Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

दीड दिवसांच्या बाप्पाला निरोप

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

यंदा भरपूर पाऊस घेऊन येणाऱ्या बाप्पाबद्दल कृतज्ञता व्यक्त करून गणेशभक्तांनी दीड दिवसांच्या गणपतीला मंगळवारी निरोप दिला. जलप्रदूषण टाळण्यासाठी काहींनी गणपतीची मूर्ती दान केली तर, बहुतांश नागरिकांनी हौदामध्येच मूर्तीचे विसर्जन केले.
लाडक्या गणरायाचे भक्तांनी सोमवारी जल्लोषात स्वागत केले असतानाच दीड दिवसांच्या गणपतीला निरोप देण्याची वेळ आल्यामुळे लहान मुले खट्टू झाली होती. 'पुढच्या वर्षी बाप्पा लवकर या' अशी साद त्यांनी घातली. विसर्जनासाठी महापालिकेतर्फे घाटाबरोबरच शहराच्या विविध भागात विसर्जन हौद बांधण्यात आले होते. नदीऐवजी हौदात मूर्ती विसर्जित करा, असे आवाहन प्रशासन आणि स्वयंसेवी संस्थातर्फे करण्यात आले. नागरिकांनीही हौदालाच प्राधान्य दिले. एस. एम. जोशी पूल, भिडे पूल, गाडगीळ पुलाजवळ मूर्ती विसर्जनासाठी येणाऱ्या गणेश भक्तांची गर्दी कमी झाल्याचे या वेळी पाहण्यास मिळाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


गणेश विसर्जनाला पुणेकरांची कसरत

$
0
0

नदीतून पाणी न सोडल्याने संतापात भर; हौदांमध्येही पाण्याचा अभाव

म. टा. प्रतिनिधी, पुणे
पुणेकरांना पाणी जपून वापरण्याचा सल्ला देणाऱ्या पालकमंत्री गिरीश बापट यांनी दीड दिवसांच्या विसर्जनासाठी नदीतून पाणी सोडले नाही. त्यामुळे, पालकमंत्र्यांच्याच मतदारसंघातील अनेक गणेशभक्तांनी नाराजी व्यक्त केली. महापालिकेच्या अनेक हौदांमध्येही पाणी नसल्याने विसर्जनासाठी आलेल्या गणेशभक्तांना कसरत करून बाप्पांना निरोप द्यावा लागला.
दीड दिवसांच्या गणपती बाप्पांना मंगळवारी दुपारनंतर रात्री उशिरापर्यंत निरोप देण्यात येत होता. नदी प्रदूषण टाळण्यासाठी हौदांत विसर्जन करण्याकडे कल वाढत असला, तरी अनेक नागरिक नदीमध्येच विसर्जनाला प्राधान्य देतात. गेल्या वर्षी दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर धरणांतून नदीत पाणी सोडण्यात आले नव्हते. परंतु, यंदा धरणे पूर्ण भरली असल्याने विसर्जनासाठी पाणी सोडण्यात येईल, अशी नागरिकांची अपेक्षा होती. परंतु, दुपारनंतर घाटांवर गेलेल्या नागरिकांची निराशा झाली. धरणांतून पाणी सोडण्यात न आल्याने नदीच्या दुर्गंधीयुक्त पाण्यामध्ये गणपती विसर्जनाची नागरिकांची तयारी नव्हती. त्यामुळे, अमृतेश्वर घाट, वृद्धेश्वर-सिद्धेश्वर घाट येथून अनेक नागरिक माघारी फिरले. त्यांनी हौदात मूर्ती विसर्जन करण्यास पसंती दिली.
हौदात मूर्ती विसर्जनासाठी प्रोत्साहन देण्याची पालिकेची भूमिका असली, तरी काही घाटांवर मात्र विरुद्धच चित्र दिसून आले. अमृतेश्वर घाटाच्या पुढील बाजूस बांधण्यात आलेल्या हौदांमध्ये निम्मेच पाणी होते. त्यामुळे, अनेक नागरिकांना मूर्ती विसर्जनासाठी कसरत करावी लागत होती. या ठिकाणी उपस्थित असलेला महापालिकेशी संबंधित एकही अधिकारी-कर्मचारी समाधानकारक उत्तर देऊ शकला नाही. हौदात पाणी भरण्यासाठीचा टँकरच आला नाही, असे मोघम उत्तर दिले जात होते. मात्र, अनेक नागरिकांना हौदावर आडवे झोपून मूर्ती विसर्जन करावे लागले. त्याविषयी, संतप्त भावना व्यक्त केल्या गेल्या.
.......................
महापौरांची बापटांवर टीका
'लाडक्या बाप्पांना निरोप देण्यासाठी नदीमध्ये पाणी सोडणे गरजेचे होते; पण पालकमंत्री गिरीश बापट यांच्या संभ्रमित भूमिकेमुळे नागरिकांमध्ये नाराजी पसरणे स्वाभाविक होते', अशा शब्दांत महापौर प्रशांत जगताप यांनी पालकमंत्र्यांवर टीका केली. तसेच, हौदात पाणी उपलब्ध नसल्याबाबत पालिकेच्या अधिकाऱ्यांना चौकशी करण्यास सांगितले असून, यापुढे पुन्हा ही चूक होणार नाही याची खबरदारी घेतली जाईल, असा निर्वाळाही दिला.
.........................
माजी पालकमंत्रीच बरे!
पुण्याचे पालकमंत्रिपद गिरीश बापट यांच्याकडे गेल्यापासून आपण जुन्या पालकमंत्र्यांच्या 'एक पाऊल पुढे' आहोत, हे दाखविण्याच्या त्यांचा अट्टहास सुरू आहे. पुण्याची पाणीकपात मागे घेण्यासाठी त्यांनी विलंब केल्यानंतर कसबा मतदारसंघाचे प्रतिनिधित्त्व करणाऱ्या पालकमंत्र्यांना दीड दिवसांच्या गणपती विसर्जनासाठी धरणे भरली असूनही पाणी सोडावेसे वाटले नाही. माजी पालकमंत्री अजित पवार यांच्या काळात धरणे भरलेली नसली, तरी गणपती विसर्जनासाठी पाणी सोडण्यात कधीच आडकाठी केली गेली नव्हती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शहरात दोन ठिकाणी पोलिसांना धक्काबुक्की

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

शहरात पोलिसांवरील हल्ल्याचे प्रकार सुरूच असून, सोमवारी पुण्यात वाहनचालकांकडून पोलिसांना धक्काबुक्की आ​णि शिवीगाळ केल्याचे दोन प्रकार घडले. एका कारचालकाने पोलिसांच्या बोटाचा चावा घेऊन पळ काढला तर, दुसऱ्या घटनेत ट्रकचालकाने महिला पोलिसाला धक्काबुक्की करून शिवीगाळ केली.
या प्रकरणी कारचालक अल मुसावीर अजीज मोहम्मद शेख (वय २७, रा. जयजवाननगर,वानवडी) याला अटक केली आहे. तर, ट्रकचालक वसिम युसूफ पटेल (वय ४४, रा. घोरपडी पेठ) फरारी झाला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कोंढवा पोलिसांच्या हद्दीमध्ये सोमवारी दुपारी पोलिस नाईक नीतेश टपके सहकाऱ्यांसह गस्त घातल होते. साईबाबानगर येथील शालीमार सोसायटीजवळ ते आले असता, त्यांना अल मुसावीर शेख हा भररस्त्यात थांबलेला दिसला. त्याच्याकडे टपके यांनी कागदपत्राची मागणी केली. दरम्यान, त्याने टपके यांना ढकलून कार सुरू केली. त्यानंतर कार वेडीवाकडी चालवत पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, टपके यांनी त्याचा पाठलाग करून मिठानगर येथे अडविले. त्याचा राग आल्याने शेखने टपके यांना शिवीगाळ करून बोटाचा चावा घेतला. या प्रकरणी शेखला अटक करण्यात आली आहे. पोलिस उपनिरीक्षक जी. डी. कुल्लाळ तपास करीत आहेत.
दुसऱ्या घटनेत खडक पोलिसांच्या हद्दीत महिला पोलिसाला ट्रकचालकाने धक्काबुक्की केली. या प्रकरणी महिला पोलिस शिपाई भाग्यश्री मोहिते यांनी तक्रार दिली आहे. श्रीमती मोहिते गणेशोत्सवाच्या बंदोबस्तासाठी गुरुवार पेठेतील दलाल चौकात उभ्या होत्या. दुपारी परिसरातून ट्रकवाहतुकीला बंदी आहे. त्यामुळे त्यांनी ट्रकचालक पटेलला ट्रक बाजूला घेण्यास सांगितले. त्याचा राग आल्याने पटेलने त्यांना शिवीगाळ आणि धक्काबुक्की केली आणि तो पळून गेला. या प्रकरणी खडक पोलिस तपास करत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

राज्यात टँकर सुरूच

$
0
0

पुणे, सातारा, सांगली, नगरमध्ये पाणी टंचाई कायम

म. टा. प्रतिनिधी, पुणे

धरणांतील अपुरा पाणीसाठा आणि पावसाची हुलकावणी यामुळे निर्माण झालेल्या भीषण पाणीटंचाईवर वरुणराजाने सुखद फुंकर घातल्याने टंचाईचे संकट दूर झाले आहे. यंदा झालेल्या पावसामुळे मराठवाड्यासह विदर्भ, नाशिक, अमरावतीमधील टँकर पूर्णतः बंद झाले असून, धरणेही भरली आहेत. पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, सातारा, सांगली व नगर जिल्ह्याचा काही भाग मात्र अजून टंचाईग्रस्त आहे. या जिल्ह्यांत १८५ टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे.

उन्हाळ्यामध्ये राज्यातील तब्बल पाच हजार गावांना पाणीटंचाईने ग्रासले होते. ही गावे आणि वाड्या-वस्त्यांना सहा हजारहून अधिक टँकरने पाणीपुरवठा करण्याची वेळ सरकारवर आली होती. त्यातही मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये भीषण पाणीटंचाई जाणवत होती. या टंचाईवर मात करण्यासाठी रेल्वेने पाणीपुरवठा करण्यापर्यंतच्या उपाययोजना करण्यात आल्या.

पाणीटंचाईमुळे हैराण झालेल्या मराठवाड्यातील अनेक कुटुंबांनी अन्य जिल्ह्यांत स्थलांतर करण्याचा मार्ग पत्करला. ही कुटुंबे पावसाची अतुरतेने वाट पाहत होती आणि अपेक्षेप्रमाणे पावसाने राज्यभर सर्वदूर हजेरी लावली. या पावसामुळे मराठवाडा, विदर्भासह नाशिक, अमरावती विभागातील जिल्ह्यांतील पाणीटंचाई दूर झाली. मात्र, काही रब्बी तालुक्यांमध्ये अद्याप पुरेसा पाऊस झालेला नाही. त्यामध्ये पुणे, सातारा, सांगली, सोलापूर तसेच नगर या जिल्ह्यांतील तालुक्यांचा समावेश आहे. अपुरा पाऊस झाल्यामुळे या ठिकाणांवर टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे.

पुणे जिल्ह्यातील २१ गावे व २६६ वाड्यांना पाणीटंचाई भासत आहे. या गावांना ३४ टँकरने पाणी देण्यात येत आहे. सांगली जिल्ह्यात ४६ गावे व १९८ वाड्यांना ४० टँकरने पाणी द्यावे लागत आहे. सातारा जिल्ह्यात दोन व सोलापूरमध्ये एक टँकर सुरू आहे. नगर जिल्ह्यात ३० गावे व १५८ वाड्या टंचाईशी सामना करीत आहेत. या गावांना ४६ टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे.

मराठवाड्यातील बीड व उस्मानाबाद जिल्ह्यातील काही भागात अपुरा पाऊस झाला आहे. त्यामुळे या जिल्ह्यांत अनुक्रमे २९ व ३० टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. उन्हाळ्यात या दोन्ही जिल्ह्यांत टँकरची संख्या लक्षणीय होती. पुणे, सांगली व नगरमधील टँकर सुरू असलेला भाग रब्बीचा आहे. त्यामुळे परतीच्या पावसानंतर तेथील टँकर बंद होतील अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

जिल्हा - टंचाईग्रस्त गावे/वाड्या - टँकर
पुणे - २१ गावे, २६६ वाड्या - ३४
सांगली - ४६ गावे, १९८ वाड्या - ४०
सातारा - २ - १
सोलापूर - - १
नगर - ३० गावे, १५८ वाड्या - ४६

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ध्व​निप्रदूषणावर ‘अॅप’ची नजर

$
0
0

गोंगाटाच्या भागातील नोंदी सार्वजनिक करण्याची सोय

म. टा. प्रतिनिधी, पुणे

दहीहंडीपासून सुरू झालेला उत्साही जल्लोष गणपती, दिवाळी आदी सणांच्या काळात शिगेला पोहोचतो. याच काळात उत्साहाबरोबरच ध्वनिप्रदूषणाचीही पातळी नकळत वाढत जाते. उत्सवांच्या नावाखाली वाढणारा गोंगाट मानवी आरोग्यासाठी अतिशय धोकादायक ठरू शकतो. हा धोका समजून घेण्यासाठी आता कोणत्याही सरकारी अहवालाची वाट पाहण्याची आवश्यकता असून, मोबाइलमध्ये डाउनलोड केलेले अॅप आसपासच्या ध्वनिप्रदूषणाची पातळी दाखवेल.

या अॅपमध्ये दिसणाऱ्या ध्वनीच्या पातळीवरून ध्वनिप्रदूषण करणाऱ्या मंडळांपासून सुरक्षित अंतरही राखणे शक्य होणार आहे. पुण्यातील मिंट सोल्युशन्स या कंपनीने 'पुणे नॉइज पोल्युशन मॉनिटर' हे अॅप विकसित केले असून, गुगल अॅप स्टोअरवरून ते मोफत डाउनलोड करता येते. 'शहरातील रिक्षाचालकांना ध्वनिप्रदूषणामुळे ऐकू कमी येण्याचा त्रास असल्याचे लक्षात आल्यावर या समस्येवर तोडगा काढण्यासाठी अॅप तयार करण्याची कल्पना मनात आली,' असे कंपनीचे संचालक उदय कोठारी यांनी सांगितले.

रहदारी किंवा गोंगाटाच्या ठिकाणी अॅप सुरू केल्यास काही सेकंदांतच डेसिबलमधील आवाजाची पातळी आपल्याला समजू शकते. ध्वनिप्रदूषण आरोग्याच्या दृष्टीने धोकादायक असल्यास तशी अॅपवरील आकडेवारीही सूचनांच्या माध्यमातून दिली जाते. हे अॅप सुरू केल्यावर मोबाइलने घेतलेल्या नोंदी गूगल मॅपवरही दिसू लागतात, असेही कोठारी म्हणाले. 'गूगल मॅपवर नोंद झालेल्या ध्वनिप्रदूषणाची आकडेवारी पाहून ज्येष्ठ नागरीक, लहान मुले, गर्भवती स्त्रिया यांना गणपतीच्या दिवसांत कोणत्या भागात जाणे टाळावे याची कल्पना येऊ शकते,' असेही ते म्हणाले.

नोंदींमध्ये अचूकता असावी यासाठी अॅप विकसित करताना सर्व प्रकारच्या मोबाइलच्या चाचण्या घेण्यात आल्या आहेत. आपल्या भागातील ध्वनिप्रदूषणाबाबत नागरिकांमध्ये आणि सार्वजनिक मंडळांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी अॅपद्वारे घेतलेल्या नोंदी सार्वजनिक कराव्यात असे आवाहनही कोठारी यांनी केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जनतेचे रक्षकच असुरक्षित

$
0
0

पोलिसांच्या 'ऑन ड्युटी' मृत्यूंत वाढ

म. टा. प्रतिनिधी, पुणे
नागरिकांच्या सुरक्षिततेची जबाबदारी असलेले पोलिसच राज्यात असुरक्षित असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. राज्यात पोलिसांवरील वाढते हल्ले हा चर्चेचा विषय बनला असतानाच 'ऑन ड्युटी' पोलिसांच्या मृत्यूंमध्ये होत असलेली वाढ चिंतेचा विषय ठरली आहे. पोलिसांच्या अपघाती आणि नैसर्गिक मृत्यूंत सर्वाधिक वाढ होत असून ताणतणाव, व्यायामाचा अभाव, अपुरी झोप यामुळे नैसर्गिक मृत्यू मोठ्या संख्येने होत आहेत. देशात उत्तर प्रदेश खालोखाल महाराष्ट्रात सर्वाधिक पोलिसांचे मृत्यू झाले असून, त्यामध्ये पोलिस शिपाई आणि नाईक यांचा समावेश आहे.

'नॅशनल क्राइम रेकॉर्ड ब्यूरो'ने (एनसीआरबी) नुकत्यात प्रकाशित केलेल्या वा​र्षिक अहवालात पोलिसांवरील हल्ले आणि त्यांच्या मृत्युबद्दलची माहिती दिली आहे. त्यामध्ये देशात सर्वाधिक पोलिसांचे मृत्यू आणि हल्ले हे उत्तर प्रदेशमध्ये होत असून, त्याच्या खालोखाल अनुक्रमे महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये होत असल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे. देशात गेल्या वर्षात ३,४८६ पोलिस जखमी झाले आहेत, तर ७३७ जण शहीद झाले आहेत. गुजरातातेतील पटेल आंदोलनासह विविध ठिकाणी झालेल्या हिंसाचारामुळे गुजरातमधील पोलिसांवरील हल्ले वाढले आहेत.

महाराष्ट्रात विशेषतः ठळकपणे फारशी आंदोलने झाली नसली, तरी पोलिसांवरील वाढणारे हल्ले चिंताजनक आहे. नागरिकांमध्ये पोलिसांमध्ये असलेली भीती कमी होत असल्याचे हे द्योतक असून 'पोलिसिंग'साठी हे चांगले चिन्ह नसल्याची प्रतिक्रिया उच्चपदस्थ अधिकाऱ्यांकडून व्यक्त होत आहे.

बडोदा येथे सराईत गुन्हेगाराला पकडण्यासाठी गेलेल्या पुणे पोलिसांवर बेछूट गोळीबार करत दोघे जायबंदी झाल्याची घटना नुकतीच घडली आहे. त्यानंतर चतुःश्रृंगी टेकडीवर पोलिसांवर एअरगनमधून गोळीबार करण्यात आला. वाहतूक पोलिस आणि नागरिकांमध्ये अनेकदा चकमकी झडत असून पोलिसांना मारहाण करण्यात येत असल्याच्या घटना घडत आहेत. या घटनांच्या पार्श्वभूमीवर राज्यातील पोलिसांवरील वाढते हल्ले हा चिंतेचा विषय बनला आहे.

पोलिस दलांमध्ये सर्वाधिक मृत्यू हे ४५ ते ६० वयोगटातील पोलिस कर्मचारी-अधिकाऱ्यांचे आहेत. त्यामध्ये ​बिनहत्यारी पोलिसांमधील मृत्यू सर्वाधिक असून त्याला जीवनशैली कारणीभूत असल्याचे निरीक्षण उच्चपदस्थ अधिकाऱ्यांनी नोंदवले आहे. नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात सर्वाधिक ३५ मृत्यू हे छत्तीसगडमध्ये झाले आहेत. तर दहशतवादी हल्ल्यात छत्तीसगड (९), जम्मू काश्मीर (८), झारखंड (८) महाराष्ट्र (२), मेघालय (४) पंजाब (४) असे मृत्यू झाले आहेत.


पोलिसांच्या मृत्युंबाबत काही निरीक्षणे

- पोलिस शिपायांचे सर्वाधिक ४२२ मृत्यू.
- एकूण ७३७ मृत्यूंमध्ये ६१६ मृत्यू हे अपघाती आहेत.
- सीमेवर लढताना तिघांचा मृत्यू झाला असून, त्यात दोघे शिपाई तर एक फौजदार आहे.
- नक्षलवादी, दहशतवादी आणि गुन्हेगारांकडून अनुक्रमे ३६, ३८ आणि ३९ पोलिस शहीद झाले आहेत.
- गेल्या वर्षभरात ३,४८६ पोलिस देशभरातील विविध घटनांमध्ये जखमी झाले आहेत.
- देशभरात उसळलेल्या विविध दंगलींत, तसेच गुन्हेगारांकडून अनुक्रमे १,५०१ आणि १,१४५ पोलिस जखमी झाले आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर अपघात; २ ठार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी । पिंपरी

मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर लोणावळा येथे सुमो गाडी नाल्यात कोसळून झालेल्या अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाला आहे, तर सहाजण गंभीर जखमी झाले आहेत. अपघातग्रस्त प्रवासी मुंबईतील गोरेगाव येथील राहणारे असल्याचं समजतं.

सकाळी सात वाजण्याच्या सुमारास हा अपघात घडला. अपघातग्रस्त सुमो मुंबईच्या दिशेनं चालली होती. भरधाव वेगात असलेली ही गाडी चालकाचा ताबा सुटल्यानं मुंबई-पुणे या दोन्ही लेनच्या मध्ये असलेल्या गार्डनमधील नाल्याचा सिमेंटचा कठडा तोडत ही थेट २० फूट खोल नाल्यात पडली.

मृतांमध्ये एक पुरुष व एका महिलेचा समावेश आहे. जखमींमध्ये १ पुरुष, दोन महिला, दोन मुले व एक मुलगी यांचा समावेश असल्याचं खंडाळा महामार्ग पोलिसांनी सांगितलं. दुर्घटनेची माहिती मिळताच महामार्गचे पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांनी घटनास्थळाला भेट देऊन पहाणी केली. जखमींना निगडी येथील लोकमान्य रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. त्यांची नावं अद्याप समजू शकलेली नाहीत.

दोन वर्षांपूर्वी याच नाल्यात पोलिसांची एक व्हँनदेखील पडली होती. यानंतर महामार्ग पोलिसांनी अपघाताच्या ठिकाणी शास्त्रोक्त पद्धतीचा कठडा व क्रॅश बँरियर आदी सुरक्षेच्या उपाययोजना करण्याबाबत प्रशासनाला पत्र दिले होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

हतबल शेतकरी, दुर्बल कष्टकरी

$
0
0

Sunil.Landge@timesgroup.com

पिंपरी : पिंपरी-चिंचवड आणि परिसरात औद्योगिक विकास होत असताना येथील शेतकरी हतबल आणि कष्टकरी दुर्बल होत असल्याचे दिसून येते. गेल्या अनेक महिन्यांपासून प्रलंबित असलेल्या या दोन्ही दुर्लक्षित घटकांच्या प्रश्नांकडे गांभीर्याने पाहण्याची गरज व्यक्त होत आहे.

महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या (एमआयडीसी) पाचव्या टप्प्यासाठी चाकण आणि परिसरातील जमीन संपादित केली जाणार आहे. गेल्या १८ महिन्यांपासून दरमहा वेतनापासून हिंदुस्थान अँटिबायोटिक्स (एचए) कंपनीतील कामगार वंचित आहेत. याव निमित्ताने शेतकरी आणि कष्टकरी कामगारांचा प्रश्न ऐरणीवर आहे. राज्यात सगळीकडे गणेशोत्सवाच्या माध्यमातून आनंदसोहळा साजरा होत असताना, हे दोन्ही घटक मात्र समस्यांनी त्रस्त आहेत. त्याकडे गांभीर्याने लक्ष देणे आवश्यक आहे. विशेषतः राजकीय पातळीवर या प्रश्नांची सोडवणूक होण्याच्यादृष्टीने पाठपुरावा आवश्यक आहे.

शेतकऱ्यांचे प्रश्न आजचे नाहीत. शहर आणि परिसराचा विचार करता सैन्य अभियांत्रिकी महाविद्यालय (सीएमई), एमआयडीसी, रेडझोन, नवनगर विकास प्राधिकरण, महापालिका विकास आराखडा, पवना थेट जलवाहिनी, हिंजवडी आयटी पार्क या माध्यमातून विकास होत असताना येथील मूळ शेतकऱ्यांच्या जमिनी मोठ्या प्रमाणावर संपादित झाल्या आहेत. त्या तुलनेने मोबदला मात्र अगदी नगण्यच मिळालेला आहे. आता पिंपरी-चिंचवडसह, तळेगाव, चाकण, हिंजवडी या भागांमध्ये अजूनही जागा संपादित करण्याचे प्रस्ताव पुढे येत आहेत. शहराच्या महापूरात शेतकरी वाहून गेला आहेच. त्यात आता उरलासुरला शेतकरीही ओढण्याचे प्रयत्न चालू आहेत. कोणत्याही शहराचा विकास होताना त्यासाठी जागेची नितांत आवश्यकता असतेच. मात्र, ही जागा संपादित करताना संबंधित जमीन मालकांवर अन्याय होऊ नये, अशी अपेक्षा असते. याच्या नेमकी उलट परिस्थिती निर्माण होते. शेतकरी भरडला जातो. दलाल, उद्योजक आणि व्यावसायिकांची आर्थिक भरभराट होते.

उदाहरणच द्यायचे झाले, तर शहरात नवनगर विकास प्राधिकरणाची स्थापना झाली. तिचा मूळ उद्देश सर्वसामान्य आणि गरजूंना परवडेल अशा दरांमध्ये भूखंड आणि सदनिका उपलब्ध करून देणे हाच आहे. परंतु, गेल्या ४० वर्षांत प्राधिकरणाने कोणाचे भले केले हे वेगळे सांगण्याची गरज नाही? शेतकऱ्यांकडून जमिनी घेऊन त्यांचा अक्षरशः व्यापार केला. त्यांच्या या कृतीने शेतकरी तर बुडालेच. मात्र, त्यांच्या पुढील कित्येक पिढ्या बरबाद झाल्या. याची फिकीर झोपेचे सोंग घेतलेल्या राज्यकर्त्यांना आणि प्रशासनाला नाही. त्यामुळे न्याय तरी कुठे मागायचा? या संभ्रमावस्थेत शेतकरी आहेत. कोर्टाची पायरी चढण्याची हिंमत सर्वसामान्य नागरिक करीत नाहीत. पोलिसांकडे दाद मागायला धजावत नाहीत. पवना जलवाहिनीच्या विरोधात आंदोलनाच्या वेळी तीन शेतकऱ्यांचे नाहक बळी गेल्याची घटना आठवल्यास अजूनही अंगावर शहारे येतात. कुंपणच शेत खाणार असेल तर राखण करायची तरी कशी? या चिंतेने शेतकरी ग्रासला आहे.

अशीच परिस्थिती कष्टकरी आणि कामगारांची आहे. शहरातील अनेक कंपन्या बंद झाल्या. त्यामुळे कामगार देशोधडीला लागले. कंपन्यांच्या जागेवर बड्या बिल्डरांच्या गृहयोजना झाल्या. तेथे उच्चभ्रू सोसायट्या झाल्या. त्या अलिशान घरांसमोर अजूनही गरवारे कंपनीचा कामगार आंदोलन करत आहे. न्याय मिळेल या अपेक्षेने वाट पाहत उभा आहे. त्याची खंत ना सरकारला, ना उद्योजकाला, ना प्रशासनाला. शहरात जवळपास ३५ हून अधिक ठिकाणी औद्योगिक कंपन्यांच्या जागी मोठे गृहप्रकल्प साकारले आहेत. त्यातून उद्योजक, बिल्डर गर्भश्रीमंत झाले. ते पाहताना शेतकरी, कष्टकरी यांच्या डोळ्यांत अश्रू नक्कीच येणार.

औद्योगिक मंदीचे मळभ अद्यापही दूर झालेले नाही. एकापाठोपाठ एक उद्योग बंद होत आहेत. लघुउद्योजक मेटाकुटीला आले आहेत. बेरोजगारीमुळे सामाजिक स्वास्थ्य बिघडले आहे. क्राईमच्या घटनांनी डोके वर काढले आहे. या सर्वांवर तोडगा निघावा, अशी अपेक्षा राजकीय व्यक्तींकडून असते. मात्र, तेही निवडणुकीच्या रणनितीमध्ये व्यस्त आहेत. त्यामुळे शेतकरी आणि कष्टकरी स्वतःच पुढाकार घेऊन आंदोलने करू लागले आहेत. त्यामुळे गणेशोत्सवाचा आनंदसोहळा साजरा होताना या कामगार आणि शेतकऱ्यांच्या च्या एका डोळ्यात हसू, तर दुसऱ्या डोळ्यात अश्रू आहेत. हे प्रश्न सोडविण्याची सुबुद्धी राज्यकर्त्यांना दे, अशी प्रार्थना ते करीत आहेत.

'एचए'चा प्रश्न प्रलंबित

एचए कंपनीतील कामगारांच्या बाबतीतही गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. गेल्या १८ महिन्यांपासून कामगारांना वेतन मिळालेले नाही. त्यामुळे कुटुंबीयांच्या उदरनिर्वाहाचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. राजकीय पातळीवर आश्वासनांची खैरात होते आहे. बैठकांचा फार्स चालू आहे. मात्र, ठोस उपाय निघत नाही. गेले सुमारे दीड वर्षे एचए कंपनीच्या वेतनाचा प्रश्न सुटलेला नाही.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


आयटी कंपन्यांना मिळकतकरात सूट

$
0
0

काँग्रेसचा विरोध डावलून 'स्थायी'त प्रस्ताव मान्य

म. टा. प्रतिनिधी, पुणे

महापालिका हद्दीतील आयटी कंपन्यांना मिळकत करात (प्रॉपर्टी टॅक्स) सवलत देण्याचा निर्णय मंगळवारी स्थायी समितीच्या बैठकीत घेण्यात आला. आयटी कंपन्यांकडून व्यावसायिक दराऐवजी निवासी दराने करवसुली करण्यास काँग्रेसचा विरोध डावलून हा प्रस्ताव मान्य करण्यात आला. आयटी कंपन्यांना सवलत देण्याच्या निर्णयामुळे पालिकेला दर वर्षी ६५ कोटी रुपयांचा भुर्दंड सहन करावा लागणार आहे.

आयटी उद्योगाला प्रोत्साहन मिळावे, यासाठी राज्य सरकारने २००३मध्ये आयटी कंपन्यांना विविध सवलती जाहीर केल्या. त्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांनी आयटी कंपन्यांकडून व्यावसायिक दराऐवजी निवासी दराने मिळकतकराची आकारणी करावी, असे स्पष्ट केले होते. ही मुदत तीन वर्षांची असावी, असा उल्लेखही त्यामध्ये होता. त्याच आधारे प्रशासनाने ७०० आयटी कंपन्यांना फायदा देऊन निवासी दराने मिळकत कर वसुलीला सुरुवात केली होती. तीन वर्षांनंतर ही सवलत बंद करणे गरजेचे असताना दुर्लक्ष करून २००६नंतरही सवलत सुरूच ठेवण्यात आली.

आयटी कंपन्यांना सवलत दिल्याने पालिकेचा महसूल बुडत असल्याचे समोर आल्याने तत्कालीन आयुक्तांनी २००९नंतर शहरात आलेल्या आयटी कंपन्यांकडून व्यावसायिक दराने करवसुलीची पद्धत अवलंबली. शहरात २०१५पर्यंत १६४ आयटी कंपन्या होत्या. पूर्वीच्या ७०० आणि त्यानंतर नव्याने आलेल्या १६४ अशा ८६४ कंपन्यांकडून व्यावसायिक दराने मिळकतकर वसुली करण्यात आल्याने वाद निर्माण झाला होता. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने ऑगस्ट २०१५मध्ये आयटी धोरण जाहीर केले. यामध्ये पालिका हद्दीतील आयटी कंपन्यांना सवलत देण्याची सूचना केली होती. याचा आधार घेऊन पालिका प्रशासनाने आयटी कंपन्यांसाठी सवलतीचा प्रस्ताव स्थायी समितीसमोर ठेवला होता.

गेले दोन ते तीन आठवडे हा प्रस्ताव समितीकडे प्रलं‌बित होता. मंगळवारी झालेल्या बैठकीत आयटी कंपन्यांना सवलत देण्यास काँग्रेसने विरोध केला. त्यामुळे मतदान घेऊन हा प्रस्ताव मंजूर करण्यात आल्याचे समितीचे अध्यक्ष बाळासाहेब बोडके यांनी सांगितले. बारा विरुद्ध तीन या फरकाने हा विषय मान्य करण्यात आला.

काँग्रेसचा तीव्र विरोध

आयटी कंपन्यांना थेट सवलत देण्यास काँग्रेसने विरोध केला. आयटी कंपन्यांना दिल्या जाणाऱ्या सवलतीचा भार महापालिकेवर पडणार असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते अरविंद शिंदे यांनी केला. एका बाजूला पुणेकरांच्या पाणीपट्टीत वाढ करून आयटी कंपन्यांवर सवलतींची खैरात केल्याबाबत त्यांनी नाराजी व्यक्त केली. 'आयटीला सूट आणि पुणेकरांची लूट' सुरू असल्याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हस्तक्षेप करण्याची मागणी करणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

येरवडा तुरुंगातील कैदी उपोषणाच्या पावित्र्यात

$
0
0

पॅरोल, फर्लो रजा मिळणार नसल्याचा गैरसमज

म. टा. प्रतिनिधी, पुणे
शिक्षा झालेल्या कैद्यांना पॅरोल आणि फर्लोची रजा मिळणार नसल्याचा गैरसमज झाल्यामुळे येरवडा जेलमधील कैदी उपोषणाच्या पावित्र्यात आहेत. मात्र, जेल प्रशासनाने ही बाब समजून सांगितल्यानंतर काहींनी आंदोलन मागे घेतले असले, तरी अद्याप काही कैदी उपोषणावर ठाम आहेत.

बलात्कार, खून, दरोडा, अंमली पदार्थांची तस्करी, लहान मुलांचे अपहरण अशा गुन्ह्यांत aशिक्षा झालेल्या कैद्यांना राज्य सरकारने देण्यात येणारी पॅरोल आणि फर्लोची रजा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यातील तुरुंगांमध्ये असे साडेपाच हजार कैदी आहेत. गंभीर गुन्ह्यांत पॅरोल अथवा फर्लो मिळाल्यानंतर दोनशे कैदी फरारी झाल्याचे समोर आले आहे. या पार्श्वभूमीवर सरकारने हा निर्णय घेतला आहे. त्यामुळे येरवडा तुरुंगातील कैद्यांचा यापुढे पॅरोल आणि फर्लोची सुट्टी मिळणार नसल्याचा गैरसमज झाला. त्यामुळे त्यांनी दोन दिवसांपासून उपोषणाला सुरुवात केली.

उपोषणानंतर काही कैद्यांचा गैरसमज दूर करण्यात तुरुंग प्रशासनाला यश मिळाले आहे. मात्र, काही कैदी अद्याप त्यांच्या म्हणण्यावर ठाम आहेत. त्यांनी जेवणास नकार दिला आहे. तुरुंगाधिकाऱ्यांनी त्यांची समजूत काढून निवेदन सादर करण्याचा सल्ला दिला. त्यानंतर कैद्यांनी राज्य सरकारच्या नावाने तुरुंग प्रशासनाकडे निवेदन दिले आहे. फर्लो आणि पॅरोल सुटी ही अनुक्रमे २८ आणि ९० दिवसांचीच ठेवावी. तसेच, जे कैदी यापूर्वी फर्लो अथवा पॅरोल रजेवर बाहेर जाऊन परत आले आहेत, त्यांना आगामी काळातही फर्लो अथवा पॅरोल देण्यात यावा, अशा मागण्या त्यांनी नमूद केल्या आहेत.

या बाबत येरवडा तुरुंगाचे अधीक्षक यू. टी. पवार यांनी सांगितले, की 'पॅरोल आणि फर्लोच्या नवीन नियमांसदर्भात तुरुंगातील कैद्यांनी उपोषण करण्याची धमकी दिली. त्यानंतर त्यांना सर्व संबंधित बाबती समजावून सांगण्यात आल्या. मंगळवारी त्यांना जेवण देण्यात आले. त्यांनी दिलेले निवेदन सरकारकडे सुपूर्द करण्यात येईल.'

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

एक्स्प्रेसवेवर वाहने सुसाटच

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर धावणाऱ्या बहुतांश वाहनांचा वेग हा किमान ८० च्या पुढेच असल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले. एक्स्प्रेस वेवरील एका लेनमधून मंगळवारी रात्री आठ ते बुधवारी सकाळी दहा वाजेपर्यंत २१०० गाड्यांनी वेगमर्यादा धुडकावून वाहने ८० पेक्षा जास्त वेगान पळविल्याचे निदर्शनास आले. त्यांपैकी काही गाड्यांचा वेग हा ताशी १४० ते १५० किमी वेग होता.

एक्स्प्रेस वेवर ड्रोनद्वारे पाहणी केल्यानंतर मंगळवारपासून सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या माध्यमातून बेशिस्त वाहनांवर नजर ठेवली जात आहे. मंगळवार आणि बुधवार असे दोन दिवशी ही पाहणी केली जाणार आहे. मळवली येथील पुलावर एक सीसीटीवही कॅमेरा बसविण्यात आला आहे. त्याद्वारे एका लेनवरील वाहनांचा अभ्यास केला जात आहे. या एका लेनवर गेल्या १४ तासात २१०० वाहनांनी वेगमर्यादा ओलांडल्याचे दिसून झाले. ऑटोमॅटिक नंबर प्लेट ट्रॅकिंगच्या माध्यमातून या वाहनांचे नंबर टिपण्यात आले आहेत, अशी माहिती ही पाहणी करणाऱ्या तन्मय पेंडसे यांनी 'मटा'ला दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

​अमेरिकेतील आमचा बाप्पा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
परदेशी गेलेले मराठीजन वास्तव्यास असतील त्या ठिकाणी आपली संस्कृती, सण साजरे करण्याचा प्रयत्न करतात. मराठी माणूस सातासमुद्रापार गेला, तरी आपली संस्कृती आणि परंपरा विसरत नाही. हेच यातून पहायला मिळते. यापैकीच एक आहेत मूळच्या पुण्याच्या भक्ती गोगटे.
भक्ती या संगणक विषयातील तज्ज्ञ असून गेल्या ४ वर्षांपासून नोकरीच्या निमित्ताने अमेरिकेतील आयडाहो राज्यातील बॉय्सी या शहरात त्या वास्तव्यास आहेत. आपल्या घरी गणपतीची प्राणप्रतिष्ठा करण्याची परंपरा भक्ती यांनी अमेरिकेत गेल्यावरही सुरू ठेवली आहे. गेल्या तीन वर्षांपासून त्या आपल्या घरी गणेशाची प्रतिष्ठापना करत भक्तिभावाने गणेशोत्सव साजरा करतात. विशेष म्हणजे 'श्रीं'ची मूर्ती पर्यावरणपूरक असावी, यासाठी त्या स्वतः मातीपासून मूर्ती बनवितात. गणरायाची सजावटही नैसर्गिक असावी याकडे त्यांचे खास लक्ष असते. 'भारतापासून दूर असलो तरीही सण-उत्सवाच्या निमित्ताने आम्ही परंपरेशी जोडले गेलो आहोत, अशी भावना तर येतेच याबरोबर येथे असलेल्या परदेशी नागरिकांनाही आपल्या परंपरांबद्दल माहिती मिळते,' असे भक्ती आवर्जून सांगतात.
भक्ती यांचे पती विश्वेश गोगटे व मुलगा पार्थ गोगटे हेदेखील अमेरिकेत आहेत. वि‍श्वेश गोगटे हे नोकरीनिमित्त तर पार्थ शिक्षणासाठी दुसऱ्या प्रांतात असतात. 'गणपतीच्या काळात कुटुंब एकत्र येते. गणरायाच्या आगमनामुळे घरामध्ये चैतन्यदायी, आनंददायी वातावरण असते. गणरायाच्या स्वागताची तयारी काही दिवस आधी सुरू करते. श्रींची मूर्ती साकार करण्यातला आनंद काही वेगळाच असतो. यंदा गणेशोत्सवासाठी पुण्यातून आई आल्याने आनंद द्विगुणित झाला आहे,' अशी भावना भक्ती यांनी व्यक्त केली.

भारतापासून दूर असलो तरीही सण-उत्सवाच्या निमित्ताने आम्ही परंपरेशी जोडले गेलो आहोत. यानिमित्ताने परदेशी नागरिकांनाही आपल्या परंपरांबद्दल माहिती मिळते. गेली तीन वर्षे आम्ही गणेशोत्सव साजरा करत आहोत. श्रींची मूर्ती पर्यावरणपूरक असावी; तसेच सजावटही नैसर्गिक असावी, याकडे आम्ही लक्ष देतो. गणरायाच्या आगमनामुळे घरामध्ये चैतन्य निर्माण झाले आहे.
- भक्ती गोगटे

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

​शक्तिगणेश

$
0
0

आनंद कानिटकर
---
इसवी सनाच्या नवव्या, दहाव्या शतकापासून गणपतीचे महत्त्व वाढू लागले होते, हे शिलालेख, मंदिरे इ. भौतिक पुराव्यावरून आपल्याला दिसते. ते विविध पुराणांतूनही दिसते. यापूर्वीच शैव, वैष्णव शाक्त व सौर हे पंथ उदयाला आले होते. गणपती शिवपरिवार देवता म्हणून गणला गेला असला, तरी दहाव्या शतकापासून त्याचा स्वतंत्र 'गाणपत्य पंथ' उदयाला येत असलेला आढळतो. या प्रत्येक पंथात तिची प्रमुख देवता सर्वोच्च मानली आहे. याच गाणपत्य पंथाची पुराणे म्हणजे गणेश पुराण आणि मुद्गल पुराण. या पुराणांची रचना साधारणपणे १२ व्या ते १४ व्या शतकात झाली असावी, असे संशोधकांचे मत आहे. या पुराणांनुसार गणेशाचे विविध अवतार मानले गेले आहेत. त्याच्या विविध असुरांबरोबरच्या युद्धाच्या पराक्रमकथाही या पुराणांमध्ये आहेत.
अशा रीतीने गणेशाची एका स्वतंत्र देवता स्वरूपात उपासना होत असताना त्याला इतर देवांप्रमाणेच त्याच्या शक्तीसह दाखवण्यात येऊ लागले. शैव पंथातील शिवपार्वती किंवा वैष्णव पंथातील लक्ष्मीनारायण यांच्या एकत्र मूर्तींप्रमाणेच गणेशाची त्याच्या शक्तीसह मूर्ती घडवण्यात येऊ लागली. या मूर्तींना शक्तिगणेश असे संबोधले जाते. गणेशाच्या लक्ष्मीगणेश, महागणपती, उच्छिष्ठ गणपती, ऊर्ध्वगणपती आणि पिंगल गणपती या मूर्तींचा समावेश शक्तिगणेश या संकल्पनेमध्ये करतात.
शक्तिगणेशाच्या मूर्ती कमी आढळतात. लखनऊ, झाशी व भोपाळ येथील संग्रहालयांमध्ये शक्तिगणेशाच्या काही मूर्ती ठेवलेल्या आहेत. झाशी येथील संग्रहालयातील शक्तिगणेशाच्या एका मूर्तीतील गणेश चार हातांचा असून त्याच्या शक्तीला दोन हात दाखवले आहेत. त्यांच्या हातात परशू, लाडू, कमळ दाखवलेले आहे. पुणे येथील त्रिशुंड गणपतीची मूर्ती ही शक्तिगणेशाची आहे. येथील सहा हातांच्या गणपतीच्या मांडीवर त्याची शक्ती स्त्री रूपात दाखवलेली आहे. येथे एक लक्षात घेतले पाहिजे, की जरी वैनायकी ही गणेशाची शक्ती म्हणून स्वतंत्रपणे मूर्तीरूपात दाखवलेली असली, तरी देखील शक्तीगणेश या स्वरूपामध्ये शक्तीला गजमुख दाखवण्यात येत नाही.
मंदसोरजवळ सापडलेली १०व्या शतकातील शक्तिगणेशाची सुंदर मूर्ती भोपाळ येथील संग्रहालयात ठेवलेली आहे. या मूर्तीतील गणेश आणि शक्ती उभे असून त्यांच्या आजूबाजूला गण दाखवलेले आहेत. यातील गणेश हा चतुर्हस्त असून त्याच्या हातातील परशू दिसतो. शक्तीची मूर्ती दोन हातांची दाखवलेली आहे. या दोन्ही मूर्ती सालंकृत आहेत.
दहा हातांचा आणि पाच सोंडांचा गणपती हे महागणपतीचे लक्षण आहे. विशेषतः भारताच्या पूर्व भागात या मूर्ती मिळाल्या आहेत. पाल राजांच्या काळातील महागणपतीची मूर्ती विशेष नमूद करण्यासारखी आहे. यातील गणपतीच्या हातात गदा, त्रिशूल, चक्र, सर्प, कमळ इ. दाखवले असून सिंहासनाच्या खाली हत्ती व उंदीरही दाखवलेले आहेत. या महागणपतीच्या डाव्या मांडीवर शक्ती बसलेली आहे.
अशा पद्धतीने महागणपतीच्या शेजारी जर लक्ष्मी ही शक्ती म्हणून दाखवलेली असेल, तर त्यास लक्ष्मीगणेश असे म्हणतात. कोणार्क येथे अशी लक्ष्मीगणेशची प्रतिमा मिळाली आहे. या मूर्तीतील लक्ष्मीच्या हातात कमळ दाखवलेले आहे.
अशा या शक्तिगणेशाची उपासना इच्छित गोष्टी प्राप्त करून घेण्यासाठी केली जाते.
(लेखक भारतीयविद्या तज्ज्ञ आहेत.)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

​बाप्पाचे चलन

$
0
0

मंदार लवाटे
-----
काही वर्षांपूर्वी इंडोनेशियाने गणपतीचे चित्र असलेली नोट छापली होती. तर अलीकडे थायलंडने गणपतीचे नाणे छापले आहे. त्यावर चार हाताचा बसलेला गणपती आहे. हे नाणे पुण्यातही पाहावयास मिळते. आपल्याकडे मात्र गणपतीचे नाणे चलनात असल्याला दोनशे वर्षे उलटून गेली आहेत. दुसऱ्या बाजीरावाने १८०४ साली 'ग' असे अक्षर असलेले नाणे पाडले होते. हे नाणे पुण्यातील टाकसाळीत पाडण्यात आले होते. यातील 'ग' अर्थातच गणपती या अर्थाने होता. परंतु, हे नाणे बाजारात स्वीकारले न गेल्याने चलनातून परत घ्यावे लागले. त्यामुळे ही नाणी अत्यंत दुर्मिळ आहेत. गणपती व पंतप्रधान अशी अक्षरे असलेले नाणे याच काळात चलनात होते. यावर फारसी अक्षरे होती. त्याकाळी पुण्यातील टाकसाळीत जी नाणी पाडली जात, त्यावर फारसी मजकूर असे. ही नाणी दिल्लीच्या बादशहाच्या नावाने पडली जात. ती सर्वत्र स्वीकारली जावी अशासाठी बहुधा असे असावे. त्यानुसार या नाण्यावर एका बाजूस शाह आलम गाजी असे शब्द असून त्यावर 'श्री गणपती' अशी अक्षरे आहेत. नाण्याच्या खालील बाजूस हिजरी सनात तारीख असून ती अपूर्ण आहे. त्यामुळे, या नाण्याची कालनिश्चिती करता येत नाही. नाण्याच्या दुसऱ्या बाजूस जुलूस व मैमनत अशी नेहमी फारसी नाण्यावर असणारी अक्षरे आहेत. यावर देवनागरीत 'श्री पंतप्रधान' असे लिहिले आहे. ही नाणी अर्धा व पाव रुपयात उपलब्ध होती. नाण्यांविषयीची सर्व माहिती व नाण्याचे छायाचित्र नाणक शास्त्रातील तज्ज्ञ अरविंद आठवले यांनी उपलब्ध करून दिले आहे. महाराष्ट्रात गणपतीची नाणी पाडली गेली नसली, तरी दक्षिणेत प्रदीर्घ काळ गणपतीची प्रतिमा असलेली नाणी प्रचलित होती. अशी बरीच नाणी पुण्यातील विनायक मारुती आवटे यांच्या संग्रहात आहेत. ही नाणी तांब्याची असून आकाराने छोटी आहेत. एका बाजूस गणपतीची प्रतिमा तर दुसऱ्या बाजूस दाक्षिणात्य लिपीत मजकूर आहे. या नाण्यांचा काळ चौदावे ते अठरावे शतक असा आहे. मदुराई नायक, तंजावर, मैसूर, सेतुपती राजा यांच्याबरोबर मुघल अर्काट यांनी ही नाणी चलनात आणली होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अतूट ऋणानुबंध

$
0
0

गणेशोत्सवाचा आणि माझा अतूट असा ऋणानुबंध आहे. आमच्याकडे घरी मोठ्या उत्साहात हा उत्सव साजरा केला जातो. घरच्या गणपतीच्या आठवणी अगदी लहानपणापासूनच्या आहेत.
----
डॉ. रघुनाथ माशेलकर
.....
आमच्या घरी गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. घरी पाच दिवसांचा गणपती असतो. गणेशोत्सवाची प्रथा पुण्यात आल्यानंतरही सुरू आहे. चौथ्या दिवशी आम्ही आप्तेष्टांना घरी पूजेसाठी बोलावतो. आमच्याकडील आरती म्हणजे एक मोठा सोहळाच असतो. शहरातील विविध मान्यवर त्याला येतात. नेहमीच्या आरत्यांखेरीज खास लिहिल्या गेलेल्या आरत्या आम्ही म्हणतो. ताराबाई बोले यांनी या आरत्या लिहिल्या असून, पद्माकर (पपा) बोले यांनी त्या संगीतबद्ध केल्या आहेत. शशी शहा या अतिशय गोड आवाजात त्या गात असत. पूर्वापार पद्धतीने या आरत्यांचे पठण सुरू आहे. शशीताई आता नाहीत. या आरत्यांची छोटी पुस्तिकाच आम्ही छापून घेतली आहे. ती यंदाच्या कार्यक्रमात आम्ही वितरित करणार आहोत. ताराबाई, पपा बोले आणि शशीताई यांना आम्ही ती पुस्तिका अर्पण केली आहे.

सार्वजनिक गणेशोत्सवही माझ्या आवडीचा. मुंबईत लहानपणी पाहिल्या गणेशोत्सवाच्या आठवणी अजूनही ताज्या आहेत. गिरगावात प्रत्येक गल्लीत सार्वजनिक मंडळांचे गणपती बसविले जात. एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी गणपती पाहायला आम्ही जात असू. सांस्कृतिक कार्यक्रम होत असत. नाटिका बसविल्या जात. साधे, पण आकर्षक देखावे असत. वक्तृत्व स्पर्धा असायची. इतरही अनेक स्पर्धा होत. त्या स्पर्धांमध्ये मी भाग घेत असे. त्यावेळी निर्भेळ करमणूक असायची. लहान मुले नाटिका बसवायची, सांस्कृतिक कार्यक्रम व्हायचे. मात्र, त्यात कुठेही आरडाओरडा वा गोंधळ नव्हता. मला आठवते, की दहावीत असताना मी 'सुंठीवाचून खोकला गेला' हे नाटक लिहिले होते. त्याला शाळेत पारितोषिक मिळाले होते. या नाटकाचे काही प्रयोगही झाले. गणेशोत्सवात सुभाष लेनमधील गणपती पाहावयास गेलो असता, तिथे मला माझ्या नाटकाचा प्रयोग सुरू असताना दिसला. माझ्यासाठी ही खूपच आनंदाची गोष्ट होती. अशा उपक्रमांमधून कल्पनाशक्तीला चालना देण्याचा भाग, संस्कृतीमधील चांगला भाग समाजासमोर येत होता. त्याचे रूप आता बदलले आहे. त्याची आठवण आता परत करून द्यायला हवी.

सार्वजनिक गणेशोत्सव आता मोठ्या प्रमाणावर बदलला आहे. काळानुरूप बदल होतात हे मान्य; परंतु साधेपणा पुरताच हरवला आहे. पूर्वीच्या काळातील गणेशोत्सवात ज्या पद्धतीचे सामाजिक आणि सांस्कृतिक उपक्रम होत, सामाजिक ऐक्य दृढ करण्यासाठी प्रयत्न होत, ते पुढे नेण्याची खरी गरज आहे. माझ्या आठवणीतील गणेशोत्सवात आमच्या परिसरात राहणारी पारशी आणि ख्रिश्चनधर्मीय मंडळीही उत्साहाने सहभागी होत असत. समाजाच्या सर्व स्तरांतील घटकही त्यात असत. उत्सवातील हा सामाजिक आशय पुन्हा अधोरेखित करण्याची गरज आहे.

लोकमान्य टिळकांनी सुरू केलेला हा उत्सव त्याच्या आशयासह टिकविण्याची गरज आहे. स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे, या घोषणेला आता बरोबर शंभर वर्षे झाली आहेत. यंदाच्या गणेशोत्सवाच्या निमित्ताने त्याची आठवण आता आपण सर्वांना करून द्यायला हवी. आपण स्वराज्य मिळविले आहे, आता सुराज्य मिळविण्यासाठी प्रयत्न करणार या भावनेने सर्व सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी आणि जनतेने काम करायला हवे.

भारतात सध्या अनेक मोठ्या, नव्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पांना सुरुवात होत आहे. मेक इन इंडिया, स्किल इंडिया, स्टार्ट अप इंडिया, या योजनांसाठी काम सुरू झाले आहे. त्या अनुषंगाने नागरिकांनीही आपले प्रयत्न सुरू करायला हवेत. हे प्रयत्न गणेशोत्सवाच्या देखाव्यांमधून प्रभावीपणे मांडायला हवेत. त्यातून देखावे पाहायला येणाऱ्या नागरिकांमध्ये जनजागृती होईल. गणेशोत्सव सुरू करताना जनजागृती हा एक महत्त्वाचा विचार लोकमान्य टिळकांच्या मनामध्ये होता. त्या वेळी ब्रिटिशांविरोधात सुरू असलेल्या लढाईचा तो एक भाग होता. आता जनजागृती करताना सुराज्य हा महत्त्वाचा भाग ठरणार आहे. लोकमान्यांच्या स्वराज्याच्या घोषणेच्या शताब्दीपूर्तीच्या निमित्ताने आता ही आठवण पुन्हा करून द्यायला हवी, असे वाटते.

आज काळ बदलला असला, तंत्रज्ञान प्रगत झाले असले, तरी गणेशोत्सवामागील मूळ प्रेरणा जाणून घेऊन सामाजिक ऐक्यासाठी त्याचा उपयोग करायला हवा.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


डेंगी, चिकनगुनियाचा येरवड्यात फैलाव

$
0
0

हॉस्पिटल, दवाखान्यांत पेशंटची गर्दी

म. टा. प्रतिनिधी, येरवडा

ऐन गणेशोत्सवाच्या काळात शहर आणि उपनगरात डेंगी आणि चिकनगुनियाच्या संशयित पेशंटची संख्या झपाट्याने वाढू लागली आहे. त्यामुळे पालिका आणि खासगी दवाखाने, तसेच हॉस्पिटलमध्ये मोठी गर्दी झाली आहे. जवळपास प्रत्येक घरातील एक सदस्य, तसेच लहान मुलांना सर्दी, ताप, खोकला झाला आहे. विशेषतः दाट लोकवस्ती असलेल्या झोपडपट्ट्यांमध्ये डेंगीच्या पेशंटची संख्या लक्षणीय आहे. पालिकेच्या आरोग्य यंत्रणा सुस्त झाल्यामुळे शहरात डेंगीची साथ झपाट्याने वाढत असल्याचा संताप नागरिक व्यक्त करू लागले आहेत.

गेल्या काही दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतल्यामुळे डेंगीचा प्रसार करणाऱ्या डासांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर होऊ लागला आहे. शहर आणि उपनगरांत डेंगी आणि चिकनगुनियाच्या पेशंटची संख्या वाढत आहे; मात्र डासांच्या अळ्यांची पैदास होण्याची ठिकाणे शोधून नष्ट करण्याची पालिकेची मोहीम अपुरी पडत आहे.

पालिकेच्या येरवड्यातील डॉ. राजीव गांधी हॉस्पिटलमध्ये दररोज सुमारे ७०० ते ८०० पेशंट उपचारांसाठी येत आहेत. यापैकी डेंगी आणि चिकनगुनियाची लक्षणे आढळून येणाऱ्या सुमारे पन्नासहून अधिक पेशंटना ससून, नायडू आणि कमला नेहरू हॉस्पिटलमध्ये पाठवत असल्याची माहिती हॉस्पिटलच्या निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. मनीषा सुलाखे यांनी दिली. सर्दी, खोकला, थंडी आणि ताप असणाऱ्या पेशंटची संख्या मोठी असल्याने दररोज शेकडो पेशंट उपचारांसाठी येत आहेत; मात्र हॉस्पिटलमध्ये केवळ तीनच डॉक्टर असल्यामुळे कामाचा अतिरिक्त ताण पडत आहे. त्यामुळे दुपारी बारानंतर हॉस्पिटलचे प्रवेशद्वार बंद केले जाते. हॉस्पिटलमधील पेशंटची संख्या कमी झाल्यानंतर दुपारी दोन वाजता दार पुन्हा उघडले जाते.

पालिकेच्या आरोग्य विभागाकडून परिसरात पूर्ण क्षमतेने औषधफवारणी होत नसल्याने डेंगीची साथ वाढल्याचा आरोप नागरिक करू लागले आहेत. याबाबत पालिकेचे आरोग्यप्रमुख एस. टी. परदेशी यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, तो होऊ शकला नाही.
............

खासगी दवाखान्यांतही गर्दी

येरवडा, विश्रांतवाडी, वडगाव शेरी, चंदननगर आणि खराडी परिसरातील सर्व खासगी दवाखाने आणि हॉस्पिटलही पेशंटच्या गर्दीने ओसंडून वाहू होऊ लागली आहेत. अनेक खासगी डॉक्टर सर्दी, खोकला, तापाचे लक्षणे आढळून येताच पेशंटना रक्त, लघवी तपासणीसाठी लॅबमध्ये पाठवत असल्यामुळे सर्वसामान्य नागरिकांवर आर्थिक बोजा पडत आहे. हमखास गुण येणाऱ्या डॉक्टरांच्या दवाखान्यात दिवसभर गर्दी दिसून येते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

देशी दारूचे दुकान बंद करण्यासाठी महिलांचा मोर्चा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कात्रज

सहकारनगर पोलिस स्टेशनसमोर दारूच्या सेवनामुळे एका इसमाचा मृत्यू झाला. पोलिस स्टेशनसमोरील दारूचे दुकान बंद करण्यात यावे, यासाठी स्थानिक नगरसेविका अश्विनी कदम यांच्या नेतृत्वाखाली महिलांनी पोलिस ठाण्यावर मोर्चा काढला. तसेच दुकान बंद न झाल्यास जनआंदोलन करण्याचा इशारा दिला. युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष अमित बागुल यांनी वरिष्ठ पोलिस निरीक्षक दिलीप निकम यांना भेटून देशी दारूचे दुकान बंद करण्याचे निवेदन दिले.

सहकारनगर पोलिस ठाण्यासमोर देशी दारूचे मोठे दुकान आहे. भर वस्तीमध्ये असलेल्या या दुकानामुळे परिसरातील महिला व नागरिक प्रचंड त्रस्त झाले आहेत. दारुड्यांची रोजची भांडणे, मारामारी, शिवीगाळ यांमुळे येथील महिला व विद्यार्थ्यांना खूप त्रास होतो. या दुकानासमोर पद्मावती पॉवर हाउस बसस्टॅाप आहे. त्यामुळे प्रवाशांनाही दररोज त्रास सहन करावा लागत आहे. या ठिकाणी दारू पिऊन आतापर्यंत अंदाजे दहा नागरिकांचे बळी गेलेले आहेत. परिसरातील नागरिकांनी वेळोवेळी मागणी केल्यानंतर पोलिस प्रशासनाने उत्पादन शुल्क विभागाकडे अहवाल पाठवला आहे. विशेष म्हणजे हे दारूचे दुकान मतदान घेऊन बंद करावे म्हणून नागरिकांच्या स्वाक्षरीचे पत्र नगरसेविका अश्विनी कदम यांनी पंधरा दिवसांपूर्वी जिल्हाधिकाऱ्यांना दिले होते; मात्र त्यावर प्रशासनाने कोणतीच कार्यवाही केली नाही.

बुधवारी दुपारी राजू किजबिले (रा. आंबेगाव पठार) या इसमाचा दारूच्या सेवनामुळे तिथेच मृत्यू झाल्याने महिला व नागरिक आक्रमक झाले. या सर्व महिला व नागरिकांनी नगरसेविका अश्विनी कदम यांच्या नेतृत्वाखाली पोलिस निरीक्षकांची भेट घेऊन दुकानदारावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली.
..................

...तर जनआंदोलन

'या दुकानात दारू प्याल्यामुळे राजू किजबिले यांचा मृत्यू झाला. या मृत्यूचे कारण शोधायला हवे. तसेच ही दारू विषारी होती का, याची चौकशी करण्यात यावी. तोपर्यंत हे दुकान सील करण्यात यावे, जेणेकरून आणखी कोणाचा बळी जाऊ नये. तसेच नागरिक व महिला यांना त्रासदायक ठरणारे व सर्वसामान्य नागरिकांचे जीवन उद्ध्वस्त करणारे हे देशी दारूचे दुकान मतदान घेऊन त्वरित बंद करण्यात यावे. अन्यथा परिसरातील नागरिक व महिलांचे जनआंदोलन उभारण्यात येईल,' असे अश्विनी कदम यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भोरमध्ये गणेशोत्सव साधेपणाने

$
0
0

४९ सार्वजनिक मंडळांनी केली प्रतिष्ठापना

म. टा. प्रतिनिधी, भोर

भोर शहरात ४९ सार्वजनिक गणेश मंडळांनी 'श्रीं'ची प्रतिष्ठापना केली आहे. पाच-सहा मंडळांचा अपवाद वगळता अन्य मंडळे साधेपणाने गणेशोत्सव साजरा करत असल्याचे दिसून येत आहे. निधीची चणचण, झोकून देउन सक्रिय काम करणाऱ्या कार्यकर्त्यांची वानवा, 'डीजे'च्या वापरावर बंदी, शहराच्या सर्वच भागांत काँक्रिटीकरणाची अर्धवट झालेली कामे, दोन्ही बाजूला रस्त्यांची केलेली खोदाई, मंडळाचा पदाधिकारी, कार्यकर्ता किंवा जवळच्या व्यक्तीचे निधन अशा अनेक कारणांमुळे गणेशोत्सव साधेपणाने साजरा केला जात असल्याचे सांगण्यात आले. याशिवाय नवरात्र, दत्तजयंती, गणेश जयंती, शिवजयंती यांसारखे धार्मिक व ऐतिहासिक कार्यक्रम मोठ्या दिमाखात व उत्साहात साजरे करण्याला काही मंडळी प्राधान्य देत असल्याचे कारणही त्यामागे आहे.

शेटेवाडीच्या जवाहर तरुण मंडळाने रांझ्याच्या पाटलाचे हात तोडण्याचा शिवकालीन ऐतिहासिक १२ पात्रांचा २० मिनिटांचा जिवंत देखावा सादर करून भाविकांचे लक्ष वेधून घेतले आहे. सुधीर शेटे मंडळाचे अध्यक्ष आहेत. वेताळ पेठेतील तुफान मित्रमंडळाने 'बोगस डॉक्टर' हा १२ पात्रांचा १६ मिनिटांचा सद्यस्थितीवर आधारित देखावा सादर केला आहे. प्रतीक गायकवाड मंडळाचे अध्यक्ष आहेत. बजरंग आळीतील आझाद तरुण मंडळाने १५ फूट उंचीची लालबागच्या राजाची मूर्ती बसवली असून, ती शहराचे आकर्षण बनली आहे. दक्षिणेतून जमा होणाऱ्या रकमेतून शालेय साहित्याचे वाटप केले जाणार आहे. गणेश ऊर्फ मुन्ना पवार मंडळाचे अध्यक्ष आहेत.

गोल्डन गणेशोत्सव मंडळाने हिमालयात भगवान श्री शंकराची तपस्या हा भव्य धार्मिक देखावा सादर केला आहे. मंडळ सांस्कृतिक कार्यक्रमाबरोबरच जलयुक्त शिवार कार्यक्रमाला मदत देणार आहे. महेश शेटे मंडळाचे अध्यक्ष आहेत. श्री सुभाष गणेश मंडळाने मोफत नेत्रतपासणी शिबिराचे आयोजन केले होते. सम्राट तरुण मंडळाने शिर्डीच्या साईबाबांची समाधी व साईंचे दर्शन हा देखावा उभारला आहे. युवराज जेधे मंडळाचे अध्यक्ष आहेत. अचानक मित्र मंडळाने पावन खिंडीची लढाई हा १२ पात्रांचा १८ मिनिटांचा ऐतिहासिक जिवंत देखावा सादर केला आहे. उमेश देशमुख मंडळाचे अध्यक्ष आहेत. शिवनेरी मित्रमंडळाने भजन, कीर्तन, प्रवचन, विविध स्पर्धांचे आयोजन केले आहे. कुणाल धुमाळ मंडळाचे अध्यक्ष आहेत.

नवी आळी, भेलकेवाडी, भोईआळी, नागोबा आळी व इतर भागांत गणेशोत्सव साधेपणानेच साजरा केला जात आहे. नोंदणीकृत ४९ व नोंदणी नसलेल्या १०पेक्षा अधिक ठिकाणी सार्वजनिक गणेशोत्सव साजरा केला जातो; मात्र यांपैकी एकाही मंडळाने उत्सवासाठी 'महावितरण'कडून वीज घेतली नसल्याचे सांगण्यात आले. ही मंडळे त्यांच्या परिसरातील मंदिरांना दिलेल्या कनेक्शनवरून वीज वापरतात, असे सांगण्यात आले.

फडणीसांचा शिवकालीन गणेशोत्सव

भोरच्या शिवपुरी आळीतील फडणीस कटुंबीयांच्या गणेशोत्सवाला छत्रपती शिवाजी महाराजांच्या वेळेपासूनची परंपरा आहे. फडणीस कुटुंबीयांचे मूळ गाव भोर तालुक्यातील चिखलावडे हे आहे. छत्रपतींच्या दरबारी कृष्णाजी, व्यंकोजी फडणीस कारभारी होते. त्या वेळी गणेशोत्सवात महाराज दर्शनासाठी चिखलावडे येथे येत असत. तीनशे वर्षांपूर्वी भोर येथे संस्थान सुरू झाले. तेव्हापासून प्रतिपदा ते पंचमी या काळात फडणीसांचा गणेशोत्सव येथे सुरू झाला. या काळांत लघुरुद्र, सहस्रावर्तन, गणेशपुराण, प्रवचन, कीर्तन, भजन, आरती आणि शेवटच्या दिवशी लळीताचे कीर्तन, एक हजार दूर्वा अर्पण करणे असे धार्मिक कार्यक्रम केले जातात. गौरीसोबत पार्थिव गणेशमूर्तीचे विसर्जन केले जाते. या उत्सवाकरिता संस्थानकाळापासून सरकारकडून दर वर्षी वेल्हे येथील उपकोषागारातून काही रक्कम देणगी म्हणून दिली जाते. सध्या ही रक्कम फक्त सत्तावीस रुपये इतकी आहे; मात्र ती आणण्यासाठी आज सव्वाशे रुपये खर्च येतो.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पुणेकरांना आता ई-रिक्षाचा पर्याय

$
0
0

सार्वजनिक वाहतूक सक्षम होण्यास हातभार लागण्याची चिन्हे

म. टा. प्रतिनिधी, पुणे

पुणे महानगर परिवहन महामंडळ, ऑटो रिक्षा, कॅब यांच्याबरोबरच आता शहरात सार्वजनिक प्रवासासाठी ई-रिक्षाचा पर्याय उपलब्ध होणार आहे. राज्य सरकारने मुंबई महानगर वगळता राज्यभरात ई-रिक्षांना परवानगी दिली आहे. दरम्यान, सद्य परिस्थितीत शहराच्या उपनगरांमध्ये कार्यरत असलेल्या ई-रिक्षांना नागरिकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे ही सेवा विस्तारल्यास सार्वजनिक वाहतूक सक्षम होण्यास हातभार लागण्याची चिन्हे आहेत.

पुण्यात औंध, बाणेर, बालेवाडी व पिंपरी-चिंचवडमध्ये पिंपळे सौदागर भागात ई-रिक्षांची सेवा दिली जात आहे. ही सेवा प्रामुख्याने त्या भागातील राजकीय व्यक्तींकडून सुरू करण्यात आली आहे. शहरात सध्या ई-रिक्षा उपलब्ध नसल्याने त्या मुंबई व अन्य शहरांतून मागवण्यात आल्या आहेत. प्रभागातील नागरिकांना खूष करण्यासाठी अनेकांनी या रिक्षांची सेवा मोफत दिली आहे. काहींनी प्रभागात मोफत पास वितरित केले आहेत. काही जणांनी प्रभागातील प्रवासासाठी दहा रुपये शुल्क आकारले आहे. या रिक्षांना नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.

ठराविक मार्ग

ऑटो रिक्षाप्रमाणे ई-रिक्षा शहरात कोणत्याही भागात चालवणे शक्य नसून, त्यांना ठराविक मार्ग निश्चित करून दिला जाईल, असे राज्य सरकारच्या धोरणात नमूद केले आहे. परिणामी या रिक्षांचे मार्ग कमी अंतराचे असण्याची शक्यता आहे. या रिक्षा जवळच्या मार्गांसाठी सोयीस्कर असल्यामुळे व तुलनेने शुल्क कमी अपेक्षित असल्याने ही सेवा निश्चितच प्रवाशांच्या पसंतीस उतरण्याची चिन्हे आहेत.

क्षमता किती?

पुण्यात सध्या कार्यरत असलेल्या ई-रिक्षांची बॅटरी क्षमता १०० वॉटची आहे. ही बॅटरी एकदा चार्ज केल्यानंतर रिक्षा ७० ते ८० किलोमीटर अंतर धावते. तसेच ई-रिक्षा सरासरी ताशी २५ किलोमीटर वेगाने धावू शकते. या रिक्षांची किंमत ५० हजारांपासून दीड लाखापर्यंत आहे. पेट्रोलच्या तुलनेत बॅटरीवर या रिक्षा चालविणे किफायतशीर ठरू शकते. उपनगरात घरापासून बस स्टॉपपर्यंत जाणे, किरकोळ खरेदी किंवा भाजी मंडईमध्ये जाणे या गोष्टींसाठी ई-रिक्षांच्या वापरास प्राधान्य दिल्यास खासगी वाहनांचा वापर कमी होऊ शकतो.

प्रतिसाद चांगला

औंध-बाणेर-बालेवाडी या परिसरात नाना वाळके यांनी दोन महिन्यांपूर्वी १० रिक्षांद्वारे प्रवासी सेवा सुरू केली. त्यांनी या भागात १० मार्ग निश्चित केले. त्या मार्गांवर ही सेवा दिली जात असून, त्यांचे अंतर सरासरी पाच ते सात किलोमीटर आहे. प्रवाशांकडून १० रुपये शुल्क आकारले जाते. या १० रिक्षांमधून एका दिवसात प्रत्येकी सरासरी ६० ते ७० प्रवासी प्रवास करतात. साधारणपणे एक प्रवासी दोन ते चार किलोमीटर प्रवास करतो, असे वाळके यांचे निरीक्षण आहे. ऑटो रिक्षांकडून नाकारले जाणारे जवळचे भाडे ई-रिक्षांना मिळत असल्याचा वाळके यांचा दावा आहे. पिंपळे सौदागर येथे नाना काटे यांनी एक रिक्षा सुरू केली असून, तिलाही चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे त्यांनी सांगितले.

परवान्याचा गोंधळ

राज्य सरकारने जाहीर केलेल्या ई-रिक्षा धोरणामध्ये या रिक्षांचा परवाना केवळ सायकलरिक्षा चालवणाऱ्यांनाच देण्याची तरतूद आहे; मात्र प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडे (आरटीओ) अशा कोणत्याही सायकलरिक्षाची नोंदणी नाही. त्यामुळे पुण्यात परवाने कसे द्यायचे हा प्रश्न आरटीओ अधिकाऱ्यांपुढे आहे. दरम्यान, शहरात सध्या कार्यरत असलेल्या ई-रिक्षांनी 'आरटीओ'कडून परवानगी घेतलेली नाही. त्या रिक्षांवर कारवाई केली जाणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘टिमवि’च्या दर्जावरील प्रश्नचिन्ह दूर

$
0
0

कुलगुरू डॉ. दीपक टिळक यांचा दावा

म. टा. प्रतिनिधी, पुणे

सुप्रीम कोर्टाने टंडन समितीचा अहवाल फेटाळून, अभिमत विद्यापीठांचा दर्जा निश्चित करण्यासाठी 'नॅक'चे मूल्यांकनच अधिकृत मानण्याचे आदेश दिले आहेत. कोर्टाच्या या आदेशामुळे टिळक महाराष्ट्र विद्यापीठाच्या दर्जावर उपस्थित होत असलेले प्रश्नचिन्ह पूर्णपणे दूर झाल्याचा दावा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. दीपक टिळक यांनी बुधवारी केला.

केंद्रीय मनुष्यबळ विकास खात्याने नेमलेल्या टंडन समितीने देशभरातील अभिमत विद्यापीठांच्या दर्जाचे मूल्यमापन केले होते. त्या आधारे एक अहवाल प्रसिद्ध करून, समितीने टिळक महाराष्ट्र विद्यापीठाच्या कारभारावरही ताशेरे ओढले होते. त्यामुळे गेल्या काही काळामध्ये विद्यापीठातून पदवी घेतलेल्या विद्यार्थ्यांमध्ये आपल्या पदव्यांच्या अधिकृततेपासून योग्यायोग्यतेपर्यंत सर्वच बाबतीत साशंकता निर्माण झाली होती. कोर्टाच्या या आदेशामुळे यापुढील काळात विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांना अशी कोणतीही साशंकता बाळगण्याची गरज नसल्याचेही डॉ. टिळक यांनी पत्रकार परिषदेमध्ये स्पष्ट केले.

डॉ. टिळक म्हणाले, 'टंडन समितीच्या कार्याबाबत देशभरातील अभिमत विद्यापीठांनी आक्षेप घेतले होते. समितीने आपले मत मांडताना प्रत्यक्षात विद्यापीठाला कधीही भेट दिलेली नव्हती. समितीने केवळ कागदी अहवालांच्या आधारे विद्यापीठांच्या दर्जावर मत मांडले. विद्यापीठांच्या वास्तवाची समितीला कल्पनाच नसल्याने, टिळक महाराष्ट्र विद्यापीठाविषयीही आक्षेप नोंदवण्यात आले होते. आता सुप्रीम कोर्टानेच या समितीचा अहवाल फेटाळला असल्याने, विद्यापीठाचे कार्य योग्य पद्धतीने सुरू असल्याचे स्पष्ट झाले आहे. यापुढील दोन वर्षांत विद्यापीठ 'नॅक'च्या मूल्यांकनामध्ये सध्याच्या 'बी' ग्रेडवरून 'ए' ग्रेडपर्यंत नेण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत.' विद्यापीठाने दोन जपानी विद्यापीठांसोबतच सामंजस्य करार केले आहेत. पुण्यातील मुख्य कार्यालयातील शैक्षणिक उपक्रमांमध्ये विस्तार करण्यासोबतच मुंबईमध्ये खारघर परिसरातील कॅम्पसवरही नवे शैक्षणिक उपक्रम सुरू करण्याचा संस्था प्रयत्न करत असल्याचेही त्यांनी या निमित्ताने सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images