Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

संमेलनाध्यक्षांच्या भाषणांचा ग्रंथ

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
साहित्य संमेलनाध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांचे साहित्य संमेलनातील अध्यक्षीय भाषण प्रसिद्ध न करून अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या तत्कालीन पदाधिकाऱ्यांनी त्यांना कात्रजचा घाट दाखवला. मात्र महामंडळाची घटक संस्था व साहित्य वर्तुळाची मातृसंस्था असलेली महाराष्ट्र साहित्य परिषद हे भाषण प्रसिद्ध करून त्यांना सांस्कृतिकदृष्ट्या सामावून घेणार आहे. माजी संमेलनाध्यक्ष आनंद यादव यांचेही न झालेले भाषण साहित्यप्रेमींसमोर येणार आहे.
महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या संशोधन विभागातर्फे माजी संमेलनाध्यक्षांच्या भाषणांचा ग्रंथ प्रसिद्ध केला जाणार आहे. विभागाच्या प्रमुख व ज्येष्ठ कवयित्री डॉ. अरुणा ढेरे यांच्याकडे ग्रंथाच्या संपादकपदाची धुरा सोपाविण्यात आली आहे. '१९९० पर्यंतच्या संमेलनाध्यक्षांच्या भाषणांचा संग्रह परिषदेतर्फे पूर्वीच प्रसिद्ध करण्यात आला आहे. १९९० ते २००० या दहा वर्षांतील संमेलनाध्यक्षांच्या भाषणांचा संग्रह भाषातज्ज्ञ डॉ. रमेश धोंगडे यांनी संपादित केला असून दिलीपराज प्रकाशनातर्फे प्रकाशित करण्यात आला आहे. त्यापुढील संमेलनाध्यक्षांच्या भाषणांचा संग्रह उपलब्ध व्हावा, या हेतूने हा प्रकल्प हाती घेतला आहे', असे डॉ. ढेरे यांनी सांगितले. 'या ग्रंथाचे काम सुरू केले असून दीड वर्षात ९१ व्या संमेलनापूर्वी हा ग्रंथ पूर्ण केला जाईल', अशी माहिती त्यांनी दिली. महाबळेश्वर येथे झालेल्या संमेलनात अध्यक्ष डॉ. आनंद यादव यांच्या पुस्तकावरून वाद झाला होता. त्यामुळे अध्यक्षाविना हे संमेलन झाले. डॉ. यादव यांचे अनुभवता न आलेले भाषण साहित्यप्रेमींना या ग्रंथातून वाचायला मिळणार आहे.
पिंपरी येथे गेल्या जानेवारी महिन्यामध्ये झालेल्या ८९ व्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. सबनीस हे मोदींवरील टिप्पणीमुळे वादात अडकले होते. संमेलनाध्यक्षांच्या भाषणावरून गोंधळ होऊ शकतो, व त्यामध्ये आपला सहभाग नको अशी कातडी बचाव भूमिका महामंडळाच्या तत्कालीन पदाधिकाऱ्यांनी घेतल्याने सबनीस यांनी स्वतःच आपले भाषण प्रसिद्ध केले. त्यांच्या भाषणाला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाल्याने गोंधळ झाला नाही. या पार्श्वभूमीवर टीका झाल्याने महामंडळाने उशिराने भाषण प्रसिद्ध केले.
'आतापर्यंतच्या साहित्य संमेलनाध्यक्षांनी अध्यक्षीय भाषणात सर्व घटकांना सामावून घेणारी तसेच त्यांच्या साहित्य, संस्कृतीचे संचित पेलणारी भूमिका मांडली नाही. मुस्लिम, भटके, दलित या घटकांविषयी दोन ओळी देखील कोणाच्या भाषणात नव्हत्या. केवळ मिरवण्यासाठी संमेलनाध्यक्षाचे पद वापरण्यात आले,' या वक्तव्याने मध्यंतरी सबनीस वादात अडकले होते.


माझे अध्यक्षीय भाषण साहित्य परिषदेच्या ग्रंथात समाविष्ट होणार असेल तर आनंदच आहे. महामंडळाने उशिराने भाषण प्रसिद्ध केले होते. भाषण १२९ पानांचे असून त्यापैकी काही भाग कमी करून ९७ पानांचे भाषण त्यामध्ये घ्यावे.
- डॉ. श्रीपाल सबनीस, संमेलनाध्यक्ष

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


रस्त्यावरचे बासरीवादन ‘सीडी’त बद्ध

$
0
0

'मॉम इंडिया'तर्फे सीडीची निर्मिती
म. टा. प्रतिनिधी, पुणे
सायंकाळी गर्दीने ओसंडणाऱ्या रस्त्यावर एका वृद्ध व्यक्तीच्या बासरीचे मधुर सूर अनेकांच्या कानावर पडतात. काही क्षण ही बासरी ऐकून त्यांना थोडे पैसे देऊन सर्वच निघून जातात; पण हेच सूर एका संगीतकाराच्या कानी पडले आणि बासरीचे शास्त्रशुद्ध शिक्षण न घेतलेल्या व कधीही रेकॉर्डिंग स्टुडिओ न पाहिलेल्या या कलाकाराची कला सीडीच्या माध्यमातून सर्वांपर्यंत पोहोचण्यास सज्ज झाली.
हे ७० वर्षांचे कलाकार आहेत, गंगाधर ऊर्फ बाबा जाधव. बाबा जाधव हे नामदार गोखले (फर्ग्युसन) रस्त्याच्या फूटपाथवर बसून दररोज सायंकाळी हिंदी-मराठी गीते आपल्या बासरीच्या माध्यमातून सादर करतात. त्यांच्याच बासरीवादनाची सीडी म्युझियम ऑफ म्युझिक अर्थात मॉम इंडियाने तयार केली आहे. या सीडीचे अनावरण येत्या स्वातंत्र्यदिनी १५ ऑगस्टला सायंकाळी सात वाजता घोले रोड येथील नेहरू सांस्कृतिक भवन येथे होईल, अशी माहिती 'मॉम इंडिया'चे निर्माते मोहनकुमार भंडारी यांनी दिली.
'मला लहानपणापासूनच संगीताची आवड होती. काही कारणामुळे लहानपणीच मला घर सोडावे लागले. कोणताही गुरू किंवा औपचारिक शिक्षण नसताना केवळ आकाशवाणी आणि विविध भारतीवर ऐकलेली गाणी मनात साठवून मी बासरीवादन शिकलो. काही काळ नोकरी केल्यानंतर एसटी स्टॅण्ड, रेल्वे स्टेशन अशा ठिकाणी बसून बासरीवादन केले. गेल्या दहा वर्षांपासून मी फर्ग्युसन रस्त्यावर बासरीवादन करून उदरनिर्वाह करत आहे,' असे जाधव यांनी सांगितले. 'रस्त्यावर पहिल्यांदाच जाधव यांचे बासरीवादन ऐकले आणि मी भारावून गेलो. त्यातूनच त्यांची सीडी तयार करण्याचा निर्णय घेतला,' असे भंडारी म्हणाले. याच कार्यक्रमात रामदास गायकवाड, संतोष चोरडिया, ओंकार मेढेकर, गंगाधर गाडगीळ, अरूणा अनगळ, अभिषेक मारोटकर, शरद शहा, गफार मोमीन, श्रेया शहा आणि केदार देव यांना 'मॉम इंडिया एक्सलन्स पुरस्कारा'ने सन्मानित करण्यात येणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भीमा खोऱ्यातील धरणांत १७६ टीएमसी पाणीसाठा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
भीमा खोऱ्यातील प्रमुख धरणांमध्ये ८२ टक्के म्हणजे १७६ अब्ज घनफूट (टीएमसी) पाणीसाठा झाला आहे. गतवर्षी या धरणांत यंदाच्या निम्मा म्हणजे ४१ टक्केच पाणीसाठा होता. दरम्यान, पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला प्रकल्पात २८.४४ टीएमसी पाणीसाठा झाला आहे.

भीमा खोऱ्यातील बहुतांश धरणांत यंदा चांगला पाऊस झाला. त्यामुळे ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यातच धरणे शंभर टक्के भरली आहेत. विशेषतः मुठा व निरा उपखोऱ्यात समाधानकारक पाऊस झाला. कुकडी प्रकल्पातील काही धरणांमध्ये मात्र अद्याप पुरेसा पाणीसाठा झालेला नाही. कुकडीतील पिंपळगाव जोगे व माणिकडोह ही धरणे पावसाच्या प्रतीक्षेत आहेत.

खडकवासला प्रकल्पातील पावसाचा जोर कमी झाला आहे. शुक्रवारी सकाळी आठ ते सायंकाळी पाचपर्यंत खडकवासला धरणात एक मिलिमीटर, पानशेत व वरसगाव धरणात प्रत्येकी सहा मिमी व टेमघरमध्ये दोन मिमी पावसाची नोंद झाली आहे. गेल्या काही दिवासांत झालेल्या पावसामुळे या धरणांत पाण्याचा ओघ सुरू आहे. धरणे पूर्ण भरली असल्याने पानशेतमधून १,६९८ क्युसेक, वरसगाव धरणातू १,७७१ क्युसेक आणि खडकवासला धरणामधून ४,२६० क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे.

धरणाचे नाव पाणीसाठा (टीएमसी) टक्केवारी पाऊस (मिमी)
खडकवासला १.८९ ९५.५१ ०१
पानशेत १०.३८ ९७.५० ०६
वरसगाव १२.८२ १०० ०६
टेमघर ३.३५ ९०.२२ ०२

एकूण साठा- २८.४४ टीएमसी (९७.५४ टक्के)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

डाव्यांमुळे लोकतांत्रिक मूल्यांना तडा

$
0
0

विनय सहस्रबुद्धे यांचा आरोप
म. टा. प्रतिनिधी, पुणे
'मतभेद हीच लोकशाही, असे समजणाऱ्या आणि विचाराधारित राजकीय पक्षांची हानी झाली,' असा आरोप भाजपचे राष्ट्रीय उपाध्यक्ष खासदार विनय सहस्रबुद्धे यांनी केला.
भाजपचे राज्याचे मुख्य प्रवक्ते माधव भांडारी लिखित आणि रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी प्रकाशित 'डाव्यांची ढोंगबाजी-भष्ट्राचार, ​हिंसाचार आणि दंडुकेशाही' या पुस्तकाचे प्रकाशन पंडित नेहरू आर्ट गॅलरी येथे झाले. त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाला बेंगळुरूचे ब्लॉगर संदीप बालकृष्णन, भाजपचे शहराध्यक्ष योगेश गोगावले, प्रबोधिनीचे कार्यकारी संचालक रवींद्र साठे, शेफाली वैद्य आदी उपस्थित होते. या वेळी बालकृष्णन यांची प्रकट मुलाखत घेण्यात आली.
'देशामध्ये डावेपणाचे जाणीवपूर्वक उदात्तीकरण करण्यात आले आहे. डावे असणे हे प्रतिष्ठेने समजले गेले. विचारसरणींच्या कथनी आणि करणीत अंतर पडले की ढोंगबाजी सुरू होते. डाव्यांच्या ढोंगबाजीची अनेक रुपे आहेत.' असे सहस्रबुद्धे यांनी स्पष्ट केले.
'असहिष्णुतेची भाषा करणाऱ्या डाव्यांची वैचारिक असहिष्णुतेची असंख्य उदाहरणे आहेत. डाव्यांच्या ढोंगबाजीची अनेक रुपे १९७० नंतर उघड होत गेली. निष्कर्ष काढायचे, शेरेबाजी करायची, इतरांना कमी लेखायचे ही डाव्यांचे वैशिष्ट्ये आहेत. त्यामुळेच डाव्या विचारांची शकले झाली आहेत.' अशी टीकाही त्यांनी केली.
'डाव्या चळवळींमध्ये तपस्वी मंडळीही होती. या चळवळींच्या घसरणीची मांडणी भंडारी यांनी या पुस्तकातून केली आहे.' असे त्यांनी नमूद केले.
'हे पुस्तक डाव्यांच्या विचारांबद्दलचे नसून त्यांच्या आचारांबद्दलचे आहे. डाव्यांनी गेल्या ९० वर्षांत काय केले, याची तपासणी झाली पाहिजे. त्यांचा आर्थिक आणि बौद्धिक अप्रामाणिकपणा यातून दाखवला आहे.' असे भांडारी म्हणाले.
'राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला (आरएसएस) कायम आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करणारे डावे हे नक्षलवाद्यांबद्दल चकार शब्दही काढत नाहीत. हा देश टोळ्यांचा आहे, अशी मांडणी डाव्यांनी केली. भारत-चीन युद्धात त्यांनी शत्रूराष्ट्राला पाठिंबा दिला. त्यांचा हा ढोंगीपणा पुस्तकातून मांडला आहे.' असे भंडारी यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

माजी पोलिस निरीक्षकाचा जेलमध्ये हृदयविकाराने मृत्यू

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
नगर जिल्ह्यातील नितीन साठे याच्या पोलिस कोठडीतील मारहाणीत झालेल्या मृत्यूप्रकरणी अटकेत असलेले माजी पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर ढोकले यांचा येरवडा जेलमध्ये शुक्रवारी हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. त्यांच्यावर येरवडा जेलमधील हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते.

येरवडा जेलच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या वर्षी मे महिन्यात चोरीच्या संशयावरून नितीन साठे याला पोलिसांना चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. चौकशीदरम्यान त्याचा मृत्यू झाल्याने कोतवाली पोलिस ठाण्याचे तत्कालीन पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर ढोकले यांच्यासह चार पोलिस कर्मचारी व एक पोलिस उपनिरीक्षक यांना निलंबित करण्यात आले होते. या प्रकरणाचा 'सीआयडी'ने तपास करून या सर्वांविरोधात खून आणि अॅट्रॉसिटी कायद्यानुसार गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणी ढोकले यांना पोलिसांना अटक केली होती. ढोकले यांना जामीन न मिळाल्याने त्यांना येरवडा जेलमध्ये ठेवण्यात आले होते. या दरम्यान ते पोलिस सेवेतून निवृत्त झाले होते. नगर जेलममधून त्यांना येरवडा जेलमध्ये वर्ग करण्यात आले होते. ढोकले मार्च महिन्यापासून येरवडा जेलमध्ये होते.

ढोकले यांना उच्च रक्तदाबाचा त्रास होता. त्यांना रक्तदाबाचा त्रास झाल्यामुळे काही दिवसांपूर्वी ससून हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. उपचार घेतल्यावर त्यांना पुन्हा जेलमध्ये हलवले होते. शुक्रवारी त्यांना हृदयविकाराचा झटका आला. त्यांच्यावर तातडीने उपचार करण्यास सुरुवात करण्यात आली. येरवडा जेलमधील मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. के. एस. देशपांडे यांनी तातडीने ढोकले यांना ऑक्सिजन पुरवण्याचा प्रयत्न केला; मात्र उपचार सुरू असतानाच त्यांचा मृत्यू झाल्याचे अधीक्षक यू. टी. पवार यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

क्लोनिंग करून बनावट कार्डवरून खरेदी

$
0
0

केरळमधील आरोपींना अटक

म. टा. प्रतिनिधी, पुणे

आंतरराष्ट्रीय बँकांच्या ग्राहकांची माहिती मिळवून डेबिट व क्रेडिट कार्डचे क्लोनिंग करणाऱ्या केरळच्या टोळीला सायबर सेलने अटक केली आहे. या टोळीने सर्व गुन्हे केरळात केले असून, क्लोनिंग केलेल्या डेबिट व क्रेडिट कार्डांवरून पुण्यात खरेदी करण्यासाठी आल्यानंतर त्यांना अटक करण्यात आली आहे.

टी. के. अजमल (२४), इरफान इब्राहिम (२५) आणि नूर महंमद इब्राहिम (३२, रा. केरळ) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. या आरोपींकडून नऊ बनावट क्रेडिट कार्डे, सात मोबाइल, तीन सिमकार्डे, क्रेडिट कार्ड बनवण्यासाठीचे मशीन जप्त करण्यात आले आहे, अशी माहिती पोलिस उपायुक्त दीपक साकोरे यांनी दिली.

क्रेडिट कार्डचे क्लोनिंग करून खरेदी करण्यासाठी आलेल्या व्यक्ती जहांगीर हॉस्पिटलजवळील एका लॉजमध्ये थांबल्या आहेत, अशी माहिती सायबर सेलला मिळाली. त्यानुसार पोलिस निरीक्षक सुनील ताकवले, दीपक लगड व उपनिरीक्षक प्रवीण स्वामी, राजू भिसे, संतोष जाधव, अस्लम आतार यांचे पथक या ठिकाणी गेले. त्या वेळी एक संशयास्पद कार आढळून आली. त्यामधील व्यक्तींची खात्री पटल्यानंतर त्यांच्याकडे चौकशी करण्यात आली. त्यांच्या अंगझडतीमध्ये पांढऱ्या व काळ्या रंगाची स्ट्रिप असलेली बनावट क्रेडिट कार्ड तयार करण्यासाठी वापरले जाणारे कोरे कार्ड मिळाले. या कोऱ्या कार्डाचा वापर करून त्यांनी महंमद साबीथ नावाने नऊ बनावट क्रेडिट कार्ड तयार केल्याचे लक्षात आले. या आरोपींना मुंढवा पोलिसांकडे वर्ग करण्यात आले आहे.

या आरोपींकडे महाराष्ट्राबाहेरील अनेक व्यक्तींच्या बँक खात्याची माहिती मिळाली आहे. त्याचा वापर करून आरोपी क्रेडिट कार्डचे क्लोनिंग करत होते. तसेच अनेक इंटरनॅशनल क्रेडिट कार्डांचीही माहिती मिळाली आहे. यावरून तयार केलेल्या बनावट क्रेडिट कार्डवरून खरेदी करण्यासाठी आरोपी पुण्यात आले होते. यापूर्वी दोन वेळा येऊन त्यांनी पुण्यात लाखो रुपयांची खरेदी केली आहे. तिघेही आरोपी दहावी नापास असून, दोघे जण दुबईला राहून आले आहेत. या आरोपींना केरळ पोलिसांच्या ताब्यात दिले जाणार आहे. राजकुमार जाबा, शाहरूख शेख, अमित औचरे, तौसीफ मुल्ला, शिरीष गावडे, नितीन चांदणे, नितेश शेलार यांनी कारवाईत सहभाग घेतला.

..............

पुण्यात सर्वाधिक फसवणूक कार्डांशी संबंधित

पुण्यात डेबिट व क्रेडिट कार्डची माहिती घेऊन फसवणूक केल्याच्या सर्वाधिक तक्रारी सायबर शाखेकडे आल्या आहेत. तसेच अनेक नागरिकांची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हे दाखल आहेत. गेल्या सात महिन्यांत डेबिट व क्रेडिट कार्ड फसवणुकीच्या २०१ तक्रारी सायबर पोलिसांकडे आल्याचे समोर आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

लोणावळ्यात चोवीस तास बंदोबस्त

$
0
0

पर्यटकांवर ठेवणार करडी नजर
म. टा. प्रतिनिधी, लोणावळा

शनिवार, रविवार आणि त्याला जोडून स्वातंत्र्य दिन अशा सलग सुट्ट्यांमुळे लोणावळ्यात पर्यटकांची मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे लोणावळ्यात १३ ऑगस्ट ते १७ ऑगस्ट या कालावधीत २४ तास मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

वीकेंड आणि जोडून आलेल्या सुट्ट्यांमु‍ळे होणाऱ्या वाहतूक कोंडीमुळे पर्यटकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागतो. भुशी डॅम, टायगर , लायन्स पॉइंट्स रोडसह जुन्या मुंबई पुणे राष्ट्रीय मार्गावर पर्यटकांची गर्दी आणि वाहनांमुळे वाहतूक ठप्प होऊन वाहनांच्या १५ ते २० किमीपर्यंत लांब रांगा लागतात. सलग सुट्ट्या आल्यास तर परिस्थिती आणखी बिकट होते. त्यामुळे पर्यटकांना पर्यटनाचा आनंद घेता यावा आणि वाहतूक कोंडी टळावी यासाठी १३ ते १७ ऑगस्ट या दरम्यान लोणावळ्यात मोठ्या वाहनांना बंदी घालण्यात आली आहे. दुपारी तीन नंतर भुशी, लायन्स, टायगर पॉइंटकडे जाणारा मार्ग बंद करण्यात आला आहे. कार्ला, भाजे लेणी, लोहगड, विसापूर किल्ला आणि पवनाधरण परिसरात सायंकाळी पाच नंतर पर्यटकांना फिरण्यास बंदी करण्यात आली आहे, अशी माहिती लोणावळा शहर पोलिसांनी दिली. पर्यटकांची गर्दी लक्षात घेऊन कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांनी मोठा बंदोबस्त परिसरात तैनात केला आहे. लोणावळ्यात सार्वजनिक ठिकाणी गैरवर्तन करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येईल, असा इशारा लोणावळा उपविभागीय पोलीस अधिकारी विनायक ढाकणे व पोलीस निरीक्षक चंद्रकांत जाधव यांनी दिला आहे.

महत्त्वाचे
- लोणावळा, खंडाळ्यात अवजड वाहनांना बंदी.
- दुपारी तीन नंतर भुशी डॅमकडे जाणारा रस्ता बंद.
- वाहतुकीस अडथळा होईल अशा पद्धतीने पार्क केलेल्या वाहनांवर कारवाई.
- सार्वजनिक ठिकाणी मद्यप्राशन करणे आणि इतरांना त्रास देणे, महिलांची छेडछाड हे प्रकार रोखण्यासाठी साध्या वेशातील पोलिस तैनात.
- ब्रेथ अॅनालायझरद्वारे दारू पिऊन वाहने चालवणाऱ्यांवर कारवाई.
- स्पीकर लावून हुल्लडबाजी करणाऱ्यावर कारवाई.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गुजरातच्या व्यक्तींबद्दल न बोललेच बरे : शत्रुघ्न सिन्हा

$
0
0



म. टा. प्रतिनिधी, पुणे
'गुजरातच्या व्यक्तीबद्दल न बोललेच बरे. आम्ही बोलू तीच पूर्व दिशा, अशी येथील लोकांची धारणा आहे. मी मन की बात करत नाही. दिल की बात करतो,' अशी टिप्पणी ज्येष्ठ अभिनेते खासदार शत्रुघ्न सिन्हा यांनी शुक्रवारी अप्रत्यक्ष पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर केली. 'भाजप सोडणार का,' या प्रश्नावर त्यांनी 'मी काय सिद्धू आहे का?' असे उत्तर देत पक्ष सोडणार नसल्याचे संकेत दिले.
सिम्बायोसिस आंतरराष्ट्रीय विद्यापीठाच्या सिम्बायोसिस इन्स्टिट्यूट ऑफ मीडिया अँड कम्युनिकेशनला (एसआयएमसी) २५ वर्षे पूर्ण होत असल्यानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. रजनी गुप्ते, एसआयएमसीच्या संचालिका रुची जग्गी उपस्थित होते.
सिन्हा म्हणाले, 'गुजरातमध्ये माझे मित्र आहेत. तेथील लोकांना वाटते, की आपण जे बोलू तेच खरे आहे. त्यामुळे त्यांच्याबद्दल न बोललेले बरे. तेथील लोक मन की बात करतात. मात्र, मी दिल की बात करतो. काश्मीर ३३ दिवस विविध मुद्द्यांवर धगधगत होते. या काळातच केंद्र सरकारने योग्य पावले उचलायला हवी होती. मात्र, आता काश्मीरवर सर्वपक्षीय बैठक होते. त्यामुळे वेळ निघून गेल्यावर बैठक घेण्याचा फारसा फायदा होणार नाही.'
'आत्मविश्वास हीच आयुष्याची शिदोरी आहे. त्याच्या जोरावर मोठा पल्ला गाठता येतो. 'काम चलेगा तो नाम चलेगा' हे सूत्र प्रत्येकाने लक्षात ठेवा. मी माझ्या कामातून स्वतःला सिद्ध केले. कोणाचा आदर्श होता नाही आले तरी प्रेरणेचा स्त्रोत होण्यात मला समाधान वाटते. चित्रपटसृष्टीत स्थिरस्थावर झाल्यावर देशासाठी काहीतरी करता यावे, यादृष्टीने मी राजकारणात आलो. चांगले लोक राजकारणात येत नाही म्हणून वाईट लोकांच्या अधिपत्याखाली सामान्यांची कोंडी होते. आवड, जिद्द, इच्छा आणि चिकाटी असेल तर अवघड वाटेवरूनही मार्गाक्रमण करता येते. त्यामुळेच इतरांपेक्षा सरस ठरण्यापेक्षा स्वतःचे वेगळेपण सिद्ध करा,' असा सल्ला सिन्हा यांनी विद्यार्थाना दिला.
'सैराटसारखे उत्तम मराठी चित्रपट येत असून ते चांगला व्यवसाय करीत आहे, ही खूप चांगली गोष्ट आहे. मी या चित्रपटाबद्दल ऐकून असून तो पाहण्याची उत्सुकता आहे. या चित्रपटाचे कलाकार आणि दिग्दर्शकच उत्कृष्ट आहे. यानंतर मराठी चित्रपट असेच चांगले येतील, अशी खात्री आहे. कारण मराठीत उत्तम दिग्दर्शक, कलाकार आणि लेखक आहेत,' असे सिन्हा यांनी सांगितले

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


हॉटेल, रेस्टॉरंट आणि बार मध्यरात्रीही सुरू

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

पुणे आणि नागपूरमधील हॉटेल, रेस्टॉरंट आणि बार यांना रात्री दीड वाजेपर्यंत व्यवसाय करण्याची परवानगी राज्य सरकारने दिली आहे. यापूर्वी रात्री उशिरापर्यंत व्यवसाय करण्याची परवानगी केवळ मुंबई शहरासाठी होती. हॉटेल व्यावसायिकांकडून या निर्णयाचे स्वागत करण्यात आले आहे.

पुण्यात सध्या रात्री साडेअकरापर्यंतच हॉटेल सुरू असतात. त्यानंतर हॉटेल बंद करणे बंधनकारक आहे. रात्री उशिरापर्यंत काम करणारे नोकरदार, बाहेरगावावरून पुण्यात येणारे प्रवासी, व्यावसायिक यांना त्याचा फटका बसत होता. या सर्वांची सोय व्हावी यासाठी पुण्यात रात्री दीडपर्यंत खाद्य, मद्य वितरित करण्यास परवानगी मिळावी, अशी मागणी वारंवार करण्यात येत होती. त्यानुसार आता परवानगी देण्यात आली आहे.

हॉटेल आस्थापनांना यापूर्वी पोलिसांचा परवाना बंधनकारक होता. राज्य सरकारने पोलिसांकडून परवाना घेण्याची सक्ती रद्द केल्याने हॉटेल रात्री किती वाजेपर्यंत उघडे ठेवण्यात यावे, यावर पोलिसांचा अंकुश राहिला नव्हता. राज्य सरकारने या प्रकरणी नव्याने आदेश काढून दीड वाजेपर्यंत सवलत दिली आहे. सोलापूर, औरंगाबाद, नाशिक आणि अमरावती या शहरांत रात्री साडेअकरापर्यंत व्यवसाय करण्याची परवानगी दिली आहे. उर्वरित राज्यासाठी रात्री दहा वाजेपर्यंत परवानगी देण्यात आली आहे. ग्रामीण भागातील हॉटेल रात्री साडेअकरापर्यंत बंद करण्यात यावेत, असे आदेशात म्हटले आहे.

रात्री दीड वाजेपर्यंत हॉटेल सुरू ठेवण्याचा घेतलेला निर्णय चाकरमानी, प्रवासी यांना दिलासा देणारा आहे. या निर्णयामुळे रोजगारात; तसेच महसुलात वाढ होईल. आता हॉटेल व्यवसाय चोवीस तास सुरू ठेवण्यास परवानगी दिली जावी. - किशोर सरपोतदार, सेक्रेटरी, पुणे रेस्टॉरंट अँड हॉटेलिअर्स असोसिएशन

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

एक्सप्रेस वे 'जॅम'; खंडाळा घाटातील वाहतूक ठप्प

$
0
0

मटा ऑनलाइन वृत्त । खंडाळा/मुंबई

सलग तीन दिवसांची सुटी 'एन्जॉय' करण्यासाठी उत्साही मंडळींनी पुण्याची वाट धरल्यानं मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर वाहतुकीची प्रचंड कोंडी झाली आहे. खंडाळा घाटातील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाल्यानं पुण्याकडे जाणाऱ्या मार्गावर 'जम्बो ब्लॉक'च पाहायला मिळतोय.

मुंबई-नाशिक हायवेवरील वाहतूकही कासवगतीने सुरू असून लांबलचक विकेण्डमुळे तिथेही वाहनांच्या लांबलचक रांगा लागल्या आहेत.

दुसरा शनिवार, रविवार आणि सोमवारची स्वातंत्र्यदिनाची सुटी असा लांबलचक विकेण्ड पाहून नोकरदारांनी पिकनिकचे प्लॅन आखले होते. अनेकांनी १६ तारखेची सुटी टाकून हा विकेण्ड पाच दिवसांचा करून घेत गावी जाऊन यायचंही नियोजन केलं होतं. ही सगळी मंडळी आज सकाळी घराबाहेर पडली आणि बघता-बघता मुंबई-पुणे एक्सप्रेस वे जॅम झाला. अमृतांजन पूलाजवळ तर १० ते १२ किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या. वाहनं जागच्या जागी उभी राहिल्यानं सगळ्यांच्याच आनंदावर विरजण पडलं.

खंडाळा घाटात कार्गो ट्रक बंद पडल्यानं वाहतूक ठप्पच झाली आहे. या संकटातून पर्यटकांची सुटका करण्यासाठी पोलीस आणि प्रशासन प्रयत्न करतंय.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वाडिया यांच्यासारख्या शिक्षकांची आज गरज

$
0
0

वाडिया यांच्यासारख्या शिक्षकांची आज गरज

म. टा. प्रतिनिधी, पुणे
'पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे 'मेक इन इंडिया'चे स्वप्न पूर्ण करण्यासाठी उत्तम आणि नावीन्यपूर्ण संशोधनाची आवश्यकता आहे. हे संशोधन करण्यासाठी प्रा. एम. एस. वाडिया यांच्यासारख्या शिक्षकांची गरज आहे. गुणवत्तापूर्ण शिक्षकांशिवाय 'मेक इन इंडिया' आणि कौशल्य भारताचे स्वप्न पूर्ण होणार नाही,' असे मत ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. ए. व्ही. रामा राव यांनी शनिवारी व्यक्त केले.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आणि प्रा. एम. एस. वाडिया एज्युकेशनल ट्रस्टच्या वतीने अध्यापनास ५० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त वाडिया यांचा सत्कार करण्यात आला. त्या वेळी डॉ. राव बोलत होते. कुलगुरू डॉ. वासुदेव गाडे, आयसरचे संचालक डॉ. के. एन. गणेश, 'बीसीयूडी'चे संचालक डॉ. व्ही. बी. गायकवाड, रसायनशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. एस. पी. गेज्जी आणि वाडिया यांच्या पत्नी उपस्थित होत्या.
डॉ. राव म्हणाले, 'विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी शिक्षकच नसतील, तर संशोधन होणार नाही. दक्षिण कोरिया, इस्त्रायल, चीन आणि अमेरिका या देशांनी शिक्षण क्षेत्र व संशोधनावर मोठ्या प्रमाणात आर्थिक गुंतवणूक केल्याने तेथे मोठ्या प्रमाणात संशोधन होऊन त्याचा वापर देशाच्या विकासासाठी झाला. मात्र, देशात या क्षेत्रात पुरेशा प्रमाणात गुंतवणूकच होत नाही. संशोधन करणाऱ्या विद्यार्थ्यांनीही आपण संशोधन का करतो आहे, त्याद्वारे पुढे काय करता येईल आणि देशाला त्याचा काय फायदा होईल, या प्रश्नांची उत्तरे शोधावीत.'
डॉ. गाडे म्हणाले, 'देशातील आणि राज्यातील विद्यापीठांमध्ये गुणवत्तापूर्ण प्राध्यपकांची संख्या कमी आहे. त्यामुळे प्रा. वाडिया यांनी आता विद्यापीठात नव्याने रुजू होणाऱ्या प्राध्यापकांना मार्गदर्शन केले पाहिजे.' डॉ. गेज्जी यांनी प्रास्ताविक केले. प्रा. प्रदीप खराडे यांनी सूत्रसंचालन केले.
........
शिक्षकांमुळे खूप गोष्टी शिकलो
'समाजात शिक्षक असणे ही अत्यंत सन्माननीय गोष्ट असते. त्यामुळे शिक्षकांनी त्या सन्मानाने आणि जबाबदारीने वागले पाहिजे. मला माझ्या शिक्षकांनी वेळोवेळी केलेल्या मार्गदर्शनामुळे आयुष्यात भरपूर गोष्टी शिकता आल्या,' अशा भावना प्रा. वाडिया यांनी व्यक्त केल्या.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

यापूर्वी दिलेल्या परवानगीचे काय?

$
0
0

यापूर्वी दिलेल्या परवानगीचे काय?

म. टा. प्रतिनिधी, पुणे
गणेशोत्सवाच्या काळात रात्री दहानंतर लाउडस्पीकर्सना परवानगी देण्याचे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना देऊ नयेत, असा आदेश मुंबई हायकोर्टाने दिला आहे. मात्र, पुण्याच्या गणेशोत्सवात यापूर्वीच पाच दिवस दिलेल्या परवानगीचे काय होणार, याबाबत संभ्रम आहे. गणेशोत्सवापूर्वी राज्य सरकारने यातून मार्ग काढावा, अशी मागणी मंडळांकडून करण्यात येत आहे.
सुप्रीम कोर्टाने ध्वनीप्रदूषणासंदर्भात दिलेल्या आदेशांमुळे रात्री दहा वाजल्यानंतर लाऊडस्पीकर्स लावता येत नाहीत. यामधून दरवर्षी पंधरा दिवसांची सवलत देण्याची मुभा राज्य सरकारला देण्यात आली आहे. त्यानुसार राज्य सरकार गणेशोत्सव आणि अन्य उत्सवांमध्ये मध्यरात्री बारा वाजेपर्यंत लाउडस्पीकर्सना परवानगी देते. मात्र, वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये वेगवेगळ्या उत्सवांसाठी ही परवानगी देण्याची वेळ येत होती, त्यामुळे राज्य सरकारने संबंधित जिल्हाधिकाऱ्यांना हे अधिकार बहाल केले होते. त्या पार्श्वभूमीवर ध्वनीप्रदूषणासंदर्भात दाखल झालेल्या याचिकांवर सुनावणी सुरू आहे. त्यामध्ये सवलत देण्याचे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना बहाल करता येणार नाहीत, असा निकाल सुप्रीम कोर्टाने दिल्याचा उल्लेख हायकोर्टाने केला आहे.
दरम्यान, यंदाच्या गणेशोत्सवात पाच दिवस रात्री बारा वाजेपर्यंत लाउडस्पीकर लावण्यास पुण्याचे जिल्हाधिकारी सौरभ राव यांनी यापूर्वीच परवानगी दिली आहे. त्यानंतर आलेल्या या आदेशामुळे या परवानगीचे काय होणार, याबाबत मंडळांमध्ये संभ्रम आहे. यामध्ये लक्ष घालावे आणि गरज भासल्यास राज्य सरकारकडून ही परवानगी देण्यासाठी पालकमंत्री गिरीश बापट यांनी पुढाकार घ्यावा, अशी मागणी अखिल मंडई मंडळाचे अध्यक्ष अण्णा थोरात यांनी केली आहे.
.............
अद्याप आदेश नाहीत : जिल्हाधिकारी
या संदर्भात आमदार मोहन जोशी यांनी जिल्हाधिकारी सौरभ राव यांच्याशी संपर्क साधला. तेव्हा याविषयी अद्याप राज्य सरकारकडून कोणतेही नवे आदेश आलेले नाहीत, असे राव यांनी स्पष्ट केले. नवे आदेश आल्यामुळे यापूर्वी दिलेला परवानगीचा आदेशच लागू राहील, असे जोशी यांनी नमूद केले. गणेशोत्सवाच्या काळात दहा सप्टेंबर, तसेच ११, १३, १४ आणि १५ सप्टेंबर रोजी रात्री बारा वाजेपर्यंत लाउडस्पीकर्सना पूर्वीच परवानगी देण्यात आली आहे, असे जोशी म्हणाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

काँग्रेस-मनसेचे आजी-माजी नगरसेवक भाजपच्या वाटेवर

$
0
0

काँग्रेस-मनसेचे आजी-माजी नगरसेवक भाजपच्या वाटेवर

म. टा. प्रतिनिधी, पुणे
अवघ्या सहा महिन्यांवर येऊन ठेपलेल्या महापालिका निवडणुकांसाठी आतापासून राजकीय हालचाली सुरू झाल्या आहेत. काँग्रेस व मनसेमधील काही आजी-माजी नगरसेवक 'अच्छे दिन'साठी भारतीय जनता पक्षाच्या वाटेवर असून पुण्यातील एक खासदार त्यासाठी प्रयत्नशील आहेत.
महापालिकेची निवडणूक फेब्रुवारी २०१७ मध्ये होणार आहे. या निवडणुकांसाठी दोनऐवजी चार वॉर्डांचे प्रभाग केले जाणार आहेत. केंद्र व राज्यातील निवडणुकांमध्ये दिसलेल्या 'मोदी इम्पॅक्ट'चा फायदा महापालिका निवडणुकीत होईल असा भाजपचा होरा आहे. त्यामुळे महापालिकेतील सत्ता एकहाती येण्याच्या दृष्टीने चार वॉर्डांचा एक प्रभाग करण्याची खेळी भाजपने केली आहे.
भाजपच्या या खेळीमुळे काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, महाराष्ट्र नवनिर्माण सेना व शिवसेनेचेही धाबे दणाणले आहेत. चारच्या प्रभागामध्ये एकट्या दुकट्याचा निभाव लागणार नाही, अशी या पक्षातील अनेकांची भावना झाली आहे. या भावनेतून निर्माण झालेली भीती काही आजी-माजी नगरसेवकांना भाजपचे दार खुणावत आहे. त्यामुळे एका खासदाराच्या मदतीने काँग्रेस व मनसेचे काही आजी व माजी नगरसेवक भाजपमध्ये जाण्यास उत्सुक आहेत. या खासदारांनी भाजपमध्ये येणाऱ्या नगरसेवक व कार्यकर्त्यांची भली मोठी यादीच पक्षाच्या वरिष्ठांना सांगितली आहे आणि लवकरच त्यांचा पक्षातील प्रवेश निश्चित करणार असल्याची बोलणी केली आहेत.
काँग्रेसमधून महापालिकेचे प्रतिनिधित्व केलेले सिंहगड रस्ता, पर्वती, इंदिरानगर, कात्रज, तसेच मनसेमधील कोथरूड, कर्वेनगर भागामधील आजी-माजी नगरसेवकांची नावे भाजपमध्ये जाण्यास उत्सुक असलेल्यांच्या यादीत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील काही मंडळीही त्या दृष्टीने चाचपणी करीत आहेत. चार वॉर्डांचा एक प्रभाग जाहीर झाल्यानंतर भाजपमधील काही तथाकथित नेतेमंडळी उपनगरांमधील काही नगरसेवकांना भेटून भाजपमध्ये येण्याचे आमंत्रण देत फिरत होती. 'तुम्हाला फेव्हर करणारा प्रभाग करू, भाजपमध्ये प्रवेश करा' अशी ऑफर त्यांना केली जात होती. मात्र, या मंडळींवर फारसा कोणी विश्वास ठेवला नाही. या नेत्यांपेक्षा भाजपशी जुळवून घेतलेल्या एका खासदारांमार्फत भाजपमधील प्रवेशाचा कार्यक्रम निश्चित केला जात असल्याची चर्चा सध्या आहे.
.................
भाजपकडेही उमेदवार नाहीत
भाजपने निवडणुकीसाठी चार वॉर्डांची प्रभाग रचना करण्याची खेळी केली असली, तरी भाजपकडेही सर्व प्रभागांत वजनदार उमेदवार नाहीत. त्यामुळे अन्य पक्षांतील उमेदवारांकडे त्यांनी गळ टाकला आहे. या गळाला कोणत्या पक्षातील किती मासे लागतात हे प्रभाग रचना निश्चित झाल्यावर स्पष्ट होऊ शकणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शिल्पकार बी. आर. खेडकर यांचे निधन

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

'शिवरायांचे आठवावे रूप' या समर्थ रामदासांनी केलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या वर्णनाला, आपल्या शिल्पकलेतून सार्थ ठरवणारे, शिवाजी महाराजांचे देशभरात ३३ अश्वारूढ पुतळे साकारणारे ज्येष्ठ शिल्पकार बी. आर. खेडकर यांनी शनिवारी त्यांच्या राहत्या घरी अखेरचा श्वास घेतला. ते ९० वर्षांचे होते. आपल्या शिल्पकलेच्या जोरावर खेडकर यांनी देशभरात ४५०हून अधिक शिल्प साकारून कलेचा एक अनोखा वस्तूपाठ कलाप्रेमींसमोर ठेवला. त्यांच्या मागे ९ मुली, जावई, नातवंडे असा परिवार आहे.


शनिवारी सकाळी ११.३०च्या दरम्यान त्यांचे निधन झाले. दुपारच्या सुमारास खेडकर यांच्या अंतिम इच्छेप्रमाणे त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी कात्रज-कोंढवा रस्त्यावरील त्यांच्या कारखान्यात ठेवण्यात आले होते. सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास त्यांच्यावर वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. गेल्या अनेक दिवसांपासून त्यांना दीर्घ आजाराने ग्रासले होते. विशेष म्हणजे १२ ऑगस्ट रोजी म्हणजे शुक्रवारी त्यांचा ९० वा वाढदिवस साजरा करण्यात आला होता.

नऊ फूट उंचीच्या पुतळ्यापासून ते साडेअठरा फूट उंचीपर्यंत छत्रपती शिवाजी महाराजांची ३४ शिल्पे खेडकर यांनी घडवली. सुरुवातीच्या काळात त्यांनी के. आसिफ यांच्या 'मुघल-ए-आझम' चित्रपटासाठी कलादिग्दर्शनामध्ये महत्त्वपूर्ण योगदान दिले. त्यांना पुणे महापालिका, कुंभार समाज, टिळक महाराष्ट्र विद्यापीठ, भारती विद्यापीठ केंद्र सरकारच्या दक्षिण सांस्कृतिक विभागाकडून पुरस्कार देऊन सन्मानीत करण्यात आले होते. कुंभार समाजाच्या अनेक स्वयंसेवी संस्थांवर त्यांनी काम करून सामाजिक बांधिलकी जपली होती. शिल्पकलेतील अनेक दिग्गज कलाकार घडवण्यामध्ये खेडकर यांचा मोलाचा वाटा आहे.

साकारले पुतळ्यांचे विश्व

खेडकर यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासह बाजीराव पेशवे, राणी चन्नम्मा यांचे अश्वारूढ पुतळे साकारले, संत गगनगिरी महाराज आणि बसवेश्वरांचा पुतळाही त्यांनी त्यांच्या कलेतून साकारला. याशिवाय कर्मवीर भाऊराव पाटील, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, यशवंतराव चव्हाण, महात्मा ज्योतिबा फुले आदी महान व्यक्तींची शिल्पे त्यांनी घडवली. सातारा येथील पवई नाक्यावरचा छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा हे खेडकर यांचे पहिले काम, त्यानंतर शिवाजी विद्यापीठातील महाराजांचा पुतळा, संसदेच्या प्रवेशद्वाराजवळ दिमाखात उभा असलेला महाराजांचा अश्वारूढ पुतळा अशा कलाकृती साकारल्यानंतर खेडकर यांची केंद्रीय स्तरावर दखल घेतली गेली.

कलेचे कोणतेही शिक्षण न घेता उपजत ज्ञानातून ज्येष्ठ शिल्पकार अप्पासाहेब खेडकर यांची कला फुलत गेली. त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य शिल्पकलेसाठी व्यतीत केले. ब्राँझचे पुतळे तयार करणारे ते एकमेव शिल्पकार होते. तरुण शिल्पकारांसाठी ते आदर्श प्रेरणास्थान होते.
- विवेक खटावकर, शिल्पकार

बी. आर. खेडकर हे राज्यातील मोजक्या थोर शिल्पकारांपैकी अग्रणीचे नाव. त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना पुतळ्याच्या माध्यमातून जिवंत केले. तरुण कलाकारांसाठी त्यांनी मदतीचा हात पुढे केला. नवोदितांना प्रोत्साहन मिळावे, यासाठी प्रतिष्ठानच्या माध्यमातून शिष्यवृत्ती आणि पुरस्कार देण्यास सुरुवात केली. ते मनस्वी आणि हळव्या स्वभावाचे होते.
- डॉ. सतीश देसाई

बी. आर. खेडकर यांची कला ही निसर्गदत्त देणगी होती. कोणत्याही महाविद्यालयात जाऊन त्यांनी कलेचे रीतसर शिक्षण घेतले नव्हते. तरीही त्यांनी कलेची अखंड सेवा केली. मन, तन आणि कामाने त्यांनी लोकांच्या मनात स्थान निर्माण केले.
- मुरली लाहोटी, ज्येष्ठ चित्रकार
---------------------
बी. आर. खेडकर हे आंतरराष्ट्रीय कीर्तीचे शिल्पकार होते. मनस्वी आनंदी व्यक्तिमत्त्व, भावस्पर्शी हळवा स्वभाव ही त्यांची वैशिष्ट्ये. जिद्द, आत्मविश्वास आणि चिकाटीतून एक सामान्य माणूस कशा प्रकारे असामान्य होऊ शकतो, याचे मूर्तीमंत रूप म्हणजे खेडकर. त्यांनी नवोदित कलाकारांना शब्दश: शेवटच्या श्वासापर्यंत मार्गदर्शन केले.
- उल्हास पवार, माजी आमदार

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बैठकीची घाई सेवेसाठी की मेव्यासाठी?

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
महापालिकेची आगामी निवडणूक डोळ्यासमोर ठेवूनच पालकमंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांसोबत पुणे शहर विकास आराखड्याची बैठक घेतली. आराखडा जाहीर करताना पालकमंत्री आणि भारतीय जनता पक्षाचे आमदार शहरातील सर्वपक्षीय नेत्यांना विश्वासात घेत नाहीत. बैठकीची घाई सेवेसाठी की मेव्यासाठी, असा सवाल आमदार डॉ. नीलम गोऱ्हे यांनी पत्रकार परिषदेत उपस्थित केला.
'आगामी पालिका निवडणुका डोळ्यांसमोर ठेवूनच पालकमंत्र्यांनी आज बैठक घेतली. सध्या शहरात बिल्डरधार्जिणे राजकारण सुरू आहे. त्याचा सुज्ञ पुणेकर विचार करतील. आमचे सर्व आमदार निवडून आले आहेत. त्यामुळे आम्ही पाहिजे तेच करू असे नाही. निवडून आलो म्हणजे कोणी स्वयंभू नेता होत नाही,' अशी टीका गोऱ्हे यांनी केली.
पुणे शहरातील अवैध धंदे बंद केल्याने शहरात अस्वस्थता आहे. अनेक अधिकारी नवीन आले आहेत. मात्र, पोलिसांमध्ये गटबाजी असेल, तर मुख्यमंत्र्यांनी याबाबत बैठक घेऊन लक्ष घालावे. कायदा सुव्यवस्थेत पोलिस आयुक्त रश्मी शुक्ला चांगले काम करीत असल्याचेही त्यांनी सांगितले. शिवसेनेचे शहर संघटक श्याम देशपांडे म्हणाले, 'विकास आराखड्याबाबत अंतिम निर्णय घेण्याचे अधिकार मुख्यमंत्र्यांनाच आहेत. आजपर्यंत अनेक पक्षांचे मुख्यमंत्री होऊन गेले. त्यांनी शहराच्या विकासाबाबत सर्व पक्षांना सामावून घेतले. सर्वांची मते घेतल्यास आराखडा चांगला होईल.'
...........
'रहस्य काही दिवसांत कळेल'
चांगला पाऊस झाल्यानंतर पुणे शहराची पाणीकपात रद्द करण्याची मागणी पालकमंत्री गिरीश बापट यांच्याकडे केली होती. पुरेसा पाणीसाठा आहे की नाही हे पाहून आम्हाला काम करावे लागते असे बापट यांनी सांगितले. मात्र, पूर्वीचे आणि सध्याचे पालकमंत्री आणि पाणी यांच्यावर अभ्यास समिती नेमली पाहिजे, असे डॉ. नीलम गोऱ्हे यांनी म्हटले. 'पाणी सोडण्याची वेळ आल्यावर माणूस स्वकेंद्रित अधिकार असल्यासारखे का वागतो? बापट यांचा स्वभाव असा नाही. मात्र, पाणी प्रश्नाचे रहस्य काही दिवसांत कळेल,' असेही डॉ. गोऱ्हे यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


दुचाकीस्वारांना आता इन्शुरन्सचाही दणका

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
प्रादेशिक परिवहन विभागाकडून हेल्मेट न घालणाऱ्या वाहनचालकांवर कारवाई केली जात असताना, त्या वाहनांचा इन्शुरन्स नसल्यास संबंधितांना दोन हजार ते २३०० रुपये आणखी दंड भरावा लागत आहे. त्यामुळे वाहनचालकांना हेल्मेट न घालणे खूपच महागात पडत आहे. पाच ते १२ ऑगस्ट या कालावधीत आरटीओमध्ये हेल्मेटबाबतचा दंड भरण्यासाठी आलेल्या ३३९ जणांपैकी तब्बल २०२ वाहनचालकांकडून इन्शुरन्स नसल्याचा दंडही वसूल करण्यात आला आहे.
वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांकडून आकारण्यात येणाऱ्या दंडाच्या रकमेत मोठ्या प्रमाणात वाढ करण्यात आली आहे. या वाढीव दंडानुसार पाच ऑगस्टपासून कारवाईची अंमलबजावणी केली जात आहे. शहरात वाहतूक पोलिसांबरोबरच प्रादेशिक परिवहन विभागाचे कर्मचारीही कारवाई करण्यासाठी रस्त्यावर उतरले आहेत. गेल्या एका आठवड्यात आरटीओने दोन हजारपेक्षा अधिक वाहनचालकांवर कारवाई केली. त्यापैकी ३३९ वाहनचालकांनी आरटीओत येऊन दंडाची रक्कम जमा केली आहे. ही रक्कम स्वीकारताना वाहनासंबंधीच्या विविध टॅक्सचा भरणा झाला आहे का आणि त्या वाहनाचा इन्शुरन्स काढण्यात आला आहे का, याची माहिती तपासली जाते. यामध्ये २०२ वाहनचालकांकडे त्यांच्या दुचाकीचा इन्शुरन्स नसल्याचे स्पष्ट झाले. प्रत्येक वाहनाचा इन्शुरन्स असणे कायद्यानुसार आवश्यक आहे. त्यामुळे या २०२ वाहनचालकांकडून प्रत्येकी दोन हजार ते २३०० रुपये दंड वसूल करण्यात आला. इन्शुरन्स नसणाऱ्या वाहनाचा चालक स्वतः त्या वाहनाचा मालक असेल, तर २००० रुपये व वाहनाचा चालक त्या वाहनाचा मालक नसेल, तर २३०० रुपये दंड वसूल केला जातो, अशी माहिती उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अनिल पाटील यांनी दिली.
चारचाकी वाहनांचा इन्शुरन्स काढण्याचे प्रमाण अधिक आहे. मात्र, त्या तुलनेत दुचाकी वाहनांचा इन्शुरन्स काढला जात नाही. दुचाकी वाहनांकडून अपघात झाल्यास समोरील व्यक्तीस भरपाई देण्यासाठी या इन्शुरन्सचा उपयोग होतो. दुचाकींना 'थर्ड पार्टी' आणि 'कोम्प्रेसिव्ह' इन्शुरन्स काढता येतो. दुचाकीसाठी इन्शुरन्स गरजेचा आहे. हे आपल्या येथील नागरिकांना फारसे माहिती नाही. प्रत्येक दुचाकीस्वाराने वाहनाचा इन्शुरन्स काढावा, असे आवाहन पाटील यांनी केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पानशेत धरणाचा विसर्ग बंद

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
पाणलोट क्षेत्रात पडणारा पाऊस ओसरल्यामुळे पानशेत धरणातून सोडण्यात येणारा पाण्याचा विसर्ग बंद करण्यात आला आहे. खडकवासला आणि वरसगाव धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू असून, मुठा नदीत ४,२७० क्युसेकने पाणी सोडण्यात येत आहे. दरम्यान, खडकवासला प्रकल्पातील चारही धरणांचा पाणीसाठा २८.५१ अब्ज घनफूट (टीएमसी) आहे.
खडकवासला प्रकल्पातील धरणांचा पाणलोट क्षेत्रात गेल्या आठवड्यात मुसळधार पाऊस पडत होता. या पावसामुळे प्रकल्पातील चारही धरणे भरली. त्यामुळे या धरणांतून मुठा नदीत पाणी सोडण्यात आले. या पावसाचा जोर आता कमी झाला आहे. शनिवारी सकाळी आठ ते सायंकाळी पाच या वेळेत खडकवासला धरणात एक मिलिमीटर, पानशेतमध्ये पाच मिमी, वरसगावमध्ये चार मिमी आणि टेमघर धरणाच्या परिसरात तीन मिमी पावसाची नोंद झाली.
पाणलोट क्षेत्रातील पाऊस कमी झाला तरी धरणात पाण्याची आवक सुरूच आहे. वरसगाव धरणाच्या सांडव्यातून १,७७७ क्युसेक पाणी व विद्युत निर्मितीसाठी ५६१ क्युसेक पाणी सोडण्यात येत आहे; तसेच टेमघर धरणातूनही वीज निर्मितीसाठी २७५ क्युसेक विसर्ग सुरू आहे. हे पाणी खडकवासाल धरणात पोहोचते. त्यामुळे खडकवासला धरणातून ४,२७० क्युसेकने मुठा नदीत पाणी सोडण्यात येत आहे.
दरम्यान, खडकवासला धरण; तसेच कुकडी प्रकल्पातील धरणातून सोडण्यात येणारे पाणी उजनी धरणात पोहोचते. या धरणांतून गेल्या पंधरा दिवसांत सोडलेल्या पाण्यामुळे उजनी धरणाचा पाणीसाठा ५२ टक्के म्हणजे २८ टीएमसीवर पोहोचला आहे. पुण्यातील धरणांतून जुलै व ऑगस्टमध्ये सोडलेल्या पाण्यामुळे उजनी धरणात जवळपास ५० ते ५२ टीएमसी पाणी पोहोचले आहे. या धरणात अचल व उपयुक्त मिळून ९२ टीएमसी पाणीसाठा झाला आहे. हे धरण शंभर टक्के भरण्यास २५ टीएमसी पाण्याची आवश्यकता आहे.
..........
धरणसाठा
धरणाचे नाव पाणीसाठा (टीएमसी) टक्केवारी पाऊस (मिमी)
खडकवासला १.९३ ९७.६० १
पानशेत १०.४० ९७.६५ ५
वरसगाव १२.८२ १०० ४
टेमघर ३.३६ ९०.६५ ३
एकूण - २८.५१ टीएमसी (९७.८९ टीएमसी)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

निवडणूक आयोगाची ताकद वाढवा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
'भारतातील राजकारण हे मर्यादित व्यक्तींच्या हाती राहिले आहे. ते सर्वांपर्यंत पोहोचलेले नाही. नागरिकांचा राजकारणातील, लोकशाहीतील सहभाग वाढविण्यासाठी त्यांच्यापर्यंत माहिती पोहोचवणे आणि सक्षम बनविणे आवश्यक आहे. त्याचबरोबर निवडणूक आयोगाची ताकद वाढवून आयोगाला अधिक सशक्त बनविणेही गरजेचे आहे,' असे मत भारतीय जनता पक्षाचे युवा खासदार वरुण गांधी यांनी व्यक्त केले.
'पुणे इंटरनॅशनल सेंटर' (पीआयसी) आयोजित 'युवा खासदार' व्याख्यानमालेचे उद् घाटन वरुण गांधी यांच्या व्याख्यानाने झाले. 'राजकीय क्षेत्रातील सुधारणा' या विषयावर त्यांनी विचार मांडले. पीआयसीचे संस्थापक सदस्य, ज्येष्ठ संपादक दिलीप पाडगावकर, संचालक प्रशांत गिरबाने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या प्रारंभी पाडगावकर यांनी प्रास्ताविक केले.
'आपल्या देशात लोकप्रतिनिधींना देवत्व बहाल केले जाते. नागरिक त्यांच्या पायाही पडतात. माझा त्याला विरोध आहे. त्यासाठी मानसिकता बदलली पाहिजे. नागरिकांना सक्षम बनवून त्यांचे म्हणणे ऐकून घेतल्यास अनेक समस्या सुटू शकतील,' असे वरुण गांधी यांनी स्पष्ट केले.
'आपल्या निवडणूक आयोगाचे अधिकार मर्यादित आहेत. निवडणूक आयोगाला सशक्त करणे आवश्यक आहे. निवडणुकीच्या काळात होणाऱ्या खर्चाबाबत विविध देशांमध्ये वेगवेगळे नियम व नियंत्रण आहे. आपल्या देशात उमेदवाराने किती खर्च करावा, याचे निर्बंध आहेत; पण पक्ष पातळीवर काहीही बंधने, नियम नाहीत. आयोगाकडे लेखापरीक्षणासाठी फक्त दोन ऑडिटर आहेत, हे बदलले पाहिजे,' असे आवाहन त्यांनी केले.
.............
'राइट टू रिकॉल' असावा
राजकारण्यांवरील जबाबदारी निश्‍चित करण्यासाठी लोकप्रतिनिधींना परत बोलविण्याचा अधिकार (राइट टू रिकॉल), लोकसंख्येच्या प्रमाणात निवड (प्रपोर्शनेट रिप्रेझेन्टेशन) या पर्यायांचा स्वीकार आपण केला पाहिजे, असे वरुण गांधी म्हणाले. 'माहिती अधिकार, जनहित याचिका ही लोकशाही व्यवस्थेतील सर्वोत्तम साधने आहेत. त्यामुळे व्यवस्थेला प्रश्न विचारण्याची ताकद नागरिकांना मिळाली आहे; परंतु असे योग्य आणि आवश्यक काम करणाऱ्या कार्यकर्त्यांचे कौतुक होण्यापेक्षा त्यांचे खून करणे किंवा हल्ला करणे हे लांछनास्पद आहे. नागरिकांनी निर्भयपणे पुढे येऊन प्रश्न विचारले पाहिजेत व राजकारण्यांनीही नागरिकांना विश्वासात घेऊन काम करावे,' असेही त्यांनी सांगितले.
..........

लोकशाही प्रगल्भ होत असल्यामुळे राजकारणाच्या मुख्य प्रवाहातून कट्टरवादी लोक बाहेर फेकले जातील. राजकारणाविषयी मोठ्या प्रमाणावर जनजागृती होत असून लोकांना विशिष्ट मुद्यांवर आधारित राजकारण अपेक्षित आहे.
- वरुण गांधी, खासदार

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शिक्षण धोरण मसुद्याचा मराठी अनुवाद उपलब्ध

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
प्रस्तावित राष्ट्रीय शिक्षण धोरणाचा मसुदा प्रादेशिक भाषांमध्ये उपलब्ध करून देण्याची मागणी विचारात घेऊन केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाने हिंदीमधून अधिकृतरीत्या हा मसुदा उपलब्ध करून दिला आहे. या मसुद्याचा मराठीमधील स्वैर अनुवादही उपलब्ध झाला असून, आता त्याविषयी नागरिकांना आपल्या सूचना पाठविण्यासाठी १५ सप्टेंबरपर्यंतची मुदत देण्यात आली आहे.
मंत्रालयाने या पूर्वी हा मसुदा केवळ इंग्रजी भाषेमधून उपलब्ध करून दिला होता; तसेच त्या विषयी सूचना पाठविण्यासाठी केवळ १५ ऑगस्टपर्यंतची मुदत दिली होती. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना या मसुद्यामध्ये नेमके काय सांगितले आहे, याची माहिती मिळणे अवघड असून, सूचना पाठविणेही शक्य नसल्याची ओरड करण्यात येत होती. शिक्षणशास्त्राचे अभ्यासक किशोर दरक यांनी याविषयी केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांना पत्र लिहून घटनेने मान्यता दिलेल्या २२ भाषांमधून हा मसुदा प्रसिद्ध करण्याची मागणी केली होती; तसेच सूचना पाठविण्यासाठी एक महिना मुदतवाढ देण्याची मागणीही केली होती. या पार्श्वभूमीवर मंत्रालयाच्या वेबसाइटवर हिंदीमध्ये भाषांतरित मसुदा अधिकृतपणे उपलब्ध करून देण्यात आला आहे. या मसुद्याचा मराठी भाषेतील स्वैर अनुवादही उपलब्ध झाला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जि. प. शाळांच्या पटसंख्येत वाढ

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
जिल्हा परिषदेच्या शाळांची गुणवत्ता ढासळत असल्याची ओरड होत असल्याने विद्यार्थ्यांची संख्या झपाट्याने घसरत चालली होती. मात्र, पुणे जिल्हा परिषदेने शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी हाती घेतलेल्या उपक्रमांमुळे यंदा विद्यार्थ्यांच्या पटसंख्येत वाढ झाली आहे. विद्यार्थी संख्येतील वाढीमुळे शैक्षणिक दर्जाकडे आणखी काटेकोर लक्ष देण्यात येणार असल्याचे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष प्रदीप कंद व उपाध्यक्ष शुक्राचार्य वांजळे यांनी पत्रकारांना सांगितले.
जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळत नसल्याची; तसेच शाळांचा दर्जा खालावल्याची ओरड केली जाते. खासगी शाळांनी आपली पटसंख्या वाढविण्यासाठी जिल्हा परिषदेच्या शाळांच्या दर्जाबद्दल अशा वावड्या उठविल्या आहे. त्यामुळे या शाळांमधील विद्यार्थी संख्या गेल्या काही वर्षांत झपाट्याने कमी झाली.
जिल्ह्यात पहिल्यांदा २०११ मध्ये विद्यार्थी संख्या १० हजार ६४२ ने झाली. २०१२ मध्ये ही संख्या १० हजार ५९७, २०१३ मध्ये ७,२३५ व २०१४ मध्ये ४,९३६ ने विद्यार्थी संख्या घटली. गेल्या वर्षी हे प्रमाण थोडे कमी झाले आणि विद्यार्थी संख्या केवळ ३२६ ने कमी झाली.
विद्यार्थी संख्या कमी होत असल्याची बाब जिल्हा परिषदेने गांभीर्याने घेतली. 'शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी २०१२ पासूनच जिल्हा परिषदेने प्रयत्न सुरू केले. त्यामुळे झपाट्याने घटणारी विद्यार्थी संख्या काहीशी रोखली गेली. या गुणवत्ता वाढीचे परिणाम यंदाच्या शैक्षणिक वर्षात (२०१६-१७) दिसून आले असून, यंदा विद्यार्थ्यांची गळती थांबली. इतकेच नव्हे, तर विद्यार्थ्यांच्या संख्येत ५५६ ने वाढ झाली,' असे उपाध्यक्ष वांजळे यांनी सांगितले.
खासगी शिक्षण संस्थांचे जाळे मोठ्या प्रमाणात विस्तारत असताना जिल्हा परिषद शाळांसमोर मोठे आव्हान उभे होते. पालकांचा सुरुवातीला खासगी शाळांकडेच कल होता, मात्र खासगी शाळांना आव्हान देणारे शिक्षण जिल्हा परिषद शाळांतून मिळू लागल्याने विद्यार्थी पटसंख्या आता वाढू लागली आहे. शिक्षकांच्या सहकार्यामुळे पटसंख्या वाढण्यास मोठी मदत झाल्याची भावनाही त्यांनी व्यक्त केली.
शैक्षणिक गुणवत्ता विकास कार्यक्रमाच्या माध्यमातून कृतियुक्त अध्ययन पद्धती, आम्ही इंग्रजी शिकतो, रसायन प्रयोगशाळा, इ-लर्निंग, हस्ताक्षर सुधार उपक्रम, मोबाइल संगणक व्हॅन, सौर अभ्यासिका, ग्रीन बोर्ड व इन्व्हर्टर
पुरवणे, शिष्यवृत्ती सराव परीक्षा असे अनेक उपक्रम राबविण्यात आले. या उपक्रमांमुळे इंग्रजी माध्यमांच्या शाळांकडे असणारा कल, मराठी माध्यमाच्या जिल्हा परिषद शाळांकडे वाढल्याचे दिसून आले आहे. जिल्हा परिषद शाळांची पटसंख्या घटल्याचे प्रमाण कमी करण्याच्या उद्देशाने हे उपक्रम राबविण्यात आले. त्यास शिक्षकांनी सहकार्य केल्याने विद्यार्थी पटसंख्या वाढण्यास मदत झाल्याचे अध्यक्ष कंद यांनी सांगितले.
..
पुणे जिल्हा परिषद शाळांची पटसंख्या
------------------
तालुका वर्ष २०१५-१६ वर्ष २०१६-१७
हवेली २७,९३५ २८,९८१
खेड ३०,७१९ ३१,१०८
मुळशी १३,५७० १४,१९२
पुरंदर १०,५४२ १०,५९६
शिरूर २६,६९२ २७,७९४
जुन्नर २०,४७० १९,९१७
इंदापूर २०,०३१ १९,६२२
दौंड २१,३२० २१,१३५
भोर १०,६१४ १०,६१४
बारामती १७,२५९ १६,४१६
वेल्हा ४,२९० ४,०३५
मावळ १९,९३३ १७,८१२
..................................................................................
एकूण २,३४,२७० २,३४,८२६

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images