Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

मनसेच्या मुलाखतींना आजपासून सुरुवात

0
0

आतापर्यंत साडेचारशे अर्जांची विक्री

म. टा. प्रतिनिधी, पुणे

पक्षातील आउटगोइंगच्या चर्चा जोरात असल्या तरी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत प्रवेश करणाऱ्या इच्छुकांची संख्या काही कमी नाही. मंगळवारी, अर्जविक्रीच्या शेवटच्या दिवशीही पक्षाकडे अर्ज घेण्यासाठी इच्छुकांची झुंबड उडाली होती. आतापर्यंत सुमारे साडेचारशेहून अधिक अर्जांची विक्री झाली आहे. आजपासून पक्षातर्फे इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या जाणार आहेत.
मनसेतर्फे चार दिवसांपासून उमेदवारी अर्जांची विक्री सुरू होती. गेल्या दोन दिवसांत मात्र, मोठ्या प्रमाणावर अर्ज विकले गेले. अर्जांसाठी मंगळवारी सायंकाळपर्यंत पक्षाच्या कार्यालयात गर्दी कायम होती. फॉर्म विक्रीबरोबरच भरलेले फॉर्म स्वीकारणे, आलेले फॉर्म स्वीकारणे आदी कामे सुरू होती. आज, बुधवारपासून तीन दिवस मुलाखती घेण्यात येणार आहेत. आपटे रोड जवळील हॉटेल सेंट्रल पार्क येथे दुपारी बारापासून मुलाखतींना सुरुवात होईल. पक्षाचे नेते बाळा नांदगावकर, राजन शिरोडकर, अनिल शिदोरे, शहराध्यक्ष अजय शिंदे, हेमंत संभूस आणि पदाधिकारी या वेळी उपस्थित असतील.
इच्छुकांनी मुलाखतीला येताना वाजतगाजत, शक्तिप्रदर्शन करत यावे, अशा सूचना गेल्या आठवड्यातच पक्षाच्या बैठकीत देण्यात आल्या आहेत. त्यामुळे इच्छुक कामाला लागले असून, शक्तिप्रदर्शनाचे नियोजन सुरू आहे. त्याचबरोबर पक्षातर्फे मंगळवारी रात्रीपर्यंत मुलाखतींचे नियोजन आणि तयारी सुरू होती.

अतिरिक्त शुल्क परत
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे उमेदवारी अर्जासाठी प्रत्येकी १५ हजार रुपये शुल्क आकारण्यात येत होते. याबाबत पक्षप्रमुख राज ठाकरे यांना विचारल्यानंतर त्यांनी ताबडतोब हे शुल्क रद्द करण्याचे आदेश दिले. त्यानुसार आता हे शुल्क दोन हजार रुपये करण्यात आले आहे. तसेच पूर्वी ज्यांनी १५ हजार शुल्क भरले आहे, त्यांनाही अतिरिक्त शुल्क परत देण्यात येणार आहे, असे पक्षातर्फे स्पष्ट करण्यात आले.

गद्दारांना माफी नाही ?
पक्षाचे ज्येष्ठ नगरसेवक पक्षाला जय महाराष्ट्र करण्याच्या पावित्र्यात आहेत. सोमवारी खुद्द पक्षप्रमुख राज ठाकरे यांनी या नगरसेवकाचे 'स्टेटस' माहिती नसल्याचे सांगितले होते. बुधवारी मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यात संबंधित नगरसेवक भाजपवासी होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर पक्षाने संबंधित नगरसेवकाविरोधात दंड थोपटले असून, प्रसंगी पक्षाचे शहराध्यक्ष अजय शिंदे यांना मैदानात उतरविण्यात येणार असल्याचे समजते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


भाजपच्या इच्छुकांसाठी पक्षाचे ‘अनुशासन पर्व’

0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

नोंदणी शुल्क ऑनलाइन..., प्रारूप जाहीरनामा प्रभागात वितरीत केल्याचा पुरावा..., प्रभागातील तीनशे प्रतिष्ठित मंडळींशी चर्चा...इत्यादी..इत्यादी...
भारतीय जनता पक्षाच्या वतीने महापालिका निवडणूक लढविण्याच्या तयारीत असलेले शहरातील इच्छुक सध्या पक्षातील नव्या ‘हेडमास्तरां’च्या ‘अनुशासन पर्वा’चा अनुभव घेत आहेत. लोकसभा आणि विधानसभेत पक्षाला मोठे यश मिळाल्यामुळे महापालिकेच्या आगामी निवडणुकीत भाजपच्या वतीने लढण्यासाठी इच्छुकांची भाऊगर्दी झाली आहे.
एक हजारांहून अधिक इच्छुकांनी पक्षाकडून उमेदवारी अर्ज नेले असून, ते भरून पक्षाकडे सादर करण्याची प्रक्रिया सध्या पक्षाच्या शहर कार्यालयात सुरू आहे. शहराध्यक्ष योगेश गोगावले, कार्यालय प्रमुख उदय जोशी आणि खजिनदार विनायक आंबेकर यांच्या देखरेखीखाली यासाठी कार्यालयात खास व्यवस्थाही करण्यात आली आहे. प्रथम अर्ज भरून विधानसभा मतदारसंघानुसार लावलेल्या टेबलवर देणे अपेक्षित आहे. त्यावेळी इच्छुकांना पक्षाने तयार केलेला प्रारूप जाहीरनामा, तसेच डि​जिटल पेमेंट-तंत्र आणि मंत्र या पुस्तिकेच्या प्रती देण्यात येत आहेत. तसेच पक्षाकडून प्रभागांचाही जाहीरनामा देण्यात येत आहे. या प्रती इच्छुकांनी आपापल्या प्रभागात वितरीत करून तेथे चाय पे चर्चा किंवा परिसंवाद-व्याख्याने आयोजित करण्याची सूचना करण्यात आली आहे. आपापल्या भागातील सोसायट्या, वस्ती, हास्य क्लब, ज्येष्ठ नागरिक संघ, तसेच डॉक्टर, वकील अशा गटांशी संपर्क साधून त्यांच्या सूचनांचे संकलन करणे अपेक्षित आहे. या पुस्तिका पोहोचविलेल्या संबंधित कुटुंबांची माहिती त्यांच्या मोबाइल नंबरसह पक्षाकडे सादर करण्याचीही सूचना इच्छुकांना करण्यात आली आहे. ही सर्व पूर्तता १५ जानेवारीपूर्वी करणे अपेक्षित आहे. येत्या काही दिवसांत इच्छुकांच्या मुलाखती घेण्यात येणार आहेत.

वॉर रूमला मुख्यमंत्र्यांची भेट
पक्षाच्या शहर कार्यालयात निवडणुकीसाठी वॉर रुम सुरू करण्यात येत असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज, बुधवारी कार्यालयास भेट देणार आहेत. इच्छुक तसेच उमेदवारीच्या संदर्भात काहीही निर्णय झाले, तरी पक्षाच्या वतीने काम करणारी एक यंत्रणा असावी, या उद्देशाने ही तयारी सुरू असल्याचे सांगण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पक्षप्रवेशांसाठी इच्छुक नगरसेवकांचे राजीनामे

0
0

मिलिंद काची, प्रिया गदादे, रेखा टिंगरे, सुनीता गलांडेंचा समावेश

म. टा. प्रतिनिधी, पुणे

महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांचे नेते मंडळी आज, बुधवारी शहरात येत असल्याने त्यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश होण्याची शक्यता आहे. दुसऱ्या पक्षात प्रवेश करणे सुलभ व्हावे, यासाठी काँग्रेसच्या दोन, राष्ट्रवादी काँग्रेस आणि मनसेचे प्रत्येकी एक अशा चार विद्यमान नगरसेवकांनी मंगळवारी आपल्या पदाचा राजीनामा दिला. महापालिका आयुक्त कुणाल कुमार यांच्याकडे राजीनामे देण्यात आले असून, सर्वांचे राजीनामे स्वीकारण्यात आले आहेत.
पालिका निवडणुकीच्या तोंडावर एका पक्षातून दुसऱ्या पक्षात प्रवेश करण्यासाठी अनेकांनी काही महिन्यांपासून जोरदार तयारी आरंभली आहे. यापूर्वी काँग्रेस, राष्ट्रवादी तसेच मनसेच्या काही विद्यमान नगरसेवकांनी आणि पदाधिकाऱ्यांनी पक्षाला सोडचिठ्ठी देऊन भाजपमध्ये छुपा प्रवेश केला आहे. पालिका निवडणुकीची आचारसंहिता पुढील तीन ते चार दिवसात लागू होण्याची शक्यता असल्याने विविध विकासकामांची उद्घाटने करण्यासाठी आज, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार, शिक्षणमंत्री विनोद तावडे शहरात येत आहेत. या नेत्यांच्या उपस्थितीत पक्षात प्रवेश करण्यास काही अडचण येऊ नये, तसेच दुसऱ्या पक्षात प्रवेश केल्यानंतर पक्षांतर्गत कारवाई होऊ नये यासाठी चार नगरसेवकांनी आपले राजीनामे दिले.
मध्यवर्ती भागातील काँग्रेसचे नगरसेवक मिलिंद काची, पर्वती मतदारसंघातील मनसेच्या नगरसेविका प्रिया गदादे, धानोरी येथील राष्ट्रवादीच्या नगरसेविका रेखा टिंगरे यांच्यासह वडगावशेरी भागातील काँग्रेसच्या नगरसेविका सुनीता गलांडे अशी राजीनामा दिलेल्यांची नावे आहेत. यापूर्वी राष्ट्रवादीचे नगरसेवक बापूराव कर्णे गुरुजी, दिनेश धाडवे यांनीही नगरसेवकपदाचा राजीनामे देऊन भाजपमध्ये प्रवेश केला आहे. बुधवारी शहरातील विविध भागात होणाऱ्या विकासकामांच्या उद्घाटनामध्ये पालिकेतील विद्यमान नगरसेवक वेगवेगळ्या पक्षात प्रवेश करण्याची शक्यता आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चंडीगडसाठी विमानसेवा

0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
एअर इंडियातर्फे पुणे ते चंडीगड दरम्यान थेट विमानसेवा सुरू करण्यात येत आहे. ही सेवा येत्या १६ जानेवारीपासून सुरू होणार आहे. ‘एआय ८१३ हे विमान चंदीगडवरून १० वाजून ५० मिनिटांनी उड्डाण करेल व एक वाजून २० मिनिटांनी पुण्यात पोहोचेल. तर परतीचे विमान दोन वाजता पुण्याहून निघून साडेचार वाजता चंदीगडला पोहोचेल. शनिवार, रविवार सोडून दररोज ही विमानसेवा उपलब्ध असेल,’ अशी माहिती एअर इंडियाचे पुण्यातील स्थानक व्यवस्थापक सुहास जाधव यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सरकारी योजनांच्या लाभासाठी झगडावे लागते

0
0

ज्येष्ठ समाजसेवक डॉ. विकास आमटे यांची खंत
म. टा. प्रतिनिधी, पुणे
‘आनंदवन स्थापन होऊन सत्तर वर्षे झाली, तरी देखील तेथील रहिवाशांना सरकारच्या योजनांचा लाभ घेण्यासाठी झगडावे लागते. तेथील कित्येक रहिवाशांकडे अद्याप आधार कार्ड नाहीत. एवढचं काय काही लोकांना कामानिमित्त आणि निमंत्रणाहून परदेशात जायचे आहे. मात्र, पासपोर्ट नसल्याने त्यांना परदेशात जाता येत नाही,’ अशी खंत ज्येष्ठ समाजसेवक डॉ. विकास आमटे यांनी बुधवारी व्यक्त केली.
डॉ. आमटे यांना किर्लोस्कर वसुंधरा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात ‘वसुंधरा सन्मान’ बुधवारी प्रदान करण्यात आला. त्यापूर्वी डॉ. आमटे यांनी वार्तालापात पत्रकारांशी संवाद साधला. या वेळी जलबिरादरीचे सुनील जोशी, सागरमित्रचे विनोद बोधनकर, महोत्सवाचे समन्वयक विरेंद्र चित्राव, डॉ. सचिन पुणेकर आदी उपस्थित होते.
डॉ. आमटे म्हणाले, ‘आनंदवन स्थापन होऊन सत्तर वर्षे झाली, मात्र तेथील रहिवाशांना सरकारच्या साध्या योजनांचा लाभ घेण्यासाठी आतापर्यत झगडावे लागते. देशात सर्वत्र नागरिकांचे आधारकार्ड काढण्यात येत आहे. मात्र, केवळ आनंदवन आणि महारोगी सेवा समितीच्या नावाहून रहिवाशांचे आधार कार्ड काढलेले नाही. आधार कार्ड काढताना बायोमेट्रिक्स आणि इतर तंत्रज्ञानाचा वापर करावा लागतो. मात्र, कुष्ठरोग्यांना या तंत्रज्ञानाचा वापर करण्यात अडचणी येतात. त्यामुळे त्यांचे अद्याप आधार कार्ड तयार झालेले नाही. त्यामुळे सरकारी योजनांचा लाभ घेता येत नाही. सरकारने त्यांच्यासाठी दुसऱ्या उपाययोजनेचा विचार केलेला नाही. आधार कार्ड नसल्याने पासपोर्ट निघत नाही. त्यामुळे काही लोकांना कामानिमित्त आणि निमंत्रणाहून परदेशात जाता येत नाही. याबाबत उदाहरणच द्यायचे झाल्यास आनंदवनातील काही कलावंतांना त्यांची कला दाखवण्यासाठी परदेशात जाता येत नाही.’
‘देशात स्मार्ट व्हिलेज तयार करण्याची प्रक्रिया सुरू आहे. मात्र, देशातील पहिले एलपीजी विरहित ‘स्मार्ट व्हिलेज’चा दर्जा आनंदवन व परिसराला अमेरिकेच्या संस्थेने नुकताच दिला आहे. या ‘स्मार्ट व्हिलेज’ची निर्मिती ‘आनंदवना’ने स्वबळावर केली आहे. येत्या काही दिवसात कुष्ठरोग्यांच्या स्मरणार्थ आनंदवनात एक समाधी बांधण्याचा आमचा विचार सुरू आहे. त्यासाठी जाणकार लोकांशी बोलणे सुरू आहे,’ असे डॉ. आमटे यांनी सांगितले.
..........
वृक्षदिंडीचे प्रवर्तक बाबा आमटे
बाबा आमटेंनी दिवंगत साहित्यिक पु. ल. देशपांडे यांना सोबत घेऊन ‘अनाम मूक कळ्या’ ही वृक्षांची पहिली स्मरणशिला आनंदवनात तयार केली. मात्र, त्यावर लोकांनी टीका केली. ‘वृक्ष दिंडी’ आणि ‘पर्यावरण यात्रा’ ही संकल्पना देशात सर्वप्रथम बाबांनी सुरू केली. मात्र, त्याचे स्मरण होत नाही. याकरता त्यांनी सोमनाथ ते एकनाथ, गोदा से नर्मदा, कन्याकुमारी ते काश्मीर, अरुणाचल ते गुजरात या सारख्या लाँग मार्चचे आयोजन केले. या प्रवासादरम्यान त्यांनी लाखो झाडे लावली. ‘भारत जोडो-वन अभियान’ देखील राबविले. ‘हात लगे निर्माण में, ना मांगने में, ना मारने में’ हा नारा त्यांनी वृक्ष संवर्धानासाठी दिला. पु. ल. देशपांडे, यदुनाथ थत्ते, मुकुंदराव किर्लोस्कर यांनी बाबांना त्यांच्या या चळवळीत मदत केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

डीपीत ८५० आरक्षणे कायम

0
0

त्रिसदस्यीय समितीचा प्रस्ताव बाजूला
म. टा. प्रतिनिधी, पुणे
पुणे शहराच्या संपूर्ण परिवर्तनाचा प्रयत्न राज्य सरकारकडून सुरू असून, प्रलंबित विकास आराखड्याला सरकारने मान्यता दिल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी केली. विकास आराखड्यात (डीपी) सुचविण्यात आलेली ९३७ आरक्षणांतून ३८० हून अधिक आरक्षणे वगळण्याचा त्रिसदस्यीय समितीच्या प्रस्ताव बाजूला ठेवून, ८५० आरक्षणे कायम करण्यात आल्याचेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.
वडगावशेरी येथील छत्रपती शिवाजी महाराज उद्यानाच्या लोकार्पण सोहळ्यानंतर मुख्यमंत्र्यांनी डीपीला मान्यता दिल्याचे अधिकृत रीतीने जाहीर केले. राज्य सरकारने मार्च २०१५ मध्ये महापालिकेच्या ताब्यातून डीपी काढून घेतला होता. विभागीय आयुक्त एस. चोक्कलिंगम यांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या त्रिसदस्यीय समितीने तब्बल ३८० आरक्षणे वगळण्याची शिफारस केली होती. त्यावरून, विरोधी पक्षांनी जोरदार टीका करून शहराच्या हिताचा निर्णय घेण्याची मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली होती. शहरातील खासदार-आमदारांशीही मुख्यमंत्र्यांनी सविस्तर चर्चा केली. शहरासाठी आवश्यक आरक्षणे कायम राहावीत, अशीच आग्रही मागणी सर्वांनी केली होती. ‘डीपी’चा अभ्यास करण्यासाठी नेमलेल्या छाननी समितीनेही काही मोजकीच आरक्षणे वगळण्याची शिफारस केली होती. त्यानुसार, साडेआठशे आरक्षणे कायम ठेवण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. सरकारी जागांवरील काही मोजकीच आरक्षणे बदलण्यात आल्याचे सूतोवाच त्यांनी केले.
शहराच्या विकासासाठी आवश्यक असलेल्या मेट्रो प्रकल्पासाठी ‘इन्फ्लुएन्स झोन’; तसेच शहरांतर्गत उच्च क्षमता वर्तुळाकार रस्ता (एचसीएमटीआर) याचा आराखडाही (अलाइनमेंट) ‘डीपी’मध्येच निश्चित करण्यात आला आहे, असे त्यांनी सांगितले.
शहराच्या मध्य वस्तीतील पेठांच्या भागांमध्ये अनेक ठिकाणी रस्ता रुंदीमुळे घरे बाधित होणार होती. पेठांच्या बहुतांश भागांत भाजपला मानणारा वर्ग असल्याने ही रस्ता रुंदी रद्द करण्याची मागणी केली जात होती. त्यानुसार, बाधित घरांना संरक्षण देत जुन्या भागांत कमीत कमी तोडफोड होईल, याकडे लक्ष देण्यात आल्याचे मुख्यमंत्र्यांनी नमूद केले.
जुन्या इमारतींचा पुनर्विकास, झोपडपट्टीधारकांसाठी अतिरिक्त सवलती अशा छाननी समितीने केलेल्या शिफारसी स्वीकारण्यात आल्याचे सांगत मुख्यमंत्र्यांनी शहराचा समतोल विकास साधण्यावरच सरकारचा भर असेल, असे सांगितले.
.....................
- फेब्रुवारी २००७ : जुन्या हद्दीचा विकास आराखड्याचे (डीपी) पुनरावलोकन करण्यासाठी इरादा जाहीर
- डिसेंबर २००७ ते ऑगस्ट २०१२ : डीपीचे प्रा-रूप सादर करण्यासाठी राज्य सरकारकडून वेळोवेळी मुदतवाढ
- डिसेंबर २०१२ : एप्रिल २०१३ पूर्वी प्रा-रूप डीपी सादर करण्याचे राज्य सरकारचे आदेश
- जानेवारी आणि मार्च २०१३ : उपसूचनांसह प्रा-रूप डीपीला मान्यता देण्याच्या प्रस्तावास महापालिकेच्या सर्वसाधारण सभेची मंजुरी
- मार्च २०१३ : हरकती-सूचनांसाठी प्रा-रूप डीपी प्रसिद्ध
- जून २०१३ : प्रा-रूप विकास आराखड्यांवर हरकतींचा पाऊस. ८७ हजार हरकती दाखल
- फेब्रुवारी २०१४ : हरकतींवर सुनावणी घेण्यासाठी नियोजन समितीची स्थापना
- मे २०१४ : हरकतींवरील सुनावणीची प्रक्रिया सुरू
- फेब्रुवारी २०१५ : नियोजन समितीचा अहवाल सर्वसाधारण सभेस सादर
- मार्च २०१५ : सरकारने डीपी पालिकेकडून ताब्यात घेऊन त्रिसदस्यीय समितीकडे सोपविला.
- सप्टेंबर २०१५ : त्रिसदस्यीय समितीकडून डीपीचा अहवाल सरकारला सादर
- नोव्हेंबर २०१५ : ‘डीपी’शी संबंधित विकास नियंत्रण नियमावली (डीसी रूल्स) सरकारकडे सादर
- एप्रिल २०१६ : ‘डीपी’वर निर्णय घेण्यासाठी छाननी समितीची नियुक्ती
- जानेवारी २०१७ : ‘डीपी’ला अंतिम मान्यता

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

त्रिसदस्यीय समितीच्या शिफारशींना कात्री

0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
महापालिकेच्या ताब्यातून शहराचा विकास आराखडा (डीपी) काढून घेतल्यावर तो सरकारला सादर करण्यासाठी नेमलेल्या त्रिसदस्यीय समितीच्या अनेक शिफारसींना राज्य सरकारने कात्री लावली आहे. तब्बल ३८० आरक्षणे वगळण्याचा समितीचा प्रस्ताव बासनात गुंडाळून ठेवत, समितीने सुचविलेले अनेक बदलही सरकारने रद्द केले आहेत. त्यामुळे, समितीने केलेल्या अनेक शिफारसींवर झालेली टीका संयुक्तिकच होती, हे सरकारने घेतलेल्या अंतिम निर्णयावरून स्पष्ट होते.
राज्य सरकारने विभागीय आयुक्त एस. चोक्कलिंगम यांच्या अध्यक्षतेखाली महापालिका आयुक्त कुणाल कुमार आणि नगररचना सहसंचालक प्रकाश भुक्ते यांची त्रिसदस्यीय समिती नेमली होती. या समितीने सहा महिन्यांत त्यांचा अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आले होते. या समितीने सप्टेंबर २०१५ मध्ये ‘डीपी’चा अहवाल सरकारला सादर करताना, त्यातून ३८० आरक्षणे वगळण्याची धक्कादायक शिफारस केली होती. १९८७ च्या डीपीची केवळ ३० टक्के अंमलबजावणी झाली असून, अनेक आरक्षणे अजून ताब्यात घेण्यात आली नसल्याने ही आरक्षणे वगळण्यात यावी, असे सुचविण्यात आले होते. त्रिसदस्यीय समितीने सुचविलेल्या शिफारसींवर सर्व स्तरांतून टीका केली जात होती. या समितीने ‘फंजिबल एफएसआय’ (चटई क्षेत्र निर्देशांक) अशी संकल्पना मांडली होती. ही संकल्पना रद्द करण्यात आली असून, त्याऐवजी अधिमूल्य आकारून एफएसआय आणि विशिष्ट वापराकरिता जादा एफएसआय मंजूर करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
‘डीपी’मध्ये अंतर्गत रस्त्यांच्या विकसनासाठी रस्तारुंदी प्रस्तावित करण्यात आली होती. वारंवार त्याच ठिकाणी रस्तारुंदी सुचविली जात असल्याने त्यालाही विरोध केला जात होता. त्यामुळे, काही भागांतील रस्ता रुंदी कमी करून आवश्यक तेथे नवीन रस्ते प्रस्तावित करण्यात आल्याचे सरकारने स्पष्ट केले आहे. मोठ्या रुंदीच्या रस्त्यांवर जादा एफएसआय मंजूर केला जाणार आहे.
................
‘मेट्रो झोन’ निश्चित
शहरात दोन मेट्रो मार्ग प्रस्तावित असून, शहराच्या प्रमुख रस्त्यांवरील मेट्रो मार्गांची निश्चिती विकास आराखड्यात करण्यात आली आहे. त्यानुसार, मेट्रो मार्गंच्या दोन्ही बाजूस ठराविक अंतरावर ‘मेट्रो झोन’ दर्शविण्यात आला असून, त्यावरील जमिनी/इमारतींना रस्ता रुंदीनुसार विशिष्ट मर्यादेपर्यंत टीडीआर किंवा अतिरिक्त एफएसआय लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

डोंगरमाथा, डोंगरउताराबाबत निर्णय राखीव

0
0

तरतुदींमध्ये समानता यावी म्हणून सरकारचा निर्णय
म. टा. प्रतिनिधी, पुणे
शहराच्या जुन्या हद्दीचा विकास आराखडा (डीपी) आणि समाविष्ट गावांचा डीपी यातील तरतुदींमध्ये एकसारखेपणा असावा, या दृष्टीने डोंगरमाथा व डोंगर उतारावरील बांधकामाचा निर्णय राखून ठेवण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. त्यामुळे, समाविष्ट गावातील जैववैविध्य उद्यानांसाठी आरक्षित जागेसह (बीडीपी) जुन्या हद्दीतील डोंगरमाथा-डोंगरउतार या ठिकाणी भविष्यात एकच नियम लागू होण्याची शक्यता आहे.
समाविष्ट गावांमधील ‘बीडीपी’मध्ये ठराविक मर्यादेपर्यंत बांधकामाला परवानगी देण्यात यावी, अशी भारतीय जनता पक्षासह राष्ट्रवादी काँग्रेसची प्रमुख मागणी आहे. तर, शहराचा पर्यावरणीय समतोल कायम राहावा, यासाठी टेकड्यांवर कोणत्याही स्वरूपाचे बांधकाम करण्यास मनाई केली जावी, अशी मागणी स्वयंसेवी संस्थांसह इतर राजकीय पक्षांकडून केली जात आहे. या पार्श्वभूमीवर जुन्या हद्दीचा आणि समाविष्ट गावांच्या ‘डीपी’तील विकास नियंत्रण नियमावली (डीसी रूल्स) एकसमान असावे, अशी शिफारस करण्यात आली होती. राज्य सरकारने ती तत्त्वतः स्वीकारली असून, बीडीपी आणि जुन्या हद्दीतील डोंगरमाथा-डोंगरउतार या दोन्ही ठिकाणी एकच निर्णय घेण्याच्या दृष्टीने त्यावरील निर्णय राखून ठेवण्यात आला आहे.
समाविष्ट गावांतील टेकड्या ‘जैसे थे’ ठेवण्यासाठी महापालिकेला तब्बल एक हजार कोटी रुपये खर्च करावे लागतील, अशी शक्यता आहे. एवढ्या मोठ्या स्वरूपात पालिकेला निधी खर्च करता येणे शक्य नसल्याने टेकड्यांच्या परिसरात अतिक्रमणे आणि झोपड्यांचे साम्राज्य वाढत आहे. ‘बीडीपी’मध्ये आठ टक्के बांधकामाला परवानगी दिली जावी, अशी आग्रही मागणी भाजप आणि राष्ट्रवादीच्या स्थानिक नगरसेवकांकडून वारंवार केली जात आहे. सरकारने गेल्या वर्षी समाविष्ट गावांतील ‘बीडीपी’चे आरक्षण कायम ठेवण्याचे जाहीर करताना, त्यावर बांधकामाबाबत कोणताही निर्णय घेतला नव्हता.
...
‘सीबीडी’लाही तात्पुरती स्थगिती
शहराच्या येरवडा-संगमवाडी परिसरात सेंट्रल बिझनेस डिस्ट्रिक्ट झोन (सीबीडी) अंतर्गत उद्योग-व्यवसायांना चालना देण्यासाठी विशेष तरतूद करण्यात आली होती. या ठिकाणी वाढीव एफएसआय वापरण्यास मुभा असेल, असेही स्पष्ट करण्यात आले होते. परंतु, सरकारने बुधवारी ‘डीपी’ला मान्यता देताना, ‘सीबीडी’बाबतचा निर्णयही प्रलंबित ठेवला आहे.
...................
विरोधाची शक्यता
महापालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर डोंगरमाथा-डोंगरउतारावर बांधकामास मंजुरी दिल्यास, त्याला विरोध होण्याची दाट चिन्हे असल्याने त्याबाबत सरकारने सावध पावले उचलली आहेत. बांधकामास मंजुरी देण्याचा निर्णय घेण्यात आला असता, तर त्यावरून पर्यावरण अभ्यासक आणि स्वयंसेवी संस्थांच्या तीव्र विरोधाचा सामना करावा लागला असता. त्याचे पडसाद निवडणुकीतही उमटू शकले असते. त्यामुळे, सध्या तरी हा विषय पुढे ढकलून त्यावर निर्णय घेण्याचे टाळले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


रंगणार स्वरझंकार महोत्सव

0
0

येत्या १३ ते १५ जानेवारी दरम्यान आयोजन
म. टा. प्रतिनिधी - पुणे
महाराष्ट्र टाइम्स आणि व्हायोलिन अकादमीच्या वतीने आयोजित केला जाणारा स्वरझंकार महोत्सव यंदाही होणार आहे. १३ ते १५ जानेवारी दरम्यान रमणबाग प्रशालेच्या मैदानावर होणाऱ्या या महोत्सवात कौशिकी चक्रवर्ती, उस्ताद रशीद खॉँ, राहुल शर्मा यांच्यासह अनेक नामवंत आपली कला पुणेकरांसमोर सादर करणार आहेत.
या महोत्सवाचे यंदाचे आठवे वर्ष असून, गेली सहा वर्षे हा महोत्सव ‘महाराष्ट्र टाइम्स’च्या वर्धापनदिनाच्या दरम्यान आयोजित करण्यात येतो. यंदाचा महोत्सव सनईसम्राट उस्ताद बिस्मिल्ला खॉँ यांच्या स्मृतीस अर्पण करण्यात आला आहे.
महोत्सवाचा प्रारंभ पतियाळा घराण्याच्या लोकप्रिय गायिका कौशिकी चक्रवर्ती यांच्या गायनाने होणार आहे. त्यांना तबल्यावर ओजस आढिया व हार्मोनियमवर मिलिंद कुलकर्णी साथसंगत करणार आहेत. त्याच दिवशी फरूखाबाद घराण्याचे ज्येष्ठ तबला वादक पंडित आनिंदो चटर्जी व बनारस घराण्याचे लोकप्रिय तबला वादक पंडितकुमार बोस यांच्यामधील तबला जुगलबंदीचा रसिकांना घेता येणार आहे. त्यांना दिलशाद खान सारंगीवर साथसंगत करणार आहेत.
महोत्सवामध्ये दुसऱ्या दिवशी म्हणजे १४ जानेवारीला मंजुषा पाटील यांचे गायन होणार आहे. त्यांना सुलोचना कुलकर्णी यांच्या स्मृती पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. व्हायोलिन अकादमीच्या वतीने सादर करण्यात येणाऱ्या विविध संगीत उपक्रमांचा प्रारंभ भारतरत्न भीमसेन जोशी यांच्या हस्ते १९९२मध्ये झाला होता. त्याला यंदा पंचवीस वर्षे पूर्ण होत आहेत. त्या निमित्त पंडितजींचे सुपुत्र श्रीनिवास जोशी व नातू विराज जोशी यांचे सहगायन होणार आहे. दुसऱ्या दिवसाची सांगता पंडित अतुलकुमार उपाध्ये (व्हायोलिन) आणि दिल्ली घराण्याचे ज्येष्ठ शहनाई वादक पं. दयाशंकर यांच्या बहारदार शहनाई-व्हायोलिन जुगलबंदीने होणार आहे. त्यांना रामदास पळसुले तबल्यावर साथ करणार आहेत.
महोत्सवाच्या शेवटच्या दिवसाचा प्रारंभ जागतिक किर्तीचे संतूरवादक पं. शिवकुमार शर्मा यांचे सुपुत्र राहुल शर्मा यांच्या संतूरवादनाने होणार असून, त्यांना तबला साथ मुकेश जाधव करणार आहेत. त्यानंतर रामपूर घराण्याचे आजच्या पिढीतील आघाडीचे लोकप्रिय गायक उ. रशिद खाँ यांच्या गायनाने समारोहाची सांगता होईल. त्यांना तबला साथ पं. विजय घाटे करणार असून सारंगीवर मुराद अली संगत करणार आहेत.
सर्व कार्यक्रम न्यू इंग्लिश स्कूल, रमणबाग येथील मैदानावर सायंकाळी ६ ते १० या वेळात होणार आहे. कार्यक्रमाच्या देणगी प्रवेशिका बालगंधर्व रंगमंदिर, टिळक स्मारक मंदिर, नावडीकर मुझिकल्स (कोथरूड), शिरीष ट्रेडर्स (कमला नेहरू पार्क), खाऊवाले पाटणकर (बाजीराव रस्ता) येथे उपलब्ध आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बेकायदा पदोन्नतीप्रकरणी कारवाई करा

0
0

खासदार वंदना चव्हाण यांची महापौरांकडे मागणी
म. टा. प्रतिनिधी, पुणे
पुणे महानगर परिवहन महामंडळ लिमिटेडने (पीएमपीएमएल) बेकायदा पद्धतीने १३ सेवकांना पदोन्नती दिली असून त्यांच्यावर तातडीने कारवाई करावी, अशी मागणी राष्ट्रवादीच्या शहराध्यक्षा खासदार वंदना चव्हाण यांनी केली आहे. महापौर प्रशांत जगताप यांच्याकडे ही मागणी करण्यात आली आहे.
राज्य सरकारच्या आदेशानुसार २००७ मध्ये पीएमटी आणि पीसीएमटी या संस्थांचे विलिनीकरण करुन पीएमपीएमएल कंपनीची स्थापना केली. त्या वेळी संचालक मंडळाने ठराव करून १२ सेवकांना सहा महिन्यांच्या कालावधीसाठी पदोन्नती दिली होती. या सेवकांना कायम करताना १२ ऐवजी १३ सेवकांना कायम करण्यात आले आहे. पीएमपी प्रशासनाने पदोन्नतीच्या आदेशात शांताराम वाघिरे यांचे नाव वाढवून त्यांना बेकायदा पद्धतीने पदोन्नती दिली आहे. यामध्ये संचालक मंडळ तसेच व्यवस्थापकीय संचालक यांची फसवणूक झाली आहे. ही गोष्ट पीएमपी प्रशासनाच्या यापूर्वी अनेकदा निदर्शनास आणून देखील यावर कोणतीही कार्यवाही झालेली नाही.
पीएमपी प्रशासनाने ज्या १२ सेवकांना सहा महिन्यांकरिता सरकारमान्यतेच्या अधीन राहून पदोन्नती दिली आहे. त्यांच्या पदोन्नतीस सरकारने मान्यता दिलेली नाही. या सेवकांना सेवा जेष्ठता, शैक्षणिक अर्हता, बिंदू नामावली, निवड मंडळ हे कोणतेही निकष न लावता पदोन्नती देण्यात आलेली आहे. या सेवकांना बेकायदा पदोन्नती देण्यात आल्याचे ‘पीएमपी’चे तत्कालीन अध्यक्ष आर. एन. जोशी यांनी स्वतः चौकशी करून मान्य केलेले आहे. ही पदे रद्द करण्याचा प्रस्ताव त्यांनी मे २०११ मध्ये संचालक मंडळाच्या बैठकीत देखील मान्यतेसाठी ठेवला होता. ज्या सेवकांवर पदोन्नतीच्या कारणास्तव अन्याय झाला असेल, त्यांनी कोर्टात दाद मागितल्यानंतर त्यावर निर्णय करणे योग्य राहील, अशी चर्चा झाली होती. त्यामुळे यावर तातडीने कार्यवाही कार्यवाही करावी, अशी मागणी खासदार चव्हाण यांनी महापौर प्रशांत जगताप यांच्याकडे केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पुणे ग्रामीणच्या अधीक्षकपदी सुवेझ हक

0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
पुणे ग्रामीण पोलिस अधीक्षकपदी सुवेझ हक यांची नियुक्ती करण्यात आली आहे. गेल्या काही दिवसांपासून रिक्त असलेल्या पुण्याच्या अतिरिक्त पोलिस आयुक्तपदी (दक्षिण) पी. व्ही. देशपांडे बदली झाली आहे.
राज्यातील पोलीस अधीक्षक व उपमहानिरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या बदल्या बुधवारी सरकारने केल्या. ‘पुणे ग्रामीण’चे अधीक्षक डॉ. जय जाधव यांची बदली मुंबई येथे करण्यात आली आहे. त्यांच्या जागी ‘पुणे ग्रामीण’चे अधीक्षक म्हणून सुवेझ हक यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पुण्यातील तीन अतिरिक्त पोलिस आयुक्तांची पदे रिक्त होती. त्यामुळे एकाच अतिरिक्त आयुक्त पदावर ताण येत होता. आता कोल्हापूरेचे पोलिस अधीक्षक पी. व्ही. देशपांडे यांची पुणे येथे अतिरिक्त आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
पुण्यात ही अंतर्गंत बदल्या करण्यात आल्या असून, वाहतूक शाखेचे पोलिस उपायुक्त प्रवीण मुंढे यांची ‘झोन चार’ला तर, ‘झोन चार’च्या पोलिस उपायुक्त कल्पना बारवकर यांची वाहतूक शाखेच्या उपायुक्त म्हणून करण्यात आली आहे. ही बदली निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर करण्यात आली आहे, असे बोलले जात आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

​विसापूर किल्ल्यावर पर्यटक आणि दुर्गप्रेमींमध्ये बाचाबाची

0
0

म. टा. प्रतिनिधी, लोणावळा

मावळातील विसापूर किल्ल्यावर ३१ डिसेंबरच्या रात्री पार्टीसाठी आलेल्या पर्यटकांना मारहाण केल्याप्रकरणी ११ दुर्गप्रेमी तरुण-तरुणींवर मारहाण व विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी १० जणांना अटक करण्यात आली आहे. यामध्ये तीन तरुणींचा समावेश आहे. तसेच ऐतिहासिक वास्तूवर बेकायदा उत्खनन करून त्यावर तंबू उभारून परिसरात जाळपोळ करून वास्तूला इजा पोहोचविल्याप्रकरणी भारतीय पुरातत्त्व विभागाच्या वतीने किल्ल्यावर पार्टीच्या कार्यक्रमाचे आयोजन करणाऱ्या आयोजकासह १० ते १३ पर्यटकांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

रसिका प्रकाश वरुडकर (वय १९, रा. यवत, दौंड, पुणे), काजल महेश पवार (वय २१, रा. तांदूळवाडी, बारामती, पुणे), निशा भोसले (वय २३, रा. हडपसर, पुणे), अमोल शंकर चव्हाण (वय २१, देहूगाव, हवेली, पुणे), किरण अशोक जाधव (वय २२, कुरुळी, खेड, पुणे), लोमेशकुमार उर्फ दिगंबर शांताराम पडवळ (वय २३, रा. दहिवली, मावळ, पुणे), राजेश विष्णू दळवी (वय २५, रा. भाजे, मावळ, पुणे), नितीन कल्याण साळुंखे (वय २४, रा. उंडवडी कडेपठार, बारामती, पुणे), अक्षय महादेव ताकवले (वय २१), अरुण मोहन तांबे (वय २१, दोघेही रा. बावधन, पुणे) अशी अटक करण्यात आलेल्या दुर्गप्रेमींची नावे आहेत. या प्रकरणी शालिनी पल्लव झाला (वय ३६, रा. आदित्य गार्डन सोसायटी, वारजे, पुणे) यांनी फिर्याद दिली आहे.
लोणावळा ग्रामीण पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नववर्षाच्या पूर्वसंध्येला (३१ डिसेंबरला) मावळातील विसापूर किल्ल्यावर पुण्यातील १० ते १३ युवक-युवती आल्या होत्या. या ठिकाणी होणाऱ्या पार्टीचे आयोजन प्रतीक शांतिदेव गुप्ता यांनी केले होते. किल्ल्यावर पार्टीसाठी आलेल्या पर्यटकांनी किल्ल्यावर घाण केल्याच्या आरोपावरून काही दुर्गप्रेमींनी त्यांना जाब विचारला. त्यांना अश्लील शिव्या देऊन काठीने व कमरेच्या पट्ट्याने मारहाण केली होती. यामध्ये फिर्यादी शालिनी यांच्या हाताला काठीचा मार लागल्याने गंभीर दुखापत झाली आहे. ही घटना ३१ डिसेंबरला रात्री साडेअकराच्या सुमारास विसापूर किल्ल्यावर घडली होती.

आयोजकासह पर्यटकांविरोधात गुन्हा
‘पार्टीसाठी किल्ल्यावर आलेल्या पर्यटकांनी बेकायदा उत्खनन करून तंबू उभारला होता. तसेच परिसरात आग लावल्याने या ऐतिहासिक वास्तूला इजा पोहोचली आहे. या प्रकरणी या पार्टीचे आयोजक प्रतीक शांतिदेव गुप्ता (रा. पुणे) यांच्यासह १० ते १३ पर्यटकांच्या विरोधात भारतीय पुरातत्व कायदा ५९ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे’, अशी माहिती भारतीय पुरातत्व विभागाचे निरीक्षक विजय उचाडे यांनी दिली. या प्रकरणाचा पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक संदीप येडे-पाटील करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कारच्या दरवाजामुळे जीवघेणा अपघात

0
0

पिंपरी : मोटारीचा दरवाजा अचानक उघडल्याने दुचाकीला धक्का लागून झालेल्या अपघातात दुचाकीवरील महिलेचा मृत्यू झाला, तर तिचा मुलगा गंभीर जखमी झाला. ही घटना मंगळवारी (३ जानेवारी) सकाळी आठ वाजता घडली.
सपना भगवान गाढे (३५) असे मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे. या प्रकरणी त्यांचा भाऊ मोहन आढाव (३६, रा. वाघोली) यांनी वाकड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. संबंधित मोटार चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सपना भगवान गाढे या त्यांचा चौदा वर्षांचा मुलगा शुभम याला घेऊन कामानिमित्त दुचाकीवरून चालल्या होत्या. डांगे चौकातील उड्डाणपुलाजवळील लक्ष्मीनगर बसथांब्याजवळ वळण घेत असताना कारचालकाने (एमएच १२ एनबी ३४७९) समोर गाडी थांबवून अचानक गाडीचे दार उघडले. त्यामुळे सपना गाढे यांच्या दुचाकीला धक्का लागून अपघात झाला. डोक्याला मार लागल्याने त्यांचा मृत्यू झाला. त्यांचा मुलगा शुभम गंभीर जखमी झाला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

एक्स्प्रेस वेवर लवकरच वाय-फाय सेवा

0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

पुणे आणि मुंबई या शहरातील अंतर कमी करणाऱ्या एक्स्प्रेस वेवर येत्या काळात इंटरनेट ‘सर्फिंग’ही सुसाट चालणार आहे. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) एक्स्प्रेस वेच्या कॉरिडोरमध्ये इंटरनेटची ‘वाय-फाय’ सेवा उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे. एखाद्या संपूर्ण रस्त्यावर इंटरनेटची वाय-फाय सेवा देण्याची राज्यातील ही पहिलीच वेळ आहे.

संबंध एक्स्प्रेस वेवर दोन्ही बाजूस इंटरनेटची ‘वाय-फाय’ सेवा उपलब्ध करून देण्याविषयी ‘एमएसआरडीसी’ने टेंडर प्रक्रिया राबविण्यास सुरुवात केली आहे. या प्रकल्पासाठीच ‘स्वारस्य अभिव्यक्ती’ (एक्स्प्रेशन ऑफ इंटरेस्ट) क़ाढण्यासाठी टेंडर मागविली आहेत. सेवा पुरवठादारांना १९ जानेवारीपर्यंत टेंडरची कागदपत्रे ऑनलाइन घेता येणार आहेत. टेलिकॉम कंपन्या व अन्य सेवा पुरवठांनी यामध्ये सहभागी अपेक्षित आहे. यासह ठाणे-घोडबंदर मार्गावरही वाय-फाय सेवा उपलब्ध करून दिली जाणार आहे.

एक्स्प्रेस वेने दररोज हजारो वाहने धावतात. त्यामधून लाखो प्रवासी प्रवास करतात. त्यामध्ये नोकरदार व व्यवसायानिमित्त ये-जा करणाऱ्या उद्योजकांची संख्या अधिक असते. सद्यपरिस्थितीत एक्स्प्रेस वेवर घाट परिसरात मोबाइल आणि इंटरनेट कनेक्टिव्हिटी कमी असते. काही काही ठिकाणी ते संपूर्ण नाहीसे होते. त्यामुळे नागरिकांची मोठ्या प्रमाणावर गैरसोय होते. तसेच, पुण्यातून मुंबईकडे जाताना खंडाळा घाटातून पुढे गेल्यानंतर पुण्यातील नागरिकांना रोमिंग नेटवर्क मिळते. त्यामुळे अनेकजण इंटरनेटचा वापर करणे टाळतात. किंवा त्यांच्या इंटरनेट कनेक्टिव्हिटीमध्ये अनेक अडथळे येतात. या पार्श्वभूमीवर ‘एमएसआरडीसी’कडून प्रवाशांना अधिकाधिक चांगल्या सुविधा देण्याचा प्रयत्न केला जात आहे. म्हणूनच, संपूर्ण एक्स्प्रेस वेवर वाय-फाय सेवा उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या प्रकल्पासाठीचे ‘एक्स्प्रेशन ऑफ इंटरेस्ट’ प्राप्त झाल्यानंतर पुढील कार्यवाही केली जाणार आहे.
या उपक्रमाबाबत ‘एमएसआरडीसी’च्या मुंबई येथील कार्यालयात येत्या ११ जानेवारीला परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. या परिषदेमध्ये ‘एमएसआरडीसी’ला अपेक्षित असलेल्या बाबींची विस्तृत माहिती दिली जाणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

​शाळा, कॉलेजांमध्ये तपासणीसाठी पथके

0
0

पुणे ः उच्च माध्यमिक शाळा व ज्युनिअर कॉलेजांमध्ये तपासणीसाठी शिक्षण उपसंचालक कार्यालयाने एका तपास पथकाची नियुक्ती केली आहे. या तपास पथकाच्या साह्याने शाळा, कॉलेजातील विविध विभागांची चौकशी केली जाणार आहे, अशी माहिती पुणे विभागाच्या सहायक शिक्षण संचालक मीनाक्षी राऊत यांनी मंगळवारी दिली.
कॉलेजातील विविध विभागांची प्रगती जाणून घेण्यासाठी शिक्षण उपसंचालक कार्यालयाकडून दर वर्षी तपासणी करण्यात येते. त्यामध्ये प्रामुख्याने विद्यार्थ्यांच्या आवश्यक गरजा, शैक्षणिक प्रगती याचा अहवाल प्रत्यक्ष तपासला जातो. चालू शैक्षणिक वर्षातील पाहणीसाठी नेमलेले पथक ३१ जानेवारीपासून कॉलेजांमध्ये तपासणी करणार आहे. ही पथके पुणे, अहमदनगर, सोलापूर या जिल्ह्यांत पाहणी करणार आहेत. कार्यालयाकडून तपासणी करण्यात येणाऱ्या पथकाला आवश्यक ती सर्व माहिती व कागदपत्रे सादर करणे महाविद्यालयांना बंधनकारक करण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


‘धान्य न उचलल्यास कारवाई’

0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
स्वस्त धान्य आणि केरोसीन मिळण्यासाठी शिधापत्रिकाधारकांच्या आधार क्रमांकाची नोंदणी करून घेण्याचे काम करण्यास काही स्वस्त धान्य दुकानदारांनी विरोध करून या महिन्यातील धान्याची उचल केलेली नाही. संबंधित दुकानदारांना शहर अन्नधान्य वितरण विभागाने नोटिसा बजावल्या असून, धान्य उचलले नाही तर जीवनावश्यक वस्तू अधिनियमाअंतर्गत गुन्हे दाखल करण्याचा इशारा दिला आहे.
राज्य सरकारने स्वस्त धान्य आणि केरोसीनचा काळा बाजार रोखण्यासाठी ऑक्टोबर २०१५ मध्ये आधार क्रमांक नोंदवलेल्या शिधापत्रिकाधारकांनाच धान्य देण्याचे आदेश दिले आहेत. या आदेशाची अन्नधान्य वितरण विभागाने अंमलबजावणी सुरू केली आहे. दुकानदारांनी शिधापत्रिकाधारकांचे आधार क्रमांक नोंदवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. मात्र, काही दुकानदारांनी या आदेशाची अंमलबजावणी करण्यास विरोध केला आहे.
याबाबत शहर अन्नधान्य वितरण अधिकारी शहाजी पवार म्हणाले, ‘या महिन्याचे धान्य आणि केरोसीन न उचलणाऱ्या दुकानदारांना नोटिसा देण्यास सुरवात केली आहे. त्यांनी धान्य आणि केरोसीन न उचलल्यास परवाना रद्द करून जीवनावश्यक वस्तू अधिनियमाअंतर्गत गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत.’

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

फोटोवरून संकुचित विचार का?

0
0

माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा सवाल

म. टा. प्रतिनिधी, पुणे

‘क्रिकेटपटू शमीचा पत्नीबरोबर फोटो पुढे आला तर त्याबाबत काही प्रवृत्तींच्या मनात संकुचित विचार येतोच कसा?’ असा सवाल माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बुधवारी उपस्थित केला. आघाडी सरकारने दिलेल्या पाच टक्के मुस्लिम आरक्षणाला न्यायालयाचा पाठिंबा असतानाही आताचे राज्यातील सरकार त्यात राजकारण आणत आहे, अशी घणाघाती टीका पवार यांनी केली.

पुणे महापालिकातर्फे वानवडी येथे महापालिकेच्या महात्मा ज्योतिबा फुले, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, मदर तेरेसा या पुरस्कारांचे वितरण पवार यांच्या हस्ते झाले. त्या वेळी ते बोलत होते. अनुक्रमे कृष्णकांत कुदळे, रझिया पटेल, रागिणी शेखर यांना हे पुरस्कार प्रदान करण्यात आले. बिशप थॉमस डाबरे यांचा मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला. महापौर प्रशांत जगताप, कमल ढोले - पाटील, दीप्ती चवधरी, अश्विनी कदम, नंदा लोणकर, रवी चौधरी या वेळी उपस्थित होते.
‘क्रिकेटपटू शमीच्या पत्नीच्या पेहरावावरून सोशल मीडियामध्ये टीका आणि चर्चा झाली होती. हा संदर्भ पकडून पवार यांनी टीकाकारांना लक्ष केले. शमीचा पत्नीबरोबर फोटो पुढे आला तर त्याबाबत काही प्रवृत्तींच्या मनात संकुचित विचार येतोच कसा? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. आघाडी सरकारने दिलेल्या पाच टक्के मुस्लिम आरक्षणाला न्यायालयाचा पाठिंबा असतानाही आताचे राज्यातील सरकार त्यात राजकारण आणत आहे,’ अशी टीका पवार यांनी केली.

मदर तेरेसा या ‘चालती बोलती प्रेममूर्ती’ होत्या, असे गौरवोद्वगार पवार यांनी काढले. महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांचे कार्य महान असून त्यांच्या नावाने पालिका देत असलेल्या पुरस्कारांबद्दल समाधान वाटते, अशी भावना पवार यांनी व्यक्त केली. बिशप थॉमस डाबरे, कृष्णकांत कुदळे, रझिया पटेल, रागिणी शेखर यांनी मनोगत व्यक्त केले. महापौर जगताप यांनी प्रास्ताविक केले. नंदा लोणकर यांनी आभार मानले. मेघना गुजर यांनी सूत्रसंचालन केले.

शमीचा पत्नीबरोबर फोटो पुढे आला तर त्याबाबत काही प्रवृत्तींच्या मनात संकुचित विचार येतोच कसा? अशा प्रवृत्तींना आपण पुढे येऊ देता कामा नये.
- अजित पवार, माजी उपमुख्यमंत्री

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चौघा आरोपींना पोलिस कोठडी

0
0

पुतळा हटविल्याप्रकरणी कोर्टाचा आदेश

म. टा. प्रतिनिधी, पुणे

नाटककार राम गणेश गडकरी यांचा संभाजी उद्यानातील पुतळा हटविल्याप्रकरणी डेक्कन पोलिसांनी अटक केलेल्या संभाजी ब्रिगेडच्या चार कार्यकर्त्यांना कोर्टाने सहा जानेवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावली. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी व्ही. बी. गुळवेपाटील यांच्या कोर्टाने हा आदेश दिला.
पोलिसांनी या प्रकरणी हर्षवर्धन महादेव मगदूम (वय २३, रा. बालाजीनगर), प्रदीप भानुदास कणसे (२५, रा. नऱ्हे, आंबेगाव), स्वप्नील सूर्यकांत काळे ( २४ रा. चऱ्होली), गणेश देविदास कारले (वय २६ रा. चांदूस, ता. खेड) या चौघांना अटक करण्यात आली आहे. छत्रपती संभाजी उद्यानाचे उद्यानप्रमुख अशोक घोरपडे ( ४७, रा. वडगावशेरी) यांनी फिर्याद दिली आहे.
अटक आरोपींनी संगनमत करून संभाजी उद्यानातील गडकरी यांचा पुतळा तीन जानेवारी रोजी मध्यरात्री पावणेदोन वाजण्याच्या सुमारास हटविला. गडकरी यांचा अर्धपुतळा हातोडा आणि कुऱ्हाडीने घाव घालून तसेच खाली पाडून सुमारे दहा हजार रुपयांचे सरकारी मालमत्तेचे नुकसान केले. ‘गडकरी यांनी संभाजी महाराजांविषयी बदनामीकारक लिखाण केले असून, त्याचा निषेध म्हणून आम्ही हे कृत्य मराठा असल्यामुळे केले आहे,’ अशी व्हिडिओ चित्रफित तयार करुन ती सोशल माध्यमांतून प्रसारित करून समाजात द्वेषभावना निर्माण केली आहे. या प्रकरणी अटक करण्यात आलेल्या चौघांना बुधवारी कोर्टात हजर करण्यात आले होते.
‘आरोपींकडून पुतळा हस्तगत करायचा आहे. पुतळ्याची तोडफोड करण्यासाठी वापरलेला हातोडा आणि कुऱ्हाड या हत्यारांचा शोध घ्यायचा आहे, व्हॉटसअॅपवर प्रसारित केलेली चित्रफित कोठे तयार केली, ती तयार करण्यासाठी त्यांना कोणी मदत केली, या गुन्ह्यातील मुख्य सूत्रधार कोण आहेत याचा तपास करायचा आहे, आरोपींनी गुन्ह्यात वापरलेले वाहन हस्तगत करायचे आहे,’ असा युक्तिवाद सरकारी वकील उज्जवला पवार यांनी कोर्टात केला.
बचाव पक्षातर्फे अॅड. मिलिंद पवार, अॅड. रविराज पवार, अॅड. सुहास फराडे, अॅड. विजय शिंदे, अॅड. विश्वजित पाटील यांनी बाजू मांडली. ‘आरोपी स्वतःहून हजर झाले आहेत. त्यांच्या डोक्यात जातीय वाद नाही. जातीयवाद डोक्यात असता तर, राज्यात विशिष्ट जातीच्या महापुरुषांचे पुतळे आहेत त्यावरही आक्षेप घेतला असता. गडकरींचा पुतळा संभाजी उद्यानातून हलवा ही मागणी आठ वर्षांपासून करण्यात येत आहे. मात्र, त्याकडे दुर्लक्ष करून सुशोभिकरण सुरू करण्यात आले आहे. खोटा इतिहास नवीन पिढीपर्यंत जाऊ नये या उद्देशाने रागाच्या भरात पुतळा हटविण्यात आला असून आरोपींच्या पोलिस कोठडीची आवश्यकता नाही,’ असा युक्तिवाद त्यांनी केला. दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकून कोर्टाने आरोपींना सहा जानेवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मास्टरमाइंडला शोधून काढूच

0
0

मुख्यमंत्र्यांची भर सभेत घोषणा

म. टा. प्रतिनिधी, येरवडा

‘नाटककार राम गणेश गडकरी यांच्या पुतळ्याची तोडफोड करणाऱ्यांना छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज समजलेच नाहीत. हे कृत्य करणाऱ्यांना पोलिसांनी अटक केलीच आहे; त्यांना हे कृत्य करण्यास भाग पाडणाऱ्या मास्टर माइंडला शोधून काढल्याशिवाय सरकार शांत बसणार नाही,’ असा इशारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी दिला.
वडगांव शेरीतील छत्रपती शिवाजी महाराज उद्यान, म्युझिकल कारंजे आणि फुलराणी बुलेट रेल्वेचे उद्घाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले. पालकमंत्री गिरीश बापट, राज्यमंत्री दिलीप कांबळे, खासदार अनिल शिरोळे, संजय काकडे, आमदार जगदीश मुळीक, योगेश मुळीक आदी या वेळी उपस्थित होते. फडणवीस म्हणाले की ‘निवडणूक जवळ येताच काही लोकांना जातीय तेढ निर्माण करण्याची हुक्की येते. त्यामुळे अशा लोकांपासून सावध राहण्याची गरज आहे. गडकरींचा पुतळा तोडणाऱ्यांना पोलिसांनी अटक केलीच आहे. पण, त्यांचे बोलाविते धनी कोण आहेत याचा शोध घेतल्याशिवाय सरकार गप्प बसणार नाही. छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांच्या नावाखाली कोणालाही वाईट कृत्ये करण्याचा अधिकारी नाही. महाराष्ट्र सर्व जाती –धर्माचे राज्य असून, ते अबाधित ठेवण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे.’
लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीप्रमाणेच महापालिका निवडणुकीत पुणेकरांनी भाजपवर विश्वास दाखवावा, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले. भाजपला एकहाती सत्ता दिल्यास पुढील पाच वर्षांत पुणे देशातील सर्वांत आधुनिक शहर म्हणून ओळखले जाईल, असेही फडणवीस म्हणाले.
या वेळी मुख्यमंत्र्यांनी स्मार्ट सिटी, पुरंदरला होणारे आंतरराष्ट्रीय विमानतळ, राज्यातील विदेशी गुंतवणूक,पीएमआरडीए, शहराचा मंजूर विकास आराखडा याविषयी सविस्तर भाष्य केले.

नगरसेविका गलांडे भाजपमध्ये
मुख्यमंत्री देवेंद फडणवीस यांच्या उपस्थित वडगांव शेरी मतदारसंघातील कॉंग्रेसच्या नगरसेविका सुनिता गलांडे यांच्यासह माजी नगरसेविका सुलभा क्षीरसागर, चंद्रकांत जंजिरे, राहुल भंडारी, सोमनाथ पठारे, धनंजय जाधव यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दुष्प्रवृत्तीमागील मास्टरमाइंड शोधा

0
0

पुतळ्याच्या पार्श्वभूमीवर अजित पवारांची मागणी

म. टा. प्रतिनिधी, येरवडा

‘नाटककार राम गणेश गडकरी यांचा संभाजी उद्यानातील पुतळा उखडणाऱ्या प्रवृत्तीमागील मास्टरमाइंड शोधला पाहिजे,’ अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अजित पवार यांनी बुधवारी केली. समाजाला दिशा देण्याचे काम महापुरुषांनी केले असून, प्रत्येकानेच त्यांचा आदर राखला पाहिजे. एकविसाव्या शतकात त्यांच्या विचारावर आणि मार्गावर चालण्याशिवाव पर्याय नसल्याचेही पवार यांनी सांगितले.
खराडी चंदननगर भागात उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारुढ पुतळ्याचे उद्घाटन पवार यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. महापौर प्रशांत जगताप, माजी आमदार बापू पठारे, नगरसेवक महेंद्र पठारे, सुमन पठारे, उषा कळमकर, मीनल सरवदे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी या वेळी उपस्थित होते.
गडकरी यांच्या संभाजी उद्यानातील पुतळ्याची मोडतोड चार व्यक्तींनी केल्याचा प्रकार मंगळवारी पहाटे घडला होता. हा धागा पकडून पवार यांनी आपल्या भाषणात कृत्याचा निषेध केला. ‘झालेला प्रकार अतिशय निंदनीय असून, त्यामागील मास्टर माइंड समोर आणला पाहिजे,’ अशी अपेक्षा व्यक्त केली. चंदननगर भागात छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने उद्यान उभारण्यात आले असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते बुधवारी उद्यानाचे उद्घाटन झाले. या कार्यक्रमासाठी प्रत्येक चौकात भाजपकडून मोठ्या प्रमाणावर फ्लेक्स लावण्यात आले होते. त्या फ्लेक्सवर भाजपच्या नेत्यांचे फोटो आहेत. मात्र, महाराजांचा एकही फोटो नाही. या कृतीतून भाजपवाले मनुवादी प्रवृत्तीचे असल्याचे स्पष्ट होते. मुख्यमंत्र्यांच्या भीतीपोटी भाजपचा एकही आमदार सभागृहात बोलत नाही. हे पुण्याचे प्रश्न काय मांडणार, या शब्दांत पवार यांनी आमदारांवर टीकास्त्र सोडले.

युवक, अनुभवींना तिकिटे
गेल्या पाच वर्षांत पालिकेत सत्ताधारी असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांनी चांगल्या प्रकारे काम केले आहे. आगामी पालिका निवडणुका लक्षात घेता, पक्षाच्या वतीने युवक आणि अनुभवी व्यक्तींना उमेदवारी दिली जाणार असून लवकरच यादीही प्रसिद्ध होइल, असे पवार यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images