Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

पुण्यात २४ तासांनंतरही विसर्जन मिरवणुका

$
0
0

मटा ऑनलाइन वृत्त । पुणे

अकरा दिवसांच्या बाप्पांना निरोप देण्यासाठी काल, गुरुवारी निघालेल्या विसर्जन मिरवणुका २४ तासांनंतर आजही सुरू आहेत. पुण्यातील मानाच्या सर्व गणपतींचे गुरुवारी सायंकाळपर्यंत विसर्जन झाले असले तरी दगडूशेठ हलवाईसह अन्य गणपतींच्या मिरवणुका मात्र रात्रभर सुरू होत्या. दगडूशेठ हलवाई गणपतीचे आज सकाळी सव्वाआठच्या सुमारास विसर्जन झाले. पुण्यात सुमारे १३३ मोठ्या मंडळांच्या गणेशमुर्तींचे आतापर्यंत विसर्जन झाले आहे.

गणेशोत्सवाचे जनक लोकमान्य टिळक यांच्या महात्मा फुले मंडईतील पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट आणि महापौर प्रशांत जगताप यांनी मानाच्या पहिल्या श्री कसबा गणपतीची आरती केली. त्यानंतर, गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या अशा जयघोषात विसर्जन मिरवणुकीला गुरुवारी सकाळी साडेदहा वाजता सुरुवात झाली. बुधवारी रात्री शहरात जोरदार पाऊस झाला होता, तर गुरुवारी सकाळपासूनही रिमझिम पाऊस सुरू होता. तरीही, लाडक्या बाप्पांच्या दर्शनासाठी पुणेकरांनी गर्दी केली होती. कसबा गणपतीपाठोपाठ, तांबडी जोगेश्वरी मंडळ, गुरुजी तालीम मंडळ, तुळशीबाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ आणि केसरीवाडा ही मानाची इतर मंडळे मुख्य मिरवणुकीत दाखल झाली. मानाच्या गणपतींनंतर लक्ष्मी रस्ता आणि शिवाजी रस्त्यावरील इतर मंडळे मिरवणुकीत सहभागी झाली.

मानाच्या गणपतींचे विसर्जन झाल्यानंतरही पुण्यात रात्रभर मिरवणुकांचा गजबजाट राहिला. बाजीराव रस्ता, शिवाजी रस्ता, टिळक रस्ता मिरवणुकांनी गजबजलेला आहे. विसर्जन घाटांवरील गर्दीही कायम आहे. अलका चौकात पोलिसांकडून डीजे बंद करण्याचा प्रयत्न झाल्याने काहीवेळ तणाव निर्माण झाला होता तर बॅरिकेट्स लावल्यामुळे केळकर रोडवरची बरीच मंडळे महापौरांकडून नारळ न घेताच टिळक चौकातून लाकडी पुलाकडे रवाना झाली. बाबू गेनू आणि भाऊ रंगारी मिरवणुकीत दोन ते अडीच तासांचा 'गॅप' पडल्यानेही काहीशी रखडपट्टी झाली. पोलिसांच्या हस्तक्षेपानंतर टिळक रस्त्यावरील मिरवणूक जलदगतीने पुढे सरकली. या रस्त्यावरून आतापर्यत ८६ मंडळे मार्गस्थ झाली आहेत. एकूण १५३ मंडळांची नोंदणी पाहता अजून मोठ्या प्रमाणात मंडळांचे गणपती बाकी आहेत. एकूणच पुण्यात दुपारपर्यंत मिरवणुका चालण्याची शक्यता आहे.

दगडूशेठ गणपती मिरवणूक रखडली

दगडूशेठ गणपती उशिराने बेलबाग चौकात आला. त्यामुळे टिळक चौकात पोहोचण्यास दरवर्षीच्या तुलनेत मोठा विलंब झाला. दरवर्षी पहाटे सहाच्या सुमारास दगडूशेठ गणपती टिळक चौकात येतो. यंदा ७.३० च्या सुमारास दाखल झाला. सव्वाआठच्या सुमारास विसर्जन झाले. श्रींची मूर्ती गणनायक रथामध्ये विराजमान होती. लक्ष लक्ष दिव्यांनी उजळून निघालेल्या या रथाने व त्यातील विलोभनीय मूर्तीने नागरिकांच्या डोळ्याचे पारणे फेडले. श्रींचे रूप व रथाचा डौल डोळ्यात व मोबाइलमध्ये साठवून घेण्यासाठी नागरिकांची झुंबड उडाली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


लोणावळ्यात ‘डीजेमुक्त’ मिरवणूक

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, लोणावळा
लोणावळा शहर आणि परिसरात भर पावसात नऊ तास ढोल-ताशा, लेझीम, बँड, बँजोच्या निनादात आणि गुलाल, भंडारा, फुलांची मुक्तपणे उधळण करत गणेश विसर्जन मिरवणूक रंगली. लोणावळा शहर पोलिसांनी केलेल्या डीजेमुक्त मिरवणुकीच्या आवाहनाला सर्वच गणेश मंडळांनी प्रतिसाद देऊन डीजेमुक्त मिरवणुका काढल्या. काही मोजक्या मंडळांचा अपवाद वगळता बहुतांश मंडळांनी गुलालाऐवजी फुलांची उधळण केली. 'गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या' अशा घोषणा देऊन बाप्पाला निरोप देण्यात आला.

मावळात लोणावळा शहर आणि ग्रामीण भागात भक्तिमय वातावरणात सोमवारी सकाळपासूनच घरघुती गणपतींसह काही गणेश मंडळांनी विसर्जन मिरणुकीला प्रारंभ केला. ढोल, लेझीम, बँड, बँजोचा निनाद आणि तुतारी, सनईच्या मंगलमय सूर यांच्या साथीने विसर्जन केले. लोणावळा परिसरात सकाळपासून पावसाची रिमरिम सुरू होती. दुपारी तीननंतर पाऊस थांबल्याने गणेश भक्तांमध्ये आणखी उत्साह संचारला. लोणावळ्यात दुपारी चार वाजता सार्वजनिक गणेश मंडळांनी आपले गणपती मिरवणुकीसाठी विसर्जन मार्गाकडे रवाना केले. सायंकाळी पाच वाजता मावळा चौकातून मिरवणुकीला सुरुवात झाली. मानाचा पहिला गणपती रायवूड सार्वजनिक तरुण मंडळासह, तरुण मराठा मित्र मंडळ, संत रोहिदास मित्र मंडळ, सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ-गवळीवाडा, शेतकरी भजनी मंडळ-वलवण या मानाच्या पाच गणपतींसह इतर गणेश मंडळे मिरवणुकीत सहभागी झाली. मिरवणूक पाहण्यासाठी लोणावळा, खंडाळा शहर व ग्रामीण परिसरासह मावळातील गणेशभक्तांनी मोठी गर्दी केली होती.

लोणावळ्यातील जयचंद चौकात सात वाजता मानाच्या पहिला गणपतीचे आगमन झाले. लोणावळ्यातील मुख्य मिरवणूक चौक असलेल्या शिवाजी चौकात रात्री आठ वाजता मानाचा पहिल्या गणपतीची मिरवणूक आली, तर बारा वाजता शेवटच्या मंडळाची मिरवणूक दाखल झाली. मंडळाच्या स्वागतासाठी राजकीय पक्ष, पोलिसांसह विविध संस्था आणि संघटनांनी स्वागत कक्ष उभारले होते. त्यांच्यावतीने गणेश मंडळे व ढोल-लेझीम पथकांचे चषक देऊन स्वागत करण्यात आले.

मिरवणूक मार्गावर लोणावळा शहर शिवसेनेच्या वतीने तीन हजार किलो मसाले भाताचा महाप्रसाद, लायन्स क्लब ऑफ लोणावळाच्या वतीने चहा, श्री रामदेव बाबा भक्त मंडळाने भेळ व सत्यनारायण मंदीर कमिटीने चहा, कॉफी व बिस्किटाचे वाटप केले. मानाच्या पहिल्या गणपतीने औपचारिकरित्या इंद्रायणी नदीच्या घाटावर रात्री पावणेआकरा छोट्या गणपतीचे विसर्जन करून मोठी गणेश मूर्ती विसर्जनासाठी लोणावळा डॅमकडे नेली, तर शेवटच्या गणपतीचे मध्यरात्री दीड वाजता विसर्जन करण्यात आले. बहुतांश मंडळांनी इतर ठिकाणी विसर्जन केले.

लोणावळा ग्रामीण भागातील कुसगावच्या दत्तवाडी येथील नवनाथ मित्र मंडळाच्या मिरवणुकीला सायंकाळी पाच वाजला प्रारंभ झाला. रात्री दहा वाजता शांततामय वातावरणात विसर्जन करण्यात आले. मिरवणूक काळात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी व कोणतेही अनुचित प्रकार घडू नये यासाठी लोणावळा शहर पोलिसांनी प्रत्येक चौकात सीसीटीव्ही कॅमेरे तैनात केले होते. लोणावळा उपविभागीय पोलिस अधिकारी विनायक ढाकणे व पोलिस निरीक्षक चंद्रकांत जाधव, ग्रामीण भागात लोणावळा ग्रामीणचे सहायक पोलिस निरीक्षक संदीप येडे यांच्यासह पोलिसांनी बंदोबस्त ठेवला होता.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कँटोन्मेंटमध्ये दणदणाट, लेझर शो

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
ध्वनीक्षेपकाच्या उभारलेल्या मोठ्या भींती, दूरपर्यंत रस्त्यावर पोहोचणाऱ्या विविध रंगाच्या लेझरचा शो आणि गाण्यांच्या तालावर थिरकरणारी तरुणाई, फटाक्यांची आतषबाजी हे कँटोन्मेंटमधील विसर्जन मिरवणुकीचे वैशिष्ट्ये ठरले. मात्र, भाजपचे नगरसेवक विवेक यादव यांच्यावर झालेल्या गोळीबाराने या मिरवणुकीला गालबोट लागल्याने मिरवणुकीत विघ्न आले.

कँटोन्मेंट भागातील भोपळे चौकातून सुरू झालेली मिरवणूक सुमारे सहा तास चालली. मिरवणुकीत सुमारे ६३ मंडळे रस्त्यावर उतरली होती. बहुतांश मंडळे मिरवणूक मार्गात बदल करून अर्ध्या वाटेतून परतली, तर अनेकांनी मंडळाचे गणपतींचे विसर्जन हौदात केले.

लष्करातील मानाचा पहिला गणपती समजला जाणाऱ्या कामाठीपुरा गणेशोत्सव सार्वजनिक मंडळाच्या मिरवणुकीला भोपळे चौकातून संध्याकाळी पावणेसात वाजता प्रारंभ झाला. मंडळाच्या गणरायाची आरती सहायक पोलिस आयुक्त निलेश मोरे, पोलिस निरीक्षक वसंत कुवंर, वैशाली चांदगुडे आणि मंडळाचे अध्यक्ष प्रसाद केदारी यांच्या हस्ते झाली. त्यानंतर शंभूगर्जना पथकाच्या ढोलवादनाला सुरुवात झाली.

कामाठीपुरा मंडळ रस्त्यावर येण्यापूर्वी सेंट्रल स्ट्रीट चौकात काही मंडळे रस्त्यावर आल्याने अचानक मंडळे रस्त्यावर कशी आली यावरून कार्यकर्ते आणि पोलिसांमध्ये बाचाबाची झाली. कामाठीपुरा मंडळासमोर 'शंभूगर्जना'च्या लहान मुलांनी सादर केलेल्या ताशा वादनाने लक्ष वेधून घेतले. नंतर पापा वस्ताद (गवळी) मंडळाने गुलालाची उधळण करीत आणि लाल रंगाचे कपडे, फेटे परिधान केल्याने मिरवणुकीत रंगत यायला सुरुवात झाली. त्यानंतर एका पाठोपाठ अनेक मंडळे चौकातून पुढे मार्गस्थ झाली.

हिंद तरुण मंडळाने सादर केलेल्या पारंपरिक नृत्याचे सादरीकरण आणि जिम्नॅस्टिक उपस्थितांचे आकर्षण ठरले. मुलींच्या शिक्षणापासून ते अवयवदानापर्यंत अनेक संदेश देणारे फलक लावले होते. नवमहाराष्ट्र व्यायाम मंडळाने काल्पनिक महालाचा देखावा केला होता. या मंडळाची सर्वाधिक सव्वा टन वजनाची श्रींची मूर्ती होती. सुयोग मित्र मंडळ, १०४ वर्षांचे जुने श्रीपाद तरुण मंडळ, नवयुग तरुण मंडळ यांनी काल्पनिक देखावे सादर केले होते. श्रीमंत साईनाथ मंडळाने गणेश महालाचा देखावा केला होता. रात्री आठनंतर महात्मा गांधी रस्त्यावर डीजेचा दणदणाट सुरू झाला. दस्तूर मेहेर मित्र मंडळाने पर्यावरणपूरक उत्सव साजरा केला. नवयुग मंडळ, नवमहाराष्ट्र व्यायाम मंडळ, अशोक चक्र मंडळ, श्रीकृष्ण मंडळ, शिवतेज मंडळ, ताबूत स्ट्रीट मंडळ, दत्त समाज मंडळ, कॉन्वेंट स्ट्रीट मंडळ, कुंभार बावडी मंडळ या मंडळांनी लेझर शो आणि संगीतावर अधिक भर दिला होता. सेंटर स्ट्रीट पोलिस चौकीसमोर रात्री साडेबारा वाजता सुयोग मित्र मंडळ आल्यानंतर या मिरवणुकीची सांगता झाली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मिरवणूक दुसऱ्या दिवशी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
दिवसा टिळक चौकात जाण्यास 'नो एन्ट्री' अन् रात्री बारानंतर डीजे वाजविण्यास बंदी अशा कचाट्यात सापडलेल्या केळकर रोडवरील गणेश मंडळांनी मिरवणुकीचा दिवस बदलल्याचे चित्र बघायला मिळाले. प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे केळकर रोडवरील मिरवणूक या वर्षीदेखील रेंगाळली. या मिरवणुकीने गुरुवारी नव्हे, तर शुक्रवारी पहाटेपासून वेग घेतला. केळकर रोडवरून गुरुवारी रात्री बारापर्यंत अवघी अकरा मंडळे गेली होती, दुसऱ्या दिवशी पहाटेपासून दुपारी दीड वाजेपर्यंत १२० मंडळांच्या मिरवणुका मार्गस्थ झाल्या.

मानाच्या गणपती मंडळांच्या मिरवणुकांमुळे गुरुवारी संध्याकाळपर्यंत नागरिकांची गर्दी लक्ष्मी रोडला खिळून होती. त्यानंतर गर्दी विभागली गेली. या कालावधीत केळकर रोड पूर्णपणे दुर्लक्षित होता. महापालिकेच्या माती गणपती येथील स्टॉलसमोर १ वाजून १० मिनिटांनी पहिले श्री गणेश कृपा मंडळ दाखल झाले. त्यानंतर दीड तास हा संपूर्ण रस्ता रिकामा होता. दुपारी अडीच वाजता विजय मित्र मंडळाची मिरवणूक झाल्यानंतर तब्बल पाच तासांनी हसबनीस सार्वजनिक गणेश मंडळाची मिरवणूक आली. महापालिकेचे अधिकारी आणि पोलिसांचे दुर्लक्ष असल्याने मंडळे सुरुवातीपासूनच रेंगाळली होती. संध्याकाळी साडे सातच्या दरम्यान नातूवाडा गणेशोत्सव मंडळ, अहल्याबाई होळकर चौक तरुण मंडळ, गावकोस मारुती सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ अशा एकापाठोपाठ अकरा मंडळांच्या मिरवणुका या रोडवरून गेल्या. बहुतांश गणेश मंडळांनी देखाव्यांऐवजी स्पीकरच्या भिंती लावल्या होत्या. त्यामुळे रात्री बारा वाजल्यानंतर आवाजावर बंधने आल्याने मंडळानी मिरवणूक थांबवली.

मंडळे पहाटेपर्यंत जागेवरच थांबली. सकाळी मिरवणुकीने वेग घेतला. गाण्यांवर नाचण्यासाठी कार्यकर्त्यांबरोबरच नागरिक सहभागी झाले होते. पोलिसांचा बंदोबस्त कमी असल्याने मंडळाचे कार्यकर्त्यांच्या इच्छेनुसार ते पुढे जात होते. सकाळी आठनंतर पोलिस रस्त्यावर उतरल्यानंतर मिरवणुकांनी वेग घेतला. पोलिसांच्या आकडेवारीनुसार या रोडवरून १३० मंडळांच्या मिरवणुका गेल्या.

केळकर रोडवरून दुपारी बारा ते दुसऱ्या दिवशी दीड या वेळेत ६९ मंडळांच्या मिरवणुका गेल्या. रात्री मंडळे जागेवर थाबंली. पहाटे पाचनंतर मिरवणूक पुन्हा सुरू झाली. रात्रीनंतरच्या मंडळांमध्ये ढोलपथकांचा समावेश नव्हता. रोडवरून शिवराज मित्र मंडळ हे शेवटचे मंडळ दुपारी १ वाजून २५ मिनिटांनी मार्गस्थ झाले, अशी माहिती महापालिकेच्या माती गणपती स्टॉलचे समन्वयक अरुण हरणावळ यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

खडकीत एकच्या आत विसर्जन

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, खडकी
'गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या'च्या जयघोषात आणि ढोल-ताशांच्या गजरात खडकीमध्ये लाडक्या बाप्पाला निरोप देण्यात आला. सकाळी साडेअकरा वाजता सुरू झालेली मिरवणुक चौदा तासानंतर रात्री एक वाजता संपली. मिरवणुकीत कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. रात्री बारा वाजता स्पीकर बंद करण्यात आल्यानंतर 'गणपती बाप्पा मोरया'च्या जयघोषात बाप्पाचे विसर्जन करण्यात आले.

खडकीमध्ये सकाळी साडेअकरा वाजता विसर्जन मिरवणुकीला सुरवात झाली. मिरवणुकीमध्ये विविध मंडळांनी देखावे सादर केले होते. मंडळाच्या पुढे ढोल-ताशांचे पथक, बँड पथक, सनई चौघडा, नगारा अशा वाद्यांचे पथके होती. विसर्जन मार्गावर अनेक ठिकाणी काही मंडळांनी आणि सामाजिक संस्थांनी स्वागतकक्ष उभारले होते. मुख्य विसर्जन मिरवणुकीत नसलेला आगरवाल समाज मंदिराच्या सार्वजनिक गणरायाचे सकाळी सव्वादहा वाजता पहिल्यांदा विसर्जन झाले. मुख्य मिरवणुकीतील पहिल्या गणपतीचे विसर्जन रात्री आठ वाजता झाले. संध्याकाळी विविध रंगांचे देखावे केलेले, तसेच रोषणाईचा वापर केलेल्या मंडळांचा समावेश होता.

खडकीमध्ये एकूण ५३ सार्वजनिक गणेश मंडळांच्या, तर २,२९३ घरगुती गणेश मूर्तींचे विसर्जन खडकीच्या महादेव मंदिर घाटावर करण्यात आले. खडकी, बोपोडी महादेव मंदिर आणि शांता आपटे घाट, होळकर पूल घाट या ठिकाणी मिळून एकूण १३३ गणेश मंडळांचे गणपती विसर्जन झाले. रात्री एक वाजता दत्त मंदिर गाडी अड्डा मंडळाच्या गणपतीचे शेवटी विसर्जन झाले.

पोलिस, कार्यकर्त्यांत वाद

खडकी पोलिस आणि गणेश मंडळांच्या कार्यकत्यांत काही ठिकाणी वाद झाले. मिरवणुकीच्या सुरुवातीलाच एका मंडळाच्या ढोल पथकाने लावलेली घंटा काढण्यास पोलिसांनी सांगितले. मंडळाने घंटा काढली तरीही घंटेची वाहतूक करणारा पथकाचा नामफलक असलेला गाडा मिरवणुकीत सहभागी करण्यासही पोलिसांनी अक्षेप घेतला. शेवटच्या गणपती मंडळाला रात्री बारानंतर स्पीकर बंद केल्यानंतर पारंपरिक वाद्य वाजवण्यासही पोलिसांनी परवानगी दिली नाही. त्यामुळे मंडळाचे कार्यकर्ते आणि मंडळाच्या महिला कार्यकर्त्याही रस्त्यावर उतरल्या. या वेळा पोलिसांनी सौम्य लाठीमार केल्याचा आरोप कार्यकर्त्यांनी केला. 'मिरवणूक शांततेत पार पडली असून कोठेही अनुचित प्रकार घटला नाही. शांतता भंग करणाऱ्या काही कार्यकर्त्यांवर नियंत्रण ठेवणे गरजेचे असते,' असे खडकीचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुहास भोसले यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पिंपरीची मिरवणूक साडेतेरा तास

$
0
0

Rohit.Athavale@timesgroup.com

पिंपरी : 'गणपती बाप्पा मोरया.. अगले बरस तू जल्दी आं...', 'गणपती गेले गावाला चैन पडेना आम्हाला' अशा जयघोषात, ढोल-ताशांचा गडगडाट व डीजेच्या दणदणाटात बेधुंद नाचणाऱ्या बहुभाषिक कार्यकर्त्यांनी पिंपरीत भावपूर्ण वातावरणात गणपतीला निरोप दिला. १०० सार्वजनिक गणेश मंडळांसह साडेचार हजार घरगुती गणेश मूर्तींचे गुरुवारी विसर्जन करण्यात आले. पिंपरी-चिंचवडमध्ये दहा दिवसांत २७९९ गणेश मंडळांच्या मूर्तींचे विसर्जन झाले.

गणेश विसर्जनाच्या निमित्ताने सकाळपासूनच पिंपरीतील प्रमुख रस्ते, चौक गजबजलेले होते. पिंपरीतील शगुन चौक येथे महापालिका आणि पोलिसांच्या वतीने गणेश मंडळांच्या स्वागतासाठी कक्ष उभारण्यात आले होते. दुपारी साडे बाराच्या सुमारास विसर्जन मिरवणुकीस सुरवात झाली. रात्री बारावाजेपर्यंत ९७ गणेश मंडळे पिंपरी कराची चौकातून मार्गस्थ झाली होती. त्यानंतर रात्री दीड वाजता शेवटच्या मंडळाचे गणेश विसर्जन झाले. पिंपरी-चिंचवडच्या महापौर शकुंतला धराडे यांच्या हस्ते गणेश मंडळांच्या अध्यक्षांचे स्वागत करण्यात आले.

शहराच्या तुलनेत पिंपरीतील अनेक मंडळांनी डीजेचा दणदणाट सालाबादाप्रमाणे कायम ठेवला होता. त्यामुळे चित्र-विचित्र हावभाव करीत कार्यकर्ते नाचत होते. तर काही मंडळांनी पारंपरिक ढोल-ताशा आणि झांजपथकाला प्राधान्य दिल्याचे पाहायला मिळाले. मागील वर्षीच्या तुलनेत गुलालाऐवजी यंदा अनेकांनी फुले आणि भंडाऱ्याची मनसोक्त उधळण केली. काही काळ पाऊस झाल्याने मिरवणुकीत खंड पडला होता.

पारंपरिक राजकीय प्रतिस्पर्ध्यांची मंडळे समोरा-समोर येऊन वाद होण्याची शक्यता वेळीच हेरून पोलिसांनी मंडळाच्या मिरवणुकीची दिशा बदलली. त्यामुळे किरकोळ वादावादीचे प्रसंग सोडता पिंपरीमधील चारही घाटांवर गणेश मूर्तींचे शांततेत विसर्जन झाले.

डीजेच्या तालावर नाचणाऱ्यांसह मिरवणूक रथांवरील आरास पाहण्यासाठी भाविकांनी गर्दी केली होती. पिंपरीतील व्यापाऱ्यांनी कार्यकर्त्यांसह भाविकांसाठी फूड पॅकेट, पाणी, सरबताचे वाटप केले. डी वार्ड फ्रेंड्स सर्कल मंडळाने तिरुपती बालाजीच्या मूर्तीची भव्य प्रतिकृती केली होती, तर नेहरूनगर येथील राष्ट्रतेज मित्र मंडळाने दरवर्षीप्रमाणे जनजागृती करून मंडळाचे वेगळेपण जपले होते. व्यसनमुक्तीसंदर्भात संदेश देणारे फलक आणि रथ हे या मंडळाच्या मिरवणुकीचे मुख्य आकर्षण होते.

मिरवणुकीतील सर्व प्रकारची वाद्ये पोलिसांनी रात्री बारानंतर बंद केली. त्यानंतर 'गणपती बाप्पा मोरया'चा जयघोष करीत गणेश मंडळांनी आपल्या लाडक्या गणरायाला भावपूर्ण वातावरणात निरोप दिला. मिरवणूक मार्ग व घाटांवर सामाजिक संस्थाचे स्वयंसेवक सेवा बजावत होते. काच-पत्रा महिला कामगार संघटनेच्या सोनाली कुंजिर यांच्यासह एक हजार महिला ठिकठिकाणी स्वच्छता करीत होत्या. त्यामुळे मिरवणुकीनंतर काही वेळातच परिसर स्वच्छ करण्यात येत होता. उपायुक्त डॉ. बसवराज तेली, सहायक आयुक्त राम मांडुरके, वरिष्ठ निरीक्षक डॉ. विवेक मुगळीकर, मसाजी काळे यांच्यासह मोठा फौजफाटा या ठिकाणी तैनात होता.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गणरायाला जल्लोषात निरोप

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पिंपरी
ढोल-ताशांचा दणदणाट, आकर्षक रथसजावट, सामाजिक संदेश आणि फुलांसमवेत पावसाच्या सरींचाही वर्षाव अशा उत्साही आणि जल्लोषाच्या वातावरणात पिंपरी-चिंचवडमध्ये गणरायाला निरोप देण्यात आला. अपवाद वगळता 'डीजे'विरहीत मिरवणुका हे यंदाच्या सोहळ्याचे वैशिष्ट्य ठरले.

'गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या' अशी साद घालत उद्योगनगरीत विसर्जन मिरवणुका संपन्न झाल्या. नऊ ते दहा तासांमध्ये मंडळांनी मिरवणुकांचे आयोजन करून बाप्पाला निरोप दिला. यंदाच्या विसर्जन मिरवणुकीत अपवाद वगळता सर्वच मंडळांनी पारंपरिक आणि ढोल-ताशांच्या पथकांना प्राधान्य दिल्याचे दिसून आले. त्यामुळे डीजेच्या कर्णकर्कश आवाजांपासून भाविकांची सुटका झाल्याचे समाधान होते. शहरात पिंपरी, चिंचवड, निगडी, रावेत, थेरगाव या भागांमध्ये ठिकठिकाणी स्वतंत्ररित्या विसर्जनाची सोय करण्यात आली होती. महापालिकेच्यावतीने चिंचवड चापेकर चौक आणि पिंपरी कॅम्प या ठिकाणी स्वागतकक्ष उभारण्यात आला होता. चिंचवड येथे महापौर शकुंतला धराडे, अतिरिक्त आयुक्त तानाजी शिंदे, तसेच अनेक नगरसेवक, नगरसेविका उपस्थित होत्या. त्यांच्या हस्ते मंडळांच्या अध्यक्षांचा सत्कार करण्यात आला.

भोईर आळीतील मोरया मित्र गणेश मंडळाची पहिली मिरवणूक दुपारी अडीच वाजता चापेकर चौकात आली. त्यानंतर सायंकाळपर्यंत कोणत्याही मिरवणुकीचे आगमन झाले नव्हते. रात्री आठपर्यंत केवळ अकरा मंडळांची नोंद झाली. रात्री पावणेनऊच्या सुमारास श्री संत ज्ञानेश्वर मित्र मंडळाची मिरवणूक चौकात आली. त्यामध्ये सहभागी ढोल-ताशा पथकाने आकर्षक खेळ सादर करून भाविकांची मने जिंकली. मिरवणुकीतील मुलींचा उत्साह वाखाणण्याजोगा होता. त्यानंतर श्री दत्त मंडळाच्या गणपतीचे आगमन झाले. त्यांनी फुलांचा आकर्षक रथ तयार केला होता. त्यापाठोपाठ भगतसिंग मंडळाने पालखीतून श्रींची विसर्जन मिरवणूक काढली. पावसांच्या सरींबरोबर बाप्पावर फुलांचा वर्षाव होत होता.

भव्य आणि आकर्षक रथ असलेल्या मिरवणुका रात्री साडेनऊनंतर चापेकर चौकात येऊ लागल्या. मयूर रथात स्वार झालेल्या गावडे कॉलनी मित्र मंडळाच्या मिरवणुकीतील ढोल ताशांच्या तालावर महिलांनाही ठेका धरला होता. मिल्कमेड गणेश मंडळाच्या मिरवणुकीत भंडाऱ्याची मुक्तपणे उधळण करण्यात आली. उत्कर्ष मंडळाने कालिका मातेचा हलता देखावा सादर केला होता. सुमारे २५ फूट उंच देवीची मूर्ती लक्षवेधक होती. चांदीच्या दागिन्यांनी मढवलेल्या समता तरुण मंडळाच्या मूर्तीचे अनेक भाविकांनी हात जोडून दर्शन घेतले. मंडळाने गुलाल आणि भंडाऱ्याऐवजी फुलांचा वर्षाव केला. गांधी पेठ तालीम मंडळाचा गणपती मयूर रथात विराजमान झाला होता. चक्रदेवाची उंच मूर्ती लक्ष वेधून घेत होती. पारंपरिक हालगी पथकाने मिरवणुकीत रंगत निर्माण केली. लक्ष्मी विनायक प्रतिष्ठान मंडळ, गावडे पार्क, झुंजार, समर्थ, राणाप्रपात या मंडळांच्या मिरवणुकाही आकर्षक सजावट केली होती.

शेतकऱ्यांच्या आत्महत्येवर आधारित जिवंत देखावा सादर करून जय गुरुदत्त मित्र मंडळाने ज्वलंत विषयाला वाचा फोडण्याचा प्रयत्न केला. मिरवणुकीत अनेक देवी-देवतांचे आणि महापुरुषांची वेशभूषा केलेले तरुण सहभागी होते. साडेअकराच्या सुमारास नवतरुण मंडळाचा गणपती भवानी रथात विराजमान होता. भोईर कॉलनीच्या आभूषणांनी नटलेल्या मूर्तीचे रूप मनाला भुरळ घालत होते. मध्यरात्रीच्या सुमारास गणेश मंडळाची मिरवणूक झाल्यानंतर महापालिका आणि पोलिसांनी मिरवणुकीची वेळ संपल्याचे जाहीर केले. तरीही काही मंडळांच्या मिरवणुका येत होत्या.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

​नगरसेवकावर गोळीबार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
कॅम्प परिसरात गणेश विर्सजन मिरवणुकीमध्ये उत्सव संवर्धन मंडळाचे अध्यक्ष व भाजप नगरसेवक विवेक यादव यांच्यावर एका गुन्हेगाराने गोळीबार केल्याची गुरुवारी रात्री घडली. गुन्हेगाराचा नेम चुकल्यामुळे यादव यांच्या जबड्यातून गोळी आरपार गेली असून ते गंभीर जखमी झाले. गोळीबार करणाऱ्या गुन्हेगाराला यादव यांच्या कार्यकर्त्यांनी जबर मारहाण केली असून तो गंभीर जखमी आहे. या प्रकरणी लष्कर पोलिस ठाण्यात तेरा जणांच्या विरोधात खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करून चौघांना अटक केली आहे. पूर्ववैमनस्यातून हा प्रकार घडला असल्याचे समोर आले आहे.
दीपक वसंत गवळी, मोहन वसंत गवळी, आशिष गवळी, सागर गवळी यांना अटक करण्यात आली आहे. तर, गोळीबार करणारा विष्णू उर्फ बबल्या गवळी हा जखमी असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. राहुल गवळी, प्रतीक गवळी, कपिल सावंत, सचिन गवळी, नितीन गवळी, आशिष भाकरे, राहुल भिसे, विशाल यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी यादव यांचे भाऊ चेतन महादेव यादव (वय ३२, रा. न्यू मोदीखाना, लष्कर) यांनी तक्रार दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कँटोन्मेंट भागातील गणपती मंडळाची विसर्जन मिरवणूक खुन्या मारूती चौकातून सुरू होऊन सेंटर स्ट्रीट पोलिस चौकीसमोर संपते. या वेळी उत्सव संवर्धक गणपती मंडळाचा गणपती मिरवणुकीत सहभागी झाला होता. रात्री पावणे दहाच्या सुमारास उत्सव संवर्धन मंडळाचा गणपती हॉटेल ट्रायलक चौकातून पुढे आला. त्या वेळी रस्त्यावर मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. गर्दीचा फायदा घेत बबल्या गवळी याने काही अंतरावरून यादव यांच्यावर पाठीमागून पिस्तुलाने गोळी झाडायचा प्रयत्न केला. हा प्रकार यादव यांच्या भाच्याला दिसला. त्याने झडप घालून गवळीला पकडण्याचा प्रयत्न केला. पण, तोपर्यंत त्याने गोळी झाडली होती. गवळीला धक्का लागल्याने त्याचा नेम चुकला. त्यामुळे यादव यांच्या जबड्यातून गोळी आरपार गेली. या प्रकाराने मिरवणुकीत एकच गोंधळ उडाला. नागरिक सैरावैरा पळू लागले. त्यामुळे गवळीला दुसरी गोळी झाडता आली नाही. तोपर्यंत यादव यांच्या कार्यकर्त्यांनी गवळीला पकडून जबर मारहाण केली. यामध्ये तो गंभीर जखमी झाला आहे. गवळीला पोलिसांनी ताब्यात घेऊन ससून हॉस्पिटलमध्ये दाखल केले आहे. २०१४ मध्ये यादव व बबल्या गवळीमध्ये काही कारणावरून भांडणे झाली होती. त्या वेळी एकमेकांविरोधात गुन्हेही दाखल झाले आहेत. यादव यांच्यावर रूबी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. या घटनेची माहिती मिळताच लष्कर पोलिस ठाण्याच्या वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी धाव घेऊन काही जणांस ताब्यात घेतले. या प्रकरणी पोलिस उपनिरीक्षक जी. आर. भापकर हे अधिक तपास करत आहेत.
पोलिसांनी अटक केलेल्या चौघांना कोर्टात हजर केले. सहायक सरकारी वकील किरण बेंडभर यांनी आरोपींना पोलिस कोठडी देण्याची मागणी केली. ती मान्य करून कोर्टाने चौघांना १९ सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला.

प्रतिबंध कागदावरच?
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहरातील दोन हजार जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई केल्याचा दावा गुन्हे शाखेकडून करण्यात आला होता. पण, खून, खुनाचा प्रयत्न, खंडणी असे गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असलेला बबल्या गवळी शहरात मोकाट फिरत होता. वानवडी येथील एका गुन्ह्यात ते फरार आहे. याच बबल्याने विसर्जन मिरवणुकीत घुसून गोळीबार केला. त्यामुळे पोलिसांनी केलेली प्रतिबंधात्मक कारवाई कागदावरच होती का, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


​राष्ट्रवादी नेते बापूसाहेब भेगडे यांच्या खुनाचा कट उधळला

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
तळेगाव दाभाडे येथील राष्ट्रवादी नेते बापूसाहेब भेगडे यांच्या खुनाचा कट पुणे ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने (एलसीबी) उधळून लावला आहे. पेट्रोल पंपावर दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या १२ जणांस पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडे चौकशी केली असता भेगडे यांच्या खुनाचा कट समोर आला. खून करण्यासाठी आणलेली तीन पिस्तूल, चार गावठी कट्टे आणि २३ जिवंत काडतुसे आरोपींकडून जप्त करण्यात आली आहेत.
मयूर उर्फ बंटी नामदेव टकले (रा. तळेगाव), जावेद उर्फ बाबा अब्दुल बागेवाडी (वय ३८, रा. दत्तवाडी, आकुर्डी), आदित्य गणेश भेगडे (वय २०), सचिन सुरेश गरुड (वय २७), व्यंकटेश उर्फ नाना केशू राठोड (वय २१), शंकर सत्यनारायण भालके (वय २२), रोहन उर्फ सनी चंद्रकांत गरुड (वय २७ रा. शनिवार पेठ तळेगाव), अजिंक्य महादेव सरोदे (वय २३), अविनाश उर्फ बुटल्या राजू भालेकर (वय २३), निखिल गुलाब घोडके (वय २६, सर्व जण रा. तळेगाव), अहमद उर्फ शाहिद चांद शेख (वय २१, रा. ढोरेवाडी, वडगाव मावळ), अखिलेश काळुराम गायकवाड (वय २३, रा. जांबे, ता. मुळशी) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. तर हेमंत उर्फ सोन्या बाबूराव बडदे (रा. चिखली), बाळू पंढरीनाथ टकले (रा. टकलेवस्ती तळेगाव) हे दोघे पळून गेले आहेत. त्यांचा शोध सुरू आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तळेगाव परिसरात एलसीबीकडून गस्त घालत असताना महामार्गावरील आय.बी.पी. पेट्रोल पंपावर दरोडा टाकण्यासाठी दोन वाहनातून काही जण येणार आहेत, अशी माहिती मिळाली. एलसीबीचे निरीक्षक राम जाधव यांच्या पथकाने सापळा रचून बारा जणांना ताब्यात घेतले. तर अंधाराचा फायदा घेऊन दोघे जण पळून गेले. त्यांच्याकडे चौकशी केली असता तीन पिस्तूल व चार गावठी कट्टे, २३ जिवंत काडतुसे, कोयते, विविध कंपन्यांचे मोबाइल असा एकूण सहा लाखांचा मुद्देमाल मिळाला. अटक आरोपींकडे अधिक चौकशी केली असता बापूसाहेब भेगडे यांच्या खुनाचा कट उघडकीस आला. अटक करण्यात आलेल्या बंटी टकले याने भेगडे यांच्या खुनाचा कट एक वर्षापूर्वी रचला होता. त्यासाठी श्याम दाभाडे याने हत्यारे आणण्यासाठी दोन लाखांची मदत केल्याची माहिती समोर आली आहे. दाभाडे हा सराईत गुन्हेगार असून मोक्कासारख्या गंभीर गुन्ह्यामध्ये बऱ्याच दिवसांपासून तो फरारी होता. भेगडे यांचा खून केल्यानंतर कोर्ट कचेरीच्या कामासाठी मोठ्या प्रमाणात पैशांची गरज भासणार होती. त्यासाठी त्याने आणि त्याच्या इतर साथीदारांनी तळेगाव येथील आयबीपी पेट्रोल पंप लुटण्याची तयारी केली असल्याचे समोर आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बेकायदा बांधकामप्रकरणी नगरसेविका टिंगरे यांचे पद रद्द

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
बेकायदा बांधकाम केल्याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रभाग क्रमांक १ च्या नगरसेविका रेखा चंद्रकांत टिंगरे यांचे नगरसेवकपद रद्द करण्याचा निर्णय पालिका आयुक्त कुणाल कुमार यांनी घेतला आहे. शुक्रवारी आयुक्तांनी हा आदेश दिला आहे. बेकायदा बांधकाम केल्याप्रकरणी अशा पद्धतीने पद रद्द केल्याची गेल्या अनेक वर्षांतील ही पहिलीच घटना आहे.
धानोरी येथील सर्व्हे क्रमांक १९ येथे नगरसेविका टिंगरे यांचे पती चंद्रकांत टिंगरे यांनी त्यांच्या मालकीच्या जागेवर कमल लॉन्स मंगल कार्यालयाचे बांधकाम केले आहे. या बेकायदा बांधकामाबद्दल येथील स्थानिक नागरिक दिलीप ओरपे यांनी तक्रार करून त्यांचे पद रद्द करण्याची मागणी केली होती. यावर पालिकेच्या बांधकाम विभागाने २०१० मध्ये अनेकदा नोटीसा बजाविल्या होत्या. तेव्हा टिंगरे यांनी पालिकेच्या कोर्टात धाव घेत संबधित बांधकामावर कारवाई करू नये, अशी मागणी केली होती. कोर्टानेही या कारवाईला स्थगिती दिली होती. मात्र पालिका प्रशासनाने टिंगरे यांनी निवडणुकीच्या प्रतिज्ञापत्रात दिलेल्या माहितीच्या आधारे याबाबत दोन्ही बाजूंची सुनावणी घेण्याचा निर्णय घेतला. या सुनावणीमध्ये टिंगरे यांनी कोर्टा‍ने अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्यास स्थगिती दिली असल्याने ही सुनावणी घेता येणार नसल्याचा दावा केला होता.

तक्रारदार ओरपे यांच्या सुनावणीत उद्यानासाठी आरक्षित असलेल्या जागेवर टिंगरे यांनी कार्यालयाचे बांधकाम केल्याचे त्याचबरोबर कार्यालयाच्या समोरील बाजूला वॉशिंग सेंटर आणि टॉयलेटचे बेकायदा बांधकाम केल्याचे स्पष्ट केले होते. या प्रकरणी महापालिकेने केलेल्या पाहणीत २०१० ते २०१५ या कालावधीत अनधिकृत बांधकाम झाल्याचे आढळून आले होते. त्यामुळे पालिका आयुक्त कुमार यांनी कलम १० (१ ड) आणि कलम ११ (अ) चा भंग केला असल्याने त्यानुसार त्यांचे नगरसेवकपद रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. यासंबधीच्या कारवाईचे आदेश आयुक्तांनी शुक्रवारी दिले.

...तर निवडणूक लढवता येणार नाही
नगरसेविका रेखा टिंगरे यांचे नगरसेवक पद उर्वरित कालावधीपुरते रद्द करण्यात आले आहे. मात्र, या प्रकरणी कोर्टाने त्यांना दोषी ठरवून कारवाई केली, तर त्यांना तसेच त्यांचे पती चंद्रकांत टिंगरे यांना सहा वर्षे कोणत्याही प्रकारची निवडणूक लढविता येणार नाही, असे विधी विभागाने स्पष्ट केले.


कोर्टात केस सुरू असताना पालिका आयुक्तांनी अशा प्रकारे निर्णय घेणे हे अन्यायकारक आहे. या निर्णयाविरोधात कोर्टात जाणार असून न्यायालयीन लढा देणार आहे.

- रेखा चंद्रकांत टिंगरे (नगरसेविका)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

​पुण्याच्या डीपीला दोन महिन्यांत मंजुरी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
पुण्याच्या बहुप्रतीक्षित विकास आराखड्याला (डीपी) येत्या दोन महिन्यात मंजुरी देण्यात येईल, अशी घोषणा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी पुण्यात केली. पर्यावरणाशी संबंधित बांधकाम व्यावसायिकांना हव्या असलेल्या परवानग्यांचे अधिकार आता स्थानिक पालिकांकडे हस्तांतरीत करणार असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी या वेळी स्पष्ट केले.
अनधिकृत बांधकामे, अस्ताव्यस्त वाढलेल्या शहरांप्रमाणे जिल्ह्यातील गावांचा विकास होऊ नये, तेेथे पायाभूत सुविधांचा नियोजनबद्ध विकास व्हावा याकरिता येत्या डिसेंबर २०१७ पर्यंत राज्यातील प्रत्येक जिल्ह्याचा प्रादेशिक विकास आराखडा तयार करण्यात येईल. तसेच राज्यातील अकरा जिल्ह्यांचा प्रादेशिक आराखडा मंजुरीच्या प्रतीक्षेत आहे. प्रत्येक जिल्ह्याचा विकास आराखडा तयार करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य ठरणार आहे, असेही मुख्यमंत्री म्हणाले.
क्रेडाई संस्थेच्या राष्ट्रीय परिसंवादामध्ये फडणवीस बोलत होते. त्या वेळी जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश बापट, 'क्रेडाई'चे राष्ट्रीय अध्यक्ष गीतांबर आनंद, सतीश मगर, शांतीलाल कटारिया, प्रशांत सरोदे आदी उपस्थित होते. राज्यात पुण्यासह अनेक महापालिकांच्या निवडणुका येत्या फेब्रुवारी महिन्यात होणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर पुण्याच्या डीपीसह अन्य घोषणांना राजकीयदृष्ट्या महत्त्व आहे. क्रेडाईने सादर केलेल्या परवडणाऱ्या घरांच्या धोरणाचा प्रस्तावाचा विचार करून राज्याचे परवडणाऱ्या घरांचे स्वतंत्र धोरण तयार केले जाईल. तसेच त्याबाबतच्या सध्याच्या नियमावलींमध्ये सुटसुटीतपणा आणि पारदर्शकता आणण्याचा आपला प्रयत्न राहील, याकडे त्यांनी लक्ष वेधले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बाप्पाला उत्साहात निरोप

$
0
0

पुण्यातील विसर्जन मिरवणूक चालली साडेअठ्ठावीस तास

म. टा. प्रतिनिधी, पुणे

मंगलमूर्तीला निरोप देण्यासाठी जमलेल्या पुणेकर भाविकांच्या उदंड उत्साहाला यंदा वरुणराजाच्या आगमनाची किनार लाभली अन् शहराच्या वैभवशाली विसर्जन मिरवणुकीचा दिमाखदार सोहळा २८ तास ३० मिनिटांनी शुक्रवारी दुपारी संपला. गुरुवारी आणि शुक्रवारी सकाळी पावसाने हजेरी लावली होती. तरीही 'मोरया'च्या गजरात तल्लीन झालेल्या भक्तांच्या उत्साहावर कोणताही परिणाम झाला नाही.

गुरुवारी सकाळी साडेदहा वाजता महात्मा फुले मंडईतील लोकमान्य टिळक यांच्या पुतळ्यापासून मुख्य विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झाली. पावसाच्या हलक्या सरींनीही त्या वेळी हजेरी लावली. मानाच्या गणपतींची मंडळे लक्ष्मी रस्त्याने पुढे सरकत असताना पावसाने उघडीप दिली. त्यामुळे सुरुवातीच्या टप्प्यात नेहमीपेक्षा रिकामे वाटणारे रस्ते थोड्याच वेळात गर्दीने भरून गेले. मानाच्या पहिल्या श्री कसबा गणपतीचे दुपारी चार वाजून २० मिनिटांनी विसर्जन झाले, तर मानाच्या उर्वरित चार गणपतींचे विसर्जन होण्यास सायंकाळचे सव्वासात वाजले. सायंकाळपर्यंत लक्ष्मी रस्त्याप्रमाणेच शहरातील इतर मार्गांवरूनही विसर्जन मिरवणुका सुरू झाल्या.

विसर्जन मिरवणुकीचे प्रमुख आकर्षण असलेल्या श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती आणि अखिल मंडई मंडळाचे वैशिष्ट्यपूर्ण रथ मुख्य मिरवणुकीत सहभागी होण्यास शुक्रवारची पहाट उजाडली. शहरातील मानाच्या मंडळांना विसर्जनासाठी झालेला विलंब आणि त्यापाठोपाठ अनेक मंडळांनी थेट लक्ष्मी रस्त्यावर केलेला प्रवेश यामुळे दगडूशेठ आणि मंडई मंडळाच्या बाप्पांच्या दर्शनासाठी भाविकांना बराच काळ प्रतीक्षा करावी लागली. या दोन्ही मंडळांच्या गणपतींचे विसर्जन शुक्रवारची सकाळ उजाडल्यावर झाले. शुक्रवारी सकाळी दहाच्या सुमारास पावसाने दमदार हजेरी लावली, तरी मंडळांच्या कार्यकर्त्यांचा उत्साह कायम होता. उलट, पावसाच्या सरी अंगावर घेत, 'डीजे'च्या भिंतींपुढे अनेकांची पावले थिरकत होती.

अखेर शुक्रवारी दुपारी तीनच्या सुमारास नटेश्वर घाटाजवळ सम्राट मित्र मंडळाच्या 'श्रीं'च्या विसर्जनानंतर या सोहळ्याची सांगता झाली. या दोन दिवसांत पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये मिळून तब्बल चार हजार ५७९ सार्वजनिक गणपतींचे विसर्जन झाले.
................

हौदांची परंपरा कायम

गेल्या वर्षी दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर शहरातील मानाच्या मंडळांनी कृत्रिम हौदात गणेशमूर्ती विसर्जन करण्याचा नवा आदर्श घालून दिला होता. ही परंपरा मानाच्या प्रमुख पाच मंडळांसह श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती आणि अखिल मंडई मंडळानेही कायम राखली. त्यांच्यासह अनेक मंडळे आणि घरगुती गणपतींचेही हौदातच विसर्जन करण्यात आले.

.....................

गेल्या काही वर्षांतील मिरवणुकीच्या वेळा

२०१५ : २८ तास २५ मिनिटे

२०१४ : २९ तास १२ मिनिटे

२०१३ : २७ तास २५ मिनिटे

२०१२ : २८ तास ५० मिनिटे

२०११ : २७ तास २० मिनिटे

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ढोलचा आवाज ‘मोठा’

$
0
0

Suneet.Bhave@timesgroup.com
Tweet: @suneetMT

पुणे : विसर्जन मिरवणुकीत प्रत्येक मंडळांसाठी घालून दिलेल्या पथकांच्या बंधनांना वाटाण्याच्या अक्षता लावून ढोल-ताशांच्या मर्यादेचे सर्रास उल्लंघन करत, सर्वच ढोल-ताशा पथकांनी 'मिरवणूक आमचीच' हा आव्वाज यंदा अधिक मोठ्या प्रमाणात पसरविला. सकाळचे मानाचे पाच आणि रात्रीची महत्त्वाची पाच मंडळे अशा दहा मंडळांमध्ये मिळून यंदा तब्बल तीस ढोल-ताशा पथके सहभागी झाली होती.
मानाच्या गणपती मंडळांची मिरवणूक मंडईपासून सुरू झाल्यानंतर दहा चौकांमध्ये वादन करण्याची संधी ढोल-ताशा पथकांना मिळते. या सर्व चौकांमध्ये भक्तांच्या आग्रहास्तव विविध तालांचे सादरीकरण केले जाते, असा दावा केला जातो. मात्र, प्रत्येक चौकातील वादनामुळे बराच वेळ खर्ची पडत असून, एका मानाच्या गणपतीनंतर पुढील गणपतीचे दर्शन घेण्यासाठी दुतर्फा जमलेल्या भाविकांना किमान दोन तासांची प्रतीक्षा करावी लागत असल्याचे दिसून येते. तसेच, एकामागोमाग केवळ ढोल-ताशा पथकांचे सादरीकरण होत असल्याने त्यात नाविन्यही राहिलेले नाही. या सर्वांचा एकत्रित परिणाम मानाच्या गणपती मंडळाच्या विसर्जन मिरवणुकीवर होताना दिसतो. काही वर्षांपूर्वी दुपारी १२ वाजता मिरवणूक सुरू झाल्यानंतर सायंकाळी सहा-साडेसहापर्यंत पाचही मंडळांचे विसर्जन पूर्ण व्हायचे. आता, सकाळी साडेदहाला मिरवणूक सुरू होऊनही, मानाच्या गणपतींच्या विसर्जनासाठी किमान साडेसात वाजतात.
पारंपरिक वाद्ये, तरुण-तरुणींचा मोठा सहभाग, नाद-ताल-लय यांची अदाकारी याला पुणेकरांनी नेहमीच उत्स्फूर्त दाद दिली. ढोल-ताशाचा आसमंत व्यापून टाकणारा आवाज केवळ कानांतच, नाही तर मोबाइल कॅमेऱ्यामध्ये साठवून घेतला. मात्र, विसर्जन मिरवणूक ही गणपती बाप्पाची असल्याने परंपरेच्या नादात त्याला निरोप देताना, किती वेळ तिष्ठत ठेवायचे, याचाही विचार करण्याची नितांत गरज निर्माण झाली आहे.
...................
बाउन्सर्सची खरेच गरज होती काय?
सार्वजनिक गणेशोत्सव हा लोकांचा उत्सव असताना त्यांनाच अडवण्यासाठी आणि त्यांच्यावर अरेरावी करण्यासाठी 'बाउन्सर्स' नेमण्यात आले का, असा प्रश्न उत्सवादरम्यान पडला. सेलिब्रेटींच्या सहभागामुळे उत्सवातील उत्साह आणि आनंद द्विगुणित होत असताना, त्यांनीच यंदा संरक्षणासाठी बाउन्सर्स नेमले होते. इतर कार्यक्रमांत गर्दीच्या ठिकाणी बाउन्सर्स नेमणे वेगळे आणि उत्सवामध्ये त्यांचा वापर करणे वेगळे, अशी कुजबूज सुरू होती. कलावंत पथकातील बाउन्सर्सने चाहत्यांशी आणि भाविकांशी केलेल्या वर्तणुकीमुळेही त्यांचे वादन पाहायला आवर्जून आलेले अत्यंत निराश झाले. त्यांनी केलेल्या धक्काबुक्कीमुळे आणि त्यांच्या एकूणच वरचढपणा दाखवणाऱ्या वागण्यामुळेही उपस्थितांनी पथकाचे वादन पाहाण्यासाठी न थांबता पुढच्या मंडळाच्या दिशेने पावले टाकली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ढोल-ताशा वगळता पारंपरिक वाद्ये हद्दपार

$
0
0

Aditya.Tanawade@timesgroup.com
............
Tweet : @AdityaMT

पुणे : महाराष्ट्राच्या संस्कृतीमध्ये गणेशोत्सव आणि पुण्याची विसर्जन मिरवणूक यांचे स्थान महत्वाचे आहे. वर्षानुवर्षे चाललेल्या या मिरवणुकीत बाप्पाला वाजतगाजत निरोप देण्याची परंपरा आहे. ही परंपरा आजही कायम असली तरी, ढोलपथकांशिवाय इतर पारंपरिक वाद्यांच्या वादनाला उतरती कळा लागली आहे. त्याचाच प्रत्यय गुरुवारी आला. काही मोजकी मंडळे सोडली तर, मिरवणुकीत पारंपरिक वाद्यांचा अभाव दिसून आला.
पुण्यात ढोलपथकांची निर्मिती होण्यापूर्वी मावळी ढोलांचा खेळ आणि हलगी, संबळ, डफ अशा पारंपरिक वाद्यांच्या तालावर वाजतगाजत मिरवणूक निघायची. चैतन्य वाढवण्यासाठी सनई चौघड्याचे मंगलमय स्वर घुमायचे. मात्र, ढोल-ताशा पथकांचा गेल्या काही वर्षांत झालेला विस्तार पाहता पारंपरिक वाद्ये मिरवणुकीतून गायब होऊ लागली. जागरण गोंधळासाठी वापरण्यात येणारे संबळ, विविध ठेक्यांवर वाजणारी हलगी, डफ ही वाद्ये महाराष्ट्राची संस्कृती दर्शवतात. वर्षानुवर्ष चौघडा आणि तुतारी मिरवणुकीची शान वाढवत होत्या. सध्याच्या मिरवणुकीत क्वचितच चौघडा पाहण्यास मिळतो. ढोलपथकांच्या आधीपासून आपली कला सादर करणारे मावळी खेळही मिरवणुकीतून जवळजवळ नाहीसे झाले आहेत. बहुतांश मंडळे पथकांनाच प्राधान्य देत असल्याने या खेळांनी मुंबईचा मार्ग धरला. उडत्या ठेक्यांवरील चाली वाजवून पुणेकरांना अनेक वर्षे नाचवणाऱ्या या खेळांना पुण्यात फारशी दाद मिळेनाशी झाली आहे. त्यामुळे ढोलपथकांच्या या पुण्यात हळूहळू इतर पारंपरिक वाद्यांचा मिरवणुतील सहभाग संपत चालला असल्याचे चित्र दिसून येत आहे.
..
पाश्चात्य वाद्यांचा अंतर्भाव
एकीकडे मिरवणुकीतून पारंपरिक वाद्ये कमी होत असतानाच जेंबेसारख्या आफ्रिकन वाद्याचा समावेश करण्यात येत आहे. मानाचा पहिला गणपती श्री कसबा गणपतीच्या मिरवणुकीत नितीन सातव आणि त्यांचे साथीदार जेंबेच्या ताफ्यासह सामील झाले होते. त्यांच्या वादनालाही पुणेकरांनी दाद दिला. जेंबेसह ड्रम्स देखील सहभागी झाले होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कार्यकर्त्यांची घरवापसी; अन् पोलिसांची धावपळ

$
0
0

Sujit.Tambade@timesgroup.com
..........
Tweet : @SujittambadeMT

पुणे : वाद्ये वाजवण्याच्या रात्री बारानंतरच्या बंदीचे पालन करून गणेश मंडळांनी आहे त्याच जागेवर देखाव्याची वाहने उभी करून मर्यादेचे पालन केले. मात्र, त्यामागे कार्यकर्त्यांची भूमिका 'आता जाऊ द्या ना घरी, वाजले की बारा,' अशी होती. त्यामुळे अनेक मंडळांच्या कार्यकर्त्यांनी रात्री बारानंतर घर गाठले. त्यामुळे पोलिसांना राखणदाराची भूमिका बजवावी लागली.
सकाळी सहा वाजता मिरवणूक पुन्हा सुरू झाल्यावर देखाव्याचे वाहन पुढे घ्यायलाच कोणी नसल्याचे चित्र होते. रात्री बारा वाजल्यानंतर पोलिसांनी मंडळांना स्पीकर बंद करण्यास सांगितले. त्यानंतर मंडळांनी स्पीकर बंद केले. काही मंडळांनी देखावे पुढे नेण्याचे कष्ट न घेता आहे त्याच जागेवर देखाव्याची वाहने उभी केली. केळकर रस्त्यावर जाण्यासाठी मिरवणूक मार्गावर आलेले मंडळ थेट नरपतगिरी चौकात उभे होते. त्याच्या पुढे सुमारे ५०० मीटरपर्यंत एकही मंडळ नव्हते. लक्ष्मी रस्त्यावरील शेवटचे मंडळ संत कबीर चौकात उभे होते. स्वारगेटमार्गे टिळक रोडला जाणाऱ्या दोन मार्गांपैकी शंकरशेट रस्त्यावरील शेवटचे मंडळ सेव्हन लव्हज चौकात उभे करून ठेवण्यात आले होते, तर सातारा रस्त्याने येणाऱ्या मंडळांपैकी शेवटचे मंडळ लक्ष्मीनारायण थिएटरजवळ उभे होते. यातील बहुतांश मंडळांचे कार्यकर्ते गायब झाले होते. एखाद-दुसऱ्या मंडळाजवळ झोपलेले कार्यकर्ते होते, तर अनेक मंडळांच्या देखाव्यांजवळ एकही कार्यकर्ता नव्हता. त्यामुळे पोलिसांना मंडळांच्या देखाव्यांचे राखण करण्याचे आणखी एक काम करावे लागले.
सकाळी सहा वाजता पुन्हा स्पीकर सुरू झाले. तरी बहुतांश मंडळांचे घरी गेलेले कार्यकर्ते, परतले नव्हते. वाहनचालक आणि एखादा कार्यकर्ता अशी मिरवणूक चालली होती. काही मंडळांचे वाहनचालकही गायब झाले होते. त्यामुळे त्यांची शोधाशोध करण्यात पोलिसांचा वेळ गेला. वाहनचालक नसलेल्या गणेश मंडळांना मागे ठेऊन अन्य मंडळे पुढे घेण्याचा खटाटोप पोलिसांना करावा लागला. झोपी गेलेल्या कार्यकर्त्यांना पुन्हा जागे करण्यात गेलेला वेळ हा दुसऱ्या टप्प्यात मिरवणूक उशिरा सुरू होण्यास कारणीभूत ठरली. पोलिसांनी रात्री बारानंतर या मंडळांना पुढे नेणे अपेक्षित होते. मात्र, पोलिसांनीही त्यासाठी फारसे कष्ट घेतले नाहीत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


गर्दीचा आलेख उंचावतच गेला

$
0
0

Chintamani.Patki@timesgroup.com
.............
Tweet : @chintamanipMT

पुणे : गणपती विसर्जन मिरवणुकीवर वरुणराजाने केलेला जलाभिषेक आणि ढोलताशांचा मनाला भावणारा गजर अशा वातावरणामध्ये शहरातील चारही विसर्जन मार्गांवर गर्दीच्या लाटा अनुभवयास मिळाल्या. मानाच्या गणपतीपासून सुरू झालेल्या गर्दीने मंडई-दगडू हलवाई गणपती आल्यावर उच्चांक गाठला. गणरायाला मनोभावे निरोप देताना गर्दीतील गणेशभक्तांचे पाय ढोलताशांवर थिरकत होते.
पावसाच्या जलाभिषेकामध्ये मिरवणुकीला सुरुवात झाल्याने सुरुवातीला गर्दी कमी जाणवत होती. रिमझिम पावसात ढोलताशांच्या निनादात मिरवणूक पुढे सरकत होती. भर पावसातही नागरिक रस्त्यांच्या दुतर्फा ठाण मांडून होते. पावसाने दुपारनंतर उघडीप दिल्याने गर्दी वाढू लागली. लक्ष्मी रस्त्यावरील मानाच्या गणपतींची दिमाखदार मिरवणूक पाहण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली. पारंपरिक वेशभूषेत नागरिक मानाच्या गणपतीच्या मिरवणुकीत सहभागी होत होते. या शानदार मिरवणुकीचे छायाचित्र, सेल्फी काढण्यावरच तरुणाईचा भर होता. पावसाने उघडीप दिली आणि ढोलताशाचा आवाज वाढू लागला तसा गर्दीचा उत्साह वाढू लागला. ढोलताशाच्या निनादात तरुणाईची पावले थिरकू लागली.
दुपारनंतर मिरवणुकीत गर्दीचे लोंढे सहभागी होत होते. सायंकाळी गर्दीचा पूर अनुभवता आला. तरुण-तरुणींबरोबर ज्येष्ठ व्यक्ती व महिला मिरवणुकीमध्ये सहभागी झाले होते. लहान मुलांचाही उत्साह तसूभरही कमी नव्हता. विविध वेशांमध्ये सहभागी झालेली बच्चेकंपनी लक्ष वेधून घेत होती. सायंकाळी मानाच्या गणपतींचे विसर्जन आटोपल्यानंतर खऱ्या अर्थाने जल्लोष सुरू झाला. मानाच्या गणपतीच्या मिरवणुकीमध्ये सामान्य नागरिकांना शिरता येत नाही. रस्त्याच्या कडेला उभा राहून मिरवणूक अनुभवावी लागते. त्यातुलनेत रात्रीच्या मिरवणुकांमध्ये मुक्त प्रवेश असल्याने या मिरवणुकांमधील तरुणाईचे प्रमाण जास्त होते. डॉल्बीचा दणदणाट सुरू झाल्याने प्रत्येकाची नाचण्याची प्रतीक्षा संपली. लक्ष्मी, कुमठेकर, केळकर व टिळक रस्त्याला जत्रेचे स्वरूप आले होते. या चारही रस्त्यांवर गर्दी, गर्दी आणि फक्त गर्दी नजरेस पडत होती. बेलबाग ते टिळक चौक या दरम्यान असणारे सर्व चौक गर्दीने फुलून गेले होते. बारा वाजता आवाजाच्या भिंतींना बंदी करण्यात आल्याने पुन्हा पारंपरिक वाद्यांचा गजर होऊ लागला. या वाद्यांच्या गजरात रात्रभर मिरवणुका सुरू होत्या, तरी गर्दी कमी-जास्त होत होती.
अखिल मंडई मंडळ, श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचे दर्शन घेण्यासाठी नागरिकांनी रात्री बेलबाग चौकात जशी गर्दी केली, तशीच शुक्रवारी सकाळी टिळक चौकात गर्दी केली होती. विलोभनीय शारदा गजाननाचे व प्रसन्न दगडूशेठ गणपतीचे रूप डोळ्यात साठवून घेण्यासाठी टिळक चौक फुलून गेला होता. या गणपतींच्या मिरवणुकीने भाविकांच्या डोळ्याचे पारणे फेडले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

उत्साहाच्या जोडीला गैरप्रकारांची ‘साथ’

$
0
0

Kuldeep.Jadhav@timesgroup.com
.........
Tweet : @kuldeepjadhavMT

पुणे : मिरवणुकीच्या उत्साहाला उन्मादाची जोड मिळाल्याने भररस्त्यात गैरप्रकार वाढल्याचे चित्र गुरुवारी पहावयास मिळाले. ओलांडलेली ध्वनिमर्यादा, रथामागेच सुरू असणारे धूम्रपान, मद्याच्या बाटल्यांचा संग्रह आणि तेथेच मद्यप्राशन असे उत्साहाला गालबोट लावणारे प्रकार कार्यकर्ते आणि नागरिकांनीही केल्याचे आढळून आले.
कुमठेकर रस्त्यावर गुरुवारी दिवसभर आणि शुक्रवारी दुपारपर्यंत एकूण ५८ मंडळांच्या विसर्जन मिरवणुका निघाल्या. विघ्नहर्ता न्यासाकडून मिरवणुकीतील प्रत्येक मंडळाचे निरीक्षण नोंदविले जाते. त्यामध्ये मंडळाच्या गणेश मूर्तीपासून त्यांनी केलेला देखावा, गणपतीचा रथ, मंडळांच्या कार्यकर्त्यांचे वर्तन, 'डीजे'ची पातळी किंवा ढोल पथकांची संख्या या सर्व गोष्टी पाहिल्या जातात. कुमठेकर रस्त्यावरील बहुतांश मंडळांच्या 'डीजें'नी आवाजाची पातळी ओलांडली होती. मात्र, आठ मंडळांचा आवाज हा कर्णकर्कश्य असल्याचे मत न्यासाने नोंदविले आहे.
गणपतीसमोर चित्रविचित्र हावभाव करून नृत्य करण्याला समाजाच्या विविध स्तरातून आक्षेप घेतला जातो. विसर्जन मिरवणुकीमध्येही अश्लील हावभाव करीत नाचणाऱ्या कार्यकर्त्यांची संख्या अधिक होती. चित्रपटातील गीतांबरोबरच गणपतीवर आधारीत गाण्यांवर नृत्य करताना अश्लील हावभाव केल्याचे पाहायला मिळाले. दोन मंडळांच्या कार्यकरत्यांनी गणपती रथाच्या मागे बसून उघडपणे धूम्रपान केले. कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी, गणपती मंडळाबरोबर मिरवणुकीदरम्यान जबाबदार कार्यकर्ते असणे आवश्यक असते. मात्र, काही मंडळांच्या रथावर केवळ लहान मुलांची उपस्थिती होती. त्यामुळे मंडळाला गांभीर्य नसल्याचे दिसून येते.
------
रथामागेच पेयपान..
मिरवणुकीत मद्यप्राशन केलेल्या कार्यकर्त्यांची संख्या प्रचंड होती. तर, एका मंडळाच्या कार्यकर्त्यांनी गणपती रथाच्या मागील बाजूस मद्याच्या बाटल्या ठेवल्या होत्या. तेथेच बसून त्यांचे मद्यप्राशन रंगले होते. अशा प्रकारांमुळे उत्साहात चाललेल्या विसर्जन मिरवणुकीला गालबोट लागले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चोरट्यांनी लांबवले दीड हजार मोबाइल

$
0
0

पोलिस स्टेशनांमध्ये तक्रार नोंदविण्यासाठी रांगा

म. टा. प्रतिनिधी, पुणे
विसर्जन मिरवणुकीमध्ये बेलबाग चौक, शिवाजी रोड आणि टिळक (अलका) चौकातील तुडूंब गर्दीत मोबाइल आणि सोनसाखळी चोरट्यांनी उच्छाद मांडला. विसर्जन मिरवणुकीदरम्यान १५०० मोबाइल चोरीला गेल्याच्या अंदाज आहे. विश्रामबाग पोलिसांनी तर तक्रारदारांना 'टोकन' देऊन तक्रार देण्यासाठी बोलावले. या पार्श्वभूमीवर मंडई, शुक्रवार पेठ, आणि संभाजी पोलिस चौकीच्या बाहेर तक्रार देण्यासाठी रांगा लागल्याचे चित्र दिसून आले.
स्वारगेट, खडक, विश्रामबाग आणि फरासखाना पोलिस ठाण्यांच्या हद्दीत सर्वाधिक मोबाइल चोरीचे गुन्हे घडले. पोलिस ठाण्यांमध्ये गुरुवारी सायंकाळपासूनच मोबाइल चोरीस गेल्याची तक्रार देण्यासाठी नागरिकांच्या रांगा लागल्या होत्या. यासाठी प्रत्येक पोलिस ठाण्यात एक पथक तयार ठेवण्यात आले होते. स्थानिक पोलिसांच्या अंदाजानुसार या चारही पोलिस ठाण्याच्या हद्दीत १५०० हून अधिक मोबाइल चोरीस गेले असण्याची शक्यता आहे. नागरिकांकडून तक्रार देण्यासाठी पोलिस ठाण्यांमध्ये गर्दी होत आहे. येत्या दोन दिवसांत बहुतांश तक्रारी दाखल झाल्यानंतर किती मोबाइल चोरीस गेले, याचा आकडा स्पष्ट होईल.
..
सोनसाखळी हिसकावल्याचे दोन गुन्हे दाखल
राजश्री हरिश्चंद्र चारी (वय ५२, रा. गोवा) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार त्यांच्या गळ्यातील ३० हजार रुपयांचे सोन्याचे मंगळसूत्र चोरल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला. श्रीमती चारी बेलबाग चौक येथे गुरुवारी दुपारी विसर्जन मिरवणूक पाहत असताना त्यांच्या गळ्यातील मंगळसूत्र चोरण्यात आले. बेलबाग चौकात दुपारी सव्वाएकच्या सुमारास विसर्जन मिरवणूक पाहत असलेल्या पूजा शंकर अनलदास उर्फ पूजा विशाल जबानी (वय २२, रा. रस्ता पेठ) यांच्या गळ्यातील ३० हजार रुपयांचे सोन्याचे मंगळसूत्र हिसकावण्यात आले.
..
अन्.. पाच तोळ्याची सोनसाखळी हिसकावली
बेलबाग चौकात विसर्जन मिरवणुकीत तल्लीन असलेल्या एका व्यक्तीच्या गळ्यातील पाच तोळ्याची सोन्याची साखळी हिसकावण्यात आली. अंगपिंडाने मजबूत असलेल्या या व्यक्तीच्या गळ्यातून सोनसाखळी चोरीस गेल्याची घटना घडल्याने पोलिसही अचंबित झाले होते. या प्रकरणी संबंधिताची तक्रार दाखल करण्याचे काम शुक्रवारी सुरू होते.
..
दोन चोरटे पकडले
पोलिसांनी विसर्जन मिरवणुकीत मोबाइलचोरी करताना दोन टोळ्या पकडल्या असून, त्यांच्याकडून काही हँडसेट जप्त केले आहेत. या चोरट्यांची चौकशी सुरू असून, त्यानंतर गुन्हा दाखल करण्यात येणार होता. विश्रामबाग पोलिस ठाण्यातील तपास पथकाकडे गुन्हे दाखल करणे आणि तपास करण्याची जबाबदारी देण्यात आली होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कॅमेऱ्यांचा क्लिकक्लिकाट घटला

$
0
0

Chaitrali.Chandorkar@timesgroup.com
Tweet : @chairalicMT

पुणे : दर वर्षी व्यावसायिक छायाचित्रकारांच्या बरोबरीने हजारो रुपयांच्या लेन्स आणि एसएलआर कॅमेरे घेऊन गल्लोगल्ली फिरणारे हौशी फोटोग्राफर यंदाच्या मिरवणुकीत मोजक्याच संख्येने दिसून आले. गेल्या दोन वर्षांत आकर्षण ठरलेल्या या कॅमेऱ्यांची जागा यंदा हाय पिक्सल असलेल्या स्मार्टफोनने घेतली.
गेल्या पाच वर्षांत एसएलआर आणि सेमी एसएलआरच्या किमती सर्वसामान्यांच्या आवाक्यात आल्याने केवळ व्यावसायिक छायाचित्रकारांच्या हातीच दिसणारे कॅमेरे आता अनेकांच्या गळ्यात अडकवलेले दिसत आहेत. गणेश विसर्जन मिरवणूक म्हणजे या कॅमेऱ्यासाठी रंगांचा उत्सव ठरतो. त्यामुळे गेल्या वर्षीपर्यंत मिरवणुकीत शेकडो हौशी फोटोग्राफर रस्त्यावर 'एलिमेंट'च्या शोधात फिरताना बघायला मिळाले होते. बंदूक हातात घेऊन सावजाच्या शोधात जावे, या थाटात फोटोग्राफर फिरत होते. मात्र, यंदा हौशी फोटोग्राफरचे प्रमाण एकदम घटले.
पावसात कॅमेरा आणि लेन्स खराब होऊ नये म्हणूने अनेकांनी कॅमेरे आणणे टाळले. तसेच, मोबाईलमध्येही अलीकडे अत्याधुनिक कॅमेरे उपलब्ध झाल्याने उत्साही तरुण मोबाइलवर मिरवणुकीचे वेगवेगळे अँगल टिपताना बघायला मिळाले. मोबाइलवर काढलेले फोटो वापरून ही मंडळी चटकन सोशल नेटवर्किंग साइट आणि अॅपवर शेअर करीत होती. कॉलेजमधील विद्यार्थ्यापासून ते ज्येष्ठ नागरिकांच्या हातातील स्मार्ट फोन या वेळी चौकाचौकात तरुणांचे ग्रुप मोबाइलवरचे फोटो ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्रामव टाकण्यात दंग झाली होती. मिरवणुकीच्या पथकांमधील वाद्ये, रथांची सजावट, कलाकारांच्या भावमुद्रा, मिरवणुकीतील जल्लोष, गणपतीच्या भावमुद्रा, कलाकार, देखावा, गणपतीच्या मूर्तीबरोबर सेल्फी काढण्याची स्पर्धा रंगली होती. अनेकांनी सेल्फीस्टीकचा वापर करून उंचावरून ढोलपथकांच्या वादनाचे चित्रिकरण केले तर काहींनी गर्दीतील स्वतःचा फोटो काढण्यातच आनंद मानला.
..........
व्हर्च्युअल रिअॅलिटीची भुरळ
मिरवणुकीचा तसेच देखाव्यांचा ३६० अंशांचा अनुभव देणाऱ्या 'व्हर्च्युअल रिअॅलिटी' प्रकाराने गणेशभक्तांना यंदा भुरळ घातली. व्हर्च्युअल रिअॅलिटी हे तंत्रज्ञान भारतात अद्याप प्रचलित झाले नसले तरी, मिरवणुकीच्या निमित्ताने हा नवीन प्रकार टेक्नोसॅव्ही तरुणांच्या अजेंड्यावर आला आहे.
गेल्या दहा दिवसांपासून श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिराने साकारलेल्या देखाव्याचा या प्रकारातील व्हिडिओ सोशल नेटवर्किंग साइटवर हायरल झाला होता. मिरवणुकीतही या तंत्रज्ञानाचा वापर करून अनेकांनी चित्रीकरण केले. डिजिटल आर्ट व्हीआरई या संस्थेने मानाच्या पहिल्या आणि ग्रामदैवत कसबा गणपतीची मिरवणूक या वेळी पहिल्यांदा या नव्या प्रकारात चित्रीत केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मिरवणुकीत फुलली खाऊगल्ली

$
0
0

Harsh.Dudhe@timesgroup.com
Tweet : @HarshDudhe_MT

पुणे : गणेशोत्सवाच्या मिरवणुकीत नाचून व चालून दमलेल्या नागरिकांनी खट्टीमिठ्ठी पाणीपुरी..गरमागरम वडापाव..खमंग डोसा..पावभाजी..भेळ..पुलाव..चायनीज अशा विविध चटपटीत खाद्यपदार्थांवर यथेच्छ ताव मारला. नेहमी वाहनांच्या भाऊगर्दीने फुललेले लक्ष्मी रस्ता, कुमठेकर रस्ता, केळकर रस्ता, टिळक रस्त्यांना जोडणाऱ्या लहान गल्ल्यांना खाऊगल्लीचेच स्वरूप प्राप्त झाले होते.
विसर्जन मिरवणुकीला गुरुवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास मानाच्या गणपतींनी सुरुवात झाली. त्या सुमारासच तात्पुरत्या खाऊगल्ल्यांमध्ये चमचमीत पदार्थ मिळण्यास सुरुवात झाली. त्यामुळे या खाऊगल्ल्यांमुळे नागरिकांना पोटाची भूक शमविण्यासाठी हक्काची जागा मिळाली. या खाऊगल्ल्या एवढ्या मोठ्या प्रमाणात उभारण्यात आल्या होत्या की, मध्यवर्ती भागाला जत्रेचेच स्वरूप आले होते. यातच भाजलेली कणसे, चनागरम मसाला आणि खारेदाने-फुटाण्याच्या हातगाड्यांची संख्या मोठी होती. खाऊगल्ल्यांमध्ये सर्वाधिक गर्दी वडापाव आणि पाणीपुरीच्या स्टॉल्सना होती. मध्यवर्ती भागातील प्रमुख रस्त्यांसोबतच लहान गल्ल्यांमध्येही खाद्यपदार्थांचे भरपूर स्टॉल होते. त्यानंतर मसाला डोसा, लोणी डोसा, कट डोसा अशा डोसांचे विविध प्रकार उपलब्ध होते. तसेच, पावभाजी आणि पुलाव यांच्या स्टॉलनाही नागरिकांनी पसंती दिली.
मध्यवर्ती भागांतील चायनीज खाद्यपदार्थांच्या हॉटेलांमध्ये पुणेकरांनी तोबा गर्दी केली होती. काही ठिकाणी पोळी-भाजीचे स्टॉल देखील लावले होते. याशिवाय व्हेज बर्गर, पॅटिस, विविध प्रकारचे रोल्स आणि पराठ्यांच्या स्टॉल्समुळे खवय्यांनी तृप्तीची ढेकर दिली. कर्वे रस्ता, फर्ग्युसन रस्ता आणि जंगली महाराज रस्त्यांबरोबरच उपनगरांमध्येदेखील मिरवणुकीच्या मार्गावर लहान खाद्यपदार्थांची दुकाने थाटण्यात आली होती.
........
एनर्जी ड्रिंकचीही सोय
मिरवणुकीत नाचून किंवा चालून थकल्याने शरीरात एनर्जी यावी, यासाठी मोठ्या प्रमाणात एनर्जी ड्रिंक आणि शीतपेयांच्या स्टॉल्सवर तरुणाईने एकच गर्दी केली. काही ठिकाणी केवळ मिनरल वॉटरचे स्टॉल्सचे लागले होते. आईस्क्रिम आणि मावा कुल्फीच्या स्टॉल्सवर आस्वाद घेणाऱ्यांची संख्या लक्षणीय होती. नागरिकांना गरमागरम आणि ‍वाफाळलेला चहा मिळण्यासाठी ठिकठिकाणी चहाचे ठेले होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images