Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

दहावीतील मुलीची होस्टेलमध्ये आत्महत्या

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, येरवडा
वाघोली येथील भारतीय जैन संघटनेच्या (बीजेएस) संकुलात दहावीत शिकणाऱ्या मुलीने होस्टेलच्या खोलीतील बाथरूममध्ये ओढणीने गळफास घेऊन आत्महत्या केली. मंगळवारी रात्री आठच्या सुमारास हा धक्कादायक प्रकार घडला.
उत्कर्षा विनोद अंबुलकर (वय १६, रा. पवनार, जि. वर्धा) असे आत्महत्या केलेल्या विद्यार्थिनीचे नाव आहे. या प्रकरणी लोणीकंद पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली असून, आत्महत्याचे कारण अद्याप समजलेले नाही.
राज्यात विविध कारणांमुळे आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांच्या मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी घेण्याचे सामाजिक काम बीजेएस संस्था करते. दोन वर्षांपूर्वी उत्कर्षाच्या वडिलांचे निधन झाले होते. त्यामुळे दहावीचे शिक्षण पूर्ण करण्यासाठी या वर्षी जून महिन्यात ती बीजेएसमध्ये दाखल झाली होती. संकुलामध्ये आल्यापासूनच तिच्यावर मानसोपचार तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली उपचार सुरू होते. गेल्या आठवड्यात ९ डिसेंबर रोजी तिच्या वडिलांचे वर्षश्राद्ध असल्याने तिच्यावर मानसिक दबाव होता. याबाबतीत ती आईशी देखील वारंवार फोन बोलत असे.
मंगळवारी रात्री तिच्यासोबत असणाऱ्या मुली जेवण करण्यासाठी बाहेर गेल्यावर उत्कर्षाने खोली बंद करून घेतली, त्यानंतर तिने बाथरूममधील लोखंडी पाइपला ओढणी बांधून गळफास घेऊन आत्महत्या केली. काही वेळाने मुली खोलीवर परतल्यावर उत्कर्षा दार उघडत नसल्याने शिक्षकांनी दरवाजा तोडला. त्यावेळी उत्कर्षाने आत्महत्या केल्याचा प्रकार उघडकीस आला, अशी माहिती संस्थेचे प्राचार्य संतोष भंडारी यांनी दिली. बीजेएसमध्ये पहिल्यांदाच असा घडल्याने शिक्षक आणि विद्यार्थ्यांमध्ये खळबळ उडाली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


स्मार्ट सिटी सीईओचा कारभार आयुक्तांकडे

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, पुणे
पुणे स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कार्पोरेशन लिमिटेडच्या (पीएससीडीसीएल) मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) पदाचा कार्यभार पालिका आयुक्त कुणाल कुमार यांच्याकडे देण्यात आला आहे. बुधवारी झालेल्या पीएससीडीसीएलच्या संचालक मंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. पालिका आयुक्तांकडे पीएमपीएमएलचा अतिरिक्त पदभारही असल्याने या तीनही पदांवर काम करताना आयुक्तांना कसरत करावी लागणार असून, या अतिरिक्त कार्यभारामुळे आयुक्तांना या सर्व पदांना न्याय देता येइल का, असा प्रश्न विचारला जात आहे.
शहरात स्मार्ट सिटी प्रकल्प राबविण्यासाठी स्मार्ट सिटी कार्पोरेशन या कंपनीची स्थापना करण्यात आली आहे. या कंपनीमध्ये सीईओ हे अत्यंत महत्त्वाचे पद आहे. योजनेच्या अंमलबजावणीसाठी योग्य तो समन्वय ठेवून हे काम पार पाडण्याची जबाबदारी सीईओंवर आहे. स्मार्ट सिटी कंपनीच्या स्थापनेनंतर सीईओ म्हणून तातडीने आयएएस अधिकाऱ्याची नियुक्ती केली जाईल, अशी अपेक्षा होती. मात्र, कंपनी स्थापन होऊन दहा महिने उलटल्यानंतरही राज्य सरकारने या कंपनीवर अधिकार नेमलेला नाही. त्यामुळे कंपनीच्या संचालक मंडळाच्या बैठकीत महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त प्रेरणा देशभ्रतार यांच्याकडे या पदाची जबाबदारी तात्पुरती देण्यात आली होतो. गेल्या महिन्यापासून देशभ्रतार दीर्घ मुदतीच्या रजेवर गेले असल्याने या पदाचा कार्यभार पालिका आयुक्त कुमार यांच्याकडे देण्याचा प्रस्ताव संचालक मंडळाच्या बैठकीत ठेवण्यात आला होता. विधानपरिषदेच्या आचारसंहितेमुळे रखडलेली संचालक मंडळाची बैठक गुरुवारी झाली. त्यामध्ये हा प्रस्ताव मान्य करण्यात आला.
शहराला स्मार्ट करण्यासाठी मोठ्या थाटात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या योजनेचे उद्घाटन करण्यात आले आहे. यासाठी काही कोटी रुपयांच्या निधीची तरतूदही करण्यात आलेली आहे. मात्र, प्रत्यक्षात कोणत्याही कामाला सुरुवात झालेली नाही. कुणाल कुमार यांच्याकडे पालिका आयुक्त, पीएमपीएमएलचे व्यवस्थापकीय संचालक या पदाची जबाबदारी आहे. त्यातच आता स्मार्ट सिटीच्या सीईओचा पदभार देखील त्यांना देण्यात आल्याने या सर्व पदांना न्याय मिळेल का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
महापालिका निवडणुकीच्या तोंडावर शहरातील नागरिकांना खुश करण्यासाठी राज्य सरकारने ही योजना सुरू केली आहे. गेल्या सहा महिन्यांत या योजनेतील एकाही प्रकल्पाच्या कामाला सुरुवात झालेली नाही. शहराच्या विकासासाठी राज्य सरकार सक्षम अधिकारी देण्याचे टाळत आहे. प्रभारी पदावरच पुणेकरांची बोळवण केली जात असल्याची टीका महापौर प्रशांत जगताप यांनी केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शहरात तिघांकडून एक किलो सोने जप्त

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, पुणे
दत्तवाडी पोलिसांनी सोमवारी तिघांना संशयांवरून ताब्यात घेत त्यांच्याजवळील एक किलो २० ग्रॅम सोने जप्त करण्यात आले आहे. सोन्याच्या रूपात काळे पैसे पांढरे करण्याच्या प्रयत्न सुरू असताना पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार ही कारवाई करण्यात आली आहे. इन्कम टॅक्स विभागाच्या ताब्यात हे सोने देण्यात आले असून, या सोन्याचा तपास करण्यात येत आहे.
दत्तवाडी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अनिल पाटील आणि त्यांच्या सहकाऱ्यांना काही संशयित सोने विक्रीचा प्रयत्न करत असल्याची माहिती मिळाली होती. हे संशयित सिंहगड रोड येथे येणार असल्याचे समजल्यावर त्यांना ताब्यात घेण्यात आले. या तिघांकडे सोन्याच्या बिस्किटांच्या स्वरूपात सोने होते. तिघांना ताब्यात घेत सोन्याची चौकशी केल्यानंतर त्यांनी उडवाउडवीची उत्तरे देण्यास सुरुवात केली होती.
या तिघांपैकी दोघे आदिनाथ सोसायटीमध्ये राहणारे आहेत; तर तिसरी व्यक्ती ही बालाजीनगर (धनकवडी) येथे राहते. हे सोने या तिघांनी बाजारात विकण्याचा प्रयत्न सुरू केला होता. या सोन्याच्या बदल्यात त्यांना ३० ते ३१ लाख रुपये हवे होते. काही व्यक्तींकडे त्यांनी सोने विक्रीबाबत चौकशी सुरू केली होती, यादरम्यान पोलिसांना त्यांची माहिती मिळाली होती.
वरिष्ठ पोलिस निरीक्षक पाटील यांनी या सोन्याची माहिती तत्काळ इन्कम टॅक्स विभागाला दिली असून ते सोने त्यांच्या ताब्यात देण्यात आले आहे. हे सोने कोठून आणले याबाबत या तिघांनीही समाधानकारक माहिती दिली नव्हती. या सोन्याचे दागिने बनवायचे होते, म्हणून आणल्याचा त्यांनी दावा केला होता. मात्र, दागिने बनवण्याच्या ऑडर्स त्यांच्याकडे नव्हत्या. त्यानंतर त्यांनी पोलिसांना आमिष दाखवण्याचा प्रयत्न केला. हे सोने काळ्या बाजारातील असल्याची खात्री पटताच ते इन्कम टॅक्स विभागाच्या ताब्यात देण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

थेरगावला ६७ लाखांची रोकड जप्त

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, पिंपरी
थेरगाव येथील एका सोसायटीजवळ थांबलेल्या संशयास्पद कारमधून गस्तीवरील पोलिसांनी ६७ लाखांची रोकड जप्त केली. जप्त करण्यात आलेल्या नोटांमध्ये २००० रुपयांच्या ६२ लाखांच्या नोटा ; तर १०० रुपयांच्या पाच लाख रुपयांच्या नोटा सापडल्या आहेत. वाकड पोलिसांच्या गस्तीवरील कर्मचाऱ्यांनी मंगळवारी (१३ डिसेंबर) मध्यरात्री ही कारवाई केली.
पोलिसांनी ही रोकड आयकर विभागाकडे सुपूर्द करत प्रवीण जैन, चेतन रजपूत, साईनाथ नेटके, अमित दोशी आणि राजीव गांधी या पाच जणांना ताब्यात घेतले आहे. ही रोकड कुणाची होती आणि कुठे नेली जात होती हे अद्याप अस्पष्ट आहे. मोटारीवर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) गट या पक्षाच्या मजदूर आघाडीचे चिन्ह आहे.
वाकड पोलिस मंगळवारी रात्री हद्दीत गस्त घालत होते. त्यावेळी एक मोटार संशयतरित्या थेरगाव येथील प्रसूनधन सोसायटीजवळ थांबल्याची पोलिसांना दिसली. पोलिसांनी मोटारीची झडती घेतली असता मोटारीच्या डिक्कीत ६७ लाख रुपयांची रोकड मिळून आली. पोलिसांनी पैशांबाबत विचारणा केली असता त्यांना उडवाउवीची उत्तरे दिली. त्यामुळे पोलिसांनी रोकड ताब्यात घेऊन आयकर विभागाकडे दिली. रात्री उशिरापर्यंत आयकर विभागाच्या पथकाकडून ताब्यात घेण्यात आलेल्या पाच जणांची चौकशी सुरू होती.
जुन्या नोटा ३० टक्के दराने बदलून देण्यासाठी हे पाच जण पुण्यात आले होते, अशी चर्चा पोलिस वर्तुळात होती. परंतु अधिकृत याबाबत कोणी बोलण्यास तयार होत नव्हते. वाकड पोलिसांनी कारवाईचे कॅमेऱ्यात रेकॉर्डिंग केल्याने आयकर विभागाला तपासात त्याचा फायदा झाला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कात्रज ते निगडी मेट्रो झालीच पाहिजे : अजित पवार

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, पिंपरी
‘मेट्रो ही निगडी ते कात्रज अशीच झाली पाहिजे. याबाबत आम्ही प्रस्ताव मांडूनदेखील ती पिंपरीपर्यंतच केली. मात्र, ती कात्रज ते निगडी झाली तरच पिंपरी-चिंचवडसाठी फायदेशीर आहे. भाजपने मेट्रोसाठी उशीर लावला. कारण एक दिवस उशीर झाला तर खर्च दोन ते तीन कोटींनी खर्च वाढतो. नागपूरला मेट्रो व्हावी यात काही दुमत नाही; मात्र लोकसंख्या व शहराची गरज बघता पुणे मेट्रोला गती मिळणे अपेक्षित होते,’ असी टीका माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली.
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने महिला बचत गटांनी उत्पादित केलेल्या वस्तूंना बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या पवनाथडी जत्रेचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते बुधवारी (१४ डिसेंबर) सायंकाळी साडेपाच वाजता उद्घाटन झाले. या वेळी ते बोलत होते. महापौर शकुंतला धराडे, उपमहापौर प्रभाकर वाघेरे, महिला व बालकल्याण समिती अध्यक्षा अनुराधा गोफने, स्थायी समिती अध्यक्ष हिरानंद असवानी, माजी आमदार विलास लांडे, पक्षनेत्या मंगला कदम आदी उपस्थित होते.
पवार म्हणाले, ‘अर्थमंत्री असताना निगडी ते कात्रज मेट्रो होण्याबाबत १२०० कोटी मंजूर केले होते. परंतु, मोदी सरकारने जाणीवपूर्वक मेट्रोला विलंब केला. वास्तविक लोकसंख्या आणि गरज लक्षात घेता पहिला टप्पाच वाढविण्यात येणे गरजेचे आहे. आता हे लोक नोटा, सोनेनंतर जमिनीवरही मर्यादा आणणार आहेत. त्यामुळे देशातील छोटे उद्योग ढसाळे आहेत, भाजी, धान्यांना भाव येत नाही. ३६ दिवस झाले तरी जनता रांगेत आहे, ५० दिवसानंतर तरी स्थिती कशी बदलेल?,’ अशी बोचरी टीकाही त्यांनी या वेळी केली.
‘स्मार्ट सिटीमध्ये ही एसपीव्हीमध्ये अधिकार हा नगरसेवकांना असायला हवा होता. मुख्यमंत्र्यांना महापालिकेच्या कारभार माहिती असायला हवा, कारण स्थानिक स्वराज्य संस्थामध्ये स्थानिकांना संधी दिली पाहिजे. कारण अधिकारी मर्यादित वेळेसाठी असतात. एसपीव्हीमध्ये सारे निर्णय आयुक्तांनी घ्यायचे तर मग नगरसेवकांनी काय बघत बसायचे का? त्यामुळे आयुक्तांना समितीवर घ्या; पण तसे नगरसेवकाना ही समितीवर नेमा,’ असेही त्यांनी सांगितले.
‘स्मार्ट सिटीमध्ये पिंपरी-चिंचवडला जाणीवपूर्वक डावलण्यात आले आहे. नोटबंदी व नव्या नोटामुळे नागरिकांमध्ये संभ्रम आहे. हा निर्णय चुकला आहे, अच्छे दिन म्हणत यांनी जनतेला रांगेत उभे केले. सोन्यावर ही मर्यादा आणली. काही लोकांकडे कोट्यवधी नव्या नोटा जमा केल्या आहेत हे आरबीआय का तपासत नाहीत? रांगेत जीव गेले याबाबत कोणावर ३०२ चा गुन्हा दाखल करणार?,’ असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. मोरारजी देसाईच्या काळातही नोटाबंदी केली होती; मात्र त्यावेळी जनतेची अशी फरफट झाली नाही. स्वतःचा पैसा असून काढता येत नाही, हे कसले अच्छे दिन?’ अशी टीकाही अजित पवार यांनी केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

लोणावळ्यात रात्री सव्वा आठ वाजेपर्यंत मतदान

$
0
0



म. टा. प्रतिनिधी, लोणावळा/पिंपरी
नगरपरिषद निवडणुकांसाठी बुधवारी (१४ डिसेंबर) पार पडलेल्या मतदान प्रक्रियेत लोणावळ्यात रात्री सव्वा आठ वाजेपर्यंत मतदान झाले. तर तळेगावदाभाडे नगरपरिषदेसाठी ६८.२२ टक्के मतदान झाले. राज्याचे निवडणूक आयुक्त जे. एस. सहारिया यांनी तळेगावमधील बालविकास शाळेतील मतदान केंद्राला बुधवारी भेट दिली.

बुधवारी सकाळी ७.३० पासून मतदानाला सुरुवात झाली. मतदारांच्या या प्रतिसादामुळे तळेगावमध्ये ६८.२२ टक्के मतदान झाले आहे. यामध्ये १६ हजार १९३ पुरूष, तर स्त्रिया १४ हजार ७१४ असे एकूण ३० हजार ९०७ मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. परंतु लोणावळ्यात दुपारनंतर मतदार घराबाहेर पडले. त्यामुळे शेवटचे मतदान होईपर्यंत सव्वा आठ वाजले. लोणावळ्यात नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारांसह १११ व तळेगावात ४८ उमेदवारांचे भवितव्य मतदान यंत्रात बंद झाले आहे.
लोणावळ्यात बहुरंगी लढतीकडे सर्व मावळाचे लक्ष लागले. भाजपा, शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस या चार पक्षात तर तळेगावात भाजपा प्रणित जनसेवा विकास समिती व राष्ट्रवादी प्रणित तळेगाव शहर सुधारणा समिती यांच्यात काट्याची टक्कर झाली. लोणावळ्यात २५ जागेसाठी १११ तर तळेगावात एकूण २६ जागेपैकी तीन जण बिनविरोध निवडून आल्याने उर्वरित २३ जागेसाठी ४८ उमेदवार रिंगणात उभे होते.
लोणावळ्यात २०,९१५ पुरुष व २०,२३१ महिला असे एकूण ४१,१३६ मतदार होते. याठिकाणी साडेसात वाजल्या तरीही मतदान प्रक्रिया पूर्ण झाली नव्हती. यामुळे लोणावळ्यातील मतदानाची अंतिम आकडेवारी समजण्यास उशीर झाला. तळेगावात २३,४९६ पुरुष व २१,८०८ महिला असे एकूण ४५,३०५ मतदार होते.
तळेगाव व लोणावळ्यात किरकोळ बाचाबाची वगळता उत्साहात व शांततेत मतदान झाले. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लोणावळ्यात १९ अधिकारी, १६० कर्मचारी,५८ होमगार्ड आणि दोन सट्रायकिंग फोर्स तर तळेगावात १२ अधिकारी, १२५ कर्मचारी, ५० होमगार्ड व एक स्ट्रायकिंग फोर्स असा मोठ्याप्रमाणात पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
गुरुवारी (१५ डिसेंबर) या निवडणुकीचा निकाल असल्याने तळेगावच्या मतदारांनी कोणाच्या पारड्यात आपले मत टाकले आहे. तसेच नगरपरिषदेवर कोणाचा झेंडा फडकणार याविषयी सर्व उमेदवार आणि कार्यकर्त्यांमधील उत्सुकता ताणलेली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महिनाअखेर आर्थिक पॅकेज

$
0
0

प्रस्तावित विमानतळासाठीचा जमीन मोबदला अंतिम टप्प्यात

म. टा. प्रतिनिधी, पुणे

पुरंदरमधील प्रस्तावित आंतरराष्ट्रीय दर्जाच्या विमानतळासाठी संपादित जमिनीच्या मोबदल्यात शेतकऱ्यांना देण्यात येणाऱ्या आर्थिक पॅकेजवर अंतिम हात फिरवण्यात येत आहे. डिसेंबरअखेर या पॅकेजबाबतचा अहवाल तयार होईल, अशी माहिती उच्चपदस्थ सूत्रांनी दिली.
हे पॅकेज तयार करण्यासाठी नवी मुंबई, कोची मॉडेलचा अभ्यास करण्यात आला आहे. शेतकऱ्यांना जमिनीचा परतावा देण्याबाबतही विचार करण्यात येत असल्याचे सूत्रांनी सांगितले. प्रस्तावित पुरंदर विमानतळाचा ‘सविस्तर प्रकल्प आराखडा’ (डीपीआर) तयार करण्यासाठीच्या निविदांची मुदत २७ डिसेंबरला संपत आहे. दरम्यान, स्थानिक शेतकऱ्यांशी जमीन संपादित करण्याबाबतच्या वाटाघाटी सुरू करण्यात येतील. शेतकऱ्यांना चांगल्या प्रकारचे पॅकेज देण्याचा प्रयत्न असणार आहे. ‘डीपीआर’साठी आंतरराष्ट्रीय स्तरावर ऑनलाइन निविदा मागविण्यात आल्या आहेत. तसेच, निविदा ज्या कंपनीला मिळेल, त्या कंपनीला सात ते आठ महिन्यात हा आराखडा सादर करण्याचे बंधन घालण्यात येणार आहे. एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाकडून पुरंदर येथील जमिनींचा ‘ओएलएक्‍स सर्व्हे’ करण्यात आला आहे. या सर्व्हेक्षणाचे विश्‍लेषण करण्याचे काम एअरपोर्ट अथॉरिटीकडून सुरू आहे. दरम्यान, विमानतळाचे बांधकाम बीओटी तत्त्वावर करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्यासाठी सविस्तर प्रकल्प आराखडा तयार करण्यासाठी महाराष्ट्र एअरपोर्ट डेव्हलपमेंट कंपनीकडून निविदा मागविण्यात आल्या आहेत. या निविदांची मुदत येत्या २७ डिसेंबर रोजी संपत आहे.

काम अंतिम टप्प्यात
शेतकऱ्यांना ​संपादित जमिनींच्या बदल्यात देण्यात येणारे पॅकेज तयार करण्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. जिल्हाधिकारी सौरभ राव पॅकेजचा अहवाल तयार करत असून, लवकरच अहवाल प्राधिकरणाला देण्यात येणार आहे. या पॅकेजमध्ये शेतकऱ्यांना जमिनीचा परतावा आणि रोख रक्कम स्वरूपात देण्यावर भर असणार आहे. संपादित जमिनींच्या पॅकेजसाठी नवी मुंबई, कोची पॅटर्न अभ्यासण्यात आला आहे. शेतकऱ्यांना विकसित करण्यात येणाऱ्या जमिनींमध्ये कशा प्रकारे मोबादला देता येऊ शकतो, याचाही विचार करण्यात येत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सातपुते टोळीतील आठ जणांवर मोक्का

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

कुख्यात जंगल्या सातपुते टोळीतील आठ जणांवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी प्रतिबंध कायदा (मोक्का) अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. अतिरिक्त पोलिस आयुक्त शशिकांत शिंद यांनी यांनी या कारवाईच्या प्रस्तावाला परवानगी दिली.
मंगेश श्याम सातपुते (वय २९) तुषार सातपुते (वय २७, दोघेही रा. वैदवाडी, हडपसर), शंकर तिपन्ना कोळी (वय २६), गणेश शंकर पवार (वय २८) शुक्रकुमार उर्फ सोनू कृष्णा रणपिसे (वय २७), सुभाष बाबू गड्डम (वय २६), सादिक सलीम अन्सारी (वय २४, सर्व रा. घोरपडे पेठ), सिद्धार्थ राम लोखंडे (वय २६, रा. लोहियानगर) अशी आरोपींची नावे आहेत. सर्व आरोपी सराईत गुन्हेगार आहेत. नोव्हेंबर महिन्यात त्यांनी बांधकाम व्यावसायिकाला पळवून नेऊन दहा लाखांची खंडणी मागितली. पैसे न दिल्यामुळे त्यांना पिस्तुलाचा धाक दाखविण्यात आला. या प्रकरणी उपनिरीक्षक संजय गायकवाड यांच्या पथकाने आरोपींना पकडले होते.
या आरोपींवर खून, खुनाचा प्रयत्न, मारामारी, दरोड्याची तयारी असे गंभीर गुन्हे दाखल आहेत. टोळीचा म्होरक्या जंगल्या सातपुते कुणाल पोळ खून प्रकरणात तुरुंगात आहे. तो संघटितपणे गुन्हे करत असल्यामुळे खडक पोलिस ठाण्याचे निरीक्षक संभाजी शिर्के यांनी टोळीवर मोक्काचा प्रस्ताव लावण्याचा पाठविला होता. त्यानुसार अतिरिक्त पोलिस आयुक्त शिंदे यांनी टोळीवर मोक्का लावण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली. या गुन्ह्याचा तपास सहायक पोलिस आयुक्त शरद उगले करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


‘सीओईपी‘मध्ये यंदा ‘एआयएमटीडीआर’

$
0
0

देशविदेशातील तज्ज्ञ उपस्थित राहणार

म. टा. प्रतिनिधी, पुणे

देशात केवळ ‘आयआयटी’ आणि ‘एनआयटी’मध्येच होणारी आंतरराष्ट्रीय ‘ऑल इंडिया मॅन्युफॅक्चरिंग टेक्नॉलॉजी, डिझाइन आणि रिसर्च कॉन्फरन्स’ (एआयएमटीडीआर) आयोजित करण्याच मान यंदा शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाला (सीओईपी) मिळाला आहे. सीओईपीमध्ये १६ ते १८ डिसेंबर दरम्यान होणाऱ्या या कॉन्फरन्समध्ये देशविदेशातील तज्ज्ञ मार्गदर्शन करणार असून, ३६६ शोधनिबंधांचे सादरीकरण करण्यात येणार आहेत.
सीओईपीच्या वतीने आयोजित पत्रकार परिषदेत कॉलेजचे संचालक डॉ. बी. बी. आहुजा यांनी माहिती दिली. कॉलेजच्या प्रॉडक्शन इंजिनीअरिंग आणि इंडस्ट्रीअल मॅनेजनेंट विभागातर्फे ही कॉन्फरन्स आयोजित करण्यात येत असून, ‘रिकॉन्टरींग मॅन्युफॅक्चरिंग ’ असा कॉन्फरन्सचा विषय आहे. विभागप्रमुख डॉ. राजीव बी आणि डॉ. एन. आर. राजहंस आदी या वेळी उपस्थित होते.
डॉ. आहुजा म्हणाले, ‘देशात आतापर्यंत एआयएमटीडीआर कॉन्फरन्स केवळ आयआयटी आणि एनआयआयटीमध्येच होत होती. मात्र, अथक प्रयत्नांनंतर ही कॉन्फरन्स सीओईपीत होत आहे. कॉन्फरन्ससाठी देशविदेशातील सुमारे एक हजार २०० प्राध्यापक आणि संशोधकांनी आपले शोधनिबंध पाठविले होते. त्यातून अंतिम ३६६ शोधनिबंधांची सादरीकरणासाठी निवड झाली आहे. या वेळी ८१ शोधनिबंधाचे पोस्टर सादरीकरण होणार आहे. तसेच, या निमित्ताने औद्योगिक प्रदर्शन भरविण्यात येणार असून, नामवंत कंपन्यांचे ५० स्टॉल विद्यार्थी आणि संशोधकांना माहिती देण्यासाठी राहणार आहे. या कॉन्फरन्सला देशभरातून सुमारे ५०० संशोधक आणि प्राध्यापक उपस्थित राहणार आहेत.’

माशेलकरांचे मार्गदर्शन मिळणार

कॉन्फरन्सचे उद्घाटन उद्या, शुक्रवारी (१६ डिसेंबर) सकाळी नऊ वाजता ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर, उद्योजक अरुण फिरोदिया यांच्या उपस्थितीत होणार आहे. या वेळी डॉ. माशेलकर मार्गदर्शन करणार आहेत. कॉन्फरन्सचा समारोप १८ डिसेंबरला ‘एआयसीटीई’चे अध्यक्ष डॉ. अनिल सहस्त्रबुद्धे यांच्या उपस्थितीत होणार आहे. कॉन्फरन्स आणि प्रदर्शनासाठी विद्यार्थी उपस्थित राहू शकतात, असे डॉ. आहुजा म्हणाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘वसुंधरा महोत्सवा’त नदीबचावाचा जागर

$
0
0

चार ते ११ जानेवारीदरम्यान होणार आयोजन

म. टा. प्रतिनिधी, पुणे

पर्यावरणाचे विविध पैलू उलगडणारे लघुपट, छायाचित्र प्रदर्शन, चर्चासत्रे, मार्गदर्शनपर व्याख्याने आदी कार्यक्रमांची रेलचेल असलेला ‘‘किर्लोस्कर वसुंधरा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव’ ४ ते ११ जानेवारीदरम्यान आयोजित करण्यात आला आहे. ‘सेव्ह रिव्हर; सेव्ह लाइफ’ ही महोत्सवाची संकल्पना आहे.
‘भारतीय संस्कृतीमध्ये नदीला जीवनदायिनीचे स्थान देण्यात आले आहे. नदीकाठीच अनेक संस्कृती रूजल्या आणि वाढल्या. मात्र, आज भौतिक विकास साधताना नद्या आकसत आहेत. अनेक नद्या मरणासान्न अवस्थेत आहेत, तर काहींना गटारगंगांचे स्वरूप प्राप्त झाले आहे. समाजात जागरूकता निर्माण करून लोकसहभागातून नदीला पुनर्जन्म देणारी चळवळ उभारणे, हा या उपक्रमाचा उद्देश आहे. महोत्सवाच्या निमित्ताने देशाच्या विविध भागात नद्यांना वाचविण्यासाठी राबविण्यात येत असलेल्या उपक्रमांचे सादरीकरण करण्यात येणार आहे,’ अशी माहिती महोत्सवाचे अध्यक्ष माधव चंद्रचूड आणि संयोजक वीरेंद्र चित्राव यांनी पत्रकार परिषदेत दिली.
महोत्सवाचे यंदा अकरावे वर्ष असून, पर्यावरण संवर्धनासाठी काम करणाऱ्या विविध संस्था सहभागी होणार आहेत. आठ दिवसांच्या महोत्सवात आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या चित्रपटांबरोबरच इको बाजार, छायाचित्र प्रदर्शन, मार्गदर्शनपर चर्चासत्र, नदी संवर्धनासंदर्भातील कार्यशाळा, पर्यावरण स्नेही साहित्य संमेलन, सांस्कृतिक कार्यक्रम, तसेच, पर्यावरण क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या संस्थांचा सन्मान, विद्यार्थ्यांची पथनाट्य आदी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
यशवंतराव चव्हाण नाट्यगृह, अर्काइव्ह थिएटर, प्रभात रोड आणि किर्लोस्कर कॅम्पसमध्ये कार्यक्रम होणार असून, २० डिसेंबरपासून मोफत प्रवेशिकांचे वाटप सुरू होईल, असे चित्राव म्हणाले. अधिक माहितीसाठी संपर्क : www.kirloskarvasundharafest.in

डॉ. आमटेंना वसुंधरा सन्मान
पर्यावरण क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तीस देण्यात येणारा किर्लोस्कर वसुंधरा सन्मान यंदा डॉ. विकास आमटे यांना जाहीर झाला आहे. बहुपैलू व्यक्तिमत्व असलेल्या डॉ. आमटे यांनी आनंदवनातील कुष्ठरोग निर्मूलनाबरोबरच पर्यावरण क्षेत्रात भरीव काम केले आहे. आनंदवन आणि सोमनाथ प्रकल्पामध्ये केलेल्या कृत्रिम तळ्यांमुळे पाण्याचा प्रश्न सुटला आहे. रहिवाशांच्या सहभागातून प्लास्टिक आणि वापरलेल्या टायरच्या साह्याने छोटे बंधारे, इमारतींचा पाया आणि रस्त्यांची निर्मिती त्यांनी केली आहे, असे चित्राव म्हणाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रेल्वेतर्फे प्रवाशांसाठी हिवाळा विशेष गाड्या

$
0
0

आजपासून ऑनलाइन बुकिंगला सुरुवात

म. टा. प्रतिनिधी, पुणे

प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेऊन मध्य रेल्वेने पुणे-जबलपूर, पुणे-करमली (गोवा) आणि पुणे-मेंगळुरू (कर्नाटक) या मार्गांवर हिवाळा विशेष गाड्या सोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आज, गुरुवारपासून या गाड्यांचे ऑनलाइन बुकिंग सुरू होणार आहे.
पुणे-जबलपुर (गाडी क्र. ०१६५५) गाडी तीन जानेवारी ते २८ मार्च २०१७ या कालावधीत धावणार आहे. ही गाडी दर मंगळवारी पुणे स्टेशनवरून सकाळी १० वाजून ३० मिनिटांनी सुटेल. जबलपूर-पुणे (गाडी क्र. ०१६५६) ही गाडी जबलपूरवरून सकाळी नऊ वाजता निघून दुसऱ्या दिवळी सकाळी चार वाजता पुणे स्टेशनला पोहोचेल. ही गाडी प्रत्येकी १३ फेऱ्या करणार आहे. या गाडीला दौंड, नगर, कोपरगाव, मनमाड, भूसावळ, खांडवा, हरदा, इटारसी, पिपरीया,नरसिंगपूर आणि व मदन महाल असे थांबे देण्यात आले आहेत.
पुणे-करमली (गाडी क्र. ०१४०९) गाडी १५ डिसेंबर २०१६ ते १२ जानेवारी २०१७ या दरम्यान धावणार आहे. ही गाडी दर गुरुवारी पुणे स्टेशनवरून रात्री १० वाजून २० मिनिटांनी सुटेल. ही गाडी ५ फेऱ्या करणार आहे. करमली-पुणे (गाडी क्र. ०१४१०) गाडी दर शुक्रवारी दुपारी एक वाजून ३५ मिनिटांनी निघणार आहे. ही गाडी पाच फेऱ्या करणार आहे. दरम्यान, या गाडीला लोणावळा, पनवेल, रोहा, खेड, चिपळूण, रत्नागिरी, कणकवली, सिंधुदुर्ग आणि टिवीम हे थांबे देण्यात आले आहेत.
पुणे-मेंगळुरू (गाडी क्र. ०१३०१) ही गाडी १७ डिसेंबर २०१६ ते १४ जानेवारी २०१७ या कालावधीत धावणार असून, ती दर शनिवारी चार वाजून १० मिनिटांनी पुणे स्टेशनवरून सुटेल. मेंगळुरू-पुणे (गाडी क्र. ०१३१०) गाडी दर रविवारी रात्री १२ वाजून ५५ मिनिटांनी मेंगळुरूहून निघेल. ही गाडी लोणावळा, पनवेल, रोहा, खेड, चिपळूण, रत्नागिरी, कणकवली, करमली, मडगाव, कारवार, मुलकी आणि टोकूर येथे थांबणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पूर्वग्रहांमुळे हुकला गदिमांचा पुरस्कार

$
0
0

ज्येष्ठ दिग्दर्शक डॉ. जब्बार पटेल यांची खंत

म. टा. प्रतिनिधी, पुणे

‘गदिमांचे साहित्य रोमँटिक, कल्पनाविलासी आहे असे त्यांच्या काळातील डाव्या विचारसरणीला वाटायचे; मात्र ते तसे नव्हते. गदिमांनी त्यांच्या आयुष्यात खाल्लेल्या खस्ता त्यांच्या साहित्यातून प्रकट होतात. परंतु, साहित्यविश्वात त्यांच्याद्दल अनेक पूर्वग्रह तयार झाले आणि त्यामुळेच त्यांना साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळू शकला नाही,’ अशी खंत ज्येष्ठ निर्माते आणि दिग्दर्शक डॉ. जब्बार पटेल यांनी व्यक्त केली.

गदिमा प्रतिष्ठानतर्फे देण्यात येणारा गदिमा पुरस्कार डॉ. पटेल यांना ज्येष्ठ रंगकर्मी अरुण काकडे यांच्या हस्ते बुधवारी प्रदान करण्यात आला. या वेळी डॉ. पटेल यांनी गदिमांच्या विविधांगी व्यक्तिमत्वावर प्रकाश टाकला. डॉ. पटेल यांच्यासह गायक नंदेश उमप यांना चैत्रबन पुरस्कार, गायिका आर्या आंबेकर हिला विद्याप्रज्ञा पुरस्कार तर वीणा तांबे यांना गृहिणी-सखी-सचिव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. गदिमा प्रतिष्ठानचे विश्वस्त श्रीधर माडगूळकर, आनंद माडगूळकर या वेळी उपस्थित होते.

‘अण्णांच्या (गदिमा) साहित्याला अनेकदा समाजाने नावे ठेवली. त्यांच्या साहित्याला रोमँटिकपणाचे लेबल लावण्यात आले. स्वातंत्र्य चळवळीत अण्णांनी स्वतःचे नाव न देता अनेक च‍ळवळींची गाणी, पोवाडे रचले; ते मात्र समाज सोयीस्कररीत्या विसरला. त्यांच्याबद्दल प्रत्येकवेळी पूर्वग्रह निर्माण केला गेला. कदाचित, त्यामुळेच साहित्य अकादमीने त्यांची दखल घेतली नसावी. काँग्रेसचे बारा वर्षे आमदार आणि निष्ठावंत कार्यकर्ते असूनही त्यांनी आणीबाणीला प्रखर विरोध केला होता. ही धमक त्यांच्यामध्ये होती,’ असे डॉ. पटेल म्हणाले.

गदिमांचे स्मारक पुण्यात व्हावे, यासाठी राजकीय पातळीवर प्रयत्न करणार आहे. त्यांचे स्मारक केवळ एक इमारत नाही, तर मराठी चित्रपटाला केंद्रस्थानी ठेवून त्या इमारतीत मराठी चित्रपटांचे अर्काइव्ह, चर्चासत्रे, अभ्यासवर्गासाठी एक सभागृह, चित्रपटांच्या संशोधकांसाठी स्वतंत्र व्यवस्था, अशा अनेक सुविधांनी युक्त स्मारक करण्याचा मानस सरकारपुढे मांडणार आहे, असे डॉ. पटेल यांनी सांगितले.

‘गदिमांच्या चित्रपटांनी एक अख्खी पिढी भारावलेली आहे. त्यांचे चित्रपट आजही पाहिले जातात. ते चित्रपट अर्थपूर्ण आणि जीवनाचे तत्वज्ञान सांगणारे आहेत,’ असे काकडे म्हणाले. स्नेहल दामले यांनी सूत्रसंचलन केले

‘मोठ्याने बोलले की ऐकावेच लागते’

डॉ. जब्बार पटेल यांना अनेकांनी सुरुवातीच्या काही चित्रपटांवर बंगाली चित्रपटांची छाप आहे, असे सांगितले. त्या नंतर तशाप्रकारचे चित्रपट केले नाहीत. ‘माझ्यावरचा बंगाली टच मी काढून टाकला.’ हे सांगताना डॉ. पटेल यांनी काढून टाकलाय ना, असा प्रश्न रसिकांना विचारला. हल्ली ओरडून विचारले की, लोकांना होच म्हणावे लागते. सध्याची राजकीय परिस्थिती तशीच आहे, असे म्हणत त्यांनी पंतप्रधान मोदींना अप्रत्यक्षरीत्या टोला मारला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘येरवडा’ ठरले सर्वोत्कृष्ट तुरुंग

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

कैद्यांसाठी विविध उपक्रम, सोई सुविधा, चांगले प्रशासन, सुरक्षाव्यवस्था, तंत्रज्ञानाचा प्रभावीपणे वापर आदी उपक्रमांची केंद्र सरकारकडून दखल घेऊन येरवडा मध्यवर्ती तुरुंगाला राज्यातील सर्वोत्कृष्ट तुरुंग म्हणून घोषित करण्यात आले आहे. चांगले उपक्रम राबविणाऱ्या देशभरातील तुरुंगांचे केंद्राकडून प्रस्ताव मागविण्यात आले होते. त्यानंतर ही घोषणा करण्यात आली.

‘राज्यात तुरुंगांचे चार विभाग आहेत. त्यांच्याकडून त्यांच्या विभागातील चांगल्या तुरुंगाचा प्रस्ताव तुरुंग विभागाचे प्रमुख डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांनी मागविले होते. त्यानुसार पश्चिम विभागातून सर्वोत्कृष्ट तुरुंगासाठी येरवडा तुरुंगाचा प्रस्ताव केंद्राकडे पाठविण्यात आला. त्यानुसार केंद्राकडून सर्व गोष्टींची पाहणी केल्यानंतर राज्यात येरवडा सर्वोत्कृष्ट तुरुंग म्हणून घोषित करण्यात आले आहे. याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे,’ अशी माहिती येरवडा तुरुंगाचे अधीक्षक यू. टी. पवार यांनी दिली.

येरवडा तुरुंगात कैद्यांसाठी योगासने, औद्योगिक उत्पादनात वाढ होण्यासाठी नवीन तंत्रज्ञान, कैद्यांसाठी रेडिओ केंद्रही सुरू करण्यात आले होते. या तुरुंगात बनविण्यात येणाऱ्या वस्तूंनाही बाजारपेठेतून मागणी आहे. तुरुंगातील प्रशासन उत्कृष्ट आहे. तसेच येथे अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर केला जातो. या सर्व बाबींमुळे येरवडा राज्यातील सर्वोत्कृष्ट तुरुंग ठरल्याचे पवार यांनी नमूद केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शिवरायांचे अप्रकाशित पत्र सापडले

$
0
0

डॉ. केदार फाळके यांचे संशोधन

Prasad.Pawar@timesgroup.com
Tweet: @PrasadPawarMT

पुणे : छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रशासकीय आणि राजकीय धोरणांवर प्रकाश टाकणारे आणि ‘स्वराज्य’ या राजांच्या संकल्पनेत सामावलेला सामान्य माणसाचा विचार अधोरेखित करणारे खुद्द शिवछत्रपतींचेच अस्सल आणि अप्रकाशित पत्र उजेडात आले आहे. शिवचरित्राचे अभ्यासक डॉ. केदार फाळके यांना धुळे येथील समर्थ वाग्देवता मंदिरात हे पत्र मिळाले असून, इतिहास अभ्यासकांसाठी हा अनमोल ठेवा ठरणार आहे.

फाळके यांनी शिवछत्रपतींच्या कार्यावर पीएचडी मिळवली आहे. रामचंद्रपंत अमात्य लिखित आज्ञापत्रावर ते अभ्यास करत आहेत. या अभ्यासासाठी धुळे येथील दफ्तरखान्यात शोध घेत असताना त्यांना हे अस्सल मुद्राधारी पत्र मिळाले आहे. १८ ऑगस्ट १६७३ म्हणजेच राज्याभिषेकापूर्वी वर्षभर सातारातर्फेचे सुभेदार अबाजी मोरदेव यांना हे पत्र शिवरायांनी पाठवले आहे. पाली (जि. सातारा) येथील पाटीलकी वतनासंबंधात कान्होजी खराडे आणि काळभर यांच्यातील वादावर दिलेला निवाडा या पत्रातून समोर आला आहे. विशेष म्हणजे, जेधे शकावलीनुसार सातारा हे २७ जुलै १९७३ मध्ये स्वराज्यात दाखल झाले. त्यानंतर पुढच्याच महिन्यातले (१८ ऑगस्ट) हे पत्र असल्याने स्वराज्यात दाखल झालेल्या प्रदेशाची प्रशासकीय व्यवस्था लावण्याबाबत महाराज किती दक्ष होते, हे यातून दिसून येत आहे.

पत्राबाबत बोलताना डॉ. फाळके म्हणाले, ‘हे पत्र राज्याभिषेकापूर्वीचे आहे. पाटीलकी वतनासंबंधात खराडे आणि काळभर यांच्यात वाद सुरू होता. ही बाब छत्रपतींच्या कानी गेल्यावर त्यांनी सातारा तर्फेचे सुभेदार अबाजी मोरदेव यांना हे पत्र पाठवले आहे. खराडे यांना समज द्यावी तसेच त्यांची घोडी किंवा माणसे पालीमध्ये असतील तर त्यांना बाहेर घालवावे आणि गावातल्या पिकांची लावणी, संचणीची कामे काळभरांकडून करून घ्यावीत असा आदेश राजांनी मोरदेव यांना दिले आहे.’

या पत्रावर दोन ओळींनंतर ‘श्री शिवनरपती हर्षनिदान, महादेव मतिमत प्रधान’ असा प्रधानाचा शिक्का असून पत्राच्या शेवटी ‘मर्यादेयं विराजते’ ही छत्रपतींची मोर्तब मुद्रा आहे. पत्रातले हस्ताक्षर हे भारत इतिहास संशोधक मंडळात असणाऱ्या महाराजांच्या १७ जुलै १६७३ या दिवशी दिलेल्या अस्सल कौलनाम्यातल्या हस्ताक्षरासारखे आहे. पत्राच्या शेवटी ‘परवानगी हुजूर’ ही अक्षरे अन्य व्यक्तीच्या हातची आहेत. पत्राच्या मागे ‘सुरू सुद’ असा पत्रनोंदणीचा तत्कालीन शेरा असून, त्याखाली पैवस्तीची म्हणजेच पत्र पोहोचल्याची तारीख अरबी कालगणनेत दिली आहे. जी ८ सप्टेंबर १६७३ या इंग्रजी तारखेशी जुळते. महाराजांची आजवर सुमारे २७० पत्रे मिळाली आहेत. या पत्रातले अक्षराचे वळण, भाषाशैली, वाक्यरचना, शब्द हे महाराजांच्या अन्य पत्रांसारखेच आहेत. अन्य पत्रांसारखी वाक्यरचनाही यात पाहायला मिळते, अशी माहिती डॉ. फाळके यांनी दिली.

रयतेचे राजे आणि प्रशासकीय व्यवस्था

या पत्रात असणाऱ्या वादाचा निकाल पाली येथे महाराजांच्या उपस्थितीत १ फेब्रुवारी १६७६ मध्ये झाला. त्यापूर्वी तीन वर्षे हा वाद सुरू असल्याचे या पत्रामुळे समोर आले आहे. न्यायाच्या बाजूने ठामपणे उभे राहणारे खऱ्या अर्थाने रयतेचे राजे या पत्रातून समोर येतात. सातारा स्वराज्यात आल्यावर केवळ २४ दिवसांतले हे पत्र आहे. दक्ष प्रशासकीय कारभाराचा हा दाखला आहे. या पत्रावर आणखी अभ्यास सुरू असून, त्यासाठी डॉ. वि. आ. चितळे, शरद कुबेर, प्रा. डोंगरे आणि रमण चितळे यांनी सहकार्य केल्याचे डॉ. केदार फाळके यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

​ दहा कोटींचे घबाड हाती

$
0
0

Prasad.Panse@timesgroup.com

Tweet : @ prasadpanseMT

पुणे : सर्वसामान्यांना नोटाबंदीच्या झळा बसत असताना, पुण्यामध्ये प्राप्तिकर विभागाच्या छाप्यांत कोट्यवधी रुपयांचे घबाड हाती आले आहे. पर्वती येथील बॅँकेच्या लॉकरमधून बुधवारी सुमारे दहा कोटी रुपयांच्या नोटा जप्त करण्यात आल्या असून, तेथील कारवाई अजूनही सुरूच आहे. याच दरम्यान एका खासगी बॅँकेच्या नऊ शाखांवरही पुण्यात छापे टाकण्यात आल्या आहेत. लक्ष्मी रस्त्यावरील एका प्रसिद्ध जवाहिऱ्यावरही छापा घालण्यात आला असून, त्यामध्ये तब्बल ४५ कोटी रुपयांचे व्यवहार संशयास्पद आढळले आहेत.

एकीकडे मोठ्या प्रमाणावर रोकडटंचाई असताना विविध शहरांतील छाप्यांत नव्या नोटा आढळून आल्याने या नवीन नोटा त्यांच्यापर्यंत कशा जातात याचीही चर्चा आहे. पुण्यामध्ये सोमवारपासून प्राप्तिकर विभागाने धडक मोहीम हाती घेतली असून, त्यात उघडकीस आलेल्या प्रकरणांची माहिती बुधवारी वरिष्ठ सूत्रांनी ‘महाराष्ट्र टाइम्स’ला दिली.

त्यांच्या माहितीनुसार, ‘बॅँक ऑफ महाराष्ट्र’च्या पर्वती शाखेतील दोन लॉकरमधून अडीच कोटींच्या शंभर रुपयांच्या, तर उर्वरीत दोन हजारच्या अशी दहा कोटी रुपयांची रोकड हातात आली आहे. अमेरिकेत मुख्यालय असलेल्या एका कंपनीच्या मालकीचे हे लॉकर असून, या कंपनीचे याच शाखेत पंधरा लॉकर आहेत. त्यांतील दोन लॉकर उघडून त्यातील रोकड ताब्यात घेण्यात आली असून, उर्वरित तेरा लॉकरची तपासणी बुधवारी रात्री उशिरापर्यंत सुरू होती. त्याला आणखी एक दिवस लागण्याची शक्यता आहे. मंगळवारपासून ही कारवाई सुरू आहे.

या बहुराष्ट्रीय कंपनीचे मुख्यालय अमेरिकेतील ह्युस्टनमध्ये आहे. आशिया प्रशांत क्षेत्रासाठीचे मुख्यालय पुण्यात आहे. कंपनीचे पूर्वीपासूनच बँकेच्या पर्वती शाखेत खाते आहे. काही महिन्यांपूर्वीच कंपनीने १५ लॉकर घेतले होते. कंपनीतर्फे एकच व्यक्ती हे लॉकर वापरत होता. नोटाबंदीच्या निर्णयानंतर विशिष्ट लॉकर अनेक वेळा उघडण्यात आले. ‘संबंधित कंपनीने ही रक्कम कशी व कोठून मिळवली, यात बँक कर्मचाऱ्यांचा संबंध आहे का, याची चौकशी करण्यात येईल,’ असे सूत्रांनी स्पष्ट केले. दरम्यान, संबंधित कंपनीचे बँकेत अनेक वर्षांपासून करंट खाते असून, त्यांना नोटाबंदीनंतर बँकेतर्फे फक्त दोनदा प्रत्येकी पन्नास हजार रुपये देण्यात आले होते. लॉकरमध्ये काय ठेवले जाते, यावर बँकेचे नियंत्रण नसते. त्यामुळे या लॉकरमध्ये सापडलेल्या रकमेशी बँकेचा काहीही संबंध नसल्याचा खुलासा बँकेच्या वरिष्ठ सूत्रांनी केला.

एका खासगी बँकेच्या पुण्यातील नऊ शाखांवर गेल्या दोन दिवसांत प्राप्तिकर खात्याने छापे घातल्याचे सूत्रांनी सांगितले. बॅँकांकडे येणारी रोख रक्कम खातेदारांना न देता, परस्पर काही जणांना बदलून दिली जात असल्याचा संशय आहे. कारवाईचा तपशील जाहीर केला नाही. भांडारकर रस्त्यावरील शाखेमध्ये सकाळी कारवाई सुरू झाली.

नोटबंदीचा निर्णय जाहीर झाल्यानंतर मोठ्या प्रमाणावर सोने व मौल्यवान रत्नांची खरेदी चढ्या भावाने केल्याच्या संशयावरून, लक्ष्मी रस्ता व पौड रस्ता येथे शाखा असलेल्या जवाहिऱ्याच्या दुकानावर प्राप्तिकरने छापा घातला. या दुकानामधून ४५ कोटीहून अधिक किमतीच्या सोन्याची, तसेच हिऱ्यांची विक्री झाल्याचे आढळून आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


नगरपरिषदांसाठी ७३.१२ टक्के मतदान

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

जिल्ह्यातील दहा नगरपरिषदांच्या निवडणुकीसाठी मतदारांनी उत्साह दाखवल्याने सरासरी ७३.१२ टक्के मतदान झाले. बारामती आणि लोणावळा नगरपरिषदांमधील मतदार हे सायंकाळनंतर मतदानासाठी बाहेर पडल्याने मतदान संपण्यास रात्रीचे आठ वाजले. सर्वाधिक मतदान जेजुरीत ८६.१४ टक्के झाले असून, दौंडमध्ये सर्वांत कमी सुमारे ६१ टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. गुरुवारी सकाळी दहा वाजता मतमोजणी होणार असून, सुमारे बारा वाजेपर्यंत निकालाचे चित्र स्पष्ट होईल, असा अंदाज प्रशासनाने वर्तवला आहे.

जिल्ह्यातील बारामती, लोणावळा, दौंड, तळेगाव-दाभाडे, आळंदी, इंदापूर, जेजुरी, जुन्नर, सासवड आणि शिरूर या दहा नगर परिषदा आणि त्यांच्या अध्यक्षपदांच्या निवडणुकीसाठी बुधवारी मतदान झाले. सकाळी साडेसात वाजता मतदानाला संथ गतीने सुरुवात झाली. साडेअकरा वाजेपर्यंत सरासरी २३ टक्के मतदारांनी मतदान केले होते. आळंदी वगळता अन्य सर्व नगरपरिषदांमध्ये मतदारांमध्ये निरुत्साह होता. दरम्यान, लातूर जिल्ह्यातील औसा, निलंगा, उदगीर आणि अहमदपूर या चार नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी उत्साहात मतदान झाले. सरासरी ७० टक्के मतदान झाले.

सासवडला ७५ टक्के, जेजुरीत ८६ टक्के मतदान

पहिल्या टप्प्यापासून शेवटच्या क्षणापर्यंत वादग्रस्त ठरत गेलेल्या सासवड नगर परिषद निवडणुकीत या वेळी मतदानाने ७५ टक्क्यांची सरासरी गाठली. त्यामुळे वाढलेले मतदान नेमके कोणाच्या आघाडीला मिळणार, याचे तर्कवितर्क सुरू झाले आहेत. जेजुरी पालिकेसाठी ८६.१४ टक्के मतदान झाले.

चोख व्यवस्था असल्याने दिवसभर तणावपूर्ण वातावरणात, परंतु शांततेत मतदान प्रक्रिया पूर्ण झाली. निवडणूक निर्णय अधिकारी तथा सासवडचे प्रांत अधिकारी संजय असवले व सहायक निवडणूक अधिकारी, मुख्याधिकारी विनोद जळक, निरीक्षक नयना बोदार्डे (गुरव) व पोलिस यंत्रणा यांनी सुरक्षित मतदानासाठी योग्य ती खबरदारी घेतल्याने संवेदनशील शहर असूनही काही अनुचित प्रकार घडले नाहीत.

सकाळी साडेसात वाजता मतदान प्रक्रिया सुरू झाली. साडेअकरापर्यंत मतदान संथ गतीने सुरू होते. तोपर्यंत ४५ टक्के मतदारांनी मतदान केले. त्यात तरुण पुरुष वर्गाचे प्रमाण मोठे होते. महिला मतदारांचा कल घरातील कामे उरकून मतदान करण्याकडे असल्याचे जाणवत होते. कारण दुपारी दोन वाजल्यानंतर मतदान झपाट्याने वाढत असल्याचे दिसत होते. तो उत्साह शेवटपर्यंत राहिला. प्रभाग १,२,५,६,७,९मध्ये दुरंगी व लक्षवेधी लढती असल्याने मतदार आणि उमेदवारांचे समर्थक मोठ्या संख्येने पोलिंग बूथवर गर्दी करून होते. अनेक वेळा पोलिसांना गर्दी हटवावी लागली. आज, गुरुवारी पुरंदर तहसील कार्यालयात सकाळी दहा वाजता मतमोजणी सुरू होणार आहे. या वर्षी प्रथमच मतमोजणी केंद्र बदलण्यात आले आहे.

मतदानाची टक्केवारी

बारामती ७६.५९

लोणावळा ७४.७५

आळंदी ८२.३०

तळेगाव-दाभाडे ६८.२२

जेजुरी ८६.१४

दौंड ६०.९९

शिरूर ७३.४७

सासवड ७५.१२

जुन्नर ७२.४३

इंदापूर ७७.७२

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नगरपालिका निवडणुकीची मतमोजणी सुरू

$
0
0

मटा ऑनलाइन वृत्त । पुणे/लातूर

पुणे व लातूर जिल्ह्यातील १४ नगरपालिकांसाठी काल झालेल्या निवडणुकीची मतमोजणी अंतिम टप्प्यात आहे. आतापर्यंत हाती आलेल्या निकालांनुसार थेट नगराध्यक्ष निवडणुकीचा भाजपला फायदा झाला असून पाच नगरपालिकांमध्ये भाजपचे नगराध्यक्ष निवडून आले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसनं बारामतीचं नगराध्यपद पटकावलं आहे. तर, काँग्रेसनं लातूरची सत्ता गमावली आहे.

निकालांवर एक दृष्टिक्षेप:

अहमदपूर (जागा २३)

राष्ट्रवादी काँग्रेस - ९
भाजप - ६
शिवसेना - २
काँग्रेस - २
बहुजन विकास आघाडी - ४
नगराध्यक्ष - अश्विनी कासनाले (बविआ)

औसा (जागा २०)

राष्ट्रवादी काँग्रेस - १२
काँग्रेस - २
भाजप - ६
नगराध्यक्ष - अफसर शेख (राष्ट्रवादी)

निलंगा ( जागा २०)

भाजप - १४
काँग्रेस - ६
नगराध्यक्ष - श्रीकांत शिंगाडे (भाजप)

उदगीर (जागा ३८)

शिवसेना - ७
काँग्रेस - ७
एमआयएम - ६
भाजप - ५
...

लोणावळा (जागा २५)

नगराध्यक्ष - सुरेखा जाधव (भाजप)
भाजप-आरपीआय - ९
काँग्रेस - ६
शिवसेना - ६
अपक्ष - ४

आळंदी (जागा १८)

नगराध्यक्ष - वैजयंता कांबळे (भाजप)
भाजप - ११
शिवसेना - ५
अपक्ष - २


शिरूर (जागा २१)

नगराध्यक्ष - वैशाली वाखरे (शविआ)
शहर विकास आघाडी - १५
भाजप - २
अपक्ष - २
लोकशाही क्रांती - १

दौंड (जागा २४)

नगराध्यक्ष - शीतल कटारिया (नागरिक हित आघाडी)
राष्ट्रवादी काँग्रेस - १२
शिवसेना - ३
नागरिक हित आघाडी - ८


सासवड ( जागा १९)

जनमत आघाडी - १५
शिवसेना - ४

इंदापूर

नगराध्यक्ष - अंकिता शहा (काँग्रेस)
काँग्रेस - ८
राष्ट्रवादी - ९


जुन्नर ( जागा १६)

नगराध्यक्ष - शाम पांडे (शिवसेना)
राष्ट्रवादी - ५
शिवसेना - ३
काँग्रेस - २
इतर - २

तळेगाव दाभाडे (जागा २६)

नगराध्यक्ष - चित्रा जगनाडे (भाजप)
जनसेवा विकासा आघाडी - १५

बारामती ( जागा ३९)

नगराध्यक्ष - पौर्णिमा तावडे (राष्ट्रवादी)
भाजप - १

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

इंदापुरात ‘राष्ट्रवादी’चा जोर; नगराध्यक्ष मात्र काँग्रेसचा

$
0
0

हर्षवर्धन पाटील बालेकिल्ला राखण्यात यशस्वी

म. टा. प्रतिनिधी, बारामती

इंदापूर नगर परिषदेच्या निवडणुकीत नगराध्यक्षपदी काँग्रेसच्या अंकिता शहा विजयी झाल्याने माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील बालेकिल्ला राखण्यात यशस्वी झाले आहेत; मात्र १७ जागांपैकी राष्ट्रवादी काँग्रेस नऊ जागांवर विजयी झाल्याने बहुमत ‘राष्ट्रवादी’कडे गेले आहे. काँग्रेसचे नगरसेवक आठ जागांवर विजयी झाले.

या निवडणुकीच्या प्रचारासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, तसेच विधान परिषदेतील विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांच्यासारख्या दिग्गज नेत्यांनी सभा घेतल्या होत्या. नागरी विकास करून प्रति बारामती निर्माण करण्याचे ध्येय या मुद्द्यांवर हर्षवर्धन पाटलांच्या विरोधात त्यांनी दंड थोपटले होते. भाजपनेही बराच जोर लावला होता. भाजपचे प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब दानवे, गिरीश बापट, सुधीर मुनगंटीवार, महादेव जानकर यांनी सभा घेतल्या होत्या. त्यामुळे ही निवडणूक पवार व पाटील यांच्या अस्तित्वाची लढाई ठरली होती. अखेर या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे नऊ आणि काँग्रेसचे आठ नगरसेवक निवडून आले आहेत; मात्र इंदापुरात विकास व स्वच्छतेची परिस्थिती जैसे थे राहणार की बदलणार, हे येणारा काळच ठरवणार आहे.


इंदापूरची नवी नगरपालिका

नगराध्यक्षा : अंकिता मुकुंद शहा (काँग्रेस)

नगरसेवक :

काँग्रेस : सुवर्णा नितीन मखरे, अनिता रमेश धोत्रे, धनंजय विश्वास पाटील, शेख रजिया हजरत, जगदीश बापू मोहिते, मोमीन मीना ताहेर, कैलास अजिनाथ कदम, मनीषा पांडुरंग शिंदे.

राष्ट्रवादी काँग्रेस : अनिकेत अरविंद वाघ, स्वप्नील राजेंद्र राऊत, हेमलता वसंत माळुंजकर, उषा श्रीकांत स्वामी, अमर माणिक गाडे, पोपट पांडुरंग शिंदे, राजश्री अशोक मखरे, गजानन अर्जुन गवळी, मधुरा शैलेश पवार

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आळंदीत शिवसेनेला नमवून भाजप विजयी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, राजगुरूनगर

अतिशय अटीतटीने लढल्या गेलेल्या आळंदी नगर परिषदेच्या नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाजपच्या वैजयंती उमरगेकर-कांबळे यांनी शिवसेनेच्या भाग्यश्री रंधवे यांचा अवघ्या ३७ मतांनी पराभव केला. आळंदी नगर परिषदेवरील शिवसेनेचे वर्चस्व मोडीत काढून भाजपने सेनेच्या ताब्यातील सत्ता हिसकावून घेतली. जिल्हा परिषद व पंचायत समितीची निवडणूक तोंडावर आलेली असताना झालेल्या शिवसेनेच्या पराभवामुळे खासदार शिवाजीराव आढळराव व आमदार सुरेश गोरे यांना जोरदार हादरा बसला आहे. या निवडणुकीत भाजपचे दहा, शिवसेनेचे सहा, तर शिवसेना पुरस्कृत दोन अपक्ष नगरसेवक निवडून आले आहेत. निवडणूक निर्णय अधिकारी तथा खेडचे प्रांताधिकारी सुनील गाढे यांनी निकाल जाहीर केले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आळंदी येथे झालेली प्रचारसभा भाजपसाठी कमालीची फायदेशीर ठरली आहे. याच सभेमुळे विजयाचे पारडे भाजपच्या बाजूने झुकले. अन्यथा भाजपची परिस्थिती अवघड झाली असती. दुसरीकडे, शिवसेनेच्या एका माजी पदाधिकाऱ्याचा हेकेखोरपणा सेनेच्या या पराभवाला कारणीभूत ठरल्याचे बोलले जात आहे. नदीपलीकडचा देहू फाटा हा भाग सेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. परंतु याच भागांत भाजपने अनपेक्षितपणे मुसंडी मारून सेनेला जोराचा झटका दिला.

अध्यक्षपदाच्या मतमोजणीत सुरुवातीला भाजपच्या वैजयंती उमरगेकर यांनी शिवसेनेच्या भाग्यश्री रंधवे यांच्यावर आघाडी घेतली होती; मात्र तिसऱ्या फेरीअखेर रंधवे यांनी उमरगेकर यांच्यावर सहाशेपेक्षा अधिक मताधिक्य घेतले. चौथ्या फेरीअखेर ही आघाडी घटून ती ऐंशी मतांवर आली. त्यानंतर पाचव्या फेरीअखेर उमरगेकर यांनी रंधवे यांचा ३७ मतांनी पराभव केला.


आळंदीची नवी नगरपालिका

नगराध्यक्षा : वैजयंती उमरगेकर-कांबळे (भाजप)

नगरसेवक :

भाजप : ज्योती चिताळकर (बिनविरोध), सागर भोसले, मीरा पाचुंदे (बिनविरोध), सागर बोरुंदिया, प्रशांत कुऱ्हाडे, प्रमिला रहाणे, सचिन गिलबिले, पारूबाई तापकीर, पांडुरंग वहिले, बालाजी कांबळे

शिवसेना : प्रतिमा गोगावले, तुषार घुंडरे, स्नेहल कुऱ्हाडे, आदित्य घुंडरे, प्राजक्ता घुंडरे, शैला तापकीर

अपक्ष (शिवसेना पुरस्कृत) : स्मिता रायकर, प्रकाश कुऱ्हाडे

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जुन्नरमध्ये ‘राष्ट्रवादी’ला बहुमत; नगराध्यक्ष सेनेचा

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, जुन्नर

जुन्नर नगरपालिकेच्या नगरसेवकांच्या १७ जागांवर झालेल्या लढतीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आठ जागा मिळवून बहुमतात आला, तर सेनेला पाच जागांवर विजय मिळाला. आमदार शरद सोनवणे आणि भाजप यांच्या आघाडीला तीन जागा मिळाल्या आहेत. काँग्रेसला एका जागेवर विजय मिळवता आला. नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत शिवसेनेचे बंडखोर उमेदवार मधुकर काजळे आणि शिवसेनेचे श्याम पांडे यांच्यात मतमोजणीच्या शेवटच्या फेरीपर्यंत स्पर्धा कायम होती. अखेर श्याम पांडे १४४ मतांनी विजयी झाले.

जुन्नर नगरपालिकेचे नवे सदस्य

नगराध्यक्ष : श्याम पांडे (शिवसेना)

नगरसेवक :

राष्ट्रवादी काँग्रेस : अक्षय मांडवे, अलका फुलपगार, लक्ष्मीकांत कुंभार, मोनाली म्हस्के, अश्विनी गवळी, दिनेश दुबे, समिना शेख, फिरोज पठाण

शिवसेना : अविन फुलपगार, सुवर्णा बनकर, अंकिता गोसावी, समीर भगत, दीपेश परदेशी

आपली आघाडी : जमीर कागदी, कविता गुंजाळ, सना मन्सुरी

काँग्रेस : हाजरा इनामदार

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 75772 articles
Browse latest View live


Latest Images