Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

मोरेश्वर घैसास यांचा उज्जैन येथे सन्मान

0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
वेदाचार्य घैसास गुरूजी वेदपाठशाळेतर्फे वेदभवनचे संस्थापक वेदमहर्षी विनायकभट्ट गुरूजी यांच्या जन्मशताब्दीचा बारावा कार्यक्रम मध्यप्रदेशातील उज्जैन येथे नुकताच साजरा करण्यात आला. या कार्यक्रमानंतर १२४ महायज्ञ करण्यात आले. उपक्रमाची दखल घेऊन उज्जैन येथील महामालव वेदशास्त्र परिषदेतर्फे वेदभवनचे प्रधानाचार्य मोरेश्वर घैसास यांचा शतक्रतु (शंभर यज्ञ करणारा) ही विशेष पदवी देऊन सन्मान करण्यात आला.
श्रीराम महाराज, सिंधिया प्राच्य विद्या विक्रम विश्वविद्यालयाचे संचालक डॉ. बाळकृष्ण शर्मा यांनी घैसास यांचा सन्मान केला. मध्यप्रदेशचे ऊर्जा मंत्री पारस जैन यांच्या हस्ते महाराष्ट्र समाजाच्या टिळक स्मृती मंदिरात कार्यक्रमाचे उद्‍घाटन झाले. या वेळी उज्जैन पंचांगाचे संचालक पं. आनंद शंकर व्यास आणि परिषदेचे अध्यक्ष पं. केदारनाथ शुक्ल, सुभाष अमृतफळे उपस्थित होते.
वेदमंत्र, वेदांचे ज्ञान हे या व्यक्तींनी प्राणपणाने जपून आजच्या पिढीपर्यंत आणून पोहोचवले. ते आश्चर्यकारक असून या विद्येचे जतन, संवर्धन सगळ्यांनी करणे आणि या कार्याला सहकार्य मिळणे ही सर्वांची जबाबदारी आहे, असे मत जैन यांनी व्यक्त केले. उज्जैनमधील नागरिकांचा या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


उत्खननात आढळले वीरगळ

0
0

म. टा. प्रतिनिधी, औंध

कोंढवळे (ता. मुळशी) येथे उत्खननात यादवकालीन वीरगळ मिळाले आहेत. युवा अभ्यासक शैलेश कंधारे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी दोन वर्षे त्यासाठी प्रयत्न केले. आत्तापर्यंत चाळीस वीरगळ जमिनीतून बाहेर काढण्यात आले आहेत. या परिसरात पुरातन मंदिरांचेही अवशेष मिळाले असून उत्खननाचे काम अद्याप सुरू आहे.

उत्खननामध्ये महिला वीरांगनांचे वीरगळ मिळाले असून चुना दळायचे जाते, विशिष्ट रचनेतले शिवलिंग, नंदीची मूर्तीही सापडली आहे. या गावात विश्वेश्वर देवाच्या नावाने साडेतीन एकर जागा आहे. तसेच, भैरवनाथाच्या नावाने सत्तर गुंठे जागा आहे. या जागेत विश्वेश्वराचे देवस्थान असून शेजारी स्मशानभूमीही आहे. गावातील शैलेश कंधारे (वय २४) हे शिक्षणासाठी पुण्यात आई-वडिलांसह स्थायिक झाले. ते दुर्गसंवर्धन आणि जतन याचा अभ्यास करतात. दोन वर्षांपूर्वी ते धार्मिक कार्यासाठी गावात आले होते. त्या वेळी त्यांना काही घोटीव दगड जमिनीवर दिसले. त्यांनी ‘अभिनव निर्माण प्रतिष्ठान’च्या सहकाऱ्यांना याबाबत माहिती दिली. हे प्रतिष्ठान पुणे जिल्ह्यात दुर्गसंवर्धनाचे काम करीत आहे.

कंधारे यांनी प्रतिष्ठानच्या शंतनू अंबुलकर, दत्तात्रेय तोंडे, ओंकार बोत्रे, गोपाल सोनी, सचिन मोटे, अमित शेडगे, पुष्कर काळे, हेमंत हुद्दार, आकाश धुमाळ आदींशी संपर्क साधला. खोदकामासाठी साहित्य विकत घेतले. एक लोखंडी ट्रॉलीही तयार केली. या युवकांनी दर रविवारी एकत्र येऊन ही जागा खोदण्यास सुरुवात केली. जमिनीखाली तीन ते चार फूट खणल्यानंतर त्यांना हा ठेवा मिळाला. हे वीरगळ त्यांनी ज्येष्ठ इतिहास संशोधक पांडुरंग बलकवडे आणि राजेंद्र टिपरे यांना दाखविले. वीरगळांच्या रचनेवरून त्यांनी हे वीरगळ बाराव्या शतकातील यादवकालीन असल्याचे सांगितले.

कोंढावळे गावाच्या या परिसरात त्यांना चाळीस वीरगळ मिळाले आहेत. त्यात महिला वीरांगनांचेही वीरगळ असल्याने या परिसराच्या इतिहासाचा अभ्यास होण्याची गरज व्यक्त होत आहे. त्याचप्रमाणे शिवलिंग, टाल्कम मातीत बनविलेली नंदीची मूर्ती, चुना दळण्याचे जाते, गोरक्षणाच्या वीरगळांचाही त्यात समावेश आहे. चारही बाजूंनी कोरलेल्या दोन चतुर्भुज वीरगळ या उत्खननात सापडल्या. छत्रपती शिवाजी महाराजांचे अंगरक्षक संभाजी कोंढाळकर यांचा स्मारकस्तंभही या ठिकाणी आढळला.

कंधारे यांनी पंचायत समितीचे माजी सभापती रवींद्र कंधारे यांना याबाबत माहिती दिली. त्या वेळी कंधारे यांनी रविवारी उत्खननासाठी जेसीबीची मदत केली. रविवार झालेल्या उत्खननातही काही वीरगळ मिळाले असून पेशवेकालीन मंदिराचे अवशेष सापडले आहेत. काही मूर्ती भंगलेल्या अवस्थेत आहेत. या परिसरात सभामंडप उभारून सर्व मूर्तींचे जतन केले जाईल. त्याचप्रमाणे वीरगळांच्या माध्यमातून त्याचा इतिहास शोधण्याचा प्रयत्न करणार असल्याचे तसेच परिसरातील गावांमध्ये असणाऱ्या वीगरगळांचेही जतन केले जाणार असल्याची प्रतिक्रिया कंधारे यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पर्यावरणप्रेमी चालवणार बाराशे किमी सायकल

0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

राज्यभरातील पर्यावरण अभ्यासकांनी एकत्र येऊन ‘सह्याद्री वाचवा’ मोहीम सुरू केली आहे. या मोहिमेची सुरुवात ‘ट्रान्स सह्याद्री सायकल रॅली’ने होणार आहे. येत्या १ ते ९ डिसेंबर या काळात पर्यावरणप्रेमी तब्बल बाराशे किलोमीटरचा पल्ला सायकलवरून पार करणार आहेत.

पर्यावरण क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या ‘अश्वमेध प्रतिष्ठान’तर्फे ही मोहीम सुरू करण्यात आली असून त्यासाठी मुंबई विद्यापीठाचे सहकार्य मिळणार आहे. पश्चिम घाटाचे एक टोक असणाऱ्या नंदुरबार जिल्ह्यातील नवागाव येथून आणि दुसरे टोक असलेल्या सावंतवाडीतून ही मोहीम सुरू होणार आहे. येत्या १ डिसेंबरला दोन्ही ठिकाणांहून एकाच वेळी रॅली निघेल. यामध्ये मुंबई, ठाणे, कल्याण, पनवेल, महाड, पुणे, नाशिक, तळेगाव, सावंतवाडी या भागातील पन्नास स्वयंसेवक सहभागी होणार आहेत.

ही रॅली नऊ दिवसांच्या कालावधीत ३६ गावांमध्ये जाईल. तेथे विविध उपक्रम राबविले जाणार आहे. मोहिमेच्या पुढील टप्प्यात २०१७मध्ये मुंबई विद्यापीठाच्या सहभागातून आंतरराष्ट्रीय स्तरावरील पर्यावरण परिषदेचे आयोजन करण्यात येणार आहे, अशी माहिती मोहिमेचे प्रमुख बिभास यांनी दिली. सह्याद्रीच्या संपूर्ण डोंगररांगात सुरू असलेली जंगलतोड, जाणीवपूर्वक लावलेले वणवे, प्राणिमित्रांच्या अधिवासांना निर्माण झालेले धोके, अवैध शिकार, मातीची वेगाने होणारी धूप, नद्यांचे प्रदूषण, प्लास्टिक कचरा अशा विविध कारणांमुळे तेथील पर्यावरण धोक्यात आले आहे. रॅलीच्या माध्यमातून वाटेतील गावांमध्ये ठिकठिकाणी पर्यावरण संरक्षण प्रदर्शन, दृकश्राव्य सादरीकरण, वृक्षारोपण, पथनाट्य या माध्यमातून पर्यावरणाच्या समस्यांबद्दल जनजागृती करण्यात येणार आहे. मोहिमेचा समारोप महाबळेश्वरमध्ये होणार असून दोन्ही टीम एका वेळी त्या ठिकाणी दाखल होतील, असे बिभास यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘स्त्री-केंद्री अर्थसंकल्पासाठी प्रयत्न’

0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

‘महिलांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी घटनादुरुस्ती करून महिलांना आरक्षण मिळाले आहे. मात्र, यावर समाधान न मानता मध्य प्रदेश, गुजरात, छत्तीसगड आणि राजस्थान या राज्यांनी स्त्री-केंद्री अर्थसंकल्प ही संकल्पना राबविण्यास सुरुवात केली आहे. महाराष्ट्रातही स्त्री-केंद्री अर्थसंकल्पासाठी प्रयत्न सुरू असून कार्यशाळांच्या माध्यमातून विविध घटकांशी आम्ही संवाद साधत आहोत,’ अशी माहिती राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनी दिली.

महाराष्ट्र राज्य महिला आयोग आणि ‘दृष्टी स्त्री अध्ययन प्रबोधन केंद्रा’तर्फे ‘राज्याच्या जेंडर बजेटच्या दिशेने : स्थिती आणि उपाय’ या विषयावर कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. या वेळी रहाटकर यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांच्या हस्ते कार्यशाळेचे उद्‍घाटन करण्यात आले. आयोगाच्या सदस्य सचिव देवयानी ठाकरे, गयाताई कराड, आमदार मेधा कुलकर्णी, केंद्राच्या अध्यक्षा गीता गोखले आणि अंजली देशपांडे उपस्थित होत्या.

रहाटकर म्हणाल्या, ‘महामार्गावरील महिलांसाठी प्रसाधनगृहे उभारावीत, अशी सूचना राज्य महिला आयोगाने राज्य सरकाराला केली आहे. हे सार्वजनिक काम विभागाने करायचे, की परिवहन मंत्रालयाने या विषयावर खल झाला आहे. प्रवासी महिला या राज्याच्या नागरिक नाहीत का, असा प्रश्न मी सरकारपुढे उपस्थित केला आहे. महिलांच्या हक्कांसाठी आणि बरोबरीच्या नात्यासाठी प्रयत्न करावयाचे आहेत.’

बापट म्हणाले, ‘आपल्या सर्व व्यवहारांमध्ये महिला केंद्रबिंदू असतील, तर त्याचा पुरुषांना आणि समाजाला चांगला फायदा होत असतो. त्यामुळे शासनाच्या सर्व योजना महिलाकेंद्री असल्या पाहिजेत. महिलांच्या समस्या ओळखून त्यांच्या निराकरणाचे प्रयत्न झाले पाहिजेत. आपल्या राज्यामध्ये विविध क्षेत्रांत काम करण्यास महिला सक्षम आहेत. आपले हक्क आणि अधिकारांसाठी महिला संघटित झाल्या नाहीत त्यांच्यासाठी केलेल्या योजना केवळ कागदावरच राहतील. या योजनांची प्रभावी अंमलबजावणी होण्यासाठी राज्य महिला आयोगाने सरकारवर लक्ष ठेवले पाहिजे. महिलांच्या विविध योजनांसाठी जिल्हा नियोजन विकास निधीतून काही निधी राखीव ठेवला जाईल.’ अंजली देशपांडे यांनी प्रास्ताविक केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

टेकडीवरील आगीत झाडे भस्मसात

0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

देशातील पहिला नागरी वनउद्यान प्रकल्प ठरलेल्या वन विभागाच्या वारजे टेकडीवर आग लावून उपद्रवी लोकांनी पाचशेहून अधिक झाडे जाळली आहेत. अतिक्रमण आणि अस्वच्छतेने व्यापलेल्या या टेकडीला वन विभागाने गेल्या वर्षभरात हरवलेले सौंदर्य मिळवून दिले होते. नुकत्याच लावण्यात आलेल्या आगीमुळे शेकडो झाडांची राख झाली आहे.

केंद्र सरकारच्या नागरी वनउद्यान या योजनेअंतर्गत तत्कालीन पर्यावरणमंत्री प्रकाश जावडेकर यांनी पुण्यातील वारजे टेकडीची निवड केली होती. वन विभागाने या टेकडीवरील अतिक्रमण हटवून, संपूर्ण परिसरातील कचरा स्वच्छ केला. पुन्हा अतिक्रमण टाळण्यासाठी टेकडीला चहूबाजूंनी सुरक्षा भिंत घातली. शहरातील विविध कंपन्या, स्वयंसेवी संस्था आणि वृक्षप्रेमींनी टेकडीसाठी स्वेच्छेने आर्थिक मदत केली, तर काहींनी श्रमदान केले. या वर्षी पाऊस चांगला झाल्याने वृक्षारोपण यशस्वी ठरले. पुढील पावसाळ्यात ही टेकडी म्हणजे पर्यटनस्थळ आणि स्थानिक नागरिकांसाठी व्यायामाचे हक्काचे ठिकाण ठरेल, अशी वनाधिकाऱ्यांची अपेक्षा होती. मात्र, काही उपद्रवी लोकांनी गेल्या आठवड्यात टेकडीला आग लावली. वाऱ्यासारख्या पसरलेल्या या आगीत पाचशेहून अधिक झाडे जळून राख झाली आहेत.

टेकडीवर लागलेली ही आग मानवनिर्मित असून याच परिसरात राहणाऱ्या काही लोकांनी लावली असण्याची शक्यता आहे. हा प्रकल्प सुरू केला तेव्हापासूनच काही लोकांनी विरोध केला होता. या प्रकारासंदर्भात आम्ही स्थानिक पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे. पुन्हा गैरप्रकार घडू नये यासाठी पोलिसांच्या सहभागातून आम्ही टेकडीवर गस्त घालणार आहे. आगीमध्ये जाळलेल्या झाडांना वाचविण्यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत, अशी माहिती वन विभागाचे उपवनसंरक्षक सत्यजीत गुजर यांनी दिली.

या वर्षी पाऊस चांगला झाल्याने या टेकडीवरील गवत खूप वाढले आहे. आम्ही अनेकांना गवत काढून घेऊन जा, असे आवाहन केले; पण अल्प प्रतिसाद मिळाला. आता वणव्यांचा हंगाम सुरू होणार आहे. त्यामुळे खबरदारी म्हणून वारजे टेकडीबरोबरच शहरातील सर्वच टेकड्यांवर आम्ही ‘फायर लाइन’ आखण्यास सुरू करीत आहोत, असे गुजर यांनी सांगितले.

वारजे टेकडीच्या उपक्रमाचे देशपातळीवरील संस्थांनी कौतुक केले असून या धर्तीवर अनेक ठिकाणी लोकसहभागातून नागरी उद्याने उभारण्याचा विचार होतो आहे. वनाधिकाऱ्यांनी कॉर्पोरेट कंपन्यांकडून आर्थिक मदत घेऊन लोकांच्या मदतीने या टेकडीचा कायपालट केला आहे. प्रत्येक झाडाशी लोकांच्या भावना जुळल्या आहेत, त्यामुळे वन विभागाने अधिक जबाबदारीने टेकडीच्या सुरक्षेकडे लक्ष दिले पाहिजे, असे मत तेर पॉलिसी सेंटरच्या डॉ. विनिता आपटे यांनी व्यक्त केले.

वन कर्मचाऱ्यांचे दुर्लक्ष

सुशोभीकरणामुळे ही टेकडी लोकांसाठी आकर्षण ठरली आहे. अनेक जण तिथे सकाळी फिरण्यासाठी येतात. मात्र, वनाधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे उपद्रवी लोकांचाही वावर वाढला आहे. धक्कादायक बाब म्हणजे वन विभागाने बांधलेल्या सुरक्षाभिंती ओलांडून वस्त्यांमधील लोक प्रातर्विधीसाठी टेकडीवर येत आहेत. संपूर्ण टेकडीवर गस्त घाळण्याऐवजी अनेकदा स्थानिक वन कर्मचारी टेकडीच्या पायथ्याशी बसून राहतात. त्यांच्या अनास्थेमुळे टेकडीचे सौंदर्य धोक्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शिक्षण मंडळाचे बजेट स्थायी समिती करणार

0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

पुणे महापालिकेच्या शिक्षण मंडळाने २०१७-१८ या आर्थिक वर्षासाठी तयार केलेल्या ३७७ कोटी रुपयांच्या बजेटचे अस्तित्व धोक्यात आले आहे. शिक्षण मंडळाच्या पदाधिकाऱ्यांची मुदत संपत असल्याने हे बजेट पालिकेच्या स्थायी समितीने करावे आणि पालिकेच्या मुख्य बजेटमध्ये एक विभाग म्हणून शिक्षण मंडळाचा समावेश करण्याचा निर्णय मंगळवारी झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत घेण्यात आला. पालिका प्रशासनाने दिलेल्या अभिप्रायामुळे मोठ्या कष्टाने मंडळाने तयार केलेल्या बजेटवर पाणी फिरले आहे.

महाराष्ट्र महापालिका अधिनियमानुसार, शिक्षण मंडळाने ३१ ऑगस्टपर्यंत बजेट तयार करून स्थायी समितीला सादर करणे आवश्यक आहे. त्यानुसार शिक्षण मंडळाने ऑगस्ट महिन्यात २०१७-१८ या आर्थिक वर्षासाठीचे ३७७ कोटी ४१ लाख रुपयांचे मंडळाचे बजेट तयार केले. यामध्ये विविध योजनांचा समावेश करण्यात आला आहे. हे बजेट सप्टेंबर महिन्यामध्ये स्थायी समितीसमोर मान्यतेसाठी ठेवण्यात आले होते. मागील वर्षीच्या मंडळाच्या बजेटच्या तुलनेत यंदाचे बजेट हे ३६ कोटी रुपयांनी फुगले आहे. हे बजेट स्थायी समितीसमोर आल्यानंतर समितीने प्रशासनाकडे याबाबत अभिप्राय मागविला होता. यावर अभिप्राय देताना प्रशासनाने महापालिकेच्या मुख्य बजेटमध्येच शिक्षणमंडळ हा एक विभाग समजावा असे स्पष्ट केले आहे. जुलै २०१३मध्ये राज्य सरकारने सर्व शिक्षण मंडळांचे अधिकार काढून घेऊन यापुढील काळात शिक्षणमंडळे स्थानिक स्वराज्य संस्थांकडे हस्तांतरित केली आहेत. शिक्षण मंडळाचे बजेट हे या स्थानिक स्वराज्य संस्था तयार करतील, असेही शासनाने काढलेल्या अध्यादेशात स्पष्ट केले आहे.

सध्या अस्तित्वात असलेल्या शिक्षण मंडळाच्या पदाधिकाऱ्यांची मुदत डिसेंबर २०१६-१७ अखेरीस संपुष्टात येत असून ते बरखास्त होत आहे. त्यामुळे राज्य सरकारने काढलेल्या जून २०१४च्या अधिनियमातील ३ (ट)नुसार त्याची कार्यवाही करणे गरजेचे आहे. महापालिकेतील इतर विभागांप्रमाणे शिक्षण मंडळ हा एक विभाग समजून स्थायी समितीमार्फत मुख्य समितीमध्ये हे बजेट मान्य करून घेतले पाहिजे, असा अभिप्राय दिला. हा अभिप्राय मान्य करण्यात आल्याचे स्थायी समितीचे अध्यक्ष बाळासाहेब बोडके यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तिसऱ्या मजल्यावरून पडून मृत्यू

0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

सभागृहाच्या तिसऱ्या मजल्यावरील छतावर पडलेले बॅडमिंटनचे फूल काढताना खाली पडून सहावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा मृत्यू झाला. सहकारनगर येथील राजीव गांधी ई-लर्निंग शाळेत मंगळवारी दुपारी ही घटना घडली.

शुभम तुकाराम खंडाळे (वय १२, रा. शिवदर्शन) असे मृत्यू झालेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे. शाळेमध्ये दुपारी बारा ते एकच्या दरम्यान जेवण झाल्यानंतर शुभम मित्रांबरोबर तिसऱ्या मजल्यावरील वर्गासमोर खेळत होता. इमारतीमधील साहित्यसम्राट विजय तेंडुलकर नाट्यगृहाच्या सभागृहाला आवाज येऊ नये, म्हणून सीलिंग केले आहे. तिसऱ्या मजला आणि सीलिंग यात बरेचसे अंतर आहे. या ठिकाणी कुणाला जाता येऊ नये, म्हणून लाकडी ग्रील लावलेले आहे. या सीलिंगवर बॅडमिंटनचे फूल पडले होते. हे फूल फूल काढण्याच्या प्रयत्नात असतानाच सीलिंग तुटले आणि शुभम थेट तिसऱ्या मजल्यावरून नाट्यगृहात पडला. या घटनेत तो गंभीर जखमी झाला. शाळेतील शिक्षकांनी त्याला जवळच्या खासगी रुग्णालयात तात्काळ दाखल केले. मात्र, उपचारांदरम्यान त्याचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच दत्तवाडी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक अनिल पाटील यांनी घटनास्थळी धाव घेतली. या प्रकरणी दत्तवाडी पोलिस ठाण्यात अपघाती मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

पालक सभेत सुरक्षेच्या सूचना

दोन महिन्यांपूर्वी झालेल्या पालक सभेत सुरक्षिततेबाबत अनेक सूचना करण्यात आल्या होत्या. मात्र, शालेय प्रशासनाने त्याकडे दुर्लक्ष केल्याने ही घटना घडल्याचा आरोप शुभमच्या पालकांनी केला. तर, या विद्यार्थ्यांच्या मृत्यूस शा‍ळेचे प्रशासन, शिक्षण मंडळ प्रशासन व अधिकारी जबाबदार आहेत. त्यांच्यावर गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कल्पेश यादव व विक्रांत अमराळे यांनी पोलिस आयुक्तांकडे केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

समान पाणीपुरवठ्यासाठी कर्जरोखे प्रस्ताव दफ्तरी

0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

शहरात समान पाणीपुरवठा योजना राबविण्यासाठी कर्ज; तसेच कर्जरोखेच्या माध्यमातून निधी उभारण्याचा महापालिका प्रशासनाचा प्रस्ताव स्थायी समितीच्या बैठकीत मंगळवारी दफ्तरी दाखल करण्यात आला. या विषयावरून समितीच्या बैठकीत मतभेद झाल्याने मतदान घेऊन हा दफ्तरी दाखल करण्यात आला.

या प्रकल्पासाठी केंद्र आणि राज्य सरकार कोणतेही अनुदान देण्यास तयार नाहीत, त्यामुळे संपूर्ण खर्च हा पालिकेला करावा लागणार आहे. पुणेकरांच्या डोक्यावर कर्जाचा भुर्दंड पडू नये, यासाठी हा विषय दफ्तरी दाखल करण्यात आल्याचे महापौर प्रशांत जगताप यांनी सांगितले. शहरातील नागरिकांना चोवीस तास पाणीपुरवठा करण्यासाठी समान पाणीपुरवठा योजना प्रस्तावित करण्यात आली आहे. या योजनेसाठी केंद्र सरकार आणि राज्य सरकारने अनुदान देण्याचे यापूर्वी जाहीर करण्यात आले होते. मात्र, राज्य तसेच केंद्र सरकारने निधी देण्यास नकार दिल्याने या प्रकल्पासाठी येणारा २२०० कोटी रुपयांचा खर्च पालिकेला उचलावा लागणार आहे. हा खर्च करण्यासाठी विविध पर्यायांचा विचार करावा, असा प्रस्ताव प्रशासनाने तयार करून स्थायी समितीसमोर मान्यतेसाठी ठेवला होता. हा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी पालिकेचे कर्ज काढल्यास पुणेकर कर्जबाजारी होतील, हे टाळण्यासाठी हा प्रस्ताव अमान्य करून दफ्तरी दाखल करण्याचा निर्णय पालिकेत सत्ताधारी असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस यांनी शिवसेनेच्या मदतीने घेतल्याचे महापौर जगताप यांनी सांगितले. याला भाजप आणि मनसेच्या एका सभासदाने विरोध केल्याने मतदान घेऊन दहा विरुद्ध तीन मतांनी विषय दफ्तरी करण्यात आल्याचे जगताप यांनी सांगितले. सभागृह नेते शंकर केमसे, स्थायी समिती अध्यक्ष बाळासाहेब बोडके या वेळी उपस्थित होते.

या योजनेला राज्य आणि केंद्र सरकारची मान्यता मिळेल, या भरवशावर पालिकेने यापूर्वीच २४५ कोटी रुपयांचे टेंडर मान्य करून काम सुरू केले. पाइपलाइन टाकणे, पाण्याच्या टाक्या बांधणे, ही कामे केली जाणार आहेत. मात्र, या योजनेसाठी केंद्र तसेच राज्य सरकारने निधी देण्यास नकार दिला आहे. हा प्रस्ताव दफ्तरी दाखल करताना महापा‌लिका आयुक्तांनी या योजनेसाठी निधी मिळावा, यासाठी राज्य तसेच केंद्र सरकारकडे फेरप्रस्ताव पाठवून प्रयत्न करावा, अशा सूचना प्रशासनाला देण्यात आल्या. या योजनेतंर्ग‍त सध्या सुरू असलेली पाण्याच्या टाक्यांची कामे पूर्ण केली जाणार असल्याचे महापौर जगताप यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


शेवटचा सोमवार मोफत प्रवासाचा

0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

शहरातील सार्वजनिक वाहतुकीला प्रोत्साहन देण्याबरोबरच वाहतूक सक्षम करण्यासाठी प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या सोमवारी शहरातील नागरिकांना ‘पीएमपीएमएल’ची सेवा मोफत देण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. मंगळवारी झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. पालिकेच्या मुख्य सभेने या प्रस्तावाला मंजुरी दिल्यानंतर निर्णयाची अंमलबजावणी सुरू होणार आहे.
शहराचा सर्व बाजूने होत असलेला वाढता विस्तार लक्षात घेता एका ठिकाणावरून दुसऱ्या भागात जाण्यासाठी अनेक खासगी वाहनांचा वापर केला जातो. गेल्या काही वर्षांत दुचाकींची संख्या वाढली आहे. खासगी वाहनांची संख्या वाढल्याने शहरातील अनेक चौकात वाहतुकीचा गंभीर प्रश्न निर्माण होत आहे. वाहतुकीसाठी रस्ते कमी पडत असल्याने प्रदूषणही वाढत आहे.
या पार्श्वभूमीवर सार्वजनिक वाहतूक सक्षम करण्यासाठी एक दिवस पीएमपीएमएलचा प्रवास मोफत उपलब्ध करून द्यावा, असा प्रस्ताव माजी‌ उपमहापौर आबा बागूल यांनी महापालिका प्रशासनाला दिला होता. प्रायोगिक तत्त्वावर राबविण्यात येणाऱ्या या योजनेद्वारे महिन्यातून दोन वेळा मोफत प्रवास देण्यात यावा, असे प्रस्तावात नमूद करण्यात आले होते. याबाबत महापालिका प्रशासनाने पीएमपीएमएलकडे अभिप्राय मागितला होता. यावर पीएमपीएमएलने अभिप्राय देताना पालिकेने पीएमपीला मिळणारे एका दिवसाचे उत्पन्न पीएमपीकडे जमा करून ही योजना राबवावी, असे म्हटले होते.
स्थायी समितीच्या बैठकीत यावर चर्चा झाली. प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या सोमवारी पुणे शहरासह पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतील नागरिकांनाही ही बससेवा मोफत उपलब्ध असणार आहे. ‘पीएमपी सक्षम करण्यासाठी हा प्रयोग महत्त्वपूर्ण ठरणार असून, याचा फायदा हजारो पुणेकर घेतील,’ असा विश्वास समितीचे अध्यक्ष बाळासाहेब बोडके यांनी व्यक्त केला. ही योजना राबविण्यासाठी पालिकेला पीएमपीला १ कोटी ७० लाख रुपये एक दिवसाचे उत्पन्न म्हणून द्यावे लागणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कुणालगीर यांनी दिली मित्रांना प्रेरणा

0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

जम्मू काश्मीरमध्ये दहशतवाद्यांशी लढताना हुतात्मा झालेले मेजर कुणालगीर गोसावी हे बृहन्महाराष्ट्र कॉलेज ऑफ कॉमर्सचे माजी विद्यार्थी होते. कॉलेजमध्ये बारावी ते बीकॉमपर्यंतचे शिक्षण घेतानाच ते एनसीसीमध्ये सक्रिय होते. त्यांच्यापासून प्रेरणा घेऊन त्यांचे सहा मित्रही लष्करात दाखल झाले होते.
‘कॉलेजमध्ये शिकत असताना कुणाल कायमच सर्व उपक्रमात आघाडीवर असे. अजूनही सातत्याने तो कॉलेजच्या संपर्कात होता. त्याच्या मदतीने विद्यार्थ्यांसाठी लष्करातील करिअरसंबंधीच्या कार्यक्रमांचे आयोजन आम्ही केले होते. विलक्षण बुद्धिमत्ता आणि ग्रहणशक्ती असलेल्या कुणालने जिद्दीने लष्करात दाखल होण्याचे स्वप्न साकारले,’ असे बीएमसीसीचे प्राचार्य डॉ. सी. एन. रावळ यांनी सांगितले.
‘कुणालचा स्वभाव अतिशय मनमिळावू होता. सन २००१ ते २००५ तो बीएमसीसीत होता. याच काळात ‘एनसीसी’च्या लष्कराच्या तुकडीत तो सक्रिय होता. इतर उपक्रमांतही तो कायम पुढाकार घेई. सधन परिवारातील कुणालची लष्करात अधिकारी होण्याची जिद्द होती. त्याच्याबरोबरचे अन्य काही विद्यार्थीही लष्करात सेवा बजावत आहेत. कुणाल शहीद झाल्याने आम्हाला धक्का बसला असला, तरी त्याचा अभिमानही आहे,’ असे एनसीसी अधिकारी मेजर प्रा. लीला माळी यांनी सांगितले.
‘आमच्या कॉलेजच्या ग्रुपमधील अनेकजण एकमेकांच्या प्रोत्साहनाने लष्करात दाखल झाले आहेत. त्यात कुणालचा वाटा मोठा होता. सर्वांशी मिळून मिसळून असणाऱ्या कुणालच्या आठवणी आता दाटून येत आहेत. मी मंगळवारीच पंढरपूरमध्ये दाखल झालो आहे,’ असे कुणाल यांचा मित्र तुषार सुर्वे याने सांगितले.
‘माझ्या एक वर्ष पुढे असणारा कुणाल आमचा पीटी लीडर होता. तेव्हापासून आमची मैत्री जुळली. लेहजवळील एका पोस्टवर तो कार्यरत असतानाही तिथे त्याची भेट झाली होती. कुणाल दहशतवाद्यांशी लढताना शहीद झाल्याने आमचे मोठे वैयक्तिक नुकसान झाले आहे,’ असे कुणाल यांचा मित्र गौरव बापट याने सांगितले.
शहीद मेजर कुणाल गोसावी यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी बीएमसीसी आणि कुणाल यांच्या मित्रपरिवारातर्फे लवकरच श्रद्धांजली सभेचे आयोजन करण्यात येणार आहे.
मेजर कुणाल गोसावी बीएमसीसीत असताना एनसीसीमध्ये सक्रिय होते. कुणाल यांची लष्कराविषयीची ओढ आणि निष्ठा पाहून तेव्हा त्यांच्याच बरोबर शिकणाऱ्या अन्य विद्यार्थ्यांनीही लष्करात दाखल होण्याचा निर्णय घेतला. आता त्यापैकी मेजर ओंकार जोशी, मेजर श्यामराव गायकवाड, मेजर सुजय तांबे, मेजर ओंकार बापट, मेजर अभिजित दामले, मेजर पूजा सानप हे लष्करात विविध विभागांत कार्यरत आहेत. मेजर कुणाल शहीद झाल्याने त्यांना धक्का बसला असला, तरी त्यांचे बलिदान वाया जाणार नाही, याची खात्री त्यांच्या मित्रपरिवाराला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘नियोजित मेट्रोमार्ग आखणी पूरक हवी’

0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

शिवाजीनगर ते हिंजवडी येथील नियोजित मेट्रोमार्गाची परिसरातील उड्डाणपूल, ग्रेड सेपरेटर आदी उपाययोजनांशी पूरक पद्धतीने आखणी करावी, अशी सूचना मंगळवारी बैठकीत करण्यात आली.
हिंजवडी आणि आसपासच्या परिसरातील वाहतुकीचा प्रश्न सोडविण्यासाठी शिवाजीनगर न्यायालय ते हिंजवडी असा मेट्रो मार्ग उभारण्याचे नियोजन पुणे महानगर प्रादेशिक विकास प्राधिकरणाकडून (पीएमआरडीए) करण्यात येत आहे. दिल्ली मेट्रो कॉर्पोरेशनकडून (डीएमआरसी) प्रकल्प अहवाल तयार करण्यात येत आहे. या मार्गाच्या आखणीचे प्राथमिक काम सध्या सुरू आहे. त्या पार्श्वभूमीवर आमदार विजय काळे यांनी मंगळवारी बैठक घेतली.
नगर अभियंता प्रशांत वाघमारे, वाहतूक नियोजक श्रीनिवास बोनाला, तसेच ‘पीएमआरडीए’चे अधिकारी या वेळी उपस्थित होते. हा एलिव्हेटेड मेट्रो मार्ग २१ किलोमीटरचा असून, त्यावर २२ स्टेशन उभारण्यात येणार आहेत. यापैकी नऊ किलोमीटरचा मार्ग पुणे महापालिकेच्या हद्दीतून जाणार आहे. दरम्यान, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या चौकातील वाहतुकीची कोंडी सोडविण्यासाठी ग्रेड सेपरेटर, तसेच उड्डाणपूल अशा उपायांचेही नियोजन सुरू आहे. येथून बीआरटी तसेच, ‘एचसीएमटीआर’ही नियोजित आहे. या सर्व उपाययोजनांनी नियोजित मेट्रो पूरक आणि सुसंगत ठरावी, यादृष्टीने बैठकीत काही सूचना करण्यात आल्या. दिल्ली मेट्रोकडून मेट्रो प्रकल्पाचा अहवाल लवकरच ‘पीएमआरडीए’कडे सादर करण्यात येणार आहे. त्यानंतर मान्यता घेऊन तो राज्य सरकारकडे पाठविला जाणार आहे, असे सूत्रांनी सांगितले.
या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हिंजवडीतील प्रमुख उद्योजकांशी चर्चा केली. हिंजवडी आणि आसपासच्या परिसरातील भीषण वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी हा प्रकल्प उपयुक्त ठरणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बिल्डरकडे खंडणी मागणारे गजांआड

0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

बांधकाम व्यावसायिकाकडे दहा लाखांची खंडणी मागणाऱ्या जंगल्या उर्फ विशाल सातपुते टोळीतील आठ जणांना खडक पोलिसांनी अटक केली. कुणाल पोळ खुनामध्ये या टोळीचा हात असून, त्यांनी कोर्टाच्या कामासाठी खंडणी मागितल्याचे समोर आले आहे.
मंगेश सातपुते (वय २९) तुषार सातपुते (वय २७, दोघेही रा. वैदूवाडी, हडपसर), शंकर तिपन्ना कोळी (वय २६), गणेश शंकर पवार (वय २८) शुक्रकुमार उर्फ सोनू कृष्णा रणपिसे (वय २७), सुभाष गड्डम (वय २६), सादिक अन्सारी (वय २४, सर्व रा. घोरपडे पेठ), सिद्धार्थ लोखंडे (वय २६, रा. लोहियानगर) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. या बाबत आसिफ मौलाना शेख (वय ३१, रा. कोंढवा खुर्द) यांनी तक्रार दिली होती. शेख यांनी घोरपडे पेठेत जागा घेतली आहे. त्या ठिकाणी येणे जाणे असल्यामुळे कुणाल पोळ खुनातील आरोपींना ते ओखळत होते. जुलै महिन्यात पोळ याच्या खुनात जामिनावर बाहेर आलेल्या आरोपींनी शिवीगाळ आणि दमदाटी करून कोर्टाच्या कामासाठी दहा लाख रुपयांची खंडणी देण्यास जंगल्याने सांगितले आहे. पैसे दिले नाही तर काही खरे नाही, अशी धमकी दिली. २८ नोव्हेंबर रोजी शेख घोरपडे पेठेत आले असताना आरोपींनी त्यांना पैसे देण्यास टाळाटाळ करतो का म्हणून गाडीवर बसवून धोबीघाट स्मशानभूमीत नेले. तेथे शंकर कोळी आणि मंगेशने पिस्तुलाचा धाक दाखवून दहा लाखांच्या खंडणीची मागणी केली. या प्रकरणी त्यांनी तक्रार दिल्यानंतर वरिष्ठ पोलिस निरीक्षक रघुनाथ जाधव यांनी तपासाच्या सूचना दिल्या.
पोलिस कर्मचारी विशाल शिंदे व इम्रान नफाद यांना मिळालेल्या माहितीनुसार उपनिरीक्षक संजय गायकवाड यांच्या पथकाने आरोपींना पकडले. आरोपी सराईत गुन्हेगार आहेत. त्यांच्याकडे तपास करण्यासाठी कोर्टाने ६ डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘मुलगी वाचवा’साठी कारवारी

0
0

भारुलता कांबळेंची इंग्लंड ते महाड यात्रा; आज ‘बार्टी’कडून होणार सन्मान

म. टा. प्रतिनिधी, पुणे

उत्तर ध्रुव... दोन खंड... नऊ टाइम झोन... तीन वाळवंट... नऊ पर्वतरांगा... तसेच बत्तीस देशांतून ३२ हजार किलोमीटरचे अंतर एकटीने पार करून एक महिला भारतात दाखल झाली आहे. हा प्रवास तिने पूर्ण केला आहे केवळ ‘मुलगी वाचवा, मुलगी शिकवा’ या संदेशाचा प्रसार करण्यासाठी... भारुलता कांबळे असे त्यांचे नाव आहे.
मुलगी वाचवा मुलगी शिकवा, महिला सक्षमीकरणाचा संदेश देण्यासाठी श्रीमती कांबळे यांनी इंग्लंड ते महाड अशी यात्रा सुरू केली होती. नुकताच त्यांचा प्रवास पूर्ण झाला. या पार्श्वभूमीवर महाड येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आांबेडकर राष्ट्रीय स्मारक येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्थेतर्फे (बार्टी) आज, बुधवारी (३० नोव्हेंबर) राज्याचे सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांच्या हस्ते त्यांचा विशेष सत्कार करण्यात येणार आहे.
कांबळे या मूळच्या गुजरातमधील नवसारी येथील. सध्या त्या इंग्लंडमध्ये वास्तव्यास आहेत. त्यांनी जुलै २०१६मध्ये हा प्रवास सुरू केला. त्यांना महाडला पोहोचण्यासाठी ७५ दिवस लागले. त्यांनी हा प्रवास कारने पूर्ण केला आहे. ‘कार चालविणे आणि स्वावलंबी बनणे या गोष्टी महिला सक्षमीकरणासाठी महत्त्वाचे हत्यार ठरू शकतात. आपल्या देशात कार चालविणे हे अजूनही पुरुषांचे काम समजले जाते. परंतु, बदलत्या सामाजिक आणि आर्थिक परिस्थितीचा लाभ घेण्यासाठी महिलांना कार चालविता आली पाहिजे,’ असे कांबळे यांचे मत आहे.
‘कांबळे यांचे ध्येय आणि बार्टीची ध्येये-उद्दिष्टे यात समानता आहे. त्यासाठी बार्टीकडून त्यांचा सन्मान केला जाणार आहे,’ असे बार्टीचे महासंचालक राजेश ढाबरे यांनी नमूद केले.

कार चालविणे आणि स्वावलंबी असणे, हे महिला सक्षमीकरणाचे महत्त्वाचे हत्यार ठरू शकते. कारण भारतामध्ये कार चालविणे हे अजूनही पुरुषांचे काम समजले जाते.
भारुलता कांबळे

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘नदीसुधार’चा निधी पालिकेच्या तिजोरीत

0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

सर्व पक्षीयांकडून टीकेचा भडीमार झाल्यानंतर शहरातील नदीसुधारणा योजनेंतर्गत केंद्र सरकारने महापालिकेला देण्यासाठी २६ लाख रुपयांचा निधी पालिकेला देण्यास मंगळवारी राज्य मंत्रिमंडळाने मान्यता दिली. या योजनेसाठी केंद्राने दिलेला निधी राज्य सरकारने सहा महिने प्रलंबित ठेवला होता.
नदी सुधारणा करण्यासाठी केंद्र सरकारने जपानच्या जायका कंपनीकडून कर्ज घेऊन महापालिकेला ते अनुदान स्वरूपात देण्याचा निर्णय घेतला. नदी सुधारणा करण्यासाठी ९९० कोटी रुपयांचा पालिकेचा प्रकल्प असून त्यातील ८५ टक्के, म्हणजेच ८४१ कोटी रुपये केंद्र सरकार देणार आहे. उर्वरित दीडशे कोटी रुपये महापालिकेला उभारावे लागणार आहेत. या योजनेसाठी ८४१ कोटी रुपये उपलब्ध करून दिल्याची घोषणा तत्कालीन केंद्रीय पर्यावरणमंत्री प्रकाश जावडेकर यांनी केली होती. त्यानंतर जावडेकर यांचा जाहीर सत्कारही करण्यात आला. मात्र, आजपावेतो योजनेचा एक दमडाही पालिकेला मिळाला नसल्याचा आरोप करून काँग्रेस, राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी भाजपचे वाभाडे काढले होते. या पार्श्वभूमीवर मंगळवारी कॅबिनेटच्या बैठकीत हा निधी तातडीने महापालिकेला देण्याचा निर्णय घेण्यात आला. ‌ हा प्रकल्प सहा वर्षांत पूर्ण करावयाचा असून दिरंगाई झाल्यास निधीसाठी हात आखडता घेतला जाईल, असे पालिकेला बजाविण्यात आले आहे.

कामांची यादी...
या योजनेतून नदीत सोडण्यात येणारे सांडपाणी अडविणे, त्यावर प्रक्रिया करणे, मैलापाणी शुद्धीकरण प्रकल्प उभारणे (एसटीपी), मत्स्यबीज केंद्र, बोटॅनिकल गार्डन, सुलभ शौचालयांची उभारणी करणे आदी कामांचा समावेश आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

राज्यातील पतसंस्थांचा उद्या मुंबईत महामोर्चा

0
0

आर्थिक कोंडीविरोधात लाक्षणिक बंदही पुकारणार

म. टा. प्रतिनिधी, पुणे

केंद्र सरकारने पाचशे आणि एक हजार रुपयांच्या जुन्या चलनी नोटांवर बंदी घातल्यामुळे पतसंस्थांचा संपूर्ण कारभार ठप्प झाला असून, या आर्थिक कोंडीविरोधात उद्या, गुरुवारी (एक डिसेंबर) राज्यातील पतसंस्थांतर्फे लाक्षणिक बंद पुकारण्यात येणार आहे. पतसंस्थांवरील निर्बंधांमुळे कोट्यवधी सामान्य नागरिकांचे हाल होत असून, त्याकडे लक्ष वेधण्यासाठी ‘सहकार बचाव महामोर्चा’ही काढण्यात येणार असल्याचे जाहीर करण्यात आले.
महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष ओमप्रकाश कोयटे यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत त्याविषयी सविस्तर माहिती दिली. पतसंस्थांकडे जमा झालेल्या पाचशे आणि एक हजार रुपयांच्या नोटा स्वीकारल्या जात नसल्याने कोट्यवधींचे नुकसान होत आहे. या आर्थिक आणिबाणीमुळे पतसंस्था बुडाल्यास ठेवीदारांची रक्कम बुडण्याची भीतीही त्यांनी व्यक्त केली.
‘पतसंस्थांच्या बँकेतील खात्यांना व्यक्तिगत खाते न समजता, बँक खात्यातून रक्कम काढण्यास परवानगी द्यावी, संस्थेच्या सभासदांना कर्ज परतफेडीची आणि जमा करावयाची रक्कम बँक खात्यात जमा करण्यास मान्यता द्यावी, पतसंस्थांना बँक करस्पॉन्डन्स म्हणून काम करण्यास मुभा द्यावी आणि सरकारच्या विविध खात्यांच्या बिलांची वसुली करण्यासाठी जुन्या नोटा स्वीकारण्यास अनुमती द्यावी, अशा मागण्या फेडरेशनतर्फे करण्यात आल्या आहेत,’ असे कोयटे यांनी सांगितले.
कष्टकरी, रोजंदारीवरील कामगार, छोटे दुकानदार, व्यावसायिक, शेतीपूरक व्यवसाय करणारे व्यावसायिक यांचे बहुतांश आर्थिक व्यवहार पतसंस्थेच्या माध्यमातून चालतात. परंतु, पतसंस्थांवरील निर्बंधामुळे सुमारे दोन कोटींपेक्षा अधिक सभासदांना हालअपेष्टा सहन कराव्या लागत आहेत. त्याकडे, लक्ष वेधण्यासाठी मुंबईतील आझाद मैदानापासून ते रिझर्व्ह बँकेच्या कार्यालयापर्यंत सहकार बचाव महामोर्चा काढण्यात येणार असल्याचेही ते म्हणाले.

अडीच लाख कर्मचाऱ्यांवर कुऱ्हाड?
राज्यात सुमारे सोळा हजार नागरी सहकारी पतसंस्था असून, त्यापैकी सात हजार दोनशे पगारदार पतसंस्था आहेत. या पतसंस्थांमध्ये अंदाजे २५ हजार कोटी रुपयांच्या ठेवी असून, १६ हजार आठशे कोटी रुपयांचे कर्ज वाटप करण्यात आले आहे. पतसंस्थांकडे आजमितीस सुमारे बावीसशे कोटी रुपयांची थकबाकी असून, अडीच लाखांहून अधिक कर्मचारी कार्यरत आहेत. पतसंस्थांमधील व्यवहार ठप्प झाल्याने ही सर्व व्यवस्था कोलमडण्याची भीती असल्याचा दावा फेडरेशनच्या पदाधिकाऱ्यांनी केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


दूध उत्पादकही झाले हवालदिल

0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांना चलन न पुरवण्याच्या निर्णयाचा फटका दूध उत्पादक शेतकऱ्यांना बसला आहे. जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे १८ नोव्हेंबरपासून दुधाचे पैसे थकले आहेत. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत कात्रज दूध संघाकडून जमा केलेल्या सात कोटी रुपयांचे वितरण न झाल्याने शेतकऱ्यांपुढील अडचणी वाढल्या आहेत.
‘शेतकऱ्यांना दुधाचे पैसे न मिळाल्याने त्यांच्या उपजीविकेचा प्रश्न निर्माण झाला आहे. तसेच, जनावरांना पशुखाद्य, औषधोपचारासाठी पैसा उपलब्ध नाही. शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे सरकार दुर्लक्ष करत आहे,’ अशी टीका पुणे जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाचे चेअरमन विष्णू हिंगे यांनी केली. पुणे जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाकडून ‘कात्रज’ या नावाने दुग्धोत्पादनांची विक्री केली जाते. शेतकऱ्यांकडून खरेदी करण्यात येत असलेल्या दुधावर प्रक्रिया केली जाते. शेतकऱ्यांचे दूध खरेदीचे पैसे दर पंधरा दिवसांनी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमध्ये जमा करण्यात येतात. सहकार खात्याच्या सूचनेनुसार सहकारी दूध उत्पादक संस्थांनी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत खाते उघडणे बंधनकारक आहे. ज्या ठिकाणी सहकारी बँकेची शाखा नसेल, त्या ठिकाणी बँक ऑफ महाराष्ट्र, स्टेट बँकेच्या शाखेत खाती उघडण्यात आली आहेत.
दूध उत्पादक संघाकडून ​पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत दुधाच्या रकमेपोटी सात कोटी ६३ लाख रुपये, बँक ऑफ महाराष्ट्रात एक कोटी २२ लाख तर स्टेट बँकेत एक कोटी २४ लाख रुपये वितरित केले जातात. दूध संघाकडून वितरित करण्यात येणाऱ्या एकूण देयकांच्या तुलनेत ८६ टक्के देयके पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमार्फत दिली जातात. त्यात सहकारी बँकेला चलनी नोटा वितरित करण्याची परवानगी नसल्याने शेतकऱ्यांना नाहक त्रासाला सामोरे जावा लागत असल्याचेही हिंगे यांनी प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गोखले रस्त्यावर कॅशलेस व्यवहार

0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

फर्ग्युसन रस्त्यावरील (नामदार गोपाळकृष्ण गोखले रस्ता) सर्व व्यवहार आज, बुधवारपासून (३० नोव्हेंबर) कॅशलेस होणार आहेत. हा प्रयोग यशस्वी झाल्यानंतर शहरातील अन्य प्रमुख रस्त्यांवर हा उपक्रम राबवला जाणार असल्याचे जिल्हाधिकारी सौरभ राव यांनी सांगितले.
‘फर्ग्युसन रस्ता कॅशलेस करण्यासाठी गेल्या अनेक दिवसांपासून प्रयत्न सुरू आहेत. विविध बँका, व्यापारी आणि स्वाइप मशिन कंपनीच्या प्रमुखांशी या संदर्भात चर्चा करण्यात आली आहे. त्यानुसार ३० नोव्हेंबरपासून हा प्रयोग राबवला जाणार आहेत. त्यानुसार ऑनलाइन पेमेंट, डेबिट आणि क्रेडिट कार्ड पेमेंट; तसेच ई-वॉलेट पेमेंटची सुविधा उपलब्ध होणार आहे,’ असेही राव म्हणाले. ‘या योजनेबाबत जनजागृती करण्यासाठी माहितीपुस्तकांचे वाटप करण्यात आले आहे. सोशल मीडिया आणि होर्डिंग्जद्वारे प्रचारही करण्यात येत आहे. दुकानदारांना स्वाइप मशिन उपलब्ध करून देण्यात आले आहेत. त्यामुळे बुधवारपासून या रस्त्यावरील सर्व व्यवहार कॅशलेस होतील,’ असेही राव म्हणाले.
‘या रस्त्यावरील कॅशलेसचा प्रयोग यशस्वी झाल्यानंतर शहरातील अन्य प्रमुख रस्त्यांवर हा प्रयोग राबवला जाणार आहे. त्यामध्ये लक्ष्मी रस्ता, टिळक रस्ता, शास्त्री रस्ता, कुमठेकर रस्ता, केळकर रस्ता, विद्यापीठ रस्ता, तुळशीबाग, मंडई, शिवाजी रस्ता, सातारा रस्ता आणि उपनगरांचा समावेश आहे. टप्प्याटप्याने ही योजना सर्वत्र राबविण्यात येणार आहे,’ असेही ते म्हणाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नोटाबंदीच्या निर्णयाचा बचतगटांनाही फटका

0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

केंद्र सरकारच्या नोटाबंदीच्या निर्णयाचा फटका महिला बचत गटांना बसला आहे. त्यांना कर्जाचे हप्ते भरणेही मुश्किल झाले आहे. जिल्हा बँकांतील आर्थिक व्यवहार थंडावले असल्याने कर्जवसुली होत नसल्याचा दावा बचत गटांकडून करण्यात येत आहे. वेळेत कर्ज न भरल्यामुळे बचतगटांना व्याजदरात मिळणाऱ्या सवलतीलाही मुकावे लागण्याची शक्यता आहे.
राज्यातील स्वयंसहायता बचत गटांना जिल्हा सहकारी बँकांकडून कर्ज पुरवठा केला जातो. पुणे जिल्हा सहकारी बँकेच्या २६१ शाखांपैकी ८२ शाखा असलेल्या गावांमध्ये जिल्हा बँकेव्यतिरिक्त दुसरी कुठलीही बँक नाही. जिल्हा सहकारी बँकेवर असलेल्या निर्बंधांमुळे शेतकरी, विविध सहकारी संस्थांचे सभासद, बचतगट, दूध उत्पादक, व्यावसायिक संस्था तसेच सभासदांचे आर्थिक व्यवहार थंडावल्याने मोठ्या प्रमाणात गैरसोय झाली आहे. त्यामुळे बचतगटांना कर्जभरणा करणे अडचणीचे झाले असल्याची टीका जिल्हा बँकेच्या उपाध्यक्षा अर्चना घारे यांनी केली.
जिल्ह्यात एकूण बचतगट ३२,०९९ असून त्याद्वारे सहा लाख २१ हजार महिला सभासद कार्यरत आहेत. ३४३ बचत गटांना २७१.८६ लाख रुपयांचे कर्ज वितरित करण्यात आले आहे. ऑक्टोबर अखेर १०२४ बचत गटांकडून ५७४.५१ लाख रुपये येणे बाकी आहे. बहुतांश बचत गटांनी नियमित कर्ज परतफेड केल्याने त्यांना चार टक्के सवलत परतावा दिला गेला आहे. चालू आर्थिक वर्षात ६५१ बचतगटांना चार टक्के व्याज दराने सवलत परतावा मिळालेला आहे. सध्या बँकेत ५०० आणि एक हजार रुपयांच्या नोटा स्वीकारण्यात येत नसल्याने बचत गटांना कर्जाचे हप्ते भरणे अडचणीचे झाले असून, पैसे असतानाही वेळेत कर्ज परतफेड न झाल्याने त्यांना परतावा मिळणार नाही, असे घारे यांनी प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

श्याम दाभाडे, शिंदेचा खात्मा

0
0

चाकणजवळील आंबु डोंगरावर ग्रामीण पोलिसांची धाडसी कारवाई

म. टा. प्रतिनिधी, पुणे

चाकणनजीकच्या आंबु डोंगरावर पोलिसांबरोबरच मंगळवारी झालेल्या चकमकीत कुख्यात गुंड श्याम दाभाडे आणि त्याचा साथीदार धनंजय शिंदे उर्फ तांबोली ठार झाले. या दोघांना शरण येण्यास सांगितल्यानंतर त्यांनी पोलिसांवर गोळीबार केला. त्यानंतर पोलिसांकडून झालेल्या गोळीबारात दोघे ठार झाले. पोलिसांनी त्यांच्याकडून पाच पिस्तुले आणि ४२ जिवंत काडतुसे जप्त केली आहेत, अशी माहिती कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटील यांनी दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तळेगाव दाभाडे येथील माजी नगराध्यक्ष सचिन शेळके यांचा १६ ऑक्टोबर रोजी खून झाला होता. दाभाडेच्या टोळीने आर्थिक फायद्यासाठी शेळके यांचा खून केल्याचे निष्पन्न झाले होते. या प्रकरणी १५ जणांस अटक करण्यात आली होती. मात्र, म्होरक्या श्याम रामचंद्र दाभाडे आणि अन्य फरारी होते.
दाभाडे या खुनाचा मुख्य सुत्रधार तसेच माहिती अधिकार कार्यकर्ते सतीश शेट्टी खुनातील आरोपी होता. त्याच्यावर यापूर्वी खून, अपहरण, खंडणी आदींसारखे १९ गंभीर गुन्हे दाखल होते. त्याची तळेगाव परिसरात खूपच दहशत होती. त्यामुळे पुणे ग्रामीणचे पोलिस अधीक्षक जय जाधव यांनी त्याला अटक करण्याच्या सूचना स्थानिक गुन्हे शाखेला दिल्या होत्या. तो आपल्याबरोबर सतत पिस्तुल बाळगून असतो, अशी माहिती पोलिसांना होती. त्यामुळे या कारवाईमध्ये नक्षलग्रस्त भागात काम करणाऱ्या दोन अधिकाऱ्यांना ‘एलसीबी’चे पोलिस निरीक्षक राम जाधव यांनी सहभागी करून घेतले होते.
‘एलसीबी’चे पोलिस निरीक्षक राम जाधव दाभाडेचा शोध घेतच होते. तितक्यात त्यांना दाभाडे आणि शिंदे खेड तालुक्यातील आंबु डोंगरावरील जंगलात वास्तव्यास असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार मंगळवारी पहाटे दोनच्या सुमारास पोलिसांनी शोधमोहीम सुरू केली. सकाळी आठच्या सुमारास आंबु डोंगरावरील पवनचक्कीजवळ पोलिसांना एक तंबू दिसला. त्यावेळी सहायक पोलिस निरीक्षक राजेश रामघरे आणि अंकुश माने यांनी दाभाडे आणि शिंदे यांना शरण येण्यास सांगितले. त्यावेळी दोघांनी कमरेला लावलेले पिस्तुल काढून पोलिसांच्या दिशेने गोळीबार सुरू केला. दरम्यान, पोलिस उंच ठिकाणी आडोशाला असल्यामुळे त्यांना जखम झाली नाही. जाधव यांनी पुन्हा त्यांना शरण येण्याविषयी बजावले. मात्र, त्यांनी पोलिसांवर गोळीबार सुरूच ठेवला. जाधव आणि सहायक निरीक्षक सतीश होडगर यांनी स्वसंरक्षणार्थ पाच गोळ्या झाडल्या. त्यापैकी दोन गोळ्या लागून दोघेही जखमी झाले. पोलिसांनी तत्काळ त्यांची शस्त्रे ताब्यात घेऊन चाकण ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र, त्यांचा मृत्यू झाला.
‘आरोपींनी गोळीबार केल्यामुळे पोलिसांनी स्वसंरक्षणार्थ केलेल्या प्रतुत्तरात ते ठार झाले. या प्रकरणी मानवाधिकार आयोग आणि न्यादंडाधिकाऱ्यांना कळविण्यात आले आहे. तसेच, या प्रकरणाचा तपास पोलिस उपअधीक्षक मितेश गट्टे यांच्याकडे देण्यात आला आहे. श्याम दाभाडे सराईत गुन्हेगार होता. तो पिस्तुल बाळगून असल्याची माहिती असल्यामुळे खास प्रशिक्षित अधिकाऱ्यांना या कारवाईत सहभागी करून घेण्यात आले होते. या घटनेमुळे तळेगार दाभाडे येथील गुन्हेगारी कमी होण्यास मदत होईल,’ अशी माहिती नांगरे पाटील यांनी दिली.

राम जाधवांचे १४ एन्काऊंटर
पोलिस दलातील धडाकेबाज अधिकारी म्हणून ओळखले जाणारे पोलिस निरीक्षक राम जाधव यांनी आतापर्यंत १४ एन्काउंटर केले आहेत. पुणे ग्रामीण दलात असताना त्यांनी चार एन्काउंटर केले आहेत. फौजदार असताना जाधव आणि बापू कुतवळ यांनी १९९७मध्ये पहिला एन्काउंटरर कुख्यात गुंड प्रमोद माळवदकर याचा केला. त्यानंतर २००१मध्ये छोटा राजन टोळीच्या दिलीप गोसावीला यमसदनी पाठवले. २००८मध्ये रॉबर्ट साळवेचा राम जाधव आणि किशोर जाधव यांनी खात्मा केला. कोथरूड परिसरातील गांधीभवन येथे संतोष ओव्हाळला तर तळोजा परिसरात मोबीन शेखला त्यांनी कंठस्नान घातले. पुणे ग्रामीणला गेल्यानंतर जाधव यांनी केलेल्या कारवाईत गुंड महाकाली, बाळू ढोरे ठार झाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सामान्य नागरिक नोटाबंदीच्या पाठीशी

0
0

ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ अनिल बोकील यांचे मत

म. टा. प्रतिनिधी, पुणे

‘नोटाबंदीच्या निर्णयाविरोधात सामान्य नागरिक आक्रोश करीत आहेत; असा कांगावा केला जात आहे. खरे तर सामान्य नागरिक या निर्णयाच्या ठामपणे पाठीशी असून, त्यांनी निर्णयाचे स्वागतच केले आहे,’ असे मत ‘अर्थक्रांती’चे प्रणेते अनिल बोकील यांनी मंगळवारी व्यक्त केले. देशातील परिस्थिती बदलण्यासाठी कायदे नाही, तर व्यवस्था बदलण्याची​ गरज असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
ग्राहक पेठ को-ऑपरेटिव्ह स्टोअर्स आणि जनता सहकारी बँकेतर्फे आयोजित व्याख्यानात बोकील बोलत होते. या वेळी महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्रीज अँड अॅग्रीकल्चरचे अध्यक्ष प्रमोद चौधरी, जनता सहकारी बँकेचे अध्यक्ष अरविंद खळदकर, पुणे सराफ असोसिएशनचे अध्यक्ष फत्तेचंद रांका, व्यापारी राजेश शहा, ग्राहक पेठेचे सूर्यकांत पाठक आणि ज्येष्ठ पत्रकार यमाजी पालकर यांनी बोकील यांच्याशी संवाद साधला.
‘सरकारने नोटाबंदीचा निर्णय जाहीर केल्यानंतर, पैसे काढण्यावर बंधने घातल्याचे जाहीर केले. त्यामुळे लोकांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण होऊन, सर्वजण पैसे काढण्यासाठी धावपळ करू लागले. त्यामुळे आजची परिस्थिती निर्माण झाली आहे,’ असे बोकील यांनी स्पष्ट केले. ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी एकीकडे कॅशलेस व्यवहारांची टिमकी वाजवत आहेत आणि दुसरीकडे दोन हजार रुपयांची नोट चलनात का आणत आहेत, असे प्रश्न सर्वत्र उपस्थित होत आहेत. मात्र, त्यामागेही कारण आहे. चलनात पाचशे व हजार रुपयाच्या नोटांचे प्रमाण मोठे होते. त्या एकाएकी बंद केल्यामुळे अर्थव्यवस्थेचा वेग मंदावला. ही परिस्थिती हाताळण्यासाठी कमी नोटांच्या माध्यमातून जास्त चलन खेळविण्यासाठी दोन हजार रुपयाची नोट चलनात आणली,’ असेही बोकील यांनी नमूद केले.

‘जीएसटीचे आव्हान मोठे’
‘एक देश एक कर या संकल्पनेमुळे जीएसटीचे खूप कौतुक करण्यात आले. मात्र, प्रत्यक्षात जीएसटीचे स्वरूप तसे राहिलेले नाही. इंधन, विजेचे दर त्याबाहेर ठेवण्यात आलेले आहेत. जीएसटी लागू करण्यास अमेरिकेसारख्या बलाढ्य अर्थव्यवस्थेने नकार दिला. या पार्श्वभूमीवर आपण ते आव्हान पेलू शकू, का हा मोठा सवाल आहे, असे बोकील यांनी नमूद केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images