Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

पैगंबरांची जयंती उत्साहात साजरी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

इस्लाम धर्माचे संस्थापक हजरत महंमद पैगंबर यांच्या जयंती निमित्त सोमवारी शहरामध्ये उत्साहात साजरी करण्यात आली. या निमित्त विविध संस्था संघटनांतर्फे दुपारनंतर मिरवणुका काढण्यात आल्या. सिरत कमिटीतर्फे नाना पेठेतील मन्नुशाह मशिदीपासून काढण्यात आलेल्या मिरवणुकीची रात्री उशिरा सांगता झाली.
मुस्लिम बांधवांमध्ये हजरत महंमद पैगंबर यांच्या जयंतीला विशेष महत्त्व आहे. त्यामुळे बांधवांनी दोन दिवसांपूर्वीपासूनच मिरवणुकीची तयारी केली होती. सिरत कमिटीने मोठ्या मिरवणुकीचे आयोजन केले होते. मन्नुशाह मस्जिदीपासून दुपारी तीन वाजता मिरवणुकीला सुरुवात झाली. मौलाना कारी मेहताब यांच्या उपस्थितीत या अध्यक्षतेखाली मिरवणूक काढण्यात आली. यामध्ये माजी महापौर दत्तात्रय धनकवडे, पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट, माजी आमदार मोहन जोशी, रमेश बागवे तसेच सिरत कमिटीचे सरचिटणीस रियाज एहमद खान, सचिव रफिउद्दीन शेख, जिया उद्दीन शेख, आसिफ शेक तसेच इतर पदाधिकारी सहभागी झाले होते. या वेळी मौलाना मौलाना हाफिज इद्रिस, मौलाना एहमद खासमी यांसह इतर इतर मान्यवरांनी बांधवांना मार्गदर्शन केले. शहरातील विविध संस्थातर्फे ठिकठिकाणी मिठाईचे वाटप करण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


प्रत्येक प्रभागासाठी संचलन समिती स्थापन

$
0
0

पदा​धिकाऱ्यांना संधी देण्यासाठी भाजपची योजना

म. टा. प्रतिनिधी, पुणे

महापालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी नव्या प्रभागरचनेनुसार जास्तीत जास्त मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी भारतीय जनता पक्षाने ‘प्रभाग संचलन समिती’ स्थापन केली आहे. त्या अंतर्गत, विविध स्वरूपाच्या कामांचे वाटप करण्यासाठी पंधराहून अधिक समित्या कार्यान्वित करण्यात आल्या आहेत. शहरातील पदाधिकाऱ्यांसह स्थानिक कार्यकर्त्यांना या समित्यांमध्ये संधी देऊन शहरातील पक्षाचे संघटन मजूबत करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.
केंद्रात आणि राज्यात सत्ता प्राप्त केल्यानंतर आता महापालिकेची सत्ता मिळविण्यासाठी भाजपने जोरदार प्रयत्न सुरू केले आहेत. त्यादृष्टीने, केंद्र आणि राज्याच्या स्तरावर प्रलंबित राहिलेल्या शहरातील विविध प्रकल्पांना गती देण्यासह स्थानिक पातळीवरही पक्षाच्या माध्यमातून मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी विविध उपाययोजना केल्या जात आहेत. पुढील वर्षी होणाऱ्या निवडणुका बहुसदस्यीय प्रभाग पद्धतीने (४१ प्रभाग) होणार असल्याने प्रत्येक प्रभागावर विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. त्यासाठी, प्रभाग संचलन समित्या कार्यान्वित करण्यात आल्या असून, पदाधिकारी, अनुभवी आणि नव्या दमाच्या कार्यकर्त्यांना त्यात स्थान देण्यात आले आहे.
पक्षाच्या स्तरावर केल्या जाणाऱ्या विविध स्वरूपाच्या तयारीसाठी संचलन समिती अंतर्गतच निधी संकलन, जाहीरनामा, सभा संयोजन, मतदार यादी यासारख्या उप-समित्याही नेमण्यात आल्या आहेत. स्थानिक स्तरावरील सर्व जबाबदारी संबंधित समित्यांकडे देण्यात आली आहे. निवडणुकीच्या कामाचे वाटप केल्याने पक्ष संघटनेवरील ताण हलका होण्यासही मदत होणार असल्याचे सांगितले जात आहे. गेल्या अनेक वर्षांपासून भाजपतर्फे हजारी यंत्रणेच्या माध्यमातून निवडणुकीची पूर्वतयारी केली जात आहे. केंद्र-राज्यातील सत्ता आणि नोटाबंदीनंतरही भाजपच्या बाजूने असलेल्या नागरिकांपर्यंत पोहोचण्यासाठी संचलन समितीच्या माध्यमातून अधिक काटेकोर नियोजन केले जात आहे.

जाहीरनामा लांबणीवर?
शहरातील विविध प्रश्न, समस्या सोडविण्यासह विविध विकासकामांचा अजेंडा मांडण्यासाठी डिसेंबरच्या मध्यापर्यंत जाहीरनामा प्रसिद्ध करण्याची तयारी शहर भाजपने केली होती. परंतु, पुणे जिल्ह्यात होणाऱ्या नगरपालिकांच्या निवडणुकांची जबाबदारी पक्षाच्या अनेक पदाधिकाऱ्यांकडे देण्यात आली होती. त्यामुळे, या निवडणुका झाल्यानंतरच जाहीरनाम्याच्या कामाला वेग येईल, असे संकेत देण्यात आले. तसेच, शहरातील सर्व ४१ प्रभागांसाठी स्वतंत्र जाहीरनामा प्रसिद्ध करण्याची तयारीही पक्षाने केली आहे. डिसेंबरअखेरपर्यंत प्रभाग स्तरावरील जाहीरनामे मतदारांसमोर मांडण्यात येण्याची शक्यता आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सराईत गुन्हेगाराचा बिबवेवाडीत खून

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

बिबवेवाडी येथील मोकळ्या मैदानात मद्यपान करणाऱ्या सराईत गुन्हेगारावर कोयत्याने, दगडाने वार करून त्याचा निर्घृण खून केल्याची घटना सोमवारी दुपारी घडली. या प्रकरणी बिबवेवाडी पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मद्यपान करताना झालेल्या वादातून हा खून झाला असावा पोलिसांचा अंदाज आहे.
सागर बोराडे असे खून झालेल्याचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बोराडे रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. दीड वर्षांपूर्वी तो तरुंगातून सुटला. सध्या कचरा वेचण्याचे काम तो करीत होता. सोमवारी दुपारी दोनच्या सुमारास सागर आणि त्याचे साथीदार दारू पिण्यासाठी बिबवेवाडीतील मैदानावर गेले होते. त्यावेळी झालेल्या वादातून बोराडेच्या तोंडावर, शरीरावर कोयत्याने वार करण्यात आले. खून झाला त्या भागात लोकांचा वावर कमी असल्याने घटनेची माहिती पोलिसांना मिळू शकली नाही. सायंकाळी सव्वासहाच्या सुमारास पोलिसांना खुनाचे वृत्त समजले. त्यानंतर त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. घटनास्थळी दारूच्या रिकाम्या बाटल्यांसह सीलबंद बाटली, चार ग्लास सापडले. खुनाचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सॉफ्टवेअरने लावली इंग्रजीची गोडी

$
0
0

​‘इंग्लिश हेल्पर’ची निर्मिती; जिल्ह्यातील ३६० शाळा सहभागी

म. टा. प्रतिनिधी, पुणे

शिक्षण पद्धतीत केलेले छोटे बदल मुलांना शिक्षणाची गोडी लावू शकतात, याचे उत्तम उदाहरण ‘राइट टू रीड’ या सॉफ्टवेअरने अनुदानित शाळांना घालून दिले आहे. गेल्या वर्षीपर्यंत किचकट व्याकरण, अवघड स्पेलिंगमुळे इंग्रजीच्या पुस्तकाकडे पाठ फिरवणारी मुले सध्या इंग्रजीतून संवाद साधण्याचा प्रयत्न करीत आहेत. एवढेच नव्हे तर, इंग्रजीच्या तासाने विद्यार्थ्यांच्या मनात घर केले आहे.

राज्यातीलच नव्हे तर देशातील बहुतांश अनुदानित शाळांमधील मुलांना इंग्रजीचे वाचन करता येत नाही. त्यातील बहुसंख्य विद्यार्थ्यांच्या घरात आर्थिक परिस्थितीमुळे इंग्रजी भाषेला प्रोत्साहन देणे तर दूरच; मुलांच्या दैनंदिन गरजाही पूर्ण करणे शक्य नाही. इंग्रजीपासून दूर पळणाऱ्या विद्यार्थ्यांना रंजक पद्धतीने हा विषय शिकवण्यासाठी ‘इंग्लिश हेल्पर’ या संस्थेने दोन वर्षांपूर्वी ‘राइट टू रीड’ नामक सॉफ्टवेअर विकसित केले. महाराष्ट्रासह, दिल्ली, गुजरात अशा सहा राज्यांतील शंभर शाळांमध्ये हा उपक्रम राबविण्यात येत असून, वीस हजारांहून अधिक विद्यार्थी इंग्रजीचे धडे गिरवत आहेत. आयएल अँड एस, अमेरिकन इंडिया फाउंडेशन, बोध शिक्षा समिती यांचे या उपक्रमाला सहकार्य मिळत आहे.

‘राइट टू रीड सॉफ्टवेअरमध्ये पहिली ते सहावी इयत्तेचे इंग्रजीचे पुस्तक डिजिटल स्वरूपात सादर करण्यात आले आहे. सॉफ्टवेअरद्वारे पुस्तकातील प्रत्येक धडा इंग्रजीत स्पष्ट आवाजात वाचून दाखवला जातो. धड्यातील अवघड शब्द, त्याचे चित्र, स्थानिक भाषेतील अर्थ, उच्चार आणि व्याकरणावर आधारित माहिती सॉफ्टवेअऱमध्ये आहे. त्यामुळे वर्गात मोठ्या स्क्रीनवर पुस्तक बघताना आणि धड्यांचे जाहीर वाचन करताना मुलांना गंमत वाटते. मुले प्रत्येक धड्याचे एकत्रित जाहीरपणे वाचन करतात. पुणे, पिंपरी-चिंचवड आणि जिल्ह्यातील ३६० शाळांमध्ये हा उपक्रम राबविण्यात येत आहे,’ अशी माहिती प्रकल्प समन्वयक शंकर सिंग यांनी दिली.
या सॉफ्टवेअरमुळे मुलींची इंग्रजीची भीती गेल्याचे पुण्यातील सेंट हिल्डाज हायस्कूलच्या मुख्याध्यापिका कल्पना कलकोटी यांनी नमूद केले. ‘आमच्याकडील मुलींची परिस्थिती अगदीच बेताची आहे. घरी इंग्रजीसाठी अनुकूल वातावरण नसल्याने त्यांचा शाळेवरच भर आहे. या सॉफ्टवेअरमुळे त्यांचा आत्मविश्वास वाढला आहे,’ असेही त्या म्हणाल्या. ‘वर्गातील पारंपरिक शिक्षणाबरोबरच कम्प्युटर लॅबमध्ये मुलींना सॉफ्टवेअरमधून इंग्रजीचे धडे देण्यात येत आहोत. त्यामुळे मुलींच्या इंग्रजी शब्दसंपदेत वाढ होत असून, संभाषणाचाही प्रयत्न होताना दिसत आहे,’ असे निरीक्षण इंग्रजीच्या शिक्षिका दीपा त्रिभुवन आणि समन्वयक अपर्णा चव्हाण यांनी नोंदवले.

गेल्या वर्षीपर्यंत इंग्रजी विषय शिकता येईल का, अशी भीती वाटत होती. इंग्रजीचे स्पेलिंग पाठ करण्याचे दडपण होते. पण, कम्प्युटरच्या मदतीने इंग्रजी शिकताना मजा वाटते. धड्यांचे जाहीर वाचन केल्यामुळे इंग्रजी बोलता येईल, असा आत्मविश्वास वाटत आहे.

रुचिता धनगर, विद्यार्थिनी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

राष्ट्रवादीकडे ४२५; सेनेकडे ६८७ अर्ज

$
0
0

इच्छुकांच्या चाचपणीला वेग येण्याची चिन्हे

म. टा. प्रतिनिधी, पुणे

महापालिका निवडणुकांसाठी जेमतेम दोन महिन्यांचा कालावधी राहिल्याने इच्छुकांच्या चाचपणीला आता वेग येण्याची चिन्हे आहेत. राष्ट्रवादीकडे आतापर्यंत सव्वाचारशे अर्ज दाखल झाले असून, शिवसेनेकडे ६८७ इच्छुकांचे अर्ज दाखल केले आहेत. इच्छुकांच्या मुलाखतींनंतर पहिली यादी तयार होण्याची शक्यता आहे. शिवसेनेच्या मुलाखती याच आठवड्यात घेतल्या जाणार आहेत.
पालिकेच्या निवडणुकांसाठी पुढील महिन्याच्या सुरुवातीला आचारसंहिता जाहीर होण्याची शक्यता आहे. त्याचवेळी, निवडणुकीचा संपूर्ण कार्यक्रम जाहीर होईल. तत्पूर्वी, विविध प्रभागांमधील इच्छुकांमधून संभाव्य उमेदवार निवडण्याची तयारी राजकीय पक्षांनी सुरू केली आहे. त्यासाठी, पुढचा कार्यक्रम निश्चित करण्यात आला आहे.
शिवसेनेने डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात इच्छुकांकडून अर्ज मागविले होते. ही मुदत गेल्या गुरुवारी संपली. या कालावाधीत शिवसेनेकडे ६८७ इच्छुकांनी अर्ज दाखल केल्याची माहिती शहरप्रमुख विनायक निम्हण यांनी दिली. शिवसेनेने १६ डिसेंबर ते १८ डिसेंबर या कालावधीत इच्छुकांच्या मुलाखतींचा कार्यक्रम ठरवला आहे. नाना पेठेतील दर्शन हॉल येथे सकाळी १० ते सायंकाळी ५ या वेळेत मुलाखती घेण्यात येतील. शुक्रवारी प्रभाग क्र १ ते १३, शनिवारी प्रभाग क्र १४ ते २८ आणि अखेरच्या दिवशी प्रभाग क्र २९ ते ४१ अशा तीन टप्प्यांत मुलाखती घेतल्या जाणार आहेत. संपर्कप्रमुख डॉ. अमोल कोल्हे, उपनेत्या डॉ. नीलम गोऱ्हे, उपनेते शशिकांत सुतार, खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, राज्यमंत्री विजय शिवतारे आणि शहरप्रमुख विनायक निम्हण यांच्या उपस्थितीत मुलाखती होतील.
राष्ट्रवादी काँग्रेसकडून निवडणूक लढविण्यास इच्छुक असणाऱ्यांसाठी अर्ज दाखल करण्याची मुदत रविवारी संपली. राष्ट्रवादीकडे ४२५ इच्छुकांनी अर्ज दाखल केले आहेत. राष्ट्रवादीच्या इच्छुकांसाठी नुकतेच काही दिवसांपूर्वी प्रशिक्षण शिबिर घेण्यात आले होते. या शिबिरात पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मार्गदर्शन केले होते. हे शिबिर पूर्ण करणाऱ्या इच्छुकांना उमेदवारीसाठी प्राधान्य देण्यात येईल, असे यापूर्वीच स्पष्ट करण्यात आले होते. तसेच, आगामी काळात इच्छुकांच्या मुलाखतीचा कार्यक्रम ठरविला जाईल, असे पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मतदान केंद्रांची संख्या २५ टक्क्यांनी वाढणार

$
0
0

एका केंद्रांवर आठशे मतदारांना मतदान शक्य

म. टा. प्रतिनिधी, पुणे

महापालिकेची आगामी निवडणूका बहुसदस्यीय पद्धतीने (चार सदस्यांचा एक प्रभाग) होणार असल्याने मतदान केंद्रांच्या संख्येत सुमारे २० ते २५ टक्क्यांनी वाढ होण्याची चिन्हे आहेत. पुण्यात गेल्या वेळी निवडणुकीतील २ हजार ९०० मतदान केंद्रांची संख्या यंदा साडेतीन हजारांपर्यंत पोहोचेल, असा प्राथमिक अंदाज आहे.
एका मतदाराला चार उमेदवारांना मत देण्यासाठी लागणारा कालावधी लक्षात घेऊन मतदान केंद्रांवरील मतदारांची संख्या आठशेच्या पुढे नेण्यात येऊ नये, असे स्पष्ट निर्देश निवडणूक आयोगाने सर्व महापालिकांना दिले आहेत. त्यानुसार, मतदान केंद्रांची संख्या निश्चित करण्याचे कामही सुरू केले आहे. २०१२मध्ये झालेल्या महापालिकेच्या निवडणुकीत सुमारे एकोणतीसशे मतदान केंद्रांवर मतदान झाले होते. यंदा मतदान केंद्रांवरील मतदारांची संख्या कमी करण्याचे आदेश देण्यात आल्याने शहरातील एकूण मतदान केंद्रे पस्तीसशेच्या पुढे जातील, असा अंदाज आहे.
फेब्रुवारी २०१७ मध्ये महापालिकेची पंचवार्षिक निवडणूक होणार आहे. निवडणुकीसाठी प्रभाग-रचना अंतिम झाली असून, जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात आचारसंहिता जाहीर होण्याचा अंदाज आहे. तसेच, जानेवारीच्या पहिल्या आठवड्यातच मतदार यादी अंतिम केली जाणार असून, त्यानुसार प्रत्येक प्रभागातील मतदारांची संख्या समजू शकणार आहे. त्यानुसार, मतदान केंद्रे निश्चित करण्याची जबाबदारी पालिकेवर आहे. एका मतदान केंद्रावर साधारणतः एक हजार ते बाराशे मतदार मतदान करतात. गेल्या निवडणुकीत दोन सदस्य निवडून द्यायचे असले, तरी मतदान केंद्रांवरील मतदारांची संख्या कायम ठेवण्यात आली होती. आगामी निवडणूक चार सदस्यीय पद्धतीने होणार असल्याने त्यामध्ये बदल करणे क्रमप्राप्त झाले होते. एका मतदाराला चार जणांना मत द्यायला नेहमीपेक्षा अधिक वेळ लागणार असल्याने मतदान केंद्रावरील सरासरी मतदारांची संख्या साडेसातशे ते आठशेपर्यंत मर्यादित ठेवावी, अशा सूचना निवडणूक आयोगाने केल्या आहेत. त्यामुळे, निवडणूक आयोगाच्या सूचनांनुसार अस्तित्वातील मतदार केंद्रांची पुनर्रचना करणे, नव्या मतदार केंद्रांचा शोध घेणे आणि मतदारनिहाय त्यांची संख्या अंतिम करण्याची कार्यवाही केली जात आहे. पुढील काही दिवसांत त्याला अंतिम स्वरूप दिले जाईल.

निवडणूकखर्चांत वाढ होणार
मतदान सुरळीत होण्यासाठी मतदान केंद्रांवर सरासरी चार ते पाच कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली जाते. आगामी निवडणुकीसाठी मतदान केंद्रांची संख्या वाढली, तर महापालिकेला मतदान केंद्रांवरील कर्मचाऱ्यांची संख्याही वाढवावी लागणार आहे. तसेच, मतदान केंद्रांची संख्या वाढल्याने निवडणुकीसाठी होणाऱ्या खर्चातही वाढ होण्याचे संकेत पालिकेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मेट्रोचे कार्यालय घोले रोडवर?

$
0
0

महामेट्रोच्या पुण्यातील जागेसाठी हालचाली सुरू

म. टा. प्रतिनिधी, पुणे

शहरातील मेट्रो प्रकल्पाला मान्यता मिळाल्यानंतर पुढील कामाचे नियोजन आणि त्याला गती देण्यासाठी ‘नागपूर मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशन’ला (एनएमआरसीएल) स्वतंत्र कार्यालय सुरू करण्यासाठी जागांची पडताळणी करण्यात येत आहे. प्राधान्याने महापालिकेच्या मुख्य इमारतीपासून जवळ असलेल्या जागेचा शोध सुरू असून, घोले रस्त्यावर तात्पुरत्या स्वरूपात ‘महामेट्रो’चे कार्यालय सुरू होण्याची शक्यता आहे.
गेल्या आठवड्यात केंद्रीय मंत्रिमंडळाने पुणे मेट्रो प्रकल्पावर मान्यतेची अंतिम मोहोर उमटवली. त्यानंतर, राज्य सरकारनेही महामेट्रोसाठी हिरवा कंदील दिल्यानंतर दुसऱ्याच दिवशी शहरातील मेट्रो मार्गांची तांत्रिक स्वरूपाची पाहणी ‘एनएमआरसीएल’च्या अधिकाऱ्यांनी केली. पुढील आठवड्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मेट्रोचे औपचारिक भूमिपूजन होणार आहे. त्यानंतर, मेट्रोच्या कामाला अधिक गती प्राप्त होण्याची शक्यता आहे.
‘महामेट्रो’च्या कामासाठी अधिकाऱ्यांना पुण्यातूनच काम करावे लागणार आहे. मेट्रो अलाइनमेंटच्या निश्चितीपासून ते भूसंपादनाच्या प्रक्रियेपर्यंत विविध स्वरूपाची कामे वेगाने पूर्ण व्हावीत, यासाठी कायमस्वरूपी कार्यालयाची गरज लागणार आहे. त्यादृष्टीने, गेल्या आठवड्यात वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या पाहणीदरम्यान काही जागांना भेट देण्यात आली. त्यातून, घोले रोडवर तात्पुरत्या स्वरूपात मेट्रोचे कार्यालय सुरू होण्याची शक्यता आहे. घोले रोडवर महापालिकेचे पं. जवाहरलाल नेहरू सांस्कृतिक भवन असून, विभागीय कार्यालयही तळमजल्यावर आहे. सांस्कृतिक भवनात यापूर्वी निवडणूक कार्यालयही काही दिवस होते. तसेच, तेथे स्मार्ट सिटीची ‘वॉर रूम’ काही दिवसांसाठी स्थापन करण्यात आली होती. या किंवा इतर एक-दोन जागांमधून येत्या काही दिवसांतच मेट्रोच्या कार्यालयासाठी जागा निश्चित केली जाण्याची चिन्हे आहेत.
महापालिकेत आजमितीस मेट्रोचा स्वतंत्र सेल कार्यरत असून, तो शहर अभियंता (प्रकल्प) यांच्या नियंत्रणाखाली आहे. सुरुवातीला मेट्रो सेलचे स्वतंत्र कार्यालय कोरेगाव पार्क येथील महापालिकेला प्राप्त झालेल्या इमारतीमध्ये होते. त्यानंतर, ते सावरकर भवन येथे हलविण्यात आले आहे. भूमिपूजनानंतर मेट्रोचे काम अधिक गतीने होण्याची अपेक्षा असल्याने त्यासाठी स्वतंत्र कार्यालय आणि मनुष्यबळच लागणार असून, त्यादृष्टीने आतापासूनच तयारी केली जात आहे.

‘एसएसपीएमएस’च्या मैदानावर भूमिपूजन

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते २४ डिसेंबरला मेट्रोचे भूमिपूजन केले जाणार, हे यापूर्वीच जाहीर करण्यात आले आहे . त्यासाठी सुरू असलेला जागेचा शोधही आता संपला असून, आरटीओ कार्यालयाजवळील एसएसपीएमएसच्या मैदानावर भूमिपूजन केले जाणार आहे. शनिवारी मोदी यांच्या हस्ते मुंबईतील अरबी समुद्रातील शिवस्मारक आणि इतर काही प्रकल्पांचे भूमिपूजन केले जाणार असून, त्यानंतर पुणे मेट्रोच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम सायंकाळी होणार असल्याचे समजते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘नोटाबंदी’चा निर्णय म्हणजे दीर्घकालीन फायदा

$
0
0

डॉ. नरेंद्र जाधव यांचे मत; ‘क्रेडाई’च्या सर्वसाधारण सभेत चर्चा
म. टा. प्रतिनिधी, पुणे
‘नोटाबंदीच्या निर्णयाने सर्वसामान्यांची काही काळ गैरसोय होईल, मात्र देशाच्या निरोगी अर्थव्यवस्थेसाठी हा खूप मोठा आणि महत्त्वाचा निर्णय आहे. हा निर्णय म्हणजे ‘शॉर्ट टर्म पेन’ आणि ‘लॉँग टर्म गेन’ ठरेल. यामुळे व्याजदर कमी होईल आणि मासिक हप्ता पंधरा टक्क्यांनी कमी होईल,’ असे मत अर्थतज्ज्ञ खासदार नरेंद्र जाधव यांनी व्यक्त केले.
क्रेडाई पुणे मेट्रोच्या सर्वसाधारण सभेत ते बोलत होते. क्रेडाई पुणे मेट्रोचे अध्यक्ष शांतिलाल कटारिया, उपाध्यक्ष श्रीकांत परांजपे, सचिव अनुज भंडारी, डी. एस. कुलकर्णी आदी या वेळी उपस्थित होते.
जाधव म्हणाले, ‘या निर्णयामुळे आपल्या सर्वांना आपल्या कामाची कार्यपद्धती बदलावी लागेल. येत्या एप्रिल महिन्यापासून नोटबंदीचे फायदे ठळकपणे दिसू लागतील. बँकेत अधिक पैसा जमा होऊन कर्ज सहजतेने उपलब्ध होईल. त्याचा परिणाम म्हणून व्याजदर कमी होतील आणि अर्थव्यवस्थेला चालना मिळेल. या निर्णयामुळे सरकारचा कर महसूल मोठ्या प्रमाणावर वाढेल. याशिवाय कर्जावरील व्याजदर कमी एक ते दोन टक्क्यांनी होण्याचा अंदाजही त्यांनी व्यक्त केला. व्याजदर एका टक्क्यांनी कमी झाल्यास मासिक हप्ता (इएमआय) पंधरा टक्क्यांनी कमी होऊन घरखरेदीदारांची क्रयशक्ती वाढेल. हाच पैसा पुढे सरकारला परवडणाऱ्या घरांसाठी(अफोर्डेबल हाऊसिंग) तरुणांच्या रोजगारासाठी, शेतकऱ्यांसाठी तसेच सामान्य जनतेसाठी वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमातून उपयोगात आणता येईल. वस्तू व सेवा कराच्या (जीएसटी) अंमलबजावणीसाठीही हा निर्णय महत्त्वाचा ठरणार आहे.’
‘दहशतवादी कृत्यांसाठी बनावट नोटांमध्ये पतपुरवठा सुरू होता आणि त्यातून दहशतवाद फोफावत होता, त्यालाही नोटबंदीमुळे आळा बसेल. देशाला कॅशलेस अर्थव्यस्थेच्या दिशेने (डिजिटल) घेऊन जाण्यासाठी हा निर्णय महत्त्वाचा आहे. या एका निर्णयामुळे फक्त दिसणाऱ्या काळ्या पैशाला आळा घालता येईल; पण मालमत्तांच्या रूपातील पैशावर अजून कारवाई बाकी आहे, त्यामुळे ही लढाई अजून पूर्ण झालेली नाही,’ असेही जाधव म्हणाले. उपस्थितांच्या शंकांचेही जाधव यांनी निरसन केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


कुष्ठरोग्यांचे प्रमाण वाढते

$
0
0

महाराष्ट्र तिसऱ्या क्रमांकावर; डॉ. विकास आमटे यांची माहिती
म. टा. प्रतिनिधी, पुणे
‘देशामध्ये कुष्ठरोगाचे प्रमाण पुन्हा वाढत असून, महाराष्ट्र त्यात तिसऱ्या क्रमांकावर आहे. गडचिरोली जिल्ह्यात कुष्ठरोगाचे पाच हजार संशयीत रुग्ण आढळले आहेत, ही चिंतेची बाब आहे. देशातल्या समाजाची मानसिकता दलली तरच कुष्ठरोगाचे प्रमाण कमी करता येईल,’ असे प्रतिपादन महारोगी सेवा समितीचे संचालक डॉ. विकास आमटे यांनी व्यक्त केले.
भोई प्रतिष्ठानतर्फे आनंदवन प्रकल्पातील ‘स्वरानंद’ या संगीत मैफलीमध्ये सहभागी असेलेल्या विशेष मुलांबरोबर संवाद कर्याक्रमाचे आयोजन केले होते. त्या वेळी डॉ. आमटे बोलत होते. भोई प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. मिलींद भोई, कोहिनूर ग्रुपचे अध्यक्ष कृष्णकुमार गोयल, इक्बाल दरबार, जयमाला इनामदार, मिलींद गायकवाड, माधवी मोरे, भाऊ करपे, राजा कदम, शिवलांग भोसले आदी उपस्थित होते.
डॉ. आमटे म्हणाले, ‘कुष्ठरोग नष्ट झाला असे सांगून राज्य सरकारने कुष्ठरोग विभाग नष्ट केला. त्याचे इतर आरोग्य विभागात विलिनीकरण केले. मात्र, कुष्ठरोगाचे प्रमाण घटलेले नसून ते वाढत चालले आहे. त्यामुळे उपचारांची समस्या निर्माण झाली आहे. बाबा आमटे यांनी आनंदवनाच्या माध्यमातून अनेक कुष्ठरोग्यांची सेवा केली. ते आनंदवनाला समाजाचे तुरुंग मानत होते आणि स्वतःला जेलर. त्यांनी समाजातील उपेक्षीतांची आयुष्यभर सेवा केली. पु. ल. देशपांडे यांनी ३५ वर्षांमध्ये सुमारे २८ वेळा आनंद वनाला भेट दिली. मराठी माणसाची मानसिकता बदलण्याचे काम ‘पुलं’नी केले.’
‘त्यांच्यामुळे मराठी चित्रपटसृष्टीतील दिग्गज अद्यापही आनंदवनातला नित्यनेमाने भेट देतात. दलाई लामा यांच्यासारखी आसामी आनंदवनामध्ये तीन दिवसांसाठी वास्तव्याला होती. कुष्ठरोग्यांसाठी काम करताना अनेक दिग्गजांचे मदतीचे हात लाभल्याने हे कार्य उभे राहू शकले,’ याकडे आमटे यांनी लक्ष वेधले. आनंदवनातील विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या संगीताच्या कार्यक्रमाला उपस्थितांनी ररून दाद दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बारामतीत प्रशासन सज्ज

$
0
0

१७७ उमेदवार रिंगणात; मतदान टक्केवारी वाढवण्याचे आवाहन

म. टा. प्रतिनिधी, बारामती

नगर परिषदेच्या लोकनियुक्त नगराध्यक्ष पदाबरोबरच १९ प्रभागांतील ३९ नगरसेवकांच्या जागांसाठी आज, बुधवारी मतदान होणार आहे. या निवडणूक प्रक्रियेची तयारी पूर्ण झाली असून, नागरिकांनी भयमुक्त वातावरणात मतदानाचा हक्क बजावून लोकशाही बळकट करण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन सहायक निवडणूक निर्णय अधिकारी नीलेश देशमुख यांनी केले आहे. नगराध्यक्ष पदासाठी सात, तर नगरसेवक पदासाठी १७० उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत.

बारामती शहरात एकूण ९८ मतदान केंद्रे स्थापन करण्यात आली असून, प्रत्येक केंद्रावर सहा कर्मचारी मतदानाची प्रक्रिया पार पाडणार आहेत. त्यासाठी १२० पथके निर्माण करण्यात आली आहेत. या वेळी ७५ हजार २७६ मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार असून, त्यासाठी ९८ मतदान केद्रांची रचना करून मतदान यंत्रांची तपासणी व सीलिंग झाले आहे. प्रत्येक केंद्रावर एक केंद्राध्यक्ष, तीन मतदान अधिकारी, एक शिपाई व पोलिस कर्मचारी तैनात केले जाणार आहेत. अनेक मतदान केंद्रावर सीसीटीव्ही बसवण्यात आले आहेत. ५१ इमारतींत व्हिडिओ शूटिंग करण्यात येणार आहे. नागरिकांनी मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी मोठ्या संख्येने मतदान प्रक्रियेत सहभागी होण्याचे आवाहनही नीलेश देशमुख यांनी केले आहे.

पोलिस प्रशासन सज्ज

लोकशाही बळकट करण्यासाठी व भयमुक्त वातावरणात मतदानाचा हक्क बजावताना मतदारांच्या सुरक्षिततेसाठी पोलिस प्रशासन सज्ज झाले आहे. त्यासाठी एक अप्पर पोलिस अधीक्षक, एक उपविभागीय पोलिस अधिकारी, तीन पोलिस निरीक्षक, नऊ सहायक पोलिस निरीक्षक , २०० पोलिस जवान, गृहरक्षक दलाचे ८० जवान, शीघ्र कृती दलाची तीन पथके, ‘एसआरपीएफ’चे ३० जवान व एक अधिकारी या फौजेचा समावेश असणार आहे. अशा प्रकारे पोलिस प्रशासन सज्ज असल्याचे उपविभागीय पोलीस अधिकारी बापू बांगर यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मोदींचा निर्णय उभ्या देशाला त्रास देणारा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, दौंड

‘निवडणूक गल्लीतील असली, तरी दिल्लीच्या धोरणांवर बोलावे लागत आहे. दिल्लीतून निर्माण केल्या गेलेल्या समस्येमुळे गल्ली प्रभावित झाली आहे. ‘अच्छे दिन’च्या आश्वासनाची चौकाचौकात टिंगलटवाळी होत आहे. नोटाबंदीच्या निर्णयामध्ये पवित्रता होती, तर काळा पैसा कुठे आहे? पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा एक निर्णय उभ्या देशाला त्रास देणारा ठरला आहे,’ असे प्रतिपादन विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी मंगळवारी केले. दौंड नगरपालिका निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना व मित्रपक्षांच्या विकास आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी घेण्यात आलेल्या शेवटच्या जाहीर सभेत ते बोलत होते.

या वेळी माजी आमदार व जिल्हा बँकेचे अध्यक्ष रमेश थोरात, वैशाली नागवडे, राणी शेळके, मानसिंग पाचुंदकर, नंदू पवार, वीरधवल जगदाळे, इंद्रजित जगदाळे, बादशहा शेख, गुरुमुख नारंग, नागसेन धेंडे, राजन खट्टी, अनिल सोनवणे, प्रवीण परदेशी, नगराध्यक्षपदाच्या उमेदवार मीनाक्षी पवार यांच्यासह विकास आघाडीतील पक्षांचे पदाधिकारी व उमेदवार उपस्थित होते.

मुंडे यांनी या सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीकास्त्र सोडले. ‘अण्णा हजारे यांच्या आंदोलनाचा फायदा घेऊन तयार झालेल्या काँग्रेसविरोधी लाटेचा फायदा घेऊन नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले. १२५ कोटी जनतेला खोटी स्वप्ने दाखवली. स्विस बँकेतील काळा पैसा भारतात आणून खात्यावर पंधरा लाख जमा होणार होते. आता आपलेच पंधरा हजार काढायचे वांदे झाले आहेत. राज्य सरकारमधील अकरा मंत्र्यांचे ३५०० कोटींचे घोटाळे पुराव्यानिशी मांडले. कारवाई करा म्हटले, तर यांची क्लीनचिट तयार असते. मी दिलेल्या पुराव्यांची चौकशी करा त्यात तथ्य नसेल, तर मला भर चौकात फाशी द्या. सत्तेवर येण्याच्या आधी राज्यात धनगर समाजाला आरक्षणाचे आश्वासन दिले होते. प्रत्यक्षात राम शिंदे व महादेव जानकर यांनाच मंत्रिपदाचे आरक्षण मिळाले. संपूर्ण समाजाला वाऱ्यावर सोडण्यात आले,’ अशी टीका धनंजय मुंडे यांनी केली.

मुंडे यांनी राहुल कुल यांच्यावरही टीका केली. ‘भीमा पाटस कारखाना बंद ठेवलाय, की बंद पाडलाय? जे साखर कारखाना नीट चालवू शकत नाहीत, ते नगर पालिकेच्या दैनंदिन समस्या कशा सोडवणार? विकासाचा जसा खेळ केला, तसा चिन्हांचा पण केलाय. हा काय भातुकलीचा खेळ आहे का? सत्ताधाऱ्यांनी चाळीस वर्षांच्या सत्तेत काय केले,’ असा सवाल मुंडे यांनी उपस्थित केला.


मग आम्ही जातीयवादी कसे?

रावसाहेब दानवे यांचा विरोधकांना सवाल

म. टा. प्रतिनिधी, दौंड

‘बसपच्या मायावती आमचा पाठिंबा घेऊन मुख्यमंत्री झाल्या. शरद पवार मुख्यमंत्री झाले. उमर अब्दुल्ला मंत्रिमंडळात होते. नुकत्याच झालेल्या पहिल्या टप्प्यातील नगरपालिका निवडणुकीत ६५ नगराध्यक्षांपैकी सगळ्यात जास्त मागासवर्गीय आणि मुस्लिम नगराध्यक्ष भाजपचे आहेत. मग आम्ही जातीयवादी कसे,’ असा सवाल खासदार रावसाहेब दानवे यांनी केला. दौंड येथे भारतीय जनता पक्षाच्या नगरपालिका निवडणुकीच्या प्रचाराच्या सांगता सभेत ते मंगळवारी बोलत होते.

या वेळी पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश बापट, युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष आमदार योगेश टिळेकर, भाजप पुणे जिल्ह्याचे माजी अध्यक्ष नामदेव ताकवणे, वासुदेव काळे, तान्हाजी दिवेकर, नगराध्यक्षपदाच्या उमेदवार डॉ. जयकुंवर भंडारी, भाजप तालुका अध्यक्ष तात्यासाहेब ताम्हाणे, अशोक होले व भाजपचे नगरसेवकपदाचे सर्व उमेदवार या वेळी उपस्थित होते.

खासदार दानवे यांनी या वेळी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे नाव न घेता त्यांच्यावर टीकास्त्र सोडले. ‘राज्यात ७० हजार कोटींचा सिंचन घोटाळा केला गेला. परंतु पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाचशे, हजारांच्या नोटांच्या बंदीचा निर्णय जाहीर केल्यानंतर सगळ्यात जास्त झोपेच्या गोळ्यांची विक्री बारामतीमध्ये झाली आहे. हा सगळा कमावलेला पैसा चलनातून बाद झाल्याने विरोधक बेछूट आरोप करत आहेत. राज्य सरकारने जलयुक्त शिवार योजनेअंतर्गत एक हजार ४०० कोटी रुपयांची कामे करून पावसाचे २४ टीएमसी पाणी जमिनीत जिरवले; परंतु काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने पाणी जिरवण्याऐवजी पाच हजार कोटी पाण्यात घातले,’ अशी टीका दानवे यांनी केली.

‘राज्यातील नगरपालिका निवडणुकीतील मतदानाचा राज्यातील आणि केंद्रातील भाजप सरकारवर कोणताही राजकीय परिणाम होणार नाही. परंतु केंद्र आणि राज्य सरकारने गेल्या अडीच वर्षांत केलेल्या विकासकामांवर शिक्कामोर्तब होणार आहे. त्यामुळे राजकीय हवा कोणत्या दिशेने वाहते हे कळणार आहे. दौंडमध्ये भाजपचा नगराध्यक्ष व नगरसेवक निवडून आले, तर ते केंद्र आणि राज्य सरकारकडून विकासनिधी आणू शकतात,’ असे प्रतिपादन दानवे यांनी केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दहा नगरपालिकांची आज निवडणूक

$
0
0

चारशे चार मतदान केंद्रांवर होणार मतदान

म. टा. प्रतिनिधी, पुणे

जिल्ह्यातील दहा नगरपालिकांच्या निवडणुकीसाठी आज, बुधवारी मतदान होत असून, मतदानासाठी जिल्हा प्रशासनाने तयारी केली आहे. या निवडणुकांमध्ये सर्वच राजकीय पक्षांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. जिल्ह्यात ४०४ मतदान केंद्रांवर मतदान होणार असून, संवेदनशील असलेल्या मतदान केंद्रांवर सॅटेलाइटद्वारे नजर ठेवली जाणार आहे.

जिल्ह्यात बारामती, लोणावळा, दौंड, तळेगाव-दाभाडे, आळंदी, इंदापूर, जेजुरी, जुन्नर, सासवड आणि शिरूर या दहा नगर परिषदा आणि त्यांच्या अध्यक्षपदांच्या निवडणुकीसाठी बुधवारी मतदान होणार आहे. उद्या, गुरुवारी निकाल जाहीर करण्यात येणार आहे. मंगळवारी रात्री दहा वाजता प्रचाराच्या तोफा थंडावल्या आहेत.

या दहा नगरपरिषदांसाठी नगरसेवकांच्या २२३ जागा आहेत. त्यामध्ये ८२६ उमेदवार नशीब आजमावण्यासाठी निवडणुकीच्या रिंगणात आहेत. सात जागांवर बिनविरोध निवडणूक झाली आहे. उर्वरित ठिकाणी बुधवारी सकाळी साडेसात ते साडेपाच या कालावधीत मतदान होणार आहे.

नगराध्यक्षपदासाठी ६८ उमेदवार उभे आहेत. या दहा नगरपरिषदांमध्ये तीन लाख २६ हजार मतदार आहेत. मतदान केंद्रांवर गैरप्रकार होऊ नयेत, यासाठी कडेकोट पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

मतदान केंद्रांवर सुमारे साडेतीनशे पोलिस अधिकारी आणि कर्मचारी नेमण्यात आले आहेत. याशिवाय ८५ होमगार्ड असणार आहेत. मतदानाच्या प्रक्रियेसाठी ८६ सेक्टर ऑफिसर आणि दोन हजार ५२२ कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सुमारे एक हजार ६१६ इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रे उपलब्ध करण्यात आली आहेत.

जिल्ह्यातील दहा नगरपरिषदांमध्ये सहा मतदान केंद्रे संवेदनशील, तर आठ मतदान केंद्रे उपद्रवी आहेत. संवेदनशील मतदान केंद्रांमध्ये जुन्नर येथील दोन, तळेगाव दाभाडेमधील चार मतदान केंद्रांचा समावेश आहे. दौंडमध्ये सहा आणि बारामतीत दोन मतदान केंद्रे उपद्रवी आहेत. संवेदनशील मतदान केंद्रांवर सॅटेलाइटद्वारे इमेज मॅपिंग करण्यात येणार आहे. या ठिकाणी बंदोबस्तासाठी असलेले पोलिस प्रत्येक तासाला पेट्रोलिंग करणार आहेत.

.............

मतदानासाठी सुटी जाहीर

जिल्ह्यातील नगर परिषदांच्या निवडणुकीसाठी आज, बुधवारी मतदान होणार असल्याने मतदारांना मतदानाचा हक्क बजावता यावा, यासाठी संबंधित क्षेत्रात जिल्हाधिकारी सौरव राव यांनी स्थानिक सुटी जाहीर केली आहे. बारामती (बारामती शहर), मावळ (तळेगाव दाभाडे शहर), दौंड (दौंड शहर), मावळ (लोणावळा शहर), खेड (आळंदी शहर), इंदापूर (इंदापूर शहर), पुरंदर (जेजुरी शहर), जुन्नर (जुन्नर शहर), पुरंदर (सासवड शहर) आणि शिरूर (शिरूर शहर) या क्षेत्रांचा त्यामध्ये समावेश आहे. हायकोर्टाच्या अधिकार कक्षेतील कार्यालये, केंद्रीय प्रशासनातील कार्यालये व बँकेच्या कक्षेतील कार्यालयांशिवाय अन्य सर्व सरकारी कार्यालये, जिल्हा परिषदेच्या कक्षेतील कार्यालये, स्थानिक स्वराज्य संस्थांची कार्यालये, महामंडळाची कार्यालये व खासगी शैक्षणिक संस्था यांना सुटी लागू असल्याचे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आनंद पोटात माझ्या माईना

$
0
0

शहरात दत्तजयंती उत्साहात साजरी

म. टा. प्रतिनिधी, पुणे

फुले आणि रोषणाईने सजवलेल्या दत्तमंदिरांमध्ये ‘दिगंबरा दिगंबरा, श्रीपाद वल्लभ दिगंबरा’च्या गजर करून भाविकांनी मंगळवारी दत्त जन्मसोहळा उत्साहात साजरा केला. फुलांच्या आकर्षक रचना आणि दीपमाळांनी सजवलेल्या मंदिरांमध्ये दिवसभर वैविध्यपूर्ण धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल अनुभवायला मिळाली.

शहराच्या विविध भागांतील दत्त मंदिरांमध्ये दिवसभर दर्शनासाठी नागरिकांची वर्दळ सुरू होती. संध्याकाळी दत्तजन्माचा नेत्रदीपक सोहळा रंगला. सोहळा अनुभवण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती. श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्तमंदिरामध्ये संध्याकाळी विजयबुवा अपामार्जने यांच्या कीर्तनानंतर नेत्रदीपक सोहळा झाला. दत्तगुरूंच्या जयघोषाने मंदिर परिसर दुमदुमला. पाळण्यावर पुष्पवृष्टी करून ‘दिगंबरा, दिगंबरा..’ असा जयघोष करण्यात आला. दत्तगुरूंच्या पादुकांची पालखी नगरप्रदक्षिणा मंदिरातून वाजत-गाजत निघाली. नगरप्रदक्षिणेत सनई चौघडा रथ, बँड, नादब्रह्म ढोल-ताशा पथक, दत्तमहाराजांच्या पादुका ठेवलेला फुलांनी सजवलेला रथ पुणेकरांचे लक्ष वेधून घेत होता.

दत्तमंदिरापासून निघालेली पालखी रामेश्वर चौक, टिळक पुतळा, मंडई, शनिपार, अप्पा बळवंत चौक, मजूर अड्डा बुधवार पेठेमार्गे मंदिरात आली. या वेळी राजेश सांकला, सुनील रासने, ट्रस्टचे अध्यक्ष एन. डी. पाटील, युवराज गाडवे, बाळासाहेब गायकवाड, अंकुश काकडे आदी पदाधिकारी उपस्थित होते. सकाळी ट्रस्टचे उत्सव उपप्रमुख चंद्रशेखर हलवाई आणि नूतन हलवाई यांच्या हस्ते लघुरुद्र करण्यात आला. दुपारी ज्येष्ठ व्यंग्यचित्रकार मंगेश तेंडुलकर, पुणे पोलिस आयुक्त रश्मी शुक्ला यांच्या हस्ते दत्तमहाराजांची महाआरती झाली. भक्तांसाठी पहाटे पाचपासून मंदिर खुले करण्यात आले होते; तरीही रात्री उशिरापर्यंत दर्शनासाठी भाविकांच्या रांगा लागल्या होत्या.

दरम्यान, मध्यवर्ती पेठांतील विविध दत्त मंडळांतर्फेही दिवसभर वैविध्यपूर्ण धार्मिक कार्यक्रमांनी दत्तजयंती साजरी करण्यात आली. साचापीर स्ट्रीटवरील सूर्यमुखी दत्त मंदिर, मंगळवार पेठेतील श्री नरपतगीर दत्त मंदिरामध्ये विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विद्याविकास प्रतिष्ठान घेणार प्रज्ञाशोध परीक्षा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

शासनाने येत्या शैक्षणिक वर्षापासून रद्द केलेल्या चौथी-सातवी शिष्यवृत्ती परीक्षेचे पुनरुज्जीवन करण्याचा निर्णय श्री विद्याविकास सेवा प्रतिष्ठानने घेतला आहे. नवीन वर्षापासून प्रतिष्ठानतर्फे ‘विद्याविकास प्रज्ञाशोध’ या नावाने या स्पर्धा घेण्यात येणार आहेत. नवीन स्पर्धाप्रकिया अधिक सरळ आणि सोपी करण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र ज्ञान महामंडळाशी (एमकेसीएल) करार करण्यात आला आहे, अशी माहिती प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्रीकांत सुतार यांनी दिली.

महामंडळाच्या सहभागातून ऑनलाइन संगणक प्रणालीद्वारे परीक्षेचा अर्ज, फी स्वीकृती आणि सराव परीक्षेची प्रक्रिया करण्यात येणार आहे. येत्या १९ मार्च २०१७ या दिवशी इयत्ता चौथी आणि सातवीच्या प्रचलित अभ्यासक्रमावर, जुन्या पॅटर्नप्रमाणे राज्य स्तरावर विद्याविकास प्रज्ञाशोध परीक्षा घेण्यात येईल. यासाठी तीनशेहून अधिक ठिकाणी तालुका केंद्रे निवडण्यात येणार आहेत. अभ्यासक्रमाचा आराखडा, ९० प्रश्नपत्रिका-उत्तरसूची स्पष्टी‍करणासह आणि एक प्रश्नसंग्रह हे स्टडी मटेरियल देण्यात येणार आहे. भाषा, गणित आणि बुद्धिमत्ता चाचणी या विषयांच्या सखोल पायाभूत अभ्यासाचा फायदा पुढील वर्षी इयत्ता पाचवी ते आठवीमध्ये होणार आहे, असे सुतार यांनी सांगितले.

दरम्यान, या वर्षी सरकारतर्फे घेण्यात येणाऱ्या इयत्ता पाचवी आणि आठवीतील शिष्यवृत्ती परीक्षेची अधिक चांगली पूर्वतयारी आणि सराव व्हावा म्हणून राज्यस्तरीय तीन रंगीत तालीम परीक्षा २९ जानेवारी, पाच ते १२ फेब्रुवारी २०१७ या कालावधीत आयोजित करण्यात आल्या आहेत. परीक्षा पारदर्शी होण्यासाठी विद्यार्थ्यांना त्यांनी लिहिलेल्या ‘ओएमआर’ उत्तरपत्रिकेची कार्बन प्रत देण्यात येणार आहे. या दोन उपक्रमांतील यशस्वी विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेनुसार शिष्यवृत्ती, बक्षि‍से देऊन मे महिन्यात गौरव करण्यात येणार आहे. नावनोंदणी, प्रवेश आणि अधिक माहितीसाठी विद्या विकासच्या वेबसाइटवर भेट द्यावी अथवा ‘एमकेसीएल’च्या केंद्राची मदत घ्यावी, असे आवाहन सुतार यांनी केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पोलिस चौकशीनंतर पुनर्परीक्षेचा निर्णय

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

‘इंजिनीअरिंगच्या पेपरफुटीप्रकरणी पोलिसांकडून चौकशी झाल्यानंतर पुनर्परीक्षेबाबतचा निर्णय घेतला जाईल. तोपर्यंत उत्तरपत्रिकांची तपासणी न करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे,’ असे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. वासुदेव गाडे यांनी मंगळवारी पत्रकारांना सांगितले. दरम्यान, या प्रकरणी नेमण्यात आलेल्या चौकशी समितीने दिलेल्या अहवालानुसार यामध्ये संबंधित संस्थेतील कर्मचारी व विद्यार्थ्यांचा हात असल्याची चर्चा विद्यापीठामध्ये आहे.

इंजिनीअरिंगच्या प्रथम वर्षाची सत्र परीक्षा सध्या सुरू आहे. शुक्रवारी सकाळी दहा वाजता बेसिक इलेक्ट्रिकल इंजिनीअरिंग विषयाची परीक्षा घेण्यात आली; मात्र ही परीक्षा सुरू होण्यापूर्वीच मॉडर्न एज्युकेशन सोसायटीच्या कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग आणि व्हीआयटी या दोन संस्थांमध्ये काही विद्यार्थ्यांना प्रश्नपत्रिका मिळाल्या होत्या. विद्यार्थी या प्रश्नपत्रिका पाहत असल्याचे एका प्राध्यापकाच्या निदर्शनास आल्याने पेपरफुटीचा प्रकार समोर आला. या प्रकरणाच्या चौकशीसाठी अभियांत्रिकी विद्याशाखेचे समन्वयक डॉ. वाय. पी. नेरकर यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आली होती. कुलगुरू डॉ. वासुदेव गाडे यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी झालेल्या परीक्षा मंडळाच्या बैठकीत हा अहवाल सादर करण्यात आला.

डॉ. गाडे म्हणाले, ‘समितीच्या अहवालामध्ये संस्थेतील कर्मचारी व काही विद्यार्थ्यांचा समावेश असल्याची शक्यता आहे. यंत्रणेप्रमाणे सकाळी नऊ वाजता सर्व महाविद्यालयांना प्रश्नपत्रिका ऑनलाइन पद्धतीने पाठवण्यात आली होती. ही प्रश्नपत्रिका डाउनलोड करून विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रात वाटली जाते; मात्र त्यापूर्वी ती काही विद्यार्थ्यांना मोबाइलवर पाठवण्यात आल्याचे दिसून आले. पेपर फुटल्याची तक्रार आली तेव्हा परीक्षा सुरू झाली होती. पेपर फुटण्याची वेळ आणि विद्यार्थी केंद्रात येण्याची वेळ सारखीच आहे. त्यामुळे पोलिस चौकशी झाल्यानंतर पुनर्परीक्षा घ्यायची की नाही, याचा निर्णय घेतला जाईल; मात्र तोपर्यंत उत्तरपत्रिकांची तपासणी केली जाणार नाही.

दरम्यान, ‘दोन्ही पेपरफुटीप्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल करण्याचे आदेश दिले होते; मात्र संबंधित पोलिस ठाण्यात तक्रार घेतली जात नसल्याचे महाविद्यालयांनी विद्यापीठाला लेखी कळवले आहे. त्यावर संबंधित पोलिस ठाण्यांना तक्रार दाखल करून घेण्याबाबतचे आदेश द्यावेत, असे विनंती पत्र विद्यापीठाकडून पोलिस आयुक्तांना दिले जाणार आहे,’ असे डॉ. गाडे यांनी सांगितले.

प्रश्नपत्रिकेवर कॉलेजचे नाव

‘परीक्षा विभागाकडून महाविद्यालयांना प्रश्नपत्रिका ऑनलाइन पाठवल्या जातात. त्यानंतर त्या प्रश्नपत्रिका महाविद्यालयांमध्ये डाउनलोड करून त्यांच्या प्रिंट घेतल्या जातात. त्या प्रिंट विद्यार्थ्यांना दिल्या जातात. आता या प्रिंट घेतल्यानंतर पेपरवर महाविद्यालयाचेही नाव छापून येणार आहे. त्यामुळे पेपर फुटला, तरी तो कोणत्या महाविद्यालयातून फुटला हे लगेचच समजेल. सुरक्षेच्या दृष्टीने हा तांत्रिक बदल करण्यात आला असून, त्याची अंमलबजावणी बुधवारच्या पेपरपासूनच होईल,’ असे डॉ. वासुदेव गाडे यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


भारूडासाठी आयुष्य वेचूनही पदरी उपेक्षाच

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

भारूडाची कास धरून त्यांनी जगभरात कार्यक्रम केले. भारूड म्हणजे नेमके काय ते सादर कसे करायचे, याचे धडे अनेकांना दिले, मात्र, ही लोककला सातासमुद्रापार नेणाऱ्या भारूडसम्राज्ञी पद्मजा कुलकर्णी यांच्या पदरी उपेक्षाच पडली आहे. वारंवार हेलपाटे घालूनही ज्येष्ठ कलाकारांना मिळणाऱ्या मानधनापासून त्या वंचित राहिल्या आहेत.

कोथरूडमध्ये राहणाऱ्या ७४ वर्षांच्या कुलकर्णी आजही भारूडाचे कार्यक्रम सादर करतात. त्यांच्या या कार्याची सरकारकडून दखल घेतली जाईल, अशी तत्कालीन आघाडी सरकारमधील अनेक नेत्यांनी आश्वासने दिली खरी; मात्र त्यानंतर केवळ वाट पाहणेच त्यांच्या नशिबी आले. अनेकदा पायपीट करून त्यांनी त्यांच्या कार्यक्रमांच्या सरकारकडे सादर केलेल्या फाइल्स गहाळ झाल्याचे त्यांना सांगितले गेले. लोककलेसाठी आयुष्याच्या उतारवयातही कटिबद्ध असलेल्या कुलकर्णींच्या वाट्याला केवळ सरकारी कार्यालयांच्या चकरा आल्या. गेल्या ४ वर्षांपासून कुलकर्णी यांनी समाजकल्याण विभागाकडून कलाकारांना मिळणाऱ्या मानधनासाठी अर्ज केला आहे. ते मानधनदेखील त्यांना मिळू शकलेले नाही.

पद्मजा कुलकर्णी यांनी भारूडांचे शेकडो कार्यक्रम केले. त्यांनी लंडन, श्रीलंका यांसह परदेशातील अनेक शहरांमध्ये भारूडाचा झेंडा रोवला. एवढेच नाही, तर त्यांच्या कार्यक्रमांच्या संख्या पाहून लिम्का बुक ऑफ रेकॉर्डसने त्यांच्या नावाची दखल घेतली. त्यांच्यासारखे अनेक कलाकार आजही मानधनाच्या प्रतीक्षेत आहेत. मात्र, सरकारी अनास्थेमुळे त्यांच्या वाट्याला निराशाच आली आहे.


देशविदेशात भारूडाचे अनेक कार्यक्रम केले, भारूडाचा प्रकार विदेशात पोहोचवला. लिम्का बुकने दखल घेतली, माध्यमांनी प्रसिद्धी दिली. सरकारकडून अनेक वेळा आश्वासने मिळाली. तुमचा पुरस्कार देऊन गौरव करू, असे सांगितले. त्यासाठी माझ्या कार्याची फाइल तयार करायला सांगितली. या प्रक्रियेचा पाठपुरावा करीत असताना फाइल गहाळ झाली, असे सांगण्यात आले. शिवाय, अजून मानधनही सुरू झालेले नाही. कलाकारांना उतारवयात अशी वागणूक मिळत असेल, तर त्यांनी काय करायचे, असा प्रश्न पडला आहे.

पद्मजा कुलकर्णी, भारूड सम्राज्ञी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘वीकएन्ड’ला उद्घाटनांचा धुमधडाका

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

महापालिकेच्या निवडणुकीची आचारसंहिता जाहीर होण्यास महिन्याभरापेक्षाही कमी कालावधी राहिल्याने येत्या ‘वीकएन्ड’ला विकासकामांची उद्घाटने-भूमिपूजनांचा जोरदार ‘धुमधडाका’ उडणार आहे. भारतीय जनता पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस, महाराष्ट्र नवनिर्माण सेना अशा सर्वच पक्षांचे मातब्बर नेते त्यासाठी उपस्थित राहणार असल्याने आरोप-प्रत्यारोपांच्या रणधुमाळीने राजकीय वातावरण तापणार आहे.

जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात पालिका निवडणुकांसाठी आचारसंहिता जाहीर होण्याची चिन्हे आहेत. तत्पूर्वी, मिळणाऱ्या शनिवार-रविवारी पक्षातील वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत जास्तीत जास्त विकासकामांची उद्घाटने आणि भूमिपूजन करण्याचे नियोजन सर्व पक्षांकडून सुरू आहे. या ‘वीकएन्ड’पासून त्याची दणक्यात सुरुवात होणार असून, एकेका दिवशी शहराच्या विविध भागांमध्ये ‘फीत’ कापण्यासाठी आणि ‘कुदळ’ मारण्यासाठी नेतेमंडळींच्या धावत्या भेटी होणार असल्यावर शिक्कामोर्तब झाले आहे.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे १७ आणि १८ डिसेंबर या दोन दिवसांत १३ ठिकाणी विविध कार्यक्रमांना हजेरी लावणार आहेत. मनसेच्या पदाधिकाऱ्यांच्या संपर्क कार्यालयांपासून ते नगरसेवकांच्या प्रभागातील विकासकामांपर्यंत सर्व ठिकाणच्या उद्घाटनांना उपस्थित राहण्यास त्यांनी संमती दिली आहे. या दोन दिवसांमध्ये पक्षाच्या इतर कोणत्याही बैठका घेण्यात येणार नाहीत.

राष्ट्रवादीचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार हे देखील शनिवार-रविवार पुण्यात मुक्कामी आहेत. त्यात, रविवारी वडगाव जलशुद्धीकरण केंद्राचे उद्घाटन पवार यांच्या हस्ते केले जाणार आहे. त्याशिवाय, शहराच्या इतर भागांतील नगरसेवकांच्या स्थानिक विकासकामांची उद्घाटनेही पवार यांच्या हस्ते केली जातील, असे पक्षातर्फे सांगण्यात आले.

शनिवार-रविवारचा उद्घाटनांचा धुमधडाका सोमवारी (१९ डिसेंबर) कायम राहणार आहे. या दिवशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजप नगरसेवकांच्या प्रभागातील विकासकामांचे लोकार्पण केले जाणार आहे. सोमवारी सकाळीच मुख्यमंत्री पुण्यात येणार असून, रात्री उशिरापर्यंत त्यांच्या उपस्थितीत विविध विकासकामे घेण्याचे भाजपने ठरवले आहे.

मुलाखतींची रणधुमाळी

येत्या शनिवार-रविवार शिवसेनेकडून इच्छुकांच्या मुलाखतीचा कार्यक्रम निश्चित करण्यात आला आहे. प्रभागनिहाय होणाऱ्या या मुलाखती नाना पेठेतील दर्शन हॉल येथे होणार आहेत. तर, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसकडील इच्छुकांच्या मुलाखतीही शनिवार-रविवारी (१७ व १८ डिसेंबर) घेतल्या जाणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मेट्रोचे कर्ज कंपनी फेडणार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

‘शहरात मेट्रो प्रकल्पासाठी घेण्यात येणाऱ्या पाच हजार कोटी रुपयांच्या कर्जाची परतफेड करण्याची जबाबदारी ही महापालिकेवर असणार नाही. या कर्जाची वित्तीय हमी केंद्र सरकारने घेतली असल्याने राज्य सरकारच्या हमीची गरज राहिली नाही. मेट्रोची कंपनी या कर्जाची परतफेड करणार आहे,’ असे महापालिका आयुक्त कुणाल कुमार यांनी मंगळवारी स्पष्ट केले.

पुणे शहर आणि पिंपरी चिंचवड महापालिकेच्या हद्दीत मेट्रो प्रकल्प राबविला जाणार आहे. केंद्राबरोबरच गेल्या आठवड्यात या प्रकल्पाला राज्य सरकारने मंजुरी दिली असून हा प्रकल्प करण्यासाठी १२ हजार कोटी रुपये खर्च येणार आहे. या खर्चासाठी घेण्यात येणाऱ्या कर्जाची परतफेड करण्याची जबाबदारी ही राज्य सरकारवर असणार नाही, या अटीवर मंत्रिमंडळाच्या बैठकीत या प्रकल्पाला मंजुरी देण्यात आली आहे. नागपूर मेट्रो प्रकल्पासाठी कर्ज घेताना सरकारने हमी घेतली होती. मात्र, पुणे मेट्रोबाबत दुजाभाव केल्याची चर्चा सुरू आहे. याबाबत पालिका आयुक्त कुमार यांना विचारले असता ते म्हणाले, ‘नागपूर मेट्रो प्रकल्पाला राज्य सरकारने कर्जाची हमी दिली याचा अर्थ पुण्याच्याही प्रकल्पाही हमी द्यायला हवी, असे होत नाही. केंद्र सरकारनेच याबाबत सुधारणा करून नवे आदेश काढले आहेत. पुणे मेट्रोचा प्रकल्प मंजूर करताना केंद्र सरकारनेही त्याबाबत समाधानकारक स्पष्टीकरण केले आहे.’

राज्य सरकारने कर्ज फेडण्याची हमी नाकारल्याने मेट्रोसाठी घेतलेले कर्ज दोन्ही महापालिकांना फेडावे लागेल, असा समज करून घेणे चुकीचे आहे. मेट्रोसाठीचे कर्ज हे दोन्ही महापालिकांना मिळणार नाही. त्यामुळे त्याचा महापालिकांशी संबंध नाही. मेट्रो प्रकल्पाची अंमलबजावणी करणाऱ्या ‘महाराष्ट्र मेट्रो’ला ते कर्ज मिळणार आहे. त्यामुळे या कर्जाची परतफेड मेट्रोची कंपनी करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

तांत्रिक सर्वेक्षण सुरू

मेट्रो प्रकल्पाचे काम प्रत्यक्ष सुरू करण्यापूर्वीचे तांत्रिक सर्वेक्षण सुरू करण्यात आले आहे. यासाठी नागपूर मेट्रोच्या अधिकाऱ्यांचे पथक शहरात आले आहे. हे सर्व तांत्रिक अधिकारी असून त्यांचे काम सध्या सुरू आहे. याबरोबरच दोन्ही शहरातील मेट्रो मार्गाची आखणी करण्याचीही प्रक्रिया सुरू झाली आहे. मेट्रो मार्गाच्या मंजूर झालेल्या अहवालाची अंमलबजावणी होणार असली तरी, प्रत्यक्ष काम करताना काही प्रमाणात मार्गाच्या संरचनेत बदल होऊ शकतात असे आयुक्त कुणाल कुमार यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मतदारयाद्या वेबसाइटवर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

निवडणूक आयोगाने विधानसभेच्या प्रारूप याद्या तयार केल्या असून, त्यानुसार महापालिका निवडणुकांसाठीच्या प्रभागनिहाय मतदारयाद्या नागरिकांच्या माहितीस्तव उद्या, गुरुवारी महापालिकेच्या वेबसाइटवर प्रसिद्ध केल्या जाणार आहेत. वेबसाइटवर टाकण्यात आलेल्या याद्या केवळ नागरिकांच्या माहितीस्तव असल्याने त्यावर अधिकृतरीत्या हरकती-सूचना मागविता येणार नाहीत, असे स्पष्ट करण्यात आले आहे.

महापालिकेच्या आगामी निवडणुकीची प्रभागरचना गेल्या महिन्यात अंतिम झाली. त्यानंतर, विधानसभा मतदारसंघानुसार तयार करण्यात आलेल्या प्रा-रूप मतदारयाद्यांचे प्रभागनिहाय विभाजन करण्याच्या सूचना निवडणूक आयोगाने सर्व महापालिकांना केल्या होत्या. १६ सप्टेंबर रोजी विधानसभा मतदारसंघनिहाय प्रसिद्ध करण्यात आलेल्या प्रा-रूप यादीनुसार पालिकेने प्रभागनिहाय केलेल्या विभाजनाची सविस्तर माहिती राजकीय पक्ष, कार्यकर्ते यांच्यासह सर्वसामान्य नागरिकांना वेबसाइटच्या माध्यमातून मिळणार आहे.

निवडणूक आयोगाने १६ सप्टेंबर ते २१ ऑक्टोबरदरम्यान नवीन मतदार नोंदणीसाठी मोहीम घेतली होती. तसेच, नाव-पत्त्यातील दुरुस्तीसाठी पुनरिक्षण कार्यक्रम घेण्यात आला होता. या कालावधीत दाखल झालेल्या अर्जांचा विचार करून पाच जानेवारी रोजी विधानसभानिहाय मतदारयादी निवडणूक आयोगातर्फे प्रसिद्ध केली जाणार आहे. निवडणूक आयोगाने प्रसिद्ध केलेल्या यादीचे पुन्हा विभाजन करून महापालिकेतर्फे १२ जानेवारीला प्रभागनिहाय प्रा-रूप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. त्यानंतर, १७ जानेवारीपर्यंत नागरिकांना त्यावर हरकती-सूचना नोंदविता येणार आहेत. २१ जानेवारीला प्रभागनिहाय मतदार यादीला अंतिम स्वरूप देण्यात येणार असल्याचे निवडणूक आयोगाने स्पष्ट केले आहे.

राजकीय पक्षांसाठी लाभदायक

निवडणूक आयोगांच्या सूचनांनुसार यंदा प्रा-रूप मतदार यादी थेट वेबसाइटवर प्रसिद्ध केली जाणार आहे. त्यामुळे, सर्वसामान्य नागरिकांना त्यात आपले नाव-पत्ता व्यवस्थित आहे ना, याची खातरजमा करता येणार आहे. प्रभागनिहाय मतदारयादी पालिका निवडणुकीच्या आधी दोन महिने राजकीय पक्षांना उपलब्ध होणार असल्याने त्या दृष्टीने नियोजन करण्यासाठी वेबसाइटवरील यादीचा त्यांनाही फायदा होणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शहरात बसविणार १६०० स्मार्ट कंटेनर

$
0
0

कचऱ्याला आग लागल्याची माहिती मिळणार

म. टा. प्रतिनिधी, पुणे

शहर कंटेनर मुक्त करण्याची महापालिका प्रशासनाने केलेली घोषणा घोषणाच ठरली आहे. कचरा गोळा करण्यासाठी शहरात १६०० कंटेनर बसविले जाणार आहेत. हे कंटेनर ‘स्मार्ट’ असून, त्यामध्ये जीपीएस तंत्रज्ञान बसविण्यात येणार आहे. त्यामुळे कंटेनर ७५ टक्के भरताच तसेच कचऱ्याला आग लागल्यास तातडीने माहिती पालिकेला मिळणार आहे. यासाठी‌ टेंडर प्रक्रिया राबविण्यात येणार असल्याचे पालिका आयुक्त कुणाल कुमार यांनी सांगितले.
शहरात दररोज तयार होणाऱ्या कचऱ्याची विल्हेवाट लावण्याची पुरेशी व्यवस्था पालिकेकडे नसल्याने दोन ते अडीच वर्षांपूर्वी कंटेनरमुक्त शहराची घोषणा करण्यात आली होती. नागरिकांनी ओला आणि सुका कचरा वेगळा करुन द्यावा आणि नागरिकांना शिस्त लागावी, यासाठी पालिकेने हा निर्णय घेतला होता. त्यावेळी शहरात जवळपास १२०० कचरा कंटेनर होते. शहर कंटेनर मुक्त करण्यासाठी पालिकेने सुरू केलेल्या मोहिमेत प्रशासनाने नागरिकांच्या घरोघरी जाऊन कचरा गोळा करण्याची व्यवस्था निर्माण करून कंटेनरची संख्या ७०० वर आणली. वेगवेगळया स्पर्धा घेऊन कंटेनर मुक्त वॉर्डची योजना सुरू केली. मात्र, कंटेनर काढल्यानंतरही अनेक ठिकाणी रस्त्यावर कचरा टाकला जात असल्याचे समोर आले होते. शहरातील मध्यव‌र्ती भागात सर्वाधिक असे प्रकार पहायला मिळत होते. यासाठी पालिकेने काही कोटी रुपयांचा निधीही खर्च केला आहे.
केंद्र सरकारच्या स्वच्छ भारत अभियानांतर्गत घनकचरा व्यवस्थापन स्मार्ट करण्यासाठी अत्याधुनिक यंत्रणा असलेले कंटेनर बसविण्याचा विचार पालिकेने सुरू केला आहे. जीपीएस यंत्रणा बसविण्यात आलेल्या १६०० स्मार्ट कंटेनरची खरेदी करून ते विविध भागात बसविले जाणार असल्याचे कुमार यांनी सांगितले. आवश्यक ती प्रक्रिया राबवून १ एप्रिल २०१७ पासून नवीन स्मार्ट कंटेनर बसविले जाणार आहेत. कंटेनर ७५ टक्के भरल्यानंतर त्याचा एसएमएस संबधित विभागातील अ‌धिकाऱ्याला मिळेल. त्यानंतर पालिकेची कचरा गोळा करणारी गाडी त्या ठिकाणी जाऊन हा कंटेनर रिकामा करेल. तसेच या नवीन कंटेनरमध्ये ‘सेन्सर’ असल्याने क्षमतेपेक्षा अधिक उष्णता निर्माण झाल्यास त्याची माहिती देखील संबधित अधिकारी तसेच अग्निशमन दलाच्या कॉल सेंटरला मिळणार आहे.

कंट्रोल रूम उभारणार
घनकचरा व्यवस्थापन विभागासाठी महापालिकेकडून पहिल्यांदाच सॉलीड वेस्ट कंट्रोल रूम तयार करण्यात येणार आहे. २४ तास या नियंत्रण कक्षाच्या माध्यमातून शहरातील कचऱ्याच्या स्थितीवर नियंत्रण ठेवण्यात येणार आहे. हा नियंत्रण कक्ष पालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाकडे येणाऱ्या तक्रारींचे निवारण केले जाणार आहे. तसेच या कक्षाच्या माध्यमातून शहरात दररोज गोळा होणारा कचरा, त्याची वाहतूक, त्यावर केली जाणारी प्रक्रिया तसेच कचऱ्याशी संबधित प्रत्येक गोष्टींवर लक्ष ठेवले जाणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 75772 articles
Browse latest View live


Latest Images

<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>
<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596344.js" async> </script>