Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

आमदारांची पगारवाढ योग्यच

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

विधिमंडळात सर्वपक्षीय आमदारांनी एकमताने पगारवाढ मान्य केल्याच्या विरोधात नाराजीचे सूर उमटत असले, तरी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी पगारवाढीचे समर्थन केले आहे. आमदारांची गुणवत्ता वाढवण्यासाठी पगारवाढीचा निर्णय घेण्यात आला असून, इतर राज्यांच्या तुलनेत राज्यातील आमदारांचे पगार कमीच होते, असा खुलासा करूत त्यांनी आमदारांची नाहक बदनामी होत असल्याचा दावा केला.

विधिमंडळाच्या नुकत्याच झालेल्या अधिवेशनाच्या अखेरच्या दिवशी आमदारांची पगारवाढ एकमताने मान्य करण्यात आली. आमदारांच्या पगारवाढीवरून सर्व स्तरांतून टीका केली जात असली, तरी अर्थमंत्र्‍यांनी ही टीका चुकीची असल्याचे सांगितले. विविध भत्ते, वाहन खर्च, टेलिफोन खर्च यामध्ये ही वाढ करण्यात आली असून, नागरिकांचे प्रश्न सोडवण्यासाठीच त्याचा उपयोग होतो, असे ठाम मत मुनगंटीवार यांनी व्यक्त केले. पुणे श्रमिक पत्रकार संघातर्फे आयोजित करण्यात आलेल्या वार्तालाप कार्यक्रमात मुनगंटीवार बोलत होते. पत्रकार संघाचे अध्यक्ष गजेंद्र बडे आणि सरचिटणीस अजय कांबळे या वेळी उपस्थित होते.

आठ आमदार निवडून दिल्यानंतरही शहराच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष होत असल्याचा मुद्दा त्यांनी खोडून काढला. पुणे मेट्रो, पुण्याचा विमानतळ, शहराचा रिंगरोड याबाबत सरकारकडून सकारात्मक पावले टाकली जात असल्याचे त्यांनी नमूद केले. प्रशासकीय कामात काही वेळ जात असल्याने संबंधित निर्णय प्रत्यक्षात येण्यासाठी थोडा अवधी लागेल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

'बदल २०१९पर्यंत दिसतील'

राज्यात शहर आणि ग्रामीण भागांतील रस्त्यांपासून ते विजेपर्यंत आणि नदी स्वच्छतेपासून पर्यावरणापर्यंत विविध क्षेत्रांत भरीव काम सुरू आहे. गेल्या १५ वर्षांतील सरकारचा कारभार पुसून काढण्यासाठी आजवरचा १७-१८ महिन्यांचा कालावधी अत्यंत अपुरा आहे. बदलांसाठी थोडा वेळ द्यावा लागतो आणि २०१९पर्यंत जनतेला हे बदल निश्चित दिसतील, असा ठाम विश्वास मुनगंटीवार यांनी व्यक्त केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


डॅनिश कंपनीचे ‘एक्सलन्स सेंटर’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

'डॅनफॉस इंडिया' या डॅनिश कंपनीने आपल्या 'युनिव्हर्सिटी एंगेजमेंट इनिशिएटिव्ह'चा भाग म्हणून पुण्यातील कॉलेज ऑफ इंजिनीअरिंगमध्ये (सीओईपी) 'सेंटर ऑफ एक्सलन्स'ची स्थापना करण्यात आली. या केंद्राच्या माध्यमातून औद्योगिक क्षेत्रात ऊर्जा बचतीसाठी म्हणून वापरल्या जाणाऱ्या औद्योगिक तंत्रज्ञानाचा प्रत्यक्ष अनुभव सीओईपीच्या विद्यार्थ्यांना घेता येणार आहे.

कॉलेजमध्ये नुकत्याच झालेल्या एका कार्यक्रमात या सेंटरचे औपचारिक उद्घाटन करण्यात आले. 'डॅनफॉस इंडिया'चे अध्यक्ष रवीचंद्रन पुरुषोत्तमन, कॉलेजचे संचालक डॉ. बी. बी. आहुजा यांच्यासह कॉलेजच्या व्यवस्थापन मंडळातील इतर पदाधिकारी या वेळी उपस्थित होते. कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी विकसित केलेल्या 'मिस्ट कुलिंग सिस्टिम' या यंत्रालाही या वेळी अधिकृत मान्यता देण्यात आली. कोणत्याही पंपाशिवाय चालणाऱ्या, प्रदूषणमुक्त आणि ऊर्जा बचतीची क्षमता असलेल्या उपकरणाच्या निर्मितीबद्दल या वेळी विद्यार्थ्यांचे आणि कॉलेजचेही अभिनंदन करण्यात आले.

'डॅनफॉसच्या युनिव्हर्सिटी एंगेजमेंट इनिशिएटिव्ह'ला कॉलेजमधून चांगला प्रतिसाद मिळाल्याविषयी पुरुषोत्तमन यांनी या वेळी समाधान व्यक्त केले. ते म्हणाले, 'विद्यार्थी ऊर्जा बचतीच्या आधारे चांगला आर्थिक विकास आणि वाढ करण्यावर जोर देत आहेत, याचा आम्हाला आनंद होत आहे. नवकल्पनांना चालना देण्यासाठी शिक्षण क्षेत्रातील लोक, सरकारी संस्था आणि बाजारपेठेतील आघाडीच्या कंपन्यांनी एकत्रितरीत्या काम केल्यास या क्षेत्रात प्रगती करणे शक्य आहे.'

'डॅनफॉस'च्या सहकार्याने कॉलेजच्या विद्यार्थ्यांना चांगल्या दर्जाचे संशोधन पुढे आणणे शक्य झाल्याविषयी डॉ. आहुजा यांनी समाधान व्यक्त केले. नव्या सेंटरच्या मदतीने विद्यार्थ्यांना आपल्या कॉलेजमध्ये स्क्रॉल कॉम्प्रेसर, स्टॉप व्हॉल्व्ह्ज, शट ऑफ व्हॉल्व्ह्ज, फिल्टर ड्रायर्स, रेसिप्रोकेटिंग कॉम्प्रेसर्स, सोलोनॉईड व्हॉल्व्ह्ज, ऑटोमॅटिक कंट्रोल्स, प्लेट हिट एक्सचेंजर, इलेक्ट्रॉनिक कंट्रोलर्स आणि इंडस्ट्रीयल रेफ्रिजरेशन कंट्रोल्स आदी यंत्रणांचा थेट अनुभव घेणे शक्य होणार असल्याविषयीही त्यांनी आनंद व्यक्त केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कुख्यात गुंड रजपूत कैद

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

गुजरातेतील बडोदा येथे पुणे पोलिस आणि गजा मारणे टोळीतील कुख्यात गुन्हेगार सागर कल्याण रजपूत (वय ३०, रा. कोथरूड) यांच्यात बुधवारी रात्री चकमक उडाली. या वेळी रजपूत याने केलेल्या गो‍ळीबारात सहायक निरीक्षक रणजित भोईटे आणि पोलिस कर्मचारी दिलीप मोरे हे जखमी झाले असून त्यांची प्रकृती स्थिर आहे. पोलिसांनी केलेल्या गोळीबारात कुख्यात गुन्हेगार रजपूत याच्या दोन्ही पायांना गोळ्या लागल्या. त्या तिघांवरही बडोदा येथे उपचार करण्यात येत आहेत.

सहायक निरीक्षक भोईटे यांच्या डाव्या पायात गोळी घुसली, तर मोरे यांच्या पाठीतून गेलेली गोळी पोटात अडकली आहे. मोरे यांच्यावर शस्त्रक्रिया करून गोळी काढण्यात येणार आहे. या घटनेची माहिती समजाच पुणे पोलिसांचे एक पथक बडोदा येथे दाखल झाले आहे. भोईटे आणि मोरे यांच्यावरील उपचारांवर लक्ष असल्याचे अप्पर आयुक्त सी. एच. वाकडे यांनी सांगितले.

जिगरबाज भोईटे आणि मोरे

गुन्हे शाखेच्या संघटित गुन्हेगारी विरोधी पथकातील (उत्तर विभाग) सहायक निरीक्षक भोईटे आणि मोरे हे रजपूतच्या शोधासाठी चार ऑगस्ट रोजी बडोदा येथे गेले होते. स्थानिक गुन्हे शाखेशी संपर्क साधून त्यांनी त्याचा शोध सुरू केला होता. चार दिवसांच्या मुक्कामांत त्यांनी बडोदा पिंजून काढले होते. ते गुरुवारी रात्री दहाच्या सुमारास नवापुरा परिसरातील नेहरूभवन येथे गेले होते. तेथे त्यांना अचानक रजपूत दिसला. पोलिस कर्मचारी मोरे यांनी रजपूतवर झडप घातली. त्याला घट्ट मिठी मारली. भोईटे तेथे जवळच होते. त्या वेळी दोन्ही हात रिकामे असलेल्या रजपूतने त्याच्याकडील गावठी पिस्तुलातून भोईटे यांच्या दिशेने गोळी झाडली. भोईटे यांच्या डाव्या पायाच्या गुडघ्याला गोळी लागली. मोरे त्याला घट्ट धरून होते. रजपूतने मोरे यांच्या पाठीवर पिस्तुलाची नळी ठेऊन गोळी झाडली. पाठीतून गेलेली गोळी त्यांच्या पोटात जाऊन अडकली. त्या वेळी जखमी भोईटे यांनी आपल्या पिस्तुलातून रजपूतच्या दिशेने गोळीबार केला. मोरे यांनी त्याला पकडून ठेवले असल्याने त्याच्यावर नेम धरण्यास अडचणी येत होत्या. तरीही, भोईटे यांनी आपल्या पिस्तुलातून पाच गोळ्या झाडल्या. त्यातील दोन गोळ्या त्याच्या दोन्ही पायांना लागल्या. तिघेही जखमी तेथेच कोसळले. भोईटे यांनी ही माहिती तात्काळ पुण्यात वरिष्ठ पोलिस निरीक्षक मिलिंद गायकवाड यांना दिली. तसेच, स्थानिक पोलिसांनाही सांगितले. या वेळी बघ्यांची गर्दी मोठ्या प्रमाणात जमली होती. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमींना उपचारांसाठी हॉस्पिटलमध्ये दाखल केले.

कोण आहे रजपूत?

सागर कल्याण रजपूत (वय ३०) हा मूळचा सांगोला येथील असून तो सध्या हनुमाननगर, कोथरूड येथे राहतो. पुण्यातील गँगस्टर नीलेश घायवळ आणि गज्या उर्फ गजाजन मारणे यांच्यात टोळीयुद्ध भडकले होते. मारणे टोळीने घायवळ टोळीतील पप्पू गावडे, अमोल बधे यांचा खून केला. पोलिसांनी महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी प्रतिबंधक कायद्यानुसार (मोक्का) मारणे टोळीवर गुन्हा दाखल केला होता. या गुन्ह्यांत रजपूत आरोपी आहे. पोलिसांना तो सापडत नसल्याने त्याला फरार घोषित करण्यात आले होते. रजपूतवर नऊ गुन्हे दाखल असून त्यात खुनाचे तीन आहेत. यापूर्वीच्या गुन्ह्यांत त्याला तीनदा अटक करण्यात आली होती. तो जामिनावर सुटला होता.

नवापूरला स्वतंत्र गुन्हा दाखल

नवापूरा येथे सहायक निरीक्षक भोईटे आणि रजपूत यांनी एकमेकांच्या दिशेने ११ गोळ्या झाडल्या. नवापूर पोलिसांनी रजपूत विरुद्ध खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल केला आहे. बडोदा पोलिस आयुक्त पी. राधाकृष्णन यांनी आपल्या अधिकाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेऊन जखमींच्या उपचारांसाठी प्रयत्न केले. पुणे पोलिस दलातील उपायुक्त पी. आर. पाटील, वरिष्ठ पोलिस निरीक्षक मिलिंद गायकवाड, फौजदार गायकवाड हे बडोदा येथे पोहोचले आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पुण्याच्या चारही धरणांतून विसर्ग सुरू

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला प्रकल्पातील चारही धरणे भरली असून, या धरणांतून पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. खडकवासला व पानशेत धरणाच्या सांडव्यातून तर वरसगाव व टेमघर धरणामधून विद्युतनिर्मितीसाठी पाणी सोडण्यात आले आहे.
गतवर्षी पावसाने हुलकावणी दिल्यामुळे खडकवासला प्रकल्पात पुरेसा पाणीसाठा होऊ शकला नव्हता. परिणामी पुणे शहराच्या पाणीपुरवठ्यात वर्षभरासाठी तीस टक्के कपात करण्यात आली; तसेच शेतीचे एक आवर्तनही रद्द करण्यात आले. यंदा पावसाने कृपादृष्टी दाखविल्यामुळे खडकवासला प्रकल्पातील चारही धरणे ओसंडून वाहत आहेत.

खडवासला प्रकल्पात सद्यस्थितीत २८.२७ अब्ज घनफूट (टीएमसी) म्हणजे ९६.९७ टक्के पाणीसाठा झाला आहे. गतवर्षी याच काळात धरणांत फक्त १५ टीएमसी (५१ टक्के) पाणीसाठा होता. यंदा गतवर्षीच्या जवळपास दुप्पट पाणीसाठा झाला. खडकवासला प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात अजून पाऊस सुरू आहे. प्रकल्पातील धरणे भरली असल्याने पानशेत धरणातून १,६९८ क्युसेकने विसर्ग करण्यात येत आहे. वरसगाव धरणातून ५७० क्युसेक व टेमघर धरणातून २७५ क्युसेक विसर्ग वीजनिर्मितीसाठी करण्यात येत आहे.

दरम्यान, भीमा खोऱ्यातील प्रमुख पंचवीस धरणांपैकी १९ धरणांमधून पाणी सोडण्यात आले आहे. यामध्ये खडकवासला प्रकल्पातील चार धरणे; तसेच पवना, मुळशी, कासारसाई, आंद्र, वडिवळे, गुंजवणी, नीरा-देवघर, भाटघर, वीर, येडगाव, वडज, डिंभे, घोड, चासकमान, कलमोडी या धरणांचा समावेश आहे. खडकवासला प्रकल्प व कुकडी खोऱ्यातील धरणांतून सोडलेल्या पाण्यामुळे उजनी धरणांचा पाणीसाठा २१.८३ टीएमसी (४० टक्के) झाला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महापालिका अधिकाऱ्यांची आमदारांकडून कानउघाडणी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पिंपरी
भोसरी विधानसभा मतदार संघातील विविध प्रलंबित प्रश्न आगामी महिनाभरात मार्गी लावा, नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी कोणत्याही प्रकारची कारणे नकोत, अशा शब्दांत आमदार महेश लांडगे यांनी पिंपरी-चिंचवड महापालिका अधिकाऱ्यांची शुक्रवारी (१२ ऑगस्ट) कानउघाडणी केली.
भोसरी आणि परिसरातील प्रलंबित विकासकामांसदर्भात महापालिका भवनामध्ये आढावा बैठक घेण्यात आली. या वेळी आमदार लांडगे यांच्यासह महापालिकेचे आयुक्त दिनेश वाघमारे, अतिरिक्त आयुक्त तानाजी शिंदे, शहर अभियंता अंबादास चव्हाण, सहआयुक्त दिलीप गावडे, नगरसेवक शांताराम भालेकर, दत्ता साने, वसंत लोंढे, अरुणा भालेकर, शुभांगी लोंढे, अॅड. नितीन लांडगे, नितीन काळजे उपस्थित होते.
मतदारसंघातील सर्व प्रभागांत पथदिवे, सीसीटीव्ही कॅमेरे, एलर्इडी बल्ब आदी कामांची तात्काळ अंमलबजावणी करावी. त्याबाबत स्थानिक नगरसदस्यांना माहिती द्यावी. करसंकलन कार्यालयासाठी दिघी येथील जागेची पाहणी करुन काम सुरु करावे. आरोग्य विभागाच्या माध्यमातून ओपीडी सुरू करावी. लांडेवाडी परिसरातील डीपी बॉक्सची दुरुस्ती व्हावी, तसेच ६१ मीटर रस्त्यालगत सर्व्हिस रोडचे काम मार्गी लावावे. नाशिक फाटा ते इंद्रायणी नदी, मोशीपर्यंतच्या रस्त्याचा विकास जलद गतीने व्हावा, अशा सूचना या वेळी करण्यात आल्या. भोसरी मतदारसंघातील विकासकामांसाठी तीन महिन्यांतून एकदा होणारी आढावा बैठक आता प्रत्येक महिन्याला होर्इल, असे आमदार लांडगे यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘वायसीएम’मध्ये पदव्युत्तर पदवी

$
0
0

महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाची परवानगी; पूर्ण वेळ वैद्यकीय अधिकारी होणार उपलब्ध
म. टा. प्रतिनिधी, पिंपरी
पिंपरी-चिंचवड महापालिकेमार्फत यशवंतराव चव्हाण (वायसीएम) हॉस्पिटलमध्ये स्वतंत्रपणे पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रम सुरू करण्यास महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाने परवानगी दिली आहे. त्यामुळे हॉस्पिटलमध्ये रुग्णसेवेसाठी नियमितपणे आणि पूर्ण वेळ तज्ज्ञ वैद्यकीय अधिकारी उपलब्ध होण्यास मदत होणार आहे.
महापालिकेमार्फत वायसीएम हॉस्पिटलची स्थापना १९८९ मध्ये झाली. त्या वेळी पिंपरी-चिंचवडची लोकसंख्या केवळ साडेचार लाख होती. आजमितीस शहराची लोकसंख्या २२ लाखांवर पोचली आहे. ती २०३० पर्यंत ३५ लाखांवर जाण्याची शक्यता आहे. याशिवाय येथे जिल्ह्याच्या आजूबाजूच्या भागातूनही रुग्ण उपचारासाठी येत असतात. त्यांना दर्जेदार वैद्यकीय सेवा मिळावी, यासाठी तत्कालिन आयुक्त डॉ. श्रीकर परदेशी यांच्या पुढाकाराने 'व्हिजन-२०३०' आराखडा तयार करण्यात आला होता. त्याचाच एक भाग म्हणून परदेशी यांनी पाठपुरावा करून पोस्ट ग्रॅज्युएट इन्स्टिट्यूट सुरू करण्याबाबत नाशिक येथील आरोग्य विज्ञान विद्यापीठाकडे पाठपुरावा केला होता. त्याबाबतचा प्रस्तावही सादर केला होता. परंतु, त्याला तीन वर्षाचा कालावधी उलटून गेल्यामुळे नव्याने परवानगी घेण्याची वेळ महापालिकेवर आली आहे. त्यापूर्वीही बी. जे. मेडिकर कॉलेजच्या सहकार्याने इन्स्टिट्यूट सुरू करण्याचा प्रयत्न झाला होता. त्याबाबतचे प्रमाणपत्र केंद्र सरकारच्या आरोग्य मंत्रालयाकडून प्राप्त न झाल्यामुळे तो प्रस्ताव बारगळला.
हा अभ्यासक्रम सुरू होण्यासंदर्भात गेल्या महिन्यात नाशिक येथील आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. दिलीप म्हैसकर, नांदेड मेडिकल कॉलेजचे व्याख्याता डॉ. चंद्रकांत मुंगळ यांच्यासमवेत नुकतीच बैठक झाली. त्यामध्ये प्रस्तावाबाबत पुन्हा चर्चा झाली. 'वायसीएम'मध्ये पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रम सुरू करताना महापालिकेचा सहभाग आर्थिक स्वरुपाचा आणि महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचा सहभाग शैक्षणिक स्वरूपाचा असे नियोजन होते. परंतु, केंद्र सरकारकडून परवानगी घेण्यासाठी महापालिकेने स्वतंत्रपणे पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रम राबविणे आवश्यक असल्याचे स्पष्ट करण्यात आले. त्या अनुषंगाने अशा प्रकारचा अभ्यासक्रम सुरू करण्यासाठी सर्वसाधारण सभेची परवानगी घेणे आवश्यक असल्याने तसा प्रस्ताव मंजुरीसाठी ठेवण्यात आला आहे. त्याबाबतचे आवश्यक महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ यांच्याकडे शुल्क भरण्यासही प्रशासनाने तयारी दर्शविली आहे.
नियमित पूर्णवेळ आणि तज्ज्ञ वैद्यकीय अधिकारी उपलब्ध होत नसल्यामुळे 'वायसीएम'मध्ये रुग्णसेवेत अडथळा ठरत आहे. योग्य पद्धतीने उपचार करण्यावर मर्यादा येत आहेत. त्यातून रुग्णांची हेळसांड होण्याची शक्यता निर्माण होते. या तक्रारी वारंवार निर्माण होऊ नयेत, यासाठी पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रम उपयुक्त ठरणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले.
......
मानधन वाढीचा प्रस्ताव सादर
आमदारांच्या वेतनवाढीचा संदर्भ देत पिंपरी-चिंचवड महापालिकेने नगरसेवकांचे मासिक मानधन साडेसात हजार रुपयांहून ५० हजार रुपये करण्याचा प्रस्ताव येत्या २० ऑगस्टला होणाऱ्या महापालिकेच्या सर्वसाधारण सभेपुढे मंजुरीसाठी ठेवला आहे. याशिवाय पदाधिकाऱ्यांचे मानधन पदानुसार निश्चित करावे, माजी नगरसेवकांना मासिक पेन्शन योजना चालू करावी, अशी शिफारसही विधी समितीने केली आहे. या मानधन वाढीच्या प्रस्तावाला शहरातील अनेक राजकीय, सामाजिक संस्थांनी विरोध दर्शविला आहे. त्या पार्श्वभूमीवर सर्वसाधारण सभा काय निर्णय घेणार? याकडे लक्ष लागले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कँटोन्मेंट होणार चकाचक

$
0
0

कचरा संकलनाची तीन मशिन भेट

म. टा. प्रतिनिधी, पुणे

'अदर पूनावाला क्लीन सिटी प्रकल्पां'तर्गत पुणे कँटोन्मेंट बोर्डाला विविध प्रकारच्या कचऱ्याचे संकलन करणारी तीन मशिन्स, तसेच टेम्पो देण्यात आला आहे. या मशिन्सची किंमत ६५ लाख रुपये आहे. त्यामुळे कँटोन्मेंटच्या आठही वॉर्डांत या मशीनद्वारे कचरा गोळा करण्यास मदत होणार आहे. परिणामी, कँटोन्मेंट चकाचक होण्यास मदत होईल, असा विश्वास व्यक्त होत आहे.

कँटोन्मेंट स्वच्छ आणि हरित करण्यासाठी 'अदर पूनावाला क्लीन सिटी प्रकल्पां'तर्गत कँटोन्मेंट बोर्डाला कचरा संकलन करणारी तीन मशीन भेट देण्यात आली. त्याशिवाय टेम्पो देण्यात आला. या सर्व साहित्याची किंमत ६५ लाख रुपये आहे. या कचरा संकलन मशीनचे उद्घाटन बोर्डाचे अध्यक्ष ब्रिगेडियर ए. के. त्यागी यांच्या हस्ते झाले. त्या वेळी बोर्डाचे उपाध्यक्ष दिलीप गिरमकर, सदस्य अतुल गायकवाड, तसेच अदर पूनावाला क्लीन सिटी प्रकल्पाचे कृष्णन आदी उपस्थित होते.

रस्त्यावरील प्लास्टिक, कागद, कचरा, पालापाचोळा आदी कचरा गोळा करण्यासाठी प्रथमच अशा प्रकारचे मशीन उपलब्ध झाले आहे. आतापर्यंत बोर्डाचे कर्मचारी रस्त्यांची साफसफाई करत होते. त्यामुळे साफसफाई करण्यात अडचणी येत होत्या. आता मशीनद्वारे हे काम करणे सहजसोपे होणार आहे. तसेच अन्य सफाई कर्मचाऱ्यांचादेखील उपयोग यासाठी करण्यात येणार आहे. हे मशीन बॅटरीच्या साह्याने चालते. एकदा बॅटरी चार्ज केली, तर मशिन आठ तास काम करू शकते. विविध प्रकारचे उत्सव, गर्दीच्या ठिकाणी असलेला कचरा अथवा सार्वजनिक ठिकाणचा कचरा गोळा करण्यास या मशिनचा उपयोग होणार असल्याचा विश्वास बोर्डाच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

लिफ्ट मिळाली; बॅकअप नाही

$
0
0

शिवाजीनगर कोर्टातील लिफ्टना नूतनीकरणानंतर 'बॅटरी बॅकअप'च नाही

म. टा. प्रतिनिधी, पुणे

शिवाजीनगर कोर्टाच्या नवीन इमारतीतील बंद पडलेल्या लिफ्टच्या दुरुस्तीसाठी वकिलांनी दहा वर्षे पाठपुरावा केल्यानंतर लिफ्टचे नूतनीकरण करण्यात आले खरे; मात्र या लिफ्टला बॅटरी बॅकअपच नसल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. तीन लिफ्टचे नूतनीकरण करण्यासाठी ४६ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला होता.

बॅटरी बॅकअप नसल्यामुळे लाइट गेल्यावर लिफ्टमध्ये अडकलेल्या लोकांना लाइट येण्याची वाट पाहत आतच अडकून बसावे लागत आहे. त्यामुळे एखादी दुर्घटना घडल्यास त्याला जबाबदार कोण अशी विचारणा कोर्टात येणाऱ्या लोकांकडून करण्यात येते आहे.

शिवाजीनगर जिल्हा न्यायालयाच्या नवीन इमारतीत तीन लिफ्ट आहेत. तीन मजली असलेल्या या कोर्टात दररोज वकील, पोलिस, आरोपी, पक्षकारांची ये-जा असते. ज्येष्ठ नागरिक, वकील, महिला, तसेच अपंग व्यक्तींकडून या लिफ्टचा वापर केला जातो. कोर्टातील या लिफ्ट कालबाह्य झाल्यानंतरही दहा वर्षांहून अधिक काळ सुरू होत्या. त्या नेहमी नादुरुस्त व्हायच्या. अनेकदा लोक लिफ्टमध्ये अडकल्याच्या घटना घडल्या आहेत. लिफ्टचे नूतनीकरण करण्यात यावे, अशी वारंवार मागणी करण्यात आल्यानंतर अखेर राज्य सरकारच्या विधी व न्याय विभागाने परवानगी देऊन ४६ लाख १३ हजार ९९६ रुपयांचा निधी मंजूर केला. कोर्टातील लिफ्टचे नूतनीकरण करण्यात आले; मात्र लिफ्टला बॅटरी बॅकअप देण्यात आलेला नाही. त्यामुळे लिफ्टचा वीजपुरवठा बंद झाल्यावर लिफ्ट बंद पडते. त्यामुळे लिफ्टमध्ये असलेल्या लोकांना आत अडकून पडावे लागते. सध्या पावसाळा सुरू असल्यामुळे लाइट जाण्याचे प्रमाण आणि वारंवारिता अधिक आहे. त्यामुळे कोर्टातील कामकाजावरही परिणाम होतो आहे; तरीही या प्रश्नाकडे कोणीही अद्याप लक्ष दिलेले नाही.

...........

शिवाजीनगर कोर्टाच्या नवीन इमारतीतील तीन्ही लिफ्टना बॅटरी बॅकअप नसणे दुर्दैवी आहे. कोर्टात एक शिल्लक जनरेटर आहे. तो वापरून नव्या इमारतीतील तिन्ही लिफ्टना बॅटरी बॅकअप देण्याबाबतची मागणी पुणे बार असोसिएशनच्या वतीने प्रमुख जिल्हा न्यायाधीशांकडे करणार आहे.

- अॅड. वाय. जी.​ शिंदे, अध्यक्ष, पुणे बार असोसिएशन

.................

सार्वजनिक बांधकाम विभागाने शिवाजीनगर कोर्टात नवीन लिफ्ट बसवताना बॅकअप देणे गरजेचे होते; मात्र लाखो रुपये खर्च करून येथे बॅकअप न देता तीन लिफ्ट बसवण्यात आल्या आहेत. त्यामुळे लिफ्ट अडकून एखादी दुर्घटना घडल्यास त्याला सार्वजनिक बांधकाम विभाग जबाबदार असेल.

- मिलिंद पवार, माजी अध्यक्ष, पुणे बार असोसिएशन

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


पोलिस आयुक्तालयात अविश्वासाचे वातावरण

$
0
0

घडताहेत वादाचे अनेक प्रसंग

म. टा. प्रतिनिधी, पुणे

अविश्वासाच्या वातावरणाने ग्रासलेल्या पोलिस आयुक्तालयाला घरघर लागली की काय, अशा घटना एकापाठोपाठ घडू लागल्या आहेत. बडोदा येथे सराईताने केलेल्या गोळीबारात एक सहायक निरीक्षक आणि पोलिस कर्मचारी जायबंदी झाले आहेत, तर एका वरिष्ठ पोलिस निरीक्षकावर निलंबनाची कारवाई झाली. आयुक्तालयात वरिष्ठ-कनिष्ठांतील दरी काही कमी होण्याची चिन्हे दिसत नसल्याचे हे द्योतक आहे.

पोलिस अधिकाऱ्यांवर वेगवेगळा ठपका ठेवून त्यांचा गोपनीय अहवाल पाठवून बदली करण्यात आल्यानंतर पोलिस आयुक्तालयातील वातावरण पेटण्यास सुरुवात झाली. 'पनिशमेंट'वर बदली झालेले बहुतांश अधिकारी 'मॅट' कोर्टाच्या आदेशान्वये पुणे आयुक्तालयात नोकरी करत आहेत. राज्यभरात तब्बल ७४ पोलिस अधिकारी मॅट कोर्टातून पुन्हा त्याच ठिकाणी नोकरीवर रजू झाले आहेत. यामुळे मुंबई वगळता सर्वच आयुक्तालयांत अधिकारी जादा झाले आहेत. त्यांचे करायचे काय, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. सहायक आयुक्त/उपअधीक्षकांचे प्रमोशन काढल्यानंतर या जादा अधिकाऱ्यांचा प्रश्न मार्गी लागणार आहे.

पुणे आयुक्तालयात वरिष्ठ पोलिस निरीक्षक, कर्मचाऱ्यांच्या करण्यात आलेल्या बदल्या पूर्वग्रहदूषित मानसिकतेतून करण्यात आल्याची टीका होत आहे. या बदल्यानंतर गेल्या काही महिन्यांपासून आयुक्तालयात तणावपूर्व शांततेचे वातावरण आहे. त्यातच आता बडोदा येथे पोलिस अधिकारी आणि कर्मचाऱ्यावर झालेला गोळीबार, वरिष्ठ पोलिस निरीक्षकाचे निलंबन या एकापाठोपाठ घडलेल्या घटनांनी आयुक्तालयातील खदखद उघडपणे बाहेर पडू लागली आहे.

आयुक्तालयातील अविश्वासाच्या वातावरणामुळे अधिकारी-अधिकारी, अधिकारी-कर्मचाऱ्यांत वादाचे प्रसंग घडत आहेत. अमुक वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या जवळचा असून तोच माहिती पुरवत आहे, अशा आरोप-प्रत्यारोपांची आयुक्तालयात राळ उठली आहे. त्यातून अंतर्गत धुसफूस सुरू झाली आहे. मुंबई पोलिस आयुक्तालयात एकेकाळी अधिकाऱ्यांतील वाद टोकाला पोहोचले होते. अगदी एकमेकांचे उकरून काढत अनेकांना जेलची हवाही खावा लागली. हेच शुक्लकाष्ठ पुणे आयुक्तालयात सुरू झाले आहे. अद्यापही वेळ गेली नसून, अंतर्गत धुसफूस थांबणे गरजेचे आहे. अन्यथा सध्या तरी एकाच अधिकाऱ्याचे निलंबन झाले आहे. ही वेळ कोणावरही येईल.

...........

हत्यारी नोकरीच का?

गुन्हे शाखेतून पोलिस ठाण्यांमध्ये पाठवलेल्या काही कर्मचाऱ्यांना हत्यारी नोकरी देण्यात यावी, असे आदेश काढण्यात आले होते. या आदेशांमुळे कर्मचाऱ्यांमध्ये अस्वस्थता आहे. चुकीला माफी नाही, या उक्तीप्रमाणे चुकलेल्या कर्मचाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करावी, प्रसंगी त्यांचे निलंबन करावे; मात्र हत्यारी नोकरीच द्यावी, असे आदेश काढून घुसमट का करण्यात आली, असा सवालही विचारला जात आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बड्या बिल्डरांवर ‘कृपादृष्टी’

$
0
0

लोणावळ्यातील टाउनशिपसाठी पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील भागही बांधकामासाठी खुले

म. टा. प्रतिनिधी, पुणे

पुणे, पिंपरी-चिंचवडसह ग्रामीण भागात टाउनशिप उभारणाऱ्या बड्या बिल्डर्सवर राज्य सरकारने 'कृपादृष्टी' दाखवली असून, डोंगरमाथा-डोंगर उतार, ना विकास झोन, अफॉरेस्टेशन झोन अशा पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील भागांत शुल्क आकारून बांधकाम करण्यास परवानगी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पुणे प्रादेशिक योजनेतील लोणावळ्याजवळील सेक्टर 'एन' आणि 'ओ'मधील बांधकामांवरील प्रतिबंधही उठवण्यात आला आहे.

विशेष म्हणजे डोंगरमाथा-डोंगर उतार, 'ना विकास झोन'मधील जमिनीचा शंभर टक्के चटईक्षेत्र निर्देशांक वापरण्यास मुभा देण्यात आली आहे. पुणे महापालिकेच्या जुन्या हद्दीत डोंगरमाथा व डोंगर उतारावर फक्त ०.४ टक्के आणि नव्या हद्दीत या ठिकाणांवर बांधकामबंदी आहे. उलटपक्षी नव्या हद्दीत या डोंगरमाथा व डोंगर उतारावर 'बीडीपी'चे आरक्षण टाकण्यात आले आहे. टाउनशिप करणाऱ्या बिल्डरांसाठी खैरात आणि शहरामधील नागरिकांना वेगळा न्याय लावण्याबाबत आश्चर्य व्यक्त होत आहे.

स्पेशल टाउनशिपच्या नियमांमध्ये नगर विकास विभागाकडून नुकतेच काही बदल करण्यात आले आहेत. यापूर्वी टाउनशिप उभारण्यासाठी सलग क्षेत्र असणे बंधनकारक होते. नव्या बदलांमध्ये मात्र एकूण क्षेत्रफळाच्या जागेत चाळीस टक्के डोंगराचा समावेश असला, तरी त्या टाउनशिपला मान्यता देण्यात येणार आहे. इतकेच नव्हे तर डोंगराचा शंभर टक्के 'एफएसआय'देखील या टाउनशिपला देण्यात येणार आहे. त्या बदल्यात रेडी रेकनरच्या दराच्या वीस टक्के प्रीमिअम शुल्क आकारण्यात येणार आहे आणि टाउनशिपच्या साठ टक्के जागेवर वापरण्यास परवानगी देण्याचा निर्णय घेतला आहे.

पुण्याच्या मंजूर प्रादेशिक योजनेमध्ये लोणावळा भागामध्ये 'आर', 'एन' व 'ओ' सेक्टर तयार करण्यात आले होते. या तिन्ही सेक्टरमध्ये कोणतेही बांधकाम करण्यास प्रतिबंध करण्यात आला होता; मात्र टाउनशिपसाठी हे प्रतिबंध शिथिल करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयानुसार आता फक्त 'आर' सेक्टरमध्ये बांधकाम प्रतिबंध राहणार आहे. 'एन' व 'ओ' सेक्टर आता टाउनशिपमध्ये खुला झाला आहे. टाउनशिपवर यापूर्वीही चटईक्षेत्राची खिरापत वाटण्यात आली होती. आता या सरकारने पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील भागही टाउनशिपसाठी खुला करून कृपादृष्टी दाखवली आहे. या वसाहतींवर एवढी मेहेरनजर दाखवण्यामागचे गौडबंगाल काय असा प्रश्न बांधकाम वर्तुळात उपस्थित होऊ लागला आहे.

...........
अॅमेनिटी स्पेस

पालिका हद्दीमधील छोट्या प्लॉटवर बांधकाम करताना दहा टक्के ओपन स्पेस, पंधरा टक्के अॅमेनिटी स्पेस ठेवण्याचे बंधन आहे. टाउनशिपमध्ये हे बंधन काढून टाकण्यात आले असून, डोंगरावर अॅमेनिटी स्पेस दाखवण्याची तरतूद नव्याने करण्यात आली आहे. यामुळे टेकड्यांवर 'अॅमेनिटी स्पेस'च्या सर्व तरतुदी लागू होणार आहेत. पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील असलेल्या टेकड्या टाउनशिपमध्ये मात्र मोकळ्या राहणार नाहीत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वीजप्रकल्पाला जमीन देण्यास शेतकऱ्यांचा विरोध

$
0
0

पुणे : रावसाहेब दादा पवार घोडगंगा सहकारी साखर कारखान्यातर्फे शिरूरमधील कोहकडेवाडी येथे उसाच्या टाकाऊ भागापासून वीजनिर्मिती करण्याच्या नियोजित प्रकल्पासाठी भू-संपादन करण्यास स्थानिक शेतकऱ्यांनी विरोध केला आहे. जमीन ताब्यात घेतल्यास आंदोलन करण्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे.

शिरूर तालुक्यातील कोहकडेवाडी येथे २०.५ मेगावॉट वीजनिर्मितीचा ​ प्रकल्प नियोजित आहे. या प्रकल्पातील वीज साखर कारखान्यातर्फे 'महापारेषण'ला दिली जाणार आहे; मात्र त्यासाठी जमीन देण्यास शेतकऱ्यांचा विरोध असल्याचे विनायक तांबे यांनी सांगितले.

या प्रकल्पासाठी तांबे यांच्यासह रामकृष्ण जेधे, अनिल जेधे, विलास कोहकडे, वैशाली शिवले, पुष्पराज कोलपकर, सचिव रावळ, अरुण तांबे, सुरेंद्र कर्नावट, भानुदास कोळपे, वैभव तळवले, ओंकार तळवले, रेश्मा तळवले आणि ठमाबाई कोळपे यांची जमीन संपादित करण्यात येणार आहे.

याबाबत विनायक तांबे म्हणाले, 'या प्रकल्पासाठी शेतकऱ्यांची जमीन ताब्यात घेण्यासाठी रावसाहेब दादा पवार घोडगंगा साखर कारखान्याचे अध्यक्ष आणि माजी आमदार अशोक पवार यांच्याकडून दबाव आणण्यात येत आहे. प्रकल्पासाठी जमीन घेतल्यास संबंधित कुटुंबांसमोर उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण होणार आहे. बहुतांश कुटुंबे या शेतजमिनीवर अवलंबून आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचा विरोध आहे.'

'जमीन ताब्यात घेण्याचा प्रयत्न केल्यास आंदोलन केले जाईल,' असेही ते म्हणाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आता पुन्हा ‘स्मार्ट’ आरसी

$
0
0

परिवहन आयुक्तालयाने पाठवला अहवाल; राज्य सरकारच्या मान्यतेनंतर होणार काम सुरू

म. टा. प्रतिनिधी, पुणे

वाहन नोंदणीचे प्रमाणपत्र (रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट - आरसी) आता पुन्हा स्मार्ट कार्ड स्वरूपात मिळणार आहे. कागदी 'आरसी'मुळे नाखूश झालेल्या नागरिकांना दिलासा मिळणार आहे. तसेच, गेल्या काही महिन्यांपासून कागदाअभावी धीम्या गतीने सुरू असलेला 'आरसी'च्या छपाईचा प्रश्नही मिटणार आहे. परिवहन विभागाने टेंडरची प्रक्रिया सुरू केली असून, त्या संबंधीचा अहवाल राज्य सरकारला पाठवला आहे. सरकारची मान्यता मिळाल्यानंतर अंतिम कार्यवाही होणार आहे.

प्रादेशिक परिवहन कार्यालयात वाहनाची नोंदणी केल्यानंतर मिळणारे नोंदणी प्रमाणपत्र स्मार्ट कार्ड स्वरूपात दिले जात होते. स्मार्ट कार्ड बनवणाऱ्या कंपनीशी झालेला करार डिसेंबर २०१४मध्ये संपुष्टात आला. तेव्हापासून आतापर्यंत आरसी कागदावर छपाई करून दिली जात आहे; मात्र प्रवासात स्वतःसोबत आरसी बाळगताना कागदापेक्षा स्मार्ट कार्ड सोईस्कर असते. कागदाच्या तुलनेत स्मार्ट कार्ड टिकाऊ असल्याने नागरिकांकडून कागदी 'आरसी'बाबत नाराजी व्यक्त केली जात होती. दरम्यानच्या काळात 'आरसी'संदर्भात एकूण चार दावे कोर्टात दाखल करण्यात आले होते. त्यामुळे परिवहन विभागाला 'स्मार्ट आरसी'चा निर्णय घेता येत नव्हता. आता चारही दावे निकाली निघाले असून, परिवहन विभागाच्या बाजूने त्यांचा निकाल लागला आहे. त्यामुळे परिवहन विभागाने 'स्मार्ट आरसी'साठी प्रक्रिया सुरू केली आहे.

गेल्या काही महिन्यांपासून 'आरसी'च्या छपाईसाठी लागणाऱ्या कागदांचा तुटवडा राज्यभरात भासत होता. परिणामी, पुण्यात दोन महिने आरसी वितरण बंद पडले होते. त्यानंतर आठ हजार आरसी उपलब्ध झाल्यावर ते काम पुन्हा सुरू झाले. तसेच, 'आरसी'चा मार्ग मोकळा करण्यासाठी नुकतीच पांढऱ्या कागदावर छपाई सुरू करण्यात आली होती. आरसी हा वाहनाबाबतचा महत्त्वाचा दस्तऐवज असून, तो दीर्घकाळ टिकवून ठेवणे गरजेचे असते. त्यामुळे पांढऱ्या कागदावरील 'आरसी'बाबत नागरिकांनी नाराजी व्यक्त केली होती.

...........

स्ट्रिप वगळल्याने किंमत घटली

पूर्वीच्या 'आरसी स्मार्ट कार्ड'मध्ये चिपसह मॅग्नेटिक स्ट्रिपचाही समावेश होता. चिपमध्ये वाहनाची माहिती व मॅग्नेटिक स्ट्रिपमध्ये वाहनधारकाने सादर केलेली कागदपत्रे डिजिटाइज करून अपलोड केलेली असायची. त्यामुळे त्या स्मार्ट कार्डची किंमत जास्त होती; मात्र आता नव्याने देण्यात येणाऱ्या 'स्मार्ट कार्ड'मध्ये केवळ चिप असेल. मॅग्नेटिक स्ट्रिप वगळण्यात आली आहे. त्यामुळे कार्डची किंमतदेखील कमी होणार आहे, अशी माहिती परिवहन आयुक्तालयातील उपायुक्त (कम्प्युटर) संदेश चव्हाण यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सुदीप देशपांडेंच्या चित्रांची बहारीनकरांना भुरळ

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

जगप्रसिद्ध अशा 'दी बहारीन फायनान्शिअल हार्बर' या टॉवर्समध्ये महिनाभर आपल्या चित्रांचे प्रदर्शन भरवण्याचा मान नुकताच मराठी चित्रकार सुदीप देशपांडे यांना मिळाला. त्यांच्या चित्राकृतींना रसिकांनी भरभरून दाद दिली. या ठिकाणी चित्रप्रदर्शन भरवणारे देशपांडे हे पहिलेच भारतीय चित्रकार ठरले आहेत.

'बहारीन फायनान्शिअल हार्बर'मधील 'वेस्ट टॉवर'मध्ये देशपांडे यांची चित्रे प्रदर्शित करण्यात आली होती. शहराच्या कोणत्याही भागातून दिसणारे हे टॉवर प्रसिद्ध आहेत. या ठिकाणी कलाप्रदर्शन भरवण्याचा मान फार कमी कलाकारांना मिळाला आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर नावाजल्या गेलेल्या कलाकारांच्याच कलाकृती या ठिकाणी प्रदर्शित केल्या जातात. अशा कलावंतांमध्ये प्रथमच एका भारतीय चित्रकाराची चित्रे प्रदर्शित झाली.

मूळचे नाशिकचे आणि पेशाने आर्किटेक्ट असणाऱ्या सुदीप यांनी भारतात मुंबई, दिल्लीसह विविध ठिकाणी त्यांच्या चित्रांची प्रदर्शने भरवली आहेत. तसेच विविध महोत्सवांमध्येही ते सहभागी झाले आहेत. आगामी काळात जम्मू-काश्मीर, जयपूर, गोवा, मुंबई या शहरांत चित्रप्रदर्शन भरवणार असल्याचे त्यांनी सांगितले. 'चित्र काढणे ही कला माझ्यासाठी सतत शिकण्याची प्रक्रिया आहे,' असे त्यांनी नमूद केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नियंत्रण समितीची चालूगिरी?

$
0
0

अकरावी प्रवेशाच्या पहिल्या फेरीनंतरही बड्या कॉलेजांत रिक्त जागा

म. टा. प्रतिनिधी, पुणे

अकरावी प्रवेशासाठी शहरातील बड्या कॉलेजांना मागणी असताना, अकरावी प्रवेशाच्या पहिल्या विशेष फेरीनंतरही अशा कॉलेजांमध्ये काही जागा रिक्तच असल्याचे शुक्रवारी स्पष्ट झाले. अकरावीच्या प्रवेश नियंत्रण समितीने अशा कॉलेजांचे 'स्टँडर्ड' विचारात घेऊन, विशिष्ट टक्केवारीच्या मर्यादेपर्यंतच अशा कॉलेजांसाठी प्रवेश देण्याचे धोरण ठेवल्याने ही परिस्थिती निर्माण झाल्याचा आरोप होत आहे. त्यामुळेच अनेक गुणवान विद्यार्थी या कॉलेजांमध्ये प्रवेश मिळवण्याची क्षमता असूनही, प्रवेशापासून वंचित राहिल्याची ओरड करण्यात आली.

अकरावी प्रवेशाच्या पहिल्या विशेष फेरीतील प्रवेशांची माहिती केंद्रीय ऑनलाइन प्रवेश नियंत्रण समितीने शुक्रवारी जाहीर केली. त्यानुसार या फेरीसाठी अर्ज केलेल्या सात हजार १९८ विद्यार्थ्यांपैकी पाच हजार ५४१ विद्यार्थ्यांना प्रवेश मिळाले. एक हजार ६५७ विद्यार्थी अद्यापही प्रवेशाविनाच असून, त्यांच्यासाठी येत्या १८ आणि १९ ऑगस्टला दुसऱ्या विशेष फेरीची अर्ज भरण्याची प्रक्रिया राबवण्यात येणार आहे. त्यासाठी १६ ऑगस्टला रिक्त जागांची कॉलेजनिहाय माहिती जाहीर होणार आहे. या प्रक्रियेतील कॉलेजनिश्चिती येत्या २२ ऑगस्टला जाहीर होणार आहे.

या फेरीनंतरही शहरातील अनेक बड्या कॉलेजांमध्ये रिक्त जागा असूनही, या कॉलेजांच्या 'कट ऑफ'पेक्षाही अधिक गुण असलेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश मिळालेला नाही. अशा विद्यार्थ्यांनी आपल्या पालकांसह शिक्षण उपसंचालक कार्यालयात गर्दी केली होती. 'सिस्टीम करेक्टिंग मूव्हमेंट'च्या (सिस्कॉम) वैशाली बाफना यांनी या प्रकाराविषयी आक्षेप घेऊन, समितीने आपल्या ऑनलाइन यंत्रणेद्वारे बड्या कॉलेजांमध्ये जाणीवपूर्वक प्रवेश पाठवले नसल्याचा आरोप केला. 'एकीकडे विद्यार्थ्यांनी अशा कॉलेजांना प्रवेश मागितल्याचे चित्र आहे, तर दुसरीकडे कॉलेजांमध्ये रिक्त जागा असूनही अनेकांना कॉलेजमध्ये प्रवेश मिळू शकला नसल्याची वस्तुस्थिती आहे. समितीने प्रक्रियेमध्ये पारदर्शकता न ठेवल्याने ही परिस्थिती निर्माण झाली आहे. या विषयी 'सिस्कॉम'ची भूमिका आम्ही उपसंचालकांनाही कळवली आहे,' अशी माहिती बाफना यांनी 'मटा'ला दिली.

000

चार कॉलेजांमध्ये ऑफलाइन प्रवेश?

शहरात सर्वच ज्युनिअर कॉलेजांमध्ये ऑनलाइन प्रवेश देण्याचे निर्देश असताना महापालिकेच्या म्हणून ओळखल्या जाणाऱ्या चार ज्युनिअर कॉलेजांमध्ये मात्र ऑफलाइन प्रवेश झाल्याची ओरडही होत आहे. याविषयी चर्चा सुरू झाल्यानंतर समितीने या चारही कॉलेजांमध्ये यापूर्वीच प्रवेशित विद्यार्थ्यांना ऑनलाइन प्रक्रियेतून कॉलेजांमध्ये प्रवेशित केल्याचा आरोपही पुढे आला आहे. कॉलेजांमध्ये प्रवेशित विद्यार्थी व्यवसाय शिक्षणाच्या विषयांसाठी म्हणून या कॉलेजांमध्ये प्रवेशित झाले. व्यवसाय शिक्षणाचे संबंधित विषय इतर ज्युनिअर कॉलेजांमध्ये नाहीत. त्यामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये, म्हणून विद्यार्थ्यांना ऑफलाइन माध्यमातून सुरुवातीलाच या कॉलेजांमध्ये प्रवेश देण्यात आल्याचेही या निमित्ताने सांगण्यात आले. याविषयी समितीची नेमकी भूमिका जाणून घेण्यासाठी समितीचे अध्यक्ष आणि पुणे विभागीय शिक्षण उपसंचालक दिनकर टेमकर, सचिव मीनाक्षी राऊत यांच्याशी संपर्क साधला असता, ते उपलब्ध होऊ शकले नाहीत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चंद्रपूरसाठी पुण्याहून ‘शिवनेरी’

$
0
0

पुणे : राज्य मार्ग परिवहन महामंडळातर्फे (एसटी) पुणे ते चंद्रपूर या मार्गावर मल्टीअॅक्सल स्कॅनिया शिवनेरी ही वातानुकूलित बससेवा येत्या बुधवारपासून सुरू होत आहे. ही बस पुण्यातील शिवाजीनगर स्थानकातून सायंकाळी सात वाजता निघून चंद्रपूरला दुसऱ्या दिवशी सकाळी नऊ वाजता पोहोचेल. परतीच्या प्रवासात चंद्रपूरहून सायंकाळी सात वाजता निघून शिवाजीनगरला सकाळी नऊ वाजता पोहोचेल. एका फेरीचे प्रवासभाडे दोन हजार ११७ रुपये असेल. प्रवाशांना शिवाजीनगर, पुणे स्टेशन आणि स्वारगेट बसस्थानकांवरून, तसेच www.msrtc.gov.in या वेबसाइटवरून तिकिटे आरक्षित करता येतील. यापूर्वी एसटीने पुणे-नागपूर 'शिवनेरी'चा प्रयोग केला होता; मात्र प्रवाशांचा प्रतिसाद न मिळाल्याने तो पूर्णपणे फसला होता.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


डाव्यांमुळे लोकतांत्रिक मूल्यांना तडा : विनय सहस्रबुद्धे

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, पुणे
'मतभेद हीच लोकशाही, असे समजणाऱ्या आणि विचाराधारित राजकीय पक्षांची हानी झाली,' असा आरोप भाजपचे राष्ट्रीय उपाध्यक्ष खासदार विनय सहस्रबुद्धे यांनी केला.
भाजपचे राज्याचे मुख्य प्रवक्ते माधव भांडारी लिखित आणि रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी प्रकाशित 'डाव्यांची ढोंगबाजी-भष्ट्राचार, ​हिंसाचार आणि दंडुकेशाही' या पुस्तकाचे प्रकाशन पंडित नेहरू आर्ट गॅलरी येथे झाले. त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाला बेंगळुरूचे ब्लॉगर संदीप बालकृष्णन, भाजपचे शहराध्यक्ष योगेश गोगावले, प्रबोधिनीचे कार्यकारी संचालक रवींद्र साठे, शेफाली वैद्य आदी उपस्थित होते. या वेळी बालकृष्णन यांची प्रकट मुलाखत घेण्यात आली.
'देशामध्ये डावेपणाचे जाणीवपूर्वक उदात्तीकरण करण्यात आले आहे. डावे असणे हे प्रतिष्ठेने समजले गेले. विचारसरणींच्या कथनी आणि करणीत अंतर पडले की ढोंगबाजी सुरू होते. डाव्यांच्या ढोंगबाजीची अनेक रुपे आहेत.' असे सहस्रबुद्धे यांनी स्पष्ट केले.
'असहिष्णुतेची भाषा करणाऱ्या डाव्यांची वैचारिक असहिष्णुतेची असंख्य उदाहरणे आहेत. डाव्यांच्या ढोंगबाजीची अनेक रुपे १९७० नंतर उघड होत गेली. निष्कर्ष काढायचे, शेरेबाजी करायची, इतरांना कमी लेखायचे ही डाव्यांचे वैशिष्ट्ये आहेत. त्यामुळेच डाव्या विचारांची शकले झाली आहेत.' अशी टीकाही त्यांनी केली.
'डाव्या चळवळींमध्ये तपस्वी मंडळीही होती. या चळवळींच्या घसरणीची मांडणी भंडारी यांनी या पुस्तकातून केली आहे.' असे त्यांनी नमूद केले.
'हे पुस्तक डाव्यांच्या विचारांबद्दलचे नसून त्यांच्या आचारांबद्दलचे आहे. डाव्यांनी गेल्या ९० वर्षांत काय केले, याची तपासणी झाली पाहिजे. त्यांचा आर्थिक आणि बौद्धिक अप्रामाणिकपणा यातून दाखवला आहे.' असे भांडारी म्हणाले.
'राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला (आरएसएस) कायम आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करणारे डावे हे नक्षलवाद्यांबद्दल चकार शब्दही काढत नाहीत. हा देश टोळ्यांचा आहे, अशी मांडणी डाव्यांनी केली. भारत-चीन युद्धात त्यांनी शत्रूराष्ट्राला पाठिंबा दिला. त्यांचा हा ढोंगीपणा पुस्तकातून मांडला आहे.' असे भंडारी यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बंद पाइपलाइन प्रकल्पाला खो

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, पुणे
धरणातून पाणी सोडण्यात हात आखडता घेणाऱ्या पाटबंधारे विभागाने आता महापालिकेचा पर्वती ते लष्कर दरम्यानच्या बंद पाइपलाइनचा प्रकल्पही 'तांत्रिक' कारणे पुढे करत बंद पाडला आहे. पालिकेने विनापरवाना काम केल्याचा आरोप करून पाटबंधारे विभागाने थेट पोलिसांमध्ये तक्रार दाखल केली असून, मान्यतेविना काम करू नये, अशी तंबी दिली आहे. त्यामुळे, शहरासाठी महत्त्वाच्या या प्रकल्पामध्ये 'खो' निर्माण झाला आहे.
खडकवासला ते पर्वती जलशुद्धीकरण केंद्रापर्यंत महापालिकेने नवी पाइपलाइन टाकण्याचे काम नुकतेच पूर्ण केले. त्याच्या पुढच्या टप्प्यात पर्वती ते लष्कर जलकेंद्र या दरम्यान सहा किमीची पाइपलाइन टाकण्यात येणार होती. पुणे कॅँटोन्मेंटच्या हद्दीतील कामही महापालिकेने सुरू केले होते. तर, उर्वरित ठिकाणी अस्तित्वातील कॅनॉलच्या बाजूनेच नवीन पाइपलाइन टाकण्याचे काम केले जाणार होते. पाटबंधारे विभागाला आवश्यक असलेली सर्व कागदपत्रे महापालिकेने पुरवली आणि पाइपलाइनचे काम सुरू केले. मात्र, पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी काही तांत्रिक बाबींचे आक्षेप काढत पालिकेने सुरू केलेले काम थांबवले. तसेच, विनापरवानगी काम केल्याने पालिकेविरोधात पोलिसांकडे तक्रार दाखल केली. त्याविरोधात, पालिकेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली असून, पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी तातडीने काम करून द्यावे, अशी मागणी केली आहे.
कॅँटोन्मेंटच्या हद्दीतील दीड किमीचे काम महापालिकेने यापूर्वीच सुरू केले आहे. पाटबंधारे विभागाच्या अडवणुकीमुळे उर्वरित साडेचार किमीच्या मार्गात खो निर्माण झाला आहे. हे काम डिसेंबरपर्यंत पूर्ण करून पालिकेला आवश्यक सर्व पाणी केवळ पाइपलाइनच्याच माध्यमातून घेण्याचा पालिकेचा मनोदय असताना, आता त्यात अडथळे निर्माण झाले आहेत.
'कॅँटोन्मेंटची परवानगी मिळण्यात अनेक अडचणी येत असताना, या ठिकाणचे काम सुरू झाले आहे. पाटबंधारे विभागाकडून सध्या काम थांबवण्यात आले असून, याबाबत त्यांच्याशी चर्चा सुरू आहे. पालिकेला कामाची परवानगी तत्परतेने मिळाल्यास वेळेत काम पूर्ण होऊ शकेल', असा दावा महापालिका आयुक्त कुणाल कुमार यांनी केला.
दरम्यान, यातून तोडगा काढण्यासाठी पालिका आणि पाटबंधारे विभागात चर्चेच्या फेऱ्या सुरू असून, पालिकेला लेखी परवानगी मिळण्याची शक्यता आहे.

'महापालिकेला सहकार्य करावे'
पर्वती ते लष्कर दरम्यानच्या बंद पाइपलाइनचा हा प्रकल्प ११० कोटी रुपयांचा आहे. त्यासाठी आवश्यक असलेल्या अतिरिक्त तरतुदीला सर्वसाधारण सभेने नुकतीच मान्यता दिली आहे. त्यामुळे, हे काम त्वरेने पूर्ण होणे शक्य आहे. हे काम पूर्ण झाल्यानंतर महापालिकेला एक थेंबही पाणी कालव्यातून घ्यावे लागणार नाही. त्यामुळे, कालवा निव्वळ शेतीसाठी वापरणे शक्य होईल. त्यामुळे, हा प्रकल्प महत्त्वाचा असून, पाटबंधारे विभागाने त्यासाठी महापालिकेला सहकार्य करावे, अशी मागणी केली जात आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अंनिस पाठवणार पंतप्रधानांना काळी निवेदने

$
0
0



म. टा. प्रतिनिधी, पुणे
डॉ. नरेंद्र दाभोलकर यांचे मारेकरी आणि सूत्रधार तीन वर्षांनंतरही सापडले नाहीत. तसेच, गोविंद पानसरे आणि प्रा. एम. एम. कलबुर्गी यांचे मारेकरी अजूनही फरार आहेत. तपासातील या दिरंगाईचा निषेध म्हणून महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना काळी निवेदने पाठविणार आहे. समितीच्या सर्व शाखांकडून शनिवारी (२० ऑगस्ट) जिल्हाधिकारी आणि तहसीलदार यांच्यामार्फत ही निवेदने पाठवणार असल्याची माहिती महाराष्ट्र अंनिसचे प्रधान सचिव मिलिंद देशमुख आणि राज्य सरचिटणीस डॉ. हमीद दाभोलकर यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली.
'डॉ. दाभोलकर यांच्या खुनाच्या तपासातील दिरंगाई अत्यंत क्लेषदायक आहे. हिंदू जनजागरण समितीचा कार्यकर्ता वीरेंद्र तावडे याला अटक होऊन दोन महिन्यांपेक्षा अधिक कालावधी लोटला. तरी तपासामध्ये म्हणावी तशी प्रगती झालेली नाही. मडगाव बॉम्बस्फोटातील फरार सनातनचे साधक सारंग अकोलकर, रुद्र पाटील, जयप्रकाश हेगडे, प्रवीण लिंबकर यांच्या छायाचित्रांना राज्यभरात प्रसिद्धी देण्याची मागणीदेखील राज्य पोलिसांकडून पूर्ण होऊ शकत नाही. राष्ट्रीय तपास यंत्रणा (एनआयए) चे याबाबत अत्यंत उदासीन असणे हे या तपासातील उद्दिष्टांविषयी संशय निर्माण करणारे आहे,' याकडे हमीद दाभोलकर यांनी लक्ष वेधले.
दाभोलकर यांच्या स्मृतिदिनानिमित्त शनिवारी विठ्ठल रामजी शिंदे पुलावर जमून कार्यकर्ते आणि नागरिक खुनाच्या तपासातील दिरंगाईचा निषेध करणार आहेत. तेथून निषेध मोर्चा टिळक चौकमार्गे साने गुरुजी स्मारक येथे पोहोचणार आहे. तेथे सर्वपक्षीय निषेध सभा होणार आहे. 'हिंसेला नकार आणि मानवतेचा स्वीकार' या मोहिमेचा भाग म्हणून दिवसभर कार्यक्रम होणार आहेत. अतुल पेठे आणि राजू इनामदार लिखित 'रिंगण' या पुस्तकाचे डॉ. शैला दाभोलकर यांच्या हस्ते प्रकाशन होणार आहे. आंतरजातीय विवाहातील हिंसा, प्रेम, आकर्षण आणि जोडीदाराची निवड या विषयावर राबविल्या जाणाऱ्या प्रबोधन अभियानाचा प्रारंभ या वेळी होणार आहे.

सरकारच्या धोरणावर टीका
'धार्मिक विद्वेष पसरवणाऱ्या झाकिर नाईक याच्यावर कडक कारवाई करणारे सरकार त्याच पद्धतीने हिंसेचे समर्थन करणाऱ्या सनातन आर्णि हिंदू जनजागृती समितीवर कारवाई का करीत नाही,' असा सवाल करत डॉ. हमीद दाभोलकर यांनी सरकारच्या धोरणावर टीका केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कास पठारासाठी २६ ऑगस्टपासून नियमावली

$
0
0



म. टा. प्रतिनिधी, पुणे
गेल्या आठवड्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे कास पठारावर अद्याप फुलांचे ताटवे बहरलेले नाहीत. त्यामुळे वन विभागातर्फे पर्यटकांकडून प्रवेश शुल्क आकारण्याचा निर्णय पुढे ढकलला आहे. येत्या पर्यटकांसाठी नवी नियमावली लागू होणार आहे.
जागतिक वारसास्थळ असलेल्या कास पठारावरील पर्यटकांच्या अनियंत्रित संख्येला लगाम घालण्यासाठी वन विभागाने गेल्या आठवड्यात पर्यटकांसाठी नवीन नियमावली जाहीर केली होती. त्यानुसार येत्या १० ऑक्टोबरपासून दररोज केवळ तीन हजार पर्यटकांनाच प्रवेश मिळणार होता. याशिवाय पर्यटकांकडून पर्यावरण उपद्रव शुल्क आणि कॅमेऱ्याचे शुल्कही आकारण्यात येणार होते. मात्र, गेल्या आठवड्यात झालेल्या पावसामुळे पठारावर अद्याप फुलांचे ताटवे बहरलेले नाहीत. त्यामुळे वन विभागाने नियमावलीची अंमलबजावणी पुढे ढकलली आहे.
पावसाचे आगमन वेळेत झाले तर साधारणतः जुलै अखेरपासून पठारावरील फुले फुलण्यास सुरुवात होते. ऑगस्टच्या दुसऱ्या आठवड्यात पठार फुलांनी बहरते. त्यामुळे दर वर्षी ऑगस्टमध्ये पर्यटकांची गर्दी वाढते. मात्र, गेल्या आठवड्यात पाऊस जोरात असल्याने फुलांसाठी अनुकूल वातावरण तयार झालेले नाही. सध्या पठारावर फक्त वाईतुरा, काळी मुसळी, मई आपटी या प्रकारातील फुलेच पाहायला मिळत आहेत. पुढील पंधरा दिवसात फुलांचे वैविध्य वाढेल, त्यानंतर म्हणजेच येत्या २६ ऑगस्टपासून आम्ही ऑनलाइन आणि ऑफलाइन तिकीट विक्री सुरू करणार आहोत, अशी माहिती सातारा वन विभागाचे उपवनसंरक्षक ए. एम. अंजनकर यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘पथकांच्या संख्येवरील बंधनाचा फायदा होणार नाही’

$
0
0



म. टा. प्रतिनिधी, पुणे
'ढोलताशा पथकांवर निर्बंध आणल्यामुळे गणेशोत्सव मिरवणूक वेळेत संपेल, हा गैरसमज आहे. उलट, पथकांमधील ढोल-ताशांच्या संख्येवर बंधने आल्यामुळे गणेशमंडळे जास्त पथकांचा आग्रह धरतील आणि त्यामुळे मिरवणुकीची वेळ वाढेल,' असे मत महाराष्ट्र ढोलताशा महासंघाचे पराग ठाकूर यांनी व्यक्त केले.
'महाराष्ट्र टाइम्स' आणि 'लिड मीडिया' यांच्या संयुक्त विद्यमाने गणेश मंडळे, ढोल-ताशा पथके आणि बेरोजगारांना नोकरीची संधी उपलब्ध करून देणाऱ्या दे आसरा फाउंडेशन यांची राउंड टेबल कॉन्फरन्स आयोजिण्यात आली होती. या वेळी ठाकूर यांच्यासह दगडूशेठ गणपती मंडळाचे महेश सूर्यवंशी, सुनील रासने, युवा वाद्य पथकाचे वैभव वाघ आणि अॅड. मनीष पाडेकर, शिवप्रताप वाद्य पथकाचे सौरभ शिंदे, लीड मीडियाचे विनोद सातव आणि अश्विनी तेरणीकर आणि दे आसरा फाउंडेशनचे एस. आर. जोशी आणि अनिल पाठक उपस्थित होते.
पोलिस आयुक्त रश्मी शुक्ला यांच्या, ३० ढोलांसह पथकांनी सहभागी होण्याच्या सूचनेविषयी ठाकूर म्हणाले, 'पथकांची संख्या वाढण्यासही निर्बंधच कारणीभूत आहेत. वर्षातून एकदाच येणाऱ्या या उत्सवात पथकांत मोठ्या संख्येने सहभागी झालेल्या सगळ्याच वादकांना वाजवायला मिळत नाही. त्यामुळे वेगळी पथके स्थापन होतात.' वाघ यांच्या मते, 'एवढ्या मोठ्या संख्येने विसर्जन मिरवणूक पाहायला येणाऱ्या लोकांची सुरक्षितता हा पोलिसांच्या काळजीचा मुद्दा आहे. तो योग्यच आहे; पण पथकांतील वादकांच्या संख्येवर मर्यादा आणून हा प्रश्न सुटणार नाही.'
उत्सवाची संस्कृती चालू ठेवण्याच्या दृष्टीने असे निर्बंध योग्य नसल्याचेच मत सूर्यवंशी यांनीही व्यक्त केले. मात्र, या चर्चेत सकारात्मक बाजू समोर आली, ती सुशिक्षित बेरोजगार तरुणांना रोजगार उपलब्ध करून देण्याची. मंडळ आणि पथकांमध्ये सुशिक्षित बेरोजगार आणि गरजू तरुण असल्यास त्यांच्या नोकरीसाठी किंवा स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी त्यांना 'दे आसरा फाउंडेशन'कडे पाठवण्याची व्यवस्था करण्याची खात्री मंडळ आणि पथकांच्या उपस्थित प्रतिनिधींनी दिली. जोशी आणि पाठक यांनी फाउंडेशनच्या वतीने करण्यात येणाऱ्या मदतीविषयी या वेळी सविस्तर माहिती सांगितली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images