल्या वर्षी सरकारला सादर केला.

या समितीने तब्बल ३८० आरक्षणे उठविल्याचा आरोप केला जात असून, अंतिम मान्यता देताना त्यापैकी किती आरक्षणे कायम राखण्यात आली, याबद्दल सर्वसामान्यांना उत्सुकता आहे. विकास नियंत्रण नियमावलीमध्ये (डीसी रुल्स) अनेक बदल सुचविताना, काही बंधने शिथिल करण्यात आली होती. त्यामुळे, शहरात गगनचुंबी इमारती उभ्या राहण्याचा मार्ग मोकळा झाला होता. त्यावरही, अंतिमतः कोणता निर्णय घेण्यात आला, याकडे लक्ष लागले आहे. शहरातील मेट्रो मार्गिकांच्या दोन्ही बाजूस पाचशे मीटर परिसरात (मेट्रो इन्फ्लुएन्स झोन) चार एफएसआय देण्याची शिफारस करण्यात आली होती. पुणे मेट्रो प्रकल्पाचे भूमिपूजन गेल्या महिन्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाल्याने त्याबाबत नेमके कोणते धोरण निश्चित करण्यात आले, याबद्दलही तर्क-वितर्क लढविले जात आहेत.


विकासाच्या ‘सुपरफास्ट’ ट्रॅकवर

शहराचा मेट्रो प्रकल्प, शिवाजीनगर-हिंजवडी मेट्रोला मान्यता, शहरालगतच्या रिंगरोडला परवानगी, पुणेकरांसाठी दिवसातून दोन वेळा पाणी आणि अखेरीस प्रलंबित विकास आराखड्यालाही मंजुरी, असे अनेक महत्त्वाचे निर्णय राज्य सरकारने गेल्या १०-१५ दिवसांमध्ये घेतले आहेत. पुण्याला विकासाच्या मार्गावर वेगाने नेण्यासाठीचे सर्वतोपरी प्रयत्न केले जात असल्याचे भाजपच्या नेत्यांकडून सांगण्यात येत असून, आघाडी सरकारच्या काळात रखडलेल्या सर्व प्रकल्पांना भाजप सरकारने अवघ्या दोन वर्षांत मंजुरी दिल्याचा दावा केला जात आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गडकरींचा पुतळा सन्मानपूर्वक बसवा

$
0
0

महापौरांचे आदेश; सर्वसाधारण सभेत घटनेचे पडसाद

म. टा. प्र‌तिनिधी, पुणे

प्रसिद्ध नाटककार राम गणेश गडकरी यांचा संभाजी उद्यानातील पुतळ्याची तोडफोड करण्यात आलेल्या घटनेचे जोरदार पडसाद मंगळवारी महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत उमटले. ‘गडकरी यांच्या पुतळ्याची झालेली तोडफोड ही अतिशय निंदनीय घटना असून, हे कृत्य करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करून गडकरी यांचा पुतळा पुन्हा सन्मानपूर्वक बसविण्यात यावा,’ असे आदेश महापौर प्रशांत जगताप यांनी दिले. पुतळा बसविण्यासाठी काही दिवसांचा कालावधी लागणार असल्याने गडकरी यांचे तैलचित्र दोन दिवसांत बसवून आवश्यक सुरक्षाव्यवस्था तैनात करण्याचेही आदेशही जगताप यांनी प्रशासनाला दिले.
जंगली महाराज रोडवरील संभाजी उद्यानातील गडकरी यांच्या पुतळ्याची संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी तोडफोड करून मंगळवारी पहाटे हा पुतळा हटविला. महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत मंगळवारी याचे पडसाद उमटले. सभेला सुरुवात होताच भाजपचे गटनेते गणेश बीडकर यांनी विचारांची लढाई विचारांनीच व्हायला हवी, असे मत मांडून घटनेचा निषेध केला. अशा घटना शहराच्या संस्कृतीला मारक असल्याचे सांगून गडकरी यांना महाराष्ट्राचे शेक्सपिअर म्हणतात, सांस्कृतिक शहरातच अशा निंदनीय घटना घडत असल्याबाबत नगरसेविका माधुरी सहस्त्रबुद्धे यांनी नाराजी व्यक्त केली. ‘शहराचे वातावरण दूषित करण्यासाठी हा प्रकार करण्यात आला आहे. निवडणुकीच्या तोंडावर नागरिकांमध्ये फूट पाडण्यासाठी हे कृत्य करण्यात आले आहे,’ असा आरोप सभागृह नेते शंकर केमसे यांनी केला. शंभर वर्षांपूर्वी गडकरी यांनी लिहिलेल्या नाटकाचा संदर्भ घेऊन आता अशी कृती करणे खेदजनक असल्याचे संजय बालगुडे म्हणाले.
‘गडकरी यांचा पुतळा सन्मानपूर्वक संभाजी उद्यानात पुन्हा बसविण्यात यावा, पुतळा बसविण्यास विलंब होत असेल तर तेथे गडकरी यांचे तैलचित्र बसवावे,’ अशी सूचना विरोधी पक्षनेते अरविंद शिंदे यांनी केली. ही घटना निषेधार्ह असून, दोषींवर कडक कारवाई करावी अशी मागणी मनसेच्या वतीने करण्यात आली. सभासदांच्या तीव्र भावना लक्षात घेऊन प्रचलित कायद्यानुसार संबधितांवर कारवाई करावी. दरम्यान, संभाजी उद्यानातील सुरक्षा रक्षकांना कारणे दाखवा नोटीस बजावून त्यांच्याकडून खुलासा मागविण्यात आला आहे.

‘गडकरी सगळ्यांचेच’
नाटककार राम गणेश गडकरी यांच्या पुतळ्याच्या जागेवर सध्या तैलचित्र लावण्यात यावे, अशी सूचना अरविंद शिंदे यांनी केली. त्यावर गणेश बीडकर यांनी लगेच ते चित्र देण्याचे मान्य केले. त्याला आक्षेप घेऊन गडकरींचे चित्र पालिकेनेच लावावे; गडकरी सगळ्यांचेच आहेत, ’असे मनसेचे बाबू वागस्कर यांनी सांगताच सभागृहात हशा पिकला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पुतळा हटवून कर्तृत्व संपणार नाही

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

‘राज्यातील सर्व साहित्यिक, कलावंतांचे पुतळे काढून टाका. त्यांचे साहित्य आम्ही वेगवेगळ्या कलाकृतीतून जिवंत ठेवू,’ अशा शब्दांत साहित्य, कलाक्षेत्रातून मंगळवारी संताप व्यक्त करण्यात आला. ‘नाटककार राम गणेश गडकरी हे मराठी भाषेचा डौल असून, पुतळा उखडल्याने त्यांचे वाङ्मयीन कर्तृत्व कमी होणार नाही,’ अशा भावना व्यक्त करून घटनेचा निषेध व्यक्त करण्यात आला.

गडकरी यांचा पुतळा हटविल्याप्रकरणी महाराष्ट्र साहित्य परिषद, नाट्य परिषद पुणे शाखा, चित्रपट महामंडळ, महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट कर्मचारी सेना यांच्या वतीने संभाजी उद्यानासमोर निदर्शने करण्यात आली. या वेळी नाटककार श्रीनिवास भणगे, चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले, परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, प्रमुख कार्यवाह प्रकाश पायगुडे, नाटय परिषदेचे पुणे शाखेचे अध्यक्ष सुरेश देशमुख, कोथरूड शाखेचे अध्यक्ष सुनील महाजन, डॉ. सतीश देसाई, मकरंद टिल्लू, रजनी भट, निकिता मोघे, दिग्दर्शक अभिनेता प्रवीण तरडे, प्रसाद ओक, योगेश सोमण, किरण यज्ञोपवित उपस्थित होते.

प्रा. जोशी म्हणाले, की ‘लोकशाहीत सनदशीर मार्गाने भूमिका मांडणे शक्य असतानाही गुंडशाही वृत्तीचा अवलंब करणे योग्य नाही. गडकरींचा पुतळा उखडल्याने त्यांचे वाड्.मयीन कर्तृत्व कमी होणार नाही. अशा घटना लोकशाहीला मारक आहेत.’

‘गडकरींचा पुतळा महापालिकेने पुन्हा उभारू नये. गडकरी कोण होते; हे आम्ही जगाला त्यांच्या साहित्यातून दाखवून देऊ. गडकरींची पुस्तके खरेदी करून, रसिकांनी पुढील पिढीपर्यंत ते पोहचवावेत,’ असे आवाहन तरडे यांनी केले. कलाकार हे जातीपातीपलीकडे असतात. कलेच्या प्रकारात जात आड येणे हे कलाकार कदापि सहन करणार नाही, याकडे ओक यांनी लक्ष वेधले. ‘साहित्यिकांचे पुतळे काढून टाका; जेणेकरून पुन्हा कुठल्याही पुतळ्याची विटंबना होणार नाही. जातीय समीकरणे निर्माण केली जात आहेत,’ अशा शब्दांत यज्ञोपवित यांनी निषेध व्यक्त केला.

सोमण म्हणाले, की ‘साहित्यिक, कलाकार यांचे सगळीकडचे पुतळे काढावेत. त्यांच्या कलाकृती अजरामर आहेत. हे घडल्यामुळे पुढच्या पिढीला राम गणेश गडकरी कोण होते हे कळेल. त्यामुळे ज्यांनी हे कृत्य केले त्यांचे अभिनंदन करून निषेध व्यक्त करतो.’

इतिहास विवेकाने लिहायचा, वाचायचा आणि मूल्यमापन करायचे असते. इतिहासात चूक अथवा विकृती आढळल्यास त्याचा विवेकाने प्रतिवाद करता येतो. पुतळा फोडून गडकरींचा प्रतिवाद करणे ही कृती योग्य नाही. ब्राह्मण, ब्राह्मणेतर वादातून महाराष्ट्राला वाचवण्याचे काम विठ्ठल रामजी शिंदे आणि यशवंतराव चव्हाण यांनी केले. तसे, वर्तमान महाराष्ट्रात कोणी करताना दिसत नाही. सध्याची परिस्थिती महाराष्ट्राच्या भवितव्यासाठी घातक आहे.
-डॉ. श्रीपाल सबनीस, साहित्य संमेलनाध्यक्ष
--------
हे प्रकरण आताच कसे निघाले. गडकरी आमचे दैवत आहेत. चर्चेचा मार्ग खुला असताना पुतळ्याचा विध्वंस करून काय मिळणार आहे? ही निंदनीय घटना आहे.
-गंगाराम गवाणकर, नाट्य संमेलनाध्यक्ष
-------------
पुतळे हटवून कोणाची मानहानी होत नाही. इतिहासात त्यांचे स्थान अजरामर राहणार आहे. मुळात ही गडकरी यांची अपूर्ण कलाकृती आहे. त्याच्याविषयी बोलायचा आपल्याला अधिकार नाही. नाट्यकृतीमध्ये छत्रपती संभाजी महाराज यांच्याविषयी अनुद्गार काढले असतील असे वाटत नाही. पुतळे उभारावेत का नाही? हाच मुळात वादाचा मुद्दा आहे. ही कृती म्हणजे शिक्षकाची पाठ असताना एखाद्या विद्यार्थ्याने त्यांच्या कपड्यावर शाई उडविण्यासारखे आहे.
- सतीश आळेकर, ज्येष्ठ नाटककार
------------------
पुतळे हटविल्याने कर्तृत्व पुसता येते का, गडकरी हे मराठी भाषेचे डौल आहेत. विचारांचा विरोध विचारानेच व्हायला हवा. त्याला तर्कशास्त्राची जोड असावी. विचारांमध्ये नैतिकता आवश्यक आहे. हिंसाचार किंवा तोडफोडीने विचार पुसता येत नाहीत.
- डॉ. जब्बार पटेल, ज्येष्ठ दिग्दर्शक
---------------
विरूद्ध विचारांचे नाटक लिहून विरोध करता येतो. कधी पुतळे हटविले जातात, तर कधी पुस्तके जाळली जातात. आज संस्कृती नावाची गोष्ट शिल्लक राहिलेली नाही. तोडफोड करणे ही झुंडशाही आहे. -
मकरंद साठे, प्रसिद्ध नाटककार
------
राम गणेश गडकरींसारख्या साहित्यविश्वातील श्रद्धेय व्यक्तीचा पुतळा फोडला जाणे ही अत्यंत वाईट घटना आहे. त्यांचा साहित्याचा प्रवास विलक्षण आहे. अशाप्रकारे साहित्यविश्वाची श्रद्धा असणाऱ्या व्यक्तीवर आघात केला जातो, ही घटना निंदनीय आहे.
-डॉ. अक्षयकुमार काळे, नियोजित अध्यक्ष, साहित्य संमेलन
---------------------------
साहित्याचा आणि नाट्यविश्वाचा राजकारणाशी काहीही संबंध असता कामा नये. गडकरी यांच्या राजसंन्यास या नाटकात काही आक्षेपार्ह मजकूर असेल आणि त्यातून संभाजी महाराजांची बदनामी झाली असेल तर, गडकरींचा पुतळा फोडल्याने त्याची भरपाई होणार आहे का, त्या नाटकात मी काम केले आहे. त्यात नेमका कोणता प्रवेश आहे, जो आक्षेपार्ह समजून पुतळा फोडण्यात आला, हे कळायला मार्ग नाही. असे कृत्य करणाऱ्यांनी त्या नाटकाचा गाभा समजून घेतलेला नाही. राजसंन्यास नाटकाला आता १०० वर्ष पूर्ण होऊन गेली आहेत. इतक्या वर्षांनंतर पुतळा फोडायचे कसे सुचले, याला त्यांचे राजकारण म्हणावे का बाळबोधपणा हे कळायला मार्ग नाही. अशा प्रकारच्या हिंसात्मक कृत्यांमुळे समाजात जातीय तेढ निर्माण होते.
-जयंत सावरकर, नियोजित अध्यक्ष, नाट्य संमेलन

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

फडणवीस, पवारांचे आज भरगच्च कार्यक्रम

$
0
0

विकासकामांच्या उद् घाटनांचा धडाका उडणार

म. टा. प्रतिनिधी, पुणे

महापालिका निवडणुकीची आचारसंहिता जाहीर होण्यापूर्वी विकासकामांच्या उद्घाटनांचा धडाका आज, बुधवारी उडणार असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिक्षणमंत्री विनोद तावडे आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत दिवसभर शहराच्या विविध भागांत भरगच्च कार्यक्रम होणार आहेत. तसेच, या प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत विविध नगरसेवक-पदाधिकाऱ्यांचे पक्षप्रवेश होणार आहेत.
पुण्या-मुंबईसह राज्यातील १० महापालिकेच्या निवडणुका फेब्रुवारीमध्ये होणार असून, निवडणूक आयोगाकडून लवकरच आचारसंहिता जाहीर होण्याची शक्यता आहे. तत्पूर्वी, शहरातील विविध विकासकामांचे उद्घाटन, लोकार्पण करण्यासाठी स्थानिक नगरसेवकांकडून घाई-गडबड सुरू आहे. शहराच्या विविध भागांतील विकासकामांच्या उद्घाटनासाठी आपापल्या पक्षातील ज्येष्ठ नेत्यांना निमंत्रित करण्यात आले असून, बुधवारी संपूर्ण शहरात तब्बल पंधराहून अधिक प्रकल्पांचे उद्घाटन/लोकार्पण केले जाणार आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत बिबवेवाडी आणि वडगावशेरी येथे कार्यक्रम होणार असून, पक्षाच्या निवडणूक कार्यालयातील ‘वॉर-रूम’च्या उद्घाटनालाही मुख्यमंत्री उपस्थित राहणार आहेत. स्वामी विवेकानंद पुतळ्यावरील मेघडंबरीचे उद्घाटन, क्रीडा संकुल व व्यायामशाळेचे उद्घाटन, तर वडगावशेरीत छत्रपती शिवाजी महाराज उद्यानाचे लोकार्पण मुख्यमंत्र्‍यांच्या हस्ते होणार आहे. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार बुधवारी सकाळी नऊपासून रात्री नऊपर्यंत संपूर्ण शहरात चौदा कार्यक्रमांचे उद्घाटन-भूमिपूजन आणि लोकार्पण सोहळ्यासाठी उपस्थित राहणार आहेत. शहराच्या पूर्व भागातील खराडी-चंदननगरपासून पवार यांच्या कार्यक्रमांना सुरुवात होणार असून, वानवडी, घोरपडी, बिबवेवाडी, धनकवडी, बाणेर, सुतारवाडी अशा विविध भागांतील विकासकामांच्या उद्घाटनाला ते उपस्थित राहणार आहेत. त्यांचा अखेरचा कार्यक्रम रात्री नऊ वाजता वडारवाडीत होणार आहे. फडणवीस, पवार यांच्या उपस्थितीत काही नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांचे भाजप आणि राष्ट्रवादीत प्रवेश होण्याची शक्यता आहे.
या शिवाय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्या हस्ते कोंढवा बुद्रुक येथील विरंगुळा केंद्राचे उद्घाटनही बुधवारी सायंकाळी करण्यात येणार आहे. तसेच, काही प्रकल्पांचे उद्घाटन महापौर प्रशांत जगताप यांच्या उपस्थितीत केले जाणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images

<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>
<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596344.js" async> </script>