Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

मोदींचा कारभार हुकूमशाहीसारखा

$
0
0

संजोग वाघेरे यांची टीका

म. टा. प्रतिनिधी, पिंपरी

‘पाचशे आणि एक हजार रुपयांच्या नोटाबंदीच्या केंद्र सरकारच्या निर्णयामुळे सर्वसामान्य नागरिकांचे अतोनात हाल होत आहेत. नोटाबंदीला ९४ टक्के लोकांचा पाठिंबा असल्याचे भाजप सांगत आहे. ही केवळ धूळफेक असून, नोटाबंदीचा निर्णय मोदी सरकारने कोणतीही पूर्वतयारी न करता घेतला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कारभार हुकूमशाही पद्धतीने सुरू आहे,’ अशी टीका पिंपरी-चिंचवड राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष संजोग वाघेरे-पाटील यांनी केली.

या निर्णयातील नियोजनशून्यतेविरोधात पिंपरी-चिंचवड शहर राष्ट्रवादी काँग्रेसने सोमवारी पिंपरीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा चौकात ‘जनआक्रोश आंदोलन’ केले. त्या वेळी उपमहापौर प्रभाकर वाघेरे, स्थायी समितीचे सभापती डब्बू आसवानी, ज्येष्ठ नगरसेवक हनुमंत गावडे, प्रशांत शितोळे, अजित गव्हाणे, नीलेश पांढारकर, उल्हास शेट्टी, नाना काटे, पंकज भालेकर, नगरसेविका मंदाकिनी ठाकरे, शिक्षण मंडळाचे माजी सभापती फजल शेख, विजय लोखंडे, वर्षा जगताप, सुनील गव्हाणे, आनंदा यादव आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

‘शेतकरी, कामगार वर्गातील नागरिकांचे बँकेत खाते नाही. त्यामुळे नागरिकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. पैसे बदलून घेण्यासाठी बँकेच्या रांगेत उभे राहिलेल्या देशभरातील ६० नागरिकांचा मृत्यू झाला असून, त्याची जबाबदारी कोण घेणार,’ असा सवालही वाघेरे यांनी उपस्थित केला.

‘केंद्र सरकारच्या नोटाबंदीच्या निर्णयाला देशभरातील ९४ टक्के लोकांनी पाठिंबा दिला असल्याचे भाजपचे लोक सांगत आहेत. देशभरातील एवढ्या लोकांचा नोटाबंदीला पाठिंबा असता, तर नगरपालिका निवडणुकीत भाजपचा पराभव झालाच नसता,’ असा टोलाही वाघेरे यांनी लगावला.


‘भारत बंद’ला पिंपरीत अत्यल्प प्रतिसाद

पिंपरी : राष्ट्रवादी काँग्रेसने पाठिंबा दर्शवल्यानंतरही ‘भारत बंद’च्या हाकेला पिंपरी-चिंचवडमध्ये अत्यल्प प्रतिसाद मिळाला. केंद्र सरकारचा नोटाबंदीचा निर्णय नियोजनशून्य असल्याचा आरोप करून सोमवारी देशभरातील विविध राजकीय पक्षांनी ‘भारत बंद’ची हाक दिली होती.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ५०० आणि १००० रुपयांच्या जुन्या नोटा आठ नोव्हेंबर रोजी चलनातून हद्दपार केल्या. त्यानंतर योग्य नियोजनाअभावी कष्टकरी जनता, कामगार, शेतकरी, व्यापारी, तसेच गृहिणी आणि निवृत्तिवेतनधारकांचे प्रचंड हाल होत असल्याचे सांगून विरोधकांनी सोमवारी ‘भारत बंद’ पुकारला होता; मात्र शहराच्या विविध भागांतील दुकाने, बाजारपेठा सुरळीत सुरू होत्या. एखाद-दुसरे दुकान बंद असल्याचे दिसून आल्याने ‘भारत बंद’ला पिंपरी-चिंचवड शहरात अत्यल्प प्रतिसाद मिळाल्याचे चित्र आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून बाजारपेठेत पोलिस तैनात होते.

दरम्यान, या बंदच्या विरोधात बाइक रॅली व निषेध सभेचे आयोजन भाजप कार्यकर्त्यांनी केले. अजमेरा-मासुळकर कॉलनीमधील भाजप पदाधिकारी वीणा सोनवलकर व त्यांच्या कार्यकर्त्यांनी रसरंग चौक, अजमेरा, मासुळकर कॉलनी यशवंतनगर, विठ्ठलनगर, नेहरूनगर, खराळवाडी येथून बाइक रॅली काढली. तसेच चौकाचौकांत सभा घेऊन ‘दुकाने बंद ठेवू नये’ असे आवाहन करण्यात आले. विनोद पाटील, सुभाष फाटक, आकाश जोशी, एच. आर. कांबळे, अभिजित तांबे, सिद्धांत भट, अजय तांबे, विशाल महानवर, सूरज कोळी आदी या वेळी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


बोपखेल रस्त्यासाठी उपोषणकरणाऱ्या घुलेंची प्रकृती बिघडली

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पिंपरी

‘कॉलेज ऑफ मिलिटरी इंजिनीअरिंग’ने (सीएमई) दापोडी ते बोपखेल गाव हा रस्ता खुला करावा, या मागणीसाठी आमरण उपोषणाला बसलेले बोपखेलचे नागरिक संतोष घुले यांची प्रकृती सोमवारी खालावली. त्यांना उपचारासाठी पिंपरी येथील वायसीएम हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.

संतोष ज्ञानोबा घुले (५०) यांच्यासह बोपखेलच्या नागरिकांनी २२ नोव्हेंबरपासून बोपखेल येथे आमरण उपोषणाला सुरुवात केली होती; मात्र सोमवारी सकाळी घुले यांच्या छातीत दुखू लागल्याने त्यांना ‘वायसीएम’मध्ये दाखल करण्यात आले.

बोपखेलला जाण्यासाठी ‘सीएमई’मधून असलेला रस्ता लष्कराकडून १२ मे २०१५ रोजी बंद करण्यात आला आहे. त्यानंतर बोपखेलवासीयांच्या रेट्यामुळे लष्कराने नदीवर झुलता पूल बांधला होता. परंतु पावसाळ्याचे कारण देऊनतो पूल काढून टाकण्यात आला आहे. त्यानंतर अद्याप बोपखेलकरांसाठी पूल उभारण्यात आला नसल्याने स्थानिक नागरिकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे.

शहरातील राजकीय नेत्यांनी संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांच्याशी बोलून हा प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न केले. परंतु त्यामध्ये अपयश आल्याने गावातील संतोष घुले या शेतकऱ्याने आमरण उपोषणाचे हत्यार उपसले. त्या आंदोलनाला राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना व मनसेच्या राजकीय नेत्यांनीही पाठिंबा दिला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विशिष्ट रक्कम काढण्याचे बंधन नाही

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

सध्या लागू असणाऱ्या चलनातील रक्कम बँकेत भरल्यास तितकीच रक्कम काढणे खातेदारांना शक्य होणार आहे. त्यासाठी सध्याचे विशिष्ट रक्कम काढण्याचे बंधन लागू नसेल. त्याच वेळी पाचशे व हजार रुपयांच्या नोटा बँकेत भरणाऱ्यांना आठवड्याला केवळ २४ हजार रुपयेच काढता येणार आहेत. रिझर्व्ह बँकेने सोमवारी रात्री याबाबतचे आदेश जारी केले. या निर्णयामुळे बँकांची डोकेदुखी मात्र, वाढणार आहे.
हा आदेश आज, मंगळवारपासून लागू असेल. रिझर्व्ह बँकेने दहा नोव्हेंबर ते २७ नोव्हेंबर दरम्यान देशभरातील बँकांच्या माध्यमातून दोन लाख १६ हजार ६१७ कोटी रुपयांचे वितरण केले आहे. मात्र, तरीही देशभरात नोटांचा तुटवडा जाणवत आहे. सध्या बँकांमधून पैसे काढण्यावर मर्यादा असल्याने खातेदार बँकेत चालू चलनातील पैसे भरत नाहीत, अशी शक्यता असल्याचे रिझर्व्ह बँकेने म्हटले आहे. त्यावर उपाय म्हणून हा पर्याय शोधून काढण्यात आला आहे.
दहा नोव्हेंबरपासून २९ नोव्हेंबरपर्यंत किंवा पुढे कोणत्याही व्यक्तीने चालू चलनातील (२०००, ५००, १००, ५०, २० व १०; तसेच इतर नोटा, नाणी) कितीही रक्कम आपल्या खात्यात भरल्यास त्याला तितकीच रक्कम काढता येणे शक्य होणार आहे. या पैसे काढण्यावर कोणतेही निर्बंध नसतील. म्हणजेच रिझर्व्ह बँकेने चालू चलन बदलून किंवा सुटे पैसे घेण्याचा एक मार्ग खुला केला आहे, असे तज्ज्ञांनी सांगितले. बँकांना मात्र, आता कोणी कोणत्या चलनात किती रुपये भरले, याची माहिती घेऊन त्यानुसार पैसे काढण्यास परवानगी द्यावी लागणार आहे, त्यामुळे बँकांची डोकेदुखी वाढली आहे.
निर्णयाच्या फायद्याबाबत साशंकता
नव्या चलनातील साठेबाजीही आता मोठ्या प्रमाणावर सुरू झाली आहे. त्यामुळेच रिझर्व्ह बँकेने अडीच लाख कोटीहून अधिक रक्कम उपलब्ध करून देऊनही बाजारात चलनतुटवडा कायम आहे. पुढे पैसे काढण्यावर मर्यादा येऊ शकतील, या भीतीने ही रक्कम सर्वसामान्य नागरिकांकडून नव्हे, तर बड्या किंवा छोट्या व्यावसायिकांकडून दडवली जात आहे. मात्र, या निर्णयानंतरही ते आपल्याकडील रोख रक्कम बँकेत भरतील, अशी शक्यता अगदीच कमी आहे, असे तज्ज्ञांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

एमआयटी, देवस्थानाच्या परस्परांवर आरोपांच्या फैरी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

आळंदी येथील संत ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधी मंदिरात नैवेद्य दाखवण्यावरून झालेल्या वादात आळंदी संस्थानचे विश्वस्त आणि कर्मचारी यांनी मारहाण केल्याचा दावा डॉ. विश्वनाथ कराड यांनी केला आहे. मात्र, कार्तिकी यात्रेची प्रथा मोडून कराड यांनी संस्थानच्या नैवेद्याची वर्षानुवर्षे चालत आलेली परंपरा मोडण्याचा प्रयत्न केला. शिवाय कराड यांच्या सुरक्षारक्षकांनी मंदिर परिसरात संस्थानचे विश्वस्त आणि कर्मचारी यांच्यावर दमदाटी केल्यानेच त्यांना भाविकांचा रोष पत्करावा लागला, असा आरोप श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटीतर्फे करण्यात आला आहे.
या प्रकरणात प्रा. कराड आणि मंदिर व्यवस्थापनानेन परस्परांवर आरोप-प्रत्यारोप करण्यास सुरुवात केली आहे. रविवारी माऊलींच्या समाधी सोहळ्याची मुख्य कीर्तन सेवा मंदिरातील वीणा मंडपात सुरू होती. समाधी सोहळ्याचे कीर्तन होऊन त्यानंतरच नैवेद्य दाखवण्याची गेल्या अनेक वर्षांची प्रथा आहे. संस्थानचा नैवेद्य अर्पण केल्याशिवाय कोणालाही मंदिरात नैवेद्य दाखवण्याची मुभा नसते. असे असतानाही कराड आणि त्यांच्या ४० सहकाऱ्यांनी मंदिराचे कुलूप तोडून प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. संस्थानच्या कर्मचाऱ्यांनी त्यांना अडवण्याचा प्रयत्न केला असता, कराड यांच्या सुरक्षारक्षकांनी कर्मचाऱ्यांना धक्काबुक्की केली. या प्रकारानंतर भाविकांचाही संताप अनावर होऊन त्यांनी कराड आणि त्यांच्या माणसांना मंदिरातून बाहेर काढले. या वेळी मंदिराचे कर्मचारी आणि विश्वस्त यांच्याकडून कराड यांना मारहाण करण्यात आली नाही. उलट कराड यांच्या सुरक्षारक्षकांनीच मारहाण केल्याचा आरोप संस्थानाकडून करण्यात आला आहे. या संदर्भातील सीसीटीव्ही फूटेजही उपलब्ध असल्याचे संस्थानने म्हटले आहे.
दरम्यान कराड यांच्या कुटुंबाला चोहोबाजूने घेराव घालून, मंदिराबाहेर जाणारे सर्व मार्ग बंद करून, धक्काबुक्की, अर्वाच्य भाषेमध्ये दमदाटी आणि मारहाण केल्याबद्दल विश्वस्त मंडळ बरखास्त करून, कडक कायदेशीर कारवाई करण्याची मागणी मुख्यमंत्र्यांकडे करणार असल्याचे विश्वशांती केंद्र आणि एमआयटीतर्फे सांगण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बनावट खात्यांद्वारे कोट्यवधींचे अनुदान

$
0
0

बीड, परभरणी जिल्ह्यातील प्रकार; १२८.२६ कोटींचे नियमबाह्य कर्जवाटप

म. टा. प्रतिनिधी, पुणे

लोकशाहीर अण्णा भाऊ साठे महामंडळ घोटाळ्यात आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. बीड आणि परभणी जिल्ह्यात लाभार्थ्यांच्या नकळत त्यांच्या नावे पतसंस्था आणि सहकारी बँकांमध्ये बनावट खाते काढून अनुदान लाटल्याचे ‘सीआयडी’ तपासात समोर आले आहेत. या घोटाळ्यात १२८ कोटी २६ लाख रुपयांचे नियमबाह्य कर्जवाटप झाल्याचे तपासात आढळून आले आहे.
राज्य गुन्हे अन्वेषण विभागाचे प्रमुख व अतिरिक्त पोलिस महासंचालक संजय कुमार यांनी या घोटाळ्याची पत्रकार परिषदेत माहिती दिली. या वेळी विशेष पोलिस महानिरीक्षक संजीवकुमार सिंघल, पोलिस अधीक्षक पौर्णिमा गायकवाड उपस्थित होत्या. राज्यात अण्णा भाऊ साठे महामंडळाचा घोटाळा उघड झाल्यानंतर राजकीय भूकंप झाला होता. यामध्ये आतापर्यंत ३१२ कोटींचा आर्थिक घोटाळा झाल्याचे समोर आले असून, राज्यात सहा ठिकाणी गुन्हे दाखल आहेत. राष्ट्रवादीचे माजी आमदार रमेश कदम यांच्यासह १३ जणांना अटक करण्यात आली आहे.
‘कदम महामंडळाचे अध्यक्ष असताना त्यांनी ३० जिल्ह्यांतील लाभार्थ्यांना १४८ कोटी रुपयांच्या विविध योजनांमधून कर्ज वाटर केले होते. त्यापैकी १२८ कोटी २६ लाख रुपयांचे कर्जवाटप नियमबाह्य झाल्याचे तपासात आढळून आले. या घोटाळ्यात आतापर्यंत ६० कोटी रुपयांसह १९१ कोटी रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे. यामध्ये महामंडळाच्या निधीतून खरेदी करून वाटप करण्यात आलेल्या ५८ चारचाकी गाड्यांचा समावेश आहे. २०१२ ते २०१४ या कालावधीत ज्या लाभार्थ्यांना अनुदान वाटप केले आहे, ते त्यांना खरेच त्यांना मिळाले की नाही यासाठी प्रत्येक जिल्ह्यात स्थानिक वृत्तपत्राच्या माध्यमातून जाहीर प्रकटन दिले होते. त्यानुसार ५५ तक्रारी सीआयडीकडे आल्या. या तक्रारी बीड, परभणी जिल्ह्यातील असल्यामुळे सीआयडीच्या पथकाने त्या ठिकाणी जाऊन तपासणी केली. त्यावेळी लाभार्थी एका जिल्ह्यात तर त्याचे बनावट बँक खाते दुसऱ्याच जिल्ह्यात काढण्यात आल्याचे आढळून आले,’ अशी मा​हिती संजयकुमार यांनी दिली.
बँक खाते काढताना केवायसीची पूर्ण करण्यात आलेली नाही. बीडमध्ये एका कुटुंबातील सात तर दुसऱ्या कुटुंबातील पाच जणांच्या नावाने बनावट बँक खाते काढून त्यांची फसवणूक केल्याचे समोर आले आहे. या प्रत्येकाच्या नावाने दोन ते चार लाख रुपयांचे अनुदान दुसऱ्या व्यक्तीने परस्पर बँकेत सही करून धनादेश वटवल्याचे समोर आले आहे. आता नेमके हे पैसे कोणी काढून घेतले याचा तपास सुरू आहे. हे बनावट बँक खाते काढणाऱ्या बँकेवरही गुन्हे दाखल केले जातील. या प्रकरणात आणखी बनवाट खाती काढली असण्याची शक्यता आहे, असेही त्यांनी नमूद केले.

‘यादी पाहून तक्रार करा‘

रमेश कदम यांच्या अध्यक्षपदाच्या कालावधीत कर्ज वाटप केलेल्या ३३, ००० लाभार्थ्यांची यादी सीआयडीने मिळविली आहे. महामंडळाच्या रकमेचा अपहार करण्यासाठी लाभार्थ्यांच्या नावाने बनावट खाती उघडल्याची शक्यता आहे. त्यामुळे सीआयडीने जिल्हानिहाय लाभार्थ्यांची यादी सीआयडीच्या वेबसाइटवर टाकली आहे. २०१२ ते २०१४ या कालावधीत लाभार्थ्यांनी कर्जाची रक्कम तपासून घ्यावी. तसेच, पूर्ण रक्कम मिळालेल्या किंवा न मिळालेल्यांनी ०२२२७५७१४८५ किंवा ९८२१९८९२९८ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन संजयकुमार यांनी केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

स्वतंत्र पोलिस आयुक्तालयाचा प्रस्ताव तयार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पिंपरी

‘पिंपरी-चिंचवडसाठी स्वतंत्र पोलिस आयुक्तालयाचा प्रश्न लवकरच मार्गी लावू, त्यासाठीचा प्रस्ताव तयार झाला आहे,’ अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी भोसरी येथील जाहीर कार्यक्रमात केली. पिंपरी-चिंचवडमधील वाढत्या गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर पिंपरीसाठी स्वतंत्र पोलिस आयुक्तालयाची आवश्यकता असल्याची भूमिका ‘मटा’ने वारंवार मांडली होती.
आमदार महेश लांडगे यांनी आयोजित केलेल्या ‘व्हिजन २०२०’ या जाहीर कार्यक्रमात फडणवीस बोलत होते. ‘महाराष्ट्र टाइम्स’च्या ‘पुणे सुपरफास्ट’ या कार्यक्रमात जानेवारी २०१५मध्ये पिंपरी-चिंचवडसाठी स्वतंत्र पोलिस आयुक्तालयाची भूमिका मांडली होती. पिंपरी-चिंचवडचे वाढलेले औद्योगिकरण आणि त्याच वेळी वाढणारी गुन्हेगारी लक्षात घेता पिंपरी-चिंचवडसाठी स्वतंत्र आयुक्तालयाची गरज विशद करण्यात आली होती. या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले ​नवनिर्वाचित मुख्यमंत्री फडणवीस यांनी ‘मटाच्या या सूचनेनुसार पिंपरी-चिंचवडसाठी स्वतंत्र पोलिस आयुक्तालयाचा नक्कीच विचार करण्यात येईल,’ असे सांगितले होते. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री फडणवीस यांनी भोसरी येथील ‘व्हिजन २०२०’ या कार्यक्रमात पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयाचा प्रश्न लवकरच मार्गी लावू, असे आश्वासन पिंपरी-चिंचवडकरांना दिले.
फडणवीस यांनी ‘मटा’च्या व्यासपीठावर दिलेल्या आश्वासनानंतर पिंपरी-चिंचवड आयुक्तालयासाठी जागेचा शोध घेण्यात आला. पुणे पोलिस आयुक्त आणि पुणे ग्रामीण अधीक्षक यांनी एकत्रितरीत्या पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयाचा आराखडा तयार केला. राज्याचे अप्पर गृहसचिव के. पी. बक्षी यांच्या नेतृत्वाखालील उच्चस्तरीय बैठका घेण्यात आल्या आहेत. या बैठकांमध्ये पिंपरी-चिंचवडचे आयुक्तालय कसे असावे, याचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे.
‘मटा’ने घेतलेल्या भूमिकेचे ​पिंपरी-चिंचवड येथील नागरिकांनी, लोकप्रतिनिधींनी स्वागत करून स्वतंत्र पोलिस आयुक्तालयाची भूमिका उचलून धरली. पैशांची आवश्यकता असेल, तर लोकप्रतिनिधी, महापालिका, आद्योगिक कंपन्या, आयटी पार्क यांनी मदतीचे आश्वासन दिले आणि निगडी प्राधिकरणाने जागा देण्याची तयारी दर्शवली. अशा प्रकारे पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयाच्या आराखड्याने अंतिमतेकडे वाटचाल केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘जेईई-मेन’साठी आधार कार्ड सक्तीचे

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

देशभरातील आयआयटी, एनआयटी, ट्रिपल आयटी आणि सीएफटीआय संस्थांतील प्रवेशांसाठी घेण्यात येणाऱ्या ‘जेईई-मेन’ या परीक्षेला बसू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना आधार कार्ड सक्तीचे करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांना ‘जेईई-मेन’चा अर्ज भरताना वैयक्तिक तपशीलासह आधार क्रमांक भरणे आवश्यक असल्याने आधार कार्ड नसेल, तर परीक्षाच देता येणार नाही. ‘जेईई-मेन’ला बसू इच्छिणाऱ्या ज्या विद्यार्थ्यांकडे आधार कार्ड नाही, त्यांना प्राधान्याने आधार कार्ड देण्याची सूचना युनिक आयडी प्राधिकरणाने (यूआयडीएआय) निबंधकांना केली आहे.
‘जेईई-मेन’च्या अधिकृत वेबसाइटवर याबाबत माहिती देण्यात आली आहे. ‘जेईई-मेनला बसू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांकडे आधार कार्ड असणे गरजेचे आहे. परीक्षेचा अर्ज भरताना विद्यार्थ्यांना त्यांचे नाव, जन्मतारीख आदी वैयक्तिक तपशीलाबरोबरच आधार कार्ड क्रमांकही भरावा लागेल. हा क्रमांक; तसेच कार्डवरील तपशील ‘यूआयडीएआय’कडे असलेल्या तपशीलाशी पडताळून पाहण्यात येईल. त्यामध्ये विरोधाभास आढळल्यास विद्यार्थ्याला अर्जच भरता येणार नाही,’ असे या संबंधी प्रसिद्धीस देण्यात आलेल्या परिपत्रकात म्हटले आहे.
ज्या विद्यार्थ्यांनी अजून आधार कार्ड काढलेले नाही, त्यांच्यासाठी ‘सीबीएसई’तर्फे परीक्षा केंद्र असलेल्या शहरांत मदत केंद्र सुरू करण्यात आली आहेत. या केंद्रांवर विद्यार्थ्यांना आधार कार्डसाठी विनामूल्य नोंदणी करता येईल. अशा केंद्रांची यादी www.jeemain.nic.in या वेबसाइटवर उपलब्ध आहे. याशिवाय आधार कार्ड नोंदणीसाठी विद्यार्थ्यांना प्राधान्य द्यावे, अशी सूचना ‘यूआयडीएआय’ने प्रादेशिक कार्यालयांनाही दिली आहे.

‘जेईई-मेन’ दोन एप्रिलला
आगामी शैक्षणिक वर्षातील आयआयटी, एनआयटी, ट्रिपल आयटी आणि इतर केंद्रीय निधीप्राप्त तंत्रशिक्षण संस्थांतील प्रवेशांसाठीची ‘जेईई-मेन’ ही परीक्षा २ एप्रिल २०१७ रोजी होणार आहे. परीक्षेसाठी ऑनलाइन अर्ज करण्याची प्रक्रिया एक डिसेंबरपासून सुरू होईल. अर्ज करण्याची अखेरची तारीख दोन जानेवारी असून, परीक्षा शुल्क तीन जानेवारीपर्यंत भरता येईल.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आता रोख रकमेचेही रेशनिंग

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

‘तुम्हाला पैसे काढायचेत, तेही नियमानुसार देण्यात आलेल्या मर्यादेत, हे मान्य. पण आमच्याकडे रिझर्व्ह बँकेकडून पुरेशी रक्कमच आलेली नाही. त्यामुळे शक्य तितकी रक्कम देण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत. ती घ्या, आणि सहकार्य करा,’ असा संवाद शहरातील बँकांमध्ये ऐकू येत आहे. रिझर्व्ह बँकेकडेही रोख रकमेची कमतरता असल्याने बँकांवर ही वेळ आली आहे.
सोमवारी विविध बँकांमध्ये पैसे काढायला गेलेल्या खातेदारांना हाच अनुभव आला. शहरातील बहुतांश बँकांमध्ये दुपारनंतर कॅश संपली, असे फलक लावण्याची वेळ आली होती. शहरातील अनेक बँकांना त्यांच्या रोजच्या गरजेच्या तुलनेत जास्तीत जास्त १० ते १५ टक्के रक्कम पुरविण्यात येत आहे. त्यामुळे बँकांना हीच रक्कम ग्राहकांना पुरवून पुरवून द्यावी लागत आहे. दोन दिवसांच्या सुट्टीनंतर सोमवारी बँका उघडल्याने मोठ्या रांगा लागून अवघ्या तीन ते साडेतीन तासातच ही रक्कम संपुष्टात आली. अगदी मोजक्याच बँकांना दुपारीही रोख रक्कम मिळाली. मात्र, अन्य बँकांना रोख रक्कम संपली, असे फलक लावण्याशिवाय गत्यंतरच उरले नाही. काही ठिकाणी वादविवादही झाले.
शहरातील मोठ्या राष्ट्रीयीकृत बँकांतही अशीच परिस्थिती होती. मुळातच कमी रक्कम आहे. त्यामुळे प्रत्येक शाखेची किमान गरज ५० लाखांची गरज असताना त्यांना जेमतेम १० ते १५ लाख रुपये पुरविण्यात आले. परिणामी प्रत्येक ग्राहकाला जास्तीत जास्त पाच हजार रुपये देण्यात आले. त्यावरून काही ठिकाणी वाद झाले असले, तरी खातेदारही समजूतदारपणा दाखवत असल्याचे बँकेच्या सरव्यवस्थापकांनी सांगितले.
एका सहकारी बँकेकडे स्वतःची करन्सी चेस्ट आहे. रिझर्व्ह बँकेकडून आलेली रोकड या चेस्टमधून बँकेच्या अन्य शाखांना तसेच बँकेचे ग्राहक असलेल्या अन्य बँकांना पुरविण्यात येते. त्यामुळे बँकेची गरज मोठी आहे. मात्र, गेल्या चार कामकाजाच्या दिवसात बँकेला केवळ चार ते पाच कोटी रुपये देण्यात आले. सोमवारीही बँकेला रिझर्व्ह बँकेकडून अवघे दोन कोटी देण्यात आले. त्यामुळे आम्ही प्रत्येक शाखेला मोजकेच पैसे देऊ शकलो. प्रत्येक खातेदाराला अधिक रक्कम काढण्याची मुभा असूनही काही ठिकाणी एक हजार तर काही ठिकाणी जास्तीत जास्त अडीच हजार रुपयेच देता आले, असे बँकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.
भांडारकर रस्त्यावरील एका खासगी बँकेनेही दुपारनंतर रोख रक्कम संपल्याचे स्पष्ट केले. सकाळी दहा वाजता रोख रक्कम मिळाली होती. तीही पुरेशी नव्हती. त्यामुळे खातेदारांना मोजकीच रक्कम दिली जात होती. मात्र, काही चालू (करंट) खात्याचे खातेदार आल्यास त्यांना अधिक रक्कम द्यावी लागत होती. परिणामी, दुपारी एकच्या सुमारास रक्कम संपल्याचे जाहीर करावे लागले.

बँका दुहेरी कचाट्यात
बँकांची एकीकडे रिझर्व्ह बँकेकडून मोजक्याच रकमेवर बोळवण केली जात आहे. दुसरीकडे खातेदारांकडे बँकेत भरण्यासाठी (चालू चलनातील) पैसेच नाहीत. किंवा खातेदारांकडून बाद चलनाचाच (५००,१०००) भरणा होत आहे. परिणामी, बँका दुहेरी कचाट्यात सापडल्या आहेत. दुसरीकडे काही खातेदार आपल्याकडील चालू चलनातील ५०० ची नवी १०० व त्याहून कमी मूल्याच्या नोटा घरातच ठेवत आहेत. त्यामुळे बाजारपेठेतील चलनतुटवडा कायम आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


स्त्रियांवरील अत्याचार, सायबर गुन्हे वाढले

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

राज्यात २०१५ मध्ये गंभीर गुन्ह्यांत दहा टक्क्यांनी, तर एकूण गुन्हेगारीत नऊ टक्क्यांनी वाढ झाली आहे. राज्यात दर तीन मिनिटांत दोन गुन्हे घडत आहेत. स्त्रियांवरील अत्याचार, सायबर गुन्हे, शरीराविरुद्ध गुन्हे, मालमत्तेविरुद्ध व आर्थिक गुन्हे, अल्पवयीन मुलींवरील बलात्कार, बालकांवरील अत्याचार यात वाढ झाली आहे. गुन्ह्यांच्या प्रमाणात अमरावती क्रमांक एकवर, औरंगाबाद दुसऱ्या, तर नागपूर तिसऱ्या स्थानी आहे. दिलासादायक गोष्ट म्हणजे आरोपींना शिक्षा होण्याच्या प्रमाणात वाढ झाली आहे.
राज्य गुन्हे अन्वेषण विभाग (सीआयडी)ने तयार केलेल्या ‘महाराष्ट्रातील गुन्हे २०१५’ च्या अहवालाचे प्रकाशन पुण्याच्या पोलिस आयुक्त रश्मी शुक्ला यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी सीआयडीचे प्रमुख संजय कुमार, विशेष पोलिस महानिरीक्षक संजीवकुमार सिंघल उपस्थित होते. या वेळी अहवालातील महत्त्वाच्या मुद्द्याची माहिती संजय कुमार यांनी दिली.
सन २०१४ च्या तुलनेत २०१५ मध्ये भारतीय दंड संहिता कायद्यानुसार दाखल होणाऱ्या गुन्ह्यात १०.२३ टक्क्यांनी, तर विशेष व स्थानिक कायद्यानुसार ९.४७ टक्क्यांनी वाढ झाली आहे. खंडणी (२५.८), बलात्कार (२०.५), बेदरकारपणे वाहन चालवून मृत्यू होणे (१९.६), विनयभंग (१७.१), जाळपोळ (१०.१), चोरी (८.६) टक्क्यांनी या गुन्ह्यांत वाढ झाली आहे; तर खून, जबरी चोरी, छेडछाड, घरफोडी, फसवणूक या गुन्ह्यांत घट झाली आहे. मालमत्तेविरुद्धच्या गुन्ह्यात २.४० टक्क्यांनी वाढ झाली आहे. मालमत्तेविरुद्धचे गुन्हे उघडकीस आणण्याचे प्रमाण ३२ टक्के असून, मालमत्ता हस्तगत करण्याचे प्रमाण ५.१२ टक्के आहे. मालमत्तेच्या गुन्ह्यात सर्वाधिक दरोडा प्रकारामध्ये ३८ टक्क्यांनी वाढ झाली आहे. आर्थिक गुन्ह्यांमध्ये १६.६९ टक्क्यांनी वाढ झाली आहे. बालकांवरील अत्याचारात ७१ टक्क्यांनी वाढ झाली आहे. अनुसूचित जमातीवरील अत्याचाराच्या गुन्ह्यात नऊ टक्क्यांनी वाढ झाली आहे. तसेच, अनुसूचित जातीच्या सदस्यांवरील गुन्ह्यांत २.७१ टक्क्यांनी वाढ झाली असल्याचे अहवालात म्हटले आहे. २०१५ मध्ये हिंसात्मक गुन्ह्यात १४.४८ टक्क्यांनी वाढ झाली आहे. यामध्ये ठाणे शहर (६०.२१), औरंगाबाद (५२.२२), नवी मुंबई (४२.११), पुणे शहर (४२.१८), पुणे ग्रामीण (४१.०३) या ठिकाणी वाढ झाल्याचे दिसून आले आहे.

स्त्रियांवरील अत्याचार वाढले

स्त्रियांवरील अत्याचाराच्या गुन्ह्यांत १६.५७ टक्क्यांनी वाढ झाली आहे. त्यामध्ये अपहरण, बलात्कार, विनयभंग; तसेच हुंडा प्रतिबंधक अधिनियम व अनैतिक व्यापार प्रतिबंधक कायद्याच्या गुन्ह्यांत वाढ झाली आहे. बलात्काराच्या गुन्ह्यात शिक्षा होण्याचे प्रमाण वाढले आहे. मात्र, एकूण महिलांच्या विरोधातील गुन्ह्यात शिक्षामध्ये वाढ होण्यासाठी शास्त्रशुद्ध पुरावे गोळा करण्याची गरज आहे. स्त्रियांवरील अत्याचाराचे ९२ टक्के खटले विविध कोर्टांत प्रलंबित आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘वैज्ञानिक दृष्टिकोनाबरोबरच अध्यात्मिक बैठक हवी’

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, पुणे
‘आयुष्य आनंदी होण्यासाठी प्रत्येकजण धडपडत असतो. या प्रवासात अनेकदा नकारात्मक भावना निर्माण होतात. पण, अध्यात्माशी आपले नाते घनिष्ट असेल, तर या नकारात्मक प्रसंगावेळीही सकारात्मक भावना प्रज्ज्वलित होतात आणि आनंदाचा यशोमार्ग सहज मिळतो. त्यामुळे वैज्ञानिक दृष्टिकोनाबरोबरच अध्यात्मिक बैठक असायला हवी,’ असे प्रतिपादन ऑस्ट्रेलिया येथील युनेस्को अध्यासनाचे प्रमुख डॉ. रसेल डिसुझा यांनी केले.
विश्‍वशांती केंद्र (आळंदी), एमआयटी यांच्यातर्फे आयोजित संतश्री ज्ञानेश्‍वर-संतश्री तुकाराम महाराज स्मृती व्याख्यानमालेत ‘आध्यात्मिक मुल्ये’ या विषयावर ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी कुलगुरू डॉ. अरुण जामकर होते. या प्रसंगी बेंगळुरू येथील डॉ. ई. मोहनदास, एमआयटीचे संस्थापक-अध्यक्ष प्रा. डॉ. विश्‍वनाथ कराड, विश्‍वशांती संघाचे कार्यकारी संचालक डॉ. संजय उपाध्ये, डॉ. मंगेश कराड, डॉ. मिलिंद पांडे, प्राचार्य डॉ. एल. के. क्षीरसागर, प्रा. सी. व्ही. कुलकर्णी उपस्थित होते.
डॉ. डिसुझा म्हणाले, ‘प्रत्येकजण प्रगतीच्या मागे धावतो आहे. या धावपळीत ताण-तणाव, विविध आजार, नकारात्मक मानसिकता आदी गोष्टी आपल्या पाठिशी लागलेल्या असतात. त्यांच्यापासून सुटका करायची असेल, तर अध्यात्म हा त्यावरचा उपाय आहे. आपल्या अवतीभवती, निसर्गाच्या सान्निध्यात, एवढेच काय तर प्रत्येकाच्या आतमध्ये ईश्‍वर असतो. त्याला ओळखून त्याप्रमाणे वागले, तर आनंद, प्रेम, विश्‍वास, इच्छाशक्ती आदी दृढ होतात.’
डॉ. ई. मोहनदास म्हणाले, ‘आपला मेंदू अध्यात्मिक भावनेला सहकार्य करीत असतो. त्याला ज्ञानयोगही म्हणतात. सामान्य माणूस आणि आध्यात्मिक माणूस यामध्ये काही फरक असेल, तर तो म्हणजे ज्ञान आहे. ज्ञानाला कर्माची जोड असली, तर अधिक चांगले आयुष्य जगता येते.’
ज्येष्ठ पत्रकार मुझफ्फर हुसेन म्हणाले, ‘इस्लामचा अर्थच शांतता असा आहे. इस्लामकडून दहशतवादाला प्रोत्साहन दिले जाणे शक्यच नाही. परंतु, दहशतवाद्यांनी इस्लामला बदनाम केले आहे. जगातील सर्वसामान्य मुसलमान हे शांतीप्रिय आहेत. भारत देश हे संपूर्ण जगातील शांती व समन्वयाचे उदाहरण आहे. येथील जनता ही नेहमीच बंधु-भावाने वागत आली आहे. सर्व जगात जेवढे धर्म आहेत, ते सर्व भारतात आहेत.’

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भोसलेंना ‘दे धक्का’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

राष्ट्रवादी काँग्रेसमधील अंतर्गत धुसफूस अद्यापही संपण्याची चिन्हे नसून, त्याचा फटका सोमवारी नवनिर्वाचित आमदार अनिल भोसले यांना बसला. भोसले यांच्या शिवाजीनगर भागांतील विविध विकासकामांसाठी पाच कोटी रुपयांचा निधी मंजूर असूनही, विरोधकांनी तटस्थ काँग्रेसच्या सहकार्याने राष्ट्रवादी काँग्रेसला कात्रजचा घाट दाखविला.
भोसले यांच्या शिवाजीनगर परिसरात पाच कोटी रुपयांची विकासकामे करण्याचा प्रस्ताव विरोधी पक्षांनी बहुमताने फेटाळला. राष्ट्रवादी काँग्रेसच्या मदतीला धावणाऱ्या काँग्रेसने ऐनवेळी तटस्थ भूमिका घेतली अन् भाजप-शिवसेना आणि मनसेने एकत्र येऊन भोसलेंना धक्का दिला. शिवाजीनगर परिसरात रस्त्यांच्या डांबरीकरणापासून ते दिवे-बाकडे बसवणे, समाजमंदिर बांधणे अशा स्वरूपाची कामे सुचविण्यात आली होती. हीच कामे स्थानिक लोकप्रतिनिधींकडून केली जात असल्याने आमदारांनी सुचविलेल्या कामांसाठी महापालिकेचा निधी कशासाठी, अशी विचारणा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केली. राष्ट्रवादी काँग्रेसने प्रभागातील कामांसाठीच हा निधी वापरला जाणार असल्याचा दावा केला. परंतु, विरोधी पक्षांनी आमदारांसाठी स्वतंत्र निधी असताना, पालिकेचा निधी वापरण्याचा नवा पायंडा पाडू नका, असा आग्रह धरला.
प्रस्तावाला विरोध झाल्याने त्यावर मतदान घेण्याच्या सूचना महापौर प्रशांत जगताप यांनी दिल्या. यामध्ये काँग्रेसची साथ मिळेल, हा राष्ट्रवादीचा विश्वास फोल ठरला. उपमहापौर मुकारी अलगुडे यांनी आक्षेप घेऊन काँग्रेसच्या सदस्यांना रोखले. त्यामुळे, राष्ट्रवादी एकाकी पडली. त्यानंतर, अचानक काँग्रेसच्या सर्व सदस्यांनी हात वर करून प्रस्तावाला पाठिंबा असल्याचे दर्शविले. तोपर्यंत प्रस्तावाच्या बाजूने असलेल्या मतांच्या मोजणीची प्रक्रिया पूर्ण झाल्याने काँग्रेसची मते ग्राह्य धरता येणार नाहीत, असे नगरसचिव सुनील पारखी यांनी स्पष्ट केले.
भाजप-शिवसेना-मनसेच्या सदस्यांची संख्या राष्ट्रवादीच्या सदस्यांपेक्षा जास्त असल्याने आमदारांच्या विकासकामांतर्गत पाच कोटी रुपये उपलब्ध करून देण्याचा प्रस्ताव १८ विरुद्ध २३ मतांनी फेटाळला गेला.

‘राष्ट्रवादी’च्या चलाखीची चर्चा
सभागृहनेते बंडू केमसे यांना हा प्रस्ताव काँग्रेसच्या सहकार्याने बहुमताने मंजूर करता येईल, असा विश्वास होता. ऐनवेळी सभागृहातील समीकरणे बदलली. काँग्रेसने पाठिंबा न देता तटस्थ राहणे पसंत केले अन् काही मिनिटांनी पुन्हा पाठिंब्यासाठी हात वर केले. सभागृहातील मतदानाची प्रक्रिया कशी असते, याची काँग्रेसच्या अनेक ज्येष्ठ सदस्यांना चांगलीच माहिती आहे. त्यामुळे, काँग्रेसने उशिराने पाठिंबा देण्यामागे राष्ट्रवादीतील काहींची चलाखी नाही ना, अशी चर्चाही रंगली होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बनावट नोटांचे गुन्हे घटले

$
0
0

सीआयडीच्या ‘क्राइम इन महाराष्ट्र’ अहवालातील नोंद

म. टा. प्रतिनिधी, पुणे

देशात बनावट नोटा वाढल्याच्या जोरदार चर्चा झडत असताना महाराष्ट्रात मात्र उलट चित्र आहे. राज्य गुन्हे अन्वेषण विभागाने (सीआयडी) सोमवारी प्रकाशित केलेल्या ‘क्राइम इन महाराष्ट्र’ या अहवालात बनावट नोटांचे गुन्हे कमी झाल्याचे म्हटले आहे. २००५च्या तुलनेत राज्यात गेल्या वर्षी बनावट नोटांच्या गुन्ह्यांमध्ये ५० टक्के घट झाल्याचेही अहवालात नमूद करण्यात आले आहे.
राज्यात बनावटीकरणाखाली सर्वाधिक गुन्हे नोटांच्या संदर्भात नोंदवले जातात. राज्यात गेल्या वर्षी बनावटीकरणाचे १९० गुन्हे नोंदवण्यात आले आहे. हाच आकडा २०१४ मध्ये २०१ होता. गेल्या वर्षी बनावट नोटांचे सर्वाधिक गुन्हे मुंबईत नोंदवले गेले. त्याखालोखाल नाशिक, ठाणे, पुणे आणि नवी मुंबई या शहरांचा क्रमांक लागतो. या पाच शहरांमध्ये मिळून सर्वाधिक ३१.५७ टक्के गुन्हे दाखल झाले आहेत, असे अहवालात म्हटले आहे.
चलनातील बनावट नोटा रोखण्यासाठी रिझर्व्ह बँकेने गुन्हा दाखल करण्याचे आदेश सर्वच बँकांना दिले आहेत. रिझर्व्ह बँकेच्या आदेशानुसार बँकेत भरणा करताना एखाद्या ग्राहकाकडे एकाचवेळी पाचहून अधिक बनावट नोटा आढळल्यास, त्याच्याविरुद्ध तत्काळ गुन्हा दाखल करण्याचा नियम आहे. तर त्या खालोखाल बनावट नोटांचा बँकेत भरणा झाल्यास संबंधिताची माहिती पोलिसांना देण्यात येते. त्यानंतर बनावट नोटा वितरित करणाऱ्यांची धरपकड दिली जाते आणि त्यांच्यावर गुन्हे दाखल करून कारवाई करण्यात येते.
गेल्या दहा वर्षांपासून बनावट नोटा चलनात आणल्याप्रकरणी गुन्हे दाखल होण्याचे प्रमाण सातत्याने घटत आहे. राज्यात २००५च्या तुलनेत गेल्यावर्षी बनावट नोटा प्रकरणी दाखल गुन्ह्यांमध्ये ५०.६ टक्क्यांनी घट झाली. गेल्या पाच वर्षांच्या सरासरीच्या तुलनेत ही घट ३५.५ टक्क्यांनी आहे, असेही ‘सीआयडी’च्या अहवालात नमूद करण्यात आले आहे.

नोटा घटल्या; गुन्हे घटले
केंद्र सरकारने नोटाबंदीच्या घेतलेल्या निर्णयामुळे बनावट नोटांचा विषय मोठ्या प्रमाणात चर्चिला गेला आहे. भारतीय चलनात मोठ्या प्रमाणात बनावट नोटा आल्याचा दावा करण्यात येत असताना मात्र, ‘सीआयडी’च्या अहवालात गुन्हे दाखल होण्याचे घटलेले प्रमाण बनावट नोटा कमी झाल्याचे द्योतक आहे, अशी टिप्पणी उच्चपदस्थ सूत्रांनी केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नामदार गोखले रस्ता होणार ‘कॅशलेस’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

शहरातील सर्वाधिक वर्दळीच्या आणि कॉलेजवयीन युवक-युवतींचा सर्वाधिक वावर असणाऱ्या गोपाळकृष्ण गोखले रस्त्याला (फर्ग्युसन कॉलेज रोड) देशातील पहिला ‘कॅशलेस रोड’ म्हणून ओळख मिळवून देण्याचा प्रयत्न भारतीय जनता पक्षाने आरंभला आहे. त्यादृष्टीने एक डिसेंबरपर्यंत ऑनलाइन, डेबिट/क्रेडिट कार्ड आणि ई-वॉलेटच्या माध्यमातून व्यवहार व्हावेत, यासाठी सर्वेक्षणाची मोहीम हाती घेण्यात आली आहे.
शहर भाजपच्या वतीने ‘कॅशलेस पुणे’ मोहिमेचा शुभारंभ शहराध्यक्ष योगेश गोगावले यांच्या हस्ते करण्यात आला. या मोहिमेंतर्गत ‘कॅशलेस’ व्यवहार करण्यासाठी नागरिकांमध्ये जनजागृती करण्यात येणार असून, येत्या आठ दिवसांत दोन लाख माहिती पुस्तिकांचे वाटप केले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. शहरातील तरुण पिढीचा सर्वाधिक वेळ गोखले रस्त्यावर जातो. त्यामुळे हा रस्ता ‘कॅशलेस व्यवहारां’साठी आदर्श ठरू शकतो, असे लक्षात आल्याने पक्षातर्फे सर्वेक्षण सुरू करण्यात आले आहे. विविध व्यापाऱ्यांना ऑनलाइन पेमेंट, डेबिट/क्रेडिट कार्ड आणि ई-वॉलेटची सुविधा उपलब्ध करून दिली जाणार असल्याची माहिती गोगावले यांनी दिली.
गोखले रस्त्यानंतर शहरातील लक्ष्मी रस्ता, टिळक रस्ता, शास्त्री रस्ता, कुमठेकर रस्ता, केळकर रस्ता, विद्यापीठ रस्ता, तुळशीबाग, मंडई, शिवाजी रस्ता, सातारा रस्ता आणि उपनगरांत या मोहिमेची व्याप्ती वाढविण्यात येणार असल्याचे त्यांनी जाहीर केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

करन्सी चेस्टसाठी आंदोलनाचा इशारा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

नागरी सहकारी बँकांसाठी स्वतंत्र करन्सी चेस्ट देण्यात यावी, अशी मागणी ‘पुणे जिल्हा नागरी सहकारी बँक्स असोसिएशन’ने पुनश्च केली आहे. असोसिएशनतर्फे पंतप्रधान, रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर, तसेच सहकार आयुक्तांकडे मागणीचे निवेदन पाठविण्यात आले आहे. ही मागणी मान्य न झाल्यास किंवा तोडगा न निघाल्यास ३० नोव्हेंबर रोजी आंदोलन करण्याचा इशाराही असोसिएशनतर्फे देण्यात आला आहे.
असोसिएशनचे अध्यक्ष अॅड. सुभाष मोहिते यांनी ही माहिती दिली. केंद्र सरकारने पाचशे अणि हजार रुपयांचा जुन्या नोटा चलनातून रद्द केल्यावर सहकारी बँकांना अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. सहकारी बँकांना जाणीवपूर्वक रोख रकमेचा पुरवठा केला जात नाही. करन्सी चेस्ट असलेल्या बँकांकडून चांगली वागणूक मिळत नाही. याविषयी असोसिएशनने यापूर्वीही रिझर्व्ह बँकेकडे पत्रव्यवहार करून कॉसमॉस बँकेच्या करन्सी चेस्टमधून नागरी सहकारी बँकांना पैसे दिले जावेत, अशी मागणी केली होती. मात्र, त्यावर कोणतीही कार्यवाही झालेली नाही, असे निवेदनात म्हटले आहे.
नागरी सहकारी बँकांमध्ये सर्वसामान्य नागरिकांची खाती आहेत. या बँकांना पैसे उपलब्ध न झाल्याने खातेदारांना पैसे देता येत नाहीत. खात्यात पैसे असूनही पैसे मिळत नसल्याने हे खातेदार अस्वस्थ झाले आहेत. त्यामुळे रिझर्व्ह बँकेने त्वरित याबाबत निर्णय घ्यावा, अन्यथा आंदोलन करावे लागेल, असा इशारा या निवेदनात देण्यात आला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नोटाबंदी विरोधकांवर तेंडुलकरांचा ‘कुंचला’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

नोटा मिळण्यासाठी रांगेत थांबावे लागल्याने त्रास होत असल्याची ओरड आता नेहमीचीच झाली आहे. या पार्श्वभूमीवर ऊन-पावसाचा सामना करीत वर्षानुवर्षे प्रतिकूल परिस्थितीत भारतीय सीमांचे रक्षण करणाऱ्या जवानांनी काय करावे, असा रोखठोक सवाल उपस्थित करून ज्येष्ठ व्यंगचित्रकार मंगेश तेंडुलकर यांनी नोटाबंदीच्या निर्णयाला विरोध करणाऱ्यांवर ‘कुंचला’ फिरवला.
पंडित दीनदयाळ उपाध्याय संस्था आणि आर्ट इंडिया फाउंडेशनच्या वतीने संभाजी उद्यानात आयोजित केलेल्या ‘नोटाबंदी व्यंगचित्रकारांच्या नजरेतून’ या कार्यक्रमात तेंडुलकर यांनी नोटाबंदीच्या निर्णयावरून आकांडतांडव माजवणाऱ्यांची चांगलीच फिरकी घेतली. तेंडुलकर यांच्यासह चारुहास पंडित, खलील खान, विश्वास सूर्यवंशी, घनश्याम देशमुख, लहू काळे आणि वैजनाथ दुलंगे अशा दिग्गज व्यंगचित्रकारांनी या उपक्रमात सहभाग घेतला.
‘मोदींनी नोटा बंद करण्याचा घेतलेला निर्णय योग्य आहे. या निर्णयामुळे आम्हालाही त्रास सहन करावा लागतोय. मात्र, देशाचा दीर्घकालीन विचार करता हा निर्णय भ्रष्टाचार, काळा पैसा, दहशतवाद आणि बनावट नोटांना आळा घालण्यासाठी आवश्यक आहे. या निर्णयामुळे विकास आणि भावी पिढीचे भवितव्य उज्ज्वल आहे. म्हणूनच थोडा त्रास सहन करावा लागला तरी भारतीय या नात्याने सर्वांनीच या निर्णयाला पाठिंबा दिला पाहिजे,’ असे मत तेंडुलकर यांनी व्यक्त केले.
तेंडुलकर यांनी काळा पैसा गिळणारा मासा, पंडित यांनी हताश झालेले दहशतवादी, खलील खान यांनी काळ्या पैशाची साफसफाई, सूर्यवंशी यांनी एटीएम कार्डमुळे सुरक्षितता, घनश्याम देशमुख यांनी उध्दवस्त झालेले माफिया, शौनक संवत्सर यांनी भ्रष्टाचाऱ्यांच्या डोक्यावरून गेलेला सिक्सर, सतीश ठाकूर यांनी चाऱ्याचा पैसा आणि पैशाचा चारा होण्याची दाखवलेली प्रक्रिया, शरयू फारकंडे यांनी कॉमन मॅनला झालेला आनंद, लहू काळे यांनी अच्छे दिन, विजय पराडकर यांचा नोटबंदीचा गुगली, वैजनाथ दुलंगे यांनी काळ्या पैशावाल्यांची दुरवस्था आदी घटना व्यंगचित्रातून उतरवून मोदींच्या निर्णयाचे समर्थन केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


काँग्रेस, ‘राष्ट्रवादी’चा जनआक्रोश

$
0
0

नोटाबंदीविरोधात मोर्चा, मुख्य चौकांमध्ये निदर्शने करून निषेध

म. टा. प्रतिनिधी, पुणे

केंद्र सरकारने पाचशे आणि एक हजार रुपयांच्या नोटांवर बंदी घातल्यामुळे सर्वसामान्यांना होणाऱ्या गैरसोयीकडे लक्ष वेधण्यासाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने सोमवारी ‘जनआक्रोश’ व्यक्त केला. काँग्रेसने नोटाबंदीविरोधात मोर्चा काढला, तर राष्ट्रवादी काँग्रेसने शहरातील मुख्य चौकात निदर्शने करून केंद्र सरकारचा निषेध केला.
केंद्राच्या निर्णयाविरोधात सोमवारी विविध राजकीय पक्षांतर्फे संपूर्ण देशभरात आंदोलन करण्यात आले. त्या अंतर्गत, शहर काँग्रेसने महात्मा फुले मंडई ते कॅम्पपर्यंत मोर्चा काढून जनसामान्यांमध्ये असलेला रोष व्यक्त केला. तर, राष्ट्रवादी काँग्रेसने सर्वसामान्यांच्या व्यथा सरकारपर्यंत पोहोचवण्यासाठी आक्रोश आंदोलन केले.
नोटाबंदीच्या निर्णयानंतर सर्वसामान्य नागरिकांना बँका आणि एटीएमबाहेर ताटकळत थांबावे लागत आहे. कोणतीही सक्षम पर्यायी व्यवस्था निर्माण न करता नोटा रद्द करण्यात आल्याने शेतकरी, मजूर, छोटे व्यावसायिक यांना हालअपेष्टा सहन कराव्या लागत आहेत. बाजारपेठा ठप्प झाल्या असून, दैनंदिन व्यवहारांवरही मोठा परिणाम झाला आहे, याकडे काँग्रेसचे शहराध्यक्ष रमेश बागवे यांनी लक्ष वेधले. बागवे यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आलेल्या मोर्चामध्ये आमदार शरद रणपिसे, अनंत गाडगीळ, युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष डॉ. विश्वजित कदम, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, बाळासाहेब शिवरकर, चंद्रकांत छाजेड, माजी आमदार उल्हास पवार, मोहन जोशी, विरोधी पक्षनेते अरविंद शिंदे, पिंपरी-चिंचवड काँग्रेसचे अध्यक्ष सचिन साठे, अभय छाजेड, कमल व्यवहारे यांच्यासह अनेक नगरसेवक-पदाधिकारी सहभागी झाले होते.
काळ्या पैशाला अंकुश घालण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतलेल्या निर्णयाचे स्वागत असले, तरी नोटा मिळविण्यासाठी नागरिकांना धावपळ करावी लागत आहे. सरकारच्या नियोजनशून्यतेमुळे सर्वसामान्य जनता हवालदिल झाली आहे. नागरिकांच्या व्यथा सरकारपर्यंत पोहोचविण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने आक्रोश आंदोलन केल्याचा दावा राष्ट्रवादी काँग्रेसच्या शहराध्यक्षा अॅड. वंदना चव्हाण यांनी केला. त्यांच्या नेतृत्वाखाली टिळक चौकात झालेल्या आंदोलनात महापौर प्रशांत जगताप, सभागृहनेते बंडू केमसे, स्थायी समितीचे अध्यक्ष बाळासाहेब बोडके, राष्ट्रवादीचे प्रवक्ते अंकुश काकडे, माजी महापौर राजलक्ष्मी भोसले, माजी उपमहापौर दीपक मानकर, माजी सभागृहनेते सुभाष जगताप यांच्यासह अनेक नगरसेवक आणि पदाधिकारी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पुणे-नागपूर व्होल्वो रविवारपासून सुरू

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
नागपूर येथील हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर येत्या चार डिसेंबरपासून राज्य मार्ग परिवहन महामंडळाची पुणे-नागपूर व्होल्वो बस सेवा सुरू होणार आहे. ही बस अकोला आणि अमरावती येथेही थांबणार असल्याची माहिती एसटी महामंडळाने दिली.
ही गाडी रविवारी सायंकाळी सात वाजता शिवाजीनगर आगारातून सुटेल. ती दुसऱ्या दिवशी सकाळी आठ वाजता नागपूरला पोहचेल. नागपूरहून पुन्हा तीच गाडी सायंकाळी सात वाजता निघून दुसऱ्या दिवशी सकाळी आठ वाजता पुण्यात दाखल होईल. गाडीचे तिकीट ऑनलाइन आणि मोबाईल अॅपच्या माध्यमातून आरक्षित करता येणार आहेत. तसेच, आगाऊ बुकिंगसाठी स्वारगेट, शिवाजीनगर, पिंपरी-चिंचवड, पुणे स्टेशन, डेक्कन जिमखाना या आगारांवरही तिकीट आरक्षणाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पुणे विभागातून ठरले ‘एम एच १२’ अव्वल

$
0
0

राज्य हौशी मराठी नाट्यस्पर्धेचा निकाल जाहीर

म. टा. प्रतिनिधी, पुणे

महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेत पुणे केंद्रातून प्रयोग, पुणे या संस्थेच्या एम एच १२ जे १६ या नाटकाला प्रथम पारितोषिक जाहीर झाल्याची घोषणा सांस्कृतिक कार्य संचालनालयाने केली आहे. एम एच १२ जे १६ या नाटकाची अंतिम फेरीसाठी निवड झाली आहे. ७ ते २६ नोव्हेंबर या कालावधीत भरत नाट्य मंदिर येथे राज्य नाट्य स्पर्धेची प्राथमिक फेरी पार पडली. स्पर्धेत २० नाट्यप्रयोग सादर करण्यात आले.
पुणे महानगर परिवहन महामंडळ नाट्य सेवा संघ, पुणे या संस्थेच्या ‘धुवाँ’ या नाटकाला द्वितीय तर, व्यक्ती, पुणे संस्थेच्या ‘कातळडोह’ नाटकाला तृतीय पारितोषिक मिळाले. एम एच १२ जे १६ नाटकाच्या दिग्दर्शनासाठी सुबोध पंडे यांस प्रथम, ‘धुवाँ’साठी द्वितीय जगन्नाथ निवंगुणे यांना द्वितीय पारितोषिक मिळाले.
प्रकाश योजनेसाठी श्रीकांत भिडे (न मिळालेले पत्र) यांना प्रथम, अक्षय पवळे (ट्रिपल सीट) यांना द्वितीय पारितोषिक मिळाले. नेपथ्यासाठी प्रथम पारितोषिक निश्रय अटल (एम एच १२ जे १६), द्वितीय पारितोषिक सुयश झुंजुरके (कातळडोह) यांना मिळाले. नरेंद्र वीर (धुवाँ) आणि आशिष देशपांडे (स्वराज्याचा चौथा खांब) यांना रंगभूषेसाठी प्रथम आणि द्वितिय पारितोषिक मिळाले. उत्कृष्ट अभिनयाचे रौप्यपदक जयदीप मुजुमदार (एम एच १२ जे १६) आणि शर्वरी जाधव (धुवाँ) यांना मिळाले. अभिनयासाठी गुणवत्ता प्रमाणपत्रे शाल्वी बोरळकर, ऋतुजा गद्रे, श्रुती पेंडसे-गोडसे, शर्वाणी नाईक, सुधन्वा पानसे, धनंजय सरदेशपांडे, अमर गायकवाड आणि राहुल बेलापूरकर यांना मिळाले. परीक्षक म्हणून मधू जाधव, मुकुंद मराठे व कमल हावले यांनी काम पाहिले. सर्व पुरस्कार विजेत्यांचे सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांनी अभिनंदन केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

​‘कलावंतांनी गतिरोधक व्हावे’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
‘सामान्य माणसाला न्याय मिळावा, हे मूल्य मागे पडले आहे. सत्तेवर कोण आहे, याने फारसा फरक पडत नाही, कारण आमच्यामध्ये फरक उरलेला नाही. राजकारणात गोंधळ माजला असून समाजही समतोल नाही. अशा वेळी साहित्यिक-कलावंत यांनी गतिरोधक म्हणून काम करायचे नाही तर कोणी करायचे,’ असा सवाल विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी मंगळवारी उपस्थित केला. ‘आम्हाला मत मागायचे असते म्हणून बंधन येते; पण तुम्हाला मत मागायचे नाही, तुम्ही बोलू शकता,’ असा टोला त्यांनी लगावला.
महाराष्ट्र साहित्य परिषदेतील माधवराव पटवर्धन सभागृहाच्या अमृतमहोत्सवी सोहळ्यात ते बोलत होते. या वेळी साहित्य संमेलनाध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस, ज्येष्ठ साहित्यिक द. मा. मिरासदार, ज्येष्ठ व्यवस्थापनतज्ज्ञ डॉ. प्र. चिं. शेजवलकर, परिषदेचे विश्वस्त उल्हास पवार, कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, प्रमुख कार्यवाह प्रकाश पायगुडे, कोषाध्यक्ष सुनीताराजे पवार उपस्थित होते.
‘सरकार ही व्यवस्था संकुचित होत असून राजकारणी व सरकारकडून अपेक्षा ठेवण्यात फारसा अर्थ नाही. सत्तेचा गैरवापर होऊ नये,’ अशी अपेक्षा व्यक्त करून निंबाळकर म्हणाले, ‘साहित्यनिर्मिती आधुनिक होत आहे, तशी ही वास्तूदेखील मूळ ढाचा ठेवून आधुनिक व्हावी. साहित्य परिषदेने सर्व साहित्य व नोंदी जपून ठेवण्यासाठी आधुनिक ग्रंथालय उभा करावे.’
‘भिंती, वास्तू अजरामर असतात. त्यांचा इतिहास संपत नसतो. सरकारी विश्रामगृहाला या सभागृहासारखे कार्यक्रम अनुभवता येत नाहीत. लोकांच्या वेदना अनुभवता आल्या असतील; पण या सभागृहात वेदनामुक्तीचा हुंकार उमटला आहे,’ याकडे डॉ. सबनीस यांनी लक्ष वेधले.

रामराजे यांची फटकेबाजी
‘पटवर्धन सभागृहासाठी निंबाळकर यांचे आजोबा मालोजीराजे यांनी साडेतीन हजार रुपये दिले. आता रामराजे यांनी ३५ कोटी नाही तर एक कोटी मदत म्हणून द्यावेत,’ अशी मागणी डॉ. श्रीपाल सबनीस यांनी केली. हा धागा पकडत रामराजे नाईक-निंबाळकर यांनी जोरदार फटकेबाजी केली. ‘राजकारण्यांकडे पैसा असतो असा समज आहे. पण माझ्याकडे पैसाच नाही. जे आहे ते वडीलोपार्जित असून ते विकून राजकारण केले. कमाविण्यासाठी राजकारण केले नाही. आम्ही चलनबाह्य कधी होऊ सांगता येत नाही. राजकारणी प्रामाणिक नाहीत. पण जे प्रामाणिक नसतात, त्यांच्याबरोबर मी नसतो. कोण प्रामाणिक हे मीच ठरवतो,’ अशा शब्दांत त्यांनी सबनीसांची फिरकी घेतली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विधिमंडळाचे कामकाज अधिवेशनानंतर पेपरमुक्त

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
‘विधिमंडळाचे कामकाज हिवाळी अधिवेशनानंतर पेपरमुक्त होणार आहे. यापुढे टॅबच्या मदतीने कामकाज चालवले जाईल,’ अशी माहिती विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांनी मंगळवारी पत्रकारांना दिली.
एका कार्यक्रमानंतर निंबाळकर यांनी पत्रकारांशी संवाद साधला. विधिमंडळाचे कामकाज, विधिमंडळासाठी स्वतंत्र वाहिनी याबाबत त्यांनी माहिती दिली.
निंबाळकर म्हणाले, ‘विधिमंडळाचे कामकाज नागपूरच्या हिवाळी अधिवेशनानंतर पेपरमुक्त होणार आहे. यापुढे टॅबच्या मदतीने कामकाज चालवले जाईल. हातात कागद घेऊन यापुढे कामकाज होणार नाही. प्रत्येकाच्या हातात टॅब असतील. त्यासाठी सध्या प्रयत्न सुरू आहेत. काम अंतिम टप्प्यात आले असून नागपूरच्या हिवाळी अधिवेशनानंतर ते प्रत्यक्षात सुरू होईल.’
‘राज्यसभा आणि लोकसभा या संसदेच्या सभागृहांसाठी स्वतंत्र वाहिनी आहे. या सभागृहांचे काम वाहिनीवरून प्रक्षेपित केले जाते. याप्रमाणे राज्याच्या विधिमंडळातील विधानपरिषद आणि विधानसभा या दोन सभागृहांसाठी स्वतंत्र वाहिनी असावी आणि तेथून कामकाज प्रक्षेपित व्हावे, ही मागणी जुनी आहे. मात्र ती अद्याप प्रत्येक्षात सुरू झालेली नाही. या वाहिनीसाठीही प्रयत्न सुरू असून लवकरच ती सुरू होईल. त्यावरून विधिमंडळाचे कामकाज प्रक्षेपित केले जाईल,’ असेही निंबाळकर म्हणाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images