Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

‘बालकुमार’च्या बैठकीवरून गोंधळ

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

‘बालकुमार संस्था’ बरखास्त केल्यानंतर नवीन संस्था स्थापनेच्या मुद्द्यावरून संस्थेत उभी फूट पडली आहे. नवीन संस्थेत जुनी संस्था विलीन करण्यासाठी रविवारी बोलाविण्यात आलेली सर्वसाधारण सभा गोंधळामुळे तहकूब करण्यात आली. बालकुमार संस्थेचे सदस्य राजकारणात अडकून पडल्याने या संस्थेचे भवितव्य टांगणीला लागले आहे.

अमरेंद्र गाडगीळ यांनी १९७६मध्ये ‘अखिल भारतीय मराठी बालकुमार साहित्य संमेलन’ या नावाने संस्थेची धर्मादाय आयुक्तालयामध्ये नोंदणी केली होती. त्यानंतर २४ वर्षांनी विश्वस्तांच्या मान्यतेने संस्थेच्या नावाचे ‘अखिल भारतीय मराठी बालकुमार संस्था’ असे नामकरण करण्याचा ठराव करण्यात आला. या संस्थेच्या नावात बदल केल्याचा अहवाल दत्ता टोळ यांनी धर्मादाय आयुक्तालयाकडे पाठविला. मात्र, नाव बदलण्याची प्रक्रिया पूर्ण झाली की नाही, हे न पाहताच कामकाजास सुरुवात करण्यात आली. तब्बल पंधरा वर्षे जुन्याच संस्थेच्या नोंदणी क्रमांकावर संस्थेचे कामकाज सुरू होते.

दरम्यान, घटनादुरुस्ती करून ‘मराठी बालकुमार संस्था’ अशी नोंद करण्यात आली. तसा प्रस्ताव धर्मादाय आयुक्तालयाकडे पाठविण्यात येणार होता. मात्र, त्याआधीच संस्थेचे पदाधिकारी अनिल कुलकर्णी व मिहीर थत्ते यांनी ‘मराठी बालकुमार साहित्य संस्था’ ही नवीन संस्था स्थापन केली. या संस्थेत जुनी संस्था विलीन करावी, असे आवाहन करण्यासाठी महाराष्ट्र साहित्य परिषदेत सर्वसाधाराण सभा बोलाविण्यात आली होती. बरखास्त केलेल्या जुन्या संस्थेचे पत्र वापरून बैठक कशी बोलावली, या मुद्द्यावरून बैठकीत गोंधळ झाला. ही बैठक घटनाबाह्य आहे, असा आरोप करण्यात आल्याने बैठक उरकण्यात आली.


जुनी संस्था कार्यान्वित करणे तांत्रिकदृष्ट्या कोणालाही शक्य नाही. त्यामुळे जुनी संस्था नवीन संस्थेत विलीन करा, असे आवाहन आम्ही करणार होतो. मात्र, बरखास्त केलेल्या संस्थेच्या पत्राने सभा कशी बोलाविण्यात आली, या मुद्द्यावरून सभा कोणत्याही निर्णयाविना तहकूब करण्यात आली. संस्था चालवायची असेल, तर सर्वांना एकत्र येऊन काम करावे लागले.
अनिल कुलकर्णी

बालकुमार या नवीन संस्थेला आमचा आक्षेप नाही. मात्र, नवीन संस्थेत जुनी संस्था विलीन करण्यासाठी जुन्या बरखास्त झालेल्या संस्थेचे पत्र परस्पर वापरून बोलाविण्यात आलेल्या बैठकीला आमचा आक्षेप होता. बरखास्त झालेल्या संस्थेचे पत्र वापरणे हा गैरप्रकार असून बोलाविलेली बैठक घटनाबाह्य होती. जुन्या संस्थेच्या आजीव सभासदांची एक समिती नेमण्यात आली आहे. सर्वसाधारण सभा बोलावून संस्थेला कसे कार्यान्वित करता येईल, याबाबत आजीव सदस्यांच्या विचाराने निर्णय घेण्यात येईल
सुनील महाजन

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


कसरतींतून बालगोपाळांची कला सादर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

पांढऱ्या कॅनव्हासवर विविध वस्तूंपासून तयार झालेल्या रंगांचे रेखाटले जाणारे चित्र, डोळ्यावर पट्टी बांधून, नृत्य करून, हाताबरोबरच पायाचा वापर करून रेखाटलेली चित्रे, अशा अनेक कसरतींच्या साह्याने लहानग्यांच्या चमूने आपली कला सादर करून उपस्थितांना थक्क केले.

‘स्ट्रोक्स संस्थे’तर्फे आयोजित करण्यात आलेल्या चित्रप्रदर्शनात विविध वयोगटांतील लहान मुलांनी अनेक विषयांवर सुंदर चित्रे रेखाटून त्यांच्या अंगी असलेली कला दाखवली. नगरसेवक दीपक मानकर यांच्या हस्ते या प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले. ज्येष्ठ चित्रकार मुरली लाहोटी या वेळी उपस्थित होते. प्रदर्शनाच्या काळात छोट्या उस्तादांनी विविध कसरती करून चित्रे काढली. हर्षदा देशपांडे हिने फिरत्या चक्रावर डोळ्यांवर पट्टी बांधून चित्र काढले. जान्हवी पाटीलने नृत्य करताना कॅनव्हासवर ब्रश फिरवले. इशिता पेशवे या मुलीने एकाच वेळी हात आणि पायाचा वापर करून चित्र काढले. त्याचबरोबर मुलांनी विविध वस्तूंपासून तयार होणारे रंग वापरून चित्रांना आकार दिला. त्यामध्ये इशा बोरकरने पत्रा व रंग वापरून चित्र रेखाटले. अनुष्का शहा हिने ओरिगामी गणपती साकारला. तनया भावे हिने दोरा व रंगांचा सहायाने चित्र काढले. अनुष्का धामणे हिने मेणबत्तीच्या काजळीचा वापर करत सुंदर चित्राला आकार दिला. कोळशाचा वापर करून प्रथमा सांडभोरने चित्र रंगवले. मुरली लाहोटी यांनी मुलांना वेगवेगळी प्रात्यक्षिके दाखवली.

प्रदर्शनादरम्यान कॅलिग्राफीच्या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. ३ वर्षांपासून ८० वर्षांपर्यंतच्या सर्व स्तरांतील नागरिकांनी त्यामध्ये सहभाग घेतला होता. कॅलिग्राफीतज्ज्ञ अच्युत पालव यांनी सर्वांना सायकलवर सुलेखनाचे प्रात्यक्षिक करून दाखवले. त्यांनी उपस्थितांना छत्री, टेबल, खुर्ची, मातीची भांडी, माठ, पिंप, शिडी, अशा वस्तूंवर कॅलिग्राफी करण्यास सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘कादंबरी ही जीवनदृष्टी’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

‘कादंबरी ही कथानक किंवा घटनांची जंत्री नसते. तर, ती एकप्रकारे लेखकाची जीवनदृष्टी असते. लेखक स्वत: निर्माण केलेल्या रंगमंचावर आपल्याच लेखणीतून साकारलेल्या व्यक्तिरेखांच्या आधारे आपल्यालाच आयुष्यात पडलेल्या प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा प्रयत्न करीत असतो. ही शोधमोहीम महाकठीण असते,’ असे मत महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांनी रविवारी व्यक्त केले.

‘उत्कर्ष प्रकाशन’तर्फे प्रियांका कर्णिक लिखित ‘सावल्या’ या कादंबरीचे प्रकाशन प्रा. जोशी यांच्या हस्ते झाले. त्या वेळी ते बोलत होते. या वेळी लेखक शिवराज गोर्ले, ‘उत्कर्ष’चे सु. वा. जोशी उपस्थित होते. जोशी म्हणाले, ‘प्रत्येकजण जीवनाची आपापल्यापरीने व्याख्या करीत असतो. शेक्सपिअर म्हणतो, ‘आयुष्य म्हणजे वेड्याने सांगणारी अर्थपूर्ण कहाणी आहे.’ खांडेकर म्हणतात, ‘लाटांशिवाय सागर असू शकत नाही, ज्वालांशिवाय यज्ञ असू शकत नाही, जखमांशिवाय संग्राम असू शकत नाही.’ हे जो हसतमुखाने स्वीकारतो त्यालाच जीवनाचा अर्थ उमगला असे आपण म्हणू शकतो. आज समाजातील कौटुंबिक व्यवस्थेची पाहाणी केली तर दुभंगलेली नाती आणि विस्कटलेली मने यांची गुंतागुंत नात्यांत पाहायला मिळते, ही परिस्थिती बदलायची असेल तर संवादाचा सेतू निर्माण होण्याची गरज आहे. मराठी कादंबरीमध्ये हे विषय अभावानेच मांडले जातात. साहित्य म्हणजे शब्दांची आतषबाजी नसते तर ती जीवनाची उपासना असते.’

‘लैंगिकतेमुळे निर्माण होणारे प्रश्न आणि एकूणच भावनांची होणारी घुसमट अशा एका संवेदनशील विषयाला कादंबरीमधून हात घालण्यात आला आहे. ही कादंबरी स्त्री-पुरुष संबंधांचा अचूकपणे वेध घेते,’ असे त्यांनी नमूद केले.

गोर्ले म्हणाले, ‘साहित्यासाठी समाज, माणूस आणि मन या शोधाच्या गोष्टी आहेत. साहित्याच्या दृष्टीने माणसाचे व्यवच्छेदक लक्षण म्हणजे चांगल्या, वाईटाचे मिश्रण असते.’ लेखिका कर्णिक यांनी कादंबरी लेखनामागची भूमिका स्पष्ट केली.’ शिरीष कर्णिक यांनी आभार मानले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पालेभाज्यांसह फळभाज्यांच्या दरात घसरण

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

दिवाळीची सुट्टी बहुतेकांची अद्याप सुरू असल्याने फळभाज्यांची पुरेशी आवक झाली असली, तरी मागणीअभावी दर दहा ते वीस टक्क्यांनी उतरले आहेत. बहुतांश पुणेकर ‘आउटिंग’ला असून भाज्यांना मागणी नसल्यामुळे कांदा, फळभाज्यांसह पालेभाज्यांचे दर १० ते २० टक्क्यांनी उतरले आहेत.

गेल्या आठवड्याच्या तुलनेत मार्केट यार्डात रविवारी दुपटीने आवक झाली. सुमारे १६० ते १७० ट्रक आवक झाली. दिवाळीमुळे अद्याप भाज्यांना मागणी नसल्याचे व्यापारी सांगतात. आणखी काही दिवस भाज्यांचे दर स्थिर राहतील. परराज्यांतून कर्नाटक आणि गुजरातहून ४ ते ५ ट्रक कोबी, हिमाचल प्रदेश येथून २ ट्रक मटार, कर्नाटक आणि मध्यप्रदेशातून १५ ते १६ टेम्पो हिरवी मिरची, आंध्र प्रदेश येथून ६ ते ६ टेम्पो शेवगा परराज्यातून फळभाज्यांची आवक झाली आहे.

पुणे विभागातून सातारी आल्याची दीड हजार पोती, टोमॅटो साडेपाच ते सहा हजार कॅरेट, हिरवी मिरची १० ते १२ टेम्पो, सिमला मिरची १४ ते १५ टेम्पोची आवक झाली आहे. कोबी १५ ते १६ टेम्पो, फ्लॉवर १८ ते २० टेम्पो, गाजर ७ ते ८ टेम्पो, भुईमुग शेंगाची १०० पोतींची आवक झाली. मटारची आवक संपत आल्याने मटारची १ टेम्पो आवक झाली. शेवगा २ ते ३ टेम्पो, तांबडा भोपळा ८ ते १० टेम्पो, भावनगरी मिरची ५ ते ६ टेम्पोची आवक झाली. पुणे विभागातून नविन आणि जुन्या कांद्याची १०० ट्रक आवक झाली. बटाट्याची आग्रा, इंदूर; तसेच तळेगाव येथून सुमारे ६० ट्रकची आवक झाली. तळेगाव येथून नव्याने बटाट्याची आवक सुरू झाली आहे. मध्य प्रदेशातून लसणाची सुमारे ४ हजार गोणी इतकी आवक झाली.

गेल्या आठवड्याच्या तुलनेत पालेभाज्यांची आवक वाढली आहे. आवक वाढल्याने सर्वच पालेभाज्यांच्या दरात घट झाली आहे. बाजारात कोथिंबिरीच्या दीड लाख जुडी, तर मेथीच्या ८० हजार जुडींची आवक झाली.

मागणीअभावी फुलांचे दर घटले

मार्केट यार्डातील फूल बाजारात सर्वच प्रकारच्या फुलांची मोठ्या प्रमाणात आवक झाली आहे. परंतु, त्याला सध्या मागणी नसल्याने फुलांच्या दरात ३० ते ४० टक्क्यांनी घट झाली आहे. गणेशोत्सवापासून ते दिवाळीपर्यंत फुलांना मागणी असते. सध्या सणांचा हंगाम संपला आहे. त्यामुळे कोणत्याही प्रकारचा उत्सव सध्या नाही. परिणामी मागणी आपोआप घटली आहे. झेंडूची प्रचंड आवक झाली आहे. आवक वाढल्याने झेंडूचे दर उतरलेले आहेत. एका किलोसाठी ५ ते २० रुपये किलो असा दर आहे. गेल्या आठवड्यात गुलछडीला एका किलोसाठी दीडशे रुपये दर मिळाला होता. आज मागणी नसल्याने गुलछडीला १० ते ३० रुपये दर मिळाला आहे.

डाळिंब उतरले

गुलटेकडी फळबाजारात फळांची आवक चांगल्या प्रमाणात झाली. आवक वाढल्याने डाळिंबाच्या भावात २० ते २५ टक्क्यांनी घट झाली. लिंबाच्या भावातही किंचितशी घट झाली असून इतर सर्व फळांचे दर स्थिर आहेत. फळ बाजारात रविवारी लिंबाची ५ ते ६ हजार गोणींची आवक झाली. हिरव्या लिंबाचे प्रमाण अधिक आहे. डाळिंबाची गेल्या आठवड्याच्या तुलनेत आवक वाढली असून त्याच्या दरात घट झाली आहे. चिक्कूची ५०० ते ८०० गोणींची आवक झाली. सफरचंदाची दोनशे ते तीनशे पेटी, चण्यामण्या, चेकनट बोरांची एकूण ४० ते ५० पोतींची आवक झाली. संत्र्याची २० टन तर मोसंबीची ७५ टन एवढी आवक झाली आहे.

मासळीचे भाव घटले

दिवाळीचा गोड फराळ खाल्ल्यानंतर आता पुणेकरांकडून मासळीची मागणी वाढली आहे. मागणीबरोबर आवकही वाढली आहे. परिणामी, मासळीच्या दरामध्ये दहा ते वीस टक्क्यांनी घसरण झाली. गणेश पेठेतील मासळी बाजारात रविवारी खोल समुद्रातील मासळीची १४ ते १५ टन, खाडीच्या मासळीची चारशे ते सहाशे किलो, नदीची मासळी पाचशे ते सहाशे किलो, आंध्र प्रदेश येथून रहू, कतला आणि सिलनची १८ टन इतकी आवक झाली. गेल्या आठवडाभरामध्ये मासळीची आवक मोठ्या प्रमाणावर वाढली. आंध्र येथून तब्बल ४० ते ५० टन तर खाऱ्या समुद्रातील मासळीचीही ४० ते ५० टन आवक झाली आहे, अशी माहिती मासळीची व्यापारी ठाकूर परदेशी यांनी दिली. गावरान अंड्यामध्येही शेकड्यामागे २० ते ३० रुपयांनी वाढ झाली. चिकनच्या दरात किलोमागे १० रुपयांनी वाढ झाली आहे.

पोहे, खाद्यतेल, साखर उतरली

गव्हाची आवक घटल्याने त्याच्या दरात वाढ झाली. त्याचा परिणाम म्हणून रवा, मैद्याच्या दरात प्रत्येकी ५० रुपयांची वाढ झाली आहे. मागणी नसल्याने खाद्यतेल, पोह्यासह साखरेच्या दरात घसरण झाली आहे.

मार्केट यार्डातील भुसार विभागातील घाऊक बाजारात दिवाळी संपल्याने ग्राहकांची फारशी वर्दळ नाही. बाजरी, तांदूळ, खोबरेल तेल, मिरची, गूळ, डाळी, कडधान्ये, बेसन, नारळ, शेंगदाणा, साबुदाणा, भगर, हळद, खोबरे यांच्या दरात कोणताही बदल झाला नाही.

गव्हाची सध्या आवक घटली आहे. गव्हाचा तुटवडा निर्माण झाल्याने त्याच्या दरात क्विंटलमागे २०० रुपयांची वाढ झाली आहे. मिल्सचालकांकडून मागणी होत असून सरकारकडेदेखील गव्हाचा साठा कमी आहे. त्यामुळे क्विंटलमागे २०० रुपयांची वाढ झाली आहे. तर, ज्वारीच्या दरात क्विंटलमागे २५० रुपयांची वाढ झाली आहे. मागील वर्षी गव्हासह ज्वारीचे उत्पन्न कमी होते. त्यामुळे तुटवडा निर्माण झाला आहे. गव्हाचे दर वाढल्याने त्याचा परिणाम रवा, आटा, मैदा यांच्यावर झाला. त्यांच्या दरात प्रत्येकी ५० रुपयांची वाढ झाली.

नवीन भाताची आवक सुरू झाल्याने पोह्याच्या दरात क्विंटलमागे १२५ ते २०० रुपयांनी दर घसरले. दिवाळी संपल्याने आता पोह्यांना मागणी कमी आहे. हरभरा डाळीचा तुटवडा सुरू असून त्याच्या दरात अद्याप तेजी आहे. हरभऱ्यामुळे बेसनाच्या दरात ही १५० ते २०० रुपयांची वाढ झाली आहे. खाद्यतेलामध्ये शेंगदाण्याचा नवा हंगाम सुरू झाला. त्यामुळे गुजरातमध्ये शेंगदाण्याची मोठी आवक होत असल्याने शेंगदाणा तेलाच्या १५ किलोच्या डब्यामागे १०० रुपये उतरले. रिफाइंड तेल ३०० रुपये तर सरकी तेलाच्या डब्यात ८० रुपयांची घसरण झाली. सोयाबीनच्या दरात डब्यामागे १० रुपयांची घसरण झाली आहे. तर सूर्यफूल आणि खोबरेल तेलाचे दर स्थिर आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सिंचनासाठी ३६ हजार कोटी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

‘राज्य हे सिंचनामध्ये पिछाडीवर असल्याने आणि शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत असल्याने राज्यातील २९ सिंचन ​प्रकल्प पूर्ण करण्यासाठी केंद्र सरकारने ३६ हजार कोटी रुपये मंजूर केले आहेत.’ असे केंद्रीय रस्ते वाहतूक, महामार्ग आणि जहाज बांधणीमंत्री नितीन गडकरी यांनी सांगितले.

‘शरद जोशी - शोध अस्वस्थ कल्लोळाचा’ या राजहंस प्रकाशनातर्फे प्रकाशित आणि वसुंधरा काशीकर-भागवत लिखित पुस्तकाचे प्रकाशन पंडित जवाहरलाल नेहरू सांस्कृतिक कलादालन येथे गडकरी यांच्या हस्ते झाले. त्या वेळी ते बोलत होते. व्यासपीठावर पालकमंत्री गिरीश बापट, शेतकरी संघटनेच्या माजी अध्यक्ष सरोज काशीकर, लेखक राजीव साने, राजहंस प्रकाशनच्या संपादक विनया खडपेकर आदी उपस्थित होते.

गडकरी म्हणाले, ‘सिंचनाला प्राधान्य देणे गरजे आहे. देशातील १४९ अपूर्ण सिंचन प्रकल्प पूर्ण करण्यासाठी पहिल्यांदाच केंद्र सरकारने ८५ हजार कोटी रुपये मंजूर केले आहेत. त्यामध्ये राज्यातील २९ प्रकल्प आहेत. याचबरोबर आता उड्डाणपुलांऐवजी मेळघाट, नंदूरबारसारख्या आदिवासी भागांत रस्त्यांचे जाळे निर्माण करणार आहे.’

ते म्हणाले, ‘जागतिक स्तरावरील देशांमध्ये शाश्वत अर्थव्यवस्था आणि सर्वांगीण विकास साधणारी अर्थव्यवस्था याबाबत गोंधळाचे वातावरण असून, सर्वांच्या नीती टोकाच्या अवस्थेला पोहोचल्या आहेत. अशा वेळी शेतकरी संघटनेचे दिवंगत नेते शरद जोशी यांनी मांडलेले शाश्वत विकासाचे मॉडेल उपयोगी पडेल. शेतीसाठी खुली अर्थव्यवस्था तारक की मारक, याबाबत अनेक चर्चा झाल्या. शरद जोशी यांच्यापासून अनेक विचारवंतांनी खुली अर्थव्यवस्था शेतीला तारक ठरेल, अशी भूमिका घेतली होती. शेतीमधील गुंतवणूक कमी करून उत्पादन कसे वाढेल, या दृष्टीने संशोधन होणे गरजेचे आहे.’

‘खुली अर्थव्यवस्था स्वीकारल्यावर अमेरिकेसारख्या भांडवलशाही देशांचे मिंधे होण्याचा अपप्रचार करण्यात आला; पण खुल्या अर्थव्यवस्थेमुळे स्पर्धा होऊन त्याचा फायदा ग्राहकांना झाला. मुक्त अर्थव्यवस्था स्वीकारताना सर्वसामान्य आणि गरीब माणूस केंद्रस्थानी ठेवण्यात आला. ग्रामीण आणि कृषी अर्थनीतीच्या सक्षमीकरणाशिवाय सर्वांगीण प्रगती होणे शक्य नाही.’ असे त्यांनी सांगितले.

‘विचारशून्यता हा देशापुढचा मोठा प्रश्न आहे. आम्ही डावेही नाही, उजवेही नाही. आम्ही संधिसाधू आहोत, असा ९० टक्के लोकांचा विचार आहे,’ अशी टीका गडकरी यांनी केली. सत्ता येईल त्याचा झेंडा घेऊन स्वत:चे नाव मोठे करायचे. मग काँग्रेस असो, की भाजप असो. असे लोक नेत्याभोवती एअरपोर्टवर गर्दी करतात; पण अशा लोकांचे नाव इतिहासात राहत नाही, अशी टिप्पणी यांनी केली. ‘गरिबी हटाव’च्या घोषणा होऊन अनेक कलमी कार्यक्रम राबवले गेले; पण गरीब हे गरीबच राहिले, तर श्रीमंत हे अधिक श्रीमंत झाले, अशी टीका त्यांनी केली.

‘शेतकऱ्यांच्या नावाखाली अनेकांनी सत्ता उपभोगली; पण शेतकऱ्यांचे प्रश्न सुटले नाहीत. शेतीच्या संशोधनाकडे दुर्लक्ष झाले आहे.’ असे बापट म्हणाले.

सरोज काशीकर म्हणाल्या, ‘शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर पोटतिडीकीने काम करणारे शरद जोशी यांसारखे नेते लाभले, हे आमचे भाग्य होते. शेतकरी स्वतःचा विकास करायला समर्थ आहे. मात्र, त्यांच्यावर लादलेले कायदे शिथिल केले पाहिजेत.’

‘शेतीतील उत्पादकता वाढवणे, सिंचनाच्या सुविधा आणि सामूहिक शेतीचे प्रयोग वाढले पाहिजेत. कृषी उत्पन्न बाजार समित्यांना पर्याय म्हणून शेतकऱ्यांच्याच कंपन्या काढणे आवश्यक आहे.’ असे साने यांनी सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रसन्न जोशी यांनी, तर भक्ती हुबळीकर यांनी आभार मानले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नाट्य संमेलनाध्यक्षपदासाठी चुरस

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

आगामी अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाच्या अध्यक्षपदासाठी सात अर्ज नाट्य परिषदेच्या मध्यवर्ती शाखेला प्राप्त झाल्याने अध्यक्षपदाच्या प्रक्रियेत चुरस निर्माण झाली आहे. जयंत सावरकर, श्रीनिवास भणगे, अशोक समेळ, बापू लिमये, प्रशांत दळवी, प्रविण कुलकर्णी व विनायक केळकर यांची नावे सुचविणारे अर्ज शाखेला प्राप्त झाले आहेत.

९७व्या नाट्य संमेलनाच्या अध्यक्षपदासाठी ५ नोव्हेंबरपर्यंत अंतिम मुदत देण्यात आली होती. निवडणूक न घेता एकमताने बिनविरोध निवड करण्याची भूमिका परिषदेची असल्याने अध्यक्षपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार, याकडे नाट्यवर्तुळाचे लक्ष लागले आहे. १४ नोव्हेंबर रोजी नाट्यसंमेलनाध्यक्षाची निवड केली जाणार आहे.

दरम्यान, ज्येष्ठतेनुसार जयंत सावरकर यांच्या नावाला पसंती मिळत आहे. रंगभूमीवरील त्यांच्या कारकिर्दीला ६१ वर्षे पूर्ण झाली आहेत. रंगभूमीवरील मानाचे असे विष्णुदास भावे पदक नुकतेच त्यांना प्रदान करण्यात आले आहे. संमेलनाध्यक्षपद सन्मानाने बिनविरोधपणे मिळाले, तर ते स्वीकारेन, असे त्यांनी यापूर्वीच जाहीर केले आहे. त्यांचे नाव सुचविणारा अर्ज ठाणे शाखेकडून पाठविण्यात आला आहे. तर पुणे शाखेने श्रीनिवास भणगे यांच्या नावाचा अर्ज परिषदेकडे सादर केला आहे. भणगे यांच्या नावाचा अर्ज गेल्या वर्षीही सादर करण्यात आला होता. त्यामुळे या दोघांपैकीच एकाची निवड पक्की मानली जात आहे. दरम्यान, दळवी यांच्या नावाचा ठराव आला असला, तरी त्यांचे संमतीपत्र मिळालेले नसल्याने त्यांचे नाव अध्यक्षपदासाठी ग्राह्य धरले जाणार नाही, असे परिषदेतर्फे स्पष्ट करण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

म्हणून देश वाचला; तुषार गांधींची RSSवर तोफ

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

'नथुराम गोडसे हा केवळ आज्ञेचे पालन करणारा माणूस होता. तो सावरकरांचा शिष्य होता. राष्ट्रीय संघटन मागे असल्याशिवाय त्याला गांधींची हत्या करणे शक्यच नव्हते,' अशा शब्दांत महात्मा गांधी यांचे पणतू तुषार गांधी यांनी रविवारी राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर अप्रत्यक्ष हल्ला चढवला. 'गांधींची हत्या झाल्यानंतर गेल्या ६० वर्षात हिंदुत्ववादाची क्रांती होऊ शकली नाही. यामुळे देश वाचला, आपण वाचलो,' अशी मार्मिक टिप्पणी त्यांनी केली.

चांगले विचार युवा व्याख्यानमालेंतर्गत 'गांधी हत्या : सत्य ,असत्य' या विषयावर ते बोलत होते. संकेत मुनोत लिखित 'एक धैयर्शील योद्धा गांधी' या पुस्तकाचे प्रकाशन यावेळी झाले. महाराष्ट्र ज्ञान महामंडळाचे संचालक विवेक सावंत, पत्रकार संजय आवटे यावेळी उपस्थित होते.

'पाकिस्तानची फाळणी, पाकिस्तानला ५५ कोटी हे विचार अस्तित्वात नव्हते तेव्हापासून गांधींच्या हत्येचे प्रयत्न सुरू होते. पुणे व अहमदनगर येथे हत्येचे कट शिजत होते. पोलिसांनी याबाबत कधीच सतर्कता बाळगली नाही. त्यांची भूमिका संशयास्पद होती,' असा आरोप गांधी यांनी केला. 'गोडसेची भाषा कायम उग्र व शिव्यांची लाखोली वाहणारी होती. न्यायालयात त्याने जी बाजू मांडून वातावरण भावूक केले, त्या भाषणाची लेखन शैली सावरकरांची होती. असे लेखन चातुर्य केवळ सावरकरांकडे होते,' याकडे गांधी यांनी लक्ष वेधले.

'बाबरी मशीद पाडताना तत्कालिन पंतप्रधान नरसिंह राव यांची भूमिका संशयास्पद होती. ते पूजेत व्यस्त होते. परिस्थिती हाताबाहेर गेली आहे, अशी राव यांची भूमिका होती. अशीच भूमिका गांधींच्या हत्येवेळेस पोलिसांची होती. दोघांना पकडले आहे. प्रकरण जास्त उकरून काढायला नको, अशी भूमिका घेण्यात आल्याने सत्य कधीच समोर येऊ दिले नाही,' असा आरोप गांधी यांनी केला. 'गांधींच्या हत्येनंतर गावागावात संघाने मिठाई कशी वाटली, ही सगळी तयारी कोणी केली होती,' अशी घणाघाती टीका गांधी यांनी केली. 'बापूंच्या हत्येनंतर नेमलेल्या कपूर समितीची सर्व कागदपत्रे उघड झाली तर ढोंगी राष्ट्रभक्तांची कुटनीती स्पष्ट होईल,' असे सांगत मुस्लिमांचे राजकारण, फाळणी व ५५ कोटी याचे खापर केवळ गांधींवर फोडण्यात येते याबद्दल त्यांनी तीव्र शब्दांत हल्ला चढवला.

बापूंच्या हत्येचे अर्धसत्य सांगण्यात आले असून आजच्या पिढीला तेच खरे वाटते. हे टाळण्यासाठी बापूंना महात्मा या पदवीतून मुक्त करावे लागणार असून ते माझे जीवनकर्तव्य आहे. बापू ही साधी व्यक्ती होती. आपल्या दुबळेपणावर प्रभुत्व मिळवून ते मोठे झाले. मी महात्मा गांधीचा वंशज नसून बापूंचा वशंज आहे. आपणही महात्म्याला विसरून बापू लक्षात ठेवू, असं आवाहन तुषार गांधी यांनी केलं.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अल्पवयीन मुलीवर अत्याचार

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, पिंपरी
अल्पवयीन मुलीवर वारंवार बलात्कार करण्याचा प्रकार वाकडमध्ये घडला आहे. मुलगी गर्भवती राहिल्याने हा प्रकार उघडकीस आला असून, पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.
दीपक साहेबराव नाझलकर (२९, रा, सांगवी) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. या प्रकरणी १५ वर्षीय मुलीने फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दीपक हा पीडित मुलगी राहत असलेल्या सोसायटीमध्ये इमारतीच्या देखभाल दुरुस्तीचे काम करतो. काही महिन्यांपूर्वी तो पाणी पिण्याच्या बहाण्याने त्यांच्या घरी आला व तिच्यासोबत ओळख निर्माण केली. त्यानंतर पीडित मुलगी घरात एकटी असताना तो घरी येऊ लागला. तिला जिवे मारण्याची तसेच मोठ्या बहिणीवर बलात्कार करण्याची धमकी देऊन तिच्यावर वेळोवेळी लैंगिक अत्याचार केले. यामध्ये पीडित मुलगी गर्भवती राहिल्याने हा प्रकार उघडकीस आला. या प्रकरणी पीडितेने शुक्रवारी वाकड पोलिस ठाण्यात धाव घेऊन फिर्याद दिली असता दीपकला अटक करण्यात आली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


‘सेल्फी’चा आदेश तत्काळ रद्द करा

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, पुणे
एकिकडे राज्यातील शाळांमध्ये शिक्षकांना वर्गात मोबाइल वापरायला बंदी असतानाच विद्यार्थ्यांसोबत शिक्षकांना सेल्फी काढण्याचा आदेश राज्य सरकारच्या शिक्षण विभागाने दिल्याने शिक्षकांमध्ये संभ्रमाचे वातावरण व नाराजीचा सूर असल्याचे शिक्षक आणि शिक्षक संघटनांनी सांगितले. असे असतानाच या प्रकरणात आता महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेने (मनविसे) उडी घेतली असून, शिक्षकांचे काम वाढवणारा हा आदेश तत्काळ रद्द करण्याची मागणी केली आहे.
शिक्षण विभागाने स्थलांतरित होणाऱ्या, शाळेत अनियमित राहणाऱ्या मुलांना शाळेत नियमित करण्यासाठी गुरुवारी निर्णय घेतला. त्यानुसार पुढील वर्षी जानेवारी महिन्यापासून वर्गशिक्षकाने आपल्या वर्गातील दहा विद्यार्थ्यांच्या गटासोबत सेल्फी काढणे गरजेचे असेल. सेल्फीमधील सर्व मुलांची नावे शिक्षकांना आधारकार्ड क्रमांकासह ‘सरल’च्या वेबसाइटवर भरावी लागतील. सुरुवातीच्या दोन सोमवारनंतर फक्त अनियमित असणाऱ्या मुलांसोबतचे सेल्फी, मुलांची नावे आणि आधारकार्ड क्रमांक अपलोड करणे सरकारला अपेक्षित आहे. या निर्णयाविरोधात शिक्षकांनी शुक्रवारी सोशल मीडियाहून निषेध नोंदविण्यास सुरुवात केली आहे.
राज्यातील बहुतांश शाळेत शिक्षकांना वर्गात मोबाइल वापरायला बंदी आहे. काही शाळेत शिक्षकांना आल्यानंतर मोबाइल बंद म्हणजेच स्वीच ऑफ करून ठेवावा लागतो. शाळांमध्ये अशी परिस्थिती असताना शिक्षकांना विद्यार्थ्यांसोबत सेल्फी काढण्याचे आदेश दिले आहे. त्यामुळे शिक्षकांमध्ये संभ्रमाची परिस्थिती असल्याचे शिक्षकांनी आणि त्यांच्या संघटनांनी सांगितले. शिक्षकांनी आणि त्यांच्या संघटनांनी शिक्षण विभागाच्या या निर्णयाला विरोध दर्शविला आहे. शिक्षकांचे काम वाढ‍णारा आणि अधिक वेळ जाणारा हा निर्णय असल्याचे शिक्षकांनी सांगितले. अशी परिस्थिती असतानाच मनविसेने शिक्षण विभागाच्या या निर्णयाला तीव्र विरोध केला आहे. विभागाने हा निर्णय तातडीने रद्द करण्याची मागणी केली आहे.
याबाबत मनविसे पश्चिम महाराष्ट्र प्रभारी अॅड. सचिन पवार म्हणाले, ‘शिक्षकांना जनगणना, आधार कार्ड, निवडणुकीचे काम करावे लागते. या कामांमध्ये अधिक भर म्हणजे शिक्षकांना विद्यार्थ्यांसोबत सेल्फी काढावा लागेल. यासाठी शिक्षकांना नवे स्मार्ट फोन खरेदी करावे लागतील. राज्यात बहुतेक शाळा ग्रामीण भागात असल्याने तेथे मोबाइल नेटवर्कची समस्या आहे. अशा परिस्थितीत शिक्षकांचे अनेक प्रश्न प्रलंबित असतांना शिक्षकांना त्यांची कामे सोडून ‘सेल्फी तास’ घ्यावा लागणार आहे. सेल्फी काढल्याने मराठी शाळांचा दर्जा सुधारणार नाही किंवा त्यांच्या गुणवत्तेत भर पडणार नाही. त्यामुळे विभागाने आणि शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी हा निर्णय रद्द करावा आणि विद्यार्थ्यांना कौशल्यपूर्ण व गुणवत्तायुक्त शिक्षण देण्याबाबत प्रयत्न करावा.’
शाळाबाह्य विद्यार्थ्यांची शाळेत संख्या वाढविण्यासाठी त्या विद्यार्थ्यांची आणि पालकांची मानसिकता बदलण्याची आवश्यकता आहे. सरकारने शिक्षकांना विद्यार्थ्यांसोबत सेल्फी काढण्याचा आदेश देण्याऐवजी शिक्षकांच्या प्रयत्नांना पाठबळ देण्याची गरज आहे. तसेच, त्यांची मानसिकता बदलण्याची आवश्यकता आहे. विद्यार्थ्यांची मोठी संख्या लक्षात घेता सरकारचा हा निर्णय चुकीचा आहे. सेल्फी काढणे व तो ‘सरल’ वेबसाइटवर अपलोड करणे म्हणजे वेळेचा अपव्यय करणे आहे, असे महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षकेतर शाळांचे महामंडळाचे सरकार्यवाह शिवाजी खांडेकर यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बँक चेअरमनचे नाव वापरून फसवणूक

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, पिंपरी
माजी नगरसेवक आणि सेवा विकास बँकेचे अध्यक्ष अमर मूलचंदानी बोलत असल्याचे भासवून पिंपरीतून १२० साड्या लंपास केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. व्यापाऱ्याला गंडा घालणाऱ्याला पिंपरी पोलिसांनी अटक केली असून, हा प्रकार पिंपरी साई चौक येथे घडला.
दिलीप झमटमल मेगांनी (३४, रा. उल्हासनगर) असे या प्रकरणी अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. मेगांनी याने यापूर्वी अशा प्रकारे पिंपरी येथून सुकामेवा लंपास केला होता. तर प्रदीप कृपालदास भागवाणी (४२, रा. पिंपरी) यांनी पिंपरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भागवणी हे कपड्यांचे व्यापारी असून, त्यांचे साई चौकात दुकान आहे. २६ ऑक्टोबरला आठच्या सुमारास त्यांना फोन आला. त्यावेळी समोरील व्यक्तीने माजी नगरसेवक, बँकचे चेअरमन अमर मूलचंदानी बोलत असल्याचे सांगितले. तसेच, त्यांचा विश्वास संपादन केला.
‘पिंपरी-चिंचवड महापालिकेतील महिला कामगारांना दिवाळीनिमित्त साड्या भेट द्यायच्या असल्याचे सांगितले. माणूस पाठविला आहे, त्याच्याकडे साड्या द्या पैसे पाठवून देतो,’ असे सांगत ७२ हजार ८८० रुपये किमतीच्या १२० साड्या घेऊन गेला. मात्र, त्यानंतर भागवाणी यांनी चौकशी केल्यावर मूलचंदानी यांनी साड्या मागविल्या नसून, कोणताही माणूस पाठविला नसल्याचे लक्षात आले. त्यानंतर भागवाणी यांनी पिंपरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. तपासादरम्यान, अशा प्रकारे काही महिन्यांपूर्वी सुकामेवा लंपास केल्याचे लक्षात आले. त्यानंतर पोलिसांनी मेगांनी याला अटक केली. या प्रकरणी पुढील तपास फौजदार हरिश्चंद्र माने करीत आहेत.

मिठाईवरही डल्ला
मिठाई खरेदीच्या बहाण्याने आलेल्या दोन अनोळखी इसमांनी दुकान मालकाचा विश्वास संपादन करून चाळीस किलो मिठाईवर डल्ला मारला. हा प्रकार नुकताच दापोडी येथील भोजवाणी स्वीट होममध्ये घडला. धीरज सुनील भोजवाणी (२९, रा. अशोक अपार्टमेंट, पिंपरी) यांनी भोसरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. या प्रकरणी दोघा अज्ञातांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दिवाळीमध्ये भोजवाणी यांच्या दुकानात दोनजण आले. त्यांनी हरीशेठ जैस्वाल या व्यक्तीशी बोलत असल्याचे भासवून धीरज यांचा विश्वास संपादन केला. या दोन चोरट्यांनी त्यांच्या दुकानातून ३२ हजार रुपयांची चाळीस किलो काजूकतली आणि काजूरोल मिठाई घेऊन गेले. त्यानंतर मात्र, जैस्वाल यांनी अशा प्रकारे कोणतीही मिठाई मागवली नसल्याचे समजल्यावर फसवणूक झाल्याचे समजताच धीरज यांनी भोसरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. या प्रकरणी भोसरी पोलिस तपास करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गांधीहत्येमागे राष्ट्रीय संघटनेचा हात’

$
0
0

पुणे : ‘नथुराम गोडसे हा केवळ आज्ञेचे पालन करणारा माणूस होता. तो सावरकरांचा शिष्य होता. राष्ट्रीय संघटन मागे असल्याशिवाय त्याच्या हातून गांधींची हत्या होणे शक्यच नव्हते,’या शब्दांत महात्मा गांधी यांचे पणतू तुषार गांधी यांनी रविवारी राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर अप्रत्यक्ष हल्ला चढवला.
‘गांधींची हत्या झाल्यानंतर गेल्या ६० वर्षांत हिंदुत्ववादाची क्रांती होऊ शकली नाही. त्यामुळे देश वाचला आणि आपणही वाचलो,’ अशी मार्मिक टिप्पणीही त्यांनी केली.
‘चांगले विचार युवा व्याख्यानमाले’अंतर्गत ‘गांधी हत्या : सत्य, असत्य’ या विषयावर ते बोलत होते. महाराष्ट्र ज्ञान महामंडळाचे संचालक विवेक सावंत, पत्रकार संजय आवटे या वेळी उपस्थित होते. ‘पाकिस्तानची फाळणी, पाकिस्तानला ५५ कोटी हे विचार अस्तित्वात नव्हते; तेव्हापासून गांधींच्या हत्येचे प्रयत्न सुरू होते. पुणे आणि अहमदनगर येथे हत्येचे कट शिजत होते. पोलिसांनी याबाबत कधीच सतर्कता बाळगली नाही. त्यांची भूमिका संशयास्पद होती,’ असा दावाही गांधी यांनी केला. ‘गोडसेची भाषा कायम उग्र आणि शिव्यांची लाखोली वाहणारी होती. न्यायालयात त्याने जी बाजू मांडून वातावरण भावूक केले; ती शैली सावरकरांची होती. असे लेखनचातुर्य केवळ सावरकरांकडे होते,’ याकडेही गांधी यांनी लक्ष वेधले. गांधींच्या हत्येनंतर गावागावात संघाने मिठाई कशी वाटली, ही सगळी तयारी कोणी केली होती, अशी घणाघाती टीकाही त्यांनी केली. ‘बापूंच्या हत्येनंतर नेमलेल्या कपूर समितीची सर्व कागदपत्रे उघड झाली तर, ढोंगी राष्ट्रभक्तांची कुटनीती स्पष्ट होईल,’ असे सांगून मुस्लिमांचे राजकारण, फाळणी आणि ५५ कोटी यांचे खापर केवळ गांधींवर फोडण्यात येते याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली.
..
बापूंच्या हत्येचे अर्धसत्य सांगण्यात आले असून, आजच्या पिढीलाही तेच खरे वाटते. हे टाळण्यासाठी बापूंना महात्मा या पदवीतून मुक्त करावे लागणार असून, तेच माझे जीवनकर्तव्य आहे.
- तुषार गांधी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

येरवडा मनोरुग्णालयात नर्सला धक्काबुक्की

$
0
0

दोन पुरुष कर्मचारी सक्तीच्या रजेवर;' कारवाईची मागणी

म. टा. प्रतिनिधी,येरवडा

येरवडा प्रादेशिक मनोरुग्णालयाच्या स्वयंपाकगृहातील जेवण मनोरुग्णांना घेऊन जाण्यास नकार दिल्याने चिडलेल्या दोन पुरुष कर्मचाऱ्यांनी नर्सला शिवीगाळ करून विनयभंग केल्याचा प्रकार शुक्रवारी संध्याकाळी घडला. या घटनेमुळे नर्सेसनी शनिवारी सकाळी काही वेळासाठी कामबंद आंदोलन केले. अखेर प्रशासनाकडून कारवाईचे आश्वासन मिळाल्यानंतर त्यांनी आंदोलन स्थगित केले.
येरवडा प्रादेशिक मनोरुग्णालयात सुमारे सोळाशेहून अधिक पुरुष आणि महिला रुग्ण वास्तव्यासह आहेत. शेकडो मनोरुग्णांसाठी आवारात भव्य स्वयंपाकगृह आहे. येथून रुग्णांचे नाष्टा आणि जेवण तयार केले जाते. पुरुष आणि महिला कर्मचारी तेथून जेवण संबंधितांपर्यंत पोहो​चवितात. शुकवारी सायंकाळी महिला विभागातील आहारतज्ञ गैरहजर असल्यामुळे एका नर्सला स्वयंपाकगृहात ड्युटी लावली होती. त्यावेळी निरीक्षणगृहातील कर्मचारी गणेश जाधव आणि शिवाजी गोरे यांनी रुग्णांचे जेवण घेऊन जाण्यासाठी स्वतः न जाता पुरुष मनोरुग्णांना स्वयंपाकगृहात पाठविले होते. स्वयंपाकगृहातून मनोरुग्णांना थेट जेवण नेण्यास बंदी असल्याने संबंधित नर्सने त्यांना परत पाठविले. त्यामुळे चिडलेल्या जाधव आणि गोरे यांनी स्वयंपाकगृहात धाव घेऊन नर्सशी बाचाबाची केली. या प्रकाराने घाबरलेल्या नर्सने वरिष्ठांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, तिचा हात धरून धक्काबुक्की केल्याचा दावा करण्यात आला आहे.
ही घटना उपधीक्षक आणि अधिकाऱ्यांना कळताच त्यांनी स्वयंपाकगृहाजवळ जाऊन जाधव आणि गोरे यांना विचारणा केल्यावर त्यांनाही उलट उत्तरे देण्यात आली. या घटनेची माहिती समजताच शनिवारी सकाळी महिला विभागातील नर्सनी कामबंद आंदोलन केले.
..
मनोरुग्णांना स्वयंपाकगृहातून जेवण घेऊन जाण्यास बंदी आहे. त्यासाठी परिचर नियुक्त केले आहेत. नियमांचा भंग करून गणेश जाधव आणि शिवाजी गोरे यांनी रुग्णांना जेवण आणण्यासाठी पाठविले. संबंधित नर्सला शिवीगाळ केल्याप्रकरणी त्यांना सक्तीच्या रजेवर पाठविले आहे. या प्रकरणाची चौकशी करून पुढील कारवाई केली जाईल.
डॉ. एस. एम. पेंढारकर, उपअधीक्षक, येरवडा प्रादेशिक मनोरुग्णालय

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शिक्षण खात्यावर शिक्षकांचे आक्षेप

$
0
0

गलथान कारभाराची व्हॉटस्अॅपवरून झाडाझडती

म. टा. प्रतिनिधी, पुणे

शिक्षण खात्याच्या वेबसाइट अपडेट नसल्याबाबत आता शिक्षकांनीच आक्षेप घ्यायला सुरुवात केली आहे. महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद, नव्यानेच अस्तित्त्वात आलेले विद्या प्राधिकरण अर्थात यापूर्वीची विद्या परिषद यांच्या वेबसाइट्स या सध्या जुनीच माहिती मांडत असल्याने, शिक्षकांनी व्हॉट्सअॅपवरून खात्याची झाडाझडती घ्यायला सुरुवात केली आहे.
शालाबाह्य विद्यार्थ्यांच्या संदर्भात राज्य सरकारने नुकत्याच घेतलेल्या निर्णयामध्ये शिक्षकांना विद्यार्थ्यांसोबत सेल्फीची सक्ती करण्यात आली आहे. सेल्फीच्या सक्तीला शिक्षकांनी तीव्र विरोध दर्शविण्यास सुरुवात केली आहे. व्हॉट्सअॅपचे स्टेटस ‘से नो टू सेल्फी’ ठेवण्यापासून ते सध्याच्या शैक्षणिक वास्तवाबाबत उपहासात्मक लेखनाद्वारे आपल्या भावना समाजापर्यंत पोहोचविण्यासाठी सध्या शिक्षक प्रयत्न करत आहेत. त्याचाच पुढचा टप्पा म्हणून शिक्षकांनी आता शिक्षण खात्याच्या वेबसाइट्सची परिस्थिती व्हॉट्सअॅपवरून समाजापर्यंत पोहोचविण्यास सुरुवात केली आहे. खात्याच्या वेबसाइट जर कायम जुनी पुराणीच माहिती देणार असतील, तर शिक्षकांकडून गोळा केल्या जाणाऱ्या अपडेट्सचा उपयोग तरी काय, असा सवाल उपस्थित केला जात आहे.
या विषयी शिक्षकांकडून मिळालेल्या माहितीनुसार, https://education.maharashtra.gov.in/ या पोर्टलवरून सध्या शिक्षण खात्याची अधिकृत माहिती उपलब्ध होत आहे. त्यावर ‘संबंधित दुवे’ या टॅबखाली उपलब्ध असलेल्या इतर वेबसाइट्सवर मात्र खात्याची जुनीच माहिती दिसून येत आहे. या वेबसाइटवरून महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेच्या (एमपीएसपी) वेबसाइटवर गेल्यास ११ जून २०१५चे शेवटचे अपडेट असल्याचे लक्षात येत आहे. वेबसाइटवर राज्याचे शिक्षण आयुक्त म्हणून एस. चोक्कलिंगम, तर राज्य प्रकल्प संचालक म्हणून प्रकाश ठुबे यांची माहिती प्रसारित केली जात आहे. प्रत्यक्षात अनुक्रमे धीरजकुमार आणि राज्याच्या शिक्षण खात्याचे प्रधान सचिव डॉ. नंदकुमार या पदांचा कार्यभार पाहत आहेत. खात्याच्या वेबसाइटवरून यापूर्वीच्या राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषद (एससीईआरटी) आणि सध्या नव्याने अस्तित्त्वात आलेल्या विद्या प्राधिकरणाच्या वेबसाइटवर जाण्याचा प्रयत्न केल्यास, ‘एससीईआरटी’चीच माहिती पाहायला मिळत आहे. राज्यातील प्रगत शाळांच्या संख्येचा वारंवार आढावा घेतला जात असताना, या वेबसाइटवर ‘प्रगत शाळा’ या नावाखाली मोकळी जागाच अनुभवायला मिळत आहे. हा विरोधाभास आता तरी थांबवा, अशी मागणी शिक्षक प्रतिनिधींकडून करण्यात येत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रूजू होण्यापूर्वीच अध्यक्षांची पुन्हा बदली

$
0
0

‘पीएमपी’ला अद्याप पूर्णवेळ अधिकाऱ्याची प्रतीक्षा

म. टा. प्रतिनिधी, पुणे

सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम करण्याची आश्वासने देणाऱ्या राज्य सरकारने नियुक्त केलेल्या अण्णासाहेब मिसाळ यांची ‘पुणे महानगर परिवहन महामंडळा’च्या (पीएमपी) अध्यक्षपदी रुजू होण्यापूर्वीच पुन्हा बदली केली गेली आहे. गेल्या चार महिन्यांपासून पीएमपीचा कारभार प्रभारी अध्यक्षांवर सुरू असून, पूर्णवेळ अध्यक्ष केव्हा मिळणार याची अद्याप प्रतीक्षा आहे.
राज्य सरकारने पीएमपीचे तत्कालीन अध्यक्ष अभिषेक कृष्णा यांची जुलैमध्ये नाशिकच्या आयुक्तपदी बदली केली. त्यानंतर पुणे महापालिकेचे आयुक्त कुणाल कुमार यांच्याकडे पीएमपी अध्यक्षपदाचा अतिरिक्त कार्यभार सोपविण्यात आला. ऑगस्टमध्ये सरकारने धुळ्याचे जिल्हाधिकारी अण्णासाहेब मिसाळ यांची पीएमपीच्या अध्यक्षपदी नियुक्ती केली. १५ ऑगस्टनंतर ते पीएमपीचा कार्यभार स्वीकारतील, अशी अपेक्षा होती. परंतु, ते पुण्यात फिरकलेच नाहीत. स्वयंसेवी संस्था आणि राजकीय पक्षांनी पीएमपीला पूर्णवेळ अध्यक्ष द्यावा, अशी वारंवार विनंती करूनही मिसाळ यांच्यावर कार्यभार स्वीकारण्यासाठी सरकारने दबाव टाकला नाही. पीएमपीचा कार्यभार घेण्यास मिसाळ उत्सुक नसल्याचे लक्षात आल्यावर सरकारने नुकतीच मुंबई औद्योगिक विकास महामंडळाच्या सह-मुख्य कार्यकारी अधिकारीपदी त्यांची बदली केली. त्यामुळे, अध्यक्षपदी बदली झाल्यानंतर कार्यभार स्वीकारण्यापूर्वीच पुन्हा नव्या ठिकाणी बदली होण्याचा प्रकार पीएमपीबाबत प्रथमच घडला.
पीएमपीच्या ताफ्यात पंधराशे बस दाखल करून घेण्यास संचालक मंडळाने यापूर्वी मान्यता दिली आहे. सध्या त्याची प्रक्रिया सुरू असून, त्यामध्ये पीएमपीला पूर्णवेळ अध्यक्ष असणे अत्यंत जरुरीचे आहे. तसेच, आगामी काळात शहरातील इतर काही मार्गांवर जलद बस वाहतूक सेवेचा (बीआरटी) विस्तार करण्यात येणार असल्याने त्याच्या नियोजनामध्येही अध्यक्षांची भूमिका निर्णायक ठरणार आहे. गेल्या चार महिन्यांपासून हे पद रिक्त असून, पीएमपीला पूर्णवेळ अध्यक्ष केव्हा मिळणार, अशी विचारणा केली जात आहे.
................
विरोधकांचे भाजपवर टीकास्र
पीएमपीचा कारभार सुधारण्यासाठी भारतीय जनता पक्षाने वारंवार आंदोलन केले आहे. गेल्या चार महिन्यांपासून अध्यक्षपद रिक्त असूनही पूर्णवेळ अध्यक्ष देण्यात यावा, अशी मागणी भाजपच्या शहरातील एकाही आमदाराने केलेली नाही. त्यामुळे, अध्यक्षांविना पीएमपीचा कारभार सुरळीत सुरू असल्याचा सत्ताधाऱ्यांचा समज आहे का, अशा खोचक शब्दांत विरोधकांनी भाजपवर टीकास्त्र सोडले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

खासगी संस्थांनाही आरटीआय लागू करा

$
0
0

माजी केंद्रीय गृह सचिव माधव गोडबोले यांची मागणी

म. टा. प्रतिनिधी, पुणे

‘सरकारशी संबंधित माहिती समोर येऊ नये, अशीच प्रत्येक सरकारची मानसिकता होती आणि आजही आहे. माहिती अधिकार कायद्यातून काही प्रमाणात माहिती खुली झाली. परंतु, खासगी संस्थांनाही माहिती अधिकार लागू होणे आवश्यक आहे. हा कायदा लागू झाल्यास या संस्थांचा कारभार एका वर्षाच्या आत सुधारेल,’ असे माजी केंद्रीय गृह सचिव माधव गोडबोले यांनी सांगितले.
सजग नागरिक मंचाच्या दशकपूर्ती सोहळ्यात गोडबोले बोलत होते. ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे, मंचाचे संस्थापक विवेक वेलणकर, जुगलकिशोर राठी, राजहंस प्रकाशनचे डॉ. सदानंद बोरसे आदी या वेळी उपस्थित होते. वेलणकर लिखित ‘ग्राहक राजा सजग हो’ या पुस्तकाचे प्रकाशनही या वेळी झाले.
‘महाराष्ट्रात माहिती अधिकाराबाबत जनतेत उत्साह असला, तरी सरकारला अजिबात उत्साह नाही,’ असे सांगून गोडबोले यांनी ताशेरे ओढले. राज्यात माहिती आयुक्तालयात आयुक्तासह अन्य पदे निधीअभावी रिक्त आहेत. माहिती अधिकाराच्या अर्जातून मिळणारी रक्कम या पदांसाठी वापरली जावी. माहिती आयुक्त म्हणून निवृत्त सरकारी अधिकारी नव्हे तर, माहिती न नाकारता ती देणाऱ्या जबाबदार व्यक्तीची नेमणूक करावी, असे मत गोडबोले यांनी व्यक्त केले.
विशाखा वेलणकर यांनी सूत्रसंचालन केले. विश्वास सहस्त्रबुद्धे यांनी आभार मानले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


माजी महापौरांची प्रतिष्ठा पणाला

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे/हडपसर

हडपसर परिसरात पुणे-सोलापूर महामार्ग आणि पुणे-मिरज लोहमार्ग या दरम्यान हडपसर गावठाण-सातववाडी (प्रभाग क्र २३) हा प्रभाग विस्तारला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन माजी महापौरांच्या या प्रभागामध्ये सर्वच पक्षांकडे इच्छुकांची गर्दी असल्याने यंदा ही लढत रंगतदार होण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या माजी महापौर वैशाली बनकर आणि शिवसेनेचे विजय देशमुख (प्रभाग क्र. ४४) आणि शिवसेनेचे प्रमोद नाना भानगिरे व काँग्रेसच्या विजया वाडकर (प्रभाग क्र. ४५) यांचे प्रभाग एकत्र होऊन हडपसर गावठाण-सातववाडी (प्रभाग क्र. २३) निर्माण झाला आहे. या दोन जुन्या प्रभागात शिवसेनेचे अस्तित्व असले, तरी भानगिरे यांनी विधानसभेच्यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत प्रवेश केला होता. त्यावेळी, झालेल्या पोटनिवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे फारूख इनामदार विजयी झाले. तर, विजय देशमुख यांचे नगरसेवकपद आयुक्तांनी रद्द केले होते. त्याबाबत, कोर्टात केस सुरू आहे. वाडकर, इनामदार आणि भानगिरे हे तिन्ही आजी-माजी नगरसेवक नव्या प्रभागातून लढण्यास इच्छुक नसून, शेजारील प्रभागातून लढण्याची तयारी त्यांनी केली आहे.
पुणे-सोलापूर रस्त्यावरील वैभव सिनेमाच्या अलीकडील चौकापासून या प्रभागाची सुरुवात होते. सोलापूर रस्त्याची मिरज लोहमार्गापर्यंतची उजवी बाजू या प्रभागात समाविष्ट झाली आहे. यामध्ये, हडपसर गावठाण, मंत्री मार्केट, हडपसर क्षेत्रीय कार्यालय, सानेगुरुजीनगर, बौद्ध वस्ती, ससाणेनगर, तोडकर टाउनशिप, वर्धमान टाउनशिप, निर्मल टाउनशिप, काळेपडळ, ग्लायडिंग सेंटर, गोंधळेनगर, सातववाडी अशा परिसराचा समावेश होता. राष्ट्रवादीकडून माजी महापौर वैशाली बनकर यांच्यासह त्यांचे पती सुनील बनकर, माजी महापौर राजलक्ष्मी भोसले, आबा कापरे, विजया कापरे, विजय मोरे, शंतनू जगदाळे, हनुमंत तुपे, राजश्री जगताप, निनाद टेमगिरे इच्छुक आहेत. शिवसेनेचे माजी नगरसेवक विजय देशमुख यांनी पुन्हा निवडणूक लढविण्याची तयारी सुरू केली आहे. त्यांच्यासह अमोल हरपळे, जयसिंग भानगिरे, सुरेश हाडदरे, अशोक धोत्रे, शैलजा भानगिरे, विशाल मिरेकर या नावांची चर्चा आहे. शिवसेनेकडून आणखी काही नावे पुढे येण्याची शक्यता आहे.
काँग्रेसने या भागावर पुन्हा लक्ष केंद्रित करण्याचे ठरविले आहे. प्रशांत सुरसे, चंद्रकांत मगर, नितीन आरू, वैभव डांगमाळी, पल्लवी सुरसे अशा नावांची सध्या चर्चा सुरू आहे. काही अनपेक्षित नावे पुढील टप्प्यात पुढे येऊ शकतात, असा अंदाज वर्तविला जात आहे. हडपसर विधानासभेमध्ये यश मिळविल्यापासून भारतीय जनता पक्षाने संघटनावर लक्ष दिले आहे. मारुती तुपे, योगेश ससाणे, उज्ज्वला जंगले, सोपान गोंधळे, मनोहर देशमुख अशा इच्छुकांच्या यादीत भर पडण्याची शक्यता आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून विनोद धुमाळ, अजय नाव्हले, पूनम भूमकर, अजिंक्य ससाणे, इंद्रायणी नाव्हले यांच्या नावांची चर्चा आहे.
................
प्रभाग क्र २३ : हडपसर-सातववाडी
लोकसंख्या : ८१,६७४
आरक्षण :
अ : ओबीसी
ब : ओबीसी (महिला)
क : महिला
ड : खुला

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शहरात वाढला थंडीचा मुक्काम

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

शाल, स्वेटर, मफलर, कानटोपी असा जामानिमा करून बाहेर पडणारे पुणेकर, सायंकाळनंतर रस्त्याच्या कडेला, बिल्डिंगच्या आवारात पेटणाऱ्या शेकोट्या आणि रात्रीच्या वेळी रस्त्यावर कमी होणारी गर्दी यामुळे आता पुण्यात थंडीच्या मुक्कामावर जणू शिक्कामोर्तबच झाले आहे. दिवाळीने जाता जाता दिलेली ही यंदाच्या मोसमातील कडाक्याच्या थंडीची भेट पुणेकरांना अंगवळणी पडू लागली आहे.
देशभरातून मान्सून माघारी परतून आता दोन आठवडे झाले आहेत. त्यामुळे वातावरणातील बाष्पाचे प्रमाण कमी झाल्याने हवामान कोरडे आहे. त्यातच उत्तरेकडील राज्यातून महाराष्ट्राकडे थंड आणि कोरडे वारे वाहत असल्याने राज्यातील थंडीचे प्रमाण वाढले आहे.
पुण्यात रविवारी ३० अंश सेल्सिअस कमाल तर, १२.३ अंश सेल्सिअस किमान तापमान नोंदले गेले. हे किमान तापमान सरासरीपेक्षा तीन अंशांनी कमी होते. परिणामी शहरात दुपारनंतरच गारवा जाणवत होता. सायंकाळनंतर शहरात बोचरे वारे वाहत असल्याने थंडीची तीव्रता आणखी वाढली. त्यामुळे सायंकाळी किंवा रात्री बाहेर पडणारे नागरिक पूर्ण जामानिम्यासहित बाहेर पडत असल्याचेच चित्र होते. रविवारी राज्यातील सर्वात नीचांकी किमान तापमानाची नोंद नाशिक येथे (११.४ अंश सेल्सिअस) झाली. महाबळेश्वर येथे १२.७, जळगाव येथे १३, अमरावती येथे १३.२, यवतमाळ येथे १३.४, सातारा येथे १४.९ अंश सेल्सिअस इतक्या किमान तापमानाची नोंद झाली. पुढील पाच ते सहा दिवस राज्यात हवामान कोरडे राहील, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. त्यामुळे थंडीचा कडाका कायम राहून तापमानात किंचित घट होण्याची शक्यता असल्याचेही हवामान विभागातर्फे सांगण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गडांवरच्या तोफा तस्करांच्या रडारवर

$
0
0

Prasad.Pawar@timesgroup.com
Tweet : @PrasadMT

कधीकाळी भडिमार करीत गरजणाऱ्या आणि शत्रूचे आक्रमण रोखणाऱ्या गडांवरच्या तोफा ऊन-वारा-पाऊस आणि अक्षम्य दुर्लक्ष यामुळे जाया झाल्या. याच तोफांकडे आता तस्कर आणि भुरट्या चोरांची नजर वळली आहे. गडांवरच्या तोफांमागे चोरीचे शुक्लकाष्ट लागले असून, दिवसेंदिवस त्या गायब होण्याचे प्रकार वाढले आहेत. राज्य सरकार, पुरातत्त्व विभाग आणि स्थानिकांनी या प्रकाराकडे दुर्लक्ष केल्यानेच तस्करांचे फावते आहे.

लोखंडासह पंचधातूच्याही तोफा आढळत असल्याने त्यांची चोरी होत आहे. मध्यंतरी मराठवाड्यातील औसा या राज्य पुरातत्त्व खात्याच्या ताब्यात असणाऱ्या गडावरील मौल्यवान तोफ चोरीला गेल्यावर राज्य सरकार आणि पुरातत्त्व खात्याला खडबडून जाग आली होती. मात्र, त्यानंतर कोणतीही ठोस उपाययोजना करण्यात आली नाही. पुणे, सातारा, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग यासह मराठवाडा, विदर्भ आणि कोकणातील महत्त्वाच्या गडांवरच्या तोफा अद्याप उपेक्षित आहेत. नुकत्याच कोकणातील रामगड (जि. सिंधुदुर्ग) येथील चार तोफा चोरीला गेल्या असून, त्याबाबतची साधी तक्रारही कुठे नोंदवण्यात आलेली नाही. या तोफा मुंबई, दिल्लीच्या चोर बाजारात आणि तिथून ‘अँटिक कलेक्शन’ करणाऱ्यांकडे तसेच तिथून श्रीमंतांचे बंगले, फार्महाउस आणि हॉटेलमध्ये जात असल्याचे निदर्शनास आले आहे. त्याबाबत तोफांचे अभ्यासक आणि दुर्ग संवर्धन समितीचे सदस्य डॉ. सचिन जोशी म्हणाले, ‘तोफांच्या चोरीचा प्रकार गेल्या चार ते पाच वर्षांपासून वाढला आहे. मूळातच राज्यातील अनेक गड संरक्षित नाहीत त्यामुळे असंरक्षित गडांवर सरकार किंवा पुरातत्त्व विभागाला काही काम करता येत नाही. त्यामुळे समितीने पुरातत्त्व खात्याला ८३ गडांची यादी दिली होती. गड संरक्षित झाले तरच या तोफांचे रक्षण करता येईल. ८३ गड संरक्षित करणे आणि तोफांचे जतन या दोन विषयांबाबत राज्याचे सांस्कृतिक मंत्री विनोद तावडे यांना सविस्तर ई-मेल केला असून, त्यांच्याकडे वेळही मागितली आहे.’

‘तोफांना नाही वाली’

नाशिकजवळच्या हरगडला तेरा टन वजनाची तोफ आहे. त्याची एक रिंग चोरट्यांनी कापून नेली आहेत. उरलेल्या रिंग कापल्या तर, भविष्यात तिथे काहीच शिल्लक राहणार असेही दुर्ग संवर्धन समितीचे सदस्य डॉ. सचिन जोशी यांनी सांगितले. जोशी यांनी विविध गडांवरील २३८ तोफांचे ड्रॉइंग आणि मॅपिंग केले आहे. यापूर्वी धातूतज्ज्ञ बालसुब्रमण्यम यांनी देशभरातील महत्त्वाच्या ठिकाणी असणाऱ्या तोफांचे ड्रॉइंग आणि माहिती संकलन केले आहे. ते पाहूनच २३८ तोफांवर काम केल्याचे जोशी यांनी सांगितले. या पार्श्वभूमीवर आपला वारसा सांभाळण्यासाठी प्रशासनासह स्थानिकांनीही दक्ष राहणे गरजेचे आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शहराचा वारसा जपण्याची गरज

$
0
0

हेरिटेज उपक्रमांच्या स्वतंत्र आराखडा तयार करावा; पर्यटन क्षेत्रातील प्रतिनिधींचे आवाहन

म. टा. प्रतिनिधी, पुणे

ऐतिहासिक नगरीची बिरुदावली मिळवलेल्या, सांस्कृतिक वाटचालीत अग्रभागी असणाऱ्या, पुरोगामी चळवळींमध्ये नेहमी पुढाकार घेतलेल्या पुण्याचे नाव जागतिक नकाशावर कोरले गेले आहे. स्मार्ट सिटीची स्वप्ने पाहाताना शहराच्या सांस्कृतिक बाजाला धक्का लावता कामा नये. ऐतिहासिक वास्तूंचे कोंदण लाभलेल्या पुण्याचा नावलौकिक सर्वदूर पोहोचविण्यासाठी महापालिकेने वारसा संवर्धनाचा स्वतंत्र आराखडा तयार करावा, अशी अपेक्षा पुण्यातील वारसा अभ्यासक आणि पर्यटन व्यावसायिकांनी व्यक्त केली आहे.
आगामी महापालिका निवडणुकीत पुणे शहराच्या विकासाच्या दृष्टीने आश्वासनांचा पाऊस पडणार आहे. यातून वर्षानुवर्षे रखडलेले बांधकाम प्रकल्प, मुबलक पाणी, सार्वजनिक व्यवस्था सुधारण्यासाठी अनेक उत्तमोत्तम पर्याय पुढे येतील. पण, यात शहरातील ऐतिहासिक वास्तूंचे जतन, पर्यटनाला चालना देणाऱ्या उपक्रमांची कधीही चर्चा होताना दिसत नाही. आपल्या प्रभागातील वारसा स्थळे, पर्यटनक्षेत्रांच्या संवर्धनाचा मुद्दा अजेंड्यात घ्यावा, असे एकाही उमेदवाराला वाटत नाही. चोहोबाजूला विस्तारलेल्या उंचच्या उंच इमारती ही पुण्याची ओळख नसून, मध्यवर्ती शहरातील ऐतिहासिक वास्तू, शैक्षणिक संस्था, मंदिरे आणि तिथे घडलेला इतिहास ही या शहराची खरी ओळख आहे. या वारसास्थळांचे संवर्धन आणि पर्यटनाकडे गांभीर्याने बघितलेच पाहिजे. हे काम सर्वसमावेशक आणि परिपूर्ण करण्यासाठी निर्णय प्रक्रियेत अभ्यासक, संस्थाचालकांना सहभागी करून घेण्याची गरज आहे. शहरातील पर्यटन ही चळवळ झाली पाहिजे, असे स्पष्ट मत या वेळी व्यक्त करण्यात आले.
पुणे महापालिकेच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मतदारराजा असलेल्या सामान्य नागरिकांसह विविध घटकांच्या अपेक्षा जाणून घेण्यासाठी ‘महाराष्ट्र टाइम्स’ने पुढाकार घेतला आहे. शहरातील वारसास्थळांचे संवर्धन आणि पर्यटन क्षेत्रात काम करणाऱ्या मान्यवरांची मते ‘मटा’ने जाणून घेतली. अपुरी सार्वजनिक वाहतूक व्यवस्था, पर्यटनस्थळांची अस्वच्छता, वारसास्थळांच्या जतनाबद्दल प्रशासकीय पातळीवर असलेले नैराश्य, पर्यटकांना मिळणाऱ्या अपुऱ्या सुविधा अशा विविध मुद्द्यांवर उपस्थितांनी परखडपणे मते नोंदविली.
........
किशोरी गद्रे
सल्लागार जनवाणी संस्था
नागरिक असो वा प्रशासकीय व्यवस्था, प्रत्येकालाच स्वतःच्या शहराचा अभिमान असतो. पर्यटकांना शहराचा वारसा सांगताना लोक भरभरून बोलतात. आपल्याकडे प्रशासकीय पातळीवर याबद्दल मात्र निराशा दिसते. विमानतळावर उतरल्यावर पर्यटकाला पुणे म्हणजे काय याची सचित्र माध्यमातून प्रचिती येणे अपेक्षित असते. शहराचे नकाशे, येथील प्रेक्षणीय स्थळांची माहिती, सहलींचे पॅकेज आदी बाबी पर्यटकाला पुण्यात पाय ठेवल्यावर तत्काळ उपलब्ध झाले पाहिजे, पण तसे होत नाही. आपण पर्यटकांच्या आदारातिथ्याच्या दृष्टीने विचार करत नाही. दुसरी महत्त्वाची बाजू म्हणजे ऐतिहासिक वास्तूंच्या संवर्धनाच्या बाबतीत महापालिका आणि लोकप्रतिनिधी उदासीन आहेत. मध्यवर्ती पुण्याचे चित्र आज वेगाने बदलते आहे. वाडा संस्कृती झपाट्याने लोप पावत आहे. हे असेच सुरू राहिले तर पुढच्या पिढीला आपण नक्की काय दाखविणार, याचा विचार अजूनही झालेला नाही. पुण्याचे अस्तित्व जपायचे असले तर शहरात हेरिटेज कॉरिडॉर निर्माण झाले पाहिजेत. मध्यवर्ती पुण्यातील वाडे, ऐतिहासिक वास्तूंना वाचविण्यासाठी प्रशासनाने बांधकाम परवानग्यांच्या धोरणांमध्ये ठोस बदल करण्याची गरज आहे. तेथील रहिवाशांना योग्य तो मोबदला देऊन वाडा संस्कृतीला वाचविले पाहिजे. स्मार्ट सिटीच्या दिशेने पावले उचलताना मूळ पुण्याला संपविणे योग्य नाही. अन्यथा सांस्कृतिक पुणे म्हणजे काय हे पुस्तकातून वाचण्याची वेळ येईल.

................

नीलेश भन्साळी

संचालक, पुणे ट्रॅव्हल एजंट असोसिएशन

नोकरी, शिक्षणाच्या निमित्ताने अनेक पर्यटक पुण्यात येतात. त्यांना शहरात फिरण्याची, माहिती जाणून घेण्याची इच्छा असते, पण त्यांना सहलीची आकर्षक पॅकेज मिळत नाहीत. अपुऱ्या वाहतूक व्यवस्थेमुळे ते नकाशा घेऊन एकट्याने सुरक्षित प्रवास करू शकत नाहीत. प्रेक्षणीय स्थळे पाहताना त्यांना पटकन गाइड उपलब्ध होत नाहीत; एवढेच कशाला शहरातून परतताना आठवण म्हणून एखादे कॉफीटेबल बुकदेखील आपण त्यांना देऊ शकत नाही. सर्वाधिक पर्यटन करणारे नागरिक अशी पुणेकरांची इतर राज्यात ओळख आहे. आपले लोक जगभ्रमंती करतात; तेथील आदरातिथ्याचे गोडवे गातात. मात्र, आपल्याकडे येणाऱ्या पर्यटकांना स्थानिक प्रशासन कोणतीही सुविधा चांगल्या पद्धतीने देऊ शकत नाही, ही शोकांतिका आहे. पर्यटनाला चालना देण्यासाठी महापालिकेने या क्षेत्रातील तज्ज्ञ, संस्थाचालक, अभ्यासकांचे एकत्रित व्यासपीठ सुरू करावे. पर्यटनाची दिशा ठरवून कायमस्वरूपी योजना प्रत्यक्षात येण्याची गरज आहे. त्या दृष्टीने प्रयत्नही करणे आवश्यक आहे.

.....................

देवेंद्र गोगटे

निसर्ग पर्यटन व्यावसायिक, फोलिएज आउटडोअर्स

पुणे परिसरातील टेकड्या, नदी, उद्यानांमध्ये निसर्ग सौंदर्याची खाण दडलेली आहे. शहरात अजूनही मुबलक प्रमाणात पक्षीवैविध्य पाहायला मिळते. आपल्याकडे खूप काही सांगण्यासारखे आहे. निसर्गभ्रमंतीची आवड असलेल्या उत्साही मंडळींसाठी शहरात उत्तमोत्तम सहलींचे नियोजन करता येऊ शकते. या पूर्वी असे प्रयोगही झाले. पण, दुर्दैवाने या सर्व ठिकाणी असलेली असुरक्षितता आणि अस्वच्छतेमुळे पर्यटक संभ्रमात पडतात. टेकड्यांवर भटकंतीसाठी गेलेल्यांना असुरक्षित वाटते. या बहुतांश ठिकाणी उत्तम माहितीफलक नाहीत की स्वच्छतागृहांसारखी प्राथमिक सुविधा नाही. परिणामी, इथे सहज दिसणारे पक्षी बघण्यासाठी लोक तास-दोन तासाचा प्रवास करून दुसऱ्या ठिकाणी जाण्यावर भर देतात. पर्यटनाला प्रोत्साहन देण्यासाठी सोशल नेटवर्किंग साइट, मॉल, मल्टिप्लेक्समध्ये जाऊन प्रचार, प्रसाराची आवश्यकता आहे.

....

दया सुदामा

केंद्र सरकारच्या शहरातील अधिकृत गाइड

पुण्याबद्दल परदेशी पर्यटकांमध्ये आदराची भावना आहे. त्यांना फिरताना कुतहूल वाटते. पण, अपुऱ्या सुविधांमुळे पर्यटक नाराज होतात. दररोज शेकडो पर्यटकांचा राबता असताना बहुतांश पर्यटन स्थळांजवळ आजही स्वच्छतागृहे, पिण्याच्या पाण्याच्या सुविधा नाहीत. पार्किंगसाठी गल्लोगल्ली फिरावे लागते. पर्यटकांना रिक्षाचालक सहकार्य करीत नाहीत. परदेशी पर्यटकांची पैशांवरून सर्रास फसवणूक होते. शहराचा नकाशा पटकन उपलब्ध होत नाही. मंदिरे, ऐतिहासिक वास्तूंच्या बाहेर उत्तम दर्जाचे माहिती फलकही पाहायला मिळत नाहीत. किती ही उदासीनता...पर्यटनाला प्रोत्साहन देण्यासाठी पर्यटकांच्या आदरातिथ्यासाठी ठोस पावले उचलली पाहिजेत.

....

साईली पलांडे–दातार

वारसा अभ्यासक

पुणे शहराचे व्यापक आणि परिपूर्ण चित्र मांडण्यात आजही आपण मागे आहोत. संस्कृती, ऐतिहासिक वारसा, देशपातळीवर गाजलेल्या चळवळींची समृद्ध परंपरा शहराला लाभली आहे. त्याचे एकत्रित डॉक्युमेंटेशन, प्रभावीपणे मांडण्यात प्रशासन कमी पडते आहे. महापालिकेच्या हेरिटेज सेलने केलेल्या वारसा स्थळांच्या यादीतील स्थळांना वाचविण्यासाठी अपेक्षित अंमलबजावणी झालेली नाही. या यादीत काही महत्वाच्या ठिकाणांचा समावेश करणे गरजेचे आहे. मध्यवर्ती पुण्यातील वाडे वाचविण्यासाठी ठोस भूमिका घेऊन रेंगाळलेली प्रकरणे तातडीने निकालात काढणे आवश्यक आहे. हेरिटेज सेलचे काम अधिक व्यापक करण्यासाठी त्याला स्वतंत्र विभागाचा दर्जा दिला पाहिजे. आपल्या शहराचा वारसा प्रगल्भ असून, तो पर्यटकांपर्यंत पोहोचविण्यासाठी शाश्वत पर्यटनाचा आराखडा तयार करावा. ऐतिहासिक वास्तूंच्या संवर्धनासाठी प्रशासकीय पातळीवर ठोस आणि नेमकेपणाने पावले उचलावीत. वारसा संवर्धनाला चळवळीचे रूप देण्याची वेळ आली आहे.

.....

डॉ. मंजिरी भालेराव

सहयोगी प्राध्यापिका, संस्कृत आणि भारतीय विद्याविभाग, टिळक महाराष्ट्र विद्यापीठ

शहरातील ऐतिहासिक वास्तूंचे जतन आणि त्याचे महत्त्व इतरांपर्यंत पोहोचविण्यात आपण खूप मागे पडतो आहोत. अलीकडे पर्यटक खूप जागरूक झाला असून त्याच्या अपेक्षाही वाढल्या आहेत, त्या पूर्ण करण्यामध्ये महापालिकेचे काम निराशाजनक आहे. इतर शहरांच्या तुलनेत पर्यटनाला बळ देणाऱ्या कोणत्याही प्रभावी योजना प्रशासन स्तरावर आपल्याकडे राबविल्या जात नाहीत. सध्याच्या इंटरनेट आणि सोशल नेटवर्किंगच्या काळात महापालिकेने अद्याप शहराचा इतिहास सांगणारी, पर्यटन स्थळांची माहिती देणारी परिपूर्ण वेबसाइट सुरू केलेली नाही, ही दुर्देवाची बाब आहे. शहरात प्रचंड वैविध्य असून, वेगवेगळ्या माध्यमातून पर्यटकांपर्यंत पोहोचविण्यासाठी आक्रमक झाले पाहिजे. यासाठी इंटरनेटबरोबरच विमानतळ, रेल्वे, स्टेशन, सार्वजनिक ठिकाणी माहितीचे फलक किंवा फोटो, फिल्म्सच्या माध्यमातून शहराचे महत्व अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचविणे शक्य आहे.

...............

प्राजक्ता पणशीकर

वारसा अभ्यासक, जनवाणी संस्था

महापालिकेच्या गेल्या काही वर्षांपासून रखडलेल्या विकास आराखड्यामध्ये शहराच्या वारसा स्थळांच्या संवर्धनाचा समावेश करण्यात आला आहे. पण, सरकारकडून मान्यता मिळेपर्यंत यातील काही स्थळे नष्ट होतील अशी भीती आहे. महापालिकेच्या हेरिटेज सेलचा कारभार उदासीन आहे. त्यांनी केलेल्या अधिकृत वारसा स्थळांच्या यादीत अद्या अनेक स्थळांच्या नोंदी नाहीत. यातील काही वारसा स्थळे नष्ट झाली आहेत तर, काही धोक्यात असून त्यांना तातडीने वाचविण्याची गरज आहे. शहरातील समृद्ध ऐतिहासिक वारसा पाहता आज महापालिकेकडे वारसा संवर्धनाचा स्वतंत्र विभाग असणे आवश्यक आहे. महापालिकेने वारसा संवर्धनाचे धोरण तयार करून त्याची प्रभावी अंमलबजावणी करावी.

..

काय करायला हवे?

- सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम हवी.

- शहराच्या विकासात वारसा स्थळांच्या संवर्धनाला प्राधान्य द्यावे.

- ऐतिहासिक आणि पर्यटनस्थळांजवळ स्वच्छतागृहांची उभारणी आवश्यक.

- वारसास्थळांच्या स्वच्छतेवर विशेष लक्ष दिले पाहिजे.

- पर्यटकांसाठी ठिकठिकाणी मराठी, इंग्रजी भाषेत माहिती फलक हवेत.

- प्रवेशशुल्काबरोबर संबंधित ठिकाणी माहितीपत्रके उपलब्ध करावीत.

- पुणे दर्शनच्या बसमध्ये थीम बेस्ड सहली असाव्यात.

- विमानतळ, रेल्वेस्टेशनन, पंचतारांकित हॉटेलमध्ये पुणे पर्यटनाचे साहित्य हवे.

- महापालिका, टूर ऑपरेटर आणि गाइड यांच्यातील संवाद वाढवावा.

- मॉल, हॉटेल्स, सार्वजनिक ठिकाणे पुणे पर्यटनाच्या व्हिडिओ क्लिप लावल्या पाहिजेत.

- पुणे दर्शनसह पर्यटकांचा प्रवासासाठी स्वतंत्र पर्याय उपलब्ध असावेत.

- पुणे पर्यटनाची वेबसाइट अद्ययावत आणि सोशल नेटवर्किंग साइटवरील सहभाग वाढवावा.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वाहनवेगावर हवे ‘इंटेलिजंट’ नियंत्रण

$
0
0

Kuldeep.Jadhav@timesgroup.com
@kuldeepjadhavMT

पुणे : पुणे-मुंबई ‘एक्स्प्रेस वे’वर लेन कटिंग आणि भरधाव वाहनांचा वेग मोजण्यासाठी पोलिसांकडून व्हिडिओ चित्रीकरण केले जाते. ‘एक्स्प्रेस वे’वर असे चित्रीकरण करणाऱ्या दोन पोलिस कर्मचाऱ्यांना गुरुवारी एका कारने ठोकरल्याची घटना घडली. त्यामुळे एक्स्प्रेस वेवर वाहनांचा वेग तपासणे, लेन कटिंग करणारी वाहने शोधणे आदीसाठी ‘इंटेलिजंट ट्रॅफिक मॉनिटरिंग सिस्टीम’ आवश्यक असल्याचे पुन्हा एकदा अधोरेखित झाले.

‘एक्स्प्रेस वे’वर पनवेलजवळ जून महिन्यात भीषण अपघात झाला. त्यामध्ये १७ प्रवाशांचा बळी गेला. त्यानंतर जुलै महिन्यात मुख्यमंत्र्यांनी ‘एक्स्प्रेस वे’संदर्भात महत्त्वाची बैठक घेतली होती. त्यामध्ये ‘एक्स्प्रेस वे’वरील बेशिस्त वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी ‘इंटेलिजंट ट्रॅफिक मॉनिटरिंग सिस्टीम’ उभारण्याची घोषणा केली. त्या बैठकीनंतर आता तीन ते साडेतीन महिन्यांचा काळ लोटला आहे. मात्र, अद्याप काही ठोस उपाययोजना झाल्याचे दिसून येत नाही. एका कारने गुरुवारी दोन पोलिस कर्मचाऱ्यांना ठोकरल्याने पुन्हा एकदा ‘इंटेलिजंट’ यंत्रणेचा मुद्दा उपस्थित झाला आहे.

गेल्या महिन्यात पुण्यातील तन्मय पेंडसे आणि कौस्तुभ वर्तक या तरुणांनी ‘एक्स्प्रेस वे’वर अत्याधुनिक सीसीटीव्ही कॅमेरे लावून दोन दिवस वाहतुकीची पाहणी केली. त्यामध्ये वाहनांचा वेग व लेन कटिंगचे हजारो प्रकार टिपले गेले. त्याचा अहवाल सरकारला पाठविण्यात आला आहे. येत्या काळात ‘इंटेलिजंट’ यंत्रणा कार्यान्वित होण्याची शक्यता आहे. मात्र, राज्यभरात असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या धामधुमीत हा विषय मागे पडला, की काय, असा प्रश्न उपस्थित होतो आहे.

‘इंटेलिजंट’ यंत्रणा कार्यान्वित होईपर्यंत उपलब्ध पोलिस मनुष्यबळाच्या आधारावर कारवाई मोहीम राबविण्याचा अपर पोलिस महासंचालक (वाहतूक) आर. के. पद्मनाभन यांचा प्रयत्न आहे. त्यांनी ‘एक्स्प्रेस वे’वर उपाययोजना सुरू केल्यापासून परिस्थितीत सुधारणाही होत आहे. ‘एक्स्प्रेस वे’वर गेल्या दीड महिन्यात सुट्टीच्या दिवसातही मोठी वाहतूक कोंडी झालेली नाही. मात्र, हा अंतिम उपाय नाही. मनुष्यबळाचा वापर करून कारवाई करणे किंवा वाहतुकीला शिस्त लावणे किमान ‘एक्स्प्रेस वे’वर तरी सोपे वाटत नाही. नाही तर गुरुवारी घडलेल्या घटनेची पुनरावृत्ती होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

‘इंटेलिजंट’ यंत्रणा का हवी?

बेशिस्तांना शिस्त लावण्यासाठी कठोर स्वरूपाची दंडात्मक कारवाई हा एकमेव पर्याय असेल, तर त्यासाठी ‘इंटेलिजंट’ यंत्रणेशिवाय पर्याय नाही. या यंत्रणेद्वारे बेशिस्तांना अचूकपणे कॅमेऱ्यात कैद करणे शक्य आहे; तसेच एखाद्या वाहनचालकाने नियमाचे उल्लंघन केल्यास, त्याचे वाहन पुढील टोल नाक्यावर पोहोचेपर्यंत पोलिसांपर्यंत ऑनलाइन दंडाची पावती पाठवणे शक्य आहे. असे झाल्यास मनुष्यबळाचा थेट वापर खूप कमी प्रमाणात करावा लागेल. त्याबरोबरच कारवाईचे स्वरूपही वाढेल. राज्य सरकारने ‘इंटेलिजंट’ यंत्रणा कार्यान्वित करण्यासाठी तातडीने पावले उचलण्याची गरज आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images