Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

...तर लोकवर्गणीतून विद्यापीठ उभारू

$
0
0

मराठी भाषा विद्यापीठासंदर्भात डॉ. सबनीसांचे सरकारला आव्हान

म. टा. प्रतिनिधी, पुणे

'आमदारांना झटपट पगारवाढ देणाऱ्या राज्य सरकारला महाराष्ट्रात मराठी भाषा विद्यापीठ उभारण्याने भीक लागत असेल, तर लोकवर्गणीतून हे विद्यापीठ उभारू. त्यासाठी शंभर रुपयांचा चेक मी स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठवायला तयार आहे,' अशा शब्दांत अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांनी राज्य सरकारवर टीकास्त्र सोडले. मराठी माणसाला न्याय देणारे विद्यापीठ सरकारने न उभारल्यास राज्यभर कृती कार्यक्रम छेडून सरकारविरोधी जागर करण्याचा इशाराही त्यांनी मंगळवारी पुण्यात दिला.

महाराष्ट्र साहित्य कला प्रसारिणी सभा, पुणे या संस्थेने मराठी भाषा विद्यापीठ निर्मितीसाठी मराठी विद्यापीठ परिषद आणि जनचर्चेचे आयोजन केले होते. पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या सभागृहात झालेल्या कार्यक्रमावेळी विद्यापीठ स्थापनेविषयी राजकारण्यांच्या आणि मराठीशी निष्ठावंत असल्याचे सांगणाऱ्या भाषाप्रेमींच्या आतापर्यंतच्या भूमिकेवर डॉ. सबनीस यांनी कडाडून टीका केली. अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष डॉ. श्रीपाद भालचंद्र जोशी, डॉ. नागनाथ कोत्तापल्ले, प्रा. हरी नरके, मराठी साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे मराठी विभागप्रमुख डॉ. अविनाश सांगोलेकर, अनिल गोरे, प्रकाशक अनिल कुलकर्णी, कार्यक्रमाचे संयोजक सचिन इटकर आदी या वेळी व्यासपीठावर उपस्थित होते.

डॉ. सबनीस म्हणाले, 'विद्यापीठ स्थापनेची मागणी ८३ वर्षांपासून अपूर्णच असेल, तर जबाबदारी केवळ सरकारची नाही. निष्ठावंत भाषाप्रेमींनी त्यासाठी काय केले, हा प्रश्नही उपस्थित होतो. मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाल्यावर, तो पेलण्यासाठी विद्यापीठ आपल्याकडे नसेल, तर आपल्याइतके करंटे कोणी नाही. काहीही करून हे विद्यापीठ उभारायला हवे. राज्याची सांस्कृतिक लोकशाही समृद्ध होण्यासाठी हे विद्यापीठ गरजेचे आहे. ते नसेल, तर राज्याचा सांस्कृतिक, राजकीय नकाशा वांझ ठरतो. त्यामुळेच या विद्यापीठासाठी कृती कार्यक्रम राबवायला हवा.' या निमित्ताने मराठी माणसांशी सुरू असलेली बेईमानी पुरी झाली असून, सरकारशी संवाद साधत विद्यापीठ निर्मितीसाठी प्रयत्न करण्याचे आवाहनही त्यांनी केले.

मराठी विद्यापीठाच्या मुद्द्याबाबत राजकारण करायचे की त्यासाठी इच्छाशक्ती निर्माण करायची, याचा विचार मराठीप्रेमींनी करणे गरजेचे असल्याचे मत डॉ. कोत्तापल्ले यांनी मांडले. मराठी भाषेविषयीच्या अशा दुर्दशेमागे मराठी विचारवंतांची कृतिशून्यताही कारणीभूत असल्याचे मत प्रा. जोशी यांनी मांडले. धर्म, भाषेविषयी मोकळेपणाने चर्चा होण्यासाठीचे एक महत्त्वाचे व्यासपीठ म्हणून मराठी विद्यापीठाची स्थापना होणे गरजेचे असल्याचे मत डॉ. जोशी यांनी आपल्या प्रास्ताविकातून मांडले.

............
राज्यात संस्कृत, हिंदीसाठी स्वतंत्र विद्यापीठे आहेत. मात्र मराठीसाठी नाही. ही परिस्थिती बदलण्यासाठी मराठी ही रोजगाराची भाषा व्हायला हवी. त्यासाठी सरकारने सर्व उद्योजक, व्यापाऱ्यांकडून मराठी राजभाषा विकास कर वसूल करावा आणि त्या आधारे मराठीचा विकास करावा.
- प्रा. हरी नरके

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


‘एक्स्प्रेस वे’वर सुमोनाल्यात कोसळून दोन ठार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, लोणावळा

पुणे-मुंबई एक्सप्रेस वेवर भरधाव वेगात जाणारी सुमो दोन्ही मार्गामधील नाल्यावरील पुलाचे लोखंडी संरक्षक खांब व सिमेंटचे कठडे तोडून सुमारे २५ ते ३० फूट खोल नाल्यात कोसळली. या अपघातात दोन जण जागीच ठार झाले असून, सहा जण गंभीर जखमी झाले आहेत. हा अपघात बुधवारी सकाळी सातच्या सुमारास लोणावळ्यातील तुंगार्ली गावाच्या हद्दीत झाला आहे. पाच वर्षांपूर्वी याच ठिकाणी पोलिसांची व्हॅन कोसळून दोन पोलिसांचा मृत्यू झाला होता. सुमोतील सर्व प्रवासी सातारा येथून वाढदिवसाच्या कार्यक्रमानंतर मुंबईला जात होते.

विजया अनंत वाघचौरे (३८, रा. अभिनव सोसायटी, गोरेगाव, मुंबई ), सुरेश बाबाजी कदम (६०, रा. नारायणनगर, सुरत) अशी अपघातात मृत्यू झालेल्यांची नावे आहेत. निखिलेश संजय चव्हाण (२०, रा. खरेजे दत्तवाडी, चिपळूण), अनंत लक्ष्मण वाघचौरे (४२), नेहा अनंत वाघचौरे (२२, दोघेही रा. अभिनव सोसायटी, गोरेगाव, मुंबई ), ओंकार शिवाजी गवळी (१४), सीमा शिवाजी गवळी (दोघेही रा. चिकणेवाडी, अंबोडे बुर्दूक, सातारा), जयश्री सुरेश कदम (रा. नारायणनगर, सुरत) हे सर्व जण जखमी झाले आहेत.

लोणावळा शहर पोलिसांनी दिलेल्या माहितीवरून सुमोमधील सर्व प्रवासी माण-दहीवडी येथे एका वाढदिवसानिमित्त गेले होते. कार्यक्रम झाल्यानंतर ते पुन्हा मुंबईकडे परत निघाले होते. लोणावळा येथील तुंगार्ली गावाच्या हद्दीत गोल्ड व्हॅली येथे भरधाव वेगामुळे चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले. त्यामुळे गाडी सुमारे शंभर मीटर अंतर कापत दोन्ही मार्गाच्या मधील नाल्यारील पुलाच्या कठड्यावर जोरात धडकली आणि पुलाच्या कडेला लावण्यात आलेले लोखंडी संरक्षक खांब व सिमेंटचे कठडे तोडून गाडी सुमारे २५ ते ३० फूट खोल नाल्यात कोसळली. या घटनेत दोघांचा जागीच मृत्यू झाला असून, सहा जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींवर निगडीतील लोकमान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

अपघाताची माहिती समजल्यावर एक्स्प्रेस वेवरील देवदूत या आपत्कालीन यंत्रणेच्या विशाल ठाकर, चेतन निकम, अरविंद सावंत, राकेश खुळपे, चंद्रकांत जायगुडे यांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी नाल्यामध्ये कोसळलेल्या सुमोतील जखमींना बाहेर काढून त्यांना पुढील उपचारासाठी निगडीला पाठविले. त्यानंतर खंडाळा महामार्ग पोलिसांनी क्रेनच्या साह्याने अपघातग्रस्त सुमो बाहेर काढली.

पाच वर्षांपूर्वी झाला होता इथेच अपघात

पाच वर्षांपूर्वी १९ जून २०११ रोजी याच नाल्यावरील पुलाच्या कठड्याला धडकून पोलिसांची व्हॅन नाल्यात कोसळून झालेल्या अपघातात दोन पोलिसांचा मृत्यू झाला होता. अपघाताची माहिती कळल्यानंतर महामार्ग पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांनी घटनास्थळी धाव घेऊन घटनेची पाहाणी केली. या घटनेचा पुढील तपास लोणावळा शहरचे सहायक पोलिस निरीक्षक बालाजी गायकवाड करीत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सर्कशीतला हत्ती पळाला

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पिंपरी
रॅम्बो सर्कशीचे भोसरी येथे ठेवण्यात आलेल्या हत्तींना बुधवारी (७ सप्टेंबर) आंघोळ घालताना एक हत्ती साखळी तोडून रस्त्यावर पळाला. हत्ती पिसाळल्याच्या अफवेमुळे आजूबाजूच्या परिसरात गोंधळ उडाला. त्यातच बघ्यांची गर्दी जमलेली असल्याने पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन जमावावर नियंत्रण आणले.
हत्तीला काबूत आणण्यासाठी महापालिकेचे पशुवैद्यकीय अधिकारी घटनास्थळी दाखल झाले होते. अथक प्रयत्नांनंतर हत्तीला ताब्यात घेण्यात माहूत व सर्कशीच्या कामगारांना यश आले. दरम्यान, हत्ती पिसाळल्याची अफवा असल्याचे सर्कशीच्या मॅनेजरने स्पष्ट केले.
भोसरी येथील गाव जत्रा मैदानात काही दिवसांपूर्वी रॅम्बो सर्कस भरली होती. कालांतराने ही सर्कस बंगलोर येथे गेली. सर्कशीतील हत्ती हलविण्यासाठी नागपूर येथील एका विभागाची परवानगी आवश्यक असते. ती येणे बाकी असल्याने हत्ती तेथेच मैदानात एका शेडमध्ये ठेवण्यात आले होते. नित्याप्रमाणे बुधवारी सकाळी हत्तीला आंघोळ घालताना या दोन हत्तींमध्ये मस्ती चालली होती. माहूताकडील पाण्याचा पाइप हत्ती ओढत होते. त्यातूनच एका लहान हत्तीची साखळी तुटली आणि तो मैदानात पळत सुटला. त्यामुळे हत्ती पिसाळल्याची अफवा पसरली. त्यामुळे काही काळ परिसरात घबराट पसरली. घटनेची माहिती मिळाल्यानंतर भोसरी पोलिस व पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. सतीश गोरे घटनास्थळी दाखल झाले होते. सुमारे तीन तासाच्या अथक प्रयत्नानंतर हत्ती ताब्यात आला. या हत्तींच्या देखभालीसाठी सर्कस मालकाने चार माहुतांसह दहा ते बारा सर्कस कर्मचारी ठेवले आहेत.
याविषयी रॅम्बो सर्कसचे भागीदार सुजीत दिलीप म्हणाले, 'हा हत्ती आमच्या सर्कशीतील सर्वात छोटा हत्ती आहे. त्यामुळे त्याला अशी कधीतरी खेळण्याची लहर येते. एरवी सर्कस असली की आमची तेथे सुरक्षा भिंत असते. इथे ती नव्हती, त्यामुळे हत्ती पळाला. हत्ती पिसाळला नव्हता मात्र, नागरिकांच्या गर्दीमुळे हत्ती बिथरला. त्याच्यापासून कोणताही धोका नागरिकांना नाही. तसेच त्याला कर्नाटकला नेण्यासाठी ट्रान्झिट परमिट नाही. तोपर्यंत आम्ही त्याला हलवू शकत नाही. तोपर्यंत आम्ही वस्तीपासून कोठे लांब जागा मिळते का याच्या शोधात आहोत. तशी जागा मिळताच आम्ही तेथून हत्ती हलवणार आहोत.'
000
माझ्या निरीक्षणानुसार तो हत्ती पिसाळला नव्हता. तो माणसांना बघून पळत होता. त्यामुळे त्याच्यावर काबू मिळवल्यानंतर त्याने थोडा चारा खाल्ला आणि पाणीही प्यायले. हत्ती छोटा असल्याने आंघोळीच्या वेळी त्याने अवखळपणा केला असावा. यापुढे अशी कोणती घटना होऊ नये, याची दक्षता सर्कस प्रशासनाने घेणे गरजेचे आहे.

- डॉ. सतीश गोरे, पशुवैद्यकीय अधिकारी, पिंपरी महापालिका

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

एक्स्प्रेस वेवर सीसीटीव्हीची दुरवस्था;

$
0
0

स्क्रीनही गेले चोरीला
म. टा. प्रतिनिधी, लोणावळा
एक्स्प्रेस वेवर मळवली येथे आयआरबीने दीड वर्षांपूर्वी दोन्ही मार्गावरील वाहतुकीवर नजर ठेवण्यासाठी दोन 'सीसीटीव्ही' कॅमेरे लावले होते. मात्र, देखभाल व दुरुस्तीअभावी ते कॅमेरे अद्यापही ऊन-पावसात पुलावरच लटकत आहे. तर, कायदा सुवस्थेची जबाबदारी असणाऱ्या मळवली महामार्ग पोलिस चौकीतून त्या 'सीसीटीव्ही'ची 'स्क्रीन टीव्ही' चोरीला गेल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्यामुळे नवीन योजना राबवा, पण त्यांची देखभालही करा, अशी मागणी स्थानिकांकडून केली जात आहे.
गेल्या काही वर्षांत 'एक्स्प्रेस वे'वर बेशिस्त वाहन चालकांमुळे झालेल्या हजारो अपघातांमध्ये हजारो प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. तर, हजारो जण गंभीर जखमी होऊन जायबंदी झाले आहेत. या सर्व घटनांच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकार, रस्ते विकास महामंडळ,आयआरबी आणि महामार्ग पोलिसांनी अशा घटनांवर अंकुश ठेवण्यासाठी विविध उपाययोजना राबविल्या. मात्र त्याही वाहन चालकांच्या बेशिस्तीमुळे फोल ठरल्या. अखेर राज्य सरकारने एक्स्प्रेस वेवर 'इंटेलिजंट ट्रॅफिक मॉनिटरिंग सिस्टीम' (आयटीएमएस) राबविण्याचा निर्णय दोन महिन्यापूर्वी घेतला होता. त्यानुसार बेशिस्त वाहनांवर नजर ठेवण्यासाठी २६ व २७ ऑगस्टला ड्रोन कॅमेऱ्यांद्वारे पाहणी घेण्यात आली. तर, गेले दोन दिवस मळवली येथे स्टील कॅमेऱ्यांच्या माध्यमातून पाहणी केली.
मळवली येथेच दोन वर्षांपूर्वी बसविलेल्या दोन 'सीसीटीव्ही' कॅमेऱ्यांची सध्याची परिस्थिती पाहता केवळ नियंत्रण ठेवणाऱ्या सुविधा व उपाययोजना नकोत, तर त्यांच्या देखभालीसह सुरक्षेचा प्राधान्याने विचार करून त्या दृष्टीने सखोल उपाययोजना राबविण्याची आवश्यकता आहे, असे मत व्यक्त केले जात आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

प्रभागाचा प्रारूप आराखडा तयार

$
0
0

आयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांच्या तपासणीनंतर प्रस्ताव निवडणूक आयोगाकडे
म. टा. प्रतिनिधी, पिंपरी
चार सदस्यीय पद्धतीने होणाऱ्या निवडणुकांसाठी ३२ प्रभागांचा प्रारूप आराखडा पिंपरी-चिंचवड महापालिका प्रशासनाने तयार केला आहे. आयुक्त दिनेश वाघमारे यांच्या स्वाक्षरीने निवडणूक विभागाचे सहायक आयुक्त डॉ. यशवंत माने यांनी बुधवारी (७ सप्टेंबर) हा आराखडा पुणे विभागीय आयुक्त एस. चोक्कलिंगम यांच्याकडे सोपविला. विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकारी आरक्षण तपासणी करून प्रारूप प्रभाग रचनेचा प्रस्ताव १२ सप्टेंबर रोजी राज्य निवडणूक आयोगाकडे पाठविणार आहेत.
महानगरपालिकांच्या फेब्रुवारी २०१७ मध्ये होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकांच्या प्रभाग प्रारूप आराखड्याबाबत कमालीची उत्सुकता आहे. निवडणुकीसाठी प्रशासन स्तरावर जोरदार तयारी सुरू असून, प्रभागाचा प्रारूप आराखडा तयार केला आहे. प्रभाग रचनेच्या प्रारूप आराखड्याबाबत अनेकांना उत्सुकता आहे. त्यामुळे अनेक नगरसेवक आणि इच्छुक कार्यकर्ते महापालिकेत याबाबत चौकशी करत होते. प्रत्येक पदाधिकाऱ्याचे आपले 'वजन' वापरून या प्रारूप आराखड्याची माहिती मिळविण्याचे प्रयत्न दिवसभर सुरू होते. परंतु, महापालिका प्रशासनाने प्रभागाच्या प्रारूप आराखड्याबाबत गुप्तता बाळगली आहे. गुगल मॅपच्या आधारे या आरखडा बनविण्यात आला आहे.
आयुक्त दिनेश वाघमारे यांनी प्रभागाचा प्रारूप आराखडा विभागीय आयुक्तांकडे बुधवारी सोपविला. आयुक्तांचे प्रतिनिधी म्हणून सहायक आयुक्त डॉ. यशवंतराव माने यांनी हा आराखडा सादर केला. विभागीय आयुक्त कार्यालयात गुरुवारपासून (८ सप्टेंबर) अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीकरिता आरक्षणाचा प्रस्ताव तयार केला जाणार आहे. आरक्षणाची तपासणी करून विभागीय आयुक्त प्रारूप प्रभाग रचना १२ सप्टेंबर रोजी राज्य निवडणूक आयोगाकडे पाठविणार आहेत.
निवडणूक आयोग त्याची तपासणी करून २३ सप्टेंबर रोजी प्रभाग रचनेच्या प्रस्तावाला मान्यता देईल. त्यानंतर ७ ऑक्टोबर रोजी आरक्षण सोडतीसह प्रारूप प्रभाग रचनेचा नकाशा प्रसिद्ध केला जाणार आहे. १० ऑक्टोबर रोजी प्रारूप प्रभाग रचनेची अधिसूचना प्रसिद्ध करण्यात येणार आहे. १० ते २५ ऑक्टोबरदरम्यान प्रभाग रचनेवर नागरिकांच्या हरकती व सूचना मागविण्यात येणार आहेत. महापालिका ४ नोव्हेंबर रोजी हरकती व सूचनांवर सुनावणी घेणार आहे. १० नोव्हेंबर रोजी प्रारूप प्रभाग रचनेवर आलेल्या हरकती व सूचनांच्या सुनावणीचा अहवाल राज्य निवडणूक आयोगाकडे पाठविण्यात येईल. प्रभाग रचनेची अंतिम अधिसूचना २५ नोव्हेंबर रोजी प्रसिद्ध करण्यात येईल. त्यामुळे ७ ऑक्टोबर रोजी कुणाचा प्रभाग कुठल्या प्रभागात जोडण्यात आला आहे, हे स्पष्ट होईल. तसेच दिवाळीनंतरच अंतिम प्रभाग रचना स्पष्ट होणार आहे.

000
असा तयार होईल आराखडा

0 आरक्षणाची तपासणी करून विभागीय आयुक्त प्रारूप प्रभाग रचना १२ सप्टेंबर रोजी राज्य निवडणूक आयोगाकडे पाठवतील.

0 निवडणूक आयोगाकडून तपासणी होऊन २३ सप्टेंबर रोजी प्रभाग रचनेच्या प्रस्तावाला मान्यता देईल.

0 ७ ऑक्टोबर रोजी आरक्षण सोडतीसह प्रारूप प्रभाग रचनेचा नकाशा प्रसिद्ध होईल.

0 १० ऑक्टोबर रोजी प्रारूप प्रभाग रचनेची अधिसूचना प्रसिद्ध होईल.

0 १० ते २५ ऑक्टोबरदरम्यान प्रभाग रचनेवर नागरिकांच्या हरकती व सूचना मागविण्यात येतील.

0 ४ नोव्हेंबर रोजी हरकती व सूचनांवर सुनावणी

0 १० नोव्हेंबर रोजी आलेल्या हरकती व सूचनांच्या सुनावणीचा अहवाल राज्य निवडणूक आयोगाकडे पाठविण्यात येईल.

0 25 नोव्हेंबर रोजी अंतिम अधिसूचना प्रसिद्ध होईल.

0 ७ ऑक्टोबर रोजी कुणाचा प्रभाग कुठल्या प्रभागात जोडण्यात आला आहे हे समजेल.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नवनियुक्त अध्यक्ष ‘हरवले’

$
0
0

पूर्णवेळ अधिकाऱ्यापासून पीएमपी दूरच; आयुक्तांवर अतिरिक्त ताण

म. टा. प्रतिनिधी, पुणे
पुणे महानगर परिवहन महामंडळावर (पीएमपी) पूर्णवेळ अध्यक्षांची नियुक्ती करून आज, गुरुवारी महिना पूर्ण होत असला, तरी नवनियुक्त अध्यक्षांनी अद्याप पदभारच घेतलेला नाही. नवे अध्यक्ष पीएमपीची सूत्रे केव्हा घेणार, याबाबत संदिग्धता निर्माण झाल्याने महापालिका आयुक्तांनाच पीएमपीच्या अध्यक्षपदाचा अतिरिक्त कार्यभार सांभाळावा लागत आहे.
पीएमपीच्या अध्यक्षपदी सरकारने गेल्या महिन्यात धुळ्याचे जिल्हाधिकारी अण्णासाहेब मिसाळ यांची नियुक्ती केली. साधारणतः आठवडाभरात ते पीएमपीचा पदभार स्वीकारतील अशी अपेक्षा होती. परंतु, त्यांच्या नियुक्तीला महिना पूर्ण होऊनही अद्याप ते पुण्यात दाखल झालेले नाहीत. राज्य सरकारने पीएमपीला पूर्णवेळ अधिकारी मिळावा म्हणून त्यांची नियुक्ती केली होती; पण त्यांनी पीएमपीच्या अध्यक्षपदाकडे पूर्णतः पाठ फिरवल्याचे दिसून येत आहे. पीएमपीमधील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पीएमपीपेक्षा अधिक चांगले पद मिळावे, अशी मागणी मिसाळ यांनी राज्य सरकारकडे केली आहे. त्यामुळे, शहरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेला चांगला आणि पूर्णवेळ अधिकारी येण्यास तयारच होत नसल्याचे पुन्हा अधोरेखित झाले आहे. याबाबत, 'महाराष्ट्र टाइम्स'ने मिसाळ यांच्याशी वारंवार संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, त्यांनी प्रतिसाद दिला नाही.
पीएमपीच्या ताफ्यात आगामी काही काळात सुमारे साडेपाचशे नव्या बसची दाखल होणार आहेत. त्यासह, शहर आणि पिंपरी-चिंचवडमध्ये जलद बस वाहतुकीचे (बीआरटी) नवे मार्ग सुरू करण्याचे नियोजन आहे. यासाठी, पूर्णवेळ अध्यक्षांची जरूरी असताना मिसाळ यांनी मात्र पीएमपीपेक्षा चांगले पद पाहिजे, असा हट्ट धरल्याचे सांगितले जात आहे. राज्य सरकारने पीएमपीचे तत्कालीन अध्यक्ष अभिषेक कृष्णा यांची जुलैमध्येच नाशिकच्या आयुक्तपदी बदली केली. त्यानंतर, महिनाभर पीएमपीचे अध्यक्षपद रिक्तच होते. गेल्या महिन्यात मिसाळ यांची नियुक्ती केली. मात्र, ते अजूनही रुजू झालेले नाहीत. त्यामुळे, पालिकेसह स्मार्ट सिटी आणि पीएमपी असे कार्यभार सांभाळताना आयुक्त कुणाल कुमार यांना तारेवरची कसरत करावी लागत आहे.
...................
शहरातील सार्वजनिक वाहतुकीसाठी चांगल्या आणि पूर्णवेळ अधिकाऱ्याची गरज आहे. नव्याने नियुक्त केलेले अधिकारी कार्यभार घेण्यास तयार नसतील, तर सरकारने नवा अधिकारी नियुक्त करावा अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे करणार आहे.
प्रशांत जगताप
महापौर
.......................
मटा भूमिका
शहरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम करण्यासाठी पीएमपीला पूर्णवेळ अधिकारी हवा, अशी मागणी सातत्याने केली जात आहे. आजवर पीएमपीची जबाबदारी सुमारे १२-१३ विविध अधिकाऱ्यांकडे देण्यात आली आहे. एका अधिकाऱ्याचा अपवाद वगळता कोणीही आपला कार्यकाल पूर्ण केलेला नाही. आता तर पीएमपीच्या अध्यक्षपदी नियुक्त केलेला अधिकारीच रुजू होण्यास तयार होत नसल्याने दोन महिन्यांपासून हे पद प्रभारी आहे. यामध्ये, राज्य सरकारची भूमिका निर्णायक ठरणार असून, नव्या नियुक्तीचा कार्यभार स्वीकारण्यास टाळाटाळ करणाऱ्यांवरही कारवाई करण्याची गरज आहे. तसेच, पीएमपीसाठी सक्षम अधिकाऱ्याची नियुक्ती तातडीने करण्यासाठी पावले उचलायला हवी.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सोनोलॉजिस्टमध्ये घबराट

$
0
0

दोन डॉक्टरांना शिक्षा झाल्याची गंभीर दखल; संतापही व्यक्त

म. टा. प्रतिनिधी, पुणे
प्रसूतीपूर्व लिंगनिदान प्रतिबंधक कायद्यानुसार (पीसीपीएनडीटी) दोन सोनोलॉजिस्टना झालेल्या शिक्षेची गंभीर दखल पुण्यातील डॉक्टरांनी घेतली आहे. या कारवाईमुळे डॉक्टरांमध्ये घबराट निर्माण झाली आहे. तसेच, या प्रकारासंदर्भात संताप व्यक्त होत आहे.
रेकॉर्ड न ठेवणे, एफ फॉर्म अपूर्ण ठेवणे, पेशंट पाठवलेल्या डॉक्टरांचे नाव न लिहिणे, कागदपत्रे अपूर्ण ठेवणे यांसारख्या कारणांसाठी 'पीसीपीएनडीटी' कायद्यानुसार खराडीतील अंकुर डायग्नोस्टिक सेंटरचे डॉ. वीरेन कुलकर्णी आणि डॉ. राजेश कंकाल या दोघांना कोर्टाने वर्षभराच्या कारावासासह दंडाची शिक्षा ठोठावली. त्यामुळे वैद्यकविश्वात मोठी खळबळ उडाली आहे.
डॉ. कुलकर्णी हे 'इंडियन रेडिओलॉजिकल अँड इमेजिंग असोसिएशन'चे माजी अध्यक्ष आहेत. काही दिवसांपूर्वी 'पीसीपीएनडीटी'चा कायदा बदलण्यासाठी देशव्यापी संप पुकारण्यात आला होता. या पार्श्वभूमीवर दोघा डॉक्टरांना झालेल्या शिक्षेमुळे रेडिओलॉजिस्टमध्ये संतापाचे वातावरण आहे. 'कोर्टाने आम्हा दोघांना शिक्षा ठोठावली आहे. ही शिक्षा लिंगनिदानासाठी नव्हे, तर कागदपत्रे अपूर्ण ठेवण्याच्या तांत्रिक गुन्ह्यासाठी आहे. कोर्टाने आम्हाला जामीन मंजूर केला असून, जिल्हा सत्र न्यायालयात दाद मागण्याची मुभा दिली आहे. आम्ही या प्रकरणी सत्र न्यायालयात दाद मागणार आहोत,' असे डॉ. वीरेन कुलकर्णी यांनी सांगितले.
'कोर्टाच्या निर्णयाचा आम्हाला आदर आहे. पण, कायद्यातील त्रुटीमुळे शहरातील रेडिओलॉजिस्ट नाहक बदनाम होत आहेत. त्यामुळेच आम्ही शहरातील सोनोलॉजिस्टना परवाने आणि पदवी महापालिकेच्या आरोग्य खात्याकडे परत करण्याचे आवाहन केले आहे. या प्रकारासंदर्भात इंडियन मेडिकल असोसिएशनची बैठक बोलावून या संदर्भात ठोस निर्णय घेतला जाणार आहे. देशात केवळ पुण्यातच वेगळ्या पद्धतीने कायदा राबवला जात असून, डॉक्टरांना त्रास देण्याच्या या प्रकाराचा आम्ही निषेध करीत आहोत,' असे 'आयएमए'च्या हॉस्पिटल बोर्डाचे अध्यक्ष डॉ. नितीन भगली म्हणाले.
'संघटनेच्या दोन डॉक्टरांना शिक्षा झाली आहे. या शिक्षेसंदर्भात आमची नेमकी भूमिका संघटनेच्या बैठकीत स्पष्ट होईल,' असे असोसिएशनच्या पुणे शाखेचे अध्यक्ष डॉ. गुरुराज लच्छानी यांनी सांगितले.
..
पुण्यातील दोन सोनोलॉजिस्टना झालेली शिक्षा योग्य नाही. या संदर्भात प्रदेश शाखेला बैठक घेण्याची विनंती केली आहे. या प्रकारासंदर्भात नेमकी कोणती भूमिका घ्यायची याचा निर्णय त्या बैठकीत होईल.
डॉ. जिग्नेश ठक्कर, समन्वयक, इंडियन रेडिओलॉजिकल अँड इमेजिंग असोसिएशन

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘होमगार्डअभावी पोलिसांवर ताण’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

गणेशोत्सवादरम्यान होमगार्ड विभागाने पोलिसांना पुरेशा प्रमाणात होमगार्ड न पुरवल्याने पोलिस आणि गणेश मंडळांवर सुरक्षेचा ताण आल्याचा दावा पुणे होमगार्ड जिल्हा सल्लागार समितीने केला आहे. पोलिसांनी मागणी केल्यानंतरही पुरेसे होमगार्ड पुरवण्यात न आल्याचा आरोप समितीने केला आहे.
समितीचे सदस्य विरेन साठे आणि जितेंद्र राऊत यांनी काढलेल्या पत्रकात होमगार्ड विभागाच्या जिल्हा समादेशकांवर आरोप करण्यात आले आहेत. 'गेल्या काही वर्षांत ५५ वर्षे वयाच्या आतील चांगल्या होमगार्डंना टप्प्याटप्याने सेवेतून कमी करण्यात आले. त्यामुळे होमगार्ड विभागासमोर मनुष्यबळाची समस्या उभी राहिली आहे. पुणे होमगार्ड जिल्हा समितीने होमगार्डच्या समस्यांबाबत आवाज उठवल्यानंतरही सकारात्मक भूमिका घेण्यात न आल्याने होमगार्डवर उपासमारीची वेळ आली आहे,' असे राऊत यांनी म्हटले आहे.
पोलिस प्रशासनाला होमगार्डची आवश्यकता असूनही ते पुरविण्याची तसदी घेण्यात येत नाही. होमगार्ड बंदोबस्तासाठी येण्यास सज्ज असतानाही प्रशासन केवळ बघ्याची भूमिका घेत आहे. या बाबत जिल्हाधिकारी सौरव राव यांना निवेदन देण्यात आल्याचेही राऊत म्हणाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


गर्दीच्या ठिकाणी अतिरिक्त कुमक

$
0
0

बेलबाग चौक, लक्ष्मी रस्त्यावर विशेष लक्ष; विविध पथके तैनात
म. टा. प्रतिनिधी, पुणे
गणेश उत्सव शांततेत आणि निर्विघ्न पार पडावा, गर्दीचे नियोजन करताना घातपात घडू नये म्हणून शहरात सर्वत्र पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. गर्दी खेचणाऱ्या मंडळांवर नियंत्रण ठेवता यावे यासाठी बेलबाग चौक परिसरात अतिरिक्त बंदोबस्त देण्यात आला आहे. या शिवाय लक्ष्मी रस्त्यावर सायंकाळी सात ते रात्री बारापर्यंत अतिरिक्त साठ पोलिसांची कुमक तैनात करण्यात आली आहे. महिलांची छेडछाड, सोनसाखळीचोरीला आळा घालण्यासाठी छेडछाड विरोधी पथक, टिंगलविरोधी पथक आणि दामिनी पथकही तैनात करण्यात आले आहे.
गणेशोत्सव शांततेत आणि उत्साहात पार पडावा यासाठी पोलिस प्रशासनाने जय्यत तयारी केली आहे. लक्ष्मी रस्त्यावर दररोज रात्री होणाऱ्या गर्दीचे नियोजन करण्यासाठी उपायुक्तासह दहा अधिकारी आणि ५० पोलिस कर्मचाऱ्यांची अतिरिक्त नियुक्ती करण्यात आली आहे. स्वतः पोलिस आयुक्त रश्मी शुक्ला महत्वाच्या आणि संवेदनशील पोलिस ठाण्यांना भेट देऊन बंदोबस्ताचा आढावा घेत आहेत. बॉम्बशोधक आणि नाशकपथकाकडून गणेश मंडळांच्या पदाधिकाऱ्यांना संशयित वस्तू आढळल्यानंतर त्वरित करावरयाच्या उपाययोजनांचे प्रशिक्षण देण्यात येत आहे. अशी माहिती गुन्हे शाखेचे उपायुक्त पी. आर. पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली. या वेळी आर्थिक आणि सायबर शाखेचे उपायुक्त दीपक साकोरे, विशेष शाखेचे उपायुक्त गणेश शिंदे आणि गुन्हे शाखेचे सहायक आयुक्त सुरेश भोसले उपस्थित होते.
शहरात बसविण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांद्वारे नियंत्रण कक्षातून देखरेख करण्यात येत आहे. संशयित वस्तू आणि संशयितांवर नजर ठेवण्यात येत आहे. गुन्हे शाखेकडून कोम्बिंग ऑपरेशन हाती घेण्यात येत आहे. अंमली पदार्थ विरोधी पथकाकडून शहरातील विविध झोपडपट्यांमध्ये घालण्यात आलेल्या छाप्यांमध्ये सहा गुन्हेगारांना अटक करण्यात आली आहे. रेकॉर्डवरील गुन्हेगार तपासण्यात येत असून, संबंधितांविरुध्द प्रतिबंधात्मक कारवाईही करण्यात आली आहे. शहरातील जवळपास पंधराहून अधिक लॉजची तपासणी करण्यात आली आहे.
..
महिलासुरक्षेवर अधिक भर
गर्दीच्या ठिकाणी महिलांच्या छेडछाडीच्या प्रकाराला आळा बसावा यासाठी छेडछाड विरोधी पथक, टिंगल विरोधी पथक, दामिनी पथक तैनात करण्यात आले आहे. तसेच, गर्दीमध्ये सोनसाखळी चोरी होऊ नयेत, यासाठी आवश्यक सूचना त्यांना देण्यात आल्या आहेत. सराईत सोनसाखळीचोरांचे फोटोही त्यांना सोपविण्यात आले आहेत.
..
श्वानपथकांकडून तपासणी
शहरात एकूण आठ घातपात विरोधी पथके तैनात करण्यात आली असून, गर्दीच्या ठिकाणी १३ प्रशिक्षित श्‍वानपथकांकडून तपासणी करण्यात येत आहे. या पथकांमध्ये पोलिस आयुक्तालयातील आठ आणि राज्य गुन्हे अन्वेषण विभागाकडील (सीआयडी) पाच पथकांचा समावेश आहे. श्‍वान पथकांकडून महत्वाच्या मंडळांच्या परिसरातील तपासणी करण्यात येत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘दोनाचे चार’मुळे चर्चा

$
0
0

प्रा-रूप प्रभागरचना त्रिसदस्यीय समितीला सादर

म. टा. प्रतिनिधी, पुणे
दोनाचे 'चार' होणार असल्याने काय होणार याची धाकधूक, कुतूहल, उत्सुकता अन् संभाव्य जबाबदारीची आत्तापासूनच चर्चा, अशा 'राजकीय' वातावरणात आगामी महापालिका निवडणुकांसाठीच्या प्रा-रूप प्रभागरचनेचा आराखडा महापालिकेने त्रिसदस्यीय समितीला सादर केला. सध्याच्या प्रभागात कोणते आणि किती बदल होणार, कोणाचा भाग कापला अन् कोणाला जोडला, याचीच चर्चा बुधवारी दिवसभर पालिका वर्तुळात रंगली होती.

आगामी महापालिका निवडणुका बहुसदस्यीय प्रभाग पद्धतीने (चार सदस्यांचा एक प्रभाग) होणार असल्याचे राज्य सरकारने जाहीर केले. या निवडणुकांसाठी प्रभागरचना निश्चित करण्याच्या सूचना निवडणूक आयोगाने गेल्या महिन्यात सर्व महापालिकांना केल्या होत्या. प्रा-रूप प्रभागरचना तयार करण्यासाठी १५ दिवसांची मुदत देण्यात आली होती. ही मुदत बुधवारी संपली. महापालिकेकडून विभागीय आयुक्त एस. चोक्कलिंगम यांना प्रा-रूप प्रभागरचनेचा आराखडा सादर करण्यात आल्याची माहिती निवडणूक विभागाचे उपायुक्त सतीश कुलकर्णी यांनी दिली. विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी आणि महापालिका आयुक्त या तीन अधिकाऱ्यांची समिती, प्रभागरचनेची तपासणी करून ती सोमवारपर्यंत (१२ सप्टेंबर) निवडणूक आयोगाला सादर करेल.

महापालिकेतर्फे सुरू असलेले प्रभागरचनेचे काम बुधवारी संपणार असल्याने दिवसभर राजकीय वर्तुळात प्रभाग कसे होणार याचीच चर्चा होती. सध्या अस्तित्वात असलेले प्रभाग दोन सदस्यांचे आहेत. नवीन प्रभागरचना करताना आणखी दोन सदस्यांचा समावेश केला जाणार असल्याने प्रभागाची हद्द कोणत्या दिशेला विस्तारणार, याबाबत अनेकांच्या मनात कुतूहल आहे. लोकसंख्या आणि नैसर्गिक हद्दीचा विचार करून नवीन प्रा-रूप प्रभागरचना तयार करण्यात आली असल्याने सध्याच्या प्रभागांचे चित्र पूर्णतः बदलण्याची दाट शक्यता आहे. तसेच, निवडणूक आयोगाने प्रभागरचना करतानाच, कोणत्या दिशेने सुरुवात करायची, कोणत्या दिशेने पुढे जायचे आणि कुठे शेवट करायचा हे निकष ठरवून दिले असल्याने संबंधित भागांतील नगरसेवकांकडून संभाव्य प्रभागरचना, नवीन हद्दी याविषयीचे आडाखे बांधले जात आहेत.

हस्तक्षेप टाळण्यासाठी समिती

महापालिका निवडणुकीसाठी प्रभागरचना तयार केल्यानंतर ती थेट निवडणूक आयोगाला सादर केली जात होती. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीपाठोपाठ महापालिकांमध्ये सत्ता प्राप्त करण्यासाठी भारतीय जनता पक्षाकडून प्रभागरचनेत हस्तक्षेप केला जाण्याची भीती राजकीय पक्षांकडून व्यक्त केली गेली. त्यामुळे, निवडणूक आयोगाने प्रथमच अशाप्रकारचा कोणताही हस्तक्षेप होऊ नये, यासाठी तीन वरिष्ठ अधिकाऱ्यांची समिती नियुक्त करून त्यांच्यामार्फतच प्रा-रूप प्रभागरचना सादर करण्याचे निर्देश दिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कौशल्य विकासात राज्य अव्वल

$
0
0

गेल्या वर्षात १.९२ लाखांनी घेतले प्रशिक्षण; पुण्याचीही आघाडी

Harsh.Dudhe@timesgroup.com
..........
Tweet : @HarshDudhe_MT
पुणे : तरुणांना कौशल्य विकासाचे प्रशिक्षण देऊन 'स्किल इंडिया'ला पाठबळ देण्याच्या केंद्र सरकारच्या महत्वाकांक्षी मोहिमेत महाराष्ट्राने अव्वल स्थान पटकाविले आहे. राष्ट्रीय कौशल्य विकास मंडळाच्या (एनएसडीसी) मदतीने २०१५-१६ या वर्षात राज्यातील एक लाख ९२ हजार ८४९ विद्यार्थ्यांनी कौशल्य विकासाचे प्रशिक्षण घेतले आहे. सर्वाधिक प्रशिक्षण घेणाऱ्यांमध्ये पुण्याच्या विद्यार्थ्यांनी आघाडी घेतली आहे.

'एनएसडीसी'ने देशातील युवावर्गाला, नवकामगारांना, व्यावसायिकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी दोन वर्षांपासून शासकीय, निमशासकीय आणि खासगी प्रशिक्षण संस्थांच्या मदतीने कौशल्य विकासाचे कार्यक्रम राबविण्यास सुरुवात केली. 'एनएसडीसी फी बेस्ड मॉडेल' अंतर्गत प्रशिक्षण देण्यात येत आहे. पाचवी ते पदव्युत्तपर्यंत शिक्षण घेतलेल्यांना तसेच अशिक्षितांना प्रशिक्षणाचा लाभ देण्यात येत आहे. २०१५-१६ या आर्थिक वर्षात राज्यात १.९२ लाख विद्यार्थ्यांनी कौशल्य विकासाचे प्रशिक्षण घेतले. तर, २०१४-१५मध्ये १.८४ लाख विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देण्यात आले. त्यामध्ये १,०३, ६५९ मुले तर, ८९,१९० मुली आहेत. पश्चिम बंगालने १.४० लाख विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देऊन दुसरा क्रमांक पटकाविला आहे. तेलंगणने ५४ हजार ७४२ विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देऊन यादीत दहावा क्रमांक मिळवला आहे.

दरम्यान, राज्यातील प्रशिक्षितांपैकी १.६८ लाख विद्यार्थी प्रथमच प्रक्षिणात सहभागी झाले आहेत. तसेच, २४ हजार १९३ व्यक्तींना नोकरीचा अनुभव आहे. एकंदरीत विद्यार्थ्यांना विविध क्षेत्रात मिळालेल्या या प्रशिक्षणाचा फायदा नोकरी मिळवण्यासाठी आणि व्यवसाय सुरू करण्यासाठी होत असल्याचे दिसून आले आहे.
.....
महाराष्ट्रात उद्योग आणि व्यवसायासाठी अत्यंत पोषक वातावरण आहे. औद्योगिकदृष्ट्या महाराष्ट्र अग्रेसर आहे. त्यामुळे विद्यार्थी आणि कामगार चांगल्या रोजगाराच्या संधी मिळविण्यासाठी मोठ्या प्रमाणात कौशल्य विकासाचे प्रशिक्षण घेत आहेत.
- जयंत कृष्णा, कार्यकारी संचालक, एनएसडीसी
..........
कौशल्य विकासाचे प्रशिक्षण देणारी दहा राज्ये (२०१५-१६)
........
राज्य प्रशिक्षित
महाराष्ट्र १,९२,८४९
पश्चिम बंगाल १,४०,८०६
नवी दिल्ली १,१९,९६०
मध्य प्रदेश १,०६,८९३
तमिळ‍नाडू ९४,९४६
उत्तर प्रदेश ८७,९५७
कर्नाटक ८२,४३२
ओडिशा ६९,७७८
छत्तीसगड ५९,२३७
तेलंगण ५४,७४२
.........
कौशल्य प्रशिक्षण देणारी राज्यातील पाच शहरे (२०१५-१६)
.......
पुणे ७२,५४६
मुंबई ३७,९२७
सातारा ३०,४४४
ठाणे ८,४५५
नागपूर ६,७७४

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

एक्स्प्रेस वेवर वाहने सुसाट

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

पुणे-मुंबई एक्स्प्रेस वेवर मुंबईकडून पुण्याकडे येणाऱ्या एका लेनवरून गेल्या २१ तासांत धावलेल्या एकूण वाहनांपैकी ९९ टक्के वाहनांनी वेगमर्यादा धुडकाविल्याचे आढळून आले आहे. मळवली येथे 'सीसीटीव्ही'द्वारे करण्यात आलेल्या पाहणीत ताशी ८० किमीपेक्षा अधिक वेगाने चालविलेली वाहने कैद झाली आहेत.

एक्स्प्रेस वेवर ड्रोनद्वारे पाहणी केल्यानंतर मंगळवारपासून 'सीसीटीव्ही' कॅमेऱ्यांच्या माध्यमातून बेशिस्त वाहनांवर नजर ठेवण्यात आली. मंगळवारी रात्री आठ वाजल्यापासून ते बुधवारी सायंकाळी पाच वाजेपर्यंत ही पाहणी करण्यात आली. या पाहणीदरम्यान मुंबईवरून पुण्याकडे येणाऱ्या एका लेनमधून चार हजार २२४ वाहने धावली. त्यापैकी चार हजार १८५ वाहनांचा वेग ताशी ८० किमीपेक्षा अधिक होता.

मळवली येथील ब्रिजवर तीन 'सीसीटीव्ही' कॅमेरे बसविण्यात आले होते. त्यापैकी एक कॅमेरा पुणे-मुंबईच्या एका लेनवर आणि दोन कॅमेरे मुंबईवरून पुण्याकडे येणाऱ्या लेनवर लावले होते. त्यातील एका कॅमेऱ्यामध्ये 'ऑटोमॅटिक नंबर प्लेट रेकग्निशन'चे तंत्रज्ञान उपलब्ध होते. त्याद्वारे वाहनांचा वेग व त्या वाहनांचा नंबर प्लेट टिपली जात होती, अशी माहिती ही पाहणी करणाऱ्या तन्मय पेंडसे यांनी 'मटा'ला दिली.

'एक्स्प्रेस वेवर अतिवेगातील वाहने व लेन कटिंग करणाऱ्या वाहनांमुळे अधिक अपघात होतात. त्यामुळे या पाहणीमध्ये प्रामुख्याने या दोन गोष्टींकडे लक्ष देण्यात आले. अतिवेगातील वाहनांची माहिती तातडीने उपलब्ध झाली आणि अन्य दोन कॅमेऱ्यांचे रेकॉर्डिंग येत्या काळात तपासले जाईल. त्याद्वारे लेन कटिंगचे प्रमाण अभ्यासले जाईल. त्याचा अहवाल लवकरच सादर केला जाईल,' असे पेंडसे यांनी सांगितले. या पाहणीदरम्यान, महामार्ग पोलिस अधीक्षक अमोल तांबे, राज्य रस्ते विकास महामंडळ व आयआरबीचे अधिकारी यांनी भेट दिली.

ड्रोनद्वारे एक्स्प्रेस वेवर केलेल्या पाहणीत ४१ बेशिस्त वाहनांवर कारवाई करण्यात आली होती. मात्र, 'सीसीटीव्ही' कॅमेऱ्यातून केलेल्या पाहणीचे निष्कर्ष वास्तवाचे दर्शन घडविणारे आहेत. एक्स्प्रेस वेवर निगराणीसाठी 'सीसीटीव्ही सर्व्हेलन्स' सर्वाधिक उपयुक्त माध्यम आहे. हे यातून स्पष्ट होते. - तन्मय पेंडसे

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ऑनलाइन पेमेंटमध्ये ‘प्रॉपर्टी टॅक्स’ अव्वल

$
0
0

मिळकतकरापोटी १५५.५० कोटी रुपये जमा

म. टा. प्रतिनिधी, पुणे

नागरिकांना करभरणा करण्यासाठी कोणत्याही कार्यालयात हेलपाटे मारावे लागू नयेत, यासाठी ऑनलाइन पेमेंटची सेवा उपलब्ध करून देण्यात पालिकेच्या मिळकतकर विभागाने (प्रॉपर्टी टॅक्स) आघाडी घेतली आहे. शहरातील ८.५० लाख मिळकतधारकांपैकी सुमारे ६ लाख मिळकतकरधारकांनी आतापर्यंत पालिकेत कर जमा केला आहे. त्यातील १.८४ लाख धारकांनी ऑनलाइन पेमेंटच्या सु​विधेचा लाभ घेतला आहे. ऑनलाइन पेमेंटद्वारे आतापर्यंत पालिकेकडे १५५ कोटी ५० लाख रुपये मिळकतकराच्या माध्यमातून जमा झाले आहेत. मागीलवर्षी मिळकतकराच्या एकूण जमा रकमेच्या केवळ १६ टक्के रक्कम ऑनलाइनद्वारे प्राप्त झाली होती. यंदा मात्र, एकूण जमा रकमेच्या ३२ टक्के रक्कम ऑनलाइनद्वारे जमा झाली आहे. ऑनलाइन पेमेंटमुळे पालिकेच्या खर्चात ९० लाख रुपयांची बचत झाली आहे. त्यामुळेच ही पद्धती लोकप्रिय व्हावी, यासाठी पालिकेतर्फे उपाययोजना आखण्यात येत असल्याचे मिळकतकर विभागाचे उपायुक्त सुहास मापारी यांनी सांगितले.

नागरिकांच्या सोयीसाठी महापालिका 'इन्स्टा पेमेंट' ही नवी संकल्पना सादर करण्याच्या विचारात आहे. त्यासाठी ६७ बँकांशी करार करण्यात येणार आहे. या बँकाच्या खातेधारांना मिळकतकर ऑनलाइन पद्धतीने भरता येणार आहे. या पद्धतीत बँका, पालिका आणि ग्राहक या तिघांचाही फायदा होणार आहे. नेटबँकिंग व्यतिरिक्त डेबिट अथवा क्रेडिट कार्डच्या मदतीने पंधरापेक्षा अधिक पद्धतींनी मालमत्ताधारकांना मिळकतकराचा भरणा करता येणार असल्याचेही मापारी म्हणाले.

थकबाकीदारांचा वाजणार 'बँड'

पालिकेचा मिळकतकर थकविणाऱ्या मिळकतधारकांच्या घरासमोर बँड वाजविण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला आहे. त्यासाठी पथके नेमण्यात आली आहेत. ज्या नागरिकांकडे मोठ्या प्रमाणात मिळकतकराचा भरणा बाकी आहे, त्यांच्या घरासमोर, दुकानांसमोर बँड वाजवून रक्कम वसूल केली जाणार आहे. आज, गुरुवारपासून (८ सप्टेंबर) ही कारवाई करण्यात येणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

लग्नाच्या आमिषाने ९४ लाखांना गंडा

$
0
0

फेसबुकवरून ओळख झालेल्याने ज्येष्ठ महिलेला फसवले

म. टा. प्रतिनिधी, पुणे

फेसबुकवरून ओळख झालेल्या व्यक्तीने ६४ वर्षीय महिलेला लग्नाचे आमिष दाखवून ९४ लाखांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. परदेशातून पाठविलेले डायमंड व पौंड सोडवून घेण्यासाठी वेळेवेळी महिलेला पैसे भरायला लावले. भारतात येऊन लग्न करण्याचे आश्वासन देऊन ही फसवणूक केल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी चुतःश्रृंगी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मॉडेल कॉलनीत राहणाऱ्या ६४ वर्षीय महिलेने याबाबत तक्रार दिली आहे. त्यावरून हर्ले बेनसोन (वय ५६) नावाच्या व्यक्तींवर फसवणूक, आयटी अॅक्ट नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित महिला ही राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा येथून अधिकारी म्हणून निवृत्त झाली आहे. या महिलेची मुलगी अमेरिकेत असते. त्यांच्या पतीचे २०१४मध्ये निधन झाले आहे. त्यामुळे ही महिला मॉडेल कॉलनीत एकटीच राहते. मे महिन्यात या महिलेला हर्ले बेनसोन नावाच्या व्यक्तीची फ्रेंड रिक्वेस्ट आली. ती महिलेने स्वीकारल्यानंतर त्यांच्यात फेसबुकवरून चॅटिंग सुरू झाले. दोघांनी एकमेकांची ओळख करून दिली. त्यानंतर हर्ले नावाच्या व्यक्तीने त्याचे वय ५६ असून लंडनमध्ये नोकरी करत असल्याचे सांगितले. काही दिवस चॅटिंग झाल्यानंतर त्या व्यक्तीने त्याच्याकडे मोठ्या प्रमाणात संपत्ती असून महिलेला लग्नाची मागणी घातली. भारतात येऊन तिच्याशी लग्न करण्याचे आश्वासन दिले. तसेच, त्याच्यात व्हॉट्स अॅपवरून चॅटिंग सुरू झाले.

लंडन येथून डायमंड, ९५ हजार पौंड्स गिफ्टची बॅग पाठविली असल्याचे सांगितले. त्यानंतर ही बॅग कस्टमने पकडली आहे. ती सोडवून घेण्यासाठी एका बँकेच्या खात्या पैसे भरायला सांगितले. त्यानुसार महिलेने पाच लाख रुपये भरले. त्यानंतर आणखी कारणे सांगून महिलेला दुसऱ्या खात्यावर पैसे भरायला लावले. त्यानंतर पीडित महिला आरोपीशी चॅटिंग करून त्याची माहिती देत होती. पैसे भरायला सांगितल्यानंतर आरोपीला विचारणा करून पैसे भरत होती. मे, जून आणि जुलै अशा तीन महिन्यात महिलेने तब्बल ९४ लाख रुपये आरोपींनी सांगितलेल्या खात्यावर भरले. एवढ्या मोठ्या प्रमाणात रक्कम भरली, तरी तिला काहीच मिळाले नाही. तसेच, आरोपीनेही संपर्क न ठेवल्यानंतर फसवणूक झाल्याचे लक्षात आले. त्यानंतर महिलेने पोलिसांकडे तक्रार दिली. याप्रकरणी पोलिस निरीक्षक यु. बी. शिंगाडे हे अधिक तपास करत आहेत.

फ्लॅट विकून महिलेने दिले पैसे

तक्रारदार महिलेचा बाणेर परिसरात एक फ्लॅट आहे. चॅटिंग करणाऱ्या व्यक्तीने ज्येष्ठ महिलेशी प्रेमाचे नाटक केले. त्यांना वेळोवेळी पैसे भरायला लावले. पैसे नसल्यामुळे त्यांनी फ्लॅट विकून प्रेमासाठी आरोपींना पैसे दिल्याचे समोर आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

लाउडस्पीकर आता तीनच दिवस

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

गणेशोत्सवात पाच दिवस लाउडस्पीकरना रात्री बारा वाजेपर्यंत परवानगी देण्याच्या घोषणेकडे पाठ फिरवून आता चारच दिवस ही परवानगी देण्याचा अजब निर्णय सरकारने बुधवारी घेतला. इतकेच नव्हे, तर हा आदेशही विलंबाने काढल्यामुळे या चार दिवसांपैकी एक दिवस यापूर्वीच निघून गेला आहे. त्यामुळे ऐन उत्तरार्धात सर्व देखावे मूक होणार असून, या उरफाट्या कारभाराच्या विरोधात गणेशोत्सव मंडळांमध्ये संतापाची लाट पसरली आहे.

गणेशोत्सवात पाच दिवस लाउडस्पीकरला परवानगी देण्याची राणा भीमदेवी घोषणा राज्य सरकारने नुकतीच केली होती. प्रत्यक्षात त्यातील एक दिवस कमी करून गणेशोत्सवाच्या आनंदावर विरजण टाकण्याचा प्रकार घडला आहे. गणेशोत्सवातील दुसरा दिवस, पाचवा दिवस, गौरी विसर्जन आणि अनंत चतुर्दशी या चार दिवसांसाठी रात्री उशिरापर्यंत लाउडस्पीकरला परवानगी देण्यात आली आहे. या संदर्भातील आदेश राज्य सरकारने ५ सप्टेंबर रोजी गणेश चतुर्थीची सार्वजनिक सुट्टी असताना काढला. हा आदेश जिल्हा प्रशासनाला गणेशोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे मंगळवारी (६ सप्टेंबर) सायंकाळी उशिरा मिळाला. आदेश उशिरा मिळाल्याने राज्य सरकारच्या निर्णयाची माहिती गणपती मंडळांना मिळू शकली नाही. सरकारी अनास्थेमुळे उत्सवातील हा दिवसच वाया गेला. त्यामुळे गणेशोत्सवामध्ये आता प्रत्यक्षात तीनच दिवस उशिरापर्यंत लाउडस्पीकर लावण्यास मिळणार आहे.

गणेशोत्सवासाठी राज्य सरकारच्या अखत्यारितील चार दिवस देण्यात आले आहेत. जिल्हाधिकाऱ्यांच्या अधिकार कक्षेतील दोन दिवसांची लाउडस्पीकरची सवलत रद्द करण्यात आली असून, त्याबाबत राज्य सरकारच्या परवानगीनेच निर्णय घ्यावा लागणार आहे.

उशिरापर्यंत लाउडस्पीकर

आता शिवजयंती, ईद-ए-मिलाद, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती, महाराष्ट्र दिन, दिवाळी (लक्ष्मीपूजन), ख्रिसमस व ३१ डिसेंबर; तसेच नवरात्रीमध्ये दोन दिवस (अष्टमी व नवमी) व गणेशोत्सवात चार दिवस (दुसरा, पाचवा, गौरी विसर्जन व अनंत चतुर्दशी) लाउडस्पीकरला उशिरापर्यंत परवानगी मिळणार आहे. उर्वरित दोन दिवस राज्य सरकारच्या मान्यतेने महत्त्वाच्या कार्यक्रमांना परवानगी दिली जाणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


दाभोलकरांच्या हत्येचा सूत्रधार वीरेंद्र तावडेच

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येचा कट सनातन संस्थेचा साधक वीरेंद्रसिंह तावडे याने रचून विनय पवार आणि सारंग अकोलकर व इतरांच्या मदतीने हत्या केल्याचे केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) केलेल्या तपासात निष्पन्न झाले आहे. सीबीआयतर्फे याप्रकरणात कोर्टात आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणातील इतर आरोपींचा शोध सुरू आहे. डॉ. दाभोलकर यांच्यावर कोणी गोळ्या झाडल्या याचा तपास अजून सुरू आहे.

या प्रकरणाशी संबंधित कागदपत्रे आणि तोंडी पुरावा असल्याचे सीबीआयतर्फे दाखल करण्यात आलेल्या आरोपपत्रात नमूद करण्यात आले आहे. प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी व्ही. बी. गुळवे पाटील यांच्या कोर्टात हे आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे.

सीबीआयचे अतिरिक्त पोलिस अधीक्षक एस. आर. सिंह यांनी कोर्टात आरोपपत्र दाखल केले. डॉ. दाभोलकर यांच्या हत्येप्रकरणात सीबीआयने दहा जून रोजी वीरेंद्रसिंह तावडेला अटक केली होती. तावडे याच्या पनवेल येथील घरी; तसेच सनातन संस्थेच्या आश्रमावर सीबीआयने एक जून रोजी छापा टाकला होता. तावडे सध्या कॉ. गोविंद पानसरे यांच्या हत्याप्रकरणात कोल्हापूर पोलिसांच्या ताब्यात आहे. डॉ. दाभोलकर यांच्या हत्येप्रकरणात सीबीआयने तावडेविरुद्ध कोर्टात २४ पानी आरोपपत्र दाखल केले आहे. कट रचणे, हत्या करणे असे आरोप तावडेविरुद्ध ठेवण्यात आले आहेत.

डॉ. दाभोलकर यांची बालगंधर्व रंगमंदिराजवळ शिंदे पुलावर हत्या झाली. त्या वेळी त्या परिसरात साफसफाईचे काम करणारे सहा साक्षीदार होते, असे तपासात निष्पन्न झाले आहेत. त्यांनी गोळीबाराचा आवाज ऐकला; तसेच काळ्या रंगाच्या मोटारसायकलवरून दोघे जण जाताना पाहिल्याचे सांगितले आहे. दाभोलकर यांच्या हत्येच्या वेळी वापरण्यात आलेल्या रिव्हॉल्व्हरचा बॅलेस्टिक अहवाल परदेशातून मागविण्यात आला असून, तो आल्यानंतर तपास करण्यात येणार आहे. फरारी आरोपी व तावडे याच्या मोटारसायकलीचा तपास करायचा असल्याचे या आरोपपत्रात सीबीआयने नमूद केले आहे.

या आरोपपत्रासमवेत २० टिपणे सादर करण्यात आली होती. त्यात साक्षीपुरावे, सीसीटीव्हीमध्ये दिसून आलेले संशयितांचे फोटो, रेखाचित्रे, तावडे याच्या घरी व सनातन संस्थेवरील छाप्यात आढळून आलेली वेगवेगळी कागदपत्रे, सनातन वृत्तपत्रातील अनेक बातम्यांची कात्रणे, विविध वृत्तपत्रांत प्रसिद्ध झालेल्या बातम्यांची कात्रणे, दाभोलकर व अंधश्रद्धा निर्मूलन समितीविषयी 'सनातन'मध्ये छापण्यात आलेली व्यंगचित्रे यांचा समावेश आहे.

हिंदू धर्माविरोधात बोलल्यामुळेच...

'डॉ. नरेंद्र दाभोलकर हे हिंदू धर्माविरुद्ध बोलतात. हिंदू धर्मातील रुढी, परंपरा यांच्याविरुद्ध मोहीम चालवितात. अंधश्रद्धा निर्मूलनाविषयी बोलतात. संतांविरुद्ध, देवाबद्दल अनुदार उद्गार काढतात. चमत्काराला आव्हान देतात. त्यांची हत्या करण्यामागे वीरेंद्रसिंह तावडेचा हा उद्देश आहे,' असे या आरोपपत्रात सीबीआयने नमूद केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पाऊलखुणा गजवदनाच्या

$
0
0

आनंद कानिटकर
---
गणपतीचे महत्त्व जसजसे वाढत होते, तसे त्याचे भक्त त्याला विविध रूपांत पाहू लागले होते. वैनायकी, शक्तिगणेश यांसोबतच मंदिरांवर गणपतीचे एक वेगळे रूप दिसू लागले, ते म्हणजे 'नृत्यगणेश' (या गणेशाचा उल्लेख प्राचीन ग्रंथांतून 'नृत्तगणेश' असा आढळतो.) शिवमंदिरामध्ये गणपतीचा समावेश होऊ लागला. मंदिरांच्या बाहेरील भिंतींवर शिव परिवारातील विविध देवता दाखवताना त्यात गणेशाचाही समावेश करण्यात आला. त्याच्या केवळ बसलेल्या अथवा उभ्या मूर्तीखेरीज जास्त लय असलेली ही नृत्यगणेशाची मूर्ती होती. 'क्रियाक्रमदयोत' या प्राचीन ग्रंथानुसार या नृत्यगणेशाच्या आठ हातात पाश, अंकुश, मोदकपात्र, कुठार, अक्षमाला, सर्प इ. दाखवावेत आणि त्याचा एक हात मोकळा असावा. म्हणजे शिल्पकाराला त्याच्या कल्पनेप्रमाणे नृत्यातील हस्तप्रकारांचा वापर करता येऊ शकतो. हा नृत्यगणेश कमलासनावर उभा असलेला दाखवला जातो. त्याचा डावा पाय कमळावर ठेवलेला असतो. तो गुडघ्यात किंचित वाकलेला असतो. त्याचा उजवा पाय नृत्य करण्यासाठी वर उचललेला असतो.
नृत्यगणेशाच्या विविध प्रतिमा मुख्यतः मंदिराच्या बाह्यभागावर आढळतात. बंगालमध्ये सापडलेल्या पाल राजांच्या काळातील अष्टभुज नृत्यगणेश हा उंदरावर उभा असून त्याच्या आजूबाजूला झांजवादक आणि मृदंगवादक उभे आहेत, तर हिमाचल प्रदेशात मिळालेल्या एका प्रतिमेत हातात घंटा घेऊन सर्पावर नाचणारा चतुर्भुज नृत्यगणेश आहे.
खजुराहो येथील कंदरीय महादेव मंदिरातील नृत्यगणेश असाच मनोरम आहे. या देवळाच्या देवकोष्ठातील ही मूर्ती त्रिभंग अवस्थेतील असून सहा हातांची आहे. गणेशाने हातात पाश, अंकुश, सर्प, मोदक इत्यादी धारण केले असून त्याचा एक हात मांडीवर आहे. त्याच्या शेजारी दोन गण वीणा आणि मृदंग वाजवत आहेत. गणेशाचे नृत्य बघण्यासाठी गंधर्वांनी दाटी केली आहे.
कनौज (उत्तर प्रदेश) येथे सापडलेल्या प्रतिहार काळातील नृत्यगणेशाच्या प्रतिमेच्या चौकटीत बाजूला शिव, मातृका, दुर्गा, कृष्ण, वाराही इत्यादी देवता दाखवल्या आहेत. फतेहगड (उत्तर प्रदेश) येथील चित्रगुप्त मंदिरातील अष्टभुज नृत्यगणेशाच्या पायाशी साथीदार बसले आहेत. या गणपतीच्या उजव्या आणि डाव्या बाजूला गजलक्ष्मी, सरस्वती, कौशिकी, शरसंधान करणारी दुर्गा आणि मातृका यांचे अंकन आहे. इतक्या देवता आजूबाजूला असणारी अशी ही नृत्यगणेशाची मूर्ती दुर्मिळ आहे.
नृत्यगणेश हा फक्त उत्तर भारतातच प्रसिद्ध होता असे नाही, तर दक्षिण भारतातदेखील त्याच्या मूर्ती आढळतात. कर्नाटकातील हळेबिडू येथील होयसाळांच्या काळातील मंदिराच्या बाह्य भागावर अत्यंत बारीक कलाकुसर केलेले नृत्यगणेश दाखवण्यात आलेले आहेत. सालंकृत गणेशाच्या या मूर्तीमध्ये गणेशाच्या मस्तकावर छत्रही दाखवण्यात आले आहे. अशी ही शिवाच्या नटराज रूपाजवळ जाणारी नृत्यगणेशाची संकल्पना आणि प्रतिमा विशेष मानली पाहिजे.

(लेखक भारतीयविद्या तज्ज्ञ आहेत.)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

​‘स्टॅम्प’वरही मंगलमूर्ती

$
0
0

- मंदार लवाटे
इंग्रजी राज्य सुरू झाल्यावर इंग्रजांनी सुरुवातीस आहे तीच नाणी चलनात ठेवली. त्यानंतर कोणत्याही संस्थानिकास नाणी पाडू दिली नाहीत. या संस्थानिकांना स्वतःच्या नावाचे स्टॅम्पपेपर छापायची मुभा होती. सांगली, कुरुंदवाड, मिरज, वाडी, जमखिंडी ही सर्व पटवर्धन घराण्याची संस्थाने. तपस्वी हरभट पटवर्धन हे या घराण्याचे मूळ पुरुष. उत्तर आयुष्यात त्यांनी संन्यास घेतला व ते पुण्यात ओंकारेश्वरी राहात होते. याच ठिकाणी त्यांचे निधन झाले. त्यांचे वंशज देश, धर्माभिमानी, लढवय्ये व गणेशभक्त होते. त्यामुळे या सर्वांच्या स्टॅम्पपेपरवर गणपतीचे चित्र आढळून येते. यातील सर्वात दुर्मिळ म्हणजे वाडी संस्थान. हे संस्थान कुरुंदवाड थोरली पाती यातून वेगळे झाले. बावची, खटाव या भागात हे संस्थान होते. या संस्थानचे राजे मिरजमध्ये राहायचे. यांचा स्टॅम्पपेपर म्हणजे लंब वर्तुळाकार शिक्का असून त्यावर मधोमध 'श्री गणराज' असे लिहिले आहे व लंबवर्तुळात वाडी स्टेट स्टॅम्प असे मराठी व इंग्लिशमध्ये लिहिले आहे. कुरुंदवाड धाकटी व थोरली पाती या संस्थानांचे वेगवेगळे तसेच एकत्रही स्टॅम्पपेपर आहेत. एकत्र स्टॅम्पपेपरवर कुरुंदवाड उभयता रावसाहेब स्टॅम्प असे लिहिले आहे. त्यामध्ये गणपतीचे चित्र आहे. मिरज संस्थांनाच्या स्टॅम्पपेपरवर संस्थान मिरज मळा, द चीफ ऑफ मिरज ज्युनियर असे छापले आहे. तर मिरज थोरली पाती यांच्या स्टॅम्पपेपरवर मिरज स्टेट, दिवाण मिरज अशी अक्षरे आहेत. सांगली संस्थानच्या स्टॅम्पपेपरवर गणपतीचे चित्र व बाजूला चिंतामणराव अप्पासाहेब यांचा फोटो आहे. 'श्री गणपतीर्जयति संस्थान सांगली' अशी अक्षरे गणपतीभोवती आहेत. तर चिंतामणराव यांचा फोटो मध्ये व बाजूला गणपती असाही स्टॅम्पपेपर आहे. नुसत्या गणपतीचे नाव व शिक्का असलेला सांगलीचा स्टॅम्पपेपरही आहे. ही संस्थाने कर्नाटकला जवळ असल्याने कानडी भाषेतही मजकूर आहे. स्टॅम्पपेपर रंगीत आहेत. स्टॅम्पपेपरवरचा शिका गणपतीचे चित्र असलेलाच आहे. विनायक मारुती आवटे यांचा संस्थानिकांच्या स्टॅम्पपेपरचा मोठा संग्रह व अभ्यास आहे. या संदर्भातील माहिती त्यांनी दिली. गणपतीच्याच स्टॅम्पपेपरवर लिहून द्यायचे असल्याने प्रत्येक जण सत्यच लिहीत असावा व लिहिलेले पाळत ही असावा, असे वाटते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जुन्नरमध्ये तुळजाभवानीचा पलंगोत्सव

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, जुन्नर

जुन्नरमध्ये नोंदणीकृत १४ गणेशोत्सव मंडळांच्या स्थापनेबरोबरच तिळवण तेली समाज कार्यालयात स्थापना झालेल्या तुळजाभवानीच्या पलंगोत्सवाने आगळे चैतन्य निर्माण झाले आहे.

पलंगाच्या दर्शनासाठी नगर, नाशिक, तसेच पुणे जिल्ह्याच्या पंचक्रोशीतून भाविक येत आहेत. घोडेगाव येथे पलंगाची स्थापना होऊन ऋषीपंचमीला प्रस्थान झाल्यानंतर जुन्नरमध्ये पलंग मुक्कामास असतो. गणेश विसर्जनानंतर दुसऱ्या दिवशी पलंगाचे तुळजापूरकडे प्रस्थान होते. पलंगे कुटुंबीयांकडून दर वर्षी या पलंगाची निर्मिती केली जाते. प्रत्येक वर्षी नवरात्रातील होमात पलंगाचे हवन केल्यानंतर तुळजाभवानी मंदिरात नवीन पलंगाची स्थापना केली जाते.

जुन्नरमध्ये तिळवण तेली समाज मंडळाकडून पलंगोत्सव काळात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती मंडळाचे अध्यक्ष राजेंद्र कर्पे, उपाध्यक्ष जयप्रकाश फल्ले यांनी दिली.

दरम्यान, शालेय गणेशोत्सवाच्या निमित्ताने शाळा-कॉलेजांमधूनही विविध स्पर्धांची धामधूम सुरू आहे. एकंदरीतच गणेशोत्सव आणि पलंगोत्सवामुळे जुन्नरमध्ये धार्मिकतेने भारलेले चैतन्यदायी वातावरण पाहायला मिळत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रामोशी समाजाच्या मागण्या रास्त

$
0
0

जानकर यांनी केले आश्वस्त

म. टा. वृत्तसेवा, सासवड

'बेरड आणि बेडर समाज असलेल्या रामोशी जमातीबाबत योग्य तो अभिप्राय येत नाही, तोपर्यंत या जमातीस आदिवासींच्या सवलती मिळणे शक्य होणार नाही; पण या समाजाच्या मागण्या रास्त असून, त्याबाबत मंत्रिमंडळ बैठकीत चर्चा करून त्या मान्य होण्यासाठी सर्व जण प्रयत्नशील राहू,' असे आश्वासन दुग्ध व पशुसंवर्धनमंत्री महादेव जानकर यांनी दिले. भिवडी येथे आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक यांच्या २२५व्या जयंती समारंभात ते बोलत होते.

पुरंदर तालुक्यातील भिवडी येथील उमाजी नाईक यांच्या जन्मगावी त्यांच्या २२५व्या जयंतीनिमित्त जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे, जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार गिरीश बापट, विधानपरिषद सदस्य रामदेव नाना रूपनवर, दुग्धविकासमंत्री जानकर, राष्ट्रीय समाज पक्षाचे राज्य उपाध्यक्ष दौलतराव राऊत, भिवडीच्या सरपंच अलका भिंताडे, उपसरपंच सतीश गायकवाड, रामदास धनवटे आदींसह जिल्ह्यातील हजारो उमाजीप्रेमी कार्यकर्ते उपस्थित होते.

रामदास धनवटे यांनी प्रास्तविक करून हुतात्मा उमाजी नाईक यांच्या कार्याचा उल्लेख करताना या बेरड आणि बेडर रामोशी समाजाची उपेक्षा होत असल्याची खंत व्यक्त केली आणि चार महत्त्वाच्या मागण्या मांडल्या. तसेच मुख्य पाहुणे जानकर यांनी, 'या मागण्या रास्त असून याचा विचार मंत्रिमंडळ बैठकीत करू,' असे आश्वासित केले. जलसंपदा राज्यमंत्री शिवतारे यांनी पुरंदरची माती आणि इतिहास जाज्ज्वल्य असल्याचे सांगून, 'ही शूर योद्ध्यांप्रमाणे संत-साहित्यिकांचीही भूमी आहे. येत्या १५ दिवसांत या समाजाच्या पदाधिकाऱ्यांना घेऊन मुख्यमंत्री फडवणीस यांच्याशी चर्चा करू. येथे भव्य प्रशस्त असे स्मारक उभे करण्याच्या कामाला प्राधान्य देऊ,' असे सांगितले.

पालकमंत्री गिरीश बापट यांनीही, मुख्यमंत्री आणि संबंधित खात्यांच्या मंत्र्यांच्या बैठका घेऊन प्रश्न मार्गी लावू, असे सांगितले. या वेळी शाहीर श्रीकांत रेणके यांनी क्रांतिवीर राजे उमाजी नाईक यांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकणारा पोवाडा सादर केला. जिल्हा काँग्रेस अध्यक्ष संजय जगताप, बापू मोकाशी, तात्यासाहेब भिंताडे या वेळी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images