Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

आरक्षणासाठी आंदोलन

$
0
0

सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिक विकासासाठी प्रा. फकरुद्दीन बेन्नूर यांचा इशारा
म. टा. प्रतिनिधी, पुणे
'देशातील सुमारे ७० टक्के मुस्लीम हे दारिद्र्यरेषेखाली आहेत. त्यामुळे सरकारने मुस्लिमांना आता सामाजिक, आर्थिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागासलेला समाज म्हणून पाच टक्के आरक्षण देण्याची गरज आहे. सरकार जर हे आरक्षण देणार नसल्यास आरक्षणासाठी नव्याने आंदोलन उभारण्याची आवश्यकता आहे,' असे मत विचारवंत प्रा. फकरुद्दीन बेन्नूर यांनी रविवारी व्यक्त केले.
महाराष्ट्रीयन मुस्लीम आरक्षण आंदोलनच्या वतीने आयोजित मार्गदर्शन सभेत प्रा. बेन्नूर बोलत होते. खासदार संजय काकडे, प्रा. जावेद पाशा, रागीब अहमद आदी उपस्थित होते. या वेळी काकडे यांच्या हस्ते प्रा. पाशा लिखित 'मुस्लिम आरक्षण का' या पुस्तकाचे तर प्रा. बेन्नूर यांच्या हस्ते हुमायून मुस्सल लिखित 'कोंडी आरक्षणाची आणि मुस्लिमांती' या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले.
प्रा. बेन्नूर म्हणाले, 'छत्रपती शाहू महाराज यांनी मुस्लिम नागरिकांची परिस्थिती ओळखून त्यांच्या काळात मुस्लिम समाजाला आरक्षण दिले होते. मात्र, त्यानंतर आलेल्या सरकारांनी मुस्लिम समाजाचा वापर केवळ राजकीय फायद्यासाठी केला. काँग्रेसने तर मुस्लिमांना हिंदुत्ववादाची भिती दाखवून जवळ करण्याचे काम केले. सरकारने मुस्लिमांना सामाजिक, आर्थिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागासलेला समाज म्हणून पाच टक्के आरक्षण दिले पाहिजे. त्यासाठी नव्याने आंदोलन उभारण्याची गरज आहे.'
काकडे म्हणाले, 'मुस्लिम आणि मराठा या दोन्ही समाजाने त्यांच्या आरक्षणाचा मुद्दा एकत्रितपणे उचलून धरण्याची आवश्यकता आहे. आरक्षणाच्या मुद्याहून दोन्ही समाज एकत्रित आल्यास दिल्लीच्या केंद्र सरकारला देखील जाग येईल. मुस्लिम समाजाच्या आरक्षणासाठी आपण सर्वोतोपरी मदत करू. वेळ पडल्यास मंत्रालयावर लोकांच्या मोठ्या संख्येने मोर्चा काढू आणि मुख्यमंत्र्यांशी आरक्षणाबाबत चर्चा करू.'
प्रा. पाशा म्हणाले ,'राजकारण्यांनी मुस्लिम नागरिकांना आरक्षण देण्याच्या आश्वासनाबरोबरच विविध प्रकारची मोठी-मोठी आश्वासने गेल्या ६५ वर्षांपासून दिली. मात्र, त्यांची पूर्तता केली नाही. राजकारण्यांनी केवळ मुस्लिम नागरिकांचा वापर हा एकगठ्ठा मते मिळवण्यासाठी केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस पक्षाच्या सरकारने राज्यातील मुस्लिमांना पाच टक्के आरक्षण देण्याचा निर्णय घेतला. मात्र, मुद्दाम त्याची कागदोपत्री पू्र्तता केली नाही.'
...........
'एकत्रित लढा उभारण्याची गरज'
'मराठा समाजात सुमारे ४० ते ४५ संघटना झाल्या असून, प्रत्येक संघटना समाजाच्या आरक्षणासाठी आपले मुद्दे मांडून लढा देत असतात. काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्र्यासोबत झालेल्या बैठकीत या संघटनांचे प्रतिनिधी एकत्र आले होते. त्या वेळी बैठकीतील ३५ मिनिटे केवळ प्रतिनिधींनी एकमेकांची गाऱ्हाणी सांगण्यात आणि भांडण्यात वाया घालवली. त्यामुळे मराठा किंवा मुस्लिम समाज एकत्रितपणे आरक्षणासाठी भांडत नाहीत, तोपर्यत आरक्षण मिळणार नाही,' असे काकडे यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


पोलिसांना सहकार्य करण्याचेगणेश मंडळांना आवाहन

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
'गणेशोत्सव मंडळे धार्मिकतेतून सामाजिकतेकडे वळत आहेत. परदेशातील लोक उत्सव पाहण्यासाठी पुण्यात येतात. आपली मंडळे आणि कार्यकर्ते नियमांचे पालन करणारे आहेत, हे आपण दाखवून द्यायला हवे. पोलिसांना सहकार्य करीत शांत वातावरणात उत्सव साजरा करा,' अशी सूचना पालकमंत्री गिरीश बापट यांनी कार्यकर्त्यांना उद्देशून केली.
अनुबंध सेवा प्रतिष्ठान ट्रस्टतर्फे 'लोकमान्य जीवनगौरव पुरस्कार' गुरुवर्य जगोबादादा वस्ताद तालमीचे अध्यक्ष इमाम मोईद्दीन खान यांना प्रदान करण्यात आला. त्या वेळी ते बोलत होते. पोलिस आयुक्त रश्मी शुक्ला, श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टचे अध्यक्ष अशोक गोडसे, मंडई मंडळाचे अण्णा थोरात, माजी महापौर शांतिलाल सुरतवाला, अ‍ॅड. प्रताप परदेशी, डॉ. सुधीर हिरेमठ, अतिरिक्त आयुक्त सी. एच. वाकडे, किरण ठाकूर, विनायक घाटे, अशोक जाधव, शिरीष मोहिते या वेळी उपस्थित होते. याप्रसंगी 'लोकमान्य गणेश सेवा पुरस्कार' युवा वाद्य पथकाला प्रदान करण्यात आला, तर 'आदर्श गणेशोत्सव कार्यकर्ता पुरस्कार' आझाद हिंद मित्र मंडळाचे अध्यक्ष अनिल पायगुडे, श्री काळभैरवनाथ तरुण मंडळाचे अध्यक्ष उमेश सपकाळ, श्रीकृष्ण तरुण मंडळाचे अध्यक्ष विशाल ओव्हाळ, अखिल भुसारी कॉलनी विकास मंडळाचे अध्यक्ष सचिन धनकुडे, आदर्श तरुण मित्र मंडळ ट्रस्टचे अध्यक्ष डॅनियल लांडगे यांना प्रदान करण्यात आला. राठी ब्रदर्स फेटेवालेचे निशिकांत राठी यांचा विशेष सन्मान करण्यात आला.
'ज्या उद्देशाने लोकमान्य टिळकांनी गणेशोत्सवाला सुरुवात केली, तो उद्देश आपण सार्थ करू. गणेशोत्सवाची ही परंपरा जगभर पोहोचायला हवी, यासाठी गणेशोत्सव कार्यकर्त्यांनी कायदा सुव्यवस्थेचे पालन करावे तसेच उत्सव निर्विघ्न पार पाडण्यासाठी मंडळांनी पोलिसांच्या खांद्याला खांदा लावून एकत्रितपणे काम करावे,' असे आवाहन शुक्ला यांनी केले. विनायक घाटे यांनी सूत्रसंचालन केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शास्त्रीय संगीताच्या रसग्रहणासाठी ‘बैठक’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
शास्त्रीय संगीत हे समजायला अवघड असते, असा रसिकांचा भ्रम असतो. या पार्श्वभूमीवर शास्त्रीय संगीत म्हणजे नेमके काय, त्याचा आस्वाद कसा घ्यावा, त्याकडे कसे पाहावे यांसारख्या अनेकविध विषयांचे गायन व वादनाच्या 'बैठकी'तून रसग्रहण करता येणार आहे. प्रसिद्ध शास्त्रीय गायक राहुल देशपांडे यांच्या संकल्पनेतून शास्त्रीय संगीताची 'बैठक' रंगणार आहे.
'गायन, वादनातून अभिजात शास्त्रीय संगीत समजून सांगण्यासाठी 'बैठक' हा उपक्रम पुण्यात आयोजित केला आहे. ३ सप्टेंबर रोजी कर्वेनगर येथील पंडित फार्म्स येथे सायंकाळी ७ वाजता या उपक्रमाला सुरुवात होणार आहे,' अशी माहिती राहुल देशपांडे यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत दिली.
गोखले कन्स्ट्रक्शन्सच्या सहकार्याने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे. व्हाइट कॉपर एंटरटेन्मेंटकडे कार्यक्रमाच्या व्यवस्थापनाची जबाबदारी आहे. पंडित फार्म्स येथे दोन महिन्यांमधून एकदा होणारा हा उपक्रम रसिकांसाठी विनामूल्य आहे.
देशपांडे म्हणाले, 'अभिजात शास्त्रीय संगीताच्या जाणकार श्रोत्यांचे प्रमाण कमी आहे. त्यामुळे हे संगीत त्याच्या मूळ गोडीसहित रसिकांपर्यंत पोहोचावे, यासाठी या उपक्रमाचे आयोजन केले आहे. या उपक्रमामध्ये शास्त्रीय गायक आणि वादक सहभागी होत आपल्या सादरीकरणाबरोबरच रसिकांशी संवाद साधतील. अभिजात शास्त्रीय संगीत म्हणजे नेमके काय, एखाद्या रागाकडे कशा पद्धतीने पाहावे, त्याचा आस्वाद कसा घ्यावा असे विविध पैलू ते कलेतून उलगडतील. नाट्य संगीत व भजन हे प्रकार यामध्ये नसतील.'
'व्हर्च्युअल रिअॅलिटी फॉरमॅट'च्या मदतीने कार्यक्रमाचे संकलन करण्यात येणार असून त्यासाठी ही बैठक ३६० डिग्रीमध्ये चित्रित करण्यात येईल. ज्या रसिकांना या बैठकीसाठी उपस्थित राहणे शक्य नाही त्यांना मोबाइल अॅपच्या माध्यमातून या बैठकीचा ३ डी प्रकारात आनंद घेता येईल,' असे डिजिटल आर्ट व्हीआरई कंपनीचे संस्थापक अजय पारगे यांनी सांगितले.
पहिल्या 'बैठकी'त स्वतः राहुल देशपांडे यांचे गायन होणार आहे. या कार्यक्रमाच्या विनामूल्य प्रवेशिका २९ ऑगस्टपासून सकाळी १० ते सायंकाळी ७ या वेळेत पंडित फार्म्स येथे उपलब्ध असतील.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शिरूरच्या नगरसेवकाचा भरदिवसा खून

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

शिरूरचे माजी उपनगराध्यक्ष आणि विद्यमान नगरसेवक महेंद्र हिरामण मल्लाव (वय ४८) यांचा पाच ते सात जणांच्या टोळक्याने धारदार शस्त्राने वार करून खून केल्याची धक्कादायक घटना रविवारी दुपारी घडली. पूर्व वैमनस्यातून हा खून झाल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. या घटनेनंतर शहरात काही ठिकाणी दगडफेक झाली. रात्री उशिरापर्यंत तणावाचे वातावरण होते. या प्रकरणी गणेश मल्लाव यांनी तक्रार दिली असून, त्यानुसार प्रवीण काळे यांच्यासह चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिरूर नगरपरिषदेतील निवृत्त कर्मचाऱ्याचे रविवारी सकाळी निधन झाले. त्यांचा अंत्यविधी उकरून मल्लाव दुपारी अडीचच्या सुमारास दुचाकीवरून घरी जात होते. रामआळी येथून जात असताना तीन ते चार मोटारसायकलींवरून आलेल्या पाच ते सात हल्लेखोरांनी त्यांना अडविले. त्यांच्यावर धारदार शस्त्राने वार केले. या हल्ल्यात मल्लाव जागेवरच कोसळले. हल्ल्यानंतर आरोपी आरडाओरडा करून मोटारसायकलवरून पळून गेले.
भरदिवसा बाजारपेठेत घडलेल्या या घटनेने घबराट उडाली. खरेदीसाठी आलेले लोक, महिला, मुले भीतीने सैरावैरा पळू लागले. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. दुपारी तीनच्या सुमारास मल्लाव यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी हलविण्यात आला. या घटनेनंतर तातडीने बाजारपेठ बंद झाली. या घटनेनंतर काही ठिकाणी दगडफेक झाली. काही छोट्या दुकानांची तोडफोडही करण्यात आली. त्यामुळे ग्रामीण पोलिसांनी बंदोबस्त वाढविला. राज्य राखीव पोलिस दलाच्या तुकड्या पाचारण करण्यात आल्यानंतर उशिरा परिस्थिती काही प्रमाणात नियंत्रणात आली. या खून प्रकरणामागील नेमके कारण अद्याप स्पष्ट होऊ शकले नसल्याचे पोलिस निरीक्षक दयानंद गावडे यांनी सांगितले. आरोपींच्या मागावर पथके रवाना झाली आहेत. तसेच, स्थानिक गुन्हे शाखेकडून आरोपींचा शोध सुरू आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

लेखापरीक्षण कधी होणार?

$
0
0

पुणे : पगारबिले वेळेवर न मिळणे...शिक्षक-प्राध्यापकांच्या मेडिकल बिलांची वेळीच पूर्तता न होणे...वेतनेतर अनुदान रखडणे... छोट्या- मोठ्या आर्थिक व्यवहारांमधून गैरव्यवहार समोर येणे अशा अनेक समस्या न सुटण्याचे महत्त्वाचे कारण हे राज्याच्या शिक्षण संचालनालयांमध्ये न होणारे अंतर्गत लेखापरीक्षण ठरले आहे. महालेखापालांनी शिक्षण संचालनालयांवर ताशेरे ओढल्यानंतरही अंतर्गत लेखापरीक्षण न करणारी संचालनालये आता तरी आपला कारभार सुधारणा का, असा सवाल राज्यभरातील प्राचार्य, प्राध्यापक आणि शिक्षक मंडळी उपस्थित करत आहेत.
केवळ प्राथमिक शिक्षण संचालनालयच नव्हे, तर राज्याच्या उच्चशिक्षण संचालनालयामध्येही अद्याप कोणत्याही प्रकारचे अंतर्गत लेखापरीक्षण होत नसल्याची धक्कादायक बाब उघड झाली आहे. दर वर्षी काही हजार कोटी रुपयांची आर्थिक उलाढाल असलेल्या या संचालनालयाच्या 'अशा' कारभारावर महालेखापालांनीही ताशेरे ओढले आहेत. या प्रकारामुळे शिक्षण खात्यामधील आर्थिक व्यवहार अनियंत्रित पद्धतीनेच चालतो की काय, असा सवाल उपस्थित होत आहे.
या विषयी 'मटा'ला मिळालेल्या माहितीनुसार, या पूर्वीच्या काळात महालेखापालांमार्फत उच्चशिक्षण संचालनालयाच्या झालेल्या तपासणीमध्येही हा मुद्दा समोर आला होता. अंतर्गत लेखापरीक्षण होत नसल्याने, संचालनालयाच्या पातळीवरच थांबविता येणारे अनियंत्रित आर्थिक व्यवहार पुढे सुरू राहिल्याने हा आक्षेप पुढे आला होता. राज्यभरातील अनुदानित कॉलेजांमधील प्राध्यापक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे वेतन अनुदान, शिक्षण संस्थांसाठीचे वेतनेतर अनुदान, राज्य पातळीवर आर्थिक नियोजनाच्या माध्यमातून उपलब्ध होणाऱ्या निधीचा वापर आदी बाबींसाठी हे संचालनालय जबाबदार आहे. मात्र गेल्या काही वर्षांमध्ये अंतर्गत लेखापरीक्षण होत नसल्याने अशा सर्वच व्यवहारांमध्ये अनियमितता दिसून आल्याचे आरोपही याच निमित्ताने करण्यात आले.

प्रस्ताव राज्य सरकारकडे सादर...
'मटा'ने राज्याचे उच्चशिक्षण संचालक डॉ. धनराज माने यांच्याशी या संदर्भात संपर्क साधला असता, संचालनालयाचे अंतर्गत लेखापरीक्षण होत नसल्याच्या बाबीला दुजोरा देण्यात आला. डॉ. माने म्हणाले, 'अंतर्गत लेखापरीक्षण होत नसल्याच्या बाबीमध्ये तथ्य आहे. मात्र ही त्रुटी दूर करण्यासाठी आम्ही राज्य सरकारकडे प्रस्ताव सादर केला आहे. त्यासाठी संचालनालयाने स्वतः पुढाकार घेऊन काही गोष्टींचे नियोजनही केले आहे. हा प्रस्ताव मान्य झाल्यास, संचालनालयाचे अंतर्गत लेखापरीक्षण सुरू होईल.'

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

​होऊ या ‘इको फ्रेंडली’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
'पर्यावरणाचे रक्षण हीच ईश्वराची सेवा आहे,' अशा शब्दांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 'इको फ्रेंडली' गणेशोत्सव साजरा करण्याचे आवाहन रविवारी देशवासीयांना केले. प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या गणेशमूर्तींऐवजी मातीच्या मूर्ती तयार करा आणि नद्या-तलाव स्वच्छ ठेवून तेथील जीवांचेही रक्षण करा, असे आवाहन त्यांनी केले आहे. या संदर्भात त्यांनी पुण्यातील ज्येष्ठ मूर्तीकार बी. जी. धोंडफळे आणि ज्ञान प्रबोधिनीचाही आपल्या भाषणात आवर्जून उल्लेख केला.
आपल्या 'मन की बात' या कार्यक्रमात त्यांनी अन्य विषयांबरोबरच आगामी गणेशोत्सव आणि दुर्गापूजा उत्सवाचा उल्लेख केला. या दोन्ही सणांच्या शुभेच्छा देऊन मोदी यांनी पर्यावरणाच्या रक्षणाचा मुद्दा उपस्थित केला. पूर्वी शाडूच्या व अन्य मातीच्या गणेशमूर्तींची प्रतिष्ठापना होत असे. मात्र, गेल्या काही काळात प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती मोठ्या प्रमाणात तयार होऊ लागल्या आहेत. या प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती पर्यावरणाच्या दृष्टीने अनुकूल नाहीत, मातीपासून गणेशमूर्ती किंवा दुर्गेच्या मूर्ती तयार करणे, हीच आपली परंपरा आहे, असे मोदी म्हणाले. प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तींचे विसर्जन केल्यामुळे नदी, तलावातील पाणी प्रदूषित होते, याचा संदर्भ घेऊन नदी व तलावांचे रक्षण करणे आणि त्या पाण्यातील छोट्या जीवांचे रक्षण करणे, हीच ईश्वसेवा आहे, असे मोदी यांनी आपल्या भाषणात नमूद केले. अशा पद्धतीने पर्यावरणाचा ऱ्हास करणे, ही साक्षात गणेशाचीही इच्छा नाही, असेही पंतप्रधान म्हणाले.
दरम्यान, गणेशोत्सवाच्या परंपरेत पुण्यातील ज्येष्ठ मूर्तीकार बी. जी. धोंडफळे, ज्ञान प्रबोधिनी, तसेच मुंबईतील गिरगावचा राजा, कोल्हापुरातील विज्ञान मित्र आणि विज्ञान प्रबोधिनी यांच्या कार्याचाही मोदी यांनी आवर्जून उल्लेख केला.

पर्यावरणपूरक उत्सवाला बळ
पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करावा, यासाठी पुण्यातील अनेक व्यक्ती आणि संस्था गेली अनेक वर्षे काम करीत आहेत. तसेच महापालिकेनेही गेल्या काही काळात याबाबत काही पावले उचलली आहेत. आता खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीच या विषयाची दखल घेतल्यामुळे पर्यावरण रक्षणाच्या चळवळीला बळ मिळेल, असे सांगण्यात येत आहे. त्यादृष्टीने महापालिका, विविध पक्ष-संघटना आणि स्वयंसेवी संस्थांसह नागरिकही आणखी एक पाऊल पुढे टाकतील, अशी आशा व्यक्त करण्यात येत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कोकणासाठी पुण्यातून सहा विशेष रेल्वेगाड्या

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

गणेशोत्सवासाठी पुण्यातून कोकणात जाणाऱ्या प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेता मध्य रेल्वेने पुणे-कोकण रेल्वे मार्गावर सहा विशेष गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे. पुणे-झाराप आणि पुणे-रत्नागिरी या मार्गावर त्या गाड्या धावणार असून, त्यांचे तिकीट आरक्षण सुरू झाले आहे.
पुण्याहून झारापला जाण्यासाठी एक व दोन सप्टेंबर रोजी पुणे स्टेशनहून गाडी अनुक्रमे सायंकाळी पावणेसात आणि साडेचार वाजता गाडी सोडण्यात येणार आहे. ती गाडी चिंचवड, तळेगाव, लोणावळा, कर्जत, रोहा, खेड, चिपळूण, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, कणकवली, कुडाळ आणि झरप या स्टेशनवर गाडी थांबणार आहे. पुण्याहून रत्नागिरीसाठी चार सप्टेंबर रोजी गाडी सोडण्यात येणार आहे. ही गाडी रात्री आठ वाजता पुण्याहून सुटून सकाळी साडेनऊ वाजता रत्नागिरीला पोहोचेल. ही गाडी चिंचवड, तळेगाव, लोणावळा, कर्जत, रोहा, मानगाव, खेड, चिपळूण, संगमेश्वर रोडमार्गे रत्नागिरीला रवाना होईल.
पुणे-झाराप व पुणे-रत्नागिरी या मार्गावरील गाड्यांचा परतीचा प्रवास अनुक्रमे दोन आणि पाच सप्टेंबरला होणार आहे. मात्र, गणपतीची प्राणप्रतिष्ठा पाच सप्टेंबर रोजी होणार आहे. त्या दिवशी परतीच्या प्रवासाची शेवटची गाडी आहे. त्यामुळे कोकणात गेलेल्या प्रवाशांना परतण्यासाठी गाडी उपलब्ध नाही. म्हणून, परतीच्या गाड्यांची तारीख बदलावी, तसेच या गाड्या झरपऐवजी मडगावपर्यंत सोडाव्यात, अशी मागणी रेल्वे प्रवासी ग्रुपच्या अध्यक्ष हर्षा शहा यांनी केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नगर रोडवर ‘बीआरटी’चे तीन-तेरा

$
0
0

मोठा खर्च करून उभारलेली यंत्रणा अत्यवस्थ

Harsh.Dudhe@timesgroup.com
पुणे : बीआरटीच्या बसथांब्यांचे स्वयंचलित दरवाजे उघडेच...वीजपुरवठा बंद असल्याने वेळापत्रकाची डिजिटल स्क्रीन आणि विद्युत दिवे बंद..बीआरटी मार्गातून सर्रास खासगी वाहनांची ये-जा...काही ठिकाणी प्रवाशांना रस्त्यावरून बसथांब्यांनजीक येण्यासाठी करावी लागणारी तारेवरची कसरत...हे चित्र आहे काही दिवसांपूर्वी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मोठ्या थाटात उद्घाटन केलेल्या नगर रस्ता बीआरटीचे...
पुणे महापालिकेने उभारलेल्या नगर रस्ता बीआरटीचे उद्घाटन मोठ्या थाटात करण्यात आले. मात्र, अल्पावधीतच या बीआरटीला विविध समस्यांनी गाठले आहे. या बीआरटीवर येरवडा, गुंजन कॉर्नर, वाडिया बंगला, शास्त्रीनगर, रामवाडी जकात नाका, वडगावशेरी फाटा, विमाननगर कॉर्नर, पाचवा मैल, टाटा गार्डरूम, चंदननगर, खराडी बायपास, जनकबाबा दर्गा आणि आपले घर असे १३ बसथांबे आहेत.
यापैकी येरवडा, विमाननगर, खराडी बायपास अशी काही महत्वाचे गर्दीचे थांबे सोडल्यास अन्य ठिकाणी पुरेसे मनुष्यबळ नसल्याने प्रवाशांना माहिती देण्यासाठी पीएमपीचे कर्मचारी उपलब्ध नसतात. त्यामुळे बसथांब्यात येणाऱ्या प्रवाशांना एकंदरीत यंत्रणेचा आवाका लक्षात येत नाही. त्यामुळे बीआरटीतून बसथांब्यावर बस आल्यानंतर गोंधळाची परिस्थिती निर्माण होते. तांत्रिक कारणामुळे बसस्थानकातील वेळापत्रकाची स्क्रीन बंद असल्यास प्रवाशांना कोणती बस नेमकी कोठे येणार आहे, या विषयी प्रवाशांचा गोंधळ उडतो.
बसस्थानकांच्या सुरक्षेसाठी पीएमपीने प्रत्येक बसथांब्यावर सुरक्षा कर्मचारी नेमले आहेत. मात्र, या मार्गावरील बहुतांश बसथांब्यांमध्ये कर्मचारी नसल्याचेच चित्र आहे. त्यामुळे बसथांब्यांची सुरक्षितता धोक्यात आली आहे. रात्रीच्यावेळी मद्यपींकडून बसथांब्यांची तोडफोड करण्याचे प्रकार सातत्याने घडत असल्याचे प्रवाशांनी सांगिले. या तोडफोडीमुळे बसथांब्यांच्या खिडक्या आणि दरवाजे तुटले आहेत. आपले घर, टाटा गार्डरूम आणि रामवाडी जकात नाका या बसथांब्यांच्या स्वयंचलित दरवाज्यांची यंत्रणा बंद पडली आहे. त्यामु‍ळे हे दरवाजे कायम उघडेच असतात. वाडिया बंगला आणि टाटा गार्डरूम बसथांब्यांमध्ये प्रवाशांची अजिबातच गर्दी नसल्याचेच चित्र आहे.
गुंजन कॉर्नर आणि येरवडा येथे दोन बीआरटींमध्ये असलेल्या डिव्हायडर प्रवासी आणि स्थानिक नागरिक पहुडलेले असतात. सकाळी आणि संध्याकाळी गर्दीच्या वेळी चारचाकी वाहने सर्रास बीआरटी मार्गातून जातात. खासगी वाहने बीआरटी मार्गातून जाऊ नये यासाठी काही महत्वांच्या ठिकाणी कर्मचारी नेमण्यात आले आहेत. मात्र, त्यांना न जुमानता ही वाहने बीआरटीतून जातात. या मार्गावरील बसथांब्यांच्या डागडुजीचे काम सुरु असल्याने बांधकामाचा राडारोडा रस्त्यातच पसरला आहे. येरवडा, आपले घर, रामवाडी जकात नाका, चंदन नगर, विमान कॉर्नर अशा महत्वाच्या बसथांब्यांमध्ये पोचण्यासाठी प्रवाशांना गर्दीतून वाट काढून, जीव मुठीत धरून रस्ता ओलांडावा लागतो. त्यामुळे अपघात होण्याची शक्यता अधिक आहे.
...........
आधुनिक बसथांब्याची दुरवस्था
बीआरटीवर रामवाडी जकात नाका बसथांब्याचा वीजपुरवठा गेल्या पाच दिवसांपासून बंद आहे. त्यामुळे बसच्या वेळापत्रकाची डिजिटल स्क्रीन बंद आहे. तसेच, स्वयंचलित दरवाज्यांची यंत्रणा बंद आहे. त्यामुळे प्रवाशांना कोणच्या मार्गाची बस नेमकी कोठे येणार आहे, याची माहिती उपलब्ध होत नाही. बसथांब्यानजकच्या पादचारी मार्गाच्या फरशा उखडल्या आहेत. त्यामुळे हा बसथांबा बीआरटीचा वाटतच नाही. दरम्यान, या मार्गावरील बसथांब्यांमध्ये पाऊस आल्यानंतर प्रचंड पाण्याची गळती होते, असे प्रवाशांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


ज्ञानप्रबोधिनीकडून शेकडो पर्यावरणपूरक मूर्तींची निर्मिती

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
गणेशोत्सवाला विधायक स्वरूप प्राप्त व्हावे आणि पर्यावरणाला धक्का बसू नये, यासाठी पर्यावरणपूरक गणेशोत्सवाची संकल्पना पुढे येत आहे. त्यामध्ये प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती टाळून, शाडू मातीच्या आणि कागदी लगद्यापासून तयार केलेल्या मूर्ती वापरण्याची संकल्पना जोर धरत आहे. याच संकल्पनेला व्यापक स्वरूप देण्याचे काम ज्ञान प्रबोधिनीकडून केले जात आहेत. कागदी लगद्याच्या आणि शाडू मातीच्या मूर्ती वापरा, असे आवाहन करण्याबरोबरच संस्थेच्या सोलापूर विभागाकडून दर वर्षी शेकडो मूर्तींची निर्मिती केली जात आहे.
गणेशोत्सवाला विधायक स्वरूप प्राप्त व्हावे, यासाठी ज्ञानप्रबोधिनीमार्फत अनेक उपक्रम राबवले जात आहेत. इको फ्रेंडली गणपतींच्या निर्मितीचा उपक्रम हा त्यापैकीच एक आहे. गेल्या ५ वर्षांपासून सोलापूर शहरामध्ये प्रबोधिनीमार्फत पर्यावरणपूरक गणपतीच्या मूर्ती तयार केल्या जातात. शिवाय महाराष्ट्राच्या सर्व भागात पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करावा, याविषयी दर वर्षी जनजागृती करण्यात येते. गेल्या काही वर्षांपासून हा उपक्रम मूळ धरत असून टप्प्या-टप्प्याने संपूर्ण महाराष्ट्रात, अशा पद्धतीचा उपक्रम राबवण्याचा प्रबोधिनीचा मानस आहे. त्यासाठी प्रयत्न देखील सु्रू असल्याचे संस्थेच्या वतीने सांगण्यात आले.
ज्ञान प्रबोधिनीचा कार्यकर्ता अभिषेक जोग म्हणाला, 'पंतप्रधान मोदी यांनी 'मन की बात'मध्ये ज्ञानप्रबोधिनीच्या विधायक उपक्रमांचा उल्लेख करून, या उपक्रमांना एक नवी उभारी दिली आहे. पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करा , अशा त्यांच्या आवाहनाला साद देत प्रबोधिनी यंदाच्या वर्षी कमात कमा प्रदूषण व्हावे, यासाठी प्रयत्न करणार आहे. तसेच इको फ्रेंडली गणेशमूर्तींचा जास्तीत जास्त प्रसार व्हावा, यासाठी राज्यभरात मोहीम सुरू करण्यात येणार आहे. सोलापूर शहरातून सुरू झालेला हा उपक्रम महाराष्ट्रात राबवण्यासाठी प्रबोधिनी प्रयत्नशील आहे.'

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कात्रज ते हडपसर मार्ग कात टाकणार

$
0
0

'रेनबो बीआरटी'च्या रचनेनुसार कार्यान्वित करणार

म. टा. प्रतिनिधी, पुणे
संपूर्ण देशाला जलद बस वाहतूक व्यवस्था (बीआरटीएस) म्हणजे काय, हे दहा वर्षांपूर्वी दाखवून देणाऱ्या 'कात्रज ते हडपसर' या १७ किमीच्या मार्गाला लवकरच नवे रूप प्राप्त होणार आहे. सातारा आणि सोलापूर रस्त्यावरील विविध कामांमुळे 'स्थगित' असलेला हा मार्ग 'रेनबो बीआरटी'च्या रचनेनुसार कार्यान्वित केला जाणार असून, पहिल्या टप्प्यात कात्रज ते स्वारगेट हा मार्ग प्रवाशांसाठी खुला होणार आहे.
केंद्र सरकारच्या जवाहरलाल नेहरू राष्ट्रीय नागरी पुनर्निर्माण योजेनेच्या (जेएनएनयूआरएम) निधीतून देशात सर्वप्रथम पुण्यात बीआरटी मार्ग सुरू झाला. त्यासाठी निवडण्यात आलेला कात्रज ते हडपसर हा मार्ग प्रवाशांची सर्वाधिक वाहतूक करणारा होता. तरीही, नियोजनातील काही त्रुटींमुळे या मार्गावर अपघातांची मालिका सुरू झाली आणि पुणेकरांनी 'बीआरटी'ला नाके मुरडली. गेल्या वर्षभरात शहरासह पिंपरी-चिंचवडमध्ये चार मार्गांवर यशस्वीरित्या 'बीआरटी' कार्यान्वित झाल्याने प्रवाशांचा या सेवेला प्रतिसाद वाढत आहे. हे लक्षात घेऊन, आता याच मार्गांवरील सेवा-सुविधा पथदर्शी बीआरटी मार्गावर निर्माण करण्याचे महापालिका आणि पुणे महानगर परिवहन महामंडळाने (पीएमपी) निश्चित केले आहे. त्यानुसार, सातारा रस्त्याच्या फेररचनेचे काम सुरू करण्यात आले असून, या मार्गावरील बीआरटी सेवा पूर्ववत करण्यासाठी लोकप्रतिनिधींकडूनही पाठपुरावा सुरू आहे.
पथदर्शी बीआरटीवर सद्यस्थितीत असलेले बस थांबे दोन्ही दिशांना (अप आणि डाउन) आहेत. त्याऐवजी, आळंदी आणि नगररोडप्रमाणेच रस्त्याच्या मधोमध एकच थांबा उभारून ये-जा करणाऱ्या प्रवाशांना रस्ता ओलांडण्यासाठी सुविधा निर्माण करून देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. त्याशिवाय, सध्याचे बसथांबे हे जुन्या रचनेप्रमाणे असल्याने प्रवाशांना पायरी चढून बसमध्ये प्रवेश करावा लागतो. कात्रज ते स्वारगेट या मार्गावरील सर्व बसथांबे 'लेव्हल बोर्डिंग'नुसार करण्याचा महापालिकेचा प्रयत्न आहे. त्यातून, प्रवाशांना अधिक चांगल्या सुविधा देता येणे शक्य होणार आहे. कात्रज आणि स्वारगेट या दोन्ही ठिकाणी पीएमपीच मोठी टर्मिनल असल्याने विश्रांतवाडी किंवा वाघोलीप्रमाणे येथे अडचण उद्भवणार नाही.
पथदर्शी बीआरटी मार्गावरील प्रवाशांना जाणवणाऱ्या त्रुटीही या निमित्ताने दूर केल्या जाणार आहेत. धनकवडी येथील शंकर महाराज उड्डाणपुलामुळे बीआरटीसाठी स्वतंत्र मार्गिकाच तयार झाली आहे. तर, काही ठिकाणी महापालिकेच्या विविध कामांमुळे अस्ताव्यस्त झालेली बीआरटीची स्वतंत्र मार्गिका पुन्हा निश्चित करण्याचे काम महापालिकेला करावे लागणार आहे. स्वारगेटसारख्या भागांतून शहराच्या अनेक भागांत जाण्यास बससेवा उपलब्ध असल्याने कात्रज किंवा परिसरातून येणाऱ्या नागरिकांसाठी ही सेवा पूर्ववत होऊ शकली, तर त्याचा लाभ मोठ्या प्रमाणावर घेतला जाईल.
.................
सोलापूर रोड संथगतीनेच
कात्रज ते हडपसर या पथदर्शी मार्गावर स्वारगेट ते हडपसर गाडीतळ या दरम्यान बीआरटीसाठी स्वतंत्र मार्गिका असूनही त्याचा योग्य वापर केला गेला नसल्याचे दिसून आले आहे. सध्या तर या मार्गिकेमधून खासगी वाहनेच मोठ्या प्रमाणावर जात असल्याचे दिसून येते. मध्यंतरीच्या काळात सोलापूर रोडचे रुंदीकरण झाले असल्याने खासगी वाहनांसाठी अधिक जागा उपलब्ध झाली आहे. त्यामुळे, आता सोलापूर रोडवरील स्वारगेट ते हडपसर या दरम्यानच्या बीआरटी मार्गाकडेही लक्ष देण्याची गरज आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘पीएनजी’च्या शोरूममधून लाखोंचे पेंडंट लंपास

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
लष्कर परिसरातील पी. एन. गाडगीळ ज्वेलर्स येथे खरेदीच्या बहाण्याने आलेल्या तीन बुरखाधारी महिलांनी साडेतीन लाखांचे हिऱ्याचे पेंडंट लंपास केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी लष्कर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत निकीता सूर्यवंशी (वय २४, रा. कसबा पेठ) यांनी तक्रार दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लष्कर भागात साचापीर रोडवर पी. एन. गाडगीळ ज्वेलर्स हे दागिन्यांचे शोरूम आहे. सूर्यवंशी या ठिकाणी सेल्सगर्ल म्हणून काम करतात. शनिवारी दुपारी एकच्या सुमारास बुरखा घातलेल्या तीन महिला व एक मुलगा दुकानात आले. त्यानंतर तो मुलगा बाहेर गेला. या महिलांनी त्यांना हिऱ्याचे पेंडंट घ्यायचे असल्याचे सांगितले. त्यानुसार सूर्यवंशी यांनी त्यांच्यापुढे काही दागिने ठेवले. त्या वेळी या महिलांनी त्यांच्याजवळील काही जुने दागिने मोडीत टाकायचे असल्याचे सांगितले. याबद्दल चौकशी करण्यासाठी सूर्यवंशी या ज्वेलर्सच्या व्यवस्थापकांकडे चौकशी करण्यासाठी गेल्या. त्या वेळी या महिलांनी ३ लाख ३३ हजार २६८ रूपयांचे हिऱ्याचे पेंडंट चोरून लंपास केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

संगमवाडी-विश्रांतवाडी मार्गावर अडचणींचे काटे

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

शहरात 'रेनबो बीआरटी'चा पहिला मार्ग म्हणून ओळख असलेल्या संगमवाडी-विश्रांतवाडी मार्गाला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. मात्र, बस स्टॉपमधील तांत्रिक अडचणी, पादचाऱ्यांना रस्ता ओलांडताना करावी लागणारी कसरत, बीआरटी मार्गात घुसणारी खासगी वाहने आणि प्रवाशांच्या सुरक्षिततेच्या दृष्टिने करावयाची उपाययोजना याकडे महापालिका प्रशासनाने लक्ष देण्याची गरज आहे.
शहरात कात्रज-हडपसर मार्गावर प्रायोगिक तत्त्वावर बीआरटी योजना सुरू करण्यात आली होती. त्यात अनेक त्रुटी असल्याचे कालांतराने निदर्शनास आले. मात्र, बीआरटी योजना नागरिकांच्या पसंतीस उतरली. त्यामुळे महापालिकेने प्रायोगिक् बीआरटीतील त्रुटी दूर करून संगमवाडी-विश्रांतवाडी मार्गावर आधुनिक स्वरुपातील बीआरटी सुरू करण्यात आली. सेवा सुरू करताना त्यात बऱ्याच त्रुटी तशाच होत्या.
बस स्टॉपचे दरवाजे आणि बस यामध्ये अधिक अंतर राहते, बस स्टॉपवर दाखल झाल्यानंतर दरवाजे लवकर उघडत नाहीत, बस स्टॉपचे गळणारे छत, विश्रांतवाडी टर्मिनल येथे वाहतूक कोंडीमुळे होणारे अडथळे आदी त्रुटींचा सामना करावा लागला. मध्यंतरी त्रुटी सुधारण्याचा प्रयत्न झाला. काही प्रश्न मार्गी लागले. मात्र, अद्याप काही ठिकाणी प्रवाशांना रस्ता ओलांडताना कसरत करावी लागते. बस स्टॉपचे दरवाजे उघडताना, बंद होताना उदभवणारी तांत्रिक अडचण, मार्गात खासगी वाहनांचा शिरकाव या समस्यांचा आजही सामना करावा लागत आहे. बस स्टॉपवरील अस्वच्छता हा देखील एक महत्त्वाचा मुद्दा आहे.
..
त्रुटींकडे लक्ष देण्याची मागणी
संगमवाडी-विश्रांतवाडी हा बीआरटी मार्ग आठ किमी अंतराचा आहे. या बीआरटीतून चार मार्गांवरील ५८ बस धावतात. त्यासाठी महापालिकेने ४७ सुरक्षारक्षक आणि ५६ ट्रॅफिक वॉर्डनची नेमणूक केली आहे. महापालिकेने या मार्गावरील त्रुटींकडे सातत्याने लक्ष दिल्यास प्रवाशांना कायम सुरक्षित वातावरण उपलब्ध होईल.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

माहितीपटातून उलगडणार बाबांचे जीवनकार्य

$
0
0

म. टा प्रतिनिधी, पुणे
सार्वजनिक जीवनामध्ये 'बाबा' या नावाने सुपरिचित असलेले अवलिया व्यक्तिमत्व म्हणजे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. अनिल अवचट. व्यसनमुक्तीसाठी अवघे आयुष्य समर्पित केलेल्या बाबांच्या जीवनकार्याचा पट काही तासांत उलगडणे तसे अशक्यच. पण तत्त्वज्ञानाचे प्राध्यापक असलेल्या प्रदीपकुमार माने यांनी हे शिवधनुष्य पेलले आहे. माहितीपटातून बाबांचे जीवनकार्य उलगडणार असून शुक्रवारी बाबांच्या ७२ व्या वाढदिनी या प्रकल्पाची घोषणा करण्यात आली.
आबासाहेब गरवारे महाविद्यालयात तत्त्वज्ञानाचे प्राध्यापक असलेल्या प्रदीपकुमार माने यांनी 'अनिल अवचट- एक मुक्तछंद' या माहितीपटाची निर्मिती केली आहे. प्रदीर्घ मुलाखती, त्यांचे सामाजिक कार्य, कलेसंबंधीची संवेदनशीलता असे त्यांच्या आयुष्यातील विविध पैलू माहितीपटात चित्रबद्ध करण्यात आले असून त्यातून हे अवलिया व्यक्तिमत्व उलगडले जाणार आहे. डॉ. अनिल अवचट यांच्या उपस्थितीत माने यांनी पत्रकार परिषदेत या माहितीपटाची घोषणा केली.
माने म्हणाले, 'मागील चार वर्षांपासून हा माहितीपट आम्ही बनवित आहोत. येत्या महिन्याभरात माहितीपटाचे काम पूर्ण होणार असून, राष्ट्रीय चित्रपट संग्रहालय येथे तो दाखविला जाईल. बाबांच्या ओरिगामी, काष्ठशिल्प, चित्रकला अशा विविध कलात्मक चित्रणांसह त्यांच्यातील लेखक, कार्यकर्ता आणि कलाकार या तिन्ही पैलूंचा समग्र परिचय माहितीपटात करून देण्यात आलेला आहे. बाबांच्या या तिन्ही वैशिष्ट्यांना अधोरेखित करणाऱ्या त्यांच्या संवेदनशीलतेवर प्रकाश टाकण्यात आला आहे. यामध्ये डॉ. सदानंद मोरे, उमा कुलकर्णी, मिलिंद बोकील, म. द. हातकणंगलेकर, सदाशिव अमरापूरकर, सुमित्रा भावे, सुनील सुकथनकर, विरुपाक्ष कुलकर्णी, आनंद नाडकर्णी, श्री. द. महाजन, मुक्ता पुणतांबेकर, यशोदा वाकणकर, डॉ. अभय बंग, नसिमा हुरजूक यांच्या बाबांविषयीची भावना ऐकता येईल.'

माझ्यावर माहितीपट तयार करत असलेले हे तरुण ग्रामीण भागातील आहेत. गावाकडचे तरुणच संस्कृती घडवितात, कारण त्यांच्यात रस, उत्साह असतो. या मुलांच्या तुलनेत शहरातील तरुण आयटी कंपन्याच्या मागे धावत आहेत.
- डॉ. अनिल अवचट

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘अॅवॉर्ड’ नाही, हे तर ‘रिवॉर्ड’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
पुणे महापालिकेच्यावतीने बालगंधर्व पुरस्काराने मला गौरविण्यात आले आहे. हा पुरस्कार माझ्यासाठी 'अॅवॉर्ड' नव्हे, तर 'रिवॉर्ड' आहे, अशा शब्दांत धृपदगायक सईदुद्दीन डागर यांनी भावना व्यक्त केली. १९८९ सालापासून राज्य सरकारने मंजूर केलेल्या घरासाठीची जागा अद्याप मिळाली नसल्याची खंत व्यक्त करायला ते विसरले नाहीत.
पुणे महानगरपालिकेच्यावतीने सुप्रसिद्ध धृपद गायक सईदुद्दीन डागर यांना बालगंधर्व पुरस्कार माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. ५१ हजार रुपये, सन्मानचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप होते. त्या वेळी पुरस्काराला उत्तर देताना ते बोलत होते. व्यासपीठावर महापौर प्रशांत जगताप, उल्हास पवार, उपमहापौर मुकारी अलगुडे, निवड समितीचे सदस्य व्हायोलिनवादक फय्याज हुसेन खाँ उपस्थित होते. या वेळी सांस्कृतिक क्षेत्रात कामगिरी करणाऱ्या अन्य कलाकारांचाही गौरव करण्यात आला.
'महापालिकेने बालगंधर्वांच्या नावाने हा पुरस्कार दिल्याने, हा मला सर्वोच्च पुरस्कार वाटतो. बालगंधर्वांच्या नावाने पुरस्कार मिळेल, असे स्वप्नातही वाटले नव्हते. संगीत क्षेत्रात मी पाण्याच्या छोट्याशा थेंबाएवढा आहे. गुरुकुल पद्धतीने मी शिक्षण घेत आलो. तेच शिक्षण इतरांना देत आलो', असे डागर म्हणाले. कोणत्याही कामाची सुरुवात करताना गणेशाची पूजा करावी लागते. मग तेथे मी असेल किंवा कोणी पंडित असेल, तरीही त्याला गणेशाचे नामस्मरण करावेच लागेल, असेही डागर पुढे म्हणाले. 'सरकारकडे मी कधी भीक मागितली नाही. भीक मागणार नाही; पण १९८९ साली मंजूर करण्यात आलेले घर अद्याप मिळाले नाही, हे माझे दुर्देव आहे. महाराष्ट्रात आपल्याला सन्मान मिळाला; पण स्थान अद्याप मिळाले नाही, अशी खंतही त्यांनी या वेळी व्यक्त केली.
माजी उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, 'बालगंधर्व यांचे कार्य हे दीपस्तंभासारखे आहे. स्त्रियांच्या भूमिका त्यांनी अजरामर केल्या. त्यांच्यामुळे रंगभूमीला नव्हे; तर अन्य कलाकारांनादेखील प्रेरणा मिळते. डागर हे कलेचे सच्चे उपासक आहेत.'
महापौर, उल्हास पवार, खाँ यांनी मनोगत व्यक्त केले. प्रकाश पायगुडे यांनी प्रास्ताविक केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

प्रवासीसंख्येत ३० हजारांची वाढ

$
0
0

चारही बीआरटी मार्गांना उत्स्फूर्त प्रतिसाद; उत्पन्नात दीड कोटींची वाढ

Kuldeep.Jadhav@timesgroup.com
पुणे : पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये चार मार्गांवर सुरू करण्यात आलेल्या 'रेनबो बीआरटी'च्या मासिक उत्पन्नात सरासरी एक कोटी ५७ लाख १५ हजार रुपयांची आणि प्रतिदिन प्रवासी संख्येत सरासरी २९ हजार ९५६ची वाढ नोंदविण्यात आली आहे. त्यामुळे किफायतशीर आणि चांगली सार्वजनिक वाहतूक सेवा उपलब्ध झाल्यास पुणेकर नागरिक खासगी वाहनांऐवजी सार्वजनिक वाहतुकीला प्राधान्य देतील यावर शिक्कामोर्तब झाले.
'पीएमपी'कडून दोन्ही शहरातील चार मार्गांवर बीआरटी सेवा दिली जाते. त्यामध्ये संगमवाडी-विश्रांतवाडी, सांगवी-किवळे, नाशिक फाटा-वाकड आणि येरवडा-वाघोली या मार्गांचा समावेश आहे. ३१ ऑगस्ट रोजी संगमवाडी-विश्रांतवाडी मार्गाला एक वर्ष पूर्ण होत आहे. त्यानिमित्ताने सर्वच बीआरटी मार्गांचा 'मटा'ने आढावा घेतला. त्यामध्ये बीआरटी सेवेला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळत असून, पीएमपीच्या मासिक उत्पन्नात आणि दैनंदिन प्रवासी संख्येत भरघोस वाढ झाल्याचे आढळून आले. चार मार्गांपैकी सांगवी-किवळे आणि येरवडा-वाघोली या मार्गांवरील उत्पन्न आणि प्रवासी संख्येत सर्वाधिक वाढ नोंदविण्यात आली आहे.
सांगवी-किवळे मार्गावर बीआरटी योजना राबविण्यापूर्वी दैनंदिन प्रवास करणाऱ्यांची संख्या अंदाजे ६१ हजार ६६७ होती. बीआरटी योजना राबविण्यास सुरुवात केल्यापासून आतापर्यंत दररोज सरासरी ७५,५०० प्रवासी प्रवास करीत असल्याचे आढळून आले आहे. येरवडा-वाघोली हा मार्ग सुरू करून अवघे चार महिने झाले आहेत. पहिल्या तीन महिन्यांत प्रतिदिन सरासरी ८,४८९ प्रवाशांनी बीआरटी प्रवासाचा उपभोग घेतला. या मार्गावर बीआरटीपूर्वी दैनंदिन प्रवास करणाऱ्यांची संख्या ८५,२८३ होती. तर, बीआरटी सुरू झाल्यापासून ९३, ७७२ प्रवासी दररोज प्रवास करीत असल्याचे आढळून आले आहे.
---------
'पीएमपी'च्या मासिक उत्पन्नाची आकडेवारी (रुपयांत)
मार्ग बीआरटीपूर्वीचे उत्पन्न बीआरटीनंतरचे उत्पन्न उत्पन्नातील वाढ
संगमवाडी-विश्रांतवाडी९८,४४,५२३ १,१२, ०४,७१९ (११ महिन्यांतील) १३,६०, १९६
सांगवी-किवळे २,६१, ९३, ७८७ ३, २९, ४२, ५१८ (११ महिन्यांतील)६७,४८,७३१
नाशिकफाटा-वाकड ३१,९३, ०९१ ५४, ८९, ९८७ (८ महिन्यांतील) २२,९६,८९६
येरवडा-वाघोली ३,५८,१८,९४९ ४, ११, २९, ०४० (तीन महिन्यांतील)५३, १०, ०९१
-----------
'पीएमपी'च्या प्रवासीसंख्येत प्रतिदिन झालेली वाढ
मार्ग बीआरटीपूर्वीचे बीआरटीनंतरचे (सरासरी) वाढ
संगमवाडी-विश्रांतवाडी२३,१८० २६,००० २,८२०
सांगवी-किवळे ६१,६७६ ७५,५०० १३,८२४
नाशिकफाटा-वाकड १०,५६६ १५,३८९ ४,८२३
येरवडा-नगर ८५,२८३ ९३,७७२ ८,४८९

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


निगडी-दापोडी सेवा डिसेंबरपासून कार्यरत

$
0
0

Sunil.Landge@timesgroup.com

पिंपरी : पिंपरी-चिंचवडमध्ये 'रेनबो बीआरटीएस' सेवेची ५० टक्के अंमलबजावणी होत असून, निगडी ते दापोडी मार्गावरील प्रलंबित सेवा डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात सुरू करण्याचे प्रशासकीय नियोजन आहे. प्रशस्त रस्त्यांच्या बाबतीत अग्रेसर असलेल्या शहरात सार्वजनिक वाहतूक जलद आणि सुलभ व्हावी, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.
केंद्र सरकारच्या सहकार्याने विशेष विकास योजनेअंतर्गत शहरात 'बीआरटीएस' सेवेचे नियोजन करण्यात आले. त्याअंतर्गत पहिल्या टप्प्यात चार मार्गांची निवड करण्यात आली. यामध्ये दापोडी ते निगडी, सांगवी ते किवळे, नाशिकफाटा ते वाकड आणि काळेवाडी ते देहू-आळंदी यांचा समावेश आहे. जनतेला बस जलद वाहतूक प्रणाली व्यवस्था जलद आणि आरामदायक पद्धतीने उपलब्ध व्हावी, असा त्यामागील उद्देश होता. यापैकी सांगवी-किवळे आणि नाशिकफाटा-वाकड मार्गांवर ही सेवा सध्या उपलब्ध आहे. त्यासाठी 'पीएमपीएमएल'ने प्रतिकिलोमीटर भाडेतत्त्वावर ६६० बस 'एसीजीएल-गोवा' यांच्याकडून भाडेतत्त्वावर घेतल्या आहेत. त्यातील काही बसेस मार्गांवर धावत आहेत.
निगडी ते दापोडी रस्त्यावरील 'बीआरटीएस' सेवा नोव्हेंबरच्या अखेरच्या किंवा डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात प्रारंभ होईल, असा दावा करण्यात येत आहे. काळेवाडी ते देहू-आळंदी रस्त्यावरील सेवा पुढील वर्षी सुरू होईल, असे नियोजन आहे. या शिवाय बोपखेल फाटा ते आळंदी (८.२५ किलोमीटर) आणि भक्ती-शक्ती चौक निगडी ते मुकाई चौक, किवळे (५.२० किलोमीटर) या मार्गांवर ही सेवा सुरू करण्याचे प्रस्तावित आहे. त्या अनुषंगाने विकासकामे हाती घेण्यात आल्याचे पालिका प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले. या सर्व मार्गांवर सेवा चालू झाल्यास शहरात बीआरटीएसचे सुमारे ६० किलोमीटरचे जाळे निर्माण होईल. त्या माध्यमातून सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम होण्यास मदत होईल, असा दावा करण्यात येत आहे.
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या स्थापत्य विभागाचे उपअभियंता आणि बीआरटीएसचे प्रवक्ते विजय भोजने म्हणाले, की 'पिंपरी-चिंचवडमध्ये रेनबो बीआरटीएस सेवेला येत्या पाच सप्टेंबरला वर्ष पूर्ण होत आहे. या कालावधीत प्रवाशांचा मिळालेला प्रतिसाद पाहता समाधान व्यक्त करावे लागेल. सांगवी ते किवळे मार्गावरील प्रवासी संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. पुण्याच्या तुलनेत या शहरातील मार्गांबाबत प्रवासी अतिशय चांगल्या प्रतिक्रिया व्यक्त करीत आहेत. पुण्याहून पिंपरी-चिंचवडकडे येताना सुलभ वाहतुकीतील बदल सुलभ आणि आरामदायी वाटतो, अशी निरीक्षणे नोंदविण्यात आली आहेत. भोसरी-हिंजवडी मार्गावर सुरवातीला २० ते २५ मिनिटाला एक बसफेरी आणि प्रवासी संख्या प्रतिदिन तीन ते चार हजार होती. परंतु, वाढता प्रतिसाद पाहून या मार्गावर पाच ते दहा मिनिटाला एक बसफेरी आणि प्रवासी संख्या प्रतिदिन १० ते १२ हजार झाली आहे. त्यामुळे या दोन्ही मार्गांवरील प्रतिसाद उल्लेखनीय म्हणता येईल.'
....
बीआरटीएस मार्गांची माहिती
मार्गाचे नाव किलोमीटर बसची संख्या दैनंदिन प्रवासी संख्या
सांगवी ते किवळे १४.५० ११० ८० ते ८५ हजार
नाशिकफाटा ते वाकड ८.०० १८ १० ते १२ हजार
(निगडी ते दापोडी हा १२.५० किलोमीटरचा आणि काळेवाडी ते देहू-आळंदी हा १०.०० किलोमीटरचा मार्ग प्रस्तावित आहे.)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नियमन नसल्यानेच ‘अभिमत’ मोकाट

$
0
0

अभिमत विद्यापीठांना शुल्क नियमन समितीत आणा; पालकांची मागणी

म. टा. प्रतिनिधी, पुणे

राज्यातील काही खासगी मेडिकल कॉलेजांना यंदा शिक्षण शुल्क समितीने शुल्ककपातीचा दणका दिला आहे. मात्र, अभिमत मेडिकल विद्यापीठांचे काम या समितीच्या चौकटीत येत नसल्याने अशा कॉलेजांमध्ये अव्वाच्या सव्वा फी वाढ झाल्याचे स्पष्ट होत आहे. त्यामुळे अभिमत मेडिकल कॉलेजांची फी नियंत्रित करण्यासाठीही या समितीला अधिकार देण्याची किंवा स्वतंत्र यंत्रणा निर्माण करण्याची मागणी पालकांकडून होत आहे.

मेडिकल प्रवेशांसाठी यंदा अभिमत आणि खासगी कॉलेजांमधून अनियंत्रित पद्धतीने फी आकारली जात असल्याची ओरड पालकांकडून करण्यात येत आहे. या विषयी पालकांनी मुख्यमंत्र्‍यांना पत्र लिहून अशा कॉलेजांची फी सर्वसामान्यांच्या आवाक्यामध्ये आणण्याची मागणी केली आहे. पालकांची ही भूमिका 'मटा'च्या व्यासपीठावरून समाजासमोर आल्यानंतर वैद्यकीय शिक्षणाच्या धंद्याविषयी खुल्या चर्चा सुरू झाल्या आहेत. याच चर्चांमधून राज्यातील काही खासगी मेडिकल कॉलेजांना यंदा शिक्षण शुल्क समितीने फी कपातीचा दणका दिल्याची माहिती रविवारी समोर आली. पुण्यातील एका बड्या संस्थेला तर यंदा फी वाढ करण्याची परवानगीही नाकारण्यात आल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे या पुढील काळात अभिमत कॉलेजांवरही अशाच पद्धतीने सरकारी नियंत्रण आणण्याची मागणी पालकांनी केली आहे.

'खासगी कॉलेजांची फी निश्चितीची प्रक्रिया ही समितीच्या मान्यतेशिवाय पूर्ण होऊ शकत नाही. अभिमत विद्यापीठे मात्र थेट मनुष्यबळ विकास मंत्रालयाच्या अखत्यारित येतात. त्यामुळे राज्य सरकारने स्थापन केलेल्या या समितीच्या कोणत्याही पूर्वपरवानगीशिवाय अभिमत मेडिकल कॉलेज आपली फीवाढीची प्रक्रिया पूर्ण करतात. मनुष्यबळविकास मंत्रालयाने या कॉलेजांवर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे. त्यासाठी गरज पडल्यास, राज्य सरकारने स्थापन केलेल्या शिक्षण शुल्क समितीचीही मदत घेणे शक्य आहे,' असे मत पालकांनी मांडले.

मटा भूमिका

'अभिमतच्या शुल्कावरही नियंत्रण हवे'

खासगी व्यावसायिक कॉलेजांच्या शुल्कांच्या नियमनासाठी असलेल्या समितीची कक्षा वाढवून अभिमत विद्यापीठांचाही त्यात समावेश करण्याची गरज आहे. अभिमत विद्यापीठे केंद्राच्या अखत्यारित येत असल्याने समितीची कक्षा वाढविण्यात अडचणी असल्यास केंद्राने स्वतंत्र नियमन समिती स्थापन करावी; परंतु कोणत्याही परिस्थितीत अभिमत विद्यापीठांना शिक्षणाचा बाजार मांडण्याची संधी दिली जाऊ नये.

अभिमत विद्यापीठांच्या शुल्कावर नियंत्रण ठेवण्यासाठी विद्यापीठ अनुदान आयोगाने (यूजीसी) शिक्षण शुल्क समितीसारखी एखादी कायदेशीर यंत्रणा निर्माण करणे गरजेचे आहे. या यंत्रणेच्या माध्यमातून अभिमत विद्यापीठांचे शुल्क निश्चितीची प्रक्रिया व्हायला हवी. या समितीमध्ये विद्यार्थी आणि पालकांचे प्रतिनिधी असावेत.

डॉ. संजय दाभाडे, दलित आदिवासी अधिकार आंदोलन

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पर्यावरण संवर्धनासाठी ७० किमीची पायपीट

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

पर्यावरण संवर्धनाचे महत्त्व नागरिकांना समजावे आणि प्रदूषणाविरोधात पुणेकरांनी चळवळ उभी करावी, या हेतूने 'मिट्टी के रंग' संस्थेतर्फे आयोजित उपक्रमात नेहा येवले यांनी तब्बल ७० किमीचा रस्ता चालत जनजागृतीचा एक अनोखा उपक्रम साध्य केला. पुणे शहराला गवसणी घालत येवले यांनी पर्यावरण आणि प्रदूषणासाठी एकत्र या, अशी साद त्यांना नागरिकांना घातली. 'महाराष्ट्र टाइम्स' मीडिया पार्टनर असलेल्या या उपक्रमाला पुणेकरांनी भरभरून प्रतिसाद दिला.

'मिट्टी के रंग' संस्थेच्या युवकांच्या गटाने रविवारी या उपक्रमाचे आयोजन केले होते. नेहा येवले यांनी तब्बल ११.३० तास चालत संपूर्ण शहराला फेरी मारली. श्रीमंत दगडूशेठ हलवाई मंदिरापासून सुरू झालेला हा प्रवास ११ तासांनंतर थेट पुणे विद्यापीठापाशी थांबला. या प्रवासात येवले यांना अनेक सामाजिक संस्थांनी साथ दिली. त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी शेकडो तरूण त्यांच्याबरोबर थोडे थोडे अंतर कापत होते. येवले यांना बघून रस्त्यावरचे नागरिकही काही ठिकाणी या उपक्रमात सहभागी झाले. अनेक दिवसांच्या सरावानंतर येवले यांनी चालण्याचे ठरवले. दररोज चालण्याचा त्या सराव करीत होत्या. पर्यावरण संवर्धनाचा संदेश घेऊन काहीतरी वेगळा उपक्रम करावा, या उद्देशाने येवले यांनी ७० किमीचे अंतर यशस्वीरीत्या पूर्ण केले. त्यांच्याबरोबर विविध संस्थांचे ६०० हून अधिक स्वयंसेवक सहभागी झाले होते.

नेहा येवले या व्यवसायाने समुपदेशन मानसशास्त्रज्ञ आहेत. या आधी जानेवारी २०१६ मध्ये त्यांनी एका संस्थेसाठी यशस्वीरीत्या ५० किमी चालण्याचा उपक्रम केला होता. पुणेकरांना पर्यावरणाचे महत्त्व कळाले पाहिजे, अशा प्रकारच्या उपक्रमांमुळे नागरिक पर्यावरण संवर्धनाच्या कार्यात सहभागी होतील, असा विश्वास वाटत होता. याहीपुढे अशा प्रकारचे उपक्रम करत राहणार असल्याचे येवले यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बीआरटी विस्तारणार १४५ किमीवर

$
0
0

आशियातील सर्वांत मोठे जाळे निर्माण करण्याचे उद्दिष्ट; मार्च २०१७ पर्यंत होणार 'कनेक्ट'

Suneet.Bhave@timesgroup.com

पुणे : आगामी तीन वर्षांत जलद बस वाहतूक व्यवस्थेचा (बीआरटी) पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये मोठ्या प्रमाणात विस्तार केला जाणार असून, आशियातील सर्वाधिक म्हणजेच १४५ किलामीटर अंतराचे बीआरटीचे जाळे निर्माण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. त्याची सुरुवात पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिकांमधील बीआरटी मार्ग जोडून केली जाणार असून, येत्या वर्षभरात त्याची सुरुवात होणार आहे.

पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील नागरिकांना सक्षम सार्वजनिक वाहतूक देण्यासाठी बीआरटीचे जाळे विस्तारण्याचा कालबद्ध कार्यक्रम निश्चित करण्यात आल्याची माहिती पुणे महानगर परिवहन महामंडळाचे (पीएमपी) प्रभारी अध्यक्ष आणि महापालिका आयुक्त कुणाल कुमार यांनी 'मटा'ला दिली. बीआरटी मार्गांवरील सध्या भेडसावणाऱ्या त्रुटी दूर करण्याचा प्रयत्नही करण्यात येणार असून, बस प्रवास अधिक सुलभ होण्यासाठी प्रवाशांकरिता 'इंटिग्रेटेड कार्ड'ची सुविधा दिली जाणार असल्याचे कुमार यांनी सांगितले.

पिंपरी-चिंचवडमधील बीआरटी मार्ग पुणे शहराला जोडण्यासाठीचा सविस्तर आराखडा (डीपीआर) येत्या १५ दिवसांत तयार होणार असून, त्यानंतर टेंडर प्रक्रिया आणि इतर कामांना सुरुवात केली जाईल. मार्चअखेरपर्यंत पुणे शहरातील १५ किमी, तर पिंपरी-चिंचवडमधील २२ किमीचे बीआरटी मार्ग पूर्ण करण्यासाठी प्रयत्न केला जाणार आहे, असे संकेत त्यांनी दिले. बीआरटीच्या बसथांब्यांवरील स्वयंचलित दरवाजे वीज खंडित झाल्यास बंद पडत असल्याने बीआरटीच्या सर्व बस थांब्यांवर 'यूपीएस' यंत्रणा बसविण्यात येणार आहे. येत्या काही दिवसांत त्याचे कामही सुरू करण्यात येईल, असेही ते म्हणाले. कात्रज ते हडपसर या पथदर्शी बीआरटी मार्गाची पुनर्रचना केली जाणार असून, येत्या वर्षभरात 'रेनबो बीआरटी' प्रमाणेच त्याला आकार देण्यात येईल. खासगी वाहनांचा वापर करणाऱ्या प्रवाशांना बीआरटीकडे आकर्षित करण्यासाठी एसी बसही सेवेत आणण्यात येतील. त्यासाठी, साडेपाचशे एसी बस खरेदी करण्याचा निर्णय घेण्यात आला असून, त्याची अंमलबजावणी लवकरच करण्याचा प्रयत्न असेल अशी ग्वाही आयुक्तंनी दिली.

हॅरिस ब्रिज ते महापालिका, राजीव गांधी पूल ते महापालिका आणि संगमवाडी ते महापालिका अशा तीन महत्त्वाच्या मार्गांवरील बीआरटी सेवा आगामी काळात पूर्ण करण्याचे नियोजन आहे. बीआरटीला पुणे आणि पिंपरी-चिंचवडकरांकडून मिळणारा वाढता प्रतिसाद पाहून सक्षम सार्वजनिक वाहतुकीसाठी बीआरटीचे जाळे आणखी विस्तारले जाणार आहे.

- प्रशांत जगताप, महापौर

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कॅशलेस विमा असूनही हॉस्पिटलची बिलवसुली

$
0
0

'केईएम'मधील प्रकार; विमा कंपनीकडे बोट

म. टा. प्रतिनिधी, पुणे

कॅशेलस' मेडिक्लेम असूनही केईएम हॉस्पिटलने पेशंटकडे उर्वरित रक्कम भरण्याचा तगादा लावला. अखेर कंपन्यांनी पूर्ण देयक दिले नसल्याचे कारण देऊन हॉस्पिटलने आपले हात वर केले. विमा कंपन्या आणि हॉस्पिटलच्या संगनमतामुळे लूट होत असल्याचा आरोप पेशंटच्या नातेवाइकांनी केला आहे.

प्रकृती अस्वस्थ्यामुळे शोभा जाधव यांना १५ ऑगस्ट रोजी केईएम हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. जाधव यांनी वैद्यकीय विमा उतरवला होता. विमा असूनही 'केईएम'ने जाधव यांना 'डिपॉझिट' भऱण्यास सांगितले. त्यानुसार त्यांनी पाच हजार रुपये भरले. उपचाराअंती पेशंटला डिस्चार्ज देताना ३१ हजार रुपयांचे देयक हाती सोपविण्यात आले. पैकी २६ हजारांचे बिल विमा कंपनीतर्फे हॉस्पिटलला देण्यात आले. या शिवाय डिपॉझिटच्या माध्यमातून मिळालेले पाच हजार रुपये असे एकूण ३१ हजार रुपये हॉस्पिटलला मिळाले. तरीही हॉस्पिटलने जाधव यांच्या हातात आणखी १० हजार ७७८ रुपयांचे देयक दिले.

बिलाची रक्कम भरूनही नव्याने हाती बिल आल्यानंतर श्रीमती जाधव यांना धक्काच बसला. त्याविषयी विचारणा केली असता हॉस्पिटल प्रशासनाकडून समाधानकारक उत्तर मिळाले नाही. त्यानंतर दहा हजार नाही तर, आणखी पाच हजार रुपये भरा असे सांगण्यात आले. असाच प्रकार पी. ए. जोसेफ या ८० वर्षाच्या व्यक्तिबाबत 'केईएम'मध्येच घडला. त्यांना उपचारासाठी ११ ऑगस्टला दाखल करण्यात आले. त्यांच्याकडूनही पाच हजार रुपये डिपॉझिट घेण्यात आले. विविध तपासण्यांचे वेगळे पैसे आकारण्यात आले. तसेच, त्यांना ३० ते ३५ हजार रुपयांची औषधे स्वतंत्रपणे आणायला लावली.

उपचारानंतर प्रकृती सुधारत नसल्याने त्यांना रुबी हॉस्पिटलला हलविण्यात आले. दरम्यान, १ लाख ४ हजार ५५४ रुपयांचे बिल त्यांना देण्यात आले. त्यातील ५० हजार रुपयांचे बिल विमा कंपनीने भरण्याची तयारी दर्शवली. 'मेडिक्लेम' असूनही उपचाराची पूर्ण रक्कम मिळत नसल्याने विमा कंपन्या आणि हॉस्पिटल यांचे साटेलोटे असल्याचा आरोप जोसेफ यांच्या नातेवाइकांनी केला.

कोणत्याही विमा कंपनीचा विमा काढताना त्यावेळी झालेल्या करारानुसार पेशंटकडून डिपॉझिट घेण्याची जबाबदारी हॉस्पिटलची आहे, असे म्हटलेले असते. त्यानुसार आम्ही कॅशलेस विमा असूनही पेशंटकडून घेतो. उपचारात वापरल्या जाणाऱ्या काही वस्तू या विम्यात मंजूर होत नाहीत. त्याचे पैसे कंपनीऐवजी पेशंटकडून घेण्यात यावेत, असे कंपनीचे म्हणणे आहे. त्यानुसार आम्ही दोन्ही पेशंटकडून उर्वरित पैसे घेतले. त्यात आमची चूक नाही.

डॉ. विश्वनाथ येमूल, वैद्यकीय अधीक्षक, केईएम हॉस्पिटल

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images