Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

मोक्कातील फरारी आरोपीला अटक

$
0
0



म. टा. प्रतिनिधी, पुणे
महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण कायद्याची (मोक्का) कारवाई केलेल्या गुन्ह्यात फरार असलेल्या एकाला खंडणी विरोधी पथकाने अटक केली.
साहिल राजेश पिल्ले (वय १९, रा. खडकी) असे अटक केलेल्याचे नाव आहे. पिल्ले हा सराईत गुन्हेगार आहे. सराईत गुन्हेगार व मोक्का सारख्या गंभीर गुन्ह्यात फरार असणाऱ्यांना अटक करण्याचे आदेश वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिले आहेत. त्यानुसार, खंडणी विरोधी पथकाकडून फरार आरोपींचा शोध सुरू होता. पिल्ले हा गेल्या तीन महिन्यांपासून मोक्काच्या गुन्ह्यात फरार होता. तो खडकी परिसरात येणार असल्याची माहिती खंडणीविरोधी पथकाचे सहायक निरीक्षक सुनील गवळी यांना मिळाली होती. त्यानुसार गवळी व त्यांच्या पथकाने साहिलला सापळा रचून अटक केली. त्याला पुढील कारवाईसाठी सहायक पोलिस आयुक्त खडकी विभागाकडे वर्ग करण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


विमानतळ गेल्यामुळे खेडमध्ये वाटले पेढे

$
0
0

विमानतळ गेल्यामुळे खेडमध्ये वाटले पेढे

राजगुरूनगर : खेड तालुक्यातील आंतरराष्ट्रीय विमानतळाचा प्रकल्प अखेर पुरंदर तालुक्यात होत असल्यामुळे कोये-धामणे-पाईट गावातील शेतकऱ्यांनी पेढे वाटून व फटाके फोडून आनंद व्यक्त केला.
भामा-आसखेड धरणालगतच असणाऱ्या या गावांतील जमिनीवर विमानतळ प्रस्तावित होते; परंतु या विमानतळामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान हाोईल, या भीतीमुळे शेतकऱ्यांचा या विमानतळाला तीव्र विरोध होता. विमानतळ होऊ नये म्हणून संबधित शेतकऱ्यांनी अनेकवेळा आंदोलने केली होती. ज्या जमिनीवर हे विमानतळ प्रस्तावित होते, ती बहुतांश जमीन बागायत असल्यामुळे जमीन देण्यास शेतकरी तयार नव्हते. ही जागा सपाट असून विमानतळास योग्य असल्याचा अहवाल संबंधित विभागाने सरकारला दिला होता.
या वेळी पप्पू राळे, जयसिंग दरेकर, बळवंत डांगले, काळूराम कोळेकर, अंकुश कोळेकर, पोपट राळे, अरुण करंडे, राजू कोळेकर, सुनील राळे, साहेबराव राळे, माऊली कोळेकर, संजय कोळेकर आदी शेतकरी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नसलेल्या कंपनीला पावणे पाच कोटी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

परदेशातून कापड आयात करायचे असल्याचे सांगत हाँगकाँग येथील कंपनीच्या नावाने बनावट बिल तयार करून त्यावर पुण्यातून तब्बल पावणे पाच कोटी रुपये पाठविल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. पुण्यातील एका बँकेत बनावट कागदपत्रे सादर करून त्यांच्या मदतीने हे पैसे पाठविल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी लष्कर पोलिस ठाण्यात दोन व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अनिलकुमार कानोजिया (वय ४१, रा. बालेवाडी) यांनी तक्रार दिली आहे. त्यावरून लक्ष्मण भोपालसिंग आणि रामेश्वर लाल (रा. दोघेही राजस्थान) यांच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कॅम्प परिसरात इंडसइंड बँकेची शाखा असून कानोजिया या बँकेच्या शाखा प्रबंधक आहेत. जानेवारी महिन्यात आरोपींनी या बँकेत सर्वग्य ट्रेडिंग कंपनीच्या नावाने चालू खाते उघडले. हाँगकाँग येथून कपडे आयात करायचे असून त्यासाठी आगाऊ रक्कम पाठविण्याची गरज आहे. असे म्हणून आरोपींनी एबलवेल गारमेंट या कंपनीची बनावट बिले दाखवून या कंपनीच्या खात्यावर तब्बला सात लाख ३३ हजार अमेरिकी डॉलर बँकेच्या खात्यातून पाठविले. बँकेकडून देखील ही रक्कम हाँगकाँग येथील कंपनीला देण्यात आली. त्यानंतर बँकेने व्यवहाराची कागदपत्रे नागपूरच्या कस्टम विभागाकडे पाठविली. त्यावेळी बँकेतून पाठविलेली अशी कंपनी नसून त्या कंपनीच्या नावाने बनावट ‌बिल तयार करून पैसे पाठविल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी सहायक निरीक्षक विठ्ठल साळुंके अधिक तपास करत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मराठा समाजाचा आज पुण्यात मोर्चा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

शिक्षण-रोजगाराच्या संधी नाकारल्या जात असल्याची अस्वस्थता आणि कोपर्डी घटनेमुळे निर्माण झालेल्या संतापाच्या भावनेचा एक 'शांततेचा हुंकार' आज (रविवारी) पुण्याच्या रस्तोरस्ती मराठा क्रांती मूक मोर्चाद्वारे उमटणार आहे. मोर्चाला मिळणारा मोठा प्रतिसाद पाहून सकाळी आठपासून मोर्चा संपेपर्यंत शहरातील अठरा रस्त्यांवरील वाहतूक बंद राहणार आहे. पीएमपी बससेवाही या काळात बंद राहणार आहे.

डेक्कन जिमखान्यावर छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून सकाळी साडेदहाच्या सुमारास मोर्चाला प्रारंभ होणार आहे. लक्ष्मी रस्ता, रास्ता पेठ मार्गे हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर जाणार आहे. तेथे जिल्हाधिकाऱ्यांना मागण्यांचे निवेदन दिल्यानंतर राष्ट्रगीताने मोर्चाची सांगता होणार आहे. मोर्चाला होणारी गर्दी लक्षात घेऊन शहरातील नागरिकांनी मध्यवस्तीत वाहने आणण्याचे टाळावे, असे आवाहन वाहतूक पोलिसांनी केले. पुण्यातील मोर्चेकऱ्यांनीही शक्यतो वाहने न आणता मोर्चात सहभागी व्हावे, असे आवाहन संयोजकांनी केले आहे.

मोर्चाचे नेतृत्व लहान मुली करणार असून, त्यानंतर महिला आणि त्यानंतर नागरिक मोर्चात सहभागी होणार आहेत. शहराच्या चारही बाजूंना पार्किंग व्यवस्था केली आहे. टिळक चौकामध्ये पोलिस नियंत्रण कक्ष उभारण्यात आला असून, मुख्य नियंत्रण कक्षाद्वारे बंदोबस्तावर लक्ष ठेवण्यात येणार आहे. गर्दीचे नियंत्रण करण्यासाठी खास पथके नेमण्यात आलेली आहेत. संयोजकांनी नियुक्त केलेले पाच हजार स्वयंसेवकही पोलिसांना मदत करणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कोर्टात दावा हरल्याने प्रौढाची आत्महत्या

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पिंपरी
जमिनीबाबत कोर्टात सुरू असलेला दावा हरल्याने प्रौढाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. शनिवारी (२५ सप्टेंबर) सकाळी ही घटना उघडकीस आली. दरम्यान, प्रौढाने आत्महत्येपूर्वी चिठ्ठी लिहून ठेवली आहे.
बाळू बबन बग (५०, रा. बगवस्ती, पाटीलनगर, चिखली) असे आत्महत्या केलेल्या प्रौढाचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बग यांच्या जमिनीसंदर्भात कोर्टाता दावा सुरू होता. त्याचा निकाल बग यांच्या विरोधात लागला. बग कर्जबाजारी झाले होते. त्यातून त्यांनी आलेल्या नैराश्यातून बग यांनी गळफास घेऊन शनिवारी आत्महत्या केल्याचे उघड झाले. बग यांनी आत्महत्येपूर्वी चिठ्ठी लिहून ठेवली असून, त्यामध्ये आठ लोकांची नावे आहेत. निगडी पोलिस तपास करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नगरसेवक-रिक्षाचालकात वाद; परस्परविरोधी गुन्हे दाखल

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पिंपरी
रिक्षा चालक आणि नगरसेवक गणेश लोंढे यांच्यात किरकोळ कारणावरून वाद झाले. लोंढे आणि त्यांच्या साथीदाराने रिक्षा चालकास मारहाण केली. शनिवारी (२४ सप्टेंबर) रात्री पावणे आकराच्या सुमारास चिंचवड येथील तानाजीनगरमध्ये हा प्रकार घडला. या प्रकरणी परस्पर विरोधी गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे.
गणेश नारायण लोंढे (रा. लोंढे चाळ, तानाजीनगर, चिंचवड), असे गुन्हा दाखल झालेल्या नगरसेवकाचे नाव आहेत. अजय बाळासाहेब खुडे (२५, रा. लोंढे चाळ, तानाजीनगर, चिंचवड) यांनी चिंचवड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. या प्रकरणी परस्पर विरोधी तक्रार दाखल करून अजय खुडे, सुमित लोंढे हरी अँथनी यांच्या विरुद्धही तक्रार देण्यात आली आहे.
वरिष्ठ निरीक्षक विठ्ठल कुबडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, खुडे रिक्षाचालक आहे. शनिवारी रात्री त्याची रिक्षाचालक अँथनी सोबत किरकोळ कारणातून भांडणे झाली. अँथनी हा लोंढे यांचा मित्र असून, त्या वेळी लोंढे त्यांच्या सोबत होते. भांडणात दोन्ही गटात धक्काबुक्की झाल्याने लोंढे यांनी खुडेच्या कानाखाली मारली. त्यानंतर खुडे याने चिंचवड पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार गणेश लोंढे व हरी अँथनी यांच्यावर तर अँथनीच्या तक्रारीनुसार सुमित लोंढे व अजय खुडे यांच्यावर अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चिंचवड पोलिस तपास करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पवना धरणात बुडून तरुणाचा मृत्यू

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, लोणावळा
मित्रांसमवेत पवनाधरण परिसरात पर्यटनासाठी आलेल्या एका तरुणाचा पवनाधरणाच्या पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने बुडून मृत्यू झाला आहे. ही घटना शनिवारी दुपारी दीडच्या सुमारास पवना धरण परिसरातील शिंदगाच्या हद्दीत घडली आहे.
शरद विनोदकोट्टा कुमार (२१, रा. विमाननगर, मूळ रा. तेलंगणा) असे बुडून मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव असून, तो पुण्यात कामाला होता.
लोणावळा ग्रामीण पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शरद हा त्याच्या सहा मित्रांसमवेत शनिवारी सकाळी त्यांच्या मोटारसायकलने मावळ व पवनाधरण परिसरात फिरायला आले होते. दुपारी एकच्या दरम्यान ते सर्व मित्र पवनाधरण परिरातील शिंदगावच्या हद्दीतील धरणाच्या पाण्यात उतरले होते. त्यातील काही मित्रांबरोबर शरद पोहण्यासाठी पाण्यात उतरला होता. मात्र, त्याला येथील पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने त्याचा पाण्यात बुडून मृत्यू झाला.
या घटनेची माहिती मिळताच लोणावळा ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत लोणावळ्यातील शिवदुर्ग मित्र अँड ट्रेकिंग क्लबच्या सदस्यांच्या मदतीने शरदला एक तासाच्या प्रयत्नानंतर पाण्यातून बाहेर काढले. या घटनेचा पुढील तपास लोणावळा ग्रामीणचे पोलिस उपनिरीक्षक शिवाजी दरेकर हे करीत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

काश्मीरमधील जनतेशी हवा सुसंवाद

$
0
0

जम्मू-काश्मीरमधील महिला आयोगाच्या अध्यक्ष नईमा मेहजूर यांचे मत
म. टा. प्रतिनिधी, पुणे
'काश्मीरमध्ये हिंसाचारासारख्या घटना घडतात, तेव्हा सामान्य जनतेला अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. सैन्याकडून सुरक्षिततेच्या दृष्टीने केल्या जाणाऱ्या गोळीबाराने काश्मीरमधील प्रश्न सुटणार नाहीत. त्यामुळे काश्मीरमध्ये शांतता प्रस्थापित करण्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन उपाय शोधला पाहिजे. गोळीबाराने प्रश्न सुटणार नाही. तेथील जनतेशी संवाद वाढविला पाहिजे,' असे मत जम्मू-काश्मीरच्या महिला आयोगाच्या अध्यक्ष नईमा मेहजूर यांनी शनिवारी व्यक्त केले.
सरहदतर्फे 'काश्मिरी महिलांची सद्यस्थिती व उपाय' या विषयावर नईमा मेहजूर यांचे व्याख्यान आयोजित केले होते. त्या वेळी त्या बोलत होते. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या विद्या बाळ, सुषमा नहार, 'सरहद'चे अध्यक्ष संजय नहार आदी या वेळी उपस्थित होते.
या वेळी मेहजूर म्हणाले, 'काश्मीरमध्ये परिस्थिती चिघळल्यास, ती आटोक्यात आणण्यासाठी गोळीबार केला जातो. स्थानिकांकडून सैन्यावर दगडफेक होते. काश्मीर बाहेरील जनतेला इतकेच चित्र दिसते. पण या परिस्थितीचा तेथील सामान्य जनतेच्या दैनंदिन जीवनावर काय परिणाम होतो, हे आपण कधीच पाहत नाही.'
'महिलांना या परिस्थितीचा सर्वाधिक जास्त फटका बसतो. एखाद्या घरातील पुरुष किंवा तरुण मुलगा दगावल्यास त्या घरातील महिलेला अनेक परिणामांचा सामना करावा लागतो. ते कधीही समोर येत नाही. आपल्याकडे लोकशाही आहे, मग लोकशाहीत गोळीबाराने प्रश्न सोडविण्याचा का प्रयत्न केला जातो,' असा प्रश्न मेहजूर यांनी उपस्थित केला.
या वेळी विद्या बाळ म्हणाल्या, 'युरोपियन युनियनमध्ये अनेक देश एकत्र येऊन नांदत होते. त्याचे मुख्य कारण त्या देशांमध्ये त्यांच्या संस्कृतीची देवाणघेवाण झाली, हे आहे. आपल्या देशातही अशाप्रकारे देवाणघेवाण झाले पाहिजे. अन्य राज्यातील नागरिकांनी काश्मिरी लोकांशी संवाद साधला पाहिजे. त्यातून सौहार्दपूर्ण वातावरण निर्माण होईल.' 'काश्मिरातील लोकांमध्ये आपण या देशाचेच घटक आहोत, ही भावना वाढील लागेल आणि त्यासाठी त्यांना भारतीयांचे प्रमे व विश्वास मिळाला पाहिजे,' असेही त्या म्हणाल्या.
००००
काश्मीरमध्ये परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी गोळीबार केला जातो. स्थानिकांकडून सैन्यावर दगडफेक होते. या परिस्थितीचा सामान्य लोकांवर गंभीर परिणाम होतो. महिलांना याचा सर्वाधिक फटका बसतो. एखाद्या घरातील पुरुष किंवा तरुण मुलगा दगावल्यास त्या घरातील महिलेला अनेक परिणामांचा सामना करावा लागतो. ते कधीही समोर येत नाही. आपल्याकडे लोकशाही आहे, पण मग लोकशाहीत गोळीबाराने प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न का केला जातो?
- नईमा मेहजूर, अध्यक्ष, जम्मू-काश्मीरच्या महिला आयोग

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


अन् उलगडला ‘सई’चा कलाप्रवास

$
0
0

सय - माझा कलाप्रवास' प्रकाशनादरम्यान उलगडले सई परांजपेंचे व्यक्तिमत्त्व
म. टा. प्रतिनिधी, पुणे
'सईताईने आनंदाला प्राधान्य दिलं. तिला समाजाबद्दल जे वाटत ते तिने अत्तर व गुलाबपाणी शिंपडावं तस शिंपडलं. विद्रोही, आक्रस्ताळी होऊन ती कधी व्यक्त झाली नाही. ती आपल्या कलाकृतींमधून आनंद देत गेली. प्रसंगी ती ठिणगी होऊन तडतडणाऱ्या विद्युत प्रवाहासारखीही भासली. ती कलाकृतींमधून आनंद पेरत राहिली. ताई तू यापुढेही आनंद घेत राहा व असाच आनंद देत राहा...' अशा शब्दवैभवातून सईताईंचे व्यक्तिमत्त्व उलगडले.
प्रतिभावंत व प्रयोगशील दिग्दर्शिका सई परांजपे यांच्या 'सय - माझा कलाप्रवास' या पुस्तक प्रकाशनानिमित्त ही मैफल जमून आली होती. कलाकार आणि प्रतिभावंतांच्या उपस्थितीने हा कार्यक्रम उत्तरोत्तर रंगत गेला. ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर, महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, राजहंस प्रकाशनचे प्रमुख दिलीप माजगावकर या वेळी उपस्थित होते. ज्योती सुभाष, सुदर्शन आठवले, सरोला परुळकर, वंदना खांडेकर, कल्याण वर्दे, राहुल रानडे, कनल ए. एस आदी मान्यवरही उपस्थित होते. या वेळी रंगलेल्या गप्पांमधून सईताईंच्या व्यक्तिमत्त्वाचे विविध पैलू रसिकांना अनुभवता आले.
वाक्यागणिक हशा, टाळ्या आणि दस्तुरखुद्द सई परांजपे यांनी दिलेली दाद यामुळे कार्यक्रमाची रंगत आणखीनच वाढत गेली. सई परांजपे यांनी पुस्तकातील काही भागांचे अभिवाचन केले. 'स्पर्श', 'दिशा', 'गुलाबी' अशा कलाकृतींमधील काही दृश्येही दाखवून त्यामागे असणारी वैचारिक मांडणीही त्यांनी सांगितली. संध्या देवरूखकर यांनी सूत्रसंचालन केले.
---------------------------
'सईने नेहमीच मोहून टाकले'
'सई फक्त मनमोकळी नव्हे तर खुल्या स्वभावाची आहे. तिचा खुलेपणा, धीटपणा व प्रसन्नता यांनी मला नेहमीच मोहून टाकले. कोणतीही गोष्ट सोपी व सुगंधी करून टाकण्याची तिची पद्धत आहे,' असे वर्णन ज्योती सुभाष यांनी केले. 'माझे पहिले व्यावसायिक नाटक 'बिकट वाट वहिवाट' हे सई यांच्या दिग्दर्शनाखाली करायला मिळाले. त्यांनी माझी निवड करणे ही माझ्यासाठी मोठी गोष्ट होती. माझ्या करिअरमध्ये मी कधी कुठली भूमिका मागितली नाही, पण सई यांनी पुन्हा एखादा चित्रपट बनवला तर मला त्यात काम करायचे आहे. त्यांची सृजनशीलता पुन्हा अनुभवायची आहे,' असे दिलीप प्रभावळकर यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सामाजिक समस्यांबाबत लहानग्यांना वाटते खंत

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
अनेकदा लहान मुलांच्या मनात समाजात होणाऱ्या चुकीच्या घटनांबाबतची नाराजी खदखदत असतात. त्यांना फक्त वाट करून देण्याची गरज असते, याचाच प्रत्यय शनिवारी आला. राज्यभरातून आलेल्या गावांतील लहानग्यांनी शेतकरी आत्महत्या, भ्रष्टाचार, अंधश्रद्धा निर्मूलन, स्त्री-भ्रूण हत्या अशा विषयांबद्दलची खंत व्यक्त केली आणि आपल्या विचारांना वाट करून दिली.
निमित्त होते, पुणे इंटरनॅशनल सेंटरतर्फे व ग्यान की लायब्ररी यांच्या सहकार्याने आयोजित केलेल्या लोकमान्य विचार स्पर्धेतील विजेत्यांच्या गौरव समारंभाचे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचे बौद्धिक कुतूहल वाढावे, त्यांना लिखाणासाठी हक्काचे व्यासपीठ मिळावे या उद्देशाने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. विविध गावांमधून आलेल्या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिके देण्यात आली.
ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर, 'पीएमआरडीए'चे प्रमुख महेश झगडे, ज्येष्ठ पत्रकार दिलीप पाडगावकर, 'महाराष्ट्र टाइम्स'चे निवासी संपादक पराग करंदीकर, रवी पंडित, प्रतापराव पवार आदी या वेळी उपस्थित होते. कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी उपस्थित सर्व मान्यवरांशी संवाद साधला. या लहानग्यांना भारतासमोरची आव्हाने विचारली असता, त्यांनी आत्मविश्वासाने राज्याला दररोज भेडसावणाऱ्या समस्या सांगितल्या आणि संपूर्ण सभागृह अवाक झाले.
महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातून तब्बल साडेचोवीस हजार विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत आपला विक्रमी सहभाग नोंदविला. विशेष म्हणजे या स्पर्धेसाठी सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांमध्ये सुमारे ६७ टक्के विद्यार्थी हे तालुका स्तरावरील होते. त्यापैकी ५८ टक्के विद्यार्थिनी आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पिंपरी शहरावर सीसीटीव्हीची नजर

$
0
0

शहरातील मुख्य चौकांसह इतर ठिकाणी १३६ कॅमेरे
म. टा. प्रतिनिधी, पिंपरी
पिंपरी-चिंचवड शहरात वाढती गुन्हेगारी लक्षात घेता सुरक्षेसाठी पिंपरी-चिंचवडच्या महापालिकेच्या वतीने शहरातील प्रमुख भागांमध्ये १३६ सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. त्यामुळे शहराच्या प्रमुख ठिकाणी आता सीसीटीव्हीची करडी नजर असणार आहे.
पिंपरी-चिंचवड महापालिकेतर्फे अ प्रभाग २३, ब २६, क ३०, ड २६, इ ९ आणि फ प्रभागात २२ अशा सहा प्रभागातील महत्त्वाच्या चौकात एकूण १३६ सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. या सर्व सीसीटीव्ही यंत्रणेचे नियंत्रण त्या भागातील पोलिस ठाण्याअंतर्गत असणार आहे. एका प्रभागातील सीसीटीव्हीसाठी ५० लाख रुपये तर सहाही प्रभागासाठी एकूण तीन कोटींचा खर्च करण्यात आला आहे.
'शहरातील महत्त्वाच्या चौकात वाहतूक शाखेच्या वतीने सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. त्यातील काही कॅमेरे सुरू करण्यात आले आहेत. यामध्ये ब, ड आणि इ प्रभागातील सीसीटीव्ही कॅमेरा यंत्रणेचे उद्घाटन करण्यात आले आहे. उर्वरित अ, क आणि फ या तीन प्रभागातील यंत्रणेचे उद्घाटन करणे अद्याप बाकी आहे. येत्या काही दिवसात येथील यंत्रणेचे उद्घाटन करण्यात येईल. तसेच या सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये एक महिन्यांपर्यंतचे रेकॉर्डिंग होऊ शकते,' अशी माहिती विद्युत विभागाचे सह शहर अभियंता प्रवीण तुपे यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जिल्ह्यातूनही जनांचा प्रवाह

$
0
0

टीम मटा

मराठा समाजाच्या मोर्चामध्ये सहभागी होण्यासाठी जिल्हा-उपनगरातून पुणे शहराकडे अनेकांनी रविवारी मार्गक्रमण केले. जिल्हा-उपनगरातून मोठ्या संख्येने लोक मोर्चामध्ये सहभागी झाले. विविध संस्था, संघटनांतर्फे मोर्चामध्ये पाणीवाटप आणि विविध प्रकारची मदत करण्यात आली.

कात्रज : धनकवडी, कात्रज, आंबेगाव परिसरासह जिल्ह्यातील भोर, वेल्हा व शिरवळ पर्यंतच्या महामार्गालगतच्या गावागावांतील मराठा बांधव, महिला, युवकांनी मार्चाच्या दिशेने जाण्यासाठी सातारा रस्ता बीआरटी मार्ग रविवारी व्यापला होता. भारती विद्यापीठ परिसरातील महापालिका आवारात आंबेगाव, जांभूळवाडी रस्ता, दत्तनगर, आंबेगाव पठार, चंद्रभागानगर, भारती विद्यापीठ परिसरातील नागरिक एकत्र आले. शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून दुचाकी रॅलीने मुख्य मोर्चाकडे जाण्यासाठी सर्व जण मार्गस्थ झाले. धनकवडीतील जानुबाई मंदिरात तळजाई पठार, धनकवडी गाव, आंबेगाव पठार, मोहननगर, गुलाबनगर, चैतन्यनगर परिसरातील नागरिक जमा झाले. आरतीनंतर शेवटच्या बसथांब्यापासून दुचाकीने मोर्चाकडे निघाले. बालाजीनगरसह काशिनाथ पाटीलनगर, पुण्याईनगर, श्रीधरनगर, शंकर महाराज मठ परिसरातील दुचाकी रॅली शहराकडे निघाली. कात्रज, संतोषनगर गुजर-निंबाळकरवाडी, मांगडेवाडी, भिलारेवाडीसह कात्रज-कोंढवा रस्ता परिसरातील नागरिक मोठ्या प्रमाणात कात्रज चौक परिसरात जमा झाले. दुचाकीने मोर्चाकडे निघाले. शहराबाहेरून खासगी बस, स्कूल बस, ट्रक, टेम्पो या वाहनांनी सकाळी आठ वाजल्यापासूनच शहराकडे येण्यास सुरुवात केली होती. भगवे झेंडे, टी-शर्ट, टोप्या परिधान करून युवक महिलांसह ज्येष्ठांनी मार्चात उत्साहाने सहभाग घेतला. ठिकठिकाणी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली होती. सातारा रस्त्यावरील प्रत्येक चौकात वाहतूक पोलिस व स्थानिक पोलिस व स्वयंसेवक मार्गदर्शन करीत होते. मार्केट यार्ड, शिंदे हायस्कूल, मुक्तांगण, लक्ष्मीनारायण, गणेश कला क्रीडा, शिवाजी मराठा हायस्कूल येथे सातारा रस्त्यावरून मुख्य मोर्चाकडे येणाऱ्यांना वाहनतळाची व्यवस्था करण्यात आली होती. मार्केट यार्डवरून नेहरू रस्त्याने सेव्हन लव्हज चौकाकडे विधानभवनकडे मोठ्या संख्येने नागरिक मोर्चामध्ये सहभागी होते.

आळंदीतून अनेकांचा सहभाग

आळंदी : मराठा क्रांती मूक मोर्चाच्या नियोजनपूर्व आढावा बैठकीत केलेल्या नियोजनाप्रमाणे आळंदीतून नागरिक, महिला, पदाधिकारी युवकांनी मोठा सहभाग नोंदविला. शेकडो वाहनांतून हजारो मराठा समाज बांधव सहभागी झाले. आळंदी परिसरातील इतर समाजाचे नागरिक-पदाधिकारी आणि अलंकापुरी प्रतिष्ठानचे कार्यकर्ते मावळ्यांची वेशभूषा करून मराठा मूक मोर्चात सहभागी झाले.

आळंदी शहर परिसरातून शनिवारी कार्यकर्त्यांनी दुचाकी रॅली काढली. यात परिसरातील युवक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. आळंदीत या मोर्चाच्या नियोजनासाठी महिला-पुरुष, युवक-युवती, पदाधिकारी स्तरावर बैठका झाल्या. मराठा समाजातील विविध समस्या आणि त्यावर उपाययोजनांसाठी अनेक तरुण कार्यकर्ते नियोजनात पुढे आले. मूक मोर्चात सहभागी होण्यासाठी आळंदी नगरपरिषद चौकातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास अलंकापुरी प्रतिष्ठानच्या कार्यकर्ते यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. सकाळी साडेसात वाजता पुण्याकडे नागरिक रवाना झाले. पुण्यात अलका चौकातून या मोर्चात नागरिक सहभागी झाले. दुचाकी रॅलीने जनजागृती करून मोर्चात सहभागी होण्याकडे नागरिकांचे लक्ष वेधण्यात आले. स्वच्छता दूत म्हणूनही अनेकांनी काम केले.

मराठा क्रांती मूक मोर्चामधील सहभागी झालेल्या नागरिकांना मुस्लिम ख्रिचन एकता मंचाच्या वतीने रास्ता पेठेमधील कादर चौकाजवळील होली एंजल चर्चजवळ पिण्याच्या पाण्याच्या बाटल्याचे वाटप करण्यात आले. या कार्यक्रमाचे संयोजक मुस्लिम समाजाचे नेते अॅड. अय्युब शेख, ख्रिश्चन समाजाचे नेते एडविन रॉबर्ट्स, मोझेस कलकोटी, नितीन डिसोझा, विकास उमापती, आल्फ्रेड अँथोनी, अॅड. रवी शिंदे, मुस्ताक पटेल, जेवियर मरियन आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पर्यटनाचे ३६५ दिवस

$
0
0

Suneet.bhave@timesgroup.com

Tweet : suneetMT

पुणे : उन्हाळी आणि दिवाळी सुट्ट्यांच्या हंगामासाठी नियोजन करायचे..., त्यासाठी रेल्वे किंवा एसटीचे आरक्षण आधीच करून ठेवायचे..., किती दिवस हाताशी मिळतात हे धरून कोणकोणती ठिकाणे पाहायची हे निश्चित करायचे... पर्यटनाचा हा नेहमीचाच शिरस्ता. परंतु, अलीकडच्या काळात या दोन्ही सुट्ट्यांप्रमाणे महिन्यात दोन-तीन दिवस जोडून सुट्टी मिळाली, तरीही अनेक नागरिकांची 'टूर' पर्यटनासाठी बाहेर पडते. पूर्वीसारखे, सुट्ट्यांपुरते मर्यादित न राहता, सध्याचे पर्यटन हे ३६५ दिवस सुरू आहे.

शालेय सुट्ट्यांच्या दिवसांत संपूर्ण कुटुंबाला एकत्र बाहेर पडता येते, एकमेकांसोबत जाता येते, यामुळे उन्हाळी आणि दिवाळी सुट्ट्यांमध्ये पर्यटनाचा हंगाम 'हाउसफुल्ल' असतो. त्याचे नियोजन सुमारे तीन-चार महिने आधीपासूनच केले जाते. आपल्या राज्यातून बाहेरच्या एखाद्या राज्यात किंवा परदेशात जायचे असेल, तर या दोन सुट्ट्यांना अजूनही प्राधान्य दिले जाते. शहराजवळच्या एखाद्या अनोळखी परिसराला भेट द्यायची असेल किंवा धकाधकीच्या जीवनातून 'रिफ्रेश' व्हायचे असल्यास छोटी सुट्टी अनेकांना हवीहवीशी वाटते. वर्षभरात कोणत्याही महिन्यात अशी सुट्टी मिळाली, तरीही 'शॉर्ट टूर'चे नियोजन केले जाते. छोट्या सुट्टीसाठी प्रत्येकवेळी 'सहकुटुंब-सहपरिवार' जाता येत नाही. त्यामुळे, मित्र-मैत्रिणींचे ग्रुप, भिशी पार्टी, ऑफिसमधील सहकारी अशांसोबत 'ट्रिप' काढल्या जातात. मोजक्या खर्चामध्ये अनेकदा अशा ट्रिपचे नियोजन केले जाते. यामध्ये, राहण्या-खाण्यासाठी जवळच्या किंवा ओळखीच्या कोणाचा तरी बंगला, रिसोर्ट आहे का, याची अनेकदा चाचपणी केली जाते. छोट्या ट्रिपसाठी अनेकांना सागरी किनारा जवळचा वाटतो. तसेच, एप्रिल-मेच्या हंगामाव्यतिरिक्त उकाडा वाढल्यास थंड हवेच्या ठिकाणांना आवर्जून भेटी दिल्या जातात. महाबळेश्वर-पाचगणी, माथेरान, लोणावळा-खंडाळा ही ठिकाणे तर वर्षात कोणत्याही कालावधीत गेले, तरी पर्यटकांच्या गर्दीने गजबजलेलीच असतात. कोकणातील काही ठिकाणेही पर्यटकांसाठी 'फेव्हरिट' आहेत.

'फाइव्ह डे वीक'चा होतोय फायदा

सध्या आयटीसह अनेक क्षेत्रांमध्ये 'फाइव्ह डे वीक' आहे. त्यामुळे, शनिवार-रविवार किंवा जोडून सुट्टी मिळण्याचा फायदा उठवून, महिन्यातून किमान एखादी तरी छोटी टूर करण्याकडे अनेकांचा कल आहे. छोट्या टूरचे अंतर ७०-७५ किमीपासून ते २५०-३०० किमीपर्यंत असू शकते. म्हणजेच, तासा-दीड तासापासून ते साडेचार-पाच तासांचा प्रवास करून आपण संबंधित ठिकाणी पोहोचू शकू, असे ठिकाण निवडले जाते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

​पर्यटकांना आले पर्यटनाचे भान

$
0
0

Chintamani.Patki@timesgroup.com

Tweet: @chintamanipMT

पुणे : जागतिकीकरण, हाताशी आलेली आधुनिक माध्यमे यामुळे जग जवळ आलेले असताना पर्यटक म्हणूनही जागतिक भान तयार होताना दिसत आहे. परदेश वाऱ्यांतून जागतिक पर्यटन व नीटनेटक्या व्यवस्थापनातून पर्यटकांचे पर्यटनभान अधोरेखित होताना दिसत आहे. आयटी, सेवा क्षेत्र आणि नव्या बाजारपेठेच्या उदयामुळे नवमध्यमवर्गाच्या हाती आलेला पैसा, हे अर्थकारण ,पर्यटन व व्यवस्थापनाची बाजारपेठ मजबूत करत आहे.

मध्यमवर्गाची क्रयशक्ती वाढल्यामुळे पैसे खर्च करण्याची तयारी असल्याने पर्यटक मंडळी सोयी-सुविधांकडे विशेष लक्ष देऊ लागली आहेत. पंचतारांकित सुविधांसाठी पर्यटक आग्रह धरत आहेत. सुट्टी कधी मिळेल, कुठल्या ठिकाणी वातावरण अल्हाददायक असेल, खर्च किती येईल, पाहण्याची ठिकाणे कोणती, राहणे व जेवणाची सुविधा अशी सर्व प्रकारची माहिती इंटरनेटवर घेतली जाते. तसेच, प्रवासात बरोबर काय काय असायला हवे, याची यादी करून योग्य प्रकारे नियोजन करण्याचे प्रमाण वाढले आहे.

उन्हाळ्याची सुट्टी लागली, की सहलीचे बेत आखले जातात. पूर्वी उन्हाळ्याच्या सुट्टीतील सहल म्हणजे आजोळी जाणे किंवा नातेवाइकांकडे जाऊन आंब्यांचा मनसोक्त आस्वाद घेणे. पुढे ही संकल्पना बदलून महाबळेश्वर, कोकण किंवा गोवा या ठिकाणांना प्राधान्य दिले जाऊ लागले. मात्र, आता मध्यमवर्गाची क्रयशक्ती वाढत असून, राज्याबाहेरील; तसेच देशाबाहेरील सहलींनाही प्राधान्य दिले जात आहे. उन्हामुळे तापलेल्या महाराष्ट्रात फिरण्यापेक्षा बाहेरच्या राज्यांमध्ये किंवा परदेशी जाऊन आल्हाददायक थंड हवेचा आनंद लुटण्याचे प्रमाण वाढीला लागले आहे.

देश अथवा परदेशवारी घडवून आणत असून, त्यामुळे पर्यटन व्यवसाय तेजीत आहे. प्रत्येकी २५ हजार ते तीन लाख रुपयांपर्यंत खर्च फिरण्याच्या निमित्ताने केला जात आहे. दूरवरचे आणि मोठे पर्यटन ही 'क्रेझ' सध्या वाढत आहे. 'उन्हाळ्याची सुट्टी म्हटली, की बर्फ असे नवे समीकरण आता तयार झाले आहे. काश्मीर, सिमला, कुलू, मनाली, लेह-लडाख, भूतान, अरुणाचल प्रदेश, आसाम, युरोप, अमेरिका अशा ठिकाणी महाराष्ट्रातून आणि खास करून पुण्यातून पर्यटनासाठी जाणाऱ्यांचे प्रमाण वाढले आहे,' असे निरीक्षण पर्यटन क्षेत्रातील जाणकार नोंदवितात. मार्च ते जून असा या पर्यटनाचा काळ असून, सर्व स्तरांतील पर्यटक राज्याबाहेर पाऊल ठेवण्याचे धाडस करू लागले आहेत.

बाहेरील राज्यांमध्ये आणि युरोप, अमेरिका अशा ठिकाणी जाण्याचे प्रमाण वाढत आहे. सिंगापूर, थायलंड, मलेशिया अशा ठिकाणांना तरुण वर्गाची पसंती मिळत आहे. देशाबाहेर पहिल्यांदाच पर्यटन करणारे या भागांनाच पसंती देतात. दोन-तीन पिढ्यांचे देशांतर्गंत आणि परदेशवारीचे पर्यटन वाढले आहे. दुसऱ्या वेळी परदेशवारी करणारे अमेरिका आणि युरोप यांची निवड करतात.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

​भटकण्यातले ‘थ्रिल’ वाढतेय

$
0
0

Prasad.Pawar@timesgroup.com Tweet : @PrasadPawarMT

पुणे ः एकट्याने करायच्या भटकंतीचा अर्थातच 'सोलो ट्रेकिंग'चा ट्रेंड भारतात वाढल्याचे सर्वेक्षण मध्यंतरी पर्यटन मंत्रालयातर्फे करण्यात आले होते. या ट्रेंडमध्ये सध्या कोणतेही पूर्वनियोजन न करता भटकंती किंवा पर्यटनासाठी बाहेर पडणाऱ्यांचे प्रमाण वाढत असल्याचेही निरीक्षण पुढे आले आहे. नाइट ट्रेक, बाइकवर फिरणे असो किंवा अनोळखी प्रदेशातली भटकंती कोणतेही आगाऊ आरक्षण न करता आणि सोयीसुविधांची खातरजमा न करता ही भटकण्यातील 'थ्रिल' तरुण आजमावत आहेत.

साहसी पर्यटन म्हणजे, ट्रेकिंग किंवा रॉक क्लाइंबिंग, रॅपलिंग, कयाकिंग, वॉटरफॉल या गोष्टींचा समावेश होता. ही संकल्पना आता केवळ एवढ्यापुरती मर्यादित नसून एकट्याने कोणतेही नियोजन न करता बाहेर पडण्यापर्यंत विस्तारली आहे. अशा भटकंतीत मुक्काम आणि खाणे या गोष्टींना दुय्यम स्थान दिले जाते. परिस्थिती असेल तसे स्वतःला 'अॅडजस्ट' करणे हा या संकल्पनेतला सर्वाधिक महत्त्वाचा मुद्दा आहे. अनेकदा अशा भटकंतीत स्वतःचा टेंट, स्टोव्ह आणि आवश्यक सामग्रीही सोबत बाळगली जाते. स्थानिकांसोबत त्यांच्या घरांमध्ये राहणे, खाद्यसंस्कृती अनुभवणे या गोष्टींची जोडही दिली जाते. अनेकदा नद्यांच्या पात्रातही तंबू ठोकून राहण्याला पसंती मिळते. सहकुटुंब किंवा आठ ते दहा जाणांचा ग्रुपने अशा भटकण्यातील 'थ्रिल' अनुभवले जात आहे.

भारतीय पर्यटक अधिक धीट होत आहे. नवनव्या ठिकाणांना भेट देण्यासाठी 'बजेट' ठेवणे; तसेच खूप आधीपासून नियोजन करणे या गोष्टी घडताना दिसत आहेत. सोलो भटकंती करण्यावर अनेकांचा भर होताच आता हे भटकणे फक्त निवांतपणासाठी नसून नियोजन नसण्यातील 'थ्रिल' आजमावणे अनेकांना आवडू लागल्याचे केंद्रीय पर्यटन मंत्राल-याच्या पुणे विभा-गाच्या गाइड दया सुदामा यांनी सांगितले.

हम किसी से कम नही...?

जगातील इतर पर्यटक किंवा भटक्यांच्या तुलनेत भारतीय पर्यटक साहस, रिस्क किंवा थ्रिल आजमावण्याला पसंती देण्यापेक्षा सहकुटुंब निवांत भटकंतीसाठी बाहेर पडतात. सहलीत त्यांना स्वतःला कुठलेही कष्ट न देता निवांतपणा अनुभवयाचा असतो. या मानसिकतेतून भारतीय पर्यटक सध्या बाहेर पडत असल्याचे चित्र आहे. डिस्कव्हरी वा तत्सम चॅनेल्सवर दाखवले जाणारे शो आणि जगभरातील ट्रेंड भारतीय पर्यटकही फॉलो करू लागले असून अनप्लॅन्ड ट्रिपचे थ्रिल आजमावणे त्यांनाही आवडू लागल्याचे हे द्योतक असून त्यात आम्हीही हे करू शकतो, ही भावना दिसत असल्याचे टूर ऑर्गनायझरचे म्हणणे आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


सामाजिक पर्यटनाला उत्स्फूर्त प्रतिसाद

$
0
0

Chaitrali.chandorkar@timesgroup.com

Tweeter - chaitralicMT

पुणे ः धावपळीच्या जीवनशैलीतून ब्रेक मिळावा म्हणून आरामासाठी पर्यटनाला जाणाऱ्यांचा आलेख चढता असतानाच सामाजिक जाणिवेतून विविध घटकांसाठी कार्यरत असलेल्या संस्थांबरोबर काम करून रिफ्रेश होणाऱ्यांची संख्या वाढत आहे. दुर्गम भागात स्वयंसेवी संस्थांबरोबर श्रमदान, गुडघाभर चिखलातील भातलावणी, मेळघाटातील लहान खेड्यात जाऊन वैद्यकीय शिबिरांचे नियोजन किंवा वन कर्मचाऱ्यांबरोबर गस्तीची ड्युटी असो... तरुण मंडळींचा या सामाजिक पर्यटनाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतो आहे. एवढेच नव्हे, चंद्रपूरमधील हेमलकसा, आनंदवनातील सहलीदेखील सध्या फुल्ल होत आहेत.

आरामदायी पर्यटनाबरोबरच सामाजिक बांधिलकीच्या उद्देशाने 'सोशल टुरिझम'चा सध्या ट्रेंड आहे. यामुळे गावातल्या मातीशी तुटलेली नाळ जोडली जात आहे. आठवडाभर काम केल्यानंतर सुट्टीच्या दिवशी आराम करायचा किंवा गाडी काढून बागडायचे, अशी अनेकांची मानसकिता आहे. खडतर जीवन जगणाऱ्यांना आपण सुट्टीच्या दिवशी मदतीचा हात दिला पाहिजे, असे काही मंडळींना वाटते. आपल्या सुट्टीचा काही वेळ सत्कारणी लावला पाहिजे, या उद्देशाने ही मंडळी विविध संस्थांशी जोडली गेली आहेत. गेल्या तीन ते चार वर्षांत हा नवीन बदल आवर्जून बघालया मिळत आहे. त्यामुळेच चंद्रपूरमधील बाबा आमटे यांचे हेमलकसा-आनंदवन तर डॉ. अभय आणि राणी बंग यांची 'सर्च' संस्था, अहमदनगरमधील हिवरेबाजार, तर अण्णा हजारे यांचे राळेगणसिद्धी गावातील काम पाहण्यासाठी लोक 'सोशल पर्यटना'चा पर्याय निवडत आहेत. सोशल नेटवर्किंग साइटमुळे या संस्थांची कामे घराघरात पोहोचली असून या ठिकाणांबद्दल कुतूहल निर्माण झाले आहे. अनेक अडचणींना सामोरे जाऊन केलेल्या त्यांच्या कामाला प्रोत्साहन देण्यासाठी ही मंडळी खेड्यापाड्यात पोहोचली आहे. या सोशल टुरिझमची अनेक आदर्श उदाहरणे गेल्या वर्षी राज्याच्या कानाकोपऱ्यात अनुभवायला मिळाली.

दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर ज्ञानप्रबोधिनी, नाम फाउंडेशनसह काही संस्थांनी गावागावात बंधारे आणि शिवारे बांधण्यासाठी शहरातील तरुणांना साद घातली आणि शेकडो तरुण मंडळी सुट्ट्यांच्या दिवशी श्रमदानासाठी गावागावात पोहोचली. शेतकऱ्यांसाठी आपण खारीचा वाटा उचलू शकलो, याचे समाधान मिळाले आणि दर वर्षी गावासाठी वेळ काढण्याचा संकल्पही त्यांनी केला. अॅड. नंदू फडके यांच्यातर्फे दर वर्षी पावसाळ्यात भात लावणीचा मोठा उपक्रम वेल्ह्यामध्ये राबवला जातो. आश्चर्य म्हणजे हजारो विद्यार्थी धबधब्यातले पावसाळी पर्यटन सोडून गावकऱ्यांबरोबर गुडघाभर चिखलात भात लावण्यासाठी येतात. दिवसभर शेतात काम करण्याचा अनुभव त्यांच्यासाठी वर्षभर उत्साह देणारा ठरतो. 'मैत्री' संस्थेतर्फे पावसाळ्यात राबविण्यात येणाऱ्या 'मेळघाट मित्र' या उपक्रमालाही तरुणांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतो. जंगल व्यवस्थापनामध्ये शहरी उत्साही निसर्गप्रेमींचा सहभागा वाढावा, या उद्देशाने राबविण्यात येणाऱ्या शिबिरांना नागरिकांचा उत्तम प्रतिसाद असून नागरिक सुट्टीच्या दिवशी खास वनरक्षकांबरोबर जंगलात गस्त घालताना दिसत आहेत. सुट्टीच्या दिवशी आराम नव्हे, तर अधिक श्रम करण्याची शहरी तरुणांचीही बदलती मानसिकता नक्कीच सकारात्मक बदल असून शहर आणि ग्रामीण भागाचा तुटलेला संवाद यातून पुन्हा जुळत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वज्रनिर्धार

$
0
0

पुण्यात लाखो मराठ्यांची मूक गर्जना

म. टा. प्रतिनिधी, पुणे

कोणतीही घोषणा नाही, भाषण नाही आणि गडबड-गोंधळही नाही...! शांतता आणि संयमातही किती प्रचंड शक्ती असते, याची प्रचिती अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने जमलेल्या विराट जनसमुदायाने रविवारी पुणेकरांना दिली; मात्र हा मूक मोर्चा असला, तरी या शांततेतूनच समाजाने केलेल्या गर्जनेने पुण्याचा आसमंत दुमदुमला. नगर जिल्ह्यातील कोपर्डी येथे घडलेल्या अत्याचार प्रकरणाच्या निषेधार्थ निघालेला हा मोर्चा पुण्याच्या इतिहासातील अभूतपूर्व ठरला.

कोपर्डी येथील अल्पवयीन मुलीवर झालेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ आणि समाजाच्या अनेक प्रलंबित मागण्यांसाठी मराठा क्रांती (मूक) मोर्चाने रविवारी पुण्यात धडक दिली. शहरातील सर्व रस्त्यांवर सकाळपासूनच 'एक मराठा, लाख मराठा'चा हुंकार पसरला अन् जिल्ह्याच्या विविध भागांतून आलेल्या समाजबांधवांनी विक्रमी गर्दीचा उच्चांक प्रस्थापित केला. डेक्कन जिमखान्यावरील छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून रविवारी सकाळी साडेदहा वाजता सुरू झालेल्या मोर्चाची जिल्हाधिकारी कार्यालयात सांगता झाली. सर्वच राजकीय नेत्यांना या वेळी मागे ठेवण्यात आले आणि समाजातील रणरागिणींनी मोर्चाचे नेतृत्व केले. शहराकडे येणारे सर्वच रस्ते दिवसभर भगव्या झेंड्यांनी आणि नागरिकांनी फुलून गेले होते. या अलोट मोर्चाचे नियोजन आणि त्याला मिळालेला प्रतिसाद यापुढील काळातही आठवणीत राहील, असाच ठरला.

दरम्यान, मोर्चासाठी केवळ मराठा समाजामधूनच नव्हे, तर इतर समाजबांधव आणि स्वयंसेवी संस्थांनीही मोलाचे सहकार्य केल्याचे अनुभवायला मिळाले. मोर्चात सहभागी नागरिकांना पिण्याचे पाणी, अल्पोपाहार वाटप करून इतर समाजबांधवांनीही या मोर्चाच्या यशस्वीतेमध्ये खारीचा वाटा उचलला.

वाहतूक कोंडी नाही

मोर्चाच्या निमित्ताने जिल्ह्यातून आणि जिल्ह्याबाहेरूनही नागरिक लाखोंच्या संख्येने पुण्यात आले. त्यासाठी शहरातील मुख्य रस्त्यांसह १८ रस्ते बंद करण्यात आले होते. यानंतरही शहरात वाहतूक कोंडी झाल्याचे पाहायला मिळाले नाही. मात्र, मोर्चा संपल्यानंतर परतीच्या मार्गावर वाहनांची संख्या अधिक असल्याने वाहतूक काही प्रमाणात धीम्या गतीने सुरू होती.

मोर्चासाठी पुण्याबाहेरील बहुतांश नागरिक हे खासगी वाहनांनी शहरात दाखल झाले होते. सोलापूर रस्ता, नगर रस्ता, सातारा रस्ता, जुना पुणे-मुंबई महामार्ग या रस्त्याने नागरिक आले. या सर्व रस्त्यावर वाहनांच्या पार्किंगची व्यवस्था करण्यात आली होती. त्यामुळे वाहतुकीला अडथळा झाला नाही. तसेच, सकाळी सात ते दुपारी तीन या वेळेत आवश्यकतेशिवाय बाहेर पडू नये, या वाहतूक पोलिसांच्या आवाहनालाही नागरिकांनी प्रतिसाद दिला. त्यामुळे शहरातील रस्त्यांवरही गर्दी कमी होती. वाहतूक पोलिसांनी केलेल्या नियोजनामुळे कोंडीची परिस्थिती निर्माण झाली नाही.

'असा मोर्चा पाहिला नाही'

संपूर्ण मोर्चामध्ये तरुणाईचेच वर्चस्व दिसून आले. मोर्चातील नागरिकांच्या संख्येबाबत निरनिराळे अंदाज व्यक्त होत आहेत; मात्र अनेक अनुभवी पोलिस अधिकाऱ्यांनीही 'आपल्या कारकीर्दीत इतका मोठा आणि शिस्तबद्ध मोर्चा पाहिला नाही,' अशी कबुली दिली आणि त्यावर सर्वांचेच एकमत झाले. सोशल मीडियाचा प्रभावी वापर आणि मोर्चाच्या नियोजनमुळे पोलिसांनाही बंदोबस्तासाठी फारसे श्रम घेण्याची वेळ आली नाही. पोलिसांपेक्षाही समाजाच्या स्वयंसेवकांची संख्या मोठी होती. लाउडस्पीकरवरून करण्यात येणाऱ्या सूचनांचे लाखोंच्या समुदायाने कोणतीही नाराजी व्यक्त न करता मनापासून पालन केले आणि महिला-मुलींचा आदर, शिस्त आणि शांतता यांची प्रचिती दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जीडीपीचे आकडे आभासी

$
0
0

पी. चिदंबरम यांचा केंद्र सरकारवर घणाघात

म. टा. प्रतिनिधी, पुणे

'केंद्र सरकार ७.४ टक्के सकल राष्ट्रीय उत्पन्नाचे (जीडीपी) चकाकणारे आकडे दाखवत आहे. या आकड्यांमागेच खरे आकडे लपले आहेत. या आकड्यांचा अभ्यास केल्यास गेल्या आर्थिक वर्षात भांडवल उभारणीमध्ये ३.१ टक्क्यांची घट झाली आहे. त्यामुळे देशाचा खरंच विकास होत आहे का, असा सवाल विचारण्याची वेळ आली आहे,' अशी टीका माजी केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी रविवारी केंद्र सरकारवर केली.
कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग, पुणेतर्फे (सीओईपी) आयोजित दहाव्या 'माइंडस्पार्क' उपक्रमामध्ये 'भारतीय अर्थव्यवस्था' या विषयावर चिदंबरम बोलत होते. 'महाराष्ट्र टाइम्स' या उपक्रमाचा मीडिया पार्टनर आहे. सीओईपीचे संचालक डॉ. बी. बी. आहुजा या वेळी उपस्थित होते. चिदंबरम म्हणाले, की 'केंद्र सरकारच्या दाव्यानुसार गेल्या वर्षी देशाच्या विकासाचा दर ७.४ टक्क्यांवर पोहोचला. चालू आर्थिक वर्षात हा दर ७.७ टक्क्यांवर जाणार असल्याचे भाकित आहे. खरे पाहता, आकड्यांच्या आधारे देशाचा विकास होत नसतो. गेल्या वर्षी जीडीपी वाढत असतानाच भांडवल उभारणीमध्ये ३.१ टक्क्यांची घट झाली आहे. औद्योगिक विकास दरात १.९ टक्क्यांची, तर उत्पादन क्षेत्रात ४.७७ टक्के घट झाली आहे. ही गेल्या २० वर्षातील सर्वांत नीचांकी घट आहे.'
'देशात औद्योगिक क्रांती होत असल्याचे पोकळ दावे केले जात आहेत. प्रत्यक्षात उद्योगांमध्ये केवळ १.२ टक्क्यांची वाढ झाली. याच्या विपरीत लघुउद्योगांमध्ये ३.४६ टक्क्यांची, मध्यम स्वरुपाच्या उद्योगांमध्ये १०.२६ टक्क्यांची, मोठ्या उद्योगांमध्ये ३.३ टक्क्यांची घट झाली आहे. एकंदरीतच ही परिस्थिती असताना थकित कर्जांमध्ये (एनपीए) ७.६ टक्क्यांची वाढ झाली आहे. अशी परिस्थिती असताना देशात फक्त बांधकाम व्यवसायामध्ये गुंतवणुकीच्या, तर वस्तूखरेदीमध्ये सवलत देण्यात आली आहे. त्यामुळे रोजगारनिर्मिती होत नसून, लोकांना नोकऱ्या गमविण्याची वेळ आली आहे,' असेही चिदंबरम म्हणाले.
येत्या काळात जलदगतीने विकास साधायचा झाल्यास सहा गोष्टींवर प्रामुख्याने भर द्यावा लागणार आहे. तोटा मर्यादित ठेवणे, करामार्फत उत्पन्नाचे नवे स्त्रोत तयार करणे, वित्तीय आयोगाने अर्थविषयक ब्ल्यू प्रिंट तयार करणे, वित्त आयोगाच्या अध्यक्षपदी सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाची नियुक्ती करणे, विकासाच्या प्रकल्पांची कामे मुदतीत करणे आणि सावर्जनिक क्षेत्राला खासगी क्षेत्रासारखी तत्परता, कार्यक्षमता बहाल करणे आदींचा त्यात समावेश आहे, असेही चिदंबरम म्हणाले.
............
'आरोग्य, शिक्षणात गुंतवणूक हवी'
देशात गेल्या वर्षभरात सुमारे ७० हजार रोजगार घटले, तर दरमहा लाखभर उच्चशिक्षित रोजगाराच्या शोधात आहेत. त्यामुळे अधिकाधिक रोजगाराची निर्मिती करण्यासाठी खासगी क्षेत्राला विविध क्षेत्रात गुंतवणुक करण्यासाठी परवानगी दिली पाहिजे. सरकारने आरोग्य आणि शिक्षण या दोन क्षेत्रांत अधिकाधिक गुंतवणूक करण्याची आवश्यकता आहे, असेही चिदंबरम म्हणाले.
.........
लोकशाहीमध्ये प्रत्येकालाच व्यक्त होण्याचा अधिकार आहे. त्यामुळे समाजात अनेक विचारधारा आहेत. मात्र, लोकशाहीमध्ये एखाद्याचा विचार तुम्ही दुसऱ्यावर थोपवू शकत नाही. विचार थोपवण्यात आले तर, ती लोकशाही ठरणार नाही.
- पी. चिदंबरम, माजी केंद्रीय अर्थमंत्री

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वनजमीन संपादित करणे फायद्याचे

$
0
0

पुरंदर तालुक्यात विमानतळासाठी सुमारे १३०० एकर सपाट जमीन उपलब्ध

Mustafa.Attar@timesgroup.com
Tweet : @mustafattarMT

पुणे : पुरंदर तालुक्यातील पारगाव मेमाणे, राजेवाडी, सिंगापूर गावांमध्ये सर्वाधिक सुमारे १३०० एकर वनजमीन सपाट असल्याने विमानतळासाठी ही जमीन संपादित करणे सरकारच्या फायद्याचे ठरणार आहे. वनजमिनीमुळे विमानतळावर निम्मी मालकी सरकारचीच राहणार असल्याचे स्पष्ट होत आहे.
पुरंदर तालुक्यात उभारल्या जाणाऱ्या विमानतळासाठी सपाट, डोंगरांचा अडथळा नसलेली जमीन आवश्यक आहे. त्यासाठी वनजमिनीच्या पर्यायाचा विचार कऱण्यात आला आहे. पुरंदर तालुक्यातील वाघापूरशेजारी असलेल्या सिंगापूर, राजेवाडी, पारगाव मेमाणे भागात १३०० एकर वनजमीन आहे. विमानतळासाठी दोन ते तीन हजार एकर जागेची आवश्यकता आहे. सरकारने विमानतळासाठी ही वनजमीन संपादित केली तर, पुरंदरला होणाऱ्या विमानतळावर ५० टक्के सरकारचीच मालकी राहील. म्हणजेच मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांची जमीन ताब्यात घेण्याची गरज राहणार नसल्याने फारसा मोबादला देण्याची वेळ येणार नाही, असा अंदाज तालुक्यातून व्यक्त होत आहे. त्यामुळे पारगाव मेमाणे, राजेवाडी, सिंगापूर भागातील ही जमीन संपादित केल्यास उर्वरीत जमिनीसाठी वाघापूरसह अन्य भागांना प्राधान्य द्यावे लागणार आहे. एकट्या वाघापूर गावात पाचशेहून अधिक एकर जमीन आहे, अशी माहिती स्थानिक जाणकारांनी दिली.
'पुरंदर येथे उभारण्यात येणाऱ्या विमानतळासाठी जमीन देण्याची आमची तयारी आहे. कोची मॉडेलनुसार संबंधित शेतकऱ्यांना भागधारक केले जाणार आहे. पारगाव मेमाणे येथील ग्रामस्थांचा विरोध नाही. शेतकऱ्यांना योग्य पद्धतीने मोबादला मिळावा. सरकारी मूल्यांकनापेक्षा चौपट मोबदला सरकारकडून मिळावा. तसेच, त्यात भागधारक करून घ्यावे एवढीच आमची अपेक्षा आहे,' अशी प्रतिक्रिया पारगाव मेमाणेचे सरपंच जितेंद्र मेमाणे यांनी 'मटा'ला दिली. वाघापूरसह पारगाव मेमाणे भागातील काही मोजक्याच व्यक्तींचा जमिनी देण्यास विरोध आहे. या प्रकल्पाची संपूर्ण माहिती त्यांना नसल्याने त्यांच्याकडून विरोध होत असून, इतरांचीही दिशाभूल केली जात असल्याचे या भागातील जाणकारांनी सांगितले.
वाघापूरच्या सरपंच छाया वाघमारे म्हणाल्या,की 'गावाचा विकास व्हावा हेच आपले ध्येय आहे. विकासासाठी जमीन देण्याची ग्रामस्थांची तयारी असेल तर, त्याला आपला विरोध नाही. सर्वांचा विकास व्हावा हीच आपली अपेक्षा आहे.'
..
पुण्याहून पुरंदर विमानतळाचा मार्ग
स्वारगेटपासून हडपसर-फुरसुंगी, वडकीनाला-दिवेघाट-सासवडमार्गे पुरंदरमधील वाघापूर-राजेवाडी येथील विमानतळाकडे जाता येऊ शकेल.
स्वारगेटपासून हडपसर ते उरुळीकांचन मार्गे वाघापूरपर्यंत जाण्यासाठी चांगला रस्ता आहे.
शिवाय स्वारगेट ते कोंढवामार्गे बोपदेव घाटातून सासवडकडे जाता येऊ शकते. सासवडमधूनही वाघापूरकडे जाण्यासाठी रस्ता आहे.
सर्वांत महत्त्वाचे म्हणजे हे तीन ही मार्ग स्वारगेटपासून समान अंतरावर आहेत.
..
पुरंदर तालुक्याचा आतापर्यंत विकास झालेला नाही. कायम दुष्काळी पट्टा म्हणून आम्ही जगत आलो आहोत. आता विमानतळामुळे कंपन्या येतील. औद्योगिक विकास महामंडळ (एमआय़डीसी) येईल. शीतगृहे, गोदामे सुरू करणे शक्य होणार आहे. त्यामुळे आमच्या जमिनी देण्याची तयारी आहे.
जितेंद्र मेमाणे, सरपंच, पारगाव मेमाणे

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विश्रांतीनगर येथील रस्त्याचे काम सुरू

$
0
0

वाहतुकीची कोंडी सुटण्यास मदत होणार

म. टा. प्रतिनिधी, पुणे
हिंगणे खुर्द विश्रांतीनगर येथील वाहतुकीची कोंडी सोडविण्यासाठी महत्वपूर्ण भूमिका बजाविणाऱ्या रस्त्याच्या कामाला नुकतीच सुरुवात झाली. या रस्त्याचे रुंदीकरण तसेच रस्त्याची अलाइनमेंट बदलण्याच्या कामाचे भूमीपूजन पेपल सेमिनरीचे फादर ऑल्विन क्रूज यांच्या हस्ते झाले. हे काम लवकरात लवकर पूर्ण करण्याचा प्रयत्न असल्याचे स्थानिक नगरसेवक श्रीकांत जगताप यांनी सांगितले.
या रस्त्याचे रुंदीकरण होत नसल्याने या भागात सकाळी आणि संध्याकाळी वाहतुकीचा गंभीर प्रश्न निर्माण होऊन कोंडी होत होती. या रस्त्याचे काम करावे, अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून केली जात होती. पालिका प्रशासनाकडे वारंवार पाठपुरावा केल्यानंतर या कामाची अखेर सुरुवात झाली आहे. हे काम पूर्ण झाल्यानंतर वडगाव बुद्रुक, धायरी आणि नांदेडकडे जाणारी वाहतूक सुरळीत होण्यास मदत होणार आहे. विकास आराखड्यानुसार हा रस्ता रुंद करण्यासाठी आणि तो वाहतूक सुरळीत होण्यासाठी हा रस्ता पुलाच्या सरळ रेषेत आणणे आवश्यक होते. सेमिनरीच्या मालकीची परंतु, रस्त्याचे आरक्षण असलेली जागा ताब्यात घेण्यासाठी गेल्या तीन वर्षांपासून प्रयत्न करण्यात येत होते. पालिकेचे अधिकारी, सेमिनरीचे फादर अलेक्स प्रग्यासन अशी संयुक्त बैठक झाल्यानंतर सेमिनरीने त्यांची जागा रस्त्यासाठी देण्याची तयारी दर्शवली.
महापालिका आयुक्तांनी रस्त्याची अलाइनमेंट बदलन्यास मान्यता दिली आहे. या कामाला सुरुवात झाली असून, पुढील तीन महिन्यात संपूर्ण काम पूर्ण होइल, असे नगरसेवक जगताप यांनी सांगितले. या वेळी सेमिनरीचे कार्ल मोन्टो, आर्किटेक्ट स्वप्नील क्षीरसागर, वीज मंडळाचे सहायक अभियंता सागर सोनारघरे, रत्नाकर जगताप, भगवान पासलकर, कृष्णराव जागडे, डॉ. जीवन आटोळे, वसंतराव पोळ, शंकर घाटविसावे, जमीर तांबोळी आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images