Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

विरोधी नगरसेवकांनाच थेट-भेट

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

सत्ताधारी भाजपमधील भल्याभल्या नेत्यांना भेटीची वेळ मिळत नसलेले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आपल्या अत्यंत व्यग्र दिनक्रमातून वेळात वेळ काढून पुण्यातील नगरसेवकांची ‘थेट भेट’ घेऊ लागले आहेत. यामध्येही काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि मनसेच्या नगरसेवकांना प्राधान्याने संधी मिळत आहे! मात्र, या भेटींबाबत पत्ताच नसल्यामुळे शहरातील भाजपजन या नगरसेवकांनी ‘भाजपमध्ये प्रवेश केला,’ अशी पत्रके काढू लागले आहेत. गेल्या काही दिवसांमध्ये चार-पाच वेळा असे ‘योगायोग’ घडल्याने सगळेच बुचकळ्यात पडले आहेत.

शहरातील प्रलंबित प्रश्नांबाबत थेट मुख्यमंत्र्यांची भेट घेण्याचा ‘ट्रेंड’ शहरातील नगरसेवकांनी सुरू केला आहे. सत्ताधारी भारतीय जनता पक्षाच्या अनेक दिग्गज नेत्यांकडून मुख्यमंत्र्यांची वेळ मिळत नसल्याची ओरड होत असताना दुसरीकडे मात्र प्रभागातील स्थानिक प्रश्नांबाबत चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्री नगरसेवकांना वेळ देत आहेत. ‘प्रभागातील प्रश्नांबाबत’ चर्चा केल्याचा दावा या नगरसेवकांनी केला. या भेटीचे फोटोही सोशल मीडियावरुन प्रसिद्ध झाले.

गेल्या महिन्यात राष्ट्रवादीचे नगरसेवक दिनेश धाडवे, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नगरसेवक राजेश बराटे यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. भाजपच्या नेत्यांनी हे दोघेही भाजपमध्ये आले, असे पत्रक लगोलग प्रसिद्ध केले. मात्र, दोघांनीही आपण मूळच्या पक्षातच असल्याचा खुलासा केला. काँग्रेसच्या नगरसेविका सुनंदा गडाळे आणि सुनीता गलांडे यांनीही मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. मात्र, शहरातील भाजपजन आणि माध्यमांना या भेटीचे गमकच उमगले नाही. त्यांनी सरळसरळ हे सर्वजण भाजपमध्ये चालल्याचे प्रसिद्ध केले. प्रत्यक्षात हे सर्वजण ‘प्रभागातील प्रश्नांसाठी’ मुख्यमंत्र्यांना भेटले होते! किमान नंतर तरी त्यांनी आपापल्या पक्षनेत्यांना तशीच पत्रे दिली.

शहरातील मेट्रो, पीएमपी, रिंगरोड असे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. त्यावर बैठक बोलाविण्याची मागणी अनेक नेत्यांनी वारंवार केली आहे. मात्र, त्यासाठी वेळ न मिळता थेट प्रभागा-प्रभागांमधील प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी विरोधी पक्षीयांना मुख्यमंत्र्यांचा वेळ सहजी मिळू लागला आहे. या भेटींमध्येही प्रथम काही जणांनी भाजपचे कमळाचे उपरणे घातल्याचे फोटो प्रसिद्ध झाले. पण त्यामुळे ‘अकारण’ ते भाजपमध्ये गेल्याचे ‘गैरसमज’ निर्माण झाले आणि नंतर ही उपरणीही फोटोतून गायब झाली आहेत. विरोधी पक्षातील नगरसेवकांशी चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्री फडणवीस वेळ देत असतील, तर ते ‘बिझी’ असल्याचा गवगवा विनाकारणच आहे का, असा प्रश्न मूळच्या भाजपजनांना पडला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


तळेगाव दाभाडेच्या माजी नगराध्यक्षांची हत्या

$
0
0

मटा ऑनलाइन वृत्त । पुणे

तळेगाव दाभाडे नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष सचिन शेळके यांची आज अज्ञात हल्लेखोरांनी हत्या केल्यानं तळेगावमध्ये तणावाचं वातावरण आहे.

सचिन शेळके सकाळी कार्यालयात जायला निघाले असताना खांडगे पेट्रोल पंपाजवळ काही जणांना त्यांना घेरलं. या हल्लेखोरांनी आधी त्यांच्यावर गोळ्या झाडल्या आणि नंतर धारदार शस्त्रांनी वार करून पसार झाले. त्यानंतर तातडीनं शेळके यांना पवना हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं. पण तिथे जाण्याआधीच त्यांचा मृत्यू झाला होता.

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर घडलेल्या या भीषण प्रकारानं तळेगाव हादरलं आहे. सचिन शेळके यांची हत्या राजकीय वैमनस्यातून झाली, की त्यामागे काही वैयक्तिक कारण आहे, याची चौकशी पोलिसांनी सुरू केली आहे. दरम्यान, भाजपच्या पुणे जिल्हा विभागानं मावळ तालुका बंदचं आवाहन केलं आहे.

एप्रिल २०१३ मध्येही सचिन शेळके यांच्यावर प्राणघातक हल्ला करण्यात आला होता. त्यावेळी ते थोडक्यात बचावले होते. हा हल्ला खंडणीसाठी झाल्याचं तपासातून निष्पन्न झालं होतं.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शाळांनी विद्यार्थ्यांना ग्रंथालयापर्यंत न्यावे

$
0
0

डॉ. प्र. ल. गावडे यांची सूचना
म. टा. प्रतिनिधी, पुणे
‘ग्रंथाची जपणूक व संवर्धन करण्याचे काम ग्रंथालये करीत असतात. विद्यार्थ्यांना ग्रंथालयापर्यंत नेण्याचे काम शाळांनी करावे’, अशी सूचना ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ व साहित्यिक डॉ. प्र. ल. गावडे यांनी केली. ‘ग्रंथच जीवनाला सामर्थ्य देतात’, असेही ते म्हणाले.
महाराष्ट्र साहित्य परिषदेतर्फे वाचन प्रेरणा दिनानिमित्त माधवराव पटवर्धन सभागृहात आयोजित मौलिक ग्रंथ प्रदर्शन व वाचन उपक्रमात ते बोलत होते. माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष गंगाधर म्हमाणे, सहाय्यक सचिव अनिल गुंजाळ, साहित्यिक कलावंत प्रतिष्ठानचे अध्यक्ष दिलीप बराटे, परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, प्रमुख कार्यवाह प्रकाश पायगुडे, कार्यवाह वि. दा. पिंगळे व दीपक करंदीकर या वेळी उपस्थित होते. परिषदेच्या वा. गो. आपटे ग्रंथालयातील निवडक मौलिक ग्रंथ विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध करून देण्यात आले होते. विद्यार्थी, तरुणांमध्ये वाचनाची आवड निर्माण व्हावी, मौलिक ग्रंथ त्यांना एकाच ठिकाणी पाहता यावेत यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यास उत्तम प्रतिसाद मिळाला.
डॉ. गावडे म्हणाले, ‘नव्या पिढीला मौलिक ग्रंथाचा खजिना उपलब्ध करून देण्याचे काम या वाचन प्रेरणा दिनानिमित्त झाले आहे. ग्रंथ आणि माझे नाते खूप जवळचे राहिले आहे. पुस्तकांच्या अतूट मैत्रीमुळे, अफाट वाचनामुळे डॉ. अब्दुल कलाम एका सामान्य घरातून देशाच्या राष्ट्रपतीपदापर्यंत पोहोचू शकले’.
म्हमाणे म्हणाले, ‘सरकारने वाचन संस्कृतीचा विकास व्हावा, विद्यार्थ्यांचे पुस्तकांशी जवळचे नाते निर्माण व्हावे, यासाठी हा उपक्रम सुरू केला आहे. वाचन प्रेरणा दिनाच्या माध्यमातून विद्यार्थी वाचनाकडे वळतील’.
‘विद्यार्थ्यांच्या स्वप्नांना विचारांचे पंख देण्याचे काम पुस्तके करतील. वाचन हा जीवनशैलीचा एक भाग बनायला हवा. पुस्तकांमध्ये फक्त छापील मजकूर नसतो तर जीवन बदलण्याची ताकद व सामर्थ्य असते’, याकडे प्रा. जोशी यांनी लक्ष वेधले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

उपचाराच्या बहाण्याने बलात्कार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पिंपरी
आईवर मेडिटेशन सेंटरमध्ये उपचार करण्याच्या बहाण्याने डॉक्टर असल्याचे भासवत एका गुरुजीने चॉकलेटमधून गुंगीचे औषध देऊन तरुणीवर बलात्कार केल्याची घटना निगडीमध्ये उघडकीस आली आहे. ही घटना मागील महिन्यात घडली होती. या तरुणीने निगडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिल्यावर घटनेनंतर पसार झालेल्या भोंदूला पोलिसांनी सापळा रचून अटक केली.
डॉ. रमेश चौहान (रा. निगडी) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. या प्रकरणी २० वर्षीय तरुणीने फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चौहान हा चिंचवडमधील कृष्णानगर येथे सिद्धशक्ती कुंडलिनी मेडिटेशन सेंटर चालवतो. आजार बरा करून शांती देण्याचे प्रलोभन तो लोकांना देत असे. तो प्रेसिडेंट ऑल इंडिया अॅँटी करप्शन कमिटी, को-ऑर्डिनेटर पीपल्स ग्रिव्हेन्सेस सेल ऑफ इंडिया, नॅशनल एक्झिक्युटिव्ह इंडिया रिलिजेस रिडर्स असोसिएशन गव्हर्नमेंट ऑफ इंडिया, फाउंडर अॅण्ड प्रेसिडेंट सिद्धशक्ती कुंडलीनी मेडिटेशन ट्रस्ट इंटरनॅशनल एनजीओ, चेअरमन इंटरनॅशनल अॅँड युनायटेड नेशन्स प्रेस एजन्सी यूएसए प्रेस एजन्सी याचा पदाधिकारी असल्याचे सांगत आहे.
पीडित तरुणी आपल्या आईच्या औषधोपचारासाठी सेंटरमध्ये गेली होती. तसेच, या वेळी तुझेही शुद्धिकरण करतो असे त्याने सांगितले. उपचार सुरू असताना तो कोणालाही आतमध्ये घेत नसे. आरोपीने या पीडित मुलीला चॉकलेट खाण्यास देऊन त्यात गुंगीचे औषध दिले आणि बलात्कार केला. या प्रकरणी तरुणीने निगडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती. घटनेनंतर चव्हाण फरार झाला होता. पोलिस त्याचा शोध घेत होते. चौव्हाण हा निगडीत येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी त्याला सापळा रचून अटक केली. या प्रकरणी निगडी पोलिस तपास करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सोने चोरीप्रकरणी कारचालकास अटक

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
माजी मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते लक्ष्मण ढोबळे यांची मुलीच्या कारमधून तीस तोळ्यांचे सोन्याचे दागिने चोरीला गेल्याप्रकरणी संशयावरून बंडगार्डन पोलिसांनी कार चालकाला अटक केली आहे. त्याला कोर्टाने १८ ऑक्टोबरपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला.
सोमनाथ शिवदास कानगुडे (३८, रा. मंगळवेढा, ता. सोलापूर) असे अटक केलेल्याचे नाव आहे. या प्रकरणी ढोबळे यांच्या कन्या कोमल साळुंखे (३४, रा. भोसरी) यांनी तक्रार दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कोमल, त्यांची आई व इतर काही जण २३ सप्टेंबर रोजी कारमधून कॅम्प परिसरातील एसजीएस मॉल येथे खरेदी करण्यासाठी आले होते. हे सर्व जण खरेदीसाठी मॉलमध्ये गेल्यानंतर चालकाने कार मॉलसमोरील फूटपाथवर पार्किंग केली. चालकास एका तरुणाने पैसे पडल्याचे सांगून खाली उतरण्यास भाग पाडले. त्यानंतर दुसऱ्या व्यक्तीने कारमधून पर्स व बॅगमधील ऐवज चोरून नेला होता. कोमल या खरेदी करून परत आल्यानंतर हा सर्व प्रकार उघडकीस आला. या प्रकरणी बंडगार्डन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या प्रकरणी पोलिसांनी चालक कानगुडे व कुटुंबीयांकडे चौकशी केली. त्या वेळी कानगुडे याने दिलेल्या माहितीमध्ये तफावत येत होती. तसेच, घटनेनंतर पंधरा दिवस तो अचानक गायब झाला होता. त्याच्यावर संशय व्यक्त केल्यानंतर पोलिसांनी कानगुडेला अटक केली आहे. कानगुडेवर पूर्वीचे काही गुन्हे असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे त्याचा या गुन्ह्यात सहभाग असण्याचा संशय आहे. कोर्टाने त्याला पोलिस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणी पोलिस उपनिरीक्षक एस. पी. शिंदे हे तपास करत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

​न्यू अहिरे गावावरील विस्थापनाचे संकट टळले

$
0
0

रस्त्याऐवजी भुयारी मार्ग होणार
म. टा. प्रतिनिधी, पुणे
पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (पीएमआरडीए) प्रस्तावित रिंग रोडमुळे पुन्हा विस्थापनाची वेळ आलेल्या न्यू अहिरे गावावरील संकट तूर्त दूर झाले आहे. न्यू अहिरे गावातून हा रस्ता न नेता त्या ठिकाणी भुयारी मार्ग करण्याचा पर्याय ठेवण्यात आला आहे. या निर्णयामुळे न्यू अहिरे ग्रामस्थांवरील विस्थापनाची टांगती तलवार दूर झाली आहे.
शहर व ग्रामीण भागातील प्रस्तावित रिंग रोड संदर्भात जिल्हाधिकारी सौरव राव यांनी बैठक घेतली. या बैठकीला खेडचे खासदार शिवाजीराव आढळराव, आमदार सुरेश गोरे, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष शुक्राचार्य वांजळे तसेच पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे (एमएसआरडीसी) अधिकारी आणि हवेली व खेड तालुक्यामधील ग्रामस्थ उपस्थित होते.
खेड तालुक्यातील काही गावांमधून पीएमआरडीए व एमएसआरडीसी या दोघांचाही रिंग रोड जात आहे. वास्ताविक, एकाच वेळी दोन रिंग रोडची आवश्यकता नाही. तथापि, या दोन्ही यंत्रणांमध्ये समन्वय नसल्याने शेतकऱ्यांच्या शेतजमिनी रस्त्यामध्ये जात आहेत, अशी तक्रार शेतकऱ्यांनी केली. या समस्येवर मार्ग काढण्याचे आश्वासन या वेळी बैठकीत देण्यात आले.
हवेली तालुक्यातील रिंग रोड न्यू अहिरे या गावामधून जात आहे. त्याला जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष वांजळे, सरपंच ज्ञानेश्वर वांजळे यांच्यासह ग्रामस्थांनी आक्षेप घेतला आहे. अहिरे गावची जमीन राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीमध्ये गेली. त्यानंतर साठ वर्षांनी या गावाचे वारज्याजवळ न्यू अहिरे येथे पुनर्वसन करण्यात आले. या पुनर्वसनासाठी सुरूवातीला ६५ एकर जागा ठेवण्यात आली होती. प्रत्यक्षात २२ एकर जागेवरच गावाचे पुनर्वसन झाले. आता या पुनर्वसित वसाहतीमधूनच ११० मीटर रुंदीचा रिंग रोड टाकण्यात आला आहे. त्यामुळे पुन्हा काही कुटुंबांवर विस्थापनाची वेळ येणार आहे, ही बाब निदर्शनास आणण्यात आली. तेव्हा या गावातील एकाही घराला धक्का लागणार नाही. गावातून रस्ता न नेता भुयारी मार्ग (टनेल) काढण्यात येईल, असे आश्वासन बैठकीत देण्यात आले. त्यामुळे न्यू अहिरे गावावरील विस्थापनाचे संकट टळले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पवनाथडी जत्रा यंदा डिसेंबरमध्येच

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पिंपरी
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी आयोजित करण्यात येणारी पवनाथडी जत्रा यंदा जानेवारीऐवजी डिसेंबरमध्येच भरणार आहे. महापालिकेच्या शनिवारी (१५ ऑक्टोबर) झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत ऐनवेळी मांडलेल्या या ठरावाला मान्यता देण्यात आली. यानुसार पवनाथडी जत्रा ही १० ते १४ डिसेंबर या कालावधीमध्ये भरणार आहे. ही जत्रा गेल्यावर्षी प्रमाणे एच. ए. मैदानावरच भरणार असून, जत्रेसाठी येणाऱ्या खर्चाला स्थायी समितीने मान्यता दिली आहे.
महापालिकेच्या नागरवस्ती विभागामार्फत शहरातील महिलांचे आर्थिकदृष्ट्या सक्षमीकरण करण्यासाठी पवनाथडी जत्रेचे आयोजन केले जाते. यामध्ये बचत गटांमधील महिलांनी बनविलेल्या वस्तू विक्रीस ठेवण्यात येतात. त्यासाठी महापालिका विनामूल्य स्टॉल उपलब्ध देते. या जत्रेमध्ये लाखो रुपयांची दरवर्षी उलाढाल होत असते. महापालिकेच्या आगामी निवडणुका व आचारसंहिता या पार्श्वभूमीवर जानेवारीऐवजी डिसेंबरमध्ये यंदा पवनाथडी भरविण्याचे निश्चित झाल्याची चर्चा महापालिकेत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दोन लाख रुपयांची ऑनलाइन फसवणूक

$
0
0

दोन लाख रुपयांची ऑनलाइन फसवणूक
म. टा. प्रतिनिधी, पुणे
एटीएम कार्डची गोपनीय माहिती घेऊन एका व्यक्तीच्या बँक ऑफ महाराष्ट्रच्या खात्यामधून दोन लाख आठ हजार रुपये ऑनलाइन काढून घेतल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी कोथरूड पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत कोथरूड येथे राहणाऱ्या एका ज्येष्ठ नागरिकाने तक्रार दिली आहे. तक्रारदार यांना एका व्यक्तीने फोन करून एटीएम कार्डची गोपनीय माहिती विचारून घेतली. त्यानंतर त्यांच्या बाजीराव रोड येथील बँकेच्या खात्यामधून ऑनलाइन दोन लाख आठ हजार रुपये काढून घेतले. हा प्रकार लक्षात आल्यानंतर त्यांनी पोलिसांकडे धाव घेतली. या प्रकरणी सहायक निरीक्षक एम. एस. बनसोडे हे पुढील तपास करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


पतपेढीच्या संचालकांकडून ठेवीदारांची फसवणूक

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, पिंपरी
पतपेढीत ठेवलेल्या मुदतठेवींची मुदत पूर्ण झाल्यानंतरही ठेवीदाराला त्याची रक्कम संचालकांनी परत न करता तिचा अपहार केल्याप्रकरणी पतपेढीच्या संचालक आणि कर्मचाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रवींद्रनाथ ओंकार पाटील, मधुकर काशिनाथ पाचपांडे यांच्यासह पतपेढीच्या संचालक आणि कर्मचाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या संदर्भात उद्धव पगारे (वय ६३, रा. निगडी) यांनी निगडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
आरोपींची आकुर्डीत औद्योगिक विकास नागरी सहकारी पतपेढी आहे. पगारे यांनी या पेढीत पाच लाख ८९ हजार ३३० रुपये ठेवले होते. ठेवींची मुदत पुर्ण झाल्यानंतरही पतपेढीच्या संचालकांनी त्यांचे पैसै आणि व्याज परत केले नाही. पगारे यांनी वांरवार पतपेढीच्या संचालकांकडे पैशाची मागणी केली. मात्र, त्यांनी पैशांचा स्वत:च्या फायद्यासाठी अपहार केला आहे. तसेच, इतर ठेवीदारांच्या बचत खात्यावरील पैसे त्यांना न देता त्याचाही अपहार केला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

​राजेंद्र शेंडे ‘युनेप’चे सल्लागार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
संयुक्त राष्ट्रसंघाच्या पर्यावरण कार्यक्रमाच्या (युनेप) तंत्रज्ञान आणि अर्थशास्त्रीय तज्ज्ञांच्या कृती समितीवर आंतरराष्ट्रीय पर्यावरण तज्ज्ञ राजेंद्र शेंडे यांची ज्येष्ठ सल्लागार म्हणून निवड झाली आहे. संयुक्त राष्ट्रसंघाच्या किगाली रवांडा येथे झालेल्या मॉन्ट्रिअल प्रोटोकॉल बैठकीत त्यांची निवड जाहीर
करण्यात आली.
ओझोनचे संरक्षण, तापमानवाढ रोखण्यासाठीची धोरणे, विशेषतः हायड्रो फ्लुरो कार्बन वायूचे उत्सर्जन कमी करण्यासाठीचे धोरण ठरवण्यासाठी संयुक्त राष्ट्रसंघातर्फे मॉन्ट्रिअल प्रोटोकॉलची बैठक आयोजित करण्यात आली होती. माजी पर्यावरणमंत्री प्रकाश जावडेकर यांनी शेंडे यांचे नामांकन काही महिन्यांपूर्वीच पाठवले होते. या नेमणुकीसाठी भारताच्या बाजूने अमेरिका, ब्राझील, किर्गीस्तान, जॉर्जिया, कझाकस्तान, तुर्कमेनिस्तान, ताजिकीस्तान, मोल्दोवा रिपब्लिक
यांनीही पाठिंबा दिला.
संयुक्त राष्ट्रसंघाची ही समिती हरितगृह वायूंच्या उत्सर्जनाबाबत कारखाने आणि त्यातील तंत्रज्ञ यांना मार्गदर्शन करून त्यातील उणीवा दूर करण्याचे काम करते. संघाच्या ओझोन कृती समितीचे प्रमुख म्हणून शेंडे यांनी गेल्या वीस वर्षांपासून काम केले आहे. पुण्यातील ‘तेर पॉलिसी सेंटर’ या पर्यावरणविषयक काम करणाऱ्या संस्थेचे ते
मार्गदर्शक आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘मेट्रोमध्येही पिंपरी-चिंचवडवर अन्याय’

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, पिंपरी
मेट्रोच्या पहिल्या टप्प्याला पीआयबीने मंजुरी दिली असली तरी पिंपरी-चिंचवडवर अन्यायच झाला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मेट्रोचा पहिला टप्पा निगडीपासून सुरू होईल, असे सांगितले असताना देखील घोषणा मात्र, पिंपरी ते स्वारगेट अशी झाल्याने शहरवासीयांमध्ये नाराजी आहे. राजकीय अनास्थेमुळे स्मार्ट सिटी, रेल्वे टर्मिनल पाठोपाठ आता मेट्रोसाठीसुद्धा पिंपरी-चिंचवडला डावलले जात आहे का, असा सवाल पिंपरी-चिंचवड सिटीझन फोरमने केला आहे. तसेच, मेट्रोचा पहिला टप्पा निगडीपासून सुरू होण्यासाठी शासन दरबारी दाद मागणार असल्याचेही रविवारी (१६ ऑक्टोबर)‘पीसीसीएफ’ने सांगितले.
मेट्रोच्या पहिल्या टप्प्याबाबत मुख्यमंत्री फडणवीस यांनी ७ मार्च २०१५ला दिलेल्या आश्वासनानंतरही केंद्रीय सार्वजनिक गुंतवणूक मंडळाने (पीआयबी) मेट्रोचा पहिला टप्पा पिंपरी ते स्वारगेट असल्याचे जाहीर केले. यापूर्वी देखील अनेकदा पिंपरी-चिंचवडला विविध विकासकामांमध्ये डावलले गेल्याचा आरोप पिंपरी-चिंचवड फोरमने रविवारी (१६ ऑक्टोबर) पत्रकार परिषदेत केला. या वेळी तुषार शिंदे, बिल्वा देव, अमोल देशपांडे, राजीव भावसार, वैभव घुगे आदी पदाधिकारी उपस्थित होते.
शिंदे म्हणाले, ‘पिंपरीऐवजी निगडीपासून मेट्रो सुरू झाल्यास नियोजित खर्चामध्ये बचत करता येऊ शकते. मेट्रोच्या नियोजित आराखड्याप्रमाणे स्वारगेट ते पिंपरी आणि त्यानंतर निगडी-पिंपरी विस्तार हे मेट्रोच्या दुसऱ्या टप्प्यात होणार आहे. पण, मेट्रोचा पहिला टप्पा सुरू होताना अजून पाच वर्षे जातील त्याच्या पुढे आणखीन पाच वर्षे. म्हणजेच बहुसंख्य पिंपरी-चिंचवडकरांना मेट्रोची सुविधा मिळायला २०२६ साल उजाडेल.’
तसेच, या मागणीसाठी खासदार अनिल शिरोळे आणि खासदार श्रीरंग बारणे यांच्याशीही चर्चा करण्यात येणार असल्याची माहिती अमोल देशपांडे यांनी दिली. मेट्रोसाठी फोरमच्या माध्यमातून २०१३ पासून पाठपुरावा चालू आहे. या मागणीसाठी लोकसहभाग वाढवण्यासाठीसुद्धा ‘ऑनलाइन याचिका’ सह्यांची मोहीम असे उपक्रम राबवण्यात येत आहेत. तसेच, ‘सध्याच्या सत्ताधारी पक्षातील नेते आणि विरोधक इतर स्थानिक नेत्यांपैकी कोणीच या निर्णयावर काहीच बोलत नाहीत ते शांत कसे, असा प्रश्न विचारत,’ असेही देशपांडे म्हणाले.
तसेच बिल्वा देव यांनीही ट्रान्सपोर्ट हब म्हणूनही निगडी हे कसे महत्त्वाचे आहे हे सांगितले. यामध्ये निगडी, भक्ती-शक्ती चौकात सध्या निगडी-दापोडी बीआरटी मार्ग, निगडी-किवळे बीआरटी मार्ग, पीएमपीएल टर्मिनल, एसटी थांबा आणि स्पाइन रस्त्याला जोडणारा मार्ग असे नियोजित वाहतुकीचे मार्ग अस्तित्त्वात आहेत. त्यामुळेच यामध्ये मेट्रो स्थानकाचेसुद्धा नियोजन केल्यास ट्रान्सपोर्ट हबचे नियोजन सोप्पे होईल. त्यामुळे निगडीला शहराचे प्रवेशद्वार म्हणले तर वावगे ठरणार नाही, त्यामुळे तेव्हा मेट्रो तेथून सुरू होणे हे सर्वांसाठी भूषणावह ठरेल, असेही मत तुषार शिंदे यांनी व्यक्त केले.

‘राजकीय पक्षांची कार्यालय पुण्यात हलवा’
राजकीय अनास्थेमुळे अनेक विकास कामांचा लाभ पूर्णतः पिंपरी-चिंचवडकरांना मिळत नाहीत. त्यामुळे शहरातील राजकीय पक्षांची कार्यालयच पुण्यात का हलवत नाहीत, असा सवाल देखील या वेळी उपस्थित केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

​‘मंत्री-अधिकाऱ्यांनी एकत्र काम करावे’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
‘मंत्री हे सरंमजामशाहीतील राजे नाहीत. मंत्र्यांनी सर्वांना बरोबर घेऊन काम करायला हवे. सनदी अधिकाऱ्यांनी काय घोडे मारलेले असते? नेते आणि सनदी अधिकारी एकत्रित काम करतील, तेव्हाच देश पुढे जाईल; पण मंत्र्यांशी स्पष्टपणे बोलण्याची ताकद आजच्या अधिकाऱ्यांमध्ये नाही’, अशा शब्दांत माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी शनिवारी मंत्री आणि अधिकाऱ्यांचे कान टोचले.
यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानचे पुणे केंद्र व कृषी सहकार व्यासपीठातर्फे माजी केंद्रीय गृहसचिव राम प्रधानलिखित व अभय सदावर्ते अनुवादित ‘राजीव आणि सोनिया यांच्या सहवासात’ या पुस्तकाचे प्रकाशन शिंदे यांच्या हस्ते झाले. त्या वेळी ते बोलत होते. पत्रकार राजीव खांडेकर, प्रतिष्ठानचे अध्यक्ष अजित निंबाळकर, कार्याध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख, राजहंस प्रकाशनच्या विनया खडपेकर या वेळी उपस्थित होते.
मंत्री आणि अधिकारी यांनी मिळून काम केले तर देश पुढे जाईल. शेवटी सर्व जण देशाची इमारत बांधण्याचे काम करत असतात; पण आज तसे चित्र नाही, याकडे शिंदे यांनी लक्ष वेधले. ‘गृहसचिवाचे काम किचकट असते. अनेक घडामोडींवर त्यांना लक्ष ठेवावे लागते. त्याच वेळी सर्वांचे लक्ष गृहसचिवाकडे असते. अशा परिस्थितीत महाराष्ट्रातील कोणत्याही अधिकाऱ्याने पंतप्रधानांचा मिळवला नसेल इतका विश्वास प्रधानांनी राजीव गांधी यांचा मिळवला’, असे गौरवोद्वगार शिंदे यांनी काढले. सूत्रसंचालन अंकुश काकडे यांनी केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पुण्यातील नऊ पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट पूर्ण

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

जिल्ह्यातील नऊ पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट पूर्ण झाले असून, त्यासाठी सुमारे तीन कोटी ४१ लाख रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने स्ट्रक्चरल ऑडिट केले असून, याबाबतचा प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठवण्यात आला आहे.महाड येथील सावित्री नदीवरील पूल कोसळल्यानंतर झालेल्या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याचे आदेश राज्य सरकारने दिले आहे. त्यानुसार जिल्ह्यातील पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याचे काम सुरू आहे. पूर्व विभागातील नऊ पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट पूर्ण झाले आहे.

‘या पुलांच्या दुरुस्तीसाठी सुमारे तीन कोटी ४१ लाख रुपये खर्च अपेक्षित आहे. याबाबतचा प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठवण्यात आला आहे.’ असे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या पूर्व भागाचे कार्यकारी अभियंता अविनाश धोंगडे यांनी सांगितले. ‘स्ट्रक्चर ऑडिट करण्यात आलेल्यांमध्ये भीमा नदीवरील खानोटा पूल, मदनवाडी, करंबोरी, बेलवाडी, शेळगाव आणि अंथुर्णी येथील दगडी पुलांचा; तसेच शिवनाला येथील सिमेंटच्या पुलाचा समावेश आहे.’ असे धोंगडे म्हणाले. ‘दुरुस्तीच्या कामांमध्ये भेगा बुजवणे, सांध्यांचे मजबुतीकरण करणे, निखळलेले दगड बसविणे, रेलिंगची दुरुस्ती, खराब झालेला सिमेंटचा भाग बदलणे आदी कामे केली जाणार आहेत.’ असे त्यांनी नमूद केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तीस तालुक्यांत ‘वॉटर कप’ स्पर्धा होणार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

‘सत्यमेव जयते वॉटर कपच्या माध्यमातून कोणत्याही गावाला पैसे न देता, दत्तक न घेता, फक्त जलसंधारणाचे शिक्षण आणि दिशा देऊन काही बदल घडवता येतो का, याचा प्रयोग आम्ही केला होता. तो आता यशस्वी ठरला आहे. म्हणूनच आता तीन तालुक्यांऐवजी ३० तालुक्यांमध्ये ही स्पर्धा आम्ही राबविणार आहोत,’ अशी माहिती पाणी फाउंडेशनचे संस्थापक आणि प्रसिद्ध अभिनेता आमीर खान यानी रविवारी दिली.

भारतीय जैन संघटना (बीजेएस) आता आमीर खान याच्या पाणी फाउंडेशनसोबत जलसंधारण व अन्य क्षेत्रात काम करणार आहे. त्यासाठीच्या ‘महाराष्ट्र दुष्काळमुक्त’ अभियानाची घोषणा रविवारी एका कार्यक्रमात करण्यात आली. आमीरसह पाणी फाउंडेशनचे सीईओ सत्यजित भटकळ, बीजेएसचे संस्थापक, अध्यक्ष शांतिलाल मुथ्था आणि पाणी फाउंडेशनचे डॉ. अविनाश पोळ या वेळी उपस्थित होते. प्रफुल्ल पारेख यांनी सूत्रसंचालन केले.

‘मशिन हे जलसंधारणाच्या कामाचा कणा बनले असून त्यातून माणूस हद्दपार होतो आहे. याउलट या कामासाठी सर्वांनी एकत्र येत एकजीव होऊन काम केले पाहिजे. पाणी फाउंडेशनने लोकांना एकही पैसा न देता लोकसहभाग आणि श्रमदानातून जलसंधारणाचे मोठे काम करवून घेतले. देशात सक्ती किंवा स्पर्धेशिवाय काहीही घडू शकत नाही. पाणी फाउंडेशन आणि बीजेएस एकत्र आल्याने भक्ती आणि शक्तीचा संगम झाला आहे,’ असे डॉ. पोळ म्हणाले. बीजेएसच्या कार्याचा दाखला देऊन मुथ्था म्हणाले, ‘बीजेएसची संपूर्ण यंत्रणा पाणी फाउंडेशनसोबत दुष्काळ निवारणासाठी खांद्याला खांदा लावून काम करेल. दुष्काळमुक्त महाराष्ट्र अभियानातून शेतकऱ्यांचा आत्मविश्वास वाढून आत्महत्याही थांबतील.’ सत्यजित भटकळ यांनी पाणी फाउंडेशन व वॉटर कपच्या संकल्पनेविषयी व पहिल्या स्पर्धेविषयी माहिती दिली.


‘दुष्काळमुक्त होईल’

महाराष्ट्र दुष्काळमुक्त करणे हे मोठे आव्हान असले तरी अशक्य नाही. पाणी वाचविण्यासाठी सर्वांनी एकत्रित काम करण्याची गरज आहे. राज्यातल्या ८५ हजार गावांनी स्वतः पाणलोट क्षेत्र विकासाचा निर्धार केल्यास अवघ्या एका वर्षात महाराष्ट्र दुष्काळमुक्त होऊ शकेल.

- आमीर खान

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

​‘चरित्र लेखनामुळे समाज विचारप्रवृत्त’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
‘कथा, कादंबऱ्यातील काल्पनिक नायकांपेक्षा समाजातील वंचित घटकांसाठी झटणाऱ्या आणि आयुष्य वेचणाऱ्या नायकांविषयी समाजात औत्सुक्य निर्माण होत आहे. सामाजिक कार्यकर्त्यांच्या अनुभवपर आणि चरित्रपर लेखनाकडे समाज मोठ्या आशेने पाहत आहे. चंगळवादी समाजाला विचारप्रवृत्त करण्याचे मोठे काम या प्रकारच्या लेखनाने केले आहे’, असे मत महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांनी व्यक्त केले.
साहित्यसम्राट न. चिं. केळकर यांच्या ६९ व्या पुण्यतिथीनिमित्त केसरी-मराठा संस्थेतर्फे शुभांगी कोपरकर यांना ‘परिवर्तनाची पहाट’ या ग्रंथासाठी केळकर ग्रंथोत्तेजक पारितोषिकाने आणि वैद्यकीय क्षेत्रातील सेवाभावी कार्यासाठी डॉ. अजित गोळविलकर यांना रा. वि. वारदेकर पारितोषिकाने गौरविण्यात आले. त्या वेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी संस्थेचे प्रमुख डॉ. दीपक टिळक होते.
‘साहित्य आणि समाज यांचा संबंध केवळ लेखक आणि वाचक इतकाच मर्यादित नाही, तर सामाजिक लेखकांच्या कार्यात आपण सहभागी व्हावे, अशी भावना निर्माण होत आहे. हीच नव्या नायकांच्या लेखणीची ताकद आहे’, असे सांगून प्रा. जोशी म्हणाले, ‘केळकर यांनी निबंध या वाङ्मय प्रकाराला प्रतिष्ठा प्राप्त करून दिली. लेखणीचे सामर्थ्य आणि सौंदर्य त्यांच्या निबंधात आढळते. ज्ञानलालसा, युक्तिवाद कौशल्य, विनोद बुद्धी, भाषा प्रभुत्व आणि समाज शिक्षणाची ओढ त्यांच्या निबंध लेखनातून दिसून येते. त्यांच्या लेखनात निर्भयता होती; पण बेतालपणा नव्हता. केळकरांचे समग्र साहित्य अभिजात सौंदर्याने नटलेले आहे’.
‘केळकरांच्या समृद्ध साहित्य दालनातील केंद्रस्थान संपादकत्व होते. संपादकांनी लिहिलेले साहित्य काल्पनिक नसते, तर कोणत्या ना कोणत्या घटनेवर आधारित असते. अशाच साहित्याची निर्मिती करून न. चिं. केळकरांनी साहित्यातून समाजाला एक नवी दिशा देण्याचे मोलाचे कार्य केले’, असे डॉ. टिळक यांनी नमूद केले. स्वप्नील पोरे यांनी सूत्रसंचालन केले. विनय पुराणिक यांनी आभार मानले.

‘पणतीने एक कोपरा उजळू’
‘परिवर्तनाची पहाट’ या पुस्तकात स्नेहालय संस्थेचा विलक्षण प्रवास मांडला आहे. या पुस्तकातून समाजसेवेचा दुर्दम्य आशावाद मला मिळाला आहे. संपूर्ण अंधःकार मिटवता येत नसला, तरी पणतीने एक कोपरा उजळून काढण्याचा हा प्रयत्न आहे. हा माझा नसून स्नेहालय संस्थेचा गौरव आहे’, अशी भावना शुभांगी कोपरकर यांनी व्यक्त केली. ‘सद्यस्थितीत साथीच्या आजारांचे प्रमाण वाढले आहे. अधिक संशोधन करण्याची गरज आहे’, अशी अपेक्षा डॉ. अजित गोळविलकर यांनी व्यक्त केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


दिवाळीत प्रवाशांचे दिवाळे

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

दिवाळीनिमित्त प्रवाशांची वाढलेली संख्या व त्यांची निकड पाहून खासगी प्रवासी बस वाहतूकदारांनी दर वर्षीप्रमाणे यंदाही प्रवासी भाड्यात दुपटीपेक्षा अधिक वाढ केली आहे. पुढील आठवड्यातील तिकीट आरक्षित करतानाही कंपन्यांकडून वाढीव दर आकारले जात आहेत. त्यामुळे पुण्याहू विदर्भ, मराठवाड्यासह राज्याच्या विविध भागात जाणाऱ्या प्रवाशांना आर्थिक भुर्दंड बसणार आहे.

नोकरी किंवा विविध कारणांनी शहरात स्थायिक झालेले अनेक नागरिक दिवाळ सणासाठी आपापल्या गावी जातात. त्यामुळे या काळात प्रवाशांची संख्या झपाट्याने वाढते. परिणामी रेल्वे, एसटी गाड्यांना गर्दीने फुलून जातात. आणि प्रवाशांना प्रवासी साधने अपुरी पडतात. रेल्वे गाड्यांटे तिकिटांचे आरक्षण फार पूर्वीच संपल्याने प्रवाशांना तिकिटे मिळत नाहीत. याच परिस्थितीचा फायदा प्रवासी वाहतूक करणाऱ्या खासगी आराम बस कंपन्या उचलून तिकीटाच्या दरात मोठी वाढ करतात. ही दरवाढ प्रामुख्याने विदर्भ, मराठवाड्यातील बुलडाणा, जळगाव, अकोला, अमरावती, नागपूर, चंद्रपूर, यवतमाळ, वर्धा, औरंगाबाद, जालना, लातूर, बीड, नांदेड आदी शहरांना जाण्यासाठी केली जाते.

पुणे-अमरावतीसाठी दोन दिवसांपूर्वी गाडीच्या प्रकारानुसार साधारणपणे पाचशे ते एक हजार रुपये प्रवास शुल्क होते. त्याच प्रवासासाठी पुढील आठवड्यात अनुक्रमे १२०० ते तीन हजार हजार रुपये भाडे मागितले जात आहे. तर, नागपूरला जाणाऱ्या गाड्यांचे प्रवास भाडे आतापासून वाढविण्यात आले असून, ते १२०० रुपयांवरून ३१०० रुपये केल्याची तक्रार काही नागरिकांनी ‘मटा’कडे केली. दिवाळीसाठी दोन आठवडे उरले आहेत. त्यामुळे प्रत्यक्ष दिवाळीच्या दोन ते तीन दिवस आधी प्रवासी भाड्यात केली जाणारी वाढ अवास्तव असल्याची प्रवाशांची तक्रार आहे.


खासगी प्रवासी बसचे दर

मार्ग... गेल्या आठवड्यातील दर....पुढील आठवड्यातील दर (अॅडव्हान्स बुकिंग करताना)

पुणे-अमरावती... ५०० ते १०००... १२००-३०००

पुणे-नागपूर... ७०० ते १०५०... १३५० ते ३८००

पुणे-वर्धा... ८०० ते १२००... १५०० ते २०००

पुणे-औरंगाबाद... ३०० ते ७००... ५०० ते २८००

पुणे-नांदेड... ३५० ते ८५०... ८०० ते १३००

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘महा ई-सेवा’ केंद्रातून आरक्षित ति​किटे

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (एसटी) ‘इंद्रधनू आरक्षण प्रणाली’ अंतर्गत ग्रामीण भागातील सर्वसामान्य प्रवाशांना एसटी बसचे आगाऊ आरक्षण सहज उपलब्ध व्हावे या दृष्टीने पावले उचलली आहे. राज्यातील ‘महा ई-सेवा' केंद्रातून आता यापुढे इतर शासकीय सेवांप्रमाणे एसटी तिकिटाची आगाऊ आरक्षण सुविधा उपलब्ध करून दिली आहे, अशी माहिती राज्याचे परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी ‘मटा’ला रविवारी दिली.
‘इंद्रधनू आरक्षण प्रणाली’अंतर्गत राज्यातून विशेषत: ग्रामीण भागात सध्या कार्यरत असलेल्या महाऑनलाइन कंपनीची ५,८०० ई-सेवा केंद्रे कार्यरत आहेत. या द्वारे तहसील कार्यालय, पंचायत समिती कार्यालयात विविध कामांसाठी लागणारे दाखले आणि अन्य शासकीय सेवांप्रमाणेच सर्वसामान्यांना एसटीच्या प्रवासाचे आगाऊ आरक्षण करता येणार आहे. याचा फायदा राज्यातील ग्रामीण जनतेला होणार आहे. या योजनेचा लाभ सर्वसामान्य प्रवाशांनी घ्यावा, असे आवाहन रावते यांनी केले. ‘इंद्रधनू आरक्षण प्रणाली’मुळे निपाणी, बेळगाव, कारवार, गोवा आदी राज्याच्या सीमा भागातील प्रवाशांनाही तिकीट आरक्षण सेवेचा लाभ घेता येणार आहे, असेही रावते यांनी नमूद केले. तसेच, ज्या प्रवाशांना थेट इंटरनेटद्वारे एसटी प्रवासाची तिकिटे आरक्षित करायची आहे, त्यांनी
www.public.msrtcors.com या अधिकृत वेबसाइटबरोबरच www.mahaonline.gov.in या वेबसाइटचाही लाभ घ्यावा, असेही रावते यांनी नमूद केले.
...........
महा-ईसेवा केंद्रातून एसटी तिकीट आगाऊ आरक्षित करण्याची सुविधा उपलब्ध झाल्याने ग्रामीण भागातील जनतेला प्रवास करताना मोठा फायदा होईल. या सुविधेचा जनतेने लाभ घ्यावा. भविष्यात या सुविधेत आणखी चांगले बदल करून प्रवाशांच्या हिताचे निर्णय घेतले जातील.
- दिवाकर रावते, परिवहन मंत्री

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शैक्षणिक चॅनेलवर झळकले सिनेमे!

$
0
0

‘एससीईआरटी’‌‌ कडून नजरचुकीने घडला प्रकार

म. टा. प्रतिनिधी, पुणे

महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेने (एमएससीईआरटी) शैक्षणिक व्हिडिओंसाठी म्हणून सुरू केलेल्या यू-ट्यूब चॅनेलवरून थेट सिनेमांचे सब्स्क्रिप्शन उपलब्ध करून देण्यात आले होते. त्या आधारे उपलब्ध लिंकवर ‘टायटॅनिक’पासून आतापर्यंतच्या ‘मदारी’पर्यंतचे सिनेमे उपलब्ध असल्याने, चॅनेलच्या मूळ उद्देशालाच हरताळ फासला जात होता. ‘मटा’ने ही बाब निदर्शनास आणून दिल्यानंतर, रविवारी रात्री ‘एससीईआरटी’ने आपल्या वेबसाइटवरील यू-ट्यूब चॅनेलची लिंक काढून टाकली. तरीही यू-ट्यूब चॅनेलचे सब्स्क्रिप्शन मात्र तसेच सुरू होते.
संस्थेने राज्यभरातील तंत्रस्नेही शिक्षकांच्या व्हिडिओंना हक्काचे व्यासपीठ मिळवून देण्यासाठी ते संस्थेच्या http://mscert.org.in/index.php या वेबसाइटवर उपलब्ध करून दिले आहेत. तसेच, याच वेबसाइटवर डाउनलोड या टॅबच्या आधारे संस्थेच्या यू-ट्यूब चॅनेलची लिंकही देण्यात आली होती. त्या आधारे संबंधित चॅनेलवर गेल्यास ‘एससीईआरटी’च्या संचालकांनी सिनेमांच्या लिंक्स उपलब्ध असलेल्या काही चॅनेलचे सब्स्क्रिप्शन नोंदविल्याचे रविवारी ‘मटा’ला आढळून आले. या लिंकवर क्लिक केले असता, ‘ढिश्श्यूम’ ‘ए फ्लाइंग जाट’ आदी सिनेमे उपलब्ध असल्याचे दिसले. ‘ओव्हीआय सरकेर’ हे एचडी दर्जाचे सिनेमे उपलब्ध करून देणारे चॅनेलही संस्थेने सब्स्क्राइब केले असून, त्यावरील मदारी, रुस्तम, मस्ती रिलोडेड आदी सिनेमेही मूळ 'एससीईआरटी'च्या यू-ट्यूब चॅनेलच्या आधारे राज्यभरातील शिक्षक प्रतिनिधींसाठी उपलब्ध होते. ‘टायटॅनिक’ सिनेमा, त्याचे थ्री डी व्हर्जन, सिनेमाचे ट्रेलर, त्यामधील काही' दृश्ये उपलब्ध असणारी लिंकही ‘एससीईआरटी’च्या चॅनेलवरून उपलब्ध करून देण्यात आली होती.
या विषयी ‘एससीईआरटी’चे संचालक गोविंद नांदेडे यांच्याशी संपर्क साधला असता, या चॅनेलवर लक्ष ठेवण्याची जबाबदारी असणाऱ्या अधिकाऱ्यांच्या तांत्रिक चुकीमुळे हे झाले असण्याची शक्यता वर्तविण्यात आली. नांदेडे म्हणाले, ‘या विषयी संबंधितांना सूचना देऊन, असे सब्स्क्रिप्शन तातडीने बंद करण्याचे आदेश देत आहे. या पुढे असे प्रकार घडणार नाहीत, याची खबरदारी घेतली जाईल. या चॅनेलवरून राज्यभरातील शिक्षकांनी तयार केलेले शैक्षणिक व्हिडिओ उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न केले जाणार असल्याचेही त्यांनी नमूद केले. त्यानंतर काही काळातच संस्थेच्या वेबसाइटवर डाउनलोड या टॅबखाली असणारी यू-ट्यूब चॅनेलची लिंक काढून टाकण्यात आल्याचे स्पष्ट झाले. असे असले, तरी https://www.youtube.com/channel/UCvAkeNF0s3p-mQDHsBvZvVw/channels या लिंकवरील संबंधित सिनेमांच्या लिंक्ससाठीचे सब्स्क्रिप्शन मात्र रात्री उशिरापर्यंत तसेच होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पोलिसाची भावी पत्नी अपघातात मृत्युमुखी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

पुणे पोलिस दलातील कर्मचारी नगरहून भावी पत्नीला पुण्याला घेऊन येत असताना रांजणगाव एमआयडीसी येथे भरधाव ट्रकने त्यांच्या दुचाकीला पाठीमागून जोराची धडक दिली. या धडकते तरुणीचा जागीच मृत्यू झाला असून, पोलिस कर्मचारी गंभीर जखमी झाला आहे.
सुषमा दादाराम थोरात (वय २६, रा. स्वारगेट पोलिस कॉलनी) असे मृत्यू झालेल्या तरुणीचे नाव आहे. नागनाथ नामदेव भालेराव (वय २६, रा. स्वारगेट पोलिस कॉलनी) असे जखमीचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नागनाथ पुणे पोलिस दलास नोकरीला आहे. सुषमाचे वडीलही पोलिस दलात चंद्रपूरला नेमणुकीस आहेत. सुषमा आणि नागनाथ यांचा १३ नोव्हेंबर रोजी विवाह होणार होता. सुषमा चंद्रपूरहून पुण्याला निघाली होती. पण, मध्येच ती नगरला उतरल्यामुळे तिला घेण्यासाठी नागनाग गेला होता. रविवारी सकाळी तिला घेऊन पुण्याला येत असताना कारेगाव येथे नाश्त्यासाठी थांबण्याचा निर्णय दोघांनी घेतला. चांगले हॉटेल मागे गेल्यामुळे नागनाथ वळून पुन्हा नगरच्या दिशेने निघाला. त्यावेळी मागून आलेल्या भरधाव ट्रकने त्यांना पाठीमागून धडक दिली. त्यात सुषमाचा मृत्यू झाला. या प्रकरणी पोलिस उपनिरीक्षक शशिकांत भोसले तपास करत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मान्सून फिरला माघारी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

सर्वसाधारण वेळापत्रकाच्या एक दिवस उशिरा मान्सूनने पुण्यासह राज्यातून काढता पाय घेतला. राज्यासह देशाच्याही बहुतांश भागातून मान्सून परत फिरला आहे.
भारतीय हवामानशास्त्र विभागातर्फे एक जून ते तीस सप्टेंबर हा कालावधी पावसाचा हंगाम समजण्यात येतो. सर्वसाधारणपणे एक ऑक्टोबरनंतर राज्यात मान्सूनचा परतीचा प्रवास सुरू होतो. त्यानंतरच्या काळात सलग पाच दिवस पाऊस न झाल्यास व हवेतील बाष्पाच्या प्रमाणात सलग घट झाल्यास त्या भागातून मान्सून परतल्याचे हवामान विभागातर्फे स्पष्ट करण्यात येते.
दर वर्षी साधारणतः १५ ते १७ ऑक्टोबरच्या आसपास मान्सून संपूर्ण राज्यातून माघारी फिरतो. २०१४ मध्ये एक दिवस आधी म्हणजे १४ ऑक्टोबरला मान्सून राज्यातून परतला होता. तर, २०१५ मध्ये १५ ऑक्टोबरला मान्सून संपूर्ण राज्यातून माघारी फिरला होता. रविवारी (१६ ऑक्टोबर) मान्सून बिहार, झारखंड, पश्चिम बंगाल, सिक्कीम, ओडिशा, छत्तीसगड, महाराष्ट्र, गोवा, तेलंगणा या राज्यांच्या उर्वरित भागासह पूर्वोत्तर राज्ये, आंध्रचा किनारपट्टी भाग, कर्नाटकचा बहुतांश भाग, बंगालच्या उपसागराचा उत्तर व पश्चिम मध्य भाग, रायलसीमा आणि अरबी समुद्राच्या मध्य भागातून मान्सून माघारी फिरल्याचे हवामान विभागातर्फे सांगण्यात आले. येत्या दोन दिवसात मान्सून आणखी काही भागातून माघारी परतण्यास परिस्थिती अनुकूल असल्याचेही हवामान विभागातर्फे सांगण्यात आले.
----
संपूर्ण राज्यातून मान्सूनची माघार
२०१६ - १६ ऑक्टोबर
२०१५ - १५ ऑक्टोबर
२०१४ - १४ ऑक्टोबर
२०१३ -२० ऑक्टोबर
२०१२ - १५ ऑक्टोबर
२०११ - २४ ऑक्टोबर

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images