Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

पुण्याचा पाणीपुरवठा येत्या गुरुवारी बंद

0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

शहरातील विविध पंपिंग स्टेशनमध्ये विद्युत आणि स्थापत्यविषयक कामे हाती घेण्यात येणार असल्याने येत्या गुरुवारी (१ सप्टेंबरला) संपूर्ण शहराचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे. या कामामुळे शुक्रवारी (२ सप्टेंबर) शहरातील विविध भागात उशिरा आणि कमी दाबाने पाणीपुरवठा होणार असल्याचे पाणीपुरवठा विभागाने कळविले आहे. गुरुवारी पाणीपुरवठा बंद असल्याने नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने केले आहे.

पाणीपुरवठा बंद राहणारा भाग पुढीलप्रमाणे :
पर्वती जलशुद्धीकरण केंद्र : राजेंद्रनगर, लोकमान्यनगर, डेक्कन, शिवाजीनगर, धनकवडी, कर्वे रोड, एसएनडीटी, एरंडवणे, कोथरूड, डहाणूकर कॉलनी, कर्वेनगर, लॉ कॉलेज रोड, पर्वती, सहकारनगर, सातारा रोड.
..
एसएनडीटी, वारजे जलशुद्धीकरण केंद्र : गोखलेनगर, पाषाण, औंध, बोपोडी, खडकी, चतु:शृंगी, जनवाडी, रेंजहिल्स, बावधन, बाणेर, चांदणी चौक, किष्किंधानगर, रामबाग कॉलनी, डावी-उजवी भुसारी कॉलनी, गणंजय सोसायटी, एकलव्य महाविद्यालय भाग, महात्मा सोसायटी, गुरू गणेशनगर, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ परिसर, वारजे महामार्ग परिसर, वारजे, माळवाडी, रामनगर, अहिरेगाव, पॉप्युलरनगर, अतुलनगर, शाहू कॉलनी, बावधन, सूस, सुतारवाडी, भूगाव रस्ता परिसर.
..
नवीन होळकर पंपिंग भाग : विद्यानगर, टिंगरेनगर, कळस, धानोरी, लोहगाव, विश्रांतवाडी, विमाननगर, नगर रस्ता.
..
वडगाव जलकेंद्र परिसर : हिंगणे, आनंदनगर, वडगाव, धायरी, आंबेगावपठार, दत्तनगर, धनकवडी, कात्रज, भारती विद्यापीठ, कोंढवा बुद्रुक.
..
लष्कर जलकेंद्र : पुणे स्टेशन, मुळा रस्ता, कोरेगाव पार्क, वानवडी, कोंढवा, रेसकोर्स, विश्रांतवाडी, नगररस्ता, कल्याणीनगर, काळेपडळ, महमंदवाडी, चंदननगर, खराडी, सोलापूर रस्ता, चंदननगर, वडगावशेरी, सोलापूररस्ता, सातववाडी.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


श्वानांना सुसज्ज प्रशिक्षण मिळणार

0
0

पुणे : स्फोटके, अमली पदार्थ आणि गुन्हेगारांचा शोध घेण्यासाठी पोलिसांना नेहमीच श्वानांची (डॉग) मदत होते. राज्यातील श्वानांच्या प्रशिक्षणासाठी असलेले सध्याचे केंद्र आणि त्या ठिकाणच्या सोयीसुविधा कमी पडत आहेत. त्यामुळे राज्यातील पोलिस दलाकडे असलेल्या श्वानांना प्रशिक्षण देण्यासाठी दौंडजवळ ७२ एकर जागेत सुसज्ज असे 'श्वान प्रशिक्षण केंद्र' (डॉग स्कॉड ट्रेनिंग सेंटर) उभारण्यात येत आहे. त्यामुळे पोलिसांना आता श्वानांकडून चांगली मदत होऊन अनेक गुन्हे उघडकीस येण्यास मदत होणार आहे.

राज्यात प्रत्येक पोलिस अधीक्षक कार्यालय आणि पोलिस आयुक्तालयाकडे श्वान पथक असते. पोलिसांना स्फोटके शोधून देणे, अमली पदार्थांचा शोध आणि गुन्हेगारांचा माग काढण्यास हे श्वान मदत करतात. या श्वानांना लहानपणापासूनच प्रशिक्षण दिले जाते. राज्याचे श्वान प्रशिक्षण केंद्र सध्या पुण्यातील शिवाजीनगर पोलिस मुख्यालयात आहे. या श्वान प्रशिक्षण केंद्राची स्थापना १९६५ साली करण्यात आली. राज्य गुन्हे अन्वेषण विभागाच्या (सीआयडी) अधिपत्याखाली या ठिकाणी राज्यातील ९२ श्वानांना प्रशिक्षण देण्याची सोय आहे. सीआयडीकडून श्वानांना सतत वेगवगेळे श्वान प्रशिक्षण कोर्स आयोजित केले जातात. या ठिकाणी पोलिस उपअधीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हवालदार दर्जाचे चार कर्मचारी येथे येणाऱ्या श्वानांना प्रशिक्षण देतात. तसेच, त्या त्या पोलिस घटकाचा श्वान प्रशिक्षक असलेला पोलिसदेखील या ठिकाणी येऊन माहिती घेतो. प्रत्येक अधीक्षक कार्यालय व आयुक्तालयात असलेल्या श्वान पथकाचा प्रमुख हा पोलिस उपनिरीक्षक दर्जाचा अधिकारी असतो. गरजेनुसार तो श्वानाला घटनास्थळी पाठवितो.

शिवाजीनगर पोलिस मुख्यालयात असलेले श्वान प्रशिक्षण केंद्र हे पत्र्याच्या शेडमध्ये चालत आहे. त्याची अवस्था खूपच दयनीय आहे. त्या ठिकाणी श्वानांना प्रशिक्षण देण्यासाठी सोयीसुविधा अपुऱ्या आहेत. त्यामुळे सीआयडीकडून नव्या सुसज्ज अशा श्वान प्रशिक्षण केंद्राचा प्रस्ताव राज्य शासनाकडे पाठविण्यात आला होता. या प्रशिक्षण केंद्रासाठी एक कोटी २९ लाख रुपयांची मागणी सीआयडीने केली होती. त्यानुसार शासनाने सीआयडीला सुसज्ज असे श्वान प्रशिक्षण केंद्र उभारण्यास मान्यता दिली आहे. त्यासाठी दौंड येथे ७२ एकर जमीन उपलब्ध करून देण्यात आली आहे. तसेच, केंद्र उभारण्यासाठी ९६ लाखांचा निधी देण्यात आला आहे. त्यानुसार जागेची पाहणी करून श्वान प्रशिक्षण केंद्राच्या कामाला सुरूवात होणार आहे.
---
श्वान प्रशिक्षण केंद्रासाठी साआयडीकडून एक कोटी २९ लाख रुपयांची मागणी करण्यात आली होती. त्यानुसार सरकारने ९६ लाख रुपये मंजूर केले आहेत. तसेच, ७२ एकर जागा दिली आहे. या जागेची पाहणी सीआयडीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी केली आहे. या ठिकाणी सुसज्ज असे श्वान प्रशिक्षण बांधण्याच्या कामाला सुरुवात केली जाणार आहे.
- संजय कुमार, सीआयडी प्रमुख व अतिरिक्त पोलिस महासंचालक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पासपोर्ट प्रक्रियेत बदल करणार : ज्ञानेश्वर मुळे

0
0



म. टा. प्रतिनिधी, पुणे
'देशात सुमारे १०० पासपोर्टची कार्यालये आहेत. गेल्या वर्षी पासपोर्टसाठी सुमारे दोन कोटी अर्ज आले. देशाची लोकसंख्या पाहता एवढ्या मोठ्या प्रमाणात नागरिकांना पासपोर्ट उपलब्ध करून देण्याची क्षमता कार्यालयांकडे नाही. त्यातच देशात फक्त १० टक्के नागरिकांकडे पासपोर्ट आहे. त्यामुळे यापुढे नागरिकांना स्थानिक पातळीवर जलगतीने पासपोर्ट मिळावा यासाठी पासपोर्ट मिळण्याच्या प्रक्रियेत अमुलाग्र बदल करण्यात येईल,' असे परराष्ट्र मंत्रालयाचे सचिव (नागरी सेवा) ज्ञानेश्वर मुळे यांनी शनिवारी सांगितले.
पुणे श्रमिक पत्रकार संघातर्फे आयोजित वार्तालापात मुळे बोलत होते. पासपोर्ट अधिकारी अतुल गोतसुर्वे, पत्रकार संघाचे अध्यक्ष गजेंद्र बडे, सरचिटणीस अजय कांबळे आदी या वेळी उपस्थित होते. मुळे म्हणाले, 'गेल्या पाच वर्षांत पासपोर्ट आणि व्हिसा धोरणात मोठा बदल झाला आहे. जागेवर पासपोर्ट सेवा उपलब्ध करून देण्याचा सरकारचा उद्देश आहे. जागतिक मंदीमुळे परदेशातील हिंदुस्थानी नागरिकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत, अशांना परत आणण्याचा आमचा प्रयत्न सुरू आहे. दरम्यान, सोलापूर पासपोर्ट कार्यालाचे काम जलदगतीने सुरू असून पुढील काही महिन्यांतच त्याचे उद्घाटन होईल. त्याचा फायदा पुणे विभागातील नागरिकांना होईल. मात्र, नेमका याला किती कालावधी लागेल हे आताच सांगता येणार नसल्याचे मुळे यांनी सांगितले.

'रूरल टुरिझम' वाढवणार
भारतातून दर वर्षी दीड कोटी पर्यटक परदेशात जातात. मात्र, त्या तुनलेत परदेशातून भारतात फक्त ७० ते ८० लाखांपर्यंत पर्यटक येतात. मालदीवमध्ये साडेतीन लाख लोकसंख्या असूनदेखील तेथे वर्षाला ८ ते ९ लाख पर्यटक भेट देतात. त्यामुळे प्रत्येक पर्यटक हा ग्राहक असतो, त्यामुळे त्याच्या सुरक्षेवर लक्ष दिले पाहिजे. जगभरातील पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी आपण 'रूरल टुरीझम'सोबतच आपली संस्कृती लोकांपुढे आणली पाहिजे. यापुढे आयटीपेक्षा जास्त रोजगार निर्मिती करणारे क्षेत्र हे पर्यटनाचे ठरणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अभिजात मराठीसाठी पंतप्रधानांना साकडे

0
0


म. टा. प्रतिनिधी, पुणे
'मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा, या मागणीसाठी महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या माध्यमातून लेखकांनी प्रथमच आग्रही 'भूमिका' घेण्यास सुरुवात केली आहे. या चळवळीचा भाग म्हणून चार वर्षांपासून भिजत घोंगडे असलेले हे प्रकरण निकाली काढावे व मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्यात यावा,' अशा मागणीचे निवेदन आता थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठविण्यात येणार आहे.
मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी केंद्र सरकारने तत्काळ पावले उचलावीत, या आग्रही मागणीसाठी साहित्य परिषदेच्या पुढाकाराने परिषदेत लेखकांची बैठक झाली. या बैठकीला सुमारे चाळीस लेखकांनी हजेरी लावत 'ठोस भूमिका' घेतली. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी महाराष्ट्र सरकारने पठारे समितीच्या आधारे तीन वर्षांपूर्वीच केंद्र सरकारला अहवाल पाठवलेला आहे. तसेच, ज्या चार निकषांच्या आधारे भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिला जातो त्याचे सबळ पुरावे दिलेले आहेत. केंद्र सरकारने साहित्य अकादमीकडे हा अहवाल तपासणीसाठी पाठवलेला होता. ५ फेब्रुवारी २०१५ रोजी साहित्य अकादमीच्या भाषा समितीने सर्वानुमते मराठीला अभिजात भाषेचा दर्जा द्यावा, अशी लेखी शिफारस केलेली आहे. केंद्र सरकारच्या विविध विभागांनी या अहवालाची छाननी करून अनुकुल अभिप्राय दिलेला आहे.
'केंद्र सरकारने तत्काळ मान्यता देऊन मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देत असल्याची घोषणा करावी,' अशी आग्रही मागणी या बैठकीत करण्यात आली. तसेच, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना साहित्यिकांच्या स्वाक्षरीचे निवेदन पाठविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे,' अशी माहिती परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांनी दिली. 'या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना यापूर्वीच पत्र देण्यात आलेले आहे,' याकडे त्यांनी लक्ष वेधले.
या बैठकीत तातडीच्या आणि दीर्घकालीन कृतिआराखड्याची चर्चा करण्यात आली. शाळा, महाविद्यालय, ग्रंथालय, पुस्तकांचे दालन अशा ठिकाणी स्वाक्षरी मोहीम राबविण्यात येणार असून बृहन्महाराष्ट्रासह इतर साहित्य संस्थांनाही आवाहन करण्यात येणार आहे. भाषा आणि संशोधनविषयक काम करणाऱ्या संस्थांनाही या अभियानात सहभागी करून घेण्यात येईल. मराठी आमदार, खासदार आणि केंद्रीय मंत्री यांना निवेदने देऊन पाठपुराव्याचा आग्रह करण्यात येईल. या प्रश्नी केंद्र सरकारवर सामाजिक दबाव वाढावा, यासाठी सामान्य लोकांचा तसेच समाजातील जाणत्या मंडळींचा या अभियानातला सहभाग वाढवित 'जागर अभिजात मराठीचा' ही चळवळ राबविण्यात येणार आहे.



मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा, यासाठी सर्व घटकांनी दबावगट निर्माण करण्याची गरज आहे. मराठीच्या आग्रहासाठी एल्गार पुकारण्यास सुरुवात झाली असून, हा विषय आता लोकांच्या न्यायालयात गेला आहे.
- प्रा. हरी नरके, पठारे समिती सदस्य

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

फसवून सोन्याची नाणी लंपास करणारा अटकेत

0
0


म. टा. प्रतिनिधी, पुणे
कंपनीतील कामगारांना बोनस म्हणून सोन्याची नाणी द्यायची असल्याचे सांगत चंदूकाका ज्वेलर्स यांच्याकडील ३२ लाखांची १२० नाणी घेऊन पसार झालेल्यास चंदननगर पोलिसांनी विशाखापट्टणम येथून अटक केली आहे. त्याच्याकडून २७ लाख २० हजार रुपये किमतीची ९३ नाणी जप्त करण्यात आली आहेत.
साबारी अरुमूगम गणेशन (वय ४०, रा. कोचीन, केरळ) असे अटक केलेल्याचे नाव आहे. गणेशन याच्यावर आंध्र, केरळ या ठिकाणी अशाच स्वरूपाचे गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिस उपायुक्त कल्पना बारवकर व पोलिस निरीक्षक अनिल पात्रुडकर यांनी दिली. चंदननगर परिसरात २६ नोव्हेंबर रोजी खराडी येथील वर्ल्ड ट्रेड सेंटर येथे त्याने एका कारचालकास कामागारांना सोन्याची नाणी बोनस द्यायचे असल्याचे सांगितले. त्या वेळी त्या चालकाने चंदूकाका ज्वेलर्स येथे काम करत असलेल्या मामा आंबादास फुंदे यांना ही माहिती दिली. आरोपीने त्या वेळी त्याचे नाव स्टीव्ह असे सांगितले होते. आरोपीने फुंदे यांच्याशी संपर्क साधून आठ ग्रॅम वजनाचे ५० व १० ग्रॅम वजनाची ७० अशी एकूण १२० सोन्याची नाणी देण्याबाबतचा व्यवहार ठरवला होता. नाणी घेऊन त्याचे बील आरटीजीएएसद्वारे देतो, असे सांगून तो पसार झाला होता.
गणेशन याला केरळ पोलिसांनी एका गुन्ह्यात पकडले होते. त्याची माहिती मिळाल्यानंतर चंदनगर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक अनिल पात्रुडकर, उपनिरीक्षक एस. एल. साळुंखे यांच्या पथकाने त्याला ताब्यात घेऊन तपास केला. त्याच्याकडे सोन्याच्या नाण्यांबाबत चौकशी केली असता ती नाणी त्याचे त्याचे चुलते सुकुमारन आयास्वामी पिल्ले यांच्याकडे दिल्याचे सांगितले. त्यानुसार ती नाणी जप्त करण्यात आली आहेत.

गुन्हा करून विमानाने पळाला
सोन्याची नाणी दाखवून आणतो म्हणून पाठीमागील दरवाजाने गणेशन पसार झाला. मागील दरवाजाजवळ त्याने अगोदरच एक कार उभी ठेवली होती. त्या कारने तो मुंबईला गेला. त्या ठिकाणाहून विमानाने केरळला गेला. या नाण्यातील काही नाणी त्याने एका व्यक्तीला विकली असून त्याचा तपास सुरू आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘विदेशनीती’ चे ज्ञान बंधनकारक हवे : ज्ञानेश्वर मुळे

0
0



म. टा. प्रतिनिधी, पुणे
'स्थानिक नेत्यांबरोबरच महापौर, आमदार, मंत्री अशा राजकारण्यांना देशाबाबतच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या व्यवहारांची माहिती म्हणजेच 'विदेशनीती'चे ज्ञान फारच कमी आहे. त्यामुळे अशा सर्वाना 'विदेशनीती'बाबतचे ज्ञान बंधनकारकरित्या देण्याची आवश्यकता आहे,' असा सल्ला विदेश मंत्रालयाचे नवनियुक्त सचिव ज्ञानेश्वर मुळे यांनी शनिवारी दिला.
मुळे म्हणाले, 'देशातील राज्यकर्तेच सरकारसाठी दोन देशांमध्ये विविध क्षेत्रांमध्ये उद्योगवाढीसाठी आणि संस्कृतीची देवाणघेवाण करण्यासाठी विविध प्रकारचे करार करीत असतात. विविध देशांमध्ये दौरे करतात. तसेच, लोकहितासाठी देशात विविध योजना व प्रकल्प राबविण्यासाठी जनतेचे आणि देशाचे नेतृत्व करीत असतात. या गोष्टी करण्यासाठी राज्यकर्त्यांमध्ये एक आकलन क्षमता असली पाहिजे. मात्र, प्रत्यक्षात या राज्यकर्त्यांना 'विदेशनीती'चे ज्ञान फारच कमी आहे. त्यामुळे या राज्यकर्त्यांना विदेशनीतीचे ज्ञान असलेच पाहिजे. त्यासाठी त्यांना ते बंधनकारकरित्या देण्याची आवश्यकता आहे. राज्यकर्त्यांनाच जर या गोष्टींची माहिती नसेल तर त्यांना त्या नागरिकांना सांगताच येणार नाही.'
दरम्यान, 'सरकारमधील उच्चपदस्थ अधिकाऱ्यांनी लोकांच्या गरजा लक्षात घेऊन काम केले पाहिजे. आपण जे काम करतो आहे, त्याचा नागरिकांना होणारा फायदा लक्षात घेतला पाहिजे. या अधिकाऱ्यांनी लोकांच्या अपेक्षेप्रमाणे काम केले नाही तर लोकांचा अपेक्षाभंग होईल,' असे मुळे यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

डिजिटल बोर्डावर अश्लील व्हिडिओ

0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

कर्वे रस्त्यावरील नळस्टॉप चौकातील डिजिटल होर्डिंगवर गेल्या आठवड्यात सोमवारी 'पॉर्न व्हिडिओ'ची वेबसाइट झळकल्याने एकच गोंधळ उडाला. त्यानंतर बघ्यांची एकच गर्दी उसळल्याने वाहतुकीचा खोळंबा झाला.
एका व्यक्तीने घटनेचे छायाचित्र आणि माहिती सोशल मीडियावर शेअर केल्याने ही घटना समोर आली. पुण्यात भरदिवसा आणि गर्दीने भरलेल्या रस्त्यावर मोठ्या स्क्रीनवर अश्लील फिल्म झळकल्याने वेगळीच चर्चा रंगली होती. पुण्यातील कर्वे रस्त्यावर नेहमीप्रमाणे गाड्यांची वर्दळ होती. त्यावेळी अचानक वाहतुकीचा वेग मंदावला. येथील डिजिटल जाहिरातीच्या बोर्डावरील लाल अक्षरे गायब झाली आणि क्षणार्धात पॉर्न फिल्म ​दिसण्यास सुरुवात झाली. त्यामुळे सगळेच भांबावले, सुस्साट जाणाऱ्या गाड्यांचे वेग अचानक कमी झाले आणि सर्वजण लपूनछपून बोर्डावर नजर टाकू लागले.
वाहनांचा वेग अचानक मंदावल्याने गर्दीने ओसंडून वाहणाऱ्या कर्वे रस्त्यावर वाहतूक कोंडी झाली. भररस्त्यात एवढ्या मोठ्या स्क्रीनवर पॉर्न फिल्म लागलीच कशी, याचे कोडे अद्याप उलगडलेले नाही. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर व्हॉट्सअॅप ग्रुपवर या प्रकाराचे चर्वितचर्वण सुरू झाले. दरम्यान, तांत्रिक बिघाडामुळे हा प्रकार घडल्याची सारवासारव डि​जिटल बोर्डाचे काम पाहणाऱ्यांकडून करण्यात आली. बोर्ड खराब झाल्यामुळे ऑनलाइन दुरुस्ती सुरू असताना तांत्रिक बिघाडामुळे हा प्रकार घडला, असे त्यांनी स्पष्ट केले.
या बाबत महापालिकेच्या परवाना आणि आकाशचिन्ह विभागाचे प्रमुख उपायुक्त विजय दहीभाते यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नाटककार केंद्रबिंदू राहिला नाही

0
0

ज्येष्ठ कलासमीक्षक शांता गोखले यांची खंत

म. टा. प्रतिनिधी, पुणे
'नाटकाच्या तांत्रिक अंगाला आणि अभिनयाला अधिक महत्त्व आल्याने नाटककार नाटकाचा केंद्रबिंदू राहिलेला नाही,' अशी खंत ज्येष्ठ कलासमीक्षक शांता गोखले यांनी शनिवारी व्यक्त केली.
संगीत नाटक अकादमी पारितोषिक मिळाल्याबद्दल साहित्य रंगभूमी प्रतिष्ठानतर्फे गोखले यांचा रंगकर्मी संजना कपूर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या वेळी ज्येष्ठ नाटककार सतीश आळेकर आणि प्रतिष्ठानचे प्रमुख अशोक कुलकर्णी उपस्थित होते. यानिमित्त झालेल्या 'बदलत्या काळात नाटककाराचे स्थान नेमके कोठे आणि कशाप्रकारचे' या विषयावरील परिसंवादात श्रीमती गोखले बोलत होत्या. परिसंवादात गोखले, कपूर यांच्यासह रंगभूमीचे अभ्यासक सुनील शानबाग, लेखक-दिग्दर्शक मोहित टाकळकर आणि लेखिका इरावती कर्णिक सहभागी झाले होते.
गोखले यांनी नाटककारांच्या परंपरेचा समग्र आढावा घेतला. त्या म्हणाल्या, की 'मराठी रंगभूमीच्या बाबतीत १८८१ ते १९३० हा काळ संगीत रंगभूमीचा होता. या नाटकांच्या सरावावेळी नाटककाराचे मूळ शब्द बोलून घेतले जात. रंगभूमीवर कब्जा घेणाऱ्या कलाकार व्यवस्थापकाचे प्राबल्य वाढल्यानंतर नाटककार हा केंद्रबिंदू राहिला नाही. महाराष्ट्रात जेवढे नाटककार जन्माला आले, तेवढे देशात कुठेच आले नाहीत.'
आळेकर यांनी जुन्या आठवणी जागवून गोखले यांच्या विषयी गौरवोद्वगार काढले. 'पुण्यात दुबेंच्या कार्यशाळेत आमची मैत्री झाली. भाषांतराच्या निमित्ताने आमचा संबंध आला. गंभीर भाषांतर करणाऱ्यांचे मराठीवर ऋण आहे. शांता गोखले यांच्यामुळे आमच्या पिढीच्या नाटककारांची नाटके इंग्रजीमध्ये गेली. समीक्षक म्हणून गोखले या शांतपणे काम करत राहिल्या,' अशी भावना त्यांनी व्यक्त केली. रूपाली भावे यांनी सूत्रसंचालन केले.
--------------------
अनुवादासाठी ५० टक्के मानधन का नाही ?
'भाषांतर करताना नाटककाराच्या भाषेचा विचार करून आणि त्यामध्ये रस घेऊन गोखले यांच्यासारख्या व्यक्ती निरपेक्षपणे का काम करतात, असा प्रश्न मला कायम पडतो. नाटकाच्या संदर्भात त्यांचे नाव पुन्हा कुठेच येत नाही. अनुवादासाठी ५० टक्के मानधन देणे अपेक्षित असताना, ते कोणीही देत नाही. तरीही या व्यक्ती दुसऱ्याच्या कलाकृतीमध्ये रस घेऊन व्रतस्थपणे काम करत राहतात. असे काम करणे सोपे नाही,' अशा शब्दांत आळेकर यांनी गोखले यांचा गौरव केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


अखंड राज्यासाठी सोनियांना भेटणार: नारायण राणे

0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

'राज्य अखंड राहिले पाहिजे यासाठी वेगळ्या विदर्भाला काँग्रेसचा विरोध असेल. या पार्श्वभूमीवर पक्षाध्यक्षा सोनिया गांधी यांची लवकरच भेट घेण्यात येईल,' अशी मा​हिती काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नारायण राणे यांनी शनिवारी दिली.

विदर्भाबाबत पक्षाची भूमिका ठरली नाही, असे सांगणाऱ्या माणिकराव ठाकरे यांना 'तुम्ही, अखंड महाराष्ट्राच्या विधानपरिषदेचे उपसभापती आहात,' या शब्दांत राणे यांनी भर पत्रकार परिषदेत सुनावले. 'काँग्रेसने गोहत्याबंदी कायदा आणलेला नाही. युती सरकारच्या काळात आपण पशुसंवर्धनमंत्री असताना गोहत्याबंदी कायदा आणला गेला. पण, हा कायदा आपल्याला मान्य नव्हता,' असे राणे म्हणाले. फडणवीस सरकारच्या कार्यकालात जातीयवाद फोफावला असून, दलित, अल्पसंख्य समाजावर हल्ले होत असल्याची टीका राणे यांनी केली.

'काँग्रेसने अधिवेशनामध्ये विविध प्रश्नांवरून राज्य सरकारला चांगलेच कोंडीत पकडले. सध्या सणासुदीचे दिवस असल्याने काँग्रेस शांत आहे. मात्र, गणपतीनंतर शेतकऱ्यांच्या प्रश्नांबरोबरच भ्रष्टाचार, महागाई आदी मुद्द्यांवर रस्त्यावर उतरून आंदोलन करू,' असेही राणे यांनी स्पष्ट केले.
..
दहीहंडीला खेळाचा दर्जा का नाही?

दहीहंडी उत्सवाबाबत मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी घेतलेल्या भूमिकेबाबत विचारले असता, राणे म्हणाले की,' तुम्ही लढा; मी घरात बसून तुमचे कपडे सांभाळतो, असा हा प्रकार आहे,' अशी टीका त्यांनी केली. कोर्टाचा अवमान केल्याने अनेक मराठी तुरुंगामध्ये जातील, त्याच्याशी यांचे काय देणेघेणे, या या शब्दांत त्यांनी ठाकरेंचा समाचार घेतला. दहीहंडीबाबत सरकारशी लढण्याची गरज होती; कोर्टाशी नाही. दहीहंडी उत्सवाची तारीख निश्चित असते, मग एक दिवस अगोदर आंदोलन करण्याऐवजी दहीहंडीला खेळाचा दर्जा का मिळवून नाही दिला, असा प्रश्नही राणे यांनी उपस्थित केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जम्मू-काश्मीरबाबत ठोस उपायांचा अभाव

0
0

अभिषेक मनु सिंघवींची केंद्र सरकारवर टीका

म. टा. प्रतिनिधी‌, पुणे
भारतीय जनता पक्ष (भाजप) आणि पीपल्स डेमोक्रॅटिक पार्टी (पीडीपी) यांच्यामध्ये समन्वयाचा अभाव असल्यानेच जम्मू-काश्मीरात चिंताजनक परिस्थिती निर्माण झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून याविषयी ठोस उपाययोजना केली जात नसल्याची टीका काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि खासदार अभिषेक मनू सिंघवी यांनी शनिवारी केली.
पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटी, प्रियदर्शनी वुमन फोरम आणि पायल तिवारी फाउंडेशनच्या वतीने काँग्रेस भवन येथे आयोजिण्यात आलेल्या गौरी गणपती साहित्य जत्रेचे उद्घाटन सिंघवी, नारायण राणे यांच्या हस्ते झाले. या वेळी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष डॉ. विश्वजित कदम, शहराध्यक्ष रमेश बागवे, संगीता तिवारी आदी उपस्थित होते. जम्मू-काश्मीर हा देशाचा मुकूट असून तेथे निर्माण झालेली परिस्थिती अत्यंत चिंताजनक असल्याचे सिंघवी यांनी स्पष्ट केले. जम्मू-काश्मीरात काँग्रेसचे सरकार असताना कधीही अशी परिस्थिती निर्माण झाली नव्हती, असेही ते म्हणाले.
'महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबतील, असे भाजप सरकारने दिलेले आश्वासन हवेतच विरले आहे. राज्यातील शेतकरी आत्महत्या वाढल्या आहेत. सरकारने कमी कालावधीमध्ये भ्रष्टाचारात मोठी आघाडी घेतली आहे. एकनाथ खडसे, पंकजा मुंडे, विनोद तावडे यांच्यावर सातत्याने भ्रष्टाचाराचे आरोप होत आहेत,' अशी टीका संघवी यांनी केली. देशात सध्या सुरू असलेल्या असहिष्णुतेच्या मुद्यावरही सिंघवी यांनी टीकास्त्र सोडले.
..
नागपूर हे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री असलेल्या देवेंद्र फडणवीस यांचे शहर आहे. मात्र, तरीही राज्यात सर्वांत जास्त गुन्हे नागपुरातच होत आहेत. देशात उत्तर प्रदेश, मध्य प्रदेशपाठोपाठ महाराष्ट्रामध्ये गुन्ह्यांचे प्रमाण वाढत आहे.
- अभिषेक मनु सिंघवी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

स्वप्ने पाहणाऱ्यांचे कमळ कोमेजलंय

0
0

अजित पवार यांनी उडविली खिल्ली

म. टा. प्रतिनिधी, पुणे

'मोदी लाटेवर स्वार होऊन केंद्रात आणि त्यानंतर राज्यात भाजपचे सरकार सत्तेवर आले. त्यामुळे आगामी महानगरपालिकेच्या निवडणुकीतसुद्धा तशीच हवा असल्याचे काहींना वाटते. यंदाही आपले कमळ फुलेल अशी स्वप्ने त्यांना पडत आहेत. प्रत्यक्षात मात्र त्यांचे कमळ कोमेजलंय,' या शब्दांत भाजपच्या नेत्यांची माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी खिल्ली उडविली. नैसर्गिक रेषेनुसार शहरातील प्रभाग रचना व्हायला हवी, अशीही भूमिकाही त्यांनी स्पष्ट केली.

'सरकारी अधिकारी सत्ताधाऱ्यांच्या दबावाखाली नियम करीत असतात. प्रमोशन, पा​हिजे तेथे नियुक्ती होण्यासाठी त्यांना असे करावेच लागते. या उलट काही अधिकारी नियमांकडे बोट दाखवून कामे करतात. मुंबईप्रमाणे पुण्यातही वॉर्डानुसार महापालिका निवडणुका घेण्याची आवश्यकता आहे. मुंबईतही प्रभाग पद्धत होती. त्यात विकासकामे करताना अडथळे आल्याचे दिसून आले. चार वॉर्डांचा एक प्रभाग असावा. नगराध्यक्ष पद देखील नागरिकांमधून निवडण्याचा नवा प्रयोग सरकारने आरंभला आहे. त्यामुळे भविष्यात पंतप्रधान, मुख्यमंत्री, महापौरांनाही जनतेतून निवडा,' अशी कोपरखळीही पवारांनी मारली.

..
पूर्वीची ती हवा आता राहिली नाही. अ​जूनही कमळ फुलेल असे त्यांना वाटते. पण ते कोमेजलंय, हे त्यांना कोण सांगणार?'
अजित पवार
..
'सरकार आणि मारेकऱ्यांचा संबंध'

राज्यात आमची सत्ता असताना डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या मारेकऱ्यांना पकडण्यासाठी १७ जणांचे पथक नेमण्यात आले. ऑक्टोबर २०१४मध्ये निवडणुका झाल्या आणि आमची सत्ता गेली. फडणवीस सरकारच्या काळात काही संघटनाच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी अटक केली. पण, त्या कार्यकर्त्यांना नेमकी अटक का करण्यात आली, हे अद्याप जनतेला न सुटलेले कोडे आहे. सरकारचे आणि त्या संघटनेचे काही संबंध आहेत का, सरकार मारेकऱ्यांना पाठीशी घालते आहे का असा सवालही पवार यांनी उपस्थित केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सेना-भाजप युती अवघडच: रामदास आठवले

0
0

पालिका निवडणुकांसाठी आठवले यांचा दावा; भाजपसोबत जाण्याचे धोरण

म. टा. प्रतिनिधी, पुणे

राज्यातील १० महापालिकांच्या निवडणुकांसाठी काही शहरांमध्ये शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष यांच्यात युती होणे अवघड आहे, असे मत केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी शनिवारी व्यक्त केले. शिवसेना आणि भाजपची युती न झाल्यास रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) भाजपसोबत निवडणुकीत उतरेल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

राज्याच्या सामाजिक न्याय विभागाच्या विविध योजनांचा आढावा घेण्यासाठी आयोजित बैठकीनंतर आठवले यांनी पत्रकारांशी संवाद साधला. राज्याचे सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले या वेळी उपस्थित होते. ' राज्यातील लोकसभा निवडणूक महायुतीच्या माध्यमातून लढविण्यात आली होती. मात्र, विधानसभा निवडणुकीत सेना, भाजपने वेगळी चूल मांडली. त्यावेळी रिपाईने भाजपसोबत ​जाण्याचा निर्णय घेतला. त्याप्रमाणेच आताही सेना आणि भाजप यांची महापालिका निवडणुकांसाठी युती न झाल्यास आम्ही भाजपसोबत जाऊ,' असे आठवले यांनी स्पष्ट केले. दरम्यान, उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांना एकत्र आणणे अवघड असले तरीही, त्यांची युती व्हावी यासाठी प्रयत्न करू, असेही ते म्हणाले.
--------
उत्पन्नाची मर्यादा वाढविण्याची सूचना

अनुसूचित जाती-जमाती, विशेष मागासवर्ग आणि भटक्या विमुक्त जमातीच्या विद्यार्थ्यांना केंद्र सरकारच्या स्कॉलरशिपचा लाभ घेण्यासाठी आर्थिक उत्पन्नाची मर्यादा अडीच लाख रुपयांची आहे. त्याच धर्तीवर राज्य सरकारनेही आर्थिक उत्पन्नाची मर्यादा दोन लाखांहून अडीच लाख रुपये करावी, अशी सूचना आठवले यांनी सामाजिक न्याय विभागाला केली.
-----
'यूपीएमध्येही दलितांवर अत्याचार'

दलितांवरील अत्याचारात कोणत्याही प्रकारची वाढ झालेली नाही, असे स्पष्टीकरण रामदास आठवले यांनी दिले. ते म्हणाले, 'यूपीए सरकारच्या काळातही दलितांवर अत्याचार होत होते. सध्याच्या मोदी सरकारच्या काळातही अशाप्रकारच्या घटना घडत आहेत. हे विषय अतिशय संवेदनशील असल्याने त्याचे राजकारण करू नये,' असे आवाहनही त्यांनी केले. कोपर्डी घटनेतील आरोपी कोणत्याही समाजाचे असोत, त्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे असेही त्यांनी नमूद केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘साठे महामंडळाची कर्जप्रक्रिया ऑनलाइन’

0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

अण्णा भाऊ साठे महामंडळातील आर्थिक घोटाळ्याच्या पार्श्वभूमीवर या महामंडळाकडून दिल्या जाणाऱ्या कर्जाची सर्व प्रक्रिया ऑनलाइन करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे यांनी शनिवारी दिली.
'महामंडळाकडे कर्ज प्रकरणासाठी ऑनलाइन अर्ज केल्यानंतर, तो अर्ज सर्वप्रथम मध्यवर्ती कार्यालयाकडे जाईल. तेथून संबंधित जिल्हा विभागाकडे पाठविण्यात येईल. त्यामुळे कर्ज प्रकरणाची माहिती पारदर्शक राहील,' असे कांबळे यांनी स्पष्ट केले. तसेच, हे महामंडळ गोरगरिबांच्या आर्थिक विकासासाठी स्थापन करण्यात आले आहे. गैरव्यवहारामुळे महामंडळाचे वाटोळे झाले होते. महामंडळाचा परवानाही रद्द करण्यात आला होता. चौपट पैसे भरून ते परत मिळविण्यात आले आहे. त्यामुळे या घोटाळ्यातील सर्व आरोपींना शिक्षा मिळेपर्यंत आपण शांत बसणार नसल्याचे कांबळे यांनी नमूद केले.
'या घोटाळ्याप्रकरणी कोर्टात दोन हजार पानांचे आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणी तत्कालीन अध्यक्षांना अटक करण्यात आली. आतापर्यंत या प्रकरणी ८४ जणांना नोकरीवरून निलंबित करण्यात आले आहे. घोटाळ्यातील आरोपींची संख्या वाढल्यास त्यांना जामीन मिळू शकतो. त्यामुळे थेट सहभागी असलेल्यांवर आधी कारवाई करू अन् मग उरलेल्यांना तुरुंगाची हवा खायला पाठवू,' असे कांबळे यांनी स्पष्ट केले.
--------
डॉ. भटकर यांना साठे पुरस्कार
राज्य मातंग समाज संघटनतर्फे दिला जाणारा लोकशाहीर अण्णा भाऊ साठे राज्यस्तरीय पुरस्कार औरंगाबाद येथील डॉ. हेडगेवार हॉस्पिटल, ज्येष्ठ कम्प्युटरतज्ज्ञ डॉ. विजय भटकर आणि हिवरे बाजारचे माजी सरपंच पोपट पवार यांना जाहीर झाला आहे. त्याचबरोबरच ​ज्येष्ठ लेखिका डॉ. अरुणा ढेरे, अर्जुनराव खुरपे, ज्येष्ठ विधिज्ञ एस. के. जैन, पोपट गायकवाड, अभिमान खुडे यांना जिल्हास्तरीय पुरस्कार जाहीर झाला आहे. ३१ ऑगस्ट रोजी वानवडी येथील महात्मा फुले सांस्कृतिक भवन येथे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्या हस्ते पुरस्कार वितरित करण्यात येतील.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दहीहंडी महोत्सवात सोन्याचे दागिने चोरले

0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
हुतात्मा बाबू गेनू मंडळ येथील दहीहंडी उत्सव पहाण्यासाठी आलेल्या अकरा जणांच्या सोनसाखळ्या गर्दीचा फायदा घेऊन चोरल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. चोरलेल्या दागिन्यांची किंमत सुमारे पाच लाख रुपये असून, या प्रकरणी विश्रामबाग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
बाबूगेनू मंडळाची दहीहंडी उत्सव पाहण्यासाठी मोठी गर्दी झाली होती. गर्दीचा फायदा घेऊन चोरट्यांनी डाव साधला. निवृत्ती जाधव (४५ हजार रुपये), राकेश बेंद्रे (१५ हजार), रणजित ठाकूर (४० हजार), मृणाल जाधव (३० हजार), स्वप्नील पानसे (५० हजार) आदींचे सुमारे दोन लाख २५ हजार रुपयांचे दागिने चोरट्यांनी लांबवले. या शिवाय विजय मारटकर यांची एक लाख दहा हजारांच्या सोनसाखळीसह अन्य चौघांचे दागिने चोरीला गेले आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मुंबई-पुणे एक्स्प्रेस-वेवर ड्रोन झेपावणार

0
0

वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनांवर ठेवणार २४ तास नजर

म. टा. प्रतिनिधी, लोणावळा

एक्स्प्रेस-वेवर लेनची शिस्त मोडणाऱ्यांसह अतिवेगाने वाहने दामटणाऱ्यांवर, चुकीच्या पध्दतीने ओव्हरटेक करणाऱ्यांवर आता ड्रोनची चोवीस तास नजर राहणार आहे. रस्ते विकास महामंडळ, 'आयआरबी'च्या वतीने एक्स्प्रेस-वेवर चार ठिकाणी ड्रोन तैनात करण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर शनिवारी प्रात्यक्षिकांचे आयोजन करण्यात आले होते. या दरम्यान लेनची शिस्त मोडणाऱ्या अवजड वाहनांविरोधात कारवाई करण्यात आली आहे.

मागील काही वर्षांपासून मुंबई-पुणे एक्स्प्रेस-वेवर अतिवेगाने वाहने चालविणे, लेनची शिस्त मोडणाऱ्या (लेनकटिंग), चुकीच्या पध्दतीने ओव्हरटेक करणाऱ्या वाहनांमुळे आतापर्यंत झालेल्या अपघातांमध्ये हजारो प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. या शिवाय गंभीर जखमी होऊन कायमस्वरूपी अपंगत्व आलेल्यांचे प्रमाणही मोठे आहे. अपघातांमुळे एक्स्प्रेस-वेवर विशेषतः खंडाळा (बोरघाट) घाटमाथा परिसरात अपघात होऊन कित्येक तास वाहतूक कोंडी होण्याच्या घटनाही वाढल्या आहेत. या वाहतूक कोंडीमुळे मुंबई आणि पुणे या शहरांदरम्यान प्रवास करणाऱ्यांना नाहक मनस्ताप होत असून, शैक्षणिक आणि करिअरविषयक संधी गमविण्याची वेळ ओढवली आहे.

या सर्व घटनांच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकार, रस्ते विकास महामंडळ, आयआरबी आणि महामार्ग पोलिसांनी अपघातांवर नियंत्रण मिळविण्यासाठी विविध उपाययोजना राबविल्या. मात्र, वाहनचालकांच्या बेशिस्तीमुळे त्याही फोल ठरल्या. या पार्श्वभूमीवर मुंबई-पुणे एक्स्प्रेस-वेवर अपघातांना कारणीभूत ठरणाऱ्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी आणि नियमबाह्य वाहतूक करणाऱ्यांना शिक्षा करण्यासाठी चार ठिकाणी ड्रोन तैनात करण्यात येणार आहेत.

शनिवारी आयोजित प्रात्यक्षिकांना महामार्ग पोलिस अधीक्षक अमोल तांबे, महामार्ग पोलिस निरीक्षक अजय बारटक्के, सुधीर अस्पत, सहायक पोलिस निरीक्षक तुकाराम जोशी, एम. आर. काटकर आदी उपस्थित होते.
..
'एरियल मॅपर्स'वर जबाबदारी
ड्रोनच्या माध्यमातून एक्स्प्रेस-वेवरील वाहतुकीवर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी पुण्यातील 'एरियल मॅपर्स'वर सोपविण्यात आली आहे. या मोहिमेत 'एरियल मॅपर्स'च्या पथकासह महामार्ग पोलिसांचा सहभाग असणार आहे. एक्स्प्रेस-वेवर लेनकटिंग, वेगमर्यादेचे उल्लंघन, चुकीचे ओव्हरटेक करणाऱ्या वाहनांची छायाचित्रे, चित्रफीत आणि संबंधित वाहनाचा क्रमांक महामार्ग पोलिसांना कळविला जाईल. त्यावरून वाहन चालकावर कारवाई करण्यात येणार आहे.
..
चार ठिकाणी ड्रोनची नजर
पुण्याहून मुंबईकडे जाणाऱ्या वाहनांसाठी खालापूर टोलनाका, तर मुंबईहून पुण्याकडे जाणाऱ्या वाहनांसाठी उर्से टोलनाक्याची कारवाईसाठी निवड करण्यात आली आहे. वाहनांवर नजर ठेवण्यासाठी खंडाळा घाट (बोरघाट), खोपोली एक्झिट ते फूडमॉल, कामशेत बोगदा ते उर्से टोकनाका परिसर, खालापूर टोलनाका ते पनवेल परिसर या परिसरात ड्रोन भिरभिरणार आहेत. एक ड्रोन चार किलोमीटर अंतरावर नजर ठेवण्यास सक्षम आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


बलात्काप्रकरणी भोंदूबाबाला कोठडी

0
0


म. टा. प्रतिनिधी, येरवडा
पती-पत्नीचा वाद मिटवून देण्याच्या बहाण्याने महिलेवर जबरदस्तीने बलात्कार करणाऱ्या भोंदूबाबा रफिक भूडान अहमद शेख याला कोर्टाने एक सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. पोलिसांनी आरोपी शेखवर बलात्कार आणि जादूटोणाविरोधी कायद्यान्वे गुन्हा दाखल केला आहे.
या प्रकरणी विवाहित महिलेने येरवडा पोलिसांत तक्रार दिली आहे. पीडित महिलेचे २००६ साली विवाह झाला होता; पण दररोज किरकोळ कारणांमुळे पती-पत्नीत भांडणे सुरू होती. त्यामुळे भांडणाला त्रासलेली महिला सुपा येथील माहेरी राहण्यास गेली. आरोपी हा पुण्यात राहण्यास असला तरी आठवड्यातून दोन दिवस सुपा येथील कुतवळवाडीमधील दर्ग्यात राहत होता. मुलीचे वडील दर्ग्यात जात असताना आरोपी शेखला मुलीच्या कुटुंबाची हकीकत सांगितली.
त्यावेळी पती-पत्नीचे वाद मिटवून देण्यासाठी मुलीला पुण्यात माझी सेवा करण्यासाठी पाठवावे लागेल, असे शेखने महिलेच्या वडिलांना सांगितले होते. त्यानुसार पीडित मुलगी, तिचा चार वर्षांचा मुलगा, आई आणि भाऊ २०१५ मध्ये शेखच्या घरी राहण्यास आले. आई दोन दिवस राहिल्यानंतर सुपाला निघून गेली. तसेच, भाऊ सकाळी कामाला गेला आणि शेखची पत्नी मुलीला क्लासला सोडविण्यासाठी बाहेर गेली असताना या संधीचा फायदा उचलत पीडित मुलीला बेडरूममध्ये बोलावून मारहाण करून जबरदस्तीने बलात्कार केला. त्यानंतर घाबरलेली महिला मुलाला गावी घेऊन निघून गेली होती. शेख सुपाला जाऊन पीडित महिलेला झालेल्या प्रकाराची माहिती धमकी दिली. तसेच, तिच्यावर पुण्यातील लॉजमध्ये पुन्हा बलात्कार केला. पुढील तपास महिला उपनिरीक्षक मनीषा टुले करीत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पिस्तूल विक्रीसाठी आलेल्या महिलेला अटक

0
0


म. टा. प्रतिनिधी, पुणे
पुण्यात पिस्तुलाची विक्री करण्यासाठी आलेल्या मध्य प्रदेशातील महिलेला गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली आहे. या महिलेकडून तीन पिस्तुले आणि २१ काडतुसे जप्त करण्यात आली आहेत.
जनेबाई ताना बारेला (वय ५०, रा. मध्य प्रदेश) असे अटक केलेल्या महिलेचे नाव आहे. तिच्या विरोधात लष्कर पोलिस ठाण्यात आर्म अॅक्टचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महिलेने ते पिस्तुल पुण्यात कोणासाठी विक्रीला आणले होते, याचा तपास सुरू आहे, अशी माहिती गुन्हे शाखेचे पोलिस उपायुक्त पी. आर. पाटील व सहायक आयुक्त सुरेश भोसले यांनी पत्रकार परिषदेत दिली.
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून सराईत गुन्हेगार व बेकायदा पिस्तूल बाळगणाऱ्यांवर लक्ष केंद्रीत केले आहे. त्या वेळी गुन्हे शाखेच्या दरोडा प्रतिबंधक पथकातील पोलिस हवालदार शैलेंद्र जगताप यांना बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, मध्य प्रदेश येथून एक महिला ही गावठी बनावटीचे पिस्तूल विकण्यासाठी दर्पण ट्रॅव्हल्सच्या खासगी बसने पुण्यात आली आहे. ती हॉटेल अरोरा टॉवर समोर येणार आहे, अशी माहिती पोलिसांना कळाली. त्यानुसार दरोडा प्रतिबंधक पथकाने महिलेला सापळा रचून ताब्यात घेतले. तिच्याकडील बॅगेची झडती घेतली असता तीन पिस्तूल आणि २१ जिवंत काडतुसे असा एकूण एक लाख नऊ हजार रुपयांचा माल जप्त केला आहे.
आरोपी महिलेने घागरा ड्रेसमध्ये घालून त्यामध्ये अंगावर शाल घेऊन ही पिस्तुले आणली होती. पुण्यात पिस्तुले आणण्यासाठी या महिलेचा कुरिअर म्हणून वापर करण्यात आला आहे. मध्य प्रदेशात तिला एका व्यक्तीने पुण्यात पिस्तूल पोहचविण्यासाठी पाठविले होते. याबाबत महिलेकडे चौकशी सुरू आहे. महिलेच्या घरची परिस्थिती हालाखीची असून ती मिळेल ते कामे करते, अशी माहिती पोलिसांनी दिली.

अनेक ठिकाणी शस्त्रविक्री
जेनीबाई बारेला ही मुळची मध्य प्रदेशची रहिवासी असून, पतीचे निधन झालेले आहे. तिचा मुलगाही बेकायदा शस्त्र निर्मितीच्या व्यवसायामध्ये आहे. गेल्या वर्षभरापासून तिने पुण्यात तीन ते चार वेळा येऊन काही जणांना शस्त्र विकलेली आहेत. त्यांचा शोध पोलिसांकडून सुरू आहे. पुण्यासोबतच मुंबई आणि नाशिकमध्येही जेनीबाईने मोठ्या प्रमाणावर शस्त्र विक्री केल्याचे समोर आले आहे. तिला यापूर्वी बेकायदा शस्त्र तस्करीप्रकरणी शिक्षा झालेली असून, ती काही काळ आग्रा जेलमध्ये होती.

आठ महिन्यांत ९२ पिस्तुले जप्त
बेकादेशीरपणे पिस्तूल बाळगल्याप्रकरणी पुणे पोलिसांनी ७१ गुन्हे दाखल केले आहेत. यामध्ये तब्बल ९२ पिस्तुले जप्त करण्यात आली आहेत. गणेशोत्सवाच्या पार्श्वभुमीवर बेकायदेशीर पिस्तूल बाळगणाऱ्यांचा शोध घेण्याची मोहीम सुरू असल्याची माहिती उपायुक्त पी. आर. पाटील यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जाहिरात कंपनीच्या टेक्‍निशियनवर गुन्हा

0
0


म. टा. प्रतिनिधी, पुणे
कर्वे रोडवरील नळस्टॉप चौकातील डिजिटल जाहिरात फलकावर पॉर्न वेबसाइटची जाहिरात झळकल्याप्रकरणी जाहिरात कंपनीच्या टेक्‍निशियनवर डेक्कन पोलिसांनी माहिती तंत्रज्ञान कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत डेक्कन पोलिस ठाण्याचे कर्मचारी संतोष जगताप यांनी तक्रार दिली आहे. त्यावरून एल-१ पब्लिसिटी फर्मचा टेक्‍निशियन नीतेश शेलार याच्याविरोधात माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या ६७ कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नळस्टॉप चौकामध्ये असलेल्या मोठ्या डिजिटल बोर्डावर २४ ऑगस्ट रोजी दुपारी तीनच्या सुमारास अश्‍लील संकेतस्थळाची जाहिरात झळकली होती. त्या जाहिरातीसह चौकाचा फोटो एका नागरिकाने काढून त्याने तो फोटो शुक्रवारी सकाळी सोशल मीडियावर टाकल्यानंतर हा प्रकार समोर आला होता. ही बातमी व्हॉट्‌सअॅपवरून पसरल्यानंतर त्याची चर्चा सुरू होती. पोलिसांना माहिती मिळाल्यानंतर शनिवारी रात्री उशिरा हा गुन्हा दाखल करण्यात आला. शेलार हा संबंधित जाहिरात संस्थेमध्ये टेक्‍निशियन म्हणून काम करतो. टीम व्ह्युव्हर या संगणकप्रणालीच्या आधारे डिजिटल फलकाच्या दुरुस्तीचे काम सुरू असताना अश्‍लील संकेतस्थळाचे होम पेज फलकावर झळकले होते. या प्रकरणी पोलिस निरीक्षक (गुन्हे) सुचेता खोकले अधिक तपास करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सराफाचे दुकान फोडून पाच लाखांचे दागिने लंपास

0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
नऱ्हे येथील नारायण ज्वेलर्स या दुकानाचे शटर उचकटून चोरट्यांनी पाच लाख ६८ हजार रुपये किमतीचे सोने व चांदीचे दागिने लंपास केल्याची घटना रविवारी सकाळी उघडकीस आली. या प्रकरणी सिंहगड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत जितुसिंग परमार (वय २६, रा. नऱ्हेगाव) यांनी तक्रार दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नऱ्हेगाव येथे ग्रामपंचायत रोडवर खेडकर बिल्डिंगमध्ये परमार यांचे नारायण ज्वेलर्स नावाने दुकान आहे. शनिवारी रात्री अकराच्या सुमारास दुकान बंद करून परमार घरी गेले. त्यानंतर सकाळी सहाच्या सुमारास रोडवरून जाणाऱ्या नागरिकांना दुकानाचे शटर उघडलेले व कुलूप तोडलेले दिसले. त्यानुसार याची माहिती पोलिसांना देण्यात आली. तसेच, परमार यांना कळविण्यात आले. घटनेची माहिती मिळताच पोलिस व परमार यांनी दुकानाकडे धाव घेतली. चोरट्यांनी दुकानात प्रवेश करून लोखंडी तिजोरी फोडून सोन्या-चांदीचे पाच लाख ६८ हजार रुपयांचे दागिने लंपास केले. परमार यांनी दुकानाच्या आत व बाहेरच्या बाजूने सीसीटीव्ही बसविले होते. परंतु, चोरट्यांनी शटर उचकटून आतमध्ये प्रवेश करून चोरी केली. त्यानंतर ते बाहेर पडताना सीसीटीव्हीचा डीव्हीआरही सोबत घेऊन गेले. त्यामुळे पोलिसांना सीसीटीव्हीतील हालचाली मिळू शकलेल्या नाहीत. या प्रकरणी वरिष्ठ पोलिस निरीक्षक विष्णू जगताप हे अधिक तपास करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

एसटीच्या टोल सवलतीबाबत ‘टोलवाटोलवी’

0
0



म. टा. प्रतिनिधी, पुणे
पुणे-मुंबई एक्स्प्रेस वेवर राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) बसकडून सवलतीच्या दरात टोल आकारणी करावी, याबाबत राज्य रस्ते विकास महामंडळाकडे (एमएसआरडीसी) ८५१ पानांचा पत्रव्यवहार करण्यात आला आहे, असे एसटी महामंडळाकडून सांगितले जात आहे. मात्र, दुसरीकडे एसटीच्या सवलतीच्या दराबाबत कोणत्याही प्रकारचा पत्रव्यवहार झाला नसल्याचे 'एमएसआरडीसी' सांगत आहे. त्यामुळे 'एमएसआरडीसी'कडून परस्परविरोधी माहिती दिली जात असल्याचे स्पष्ट होत असून, सवलतीच्या टोलबाबत टोलवाटोलवी केली जात आहे.
एक्स्प्रेस वेच्या कंत्राटामध्ये एसटी बसकडून सवलतीच्या दरात टोल आकारणी करण्याची तरतूद असताना, प्रत्यक्षात टोल आकारणीचा अध्यादेश काढताना एसटीची सवलत नाकारल्यात आली. त्यामुळे एक्स्प्रेस वेवर टोल आकारणी करताना खासगी बसप्रमाणेच एसटी बसकडून टोल आकारणी करण्यात आली. त्यामुळे एसटी महामंडळाला गेल्या १० वर्षांत वीस कोटी रुपयांचा आर्थिक भुर्दंड बसल्याची धक्कादायक बाब ऑक्टोबर २०१५ मध्ये उघडकीस आली. त्यानंतर यापुढील काळात एसटीला टोलमध्ये सवलत मिळावी, यासाठी प्रयत्न करणार असल्याचे एसटी महामंडळाकडून सांगण्यात आले होते.
दरम्यान, ऑक्टोबर २०१५ पासून आतापर्यंत एसटी महामंडळ व 'एमएसआरडीसी' यांच्यात एक्स्प्रेस वेवरील एसटीच्या सवलतीच्या टोलबाबत झालेल्या पत्रव्यवहाराची माहिती सजग नागरी मंचाचे विवेक वेलणकर यांनी एसटी व एमएसआरडीसी यांच्याकडे मागितली होती. त्यावर उत्तर देताना, एसटीकडून 'एमएसआरडीसी'ला ८५१ पानांचा पत्रव्यवहार झाला असल्याची माहिती एसटी महामंडळाने दिली. तर, सवलतीच्या टोलबाबत एसटीकडून कोणत्याही प्रकारचा पत्रव्यवहार झाला नसल्याचे 'एमएसआरडीसी'ने उत्तर दिले आहे. एसटी किंवा 'एमएसआरडीसी' या दोन संस्थांपैकी एका संस्थेकडून दिली जाणारी माहिती सत्य नसल्याचे स्पष्ट होते.

'एसटीवरील भार कमी करा'
एसटीकडून पत्रव्यवहाराबाबतची तपशीलवार माहिती दिली जात असताना, कोणत्याही प्रकारचा पत्रव्यवहार झाला नाही, असे 'एमएसआरडीसी'कडून सांगितले जात आहे. 'एमएसआरडीसी' खोटी माहिती देऊन दिशाभूल करीत आहे. या प्रकरणी तातडीने लक्ष घालून टोल सवलतीचा लाभ मिळवून द्यावा आणि एसटीवरील आर्थिक भार कमी करण्यास मदत करावी, अशी मागणी विवेक वेलणकर यांनी 'एमएसआरडीसी'चे व्यवस्थापकीय संचालक राधेश्याम मोपलवार यांच्याकडे केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images