Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

वाहन उत्पादन क्षेत्रातील निर्यात वाढणार

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, पुणे
भारतातील वाहन उत्पादन क्षेत्रातून जगभरात होणाऱ्या निर्यातीमध्ये पाचपट वाढ करण्यासाठी केंद्र सरकारने 'ऑटोमोटिव्ह मिशन प्लॅन २०१६-२६' ही योजना राबविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे देशाच्या एकूण दरडोई उत्पन्नात १२ टक्के वाढ अपेक्षित असून, नोकरीच्या ६५लाख संधी निर्माण होतील,' असा विश्वास केंद्र सरकारच्या अवजड उद्योग विभागाचे (डीएचआय) सचिव गिरीश शंकर यांनी शुक्रवारी व्यक्त केला. येत्या काळात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ही योजना सुरू केली जाण्याची शक्यता आहे.
सरकारच्या अवजड उद्योग विभागाकडून राबविण्यात येत असलेल्या नवीन योजनांची माहिती देण्यासाठी पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी 'डीएचआय'चे संचालक प्रवीण अगरवाल, वरिष्ठ विकास अधिकारी संजय चावरे, ऑटोमोटिव्ह रिसर्च असोसिएशन ऑफ इंडियाचे अध्यक्ष राजन वढेरा, संचालक डॉ. रश्मी उर्ध्वरेषे आदी या वेळी उपस्थित होते.
सरकारच्या 'मेक इन इंडिया' प्रकल्पामध्ये ‍वाहन उत्पादन क्षेत्र महत्त्वाची भूमिका बजावणारे क्षेत्र आहे. त्यामुळे भारताचे वाहन उद्योग क्षेत्रातील उत्पादन आणि वाहनांची व तत्सम घटकांची निर्यात यामध्ये जगभरात पहिल्या तीन देशांमध्ये स्थान निर्माण करण्याचे ध्येय आहे. त्यासाठी वाहन उत्पादन क्षेत्राला स्थिर धोरण व समन्वयाची गरज आहे, असे शंकर यांनी सांगितले.
नवीन वाहनांचे टेस्टिंग व विकसनासाठी 'नॅशनल ऑटोमोटिव्ह टेस्टिंग रिसर्च अॅण्ड डेव्हलपमेंट इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट' ही संस्था देशात इंदूर, मनेसरसह सहा ठिकाणी सुरू केली जाणार आहे. तसेच, सरकारने थर्मल पॉवर प्लँटसाठी 'अॅडव्हान्स अल्ट्रा सुपर क्रिटीकल टेक्नॉलॉजी' विकसित करण्यासाठी निधी मंजूर केला आहे. ठिकठिकाणी यासाठी केंद्र उभारली जाणार आहेत, असे शंकर म्हणाले.

वीस हजार दुचाकींची विक्री
'केंद्र सरकारकडून राबविण्यात येत असलेल्या 'फेम इंडिया' (फास्टर अॅडॉप्शन अॅण्ड मॅन्युफॅक्चरिंग ऑफ इलेक्ट्रिक व्हेईकल्स इन इंडिया) या योजनेला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. दुचाकी, तीन चाकी व चारचाकी वाहनांच्या खरेदीत वाढ होऊ लागली आहे. देशभरात गेल्या वर्षात एक हजार पूर्णपणे इलेक्ट्रीक कार आणि २० हजार दुचाकींची विक्री झाली आहे,' असे गिरीश शंकर यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


एलिमेंटरी परीक्षेबाबत रद्दची सूचना नाही

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

पुण्यात उद्या, रविवारी निघणाऱ्या मराठा क्रांती मूक मोर्चामुळे एलिमेंटरी या शालेय विद्यार्थ्यांच्या चित्रकलेच्या परीक्षेला विद्यार्थ्यांना वेळेत पोहोचविण्याची व्यवस्था करावी लागणार आहे.

सरकारच्या कला संचनालयातर्फे पुण्यासह राज्यात रविवारी एलिमेंटरी ही चित्रकलेची स्पर्धा होणार आहे. सातवी व आठवीचे विद्यार्थी यामध्ये भाग घेतात. ऐच्छिक असलेल्या या परीक्षेतून विद्यार्थ्यांच्या चित्रकलेच्या प्रवासाला सुरुवात होते. शहरात किमान पंधरा शाळांमध्ये ही परीक्षा सकाळी १० ते ४ या वेळेत होणार आहे.

मोर्चाचा मार्ग असलेल्या पट्ट्यात डेक्कनवरील विमलाबाई गरवारे, नूतन मराठी, मॉडर्न, शिवाजी मिलटरी, गुजराती, हुजूरपागा, न्यू इंग्लिश स्कूल अशा शाळांची केंद्र आहेत. मोर्चाला होणारी गर्दी व एक वेळ लक्षात घेता परीक्षा होणार की नाही, याबाबत पालकांकडून विचारणा होत आहे. परीक्षा केंद्रावर मुले पोहोचली तरी या केंद्रांच्या आसपास प्रचंड वर्दळ राहणार आहे. त्यामुळे परीक्षेच्या व्यवस्थेवरच प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांनी सकाळी नऊपर्यंत परीक्षा केंद्रावर पोहोचावे, असे आवाहन मोर्चा समितीने केले आहे.

'रविवारी सकाळी १० ते १ व दुपारी २ ते ४ या वेळेत दोन पेपर आहेत. एका केंद्रातून साधारण सातशे ते आठशे विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. त्यामुळे शहराच्या मध्य भागातील सर्व केंद्रांवर मिळून अंदाजे दहा ते पंधरा हजार विद्यार्थी असतील. ज्या विद्यार्थ्यांचे घर जवळ आहे, त्यांना अडचण येणार नाही. परंतु, लांबून येणारे विद्यार्थी व शिक्षक यांना परीक्षेच्या खूप आधी केंद्रावर पोहचावे लागेल. परीक्षा राज्यात सर्वत्र होणार असल्याने ती रद्द होण्याची शक्यता नाही. तशी कोणतीही सूचना सरकारकडून मिळालेली नाही,' अशी माहिती कला शिक्षकांनी दिली.

विविध संघटनांचा पाठिंबा

मराठा क्रांती मूक मोर्चाला विविध स्तरातून पाठिंबा मिळू लागला आहे. विविध समाजाच्या संघटनांनी या मोर्चाला पाठिंबा जाहीर केला आहे. कोकणवासीय महासंघ, मुस्लिम, काची,किराड, धनगर, उत्तर भारतीय संघटना, क्षत्रीय समाज, भोई, जैन, वंजारी या समाजाच्या संघटनांनी मोर्चाला पाठिंबा जाहीर केल्याचे मराठा मोर्चा समितीतर्फे शुक्रवारी पत्रकार परिषदेत सांगण्यात आले. दि पूना लॉयर्स कन्झ्युमर्स को.ऑप सोसायटी तसेच अखिल महाराष्ट्र पदवीधर समितीने मोर्चाला पाठिंबा जाहीर केला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘शैक्षणिक स्वायत्तता शिक्षणासाठीच वापरा’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

'शैक्षणिक स्वायत्तता शिक्षणाची दुकाने थाटण्यासाठी नसून, गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी वापरणे गरजेचे आहे,' अशी ठाम भूमिका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी मांडली.
देशात शिक्षक समाज निर्माणाचे काम करतात. त्यामुळे लोकांना शिक्षकांपासून प्रेरणा मिळेल, अशा प्रकारचे काम शिक्षकांना करायचे आहे, असे सांगून फडणवीस यांनी पहिल्या 'नॅशनल टीचर्स काँग्रेस'चे उदघाटन केले. महापौर प्रशांत जगताप, परिषदेचे अध्यक्ष डॉ. अनिल काकोडकर, ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर, डॉ. विजय भटकर, नॅस्कॉम फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. गणेश नटराजन, प्राचार्य महासंघाचे अध्यक्ष नंदकुमार निकम, ज्येष्ठ पत्रकार राजीव खांडेकर, प्रा. सुधाकरराव जाधवर, परिषदेचे समन्वयक प्रा. राहुल कराड उपस्थित होते.
फडणवीस यांच्या हस्ते सिम्बायोसिस आंतरराष्ट्रीय विद्यापीठाचे कुलपती डॉ. शां. ब. मुजुमदार, माईर्स एमआयटीचे अध्यक्ष डॉ. विश्वनाथ कराड यांना जीवनगौरव पुरस्कार देण्यात आला.
फडणवीस म्हणाले, 'विद्यापीठांचा कारभार वाढतच आहे. एका विद्यापीठामध्ये सुमारे चारशे कॉलेज आहेत. त्यामुळे या कॉलेजांचा मूल्यमापनाचा, त्यांच्यावर देखरेख ठेवण्याचा मोठा भार विद्यापीठांवर आहे. त्यामुळे या कॉलेजांना हळूहळू स्वायतत्ता दिली पाहिजे. मात्र, ही स्वायत्तता रेग्युलिटरी अॅथोरिटीपासून सुटका मिळवण्यासाठी आणि शिक्षणाची दुकाने थाटण्यासाठी नसली पाहिजेत. स्वायत्ततेच्या आधारे कॉलेजांनी विद्यार्थ्यांना केवळ गुणवत्तापूर्ण शिक्षण दिले पाहिजे.'
डॉ. काकोडकर म्हणाले,' शिक्षणव्यवस्थेतील गुणवत्तापूर्ण शिक्षण आणि वैश्विक मूल्यांचा अभाव ही दोन मुख्य आव्हाने आपल्यासमोर आहेत. प्राचीन भारतीय शिक्षणात वैश्विक मूल्यांचा ठेवा आहे. त्यातील मूल्ये आणि आधुनिक तंत्रज्ञान याची सांगड घालून शिक्षकाने विद्यार्थ्यांना प्रेरित केल्यास चांगली पिढी निर्माण होईल.'

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बिल्डरांविरोधातील वॉरंटला स्थगिती

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

बालेवाडी येथील पार्क एक्स्प्रेस इमारतीच्या १३व्या मजल्याचा स्लॅब कोसळून झालेल्या दुर्घटनेप्रकरणी बांधकाम व्यावसायिकांसह पाच जणांवर बजावलेले अजामीनपात्र वॉरंट कोर्टाने स्थगित केले आहे. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी समता चौधरी यांच्या कोर्टाने हा आदेश दिला.
बांधकाम व्यावसायिक अरविंद प्रेमचंद जैन (४४, रा. शिवाजीनगर), श्रवण देवकीनंदन अगरवाल (४५, रा पाषाण), श्यामकांत जगन्नाथ वाणी-शेंडे (५२, रा. शिवाजीनगर) आणि कैलास बाबूलाल वाणी (४८, रा. एरंडवणे), प्रदीप जनार्धन कोसुम्बकर (५१, कोथरूड) यांच्या विरोधात अजामीनपात्र वॉरंट बजावण्यात आले होते.
'संबंधितांनी अटकपूर्व जामिनासाठी हायकोर्टात अर्ज केला आहे. याचाच अर्थ ते फरारी नाहीत. त्यामुळे त्यांच्या विरोधातील वॉरंट स्थगित करण्यात यावे,' अशी विनंती अॅड. एस. के. जैन, अॅड. प्रसाद कुलकर्णी आणि अॅड. अमोल डांगे यांनी कोर्टात केली. बालेवाडी येथील पार्क एक्स्प्रेस या बांधकाम प्रकल्पातील इमारतीचा तेरावा मजला २९ जुलै रोजी सकाळी कोसळला. या अपघातात नऊ मजुरांना जीव गमवावा लागला होता. या प्रकरणी मृगांक कन्स्ट्रक्शनचे महेंद्र कामत, भावेन हर्षद शहा, संतोष सोपान चव्हाण, ज्ञानेश्वर लक्ष्मण चव्हाण, श्रीकांत किसन पवार या सहा जणांना अटक करण्यात आली. त्यांची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली.
वॉरंट बजावलेल्या पाच जणांचा जामीन यापूर्वीच सत्र न्यायालयाने फेटाळला. तेव्हापासून ते पाचही जण फरारी आहेत. पोलिसांच्या पथकांनाही त्यांचा माग काढता आलेला नाही. त्यामुळे त्यांना कोर्टाकडून फरारी घोषित करण्यासाठी अजामीनपत्र वॉरंट बजावणे गरजेचे असल्याचा अर्ज पोलिस निरीक्षक दयानंद ढोमे यांनी कोर्टात केला होता. त्या अर्जानुसार पाच जणांच्या विरोधात अजामीनपात्र वॉरंट बजावण्यात आले होते. बचाव पक्षाच्या युक्तिवादानंतर कोर्टाने अजामीनपात्र वॉरंटला स्थगिती दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आयटीआय उत्तीर्णांना बारावीचे प्रमाणपत्र

$
0
0

दोन विषयांत उत्तीर्ण होण्याची 'एनआयओएस'ची अट

म. टा. प्रतिनिधी, पुणे

दहावीनंतर 'आयटीआय'चा दोन वर्षांचा अभ्यासक्रम उत्तीर्ण होणाऱ्यांना आता राष्ट्रीय मुक्त विद्यालयीन शिक्षण संस्थेकडून (एनआयओएस) बारावी उत्तीर्ण झाल्याचे प्रमाणपत्र मिळणार आहे. त्यासाठी त्यांना केवळ 'आयटीआय'शी संबंधित असणाऱ्या दोन विषयांमध्ये उत्तीर्ण व्हावे लागेल.
केंद्र सरकारच्या या नव्या निर्णयामुळे विद्यार्थ्यांची दोन वर्षे वाचणार आहेत; शिवाय त्यांना बारावी उत्तीर्ण झाल्याचा फायदा मिळून उच्चशिक्षणाची संधी घेता येणार आहे. 'आयटीआय'च्या विद्यार्थ्यांसाठी हा निर्णय 'सोने पे सुहागा'च ठरणार आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १५ जुलै रोजी कौशल्यदिनानिमित्त दहावीनंतर आयटीआय उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना बारावी उत्तीर्ण झाल्याचे प्रमाणपत्र देण्याची घोषणा केली होती. त्यानुसार अॅडव्हान्स्ड ट्रेनिंग इन्स्टिट्यूट (एटीआय) आणि राज्याच्या व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाने (डिव्हीइटी) कार्यवाही करून याबाबतची अधिसूचना शुक्रवारी जाहीर केली. राज्यातील हजारो विद्यार्थ्यांना या सुविधेचा फायदा होणार आहे. यापूर्वी आयटीआय उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांनाही या संधीचा उपयोग होणार आहे.
राज्यातील शासकीय, खासगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमधून (आयटीआय) दहावीनंतर दोन वर्षांचा आयटीआय अभ्यासक्रम पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांना राष्ट्रीय मुक्त विद्यालयीन शिक्षण संस्थेकडून बारावी उत्तीर्ण झाल्याचे प्रमाणपत्र मिळणार आहे. हे प्रमाणपत्र मिळण्यासाठी संबंधित विद्यार्थ्याला दोन विषयांमध्ये उत्तीर्ण व्हावे लागणार आहे. हे दोन विषय विद्यार्थ्यांनी आयटीआय केलेल्या ट्रेडशी संबंधित आहेत. तसेच या विषयांसाठी 'डिव्हीइटी'तर्फे अभ्यासक्रमाची पुस्तकेही उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.
या सुविधेचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थ्यांनी www.nios.ac.in या वेबसाइटवर ऑनलाइन अर्ज भरायचा आहे. विद्यार्थ्यांना अर्जासोबत नॅशनल कौन्सिल ऑन व्होकेशनल ट्रेनिंगचे (एनसीव्हीटी) राष्ट्रीय व्यवसाय प्रमाणपत्र, जन्म अथवा शाळा सोडल्याचा दाखला, निवासी पत्त्याचा पुरावा, दहावीची गुणपत्रिका, जातीचा दाखला आणि अपंगत्व प्रमाणपत्र लागू असल्यास ऑनलाइन पद्धतीने सादर करायचे आहे. तसेच शुल्काचा दोन हजार ४६० रुपयांचा डीडी सचिव, राष्ट्रीय मुक्त विद्यालयीन शिक्षण संस्था, सेक्टर ६२, नोएडा या पत्त्यावर ३० सप्टेंबरपर्यत पाठवणे अनिवार्य आहे. इच्छुक विद्यार्थ्यांनी अधिक माहितीसाठी मुंबईतील शीव येथील 'एटीआय'शी संपर्क साधावा.
.........
१०, ११ डिसेंबरला परीक्षा
'एटीआय'मध्ये दोन विषयांची परीक्षा १० आणि ११ डिसेंबर रोजी होणार आहे. सुमारे ५०० विद्यार्थी परीक्षा देऊ शकतील अशी व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच, या विषयांसाठी मार्गदर्शन वर्ग विद्यार्थ्यांच्या मागणीनुसार 'एटीआय'मध्ये घेण्यात येतील. विद्यार्थ्यांना अर्ज भरताना अडचण आल्यास ते जवळच्या शासकीय, खासगी आयटीआयशी किंवा एटीआयशी संपर्क साधू शकतात, अशी माहिती 'डिव्हीइटी'चे उपसंचालक योगेश पाटील यांनी 'मटा'ला दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शुक्रवार पेठेत तरुणावर गोळीबार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

शुक्रवार पेठेतील शाहू चौकात गुरुवारी रात्री तरुणावर गोळीबार केल्याचा खळबळजनक प्रकार घडला. तरुणाला तीन गोळ्या लागल्या असून, त्याच्यावर खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. गोळीबार करणाऱ्या तिघांना खडक पोलिसांनी अटक केली असून, त्यांच्या अन्य साथीदारांचा शोध सुरू आहे.
भावाच्या खुनाचा बदला घेण्यासाठी गोळीबार केल्याचे तपासात समोर आले आहे. अर्जुन वसंत देवकर (वय २८, रा. शुक्रवार पेठ) असे गोळीबारात जखमी झालेल्याचे नाव आहे. या प्रकरणी अतुल नामदेव घुले (वय ३०, रा. बोपखेल), रितेश अजय पवार (वय १९) आणि दिवाकर सुरेंद्र सिंग (वय २१) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. शशिकांत घुले, देविदास उर्फ सोन्या धावडे, दिनेश धावडे, मनोज उर्फ पप्पी शिर्के, अमोल गिरी आणि चंद्रकांत नवले यांचा शोध सुरू आहे. या प्रकरणी जखमीचा आतेभाऊ संग्राम जयंतराव खामकर (वय ३३, रा. शुक्रवार पेठ) यांनी तक्रार दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अर्जुन देवकर यापूर्वी हिंजवडी परिसरात राहण्यास होता. त्यावेळी तेथे २०१०मध्ये आरोपी अतुल घुले याचा भाऊ राकेश घुलेचा खून झाला होता. या गुन्ह्यात अर्जुन देवकर हा आरोपी होता. या प्रकरणी तो नुकताच जामिनावर सुटला होता. घुले आणि त्याच्या साथीदारांनी भावाच्या खुनाचा बदला घेण्यासाठी अर्जुनला ठार मारण्याचा कट रचला. अर्जुन सध्या शुक्रवार पेठेत आत्याच्या घरी राहण्यास आला होता. गुरुवारी रात्री पावणेनऊच्या सुमारास शाहू चौकामध्ये मित्रांसोबत उभा होता. त्यावेळी अचानक दुचाकीवरून आलेल्या दोन हल्लेखोरांनी त्याच्यावर गोळीबार केला. त्याच्यावर पाच गोळ्या झाडण्यात आल्या. त्यामध्ये अर्जुनच्या डोक्यात, मानेवर आणि पायावर तीन गोळ्या लागल्या. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या अर्जुनला मित्रांनी तातडीने खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल केले.
..
आरोपींना पोलिस कोठडी
घटनेची माहिती मिळताच पोलिस सहआयुक्त सुनील रामानंद, उपायुक्त सुधीर हिरेमठ, गुन्हे शाखेचे उपायुक्त पी. आर. पाटील, सहायक आयुक्त सुरेश भोसले यांनी घटनास्थळी धाव घेतली. अर्जुनच्या डोक्यातून आणि मानेतून दोन गोळ्या काढण्यात आल्या असून, त्याची प्रकृती ठीक असल्याचे पोलिसांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पुरंदरला होणार विमानतळ

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

पुरंदर येथील जागेवर आंतरराष्ट्रीय विमानतळ उभारण्यास विमानतळ प्राधिकरणाने मान्यता दिली असून, पुढील कार्यवाहीसाठी येत्या आठ दिवसांत महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीच्या संचालक मंडळाबरोबर (एमएडीसी) बैठक घेण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी जाहीर केले. त्यामुळे पुरंदर येथे विमानतळ होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

'पुरंदर येथे विमानतळ उभारण्यास विमानतळ प्राधिकरणाने चार दिवसांपूर्वी मंजुरीचे पत्र दिले आहे. आता विमानतळाचा सर्वंकष विकास आराखडा (डीपीआर), उभारणीचे वेळापत्रक, खर्च याबाबींचा विचार करण्यासाठी 'एमएडीसी'च्या संचालक मंडळाबरोबर येत्या आठ दिवसांत बैठक होणार आहे. पुरंदरमधील जागा देण्यास स्थानिक नागरिकांनी सहमती दर्शवली आहे,' अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. पुणे विभागीय आढावा बैठकीनंतर ते पत्रकारांशी बोलत होते.

पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळाचा प्रश्न १९९८ पासून चर्चिला जात आहे. पहिल्यांदा चाकणजवळील आंबेठाण परिसराचे सर्वेक्षण झाले. त्यानंतर चांडोली आणि चांदूस येथील जागांची पाहणी झाली. या ठिकाणी विरोध झाल्याने पाबळ परिसरातील जागेची चाचपणी करण्यात आली. या ठिकाणीही शेतकऱ्यांनी विरोध दर्शवला. शेतकऱ्यांकडून विरोध सुरू असतानाच खेडमधील जागेबाबत चर्चा सुरू झाली. आता पुरंदरमधील जागेला हिरवा कंदील दाखवण्यात आला आहे. पुरंदरमधील राजेवाडी आणि वाघापूर परिसराची नुकतीच विमानतळ प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी पाहाणी केली. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री फडणवीस यांनी पुरंदरमध्ये विमानतळ उभारणीसाठी प्राधिकरणाची मान्यता मिळाल्याचे स्पष्ट केले आहे.

फडणवीस म्हणाले, 'राज्यात आतापर्यंत घेण्यात येणाऱ्या विभागीय आढावा बैठका जिल्हाधिकारी आणि मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या उपस्थितीत होत असत. आता तालुका स्तरावरील अधिकाऱ्यांबरोबर बैठका घेण्यास सुरुवात करण्यात आली आहे. दर तीन महिन्यांनी या आढावा बैठका घेतल्या जाणार आहेत.' जलयुक्त शिवार अभियानांतर्गत पुणे विभागात पहिल्या क्रमांकाचे काम झाले आहे, असे सांगून ते म्हणाले, 'या अभियानाअंतर्गत ९०५ गावे निवडण्यात आली होती. त्यापैकी ८७१ गावांमध्ये कामे झाली आहेत. पावसाळा संपल्यानंतर उर्वरित गावांमध्ये कामे केली जाणार आहेत. या कामांमुळे सुमारे सहा लाख ४५ हजार हेक्टरला पुरेल एवढा पाणीसाठा झाला आहे. २०१६-१७ या वर्षासाठी आणखी ८२५ गावे निवडण्यात आली आहेत.'

'स्थनिकांची सहमती'

पुरंदर येथे विमानतळ उभारण्यास विमानतळ प्राधिकरणाने चार दिवसांपूर्वी मंजुरीचे पत्र दिले आहे. पुरंदरमधील जागा देण्यास स्थानिक नागरिकांनी सहमती दर्शवली आहे.

- देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दहावी, बारावीसाठी ‘आधार’ची सक्ती

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी आधार क्रमांक सक्तीचा केला आहे. येत्या फेब्रुवारी-मार्चच्या परीक्षेसाठीच्या नोंदणीपासूनच ही सक्ती लागू केली होणार आहे.

शैक्षणिक वर्ष २०१६-१७ पासून दहावी आणि बारावीच्या परीक्षेसाठी बसणाऱ्या विद्यार्थ्यांची नोंदणी करतानाच विद्यार्थ्यांनी आपले आधार क्रमांक सादर करणे गरजेचे असल्याचे मंडळाने म्हटले आहे. त्यानुसार फेब्रुवारी-मार्च २०१७पासून होणाऱ्या दहावी-बारावीच्या परीक्षेचे अर्ज भरतानाही, त्यासाठीच्या अर्जात विद्यार्थ्यांना आपले आधार क्रमांक भरावे लागतील. सर्व विद्यार्थी, पालक, सर्व शाळांचे मुख्याध्यापक, ज्युनिअर कॉलेजांचे प्राचार्य यांनी या बाबीची नोंद घ्यावी, असे आवाहन मंडळाने केले आहे.

'मंडळाच्या परीक्षा अर्ज भरण्याच्या प्रक्रियेला अद्याप सुरुवात झालेली नाही. त्यापूर्वी विद्यार्थ्यांनी आधार नोंदणी करणे शक्य आहे. ज्या विद्यार्थ्यांकडे आधा रकार्ड नाही, त्यांनी ते काढून घ्यावे. बाहेरून परीक्षा देण्याचा विचार करणाऱ्या खासगी परीक्षार्थींनीही ही बाब लक्षात घ्यावी,' असे आवाहन मंडळाचे अध्यक्ष गंगाधर म्हमाणे यांनी या निमित्ताने केले.

गेल्या वर्षी विद्यार्थ्यांच्या आधार क्रमांकांची परीक्षेसाठीची नोंदणी सरकारी पातळीवरून ऐच्छिक ठेवण्यात आली होती. अद्यापही आधार क्रमांक नसणाऱ्या विद्यार्थ्यांची, विशेषतः शाळांपासून लांब असलेल्या आणि खासगी विद्यार्थी म्हणून बोर्डाच्या परीक्षा देऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांची या निर्णयामुळे धावपळ होण्याची शक्यता आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


मिळकतकर विभागाकडे बाराशे कोटींची थकबाकी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

शहरातील एक लाख मिळकतींची आकारणी नाही..., कोर्टातील प्रकरणांमध्ये २९५ कोटींची थकबाकी..., आयटी कंपन्यांकडे ३२५ कोटींची थकबाकी..., तर मोबाइल कंपन्यांकडून २२७ कोटींची वसुली बाकी..., अशी वेगवेगळ्या स्वरूपातील बाराशे कोटी रुपयांची थकबाकी असल्याचे महापालिका प्रशासनाने शुक्रवारी मान्य केले. मिळकतकरातून पालिकेला मिळणाऱ्या उत्पन्नाएवढीच थकबाकी असल्याने येत्या मार्चपर्यंत त्यापैकी ५० टक्के रक्कम वसूल करण्याची मागणी सर्वपक्षीय सदस्यांनी सर्वसाधारण सभेत केली.
मिळकतकर विभागाच्या दिरंगाईमुळे महापालिकेचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान होत असल्याचा दावा करून सर्वपक्षीय सदस्यांनी मिळकतकर विभागाच्या कारभाराचे वाभाडे काढले. तसेच, मिळकतींची करआकारणी करण्यात टाळाटाळ करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचा आग्रह आयुक्तांकडे धरण्यात आला. काँग्रेसचे नगरसेवक आबा बागूल यांनी विचारलेल्या प्रश्नांतून मिळकतकर विभागाकडे बाराशे कोटी रुपयांची थकबाकी असल्याची माहिती प्रथमच समोर आली आहे. पालिका हद्दीमध्ये सुमारे ९६ हजार मिळकतींची करआकारणी अद्याप बाकी असल्याची माहिती मिळकतकर विभागप्रमुख सुहास मापारी यांनी दिली. परंतु, मापारी महापालिकेची दिशाभूल करत असून, चार लाख मिळकतींची अद्यापआकारणी झाली नसल्याचा आरोप बागूल यांनी केला. त्यावर, स्पष्टीकरण देताना, प्राथमिक ठोकताळ्यानुसार ९६ हजार मिळकती असल्याचा दावा मापारी यांनी केला. मिळकतींची नेमकी संख्या समजावी, यासाठी जीआयएस मॅपिंग करण्यात येणार असून, येत्या सोमवारपासून सर्वेक्षण सुरू केले जाणार असल्याचे मापारी यांनी स्पष्ट केले.
मोबाइल कंपन्यांकडील थकबाकी वसूल का केली जात नाही, असा प्रश्न नगरसेवक अविनाश बागवे, संजय बालगुडे, डॉ. सिद्धार्थ धेंडे यांनी उपस्थित केला. मोबाइल कंपन्यांशी संबंधित प्रकरण सुप्रीम कोर्टात असल्याने त्यांच्यावर कारवाई करता येत नाही, असा खुलासा विधी विभागाने केला. त्यावर आक्षेप घेऊन सक्तीने वसुली करू नका, असे आदेश आहेत; वसुली थांबवा, असे नाही, अशी बाब सदस्यांनीच निदर्शनास आणून दिली. अखेर, सुप्रीम कोर्टातील वकिलांशी चर्चा करून बँड वाजवायचा का, याचा निर्णय घेण्यात येईल, असे स्पष्ट करण्यात आले.
...............
मंजुरीविनाच 'अभय योजना'
करआकारणी न झालेल्या किंवा मिळकतींच्या वापरात बदल झालेल्या मिळकतींसाठी महापालिकेने अभय योजना जाहीर केली आहे. सर्वसाधारण सभेची मान्यता न घेताच, ही योजना जाहीर केल्याने काँग्रेसचे विरोधी पक्षनेते अरविंद शिंदे यांनी त्याबाबत नाराजी व्यक्त केली. सर्वसाधारण सभेला पूर्णतः दुर्लक्षित करून आयुक्त त्यांच्या अधिकाराचा गैरवापर करत असल्याचा आरोप त्यांनी केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विद्यापीठांनी द्यावा संशोधनावर भर

$
0
0

'इस्रो'चे माजी अध्यक्ष डॉ. के. राधाकृष्णन यांचे प्रतिपादन

म. टा. प्रतिनिधी, पुणे
'नव्या कल्पना आणि तंत्रज्ञान यांच्या जोरावर अवकाश कार्यक्रमामध्ये आपले स्वतंत्र स्थान निर्माण करता येऊ शकते. जगात सहाव्या स्थानी असणारा भारताचा अवकाश कार्यक्रम पहिल्या तीन क्रमांकांमध्ये आणायचा असल्यास विद्यापीठे आणि इंजिनिअरींग कॉलेजनी संशोधनावर भर द्यायला हवा,' असे प्रतिपादन भारतीय अवकाश संशोधन संस्थेचे (इस्रो) माजी अध्यक्ष डॉ. के. राधाकृष्णन यांनी केले.
कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग, पुणेतर्फे (सीओईपी) आयोजित दहाव्या 'माइंडस्पार्क' उपक्रमामध्ये डॉ. राधाकृष्णन यांचे शुक्रवारी व्याख्यान झाले. त्या वेळी ते बोलत होते. 'महाराष्ट्र टाइम्स' या उपक्रमाचा मीडिया पार्टनर आहे. कार्यक्रमाला सीओईपीचे संचालक डॉ. बी. बी. अहुजा उपस्थित होते.
डॉ. राधाकृष्णन म्हणाले, 'अवकाश कार्यक्रमाचे तंत्रज्ञान अवगत असलेल्या एकूण ८३ देशांमध्ये अमेरिका, रशिया, युरोप, जपान आणि चीननंतर भारताचा सहावा क्रमांक लागतो. मात्र, अवकाश कार्यक्रमाचा नागरिकांना लाभ करून देण्यात भारत पहिल्या स्थानी आहे. अवकाश कार्यक्रमात केलेल्या गुंतवणुकीच्या तुलनेत भारताला त्याकडून मिळणारा लाभही इतर देशांपेक्षा अधिक आहे. मात्र, सर्वच बाबींमध्ये देशाला अव्वल स्थानी न्यायचे असल्यास इतरांपेक्षा अव्वल दर्जाचे तंत्रज्ञान हवे.'
'अमेरिकेचे पहिले रॉकेट १९५७मध्ये प्रक्षेपित झाले असले, तरी त्याच्या विकासाची सुरुवात दशकभर आधीच कॅलटेक विद्यापीठात झाली होती. नवे तंत्रज्ञान निर्माण करण्यात देशातील विद्यापीठे आणि इंजिनिअरींग कॉलेज महत्वाची भूमिका बजावू शकतात. देशाच्या अवकाश कार्यक्रमाच्या गरजा ओळखून विद्यापीठांनी संशोधन सुरू करावे,' असे डॉ. राधाकृष्णन यांनी नमूद केले. भविष्यात चंद्र, मंगळ आणि सूर्याचा अभ्यास करण्यासाठी अवकाशात पाठवण्यात येणाऱ्या मोहिमांविषयी त्यांनी माहिती दिली.
----------------------------------------------
अवकाश मोहिमा कशासाठी?
अवकाश मोहिमांवर कोट्यवधी रुपये खर्च करण्याचे कारण काय, असा प्रश्न 'इस्रो'ला नेहमी विचारला जातो. त्यावर स्पष्टीकरण देताना डॉ. राधाकृष्णन म्हणाले,'मंगळयानाद्वारे मंगळाचे अज्ञात पैलू शोधण्याचा प्रयत्न तर आहेच; शिवाय यानात वापरलेले तंत्रज्ञान भविष्यवेधी आहे. मंगळयान पूर्णपणे स्वयंचलित करण्यात आले आहे. येत्या काळात तेच तंत्रज्ञान आपल्या उपग्रहांवर वापरून स्मार्ट सॅटेलाइट तयार करण्यात येतील. चोवीस तास नजर ठेवणारे हे उपग्रह देशातील वणवे, दरडी, पूर, घुसखोरी स्वतःहून निदर्शनास आणून देऊ शकतील. अवकाश मोहिमांच्या निमित्ताने निर्माण होणारे अत्याधुनिक तंत्रज्ञान भविष्यात दैनंदिन वापरात येते, हे लक्षात ठेवावे.'

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

राज्याने द्यावा रिंगरोडचा प्रस्ताव

$
0
0

आवश्यक निधी देण्याची नितीन गडकरी यांची तयारी

म. टा. प्रतिनिधी, पुणे

पुणे शहराच्या आजूबाजूच्या पाच महामार्गांना जोडणाऱ्या रिंग रोडसाठीचा प्रस्ताव राज्य सरकारने दिल्यास, त्यासाठीचा खर्च केंद्र सरकारच्या माध्यमातून देण्याची तयारी केंद्रीय वाहतूक आणि रस्तेविकासमंत्री नितीन गडकरी यांनी शुक्रवारी दर्शविली. पुण्यासाठी महत्त्वाचे असणारे मेट्रो आणि विमानतळाचे प्रश्न मार्गी लावण्यासाठीही आपण प्रयत्नशील असल्याचे त्यांनी सांगितले.
पुण्यात एका कार्यक्रमाच्या निमित्ताने बोलताना गडकरी यांनी देशाच्या औद्योगिक क्षेत्रासाठी असणारे पुण्याचे महत्त्व, पुण्याची वाहतूक आणि त्याच्याशी निगडीत औद्योगिक क्षेत्राचा दृष्टिकोन आदी बाबींवर प्रकाश टाकला. गडकरी म्हणाले, की 'पुण्याच्या भोवती प्रस्तावित रिंग रोड हा पाच महामार्गांना एकमेकांशी जोडणारा आहे. त्यासाठीचा प्रस्ताव राज्य सरकारने पाठविल्यास त्यावर निश्चितच विचार करणे शक्य आहे. त्यासाठी मी निधी देण्यासाठी तयार आहे.'
या कार्यक्रमात पुण्याच्या औद्योगिक क्षेत्रातील सन्माननीय व्यक्तींनी पुण्यातील औद्योगिक क्षेत्रासाठी गरजेच्या असणाऱ्या वाहतूक सुविधांकडे लक्ष पुरविण्याची विनंती गडकरी यांच्याकडे केली. तोच संदर्भ घेऊन गडकरी म्हणाले, 'पुण्यासाठीच्या प्रस्तावित विमानतळासाठी सध्या १७ एकर जागा उपलब्ध होत आहे. हे विमानतळ एकदाच बांधले जाणार असल्याने, त्यासाठी आणखी मोठी जवळपास ३२ एकर जागेची मागणी मी केली आहे. ही मागणी लवकरच पूर्ण होण्याचा विश्वास आहे. पुण्याच्या मेट्रो प्रकल्पाची फाइल उच्चस्तरीय समितीकडे आहे. त्यावरही लवकरच निर्णय होईल, अशी आशा आहे.'
000
पुण्याच्या भोवती प्रस्तावित रिंग रोड हा पाच महामार्गांना एकमेकांशी जोडणारा आहे. त्यासाठीचा प्रस्ताव राज्य सरकारने पाठविल्यास त्यावर निश्चितच विचार करणे शक्य आहे. त्यासाठी मी निधी देण्यासाठी तयार आहे.
नितीन गडकरी, केंद्रीय रस्तेविकास मंत्री

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जैवइंधनाचे संशोधन, निर्मिती पुण्यात व्हावी

$
0
0

केंद्रीय रस्तेविकास मंत्री नितीन गडकरींची अपेक्षा

म. टा. प्रतिनिधी, पुणे
'जैवइंधनासारख्या अपारंपरिक इंधनांविषयीचे संशोधन आणि निर्मितीसाठी पुणे केंद्र म्हणून पुढे यावे,' अशी अपेक्षा केंद्रीय वाहतूक आणि रस्तेविकास मंत्री नितीन गडकरी यांनी शुक्रवारी व्यक्त केली. त्यासाठी मराठा चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रीज अँड अॅग्रिकल्चरसारख्या (एमसीसीआयए) औद्योगिक संस्था आणि शहरातील संशोधकांनी एकत्रितरीत्या काम करण्याची गरज असल्याचे मतही त्यांनी मांडले.
'एमसीसीआयए'च्या ८२व्या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये प्रमुख पाहुणे म्हणून गडकरी बोलत होते. पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट, 'एमसीसीआयए'चे मावळते अध्यक्ष सतीश मगर, नवनियुक्त अध्यक्ष प्रमोद चौधरी, महासंचालक डॉ. अनंत सरदेशमुख आदी या वेळी उपस्थित होते. पुण्यातील औद्योगिक क्षेत्राच्या विस्तारासाठी महत्त्वाच्या ठरणाऱ्या वाहतूक सोयी-सुविधांच्या संदर्भाने गडकरी यांनी भाष्य केले. पुण्यातील औद्योगिक क्षेत्रानेही या सोयी-सुविधांचा विचार करताना पारंपरिक पद्धतीने विचार करण्याची आपली पद्धत सोडून देऊन नव्या पद्धतीने विचार करण्याची गरज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
गडकरी म्हणाले, 'आपल्याकडे पेट्रोलिअम आणि इलेक्ट्रॉनिक हार्डवेअरची मोठ्या प्रमाणावर आयात होते. त्यामुळे रुपयाच्या तुलनेत डॉलरची किंमत वाढत चालली आहे. ही आयात कमी करून निर्यातप्रधान अर्थव्यवस्थेचा विचार करायला हवा. त्यासाठी अशा बाबींना स्थानिक पर्याय विकसित व्हायला हवा. पेट्रोलिअमला पर्याय म्हणून साखर कारखान्यांतून, बांबू उद्योगातून तयार होणारे इथेनॉल, शहरांमधील कचऱ्यापासून इथेनॉलनिर्मिती, कोळशापासून मिथेनॉलनिर्मिती आदी बाबींवर औद्योगिक क्षेत्राने भर द्यायला हवा. त्यासाठी संशोधन होणेही गरजेचे आहे.' 'वेस्ट टू वेल्थ' आणि 'नॉलेज टू वेल्थ' या दोन्ही बाबींचा औद्योगिक क्षेत्राने गांभीर्याने विचार करणे गरजेचे असल्याचेही त्यांनी नमूद केले.
000
चौधरींनी स्वीकारली सूत्रे
'एमसीसीआयए'चे नवे अध्यक्ष म्हणून 'प्राज इंडस्ट्रीज'चे संस्थापक प्रमोद चौधरी यांनी सूत्रे स्वीकारली. संस्थेचे मावळते अध्यक्ष सतीश मगर यांनी चौधरी यांना सूत्रे सोपविली. चौधरी यांचे जैवइंधन क्षेत्रातील कार्य लक्षात घेता, भविष्यात 'एमसीसीआयए' त्यांच्या नेतृत्वाखाली चांगली कामगिरी करेल, असा विश्वासही गडकरी यांनी व्यक्त केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पाणीविषयक तक्रारींचा सदस्यांनी वाचला पाढा

$
0
0

सर्वसाधारण सभेत मांडली अपुऱ्या पाणीपुरवठ्याची कैफियत

म. टा. प्रतिनिधी, पुणे

शहराच्या पूर्व भागातील पाणीपुरवठा सुरळीत करण्याचे आश्वासन वारंवार देऊनही नागरिकांना अद्याप पुरेसे पाणी मिळत नसल्याचे गाऱ्हाणे स्थानिक नगरसेवकांनी शुक्रवारी पुणे महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत मांडले. शहराच्या इतर भागांतील सदस्यांनीही पाणीपुरवठ्यातील तक्रारींचा पाढा वाचला. अखेर, येत्या सोमवारी पाणीपुरवठ्याच्या नियोजनाबाबत बैठक घेऊन मार्ग काढण्यात येईल, असे आश्वासन आयुक्तांनी दिले.
येरवडा आणि परिसरातील पाणीपुरवठा सुरळीत करण्याची ग्वाही गेल्या महिन्यात देण्यात आली होती. तरीही, अद्याप नागरिकांना दिवसातून एक तासही पुरेसे पाणी मिळत नसल्याची तक्रार स्थायी समितीचे माजी अध्यक्ष बापूराव कर्णे गुरुजी यांनी केली. उपोषण, मोर्चे काढून झाले; पण तरीही प्रश्न सुटत नसून, आता आणखी वेगळे आंदोलन करावे लागेल, असा इशाराही त्यांनी दिला. त्यांच्यासह कमल व्यवहारे, सुनंदा गडाळे यांनी शहराच्या मध्यवस्तीतील पाण्याच्या तक्रारी, तर माजी महापौर दत्तात्रय धनकवडे यांनी धनकवडी भागांतील पाणीपुरवठ्याबाबत गाऱ्हाणे मांडले. सणासुदीच्या दिवशी जाणीवपूर्वक पाणी कमी सोडले जात असल्याची तक्रार अविनाश बागवे यांनी केली. विजया वाडकर यांनी पुरेशा दाबाने पाणीपुरवठा केला जावा, असा आग्रह धरला.
गेल्याच महिन्यात येरवडा आणि परिसराच्या पाणीप्रश्नावर तोडगा काढण्याचा निर्णय झाला होता. त्यानुसार, सुधारणा अपेक्षित होत्या. मात्र अद्याप त्या झालेल्या नाहीत. या प्रश्नी योग्य मार्ग काढण्यासाठी येत्या सोमवारी तातडीची बैठक घेण्यात येईल, असे आश्वासन आयुक्त कुणाल कुमार यांनी दिले. तसेच, भामा-आसखेडच्या प्रलंबित प्रश्नावर तोडगा निघाला असून, त्याचे काम वेळेत पूर्ण करण्यावर भर दिला जाईल, असेही ते म्हणाले.
...............
पाणीप्रश्नात राजकारणाचा व्यत्यय
शहराच्या पाणीप्रश्नावरून चर्चा सुरू झाली, की त्यामध्ये राजकारण आणले जाते. शुक्रवारच्या चर्चेदरम्यान पुन्हा त्याचाच अनुभव आला. शहराच्या इतर भागांतील पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी सध्याच्या १२०० एमएलडीऐवजी दैनंदिन स्वरूपात तेराशे एमएलडी पाण्याची गरज आहे. शहराचा कोटा वाढवून देण्यासाठी भारतीय जनता पक्षाचे गटनेते गणेश बीडकर यांनी प्रयत्न करावे, अशी सूचना महापौर प्रशांत जगताप यांनी केली. त्यावर, शहरासाठी आवश्यक कोटा वाढवून देण्यासाठी निश्चित पाठपुरावा केला जाईल, अशी ग्वाही बीडकर यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पुणे-दौंड लोकल रूळावर?

$
0
0

ऑक्टोबरपासून सेवा सुरू करण्याचा रेल्वेचा प्रयत्न

म. टा. प्रतिनिधी, पुणे

पुणे-दौंड रेल्वे मार्गाचे गेली वीस वर्षे प्रलंबित असणारे विद्युतीकरणाचे काम अखेर पूर्ण झाले आहे. त्यामुळे या मार्गावरील वाहतुकीचा वेग वाढण्यास मदत होणार आहे. तसेच, पुणे-दौंड दरम्यान लोकल सेवा सुरू करणे आता शक्य झाले असून, ऑक्टोबरमध्ये लोकल सुरू करण्याचा रेल्वेचा प्रयत्न आहे. दरम्यान, या मार्गाचे काम पूर्ण झाल्यामुळे दौंड ते मुंबईपर्यंतचा भाग विद्युतीकरणाने जोडला जाणार आहे. त्यामुळे दौंड-पुणे-लोणावळा अशी लोकलही सुरू करणे शक्य आहे.
रेल्वेच्या सुरक्षा विभागाचे आयुक्त २८ आणि २९ सप्टेंबरला विद्युतीकरणाच्या कामाची पाहणी करण्यासाठी येणार आहेत. त्यांनी पाहणी केल्यानंतर आयुक्तांची समिती लोकल सुरू करण्याची परवानगी देईल. समितीच्या पत्रानंतर गाड्या सुरू करण्याबाबत रेल्वे बोर्डाला पत्र पाठविले जाईल. त्यानंतर डिझेलवर चालणाऱ्या सर्व गाड्या विजेवर धावतील. पुणे-दौंड मार्गावर वेगवान लोकल धावेल, अशी माहिती रेल्वेच्या पुणे विभागाचे व्यवस्थापक बी. के. दादाभॉय यांनी पत्रकार परिषदेत दिली. 'दौंड उपकेंद्रातील सहा टॉवर असलेल्या उच्चदाब वाहिनीचे काम ३१ डिसेंबर २०१५ रोजी पूर्ण झाले. यवतमधील अतिउच्चदाब वाहिनी आणि उपकेंद्राचे काम बाकी होते. सद्यपरिस्थितीत सर्व कामे पूर्ण झाली आहेत. काही महिन्यांपूर्वी या मार्गावर लोकलची चाचणी घेण्यात आली होती. त्यामुळे लोकल सुरू होण्यास काही तांत्रिक अडथळा येणार नाही,' अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
दररोज दौंड-पुणे असा प्रवास करणाऱ्यांना कायमच गाडी उशिरा येणे, बसायला जागा न मिळणे अशा समस्यांचा सामना प्रवाशांना करावा लागतो. यापूर्वी गाडी वेळेत न आल्याने प्रवाशांनी आंदोलनांचा मार्गही अवलंबला आहे. मात्र, लोकलसेवा सुरू झाल्यास त्यांची त्रासातून सूटका होणार आहे. लोकल सुरू झाल्यानंतर पुणे-दौंड मार्गावरील पॅसेंजर गाड्यांवरील भार कमी होईल. लोकलचा वेग अधिक असल्याने प्रवाशांच्या वेळेतही बचत होणार आहे.
...........
लोकलचे रेकही उपलब्ध होणार
पुणे-दौंड हे अंतर ७२ किलोमीटर आहे. या मार्गावर पुणे आणि दौंडच्या दरम्यान हडपसर, लोणी, उरुळीकांचन, यवत, केडगाव, पाटस ही महत्त्वाची स्थानके आहेत. या ठिकाणांवरून पुण्यात येणाऱ्या नोकरदारांचे प्रमाण अधिक आहे. पॅसेंजरची सेवा त्यांना समाधानकारक वाटत नव्हती. त्यामुळे मेल, एक्स्प्रेस गाड्यांना थांबा द्यावा, अशी मागणी होत होती. लवकरच पुण्यासाठी लोकलचे चार नवीन रेक उपलब्ध होणार आहेत. त्यातील काही रेक या मार्गासाठी वापरले जाण्याची शक्यता आहे.
...........
पुणे-दौंड विद्युतीकरणाचे काम पूर्ण झाले आहे. पुढच्या आठवड्यात रेल्वेच्या सुरक्षा विभागाचे आयुक्त मार्गाची तपासणी करणार आहेत. तपासणीनंतर समितीने हिरवा कंदिल दाखविल्यास या मार्गावर अंतिम चाचणी घेऊन पुढील महिन्यापासून लोकलसेवा कार्यरत होईल.
बी. के. दादाभॉय, पुणे विभाग व्यवस्थापक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

माजी मंत्र्यांच्या मुलीच्या कारमधून साडे नऊ लाखाचे सोने लंपास

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

माजी मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते लक्ष्मण ढोबळे यांची मुलगी व पत्नी खरेदी करण्यासाठी माॅलमध्ये गेल्यानंतर पार्किंग केलेल्या कारमधून तब्बल तीस तोळे सोन्याचे दागिने लंपास केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. कॅम्प परिसरातील एसजीएस मॉलसमोर शुक्रवारी दुपारी ही घटना घडली. या प्रकरणी बंडगार्डन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत ढोबळे यांच्या कन्या कोमल साळुंखे (वय ३४, रा. भोसरी) यांनी तक्रार दिली आहे. कोमल व त्यांची आई व इतर काहीजण कारमधून कॅम्प परिसरातील एसजीएस मॉल येथे खरेदी करण्यासाठी शुक्रवारी दुपारी दोनच्या सुमारास आले होते. हे सर्वजण खरेदीसाठी मॉलमध्ये गेल्यानंतर चालकाने कार मॉल समोरील फुटपाथवर पार्किंग केली. कार लॉक करून तोही बाहेर येऊन थांबला. त्यावेळी अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या कारमध्ये ठेवलेले तीस तोळे सोन्याचे दागिने, काही महत्त्वाचे कागदपत्रे तसेच इतर साहित्य असलेली बॅग चोरून नेली. कोमल या खरेदी करून साडेतीन वाजता परत आल्या. त्यावेळी त्यांना कारमध्ये दागिन्यांची बॅग नसल्याचे आढळून आले. त्यांनी चालकाकडे चौकशी केली. मात्र, त्यालाही माहीत नसल्याचे त्याने सांगितले. या घटनेची तत्काळ पोलिसांना माहिती देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. दरम्यान, चालकाकडे विचारल्यानंतर त्याने कार लॉक करून तो लंघुशंकेसाठी गेल्याचे त्याने पोलिसांना सांगितले. त्यानंतर या प्रकरणी बंडगार्डन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले आहेत. मात्र, मॉलचा सीसीटीव्ही अस्पष्ट दिसत असल्याने पोलिसांना तपासात अडथळे येत आहेत. या प्रकरणी उपनिरीक्षक एस. पी. शिंदे हे अधिक तपास करत आहेत.

दरम्यान, शिवाजीनगर येथील अॅक्सिस बँकेच्या एटीएमजवळ साळुंके यांची चोरीला गेलेली पर्स एका नागरिकाला आढळून आली आहे. त्यातील माहितीच्या आधारे त्याने त्यांना संपर्क साधला आहे. पोलिसांनी येथील एटीएमचे सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले असून त्याच्या आधारे तपास सुरू आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


पवनाधरणात बुडून तरुणाचा मृत्यू

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, लोणावळा
मित्रांसमवेत पवनाधरण परिसरात पर्यटनासाठी आलेल्या एका तरुणाचा पवनाधरणाच्या पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने बुडून मृत्यू झाला आहे. ही घटना शनिवारी दुपारी दीडच्या सुमारास पवनाधरण परिसरातील शिंदगाच्या हद्दीत घडली आहे.
शरद विनोदकोट्टा कुमार (वय २१, रा. विमाननगर, मूळ रा. तेलंगणा) असे बुडून मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव असून, तो पुण्यात कामाला होता.
लोणावळा ग्रामीण पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शरद हा त्याच्या सहा मित्रांसमवेत शनिवारी सकाळी त्यांच्या मोटारसायकलने मावळ व पवनाधरण परिसरात फिरायला आले होते. दुपारी एकच्या दरम्यान ते सर्व मित्र पवनाधरण परिरातील शिंदगावच्या हद्दीतील धरणाच्या पाण्यात उतरले होते. त्यातील काही मित्रांबरोबर शरद पोहण्यासाठी पाण्यात उतरला होता. मात्र, त्याला येथील पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने त्याचा पाण्यात बुडूुन मृत्यू झाला.
या घटनेची माहिती मिळताच लोणावळा ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत लोणावळ्यातील शिवदुर्ग मित्र अँड ट्रेकिंग क्लबच्या सदस्यांच्या मदतीने शरदला एक तासाच्या प्रयत्नानंतर पाण्यातून बाहेर काढले. या घटनेचा पुढील तपास लोणावळा ग्रामीणचे पोलिस उपनिरीक्षक शिवाजी दरेकर हे करीत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तब्बल सहा वर्षांपूर्वीचा टीडीआर घाईने रद्द

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, पुणे
पुणे महानगरपालिकेमध्ये नवा टीडीआर घोटाळा उघडकीस आला असून, आता त्याची सारवासारव करण्यासाठी तब्बल सहा वर्षांनी देण्यात आलेला टीडीआर रद्द करण्यात आला आहे. या सगळ्यामध्ये मूळ जागेच्या इतर हक्कांमध्ये नाव असलेल्याने पालिका प्रशासनाकडे केलेल्या तक्रारीकडे तब्बल सहा वर्षे दुर्लक्ष केले गेले; पण या मालकाने न्यायालयात धाव घेतल्यानंतर अवघ्या पंधरा दिवसांमध्ये पालिका प्रशासनाने धावपळ करून प्रकरण निस्तरण्यासाठी गतिमान कारभार केल्याचे पुढे आले आहे.
धनकवडी येथील एका जागेच्या बाबत हा प्रकार घडला आहे. 'महाराष्ट्र टाइम्स'ने सर्वप्रथम हा प्रकार उघडकीस आणला होता. धनकवडी येथील सर्व्हे नंबर ४/१७/२ या मिळकतीमधील दहा गुंठे जागेवर रस्त्याचे आरक्षण आहे. ही जागा मूळ मालकांनी संभाजी थोरवे, शेखर चिंधे, श्रीधर कामठे यांना विकसनासाठी दिली होती. या जागेच्या सातबाराच्या उताऱ्यावर इतर हक्कात या सर्वांची नावे होती. असे असतानाही मूळ मालकांनी ही जागा राष्ट्रवादीचे नगरसेवक सुभाष जगताप यांना विकली. मूळ मालकांनी आपली फसवणूक करून ही जागा दुसऱ्या व्यक्तींना विकली आहे; हे लक्षात येताच ही बाब महापालिकेच्या निदर्शनास आणून देऊन आपला विकसन हक्क असल्याचे थोरवे आणि कामठे यांनी स्पष्ट केले होते.
या जागेच्या मोबदल्यात तत्कालीन सभागृह नेते जगताप यांनी पालिकेकडे हस्तांतरीय विकास हक्क (टीडीआर) मिळण्यासाठी अर्ज दाखल केल्याचे लक्षात येताच अर्ज दाखल करून टीडीआर देण्यात येऊ नये, असा अर्ज पालिकेकडे केला होता. विधी सल्लागारांनी याबाबत अर्जदारांच्या बाजूने अहवाल देखील दिला होता. मात्र, याकडे दुर्लक्ष करत जगताप यांच्या दबावामुळे पालिकेचे तत्कालीन आयुक्त तसेच बांधकाम आणि विधी विभागातील अधिकाऱ्यांनी टीडीआर दिला होता.
पालिकेकडे वारंवार तक्रार करून देखील चुकीच्या पद्धतीने टीडीआर दिल्याने थोरवे, कामठे यांनी कोर्टात तक्रार दाखल केली होती. पाच दिवसांपूर्वी या अर्जावर सुनावणी देताना कोर्टाने पालिकेचे अतिरिक्त‌ आयुक्त, माजी सभागृह नेते जगताप यांच्यासह अकरा जणांची चौकशी करण्याचे आदेश शिवाजीनगर पोलिसांना दिले आहेत.

पालिकेच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह
न्यायालयात हे प्रकरण गेल्याचे लक्षात येताच पालिका प्रशासनाला तब्बल सहा वर्षांनी जाग आली. पालिका आयुक्त कुणाल कुमार यांनी हा टीडीआर रद्द करण्याचे आदेश दिल्याचे शहर अभियंता कार्यालयाने संबंधितांना दिलेल्या पत्रामध्ये म्हटले आहे. याच पत्रामध्ये जगताप यांनी पालिकेला पत्र देऊन ही जागा पालिकेने परत घ्यावी व टीडीआर रद्द करावा अशी विनंती केल्याचे म्हटले आहे. पालिका आयुक्तांनी त्यांची ही विनंती मान्य करण्याचा निर्णय घेतल्याचेही अधीक्षक अभियंता यांनी सर्व जागा मालकांना कळविले आहे. पालिका प्रशासनाची ही कार्यक्षमता खरोखरच चक्रावून टाकणारा आहे.

मालकी नक्की कोणाची ?
महापालिका प्रशासनाची ही कृती अनेक प्रश्न उपस्थित करणारी आहे. मुळात महापालिकेच्या मालकीचा एखादा भूखंड कोणालाही देण्याचा अधिकार हा सर्वसाधारण सभेचा आहे. पालिका आयुक्त तसा निर्णय परस्पर घेऊ शकत नाहीत. त्याचप्रमाणे हा टीडीआर वापरून करण्यात आलेल्या बांधकांमाचे काय या प्रश्नाचेही उत्तर अजून अनुत्तरित आहे. त्याचप्रमाणे फक्त पालिका आयुक्तांच्या आदेशाने टीडीआर रद्द करण्यात आला असला तरीही पालिकेच्या वतीने ताब्यात घेण्यात आलेल्या भूखंडाचे भवितव्य काय, त्याची मालकी नक्की कोणाची हा प्रश्नही अनुत्तरितच आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मिळकतकराचे ‘जीआयएस’ मॅपिंग सोमवारपासून करणार

$
0
0



म. टा. प्रतिनिधी, पुणे
महापालिकेच्या हद्दीत असलेल्या सर्व मिळकतींची माहिती एका क्लिकवर उपलब्ध व्हावी, तसेच आजपर्यंत मिळकतकर (प्रॉपर्टी टॅक्स) न भरलेल्या मिळकतदारांची माहिती समोर यावी, यासाठी महापालिका प्रशासनाने 'जीआयएस मॅपिंग' करण्याचा निर्णय घेतला आहे. सोमवार (२६ सप्टेंबर) पासून याची सुरुवात होणार आहे. या पाहणीनंतर शहरातील प्रत्येक मिळकतीची कर आकारणी होणार असून, महापालिकेच्या तिजोरीत वर्षाला दोनशे कोटी रुपयांची भर पडण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
महापालिकेच्या हद्दीत सुमारे आठ ते साडेआठ लाख मिळकती असल्याची नोंद महापालिकेकडे आहे. पालिकेकडे नोंद असलेल्या मिळकतींपेक्षा अधिक मिळकती शहरात असल्याचा अंदाज पालिकेचा आहे. ज्या मिळकती पालिकेच्या नजरेतून सुटल्या आहेत, त्यांचा टॅक्स वसूल व्हावा, या उद्देशाने पालिकेने जीआयएस मॅपिंग करण्याचा निर्णय घेतला आहे. मिळकतींची थकबाकी वसूल करण्याबरोबरच या सर्वेक्षणामुळे मिळकतींच्या वापरातील बदलाची माहितीही मिळणार आहे. झपाट्याने वाढत असलेल्या शहरातील अनेक मिळकतींची नोंदणी पालिकेकडे नसल्याने पालिकेचे दरवर्षी कोट्यवधी रुपयांचे नुकसान होते. विविध भागांतील एक लाख प्रॉपर्टीची अद्यापही कर आकारणी झाली नसल्याचे पालिका प्रशासनाने स्पष्ट केले. तर शहरातील चार लाख मिळकतींची नोंदणी प्रशासनाकडे नसल्याचे नगरसेवकांचे म्हणणे आहे.
शहरात नक्की किती मिळकती आहेत, त्यापैकी किती मिळकतींचा प्रॉपर्टी टॅक्स पालिकेकडे जमा होतो. निवासी ते व्यापारी आणि व्यापारी ते निवासी असा बदल झालेल्या किती प्रॉपर्टी आहेत. याची संपूर्ण माहिती उपलब्ध व्हावी, यासाठी पालिकेने जीआयएस मॅपिंग करण्याचा निर्णय घेतल्याचे पालिकेतील अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. यासाठी २ हजार २०० कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात येणार आहे. पालिकेचे कर्मचारी घरोघरी जाऊन पाहणी करणार असून, यामध्ये प्रामुख्याने मिळकतींच्या बदलाचीही नोंद घेतली जाणार आहे. करआकारणी न झालेल्या मिळकतींची संख्या मोठी आहे. शिवाय, मिळकतकराची थकबाकीही वाढत आहे. परंतु, करआकारणी आणि थकबाकी वसुलीच्या दृष्टीने प्रयत्न होत नसल्याची तक्रार बागूल यांनी महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत केली.


शहरातील मिळकतींची इत्भूंत माहिती उपलब्ध व्हावी, यासाठी मिळकतींचे जीआयएस मॅपिंग केले जाणार आहे. यामुळे प्रत्येक प्रॉपर्टीला एक ओळख मिळेल. पुढील नऊ महिन्यांत हे काम पूर्ण होणार असून, पालिकेला वाढीव उत्पन्न मिळणार आहे.
सुहास मापारी,
उपायुक्त, कर आकारणी व करसंकलन विभाग, महापालिका

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

डेंगी, चिकुनगुनियासाठी सोमवारपासून तपासणी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

शहराच्या सर्व भागांत डेंगी आणि चिकुनगुनियाचा मोठ्या प्रमाणावर फैलाव झाला असल्याने डासांची उत्पत्ती रोखण्यासाठी येत्या सोमवारपासून (२६ सप्टेंबर) घरोघरी तपासणी मोहीम केली जाणार असल्याचे पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने शुक्रवारी जाहीर केले. या तपासणी मोहिमेसाठी आरोग्य विभागाकडे उपलब्ध असलेले मनुष्यबळ अपुरे असल्याने, इतर विभागांकडून उपलब्ध झालेल्या मनुष्यबळाचा वापर त्यासाठी केला जाणार आहे.

शहरात डेंगी आणि चिकुनगुनियाच्या पेशंटमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ होत आहे. प्रत्येक घरटी एक तरी व्यक्ती यापैकी एका रोगाने आजारी असल्याकडे लक्ष वेधत नगरसेविका उषा कळमकर यांनी शुक्रवारी महापालिकेतर्फे कोणत्या उपाययोजना सुरू आहेत, अशी विचारणा केली. त्यांच्यासह इतर सर्वच पक्षाच्या नगरसेवकांनी डेंगी आणि चिकुनगुनिया नियंत्रणात आणण्यासाठी पालिकेतर्फे कोणती पावले उचलली जात आहेत, याचा खुलासा केला जावा, अशी मागणी केली. तसेच, नागरिकांच्या तक्रारींची दखल घेतली जात नसून, डेंगी-चिकुनगुनियाच्या टेस्टसाठी त्यांच्याकडून जादा रकमेची मागणी केली जात असल्याचे निरीक्षणही सदस्यांनी नोंदविले.
महापालिकेचे प्रभारी आरोग्यप्रमुख डॉ. एस. टी. परदेशी यांनी या दोन्ही रोगांवर नियंत्रण मिळविण्यासाठी डासांची उत्पत्ती थांबवणे, हा एकमेव उपाय असल्याचे सांगितले. अनेक सुशिक्षित घरांमध्येही त्यासाठीची दक्षता घेतली जात नसल्याने रोगांचा प्रसार होत असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. महापौरांनी गुरुवारी घेतलेल्या बैठकीत दिलेल्या सूचनांनुसार घरोघरी तपासणी मोहीम घेण्यात येणार असल्याचे त्यांनी जाहीर केले. त्यासाठी, इतर विभागांतून जादा मनुष्यबळ महापालिका आयुक्तांनी उपलब्ध करून दिले असून, सोमवारपासून ही मोहीम हाती घेण्यात येणार आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.

डेंगी कमी; चिकुनगुनिया वाढला

गेल्यावर्षीच्या तुलनेत डेंगीच्या पेशंटची संख्या कमी झाली असल्याचे निदर्शनास आल्याचे निरीक्षण डॉ. एस. टी. परदेशी यांनी मांडले. या वर्षी डेंगीचे १ हजार ५९६ पेशंट आढळून आले आहेत. तर, चिकुनगुनियाच्या पेशंटमध्ये मात्र मोठी वाढ झाली आहे. दरवर्षी सरासरी ५० ते ६० पेशंट आढळून येत असताना, यंदा आत्ताच चिकुनगुनियाच्या पेशंटची संख्या चारशेपर्यंत पोहोचली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वैयक्तिक शौचालयांत पुणे प्रथम

$
0
0

वैयक्तिक शौचालयांत पुणे प्रथम

म. टा. प्रतिनिधी, पुणे
केंद्र सरकारतर्फे राबविण्यात येत असलेल्या वैयक्तिक शौचालय योजनेत जबलपूर शहराला मागे टाकत पुणे महापालिकेने देशात प्रथम क्रमांकावर झेप घेतली आहे.
स्वच्छ भारत योजनेअंतर्गत केंद्र सरकारच्या वतीने ही योजना राबवण्यात येत आहे. शौचालये नसलेल्या भागात प्रत्येक घरी शौचालय बांधण्याचा उद्देश आहे. यापूर्वी १० हजारांचा पल्ला गाठल्यावर महापालिकेने कर्मचाऱ्यांचे विशेष कौतुक केले होते. आता हा आकडा १९ हजारांवर पोचला आहे. शहरातील अनेक भागातील वस्त्या आणि झोपडपट्ट्यांमध्ये हे काम सुरू आहे. महापालिकेच्या घनकचरा विभाग, १५ क्षेत्रीय कार्यालये व क्रेडाई संस्थेतर्फे हे काम सुरू आहे. यासाठी केंद्र सरकार बारा हजार रुपये आणि राज्य सरकारकडून तीन हजारांचे अनुदान दिले जाते. त्यामध्ये महापालिका देखील आपला वाटा उचलत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images