Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

औषधांचा कचरा धोकादायक

$
0
0

Yogesh.Borate@timesgroup.com
Tweet : @yogeshborateMT

पुणे : भारतात न वापरलेली वा मुदत संपून गेलेली, कचरा ठरलेली ३१ टक्के औषधे ही कचरा कुंड्यांमध्येच जातात. अशी २३.१४ टक्के औषधे सांडपाण्यात सोडून दिली जातात, तर १८.४२ टक्के नेहमीच्या नळाच्या पाण्यात धुतली जातात. कचरा ठरणाऱ्या १७.२ टक्के औषधांचा जाळून धूर होतो. या सर्व प्रकारांमुळे मानवी शरीरावर होणाऱ्या विपरीत परिणामांबाबत मात्र देशात एक चकार शब्दही काढला जात नाही. कारण, तसे होऊ नये, यासाठी आवश्यक सुरक्षित प्रक्रियांचा अट्टाहास धरणारा कायदाच देशात अस्तित्त्वात नाही.

भारतात औषध उद्योगाशी थेट संबंध असलेल्या विविध घटकांच्या झालेल्या सर्वेक्षणातून या बाबी समोर आल्या आहेत. औषधांच्या कचऱ्याची विल्हेवाट लावण्याविषयीच्या विविध नियमांविषयी भारतात या उद्योगाशी थेट संबंधित असलेल्यांपैकी ७३ टक्के घटक अंधारातच असल्याचेही पुण्यातील भारती विद्यापीठाच्या पूना कॉलेज ऑफ फार्मसीमधील संशोधकांनी दाखवून दिले आहे. ‘औषधांच्या कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी आवश्यक कायद्यांचा अभ्यास’ या विषयावर कॉलेजचे प्राचार्य डॉ. के. आर. महाडिक यांनी नुकतेच आपले पीएचडीचे संशोधन पूर्ण केले. त्याआधारे भारतामध्ये औषधांमुळे निर्माण होणाऱ्या कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी आवश्यक नियमावलीही तयार झाल्याची माहिती डॉ. महाडिक यांनी ‘मटा’ला दिली.

डॉ. महाडिक म्हणाले, ‘वापरण्यास अयोग्य असलेली, गरज संपून गेल्याने शिल्लक राहिलेली औषधे ही शेवटी कचऱ्यामध्ये जातात. औषधांच्या कचऱ्यातून मातीत वा पाण्यामध्ये मिसळणारे विविध घटक मानवी शरीरावर विपरीत परिणाम करणारे ठरतात. जागतिक पातळीवर विविध संशोधनानी हे सिद्ध झाले आहे. त्या अनुषंगाने देशातील परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी हे संशोधन केले.’ भारतातच नव्हे, तर जगभरातील प्रमुख देशांमध्येही औषधांच्या कचऱ्याची विल्हेवाट नेमकी लावायची तरी कशी, या विषयी कोणतीही विशिष्ट नियमावली वा कायदे अस्तित्त्वात नाही. हॉस्पिटलमधून तयार होणाऱ्या बायोमेडिकल कचऱ्याची विल्हेवाट लावण्याच्या काही पद्धतींचा सर्वत्र वापर केला जात आहे. अमेरिकेसारख्या देशात औषधांच्या कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी आवश्यक नियम सांगणाऱ्या कायद्याच्या निर्मितीसाठी प्रयत्न झाले. मात्र, अद्याप कायदा अस्तित्त्वात येऊ शकला नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. या माध्यमातून औषधांच्या कचऱ्याविषयी समाजामध्ये जनजागृती होण्याची गरज असून, त्यासाठी व्यापक प्रयत्न होणे गरजेचे असल्याचेही समोर आल्याचे डॉ. महाडिक यांनी नमूद केले.

येथे होतो औषधांचा कचरा

- औषधांची निर्मिती करणाऱ्या कंपन्या
- औषध विक्रेते (घाऊक आणि किरकोळ)
- हॉस्पिटल आणि दवाखाने
- स्वयंसेवी संस्था
- घरगुती वापर

सर्वेक्षणामध्ये सहभागी घटक

हॉस्पिटल : २०१
औषध विक्रेते : १३५
औषध कंपन्या : १२३
नियामक संस्था : १६१
वकील : ७७
स्वयंसेवी संस्था : ५१
एकूण : ७४८

संशोधनातील महत्त्वाचे मुद्दे

- डायक्लोफिनॅक या औषधी रसायनाचा परिणाम थेट गिधाडांच्या संख्येवर होत आहे.
- एका अमेरिकन संशोधनानुसार, २००२मध्ये अमेरिकेसारख्या देशात १३९ पैकी ९५ जलस्रोतांमध्ये जैविक कचऱ्याचे विपरीत परिणाम दिसून आले. त्यामध्ये संप्रेरकांची, तसेच संप्रेरकांवर थेट परिणाम करणाऱ्या औषधांचाही समावेश होता. त्यामुळे अशा जलस्रोतांविषयी नागरिकांच्या मनात असुरक्षिततेची भावना निर्माण झाली होती.
- एका अमेरिकी संशोधनानुसार, औषधांच्या कचऱ्याच्या विपरीत परिणामांचा एक भाग म्हणून, सन १९३९च्या तुलनेमध्ये सन २०००मध्ये पुरुषांमध्ये शुक्राणूंची संख्या ५० टक्क्यांनी घटली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


‘हवामान बदल करारावर आयोगाचे काम’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
‘हवामान बदलाच्या अनेक तीव्र समस्या जगातील सर्वच देशांना भेडसावत आहेत. भविष्यात यासंदर्भात निर्माण होणाऱ्या प्रश्नांना तोंड देण्यासाठी देशांतर्गतच चांगले करार करणे आवश्यक आहेत. या करारांसंदर्भात आंतरराष्ट्रीय विधी आयोगाकडून काम हाती घेण्यात आले आहे. आयोगाकडून करण्यात येणाऱ्या करारांना संमती देतानाच सहभागी देशांनी पारदर्शकता राखणे आवश्यक असल्याचा मुद्दा आपण प्रचारादरम्यान मांडला होता,’ अशी माहिती आंतरराष्ट्रीय विधी आयोगाचे सदस्य म्हणून निवडून आलेले अनिरुद्ध रजपूत यांनी ‘मटा’शी बोलताना दिली.

या आयोगावर प्रतिनिधीत्व करण्याची संधी प्रथमच एका भारतीयाला मिळाली आहे. अनिरुद्ध रजपूत पुणेकर आहेत. या आयोगाचे सदस्य म्हणून निवड करण्यात आल्यानंतर ‘मटा’ने रजपूत यांच्याशी संवाद साधला. ‘आंतरराष्ट्रीय विधी आयोगाकडून सहभागी देशांमधील पारंपरिक कायद्यांचा अभ्यास केला जातो. त्या कायद्याच्या आधारे करार केले जातात. या कराराचे ड्राफ्टिंग आयोगाकडून केले जाते. आयोगाचे सदस्य म्हणून नुकतीच ३४ जणांची नियुक्ती करण्यात आली. त्यात आपल्याला प्रतिनिधीत्व करण्याची संधी मिळाली आहे,’ असेही रजपूत यांनी सांगितले. ‘सध्या हवामान बदलासंदर्भातील प्रश्न जगातील देशांना भेडसावत आहेत. आयोगाकडून प्रामुख्याने हवामान बदलासंदर्भातील कायदे आणि करार याविषयी अभ्यास सुरू आहे. भारताबरोबरच आशिया, आफ्रिकेतील हवामान बदलाचा प्रश्न प्रामुख्याने आपण मांडणार आहोत,’ असेही ते म्हणाले.

‘आणखी दोन वर्षांनी हा आयोग ७० वर्षे पूर्ण करणार आहे. आयोगातील बहुतांश सदस्य वयाने ज्येष्ठ असल्याची ओरड करण्यात येत आहे. अनेक देशांना आयोगाचे प्रतिनिधित्व करणारे उमेदवार तरुण असावेत असे वाटते. या निवडीमुळे तरुणांचा प्रतिनिधी या नात्याने काम करण्याची संधी मला मिळाली आहे. आंतरराष्ट्रीय कायद्याला अनेक पैलू असतात. या आयोगाकडून या पारंपरिक कायद्याचा अभ्यास करून, वर्गीकरण करून कायदा तयार करण्यात येतो. सहभागी देशांतील पारंपरिक कायद्याचा अभ्यास करून त्यानंतर देशाअंतर्गत कराराचा आराखडा तयार करण्यात येतो. या करारांना प्रथम त्या देशांमध्ये संमती मिळावी लागते. करार करण्यात आल्यानंतर त्याच्या संमतीबाबत पारदर्शकता हवी. मात्र ती दिसून येत नाही,’ असे निरीक्षणही त्यांनी नोंदवले.

‘​जिनिव्हा येथे दर वर्षी मे आणि जुलै महिन्यात सर्व सदस्य भेटून चर्चा करतात. त्यानंतर आयोगातील काही सदस्य कराराचा आराखडा तयार करण्याचे काम करतात. सर्व क्षेत्राचे प्रतिनिधीत्व या ठिकाणी व्हावे, तरच पारंपरिक आवाज या ठिकाणी उमटेल असे मला वाटते. दहशतवादासंदर्भात कराराबाबत सध्या आयोग कार्यरत नाही. त्यासाठी सर्वच देशांकडून तशी मागणी होणे आवश्यक आहे. भारताकडून मात्र दहशतवाद रोखण्यासंदर्भातील कराराबाबतचा आराखडा संयुक्त राष्ट्राकडे सादर करण्यात आला असून, त्यावर चर्चा सुरू आहे,’ असेही रजपूत यांनी नमूद केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रिकाम्या गाळ्यांत दारू अड्डा

$
0
0

हडपसर भाजी मार्केटमधील प्रकाराकडे पालिकेचे दुर्लक्ष

म. टा. प्रतिनिधी, हडपसर
हडपसर भाजी मार्केटमधील रिकामा गाळा दारुड्यांचा अड्डा बनल्याने भाजी विक्रते रस्त्यावर भाजी विकत आहेत. त्यामुळे हडपसर भाजी मार्केटचे नियोजन रस्त्यावर आले आहे. हसपसर भाजी मार्केटमधील टोमॅटो गाळ्यांची ५००० हजार स्केअर फूट जागा कित्येक वर्षांपासून रिकामी पडली आहे. सध्या तेथे दारूड्यांनी अड्डा बनवला आहे. या रिकाम्या गाळ्यांतच अनेक जण लघुशंका करतात. त्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली आहे. मंडईच्या बाजूने भिंत नसल्याने रात्रीच्या वेळी कोणीही आत येते. महापालिकेचे मंडई अधिकारी, निरीक्षक आणि सुरक्षारक्षकांचे याकडे दुर्लक्ष झाले आहे.

भाजी मंडईच्या शेजारीच महापालिकेचे सहायक आयुक्त कार्यालय आहे. भाजी मार्केटच्या बाजूने ६० फूट लांब आणि ८ फूट उंच भिंत बांधून मिळावी, असा प्रस्ताव मंडई विभागाने हडपसर कार्यलयाकडे दिला आहे. मात्र, बजेट नसल्याचे कारण देऊन मागील पाच वर्षांपासून हडपसर सहायक आयुक्त भिंत बांधण्याला टाळाटाळ करत आहेत, असे मंडई निरीक्षक लकारे यांनी सांगितले.

भाजी मंडईमध्ये पार्किंग व्यवस्था नसल्याने ग्राहकांना रस्त्यावर वाहने पार्क करावी लागतात. भाजी मार्केटमध्ये ५००० हजार स्केअर फूट जागा असताना भाजी विक्रेत्यांनी पुणे-सोलापूर रोडवर उड्डाणपुलाखाली भाजी विक्रीची दुकाने थाटली आहेत. रस्त्यावरच भाजी खरेदी करताना वेगात जाणाऱ्या वाहनाची धडक लागून अपघात झाल्यास ग्राहकांच्या जीवावर बेतू शकते. उड्डाणपुलाखाली साने गुरुजी हॉस्पिटलकडे जाण्यासाठी रस्ता आहे. रस्त्यावरच भाजी विक्रेत्यांनी दुकाने थाटल्याने संपूर्ण रस्ताच बंद झाला आहे.

‘बजेट नसल्याने भिंत नाही’

हडपसर सहायक आयुक्त कार्यालयाचे सहायक आयुक्त सुनील गायकवाड यासंदर्भात म्हणाले, ‘भाजी मंडईमध्ये टोमॅटोच्या गाळ्यात काही जण दारू पीत बसतात ही बाब गंभीर आहे. याबाबत मंडई विभागाने सुरक्षारकाद्वारे कारवाई केली पाहिजे. संबंधित ठिकाणी भिंत बांधण्याचा प्रस्ताव आमच्याकडे आला आहे. मात्र, निधी नसल्याने भिंत बांधता येत नाही.’

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

एकवीरा पायथा मंदिरात साडेचार लाखांची चोरी

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, लोणावळा
वेहरगाव-कार्ला येथील श्री. एकवीरा पायथा मंदिरात अज्ञात चोरट्यांनी मंदिराचे कुलूप तोडून काही दागिन्यांसह दोन दान पेटीतील अंदाजे साडेचार ते पाच लाखांची रोकड चोरल्याची घटना सोमवारी पहाटे उघडीस आली आहे. या प्रकरणी लोणावळा ग्रामीण पोलिसांत अज्ञात चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
लोणावळ्याजवळ असलेल्या वेहरगाव-कार्ला येथील एकवीरा देवी मंदिराच्या गडाच्या पायथ्याशी असलेल्या वाहनतळाजवळील एकवीरा देवीचे पायथा मंदीर आहे. या पायथा मंदिरात सोमवारी रात्री काही अज्ञात चोरट्यांनी देवीच्या मंदिराचे कुलूप तोडून मंदिरात प्रवेश केला. तसेच, देवीचा ५१ हजार किमतीचा चांदीचा मुखवटा, ३० हजार किमतीचे कानातील सोन्याचे अलंकार, नाकातील नथ आणि दोन दान पेटीतील अंदाजे साडेचार ते पाच लाखांची रक्कम लंपास केली. सोमवारी पहाटे मंदिराचे पुजारी निखील नाखवा (वय ३१) हे नेहमीप्रमाणे देवीच्या पूजेसाठी मंदिराकडे गेले होते. मंदिराजवळ जाऊन ते कुलूप उघडण्यासाठी गेले असता, त्यांना मंदिराचे कुलूप तुटल्याचे आढळले. त्यानंतर या घटनेची माहिती तत्काळ मंदिराच्या विश्वस्तांना तसेच लोणावळा ग्रामीण पोलिसांना दिली. माहिती कळताच लोणावळा ग्रामीणचे सहायक पोलिस निरीक्षक संदीप येडे-पाटील यांनी सहकार्यांसह घटनास्थळाची पाहाणी केली असता मंदिरापासून चारशे पाचशे मीटर अंतरावर दोन्ही दान पेट्या आढळल्या. मात्र, अधिक काही हाताशी लागले नाही. या घटनेचा पुढील तपास लोणावळा ग्रामीण पोलिस करीत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

स्वतंत्र आयुक्तालयासाठी पिंपरीला प्राधान्य

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, पिंपरी
पिंपरी-चिंचवड आणि तळेगाव या परिसरात मोठ्या प्रमाणात औद्योगिक वसाहती असून, या भागाला मे​क इन इंडियामुळे महत्त्व प्राप्त झाले आहे. त्यामुळे पिंपरी-चिंचवडसाठी स्वतंत्र आयुक्तालय करण्यास प्रथम प्राधान्य दिले जात आहे. आयुक्तालय झाल्यावर या परिसराला त्याचा फायदा होणार आहेच. परंतु, त्यापूर्वी पुणे ग्रामीण पोलिसांकडून येथील सुरक्षेव्यवस्थेबाबत कटिबद्ध आहेत, असे आश्वासन कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील यांनी दिले.
नांगरे-पाटील यांनी तळेगाव परिसरातील विविध खासगी कंपन्यांच्या प्रतिधिनिंशी सोमवारी चर्चा करून त्यांचे प्रश्न समजून घेतले. तळेगाव येथे नुकतीच एक खुनाची घटना घडली होती. या घटनेमुळे व्यावसायिकांमध्ये घबराट पसरली होती. या पार्श्वभूमीवर नांगरे-पाटील यांनी आपल्या सर्व अधिकाऱ्यांसह बैठकीसाठी उपस्थित असणाऱ्या ​विविध कंपन्यांच्या प्रतिनिधींशी संवाद साधला. पोलिस अधीक्षक डॉ. जय जाधव, अप्पर पोलिस अधीक्षक राजकुमार शिंदे यांच्यासह तळेगाव एमआयडीसी, तळवडे, पौड येथील खासगी कंपन्यांचे प्रतिनिधी, ‘एमआयडीसी’चे अधिकारी उपस्थित होते.
राज्यात नवीन चार पोलिस आयुक्तालये होत आहेत. मात्र, ​पिंपरी चिंचवड आणि तळेगाव परिसराला ‘मेक इन इंडिया’मुळे प्रथम प्राधान्य दिले जाणार आहे. या ठिकाणी पोलिस आयुक्तालय सुरू झाल्यावर पेट्रोलिंगसाठी वाहने तसेच अतिरिक्त मनुष्यबळ मिळेल. पण, त्याला काही कालावधी लागेल. अप्पर मुख्य सचिव के. पी. बक्षी यांच्याकडे झालेल्या बैठकीत पुणे शहर आणि ग्रामीणसाठी मनुष्यबळ भरती करण्यास मान्यता मिळालेली आहे, असे पाटील यांनी उद्योजकांना सांगितले.
राज्यातील उद्योग व्यवसायला चालना देण्यासाठी तेथील कायदा-सुव्यवस्था तसेच उद्योजकांच्या अडचणींसंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बैठक बोलाविली होती. या बैठकीत ‘एमआयडीसी’बाबत विविध मुद्यांवर चर्चा करण्यात आली. त्याचाच एक भाग म्हणून पोलिस स्वतःहून उद्योग-व्यवसायाच्या अडीअडचणी जाणून घेत आहेत.

त्यांचा वेळीच बंदोबस्त करा...
‘कंपनीत कंत्राट मिळविण्यासाठी, कच्चामाल, पाणी व इतर गोष्टी अमूक व्यक्तीकडूनच घ्या, असे कोणी धमकावत असेल तर त्यांचा वेळीच बंदोबस्त करा,’ असे आदेश सर्व पोलिस अधीक्षकांना दिले आहेत. ‘प्रत्येक जिल्ह्यातून दोन किंवा त्यापेक्षा जास्त गुन्हे दाखल असणाऱ्या किमान ५०० जणांना निवडणुकीपूर्वी तडीपार करण्यात येणार आहे. कंत्राटदारांचा बुरखा पांघरून जर कोणी दादागिरी करीत असेल तर त्यांची वेळीच तक्रार करा,’ असे आवाहन नांगरेपाटील यांनी या वेळी उपस्थितांना केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘पालिका अधिकाऱ्यांनी संपत्ती वेबसाइटवर जाहीर करावी’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पिंपरी
‘पिंपरी-चिंचवड महापालिकेचा प्रशासकीय कारभार पारदर्शी होण्याच्या दृष्टीने पालिका आयुक्तांसह पालिकेच्या सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची संपत्ती जाहीर होणे गरजेचे आहे. त्यांच्या संपत्तीबाबतची माहिती पालिकेच्या संकेतस्थळावर (वेबसाईटवर) उपलब्ध करून द्यावी,’ अशी मागणी भारतीय जनता पक्षाचे शहर सरचिटणीस अमोल थोरात यांनी केली आहे.
या संदर्भात थोरात यांनी पालिकेचे आयुक्त दिनेश वाघमारे यांना निवेदन दिले आहे. त्याच्या प्रती लाचलुचपत प्रतिबंधक विभाग आणि प्राप्तीकर विभागालाही प्रती दिल्या आहेत. निवेदनात म्हटले आहे, की पिंपरी-चिंचवड पालिकेच्या विविध विभागांतील भ्रष्टाचाराची आणि अनागोंदी कारभाराची प्रकरणे सातत्याने चव्हाट्यावर येत आहेत. या प्रकरणात काही अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर निलंबनासह अन्य कारवाई झाली आहे. तरीही पालिकेतील भ्रष्टाचार आणि अनागोंदी कारभार थांबलेला नाही. अजूनही काही अधिकारी आणि कर्मचारी नियमबाह्य कामे करून शिस्तीचा भंग करीत आहेत. पदाचा गैरवापर करून भ्रष्टाचाराला चालना देत आहेत. त्यामुळे पालिकेच्या सर्वच विभागातील अधिकारी आणि कर्मचारी यांची मालमत्ता जाहीर होणे आवश्यक आहे.
प्रशासनातील अनागोंदीमुळे कामकाजात सुसूत्रता न राहता गोंधळ माजल्याचे दिसून येते. या कार्यशैलीचा शहराच्या विविध प्रकल्प आणि उपक्रमांवर परिणाम होत आहे. यातून विकासाला खीळ बसून अनेक प्रकल्प रेंगाळत आहेत. याबाबतही गांभीर्याने दखल घेण्यात यावी. पालिका आयुक्तांपासून सर्वच विभागांतील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची संपत्ती जाहीर करण्यात यावी. तसेच पालिकेच्या संकेतस्थळावर (वेबसाईटवर) याबाबतची सर्व माहिती उपलब्ध करून देण्यात यावी, अशी मागणी थोरात यांनी केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

एमआयडीसीच्या प्रतिनिधींनी वाचला तक्रारींचा पाढा

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, पिंपरी
कंपन्यांमधील महिला कर्मचाऱ्यांची सुरक्षा, एमआयडीसीमधील सीसीटीव्ही, टोलनाक्यावरील कोंडीमुळे थेट प्रॉडक्शनवर होणारा परिणाम, तळवडे चौकातील कोंडी, पोलिसांचे कमी मनुष्यबळ, तळेगाव एमआयडीसी पोलिस ठाण्याला दूरध्वनी नाही, कामगारांचे पोलिस व्हेरिफिकेशन, रात्रीची पोलिसगस्त, १०० क्रमांकावर लावलेला कॉल पुणे शहराला जोडला जाणे यासारख्या अनेक समस्यांचा पाढा कंपन्यांच्या प्रतिनिधींनी थेट विशेष पोलिस महानिरीक्षक विश्वास नांगरेपाटील यांच्या समोर वाचला.
तळेगाव एमआयडीसीमधील जेसीबी कंपनीमध्ये परिसरातील कंपन्यांच्या पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. पोलिस अधीक्षक डॉ. जय जाधव, अप्पर पोलिस अधीक्षक राजकुमार शिंदे यांच्यासह तळेगाव एमआयडीसी, तळवडे, पौड येथील खासगी कंपन्यांचे प्रतिनिधी, ‘एमआयडीसी’चे अधिकारी यावेळी उपस्थित होते.
कंत्राट मिळविण्यासाठी कंपन्यांना देण्यात येणारा त्रास, सुरक्षा, वाहतूक व्यवस्था, कंत्राटी कामगारांचे प्रश्न, माथाडी कामगारांच्या नावाखाली चालणारी गुंडगिरी आदींसह विविध मुद्यांवर या वेळी चर्चा करण्यात आली. त्यानंतर उपस्थितांनी तळेगाव दाभाडे, तळवडे, पौड येथील समस्यांचा अक्षरश: पाढाच नांगरेपाटील यांच्या समोर वाचला. कंपन्यांच्या प्रतिनिधींनी या वेळी मांडलेल्या समस्यांमध्ये पुढील बाबींचा उल्लेख करण्यात आला. पुणे-मुंबई महामार्गावरील सोमाटणे फाटा येथील टोनलाक्यावर सकाळी आणि सायंकाळी मोठी कोंडी असते. त्यात घराकडे परतणाऱ्या मुंबईकरांमुळे दर सोमवारी भर पडते. या कोंडीत कामगारांना ने-आण करणाऱ्या बस अडकून पडतात आणि याचा थेट परिणाम कंपनीच्या प्रॉडक्शनवर होतो.
तसेच तळवडे आयटी पार्कमध्ये काम करणाऱ्यांना वाहतूक कोंडीचा रोज सामना करावा लागतो. तसेच येथील रस्त्यांवर रात्री लाईट नसतात. काही दिवसांपूर्वी येथील पेट्रोल पंपावर काम करणाऱ्याला भरदिवसा लुटण्याचा प्रयत्न झाला. त्यामुळे अनेकांच्या मनात भीतीचे वातावरण आहे. कॉन्ट्रॅक्टवर कामगार ठेवताना आवश्यक असलेले कामगारांचे पोलिस व्हेरिफिकेशन करताना अनेक अडचणी येतात. परराज्यातून कामाला येणाऱ्यांमध्ये गुन्हेगार, नक्षलवादी देखील असून शकतात. त्यामुळे ही समस्या लवकर मार्गी लागावी. एमआयडीसीमधील रस्त्यांची चाळण झाली असून, ते लवकर चांगले करण्यात यावेत. पोलिसांची गस्त वाढवावी. तक्रारी करण्यासाठी एक सेंट्रलाईज क्रमांक उपलब्ध करून द्यावा, आदी मुद्दे यावेळी चर्चेली गेले. याला नांगरेपाटील यांनी उत्तरे दिली. तसेच हे प्रश्न मार्गी लावण्यासाठी ठोस उपाययोजना करण्यात येतील असे आश्वासन देखील त्यांनी दिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चव्हाण यांच्या निषेधाचा ठराव मान्य

$
0
0

भाजपने केली जोरदार घोषणाबाजी
म. टा. प्रतिनिधी, पुणे
शहरातील कचऱ्याबाबत केलेल्या वक्तव्याबाबत सत्ताधारी राष्ट्रवादीच्या शहराध्यक्ष खासदार वंदना चव्हाण यांच्या निषेधाचा ठराव सोमवारी महापालिकेत मान्य करण्यात आला. अन्य सर्व पक्षांनी या विषयावर एकत्र येऊन राष्ट्रवादी काँग्रेसलाला मतदानात एकटे पाडले. भाजपच्या वतीने चव्हाण यांच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली.
‘शहरात जागोजागी पडलेला कचरा पाहून शहराची लोकप्रतिनिधी म्हणून लाज वाटते,’ असे वक्तव्य खासदार चव्हाण यांनी केले होते. सभा सुरू होताच चव्हाण यांच्या वक्तव्याच्या निषेधाच्या घोषणा भाजप सदस्यांनी दिल्या. पाणीपट्टी, मिळकतकर लादताना लाज वाटायला हवी. पण गेली दहा वर्ष महापौर, सभागृह नेते ही पदे असूनही काही करता आले नाही, म्हणून खासदार चव्हाण अशी टीका करतात,’ असे विरोधी पक्षनेते अरविंद शिंदे म्हणाले.
‘चव्हाण या पर्यावरणावर भाषण करतात. ज्या शहराने त्यांना नाव, नगरसेवक, महापौर, आमदार आणि खासदारपद बिनविरोध दिले. त्या शहराबद्दल केलेले विधान निषेधार्ह आहे,’ अशी टीका त्यांनी केली.
शिवसेनेचे गटनेते अशोक हरणावळ, भाजपचे गटनेते गणेश बीडकर यांनीही चव्हाण यांच्यावर टीकास्त्र सोडले. चव्हाण यांच्या वक्तव्याचा निषेध करुन सभा तहकूब करण्याचा ठराव मांडण्यात आला. त्याला राष्ट्रवादीने विरोध केल्याने सर्वपक्षीय सभासदांनी एकत्र येऊन बहुमताच्या जोरावर ही तहकुबी मान्य केली.
.....
ही ‘भाजप’ची स्टंटबाजी
आश्रमशाळेतील मुलीवर बलात्कार झाला. त्याबद्दल भाजपवाले आंदोलन करत नाहीत, कारण मंत्री त्यांचेच आहेत. मात्र एका महिला खासदाराने कचऱ्याबाबत विधान केले. तर भाजपवाले स्टंटबाजी करतात, असा आरोप नगरसेविका नंदा लोणकर यांनी केला. ‘जाहीर कार्यक्रमात पालकमंत्री गिरीश बापट हे महिलेचा हात धरतात, त्यांची लाज वाटत नाही. तेव्हा कुठे गेले होते भाजपवाले,’ असा टोलाही लोणकर यांनी लावला.
.......
त्यांनी कायम खोडा घातला
शहरातील स्वयंसेवी संस्थांनी शहराच्या विकासात काय योगदान दिले? त्यांनी प्रत्येकवेळी खोडा घातला असल्याची टीका विरोधी पक्षनेते शिंदे यांनी केली. कोर्ट, एनजीटी यांच्याकडे जाऊन तक्रारी करण्याचे काम फक्त काम एनजीओने केले आहे. याच एनजीओची फौज घेऊन खासदार चव्हाण लढत असल्याची टीका त्यांनी केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


चारित्र्यावर संशय घेऊन पत्नीचा खून

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
शिरूर येथे चारित्र्याच्या संशयावरून पत्नीचा गळा आवळून खून केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. खून केल्यानंतर पत्नीचा मृतदेह शिरूर जवळील शेतात टाकून दिल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी शिरूर पोलिसांनी पतीला अटक केली आहे.
रूपाली सीताराम घावटे (२५, रा. शिरूर) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. या प्रकरणी तिचा पती सीताराम संपत घावटे (३१, रा. रामलिंग रोड, शिरूर) याला अटक करण्यात आली आहे. या प्रकरणी बेबी बाळू शिंदे (४४, रा. ढोर आळी, शिरूर) यांनी तक्रार दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लग्नानंतर सीताराम रूपाली यांच्या चारित्र्यावर संशय घेत होता. यावरून त्यांच्यात सतत वादावादी होत होती. यामध्ये सीताराम याने पत्नीला मारहाण केली होती. या कारणावरून सीताराम याने पत्नी रुपालीचा ४ नोव्हेंबर रोजी गळा आवळून खून केला. तिचा मृतदेह शिरूरपासून जवळ असलेल्या कर्डे घाटातील शेतात टाकून दिला होता. दोन दिवसांनंतर ही घटना उघडकीस आली. या प्रकरणी पोलिसांनी सीताराम याला अटक केली. सहायक निरीक्षक गणेश क्षीरसागर अधिक तपास करत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चांगल्या कामात भाजपचा नेहमी ‘खो’

$
0
0

राष्ट्रवादीच्या शहराध्यक्षा वंदना चव्हाण यांचे टीकास्त्र
राजकारण करण्याऐवजी प्रश्न सोडवण्याचे आवाहन
म. टा. प्रतिनिधी, पुणे
पुण्याचे प्रश्न सोडविणे तर दूर, पण भारतीय जनता पक्षाने त्याबाबत कधी आवाजही उठवलेला नाही. उलट, चांगल्या कामात खो घालण्याचा प्रकार भाजपने सातत्याने केल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेसच्या शहराध्यक्षा अॅड. वंदना चव्हाण यांनी सोमवारी केला. ‘न काढलेले उद्गार माझ्या तोंडी घालून खोटा प्रचार करण्याचे काम भाजपच्या शहराध्यक्षांनी थांबवावे आणि राजकारण करण्याऐवजी शहराचे प्रश्न सोडवण्यास प्राधान्य द्यावे,’ असेही त्यांनी भाजपचे शहराध्यक्ष योगेश गोगावले यांना सुनावले.
‘पुणे शहराबद्दल कुठेही अनादर व्यक्त केलेला नसून, केवळ शहरात जागोजागी साठलेला कचरा पाहून लोकप्रतिनिधी म्हणून त्याची लाज वाटते, असे वक्तव्य केल्याचा पुनरुच्चार चव्हाण यांनी केला. महापालिकेत राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता असली, तरी समस्या सोडविण्याचे सर्वाधिकार केवळ महापालिका आयुक्त आणि आरोग्य अधिकाऱ्यांनाच आहेत,’ असा दावा त्यांनी केला.
कचऱ्याच्या ज्वलंत समस्येविषयी आवाज उठविताच, त्याचा विपरीत अर्थ काढून त्यामध्ये महापौरांच्या बस प्रवासाची सांगड घालण्याचा भाजपचा प्रकार म्हणजे अपरिपक्वतेचे लक्षण असल्याचे टीकास्त्र चव्हाण यांनी सोडले. ‘यातून भाजपचे अज्ञान आणि असंवेदनशीलताच प्रकट होते,’ असा टोलाही त्यांनी लगावला.
वाढत्या कचऱ्यामुळे मी अस्वस्थ होत असून, माजी महापौर आणि माजी महापालिका सदस्य म्हणून या परिस्थितीची मला शरम वाटते, या उद्गारांमध्ये काहीही गैर नाही. तरीही, राजकारणासाठी त्याचा वापर भाजपतर्फे केला जात असून, त्यापेक्षा शहराचे प्रश्न सोडवण्यासाठी त्यांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन चव्हाण यांनी केले.
.................
बापट, गोगावलेंवर थेट टीका
महापालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी भाजपकडे योग्य उमेदवार नसल्याने पालकमंत्री आणि शहराध्यक्ष यांनी गुंडांना तिकिटे द्यायचे ठरवून आधीच शोभा करवून घेतली आहे, अशा शब्दांत वंदना चव्हाण यांनी गिरीश बापट आणि योगेश गोगावले यांच्यावर हल्ला चढविला. चांगल्या कामाचे श्रेय राष्ट्रवादीला मिळू नये म्हणून बेताल पत्रकबाजीही सुरू केल्याचा आरोप त्यांनी केला.
.................
कचऱ्याच्या ज्वलंत समस्येविषयी आवाज उठविताच, त्याचा विपरीत अर्थ काढून त्यामध्ये महापौरांच्या बस प्रवासाची सांगड घालण्याचा भाजपचा प्रकार म्हणजे अपरिपक्वतेचे लक्षण आहे. यातून भाजपचे अज्ञान आणि असंवेदनशीलताच प्रकट होते.
- वंदना चव्हाण, शहराध्यक्षा, राष्ट्रवादी काँग्रेस

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महापौरांनी घेतला अपप्रचाराचा समाचार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
वानवडीपासून महापालिकेपर्यंत बसने प्रवास करताना वृद्ध महिलेने ‘महापौर’ पदाचा मान राखून आवर्जून बसण्याची विनंती केल्यानेच त्यांच्याशेजारी बसून चर्चा केली, असे स्पष्टीकरण महापौर प्रशांत जगताप यांनी सोमवारी दिले. बसमध्ये अनेक आसने रिकामे होती, त्यामुळे आपल्यामुळे कोणालाही ताटकळत उभे राहावे लागले नाही, असा दावा करून त्यांच्याविरुद्ध केल्या जाणाऱ्या अपप्रचाराचा त्यांनी समाचार घेतला.
महापौरांनी महिलांसाठी आरक्षित जागेवरून प्रवास करण्याची स्टंटबाजी केल्याचा आरोप भारतीय जनता पक्षाचे शहराध्यक्ष योगेश गोगावले यांनी केली होती. त्यावरून, सोमवारच्या सर्वसाधारण सभेत भाजपच्या नगरसेवकांनीही महापौरांवर हल्ला चढविला. त्याला उत्तर देताना, पदाचा वापर राजकारणासाठी करू नका, असे महापौर जगताप यांनी विरोधी पक्षाच्या सदस्यांना बजावले. ‘शहराविषयी आत्मीयता असल्यानेच ‘पीएमपी’साठी सातत्याने चांगले काम करण्याचा प्रयत्न करत असून, शहरासाठी आवश्यक बसखरेदीची प्रक्रियाही सर्वपक्षीय नेत्यांच्या सहकार्यामुळे वेळेत पूर्ण होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. तसेच, ‘पीएमपी’च्या प्रवासावरून स्टंटबाजीचे आरोप करणाऱ्यांनी चार महिन्यात कंपनीला पूर्णवेळ अध्यक्ष का दिला नाही याचे आत्मचिंतन करावे,’ असा टोमणा त्यांनी मारला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

डॉ. प्रकाश आमटे यांना आरोग्य विद्यापीठाची ‘डी. लिट’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
कुष्ठरुग्णांसह समाजातील वंचित घटकांसाटी हालअपेष्टा सहन करीत त्यांची सुश्रुषा करणाऱ्या ज्येष्ठ समाजसेवक डॉ. प्रकाश आमटे यांना महाराष्ट्र आरोग्य विद्यापीठाने ‘डॉक्टर ऑफ लिटरेचर’ (डी. लिट) पदवी जाहीर केली आहे.
या संदर्भात महाराष्ट्र आरोग्य विद्यापीठाच्या अधिसभेत या संदर्भात ठराव मंजूर केला आहे. ‘वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन यांनी यासंदर्भात आरोग्यविद्यापीठाला सूचना केली होती. त्यानुसार कुलपती कार्यालयासह व्यवस्थापन परिषदेत याबाबतचा प्रस्ताव देण्यात आला होता. या दोन्हींकडून डॉ. आमटे यांना पदवी बहाल करण्यासंदर्भात मान्यात दिली होती. त्यानंतर आरोग्य विद्यापीठाच्या झालेल्या अधिसभेत हा प्रस्ताव ठेवण्यात आला,’ अशी माहिती आरोग्य विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. दिलीप म्हैसकर यांनी दिली.
डॉ. आमटे यांना पदवी देऊन गौरविणयात येणार आहे. त्या वेळी त्यांच्या पत्नी मंदाकिनी आमटे यांचा देखील सत्कार करण्यात येणार आहे. गडचिरोली जिल्ह्यातील हेमलकसा या दुर्गम भागात जाऊन आदिवासी जनतेची त्यांनी सेवा केली. दुर्लक्षित घटकांना वैद्यकीय सुविधा देऊन आरोग्य विषयक विकास साधने, शिक्षण प्राणी, अनाथालय आदी क्षेत्रात त्यांनी उल्लेखनीय कार्य केले आहे. यापूर्वी डॉ. एल. एच. हिरानंदानी यांना २००७ मध्ये, तर डॉ. अनिल कोहली यांना २००८ मध्ये देण्यात येणार आहे. गेल्या वर्षी डॉ. सायरस पूनावाला यांना डी. लिट. पदवीने सन्मानित करण्यात आले आहे, अशी माहिती विद्यापीठाकडून देण्यात आली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पोलिस कर्मचाऱ्याचा सरावादरम्यान मृत्यू

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

पोलिस उपनिरीक्षक पदासाठीच्या परीक्षेसाठी सराव करीत असताना हृदयविकाराच्या झटक्यामुळे पोलिस कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला. राज्य राखीव पोलिस दलाच्या मैदानावर सोमवारी सकाळी ही घटना घडली.

राम नामदेव नागरे (२९, रा. कौडगाव, ता. जिंतूर, जि. परभणी) असे मृत्यू झालेल्या कर्मचाऱ्याचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नागरे सन २००८ साली पुणे पोलिस दलामध्ये भरती झाले होते. सध्या ते मुख्यालयातच राहत होते. पोलिस नियंत्रण कक्षामध्ये त्यांची नेमणूक होती. खात्याअंतर्गत घेतल्या जाणाऱ्या पोलिस उपनिरीक्षक पदासाठीच्या परीक्षेची तयारी नागरे करीत होते. उपनिरीक्षक पदासाठी झालेल्या लेखी परीक्षेत त्यांना ३०० पैकी २१८ गुण मिळाले होते. मैदानी परीक्षेच्या तयारीसाठी ते वानवडीच्या ‘एसआरपीएफ’च्या मैदानावर जात असत. सोमवारी सकाळी ते परवानगी घेऊन ‘एसआरपीएफ’च्या मैदानावर सरावासाठी गेले होते.

मैदानामध्ये चक्कर मारत असताना त्यांना अचानक त्रास जाणवू लागला. हृदयामधून कळ गेल्याने त्यांना श्वास घ्यायला त्रास होत होता. सहकाऱ्यांनी त्यांना तत्काळ जवळील खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल केले. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. नागरे यांचे लग्न झालेले असून, कुटुंबीय परभणीला मूळ गावी असतात. त्यांच्या मागे आई-वडील, पत्नी, चार वर्षांचा मुलगी व दोन वर्षांचा मुलगा असा परिवार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वंदना चव्हाणांना घरचा आहेर

$
0
0

दत्तक गावात काय दिवे लावले?; सुभाष जगताप यांचा सवाल
म. टा. प्रतिनिधी, पुणे
राष्ट्रवादीच्या शहराध्यक्ष खासदार वंदना चव्हाण यांच्या वक्तव्यानंतर पक्षातील मतभेदही महापालिकेच्या सभागृहात उफाळून आले. चव्हाण यांनी दत्तक घेतलेल्या गावांमध्ये काय दिवे लावले यचा खुलासा करावा, असे जाहीर आव्हानच माजी सभागृह नेते सुभाष जगताप यांनी दिले. ‘पुण्याचे लोकप्रतिनिधी असण्याचा आपल्याला अभिमान आहे,’ अशी टिप्पणीही त्यांनी केली.
‘कचऱ्याची समस्या पाहून शहराचे लोकप्रतिनिधी असल्याची लाज वाटते,’ असे खासदार चव्हाण यांनी नुकतेच म्हटले होते. या वक्तव्याचा समाचार घेताना जगताप यांनी त्यांना घरचा आहेर दिला. ‘शहरातील कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी महापालिका प्रशासन अत्यंत चांगल्या पद्धतीने करत आहे. त्यामुळेच महापालिकेला केंद्र सरकारकडून अनेक पुरस्कारांनी गौरविले जाते. केंद्र सरकारपेक्षा खासदारांना अधिक कळते का,’ असा प्रश्नही जगताप यांनी विचारला.
‘केंद्र सरकारच्या प्रतिनिधी म्हणून खासदार चव्हाण अनेकदा वेगवेगळ्या समित्यांच्या माध्यमातून परदेशात जातात. तेथे असलेली कचऱ्याची परिस्थिती आणि पुणे शहरातील कचऱ्याची स्थिती सारखीच असेल, असे नाही. आपले उत्पन्न आणि इतर देशांतील आर्थिक परिस्थिती यामध्ये मोठा फरक आहे. त्यामुळे परदेशाप्रमाणे पुणे शहरात कचऱ्याची विल्हेवाट लावणे शक्य नाही, असेही जगताप यांनी सुनावले.
जगताप म्हणाले, ‘चव्हाण यांनी महापालिकेत काम केले आहे. त्या महापौर असतानाही शहरात कचऱ्याची स्थिती काय होती, हे त्यांनी विसरू नये. सभासद म्हणून आम्ही पालिकेचा विचार करतो. त्यामुळे तुमचे मत आमsच्यावर लादण्याचा प्रयत्न करू नका. तसे केल्यास आम्ही सहन करणार नाही.’
‘आमच्या कामाचे मूल्यमापन करण्याचा अधिकार असल्याचे शहराध्यक्षा खासदार चव्हाण सांगतात, त्याच न्यायाने त्यांनी खासदार म्हणून जे गाव दत्तक घेतले होते, त्या गावामध्ये दिवे नव्हते, वीजही नव्हती; तेथे त्यांनी काय दिवे लावले आहेत, ते विचारण्याचाही आम्हांला आधिकार आहे,’ असेही जगताप यांनी सुनावले.
....
आमच्या कामाचे मूल्यमापन करण्याचा अधिकार असल्याचे शहराध्यक्षा खासदार चव्हाण ज्या न्यायाने सांगतात, त्याच न्यायाने आम्हालाही त्यांना प्रश्न विचारण्याचा अधिकार आहे. खासदार म्हणून त्यांनी जे गाव दत्तक घेतले आहे, तिथे वीज नाही, दिवे नाहीत. तेथे त्यांनी काय दिवे लावले आहेत?
- सुभाष जगताप, माजी सभागृह नेते, राष्ट्रवादी काँग्रेस

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘पालकमंत्र्यांनी आकसापोटी गुन्हा दाखल केला’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
कोणत्याही परवानगीविना बेकायदा वृक्ष छाटणी सुरू असल्याबाबत जाब विचारला म्हणून पालकमंत्र्यांनी आकसाने आपल्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यासाठी पोलिसांवर दबाव आणला, अशी टीका महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नगरसेवक रवींद्र धंगेकर यांनी सर्वसाधारण सभेत केली. धंगेकर आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी महापालिकेच्या सेवकाला मारहाण केल्याचा ठपका भाजपने ठेवला. यावरून मनसे आणि भाजपच्या सदस्यांमध्ये शा‍ब्दिक चकमकही झाली. अखेर धंगेकरांविरोधातील गुन्हा मागे घेऊन सामंजस्याने मार्ग काढण्यावर सर्वपक्षीय सहमती झाली.
वृक्ष छाटणीसाठी आलेल्या कर्मचाऱ्याला शिवीगाळ केल्याप्रकरणी धंगेकर यांच्याविरुद्ध फरासखाना पोलिस स्टेशन येथे गुन्हा दाखल झाला आहे. हा गुन्हा पालकमंत्री गिरीश बापट यांच्या दबावामुळेच दाखल झाल्याचा आरोप धंगेकर यांनी केला. परवानगीविना वृक्ष छाटणी करणाऱ्या अधिकाऱ्यांविरोधात काय कारवाई करणार, अशी मागणी मनसेने लावून धरली. भाजपने मनसेच्या मनमानी आणि दमदाटी कारभारावर ताशेरे ओढले. अखेर, लोकप्रतिनिधी आणि अधिकारी-कर्मचाऱ्यांना एकत्र काम करायचे असल्याने यावर सामंजस्याने तोडगा काढण्याचे आवाहन केले गेले आणि सर्वपक्षीयांनी ते मान्य केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


भाजप-सेनेमध्ये होणार रस्सीखेच

$
0
0

प्रभागफेरी
..
प्रभाग क्रमांक - १२
०००
भाजप-सेनेमध्ये होणार रस्सीखेच
म. टा. प्रतिनिधी, पुणे
महापालिकेच्या गेल्या काही निवडणुकीत शिवसेनेच्या पाठीमागे खंबीरपणे उभ्या राहिलेल्या ‘मयूर कॉलनी-डहाणूकर कॉलनी’ (प्रभाग क्र १२) या भागात विधानसभा निवडणुकीत बदल झाला. त्यामुळे, येणाऱ्या निवडणुकीत जोरदार मुसंडी मारण्याचे मनसुबे भारतीय जनता पक्षाने आखले आहेत. तर, भाजप-सेनेच्या भांडणात फायदा करून घेण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि काँग्रेस-राष्ट्रवादीनेही तयारी केली आहे.
शिवसेनेचे योगेश मोकाटे आणि संगीता देशपांडे (प्रभाग क्र ३३), शिवसेनेचे पृथ्वीराज सुतार आणि भाजपच्या मोनिका मोहोळ (प्रभाग क्र ३४) या दोन्ही प्रभागांचा संपूर्ण भाग आणि मनसेच्या किशोर शिंदे व जयश्री मारणे (प्रभाग क्र २८) यांच्या प्रभागाचा काही भाग नव्या ‘मयूर कॉलनी-डहाणूकर कॉलनी’ प्रभागात समाविष्ट झाला आहे. या प्रभागांवर शिवसेनेचे वर्चस्व राहिले असल्याने चारपैकी तीन नगरसेवक त्यांचे आहेत. विधानसभा निवडणुकीत शिवसेना-भाजप स्वतंत्र लढल्याने येणाऱ्या निवडणुकीत कोणते बदल होणार, याबाबत उत्सुकता आहे.
डहाणूकर कॉलनीच्या मागील टेकडीवर असलेल्या लक्ष्मीनगर झोपडपट्टीपासून या प्रभागाची सुरुवात होते. डहाणूकर कॉलनीचा संपूर्ण भाग, कमिन्स कंपनी, गोपीनाथनगर, गणंजय सोसायटी, तेजसनगर, कोथरूड क्षेत्रीय कार्यालयाचा परिसर, कोथरूड गावठाण, कर्वे पुतळा, शिवाजी पुतळा, यशवंतराव चव्हाण नाट्यगृह, थोरात उद्यान, सुतार दवाखाना, माळवाडी, वनाज कंपनी, आंग्रे उद्यान, न्यू अजंठा अॅव्हेन्यू, गुजराथ कॉलनी, प्रशांत सोसायटी, आयडियल कॉलनी, मयूर कॉलनी, आनंदनगर अशी महत्त्वाची ठिकाणे या प्रभागात येतात.
शिवसेनेच्या तीन नगरसेवकांचा भाग या प्रभागात आहे. त्यातील पृथ्वीराज सुतार आणि योगेश मोकाटे हे दोन्ही नगरसेवक पुन्हा लढणार आहेत. तर, संगीता देशपांडे यांच्याऐवजी शिवसेनेचे शहर संघटक शाम देशपांडे पुन्हा निवडणूक लढण्याच्या तयारीत आहेत. त्यांच्यासह उत्तम भेलके, नवनाथ जाधव यांच्या कुटुंबातील सदस्यांची चर्चा आहे.
भाजपकडून मोनिका मोहोळ यांच्या जागी पक्षाचे शहर सरचिटणीस मुरलीधर मोहोळ निवडणूक लढविणार आहेत. त्यांच्यासह जगन्नाथ कुलकर्णी, रितेश वैद्य, दिनेश माथवड, उल्का मोकासदार आणि शिरीष भुजबळ यांच्या नावांची चर्चा आहे. गिरीश भेलके, सचिन फोलाणे, उल्का मोकासदार, अॅड्. वर्षा डहाळे, ज्योत्सना जगन्नाथ कुलकर्णी
मनसेचे शहराध्यक्ष हेमंत संभूस आणि त्यांची पत्नी पद्मजा संभूस या प्रभागातून इच्छुकांमध्ये अग्रभागी आहेत. त्यांच्यासह अनिल कंधारे, राजकन्या खंडारे, सुप्रिया वानखडे, दादा भेलके, सीमा भेलके, संजय काळे किंवा त्यांच्या पत्नी आणि गणेश शेलार यांच्या कुटुंबातील सदस्य अशी नावे चर्चेच्या केंद्रस्थानी आहेत.
राष्ट्रवादीकडून माजी नगरसेवक दामू कुंबरे, रोहिदास सुतार आणि मृणाल ववले अशी नावे सध्या चर्चेत आहेत. यापुढील टप्प्यात राष्ट्रवादीकडून आणखी काही नावे पुढे येण्याची शक्यता आहे.
काँग्रेसकडील इच्छुकांची यादी सध्या मर्यादित आहे. विशाल भेलके आणि राजेंद्र मगर अशी मोजकीच नावे सध्या चर्चेत आहेत. या नावांमध्ये पुढील काळात आणखी भर पडण्याची शक्यता आहे.
.............
प्रभाग क्र १२ : मयूर कॉलनी-डहाणूकर कॉलनी
लोकसंख्या : ७५,१७६
..
आरक्षण :
अ : ओबीसी महिला
ब : महिला
क : खुला
ड : खुला

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘अनधिकृत घरे नियमित करा’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औंध
पुणे महानगर प्रादेशिक विकास प्राधिकरणाच्या हद्दीतील अनधिकृत बांधकामे दंड आकारून नियमित करावीत, आणि शहराप्रमाणे ‘पीएमआरडीए’च्या हद्दीतील सर्व घरेही अधिकृत करावीत, अशी मागणी खासदार संजय काकडे यांनी सोमवारी केली.
‘पीएमआरडीए’च्या कार्यालयास भेट देऊन काकडे यांनी विविध विषयांवर चर्चा केली. त्यामध्ये त्यांनी हा मुद्दा उपस्थित केला आहे. शहराच्या आसपासच्या परिसरात सुमारे ८६ हजार घरे अनधिकृत असल्याची नोंद जिल्हाधिकारी कार्यालयाकडे आहे. यापैकी ४६ हजार घरांना नोटिसा काढण्यात आल्या आहेत. यामुळे सुमारे बेघर होणाऱ्यांची संख्या लाखांच्या घरात आहे. शासनाने २०१२ पर्यंतची अनाधिकृत झोपडपट्टी नोंद करून त्यांना योजनेचा फायदा दिला आहे. तसेच पिंपरी चिंचवड मधिल घरे गुंठेवरी अंतर्गत नोंदवण्याचा निर्णय घेतला आहे. याचप्रमाणे ग्रामीण भागातील घरे अधिकृत करण्यात यावी अशी मागणी काकडे यांनी केली. ही घरे झोन चेंज करून रेडी रेकनरच्या दराने दंड आकारून अधिकृत करण्यात यावी अशी मागणी ‘पीएमआरडीए’कडे केली आहे. पालिका हद्दीप्रमाणे गुंठेवारी नियम पालिका हद्दीजवळील गावांनाही लागू करण्यात यावा. या पालिका हद्दीलगतच्या गावांमध्ये मोठ्या प्रमाणात अनाधिकृत बांधकामे झाली आहेत. या घरांच्या नोंदी ग्रामपंचायतींमध्ये करण्यात आल्या आहेत. एक ते दहा गुंठे जागेमध्ये ही बांधकामे आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पंजाबी संमेलन विश्व कसे?

$
0
0

पाकिस्तानला वगळल्याबद्दल नवाज शरीफ यांनी मांडली कैफियत

म. टा. प्रतिनिधी, पुणे

पुण्यात होणाऱ्या पहिल्या विश्व पंजाबी साहित्य संमेलनाची दखल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यानंतर थेट पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांनी घेतली आहे. ‘पाकिस्तान या पंजाबी संस्कृती असणाऱ्या देशाला वगळून पंजाबी साहित्य संमेलन विश्व' कसे होऊ शकते,’ असा सवाल शरीफ यांनी आयोजकांना केला आहे. भारत-पाकिस्तानचे संबंध ताणले गेल्याने इच्छा असूनही भारतातील पाकिस्तानच्या उच्चायुक्त कार्यालयाला संमेलनात सहभागी होता आलेले नाही.
येत्या १८ ते २० नोव्हेंबर या कालावधीत गणेश कला क्रीडा रंगमंच येथे पहिले विश्व पंजाबी साहित्य संमेलन होणार आहे. पाकिस्तानात मोठ्या प्रमाणावर पंजाबी संस्कृती बहरली आहे. सर्वांत जास्त पंजाबी भाषिक, साहित्यिक पाकिस्तानमध्ये आहेत. पाकिस्तानात पंजाबी भाषेचा प्रभाव असून, तेथील अनेक साहित्यिकांनी पंजाबी भाषेसाठी योगदान दिले आहे. पंजाबमधील घुमान येथे झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात पाकिस्तानातील साहित्यिक सहभागी झाले होते. मात्र, सद्यस्थितीत दोन्ही देशातील तणावपूर्ण संबंधांमुळे पाकिस्तानला पंजाबी संमेलनात सहभागी करून घ्यायचे नाही, असे आयोजकांनी ठरवल्याने शरीफ यांनी आपल्या मनातील सल आयोजकांपर्यंत पोहोचवली आहे. ‘काश्मीरमधील उरी येथील लष्करी छावणीवर झालेला भीषण हल्ला आणि पाकिस्तानकडून सातत्याने करण्यात येणारी आगळीक या पार्श्वभूमीवर संमेलनात पाकिस्तानी साहित्यिक नको,’ अशी तंबी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी संयोजकांना दिली होती.
दुसरीकडे भारतातील पाकिस्तानचे उच्चायुक्त कार्यालय या संमेलनासाठी शुभेच्छापत्र पाठवणार होते. त्यासाठी आयोजकांनी उच्चायुक्त कार्यालयाला संमेलनाचे निमंत्रण पत्र पाठवणे आवश्यक होते. पण राष्ट्रीय भूमिकेशी विसंगत भूमिका नको, म्हणून आयोजकांनी पाकिस्तानच्या उच्चायुक्त कार्यालयाला निमंत्रण देण्याचे जाणीवपूर्वक टाळले आहे. विशेष म्हणजे पाकिस्तान सोडून तेरा देशांमधील पंजाबी भाषिकांना साहित्य संमेलनाचे निमंत्रण पाठविण्यात आले आहे. विशेष म्हणजे संबंधित देशांच्या राष्ट्रप्रमुखांसह राजदूतांनाही पत्रे पाठविण्यात आली आहेत. अमेरिका, ब्रिटन, अफगाणिस्तान आदी देशांच्या प्रतिनिधींनी येण्याचे मान्यही केले आहे. पाकिस्तानातील साहित्यिकांना संमेलनात समावेश नसला, तरी संमेलनातील एका सभागृहाला पाकिस्तानचे उर्दू कवी फैज अहमद फैज यांचे नाव देण्यात आले आहे.
-------------
पाकिस्तानला वगळून पंजाबी संमेलन विश्व कसे, असा प्रश्न नवाज शरीफ यांनी पोहोचवला आहे. पाकिस्तानचे उच्चायुक्त कार्यालय संमेलनासाठी शुभेच्छापत्र पाठवणार होते. पण सध्याच्या परिस्थितीत राष्ट्रीय भूमिकेशी विसंगत भूमिका नको, म्हणून पाकिस्तानचा सहभाग जाणीवपूर्वक टाळण्यात आला आहे. संबंध सुधारल्यास अशा कार्यक्रमांमध्ये त्यांना सहभागी करून घेता येईल.
-संजय नहार, आयोजक, विश्व पंजाबी साहित्य संमेलन

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

येत्या गुरुवारी शहरात पाणी बंद

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

पर्वतीसह वडगाव, लष्कर, एसएनडीटी, नवीन होळकर जलकेंद्राच्या अखत्यारित येणाऱ्या विविध पंपिंग स्टेशनमध्ये स्थापत्य/विद्युतविषयक अत्यावश्यक कामे करायची असल्याने येत्या गुरुवारी (१० नोव्हेंबर) संपूर्ण शहराचा पाणीपुरवठा संपूर्ण दिवस बंद राहणार आहे. शुक्रवारी (११ ऑक्टोबर) उशिरा आणि कमी दाबाने पाणीपुरवठा होण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन पाणीपुरवठा विभागाने केले आहे.
पाणीपुरवठा बंद राहणारा भाग पुढीलप्रमाणे :
पर्वती जलकेंद्र : शहरातील सर्व पेठा, दत्तवाडी परिसर, राजेंद्रनगर, लोकमान्यनगर, डेक्कन परिसर, शिवाजी नगर परिसर, स्वारगेट परिसर, पर्वती गाव, पर्वती दर्शन, मुकुंद नगर, सहकार नगर, सातारा रोड परिसर, बिबवेवाडी परिसर, पद्मावती, बिबवेवाडी, तळजाई, कात्रज, धनकवडी, इंदिरानगर परिसर, कर्वे रोड ते एसएनडीटी परिसर, एरंडवणा, संपूर्ण कोथरूड परिसर, डहाणूकर कॉलनी, कर्वेनगर, लॉ कॉलेज रोड, सेमिनरी झोनवरील मिठा नगर, शिवनेरी नगर, भाग्योदय नगर, ज्ञानेश्वर नगर, साईबाबा नगर, सर्व्हे क्र (४२, ४६) कोंढवा खुर्द, कोंढवा बुद्रुक, पर्वती व पद्मावती टँकर भरणा केंद्र.
वडगाव जलकेंद्र : हिंगणे, आनंदनगर, वडगाव धायरी, आंबेगाव पठार, दत्तनगर, धनकवडी, कात्रज, भारती विद्यापीठ.
चतुःशृंगी/एसएनडीटी/वारजे जलकेंद्र : पाषाण, औंध, बोपोडी, खडकी, चतुःशृंगी परिसर, गोखलेनगर, जनवाडी, रेंजहिल्स, बावधन, बाणेर, चांदणी चौक, किष्किंधानगर, रामबाग कॉलनी, डावी-उजवी भुसारी कॉलनी, धनंजय सोसायटी, एकलव्य कॉलेज परिसर, महात्मा सोसायटी, गुरुगणेश नगर, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ परिसर, वारजे हायवे परिसर, वारजे माळवाडी, रामनगर, अहिरेगाव, पॉप्युलर नगर, अतुल नगर, शाहू कॉलनी, वारजे जलशुद्धीकरण परिसर, सूस, सुतारवाडी, भूगाव रोड परिसर.
लष्कर जलकेंद्र : लष्कर भाग, पुणे स्टेशन परिसर, मुळा रस्ता, कोरेगाव पार्क, ताडीवाला रस्ता, रेसकोर्स परिसर, वानवडी, कोंढवा, हडपसर, महंमदवाडी, काळेपडळ, मुंढवा, येरवडा परिसर, विश्रांतवाडी, नगर रस्ता, कल्याणी नगर, महाराष्ट्र हौसिंग बोर्ड कॉलनी, वडगावशेरी, चंदननगर, खराडी, सोलापूर रस्ता, गोंधळे नगर, सातववाडी.
नवीन होळकर : विद्या नगर, टिंगरे नगर, कळस, धानोरी, लोहगाव, विश्रांतवाडी परिसर.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सरकारी नि​धीविना संमेलनखर्च निम्यावर

$
0
0

विविध निवडणुकांमुळे आचारसंहितेचा बसला फटका

म. टा. प्रतिनिधी, पुणे

विधान परिषद निवडणुकीमुळे लागू झालेल्या आचारसंहितेचा फटका पुण्यात होणाऱ्या विश्व पंजाबी साहित्य संमेलनाला बसला आहे. केंद्र सरकार, महाराष्ट्र सरकार, पंजाब सरकार आणि पुणे महापालिका यांच्याकडून संमेलनाला मिळू शकणाऱ्या कोट्यवधीच्या निधीवर आयोजकांना पाणी सोडावे लागले आहे. यामुळे सव्वा कोटी रुपयांमध्ये संमेलन उरकण्याची नामुष्की आयोजकांवर ओढावली आहे.
येत्या १८ ते २० नोव्हेंबर या कालावधीत गणेश कला क्रीडा रंगमंच येथे पहिले विश्व पंजाबी साहित्य संमेलन होणार आहे. संमेलनाचे एकूण अंदाजपत्रक अडीच कोटी रुपयांचे असताना आचारसंहितेमुळे त्यास कात्री लावावी लागली आहे. केंद्र सरकारने सुरुवातीला संमेलनाचा सर्व खर्च उचलण्याची तयारी दाखवली होती. राज्य सरकार तसेच, पुणे महापालिका यांच्यातर्फे प्रत्येकी २५ लाख रुपये मिळणार होते. पंजाब सरकारनेही एक कोटी रुपये देण्याची तयारी चालवली होती. मात्र, आचारसंहिता लागू झाल्याने या सर्व प्रयत्नांवर पाणी फेरले आहे.
‘आपल्याकडे विधान परिषद तर, पंजाबमध्ये विधानसभेची निवडणूक होणार आहे. संमेलनासाठी सरकारने निधी दिला तर तो मतदारांना खूश करण्याचा प्रयत्न ठरू शकतो. निवडणूक आयोगाचा ठपका टाळण्यासाठी कोणत्याही सरकारकडून निधी मिळू शकलेला नाही. त्यामुळे संमेलनाचा खर्च अडीच कोटीं वरून सव्वा कोटींपर्यंत आणण्यात आला आहे. पंजाबी लोकांच्या वर्गणीतून संमेलन यशस्वी करणार आहोत. संमेलनाच्या पत्रिकेतून राज्य सरकार आणि पुणे महापालिकेचे नावही वगळावे लागले आहे,’ असे संमेलनाची आयोजक संस्था असलेल्या सरहद संस्थेचे प्रमुख संजय नहार यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत सांगितले.
‘संमेलनाचे उद्घाटन केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते होणार आहे. त्यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रमुख उपस्थिती असेल. अध्यक्षस्थानी माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार असतील. संमेलनाच्या समारोपाला जम्मू-काश्मीरचे राज्यपाल एम. एम. व्होरा, केंद्रीय मंत्री हंसराज अहिर, माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे आदींची प्रमुख उपस्थिती असेल. १० नोव्हेंबर रोजी पंजाबमधून ग्रंथदिंडी निघणार आहे. २२ भाषांचे ग्रंथ त्यामध्ये असणार आहेत. भाषा अनेक'; भारत एक ही संकल्पना मांडण्यात येणार आहे,’ अशी माहिती नहार यांनी दिली.
..
निवडणुकीच्या धामधूमीत होणारे संमेलन कोणत्याही एका राजकीय पक्षाच्या फायद्याचे ठरू नये तसेच, संमेलनामधून कोणाचाही राजकीय प्रचार केला जाणार नाही. संमेलनाचा हेतू राजकीय नाही, अशा आशयाचे पत्र जिल्हाधिकाऱ्यांमार्फत निवडणूक आयोगाला पाठवले आहे.
-संजय नहार, आयोजक, विश्व पंजाबी साहित्य संमेलन

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images