Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

खासगी उड्डाणांवर पुण्यात निर्बंध

$
0
0

‘हाय अलर्ट’च्या पार्श्वभूमीवर हवाई दलाचा आदेश

Prasad.Panse@timesgroup.com

Tweet@prasadpanseMT

पुणे : संभाव्य धोका टाळण्यासाठी पुण्याच्या हवाई हद्दीतील खासगी उड्डाणांवर निर्बंध घालण्यात आले असून, लोहगाव विमानतळाच्या हवाई वाहतूक नियंत्रकाच्या (एटीसी) परवानगीशिवाय कोणत्याही प्रकारचे विमान, हेलिकॉप्टर, ग्लायडर, पॅराग्लायडर आदींचे उड्डाण करता येणार नाही. परवानगीशिवाय उड्डाण केल्यास तो हवाई तळाला धोका समजून त्याला तातडीने गंभीर उत्तर दिले जाईल, असा इशारा हवाई दलातर्फे देण्यात आला आहे.

हवाई दलाच्या लोहगाव येथील तळाच्या प्रमुखांच्या वतीने वरिष्ठ नियंत्रण अधिकाऱ्यांनी याबाबतचा आदेश जारी केला असून, त्याची प्रत ‘महाराष्ट्र टाइम्स’ला उपलब्ध झाली आहे. लोहगावचा तळ हा हवाई दलाच्या प्रमुख तळांपैकी एक आहे. तेथून देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय नागरी उड्डाणेही होत असतात. त्यामुळे येथे हवाई दलाच्या अत्याधुनिक विमानांसोबतच नागरी वाहतूक कंपन्यांची विमानेही उभी असतात. उरी येथील दहशतवादी हल्ला आणि त्यापाठोपाठ पाकव्याप्त काश्मीरमध्ये झालेल्या सर्जिकल स्ट्राइकनंतर देशभरातील लष्करी संस्थांना हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर लोहगाव हवाई तळाबाबत आदेश देण्यात आला आहे. उड्डाणासाठी ठरवून दिलेला मार्ग व अन्य निकषांचेही काटेकोर पालन करण्याचा इशाराही देण्यात आला आहे.

‘यापुढे परवानगीशिवाय कोणतेही उड्डाण केल्यास किंवा ठरवून दिलेल्या मार्गाशिवाय हवाई तळाच्या जवळपास उड्डाण केल्यास तो हवाई तळाला धोका समजण्यात येईल. त्याचबरोबर तातडीने गंभीर पावलेही उचलण्यात येतील,’ असे या आदेशात म्हटले आहे. शिर्डी विमानतळ, हडपसर येथील ग्लायडिंग सेंटर यांसह या परिसरात अनेक बड्या उद्योजकांची खासगी हेलिपॅड आहेत. त्यावरून नियमित उड्डाणे सुरू असतात. या सर्व हेलिपॅड किंवा विमानतळांच्या, तसेच फ्लाइंग क्लबच्या व्यवस्थापकांना या आदेशाची माहिती देण्यात आली आहे.

ड्रोनवर बंदी

गेल्या काही दिवसात राजस्थान आणि पंजाबच्या पाकिस्तानलगतच्या सीमेकडील भागात काही फुगे आढळले होते. तसेच मुंबईच्या आकाशातही काही दिवसांपू्र्वी संदिग्ध फुगे दिसल्याची तक्रार वैमानिकाने केली होती. त्या पार्श्वभूमीवर मुंबईत ड्रोन, पॅराग्लायडिंग आणि रिमोटने चालणारी हलकी किंवा खेळण्यातली विमाने उडविण्यास बंदी घालण्यात आली आहे. त्याचे उल्लंघन केल्यास गुन्हा दाखल केला जाईल, असा आदेश मुंबई पोलिसांनी काढला आहे. त्या पार्श्वभूमीवर हवाई दलाच्या पुण्यातील तळातर्फेही असे आदेश काढण्यात आले आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


पुण्यात पवारांच्या फोटोवर शाई फेकण्याचा प्रयत्न

$
0
0

मटा ऑनलाइन वृत्त | पुणे

पुण्यातील विद्या प्रतिष्ठानच्या बारामती हॉस्टेलमध्ये काही युवकांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या प्रतिमेवर शाई फेकण्याचा प्रयत्न केला. दुग्धविकास मंत्री महादेव जानकर यांच्या हिंगणे येथील कार्यालयाची मोडतोड केल्याच्या निषेधार्थ राष्ट्रीय समजा पक्षाच्या कार्यकर्त्यांनी शाई फेकण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतले आहे.

बुधवारी दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास राष्ट्रीय समाज पक्षाचे काही कार्यकर्त्यांनी बारामती होस्टेलमध्ये शिरले. त्यांनी होस्टेलच्या आतल्या बाजूला असलेल्या शरद पवार यांच्या फोटोवर शाई फेकण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी तिथे उपस्थित असलेल्या हॉस्टेलच्या विद्यार्थ्यांनी या युवकांना रोखले. ही घटना समजताच जनवाडी पोलीस चौकीतील पोलिसांनी तेथे येऊन उमेश कोकरे, विजय भोसले आणि नितीन काळे यांना ताब्यात घेतले. याप्रकरणी बारामती होस्टेलचे सुपरिटेंड शिवाजी काळे यांनी फिर्याद दिली आहे. दरम्यान, या घटनेनंतर जनवाडी पोलीस चौकीसमोर राष्ट्रीय समाज पक्ष व राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची झाली. पोलिसांनी हस्तक्षेप करून कार्यकर्त्यांना शांत केले.

भगवानगडाच्या पायथ्यावरून केलेल्या भाषणात महादेव जानकर यांनी शरद पवार आणि अजित पवार यांच्यावर टीका केली होती. त्यामुळे चिडलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी जानकर यांच्या हिंगणे येथील कार्यालयाची तोडफोड केली होती.

महादेव जानकरांना बडतर्फ करा- धनंजय मुंडे

महादेव जानकर यांना बडतर्फ करा, अशी मागणी विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केली आहे. यासंदर्भात राज्यपालांना पत्र लिहिणार असल्याचं धनंजय मुंडे यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वाळू लिलावातून कोटीच्या कोटी उड्डाणे

$
0
0

येत्या २७ ऑक्टोबरला लिलाव
म. टा. प्रतिनिधी, पुणे
ग्रामीण भागातील पंधरा वाळू ठिकाणांचे लिलाव ‘ई-निविदा’ व ‘ई-ऑक्शन’ पद्धतीने करण्यात येणार असून त्यासाठी ठेकेदारांना ऑनलाइन नोंदणी करावी लागणार आहे. या लिलावामध्ये भाग घेणाऱ्या ठेकेदेरांना वाळू लिलावाच्या रकमेच्या वीस टक्के रक्कम अनामत म्हणून भरावी लागणार आहे.
या लिलावामध्ये सहभाग घेण्यासाठी २० ऑक्टोबरपर्यंत रजिस्ट्रेशन करणे आवश्यक आहे. ही नोंदणी झाल्यावर २७ ऑक्टोबर रोजी होणाऱ्या ई-निविदा व ई-ऑक्शनमध्ये सहभाग घेता येणार आहे. या लिलावाला पर्यावरण आघात मूल्यांकन समितीने मान्यता दिली आहे. यामध्ये दौंड तालक्यातील मलठण, वाटलूज, नायगाव, पेडगाव, राजेगाव, मिरवडी, दहिटणे, खामगाव, बाभुळसर तसेच शिरूर तालुक्यातील आपटी, खेड तालुक्यामधील पांगारी, सिद्धेगव्हाण, कोयाळीतर्फे चाकण आणि हवेली तालुक्यातील बिवरी व तुळापूर या गावांतील ठिकाणांचा समावेश आहे.
या वाळू ठिकाणांच्या लिलावाद्वारे ३६ कोटी रुपये उत्पन्न अपेक्षित आहे. या लिलावातील प्रत्येक वाळू गटासाठी स्वतंत्र फॉर्म फी व प्रक्रिया शुल्क भरावे लागणार आहे. लिलावाची अपसेट प्राइज दहा लाख रुपये असल्यास साडेतीन हजार रुपये व दहा लाख रुपयांपेक्षा अधिक असल्यास यापेक्षा दुप्पट रक्कम भरावी लागणार आहे. वाळूचा लिलाव निश्चित झाल्यानंतर संबंधित खरेदीदाराला लिलावाची २५ टक्के रक्कम तत्काळ भरावी लागणार आहे. त्यानंतर लिलावाला मंजुरी मिळाल्यावर १५ दिवसांत उर्वरित रक्कम भरावी लागणार आहे.
गेल्या काही वर्षांत वाळूच्या चोरीचे प्रमाण वाढले आहे. वाळूमाफियांना रोखण्यासाठी धडक कारवाई करण्याचे आदेश थेट मुख्यमंत्र्यांनी दिली होते. त्यानंतर प्रशासनाने वाळूमाफियांच्या मुसक्या आवळल्या. वाळूचोरी रोखण्यासाठी प्रशासनाने नाकाबंदी करण्यापासून तपासणी पथके स्थापन करण्यापर्यंत उपाययोजना केली. त्यामुळे वाळूचोरीचे प्रमाण कमी झाले आहे. वाळूचे लिलाव लवकर झाल्यास चोरीचे प्रमाण कमी होते असा अनुभव असल्याने प्रशासनाने यंदा ऑक्टोबरमध्येच लिलाव पुकारले आहेत. त्यातून प्रशासनाला कोट्यवधींचे महसुली उत्पन्न मिळणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

स्वारगेटला एसटीचे सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल?

$
0
0

एसटी कर्मचाऱ्यांबरोबरच पुणेकरांना मिळणार लाभ
म. टा. प्रतिनिधी, पुणे
राज्य मार्ग परिवहन महामंडळाकडून उभारण्यात येणाऱ्या पहिल्या सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलसाठी स्वारगेट येथील जागा निश्चित करण्यात आली आहे. हॉस्पिटल उभारणीच्या अंतिम मान्यतेसाठी राज्य सरकारकडे प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. सरकारने हिरवा कंदील दाखविल्यानंतर प्रत्यक्ष कामास सुरुवात होणार आहे.
काही महिन्यांपूर्वी एसटी महामंडळाने अद्ययावत सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल उभारण्याची घोषणा काही महिन्यांपूर्वी केली होती. त्या पार्श्वभूमीवर हॉस्पिटल उभारणीचे कामकाज सुरू करण्यासाठी महामंडळाकडून प्रयत्न सुरू झाले आहेत. महामंडळाने स्वारगेट आगाराच्या मागे असलेल्या एसटी कार्यशाळेच्या जागेत हॉस्पिटल उभारण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या दोन वर्षात हे हॉस्पिटल उभारले जाणार असून, ते शंभर बेडचे असणार आहे. या हॉस्पिटलचा लाभ एसटीच्या कर्मचाऱ्यांबरोबरच सामान्य नागरिकांनाही होणार आहे, अशी माहिती एसटीतील सूत्रांनी दिली.
हॉस्पिटलसाठीच्या जागेचा शोध संपल्यानंतर एसटी महामंडळाने या प्रकल्पासाठी सल्लागाराचीही नियुक्ती करण्यासंबंधी टेंडर प्रक्रियाही पार पाडली आहे. या हॉस्पिटलमधील २५ टक्के बेड एसटी कर्मचारी आणि त्यांच्या नातेवाइकांसाठी राखीव असतील. त्यांना मोफत उपचारही देण्यात येणार आहे. ऑपरेशन थिएटर, पॅथॉलॉजी लॅब, एक्स-रे, स्कॅनिंग मशिन, ओपीडी इत्यादींसह अद्ययावत सेवा हॉस्पिटलमध्ये उपलब्ध करून दिली जाणार आहे. एसटी कर्मचाऱ्यांसाठी राखवी बेड वगळता उर्वरित बेड सामान्य नागरिकांसाठी असतील. हॉस्पिटलसाठी सुमारे पाच कोटींपेक्षा जास्त खर्च अपेक्षित आहे.
...........
मध्यवस्तीसाठी चांगला पर्याय
सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये दिल्या जाणाऱ्या सोयीसुविधा उपलब्ध असलेले ससून हे एकमेव सरकारी हॉस्पिटल आहे. त्यामुळे एसटीच्या हॉस्पिटलमुळे येत्या काळात पुणेकरांना शहराच्या मध्यवस्तीत एक चांगला पर्याय उपलब्ध होणार असून खासगी हॉस्पिटलच्या तुलनेत कमी खर्चात औषधोपचार मिळणार आहे.
............
सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल उभारण्याच्या अंतिम मान्यतेसाठी राज्य सरकारकडे प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. या प्रकल्पाकरीता सल्लागार नेमण्यात येणार आहे. त्यासाठी टेंडर प्रक्रिया राबविली आहे.
- रणजितसिंह देओल, व्यवस्थापकीय संचालक व उपाध्यक्ष, एसटी महामंडळ

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पुण्यात महिलांसाठी१३ नोव्हेंबरला मॅरेथॉन

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
महिलांच्या आरोग्याबाबत जनजागृती व्हावी तसेच सक्षमीकरणासाठी ‘पिंकेथॉन’च्या वतीने येत्या १३ नोव्हेंबरला मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले आहे. पुण्यातील पाषाण येथील आयआयएसईआर मैदानात ही मॅरेथॉन होणार असून त्यात ३, १० आणि २१ किलोमीटर लांब अंतरासाठी ही मॅरेथॉन होणार आहे.
‘पिंकेथॉन’चे संस्थापक मिलिंद सोमण यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. मॅरेथॉनला अभिनेत्री सई ताम्हणकर, प्रिया बापट यांनी पाठिंबा दर्शविला आहे. ‘देशातील स्त्रियांना सक्षम करणे आणि त्यांना समाजापुढे नेण्यासाठी पिंकेथॉन ही चळवळ आहे. या चळवळीच्या माध्यमातून देशातील विविध शहरांत मॅरेथॉनचे आयोजन केले जाते. महिलांनी स्वतःच्या आरोग्य लक्ष देणे, स्वतःचा आदर करणे, स्वतःला समजून घेणे आणि आपल्यामुळे घर व समाजात रुजणाऱ्या नीतीमूल्यांचा उत्सव साजरा करणे, हा त्यामागे उद्देश आहे. महिलांमध्ये स्वतःच्या आरोग्य आणि व्यायामाबाबत जागृती निर्माण व्हावी हा मूळ हेतू आहे,’ अशी माहिती मिलिंद सोमण यांनी दिली.
या मॅरेथॉनमध्ये कॅन्सरविरोधात लढणारे पेशंट देखील धावणार आहेत. त्यांच्या या धाडसाबद्दल त्यांना गौरविले जाणार आहे. पिंकेथॉनमध्ये २० नेत्रहीन मुली आणि २० कर्णबधीर मुलीही वेगळ्या विभागात धावणार आहेत. या मॅरेथॉनमध्ये सुमारे सात हजार महिला सहभागी होणार आहेत. इच्छुकांना www.pinkathon.in यावर ऑनलाइन नोंदणी करता येणार आहे. तसेच ‘२१ किमी रन’साठी info@pinkathon.in वर मेल पाठवावा लागेल, असे आवाहन करण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बीआरटी मार्गाने पिंपरी - पुणे जोडणार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
संगमवाडी-विश्रांतवाडी (आळंदी रोड) आणि नगर रोडवर जलद बस वाहतूक सेवा (बीआरटी) यशस्वीपणे कार्यान्वित केल्यानंतर आता पिंपरी-चिंचवडमधील दोन बीआरटी मार्ग शहराला जोडण्यासाठी पुणे महापालिकेने तयारी सुरू केली आहे. सांगवीपर्यंत येणारा बीआरटी मार्ग औंध-गणेशखिंड रस्त्यामार्गे, तर जुन्या पुणे-मुंबई महामार्गाने बोपोडीपर्यंत येणारा बीआरटी मार्ग वाकडेवाडी, इंजिनीअरिंग कॉलेज चौकामार्गे महापालिका भवनापर्यंत जोडला जाणार आहे. येत्या काही दिवसांत त्यासाठीची टेंडर प्रक्रिया पूर्ण केली जाणार असून, निवडणुकीपूर्वी या रस्त्यांचे काम सुरू केले जाण्याची शक्यता आहे.
महापालिकेने गेल्या वर्षी आळंदी रोड, तर २०१६ मध्ये नगर रोडवरील बीआरटी सुरू केली. बीआरटीसाठी आवश्यक असणाऱ्या अत्याधुनिक बसथांबे, आयटीएमएस प्रणाली अशा सर्व सुविधा कार्यान्वित करण्यात आल्या. नगर रोडवरील बीआरटी सुरू झाल्यानंतर शहरातील बीआरटीचे इतर मार्ग सुरू करण्याच्या दृष्टीने आता महापालिकेने पुढाकार घेतला आहे. पिंपरी-चिंचवड महापालिकेने किवळे ते सांगवी अशी सेवा सुरू केली असून, त्याला उत्तम प्रतिसाद लाभत आहे. हीच सेवा आता पुणे महापालिकेपर्यंत विस्तारण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. सांगवीपासून औंध-गणेशखिंड रोडमार्गे पुणे महापालिकेपर्यंतचे अंतर सुमारे साडेसहा किमी असून, काही ठराविक भाग सोडला तर या भागातील रस्तेही पुरेसे रुंद आहेत. आळंदी आणि नगररोडप्रमाणेच बीआरटीचा मार्ग या रस्त्यावरही मधोमधच असणार आहे.
पिंपरी-चिंचवड महापालिकेतर्फे जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर निगडी ते दापोडी हा बीआरटीचा टप्पा सुरू करण्यासाठी हालचाली सुरू आहेत. हा बीआरटी मार्ग जोडण्यासाठी पुणे महापालिकेनेही तयारी सुरू केली असून, बोपोडी (हॅरिस ब्रिज) ते पुणे महापालिका या सुमारे साडेपाच किमीच्या अंतरावर बीआरटी मार्ग विकसित केला जाणार आहे. या रस्त्यावरही अगदी तुरळक ठिकाणी स्वतंत्र मार्ग कार्यान्वित करण्यात अडचणी उद्भवणार असून, उर्वरित रस्ता पुरेसा रुंद असल्याचा दावा महापालिकेने केला आहे.
महापालिका आयुक्तांनी २०१६-१७ च्या अर्थसंकल्पात नवे ३० किमीचे बीआरटी मार्ग विकसित करण्यासाठी निधीची तरतूद केली होती. त्यातूनच, या दोन्ही रस्त्यांवरील कामे केली जाणार असल्याचे सांगण्यात येत आहे. या दोन्ही रस्त्यांवरील बीआरटीसाठीची टेंडर प्रक्रिया लवकरच सुरू केली जाणार असल्याचे संकेत देण्यात आले. ही सर्व प्रक्रिया पूर्ण होऊन निवडणुकीपूर्वी प्रत्यक्षात हे काम सुरू करण्याचे महापालिकेचे नियोजन आहे.
..................
० किवळे ते सांगवी : १४ किमी
० सांगवी ते पुणे महापालिका : ६.५ किमी
० जुना पुणे-मुंबई महामार्ग : १२ किमी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

किरकोळ कारणावरून तरुणाचा खून

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
‘आमच्या दुचाकीवर का बसला, दुचाकीचा प्लग का काढला,’ या किरकोळ कारणावरून १९ वर्षांच्या तरुणाच्या डोक्यात सिमेंट ब्लॉक घालून त्याचा खून केल्याची घटना बुधवारी मध्यरात्री हिंगणे येथे घडली. सिंहगड पोलिसांनी या प्रकरणी चार आरोपींविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला असून त्यांचा शोध सुरू आहे.
संदीप लक्ष्मण निंगुळे (१९, रा. कुमार प्रतीक हाइट्स समोर, आनंदनगर, मूळ रा. रोशनपुरी, ता. माजलगाव, जि. बीड) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. या प्रकरणी रवी कांबळे, विकी आखाडे, विजय देवरेकर, योगेश कांबळे यांचा शोध घेण्यात येत आहे. संदीपचा भाऊ संजय लक्ष्मण निंगुळे (२१) याने दिलेल्या तक्रारीनुसार खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
संदीप ‘महावितरण’मधील एका व्यक्तीकडे चालक म्हणून नोकरी करत होता. तो मंगळवारी सायंकाळी दांडिया बघायला जातो, म्हणून घरातून बाहेर पडला होता. तक्रारदार संजय याचा मित्र रमेश कोंदरे याने संजय यांना मंगळवारी सायंकाळी सातच्या सुमारास फोन केला होता. या वेळी संशयित आरोपी विकी आखाडे आणि इतरांचे आपल्याशी वाद सुरू आहेत, अशी माहिती संदीपने कोंदरे यांना दिली. संजय आणि कोंदरे हे तत्काळ सनसिटी रोड येथे पोहोचले होते, आणि त्यांनी त्यांच्यातील भांडणे मिटवली होती. संजय संदीपला घेऊन घरी आले होते. त्यानंतर संजय हे नोकरीनिमित्ताने रात्री घराबाहेर पडले होते. संदीप नेहमीप्रमाणे मंगळवारी रात्री घरी झोपला होता.
मध्यरात्रीच्या सुमारास आरोपींनी संदीपला घरातून बाहेर बोलावले. त्याला ते​ हिंगणे येथील महादेव नगर येथे घेऊन गेले. या वेळी त्यांनी ​संदीपच्या डोक्यात सिमेंट ब्लॉक टाकून त्याचा खून केला. त्याचा मृतदेह फरफटत नेल्याचे खुणा घटनास्थळी दिसत आहेत. मॉर्निंक वॉकला निघालेल्या व्यक्तींना संदीपचा मृतदेह दिसल्यावर त्यांनी तत्काळ पोलिसांना ही माहिती दिली होती. ही घटना कोंदरे यांना समजल्यानंतर त्यांनी संजय याला घटनेची माहिती दिली, असे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
...
संदीपचे रात्री दोन मिस्ड कॉल
संदीप रात्री घरातून बाहेर पडल्याचे त्याच्या आई-वडील, भावाला माहिती नव्हते. संदीपने रात्री दोनच्या सुमारास कोंदरे यांना दोन केले होते. मात्र, कोंदरे यांना फोन आल्याचे न समजल्याने ते ‘मिस्ड’ झाले. संदीपने नेमका कशाला फोन केला होता. आरोपी आणि संदीपमध्ये नेमके काय घडले, याचा तपास सिंहगड पोलिसांकडून सुरू आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सहा जणांना जामीन

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
भगवानगड येथील कार्यक्रमामध्ये राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते आणि पशुसंवर्धन मंत्री महादेव जानकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी हिंगणे येथील महादेव जानकर यांच्या कार्यालयाची मंगळवारी तोडफोड केल्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या सहाजणांची बुधवारी कोर्टात जामिनावर सुटका करण्यात आली.
मंगळवारी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास तोडफोड करण्यात आली होती. जानकर यांनी शरद पवार, अजित पवार यांच्याबद्दल आक्रमक भाषेत टीका केली. त्यांच्या या वक्तव्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या शहराध्यक्ष रूपाली चाकणकर व इतर कार्यकर्त्यांनी हिंगणे येथील रोकडोबा मंदिराजवळच्या जानकर यांच्या कार्यालयाची तोडफोड केली. जानकर यांच्या कार्यालयाचे शटर बंद होते. कार्यालयाच्या फलकाची मोडतोड करण्यात आली.
या प्रकरणी बाळासाहेब कोंडीबा कोकरे (४३, रा. हिंगणे खुर्द) यांनी सिंहगड पोलिस स्टेशनमध्ये फिर्याद दाखल केली आहे. या प्रकरणी विकी दत्तात्रय महापुरे (२१, रा. पानमळा वसाहत, सिंहगड रोड), अमित चंद्रकांत तागडे (२३, रा. सिंहगड रोड), अविनाश शिवाजी ठोंबरे (२० रा. धायरी), अजय जयसिंग गजघाटे (२३, रा. तुकाईनगर, वडगाव बुद्रूक), ताजुदिन बशीर बरुडे (२० रा. कर्वेनगर), हर्षद बाळासाहेब जगताप (२७ रा. हिंगणे खुर्द) यांना अटक करुन कोर्टात हजर करण्यात आले होते. कोर्टाने त्यांची साडेसात हजार रुपयांच्या जामिनावर सुटका केली. त्यांच्यातर्फे अॅड. राजेंद्र सोनावळे, ए. पी. मालवीय यांनी काम पाहिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


जानकरांच्या पुतळ्याचे दहन

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पिंपरी
राज्याचे दुग्धविकास मंत्री महादेव जानकर यांनी राष्ट्रवादीचे नेते व माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केल्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेसने बुधवारी पिंपरी चौकात आंदोलन केले. या वेळी कार्यकर्त्यांनी जानकर यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन केले. तसेच आज, गुरुवारी जानकर रहाटणी येथे येणार असून या वेळी त्यांना काळे फासण्याचा इशारा राष्ट्रवादीने दिला आहे.

राष्ट्रवादीचे शहाराध्यक्ष संजोग वाघेरे, उपमाहपौर प्रभाकर वाघेरे, आझम पानसरे, नगरसेविका सुजाता पालांडे, अमिना पानसरे, नगरसेवक गोरक्ष लोखंडे, नाना काटे, फजल शेख, आनंदा यादव या आंदोलनात सहभागी झाले होते.

संजोग वाघेरे म्हणाले, ‘जानकर यांनी त्यांचे वक्तव्य मागे घ्यावे आणि जाहीर माफी मागावी. तसे झाले नाही, तर त्यांच्याविरुद्ध आणखी तीव्र निषेध केला जाईल. जानकर शहरामध्ये आल्यास त्यांच्या तोंडाला काळे फासले जाईल.’ या वेळी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी जानकर यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला चपलांचा हार घालून त्याचे दहन केले. जानकरांच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली.

पोलिसांनी संजोग वाघेरे यांना प्रतिबंधात्मक कारवाई म्हणून नोटीस बाजविली आहे. तसेच कायदा-सुव्यवस्था बिघडेल असे कृत्य करू नये, असे सांगितले आहे. राष्ट्रवादीचा विरोध आणि रासपचा कार्यक्रम या पार्श्वभूमीवर रहाटणी परिसरात गुरुवारी मोठा पोलिस बंदोबस्त तैनात असणार आहे.‍ दरम्यान, मंत्री महादेव जानकर यांनी पदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी राष्ट्रीय श्रमिक आघाडीचे अध्यक्ष यशवंत भोसले यांनी केली आहे.

जानकर आज रहाटणीत

राष्ट्रीय समाज पक्षातर्फे रहाटणी येथील थोपटे लॉन्समध्ये गुरुवारी सकाळी विभागीय कार्यकर्ता शिबिराचे आयोजन केले आहे. त्यामध्ये महादेव जानकर यांच्यासह राष्ट्रीय सचिव दशरथ राऊत, प्रदेश सचिव बाळासाहेब दोडतले, पश्चिम महाराष्ट्र विभागाचे अध्यक्ष प्रा. माणिक पाटील आदी उपस्थितांशी संवाद साधणार आहेत. या वेळी पश्चिम महाराष्ट्रातील सुमारे दोन हजार पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी होणार आहेत. आगामी निवडणुकीच्या दृष्टीने महापालिका, जिल्हा परिषद, नगरपरिषद याबाबत शिबिरात मार्गदर्शन करण्यात येणार आहे. या वेळी राष्ट्रवादी काँग्रेसकडून जानकरांचा निषेध नोंदविण्यात येणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ओंकारेश्वर मंदिराला मिळणार पेशवेकालीन रूप

$
0
0



म. टा. प्रतिनिधी, पुणे
पेशवेकालीन पहिले मंदिर असलेल्या ओंकारेश्वर मंदिराला पेशवेकालीन वैभव प्राप्त होणार आहे. देवस्थान ट्रस्टने मंदिराच्या स्वरुपाबरहुकूम दुरुस्तीचे काम हाती घेतले आहे. मंदिराला पेशवेकालीन रंगयोजनेत रंगविण्यात येणार आहे. मंदिरावर तेरा कळस असून, कळसांना सोन्याचा मुलामा चढवण्याचे काम सुरू आहे.
ओंकारेश्वर मंदिराला २८० वर्षे पूर्ण झाली आहेत. मंदिराची उभारणी पेशव्यांचे अध्यात्मिक गुरू वेदमूर्ती शिवराम भट चित्राव यांनी केली. मंदिरातील शिवलिंगाची पिंड नर्मदेहून पाचशे रुपयांस आणण्यात आला. पिंडीची प्राणप्रतिष्ठा १७३६ मध्ये करण्यात आली. मंदिराच्या बांधकामास तेव्हा एक लाख दहा हजार रुपये खर्च आला होता. पेशवाईतील ओंकारेश्वर मंदिर हे पहिले बांधले गेले. त्यानंतर पर्वती, सारसबाग, शनिवारवाडा व नाशिकच्या काळाराम मंदिर या वास्तूंची निर्मिती करण्यात आली. ऐतिहासिक दृष्ट्या असलेले हे महत्त्व लक्षात घेऊन राज्य सरकारने मंदिरास वारसा म्हणून ‘अ’ श्रेणी; तर पर्यटन केंद्र म्हणून ‘क’ श्रेणी दिली आहे. यातून उपलब्ध झालेल्या निधीतून विविध कामे केली जात आहेत.
‘वारसा दर्जा श्रेणीतून सरकारकडून ३० लाखांचा निधी मंजूर झाला आहे. त्या माध्यमातून कामे सुरू आहेत. मंदिर परिसरात नवीन बांधकाम करता येणार नाही. दगडांना रंगवता येणार नाही. ही काळजी घेऊन तसेच पेशवेकाळात वापरल्या गेलेल्या वस्तूंचा आधार घेऊन सुशोभिकरण करण्यात येत आहे. आगामी महाशिवरात्रीपर्यंत काम पूर्ण करण्याचा प्रयत्न आहे,’ अशी माहिती देवस्थानचे कार्यकारी विश्वस्त धनोत्तम लोणकर यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिली. ‘ओंकारेश्वर मंदिर शहरातील आकर्षणाचे ठिकाण ठरावे, असा आमचा प्रयत्न आहे. नागरिकांचा वारसा स्थळांकडे कल वाढत आहे. मंदिर परिसरात असलेल्या चिमाजी अप्पांच्या समाधीचे सुशोभिकरण करण्यात आले आहे,’ असे लोणकर यांनी सांगितले. देवस्थानचे सल्लागार शैलेश टिळक, रवी देशपांडे व व्यवस्थापक शरद जोशी या वेळी उपस्थित होते.

आजपासून वर्धापनदिन महोत्सव
मंदिराला २८० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त वर्धापनदिन महोत्सव १३ ते १५ ऑक्टोबर या कालावधीत रंगणार आहे. पावसामुळे हा महोत्सव यापुढे ऑक्टोबर महिन्यातच होईल. १३ तारखेला डॉ. रामचंद्र देखणे यांचे ‘बहुरुपी भारूड’ हा कार्यक्रम होईल. १४ तारखेला भाजपचे प्रवक्ते माधव भांडारी यांचे ‘महाराष्ट्रातील सद्य सामाजिक व राजकीय परिस्थिती’ या विषयावर व्याख्यान होणार आहे. १५ तारखेला डॉ. एन. राजम यांचे व्हायोलिन वादन रंगणार आहे. सर्व कार्यक्रम सायंकाळी ६ वाजता मंदिर प्रांगणात होणार असून, महोत्सव सर्वांसाठी खुला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ग्रामीण रस्त्यांची दुरुस्ती होणार

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, पुणे
ग्रामीण भागातील प्रमुख रस्त्यांची दुरुस्ती आणि रुंदीकरणाचे काम सार्वजनिक बांधकाम खात्यामार्फत करण्यात येणार असून, त्यासाठी सुमारे पावणेदोन कोटी रुपयांच्या निविदा काढण्यात आल्या आहेत. या रस्त्यांची कामे सहा महिन्यांत पूर्ण करण्यात येणार आहेत.
पाऊस व अवजड वाहतुकीमुळे ग्रामीण भागातील काही रस्त्यांची दुर्दशा झाली आहे. या रस्त्यांच्या दुरुस्तीबरोबर काही रस्त्यांचे विस्तारीकरण करण्यात येणार आहे. हडपसर-सासवड ते जेजुरी या रस्त्याच्या कामासाठी २१ लाख रुपये खर्चाची निविदा काढण्यात आली आहे. तसेच ‍वेल्हा-पाबळ-शिक्रापूर-आष्टा-उरळीकांचन ते शिंदवणे या रस्त्याच्या कामावरही ४२ लाख रुपये खर्च करण्यात येणार आहे.
वेल्हा तालुक्यातील कासुर्डी-हातवे-तांभाड या रस्त्याचे रुंदीकरण करण्याचे काम केले जाणार आहे. त्यासाठी २४ लाख रुपये खर्च अपेक्षित आहे. तसेच, वेल्हा तालुक्यातील मढेघाट रस्त्याच्या दुरुस्तीसाठी दहा लाख रुपयांची निविदा काढण्यात आली आहे. पौड-मुळशी ते कोलाड या वाहतुकीच्या रस्त्याची पावसामुळे दुरवस्था झाली आहे. या रस्त्याच्या कामावर ५० लाख रुपये खर्च करण्यात येणार आहे. तसेच, कॅरेज वे तयार करण्यासाठी ३२ लाख रुपये खर्चाची तरतूद करण्यात आली आहे. या कामांच्या निविदा काढण्यात आल्या असून, सहा महिन्यांत कामे पूर्ण करण्यात येणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मोर्चा मूक; पण संख्या बोलकी

$
0
0

प्रवीण गायकवाड यांचे प्रतिपादन

म. टा. प्रतिनिधी, पिंपरी
‘ओबीसींच्या कुठल्याही आरक्षणाला धक्का न लावता तामिळनाडूच्या धर्तीवर मराठा समाजाला आरक्षण दिले पाहिजे. कारण, मराठा समाजाचा क्रांती मोर्चा मूक असला तरी संख्या बोलकी आहे. त्यामुळे सरकारला दखल घ्यावीच लागेल,’ असे प्रतिपादन संभाजी ब्रिगेडचे मार्गदर्शक प्रवीण गायकवाड यांनी येथे केले.

विजयादशमीनिमित्त मराठा सेवा संघाच्या संत तुकारामनगर शाखेच्या वर्धापनदिनानिमित्त आचार्य अत्रे सभागृहात मेळावा झाला. त्यावेळी ते बोलत होते. मेळाव्याचे उद्घाटन माजी महापौर योगेश बहल यांच्या हस्ते झाले. अध्यक्षस्थानी मराठा सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष प्रकाश जाधव होते. स्वागताध्यक्ष सदानंद यादव, नगरसेविका सुजाता पालांडे, यशवंत भोसले, मुक्ता पडवळ, बबन गाढवे, विजयकुमार ठुबे, सारिका शिरोळे, सुजाता ठुबे, विजय देशमुख, अभिमन्यू पवार या वेळी उपस्थित होते. अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराजे भोसले, उद्योजक नंदकुमार भोंडवे, कार्यकर्ते कैलास वडघुले, मालोजीराव जगदाळे, विरेंद्रसिंह शितोळे यांना ‘मराठा भूषण’ पुरस्कार, तर व्यंकट सूर्यवंशी, सुभाष देसाई, आनंदराव शिंगटे यांना ‘नैपुण्य’ पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.

गायकवाड म्हणाले, ‘मराठा समाजाचा आक्रोश कोणत्याही जाती धर्माविरुद्ध नाही. राजकारण्यांवर समाजाचा अंकुश ठेवण्यासाठी आहे. ओबीसींच्या कुठल्याही आरक्षणाला धक्का न लावता तमिळनाडूच्या धर्तीवर मराठा समाजाला आरक्षण दिले पाहिजे. स्त्रीरक्षण, आरक्षण, शिक्षण, आरोग्य, शेतमालाला हमीभाव या समस्या फक्त मराठा समाजाच्याच नाहीत. त्यामुळेच इतर समाजही मोर्चात सहभागी होत आहे. औरंगाबादपासून सुरू झालेल्या सर्व मोर्चांमध्ये मुस्लिम धर्मीयांनी पाणी वाटप केले. धार्मिक तेढ निर्माण होऊ नये म्हणून आम्ही प्रयत्न करीत आहोत. परंतु, मोर्चा मूक असला तरी मोर्चातील संख्या बोलकी आहे. आता सरकारला दखल घ्यावीच लागेल.’

‘पुरुषप्रधान संस्कृतीच्या अतिरेकामुळे देशात महिलांवरील अत्याचार वाढत आहेत. मात्र, महिलांना सन्मानपूर्वक वागणूक मिळावी, या मागणीसाठीच सर्व मराठा मोर्चात युवतींच्या हस्ते जिल्हाधिकाऱ्यांना निवेदने देण्यात येत आहेत. मोर्चाचा समारोप नागपूर अधिवेशनाच्या वेळी होणार आहे. कोणत्याही आरक्षणाला आमचा विरोध नाही. तामिळनाडूच्या धर्तीवर मराठा समाजाला आरक्षण मिळावे. अॅट्रासिटीचा गैरवापर, ब्लॅकमेलिंग थांबले पाहिले. स्वामीनाथन आयोगाने शेतकऱ्यांविषयी केलेल्या शिफारशी लागू केल्या पाहिजेत,’ असेही गायकवाड म्हणाले.

अॅड. लक्ष्मण रानवडे यांनी प्रास्ताविक केले. नकुल भोईर यांनी आभार मानले. प्रशांत चव्हाण यांनी सूत्रसंचालन केले. मराठा सेवा संघ, जिजाऊ ब्रिगेड, संभाजी ब्रिगेड आणि वीर भगतसिंग विद्यार्थी परिषदेने मेळाव्यात भाग घेतला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

एटीएम’द्वारे पाण्याचा मार्ग मोकळा

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, पुणे
पुणे कँटोन्मेंट बोर्डातील रहिवाशांना शुद्ध पाणी देण्यासाठी ‘एटीएम’द्वारे पाणी देण्याच्या योजनेस आता गती मिळण्याची शक्यता आहे. बोर्डाने काढलेल्या निविदेला काही संस्थांनी प्रतिसाद दिल्याने शुद्ध पाणी देण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
एटीएमद्वारे पाणी शुद्ध होणार आहे. परंतु, हे पाणी मोफत द्यायचे की काही शुल्क आकारायचे याबाबत बोर्डाच्या बैठकीत निर्णय होण्याची शक्यता आहे. एटीएमद्वारे पाणी देणार असल्याने त्यासाठी काही शुल्क आकारले जाणार असल्याचे तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी संजीवकुमार यांनी सांगितले होते. परंतु, अंतिम निर्णय बैठकीतच होण्याची शक्यता आहे. या संदर्भात ‘मटा’ने हा विषय प्रकाशात आणला होता.
पुणे कँटोंन्मेंट बोर्डाच्या हद्दीतील नागरिकांना दरवर्षी उन्हाळ्यात पाणीटंचाईला सामोरे जावे लागते. त्यामुळे नागरिकांना पुणे महापालिकेच्या पाणीपुरवठ्यावर अवलंबून राहावे लागते. त्याशिवाय पालिकेने पाणी वाटपात कपात केल्यास त्याचा कँटोन्मेंट बोर्डाच्या रहिवाशांना फटका बसतो. ऐन उन्हाळ्यात त्यांना वणवण करावी लागते. त्यावर पर्याय म्हणून बोर्डाच्या विविध भागात बोअरवेल खोदण्यात आले. त्याच्या पाण्यावर प्रक्रिया करून ते पाणी एटीएमद्वारे नागरिकांना उपलब्ध करण्याची योजना राबविण्याचा विचार आहे. एटीएमद्वारे शुद्ध पाणी योजना राबविण्यासाठी लागणारी आवश्यक यंत्रणा उभारण्यासाठी ‘परिमल पेयजल’ या संस्थेचे सहकार्य घेण्यात येणार आहे. बोअरवेलचे पाणी शुद्ध करण्यात येणार आहे. बोअरवेलच्या जवळ एटीएमची मशिन बसविण्याची योजना आहे.
बोअरवेल किंवा विहिरीतील पाणी शुद्ध करण्यापूर्वी त्या पाण्याचे नमुने तपासण्यात आले होते. त्यामुळे या पाण्यावर प्रक्रिया करून हे पाणी पिण्यायोग्य असल्याने नागरिकांना उपलब्ध करण्याची योजना आहे. पाणी शुद्ध करण्यासाठी बाहेरील संस्थेकडे काम देण्यात येणार आहे. त्या करिता पुणे कँटोन्मेंट बोर्डाने ऑगस्ट महिन्यात निविदा काढल्या होत्या. त्यावेळी बोर्डाला फारसा प्रतिसाद न मिळाला नाही. त्यामुळे बोर्डाने पुन्हा निविदा काढल्या. त्या निविदांना आता तीन संस्थांनी प्रतिसाद दिल्याचे बोर्डाकड़ून सांगण्यात आले. त्यामुळे शुद्ध पाणी देण्याचा प्रश्न लवकरच मार्गी लागण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘त्रयस्थां’मार्फत हवे मूल्यमापन

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, पुणे
पुणे महापालिकेच्या शिक्षण मंडळाच्या कामकाजाचे त्रयस्थ सरकारी यंत्रणेमार्फत मूल्यमापन करण्याची मागणी आता शिक्षण खात्यातील अधिकाऱ्यांकडून केली जात आहे. राजकीय दबावापोटी मंडळामध्ये चालणारे गैरव्यवहार थांबवायचे असतील, तर गुणवंत अधिकाऱ्यांची पाठराखण करणे गरजेची असल्याची भूमिकाही खात्यातील अधिकारी व्यक्त करत आहेत.
स्मार्ट सिटी होऊ पाहणाऱ्या पुणे महापालिकेच्या शिक्षण मंडळाला सध्या शिक्षणप्रमुख मिळेनासा झाला आहे. महापालिकेच्या शिक्षण मंडळामध्ये काम करताना येणारा राजकीय दबाव, भ्रष्टाचाराचे आरोप आणि त्यामुळे येणारा कारवाईचा बडगा अधिकाऱ्यांमध्ये मंडळाविषयीची नकारात्मक प्रतिमा निर्माण करत आहे. त्यामुळेच गेल्या सहा महिन्यांपासून रिक्त असलेल्या शिक्षणप्रमुख पदावर काम करण्यासाठी खात्यातील अधिकारी तयार नसल्याचे ‘मटा’ने नुकतेच उघड केले. त्या पार्श्वभूमीवर शिक्षणप्रमुख पदाचा अनुभव असलेल्या काही अधिकाऱ्यांशी ‘मटा’ने संवाद साधला. नाव न छापण्याच्या अटीवर या अधिकाऱ्यांनी माहिती दिली. त्यातून मंडळाच्या कारभाराचे ‘अंतरंग’ समोर आले.
मंडळाच्या वार्षिक अर्थसंकल्पाला मंजुरी मिळविण्यापासून ते मंडळासाठीच्या विविध वस्तूंच्या पुरवठ्यासाठीच्या निविदा प्रक्रियेपर्यंत आणि मंडळातील कर्मचाऱ्यांच्या जबाबदाऱ्या निश्चित करण्यापासून ते शिक्षकांच्या नियुक्तीपर्यंतच्या सर्वच टप्प्यांवर शिक्षणप्रमुखाला राजकीय हस्तक्षेपाला सामोरे जावे लागते. मंडळाच्या काही योजना या मुळात राजकीय स्वरुपाच्या असतात. अशा योजनांसाठी म्हणून कोणा एका विशिष्ट पक्षाच्या नव्हे, तर सर्वच पक्षनेत्यांचा दबाव वेळोवेळी येतो. स्थायी समितीचे पदाधिकारी, शिक्षण मंडळाचे पदाधिकारीही असा दबाव टाकण्यात मागे नाहीत. त्यातच अशा पदाधिकाऱ्यांचे वेगवेगळे गटही एकमेकांच्या विरोधात कुरघोड्या करण्याच्या प्रयत्नांमधून अनेकदा खोटे आरोप करतात. त्यामध्येही अधिकाऱ्यांचे नाव गोवले जात असल्याचे या अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.
मंडळाच्या कामकाजाचे मूल्यमापन करण्यासाठी, वेगवेगळ्या निविदा प्रक्रियांमधून समोर येणाऱ्या विविध योजनांचे नेमकेपणाने परीक्षण करण्यासाठी वा अशा योजनांचा विद्यार्थ्यांवर नेमकेपणाने काय परिणाम झाला, याचा आढावा घेण्यासाठी मंडळाकडे कोणतीही यंत्रणा नाही. अशी यंत्रणा उभारण्यासंदर्भात अधिकाऱ्यांकडून करण्यात आलेल्या सूचनाही धुडकावून लावल्या जात असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. त्रयस्थ सरकारी यंत्रणांकडून वस्तुनिष्ठ मूल्यमापन झाल्यास, मंडळाचा नेमका व्यवहार चव्हाट्यावर येण्याच्या भीतीनेच अद्याप असे मूल्यमापन होऊ शकले नसल्याचेही या अधिकाऱ्यांनी नमूद केले.

स्वयंसेवी संस्थासाठीही लॉबिंग
मंडळाच्या शाळांमध्ये कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटीच्या आधारे काम करण्यासाठी विविध स्वयंसेवी संस्थांचे प्रस्ताव येतात. मात्र, त्यातून काही विशिष्ट संस्थांनाच मंडळाच्या शाळांसाठी काम करण्याची संधी मिळते. अशा संस्थांनी आजपर्यंत केलेल्या कामाचे त्रयस्थ सरकारी यंत्रणांनी कोणतेही मूल्यमापन केलेले नाही. असे मूल्यमापन हाती नसतानाही विशिष्ट स्वयंसेवी संस्थाच चांगले काम करतात, असा दावा पालिकेतील राजकारणी मंडळी करतात. अशा संस्थांनाच मंडळाच्या शाळांमधून काम करता यावे, यासाठीही राजकारण्यांचे गट शिस्तबद्धपणे मंडळाच्या कामात हस्तक्षेप करत असल्याची नोंदही या अधिकाऱ्यांनी केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

हवाई दलाच्या आदेशाचे काटेकोर पालन

$
0
0

पॅराग्लायडिंग क्लबसह खासगी वाहतूक कंपन्यांचे स्पष्टीकरण
म. टा. प्रतिनिधी, पुणे
हवाई दलातर्फे शहरातील खासगी हवाई वाहतूक करणाऱ्या कंपन्यांना देण्यात आलेले आदेश हे लोहगाव येथील तळाच्या सुरक्षेसाठीच आहेत. देशहिताच्या आणि सुरक्षेच्या दृष्टीनेच हे आदेश देण्यात आले आहेत. त्याचे आम्ही काटेकोरपणे पालन करू, अशी माहिती शहरातील पॅराग्लायडिंग क्लबसह काही खासगी हवाई वाहतूक कंपन्यांच्या संचालकांनी दिली.
संभाव्य धोका टाळण्यासाठी पुण्याच्या हवाई हद्दीतील खासगी उड्डाणांवर निर्बंध घालण्यात आले असून, लोहगाव विमानतळाच्या हवाई वाहतूक नियंत्रकाच्या (एटीसी) परवानगीशिवाय कोणत्याही प्रकारचे विमान, हेलिकॉप्टर, ग्लायडर, पॅराग्लायडर आदींचे उड्डाण करता येणार नाही. परवानगीशिवाय उड्डाण केल्यास तो हवाई तळाला धोका समजून त्याला तातडीने गंभीर उत्तर दिले जाईल, असा इशारा हवाई दलातर्फे देण्यात आला आहे. त्याबाबतचे वृत्त ‘महाराष्ट्र टाइम्स’ने बुधवारी प्रकाशित केले होते.
हवाई मार्गेही दहशतवाद्यांकडून हल्ले होऊ शकतात, असा इशारा गुप्तचर विभागाने दिला आहे. त्या पार्श्वभूमीवर हवाई दलातर्फे पुण्यातील खासगी हवाई उड्डाण करणाऱ्या कंपन्यांना आदेशाद्वारे सूचना दिल्या आहेत.
‘सध्याच्या बदललेल्या परिस्थितीत सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देऊन हवाई दलाने हे निर्देश दिले आहेत. प्रत्येक उड्डाणावेळी नेमून दिलेल्या हवाई हद्दीचाच वापर करावा लागतो. त्यासाठी आधीपासूनच पूर्वपरवानगी घ्यावी लागते. मात्र, या हद्दीचा भंग केल्यास व अनधिकृत रीतीने हवाई तळाच्या जवळ जाण्याचा प्रयत्न झाल्यास तो हवाई तळाला धोका समजून त्यावर तातडीने गंभीर कारवाई केली जाईल, असे या नव्या आदेशाद्वारे स्पष्ट करण्यात आले आहे,’ असे एका खासगी हेलिकॉप्टर ऑपरेटर कंपनीच्या व्यवस्थापकाने सांगितले.
‘सुरक्षेच्या दृष्टीनेच हवाई दलाने हे निर्देश दिले आहेत. त्याचे आम्ही काटेकोरपणे पालन करू. दररोज पॅराग्लायडिंग सुरू करताना आणि संपल्यानंतर त्याची सूचना लोहगाव येथील नियंत्रण कक्षाला दिली जाते. पावसामुळे सध्या पॅराग्यालडिंग बंद असून, पुढील आठवड्यापासून ते सुरू होईल. त्या वेळी सर्व निकषांचे पालन केले जाईल,’ असे कामशेत पॅराग्लायडिंग असोसिएशनचे अध्यक्ष संजय राव यांनी सांगितले.
‘हवाई वाहतुकीचे नियंत्रण हवाई नियंत्रण कक्षातर्फे केले जाते. देशाच्या हवाई सुरक्षेची जबाबदारी हवाई दलाची असल्याने त्यांनी या सूचना दिल्या आहेत. त्यांनी ग्लायडर्सच्या उड्डाणावर बंदी आणलेली नाही. तर नियमांचा वा हद्दीचा भंग केल्यास कडक कारवाईचा इशारा दिला आहे. आम्ही हवाई दलाच्या सर्व आदेशांचे काटेकोर पालन करू,’ असे हडपसर येथील ग्लायडिंग सेंटरचे प्रमुख कॅप्टन शैलेंद्र चारभे यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


शरद पवारांच्या फोटोवर शाईफेक

$
0
0

बारामती होस्टेलमधील प्रकार; राष्ट्रवादी-रासप कार्यकर्त्यांमध्ये धक्काबुक्की
म. टा. प्रतिनिधी, पुणे
पशुसंवर्धन मंत्र महादेव जानकर यांनी भगवानगडावर केलेल्या विधानांनंतर राष्ट्रवादी काँग्रेस आणि राष्ट्रीय समाज पक्षाच्या कार्यकर्त्यांमधील राडा रस्त्यावर आला आहे. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी जानकर यांचे ऑफिस फोडल्यानंतर रासपच्या कार्यकर्त्यांनी बारामती होस्टेलमध्ये घुसून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या फोटोंवर शाई फेकण्याचा प्रकार बुधवारी घडला. त्यानंतर दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये पोलिस चौकीत धक्काबुक्की झाली.
या प्रकरणी उमेश कोकरे या कार्यकर्त्याला अटक करण्यात आली आहे.जानकर यांनी दसऱ्याच्या दिवशी भगवान गडावर केलेल्या भाषणानंतर राष्ट्रवादी काँग्रेस आणि जानकर समर्थकांमध्ये जुंपली आहे. या भाषणात जानकर यांनी माजी मुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर ​टीका केली होती. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी जानकर यांचे हिंगणे येथील कार्यालयाची मंगळवारी रात्री तोडफोड केली. राष्ट्रवादीने जानकर यांच्याविरुद्ध शहर आणि जिल्ह्यात ठिकठिकाणी निदर्शने केली आहेत.
बारामती होस्टेलचे सुरक्षारक्षक गणपत कोकाटे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार सात ते आठ जणांविरुद्ध दंगल माजवल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. या वेळी पोलिसांनी उमेश कोकरे या जानकर यांच्या समर्थकाला ताब्यात घेतले आहे. पवार यांच्या विद्या प्रतिष्ठान संचलित बारामती होस्टेलमध्ये बुधवारी दुपारी बाराच्या सुमारास जानकर समर्थक असलेले सात ते आठ कार्यकर्ते घुसले होते. यावेळी कोकाटे यांनी त्यांना अडवण्याचा प्रयत्न केला असता या समर्थकांनी कोकाटे यांना मारहाण केली आणि ते आत गेले. त्यांनी पवार यांच्या फोटोवर शाई फेकली आणि पळून गेले. या वेळी झालेल्या धावपळीत कोकरे याला होस्टेलमधील तरुणांनी पकडले आणि त्याला चतुःश्रृंगी पोलिसांच्या ताब्यात दिले.
या घटनेची माहिती मिळताच राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अनिल भोसले, माजी नगरसेवक नीलेश निकम, युसुफ खान, उदय महाले यांच्यासह अनेक कार्यकर्ते जनवाडी पोलिस चौकीत जमले होते. या वेळी राष्ट्रीय समाज पक्षाचे (रासप) कार्यकर्ते संतोष पाटील हे तेथे उभे राहून फोन करत होते. त्या वेळी राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आणि पाटील यांच्यात वादावादी झाली. काही कार्यकर्ते त्यांच्यावर धावून गेले होते. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने अनुचित प्रकार टळला. ‘रासप’च्या कार्यालयाची तोडफोड करताना राज्य सचिव बाळासाहेब कोकरे यांच्या आई, पत्नी व मुलाला राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केली होती. पोलिसांनी या कार्यकर्त्यांवर कारवाई न केल्याने त्याच्या निषेधार्थ आपण हे कृत्य केल्याचे कोकरे याने दावा केला आहे, अशी माहिती पोलिसांनी ​दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बँक अकाउंट हॅकिंगद्वारे नागरिकांना लुटले

$
0
0

केमिकल इंजिनीअरकडून दहा जणांची ऑनलाइन फसवणूक
म. टा. प्रतिनिधी, पुणे
ऑनलाइन तीन पत्ती खेळण्याच्या हव्यासापोटी एका केमिकल इंजिनीअरने ऑनलाइन पैसे चोरायचा धडका लावून दहा नागरिकांची हजारो रुपयांची फसवणूक केली आहे. या नागरिकांनीही आपल्या फेसबुक आणि ई-मेल आयडीचा पासवर्ड हा मोबाइल नंबर ठेवला होता. या इंजिनीअरने त्यांचे बँक अकाउंट हॅक करून ते अकाउंट तीन पत्ती खेळण्याच्या अकाउंटला लिंक केले आणि हजारो रुपये उकळून तीन पत्ती खेळण्याचा शौक पुरा केला.
‘गुन्हे शाखेच्या सायबर सेलने २४ वर्षांच्या या हॅकरला गजाआड केले असून, त्याच्या विरुद्ध पुणे शहरात तीन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. नागरिकांकडून फेसबुक, ई-मेल अकाउंट वापरताना होणारा हलगर्जीपणा त्यांचीच फसवणूक होण्यास कसा कारणीभूत ठरतो, याची अनेक उदाहरणे या तपासादरम्यान निदर्शनास आली,’ अशी माहिती सायबर सेलचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुनील पवार यांनी दिली.
किरण चंद्रकांत देवकर (२४, रा. कोरेगाव भीमा, मूळ रा. नगर) असे अटक करण्यात आलेल्या केमिकल इंजिनीअरचे नाव आहे. या प्रकरणी सचिन सुशिल चिंचवेकर (रा. शुभलक्ष्मी, अपार्टमेंट, भारती विद्यापीठ) यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. चिंचवेकर यांना २५ ऑगस्ट रोजी त्यांचे फेसबुक अकाउंट हॅक झाल्याचे लक्षात आले होते. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी त्यांच्या बँक अकाउंटवरून १३ हजार ५०० रुपये ट्रान्स्फर झाले होते.
‘चिंचवेकर यांनी या घटनेची तक्रार सायबर सेलकडे केली होती. फौजदार प्रवीण स्वामी यांनी केलेल्या तपासात देवकरचे नाव निष्पन्न झाल्यावर त्याला गजाआड करण्यात आले,’ असे पवार म्हणाले. देवकर हा केमिकल इंजिनीअर आहे. तो मूळचा नगर जिल्ह्यातील असून पुण्यात तो कोरेगाव भीमा येथे मामाकडे राहतो.
...
फेसबुक आणि पासवर्ड
चिंचवेकर यांनी दिलेल्या तक्रारीचा तपास फौजदार प्रवीण स्वामी करत होते. फेसबुककडून मिळालेल्या माहितीच्या आधारे स्वामी यांनी देवकर याला चौकशीसाठी ताब्यात घेतले. पोलिसांनी देवकरकडे चौकशीत नागरिकांकडून अनेक वेळा फेसबुक तसेच ई-मेल अकाउंटचा पासवर्ड आपला मोबाइल नंबर ठेवला असल्याचे लक्षात आले आहे. देवकर हा फेसबुकवर अंदाजे एखादे अकाउंट निवडत असे. अकाउंटवरील माहिती घेतली तर त्याला त्या अकाउंटला लिंक असलेला मोबाइल नंबर मिळत असे. त्याचा वापर करून तो फेसबुक उघडत असे. त्या अकाऊंटला लिंक असलेला मेल आयडी शोधून मेल आयडीचा पासवर्ड म्हणून मोबाइल नंबर टाकून पाहत असे. अशा प्रकारे दोन्ही आयडी हॅक झाल्यानंतर तो दोन्ही अकाउंटचे पासवर्ड बदलून टाकत असे. त्या मेलमध्ये असलेल्या बँक अकाउंटच्या आधारे तो ऑनलाइन बँकिंगचा वापर करून त्यावरील पैसे तीन पत्ती खेळत असलेल्या अकाउंटला लिंक करत असे. अशा प्रकारे त्याने दहा फेसबुक अकाउंट हॅक केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.
...
पासवर्ड सिक्युअर करा
नागरिकांनी आपल्या मेल आयडीचा तसेच फेसबुक अकाउंटचा पासवर्ड मोबाइल नंबर ठेवू नये. पासवर्ड ठेवताना शब्द, अंक तसेच इतर की असतील याची दक्षता घ्यावी. त्यामुळे पासवर्ड अधिक मजूबत असेल आणि कोणालाही तो सहज ‘ब्रेक’ करता येणार नाही. मेल आयडीमध्ये बँक अकाउंटची माहिती मर्यादित असावी, असे आवाहन पवार यांनी केले आहे.
.....

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मूक मोर्चा बोलेल तेव्हाच क्रांती होईल

$
0
0

रावसाहेब कसबे यांचे सूचक वक्तव्य
म. टा. प्रतिनिधी, पुणे
‘मराठा क्रांती मूक मोर्चात लाखोंच्या संख्येने गरीब, कष्टकरी, शेतकऱ्यांची मुले सहभागी होत आहेत. मोर्चातील तरुण पुढाऱ्यांच्या विरोधात बोलतील म्हणून त्यांना बोलू दिले जात नाही; पण मराठा क्रांती मूक मोर्चा बोलेल, त्या दिवशी क्रांती होईल,’ असे सूचक वक्तव्य ज्येष्ठ विचारवंत रावसाहेब कसबे यांनी केले.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर अध्यासन व अभ्यास केंद्र, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक महोत्सव समिती, कॅनडा येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर इंटरनॅशनल मिशन तसेच फुले, शाहू, आंबेडकर विचार प्रसारक मंडळातर्फे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५व्या जयंतीनिमित्त ‘बौद्ध धम्म : ६० वर्षांचा प्रवास एक आकलन’ या विषयावरील आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. त्या वेळी ते बोलत होते. माजी अतिरिक्त जिल्हाधिकारी पंजाबराव वानखेडे, पुणे विभागीय पासपोर्ट कार्यालयाचे प्रमुख अतुल गोतसुर्वे, रोहिदास जाधव, विद्यापीठाच्या आंतरराष्ट्रीय विभागाचे प्रमुख डॉ. विजय खरे या वेळी उपस्थित होते. लोकशाहीच्या माध्यमातून सामाजिक व आर्थिक समानता आली नाही तर अराजकता येईल, असे भाकित डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केले होते, याकडे कसबे यांनी लक्ष वेधले. ‘समाजातील आर्थिक विषमतेमुळे राज्यभरात मराठा क्रांती मोर्चे काढले जात आहेत. परंतु, राज्याची सत्ता काही मोजक्या घराण्यांच्या हातात आहे. मराठा क्रांती मूक मोर्चाला बोलता येत नाही. त्यामुळे मोर्चात सहभागी होणाऱ्या तरुणांची फसवणूक होत आहे. मात्र, ज्या दिवशी मोर्चा बोलू लागेल, त्या दिवशी क्रांती होईल,’ कसबे म्हणाले.
बौद्ध धम्माबाबत कसबे म्हणाले, ‘बौद्ध धम्म सर्व देशांमध्ये गेला. तो ज्या देशात गेला त्या संस्कृतीत मिसळून गेला. बौद्ध धम्माने स्वतःची संस्कृती निर्माण केली नाही. समाजातील आर्थिक विषमता, जाती संस्था नष्ट होणार नाही तोपर्यंत माणूस सुखी होणार नाही. बुद्धांनी स्वातंत्र्य, समता आणि न्यायाची शिकवण दिली. मात्र, समाजातील काही घटकांनी ती दाबून टाकली.’ दरम्यान, परिषदेचे उद्घाटन विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. वासुदेव गाडे, थायलंडचे कौन्सुलेट जनरल एकापोल पुलपिपात, अमेरिकेतील हार्वर्ड विद्यापीठाचे डॉ. ख्रिस्तोफर क्वीन, राजू कांबळे, परशुराम वाडेकर यांच्या उपस्थितीत झाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पुन्हा उलगडली ‘अण्णां’ची मुलाखत

$
0
0

‘लौकिक ते अलौकिक’मध्ये रसिक झाले अंतर्मुख

म. टा. प्रतिनिधी, पुणे

‘गेल्या पंचवीस वर्षांमध्ये मी आखलेल्या आणि अंशतः लिहिलेल्या अनेक प्रकल्पांचा मला दुःखाने निरोप घ्यावा लागणार आहे. प्रत्येक ज्ञानोपासक लेखकाला आयुष्याच्या एका विशिष्ट टप्प्यावर हा अनुभव येतो,’ हे महाराष्ट्राच्या लोकसंस्कृतीचे ज्येष्ठ अभ्यासक कै. रा. चिं. ढेरे म्हणजेच अण्णांचे शब्द मनाला चटका लावून गेले. डॉ. तारा भवाळकर यांनी घेतलेली अण्णांची विस्तृत मुलाखत ‘लौकिक ते अलौकिक’ या अभिवाचन कार्यक्रमात ऐकताना उपस्थित रसिक अंतर्मुख झाले.
रा. चिं. ढेरे संस्कृती संशोधन केंद्रातर्फे आयोजित कार्यक्रमात अण्णांचे बालपण, त्यांचे शोधकार्य आणि साहित्य, व्यक्तिमत्वाचा आढावा घेणारे अभिवाचन ज्येष्ठ अभिनेत्री ज्योती सुभाष, ज्येष्ठ लेखिका माधुरी पुरंदरे, अभिनेता जितेंद्र जोशी, हर्षद राजपाठक यांनी सादर करून अण्णांच्या शोधयात्रेचे विविध पैलू उलगडले. या अभिवाचनात कल्याणी देशपांडे यांच्या सतारीने सुरेल रंग भरले. दिग्दर्शक उमेश कुलकर्णी यांनी कार्यक्रमाचे दिग्दर्शन केले होते.
अण्णांनी महाराष्ट्राच्या संस्कृतीच्या शोधकार्यासाठी आयुष्य वेचले. लहानपणी अठरा विश्वे दारिद्र्य भोगलेले अण्णा पुढे जाऊन प्रसिद्ध संशोधक झाले. मात्र, त्यांनी कधीही प्रसिद्धीचा मोह धरला नाही. त्यांच्या कार्यावर अनेक टीका झाल्या, मात्र त्यांनी कधीही त्याला प्रत्युत्तर दिले नाही. त्यांच्या आयुष्यात आलेले असे अनेक प्रसंग जितेंद्र जोशी, ज्योती सुभाष आणि माधुरी पुरंदरे यांनी प्रेक्षकांसमोर सादर केले. अण्णांचे लहानपण, त्यांची बहीण, त्यांच्यासाठी गाव सोडून शहरात येणारी आजी आणि तिची सहनशीलता विलक्षण होती. तिच्या संस्कारांमुळे आणि परिस्थितीने वेळोवेळी दिलेल्या धक्क्यांनी अण्णा घडले. अण्णांच्या आयुष्याचे हे टप्पे ज्योती सुभाष यांनी अलगदपणे उलगडले.
कार्यक्रमाच्या पूर्वार्धात ढेरे यांच्या ‘नरसिंहोपासना- उदय आणि विकास’ या शोध ग्रंथाचे डॉ. द. ना. धनागरे आणि पुरातत्व शास्त्रज्ञ डॉ. मधुकर ढवळीकर यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. अण्णांच्या अकाली निधनामुळे या ग्रंथाचे काम अपूर्ण राहिले होते. त्यांच्यावर आधारीत ‘समन्वय’ या गौरवांकाचे प्रकाशनही या वेळी करण्यात आले. डॉ. तारा भवाळकर, डॉ. रमेश जाधव, डॉ. प्रकाश खांडगे, ज्येष्ठ चित्रकार रवि परांजपे, उमा कुलकर्णी या वेळी उपस्थित होते.
-------------------------------
‘अण्णांनी कधी लॉबिंग केले नाही’
महाराष्ट्राच्या संस्कृतीचा अभ्यासक म्हणून अण्णांना नावलौकिक प्राप्त झाला, मात्र त्यांनी सरकारकडे कोणत्याही पदासाठी कधी लॉबिंग केले नाही, त्यांना प्रसिद्धीची हाव नव्हती. प्रसिद्धीपलिकडे जाऊन त्यांची शोधयात्रा सुरूच राहिली, असे ढवळीकर यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दिवाळीचा चिवडा यंदा महागच

$
0
0

भाजकी डाळ, भाजक्या पोह्याचे भाव वधारले; हरभरा पिकातही घट

म. टा. प्रतिनिधी, पुणे

दिवाळीनंतर येणाऱ्या तांदळामुळे भाजक्या पोह्यासह अन्य पोह्यांच्या आवकवर झालेला परिणाम आणि भाजक्या डाळीचे वाढलेले दर यांमुळे दिवाळीचा चिवडा जिभेची लज्जत वाढविण्यापेक्षा महागडाच ठरण्याची शक्यता आहे.

भाजक्या डाळीच्या दरात ४० किलोमागे गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा २ हजार रुपयांची वाढ झाली आहे. भाजका तसेच पातळ पोह्याच्या दरात किलोमागे ५ ते ४० रुपयांनी वाढ झाल्याने पुणेकरांना दिवाळीत महागडा चिवडा खावा लागणार आहे. दसऱ्यानंतर दिवाळीचे वेध लागतात. गोड पदार्थांपासून ते तिखट चिवड्यासाठी लागणाऱ्या सामग्रीच्या खरेदीसाठी मार्केट यार्डातील भुसार विभागाच्या घाऊक बाजारात सध्या ग्राहकांची वर्दळ सुरू झाली आहे. पुढील काही दिवसांत किरकोळ व्यापाऱ्यांसह घरगुती ग्राहकांची देखील खरेदीसाठी गर्दी वाढण्याची शक्यता आहे. चिवड्यासाठी भाजका पोहा, पातळ, दही पोहा, दगडी पोहा, भडंग मुरमुरा, तसेच भाजक्या डाळीला विशेष मागणी असते.

‘यंदा हरबभऱ्याचे पीक कमी आहे. उत्पादन क्षेत्रात यंदा पाऊस कमी झाल्याने उत्पादनही घटले आहे. घरांमध्ये तसेच हॉटेलमधील प्रत्येक पदार्थांत हरभऱ्याची आवश्यकता भासते. उत्पादन घटल्याने तसेच, मागणी आणि पुरवठा यांच्यात तफावत असल्याने भाजक्या डाळीच्या ४० किलोच्या दरात गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा २००० रुपयांची वाढ झाली आहे. त्यामुळे चिवड्यामध्ये लागणारी भाजकी डाळ महागण्याची शक्यता आहे,’ अशी माहिती डाळीचे व्यापारी कांतिलाल गुंदेचा यांनी दिली. भाजक्या डाळीचा घाऊक बाजारात प्रतीकिलो भाव १३५ ते १४० रुपयांच्या दरम्यान आहे. मात्र, किरकोळ बाजारात ही डाळ प्रतीकिलो दीडशे रुपयांच्या घरात गेली आहे. पुण्यात भाजकी डाळ प्रामुख्याने देगलूर (जि. नांदेड), उदगीर, अकोला, अमरावती या भागातून येते.

‘यंदाच्या वर्षी आठ ते दहा दिवस दिवाळी लवकर आली आहे. तांदळाचे पीक आता दिवाळीनंतर येणार आहे. काही दिवसांपूर्वी झालेल्या पावसाचे पाणी भाताच्या शेतात साठल्याने कापणी उशिरा झाली. यंदा तांदळाचे उत्पादन चांगले असल्याने पोह्यांचे दर घटणे अपेक्षित होते. परंतु, कापणी न झाल्याने दिवाळीनंतर बाजारात नवा तांदूळ येणार असल्याने पोह्यांचे दर घटतील. सर्व प्रकारच्या पोह्यांची गुजरातमधील नवसारी, मध्यप्रदेश, छत्तीसगड राज्यातून आवक होते. दिवाळीला मागणी असल्याने भाजक्या पोह्याच्या दरात १२ किलोमागे ४० रुपयांची तर, एका किलोमागे दोन ते तीन रुपयांची वाढ झाली आहे. तसेत पातळ पोहे क्विंटलमागे पाचशे रुपयांनी तसेच किलोमागे ५ रुपयांनी महागले आहेत,’अशी माहिती गुंदेचा यांनी दिली.
..

वस्तूचे नाव .................. २०१५ मधील दर .......... २०१६ मधील दर (रुपयांत)
पोहे (क्विंटल) ..................३१३२ ............ ......... ३३३४
पातळ पोहे .................... ३३५० ते ३४००................३७०० ते ३९००
दगडी पोहे ................... २७०० ते २८००.....................३००० ते ३२००
भाजके पोहे (१२ किलो)........... ४३० ते ४४० .............४८० ते ५००
दही पोहे (१० किलो)............... ६०० ते ६२०...................६५० ते ६६०
मका पोहे (१५ किलो)................ ४६० ते ४७० ............ ....... ४९० ते ५१०
भडंग मुरमुरा (९ किलो)................. ७६० ते ७८०...............७७० ते ८००
मुरमुरा (९ किलो) ...................... ३५० ते ३६० ....................३८० ते ३९०
भाजकी डाळ (४० किलो)............... ३२०० ते ३४००..................५४०० ते ५६००

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images