Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

शिक्षा होण्याचे प्रमाण वाढवणार

$
0
0

पोलिसांना दिले टार्गेट; अप्पर मुख्य सचिव (गृह) बक्षी यांनी दिली माहिती
म. टा. प्रतिनिधी, पुणे
येत्या वर्षात गुन्हेगारांना शिक्षा होण्याचे प्रमाण ६५ टक्क्यांपर्यंत पोहोचवण्याचे लक्ष्य पोलिसांसमोर ठेवण्यात आले असल्याची माहिती राज्याचे अप्पर मुख्य सचिव (गृह) के. पी. बक्षी यांनी दिली. बक्षी यांनी पुणे पोलिस आयुक्तालय, राज्य गुन्हे अन्वेषण विभागात (सीयआयडी) बैठक घेत महत्त्वाचे प्रश्न, गुन्हे या विषयी सोमवारी आढावा घेतला.
६५ टक्क्यांचे टार्गेट
० गुन्हेगारांना शिक्षा होण्याचे प्रमाण वाढले पाहिजे, यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पोलिसांना टार्गेट दिले होते. या मार्चअखेर हे प्रमाण ३५ टक्के असणे अपेक्षित होते.
० पोलिस विभागाने केलेल्या चांगल्या कामामुळे मार्च अखेर हे प्रमाण ४८ टक्के इतके आहे, तर गेल्या दोन महिन्यांत त्यात वाढ झाली आहे.
० जून अखेर ते ५४ टक्क्यांपर्यंत पोहोचले आहे. या वर्षांसाठी आम्ही आणखी लक्ष्य ठेवले असून मार्च-२०१७ अखेर हे प्रमाण ६५ टक्क्यांपर्यंत पोहोचण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहे, अशी अपेक्षा बक्षी यांनी व्यक्त केली....
'सीआयडी'मध्ये महत्त्वाच्या गुन्ह्यांवर चर्चा
० भंडारा येथील धान्य घोटाळा, अण्णा भाऊ साठे महामंडळातील घोटाळा, तुळजापूर मंदिर तसेच महालक्ष्मी मंदिरांच्या आर्थिक व्यवहारांची चौकशी 'सीआयडी'मार्फत सुरू आहे. या गुन्ह्यांचा तपासाबाबत गृह विभागाचे अप्पर मुख्य सचिव के. पी. बक्षी यांनी 'सीआयडी'च्या पाषाण येथील कार्यालयात आढावा घेतला.
० 'भंडारा धान्य घोटाळ्याचा तपास पूर्ण झाला आहे. पोलिसांना नव्याने पुरावे मिळाले असल्याने आरोपींचा जामीन रद्द करण्यासाठी सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती. कोर्टाने नवीन पुरावे सत्र न्यायालयासमोर सादर करावेत, असे आदेश सुप्रीम कोर्टाने दिले आहेत. त्यामुळे येत्या १५ सष्टेंबरपर्यंत कोर्टासमोर पुरावे सादर करण्यात येतील.'
० अण्णा भाऊ साठे महामंडळ घोटाळाप्रकरणी ७० टक्के तपास पूर्ण झाला आहे. राहिलेला तपास लवकरच पूर्ण करून चार्जशीट दाखल करण्यात येईल. मंदिरांच्या आर्थिक व्यवहारांची चौकशी अंतिम टप्प्यात असून, लवकरच त्याचा अहवाल सरकारला सादर करण्यात येईल.
...
पोलिस हाउसिंगसाठी विशेष प्रयत्न
० मुख्यमंत्री फडणवीस यांनी पोलिसांसाठी एक लाख घरे बांधण्याचे जाहीर केले असून, त्या दृष्टीने पावले उचलण्यात येत आहेत.
० पुण्यात लोहगाव येथे पोलिसांसाठी पाच हजार घरे बांधण्यात येत आहेत. संबंधितांकडून सरकारी मदतीची अपेक्षा व्यक्त केली आहे. मुंबईत पुढील काही दिवसांत याबाबत बैठक आयोजित केली जाईल.
० पुणे शहरातील स्वारगेट, औंध, शिवाजीनगर येथील पोलिस वसाहतींची पाहणी केली आहे. शहरातील आणखी काही जागांची पाहणी केली असून तेथे काही कार्यालये सुरू करता येतील का, याबाबत विचार सुरू असल्याचे बक्षी यांनी सांगितले.
...
'सीसीटीव्ही'चे कामकाज चांगले
० पुणे शहरात १२००पेक्षा अधिक कॅमेरे आहेत. त्यातील ९५ टक्के कॅमरे चालू असेल, तर काम समाधानकारक आहे.
० 'एडीएसएल' कंपनीमुळे दीड टक्के कॅमेरे बंद आहेत. तर 'बीएसएनएल'ने खोदकाम केल्यामुळे काही कॅमेरे बंद आहेत. या दोन्ही कारणांमुळे ३९ कॅमेरे बंद असून, हे प्रमाण तीन-साडेतीन टक्के आहे.
० पुण्यातील 'सीसीटीव्ही' चांगल्या रीतीने सुरू असल्याचे दिसले आहे, असे बक्षी यांनी स्पष्ट केले. गणपतीत विसर्जन मार्गावर 'सीसीटीव्ही' बसवण्यास सांगण्यात आले आहे.
...
पिंपरी-चिंचवड आयुक्तालयासाठी जोरदार मागणी
पिंपरी-चिंचवडसाठी स्वतंत्र पोलिस आयुक्तालय सुरू करावे, यासाठी जोरदार मागणी होत आहे. मात्र, त्याबाबतचा कुठलाही प्रस्ताव माझ्यासमोर आलेला नाही. या मागणीला पूरक असे कागदी स्वरूप आलेले नाही. माझ्याकडे प्रस्ताव आल्यानंतर त्याबाबत मी बोलेन, असे त्यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


राष्ट्रवादीत नाराजीनामा

$
0
0

महापौरांच्या कार्यक्रमावर स्थायी समितीच्या माजी अध्यक्षांचा बहिष्कार
म. टा. प्रतिनिधी, पुणे
स्थानिक स्तरावरील समस्या सोडवण्यासाठी राष्ट्रवादीकडून थेट 'महापौर आपल्या दारी' यासारखा उपक्रम राबवला जात असला, तरी पक्षाच्या स्थायी समितीच्या माजी अध्यक्षांनीच सोमवारी या कार्यक्रमावर बहिष्कार टाकला. पाण्यासारखी मूलभूत सुविधा पुरविण्यात अडचणी येत असल्याने स्थायी समितीचे माजी अध्यक्ष बापूराव कर्णे गुरुजी महापौर प्रशांत जगताप यांच्या कार्यक्रमास अनुपस्थित राहिले. तसेच, राष्ट्रवादीविषयी नागरिकांमध्ये प्रचंड असंतोष पसरत असल्याचे सांगत, त्यांनी पक्षाला घरचा आहेर दिला.
येरवडा भागांत राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांचे प्राबल्य आहे. तरीही, या भागांत पुरेशा दाबाने पाणीपुरवठा होत नसल्याचे गाऱ्हाणे कर्णे गुरूजी यांनी महापौर जगताप यांच्याकडे मांडले होते. पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक घेण्यात आली होती. वारंवार पाठपुरावा करूनही पुरेशा दाबाने पाणीपुरवठा होत नसल्याने नागरिकांचे हाल होत आहेत. याबाबत, महापौरांना पत्र दिल्यानंतर त्यांनी पाण्याची समस्या दूर करण्यासाठी पुढाकार घेण्याची गरज होती. पाणीपुरवठ्याचे योग्य नियोजन झाले असते, तर नागरिकांची गैरसोय दूर झाली असती. मात्र, नागरिकांचे हाल दूर करण्यात पक्ष अपयशी ठरत असल्याने महापौरांच्या कार्यक्रमावर बहिष्कार घालण्याचा निर्णय घ्यावा लागला, असे कर्णे गुरूजी यांनी जाहीर केले. 'महापौर आपल्या दारी' हा उपक्रम सोमवारी सायंकाळी येरवडा क्षेत्रीय कार्यालयात झाला. परंतु, कर्णे गुरूजी त्यामध्ये सहभागी झाले नाहीत. कर्णे गुरूजींनी पक्षाविरोधात नागरिकांमध्ये असंतोष वाढत असल्याबाबतही महापौरांना सावध केले आहे.
स्थानिक स्तरावरील प्रश्न सोडवण्यासाठी महापौर विविध क्षेत्रीय कार्यालयांना भेटी देत, समस्या दूर करण्याचा प्रयत्न करीत आहेत. मात्र, येरवडा परिसरातील नागरिकांची पाण्याची समस्या काही अजून दूर झालेली नाही. त्यामुळे, स्थायी समितीच्या माजी अध्यक्षांनाच महापौरांच्या कार्यक्रमापासून दूर राहावे लागले.
...................
सोशल मीडियावर राष्ट्रवादीची कार्यशाळा
भारतीय जनता पक्षाने लोकसभा-विधानसभा निवडणुकीत सोशल मीडियाचा आधार घेतल्याने आगामी पालिका निवडणुकीत राष्ट्रवादीनेही त्यावर भर देण्याचे ठरवले आहे. त्यादृष्टीने, पक्षाच्या सर्व नगरसेवकांनी ट्विटरचा वापर करण्याच्या सूचना यापूर्वी झालेल्या बैठकीतच देण्यात आल्या आहेत. आता, येत्या बुधवारी (३१ ऑगस्ट) निसर्ग मंगल कार्यालय येथे राष्ट्रवादीतर्फे सोशल मीडियावर विशेष कार्यशाळा घेण्यात येणार आहे.
....................
'महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी सर्वसाधारण सभेत दिलेल्या आश्वासनानुसार नगर रोडचा पाणीपुरवठा सुरळीत झाला आहे. त्यामुळे, इतर सर्व नगरसेवक कार्यक्रमाला उपस्थित होते. गुरूजींनीही कार्यक्रमाला येणे अपेक्षित होते. त्यासाठी, मी त्यांना फोन, मेसेज केला होता.'
प्रशांत जगताप, महापौर

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पुलांच्या काळजीसाठी आपत्ती व्यवस्थापक

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
महाडमधील सावित्री नदीवरील पूल पुरात वाहून गेल्याची दुर्घटना घडल्यानंतर जाग आलेल्या सार्वजनिक बांधकाम विभागाने पावसाळ्याच्या काळात महत्त्वाचे पूल व इमारतींच्या ठिकाणी आपत्ती व्यवस्थापक नेमण्याचा निर्णय घेतला आहे. आयुर्मान संपलेल्या आणि धोकादायक झालेल्या पुलांची तातडीने दुरुस्ती करण्याऐवजी आपत्ती व्यवस्थापक नेमण्याची जुजबी उपाययोजना करण्यात आली आहे.
महाडमधील सावित्री नदीवरील जुना पूल महापुराच्या पाण्यात वाहून गेल्याची घटना नुकतीच घडली. या दुर्घटनेत दोन एसटी बसमधील प्रवाशांना जीव गमवावा लागला. या घटनेनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारितील सर्व पुलांची तातडीने तपासणी करून आवश्यकतेनुसार स्ट्रक्चरल ऑडीट करण्याचे आश्वासन दिले.
या दुर्घटनेनंतर आपत्ती व्यवस्थापनाची चोख व्यवस्था नसल्याची जाणीव सरकारला झाली. त्या पार्श्वभूमीवर बांधकाम विभागाचे प्रधान सचिव व मुख्य अभियंत्यांची बैठक झाली. या बैठकीत आपत्कालीन व्यवस्थेवर चर्चा करण्यात आली. अशी व्यवस्था निर्माण झाल्यास आपत्तीची माहिती देऊन जीवितहानी टाळता येणे शक्य होणार असल्याचे मत मांडण्यात आले. त्यानुसार बांधकाम विभागाच्या अखत्यारितील महत्त्वाचे पूल आणि इमारतींवर पावसाळ्याच्या काळात देखरेख ठेवण्यासाठी आपत्ती व्यवस्थापक नेमण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
नद्यांवरील जुने पूल तसेच धोकादायक झालेल्या इमारती निश्चित करून पावसाळ्याच्या काळात या ठिकाणी आपत्ती व्यवस्थापक नेमण्याच्या सूचना सर्व मुख्य अभियंत्यांना देण्यात आल्या आहेत. तसेच या आपत्ती व्यवस्थापकांची नियुक्ती कंत्राटी पद्धतीने करण्याबरोबरच त्यांना प्रशिक्षण देण्याची जबाबदारी मुख्य अभियंत्यांवर सोपविण्यात आली आहे. या व्यवस्थापकांनी नेमून दिलेल्या पूल व इमारतींवर पावसाळ्यात देखरेख ठेवावी. काही आकस्मिक आपत्ती असल्यास पुलांवरील वाहतूक बंद करावी. तसेच इमारतींमध्ये काही धोका दिसल्यास रहिवाशांना सतर्क करण्याचे काम या व्यवस्थापकांनी करावे, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.
आपत्ती व्यवस्थापकांना कामकाजासाठी सिग्नल, दिवे, लाल झेंडे उपलब्ध करून द्यावेत. या व्यवस्थापक व स्थापत्य अभियांत्रिकी सहायक यांनी पर्जन्यमापकातील दैनंदिन नोंद, पूरपातळी याची दैनंदिन नोंद ठेवावी. मोठा पूर आल्यास व इमारतीला तडे जाताना दिल्यास त्याची माहिती सचिवांपर्यंत द्यावी. तसेच जिल्हाधिकारी, पोलिस यांनाही तत्काळ माहिती देण्यात यावी, असेही स्पष्ट करण्यात आले आहे. ही व्यवस्था करूनही महाडमधील पुलासारखी दुर्घटना घडल्यास संबंधित पर्यवेक्षीय अधिकाऱ्याला जबाबदार धरून कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विनाअनुदानित अभ्यासक्रमांमधून लूट

$
0
0

पुणे : राज्यात पारंपरिक अभ्यासक्रम चालविणाऱ्या विनाअनुदानित कॉलेजांच्या आर्थिक व्यवहारांचा कोणताही लेखाजोखा राज्य उच्चशिक्षण संचालनालयाकडे नाही. संचालनालयाने त्यासाठी कोणतेही विशेष प्रयत्न न केल्याने, राज्यात अनुदानित कॉलेजांसाठी उभारलेल्या पायाभूत सुविधा आणि मनुष्यबळाच्या आधारे 'विनाअनुदानित'चा कारभार हाकला जात आहे. 'विनाअनुदानित'च्या या बेहिशेबी व्यवहारासाठी विद्यार्थी आणि पालकांना मात्र थेट बळीचा बकरा बनविले जात आहे.
राज्याच्या उच्चशिक्षण संचालनालयामध्ये गेल्या कित्येक वर्षांपासून अंतर्गत लेखापरीक्षण झालेच नसल्याची बाब 'मटा'ने सोमवारी उघड केली. उच्चशिक्षण संचालक डॉ. धनराज माने यांनी स्वतः ही बाब कबूल करतानाच, संचालनालयाने या लेखापरीक्षणासाठी राज्य सरकारकडे प्रस्ताव सादर केल्याचे सांगितले. राज्यातील उच्चशिक्षण क्षेत्रासाठीचा हजारो कोटी रुपयांचा व्यवहार सांभाळणाऱ्या या कार्यालयात लेखापरीक्षणाची प्रभावी यंत्रणा नसल्याने, गेल्या काही वर्षांमध्ये मोठ्या प्रमाणावर उधळपट्टी झाल्याचे आरोप केले जात आहेत. या आरोपांमध्ये तथ्य असल्याची माहिती कार्यालयांतर्गत अधिकाऱ्यांकडूनच पुढे येत आहे. त्या पाठोपाठ संचालनालयाने राज्यातील विनाअनुदानित कॉलेजांच्या लेखापरीक्षणासाठी पुरेशी काळजी घेतली नसल्याची बाबही मंगळवारी स्पष्ट झाली. संचालनालयाने आपल्या अंतर्गत लेखापरीक्षणासह विनाअनुदानित कॉलेजांच्या लेखापरीक्षणाकडेही जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याचे आरोपही याच निमित्ताने समोर येत आहेत.
राज्यात विनाअनुदानित कॉलेजे वा तुकड्यांना मान्यता दिली जात असली, तरी अशा कॉलेजांची वा तुकड्यांची संचालनालयाकडून कोणतीही तपासणी केली जात नाही. अशा कॉलेजांसाठी विद्यापीठे केवळ शुल्क निश्चितीची जबाबदारी पार पाडत असली, तरी या कॉलेजांच्या वा तुकड्यांसाठी गोळा केल्या जाणाऱ्या इतर शुल्कावर विद्यापीठांचे वा संचालनालयाचे कोणतेही नियंत्रण नाही. बहुतांश कॉलेजांमधून अनुदानित कॉलेजांसाठीचे मनुष्यबळ आणि पायाभूत सुविधा वापरून 'विनाअनुदानित'चे अभ्यासक्रम चालविले जातात. मात्र, या अभ्यासक्रमांमधून गोळा होणारे शुल्क हे 'विनाअनुदानित'च्या नावाखाली थेट संस्थेकडे गोळा होत आहे. अशा आर्थिक व्यवहारांची कोणतीही पडताळणी राज्यात होत नाही. अनुदानित अभ्यासक्रमांसाठी एकीकडे गुणवत्तेच्या लेखापरीक्षणाचा (अॅकॅडमिक ऑडिट) विचार होत असताना, विनाअनुदानित अभ्यासक्रमांचे असे लेखापरीक्षण करण्याकडे संचालनालयासह संस्थाचालकांचाही विरोध असल्याची माहिती या निमित्ताने समोर आली.

'अनुदानित'च्या सुविधा, 'विनाअनुदानित'ची फी
विनाअनुदानित अभ्यासक्रमांसाठी शुल्कनिश्चिती करण्याची बाब विद्यापीठांच्या अखत्यारित असल्याचे संचालनालयाकडून सांगण्यात येत आहे. मात्र, अनुदानित कॉलेजांमधील विनाअनुदानित तुकड्यांसाठी सरकारी अनुदानाच्या आधारे उभारण्यात आलेल्या सुविधांचाच विचार केला जातो. विनाअनुदानितसाठी ग्रंथालयासारख्या सुविधा स्वतंत्रपणे उभारल्या जात नाहीत, स्वतंत्र आणि पुरेसे मनुष्यबळही पुरविले जात नाही. असे असताना, विनाअनुदानित अभ्यासक्रमांसाठी प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांकडून मात्र किमान दुप्पट शुल्क आकारले जात आहे. संचालनालयातील वरिष्ठ अधिकारी या बाबी कबूल करत असले, तरी त्यावर नियंत्रण आणण्याविषयी मात्र असमर्थता दर्शवित आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पुणे बार असोसिएशनचा आंदोलनाचा इशारा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
अटकपूर्व जामीन मंजूर असतानाही एका वकिलाला अटक केल्याच्या प्रकरणाचा वकिलांनी निषेध केला असून पौड पोलिस स्टेशनचे पोलिस उपनिरीक्षक एन. एस. मोरे यांना त्वरित निलंबित करण्यात यावे, अन्यथा तीव्र आंदोलन केले जाईल, असा इशारा पुणे बार असोसिएशनतर्फे देण्यात आला आहे. दरम्यान पुणे ग्रामीण पोलिस अधीक्षक डॉ. जय जाधव यांनी कोर्टात हजर राहून माफी मागितली असल्याची माहिती, पुणे बार असोसिएशनचे अध्यक्ष वाय. जी. ऊर्फ आबासाहेब शिंदे यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली.
पत्रकार परिषदेस उपाध्यक्ष अॅड. चेतन शेवाळे, सचिव अॅड. सत्यजित तुपे आदी पदाधिकारी उपस्थित होते. विनयभंग दाखल झाल्याच्या गुन्ह्यात अटकपूर्व जामीन मंजूर असतानाही अॅड. आकाश मारणेला पौड पोलिसांनी अटक केली. कोर्टाकडून जामीन मंजूर असतानाही मारणेला अटक करण्यात आली. मारणेला बेकायदा अटक करण्यात आल्याच्या प्रकाराचा पुणे बार असोसिएशनतर्फे सोमवारी सभा घेऊन निषेध करण्यात आला. अॅड. मारणेला अटक केलेल्या पोलिस उपनिरीक्षकाला निलंबित करण्याच्या मागणीचा ठराव एकमताने या सभेत मंजूर करण्यात आला आहे. या ठरावाची प्रत विशेष न्यायाधीश मंगला धोटे, राज्याचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देण्यात येणार असल्याची माहिती अॅड. शिंदे यांनी या वेळी दिली. वकिलाला चुकीच्या पद्धतीने अटक केलेल्या घटनेचा निषेध बार असोसिएशन करत आहे. मात्र, असोसिएशन कोणत्या गुन्हेगारी, अपप्रवृत्तीला पाठीशी घालणार नाही. यासंबंधी व्हॉट्‌सअप, फेसबुकच्यासारख्या सोशल मीडियाच्या माध्यमातून मेसेज टाकून विनाकारण वकिलांची बदनामी करण्यात येत आहे. असे कोणतेही लेखन प्रसारित करू नये, असे आवाहन अॅड. शिंदे यांनी या वेळी व्यक्त केले.
तसेच संबंधित वकील दोषी असेल तर त्याला कोर्टाकडून योग्य ते शासन होईल, त्याच्या चुकीचे आपण समर्थन करणार नाही. मात्र कायद्याचा अवमान करून त्याला अटक करण्यात आली, या प्रकाराचा आपण निषेध करत आहोत, असे अॅड. शिंदे यांनी सांगितले.
अटकपूर्व जामीन मंजूर असतानाही अटक केल्याप्रकरणी कोर्टाने ग्रामीण पोलिस अधीक्षक डॉ. जय जाधव यांना कोर्टात हजर राहून म्हणणे मांडण्याचा आदेश दिला होता. ग्रामीण अधीक्षक डॉ. जय जाधव सोमवारी कोर्टात हजर झाले.

न्यायालयात कडक पोलिस बंदोबस्त
जामीन मंजूर असतानाही वकिलाला अटक केल्याच्या घटनेमुळे वकील वर्गात नाराजी होती. ग्रामीण पोलिस अधीक्षक डॉ. जय जाधव कोर्टात हजर राहणार होते. त्यामुळे कोणताही गोंधळ होऊ नये, यासाठी कोर्टात मोठ्या प्रमाणावर पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रांका हॉस्पिटलमध्ये तोडफोड

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
अपघातामध्ये जखमींवर उपचार करण्यास टाळाटाळ करत असल्याचा गैरसमज झाल्याने सहा ते सात जणांच्या टोळक्याने रांका हॉस्पिटलच्या डॉक्टरांना शिवीगाळ करत तोडफोड केली. रविवारी रात्री सव्वा बाराच्या सुमारास हा प्रकार घडला. या प्रकरणी सात जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत डॉ. सर्वेश यादव यांनी तक्रार दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मित्रमंडळ चौकात दोन तरुणाच्या दुचाकीला अपघात झाला होता. जखमी झालेल्या दोघांनी मद्यपान केलेले होते. त्यांना तत्काळ रांका हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी त्यांच्यावर प्राथमिक उपचार करून त्यांची माहिती घेण्याचा प्रयत्न केला. त्या वेळी उपचार करण्यास टाळाटाळ करत असल्याचा समज झाल्यामुळे काही जणांनी या ठिकाणी गोंधळ घातला. डॉक्टरांना शिवीगाळ केली. ते जखमींना दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये घेऊन निघाले. जखमींसोबत असेलल्यांपैकी एकाने हॉस्पिटलच्या काचेवर दगड फेकून मारला. यामध्ये हॉस्पिटलचे नुकसान झाले म्हणून तक्रार दाखल करण्यात आली आहे. या प्रकरणी सहायक पोलिस निरीक्षक व्ही. आर. गौड तपास करत आहेत.
दरम्यान, अपघातामध्ये जखमी झालेले दोन्ही तरुण हे मूळचे बीडचे राहणारे आहेत. त्यांच्यापैकी एक जण नुकताच पुण्यात आला होता. मित्र मंडळ चौकाजवळ त्यांच्या दुचाकीला धडक दिल्याप्रकरणी स्वारगेट पोलिस ठाण्यात दुसरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोघांची प्रकृती ठीक आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘मसाप, सातारा’ शाखेची कार्यकारिणी बरखास्त

$
0
0

आर्थिक गैरव्यवहार, निवडणुकीतील अनियमितता भोवली

म. टा. प्रतिनिधी, पुणे
कार्यकारिणीवरील व्यक्तींना आपल्या पदाविषयी माहिती नसणे, आर्थिक गैरव्यवहार तसेच तेवीस वर्षे निवडणूक न होणे, अशा तक्रारी असतानाही कारभार करणाऱ्या महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या सातारा शाखेची कार्यकारिणी रविवारी बरखास्त करण्यात आली. परिषदेचे अध्यक्ष डॉ. रावसाहेब कसबे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
सातारा शाखेच्या निमित्ताने सर्व शाखांची झाडाझडती करण्यात येणार असून, पुढील तीन महिन्यांत आर्थिक व कार्यविषयक अहवाल सादर करण्याच्या सूचना सभेत करण्यात आल्या. या बैठकीला परिषदेच्या विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष डॉ. शिवाजीराव कदम, कार्यकारी विश्वस्त उल्हास पवार, उपाध्यक्ष निर्मला ठोकळ, कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, प्रमुख कार्यवाह प्रकाश पायगुडे, कोषाध्यक्ष सुनीताराजे पवार तसेच सभासद उपस्थित होते.
परिषदेच्या सातारा शाखेची १९९३पासून निवडणूक झालेली नाही. मधुसूदन पत्की २०१२ पासून या शाखेचे अध्यक्ष असून, अकरा लोकांची कार्यकारिणी आहे. मात्र, यातील अनेकांना आपण कार्यकारिणीमध्ये आहोत हेच माहीत नसल्याचे समोर आले आहे. तसेच, शाखेने १९९३पासून बैठकीचे इतिवृत्त, हिशेब सादर केलेला नाही. परिषदेच्या पावतीपुस्तकाचा वापर करण्यात आला असून, रक्कम अद्याप जमा झालेली नाही. अशा तक्रारींवरून निरीक्षक राजन लाखे यांनी कार्यकारिणीशी पत्रव्यवहार केला. या प्रकरणाचे पडसाद बैठकीत उमटले. त्यानुसार सातारा शाखेची कार्यकारिणी बरखास्त करण्याचा निर्णय घेण्यात आला.
आर्थिक अनियमितता आणि गैरव्यवहाराच्या तक्रारीत प्रथम दर्शनी तथ्य आढळल्याने ही कारवाई करण्यात आल्याचे परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. जोशी यांनी सांगितले. तसेच, या तक्रारीनुसार आर्थिक व्यवहाराची सखोल चौकशी करण्याचा निर्णय घेण्यात आला असून, परिषदेच्या सर्व ७० शाखांची झाडाझडती घेण्यासाठी जिल्हा प्रतिनिधींना अधिकार देण्यात आले आहेत. शाखांचे कामकाज कसे चालू आहे, आर्थिक बाबी याबाबतचा वस्तुस्थितीदर्शक अहवाल पुढील तीन महिन्यांत परिषदेला सादर करण्याचे आदेश देण्यात आल्याचे जोशी यांनी सांगितले. गैरव्यवहार आढळले तर दोषींवर कारवाई करण्यात येईल. मात्र, साहित्य चळवळ थांबू नये यासाठी शाखा बंद होणार नाहीत. सातारा शाखेसाठी अॅड. प्रमोद आडकर यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आली असून, अहवालानुसार तीन महिन्यांच्या आत नवीन कार्यकारिणी निवडण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली. विशेष म्हणजे जोशी यांचे सभासदत्व कायमस्वरूपी रद्द करण्यात यावे, अशी जोरदार मागणी पत्की यांनी गेल्या वार्षिक सभेत केली होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘सार्व. गणेशोत्सवाचे संस्थापक भाऊ रंगारी’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

भाऊसाहेब रंगारी यांनी १८९२मध्ये सार्वजनिक गणेशोत्सवाची मुहूर्तवेढ रोवली; त्यानुसार यंदा सार्वजनिक गणेशोत्सवाला १२५वर्षे पूर्ण होत आहेत. सार्वजनिक गणेशोत्सवाचे संस्थापक लोकमान्य टिळक नसून, भाऊसाहेब रंगारी आहेत,' असा दावा भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्टने सोमवारी पत्रकार परिषदेत केला.
'लोकमान्य टिळकांनी गणेशोत्सव चळवळ मोठी केली. त्यांचे काम मोठे आहेच; पण सार्वजनिक गणेशोत्सव भाऊसाहेबांच्या नावे ओळखला जावा. सरकारने सार्वजनिक गणेशोत्सवाचे १२५वे वर्ष पुढील वर्षी साजरे न करता यंदा करावे. तसा बदलही पाठ्यपुस्तकांत करावा,' अशी मागणी ट्रस्टतर्फे करण्यात आली. वैद्य भाऊ लक्ष्मण जावळे अर्थात भाऊसाहेब रंगारी यांनी ब्रिटिशांच्या विरोधात स्फुल्लिंग चेतवण्यासाठी १८९२मध्ये सार्वजनिक गणेशोत्सवाला सुरुवात केली. लोकमान्य टिळकांनी या गणेशोत्सवाची दखल घेऊन केसरीच्या २६ सप्टेंबर १८९३ च्या अंकात एक स्फूट लिहून उपक्रमाचे कौतुक केले. पुढे १८९४मध्ये लोकमान्यांनी सरदार विंचुरकर वाड्यात गणेशोत्सवाला सुरुवात केली. ही नोंद असल्याचा पुरावा ट्रस्टला मिळाल्याचा दावा करीत विश्वस्त सूरज रेणुसे यांनी पुरावा म्हणून केसरीचा अंक पत्रकार परिषदेत सादर केला. ट्रस्टचे अध्यक्ष सुनील कुलकर्णी, सचिव राजेंद्र गुप्ता, दत्तात्रय माने आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


फेरपरीक्षा उत्तीर्णांसाठी विशेष फेरीचे आयोजन

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
दहावीच्या जुलैच्या फेरपरीक्षेमध्ये उत्तीर्ण होणाऱ्यांसाठी अकरावीला प्रवेश घेता येण्यासाठी एक विशेष प्रवेश फेरी घेण्यात येणार आहे. या फेरीचे वेळापत्रक लवकरच जाहीर करण्यात येईल, अशी माहिती शिक्षण उपसंचालक दिनकर टेमकर यांनी सोमवारी दिली.
दहावीच्या फेरपरीक्षाचा निकाल आज, मंगळवारी ३० ऑगस्ट रोजी जाहीर झाल्यानंतर उत्तीर्ण होणाऱ्यांचे शैक्षणिक वर्ष वाया जाऊ नये म्हणून अकरावी प्रवेशासाठी ही विशेष फेरी घेण्यात येणार आहे. या फेरीचे वेळापत्रक लवकरच जाहीर करण्यात येणार आहे. राज्य सरकारने मार्च महिन्यात दहावीच्या परीक्षेत अनुत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांचे वर्ष वाया जाऊ नये म्हणून गेल्या वर्षीपासून दहावीची फेरपरीक्षा जुलै महिन्यात घेण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाने ही परीक्षा घ्यायला सुरुवात झाली.
गेल्या जुलै महिन्यात झालेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर झाल्यानंतर उत्तीर्ण विद्यार्थ्यांना पिंपरी-चिंचवड व पुणे महापालिका क्षेत्रातील अकरावीच्या कॉलेजात प्रवेश मिळाला पाहिजे, यासाठी ही विशेष फेरी होणार आहे. या फेरीमध्ये अकरावी केंद्रीय ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेमध्ये आतापर्यत सहभागी न झालेल्या विद्यार्थ्यांचा समावेश केला जाणार आहे, असे टेमकर यांनी सांगितले.
दरम्यान, अकरावी केंद्रीय प्रवेश नियंत्रण समितीने प्रवेश प्रक्रियेच्या तिसऱ्या विशेष फेरीमधून एक हजार ७१९ विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात आला. त्यापैकी सोमवारपर्यत ९४० विद्यार्थ्यांनी पसंतीच्या कॉलेजात प्रवेश घेतला आहे. समितीने ४ विद्यार्थ्यांचे पसंतीक्रमाचे अर्ज रद्द केले आहे. त्यामुळे उर्वरित ७७५ विद्यार्थ्यांना आज मंगळवारी ३० ऑगस्ट सकाळी अकरा ते पाच या वेळेत प्रवेश घ्यायचा आहे, असे समितीने सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

उच्चभू भागांत डेंगीचा प्रादुर्भाव

$
0
0

मॉडेल कॉलनी, भांडारकर, प्रभात रस्त्यावर सर्वाधिक पेशंट

म. टा. प्रतिनिधी,पुणे
शहराच्या मध्यवस्तीतील प्रभात रस्ता, भांडारकर रस्ता, मॉडेल कॉलनी, फर्ग्युसन रस्ता, आपटे रस्ता, जंगली महाराज रस्ता, लॉ कॉलेज रस्ता या भागातील सोसायट्यांमध्येच सर्वाधिक डेंगीचे पेशंट आढळत असल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे.
शहरात सर्वत्र डेंगीचे पेशंट आढळत असल्याने पालिकेच्या आरोग्य विभागावर टीका झाली होती. त्यानंतर डेंगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी पालिकेच्या आऱोग्य विभागाने शहराच्या विविध भागांचे सर्वेक्षण करण्याचे नियोजन केले. प्रत्येक क्षेत्रीय कार्यालयांतर्गत वीस कर्मचारी यासाठी देण्यात आले होते. त्यांच्या माध्यमातून सर्वेक्षण करण्यात आले. १६ ते २६ ऑगस्ट दरम्यान झालेल्या सर्वेक्षणाची माहिती उपलब्ध झाली आहे.
'शहरात सर्वाधिक डेंगीची उत्पत्तीस्थाने घोले रस्ता क्षेत्रीय कार्यालयांतर्गत भागात आढळून आली आहे. त्यात मॉडेल कॉलनी, भांडारकर रस्ता, प्रभात रस्ता, लॉ कॉलेज रस्ता, फर्ग्युसन कॉलेज रस्ता, जंगली महाराज रस्ता, आपटे रस्ता, शिवाजीनगर गावठाण, दीपबंगला चौक, सेनापती बापट रस्ता या भागांचा समावेश आहे. या भागातील सोसायट्यांमध्ये ३३२ घरांमध्ये डेंगीची डासांची अंडी आढळली. त्याशिवाय वडगाव धायरी, वारजे, उत्तमनगर, कोंढवे धावडे, सिंहगड रोड, धनकवडी, बालाजीनगर, बिबवेवाडी, लुल्लानगर, साळुंके विहार, एनआयबीएम रस्ता, कोंढवा, हडपसर, संगमवाडी, ढोले पाटील, नगर रस्ता या भागात सर्वाधिक डेंगींच्या डासांची अंडी आढळली आहेत,' अशी माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाच्या सहायक आरोग्य प्रमुख डॉ. कल्पना बळिवंत यांनी दिली.
..
डेंगीच्या डासांची अंडी आढळणाऱ्या ठिकाणी संबंधित सोसायटी, व्यक्तींना दंड केला जातो. दंड देण्यास अनेक सोसायट्या अथवा व्यक्ती नकार देतात. त्यासाठी आम्ही दंडात्मक स्वरुपाची नोटीस संबंधितांना देतो. दोनदा दंड केल्यास तरीही सुधारणा न झाल्यास मात्र कोर्टात खटला दाखल करण्यात येणार आहे. सप्टेंबर महिन्यात खटले दाखल कऱण्यास सुरुवात होईल.
डॉ. कल्पना बळिवंत, सहायक आरोग्य प्रमुख, कीटक विभाग
............................
शहरातील डेंगीच्या डासांची स्थिती
...........................
क्षेत्रीय कार्यालय ............अंडी आढळलेली ठिकाणे ......... दंडाची ठिकाणे .......... दंडवसुली
औंध .................................. ६८ ......................३ ............................. २६,०००
घोले रस्ता ...............................३३२ ................० ................................. ०
वारजे ............................... ९२ ....................... ६ ....................... ३१००
कोथरूड ...........................९३ ....................... ३ .................... ९५
ढोले पाटील ........................ १८९ ....................... १ ....................... ५००
नगर रस्ता .........................२१७ ......................... २५ ................... ११,८००
संगमवाडी ......................६८ .......................... ३ ......................... ७००
टिळक रोड ................. ११६ .......................१ ............................ १०००
भवानी पेठ .....................१२३ ................... ५ ........................... ७५००
विश्रामबाग वाडा ................ १०५ .................... ९ .................. ३३५०
बिबवेवाडी ................५१ .......................... २० .................... १६,२००
सहकारनगर .............. ४४ ........................ ३ ...................... ७५००
हडपसर .................. १२९ ...................... ४ ......................४२००
धनकवडी ..................... १२५ ........................० .................... ०
कोंढवा वानवडी ............... १९५ ...................... २ .....................७००
..................................................................................................
एकूण ........................... १९४७ ......................... ८५ ................. ९२,०५०

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

डेंगीची १९४७ उत्पत्तीस्थाने

$
0
0

डेंगीचे सर्वेक्षण सुरूच ठेवण्याचा महापालिकेचा निर्णय

म. टा. प्रतिनिधी, पुणे
शहरात गेल्या दहा दिवसांत महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून करण्यात आलेल्या सर्वेक्षणात डेंगीच्या डासांची १,९४७ उत्पत्तीस्थाने आढळली आहेत. आणखी काही दिवसांनी पुन्हा याच ठिकाणांचा शोध घेण्यासाठी तसेच, डेंगी नियंत्रणात येईपर्यंत सर्वेक्षण सुरूच ठेवण्याचा निर्णय आरोग्य विभागाने घेतला आहे.
'डेंगी नियंत्रणासाठी शहरात महापालिकेच्यावतीने सर्वेक्षण सुरू करण्यात आले आहे. साधारणतः डेंगीच्या डासांची अंडी ही घराबरोबर कुंड्यांमध्ये, भंगाराच्या वस्तू, बूट, मनीप्लॅँट, बंगल्याच्या परिसरात, पावसाळी नाले, ड्रेनेजची झाकणे, पाणी नसलेला धबधबा, शुष्क खड्डे, तळी, कारंजे, जलतरण तलाव, तळघर, बांधकामाच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आढळतात. गेल्या दहा दिवसांमध्ये पंधरा क्षेत्रीय कार्यालयांतर्गत येणाऱ्या परिसरात सर्वेक्षण करण्यात आले. त्यात १,९४७ घरांमध्ये डेंगीच्या डासांची अंडी आढळली आहेत,' अशी माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाच्या कीटकविभागाच्या सहायक आरोग्य विभाग प्रमुख डॉ. कल्पना बळिवंत यांनी दिली.
डेंगीचे डास नियंत्रणात येईपर्यंत शहरात डेंगीचे सर्वेक्षण सुरूच ठेवण्यात येणार आहे. शिवाय ज्या ठिकाणची अंडी अथवा डेंगीच्या डासांची उत्पत्तीस्थाने नष्ट करण्यात आली आहे. त्या ठिकाणी पुन्हा काही दिवसांनी सर्वेक्षण करण्यात येईल. उत्पत्तीस्थाने नष्ट केल्यानंतरही अंड्यांची निर्मिती होते अथवा नाही, याचा शोध घेतला जाणार आहे. शहरात आतापर्यंत संशयित १०४२ जणांपैकी १७४ जणांना डेंगीची लागण झाली आहे. चिकुनगुनियाचे २९१ तसेच, मलेरियाचे १२ पेशंट आढळले आहेत, अशीही माहिती डॉ. बळिवंत यांनी दिली.
..
१,९४७
डेंगी डासांची उत्पत्तीस्थाने
८५
दंड केलेली उत्पत्तीस्थाने
रुपये ९२,०५०
वसूल केलेला दंड
१,९४,२८८
दहा दिवसांतील घरांचे सर्वेक्षण
१,०४२
२६ ऑगस्टपर्यंत संशयित डेंगीचे पेशंट
१७२
२६ ऑगस्टपर्यंत डेंगीचे पॉझिटिव्ह पेशंट
..

महिना ............. डेंगीच्या संशयितांची संख्या
जानेवारी ................. ६२
फेब्रुवारी ................... ३०
मार्च ...................... ८
एप्रिल ................. ...१८
मे ........................ ३०
जून ....................... १४०
जुलै ........................ २९५
ऑगस्ट ..................... ४५९

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पठ्ठे बापूराव पुरस्कार शिवणीकर यांना जाहीर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
पुणे महापालिकेच्या वतीने दिल्या जाणाऱ्या लोकशाहीर पठ्ठे बापूराव पुरस्काराची घोषणा सोमवारी महापौर प्रशांत जगताप यांनी केली. २०१५चा पुरस्कार शाहीर हेमंत मावळे यांना तर, यंदाचा पुरस्कार (२०१६) ज्येष्ठ कलावंत प्रभा शिवणीकर यांना प्रदान करण्यात येणार आहे. एक लाख रुपये, शाल, स्मृतिचिन्ह, असे या पुरस्काराचे स्वरुप आहे.
लोककला आणि लोकनाट्य क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींना दरवर्षी महापालिकेच्या वतीने पठ्ठे बापूराव पुरस्काराने गौरविले जाते. १९९५पासून दिला जाणारा हा पुरस्कार आतापर्यंत यमुनाबाई वाईकर, सरोजिनी बाबर, लीला गांधी, शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे, लावणीसम्राज्ञी सुलोचना चव्हाण आदी दिग्गजांना देण्यात आला आहे. याच पुरस्काराबरोबरच लोकनाट्य क्षेत्रातील ज्येष्ठ सहायक कलाकाराला आणि उदयोन्मुख कलाकाराला २१ हजार रुपयांचा पुरस्कार देऊन गौरविले जाते.
२०१५च्या या पुरस्कारांनी पद्मजा कुलकर्णी (भारूड), वैशाली नंदू गांगवे (नृत्यांगणा), बुवा भाऊसाहेब डावळकर (ढोलकी), गोविंद कुडाळकर (तबला), आशाबाई मुसळे (गायिका) यांना गौर​विण्यात येणार आहे. २०१६ चे पुरस्कार सीमा पाटील (शाहीर), ज्ञानेश्वर बंड (ढोलकी), शकुंतला सोनवणे (पार्श्वगायिका), विठ्ठल थोरात राशिनकर (वगनाट्य), रेखा परभणीकर (नृत्यांगणा) यांना प्रदान करण्यात येणार आहेत, अशी माहिती महापौर प्रशात जगताप यांनी दिली. पक्षनेते आणि पुरस्कार निवड समितीच्या बैठकीत एकमताने हा निर्णय घेण्यात आला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कोकणातील विशेष गाड्यांचा प्रवास महाग

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

मध्य रेल्वेकडून गणेशोत्सवासाठी कोकण मार्गावर सोडण्यात विशेष गाड्यांच्या प्रवासासाठी प्रवाशांना नेहमीपेक्षा अधिक दराने तिकीट काढावे लागणार आहे. या गाड्यांचे तिकीट ६० रुपयांनी अधिक असणार आहे. विशेष गाड्यांसाठी अशा प्रकारचे वाढीव शुल्क आकारण्याला रेल्वे प्रवासी ग्रुपने विरोध केला आहे.

प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेत गणेशोत्सवाच्या काळात मध्ये रेल्वे पुणे-झाराप आणि पुणे-रत्नागिरी या मार्गांवर सहा विशेष गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे. एक ते पाच सप्टेंबरदरम्यान या गाड्या धावणार आहेत. त्यांचे तिकीट बुकिंग आज, मंगळवारपासून सुरू होणार आहे. सकाळी आठ ते दहा या वेळेत बुकिंग करता येणार आहे. नेहमीच्या तिकीट दरापेक्षा तिकिटासाठी साठ रुपये अधिक मोजावे लागणार आहेत. तसेच, वेळेत तिकीट न मिळाल्यास प्रवाशांना तत्काळ तिकीट काढावे लागणार आहे. त्या तिकिटाचे दरही अधिक असतात. त्यामुळे कोकणचा विशेष प्रवास प्रवाशांना महागात पडणार आहे.
या गाड्या सायंकाळी पुण्याहून सोडल्यामुळे झारापच्या आधी येणाऱ्या स्टेशनवर उतरणारे प्रवासी आपापल्या मुक्कामी रात्री उशिरा पोचणार आहेत. त्यामुळे त्यांची गैरसोय होण्याची शक्यता आहे, असे मत रेल्वे प्रवासी ग्रुपच्या अध्यक्षा हर्षा शहा यांनी व्यक्त केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘पुरुषोत्तम’मध्ये मर्कटलीला

$
0
0

एकांकिका सुरू असताना दोन माकडे आल्याने आयोजकांची तारांबळ

म. टा. प्रतिनिधी, पुणे
पुरुषोत्तम करंडक स्पर्धेच्या प्राथमिक फेरीचा प्रयोग सुरू असताना रविवारी अचानक रंगमंचावर दोन माकडे आल्याने गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली. रंगमंचाच्या वरील बाजूस असलेल्या लाइट बारवर ही माकडे बराच काळ येऊन बसली. त्यामुळे प्रेक्षकांमध्ये थोडा गोंधळ होऊनही, प्रयोग सुरू राहिला. प्रयोग संपल्यानंतर माकडे आल्यापावली निघून गेली. मात्र, आपल्या उपस्थितीने त्यांनी काही काळ स्पर्धकांसह आयोजकांच्या काळजाचा ठेका चुकवला.
रविवारी सकाळी पुरुषोत्तम करंडकाच्या प्राथमिक फेरीमध्ये एमआयटी महाविद्यालयाचा प्रयोग सुरू होता. सुट्टीचा दिवस असल्याने प्रेक्षागृह खचाखच भरले होते. त्याचवेळी रंगमंचाच्या वरच्या बाजूस असलेल्या मंडपीमधून वाट मिळाल्याने, दोन माकडांनी रंगमंचाजवळ प्रवेश केला. सुरूवातीला पडद्याच्या बारवर काही काळ घालवल्यानंतर दोन्ही माकडे लाइट बारवर येऊन बसली. त्यामुळे प्रेक्षकांना त्यांची कुणकुण लागली. एरव्ही नाटक सुरू असताना सभागृहात भयाण शांताता पसरलेली असते, मात्र माकडांचा सुगावा लागल्यानंतर प्रेक्षकांमधूनही कुजबूज जाणवू लागली. या सगळ्या प्रकारामुळे संयोजकांना नेमके काय करावे कळेनासे झाले, रंगमंचाच्या बाजूच्या विंगेत रंगमंचावर असलेले कलाकार मात्र त्यांच्या कामात गुंग होते. त्यांना वर कबुतरे येऊन काहीतरी करत असावीत असे वाटले. प्रयोग संपल्यानंतर संयोजकांनी कलाकारांना माकडे येऊन बसल्याचे सांगितले. याही आधी एक दोन वेळा स्पर्धेमध्ये माकडांमुळे व्यत्यय आला आहे. मात्र, रविवारी घडलेल्या प्रकारात माकडे रंगमंचावर आली नाहीत, त्यामुळे प्रयोग थांबवण्याची नामुष्की आयोजकांवर ओढवली नाही.
महाराष्ट्रीय कलोपासकचे मंगेश शिंदे म्हणाले, की 'माकडांनी मंडपीत प्रवेश केल्यानंतर सर्वांचीच तारांबळ उडाली. नेमके काय करावे, हे काहीच कळत नव्हते. पुरुषोत्तमच्या परंपरेप्रमाणे प्रयोग सुरू राहणे गरजेचे होते. त्याप्रमाणे तो सुरू राहिला. परंतु, माकडांनी रंगमंचाचा ताबा घेतला असता किंवा त्यांनी प्रेक्षागृहात प्रवेश केला असता, तर परिस्थिती हाताबाहेर गेली असती. सुदैवाने प्रयोग संपेपर्यंत कोणताही धूडगूस न घालता माकडे निघून गेली. मात्र, नाट्यगृहाच्या व्यवस्थापनाने अशाप्रकारच्या घटना होऊ नयेत यासाठी प्रयत्न करून मंडपीची​ डागडुजी करणे गरजेचे आहे. '

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

देशात इतिहासाबाबत जागृती कमी

$
0
0

शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांची खंत

म. टा. प्रतिनिधी, पुणे

समर्थ पुणे परिवारातर्फे पहिला 'समर्थ पुणे पुरस्कार' इतिहास संशोधक पांडुरंग बलकवडे यांना पुरंदरे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. संतसाहित्याचे अभ्यासक डॉ. सदानंद मोरे, खासदार अनिल शिरोळे, समर्थ परिवाराचे सुनील शितोळे, जगन्नाथ लडकत या वेळी उपस्थित होते.
'अभ्यासासाठी लंडन येथे असताना एक पत्र पाठवायचे होते. पत्राला तिकीट चिकटवताना गडबडीत उलटे लागले. ते तिकीट ब्रिटनच्या राणीचे होते. ते उलटे लागल्याने राणीचे डोके खाली झाले होते. त्या वेळी तेथे काम करणाऱ्या महाविद्यालयीन मुलीने मला ते तिकीट सरळ लावायला सांगितले. तसेच फ्रान्समधील एका संग्रहालयात सातशे वर्षांपूर्वी झालेल्या विजयी लढाईचे प्रतीक म्हणून एक तुटकी तलवार जतन करून ठेवली आहे,' असे संदर्भ देऊन पुरंदरे यांनी 'आपल्याकडे याबाबतीत जागृती कमीच आहे,' अशी टीका केली.
'इतिहास मांडताना काही चुका होऊ शकतात. त्यांचा बाऊ न करता योग्य अभ्यासानिशी त्या दुरुस्त करायला हव्यात. मतभेद असायला हवेत परंतु ते समजुतीने घ्यायला हवेत आणि सातत्याने कार्यरत राहायला हवे. इतिहासाची कुचेष्टा करता कामा नये,' असेही ते म्हणाले. सत्काराला उत्तर देताना बलकवडे म्हणाले, 'शिवरायांनी स्वतःमध्ये आदर्श व्यक्तिमत्व घडविले, मग आदर्श समाज निर्माण केला. शिवरायांनी जे राज्य निर्माण केले, ते आपल्याला स्वातंत्र्याच्या सत्तर वर्षांत निर्माण करणे जमले नाही. पेशवे दप्तरात ५ कोटी ऐतिहासिक कागद उपलब्ध आहेत, त्यातील केवळ लाख-दोन लाख कागदांवर अभ्यास झाला आहे. सध्या जात, प्रांताच्या चष्म्यातून इतिहास पाहिला जात आहे, त्यामुळे चांगले इतिहास संशोधक निर्माण झाले पाहिजेत.' सूत्रसंचालन स्वाती महाळंक यांनी केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


सजली फ्लेक्सची बाजारपेठ

$
0
0

कपडे, दागिन्यांबरोबरच कुमठेकर रस्त्याला मिळाली नवी ओळख

Chintamani.Patki@timesgroup.com
पुणे : कपडे आणि दागिने म्हटले की डोळ्यासमोर उभा राहतो लक्ष्मी आणि कुमठेकर रस्ता... दसरा, दिवाळी आणि लग्नसराईची खरेदी या भागाशिवाय पूर्णच होऊ शकत नाही. ही ओळख कायम असताना कुमठेकर रस्त्याने आता आणखी एक ओळख निर्माण केली आहे. ती म्हणजे फ्लेक्स व डिजिटल प्रिंटिंगची बाजारपेठ.
अत्यंत आधुनिक तंत्रज्ञानासह सर्व प्रकारच्या प्रिंटिंगचे काम येथील दुकानांमधून होत असल्याने 'डिजिटल रस्ता' अशी नवी ओळख कुमठेकर रस्त्याला मिळाली आहे. कुमठेकर रस्त्यावरून पेशवाई क्रिएशनपासून पुढे जाऊ लागलो की रस्त्याच्या दुतर्फा डिजिटल प्रिटिंगची दुकाने लक्ष वेधून घेतात. पुढे बिझीलँड बिल्डिंगपर्यंत ही दुकाने थाटलेली दिसून येतात. या पट्ट्यात छोटी-मोठी साधारण वीस दुकाने असून, डिजिटलची ही नवी बाजारपेठ विकसित झाली आहे. सध्याचे युग हे जाहिरातीचे असल्याने ही बाजारपेठ दिवसेंदिवस बहरत आहे.
जाहिरातीचे क्षेत्र मोठे असल्याने या बाजारपेठेतून कोट्यवधी रुपयांची उलाढाल होत आहे. तसेच या माध्यमातून मोठा रोजगार निर्माण झाला आहे. कुमठेकर रस्त्यावर असणाऱ्या स्वामी समर्थ डिजिटलचे प्रमुख महेंद्र भावसार यांनी या व्यवसायाविषयी 'मटा'ला माहिती दिली. ते म्हणाले, की 'फ्लेक्स व कॅनव्हास प्रिटिंगचे सर्व प्रकार याठिकाणी उपलब्ध आहेत. प्रिंटिंगच्या कामाला पुणे जिल्ह्यासह विविध भागातून मोठ्या प्रमाणावर मागणी असते. डिजिटलमुळे अत्यंत आधुनिक तंत्रज्ञानावर हे काम होते. त्यामुळे सात लाखांपासून ते तीन कोटींपर्यंतच्या मशिनवर काम चालते. आपल्याकडे कैक लाखांच्या मशिन वापरल्या जातात. जाहिरातीच्या क्षेत्राचे काम बाराही महिने सुरू राहणारे असले तरी, प्रामुख्याने गणपती, दसरा व दिवाळी या काळात मोठी मागणी असते. कॉर्पोरेट क्षेत्राकडून सर्वांत जास्त मागणी असते.'
या व्यवसायामध्ये काम करणाऱ्या कुशल कामगारांविषयी भावसार म्हणाले की,'या व्यवसायासाठी कोणत्याही शिक्षणाची अट नाही. इच्छा असेल तर हे काम एका महिन्यात शिकता येते. दुकानांमधून एका महिन्यात कुशल कामगार तयार होतात. मात्र, त्यासाठी कम्प्युटर व प्रिंटिंगचे ज्ञान आवश्यक आहे. प्रिंटिंगचा व्यवसाय पूर्णत: वेगळा असल्याने या व्यवसायाचा परिणाम ऑफसेट व्यवसायावर झालेला नाही.'
------------------------
नेत्यांवर व्यवसाय अवलंबून
जाहिरातीच्या फ्लेक्सपेक्षा वाढदिवसाच्या फ्लेक्सचे प्रमाण वाढत असल्याने बाजारपेठच नेत्यांच्या वाढदिवसावर अवलंबून असल्याचे चित्र आहे. वाढदिवसाच्या फ्लेक्सला अगदी ग्रामीण भागातूनही मोठ्या प्रमाणात मागणी असून, अनेकजण चौकात आपला फ्लेक्स लावून झळकून घेण्याची संधी साधतात. याबरोबरच लग्नाच्या फ्लेक्सचे तसेच लग्नाच्या पत्रिकेच्या फ्लेक्सचे नवीन आकर्षण लोकांमध्ये रूजत आहे. त्यामुळे जाहिरातीबरोबरच अशा कारणांसाठी डिजिटलची बाजारपेठ कायम गजबजलेली दिसून येते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कुख्यात गुन्हेगार ‘केडी’चा खून

$
0
0

चिखलीतील पूर्णानगर येथील खळबळजनक घटना

म. टा. प्रतिनिधी, पिंपरी
सातारा आणि पुणे जिल्ह्यात अनेक गंभीर गुन्हे दाखल असलेल्या सराईत गुन्हेगार कृष्णा हनुमंत डांगे ऊर्फ केडीचा तलवारीने वार करून चिखली येथील पूर्णानगर येथे खून करण्यात आला. सोमवारी रात्री साडेसातच्या सुमारास ही घटना घडली.
कृष्णा हनुमंत डांगे ऊर्फ केडी (३५, रा. उंब्रज, ता, कराड, जिल्हा सातारा) असे खून झालेल्या सराईत गुन्हेगाराचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कृष्णा हा मूळचा कराडचा रहिवासी आहे. त्याच्यावर दहा ते बारा गुन्हे दाखल आहेत. महिन्याभरापूर्वी तो कोल्हापूर कारागृहातून सुटला होता. सध्या तो गणराज हौसिंग सोसायटी, चिंचवड येथे राहत होता.
सोमवारी साडेसातच्या सुमारास तो पूर्णानगर येथून दुचाकीवरून जात असताना स्वीफ्ट डिझायर मधून आलेल्या हल्लेखोरांनी केडीचा पाठलाग सुरू केला. केडीच्या दुचाकीला धडक देऊन खाली पाडल्यानंतर हल्लेखोरांनी त्याच्या धारदार शस्त्रांनी वार केले. या वेळी पिस्तूलातून गोळीबार करण्याचा प्रयत्न झाला. एक मॅगझिन घटनास्थळी आढळून आले.
भरचौकात घडलेल्या या प्रकाराने परिसरात एकच खळबळ उडाली. त्याच्यावर अज्ञातांनी तलवारीने वार केले. केडीवर सातारा, उंब्रज, पुणे ग्रामीण भागात दरोडा, मारहाणी, सोनाराला लुटले आदी स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बसची काच फोडणारी महिला ताब्यात

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पिंपरी

बसमध्ये चढत असताना पुढील दरवाजातून चढण्यास मनाई केल्याच्या कारणावरून एका प्रवासी महिलेने बसची काच फोडून शिवीगाळ केली. या महिलेने पोलिसांनाही शिवीगाळ करत धक्काबुक्की केली. या प्रकरणात चिंचवड पोलिसांनी महिलेस ताब्यात घेण्यात आले आहे. चिंचवडमधील हॉटेल रिव्हर व्ह्यू जवळील बसस्टॉपजवळ सोमवारी सकाळी हा प्रकार घडला.

सुरेखा मळू गेरंगे (३५, रा. साखरेवस्ती, नारायणनगर, वाकड) असे ताब्यात घेण्यात आलेल्या महिलेचे नाव आहे. या प्रकरणात बसचालक अच्युत पांडुरंग दोडके (रा. श्रीनगर, आदिनाथ कॉलनी, काळेवाडी) यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी सकाळी चिंचवडमधील हॉटेल 'रिव्हर व्ह्यू'जवळील बसथांब्यावर बस थांबली. या वेळी गेरंगे यांनी बसच्या पुढील दारातून चढण्याचा प्रयत्न केला असता दोडके यांनी त्यांना हटकले. त्या वेळी दोघांमध्ये वाद झाला. दरम्यान, गेरंगे यांनी बसचालकाला शिवीगाळ करून खाली उतरून बसच्या काचेवर दगड मारला. पोलिस नियंत्रण कक्षाला माहिती दिली असता पोलिस त्या ठिकाणी दाखल झाले. गेरंगे यांनी दोन महिला पोलिसांनाही शिवीगाळ करत धक्कबुक्की केली. चिंचवड पोलिस तपास करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पतीने दिले पत्नीला सिगारेटचे चटके

$
0
0

पुणे : महिलेला दारू पाजून मित्रांसोबत शरीरसंबंध ठेवण्यासाठी छळ केल्याचा धक्क्कादायक प्रकार वानवडी परिसरात उघडकीस आला आहे. महिलेने या प्रकाराला विरोध केल्यामुळे पतीने तिला सिगारेटचे चटके दिल्याचे तिने तक्रारीत म्हटले आहे. या प्रकरणी पती, सासू आणि नणंद यांच्यावर वानवडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत ३५ वर्षीय पीडित महिलेने तक्रार दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार महिलेच्या पतीला दारूचे व्यसन आहे. त्याचे पहिले लग्न झालेले आहे. त्याची पहिली पत्नी इमारतीवरून तोल जाऊन पडल्याने मृत झाली आहे. तिला दोन मुली आहेत. आरोपीचे पीडित महिलेशी २०१३ मध्ये लग्न झाले आहे.

लग्नाच्या वेळी तक्रारदार महिलेच्या कुटुंबीयांनी तिला २१ तोळे सोने दिले होते. ते सोनेही आरोपी तिच्याकडून घेतले आहे. आरोपी पती तिला दारूच्या नशेत मारहाण करून मानसिक छळ करत होता. फेब्रुवारी ते मार्च महिन्यात आरोपीने तक्रारदार महिलेला अश्लील व्हिडिओ दाखवून तिचा शारीरिक छळ केला. तसेच, तिला मित्रांसोबत शारीरिक संबंध ठेवण्यासाठी जबरदस्ती केली. पीडित महिलेने याला विरोध केला असता तिला आरोपीने तिला सिगारेटचे चटके दिले. तसेच, तिला जबरदस्तीने दारूही पाजल्याचे तिने तक्रारीत म्हटले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पिंपरीत कारचोरीचे प्रकार थांबेनात

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पिंपरी

चोरट्यांनी कार चोरून नेत असताना गस्तीवरील पोलिसांना संशय आल्याने गाडी थांबवण्याचा प्रयत्न केला. मात्र, गाडी न थांबवता चोर पळून गेले. पोलिसांनी त्यांचा पाठलाग केला; पण चोर त्यांच्या हाती लागले नाहीत. या चोर-पोलिसांच्या खेळात चोरांचा विजय झाला. निगडी साईनाथ नगर ते मोशी चौक येथे रविवारी हा प्रकार घडला.

निगडी येथील साईनाथ नगरमध्ये राहणारे संतोष गेंदालाल लोढा यांची सिल्व्हर कलरची वॅगनार (एमएच १२ सीडी १०७२) मोटार रात्री नऊच्या सुमारास बंद पडली. त्यामुळे त्यांनी ही मोटार अमृतानंदमयी मठाजवळील नंदकिशोर कपोते हॉलजवळ लॉक करून उभी केली. पहाटे तीनच्या सुमारास चोरांनी ही गाडी चोरून नेली. गस्तीवरील पोलिसांना संशय आल्याने त्यांनी या गाडीचा पाठलाग केला.

पोलिस गाडीचा पाठलाग करत असल्याचे पाहून चोरट्यांनी मोटार कार चिंचवडच्या दिशेने नेली. पोलिसांनी चोरांना थांबण्याचा इशारा केला. मात्र, चोरट्यांनी गाडी थांबवली नाही. चोरांनी पोलिसांना पिंपरी, काळेवाडी, पिंपळे सौदागर मार्गे नाशिक फाट्यापर्यंत आले. संशयास्पद कार निगडी पोलिसांना गुंगारा देत असल्याचे त्यांनी नियंत्रणकक्षाला कळविले होते. त्यामुळे चिंचवड, सांगवी, भोसरी पोलिसांनीही गाडीचा पाठलाग सुरू केला. पोलिसांचा पाठलाग सुरू असल्याचे पाहून चोर भोसरीच्या दिशेने पळाले. परंतु भोसरीतील लांडेवाडी येथे गाडीचा पाठलाग करीत पोलिस आले असता त्यांना गाडी दिसली नाही. त्यामुळे पोलिसांनी त्यांचा या परिसरात शोध घेतला. चोर दुसऱ्या रस्त्याने पळून जाण्यात यशस्वी झाले. त्यामुळे या चोर-पोलिसांच्या खेळात चोर यशस्वी ठरले.

चोरीचे प्रमाण वाढले

गेल्या काही दिवसांपासून पिंपरी-चिंचवड आणि परिसरातून कार चोरीला जाण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. मध्यंतरी चोरट्यांनी इनोव्हा कारला आपले लक्ष बनविल्याचे उघड झाले होते. त्यानंतर आता सँट्रो कार चोरीचा प्रकार उघड झाला आहे. दरम्यान, लोढा यांच्या घरी पोलिस गेले. त्यांच्याकडे गाडीची चौकशी केली. त्या वेळी लोढा यांनी गाडीमध्ये बिघाड झाल्याने कपोते हॉलसमोर उभी केल्याचे सांगितले. पोलिस ज्या ठिकाणी पार्क केली होती त्या ठिकाणी आले. परंतु गाडी नसल्याचे लोढा यांच्या लक्षात आले. त्या वेळी पोलिसांनी तुमची गाडी चोरीला गेली असून आमचे पोलिस चोरांचा पाठलाग करीत असल्याचे सांगितले. तसेच पोलिसांनी त्यांना मोशी टोल नाक्यापर्यंत जाऊन गाडी शोधण्यास सांगितली. मात्र, गाडी मिळून आली नाही.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images