Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

​‘अवयवदाना’चे अर्धशतकही पुण्यातच

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
राष्ट्रीय अवदान दिनाच्या पार्श्वभूमीवर ससून सरकारी हॉस्पिटलमध्ये रविवारी दुसऱ्यांदा अवयवदान करण्यात आले. ‘ब्रेनडेड’ पेशंटच्या अवयवदानामुळे शहरातील ५१ वे यकृत दान झाले. त्याशिवाय अवयवदानाचे अर्धशतकही पुण्यात पूर्ण झाल्याने या घटनेला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.
पश्चिम महाराष्ट्रातील गरीबांचे हॉस्पिटल समजल्या जाणाऱ्या ससून हॉस्पिटलमध्ये आता गेल्या काही दिवसांत हे दुसरे अवयवदान करण्यात यश आले. काही दिवसांपूर्वीच २९ वर्षांच्या तरुणाचा अपघाती मृत्यू झाला होता. त्यानंतर त्याला ससून सरकारी हॉस्पिटलमध्ये ‘ब्रेनडेड’ जाहीर करण्यात आले. त्याचे पहिले अवयवदान ससूनमध्ये करण्यात आले. त्यामुळे सरकारी हॉस्पिटलमधील ही पहिलीच अवयवदानाची घटना मानली गेली. त्यानंतर रविवारी पुन्हा दुसरे अवयवदान झाले.
‘पुण्यातील ४८ वर्षांच्या महिलेचा अपघात झाला. ससून हॉस्पिटलमध्ये या महिलेला ‘ब्रेनडेड’ जाहीर करण्यात आले. त्यानंतर अवयवदान करण्यासाठी नातेवाइकांना ससून हॉस्पिटलच्या सामाजिक वैद्यकीय अधिकाऱ्यांनी समुपदेशन केले. त्यात यश आले. त्यामुळे नातेवाइकांनी अवयवदान करण्यास संमती दिली. परिणामी, ससून हॉस्पिटलमधील हे गेल्या काही दिवसांतील दुसरे अवयवदान ठरले आहे. ब्रेनडेड पेशंटचे केवळ यकृतच दान करण्यात आले,’ असे अधिष्ठाता डॉ. अजय चंदनवाले यांनी सांगितले. दरम्यान, पेशंटचे डोळे ससून हॉस्पिटलमध्ये गरजूंना रोपण करण्यासाठी ठेवण्यात आल्याचे सांगण्यात आले.
दरम्यान, पेशंटचे मूत्रपिंड वापरण्यासाठी उपयुक्त नव्हते. त्यामुळे ते दान करता आले नाही. पेशंटचे यकृत सह्याद्री हॉस्पिटलमधील गरजू पेशंटला देण्यात आले आहे. शहरातील यकृत दान करण्याची ही ५१ वी घटना आहे. तर अवयवदानाची ही ५० वी घटना आहे,’ असे प्रादेशिक अवयव प्रत्यारोपण समन्वय समितीच्या समन्वयक आरती गोखले यांनी सांगितले.
‘सह्याद्री हॉस्पिटलमध्ये गेल्या सहा महिन्यांपासून एका ४२ वर्षांच्या पेशंटवर यकृताचे उपचार सुरू होते. लिव्हर सिरॉसिसचा आजार झाला होता. त्यापूर्वी पेशंटना दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये उपचार घेत होता. त्यानंतर तो पेशंट सह्याद्रीत दाखल झाला. त्याला यकृत बसविण्याची गरज होती. योग्य ते यकृत मिळाल्याने अखेर त्याच्यावर रोपण करण्याचे ऑपरेशन रविवारी रात्री उशिरापर्यंत सुरू होते,’ अशी माहिती सह्याद्री हॉस्पिटलचे यकृत प्रत्यारोपण तज्ज्ञ डॉ. बिपीन विभुते यांनी दिली. या ऑपरेशनसाठी सह्याद्री हॉस्पिटलचे यकृत तज्ज्ञ डॉ. बिपीन विभुते, भूलतज्ज्ञ डॉ. मनीष पाठक, डॉ. अनुराग श्रीमल, डॉ. राहुल सक्सेना, डॉ. अभिजित माने आदींनी परिश्रम घेतले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


​‘संघटित लूट तर यूपीएच्या काळात’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
‘यूपीए सरकारच्या काळात लाखो कोटींचे घोटाळे झाले. टूजी घोटाळा, स्पेक्ट्रम घोटाळा यासह कोळसा घोटाळा ही तर संघटित लुटीची परिसीमाच होती. आम्ही आता भ्रष्टाचार आणि काळ्यापैशांविरोधात प्रामाणिक प्रयत्न करत आहोत, तेव्हा त्याला तुम्ही संघटित लूट कसे म्हणता,’ असा टोला केंद्रीय ऊर्जामंत्री पीयूष गोयल यांनी माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांना हाणला.
एका व्याख्यानात व त्यानंतर पत्रकारांशी बोलताना गोयल यांनी मनमोहन सिंग यांच्यावर हल्ला चढवला. मोदी सरकारचा नोटाबंदीचा निर्णय म्हणजे संघटित लूट होती, असा आरोप डॉ. मनमोहन सिंग यांनी संसदेत केला होता. सिंग यांच्या वयाचा मान राखून त्या वेळी काही बोललो नाही, असे सांगत गोयल यांनी सिंग यांच्यावर निशाणा साधला. ‘मी ऊर्जामंत्री असताना कोळसा घोटाळ्यासंदर्भातील फाइल उघडून त्याचा अभ्यास केला. ते पाहून ही संघटित लुटीची परिसीमा असल्याचे स्पष्ट झाले. केवळ कोळसाच नव्हे; तर अन्य बडे घोटाळेही त्यांच्याच काळात झाले. आमच्या सरकारने कोळसा खाणींच्या लिलावासाठी पारदर्शी पद्धत वापरली. त्यातून सरकारला मोठे उत्पन्न मिळाले,’ असे गोयल म्हणाले.
सोमवारी विरोधकांनी पुकारलेल्या ‘भारत बंद’विषयी बोलताना गोयल म्हणाले, ‘प्रत्येक समजूतदार व्यक्ती नोटाबंदीच्या निर्णयाचे समर्थन करत आहे. मात्र, ज्यांना या निर्णयाचा राजकीयदृष्ट्या किंवा व्यक्तिगत फटका बसला आहे, अशा व्यक्तीच या निर्णयाविरोधात आंदोलन करत आहेत. सामान्य नागरिक या बंदमध्ये सहभागी होणार नाहीत.’

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मोर्चात कार्यकर्ते पुढे अन् नेते मागे

$
0
0

बडेजाव न मिरवता सामान्य जनतेबरोबर मोर्चात सहभागी

म. टा. प्रतिनिधी, पुणे

राजकीय पक्ष कोणतेही असले, तरी संविधानाचा सन्मान या एकाच भावनेने सर्व राजकीय नेते आपापले पक्षाचे झेंडे बाजूला ठेवून सामान्य कार्यकर्त्याच्या भूमिकेत मोर्चात सहभागी झाले होते. या राजकीय नेत्यांच्या एकीच्या बळातून विराट जनसमुदाय एकाच झेंड्याखाली एकवटला.
मोर्चाच्या निमित्ताने रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या (आरपीआय) नेत्यांबरोबरच सर्वच राजकीय पक्षांचे नेते एकत्र आले होते. ​त्यामध्ये खासदार संजय काकडे, पद्मश्री मिलिंद कांबळे, काँग्रेसचे शहराध्यक्ष रमेश बागवे, माजी मंत्री चंद्रकांत छाजेड, आमदार जयदेव गायकवाड, माजी आमदार दीप्ती चवधरी, ‘आरपीआय’चे नेते डॉ. राजेंद्र गवई, अविनाश महातेकर, माजी महापौर रजनी त्रिभुवन, ‘आरपीआय’चे पुणे महापालिकेतील गटनेते डॉ. सिद्धार्थ धेंडे, काँग्रेसचे पुणे महापालिकेतील गटनेते अरविंद शिंदे, नगरसेवक अविनाश बागवे, माजी नगरसेवक नवनाथ कांबळे, लक्ष्मण आरडे, नगरसेविका चंद्रकांता सोनकांबळे आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला शहराध्यक्षा रुपाली चाकणकर आदी सहभागी​ झाले होते.
मोर्चात राजकीय नेते सहभागी झाले, तरी त्यांनी सामान्य कार्यकर्त्यांची भूमिका पत्करली होती. मोर्चाच्या अग्रस्थानी तरुणी आणि महिला होता. हेवेदावे विसरून राजकीय मंडळी एकाच मार्गाने निघाल्याचे चित्र या निमित्ताने पहायला मिळाले. मोर्चाच्या प्रारंभापासून ते सांगता होईपर्यंत मोर्चाची सूत्रे तरुणी आणि महिलांच्या हाती होती. सर्वच राजकीय नेत्यांनी सामान्य नागरिकाप्रमाणे सहभागी होण्याची भूमिका घेऊन नवा पायंडा घातला.
..
स्वयंसेवकांची शिस्त वाखाणण्याजोगी
संविधानाच्या सन्मानासाठी विविध जाती-धर्मांतील लाखोंचा जनसमुदाय रस्त्यावर उतरूनही अत्यंत शिस्तीत रविवारी संविधान सन्मान मूक मोर्चा काढण्यात आला. पोलिस आणि स्वयंसेवकांच्या एकमेकांतील समन्वयामुळे मोर्चा ठरलेल्या मार्गाने मार्गस्थ झाला. मोर्चादरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडला नाही.
पुणे शहर आणि जिह्यातील विविध भागांतून मोठ्या संख्येने लोक मोचार्साठी येण्याची शक्यता गृहीत धरून पुणे पोलिसांनी नियोजन केले होते. संयोजकांनीही मोर्चाच्या नियोजनासाठी दोन हजार स्वयंसेवकांची नेमणूक केली होती. मोर्चा मार्गावर ठरावीक अंतरावर स्वयंसेवकांना थांबण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. त्यामुळे मोर्चा मार्गस्थ असताना सहभागींना मार्ग सांगण्यापासून विविध सूचना देण्याची कामे त्यांनी चोख केली. जिल्ह्यातून आणि उपनगरातून येणाऱ्या नागरिकांची वाहने लावण्याची व्यवस्था शहराच्या मध्यवर्ती भागापासून दूर असलेल्या शाळा, कॉलेजांच्या मैदानांवर करण्यात आली होती. नागरिकांनीही नियमांचे पालन करीत वाहने मध्यवर्ती भागात आणण्याचा मोह टाळला. त्यामुळे मध्यवस्तीतील अरूंद रस्तेही मोकळे राहिले. त्यामुळे मोर्चा संपल्यानंतर रस्ते वाहतुकीसाठी खुले केल्यानंतरही अडथळा निर्माण झाला नाही.
मोर्चाच्या मार्गावर ध्वनीवर्धक यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली होती. दुपारी पावणेतीन वाजण्याच्या सुमारास मोर्चा कौन्सिलच्या परिसरात पोहोचला. पावणेपाचच्या सुमारास मोर्चाची सांगता झाली. त्यानंतर मोर्चात सहभागी झालेले नागरिक परतण्यास सुरुवात झाली. नागरिकांना परतीच्या मार्गाबाबत ध्वनीवर्धकाद्वारे सूचना दिली गेल्याने परतीच्या मार्गावर फारशी गर्दी झाली नसल्याचे दिसून आले.
..
दिव्यांगांचाही समावेश
संविधान सन्मान मूक मोर्चात राज्याच्या विविध ठिकाणाहून आलेल्या नागरिकांमध्ये महिलांची संख्या देखील मोठ्या प्रमाणात होती. या सर्वांमध्ये व्हिलचेअरवर बसून मोर्चात सहभागी झालेल्या एका महिलेने सर्वांचे लक्ष वेधले. या दिव्यांग महिलेने पाळीव कुत्र्यासह मोर्चात सहभाग घेतला. नागरिकांनी त्यांना मोर्चा दरम्यान ठिकठिकाणी मदत केली. त्यांच्या उत्साहामुळे अनेकांना प्रेरणा मिळाली.

पोलिसांचा चोख बंदोबस्त

संविधान सन्मान मूक मोर्चासाठी पोलिसांकडून चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. मोर्चामार्गावर दोन हजार पोलिस तैनात करण्यात आले होते.
डेक्कन येथील छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्यापासून मोर्चाला दुपारी सव्वाबाराच्या सुमारास सुरुवात झाली. मोर्चाच्या नियोजनासाठी रविवारी पहाटेपासून बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. दहा पोलिस उपायुक्त, १६ सहायक आयुक्त, राज्य राखीव पोलिस दलाच्या दोन तुकड्या, शीघ्र कृती दलाच्या पाच तुकड्या आणि दीड हजार पोलिस कर्मचारी आणि अधिकारी बंदोबस्तासाठी तैनात होते. त्यांना मोर्चातील दोन हजार स्वयंसेवकांनी मदत केली. मोर्चासाठी डेक्कन परिसर आणि कौन्सिल हॉल परिसरात वॉच टॉवर उभारण्यात आले होते. या वॉच टॉवरवरून मोर्चावर नजर ठेवली जात होती. चौकाचौकात बंदोबस्त असल्यामुळे गर्दीचे नियोजन करणे शक्य झाले. हा मोर्चा शांततेत पार पडल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.

वाहतूक पोलिसांचे नियोजन
डेक्कन परिसरात गर्दी जमा होण्यास सुरुवात झाल्यानंतर पोलिसांनी येथील वाहतूक बंद केली. मोर्चाला दुपारी सुरुवात झाल्यानंतर मोर्चामार्गावर बॅरीकेटिंग करून वाहतूक वळविण्यात आली. मोर्चा संपताच बंद केलेले रस्ते वाहतुकीसाठी खुले करण्यात आले. सुट्टीचा दिवस असल्यामुळे रस्त्यावर गर्दी झाल्यामुळे काही ठिकाणी वाहतुकीची कोंडी झाली होती. पण, वाहनचालकांनी पोलिसांच्या सूचनांचे पालन केल्याने कोंडी झाली नाही. दुपारी तीननंतर डेक्कन परिसरातील वाहतूक सुरळीत सुरू झाली होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

हडपसरमध्ये पकडली पंचवीस लाखांची रोकड

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

एक हजार आणि पाचशे रुपयांच्या नोटा चलनातून बाद केल्यानंतर काळा पैसा कायदेशीर करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. काळे पैसे पांढरे करणाऱ्या दोघांकडून आतापर्यंत दोन कोटी रुपये ताब्यात घेण्यात आले आहेत. या पार्श्वभूमीवर हडपसर पोलिसांनी जुन्या नोटा बदली करण्यासाठी आलेल्या दोघांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून २५ लाखांची रोकड शनिवारी जप्त केली.
निर्मल किरण हिरण (वय ३६, रा. शांतीनगर सोसायटी, कोंढवा), आशिष माणिकचंद सोळंकी (वय ३६, रा. भवानी पेठ) अशी या दोघांची नावे आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हडपसर येथील ससाणे नगर येथे दोघेजण जुन्या नोटा बदलण्यासाठी येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार शनिवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास सापळा रचून या दोघांना ताब्यात घेतले. दुचाकीच्या डिकीतून हजार रुपयांच्या अडीच हजार नोटा त्यांच्याकडे आढळल्या. त्यांची चौकशी केल्यानंतर हार्डवेअर व्यापारी सुभाष व्यंकटेश कामत (वय ४९) यांच्या पिंपळे सौदागर येथील घराची आणि दुकानाची झडती घेण्यात आली. पण त्यात काहीही आक्षेपार्ह आढळले नाही. या रकमेबाबत प्रा​प्तिकर विभागाला कळविण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सरकारी वनजमिनी नष्ट होण्याच्या मार्गावर

$
0
0

ज्येष्ठ पर्यावरणतज्ज्ञ डॉ. माधव गाडगीळ यांची टीका

म. टा. प्रतिनिधी, पुणे

‘वन विभागाने किंवा सरकारने आदिवासींना नियंत्रणासाठी दिलेल्या वनजमिनी अजूनही चांगल्या आहेत. आदिवासी तेथील जैवविविधता टिकून राहण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. मात्र, वन विभागाच्या किंवा सरकारी नियंत्रणाखाली असलेल्या वनजमिनी नष्ट होत आहेत. याची राज्य सरकारला काळजीच नाही,’ अशी टीका ज्येष्ठ पर्यावरण तज्ज्ञ डॉ. माधव गाडगीळ यांनी रविवारी केली.
मराठी विज्ञान परिषदेच्या वतीने आयोजित एका जाहीर कार्यक्रमात डॉ. गाडगीळ बोलत होते. डॉ. गाडगीळ म्हणाले, ‘आदिवासी किंवा वनजमिनींवर हक्क सांगणारी मंडळी त्या जमिनीवर देवराया लावत आहेत. गडचिरोली आणि चंद्रपूरमध्ये या लोकांनी मोठ्या प्रमाणात देवराया लावल्या आहेत. त्यामुळे पर्यावरणाला फायदा होत आहे. लोकांना या जमिनींपासून फायदा होत असल्याने ते या जमिनींची काळजी घेत आहेत. तेथील जैवविविधता टिकून आहे. याउलट सरकारी नियंत्रणाखाली जेवढी काही जमीन आहे, त्यावर नीट नियंत्रण नसल्याने या जमिनी उद्धवस्त होण्याच्या मार्गावर आहेत. सरकारी यंत्रणांनी नॅशनल पार्क निर्माण केल्या किंवा वनजमिनींवर सरकारी हक्क आणल्यास त्यातील जैवविविधेचे संरक्षण होणार असे नाही.’
राज्य सरकारला पश्चिम घाटाच्या जैवविविधतेबाबत जो अहवाल दिला होता, तो त्यांनी स्वीकारला नाही. तापी खोरे ते कन्याकुमारीपर्यंतचा अभ्यास करूनच पुराव्यानिशी अहवाल तयार करण्यात आला होता. मात्र, सरकारला ते रुचले नाही. तरीही पश्चिम घाटाचा लढा सुरूच राहील, असेही डॉ. गाडगीळ म्हणाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शहरातील पारा ९.३ अंशांवर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

पुण्यातील पारा ९.३ अंश सेल्सिअसपर्यंत उतरला असून, पुणेकरांना आता पुन्हा हुडहुडी भरायला लागली आहे. पुण्यात रविवारी नोंदले गेलेले किमान तापमान राज्यातील सर्वांत नीचांकी तापमान होते. पुढील दोन दिवसात तापमानात आणखी काहीशी घट होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.
उत्तरेकडील राज्यात तापमानात घट झाली आहे. पंजाब, हरियाणा, चंदिगड, दिल्ली, राजस्थान या उत्तरेकडील राज्यांसह मराठवाड्यातही तापमानात तीन ते पाच अंशांची घट झाली आहे. तेथून राज्याकडे वाहणाऱ्या थंड व कोरड्या वाऱ्यांमुळे राज्यातील थंडीचा कडाकाही वाढला आहे. पुढील दोन दिवस परिस्थिती अशीच राहून किमान तापमानात काहीशी घट होण्याची शक्यताही वर्तविण्यात आली आहे. रविवारी नाशिक येथे ९.८, जळगाव येथे १०, महाबळेश्वर येथे १६, सातारा येथे ११.८, औरंगाबाद येथे १३.४, परभणी येथे १२.६, अकोला येथे १२.४, नागपूर येथे १२.५ अंश सेल्सिअस इतके किमान तापमान नोंदले गेले. त्यामुळे राज्यातही थंडीचा प्रभाव जाणवत होता.
गेल्या दोन दिवसांपासून पुण्यात थंडीचा कडाका पुन्हा एकदा जाणवू लागला आहे. रविवारी थंडी वाढल्यामुळे स्वेटर, शाल, टोपी, जर्किन असा जामानिमा केलेले नागरिक पुन्हा दिसू लागले आहेत. तर सायंकाळनंतर काही ठिकाणी शेकोट्याही पेटू लागल्या आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

​कराड यांना धक्काबुक्की

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
आळंदी येथील श्री ज्ञानेश्वर महाराज समाधी मंदिरात दर्शनाची रांग मोडून प्रवेश देण्यावरून तसेच नैवेद्य दाखवण्यावरून ‘एमआयटी’चे प्रमुख प्रा. विश्वनाथ कराड आणि त्यांचे कुटुंबीय आणि देवस्थानचे पदाधिकारी यांच्यात बाचाबाची झाल्याची घटना रविवारी सकाळी पावणेबाराच्या दरम्यान घडली. याच दरम्यान कराड यांच्या सुरक्षारक्षकांनी तेथील उपस्थितांवर हात उगारल्यानंतर रांगेतील मंडळींचा संयम सुटून त्यांनी कराड यांच्यासोबतच्या सर्वांनाच ‘प्रसाद’ दिला. या घटनेमुळे समाधी मंदिरातील वातावरण काही काळ तंग झाले होते.
देवस्थानच्या वतीने दुपारी नैवेद्य दाखविल्यानंतर कराड कुटुंबीयांच्या वतीने गेली काही वर्षे नैवेद्य दाखविण्यात येतो. रविवारी दुपारीही प्रा. कराड आपल्या कुटुंबीयांसह तसेच सुरक्षारक्षकांसह मंदिर परिसरात दाखल झाले. ते सर्व महाद्वारातून आत आले होते व पाठीमागील मुक्ताई मंदिरासमोरून आत जाण्यास थांबले होते. येथील दरवाजाने आत जाण्यासाठी लागणाऱ्या कुलुपाची चावी घेण्यासाठी कराड कुटुंबातील एक व्यक्ती मंदिर समितीच्या कार्यालयात दाखल झाली होती.
यावेळी कराड यांना देवस्थानच्या वतीने अजून नैवैद्य दाखविण्यात आला नसल्याने नैवेद्य दाखविण्याची घाई करण्यात येऊ नये, असे सांगण्यात आले होते. अद्यापपर्यंत सोहळा पार पडलेला नसल्याचे त्यांच्या निदर्शनास आणण्यात आले होते. त्यानंतर किल्ली मागणारी व्यक्ती तेथून निघून गेली होती. दरम्यान, कराड यांच्या सुरक्षारक्षकांनी तेथील बांबू सोडून कराड कुटुंबीयांना मंदिरात प्रवेश दिला. मंदिर समितीच्या कार्यालयात ही माहिती समजताच तेथील पदाधिकारी तसेच इतर व्यक्ती तत्काळ मंदिरात दाखल झाल्या आणि त्यांनी कराड यांना नैवद्य दाखवू नये, असे सांगितले. यावेळी झालेल्या बोलाचालीचे पर्यावसान बाचाबाचीत झाले. समितीतील एका व्यक्तीच्या पाठीवर मारहाण करण्यात आली; तसेच कराड यांच्या सुरक्षारक्षकांनीही तेथील उपस्थितांना धक्काबुक्की केली. त्यानंतर तेथे दर्शनासाठी आलेल्यांचा संयम संपला व त्यांनी या सर्वांनाच धक्काबुक्की करीत मंदिराच्या बाहेर जाण्यास भाग पाडल्याची माहिती संबंधितांना दिली.
दरम्यान, कराड यांनी हा वाद थांबविण्यासाठी उपस्थितांची तसेच पदाधिकाऱ्यांची माफी मागण्याचा प्रयत्न केला. तसेच त्यांच्याबरोबर असेल्या कर्नल तांदळे (निवृत्त) व इतर अधिकाऱ्यांनी मंदिर समितीच्या विश्वस्तांची माफी मागितली. ही घटना घडताच आळंदी येथे बंदोबस्तासाठी उपस्थित असलेले पोलिस अधिकारी मंदिर समितीच्या कार्यालयात दाखल झाले होते. पदाधिकाऱ्यांनी या बाबत पोलिसामध्ये तक्रार करण्याची भूमिका घेतल्यानंतर कराड यांनी याप्रकरणी माफी मागून या प्रकारावर पडदा पाडण्याची विनंती केली. त्यानंतर पोलिसांच्या मध्यस्थीनंतर दोन्ही बाजूंनी या प्रकारावर पडदा टाकण्यात आल्याचे सांगण्यात आले. मात्र उपस्थितांमध्ये या प्रकाराची चांगलीच चर्चा रंगली होती.

आळंदीच्या देवस्थान समितीचे कृत्य हे देवस्थानच्या पावित्र्याला काळिमा फासणारे आहे, असा दावा ‘माईर्स एमआयटी’ व विश्वशांती केंद्रातर्फे करण्यात आला आहे, तर डॉ. विश्वनाथ कराड यांचे आरोप धादांत खोटे असून सीसीटीव्ही फूटेजमधून सत्य बाहेर येईल, असे आळंदी देवस्थानतर्फे स्पष्ट करण्यात आले आहे.
‘सीसीटीव्ही फूटेजमध्येच सत्य समोर येईल’

‘डॉ. विश्वनाथ कराड यांनी केलेले आरोप धादांत खोटे आहेत. याबाबतची वस्तुस्थिती देवस्थानतर्फे सोमवारी अधिकृत प्रसिद्धीपत्रकाद्वारे जाहीर केली जाईल. मंदिरात सीसीटीव्ही असून त्यात हा सर्व प्रकार कैद झाला आहे. हे सीसीटीव्ही फूटेजही जाहीर केले जाईल. विश्वशांतीबाबत सातत्याने बोलणाऱ्या व्यक्तींनी माउलींच्या मंदिरात समाधी कीर्तनावेळी अशा प्रकारे शांतता भंग करणे योग्य नाही, एवढेच त्यांना सांगण्यात आले होते.’
- अजित कुलकर्णी, मुख्य विश्वस्त, आळंदी देवस्थान
‘देवस्थान समितीचे कृत्य काळिमा फासणारे’

‘श्री क्षेत्र आळंदी देवस्थान समितीचे अध्यक्ष अजित कुलकर्णी यांचे कृत्य देवस्थानच्या पावित्र्याला काळिमा फासणारे आहे. अनेक वर्षांच्या परंपरेप्रमाणे नैवेद्य दाखविण्यासाठी कुलकर्णी यांना विनंती करूनही त्यांनी परवानगी दिली नाही. मात्र, देवस्थानचे काही कर्मचारी व ग्रामस्थांनी दरवाज्याच्या दोऱ्या सोडवून कराड सरांना आत सोडले. मात्र, त्यानंतर कुलकर्णी व सहकाऱ्यांनी डॉ. विश्वनाथ कराड व कुटुंबीयांना घेराव घालून अरेरावी, धक्काबुक्की केली. यात महिला कीर्तनकार व अन्य व्यक्तींनाही गंभीर मारहाण करण्यात आली. या विश्वस्त मंडळाची त्वरित बरखास्ती करण्यात यावी, अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.’
- कर्नल विलास तांदळे (नि), संचालक, सुरक्षा व दक्षता, एमआयटी समूह

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अस्सल ग्रामीण साहित्यातून ‘आनंद’ देणारा साहित्यिक

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
‘झोंबी’ या आत्मचरित्रपर कादंबरीमुळे डॉ. आनंद यादव यांची ओळख संपूर्ण देशाला झाली. ‘झोंबी’ला १९९० मध्ये साहित्य अकादमीचा पुरस्कार प्राप्त झाला होता. नांगरणी, घरभिंती, काचवेल, गोतावळा, नटरंग, झाडवाटा, उगवती मने यासह त्यांची अनेक पुस्तके लोकप्रिय झाली. ‘नटरंग’ या त्यांच्या कादंबरीवर काही वर्षांपूर्वी त्याच नावाचा मराठी चित्रपट प्रदर्शित झाला होता.
डॉ. यादव यांचा जन्म कोल्हापूर जिल्ह्यामधील कागलचा. आनंदा रत्नाप्पा जकाते हे त्यांचे मूळ नाव. अत्यंत गरीब कुटुंबातील यादव यांना शिक्षणासाठी घरून पाठिंबा नव्हता. त्यामुळे, यादव यांनी सुरुवातीचे शिक्षण कोल्हापूर येथे पूर्ण करून पुढील शिक्षणासाठी पुणे गाठले. शिक्षणाचा ध्यास घेतलेल्या डॉ. यादव यांना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात प्रपाठक म्हणून काम करण्याची संधी लाभली; तसेच, विद्यापीठाच्या मराठी विभागाचे प्रमुख म्हणून ते निवृत्त झाले.
विद्यापीठात मराठीचे प्राध्यापक म्हणून काम करण्याआधीपासूनच त्यांनी लेखन सुरू केले होते. ग्रामीण साहित्य, ग्रामसंस्कृती हे त्यांच्या आवडीचे विषय होते. ग्रामीण साहित्याला ओळख निर्माण करून देण्यात डॉ. यादव यांचा महत्त्वाचा वाटा होता.

दुर्दैवी अध्यक्ष
महाबळेश्वर येथे २००९ मध्ये झालेल्या ८२ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी डॉ. यादव यांची निवड झाली होती. याच दरम्यान त्यांनी लिहिलेल्या ‘संतसूर्य तुकाराम’ या त्यांच्या कादंबरीवरून वाद उद्भवला. या पुस्तकात संतश्रेष्ठ तुकारामांविषयी अनुचित मजकूर असल्याचा आरोप करत वारकरी संप्रदायाने डॉ. यादव यांना तीव्र विरोध केला. देहू येथे जाऊन डॉ. यादव यांनी पुस्तक मागे घेतल्याचे जाहीर केले होते. तरीही, त्यांना संमेलनात अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारता आली नाहीत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


वंचित, अपंगानाही नियोजनात सामावून घ्या

$
0
0

दुर्बल घटकांसाठी कार्यरत संस्थांच्या प्रतिनिधींची आग्रही मागणी

म. टा. प्रतिनिधी, पुणे

सर्वसामान्य नागरिकांप्रमाणेच शहरातील अपंग आणि वंचितांच्याही महापालिकेकडून अनेक अपेक्षा आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून हा समाज त्यांच्या मागण्यांसाठी लढत आहे. शहराच्या विकासात विविध प्रकारे हातभार लावणाऱ्या या घटकांनाही न्याय मिळाला पाहिजे, अशी अपेक्षा दुर्बल घटकांसाठी काम करणाऱ्या संस्थांच्या प्रतिनिधींनी व्यक्त केली.
पुणे महापालिकेच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सामान्य नागरिकांसह विविध घटकांच्या अपेक्षा जाणून घेण्यासाठी ‘महाराष्ट्र टाइम्स’ने पुढाकार घेतला आहे. शहरातील अपंग व्यक्ती, देवदासी, तृतीय पंथी, रस्त्यावर राहणाऱ्या नागरिकांसाठी काम करणाऱ्या संस्थांच्या प्रतिनिधींची मते आम्ही जाणून घेतली. पालिकेचे शैक्षणिक धोरण, सार्वजनिक व्यवस्था, वैद्यकीय यंत्रणा, वाहतूक धोरण या मुद्द्यांवर त्यांनीही परखडपणे मते नोंदवली.

मीना कुर्लेकर, वंचित विकास संस्था
गेल्या अनेक वर्षांपासून चालत आलेला वेश्या व्यवसाय पूर्णतः थांबवणे शक्य नाही. शहरात लालबत्ती विभाग सोडून अन्य ठिकाणी वेश्या व्यवसाय चालतो. पालिकेने पुढाकार घेऊन सामाजिक संस्थांच्या मदतीने या स्त्रियांची गणती करावी. त्या कुठून आल्या, कशा पद्धतीने या व्यवसायात ओढल्या गेल्या, त्यांच्या समस्यांचा अभ्यास करावा, या व्यवसायातील स्त्रियांना परवाना द्यावा, त्यांना आरोग्याच्या सोयीसुविधा देण्याची आवश्यकता आहे. या व्यवसायातून बाहेर पडण्यास इच्छुक महिलांसाठी स्वतंत्र पुनर्वसन कक्ष असावा, तृतीय पंथींनाही रोजगार उपलब्ध करून देण्याची गरज आहे. महापालिकेची सर्व रुग्णालये अद्ययावत आणि उत्तम सेवा देणारी असावीत. शवागारांची संख्या वाढवावी, मूत्रपिंडाच्या आजाराने त्रस्त असणाऱ्यांची संख्या वाढत असून, त्यांना माफक दरात डायलिसिस करून द्यावे. या रुग्णालयांमध्ये टेक्निशियन आणि डॉक्टर यांचीही सेवा मिळावी. प्रत्यारोपण शस्त्रक्रिया महापालिकेच्या रुग्णालयातही सुरू व्हावी.

सुनीता जोगळेकर, जाणीव संघटना

अडचणीत सापडलेल्या स्त्रियांसाठी मार्गदर्शन केंद्रे सुरू करावीत. त्याला जोडून दवाखाना आणि कायदा सल्ला मार्गदर्शनाची सोय असावी. महिलेला अचानक घर सोडण्याची वेळ आल्यास तात्पुरती निवास केंद्रे असावीत. मनोरूग्ण, बेवारस माणसे रस्त्यावर फिरत असतात, त्यांना तातडीने निवारा आणि वैद्यकीय उपचार मिळावेत. समाजातील वाढते मानसिक अस्वास्थ्य लक्षात घेऊन करमणूक केंद्र, दिलासा केंद्र, समुपदेशन केंद्रांची संख्या वाढवावी. लहान मुलांना खेळण्यासाठी मोकळी मैदाने उपलब्ध करावीत. विभक्त कुटुंब पद्धती, नोकरीनिमित्त शहराबाहेर राहणाऱ्या मुलांच्या वृद्ध पालकांसाठी प्रभात कट्टे करावेत. अल्पदरातील वृद्धाश्रमांची संख्या वाढवावी. शहरातील महिलांच्या स्वच्छतागृहांची संख्या वाढवावी. सेवा शुल्क घेतले तरी चालेल; पण पाण्याची उपलब्धता असणारी आणि स्वच्छता, टापटिप असणाऱ्या स्वच्छतागृहांची संख्या वाढविण्याची गरज आहे.

कालिदास सुपाते, कामायनी संस्था

शहरात दिव्यांगांसाठी काम करणाऱ्या संस्थांचे प्रमाण उल्लेखनीय आहे. या संस्था आपापल्या परीने उत्तमोत्तम उपक्रम राबवित आहेत. मात्र, त्यांच्या प्रयत्नांना प्रशासकीय सहकार्याची गरज आहे. दिव्यांगांची संख्या पाहता शहरातील महापालिकेच्या सर्व इमारती, दवाखाने, वॉर्ड ऑफिस अडथळा विरहित असणे आवश्यक आहे. दिव्यांग मुलांसाठी तत्काळ मदत मिळवून देण्यासाठी हेल्पलाइन कार्यरत करावी. सर्व प्रकारच्या अपंगांना दिव्यांग म्हणून ओळखले जावे. प्रशासकीय तरतुदीनुसार महापालिकेच्या उत्पन्नातील तीन टक्के रक्कम दिव्यांगांच्या कल्याणासाठी खर्च होणे आवश्यक आहे. विविध पातळ्यांवर उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या मुलांना महापालिकेतर्फे दरमहा शिष्यवृत्ती मिळावी. महापालिकेच्या शाळांमध्ये या मुलांसाठीही स्वतंत्र वर्ग सुरू करावेत. नोकरीमध्ये ३ टक्के आरक्षणाची काटेकोरपणे अंलमबजावणी व्हावी. ब्रेल छपाई कारखाने चालू करा, ग्रंथालये आणि अभ्यासिका सुरू व्हाव्यात. महापालिका हद्दीबाहेर राहणाऱ्या दिव्यांग मुलांना पीएमपीचे मोफत पास मिळावेत. अपंग विद्यार्थ्यांच्या पालकांना मिळकतकरामध्ये सवलत मिळावी. त्यांच्यासाठी करमणूक केंद्रे सुरू करावीत.

अॅड. बस्तू रेगे, संतुलन संस्था

पोटासाठी पुण्यात येणारा स्थलांतरीत कामगार वर्ग मोठा असून, शहराच्या विकासात त्याचेही योगदान आहे. रस्त्याच्या बाजूला राहून रोजंदारी करणाऱ्यांना लोकप्रतिनिधींच्या जाहीरनाम्यात कधी जागा मिळत नाही. महापालिकेने या लोकांचे सर्वेक्षण करून त्यांना तात्पुरत्या स्वरुपाचे रेशनकार्ड द्यावे, त्यामुळे रास्त दरात त्यांना धान्य प्राप्त होईल आणि रस्त्यावर भीक मागण्याचे प्रमाण कमी होईल. प्रत्येक वॉर्डामध्ये लोकप्रतिनिधींनी नाला, रस्ता, पुलाखाली राहणाऱ्या लोकांचे सर्वेक्षण करून त्यांना मूलभूत अधिकार मिळवून द्यावेत. या लोकांचे शहर पातळीवर सर्वेक्षण झाल्यास यांना सुविधा देऊन उर्वरित नव्याने येणाऱ्या लोकांना अडविणे किंवा निर्बंध आणणे शक्य होईल. या लोकांना रोजगार आणि वैद्यकीय सुविधेच्यादृष्टीने ठोस पावले उचलावीत.


सत्येंद्र राठी निकिता मंत्री, के अँड क्यू परिवार

शहरातील वाढत्या वाहनांची संख्या लक्षात घेऊन पार्किंगच्या नियोजनाबद्दल ठोस भूमिका घेण्याची वेळ आली आहे. दिवसेंदिवस वाढणाऱ्या वाहतुकीच्या कोंडीवर नियंत्रण आणण्यासाठी सार्वजनिक वाहतूक सुधारणे आवश्यक आहे. यासाठी वॉर्डस्तरावर नियोजन झाले पाहिजे. महापालिका आणि वाहतूक शाखेतर्फे सातत्याने विविध प्रयोग राबविले जातात. मात्र, त्यात सातत्य नसल्याने प्रत्यक्ष परिणाम काही दिसत नाही. मध्यवर्ती शहरात असलेल्या मुख्यतः सणासुदीच्या काळात ही वाहतुकीची समस्या जास्त जाणवते, अशा वेळेस या परिसरातील शाळांमध्ये महापालिकेने ठरावीक वेळांमध्ये सशुल्क पार्किंग सुरू करावे. यातील काही रक्कम शाळेला देण्यात यावी. यामुळे मुख्य रस्त्यांवर येणारा वाहतुकीचा ताण नक्कीच कमी होईल. अनधिकृत फ्लेक्स बाबतीत भूमिका ठरवून हे फलक छापणाऱ्या व्यक्तींपर्यंत पोहोचून शहराला फ्लेक्समुक्त करावे.

नवनीत मानधण्या, के अँड क्यू परिवार

शिक्षणाच्या बाबतीत महापालिकेची भूमिका उदासीन आहे. एकीकडे शहरात शैक्षणिक पर्यटन वाढत असताना विद्यार्थी मूलभूत सुविधांपासून वंचित राहत आहेत. शहरात आजही पुरेशा अभ्यासिका नाहीत. हॉस्टेलची संख्या अत्यल्प आहे. स्पर्धा परीक्षांसाठी दुर्गम भागातून येणाऱ्या विद्यार्थ्यांना, विशेषतः मुलींना खासगी हॉस्टेलमध्ये राहणे परवडत नाही. विद्यार्थ्यांसाठी महापालिकेने स्वतंत्र आराखडा करून सर्वसमावेशक उपक्रम राबविले पाहिजेत.

पीयूष शहा, साईनाथ मंडळ ट्रस्ट

महापालिकेच्या शाळांमध्ये भीषण परिस्थिती आहे. या शाळा, विद्यार्थी, शैक्षणिक साहित्यावर कोट्यवधी रुपये खर्च करीत असल्याचे महापालिका दाखवत असली तरी, प्रत्यक्षात शाळांमधील चित्र वाईट आहे. बहुतांश शाळांमधील स्वच्छतागृहे अस्वच्छ असल्याने मुलींना विविध आजारांचा सामना करावा लागत आहे. परिणामी मुली शाळेत जाण्यास टाळाटाळ करीत आहेत. मुलांना नियोजित वेळेत गणवेश आणि शैक्षणिक साहित्य मिळत नाही. इयत्ता पाचवी आठवीत जाऊनही मुलांना स्वतःचे नाव लिहिता येत नाही. या शाळांचा दर्जा सुधारण्यासाठी आक्रमक भूमिका घ्यावी. अन्यथा या मुलांवर खर्च होणारे पैसे पालकांच्या बँक अकाउंटला जमा करून त्यांना हव्या त्या शाळेत पाठविण्याची मुभा द्यावी. प्रत्येक शाळेत मुलांना त्यांचे मनमोकळे करण्यासाठी समुपदेशक आणि मार्गदर्शन केंद्रे उपलब्ध करून द्यावीत.........................

काय करायला हवे?

- उल्लेखनीय शैक्षणिक, क्रीडा अथवा सांस्कृतिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या मतिमंद तसेच अपंग विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र शिष्यवृत्ती सुरू करा.

- अपंग व्यक्तींसाठी राखीव असलेल्या आरक्षणाची काटकोर अंमलबजावणी व्हावी.

- महापालिकेच्या क्रीडा संकुलात दिव्यांग मुलांसाठी स्वतंत्र व्यवस्था, प्रशिक्षक हवेत.

- सर्व प्रकारच्या दिव्यांगांसाठी शहरात करमणूक केंद्र सुरू करावे.

- दिव्यांग विद्यार्थ्यांच्या पालकांना प्रॉपर्टी टॅक्समध्ये सवलत द्यावी.

- दिव्यांग व्यक्तींनी बनविलेल्या वस्तूंच्या विक्रीसाठी केंद्रे सुरू करावीत.

- महापालिकेने मुलांना खेळण्यासाठी मोकळी मैदाने उपलब्ध करून द्यावीत

- महिलांच्या स्वच्छतागृहांची संख्या वाढवावी; त्यात पाण्याची सोय हवी.

-अडचणीत सापडलेल्या स्त्रियांसाठी मार्गदर्शन केंद्रे आणि निवारा गृहे सुरू करावीत.

- एकट्या राहणाऱ्या स्त्रिया आणि वृद्धांसाठी स्वतंत्र मदत केंद्र असावीत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

स्वरवर्षावात न्हाले रसिक

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

सतारीचा झंकार आणि गायकीच्या सुरांनी रसिकांना रविवारी मंत्रमुग्ध केले. उस्ताद शुजात खान यांचे सतारवादन आणि कौशिकी चक्रवर्ती यांचे गायन रसिकांसाठी परमोच्च आनंदाचा बिंदू ठरले.
मित्र फाउंडेशनतर्फे आयोजित ‘मित्र महोत्सव’ या संगीत मैफलीच्या दुसऱ्या आणि अखेरच्या दिवशी रसिकांनी हा आनंदाचा ठेवा अनुभवला. प्रथम उस्ताद शुजात खान यांनी सतारवादनातून स्वरझंकार केला. यमन कल्याण राग पेश करत त्यांनी स्वरांची उधळण केली. सतारीच्या तारांतून निघणारी मिंड रसिकांच्या मनाच्या तारा छेडत होती. शुजात खान यांचे बहारदार सतारवादन हे रसिकांसाठी आनंदाची पर्वणी ठरले. पं. मुकेश जाधव यांनी त्यांना सुरेख तबला साथ केली.
उत्तरार्धात कौशिकी चक्रवर्ती यांनी आपल्या सदाबहार गायकीने रसिकांची मने जिंकली. बागेश्री रागाचा विस्तार करताना त्यांनी मांडलेल्या ताना, हरकती विशेष ठरल्या. ‘आओ सजाओ मंदिर आज’ ही द्रुत तीनतालातील रचना दाद घेऊन गेली. मिश्र पिलूमधील ‘जिया मोरा’ या दादरा ठुमरीने वातावरणात रंग भरले. ‘सैंया सोतन घर ना जा’ या ठुमरीने रसिकांना मंत्रमुग्ध केले. त्यानंतर त्यांनी ‘सुंदर ते ध्यान’ हे भक्तिगीत सादर केले. या गीताने रसिकांना भक्तिरसात चिंब भिजवले. त्यांना हार्मोनियमवर सुधीर नायक यांनी आणि तबल्यावर पं. रामदास पळसुले यांनी साथ केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

'झोंबी'कार आनंद यादव यांचे निधन

$
0
0

पुणेः ‘झोंबी’तून ग्रामीण जीवनाचे अस्सल दर्शन घडविणारे आणि साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड होऊनही ते भूषविता न आलेले प्रसिद्ध लेखक, साहित्यिक डॉ. आनंद यादव यांचे रविवारी रात्री निधन झाले. ते ८१ वर्षांचे होते. त्यांच्या मागे पत्नी, दोन मुली आणि एक मुलगा असा परिवार आहे.

डॉ. यादव यांच्या पार्थिवावर आज, सोमवारी दुपारी १२.३० वाजता वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. तत्पूर्वी सकाळी ११ वाजता मेहता पब्लिशिंग हाऊस आणि त्यानंतर महाराष्ट्र साहित्य परिषद येथे त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे.

‘झोंबी’ या आत्मचरित्रपर कादंबरीमुळे डॉ. आनंद यादव यांची ओळख संपूर्ण देशाला झाली. ‘झोंबी’ला १९९० मध्ये साहित्य अकादमीचा पुरस्कार प्राप्त झाला होता. नांगरणी, घरभिंती, काचवेल, गोतावळा, नटरंग, झाडवाटा, उगवती मने यासह त्यांची अनेक पुस्तके लोकप्रिय झाली. ‘नटरंग’ या त्यांच्या कादंबरीवर काही वर्षांपूर्वी त्याच नावाचा मराठी चित्रपट प्रदर्शित झाला होता.

डॉ. यादव यांचा जन्म कोल्हापूर जिल्ह्यामधील कागलचा. आनंदा रत्नाप्पा जकाते हे त्यांचे मूळ नाव. अत्यंत गरीब कुटुंबातील यादव यांना शिक्षणासाठी घरून पाठिंबा नव्हता. त्यामुळे, यादव यांनी सुरुवातीचे शिक्षण कोल्हापूर येथे पूर्ण करून पुढील शिक्षणासाठी पुणे गाठले. शिक्षणाचा ध्यास घेतलेल्या डॉ. यादव यांना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात प्रपाठक म्हणून काम करण्याची संधी लाभली; तसेच, विद्यापीठाच्या मराठी विभागाचे प्रमुख म्हणून ते निवृत्त झाले. विद्यापीठात मराठीचे प्राध्यापक म्हणून काम करण्याआधीपासूनच त्यांनी लेखन सुरू केले होते. ग्रामीण साहित्य, ग्रामसंस्कृती हे त्यांच्या आवडीचे विषय होते. ग्रामीण साहित्याला ओळख निर्माण करून देण्यात डॉ. यादव यांचा महत्त्वाचा वाटा होता.

दुर्दैवी अध्यक्ष

महाबळेश्वर येथे २००९ मध्ये झालेल्या ८२ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी डॉ. यादव यांची निवड झाली होती. याच दरम्यान त्यांनी लिहिलेल्या ‘संतसूर्य तुकाराम’ या त्यांच्या कादंबरीवरून वाद उद्भवला. या पुस्तकात संतश्रेष्ठ तुकारामांविषयी अनुचित मजकूर असल्याचा आरोप करत वारकरी संप्रदायाने डॉ. यादव यांना तीव्र विरोध केला. देहू येथे जाऊन डॉ. यादव यांनी पुस्तक मागे घेतल्याचे जाहीर केले होते. तरीही, त्यांना संमेलनात अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारता आली नाहीत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

खुनाला फुटली ४१ वर्षांनी वाचा

$
0
0

Prashant.Aher@timesgroup.com

Twwet : @prashantaherMT

पुणेः भारतात फिरण्यासाठी आलेल्या दोघा जर्मन नागरिकांचा गोवा ते पुणे प्रवासादरम्यान खून केल्याची घटना तब्बल ४१ वर्षांनी उघडकीस आली आहे. हे खून दोघा जर्मन नागरिकांनीच केले आहेत. त्यातील एका संशयितानेच विवेकबुद्धीला लागलेल्या टोचणीमुळे जर्मन पोलिसांसमोर १९७५ मध्ये केलेल्या खुनाची कबुली दिली आहे. त्यानुसार जर्मन पोलिसांनी भारतीय तपास यंत्रणांशी संपर्क साधून या खुनांची माहिती मिळवण्यास सुरुवात केली आहे.

हान्स इवाल्ड उल्म या जर्मन नागरिकाने १७ जून २०१६ रोजी जर्मनीतील लांडाऊ पोलिसांसमोर खुनाची कबुली दिली आहे. उल्म हा आपला साथीदार मिशाइल ग्वॉडिअर याच्यासोबत भारतात ​आला होता. हे दोघे १९७५ मध्ये एका भारतीय मर्सिडीज वाहतूकदाराबरोबर फिरत होते. यावेळी गोवा ते पुणे प्रवासादरम्यान या दोघांनी जर्मन नागरिकांचा खून केल्याची कबुली दिली ​आहे.

उल्म याने तब्बल ४१ वर्षांनंतर आपण आपल्या विवेकबुद्धीचा आवाज ऐकून खुनाची कबुली देत असल्याचे लाडांऊ पोलिसांना सांगितले आहे; तसेच आपण केलेला गुन्हा हा अत्यंत निंदनीय असल्याचे त्याने आपल्या जबाबात म्हटले आहे. उल्म याने दिलेल्या माहितीनंतर जर्मन पोलिसांनी खून झालेल्या दोघांची माहिती मिळवण्यास सुरूवात केली आहे. जर्मन पोलिसांनी ‘इंटरपोल’च्या मदतीने भारतीय यंत्रणांशी संपर्क साधला. त्यानुसार केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) महाराष्ट्र आणि गोवा पोलिसांशी संपर्क साधून, खून झालेल्या दोघांची माहिती मिळण्याची सूचना केली आहे.

उल्म याच्या दाव्यानुसार, गोवा ते पुणे प्रवासादरम्यान हे खून झाले आहेत. त्यामुळे पुणे शहर, पुणे ग्रामीण आणि सातारा पोलिसांनी १९७५ मध्ये परदेशी नागरिकांचे मृतदेह मिळाले होते का, याचा शोध घेण्यास सुरुवात केली आहे. राज्य गुन्हे अन्वेषण ​विभागाच्या अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी पुणे शहर आणि ग्रामीण पोलिसांशी संपर्क साधत त्यांना जर्मन नागरिकांच्या खुनाची माहिती दिली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

संविधान सन्मान मूक मोर्चाला मोठा प्रतिसाद

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

संविधान दिनाचे औचित्य साधून दलित, ओबीसी, आदिवासी, भटक्या-विमुक्त आणि मुस्लिम बांधवांनी एकत्र येत काढलेल्या संविधान सन्मान मूक मोर्चासाठी रविवारी पुण्यात जनसागर लोटला. तरुणी आणि महिलांची लक्षणीय संख्या असलेल्या या मूक मोर्चाद्वारे एकीचा हुंकार उमटला आणि शिस्तीचे अनोखे दर्शन घडवले गेले.

डेक्कन येथील संभाजी महाराज यांच्या पुतळ्याला विद्यार्थिनींच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून मोर्चाला आरंभ करण्यात आला. संविधानाच्या प्रस्तावनेचे आणि मागण्यांचे वाचन करून हा मोर्चा खंडुजीबाबा चौकातून दुपारी सव्वाबाराच्या सुमारास सुरू झाला. मोर्चात सर्वांत पुढे तरुणी, महिला आणि त्यानंतर पुरूष होते. लक्ष्मी रस्त्यामार्गे मोर्चा विधानभवनापर्यंत अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने काढण्यात आला. त्यामध्ये तरुणी आणि महिलावर्ग मोठ्या संख्येने होता. काही अपंग तरुण आणि तरुणीदेखील दुचाकीवरून मोर्चात सहभागी झाले होते. महात्मा जोतिबा फुले, गाडगेमहाराज यांची वेशभूषा करून काही तरुणांनी सामाजिक समतेचा संदेश दिला.

मोर्चाच्या मार्गात ठिकठिकाणी पाण्याची व्यवस्था करण्यात आली होती. संयोजकांकडून सतत सूचना देण्यात येत होत्या. स्वच्छता आणि ​शिस्तीचे अनोखे दर्शन घडवून हा मोर्चा दुपारी पावणेतीनच्या सुमारास विधानभवन येथे पोहोचला. त्यानंतर तरुणींच्या शिष्टमंडळाने मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी सौरव राव यांना दिले. त्या शिष्टमंडळामध्ये सृष्टी वाडेकर, संध्या सोनवणे, निहा शेख, आकांक्षा नवले, चैताली गायकवाड, अमिषा सोंडे, मयुरी कांबळे, नबिला तांबोळी, विजयालक्ष्मी पल्लेवर यांचा समावेश होता.

जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आल्यावर जाहीर सभा घेण्यात आली. त्यामध्ये भाग्यश्री पुरणे, सना अन्सारी, पिंकी वाजे आदी तरुणींनी विचार व्यक्त केले. राष्ट्रगीताने दुपारी साडेचारच्या सुमारास मोर्चाची सांगता झाली.

स्वच्छता आणि बंदोबस्त

विविध राजकीय पक्षांचे नेते हे राजकीय पक्षांचे झेंडे बाजूला ठेवत मोर्चात सामान्य कार्यकर्त्याप्रमाणे सहभागी झाले होते. मोर्चाच्या मार्गात कोठेही कचरा होणार नाही, याची दक्षता संयोजकांकडून घेण्यात येत होती. तरुणी आणि महिलांना पुढे जाण्यासाठी वाट मोकळी करून देण्याचे काम स्वयंसेवकांकडून करण्यात येत होते. या मोर्चासाठी कडेकोट पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पाषाण शाळांतील विद्यार्थ्यांचेआंदोलन पाचव्या दिवशीही सुरूच

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

‘दगडखाण क्षेत्रातील मुलांच्या शिक्षणासाठी उपाययोजना आणि निधी उपलब्धतेबाबतचे पर्याय सुचवण्यासाठी सरकारने स्थापन केलेल्या समितीची बैठक जाहीर करा, पाषाण शाळांसाठी समितीची तातडीची बैठक घ्या, नवा अहवाल तयार करून सरकारला सादर करा,’ अशा मागण्यांसाठी संतुलन संस्थेच्या वतीने सोमवारी सलग पाचव्या दिवशी सुरू असलेल्या बेमुदत धरणे आंदोलनात पाषाण शाळांमध्ये शिकणारे विद्यार्थी सहभागी झाले.

अॅड. बी. एम. रेगे, दगडखाण कामगार व शिक्षक यांनी समितीची बैठक होण्याबाबत आणि त्याच्या नव्या अहवालानुसार कार्यवाही करण्यासाठी शिक्षण संचालक कार्यालयासमोर (प्राथमिक) बेमुदत आंदोलन सुरू केले आहे. राज्य सरकारने दगडखाण क्षेत्रातील मुलांच्या शिक्षणासाठी उपाययोजना व निधी उपलब्धतेबाबतचे पर्याय सुचवण्यासाठी नऊ सदस्यांच्या समितीची स्थापना केली. या समितीने राज्यातील २० पाषाण शाळांची पाहणी केली; मात्र त्यानंतर एकदाही समितीची बैठक झालेली नाही. तरीही समितीद्वारे खोटा अहवाल तयार करण्यात आला, असा आरोप अॅड. रेगे यांनी केला. या अहवालाद्वारे या शाळांना मदत अथवा मान्यता देता येणार नसल्याचे महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेचे प्रकल्प संचालक व राज्याचे शिक्षण सचिव नंदकुमार यांनी सांगितले असल्याचे अॅड. रेगे यांनी सांगितले. त्यामुळे समितीची बैठक जाहीर होईपर्यंत आणि नवा अहवाल तयार करण्याची घोषणा सरकार करेपर्यंत आंदोलन सुरू राहील, असे अॅड. रेगे म्हणाले.

.........

तावडेंना पाचशे पोस्टकार्डे

‘पाषाण शाळांच्या विविध मागण्यांसाठी विद्यार्थ्यांकडून शिक्षणमंत्री विनोद तावडे यांना पाचशे पोस्टकार्डे पाठवण्यात आली. आंदोलन जेवढे दिवस सुरू राहील, त्या प्रत्येक दिवशी तावडे यांना मागण्यांची शंभर पोस्टकार्डे पाठवण्यात येतील,’ असे अॅड. रेगे यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पालिकेचे निकाल म्हणजे भाजपला मिळालेली चपराक

$
0
0

काँग्रेस शहराध्यक्ष साठे यांची टीका

म. टा. प्रतिनिधी, पिंपरी

‘फुले, शाहू, आंबेडकरांच्या समतेच्या आणि पुरोगामी विचारांच्या विरुद्ध निर्णय घेऊन भाजपने शेतकरी, कामगारांचा अपेक्षाभंग केला आहे. मागील दोन वर्षांत शेतकरी व कामगारांसाठी कोणताही अनुकूल निर्णय सरकारने घेतला नाही. जनतेचा त्याबद्दलचा जनआक्रोश व्यक्त करण्यासाठी हा बंद आयोजित करण्यात आला. राज्यभर नगरपालिका निवडणुकांमधील निकाल म्हणजे सर्वसामान्य जनतेने भाजपला दिलेली चपराक आहे,’ अशी परखड टीका पिंपरी-चिंचवड काँग्रेस शहराध्यक्ष सचिन साठे यांनी दिली.

सोमवारी पिंपरी चिंचवड शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने जनआक्रोश मोर्चाचे आयोजन पुण्यात करण्यात आले होते. मोर्चाला जाताना पिंपरीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासमोर सचिन साठे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले. तत्पूर्वी थोर समाजसुधारक महात्मा जोतिबा फुले यांच्या पुण्यतिथीनिमित्त साठे यांच्या हस्ते फुलेंच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. माजी विरोधी पक्षनेते ज्येष्ठ नगरसेवक कैलास कदम यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला. या वेळी माजी महापौर कविचंद भाट, माजी नगरसेविका गिरिजा कुदळे, महिला काँग्रेसच्या शहराध्यक्षा ज्योती भारती, सेवा दलाचे शहराध्यक्ष संग्राम तावडे, प्रदेश युवा सरचिटणीस चिंतामणी सोंडकर, सुदाम ढोरे, लक्ष्मण रूपनर, भाऊसाहेब मुगुटमल, शहाबुद्दीन शेख, मयूर जैस्वाल, विशाल कसबे, अॅड. क्षितिज गायकवाड, नितीन कांबळे, राजाराम भोंडवे आदी उपस्थित होते.

डॉ. कैलास कदम म्हणाले, ‘चलनातून नोटा रद्द करण्याच्या निर्णयाचा खरा परिणाम एक डिसेंबरनंतर सर्व कुटुंबांवर होईल. एक तारखेनंतर जेव्हा कामगारांचे वेतन बँकेत जमा होईल, त्यानंतर किराणा सामान व इतर चीजवस्तू घेण्यासाठी गृहिणींना बँकेच्या बाहेर दिवसभर थांबावे लागेल. तेव्हा गृहिणींचा या सरकारच्या विरोधातील आक्रोश तीव्रतेने व्यक्त होईल. या निर्णयामुळे शहरातील रोजंदारी, कंत्राटी, तसेच कायम कामगारांच्या कुटुंबीयांवर, शहरी, तसेच ग्रामीण अर्थव्यवस्थेवर विपरीत परिणाम झाला आहे. सामान्य जनतेचा वेळ आणि श्रम यामुळे वाया जात आहेत. त्यामुळेच ग्रामीण भागातील जनतेने पुन्हा काँग्रेसवर विश्वास व्यक्त केला आहे.’

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


आमिष दाखवून महिलेची फसवणूक

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
फेसबुकवरून महिलेशी ओळख निर्माण करून तिला मौल्यवान वस्तू पाठविण्याच्या आमिषाने लाखोंचा गंडा घालणाऱ्या तिघांच्या नायजेरीयन टोळीला सायबर सेलने अटक केली आहे. हे ठक दिल्ली येथून ‘ब्रिटन’मधील मोबाइल क्रमांकाचा वापर करून महिलांना फोन करत होते. आपण ‘ब्रिटन’मधून फोन करत असल्याचे भासवून ते महिलांची फसवणूक करत होते.
ओसान्येदे ओकाफोर, मिचेल अॅडम्स्‌, अॅटोली होविके (वय २६, रा. नायजेरिया, सध्या दिल्ली) अशी अटक केलेल्या तिघांची नावे आहेत. या प्रकरणी एका महिलेने कोंढवा पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. तक्रारदार महिलेच्या फेसबुक अकाउंटवर ऑक्टोबरमध्ये एक ‘फ्रेंड रिक्वेस्ट’ आली होती. ती तिने स्वीकारल्यानंतर त्यांच्यामध्ये चॅटिंग सुरू झाले होते, अशी माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुनील पवार यांनी दिली.
फेसबुकवर ओळख झाल्यानंतर दोघांनीही एकमेकांना वॉट्‌सअॅपचा नंबर शेअर केला होता. त्यानंतर त्यांच्यात व्हॉट्स अॅपवरून चॅटिंग सुरू झाले होते. या चॅटिंगमधून महिलेचा विश्वास संपादन करण्यात आला. त्यानंतर या संशयिताने त्या महिलेस एक भेट पाठवून असून त्यामध्ये ५० हजार पौंड असल्याचे सांगितले होते. महिलेच्या मोबाइलवर १८ ऑक्टोबर रोजी एका महिलेचा फोन आला. तिने आपण कस्टममध्ये नोकरीस असून तुमच्या नावाचे पार्सल आले आहे. तो सोडवून घेण्यासाठी स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये ३५ हजार रुपये भरण्यास सांगितले. महिलेने सांगितलेल्या खात्यावर तक्रारदार यांनी पैसे भरले. त्यानंतर तक्रारदार महिलेला विविध कारणे सांगून एक लाख २७ हजार रुपये घेतले. पण, तिला कोणत्याही प्रकारची वस्तू मिळाली नाही. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर तिने कोंढवा पोलिस ठाण्यात तक्रार दिली.
या प्रकरणाचा समांतर तपास करत असताना मिळालेल्या तांत्रिक माहितीच्या आधारे सायबर विभागाच्या पोलिस निरीक्षक मनीषा झेंडे, पोलिस उपनिरीक्षक प्रवीण स्वामी, नितीन मस्के यांच्या पथकाने दिल्ली येथे कारवाई करून नायजेरीयन असलेल्या तिघांना अटक केली. पोलिसांनी त्यांच्याकडून सहा मोबाइल, दोन लॅपटॉप, दोन इंटरनेट डोंगल, तीन सिमकार्ड जप्त केले आहेत. आरोपींकडे अधिक तपास केल्यानंतर त्यांनी फेसबुकवरून आणखी काही महिलांना अशा प्रकारे फसवल्याचे सांगितले. त्यांनी या प्रकारे ५० लाख रुपये जमा केल्याचेही निष्पन्न झाले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अनधिकृत धार्मिक स्थळांवर हातोडा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (पीएमआरडीए) हद्दीत खासगी किंवा सार्वजनिक जागांवर बांधलेली अनधिकृत धार्मिक स्थळे पाडण्यात येणार आहेत. मुंबई हाय कोर्टाने दिलेल्या आदेशानुसार, जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या समितीने हा निर्णय घेतला असल्याने अनधिकृत धार्मिक स्थळांवर हातोडा पडणार आहे.
मुंबई हाय कोर्टात याबाबत याचिका दाखल करण्यात आली होती. सुनावणीनंतर एक ऑक्टोबर २०१६ रोजी हायकोर्टाने दिलेल्या आदेशानुसार जिल्हास्तरीय समिती नेण्यात आली. या समितीचे अध्यक्ष जिल्हाधिकारी होते. या समितीने खासगी किंवा सार्वजनिक जागांवर बांधलेली अनधिकृत धार्मिक स्थळे पाडण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे संबंधित धार्मिक स्थळांवर हातोडा पडणार आहे.
या समितीने जिल्ह्यातील विविध धार्मिक स्थळांचे सर्वेक्षण केले. त्यानुसार तीन प्रकारांमध्ये धार्मिक स्थळांचे वर्गीकरण केले. त्यानुसार नियमित धार्मिक स्थळे निश्चित करण्यात आली आहेत. काही धार्मिक स्थळांचे स्थलांतरण करता येणार आहे. त्यांचीही यादी बनवण्यात आली. संबंधित धार्मिक स्थळांचे स्थलांतरण होणार आहे. उर्वरित धार्मिक स्थळे ही खासगी किंवा सार्वजनिक जागांवर अनधिकृतपणे बांधलेली आहेत. त्यांचीही यादी निश्चित करण्यात आली आहे. ती धार्मिक स्थळे पाडण्यात येणार असल्याचे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले.

‘पीएमआरडीए’ला माहिती कळवा
‘पीएमआरडीए’च्या हद्दीत अनधिकृत धार्मिक स्थळे बांधण्यात येत असल्याची माहिती असल्यास नागरिकांनी खबर देण्याचे आवाहन ‘पीएमआरडीए’ने केले आहे. टपाल पाठवून, ई-मेल किंवा ‘पीएमआरडीए’च्या मोबाइल अॅपद्वारे ही माहिती देता येणार असल्याचे ‘पीएमआरडीए’च्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सेट टॉप बॉक्ससाठी ३१ डिसेंबरपर्यंत मुदत

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
पुणे शहरातील सर्व ग्राहकांच्या टीव्हींना सेट टॉप बॉक्स बसवण्यात आल्यानंतर आता जिल्ह्यातील ग्रामीण भागात केबलसेवा देण्यात आलेल्या सर्व टीव्हींना सेट टॉप बॉक्स बसवण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाने केबलचालकांना दिले आहेत. त्यासाठी ३१ डिसेंबरपर्यंत मुदत देण्यात आली असून, त्यानंतर कारवाई करण्यात येणार आहे.
केबलचालकांनी कनेक्शन दिलेल्या ग्राहकांच्या टीव्हींना सेट टॉप बसवण्याबाबत जिल्हाधिकारी कार्यालयात मुख्य केबलचालकांची बैठक घेण्यात आली. बैठकीला निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र मुठे, करमणूक कर अधिकारी सुषमा चव्हाण आदी उपस्थित होते. या बैठकीत सर्व ग्राहकांच्या टीव्हींना केबलचालकांनी सेट टॉप बसवण्याबाबत आदेश देण्यात आले.
पहिल्या टप्प्यामध्ये पुणे शहरातील ग्राहकांच्या टीव्हींना सेट टॉप बॉक्स बसवण्याची मोहीम राबवण्यात आली. त्यामुळे शहरामध्ये सर्व ग्राहकांच्या टीव्हींना सेट टॉप बॉक्स बसवण्यात आले आहेत. आता जिल्ह्याच्या अन्य परिसरातही त्याची अंमलबजावणी केली जाणार आहे. त्यानुसार नगरपरिषद, पंचायत समिती आणि ग्रामपंचायतींच्या क्षेत्रांत सर्व ग्राहकांच्या टीव्हींना सेट टॉप बॉक्स बसवले जाणार आहेत. त्यासाठी केबलचालकांना ३१ डिसेंबरपर्यंतची मुदत देण्यात आली आहे. मुख्य केबलचालकांनी हे काम मुदतीत न केल्यास कारवाईचा इशारा देण्यात आला आहे.
करचुकवेगिरी टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. शहरात शंभर टक्के सेट टॉप बॉक्स बसवण्यात आल्यामुळे महसुलात तिप्पट वाढ झाली असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तोंडी तलाक, हलाला पद्धत बंद व्हावी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
मुस्लिम वैयक्तिक कायदे आता कालबाह्य ठरत असल्याने त्याबाबत संशोधन झाले पाहिजे. शरियत कायद्यांमध्ये काही बदल करण्याची गरज आहे. तोंडी तलाख, हलाला पद्धत बंद करून मुस्लिम महिलांना त्यांचे अधिकार मिळाले पाहिजे, अशी अपेक्षा सायरा बानो यांनी व्यक्त केली. त्यावेळी मुस्लिम महिलांच्या हक्कासाठी मी न्यायालयीन लढाई लढत असून त्यात आपल्याला यश मिळेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
मुस्लिम सत्यशोधक मंडळाच्यावतीने आयोजित मुस्लिम महिला अधिकार राष्ट्रीय परिषदेचे उदघाटन झाले. मुस्लिम व्यक्तिगत कायदा, शरियत आणि तोंडी तलाख या विरोधात सुप्रीम कोर्टात दाद मागणाऱ्या सायरा बानो या उदघाटनप्रसंगी बोलत होत्या. त्यावेळी समाजवादी नेते भाई वैद्य, लेखिका डॉ. नूर जहीर, विद्या बाळ, शमसुद्दीन तांबोळी, अर्शद अली, खातून शेख, रुबीना पटेल आदी उपस्थित होते.
‘माझ्या सासरच्या मंडळींनी माझ्यावर अत्याचार केले. मानसिक आणि शारीरिक शोषण केले. मुलांना भेटू दिले जात नाही. दावा मागे घेण्यासाठी माझ्यावर दबाव टाकला जात आहे. परंतु, सरकारने माझी बाजू उचलून धरण्याचे आश्वासन दिले आहे. मुस्लिम संघटना, महिलाही माझ्या पाठीशी खंबीरपणे उभ्या आहेत. त्यामुळे मला यश मिळेल,’ असा विश्वास सायरा बानो यांनी व्यक्त केला.
‘तोंडी तलाक देण्याच्या पद्धती बंद करून समस्या सुटणार नाहीत. पीडित महिलेचे भविष्य सुरक्षित झाले पाहिजे. पुरुषांप्रमाणे महिलांनाही तलाक देण्याचा हक्क असला पाहिजे. यासाठी कायद्यात बदल करण्याची गरज असून अन्यायाविरोधात लढले पाहिजे,’ असे डॉ. नूर जहीर म्हणाल्या.
‘महिलांना दुय्यम वागणूक मिळू नये. त्यांना पुढे जाता यावे यासाठी कायद्यात बदल केले पाहिजेत,’ असे भाई वैद्य म्हणाले.
‘इतिहासात महिलांचे योगदान मोठे असले तरी त्याचा उल्लेख प्राधान्याने केला जात नाही. महिला अत्याचाराच्या विरोधात धैर्याने उभे राहिले पाहिजे,’ असे मत विद्या बाळ यांनी व्यक्त केले.
सायरा बानो यांच्या मागे उभे राहणार असून, मुस्लिम सत्यशोधक मंडळ समान नागरी कायद्याला पाठिंबा देईल. मात्र त्याचा मसुदा जाहीर करण्यात यावा. जिल्हा स्तरावर कौटुंबिक न्यायालय असावे, अशी मागणी शमसुद्दीन तांबोळी यांनी केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महाराष्ट्राच्या संस्कृतीचे दर्शन

$
0
0

‘संपर्क’तर्फे जनजागृतीसाठी विशेष दिंडीचे आयोजन

म. टा. प्रतिनिधी, लोणावळा

महाराष्ट्राचा सांस्कृतिक, ऐतिहासिक व प्राचीन वारसा जपण्याच्या उद्देशाने लोणावळ्याजवळील मळवली-भाजे येथील संपर्क बालग्राम संस्थेच्या वतीने ‘हेरीटेज वॉक - दी ग्लोरी ऑफ महाराष्ट्र’ (संपर्क प्राचीन वारसा परिक्रमा दिंडी - महाराष्ट्राची शान) या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला असून, परिक्रमा दिंडीत तीन हजार नागरिकांनी सहभाग घेतला. भाजे लेणी पायथ्यापासून लोहगड किल्ल्यापर्यंत या दिंडीचे आयोजन करण्यात आले होते. परिक्रमा दिंडीत महाराष्ट्राची लोकधारा, संस्कृती, परंपरेच्या दर्शनासह शिवसृष्टीच्या जिवंत देखाव्याचे आयोजन करण्यात आले होते.

कोल्हापूर येथील पथकाने सादर केलेल्या तलवारबाजीच्या साहसी प्रात्यक्षिकांनी परिक्रमा दिंडीला सुरुवात झाली. परिक्रमा दिंडीमार्गावर महाराष्ट्राच्या प्राचीन सांस्कृतिक व ऐतिहासिक संस्कृतीचे दर्शन झाले. शिवाजी महाराज, मावळे, वासुदेव, गोंधळी, पोतराज, वारकरी आदींच्या वेशभूषा केलेल्या युवकांनी महाराष्ट्रातील प्राचीन कला व संस्कृतीचे दर्शन घडवले. दिंडीमध्ये महिला जात्यावरच्या ओव्या, लोकगीते व गाणी गात होत्या. डोक्यावर तुळशी वृंदावन घेऊन महिलांनी लोकगीते व गाणी गात फेरानृत्य सादर केले. पोवाडा, अभंग, गवळण, जागरण, गोंधळ, लावणीनृत्य, भिल्लनृत्य, कोळीनृत्य यांचेही सादरीकरण दिंडीत झाले. परिसरातील इतिहासप्रेमी शालेय विद्यार्थ्यांनी इतिहासातील जिवंत देखावे सादर करून भारताचा सांस्कृतिक वारसा व इतिहासाचे दर्शन घडवले.

परिक्रमा दिंडीत सहभागी झालेल्या नागरिकांनी भाजलेले शेंगदाणे, मक्याची भाजलेली कणसे, वडापाव, चहा, पिठले-भाकरी, कांदा व मिरचीचा ठेचा अशा मावळी शिदोरीचा आस्वाद घेतला. लोहगड किल्ल्याच्या पायथ्याशी परिक्रमा दिंडीची सांगता झाली.

............

दिंडीमागचा उद्देश

‘मावळ तालुक्यातील भाजे, कार्ला, बेडसे लेणी व लोहगड, विसापूर, तुंग व तिकोना या प्राचीन व ऐतिहासिक वारसास्थळांची नोंद ‘युनेस्को’मध्ये व्हावी, तसेच या स्थळांना ‘हेरिटेज’चा दर्जा मिळावा आणि अशा अनमोल प्राचीन वारशाचे जतन व्हावे; तसेच छत्रपती शिवाजी महाराजांनी उभारलेल्या गड-किल्ल्यांचे संवर्धन, महाराष्ट्राच्या सांस्कृतिक-सामाजिक मूल्यांसोबत अनाथ व गरजू बालकांची काळजी घेणे या सगळ्या मुद्द्यांबद्दल जागृती; पर्यटन व्यवसायाला चालना आणि परिसरातील स्थानिकांना रोजगार उपलब्ध करून देणे, असे या दिंडीच्या आयोजनाचे उद्देश होते,’ असे ‘संपर्क’चे संस्थापक अमितकुमार बॅनर्जी आणि सल्लागार डॉ. सतीश पाटील यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images