Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

दुचाकीचोरीत चौपट वाढ

$
0
0

पुणे पोलिस अपयशी; गुन्हे शाखेचे स्थानिक पोलिसांकडे बोट

Shrikrishna.kolhe@timesgroup.com
Tweet: @ShrikrishnakMT

पुणे : दुचाकींचे शहर म्हणून ओळखले जाणारे पुणे आता वाहनचोरांचे म्हणून ओळखले जाऊ लागले आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत पुण्यात यंदा वाहनचोरीच्या घटनांमध्ये चौपट वाढ झाली आहे. वाहनचोरीचे गुन्हे रोखण्यात आणि उघडकीला आणण्यात पोलिसांना अपयश येत असल्याचे दिसून आले आहे. गुन्हे रोखण्यात अपयश येत असल्याने स्थानिक पोलिस आणि गुन्हे शाखेकडून एकमेकांकडे बोट दाखविण्यात येत आहे.
शहरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम नसल्यामुळे राज्यात सर्वाधिक दुचाकींमध्ये पुणे अग्रस्थानी आहे. दरवर्षी वाहनांच्या संख्येत मोठी भर पडत आहे. शहरात दर वर्षी साधारणतः सहाशे वाहने चोरीला जातात. त्यामध्ये दुचाकींचे प्रमाण सर्वाधिक आहे. २०१५ मध्ये शहरातून ५७४ वाहने चोरीला गेली होती. मात्र, यंदा वाहनचोरांनी धुमाकूळ घातला असून, ८ डिसेंबरपर्यंत २,५५० वाहनांची चोरी झाली आहे. शहरातील वाहनचोरीचा वाढता ‘आलेख’ पाहता पोलिस आयुक्त रश्मी शुक्ला यांनी काही दिवसांपूर्वी पोलिस ठाण्याचे अधिकारी आणि गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांची बैठक घेतली. वाढणाऱ्या वाहनचोरीवर काय उपाययोजना केल्या आहेत, याची त्यांनी विचारणा केली. त्यावेळी गुन्हे शाखेकडून स्थानिक पोलिसांकडे बोट दाखविण्यात आले. गुन्हे शाखेकडून वाहनचोरीमध्ये अनेक छोट्यामोठ्या घटनांचा तपास करण्यात आला. तसेच, पोलिस ठाण्यांनीही काही वाहनचोरांना पकडले. मात्र, प्रत्येक वेळेस पोलिस आयुक्तांनी जाब विचारल्यानंतरच कारवाई होणार का, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
वाहनांच्या वाढत्या चोऱ्यांमुळे सर्वसामान्यांच्या खिशाला झळ बसत आहे. अन्य प्रकारची गुन्हेगारी नियंत्रणात येत असताना वाहनचोरीचे प्रमाण वाढत आहे. यंदा घडलेल्या वाहनचोरीच्या अडीच हजार गुन्ह्यांपैकी फक्त २७ टक्के (६७५) गुन्हेच उघडकीस आले आहेत. बहुतांश वेळा वाहनचोरी करणारे आरोपी सराईत असल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे वाहनचोरीचे गुन्हे रोखण्यासाठी सराईत गुन्हेगारांवर ठोस कारवाई करण्याची गरज आहे.

वाहनचोरी रोखण्यासाठी स्वतंत्र पथक
शहरात वाहनचोरीच्या गुन्ह्यांचे वाढते प्रमाण पाहता तपास करण्यासाठी गुन्हे शाखेमध्ये वाहन चोरीविरोधी पथकाची स्थापना करण्यात आली. गुन्हे शाखेमध्ये यापूर्वीही वाहनचोरीविरोधी आणि साखळीचोरी विरोधी पथके होती. मात्र, त्यांना गुन्हे रोखण्यात अपयश आले. ही पथके फक्त नावालाच राहिल्यामुळे तत्कालीन पोलिस आयुक्तांनी दोन्ही पथके बंद केली होती. आता पुन्हा नव्याने वाहन चोरीविरोधी पथक सुरू केले आहे. त्याच्याकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा आहे.

वर्ष वाहनचोरीचे गुन्हे
२०१३ १०४१
२०१४ ६५७
२०१५ ५७४
२०१६ २५५० (८ डिसेंबरपर्यंत)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


विकास आराखड्याची वेळेत अंमलबजावणी हवी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

महापालिकेच्या प्रत्येक विभागाचे फायनान्शियल कंट्रोल अँड ऑडिट होणे आवश्यक आहे. कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिब्लिटीच्या माध्यमातून शहरातील काही विकासकामे करणे शक्य आहे. विकास आराखडा वेळेत तयार होऊन त्याची अंमलबजावणीही होणे गरजेचे आहे. पालिकेच्या विविध कामांसाठी आम्ही आवश्यक ते सहकार्य करण्यास तयार आहोत, अशी ग्वाही 'इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया' (आयसीएआय), 'इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडिया' (आयसीएसआय) आणि 'इन्स्टिट्यूट ऑफ कॉस्ट अकाउंटंट्स ऑफ इंडिया (आयसीडब्ल्यूए)चे पदाधिकारी आणि सदस्यांनी मटा जाहीरनाम्याच्या व्यासपीठावरून दिली.

सध्याच्या नागरी सुविधांचे ऑडिट गरजेचे आहे. पुण्यात मोठ्या संख्येने विद्यार्थी आहेत. या विद्यार्थ्यांसाठी कोणत्याही खास सुविधा शहरात उपलब्ध नाहीत. या विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी पालिकेने विभागवार अभ्यासिका आणि सुसज्ज ग्रंथालये निर्माण करावीत. त्याचबरोबर खास विद्यार्थ्यांसाठी विशेष बससेवा सुरू केली जावी. यासाठी कंपन्यांच्या सीएसआर निधीचा वापर करता येईल. आयसीएसआयमार्फत आम्ही महापालिका व अशा कंपन्यांची योग्य सांगड घालून देऊ शकतो. शहरात एकट्याने राहणाऱ्या वृद्ध व्यक्ती किंवा दाम्पत्यांची संख्या वाढते आहे. त्यांच्याकडे पैसे आहेत, परंतु, नातेवाइक सोबत नसल्याने त्यांना सेवेची आवश्यकता आहे. त्यासाठी पालिकेने डे-केअर किंवा वृद्धाश्रम, सर्व्हिस अपार्टमेंटसारख्या सुविधा पुरविल्यास त्यांची सोय होऊ शकेल.

- देवेंद्र देशपांडे, रिजनल कौन्सिल सदस्य, आयसीएसआय

शहरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था असलेल्या पीएमपीचा पुरता बोजवारा उडाला आहे. कायमच ही बससेवा तोट्यात दिसते. पीएमपीचे शास्त्रशुद्ध ऑडिट करून पीएमपीच्या खर्चात कशी कपात करता येईल, त्यावर कसे नियंत्रण ठेवता येईल, यासाठी आयसीडब्ल्यूए मदत करू शकेल. शहरातील रस्ते, फूटपाथची दुर्दशा झाली आहे. रस्त्याच्या, फूटपाथच्या कामाचेही ऑडिट झाले पाहिजे, तसेच रस्ताखोदाईची कामे एकाचवेळी केल्यास पुन्हा रस्ते खणावे लागणार नाहीत. पालिकेचा कारभार अधिकाधिक डिजिटाइज करणेही आवश्यक आहे. सार्वजनिक स्वच्छतागृहांची संख्या वाढविणे व त्यांची स्वच्छता कायम ठेवणेही गरजेचे आहे.

दीपक मारणे, सदस्य, आयसीडब्ल्यूए

महापालिकेला विविध विभागांसाठी कॉस्ट मॅनेजमेंटच्या क्षेत्रात आम्ही मदत करू शकतो. पालिकेचे विविध प्रकल्प, पालिकेच्या व्हेंडर्सचे ऑडिट, त्यांचे मानांकन यासाठी आम्ही मदत करू. रस्त्यांची कामे अधिक दर्जेदार पद्धतीने होण्याबरोबरच रस्ते तयार झाले की खड्डे आणि पुन्हा रस्ते ही साखळी तोडणे आवश्यक आहे. हडपसर कात्रज बीआरटी रस्त्यावरील सायकल ट्रॅक, फूटपाथ व सर्व्हिस रोडवर जुन्या वाहनांचे विक्रेते, व अन्य विक्रेत्यांनी अतिक्रमण केले आहे. अशीच अतिक्रमणे शहरातील अनेक रस्त्यांवर, फूटपाथवर व सायकल ट्रॅकवर दिसतात. सायकल ट्रॅक सायकलसाठी वापरताच येणार नसतील, तर ते ठेवायचेच कशाला, असा प्रश्न उपस्थित होतो. शहरात एकाच प्रकारची उद्याने न उभारता विशिष्ट संकल्पना घेऊन त्यावर आधारित उद्यानांची गरज आहे.

चैतन्य मोहरीर, उपाध्यक्ष, आयसीडब्ल्यूए

शहराच्या दृष्टीने सर्वात महत्त्वाची पीएमपी वारंवार तोट्यातच का असते, याचे शास्त्रशुद्ध ऑडिट गरजेचे आहे. पीएमपीच्या तिकीट दरांचा शास्त्रशुद्ध अभ्यास करून ही तिकिटे सर्वसामान्यांच्या दृष्टीने अधिक परवडणारी कशी करता येतील, हे पाहणे गरजेचे आहे. मेट्रोसाठीही पुढील दहा वर्षांचा अभ्यास करून स्टेशन्स व तिकिट दर निश्चित करावे लागतील. पालिकेच्या दवाखान्यांची दुरावस्था असून त्यात सुधारणा करणे गरजेचे आहे. पालिकेच्या सर्वच विभागांचे अंतर्गत ऑडिट होणे अत्यंत गरजेचे आहे. सोयी-सुविधांवर कोट्यवधींचा खर्च होऊनही नागरिकांना कोणतीही कामे झाली नाहीत, असे वाटते. मग हा खर्च कोठे व कसा झाला, याचा तपास व्हायला हवा. त्यासाठी आमच्यासारखे तज्ज्ञ मार्गदर्शन, मदत करू शकतो.

प्रशांत वझे, स्टडी सर्कल प्रमुख,

आयसीडब्ल्यूए, पुणे

महापालिकेकडे निधीचा तुटवडा असल्याने महसूलवाढीसाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे. त्यासाठी आयसीएआय मदत करू शकते. आयसीएसआयच्या माध्यमातून विविध कंपन्या व महापालिका यांच्यात सामंजस्य करार करून स्पेशल पर्पज व्हेइकलच्या माध्यमातून शहरातील काही विकासकामे करता येतील. महापालिकेसाठी लागू होणारे कायदे किंवा महापालिकेने विविध विषयांसाठी बनविलेले नियम अनेक वर्ष जुने असून काही कालबाह्य झाले आहेत. बदलत्या काळात हे नियम, तरतुदीही नव्याने करणे आवश्यक आहे. शहरातील विविध प्रकल्पांसाठी, योजनांसाठी कायदे, नियमावली, परवाने तयार करण्यासाठी आम्ही मदत करू शकतो. व्हिजन २०२० किंवा २०२५ डोळ्यासमोर ठेवून त्यासाठी काम करणे आवश्यक आहे.

ऋषीकेश वाघ, अध्यक्ष,आयसीएसआय, पुणे

पालिकेचा अर्थसंकल्प तयार करण्यापासून निधीचा विनियोग व त्याच्या ऑडिटपर्यंत अशा आर्थिक क्षेत्राशी संबंधित सर्व बाबतीत आम्ही पालिकेला सहकार्य व मदत करू शकतो. सीएसआरअंतर्गत कंपन्यांच्या माध्यमातून पालिकेशी संबंधित उपक्रमांसाठीही आयसीएआय पुढाकार घेईल. शहरात पाणीटंचाई असल्यावरच पाणीबचतीबाबत प्रबोधन केले जाते. मात्र, पाणीबचतीसाठी कायमस्वरूपी उपाययोजनांची गरज आहे. पाणी वाचविणाऱ्या तंत्रज्ञानासाठी पालिकेने सबसिडी दिल्यास त्याचा वापर वाढेल. स्मार्ट सिटीसाठी शहरात ठिकठिकाणी वाय फाय झोन निर्माण करणे आवश्यक आहे. नागरिकांना पालिकेशी संबंधित कोणते अधिकार आहेत, याचीच पुरेशी माहिती नाही. त्याबाबत जागृती करून जबाबदार, सुजाण नागरिक घडविणे आवश्यक आहे. भ्रष्टाचार रोखण्यासाठी पालिकेच्या सर्व विभागात अचानक धाड टाकून ऑडिट केले पाहिजे. उड्डाणपुलाखालील जागांबाबत विशिष्ट धोरण आखून त्याचा विकास केला पाहिजे.

रेखा धामणकर, अध्यक्ष, आयसीएआय, पुणे

लवकरच वस्तू व सेवा कर (जीएसटी) लागू होणार आहे. त्यामुळे एलबीटी रद्द होऊन पालिकेच्या उत्पन्नावर मोठा परिणाम होणार आहे. त्यामुळे पालिकेला उत्पन्नासाठी नवे स्त्रोत शोधावे लागणार आहेत. त्यासाठी आम्ही मदत करू शकतो. पुणे स्मार्ट सिटी होणार आहे, त्यासाठी नागरिकही स्मार्ट असणे आवश्यक आहे. त्यासाठी नागरिकांना योग्य प्रशिक्षण देऊन स्मार्ट सुविधा पुरविणे आवश्यक आहे. शहरातील मिळकतींचे जीओ टॅगिंग केल्यास पालिकेला कर न भरणाऱ्या मिळकतींची माहिती मिळून पालिकेचे उत्पन्न वाढेल. सीएच्या विद्यार्थ्यांसह अन्य विद्यार्थ्यांसाठी पालिकेने ठिकठिकाणी लायब्ररी सुरू करणे आवश्यक आहे.

अभिषेक धामणे, सचिव, आयसीएआय, पुणे

शहरातील विकासकामांसाठी दीर्घकालीन नियोजनाची गरज आहे. त्यामुळे नागरिकांच्या पैशाची उधळपट्टी थांबू शकेल. शहरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अत्यंत दयनीय असल्यानेच शहरात देशातील सर्वाधिक दुचाकी वाहने आहेत. पीएमपी सक्षम केल्यास व मेट्रोच्या दोन्ही प्रस्तावित मार्गांना जोडून वाहतुकीचे सक्षम जाळे निर्माण केल्यास सार्वजनिक वाहतुकीचा प्रश्न काही अंशी सुटू शकेल. प्रस्तावित रिंगरोड वेळेत पूर्ण करून त्याभोवती चहुबाजुंनी विकास होईल, अशा पद्धतीने आखणी करावी. पुण्यातून वाहणाऱ्या दोन्ही नद्यांच्या काठाभोवती सुंदर लँडस्केपिंग करून त्या परिसराचा विकास करता येईल. पुण्यातील जुन्या शैलीतील वाडे व अन्य इमारती पालिकेने योग्य मोबदला देऊन ताब्यात घेऊन जतन कराव्यात. तरच त्या भावी पिढीला पाहता येतील. शहराच्या विकास आराखडा वेळेत तयार होऊन त्याची त्याच कालमर्यादेत अंमलबजावणी होणे आवश्यक आहे. पालिकेच्या प्रत्येक विभागात फायनान्शियल कंट्रोल अँड ऑडिटची गरज असून त्यासाठी आम्ही सहकार्य करू.

यशवंत कासार, माजी अध्यक्ष, आयसीएसआय, पुणे

शहरात विद्यार्थ्यांसाठी सुविधा निर्माण करणे आवश्यक आहे. गावाकडून शहरात आलेल्या विद्यार्थ्यांसाठी कम्युनिटी शेल्टर्स उभारून त्यांचा व्यक्तिमत्व विकास साधणे गरजेचे आहे. अशीच शेल्टर्स महिला व ज्येष्ठ नागरिकांसाठीही उभारून त्यांना एकत्र येण्याची संधी दिली पाहिजे. शहरातील सर्व इमारतींचे स्ट्रक्चरल ऑडिट करून मगच पुनर्विकासाला परवानगी दिली पाहिजे. बांधकामाला परवानगी देण्यापूर्वीच संबंधित परिसरातील लोकसंख्या, त्या तुलनेत पायाभूत सुविधा, रस्त्यांची वहनक्षमता, आरोग्य व करमणुकीच्या सुविधा याचा अभ्यास झाला पाहिजे. पालिकेच्या सर्व दवाखाने, हॉस्पिटलची दुरावस्था झाली असून त्यांचे ऑडिट करणे अत्यावश्यक आहे.

मीना वैद्य, खजिनदार,

आयसीडब्ल्यूए, पुणे

माझ्या पाहण्यात पुण्याचा प्रवास वाईटपासून अत्यंत वाईट असा झाला आहे. नगरसेवकांच्या विकासनिधीतील ५० ते ६० टक्के निधी बाकड्यांवर खर्च होत असतील, तर त्याची पाहणी करून त्यावर आवाज उठवणे आवश्यक आहे. केवळ आपल्याला समस्या आल्यानंतरच नगरसेवकांकडे धावण्यापेक्षा सातत्याने त्यांच्या संपर्कात राहून विकासकामांवर लक्ष ठेवणे गरजेचे आहे. शहरात आर्थिक साक्षरतेचे प्रमाण खूपच कमी आहे. सध्याच्या नोटाबंदी व डिजिटल पेमेंट्सच्या काळात पालिकेनेही पुढाकार घेऊन आर्थिक साक्षरतेसाठी काम करणे गरजेचे आहे. स्मार्ट सिटीच्या प्रचाराला बळी न पडता स्मार्ट सिटीच्या रचनेचा अभ्यास करणे आवश्यक आहे. शहराचा विशिष्ट भाग नव्हे तर संपूर्ण शहर स्मार्ट व्हायला हवे. जर विशिष्ट भागच स्मार्ट होणार असेल, कर त्यासाठीचा विकास कर संपूर्ण शहराने का भरायचा, शहराच्या विकासासाठी नागरिकांनी आग्रही असले पाहिजे. शहरात सर्व्हिस अपार्टमेंट सुविधा किंवा पेइंग गेस्ट सुविधा पुरविणे आवश्यक असून त्याची लिंक वेबसाइटवर दिली पाहिजे. नवी प्रभागरचना मिनी विधानसभेसारखी असून त्यामुळे विकासकामांवर परिणाम होईल.
अरुण गिरी, सदस्य
आयसीडब्ल्यूएआय कार्यकारिणी, पुणे

पीएमपी सक्षम करणे अत्यावश्यक आहे. शहरात प्रायोगिक तत्वावर प्रयोग करत बसण्यापेक्षा ठोस उपाययोजना करणे अधिक आवश्यक आहे. राजकारण्यांनी विरोधासाठी विरोध न करता, श्रेयाचा विचार न करता परस्पर सहमतीने नागरिकांच्या व शहराच्या हिताचे निर्णय घेतले पाहिजेत. शहरासाठी शाश्वत विकासाचे प्रारूप तयार करणे काळाची गरज आहे. नोटाबंदीमुळे बाद नोटा भरण्यास परवानगी दिली, म्हणून थकबाकीदारांनी मोठ्या प्रमाणावर कर भरला. मात्र, तोपर्यंत पालिका प्रशासन काय करत होते. घनकचरा व्यवस्थापन, सौरऊर्जा आदी क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर कामाची गरज आहे. साबरमतीच्या धर्तीवर मुळा-मुठा नदीकाठचा विकास करणे आवश्यक आहे. त्यामुळे शहराच्या सौंदर्यात भर पडेल.

पवन चांडक, माजी अध्यक्ष

आयसीएसआय, पुणे

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ग्राहकांच्या मुंबईवाऱ्या टळणार

$
0
0

ग्राहक आयोगाच्या पुण्यातील सर्किट बेंचचे कामकाज होणार

म. टा. प्रतिनिधी, पुणे

राज्य ग्राहक आयोगाच्या पुण्यातील सर्किट बेंचचे कामकाज पाहण्यासाठी न्यायिक सदस्याचे पद रिक्त असल्यामुळे काही कालावधीसाठी स्थगित करण्यात आलेले बेंचचे कामकाज पुन्हा सुरू करण्यात येणार आहे. १५ आणि १६ डिसेंबर रोजी पुण्यातील सर्किट बेंचसमोर सुनावणी होणार असल्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाकडून जाहीर करण्यात आले आहे.

ग्राहक आयोगाच्या पुण्यातील सर्किट बेंचचे कामकाज अनिश्चित काळासाठी स्थगित करण्यात आल्यामुळे आता ‘ग्राहकांच्या नशिबी मुंबईवारी’ असे वृत्त ‘मटा’मध्ये तीन डिसेंबर रोजी प्रसिद्ध करण्यात आले होते. या वृत्तासंदर्भात अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाकडून खुलासा करण्यात आला आहे. त्यानुसार पुण्यातील ग्राहक आयोगाच्या सर्किट बेंचचे कामकाज १५ आणि १६ डिसेंबर रोजी होणार आहे.

राज्य ग्राहक आयोगापुढे प्रलंबित असलेल्या केस आणि दाखल होणाऱ्या केसची वाढती संख्या लक्षात घेऊन ग्राहक आयोगाची सर्किट बेंच राज्यात सुरू करण्यात आली आहेत. त्याअंतर्गत पुण्यातही सर्किट बेंच सुरू करण्यात आले आहे. या बेंचमुळे पुण्यातील ग्राहकांना अपील करण्यासाठी मुंबईला जावे लागत नव्हते. मुंबईला जाण्याचा वेळ आणि खर्च यामुळे वाचू लागला होता; मात्र बेंचचे कामकाज अनिश्चित काळासाठी स्थगित करण्यात येत असल्याचे ऑगस्ट २०१६मध्ये जाहीर करण्यात आले. ऑगस्टपासून पुण्यातील सर्किट बेंचचे कामकाज झालेले नाही. त्यामुळे ग्राहकांना राज्य आयोगाकडे अपील करण्यासाठी पुन्हा मुंबईच्या वाऱ्या सुरू कराव्या लागल्या. पुण्यातील बेंचसमोर सध्या १७००हून अधिक प्रकरणे प्रलंबित आहेत. या बेंचच्या कामकाजासाठी पुण्याचे पालकमंत्री आणि ग्राहक संरक्षण विभागाचे मंत्री गिरीश बापट यांनी आतापर्यंत एकही बैठक घेतलेली नाही.

बेंचचे कामकाज चालवण्यासाठी पुरेशा सोयीसुविधा उपलब्ध नसल्यामुळे कामकाज अनिश्चित काळासाठी बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार पुण्यातील बेंचचे कामकाज आतापर्यंत बंद आहे. त्याचा फटका पुण्यातील ग्राहकांना बसतो आहे; मात्र या बेंचचे कामकाज पाहण्यासाठी न्यायिक सदस्य नसल्यामुळे कामकाज बंद असल्याचे स्पष्ट करण्यात आले असून, आता कामकाज पुन्हा सुरू होणार आहे.

............

सुरुवात चांगली, मग रखडले

पुण्यात २३ जानेवारी २०१५ रोजी ग्राहक आयोगाचे सर्किट बेंच सुरू करण्यात आले. दरमहा दुसऱ्या सोमवारपासून सुरू होणाऱ्या आठवड्यात या बेंचचे कामकाज करण्याचा आदेश देण्यात आला होता. सुरुवातीचे काही दिवस कामकाज सुरळीत सुरू होते; मात्र त्यानंतर पुन्हा कामकाज रखडले. दरम्यान, व्हिडिओ कॉन्फरसिंगद्वारे सुनावणी घेण्याचाही उपक्रम राबवण्यात आला होता.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सर्जनशीलतेला कथा आव्हान देते

$
0
0

प्रसिद्ध कथाकार मोनिका गजेंद्रगडकर यांचे मत

म. टा. प्रतिनिधी, पुणे

‘अनेक प्रकारचे चकवे दिसत असलेला आणि हाती आल्या सारखा वाटणारा अनुभव एकांगी कधीच नसतो. त्याला अनेक बाजू, मिती आणि कोन असतात. त्यांचे स्तर शोधण्यासाठी कथाकाराला त्याच्यातली संवेदनशक्ती पणाला लावावी लागते. स्वतःमधल्या माणूसपणाचा आणि लेखकत्वाचा अखंड संघर्ष कथाकाराच्या मनात सुरू असतो. कथाकाराच्या सर्जनशीलतेपुढे कथा अनेक आव्हाने उभी करते,’ असे मत मौजच्या संपादक आणि प्रसिद्ध कथाकार मोनिका गजेंद्रगडकर यांनी व्यक्त केले.

महाराष्ट्र साहित्य परिषदेतर्फे आयोजित ‘कथासुगंध’ या कार्यक्रमात त्या बोलत होत्या. या वेळी परिषेदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, प्रमुख कार्यवाह प्रकाश पायगुडे उपस्थित होते. मोनिका गजेंद्रगडकर यांच्या ‘शिल्प’ या कथासंग्रहातील ‘धर्म’ या दीर्घ कथेचे अभिवाचन शुभांगी दामले आणि अमृता पटवर्धन यांनी केले.

गजेंद्रगडकर म्हणाल्या, ‘कथेचे निवेदन प्रथमपुरुषी की तृतीयपुरुषी या प्रश्नापासून ते आरंभ, मध्य, शेवट असा कथेचा प्रवास विचारात घेताना प्रत्येक पातळीवर कथाकारापुढे पेच निर्माण होत असतात. पात्रांची मनोवस्था शोधताना आपल्यातल्याच माणूसपणाचा कथाकार नकळत शोध घेत असतो. हा शोध अलिप्तपणे घ्यावा लागतो आणि पूर्णपणे गुंतूनही घ्यावा लागतो.’

‘कुठलेही सर्जनशील लेखन ही लेखकाला प्रगल्भ आणि अंतर्मुख करीत नेणारी प्रक्रिया असते. कथाकार व्यक्तिरेखांतून त्यांच्या आयुष्यातून, भावनिक - वैचारिक स्पंदनातून एकूण मानवी जीवनाचे, अस्तित्वाचे चिंतन कथेतून मांडत असतो. स्त्रीवाद, सामाजिकता, सामाजिक वास्तव, अशा वादांच्या (ईझम)भूमिकांच्या चौकटीत लेखकाला अनेकदा बसवले जाते. पण कोणताही लेखक विशिष्ट भूमिका घेऊन लिहीत नसतो. कथेतला अनुभव त्याच्या दृष्टीने सर्वात महत्वाचा असतो. लेखकाची विशिष्ट अनुभवाकडे पाहण्याची विशिष्ट दृष्टी असू शकते पण ती दृष्टी म्हणजे त्याची भूमिका नसते,’ असेही त्यांनी स्पष्ट केले. वि. दा. पिंगळे यांनी सूत्रसंचालन केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आरटीओ परवान्याची ई-रिक्षाला गरज नाही

$
0
0

रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालयाच्या उपसचिवांची स्पष्टोक्ती

म. टा. प्रतिनिधी, पुणे

देशभरात ई-रिक्षाद्वारे प्रवासी वाहतूक करण्यासाठी प्रादेशिक परिवहन विभागाचा (आरटीओ) परवाना आवश्यक नाही, असा स्पष्ट आदेश केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालयाने दिला आहे. त्यामुळे देशभरात कोठेही ई-रिक्षाद्वारे प्रवासी वाहतूक करण्याचा मार्ग मोकळा असल्याचे या मंत्रालयाचे उपसचिव अभय दामले यांनी सोमवारी स्पष्ट केले. त्यामुळे राज्य सरकारच्या नियमावलीनुसार केवळ सायकल रिक्षाचालकांनाच ई-रिक्षाचा परवाना देण्याच्या तरतुदीला काही अर्थ उरत नसल्याचे स्पष्ट झाले.

राज्यात मुंबई व रायगड वगळता ई-रिक्षांना परवाना देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. राज्य सरकारने ई-रिक्षासंबंधी नियमावलीदेखील जाहीर केली आहे. त्या नियमावलीमध्ये केवळ सायकल रिक्षाचालकांना ई-रिक्षाचा परवाना देण्याची अट आहे. पुण्यासह अनेक शहरांमध्ये शहरात सायकलरिक्षा अस्तित्वात नसल्यामुळे, तसेच गेल्या काळात अशा कोणत्याही सायकल रिक्षाचालकाची आरटीओ किंवा महापालिकेकडे नोंद नसल्यामुळे ई-रिक्षांना परवाने कसे द्यायचे, असा प्रश्न पुणे प्रादेशिक परिवहन कार्यालयातील अधिकाऱ्यांना पडला होता. या नियमामुळे तूर्तास ई-रिक्षांना शहरात ‘नो-एंट्री’ आहे. तसेच उपनगरात सुरू असलेल्या अशा ई-रिक्षांवर ‘आरटीओ’ने कारवाई बडगा उगारला; मात्र याबाबत दामले यांना विचारले असता, ‘राज्य सरकारच्या आदेशानंतर राज्य रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालयाने आदेश दिला आहे. त्यामुळे केंद्राच्या आदेशानंतर परिस्थिती स्पष्ट झाली आहे,’ असे त्यांनी सांगितले.


ई-रिक्षांना परवाना प्रवासी वाहतुकीसाठी परवान्याची गरज नाही. परंतु, अन्य वाहनांप्रमाणेच ई-रिक्षांची ‘आरटीओ’कडे नोंदणी करणे बंधनकारक आहे. वाहनचालकाकडे रिक्षा चालवण्याचे लायसन्स असणे गरजेचे आहे.
- अभय दामले, उपसचिव, केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालय

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

हिराभाई शहांच्या हॉस्पिटलचे उद्‍घाटन

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
गरिबांची, गरजूंची सेवा करणे, त्यांच्या मदतीला धावून जाणे हा हिराभाई शहांचा स्वभाव होता. त्यांच्याच शिकवणीतून त्यांचे कुटुंबीय हा वारसा पुढे नेत आहेत, असे गौरवोद्गार विरायतन बिहारच्या संस्थापिका आचार्य श्रीचंदनाजी महाराज यांनी काढले.
गुजरातमधील मेहसाणा जिल्ह्यातील पेढामली या हिराभाई शहा चोखावाला यांच्या मूळ गावी ‘कंचन-हिरा’ आयुर्वेदिक हॉस्पिटल व कॅन्सर रिसर्च सेंटरची स्थापना केली असून त्याच्या उद‍्घाटनप्रसंगी आचार्य श्रीचंदनाजी महाराज बोलत होत्या. डॉ. अतुल भावसार यांनी गेल्या ८ महिन्यांमध्ये ८० बेडच्या हॉस्पिटलची उभारणी केली. २ वर्षांपूर्वी हिराभाई यांनी शाळेची उभारणी केली. यामध्ये इमारत, विद्यार्थ्यांसाठी कम्प्युटर केंद्राची सुरुवात केली आहे.
‘कंचन-हिरा’ आयुर्वेदिक हॉस्पिटल व कॅन्सर रिसर्च सेंटरमध्ये रोज परिसरातील दोनशे ते सव्वादोनशे नागरिकांची तपासणी व निवासी उपचार केले जाणार असून सर्व उपचार मोफत आहेत. या कार्यक्रमासाठी जयराज ग्रुपचे राजेश शहा, जयंत शहा, धवल शहा, मालव शहा, डॉ. विनोद शहा, अहमदाबाद विकास प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी ए. बी. गोर, एस. के. लांगा, गृहखात्याचे सहसचिव निखिल भट, आश्रममढीचे अध्यक्ष रामूभाई पटेल , गिफ्टसिटीचे आर्थिक सल्लागार के. एल. तेजानी, अहमदाबादमधील कॅन्सर सर्जन डॉ. पी. बी. पटेल आणि जयराज परिवारातील सदस्य उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

​उशिरा प्रवेशांबद्दल कारवाईची मागणी

$
0
0

पुणे ः तंत्रशिक्षण संचालनालयाच्या पदवी, पदव्युत्तर आणि पदविका या व्यावसायिक अभ्यासक्रमांमध्ये विद्यार्थ्यांचे प्रवेश उशिराने करणाऱ्या आणि संचालनालयाच्या वेबसाइटवर प्रवेशांची माहिती उशिराने अपलोड करणाऱ्या कॉलेजांवर कारवाई करण्याची मागणी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेने केली आहे. दर वर्षी कॉलेजांकडून अशा प्रकारची हेळसांड केली जाते आणि त्याचा भुर्दंड विद्यार्थ्यांना बसतो. भविष्यात हा प्रकार टाळण्यासाठी संचालनालयाने कायदा करावा, अशी मागणी ‘मनविसे’ने केली आहे.
गेल्या वर्षी संचालनालयाने राबविलेल्या व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेमध्ये राज्यात ३३५ विद्यार्थ्यांचे प्रवेश खासगी कॉलेजांकडून उशिराने करून प्रवेशांची माहिती वेबसाइटवर उशिरा करण्यात आली होती. त्यामुळे या विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा प्रश्न निर्माण झाला होता. यावर मनविसेतर्फे कल्पेश यादव आणि विक्रांत अमराळे यांनी निवेदन दिले होते. त्यावर संचालनालयातर्फे विद्यार्थ्यांच्या प्रवेशांना मोठा कालावधी उलटून गेल्यानंतर २४ नोव्हेंबरला मान्यता देण्यात आली. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक वर्षाचे नुकसान वाचले.
दरम्यान, संचालनालयाने कॉलेजांमध्ये २३ ऑक्टोबरनंतर झालेले प्रवेश रद्द करण्याबाबत परिपत्रक काढले होते. मात्र, त्यानंतरही राज्यातील कॉलेजांमध्ये प्रवेश झाले. भविष्यात प्रवेश प्रक्रिया राबविताना असे प्रकार होऊ नये, म्हणून संबंधित कॉलेजांवर कारवाई करावी आणि कायदा करावा, अशी मागणी ‘मनविसे’ने केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

...आणि तुटणारा संसार जुळला

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
ती सॉफ्टवेअर इंजिनिअर तर तो केमिकल इंजिनीअर...त्या दोघांनी रजिस्टर लग्न केले होते...दोघांनी मिळून घर घेतले...सासरच्या लोकांची संसारात लूडबडू नको म्हणून त्यांच्यापासून तिने त्याला वेगळे केले...दोघांनाही भरघोस पगार...आपले त्याच्यावाचून काही अडत नाही म्हणून ती संसाराची जबाबदारी घ्यायला तयार नव्हती...नेहमी होणाऱ्या भांडणाला कंटाळून ते दोघे वेगळे राहू लागले...त्याने घटस्फोटासाठी कोर्टात दावा दाखल केला...एकमेकांवर प्रेम असूनही अहंकारामुळे आणि आपल्या जबाबदाऱ्या टाळत असल्यामुळे तुटत चाललेल्या संसाराचे वास्तव ‘मीडीएशन’द्वारे त्यांना समजावून देण्यात आले...दोघांनीही झालेल्या चुका सुधारून पुन्हा एकत्र येण्याचा निर्णय घेतला.
शिवाजीनगर कोर्टातील जिल्हा न्यायाधीश आर. एच. महंमद यांनी केलेल्या समुपदेशनामुळे राजेश आणि आरतीचा (दोघांची नावे बदलली आहेत) संसार पुन्हा जुळला. राजेश २९ वर्षांचा आहे; तर आरती २६ वर्षांची आहे. त्या दोघांचे विशेष विवाह नोंदणी कायद्यानुसार रजिस्टर लग्न झाले. लग्नानंतर दोन महिने ते दोघे भाड्याच्या घरात राहिले. त्यानंतर त्या दोघांनी मिळून फ्लॅट विकत घेतला. दोघेही फ्लॅटचे हप्ते भरत होते. त्यांनी घेतलेल्या फ्लॅटजवळच काही अंतरावर तिच्या वडीलांचे घर होते. ती दररोज सायंकाळी वडीलांच्या घरी जात असे. ती नवऱ्यासाठी घरी स्वयंपाक करत नसे. त्यामुळे अनेकदा त्याला बाहेर खाऊन यावे लागत असे. त्याने त्याच्या आईवडीलांना, नातेवाइकांना भेटायचे नाही. त्यांच्या घरातील कोणत्याही कार्यक्रमाला जायचे नाही, अशी बंधने तिने त्याच्यावर घातली होती. त्याच्या घरचे लोक गरीब आहेत म्हणून त्याला ती हिणवत असे. त्याची आई आजारी असल्यामुळे त्यांच्याकडे राहण्यासाठी आली. तेव्हा तिने तिच्याबरोबरही भांडणे केली होती. भांडणे वाढल्यामुळे ते एकमेकांपासून वेगळे राहू लागले. ती त्यांनी घेतलेल्या फ्लॅटमध्येच राहत होती. त्याने घटस्फोटासाठी कोर्टात दावा दाखल केला. त्यांचा हा दावा समुपदेशनासाठी जिल्हा न्यायाधीश आर. एच. महंमद यांच्याकडे पाठविण्यात आला.
दोघेही उच्चशिक्षित आणि भरघोस पगार मिळवित होते. त्यामुळे त्या दोघांनाही आपले एकमेकांवाचून काही अडणार नाही असे वाटत होते. मात्र, संसाराच्या जबाबदाऱ्या कशा टाळल्या जात आहेत, हे त्यांच्या लक्षात आणून देण्यात आले. त्या दोघांचेही एकमेकांवर प्रेम होते. मात्र माघार का घ्यायची, म्हणून ते भांडण मिटविण्यास तयार नव्हते. त्या दोघे आणि त्यांच्या आईवडीलांशी चर्चा करण्यात आली. या केसध्ये सात-आठ वेळा समुपदेशन करण्यात आले. त्यांच्यातील मतभेद दूर करण्यात यश आल्यामुळे ते दोघे पुन्हा एकत्र आले, अशी माहिती जिल्हा न्यायाधीश आर. एच. महंमद यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


​‘सीमेवरील जवानांना प्रोत्साहन द्यावे’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
‘देशातील बांधव सुरक्षित राहावेत म्हणून जवान सीमेवर तैनात असतात. अशा वेळी त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजेत,’ असे आवाहन कोल्हापूर जिल्ह्यातील बेलेवाडी येथील शहीद जवान सातप्पा पाटील यांच्या पत्नी अश्विनी पाटील यांनी रविवारी केले.
डेक्कन एज्युकेशन सोसायटी व सिर्फ फाउंडेशनच्या वतीने शहीद जवान लान्स नायक चंद्रकांत गलांडे, बीएसएफचे शिपाई नितीन कोळी, कोल्हापूरचे राजेंद्र तुपारे व साताप्पा पाटील यांच्या कुटुंबीयांना विद्यार्थ्यांच्या कमाईतून संकलित झालेल्या एक लाख ३५ हजार रुपयांच्या निधीचे वाटप करण्यात आले. त्या वेळी पाटील बोलत होत्या. सोसायटीच्या डीईएस प्रायमरी अॅन्ड सेकंडरीच्या एक हजार ३५० विद्यार्थ्यांनी शहीद सैनिकांच्या कुटुंबीयांसाठी घरोघरी जाऊन कार पुसणे, झाडू मारणे, बागकाम करणे अशा प्रकारची कामे केली. या वेळी डेक्कन शिक्षण संस्थेचे शरद कुंटे, आयकर विभागाचे अधिकारी प्रदीप नाईक, फाउंडेशनच्या सुमेधा चिथडे उपस्थित होते.
पाटील म्हणाल्या, ‘आपण रोज स्वतःसाठी प्रार्थना करतो; पण यापुढे सीमेवरील जवानांसाठी करू या.’ साताप्पा पाटील यांच्या पत्नी अश्विनी यांनी शासनाकडून मिळणारी मदत नाकारून त्या निधीतून कोल्हापूर जिल्ह्यातील साताप्पा पाटील यांच्या बेलेवाडी या गावात आठवी ते दहावीपर्यंत शाळा बांधकाम करण्याची सूचना केली. सद्यस्थितीत बांधकाम अंतिम टप्प्यात असल्याचे पाटील यांनी सांगितले.

‘पैशाने सगळेच काही मिळत नाही; पण तुम्ही दाखवलेली आत्मियता आम्हाला बळ देणारी आहे. मी माझ्या दोनही मुलांना सैन्यात पाठवण्याचा संकल्प केला आहे. पतीने सुरुवातीलाच मी माझे शिक्षण पूर्ण करावे, हे त्यांचे स्वप्न होते. त्यामुळे मी उच्च शिक्षण घेऊन पतीचे स्वप्न पूर्ण करणार आहे’, असे शहीद नितीन कोळी यांच्या पत्नी संपत्ती कोळी यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विश्वासात घेतल्यास सत्ता

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पिंपरी
महापालिकेच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकांच्या तोंडावर पिंपरी-चिंचवडमधील राष्ट्रवादी काँग्रेसला लागलेली गळती रोखण्यासाठी आता पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी स्वतः लक्ष घालण्याची तयारी सुरू केली आहे. दरम्यान, शहरात पुन्हा सत्ता हवी असेल, तर आम्हालाही विश्वासात घ्या, अशी गळ माजी आमदार विलास लांडे आणि स्थानिक नेते आझम पानसरे यांनी पवार यांच्याकडे घातल्याचे समजते.
शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त माजी महापौर पानसरे आणि माजी आमदार लांडे यांनी शरद पवार यांची भेट घेतली. पक्षातील जुने आणि शरद पवार यांचे विश्वासू म्हणून आझम पानसरे यांची पक्षात वेगळी ताकद आहे. माजी आमदार लांडे यांच्याबाबतदेखील शरद पवार यांना आस्था आहे. त्यामुळे पक्षातील या जुन्या जाणत्यांबरोबर पवार यांनी शहरातील सद्यस्थितीबाबत चर्चा केल्याचे समजते. विधानपरिषदेला पिंपरी-चिंचवड शहराला उमेदवारी मिळेल असे बोलले जात होते. परंतु शहरातील अंतर्गत वाद लक्षा घेता, ही उमेदवारी पुन्हा एकदा पुण्याच्या पदरात पडली. तसेच ही जागा निवडून आणण्यासाठी भाजप-राष्ट्रवादीने ‘सेटिंग’ करत पुण्याच्या बदल्यात राष्ट्रवादीने जळगावची जागा सोडली असे बोलले जाते. त्यामुळे महापालिका निवडणुकीत तरी असले प्रकार होऊ नये अशी मागणी कार्यकर्ते करू लागले आहेत.
पक्षातील एकाधिकारशाहीला आता तुम्हीच अटकाव घाला, अशी मागणी पानसरे व लांडे यांनी केल्याची चर्चा शहरात आहे. या तिघांमध्ये नेमकी काय चर्चा झाली, लांडे-पानसरे यांनी शरद पवार यांच्याकडे कोणाकोणाबाबत तक्रारी केल्या याबाबतदेखील चर्चांना उधाण आले आहे. महापालिकेत सत्तेची ‘हॅटट्रिक’ हवी असेल, तर तिकिट वाटपापूर्वी चर्चा केली जावी, पद वाटप करताना सर्वांना सामावून घेतले जावे, विश्वासात घेऊन काम झाले पाहिजे, ठराविक टाळक्यांच्या हाती सर्व दिले, तर निराशा पदरात येईल आदी मुद्द्यांवर या दोघांनी शरद पवार यांच्याकडे गाऱ्हाणे मांडले.
निर्णय प्रक्रियेत सामील करून न घेतल्यास सत्तेची हॅटट्रिक तर दूरच परंतु, पक्षाची मोठी नाचक्की निकालातून होईल असे मत या गोटातून व्यक्त
होत आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत शहरातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाच नगरसेवकांनी भाजपमध्ये प्रवेश केला. येत्या काही कार्यक्रमांमध्ये दोन आकडी संख्येत नगरसेवक पक्षांतर करण्याची शक्यता वर्तविली जाते. त्यामुळे पक्षातील ही गळती रोखण्यात स्थानिक नेतृत्वासह एकाधिकारशाहीला अपयश आल्याचे बोलले जाते. त्यामुळेच लांडे व पानसरे यांनी शरद पवार यांनाच शहरातील राजकारणावर लक्ष देण्याची विनंती केल्याचे समजते.
बराच वेळ झालेल्या चर्चेनंतर शरद पवार यांनी शहरातील स्थानिक पदाधिकारी-नेत्यांची बैठक घेण्याचे आश्वासन पानसरे व लांडे यांना दिले आहे. यामध्ये अजित पवार यांच्यासह सर्वच पदाधिकाऱ्यांकडून आगामी नियोजनाबाबत चर्चा केली जाणार आहे. तसेच आपसातील वाद विसरून सत्तेची हॅटट्रिक करण्यासाठी काम करा, असे आदेशदेखील पवार यांनी या दोघांना दिले आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बोपखेलच्या पुलासाठी विद्यार्थ्यांचे मोदींना पत्र

$
0
0

पिंपरी ः बोपखेलचा रस्ता बंद झाल्यानंतर प्रशासन आता चालढकल करू लागल्याने गावातील शाळकरी विद्यार्थ्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोंदींना याबाबत पत्र लिहिले आहे. सोमवारी (१२ डिसेंबर) सुमारे तीनशे विद्यार्थ्यांनी पत्रातून आपल्या अडचणी मांडल्या आहेत.
दीड वर्षापासून बंद असलेल्या रस्त्याच्या संदर्भात लवकर निर्णय घ्यावा, जोपर्यंत महापालिकेकडून पुलाचे काम होत नाही, तोपर्यंत मुळा नदीवर तात्पुरता पूल उभारण्यात यावा, अशा आशयाची पत्रे या विद्यार्थ्यांनी पंतप्रधानांना लिहिली आहेत. बोपखेलमधील मोठ्या प्रमाणात विद्यार्थी दापोडी येथील विविध शाळांमध्ये शिक्षण घेत होते. मात्र, रस्ता बंद झाल्यापासून अनेक विद्यार्थ्यांच्या शाळा पालकांनी बदलल्या आहेत. सीएमईमधून जाणारा रस्ता बंद झाल्यामुळे दापोडी येथील शाळांमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना दिघी, भोसरीमार्गे १८ किलोमीटरचा वळसा घालून जावे लागत आहे. विद्यार्थ्यांनी मराठी, हिंदी आणि इंग्रजी भाषेमध्ये पत्रे लिहिली आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींना आमच्या समस्या समजतील आणि ते नक्कीच आमच्या शिक्षणाच्या सोयीसाठी आमच्या रस्त्याचा प्रश्न सोडवतील. आमच्या पत्राला त्यांचे उत्तर येईल, अशी अपेक्षा विद्यार्थ्यांनी व्यक्त केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पक्षिमित्र संमेलन यंदा अंबेजोगाईत

$
0
0

सात, आठ जानेवारीला आयोजन

म. टा. प्रतिनिधी, पुणे

पक्ष्यांच्या संवर्धनासाठी काम करणाऱ्या पक्षिमित्रांचे संमेलन यंदा सात आणि आठ जानेवारीला बीड जिल्ह्यातील अंबेजोगाई येथे भरणार आहे. ‘प्रतिकूल परिस्थितीही पक्ष्यांचे संवर्धन आणि संगोपन’ या विषयावर संमेलनामध्ये विचारमंथन होणार आहे.

राज्यातील पक्षिमित्रांना एकत्र आणून पक्ष्यांच्या संवर्धनाबद्दल परिणामकारक उपक्रम राबवण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र पक्षिमित्र संस्थेतर्फे दर वर्षी राज्याच्या विविध भागांत पक्षिमित्रांचे संमेलन आयोजित करण्यात येते. यंदाचे संमेलनाचे तिसावे वर्ष असून, त्यासाठी अंबेजोगाईची निवड करण्यात आली आहे. अंबेजोगाईतील यूथ एन्व्हायर्न्मेंटल सोसायटी (एस) या संस्थेतर्फे संमेलनाचे आयोजन करण्यात येणार आहे. या संस्थेतर्फे गेल्या चार ते पाच वर्षांपासून पक्ष्यांच्या डॉक्युमेंटेशनचे काम सुरू आहे. आतापर्यंत संस्थेने स्थानिक आणि स्थलांतरित मिळून १९५ पक्षी प्रजातींची नोंद करून पुस्तिकाही प्रकाशित केली आहे.

‘राज्याच्या विविध भागांतील पक्षी अभ्यासक, संशोधक आणि हौशी पक्षिमित्र या संमेलनामध्ये सहभागी होणार आहेत. गेल्या काही वर्षांत विकासकामांमुळे नष्ट होत असलेले पक्ष्यांचे अधिवास, पक्ष्यांच्या विविध जाती संकटात येण्यामागची कारणे, सर्वसामान्यांमध्ये पक्ष्यांविषयी संवेदनशीलता निर्माण करण्यासाठी काय करता येईल, यावर संमेलनात चर्चा होणार आहे,’ असे संस्थेचे संस्थापक सदस्य भाऊ काटदरे यांनी सांगितले.

गेल्या वर्षीच्या दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर यंदा प्रतिकूल परिस्थितीत पक्ष्यांचे संवर्धन हा संमेलनाचा विषय निवडला आहे. पक्ष्यांसाठी कृत्रिम घरटी कशी बांधायची, विविध कारणांमुळे जखमी होणाऱ्या पक्ष्यांवर तत्काळ उपचार कसे करायचे, त्यांचे पुनवर्सन या बाबींवर संमेलनात चर्चा होणार आहे. या वर्षी औरंगाबादचे विजय दिवाण संमेलनाचे अध्यक्ष असतील. संमेलनाच्या शेवटच्या सत्रात वर्षभरातील कामांचा कृती आराखडा निश्चित करण्यात येईल, असे संमेलनाच्या समन्वयक शुभदा लोहिया यांनी सांगितले.

पक्षिमित्र संमेलनाच्या अधिक माहितीसाठी www.pakshimitra.org ही वेबसाइट, शंकर कराड (९९२३०५०७०७) अथवा डॉ. लोहिया (९४२२७४४८४४) यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शिक्षकेतर संघटनेचे अधिवेशन

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पिंपरी
महाराष्ट्र राज्य माध्यमिक शाळा शिक्षकेतर संघटनेच्या महामंडळाचे ४५ वे राज्यस्तरीय अधिवेशन पिंपरी येथे होणार आहे. पिंपरीच्या एच. ए. कॉलनीतील एच. ए. स्कूल येथे रविवारी १८ डिसेंबर रोजी सकाळी दहा वाजता अधिवेशन सुरू होईल. या अधिवेशनात शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या अनेक प्रलंबित प्रश्नांबाबत चर्चा करण्यात येणार असल्याची माहिती महामंडळाचे सरकार्यवाह शिवाजी खांडेकर यांनी दिली.
शिक्षकेतर संघटनेच्या राज्यस्तरीय अधिवेशन आणि चर्चासत्राचे उद्घाटन माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांच्या हस्ते होणार असून प्रमुख पाहुणे म्हणून शिक्षणमंत्री विनोद तावडे, विधानसभा अध्यक्ष रामराजे निंबाळकर, अन्न व प्रशासनमंत्री व पालकमंत्री गिरीश बापट, पशुसंवर्धन, दुग्धविकास व मत्स्यविकास मंत्री महादेव जानकर, महापौर शकुंतला धराडे आदी उपस्थित राहणार आहे. शिक्षकेतर कर्मचारी हा शाळेतील महत्त्वाचा घटक आहे. शाळेचे कामकाज सुरळीत चालण्याकरिता शिक्षकेतर कर्मचारी मोलाची भूमिका बजावतात. गेल्या १३ वर्षांपासून शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची भरती बंद असल्याने सेवानिवृत्तीमुळे रिक्त झालेल्या पदांवर काम करायला कर्मचारी नाहीत. राज्यभरात सध्या ४० हजार शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची पदे रिक्त आहेत. ही पदे लवकरात लवकर भरावीत, अशी संघटनेची मागणी आहे.
अधिवेशनात शिक्षकेतर आकृतीबंधाबाबत नियुक्त केलेल्या समितीने सादर केलेला अहवाल जसाच्यातसा मंजूर करून शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची त्वरित भरती करण्याची मागणी करण्यात येणार आहे. तसेच राज्यातील शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे माध्यमिक शाळेतील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना १२ व २४ वर्षांनंतर पहिला आणि दुसरा लाभ तत्काळ लागू करावा. राज्यातील शिक्षकेतरांच्या अनुकंपा तत्त्वावरील नियुक्त्यांना मान्यता द्यावी. शैक्षणिक पात्रता वाढलेल्या शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना वेतन संरक्षणासह विनाअट संवर्ग बदलून मिळावा. महाराष्ट्र विधान परिषदेतील शिक्षक आमदारांना मतदान करण्याचा अधिकार शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना मिळावा. कर्मचाऱ्यांना गणवेष आणि धुलाई खर्च मिळावा. कर्मचाऱ्यांना कॅशलेस वैद्यकीय सुविधा लागू करावी, अशा विविध प्रमुख मागण्या या अधिवेशनात
केल्या जातील.
सदर मागणीप्रमाणेच न्यायालयीन निर्णयानुसार राज्यातील सर्व पदवीधर, ग्रंथपालांना पदवीधर वेतनश्रेणी लागू करावी. विनाअनुदानित तुकडीवरील विद्यार्थी शिक्षकेतर पदे मंजूर करताना ग्राह्य धरावी. शैक्षणिक क्षेत्रातील नोकरीत शिक्षकेतरांच्या पाल्यांना राखीव जागा असावी, उच्च माध्यमिकसाठी लिपीकासह इतर कर्मचारी देण्यात यावे, शासकीय अनुदानित किंवा विनाअनुदानित मान्यताप्राप्त वैद्यकीय, अभियांत्रिकी आदी महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या शिक्षकेतर पाल्यांना शैक्षणिक सवलती द्याव्या, असे विविध ठराव मंजुरीसाठी अधिवेशनात मांडण्यात येणार आहे. या ठरांवामुळे हे अधिवेशन शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाचे ठरणार असल्याचा विश्वास संघटनेच्या सदस्यांनी व्यक्त
केला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

परिवहन विभागाची आता तक्रार निवारण प्रणाली

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

राज्यातील प्रादेशिक परिवहन कार्यालयांपासून परिवहन विभागाशी संबंधित सर्व प्रकारच्या तक्रारींचे गाऱ्हाणे थेट परिवहन आयुक्तांपुढे मांडण्याची संधी नागरिकांना मिळणार आहे. परिवहन विभागाकडून येत्या काळात ‘तक्रार निवारण प्रणाली’ विकसित करण्यात येत आहे. त्यासाठी इच्छुक कंपन्यांकडून टेंडर मागवण्यात आली आहेत. परिवहन विभागकडून अशा प्रकारचा उपक्रम पहिल्यांदाच राबवला जात आहे. नागरिकांच्या तक्रारी सोडवणे आणि प्रशासन व नागरिक यांच्यात सुसंवाद घडावा, हा यामागील उद्देश आहे.

राज्यात परिवहन आयुक्तालयाअंतर्गत एकूण ५४ प्रादेशिक व उपप्रादेशिक परिवहन कार्यालये आहेत. वाहन चालवण्याचे लायसन्स काढणे, नवीन वाहनांची नोंदणी करणे, ट्रान्स्पोर्टच्या वाहनांचे पासिंग करणे, विविध प्रकारचे कर भरणे यांसह विविध प्रकारची कामे घेऊन मोठ्या संख्येने नागरिक ‘आरटीओ’मध्ये येत असतात. राज्य सरकारच्या अनेक विभागांपैकी परिवहन हा एक महत्त्वाचा विभाग आहे. कार्यालयीन वेळेत या विभागाच्या कार्यालयांमध्ये सर्वाधिक संख्येने नागरिक येतात. त्यामुळे ‘आरटीओ’मध्ये नागरिकांना दिल्या जाणाऱ्या सोयी-सुविधा आणि सेवांबाबत तक्रारींचे प्रमाणही अधिक आहे. या तक्रारींचा निपटारा करून नागरिकांना अधिकाधिक चांगली सेवा देण्याच्या उद्देशाने परिवहन आयुक्तालयाने ही तक्रार निवारण प्रणाली निर्माण करण्याचा निर्णय घेतला आहे. या संबंधीचे टेंडर नुकतेच परिवहन विभागाच्या वेबसाइटवर प्रसिद्ध झाले आहे.

ही प्रणाली मराठी आणि इंग्रजी या दोन्ही भाषांमध्ये असणार आहे. त्याद्वारे मराठीतही तक्रार नोंदवता येणार आहे. एकदा तक्रार नोंदवल्यानंतर त्यावर पुढे काय कार्यवाही करण्यात आली, याची प्रत्येक टप्प्यावरील माहिती नागरिकांना पाहता येणार आहे. तसेच नागरिकांनी नोंदवलेली एखादी तक्रार संबंधित अधिकाऱ्याला ‘फॉरवर्ड’ केल्यानंतर ठराविक कालावधीत ती तक्रार सोडविणे अपेक्षित आहे. त्या कालावधीमध्ये तक्रारीचे निरसन झाले नाही, तर त्या अधिकाऱ्याला प्रणालीद्वारेच सूचित केले जाणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

प्रचाराच्या तोफा आज थंडावणार

$
0
0

भरारी पथकांनी जप्त केले आठ कोटी रुपये

म. टा. प्रतिनिधी, पुणे

जिल्ह्यात होणाऱ्या दहा नगर परिषदांच्या निवडणुकांसाठी प्रचाराचा आज, मंगळवारी शेवटचा दिवस असून, रात्री दहानंतर प्रचाराच्या तोफा थंडावणार आहेत. निवडणुकीच्या प्रचाराच्या कालावधीत भरारी पथकांनी विविध ठिकाणी केलेल्या तपासणीत आतापर्यंत सुमारे आठ कोटी रुपये जप्त करण्यात आले आहेत.

जिल्ह्यात बारामती, लोणावळा, दौंड, तळेगाव-दाभाडे, आळंदी, इंदापूर, जेजुरी, जुन्नर, सासवड आणि शिरूर या दहा नगरपरिषदा आणि त्यांच्या अध्यक्षपदांच्या निवडणुकीसाठी १४ डिसेंबरला मतदान होणार आहे. १५ डिसेंबरला निकाल जाहीर करण्यात येणार आहे. जाहीर प्रचारासाठी मंगळवारी शेवटचा दिवस आहे. रात्री दहानंतर प्रचाराच्या तोफा थंडावणार असल्याने उमेदवारांची मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी धावपळ सुरू आहे.

‘भरारी पथकांनी वेगवेगळ्या ठिकाणी केलेल्या तपासणीमध्ये सुमारे आठ कोटी रुपये जप्त करण्यात आले आहेत.’ असे जिल्हा निवडणूक समन्वय अधिकारी उत्तम पाटील यांनी सांगितले. ‘निवडणुकीच्या कालावधीत मतदारांना आमिष दाखवण्यात येत असल्याने ११० भरारी पथके नेमण्यात आली आहेत; तसेच चेक पोस्ट आहेत. नगर परिषदांच्या परिसरात येणाऱ्यांची आणि बाहेर जाणाऱ्यांची तपासणी केली जात आहे. या पथकांनी आतापर्यंत सुमारे १७ हजार ५०० वाहनांची तपासणी केली असून, त्यामध्ये सुमारे आठ कोटी रुपये जप्त झाले आहेत. भरारी पथकांची कारवाई अधिक तीव्र करण्यात आली आहे.’ असे पाटील यांनी स्पष्ट केले.

नगर परिषदांच्या निवडणुकीत मतदानासाठी हॉटेल, दुकाने, कारखाने आणि कार्यालयांमध्ये काम करणाऱ्या कामगारांना पुरेसा वेळ देण्याचे आवाहन जिल्हाधिकारी सौरव राव यांनी केले आहे.

.................

निवडणुकीमुळे जिल्ह्यात तीन दिवस मद्यविक्री बंद

पुणे : पुणे जिल्ह्यातील दहा नगर परिषदांच्या निवडणुकीमुळे संबंधित नगर परिषदांच्या हद्दीत १३ ते १५ डिसेंबर या कालावधीत मद्यविक्रीला बंदी घालण्यात आली​ आहे. जिल्हाधिकारी सौरव राव यांनी याबाबतचे आदेश दिले आहेत.

बारामती, लोणावळा, दौंड, तळेगाव-दाभाडे, आळंदी, इंदापूर, जेजुरी, जुन्नर, सासवड आणि शिरूर या दहा नगर परिषदा आणि त्यांच्या अध्यक्षपदांच्या निवडणुकीसाठी १४ डिसेंबरला मतदान होणार आहे. १५ डिसेंबरला निकाल जाहीर करण्यात येणार आहे. या कालावधीत निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी, तसेच कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी १३ ते १५ डिसेंबर या कालावधीत मद्यविक्रीला बंदी घालण्यात आली आहे. या कालावधीत मद्य उत्पादन करणाऱ्या कंपन्यांची उत्पादनप्रक्रिया चालू राहील; मात्र निवडणूक असलेल्या नगर परिषदांच्या हद्दीत मद्यविक्री करता येणार नाही. या आदेशाचे उल्लंघन झाल्यास संबंधितांविरुद्ध कारवाई करण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी कार्यालयाकडून कळवण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


काळ्या धनावर ठकसेनांचा डोळा

$
0
0

शहरातील दोन घटनांमध्ये १८ लाख लांबवले

म. टा. प्रतिनिधी, पुणे

पोलिस असल्याच्या बहाण्याने ज्येष्ठ नागरिकांना, महिलांना लुटण्याच्या घटना नेहमीच घडतात. आता मात्र काळे धन बाळगणाऱ्यांना ठकांनी लुटण्यास सुरुवात केली आहे. अशा प्रकारच्या दोन घटनांमध्ये अठरा लाख रुपये लुबाडण्यात आले आहेत; मात्र त्याविषयी तक्रार देण्यास कोणीही पुढे येत नसल्याचे चित्र आहे.

बंदी घालण्यात आलेल्या ५०० आणि हजार रुपयांच्या नोटा घेऊन जाणाऱ्यांना पोलिस असल्याच्या बहाण्याने लुटण्यात येत असल्याच्या दोन घटना गेल्या आठवड्यात घडल्या. या घटनांमध्ये अनुक्रमे दहा लाख आणि आठ लाख रुपये लुटण्यात आल्याचे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले. लुटलेली रक्कम बेहिशेबी असल्याने कुणीही त्याविषयी ब्र काढण्यास तयार नाही. या घटना पुणे आणि पिंपरीत घडल्या आहेत. दोन्हीही घटनांमध्ये साध्या वेषातील तथाकथित पोलिसांनी रक्कम जप्त केल्याचे भासवले. संबंधितांना पोलिस ठाण्यांत येण्याचे सांगून रक्कम घेऊन चोरटे फरारी झाले. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर व्यवहारांतील रक्कम असल्याने कोणीही चकार शब्द काढलेला नाही, अशी माहिती सूत्रांनी दिली.

नोटा बदलून देण्याच्या प्रयत्नात असणाऱ्यांविरोधात पोलिसांनी मोहीम उघडली आहे. तीन घटनांमध्ये कोट्यवधी रुपये जप्त करण्यात आले असून, ते प्रा​प्तिकर विभागाच्या ताब्यात देण्यात आले आहेत. पिंपरी-चिंचवड परिसरात अशाच प्रकारे तरुण-तरुणीला दहा लाख रुपयांना लुटण्यात आल्याचा प्रकार घडला आहे. संबंधितांना निवडणुकीनिमित्त दहा लाख रुपये मिळाले होते. हे पैसे पोलिस असल्याच्या बहाण्याने लुटण्यात आले आहे. पैसे लुटलेले दोघेही ठक साध्या वेषात होते. स्पोर्ट शूज घातलेल्या ठकांनी आपण पोलिस असल्याचे भासवले. त्यांच्याकडील रोख रक्कम पोलिस ठाण्यात आणण्यास सांगण्यात आले. दोघे पोलिस ठाण्यात पोहोचले असता, त्या व्यक्ती पोलिस नव्हत्याच, असे त्यांच्या लक्षात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘कलावंत मानधन प्रक्रियेत भ्रष्टाचार’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

जिल्हास्तरावर समाज कल्याण विभागातर्फे देण्यात येणाऱ्य़ा वृद्ध, कलावंत साहित्यिकांच्या मानधनाच्या प्रक्रियेत जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी यशवंत शितोळे यांनी गैरकारभार करून मानधनासाठी पात्र नसलेल्या कलाकारांचे नाव यादीत समाविष्ट केले आहे. या कारभाराची चौकशी होऊन त्यांनी बडतर्फ करावे, अशी मागणी कलाकार मानधन समितीचे सदस्य वसंत यादव यांनी केली आहे.
शितोळे जिल्हास्तरावर कलाकार मानधनासंदर्भात नेमण्यात आलेल्या समितीचे सचिव आहेत. याच समितीतील सदस्य यादव यांनी शितोळे यांच्यावर आरोप करून राज्य सरकारने या विषयात लक्ष घालण्याची मागणी केली. शाहीर मालुसकर, कलाकार समितीचे माजी सदस्य दत्ता गाडगे, वारकरी साहित्य परिषदेचे राम कुटे, लक्ष्मण गिरी, सखाराम घोडेकर यांच्यासह ग्रामीण भागातील कलाकार उपस्थित होते. आम्ही गेल्या अनेक वर्षांपासून मानधनासाठी अर्ज करीत आहोत, मात्र अजूनही मानधनाचा एकही रुपया मिळू शकलेला नाही, अनेकदा समाजकल्याण विभागाकडे अर्ज केले मात्र ते रद्दबातल ठरवण्यात आले, अशी व्यथा या कलाकारांनी व्यक्त केली.
यादव म्हणाले, ‘कलाकार मानधनासाठीची नवी समिती नेमण्याआधी कलाकारांचे ७३३ अर्ज आले होते. वाढीव अर्जांची भर पडून ते ८४३ झाले. त्या अर्जांसंदर्भात २०१४-१५ व २०१५-१६ या वर्षांमध्ये एकही बैठक झाली नाही. त्यानंतर नव्या समितीच्या बैठकीत केवळ १६५ अर्ज समोर ठेवण्यात आले. त्याची छाननी झाली असल्याचे सांगण्यात आले. त्यामध्ये काही कलाकारांनी वयवर्ष ५० पूर्ण केले नव्हते आणि काही कलाकारांचे उत्पन्न ६० हजारांपेक्षा अधिक होते. अशा कलाकारांचा पात्र यादीत समावेश केल्याने भ्रष्ट कारभार समोर आला आहे,’ असा थेट आरोप यादव यांनी केला.
पालकमंत्र्यांनी संमती दर्शवल्यानंतर सरकारकडून समितीसंदर्भात शासन निर्णय जाहीर होतो. मात्र, शितोळे यांनी मनमानी कारभार करून पालकमंत्र्यांची मंजुरी मिळताच शासन आदेशाची वाट न पाहता. स्वतः बोगस समिती तयार केली. त्यामध्ये अनेक प्रसिद्ध ज्येष्ठ कलाकारांचा समावेश होता. मात्र विरोध झाल्यानंतर त्यांना ती समिती बरखास्त करून नव्याने समितीचे गठन करावे लागले.


कलाकार मानधन योजनेच्या नियमांमध्ये फेब्रुवारी २०१४ मध्ये काही बदल करण्यात आले. त्यानंतर नव्या निकषांनुसार कलाकारांनी केलेल्या अर्जांपैकी केवळ १६५ अर्ज गटविकास अधिकाऱ्यांनी पात्र ठरवून समितीपुढे सादर केले. कोणतेही अर्ज गहाळ झालेले नाहीत. नव्या समितीच्या पहिल्या बैठकीनंतर यादव यांनीच ७ अर्ज आणून कोणत्याही परिस्थितीत त्यांना मानधन द्या, असा तगादा लावला होता. छाननीशिवाय तसे करता येणार नाही, असे सांगितले आहे. त्यामुळेच यादव यांनी सुडबुद्धीने हे आरोप केले आहेत.
यशवंत शितोळे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी, पुणे जिल्हा परिषद

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मोबाइलशी संबंधित गुन्ह्यांमध्ये वाढ होणार

$
0
0

सायबरतज्ज्ञांकडून भीती व्यक्त; ऑनलाइन पेमेंट कारणीभूत

म. टा. प्रतिनिधी, पुणे

नोटबंदीच्या निर्णयानंतर ई-वॉलेट आणि ऑनलाइन पेमेंटवर भर दिला जात असतानाच मोबाइलशी संबंधित गुन्ह्यांत जवळपास ६० ते ६५ टक्क्यांनी वाढ होण्याची शक्यता सायबर तज्ज्ञ व्यक्त करत आहेत. केंद्र सरकारकडून यापुढील काळात आर्थिक व्यवहारांचे मुख्य माध्यम मोबाइल करण्याचे संकेत मिळत असताना, मोबाइलवरून करण्यात येणाऱ्या व्यवहारांबाबत अधिक खबरदारी घेण्याची जबाबदारी नागरिकांवर असणार आहे.

‘असोचेम’ने केलेल्या अभ्यासात हा धोका वर्तवण्यात आला आहे. देशात मोबाइलवरील थ्री जी आणि फोर जी सेवेचा वाढता वापर पाहता, पुढील तीन वर्षांत इंटरनेट वापर दुप्पट होईल. भारत ही मोबाइलची जगातील सर्वांत मोठी बाजारपेठ आहे. भारतात जवळपास १०० कोटी मोबाइल हॅन्डसेटचा वापर होत आहे. त्यापैकी २५ टक्के हे स्मार्ट फोन असून पुढील तीन वर्षांत हे प्रमाण ५० टक्क्यांहून अधिक असेल.

केंद्र सरकारकडून कॅशलेस व्यवहार वाढवण्यावर भर दिला जात असून, हे व्यवहार मोबाइलच्या माध्यमातून करण्यात येतील. सायबर सुरक्षितता यापुढे व्यवसाय करतानाचा महत्वाचा निकष ठरणार आहे. यापुढे जवळपास ४० ते ४५ टक्के व्यवहार हे मोबाइलवरून होणार आहे. त्यामुळे या व्यवहारांची सुरक्षितता हा महत्वाचा विषय ठरणार असून, मोबाइल सं​बंधित गुन्ह्यांत ६० ते ६५ टक्के वाढणार आहे. ऑनलाईन बँकिंगबाबत येणाऱ्या तक्रारींमध्ये ४६ टक्के तक्रारी या क्रेडिट, डेबिट कार्डशी संबंधित आहे. त्याखोलाखाल ३९ टक्के तक्रारी या फेसबुकवरून होणाऱ्या गुन्ह्यांशी संबंधित आहेत. मोबाइलच्या वापराने होणाऱ्या फसवणुकीचे प्रमाण २१ टक्के आहे.

मोबाइलमुळे होणाऱ्या गुन्ह्यांत होणारी वाढ पोलिसांसाठी ​डोकेदुखी ठरणारी आहे. झारखंड, दिल्लीमध्ये बसलेले ठक ग्राहकांना फोन करून बँक खाते, , क्रेडिट-डेबिट कार्डची गोपनीय माहिती मिळवतात. त्या माहितीचा वापर करून बँक अकाउंटवरील पैशांवर डल्ला मारण्यात येत आहे. स्मिशिंगमध्ये ठकांकडून वेगवेगळे मेसेज पाठवले जातात. लॉटरी लागली आहे, अमूकतमूक गिफ्ट मिळाले आहे आदी मेसेज पाठवून ग्राहकांना आमिष दाखवले जाते. या प्रकारे फसवणूक होण्याचे गुन्हे वाढत असून, त्याला रोखण्यासाठी देशपातळीवर यंत्रणांना धोरण ठरवावे लागणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

देशात कवी, लेखक संशोधक हवे आहेत

$
0
0

शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांची भावना

म. टा. प्रतिनिधी, पुणे

‘माडगूळकर, कुसुमाग्रज पडद्याआड गेल्यानंतर मराठी साहित्यात आलेला काळ उदासवाणा आहे. साहित्य, चित्रपट, नाटक या कला लृप्त झाल्या की काय, अशी परिस्थिती आहे. नाटकावर बंदी येणे हाच एकेकाळी गौरव होता. हे बीज झाकोळून गेले आहे. स्वातंत्र्य मिळालेल्या देशात कवी, लेखक, संशोधक हवे आहेत. पण आमच्या महत्त्वाकांक्षा कुठे गेल्या,’ असा परखड सवाल शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी सोमवारी उपस्थित केला.

महाराष्ट्र ग्रंथोत्तेजक संस्थेचा १२२ वा वर्धापन दिन आणि वार्षिक ग्रंथ पारितोषिक वितरण कार्यक्रमात ते बोलत होते. आनंद केळकर स्मृतिप्रीत्यर्थ देण्यात येणारा ‘महाराष्ट्र ग्रंथोत्तेजक संस्था गौरव पुरस्कार’ महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांना प्रदान करण्यात आला. संस्थेचे अध्यक्ष डॉ. प्र. ल. गावडे, उपाध्यक्ष डॉ. गो. बं. देगलूरकर, पुष्पा लिमये, अ. नी. नवरे, अ. श्री. चाफेकर या वेळी उपस्थित होते. पारितोषिक प्राप्त ग्रंथपुरस्कारांचेही वितरण करण्यात आले.
‘दीर्घ परंपरा मराठी साहित्याला असताना त्या समृद्ध साहित्य परंपरेतील स्फुल्लिंग, अंगार अलीकडील साहित्यात दिसत नाही,’ अशी खंत व्यक्त करून बाबासाहेब म्हणाले, की ‘तरुणांच्या अंगातील रक्त राष्ट्रभक्तीने, राष्ट्रप्रेमाने पेटून उठेल अशा साहित्य निर्मितीची गरज आहे. साहित्यात प्रचंड ताकद असते. शब्दांच्या ताकदीनेच क्रांतीची मशाल स्वातंत्र्यलढ्यात पेटल्याचा इतिहास आहे. साहित्य असे लिहिले गेले पाहिजे की ज्यामुळे तलवारीच्या पात्याला देखील धार चढावी. आज तरुणांच्या प्रतिभेला आव्हान आणि आवाहन उभे झाले आहे.’

‘लेखणी आणि वाणी ही दोन्ही शब्दशक्तीची रूपे आहेत. त्यांना साहित्य संस्कृतीच्या देव्हाऱ्यात समाज स्थान मिळाले पाहिजे. लेखक व वक्ता यांना समान वागणूक मिळायला हवी. सर्व साहित्य संस्थांनी एकत्र येऊन काम करण्याची गरज असताना त्यांना समाजात दुय्यम समजले जाते. भाषा, संस्कृतीचा पोत बदलला तरी ती नष्ट होणार नाही. भाषेचे प्रेम राजकारणसाठी किंवा दाखवण्यासाठी नको,’ याकडे प्रा. जोशी यांनी लक्ष वेधले. विनया देसाई यांनी सूत्रसंचालन केले.

समाजाने काही साहित्यिकांना चुरगाळून टाकले आहे, त्यात स्वातंत्र्यवीर सावरकरांचे नाव आहे. असे करणारे संस्कृतीचे गुन्हेगार असतात.
शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

प्लास्टिक रस्त्याचा शहरात यशस्वी प्रयोग

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

शहरातील रस्ते बांधणीमध्ये प्लास्टिकचा वापर करण्याचा पालिकेचा प्रयोग सोमवारी यशस्वी झाला असून, लालबहाद्दूर शास्त्री रस्त्यालगतच्या उपरस्त्यावर प्लास्टिकमिश्रित डांबरीकरण पूर्ण करण्यात आले. यापूर्वी, केवळ रस्ते दुरुस्तीसाठी प्लास्टिकचा वापर करण्यात येत होता.
शहरातील रस्त्यांच्या टिकाऊपणासाठी त्यात काही प्रमाणात प्लास्टिकचा वापर करण्यात येतो. त्यामध्ये, आता पुण्याचाही समावेश झाला आहे. पथ विभागप्रमुख राजेंद्र राऊत यांच्या नेतृत्वाखाली पथ विभागाच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांनी सोमवारी प्लास्टिक रस्त्याची यशस्वी चाचणी घेतली. रस्त्याच्या डांबरीकरणासाठी खडी, डांबर आणि इतर रासायनिक पदार्थांचा वापर केला जातो. एक टन डांबर मिश्रित खडी तयार करण्यासाठी ४५ किलो डांबरासह चार किलो प्लास्टिकचा वापर करण्यात आला आहे. सहाशे मायक्रॉनपेक्षा अधिक आणि २३३ एमएम जाडीच्या प्लास्टिकचा त्यासाठी वापर करण्यात आला आहे. ठरावीक तापमानावर प्लास्टिक डांबरासह वितळवले जाते. त्यानंतरच, त्याचा रस्त्याच्या कामात वापर करता येऊ शकतो, अशी माहिती पथ विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली.
एखाद्या मोठ्या पावसात किंवा जड वाहनांची संख्या जास्त असल्यास डांबरीकरणाद्वारे केलेला रस्ता उखडण्याची शक्यता असते. प्लास्टिक वापरून केलेल्या रस्त्यामुळे त्याचे आयुर्मान वाढण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. त्यामुळे, लहान रस्त्यांप्रमाणेच भविष्यात महापालिकेने एखाद्या वर्दळीच्या रस्त्यावरही या नव्या तंत्रज्ञानाचा वापर करावा, अशी मागणी केली जात आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images

<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>
<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596344.js" async> </script>