Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

नवीन गणवेशात संचलन

$
0
0

विजयादशमीनिमित्त पिंपरी-चिंचवडमध्ये संघाचे विविध कार्यक्रम

म. टा. प्रतिनिधी, पिंपरी
दर वर्षी शिस्तीचे व परंपरेचे दर्शन घडवणारे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संचलन यंदा प्रथमच नवीन गणवेशात (फुल पँट) पिंपरी-चिंचवडमध्ये करण्यात आले. पिंपरी-चिंचवड शहरातील पाच ठिकाणांवरून संघाचे पथसंचलन करण्यात आले.

देहू गट (निगडी, चिखली व देहू) हे संचलन सकाळी सात वाजता यमुनानगर येथील ठाकरे मैदान येथे झाले. या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून रामदास माने उपस्थित होते. या संचलनात २८८ स्वयंसेवकांनी सहभाग घेतला. भोसरी गट (इंद्रायणी, मोशी, आळंदी, भोसरी) हे संचलन सकाळी सात वाजता भोसरी येथील द्वारका विश्व सोसायटीच्या समोर झाले. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे प्रा. नामदेव वाळके उपस्थित होते. या वेळी ३११ स्वयंसेवक सहभागी झाले होते. संत तुकारामनगर (संत तुकारामनगर, कासारवाडी, सांगवी, पिंपळे गुरव) हे संचलन सकाळी सात वाजता संत तुकारामनगर येथील नेहरूनगरमधील राजीव गांधी विद्यालय येथे झाले. या वेळी ३०२ स्वंयसेवक सहभागी झाले होते. चिंचवड (पिंपरी, काळेवाडी, चिंचवड, विशालनगर) हे संचलन पिंपरी गावातील सत्यं शिवम सुंदरम सोसायटीसमोर झाले. या वेळी आर. बी. कृष्णानी, तसेच ४४९ स्वयंसेवक सहभागी झाले होते. तर, आकुर्डी (वाकड, हिंजवडी, रावेत आकुर्डी) पथसंचलन आकुर्डी प्राधिकरण येथील गंगानगर बस स्थानकावर घेण्यात आले. या वेळी ३६० स्वयंसेवक, तर प्रमुख पाहुणे म्हणून गंगाराम पटेल सहभागी झाले होते. अशा पाच ठिकाणी एक हजार ७१० स्वयंसेवकानी पथसंचलन व शस्त्रपूजेद्वारे दसरा साजरा केला. या वेळी चौका-चौकात या स्वयंसेवकांचे फुलांची उधळण करून स्वागत करण्यात आले.

विविध धार्मिक कार्यक्रम

पुणे आळंदी रोड वडमुखवाडी येथील साई मंदिरात दसऱ्यानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रम करण्यात आले. दुपारी बारा वाजता साईंची माध्यान्ह आरती खासदार श्रीरंग बारणे, क क्षेत्रिय कार्यालयाच्या अध्यक्षा शैलजा शितोळे, धर्मवीर संभाजी नागरी सहकारी बँकेचे संस्थापक अध्यक्ष बाबूराव शितोळे, हवेलीचे तहसीलदार दशरथ काळे यांच्या उपस्थितीत झाली. या वेळी साई सेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष सुभाष नेलगे यांच्या हस्ते उपस्थितांचा सत्कार करण्यात आला. शिवकुमार नेलगे या वेळी उपस्थित होते. या सोहळ्याची सांगता बुधवारी दुपारी बारा वाजता माध्यान्ह आरतीने होणार आहे. जय भवानी नवरात्र उत्सव मोहननगर येथे देवीची मिरवणूक वाजतगाजत काढण्यात आली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


नवमतदारांचे २५ हजार अर्ज

$
0
0

नोंदणी प्रक्रियेस प्रतिसाद; १४ ऑक्टोबरपर्यंत मुदत

म. टा. प्रतिनिधी, पिंपरी
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी राबविण्यात येणाऱ्या विशेष मतदार नोंदणी मोहिमेअंतर्गत सुमारे २५ हजार अर्ज मतदार नोंदणीसाठी प्राप्त झाले आहेत. नावनोंदणीसाठी १४ ऑक्टोबरपर्यंत मुदत आहे.

महापालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी मतदारांना यादीत नाव नोंदण्यासाठी राज्य निवडणूक आयोगातर्फे विशेष मतदार नोंदणी मोहीम राबविण्यात येत आहे. ही मोहीम असून १४ ऑक्टोबरपर्यंत चालणार आहे. मतदारांच्या नावात अथवा पत्त्यामध्ये बदल करण्याचीही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. १६ सप्टेंबरपासून मोहीम चालू आहे. एक जानेवारी २०१७ रोजी वयाची १८ वर्षे पूर्ण करणाऱ्या नागरिकांची नोंदणी या मोहिमेद्वारे करण्यात येत असून सोमवारअखेर (दहा ऑक्टोबर) शहरातील तीनही विधानसभा मतदारसंघांतर्गत सुमारे २५ हजार ६०० नवमतदारांची नोंदणी करण्यात आली आहे.

पिंपरी विधानसभा मतदारसंघात सहा हजार ७२०, चिंचवडमध्ये १२ हजार ७५, आणि भोसरी विधानसभा मतदार संघात पाच हजार ५५६ अर्ज मतदार नोंदणीसाठी प्राप्त झाले आहेत. चिंचवड विधानसभा मतदारसंघ कार्यक्षेत्रातील मतदार नोंदणीसाठी पाण्याच्या टाकीजवळ, थेरगाव येथील महापालिका शाळा, पिंपरी विधानसभा मतदार संघातील नोंदणीसाठी आकुर्डी स्टेशनजवळील डॉ. हेगडेवार भवन, तर भोसरी विधानसभा मतदारसंघ कार्यक्षेत्रातील मतदार नोंदणीसाठी नेहरूनगर येथील अण्णासाहेब मगर स्टेडियम येथे केंद्र स्थापन करण्यात आले आहेत. याव्यतिरिक्त पिंपरी महापालिकेच्या सहा प्रभाग कार्यालयांसह शहरातील चौदा महाविद्यालयात देखील मतदार नोंदणीची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्याचप्रमाणे भोर-वेल्हा-मुळशी विधानसभा मतदारसंघातील नोंदणीसाठी भोर येथील प्रांत कार्यालयात मतदार नोंदणी संपर्क केंद्र स्थापन करण्यात आले आहे, अशी माहिती प्रशासनातर्फे देण्यात आली.

महापालिकेच्या सहा प्रभाग कार्यालयांसह शहरातील १४ कॉलेजमध्ये नोंदणीची सोय उपलब्ध आहे. यामध्ये बाबुराव घोलप कॉलेज (सांगवी), मानधनमल उधराम कॉलेज (पिंपरी), प्रतिभा कॉलेज ऑफ कॉमर्स अँड कम्प्युटर स्टडीज्, डॉ. डी. वाय. पाटील विद्या प्रतिष्ठान इ अँड टीसी (पिंपरी), कॅम्प एज्युकेशन सोसायटी (निगडी-प्राधिकरण), डॉ. डी. वाय. पाटील विद्या प्रतिष्ठान आर्टस, कॉमर्स अँड सायन्स कॉलेज (निगडी-प्राधिकरण), डॉ. डी. वाय. पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरींग (आकुर्डी), एटीएसस कॉलेज ऑफ बिझनेस स्टडीज अँड कम्प्युटर अॅप्लिकेशन (चिंचवड स्टेशन), प्रा. रामकृष्ण मोरे कॉलेज (आकुर्डी), राजमाता जिजाऊ शिक्षण प्रसारक मंडळ (भोसरी), रसिकलाल एम. धारिवाल इन्स्टिट्यूट (चिंचवड), राजर्षी शाहू कॉलेज (ताथवडे), बालाजी लॉ कॉलेज (रावेत रोड, ताथवडे), इंदिरा कॉलेज आर्टस्, कॉमर्स अँड सायन्स कॉलेज (वाकड) या ठिकाणांचा समावेश आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

लोणावळ्यात मिरवणूक

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, लोणावळा
लोणावळा शहर आणि ग्रामीण परिसर हिंदू समितीच्या वतीने दसऱ्यानिमित्त लोणावळ्यात शाही शिलांगण व विजयी मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले होते. या मिरवणुकीत मोठ्या संख्येने नागरिक सहभागी झाले होते. या वर्षी मिरवणुकीत शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित विविध जिवंत देखावे सादर करण्यात आले होते.

भारतीय पारंपरिक सणांना मागील काही वर्षांपासून आधुनिकतेचा स्पर्श झाला आहे. सणांची वैभवशाली परंपरा आणि संस्कृतीचे महत्त्व नव्या पिढीला समजावे यासाठी लोणावळा शहर व ग्रामीण परिसर हिंदू समितीतर्फे दसऱ्यानिमित्त शाही शिलांगण व विजयी मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले होते. सकाळी अकरा वाजता लोणावळ्यातील गवळीवाडा येथील श्रीराम मंदिरात फुलांनी सजविलेल्या आकर्षक पालखीमध्ये ठेवलेल्या तलवारींचे पूजन करण्यात आले. शस्त्र पूजनानंतर ढोलताशा, टाळमृदुंगाच्या निनादात आणि रणशिंग व सनई चौघड्याच्या मंगलमय सुरात शिलांगण व विजयी मिरवणुकीला सुरुवात झाली. मिरवणुकीत पारंपरिक वेशभूषा परिधान केलेल्या महिला आणि पुरुषांनी उत्स्फूर्तपणे भाग घेतला.

शिवदुर्ग मित्रच्या सांस्कृतिक विभागाच्या कलाकारांनी छत्रपती शिवाजी महाराज, मावळ्यांच्या वेशभूषा केल्या होत्या. यामध्ये भाले, तलवारी, रणशिंग, लाठी, काठी, दांडपट्टे, झेंडे, छबिना, अबदागिऱ्या, शेले, फेटे धारण केलेले मावळे लक्ष वेधून घेत होते. मिरवणूक मार्गावर अनेक ठिकाणी पुष्पवृष्टी करण्यात आली. दुपारी दोन वाजता लोणावळ्यातील भांगरवाडी येथील श्रीराम मंदिरात मिरवणुकीचा समारोप झाला.

मावळात मोठ्या उत्साहात पारंपरिक पद्धतीने दसरा साजरा करण्यात आला. तळेगाव येथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वतीने संचलन करण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आघाडीची खलबते सुरू

$
0
0

आघाडीची खलबते सुरू
राष्ट्रवादी-काँग्रेसमध्ये फॉर्म्युल्याची चर्चा
म. टा. प्रतिनिधी, पुणे
महापालिकेत चार सदस्यांच्या प्रभागात निवडणूक लढविण्याचे आव्हान पेलण्यासाठी राष्ट्रवादी आणि काँग्रेस या पक्षांनी आघाडीची खलबते सुरू केली आहेत. आघाडी झाल्यास कोणता फॉर्म्युला स्वीकारायचा, यासाठी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत भूमिका मांडण्यात येणार आहे.
आगामी निवडणुकीची प्रा-रूप प्रभागरचना जाहीर झाल्यानंतर भारतीय जनता पक्षाला सत्तेपासून रोखण्यासाठी आघाडीच्या दृष्टीने चाचपणी सुरू झाली आहे. काँग्रेसच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक येत्या गुरुवारी (१३ ऑक्टोबर) काँग्रेस भवनमध्ये होणार आहे. महापालिकेची आगामी निवडणूक राष्ट्रवादीसमवेत आघाडी करून लढवायची झाल्यास त्याबाबत पक्षाचे धोरण नेमके काय असेल, याबाबत पदाधिकाऱ्यांशी विचार-विनिमय केला जाणार आहे. आघाडीबाबत काँग्रेसमध्येच दोन गट असले, तरी प्रा-रूप प्रभागरचनेमुळे भाजपचा फायदा होऊ शकतो, हे लक्षात आल्याने त्याबाबत पुन्हा सर्वांशी संवाद साधण्यासाठी ही बैठक घेण्यात येणार असल्याचे समजते.
काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेतृत्वाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आघाडीचा निर्णय स्थानिक पातळीवरील नेत्यांकडे सोपविला आहे. त्यामुळे आघाडी करायची झाल्यास कोणत्या मुद्द्यांवर करायची, आघाडीमध्ये जागावाटपाचे सूत्र काय असेल, चार सदस्यांच्या नव्या प्रभागरचनेत आघाडी झाल्यास विद्यमान नगरसेवक आणि पक्षातील इच्छुक कार्यकर्त्यांना कसे सामावून घेता येईल, यासह निवडणुकीशी संबंधित इतर बाबींवर प्राथमिक स्वरूपाची चर्चा होऊ शकते. या चर्चेतून पदाधिकाऱ्यांचा कल जाणून घेतल्यानंतर आघाडी करायची की नाही, याबाबत प्रदेश पातळीवरील नेत्यांशी संपर्क साधण्यात येणार आहे.
गेल्या पाच वर्षांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने सातत्याने काँग्रेसला अपमानास्पद वागणूक दिल्याची नाराजी अजूनही अनेक काँग्रेसजण उघडपणे व्यक्त करतात. राष्ट्रवादीने स्थायी समिती अध्यक्षपद देण्याचे कबूल करूनही आयत्यावेळी शहर सुधारणा समितीवर काँग्रेसची बोळवण केल्याची खंत व्यक्त केली जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या अनेक मनमानी पद्धतीने घेतलेल्या निर्णयांना काँग्रेसनेही विरोध केला होता. त्यामुळे, राष्ट्रवादीने कधी भाजप, तर कधी मनसेला सोबत घेतले होते. एकहाती सत्ता नसल्याने विकासकामांवर बंधने येत असल्याचे राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी स्पष्ट केले होते. परंतु, केंद्र आणि राज्यानंतर महापालिकेमध्ये भाजपला सत्तेपासून रोखण्यासाठी आघाडी करण्याची सूचना राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनीच केली होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

फुलपाखरे.. छान किती दिसती...

$
0
0

भीमाशंकर, ताम्हिणी अभयारण्यात विविध फुलपाखरे पाहण्याची संधी

म. टा. प्रतिनिधी, पुणे

पावसाळा संपत आल्याने भीमाशंकर आणि ताम्हिणी अभयारण्यातील फुलांनी बहरलेल्या रानांमध्ये सध्या फुलपाखरांचा उत्सव सुरू झाला आहे. विविध रंगी, कोवळ्या उन्हात चमकणारी, काही नाजूक तर काही मोठ्या आकारातील फुलपाखरे फुलांच्या ताटव्यांमध्ये भिरभिरताना दिसत आहेत.

दर वर्षी पावसाळा संपत आल्यानंतर साधारणतः ऑक्टोबर ते डिसेंबर आणि मार्च- एप्रिल या महिन्यात फुलपाखरांचा वावर सर्वाधिक असतो. या कालावधीत फुलझाडे बहरलेली असतात. छोट्याशा फुले माळरानांना व्यापतात. हा काळ फुलपाखरांसाठी नैसर्गिकदृष्ट्या महत्त्वाचा काळ असतो. या वर्षी देखील भरपूर पाऊस झाल्यामुळे पुणे जिल्ह्यातील भीमाशंकर अभयारण्य आणि ताम्हिणी अभयारण्यामध्ये फुलपाखरांचा उत्सव बघायला मिळतो आहे. या दोन्ही अभयारण्याचा जैवविविध्याने समृद्ध असलेल्या पश्चिम घाटात समावेश होतो. या दोन्ही अभयारण्यांमध्ये शंभरहून अधिक प्रकारची फुलपाखरे वास्तव्यास आहेत. राज्याच्या फुलपाखराचा मान मिळाले ब्ल्यू मॉरमॉन यांसह अनेक दुर्मिळ प्रकारातील फुलपाखरे या अभयारण्यांमध्ये बघायला मिळतात. त्यामुळे वन्यजीव छायाचित्रण करणाऱ्या छायाचित्रांसाठी या अभयारण्यांमध्ये पर्वणी उपलब्ध झाली आहे.

‘निसर्गसाखळीत फुलपाखरांची भूमिका महत्त्वाची असते. भीमाशंकरमध्ये ब्यू मॉरमॉन, निलपरी, सरदार, पतंग, लेमन पेन्सी, पियरो अशी विविध प्रजातींची फुलपाखरे आढळतात. फुलपाखरांविषयी जागृती करण्यासाठी बोरीवली येथील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात फुलपाखरे साकारले आहे. भीमांशकर अभयारण्यात वन विभागातर्फे साकारण्यात येत असलेल्या बेलवनात याच प्रकारचे फुलपाखरू उद्यान करण्यात येणार आहे. यासाठी अभ्यासकांच्या सहभागातून फुलपाखरांना आकर्षित करणाऱ्या स्थानिक फुलांची झुडपे लावण्यात येणार आहेत,’ अशी माहिती पुणे विभागाचे मुख्य वनसंरक्षक सुनील लिमये यांनी दिली.
……………….
पश्चिम घाटात दोनशेपेक्षा जास्त प्रजाती
महाराष्ट्रातील पश्चिम घाटात दोनशेहून अधिक प्रकारची फुलपाखऱे वास्तव्यास आहेत. गावांजवळील माळराने, गवताळ प्रदेशांमध्ये फुलपाखरे जास्त संख्येने दिसतात. आबासाहेब गरवारे कॉलेजच्या जैवविविधता विभागाने केलेल्या सर्वेक्षणानुसार कर्नाळा अभयारण्यात सर्वाधिक म्हणजेच १४३ प्रकारच्या फुलपाखरांच्या जाती आढळून आल्या. पोफळी, डोंगरवाडी भागात सर्वांत कमी म्हणजेच केवळ २६ प्रकारची फुलपाखरे आढळली. पश्चिम घाटात ‘पॅरिस पिकॉक’ या फुलपाखराची नोंद यापूर्वी कधीच झाली नव्हती. सर्वेक्षणात पहिल्यांदा दुर्मिळ फुलपाखराचे दर्शन झाले. ‘मलबार ट्री निभ’ हे एरवी राज्यात न दिसणारे फुलपाखरू फणसाड आणि भीमाशंकरच्या अभयारण्यामध्ये पाहायला मिळाले. मात्र, गेल्या काही वर्षात वेगाने उभारल्या जात असलेल्या पवनचक्क्यांमुळे फुलपाखरांचा अधिवास नष्ट होतो आहे. त्यामुळे माळरानांवरील फुलपाखरांची संख्या धक्कादायक पद्धतीने घटली असल्याचा निष्कर्ष या अहवालातून पुढे आला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आंबोलीत फुलपाखरू महोत्सव

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
फुलपाखरांच्या रंगबिरंगी विश्व उलगडून दाखविण्यासाठी, त्यांचे अंतरंग जाणून घेण्यासाठी मलबार नेचर कॉन्झर्व्हेशन क्लब आणि वन विभागातर्फे येत्या २१ ते २३ ऑक्टोबर दरम्यान राज्यस्तरीय फुलपाखरू महोत्सवाचे आयोजित केला आहे. यामध्ये राज्यभरातील निसर्गप्रेमी सहभागी होणार आहेत.

गेल्या वर्षी बायसन नेचर क्लबतर्फे राधानगरी अभयारण्यामध्ये फुलपाखरू महोत्सव घेतला होता. या वर्षी आंबोलीची निवड केली आहे. जैवविविधेच्या दृष्टीने संपन्न असलेल्या आंबोलीत फुलपाखरू अभ्यासक हेमंत ओगले यांनी आत्तापर्यंत २०४हून अधिक फुलपाखरांची नोंद केली आहे. राज्यात सर्वाधिक फुलपाखऱे आणि अनेक दुर्मिळ प्रजाती या भागात आढळून येतात. राज्य फुलपाखरू ब्ल्यू मॉरमॉन आणि सर्वात मोठे फुलपाखरू सदर्न बर्डविंग ही दोन्ही आंबोलीत मोठ्या संख्येने आढळतात. तसेच अॅटलास मॉथ आणि मून मॉथ हे पतंग येथे पाहायला मिळतात, अशी माहिती मलबार नेचर कॉन्झर्व्हेशन क्लबच्या सायली पलांडे- दातार यांनी दिली.

‘फुलपाखरू संवर्धन आणि जनजागृती हा या उपक्रमाचा उद्देश असून या माध्यमातून स्थानिकांना पर्यटनाची संधी उपलब्ध करून देणार आहोत. महोत्सवात फुलपाखरांची निसर्ग चक्रातील भूमिका, फुलपाखरू- पतंगांचे जीवन, अधिवास, खाद्य आणि धोके याबद्दल अभ्यासक मार्गदर्शन करणार आहेत. बेंगळुरू येथील फुलपाखरू उद्यानाचे संचालक समिलन शेट्टी आणि राज्यातील पहिल्या ओवळेकरवाडी येथील फुलपाखरू उद्यानानेच निर्माते डॉ. राजेंद्र ओवळेकर, गोवा जैवविविधता मंडळाचे सदस्य डॉ. पराग रांगणेकर, डॉ. अमोल पटवर्धन, रमण कुलकर्णी आदी मान्यवर माहिती देणार आहेत,’ असे दातार यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

राष्ट्रवादी - काँग्रेस आमनेसामने

$
0
0

दोन्ही पक्षांच्या माजी पदाधिकाऱ्यांमध्येच लढतीची शक्यता
म. टा. प्रतिनिधी, पुणे
राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या माजी पदाधिकाऱ्यांचे प्रभाग एकत्र मिळून सहकारनगर-पद्मावती (क्र ३५) प्रभाग तयार झाला आहे. नव्या प्रभागामध्ये पुन्हा एकदा पदाधिकाऱ्यांनी जय्यत तयारी केली असून, कदाचित या वेळी त्यांना एकमेकांसमोर लढावे लागण्याची शक्यता आहे. भारतीय जनता पक्षासह इतर पक्षांकडून निर्माण होणाऱ्या आव्हानावर प्रभागाचे नवे कारभारी ठरणार आहेत.
माजी उपमहापौर आबा बागूल आणि स्थायी समितीच्या माजी अध्यक्षा अश्विनी कदम यांचा जुना (प्रभाग क्र ६७) आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी सभागृहनेते सुभाष जगताप यांचा (प्रभाग क्र ६८) भाग नव्या प्रभागात एकत्र झाला आहे. त्याशिवाय, राष्ट्रवादीचे नगरसेवक शिवलाल भोसले यांचा (प्रभाग क्र ६९) आणि भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक राजेंद्र शिळीमकर (प्रभाग क्र ७०) यांचाही काही भाग नव्या प्रभागात समाविष्ट झाला आहे. शाहू कॉलेज रस्त्यापासून या प्रभागाची सुरुवात होते. शाहू कॉलेज, सहकारनगर क्र १ व सहकारनगर क्र २, सारंग सोसायटी, तावरे कॉलनी, अरण्येश्वर, तळजाई परिसर, पद्मावती, पंचवटी सोसायटी, चव्हाणनगर यासह धनकवडीच्या जुन्या महापालिका हद्दीपर्यंतचा भागाचा समावेश नव्या प्रभागामध्ये झाला आहे.
जुन्या पदाधिकाऱ्यांच्या प्रभागामुळे आगामी निवडणुकीत त्यांनी पुन्हा लढण्याची तयारी आत्तापासूनच सुरू केली आहे. राष्ट्रवादीकडून माजी सभागृहनेते सुभाष जगताप यांच्यासह त्यांच्या पत्नी उषा जगताप, स्थायी समितीच्या माजी अध्यक्षा अश्विनी कदम व त्यांचे पती नितीन कदम, नगरसेवक शिवलाल भोसले इच्छुक आहेत. त्यांच्यासह आणखीही काही कार्यकर्त्यांची नावे पुढे येण्याची शक्यता आहे. काँग्रेसकडून माजी उपमहापौर आबा बागूल यांच्यासह त्यांच्या परिवारातून आणखी एकाला तिकीट मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तसेच, माजी नगरसेवक अनिल जाधव, महेश वाबळे, नरेंद्र व्यवहारे, सतीश पवार, हरीश यादव अथवा त्यांच्या कुटुंबातील सदस्य, अशी नावे काँग्रेसमधून चर्चेमध्ये पुढे येत आहेत.
राष्ट्रवादी आणि काँग्रेसमधून तुल्यबळ उमेदवारांना टक्कर देण्यासाठी इतर पक्षांकडून प्रभावी उमेदवारांची चाचपणी केली जात आहे. भारतीय जनता पक्षाचे सरचिटणीस गणेश घोष यांचे नाव इच्छुकांच्या यादीत आघाडीवर आहे. त्यांच्यासह राहुल माने, सचिन ढेरे, नीलेश खंडाळे यांच्या कुटुंबातील सदस्य, महिला चिटणीस संगीता चौरे यांची नावे चर्चेत आहेत. तसेच, बाळा पासलकर यांच्या पत्नी, कैलास मोरे आणि संतोष कांबळे यांच्या नावांचीही चर्चा सुरू आहे. शिवसेनेकडून सध्या तरी अर्जुन जानगवळी यांचे नाव अग्रभागी आहे. इतर, जागांवर शिवसेनेकडून विविध पर्यायाची चाचपणी केली जात असून, इतर पक्षांतील काही नेत्यांना पक्षात स्थान दिले जाण्याची चर्चा आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये इच्छुकांची मोठी गर्दी आहे. रुपेश तुरे, जितेन महाजन, आशिष किंवा भावना वाघमारे, विद्या ओहाळ, ऋषभ शिंगवी, दीपक ठकार अशा अनेक नावांबाबत विचार-विनिमय सुरू आहे.
आगामी निवडणुकीतील मोजक्या चुरशीच्या लढतींमध्ये अनेक माजी पदाधिकाऱ्यांच्या उमेदवारीमुळे हा प्रभाग चर्चेत राहणार असल्याचे स्पष्ट आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीचे ज्येष्ठ सदस्य अनुभवावर पुन्हा बाजी मारण्याची चिन्हे असली, तरी ‘डार्क हॉर्स’ प्रस्थापितांना धक्का देणार का, याबाबतही उत्सुकता आहे.
.................
प्रभाग क्र. ३५ : सहकारनगर, पद्मावती
लोकसंख्या : ८४,६६०
..
आरक्षण
अ : अनुसूचित जाती (महिला)
ब : ओबीसी (सर्वसाधारण)
क : सर्वसाधारण (महिला)
ड : सर्वसाधारण

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

​पिंपरीकरांच्या दिमतीला ‘मटा’ कल्चर क्लब

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
पिंपरी-चिंचवडकरांनाही आता विविध सांस्कृतिक उपक्रमांची मेजवानी मिळणार आहे. ‘मटा’ कल्चर क्लब आता उद्योगनगरीतही कार्यरत झाल्याने मराठी मनाला भावणाऱ्या नाट्य संस्कृतीपासून ते कलाकारांशी थेटभेट, साहित्य, संगीत, नृत्य तालवाद्य असे नानाविध कार्यक्रम तसेच, ताणतणाव कमी करण्यापासून ते विविध खाद्यपदार्थांची निर्मिती, कलागुणांना प्रोत्साहन देणाऱ्या कार्यशाळा, नावीन्यपूर्ण ठिकाणी भटकंती करण्याची संधी ‘कल्चर क्लब’ सभासदांना आता मिळणार आहे. सभासदत्वासाठी नावनोंदणी करणे एवढेच आता पिंपरी-चिंचवडकरांनी करायचे आहे.
गेल्या वर्षभरात ‘कल्चर क्लब’ने सभासदांच्या संपूर्ण कुटुंबाला आनंद घेता येतील, असे शंभरहून अधिक कार्यक्रम पुण्यात आयोजित केले. सभासदांचाही सर्व उपक्रमांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. अशा नावीन्यपूर्ण कार्यक्रमांची रेलचेल आता पिंपरी चिंचवडमध्येही अनुभवायला मिळणार आहे. नामवंत कलाकारांचा सहभाग असलेले सांस्कृतिक कार्यक्रम, प्रसिद्ध शेफच्या मार्गदर्शनातून उलगडणाऱ्या पाककृती, कलाकुसरीला प्रोत्साहन देणाऱ्या कार्यशाळा, पर्यटनप्रेमी सभासदांसाठी नेचर ट्रेल, सहली, ट्रेकची पर्वणी असे सगळेच उपक्रम आयोजिले जाणार आहेत. या उपक्रमाचा श्रीगणेशा होतोय नाट्य, नृत्य आणि संगीताचा रंगमंचीय नजराणा देणाऱ्या ‘रंगयात्री : रंगमंचीय कलोत्सव’ या कार्यक्रमाने. १२ आणि १३ ऑक्टोबर रोजी संध्याकाळी पाच ते आठ या वेळेत पिंपरीच्या आचार्य अत्रे रंगमंदिरात ही दोन दिवसीय मैफल रंगणार आहे. अशा वैविध्यपूर्ण उपक्रमांचा आस्वाद घेण्यासाठी लवकरात लवकर ‘महाराष्ट्र टाइम्स’ कल्चर क्लबचे सदस्य व्हा.

सभासदत्त्व १९९ रुपयांमध्ये
एरवी कल्चर क्लबचे सभासद होण्यासाठी २९९ रुपये शुल्क आकारले जाते. मात्र, पिंपरी चिंचवडवासीयांना उत्सवी भेट म्हणून फक्त १९९ रुपयांमध्ये कल्चर क्लबचे सभासद होता येणार आहे. नागरिकांच्या सोयीसाठी शहराच्या विविध भागांत नावनोंदणीची व्यवस्था करण्यात आली आहे. ‘मटा’ कल्चर क्लब कार्डवर दोन सदस्यांना कार्यक्रमाचा आस्वाद घेता येईल. पिंपरी-चिंचवडकरांना कुटुंबीयांना सांस्कृतिक भेट देण्याची पर्वणी या निमित्ताने साधता येणार आहे. नावनोंदणी www. mtcultureclub.com या वेबसाइटला भेट देऊनही करता येणार आहे. अधिक माहिती, नाव नोंदणी आणि प्रवेशिकांसाठी संपर्क : ९९७५४०४०२६

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


​‘साहित्य संस्कृती मंडळात काम करणे मूर्खपणाचे’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
‘साहित्य, संस्कृती, भाषेसाठी सरकार काही करत नाही, हे खरेच आहे. राज्य साहित्य संस्कृती मंडळाला तसेच समित्यांना पैसे दिले की आपले काम संपले अशी सत्ताधाऱ्यांची भूमिका असते. याला साहित्याला उत्तेजन देणे म्हणत नाही. साहित्य संस्कृती सारख्या मंडळांमध्ये काम करणे मूर्खपणाचे आहे’, अशा शब्दांत ख्यातनाम लेखक प्रा. रंगनाथ पठारे यांनी मंगळवारी साहित्य संस्कृती मंडळ व सरकारी समित्यांच्या कारभाराची खिल्ली उडवली.
आयडियल कॉलनी येथील ‘पुस्तक पेठ-वाचू या आनंदे!’ या दालनाचे उद‍्घाटन पठारे व अभिनेत्री मृणाल कुलकर्णी यांच्या हस्ते झाले. ‘पुस्तक पेठ’चे प्रमुख माधव वैशंपायन व संजय भास्कर जोशी या वेळी उपस्थित होते. जोशी यांच्या ‘नचिकेताचे उपाख्यान’ या पुस्तकाच्या आवृत्तीचे प्रकाशन पठारे यांच्या हस्ते झाले.
‘साहित्य संस्कृती मंडळाचे अधिकारी बैठकीला आपल्या कारकूनाला पाठवतात. कार्यालयात जायचे, साहित्य संस्कृतीच्या गप्पा मारायच्या, भत्ता घ्यायचा आणि यायचे... यापुढे ठोस काम होत नाही. सरकार कामासाठी देत असलेल्या रकमा सरकारसाठी किरकोळ असतात. पैसे दिले की काम झाले, अशी धारणा असते’, असे टीकास्त्र पठारे यांनी सोडले. ‘साहित्य संस्कृती मंडळ किंवा समित्यांमार्फत काढल्या जाणाऱ्या ग्रंथांचा दर्जा चांगला असतो ; पण केवळ शहराच्या कोपऱ्यात असणाऱ्या सरकारी दुकानात हे ग्रंथ असतात. ही पुस्तके वाचकापर्यंत पोहोचत नाहीत. ठराविक दुकानांपेक्षा महाराष्ट्र खूप मोठा आहे, असा टोला लगावत सरकारने ठिकठिकाणी ही पुस्तके उपलब्ध करून द्यायला हवीत’, याकडे त्यांनी लक्ष वेधले. ‘यशवंतराव चव्हाण यांच्यानंतर नेत्यांमधील सांस्कृतिक आस्था कमी होत गेली. यशवंतरावांनी रचलेला पाया पुढे नेला असता तर मोठे काम झाले असते. साहित्य सांस्कृतिक क्षेत्रात आस्था उरलेली नाही’, अशी टीका त्यांनी केली.
कुलकर्णी म्हणाल्या, ‘आपट्याची पाने न देता, पुस्तकाची पाने देऊन साजरा झालेला हा दसरा वेगळा आहे.’ अंजली वैशंपायन व अनघा जोशी यांनी स्वागत केले. अर्पिता वैशंपायन यांनी गायलेल्या पसायदानाने सांगता झाली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

​‘पेरेन्टिंग प्लॅन’चा सुवर्णमध्य

$
0
0

पुणे ः त्या दोघांनी कायदेशीर घटस्फोट घेतला. तो लष्करामध्ये सेवेस होता. मुलीचा ताबा पत्नीकडे देण्यात आला. मुलीचे शिक्षण, खर्च या कारणावरून त्यांच्यात कोर्टात वाद सुरू झाले. कोर्टातील तारखांना प्रत्येक वेळी हजर राहणे शक्य नसल्यामुळे त्यांनी ‘पेरेन्टिंग प्लॅन’द्वारे दोघांच्या जबाबदाऱ्या ठरवून घेतल्या. तो सुट्टीवरून आल्यावर मुलीचा तात्पुरता ताबा त्याच्याकडे देण्याचे ठरले. तिच्या जबाबदाऱ्या दोघांनी वाटून घेतल्या. पे​रेन्टिंग प्लॅनमुळे त्यांच्या कोर्टाच्या चकरा वाचल्या. पुण्यातील फॅमिली कोर्टात नुकताच घटस्फोट घेतलेल्या पालकांनी ‘पेरेन्टिंग प्लॅन’ या उपक्रमाचा आधार घेऊन मुलीचे पालकत्व सक्षमरीत्या निभावण्याचे ठरविले.
तो मिलिटरीमध्ये कामाला होता, तर ती एका कंपनीत कामाला होती. त्या दोघांमध्ये काही कारणांमुळे वाद झाले होते. त्यांच्यात झालेल्या वादाचा परिणीती शेवटी घटस्फोटामध्ये झाली. तो मिलिटरीमध्ये कामाला असल्यामुळे मुलीची जबाबदारी घेणे त्याला शक्य नव्हते. त्यामुळे मुलीचा ताबा आईकडे देण्यात आला.
घटस्फोट घेऊन ते दोघे एकमेकांपासून दूर झाले. मात्र मुलीचे शिक्षण, करिअर, आरोग्य आणि मुख्य म्हणजे त्यालाही मुलीचा ताबा तात्पुरत्या स्वरूपात तरी हवा होता. या कारणावरून त्यांच्यात पुन्हा कोर्टात वाद सुरू झाले. कोर्टातील कामकाजासाठी तसेच कायदेशीरबाबींची पूर्तता करण्यासाठी त्याला प्रत्येक वेळी कोर्टात हजर राहणे शक्य नव्हते. त्यामुळे त्याने शेवटी वकील आणि फॅमिली कोर्टातील समुपदेशकांच्या सल्ल्याने पेरेन्टिंग प्लॅन कोर्टात दाखल केला. त्या दोघांनीही मुलीची जबाबदारी एकत्रितपणे घेत असल्याचे कोर्टाला सांगितले. तो सुट्टीत परत आल्यावर मुलीचा तात्पुरता ताबा त्याच्याकडे राहिल. त्या दोघांची दरम्यानच्या काळात ऑनलॉइन भेट घडविली जाईल. मुलीच्या शिक्षणाचा सर्व खर्च तो करेल. तसेच भविष्यात तिला काही मोठा आजार झाल्यास तिच्या वैद्यकीय खर्चाची जबाबदारी त्याच्याकडे असेल, असे ठरविण्यात आले. तसेच मुलीचा सांभाळ करण्यासाठी येणारा खर्च तिची आई करेल असे ठरविण्यात आले. त्या दोघांनी पेरेन्टिंग प्लॅनद्वारे मुलीचा सांभाळ करण्याची जबाबदारी घेतली असल्याचे कोर्टाला सांगितले. त्यासंदर्भात अर्ज कोर्टाला सादर
करण्यात आला.
पती-पत्नी एकमेकांपासून कायदेशीररीत्या दूर होतात. मात्र, त्याचा कळत नकळत परिणाम त्यांच्या मुलांवर होतो. अशा वेळी आपल्यात झालेले वाद बाजूला ठेवून मुलांची संयुक्तरीत्या जबाबदारी घेतल्यामुळे कोर्टातील चकरा वाचतात. तसेच मुलांकडे अधिक लक्ष दिले जाते, अशी प्रतिक्रिया फॅमिली कोर्टातील समुपदेशकांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अतिक्रमण झाल्यास निरीक्षक जबाबदार

$
0
0

वाढत्या अतिक्रमणांमुळे पालिकेचा निर्णय

म. टा. प्रतिनिधी, पुणे

शहरातील रस्ते आणि फूटपाथवर महापालिकेतर्फे वारंवार कारवाई करूनही अतिक्रमणे ‘जैसे थे’ राहत असल्याने आता संबंधित विभागाच्या अतिक्रमण निरीक्षकाला जबाबदार धरण्यात येणार आहे. त्यामुळे, महापालिकेच्या कारवाईनंतर पाच दिवसांत पुन्हा अतिक्रमण झाल्यास निरीक्षकालाच कारवाईला तोंड द्यावे लागणार आहे.
महापालिकेच्या अतिक्रमण विभागाची सूत्रे गेल्या चार महिन्यांत दोन वेळा बदलण्यात आली. त्यातच, सणासुदीच्या कालावधीमुळे शहरातील सर्वच रस्त्यांवर पुन्हा अतिक्रमणांची संख्या वाढल्याचे दिसून आले आहे. पालिकेतर्फे कारवाई केली जात असूनही, संबंधित विक्रेते-फेरीवाले पुन्हा त्याच ठिकाणी दिसून येतात, अशी तक्रार केली जाते. महापालिकेने त्याविरोधात कठोर भूमिका घेण्याचे निश्चित केले असून, कारवाईनंतर पुन्हा अतिक्रमण झाल्याचे आढळून आल्यास संबंधित भागातील अतिक्रमण निरीक्षकाला त्याची शिक्षा मिळणार आहे. महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त राजेंद्र जगताप यांनी नुकतेच त्याबाबतचे आदेश काढले.
महापालिकेच्या सर्व अतिक्रमण निरीक्षकांना पुढील १५ दिवसांत त्यांच्या भागातील/हद्दीतील अतिक्रमणांची पाहणी करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. रस्त्यांवर आणि चौकात उभ्या राहणाऱ्या हातगाड्या, त्यावर शिजविण्यात येणारे खाद्यपदार्थ याबाबतचा सविस्तर अहवाल पुढील १५ दिवसांत सादर करण्याचे आदेश जगताप यांनी दिले आहेत. तसेच, सायंकाळी चार ते रात्री दहा या वेळेत ही पाहणी करून अनधिकृत अतिक्रमणांवर कारवाई करण्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. अतिक्रमण कारवाईनंतर पुढील पाच दिवसांत पुन्हा त्याच जागेवर अतिक्रमण झाल्याचे आढळून आल्यास संबंधित अतिक्रमण निरीक्षकाला जबाबदार धरण्यात येणार असून, त्याच्यावरही कारवाई होऊ शकते, असे स्पष्ट संकेत जगताप यांनी दिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

खड्डेविरहित खोदाई कागदावर

$
0
0

सवलतीच्या शुल्काचा निर्णय घेण्याबाबत स्थायी समितीकडून चालढकल

म. टा. प्रतिनिधी, पुणे

शहरातील रस्ते खड्डेमुक्त करण्यासाठी एक ऑक्टोबरपासून खोदाईला परवानगी न देण्याचा पुणे महापालिकेचा निर्णय कागदावरच राहिला आहे. नव्या धोरणांतर्गत रस्तेखोदाईच्या शुल्कात सवलत देण्याचा प्रस्ताव अद्याप स्थायी समितीच्या मंजुरीसाठी पडून आहे. त्यामुळे, सध्याच्या सणासुदीच्या काळात खोदाईला मान्यता देण्याऐवजी आता पुढील महिन्यापासूनच या धोरणाची अंमलबजावणी करण्यात येणार आहे.
महापालिका आयुक्त कुणाल कुमार यांनी एक ऑक्टोबरपासून ‘ट्रेंचलेस पॉलिसी’ राबविण्यात येणार असल्याचे जाहीर केले होते. विविध सरकारी आणि खासगी कंपन्यांकडून केबल टाकण्यासाठी रस्त्याची खोदाई केल्यानंतर संबंधित रस्ते पूर्वस्थितीत येत नसल्याची तक्रार केली जात होती. त्यामुळे, संपूर्ण रस्ता खोदण्याऐवजी ठरावीक अंतरावर मोठे खड्डे (पिट्स) घेऊन त्याद्वारे केबल टाकण्याचे प्रात्यक्षिक महापालिकेने सर्व सरकारी आणि खासगी कंपन्यांना दाखवले. रस्तेखोदाईसाठी सध्या सर्व कंपन्यांना मोठ्या प्रमाणावर शुल्क भरावे लागत असल्याने नव्या धोरणात हे शुल्क कमी करण्याची तयारीही महापालिकेने दाखवली होती. त्या दृष्टीने, खड्डेविरहित खोदाई करणाऱ्या कंपन्यांसाठी सवलतीच्या शुल्काचा प्रस्ताव गेल्या महिन्यातच स्थायी समितीच्या मान्यतेसाठी सादर केला गेला होता. त्याला मान्यता मिळाली असती, तर एक ऑक्टोबरपासून परवानगी देणे महापालिकेला शक्य झाले असते. स्थायी समितीतर्फे गेल्या तीन आठवड्यांपासून हा प्रस्ताव पुढे ढकलण्यात येत असून, अधिकाऱ्यांकडून योग्य माहिती मिळत नसल्याचा दावा केला जात आहे.
सणासुदीच्या काळामध्ये आधीच रस्त्यावर प्रचंड वाहतूक कोंडी होत असल्याने रस्ते खोदाई तूर्तास तरी थांबविण्यात आली आहे. दिवाळीनंतर विविध कंपन्यांकडून खोदाईबाबत विचारणा होण्याची शक्यता असून, तत्पूर्वी महापालिकेला त्याचे दर ठरविणे गरजेचे आहे. ‘महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेड’ (एमएनजीएल), महावितरण, ‘भारत संचार निगम लिमिटेड’ (बीएसएनएल) अशा सरकारी कंपन्यांसह सर्व खासगी केबल कंपन्यांना आगामी काळात ‘ट्रेंचलेस’ नुसारच खोदाईची परवानगी दिली जाणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

परदेश दौरे रडारवर

$
0
0

विद्यापीठ प्रतिनिधींना केंद्र सरकारची परवानगी अनिवार्य

म. टा. प्रतिनिधी, पुणे

स्वायत्ततेच्या नावाखाली विद्यापीठ प्रतिनिधींच्या परदेश दौऱ्यांविषयी समोर न येणाऱ्या माहितीबाबत केंद्रीय गृह मंत्रालयाने आक्षेप नोंदवले आहेत. त्यामुळे आगामी काळात राज्यातील विद्यापीठांचे कुलगुरू आणि इतर पदाधिकाऱ्यांना परदेश दौऱ्यांपूर्वी केंद्र सरकारची परवानगी घेणे बंधनकारक करण्यात आले आहे. परदेशात मिळणाऱ्या सुविधांबाबत केंद्राच्या गृह मंत्रालयाने, तर राजकीय पातळीवर केंद्राच्या परराष्ट्र मंत्रालयाने परवानगी दिल्यानंतरच विद्यापीठांच्या प्रतिनिधींना परदेश दौऱ्यांमध्ये सहभागी होता येईल.
राज्यपाल कार्यालयाने या विषयी राज्यातील विद्यापीठांना लेखी पत्राद्वारे सूचना केल्या आहेत. या पत्रामध्ये नमूद बाबींनुसार, राज्यभरातील विद्यापीठे आणि परदेशी शैक्षणिक संस्थांमध्ये झालेल्या करारांचा भाग म्हणून अनेकदा विद्यापीठांचे कुलगुरू, प्राध्यापक आणि इतर पदाधिकारी परदेश दौऱ्यावर जातात. दौऱ्यांदरम्यान परदेशी संस्थांकडून त्यांना विविध सुविधा पुरविल्या जातात. त्यामध्ये विमानप्रवासाचा खर्च, परदेशामध्ये राहण्याचा आणि प्रवास खर्च आदी बाबींचा समावेश असतो. या विषयी केंद्राच्या गृह मंत्रालयाला कोणतीही माहिती न देता, विद्यापीठांचे पदाधिकारी या बाबींचा स्वीकार करतात. विद्यापीठे स्वायत्त असल्याने शैक्षणिक देवाणघेवाण आणि परदेशी विद्यापीठांसोबतच्या सहकार्यासाठी ‘फॉरेन कॉन्ट्रिब्युशन रेग्युलेशन अॅक्ट २०१०’ मध्ये अपेक्षित पूर्वपरवानगी घेण्याची कोणतीही गरज नसते, अशी भूमिका विद्यापीठांकडून घेतली जाते. मात्र, विद्यापीठांच्या पदाधिकाऱ्यांना अशा दौऱ्यांपूर्वी पूर्वपरवानगी घेणे गरजेचे असल्याचे केंद्राच्या गृह मंत्रालयाने राज्यपाल कार्यालयाला कळविले आहे. त्यानुसार आगामी काळात विदेश दौऱ्यांसाठी राज्यपाल कार्यालयाकडून परवानगी मिळाल्यानंतर केंद्राच्या गृह आणि परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाची परवानगी मिळविण्याची जबाबदारी संबंधित विद्यापीठांच्या कुलगुरूंची असेल.
या पत्राचा संदर्भ घेऊन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठानेही सर्व प्राध्यापक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना पूर्वपरवानगी घेणे गरजेचे असल्याचे परिपत्रकाद्वारे स्पष्ट केले आहे. गृह मंत्रालय आणि परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाकडून पूर्वपरवानगी मिळाल्याशिवाय परदेश दौऱ्यांचे नियोजन करू नये, असेही विद्यापीठाने परिपत्रकात नमूद केले आहे.
000
अघोषित सेन्सॉरशिप?
या माध्यमातून केंद्र सरकार आपल्याला हव्या त्याच व्यक्तींना, हव्या त्याच देशांमध्ये आणि हव्या त्याच विषयांवर चर्चा करण्यासाठी वा भूमिका मांडण्यासाठी पाठविणार असल्याचा आरोप आता विद्यापीठांमधील प्राध्यापक वर्ग करीत आहेत. उच्चशिक्षण क्षेत्रामध्ये विचार आणि मतांच्या स्वातंत्र्याची पाठराखण गरजेची असताना, अशा परवानग्या घेण्याची सक्ती करून, वेळप्रसंगी परवानगी नाकारून देशाचे एकसुरी चित्र परदेशात उभे करण्याचा केंद्राचा प्रयत्न असल्याचे आरोपही प्राध्यापकांकडून होत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भामा आसखेड रखडणार?

$
0
0

पुनर्वसनाचा आर्थिक भार उचलण्यातील अस्पष्टता कारणीभूत

म. टा. प्रतिनिधी, पुणे

शहराच्या पूर्व भागातील पाण्याची टंचाई सोडविण्यासाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजाविणारा भामा आसखेड प्रकल्प रखडण्याची शक्यता निर्माण झाला आहे. या प्रभागातील प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन करण्यासाठी पुणे महापालिका तसेच राज्य सरकार नक्की किती आर्थिक भार उचलणार याची कोणतीही स्पष्ट माहिती दिली जात नसल्याने प्रकल्पाच्या कामास अद्याप परवानगी देण्यात आलेली नाही. त्यामुळे हा प्रकल्प रखडण्याची शक्यता आहे.
शहराच्या पूर्व भागातील नगररोड, धानोरी, लोहगाव, विमानतळ भागातील पाण्याची टंचाई सोडविण्यासाठी आघाडी सरकारने ‘जेएनएनयूआरएम’ योजनेच्या अंतर्गत महापालिकेला निधी उपलब्ध करुन दिला. त्यातून हा प्रकल्प उभारला जाणार आहे. प्रकल्पाच्या कामाला स्थानिक शेतकऱ्यांनी कडाडून विरोध केला. जोपर्यंत या भागातील प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन केले जाणार नाही, तोपर्यंत काम सुरू करू देणार नाही, अशी भूमिका घेण्यात आली. गेले अनेक महिने हे काम रखडल्याने महापालिकेने राज्य सरकारकडे तोडगा काढण्याची विनंती केली होती. या भागातील शिवसेनेचे आमदार सुरेश गोरे यांच्या नेतृत्त्वाखाली शेतकऱ्यांचा विरोध सुरू असल्याने तोडगा काढण्यासाठी महापौर प्रशांत जगताप यांनी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचीही भेट घेतली होती. तसेच, पालकमंत्री गिरीश बापट यांच्या नेतृत्वाखाली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चाही करण्यात आली. या बैठकीत जिल्हाधिकारी कार्यालयाने प्रकल्पग्रस्तांची माहिती राज्य सरकारकडे पाठवावी, त्यावर राज्य सरकार सकारात्मक निर्णय घेइल, असे स्पष्ट करण्यात आले होते.
भामा आसखेडच्या रखडलेल्या प्रकल्पाचे काम सुरू व्हावे, यासाठी गेल्या महिन्यात बापट यांनी पालिकेतील अधिकारी, स्थानिक शेतकरी, जिल्हाप्रशासनातील अधिकारी, आमदार सुरेश गोरे, पाटबंधारे विभागाचे अधिकारी यांची बैठक घेतली होती. या बैठकीत भामा आसखेड प्रकल्पातील अशा १३०३ प्रकल्पग्रस्तांना विशेष बाब म्हणून आर्थिक मदत करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानंतर रखडलेले हे काम सुरू होइल असा विश्वास व्यक्त केला जात होता. मात्र, महिना उलटूनही काम सुरू झालेले नाही. बापट यांनी प्रकल्पग्रस्तांना आर्थिक मदत करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, ही मदत नक्की कोण करणार याचा कोणताही ठोस निर्णय झालेला नाही.
..
आर्थिक मदतीबाबत संभ्रमच
जिल्हाप्रशासन किती टक्के आर्थिक भार उचलणार, महापालिका प्रशासन किती मदत करणार यावर एकमत न झाल्याने स्थानिक नागरिक प्रकल्पाचे काम सुरू करण्यास विरोध करत असल्याचे पालिकेतील अधिकाऱ्यांनी सांगितले. प्रकल्पग्रस्तांना केल्या जाणाऱ्या आर्थिक मदतीमध्ये जिल्हा प्रशासन, पालिका प्रशासनाचा वाटा किती यावर शिक्कामोर्तब होणार नाही तोपर्यंत काम सुरू होण्यास अडचण होणार असल्याचे पालिकेतील अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.
..
भामा आसखेडचा प्रश्न पालिका निवडणुकीपूर्वी मार्गी लागावा अशी इच्छा पालकमंत्री गिरीश बापट यांची दिसत नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर झालेल्या चर्चेत प्रकल्पग्रस्तांना आर्थिक मदत देण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाने तातडीने माहिती सरकारकडे पाठवावी, अशा सूचना देण्यात आल्या होत्या. या प्रकल्पाचे श्रेय मिळावे, यासाठी गेल्या महिन्यात बापट यांनी बैठक घेऊन आर्थिक भार उचलण्यास तयार असल्याचे सांगितले. मात्र त्यातील किती भार राज्य सरकार, पिंपरी चिंचवड पालिका आणि पुणे महापालिकेला उचलावा लागणार आहे, हे स्पष्ट केलेले नाही. पालकमंत्र्यांनी आतापर्यंत लक्ष घालून हा प्रश्न मार्गी लावणे गरजेचे होते. प्रकल्पला विलंब होत असल्याने खर्चात देखील वाढ होत आहे. बापट यांच्या हट्टी भूमिकेमुळे या कामाला विलंब होत आहे. राज्य सरकारने पालिकेला त्यांच्या वाट्याचा हिस्सा कळविल्यास आम्ही तो हिस्सा देण्या‌त तयार आहोत.
प्रशांत जगताप, महापौर, पुणे महापालिका

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

​शालेय परिवहन समित्यांची बैठकच नाही

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
शालेय विद्यार्थ्यांची ‘सुरक्षित’ वाहतूक हा अत्यंत जिकिरीचा प्रश्न झाला असतानाच पुणे शहर-जिल्ह्यातील शाळांनी राज्य सरकारच्या आदेशाचे पालन करायचे म्हणून केवळ कागदोपत्री शालेय परिवहन समित्या स्थापन केल्याचेच चित्र आहे. प्रादेशिक परिवहन कार्यालय (आरटीओ) पुणेच्या अखत्यारित येणाऱ्या पुणे शहर तसेच काही तालुक्यांमध्ये ३ हजार २४ शाळांमध्ये समित्यांची स्थापना झाली आहे. शाळा सुरू होऊन तीन महिने उलटून गेले तरी यापैकी कित्येक शाळांमध्ये समितीची अद्याप एकही बैठकच झाली नसल्याचे ‘आरटीओ’च्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी खास ‘मटा’ला सांगितले.
शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक होणाऱ्या शाळांना त्यांच्या शाळेत चालू शैक्षणिक वर्षांसाठी शालेय परिवहन समिती स्थापन करायची होती. त्यानुसार आरटीओ पुणेच्या अखत्यारित येणाऱ्या पुणे शहर तसेच शिरुर, मुळशी, वेल्हा, पुरंदर व भोर या तालुक्यांमध्ये ३ हजार २४ शाळांमध्ये समित्यांची स्थापना करण्यात आली आहे. या समितीमध्ये मुख्याध्यापकांच्या अध्यक्षतेखाली पालक-शिक्षक संघाचा प्रतिनिधी, वाहतूक पोलिस निरीक्षक किंवा पोलिस निरीक्षक, मोटार वाहन निरीक्षक, शिक्षण निरीक्षक, बस कंत्राटदाराचा प्रतिनिधी आणि स्थानिक प्रशासनाचा प्रतिनिधी अशा सदस्यांचा समावेश आहे.
शाळा सुरू झाल्यानंतर साडे तीन महिने उलटून गेल्यानंतर काही शाळांमध्ये या समितींच्या स्थापनेचे काम सुरू आहे, तर काहींनी अद्याप त्यादृष्टीने पावले उचलली नाहीत. पुणे शहर तसेच काही तालुक्यांमध्ये ३ हजार २४ शाळांमध्ये समित्यांची स्थापना कागदोपत्री झाली असली तरी यापैकी काहीच शाळांमध्ये समितीच्या बैठका झाल्या आहेत. त्यामुळे शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षित वाहतुकीबाबत शाळा गांभीर्य नसल्याचेच चित्र आहे. दरम्यान, पिंपरी-चिंचवड उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या कार्यक्षेत्रात पिंपरी-चिंचवड तसेच जुन्नर, खेड, आंबेगाव व मावळ तालुक्यामध्ये शालेय परिवहन २ हजार ८५० समित्या आहेत. तेथे देखील समितीच्या बैठकी झाल्या नसल्याचे चित्र आहे.

अकराशे बस परवान्याशिवाय
पुणे ः शहरातील विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या सुमारे अकराशे स्कूल बस परवान्याशिवाय धावत असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे शालेय वाहतूक धोरणाच्या अंमलबजावणीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
चार हजार ८०४ स्कूल बसची आरटीओकडे नोंद आहे. त्यापैकी तीन हजार ७०३ स्कूल बसचालकांनी आतापर्यंत वाहनांची तपासणी करून, आरटीओकडून विद्यार्थी वाहतुकीचा परवाना घेतला आहे. तर, एक हजार १०१ स्कूल बसची अद्यापही तपासणी झालेली नाही.
पटवर्धन बाग परिसरात गेल्या आठवड्यात स्कूल व्हॅनमधील सीएनजीने पेट घेतल्याची घटना घडली. या घटनेने धोरणाच्या अंमलबजावणीचा अभाव आणि शिक्षण विभाग व परिवहन विभागाचे त्याकडे होणारे दुर्लक्ष अशी चर्चा सुरू झाली आहे. आयुक्तालयाने स्कूल बसची १५ जून २०१६ पर्यंत तपासणी करून, त्यानंतर त्यांना परवाना देणे बंधनकारक केले होते. मात्र, ४८०४ स्कूल बसपैकी फक्त २६५७ बसने तपासणी केली होती. आरटीओद्वारे राहिलेल्या वाहनांवर नोटीस काढण्यात आली होती. तरीही अद्याप १०८९ वाहनांनी तपासणी
केलेली नाही.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


जानकरांचे कार्यालय राष्ट्रवादीने फोडले

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याबद्दल अवमानकारक वक्तव्य केल्याच्या निषेधार्थ राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते आणि राज्याचे पशुसंवर्धन मंत्री महादेव जानकर यांच्या कार्यालयाची राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी मंगळवारी तोडफोड केली. राष्ट्रवादीच्या महिला आघाडीच्या कार्यकर्त्यांनी हिंगणे येथील जानकर यांच्या कार्यालयावर धडक देऊन तोडफोड केली.

भगवानगड येथील कार्यक्रमात बोलताना जानकर यांनी शरद पवार, अजित पवार यांच्याबद्दल अवमानकारक वक्तव्य केले होते. त्यांच्या वक्तव्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादीच्या महिला आघाडीच्या शहराध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्या नेतृत्वाखाली हिंगणे येथील जानकर यांच्या कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले. त्यानंतर त्यांच्या कार्यालयाची तोडफोड करण्यात आली. या वेळी मोठ्या संख्येने पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. ‘जानकर यांची भाषा मंत्रिपदाला शोभेल अशी नाही. अशा पद्धतीने त्यांनी परत वक्तव्य केल्यास त्याला चोख उत्तर दिले जाईल,’ असे चाकणकर यांनी सांगितले. या आंदोलनामध्ये रासपचे प्रदेश सचिव बाळासाहेब कोकरे यांच्या पत्नी आणि मुलाला मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला असून, तशी तक्रार सिंहगड पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे.

जानकर यांनी शरद पवार, अजित पवार यांच्यावर ज्या भाषेत टीका केली, ती राज्याचे सुसंस्कृत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मान्य आहे का याचा खुलासा करावा, अशी मागणी राष्ट्रवादीचे प्रवक्ते अंकुश काकडे यांनी केली आहे. जानकर पुण्यात कधी येतात याची आम्ही वाट पाहत आहोत. त्यांच्या भाषणाचा त्यांना पश्चाताप होईल अशी अद्दल राष्ट्रवादीकडून घडविली जाईल, असा इशाराही काकडे यांनी दिला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

झेंडूच्या फुलांना पावसाचा फटका

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

दसऱ्यासाठी मोठ्या प्रमाणात मागणी असणाऱ्या झेंडूच्या फुलांचा भाव पावसामुळे मंगळवारी उतरल्याचे दिसून आले. मार्केट यार्डातील घाऊक फूल बाजारात झेंडूच्या फुलांना प्रतीकिलो १० ते २० रुपये दर मिळाला. किरकोळ बाजारात झेंडूची १० ते ४० रुपये प्रतीकिलो दराने विक्री झाली.
दसऱ्यानिमित्त शहरात मोठ्या प्रमाणात झेंडूसह शेवंतीच्या फुलांची आवक झाली होती. या दोन्ही फुलांना सर्वत्र चांगली मागणी होती. गेल्या वर्षीच्या तुलनेत झेंडूच्या फुलांसह शेवंतीला चांगला भाव मिळाला. मात्र, दसरा मंगळवारी असल्याने सोमवारी सकाळपासूनच बाजारात फुलांची मोठी आवक झाली. सोमवारी दुपारनंतर झालेल्या पावसामुळे फुले भिजल्याने मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. सोमवारी झेंडूच्या फुलांना एका किलोसाठी ५० ते ८० रुपये दर मिळाला होता. पावसामुळे फुले खराब होण्याच्या भीतीने व्यापारी, शेतकऱ्यांनी १५ ते ४० रुपये दराने फुलांची विक्री केली.
मंगळवारी मार्केट यार्डात झेंडूच्या फुलांची सुमारे पाचशे टन आवक झाली. पावसामुळे भिजलेल्या फुलांचे प्रमाण अधिक होते. त्यामुळे झेंडूला सकाळी प्रतीकिलो १० ते २० रुपये दर मिळाला. सजावटीसाठी कट फ्लॉवरच्या फुलांनाही मागणी होती. अॅस्टरच्या फुलांना शेकडा १० ते २० रुपये दर मिळाला. एक किलो शेवंतीला १८० ते २०० रुपये तर, बिजलीला १०० ते १२० रुपये दर मिळाला. गुलाबाच्या गड्डीला २० ते ५० रुपये दर मिळाला.
‘ग्राहकांनी दसऱ्यासाठी फुलांची खरेदी सोमवारी केली. दोन दिवसांच्या तुलनेत मंगऴवारी फुलांची आवक कमी होती. पावसामुळे झेंडूला १० ते २० रुपये भाव मिळाला. चांगल्या फुलांना चांगलाचा भाव मिळाला; मात्र भिजलेल्या फुलांना कमी भाव मिळाला. आणखी काही दिवस झेंडूच्या फुलांचे दर खालीच राहण्याची शक्यता आहे. दिवाळीत झेंडूला पुन्हा भाव येईल,’ अशी माहिती फुलांचे व्यापारी सागर भोसले यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘आयाराम’मुळे भाजपमध्ये अंतर्गत संघर्ष

$
0
0

मुख्यमंत्री व प्रदेशाध्यक्षांना भावना कळविणार
म. टा. प्रतिनिधी, पुणे
महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ‘आयारामां’च्या भरतीमुळे भारतीय जनता पक्षामध्ये अंतर्गत संघर्ष सुरू झाला आहे. पक्षामध्ये त्यागाची परंपरा असली तरी महापालिका निवडणुकीत ‘आयारामां’साठी निष्ठावंतांना त्याग करायला लावू नका, अशा भावना कार्यकर्त्यांकडून बोलून दाखविल्या जात आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या करिष्म्यामुळे भाजपला ‘अच्छे दिन’ आले आहेत. लोकसभा व विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपने मुसंडी मारली. महापालिका निवडणुकीमध्येही भाजपची घोडदौड कायम राहणार असल्याची चर्चा आहे. त्यामुळे पालिका निवडणुकीतील उमेदवारीसाठी भाजपमध्ये प्रवेश करू इच्छिणाऱ्यांची संख्या वाढली आहे.
पक्षामध्ये नव्याने कार्यरत झालेले राज्यसभेचे खासदार संजय काकडे यांनी अन्य पक्षातील नगरसेवक तसेच कार्यकर्त्यांना भाजपमध्ये प्रवेश देण्याचा सपाटा लावला आहे. शहर भाजपमधील पदाधिकाऱ्यांना विश्वासात न घेता हे प्रवेश होत असल्याने पक्षामध्ये संघर्ष वाढला आहे. काकडे यांचा वाढता प्रभाव भविष्यात अडचणीचा ठरू शकतो असा पक्षातील जाणत्या मंडळींचा होरा आहे. त्यामुळे काकडे यांच्या कृतीला आतापासूनच अटकाव घालण्याचे प्रयत्न सुरू आहेत. काकडे यांना शह देण्यासाठी शहर भाजपचे काही वरिष्ठ पदाधिकारीही अन्य पक्षातील मंडळींना हेरून पक्षप्रवेशाची तयारी करीत आहेत.
महाराष्ट्र नवनिर्माण सेना, राष्ट्रवादी काँग्रेस तसेच काँग्रेसमधील ‘माननीयांना’ भाजपमध्ये प्रवेश देण्याची सध्या चढाओढ सुरू असल्याने पक्षातील निष्ठावंतांमध्ये नाराजीचा सूर आहे. पक्षाला वाईट दिवस असताना कित्येक वर्षे अहोरात्र कष्ट करून पक्ष वाढविण्याचे काम केले. आता पक्षाला अच्छे दिन आले आहेत. अशा काळात जुन्या व निष्ठावंत कार्यकर्त्यांना लढण्याची संधी दिली पाहिजे. परंतु त्यांना दूर करून ‘आयारामां’ना उमेदवारीचे शब्द दिले जात आहेत याबद्दलही कार्यकर्त्यांमध्ये संतापाची भावना आहे.
केंद्रामध्ये अटलबिहारी वाजपेयी यांचे सरकार आणण्यासाठी पुण्यातून सुरेश कलमाडी यांना भाजपची उमेदवारी देण्यात आली होती. त्या वेळी ‘त्यागा’चा संदेश देण्यात आला होता. परंतु त्यानंतर काय घडले याची कल्पना पक्षाला आहे. त्यामुळे आता ‘आयारामां’साठी निष्ठावंतांना त्याग करायला लावू नका, अशा भावना कार्यकर्ते बोलून दाखवित आहेत. या भावना मुख्यमंत्र्यांपासून प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्यापर्यंत पोहोचविण्याची तयारी काही निष्ठावंतांनी केली आहे. त्यासाठी निष्ठावंत मंडळी लवकरच त्यांची भेट घेणार आहेत.
.....
नेत्यांची आयात नको
अनेक वर्षांच्या प्रयत्नांनंतर पक्षाच्या एकनिष्ठ कार्यकर्त्यांच्या बळावर केंद्र व राज्यात भाजपची सत्ता आली आहे. आता महापालिकेची निवडणूक आल्याने अन्य पक्षातील उमेवारांना भाजपमध्ये प्रवेश देण्याची चढाओढ सुरू झाली आहे. हा दुर्दैवी प्रकार असून ही ‘आयातगिरी’ बंद करावी, अशी मागणी अखिल भारतीय खान्देश युवा विचार मंचचे सचिन पाटील, विनायक ठाकरे, दीपक परदेशी, राजेंद्र पाटील, मनोज पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व पालकमंत्री गिरीश बापट यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दसऱ्यादिवशी अडीचशे टन चिकन फस्त

$
0
0

मंगळवारी सायंकाळपासून हॉटेलमध्ये खवय्यांची गर्दी

म. टा. प्रतिनिधी, पुणे

पितृ पंधरवड्यापाठोपाठ नवरात्रोत्सव सुरू झाल्याने मांसाहारावर बंधन आले होते. मात्र, ही उणीव भरून काढत पुणेकरांनी दसऱ्याच्या दिवशी अडीचशे टन चिकन आणि सातशे किलो मटण फस्त केले. मंगळवारी सायंकाळपासूनच चिकन, मटणाच्या दुकानात आणि हॉटेलात ग्राहकांनी रांगा लावल्याचे दिसून आले. चिकनच्या तुलनेत मटणाला मागणी कमी असल्याचे दिसून आले.
नऊ दिवस देवीच्या पूजनामुळे मांसाहार केला जात नाही. दसऱ्याच्या दुसऱ्या दिवसापासून चिकन, मटण, मासळीला खवय्यांची मागणी असते. या पार्श्वभूमीवर, पुणेकरांनी मंगळवारी दुपारपासून खरेदीसाठी दुकानांसमोर गर्दी केली होती. अचानकपणे मंगळवारी ग्राहकांची मागणी वाढल्याने दुकानदारांची पंचाईत झाल्याचे दिसून आले.

‘दसऱ्याच्या दिवशी अचानकपणे चिकन, मटणाची मागणी वाढली. मंगळवारी दुपारनंतर हॉटेल, चायनीज विक्रेत्यांसह घरगुती ग्राहकांकडून मोठ्या प्रमाणात मागणी नोंदविली गेली. मटणाला मागणी कमी असल्याने दिवसभरात २०० ते २५० टन चिकनची शहरात विक्री झाली. गेल्या वर्षी दसऱ्याच्या दिवशी शहरात १०० ते १५० टन चिकनविक्री झाली होती. यंदा अचानक मागणी वाढल्याने मागणीच्या तुलनेत पुरवठा कमी झाला,’ अशी माहिती चिकनचे व्यापारी रुपेश परदेशी यांनी दिली. एक किलो चिकनसाठी ग्राहकांना १४० रुपये मोजावे लागले. तर, लेगपीस, जिवंत कोंबडी आणि बोनलेस चिकनला अनुक्रमे १७०, ११० आणि २४० रुपये भाव मिळाला.

‘मांसाहार करताना चिकनला पसंती दाखविणाऱ्या खवय्ये मटणाची मोठी मागणी नोंदवितात. परंतु, अनेक वर्षांपासून मटणाचे वाढणारे दर, बोकडाच्या उपलब्धतेचे प्रमाण पाहता चिकनला अधिक मागणी निर्माण होत आहे. तरीही काही प्रमाणात मटणला मागणी होती. चाकण आणि अकलूज येथून मोठ्या प्रमाणात बकऱ्यांची आवक झाली. गेल्या वर्षीच्या तुलनेत मटणाला यंदा मागणी कमीच होती. त्यामुळे सातशे किलो मटणाची विक्री झाली,’ अशी माहिती मटण व्यापारी संघटनेचे अध्यक्ष प्रभाकर कांबळे यांनी दिली. बोकडासह बोल्हाईच्या मटणाला एका किलोसाठी ४४० रुपये दर मिळाला. खिम्याला ४४० रुपये तर, कलेजीसाठी ४६० रुपये मोजावे लागले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महाराष्ट्र एक्स्प्रेसचे २ डबे घसरले

$
0
0

मटा ऑनलाइन वृत्त । पुणे

महाराष्ट्र एक्स्प्रेसचे दोन डबे पुणे रेल्वे स्थानकातल्या फलाट क्र. १ जवळ रुळावरून घसरले. ११ वाजून ४५ मिनिटांच्या दरम्यान ही घटना घडली. कोणीही जखमी झालेले नाही.

रेल्वे प्रशासनाने घसरलेले डबे हटवण्याचे काम सुरू केले असून दोन नवे डबे गाडीला लवकरच जोडण्यात येतील. तोपर्यंत फलाट क्र. १ कार्यरत राहणार नाही. या फलाटावरील रेल्वेसेवा सुरळीत होण्यासाठी आणखी किमान दोन तास लागणार असल्याची माहिती रेल्वे प्रशासनाने दिली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images