Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

बहुमत असूनही भाजपने राममंदिर उभारले नाही

$
0
0

राज ठाकरे यांची टीका

म. टा. प्रतिनिधी, पुणे

‘राम मंदिर बनविण्याच्या नावाखाली भाजपने मते मिळवली. पूर्ण बहुमत असतानाही त्यांना राम मंदिर उभारता आले नाही; म्हणून त्यांनी मुंबईतील रेल्वे स्टेशनला राम मंदिर नाव दिले,’ अशी टीका महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पक्षप्रमुख राज ठाकरे यांनी सोमवारी केली. त्याचबरोबर भाजप सरकार घोषणाप्रिय असून, शिवस्मारकासह अन्य योजनांसाठी पैसे कोठून आणणार, असा सवालही ठाकरे यांनी उपस्थित केला.
मनसेच्या भांडारकर रस्त्यावरील मध्यवर्ती निवडणूक कार्यालयाचे उद् घाटन ठाकरे यांच्या हस्ते झाले. पक्षाचे नेते बाळा नांदगावकर, अविनाश अभ्यंकर, अनिल शिदोरे, रिटा गुप्ता, शहरप्रमुख अजय शिंदे आणि हेमंत संभूस, गटनेते किशोर शिंदे आदी उपस्थित होते. मनसे सेवा या मोबाइल अॅप्लिकेशनचे उद् घाटनही ठाकरे यांच्या हस्ते झाले.
‘राम मंदिराच्या नावाखाली भाजपने राजकारण केले, पैसे मिळवले, अनेकांचे बळी गेले त्यानंतर सत्ता मिळवली आणि राम मंदिर मात्र, उभारले नाही. तेव्हा त्यांनी भूमिका बदलली, असे कोणी म्हणत नाही. शिवस्मारक उभारायला तेवढे पैसे आहेत का. एवढे पैसे गड किल्ल्यांच्या डागडुजीसाठी दिले तर पुढील पिढ्यांना हे ऐतिहासिक वैभव पाहता, अनुभवता येईल, त्यातून प्रेरणा मिळेल. नुसते पुतळे उभारून जयंत्या, पुण्यतिथ्यांना गर्दी होण्याशिवाय काहीही घडत नाही,’ असेही ठाकरे म्हणाले.
‘आजकाल कोणीही उठते आणि कोर्टात जाते. देशाची रचना भाषेच्या आधारावरील प्रांतरचनेनुसार झाली. परंतु, महाराष्ट्राची स्थिती खूप वेगळी आहे. येथे येणारा परप्रांतीयांचा लोंढा खूप मोठा आहे. हे परप्रांतीय जेव्हा इथली भाषा नाकारतात, तेव्हा संघर्ष सुरू होतो. राज्यातील सर्व नोकऱ्या प्राधान्याने स्थानिकांना मिळाल्या पाहिजेत असे धोरण नसते. आमच्यावर आंदोलन करण्याची वेळ का येते, हे सुप्रीम कोर्टाने समजून घ्यावे. आमच्या धर्मावर कोणी बोलणार असेल, तर आम्ही गप्प का बसावे, भारतासारखा देश समजून घेणे मोदींना कठीण जाते, सुप्रीम कोर्टालाही ते कसे कळणार,’ असा सवालही ठाकरे यांनी उपस्थित केला.
भाजप सरकारला सातत्याने घोषणा करणे आवडते. परवानग्या आणायच्या, घोषणा करायच्या आणि भूमीपूजन करायचे, पुढे काय ते कोणालाच माहीत नाही. कल्याण डोंबिवलीसाठीचे साडेसहा हजार कोटी, मुंबई पालिकेसाठीचे दहा हजार कोटी प्रत्यक्षात आले का, या प्रकल्पांसाठीचे पैसे आणणार कोठून, असा प्रश्नही ठाकरे यांनी उपस्थित केला.

सहा हजार कशासाठी?
नोटाबंदीचे ५० दिवस संपल्यानंतरही पंतप्रधान मोदी त्यावर बोलायला तयार नाहीत. हा निर्णय फसल्याचे त्यांच्या ३० डिसेंबरच्या भाषणादरम्यानच्या देहबोलीतून दिसत होते. गर्भवती महिलांना सहा हजार रुपये देणे, हा लोकसंख्या वाढीचा नवा प्रकार आहे का, असा मार्मिक सवालही ठाकरेंनी केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


‘कोणी गेले, तरी मनसेला फरक नाही’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

‘१९५२ साली स्थापन झालेल्या भारतीय जनता पक्षाला अजूनही उमेदवार सापडत नाहीत. माझ्याकडे खूप कर्तबगार उमेदवार आहेत. कोणी गेले, तरी मनसेला फरक पडत नाही. गेलेले मात्र पुन्हा निवडून येतील, याची खात्री नाही,’ असा टोला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पक्षप्रमुख राज ठाकरे यांनी सोमवारी लगावला.
‘पक्ष सोडून जाणारे हवापालटासाठी जात असावेत. प्रत्येक पक्षात स्थित्यंतरे होतच असतात. एक गेला, तर माझ्याकडे अनेक कर्तबगार आहेत. त्यांना संधी देऊ,’ असे ठाकरे म्हणाले. पक्षाचे नगरसेवक रवींद्र धंगेकर यांचे सध्याचे स्टेटस काय आहे, हे मलाही माहिती नाही, असेही ते म्हणाले.
‘पुणे, मुंबई आणि नाशिक या तिन्ही ठिकाणच्या मनसेच्या नगरसेवकांनी केलेल्या कामावर मी शंभर टक्के समाधानी आहे. इतर पक्षांच्या नगरसेवकांच्या कामाशी त्याची तुलना करा, मग लगेच फरक लक्षात येईल. माझ्या नगरसेवकांनी केलेल्या कामांची उद् घाटने होत आहेत. इतर पक्ष मात्र अजून भू‌मिपूजन करत आहेत. यावरून अनेक गोष्टी स्पष्ट होतात,’ असे ते म्हणाले. अनेक जण सध्या भाजपच्या वाटेवर आहेत, याबाबत विचारले असता, ठाकरे म्हणाले, ‘तीन वर्षांपूर्वी भाजप कोठे होती. मोदींच्या नावावर मते मागण्यात येत आहेत. आताही हीच परिस्थिती कायम आहे.’

पंधरा हजार घेणे बंद करा
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे उमेदवारी अर्जांची विक्री सुरू झाली आहे. आतापर्यंत ३०० च्या आसपास अर्ज विकले गेले आहेत. मात्र, या अर्जासाठी प्रत्येकी पंधरा हजार रुपये शुल्क आकारण्यात येत होते. त्याबाबत विचारले असता, ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांकडूनच त्याची माहिती घेतली. त्यानंतर असा काहीही निर्णय झालेला नसून हा प्रकार तातडीने बंद करा, असे ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांना सुनावले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

हरिभाऊ लिमये यांचे पुण्यात ‌निधन

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील १९४२ च्या आंदोलनात पुण्यातील कॅपिटल चित्रपटगृहात क्रांतिकारकांनी केलेल्या बॉम्बस्फोटातील सेनानी, मसाजतज्ज्ञ आणि नामवंत वकील हरिभाऊ लिमये (वय ८९) यांचे सोमवारी वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पश्चात मुलगा, मुलगी, सून आणि नातवंडे असा परिवार आहे. कोणतेही धार्मिक विधी न करता त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
हरिभाऊ यांचा जन्म २६ एप्रिल १९२६ रोजी पुण्यात झाला. त्यांचे आजोबा लक्ष्मण लिमये यांनी दीडशे वर्षांपूर्वी भारतीय उपचार पद्धतीमधील मसाज केंद्र घरी मोफत सुरू केले. त्यांच्यानंतर हा वारसा त्यांचे ज्येष्ठ पुत्र वामन उर्फ महाराज लिमये यांनी सुरू ठेवला. महाराज लिमये यांचे हरिभाऊ धाकटे चिरंजीव होत. श्रीकृष्ण लिमये आणि माजी महापौर निळूभाऊ लिमये हे हरिभाऊंचे ज्येष्ठ बंधू होत.
१९४२ च्या स्वातंत्र्य चळवळीने हरिभाऊंना झपाटून टाकले होते. इंग्रज करत असलेल्या अत्याचारांबद्दल अवघ्या १६ वर्षांच्या हरिभाऊंच्या मनात संतापाची भावना होती. काही तरुणांनी छावणी परिसरातील कॅपिटल, एम्पायर ,वेस्टएंड या चित्रपटगृहात बॉम्बस्फोट करण्याचे ठरवले. त्यांना हरिभाऊंनी साथ दिली. ब्रिटिश अधिकारी, कर्मचारी तेथे मोठ्या संख्येने सिनेमा बघायला येत असत. त्यावेळी पोलिस समोर येताच त्यांनी बॉम्बच्या रसायनाची बाटली खिशात घातली होती. ती खिशातच सांडली आणि मांडी भाजून निघाली; तरी सहकारी पकडले जातील म्हणून हरिभाऊंनी तोंडातून अवाक्षरही काढले नाही.
पुढे त्यांनी एल. एल. बी. पदवी संपादन केली. समाजवादी चळवळीचा संस्कार, महात्मा गांधी, अच्युतराव पटवर्धन, राम मनोहर लोहिया, साने गुरुजी यांचा त्यांच्यावर प्रभाव होता. संयुक्त महाराष्ट्र चळवळीतही ते आघाडीवर होते. आणीबाणीत तुरुंगात डांबलेल्या कार्यकर्त्यांचे वकीलपत्र घेऊन त्यांनी अनेकांची सुटका केली. अमृतपुत्र साने गुरुजी, दारूबंदीची नशा, कारागृहातील पथिक यांसह ‘द हिलींग टच’ अशी त्यांची पुस्तके प्रसिद्ध आहेत. अनेक संस्थांचे ते आधारवड होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

राजकीय गरमागरमीचा आठवडा

$
0
0

भाजपमधील ‘इन्कमिंग’ला वेग येणार; उद्या मुख्यमंत्री पुण्यात

म. टा. प्रतिनिधी, पुणे

आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अन्य पक्षांतील प्रमुख कार्यकर्ते, नगरसेवकांचे ‘इन्कमिंग’ करण्याचा सपाटा सुरूच असल्याने भाजपमधील जुन्या कार्यकर्त्यांच्या पोटात गोळा आला आहे. काँग्रेसला खिंडार पाडण्याचे भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे मनसुबे सुरू आहेत. राष्ट्रवादीचे दोन ते तीन नगरसेवक भाजपच्या वाटेवर असल्याने पक्षातील पडझड रोखण्यासाठी कारभाऱ्यांचीही तारांबळ होत आहे. त्यामुळे नवीन वर्षाचा पहिला आठवडा गाजण्याची शक्यता आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उद्या, बुधवारी पुण्याच्या दौऱ्यावर येत आहेत. या दौऱ्यात मुख्यमंत्री शहरात मुक्काम ठोकण्याची शक्यता आहे. दौऱ्यात ते पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिकांच्या निवडणुकांचा आढावा घेऊन प्रचाराचा बिगुल वाजवतील. या दौऱ्यामध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील काही नगरसेवकांचे भाजपमध्ये प्रवेश निश्चित होण्याची शक्यता आहे.
फडणवीसांच्या दौऱ्यानंतर आचारसंहिता लागण्यापूर्वी मंमिमंडळाची बैठक अपेक्षित आहे. या बैठकीत पुण्याचा विकास आराखडा, ‘बीडीपी’ आणि ‘एसआयए’बाबत महत्वपूर्ण निर्णय घेण्याचे प्रयोजन असल्याची शक्यता आहे. भाजपकडून महापालिका निवडणुकीची जय्यत तयारी सुरू करण्यात आली आहे. त्याचवेळी काँग्रेसच्या नेत्यांकडून पक्षाला लागलेली घरघर थांबवण्यासाठी जिकिरीचे प्रयत्न सुरू आहेत. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर पुण्याची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. काँग्रेस सोडून अन्य पक्षांत जाणाऱ्या नगरसेवकांना थांबवण्यासाठी त्यांनी फोनाफोनी सुरू केल्याची चर्चा आहे.
भाजपच्या नेतेमंडळींकडून काँग्रेस आणि राष्ट्रवादीतील नगरसेवकांना फोडून पक्षात घेण्याचा सपाटा अद्याप सुरूच आहे. इतर पक्षातील मंडळी पक्षात येत असल्याचे पाहून भाजपच्या निष्ठावंतांच्या छातीत धडकी भरली आहे. भाजपमध्ये ‘इन्कमिंग’ करताना कोणाच्या आश्रयाखाली जावे, अश प्रश्नही संबंधितांना पडला आहे. भाजपमध्ये गेलो अन् तिकिटही मिळाले नाही तर काय, या भीतीनेही अनेक मंडळी पछाडली आहेत. भाजपमधील वरिष्ठ नेत्यांमध्ये असलेले शीतयुद्ध या भीतीमागे आहे.

उपनगरांमध्ये हालचालींना वेग
उपनगरांमध्ये ताकद वाढवण्यासाठी भाजपने बाह्या सरसावल्या आहेत. त्या पार्श्वभूमीवरच फडणवीस यांच्या बुधवारच्या दौऱ्यात अनेक राजकीय उलाढाली पाहावयास मिळणार आहेत. एकूण थंडीच्या दिवसांत पुण्यातील राजकीय वातावरण तापण्यास सुरुवात झाली आहे. पुढील आठ दिवसांत महापालिका निवडणुकांची आचारसंहिता अपेक्षित असल्याने अनेक विकासकामांचा धडाकाच लावण्यात येत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

उमेदवारी अर्जांसाठी भाजपकडे झुंबड

$
0
0

तीन दिवसांत तब्बल १०६८ जणांनी नेले अर्ज

म. टा. प्रतिनिधी, पुणे

महापालिकेच्या आगामी निवडणुकीत भारतीय जनता पक्षाकडून उमेदवारी मिळविण्यासाठी इच्छुकांमध्ये सुरू असलेली धडपड अर्ज विक्रीला मिळालेल्या उत्स्फूर्त प्रतिसादातून सोमवारी पुरेशी स्पष्ट झाली. अर्ज विक्रीच्या अवघ्या तीन दिवसांत तब्बल एक हजार ६८ इच्छुकांनी भाजपचे अर्ज नेले आहेत. अर्ज स्वीकारण्यास सोमवारपासून सुरुवात झाली असून, येत्या गुरुवारपर्यंत (५ जानेवारी) अर्ज स्वीकृती सुरू राहणार आहे.
पुणे महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुका फेब्रुवारीमध्ये होण्याची शक्यता आहे. शहरातील अनेक राजकीय पक्षांनी त्या दृष्टीने मोर्चेबांधणी सुरू केली असून, विविध पक्षांनी अर्जांसह मुलाखतींचा पहिला टप्पा पूर्ण केला आहे. केंद्रात आणि राज्यातील सत्तेमुळे महापालिकेच्या निवडणुकीतही पक्षाला फायदा होण्याची शक्यता असल्याने भाजपच्या अनेक कार्यकर्त्यांनी निवडणूक लढण्याची तयारी केली आहे. सर्व इच्छुक उमेदवारांसाठी भाजपने गेल्या शुक्रवारपासून अर्ज विक्री सुरू केली. भाजपच्या कार्यकर्त्यांसह विविध पक्षांतून भाजपमध्ये प्रवेश केलेल्या किंवा येऊ इच्छिणाऱ्या उत्सुक उमेदवारांनीही अर्ज घेण्यास प्राधान्य दिल्याचे चित्र दिसून आले. अर्ज विक्रीचा सोमवारी अखेरचा दिवस होता. या दिवशी अर्ज विक्रीला भरघोस प्रतिसाद मिळाला असून, तब्बल ४४३ अर्जांची विक्री झाल्याची माहिती पक्षातर्फे देण्यात आली. पहिल्या दोन दिवसांत अनुक्रमे २८९ आणि ३३७ अर्जांची विक्री झाली होती. पक्षाच्या सर्व विद्यमान नगरसेवकांनी अर्ज नेले आहेत.
अर्ज विक्रीसोबतच सोमवारपासून अर्ज स्वीकृतीही सुरू झाली आहे. भाजपच्या जंगली महाराज रोडलगतच्या निवडणूक कार्यालयात अर्ज स्वीकृतीसाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली आहे. प्रत्येक विधानसभा मतदारसंघात येणाऱ्या महापालिकेच्या प्रभागांसाठी व्यवस्था करण्यात आली असून, सर्व कागदपत्रांची काटेकोर तपासणी करण्यात येणार आहे. येत्या गुरुवारी (५ जानेवारी) सायंकाळी पाचपर्यंत अर्ज स्वीकारण्यात येणार आहेत.

मुलाखतीसाठी येताना शक्तीप्रदर्शन नको
इच्छुक उमेदवारांकडून अर्ज भरून घेतल्यानंतर मुलाखतींचा सविस्तर कार्यक्रम जाहीर करण्यात येईल, असे पक्षाने स्पष्ट केले आहे. मुलाखतीसाठी येताना वाहने, कार्यकर्त्यांना सोबत घेऊन शक्तीप्रदर्शन करण्यात येऊ नये, असे स्पष्ट आदेश शहराध्यक्ष योगेश गोगावले यांनी दिले आहेत. सार्वजनिक शांततेचा भंग होईल किंवा नागरिकांना त्रास होईल, असे वर्तन करू नये, असे बजावण्यात आले आहे; तसेच मुलाखत एकट्याची असल्याने संबंधित व्यक्तीनेच किंवा त्यासोबत आणखी एकानेच यावे, अशी तंबी देण्यात आली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

त्रुटी असलेल्या मेट्राेचे भू‌मिपूजन कसे केले?

$
0
0

माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा सवाल

म. टा. प्रतिनिधी, पुणे

‘निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून दहा दिवसांपूर्वी मोठा गाजावाजा करत भाजप सरकारने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते भू‌मिपूजन केलेल्या पुणे मेट्रोच्या कामाला राष्ट्रीय हरित लवादाने (एनजीटी) स्थगिती दिली आहे. केंद्रात आणि राज्यात भाजपचे सरकार असतानाही या प्रकल्पातील त्रुटी दूर न करता अर्धवट प्रकल्पाचे भू‌मिपूजन कसे केले?’ असा प्रश्न माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सोमवारी उपस्थित केला. पालिका निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून त्रुटी असतानाही घाईगडबडीत हे उद्घाटन उरकण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला.
कोंढवा, वानवडी, तसेच महंमदवाडी, सय्यदनगर या भागात राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांच्या वतीने करण्यात आलेल्या विविध विकासकामांचे भू‌मिपूजन; तसेच काही प्रकल्पांचा लोकार्पण सोहळा माजी उपमुख्यमंत्री पवार यांच्या हस्ते पार पडला. त्यावेळी आयोजित करण्यात आलेल्या जाहीर सभेत पवार बोलत होते. महापौर प्रशांत जगताप, शहराध्यक्षा खासदार वंदना चव्हाण, नगरसेवक फारुक इनामदार, नंदा लोणकर, माजी महापौर वैशाली बनकर, राजलक्ष्मी भोसले यांच्यासह पक्षाचे अनेक पदाधिकारी या वेळी उपस्थित होते. कोंढवा भागात उभारण्यात येणाऱ्या हज हाऊसचे भू‌मिपूजनही पवार यांच्या हस्ते झाले.
‘केंद्रात आणि राज्यात सत्ता मिळविल्यानंतरही सर्वसामान्य नागरिकांना दाखविण्यात आलेले ‘अच्छे दिन’चे स्वप्न पूर्ण करण्यास भाजपला अपयश आले आहे. भाजपच्या भूलथापांना बळी पडून नागरिकांनी त्यांना सत्तेची संधी दिली. मात्र, गेल्या अडीच वर्षांत भाजपने कोणताही महत्त्वाचा प्रकल्प मार्गी लावलेला नाही. निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून मेट्रोचे उद्घाटन करण्यात आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय नगरविकास मंत्री वेंकय्या नायडू, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत मोठा गाजावाजा करत मेट्रोचे भू‌मिपूजन करण्यात आले. मात्र, एनजीटीने मेट्रो प्रकल्पाला स्थगिती दिली आहे. केंद्र, तसेच राज्यात सत्ता असतानाही या प्रकल्पातील त्रुटी दूर न करत हे उद्घाटन करण्याची घाई केली,’ अशी टीकाही पवार यांनी केली.
‘काळा पैसा आणि भ्रष्टाचार दूर करण्याच्या नावाखाली नोटाबंदीचा निर्णय घेऊन मोदी सरकारने देशातील १२५ कोटी जनतेला वेठीस धरले आहे. या निर्णयामुळे सर्वसामान्य नागरिक हैराण झाला असून अंबानी आणि अदानी हे उद्योगपती मालामाल झाले आहेत. त्यांच्या फायद्यासाठीच हा निर्णय घेण्यात आला आहे. प्रत्येक दिवशी साडेचार हजार रुपये खात्यातून काढण्याची घोषणा पंतप्रधान मोदी यांनी केली आहे. मात्र, आठवड्याला असलेली २४ हजार रुपयांची मर्यादा वाढविण्यात आलेली नाही, नागरिकांचे हक्काचे पैसे काढण्यास बंदी घालणारे हे कसले सरकार?’ अशा शब्दांत त्यांनी भाजपवर टीका केली. लोकसभा, विधानसभेच्या निवडणुकीत लाटेवर विजयी झालेल्या भाजपला पालिका निवडणुकीत मतदारांनी जागा दाखवावी,’ असे आवाहनही त्यांनी केले.

जाती, धर्मात भेदभाव केला नाही
हज हाऊस ही समाजाची गरज आहे. पुण्यातही हज भवन उभारले जात असून, याचे भू‌मिपूजन राष्ट्रवादी काँग्रेसच्या काळात करण्यात आले आहे. सत्ताधारी म्हणून काम करताना कोणत्याही एका जाती, धर्मात भेदभाव केला नाही. प्रत्येकाला समान न्याय दिला. वारकरी भवन जशी गरज आहे, तशीच हज हाऊसची गरज आहे. महंमदवाडी सय्यदनगर येथे अडीच वर्षांपूर्वी झालेल्या पोटनिवडणुकीत पक्षाच्या ति‌किटावर विजयी झाल्यानंतर नगरसेवक फारुक इनामदार यांना या भागाचा विकास करण्यासाठी ५२ कोटी रुपयांचा निधी देण्यात आला, याचा चांगला वापर इनामदार यांनी केल्याचे पवार यांनी स्पष्ट केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

काँग्रेसचा नगरसेवक, पदाधिकाऱ्यांना दणका

$
0
0

सहा विद्यमान नगरसेवकांसह पदाधिकाऱ्यांची सहा वर्षांसाठी पक्षातून हकालपट्टी

म. टा. प्रतिनिधी, पुणे

महापालिकेच्या गेल्या निवडणुकीत काँग्रेस पक्षाच्या चिन्हावर निवडून आले असतानाही, इतर पक्षांमध्ये प्रवेश करणाऱ्या सहा नगरसेवक आणि दोन माजी पदाधिकाऱ्यांना सहा वर्षांसाठी निलंबित करण्याचा ठराव सोमवारी काँग्रेसच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी एकमताने घेतला. प्रदेश पातळीवरून सर्वांच्या निलंबनावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता असून, त्या संदर्भातील पत्र प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांना आज, मंगळवारी दिले जाणार आहे.
गेल्या काही दिवसांमध्ये काँग्रेसच्या अभिजीत कदम, सुनीता गलांडे, सुनंदा गडाळे या विद्यमान नगरसेवकांनी औपचारिकरित्या दुसऱ्या पक्षात प्रवेश केला आहे, तर रईस सुंडके, शीतल सावंत आणि अश्विनी जाधव हे तिन्ही नगरसेवक इतर पक्षांच्या वाटेवर असून, त्यांनी उमेदवारीसाठी पक्षाकडे अर्जही केला नसल्याने सर्वांना निलंबित करण्याचा ठराव विरोधी पक्षनेते अरविंद शिंदे यांनी मांडला. नगरसेवकांसह माजी उपमहापौर प्रसन्न जगताप आणि प्रदेशचे चिटणीस हरिदास चरवड यांनी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला असल्याने त्यांनाही सहा वर्षांसाठी निलंबित करण्याच्या या ठरावाला प्रदेश काँग्रेसचे चिटणीस सुधीर जानजोत आणि माजी सरचिटणीस रशीद खान यांनी अनुमोदन दिले.
काँग्रेसचे शहराध्यक्ष रमेश बागवे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत हा ठराव एकमताने मान्य करण्यात आला. या वेळी आमदार शरद रणपिसे, माजी आमदार बाळासाहेब शिवरकर, मोहन जोशी, दीप्ती चवधरी, राष्ट्रीय महिला काँग्रेसच्या सरचिटणीस कमल व्यवहारे यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते.
शहर काँग्रेसने एकमताने सर्वांना निलंबित करण्याचा ठराव मंजूर केला असला, तरी प्रदेश काँग्रेसतर्फे त्यावर शिक्कामोर्तब होण्याची आवश्यकता आहे. प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण मंगळवारी पुण्यात येणार असल्याने या वेळी त्यांना सर्व नगरसेवकांच्या निलंबनाच्या ठरावाचे पत्र देण्यात येईल, असे पक्षातर्फे स्पष्ट करण्यात आले. प्रदेश काँग्रेसतर्फे त्यांच्या निलंबनावर अंतिम मोहोर उमटवली जाईल, अशी चिन्हे आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

एटीएमचा घोळ कायमच

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

खातेदारांना एटीएममधून पैसे काढण्याची मर्यादा साडेचार हजार रुपयांपर्यंत वाढविण्यात आली असली, तरी प्रत्यक्षात अडीच हजार किंवा दोन हजार रुपयेच मिळत आहेत. काही ठिकाणी फक्त दोन हजार रुपयांच्या नोटा उपलब्ध असल्याचे चित्र आहे. एटीएमबाहेरील गर्दी मात्र, लक्षणीयरित्या घटली आहे.
सर्व बँकांनी शक्य तितकी एटीएम सुरू ठेवावीत, असे आदेश रिझर्व्ह बँकेने दिले आहेत. त्याचबरोबर पाचशेच्या नोटाही एटीएममधून उपलब्ध करून देण्यास सांगितले आहे. एटीएममधून पैसे काढण्याची मर्यादाही दररोज अडीच हजारांऐवजी साडेचार हजार रुपये करण्यात आली आहे. मात्र, अजूनही बहुतांश एटीएमवर त्याची अंमलबजावणी झालेली नाही.
काही एटीएममध्ये फक्त दोन हजार रुपयांच्याच नोटा आहेत. बहुतांश एटीएममधून दोन हजार रुपयेच काढता येत आहेत. काही ठिकाणी चार हजार रुपये काढता येत आहेत. मोजक्याच एटीएममध्ये पाचशे आणि शंभर रुपयांच्याही नोटा उपलब्ध आहेत. त्या एटीएमबाहेर गर्दी होत असून, तीन ते चार तासात या एटीएममधील रक्कम संपत आहे.
रिझर्व्ह बँकेकडून अजूनही अपुरी रक्कम मिळत आहे. मिळणाऱ्या रकमेत दोन हजाराच्या नोटांचेच प्रमाण सर्वाधिक आहे. पाचशे व शंभरच्या नोटांचे प्रमाण कमी असल्याने त्या नोटा एटीएममध्ये टाकल्यानंतरही लगेचच काढल्या जात आहेत. खातेदारांकडूनही ९०० किंवा १९०० रुपये काढण्याचे प्रमाण अधिक आहे. त्यामुळे पाचशे व शंभरच्या नोटा लगेच संपत आहे, असे एका राष्ट्रीयीकृत बँकेच्या सरव्यवस्थापकांनी सांगितले.

दोन दिवसांत सुरळित
कॅलिब्रेट झालेल्या एटीएममध्ये पाचशेच्या नोटा भरल्या जाऊन साडेचार हजार रुपये काढता येण्यासाठी मंगळवार दुपार किंवा बुधवार उजाडेल. मुंबईहून रोकड किती लवकर उपलब्ध होते, यावर एटीएममध्ये कोणत्या नोटा भरता येतील, याचा निर्णय अवलंबून आहे, असे सूत्रांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


दोनवेळा पाणी मिळणार?

$
0
0

कालवा समितीची आज मुंबईत बैठक होणार

म. टा. प्रतिनिधी, पुणे

गेल्या तीन महिन्यांपासून तहानलेल्या पुणेकरांची दोन वेळा पाण्याची मागणी आज, मंगळवारी पूर्ण होणार का, याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे. पालकमंत्री गिरीश बापट यांनी अखेर आज कालवा समितीची बैठक मुंबईत आयोजित केली आहे. महापालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुणेकरांची तहान भागविण्यासाठी दोन वेळा ‘पाणी’ देण्याचा लोकप्रिय निर्णय घेतला जाण्याची दाट शक्यता आहे. परंतु, कालव्यातून शेतीसाठी पाणी सोडले जात असताना, पुणेकरांच्या वाढीव कोट्याकडे दुर्लक्ष करण्यात नेमके ‘पाणी’ कुठे मुरत होते, असा जाब विरोधी पक्ष आणि स्वयंसेवी संस्थांनी उपस्थित केला आहे.
दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर गेल्या मोसमात समाधानकारक पाऊस झाला. शहराला पाणीपुरवठा करणारी सर्व धरणे पूर्ण क्षमतेने भरली. त्यामुळे, पुणेकरांना पूर्वीसारखे दिवसातून दोनवेळा पाणी दिले जाईल, अशी अपेक्षा होती. दुर्दैवाने, त्यासाठी आवश्यक असलेले पाणी देण्याचा निर्णय घेण्यासाठी बापट यांनी कालवा समितीची बैठकच घेतली नाही. आचारसंहितेचे कारण पुढे केले जात असले, तरी गेल्या महिन्याभरातही ही बैठक घेण्यात चालढकल केली गेली. अखेर, आचारसंहिता जाहीर होण्यापूर्वी पुणेकरांना खुश करण्यासाठी दोन वेळा पाणी देण्याचा निर्णय घेतला जाण्याचे संकेत मिळत आहेत. त्यासाठी, मंगळवारी ही बैठक थेट मंत्रालयातच घेण्याचा निर्णय बापट यांनी घेतला असून, त्यासाठी पाटबंधारे, महापालिका विभागाच्या सर्व अधिकाऱ्यांसह आमदारांना मुंबईला खेप मारावी लागणार आहे.
खडकवासला धरणातून सध्या २०.८१ टीएमसी पाणीसाठा आहे. सध्याच्या धोरणानुसार दिवसातून एकदाच पाणीपुरवठा कायम ठेवल्यास जुलैअखेरपर्यंत ९.५ टीएमसी पाणी शहरासाठी आवश्यक आहे. तर दोनवेळा पाणीपुरवठा करण्याचा निर्णय घेतला गेल्यास, १०.३ टीएमसी पाण्याची आवश्यकता आहे. त्यामुळे, दोन वेळा पाणीपुरवठा केला जाण्याची मागणी विरोधी पक्षांसह स्वयंसेवी संस्थांनी केली आहे.

‘पाणी तोडणाऱ्यांवर कारवाई करा’
पुण्याशी संबंधित महत्त्वाचा निर्णय घेण्यासाठी कालवा समितीची बैठक पुण्यातच घेणे गरजेचे होते; पण काँग्रेसकडून जाब विचारला जाईल, या भीतीने पुण्याऐवजी मुंबईत बैठक घेण्यात येत असल्याचा आरोप काँग्रेसचे विरोधी पक्षनेते अरविंद शिंदे यांनी केला. शहराला दिवसातून दोनदा पाणी मिळावे आणि पुण्याचे पाणी तोडणाऱ्या अधिकाऱ्यांवर फौजदारी गुन्हा दाखल केला जावा, अशी आग्रही मागणी शिंदे यांनी आयुक्त कुणाल कुमार यांना दिलेल्या पत्रात केली आहे.

‘सजग’ची गांधीगिरी
पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता पांडुरंग शेलार यांनी शेतीसाठी प्रक्रिया केलेल्या पाण्याचा वापर करण्याऐवजी धरणांतील शुद्ध पाण्याचा वापर केल्याच्या निषेधार्थ सजग नागरिक मंचाच्या विवेक वेलणकर व विश्वास सहस्रबुद्धे यांनी ‘गांधीगिरी’ पद्धतीने आंदोलन करून शेलार यांचा पुष्पगुच्छ देऊन सोमवारी सत्कार केला. कालवा समितीची मान्यता न घेताच, गेल्या ४० दिवसांपासून शुद्ध पाण्याचा पाणीपुरवठा केला जात असताना, मुंढवा जॅकवेलमधून २४ दिवस एक थेंबही पाणी घेण्यात आले नसल्याचा आरोप त्यांनी केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मेट्रो प्रकल्प रखडणार नाही

$
0
0

‘एनजीटी’च्या मनाईबाबत महामेट्रोचे स्पष्टीकरण

म. टा. प्रतिनिधी, पुणे

पुणे मेट्रो प्रकल्पाच्या नदीपात्रातील मार्गात कोणत्याही स्वरूपाचे बांधकाम करण्यास राष्ट्रीय हरित लवादाने (एनजीटी) मनाई केली असली, तरी यामुळे मेट्रोचा संपूर्ण प्रकल्प पुन्हा रखडण्याची शक्यता अजिबात नाही, असा निर्वाळा महामेट्रोच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिला. कायदेशीर आणि तांत्रिक बाजूंचा परामर्श घेऊन एनजीटीसमोर पुढील सुनावणीच्यावेळी योग्य भूमिका मांडण्यात येईल, असा विश्वास महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक ब्रिजेश दीक्षित यांनी व्यक्त केला.
एनजीटीने सोमवारी सकाळी मेट्रोच्या बांधकामाला स्थगिती दिल्याचे वृत्त वाऱ्यासारखे फिरले. पंतप्रधानांच्या हस्ते भूमिपूजन झाल्यानंतर मेट्रोच्या कामाला नुकतीच गती मिळत असताना, एनजीटीच्या स्थगितीमुळे पुन्हा ‘पहिले पाढे पंचावन्न’ अशीच गत होणार, अशी भीती अनेकांना वाटू लागली. राजकीय नेतेमंडळी आणि पुढाऱ्यांनीही त्यावरून आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी सुरू केल्या. परंतु, एनजीटीने केवळ अंतरिम स्थगिती दिली असून, २५ जानेवारीला पुढील सुनावणी होणार असल्याचे स्पष्ट केले आहे. मेट्रो मार्गिकांबाबत कायदेशीर आणि तांत्रिक सल्ला घेण्यात येणार असून, महामेट्रोतर्फे कोर्टापुढे सर्व बाजू व्यवस्थित मांडण्यात येणार असल्याचा दिलासा दीक्षित यांनी दिला. ‘एनजीटीसमोर सुरू असलेल्या याचिकेवरील सुनावणीमध्ये महामेट्रो निश्चित सहभागी होईल. किंबहुना, तोपर्यंत महामेट्रोच्या स्थापनेची सर्व प्रक्रिया पूर्ण झाली असल्याने महामेट्रोतर्फे पुढाकार घेण्यात येईल. सर्व कायदेशीर बाबींची पूर्तता आणि नदीपात्रातील मार्गाबाबत घेण्यात येणाऱ्या आक्षेपांवर तज्ज्ञ आणि अभ्यासकांचे निष्कर्ष कोर्टासमोर सादर करण्याचा प्रयत्न असेल,’ असे दीक्षित म्हणाले.
नदीपात्रातील बांधकामाला स्थगिती दिल्याचे आदेश दिले असले, तरी मुळातच नदीपात्रात प्रत्यक्ष काम सुरू होण्यास आणखी किमान वर्षभराचा कालावधी लागण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. अंतरिम स्थगिती देताना, एनजीटीने मेट्रोसाठी सध्या सुरू असलेल्या कोणत्याही सर्वेक्षणावर किंवा कामांवर बंधने घातलेली नाहीत. त्यामुळे, मेट्रोचा प्रवास पुन्हा अडखळण्याची भीती नागरिकांच्या मनात असली, तरी ती लवकरच दूर होईल, असा विश्वास मेट्रोच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विद्यापीठातर्फे गझलांवर आंतरराष्ट्रीय चर्चासत्र

$
0
0

गझलगायन, गझलनृत्याचे प्रमुख आकर्षण

म. टा. प्रतिनिधी, पुणे

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या मराठी विभागाच्या वतीने ‘मराठी गझलेचा आंतरराष्ट्रीय संचार’ या विषयावर आंतरराष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे. विभागाच्या गेल्या ६६ वर्षांच्या इतिहासात प्रथमच अशाप्रकारच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
चर्चासत्रात गझलगायनाबरोबरच मराठी गझलांवर ‘गझलनृत्या’चा आविष्कार सादर करण्यात येणार आहे. विभागाच्या विद्यार्थिनी प्रसिद्ध लावणी नृत्यांगना रेश्मा मुसळे परितेकर गझलनृत्य सादर करणार आहेत. तसेच, सातासमुद्रापार गझलगायन करणारे कलावंत या निमित्त एकत्र येणार आहेत.
येत्या १२ ते १४ जानेवारी दरम्यान संत नामदेव सभागृहात आंतरराष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती विद्यापीठाचे मराठी विभागप्रमुख डॉ. अविनाश सांगोलेकर यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली. चर्चासत्राचे उद्‌घाटन ९० व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष डॉ. अक्षयकुमार काळे यांच्या हस्ते होणार आहे. प्रमुख उपस्थिती मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष डॉ. श्रीपाद जोशी यांची राहील. अध्यक्षस्थान कुलगुरू डॉ. वासुदेव गाडे भूषविणार आहेत. समारोप ज्येष्ठ साहित्यिक डॉ. नागनाथ कोत्तापल्ले यांच्या उपस्थितीत होणार आहे.
चर्चासत्राच्या उद्घाटनाला गझलगायन आणि गझलनृत्याची मेजवानी मिळणार आहे. तसेच, जगाच्या पाठीवर मराठी गझल, मराठी गझल जगभर पोहोचवण्यासाठी काय केले पाहिजे, मराठी गझलेतील विश्वात्मकता, गझलवाचन, हिंदी-उर्दू गझलेच्या तुलनेत मराठी गझल आदी चर्चासत्रे होणार आहेत. डॉ. बीदन अब्बा, शैलेंद्र साठे, सोनाली जोशी, नितीन वानखेडे, इलाही जमादार, गझलगंधर्व सुधाकर कदम, शशिकला शिरगोपीकर, दत्तप्रसाद रानडे, शिवानी शिरोडकर, शुभांगी पेठे, शाहीर सुरेशकुमार वैराळकर, दत्ता बाळसराफ, अप्पा ठाकूर, रवी धारणे, अजीज नदाफ, विश्वास वसेकर, जनार्दन म्हात्रे, विजया तेलंग, इक्बाल शेख, संतोष कुलकर्णी, प्रदीप निफाडकर यांच्यासह नामवंत गझलकार चर्चासत्रात सहभागी होणार आहेत.

मराठी गझल आता महाराष्ट्रापुरती किंवा भारतापुरती मर्यादित राहिली नसून, ती जगाच्या पाठीवर सर्वत्र संचार करताना दिसत आहे. तिचा अधिक धांडोळा घेण्याच्या दृष्टीने या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. प्रथम येणाऱ्यास प्रथम प्रवेश या तत्वावर सर्वांना प्रवेश दिला जाणार आहे. या चर्चासत्रात तीन पिढ्यांतील गझलगायक सहभागी होणार आहेत. त्याचा लाभ मराठी गझलेच्या क्षेत्रातील सर्वांनी घ्यावा.
डॉ. अविनाश सांगोलेकर, मराठी विभागप्रमुख

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

स्वच्छतेत घसरण

$
0
0

प्रभागांच्या सर्वेक्षणातील वास्तव; ‘स्वच्छ पुणे’ला धक्का

म. टा. प्रतिनिधी, पुणे

पुणे महानगरपालिकेने शहरातील सर्व प्रभागांच्या स्वच्छतेसाठी विविध स्वरूपाचे उपक्रम/योजना सुरू केल्या असल्या, तरी ‘स्वच्छ पुणे’ मोहिमेला मोठा धक्का बसला आहे. शहरातील सर्व प्रभागांच्या स्वच्छता सर्वेक्षणात महापालिकेच्या गुणांकनाचा टक्का घसरला असून, नव्या वर्षात पालिकेला पुन्हा प्रभागांतील सर्वेक्षणावर अधिक लक्ष केंद्रित करावे लागणार आहे.
शहरातील सर्व प्रभागांमध्ये स्वच्छतेचा आढावा पालिकेकडून दरमहा घेण्यात येतो. त्यामध्ये, घनकचरा वर्गीकरण, घनकचरा संकलन, सार्वजनिक स्वच्छतेच्या तक्रारींचे निराकरण आणि त्यामध्ये घट, सातत्याने कचरा साठणाऱ्या ठिकाणांची स्वच्छता, शौचालयांची उपलब्धता आणि उघड्यावरील स्वच्छतेचे प्रमाण अशा निषकषांवर सर्व प्रभागांचे दर महिन्याला मूल्यांकन केले जाते. या मूल्यांकनातील निकषांवर संपूर्ण शहराचे सरासरी गुणांकन निश्चित केले जाते. स्वच्छतेविषयी सातत्याने विविध उपक्रम-योजनांची अंमलबजावणी पालिकेने सुरू केल्याने या गुणांकनात सातत्याने सुधारणा सुरू होती. एप्रिलपासून या सर्वेक्षणाला सुरुवात करण्यात आली. त्याचे पहिले निष्कर्ष मे मध्ये जाहीर करण्यात आले. त्यावेळी, पाचपैकी जेमतेम १.९८ गुणांकन पालिकेला प्राप्त झाले होते. प्रत्येक महिन्याच्या पहिल्या दिवशीच सर्वेक्षणाचा सविस्तर अहवाल प्रसिद्ध केला जातो. पालिकेने नोव्हेंबर आणि डिसेंबर अशा गेल्या दोन महिन्यांच्या अहवालात ३.०२ असे आत्तापर्यंतचे सर्वोच्च गुणांकन प्राप्त केले होते. जानेवारीत प्रसिद्ध झालेल्या गेल्या महिन्याच्या स्वच्छता अहवालातील गुणांकनात महापालिकेची घसरण झाली असून, तीन महिन्यांपूर्वीच्या गुणांकनापेक्षाही कमी गुणांकन पालिकेला प्राप्त झाले आहे. हे स्वच्छतेचे गुणांकन २.६३ पर्यंत घसरले आहे. यापूर्वी, सप्टेंबरच्या अहवालात पालिकेला २.६५ गुणांकन प्राप्त झाले होते.
स्वच्छता आणि कचरा वर्गीकरण; तसेच तक्रार निवारणामध्ये पालिकेचा पुढाकार स्वागतार्ह असला, तरी वारंवार कचरा आढळणाऱ्या ठिकाणांमध्ये सुधारणा करण्यात पालिकेला संपूर्ण अपयश आल्याचे चित्र दिसून येत आहे. शहरात अनेक ठिकाणी कचरा साठून राहिल्याच्या तक्रारी नागरिकांकडून नेहमी केल्या जातात. हा कचरा वेळेत उचलला जात असल्याचा दावा घनकचरा विभागाकडून केला जात असला, तरी गेल्या महिन्यात कचऱ्याची परिस्थिती ‘जैसे थे’ राहिल्याचे स्पष्ट होत आहे. त्यामुळे, रस्त्यावर साठणारा कचरा उचलण्यासाठी महापालिकेला यापुढील काळात अधिक मेहनत घ्यावी लागणार आहे. नवीन वर्षात आणि त्यातही येणाऱ्या महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शहराला कचरामुक्त ठेवण्यासाठी पालिकेला प्राधान्य द्यावे लागणार आहे.

गेल्या पाच महिन्यांतील ‘स्वच्छ’ गुणांकन
महिना गुणांकन
जानेवारी २.६३
डिसेंबर ३.०२
नोव्हेंबर ३.०२
ऑक्टोबर २.९०
सप्टेंबर २.६५

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

येत्या गुरुवारी शहरात पाणी बंद राहणार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

पर्वतीसह वडगाव, लष्कर, एसएनडीटी, नवीन होळकर जलकेंद्राच्या अखत्यारित येणाऱ्या विविध पंपिंग स्टेशनमध्ये स्थापत्य/विद्युतविषयक अत्यावश्यक कामे करायची असल्याने येत्या गुरुवारी (५ जानेवारी) संपूर्ण शहराचा पाणीपुरवठा दिवसभर बंद राहणार आहे. शुक्रवारी (६ जानेवारी) उशिरा आणि कमी दाबाने पाणीपुरवठा होण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन पाणीपुरवठा विभागाने केले आहे.

पाणीपुरवठा बंद राहणारा भाग पुढीलप्रमाणे :
पर्वती जलकेंद्र : शहरातील सर्व पेठा, दत्तवाडी परिसर, राजेंद्रनगर, लोकमान्यनगर, डेक्कन परिसर, शिवाजी नगर परिसर, स्वारगेट परिसर, पर्वती गाव, पर्वती दर्शन, मुकुंद नगर, सहकार नगर, सातारा रोड परिसर, बिबवेवाडी परिसर, पद्मावती, बिबवेवाडी, तळजाई, कात्रज, धनकवडी, इंदिरानगर परिसर, कर्वे रोड ते एसएनडीटी परिसर, एरंडवणे, संपूर्ण कोथरूड परिसर, डहाणूकर कॉलनी, कर्वेनगर, लॉ कॉलेज रोड, सेमिनरी झोनवरील मिठा नगर, शिवनेरी नगर, भाग्योदय नगर, ज्ञानेश्वर नगर, साईबाबा नगर, सर्व्हे क्र (४२, ४६) कोंढवा खुर्द, कोंढवा बुद्रुक, पर्वती व पद्मावती टँकर भरणा केंद्र.
वडगाव जलकेंद्र : हिंगणे, आनंदनगर, वडगाव धायरी, आंबेगाव पठार, दत्तनगर, धनकवडी, कात्रज, भारती विद्यापीठ.
चतुःशृंगी/एसएनडीटी/वारजे जलकेंद्र : पाषाण, औंध, बोपोडी, खडकी, चतुःशृंगी परिसर, गोखलेनगर, जनवाडी, रेंजहिल्स, बावधन, बाणेर, चांदणी चौक, किष्किंधानगर, रामबाग कॉलनी, डावी-उजवी भुसारी कॉलनी, धनंजय सोसायटी, एकलव्य कॉलेज परिसर, महात्मा सोसायटी, गुरुगणेश नगर, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ परिसर, वारजे हायवे परिसर, वारजे माळवाडी, रामनगर, अहिरेगाव, पॉप्युलर नगर, अतुल नगर, शाहू कॉलनी, वारजे जलशुद्धीकरण परिसर, सूस, सुतारवाडी, भूगाव रोड परिसर.
लष्कर जलकेंद्र : लष्कर भाग, पुणे स्टेशन परिसर, मुळा रस्ता, कोरेगाव पार्क, ताडीवाला रस्ता, रेसकोर्स परिसर, वानवडी, कोंढवा, हडपसर, महंमदवाडी, काळेपडळ, मुंढवा, येरवडा परिसर, विश्रांतवाडी, नगर रस्ता, कल्याणी नगर, महाराष्ट्र हौसिंग बोर्ड कॉलनी, वडगावशेरी, चंदननगर, खराडी, सोलापूर रस्ता, गोंधळे नगर, सातववाडी.
नवीन होळकर : विद्या नगर, टिंगरे नगर, कळस, धानोरी, लोहगाव, विश्रांतवाडी परिसर.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पर्यावरणस्नेही संमेलन येत्या गुरुवारी पुण्यात

$
0
0

संमेलनाध्यकक्षपदी डॉ. रामचंद्र देखणे

म. टा. प्रतिनिधी, पुणे

किर्लोस्कर वसुंधरा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या निमित्ताने महाराष्ट्र साहित्य परिषद आणि सर परशुराम भाऊ महाविद्यालय यांच्यातर्फे ५ जानेवारी रोजी पर्यावरणस्नेही साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. या संमेलनाच्या अध्यक्षपदी संतसाहित्याचे ज्येष्ठ अभ्यासक डॉ. रामचंद्र देखणे यांची निवड करण्यात आली आहे. डॉ. देखणे लोकसाहित्य, लोकसंस्कृती आणि पर्यावरण या विषयावर आपले विचार मांडणार आहेत.
हे संमेलन स. प. महाविद्यालयाच्या लेडी रमाबाई सभागृहात सकाळी ११ ते ५ या वेळेत होणार आहे, अशी माहिती परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली. या वेळी संमेलनाच्या बोधचिन्हाचे अनावरण महाविद्यालयाचे प्राचार्य दिलीप शेठ यांच्या हस्ते झाले. परिषदेचे प्रमुख कार्यवाह प्रकाश पायगुडे, कोषाध्यक्ष सुनीताराजे पवार, महोत्सवाचे संयोजक वीरेंद्र चित्राव याप्रसंगी उपस्थित होते.
संमेलनाचे उदघाट्न ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते विकास आमटे यांच्या हस्ते होणार असून, उदघाट्न सत्रानंतर त्यांची प्रकट मुलाखत डॉ. मंदार परांजपे घेणार आहेत. वैशिष्ट्य म्हणजे विद्यार्थ्यांच्या साहित्याचे सादरीकरण या संमेलनात होणार आहे.
दुसऱ्या सत्रात पर्यावरणतज्ज्ञ अनिरुद्ध चावजी यांचे ‘रामायणातील पक्षीजीवन’ या विषयावर व्याख्यान होणार आहे. अशोक नायगावकर आणि रमजान मुल्ला यांच्या कवितांची मैफल रंगणार आहे. संमेलनाचा समारोप ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते व लेखक डॉ. अनिल अवचट यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे. या संमेलनासाठी प्रवेश विनामूल्य असून इच्छुकांनी ७३८५०२९८२५ या क्रमांकावर एसएमएसद्वारे अथवा masaparishad@gmail.com या ई-मेलवर नावनोंदणी करावी असे आवाहन प्रा. जोशी यांनी केले. नावनोंदणी करून संमेलनाला उपस्थित राहणाऱ्यांना सहभागाचे प्रमाणपत्र दिले जाणार आहे.

विद्यार्थी मांडणार पर्यावरण रक्षणाचे ठराव
साहित्य संमेलनाप्रमाणे या संमेलनाच्या समारोपाच्या सत्रात विद्यार्थी पर्यावरण रक्षणासाठीचे ठराव मांडणार आहेत. स्वतःच्या जीवन शैलीपासून ते महाविद्यालयाच्या परिसरातील पर्यावरणाबरोबरच भोवतालच्या पर्यावरणाच्या रक्षणाविषयीचे हे ठराव सूचक - अनुमोदकासह मंजूर करण्यात येणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सत्याविषयी खरेखुरे!

$
0
0

श्रीधर लोणी

कॅलेंडरचे एक पान उलटण्यापुरतेच नव्या वर्षाला मर्यादित करण्याचा कितीही प्रयत्न केला, तरी नवे वर्ष ते नवे वर्ष! नवे वर्ष सुरू होणार म्हणून भोवतालच्या सामाजिक, राजकीय, आर्थिक स्थितीत बदल होत नसला, तरी अनेकांमध्ये आंतरिक बदल होत असतो. अनेक जण गतवर्षातील कटुता स्मरून उमेदीने नव्या वर्षाचे स्वागत करतात; सरते वर्ष चांगले गेलेली मंडळी नव्या वर्षही असेच चांगले जावे, यासाठी उत्साहाने त्याला सामोरे जातात. संकल्प वगैरे सोडणारेही काही कमी नसतात. शिवाय एक साल इतिहासाच्या उदरात जाते आणि नवीन साल सुरू होते. त्यामुळे नव्या वर्षाच्या आरंभाचे महत्त्व नाकारता येणार नाही. नवे वर्ष ‘कोरे करकरीत’ असले, तरी आधीच्या वर्षांमधील घडामोडी घेतच ते पुढे सरकत असते. त्यामध्ये एक सलगता असते. गतवर्षातील अनेक घटनांचे, प्रक्रियांचे पडसाद स्वाभाविकच नव्या वर्षात उमटत असतात. त्यामुळे, ऑक्सफर्ड डिक्शनरीने गेल्या वर्षीचा शब्द म्हणून कोशात भर घातलेला ‘पोस्ट ट्रुथ’ हा शब्द नव्या वर्षातही असणार आहे; परंतु या शब्दापासून सुटका करून घेऊन खऱ्याखुऱ्या ‘सत्या’च्या दिशेने जाता आले, तर २०१७ हे वर्ष वेगळे ठरेल.

‘खरेखुरे सत्य’ हा शब्दप्रयोग बुचकळ्यात टाकणारा आहे; परंतु सोशल मीडियाच्या आजच्या जगात सत्य म्हणून मोठ्या प्रमाणावर असत्य गोष्टी व्हायरल केल्या जात असल्याने ‘खरेखुरे सत्य’ जाणून घेण्यासाठी तथ्ये तपासण्याची वृत्ती असावीच लागते. अन्यथा, ‘आपल्या राष्ट्रगीताला युनेस्कोने सर्वोत्तम राष्ट्रगीताचा दर्जा दिल्या’पासून ‘दोन हजार रुपयांच्या नोटेत चीप बसविण्यात आल्या’पर्यंतच्या आणि ‘गीतेतील श्लोकांच्या संख्येद्वारे आपले वय सांगण्या’पासून ‘आधुनिक तंत्रज्ञानाशी निगडित बहुतेक शोध आपल्याकडेच आधी कसे लागले हे सांगण्या’पर्यंतच्या अनेक बाबी मोठ्या जनसमूहाने ‘सत्य’ म्हणून स्वीकारल्या नसत्या! सत्य आणि असत्य या दोन्ही गोष्टी पांढरे आणि काळे यांच्यासारखे पूर्णपणे भिन्नता दर्शविणाऱ्या आहेत; परंतु सत्य आणि असत्य या दोहोंचे बेमालूम मिश्रण करून माहिती प्रसृत करणे ही काही नवीन गोष्ट नाही. प्राचीन काळापासून ते चालत आले आहे. मात्र, सोशल मीडियाच्या काळात अशी माहिती इतक्या वेगाने आणि इतक्या मोठ्या प्रमाणावर प्रसृत केली जात आहे, की सत्य आणि असत्य यांमधील भेदच कळणे अवघड होऊन बसले आहे. आम्ही सांगत असलेली एक अमूक गोष्टच अंतिम सत्य आहे, असा दावा करून सत्याचा आभास निर्माण करणारेही वाढले आहेत. या भ्रामक सत्याचे प्रत्यंतर २०१६मध्ये जगभर आढळल्यानेच ऑक्सफर्ड डिक्शनरीने ‘पोस्ट ट्रुथ’ या शब्दाचा समावेश शब्दकोशात केला आहे.

‘पोस्ट ट्रुथ’चे सत्योत्तर असे थेट मराठी भाषांतर करता येईल; परंतु या शब्दाचा आशय या भाषांतरात मावणारा नाही. शिवाय, इंग्रजीतील ‘पोस्ट’ या पूर्वपदाचा अर्थ ‘नंतर’ असाही येथे अभिप्रेत नाही. ‘पोस्ट ट्रुथ’ची व्याख्या करताना ऑक्सफर्ड शब्दकोशाने म्हटले आहे, की ‘इट इज रिलेटिंग टु ऑर डिनोटिंग सर्कमस्टन्सेस इन विच ऑब्जेक्टिव्ह फॅक्ट्स आर लेस इन्फ्लुएन्शियल इन शेपिंग पब्लिक ओपिनियन दॅन अपील्स टु इमोशन अँड पर्सनल बिलीफ.’ सार्वजनिक मतप्रणाली घडविताना सत्य किंवा वस्तुनिष्ठ माहितीपेक्षा भावनेचा वा वैयक्तिक श्रद्धांचा प्रभाव अधिक टाकणाऱ्या घटना म्हणजे ‘पोस्ट ट्रुथ’ घटना असा याचा अर्थ. सत्य उजेडात येऊ न देता भावनात्मकतेचा आधार घेऊन आपल्याला हवी ती गोष्ट जनमानसावर ठसविणे म्हणजे ‘पोस्ट ट्रुथ’. राजकारणात याचा वापर मोठ्या प्रमाणावर होतो. युरोपीय संघातून बाहेर पडण्यासाठी ब्रिटनमध्ये घेण्यात आलेल्या सार्वमताच्या वेळी (ब्रेक्झिट), तसेच अमेरिकेच्या अध्यक्षीय निवडणुकीत डोनाल्ड ट्रम्प यांनीही तेच केले. आपल्याकडील निवडणुकांत याहून वेगळे काय होत असते?

अमेरिकेच्या निवडणूक निकालाच्या आधीच ‘पोस्ट ट्रुथ’ या शब्दाची २०१६चा शब्द म्हणून निवड केली होती, असे ‘ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी प्रेस’च्या कॅथरीत मार्टिन सांगतात. ‘आपले शब्द आणि आपली संस्कृती यांच्यातील नाते स्पष्ट करणारा किंवा ते अधोरेखित करणारा शब्द आम्ही निवडत असतो; त्या वर्षाचा मूड दाखविणारा किंवा त्या वर्षावर प्रभाव टाकणारा शब्द आम्ही निवडतो,’ असे स्पष्टीकरणही त्यांनी केले आहे. हे खरे असले, तरी ‘पोस्ट ट्रुथ’ची अनुभूती काही नवीन नाही. ‘पोस्ट ट्रुथ’ ही संज्ञा नवीन नक्की आहे; परंतु ही प्रक्रिया काही आजची नाही. नजीकच्याच नव्हे, तर प्राचीन इतिहासातही याचे दाखले मिळू शकतात. ‘रेटून खोटे बोलले, की खरे वाटते’ किंवा ‘एकच खोटे सातत्याने बोलले, की तेच खरे असल्याचे सर्वांना वाटते,’ अशा प्रकारची वक्तव्ये आपल्याकडे अनेकदा केली जातात. उक्ती आणि कृती या दोहोंतून सत्याचा आभास निर्माण करण्याची प्रवृत्ती अनेकांमध्ये असते.

राजकारण, समाजकारण, अर्थकारण यांमध्ये या प्रवृत्ती बळावल्या, की भ्रामक सत्याची व्याप्ती वाढते आणि त्याचा इतका जाड पडदा समाजाच्या नजरेसमोर तयार होतो, की त्यामुळे दुसरे काही दिसेनासे होते. भ्रामक सत्याच्या साह्याने समाजावर गारूड निर्माण करणारे नेतृत्व पूर्वीही होते आणि आताही उदयाला येत आहेत. पूर्वीच्या काळी साधने कमी असल्याने या प्रक्रियेला विलंब लागत असे. आता साधने वाढली आहेत, माध्यमेही वाढली आहेत. त्यामुळे ही प्रक्रिया वेगाने तयार होऊ शकते. सर्वांच्याच हातात सोशल मीडिया असल्याने सत्याचा अपलाप करणाऱ्यांची संख्या वाढली आहे. त्यांच्यात स्पर्धाही निर्माण झाली आहे. दावे, प्रतिदावे केले जात आहेत. सत्यासत्याच्या या कोलाहलात सर्वसामान्यांचा संभ्रम होणे स्वाभाविक आहे. ते संभ्रमात राहावेत, त्यांची दिशाभूल व्हावी, यासाठीच जाणीवपूर्वक सत्याचा आभास निर्माण केला जातो.

स्मार्ट फोन हातात असल्याने प्रत्येक जण सोशल मीडियाचा एक भाग आहे. सोशल मीडियाने सर्वांनाच व्यक्त होण्याची संधी दिली आहे. एक प्रकारे हे अभिव्यक्तीसाठीचे सबलीकरण आहे. हे सबलीकरण स्वागतार्हच आहे. आपल्याला हवे ते मत प्रत्येकाने जरूर मांडावे; परंतु ‘आपले ते मत आणि इतरांनी टाकलेली ती पिंक’ अशी भूमिका असून चालणार नाही. प्रत्येकाच्या मताचा आदर ठेवण्याइतपत सहिष्णुता बाळगायलाच हवी. सोशल मीडियाद्वारे आपल्यापर्यंत येणारी प्रत्येक माहिती तपासून घेणे सर्वांना अर्थातच शक्यही नसते. ‘अभ्यासोनी प्रकटावे’ असे संतवचन असले, तरी सोशल मीडियावरील सारे प्रकटन अभ्यासानंतरचे नसते. ते असणे शक्यच आहे, असेही नाही. मात्र, आपल्यापर्यंत येणारी माहिती खरी नसते याची जाणीव प्रत्येकाला व्हायला हवी. आली पोस्ट, की कर फॉरवर्ड हा प्रकार थांबला, तरी अनावश्यक गोष्टी व्हायरल होण्याचे थांबू शकते. भ्रामक सत्याचे वाहक न बनण्याचा संकल्प नव्या वर्षात सर्वांनी सोडला, तर कदाचित ‘पोस्ट ट्रुथ’चा महिमा काहीसा कमी होऊ शकेल. अर्थात, ‘पोस्ट ट्रुथ’चा संस्थात्मक आधार वाढत असतानाच्या काळात, ही अपेक्षा कदाचित गैरवाजवी ठरू शकेल, हे खरे आहे; परंतु नव्या वर्षाच्या सुरुवातीला आशावादी राहायला काय हरकत आहे?

Shridhar.Loni@timesgroup.com

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


एसके@१९९२ = एसके@२०१७?

$
0
0

पराग करंदीकर

पुणे महापालिकेच्या निवडणुकीची घोषणा या आठवड्यामध्ये अपेक्षित आहे. सध्या सत्तेत असलेल्या राष्ट्रवादी कॉँग्रेसकडून सत्ता हिरावून घेण्यासाठी भारतीय जनता पक्षाने मोठी तयारी सुरू केली आहे. गेले काही दिवस भाजपमध्ये विविध पक्षांतील आजी माजी नगरसेवक तसेच भावी नगरसेवकांचे प्रवेश सुरू आहेत. काही जण कॉँग्रेसमधून राष्ट्रवादी कॉँग्रेसमध्ये प्रवेश करीत आहेत. शिवसेनेमध्येही काही नवीन चेहरे समाविष्ट होत आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेना पुन्हा एकदा आपला जनाधार शोधण्याचा प्रयत्न करीत आहे. रिपब्लिकन पक्षही आपल्या नवीन साथीदारांसह आपली संख्या वाढविण्यासाठी प्रयत्न करताना दिसतो आहे. येणारा आठवडा हा या पेक्षाही मोठ्या घडामोडींचा असणार आहे.

गेली पंचवीस वर्षे मी महापालिकेच्या निवडणुका जवळून पाहतो आहे. आताची परिस्थिती या पूर्वी कधी होती का, याचे उत्तर शोधताना मला १९९२ आणि २०१७च्या निवडणुकीची तुलना करण्याचा मोह आवरला नाही. चाळिशी पार केलेल्या सगळ्याच पुणेकरांना ती निवडणूक आठवत असेल. विठ्ठलराव गाडगीळ हे लोकसभेच्या १९९१च्या निवडणुकीत पराभूत झाले होते. मात्र, महापालिकेची सत्ता त्यांच्याच हातात होती. महापालिकेच्या सत्तारूढ काँग्रेस पक्षामध्ये गाडगीळ गट प्रभावी होता. शरद पवार हे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदावरून केंद्रामध्ये संरक्षणमंत्री झाले होते. तरीही, त्यांचे पुण्यातील लक्ष कायम होते. पुण्यात त्यांना मानणारेही कॉँग्रेसमध्ये अनेक नगरसेवक होते. मात्र, गाडगीळांचा पराभव झाल्यानंतर पवार गटाने त्यांच्याकडून पालिकेची सत्ता आपल्या ताब्यात घेण्यासाठी प्रयत्न सुरू केले होते. त्या काळात पवारांचे पुण्यातील कारभारी होते ते सुरेश कलमाडी. ते त्या वेळेस राज्यसभेचे सदस्य होते. पुण्यात राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा होणार असल्याची घोषणा झाली होती. तोपर्यंत कलमाडींची ओळख ही क्रीडा क्षेत्रामध्ये धडपडणारा संघटक अशीच होती. शहराच्या राजकारणामध्ये त्यांना कोणीच गांभीर्याने घेत नव्हते. कलमाडींचा कारभार हा त्यांच्या ‘पूना कॉफी हाउस’मधून सुरू होता. मात्र, त्यांच्याकडे कॉँग्रेसचा एखादा नगरसेवक जायचा. अन्यथा त्या पक्षातील दुय्यम कार्यकर्त्यांच्या मदतीनेच कलमाडी पुण्यात आपल्या आस्तित्वाचा लढा देत होते; पण पवारांनी लोकसभा निवडणुकीनंतर कलमाडींना महापालिकेमध्ये लक्ष घालण्याचे अधिकार दिले. किंबहुना आपला उत्तराधिकारी नियुक्त केले. तोपर्यंत गाडगीळांच्या पायाशी निष्ठा वाहणाऱ्यांनी एका रात्रीत गाडगीळवाडा ते कलमाडी हाउस हा प्रवास केला. आणि निवडणुकीची चाहूल लागताना इच्छुकांची गर्दी गाडगीळांच्या वाड्याऐवजी कलमाडींच्या हाउसवर व्हायला लागली.

आता भाजपमधील स्थिती अशीच काहीशी आहे. भाजपचे राज्यसभेचे सदस्य असलेल्या संजय काकडे यांना महापालिकेच्या आणि शहराच्या राजकारणामध्ये अपवादानेच स्थान होते. खासदार झाल्यानंतर काकडे यांनी प्रारंभी कॉँग्रेसशी व नंतर भाजपमधील नितीन गडकरींशी जवळीक साधली होती. त्यानंतर त्यांनी भाजपचे सहयोगी सदस्यपद स्वीकारले. तरीही, शहर भाजपवर वर्चस्व होते ते गिरीश बापट यांचेच. सहा वर्षांपूर्वी विधान परिषदेच्या निवडणुकीत आपल्याला विश्वासात न घेतल्याने बापट यांनी शहराध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. भाजपमध्ये त्या वेळेस मुंडे विरुद्ध गडकरी असे गट जोरात होते. मुंडे यांच्या निधनानंतर भाजपमध्ये गडकरी यांची राज्यातील भाजपवर एकहाती पकड बसली होती. पुण्यामध्ये अनिल शिरोळे खासदार झाले. मात्र, शिरोळे यांनी बापट यांच्याशी संघर्ष करून स्वतः महापालिकेच्या निर्णयांमध्ये उघड लक्ष घालण्याची भूमिका घेतली नाही. त्याच काळात देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले. पाहता पाहता पुण्यातील तरुण भाजप कार्यकर्त्यांना बळ देण्यास त्यांनी सुरुवात केली. फडणवीस यांनी बापट यांना जाहीरपणे कधीच विरोध केलेला नाही; पण त्यांचे अनेक निर्णय हे शहरामध्ये बापट यांच्याबरोबरच भाजपमध्ये आणखी एखादे सत्ताकेंद्र तयार होण्यास पोषक ठरले. संजय काकडे यांनी ही संधी साधत मुख्यमंत्र्यांबरोबरील आपली जवळीक वाढविली. हळूहळू काकडे यांनी आपल्या समर्थकांचे भाजपमध्ये प्रवेश करून घेण्यास सुरुवात केली.

कलमाडी यांनीही १९९२मध्ये असेच काही प्रवेश करून घेतले होते. रज्जाक रामपुरी, अनिल जाधव, शंकर पवार यांच्याबरोबरच आंदेकर कुटुंबीय असे त्या काळात गुन्हेगारी जगताशी संबंधित म्हणून नावे घेतली जाणारे अनेक जण कलमाडींनी कॉँग्रेसमध्ये आणले. त्यांना पालिकेची उमेदवारीही दिली. काकडे यांनीही दिनेश धावडे, शंकर पवार यांच्यासारखी मंडळी भाजपमध्ये आणली. त्यांच्यावर सध्या कोणतेही गुन्हे नसतील, पण त्यांची ओळख तीच आहे. कलमाडी यांनीही १९९२मध्ये काही काळ गाडगीळांशी जुळवून घेतले होते. सध्या काकडे बापटांशी जुळवून घेत आहेत.

अर्थात, कलमाडींची तुलना काकडे यांच्याशी करण्याचा हा प्रयत्न नाही. कलमाडी यांना पवारांचा थेट आशीर्वाद होता. काकडे यांना मुख्यमंत्र्यांनी जाहीर आशीर्वाद दिलेला नाही. त्याचप्रमाणे गाडगीळ लोकसभेत पराभूत झाले होते. बापट सलग पाचव्यांचा निवडून आलेले आणि मंत्री झालेले आहेत. कलमाडींचे संघटन कौशल्य सिद्ध झाले होते. काकडे यांना अजून बरीच मजल मारायची आहे. मात्र, मोदींच्या नोटबंदीच्या समर्थनार्थ पन्नास साठ हजार नागरिकांचा मोर्चा काढून त्यांनी आपणही बरेच काही करू शकतो, हे दाखवून दिले आहे. तेव्हा कॉँग्रेसमध्ये अनेक नामवंत चेहरे होते. प्रकाश ढेरे यांच्यापासून बाळासाहेब शिवरकरांपर्यंत आणि शिवाजीराव भोसलेंपासून बाळासाहेब शिरोळेंपर्यंत अनेक जण कलमाडींना मोजत नव्हते. काळाच्या ओघात कलमाडींनी त्यातील काहींना आपल्या बाजूला वळविले, तर काहींना विरोध करून संपविले. त्या काळात कलमाडींनी अभय छाजेड यांच्यापासून वंदना चव्हाण यांच्यापर्यंत अनेक तरुणांची मदत घेत आपले राजकारण पुढे रेटले. आज भाजपमध्येही बापटांपासून योगेश गोगावलेंपर्यंत आणि प्रकाश जावडेकरांपासून ते अनिल शिरोळेंपर्यंत अनेक जण काकडे यांना मान्यता देण्यास तयार नाहीत. तरीही, काकडे धडक मारण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत. कलमाडींकडे असलेली आर्थिक ताकद काकडे यांच्याकडेही आहे. वेळ पडल्यास ‘मसल पॉवर’ आपण गोळा करू शकतो हे त्यांनी दाखवून दिले आहे.

कलमाडी आणि काकडे यांच्यामध्ये असलेला आणखी एक मोठा फरक म्हणजे भाजपचा कणा हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आहे. कॉँग्रेसमध्ये ती व्यवस्था नव्हती. त्यामुळे गाडगीळांपासून कलमाडींपर्यंतचा कॉँग्रेसचा प्रवास बराच सुकर होता. येथे मात्र काकडे यांना संघाचा आशीर्वाद मिळविण्यासाठी मोठी कसरत करावी लागणार आहे.

भविष्यात नक्की काय होईल, हे आत्ता कोणालाच सांगता येणार नाही. कलमाडींनाही पुणेकर स्वीकारणार नाहीत असेच म्हटले जात होते. कलमाडींनी पुढे सुमारे पंधरा वर्षे पुण्यावर राज्य केले.

पुण्याच्या राजकारणामध्ये बदल होण्याची चिन्हे आहेत. हा बदल कसा असेल, कोणाच्या माध्यमातून असेल याची उत्तरे पुढच्या दोन महिन्यांत मिळतीलच. अजित पवारांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पुन्हा एकदा मुसंडी मारणार का, भाजपला सत्ता मिळविण्यासाठी शिवसेनेची मदत घ्यावी लागणार का, मनसेला पुणेकर पुन्हा पसंती देणार का, यासारख्या सगळ्याच प्रश्नांची उत्तरे मिळण्यासाठी आपल्याला पुढचे सुमारे पन्नास दिवस वाट पहावी लागणार आहे. त्याचबरोबर सुरेश कलमाडी यांच्याप्रमाणेच संजय काकडे प्रवास करणार का याचेही उत्तर त्याच दरम्यान मिळेल. या दोन ‘एसकें’चा हा प्रवास. इतिहासाची पुनरावृत्ती होते, असे म्हणतात. एसके@१९९२ = एसके@२०१७ हे समीकरण चूक, की बरोबर याचेही उत्तर त्याच वेळेस मिळेल.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नदीपात्रातील मेट्रोच्या कामास स्थगिती

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

‘महाराष्ट्र मेट्रो कार्पोरेटेशन कंपनी’ स्थापन होईपर्यंत नदीपात्रात मेट्रोचे कोणतेही काम करण्यास राष्ट्रीय हरित लवादाने (एनजीटी) सोमवारी स्थगिती दिली. ‘कंपनी स्थापन झाल्यावर याचिकेमध्ये कंपनीला प्रतिवादी करा, त्यांची बाजू ऐकल्यानंतरच पुढची सुनावणी होईल,’ असा आदेश राष्ट्रीय न्या. यू. डी. साळवी आणि डॉ. अजय देशपांडे यांनी दिले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते काही दिवसांपूर्वीच या प्रकल्पाचे भूमिपूजन करण्यात आले होते. त्यानंतर मेट्रोच्या विविध स्वरूपाच्या सर्वेक्षणांना सुरुवात झाली होती. मेट्रोच्या नदीपात्रातील प्रस्तावित मार्गामुळे पर्यावरणाला धोका निर्माण होणार असल्याची भीती व्यक्त करून पर्यावरण अभ्यासकांनी ‘एनजीटी’कडे दाखल केलेल्या याचिकेवर सोमवारी सुनावणी झाली. याबाबतच्या निर्णयात केवळ नदीपात्रातील बांधकामांवर निर्बंध लादण्यात आले असून, मेट्रोसाठी सुरू असलेल्या इतर कोणत्याही सर्वेक्षणावर आडकाठी नसेल, असे स्पष्ट करण्यात आले आहे.

पुण्यात मेट्रोची अंमलबजावणीची जबाबदारी ‘महाराष्ट्र मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशन’कडे (महामेट्रो) असल्याने त्यांनाही प्रतिवादी केले जावे, अशी मागणी करण्यात आली. या कंपनीच्या स्थापनेची प्रक्रिया अद्याप पूर्ण झालेली नाही. त्यामुळे, तोपर्यंत नदीपात्रातील मेट्रोशी निगडित काम थांबवावे, असे आदेश ‘एनजीटी’ने दिले.

कंपनीच्या अधिकृत नोंदणीनंतर याचिकेमध्ये त्यांनाही प्रतिवादी करून घ्यावे, त्यांची बाजू जाणून घेतल्यानंतर पुढीच कार्यवाही होईल, असे ‘एनजीटी’ने स्पष्ट केले असून, या प्रकरणी २५ जानेवारीला पुढील सुनावणी होणार आहे, अशी माहिती याचिकाकर्ते सारंग यादवाडकर आणि अॅड. असीम सरोदे यांनी सांगितले.

निर्णय नदीपात्रापुरताच

मेट्रोच्या नियोजनाशी संबंधित कामांवर एनजीटीने कोणतेही बंधन घातलेले नाही. केवळ नदीपात्रातून जाणाऱ्या प्रस्तावित मेट्रोमार्गापुरते हे आदेश मर्यादित आहेत. मेट्रो मार्गांचे नियोजन, त्याची रचना-आरेखन किंवा इतर भागांत सुरू असणारे मृदा सर्वेक्षण (जिओ-टेक्निकल सर्व्हे) ही कामे पूर्वीप्रमाणेच सुरू राहतील, असे महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पुणे: राम गणेश गडकरी यांचा पुतळा हटवला!

$
0
0

मटा ऑनलाइन वृत्त । पुणे

पुण्यातील संभाजी उद्यानात असलेला नाटककार राम गणेश गडकरी यांचा पुतळा अज्ञात समाजकंटकांनी हटवला आहे. मध्यरात्री अडीचच्या सुमारास १० ते १५ जणांनी हा पुतळा हटवला आणि जवळच्या मुठा नदीत फेकून दिल्याची माहिती पुढं आली आहे.

पुण्यातील जंगली महाराज रोडवर महापालिकेचे संभाजी उद्यान आहे. या उद्यानात राम गणेश गडकरींचा पुतळा होता. आचार्य अत्रे यांच्या हस्ते २३ जानेवारी १९६२मध्ये या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले होते. काल रात्री अचानक हा पुतळा हटवण्यात आल्यानं उलटसुलट चर्चेला उधाण आलं आहे.

उद्यानाच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर असलेला हा पुतळा राम गणेश गडकरी स्मारक समितीने पुणे महापालिकेला भेट दिला होता. पालिकेने उद्यानात सुरक्षा रक्षक नेमले आहेत. रात्री १० ते १५ कार्यकर्ते उद्यानात शिरले मात्र त्याची माहिती सुरक्षा रक्षकांना कशी समजली नाही, असा प्रश्न उपस्थित होत आहे. उद्यानातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात हा प्रकार कैद झाला आहे की नाही याबद्दल अद्याप समजू शकले नाही.

संभाजी ब्रिगेडचा हात?

राम गणेश गडकरी यांच्या महानाट्यातून संभाजी महाराज यांची बदनामी झाल्याचा आक्षेप संभाजी ब्रिगेडने घेतला होता. त्यामुळे या कृत्यामागे ब्रिगेडचा हात असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. काही दिवसांपूर्वीच पक्षीय राजकारणात उतरलेल्या संभाजी ब्रिगेडने पुणे पालिका निवडणुकीसाठी आक्रमक भूमिका घेतल्याचे दिसत आहे. मात्र, या संदर्भात कोणीही अधिकृत माहिती दिलेली नाही.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

'राम गणेश गडकरींचा पुतळा पुन्हा उभारू'

$
0
0

मटा ऑनलाइन वृत्त । पुणे

संभाजी उद्यानातील नाटककार राम गणेश गडकरी यांचा पुतळा हटवल्यानंतर याप्रकरणी राजकारण सुरू झालं आहे. 'राम गणेश गडकरी यांचा पुतळा पुन्हा उभा करू', असं महापौर प्रशांत जगताप यांनी सांगितलं. तसंच गडकरी यांचा पुतळा हटवून पुणेकरांमध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातोय, असा आरोपही महापौर जगताप यांनी केला आहे.​

राम गणेश गडकरी यांचा पुतळा हटवल्याची घटना निंदनीय आहे. या प्रकरणी चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत, असं पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांनी सांगितलं. ​दरम्यान, या प्रकरणी चार अज्ञातांविरोधात चोरीचा आणि मालमत्तेचे नुकसान केल्याचा गुन्हा डेक्कन पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे. महापालिकेच्या उद्यान प्रमुखांनी यासंदर्भात तक्रार केली आहे.

जंगली महाराज रोडवरील संभाजी उद्यानातील गडकरी यांचा पुतळा अज्ञात समाजकंटकांनी हटवला आहे. मध्यरात्री अडीचच्या सुमारास १० ते १५ जणांनी हा पुतळा हटवला आणि जवळच्या मुठा नदीत फेकून दिल्याचं सांगण्यात येतंय. आचार्य अत्रे यांच्या हस्ते २३ जानेवारी १९६२मध्ये या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले होते. काल रात्री अचानक हा पुतळा हटवण्यात आल्यानं उलटसुलट चर्चेला उधाण आलं आहे.

उद्यानाच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर असलेला हा पुतळा राम गणेश गडकरी स्मारक समितीने महापालिकेला भेट दिला होता. पालिकेने उद्यानात सुरक्षा रक्षक नेमले आहेत. रात्री १० ते १५ कार्यकर्ते उद्यानात शिरले मात्र त्याची माहिती सुरक्षा रक्षकांना कशी समजली नाही, असा प्रश्न उपस्थित होत आहे. उद्यानातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात हा प्रकार कैद झाला आहे की नाही याबद्दल अद्याप समजू शकले नाही.

संभाजी ब्रिगेडचा हात?

राम गणेश गडकरी यांच्या महानाट्यातून संभाजी महाराज यांची बदनामी झाल्याचा आक्षेप संभाजी ब्रिगेडने घेतला होता. त्यामुळे या कृत्यामागे ब्रिगेडचा हात असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. काही दिवसांपूर्वीच पक्षीय राजकारणात उतरलेल्या संभाजी ब्रिगेडने पुणे पालिका निवडणुकीसाठी आक्रमक भूमिका घेतल्याचे दिसत आहे. मात्र, या संदर्भात कोणीही अधिकृत माहिती दिलेली नाही.

नीतेश राणेंचा 'त्यांना' सलाम

काँग्रेस आमदार नितेश राणे यांनी या प्रकरणात उडी घेत ट्विट केलं आहे. राम गणेश गडकरी यांचा पुतळा हटवणाऱ्यांना त्यांनी सलाम केला आहे.



दरम्यान, शिवसंग्राम संघटनेचे नेते विनायक मेटे यांनी गडकरींच्या पुतळा तोडफोडीवर नाराजी व्यक्त केली आहे.
राम गणेश गडकरी यांचं योगदान मोठं. नासधूस करणं राज्याच्या संस्कृतीला साजेसं नाही.
- विनायक मेटे, नेते शिवसंग्राम

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सावित्रीबाईंबद्दल या ११ गोष्टी माहीत आहेत का?

$
0
0

मटा ऑनलाइन वृत्त । पुणे

स्त्री मुक्तीच्या आद्य प्रणेत्या सावित्रीबाई फुले यांची आज १८५वी जयंती. देशातील पहिल्या महिला शिक्षिका व नंतर मुख्याध्यापिका म्हणून त्यांनी काम केले. स्त्री शिक्षणाबरोबरच सामाजिक व सांस्कृतिक जीवनात परिवर्तन आणण्यातही सावित्रीबाईंचा सिंहाचा वाटा होता. सावित्रीबाईंच्या जयंतीनिमित्त त्यांच्याबद्दल जाणून घ्या महत्त्वाच्या गोष्टी...

>> साताऱ्यातील नायगाव येथे खंडोजी नेवासे आणि लक्ष्मीबाई यांच्या पोटी ३ जानेवारी १८३१ला सावित्रीबाईंचा जन्म झाला. वयाच्या नवव्या वर्षी म्हणजे १८४०मध्ये त्यांचा ज्योतिबा फुले यांच्याशी विवाह झाला.

>> लग्नानंतर एका वर्षातच ज्योतिबांनी त्यांना शिक्षण देण्यास सुरुवात केली.

>> मुलींना शिकण्याची सोय नसल्याने सावित्रीबाईंनी घरीच शिकून नॉर्मल स्कूल, छबिलदासवाडा, पुणे येथे अंकगणित, बाराखडी आणि इतर विषयांची परीक्षा दिली. त्यानंतर त्यांनी १८४५-४६ला तिसरी व १८४६-४७ला चौथी, नंतर दोन वर्षांचा कोर्स करून शिक्षकी पेशाचे ट्रेनिंग घेतले.

>> १८४८मध्ये भिडेवाड्यात भारतातील मुलींची पहिली शाळा सुरू केली. याच शाळेत सावित्रीबाईंनी प्रथम शिक्षिका व नंतर मुख्याध्यापिका म्हणून काम केले.

>> २८ जानेवारी १८५३ रोजी त्यांनी बालहत्या प्रतिबंधक गृहाची स्थापना केली.

>> १८५४मध्ये ‘काव्यफुले’ हा त्यांचा पहिला काव्यसंग्रह प्रसिद्ध झाला.

>> सावित्रीबाईंनी एका विधवेच्या मुलाला दत्तक घेऊन त्याला वारसपुत्र बनवले. पुढे १८८४ला यशवंतचा सत्यशोधक पद्धतीने विवाह लावून दिला.

>> सावित्रीबाईंचा दुसरा काव्यसंग्रह ‘बावन्नकशी सुबोध रत्नाकर’ हा १८९१ला म्हणजे ज्योतिबांच्या महानिर्वाणानंतर प्रसिद्ध झाला.

>> ज्ञानदानाचे कार्य करायला सावित्रीबाई घराच्या बाहेर पडत असे, तेव्हा एक साडी पिशवीत घेत असे, कारण रस्त्याने जाताना लोक चिखल वा शेण फेकून मारत आणि मग शाळेत गेल्यावर त्यांना साडी बदलावी लागे.

>> एका प्लेग झालेल्या मुलाची सेवा सुश्रुषा करत असताना त्यांना प्लेगची लागण झाली आणि १० मार्च १८९७ रोजी त्यांचे निधन झाले.

>> स्त्री शिक्षणाचे जे बीज सावित्रीबाईंनी त्यावेळेस लावले होते, त्याची फळे आजची भारतीय महिला चाखत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images