Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

सत्ता आली, पत गेली

$
0
0

बारामतीत दोन माजी नगराध्यक्षांचा खळबळजनक पराभव; ‘राष्ट्रवादी’वर नामुष्की

म. टा. प्रतिनिधी, बारामती

बारामती नगरपालिकेची निवडणूक अपेक्षेप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेसने बहुमताने जिंकली; मात्र मावळते नगराध्यक्ष योगेश जगताप, तसेच त्यांच्याआधीचे नगराध्यक्ष सुभाष सोमाणी यांना मतदारांनी घरी बसवले. या दोन्ही दिग्गजांचा पराभव ‘राष्ट्रवादी’च्या जिव्हारी लागला असून, अजित पवार यांच्या प्रतिष्ठेलाही धक्का बसला आहे. त्यांच्यासाठी ‘सत्ता आली, पत’ गेली अशी परीस्थिती निर्माण झाली आहे.

बारामती नगरपालिकेत राष्ट्रवादी काँग्रेसची एकहाती सत्ता होती. ती याही निवडणुकीत कायम राहिली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या पौर्णिमा तावरे यांनी नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाजपपुरस्कृत आघाडीचे सुनील पोटे यांचा पराभव केला. ‘राष्ट्रवादी’ने ३९ पैकी ३५ जागा जिंकून निर्विवाद वर्चस्व मिळवले. परंतु दोन माजी नगराध्यक्षांच्या पराभवाने ‘राष्ट्रवादी’च्या तंबूत एकच खळबळ उडाली. मावळते नगराध्यक्ष योगेश जगताप यांच्यावर भाजपपुरस्कृत आघाडीचे जयसिंग ऊर्फ बबलू काटे-देशमुख यांनी अवघ्या सात मतांनी मात केली. योगेश जगताप राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष होते. तसेच ते पवार कुटुंबीयांच्या निकटवर्तीयांपैकी एक आहेत. जगताप यांनी ज्यांच्याकडून नगराध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतली होती, त्या सुभाष सोमाणी यांनाही मतदारांनी नाकारले. भाजपपुरस्कृत आघाडीचे सुनील सस्ते यांनी सोमाणी यांचा पराभव केला. या दोन्ही उमेदवारांना पुन्हा पालिकेत पाठवण्यासाठी अजित पवारांनी कंबर कसली होती; मात्र त्यांच्या पराभवामुळे मतदारांनी पवारांच्या कथित बारामती विकास मॉडेलची हवाच काढून घेतली असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

सोमाणींविरुद्ध मराठा कार्ड चालले

तीन वर्षांपूर्वी अनेक ज्येष्ठांना डावलून सोमाणींना नगराध्यक्षपदाची संधी दिल्याने ‘राष्ट्रवादी’च्या गोटात नाराजीचा सूर होता. पुन्हा सोमाणींना नगरसेवकपदासाठी संधी दिल्याने ‘राष्ट्रवादी’तील गटबाजी उफाळून आल्याने नाराजांनीच सुनील सस्ते यांना मदत केली असल्याचे बोलले जाते. ‘मी सांगेन त्यालाच मराठा समाज मतदान करील,’ असा अजित पवारांना आत्मविश्वास होता. तो फोल ठरल्याने सोमाणी यांना पराभवाचा सामना करावा लागला.

बारामती नगरपालिकेचे नवे सदस्य

नगराध्यक्षा : पौर्णिमा वैभव तावरे (राष्ट्रवादी काँग्रेस)

नगरसेवक :

राष्ट्रवादी काँग्रेस : ज्योती भारत सरोदे, समीर शिवाजी चव्हाण, जय पाटील, अनिता विनोद माने, नीलिमा दीपक मलगुंडे, अभिजित भानुदास जाधव, सुरेखा पांडुरंग चौधर, कमल सतीश कोकरे, बाळासाहेब साधू सातव, आशा दत्तू माने, अतुल आनंदराव बालगुडे, शारदा माणिक बालगुडे, राजेंद्र दत्तात्रय बनकर, अनघा अजिंक्य जगताप, सीमा योगेश चिंचकर, रूपाली दीपक गायकवाड, सूरज दत्तात्रय सातव, संतोष बाळकृष्ण जगताप, सुहासिनी सचिन सातव, कुंदन किशोर लालबिगे, शीतल गणेश गायकवाड, सत्यव्रत अर्जुनराव काळे, सविता सुजित जाधव, नीता अभिजित चव्हाण, संजय वालचंद संघवी, रमेश अण्णा भोकरे, वीणा नितीन बागल, बागवान बेबीमरियम अजीज, बिरजू मांढरे, मयूरी सूरज शिंदे, अश्विनी कुणाल गालिंदे, सचिन सदाशिव सातव, नवनाथ सदाशिव बल्लाळ, सय्यद तरन्नुम अल्ताफ, अनिता दिनेश जगताप

भाजप पुरस्कृत आघाडी : विष्णू तुळशीराम चौधर, जयसिंग अशोक काटे-देशमुख, अशोक नानासाहेब देशमुख, सुनील दादासाहेब सस्ते

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


सासवडमध्ये जनमत विकास आघाडीचा झेंडा

$
0
0

शिवसेनेचे शिवतारे यांना जबर धक्का

म. टा. प्रतिनिधी, सासवड

सासवडमध्ये विद्यमान काँग्रेसप्रणित जनमत विकास आघाडीने बहुमत प्राप्त करून, शिवसेना राज्यमंत्री विजय शिवतारे व लोकमित्र राष्ट्रवादी आघाडीला पराभवाची धूळ चारली आहे. हा अनपेक्षित धक्का मानला जात आहे. जनमत विकास आघाडीने नगराध्यक्षपदासह आणि नगरसेवकपदांपैकी १९ पैकी १५ जागा जिंकल्या आहेत. पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे सेवानिवृत्त अधिकारी असलेले मार्तंड भोंडे नगराध्यक्षपदी निवडून आले असून, माजी नगरसेवक असलेले शिवसेनेचे डॉ. राजेश दळवी यांना त्यांनी पराभूत केले.

अत्यंत चुरशीच्या लढतीत माजी नगराध्यक्षा आनंदीकाकी जगताप नगरसेवक म्हणून विजयी झाल्या असून, माजी नगराध्यक्षा राष्ट्रवादी काँग्रेसच्या कलाताई फडतरे यांना नगरसेवकपदाच्या लढतीत पराभूत व्हावे लागले. मनोहर जगताप, अजित जगताप, निर्मला जगताप, वसुधा आनंदे, संदीप जगताप, सुहास लांडगे हे विद्यमान नगरसेवक विजयी झाले आहेत. मंगल म्हेत्रे या राष्ट्रवादी काँग्रेसच्या एकमेव नगरसेविका विजयी झाल्या आहेत. काँग्रेसप्रणित सासवड शहर जनमत विकास आघाडीचे नेतृत्व संजय जगताप यांचा करिष्मा पुन्हा चालल्याची चर्चा असून, जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे यांना मोठा धक्का बसला आहे. भाजप, मनसे, शेतकरी संघटना यांच्यासह अपक्षांना या निवडणुकीत दारुण पराभवाला सामोरे जावे लागले आहे.

सासवडची नवी नगरपालिका

नगराध्यक्ष : मार्तंड लक्ष्मण भोंडे (काँग्रेस प्रणित जनमत आघाडी)

नगरसेवक :

जनमत विकास आघाडी :

सारिका हिरामण हिवरकर, मनोहर ज्ञानोबा जगताप, विजय शिवाजी वढणे, माया रवींद्र जगताप (बिनविरोध), प्रवीण लक्ष्मण भोंडे, पुष्पा नंदकुमार जगताप, विद्या श्रीकांत टिळेकर, संदीप वामन जगताप, वसुधा विश्वजित आनंदे, अजित काळूराम जगताप, सुहास दत्तात्रय लांडगे, निर्मला यशवंत जगताप, आनंदी चंद्रकांत जगताप, सीमा महादेव भोंगळे, संजय गणपत जगताप

शिवसेना : डॉ. अस्मिता अरविंद रणपिसे, सचिन सुरेश भोंगळे

लोकमित्र राष्ट्रवादी आघाडी : मंगल सुधाकर म्हेत्रे

लोकमित्र जनसेवा आघाडी पुरस्कृत : दीपक दत्तात्रय टकले

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तळेगावमध्ये परिवर्तन

$
0
0

भाजप महायुतीचा दणदणीत विजय

म. टा. प्रतिनिधी, पिंपरी

तळेगाव-दाभाडे नगर परिषदेत परिवर्तनाच्या लाटेत सत्तांतर झाले असून, २६ पैकी २० जागा जिंकून भाजप-जनसेवा विकास समिती-आरपीआय महायुतीने एकहाती सत्ता काबीज केली आहे. माजी नगराध्यक्ष सुरेश धोत्रे, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष गणेश काकडे, भाजपचे शहराध्यक्ष संतोष दाभाडे या दिग्गजांना पराभवाचा धक्का बसला.

तळेगाव दाभाडे नगर परिषदेच्या अध्यक्षपदासाठी झालेल्या लढतीत भारतीय जनता पक्ष महायुतीच्या चित्रा जगनाडे यांनी एकतर्फी विजय मिळविला. मतमोजणीच्या पहिल्या फेरीपासून जगनाडे यांनी घेतलेली आघाडी अखेरपर्यंत कायम राहिली. त्यांनी पहिल्याच फेरीत पाच हजार मतांची आघाडी घेतली. ती टप्प्याटप्प्याने वाढतच गेली. मतमोजणी पूर्ण झाल्यानंतर जगनाडे यांना २१,७११ मते मिळाली. धोत्रे यांना ८६४८ मते मिळाली. १३ हजार ६३ मतांनी जगनाडे विजयी झाल्या.

नवी तळेगाव-दाभाडे नगरपालिका

नगराध्यक्षा : चित्रा जगनाडे (भाजप महायुती)

नगरसेवक :

भाजप : संदीप शेळके, कल्पना भोपळे, सुशील सैंदाणे, विभावरी दाभाडे, नीता काळोखे, संतोष शिंदे, काजल गटे, प्राची दळवी (हेंद्रे), अमोल शेटे, मंगल जाधव, शोभा अरुण भेगडे, संध्या भेगडे, अरुण भेगडे, सुनील शेळके (बिनविरोध)

जनसेवा विकास समिती : सुलोचना आवारे, गणेश खांडगे, संग्राम काकडे, रोहित लांघे (बिनविरोध), हेमलता खळदे (बिनविरोध)

आरपीआय : अनिता पवार

शहर सुधारणा व विकास समिती : बापूसाहेब भेगडे, किशोर भेगडे, संतोष भेगडे, अरुण माने, वैशाली दाभाडे, मंगल भेगडे

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दौंडमध्ये कुल-कटारिया गटाकडे नगराध्यक्षपद

$
0
0

बहुमत राष्ट्रवादी-शिवसेनेकडे

म. टा. प्रतिनिधी, दौंड

दौंड नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदी शीतल योगेश कटारिया विजयी झाल्या असून, नगरपालिकेत बहुमत राष्ट्रवादी काँग्रेस-शिवसेना आघाडीला मिळाले आहे. अॅड. राहुल कुल व प्रेमसुख कटारिया यांच्या नागरिक हितसंरक्षण मंडळाला नगराध्यक्षपदासाठी कौल मिळाला. २४ सदस्य असलेल्या नगरपालिकेत राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, पीपल्स रिपब्लिकन आघाडी, बहुजन रयत परिषद आघाडीला १४ व कुल-कटारिया गटाला १० जागांवर समाधान मानावे लागले. प्रेमसुख कटारिया यांच्यासह त्यांचे पुत्र व विद्यमान नगरसेवक योगेश कटारिया हे मात्र या निवडणुकीत पराभूत झाले आहेत.

प्रभाग क्रमांक ‘तीन अ’मध्ये भाग्यश्री पळसे (शिवसेना) व पूजा गायकवाड (नागरिक हितसंरक्षण मंडळ) यांना सारखीच म्हणजे १२७२ मते मिळाली. फेरमतमोजणीनंतरही ती कायम राहिल्याने चिठ्ठीद्वारे हा कौल निश्चित करण्यात आला. त्यात नागरिक हित संरक्षण मंडळाच्या पूजा गायकवाड यांना विजयी घोषित करण्यात आले. थेट नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत कुल-कटारिया गटाने निसटत्या फरकाने नगराध्यक्षपद राखले.

कुल, कटारिया गटाचे सर्वेसर्वा व सतत ४० वर्षे सभागृहात असलेले प्रेमसुख कटारिया यांचा माजी नगराध्यक्ष इंद्रजित जगदाळे यांनी ‘प्रभाग क्रमांक चार ब’मध्ये दारूण पराभव केला. प्रथमच कटारिया सभागृहात असणार नाहीत. नागरिक हित संरक्षण मंडळाच्या विद्यमान नगराध्यक्षा अंकुशा शिंदे यांचाही पराभव झाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार व माजी नगराध्यक्ष बादशहा शेख सहाव्यांदा, ‘नागरिक हित’चे बबलू कांबळे दोनदा (स्वीकृतसह चौथ्यांदा), प्रमोद देशमुख तिसऱ्यांदा निवडून आले आहेत. विद्यमान नगरसेवक योगेश कटारिया यांचा पराभव करून राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक विलास शितोळे यांनी सलग दोन पराभवांनंतर सभागृहात प्रवेश केला. ‘नागरिक हित’च्या रेखा सरनोत यांचा पाच वर्षांनंतर सभागृहात पुन्हा प्रवेश झाला. सरनोत पती-पत्नीपैकी एक जण सभागृहात असण्याची परंपरा कायम राहिली. विजयी उमेदवारांपैकी १८ उमेदवार पहिल्यांदाच निवडून आले आहेत.

नवी दौंड नगरपालिका

नगराध्यक्षा :

शीतल योगेश कटारिया (नागरिक हितसंरक्षण मंडळ)

नगरसेवक :

राष्ट्रवादी काँग्रेस : संजय चितारे, रिझवान पानसरे, इंद्रजित जगदाळे, प्रणोती चलवादी, राजेश जाधव, ज्योती वाघमारे, बादशहा शेख, कांचन साळवे, वासिम शेख, संध्या डावकर, विलास शितोळे, ज्योती राऊत

शिवसेना : अनिता दळवी, हेमलता परदेशी

नागरिक हितसंरक्षण मंडळ : बबलू कांबळे, विजया नाईक, पूजा गायकवाड, शहानवाज खान, नितीन कांबळे, रेखा सरनोत, राजेश गायकवाड, अरुणा डहाळे, जिवराज पवार, प्रमोद देशमुख

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जेजुरीत सत्तांतर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, सासवड

जेजुरी नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदासाठी झालेल्या निवडणुकीत काँग्रेसच्या वीणा हेमंत सोनवणे विजयी झाल्या. तसेच काँग्रेसने सतरापैकी दहा जागा मिळवून पालिकेत स्पष्ट बहुमत मिळवले.

नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत वीणा सोनवणे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार मीनल जयदीप बारभाई यांचा ३५१ मतांनी पराभव केला. यापूर्वी पालिकेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता होती; मात्र अत्यंत अटीतटीच्या झालेल्या लढतीमध्ये काँग्रेसचे नेते संजय जगताप यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसच्या पॅनेलमधील उमेदवारांनी १० जागा मिळवून सत्ता हस्तगत केली. या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप, शिवसेना, मनसे आदी पक्षांनी उमेदवार उभे केले होते; मात्र भाजप, शिवसेना, मनसे यांचे उमेदवार सर्व जागांवर उभे नसल्याने खरी लढत राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस यांच्यातच होती. शरद पवार यांचे कट्टर अनुयायी असलेले आणि ३५ वर्षे सत्ता अबाधित राखणारे दिलीपदादा बारभाई यांना या वेळी सत्ता गमवावी लागली आहे.

जेजुरीची नवी नगरपालिका

नगराध्यक्षा : वीणा सोनवणे (काँग्रेस)

नगरसेवक :

काँग्रेस : पौर्णिमा मोहन राऊत, महेश ज्ञानोबा दरेकर, गणेश मच्छिंद्र निकुडे, सुरेश जगन्नाथ सातभाई, रुक्मिणी हरिश्चंद्र जगताप, वृषाली कुंभार, अजिंक्य सतीश देशमुख, शीतल राहुल बयास, सचिन रमेश सोनवणे, गणेश अशोक शिंदे

राष्ट्रवादी काँग्रेस : अमिना मेहबूब पानसरे, साधना परशुराम लाखे, अरुण रघुनाथ बारभाई, सुजाता तुकाराम झगडे, जयदीप दिलीप बारभाई, मंगल सुरेश दोडके, सविता नारायण जगताप

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शिरूरमध्ये आघाडीच कायम

$
0
0

मुख्यमंत्र्यांची सभा होऊनही भाजप पराभूत

म. टा. प्रतिनिधी, शिरूर

शिरूर नगरपालिकेच्या प्रतिष्ठेच्या निवडणुकीत सत्तारूढ शिरूर शहर विकास आघाडीने वर्चस्व राखून १६ जागांवर विजय मिळवला. नगराध्यक्षपदावरही या आघाडीच्याच वैशाली वाखारे विजयी झाल्या. भाजपला या निवडणुकीत पराभव पत्करावा लागला. लोकशाही क्रांती आघाडीने एका जागेवर, तर भाजपने दोन जागांवर विजय मिळवून पालिकेत खाते उघडले. विकास आघाडीने प्रतिष्ठेच्या केलेल्या ठिकाणी विरोधक निवडून आले आहेत.

सत्तारूढ शिरूर शहर विकास आघाडीसमोर लोकशाही क्रांती आघाडी आणि भाजप यांनी आव्हान उभे केले होते. पालिकेच्या निवडणूक प्रचारासाठी प्रथमच मुख्यमंत्र्यांची सभा शिरूर येथे झाली. विकास आघाडीच्या उमेदवारांसाठी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सभा घेऊन मोठी चुरस निर्माण केली होती. सर्वांत धक्कादायक निकाल वॉर्ड क्रमांक तीनमध्ये लागला. लोकशाही क्रांती आघाडीचे उमेदवार आणि शिवसेनेचे शहरप्रमुख मंगेश खांडरे यांनी शिरूर शहर विकास आघाडीचे उमेदवार आणि ‘राष्ट्रवादी’चे शहराध्यक्ष नगरसेवक जाकीरखान पठाण यांचा पराभव केला. वॉर्ड क्रमांक नऊमध्ये नीलेश केरू गाडेकर या राजकारणात नवख्या असणाऱ्या तरुण अपक्ष उमेदवाराने आघाडीचे उमेदवार आणि शिवसेनेचे शहरप्रमुख संजय देशमुख यांचा पराभव केला. वॉर्ड क्रमांक दहामध्ये भाजपचे संदीप गायकवाड यांनी विकास आघाडीच्या नगरसेविका कविता वाटमारे यांचा पराभव केला.

पठाण व देशमुख यांचा पराभव विकास आघाडीला आणि भाजपच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार वत्सला पाचंगे यांचा पराभव भाजपच्या जिव्हारी लागला आहे.

शिरूरच्या राजकारणात उद्योगपती रसिकलाल धारिवाल यांची भूमिका निर्णायक राहिली आहे. अनेक वर्षांपासून पालिकेवर त्याचे वर्चस्व राहिले आहे. यंदाच्या निवडणुकीतही रसिकलाल धारिवाल आणि त्यांचे चिरंजीव माजी नगराध्यक्ष प्रकाश धारिवाल यांनी शिरूर शहर विकास आघाडीचे नेतृत्व केले. राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, काँग्रेस या पक्षांना घेऊन ते आघाडीच्या माध्यमातून निवडणुकीला सामोरे गेले. प्रचारासाठी मुख्यमंत्री फडणवीस यांना बोलावूनही पक्षाला पराभव स्वीकारावा लागला. दुसरीकडे, लोकशाही क्रांती आघाडीने नियोजनबद्ध प्रचार यंत्रणा उभी करून प्रचारात आघाडी घेऊन एका जागेवर विजय मिळविला.

यंदाच्या निवडणुकीत प्रथमच लोकशाही क्रांती आघाडी व भाजपने विजय मिळवून खाते उघडल्याने त्यांच्या कार्यकर्त्यांत मोठा उत्साह होता. या निवडणुकीत राष्ट्रवादी, शिवसेना, मनसे आणि भाजप या चार पक्षांच्या शहराध्यक्षांना पराभव स्वीकारावा लागला.

शिरूरची नवी नगरपालिका

नगराध्यक्षा : वैशाली दादाभाऊ वाखारे (शिरूर शहर विकास आघाडी)

नगरसेवक :

शिरूर शहर विकास आघाडी : प्रकाश धारिवाल, उज्ज्वला बरमेचा, विनोद भालेराव, रेश्मा लोखंडे, सचिन धाडीवाल, मुझफ्फर कुरेशी, अंजली मयूर थोरात, मनीषा यशोधन कालेवार, अभिजित पाचर्णे , पूजा नीलेश जाधव, सुनीता पोपट कुरुंदळे, विठ्ठल पवार, सुरेखा शितोळे, संगीता महेंद्र मल्लाव, रोहिणी किरण बनकर, उज्ज्वला वैभव वारे

भाजप : नितीन पाचर्णे, संदीप गायकवाड

लोकशाही क्रांती आघाडी : मंगेश दत्तात्रय खांडरे (शिवसेना)

अपक्ष : ज्योती लोखंडे, नीलेश केरू गाडेकर

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

उत्पादन शुल्क ठेवणार‘स्पिरिट’चा हिशेब

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
साखर कारख्यान्यांच्या ‘डिस्टलरी’मध्ये तयार होणाऱ्या ‘स्पिरिट’वर आता राज्य उत्पादन शुल्क विभागाने आपले लक्ष केंद्रीत केले आहे. कारखान्यांमध्ये उसाचे गाळप किती होते, मळी किती तयार होते आणि या मळीपासून किती स्पिरिट तयार होत आहे, याचा हिशेब राज्य उत्पादन शुल्क विभाग ठेवणार आहे. कारखान्यांकडून ‘स्पिरिट’च्या विक्रीत गडबड करण्यात येत असल्याच्या ठोस संशयामुळे कारवाईचा बडगा उगारण्यास सुरुवात झाली आहे.
राज्यातील बहुतांश साखर कारखान्यांकडे स्वतःचे ‘डिस्टलरी’ युनिट आहेत. कारखान्यात उसाचे गाळप केल्यानंतर तयार होणाऱ्या मळीपासून ‘स्पिरिट’ तयार करण्यात येते. साखर कारखान्यांमध्ये तयार होणारे बहुतांश स्पिरिट हे औद्योगिक उपयोगासाठी वापरण्यात येते. मात्र, काही कारखान्यांकडून चोरून ते ‘स्पिरिट’ मद्यनिर्मितीसाठी वापरण्यात येत असल्याचे प्रकार उघडकीस आले आहे. स्पि​रिटच्या बेकायदा वापरामुळे सोलापूर आ​णि परभणी जिल्ह्यातील प्रत्येक एक, अशा दोन कारखान्यांचे ‘डिस्टलरी’चे परवाने रद्द करण्यात आले आहेत.
या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या आयुक्त व्ही. राधा यांनी साखर आयुक्त, वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटमधील तज्ज्ञांशी संपर्क साधत ‘स्पिरिट’ तयार करण्याच्या पद्धती, विक्री व्यवहार आणि त्यापोटी सरकारला मिळणारा महसूल, याबाबत बैठका घेत आढावा घेतला आहे.
पुणे जिल्ह्यात १४ पथके आहेत. तसेच, १२ रेंजच्या अधिकाऱ्यांकडून आपआपल्या हद्दीतील कारखान्यातील ‘डिस्टलरी’ची सखोल माहिती घेण्यात येत आहे. कारखान्यांमध्ये साधारण उसाचे गाळप किती करण्यात येते, त्यातून किती मळी तयार होते आणि त्या मळीपासून किती लिटर स्पिरिट तयार करण्यात आले. या स्पिरिटची विक्री कशाप्रकारे झाली, याची पूर्ण माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून ठेवण्यास सुरुवात झाल्याचे उच्चपदस्थ सूत्रांनी दिली.

राज्य उत्पादन शुल्क विभागाचा टोल फ्री नंबर
बेकायदा मद्यविक्री, गावठी दारूची निर्मिती, मद्य गैरव्यवहारांबाबत काही माहिती असल्यास ती राज्य उत्पादन शुल्क विभागाला पाठवावी, असे आवाहन उपअधीक्षक सुनील फुलपगार यांनी केले आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाने नागरिकांच्या सेवेसाठी फ्री टोल नंबर सुरू केला आहे. १८००८३३३३३३ आणि व्हॉटस् अॅप नंबर ८४२२००११३३ या क्रमाकांवर संपर्क साधावा, असे फुलपगार यांनी सांगितले. माहिती देणाऱ्या नागरिकाचे नाव गोपनीय ठेवण्यात येणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

​विविध संघटना, पक्षांकडून डॉ. गाडेंना पाठिंबा जाहीर

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, पुणे
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. वासुदेव गाडे यांच्यावर बायोडेटाहून करण्यात आलेल्या आरोपांचा निषेध विविध आंबेडरकरवादी संघटंना आणि विविध रिपब्लिकन पक्षांकडून गुरुवारी करण्यात आला. आरोपांमुळे डॉ. गाडे आणि विद्यापीठाची प्रतिमा मलीन होत आहे. त्यामुळे खोटे आरोप करण्यांवर कारवाई व्हावी आणि तसेच त्यांनी बदनामी करणे सुरू ठेवल्यास ‘अॅट्रोसिटी’ दाखल करा, अशी मागणी करून काही संघटनांनी डॉ. गाडे यांना आपला पाठिंबा जाहीर केला आहे.
डॉ. गाडे यांच्यावर काही दिवसांपूर्वी बायोडेटाहून विविध आरोप करण्यात आले होते. याचा विरोध करण्यासाठी विविध आंबेडरकरवादी आणि पुरोगामी संघटनांचे विद्यार्थी प्रतिनिधी व कार्यकर्त्यांनी डॉ. गाडे यांच्या दालनासमोर ठिय्या मांडला होता. या वेळी संघटनांच्या प्रतिनिधींनी डॉ. गाडे यांची भेट घेऊन त्यांना पाठिंबा दर्शविला आहे. डॉ. गाडे यांनी गेल्या साडेचार वर्षांत चांगले काम करून विद्यापीठाचा दर्जा उंचावला आहे. विद्यापीठात विद्यार्थ्यांसाठी विविध उपक्रम आणि उपायोजना राबविल्या आहेत. डॉ. गाडे यांच्यावर खोटे आरोप करणाऱ्यांवर कारवाई करा, अशी मागणी या वेळी करण्यात आली.
काही संघटनांकडून डॉ. गाडे यांच्यावर आरोप करणाऱ्या लोकांवर अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली. तसेच, डॉ. गाडे यांची नाहक बदनामी करणाऱ्या लोकांवर कारवाई न केल्यास रस्त्यावर उतरून आंदोलन करण्यात येईल, असाही इशारा संघटनांकडून देण्यात आला आहे. डॉ. गाडे यांना सुमारे २० ते २५ संघटना व पक्षांनी पाठिंबा दर्शविला आहे. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या पश्चिम महाराष्ट्र युवक आघाडी प्रमुख
परशुराम वाडेकर, रिपब्लिकन युवा मोर्चाचे राहुल डंबाळे तसेच बाळा चव्हाण व संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

डॉ. एकबोटेंचा गाडेंना पाठिंबा
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. वासुदेव गाडे यांच्या बायोडेटाहून त्यांच्यावर झालेल्या आरोपांचा प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायोटीचे कार्याध्यक्ष डॉ. गजानन एकबोटे यांनी निषेध केला आहे. डॉ. एकबोटे यांनी आणि सोसायटीचे पदाधिकारी, प्राध्यापक अशा शिष्टमंडळासोबत डॉ. गाडे यांची बुधवारी भेट घेतली. या वेळी त्यांनी निषेध व्यक्त करून डॉ. गाडे यांच्या पाठीशी असल्याचे सांगितले आणि भविष्यातही चांगले काम करण्यासाठी शुभेच्छा दिल्या.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


​संपामुळे ‘बीएसएनएल’ ठप्प

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
भारत संचार निगम लिमिटेड अर्थात बीएसएनएलच्या सर्व कामगार संघटनांनी पुकारलेल्या एकदिवसीय संपामुळे संपूर्ण देशात गुरुवारी बीएसएनएलचे कामकाज ठप्प राहिले. बीएसएनएलतर्फे टॉवरसाठी उपकंपनी स्थापन करण्याच्या निर्णयाविरोधात हा संप पुकारण्यात आला होता. हा निर्णय म्हणजे बीएसएनएलच्या खासगीकरणाची सुरुवात असल्याचा दावा कामगार संघटनांतर्फे पत्रकार परिषदेत करण्यात आला.
बीएसएनएलमधील विविध संघटनांच्या प्रतिनिधींनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत नागेश नलावडे, एम. आय. जकाती, दिलीप जगदाळे, भरत सोनावणे, धनंजय हरिसंगम, अमर जोशी, वंदना कामठे, महेंद्र कांबळे, चांगदेव सरोदे, उल्हास जवळेकर आदी उपस्थित होते.
‘गेल्या वर्षी तत्कालीन दूरसंचारमंत्री रवीशंकर प्रसाद यांनी बीएसएनएलच्या टॉवर्ससाठी उपकंपनी काढण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार कंपनीचे देशातील ६५ हजार टॉवर्स खासगी कंपन्यांना भाडेतत्वावर देण्यात येणार असून त्यापोटी कंपनीला प्रतिटॉवर प्रतिवर्ष ३ लाख ६० हजारांचा महसूल मिळणार आहे. असे असले, तरी त्यानंतर टॉवर भाड्याने घेतलेल्या कंपनीकडून आम्हाला टॉवर भाड्याने घ्यावे लागतील. म्हणजेच या निर्णयाने बीएसएनएलच्या खासगीकरणाची सुरुवात होणार असल्याने त्याविरोधात आम्ही आंदोलन पुकारले आहे,’ असे कांबळे यांनी सांगितले.
‘एका खासगी कंपनीला इतर कंपन्या टॉवर देण्यास तयार नाहीत, म्हणून बीएसएनएलचे टॉवर्स त्यांच्या खिशात घालण्यात येत आहेत. संपूर्ण बीएसएनएल विकत घेण्यास कोणी तयार नसल्याने त्याच्या उपकंपन्या पाडून खासगी उद्योगांच्या घशात घालण्याचे कारस्थान सुरू आहे,’ असे नलावडे यांनी सांगितले.
‘डिजिटल इंडियासाठी प्रयत्नशील सरकारला बीएसएनएल जिवंत राहावे, असे वाटत नसल्याने खासगीकरणाचा घाट घातला जात आहे,’ असे जकाती म्हणाले.
‘आतापर्यंत बीएसएनएलने १० हजार टॉवर्स अन्य कंपन्यांना भाड्याने दिले आहेत. स्ट्रॅटेजिक पार्टनर आणून व्हीएसएनएलचे खासगीकरण केले गेले. त्याच धर्तीवर ही उपकंपनी स्थापण्यात येणार आहे. त्याला आमचा विरोध आहे,’ असे सोनावणे यांनी सांगितले.

देशभरातील कर्मचारी २ लाख २० हजार
पुण्यातील कर्मचारी ३ हजार १००
देशभरातील टॉवर्स ६५ हजार

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मनसे, शिवसेनेत मैत्रीची चाचपणी

$
0
0

दोन्ही पक्षांच्या नेत्यांमध्ये संपर्काची चर्चा

म. टा. प्रतिनिधी, पुणे

भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना यांच्यात युतीबाबत संघर्ष सुरू असतानाच स्थानिक पातळीवर शिवसेना आणि मनसे यांची मैत्री होऊ शकेल का, याबाबत चाचपणी सुरू झाली आहे. दोन्ही पक्षांत अधिकृत युती झाली नाही तर परस्पर पूरक भूमिका घेण्याबाबतही दोन्ही पक्षांच्या नेत्यांमध्ये संपर्क सुरू असल्याचे एका गोटातून सांगण्यात आले.
विधानसभेच्या निवडणुकीत युती तुटल्यावर भाजप आणि सेना राज्यात एकत्र आले असले, तरी राज्यकारभार वगळता दोन्ही पक्षांमधून विस्तव जात नाही. त्यामुळे अनेक स्थानिक निवडणुका दोन्ही पक्षांनी स्वबळावर लढल्या आहेत. दरम्यान, नगरपालिकांच्या निवडणुकीत पहिल्या टप्प्यात भाजपला चांगले यश मिळाले. त्यामुळे या पक्षात स्वबळाची भाषा जोरात सुरू झाली आहे. त्या पार्श्वभूमीवर महापालिकेच्या येत्या निवडणुकीमध्ये अनेक नवी समीकरणे आकार घेण्याची शक्यता आहे.
पुणे महापालिकेच्या निवडणुकीत भाजप आणि शिवसेना यांच्यात युती व्हावी, अशी भूमिका असलेली मंडळी दोन्ही पक्षांमध्ये आहेत. परंतु, इच्छुकांची संख्या वाढल्यामुळे युती करू नये याबाबत दोन्ही पक्षांच्या नेत्यांवर मोठा दबाव आहे. त्याबरोबरच यंदा मुंबई महापालिकेची निवडणूक कळीची ठरणार असून तेथे युती होईल की नाही, यावर राज्यातील युतीचे भवितव्य ठरणार असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे पुण्यात युती होणार की नाही, हा विषय गुलदस्तातच आहे.
या पार्श्वभूमीवर भाजपशी युती करण्याबरोबरच स्थानिक पातळीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेशी मैत्री करता येईल का, याबाबत सेनेच्या नेत्यांकडून चाचपणी सुरू झाली आहे. याबाबत दोन्ही पक्षांच्या काही वरिष्ठ नेत्यांमध्ये संपर्कही झाल्याचे वृत्त आहे. ‘गरज असेल, तेव्हा शिवसेनेशी जुळवून घेणारा भाजप इतर वेळी मात्र विचारत नाही. त्या तुलनेत मनसेचे सर्वजण पूर्वश्रमीचे शिवसैनिकच आहेत. त्यामुळे दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये संवाद अधिक सुलभपणे होऊ शकतो,’ असे कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे अधिकृत युती झाली नाही, तर परस्परांना पूरक अशी रणनीती आखणे शक्य आहे, असे सांगण्यात येत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पवारांच्या हस्ते भूमिपूजन; शहर काँग्रेसचा पाठिंबा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

बहुचर्चित मेट्रो प्रकल्पाचे भूमिपूजन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते करण्यास काँग्रेसने पा​ठिंबा दिला आहे. २००७च्या निवडणुकीपूर्वीच महा‌पालिकेत सत्तेवर असलेल्या काँग्रेसने मेट्रोचा डीपीआर तयार करण्यास मंजुरी दिली होती. ‘शहराचा प्रकल्प असल्याने भूमिपूजन कोणाच्या हस्ते करायचे याचा निर्णय घेण्याचा अधिकार महापौरांना आहे. पक्षनेत्यांच्या बैठकीत पवार यांच्या हस्ते मेट्रोचे भूमिपूजन करण्याचा ठराव मान्य करण्यात आला आहे; त्याला काँग्रेसचा पाठिंबा आहे,’ अशी माहिती​ शहराध्यक्ष रमेश बागवे यांनी गुरुवारी दिली.
शहरातील वाहतुकीचा प्रश्न सोडविण्यासाठी काँग्रेसने २००७ पूर्वीच स्थायी समितीमध्ये निर्णय घेऊन मेट्रोचा डीपीआर तयार करण्यास मान्यता दिली होती. २००९मध्ये दिल्ली मेट्रो रेल कॉर्पोरेशनने दिलेल्या अहवालामध्ये काही सुधारणा करून प्रस्ताव मान्य करण्यात आला होता. त्यानंतरही हा प्रकल्प तातडीने मार्गी लागावा, यासाठी काँग्रेसने अनेकदा राज्य तसेच केंद्र सरकारकडे पाठपुरावा केला. मात्र मेट्रो जमिनीवरुन धावणारी असावी की भुयारी याबाबत काही राजकीय पक्ष तसेच स्वयंसेवी संस्थांमध्ये एकमत होत नसल्याने प्रकल्प रखडल्याचे बागवे यांनी सांगितले.
पालिका निवडणुकीच्या तोंडावर मेट्रो प्रकल्पाचे श्रेय घेण्यासाठी भाजपने पालिकेच्या मुख्य सभेची कोणतीही परवानगी न घेता, परस्पर या प्रकल्पाचे भूमिपूजन करणार असल्याचे जाहीर केले. महापालिकेच्या प्रकल्पांची घोषणा करण्याचा अधिकार महापौरांना असून, पक्षनेत्यांच्या बैठकीत पवार यांच्या हस्ते आणि काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण यांच्या उपस्थितीत भूमिपूजनाचा प्रस्ताव मान्य करण्यात आला. तातडीने या प्रकल्पाचे भूमिपूजन करावे, अशी मागणीही बागवे यांनी केली. याबाबतचे पत्रही त्यांनी महापौर प्रशांत जगताप यांना दिले आहे.

‘भाजपचे राजकारण’
निवडणुकीच्या तोंडावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मेट्रोचे भूमिपूजन करण्याचा घाट भाजपने घातला आहे. राजकारणासाठी हट्ट केला जात असल्याचा आरोप माजी आमदार मोहन जोशी यांनी केला. पक्षनेत्यांनी केलेला ठराव कायदेशीर असल्याचेही त्यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘पाणीबंद करणाऱ्यावर गुन्हा दाखल करा’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

महापालिकेला पूर्वकल्पना न देता शहराचे पाणी बंद करून पुणेकरांना वेठीस धरणाऱ्या जलसंपदा विभागातील अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी गुरुवारी सर्वसाधारण सभेत करण्यात आली. काँग्रेस, राष्ट्रवादी तसेच मनसेच्या सभासदांनी एकत्र येऊन याबाबत पालिका प्रशासनाला जाब विचाला. तसेच, गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. सभागृहाच्या भावना लक्षात घेऊन संबंधित विभागाबरोबरच राज्य सरकारला नाराजीचे पत्र पाठवून गुन्हा दाखल करण्याबाबत चाचपणी करावी, असे आदेश महापौर प्रशांत जगताप यांनी दिले.
महापालिका ठरवून दिलेल्या क्षमतेपेक्षा अधिक पाणी उचलत असल्याचा आरोप करून पंधरा दिवसापूर्वी जलसंपदा विभागातील अधिकाऱ्यांनी पुण्याचे पाणी तोडले होते. या प्रकारामुळे शहरातील मध्यवर्ती भागातील पाणीपुरवठा विस्कळीत झाला होता. दुसऱ्या दिवशी गुरुवार असल्याने पाणीपुरवठा बंद राहिल्याने सलग दोन दिवस नागरिकांना पाण्यापासून वंचित रहावे लागले होते. सर्वसाधारण सभेत याचे पडसाद उमटले. कालव्याचे गेट परस्पर बंद करण्याचा अधिकार जलसंपदा विभागाला कोणी दिला? असा प्रश्न उपस्थित काँग्रेसचे नगरसेवक संजय बालगुडे यांनी विचारून चर्चा सुरु केली. भाजप सरकार सत्तेवर आल्यानंतरच जलसंपदा विभागाची मनमानी वाढली असून, मर्जीप्रमाणे काम सुरू असल्याची टीका विरोधी पक्षनेते अरविंद शिंदे यांनी केली.
शहराचा पाणीपुरवठा बंद ठेवून तीस लाख नागरिकांना वेठीस धरणाऱ्या जलसंपदा विभागातील अधिकाऱ्यांवर पालिकेने गुन्हा दाखल का नाही केला? अशी विचारणा मनसेचे गटनेते किशोर शिंदे यांनी केली. चुकीचा कारभार करत भाजप सरकार पुणेकरांवर सूड घेत असल्याचा आरोप करण्यात आला. पालिकेला कल्पना न देता पाणी तोडणाऱ्या अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली. गुन्हा दाखल होऊ शकतो का? याची चाचपणी करुन कारवाई करावी. त्याचा अहवाल सर्वसाधारण सभेसमोर ठेवावा, असे आदेश महापौर जगताप यांनी प्रशासनाला दिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मतांच्या टक्केवारीत भाजपच ठरला अव्वल

$
0
0

पा​लकमंत्री बापट यांची माहिती; ‘युती असती तर मोठे यश’

म. टा. प्रतिनिधी, पुणे

‘जिल्ह्यातील नगरपालिकांच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाची ताकद वाढली आहे. पूर्वीच्या ११ जागा वाढून आता ५०वर गेल्या आहेत. तीन नगरपालिकांमध्ये सत्ता तर तीन नगराध्यक्ष भाजपचे झाले आहेत,’ असे पालकमंत्री गिरीश बापट यांनी गुरुवारी सांगितले. तसेच मतांच्या टक्केवारीत भाजपच पहिल्या क्रमांकाचा पक्ष ठरल्याचा दावाही बापट यांनी केला आहे. दरम्यान, शिवसेनासोबत राहिली असती, तर यापेक्षा मोठे यश मिळविले असते, अशीही टिप्पणीही त्यांनी केली.
जिल्ह्यात लोणावळा, तळेगाव दाभाडे आणि आळंदीमध्ये भाजपची सत्ता आली असून, तीन ठिकाणी नगराध्यक्षपदी भाजपचे उमेदवार विजयी झाले आहेत. जिल्ह्यात दहा ठिकाणी ११ सदस्य होते. नुकत्याच झालेल्या निवडणुकीत त्यांची संख्या ५०वर पोहोचली आहे, असे बापट म्हणाले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार, महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांच्यासह आमदार बाळा भेगडे, महेश लांडगे, शहराध्यक्ष योगेश गोगावले यांच्यासह शहर आणि जिल्ह्यातील संघटनेनेही निवडणुकीसाठी मेहनत घेतली त्यामुळे यश मिळाले, असे बापट म्हणाले. या निवडणुकीत भाजपने १२९ जागा चिन्हावर लढविल्या,तर ४० जागांवर उमेदवार पुरस्कृत केले होते.शिवसेनेशी युती व्हावी, अशी भाजपची इच्छा होती. आपण स्वतः शिवसेनेचे संपर्कप्रमुख आणि संघटनेतील प्रमुखांना चर्चेचे निमंत्रण दिले होते, मात्र त्याला प्रतिसाद मिळाला नाही. शिवसेना सोबत असती, तर आणखी मोठे यश मिळाले असते, असे बापट यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. दरम्यान, शिवसेने काही ठिकाणी इतर पक्षांना साथ दिली, पण भाजप आपल्या भूमिकेवर ठाम राहिला, अशीही टिप्पणी त्यांनी केली.

‘पालिकेतही व्हावी युती’
नगरपालिकांच्या निवडणुकीनंतर पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिका आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुकीवर आम्ही लक्ष केंद्रीत करणार आहोत. या निवडणुकीसाठीही शिवसेनेशी युती व्हावी, अशीच आमची इच्छा आहे, असे बापट यांनी सांगितले.

‘...पक्षातच बोलेन’
मनसेचे नगरसेवक रवींद्र धंगेकर यांच्या संभाव्य भाजप प्रवेशाला काहींचा विरोध आहे. त्यासंदर्भात विचारले असता ‘याबाबत आपण पक्षाच्या व्यासपीठावरच भूमिका व्यक्त करू,’ असे बापट यांनी स्पष्ट केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘महापौर कुस्ती’साठी १.८३ कोटींचा खर्च

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

महापालिकेच्या वतीने घेण्यात आलेल्या महापौर चषक आंतरराष्ट्रीय कुस्ती स्पर्धेसाठी देण्यात आलेल्या १ कोटी ८३ लाख रुपये खर्चाच्या मंजुरीवरून स्थायी समितीत वाद झाला. या स्पर्धेसाठी लाइट व्यवस्था उभारण्यासाठी १५ लाख, मंडप, गॅलरीसाठी १२ लाख, फोटो तसेच व्हिडिओ शुटिंगसाठी ११ लाख रुपये तर आंतरराष्ट्रीय खेळाडू आणि पंच यांच्या प्रवासखर्चापोटी ४७ लाख ४७ हजार रुपये खर्च करण्यात आला. विशेष म्हणजे ही स्पर्धा पार पडल्यानंतर खर्चाला मान्यता घेण्यात आली.
राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय पातळीवरील खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी पालिकेच्या वतीने कुस्ती स्पर्धा घेतली जाते. यापूर्वीही झालेल्या खर्चामुळे स्पर्धा वादात सापडली होती. यंदाची स्पर्धा ५ ते ९ ऑक्टोबर या कालावधीत खराडी येथे झाली. स्पर्धेत विविध देशांतील मल्ल सहभागी झाले होते. त्यांच्यासह राज्यभरातील मल्लांच्या बक्षिसांसह उदघाटन, खेळाडूंचे निवास, भोजनाची व्यवस्था, प्रवासखर्चावर मोठ्या प्रमाणात खर्च करण्यात आला आहे. राष्ट्रीय तालीम संघाकडे या स्पर्धेच्या आयोजनाची जबाबदारी होती. स्पर्धेसाठी झालेल्या खर्चाचा अहवाल आयोजकांनी स्थायी समितीसमोर सादर केला. त्यामध्ये सुमारे १ कोटी ८३ लाख रुपये खर्च झाल्याचे स्पष्ट करण्यात आले. राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय खेळाडूंच्या भोजनासाठी २५ लाख रुपये, खेळाडूंच्या बक्षिसांवर ३३ लाख रुपये खर्च करण्यात आले आहेत. एवढ्या मोठ्या प्रमाणात हा खर्च कसा झाला, असा प्रश्न उपस्थित करून भाजपच्या नगरसेविका मुक्ता टिळक यांनी आक्षेप घेतला. मात्र, अखेर मतदान घेऊन खर्चाला मान्यता देण्यात आली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पहिली ‘परीक्षा’आजपासून

$
0
0

शिवसेनेच्या मुलाखतींना होणार सुरुवात; राष्ट्रवादीच्या उद्यापासून

म. टा. प्रतिनिधी, पुणे

महापालिकेच्या आगामी निवडणुकीच्या शक्तिप्रदर्शनाला आज, शुक्रवारपासून खऱ्या अर्थाने सुरुवात होणार आहे. शिवसेनेकडे अर्ज केलेल्या इच्छुकांच्या मुलाखतींचा पहिला टप्पा शुक्रवारपासून सुरू होणार असून, उद्या शनिवारी राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे इच्छुकांच्या मुलाखती सुरू होणार आहेत.
फेब्रुवारीत होणाऱ्या महापालिका निवडणुकीसाठी विविध राजकीय पक्षांकडून जोरदार मोर्चेबांधणी सुरू आहे. गेल्या काही दिवसांत प्रमुख पक्षांनी इच्छुकांकडून अर्ज मागवून घेतले होते. या पार्श्वभूमीवर आजपासून विविध पक्षांचे मुलाखतींचे सत्र सुरू होत असून, शिवसेनेने त्यात आघाडी घेतली आहे. शिवसेनेचे संपर्कप्रमुख डॉ. अमोल कोल्हे, उपनेत्या डॉ. नीलम गोऱ्हे, उपनेते शशिकांत सुतार, खासदार शिवाजीराव आढळराव-पाटील, आमदार विजय शिवतारे आणि शहरप्रमुख विनायक निम्हण यांच्या उपस्थितीत इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या जाणार आहेत. प्रभाग क्र १ ते १३ या प्रभागातील इच्छुकांना आज, मुलाखतीसाठी बोलाविण्यात आले आहे. नाना पेठेतील दर्शन हॉल येथे सकाळी १० ते सायंकाळी ५ या वेळेत या मुलाखती होणार आहेत. शनिवार-रविवारीही मुलाखतींची पुढील सत्रे होतील.
शिवसेनेप्रमाणेच राष्ट्रवादी काँग्रेसच्या मुलाखतींचा कार्यक्रमही निश्चित झाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत मुलाखती निसर्ग मंगल कार्यालय येथे होतील. राष्ट्रवादी काँग्रेसच्या मुलाखती विधानसभा मतदारसंघनिहाय घेण्यात येणार आहेत. पहिल्या दिवशी (१७ ऑक्टोबर) खडकवासला, शिवाजीनगर, कोथरूड आणि वडगावशेरी या चार मतदारसंघातील मुलाखती सकाळी साडेआठ ते दुपारी चार या वेळेत होतील. तर, रविवारी उर्वरित मतदारसंघातील मुलाखती घेण्यात येतील.

राष्ट्रवादी इच्छुकांना प्रमाणपत्र वाटप
राष्ट्रवादी काँग्रेसच्या इच्छुक उमेदवारांच्या प्रशिक्षणासाठी आखलेला ‘सक्षम’ या प्रशिक्षण कार्यक्रम पूर्ण करणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांना आज, शुक्रवारी सायंकाळी प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे. बिबवेवाडी येथील अण्णा भाऊ साठे स्मारक येथे सायंकाळी चार वाजता हा कार्यक्रम होणार असल्याची माहिती शहराध्यक्षा अॅड्. वंदना चव्हाण यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


‘स्थायी’त ऐन वेळी १२५ प्रस्ताव सादर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

विकास कामांचे ४० कोटी रुपयांचे १२५ प्रस्ताव स्थायी समितीच्या बैठकीत आयत्यावेळी सादर करून मान्य करण्यात आले. शहरात समान पाणीपुरवठा योजना राबविण्यासाठी कर्ज उभारण्याचा स्थायी समितीने अमान्य केलेला प्रस्ताव सर्वसाधारण सभेत मान्य करण्याचे संकेत पालिकेतील गटनेत्यांनी पालिका आयुक्तांना दिल्याने आयत्यावेळेस प्रस्ताव समितीसमोर आणची चर्चा सुरू आहे.
शहरात समान पाणीपुरवठा योजना राबविण्यासाठी पालिकेला २२०० कोटी रुपये कर्जरोखे किंवा कर्ज घेण्याची मंजुरी मिळावी, या आयुक्तांच्या प्रस्तावावर १९ डिसेंबरच्या सर्वसाधारण सभेत तोडगा काढला जाईल, अशी हमी पक्षनेत्यांनी दिल्याने विकासकामांचे मंजुरीसाठी प्रस्ताव स्थायी समोर पाठविण्यात आले. दोन आठवड्यापूर्वी कर्ज घेऊन योजना करण्यास स्थायी समितीने विरोध करून प्रस्ताव दफ्तरी दाखल केला होता. त्यामुळे नाराज झालेल्या पालिका आयुक्त कुणाल कुमार यांनी विकासकामाचा एकही प्रस्ताव स्थायी समितीकडे पाठवू नका, असे तोंडी आदेश विभागप्रमुखांना दिले होते. गुरुवारी सकाळी आयुक्तांनी गटनेत्यांशी चर्चा केली, त्यामध्ये सोमवारी होणाऱ्या सर्वसाधारण सभेत हा प्रस्ताव मान्य करण्याचे आश्वासन देण्यात आल्याने तातडीने प्रशासनाने ४० कोटी रुपयांचे प्रस्ताव पाठविल्याची चर्चा‍ पालिकेत आहे.
गुरुवारी दुपारी ३ वाजता डिसेंबर महिन्याची मुख्यसभा होती. स्थायीमध्ये आयत्यावेळी मांडून मंजूर करण्यात आलेल्या ६३ विषयांना मुख्यसभेमध्ये लगेच दाखल करून घेण्यात आले. महापालिका निवडणुकांची आचारसंहिता पुढील पंधरा दिवसात लागण्याची शक्यता आहे. आचारसंहिता लागण्यापूर्वी या विकासकामांना स्थायी तसेच मुख्य सभेची मान्यता मिळावी, यासाठी हा प्रयत्न सुरु आहे. सोमवारी होणाऱ्या मुख्य सभेत स्थायी समितीने कर्ज घेऊन पाणीपुरवठा योजना राबविण्याचा दफ्तरी दाखल केलेला प्रस्ताव मान्य होणार का, असा प्रश्न विचारला जात आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महापालिकेवर पडणार दुपटीहून अधिक बोजा

$
0
0

पीएमपी बसखरेदीसाठी सात वर्षे हप्ते फेडण्यास स्थायी समितीची मान्यता

म. टा. प्रतिनिधी, पुणे

पुणे महानगर परिवहन महामंडळासाठी (पीएमपी) करण्यात येणाऱ्या नव्या पंधराशे बस खरेदीचा संपूर्ण बोजा पुणे महापालिकेवर पडणार आहे. मासिक हप्ते पद्धतीने घेण्यात येणाऱ्या नऊशे बसच्या खरेदीसाठी पुढील सात वर्षे पालिकेला पीएमपीला दर महिन्याला निधी द्यावा लागणार असून, भाडेतत्त्वावर घेण्यात येणाऱ्या साडेपाचशे बसमुळे वाढणारा संचलन तोटाही पालिकेला भरून द्यावा लागणार आहे.
महापालिकेच्या स्थायी समितीने गुरुवारी पुढील सात वर्षे हा संपूर्ण भार उचलण्यास मान्यता दिली. गेल्या काही महिन्यांपासून रखडलेली बस खरेदीची प्रक्रिया आता पूर्ण होऊ शकेल, अशी शक्यता स्थायी समितीचे अध्यक्ष बाळासाहेब बोडके यांनी वर्तवली. महापालिकेच्या ताफ्यात नव्याने १ हजार ५५० बस घेण्याचा निर्णय यापूर्वीच घेण्यात आला होता. त्यापैकी, १०० बस पालिकेच्या बजेट तरतुदीतून खरेदी केल्या जाणार आहेत. तर, नऊशे बस हप्तेबंद पद्धतीने खरेदी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पुढील सात वर्षांत दरमहा सर्व निधी फेडण्यात येणार असून, संबंधित रक्कम दर महिन्याला बस पुरवठा करणाऱ्यांच्या खात्यात जमा करण्याचे पत्र पीएमपीच्या अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालकांनी पाठविले होते. मात्र, बस पुरवठादाराला निधी देण्याऐवजी दर महिन्याला ठरावीक रक्कम पीएमपीच्या खात्यात जमा करण्याचा प्रस्ताव प्रशासनाने ठेवला होता. त्याला स्थायी समितीने मान्यता दिली. संचलन तुटीपोटी दिल्या जाणाऱ्या रकमेतून हप्ता रक्कम समायोजित करण्यात येईल, असेही पालिकेने स्पष्ट केले आहे.
नऊशे नव्या बसच्या खरेदीसह पीएमपी ५५० एसी बसही भाडेतत्त्वावर घेणार आहे. एसी बसमुळे पीएमपीच्या संचलन खर्चात वाढ होण्याची शक्यता असून, त्यामुळे होणारी तूट भरून देण्याचेही मान्य करण्यात आले. पीएमपीला येणारा वार्षिक संचलन तोटा भरून देण्याची जबाबदारी पालिकेवर असताना, आता बसखरेदीचा सर्व भारही पुणे व पिंपरी-चिंचवड महापालिकांवर पडणार आहे. पुणे महापालिकेला त्यापैकी ६० टक्के भार उचलावा लागणार असून, उर्वरित रक्कम पिंपरी-चिंचवड महापालिकेकडून प्राप्त होण्याची अपेक्षा आहे.

खर्च ७० टक्क्यांनी वाढणार
केंद्रातील तत्कालीन यूपीए सरकारच्या काळात जवाहरलाल नेहरू राष्ट्रीय नागरी पुर्ननिर्माण योजनेतून (जेएनएनयूआरएम) महापालिकेला बस खरेदीसाठी ७० टक्के अनुदान प्राप्त झाले होते. त्यामुळे, केवळ ३० टक्के रक्कमच पालिकेला खर्च करावी लागली होती. त्यातही, पुणे व पिंपरी-चिंचवडमध्ये या रकमेचे विभाजन झाल्याने पालिकेच्या अर्थसंकल्पावर बोजा पडला नव्हता. केंद्रातील मोदी सरकार आणि राज्यातील फडणवीस सरकारने बस खरेदीसाठी कोणतेही अनुदान मिळणार नाही, असे स्पष्ट केल्याने संपूर्ण बोजा पालिकेवर पडणार आहे. त्यामुळे, पुढील सात वर्षे पालिकेला बस खरेदीचे हप्ते फेडण्यासह पीएमपीला संचलन तुटीचा निधी देण्याची दुहेरी कसरत करावी लागणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जकात नाके पीएमपीला

$
0
0

चार जागांना ‘स्थायी’ची मान्यता; पार्किंग, संचलनासाठी वापर शक्य

म. टा. प्रतिनिधी, पुणे

पुणे महापालिकेच्या जकात नाक्यांच्या चार जागा पुणे महानगर परिवहन महामंडळाला (पीएमपी) ३० वर्षांसाठी भाडेतत्त्वावर देण्यास स्थायी समितीने गुरुवारी मान्यता दिली. या चारही जागा पीएमपीला बस पार्किंग आणि बस संचलनासाठी वापरता येतील.
महापालिका हद्दीत स्थानिक संस्था कर (एलबीटी) लागू झाल्यापासून जकात नाक्यांच्या जागांचा वापरच होत नव्हता. शहरातील महत्त्वाच्या ठिकाणी असलेल्या या जागा पीएमपीच्या वापरासाठी देण्याची मागणी केली होती. त्यानुसार, यापूर्वी ११ महिन्यांच्या कराराने पालिकेने शेवाळवाडी (सोलापूर रोड), भेकराईनगर (सासवड रोड), शिंदेवाडी (सातारा रोड), भूगाव (पौड रोड) आणि बालेवाडी (कात्रज-देहूरोड बायपास) या पाच जकात नाक्यांचा जागा पीएमपीला दिल्या होत्या. त्यापैकी, बालेवाडीची जागा वगळता इतर चारही जागा पीएमपीला दीर्घकालीन वापरासाठी देण्याचा प्रस्ताव स्थायी समितीने मंजूर केला. या जागांमुळे पीएमपीला तब्बल ८५ हजार चौरस मीटर जागा कायमस्वरूपी वापरास उपलब्ध होणार आहे. पालिकेला आवश्यक असेल, त्यावेळी या जागा परत करण्याचे बंधन घालण्यात आले आहे. तसेच, पालिकेच्या परवानगीशिवाय या ठिकाणी कोणत्याही स्वरूपाचे पक्के बांधकाम केले जाऊ नये, अशी अट घालण्यात आली आहे.
महापालिकेच्या मिळकत वाटप नियमावली २००८ नुसार या सर्व जागांचे भाडे पीएमपीला भरावे लागणार आहे. त्यामध्ये, दर वर्षी १२ टक्के वाढ करण्याचेही प्रस्तावित करण्यात आले आहे.

श्रीकर परदेशींचे प्रयत्न फळाला
पीएमपीचे तत्कालील अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक डॉ. श्रीकर परदेशी यांनी जकात नाक्यांच्या जागा मिळविण्यासाठी सर्वप्रथम पाठपुरावा केला होता. त्यानंतर, पीएमपीचे माजी अध्यक्ष अभिषेक कृष्णा यांच्या कार्यकाळात या जागांचा प्रत्यक्ष वापर करण्यास पीएमपीने सुरुवात केली. डेपो आणि बस संचलनासाठी त्याचा वापर वाढल्याने या जागा दीर्घ कालावधीसाठी पीएमपीच्या ताब्यात द्याव्या, अशी मागणी करण्यात आली होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दुसऱ्या टप्प्यात भाजप, राष्ट्रवादीची सरशी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

पुणे जिल्ह्यातील दहा नगरपरिषदांच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने चार नगरपरिषदा काबीज करून आणि सर्वाधिक ७१ जागा मिळवून बालेकिल्ला शाबूत ठेवण्यात यश मिळवले, तर भारतीय जनता पक्षाने तीन ठिकाणी निर्विवाद विजय मिळवून जिल्ह्यातील दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष म्हणून मुसंडी मारली. काँग्रेसने माजी आमदार चंदुकाका जगताप यांच्या ‘जनमत विकास आघाडी’सह दोन नगरपरिषदा ताब्यात घेऊन आब राखला.

जिल्ह्यातील दहापैकी बारामती, दौंड, इंदापूर आणि जुन्नर या चार नगरपरिषदांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस, भाजपकडे लोणावळा, तळेगाव दाभाडे आणि आळंदी, काँग्रेसकडे जेजुरी आणि काँग्रेसप्रणित ‘जनमत विकास आघाडी’कडे सासवड; तसेच शिरूरमध्ये ‘शिरूर शहर विकास आघाडी’ यांनी विजय मिळवला.

या निवडणुकीत राष्ट्रवादी सर्वाधिक ७१ , तर भाजपला ३४ जागा मिळाल्या. काँग्रेसला २५ आणि शिवसेनेला २१ जागा मिळवता आल्या. अपक्ष आणि वेगवेगळ्या आघाड्यांनी ३४ जागा पटकावल्या. लोणावळ्यात ‘आरपीआय’ने खाते उघडले. तळेगाव दाभाडेची सत्ता राखण्याबरोबरच आळंदी आणि लोणावळा या नगरपालिका त्यांनी खेचून आणल्या. अन्य ठिकाणी मात्र भाजपची डाळ शिजली नाही. बारामतीत भाजपप्रणीत आघाडीला चार आणि शिरूरमध्ये दोन जागा मिळवता आल्या. दौंड, इंदापूर, जेजुरी, जुन्नर आणि सासवड येथे भाजपला खातेही उघडता आले नाही. मात्र, ३४ जागा घेत भाजप दुसऱ्या क्रमांकावरील पक्ष झाला.

राष्ट्रवादी काँग्रेसकडे अनेक वर्षांपासून असलेली जेजुरी नगरपालिका काँग्रेसने हिसकावून घेतली, तर राष्ट्रवादी काँग्रेसने काँग्रेसकडे असलेल्या इंदापूर नगरपरिषदेवर ताबा मिळवला. आळंदीमध्ये भाजप आणि शिवसेना यांच्यातच लढत झाली. शिवसेनेला सहा जागा मिळाल्या; पण भाजपने निर्विवाद यश प्राप्त केले. लोणावळ्यात काँग्रेसप्रमाणेच शिवसेनेने सहा जागा ​मिळवल्या.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

लोणावळ्यात भाजपच

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, लोणावळा

लोणावळा नगरपालिकेच्या झालेल्या चुरशीच्या सार्वत्रिक निवडणुकीत भाजपच्या सुरेखा जाधव यांनी शिवसेनेच्या शादान चौधरी यांचा १६३१ मतांनी दणदणीत पराभव करून त्या दुसऱ्यांदा नगराध्यपदी विराजमान झाल्या. भाजपचेच सर्वाधिक आठ नगरसेवक निवडून आले असून, शिवसेना व काँग्रेसने प्रत्येकी सहा, अपक्षांनी चार, तर ‘आरपीआय’ने एका जागेवर विजय मिळवला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसला एकाही जागेवर विजय मिळवता आलेला नाही.

लोणावळ्यात काँग्रेसच्या सुवर्णा अकोलकर सर्वाधिक १२५८ मतांनी, तर भाजपचे देविदास कडू हे अवघ्या चार मतांनी विजयी झाले. मागील निवडणुकीत विक्रमी मतांनी विजयी झालेल्या नगरसेविका जयश्री इंगुळकर यांची या वेळी अनामत रक्कमही जप्त झाली असून, राजू बच्चे यांनी सलग चौथ्यांदा विजय संपादन करून विक्रम केला आहे.

लोणावळ्याचे नगराध्यक्षपद सर्वसाधारण महिलेसाठी आरक्षित होते. या पदासाठी सहा जणी रिंगणात उतरल्या होत्या. भाजपच्या सुरेखा जाधव यांनी अपेक्षितपणे विजय मिळवून त्या दुसऱ्यांदा नगराध्यक्षपदी विराजमान झाल्या. १२ विद्यमान नगरसेवक पराभूत झाले, तर सहा विद्यमान नगरसेवकांना पुन्हा विजय मिळाला.

नवी लोणावळा नगरपालिका

नगराध्यक्षा : सुरेखा जाधव (भाजप)

नगरसेवक :

भाजप : गौरी गणेश मावकर, जयश्री मारुती आहेर, भरत मारुती हारपुडे, अपर्णा विजय बुटाला, देविदास भाऊसाहेब कडू, श्रीधर सोमाप्पा पुजारी, वृंदा अनीश गणात्रा, रचना विजय सिनकर

शिवसेना : सिंधू अमोल परदेशी, शादान राजू ऊर्फ भूपेंद्र चौधरी, शिवदास वासुदेव पिल्ले, सुनील नामदेव इंगूळकर, कल्पना गंगाराम आखाडे, माणिक मोतिराम मराठे

काँग्रेस : आरोही उमेश तळेगावकर, सुवर्णा यतीन अकोलकर, सुधीर दत्तात्रय शिर्के, पूजा प्रमोद गायकवाड, संजय मोहन घोणे, संध्या सुबोध खंडेवाल

आरपीआय : दिलीप शामराव दामोदरे

अपक्ष : राजू किसन बच्चे, सेजल मुकेश परमार, अंजना विठ्ठल कडू, मंदा रमेश सोनवणे

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images