Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

दिवाळीसाठी एसटी सज्ज

0
0

प्रवाशांच्या सोयीसाठी अडीज हजार गाड्यांचा ताफा

म. टा. प्रतिनिधी, पुणे

दिवाळीच्या काळात प्रवाशांची वाढणारी संख्या आणि त्या तुलनेत प्रवासाची अपुरी पडणारी साधने यामुळे होणारी प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (एसटी) १२५० जादा गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे. त्याबरोबरच १२२४ नियमित गाड्या, अशा एकूण २,४७४ गाड्या प्रवाशांच्या सेवेसाठी असणार आहेत.
दरवर्षी दिवाळीच्या सुटीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये नागरिक बाहेरगावी जातात. दिवाळीच्या तीन ते चार दिवसांमध्ये एसटीलाही गर्दी असते. दिवाळीसाठी प्रवाशांना उत्तम सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी एसटी महामंडळ सज्ज झाले आहे. दिवाळीसाठी शहरातून मोठ्या प्रमाणात नागरिक बाहेरगावी जातात. एसटीच्या पुणे विभागाने २६ ते २९ ऑक्टोबर या कालावधीत शिवाजीनगर एसटी स्टँड आणि पिंपरी-चिंचवड येथून २, ४७४ गाड्यांचे नियोजन करण्यात आले आहे. तसेच, स्वारगेट आणि कात्रज येथून ४५० जादा गाड्या सोडण्याचे स्वतंत्र नियोजन लवकरच केले जाणार आहे, असे एसटी महामंडळाच्या पुणे विभागाने कळविले आहे.
शिवाजीनगर स्टँड येथून ८९१ नियमित गाड्या आणि ४५० जादा गाड्या सोडण्यात येणार आहेत. तर, कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग (सीईओपी) मैदानातून ४८० जादा गाड्या सोडण्यात येणार आहेत. शिवाजीनगर स्टँडवरून नियमित सुटणाऱ्या गाड्यांव्यतिरिक्त लातूर, औरंगाबाद, नाशिक, उदगीरसाठी जादा गाड्या सोडण्यात येतील. तर, ‘सीओईपी’च्या मैदानातून नागपूर, अकोला, अमरावती, अंबाजोगाई, अंबड, अहमदपूर, बीड, औसा, सिल्लोड, चोपडा, धुळे, हिंगोली, जाफराबाद, जालना, कळंब, मलकापूर, लातूर, मेहकर, जामनेर, जळगाव, नांदेड, उस्मानाबाद, परळी, परभणी, परतूर, पुसद, शेगाव, तुळजापूर, गाणगापूर, उमरगा, वाशिम, यावल, यवतमाळ, बुलढाणा या मार्गावर जादा गाड्या सोडण्यात येणार आहेत.
पिंपरी चिंचवड येथून नियमित ३२४ आणि जादा २५० गाड्या सोडण्यात येतील. निगडी येथून नऊ नियमित आणि ७० जादा गाड्यांचे नियोजन केले आहे. पिंपरी-चिंचवड व निगडी एसटी स्टँड येथून नियमित सुटणाऱ्या गाड्यांव्यतिरिक्त कोल्हापूर, औरंगाबाद, चिपळूण, उमरगा, लातूर, खेड या मार्गांवर जादा गाड्या सोडण्यात येणार आहेत.
............
ऑनलाइन आरक्षणाची सोय
एसटीच्या अधिकृत व खासगी तिकीट आरक्षित केंद्राबरोबरच स्टँडरूनही नियमित व जादा गाड्यांसाठी आरक्षण करता येणार आहे. एसटीच्या
www.msrtc.gov.in / www.msrtcors.com.in या वेबसाइटद्वारे आणि मोबाइल अॅपद्वारेही प्रवाशांना तिकीट आरक्षित करता येणार आहे. दरम्यान, ऑनलाइन तिकीट आरक्षणासाठी सीईओपी मैदावरील गाड्यांसाठी ‘इएनजीजीडी’ असा कोड देण्यात आला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


‘समान नागरी कायदा अंमलात आणावा’

0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

‘मुस्लिम व्यक्तिगत कायद्यातील तरतुदी मुस्लिम महिलांना संविधानाने दिलेले मुलभूत अधिकार वापरण्यास प्रतिबंध करतात. त्यामुळे केवळ तोंडी तलाक, बहुपत्नीत्व आणि हलाला या प्रथांना प्रतिबंध करण्याबरोबरच समान नागरी कायदा अंमलात आणण्याची आवश्यकता आहे,’असे मुस्लिम सत्यशोधक मंडळाचे अध्यक्ष प्रा. शमशुद्दीन तांबोळी यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत सांगितले. त्यासाठी येत्या काळात जनआंदोलन उभारणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
सुप्रीम कोर्टाच्या सूचनेनुसार केंद्र सरकारने एक प्रतिज्ञा सादर केले. त्यामध्ये तोंडी तलाक, बहुपत्नीत्व आणि हलाला या सारख्या प्रथा संविधानाच्या १४ ​आणि १५व्या कलमाविरूद्ध असल्याने, या तरतुदी रद्द करण्याचा मानस सरकारने व्यक्त केला. तसेच, कायदा आयोगाला शिफारस करण्यास सुचविले आहे. केंद्र सरकारच्या या भूमिकेचे मुस्लिम सत्यशोधक मंडळाने स्वागत केले आहे. कायदा आयोगाने मुस्लिम जनमत आजमावण्यासाठी सोळा प्रश्नांवर प्रतिसाद मागविला आहे. वास्तविक या पूर्वीच ९२ टक्के मुस्लिम महिलांनी तोंडी तलाकला विरोध दर्शविला असून, ५० हजार महिलांनी सरकारला निवेदनही दिले आहे. असे असताना मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड, एमआयएम आणि अन्य मुस्लिम परंपरावादी संघटना या सुधारणांना विरोध दर्शवित आहेत. या संघटना म्हणजे सर्व मुस्लिम समाजाच्या प्रतिनिधी नाहीत. तसेच, अन्य धर्मांच्या कौटुंबिक कायद्यात सुधारणा करताना सरकारने धर्मांधवाद्यांचा विरोध जुमानला नाही. त्याप्रमाणे मुस्लिम व्यक्तिगत कायद्यात सुधारणा करावी, अशी मागणी प्रा. तांबोळी यांनी केली.
येत्या काळात मुस्लिम समाजात प्रबोधन करण्यासाठी व सुधारणाविषयक लढ्याला बळ देण्यासाठी स्वाक्षरी मोहीम राबविली जाणार आहे. तसेच, येत्या २६ नोव्हेंबर रोजी या विषयावर राष्ट्रीय पातळीवरील परिषदेचे आयोजन केले जाणार आहे, असेही त्यांनी सांगितले. या वेळी खजिनदार दिलावर शेख, तम्मना शेख-इनामदार आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

लेखक असल्याचा भ्रम तयार होतोय

0
0

डॉ. वीणा देव यांची खंत; पुंडलिक पुरस्कार वितरित

म. टा. प्रतिनिधी, पुणे

‘पूर्वीसारखी कृत्रिमता, अलंकारी लेखन आता होत नाही. साध्या, सरळ आणि स्वाभाविक लेखनाकडे आपण जात आहोत; पण त्याच वेळी संस्मरणीय लेखन होताना दिसत नाही,’ अशी खंत प्रसिद्ध लेखिका डॉ. वीणा देव यांनी गुरुवारी व्यक्त केली. ‘आज विविध माध्यमांतून लेखन होत असल्याने ऐवढे का लिहिले जाते, असे वाटते. आपण लेखक आहोत, असा भ्रम त्यामुळे तयार होतो,’ अशी टीका त्यांनी केली.
महाराष्ट्र साहित्य परिषदेतर्फे ‘विद्याधर पुंडलिक पुरस्कार’ प्रा. व. बा. बोधे यांना ‘अक्षरब्रह्माचे स्वामी’ (व्यक्तिचित्रे) या ग्रंथासाठी देण्यात आला. त्यावेळी त्या बोलत होत्या. परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, प्रमुख कार्यवाह प्रकाश पायगुडे, कोषाध्यक्ष सुनीताराजे पवार, भारती पांडे या वेळी उपस्थित होते. ‘व्यक्तिचित्रे हे मराठी भाषेचे वैभव आहे. अकृत्रिम, असांकेतिक, व्यक्तिमत्त्वाचे मर्म हेरणारी, नात्यातून स्पष्टपणे जाणवणारी, कार्यक्षेत्राचा प्रमाणबद्ध तपशील देऊन आठवणींच्या माध्यमातून व्यक्तिमत्त्व साकार करणारी व्यक्तिचित्रे आत्मचरित्रापेक्षा वेगळी ठरतात. कारण त्यास लिहिणाऱ्या व्यक्तीची नजर लाभलेली असते,’ असे सांगून डॉ. देव म्हणाल्या, की आपण आनंद व जीवनाचे आकलन होण्यासाठी वाचतो. एखादी व्यक्ती जन्मभर सोबत असते, तरीही ती समजत नाही. तीच व्यक्ती चार पानांतून समजू शकते. १९५० नंतरच्या कालखंडात कलावादाचा जो नवा विचार आला, त्यानंतर ललित निबंध, ललित गद्य, ललित लेख, आत्मनिष्ठ असे गद्य अशा विविध नावांनी लेखन सुरू झाले. गेल्या चाळीस वर्षांमध्ये त्याचे प्रमाण आणि गुणवत्ता विस्तारली आहे.
प्रा. बोधे म्हणाले, ‘मला भेटलेल्या अनेक व्यक्तींनी माझे जीवन समृद्ध केले आणि मला लिहिते केले. साहित्यिकांचे अनुभव सांगावेसे वाटले म्हणून लेखन केले. त्यातून अनेकांचे व्यक्तिचित्र रेखाटता आले.‘ साहिल पुंडलिक यांनी शारदा स्तवन सादर केले. सचिन जोशी यांनी व्यक्तिचित्राचे अभिवाचन केले. बंडा जोशी यांनी सूत्रसंचालन केले. वि. दा. पिंगळे यांनी आभार मानले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रंगला नृत्यसोहळा ‘अर्पण’

0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

सावित्रीबाई फुले यांचे कार्य, ‘कठपुतळी’ची संवेदना, आळवलेला ‘मौन’ राग, ‘सूरज के खिलाफ’मधून घडविलेले उदास मनाचे दर्शन घडवित ‘अर्पण’ हा कथक नृत्यसोहळा रंगला. सुप्रसिद्ध कथक नृत्यांगना गुरु पं. रोहिणी भाटे आणि गुरु रोशन दात्ये यांना त्यांच्याच नृत्यशैलीतून ‘मानवंदना’ देण्यासाठी ‘आरोहिणी आर्ट वेल्फेअर ऑर्गनायझेशन’तर्फे नुकताच यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात हा सोहळा झाला. रोशन दात्ये, गुरु शमा भाटे, गुरु शरदिनी गोळे उपस्थित होत्या. प्राजक्ता राज यांनी स्वागत केले. शिल्पा भिडे यांनी सूत्रसंचालन केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

​चोरीला गेलेली दुचाकी गुंडांकडे

0
0

म. टा. प्रतिनिधी, पिंपरी
घराच्या पार्किंगमधून चोरीला गेलेली दुचाकी अंडरवर्ल्ड डॉनच्या हस्तकांनी बिल्डरवर गोळीबार करण्यासाठी वापरली असल्याचे समोर आले आहे. या दुचाकीचा मालक संभाजीनगर, चिखली येथे राहत असून हा प्रकार समजल्यानंतर त्याला धक्का बसला. दुचाकीचोरीची फिर्याद त्याने वेळीच पोलिसांत दिली होती, मात्र त्याचा शोध लागलेला नव्हता.
३० जूनला बिल्डिंगच्या पार्किंगमध्ये संबंधित उच्चशिक्षित युवकाने आपली दुचाकी लावली होती. त्यानंतर काही वेळाने दुचाकी चोरीला गेल्याचे त्याच्या लक्षात आले होते. त्यामुळे त्याने तत्काळ याबाबत शहर पोलिसांकडे फिर्याद दिली. परंतु या दुचाकीचा काही शोध लागला नाही. दरम्यान, दोन दिवसांपूर्वी ठाणे येथील गुन्हे शाखेचे पथक संबंधित युवकाच्या घरी आले. खंडणीविरोधी पथकाच्या अधिकाऱ्यांनी दुचाकीची कागदपत्रे आणि चोरीच्या फिर्यादीची कॉपी पाहिल्यावर संबंधित युवकाला ११ जुलैला कल्याण-डोंबिवली येथे घडलेली घटना सांगितली. कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन रवी पुजारी याच्या हस्तकांनी खंडणी उकळण्यासाठी एका बिल्डरवर गोळीबार केला होता. त्या वेळी या लोकांनी संभाजीनगर येथून चोरलेल्या दुचाकीचा वापर केला होता.
दुचाकी नेमकी कोणी चोरली आणि ती थेट अंडरवर्ल्ड डॉनच्या हस्तकांकडे कशी पोहोचली, याचा शोध सध्या ठाणे पोलिसांची गुन्हे शाखा करीत आहे. औद्योगिकनगरी म्हणून ओळख असलेल्या पिंपरी-चिंचवडमधून दर दिवशी दुचाकी वाहनांची चोरी होते. मध्यंतरी तर इनोव्हा कारच्या चोरीचे सत्रच पिंपरी-चिंचवड आणि मावळ परिसरात सुरू होते. सध्या हे प्रकार थांबले असले, तरी दुचाकी चोरीचे प्रमाण कमी झालेले नाही. पिंपरी-चिंचवड परिसरातील नऊ पोलिस ठाणी, गुन्हे शाखा यांच्याकडूनदेखील या चोरीच्या वाहनांचा म्हणावा तसा तपास होताना दिसत नाही. सध्या चोरीला गेलेल्या आणि न सापडलेल्या दुचाकींचा आकडा हा शेकड्यात आहे. नागरिकांनीदेखील आपले दुचाकी-चारचाकी वाहने चोरीला गेल्यास तत्काळ जवळच्या पोलिसांशी संपर्क साधणे गरजेचे आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आचारसंहिता न पाळल्यास तातडीने कारवाईचे आदेश

0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
निवडणुकीच्या आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन झाल्यास राजकीय पक्ष, उमेदवार आणि अधिकारी-कर्मचाऱ्यांविरुद्ध तातडीने कारवाई करण्याचे आदेश राज्य निवडणूक आयोगाने दिले आहेत. निवडणुकीशी संबंधित अधिकारी-कर्मचाऱ्यांनी कोणताही पक्ष, उमेदवार आणि विशेषतः सत्ताधारी पक्ष यांची बाजू न घेता निष्पक्ष काम करावे, अशी सूचनाही आयोगाने केली आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आदर्श निवडणूक आचारसंहितेबाबत निवडणूक आयोगाने सुधारित आदेश काढले आहे. ही आचारसंहिता महापालिका, नगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती व ग्रामपंचायतीसाठी लागू राहणार आहे. नगर परिषद, जिल्हा परिषद, पंचायत समिती व ग्रामपंचायतीच्या आचारसंहितेच्या अंमलबजावणीची जबाबदारी जिल्हाधिकाऱ्यांवर आणि महापालिकेची जबाबदारी आयुक्तांवर सोपविण्यात आली आहे.
निवडणुका निर्भय व पारदर्शक वातावरणात होण्यासाठी निवडणुकीशी संबंधित अधिकारी-कर्मचारी यांनी कोणत्याही राजकीय पक्षाची व उमेदवाराची बाजू न घेता निष्पक्षपणे काम करावे. विशेषतः सत्ताधारी राजकीय पक्षांबाबत नियमाप्रमाणे काम करावे. मतदारांवर विपरीत परिणाम होणाऱ्या तसेच प्रभावित करणाऱ्या योजना व कृत्यांवर अंकुश ठेवावा, असे आयोगाने बजावले आहे.
निवडणूक आचारसंहितेचे उल्लंघन झाल्यास राजकीय पक्ष, उमेदवार तसेच अधिकारी-कर्मचारी यांच्यावर तत्काळ कारवाई करण्याचे आदेश आयोगाने दिले आहे. यामध्ये राजकीय पक्षांची नोंदणी रद्द करण्यापर्यंतचे प्रस्ताव आयोगाला पाठवावेत. उमेदवार, अधिकाऱ्यांकडून काही गैरवर्तन झाल्यास तत्काळ गुन्हे दाखल करावेत, अशीही सूचना आयोगाने केली आहे. राज्यातील १ ऑक्टोबर २०१६ नंतर होणाऱ्या सर्व निवडणुकांसाठी ही सुधारित आचारसंहिता लागू होणार असल्याचे आयोगाचे सचिव एस. एम. चन्ने यांनी स्पष्ट केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

राजकीय साठमारीत भामा-आसखेड ठप्प

0
0

शहराची वाढती गरज भागविण्यासाठी पूर्व पुण्याला भामा-आसखेड धरणातून सुमारे अडीच टीएमसी पाणीसाठा मंजूर केल्याच्या विरोधात वेगवेगळे मुद्दे उपस्थित करून आजवर अडथळा आणण्याचे प्रयत्न केले गेले. त्यामुळे, हा प्रकल्प रखडला आणि आता पुढील पाच महिन्यांत तो पूर्ण होण्याची शक्यता नसल्याने केंद्र आणि राज्य सरकारकडून मिळणाऱ्या अनुदानापासून पुणे महापालिकेला वंचित राहावे लागणार आहे. केवळ ‘राजकीय’ पोळी भाजून घेण्यासाठी शिवसेनेने केलेले आंदोलन आणि सत्ता असूनही धडाडीने निर्णय घेण्यात भारतीय जनता पक्षाने दाखविलेले औदासीन्य, याचा फटका या प्रकल्पाला बसला आहे.
खडकवासला धरण प्रणालीवर पुणे शहरासह ग्रामीण भागातील शेती मोठ्या प्रमाणावर अवलंबून आहे. या प्रकल्पातील चार धरणांच्या एकूण क्षमतेपैकी निम्मे पाणी आत्ताच पुणे शहरासाठी वापरले जात आहे. त्यातून, शहर विरुद्ध ग्रामीण असा संघर्षही उभा राहत आहे. त्यामुळे, शहराची पिण्याच्या पाण्याची वाढती गरज पूर्ण करण्यासाठी आघाडी सरकारने भामा-आसखेड धरणातून शहरासाठी अडीच टीएमसीचा कोटा मंजूर केला. या संपूर्ण प्रकल्पाला केंद्र सरकारच्या ‘जवाहरलाल नेहरू राष्ट्रीय नागरी पुनर्निर्माण योजने’तून (जेएनएनयूआरएम) निधी देण्यास संमती दर्शविण्यात आली. त्याचे काम सुरू झाल्याने केंद्राने निधीचा पहिला हप्ताही वितरित केला.
केंद्रात सत्तांतर झाल्यानंतर जेएनएनयूआरएम योजना गुंडाळण्यात आली. त्या अंतर्गत मान्यता देण्यात आलेल्या काही प्रकल्पांना अमृत योजनेतून निधी देण्याचे जाहीर केले गेले. तसेच, निश्चित केलेल्या मुदतीमध्येच प्रकल्प पूर्ण केला जावा, असे बंधन घालण्यात आले. त्यानुसार, महापालिकेने भामा-आसखेड योजनेचे काम युद्धपातळीवर सुरू केले. परंतु, शिवसेनेचे आमदार सुरेश गोरे यांनी शेतकऱ्यांच्या पुनर्वसनाचा प्रश्न प्रलंबित असून, तो सोडवल्याशिवाय प्रकल्पाचे काम करू दिले जाणार नाही, असा पवित्रा घेतला. त्यांनी भामा-आसखेडचे कामही थांबवले. त्यावर, तोडगा काढण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत बैठका झाल्या. मुख्यमंत्र्यांनी आदेश दिले, तरीही काम सुरू झाले नाही. जिल्हाधिकाऱ्यांमार्फत प्रस्ताव सरकारला सादर झाल्यानंतर काही प्रमाणात कामाला गती मिळाली; पण शेतकऱ्यांना नेमकी नुकसान भरपाई कशी मिळणार, यावरून पुन्हा विरोध होऊ लागला आहे. या सगळ्या प्रकरणात योजनेचे काम रेंगाळल्याने ३५ ते ४० टक्के एवढेच काम आतापर्यंत झाले आहे. केंद्र सरकारने निश्चित करून दिलेल्या कालमर्यादेत, म्हणजेच मार्च २०१७ पर्यंत हे काम पूर्ण होणे अत्यंत आवश्यक आहे. अन्यथा आतापर्यंत मिळालेल्या निधीवरच महापालिकेला समाधानी राहावे लागेल. तसेच, प्रकल्प पूर्ण करण्यासाठी उर्वरित निधी स्वतःच्या बजेटमधून द्यावा लागेल.
शिवसेनेच्या आमदारांनी वारंवार केलेल्या विरोधावर सर्वमान्य तोडगा काढून तातडीने सर्व प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण करणे गरजेचे होते. त्यासाठी पालकमंत्री म्हणून गिरीश बापट यांनी पुढाकार घ्यायला हवा होता. दुर्दैवाने, सुरुवातीच्या काळात बापट यांनी या प्रश्नाकडे दुर्लक्षच केले. त्यामुळेही तोडगा निघण्याऐवजी गुंता अधिकाधिक वाढत गेला. भामा-आसखेडचे काम बंद पडून आता एक वर्ष झाले असून, अजूनही या प्रकल्पाचे पुढे काय होणार, याबाबतची संदिग्धता कायम आहे.

भामा-आसखेड पाणीपुरवठा योजना
एकूण प्रकल्पाचा खर्चः ३८० कोटी
केंद्राचे अनुदानः १९० कोटी
राज्य सरकारचे अनुदानः ७६ कोटी
महापालिकेचा हिस्साः ११४ कोटी
आतापर्यंत केंद्र व राज्याकडून प्राप्त अनुदानः १०६ कोटी
आजवर झालेला खर्चः १५२ कोटी

अखेरच्या अनुदानाला मुकावे लागणार?
केंद्र आणि राज्य सरकारकडून या प्रकल्पासाठी अनुदानाचे दोन हिस्से पुणे महापालिकेला प्राप्त झाले आहेत. तिसऱ्या टप्प्यातील अनुदान मिळावे, यासाठी सध्या महापालिकेच्या स्तरावरून प्रयत्न सुरू असून, आगामी काही दिवसांत केंद्राने अनुदान मंजूर केले, तर मार्चपूर्वी महापालिकेला ते खर्च करता येणे शक्य होणार आहे. परंतु, मार्चअखेरपूर्वी काम संपविण्याचे बंधन असल्याने महापालिकेला केंद्र-राज्य अनुदानाचा साधारणतः ८० ते ९० कोटी रुपयांचा अखेरचा हिस्सा मिळणे सध्याची प्रकल्पाची रखडलेली अवस्था पाहता अवघड आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मनसे-राष्ट्रवादी ‘फिरसे’?

0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
कोरेगाव पार्क-ढोले पाटील रोड यासारख्या उच्चभ्रू भागाला हडपसर इंडस्ट्रीयल इस्टेट आणि भीमनगर झोपडपट्टी असा भाग जोडून ‘कोरेगाव पार्क-घोरपडी’ (क्र २१) हा नवा प्रभाग तयार करण्यात आला आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ‘श्री’ व ‘सौ’ यांना गेल्या वेळी मिळालेला एकहाती विजय ‘फ्लुक’ नव्हता हे सिद्ध करावे लागणार असून, राष्ट्रवादीचे विद्यमान नगरसेवकही पुन्हा रिंगणात उतरणार आहेत.
मनसेचे माजी गटनेते बाबू वागसकर आणि वनिता वागसकर यांचा जुना (प्रभाग क्र. २१) आणि राष्ट्रवादीचे नगरसेवक प्रशांत म्हस्के आणि सुरेखा कवडे (प्रभाग क्र. ४१) यांचा जुना प्रभाग मिळून नवा कोरेगाव पार्क-घोरपडीचा प्रभाग तयार झाला आहे. जहांगीर हॉस्पिटल, रुबी हॉस्पिटल, वाडिया कॉलेज, नारंगीबाग सोसायटी, कोरेगाव पार्क, ओशो आश्रम, घोरपडी, भैरोबा पंपिंग स्टेशन, कवडेवाडी, विकासनगर, भीमनगर झोपडपट्टी आणि हडपसर इंडस्ट्रीयल इस्टेट असा मोठा परिसर या प्रभागात समाविष्ट झाला आहे. नव्या प्रभागामध्ये विद्यमान नगरसेवकांसह माजी नगरसेवकांचाही भाग येत असल्याने त्यांनीही आतापासूनच मोर्चेबांधणी सुरू केली आहे.
मनसेच्या वागसकर दाम्पत्याने कोरेगाव पार्क प्रभागामध्ये सातत्याने संपर्क ठेवला आहे. त्यामुळे, नव्या प्रभागामध्ये पती-पत्नी पुन्हा निवडणूक लढविणार असल्याचे स्पष्ट आहे. येत्या काही दिवसांत वैयक्तिक पातळीवर प्रचारालाही सुरुवात केली जाणार आहे. प्रभागातील दोन जागा निश्चित असल्या, तरी उर्वरित दोन जागांवर मनसेला उमेदवारांचा शोध घ्यावा लागणार आहे. घोरपडी-हडपसरच्या पट्ट्यातून सक्षम उमेदवाराची चाचपणी केली जात आहे.
मनसेच्या उलट स्थिती राष्ट्रवादीची आहे. प्रशांत म्हस्के आणि सुरेखा कवडे हे दोन्ही नगरसेवक या प्रभागातून पुन्हा निवडणूक लढविणार आहेत. परंतु, कोरेगाव पार्क परिसरातून राष्ट्रवादीकडे उमेदवार नाही. ढोले-पाटील यांच्या कुटुंबातील एखादी व्यक्ती कदाचित या प्रभागातून पुढे आली, तर येथील समीकरणे बदलू शकतात.
शिक्षण मंडळाच्या माजी अध्यक्षा संगीता तिवारी यांनी गेल्या निवडणुकीत काँग्रेसकडून किल्ला लढविला होता. यंदाही त्यांच्या नावाची चर्चा आहेच. तसेच, माजी महापौर रजनी त्रिभुवन यांचा काही भाग प्रभागाला जोडला गेल्याने त्यांच्या कुटुंबातील एखाद्या सदस्याचे नाव पुढे येऊ शकते. राजेश गायकवाड यांच्याही नावाची चर्चा आहे.
काँग्रेसचे माजी नगरसेवक प्रकाश मंत्री यांनी भाजपमध्ये प्रवेश केला असल्याने या प्रभागातून चर्चेमध्ये त्यांचे नाव आघाडीवर आहे. किरण कांबळे, जयप्रकाश पुरोहित, योगेश पिंगळे अशा नावांचीही चर्चा आहे. भाजप आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (ए) यांची युती झाली, तर नवनाथ कांबळे या भागातून निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची दाट शक्यता आहे.
या प्रभागासाठी शिवसेनेकडेही इच्छुकांची संख्या मोठी आहे. त्यामध्ये दिलीप कवडे, नितीन पत्की, संतोष सोनावणे, वीरेंद्र गायकवाड, नरेंद्र दरवडे अशी नावे चर्चेत आहेत.

प्रभाग क्र. २१ - कोरेगाव पार्क-घोरपडी
लोकसंख्याः ८३,३७५
आरक्षण-
अः अनुसूचित जाती
बः नागरिकांचा मागासवर्ग (महिला)
कः महिला
डः खुला

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


​म्हाडा गृहप्रकल्पांसाठी नोंदणीस मुदतवाढ

0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्रविकास प्राधिकरणाकडून (म्हाडा) मोरवाडी, म्हाळुंगे आणि वानवडीसह आठ ठिकाणी विकसित करण्यात येणाऱ्या सदनिका आणि भूखंडासाठी ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे. आता चार नोव्हेंबरपर्यंत ऑनलाइन अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू राहणार आहे.
‘ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी यापूर्वी चार ऑक्टोबरपर्यंत मुदत होती. त्यामध्ये वाढ करून चार नोव्हेंबर करण्यात आली आहे. मात्र, त्यासाठी दोन नोव्हेंबरला रात्री १२ वाजण्यापूर्वी रजिस्ट्रेशन केले पाहिजे. त्यानंतर तीन नोव्हेंबरला अर्ज भरण्याची प्रक्रिया पूर्ण करणे आणि चार नोव्हेंबरपर्यंत अनामत रक्कम भरणे अत्यावश्यक आहे’, असे ‘म्हाडा’चे मुख्य अधिकारी अशोक काकडे-देशमुख यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
आतापर्यंत ३६ हजार ७१३ नागरिकांनी रजिस्ट्रेशन केले असून, त्यापैकी २१ हजार ९०६ जणांनी पैसे भरण्याची प्रक्रिया पूर्ण केली आहे. यापूर्वी अनामत रक्कम म्हणून सदनिकेच्या किमतीच्या सुमारे दहा टक्के रक्कम भरावी लागत होती. आता अत्यल्प उत्पन्न गटासाठी पाच हजार रुपये, अल्प उत्पन्न गटासाठी दहा हजार रुपये, मध्यम उत्पन्न गटासाठी १५ हजार रुपये आणि उच्च उत्पन्न गटासाठी २० हजार रुपये अनामत रक्कम भरावी लागणार आहे. अनामत रक्कम ऑनलाइन किंवा डिमांड ड्राफ्टद्वारेही (डीडी) भरता येणार आहे’, असे काकडे-देशमुख यांनी स्पष्ट केले.
‘यापूर्वीच्या प्रक्रियेनुसार लॉटरीमध्ये सदनिका न मिळालेल्यांना अनामत रक्कम परत मिळण्यासाठी अर्ज करावा लागत होता. आता अर्ज करण्याची गरज नाही. संबंधित अर्जदारांची अनामत रक्कम सात दिवसांच्या आत त्यांच्या बँक खात्यावर जमा होणार आहे’, असेही त्यांनी सांगितले.

२४ नोव्हेंबरला लाइव्ह सोडत
‘सदनिकांसाठी २४ नोव्हेंबरला पुण्यात गणेश कला क्रीडा रंगमंदिर येथे सोडत होणार आहे. ही प्रक्रियादेखील ऑनलाइन होणार आहे. त्यासाठी देखरेख समिती स्थापन करण्यात आली आहे. ही सोडत ‘म्हाडा’च्या वेबसाइटवर लाइव्ह दिसणार आहे. सोडतीच्या ठिकाणी अर्जदारांनी येण्याची आवश्यकता नाही. त्यांना घरबसल्याही सोडत पाहता येणार आहे. www.mhada.gov.in या वेबसाइटवर सोडत दिसणार आहे; तसेच लॉटरीत सदनिका मिळालेल्यांना त्याबाबतची माहिती एसएमएसद्वारे पाठवली जाणार आहे’, असे काकडे-देशमुख यांनी सांगितले.

प्रकल्पाचे ठिकाण सदनिकांची संख्या
म्हाळुंगे १४१३
मोरवाडी ८४५
वानवडी ८२
​शिवाजीनगर, सोलापूर ४७
जुळे सोलापूर ७२
दिवे ४०
सासवड ४
वाठार निंबाळकर ६७ (भूखंड)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विमानतळाला इंचभरही जमीन देणार नाही

0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

‘पुरंदरमध्ये विमानतळाची घोषणा करताना शेतकऱ्यांना विश्वासात घेतले गेले नाही. १९७२ च्या भीषण दुष्काळातही पुरंदरच्या ग्रामस्थांनी गाव सोडले नाही आणि जमिनीही विकल्या नाहीत. पुरंदर उपसा सिंचन योजनेमुळे आता चांगले दिवस आल्याने विमानतळासाठी एक इंचही जागा देणार नाही,’ असा निर्धार पुरंदरमधील शेतकऱ्यांनी केला.

पुरंदर तालुक्यातील प्रस्तावित आंतरराष्ट्रीय दर्जाच्या विमानतळाला विरोध करण्यासाठी पारगाव, राजेवाडी, आंबळे, एखतपूर, मुंजवडी, खानवडी आणि वाघापूर या सात गावातील ग्रामस्थांनी गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मूक मोर्चा काढला. त्यानंतर जाहीर सभेत मनसेच्या शेतकरी सेनेचे अध्यक्ष बाबाराजे जाधवराव, राष्ट्रवादीचे माजी आमदार अशोक टेकवडे तसेच प्रदीप पोमण, माणिक पाटील, दत्ताशेठ झुरंगे, सर्जेराव मेमाणे, सुदाम इंगळे, कांता राऊत, गौरी कुंजीर आदींनी विमानतळाच्या विरोधात सूर काढला.

आंतरराष्ट्रीय विमानतळ श्रीमंतांच्या विकासाचा केंद्रबिंदू आहे. लोकसंख्येच्या केवळ दोन टक्केच लोक विमानाने प्रवास करतात. त्यामुळे सरकारने विमानतळासाठीचे पैसे सार्वजनिक वाहतुकीच्या सुधारणेवर खर्च करावेत, असा सल्ला जाधवराव यांनी दिला. शेतकऱ्यांना विश्वासात न घेता पुरंदरमध्ये विमानतळ करण्याचा घाट घातला गेला आहे. पुरंदरचे प्रतिनिधित्व करणाऱ्या राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी येत्या आठ दिवसांत विमानतळाचा निर्णय रद्द करावा, अन्यथा त्यांच्या निवासस्थानासमोर बेमुदत आंदोलन करू, असा इशारा टेकवडे यांनी या वेळी दिला.

‘महात्मा फुले यांचे नाव का नाही ?’

पुरंदरमधील प्रस्तावित आंतरराष्ट्रीय दर्जाच्या विमानतळाला ‘छत्रपती संभाजी महाराज’ यांचे नाव देण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. त्यावर, कुठलेही काम पूर्ण झाल्यावर त्याला नाव दिले जाते. या विमानतळाला नाव देण्याची घाई राज्यकर्त्यांनी का केली? विमानतळासाठी प्रस्तावित असलेले खानवडी हे महात्मा जोतिबा फुले यांचे मूळगाव आहे. त्यामुळे विमानतळाला त्यांचे नाव का द्यावेसे वाटले नाही, असा सवाल जाधवराव यांनी या वेळी केला.

‘राष्ट्रवादी’ची भूमिका काय ?

या सभेत राष्ट्रवादीचे माजी आमदार अशोक टेकवडे व जिल्हा परिषदेचे माजी सदस्य सुदाम इंगळे यांनी विमानतळाच्या विरोधात भूमिका मांडली. परंतु, याविषयी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची भूमिका काय आहे, हे जाहीर करण्याची मागणीही जाधवराव यांनी केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

यंदाही पर्यटकांना कोकणसौंदर्याची भुरळ

0
0

दिवाळीच्या सुट्टीसाठी ‘एमटीडीसी’सह सर्व रिसॉर्ट फुल

म. टा. प्रतिनिधी, पुणे

दिवाळीच्या सुट्टीचा आनंद द्विगुणित करण्यासाठी पुणेकरांनी यंदाही लाडक्या कोकणाला पसंती दिली आहे. लक्ष्मीपूजनाच्या दुसऱ्या दिवसापासून पुढे आठवडाभराच्या कालावधीसाठी महाराष्ट्र पर्यटन विकास मंडळाची (एमटीडीसी) सर्व रिसॉर्ट आणि खाजगी हॉटेल फुल झाली आहेत. कोकणातील ‘होम स्टे’लादेखील पर्यटकांचा उत्तम प्रतिसाद मिळतो आहे.

शाळेचे कॅलेंडर मिळाले की लगेचच वर्षभराच्या सुट्ट्यांचे नियोजन करण्याचा ट्रेंड पालकांनी स्वीकारला आहे. त्यामुळे पर्यटकांनी ऑगस्टअखेरीपासूनच दिवाळीच्या सहलींची चौकशी करण्यास सुरुवात केली होती. मुख्यतः केरळ, हैदराबाद, गुजरात, बेंगळुरू, राजस्थान या भागांत जाण्यास पर्यटक इच्छुक असून, पर्यटकांनी विमान कंपन्यांच्या सवलतीचा लाभ घेऊन तीन महिन्यांपूर्वी नियोजन केले आहे, अशी माहिती ट्रॅव्हल कंपनी चालकांनी दिली.

महाराष्ट्रामध्ये या वर्षीदेखील कोकणाला पर्यटकांची पसंती मिळाली आहे. महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तारकर्ली, वेंगुर्ला, आंबोली येथील आणि रत्नागिरीतील गणपतीपुळे, वेळणेश्वर, हरिहरेश्वर येथील प्रमुख रिसॉर्टचे बुकिंग पूर्ण झाले आहे. याशिवाय मंडळाने अधिकृत केलेली हॉटेल, ‘होम स्टे’लाही चांगला प्रतिसाद मिळतो आहे. महाबळेश्वर, कार्ला, माथेरान, भंडारदरा या ठिकाणी ९० टक्क्यांहून अधिक रिसॉर्ट आरक्षित झाले आहेत.

‘मंडळाच्या सर्व रिसॉर्टना आता सर्वच ऋतूंमध्ये पर्यटकांचा उत्तम प्रतिसाद मिळतो. जोडप्यांबरोबरच कौटुंबिक सहलींसाठी पर्यटक मंडळाच्या रिसॉर्टला प्राधान्य देतात. दिवाळीच्या सुट्ट्यांसाठी नागरिकांनी गेल्या महिन्यात बुकिंग करायला सुरुवात केली होती. तारकर्ली येथील हाउस बोटला पर्यटकांची मागणी आहे,’ अशी माहिती ‘एमटीडीसी’च्या प्रादेशिक व्यवस्थापक वैशाली चव्हाण यांनी दिली.

...............

व्याघ्र प्रकल्पांचे बुकिंग झाले फुल

गेल्या काही वर्षांत वन्यजीवांविषयी वाढलेल्या आकर्षणामुळे अभयारण्यांमध्ये सहलीसाठी जाणाऱ्यांची संख्याही वाढते आहे. मुख्यतः वाघांसाठी आरक्षित असलेल्या जंगलांना पर्यटकांची जास्त मागणी आहे. दिवाळीच्या सुट्ट्यांमुळे महाराष्ट्रातील ताडोबा आणि पेंचसह इतर राज्यांतील कान्हा, रणथंबोर, बांधवगड, काझीरंगा या अभयारण्यांचे बुकिंग झाले आहे. ‘व्याघ्र प्रकल्पांचे बुकिंग चार महिने आधी सुरू होते. पावसाळ्यात बहुतांश अभयारण्ये, राष्ट्रीय उद्याने बंद असतात. त्यामुळे ऑक्टोबर महिना सुरू झाला की पर्यटनाला सुरुवात होते. दिवाळीच्या सुट्ट्यांनिमित्त आम्हाला पर्यटकांसाठी चार महिने आधीच व्याघ्र प्रकल्पांचे नियोजन करावे लागते. या वर्षीदेखील कान्हा, ताडोबा या लोकप्रिय अभयारण्यांचे बुकिंग ऑगस्ट-सप्टेंबरमध्येच संपले आहे. विशेष म्हणजे यंदा पर्यटक वाघांचे वास्तव्य नसलेल्या इतर अभयारण्यांचाही पर्याय निवडत आहेत,’ अशी माहिती फोलिएज संस्थेचे देवेंद्र गोगटे यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

इच्छुकांमध्ये ‘सायबर वॉर’

0
0

पोलिसांची डोकेदुखी वाढली

म. टा. प्रतिनिधी, पुणे

महापालिका निवडणुकीचे पडघम वाजू लागताच इच्छुक उमेदवार आणि त्यांच्या समर्थकांनी दंड थोपटण्यास सुरुवात केली आहे. त्यातून या इच्छुकांच्या समर्थकांमध्ये थेट ‘फेसबुक’वर चकमकी होऊ लागल्या आहेत. सोशल मीडियावरील या आरोप-प्रत्यारोपांचा त्रास पोलिसांना होऊ लागला आहे. कात्रज आणि बाणेर परिसरात नुकत्याच अशा घटना घडल्या असून, पोलिसांनी संबंधितांचे कान टोचले आहेत.

गेल्या लोकसभा निवडणुकांमध्ये सोशल मीडियाचे महत्त्व सर्वच राजकीय पक्ष, पुढाऱ्यांना समजले आणि या माध्यमाचा वापर सर्वांनीच सुरू केला. सोशल मीडियावरून स्वतःचा प्रचार अथवा ‘पर्सनल रिलेशन’ (पीआर) वाढवण्यासाठी सर्वच इच्छुकांनी जोरदार प्रयत्न सुरू केले आहेत. ‘सर्जिकल स्ट्राइक’पासून अगदी छोट्या-मोठ्या घटनेवर हे ‘मान्यवर’ आपली प्रतिक्रिया ‘पोस्ट’ करत आहेत. आपल्या नेत्याचे अनुकरण करण्यात त्यांचे समर्थकही पाठीमागे राहिले नसून, ‘अब की बार’चा नारा सोशल मीडियावर दिला गेला आहे.

नेतेमंडळी आणि त्यांच्या समर्थकांकडून टाकण्यात येणाऱ्या पोस्टवर प्रतिक्रिया नोंदवण्यात येत आहेत. ‘फेसबुक’वर टाकलेल्या पोस्टवर प्रतिक्रिया देताना एकमेकांची उणीदुणी काढण्याचे प्रकार वाढत असून, त्याचा फटका कायदा-सुव्यवस्थेला बसू नये, याची काळजी पोलिसांना घ्यावी लागत आहे. कात्रज येथे दोन राजकीय पक्षांच्या नेत्यांच्या समर्थकांमध्ये अशीच जुंपली होती. कार्यकर्त्यांमध्ये सुरू असलेले ‘फेसबुक वॉर’ विकोपाला जात असल्याचे लक्षात येताच भारती विद्यापीठ पोलिसांनी त्या सर्वांना बोलावून घेतले आणि त्यांना ‘समज’ दिली. भारती विद्यापीठ पोलिसांनी कात्रज येथे रविवारी सर्व नागरिक, इच्छुक उमेदवार, कार्यकर्ते यांची बैठक बोलावली असून, त्यामध्ये सगळ्यांना कायदा आणि त्यांच्या अंमलबजावणीबाबत माहिती दिली जाणार आहे.

बाणेर येथे अशाच प्रकारे दोन नेत्यांच्या मुलांमध्ये ‘फेसबुक’वर जुंपली होती. निवडणुकीचे आव्हान देताना ‘कुधीही आणि कुठेही लढू’ येथून सुरू झालेले ‘सायबर वॉर’ अगदी एकमेकांना धमकावण्यापर्यंत पोहोचले. ‘घरातून बाहेर तर पडून दाखव,’ ‘आम्ही गैरमार्गाने मिळवलेल्या पैशांतून निवडणुका लढवत नाही,’ असे संवादही पाहायला मिळत आहेत. अशा घटना आगामी काळात वाढणार असून, कार्यकर्त्यांनी चुकीचे पाऊल उचलू नये. अन्यथा त्यांच्यावर गुन्हे दाखल होतील, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.


सोशल मीडियावर, विशेष करून ‘व्हॉट्सअॅप’ आणि ‘फेसबुक’वर प्रतिक्रिया देताना, कुठलीही पोस्ट टाकताना नागरिकांनी काळजी घ्यावी. कोणाच्याही भावना दुखावल्या गेल्यास गुन्हा तर दाखल होईलच, शिवाय ‘अॅडमिन’लाही कारवाईला सामोरे जावे लागेल.

- दीपक साकोरे, उपायुक्त, सायबर सेल

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

फी परतावा वेळेत द्यावा

0
0

‘ईबीसी’बाबत संस्थांची मागणी

म. टा. प्रतिनिधी, पुणे

आर्थिकदृष्ट्या मागास प्रवर्गातील (ईबीसी) विद्यार्थ्यांसाठी उत्पन्नाची मर्यादा वाढवून, फी परताव्याची सवलत देण्याच्या निर्णयाचे शिक्षण क्षेत्रातून स्वागत होत आहे; मात्र त्याच वेळी या पुढील काळात विद्यार्थ्यांना मोठ्या संख्येने दिल्या जाणाऱ्या सवलतीसाठीचा फी परतावा सरकारने कॉलेजांकडे वेळीच न सोपवल्यास, राज्याची शिक्षण यंत्रणाच कोलमडून पडण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.

राज्य सरकारने ईबीसी योजनेसाठी आता सहा लाख रुपयांपर्यंत वार्षिक उत्पन्न असलेल्या कुटुंबांमधील विद्यार्थ्यांचाही विचार होणार असल्याचे गुरुवारी जाहीर केले. या निर्णयामुळे राज्यात ईबीसी योजनेच्या आधारे उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येमध्ये मोठी वाढ होणार असल्याचे स्पष्ट होत आहे. या पार्श्वभूमीवर सध्याच्या ईबीसी योजनेचा निधी कॉलेजांपर्यंत पोहोचण्यात येणाऱ्या अडचणी आणि त्यातून मार्ग काढण्यासाठी संभाव्य उपायांबाबत ‘मटा’ने शुक्रवारी पुण्यातील संस्थाचालक आणि प्राचार्य प्रतिनिधींशी संवाद साधला. त्यातून सरकारने कालमर्यादेची अट पाळून ‘ईबीसी’चा फी परतावा वेळीच कॉलेजांकडे सोपवला नाही, तर त्याचा राज्यातील शिक्षण व्यवस्थेला मोठा फटका बसण्याची भीतीही समोर आली.

यापूर्वीच्या योजनेसाठी विद्यार्थ्यांकडून आवश्यक ती कागदपत्रे सादर झाल्यानंतरही, जवळपास दीड ते दोन वर्षांनी ‘ईबीसी’चा फी परतावा मिळत होता. आतापर्यंत या योजनेसाठी अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या मर्यादित होती. नव्या बदलांमुळे ही संख्या जवळपास तिप्पट वाढण्याची शक्यता आहे. अनुदानित कॉलेजांमध्ये ‘ईबीसी’साठी अर्ज भरणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या मर्यादित असली, तरी विनाअनुदानित आणि कायम विनाअनुदानित संस्थांमध्ये ही संख्या एकूण विद्यार्थ्यांच्या संख्येच्या जवळपास ८० टक्के होण्याची शक्यता आहे. त्यामुळे उर्वरित २० टक्के विद्यार्थ्यांकडून मिळणाऱ्या फीच्या आधारे कॉलेजे भरणार आहेत. त्यामुळे सरकारकडून वेळीच फी परतावा मिळाला नाही, तर प्राध्यापकांचे पगार देण्यापासून विविध कर आणि बिले भरण्यापर्यंत सर्वच पातळ्यांवर संस्था आणि प्राचार्यांना मोठी कसरत करावी लागणार आहे. वेगवेगळ्या शिष्यवृत्ती योजना आणि ‘ईबीसी’चा आतापर्यंतचा कारभार पाहता, सरकार फी परतावा वेळेवर देत नाही, हा अनुभव राज्यातील संस्था आणि प्राचार्य घेत आहेत. त्यामुळेच नव्या बदलांसोबत सरकारने सर्वच योजनांसाठी कालबद्ध परताव्याची योजना आखण्याची मागणी प्राचार्य आणि संस्थाचालकांकडून शुक्रवारी करण्यात आली.

.........
या योजनेची घोषणा निश्चितच स्वागतार्ह आहे; मात्र योजनेसाठीची वितरण यंत्रणा आणि योजनेच्या शासन निर्णयामधील शब्दांकनावर योजनेचे भवितव्य अवलंबून असेल. सवलत नेमकी कोणासाठी, ६० टक्क्यांची अट केवळ पहिल्या वर्षासाठी की कायम ६० टक्के मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांनाच योजनेचा लाभ मिळणार, योजनेचा फी परतावा हा ट्यूशन फी विचारात घेऊन की सर्व फी विचारात घेऊन, आरक्षणात बदल झाल्यास योजनेचे भवितव्य काय असेल, योजनेसाठी नेमका कोणाचा दाखला गृहीत धरला जाणार, असे अनेक तांत्रिक प्रश्न निर्माण झाले आहेत. या विषयी प्राचार्य महासंघ सरकारला मदत करण्यास तयार आहे.

- नंदकुमार निकम, अध्यक्ष, प्राचार्य महासंघ

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘टाटा मोटर्स’चे रावळ कालवश

0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

‘टाटा मोटर्स’चे माजी कार्यकारी संचालक विनोद मणिलाल तथा व्ही. एम. रावळ (८१) यांचे रविवारी पुण्यात निधन झाले. रतन टाटा यांचे विश्वासू सहकारी असलेल्या रावळ यांनी ‘टाटा मोटर्स’मध्ये विविध पदांवर तब्बल ४१ वर्षांहून अधिक काळ काम केले होते.

रावळ यांच्या पश्चात पत्नी, दोन मुलगे व एक मुलगी असा परिवार आहे. परदेशात असलेले नातलग पुण्यात आल्यानंतर रावळ यांच्या पार्थिवावर सोमवारी औंध येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येतील.

रावळ यांनी टाटा समूहात ‘टाटा कमिन्स’चे अध्यक्ष, ‘टाटा होलसेट’चे अध्यक्ष, ‘टाटा टेक्नोलॉजीज’चे संचालक, टाटा इंडस्ट्रीज व ‘टाटा फायनान्स’चे संचालक आणि ‘मर्सिडिझ बेन्झ इंडिया’चे संचालक म्हणून काम पाहिले. टाटा समूहाचे तत्कालीन अध्यक्ष रतन टाटा यांचे सल्लागार म्हणूनही २००१पर्यंत ते कार्यरत होते. ‘टाटा मोटर्स’च्या भारतीय बनावटीच्या इंडिका कारसाठीचे नियोजन व उत्पादनप्रक्रियेत त्यांचा मोठा वाटा होता. ‘असोसिएशन ऑफ इंडियन ऑटोमोबाइल मॅन्युफॅक्चरर्स’चे अध्यक्ष म्हणूनही त्यांनी दोन वर्षे काम पाहिले. वरिष्ठ व्यवस्थापनाबरोबरच कामगारांशीही त्यांचे जिव्हाळ्याचे संबंध होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मतदार नोंदणीची मुदत आता २१ ऑक्टोबरपर्यंत

0
0

निवडणूक आयोगाकडून एक आठवड्याची मुदतवाढ

म. टा. प्रतिनिधी, पुणे

वयाची अठरा वर्षे पूर्ण करणाऱ्या नागरिकांना मतदानाचा अधिकार मिळावा, यासाठी सुरू करण्यात आलेल्या मतदार नोंदणी अभियानाला मुदतवाढ देण्याचा निर्णय राज्य निवडणूक आयोगाने घेतला आहे. याबाबतचे आदेश आयोगाने काढले असून, नवीन आदेशानुसार आता नागरिकांना २१ ऑक्टोबरपर्यंत मतदार नोंदणी करता येणार आहे. नवीन मतदार नोंदणीबरोबरच मतदान ओळखपत्रावरील पत्त्यातील दुरुस्ती, दुबार नोंदणी, तसेच मृत किंवा स्थलांतरित झालेल्या मतदारांची नावे वगळण्यासाठी अर्जदेखील नागरिकांना भरून देता येणार आहेत. महापालिकेच्या पंधरा क्षेत्रीय कार्यालयांबरोबरच यापूर्वी मतदार नोंदणीचे अभियान राबविले जात असलेल्या शहरातील ५५ कॉलेजांमध्ये विद्यार्थ्यांना नावनोंदणी करता येणार आहे.

मतदार नावनोंदणी करण्यासाठी जिल्हा प्रशासनाला मदत म्हणून गेल्या महिन्यापासून महापालिकेने मतदार जनजागृती अभियान राबवण्यास सुरुवात केली आहे. आगामी पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण शहराची मतदारयादी अधिकाधिक अद्ययावत व्हावी, या उद्देशाने प्रशासनाने ही मोहीम राबवण्याच्या सूचना निवडणूक आयोगाने दिल्या होत्या. १४ ऑक्टोबरपर्यंत हे अभियान राबवले जाणार होते. या मोहिमेला नागरिकांकडून मिळत असलेला प्रतिसाद लक्षात घेता अधिकाधिक नागरिकांनी याचा फायदा घ्यावा, यासाठी या अभियानाला एक आठवड्याची मुदतवाढ देण्याचा निर्णय निवडणूक आयोगाने घेतला आहे.

येत्या जानेवारी महिन्यात वयाची अठरा वर्षे पूर्ण होणाऱ्या तरुण-तरुणींना या मोहिमेत सहभागी होऊन मतदार नोंदणी करता येणार आहे. मतदारांच्या ओळखपत्रात काही दुरुस्ती करायची असल्यास नागरिकांनी त्यासाठीचे अर्ज भरून संबधित कार्यालयांकडे द्यावेत, असे आवाहन निवडणूक अधिकाऱ्यांनी केले आहे. आयोगाने नोंदणी करण्यासाठी मुदतवाढ दिल्याने २१ ऑक्टोबरपर्यंत नागरिकांना क्षेत्रीय कार्यालयात जाऊन हे अर्ज भरून देण्याची संधी मिळाली असल्याचे पालिकेचे निवडणूक अधिकारी सतीश कुलकर्णी यांनी सांगितले.

..............

येथे देता येतील अर्ज

औंध, घोले रोड, कोथरूड, वारजे-कर्वेनगर, ढोले-पाटील रोड, येरवडा, नगर रोड वडगावशेरी, भ‍वानी पेठ, विश्रामबागवाडा, टिळक रोड, सहकारनगर, बिबवेवाडी, धनकवडी, कोंढवा-वानवडी, हडपसर येथील पालिकेची क्षेत्रीय कार्यालये.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


गुन्हेगारांना तिकीट नाही

0
0

गिरीश बापट यांचे स्पष्टीकरण

म. टा. प्रतिनिधी, पुणे

‘मुख्यमंत्र्यांना अनेक जण भेटत असतात. त्यांना भेटले म्हणजे निवडणुकीत पक्षाचे तिकीट मिळाले, असे होत नाही. महापालिकेच्या निवडणुकीत भाजपकडून गुन्हेगारांना उमेदवारी देण्यात येणार नाही,’ असे पालकमंत्री गिरीश बापट यांनी शनिवारी स्पष्टपणे सांगितले. दरम्यान, ‘काही जण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना बदनाम करण्याचा डाव साधत आहेत,’ असाही आरोप त्यांनी कोणाचेही नाव न घेता केला.

कोरेगाव पार्क आणि विमानतळ पोलिस ठाण्याच्या नवीन इमारतींचे भूमिपूजन बापट यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. या वेळी महापौर प्रशांत जगताप, सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे, आमदार जगदीश मुळीक, पोलिस आयुक्त रश्मी शुक्ला, सहआयुक्त सुनील रामानंद, पोलिस उपायुक्त पंकज डहाणे व स्थानिक नगरसेवक उपस्थित होते.

कुख्यात गुंड बाबा बोडके व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीचे फोटो सोशल मीडियातून व्हायरल झाल्याने खळबळ उडाली. तसेच यापूर्वी इतर पक्षांवर आरोप करणाऱ्या भाजपलाच राजकारणाच्या गुन्हेगारीकरणाच्या आरोपांना सामोरे जावे लागले आहे. ‘तुम्हाला अंधारात ठेवूनच हे प्रवेश केले जात आहेत का,’ असा प्रश्न केला असता बापट म्हणाले, ‘शहरातील राजकारणात मला अंधारात ठेवून काम केले जात नाही आणि कोणी तसे करूही शकत नाही. गोपीनाथ मुंडे व मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासह आम्ही गुन्हेगारीच्या विरोधात रान उठवण्याचे काम केले. त्यामुळे आम्ही गुन्हेगारांना पाठीशी घालण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. महापालिकेच्या निवडणुकांमध्ये गुन्हेगार किंवा गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या व्यक्तीला तिकीट दिले जाणार नाही.’ बोडकेच्या मुख्यमंत्री भेटीसंदर्भात विचारले असता, ‘अनेक व्यक्ती मुख्यमंत्रांना भेटत असतात. त्यांना भेटले म्हणजे तिकीट दिले जाईल, असे होत नाही. काही व्यक्ती मुख्यमंत्र्यांना बदनाम करण्याचा डाव साधत आहेत,’ अशी टीका बापट यांनी केली.

‘मेट्रोचे भूमिपूजन लवकरच होईल. त्यात सर्व राजकीय पक्षांना एकत्र घेऊ; मात्र महापौर प्रशांत जगताप यांनी मेट्रो प्रकरणात राजकारण आणू नये. प्रकल्पाला उशीर झाल्यामुळे पैशांचे नुकसान झाले, असी टीका महापौरांनी केली; मात्र यापूर्वी दहा वर्षे उशीर झाला आहे, त्याचे पैसे मी मागू का,’ असा सवाल बापट यांनी विचारला.

.................

पोलिसांचे कान टोचले

‘पोलिस हे सामान्य जनतेचे सेवक आहेत. पोलिस चौकीत किंवा ठाण्यात येणाऱ्या प्रत्येकाला पोलिसांनी चांगली वागणूक द्यावी. त्या व्यक्तीला पोलिस चौकी आधार केंद्र वाटली पाहिजे, असे काम करा. शहरात तुरुंगांची संख्या कमी आहे. महिलांना पोलिस कोठडी सुनावल्यानंतर त्यांना ठेवण्यासाठी अडचणी आहेत. त्यासाठी काय करता येईल, या दृष्टीने प्रयत्न करण्यात येतील,’ असे गिरीश बापट यांनी कार्यक्रमामध्ये बोलताना सांगितले. ‘कोरेगाव पार्क परिसरात उच्चभ्रू लोक राहतात; मात्र याच परिसरात रात्री हुक्का पार्लर, हॉटेलमध्ये व बाहेर गाड्या बेशिस्त लावून धिंगाणा चालतो. पूर्ण शहरात याची चर्चा आहे. पोलिसांनी त्याकडे लक्ष द्यावे,’ अशी सूचनाही त्यांनी केली.

..............

मिहीर कुलकर्णींकडून दिलगिरी

‘मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सामाजिक कार्यक्रमाचे निमंत्रण देण्यासाठी गेलो असता बाबा बोडकेच्या उपस्थितीमुळे वाद निर्माण झाला. त्यामुळे मुख्यमंत्र्यांना झालेल्या मनस्तापाबद्दल दिलगीर आहोत,’ अशी भावना हावरे लीग व ग्रॅव्हिटी इन्फ्रास्ट्रक्चरचे भागीदार मिहीर कुलकर्णी यांनी व्यक्त केली. वर्षा बंगल्यावर शुक्रवारी झालेल्या भेटीत बोडकेच्या उपस्थितीवर विरोधी पक्षांनी टीका केली. त्याबाबत कुलकर्णी यांनी दिलगिरी व्यक्त केली. या वेळी हावरे लीगच्या उज्ज्वला हावरे, कौस्तुभ देशपांडे उपस्थित होते.

.................................................................................

'बाबा बोडकेबद्दल खासदार अमर साबळेंना विचारा'


‘भारतीय जनता पक्षाचे सदस्य नीलेश निम्हण यांनी पक्षाचे कोथरूड मंडल अध्यक्ष किंवा आपल्या कार्यालयाची कोणतीही परवानगी न घेता वाढदिवसाच्या फ्लेक्सवर आपला फोटो लावला असल्याचे आमदार मेधा कुलकर्णी यांनी सांगितले. राज्यसभेचे खासदार अमर साबळे यांच्या माध्यमातून निम्हण यांचा पक्षप्रवेश झाला आहे. त्यामुळे खासदार साबळे त्याबद्दल अधिक माहिती देऊ शकतील. तसेच गुंड बाबा बोडके व नीलेश निम्हण यांच्या संबंधाबद्दलही प्रकाश टाकू शकतील,’ असे स्पष्ट करून आमदार कुलकर्णी यांनी या प्रकरणाची संपूर्ण जबाबदारी खासदार साबळे यांच्यावर टाकली आहे.

कुख्यात गुंड बाबा बोडके याचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबरचा फोटो शुक्रवारी व्हायरल झाला. तसेच औंध भागात भाजपच्या फ्लेक्सवरही बोडकेचा फोटो झळकल्याने खळबळ उडाली होती. कोथरूड विधानसभा मतदारसंघाच्या आमदार मेधा कुलकर्णी यांच्या समवेत गुंड बाबा बोडके याचा फ्लेक्स पाषाण, बाणेर भागात लावण्यात आला होता. या भागातील भाजपचे सदस्य नीलेश निम्हण यांनी हे फ्लेक्स लावले होते. निम्हण यांनी फ्लेक्सवर फोटो लावण्यासाठी आपली कोणतीही परवानगी घेतली नसल्याचे आमदार कुलकर्णी यांनी सांगितले.

खासदार साबळे यांच्या माध्यमातून निम्हण यांनी पक्षप्रवेश केला आहे. त्यानंतरच आपली त्यांच्याशी वैयक्तिक ओळख झाली. निम्हण यांनी लावलेल्या फ्लेक्सवर गुंड बोडके याचा फोटो कसा आला, त्याचे आणि निम्हण याचे संबंध नक्की काय आहेत, यावर खासदार साबळे हेच प्रकाश टाकू शकतील, असे आमदार कुलकर्णी यांनी कळवले आहे. या प्रकरणात आपल्याला ओढून ताणून आणणे दुर्दैवी आणि खोडसाळपणाचे असल्याचे त्या म्हणाल्या. निम्हण याच्याबद्दल योग्य निर्णय घेण्याचे खासदार साबळे यांना सूचित केल्याचेही कुलकर्णी यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तोच चंद्रमा नभात...

0
0

गप्पाष्टकांच्या साक्षीने रंगली कोजागरी

म. टा. प्रतिनिधी, पुणे

शनिवारचा सूर्य अस्ताला गेला आणि संध्याकाळनंतर शहराच्या विविध भागांतील बागा, सोसायट्यांमधील लॉन्स, कम्युनिटी हॉलमध्ये कुटुंबीय, मित्रमंडळींच्या गप्पा रंगत गेल्या..कुठे विविध गुणदर्शन, तर कुठे गाणी-गप्पा कवितांची मैफल रंगली..मसाला दुधाच्या जोडीला पावभाजी, बटाटेवडे अशा चटपटीत पदार्थांवर ताव मारून पुणेकरांनी कोजागरी पौर्णिमेची रात्र उत्साहात जागवली. यंदा कोजागरी सुट्टीच्या पूर्वसंध्येला आल्याने हॉटेलमध्येही रात्री उशिरापर्यंत खवय्यांची गर्दी पाहायला मिळाली.

गेल्या चार दिवसांपासून कोणत्याही वेळेस अचानक पाऊस पडत असल्याने कोजागरीच्या रात्री आकाशात चांदणे असेल का, असा संभ्रम नागरिकांच्या मनात होता. सोसायट्यांच्या बागेतील कार्यक्रम रद्द करून सभासदांच्या घरी कार्यक्रम घेण्याचे नियोजन अनेकांनी केले होते; मात्र शनिवारी दुपारपासून आभाळ निरभ्र होते आणि संध्याकाळी हवेत गारवाही अनुभवायला मिळाला. त्यामुळे रात्रीच्या आल्हाददायक गारव्यात मसाला दुधाची रंगत वाढली.

कोजागरीच्या शुभ्र चांदण्यात फिरण्याचा आनंद घेण्यासाठी तरुणांनी व्हॉट्सअॅप, फेसबुकच्या माध्यमातून नियोजन केले होते. ऑफिसमधून सुटल्यावर एकत्र जमून ‘लाँग ड्राइव्ह’ला जाण्याचे नियोजनही अनेकांनी केले होते. शहरातील कमला नेहरू पार्क, संभाजी पार्क, पु. ल. देशपांडे उद्यान, ताथवडे उद्यान, थोरात उद्यान आदी बागा रात्री उशिरापर्यंत सुरू होत्या. त्यामुळे बागांमध्ये सहकुटुंब जमलेल्या मैफलींमध्ये दुग्धप्राशनासह भेळ आणि वडा-पावचा आस्वाद घेतला जात असल्याचे चित्र होते. बागांप्रमाणेच नागरिकांनी विविध भागांतील टेकड्यांवरही गर्दी केली होती.

सोसायट्यांमध्ये गच्चीत, लॉनवर मसाला दूध पार्टी रंगली. भरपूर गप्पांबरोबर शेरोशायरी, काव्यवाचनाचे सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात आले. शहरातील विविध नाट्यगृहांमध्येही कोजागरीनिमित्त सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. या उपक्रमांमुळे दुधाच्या विक्रीत मोठी वाढ झाली होती. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा दुधाची विक्री दहा टक्क्यांनी जास्त झाल्याचे विक्रेत्यांनी सांगितले. काही हॉटेलचालकांनी खास कोजागरीसाठी मसाला दुधाचा मेनू उपलब्ध केला होता.

कोजागरीसाठी दूध ७० रुपये लिटर

चांदण्या रात्री, निसर्गरम्य वातावरणात मित्र-मैत्रिणींच्या संगतीत कोजागरी पौर्णिमा साजरी करण्यासाठी नागरिकांना एक लिटर दुधासाठी तब्बल ७० रुपये द्यावे लागले.

कोजागरी पौर्णिमेसाठी दुधाला मोठ्या प्रमाणात मागणी असते. त्यामुळे शहरातील विविध संस्था, संघटनांसह सोसायट्यांमध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. त्याकरिता दुधाची मागणी वाढते. कोजागरी पौर्णिमा शनिवारी आली असली, तरी सुट्टीचा आनंद म्हणून शहरात ही पौर्णिमा दोन दिवस साजरी करण्याची तयारी सुरू आहे. त्यामुळे दोन दिवस दुधाला मागणी राहणार आहे.

‘गणेश पेठेतील दूध बाजारात मागील वर्षीच्या तुलनेत दुधाचे दर स्थिर होते. किरकोळ बाजारात एका लिटरसाठी ६५ ते ७० रुपये दर मिळाला आहे. दसऱ्याला १८ लिटरच्या घागरीला १३२० रुपये दर मिळाला होता. एका लिटरसाठी ७० ते ७२ रुपये दर मिळाला होता. त्यामुळे कोजागरीला दर वाढण्याची शक्यता होती. परंतु, नागरिकांकडून दोन दिवस कोजागरी साजरी होत असल्याने मागणीत घट झाली. परिणामी दरही उतरले. शुक्रवारी १८ लिटरच्या घागरीला १२१० रुपये दर मिळाला. लिटरला ६५ ते ७० रुपये दर मिळाला आहे. मागील वर्षी १८ लिटरच्या घागरीला १२०० रुपये दर मिळाला होता,’ अशी माहिती गणेश पेठ दूध बाजार खरेदी-विक्री संघाचे उपाध्यक्ष दामोदर हिंगमिरे यांनी शनिवारी दिली.

कोजागरीसाठी वाघोली, वाडेबोल्हाई, मुळशी, मावळ, वेल्हा, नसरापूर या भागातून पाच ते सहा हजार लिटर दुधाची आवक दूध बाजारात झाली होती. त्याप्रमाणे यंदाही दुधाला मागणी असेल, अशी अपेक्षा होती. परंतु, अपेक्षेप्रमाणे मागणी मिळाली नाही, याकडे हिंगमिरे यांनी लक्ष वेधले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शेवटपर्यंत संगीतप्रवास एकत्रच करू

0
0

पंडित राजन-साजन मिश्रा यांची भावना

म. टा. प्रतिनिधी, पुणे

‘आम्ही शरीराने जरी वेगळे असलो, तरी आत्मा एकच आहे. आयुष्यभर एकत्र गात आहोत. कधीही साथ सोडली नाही, यापुढेही सोडणार नाही. शेवटच्या श्वासापर्यंत संगीताचा प्रवास एकत्रच करायचा आहे......’.. पंडित राजन-साजन मिश्रा यांच्या या भावनांनी रसिक प्रेक्षक भारावून गेले.

पंडित साजन मिश्रा यांच्या षष्ट्यब्दी सोहळ्यानिमित्त आयोजित कार्यक्रमात त्यांचा तालायन परिवारातर्फे खास पुणेरी पद्धतीने सत्कार करण्यात आला. ‘जोपर्यंत शरीरात प्राण आहेत तोपर्यंत पंडित राजन-साजन मिश्रा हे नाव एकत्रच असेल. राजन मिश्रा हे माझे गुरू, बंधू, मार्गदर्शक आहेत. त्यांच्याशिवाय मी अपूर्ण आहे,’ अशा भावना साजन मिश्रा यांनी व्यक्त केल्या. ज्येष्ठ कथकसम्राट पं. बिरजू महाराज, पं. राजन मिश्रा, विदूषी अश्विनी भिडे-देशपांडे, शाश्वती सेन, रूपकुमार राठोड, पं. अरविंदकुमार आझाद या वेळी उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या पूर्वार्धात विदूषी अश्विनी-भिडे देशपांडे यांनी आपल्या आवाजाने रसिकांना कोजागरी पौर्णिमेची सुरेल मेजवानी दिली. उत्तरार्धात पं. बिरजू महाराजांच्या नृत्याने रसिकांना शास्त्रीय गायन, नृत्य, वादन यांचा अनोखा मिलाफ अनुभवायला मिळाला. अश्विनी भिडे-देशपांडे यांनी ‘शिव आद मध्य अंत' या झपतालातील बंदिशीने मैफलीला सुरुवात केली. मधुवंती रागातील शिवस्तुतीतील सुरेल गायकीने त्यांनी रसिकांना मंत्रमुग्ध केले. संत नामदेवांचे ‘राम बिना को बोले रे’ हे निर्गुणी भजन सादर करून त्यांनी वातावरण भक्तिमय केले. त्यांना सुयोग कुंडलकर (हार्मोनियम), प्रशांत पांडव (तबला), स्वरांगी मराठे आणि मेघा भट (तानपुरा) यांनी सुरेल साथसंगत केली.

पं. बिरजू महाराज यांच्या कथक प्रस्तुतीने कार्यक्रमाची सांगता झाली. त्यांच्या नृत्याने अवघे रसिकजन तृप्त झाले. झाले. वयाची पंचाहत्तरी उलटून गेली तरी वीज कडाडते, त्याप्रमाणे थिरकणारी बिरजू महाराज यांची पावले, त्यातून निघणारा घुंगरांचा मंजूळ स्वर रसिकांसाठी पर्वणी ठरला. त्यांना पं. अरविंदकुमार आझाद (तबला), पं. सोमनाथ मिश्रा (गायन), संदीप मिश्रा (सारंगी) आणि अलका गुजर (सतार) यांनी साथ दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘विमानतळ हवा खेडमध्येच’

0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

गेली दहा वर्षे विमानतळाच्या प्रस्तावित जागांना विरोध करणाऱ्या खासदार शिवाजीराव आढळराव यांनी आता खेडमध्ये विमानतळ न झाल्यास त्याची मोठी किंमत महाराष्ट्राला मोजावी लागेल, असा सूर आळवला आहे. पुरंदरमध्ये विमानतळ करण्याचा निर्णय चुकीचा असून, तो खेडमध्येच करण्याचा आग्रह मुख्यमंत्र्यांकडे धरणार असल्याचेही त्यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.

खेडमध्ये विमानतळासाठी आवश्यक असलेली दोन हजार हेक्टर जागा उपलब्ध नसल्याने तो पुरंदरला नेण्यात आल्याचे कारण देण्यात येत आहे. परंतु मुंबईतील विमानतळ चौदाशे एकरवर आहे. त्यामुळे खेडमधून विमानतळ हलवण्याचे चुकीचे कारण दिले जात असल्याचेही आढळराव यांनी सांगितले. ‘जिल्ह्यात चाकण, राजगुरूनगर, तळेगाव व शिक्रापूर येथे मोठ्या औद्योगिक वसाहती आहेत. या औद्योगिक विकासाला चालना मिळण्यासाठी, तसेच जुन्नर, खेड, आंबेगावसह नाशिक व नगर जिल्ह्यातील कृषिमालाची निर्यात करण्यासाठी विमानतळ खेड तालुक्यातच होणे अत्यंत गरजेचे आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विमानतळ पुरंदर तालुक्यात होणार असल्याचे जाहीर केले आहे. या चुकीच्या निर्णयाची मोठी किंमत भविष्यात महाराष्ट्राला मोजावी लागेल,’ असेही त्यांनी स्पष्ट केले.

खेडचा विमानतळ शिवसेनेच्या नेत्यांनी विरोध केल्यामुळे पुरंदर तालुक्यात गेल्याची टीका माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली. त्यावर बोलताना, ‘पवार यांच्याकडे सत्ता असताना गेल्या पंधरा वर्षांत विमानतळाचा विषय का सुटला नाही. आता मात्र आमच्या विरोधामुळे विमानतळ इकडे-तिकडे गेल्याची भाषा ते करतात. मग विमानतळ करण्याचा शहाणपणा त्यांना अगोदर का सुचला नाही,’ असा टोला आढळराव यांनी मारला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बोर्डाने केली आधार कार्डाची अट शिथिल

0
0

दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी बोर्डाचा निर्णय

म. टा. प्रतिनिधी, पुणे

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी-मार्च २०१७मध्ये घेण्यात येणाऱ्या दहावी आणि बारावीच्या परीक्षेसाठी ऑनलाइन अर्ज भरताना आधार कार्ड क्रमांकाची नोंदणी सक्तीने करण्याची अट शिथिल झाली आहे. विद्यार्थ्याकडे आधार कार्ड नाही म्हणून त्याचा परीक्षेचा अर्ज भरायचा राहिला, असे प्रकार होऊ नयेत म्हणून मंडळाने हा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता आधार कार्ड नसणाऱ्या विद्यार्थ्याला निकालापर्यंत कार्ड काढण्याचे लेखी निवेदन मुख्याध्यापक अथवा प्राचार्यांकडे देऊन अर्ज भरता येईल.

राज्याच्या शालेय विभागाने काही दिवसांपूर्वीच दहावी आणि बारावीच्या परीक्षेसाठी ऑनलाइन अर्ज भरताना आधार कार्डाच्या क्रमांकाची नोंदणी करण्याचे आदेश काढले. त्यानुसार या परीक्षांचे अर्ज भरण्याची प्रक्रियादेखील सुरू झाली आहे; मात्र राज्यात सुमारे ७० टक्के विद्यार्थ्यांकडे आधार कार्ड असण्याची शक्यता आहे. त्यामुळे उर्वरित विद्यार्थी आधार कार्ड काढण्याच्या प्रक्रियेत आहेत. तसेच, काही विद्यार्थ्यांकडे आधार कार्ड नसल्याने ते परीक्षेचा अर्ज भरण्यापासून वंचित राहू शकतात.

एकंदरीत ही परिस्थिती लक्षात घेता महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे शहराध्यक्ष कल्पेश यादव व विक्रांत अमराळे यांनी दहावी आणि बारावीच्या परीक्षेसाठी ऑनलाइन अर्ज भरताना आधार कार्डाच्या क्रमांकाची नोंदणी करण्याच्या सक्तीची अट शिथिल करण्याची मंडळाकडे मागणी केली. तसेच, राज्यातील काही विद्यार्थ्यांकडे आधार कार्ड नसल्याचे मंडळाच्या निदर्शनास आणून दिले. सजग नागरिक मंचाने देखील याबाबतच्या सूचना राज्याचे मुख्य सचिव व शालेय विभागाच्या सचिवांना पाठविल्या.

त्यानुसार मंडळाचे सचिव कृष्णकुमार पाटील यांनी राज्यातील विभागीय मंडळांना दहावी आणि बारावीच्या परीक्षेसाठी ऑनलाइन अर्ज भरताना आधार कार्डाच्या क्रमांकाची नोंदणी करण्याच्या सक्तीची अट शिथिल करण्याबाबतच्या आवश्यक त्या सूचना दिल्या आहेत. त्यानुसार आता दहावी आणि बारावीच्या परीक्षेसाठी ऑनलाइन अर्ज भरताना आधार कार्ड नसतानादेखील विद्यार्थ्यांना अर्ज भरता येईल. मंडळाच्या या निर्णयामुळे राज्यातील आधार कार्ड नसणाऱ्या विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे.

.......

निकालापर्यंत हवे ‘आधार’

दहावी आणि बारावीच्या परीक्षेसाठी ऑनलाइन अर्ज भरताना विद्यार्थ्याकडे आधार कार्ड असल्यास त्याने क्रमांकाची नोंदणी करावी. ज्या विद्यार्थ्याने कार्डासाठी नोंदणी केली आहे, त्याला नोंदणी क्रमांक भरता येईल. तसेच ज्या विद्यार्थ्यांनी आतापर्यंत कार्ड काढण्यासाठी नोंदणीच केली नाही, अशांनी निकालापर्यंत कार्ड काढण्याचे लेखी निवेदन मुख्याध्यापक अथवा प्राचार्याकडे देऊन अर्ज भरायचा आहे, अशा सूचना मंडळाने दिल्या आहेत. दरम्यान, विद्यार्थ्याकडे आधार कार्ड नाही म्हणून त्याचा परीक्षेचा अर्ज भरायचा राहीला, असे प्रकार होणार नाहीत याबाबत काळजी घेण्याच्या सूचना सर्व विभागीय मंडळांना दिल्या आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images