Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

परदेशी विद्यार्थ्यांचे ‘बाप्पा मोरया’

$
0
0

अश्विन फडके

सांस्कृतिक देवाणघेवाणीअंतर्गत पुण्यात दाखल झालेल्या परदेशी विद्यार्थ्यांनी उत्साहात गणेशोत्सव विसर्जन मिरवणुकीत सहभाग नोंदवला. गणेशोत्सव म्हणजे काय, त्यावेळी परिधान करण्यात येणारे पारंपरिक पेहराव आदींची पुरेशी मा​हिती घेऊन त्यांनी उत्सवाचा आनंद लुटला. अंबाडा घालून, त्यावर गजरा माळून, नऊवारी साडी नेसून, नाकात नथ घालून अमेरिकेची अॅना शोल्झ कार्लसन लक्ष्मी रस्त्यावरील मिरवणुकीचा पुरेपूर आनंद घेत होती. 'इतक्या भव्य प्रमाणावर एखाद्या देवाची केली जाणारी पूजा आणि त्याचा इतका नयनरम्य सोहळा माझ्यासाठी मोठा आनंददायी आहे. नऊवारी साडी नेसून सुरुवातीला थोडे अवघडल्यासारखे वाटले, मात्र सवयीचे झाल्यानंतर ढीगभर फोटो काढले,' अॅना सांगत होती. ब्राझीलचा आंद्रे लुकास म्हणाला, की 'आमच्याकडे होणारे कार्निव्हल आणि गणेशोत्सवात मला प्रचंड साम्य आढळते. इंटरनेटवरून माहिती घेतलेले येथील ढोलवादन प्रत्यक्ष पाहून मी प्रचंड खूश झालो. मी स्वतःला नाचण्यापासून थांबवू शकलो नाही. मला दरवर्षी गणेशोत्सवात पुण्यात यायला आवडेल. उत्सवाचा एकूणच डामडौल पाहता, मला सेलिब्रेटी असल्याचेच वाटत आहे.' वेस्ली डॉमनिक रोझा ऑलिव्हिएरा या ब्राझिलच्या विद्यार्थिनीला इंडियन बर्गर (वडा पाव) प्रचंड आवडला, तर अँडर्स गॉर्डनने पांढरा सलवार - कुर्ता आणि भगवा फेटा विकत घेऊन घरी नेण्याचे ठरवले आहे. या दोघांनीही केवळ मिरवणुकीसाठी 'गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया' हा जयजयकार शिकून घेतला.
...
..नथ नाकात नव्हे कानात
नथ हा अगदी खास मराठमोळा दागिना. तो नाकात घालायचा असतो, याची कल्पना नसलेल्या एका मेक्सिकन तरुणीने नथ चक्क कानात घातली होती. तिला हे एक प्रकारचे 'पिअर्सिंग'च वाटले; पण तिची ही वेगळी स्टाइल चर्चेचा विषय ठरली होती

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


पहिला पहिला बंदोबस्त...

$
0
0

प्रशिक्षणार्थी पोलिसांनी अनुभवला पुणेरी गणेशोत्सव

Shrikrishna. Kolhe@timesgroup.com
Tweet : @ShrikrishnakMT

पुणे : 'पुण्याच्या गणेशोत्सावाबद्दल बरेच ऐकले होते..बऱ्याच वेळा टीव्हीवरदेखील हा उत्सव पाहिला होता. पण, बंदोबस्तासाठी या उत्सवात सहभागी व्हावे लागेल, असे कधीच वाटलेही नव्हते. बंदोबस्तासाठी पुण्यात जाण्याची संधी मिळणार असल्याचे समजल्यानंतर खूपच आनंद झाला,' ही बोलकी प्रतिक्रया आहे पोलिस दलात नव्याने दाखल झाल्यानंतर प्रशिक्षण घेणाऱ्या आणि पहिलाच बंदोबस्त करणाऱ्या पोलिस शिपायांची...
गणेशोत्सवाच्या बंदोबस्तासाठी पुणे पोलिसांना मदत म्हणून बाहेरगावच्या पाचशे नवीन प्रशिक्षणार्थी पोलिसांचा ताफा देण्यात आला होता. या प्रशिक्षणार्थींची नेमणूक महत्वाच्या चौकांत आणि रस्त्यांवर झाली होती. इतक्या मोठ्या गणेशोत्सवासाठी प्रथमच बंदोबस्त करताना त्यांच्या चेहऱ्यावर वेगळाच आनंद ओसंडून वाहात होता. बंदोबस्ताच्या निमित्ताने आतापर्यंत वर्तमानपत्रात वाचलेल्या आणि टीव्हीवर पाहिलेल्या बाबी 'याजि देही याचि डोळा' अनुभवताना ते आनंदी असल्याचे दिसून आले.
दौंड येथील प्रशिक्षण केंद्राच्या माध्यमातून अडीचशे नवीन प्रशिक्षणार्थी बंदोबस्तात सहभागी झाले होते. नांदेड पोलिस दलात नव्याने भरती झालेला शिपाई महेश शंकरे म्हणारे, की 'गावाकडील गणेशोत्सवात मी अनेकदा सहभागी झालो आहे. मात्र, पुण्यातील उत्सवाची बातच काही और... येथील उत्सव यापूर्वी अनेकदा टीव्हीवर पा​हिला होता. राज्यात पुणे, मुंबईच्या गणेशोत्सवाचे सर्वांनाच कुतूहल असते. पोलिस दलास भरती झाल्यानंतर दोन महिन्यांपूर्वीच दौंडमधील पोलिस प्रशिक्षण केंद्रात दाखल झालो. या ठिकाणी प्रशिक्षण घेताना गणेशोत्सवाच्या बंदोबस्तासाठी पुण्याला जायचे असल्याचे समजले. त्यावेळी सलग ३६ ते ४८ तास बंदोबस्त करावा लागत असल्याचे वरिष्ठांनी सांगितले.'
अमरावती पोलिस दलातील अशोक सूर्यवंशी म्हणाले, की 'मी सध्या दौंड येथील प्रशिक्षण केंद्रात प्रशिक्षण घेत आहे. पुण्यात गणेशोत्सवाच्या बंदोबस्ताला जायचे असल्याचे सांगितल्यानंतर वेगळाच आनंद झाला. आमच्या ग्रुपला बेलबाग चौकात बंदोबस्त देण्यात आला आहे. हा पहिलाच बंदोबस्त असल्यामुळे या अनुभवाचा खूप फायदा होणार आहे. हा प्रसिद्ध गणेशोत्सव जवळून पाहता आल्याचा वेगळाच आनंद आम्हा सर्वांना आहे. त्यामुळे हा बंदोबस्त नेहमीच आमच्या लक्षात राहील.'

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

​डोक्यात हातोडा घालून उद्योजकाचा खून

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पिंपरी

भोसरी येथील लघु उद्योजक विजय सुभेदार पवार (४५) यांचा अज्ञात व्यक्तीने डोक्यात हातोडा घालून निर्घृण खून केला. भोसरी एमआयडीसीमधील सेक्टर चारमध्ये गुरुवारी रात्री दोनच्या सुमारास ही घटना घडली. पवार हे शिवम एन्टरप्रायजेसचे भागीदार होते. सकाळी त्यांच्या कंपनीचे सुरक्षारक्षक आल्यावर ही घटना उघडकीस आली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विजय पवार हे पोपट तुकाराम रासकर यांच्यासोबत भागीदारीमध्ये भोसरी येथील सेक्टर क्रमांक चारमध्ये शिवम एन्टरप्रायजेस ही फॅब्रिकेशनची कंपनी चालवत होते. रात्री ते त्यांच्या कंपनीमध्ये एकटे झोपलेले असताना अज्ञात व्यक्तीने रात्री दोनच्या सुमारास त्यांच्या डोक्यात हातोडा घालून खून केला. ही घटना सकाळी कंपनीचा सुरक्षारक्षक तेथे आल्यानंतर उघडकीस आली. हा खून कोणी केला व त्यामागचे कारण हे अद्याप स्पष्ट होऊ शकलेले नाही. या घटनेबाबत भोसरी एमआयडीसी पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कार्यकर्त्यांचा हट्ट: खाकी वर्दीची माघार

$
0
0

Prashant.Aher@timesgroup.com
.......
Tweet : @PrashantAherMT

पुणे : मानाचे पहिले पाच, रात्रीचे मानाचे अशी २० टक्के मंडळे मिरवणुकीतील निम्म्याहून अधिक काळ घेतात आणि उर्वरित ८० टक्के मंडळांचे कार्यकर्ते पोलिसांच्या 'तालावर' नाचत नाचत गणेश विसर्जन करतात. पोलिस बंदोबस्तचा हा 'ट्रेंड' यावर्षीही कायम होता. 'कायदा सुव्यवस्थे'च्या गोंडस नावाखाली बंदोबस्तादरम्यान करण्यात येणारी तडजोडच मिरवणुकीचे व्यवस्थापन बिघडवून टाकत असल्याचे दिसून आले आहे.

गणेशोत्सव काळात पोलिस आणि कार्यकर्ते यांच्यात वादाच्या फैरी झडल्या नाही तरच नवल...यंदाचेही वर्ष त्याला अपवाद ठरले नाही. राजकीय दबावापोटी पोलिसांना माघार घ्यावी लागली आणि त्याचे थेट पडसाद विसर्जन मिरवणुकीत जाणवले. ​हायकोर्टाच्या आदेशानंतरही 'डीजें'चा दणदणाट कमी करण्याचा कोणी प्रयत्न केला नाही. आज काय वाजवायचे ते वाजवू द्या, उद्या त्यांच्यावर गुन्हे दाखल करू, अशी भूमिका घेण्यात आली. पोलिसांनी दाखल केलेले गुन्हे राजकीय गुन्ह्यांच्या नावाखाली निकाली काढण्यात येतात. त्यामुळे पोलिसांकडून गुन्हे दाखल करण्याचा हा प्रयत्न कुचकामी ठरतो.

मिरवणुकीमध्ये लाखोंच्या संख्येने भाविक गर्दी करतात. अशावेळी कायदा सुव्यस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, म्हणून पोलिस कार्यकर्त्यांची अरेरावी सहन करतात. सेवासदन चौकात बंदोबस्त करणाऱ्या एका महिला अधिकाऱ्याला मंडळांच्या अधिकाऱ्यांनी दमबाजी केली. 'मिरवणुकीला पुढे ढकलले तर, आम्ही येथेच बसू आणि मिरवणूक थांबवू. पुढे काय होईल ते तुम्ही बघून घ्या.' त्या महिला अधिकाऱ्याने तडजोडीची भूमिका स्वीकाररून कार्यकर्त्यांच्या मनाप्रमाणे वादन होऊ ​दिले. परिणामी बेलबाग चौकात श्रीमंत दगडूशेठ गणपती, अखिल मंडई मंडळ यांना येण्यास उशीर झाला.

महोत्सवी मंडळांनी लक्ष्मी रोडवर विसर्जन मार्गात सहभागी करण्यासाठी पोलिसांना विनंती केली होती. पोलिसांनी सर्वानुमते त्यांना परवानगी दिली. मात्र, याच मंडळांनी मिरवणुकीला उशीर केला; त्याचा फटका सर्वसामान्य मंडळांना बसला. मिरवणुकीत मंडळांपुढे किती पथके असावीत, एका पथकात किती ढोल असावेत, याबाबत ठोस भूमिका घेणे गरजेचे आहे. यंदा उत्सवात पोलिसांनी तशा सूचना दिल्या होत्या. मात्र, ढोलपथकांतील वर्चस्वाच्या संघर्षातून कोणाही ढोल, ताशांची संख्या मर्यादित ठेवली नाही.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पहिलीच परीक्षा केली आयुक्तांनी ‘एंजॉय’

$
0
0

मिरवणुकीच्या गोंधळातही मोबाइलवर संवाद साधण्यावर भर

Ashish.Chandorkar@timesgroup.com
Tweet : @AshishChandMT

पुणे : पुण्यातील गणेशोत्सव शांततेत आणि सुरळीत पार पाडणे, ही पुण्यातील पोलिस आयुक्तांची एकप्रकारे वार्षिक परीक्षाच असते. मानाच्या पाच गणपतींना तुलनेने विशेष अडचण किंवा समस्या निर्माण होत नाहीत. मात्र, रात्री आठ-नऊ नंतर प्रतिष्ठेची मंडळे बेलबाग चौकात येऊ लागल्यानंतर पुढील काही तास पोलिसांचे आणि अर्थातच, पोलिस आयुक्तांची कसोटी पाहणारे असतात. त्यातून वार्षिक परीक्षेचे पहिलेच वर्ष असेल तर, मग तयारीनेच पेपर द्यावा लागतो. तसा पुण्याच्या पोलिस आयुक्त रश्मी शुक्ला यांनीही तो दिला...

रात्री आठपासूनच अखिल मंडई मंडळ आणि श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती यांना बेलबाग चौकात आणण्यासाठी पोलिसांचे प्रयत्न सुरू होतात. मात्र, गुरुवारी तशी काहीच हालचाल दिसली नाही. छत्रपती राजाराम मंडळ आणि श्रीमंत भाऊ रंगारी यांनी प्रत्येकी पाच-पाच पथके लावल्यामुळे होत असलेल्या उशिराबद्दल पोलिसांनी चकार शब्दही काढलेला दिसला नाही. पोलिस आयुक्त रश्मी शुक्ला या बेलबाग चौकातील मांडवात निवांत बसून होत्या. मोबाइलवरच बिझी होत्या. येणारे मंडळ, आणखी किती पथकं आहेत, याचीच जुजबी माहिती घेताना दिसत होत्या.

भाऊ रंगारी आणि मंडई मंडळाच्या आरतीला जायलाही त्यांनी विनम्रपणे नकार दिला. 'हे येतील...' असं पोलिस उपायुक्त वाकडे यांच्याकडे हात दाखवून म्हटले. मंडईचा भक्तिरथ बेलबाग चौकातून पुढे जात असताना वायरमुळे रथ थांबला. 'आता काय करणार' या उत्सुकतेने आयुक्तही ते दृष्य बघत होत्या. कार्यकर्त्याने बांबूच्या मदतीने वायर वर ढकलून रथ पुढे ढकलला. हे अस्सल 'पुणेरी जुगाड' पाहून त्या गालातल्या गालातच हसल्या. पण, पाचच सेकंदातच गाडा पुन्हा थांबला. या दोन वायरी खूपच खाली होत्या. आता काय करणार, अशी विचारणा त्यांनी सुनील रामानंद यांच्याकडे केली. 'कापून टाकणार,' असे उत्तर आल्यानंतर 'ओह...' म्हणून पुन्हा त्याकडे पाहू लागल्या. तसेच झाल्यानंतर 'अरेरे...' अशी प्रतिक्रिया व्यक्त करून पुन्हा मोबाइलमध्ये रमल्या.

श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंडळ बेलबाग चौकात येण्याची चाहूल लागताच पोलिसांनी बेलबाग चौक मोकळा करण्यास सुरुवात केला. तोपर्यंत तो चौक भाविकांनी तुडुंब भरला होता. तेवढ्यात स्वरुपवर्धिनीच्या कार्यकर्त्यांनी ढोल-ताशावर ठेका धरला. पोलिस हुसकावून लावत असलेल्या तरुणांच्या एका टोळक्याने त्यावर ताल धरले. त्यामुळे 'सिव्हिल ड्रेस'मधल्या पोलिसाचा पारा चढला. आणि त्याने त्याला बदडण्यास प्रारंभ केला. कार्यकर्ताही तयारीचा होता. 'जातोय ना, मारता कशाला,' वगैरे अशी विचारणा केली. मग काय पोलिसाने त्याला धक्काबुक्की, फटके आणि लाठीचे दोन-चार फटके हाणले. ते पाहून लगबगीने आयुक्त मॅडम उठल्या आणि 'अरे, क्या पागल हो क्या...' असं म्हणत त्या पोलिसाला बाजूला न्यायला सांगितलं... अशा प्रकारांबद्दल त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. नशीब त्या मिरवणुकीत फिरल्या नाहीत. अन्यथा, अशी नाराजी त्यांना वारंवार व्यक्त करावी लागली असती.

आयुक्त मॅडमनी टाकला निश्वास

श्रीमंत दगडूशेठ हलवाईच्या आरतीला मात्र, त्या आवर्जून गेल्या. बैलगाडीवर चढल्या. आरती झाली. सत्कार स्वीकारला. नंतर रथाच्या सारथ्याची सुरुवात त्यांच्या हस्ते झाली. अगदी थोडावेळ त्यांनी गाड्याची दोरी हातात घेतली. बैलांनी हिसका दिल्यानंतर सर्वसामान्यांची उडते तशीच काहीशी भंबेरी त्यांचीही उडाली. दहा-पंधरा सेकंदाचांच खेळ सारा. त्यानंतर त्या पुन्हा मांडवात येऊन विराजमान झाल्या. आणि हे असंच पुढे नेतात का, गाडा वळवितात कसा वगैरे याची त्या माहिती घेत होत्या. अनपेक्षितपणे आलेल्या अनुभवाचा धक्का त्यांच्या चेहऱ्यावर टिकून होता. श्रीमंत दगडूशेठ हलवाई मंडळाचा गणपती बेलबाग चौकातून मार्गस्थ झाला आणि मग त्यांच्या आधीच्या पोलिस आयुक्तांप्रमाणेच मॅडमनीही सुटकेचा निश्वास टाकला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पुणे मेट्रो : २ बँकांचे ६ हजार कोटींचे कर्ज

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

पुणे मेट्रो प्रकल्पाच्या अंतिम मान्यतेची प्रक्रिया अद्याप प्रलंबित असताना, मेट्रो उभारणीसाठी जागतिक बँक आणि एशियन इन्फ्रास्ट्रक्चर इन्व्हेस्टमेंट बँक यांच्याकडून तब्बल सहा हजार ३२५ कोटी रुपयांचे कर्ज घेण्यास केंद्र सरकारने मान्यता दिली आहे. अर्थ मंत्रालयाच्या 'आर्थिक घडामोडीविषयक' (इकॉनॉमिक अफेअर्स) विभागाने कर्जाच्या प्रस्तावाला मंजुरी दिल्याने मेट्रोच्या निधीची जुळवाजुळव करण्यातील अडचणी दूर झाल्या आहेत.

दिल्ली मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनने (डीएमआरसी) केलेल्या प्रकल्प आराखड्यानुसार शहराच्या मेट्रो प्रकल्पाचा खर्च ११ हजार ५२२ कोटी रुपये आहे. एकूण खर्चाच्या ५० टक्के निधी केंद्र-राज्य सरकारचे अनुदान आणि पुणे व पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या हिश्श्यातून उभारला जाणार आहे. उर्वरित ५० टक्के रक्कम कर्ज स्वरूपात उभारावी लागणार आहे. त्यासाठी जागतिक बँक आणि एशियन इन्फ्रास्ट्रक्चर बँकेसोबत गेल्या काही महिन्यांपासून चर्चा सुरू होती. या दोन्ही बँकांकडून कर्ज घेण्याचा प्रस्ताव राज्याच्या नगरविकास विभागाने केंद्रीय नगरविकास मंत्रालयाला पाठवला होता. नगरविकास मंत्रालयाने हा प्रस्ताव अर्थ खात्याकडे सादर केला होता. त्याची छाननी करून या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली असून, या दोन्ही बँकांशी पुढील दोन ते तीन महिन्यांत कर्जपुरवठ्यासाठी आवश्यक करारनामे केले जातील, अशी माहिती पालकमंत्री गिरीश बापट यांनी दिली.

शहराचा मेट्रो प्रकल्प तातडीने मार्गी लागावा, यासाठी पाठपुरावा सुरू असून, दोन्ही बँकांकडून कर्जपुरवठा होणार असल्याने मेट्रोच्या निधीचा मोठा अडथळा दूर झाल्याची भावना पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांनी व्यक्त केली. पुणे मेट्रो प्रकल्पाचा एकूण खर्चापैकी केंद्र सरकार दोन हजार ११८ कोटी, तर राज्य सरकार दोन हजार ४६० कोटी रुपये अनुदान स्वरूपात देणार आहे. पुणे व पिंपरी-चिंचवड महापालिकेमार्फत त्यांच्या हद्दीतील मेट्रो मार्गिकेच्या प्रमाणात एक हजार २७८ कोटी रुपये उपलब्ध करून दिले जाणार आहेत.

'पुणे महानगर मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशन' (पीएमएमआरसी) या स्वतंत्र कंपनीला (स्पेशल पर्पज व्हेईकल) हा कर्जपुरवठा करण्यात येणार आहे. दोन्ही बँकांकडून दोन ते तीन हप्त्यांमध्ये कर्जपुरवठा केला जाणार असून, त्याबाबतचा इतर तपशील आगामी काळात निश्चित केला जाणार असल्याचे महापालिका आयुक्त कुणाल कुमार यांनी सांगितले.

मेट्रोला मान्यता केव्हा?

मेट्रोच्या अवाढव्य खर्चासाठी आवश्यक निधीची जमवाजमव करण्यात केंद्र सरकारने मंजुरी दिली असली, तरी अनेक महिन्यांपासून मान्यतेसाठी रखडलेल्या या प्रकल्पावर केंद्रीय मंत्रिमंडळाची मोहोर कधी उमटणार, असा प्रश्न केला जात आहे. महापालिकेच्या आगामी निवडणुकांना सहा महिन्यांपेक्षा कमी अवधी राहिल्याने निवडणुकांमध्ये फायदा घेण्यासाठी पुढील महिन्या-दोन महिन्यांत मेट्रोला मान्यता देऊन भूमीपूजन करण्यात येण्याची शक्यता आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आरक्षण मागतात, लग्नावेळी मात्र लपवतात: अजित पवार

$
0
0

मटा ऑनलाइन वृत्त। बारामती

मराठा मूकमोर्चाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी मराठा समाजाच्या मागासलेपणासाठी राज्य सरकारच्या निष्क्रियतेकडे बोट दाखवत सरकारविरूद्धच्या संघर्षात उडी घेतली असताना, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील मराठा आरक्षणाबाबत भाष्य करत मराठा आंदोलनाला वेगळी दिशा देण्याचा प्रयत्न केला आहे. 'अनेकांना आरक्षण हवं असतं मात्र, जेव्हा लग्नाची वेळ येते तेव्हा सर्वजण आरक्षण लपवतात आणि आम्ही कसे वरच्या दर्जाचे आहोत याचाच खटाटोप करत असतात.' असं वक्तव्यं करत अजित पवार यांनी मराठा मूकमोर्चाच्या माध्यमातून होणारी चर्चा आरक्षणाकडे वळती करण्याचा प्रयत्न केला आहे.

बारामती पंचायत समितीच्यावतीनं मोरोपंत सभागृहात पार पडलेल्या गुणगौरव सोहळ्यात पवार बोलत होते. मराठा आरक्षणाबाबत बोलत असताना ते आपल्या खास शैलीत पुढे म्हणाले, 'माझ्यासह सगळ्यांना आरक्षण पाहिजे आहे, मात्र लग्नसमारंभ या गोष्टी आल्या की मग सगळे आरक्षण बाजूला ठेवून आम्ही कडूतले नाही, आम्ही वरच्या दर्जाचे, लय लय वरचे असे सांगायलाही विसरत नाहीत. याबाबत मी खूप ऐकलं आहे. जाऊ दे आता काही जास्त बोलत नाही. मागं काय काय बोलून माझं लय वंगाळ झालंय', असं म्हणत पवार यांनी आरक्षणाबाबतच्या मराठा समाजाच्या मानसिकतेवर बोट ठेवलं आहे.

आरक्षणाच्या मुद्द्यावर मराठा समाज आक्रमक आहे. मराठा समाजाच्या आजच्या स्थितीला आमच्या पूर्वीचे राज्यकर्ते जबाबदार असल्याचं सांगत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठा समाजातील प्रस्तापितांनी मराठा समाजावर अन्याय केल्याची टीका केली आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी हा आरोप फेटाळून लावत फडणवीस सरकारलाच जबाबदार धरले आहे. या पार्श्वभूमीवर अजित पवार यांनी आरक्षणाबाबतचं हे सूचक वक्तव्यं केलं आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ध्वनिप्रदूषण घटले

$
0
0

मध्यरात्रीनंतर आवाजावर घातलेल्या बंदीचा परिणाम
म. टा. प्रतिनिधी, पुणे
विसर्जन मिरवणुकीमध्ये गणेश मंडळांच्या रथासमोर अनियंत्रित ढोल-ताशा पथके आणि स्पीकर्सच्या भिंती असतानाही यंदा ध्वनिप्रदूषणाची पातळी घटल्याचे निदर्शनास आले आहे. मध्यरात्रीनंतर आवाजावर घातलेल्या बंधनांमुळे मिरवणुकीतील सरासरी ध्वनिप्रदूषण ९२.६ डेसिबलपर्यंत कमी करण्यास प्रशासनाला यश आले आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा उल्लेखनीय प्रमाणात प्रदूषण घटले.
बेलबाग ते टिळक चौकापर्यंतच्या नऊ चौकांमध्ये ध्वनिप्रदूषणाच्या सरासरी नोंदी थोड्या फार फरकाने सारख्याच मिळाल्या आहेत. होळकर चौकात सर्वाधिक सरासरी ९६ डेसिबलची नोंद झाली. गणपती चौक, उंबऱ्या गणपती चौकामध्ये प्रदूषण ९४ डेबिसलच्या पुढे होते. सर्वात कमी प्रदूषणाची ८५.७ डेसिबलची नोंद खंडुजीबाबा चौकात झाली.
गणेशोत्सवातील पारंपरिक वाद्य आणि डॉल्बीमुळे होणारे ध्वनिप्रदूषण हे गेल्या काही वर्षांत वादग्रस्त ठरले आहे. या पार्श्वभूमीवर पर्यावरण अभ्यासक डॉ. महेश शिंदीकर यांच्या मार्गदर्शनाखाली इंजिनीअरिंग कॉलेजच्या विद्यार्थी कल्याण मंडळाचे विद्यार्थी दर वर्षी विसर्जन मिरवणुकीतील ध्वनिपातळीच्या नोंदी घेत आहेत.
लक्ष्मी रस्त्यावर रविवारी दुपारी बारा ते मंगळवारी सकाळी आठपर्यंत घेतलेल्या नोंदीनुसार आवाजाच्या पातळीने यंदा १०४. १ डेसिबलची उंची गाठली. मिरवणुकीच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच सोमवारी सकाळी ८ ते १२ या वेळेत आवाजाची पातळी वाढली. गेल्या वर्षीच्या तुलनेत ध्वनिप्रदूषणात घटले असले, तरी मंडळांनी यंदाही मुख्य रोडवर गुरुवार सकाळपासून आवाजाची मर्यादा ओलांडली होती.
विद्यार्थ्यांच्या नोंदीनुसार लक्ष्मी रस्त्यावरील आवाजाची सरासरी पातळी ९२.६ डेसिबल होती. यातील गुरुवारी घेतलेली सर्वाधिक पातळी १०३.८ कुंटे चौकात दुपारी १२ ते ४ दरम्यान नोंदवली गेली, तर दुसऱ्या दिवशी पहाटेपासून आवाज वाढला आणि १०९.६ डेसिबल ही नोंद गोखले चौकात शुक्रवारी पहाटे चार ते सकाळी आठ या वेळेत मिळाली.
लक्ष्मी रोड हा रहिवासी आणि औद्योगिक झोनमध्ये येतो. त्यामुळे या रोडवर दिवसा ६० ते रात्री ५५ डेसिबल आवाजाला परवानगी आहे. मात्र सर्वेक्षणादरम्यान लक्ष्मी रोडवर दुपारी बारा वाजता सरासरी ९०.६ डेलिबल, सायंकाळी चार वाजता ९१.६ डेसिबल, रात्री आठ वाजता ९३.७ डेसिबल अशा नोंदी मिळाल्या. रात्री १२ ते ६ या वेळेत पोलिसांनी स्पीकर बंद केल्यानंतर हे प्रमाण कमी म्हणजेच ८८ डेसिबलवर घसरले आणि पुन्हा डॉल्बी सुरू झाल्यावर सकाळी आठ ते १२ या वेळेत ९९.३ डेसिबलवर ही पातळी पोहोचली. या वर्षी मुरली कुंभारकर, नीलेश वाणी, सतीश सुखबोटलावार, शुभम बादलवाड, प्रवीण शिवपूजे, अतुल इंगळे, सुदेश राठोर, गणेश ठोमरे, शिवकुमार पाटील, शुभम पवार हे विद्यार्थी सहभागी झाले होते.
...
चौकाचे नाव - ध्वनीची नोंद डेसिबलमध्ये (एकत्रित)
- २०१४ - २०१५ - २०१६
- बेलबाग चौक - ९७. ३ - ९५.४ - ९२.३०
- गणपती चौक - ९५.६ - ९४.६ - ९४.९
- लिंबराज महाराज - चौक ९७.२ - १००.१ - ९३.८
- कुंटे चौक - ९७.६ - १०२.७ - ९३.८
- उंबऱ्या गणपती - ९४.९ - ९७.७ - ९४.५
- गोखले चौक - ९७.१ - ९५.६ -९३.७
- शेडगे विठोबा चौक - ९६.८ - ९७.० - ९१.४
- होळकर चौक - ९५. ३ - ९४.८ - ९६
- लोकमान्य टिळक चौक - ९७.९ - ९३.२ - ८९.६
- खंडुजी बाबा चौक - ९२.६ - ९४.९ - ८५.७
- लक्ष्मी रस्ता एकत्रित - ९६.३ - ९६.६ - ९२.६
......
भाऊसाहेब गोखले चौकात १०९.६ डेसिबल
विसर्जन मिरवणूक सुरू झाली तेव्हापासूनच प्रदूषणाला सुरुवात झाली होती. रात्री आठ ते बाराच्या दरम्यान सरासरी प्रदूषणाने उच्चांक गाठला. त्या वेळी आवाजाची नोंद ९९.३ डेसिबल इतकी होती. या वर्षी मिरवणुकीने कोणत्याही वेळेत सरासरी शंभरी ओलांडली नाही. मिरवणुकीत सर्वाधिक सरासरी प्रदूषण भाऊसाहेब गोखले चौक (९६ डेसिबल)आणि उंबऱ्या गणपती चौकात (९४.५) झाले. या चौकात रात्री आठ वाजता १०८.५ डेसिबल आवाजाची नोंद झाली. शुक्रवारी सहानंतर मोठ्या आवाजाला परवानगी मिळाल्यानंतर प्रदूषणात वाढ झाली. भाऊसाहेब गोखले चौकात १०९.६ शेडगे विठोबा चौकात ९८.५, गणपती चौक आणि लिंबमहाराज चौकात ९८.६, टिळक चौकात १००.४ डेसिबल आवाज उमटला.
...........
पंधरा वर्षात ध्वनिप्रदूषण वाढले
गणेश विसर्जन मिरवणुकीत पंधरा वर्षांपूर्वी आवाजाच्या मर्यादेला रात्रीचे बंधन नव्हते, तरी ९०.७ डेसिबल आवाजाची नोंद झाली होती. दर वर्षी बंधने वाढूनही प्रदूषणातही वाढ होते आहे. सर्वेक्षणानुसार २००७मध्ये पहिल्यांदा मिरवणुकीने शंभरी ओंलाडली आणि १०२. ६ डेसिबलची नोंद झाली. स्वाइन फ्ल्यूच्या साथीमुळे २००९ वर्ष अपवाद ठरले, त्या वेळी आवाज निच्चांकी ७९.१४ डेसिबल नोंदवला गेला. गेल्या पंधरा वर्षात १०१३मध्ये उच्चांकी ११४.४ आवाज होता. गेल्या चार वर्षात प्रदूषण घटते आहे. या वर्षी तब्बल बारा वर्षानंतर पुन्हा ९२ डेसिबलपर्यंत आवाज खाली आला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


आगामी संमेलनाची स्थलनिश्चिती आज?

$
0
0

संमेलनाध्यक्षपदाच्या निवडणुकीचा कार्यक्रमही होणार जाहीर
म. टा. प्रतिनिधी, पुणे
पिंपरी येथे झालेल्या साहित्य संमेलनाचे कवित्व संपत नाही तोच, आगामी साहित्य संमेलनाचे स्थळ आज, रविवारी महाराष्ट्र साहित्य परिषदेत होणाऱ्या साहित्य महामंडळाच्या बैठकीत निश्चित होणार आहे. तसेच संमेलनाध्यक्षपदाच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला जाणार आहे. संमेलनासाठी डोंबिवली किंवा बेळगाव यापैकी एका ठिकाणावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे.
साहित्य महामंडळाचे कार्यालय नागपूरला जाऊन सहा महिने झाले तरी महत्त्वाचे निर्णय पुण्यातून होत आहेत. साहित्य महामंडळाचे दप्तर साहित्य परिषदेतच (मसाप) अडकून पडल्याने कार्यालय नेमके नागपूरला आहे की पुण्यालाच आहे असा प्रश्न साहित्य वर्तुळात चर्चिला जात आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे फिरते कार्यालय सहा महिन्यांपूर्वी पुण्यातील महाराष्ट्र साहित्य परिषदेतून नागपूरच्या विदर्भ साहित्य संघाकडे गेले. साहित्य महामंडळाचे अनेक कागदपत्र 'मसाप'मध्ये असल्याने महामंडळाच्या कार्यालयाचा अद्यापही जम बसू शकलेला नाही. त्यातच महामंडळाचे अध्यक्ष डॉ. श्रीपाद भालचंद्र जोशी यांचा मुक्कामही पुण्यात वाढल्याने महामंडळाची महत्त्वाची बैठक 'मसाप'मध्ये होणार असल्याने नागपूरचे कार्यालय केवळ नावापुरते उरले आहे.
९० व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी १६८ वर्षांची परंपरा असलेले बेळगावमधील सार्वजनिक वाचनालय, डोंबिवलीतील आगरी यूथ फोरम, कल्याणमधील सार्वजनिक वाचनालयाबरोबरच सातारा, इंदापूर, चंद्रपूर, रिद्धपूर येथील निमंत्रणे महामंडळाकडे आली आहेत. डोंबिवली, बेळगाव आणि कल्याण या स्थळांची पाहणी करण्याचा निर्णय महामंडळाने घेतला होता. महामंडळाच्या अध्यक्षांचा भर बेळगाव, तर काही पदाधिकाऱ्यांचा भर डोंबिवलीच्या निमंत्रणावर आहे. त्यामुळे यापैकीच एक स्थळ संमेलनासाठी निश्चित होईल, असे बोलले जात आहे.
------------------------------------------
अध्यक्षपदाची मोर्चेबांधणी सुरू?
साहित्यवर्तुळात संमेलनाध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. काही लेखकांनी आत्तापासूनच प्रचार सुरू केला आहे. निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर हालचालींना वेग येणार असून, निवडणुकीच्या रिंगणात कोण कोण साहित्यिक उतरणार, हे लवकरच स्पष्ट होईल.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पाणीसाठ्यात वाढ

$
0
0

चारही धरणक्षेत्रांत पाऊस; पाण्यात ०.१८ अब्ज घनफुटाची वाढ
म. टा. प्रतिनिधी, पुणे
पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला प्रकल्पातील धरणांच्या पाणलोटात गेल्या चोवीस तासांत मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला. या पावसामुळे खडकवासला प्रकल्पातील चारही धरणांच्या पाणीसाठ्यात ०.१८ अब्ज घनफुटांनी (टीएमसी) वाढ झाली.
गेल्या महिनाभराहून अधिक काळ विश्रांती घेतलेल्या पावसाने धरणांच्या पाणलोटात पुन्हा हजेरी लावली आहे. गेल्या चोवीस तासांत खडकवासला धरणात चार मिलिमीटर, पानशेतमध्ये २३ मिमी, वरसगाव धरणात २५ मिमी आणि टेमघर धरणात २६ मिमी पावसाची नोंद झाली आहे. या पावसामुळे चारही धरणांचा पाणीसाठा ०.१८ टीएमसीने वाढला आहे.
पानशेत आणि वरसगाव ही दोन्ही धरणे शंभर टक्के भरली आहेत. टेमघर धरणात ८०.८६ टक्के आणि खडकवासला धरणात ५८.८८ टक्के पाणीसाठा झाला आहे. याशिवाय पवना धरणात ११ मिमी, मुळशी २९ मिमी, कलमोडी ४२ मिमी, चासकमान २४ मिमी, भामाआसखेड २१ मिमी, आंद्र १७ मिमी, वडिवळे ३० मिमी, गुंजवणी ५४ मिमी, भाटघर २२ मिमी, नाझरे ३० मिमी, पिंपळगावजोगे ३५ मिमी, माणिकडोह २० मिमी, डिंभे ३५ मिमी, घोड ४३, येडगाव २८ व वडज धरणात २४ मिमी पाऊस झाला आहे.
उजनी धरणातही १३ मिमी पाऊस पडला असून या धरणाचा साठा ५८ टक्के झाला आहे. या पावसाने भीमा खोऱ्यातील प्रमुख धरणांचा पाणीसाठा तब्बल १.४१ टीएमसीने वाढण्यास मदत झाली आहे. कृष्णा खोऱ्यातील धरणांच्या क्षेत्रातही पावसाने हजेरी लावली आहे. कोयना धरणात गेल्या चोवीस तासांत ८९ मिमी व कासारी धरणात १५० मिमी पाऊस झाला आहे. कृष्णा खोऱ्यातील धरणांत एका दिवसात १.४० टीएमसी पाणी जमा झाले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

राज्य विमा निगम कार्यालयात हिंदी पंधरवड्या निमित्त कार्यक्रम

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
कर्मचारी राज्य विमा निगमच्या पुणे उपक्षेत्रीय कार्यालयाने विविध प्रकारच्या कार्यक्रमांचे आणि स्पर्धांचे आयोजन करून 'हिंदी भाषा पंधरवडा' म्हणजेच राजभाषा पंधरवडा उत्साहात साजरा केला. १ ते १५ सप्टेंबर या कालावधीत पार पडलेल्या या पंधरवड्याचा समारोप बुधवारी १४ सप्टेंबर रोजी 'हिंदी दिवसा'निमित्त करण्यात आला.
समारोपाच्या कार्यक्रमाला सेंट्रल वॉटर पॉवर अँड रिसर्च स्टेशनचे संशोधक आणि हास्यकवी महेंद्र पवार उपस्थित होते. पवार यांच्या हस्ते कार्यालयाच्या 'राजभाषा सरिता सह्याद्री' या माहिती पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले. या वेळी पवार यांनी आपल्या कवितांचे सादरीकरण करून उपस्थितांची मने जिंकली आणि मार्गदर्शन केले. कार्यक्रमात कार्यालयाचे महासंचालक दीपक कुमार यांनी हिंदी दिवसाच्या निमित्ताने शपथेचे वाचन केले आणि भाषेचे महत्त्व समजावून सांगितले.
कार्यक्रमात स्पर्धांच्या विजेत्यांना पारितोषिके देण्यात आली. वर्षभर हिंदी भाषेत सर्वाधिक व्यवहार करणाऱ्या राजस्व वसुली शाखेला आंतरकार्यालयीन शील्ड ट्रॉफी प्रदान करण्यात आली. या वेळी उपस्थित असलेले संचालक दीपक जोशी म्हणाले 'हिंदी ही सामान्य नागरिकाची आणि ‍व्यापाराची महत्त्वाची भाषा आहे. त्यामुळे या भाषेचा प्रसार आणि प्रचार करण्याची जबाबदारी आपल्या सर्वांची आहे.' कार्यालयाचे कर्मचारी व्ही. जी. स्वामी यांनी आपल्या हास्यकविता वाचल्या. राजभाषा विभागाच्या सहायक संचालक सोनल गोयल उपस्थित होते. अंजली झंवर यांनी सूत्रसंचालन तर रीती द्विवेदी यांनी आभार मानले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कर्जाच्या परतफेडीचा भारपुणेकरांच्या माथी?

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
शहरात कोणताही विकास प्रकल्प राबवायचा झाल्यास कर्ज घेऊन या प्रकल्पांची आखणी केली जात आहे. शहरात प्रस्तावित असलेल्या मेट्रो, समान पाणीपुरवठा योजना, नवीन बस या प्रकल्पांसाठी महापालिकेला सुमारे दहा ते बारा हजार कोटी रुपयांचे कर्ज घ्यावे लागणार आहे. पालिकेचे आर्थिक उत्पन्न तुटपुंजे असताना घेतलेल्या कर्जाची परतफेड करण्यासाठी वाढीव कराचा भुर्दंड पुणेकरांच्या माथी पडण्याची भीती काँग्रेसचे नगरसेवक संजय बालगुडे यांनी व्यक्त केली.
पुणे शहरातील वाहतुकीचा प्रश्न सोडविण्यासाठी मेट्रो प्रकल्प राबविला जाणार आहे. या प्रकल्पासाठी नुकतीच साडेसहा हजार कोटींची कर्ज मंजुरी झाली आहे. पुणे शहरामध्ये मेट्रो प्रकल्प झालाच पाहिजे. परंतु प्रत्येक प्रकल्पासाठी पुणेकरांवर कर्जाचा बोजा टाकणे योग्य होणार नसल्याचे बालगुडे यांनी सांगितले. काँग्रेसने सतत मेट्रो प्रकल्पासाठी प्रयत्न केले आहेत. भाजपने मेट्रोचा आता हमी घेतली आहे. प्रकल्पांसाठी घेतलेल्या कर्जाची परतफेड ही आता तिकिटाच्या उत्पन्नातून व पुणेकरांच्या टॅक्समधून होणार आहे.
शहराच्या मेट्रो प्रकल्पाला अद्यापही पूर्णपणे मंजुरी मिळालेली नसताना त्या अगोदरच प्रकल्पासाठी होणारी कर्ज मंजुरी म्हणजे 'लग्ना अगोदर वरात' असा प्रकार आहे. यापूर्वी 'चोवीस बाय सात' या पाण्याच्या योजनेसाठी पालिकेने दोन हजार कोटी, स्मार्ट सिटी योजनेसाठी अडीच हजार कोटी, पीएमपी बस खरेदीसाठी आठशे कोटी रुपयांचे कर्ज घेण्याचा निर्णय घेतला आहे. या कर्जाची परतफेड पुणेकरांकडून होणार आहे. याबाबत शहरात जनजागृती केली जाणार असल्याचे बालगुडे यांनी सांगितले.
०००००००

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

प्रलोभनांना बळी न पडता पक्षकार्य करा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी‌, पुणे
'निवडणुकीच्या तोंडावर अनेक प्रलोभने दिली जातील, मात्र त्याला बळी न पडता पक्षाचे काम करा,' असे राष्ट्रवादीचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले.
महापालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षाचे नगरसेवक, पदाधिकारी तसेच विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष यांना मार्गदर्शन करण्यासाठी कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. त्यामध्ये मार्गदर्शन करताना पवार बोलत होते. शहराध्यक्ष, खासदार वंदना चव्हाण, महापौर प्रशांत जगताप, स्थायी समितीचे अध्यक्ष बाळासाहेब बोडके, सभागृहनेते शंकर केमसे, राष्ट्रवादीचे प्रवक्ते अंकुश काकडे या वेळी उपस्थित होते.
'गेल्या आठवड्यात राष्ट्रवादीचे नगरसेवक दिनेश धाडवे यांनी गेल्या आठवड्यात भाजपमध्ये केलेल्या प्रवेशाचा थेट उल्लेख न करता, पवार यांनी उपस्थित पदाधिकारी, नगरसेवकांना सूचना केल्या. निवडणुकीच्या काळात इतर पक्षांकडून अनेक प्रलोभने दाखविली जातील, परंतु याला बळी न पडता पक्षाचे निष्ठेने काम करा,' असे त्यांनी सांगितले.
'महापालिकेच्या आगामी निवडणुकीत ‌पिंपरी-चिंचवडप्रमाणे पुण्यातही एकहाती सत्ता आली पाहिजे, यासाठी एकमेकांमधील हेवेदावे विसरून काम केले पाहिजे. पालिका निवडणुकीपूर्वी करण्यात आलेल्या सर्वेक्षणामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस एक क्रमांकाचा पक्ष राहील असा निष्कर्ष काढण्यात आला आहे. तरीही पक्षाच्या कोणत्याही पदाधिकारी तसेच कार्यकर्त्याने 'ओव्हर कॉन्फिडन्स' मध्ये राहू नये,' असा सल्लाही पवार यांनी दिला.
'पक्षात तुम्हाला काही अडचण असल्यास माझ्याशी बोला, खासदार सुप्रिया सुळे तसेच पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्याशी बोला, चुकीचे निर्णय घेऊ नका,' असेही त्यांनी स्पष्ट केले.
...
प्रेसला बातम्या देऊ नका
'पक्षाची बैठक झाली की लगेच काही जण प्रेसला माहिती देतात. त्यामुळे पक्षात वेगळे गट असल्याचे चित्र निर्माण केले जाते. यापुढील काळात हे खपवून घेतले जाणार नाही. पत्रकार जसे तुमचे मित्र आहेत, तसे माझेही मित्र आहे. त्यामुळे आम्हाला कोण काय करते आहे, ते कळते. त्यामुळे या पुढे प्रेसला बातम्या देऊ नका,' असा दम देखील अजित पवारांनी या बैठकीत भरला.
०००

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पाणी आणि शिक्षणाअभावी मराठवाड्याचा विकास नाही

$
0
0

विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांचे मत
म. टा. प्रतिनिधी, पुणे
'मराठवाड्यात पाणी आणि दर्जेदार शिक्षणाची सोय नसल्यानेच मराठवाड्याचा विकास झालेला नाही,' असे मत राज्याच्या विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी शनिवारी व्यक्त केले. मराठवाडा मुक्तिदिन महोत्सवात ते बोलत होते.
मराठवाडा समन्वय समितीने मराठवाडा मुक्तिदिनानिमित्त आयोजित केलेल्या मराठवाडा मुक्तिदिन महोत्सवात बागडे यांच्या हस्ते मराठवाडा भूषण पुरस्कार स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. पंडित विद्यासागर, आदर्श शेतकरी कांतराव देशमुख, लातूरचे जिल्हाधिकारी पांडुरंग पोले, उद्योजक सचिन इटकर, दिग्दर्शक दिलीप खंडेराय या व्यक्तींना आणि नळदुर्गच्या 'आपलं घर' या संस्थेला देण्यात आला. महापौर प्रशांत जगताप, युवक क्रांती दलाचे 'युक्रांद' अध्यक्ष डॉ. कुमार सप्तर्षी, साहित्य महामंडळाचे माजी अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील, समितीचे अध्यक्ष राजकुमार धुरगुडे पाटील, उपाध्यक्ष किशोर पिंगळीकर उपस्थित होते.
बागडे म्हणाले, 'मोठ्या संघर्षातून मराठवाड्याची निर्मिती झाली आहे. मराठवाड्यात शेती करण्यासाठी मुबलक प्रमाणात पाणीच उपलब्ध नाही. त्यामुळे तेथे शेती चांगल्या प्रमाणात होत नाही आणि त्यातून उत्पन्न मिळ‍त नाही. दर्जेदार शिक्षणाची सोय नसल्याने विद्यार्थ्यांना शिक्षण मि‍ळत नाही. याचा प्रतिकूल परिणाम रोजगार निर्मितीवर होऊन विकासात घट होते. त्यामुळे मराठवाड्यात पाणी उपलब्ध होण्यासाठी राज्य सरकारच्या जलयुक्त शिवाराला नागरिकांनी सहकार्य केले पाहिजे. तसेच शैक्षणिक सुविधा निर्माण झाल्या पाहिजे व त्याचा लाभ विद्यार्थ्यांनी घेणे गरजेचे आहे.'
या वेळी बागडे यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना कमी दरात जेवण उपलब्ध करणाऱ्या 'माफक सकस आहार' योजनेचा शुभारंभ करण्यात आला. तसेच मान्यवरांच्या हस्ते 'वैभवशाली मराठवाडा' या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले आहे. ठाले पाटील आणि कुमार सप्तर्षी यांनी आपले मनोगत व्यक्त केले. धुरगुडे पाटील यांनी प्रास्ताविक केले.
............
स्वतंत्र भारताचे वर्ष चुकले?
विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी आपल्या मराठवाडा मुक्तिदिनाबद्दलच्या भाषणात भारत १९४५ सालामध्ये स्वतंत्र झाला असा एकदा उल्लेख केला. त्यामुळे बालगंधर्व रंगमंदिराच्या सभागृहात उपस्थितांमध्ये एकच कुजबुज निर्माण झाली. काहींनी थेट चर्चा करायला सुरुवात केली. मात्र, बागडे यांनी काही वेळात दुसऱ्यांदा उल्लेख हा १९४७ असा केल्याने सभागृहात पुन्हा शांतता निर्माण झाली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पानशेत पूरग्रस्तांचा प्रश्न मार्गी

$
0
0

१०३ वसाहतींना मिळणार मालकी हक्क
म. टा. प्रतिनिधी, पुणे
पानशेत पूरग्रस्तांच्या वसाहतींना मालकी हक्क देण्याबरोबरच तेथील बांधकामे नियमित करण्याचा प्रश्न मार्गी लागला आहे. राज्याचे महसूल, पुनर्वसन आणि मदतकार्यमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत कोकण भवन येथे झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. या बैठकीत १०३ वसाहतींना मालकी हक्क देण्याचा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आल्याने वसाहतीमधील पूरग्रस्तांना दिलासा मिळाला आहे.
पानशेत धरण १९६१ मध्ये फुटल्यानंतर आलेल्या पुरामुळे शहरातील अनेक कुटुंब रस्त्यावर आली. त्या वेळी राज्य सरकारने या पूरग्रस्तांचे पुनर्वसन सहकारनगर, चतु:श्रुंगी, पद्मावती यासह शहरातील विविध भागात केले. या वसाहतीमधील घरे मालकी हक्काने व्हावीत, यासाठी येथील नागरिकांनी लढा उभारला होता. आंदोलने, मागण्यांचे निवेदने अनेकदा राज्य सरकारकडे देण्यात आली होती. प्रत्येक कुटुंबातील सदस्य संख्या वाढल्याने तेथे आवश्यक ते बदल, बांधकाम करता येत नव्हते. त्यामुळे या भागातील अनेक नागरिकांनी विनापरवानगी बांधकाम केले होते. वारस हक्काचाही प्रश्न निर्माण झाला होता. यावर निर्णय घेण्यासाठी पुनर्वसनमंत्री पाटील यांच्या उपस्थितीत मुंबई येथे बैठक झाली. आमदार माधुरी मिसाळ, मेधा कुलकर्णी, कोकण विभागीय आयुक्त प्रभाकर देशमुख, सचिव मालिनी शंकर, जिल्हाधिकारी सौरभ राव या वेळी उपस्थित होते.
या बैठकीत शुद्धिपत्रक दिनांक ३१ मार्च २०१५ नुसार १९९१ च्या प्राइम लँडिंग रेटनुसार रक्कम भरून या भागातील नागरिकांना घरांचा मालकी हक्क देण्याला पुनर्वसन मंत्र्यांनी मान्यता दिली आहे. याबाबतचा अध्यादेश लवकरच प्रसिद्ध केला जाणार असल्याचे पाटील यांनी सांगितले. शहरातील लक्ष्मीनगर, महर्षीनगर, दत्तवाडी, शिवदर्शन, सहकारनगर, गोखलेनगर, नागपूर चाळ, वडारवाडी, जनवाडी अशा विविध भागातील तेरा वसाहतींमध्ये पानशेत पूरग्रस्तांचे पुनर्वसन करण्यात आले आहे. कुटुंबातील सदस्यांची संख्या वाढल्याने या भागातील अनेक नागरिकांनी आपल्या ऐपतीनुसार घरांची दुरुस्ती आणि वाढीव बांधकामे केली. ही बांधकामे करण्याला महापालिका आणि सरकारकडून परवानगी मिळत नव्हती. या विषयावर बैठकीत चर्चा झाली. पुणे विकास आराखड्यात त्रिसदस्यीय समितीने पूरग्रस्तांसाठी चार एफएसआय देण्याची शिफारस केली असल्याकडे आमदार मिसाळ यांनी लक्ष वेधले. तसेच या वसाहतीतील घरे चाळींसारखी एकमेकांना जोडून असल्याने बांधकाम परवानगी देताना फाँट आणि साइड मार्जिन वगळावे अशी मागणी मिसाळ यांनी केली.

या वसाहतींना होणार फायदा...

- सहकार नगर नंबर. १, नंबर २,
- पद्मावती व मागासवर्गीय वसाहती,
- चतुःश्रृंगी वसाहत,
- निसेन हट्स वसाहती

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


महापालिका राबविणार मतदार जागृती अभियान

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वयाची अठरा वर्ष पूर्ण करणाऱ्यांना मतदानाचा हक्क, अधिकार मिळावा, यासाठी महापालिका प्रशासनाने मतदार जागृती अभियान राबविण्याचा निर्णय घेतला आहे. १४ ऑक्टोबरपर्यंत हे अभियान राबविले जाणार असून, यामध्ये नवीन नावनोंदणी, मतदान ओळखपत्रावरील पत्त्यातील दुरुस्ती, दुबार नोंदणी तसेच मृत किंवा स्थलांतरित झालेल्या मतदारांची नावे वगळण्यासाठी अर्ज देखील भरून घेतले जाणार आहे. कॉलेजमधील तरुणांना यामध्ये नाव नोंदविता यावे, यासाठी शहरातील ५५ कॉलेजमध्ये ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्याची माहिती महापालिका आयुक्त कुणाल कुमार यांनी दिली.
पालिकेच्या निवडणुकीत संपूर्ण शहराची मतदार यादी अधिकाधिक अद्ययावत व्हावी, या उद्देशाने प्रशासनाने ही मोहीम राबविण्याचा निर्णय घेतला आहे. प्रत्येक विधानसभा मतदारसंघातील कार्यालयाबरोबरच महापालिकेच्या पंधरा क्षेत्रीय कार्यालय तसेच शहरातील सुमारे ५५ कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांना मतदार नोंदणीचे अर्ज उपलब्ध करून दिले जाणार आहेत. विद्यार्थ्यांनी हे अर्ज कॉलेजकडून घेऊन तेथेच जमा करायचे आहे. सर्वसामान्य नागरिकांसाठी पालिकेच्या पंधरा क्षेत्रीय कार्यालयात ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. नागरिकांनी मतदार यादीत आपले नाव असल्याची खात्री करून त्यामध्ये दुरुस्ती करायची असल्यास या कार्यालयांमध्ये जाऊन अर्ज भरावे, असे आवाहन आयुक्त कुमार यांनी केले आहे.
येत्या जानेवारी महिन्यात वयाची अठरा वर्षे पूर्ण होणाऱ्या तरुण-तरुणींना या मोहिमेत सहभागी होऊन मतदार नोंदणी करता येणार आहे. मतदार यादीत नाव असेल तरच नागरिकांना मतदान करण्याचा अधिकार मिळणार आहे. राज्य निवडणूक आयोगाने दिलेले ओळखपत्र असेल, परंतु मतदार यादीत नाव नसल्यास संबधित नागरिकाला आपला मतदानाचा हक्क बजाविता येणार नाही, त्यामुळे आयोगाने प्रसिद्ध केलेल्या मतदार यादीत नाव असल्याची खात्री नागरिकांनी करावी. त्यामध्ये काही दुरुस्ती असल्यास त्यासाठीचे अर्ज भरून संबधित कार्यालयांकडे द्यावेत. शहरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने यामध्ये सहभागी व्हावे, यासाठी महापालिकेच्या माध्यमातून जनजागृती केली जात आहे. गणेशोत्सवाच्या काळातही मतदानाबाबत जनजागृती करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. मतदार नावनोंदणीचा अर्ज संबधित नागरिकाने स्वत: येऊन करणे गरजेचे आहे. राजकीय कार्यकर्त्यांच्या माध्यमातून गठ्ठा पद्धतीने केले जाणारे अर्ज स्वीकारू नयेत, अशा निवडणूक आयोगाच्या सूचना आहेत. एकाच कुटुंबातील अनेक अर्ज असल्यास असे अर्ज स्वीकारण्याच्या सूचना सर्व अधिकाऱ्यांना देण्यात आल्याचे आयुक्त कुमार यांनी सांगितले.
०००
वेबसाइटवर माहिती उपलब्ध
मतदार यादीत आपले नाव आहे की नाही, याची पाहणी करण्यासाठी नागरिकांनी राज्य निवडणूक आयोगाच्या https://ceo.maharashtra.gov.in या वेबसाइटवर जाऊन त्याची माहिती घ्यावी. तसेच याबाबत तक्रार असल्यास आयोगाच्या १८००२२१९५० या हेल्पलाइनवर संपर्क साधावा, असे आवाहन पालिका आयुक्त कुणाल कुमार यांनी केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मेट्रोबाबत भाजपला इशारा

$
0
0

फसवणूक केल्यास जनता जागा दाखवेल; महापौरांची थेट टीका
म. टा. प्रतिनिधी, पुणे
'केंद्र सरकारने अद्यापही पुणे मेट्रो प्रकल्पाच्या निधीला मंजुरी दिलेली नसताना देखील शहरावर विश्वास दाखवून वर्ल्ड बँक व एशिया इन्फ्रा स्ट्रक्चर इन्व्हेस्टमेंट बँक यांनी मेट्रोसाठी सहा हजार ३५० कोटी रुपयांचे कर्ज मान्य केले आहे. हे कर्ज मेट्रोसाठी स्थापन करण्यात येणाऱ्या स्पेशल पर्पज व्हेइकल (एसपीव्ही) कंपनीला मिळणार असताना, भारतीय जनता पक्षाकडून मात्र हा निधी मान्य केल्याचा खोटा दिखावा केला जात आहे. केंद्रात सत्तेवर असलेल्या भाजप सरकारने पुणेकरांच्या भावनांशी खेळू नये, अन्यथा निवडणुकीत पुणेकर त्यांना जागा दाखविल्याशिवाय राहणार नाहीत,' अशा शब्दात महापौर प्रशांत जगताप यांनी भाजपवर टीका केली.
याबाबत बोलताना जगताप म्हणाले, 'मेट्रो प्रकल्पासाठी केंद्र सरकारकडून मिळणारा निधी आणि बँकेकडून कर्ज स्वरूपात मिळणारा निधी यामध्ये फरक आहे. केंद्राकडून प्रकल्पासाठी जो निधी मिळतो, त्याला कोणताही परतावा नसतो, मात्र बँकेकडून जो निधी मिळतो, त्याचे हप्ते भरावे लागतात, हे समजण्या इतके पुणेकर सूज्ञ आहेत.' 'केंद्राकडे गेली अनेक महिने मान्यतेच्या प्रतीक्षेत असलेल्या पुणे मेट्रो प्रकल्पाचा निधी सरकारने तातडीने जाहीर करावा, तसेच केंद्रीय कॅबिनेट मंडळाने त्यासाठी तातडीने मंजुरी देऊन मेट्रोचा निधी जाहीर करावा, अशी मागणी महापौर जगताप यांनी केली. केंद्रात भाजपची सत्ता येऊन अडीच वर्षे उलटल्यानंतरही पुणे मेट्रोला मंजुरी मिळालेली नाही, ही अत्यंत दुर्दैवी बाब आहे,' असेही ते म्हणाले.
ज्या शहरातील नागरिकांनी भाजपला आठ आमदार, एक खासदार देऊन स्पष्ट बहुमत दिले, त्याच शहरातील मेट्रोबाबत भाजप सरकार दुजाभाव करत असल्याचा आरोप त्यांनी केला. 'कर्जाच्या घोषणेअगोदरच केंद्र सरकारने पुणे मेट्रोला निधी उपलब्ध करून दिला असता, तर निश्चित आनंद झाला असता. वर्षानुवर्षे मागणी करूनही भाजप सरकार पुणेकरांच्या तोंडाला पाने पुसणार असेल, तर अशा सरकारला येणाऱ्या निवडणुकीत धडा शिकविल्याशिवाय नागरिक राहणार नाहीत, असा इशाराही महापौर जगताप यांनी दिला.
....
ज्या शहरातील नागरिकांनी भाजपला आठ आमदार, एक खासदार देऊन स्पष्ट बहुमत दिले, त्याच शहरातील मेट्रोबाबत भाजप सरकार दुजाभाव करत आहे. कर्जाच्या घोषणेआधी केंद्र सरकारने मेट्रोला निधी दिला असता, तर आनंद झाला असता. भाजप सरकारने पुणेकरांच्या भावनांशी खेळू नये, अन्यथा निवडणुकीत पुणेकर त्यांना जागा दाखविल्याशिवाय राहणार नाहीत.
प्रशांत जगताप, महापौर, पुणे

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

घुंगरांनीच केले जीवन समृद्ध

$
0
0

लीला गांधी यांचा रंगत-संगत प्रतिष्ठानतर्फे सत्कार
म. टा. प्रतिनिधी, पुणे
'लीला गांधी यांच्या आयुष्यातील घटनाक्रम पाहिल्यास लावणींच्या घुंगरांनीच त्यांचे जीवन समृद्ध केल्याचे दिसून येते,' असे मत प्रतिभा शाहू मोडक यांनी शनिवारी व्यक्त केले. रंगत-संगत प्रतिष्ठानचा काव्य विभाग आणि लोकमंगल ग्रुप शिक्षण संस्थेने ज्येष्ठ अभिनेत्री लीला गांधी यांच्या मराठी चित्रपट सृष्टीतील योगदानाबद्दल विशेष सत्काराचे आयोजन केले होते. या वेळी मोडक बोलत होत्या. मानपत्र आणि स्मृतिचिन्ह असे विशेष सन्मानाचे स्वरूप होते. या वेळी रंगत-संगत प्रतिष्ठानचे अॅड. प्रमोद आडकर, लोकमंगल ग्रुप शिक्षण संस्थेचे शिरिष चिटणीस उपस्थित होते. 'गांधी यांनी त्यांच्या नृत्य गुणांनी मराठी चित्रपट सृष्टी गाजवून सोडली होती. लावणीचा ठेका आणि त्यांच्या भावविश्वातून अलगडलेली लावणी असे समीकरण त्या काळात तयार झाले होते,' असे मोडक यांनी सांगितले.
'नृत्य शिकून चित्रपटसृष्टीत काम करण्याची माझी फार इच्छा होती आणि मी लग्न करून संसाराला लागावे, असे वडिलांना वाटत होते. आईच्या पाठिंब्यामुळे मी या क्षेत्रात आले. या क्षेत्राने मला नाव दिले. रसिक श्रोत्यांचे प्रेम मिळाले. त्यामुळे आज आयुष्यात समाधान आहे,' अशी भवना गांधी यांनी या वेळी व्यक्त केली. पुरस्कार वितरणाच्या कार्यक्रमानंतर 'लावण्य' या विषयावर घनश्याम धेंडे, बंडा जोशी, डॉ. स्नेहसुधा कुलकर्णी, जयंत भिडे, ज्योती ढमढेरे आदी कवींनी कविता सादर केल्या.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पेशंटसाठी १४० बेड राखीव

$
0
0

पेशंटसाठी १४० बेड राखीव

म. टा. प्रतिनिधी, पुणे
खासगी हॉस्पिटल सध्या फुल झाल्याने डेंगी, चिकुनगुनियाच्या पेशंटसाठी कमला नेहरू, नायडू आणि येरवड्याच्या राजीव गांधी हॉस्पिटलमध्ये स्वतंत्र बेडची व्यवस्था करण्यात आली आहे. या तीनही हॉस्पिटलमध्ये सध्या १४० बेड राखीव ठेवण्यात आले असून, गरज पडल्यास आणखी ६० बेडची व्यवस्था नायडू हॉस्पिटलमध्ये करण्यात येणार आहे.
पुण्यात चिकुनगुनियासह डेंगीचे पेशंट वाढत असल्याचे गांभीर्य ओळखून पालकमंत्री गिरीश बापट यांनी सरकारी, खासगी हॉस्पिटलमधील आरोग्य व्यवस्थेची पाहणी केली. त्या संदर्भात पेशंटसाठी बेड राखीव ठेवण्याचे आदेश पालकमंत्र्यांनी दिले. त्यानुसार महापालिकेच्या आरोग्य विभागाने त्याबाबत नियोजन केले आहे.
'डेंगी, चिकुनगुनियाचे पेशंट वाढत आहेत. त्यामुळे सर्व खासगी हॉस्पिटल फुल झाली आहेत. तरीही या पेशंटसाठी खासगी हॉस्पिटलमध्ये काही बेड राखीव ठेवण्यात यावेत अथवा त्या पेशंटना प्राधान्य द्यावे, याबाबत खासगी हॉस्पिटलना पत्र पाठविण्यात येईल. त्याशिवाय महापालिकेच्या नायडू आणि कमला नेहरू हॉस्पिटलमध्ये सध्या प्रत्येकी ६० बेड राखीव ठेवले आहेत. त्याशिवाय येरवड्याच्या राजीव गांधी हॉस्पिटलमध्ये २० बेडची व्यवस्था केली आहे. आणखी पेशंट वाढत असल्यास नायडू हॉस्पिटलमध्ये अतिरिक्त ६० बेडची व्यवस्था केली जाईल,' अशी माहिती आरोग्य विभागाचे प्रभारी आरोग्य प्रमुख डॉ. एस. टी. परदेशी यांनी दिली.
येरवड्यातील सर्वाधिक पेशंट असल्याने त्यांनी राजीव गांधी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी जावे, असे आवाहन डॉ. परदेशी यांनी केले. राष्ट्रीय विषाणू संस्थेला (एनआयव्ही) विविध भागातील पेशंटच्या रक्ताचे पाच नमुने तपासणीला पाठविले होते. त्याची तपासणी केल्यानंतर सर्वाधिक चिकुनगुनियाचे पेशंट असल्याचे आढळले आहे, असे एनआयव्हीने म्हटले आहे. पुण्यात दुसरा कुठलाही विषाणू नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. प्रादुर्भाव कमी झाला, तरच साथ आटोक्यात येईल, असे त्यांनी सांगितले.
शहरात खासगी, सरकारी हॉस्पिटल; तसेच दवाखाने पेशंटने फुल झाले आहेत. सामान्य नागरिकांना डासांची लागण झाली असली, तरी त्यातून डॉक्टरदेखील सुटलेले नाहीत. महापालिकेच्या १३ डॉक्टरांनाच डेंगी झाल्याची कबुली प्रभारी आरोग्य प्रमुख डॉ. एस. परदेशी यांनी दिली. त्याशिवाय आणखी काही खासगी डॉक्टरांना लागण झाल्याचेही ते म्हणाले. पेशंटसाठी बेड राखीव ठेवण्याचे आदेश पालकमंत्र्यांनी दिले. त्यानुसार आरोग्य विभागाने त्याबाबत नियोजन केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

व्हॅटच्या वाढीने व्यापारी संतप्त

$
0
0

व्हॅटच्या वाढीने व्यापारी संतप्त

पुणे ः केंद्र सरकारने जाहीर केलेल्या खाद्यतेल, तेलबिया, वनस्पती यांसारख्या जीवनावश्यक वस्तू राज्य सरकारने व्हॅटमधून माफ कराव्यात; तसेच अतिरिक्त व्हॅटची अंमलबजावणी येत्या एक जानेवारी २०१७ पासून करण्यात यावी, अशी मागणी दी पूना मर्चंट्स चेंबरने केली आहे. राज्य सरकारने व्हॅट वाढविल्याने व्यापारी वर्गात असंतोषाची भावना निर्माण झाली आहे.
राज्य सरकारने काल व्हॅट वाढविण्याचा निर्णय घेऊन त्याची अधिसूचना जारी केली. त्यामुळे शनिवारपासून त्याच्या अंमलबजावणीला प्रारंभ झाला. व्यापारी वर्गाला कोणतीही पूर्वसूचना न देता; तसेच मुदत न देता व्हॅट लागू केल्याने व्यापाऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे. या संदर्भात दी पूना मर्चंट्स चेंबरने व्हॅटसंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन दिले आहे.
'राज्य सरकारने एक एप्रिलला व्हॅटच्या दरात बदल केला होता; तसेच कायद्यात बदल केला होता. सरकारच्या संगणकप्रणालीत अद्याप व्हॅट रिटर्न अपलोड होऊ शकलेले नाही. तातडीने सॉफ्टवेअर बदलणे शक्य नसल्याने व्यवसायात बदल करता येणार नाही. जीवनावश्यक कायद्यांतर्गत ज्या वस्तू केंद्र सरकारने जीवनावश्यक ठरविल्या आहेत, त्याच वस्तू व्हॅट कायद्यांतर्गत जीवनावश्यक ठरत नाहीत, हा मोठा विरोधाभास आहे. केंद्र सरकारने जाहीर केलेल्या खाद्यतेल, वनस्पती, तेलबिया आदी वस्तू करमाफ कराव्यात,' अशी मागणी प्रवीण चोरबेले यांनी केली.
व्हॅटचा दर अचानक वाढविल्याने व्यापारी वर्गात असंतोषाची भावना पसरल्याचे मत पुणे व्यापारी महासंघाने नोंदविले. '१६ सप्टेंबरपर्यंतचा व्हॅटचा दर एक आणि पुढील पंधरा दिवसांचा व्हॅटचा दर वेगळा असल्याने कराचे विवरण भरताना छोट्या व्यापाऱ्यांना ते अडचणीचे असल्याने व्यापारी वर्गात नाराजी आहे. व्हॅटसंदर्भात बदल करण्यासाठी संगणकप्रणालीची मदत घ्यावी लागते. त्यासाठी सरकारने पुरेसा अवधीही दिला नाही. दरवाढीच्या या पद्धतीला व्यापाऱ्यांचा तीव विरोध आहे,' असे पुणे व्यापारी महासंघाचे अध्यक्ष फत्तेचंद रांका व सचिव महेंद्र पितळिया यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images