Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

गणेशोत्सवानिमित्त वाहतुकीत बदल

$
0
0

चार, पाच सप्टेंबर रोजी होणार अंमलबजावणी

म. टा. प्रतिनिधी, पुणे
गणपती प्राणप्रतिष्ठा आणि मूर्ती खरेदीनिमित्त शहराच्या मध्यवस्तीतील वाहतुकीत बदल करण्यात आला आहे. शिवाजी रस्ता ते गोटीराम भैय्या चौकापर्यंत, कुंभार वेस चौक ते शिवाजी पूल, नरवीर तानाजी मालुसरे रस्ता (सिंहगड रस्ता), सावरकर पुतळा चौक ते समाधान भेळ सेंटर आदी रस्ते चार आणि पाच सप्टेंबर रोजी वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात येणार आहेत.
पाच सप्टेंबरपासून गणेशोत्सवास सुरुवात होणार आहे. त्यासाठी चार सप्टेंबरपासून गणेश मूर्तींच्या खरेदीसाठी मोठ्या प्रमाणावर गर्दी होते. सार्वजनिक गणेश मंडळे आणि सामान्य नागरिक मोठ्या संख्येने डेंगळे पूल परिसर, शनिवार वाडा, सारसबाग (सावरकर पुतळा) या ठिकाणी जमतात. त्यावेळी तेथून वाहतूक सुरू ठेवणे अशक्य होऊन बसते. परिणामी, दर वर्षी येथील वाहतुकीत बदल केला जातो. तसेच, पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या बसमार्गातही बदल केला आहे.
-----
शिवाजी रस्त्याने स्वारगेटला जाणाऱ्या वाहनांसाठी पर्यायी रस्ते :
कुंभारवाड्यापासून शाहीर अमर शेख चौक (जुनाबाजार) मार्गे इच्छितस्थळी जावे.
सूर्य हॉस्पिटल (कसबा पेठ) समोरून पवळे चौक, कमला नेहरू हॉस्पिटल, नरपतगीर चौक, नेहरू रोडने ढोले पाटील (सेव्हन लव्हज) चौकामार्गे.
स. गो. बर्वे चौकातून जंगली महाराज रस्त्याने डेक्कनपर्यंत, तेथून टिळक रस्त्याने स्वारगेटला.
-----
सुरू असलेले रस्ते :
फडके हौद चौक ते जिजामाता चौक ते फुटका बुरूज
अप्पा बळवंत चौक ते बुधवार चौक ते मोती चौक
सोन्या मारुती चौक ते बेलबाग चौक ते सेवासदन चौक
मंगला टॉकिजसमोरील प्रीमिअर गॅरेज लेनमधून शिवाजी रस्ता ते खुडे चौक (सिमला ऑफिस)
-----
पीएमपीच्या बस मार्गातील बदल :
शिवाजी रस्त्याने स्वारगेटकडे जाणाऱ्या बस स. गो. बर्वे चौकातून जंगली महाराज रस्ता आणि पुढे टिळक रस्त्याने स्वारगेटला जातील.
मनपा भवन स्टॉपवरून स्वारगेटला जाणाऱ्या बस जंगली महाराज रस्ता, टिळक रस्त्याने जातील.
मनपा भवन येथून पुणे स्टेशनला जाणाऱ्या बस साठे चौक, कामगार पुतळामार्गे स्टेशनला न जाता, महापालिकेपासून खुडे चौकात (सिमला ऑफिस) आणि तेथून ग्रेड सेपरेटरमधून कामगार पुतळ्यापासून शाहीर अमर शेख चौक (जुना बाजार) येथून स्टेशनला जातील.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


​थेट‘सीएमओ’तर्फे चौकशी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
उच्चशिक्षण संचालनालयातील कारभाराच्या संदर्भाने सध्या थेट मुख्यमंत्री कार्यालयातून चौकशी सुरू झाल्याची माहिती बुधवारी समोर आली. एका विद्यापीठातील प्राध्यापक भरतीच्या संदर्भाने समोर आलेल्या तक्रारींवरून ही चौकशी सुरू आहे. याच संदर्भाने संचालनालयाने विद्यापीठाकडे केलेल्या तपासणीला संबंधित विद्यापीठ दाद देत नसल्याचा प्रकारही याच निमित्ताने अनुभवायला मिळाला.
उच्चशिक्षण संचालनालयामध्ये अंतर्गत लेखापरीक्षण (इंटर्नल ऑडिट) होत नसल्याची बाब 'मटा'ने नुकतीच उघड केली. त्या पाठोपाठ राज्यातील विनाअनुदानित संस्थांमधून सुरू असलेल्या व्यवहारांचा कोणताही लेखाजोखा संचालनालयाकडे नसल्याचेही उघड झाले. संचालनालयामधील काही बड्या अधिकाऱ्यांच्या व्यवहारांमुळे त्यांच्याकडे संचालनालयानेच वसुली प्रस्तावित केल्याचेही याच निमित्ताने समोर आले. त्या पाठोपाठ आता मुख्यमंत्री कार्यालयामधून संचालनालयाकडे चौकशी सुरू झाल्याचे समोर येत असल्याने, संचालनालयाच्या कारभाराविषयी घेतल्या जाणाऱ्या आक्षेपांमध्ये तथ्य आहे की काय, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
एका विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रात काही वर्षांपूर्वी झालेली प्राध्यापक भरती नियमबाह्य असल्याचे आरोप सातत्याने करण्यात येत आहेत. त्या विषयी संबंधित विद्यापीठ, विभागीय उच्चशिक्षण सहसंचालक कार्यालय आणि उच्चशिक्षण संचालक कार्यालयाकडेही या पूर्वीच्या काळात तक्रारी करण्यात आल्या होत्या. मात्र, या तक्रारींना कोणताही प्रतिसाद न मिळाल्याने, तक्रारदारांनी शिक्षण खाते, अर्थ खाते आणि अखेर मुख्यमंत्री कार्यालयाकडेही तक्रार केली होती. मुख्यमंत्री कार्यालयाने या तक्रारीची दखल घेत शिक्षणमंत्र्यांच्या कार्यालयामार्फत उच्चशिक्षण संचालनालयाकडे या विषयीची चौकशी आता सुरू केली आहे. संचालनालयाने या प्रकरणाशी संबंधित सर्व कागदपत्रे गोळा करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. त्यासाठी संबंधित विद्यापीठाकडून अपेक्षित कागदपत्रांचीही संचालनालयाने तातडीने मागणी केली आहे. मात्र, विद्यापीठाकडून कागदपत्रे सादर करण्याकडे दुर्लक्षच केले जात असल्याची माहिती संचालनालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी बुधवारी 'मटा'ला दिली. संचालनालयाने यापूर्वीही विद्यापीठाकडे अशा कागदपत्रांची मागणी केली होती. मात्र, त्यावेळीही विद्यापीठाने ही कागदपत्रे सादर केलेली नाहीत. आता थेट मुख्यमंत्री कार्यालयाकडूनच विचारणा होत असल्याने, आता तरी हे प्रकरण गांभीर्याने घेत, कागदपत्रे सादर करण्याची अपेक्षाही हे अधिकारी सध्या व्यक्त करत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

घरफोड्या करणारी टोळी अटकेत

$
0
0

सात वर्षांमध्ये १३० गुन्हे केल्याचे उघड; २८ लाखांचा ऐवज जप्त

म. टा. प्रतिनिधी, पुणे

पुणे शहरात दिवसाढवळ्या १३० घरफोड्या करणाऱ्या टोळीला डेक्कन पोलिसांनी शिताफीने गजाआड केले. या टोळीकडून २८ लाख रुपयांचा ऐवज जप्त करण्यात पोलिसांना यश आले आहे. मागील सात वर्षांपासून या टोळीने पुण्यात उच्छाद मांडला होता. सोसायट्यांमध्ये साहेबी थाटात प्रवेश केल्यानंतर बंद फ्लॅटची रेकी करून ते फोडण्याचा सपाटा या टोळीने लावला होता.
या टोळीने गेल्या वर्षी पुण्यात सर्वाधिक ४० घरफोड्या केल्या. सिंहगड रोड, भारती विद्यापीठ, वारजे, हिंजवडी, कोथरूड, सांगवी परिसरात सर्वाधिक गुन्हे घडल्याचे तपासात निष्पन्न झाले. या आरोपींचे कोणतेही गुन्हेगारी रेकॉर्ड नसल्याने त्यांच्यावर संशय व्यक्त झाला नाही. दरम्यान, त्यांनी गेल्या सात वर्षांमध्ये ५४ लाख रुपयांचा ऐवज लांबवल्याचेही उघड झाले आहे. इस्ताक मोहम्मद इक्बाल शेख (वय ४७, रा. देहुरोड), मदन विरन स्वामी (वय २४, रा, देहुरोड), अजय मधुकर गायकवाड (वय ४३, रा. रेल्वे क्वॉटर्सजवळ) यांना अटक करण्यात आली असून, पटेल नामक आणखी एक साथीदार फरारी झाल्याची माहिती उपायुक्त सुधीर हिरेमठ आणि ​वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुषमा चव्हाण यांनी दिली.
निरीक्षक चव्हाण यांना इस्ताक शेख घरफोडीच्या गुन्ह्यांत सामील असल्याची माहिती मिळाली होती. तो डेक्कन परिसरात येणार असल्याचे समजताच निरीक्षक सुचेता खोकले, फौजदार राहुल कोलंबिकर, चंद्रकांत लोहकरे, संतोष जगताप, सतीश भालेराव, पांडुरंग जगताप, संजय शिंदे, संजय पायगुडे, राज सावंत, मॅगी जाधव, नवनाथ वनवे आदींनी सापळा रचून त्याला ताब्यात घेतले. इस्ताकला मुंबईत घरफोडीच्या गुन्ह्यांत अटक झाली होती. त्यानंतर त्याने आपला मोर्चा पुण्यात वळवला होता. मूळचा देहुरोडच्या असणाऱ्या इस्ताकने तेथील तिघांना घेऊन टोळी बनवली. या टोळीने पुण्यात उच्छाद मांडून १३० घरफोड्या केल्याचे उघडकीस आले आहे. या टोळीने आणखी घरफोड्या केल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
..
साहेबी थाटात रेकी
घरफोडी करण्यासाठी फ्लॅटची रेकी करण्यात येत असे. साहेबाच्या रुबाबात आरोपी सोसायट्यांमध्ये प्रवेश करीत असत. ज्या सोसायट्यांमध्ये 'वॉचमन', 'सीसीटीव्ही' नाही; तेथे घरफोडी करण्यास प्राधान्य दिले जाई. कटावणीच्या मदतीने कुलूप तोडण्यात येई. सोन्या-चांदीचे दागिने, रोख रक्कम चोरी करून चोरटे फरारी होत असत, असे हिरेमठ यांनी सांगितले. या चोरट्यांकडून पोलिसांनी ९० तोळे सोने, तीन किलो चांदी, रोख रक्कम असा २७ लाख ९३ हजार रुपयांचा ऐवज जप्त केला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दारू पाजून महिलेवर बलात्कार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

कामावरून घरी पायी निघालेल्या पंचवीसवर्षीय महिलेच्या कपाळावर मारहाण करून तिला जबरदस्तीने दारू पाजून बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार धनकवडी परिसरात मंगळवारी रात्री घडला. या प्रकरणी सहकारनगर पोलिसांनी काही तासांतच दोन व्यक्तींना अटक केली.
नवनाथ राम जाधव (वय २०) आणि खंडू बापू लोंढे (वय ३२, दोघे रा. शंकर महाराज वसाहत, धनकवडी) असे अटक केलेल्यांची नावे आहेत. या बाबत पीडित महिलेने तक्रार दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित महिला केटरिंगचे काम करते. २८ ऑगस्ट रोजी ही महिला अहमदनगर जिल्ह्यातील नेवासे येथे गेले होती. अहमदनगर ते शिवाजीनगर असा प्रवास करून ती रात्री अकरा वाजता पुण्यात आली. तेथून तिने रिक्षा केली आणि धनकवडी गाठली. तेथून पायी घरी जात असताना महिलेच्या कपाळवर मारहाण करण्यात आली. त्यानंतर आरोपींनी तिला एका सोसायटीच्या पार्किंगमध्ये नेले.
त्या ठिकाणी आणखी एक व्यक्ती होती. ती व्यक्ती दारू पित होती. आरोपींनी पीडितेला जबरदस्तीने दारू पाजली आणि त्यातील एकाने तिच्यावर बलात्कार केला. दरम्यान, पीडितेने त्यांच्या तावडीतून सुटका केली आणि धावत सोसायटीच्या पहिल्या मजल्यावर गेली. पहिल्या मजल्यावर असलेल्या घरांचे दरवाजे वाजवून तिने तेथील रहिवाशांना घडलेला प्रकार सांगितला. तत्काळ रहिवाशांनी पार्किंगमध्ये धाव घेतली. मात्र, आरोपी तोपर्यंत तेथून पसार झाले होते. त्यानंतर महिला घरी गेली आणि तिने घडलेला प्रकार कथन केला. त्यानंतर पीडीत महिलेने आणि तिच्या नातेवाइकांनी सहकारनगर पोलिसांकडे धाव घेतली. घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलिस निरीक्षक दीपक यांनी गुन्ह्याचा तपास सुरू केला. दरम्यान, पोलिस कर्मचारी संजय भापकर आणि सतीश चव्हाण यांना आरोपींबाबत माहिती मिळाली. त्यानुसार निरीक्षक निकम, सहायक निरीक्षक सी. एम. मोरे यांच्या पथकाने दोघांना अटक केली. दोघेही घटना घडली त्या इमारतीमध्येच राहण्यास आहेत. लोंढे लेबर कॉन्ट्रक्टर असून, जाधव हा काहीच काम करत नाही. त्यांच्याकडे अधिक तपास सुरू आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

​राज्य कर्मचाऱ्यांच्या संपामुळे फटका?

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांप्रमाणे सातवा वेतन आयोग हा राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना लागू करावा, अंशदायी पेन्शन योजना रद्द करावी, निवृत्तीचे वय ६० वर्षे करावे आदी मागण्यांसाठी दोन सप्टेंबर रोजी राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या लाक्षणिक संपामुळे प्रमुख सेवांवर परिणाम होणार आहे. त्यामध्ये आरोग्य, नागरी सुविधा केंद्र आणि शाळा-कॉलेजांचे कामकाज ठप्प होण्याची शक्यता आहे.
राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना या लाक्षणिक संपात सहभागी होणार आहेत. संघटनेचे पुणे विभागाचे अध्यक्ष मारुती शिंदे म्हणाले, 'राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या अनेक मागण्या प्रलंबित आहेत. त्यामध्ये केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे ३० टक्के घरभाडे, अंशदायी पेन्शन योजना रद्द करून जुनी पेन्शन योजना लागू करणे, महिला कर्मचाऱ्यांसाठी दोन वर्षांची संगोपन रजा मंजूर करण्यात यावी, पाच दिवसांचा आठवडा बिनाशर्त सुरू करणे आदी मागण्या आहेत. या संपात जिल्हा परिषद कार्यालय, आरोग्य, कृषी, पाटबंधारे, समाजकल्याण, विक्रीकर आदी विभागांतील कर्मचारी सहभागी होणार आहेत. त्यामुळे काही प्रमुख सेवांवर परिणाम होणार आहे.'
'सर्व सरकारी कार्यालयांतील कर्मचारी दोन सप्टेंबर रोजी ​सकाळी ११ ते दुपारी दोन या कालावधीत जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढणार आहेत', असेही शिंदे म्हणाले.

भारतीय मजदूर संघ संपात नाही
असंघटित, कंत्राटी आणि अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांबाबत केंद्र सरकारने सकारात्मक भूमिका घेतल्याने भारतीय मजदूर संघ दोन सप्टेंबरच्या संपात सहभागी होणार नाही. राजकीय हेतूने प्रेरित असलेल्या या संपात कर्मचाऱ्यांनी सहभागी होऊ नये, असे आवाहन संघटनेचे प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत धुमाळ आणि प्रदेश सरचिटणीस रवींद्र देशपांडे यांनी केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सागर रजपूतने केला प्रेयसीचा निर्घृण खून

$
0
0

सहा महिन्याच्या मुलीस सोडले मंदिरात; पोलिस तपासात उघड

म. टा. प्रतिनिधी, पुणे
गुजरातमध्ये पुण्यातील दोन पोलिसांवर गोळीबार करणारा गजा मारणे टोळीचा कुख्यात गुंड सागर राजपूतने प्रेयसीला बडोद्याला घेऊन जाताना धुळे परिसरात गळा दाबून खून केल्याचे समोर आले आहे. प्रेयसीने नवीन फ्लॅट घेण्यासाठी तगादा लावल्यामुळे तिचा खून केला आणि तिच्या सहा महिन्याच्या चिमुरडीला इंदूर येथील मंदिरात सोडून दिल्याची धक्कादायक माहिती तपासात समोर आली आहे.
सरोज हनुमंत चोपडे (वय २३, रा. राजविलास हाइट्स, बावधन) असे खून केलेल्या महिलेचे नाव आहे. तसेच, त्याच्याकडून अमोल बधे खून प्रकरणात वापरलेले पिस्तूल जप्त केले आहे. हे पिस्तूल गजा मारणेच्या मुळशीतील फार्महाउसमध्ये लपवून ठेवले होते, अशी माहिती पोलिस उपायुक्त पी. आर. पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.
बडोदा येथे शोध घेण्यासाठी गेलेल्या दोन पोलिसांवर रजपूत याने गोळीबार केला होता. त्यानंतर गुजरात पोलिसांनी त्याला अटक केली. त्यानंतर पुणे पोलिसांनी त्याला पुण्यातील अमोल बधे खून प्रकरणात अटक करून तपास केला. त्यावेळी त्याने केलेल्या खुनाची माहिती पोलिसांना मिळाली. १४ डिसेंबर २०१५ रोजी सागर, सरोज आणि त्याच्या सहा महिन्याच्या मुलीसोबत कारने बडोद्याला निघाला होता. नवीन फ्लॅट घेण्यासाठी सरोजने त्याच्याकडे आग्रह धरला. त्यावरून या दोघांची कारमध्ये भांडणे झाली. त्यावेळी सागरने धुळ्याजवळ गेल्यानंतर तिचा गळा दाबून खून केला. त्यानंतर चाकूने वार करून तिचा मृतदेह झुडपात नेऊन टाकला. तेथून पुढे पाच तास प्रवास करून पहाटेच्या वेळी इंदूर येथील एका मंदिरात सहा महिन्याच्या मुलीला सोडून दिले. पोलिस कोठडीत सागरने ही माहिती दिल्यानंतर गुन्हे शाखेच्या पथकाने धुळ्याला जाऊन या प्रकरणाची चौकशी केली. त्यावेळी १५ डिसेंबर २०१५ रोजी एका महिलेचा खून झाल्याची नोंद आहे.
सरोजचा पती हनुमंत चोपडे यांची आणि सागरची पूर्वीपासून ओळख होती. त्यांनतर सागरने सरोजशी ओळख वाढवून तिच्याशी संबंध प्रस्थापित केले. तिचा ब्युटीपार्लरचा व्यवसाय होता. रजपूतला ३ सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे, अशी माहिती पाटील यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रेडिओलॉजिस्टचा आजपासून संप

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
गर्भलिंग प्रसवपूर्व व निदान चाचणी (पीसीपीएनडीटी) या कायद्याच्या नावाखाली कागदपत्रातील चुकांसाठी सरसकट सोनोग्राफी मशीन सील करणे किंवा सदस्यत्व रद्द करणे यासारखे प्रकार थांबविण्यात यावेत. कायद्यातील चुकीच्या नियमांविरोधात इंडियन रेडिओलॉजिकल व इमेजिंग असोसिएशनने (आयआरआयए) आजपासून (दि. १ सप्टेंबर) देशव्यापी बेमुदत संप पुकारला आहे.
संपाच्या पहिल्या दिवशी सोनोग्राफी, एक्स रे, सीटी स्कॅन, एमआरआय या सेवा बंद राहतील, तर दुसऱ्या दिवशी मात्र देशातील सर्व खासगी हॉस्पिटलमधील सोनोग्राफीची सेवा बेमुदत बंद राहणार आहेत. संपात देशातील वीस हजारांहून अधिक रेडिओलॉजिस्ट संपात सहभागी होणार आहेत. संपाच्या पार्श्वभूमीवर संघटनेने विविध मागण्या केल्या आहेत.
'कायद्याची एकसारखी अंमलबजावणी संपूर्ण देशात व्हावी, यासाठी मार्गदर्शक तत्वे आखून द्यावीत. त्याकरिता समुचित अधिकाऱ्याने मशीन सील करण्याची कारवाई करण्यापूर्वी सल्लागार मंडळाची पूर्वपरवानगी घ्यावी. या सल्लागार मंडळात डॉक्टरांच्या सर्व संघटनांच्या प्रतिनिधींचा समावेश असावा. कागदपत्रांतील चूक आणि प्रत्यक्ष लिंगनिदान या दोन गोष्टी वेगळ्या असून त्यासाठी एकच शिक्षा ही चुकीची आहे. कायद्यातील ही सर्वांत मोठी त्रुटी असून त्यात सुधारणा करण्यात यावी. तसेच संपूर्ण कायद्यातच दुरुस्ती करण्यात यावी,' अशी मागणी 'आयआरआयए'च्या पुणे शाखेचे अध्यक्ष डॉ. गुरुराज लच्छानी यांनी केली.
'पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 'बेटी बचाओ' या मोहिमेला आमचा पाठिंबा आहे. हा उद्देश साध्य करण्यासाठी 'पीसीपीएनडीटी' कायद्याची खऱ्या अर्थाने अंमलबाजवणी व्हावी. त्यामुळे मुलींची संख्या वाढेल. प्रामाणिक डॉक्टरांवर कारवाई करून केवळ कारवाईचे आकडे वाढलेले दिसतील; पण कायद्याचा मूळ उद्देश बाजूला राहिल. कागदोपत्री क्षुल्लक त्रुटींसाठी खटले दाखल करू नका. असे खटले मागे घ्यावेत. कायद्यात दुरुस्ती करून तो परिणामकारक राबवावा', या मागण्या असल्याचे डॉ. लच्छान यांनी सांगितले.

'पीसीपीएनडीटी' कायद्यात दुरुस्ती व्हावी, अशी आमची राज्य आणि केंद्र सरकारकडे यापूर्वीपासून मागणी होती. त्या मागण्यांकडे केंद्र सरकारने दुर्लक्ष केले. त्यामुळेच आमच्याकडे आंदोलनाशिवाय पर्याय राहिला नव्हता. त्यामुळे आजपासून देशव्यापी बेमुदत संप पुकारत आहोत.
- डॉ. जिग्नेश ठक्कर, समन्वयक, इंडियन रेडिओलॉजिकल अॅन्ड इमेजिंग असोसिएशन

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मीटरमुळे पाणीखर्च वाढता वाढता वाढे...

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
घरोघरी 'वॉटर मीटर' बसवण्याच्या उद्देशाने 'पाण्यासाठी जास्त पैसे मोजू नका', 'जेवढे पाणी वापराल, त्याचेच पैसे द्या' अशा जाहिराती पालिकेतर्फे सुरू असल्या, तरी मीटर बसल्यानंतर पुणेकरांच्या पाण्याच्या खर्चात दर वर्षी वाढच होत जाणार आहे. पाण्याच्या दरांत दर वर्षी पाच टक्के वाढीचा प्रस्ताव असल्याने पाण्याचा वापर कमी केला, तरी त्याचे 'मीटर' फिरतच राहणार आहे.
समान पाणीपुरवठ्याच्या योजनेसाठी (२४ बाय ७) महापालिकेतर्फे सध्या प्रयत्न सुरू आहेत. त्याअंतर्गत नव्याने ८२ टाक्या बांधण्यास स्थायी समितीने नुकतीच मंजुरी दिली आहे. मीटरबाबत जनजागृती करताना, त्यातून नागरिकांचे पैसे वाचणार असल्याचा दावा पालिकेतर्फे केला जात आहे. मात्र, पाण्याचा ठराविक वापर कायम राहिला, तरी पुणेकरांचे पाण्याचे बिल मात्र वाढतच जाणार आहे. आजमितीस वार्षिक अकराशे-बाराशे रुपये पाणीपट्टी भरणाऱ्या पुणेकरांना यापुढे किमान बिलच पंधराशे रुपये येणार असून, ठराविक मर्यादेपलीकडे पाण्याचा वापर केल्यास, बिलाची रक्कम वाढतच जाणार आहे.
मीटर बसल्यानंतर पुणेकरांना प्रतिदिन प्रतिमाणशी १५० लिटर पाणीपुरवठा केला जाणार असून, दर महिन्याला प्रत्येक कुटुंबासाठी २२.५० किलो लिटरची मर्यादा निश्चित करण्यात आली आहे. साधारणतः चार व्यक्तींच्या कुटुंबासाठी हे प्रमाण ठरविण्यात आले आहे. या मर्यादेत पाणी वापरणाऱ्या कुटुंबांकडून साडेपाच रुपये दराने आकारणी केली जाणार आहे. या मर्यादेत पाणी वापरणाऱ्या कुटुंबाचे वार्षिक बिल सध्याच्या अकराशे-बाराशे रुपयांवरून पंधराशे रुपयांवर जाणार आहे. तर, त्यापुढे पाणीवापर केल्यास जादा दराने आकारणी केली जाणार आहे. म्हणजेच, पाण्याचे बिल दोन हजार रुपये किंवा त्याहून अधिक होण्याची भीती आहे. त्यातच, दर वर्षी पाणीपट्टीत पाच टक्के वाढ केली जाणार असल्याने किमान बिलही काही वर्षांतच दोन हजार रुपयांपेक्षा अधिक होऊ शकते. मीटरद्वारे केल्या जाणाऱ्या पाणीपुरवठ्याचा कमाल दर १८ रुपये आहे. त्यामुळे सण-समारंभाच्या निमित्ताने एकत्र येणाऱ्या कुटुंबांना त्याचा भुर्दंड सहन करावा लागणार आहे.

दोनदा भुर्दंड?
महापालिकेने 'वॉटर मीटर'ची योजना दोन ऑक्टोबरपासून सुरू करण्याचे जाहीर केले आहे. त्यानुसार काही घरांमध्ये मीटर बसले, तर त्यांना यापुढे दर महिन्याला पाण्याचे बिल पाठविण्यात येणार आहे. म्हणजेच यापूर्वी पूर्ण वर्षाची पाणीपट्टी भरणाऱ्या नागरिकांवर पुन्हा मीटरनुसार पाणी घेतल्याचा बोजा पडणार आहे. एकाच वर्षात त्यांना पाण्यासाठी दोनदा पैसे द्यावे लागण्याची शक्यता आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


कुटुंबातील तिघांच्या खूनप्रकरणी फाशी

$
0
0

प्रेयसीसोबात विवाह करण्यासाठी केले कृत्य; सत्र न्यायालयाचा आदेश

म. टा. प्रतिनिधी, पुणे
प्रेयसीबरोबर लग्न करण्यास विरोध करणारी आई, पत्नी आणि दोन वर्षांच्या मुलीचा निर्घृणपणे खून करणाऱ्याला पुणे सत्र न्यायालयाने बुधवारी फाशीची शिक्षा सुनावली. तर, शेजारी राहणाऱ्या व्यक्तीला जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी त्याला जन्मठेपही ठोठावण्यात आली.
आरोपीने आई, पत्नी आ​णि मुलीचा खून करून चोरीचा बनाव रचला. मात्र, तपासाअंती त्याने लोखंडी हातोडीने पत्नी आणि आईचा खून केल्याचे समोर आले. हा खटला दुर्मिळातील दुर्मिळ असल्याचे नमूद करून जिल्हा व सत्र न्यायाधीश पी. वाय. लाडेकर यांनी आरोपीला फाशीची शिक्षा सुनावली. विश्वजित केरबा मसलकर (वय २५, रा. चंपरत्न सोसायटी, वानवडी) असे आरोपीचे नाव आहे.
बुधवारी सकाळी मसलकर याला कोर्टात हजर केल्यानंतर निकाल वाचून दाखविण्यात आला. मुलगी किमया (वय दोन वर्षे), पत्नी अर्चना (वय २५) आणि आई शोभा (वय ५०) यांच्या खूनप्रकरणी फाशीची शिक्षा सुनावण्यात येत आहे. तर, शेजारी राहणाऱ्या मधुसुदन दत्तात्रय कुलकर्णी यांच्या खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी जन्मठेप ठोठावण्यात येत असल्याचेही कोर्टाने स्पष्ट केले. निकाल वाचून झाल्यानंतर आरोपीच्या चेहऱ्यावर अपराधीपणाचा लवलेशही दिसत नव्हता. निर्विकार चेहऱ्याने त्याने निकाल ऐकला. या खटल्यात जिल्हा सरकारी वकील उज्ज्वला पवार यांनी सरकार पक्षाची बाजू भक्कमपणे मांडून आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची विनंती कोर्टाला केली.
..
खून करून रचला चोरीचा बनाव
४ ऑक्टोबर २०१२ रोजी रात्री पावणेआठच्या सुमारास मसलकर घरी आला आणि त्याने चोरी झाल्याची थाप सोसायटीचे अध्यक्ष आणि इतरांना मारली. या घटनेत चोरट्यांनी तिघांचा खून करून घरातील तीन लाखांचा ऐवज चोरल्याचे त्याने पोलिसांकडे नोंदविलेल्या तक्रारीत म्हटले होते. शहरात चोरीच्या उद्देशाने तिघांचा खून झाल्यामुळे एकच खळबळ उडाली होती. अवघ्या दोन वर्षांच्या मुलीचा खून झाल्यामुळे प्रकरणाचे गांभीर्य वाढले होते. त्यामुळे या गुन्ह्याचा तपास करत असताना पोलिसांना मसलकरच्या वडिलांच्या फोटोमागे चोरीला गेलेला ऐवज मिळाल्यामुळे त्याच्यावरच संशय बळावला. त्याच्याकडे अधिक चौकशी केल्यानंतर त्याचे जेजुरी येथील तरुणीशी दोन वर्षांपासून प्रेमसंबंध होते. तिच्या सोबत त्याला लग्नही करायचे होते. मात्र, लग्नाला पत्नीचा आणि आईचा विरोध होता. त्यामुळे त्याने दोघींच्या डोक्यात हातोडी घालून खून केला. त्यानंतर मुलीच्या तोंडावर उशी ठेवून तिचा खून केला. मसलकर यांच्या शेजारी राहणाऱ्या कुलकर्णी यांनी हा प्रकार पाहिला होता. त्यामुळे त्यांनाही जीवे मारण्याचा प्रयत्न मसलकरने केल्याचे समोर आले.
.
तोंडावर उशी ठेवून मुलीचा खून
मसलकर कंपनीत सुपरवायझर म्हणून काम करत होता. त्यावेळी त्याचे जेजुरीत राहणाऱ्या एका तरुणीशी प्रेमसंबंध निर्माण झाले. त्याने तरुणीकडे लग्नासाठी लकडा लावला. पण, त्याचे अगोदरच लग्न झाल्याने तिने नकार दिला. या पार्श्वभूमीवर घरच्यांचा अडथळा दूर करतो, असा शब्द मसलकरने तरुणीला दिला. घटनेच्या दिवशी त्याने लग्नाला जायचे असल्याचे कारण सांगून सुट्टी घेतली. दुपारी पत्नीचा बेडरूमध्ये त्याने हातोडीने वार करून खून केला. तिच्या आकांतामुळे दोन वर्षांची मुलगी रडू लागली. त्यामुळे चिडलेल्या मसलकराने तिच्या तोंडावर उशी ठेवून तिचाही खून केला. या आवाजामुळे शेजारी राहणारे कुलकर्णी काय झाले हे पाहण्यासाठी आले असता, त्यांच्याही डोक्यात हातोडी मारली. त्यानंतर बेडरूमला कडी लावून मसलकर सोफ्यावर बसला. काही वेळानंतर त्याची आई बाहेरून आली. बेडरूममध्ये गेल्यानंतर तिने हा सर्व प्रकार पाहिला. मुलाचा अवतार पाहून ती बाथरूममध्ये जाऊन लपली. मसलकरने बाथरूमचा दरवाजा तोडून तिला बाहेर काढले. हातोड्याने वार करून आईचाही खून केला. त्यानंतर तो मोटारसायकलवरून निघून गेला आणि रात्री पावणेआठ वाजता घरात दाखल झाला. मारहाणीत कुलकर्णी यांचाही मृत्यू झाल्याचे त्याला वाटले. त्याने ही माहिती शेजाऱ्यांना दिली आणि त्यानंतर पोलिस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी केलेल्या तपासात मसलकर दुपारी साडेचारच्या सुमारास घराच्या बाहेर पडल्याचे आढळून आले.
..
सरकारी वकिलांची हॅट् ट्रिक
जिल्हा सरकारी वकील उज्ज्वला पवार यांनी या खटल्यात सरकार पक्षाची बाजू मांडली. त्यांनी काम पाहिलेल्या संतोष माने खटल्यात आणि दीपक महाजन खून खटल्यात आरोपींना यापूर्वी फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे. या तिहेरी खुनाच्या खटल्यात आरोपींला फाशी सुनावल्यामुळे त्यांनी काम पाहिलेल्या तिन्ही खटल्यात सारखाच निकाल लागला आहे.
---------------------
पुणे कोर्टाने सुनावलेली फाशी
२००२ चार वर्षांच्या मुलीवर बलात्कार, खून केल्याप्रकरणी राहुल दशरथ भोंगळे याला फाशी.
२००३ अल्पवयीन मुलीवर बलात्कार, खुनाप्रकरणी शिवाजी शंकर आल्हाट याला फाशी.
२००४ माजी राष्ट्रीय टेनिस खेळाडू आर. कार्तिकराज याच्या खुनाप्रकरणी संतोष बेरियारला फाशी.
२००४ रमेश पाटील (वय ५०), त्यांची पत्नी वैजयंती (वय ४७) मुलगा मंजुनाथ (वय ९), मुलगी पूजा (वय १३, सर्वजण रा. कल्याणीनगर) यांच्या घरी ४९ लाखांची चोरी करून खून केल्याप्रकरणी साहेबराव काळे यास फाशी.
२००४ हृषीकेश मैनकर या तेरा वर्षांच्या मुलाच्या खुनाप्रकरणी ज्ञानेश्‍वर बोरकर ऊर्फ माऊली
(वय २२) यास फाशी
२००७ डॉ. दीपक महाजन यांच्या हत्येप्रकरणी लीना देवस्थळी (वय ५२) आणि तिची मुलगी दीप्ती देवस्थळी (वय २६) या दोघींना फाशी.
२०१० अप्पर इंदिरानगर येथील ज्येष्ठ महिलेचा खून करून तिच्या सुनेवर बलात्कार केल्याप्रकरणी संदेश ऊर्फ साईनाथ कैलास अभंग (वय २६) यास फाशी.
२०१२ विप्रो कंपनीची कर्मचारी ज्योतीकुमारी बलात्कार आणि खूनप्रकरणी पुरुषोत्तम बोराटे (वय ३१) आणि त्याचा मित्र प्रदीप यशवंत कोकाटे (वय २५) यांना फाशी.
२०१३ जर्मन बेकरी बॉम्बस्फोटील आरोपी मिर्झा हिमायत बेग याला फाशी.
२०१३ बेदरकारपणे एसटी चालवून नऊ जणांचे बळी घेणाऱ्या संतोष मानेला फाशी.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बाजार फीमधून रेशन दुकाने मुक्त

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
कृषी उत्पन्न बाजार समितीमार्फत वसूल करण्यात येणाऱ्या बाजार फी व देखरेख फीमधून रेशन दुकानांना वगळण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्यामुळे यापुढील काळात रेशन दुकानांत झालेल्या व्यवहारांवर बाजार व देखरेख फी आकारता येणार नाही. या निर्णयामुळे रेशन दुकानदारांना मोठा दिलासा मिळाला आहे.
सार्वजनिक वितरण व्यवस्थेंतर्गत (रेशन) विविध योजनांद्वारे गरीब व गरजू कुटुंबांना अन्नधान्य वितरित करण्यात येत आहे. राज्य सरकारने मंजूर केलेल्या अन्नधान्याची भारतीय अन्न महामंडळाकडून उचल केली जाते. या धान्याची निविदा निघाल्यावर वाहतूक कंत्राटदारामार्फत गोदामातून ते रेशन दुकानापर्यंत पोहोचविले जाते. यामध्ये रेशन दुकानदाराकडून कोणत्याही प्रकारच्या खरेदी-विक्रीचा व्यवहार होत नाही.
रेशन दुकानात विक्री होत असलेल्या मालाची बाजार फी शासनामार्फत अगोदरच देण्यात येते. त्यामुळे आधीच बाजार फी आकारली असताना त्यावर पुन्हा बाजार फी आकारता येत नसल्याने रेशन दुकानांकडून ही फी घेता येणार नाही, असा आदेश राज्य सरकारने काढला आहे. बाजार समितीच्या कार्यक्षेत्रात कृषी उत्पादनांची खरेदी-विक्री करणाऱ्या प्रत्येकास मार्केट परवाना काढवा लागतो. तसेच या उत्पादनाची खरेदी करणाऱ्यांना बाजार फी व देखरेख फी द्यावी लागते. रेशन दुकानदार हा खरेदीदार म्हणून कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कार्यक्षेत्रात प्रत्यक्षात कोणताही खरेदी-विक्रीचा व्यवसाय करीत नाही. त्यामुळे रेशन दुकानदारांना यातून वगळण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

स्टार्ट अपसाठी पोषक वातावरणाचा अभाव

$
0
0

पुण्याविषयी डॉ. माशेलकर यांचे मत;

उद्योगांचे 'चलो बेंगळुरू'

म. टा. प्रतिनिधी, पुणे

'गेल्या काही वर्षांमध्ये पुण्यात स्टार्ट अपना प्रोत्साहन देण्यासाठी पोषक वातावरणनिर्मिती न झाल्याने नवउद्योजकांनी उद्योगांसाठी बेंगळुरूची वाट धरली,' असे मत ज्येष्ठ वैज्ञानिक डॉ. रघुनाथ माशेलकर यांनी बुधवारी व्यक्त केले. सध्या शहरात वातावरणनिर्मिती करण्यासाठी योग्य वेळ असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
'इंडियन सायन्स अँड टेक्नॉलॉजी आंत्रप्रेन्युअर्स पार्क' आणि 'बिझनेस इन्क्युबेटर्स असोसिएशन'तर्फे (इस्बा) पुण्यात १० आणि ११ सप्टेंबर रोजी ११ व्या राष्ट्रीय वार्षिक परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. केंद्रीय वाहतूक आणि रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते परिषदेचे उद्घाटन होणार आहे. परिषदेच्या आयोजनाची माहिती देण्यासाठी 'इस्बा'तर्फे आयोजित पत्रकार परिषदेत डॉ. माशेलकर यांनी नवउद्योजक आणि स्टार्ट अपच्या संदर्भात विचार मांडले. ही परिषद पुण्यातील स्टार्टअपना पोषक वातावरण निर्मिती करण्यासाठी उपयुक्त ठरेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. टेक्नोलॉजी पार्कचे उपाध्यक्ष डॉ. प्रतापराव पवार, महासंचालक आणि 'इस्बा'चे अध्यक्ष डॉ. राजेंद्र जगदाळे या वेळी उपस्थित होते. या उपक्रमाद्वारे देशभरातील स्टार्ट अपना प्रोत्साहन देण्यासाठी कार्यरत असणाऱ्यांना मार्गदर्शन पुरविले जाणार आहे. केंद्र सरकारच्या 'स्टार्ट अप इंडिया' धोरणाला अनुसरून परिषदेचे आयोजन करण्यात आल्याचे या वेळी स्पष्ट करण्यात आले.

डॉ. माशेलकर म्हणाले, 'नवकल्पना एखाद्या उत्पादनाच्या माध्यमातून प्रत्यक्षात येण्यासाठी विशिष्ट प्रकारचे वातावरण गरजेचे असते. त्यासाठी गुंतवणूकदारांपासून ते योग्य धोरणकर्त्यांपर्यंत सर्वांचीच गरज असते. आर्थिक पाठबळ आणि सुरुवातीच्या टप्प्यात उद्योजकांना चालना देण्यासाठीची मानसिकता आपल्याकडे दुर्देवाने उशिरा निर्माण झाली. त्या तुलनेत अशा सुविधा चटकन मिळू लागल्याने, स्टार्ट अपसाठी बेंगळुरू प्रमुख केंद्र बनले आहे.' सध्या केंद्रीय पातळीवरूनही स्टार्ट अपना पूरक धोरणांची अंमलबजावणी सुरू झाली आहे. त्यामुळे पुण्यात स्टार्ट अपना चालना देण्याची हीच योग्य वेळ असल्याचेही त्यांनी नमूद केले.

आंतरराष्ट्रीय दर्जाचे विमानतळ, त्याच दर्जाचे प्रदर्शन केंद्र उभारणीसाठी पुण्यात गेल्या कित्येक वर्षांपासून प्रयत्न सुरू आहेत. हे प्रयत्न प्रत्यक्षात येत नसल्यामुळेही नवउद्योजकांनी पुण्याच्या तुलनेत बेंगळुरूला प्राधान्य दिल्याची शक्यता डॉ. पवार यांनी व्यक्त केली.

नवकल्पना एखाद्या उत्पादनाच्या माध्यमातून प्रत्यक्षात येण्यासाठी विशिष्ट प्रकारचे वातावरण गरजेचे असते. त्यासाठी गुंतवणूकदारांपासून ते योग्य धोरणकर्त्यांपर्यंत सर्वांचीच गरज असते. आर्थिक पाठबळ आणि सुरुवातीच्या टप्प्यात उद्योजकांना चालना देण्यासाठीची मानसिकता आपल्याकडे दुर्देवाने उशिरा निर्माण झाली.
- डॉ. रघुनाथ माशेलकर

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चिकुनगुनियात पुणे ‘अव्वल’

$
0
0

राज्यातील एकूण पेशंटांच्या तुलनेत ९५ टक्के पेशंट पुण्यात

म. टा. प्रतिनिधी, पुणे

एकीकडे डेंगीचा प्रादुर्भाव वाढत असतानाच राज्यात आता पुणे शहर आणि जिल्ह्यात चिकुनगुनियाची लागण झालेल्या पेशंटची संख्या सर्वाधिक असल्याचे समोर आले आहे. राज्यातील पेशंटच्या तुलनेत ९५ टक्के पेशंट पुणे शहर आणि जिल्ह्यातील आहेत.

'एडिस इजिप्ती' डासांनी चावा घेतल्यास डेंगीबरोबर चिकुनगुनियाची लागण होते. दोन्ही आजारांची लक्षणे जवळपास सारखीच आहेत. अनेकदा दोन्ही आजाराच्या पेशंटची चाचणी निगेटिव्ह येत असली तरी, लक्षणे मात्र कायम राहतात. त्यामुळे अनेकदा लागण झाली आहे अथवा नाही असा प्रश्न पडतो. सध्या शहरात डेंगीच्या पेशंटबरोबर चिकुनगुनियाच्या पेशंटची संख्या वाढत असल्याने हॉस्पिटल, क्लिनिकमध्ये गर्दी होत आहे.

'राज्यात डेंगीबरोबर चिकुनगुनियामुळे एकही मृत्यू झालेला नाही. जुलैअखेर राज्यात ३३३ जणांना चिकुनगुनियाची लागण झाली होती. जानेवारी ते ऑगस्टपर्यंत राज्यात ४३७ जणांना चिकुनगुनियाची लागण झाली. त्यामध्ये सर्वाधिक पेशंट पुण्यातील असून, (२२५) त्यापाठोपाठ पुणे जिल्ह्याचा (१६८) क्रमांक लागतो. पिंपरी चिंचवडमध्ये १४, सातारा जिल्ह्यात ६ तर, नगर जिल्ह्यात ९ जणांना लागण झाली आहे,' अशी माहिती आऱोग्य विभागाच्या सहसंचालक डॉ. कांचन जगताप यांनी दिली.

राज्यातील एकूण चिकुनगुनियाच्या पेशंटपैकी ९५ टक्के पेशंट एकट्या पुण्यातील आहेत, असे निरीक्षण आरोग्य खात्यातील अधिकाऱ्यांनी नोंदवले आहे. महापालिकेच्या आरोग्य विभागानेही याला दुजोरा दिला आहे. 'पुणे जिल्ह्यात आठ वर्षांनंतर चिकुनगुनियाचा मोठ्या प्रमाणात उद्रेक झाला आहे. गेल्या दोन वर्षांत चिकुनगुनियाचा एकही पेशंट आढळला नाही. जिल्ह्यात दौंड, फुरसुंगी, लोणीकाळभोर, सांगरूण, हवेली तालुक्यात चिकुनगुनियाचे पेशंट आढळले,' अशी माहिती जिल्हा परिषदेचे आरोग्य अधिकारी डॉ. भगवान पवार यांनी दिली.

जिल्ह्यात १८९ पेशंट

जिल्ह्यात आजमितीपर्यंत सात ठिकाणी चिकनगुणियाचा उद्रेक झाला असून, १८९ जणांना चिकुनगुनियाची लागण झाली आहे, असे अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संजय जठार यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चोरट्यांकडून पतीने मिळवले मंगळसूत्र

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

पीएमपीमधून प्रवास करताना चोरट्याने एका महिलेचे मंगळसूत्र हिसकावले खरे; पण त्याच गाडीतून प्रवास करणाऱ्या महिलेच्या पतीने ते पाहिले आणि चोरापाठोपाठ बसमधून उडी टाकली. काही अंतर धावून चोरट्याचा पाठलाग केला आणि पोलिसांच्या मदतीने त्याला पकडण्यात अखेर यश मिळवले.

एखाद्या बॉलिवूडपटालाही लाजवेल असा प्रसंग मुंढवा परिसरात मंगळवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास घडला. प्रशांत अनिल पवार (वय २७, रा. सर्वोदय कॉलनी, मुंढवा) असे अटक केलेल्या चोरट्याचे नाव आहे. त्याचा साथीदार रवी गायकवाड मात्र, पळून गेला. पंढरीनाथ सस्ते (वय ४५, रा. यवत, दौंड) यांनी या प्रकरणी फिर्याद नोंदवली आहे.

पंढरीनाथ सस्ते आणि त्यांची पत्नी हडपसर ते मुंढवा या मार्गावर पीएमपीने प्रवास करीत होते. साईनाथनगरच्या बसथांब्यावर त्यांना उतरायचे होते. त्यामुळे ते पुढील दाराजवळ येऊन थांबले. बसथांबा काही अंतरावर असतानाच बसमधील आरोपी पवार आणि गायकवाड अचानक पुढे आले. त्यांनी सस्ते यांच्या पत्नीच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावून चालत्या बसमधून उडी मारली. पत्नीचे मंगळसूत्र हिसकावून नेल्याचे समजताच सस्ते यांनी देखील चालत्या बसमधून उडी मारली आणि चोरांचा पाठलाग सुरू केला. आपला पाठलाग होत असल्याचे लक्षात येताच आरोपींनी थांबून सस्ते यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली आणि त्यांच्या दिशेने दगडही फेकून मारला. या हल्ल्यात ते थोडे जखमी झाले. तरीही त्यांनी पाठलाग थांबवला नाही.

दरम्यान, त्यांनी घटनेची माहिती पोलिसांना कळवली. दगडफेक करूनही आपला पाठलाग होत असल्याचे पाहून चोरट्यांपैकी गायकवाडने मुंढवा पुलावरून थेट नदीत उडी मारली. नदीतून पोहत पोहत केशवनगरच्या बाजूला निघण्याचा प्रयत्न केला. तरीही पूल ओलांडून पलीकडच्या दिशेने सस्ते धावत राहिले. दरम्यान, पाठीमागून आलेल्या पोलिसाने सस्ते यांना गाडीवर बसवून नदीच्या बाजूने नेले. मुंढवा पोलिसांनी केशवनगरच्या बाजूने ऑस्कर शाळेच्या मागील बाजूस गायकवाडला पकडण्याची तयारी केली. अखेर गायकवाडला पकडण्यात पोलिसांना यश आले. चित्रपटात शोभावा असाच प्रसंग मुंढवा परिसरात घडला. सस्ते यांनी पत्नीचे मंगळसूत्र मिळवल्याने सस्ते यांच्या पराक्रमाची परिसरात चर्चा सुरू होती. पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक बी. एस. ढवळे करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मान्सूनचा परतीचा प्रवास लांबणीवर

$
0
0

अनुकूल परिस्थिती नसल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे

म. टा. प्रतिनिधी, पुणे

मान्सूनचा परतीचा प्रवास सुरू होण्यासाठी अद्याप अनुकूल स्थिती निर्माण झाली नसल्याचे हवामान तज्ज्ञांनी स्पष्ट केले आहे. पुढील आठवड्यात पश्चिम- वायव्य भारतात पावसाची शक्यता असल्यामुळे त्या पावसाचा जोर ओसरल्यावरच मान्सूनच्या परतीच्या प्रवासासाठी अनुकूल स्थिती निर्माण होईल, असे हवामानतज्ज्ञांचे म्हणणे आहे.

भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या (आयएमडी) तक्त्यानुसार मान्सूनचा पश्चिम राजस्थानातून परतीचा प्रवास सुरु होण्याची सर्वसाधारण तारीख एक सप्टेंबर आहे. मात्र, गेली काही वर्षे सप्टेंबरच्या दुसऱ्या पंधरवड्यात मान्सून राजस्थानातून माघारी फिरण्यास सुरु झाल्याचे दिसून आले आहे. यंदाही सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात मान्सूनचा परतीचा प्रवास सुरु होण्याची चिन्हे नाहीत. 'आयएमडी'तील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार,'राजस्थान आणि वायव्य भारतात सध्या पावसाने हजेरी लावली असून, दोन सप्टेंबरपासून काही दिवस वायव्य भारतातील पावसामध्ये तात्पुरता खंड पडण्याची शक्यता आहे. मात्र, त्या नंतर पुन्हा पावसाचा जोर वाढण्याची शक्यता असल्यामुळे सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात तरी पश्चिम राजस्थानमधून मान्सून माघारी फिरण्याची चिन्हे नाहीत.

'आयएमडी'च्या निकषानुसार एक सप्टेंबरच्या आधी मान्सूनचा परतीचा प्रवास सुरू होत नाही. एक सप्टेंबरनंतर राजस्थानमध्ये सलग पाच दिवस पावसाची अनुपस्थिती, वातावरणात दीड किलोमीटर उंचीच्या खाली अँटिसायक्लोनची स्थिती निर्माण झाल्यावर, तसेच उपग्रहीय छायाचित्रामधून बाष्पाचे प्रमाण कमी झाल्याचे दिसून आल्यावर मान्सून माघारी फिरल्याचे जाहीर करण्यात येते. २०११ मध्ये २३ सप्टेंबर, २०१२मध्ये २४ सप्टेंबर, २०१३मध्ये ९ सप्टेंबर आणि २०१४ मध्ये २३ सप्टेंबरपासून मान्सून माघारी फिरण्यास सुरुवात झाली होती.

-----------------------------
राज्यात १०९ टक्के पाऊस

मान्सूनच्या हंगामातील शेवटचा महिना शिल्लक राहिला असताना देशभरात आतापर्यंत समाधानकारक पाऊस झाल्याचे 'आयएमडी'च्या आकडेवारीवरून दिसून येत आहे. एक जून ते ३१ ऑगस्टपर्यंत देशभरात सरासरीच्या १०३ टक्के पाऊस झाला असून, ३६ पैकी २८ हवामानशास्त्रीय विभागांमध्ये सरासरी इतका किंवा त्यापेक्षा जास्त पाऊस झाला आहे. दोन आठवड्यांच्या विश्रांतीनंतरही महाराष्ट्रात सरासरीपेक्षा नऊ टक्के (१०९ टक्के) जास्त पाऊस झाला असल्याचे आकडेवारीवरून दिसून येत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

यापुढं दहावीत कुणीही 'नापास' होणार नाही!

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

दहावीच्या निकालावर यापुढे कधीही 'नापास' असा शेरा छापून येणार नाही. शिक्षण खात्याने त्यासाठी दहावीच्या निकालपत्रकामध्ये महत्त्वाचे बदल केले असून, नुकत्याच झालेल्या जुलै फेरपरीक्षेच्या निकालपत्रापासून ते लागू होणार आहेत. त्यानुसार विद्यार्थ्यांना निकालपत्रावर 'उत्तीर्ण', 'एटीकेटीच्या आधारे अकरावी प्रवेशासाठी पात्र', 'केवळ कौशल्यविकास अभ्यासक्रमांसाठी पात्र' किंवा 'फेरपरीक्षेसाठी पात्र' असा शेरा मिळणार आहे.

राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दहावीच्या जुलैमध्ये घेतलेल्या फेरपरीक्षेचा ऑनलाइन निकाल मंगळवारी जाहीर केला. त्या अनुषंगाने राज्य सरकारने एका सरकारी निर्णयाद्वारे निकालपत्रातील शेऱ्यांमध्ये होणाऱ्या बदलांविषयीची माहिती जाहीर केली. यापुढील काळात दहावीच्या निकालावर 'अनुत्तीर्ण' हा शब्द वापरण्यात येणार नसल्याचेही या निर्णयात स्पष्ट करण्यात आले.

जुलै २०१६च्या फेरपरीक्षेपासून सर्व विषयांत उत्तीर्ण विद्यार्थ्यांच्या निकालावर उत्तीर्ण, एक वा दोन विषयांत अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांच्या निकालावर 'एटीकेटी सुविधेच्या आधारे अकरावी प्रवेशास पात्र' आणि तीन किंवा तीनपेक्षा अधिक विषयांमध्ये नापास झालेल्या विद्यार्थ्यांसाठी 'केवळ कौशल्यविकास कार्यक्रमांसाठी पात्र' असा शेरा दिला जाईल. फेब्रुवारी-मार्चच्या परीक्षेसाठी उत्तीर्ण, 'एटीकेटी'च्या आधारे अकरावीस पात्र हे शेरे कायम राहतील. त्याच वेळी तीन वा त्यापेक्षा जास्त विषयांमध्ये अनुत्तीर्णांसाठी 'फेरपरीक्षेसाठी पात्र' असा शेरा निकालपत्रामध्ये नमूद केला जाणार असल्याचेही या निर्णयात स्पष्ट करण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


कामगार संघटना बंदमध्ये सहभागी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पिंपरी

कामगार कायद्यातील तरतुदी व बदलांबाबत आज, शुक्रवारी (२ सप्टेंबर) पुकारण्यात आलेल्या देशव्यापी बंदमध्ये पिंपरी-चिंचवडमधील विविध कामगार संघटना सहभागी होणार आहेत. या बंदमध्ये सर्वच कामगारांनी सहभागी व्हावे, असे आवाहन कामगार संघटना संयुक्त कृती समितीचे व पुणे जिल्हा इंटकचे अध्यक्ष डॉ. कैलास कदम, राष्ट्रवादी कामगार सेलचे यशवंत भोसले यांनी केले आहे.

कामगारविरोधी व मालकधार्जिणे बदल रद्द करावेत. अंगणवाडी, शालेय पोषाण आहार योजनेतील कामगारांना किमान वेतन द्यावे. या योजनांवरील आर्थिक तरतूदीमध्ये केलेली कपात रद्द करून जास्तीची तरतूद करावी. यंत्रमाग व बिडी कामगारांना सरकारने जाहीर केलेले किमान वेतन लागू करावे. कोणतीही सरकारी पेन्शन नसलेल्या ज्येष्ठांना दरमहा रुपये तीन हजार पेन्शन द्यावी. शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी द्यावी. शेतमालाला उत्पादन खर्चावर ५० टक्के नफा धरून आधारभूत भावाची हमी द्यावी, अशी मागणी कामगार संघटना संयुक्त कृती समितीचे व पुणे जिल्हा इंटकचे अध्यक्ष डॉ. कैलास कदम यांनी केली.

या कायद्याविरोधात मागील पंधरा दिवसात पिंपरी चिंचवड शहर, पुणे शहर व जिल्ह्यातील औद्योगिक पट्ट्यांत ठिकठिकाणी कॉर्नर सभा, कंपनी प्रवेशव्दारासमोर सभा, कामगार मेळावे घेण्यात आले. त्याअंतर्गत बुधवारी (३१ ऑगस्ट) संयुक्त कृती समितीचे व पुणे जिल्हा इंटकचे अध्यक्ष डॉ. कैलास कदम यांच्या नेतृत्वाखाली खडकीतील अॅम्युनिशन फॅक्टरीच्या प्रवेशद्वारासमोर घेण्यात आलेल्या सभेत कामगार नेते कॉ. अजित अभ्यंकर, अॅड. म. वि. अकोलकर, कॉ. वसंत पवार (सिटू), शशिकांत धुमाळ, सुभाष वाघमोडे (खडकी अॅम्यूनिशन फॅक्टरी), मनोहर गडेकर (इंटक), अनिल आवटी (एमएसईबी), गिरीष मेंघे (बँक कर्मचारी संघ), भारती अवसरे (बांधकाम कामगार संघटना), प्रकाश जाधव, मधुकर रणसिंगे (पुणे मनपा), अॅड. गोपाळ गुणाले (एनएफटीयू), राहुल बहिरट (कंत्राटी कामगार संघटना), मेधा थत्ते (घरेलू कामगार), भारती घाग (मजदूर महिला संघ), दतात्रय येळवंडे (श्रमिक एकता महासंघ), शब्बीर इनामदार (सीओडी देहुरोड), मधुकर रणसिंगे (पुणे मनपा), सचिन कदम (हिंद कामगार संघटना) आदी कामगार प्रतिनिधी उपस्थित होते.

पुणे, पिंपरी-चिंचवड व जिल्ह्यातील सर्व औद्योगिक पट्ट्यातून संघटीत, असंघटीत कामगार, शासकीय, निमशासकीय, संरक्षण, बँका, विमा, रेल्वे, वाहतूक, औषधे, व्यापार, बांधकाम क्षेत्रातील सर्व कामगार आज, शुक्रवारी (२ सप्टेंबर) सकाळी साडेदहा वाजता वाकडेवाडी पुणे येथील कामगार उपायुक्त कार्यालय येथे एकत्र येतील. या ठिकाणी जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले असून, सभेनंतर कृती समितीच्या वतीने कामगार उपायुक्तांना निवेदन देण्यात येणार आहे.

दरम्यान, कामगार नेते यशवंत भोसले यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय श्रमिक आघाडी, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कामगार सेल आणि कामगार संयुक्त आघाडी हेही देखील सहभागी होत आहेत. पिंपरी-चिंचवड मधील टाटा मोटर्स, बजाज, फोर्ब्स मोटर, थरमॅक्स, अल्फा लावल, सँडविक, मार्शल अशा छोट्या मोठ्या सर्व कारखान्यांतील सर्व कामगार संघटना व कामगारांना संपमध्ये सहभागी होण्याचे आवाहन भोसले यांनी केले आहे.

या संघटनांचा सहभाग

देशव्यापी बंदमध्ये इंटक, सीटू, आयटक, राष्ट्रवादी कामगार सेल, बँक एम्प्लॉईज फेडरेशन, श्रमिक एकता महासंघ, विमा कामगार संघटना, बीएसएनएल एम्लॉइज युनियन, एमएसईबी वर्कर्स फेडरेशन, एआयबीईए, महाराष्ट्र स्टेट बँक एम्प्लॉइज युनियन, नॅशनल रेल्वे मजूर युनियन, महाराष्ट्र नर्सेस फेडरेशन, ऑर्डनन्स फॅक्टरी वर्कर्स युनियन, केंद्र सरकार कामगार व कर्मचारी महासंघ, टीयूसीसी, आयएफटीयू, नॅशनल फेडरेशन ऑफ पोस्टल एम्प्लॉइज, राज्य सरकारी कर्मचारी संघटना, हिंद कामगार संघटना, एआयडीईएफ, पीएमटी इंटक, बँक कर्मचारी संघ इंटक, महाराष्ट्र राज्य सर्व श्रमिक संघटना, फेडरेशन ऑफ नॅशनल पोस्टल ऑर्गनायझेशन, सेंट्रल बँक ऑफ इंडिया एम्प्लॉईज युनियन, पुणे मनपा युनियन, पूना एम्प्लॉइज युनियन, पुणे मनपा कर्मचारी कामगार युनियन, अंगणवाडी व घरेलू कामगारांच्या विविध संघटना, डिफेन्स कोऑर्डनेशन कमिटी इंटक, इंडियन नॅशनल डिफेन्स वर्कर्स फेडरेशन, ग्रीव्हज व असलाइडस कंपनी एम्प्लॉइज युनियन, बांधकाम व खाण क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या विविध संघटना सहभागी होणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पिंपरी आयुक्तांच्या चौकशीची मागणी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पिंपरी

'पिंपरी-चिंचवड महापालिकेचे आयुक्त दिनेश वाघमारे यांनी आर्थिक हिसात बाधा आणून उत्पन्नावर विपरीत परिणाम होणारे निर्णय आहेत. त्यांची मुख्यमंत्र्यांनी उच्चस्तरीय चौकशी करावी,' अशी लेखी मागणी महाराष्ट्र प्रदेश विद्यार्थी काँग्रेसचे माजी अध्यक्ष मनोज कांबळे केली आहे.

कांबळे यांनी दिलेल्या निवेदनात त्यांनी म्हटले आहे की, पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्त दिनेश वाघमारे यांनी बेकायदा निर्णय घेऊन महापालिकेच्या आर्थिक हितास बाधा आणली आहे. आयुक्तांनी डॉ. डी. वाय. पाटील कॉलेजला सुमारे १९ कोटी रुपयांची कर सवलत दिली आहे. त्यामुळे महापालिकेच्या उत्पन्नावर विपरित परिणाम झाला आहे.

महापालिका परिसरातील मिळकतींना व्यवसाय परवाना द्यायचा असल्यास यामध्ये कर भरण्यास मिळकत धारकास अडचण असल्यास किंवा त्याबाबत न्यायालयात दावा प्रलंबित असल्यास संबंधित व्यक्ती या संस्थेकडून बाँड लिहून घेऊन अंडरटेकिंग घेऊन सक्षम प्राधिकरणाची मान्यता घेणे आवश्यक असते, असे असतानाही पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्त दिनेश वाघमारे यांनी डॉ. डी. वाय. पाटील कॉलेज ऑफ मेडिकल अँड रिसर्च सेंटर या संस्थेला १९ कोटी रुपयांची बेकायदा सवलत दिली आहे. करसवलत देऊन सामान्य नागरिकांवर अन्याय केला आहे, असे मनोज कांबळे यांनी पत्रकात म्हटले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बोपोडी चौकात वाहतूककोंडी कायम

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, खडकी

बोपोडी चौकात सतत होत असलेल्या वाहतुकीच्या कोंडीचा प्रश्न कधी सुटणार, असा प्रश्न वाहनचालकांना भेडसावत आहे. बोपोडी चौकात सातत्याने वाहतुकीची कोंडी होत आहे. पुणे-मुंबई रस्त्यावरील बोपोडी चौकात रोज सकाळी आणि संध्याकाळी वाहतूककोंडी होत असते. बोपोडी चौकात होणाऱ्या वाहतूककोंडीमुळे पिंपरीच्या दिशेने फुगेवाडीपर्यंत, पुण्याच्या दिशेने ऑल सेंट हायस्कूल चौकापर्यंत, तर खडकीच्या दिशेने बोर्ड ऑफिसपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्याचे चित्र मंगळवारी दिसून आले. बोपोडी चौकात वाहतूक शाखेचे पोलिस रात्री उशीरापर्यंत वाहतुक सुरळीत करण्याचा प्रयत्न करीत होते.

चौकातील कोंडी सुटावी यासाठी वाहतूक शाखेच्या पोलिस अधिकाऱ्यांनी मुंबई-पुणे महामार्गावरील हॅरिस पूल संपल्यावर बोपोडी चौकापर्यंत बॅरिकेड लावले आहेत. त्यामुळे काही दिवस वाहतुक सुरळीत झाली होती. मात्र, गेल्या दोन दिवसांपासून पुन्हा वाहतुकीची कोंडी होण्यास सुरुवात झाली आहे. या चौकात रस्ता रुंदीकरण व्हावे यासाठी आरपीआयचे नेते परशुराम वाडेकर यांनी अनेक वेळा आंदोलने केली होती. मात्र, आजपर्यंत त्याचा काहीही उपयोग झालेला नाही. महापालिका प्रशासन त्यांच्या आंदोलनाकडे दुर्लक्ष करीत असल्याचे दिसून आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मंडळांचा आंतरराष्ट्रीय राजकारणाला हात

$
0
0



म. टा. प्रतिनिधी, पुणे
ऐतिहासिक घटना, शेतकऱ्यांच्या आत्महत्या, पाणी वाचवा अशा देखाव्यांपेक्षा गणेशोत्सव मंडळांनी यंदा थेट आंतरराष्ट्रीय राजकारणाला हात घातला आहे. आंतरराष्ट्रीय राजकारणावरील सजीव देखावे यंदाच्या गणेशोत्सवाचे आकर्षण ठरणार असून, काही ठिकाणी पहिल्या दिवसापासून हे देखावे पाहता येतील.
गेल्या काही वर्षांत हलत्या देखाव्यांची जागा सजीव देखाव्यांनी घेतली आहे. कमी खर्चात चांगला विषय मांडला जात असल्याने मंडळांकडूनही सजीव देखाव्यांना प्राधान्य देण्यात येत आहे. सजीव देखाव्यांसाठी लेखक, दिग्दर्शक, रंगकर्मींची फळी कामाला लागली आहे. सामाजिक व ऐतिहासिक विषय सजीव देखाव्यांतून मांडले जातात. त्याला प्रकाशयोजना व नेपथ्याची जोड दिली जाते, तर काही वेळा पथनाट्याच्या रुपातही देखाव्याची मांडणी केली जाते.
यंदा विविध विषयांवरील सजीव देखावे पाहायला मिळणार आहेत. विविध विषयांचे पैलू नाट्याच्या जिवंत माध्यमातून उलगडण्यासाठी रंगकर्मी सज्ज असून, सजीव देखाव्यांसाठी रंगकर्मींच्या तालमी अंतिम टप्प्यात आहेत. विशेष म्हणजे काही मंडळांच्या देखाव्यांमध्ये मंडळातील कलाकाराचांच सहभाग आहे.
याबाबत बुधवार पेठेतील साईनाथ मंडळ ट्रस्टचे प्रमुख पीयुष शहा यांनी सांगितले, 'सैन्यात १४ हजार पदे रिक्त आहेत, ही पदे भरणार कोण, असा प्रश्न आहे. त्यामुळे आम्ही 'तरुणांनो सैन्यात भरती व्हा', हा विषय यंदा घेतला आहे. सजीव देखाव्यामध्ये १२ कलाकार असून, ते सर्व मंडळाचे कार्यकर्ते आहेत.'
'गुरुवार पेठेतील वीर शिवराज तरुण मंडळ सियाचीनवरील माहितीपट देखावा सादर करणार आहे,' असे मंडळाचे किरण सोनीवाल यांनी सांगितले. 'कॅम्पमधील हिंद तरुण मंडळाने काश्मीर हा विषय घेतला आहे. या देखाव्यामध्ये १६ कलाकार असून, सैनिकांवरील प्रदर्शन याठिकाणी पाहता येईल,' असे दिलीप गिरमकर यांनी सांगितले.
नातूवाडा मंडळाने 'भारत-इराण' करार हा विषय निवडून आपले वेगळेपण दाखवले आहे. दिलीप भोकटे म्हणाले, 'या देखाव्यात इराण येथील शबाहद बंदर, बोट, रेल्वे, गॅस पाइपलाइन अशा चलत प्रतिकृती पाहता येतील. या करारामुळे भारताला तेल व गॅस असे इंधन मिळणार असून, ते या देखाव्यातून अधोरेखित करण्यात येणार आहे.'

सामाजिक देखाव्यांना प्राधान्य
ऐतिहासिक घटना, पाणी, अन्न नासाडी, शेतकऱ्यांच्या आत्महत्या, स्त्रीभ्रूण हत्या अशा सामाजिक देखाव्यांना दरवर्षी प्राधान्य दिले जाते. हलत्या देखाव्यांपेक्षा सजीव देखाव्यांचे प्रमाण वाढलेले असताना आता त्यामध्येही वैविध्य येत आहे. मोठा खर्च करणे मंडळांना शक्य नसल्यास सजीव देखाव्याचा विचार केला जातो. गेल्या काही वर्षांत सजीव देखाव्यांनी आपले स्थान ठळक केले आहे. शनिपार मंडळ आग्य्राहून सुटका, सेवा मित्र मंडळ सकारात्मक विचार, गोसावीपुरा लहान मुलांचे लैंगिक शोषण, जयहिंद मंडळ ई-कचरा प्रकल्प, असे विविध देखावे यंदा पाहायला मिळणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मिरवणुकीत आवाज पातळीच्या उल्लंघनावर लक्ष ठेवणार

$
0
0




म. टा. प्रतिनिधी, पुणे
गणेशोत्सव मिरवणुकीत सहभागी होणाऱ्या पथकांनी आवाजाची मर्यादा ओलांडू नये, तसेच मिरवणुकीदरम्यान संपूर्ण रस्ता व्यापू नये, अशाप्रकारच्या सूचना परिमंडळ १ चे पोलिस उपायुक्त सुधीर हिरेमठ यांनी पथकांना दिल्या आहेत. आवाजाच्या पातळीच्या उल्लंघनावर यंदा विशेष लक्ष दिले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.
गणेशोत्सवाला अवघे काही दिवस बाकी आहेत. शहरात उत्सवाच्या वातावरण निर्मितीला सुरुवात झाली आहे. अशातच ढोल पथकांचे सराव देखील अंतिम टप्प्यात आहेत. गणेशोत्सवाच्या पहिल्या आणि शेवटच्या दिवशी मुख्यत्वे शहरात मिरवणुकांचा माहोल असतो, त्या दरम्यान पथके मोठ्या प्रमाणावर मिरवणुकीमध्ये सहभागी होतात. याचवेळी आवाजाची पातळी वाढते, त्यामुळे नागरिकांना त्रास होऊ नये, यासाठी यंदा पोलिसांकडून विशेष काळजी घेण्यात येणार आहे. न्यायालयाने बंधनकारक केलेल्या आवाजाच्या पातळी पलीकडे वादन करू नये आणि त्याप्रमाणे मर्यादित वाद्यांची संख्या मिरवणुकीत वापरावी, अशा सूचना पोलिसांकडून देण्यात आल्या आहेत. याशिवाय मिरवणुकीत चार ऐवजी तीनच रांगा करून वादन करावे, मिरवणुकीदरम्यान रस्ता अडवणाऱ्या पथकांवर आणि संबंधित मंडळांवर पोलिसांकडून कारवाई केली जाणार आहे.
पोलिस उपायुक्त सुधीर हिरेमठ म्हणाले, 'शिस्तीचे आणि नियमांचे पालन करून वादन करणाऱ्या पथकांना पोलिसांकडून पूर्ण सहकार्य केले जाईल. मात्र, त्यांनी आवाजाची पातळी सांभाळणे अत्यंत गरजेचे आहे. मिरवणुकीमुळे सामान्य नागरिकांना कोणताही त्रास होणार नाही, याची काळजी पथकातील वादकांनी घ्यावी. मर्यादित ढोलांच्या संख्येमुळे आवाजाची पातळी ओलांडली जाणार नाही. त्यामुळे पथकांनी अवास्तव वाद्यांच्या संख्येने मिरवणुकीत सहभागी होऊ नये, अशा सूचना पथकांना करण्यात आल्या आहेत. त्यासंदर्भात पोलिसांची एक बैठक होणार असून उत्सवादरम्यानची कार्यवाही ठरवण्यात येणार आहे.

पोलिसांनी सांगितलेल्या नियमांचे पालन करून पथके यंदाच्या वर्षी वादन करतील. आवाजाची पातळी ओलांडली जाणार नाही याची खबरदारी घेतली जाणार आहे. त्यासाठी ढोल-ताशा महासंघाच्या वतीने एक शिष्टमंडळ मिरवणुकीत पथक आणि पोलिसांमध्ये समन्वय साधणार आहेत. यंदाचा गणेशोत्सव अत्यंत शांततेने आणि उत्साहपूर्ण वातावरणात पार पाडण्यासाठी सर्व पथकांकडून सहकार्य केले जाईल.
- पराग ठाकूर,
अध्यक्ष, ढोल-ताशा महासंघ

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images