Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

भव्यतेचा अनुपम सोहळा

$
0
0

वैविध्यपूर्ण उपक्रमांमुळे पुण्यनगरीच्या गणेशोत्सवाचा जगभर बोलबाला

Suneet.Bhave@timesgroup.com
पुणे : एखाद्या चौकामध्ये शिवाजी महाराजांच्या जीवनातील प्रसंगावर आधारित चलचित्र..., तर पुढच्याच चौकात सावित्रीबाई फुलेंवर आधारित महिला शिक्षणाविषयी प्रबोधन करणारा देखावा..., कुठे संत-महंतांचे जीवनकार्य, तर कुठे रामायण-महाभारतामधील पौराणिक कथा..., काही मंडपात मंगळयानाच्या मोहिमेचे सादरीकरण, तर कुठे अंधश्रद्धा निर्मूलनावर जिवंत देखावा...
अशा पौराणिक, ऐतिहासिक, समाजप्रबोधनपर विषयांसह कुठेतरी निव्वळ मनोरंजनात्मक विद्युत रोषणाई आणि संगीत कारंजेही... या वैविध्यामुळेच शतकोत्तर रौप्यमहोत्सवाकडे वाटचाल करणाऱ्या पुण्यनगरीच्या गणेश उत्सवाकडे अजूनही राज्य, देश; एवढेच नव्हे तर जगभरातूनही अनेक पावले आपसूकच वळतात. तुम्ही पुण्याजवळच्या दौंड, बारामती किंवा जुन्नर तालुक्यातील रहिवासी असा किंवा मुंबई, नागपूर, कोल्हापूर आणि अगदी बडोदा-बेंगळुरू-दिल्लीपासून ते लंडन-पॅरिस आणि न्यूयॉर्कपर्यंत... पुण्याच्या गणेशोत्सवात सहभागी होण्याची, उत्सवातील भारलेल्या वातावरणात जनप्रवाहासह हिंडण्याची हौस अनेकांना असते. जगाच्या पाठीवर कधी ना कधी, केव्हा तरी एखाद्या परदेशी नागरिकानेही उत्सवामध्ये तल्लीन होत, कपाळावर 'गणपती बाप्पा मोरया'ची पट्टी बांधलेली असतेच.
लोकमान्य टिळकांनी सुरू केलेल्या गणेशोत्सवात कालानुरूप अनेक बदल झाले. स्वातंत्र्यानंतर, आर्थिक उदारीकरण आणि जागतिकीकरणाच्या काळात आणि त्यानंतर २१व्या शतकाच्या पूर्वार्धातील १५ वर्षे सरतानाही, उत्सवात बदल होतच आहेत. कदाचित, यापुढेही होतील. तरीही, पुण्यातील मानाच्या गणपती मंडळांपासून ते अगदी एखाद्या छोट्या गल्ली-बोळातील गणेश मंडळांपर्यंत प्रत्येकाचा हा उत्सव अधिकाधिक नागरिकांपर्यंत पोहोचवण्यात निश्चितच खारीचा वाटा आहे. श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंडळासारख्या मंडळाला पुढील वर्षीच्या सजावटीचे वेध पाच-सहा महिने आधीपासूनच लागतात. लाखो दिव्यांच्या विद्युत रोषणाईने नटलेल्या त्यांच्यासारख्या भव्य-दिव्य सजावटीसह शास्त्रीय-वैज्ञानिक प्रकल्पांची सविस्तर आणि नेटकी माहिती विविध स्लाइड आणि प्रतिकृतींच्या माध्यमातून पोहोचवणाऱ्या मेहुणपुरा, नातूवाडा यासारख्या मंडळांपर्यंत, प्रत्येकालाच उत्सवातील देखावे-सजावटीच्या संकल्पना प्रत्यक्षात उतरवण्यासाठी बराच काळ झटावे लागते.
स्वातंत्र्यपूर्व काळातील मेळे-सभा यापासून ते सध्याच्या हलते, जिवंत देखाव्यांपर्यंतच्या काळात, पुण्यातील प्रत्येक मंडळाने लोकजागृतीचा वसा कायम जपण्याचा प्रयत्न केला आहे. हलत्या देखाव्यांच्या माध्यमातून आबालवृद्धांना खिळवून ठेवण्याचे काम शहरातील अनेक मंडळे अनेक वर्षांपासून नेमाने करत आहेत. हत्ती गणपती मंडळ, हिराबाग मंडळ, खडकमाळ आळी, राजर्षी शाहू चौक तरुण मंडळ, अकरा मारुती कोपरा, निंबाळकर तालीम यांच्यासह इतरही अनेक मंडळांचा हलते देखावे भव्य स्वरूपात सादर करण्यात हातखंडा आहे. काही मंडळे विविध संत-महंतांच्या भव्य प्रतिकृती सादर करत असून, जिवंत देखाव्यांचा ट्रेंडही अलीकडे वाढताना दिसून येतो.
..
भाविकांना आपुलकीचे निमंत्रण
विविध देखावे आणि सजावटी यांच्याप्रमाणेच काही मंडळे आकर्षक विद्युत रोषणाईच्या माध्यमातून गणेशभक्तांना ठेका धरायला लावतात. गेल्या वर्षभरातील हिट गाण्यांसह नेहमीची गणपती उत्सवामध्ये ऐकायला मिळणाऱ्या गाण्यांचा आव्वाज रात्री दहापर्यंत (पाच दिवस रात्री बारापर्यंत) घुमत राहतो. पुण्यामध्ये पूर्वी रात्री दहा ते पहाटे पाचपर्यंत उत्सवातील देखावे पाहण्यासाठी रात्र जागवली जायची. स्पीकरवरील निर्बंधामुळे आता हे प्रमाण कमी झाले आहे; पण अजूनही उत्सवातील पुण्यातल्या रस्त्यांना जाग असते. 'श्री शिवछत्रपतींच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या पुण्यनगरीत सर्व गणेशभक्तांचे सहर्ष स्वागत' ही साद येणाऱ्या प्रत्येक भाविकाला आपुलकीने निमंत्रिण देत असते, या लोकोत्सवात सहभागी होण्याचे...!
...............

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


नेतृत्त्वाची परंपरा घडविणारा उत्सव

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
शेकडो-हजारो लोकांच्या हृदयावर राज्य करतो, तो नेता..., या सर्वांना एकत्र आणून काही घडवून आणतो तो नेता आणि वेळप्रसंगी हजारोंच्या गर्दीला आपल्या काबूत ठेवतो, तो नेता....
नेतृत्वाच्या अशा निरनिराळ्या व्याख्या करता येतील. समाजात राजकीय, सामाजिक, प्रशासकीय, शैक्षणिक अशा विविध क्षेत्रांमध्ये नेतृत्त्वाची मोठी परंपरा आहे. इतिहासकाळापासून पुणे शहराने अनेक क्षेत्रांमध्ये राज्यालाच नव्हे, तर देशाला नेतृत्व दिले आहे. यापैकी अनेक नेतृत्त्वांचे मूळ येथील सार्वजनिक गणेशोत्सवाच्या परंपरेत आढळते.
अनेक उदात्त परंपरांना जन्म देणाऱ्या सार्वजनिक गणेशोत्सवाने पुण्यातही राजकीय आणि सामाजिक नेतृत्त्वाच्या पिढ्या घडविल्या आहेत. शहरच नव्हे, तर राज्यात आणि देशातही पुण्याचे प्रतिनिधित्व करणारे अनेक नेते आणि हजारो कार्यकर्त्यांना याच उत्सवातून नेतृत्त्वाची प्रेरणा, संघटनकौशल्याचे बाळकडू मिळाले आहे. राजकीय आणि सामाजिक ऐक्य घडविण्याच्या उद्देशाने सुरू झालेल्या गणेशोत्सवाची परंपरा आता जगभरात पोहोचली आहे. या उत्सवाचा श्रीगणेशा झाला, त्या पुण्यातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांची संख्या आजमितीला दोन हजारांपेक्षा अधिक असून, या सर्व मंडळांमधून हजारो नेते आणि कार्यकर्ते वर्षानुवर्षे सहभागी होत आहेत. या सहभागातूनच आपण काही तरी सार्वजनिक कार्य करावे, हा संस्कार रुजत असून, ही भावनाच नेतृत्त्वाची सुरुवात असते.
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळात कार्यकर्त्यांना निरनिराळी कामे करावी लागतात. अगदी वर्गणी मिळविण्यापासून ते अनेक कामांसाठी त्याला आपल्या परिसरातील नागरिकांच्या घरी जावे लागते. त्यांचे ऐकून घेऊन वर्गणी मिळविण्यासाठी कौशल्याने त्यांच्याशी संवाद साधावा लागतो आणि त्यांचे मन वळवून उत्सवासाठी अधिकाधिक निधी जमा करावा लागतो. लोकांशी संवाद साधण्याची शिकवण येथे मिळते. हा निधी अधिक योग्य पद्धतीने खर्च करण्याचे, म्हणजेच निधीच्या व्यवस्थापनाचे धडेही त्याला मंडळातच मिळतात. त्याबरोबरच आपल्याकडे असलेल्या पुरेशा-अपुऱ्या साधनांमधून अधिक परिणामकारक आणि प्रभावशाली असा उत्सव साजरा करताना कार्यकर्त्याच्या कल्पकतेलाही मोठा वाव मिळतो; तसेच बरोबरच्या सहकाऱ्यांचे राग-लोभ सांभाळून त्यांना कामाला जोडून घेण्याचे, म्हणजे संघटनकौशल्यही येथे लहान वयातच जन्म घेते. उत्सव साजरा करण्यात अनेक अडचणींवर मात करावी लागते आणि अनेक गोष्टींचे व्यवधानही सांभाळावे लागते. त्यामुळे प्रसंगावधान ठेवण्याचीही शिकवण त्याला उत्सवात मिळते.
गल्ली किंवा सोसायटीच्या पातळीवर लहान वयातच हे धडे आणि दुसरीकडे लोकांसाठी काही करण्याची भावना अशा दुहेरी संस्कारांतून नेतृत्वाची बीजे रोवली जातात. मंडळ आणि कार्यकर्ते यांचे नाते पुढे इतके घट्ट होते, की शहरातील अनेक मंडळे त्यांच्या अध्यक्षांच्या नावाने ओळखली जातात. त्यातूनच गणेशोत्सवाबरोबर वर्षभर अन्य उत्सवही साजरे केले जातात; तसेच नागरिकांशी परिचय होतो आणि वेळोवेळी संवाद साधून त्यांची काही कामेही करण्याची सवय होते. हळूहळू नागरिकांचा विश्वास बसल्यावर आणि त्यांची कामे केल्यावर या नेतृत्वाच्या शब्दाला मान मिळू लागतो. त्या परिसरातील नागरिकांना अशा कार्यकर्त्यांचा आधार वाटू लागतो. यातूनच काही मंडळी निवडणुकांमध्ये जनमत आजमावतात. काही यशस्वी होतात, तर काहींना निवडणुकीत यश मिळाले नाही, तरी ते या राजकीय व्यवस्थेत सहभागी तरी होतात. शहराचा मध्यभाग आणि आसपासच्या परिसरातही अनेक नगरसेवक या परंपरेतून पुढे आल्याचे अभिमानाने सांगतात. केवळ महापालिकाच नव्हे, तर या परंपरेतून पुढे आलेले वसंत थोरात यांच्यासारखे काही नेते थेट विधानसभेत पोहोचले. दोन दशके पुण्यावर राज्य करणारे माजी खासदार सुरेश कलमाडी यांनीही गणेशोत्सवाच्या काळातच 'पुणे फेस्टिव्हल'च्या माध्यमातून पुण्याचे ब्रँडिंग केले आहे.
..
मिरवण्याचा ट्रेंड वाढतो आहे
हल्ली कार्यकर्त्यांचीही पिढी बदलत असून, पूर्वीप्रमाणे रात्र रात्र जागून स्वतः कामे करण्यापेक्षा कंत्राटी पद्धतीने कामे सोपविण्याची पद्धत या उत्सवातही रूढ होऊ पाहत आहे. त्याबरोबर वर्गणीच्या निमित्ताने घरोघरी जाणे आणि त्यानमित्ताने नागरिकांशी संवादही कमी होत असून ती जागा आता मोठमोठ्या प्रायोजकांनी घेतली आहे. त्यामुळेच उत्सवातून समाजाशी कायमस्वरुपी नाते जोडण्यापेक्षा फक्त मिरविण्याचाही ट्रेंड निर्माण होऊ पाहत आहे. मात्र, गेल्या काही काळात माणूसच आत्मकेंद्रीत आणि कुटुंबकेंद्रीत झाल्यामुळे सार्वजनिक जीवनातील त्याचा वावर कमी झाला आहे. अशा वेळी तर सार्वजनिक कार्यात सहभागी होण्याचे आणि समाज समजावून घेण्याचे गणेशोत्सवासारखे दुसरे औचित्य नाही.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वर्गणीपेक्षा आता स्पॉन्सरवर भर

$
0
0

गणेशोत्सवाच्या अर्थकारणाची लाखोंवर मजल

Sujit.Tambade@timesgroup.com
पुणे : डेक्कन जिमखान्यावरील एक प्रसंग...एका गणेश मंडळाचे आठ-दहा कार्यकर्ते आले आणि चहावाल्याला फर्मान सोडले, 'हजाराची पावती फाडा!...चहावाला अवाकच. दुसऱ्या कार्यकत्याची लगेच जोड, 'यंदा बाप्पाला चांदीचे दागिने केलेत!...चहावाला पावती फाडणार नाही, याचा अंदाज आल्याने लगेच तिसऱ्या कार्यकत्याचा टिपिकल निर्वाणीचा आवाज, 'चला रे, नाय फाडली, तर नको फाडू दे. बघून घेऊ...' त्यावर चहावाल्याची पाचशे रुपये घ्या अशी विनवणी. थोडीफार बाचाबाची आणि पाचशेची पावती फाडून कार्यकर्ते पुढील मोहिमेला रवाना...
असे प्रसंग गणेशोत्सवाच्या काळात नेहमीच पाहायला आणि अनुभवायला मिळतात. त्यामागे गणेशोत्सवातील अर्थकारण लपले आहे. अर्थात पावत्या फाडून गल्लोगल्ली फिरणाऱ्या कार्यकर्त्यांची संख्याही आता रोडावत चालली आहे. कारण, पावत्या फाडत बसण्याऐवजी स्पॉन्सर्स मिळवणे आणि गणेशोत्सव साजरा करणे, हा नवीन पायंडा गणेशोत्सवात आला आहे. एक काळ असा होता की, गणेशोत्सव साजरा करण्यासाठी कार्यकर्ते पदरचे पैसे खर्च करत होते. आता पदरमोड करणे इतिहासजमा झाले आहे. त्याऐवजी निधी कसा गोळा करायचा आणि कोणाकडून हमखास वर्गणी मिळेल, याची शोधाशोध करण्यात कार्यकर्त्यांना जास्त रस असतो. बांधकाम
व्यावसा​यिक, कंपन्या आणि राजकारणी हे प्रमुख ग्राहक (देणगीदार) असतात. त्यांच्याकडून लाखो रुपयांची देणगी मिळाली की, गणेशोत्सव जास्त उत्साहाने साजरा होतो. अशाप्रकारची वर्गणी गोळा करणाऱ्या मंडळांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. त्यामुळे गणेशोत्सवातील अर्थकारण हे आता हजारोंऐवजी लाखोंच्या पटीत जाऊन पोहोचले आहे.
..
​शिल्लक रक्कम शून्य?
देणगीदारांशिवाय गणेश मंडळांकडून आता स्मरणिका किंवा अहवाल हा वर्गणी गोळा करण्याचा हुकमी एक्का बनला आहे. एकेकाळी या अहवालांमध्ये लोकांना अत्यावश्यक माहिती दिलेली असायची. आता जाहिरातींनीच अहवाल भरलेला असतो. या अहवालांमध्ये सुरुवातीलाच जमा आणि खर्चाचा ताळमेळ दिलेला असतो. त्यामध्ये बहुतांश मंडळांची शिल्लक रक्कम शून्य असते. जमा आणि खर्चाचा हा ताळमेळ जुळून बाकी शून्यच कशी येते, हे एक कोडे आहे. मात्र, प्रसिद्ध मंडळे किंवा ट्रस्ट असलेल्या मंडळांकडे बाकी दाखवली जाते. अन्य मंडळांकडे शिल्लक का राहत नाही, हा एक प्रश्न आहे.
..
नवसाचे फॅड
बाप्पाची भक्तिभावाने आराधन केली जाते. सध्या काही गणेश मंडळांमध्ये नवसाचे फॅड आले आहे. 'नवसाला पावणारा गणपती' असा प्रचार मंडळे स्वतःच करतात. नवसाच्या नावाखाली दानपेटीत लाखो रुपये, सोन्या-चांदीचे दागिने आणि वस्तू जमा होतात. त्यामागेही मोठे अर्थकारण दडलेले असते. या वस्तूंचा कधीकधी लिलाव केला जातो. हा लोकांच्या भावनेचा लिलाव नाही का?
..
राजकारण्यांची 'व्होट बँक'
गणेश मंडळे ही राजकारण्यांची व्होट बँक असते. त्यामुळे गणेशोत्सवाच्या काळात राजकारण्यांकडून त्याचा पुरेपूर वापर करून घेतला जातो. काही राजकारण्यांकडून उत्सवाच्या काळातील सर्व खर्च केला जातो. त्यामुळे मंडळांना तिजोरी रिती करण्याची आवश्यकता भासत नाही. त्यांचेही काम होते आणि राजकारण्यांचेही. यंदाच्या गणेशोत्सवाला पुणे महापालिकेच्या आगामी निवडणुकीची पार्श्वभूमी आहे. त्यामुळे निवडणुकीपूर्वीच इच्छुकांकडून प्रचाराचा श्रीगणेशा करून घेतला जाणार आहे. सर्वच गणेश मंडळे ही वर्गणी गोळा करण्यासाठीच उत्सव साजरा करतात, असे नाही. अनेक गणेश मंडळे ही जमा झालेल्या वर्गणीतून समाजोपयोगी उपक्रम राबवतात. गरजूंना मदत करून दातृत्त्वाची दिशा या उत्सवाला देतात. त्यांचे अनुकरण सर्वच मंडळांनी करावे, अशी भाविकांची रास्त अपेक्षा असते. या उत्सवाला व्यावसायिक स्वरुप येत असताना, त्यामध्ये समाजहित जोपासले जावे. तरच या उत्सवाचा मूळ हेतू साध्य होईल.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सव्वाशे वर्षांची भक्तीची परंपरा

$
0
0

लोकशिक्षण, लोकजागृतीसाठी एक पाऊल पुढेच

Chintamani.Patki@timesgroup.com
पुणे : एखाद्या शहरात, गावात गणपतीची अनेक मंदिरे असली, तरी एखादेच मंदिर स्थानिकांना विशेष जवळचे असते. किंबहुना, त्या गावात येणाऱ्या पर्यटकांसाठी संबंधित मंदिरच आकर्षणाचा केंद्रबिंदू असते. त्यामुळे, त्या गणपती मंदिरात भक्त-भाविकांचा नेहमीच राबता असतो. गणेशोत्सवामध्ये तर पंचक्रोशीतून अनेक भाविक दर्शनासाठी रीघ लावतात. एखाद्या शहरातील या मंदिराची कीर्ती दूर-दूरवर पोहोचते अन् त्या गणपतीला मानाचे स्थान प्राप्त होते.
पुण्यात मात्र, असे मानाचे अनेक गणपती आहेत. 'मानाच्या पाच' गणपतींना तर पुण्यात विशेष स्थान आहेच; पण त्याचबरोबर आणखीही काही गणपती मान राखून आहेत. अशी मानाची परंपरा खचितच अन्य कोणत्या शहरात वर्षोनुवर्षे चालत आली असेल. कोणत्याही शहरात ग्रामदैवताला आद्यपूजेचा मान मिळतो. त्यामुळे, 'कसबे पुणे' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या पुण्यामध्ये 'कसबा गणपती'ला अग्रस्थान प्राप्त झाले आहे. त्यासोबत, तांबडी जोगेश्वरी, गुरुजी तालीम, तुळशीबाग आणि केसरीवाडा या इतर चार मंडळांनाही मानाचे गणपती म्हणूनच ओळखले जाते. पुण्यासह देश-विदेशात ख्यातकीर्त श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती, शारदा-गजाननाची लोभस मूर्ती असलेले अखिल मंडई मंडळ आणि उत्सवाला सार्वजनिक रूप प्राप्त होण्याआधी प्रतिष्ठापना झालेला श्रीमंत भाऊ रंगारी गणपती यांनाही पुण्याच्या उत्सवी परंपरेत महत्त्वाचे स्थान आहे. या सर्वच मानाच्या गणपती मंडळांतर्फे ही परंपरा कायम राखली गेली आहे.
दळण-वळणाच्या अनेक गतिमान साधनांचा शोध नव्या युगात लागला असला, तरी बाप्पाचा शाही थाट चांदीच्या पालखीमध्ये अधिक शोभून दिसतो. कसबा आणि जोगेश्वरी या दोन्ही मानाच्या गणपतींकडून ही परंपरा आजही जोपासली जाते. लोकवर्गणीशिवाय उत्सव साजरा करण्यात पुढाकार घेणाऱ्या मंडळांमध्ये गुरुजी तालीम मंडळाने आघाडी घेतली होती. अनेक वर्षांपूर्वीच वर्गणी बंद करण्याची परंपरा याच मंडळाने सुरू केली. गणपतीच्या मोठ्या मूर्ती मुंबईत परिचयाच्या असल्या, तरी पुण्याला त्याची ओळख करून देण्याचा मान तुळशीबाग मंडळाकडे जातो. तर, लोकमान्यांच्या विचारांची कास धरून विविध उपक्रम-व्याख्याने यातून मार्गदर्शन करण्याचा वसा केसरीवाड्याने टिकवला आहे. दगडूशेठ, मंडई आणि भाऊ रंगारी या गणपती मंडळांकडून केली जाणारी आरास, सजावट आणि विविध समाजोपयोगी कार्यक्रमांची परंपरा, ही केवळ उत्सवाच्या दहा दिवसांपुरती मर्यादित नसते. तर, वर्षभरात समाजासाठी कार्य करण्यात या मंडळांची हातोटी आहे. उत्सवाची परंपरा पुढील पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी सामूहिक अथर्वशीर्ष पठण यासारखे उपक्रम आवर्जून घेतले जातात अन् त्याला नव्या पिढीचाही भरभरून प्रतिसाद मिळतो.
मानाचे गणपती म्हणून केवळ काही मोजक्या मंडळांचा उल्लेख केला असला, तरी समाजासाठी झटणाऱ्या, प्रबोधनाची परंपरा टिकविणाऱ्या मंडळांची संख्या पुण्यात अमाप आहे. उत्सवात कालानुरूप होत गेलेल्या बदलांशी जुळवून घेऊन लोकशिक्षण आणि लोकजागृतीसाठी एक पाऊल नेहमी पुढे असणाऱ्या या मंडळांमुळेच ही सव्वाशे वर्षांची परंपरा आपला आब राखून आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शाळा-कॉलेजांच्या उत्सवाचीही परंपरा

$
0
0

ढोल-ताशा पथकाचा श्रीगणेशाही पुण्यातच

Yogesh.Borate@timesgroup.com

पुणे : विद्येचे माहेरघर असणाऱ्या पुण्यात शाळा-कॉलेजांमधून गणेशोत्सव साजरा होत नसेल, तरच ते नवल. त्यामुळेच की काय, राज्याला गणेशोत्सवाची देणगी देणाऱ्या पुण्याने, राज्यभरातील शाळा- कॉलेजांनाही पाच दिवसांच्या गणेशोत्सवाची एक वेगळी परंपराच आखून दिली आहे. विशेष म्हणजे गणेशोत्सव मिरवणुकींना एक वेगळी शिस्त लावणाऱ्या ढोल-ताशा पथकांची परंपराही पुण्यातील शाळांमधूनच पुढे आली आहे.
पुण्याच्या मध्यवस्तीतील पेठांमधील शाळांमध्ये गणेशोत्सवाच्या काळात कार्यक्रमांची मोठी रेलचेल पाहायला मिळते. विद्यार्थ्यांना एकत्र आणून त्यांच्यातील विविध गुणांना वाव देण्यासाठी शाळांमधून होणारे कार्यक्रम पुढील आयुष्यामध्येही विद्यार्थ्यांना उपयुक्त ठरत असल्याच्या आठवणी शिक्षक आवर्जून नमूद करतात. नूमवि प्रशाला, न्यू इंग्लिश स्कूल, रमणबाग, न्यू इंग्लिश स्कूल, टिळक रोड, ज्ञानप्रबोधिनी आदी संस्थांमधील गणेशोत्सव शहरातील बहुतांश शाळांसाठी दरवर्षी चर्चेचा विषय ठरतो. अशी माहिती रमणबाग प्रशालेच्या मुख्याध्यापिका तिलोत्तमा रेड्डी यांनी सांगितली. रमणबाग प्रशालेचे यंदा गणेशोत्सवाचे ७० वे वर्ष असून, 'स्वराज्य ते सुराज्य' या संकल्पनेवर उत्सव साजरा होणार असल्याचे त्या म्हणाल्या.
'ज्ञानप्रबोधिनी'चे संस्थापक अप्पा पेंडसे आणि विमलाबाई गरवारे शाळेच्या अनिल गाडगीळ यांनी शालेय गणेशोत्सवच नव्हे, तर एकूणच पुण्याच्या गणेशोत्सवाला शिस्त लावण्यात मोलाची भूमिका बजावल्याची आठवण इतिहास अभ्यासक मोहन शेटे यांनी सांगितली. शेटे म्हणाले, की 'पेंडसे यांनी पन्नास वर्षांपूर्वी शालेय विद्यार्थ्यांच्या ढोल पथकांना उत्सवामध्ये महत्त्वाचे स्थान मिळवून दिले. शालेय विद्यार्थ्यांच्या गणेशोत्सवातील सहभागाद्वारे उत्सवाला विधायक वळणाकडे नेण्याचा त्यांचा प्रयत्न आता विद्यार्थीच नव्हे, तर समाजातील इतर घटकांनीही आपलासा केला आहे.'
000
शालेय गणेशोत्सवाचे बदलते स्वरूप...
शाळांमध्ये दीड दिवस वा पाच दिवसांच्या गणेशोत्सवासाठी नियमित गणेशोत्सवाप्रमाणेच सर्व बाबींचा विचार केला जात होता. मात्र, हळूहळू त्यामध्ये बदल होत गेल्याचा अनुभवायला शहरातील शाळांमधील शिक्षक आवर्जून नमूद करतात. शालेय शिक्षणामध्ये सध्या महत्त्वाचा भाग मानला जात असलेला पर्यावरणाचा विषय आता गणेशोत्सवासोबत जोडून घेतला जात आहे. शाळांमधून पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्यावर भर दिला जात आहे. विद्यार्थ्यांनीच एकत्र येत बनविलेल्या शाडू मातीच्या मूर्ती, प्रतिमा गणेशोत्सवासाठी विचारात घेतल्या जात आहेत. सजावटीसाठीही पर्यावरणपूरक साहित्याचा विचार केला जात आहे. वर्गामधून शिकलेले विषय प्रत्यक्ष अनुभवातून शिकण्यासाठी म्हणूनही हा उत्सव मोलाचा ठरत असल्याचेही शिक्षकांकडून सांगण्यात येत आहे.
000
डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या प्रत्येक शाळेमध्ये वेगवेगळ्या संकल्पनेवर आधारित गणेशोत्सव साजरा केला जातो. गणेशोत्सवाच्या माध्यमातून सुरक्षित वाहतूक, प्लास्टिक कचरा मुक्ती, ई- कचरामुक्ती, नवे तंत्रज्ञान, संगणक युग सारखे विषय विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष कृती आणि अनुभवातून शिकविणे आमच्या शाळांना शक्य झाले. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळण्यासाठीही शालेय गणेशोत्सव ही एक मोठी संधी ठरते. शिकलेल्या अनेक बाबी प्रत्यक्ष अनुभवण्यासाठीही विद्यार्थ्यांना शालेय गणेशोत्सव उपयोगी ठरतो.
किरण शाळिग्राम, नियामक मंडळ सदस्य

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

देशाला मान दिलात तर मान मिळेलः खेर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

देशात एक पक्ष सत्तेत आल्यानंतर असहिष्णुतेचे पेव फुटले आहे. 'भारत माता की जय', 'सारे जहाँ से अच्छा' म्हणायला अनेकांचा नकार असतो. मला ते पटत नाही कारण मी मनापासून भारतीय आहे आणि त्याचा मला अभिमान आहे. देशाविरोधात जे बोलतात त्यांना मी माझ्या पद्धतीने उत्तर देतो,' अशा शब्दांत ज्येष्ठ अभिनेते अनुपम खेर यांनी विरोधकांवर टीकास्त्र सोडले. 'तुम्ही देशाला जेवढा मान द्याल, तेवढा मान तुम्हालाही मिळेल. कुछ गंदी मछलियोंकी वजह से पुरा समुंदर खराब नहीं होने देंगे' असा सूचक वजा इशाराच त्यांनी विरोधकांना दिला. पुणे इंटरनॅशनल लिटररी फेस्टिव्हलच्या समारोप सत्रात प्रकाशक अशोक चोप्रा यांनी अनुपम खेर यांच्याशी 'कुछ भी हो सकता है' या कार्यक्रमा दरम्यान संवाद साधला. संयोजिका डॉ. मंजिरी प्रभू, बिपीनचंद्र चौगुले, सबिना संघवी, लीना प्रभू यावेळी उपस्थित होते.

'तरुणांना राष्ट्रवाद शिकवायची गरज नसून त्यांना तो चांगला कळतो. तरुणांकडून आज देशाला खूप अपेक्षा आहेत. मी माझ्या यशापेक्षा चुकांवरच नेहमी बोलतो. कारण चुकांमधून मी जास्त शिकलो आहे. मी सकारात्मक वातावरणात लहानाचा मोठा झालो त्यामुळे मी स्वत: सकारात्मक माणूस आहे. आपल्या पडत्या बाजू आपल्याला माहिती असल्या की आपल्याला कोणत्याच गोष्टीची भीती राहत नाही. अपयश आले तरी ते तुम्ही कोणत्या पद्धतीने स्वीकारता हे अधिक महत्त्वाचे आहे', असं खेर म्हणाले.

'पुस्तकांचे भावविश्व मला नेहमीच आकर्षित करत आले आहे. पुस्तकांमुळेच आपली प्रतिभाशक्ती वाढते, याच पुस्तकांनी अभिनय क्षेत्रात काम करीत असताना माझ्या आयुष्यात महत्वाची भूमिका बजावली,' अशी भावना व्यक्त करत अनुपम खेर यांनी आपल्या यशाचे रहस्य उलगडले. राष्ट्रवादावर परखड भाष्य करणारे 'नॉट अॅन अॅक्सिडेंटल नॅशनॅलिझम' हे पुस्तक लवकरच प्रकाशित होणार असल्याचे त्यांनी जाहीर केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बोकडांची चोरी करणारे अटकेत

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

बकरी ईदसाठी कुर्बानी देण्याच्या उद्देशाने खरेदी केलेल्या बोकडांची चोरी करणाऱ्या दोघांना खडक पोलिसांनी अटक केली. त्यांनी आतापर्यंत ५० ते ६० बकऱ्या, बोकडांची चोरी करून विक्री केल्याचे समोर आले आहे.
इरफान महंमद फुलखान (वय २३, रा. लोणी काळभोर) इरफान फकीरमहंमद कुरेशी (वय २७, रा. पठारे वस्ती, लोणी काळभोर) असे अटक केलेल्यांची नावे आहेत. बकरी ईदला कुर्बानी देण्यासाठी मोहसीन खलील बागवान (वय ३२, रा. म्हसोबा मंदिराजवळ) यांनी खरेदी केलेली बकरी चोरीला गेली होती. या शिवाय अनेक बकऱ्या, बोकडांची चोरी झाल्याची माहिती खडक पोलिसांना मिळाली. खडक पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक संजय गायकवाड व त्यांचे पथक या गुन्ह्याचा तपास करत होते. त्यावेळी त्यांना आरोपींबाबत माहिती मिळाली. पोलिसांनी त्यांना लक्ष्मीबाजार येथून सापळा रचून अटक केली. त्यांच्याकडे चौकशी केली असता, त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. त्यांच्याकडून एक बोकड, तीन बकऱ्या आणि टेम्पो असा एकूण अडीच लाखांचा माल जप्त केला आहे. आरोपींनी अशाच प्रकारे ५० ते ६० बोकड चोरून विक्री केल्याचे तपासात समोर आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पोलिस असल्याचे भासवून फसवणूक

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

मुंबई येथे पोलिस अधिकारी असल्याची बतावणी करून भामट्याने कोथरूड येथील दुकानातून दोन लॅपटॉप लांबवल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी अलंकार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या बाबत अजिंक्य भोसले (वय २६, रा. हडपसर) यांनी तक्रार दिली आहे. त्यावरून राजकुमार डी. पाटील यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भोसले यांचे कोथरूड येथे दुकान आहे. ३१ ऑगस्ट रोजी एक व्यक्ती त्यांच्या दुकानात आली. त्या व्यक्तीने आपले नाव राजकुमार डी. पाटील असून, आपण मुंबईत पोलिस अधिकारी असल्याचे सांगितले. त्यानंतर त्याच्याकडून एक लाख १५ हजार रुपये किमतीचे दोन लॅपटॉप नेले. तक्रारदार यांनी आरोपीने दिलेल्या नंबरवर फोन करण्याचा प्रयत्न केला. पण, फोन लागला नाही. त्यामुळे फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर भोसले यांनी पोलिसांकडे तक्रार दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


हांडेवाडी रोड येथे पाच घरफोड्या

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, हडपसर
गणेशोत्सवानिमित्त गावाला गेलेल्या पाच जणांचे फ्लॅट अज्ञात चोरट्याने कटावणीच्या साह्याने फोडले. ही घटना हांडेवाडी रोड, जैन टाउनशिप येथे रविवारी पहाटे तीनला घडली. एका फ्लॅटमधील सहा तोळे सोने व अडीच लाख रुपये रोख रक्कम असा सव्वाचार लाखाचा ऐवज चोरट्याने लंपास केला. उर्वरित चार फ्लॅटमधून चोरट्यांच्या हाती फारसे काही लागले नाही. याबाबत सतीश रामचंद्र चौधरी (वय ४५) यांनी फिर्याद दिली असून वानवडी पोलिस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चोरट्यांनी चोरी करण्याआधी आजूबाजूच्या फ्लॅटना बाहेरून कडी लावली होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘स्पर्धा परीक्षांच्या नावाने धंदा’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
'स्पर्धा परीक्षा म्हणजेच आयुष्य असे समजून तरुणाई त्यामागे धावत आहे. स्पर्धा परीक्षांसाठी घेण्यात येणाऱ्या विविध क्लासेसनी एक प्रकारचा धंदा सुरू केला असून त्यांच्या अट्टाहामुळे अनेक तरुणांना नैराश्याला सामोरे जावे लागत आहे,' अशी टीका ज्येष्ठ साहित्यिक आणि परराष्ट्र मंत्रालयाचे सचिव ज्ञानेश्वर मुळे यांनी केली.

मनोविकास प्रकाशनाच्या वतीने ज्ञानेश्वर मुळे यांच्या 'माती, पंख आणि आकाश' या आत्मचरित्रात्मक पुस्तकाच्या नवव्या आवृत्तीचे प्रकाशन संत साहित्याचे अभ्यासक डॉ. सदानंद मोरे यांच्या हस्ते झाले. त्या वेळी ते बोलत होते. पानिपतकार विश्वास पाटील आणि दीपा देशमुख या वेळी उपस्थित होते.

मुळे म्हणाले, 'स्पर्धा परीक्षांचे वेड म्हणजे तरुणाला लागत चाललेला संसर्गजन्य रोग आहे. 'आयएएस' अधिकारी झाले की आयुष्याचे सार्थक झाले, असा समज तरुणांनी करून घेतला आहे. त्याचाच फायदा काही खासगी संस्थांनी उचलला असून क्लासच्या निमित्ताने नवा धंदा जन्माला घातला आहे. त्याची उलाढाल ५ हजार कोटींच्या घरात आहे. आमच्या काळात स्पर्धा परीक्षांकडे स्पर्धात्मक दृष्टीकोनातून पाहिले जात नव्हते. तो काहीसा संघर्षात्मक भाग होता. मात्र त्याने आनंद मिळायचा. गेल्या अनेक वर्षांत तरुणांना नोकरीच्या अनेक संधी उपलब्ध झाल्या. मात्र तरुणांनी त्या न स्वीकारता 'आयएएस'ची वाट धरली. समाजसेवा म्हणून 'आयएएस'कडे जाऊ, असे तरुणांना वाटते. परंतु, समाजसेवेसाठी 'आयएएस' होण्याची काय गरज,' असा सवाल या वेळी मुळे यांनी उपस्थित केला. 'सगळ्यांनाच स्पर्धा परीक्षांचे वेड लागल्यामुळे चांगले शास्त्रज्ञ, समाजशास्त्रज्ञ निर्माण होऊ शकलेले नाहीत. साहित्यामध्ये १९१३ नंतर एकाही भारतीयाला नोबेल मिळू शकले नाही, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली.'

डॉ. मोरे म्हणाले, 'ज्ञानेश्वर मुळे यांचे पिढीजात वारकरी कुटुंब आहे. गाथा, पारायण आणि कीर्तन घरी होत असल्याने नैतिकदृष्ट्या कसे झाले पाहिजे याचे वस्तुपाठ त्यांच्यात पाहायला मिळतो. हाच पाया व्यक्तीला कळसापर्यंत घेऊन जातो.'

'चिकाटीने अभ्यास करण्याची हातोटी, जबरदस्त आकलनक्षमता ही ज्ञानेश्वरची गुणवैशिष्ट्ये आहेत. आज 'आयएएस' झाला असता, तर महाराष्ट्राचा प्रमुख सचिव झाला असता. एका चांगल्या सचिवाला आपण मुकलो, ' असे विश्वास पाटील यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

साडेनऊ लाखांचा बर्फीचा साठा जप्त

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
अन्न व औषध प्रशासनाच्या नियमांचे पालन न करता गणेशोत्सवासाठी गुजरातवरून आणला जात असलेला साडेनऊ लाख रुपयांच्या बर्फीचा साठा अन्न व औषध प्रशासनातील (एफडीए) अधिकाऱ्यांनी जप्त केला. सणाच्या काळात परराज्यातून व्हेजिटेबल फॅट व स्कीम्ड मिल्क पावडरपासून तयार केलेली बर्फी विक्रीसाठी येणार असल्याची माहिती 'एफडीए'च्या अधिकाऱ्यांना मिळाली होती.
उर्से टोल नाका येथे गुजरात येथून येणाऱ्या ट्रॅव्हल्सची तपासणी करून ही कारवाई करण्यात आली. तीन दिवसांपूर्वी 'एफडीए'च्या अधिकाऱ्यांनी शहरात विशेष मोहीम राबवून ३ हजार २९६ किलो स्पेशल बर्फीचा साठा जप्त केला होता. या कारवाईनंतर केलेल्या चौकशीत १ सप्टेंबरला ट्रॅव्हलच्या माध्यमातून स्पेशल बर्फीचा साठा शहरात येणार असल्याची माहिती समोर आली होती. या माहितीच्या आधारे 'एफडीए'च्या अधिकाऱ्यांनी तपासणी करून ही कारवाई केली. यामध्ये साडेनऊ लाख रुपये किंमतीची बर्फी जप्त करण्यात आली. सहआयुक्त शिवाजी देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आलेल्या कारवाईत सहाय्यक आयुक्त संपत देशमुख, अर्जुन भुजबळ, संजय शिंदे, अन्न सुरक्षा अधिकारी गणपत कोकणे, युवराज ढेंबरे, लक्ष्मीकांत सावळे, किरण जाधव यांनी सहभाग घेतला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गणेशोत्सवात कलाव्यवहार ठप्प

$
0
0

करमणुकीची साधने बदलल्याने कार्यक्रमांचे प्रमाण फक्त १० टक्के

म. टा. प्रतिनिधी, पुणे
कलाकारांसाठी हक्काचे व्यासपीठ मानल्या जाणाऱ्या गणेशोत्सवातील कार्यक्रमांना घरघर लागली आहे. आवाक्याबाहेर जाणारे पैशाचे नियोजन, करमणुकीची साधने बदलल्याने कमी होत जाणारे रसिकांचे प्रमाण यामुळे गणेशोत्सवातील सांस्कृतिक चळवळ व कलाव्यवहार जवळपास ठप्प झाला आहे. एकपात्री कार्यक्रमांचे अंदाजपत्रक कमी असल्याने या कलाप्रकारातून गणेशोत्सवाशी कलेची असलेली नाळ अद्याप टिकून आहे. मोठ्या कार्यक्रमांना मागणी नसल्याने ऐन गणेशोत्सवात कलाक्षेत्रात मंदीचे सावट आणि नाराजीचे वातावरण पसरले आहे.

भारतीय संस्कृती आणि परंपरा १४ विद्या आणि ६४ कलांनी बहरलेली आहे. तमाम महाराष्ट्राचे आराध्य दैवत असणाऱ्या विघ्नहर्त्या श्री गणेशाला १४ विद्या आणि ६४ कलांचा अधिपती मानले जाते. राज्यात अतिशय उत्साहात गणरायाचे आगमन होत असताना या कलांना कोणीच वाली नाही, असे चित्र आहे. गणेशोत्सवात सांस्कृतिक कार्यक्रम म्हटले की त्या अनुषंगाने मांडववाले, ध्वनिक्षेपक व्यवस्था, संयोजन, कलाकार, जाहिरातदार अशी एक बाजारपेठ साखळी तयार होत असे. कार्यक्रमच नसल्याने गणेशोत्सवातील ही कोटींची बाजारपेठ जवळपास ठप्प झाली आहे. पूर्वी गणेशोत्सवाला सांस्कृतिक अधिष्ठान होते. यामाध्यमातून नाटक, जादूचे प्रयोग, लोकनाट्य, महाराष्ट्राची लोकधारा, सुगम संगीत, ऑर्केस्ट्रा, शास्त्रीय संगीत, नृत्य, नाट्यछटा, व्याख्यान व एकपात्री कार्यक्रम मोठ्या संख्येने होत असत. यामुळे कलाकारांना मोठे व्यासपीठ उपलब्ध असे.

'शहरी भागात करमणुकीची आधुनिक माध्यमे हाताशी आल्याचा परिणाम जाणवत आहे. ग्रामीण भागात साखर कारखाने, शिक्षण संस्था, गिरण्या, दूध संघ अशा सहकारी संस्थांच्या आर्थिक मदतीवर असे कार्यक्रम होत असत. या संस्थांना राजकीय आणि आर्थिक घरघर लागल्याने सांस्कृतिक कार्यक्रम ठप्प झाले आहेत,' असे मनोरंजन संस्थेचे मोहन कुलकर्णी यांनी 'मटा'ला सांगितले.

'एकपात्री कार्यक्रमांना चांगली मागणी आहे. सहकारी गृहनिर्माण संस्था, कॉलनी, छोटी मंडळे यांच्यातर्फे साजऱ्या केल्या जाणाऱ्या गणेशोत्सवात एकपात्री कार्यक्रम होत आहेत. शहरी भागात कार्यक्रमांपेक्षा देखाव्यांवरच भर दिला जात असल्याने मोठ्या कार्यक्रमांची मागणी दरवर्षी घटत आहे. यंदा हे प्रमाण फक्त १० टक्के राहिले आहे. कार्यक्रमासाठी पन्नास हजार ते लाखाचे अंदाजपत्रक असल्याने ते कोलमडून पडल्याचे जाणवत आहे,' असे निरीक्षण त्यांनी नोंदविले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पुणे फेस्टिव्हलची उद्यापासून मेजवानी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
पुण्याच्या गणेशोत्सवाचे प्रमुख आकर्षण असलेल्या 'पुणे फेस्टिव्हल'चे उद्घाटन अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस खासदार दिग्विजय सिंह, माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, उद्योगपती राहुल बजाज, पालकमंत्री गिरीश बापट यांच्या प्रमुख उपस्थितीत ९ सप्टेंबर रोजी होणार आहे. मात्र, पुणे फेस्टिव्हलच्या माध्यमातून विविध सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी उद्यापासूनच (मंगळवार) अनुभवता येणार आहे.
या वर्षीचा 'पुणे फेस्टिव्हल जीवनगौरव पुरस्कार' ज्येष्ठ अभिनेत्री शर्मिला टागोर यांना प्रदान करण्यात येणार असून ज्येष्ठ कवयित्री डॉ. अरुणा ढेरे आणि हृदयतज्ज्ञ डॉ. रणजित जगताप यांना पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे.
'पुणे फेस्टिव्हल समिती, केंद्रीय पर्यटन विभाग, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ यांच्या वतीने आयोजित 'पुणे फेस्टिव्हल'चे हे २८ वे वर्ष आहे. ५ ते १५ सप्टेंबर दरम्यान होणाऱ्या 'पुणे फेस्टिव्हल'मध्ये अनेक रंगारंग, वैविध्यपूर्ण कार्यक्रमांचा समावेश आहे. 'पुणे फेस्टिव्हल'च्या श्री गणेशाची प्रतिष्ठापना नेहरू स्टेडियमच्या सारस हॉलमध्ये ५ सप्टेंबर रोजी सकाळी दहा वाजता होणार आहे. या वेळी अभिनेत्री भार्गवी चिरमुले आणि अनुजा साठे उपस्थित राहणार आहेत', अशी माहिती 'पुणे फेस्टिव्हल'चे संस्थापक-अध्यक्ष सुरेश कलमाडी यांनी रविवारी पत्रकार परिषदेत दिली.
९ तारखेला गणेश कला क्रीडा रंगमंच येथे दुपारी ४ वाजता होणाऱ्या उद्घाटन सोहळ्याला महापौर प्रशांत जगताप, उपमहापौर मुकारी अलगुडे, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, डॉ. के. एच. गोविंदाराज, संजय खान, शेखर सुमन, सूरज पांचोली, मल्लिका शेरावत, नेहा पेंडसे, पूजा हेगडे आदी उपस्थित राहणार आहेत. उद्‍घाटन सोहळ्यात तुकाराम दैठणकर यांचे सनईवादन होणार आहे. अरुंधती पटवर्धन, तेजस्विनी साठे, प्रचिती डांगे 'कथक, भरतनाट्यम् आणि ओडिसी' नृत्य यांचा संगम असलेली गणेश वंदना सादर करणार आहेत. लोकमान्य टिळक यांच्या 'स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे' या सिंहगर्जनेच्या शताब्दीनिमित्त कार्यक्रम, कलरफुल लावणी तसेच विविध सांस्कृतिक कार्यक्रम, क्रीडा स्पर्धा, छायाचित्र प्रदर्शन, नृत्य, गायन असे कार्यक्रम होणार आहेत. मराठीच्या भाषा भगिनी असलेल्या मल्याळी, केरळी, कर्नाटकी, भाषेतील कार्यक्रमांचाही 'पुणे फेस्टिव्हल'मध्ये समावेश आहे. सर्व कार्यक्रम गणेश कला क्रीडा रंगमंच, बालगंधर्व रंगमंदिर व यशवंतराव चव्हाण नाट्यगृह येथे होतील.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

​गणेशपत्रींमध्येही भेसळ

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
हरितालिका आणि गणपतीच्या पूजेसाठी वापरण्यात येणाऱ्या २१ पत्रींची नावे माहिती असली, तरी त्या प्रत्यक्षात कशा दिसतात, हेच कळत नसल्याने बाजारपेठांमध्ये गणेशपत्रींच्या नावाखाली कोणत्याही वनस्पती विकल्या जात आहे. गावकऱ्यांकडून रानावनात फिरून तोडल्या जाणाऱ्या या वनस्पतींमध्ये परदेशी वनस्पतींच्या पानांबरोबरच प्रदेशनिष्ठ आणि दुर्मिळ वनस्पतींची बेसुमार लूट होते आहे.
श्रावण सुरू झाला की व्रतवैकल्यांच्या निमित्ताने बाजारपेठांमध्ये बेल, आघाडा, शमी, अशा वनस्पती टप्प्याटप्याने दाखल होण्यास सुरूवात होते. हरितालिका आणि गणपतीच्या पूजेसाठी २१ पत्री आवश्यक असल्याने हजारो टन पत्री आणि दुर्वांच्या गड्ड्या विक्रीसाठी येतात. मात्र अलीकडील तीन चार वर्षांत या गड्ड्यांमध्ये मोठ्या प्रमाणात भेसळ होण्यास सुरूवात झाली आहे. पूजेमधील एकवीस पत्री नेमक्या कोणत्या, या विषयी अजूनही पुरेशी माहिती नसल्याने बाप्पाला चक्क परदेशी वनस्पती अर्पण केल्या जात आहेत. यामध्ये उंदीरमारी (ग्लिरिसिडीया), सुबाभूळ, वेडीबाभूळ, शंकासूर अशा परदेशी वनस्पतींचा समावेश आहे. तसेच पश्चिम घाटातील दुर्मिळ आणि प्रदेशनिष्ठ वनस्पतीही जंगलातून सर्रास ओरबाडल्या जात आहेत. विक्रेत्यांबरोबरच ग्राहकही नगाला नग या भूमिकेतून पत्रींची खरेदी करीत आहेत.
मंडईच्या कानाकोपऱ्यात सध्या पत्री विकणारे लोक बसले आहेत, जर आपण त्यांना या गड्डीत कोणत्या पत्री आहेत, याची विचारणा केली तर त्यांना सांगता येत नाही. केवळ विक्रेते नव्हे; तर ज्या भागातून हा माल येतो, तेथील ग्रामस्थही वनस्पतींबद्दल अज्ञानी आहेत. काही वर्षांपूर्वीपर्यंत ग्रामीण भागातील बुजुर्गांना गावाबाहेर दिसणाऱ्या वनस्पती, रानभाज्या आणि त्यांचे महत्त्व याबद्दल माहिती होती. पिढ्यान् पिढ्या हे ज्ञान पुढे आले होते, मात्र अलीकडे नोकरीनिमित्त गावाबाहेर राहिलेली मंडळी पारंपरिक ज्ञानापासून वंचित आहेत, परिणामी जशा अनेक रानभाज्या काळाच्या पडद्याआड गेल्या तशी गणेशपत्रींची माहितीही लुप्त होते आहे, अशी माहिती वनस्पती अभ्यासक डॉ. सचिन पुणेकर यांनी दिली.
गणेशोत्सवा दरम्यान बाजारपेठांमध्ये विक्रीस येणाऱ्या वनस्पती आणि फुले यांची उलाढाल जाणून घेण्यासाठी बायोस्फीअर्स संस्थेनेतर्फे नुकतेच सर्वेक्षण करण्यात आले आहे. या सर्वेक्षणादरम्यान चुकीच्या वनस्पतींचीही माहिती मिळाली. प्रत्यक्षात गणपतीच्या चरणी अर्पण होणारी प्रत्येक पत्री ही विविध नैसर्गिक अधिवासाचे प्रतीक आहे. त्यासाठी स्वतंत्र श्लोकही आहेत. उत्सवाच्या निमित्ताने भाविकांनी या वनस्पतींची माहिती करून घ्यावी, असे आवाहन पुणेकर यांनी केले.

एकवीस पत्री याप्रमाणे..
मधुमालती, माका, बेलाचे पान, पांढऱ्या दुर्वा, बोरीचे पान, धोतरा, तुळशीचे पान, शमी, आघाडा, डोरलीचे पान, कण्हेरीचे पान, रूई (मंदार), अर्जुनसारडा, विष्णुक्रांत (शंखपुष्पी), डाळिंबाचे पान, देवदाराचे पान, पांढरा मरवा, पिंपळाचे पान, जाईचे पान, केवडा आणि अगस्त्याचे पान

पत्रीच्या नावाखाली ओरबाडल्या जाणाऱ्या दुर्मिळ वनस्पती
कचोरा (गौरीचे हात, रान हळद), चवर, भुई आमऱ्या (ग्राऊंड ऑर्किड), रानआले, सफेद मुसळी, कळलावी (अग्निशिखा), भारंगी

भेसळ होणाऱ्या वनस्पती
गुडमई, तेरडा, सुबाभूळ, आंबा, उंदीरमारी, गुलबक्षी, शंकासूर, खैर, ऑस्ट्रेलियन बाभूळ, सीताफळ, वेडी बाभूळ, पर्जन्यवृक्ष

गणेशपत्री म्हणून विक्री होणाऱ्या गड्ड्यांमध्ये अपवादानेच खरी पूजापत्री बघायले मिळते. पत्रीच्या नावाखाली वाट्टेल त्या वनस्पतींची भेसळ होते आहे. दुदैवाने माहितीअभावी तोडल्या जाणाऱ्या वनस्पतींमध्ये दुर्मिळ, प्रदेशनिष्ठ आणि औषधी वनस्पतींची मोठ्या प्रमाणात कत्तल होते आहे.
- डॉ. सचिन पुणेकर, वनस्पती अभ्यासक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कॅपचे वेळापत्रक जाहीर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
गेल्या काही दिवसांपासून रखडलेले विधी (लॉ) अभ्याक्रमांचे केंद्रीय ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेचे (कॅप) नवे वेळापत्रक राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षाने शनिवारी जाहीर केले. यानुसार 'कॅप'च्या पहिली फेरीसाठी ३ ते ८ सप्टेंबर दरम्यान विद्यार्थ्यांना आवडीच्या कॉलेजांचे पसंतीक्रमाचे अर्ज भरायचे आहे. या फेरीची गुणवत्ता फेरी १० सप्टेंबरला जाहीर होईल. 'कॅप'च्या फेऱ्या २९ ऑक्टोबरपर्यंत असल्याने कॉलेजमध्ये खऱ्या अर्थाने शैक्षणिक वर्षाला सुरुवात ही 'दिवाळी'नंतर म्हणजेच नोव्हेंबरमध्ये होणार आहे.
विधी शाखेच्या पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी राबविण्यात येणाऱ्या ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेत सहभागी होणाऱ्या कॉलेजांना बार कौन्सिल ऑफ इंडिया, राज्य सरकार आणि विद्यापीठांची मान्यता आवश्यक आहे. मात्र, राज्यातील काही कॉलेजांना संबंधित मान्यतेपैकी काही मान्यता नाही; तसेच काही कॉलेज ही मान्यता मिळवण्याच्या प्रक्रियेत होते. त्यामुळे प्रक्रियेत सहभागी होणाऱ्या कॉलेजांच्या माहितीची जुळवाजुळव करण्याचे काम उच्चशिक्षण संचालनालयाकडून सुरू होते. या कारणांमुळे कक्षाच्या जुन्या वेळापत्रकानुसार साधारण ऑगस्ट महिन्यात संपणारी प्रवेश प्रक्रिया रेंगाळली.
नव्या वेळापत्रकानुसार कॅपच्या पहिली फेरीसाठी ३ ते ८ सप्टेंबर दरम्यान विद्यार्थ्यांना आवडीच्या कॉलेजांचे पसंतीक्रमाचे अर्ज dhe.mhpravesh.in या संकेतस्थळाहून भरायचे आहे. गुणवत्ता यादी १२ सप्टेंबरला जाहीर होईल. त्यानुसार विद्यार्थ्यांना १४ ते १९ सप्टेंबर या कालावधीत प्रवेश घ्यायचा आहे. कॅपच्या दुसऱ्या फेरीची गुणवत्ता यादी २२ सप्टेंबरला जाहीर होईल. त्यानुसार विद्यार्थ्यांना २३ ते २७ सप्टेंबर या कालावधीत कॉलेजमध्ये जाऊन प्रवेश घ्यायचा आहे. कॅपच्या तिसऱ्या फेरीची गुणवत्ता यादी ३० सप्टेंबरला जाहीर करण्यात येणार आहे. या यादीनुसार विद्यार्थ्यांना १ ते ५ ऑक्टोबर्यंत प्रवेश घ्यायचा आहे.
विद्यार्थ्यांना कॅपच्या चौथ्या फेरीसाठी ७ ते १२ ऑक्टोबर दरम्यान पसंतीक्रमाचे अर्ज भरायचे आहेत. या फेरीची गुणवत्ता यादी १४ ऑक्टोबरला जाहीर होणार असून १५ ते १९ ऑक्टोबरपर्यंत विद्यार्थ्यांना पसंतीच्या कॉलेजमध्ये प्रवेश घ्यायचा आहे. कॅपच्या फेऱ्यांनंतर कॉलेजमध्ये शिल्लक राहणाऱ्या जागांवर प्रवेश घेण्यासाठी पाचवी फेरी २२ ते २५ ऑक्टोबरमध्ये कॉलेजस्तरावर होणार आहे. या कालावधीत विद्यार्थ्यांना संबंधित कॉलेजमध्ये प्रवेशासाठी अर्ज करावे लागणार आहेत. या फेरीची गुणवत्ता यादी २६ ऑक्टोबरला जाहीर होणार असून त्यांना २७ ते २९ ऑक्टोबर या कालावधीत प्रवेश घ्यावा लागणार आहे. ऑक्टोबरच्या शेवटच्या आठवड्यात दिवाळी असल्याने कॉलेजमध्ये शैक्षणिक वर्षाला खऱ्या अर्थाने सुरुवात ही दिवाळीनंतर म्हणजेच नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात होईल. याचा प्रतिकूल परिणाम विद्यापीठांच्या परीक्षेवर आणि विद्यार्थ्यांच्या अभ्यासावर होणार आहे.

विद्यार्थी ३० जूनपासून प्रतीक्षेत
राज्य सामायिक प्रवेशपरीक्षा कक्षाने जून महिन्यात १७ आणि १८ तारखेला विधी कॉलेजांच्या प्रवेशासाठी सीईटी घेतली. या अभ्यासक्रमाला प्रवेश घेण्यासाठी राज्यातील सुमारे २५ हजार विद्यार्थ्यांनी सीईटी दिली होती. सीईटीचा निकाल ३० जून रोजी जाहीर करण्यात आला. मात्र, कक्षाने अद्याप कॅपचे पसंतीक्रम भरण्याचे नवे वेळापत्रक जाहीर केले नव्हते. त्यामुळे कॅपची प्रक्रिया सुरू कधी होणार, याबाबत विद्यार्थ्यांमध्ये साशंकताच होती. अभ्यासक्रमाला प्र‍वेश घेण्यासाठी इच्छुक असणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण होते. त्यामुळे विद्यार्थ्यांना आता काहीसा दिलासा मिळाला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


देशविरोधकांना माझ्या पद्धतीने उत्तर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

'देशात एक पक्ष सत्तेत आल्यानंतर असहिष्णुतेचे पेव फुटले आहे. 'भारत माता की जय', 'सारे जहाँ से अच्छा' म्हणायला अनेकांचा नकार असतो. मला ते पटत नाही; कारण मी मनापासून भारतीय आहे आणि त्याचा मला अभिमान आहे. देशाविरोधात जे बोलतात त्यांना मी माझ्या पद्धतीने उत्तर देतो,' अशा शब्दांत ज्येष्ठ अभिनेते अनुपम खेर यांनी विरोधकांवर टीकास्त्र सोडले.

'तुम्ही देशाला जेवढा मान द्याल, तेवढा मान तुम्हालाही मिळेल. कुछ गंदी मछलियोंकी वजह से पुरा समुंदर खराब नहीं होने देंगे,' असा सूचकवजा इशाराच त्यांनी विरोधकांना दिला. पुणे इंटरनॅशनल लिटररी फेस्टिव्हलच्या समारोप सत्रात प्रकाशक अशोक चोप्रा यांनी अनुपम खेर यांच्याशी 'कुछ भी हो सकता है' या कार्यक्रमादरम्यान संवाद साधला. त्या वेळी खेर बोलत होते. फेस्टिव्हलच्या संयोजक डॉ. मंजिरी प्रभू, बिपीनचंद्र चौगुले, सबिना संघवी, लीना प्रभू आदी या वेळी उपस्थित होते.

'तरुणांना राष्ट्रवाद शिकवायची गरज नसून त्यांना तो चांगला कळतो. तरुणांकडून आज देशाला खूप अपेक्षा आहेत,' असे नमूद करून खेर म्हणाले, 'मी माझ्या यशापेक्षा चुकांवरच नेहमी बोलतो; कारण चुकांमधून मी जास्त शिकलो आहे. मी सकारात्मक वातावरणात लहानाचा मोठा झालो. त्यामुळे मी स्वतः सकारात्मक माणूस आहे. आपल्या पडत्या बाजू आपल्याला माहीत असल्या, की आपल्याला कोणत्याच गोष्टीची भीती राहत नाही. अपयश आले, तरी ते तुम्ही कोणत्या पद्धतीने स्वीकारता, हे अधिक महत्त्वाचे आहे.'

तुम्ही देशाला जेवढा मान द्याल, तेवढा मान तुम्हालाही मिळेल. देशाविरोधात जे बोलतात त्यांना मी माझ्या पद्धतीने उत्तर देतो. कुछ गंदी मछलियोंकी वजह से पुरा समुंदर खराब नहीं होने देंगे. - अनुपम खेर, ज्येष्ठ अभिनेते

'पुस्तकांची भूमिका महत्त्वाची'

'पुस्तकांचे भावविश्व मला नेहमीच आकर्षित करत आले आहे. पुस्तकांमुळेच आपली प्रतिभाशक्ती वाढते. अभिनय क्षेत्रात काम करीत असताना याच पुस्तकांनी माझ्या आयुष्यात महत्त्वाची भूमिका बजावली,' असे अनुपम खेर यांनी सांगितले. राष्ट्रवादावर परखड भाष्य करणारे 'नॉट अॅन अॅक्सिडेंटल नॅशनॅलिझम' हे पुस्तक लवकरच प्रकाशित होणार असल्याचेही त्यांनी जाहीर केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘पर्सनल लॉ राज्यघटनाविरोधी’

$
0
0

साहित्य संमेलनाध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांचे मत

म. टा. प्रतिनिधी, पुणे
'देशात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेली राज्यघटना आहे. त्यानुसार नागरिकांसाठी समान नागरी कायदे आहेत. असे असताना हिंदू, मुस्लिम, बौद्ध अशा कोणत्याही धर्मांच्या लोकांसाठी 'पर्सनल लॉ' ठेवण्याचे कारणच नाही. 'पसर्नल लॉ' हे राज्यघटनेतील तत्त्वांच्या विरोधात आहेत,' असे परखड मत अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांनी रविवारी व्यक्त केले.

डॉ. सबनीस यांच्या हस्ते बाबूमियाँ बँडवाले स्मृती राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेचे उद्घाटन झाले. या वेळी ते बोलत होते. मुस्लिम सत्यशोधक मंडळ आणि एस. एम. जोशी सोशालिस्ट फाउंडेशन यांच्यातर्फे ही स्पर्धा आयोजित केली आहे. मंडळाचे अध्यक्ष प्रा. शमसुद्दीन तांबोळी, सचिव प्रा. अझरुद्दीन पटेल, सरचिटणीस प्रा. जमीर शेख, स्पर्धेच्या स्पर्धेच्या संयोजिका डॉ. बेनेझीर तांबोळी, कवयित्री अंजली कुलकर्णी आदी उपस्थित होते.

डॉ. सबनीस म्हणाले, 'सर्व भारतीयांमध्ये समानतेची भावना आणि समान नागरिकत्व निर्माण करायचे असल्यास डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या राज्यघटनेच्या निकषांचा आधारच घ्यावा लागणार आहे. त्याद्वारे नागरिकांना धार्मिक, सामाजिक व आर्थिक ऐक्य मिळणार आहे. 'पर्सनल लॉ'ची संकल्पना ही राज्यघटनेच्या समाजवादी आणि धर्मनिरपेक्ष ध्येयधोरणांना विरोध करणारी आहे. त्यामुळे विविध धर्मांतील लोकांना 'पर्सनल लॉ'ची आवश्यकता नाही.'

'इस्लाम धर्माची शिकवण ही खूप चांगली आहे. बगदादी, लष्कर-ए-तोयबा, इंडियन मुजाहिदीन आणि दहशतवाद्यांचा इस्लाम हा खरा इस्लाम नाही. पैगंबरांचा शुद्ध इस्लामच या लोकांनी हायजॅक करून टाकला आहे. त्यामुळेच जगातील ३४ देशांमधील लोक या दहशतवादाच्या विरोधात लढत आहेत. भारतात देखील मौलवी, इमाम आणि मुस्लिम संघटना या दहशतवादाच्या विरोधात काम करीत आहेत,' असेही डॉ. सबनीस यांनी सांगितले. प्रा. तांबोळी यांनी प्रास्ताविक केले. दरम्यान, या स्पर्धेत एकूण ६० विद्यार्थ्यांनी भाग घेतला आहे. कुलकर्णी, डॉ. लता जाधव, किरण किसनराव, अभिषेक भोसले हे परीक्षक म्हणून काम पाहणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

​महिला पोलिस कर्मचाऱ्याचा विनयभंग

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

महिला कर्मचाऱ्याची दुचाकी रोडवर उभी असल्याच्या कारणावरून कारचालकाने व त्याच्या सहकाऱ्यांनी महिला कर्मचाऱ्याशी हुज्जत घालत विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार वडगाशेरी येथे घडला. या घटनेनंतर आरोपींना पोलिस ठाण्यात आणल्यानंतर त्यांनी पोलिसांना शिवीगाळ करत ठाण्यात गोंधळ घातला. या प्रकरणी चंदननगर पोलिसांनी तिघांना अटक केली.

विजय पोपटराव नरवडे (वय ४८), संदीप विजय नरवडे (२६) व संजय पोपटराव नरवडे (वय ४७, रा. गणेशनगर, वडगाव शेरी) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. या प्रकरणी २८ वर्षीय महिला पोलिस कर्मचाऱ्याने तक्रार दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चंदननगर पोलिस ठाण्यात तक्रारदार नेमणुकीस आहेत. त्या खासगी कामानिमित्त दुचाकीने गणेशनगर परिसरातील गल्ली क्रमांक सहा येथील दुकानात गेल्या होत्या. त्या वेळी दुचाकी दुकानाच्या बाहेर पार्क केली. त्या वेळी आरोपी विजय नरवडे हा कारने आला व त्याने मोठ-मोठ्याने हॉर्न वाजवला. तक्रारदार या दुकानातून बाहेर आल्या असता, त्यांना शिवीगाळ केली. तसेच, दुचाकी बाजूला घेण्यास सांगून त्यांच्याशी हुज्जत घातली. त्यानंतर आरोपी संदीप नरवडे यांने तक्रारदार यांच्या मनास लज्जा उत्पन्न होईल, असे वर्तन करून त्यांचा हात पकडला. तक्रारदार या त्यांना चंदननगर पोलिस ठाण्यात घेऊन आल्यानंतर त्यांनी ठाण्यातही पोलिसांना शिवीगाळ केली. तसेच, तेथे मोठ्याने आरडा-ओरडा करून गोंधळ घातला. या प्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे.

वाहतूक शाखेच्या महिला कर्मचाऱ्याचा विनयभंग

वाहतूक ठप्प झाल्याने वाहतूक सुरळीत करताना झालेल्या वादातून एका महिला कर्मचाऱ्याचा विनयभंग केल्याचा प्रकार बुधवार पेठेत शनिवारी दुपारी घडला. या प्रकरणी एका महिलेसह तिच्या मुलावर फरासखाना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘एक्स्प्रेस’वेवर आता स्टिल कॅमेऱ्याने ‘वॉच’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

पुणे-मुंबई एक्स्प्रेस वेवर गेले दोन दिवस घेण्यात आलेल्या ड्रोनच्या चाचणीनंतर आता स्टिल कॅमेरे लावून त्याद्वारे बेशिस्त वाहनांवर २४ तास नजर ठेवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. या आठवड्यात सहा व सात सप्टेंबरला मळवली येथे ही चाचणी घेण्यात येईल.

एक्स्प्रेस वेवरील बेशिस्त वाहतूक आणि प्राणांतिक अपघातांचे वाढते प्रमाण, यामुळे एक्स्प्रेस वेवर 'इंटेलिजंट ट्रॅफिक मॉनिटरिंग सिस्टीम' (आयटीएमएस) राबविण्याचा निर्णय राज्य सरकारने दोन महिन्यांपूर्वी घेतला. मात्र, अद्याप त्या दृष्टीने पावले उचलण्यात आली नसल्याचे वृत्त 'मटा'ने प्रसिद्ध करून हा विषय पुन्हा उपस्थित केला. त्यानंतर 'आयटीएमएस'च्या अंमलबजावणीसाठी एक पाऊल पुढे टाकत गेल्या शनिवारी व रविवारी दोन दिवस बेशिस्त वाहनचालकांवर नजर ठेवण्याच्या उद्देशाने ड्रोनचा वापर करणे शक्य आहे का, याची चाचणी घेण्यात आली. तर, आता दुसरा पर्याय म्हणून एक्स्प्रेस वेवर स्टिल कॅमेरे लावून व्हिडिओ सर्व्हेलन्सच्या माध्यमातून नजर ठेवण्यात येणार आहे. त्यासाठी यापूर्वी एक्स्प्रेस वेवर व्हिडिओ सर्व्हेलन्सचा अभ्यास केलेले तन्मय पेंडसे पुढील आठवड्यात ही कॅमेऱ्यांची चाचणी घेणार आहेत, अशी माहिती महामार्ग पोलिस अधीक्षक अमोल तांबे यांनी 'मटा'ला दिली.

ड्रोनच्या चाचणीदरम्यान दोन दिवसांत उर्से टोल नाक्यावर ५१ व खंडाळा येथे १७ बेशिस्त वाहनचालकांवर कारवाई करण्यात आली. या पार्श्वभूमीवर पेंडसे यांनी स्टिल कॅमेऱ्यांद्वारेदेखील चाचणी करण्याची इच्छा प्रदर्शित केली. त्यानुसार ही चाचणी घेण्यात येत आहे. मळवली येथील ओव्हरब्रिजला तीन कॅमेरे बसविले जाणार आहेत. या दोन दिवसीय पाहणीचा अहवाल राज्याच्या गृह विभागाला सादर केला जाणार आहे, अशी माहिती पेंडसे यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पोलिसांवर एअरगनमधून गोळीबार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

पाषाण टेकडीवर गस्त घालण्यासाठी गेलेल्या दोन पोलिसांवर एअरगनमधून गोळीबार केल्याची धक्कादायक घटना शनिवारी रात्री साडेनऊला घडली. यामध्ये एका पोलिसाच्या बरगडीजवळ डाव्या बाजूला जखम झाली आहे, तर दुसऱ्याच्या डोक्याला मार लागला आहे. गोळीबार केल्यानंतर हल्लेखोर पळून गेले. या प्रकरणी चतु:श‍ृंगी पोलिस ठाण्यात खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हवालदार बबन मारुती गुंड आणि पोलिस शिपाई अमर अब्दुल शेख अशी जखमी झालेल्या पोलिस कर्मचाऱ्यांची नावे आहेत. गुंड यांना छर्ऱ्याची गोळी लागल्यामुळे त्यांना एम्स हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून तीन अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 'सूस खिंड भागातील पाषाण टेकडीवर लूटमारीच्या घटना घडतात. त्यामुळे या ठिकाणी चतु:श‍ृंगी पोलिसांकडून गस्त घालण्यात येते. गुंड आणि शेख हे दोघे शनिवारी रात्री आठपासून पाषाण भागात गस्त घालत होते. रात्री सव्वानऊच्या सुमारास त्यांना तीन व्यक्ती दिसल्या. त्यांच्या हालचाली संशयास्पद वाटल्याने पोलिसांनी त्यांना थांबवून त्यांची अंगझडती घ्यायला सुरुवात केली. त्या वेळी एका व्यक्तीने कमरेजवळ लावलेल्या एअरगनमधून गुंड यांच्यावर गोळी झाडली. दुसऱ्या दोघांनी शेख यांना मारहाण केली. गुंड यांच्यावर गोळी झाडणाऱ्यानेच शेख यांच्या कपाळावर एअरगनच्या बटने मारले.'

पोलिस कर्मचाऱ्यांना जखमी करून हे हल्लेखोर पळून गेले. जखमी पोलिसांनी घटनेची माहिती चतु:श‍ृंगी पोलिसांना दिली. त्यांना उपचारासाठी खासगी रुग्णालात दाखल करण्यात आले. गुन्हे शाखेच्या पोलिसांनी रविवारी घटनास्थळाची पाहणी करून आरोपींचा शोध सुरू केला. या प्रकरणी सहायक पोलिस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर अधिक तपास करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images