Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

एटीएमसमोर रांगाच रांगा

$
0
0

रोकडटंचाईमुळे मिळेल तितक्या रकमेवर मानले समाधान

म. टा. प्रतिनिधी, पुणे

सलग तीन दिवसांच्या सुटीनंतर उघडलेल्या बँकांबाहेर मंगळवारी खातेदारांनी मोठी रांग लावली होती. बँकांकडील रोकडटंचाई अजूनही कायम असल्याने खातेदारांना मिळेल तितकी रक्कम घेऊन परतावे लागले.
खासगी बँकांमध्ये रोकड टंचाई अधिक तीव्र होती. एटीएमबाहेरच्या रांगाही कायम होत्या. गेल्या आठवड्यातील शनिवार, त्यानंतर रविवार आणि सोमवारी ईदनिमित्त बँकांना सुट्टी होती. सुट्टीच्या काळात शहरातील केवळ १५ ते २० टक्के एटीएमच सुरू होती. त्यापैकी अनेक एटीएममधील रक्कमही संपुष्टात आली होती. त्यामुळे मंगळवारी बँकांपुढे रांगा लागणार हे स्पष्ट होतेच. त्याप्रमाणे मंगळवारी शहराच्या विविध भागात बँकांबाहेर खातेदारांची मोठी रांग दिसून आली.
रिझर्व्ह बँकेकडून बँकांना मोजकीच रक्कम दिली जात आहे. त्यातच बँका आपल्या शाखांनाही मोजकीच रक्कम देत आहेत. त्यामुळे बँकांच्या शाखांना खातेदारांना रेशनिंग करून रक्कम द्यावी लागत आहे. गेल्या आठवड्यात अनेक बँकांमध्ये अवघे एक हजार किंवा दोन-तीन हजार रुपयेच खातेदारांना देण्यात आले. त्या पार्श्वभूमीवर तीन दिवसांच्या सुटीनंतर तरी आपल्याला अधिक रक्कम काढता येईल, यासाठी खातेदार बँकेत आले होते. मात्र, बँकांकडे तुटपुंजी रक्कम असल्याने खातेदारांना मंगळवारीही कमीच रक्कम मिळाली. त्यातच कोअर बँकिंगमुळे कोणत्याही शाखेचे खातेदार कोणत्याही शाखेत चेकबुक घेऊन जात असल्याने बँकांपुढच्या समस्यांमध्ये वाढ झाली आहे.
काही राष्ट्रीय बँकांमध्ये प्रत्येक खातेदाराला दोन ते आठ हजार रुपयांपर्यंत रक्कम देण्यात आली. तर, काही बँकांनी आठ ते बारा हजारापर्यंत रक्कम दिली. यामध्ये दोन हजार रुपयांच्या नोटांचेच प्रमाण अधिक असल्याने खातेदार आणि बँक कर्मचाऱ्यांमध्ये हमरीतुमरी होत होती. तर, दुसरीकडे खासगी बँकांमध्ये अगदी दोन ते सहा हजार रुपयांपर्यंतच रक्कम दिली जात होती. एक-दोन खासगी बँकांनी खातेदारांना दहा हजार किंवा त्यापेक्षा अधिक रक्कम देऊ केली होती.
मंगळवारी बँका सुरू झाल्या, तरी शहरातील मोजकीच एटीएम कार्यान्वित होती. त्यामुळे या एटीएमबाहेर मोठ्या रांगा लागल्याचे चित्र होते. काही एटीएममध्ये सायंकाळी उशिरा रक्कम भरण्यात आली. त्यामुळे या एटीएमबाहेर रात्री उशिरापर्यंत रांगा कायम होत्या.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


‘सीसीटीव्ही’ फुटेज साठवा

$
0
0

रिझर्व्ह बँकेचे आदेश; वारंवार पैसे काढणाऱ्यांची चौकशी शक्य

म. टा. प्रतिनिधी, पुणे

काळा पैसा पांढरा करणाऱ्यांचे उखळ पांढरे करण्यासाठी तपास यंत्रणा सरसावल्या असून, नवीन चलनी नोटांमध्ये पैसा साठवणाऱ्या सावकारांचे पाश आवळण्यास सुरुवात केली आहे. त्यातच रिझर्व्ह बँकेने आता बँकांना आदेश देऊन आठ नोव्हेंबरपासूनचे ‘सीसीटीव्ही’ फुटेज साठवण्यास सांगितले आहे. रिझर्व्ह बँकेच्या या आदेशामुळे बँकेतून वारंवार पैसे काढण्याऱ्यांच्या पाठीमागे चौकशीचा ससेमिरा लागणार आहे.
नवीन चलनी नोटा दडवून ठेवण्याचे प्रकार वाढत असून, अशा सावकारांना वठणीवर आणण्यासाठी केंद्र सरकार आणि रिझर्व्ह बँकेने ठोस कारवाईची जोरदार तयारी सुरू केली आहे. काही सावकरांनी काळा पैसा पांढरा करण्यासाठी १० ते ३५ टक्क्यांपर्यंतची बोली लगावून करोडो रुपयांचे व्यवहार केले आहेत. नोटा बदलून देण्याच्या या प्रकारांमुळे चलनात आणण्यात आलेल्या नोटा बाजारातून ‘गायब’ होत आहेत. या प्रकारांना आळा घालण्यासाठी पोलिस, अंलमबजावणी संचलनालय, इन्कम टॅक्स, डीआरआय आदी विभागांकडून छापासत्रे सुरू करण्यात आली आहेत. तपास यंत्रणांकडून नवीन चलनी नोटा साठवणाऱ्यांविरोधात कारवाई सत्र सुरू केले आहे. या कारवाईसाठी बँकेतील ‘सीसीटीव्ही’ फुटेजची आवश्यकता पडणार असल्याने हे फुटेज साठवण्यास सांगण्यात आले आहे.
रिझर्व्ह बँकेने २७ आक्टोबर रोजी आदेश देऊन बनावट नोटा चलनात भरणा करण्यांना शोधण्यासाठी बँकेत ‘सीसीटीव्ही’ कॅमेरे बसवण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार सर्व बँकांनी बँकेतील सर्व परिसर सीसीटीव्ही फुटेजच्या निगराणीखाली आणला आहे. आता रिझर्व्ह बँकेने हे या कॅमेऱ्यांत कैद झालेले फुटेज साठवण्यास सांगितले आहे. नोटाबंदीचा निर्णय जाहीर झाल्यापासून म्हणजे आठ नोव्हेंबरपासूनचे सर्व ‘सीसीटीव्ही’ फुटेज साठवण्यात येणार आहे.
चलनातील बनावट नोटा रोखण्यासाठी रिझर्व्ह बँकेने गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. दहशतवाद्यांकडून मोठ्या प्रमाणात बनावट नोटा चलनात आणल्याच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नोटा बाद करण्याचा निर्णय घेतला. नागरिकांकडून सध्या बँकांमध्ये पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटा भरण्यात येत असून, त्यामध्ये बनावट नोटा सापडत आहेत. रिझर्व्ह बँकेच्या आदेशानुसार एकाचवेळी पाचहून अधिक बनावट नोटा आढळल्यास तत्काळ गुन्हा दाखल करण्याचा नियम आहे. तसेच पाचहून कमी बनावट नोटा आढळल्यास ती माहिती पोलिसांना देण्याचे बंधनकारक करण्यात आले आहे.

बनावट नोटांची माहिती पाठवा
नागरिकांनी बँकामध्ये करोडो रुपये साठवले असून त्यामध्ये भरणा झालेल्या बनावट नोटांची माहिती संकलित करण्यास रिझर्व्ह बँकेने सुरूवात केली आहे. या बनावट नोटांची माहिती संकलित करण्यात येत असून त्यामुळे देशभरात किती बनावट नोटा चलनात होत्या,याचा अंदाज येणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मोबाइलचोरी करणारे रिक्षाचालक गजांआड

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

मोबाइल चोरणाऱ्या चार रिक्षा चालकांना गुन्हे शाखेच्या युनिट चारने अटक केली आहे. त्यांच्याकडून विविध कंपन्याचे २३ महागडे मोबाइल जप्त करण्यात आले आहेत.
अलिशान रफिक शेख (वय २६, रा. नाना पेठ), मोहंमद जाबीर उर्फ सलमान अल्ताफ कुरेशी (वय २६, रा. लक्ष्मीनगर, येरवडा), सद्दाम इस्माईल बेग (वय २६, रा. कामराजनगर, येरवडा) आणि अनिस हुसेन सय्यद (वय २७, रा. लक्ष्मीनगर, येरवडा) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. यांच्याकडून चोरीचे आणखी काही मोबाइल मिळण्याची शक्यता आहे. चोरीचे मोबाइल कमी किमतीमध्ये ग्रामीण भागात विकत असल्याचे तपासात समोर आले आहे, अशी माहिती पोलिस निरीक्षक सीताराम मोरे यांनी दिली.
बंडगार्डन पोलिस ठाण्याच्या हद्दीत गुन्हे शाखेचे कर्मचारी रोहिदास लवांडे, संदीप तळेकर, कल्पेश बनसोडे यांनी वाहनचोरीसंदर्भात सापळा लावला होता. त्यावेळी बनसोडे यांना वुडलँड हॉटेलजवळील गल्लीत चार व्यक्ती चोरीचे मोबाइल विक्री करत असल्याची खबर मिळाली. त्यानुसार गुन्हे शाखेचे अतिरिक्त पोलिस आयुक्त दीपक साकोरे, सहायक पोलिस आयुक्त सुरेश भोसले यांच्या मार्गदर्शनाखाळी पोलिस निरीक्षक सीताराम मोरे यांच्या पथकाने सापळा रचून चौघांना पकडले. त्यावेळी त्यांच्याकडे सापडलेल्या पिशवीमध्ये विविध कंपन्यांचे २३ महागडे मोबाइल आढळून आले. मोबाइलबाबत चौकशी केली असता त्यांना काहीच सांगता आले नाही.
मोबाइलच्या तीन मालकांचा शोध लावण्यात पोलिसांना यश आले आहे. या प्रकरणी तीन गुन्हे दाखल करण्यात आले आहे. पकडण्यात आलेले तिघे आरोपी रिक्षाचालक आहेत. शहरात विविध ठिकाणी गर्दीचा फायदा घेऊन मोबाइल चोरत होते. त्यांनी चोरलेले काही मोबाइल ग्रामीण भागात कमी किमतीत विक्री करण्यात आले आहेत. मोबाइल हरवलेल्या व्यक्तींनी गुन्हे शाखेच्या ९८८१०५११०० या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.

गुन्हा नोंदविण्याची गरज
शहरातून दररोज मोबाइल चोरीला जात आहेत. मात्र, नागरिक पोलिसांकडे तक्रार देण्यासाठी गेल्यानंतर चोरीचा गुन्हा नोंदवून घेतला जात नाही. पोलिसांकडून मोबाइल हरवला असल्याची तक्रार दाखल करून घेतली जाते. हा अनुभव अनेकांना आला आहे. मोबाइल चोरीला गेल्याची तक्रार नोंदवून घेतल्यास गुन्हेगारांना पकडून मुद्देमाल जप्त केल्यानंतर पोलिसांना मोबाइलधारकाचा शोध घेण्यासाठी फिरावे लागणार नाही. पोलिसांनी मोबइल चोरीला गेल्यानंतर चोरीचा गुन्हा दाखल करण्याची गरज आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चिमुकल्यांनी भरले गीतरामायणात रंग

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

रामजन्म, त्राटिका वध, अहिल्या उद्धार, सीता स्वयंवर, रामसीतेचा विवाह, राज्याभिषेक, वनवास, हनुमान भेट, लंकास्वारी आणि रावण वध आदी रामायणातील प्रसंग रंगीबेरंगी पेहरावातील मुलामुलींनी उभे केलेले पाहून उपस्थितांच्या अंगावर रोमांच उभे राहिले. निमित्त होते विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या ‘गीतरामायण’ नाट्याचे...
डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या नवीन मराठी शाळेतील १२५० विद्यार्थ्यांनी ग. दि. माडगूळकर यांनी लिहिलेले आणि सुधीर फडके यांनी स्वरबद्ध केलेल्या गीतरामायणाचे मंगळवारी नाट्यरूपी सादरीकरण केले. रमणबाग शाळेच्या मैदानावर उपस्थित दहा हजारहून अधिक रसिकांनी चिमुकल्यांचा हा आविष्कार अनुभवला. वंडरबुक ऑफ रेकॉर्डस, वर्ल्ड रेकॉर्डस ऑफ इंडिया आणि लिम्का बुक यांनी ६ ते ११ या वयोगटातील १२५० अधिक विद्यार्थ्यांनी सादर केलेले सर्वांत मोठे आध्यात्मिक नाट्य या गटात उपक्रमाची नोंद घेण्यात आली.
‘स्वये श्रीराम प्रभू ऐकती’ या लवकुशांच्या गीताने महानाट्याचा प्रारंभ झाला. त्यानंतर दशरथाचे पायसदान, रामजन्म, यज्ञ रक्षणासाठी सज्ज झालेला राम, त्राटिका वध, अहिल्या उध्दार, सीता स्वयंवर, राम-सीतेचा विवाह, रामाचा राज्याभिषेक, वनवास, हनुमान भेट, लंकास्वारी आणि रावण वध आदी प्रेक्षकांची उत्कंठा वाढवणारे रोमांचकारी प्रसंग विद्यार्थ्यांनी संगीत-नृत्य-नाट्याद्वारे सादर केले. ‘सवाई गंधर्व’च्या भव्य व्यासपीठावर हा कार्यक्रम सादर झाला.
‘मुलांमध्ये सभाधीटपणा, सहकार्य, समूहभावना, स्वयंशिस्त, वक्तशीरपणा आदी गुण वाढावेत आणि रामकथेचा प्रसार सर्वदूर व्हावा यासाठी उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे,’ अशी माहिती मुख्याध्यापिका कल्पना वाघ यांनी दिली. महापौर प्रशांत जगताप, उपमहापौर मुकारी अलगुडे, सोसायटीच्या नियामक मंडळाचे संचालक किरण शाळिग्राम, शाला समितीचे अध्यक्ष दिलीप कोटिभास्कर या वेळी उपस्थित होते. शिक्षिका तनुजा तिकोने, धनंजय तळपे यांनी संयोजन केले. अर्चना देव व भाग्यश्री हजारे यांनी पटकथालेखन केले. कलाशिक्षिका सारिका दुसाने यांनी नेपथ्याची तयारी केली. पालक संतोष राऊत यांनी दिग्दर्शन, वेषभूषेसाठी प्रसाद सुपेकर यांनी सहकार्य केले. माजी विद्यार्थी आणि शिक्षक-पालक संघाचे विशेष सहकार्य यासाठी मिळाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

राहुल देशपांडे यांचा ‘संतप्त सूर’

$
0
0

संगीतमैफलींना पोलिसांकडून मिळणाऱ्या दुजाभावामुळे फेसबुकवर नाराजी व्यक्त

म. टा. प्रतिनिधी, पुणे

‘वराती- मिरवणुकीतील डिस्को म्युझिकचा धांगडधिंगा आम्ही उशिरापर्यंत सहन करायचा. शास्त्रीय संगीताची मैफल मात्र रात्री दहाच्या जरा पुढे गेली, की सुप्रीम कोर्टाचा नियम दाखवायला स्थानिक पोलिस लगेचच हजर होतात, असे का?’ अशी संतप्त भावना प्रसिद्ध गायक राहुल देशपांडे यांनी फेसबुकवर पोस्ट करून रात्री-अपरात्रीपर्यंत चालणाऱ्या डिस्को म्युझिकच्या आवाजाविरोधात निषेध व्यक्त केला आहे.
देशपांडे यांनी ही पोस्ट केल्यानंतर त्याच्यावर अनेक प्रतिक्रिया आणि स्वानुभव व्यक्त होऊन ती शेअर झाली. ही पोस्ट २४ तासांच्या आत अडीचशेहून अधिक वेळा शेअर झाली आहे. या पोस्टमध्ये देशपांडे यांनी पुणे पोलिस, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी असे हॅशटॅगही तयार केले आहेत. मात्र, त्यांच्याकडून अद्याप काहीही प्रतिसाद मिळाला नाही.
याबाबत देशपांडे यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, ‘एका मिरवणुकीमधील डीजेच्या असह्य आवाजाची तक्रार करण्यासाठी स्थानिक पोलिस स्टेशन आणि १०० नंबरशी संपर्क साधूनही प्रतिसाद मिळाला नाही. शास्त्रीय मैफलीला वेळेच्या बंधनाचा नियम सांगणाऱ्या स्थानिक पोलिसांना डीजेचा आवाज चालतो? तिथे कुठे जातो सर्वोच्च न्यायालयाचा आदेश? गणपती-नवरात्रीमध्येही मी हेच सहन करतो.’
‘दहानंतर डीजे चालतो, शास्त्रीय संगीत नाही,’ असा प्रतिप्रश्न करून देशपांडे म्हणाले की, ‘नरेंद्र मोदींनी घेतलेल्या नोटाबंदीच्या निर्णयाला देशप्रेमापोटी ओ देऊन मी शिस्तीत एटीएमच्या रांगेत उभा राहिलो. मग आम्हा कलाकारांना येणाऱ्या अडचणी कोण ऐकणार? आम्ही त्यांच्यासाठी व्होटबँक नाही का, जो नियम पाळतो, त्यांच्यावरच ते लादले जातात हेच खरे... मग नियम गुंडाळून चालणाल्या डीजे मिरवणुका, पार्ट्या पोलिसांना दिसत नाहीत का?’ स्थानिक पोलिसांकडून प्रतिसाद मिळत नाही म्हटल्यानंतर देशपांडे यांनी पोलिस आयुक्तांच्या चोवीस तास सुरू असणाऱ्या हेल्पलाइनशी संपर्क साधला. त्यांच्या आश्वासनानंतर रात्री पाऊणच्या सुमारास आवाज बंद झाला.

ध्वनिप्रदूषण होते असे कारण देऊन रात्री दहानंतर चालणाऱ्या शास्त्रीय मैफलींना कायद्याचा बडगा दाखवला जातो. माझ्या मते उलट अशा मैफलींमुळे वातावरण शुद्ध होते. माझा धर्म कलाकाराचा आहे आणि सूर हेच आमचे दैवत आहे. मग आमच्या देवतेची पूजा करतानाच सरकार कसे काय आड येते.

राहुल देशपांडे

मैफल थांबवली; फटाक्यांचे काय?
देशपांडे यांनी ‘वसंतोत्सवा’च्या पहिल्या ‍‍‍‍‍वर्षाचा किस्सा सांगितला. ‘किशोरी आमोणकर यांची मैफल रंगात आली असताना सव्वादहाच्या सुमारास पोलिस मैफल बंद करण्यासाठी हजर झाले. तेव्हा नाना पाटेकर आणि सुधीर गाडगीळ यांनी मोठ्या हिमतीने किशोरीताईंना थांबवले. आम्ही मैफल संपवल्यानंतर लगेचच कुठेतरी फटाक्याची माळ लावण्यात आली. तिचा आवाज पोलिसांनी कसा काय खपवून घेतला, याचेच आश्चर्य वाटते. आताही परिस्थिती फार काही बदलेली नाही,’ अशी खंत देशपांडे यांनी व्यक्त केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बहुजन क्रांती मोर्चाचे रविवारी आयोजन

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

अॅट्रॉसिटी कायद्याची कडक अंमलबजावणी करावी, महिलांवरील अत्याचार रोखण्यासाठी कडक कायदा करावा, कोपर्डी बलात्कार घटनेतील गुन्हेगारांना त्वरीत फाशी द्यावी, ओबीसी, एसबीसी, भटक्या विमुक्तांची जातनिहाय जनगणना करून लोकसंख्येच्या प्रमाणात आरक्षण द्यावे, अॅट्रॉसिटी कायद्याचा गैरवापर करणाऱ्यांवर त्या कायद्याअंतर्गत गुन्हे दाखल करावेत आदी मागण्यांसाठी येत्या रविवारी (ता. १८) सकाळी ११ वाजता बहुजन क्रांती मोर्चा काढण्यात येणार आहे.
बहुजनांचे संवैधानिक हक्क आणि अधिकार नष्ट करण्यासाठी जाणीवपूर्वक षडयंत्र रचण्यात येत आहे. बहुजनांचे हक्क आणि अधिकार नष्ट होऊ नयेत यासाठी सर्व बांधवांनी न्याय हक्कासाठी लढा दिला पाहिजे. त्यासाठी एससी, एसटी, ओबीसी, एटीडी, व्हीजेएनटी, मराठा, बारा-बलुतेदार, ख्रिश्चन, मुस्लिम, बौद्ध, लिंगायत, जैन आदी बहुजन समाजातील लाखो बांधवांनी मोर्चात सहभागी व्हावे, असे आवाहन बहुजन क्रांती मोर्चाच्या संयोजकांनी केले आहे.
छत्रपती संभाजी महाराज यांच्या डेक्कन येथील पुतळ्यापासून रविवारी सकाळी ११ वाजता मोर्चाला प्रारंभ होणार आहे. कौन्सिल हॉल येथे समारोप होईल. या वेळी जिल्हाधिकाऱ्यांना मागण्यांचे निवेदन सादर केले जाणार आहे.

मोर्चेकऱ्यांच्या प्रमुख मागण्या
- अॅट्रॉसिटी कायद्याची कडक अंमलबजावणी करा
- कोपर्डीतील गुन्हेगारांना त्वरित फाशी द्या
- ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण द्या
- खासगी क्षेत्राला आरक्षण लागू करा
- मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांची थकित शिष्यवृत्ती द्या
- सरकारी नोकरभरती कपातीचा निर्णय मागे घ्या
- शेतीमालाला हमीभाव द्या

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पाण्याभोवती गुंफली ‘कथायात्रा’

$
0
0

येत्या शुक्रवारपासून तीन दिवसीय महोत्सवाला सुरुवात

म. टा. प्रतिनिधी, पुणे

‘पाणी’ या एका विषयाच्या भोवती गुंफलेल्या ‘कथायात्रा’ या महोत्सवाला येत्या शुक्रवारपासून (१६ डिसेंबर) बालगंधर्व रंगमंदिरामध्ये सुरुवात होणार आहे. तीन दिवस चालणाऱ्या महोत्सवामध्ये नृत्य, नाट्य, कथाकथन, सांगीतिका, परिसंवाद आदी कार्यक्रमांची रेलचेल आहे. शिवाय साजरी करण्यात येणारी ‘जलकथा’ हे कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण असणार आहे.
प्रादेशिक भाषांचे जतन आणि संवर्धनासाठी कार्यरत असलेल्या पुण्यातील ‘भाषा’ संस्थेच्या वतीने आयोजित करण्यात येणारा हा चौथा महोत्सव असणार आहे. ‘आजच्या आधुनिक आणि धकाधकीच्या जगण्यात आजीच्या गोष्टी हरवत गेल्या आहेत. पारंपरिक कथनप्रकारांना ओहोटी लागली. आयुष्यात रस निर्माण करणारी, रससंपन्न जगण्याचा गाभा असणारी गोष्ट दूर गेली आहे. ती गोष्ट पुन्हा एकदा आयुष्यात रुजवण्यासाठी भाषातर्फे कथायात्रा साजरी केली जाते,’ अशी माहिती संस्थेच्या प्रमुख स्वाती राजे यांनी दिली.
महोत्सवाचा प्रारंभ परराष्ट्र मंत्रालयातील सचिव ज्ञानेश्वर मुळे यांच्या हस्ते होणार असून, तीन दिवसांमध्ये आयोजित कार्यक्रमांमध्ये ज्येष्ठ लेखिका माधुरी पुरंदरे, कथक नृत्यांगना अस्मिता ठाकूर, ज्येष्ठ गायिका आरती अंकलीकर, गिटारवादक मनोज पंड्या, अभिनेता आलोक राजवाडे आणि पर्ण पेठे सहभागी होणार आहेत. त्याचप्रमाणे समारोपाच्या दिवशी माजी नौदलप्रमुख अॅडमिरल मनोहर आवटी आणि नौकेतून पृथ्वीप्रदक्षिणा करणारे कमांडर दिलीप दोंदे आपले अनुभव सांगणार आहेत. या शिवाय कार्यशाळा घेण्यासाठी कोलकात्यावरून देबाशिष–देबारती, तसेच ‘शांतीनिकेतन’च्या प्रार्थना हाजरा आणि रितम नंदी खास उपस्थिती लावणार आहेत.
‘भाषा’ तर्फे आयोजित ‘कथायात्रा’ सर्वांसाठी विनामूल्य खुली असून कार्यशाळा आणि स्पर्धांसाठी आगाऊ नोंदणी करणे आवश्यक आहे. याठीचे नोंदणी अर्ज आणि महोत्सवाच्या विनामूल्य प्रवेशिका बालगंधर्व रंगमंदिर आणि भाषा कार्यालय, कॅनरा बँक बिल्डिंग, जंगली महाराज रस्ता, मॅकडोनल्डसमोर डेक्कन जिमखाना यांसह व्हिनस ट्रेडर्सच्या सर्व शाखांमध्ये उपलब्ध होणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

फरारी कैद्यांमध्ये वाढ

$
0
0

१४३ कैद्यांनी ठोकली धूम; पॅरोल, फर्लोच्या सुट्ट्या कारणीभूत

Shrikrishna.Kolhe@timesgroup.com
Tweet : @ShrikrishnaMT

पुणे : राज्यातील तुरुंगात शिक्षा भोगणाऱ्या कैद्यांना पॅरोल (अभिवचन) आणि फर्लोची (संचित) सुट्टी देण्याच्या प्रमाणात २०१५मध्ये वाढ झाली आहे. त्यामुळे पळून जाणाऱ्या कैद्यांचे प्रमाण वाढले आहे. गेल्या वर्षी राज्यातील तुरुंगातून पॅरोल आणि फर्लोद्वारे बाहेर गेलेले १४३ कैदी फरार झाले आहेत. नागपूरमधून सर्वाधिक (६९) कैदी फरारी झाले आहेत.
सुट्टीवर सोडल्यानंतर कैदी फरारी होण्याचे प्रमाण वाढले असतानाच त्यांना पकडण्याच्या प्रमाणातही वाढ झाली आहे. कैदी फरारी झाल्यानंतर त्यांच्यावर संबंधित पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करून त्यांचा शोध घेतला जातो. त्यामुळे गेल्या काही वर्षांत फरार झालेले कैदी मोठ्या प्रमाणात पकडण्यात यश आले आहे. यंदा पळून गेलेले ११४ कैदी पकडण्यात आले आहेत. ‘महाराष्ट्र कारागृह सांख्यिकी २०१५’ या विषयी सविस्तर माहिती देण्यात आली आहे.

राज्यात तुरुंग विभाग संवेदनशील म्हणून ओळखला जातो. राज्यात सध्या नऊ मध्यवर्ती आणि पंचेचाळीस जिल्हा असे एकूण ५४ तुरुंग आहेत. राज्यातील तुरुंगात सध्या २९ हजार कैदी शिक्षा भोगत आहेत. तुरुंगात शिक्षा भोगणाऱ्यांना पॅरोल आणि फर्लो अशा दोन प्रकारच्या सुट्ट्या दिल्या जातात. त्यापैकी पॅरोल विभागीय आयुक्त कार्यालयाकडून तर, फर्लो तुरुंग प्रशासनाकडून दिली जाते.
अलीकडे या सुट्ट्यांमध्ये बदल करून त्यांचा कालावधी कमी करण्यात आला आहे. तसेच, गंभीर गुन्ह्यातील कैद्यांना विशेष कारणांशिवाय सुट्ट्या दिल्या जाणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
राज्यातील तुरुंगातून २०१५मध्ये तीन हजार ५६१ कैद्यांना पॅरोल आणि फर्लोची सुट्टी देण्यात आली. २०१४च्या तुलनेत हा आकडा चारशेने जास्त आहे. यंदा सुट्टीवर गेलेल्या कैद्यांपैकी ७० कैदी पळून गेले. मात्र, २०१५मध्ये कैदी पळून (१४३) जाण्याचे प्रमाण यंदापेक्षा दुप्पट आहे. २०१४मध्ये पळून गेलेल्या कैद्यांपैकी ५९ कैदी पकडण्यात आले. २०१५ मध्ये कैदी पकडण्याचे प्रमाण वाढले असून, आकडा ११४पर्यंत गेला आहे.

फरारी कैद्यांमध्ये नागपूर ‘अव्वल’

तुरुंगातून कैदी पळून जाण्यात (६९) तसेच, फरारी कैदी पकडण्यातही (६५) नागपूर तुरुंगच ‘अव्वल’ आहे. नाशिक रोड, औरंगाबाद आणि येरवडा येथून अनुक्रमे १८, १३ आणि ४ कैदी पळून गेले आहेत.

वर्ष पॅरोल फर्लो

२०१२ ७२ ३२
२०१३ ६५ ३६
२०१४ ४६ २४
२०१५ ९० ५३
पकडण्यात आलेले कैदी

वर्ष पॅरोल फर्लो

२०१२ ५० ३५
२०१३ ४९ ३७
२०१४ ४१ १८
२०१५ ६९ ४५

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


मनसेचे नगरसेवक सर्वांत ‘कार्यक्षम’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

पुणे महापालिकेमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नगरसेवक सर्वांत ‘कार्यक्षम’ असल्याचे स्पष्ट करून त्यांच्या कार्यक्षमतेमुळेच इतर राजकीय पक्षांमध्ये त्यांच्याविषयी उत्सुकता असल्याचा दावा पक्ष नेते बाळा नांदगावकर यांनी मंगळवारी केला. प्रत्येक निवडणुकीत पक्षांतर होतच असल्याचे सांगून पक्ष नेतृत्व सर्व विद्यमान नगरसेवकांच्या सातत्याने संपर्कात असल्याची पुष्टी त्यांनी जोडली. तसेच, मनसेचे प्रमुख नगरसेवक इतर पक्षांच्या वाटेवर असल्याच्या निव्वळ वावड्या उठवल्या जात असल्याचा खुलासा त्यांनी केला.

गेल्या अनेक महिन्यांपासून शहर मनसेच्या पुनर्बांधणीत आणि संघटनेमध्ये महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या नांदगावकर यांनी सर्व पुणेकरांना उद्देशून जाहीर पत्राद्वारे मनसेच्या नगरसेवकांनी गेल्या पाच वर्षांत सर्वोत्तम काम केल्याचे प्रशस्तिपत्र दिले आहे. मनसेकडे चांगल्या नगरसेवकांची किंवा पुन्हा निवडून येण्याची क्षमता असलेल्यांची संख्या सर्वाधिक असल्याने त्यांच्याबाबत अफवा पसरवल्या जात आहेत. त्यांच्याबद्दल केली जाणारी चर्चा म्हणजे त्यांनी केलेल्या चांगल्या कामाची पावतीच आहे, असे ठाम मत नांदगावकर यांनी व्यक्त केले आहे.

गुंडांना प्रवेश देऊनही ‘पार्टी विथ डिफरन्स’चा नारा लगावणारा भाजप, सरकारमध्ये असूनही दुसऱ्यांना दोष देणारा ‘संभ्रमित’ शिवसेना, मनी आणि मसलद्वारे महापालिकेला भ्रष्टाचाराचे कुरण बनविणारा ‘राष्ट्रवादी’ आणि ‘काँग्रेस’ या पक्षांना मतदार त्यांची जागा दाखवून देतील, अशी टीका त्यांनी केली आहे. तसेच, महापालिका निवडणुकीसाठी मनसेतर्फे जोरदार तयारी सुरू असून, पुणेकरांकडून उत्तम प्रतिसाद मिळत असल्याचा दावा त्यांनी केला आहे.

पालकमंत्र्यांचाही धंगेकरांना विरोध

पक्षाचे नगरसेवक पक्षांतर करणार नसल्याचा दावा एका बाजूने मनसेच्या वरिष्ठांकडून केला जात असताना, दुसरीकडे त्यांना पक्षात घेण्यावरून भाजपमध्येही अंतर्गत कुरबुरी सुरू झाल्या आहेत. खासदार संजय काकडे यांच्या पुढाकाराने कसब्यातील मनसेचे नगरसेवक रवींद्र धंगेकर यांना पक्षात प्रवेश देण्याच्या हालचाली सुरू आहेत. परंतु, त्याचे खंडन करून पालिकेतील भाजपचे गटनेते गणेश बीडकर म्हणाले, ‘पक्षात अनेक सक्षम उमेदवार असून, जुन्या-जाणत्या कार्यक्रमांना योग्य संधी दिली जाईल. रवींद्र धंगेकर यांचा भाजपमध्ये प्रवेश देण्यात येणार नाही. त्यांना प्रवेश देण्यास पालकमंत्री गिरीश बापट यांचाही विरोध आहे.’

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सीटवर रुमाल टाकून जागा अडविणाऱ्यांना चाप

$
0
0

एसटीतील जागा अडवण्याच्या प्रकारांना आळा घालण्यासाठी उपाययोजना

म. टा. प्रतिनिधी, पुणे

राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) बसमध्ये सीट मिळवण्यासाठी सीटवर रुमाल किंवा वर्तमानपत्र टाकण्याच्या प्रकारामुळे होणाऱ्या वादावादीला आळा बसणार आहे. ‘रुमाल किंवा अन्य सामान टाकून सीट निश्चित करण्याचा प्रकार यापुढे बंद झाला पाहिजे. त्यासाठी संबंधित ड्रायव्हर, कंडक्टरने दक्षता बाळगावी,’ असा आदेश महामंडळाच्या महाव्यवस्थापकांनी (वाहतूक) दिला आहे.

एसटी महामंडळाच्या बसमध्ये एखादी वस्तू टाकून सीट निश्चित करणारे आणि गर्दीतून वाट काढत जागा मिळवणारे प्रवासी यांच्यात मोठ्या प्रमाणावर वाद होतात. अनेकदा या वादामुळे बस पोलिस स्टेशनलाही न्यावी लागते. त्यामुळे एसटीचा वेळ व पैसा वाया जातो, प्रवाशांचाही वेळ वाया जातो. हा प्रकार एसटीसाठी डोकेदुखी ठरत असल्याचे वृत्त ‘मटा’ने नऊ सप्टेंबर २०१६च्या अंकात प्रसिद्ध केले होते. त्यानंतर कल्याण येथील आमदार नरेंद्र पवार यांनी या प्रकरणावर तोडगा काढण्याबाबत मागणी करणारे पत्र एसटी महामंडळाला दिले होते. त्यावर महामंड‍ळाने नुकताच निर्णय घेतला आहे. एसटी बस फलाटावर उभी करण्यापूर्वीच त्या बसच्या खिडक्यांच्या काचा आतून लावून घेणे किंवा प्रवाशांना दरवाजा व्यतिरिक्त शिरकाव करता येईल, अशा ठिकाणी प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याची सूचना करण्यात आली आहे. याबाबतचा लेखी आदेश राज्यातील सर्व आगारप्रमुखांना पाठवण्यात आला आहे.

एसटी स्टँडवर प्रवाशांची गर्दी असल्यास पहिल्या स्टँडपासून प्रवासी किंवा त्यांचे नातेवाइक रुमालासह विविध प्रकारच्या वस्तू खिडकीतून सीटवर ठेवतात. अनेक जण गर्दीतून वाट काढत त्या सीटपर्यंत पोहोचतात; मात्र रुमाल टाकलेला पाहून तेथे बसणे टाळतात, तर काही जण रुमाल बाजूला करून त्या सीटवर बसतात. त्यामुळे संबंधित दोन्ही प्रवाशांमध्ये वाद होतो. एसटी महामंडळाकडे प्रवाशांचे वाद आणि प्रवासी व कंडक्टरमधील वादाच्या घटनांची नोंद आहे. ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर दादागिरी केली जाते. रुमाल टाकून सीट आरक्षित करण्याच्या प्रकाराला प्रतिबंध करणाऱ्या कंडक्टरना मारहाण झाल्याच्या घटना घडल्या आहेत. शिरूर, नारायणगावात महिला कंडक्टरना मारहाण झाल्याच्या घटना ताज्या आहेत. या प्रवृत्तींवर प्रशासनाने कारवाई करण्याची गरज आहे, अशी मागणी करण्यात आली होती.

खिडक्या बंद करण्याची सूचना

एसटी बस फलाटावर लावण्यापूर्वी त्या बसच्या सगळ्या खिडक्यांच्या काचा आतून लावून घेणे बंधनकारक करण्यात आले आहे. अनेक बसमध्ये खिडक्यांची आतील लॉक नादुरुस्त असतात. त्यामुळे त्यांची तातडीने दुरुस्ती करून घेण्याची सूचना महामंडळाच्या महाव्यवस्थापकांनी (वाहतूक) केली आहे. तसेच, या आदेशाच्या कार्यवाहीचा अहवालही सर्व आगारप्रमुखांना महाव्यवस्थापकांना सादर करावा लागणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रेल्वेचे तिकीटही मिळणार ‘कॅशलेस’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

रेल्वेचे तिकीट आरक्षित करण्यासाठी, चालू तिकीट घेण्यासाठी आणि पार्सल विभागातून माल पाठविण्यासाठी भरावयाचे शुल्क आता विनारोकड भरता येणार आहे. केंद्र सरकारच्या ‘कॅशलेस’ योजनेला बळ देण्यासाठी रेल्वेच्या पुणे विभागाने ‘कॅशलेस’ सेवा देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी विविध बँकांच्या माध्यमातून ‘पीओएस’ मशिन उपलब्ध करून दिले जाणार आहे. आठवडाभरात संपूर्ण विभागात ही सेवा कार्यान्वित होईल.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काळ्या पैशाला आवर घालण्यासाठी चलनातून पाचशे व हजार रुपयाच्या नोटा बंद केल्या. त्यानंतर भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी रोखीने व्यवहार न करता ‘कॅशलेस’ व्यवहार करण्याची संकल्पना पुढे आली. नागरिकांनी अधिकाधिक प्रमाणात ‘कॅशलेस’ व्यवहार करावेत, यासाठी विविध प्रकारच्या सवलती जाहीर केल्या. तसेच, सध्या सुट्या पैशांवरून नागरिकांची गैरसोय होत आहे. त्यामुळे गैरसोय टाळण्यासाठी रेल्वे प्रशासनाकडून पहिल्या टप्प्यात पुणे स्टेशन, शिवाजीनगर स्टेशन, खडकी, तळेगाव, सातारा, मिरज, कोल्हापूर आणि बारामती या स्टेशनवर बॅकिंग व्यवहारासाठी ‘पीओएस’ मशिन ठेवले जाणार आहे, अशी माहिती रेल्वेच्या पुणे विभागाचे व्यवस्थापक (वाणिज्य) संजय कुमार यांनी दिली.

सध्या प्रायोगिक तत्त्वावर पुणे रेल्वे स्टेशनवरील तिकीट आरक्षण केंद्रावर एक ‘पीओएस’ मशिन कार्यान्वित करण्यात आले आहे. नागरिकांचा त्यास चांगला प्रतिसाद मिळत आहे. येत्या दोन ते तीन दिवसांत बँकांकडून आणखी मशिन उपलब्ध होणार आहेत, अशी माहिती रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी मनोज झंवर यांनी दिली.

शहरात बारा मशिन

पुणे स्टेशनवर आठ ‘पीओएस’ मशिन कार्यान्वित केल्या जाणार आहेत. स्वारगेट, फडके हौद, कॅम्प आणि कर्वे रस्त्यावरील तिकीट आरक्षण केंद्रावरही प्रत्येकी एक मशिन उपलब्ध करून दिले जाणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कुलगुरू डॉ. गाडेंचा बायोडेटा वादात

$
0
0

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. वासुदेव गाडे यांनी आपल्या निवडीसाठी सादर केलेले परिचयपत्र (बायोडेटा) खोटा आणि दिशाभूल करणारा असल्याचा आरोप अधिसभेचे माजी सदस्य डॉ. अतुल बागूल आणि माहिती अधिकार कार्यकर्ते विवेक वेलणकर यांनी केला आहे. डॉ. गाडे यांनी आरोपाचे खंडन केले असून, बायोडेटामधील संपूर्ण माहिती खरी असल्याचे म्हटले आहे.

डॉ. गाडे यांच्या बायोटेडात विसंगत माहिती असून, या प्रकरणी त्यांची आणि निवड समितीची चौकशी करून कारवाई करावी, अशी मागणी कुलपती सी. विद्यासागर राव, पंतप्रधान कार्यालय, मुख्यमंत्री, उच्च शिक्षण मंत्री व प्रधान सचिवांकडे केली असल्याचे डॉ. बागूल यांनी सांगितले. दरम्यान, ‘माझे शोधनिबंध, प्रकल्पांचे पेटंट आदी सर्व माहिती सर्वांना उपलब्ध आहे. बायोडेटाच्या आरोपांबाबत लवकरच पुराव्यांसह उत्तर देईन,’ असे कुलगुरू डॉ. वासुदेव गाडे यांनी सांगितले.

कुलगुरूंचा बायोडेटा विद्यापीठाकडे नाही

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडे कुलगुरू डॉ. वासुदेव गाडे यांचा बायोडेटा मागितला असता, तो उपलब्ध नसल्याचे माहिती अधिकाराअंतर्गत लेखी देण्यात आले. विद्यापीठाने बायोडेटा उपलब्ध करून न देणे संशयास्पद असून या संपूर्ण प्रकरणाची चौकशी होऊन कारवाई होणे आवश्यक आहे, असे माहिती अधिकार क्षेत्रातील कार्यकर्ते विवेक वेलणकर यांनी सांगितले.

अधिसभेचे माजी सदस्य डॉ. अतुल बागूल म्हणाले, ‘डॉ. गाडे दिल्ली विद्यापीठात सहयोगी प्राध्यापक म्हणून कार्यरत असतानाच दुसरीकडेही कार्यरत होते. तीन पेटंट असल्याच्या दावा करणाऱ्या डॉ. गाडेंच्या दोन पेटंटची माहिती उपलब्ध असून, तिसरे पेटंट मिळालेलेच नाही. काही पुस्तकांचे लेखन करणाऱ्या डॉ. गाडे यांनी प्रत्यक्षात या पुस्तकातील एक प्रकरणच लिहिले आहे. त्यांनी सादर केलेल्या शोधनिबंधांपैकी काही शोधनिबंध पुस्तक व शोधनिबंध पुस्तिका दोन्हीकडे प्रकाशित झाल्याचे दाखविले आहे. शोधनिबंध, संशोधन परिषदा, पुस्तके, संशोधन प्रकल्प व त्यासाठीचा निधी, पीएचडीचे विद्यार्थी व एकूण अनुभव अशा सर्वच बाबतीतील माहिती दिशाभूल करणारी आहे.’

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

'बँक ऑफ महाराष्ट्र'च्या लॉकरमध्ये १० कोटी

$
0
0

प्रसाद पानसे, पुणे

देशात अनेक ठिकाणी बेहिशेबी पैशांची घबाडं हाती लागत असताना पुण्यात बँक ऑफ महाराष्ट्रच्या पर्वती शाखेतील लॉकरमध्ये दडवलेली एका बहुराष्ट्रीय कंपनीची कोट्यवधींची रक्कम प्राप्तिकर विभागाने जप्त केली आहे. मंगळवारपासून प्राप्तिकर विभागाचे अधिकारी बँकेच्या पर्वती शाखेत ठाण मांडून आहेत. आतापर्यंत कंपनीचे काही लॉकर उघडण्यात आले असून जप्त केलेली वैध चलनातील रक्कम दहा कोटींच्या आसपास असल्याचे समजते. कंपनीचे सर्व लॉकर तपासण्यासाठी आणखी एक दिवस लागू शकतो.

प्राप्तिकर विभागाने या धाडीत दहा कोटींच्या आसपास वैध (चालू चलनातील) रक्कम जप्त केल्याने एकच खळबळ उडाली आहे. नोटाबंदीच्या निर्णयानंतर प्राप्तिकर विभागाने राज्यात टाकलेल्या धाडींमध्ये मिळालेली वैध चलनातील ही सर्वात मोठी रक्कम असल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. मंगळवारपासून ही कारवाई सुरू असून अनेक लॉकर उघडण्याचे काम बाकी असल्याने ही रक्कम वाढण्याची शक्यता आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सर्व राज्यांमध्ये एफटीआयआय?

$
0
0

Chintamani.Patki@timesgroup.com
Tweet: @chintamanipMT
पुणे : राष्ट्रीय चित्रपट आणि दूरचित्रवाणी संस्थेचे (एफटीआयआय) चित्रपट कलेतील योगदान पाहता देशातील इतर राज्यांनाही एफटीआयआय सारखी संस्था आपल्या राज्यात असावी असे वाटू लागले आहे. केंद्र सरकारने एफटीआयआय सारखी संस्था आमच्या राज्यातही स्थापन करावी. त्यास राज्य सरकार सहकार्य करेल, अशी मागणी काही राज्यांनी केंद्र सरकारकडे केली आहे. केंद्र सरकारने या मागणीची दखल घेऊन देशातील राज्यांकडून प्रस्ताव मागवले आहेत.
केंद्र सरकारच्या माहिती व प्रसारण मंत्रालयातर्फे २८वी सिमकॉम परिषद दिल्लीतील विज्ञान भवन येथे आयोजित करण्यात आली होती. केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्री व्यंकय्या नायडू यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या परिषदेत या खात्याचे राज्यमंत्री राज्यवर्धनसिंह राठोड, सचिव अजय मित्तल तसेच विविध राज्यांचे या खात्याचे मंत्री, एफटीआयआयचे संचालक भूपेंद्र कँथोला आदी उपस्थित होते.
भारतीय चित्रपट सृष्टीत ‘एफटीआयआय’ने एक परंपरा निर्माण केली आहे. अनेक मातब्बर कलावंत या संस्थेतून घडले व त्यांनी भारतीय चित्रपट सृष्टी आपल्या कलेने बहरली. भारतीय चित्रपट सृष्टीसाठी ‘एफटीआयआय’चे योगदान मोठे आहे. त्यामुळे इतर राज्यांनाही म्हणूनच एफटीआयआयसारख्या संस्थेची गरज वाटू लागली आहे.
‘एफटीआयआयसारखी संस्था आमच्या राज्यात सुरू करावी. केंद्र सरकारने ‘एफटीआयआय’प्रमाणे ती संस्था उभारावी. राज्य सरकार त्यासाठी पूर्ण सहकार्य करेल, अशी मागणी काही राज्य सरकारच्या मंत्र्यांनी केली. पाँडेचेरी हा केंद्रशासित प्रदेश त्यासाठी जास्त आग्रही आहे. या मागणीची दखल घेऊन केंद्र सरकारच्या माहिती व प्रसारण मंत्रालयाने राज्यांकडून याबाबत लेखी प्रस्ताव मागवले आहेत,’ अशी माहिती ‘एफटीआयआय’चे संचालक भूपेंद्र कँथोला यांनी 'मटा'ला दिली.
-------------------
‘एफटीआयआय’वर परिणाम
देशात केंद्र सरकारच्या दोन चित्रपट शिक्षण संस्था आहेत. त्यापैकी एक पुण्यातील एफटीआयआय असून दुसरी कोलकाता येथील सत्यजित रे चित्रपट आणि दूरचित्रवाणी ही संस्था आहे. या संस्थांचे काम माहिती व प्रसारण मंत्रालयातर्फे पाहिले जाते. तिसरी संस्था अरुणाचल प्रदेश येथील इटानगर शहरात सुरू होणार आहे. यातील एफटीआयआय सर्वात जुनी असून प्रभात स्टुडिओच्या जागी १९६० मध्ये फिल्म इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया सुरू झाली. १९७१ मध्ये दूरचित्रवाणी शिक्षण सुरू करण्यात आल्यामुळे फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया म्हणजेच एफटीआयआय या नावाने ती ओळखली जाऊ लागली. गेल्या पन्नास वर्षांच्या काळात ‘एफटीआयआय’ने चित्रपट क्षेत्रात एक मानदंड प्रस्थापित केल्याने देशभरात या संस्थेविषयी आकर्षण आहे. विद्यार्थ्यांच्या दिव्य परंपरेत आपलेही नाव यावे, यासाठी देशभरातून विद्यार्थी ‘एफटीआयआय’मध्ये शिक्षण घेण्यासाठी येतात. राज्याराज्यात अशा संस्था उभा राहणे आवश्यक असले, तरी त्यामुळे ‘एफटीआयआय’कडे येणारा ओढा कमी होऊ शकतो, असे बोलले जात आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महाअंतिम फेरी नक्की कशासाठी?

$
0
0

पुरुषोत्तम करंडक स्पर्धेबाबत सवाल
म. टा. प्रतिनिधी, पुणे
महाविद्यालयीन तरुणांचे भावविश्व व्यक्त करणारी पुरुषोत्तम करंडक एकांकिका स्पर्धा गेल्या ५०हून अधिक वर्षांपासून उत्तमप्रकारे सुरू आहे. केवळ पुण्यापुरती ही स्पर्धा मर्यादित न राहता सबंध महाराष्ट्रात या स्पर्धेचा डोलारा उभा राहिला आहे. महाविद्यालयीन स्तरावर या स्पर्धेने अनेक कलाकारांना व्यासपीठ मिळवून दिले आहे. या स्पर्धेच्या महाअंतिम फेरीचे गेल्या सहा वर्षांपासून आयोजन केले जात आहे. परंतु दर वर्षी लांबून येणाऱ्या राज्यभरातील संघांचे सादरीकरण पाहण्यासाठी प्रेक्षकच नसल्याने ही स्पर्धा नेमकी कुणासाठी आणि कशासाठी असे प्रश्न समोर उभे राहतात.
महाराष्ट्रीय कलोपासक या संस्थेतर्फे पुरुषोत्तम करंडक स्पर्धेचे आयोजन केले जाते. स्पर्धेची संकल्पना मांडणाऱ्या राजाभाऊ नातू यांचे स्वप्न साकारण्यासाठी गेल्या सहा वर्षांपासून राज्यभरात स्पर्धा सुरू करण्यात आली. पुण्याबाहेरील पाच केंद्रांवरून विजेते संघ पुण्यात महाअंतिम फेरीसाठी एकांकिका सादर करू लागले. मात्र, त्यांच्या वाट्याला चोखंदळ प्रेक्षकच आले नाहीत. पुण्याच्या महाविद्यालयीन तरुणांनी खरे तर या स्पर्धेला मेजवानी समजून गर्दी करणे अपेक्षित आहे, मात्र तसे होताना दिसत नाही. परिणामी बाहेरून आलेल्या संघांना प्रेक्षकच मिळत नाहीत. मग प्रयोग रंगणार तरी कसा, असा सवाल पुढे येत आहे. स्पर्धक कलाकाराने समोर किती प्रेक्षक बसले आहेत, याचा विचार करू नये, ही संकल्पना मान्य असली, तरी केवळ परीक्षकांसाठी पुण्यात येऊन प्रयोग सादर करायचा का? मग त्यापेक्षा परीक्षकांनीच त्या त्या केंद्रावर जाऊन प्रयोग का पाहू नयेत?, असे अनेक प्रश्न महाअंतिम फेरीच्या निमित्ताने समोर आले आहेत.
‘राजाभाऊ नातू यांचे अपुरे राहिलेले स्वप्न पूर्ण करण्याच्या हेतूने महाराष्ट्रीय कलोपासककडून महाअंतिम फेरी सुरू आहे. पुण्यातल्या एकांकिकांची चळवळ महाराष्ट्रात न्यायला संस्थेला यश आले आहे. कोणतेही आर्थिक पाठबळ नसताना संस्था स्वतःच्या हिमतीवर स्पर्धा राबवते,’ असे महाराष्ट्रीय कलोपासकचे सचिव राजेंद्र ठाकूरदेसाई यांनी सांगितले. संस्थेच्या दृष्टिकोनातून ते बरोबर आहे. मात्र, स्पर्धा आयोजित यशस्वीपणे आयोजित करायची आणि त्याला प्रेक्षकच नसेल तर काय उपयोग, असा प्रश्न संयोजकांनाही भेडसावत असावा. पुण्याबाहेर एखादी राज्यस्तरीय स्पर्धा होते. तेव्हा प्रेक्षक तुडुंब गर्दी करतात. मात्र, पुण्यात अशाप्रकारची स्पर्धा पार पडत असताना महाविद्यालयीन तरुणांनी त्याकडे पाठ फिरवावी, हे चांगले नाही. स्पर्धेत शनिवारी आणि रविवारी पुण्याच्या संघांच्या एकांकिका सादर झाल्या. त्यांच्या महाविद्यालयातील तरुणांनी बऱ्यापैकी उपस्थिती लावली होती. तेव्हा थोडीफार गर्दी जमली. पण मग संयोजक स्पर्धेच्या प्रत्येक दिवशी पुण्याच्या संघाचे सादरीकरण करू शकत नाहीत, का हे देखील अभ्यासणे गरजेचे आहे. यामुळे निदान बाहेरून आलेल्या संघांना त्यांची कला सादर करण्यासाठी थोड्या प्रमाणावर का होईना पण चांगला प्रेक्षकवर्ग मिळेल.
..
प्रयत्न सार्थकी लागतील का?
पुरुषोत्तम करंडक स्पर्धेला पुण्याच्या सांस्कृतिक चळवळीत अनन्यसाधारण महत्त्व आहे. या स्पर्धेने नाट्य-चित्रसृष्टीला अनेक दर्जेदार कलावंत दिले आहेत. यापुढेही चांगले कलाकार स्पर्धेतून मिळतील. पण स्पर्धेची रया आणि राज्यभरात त्याचा दर्जा टिकून राहण्यासाठी संयोजक आणि महाविद्यालयीन तरुण या दोन्ही पातळ्यांवर प्रयत्न होणे गरजेचे आहे. अन्यथा केवळ कर्तव्य म्हणून स्पर्धा पार पाडली, तर महाराष्ट्रीय कलोपासकच्या पूर्वसुरींनी स्पर्धेच्या भवितव्याच्या दृष्टीने केलेले प्रयत्न सार्थकी लागतील का, याबद्दल शंका उपस्थित व्हायला वेळ लागणार नाही.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


प्रबोधनकार ठाकरे यांचेमोडी लिपीतील पत्र प्रकाशात

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

प्रबोधनकार ठाकरे यांनी मोडी लिपित लिहिलेले पत्र भारत इतिहास संशोधक मंडळात मिळाले आहे. इतिहास अभ्यासक मंदार लवाटे यांना मिळालेले हे पत्र इतिहासाचार्य वि. का. राडवाडे यांच्या श्रद्धांजली सभेच्या संदर्भातले असून, ते १९२७ मध्ये ठाकरे यांनी दत्तो वामन पोतदार यांना लिहिलेले आहे.

भारत इतिहास संशोधक मंडळाच्या जुन्या पत्रव्यवहारचे योगेश फाटक आणि महेश फणसळकर यांच्यासोबत फायलिंग करत असताना हे पत्र मिळाल्याचे लवाटे यांनी सांगितले. ‘३१ डिसेंबर १९२६ रोजी वि. का. राजवाडे यांचे निधन झाले. डिसेंबर महिन्यातच हे पत्र सापडावे हा योगायोग म्हटला पाहिजे. पत्रावर प्रबोधन अशी अक्षरे दिसल्याने इतर कागद बाजूला ठेवून हे पत्र आधी वाचले. प्रबोधनच्या लेटरहेडवर ‘३४५, सदाशिव पेठ’ असा पत्ता आहे. त्या काळात हा पत्ता सध्याच्या ज्ञानप्रबोधिनीच्या आसपास येत असावा. प्रबोधन हे अक्षरे इंग्रजीत असून, प्रिंटर्स अँड पब्लिशर्स असेही त्यावर लिहिले आहे. प्रबोधनकारांनी स्वतः हे पत्र लिहिले असावे. पत्र मोडीत असून खाली त्यांची स्वाक्षरी ही मोडी लिपीत आहे. मंडळात होणाऱ्या श्रद्धांजली सभेच्या दिवशी म्हणजे ५ जानेवारी १९२७ रोजी हे पत्र लिहिले आहे,’ अशी माहिती मंदार लवाटे यांनी दिली.

या पत्रात ठाकरे यांनी राजवाडे यांच्याविषयी वापरलेले शब्द महत्त्वपूर्ण आहेत. त्यांनी राजवाडेंच्या कार्याचे महत्त्व जाणले होते. दोन्हीही मोठ्या व्यक्ती आहेत. मतभेद असूनही त्यांच्या योग्यतेविषयी प्रबोधनकारांनी बोलणे यातून त्यांची इतिहासाविषयी असणारी आस्था तसेच त्यांनी जाणलेले राजवाडे यांच्या कार्याचे मोल दिसून येते. सध्याच्या अभ्यासकांनी ही गोष्ट शिकण्यासारखी आहे.’ असेही लवाटे म्हणाले.

असा आहे पत्रातला मजकूर

श्रीयुत दत्तो वामन पोतदार सेक्रेटरी भारत इतिहास संशोधक मंडळ, मुक्काम पुणे यांसी कृ. सा. नमस्कार. वि. वि आज रोजी सायंकाळी कै. राजवाडे यांच्या आकस्मिक निधनानिमित्त मंडळातर्फे सभा भरणार आहे. शक्य असते तर मी हजार राहिलो असतो. कै. राजवाडे यांच्या निधनामुळे महाराष्ट्रातील एक अष्टपैलू आणि कुशाग्र बुद्धिमत्तेचा बृहस्पती नाहीसा झाला, यात मुळीच संशय नाही. मतभेद कितीही असले तरी महाराष्ट्र सारस्वताच्या आणि विशेषतः इतिहासाच्या क्षेत्रात राजवाड्यांच्या तोडीचा एकनिष्ठ निष्काम कर्मयोगी पूर्वी झाला नाही, पुढे होणे नाही, असे मला वाटते. त्यांच्याविषयी माझ्या भावना प्रबोधनच्या येत्या अंकी मी आदरपूर्वक व्यक्त करणार आहे. सभेच्या कार्यक्रमाला माझी पूर्ण सहानुभूती आहे.
आपला नम्र
केशव सीताराम ठाकरे

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आयुक्तांच्या भेटीचा फार्स

$
0
0

सहारियांच्या बारामती दौऱ्याबाबत स्थानिक प्रशासनाने बाळगली गुप्तता

म. टा. प्रतिनिधी, बारामती

नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य निवडणूक आयुक्तांनी बारामतीचा दौरा केला असला, तरी त्याबाबत फार गुप्तता पाळण्यात आली. बारामतीच्या भेटी दरम्यान पुणे-मोरगाव रस्त्यालगत असणाऱ्या ढवाण-पाटील वस्तीवरील प्राथमिक शाळेतील मतदान केंद्राला आयुक्तांनी अचानक भेट दिली असल्याचे तेथील मतदारांनी सांगितले; मात्र आयुक्तांची बारामती भेट म्हणजे केवळ फार्स ठरली असल्याचे बोलले जात आहे.

जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायत, महानगरपालिका, नगर परिषद व नगर पंचायत यांच्या निवडणुका घेण्याची संवैधानिक जबाबदारी राज्य निवडणूक आयोगाची आहे. राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका भयमुक्त व न्याय्य वातावरणात पार पाडण्यासाठी निवडणूक आयुक्त प्रयत्न करतात, नव्हे शक्य असल्यास संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थेच्या मतदानाच्या दिवशी भेटही देतात. असे असले, तरी स्थानिक निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या मनमानी कारभारामुळे राज्य निवडणूक आयुक्त जगेश्वर एस. सहारिया यांच्या दौऱ्याबाबत जाणूनबाजून गुप्तता पाळून प्रसारमाध्यमांना व अनेक उमेदवारांना कळू न देण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप मतदार व उमेदवारांनी केला आहे. याबबत निवडणूक अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता कोणताही प्रतिसाद मिळाला नाही.

राज्य निवडणूक आयुक्त येणार होते, ही बाब येथील निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी जाणूनबुजून आम्हाला सांगितली नाही. याबबत आम्ही निवडणूक आयोगाकडे तक्रार करणार आहोत.
- किशोर मासाळ

आमच्या भागात आम्हाला मतदान स्लिपा मिळाल्या नाहीत. त्यामुळे मतदानाचा हक्क बजावताना अनेक अडचणींचा सामना करावा लागला. आयुक्त भेट देणार हे माहिती असते, तर याबाबत त्यांना थेट विचारले असते.
- सागर जाधव, मतदार (प्रभाग २)
.................

बारामतीत ७६.५९ टक्के मतदान

नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी बारामतीमध्ये एकूण ७६.५९ टक्के मतदान झाले. सकाळी मतदारांनी अल्प प्रतिसाद दाखवून मतदानाला सुरुवात केली; मात्र दुपारनंतर गर्दी वाढली होती. कोणताही अनुचित प्रकार न घडता मतदान प्रक्रिया पार पडली. काही केंद्रांवर तर सायंकाळी उशिरापर्यंत मतदान सुरू होते. पालकमंत्री गिरीश बापट यानी लक्ष घातल्याने माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची प्रतिष्ठा पणाला लागलेल्या बारामती नगर परिषदेसाठी चुरशीने मतदान झाले. ९८ मतदान केंद्रांवर मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली. दुपारी साडेतीन वाजेपर्यंत ५३.४८ टक्के मतदान झाले. या निवडणुकीमध्ये यंदा प्रथमच जनतेतून थेट नगराध्यक्षपदासाठी निवडणूक होत आहे. हा फार मोठा अधिकार कायद्याने मतदारांना मिळाला आहे. त्यामुळे मतदारांना प्रभागातील दोन नगरसेवक व एक नगराध्यक्ष अशी तीन मते द्यावी लागली. त्यामुळे काही मतदारांचा गोंधळ होत होता.

................

जुन्नरमध्ये शांततेत मतदान

जुन्नर : जुन्नर नगर परिषद निवडणुकीसाठी २५ मतदान केंद्रांवर सकाळपासून तुरळक संख्येने मतदार दिसत होते; मात्र दुपारी साडेतीननंतर मतदानाचा जोर वाढल्याचे दिसून आले. एकंदरीतच मतदान शांततेत पार पडले. कोणताही अनुचित प्रकार न घडता मतदान सुरळीत व शांततेत पार पडल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी कल्याण पांढरे व सहायक निवडणुक निर्णय अधिकारी तथा मुख्याधिकारी संतोष वारुळे यांनी दिली.

सकाळी ९.३०पर्यंत ८.१२ टक्के, ११.३०पर्यंत २० टक्के, दुपारी १.३०पर्यंत ३४.४२ टक्के व ३.३०पर्यंत ५०.७१ टक्के मतदान झाले; मात्र काही चुरशीच्या मतदान केंद्रांवर दुपारपर्यंत ६० टक्के मतदान झाले होते. जुन्नरच्या श्री शिवछत्रपती महाविद्यालयाच्या ग्रंथालयात आज, गुरुवारी सकाळी दहा वाजता मतमोजणीस सुरवात होणार आहे. दरम्यान, सकाळी महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष अतुल बेनके यांच्या मोबाइल नंबर क्लोन करून व्हॉइस कॉलद्वारे शहरातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रमुख कार्यकर्त्यांना ‘तुम्ही किटली चालवा व मला परत फोन करू नका’ अशा आशयाचे फोन गेल्याने घड्याळ चिन्हाबाबत संभ्रम निर्माण झाला. त्यानंतर बेनके यांनी तक्रार दाखल केली. मग ही अफवा असल्याचे संदेश सर्वत्र पाठवून संभ्रमाचे वातावरण दूर केले.

...........

दौंड नगरपालिकेसाठी ६०.९९ टक्के मतदान

दौंड : नगरपालिकेच्या निवडणुकीत ६०.९९ टक्के मतदान झाले असून, मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली. ४४,३६७ मतदारांपैकी २७,०६३ मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. यात १४,०३२ पुरुष व १३,०३१ महिला मतदारांचा समावेश होता. तरुणाईसह महिला व ज्येष्ठांनीही रांगा लावून मतदान केले. दौंडच्या नगराध्यक्षा कोण होणार, याची उत्सुकता नागरिकांना आहे. सुरुवातीच्या दोन तासांत ६.५७ टक्के, ११ वाजता १६ टक्के, एक वाजेपर्यंत २५ टक्के आणि तीन वाजेपर्यंत ४० टक्के मतदान झाले होते. मतदान संपले तेव्हा ६०.९९ टक्के मतदानांची नोंद झाली. दुपारी आलेल्या अवकाळी पावसामुळे मतदान प्रक्रिया थंडावली होती. यंदाची निवडणूक अत्यंत चुरशीची झाली; मात्र कमी झालेल्या मतदानामुळे काही मंडळी धास्तावली आहेत, तर काहींच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. दरम्यान, आज, गुरुवारी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास मतमोजणी सुरू होणार असून, एक वाजेपर्यंत निकाल हाती येतील, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी श्रीपती मोरे यांनी दिली.

..................

शिरूरमध्ये ७३ टक्के मतदानाची नोंद

शिरूर : अत्यंत चुरशीने होत असलेल्या शिरूर नगरपालिका निवडणुकीकरिता दिवसभरात ७३.४७ टक्के मतदान झाले. शिरूर नगरपालिका निवडणुकीकरिता बुधवारी सकाळपासून मोठ्या उत्साहात मतदान सुरू झाले. सकाळी अकरापर्यंत साधारणपणे ३० टक्क्यांहून अधिक मतदानाची नोंद झाली. त्यानंतर मतदानाचा वेग वाढून दुपारी साडेतीन वाजेपर्यंत साधारणपणे ५४ टक्के मतदान झाले. दुपारी तीन वाजेपर्यंत बोरा कॉलेज येथील मतदान केंद्रावर ५३ टक्के, तर सर्टिफाइड शाळेतील केंद्रावर ८७ टक्के मतदान झाले. नगरपालिकेचे सभागृह नेते प्रकाश धारिवाल यांनी कापड बाजारातील केंद्रावर, भाजपच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार वत्सला पाचंगे यांनी वाडा कॉलनीतील केंद्रावर, शिरूर शहर विकास आघाडीच्या उमेदवार वैशाली वाखारे यांनी विठ्ठलनगर येथील, तर लोकशाही क्रांती आघाडीच्या उमेदवार सविता बांडे यांनी हुडको कॉलनीतील मतदान केंद्रावर मतदान केले. मतमोजणी आज, गुरुवारी सकाळी शिरूर नगरपालिकेच्या मंगल कार्यालयात होणार आहे.

...............

आळंदीत ८२ टक्के मतदान

राजगुरूनगर : आळंदी नगरपालिकेच्या सोळा जागांसाठी सुमारे ८२ टक्के मतदान झाल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी सुनील गाढे यांनी दिली आहे. या निवडणुकीसाठी चुरशीने मतदान झाले आणि निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पडली. या नगर परिषदेच्या एकूण १८ जागा असून, दोन जागा बिनविरोध निवडून आलेल्या आहेत. तेथे ज्योती राहुल चिताळकर व मीराबाई विलास पाचुंदे या दोन्ही भाजपच्या उमेदवारांची बिनविरोध निवड झाली आहे. आळंदी नगर परिषदेची सत्ता ताब्यात घेण्यासाठी भाजपने ही निवडणूक अतिशय प्रतिष्ठेची केली होती. त्यामुळे भाजपने थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाच मैदानात उतरवले होते. असे असले तरी, शिवसेना व भाजपमध्ये काट्याची टक्कर पाहावयास मिळाली. काही ठिकाणी अपक्ष उमेदवारांनीदेखील चांगली लढत दिली. त्यामुळे अनपेक्षित निकाल लागू शकतात.

............

सासवडमध्ये ७५ टक्के मतदान

म. टा. वृत्तसेवा, सासवड

पहिल्या टप्प्यापासून शेवटच्या क्षणापर्यंत वादग्रस्त ठरत गेलेल्या सासवड नगर परिषद निवडणुकीत या वेळी मतदानाने ७५ टक्क्यांची सरासरी गाठली. त्यामुळे वाढलेले मतदान नेमके कोणाच्या आघाडीला मिळणार, याचे तर्कवितर्क सुरू झाले आहेत. जेजुरी पालिकेसाठी ८६.१४ टक्के मतदान झाले.

चोख व्यवस्था असल्याने दिवसभर तणावपूर्ण वातावरणात, परंतु शांततेत मतदान प्रक्रिया पूर्ण झाली. निवडणूक निर्णय अधिकारी तथा सासवडचे प्रांत अधिकारी संजय असवले व सहायक निवडणूक अधिकारी, मुख्याधिकारी विनोद जळक, निरीक्षक नयना बोदार्डे (गुरव) व पोलिस यंत्रणा यांनी सुरक्षित मतदानासाठी योग्य ती खबरदारी घेतल्याने संवेदनशील शहर असूनही काही अनुचित प्रकार घडले नाहीत.

सकाळी साडेसात वाजता मतदान प्रक्रिया सुरू झाली. साडेअकरापर्यंत मतदान संथ गतीने सुरू होते. तोपर्यंत ४५ टक्के मतदारांनी मतदान केले. त्यात तरुण पुरुष वर्गाचे प्रमाण मोठे होते. महिला मतदारांचा कल घरातील कामे उरकून मतदान करण्याकडे असल्याचे जाणवत होते. कारण दुपारी दोन वाजल्यानंतर मतदान झपाट्याने वाढत असल्याचे दिसत होते. तो उत्साह शेवटपर्यंत राहिला. प्रभाग १,२,५,६,७,९मध्ये दुरंगी व लक्षवेधी लढती असल्याने मतदार आणि उमेदवारांचे समर्थक मोठ्या संख्येने पोलिंग बूथवर गर्दी करून होते. अनेक वेळा पोलिसांना गर्दी हटवावी लागली. आज, गुरुवारी पुरंदर तहसील कार्यालयात सकाळी दहा वाजता मतमोजणी सुरू होणार आहे. या वर्षी प्रथमच मतमोजणी केंद्र बदलण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अखेर सात महिन्यांनी बैठक

$
0
0

अन्नधान्य वितरण कार्यालयाला आली जाग

म. टा. प्रतिनिधी, येरवडा

येरवडा येथील अन्नधान्य वितरण कार्यालय परिमंडळ ‘ई’ विभागात अखेर सात महिन्यांनंतर आमदारांच्या अध्यक्षतेखाली दक्षता समितीची बैठक शनिवारी पार पडली. समितीच्या बैठकाच होत नसल्याने सदस्यांवर कोणाचाही अंकुश राहिला नव्हता. परिणामी स्वस्त धान्य दुकानदारांना धमकावून पैसे उकळण्याचे प्रकार घडू लागले आहेत. भविष्यात सदस्यांकडून असे प्रकार पुन्हा घडू नयेत, यासाठी दुकानदाराला धमकावणाऱ्या अशासकीय सदस्याला समितीतून काढून टाकणार असल्याचे समजते.

सार्वजनिक वितरण व्यवस्थेतील जीवनावश्यक वस्तू आणि अन्नधान्याचा काळाबाजार, तसेच गैरप्रकार रोखण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी गाव, तालुका, जिल्हा आणि महानगरपालिका पातळीवर दक्षता समित्यांची स्थापना केली आहे. महानगरपालिका क्षेत्रात प्रत्येक परिमंडळात आमदारांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली आहे; पण समितीतील अशासकीय सदस्यच रेशनिंग दुकानदारांना धमकावत असल्याचा प्रकार नुकताच परिमंडळ ‘ई ‘विभागात घडला आहे.

येरवड्यातील स्वस्त धान्य दुकानदाराला रेशनिंगचा माल पकडल्याचे सांगून दक्षता पथकातील एकाने धमकावून पन्नास हजार रुपयांची मागणी केली होती. पैसे न दिल्यास गोळ्या घालून जिवे मारण्याची धमकी दिली होती. या प्रकरणी दुकानदाराने पोलिसांत तक्रार दाखल केली होती. याबाबत रेशनिंग कार्यालयात दक्षता समितीबाबत माहिती घेतली असता परिमंडळ ‘ई’ विभागात गेल्या सात महिन्यांपासून बैठक झाली नसल्याचे समोर आले होते. याबाबत सात डिसेंबर रोजी ‘महाराष्ट्र टाइम्स’ने वृत्त प्रसिद्ध केले होते.

‘मटा’च्या वृत्ताची दखल घेऊन आमदार जगदीश मुळीक यांनी परिमंडळ कार्यालयात शनिवारी दक्षता समितीची बैठक घेतली होती. बैठकीला अन्नधान्य वितरण अधिकारी तथा सचिव रघुनाथ ताडगे आणि समितीचे शासकीय व अशासकीय सदस्य उपस्थित होते. यामध्ये ग्राहकांना वेळेत शिधापत्रिका मिळाव्यात, अशासकीय सदस्यांनी दुकानदारांकडे पैशांची मागणी करू नये, काही गैरप्रकार अथवा भ्रष्टाचाराची माहिती असल्यास रेशनिंग अधिकाऱ्यांना कल्पना द्यावी, अशा सूचना मुळीक यांनी सदस्यांना केल्याची माहिती सूत्रांनी दिली. तसेच रेशनिंग दुकानदाराला धमकावून पन्नास हजारांची मागणी करणाऱ्या सदस्याला समितीतून काढून टाकणार असल्याचे समजते.

वर्षभरानंतर आमदार बैठकीला

गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात ‘ई’ विभागात दक्षता समितीची स्थापना झाल्यानंतर डिसेंबर २०१५मध्ये आमदारांच्या अध्यक्षतेखाली समितीची बैठक झाली होती. त्यानंतर जानेवारी ते एप्रिल या महिन्यातील बैठका अन्नधान्य वितरण अधिकारी तथा सचिव रघुनाथ ताडगे यांनी घेतल्या; मात्र ताडगे काही महिने वैद्यकीय रजेवर गेल्यापासून सात महिने समितीची बैठक झाली नव्हती. ‘मटा’च्या वृत्तानंतर वर्षभराने आमदारांच्या अध्यक्षतेखाली समितीची शनिवारी बैठक पार पडली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

हॅकर्सकडून फसवणूक वाढली

$
0
0

‘ई-मेल स्पूफिंग’च्या प्रकारांत वाढ

म. टा. प्रतिनिधी, पुणे

‘ई-मेल स्पूफिंग’च्या प्रकारात वाढ होत असून, हॅकर्सकडून शहरातील व्यावसायिकांना मोठ्या प्रमाणात गंडा घालण्यात येत आहे. हॅकर्सनी वर्षभरातील २३ घटनांमध्ये तब्बल सव्वाचार कोटी रुपयांवर डल्ला मारला आहे. हिंजवडी येथील एका घटनेत एक कोटी ८० लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे. नोटाबंदीच्या निर्णयानंतरही ‘मेल स्पूफिंग’च्या प्रकारात वाढ झाली असून, तशा तक्रारी सायबर सेलकडे येण्यास सुरुवात झाली आहे.

‘मेल स्पूफिंग’च्या आधारे हॅकर्सनी हिंजवडी येथील घटनेत एक कोटी ८० लाख, पिंपरी येथील एम. के. माधवन कंपनीची एक कोटी १८ लाख, जितेंद्र बवाल यांची ५४ लाख रुपयांची फसवणूक केली आहे. या तिन्ही घटनांमध्ये परदेशातील कंपन्यांशी व्यवहार करताना फसवणूक झाल्या आहेत.

हॅकर्सकडून अनेकदा ई-मेलद्वारे मालवेअर पाठवले जातात. मोबाइल, कम्प्युटरवर पाठवण्यात येणारे हे मालवेअर त्यावरील सर्व अकाउंटचे पासवर्ड मिळवतात आणि ते हॅकर्सना मिळतात. अनेकदा खरेदी-विक्री करण्यात येणाऱ्या अकाउंटवर हॅकर्सचा भर असतो. हॅकर्सकडून दोन-तीन महिने या ई-मेलवर घडणाऱ्या गोष्टींवर लक्ष ठेवले जाते. एखाद्या कंपनीने परदेशातील कंपनीशी केलेल्या व्यवहारानुसार माल, वस्तू, सॉफ्टवेअर असे काहीही पाठवले, की त्यापोटी त्या कंपनीला पैसे येणार असतात. हॅकर्स या वेळी अचानक परदेशातील कंपनीला ई-मेल पाठवून संपर्क साधतात. भारतातील कंपनीचे बँक अकाउंट बदलले असून, दुसऱ्या अकाउंटवर पैसे पाठवण्यात यावेत, असे सांगितले जाते. या वेळी हॅकर्स त्यांच्या बँक अकाउंटची माहिती परदेशातील कंपनीला पाठवतात आणि फसवणूक केली जाते, अशी माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुनील पवार यांनी दिली.

काय काळजी घ्याल?

- अनोळखी कुठलीही लिंक कम्प्युटर, मोबाइलवर उघडू नका.

- पैशांचा व्यवहार येईल, अशा वेळी फोनवर संभाषण साधून बँक अकाउंटबाबत खात्री करण्यात यावी.

- कम्प्युटरवर चांगल्या दर्जाचे अँटी-व्हायरस सॉफ्टवेअर अपलोड करावे.

- अनोळखी व्यक्तींकडून पाठवण्यात आलेले ई-मेल उघडू नयेत.

- ई-मेलसाठी पासवर्ड कठीण असावा आणि तो वारंवार बदलावा.

- वेगवेगळ्या अकाउंटसाठी वेगवेगळे पासवर्ड ठेवण्यात यावेत.

- आलेल्या ई-मेलचा अॅड्रेस बारकाईने पाहावा. त्यात सूक्ष्म बदल करून हॅकर्स फसवणुकीचा प्रयत्न करतात.

- कोणतीही शंका आल्यास तत्काळ गुन्हे शाखेच्या सायबर सेलशी संपर्क साधावा.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तुरुंगांमध्ये क्षमतेपेक्षा जास्त कैदी

$
0
0

कैद्यांचे वाढते प्रमाण आणि प्रलंबित खटल्यांमुळे तुरुंग भरले

Shrikrishna.Kolhe@timesgroup.com

Tweet : @ShrikrishnaMT

पुणे : राज्यातील तुरुंग कैद्यांनी खचाखच भरले असून, सात मध्यवर्ती तुरुंगांत क्षमतेपेक्षा तब्बल दोन ते तीन पट अधिक कैदी ठेवण्यात आले आहेत. क्षमतेपेक्षा जास्त भरलेल्या तुरुंगांत ७२ टक्के न्यायालयीन कैदी असल्याचे समोर आले आहे. बराकी वाढवून तुरुंगाची क्षमता वाढवण्यात येत आहे; मात्र तुरुंगात येणाऱ्या कैद्यांचे वाढते प्रमाण आणि प्रलंबित खटले यामुळे तुरुंग भरले आहेत. येरवडा तुरुंगात क्षमतेपेक्षा दुप्पट कैदी ठेवण्यात आले आहेत.

राज्यात नऊ मध्यवर्ती, तर २९ जिल्हा आणि अकरा खुले तुरुंग आहेत. खुली वसाहत, महिला तुरुंग असे प्रकार मिळून एकूण ५४ तुरुंग आहेत. राज्यातील तुरुंगांमध्ये कैदी ठेवण्याची क्षमता २३ हजार ९४२ एवढी आहे; मात्र प्रत्यक्षात तेथे २९ हजार ८०६ कैदी ठेवण्यात आले आहेत. त्यापैकी २१ हजार ५३२ कैदी न्यायालयीन कोठडीत आहेत. त्यांच्यावर राज्यातील विविध कोर्टांत खटले सुरू आहेत. आठ हजार १८० कैदी शिक्षा भोगत आहेत. राज्यातील तुरुंगांची ही सविस्तर माहिती ‘महाराष्ट्र कारागृह सांख्यिकी अहवाल २०१५-१६’मध्ये देण्यात आली आहे.

राज्यातील तुरुंगाची क्षमता वाढवण्यासाठी येरवडा व इतर तुरुंगांत नवीन बराकी बांधण्याचे काम सुरू आहे; पण राज्यातील प्रलंबित खटल्यांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. तसेच, महालोकअदालत, दैनंदिन लोकन्यायालय, दाखलपूर्व खटले निकाली, न्याय आपल्या दारी अशा अनेक योजना राबवल्या असल्या तरीही प्रलंबित खटले वाढतच आहेत. गुन्ह्यांची संख्या वाढत असल्यामुळे कैद्यांची संख्या वाढत असून, त्याचा तुरुंग व्यवस्थेवर ताण पडत आहे.

राज्यात असलेल्या ५४ तुरुंगांपैकी नऊ मध्यवर्ती तुरुंगांत २० हजार ६२६ कैदी ठेवण्यात आले आहेत. या नऊ तुरुंगांची क्षमता १४ हजार आठशे आहे. नऊपैकी सात तुरुंगांत क्षमतेपेक्षा तब्बल दोन ते तीन पट अधिक कैदी ठेवण्यात आले आहेत. मुंबई येथील तुरुंगांची क्षमता ८०४ असताना त्या तुरुंगात २७३४ कैदी ठेवण्यात आले आहेत. येरवडा तुरुंगाची क्षमता २४४९ असून, या ठिकाणी ४१२९ कैदी ठेवण्यात आले आहेत. जिल्हा तुरुंगाची क्षमता ७३१७ असताना २९ जिल्हा तुरुंगांत प्रत्यक्षात ७९४० कैदी आहेत. कल्याण जिल्हा तुरुंगाची क्षमता ५४० असताना, या ठिकाणी १४५४ कैदी ठेवण्यात आले आहेत, अशी माहिती अहवालात देण्यात आली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images