Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

सांधेरोपण झालेल्या पेशंटने केले ‘रॅम्प वॉक’

0
0


म. टा. प्रतिनिधी, पुणे
सांधेरोपण झालेल्या अनेक पेशंटने रॅम्प वॉक करीत आपले सांध्याचे दुखणे गायब झाल्याचे दाखवून दिले. जहांगीर हॉस्पिटलने हॅपी जॉइंट्स नावाच्या एका कार्यक्रमाचे आयोजन केले होते. त्या कार्यक्रमात शहराच्या विविध भागांतील सांधेरोपणाच्या अनेक पेशंटने रॅम्प वॉक करीत आनंदोत्सव साजरा केला.
सांधेदुखीने त्रस्त असलेल्या प्रत्येक पेशंटपर्यंत पोहचून त्यांना आधुनिक सांधेरोपण सेवेबद्दल माहिती देण्यासाठी जहांगीर हॉस्पिटलने या उपक्रमाचे आयोजन केले होते. या वेळी हॉस्पिटलच्या वैद्यकीय संचालक डॉ. सुजाता मलिक तसेच पेशंट, त्यांचे नातेवाइक उपस्थित होते. या वेळी अनेक पेशंटने त्यांचे अनुभव कथन केले. त्यात अनेक वैद्यकीय तज्ज्ञांनी सांधेरोपणाबाबत माहिती दिली. तसेच, ऑपरेशन झालेल्या पेशंटने गाण्यांच्या तालावर नृत्य सादर करून आनंद लुटला.
पाच वर्षांपूर्वी बायलॅटरल नी रिप्लेसमेंट झाली होती. ऑपरेशनचा माझा अनुभव चांगला होता. त्याच्या दुसऱ्या दिशी मी माझ्या गुडघ्याची व्यवस्थित हालचाल करू शकत होतो. तसेच, अवघ्या पाच दिवसांत माझ्या घरी जाता आले, असे राहुल भोसले या ५८ वर्षांच्या पेशंटने प्रतिक्रिया दिली.
'सांधेरोपण ऑपरेशनविषयी जागृती करून त्याविषयीचे गैरसमज दूर करण्यासाठी आम्ही प्रयत्न करीत आहोत. हे ऑपरेशन अतिशय सुरक्षित असून, त्यास सामोरे गेले पाहिजे,' असे मत जहांगीर हॉस्पिटलच्या मेडिकल स्ट्रॅटजी अँड डेव्हलपमेंटच्या संचालिका डॉ. सुजाता मलिक यांनी व्यक्त केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


तूर डाळीसह सर्व डाळी महागल्या

0
0

दोन दिवसांत २०० ते १५०० रुपयांची वाढ

म. टा. प्रतिनिधी, पुणे

तूर डाळीचे दर सामान्यांच्या आवाक्यात येत असताना सरकारची डाळ बाजारात आली खरी पण गेल्या दोन दिवसांत पुन्हा तूर डाळीच्या दरा क्विंटलमागे दीड हजार रुपयांची वाढ झाली आहे. त्यामुळे तुरीला किलोमागे १५ रुपये जादा मोजावे लागणार आहे. परिणामी तूरडाळीला क्विंटलमागे ८५००ते १०२०० रुपये असा दर झाला आहे.
डाळीचे भाव गगनाला भिडल्याने डाळींच्या खरेदीपासून ग्राहक अद्यापही दूर आहेत. त्यात गेल्या वर्षी डाळ बाजारात आणण्यासंदर्भात सरकारने चूक केली होती. पण आता डाळींचे भाव वाढल्यानंतर डाळ बाजारात आणण्याऐवजी डाळ उतरल्यानंतर बाजारात ९५ रुपये दराने डाळ उपलब्ध केली. पण ती डाळ घेण्यास ग्राहक फारसे उत्सुक नसल्याचे दिसून आले.

'मार्केट यार्डातील घाऊक बाजारात तूरडाळ ८५ रुपये किलोपर्यंत खाली उतरली होती. परंतु, गेल्या दोन दिवसांत सर्व प्रकारच्या डाळींचे भाव गुरुवारी वाढले. तूरडाळीची दोन दिवसांत किलोमागे १५ रुपयांची वाढ झाली. तर पुन्हा शंभर रुपयांचा आकडा डाळीने ओलांडला. काही आठवड्यापूर्वी १३५ रुपये किलो असलेली तूरडाळ ८५ रुपयापर्यंत खाली आली. पुन्हा डाळींच्या दरात चढउतार सुरु झाली आहे,' अशी माहिती डाळींचे व्यापारी विजय राठोड यांनी दिली. हरभरा डाळीच्या दरात किलोमागे १० रुपयांची, मूगडाळ, मसूरडाळीच्या दरात अनुक्रमे ३०, आणि २० रुपयांनी दर वाढले आहेत. तर उडीदडाळीच्या दरात किलोमागे ७ रुपयांची वाढ झाली आहे, अशीही माहिती त्यांनी दिली.

आयातीचा माल अधिक आला होता. त्याशिवाय दर खाली येत असल्याने साठवणूकदारांनी देखील मोठ्या प्रमाणात तूरडाळ बाजारात विक्रीसाठी आणली होती. त्यामुळे डाळीचे दर खाली उतरण्यास सुरुवात झाली होती. लाखो रुपये नुकसान करून व्यापाऱ्यांनी तूरडाळ कमी दराने विकली. रोज डाळींचे दर खाली येत होते. आता बाजारातील साठा संपल आणि पुन्हा बाजारात तेजी आल्याने विक्रेत्यांना डोक्याला हात लावण्याची वेळ आली.
...
सरकारची डाऴ विकण्यासाठी 'तेजी '?

बाजारात तूरडाळीने शंभरी ओलांडल्याने ग्राहकांपासून ते राजकीय पक्षापर्यंत सर्वांनीच सरकारवर टीकेची झोड उठविली होती. त्यानंतर सरकारने योग्य वेळी डाळ आयात करण्याचा निर्णय घेणे अपेक्षित होते. मात्र तसे झाले नाही. आता पुन्हा ओरड सुरु झाल्यानंतर सरकारने ९५ रुपये दराने रेशन कार्डवर डाळ उपलब्ध करून दिली. पण त्या डाळीकडे ग्राहकांनी पाठ फिरविली आहे. सरकारची डाळ विक्री होत नसल्याने घाऊक बाजारातील डाळीचे दर वाढविण्यास सरकारनेच विक्रेत्यांवर दबाव आणला की काय अशी दबक्या आवाजात बाजारात चर्चा सुरु आहे.
...
डाळींचे नाव ............ क्विंटलचे वाढलेले दर
तूरडाळ ................ ८५०० ते १०२००
हरभराडाळ ............... ८५०० ते १००००
उडीद डाळ ................... ११५०० ते १२५००
मूगडाळ ................ ६००० ते ६५००
मसूरडाळ .............. ६५०० ते ६६००

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पुणे विमानतळासाठी आज पाहणी

0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
पुण्यातील प्रस्तावित आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी राजगुरूनगरसह जेजुरी आणि चौफुला येथील जागांचा पर्याय ठेवण्यात आला असून एअरपोर्ट अॅथोरिटी ऑफ इंडियाचे पथक आज, शुक्रवारी या तीनही ठिकाणांवरील जागांची पाहणी करणार आहे.
पुण्यातील प्रस्तावित आंतरराष्ट्रीय दर्जाचे विमानतळ राजगुरूनगर येथे होणार असल्याचे ट्विट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मागील आठवड्यात केले होते. तसेच त्यासाठी सप्टेंबरमध्ये एअरपोर्ट अॅथोरिटीचे पथक येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले होते. त्यानुसार एअरपोर्ट अॅथोरिटीचे पथक आज पुण्यात दाखल होणार आहे. विमानतळासाठी राजगुरूनगर येथील जागेला प्राधान्य देण्यात आले आहे. त्यामुळे हे पथक प्रथम राजगुरूनगर येथील जागेची पाहणी करणार आहे.
राजगुरूनगर येथील जागेची पाहणी केल्यावर या पथकाला पुरंदर तालुक्यातील जेजुरी व दौंडमधील चौफुला येथील प्रस्तावित जागा दाखविण्याची सूचना विभागीय आयुक्त एस. चोक्कलिंगम यांनी केली आहे. परंतु या तीनही जागा एकाच दिवशी पाहणे अशक्य आहे. तथापि, या जागा पथकाला दाखविण्याचा विभागीय आयुक्तांचा आग्रह आहे. त्यानुसार नियोजन करण्यात येत असल्याचे विश्वसनीय सूत्रांकडून सांगण्यात आले. राजगुरूनगर येथील जागेची पाहणी झाल्यावर या दोन्ही जागा एअरपोर्ट अॅथोरिटीच्या पथकाला दाखविण्याच्या दृष्टीने संबंधित अधिकाऱ्यांना तयारी करण्यास सांगण्यात आले आहे.
पुण्यातील आंतरराष्ट्रीय विमानतळाची घोषणा सन २००७ मध्ये करण्यात आली. मात्र, विमानतळाची जागा निवडण्यात अद्याप यश आलेले नाही. या विमानतळासाठी सुरूवातीला चाकणची जागा निवडण्यात आली होती. परंतु चाकणमध्ये विमानतळ करण्यास स्थानिक नागरिकांनी विरोध केला. त्यानंतर विमानतळासाठी कोये-पाईट येथील जागेची निवड करण्यात आली. या जागेसही स्थानिकांकडून विरोध झाला. विमानतळासाठी खेड सेझसह निमगाव-दावडी, केंदूर व कन्हेरसर या जागेचा पर्याय पुढे आला. परंतु सेझमधील जमीन विमानतळाला देण्यावरून वाद निर्माण झाला. अखेर कोये-पाईट, केंदूर, पाबळ व रौंदळवाडीचा प्रस्ताव पुढे आला. खेडमधून विमानतळाला सातत्याने विरोध होत असल्याने प्रशासनाने जेजुरी व चौफुला येथील जागांचा पर्याय विमानतळासाठी दिला आहे. खेडमध्ये आता मोठा विरोध झाल्यास विमानतळ या दोनपैकी एका ठिकाणी जाण्याची शक्यता आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

​महापौर दारी; नाग‌रिक घरी

0
0

महापौर दारी; नाग‌रिक घरी
सहकारनगरच्या नागरिकांचा अल्प प्रतिसाद
म. टा. वृत्तसेवा, कात्रज
प्रभागातील नागरिकांच्या समस्या थेट जाणून घेऊन त्या सोडविण्यासाठी पुणे मनपा तत्पर आहे. नागरिकांचे प्रश्न समजावून घेवून ते सोडवण्यासाठी 'महापौर आपल्या दारी' हा कार्यक्रम सध्या ठिकठिकाणी राबविला जात आहे. सहकारनगर शिवदर्शन राजीव गांधी ई लर्निंग स्कूल येथेही हा कार्यक्रम घेण्यात आला. मात्र, त्यास नागरिकांचा अल्प प्रतिसाद होता. तसेच आठपैकी केवळ दोनच नगरसेवक हजर होते.
सहकारनगर क्षेत्रिय कार्यालयांतर्गत घेण्यात आलेल्या कार्यक्रमास एकूण चार प्रभागांतील मिळून आठ नगरसेवक येणे अपेक्षित होते. यापैकी दोन राष्ट्रवादी काँग्रेस, दोन काँग्रेस, दोन भाजपा, एक शिवसेना, अपक्ष एक आठ नगरसेवक आहेत. मात्र, या ठिकाणी यापैकी नगरसेवक सुभाष जगताप, नगरसेविका अश्विनी कदम हे दोघेच उपस्थित होते. या वेळी नागरिकांनी कचरा, वाहतूक कोंडी, पदपथावर अतिक्रमण, भारत स्वच्छ अभियान अंतर्गत वैयक्तिक शौचालय, नाला सफाई, लक्ष्मीनगरमध्ये कमी दाबाने पाणी इत्यादी प्रश्न नागरिकांनी विचारले. याबाबत महापौरांनी आठ दिवसांत सर्व तक्रारींचे निरसन होईल, तशा सूचना संबंधित विभागाला देऊन नागरिकांचे प्रश्न सोडवले जातील, असे आश्वासन देण्यात आले. त्याचबरोबर शहरातील कचऱ्याचा प्रश्न गंभीर असून रस्त्यावर अथवा सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकल्यास कठोर कारवाई करण्यात येईल. या वेळी रामदास गाडे (रा. पर्वती दर्शन)यांनी प्रभाग क्रमांक ५७ मधील सर्वाधिक सोळा प्रश्न विचारले. गरज नसताना एका ठिकाणी शौचालय बांधले जात असल्याचा आरोप त्यांनी केला. या भागात नगरसेवक लक्ष देत नाहीत, अशी तक्रार करून कचरा समस्या, कमी दाबाने पाणी येणे आदी गंभीर समस्या सोडविण्याची विनंती करण्यात आली. अण्णा भाऊ साठे स्मारकाच्या इमारतीमध्ये तरूणांना अभ्यासिका, ग्रंथालय चालू करावे, ही विनंती संतनगर येथील विनोद शिंदे यांनी केली. डॉ. मनीषा दाते यांनी नागरिक अंधारात रस्त्यावर कचरा टाकतात, याबाबत कठोर कारवाई करण्याची मागणी केली. ई-कचरा, बायोवेस्ट आणि ई-वेस्ट याबाबत प्रशासनाने गांभीर्याने लक्ष द्यावे, असेही त्या म्हणाल्या. या वेळी उपआयुक्त ज्ञानेश्वर मुळीक, सहाय्यक आयुक्त मनपा सहकारनगर उमेश माळी, नरेंद्र भालेराव इ. प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते.

हा कार्यक्रम कुणाचा?
येरवडा : गेल्या काही दिवसांपासून शहरात 'महापौर आपल्या दारी' हा उपक्रम चालू आहे. हा उपक्रम महापालिका प्रशासनाचा की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आहे, याचा पालिका आयुक्तांनी तातडीने खुलासा करावा, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केली आहे.
शहरातील स्थानिक स्तरावरील समस्या सोडविण्यासाठी सध्या 'महापौर आपल्या दारी' हा अभिनव उपक्रम राबविला जात आहे. मात्र हे अभियान राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे की पालिकेचे याचा आयुक्त कुणाल कुमार यांनी खुलासा करावा, त्यानंतरअभियानाच्या जहिरातीसाठी तयार करण्यात आलेल्या फलकांचे बिल अदा केले जावे, अशी मागणी मनसेचे पुणे जिल्हा सरचिटणीस कल्पेश यादव यांनी केली आहे.
महापौर हे शहराचे प्रथम नागरिक आहेत; पण आगामी महापालिकेच्या निवडणुकीच्या तोंडावर महापौर जनतेच्या पैशांची उधळपट्टी करून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा जाहीर कार्यक्रम करीत आहे. प्रशासनाचे अभियान असल्यास जाहिरात फलकांवर महापौर आणि आयुक्तांचे नाव असले पाहिजे. मात्र वडगावशेरी मतदारसंघात उपक्रम राबविताना फलकावर जाणीवपूर्वक आयुक्तांचे नाव टाळून राष्ट्रवादीचे सभागृहनेते आणि स्थायीसमिती अध्यक्षांची नावे टाकली जात आहेत.
राष्ट्रवादीकडून जनतेच्या पैशांची उधळपट्टी होत असल्याने मनसे महापौरांचा निषेध करत असल्याचे यादव यांनी सांगितले आहे. महापौर आपल्या दारी या अभियानाच्या जाहिरातीचे बिल अदा करू नये, अशी मागणीही त्यांनी केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

​उड्डाणपुलावरून उडी मारून आत्महत्या

0
0

हडपसर : हडपसर गाडीतळ येथे उड्डाणपुलावरून एका व्यक्तीने खाली उडी मारून आत्महत्या केली. ही घटना गुरुवारी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास गाडीतळ चौकात झाली. आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
सचिन जयसिंग आल्हाट (वय ३६, रा. आल्हाट वस्ती, हडपसर गाव) असे आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव आहे. वाहतूक विभागाचे सहाय्यक फौजदार दत्तात्रय शिंदे यांनी दिलेल्या माहितीनुसार, दुपारी एकच्या सुमारास सचिनने पुलावरून उडी मारली. डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्याला उपचारासाठी खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र डॉक्टरांनी त्याला उपचारापूर्वीच मृत घोषित केले. सहा वर्षांपूर्वी पत्नी त्याला सोडून गेल्याने नैराश्यातून त्याने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता, अशी माहिती त्यांच्या कुटुंबीयांनी दिली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

​जुन्नरमधील ३०० घरांमध्ये डेंगीच्या डासाच्या अळ्या

0
0

म. टा. वृत्तसेवा, जुन्नर
जुन्नर शहरातील ३२२ घरामध्ये डेंगीचा प्रसार करणाऱ्या डासांच्या अळ्या आढळल्याने शहरात आरोग्याचा प्रश्न उद्भवला आहे. डेंगीसदृश आजाराचे रुग्णही ग्रामीण रुग्णालयात दाखल होऊ लागल्याने नगरपालिका प्रशासनाने डासांच्या पैदास जागांच्या निर्मूलनासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्याचे निर्देश तालुका आरोग्य विभागाने दिले आहेत.
याबाबत तालुका आरोग्य अधिकारी डॉ. शाम बनकर यांना विचारले असता, जुन्नरमधील १३ हजार ४० लोकसंख्येअंतर्गत ३ हजार घरांची तपासणी करण्यात आली. त्यामध्ये ३२२ घरांच्या दूषित परिसरात डेंगीचा प्रसार करणाऱ्या डासांच्या अळ्या आढळून आल्याचे त्यांनी सांगितले. या सर्वेक्षणासाठी २० आरोग्य सेवक, ४ आरोग्य सहायक, तालुका आरोग्य सुपरवायझर तसेच नगरपालिकेच्या १० कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला.
प्रामुख्याने शहरातील शिपाई मोहल्ला, खालचा माळीवाडा, बोडकेनगर आणि सय्यदवाडा या भागात अधिक प्रादुर्भाव झालेला दिसून आला आहे. शहरातील नागरिकांनी त्यांच्या घराजवळ पाणी साचणार नाही, याची काळजी घेण्याचे आवाहन नगरपालिका प्रशासन तसेच आरोग्य विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

​तीन पिस्तूल, काडतुसे दोन गुन्हेगारांकडून जप्त

0
0

पुणे ः कुख्यात गुंड गजा मारणे टोळीतील सागर कल्याण रजपूत या सराईत गुन्हेगाराच्या संपर्कात असलेल्या दोघांना गुन्हे शाखेने अटक केली असून त्यांच्याकडून तीन पिस्तूल आणि १० काडतुसे असा एक लाख ५५ हजार रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे.
अविनाश सोमनाथ कंधारे (वय २६, रा. किष्किंधा नगर, कोथरूड) आणि ओम तीर्थराम धर्मजिज्ञासू (वय २८, रा. तानाजीनगर, धनकवडी) अशी अटक करण्यात आलेल्या गुन्हेगारांची नावे आहेत, अशी माहिती पोलिस उपायुक्त पी. आर. पाटील यांनी दिली.
रजपूत याच्यावर पुणे पोलिसांनी महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियमानुसार (मोक्का) कारवाई केली होती. त्यानंतर तो फरार होता. त्याला बडोदा येथून अटक केल्यानंतर त्याने तपासात कंधारे आणि धर्मजिज्ञासू यांची माहिती दिली. गुन्हे शाखेचे अप्पर आयुक्त सी. एच. वाकडे, उपायुक्त पाटील, सहायक आयुक्त अरूण वालतुरे, वरिष्ठ निरीक्षक मिलिंद गायकवाड, लक्ष्मण बोराटे, सहायक निरीक्षक नितीन भोयर, गणेश पाटील, अन्सार शेख, कर्मचारी दिलीप लोखंडे, राजू मचे, संजय गवारे, संतोष बर्गे, हेमंत खरात, राजेंद्र शेटे, धर्मराज आवटे, प्रमोद लांडे ​आदींनी कंधारे आ​णि धर्मजिज्ञासू यांना अटक केली. कोथरूड परिसरातील किष्किंधा नगर येथून कंधारेला तर धर्मजिज्ञासू याला भारती विद्यापीठ हॉस्पिटलच्या मेन गेट समोरून ताब्यात घेण्यात आले. त्या वेळी त्यांच्याकडे घेतलेल्या झडतीमध्ये तीन पिस्तूल आणि दहा काडतुसे सापडली असल्याची माहिती पाटील यांनी दिली. दोघेही रजपूतच्या संपर्कात होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘मागण्या तातडीने मान्य व्हाव्यात’

0
0

'इंटक'चे अध्यक्ष डॉ. कदम यांची मागणी
म. टा. प्रतिनिधी, पुणे
कामगारांच्या प्रलंबित मागण्यांसाठी दोन सप्टेंबर रोजी पुकारण्यात आलेल्या देशव्यापी संपामध्ये बँक, सरकारी कार्यालये, विमा, आरोग्य, पोस्ट, औद्योगिक क्षेत्रातील कामगार संघटना सहभागी होणार आहेत. याबाबत माहिती देताना कामगार संघटना संयुक्त कृती समिती आणि पुणे जिल्हा इंटकचे अध्यक्ष डॉ. कैलास कदम म्हणाले, 'राज्य सरकारने सरकारी कार्यालयांतील रिक्त पदे भरावीत. किमान वेतन दरमहा १८ हजार रुपये निश्चित करावे, महागाई भत्ता लागू करावा, बांधकाम कामगारांना विमा, पेन्शन, बोनस, तर शेतमजूर, घरकामगारांसह अन्य असंघटित कामगारांना नोंदणी करून कल्याण मंडळामार्फत आरोग्य विमा, पेन्शन लागू करावी. सार्वजनिक उद्योगांचे खासगीकरण आणि विक्री रद्द करावी. रेल्वे, विमा, किरकोळ व्यापार, औषधे व संरक्षण क्षेत्रातील थेट विदेशी गुंतवणुकीचे धोरण मागे घ्यावे, या मागण्याही आहेत.' या मागण्या तातडीने मान्य कराव्यात अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
..........
काळ्या फिती लावून काम
महाराष्ट्र राज्य जलसंपदा (पाटबंधारे) कर्मचारी संघटना या संपात सहभागी होणार नाही. 'संपात संघटना सहभागी होणार नसली, तरी कर्मचाऱ्यांकडून काळ्या फिती लावून काम केले जाणार आहे,' असे संघटनेचे जिल्हाध्यक्ष दिनकर रायकर म्हणाले.
..................
संपात सहभागी होणाऱ्या संघटना
इंटक, सीटू, आयटक, राष्ट्रवादी कामगार सेल, बँक एम्प्लॉइज फेडरेशन, श्रमिक एकता महासंघ, विमा कामगार संघटना, बीएसएनएल एम्लॉइज युनियन, एमएसईबी वर्कर्स फेडरेशन, एआयबीइए, महाराष्ट्र स्टेट बँक एम्प्लॉइज युनियन, नॅशनल रेल्वे मजूर युनियन, महाराष्ट्र नर्सेस फेडरेशन, ऑर्डनन्स फॅक्टरी वर्कर्स युनियन, केंद्र सरकार कामगार व कर्मचारी महासंघ, टीयूसीसी, आयएफटीयू, नॅशनल फेडरेशन ऑफ पोस्टल एम्प्लॉइज, राज्य सरकारी कर्मचारी संघटना, हिंद कामगार संघटना, एआयडीइएफ, पीएमटी इंटक, बँक कर्मचारी संघ इंटक, महाराष्ट्र राज्य सर्व श्रमिक संघटना, फेडरेशन ऑफ नॅशनल पोस्टल ऑर्गनायझेशन, सेंट्रल बँक ऑफ इंडिया एम्प्लॉइज युनियन, पुणे मनपा युनियन, पुना एम्प्लॉइज युनियन, पुणे मनपा कर्मचारी कामगार युनियन, अंगणवाडी व घरेलू कामगारांच्या विविध संघटना, डिफेन्स कोऑर्डनेशन कमिटी इंटक, इंडियन नॅशनल डिफेन्स वर्कर्स फेडरेशन, ग्रीव्हज व असलाईडस कंपनी एम्प्लॉइज युनियन संघटना या संघटना सहभागी होणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


सोनोग्राफी, सीटी स्कॅन, एमआरआय बंद

0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
गर्भलिंग प्रसवपूर्व व निदान चाचणी (पीसीपीएनडीटी) या कायद्यात दुरुस्ती करून रेडिओलॉजिस्टची होणारी पिळवणूक थांबण्याच्या मागणीसाठी देशव्यापी संपात पुण्यातील रेडिओलॉजिस्ट सहभागी झाले होते. शहरातील सर्व खासगी हॉस्पिटल, डायग्नोस्टिक सेंटरमधील सोनोग्राफी, सीटी स्कॅन, एमआरआय, एक्स-रेसारख्या रोग निदान चाचण्यांची सेवा बंद असल्याने पेशंटची गैरसोय झाली.
शहरातील अनेक खासगी सेंटरना टाळे असल्याचे दिसून आले. तातडीच्या पेशंटसाठी खासगी हॉस्पिटलमध्ये ही सेवा सुरू होती. ससून हॉस्पिटल, औंध येथील जिल्हा हॉस्पिटल तसेच महापालिकेच्या सरकारी हॉस्पिटलमध्ये ही सेवा सकाळपासून सुरू होती. त्यामुळे संपाच्या पहिल्या दिवशी रेडिओलॉडजिस्टच्या बंदचा फारसा फटका बसला नाही. या संपाची तीव्रता आज, शुक्रवारपासून वाढण्याची शक्यता आहे. शहर आणि परिसरात केवळ सोनोग्राफी सेवा बंद राहणार आहे.
विविध मागण्यांसाठी इंडियन रेडिओलॉजिकल व इमेजिंग असोसिएशनने (आयआरआयए) गुरुवारपासून बेमुदत बंद पुकारला आहे. त्या बंदच्या पार्श्वभूमीवर शहरातील ४५० रेडिओलॉजिस्ट संपात सहभागी झाले होते. या संदर्भात 'आरआरआयए'च्या पुणे शाखेचे अध्यक्ष डॉ. गुरुराज लच्छानी तसेच डॉ. विनय चौधरी यांनी पत्रकारांकडे संपामागील भूमिका स्पष्ट केली. त्या वेळी डॉ. हिमानी तपस्वी, इंडियन मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. मोहन जोशी, डॉ. मनीष माचवे आदी उपस्थित होते. पुणे स्त्री रोग तज्ज्ञ संघटना, इंडियन मेडिकल असोसिएशनने या संपाला पाठिंबा दर्शविला आहे.
'इंडियन रेडिओलॉजिकल व इमेजिंग असोसिएशनने 'पीसीपीएनडीटी' कायद्यातील दुरुस्ती व्हावी, त्यात सुधारणा व्हावी अशी मागणी स्थानिक आरोग्य अधिकाऱ्यांपासून ते राजकीय नेत्यापर्यंत केली आहे. केंद्रीय सल्लागार समितीबरोबर केंद्रीय आरोग्य सचिवापर्यंत या संदर्भात भूमिका मांडून कायद्यातील त्रुटी त्यांच्या निदर्शनास आणून दिल्या आहेत. कायद्यात त्रुटी असूनही त्या दुरुस्त करण्याची केंद्राची तयारी हे मोठे दुर्देव आहे,' अशा शब्दांत रेडिओलॉजिस्ट संघटनेच्या पुणे शाखेच्या पदाधिकाऱ्यांनी खंत व्यक्त केली आणि याच कारणामुळे आम्ही देशव्यापी संप पुकारल्याचे स्पष्ट केले.
सोनोग्राफी करण्यापूर्वी भरण्यात येणाऱ्या 'एफ फॉर्म'मध्ये ११९ प्रकारच्या किरकोळ चुका आरोग्य विभागाकडून काढण्यात आल्या आहेत. या चुका दुरुस्त करायच्या की सोनोग्राफी करायची असा सवालही या वेळी उपस्थित करण्यात आला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

व्होडाफोन व रिलायन्सच्या मालमत्तेवर बोजा

0
0

दंड न भरल्याने होणार कारवाई
म. टा. प्रतिनिधी, पुणे
विनापरवानगी रस्ते खोदून ऑप्टिकल फायबर केबल टाकल्याबद्दल व्होडाफोन आणि रिलायन्स कम्युनिकेशन टेलिकॉम या कंपन्यांना ११ कोटी ९ लाख रुपयांचा दंड करण्यात आला असून या दंडाच्या वसुलासाठी दोन्ही कंपन्यांच्या मालमत्तेवर बोजा चढविण्याचे पत्र महापालिकेने जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहे.
महापालिकेच्या रस्त्यांवर व्होडाफोन सेल्युलर कंपनी, टाटा टेलिसर्व्हिसेस, रिलायन्स इन्फ्रा टेली लिमिटेड/ रिलायन्स कम्युनिकेश व आयडीया सेल्युलर या कंपन्यांनी भुमिगत ऑप्टिकल फायबर केबल टाकल्या. ही केबल टाकण्यासाठी संबंधित कंपन्यांनी रस्तो खोदाई केली. त्यासाठी महापालिकेची कोणतीही परवानगी घेतली गेली नाही. त्यामुळे पालिकेने संबंधित कंपन्यांवर दंडात्मक कारवाई केली.
यामध्ये व्होडाफोनला ६ कोटी ६६ लाख रुपये, टाटा टेलिसर्व्हिसेसला ५ कोटी १० लाख रुपये, रिलायन्स इन्फ्रा टेलि कंपनीला ७ कोटी ४२ लाख रुपये आणि आयडीया सेल्युलरला ३ कोटी ६६ लाख रुपयांचा दंड झाला. या दंडात्मक कारवाई विरोधात आयडिया कंपनी व टाटा टेलिसर्व्हिसेसने हायकोर्टात धाव घेतली. त्याच्या सुनावणीमध्ये आयडीया व टाटा टेलिसर्व्हिसेसला कोर्टाने दिलासा दिला आणि जबरदस्तीची कारवाई करू नये, असे कोर्टाने स्पष्ट केले.
या चारही कंपन्यांनी दंडाची रक्कम भरलेली नाही. आयडीया व टाटा कंपनीने कोर्टाचे आदेश मिळविले. त्यामुळे या दोन कंपन्या वगळता व्होडाफोन आणि रिलायन्स कम्युनिकेशन टेलिकॉमकडून दंडाची रक्कम वसूल करण्याची कारवाई महापालिकेने सुरू केली आहे. या दंड वसुलीसाठी दोन्ही कंपन्यांच्या शहर व ग्रामीण भागातील मिळकतींवर महसुली बोज चढविण्यात यावा, असे पत्र पालिकेच्या अतिरिक्त आयुक्त प्रेरणा देशभ्रतार यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाला दिले आहे.
...
मालमत्तेची माहिती मागवली
व्होडाफोन आणि रिलायन्स कम्युनिकेशन टेलिकॉम या कंपन्यांच्या शहरातील मालमत्तांची माहिती महापालिकेने द्यावी. ही माहिती मिळाल्यावर महसुली बोज चढविण्याची कारवाई करण्यात येईल, असे जिल्हाधिकारी कार्यालयाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ऑगस्टमध्ये सरासरीपेक्षा शंभर मिमी अधिक पाऊस

0
0

हंगामातील सरासरी ओलांडली

म. टा. प्रतिनिधी, पुणे

पावसाळी हंगामाच्या पहिल्या दोन महिन्यांत सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्याने शेतकरी आणि सर्वसामान्यांच्या चेहऱ्यावर दाटलेली चिंता ऑगस्टमधील पावसाने दूर केली आहे. शहरात ऑगस्टमध्ये तब्बल २३० मिमी पाऊस झाला असून, सरासरीमध्येही पावसाने आघाडी घेतली आहे.

जूनमध्ये पावसाळी हंगाम सुरू झाल्यानंतर जुलैअखेरपर्यंत शहरात सरासरी ३२१ मिमी पाऊस होतो. यंदा जूनमध्ये सरासरीच्या निम्माच पाऊस झाल्याने जुलैमध्ये चांगला पाऊस होऊनही सुरुवातीच्या दोन महिन्यांतील सरासरी पावसाचा गाठता आली नव्हती. ही कसर ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यातच पावसाने भरून काढली. सलग आठ ते दहा दिवस पावसाने हजेरी लावल्याने शहराला पाणीपुरवठा करणारी धरणे पूर्ण क्षमतेने भरली. त्यानंतरही, शहरात हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस सुरू होता. गेल्या आठवड्यात पावसाने पूर्ण विश्रांती घेतली असली, तरी ऑगस्टची १२२ मिमीची सरासरी पावसाने केव्हाच ओलांडली आहे. ऑगस्टच्या सरासरीच्या तुलनेत शहरात शंभर मिमी अधिक पाऊस झाला आहे. एक जूनपासून ऑगस्टअखेरपर्यंत शहरात सरासरी ४४३ मिमी पाऊस होतो. यंदा, पावसाने आत्ताच पाचशे मिमीचा टप्पा ओलांडला असून, सरासरीपेक्षा ६९ मिमी अधिक पाऊस झाला आहे.

दरम्यान, शहरात पुढील दोन दिवसांत पावसाच्या एक-दोन हलक्या सरी पडण्याची शक्यता आहे. तर, त्यानंतर आकाश ढगाळ राहण्याची शक्यता पुणे वेधशाळेने वर्तवली आहे. गणपतीच्या सुरुवातीला शहरात पावसाचे पुनरागमन होण्याचे संकेत वेधशाळेने दिले आहेत.

.....................

आकडे बोलतात...
(महिना सरासरी पाऊस प्रत्यक्ष पाऊस)

जून - १३७.७ ५९
जुलै - १८४ २२३.३
ऑगस्ट - १२२.३ २३०

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

फेरपरीक्षा उत्तीर्णांसाठी चौथ्या फेरीचे आयोजन

0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

जुलै महिन्यात झालेल्या दहावीच्या फेरपरीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना पुणे, पिंपरी-चिंचवड परिसरातील कॉलेजमध्ये प्रवेश घेता येण्यासाठी अकरावी केंद्रीय प्रवेश नियंत्रण समितीने चौथ्या विशेष फेरीचे आयोजन केले आहे. या फेरीसाठी रिक्त जागांचा तपशील उद्या शनिवारी (३ सप्टेंबर) जाहीर करण्यात येणार आहे. त्यासाठी विद्यार्थ्यांना ६ ते ८ सप्टेंबर या कालावधीत माहिती पुस्तिका विकत घ्यावी लागणार आहे. दरम्यान, अद्याप या फेरीत प्रक्रियेत सहभागी न झालेल्यांना आणि प्रक्रियेत असलेल्यांना सहभागी होण्याची संधी मिळणार आहे.
अकरावी प्रवेशासाठी अकरावीच्या कॉलेजच्या रिक्त जागा शनिवारी जाहीर होणार आहेत. विद्यार्थ्यांना या रिक्त जागांवर प्रवेश घेण्यासाठी अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेची माहितीपुस्तिका ६ ते ८ सप्टेंबर या कालावधीत विकत घ्यावी लागेल. या माहिती पुस्तिकेत नवीन लॉगइन आयडी आणि पासवर्डचा समावेश आहे. त्या आधारे विद्यार्थ्यांना वेबसाइटवर ६ ते ८ सप्टेंबर या कालावधीत ऑनलाइन प्रवेश अर्ज भरायचे आहेत. प्रवेश अर्जातील भाग एक भरायचा असून, त्याचे अॅप्रूव्हलही घ्यायचे आहे.
याच कालावधीत अॅप्रूव्हल घेतल्यानंतर प्रवेश अर्जातील भाग दोनमधील पसंतीक्रमाचा अर्ज भरावा लागणार आहे. हा अर्ज ८ सप्टेंबरला सायंकाळी सहापर्यंत भरता येणार आहे. त्यानंतर १० सप्टेंबरला सकाळी अकरा वाजता गुणवत्ता यादी जाहीर होणार आहे. या यादीनुसार विद्यार्थ्यांना १० ते १३ सप्टेंबर या कालावधीत सकाळी अकरा ते दुपारी चार या वेळेत पसंतीच्या कॉलेजमध्ये प्रवेश घ्यायचा आहे, अशी माहिती समितीने दिली.
दरम्यान, या फेरीत अद्याप ऑनलाइनच्या माध्यमातून प्रवेश प्रक्रियेत सहभागी न झालेले विद्यार्थी, या पूर्वी प्रवेश प्रक्रियेत सहभागी, प्रक्रियेविषयी तक्रारी असणारे विद्यार्थी आणि पसंतीचे कॉलेज मिळण्यासाठी इच्छुक असणारे विद्यार्थी सहभागी होऊ शकतात. ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेत सहभागी न झालेल्यांना माहिती पुस्तिका घ्यावी लागणार आहे. मात्र, लॉगइन आयडी आणि पासवर्ड असलेल्यांनाच केवळ पसंतीक्रमाचा अर्ज भरता येणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘अॅस्ट्रोसॅट’ने केला शोधाचा श्रीगणेशा

0
0

चाळीस हजार प्रकाशवर्षे दूरच्या कृष्णविवरातील घडामोडी टिपल्या

म. टा. प्रतिनिधी, पुणे
प्रक्षेपित होऊन एक वर्ष पूर्ण होत असताना 'अॅस्ट्रोसॅट' या भारताच्या पहिल्या अवकाशस्थ वेधशाळेने आपली क्षमता दाखविण्यास सुरुवात केली आहे. ४० हजार प्रकाशवर्षे अंतरावरील कृष्णविवराकडून आलेले क्ष-किरण पकडण्यात 'अॅस्ट्रोसॅट'ला यश आले असून, या नोंदींच्या आधारे कृष्णविवराभोवतीच्या घडामोडी उलगडण्यात भारतीय शास्त्रज्ञांना यश आले आहे. 'अॅस्ट्रोसॅट'ने लावलेला पहिला शोध लवकरच 'अॅस्ट्रोफिजिकल जर्नल' या प्रख्यात नियतकालिकात प्रकाशित होणार आहे.
'अॅस्ट्रोसॅट'वर बसवण्यात आलेल्या 'लार्ज एरिया एक्स रे प्रपोर्शनल काउंटर' (लॅक्सपीसी) या उपकरणाने नोंदी घेतल्या आहेत. मुंबईच्या टाटा मूलभूत संशोधन संस्थेने (टीआयएफआर) 'लॅक्सपीसी'ची निर्मिती केली असून, 'टीआयएफआर'सोबत आयुका, मुंबई विद्यापीठ आणि बेंगळुरू येथील रामन रिसर्च इन्स्टिट्यूटमधील (आरआरआय) शास्त्रज्ञांनी नोंदींचे विश्लेषण केले आहे. 'आयुका'च्या माहितीनुसार, गरुड तारकासमूहात (अॅक्विला) असणाऱ्या 'जीआरएस १९१५ + १०५' या क्रमांकाच्या द्वैती ताऱ्यांकडून आलेल्या उच्च ऊर्जेच्या क्ष किरणांची नोंद 'अॅस्ट्रोसॅट'ने घेतली. ताऱ्यांच्या या जोडीमध्ये एक कृष्णविवर असून, दुसऱ्या ताऱ्यातील पदार्थ कृष्णविवर गिळंकृत करीत आहे. ही प्रक्रिया सुरू असतानाच कृष्णविवराभोवती दुसऱ्या ताऱ्याच्या अवशेषांची तबकडी निर्माण झाली असून, तिचे तापमान तब्बल एक कोटी अंशांपर्यंत आहे. या उच्च तापमानाच्या भागाकडून उत्सर्जित झालेले क्ष किरण आणि त्यांची अतिसूक्ष्म स्पंदनेही 'अॅस्ट्रोसॅट'ने टिपली आहेत.
कृष्णविवराच्या अगदी जवळच्या भागाकडून आलेले हे क्ष किरण असून, या नोंदींमुळे कृष्णविवराच्या इतक्या जवळच्या भागाविषयी खगोलशास्त्रज्ञांना प्रथमच नेमकी माहिती मिळू शकणार आहे. या आधी अमेरिकी उपग्रहाच्या साह्याने याच द्वैती ताऱ्यांमधील कमी ऊर्जेच्या क्ष किरणांची स्पंदने अभ्यासण्यात आली होती. मात्र, अॅस्ट्रोसॅटच्या नोंदींमुळे संबंधित कृष्णविवराचे अधिक व्यापक आणि नेमके मॉडेल तयार करण्यात शास्त्रज्ञांना यश आले आहे.
..
'ही तर सुरुवात आहे..'
'अॅस्ट्रोसॅट'च्या पृथ्वीभोवतीच्या केवळ नऊ फेऱ्यांमधून जमा झालेल्या माहितीतून हा महत्त्वाचा शोध लागला असून, 'ही तर सुरुवात आहे,' अशी प्रतिक्रिया 'आयुका'ने दिली आहे. 'आयुका'च्या प्रा. रंजीव मिश्रा आणि मयुख पहारी यांनी या संशोधनामध्ये महत्त्वाची भूमिका बजावली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दक्षिण मुख्यालयाच्या प्रमुखपदी पी. एम. हारीज

0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

लेफ्टनंट जनरल पी. एम. हारीज यांनी लष्कराच्या दक्षिण मुख्यालयाचे प्रमुख (सदर्न कमांड) म्हणून गुरुवारी सूत्रे स्वीकारली. या पूर्वी हारीज सेना प्रशिक्षण मुख्यालयाच्या जनरल कमांडिंग ऑफिसर म्हणून कार्यरत होते. दरम्यान, दक्षिण मुख्यालयाचे माजी प्रमुख लेफ्टनंट जनरल बिपिन रावत यांची लष्करात उपप्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
हारीज मूळचे केरळमधील कोझीकोड येथील असून, त्यांनी अमरावतीनगर येथील सैनिकी शाळेतून लष्करी जीवनाला सुरुवात केली. त्यांनी पदवीचे शिक्षण खडकवासलाच्या राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीतून (एनडीए) घेतले आहे. इंडियन मिलिटरी अॅकेडमीतून पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केल्यानंतर १९७८मध्ये ते मेकॅनाइज्ड इन्फ्रंट्रीमधून लष्करात दाखल झाले. त्यांनी लष्कराचे सर्व प्रकारचे प्रशिक्षण घेतले असून, त्यात प्रामुख्याने इंग्लंडच्या आणि दिल्लीतील नॅशनल डिफेन्स कॉलेजचा समावेश आहे. युनायटेड नेशन्सच्या देखरेखीखाली अंगोला देशात सैन्य निरीक्षक, चीफ पर्सनल ऑफिसर आणि प्रदेश प्रमुख म्हणून कर्तव्य बजावले आहे.
या शिवाय हारीज यांनी महू येथील इन्फंट्री स्कूल आणि वेलिंग्टन येथील प्रतिष्ठित डिफेन्स सर्व्हिस स्टाफ कॉलेजमध्ये प्रशिक्षक पदी काम केले आहे. हारीज यांना आतापर्यंत अतिविशिष्ट सेवा मेडल, सेना मेडल आणि विशिष्ट सेवा मेडलने सन्मानित करण्यात आले आहे. त्यांची पत्नी झरीन हारीज या महिला सशक्तीकरण, आरोग्य आणि शिक्षण क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांचा मुलगा मेकॅनाइज्ड इन्फ्रंट्रीमध्ये कार्यरत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तरुणाई झाली व्यक्त

0
0

'स्पीक फॉर इंडिया'ची प्राथमिक फेरी उत्साहात; चौघांची निवड

म. टा. प्रतिनिधी, पुणे
राजकारण आणि गुन्हेगारी, समाजात पुरुष महत्त्वाचे की स्त्री, बॉलीवूड कलाकारांचा तरुणांवर होणारा परिणाम, उत्सवात राजकारणी आणि राजकारण पाहिजे का, माणसाच्या जीवनात शिक्षणाचे महत्त्व किती, क्रिकेटलाच अवास्तव महत्त्व का, अशा असंख्य विषयांवर पुणे जिल्ह्यातील कॉलेजवयीन विद्यार्थ्यांनी गुरुवारी मनमोकळी आणि उत्स्फूर्त मते मांडली. संबंधित विषयांवर मुद्देसूद आणि टोकदार मते मांडल्याने स्पर्धा चांगलीच रंगली. निमित्त होते टाइम्स ऑफ इंडिया आणि महाराष्ट्र टाइम्स यांच्यावतीने आयोजित 'स्पीक फॉर इंडिया' या वादविवाद स्पर्धेच्या प्राथमिक फेरीचे...
फेडरल बँकेच्या सहकार्याने या वादविवाद स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. 'नेव्हिल वाडिया इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च'मध्ये स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या फेरीत पुणे जिल्ह्यातील कॉलेजांमधून आलेल्या एकूण १५८ स्पर्धकांनी सहभाग घेतला. प्रत्येक सहभागी स्पर्धकाने ऐनवेळी निवडलेल्या विषयावर विचारपूर्वक मते मांडली. त्यामुळे ही फेरी अतिशय उत्साहात पार पडली.
राज्यसभेत सेलिब्रेटी पाहिजेत का, स्वातंत्र्य हे श्रीमंतीपेक्षा महत्त्वाचे आहे, शिक्षण माणसाला हुशार बनवते का, काश्मीरच्या मुद्द्यावर सरकारने काय करावे, मेक इन इंडिया : दिवास्वप्न की वास्तव, निर्भयासारखे प्रकार थांबतील का, कॉलेजांमध्ये योग सक्तीचे असावे का, आदी अनेकविध विषयांवर विद्यार्थ्यांनी परखड भाष्य केले. या फेरीतून निवडण्यात आलेल्या २० स्पर्धकांनी चारच्या गटात वादविवाद स्पर्धेत सहभाग घेतला. या फेरीसाठी ऑनलाइन व्यवसायाचा अर्थव्यवस्थेवर होणारा परिणाम, प्रीमियर लीगचा स्पर्धांचा खेळातील एकाग्रतेवर होणारा परिणाम, रस्त्यांवर सतत हॉर्न वाजवणे आवश्यक आहे का, चिनी मालावर बंदी घालावी का, रिओ ऑलिंपिक - यश की अपयश अशा अनेक चर्चेत राहणाऱ्या विषयांवर विद्यार्थी समरस होऊन बोलत होते.
या स्पर्धकांतील तून चार विद्यार्थ्यांची निवड ही विभागीय स्पर्धेसाठी झाली आहे. स्पर्धक संख्येत वाढ झाल्याने ७ सप्टेंबरला आणखी एक प्राथमिक फेरीचे आयोजन करण्यात आले आहे. या फेरीतूनही चार विद्यार्थ्यांची निवड होईल. अशा एकूण आठ विद्यार्थ्यांची निवड विभागीय स्पर्धेसाठी करण्यात येईल. त्यानंतर उपांत्य आणि अंतिम फेरी होणार आहे. स्पर्धेतील विजेत्याला एक लाख रुपयांचे रोख पारितोषिक आणि दोन लाख रुपयांची शिष्यवृत्ती मिळणार आहे. तसेच, संबंधित कॉलेजला पन्नास हजार रुपयांचे पारितोषिक मिळणार आहे. परीक्षक म्हणून डॉ. आनंद दडस, प्रा. श्रेष्ठा बिपारी, प्रा. विकास डोळे या तज्ज्ञांनी काम पाहिले.
............
ऑनलाइन नोंदणीचे आवाहन
'स्पीक फॉर इंडिया' स्पर्धेच्या पुणे जिल्ह्याच्या प्राथमिक फेरीतून एम. एम. लॉ कॉलेजचा अंकित मिश्रा, झील इंजिनीअरिंग कॉलेजचा अक्षय उंड्रे, सिम्बायोसिस कॉलेजच्या शब्बीर पत्रावाला आणि फर्ग्युसन कॉलेजच्या सिद्धी वाडेकर या चार विद्यार्थ्यांची विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. ज्या विद्यार्थ्यांना प्राथमिक फेरीत सहभागी व्हायचे आहे, त्यांनी www.speakforindia.com या वेबसाइटवर ऑनलाइन नोंदणी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


कामगारांचा आज संप

0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

कामगारांच्या प्रलंबित मागण्यांसाठी दोन सप्टेंबर रोजी पुकारण्यात आलेल्या देशव्यापी संपामध्ये बँक, सरकारी कार्यालये, विमा, आरोग्य, पोस्ट, औद्योगिक क्षेत्रातील कामगार संघटना सहभागी होणार आहेत. त्यामुळे नागरी सुविधांवर परिणाम होणार आहे; मात्र प्रवाशांची गैरसोय होऊ नये म्हणून काळ्या फिती लावून काम करण्याचा निर्णय पीएमटी कामगार संघटनेने घेतला असल्याने पुणे महानगर परिवहन महामंडळाची (पीएमपी) सेवा सुरू राहणार आहे.

जिल्ह्यातील औद्योगिक परिसरातील संघटित, असंघटित कामगार, सरकारी आणि निमसरकारी कार्यालये, बँका, विमा, रेल्वे, वाहतूक, औषधे, व्यापार, बांधकाम आदी क्षेत्रांतील कामगार दोन सप्टेंबर रोजी सकाळी साडेदहा वाजता वाकडेवाडी येथील कामगार उपायुक्त कार्यालय येथे एकत्र जमणार आहेत. या ठिकाणी जाहीर सभा होणार आहे. याशिवाय जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे.

'अंगणवाडी आणि शालेय पोषाण आहार योजनेतील कामगारांना किमान वेतन द्यावे. यंत्रमाग आणि विडी​ कामगारांना सरकारने जाहीर केलेले किमान वेतन लागू करावे. कोणतीही सरकारी पेन्शन नसलेल्या ज्येष्ठांना दरमहा तीन हजार रुपये पेन्शन द्यावी आदी मागण्यांसाठी संप पुकारण्यात आला आहे,' असे कामगार संघटना संयुक्त कृती समिती आणि पुणे जिल्हा इंटकचे अध्यक्ष डॉ. कैलास कदम यांनी सांगितले.

''पीएमपी'चे ११ हजार कामगार काळ्या फिती लावून या संपात सहभागी होणार आहेत; मात्र बससेवा सुरू राहणार आहे,' असे संघटनेचे अध्यक्ष राजेंद्र खराडे यांनी सांगितले.

.........

- या सेवा बंद

सरकारी बँका, विमा कार्यालये, नागरी सुविधा केंद्र, सरकारी कार्यालये, टपाल.

- या सेवा सुरू

पीएमपी बस, रिक्षा, हॉस्पिटल, पाटबंधारे, शाळा आणि महाविद्यालये, औषध दुकाने.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

यंदाची दिवाळी‘अॅटमबॉम्ब’विना

0
0

प्रदूषणामुळे घातली बंदी;

रस्त्यावर वाजवल्यास संबंधितांवर गुन्हा दाखल करणार

म. टा. प्रतिनिधी, पुणे

गणपती, दिवाळी आदी उत्सवांमध्ये 'अॅटमबॉम्ब' (सुतळीबॉम्ब) वाजवणे महागात पडणार आहे. या फटाक्यामुळे ध्वनी प्रदूषण होत असल्याने त्यावर बंदी घालण्यात आली आहे. रस्त्यावर किंवा रस्त्यापासून १० मीटर अंतराच्या आत फटाके वाजवल्यास संबंधितांवर गुन्हाही दाखल होऊ शकतो.

पोलिस आयुक्त रश्मी शुक्ला यांनी फटाके वाजवण्यासंदर्भात माहिती दिली असून, त्यामध्ये कोर्टाच्या आदेशाचे पालन करण्याचे आवाहनही केले आहे. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर फटाक्यांची विक्री २५ ऑक्टोबर ते तीन नोव्हेंबर या दरम्यान करता येणार आहे. मुदत संपल्यानंतर फटाक्यांची विक्री करता नाही. उर्वरित फटाके परवानाधारक गोदाम तथा घाऊक परवाना धारकांकडे परत करावेत, असेही या आदेशात म्हटले आहे. 'उत्सवांदरम्यान रस्त्यांवर फटाके उडवण्यास बंदी घालण्यात आली आहे. रस्ता किंवा रस्त्यापासून दहा मीटर अंतराच्या आत फटाके उडवता येणार नाहीत. मुंबई पोलिस अधिनियम १९५१ नुसार शोभेची दारू, फटाके फेकणे, उडवणे, सोडणे तसेच अग्निबाण उडवण्यावर बंदी घालण्यात आलेली आहे. या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर कलम १३१ नुसार कारवाई करण्यात येईल,' असे शुक्ला यांनी दिलेल्या आदेशात म्हटले आहे.

'साखळी फटाक्या'वर मर्यादा येणार

साखळी फटाका वाजवताना त्याचा आवाज किती होतो, याचा अंदाज फटाक्यांचे उत्पादन करणाऱ्यांना घ्यावा लागणार आहे. ५० ते १०० तसेच १०० किंवा त्यावरील फटाक्यांची माळ पेटवताना आवाज किती असावा याबाबत नियम करण्यात आले आहेत. माळ पेटवल्या जाणाऱ्या ठिकाणापासून चार मीटर अंतरामध्ये ११५, ११० किंवा १०५ डेसिबलपेक्षा जास्त आवाजाच्या फटाक्यांवर बंदी घालण्यात आली आहे.

'अॅटमबॉम्ब' म्हणजे काय?

कागदामध्ये ठासून भरलेली फटाक्याची दारू, त्याभोवती ४२.५३४ ग्रॅम वजनाचा, ५.७१५ सेंटीमीटर लांबीच्या आणि ३.१७५ सेंटीमीटर व्यासाच्या दोऱ्याने गुंडाळलेला फटाका अॅटमबॉम्ब (सुतळी बॉम्ब) म्हणून ओळखला जातो. या अॅटमबॉम्बचे उत्पादन, विक्री करण्यावर महाराष्ट्र शस्त्र अधिनियम (१५४) (३) अन्वये बंदी घालण्यात आली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गंभीर गुन्ह्यांत राज्याची ‘सरशी’

0
0

ज्येष्ठ नागरिक, लहान मुले, महिलांवरील गुन्ह्यांमध्ये मोठी वाढ

म. टा. प्रतिनिधी, पुणे

देशात सर्वाधिक गंभीर गुन्हे महाराष्ट्रात नोंदवले गेले असून, बिहार-उत्तर प्रदेशही राज्याच्या मागे असल्याचे 'नॅशनल क्राइम रेकॉर्ड ब्यूरो'च्या (एनसीआरबी) अहवालातून स्पष्ट झाले आहे. रस्त्यावर घडणारे गुन्हे, ज्येष्ठ नागरिक, लहान मुले यांच्याबाबतच्या गुन्ह्यांतही राज्याचा 'अव्वल' क्रमांक लागला आहे.

देशातील सर्वाधिक गंभीर गुन्हे महाराष्ट्रात नोंदविण्यात आले आहेत. अन्य राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रात गुन्हे दाखल करण्याचे प्रमाण ​अधिक असल्याने गुन्ह्यांचा आकडा इतरांपेक्षा जास्त दिसत असल्याचा दावा पोलिस खात्याकडून करण्यात येत आहे. देशातील सर्वाधिक म्हणजेच दहा टक्के ज्येष्ठ नागरिक एकट्या महाराष्ट्रात राहतात. त्यामुळे ज्येष्ठांबाबत घडणाऱ्या गुन्ह्यांमध्ये राज्याचा क्रमांक वरचा आहे. गेल्या वर्षी १६७ घटनांमध्ये १७३ ज्येष्ठ नागरिकांचा खून झाला आहे. पुण्यातही ज्येष्ठांवरील गुन्ह्यांमध्ये वाढ झाल्याचे दिसून आले आहे. दोन महिन्यांपूर्वी पर्वती परिसरात युवकाने बंगल्यात घुसून दोघा ज्येष्ठ नागरिकांना मारहाण करून चोरी केली होती. सोनसाखळी हिसकावण्याच्या घटनांमध्ये ज्येष्ठ नागरिक महिलांना सर्वाधिक लक्ष्य करण्यात येत असल्याचे दिसून आले आहे.

दिल्ली-उत्तर प्रदेशच्या तुलनेत रस्त्यावरील गुन्हेगारी राज्यात अधिक असल्याचे आकडेवारीवरून दिसून आले आहे. राज्यात साडेआठ हजार जबरी चोरीचे तर, पावणे आठशे दरोड्याचे गुन्हे नोंदविण्यात आले आहेत. राज्यात सोनसाखळी हिसकावल्याचा गुन्हा जबरी चोरी म्हणून नोंदवला जातो. इतर राज्यांमध्ये तो केवळ चोरी म्हणून नोंदवला जात असल्याने महाराष्ट्रातील जबरी चोरीचे गुन्हे वाढल्याचा दावा पोलिसांकडून करण्यात येत आहे. राज्यात महिलांविरुद्ध घडणाऱ्या गुन्ह्यांमध्येही मोठी वाढ झाली आहे. बलात्काराच्या गुन्ह्यांचा आढावा घेतल्यास राज्याचा देशात चौथा क्रमांक लागतो. देशात बलात्काराचे सर्वाधिक ४,३९१ गुन्हे मध्य प्रदेशमध्ये नोंदवले आहे. मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, राजस्थाननंतर महाराष्ट्रात सर्वाधिक गुन्हे नोंदवण्यात आले आहेत. राज्यात लहान मुलांविरुद्धच्या गुन्ह्यांतही मोठी वाढ झाली आहे.

राज्य गंभीर गुन्हे
महाराष्ट्र २,७५,४१४
मध्य प्रदेश २,६८,६१४
केरळ २,५७,०७४
उत्तर प्रदेश २,४१,९२०
राजस्थान १,९८,०८०
दिल्ली १,९१,३७७
पश्चिम बंगाल १,७९,५०१
तमिळनाडू १,८७,५५८
बिहार १,७६,९७३
(स्रोत : नॅशनल क्राइम रेकॉर्ड ब्यूरो)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘पुणेकरांनो, पाणी जपून वापरा’

0
0

भाजपचे कार्यकर्ते करणार मीटरचा प्रसार

म. टा. प्रतिनिधी, पुणे

शहरातील पाणीकपात रद्द करण्यास विलंब केल्याने भारतीय जनता पक्षाला सर्व स्तरांवरून टीका सहन करावी लागल्याने पाण्याचे सर्वंकष धोरण कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी गुरुवारी पुण्यात पाणी परिषद घेण्यात आली. पाण्याचे संकट दूर करण्यासाठी 'वॉटर मीटर' आणि अन्य योजनांचा प्रसार-प्रचार नागरिकांपर्यंत करण्याचा सल्ला परिषदेतून भाजपच्या पदाधिकारी-कार्यकर्त्यांना देण्यात आला; तसेच पुणेकरांना पाणी जपून वापरण्याची सूचनाही देण्यात आली.

खडकवासला धरणप्रकल्प भरल्यानंतरही पुण्यातील पाणीकपात मागे घेण्यास पालकमंत्री गिरीश बापट यांनी विलंब लावल्याचा आरोप सर्वपक्षीयांकडून केला जात आहे. बापट यांनी त्याबाबतची भूमिका सविस्तर मांडली असली, तरी पाण्याची स्थिती, त्याचे नियोजन आणि एकूण पाणीपुरवठा योजना, याची नेमकी माहिती नागरिकांपर्यंत पोहोचावी, या दृष्टीने कार्यकर्त्यांच्या मार्गदर्शनासाठी पाणी परिषद घेण्यात आली. बापट यांच्या हस्ते परिषदेचे उद्घाटन झाल्यानंतर महापालिका आणि पाटबंधारे विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पाण्याच्या सद्यस्थितीविषयी सादरीकरण केले.

शहराप्रमाणेच ग्रामीण भागाचा, तेथील नागरिकांचा, शेती आणि उद्योगाचा विचार करण्याचा मूलमंत्र या परिषदेत कार्यकर्त्यांना देण्यात आला. पालिकेतर्फे '२४ बाय ७' योजनेसाठी राबवण्यात येत असलेल्या विविध उपाययोजनांमुळे शहरातील पाणीपुरवठा यंत्रणेचे चित्र आमूलाग्र बदलणार असल्याचा दावा केला गेला. तसेच नागरिकांना अधिक पैसे भरावे लागले, तरी मीटर लावूनच पाणी घेण्याचा आग्रह धरा, ही बाब अधिकाऱ्यांमार्फत कार्यकर्त्यांवर बिंबवण्यात आली. रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीच्या वतीने ही विशेष परिषद घेण्यात आली असली, तरी भाजपच्याच अनेक आमदार, नगरसेवकांनी या बैठकीकडे साफ पाठ फिरवली. विरोधात असताना पाणीप्रश्नावरून आक्रमक भूमिका घेणाऱ्या भाजपच्या पदाधिकाऱ्यांना सध्याचा ग्रामीण भागाला झुकते माप देण्याचा पवित्रा पटत नसल्याचेही त्यामुळे स्पष्ट झाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बालचित्रवाणी बंद होणार?

0
0

प्रस्ताव राज्य सरकारकडे

योगेश बोराटे । पुणे

शालेय विद्यार्थ्यांसाठी दृकश्राव्य शैक्षणिक आशयनिर्मिती करणारी राज्य शैक्षणिक तंत्रज्ञान संस्था (बालचित्रवाणी) बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला असून, त्यासाठीचा अंतिम प्रस्ताव शिक्षण खात्यातील अधिकाऱ्यांनी राज्य सरकारकडे पाठवल्याचे गुरुवारी समोर आले. संस्थेतील कर्मचाऱ्यांचे थकलेले पगार देण्यासाठी 'बालभारती'कडून 'उसने' पैसे घेण्याचाही विचार झाल्याचे स्पष्ट होत आहे.

केंद्र आणि राज्य सरकारच्या एकत्रित प्रयत्नांमधून पुण्यात १९८४ साली 'बालचित्रवाणी'ची स्थापना झाली होती. अशा संस्था सुरू करणाऱ्या चार राज्यांपैकी महाराष्ट्र हे एक महत्त्वाचे राज्य मानले जात होते. या संस्थेसाठी सुरुवातीच्या टप्प्यात पाच वर्षे केंद्राकडून आर्थिक निधी उपलब्ध करून देण्याची तरतूद करण्यात आली होती; मात्र केंद्र सरकारने त्यासाठी २००२पर्यंत निधी उपलब्ध करून दिला होता. त्यानंतर केंद्राने हा निधी उपलब्ध करून देणे शक्य नसल्याचे राज्य सरकारला कळवले होते. तत्कालीन राज्य सरकारने २००३मध्ये केंद्राकडे संस्थेविषयीची आपली भूमिका स्पष्ट करून, आर्थिक कारणास्तव ही संस्था चालवणे शक्य नसल्याचे कळवले होते. त्यानंतरच्या काळात या संस्थेला उतरती कळा लागल्याचे सातत्याने अनुभवायला मिळत होते. त्यातूनच आता सरकारने ही संस्था बंद करण्याचा निर्णय घेतल्याचे सूत्रांनी 'मटा'ला सांगितले.

सध्या या संस्थेत ३५ कर्मचारी कार्यरत आहेत. गेल्या काही काळापासून संस्थेमध्ये चांगल्या दर्जाच्या कार्यक्रमांची निर्मिती होऊ न शकल्याने, कर्मचाऱ्यांच्या पगाराची मोठी समस्या निर्माण झाली होती. त्यामुळे कर्मचाऱ्यांनी सरकारविरोधात कोर्टात धाव घेतली होती. कोर्टाच्या निकालानुसार, आता सरकार या कर्मचाऱ्यांना त्यांचा २९ महिन्यांचा पगार देणार आहे. त्यानंतरच्या काळात ही संस्था बंद करण्याचा निर्णय खात्यातील उच्चपदस्थ अधिकाऱ्यांनी घेतला आहे. त्याला अंतिम मान्यता मिळण्याची औपचारिकताच आता बाकी राहिल्याचे संबंधितांनी सांगितले.

.....

इतर पर्यायांचाही विचार

'बालचित्रवाणी'च्या कार्यालयामध्ये मोठा स्टुडिओ आहे. गेल्या काही काळामध्ये संस्थेचे पुनरुज्जीवन करण्यासाठी काही अद्ययावत यंत्रणाही संस्थेमध्ये बसवण्यात आली होती. ही संस्था थेट बंद करण्यापूर्वी ती खासगी संस्थांच्या मदतीने ('पीपीपी'द्वारे) चालवणे, शिक्षण खात्यामधील इतर कार्यालयांसाठी संस्थेची जागा भाड्याने देणे, संस्था 'बालभारती'मध्ये समायोजित करणे आदी पर्यायांचा विचार झाला होता; मात्र संस्था 'पीपीपी'वर चालवण्याकरिता देण्यासाठी म्हणून सुरू केलेल्या प्रयत्नांना अत्यल्प प्रतिसाद मिळाला.

....

बालचित्रवाणी'मधील कर्मचाऱ्यांच्या पगारासाठी कोर्टाच्या निर्णयाप्रमाणे तरतूद करत आहोत. त्यासाठी 'बालभारती'मधून निधी उपलब्ध करून दिला जाईल.

- विनोद तावडे, शिक्षणमंत्री

.......

मटा भूमिका - 'बालचित्रवाणी' गरजेची

प्राथमिक शिक्षणात ज्ञानरचनावादाचा आधार मोठ्या प्रमाणावर घेतला जात असतानाच्या आजच्या काळात 'बालचित्रवाणी'सारखी संस्था मोठे योगदान देऊ शकते. या प्रकारच्या शिक्षणाला पूरक असे अनेक दृकश्राव्य कार्यक्रम 'बालचित्रवाणी'द्वारे होऊ शकतात. त्यामुळे ती वाचवली पाहिजे आणि त्यासाठी केंद्र सरकारची मदत घ्यायला हवी. केंद्रीय मनुष्यबळ विभागाच्या अंतर्गत उच्च शिक्षणासाठी समाविष्ट असलेल्या संस्थांच्या धर्तीवर 'बालचित्रवाणी'ला पाठबळ द्यायला हवे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images