Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

पिंपरीला पावसाने झोडपले

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पिंपरी पिंपरी-चिंचवडमध्ये सोमवारपासून सुरू झालेल्या पावसाने बुधवारी सलग तिसऱ्या दिवशी शहरवासीयांना झोडपले. जुलैच्या पहिल्या आठवड्यात पडलेल्या जोरदार पावसामुळे धरणे ५० टक्क्यांर्यंत भरली होती. त्यानंतर, गेल्या काही दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतली होती. मात्र, सोमवारपासून मान्सून पुन्हा सक्रिय झाल्याने पाणीसाठ्यात वाढ झाली आहे.

शहरात मंगळवारी सकाळपासूनच आभाळ ढगांनी भरून गेले होते. बुधवारी पावसाचा जोर कायम होता. दिवसभरात सूर्यदर्शन झाले नाही. सकाळपासून दुपारपर्यंत पावसाच्या हलक्या सरी सुरू होत्या. दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास सुरू झालेल्या जोरदार पावसाने शहराला झोडपून काढले.

तीन दिवसांच्या जोरदार पावसामुळे शहरातील अनेक भागात पाणी साचले आहे. शहरातील काही चौकांमध्ये पाणी साचल्याने वाहनधारकांना वाहतूक कोंडीतून मार्ग काढताना तारेवरची कसरत करावी लागली. दुचाकीस्वारांची पावसाने दैना उडवली. अनेकांना भिजतच घर गाठावे लागले, तर शालेय विद्यार्थ्यांना शाळा सुटल्यानंतर पाऊस थांबण्याची प्रतीक्षा करत शाळेच्या आवारात थांबावे लागले.

पवना धरणसाठा ७४ टक्के

दोन दिवसांपासुन सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या पवना धरणाचा पाणीसाठा ७४ टक्यांवर गेला आहे. पिंपरी-चिंचवड शहारला पाणीपुरवठा करणाऱ्या पवना धरण परिसरात मंगळवारी १०४ मिमी पावसाची नोंद झाली होती. बुधवारी सायंकाळपर्यंत ५६ मिमी पावसाची नोंद झाली. धरणाचा पाणीसाठा ७३.७२ टक्के झाले आहे. परिसरात एकूण एक हजार ४२९ मिमी पावसाची नोंद झाली आहे. पुणे वेध शाळेने दिलेल्या माहितीनुसार पुणे परिसरात आठ ऑगस्टपर्यंत हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाच्या सरी कोसळणार असल्याचा अंदाज आहे. त्यामुळे या काळात धरण पूर्ण भरण्याची शक्यता आहे.

लवकरच पाणीकपात रद्द?

पिंपरी चिंचवड शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या पवना धरणातील पाणीसाठी ७०.९५ टक्के झाला असल्याचे आयुक्त दिनेश वाघमारे यांनी सांगितले. धरणाचा एकूण साठा २७२.११ दशलक्ष घनमीटर असून उपयुक्त साठा २४०.९७ दशलक्ष घनमीटर आहे. सध्या २५ टक्के पाणी कपात करण्यात येत असून त्यानुसार हा साठा २६० दिवस (२० एप्रिल १७) पुरेल इतका आहे. ही कपात १५ टक्के केल्यास २२९ दिवस, १० टक्के कपात केल्यास २१२ दिवस पाणीपुरवठा करता येईल. कपात रद्द केल्यास १९१ दिवस म्हणजे १० फेब्रुवारीपर्यंत पाणीपुरवठा करणे शक्य होईल. याबाबत लवकरच सर्वपक्षीय सदस्यांची बैठक घेऊन नियोजन करणार असल्याचे आयुक्त वाघमारे यांनी सांगितले. धरणांमध्ये पुरेसा पाणीसाठी झाल्यामुळे शहरातील पाणी कपात रद्द करावी यासाठी आता राजकीय पातळीवरून महापालिका आयुक्तांना निवेदने दिली जात आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


अनधिकृत बांधकामांचे सर्वेक्षण

$
0
0

दोषी बिल्डरांवर महापालिका करणार कारवाई

म. टा. प्रतिनिधी, पिंपरी बाणेर येथील दुर्घटनेनंतर पिंपरी-चिंचवडमधील बिल्डरांच्या अनधिकृत बांधकामांचे सर्वेक्षण करण्यात येणार असून त्यात दोषी आढळणाऱ्या व्यावसायिकांना नोटीस बजावण्यात येतील, असा इशारा महापालिकेचे आयुक्त दिनेश वाघमारे यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिला.

बाणेर येथील पार्क एक्सप्रेस इमारतीचा स्लॅब कोसळून नऊ जण ठार झाले. त्याची गंभीर दखल घेऊन खासदार श्रीरंग बारणे यांनी संबंधित बांधकाम व्यावसायिकांच्या वाकड आणि चऱ्होलीतील बांधकामांच्या चौकशीची मागणी केली होती. त्याची दखल घेतली असल्याचे नमूद करून वाघमारे म्हणाले, 'काही बांधकाम व्यावसायिक पहिल्या टप्यात बांधकाम परवानगी घेताना काही मजल्यांची घेतात. मात्र, पुढे प्रत्यक्षात बांधकाम करताना टीडीआर (विकास हस्तांतरण हक्क) लोड करून आणखी मजले उभारण्याचे नियोजन करतात. त्याची परवानगी घेतली जात नाही. बांधकाम पूर्ण झाल्यानंतर परवानगीचा अर्ज सादर करतात. या प्रवृत्तीच्या व्यावसियाकांची जणू मानसिकताच झाली आहे. त्यामुळे शहरात विविध ठिकाणी चालू असलेल्या बांधकाम प्रकल्पांचे सर्वेक्षण सुरू केले आहे. त्यानुसार विनापरवाना मजले उभारणाऱ्यांना नोटीसा देण्यात येणार आहेत. 'प्राइड पर्पल'च्या या शहरातील कामांची तपासणी करण्यासाठी बांधकाम परवाना विभागातील अधिकाऱ्यांची एक समिती नियुक्त केली आहे. तिचा अहवाल येताच पुढील कार्यवाही होईल.'

खड्ड्यांच्या तक्रारी व्हॉट्सअॅपवर

वाघमारे म्हणाले, 'पावसाळ्यात शहरातील रस्त्यांवर पडलेले खड्डे बुजवावेत, यासाठी व्हॉट्सअ‍ॅप क्रमांक सुरू केला होता. त्यास चांगला प्रतिसाद मिळाला. त्या माध्यमातून शहरात एक हजार ६९२ खड्डे आढळून आले आहेत. त्यापैकी एक हजार ४१९ खड्डे बुजविले आहेत. खड्ड्यांबाबतच्या तक्रारींसाठी ७७४५०६१९९९ हा व्हॉटस्अॅप क्रमांक उपलब्ध आहे. त्यावर नागरिक तक्रारी करू शकतात.'

महापालिकेच्या कोणत्याही विभागातील बेशिस्तपणा, हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नाही. कामचुकार अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल असा, इशारा देऊन वाघमारे म्हणाले, आरोग्य समस्यांबाबत सदस्यांनी तक्रारी केल्या आहेत. त्यांची शहानिशा करण्यात आली आहे. त्यानुसार कारवाईला कामगार संघटनेचा विरोध मोडून काढला जाईल. आरोग्याच्या गंभीर प्रश्नांबाबत कोणाचा हस्तक्षेप खपवून घेतला जाणार नाही.

दरम्यान, शहरातील कचऱ्याविषयाबाबतही व्हॉटअ‍ॅप क्रमांक सुरू केला होता. परंतु, त्यास अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही. कचरा उचलणाऱ्या संस्थेस काळ्या यादीत टाकण्याच्या सदस्यांच्या मागणीबाबत योग्य कार्यवाहीसाठी संबंधित अधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत, असे वाघमारे यांनी स्पष्ट केले. ...

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मंगलमूर्तींच्या द्वारयात्रेला प्रारंभ

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पिंपरी चिंचवड येथील महासाधू श्री मोरया गोसावी समाधी मंदिरातून निघणाऱ्या मंगलमूर्तींच्या द्वारयात्रेला उत्साह आणि भक्तिमय वातावरणात बुधवारपासून प्रारंभ झाला.

द्वारयात्रेच्या पहिल्या दिवशी सकाळी साडेआठ वाजता मंगलमूर्तींची विधीवत पूजा करून त्यांना दुर्वा वाहण्यात आल्या. त्यानंतर चिंचवड येथीलच मंगलमूर्ती वाड्याजवळ असणाऱ्या देवी देवतांचे आणि संजीवन समाधीचे दर्शन घेऊन द्वारयात्रा वाजतगाजत मार्गस्थ झाली. त्यामध्ये चिंचवड देवस्थानचे मुख्य विश्वस्त मंदार देव महाराज, चिंतामणी धुपारती मंडळाचे सदस्य, नारायण लांडगे, गंगाधर जाधव, मनोहर बेणारे, बापू खासनीस, विनायक पवार, तसेच दोनशेहून अधिक भाविक सहभागी झाले. पूजन, गोंधळ, जोगवा असे धार्मिक विधी परंपरेप्रमाणे करण्यात आले. श्री चिंतामणी मंदिरासमोर मोरया गोसावींनी रचलेल्या आरत्या म्हणण्यात आल्या. त्यानंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.

मांजराई देवी परिसरात सिंधी बांधवांच्यावतीने साफसफाई करण्यात आली. त्यांच्याकडून यात्रेत सहभागी भक्तांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. यात्रेच्या दुसऱ्या दिवशी दक्षिणद्वार असलेल्या वाकड येथील आसराई देवी मंदिर, तिसऱ्या दिवशी पश्चिमद्वार असलेल्या रावेत येथील ओझराई देवी मंदिर आणि चौथ्या दिवशी उत्तरद्वार असलेल्या आकुर्डी येथील मुक्ताई देवी मंदिरात यात्रा दर्शनासाठी जाणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘त्या’ बापाचा जामीन फेटाळला

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे स्वत‍ःच्या मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी जामीन मिळावा म्हणून बापाने दाखल केलेला अर्ज कोर्टाने फेटाळला आहे. विशेष न्यायाधीश मंगला धोटे यांच्या कोर्टाने दुसऱ्यांदा त्याचा अर्ज फेटाळला आहे.

या प्रकरणी संबंधित पीडीत मुलीच्या आईने शिरूर पोलिस स्टेशनमध्ये फिर्याद दाखल केली होती. पीडित मुलीची आई शिक्षिका आहे. नऊ सप्टेंबर २०१५ रोजी फिर्यादी शाळेतून दुपारी घरी आल्या. त्यांचा पती दारू पित असल्यामुळे त्या त्याच्याबरोबर काही बोलल्या नाहीत. सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास त्यांची मोठी मुलगी घरी आली. कपडे बदलत असताना आरोपी तिच्यावर जबदरस्ती करत असताना फिर्यादीने पाहिले.

त्यानंतर त्यांनी शिरूर पोलिसांकडे फिर्याद दाखल केली. पीडित मुलीकडे चौकशी केल्यानंतर त्याने यापूर्वीही अशाच पद्धतीने अत्याचार केल्याचे निष्पन्न झाले. त्याला या प्रकरणी अटक होऊन पोलिस कोठडी नंतर न्यायालयीन कोठडीत सुनावण्यात आली. त्याने जामीनासाठी अर्ज केल्यानंतर त्याचा अर्ज कोर्टाने फेटाळून लावला. या प्रकरणी दोषारोपपत्र दाखल झाल्यामुळे जामीन मिळण्यासाठी आरोपीने नुकताच पुन्हा जामीनासाठी अर्ज दाखल केला. सरकारी वकिलांनी त्याच्या जामीनाला विरोध करताना आरोपी पीडित मुलीचे वडील असल्याने तो त्याच्यावर व साक्षी पुराव्यांवर दबाव आणण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्याचा जामीन अर्ज फेटाळण्यात यावा, असा युक्तिवाद केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दुर्मिळ संत साहित्याचा अभ्यास शक्य

$
0
0



Aditya.Tanawade @timesgroup.com पुणे : 'मातीची भिंताडे चालवितो मढे, सांडोनिया वेडे तीर्था जाती,' या अभंगातून संत मुक्ताबाईंनी चांगदेवांच्या भेटीसाठी ज्ञानेश्वरांनी चालवलेल्या भिंतीच्या प्रसंगाचे केलेले समर्थन, 'रायाचे शिपाई हजाराचे बारा, चोखोबा सेनापती खरा पंढरीचा' या अभंगातून तुकोबांनी संत चोखोबांच्या भक्तीचा घेतलेला ठाव, अशा दुर्मिळ आणि अप्रकाशित संत साहित्याचा अनुभव आता अभ्यासकांना घेता येणार आहे. संत साहित्याचे अभ्यासक वा. ल. मंजुळ यांना संत साहित्याची शेकडो हस्तलिखिते सापडली असून, त्याचे डिजिटायजेशन करण्यात आले आहे. गेल्या वर्षभराच्या संशोधनानंतर मंजुळ यांनी राज्यभरातून हस्तलिखिते मिळवली आहेत. त्यामध्ये २५० वर्षांपूर्वी लिहिलेले संत कान्होपात्रा यांचे चरित्र, संत नामदेव यांची पुतणी संतकवी नागी नागरी यांचे संत साहित्य, चर्मकार संतकवी संताबाई यांचे जीवनचरित्र अशी अनेक हस्तलिखिते मंजुळ यांना मिळाली असून, महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि वाङ्मयीन वारसा या निमित्ताने जपण्याचे काम त्यांनी केले आहे. मंजुळ यांच्या या प्रकल्पाला लंडनच्या ब्रिटिश कौन्सिलने सहाय्य केले आहे. संत ज्ञानेश्वरांनी संपूर्ण सृष्टीचे सार सांगितलेल्या ज्ञानेश्वरीचे १६९२ साली लिहिलेले सर्वात जुन्या हस्तलिखिताचा शोध मंजुळ यांनी घेतला असून, अशाप्रकारची १२० हस्तलिखिते पुण्यात उपलब्ध आहेत. त्या संदर्भातील सर्व प्रकारच्या माहिती संकलनाचे काम मंजुळ यांनी पूर्ण केले आहे. याशिवाय संत मुक्ताबाई आणि संत चोखोबा यांचे दुर्मिळ अभंग आणि त्याची हस्तलिखिते सापडली असून, आजवर कधीही न प्रकाशित झालेल्या आणि सामाजिक संदेश देणाऱ्या अभंगांची हस्तलिखिते संत साहित्याच्या संचितामध्ये भर टाकणारी ठरणार आहेत. जुन्नरमध्ये संत तुकारामांनी लिहिलेल्या २५१ अभंगांचे एक हस्तलिखित मिळाले असून, त्यामध्ये देखील तुकोबांचे दुर्मिळ अभंग अभ्यासण्यासाठी उपलब्ध होणार आहेत. याबाबत बोलताना वा. ल. मंजुळ म्हणाले, 'महाराष्ट्रात अनेक ठिकाणी आजही हजारो संत साहित्याची हस्तलिखिते उप्लब्ध आहेत. त्यांची जशी माहिती मिळते, तसा शोध घेण्याचे काम सुरू आहे. गेल्या वर्षभरात मोठ्या प्रमाणावर संत साहित्याची हस्तलिखिते सापडलेली आहेत. ही हस्तलिखिते संत साहित्याच्या अभ्यासकांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची आहेत. यामुळे आजवर फारसे प्रकाशित न झालेले साहित्य उलगडणार असून, संत साहित्याचा हा वारसा चिरंतर टिकण्यासाठी हा प्रकल्प हाती घेण्यात आला आहे.'

मराठी हस्तलिखितांची समग्रसूची मराठी भाषेतील हस्तलिखितांची एकत्रित माहिती अभ्यासक आणि संशोधकांना मिळावी यासाठी मंजुळ यांनी हस्तलिखितांची समग्रसूची तयार करण्याचे काम सुरू केले आहे. त्याचा पहिला खंड प्रकाशित करण्यात आला आहे; तर दुसऱ्या खंडाचे लवकरच प्रकाशन करण्यात येणार आहे. एकूण पाच खंडांमध्ये ही समग्रसूची तयार केली जाणार असून, हस्तलिखिताचे शीर्षक, लेखक, काळ, पानांची संख्या, आकार अशा प्रकारची उपयुक्त माहिती खंडात दिली जाणार आहे. पुणे, मुंबई, नागपूर, उर्वरित महाराष्ट्र, आणि महाराष्ट्राच्या बाहेर असलेली हस्तलिखिते अशा एकूण पाच खंडांमध्ये ही समग्रसूची तयार करण्यात येत असल्याचे मंजुळ यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रिक्त जागांचे प्रवेशही आता ऑनलाइनच द्या

$
0
0

रिक्त जागांचे प्रवेशही आता ऑनलाइनच द्या

म. टा. प्रतिनिधी, पुणे
इंजिनीअरिंगच्या प्रवेशांदरम्यान राज्य तंत्रशिक्षण संचालनालयाने (डीटीई) संस्था पातळीवरील रिक्त जागाही केंद्रीय ऑनलाइन पद्धतीनेच भराव्यात, अशी मागणी पालक आणि विद्यार्थी संघटनांनी सुरू केली आहे. इंजिनीअरिंग कॉलेजांमधून संस्था पातळीवरील जागांचा 'बाजार' सुरू झाल्याचे उघड झाल्याने, ही मागणी जोर धरत आहे. त्यासाठी पूरक धोरणे राबविणाऱ्या तंत्रशिक्षण संचालनालयाचाही तीव्र निषेध सुरू झाला आहे.
इंजिनीअरिंगच्या केंद्रीय ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेमधील पहिल्या चार फेऱ्यांची प्रक्रिया नुकतीच पूर्ण झाली. या फेऱ्यांनंतरही कॉलेज पातळीवर हजारो जागा रिक्तच राहिल्याची माहिती या प्रक्रियेसाठी कार्यरत अधिकृत सूत्रांकडून सध्या दिली जात आहे. कॉलेज पातळीवर अशा रिक्त जागांसाठी संचालनालयाने कॉलेज पातळीवरच प्रवेश प्रक्रिया राबविण्याच्या सूचना कॉलेजांना दिल्या आहेत. त्यासाठी रिक्त जागा जाहीर करून, गुणवत्तेनुसार प्रवेश करण्याचे निर्देश संचालनालयाने दिले आहेत. असे असतानाही बहुतांश इंजिनीअरिंग कॉलेजांमधून आपल्याकडील रिक्त जागांची कोणतीही माहिती विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिली जात नाही; तसेच संस्था पातळीवरील रिक्त जागांच्या प्रवेशांसाठी विचारणा करणाऱ्या विद्यार्थ्यांना थेट मॅनेजमेंट कोट्यातील जागांची प्रवेश प्रक्रिया सांगितली जात आहे. 'मटा'ने मंगळवारी ही बाब उघड करत, संस्था पातळीवरील जागांचा बाजार समाजासमोर मांडला. त्यानंतर पालक आणि विद्यार्थ्यांनीही ही प्रक्रिया थांबवून पुन्हा ऑनलाइन प्रक्रियेच्या माध्यमातूनच रिक्त जागांचे प्रवेश देण्याची मागणी केली आहे.
'इंजिनीअरिंगच्या ऑनलाइन प्रक्रियेच्या आधारे चांगल्या कॉलेजांसाठी अर्ज सादर केलेल्या अनेक विद्यार्थ्यांना राष्ट्रीय पातळीवरील बड्या कॉलेजांमधून प्रवेश मिळाले आहेत. या विद्यार्थ्यांचे राज्यातील प्रवेश होणार नसल्याने, त्यांच्या जागा रिक्तच राहणार आहेत. अशा जागांविषयी चौकशी केल्यास कॉलेजे मॅनेजमेंट कोट्याचे प्रवेश सुचवित आहेत. ही बाब पूर्णपणे चुकीची आहे. त्यामुळेच मॅनेजमेंट कोट्याच्या कॉलेजांच्या हक्काच्या जागा वगळता, कॉलेज पातळीवरील इतर रिक्त जागांच्या प्रवेशांसाठीही संचालनालयाने पाचव्या ऑनलाइन फेरीचे आयोजन करावे,' अशी मागणी या प्रक्रियेत सहभागी असलेल्या एका विद्यार्थ्याच्या पालकाने 'मटा'कडे नोंदविली.
.............
संचालनालय जबाबदारी झटकू शकत नाही
या प्रकाराचा अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने बुधवारी तीव्र निषेध केला. संघटनेचे प्रदेशमंत्री राम सातपुते म्हणाले, 'डीटीईने इंजिनीअरिंगच्या प्रवेशांमध्ये पारदर्शकता ठेवणे गरजेचे आहे. त्यासाठी भरलेल्या जागांचा तपशील, कॉलेज पातळीवर रिक्त जागांचा तपशील 'डीटीई'नेच तातडीने जाहीर करायला हवा. संस्था पातळीवरील रिक्त जागांवर विद्यार्थ्यांना जबरदस्तीने मॅनेजमेंट कोट्यातून प्रवेश घ्यावा लागल्यास, विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप मिळविण्यातही अडचणी उद्भवू शकतात. ही बाब विद्यार्थ्यांसाठी त्रासदायकच आहे. संचालनालय आपली जबाबदारी झटकू शकत नाही. संघटना या बाबतीत तंत्रशिक्षण संचालकांना निवेदन देणार असून, हा बाजार थांबविण्यासाठी गरज पडल्यास तीव्र आंदोलनही करेल.'

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मिलिटरी फाउंडेशन लढवणार निवडणुका

$
0
0

मिलिटरी फाउंडेशन लढवणार निवडणुका

म. टा. प्रतिनिधी, पुणे
नागरी यंत्रणा पूर्ववत करण्याचे काम लष्करी अधिकाऱ्यांकडूनच होत असल्याने त्यांच्या अनुभवाचा उपयोग आगामी महापालिका निवडणुकीत करून घेण्याचे उद्दिष्ट 'महाराष्ट्र मिलिटरी फाउंडेशन'ने (एमएमएफ) ठेवले आहे. माजी लष्करी कुटुंबीयांच्या मदतीने महापालिका निवडणुकीच्या सर्व जागा लढविण्याचे 'एमएमएफ'ने मंगळवारी जाहीर केले.
स्वतंत्र पक्षाची स्थापना न करता, अत्यंत कमी खर्चामध्ये निवडणूक लढवण्याचा इरादा 'एमएमएफ'चे संस्थापक कर्नल जयंत चितळे यांनी व्यक्त केला आहे. महापालिका निवडणुकीतील सर्व जागा माजी लष्करी अधिकाऱ्यांकडून लढविण्याचा देशातील हा पहिलाच प्रयोग असल्याचा दावा त्यांनी केला; तसेच त्यासाठी पुण्यात स्थायिक असलेल्या माजी लष्करी अधिकाऱ्यांनी पुढे यावे, असे आवाहन त्यांनी केले आहे.
पालिकेच्या निवडणुकीसाठी प्रति उमेदवार अवघ्या १० हजार रुपये खर्चात निवडणूक लढवली जाणार आहे. त्यासाठी कालबद्ध वचननामा जाहीर करण्यात आला असून, प्रचाराची रणधुमाळी अभिनव आणि आक्रमक पद्धतीने आखण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. येत्या स्वातंत्र्यदिनापासून या मोहिमेची सुरुवात केली जाणार आहे. त्यानंतर दर रविवारी सकाळी ११ वाजता त्या संदर्भातील कार्यशाळा घेण्यात येणार आहे. निवृत्तीनंतर योग्य संधी न मिळालेल्या; पण प्रशासनाचा अनुभव असलेल्या लष्करी अधिकाऱ्यांना उमेदवार म्हणून उभे केले जाईल, असे त्यांनी नमूद केले. निःपक्षपाती, कर्तव्यकठोर, पारदर्शक पर्व सुरू करायचे असेल, तर 'एमएमएफ'ला सहकार्य करावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वीजयंत्रणेपासून सतर्क राहा

$
0
0

वीजयंत्रणेपासून सतर्क राहा

म. टा. प्रतिनिधी, पुणे
पावसाची संततधार असल्याने नागरिकांनी वीजयंत्रणेपासून सतर्क राहावे; तसेच घरगुती उपकरणांपासून सावधानता बाळगावी, असे आवाहन महावितरणने केले आहे.
अतिवृष्टी आणि वादळामुळे तुटलेल्या वीजतारा, वीजखांब, रस्त्याच्या बाजूचे फिडर पिलर, रोहित्राचे लोखंडी कुंपण, फ्यूज बॉक्स, घरातील ओलसर असलेली विद्युत उपकरणे, शेतीपंपाचा स्वीचबोर्ड आदींकडे दुर्लक्ष केल्याने दुर्घटना होण्याची शक्यता अधिक असते. या दुर्घटना टाळता येणे शक्य आहे. झाडाच्या फांद्या तुटून वीजतारांवर पडतात; तसेच झाडे पडल्याने वीजखांब वाकला जातो. परिणामी वीजतारा तुटण्याचे प्रकार घडतात. त्यामध्ये वीजप्रवाह असण्याची शक्यता असल्याने अशा तुटलेल्या वीजतारांपासून सावध राहावे. या तारांना हात लावण्याचा किंवा हटवण्याचा प्रयत्न करू नये, असे आवाहन महावितरणने केले आहे.
अतिवृष्टीमुळे कोणत्याही क्षणी प्रतिकूल स्थिती निर्माण होण्याची शक्यता असल्याने खबरदारीचा उपाय म्हणून रोहित्र आणि वीजपुरवठा बंद करण्यात येतो. अशा स्थितीत संभाव्य धोका टाळण्यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे, असे महावितरणकडून सांगण्यात आले.
दरम्यान, वीजग्राहकांसाठी २४ तास सुरू असणाऱ्या कॉलसेंटर्सचे १९१२ तसेच १८००२००३४३५ किंवा १८००२३३३४३५ हे टोल फ्री क्रमांक उपलब्ध आहेत. वीजसेवेच्या तक्रारींसह अतिवृष्टी किंवा वादळामुळे वीजपुरवठ्यात तांत्रिक बिघाड होऊन दुर्घटना होण्याची शक्यता असणाऱ्या ठिकाणांची माहिती या टोल फ्री क्रमांकावर देता येणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


पेशंटशी बांधिलकी जपणाऱ्या डॉक्टरांची गरज

$
0
0

पेशंटशी बांधिलकी जपणाऱ्या डॉक्टरांची गरज

म. टा. प्रतिनिधी, पुणे
'आरोग्य हीच खरी संपत्ती असल्याने प्रत्येक जण स्वतःच्या आरोग्याबाबत खूप जागरूक आहेत. त्यामुळे वैद्यकीय व्यवसाय करणारे नाहीत, तर पेशंटशी बांधिलकी जपणाऱ्या डॉक्टरांची नागरिकांना आवश्यकता आहे,' असे मत माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांनी व्यक्त केले.
बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयात आयोजित 'रिअस्पायर २०१६' या परिषदेत त्या बोलत होत्या. त्या वेळी कॉलेजचे अधिष्ठता डॉ. अजय चंदनवाले, हिलिंग हँड्स क्लिनिकचे संस्थापक डॉ. अश्विन पोरवाल, डॉ. अरुण पवळे, डॉ. समीर जोशी, डॉ. शिल्पा नाईक, डॉ. नितेश अग्रवाल आदी उपस्थित होते.
'शरीराबरोबर मनाने देखील आजारी असलेले अनेक पेशंट डॉक्टरांकडे येत असतात. त्या वेळी डॉक्टरांनी प्रेमाने त्यांच्याशी संवाद साधताच त्यांचा अर्धा आजार बरा होतो. हेच तंत्र समजून डॉक्टरांनी पेशंटची सेवा करणे अपेक्षित आहे. शहरात ७५ टक्के आधुनिक वैद्यकीय सेवा उपलब्ध आहेत. त्याच सुविधा ग्रामीण भागात देखील उपलब्ध झाल्या पाहिजेत,' अशी अपेक्षा पाटील यांनी व्यक्त केली.
'कॉलेजचा माजी विद्यार्थी असल्याचा मला अभिमान आहे. या निमित्ताने आमच्या शिक्षणाचे दिवस आठवतात. या महाविद्यालयात विद्यार्थ्यांना नेहमीच सर्वोत्कृष्ट शिक्षक लाभतात. त्यांच्यामुळेच चांगले डॉक्टर घडतात,' अशा भावना हिलिंग हँड्स क्लिनिकचे संस्थापक आणि कॉलेजचे माजी विद्यार्थी डॉ. अश्विन पोरवाल यांनी व्यक्त केल्या.
...............

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दानवेंच्या निषेधात मुख्य सभा तहकूब

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

महाराष्ट्र तोडून वेगळा विदर्भ करण्याबाबत भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी केलेल्या वक्तव्याचे जोरदार पडसाद पालिकेच्या स्थायी समितीच्या बैठकीत बुधवारी उमटले. अखंड महाराष्ट्राच्या विरोधात भूमिका बजाविणाऱ्यांना समाजकंटकाची उपमा देऊन स्थायी समिती आणि महापालिके‌ची मुख्य सभा तहकुब करण्यात आली.
लोकसभा अधिवेशनात वेगळ्या विदर्भाच्या हालचाली सुरु आहेत. १०५ हुतात्म्यांच्या बलिदानाने तसेच लाखो मराठी जणांच्या प्रयत्नांनी साकारलेल्या अखंड महाराष्ट्राच्या विरोधात छुपी आणि उघड भूमिका बजाविणाऱ्या समाजकंटकांचा निषेध करून स्थायी समितीची बैठक तहकूब करण्यात आल्याचे समितीचे अध्यक्ष बाळासाहेब बोडके यांनी सांगितले.
काँग्रेसचे नगरसेवक अविनाश बागवे यांनी तहकुबी मांडली. शिवसेनेच्या दीपाली ओसवाल यांनी अनुमोदन दिले. इतर पक्षांच्या सभासदांनी देखील पाठिंबा दिला. राज्याचे तुकडे करण्याची भूमिका मांडणाऱ्या राज्य सरकारचा आणि प्रदेशाध्यक्ष दानवे यांचा निषेध राष्ट्रवादीचे नगरसेवक सतीश म्हस्के यांनी केला. सर्वसाधारण सभेत वेगळा पोषाख परिधान करून भाजपचा निषेध केला.
..
भाजपच्या नगरसेवकाचाही पाठिंबा
अखंड महाराष्ट्राला विरोध करणाऱ्या भाजपचे प्रदेशाध्यक्ष दानवे यांच्या निषेधार्थ मांडण्यात आलेल्या तहकुबीच्या प्रस्तावाला भाजपचे नगरसेवक श्रीकांत जगताप यांनी पाठिंबा दिला. जगताप यांनी ठामपणे घेतलेल्या भूमिकेचे विशेष कौतुक होत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शहराचा आराखडा महिनाभरात मंजूर

$
0
0

नगरविकास राज्यमंत्र्यांचे आश्वासन

म. टा. प्रतिनिधी, पुणे
बहुचर्चित पुणे शहराच्या जुन्या हद्दीचा विकास आराखडा (डीपी) येत्या महिनाभरात मंजूर केला जाणार असल्याचे आश्वासन राज्याचे नगरविकास राज्यमंत्री रणजित पाटील यांनी दिले.
महापालिकेने वेळेत 'डीपी' मंजूर केला नाही. त्यामुळे राज्य सरकारने 'डीपी' ताब्यात घेऊन विभागीय आयुक्त एस. चोक्कलिंगम यांचा अध्यक्षतेखाली तीनजणांची समिती नेमली होती. या समितीने राज्य सरकारला 'डीपी' सादर केला. मात्र, अद्याप त्यास मंजुरी देण्यात आलेली नाही. याबाबत भाजपच्या आमदार मेधा कुलकर्णी यांनी विधिमंडळात लक्षवेधी उपस्थित केली होती. त्यावेळी पाटील यांनी एक महिन्यात डीपी मंजूर करण्याची घोषणा केली.
या बाबत आमदार कुलकर्णी म्हणाल्या, 'शहराच्या १९८७ च्या 'डीपी'ची २५ टक्केही अंमलबजावणी झालेली नाही. 'डीपी' मंजूर करण्यास विलंब झाल्यास विकासकामांमध्ये अडथळा निर्माण होतो. त्यामुळे 'डीपी' लवकर मंजूर करावा.' 'शहरात अनधिकृत बांधकामे वाढत आहेत. त्यास बांधकाम व्यावसायिकांबरोबरच अनधिकृत बांधकामांकडे दुर्लक्ष करणारे अधिकारी जबाबदार आहेत. त्यामुळे यांच्यावर कारवाई करावी; तसेच बांधकाम विभागातील भरतीचा अनुशेष पूर्ण करण्यात यावा,' अशी मागणी आमदार कुलकर्णी यांनी केली. 'शहराचा 'डीपी' एक महिन्यात मंजूर केला जाईल; तसेच अनधिकृत बांधकामांना जबाबदार असलेल्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल,' असे पाटील यांनी जाहीर केले. 'भरती आणि नेमणुकीचा बॅकलॉग पूर्ण करण्यात येईल,' असेही ते म्हणाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नदीकाठच्या लोकांना दक्षतेचा इशारा

$
0
0

मुसळधार पावसामुळे शहरात पूरपरिस्थिती

म. टा. प्रतिनिधी, पुणे
धरण क्षेत्रात आणि शहरात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे शहरात पूरस्थिती निर्माण झाली असून, नदीकाठच्या नागरिकांना दक्षतेचा इशारा देण्यात आला आहे.
गेले दोन दिवस पडत असलेल्या पावसामुळे खडकवासला धरणातून पाणी सोडण्यास सुरुवात करण्यात आली आहे. बुधवारी दुपारनंतर खडकवासला धरणातून ४० हजार क्युसेकने पाणी सोडले जात असल्याने सिंहगड रोडवरील अनेक सोसायट्यांच्या पार्किंगमध्ये पाणी घुसले. विठ्ठलवाडी, एकतानगरी, द्वारका अपार्टमेंट, जलविहार याबरोबरच शारदा सरोवर, पूजा पार्क, आनंदनगर भागातील सोसायट्यांमध्ये पाणी शिरले. या ठिकाणी पालिकेच्या वतीने बचाव कार्य सुरू करण्यात आले असून पालिकेची आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा काम करत असल्याचे पालिका आयुक्त कुणाल कुमार यांनी सांगितले.
शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या चारही धरणांच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस पडत आहे. खडकवासला धरण शंभर टक्के भरल्याने खबरदारीचा उपाय म्हणून बुधवारी सकाळी धरणातून तीन हजार क्युसेकने पाणी सोडण्यास सुरुवात करण्यात आली. त्यानंतरही पावसाचा जोर वाढत गेल्या टप्प्याटप्प्याने पाण्याचा विसर्ग वाढविण्यात आला. सायंकाळी धरणातून ४० हजार क्युसेक पाणी सोडण्यात येत होते. धरणामधून पाणी सोडण्यात येत असल्यामुळे बाबा भिडे पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आला. नदीपात्रातील २० ते २५ गाड्या पुराच्या पाण्यात अडकल्या. विशेष प्रयत्न करून अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी या गाड्या बाहेर काढल्या.
सिंहगडरोडवरील अनेक सोसायट्यांमध्ये नदीचे पाणी घुसल्याने नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. डेक्कन भागातील पुलाची वाडी येथील काही घरांमध्ये पाणी घुसले आहे. त्यामुळे नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्याच्या सूचना पालिका प्रशानाकडून देण्यात आल्याचे कुमार यांनी सांगितले. पावसाचा जोर कमी होत नसल्याने खबरदारी घेण्यासाठी महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून सर्व क्षेत्रीय कार्यालयांना सावधनतेच्या सूचना देण्यात आल्या आहेत. ज्या भागात पावसाचे पाणी शिरले आहे, तेथे घटनास्थळी जाऊन महापौर प्रशांत जगताप यांनी आयुक्तांसह पाहणी केली.
..
पूल बनले पिकनिक स्पॉट
खडकवासला धरणामधून नदीत सुमारे ४० हजार क्युसेक पाणी सोडण्यास सुरुवात झाल्याने नदीपात्रातील रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. नदीपात्रालगत असलेल्या ओंकारेश्वरला मुठा नदीने श्रावणाच्या पहिल्याच दिवशी जलाभिषेक घातला. नदीत पाणी सोडल्याने नदीवरील पूल बुधवारी पिकनिक स्पॉट बनला होता. धरणातून सोडलेले पाणी पाहण्यासाठी दुपारनंतर पुणेकरांनी प्रत्येक पुलावर गर्दी केली होती.
००००
धरणांतून मोठा विसर्ग
सातत्याने पडत असलेल्या पावसामुळे चोवीस तासांत चार टीएमसी पाणीसाठा धरणांमध्ये वाढला आहे. शहराला चार महिने पुरेल इतका पाणीसाठा अवघ्या चोवीस तासांत निर्माण झाला. धरणांमधून सुमारे तीन टीएमसी पाणी सोडण्यात आले आहे. कालव्यामधून देखील मोठ्या प्रमाणात पाणी सोडले जात आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शहर, परिसरात पावसाची संततधार

$
0
0

पुणे : शहर आणि परिसरात सलग दुसऱ्या दिवशी दिवसभर पावसाचा जोर कायम होता. रात्री साडेआठपर्यंत ३२.९ मिमी पावसाची नोंद वेधशाळेत झाली. येत्या ४८ तासांत शहर आणि परिसरात अधूनमधून पावसाच्या सरी पडण्याची शक्यता पुणे वेधशाळेने वर्तवली आहे.
गेल्या दोन दिवसांपासून शहरात पावसाचा जोर वाढला आहे. बुधवारी सकाळी साडेआठपर्यंतच्या २४ तासांत शहरात ३९.६ मिमी पावसाची नोंद झाली होती. तर, त्यानंतरच्या १२ तासांमध्ये ३२.९ मिमी पाऊस झाला. बुधवारी सकाळपासूनच दमदार पाऊस सुरू झाला. शहराच्या सर्वच भागांत पावसाचा जोर होता. त्यामुळे, अनेक ठिकाणी रस्त्यावर पाणी साचले, तर अनेक भागांत रस्त्यांना नाल्याचे स्वरूप प्राप्त झाले. दुपारनंतर पावसाचा जोर काहीसा कमी झाला, तरीही अधूनमधून पावसाच्या जोरदार सरी कोसळल्या. लोहगाव येथेही २० मिमी पाऊस झाला. पावसाळी हंगामात संपूर्ण दिवस संततधार कायम राहण्याचा अनुभव बुधवारी पुणेकरांनी घेतला.
गेल्या महिनाअखेरीस दोन महिन्यांच्या सरासरीच्या तुलनेत पावसाचे प्रमाण कमी होते. मंगळवार आणि बुधवारी झालेल्या पावसाने आता हे चित्र बदलले असून, सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाला आहे. येत्या दोन दिवसांत शहरात अधूनमधून पावसाच्या सरी पडण्याची शक्यता वेधशाळेने वर्तवली असून, त्याचा जोर काहीसा कमी होण्याचे संकेत देण्यात आले आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दोन लाख क्युसेकने विसर्ग

$
0
0

भीमा, कृष्णेच्या खोऱ्यात दमदार वृष्टी; तेरा धरणांचे दरवाजे वर

म. टा. प्रतिनिधी, पुणे
भीमा, कृष्णा खोऱ्यातील धरणांच्या पाणलोट क्षेत्रात गेल्या चोवीस तासांत जोरदार पर्जन्यवृष्टी झाली. या पावसामुळे दोन्ही खोऱ्यांमधील तेरा धरणांचे दरवाजे उघडून दोन लाख क्युसेकने पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. या पाण्यामुळे नद्यांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे.
गेले काही दिवस विश्रांती घेतलेल्या पावसाने १ ऑगस्टपासून राज्यात पुनरागमन केले. भीमा, कृष्णा खोऱ्यातील धरणांच्या पाणलोटात गेले तीन दिवस मुसळधार पाऊस पडत आहे. गेल्या चोवीस तासांत पावसाचा जोर आणखी वाढला. त्यामुळे या दोन्ही खोऱ्यांतील प्रमुख ३७ धरणांपैकी १३ धरणे शंभर टक्के भरली. ही धरणे भरल्याने सांडव्यातून नदीपात्रात पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे.
पुण्यातील खडकवासला धरण शंभर टक्के भरल्याने त्यातून बुधवारी सायंकाळपर्यंत ३१ हजार क्युसेकने पाणी सोडण्यात येत आहे. त्यामुळे मुठा नदीला पूर आला आहे. पुरंदर तालुक्यातील वीर धरणाचे दरवाजे उघडून ४० हजार क्युसेकने पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. वेल्हे तालुक्यातील गुंजवणी धरण शंभर टक्के भरले आहे. या धरणातून पाच हजार क्युसेकने विसर्ग करण्यात येत आहे. मुळशी धरणातून तीन हजार क्युसेक, कासारसाई धरणातून ७७४ क्युसेक, कलमोडी धरणातून २८०० क्युसेक आणि वडिवळे धरणातून ८८५ क्युसेकने पाणी सोडण्यात येत आहे. चासकमान धरणाचे पाच दरवाजे उघडून ८८०० क्युसेकने पाणी नदीत सोडण्यात येत आहे. कुकड प्रकल्पातील येडगाव धरणातून २० हजार आणि वडज धरणातून ५९०० क्युसेकने विसर्ग सुरू आहे.
कृष्णा खोऱ्यातील धोम, तारळी, कासारी व राधानगरी ही धरणे शंभर टक्के भरली आहेत. धोम-बलकवडी धरणातून ६९३२ क्युसेक, तारळी धरणातून ६०० क्युसेक, कासारी धरणातून ४५०० क्युसेक व राधानगरी धरणातून १८०० क्युसेकने विसर्ग करण्यात येत आहे. धरणांतून सोडलेल्या पाण्यामुळे नद्यांची पाणीपातळी वाढली आहे. काही भागांतील गावांना धोक्याचा इशाराही देण्यात आला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अतिवृष्टीमुळे मुठा नदीला पूर

$
0
0

खडकवासला धरणाचे ११ दरवाजे उघडले; ४० हजार क्युसेकने विसर्ग

म. टा. प्रतिनिधी, पुणे
पाणलोट क्षेत्रात झालेल्या मुसळधार पावसामुळे खडकवासला धरणातून ३९ हजार ६०० क्युसेकने पाणी सोडण्यात येत आहे. धरणातून सोडलेल्या या पाण्यामुळे मुठा नदीला पूर आला असून दोन वर्षांच्या खंडानंतर बुधवारी मुठा नदी दुथडी भरून वाहिली. पाणलोटात पावसाचा जोर कायम असल्याने धरणातून रात्री उशिरा आणखी पाणी सोडले जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे नदीकाठच्या रहिवाशांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
खडकवासला साखळी प्रकल्पातील धरणांत गोल्या तीन दिवसांपासून पाऊस सुरू आहे. गेल्या चोवीस तासांत या धरणांच्या पाणलोटात अतिवृष्टी झाली. परिणामी, धरणांत येणाऱ्या पाण्याचे प्रमाण वाढले आहे. पाणलोटातून येणाऱ्या पाण्यामुळे खडकवासला धरण शंभर टक्के भरले. त्यामुळे सकाळी साडेनऊ वाजता धरणाचे अकरा दरवाजे साडेचार फुटांनी उघडण्यात आले. धरणातून मुठा नदीत सुरुवातीला ४ हजार २८० क्युसेकने विसर्ग सुरू करण्यात आला. मात्र, पाणलोटात पावसाचा जोर कायम राहिल्याने अकरा वाजता हा विसर्ग १० हजार क्युसेक आणि साडेअकरा वाजता १६ हजार ८०० क्युसेक करण्यात आला.
खडकवासला धरणाच्या वरच्या भागात दुपारीही जोरदार पाऊस झाल्याने मुठा नदीतील विसर्ग २२ हजार ८०० क्युसेकपर्यंत वाढविण्यात आला. दुपारी दोनच्या सुमारास त्यात आणखी वाढ करून ३१ हजार ९४४ क्युसेकने पाणी सोडण्यात आले. पावसाचा जोर सायंकाळीही कायम राहिल्याने धरणातून ३९ हजार ६०० क्युसेकने पाणी सोडण्याचा निर्णय पाटबंधारे खात्याच्या अधिकाऱ्यांनी घेतला. धरण परिसरात पाऊस सुरू असल्याने ओढे-नाल्यांतून प्रचंड पाणी धरणात येत आहे. त्यामुळे रात्री उशिरा विसर्गाचे प्रमाण आ‍णखी वाढवावे लागण्याची शक्यता पुणे पाटबंधारे मंडळाचे अधीक्षक अभियंता अतुल कपोले आणि खडकवासला पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता पांडुरंग शेलार यांनी व्यक्त केली आहे.
पावसाअभावी गेली दोन वर्षे खडकवासला प्रकल्पातील धरणे शंभर टक्के भरली नाहीत. खडकवासला धरण भरल्याने त्यातून मुठा नदीत पाणी सोडण्यात आले. त्यामुळे दोन वर्षांच्या खंडानंतर मुठा नदीला पूर आला आणि नदी दुथडी भरून वाहिली. या पाण्यामुळे भिडे पूल पाण्याखाली गेला. तसेच नदीपात्रातील रस्ताही पाण्याखाली गेला.
..
'पानशेत'मधून पाणी सोडावे लागणार
पाणलोटातील पावसामुळे पानशेत धरणात नऊ टीएमसी म्हणजे ८५ टक्के पाणीसाठा झाला आहे. पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कायम असल्याने हे धरण शंभर टक्के भरण्याच्या मार्गावर आहे. त्यामुळे त्यातूनही पाणी सोडावे लागण्याची शक्यता आहे. पानशेत धरणातून सोडलेले पाणी थेट खडकवासला धरणात येते. खडकवासला धरणाची साठवण क्षमता कमी आहे. पानशेतमधील पाणी सोडल्यावर खडकवासला धरणात पाणी सामावून घेणे शक्य होत नाही. त्यामुळे सुरक्षिततेचा उपाय म्हणून खडकवासला धरण काही प्रमाणात रिते ठेवावे लागते. या पार्श्वभूमीवर खडकवासला धरणातून मुठा नदीत जादा पाणी सोडण्याचा निर्णय पाटबंधारे खात्याला घ्यावा लागणार आहे.
..
'उजनी'त चार टीएमसी पाणी पोहोचणार
खडकवासला धरणातून सोडण्यात आलेले ४० हजार क्युसेक पाणी तसेच मुळशी, घोड, चासकमान या धरणातून सोडलेले पाणी उजनी धरणात पोहोचते. बंडगार्डन पुलावरून सद्यास्थितीत ५० हजार क्युसेक पाणी वाहत आहे. दौंडमधील देऊळगावराजे भागात प्रमाण अधिक असणार आहे. भीमा खोऱ्यातून सोडलेल्या या पाण्यामुळे उजनी धरणाचा साठा चार ते पाच टीएमसीने वधारण्यास मदत होणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


संततधार पावसाने पुणेकरांची दाणादाण

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाचा जोर वाढल्याने पुणेकरांची दाणादाण उडाली. शहराच्या मध्यवस्तीसह उपनगरात रस्त्यांवर साचलेले पाणी, मोठ्या प्रमाणावर निर्माण झालेली वाहतूक कोंडी, खडकवासला धरणातून नदीत पाण्याचा विसर्ग केल्याने सिंहगड रोड परिसरातील सोसायट्यांमध्ये शिरलेले पाणी आणि खंडित झालेला वीजपुरवठा अशी प्रतिकूल परिस्थिती बुधवारी अनुभवायला मिळाली.
जुलैच्या शेवटच्या दोन आठवड्यांपासून दडी मारलेल्या पावसाचे रविवारी शहरात पुनरागमन झाले. रविवार आणि सोमवारी शहरात काही प्रमाणात पाऊस झाला. मात्र, मंगळवारी सायंकाळपासून पावसाचा अचानक जोर वाढला. त्यानंतर मंगळवारची संपूर्ण रात्र आणि बुधवारी सायंकाळपर्यंत पावसाचा जोर कायम राहिला. त्यामुळे पुणेकरांची खूपच गैरसोय झाली. भाजी मंडईमध्ये दररोज सायंकाळी खरेदीसाठी होणारी गर्दी पाहायला मिळाली नाही. पावसामुळे ग्राहकांनी पाठ फिरवल्याने पेठांमधील विविध बाजारपेठाही रिकाम्या होत्या.
सकाळी १० वाजल्यापासून खडकवासला धरणातून मुठा नदीत पाणी सोडण्यास सुरुवात झाली. त्यावेळी सुरक्षिततेच्या कारणास्तव नदी पात्रातील रस्ता व भिडे पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आला. त्यामुळे कर्वे रस्ता व मध्यवर्ती पेठातील रस्त्यांवरील ताण वाढून वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. कर्वे रस्ता, बाजीराव रस्ता, शिवाजी रस्ता, जंगली महाराज रस्ता, घोले रस्ता यासह उपनगरात मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी झाली होती.
दुपारी चारनंतर नदीच्या पाण्याची पातळी वाढल्याने गाडगीळ पूल (झेड ब्रिज), विठ्ठल रामजी शिंदे पूल आणि एस. एम. जोशी पुलावर पाणी पाहण्यासाठी तरुणांसह ज्येष्ठांनीही गर्दी केली होती. त्यावेळी अनेकांनी गरमागरम मक्याच्या कणसावर ताव मारला. तसेच, सेल्फी काढणाऱ्यांची संख्याही अधिक होती.
----------
शहरात मोठी वाहतूककोंडी
सातत्याने सुरू असलेल्या पावसाने मंदावलेली वाहतूक आणि त्यातच भर रस्त्यात बंद पडलेली पीएमपी बस यामुळे विद्यापीठ रस्त्यावर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. त्याचा थेट परिणाम या रस्त्याला जोडणाऱ्या अन्य रस्त्यांवर झाला. जुना-पुणे मुंबई रस्ता, शिवाजीनगर एसटी स्टँड परिसर, फर्ग्युसन कॉलेज रस्ता येथून येणाऱ्या वाहनांना त्या कोंडीचा फटका बसला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नागरिक सुरक्षेसाठी वीजपुरवठा बंद

$
0
0

सिंहगडरोड परिसरातील सखल भागात शिरले पाणी

म. टा. प्रतिनिधी, पुणे

मुठा नदीला पूर आल्यामुळे सिंहगड रोड परिसरातील सखल भागात बुधवारी पाणी शिरले. त्यामुळे सुरक्षिततेच्या दृष्टीने या भागातील आठ रोहित्रांचा वीजपुरवठा तात्पुरता बंद करण्यात आला आहे. पुराचे पाणी ओसरल्यानंतर या रोहित्रांचा वीजपुरवठा पूर्ववत करण्यात येणार असल्याचे महावितरणकडून सांगण्यात आले.

मुठा नदीच्या पाण्याची पातळी वाढल्याने एकतानगर, साईसिद्धार्थ, आनंदपार्क, विठ्ठलनगर, शारदासरोवर सोसायटी, राजपार्क सोसायटी, जलतंरग, जलविहार आदी परिसरातील सखल भागात पाणी साचले आहे. तळमजल्यात असणाऱ्या वीजयंत्रणेमुळे नागरिकांच्या सुरक्षिततेला धोका निर्माण होऊ नये, यासाठी दुपारी चारच्या सुमारास या परिसरातील आठ रोहित्रांचा वीजपुरवठा तात्पुरता बंद करण्यात आला. या रोहित्रांवरून सुमारे एक हजार ८०० वीजग्राहकांना वीजपुरवठा केला जातो. पुराचे पाणी ओसरल्यानंतर बंद केलेला वीजपुरवठा पुन्हा सुरळीत करण्यात येणार आहे, असे महावितरणकडून स्पष्ट करण्यात आले.
दरम्यान, मुख्य अभियंता रामराव मुंडे, अधीक्षक अभियंता सुंदर लटपटे, कार्यकारी अभियंता गणेश लटपटे, अतिरिक्त कार्यकारी अभियंता दिलीप कोकणे यांनी परिसराला भेट देऊन वीजयंत्रणेची पाहणी केली.

अन्य भागातही वीजपुरवठा खंडित

पावसामुळे अन्य भागातील वीजपुरवठा खंडित झाला. त्यामध्ये मुंबई-बंगळुरू बाह्यामार्गावरील टोलनाका परिसरातील वीजपुरवठा खंडित झाला होता. त्यामध्ये सन गॅलक्सी, नारायण बाग आदी प्रमुख सोसायट्यांचा समावेश होता. या सोसायट्यांमध्ये दिवसभर वीजपुरवठा खंडित झाला होता. याशिवाय कात्रज-कोंढवा रस्ता परिसर, वानवडी, एनआयबीएम रोड, बिबवेवाडी आदी परिसरात तांत्रिक बिघाडामुळे वीजपुरवठा खंडित झाला होता. सायंकाळी वीजपुरवठा सुरळीत करण्यात आला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पावसाचा जोर ओसरणार

$
0
0

कमी दाबाची क्षेत्रे उत्तरेकडे सरकण्याची शक्यता

म. टा. प्रतिनिधी, पुणे

राज्यभरातील पावसाचा जोर येत्या ४८ तासांत ओसरण्याची शक्यता भारतीय हवामानशास्त्र विभागाने (आयएमडी) वर्तवली आहे. बंगालच्या उपसागरात एकापाठोपाठ एक अशी दोन कमी दाबाची क्षेत्रे निर्माण झाल्यामुळे महाराष्ट्रासह मध्य भारतात पावसाने दमदार हजेरी लावली आहे. कमी दाबाची क्षेत्रे उत्तरेकडे सरकण्याची शक्यता असल्यामुळे कोकण वगळता राज्याच्या इतर भागांतील पावसाचे प्रमाण कमी होईल असे 'आयएमडी'ने म्हटले आहे.

बंगालच्या उपसागरात निर्माण होऊन छत्तीसगडवर स्थिरावलेल्या कमी दाबाच्या क्षेत्राची तीव्रता बुधवारी वाढली. त्या पाठोपाठ ओडिशाच्या किनारपट्टीजवळ आणखी एक कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाल्यामुळे महाराष्ट्रासह पूर्व किनारपट्टी आणि मध्य भारतातील पावसाचा जोर वाढला. हि दोन्ही कमी दाबाची क्षेत्रे उत्तर- वायव्य दिशेने सरकण्याची शक्यता असल्यामुळे येत्या ४८ तासांत मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यातील पावसाचा जोर ओसरेल असे 'आयएमडी'ने म्हटले आहे. दरम्यान, गुजरात ते कोकणदरम्यान किनारपट्टीवरील कमी दाबाचा पट्टा सक्रिय असल्यामुळे पुढील पाच दिवस कोकणात काही ठिकाणी मोठ्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

बंगालच्या उपसागरात कमी दाबाची क्षेत्रे निर्माण झाल्यामुळे अरबी समुद्रावरून महाराष्ट्राकडे येणाऱ्या मोसमी वाऱ्यांची तीव्रता वाढली. या वाऱ्यांसोबत आलेल्या बाष्पामुळे गेल्या तीन दिवसांत कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात पावसाने दमदार हजेरी लावली असे हवामानतज्ज्ञांचे म्हणणे आहे.

पुण्यातील पाऊस

सिटिझन सायन्स नेटवर्कतर्फे (सीएसएन) बुधवारी रात्री साडेआठपर्यंतच्या ३६ तासांमध्ये शहराच्या विविध भागांमध्ये नोंदला गेलेला पाऊस (मिलीमीटरमध्ये) - नवी पेठ - ७७ कोथरूड - ८९ वारजे - १०८ सिंहगड रस्ता- १०१ हडपसर- ४९ चिंचवड- ७१

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ब्रिटिशकालीन पुलांची पालिका करणार डागडुजी

$
0
0

आयुर्मान वाढलेल्या पुलांना पर्यायी पूल उभारणार

म. टा. प्रतिनिधी, पुणे

कोकणात सावित्री नदीवरील ब्रिटिशकालीन पूल वाहून गेल्यामुळे शहरातील जुन्या पुलांच्या सुरक्षेबाबत चिंता व्यक्त केली जात असली, तरी महापालिकेतर्फे अशा सर्वच पुलांच्या मजबुतीकरणाचे काम सध्या हाती घेण्यात आले आहे. स्वातंत्र्यपूर्व काळातील मोजकेच पूल शहरात असून, काही पुलांचे आयुर्मान वाढत चालल्याने त्याला पर्यायी पूल उभारण्याचे कामही पालिकेने आरंभले आहे.

ब्रिटिशांच्या काळात उभारलेल्या पुलांपैकी वेलस्ली पूल (संगम पूल), फ्रिट्ज गेराल्ड पूल (बंडगार्डन पूल) आणि शिवाजी पूल (नवा पूल) हे तीन पूल सध्या अस्तित्त्वात आहेत. पेशवाईमध्ये उभारण्यात आलेला पुण्यातील पहिला लकडी पूल (संभाजी पूल) आतापर्यंत दोनदा वाहून गेला आहे. पानशेतच्या पुरामध्ये या पुलाचे सर्वाधिक नुकसान झाले. तत्पूर्वी ब्रिटिशांच्या काळात पेशव्यांनी बांधलेला हा संपूर्ण पूलच वाहून गेला होता. त्यामुळे, ब्रिटिशांनी दगडी बांधकामात या पुलाचे काम पूर्ण केले, अशी माहिती इतिहास अभ्यासक मंदार लवाटे यांनी दिली.

संगम पूल आणि बंडगार्डन पूल अनुक्रमे १९ व्या शतकाच्या पूर्वार्धात आणि उत्तरार्धात उभारण्यात आले. या दोन्ही पुलांवरील वाढती वाहतूक लक्षात घेता, महापालिकेने पुलाच्या सुरक्षिततेसाठी वाहतूक एकेरी केली. बंडगार्डन पुलाशेजारी नवा पूलच उभारण्यात आला. तरीही, त्यावरून धावणाऱ्या वाहनांची संख्या वाढतच चालल्याने शहरातील सर्वच जुन्या पुलांच्या मजबुतीकरणाचे काम काही वर्षांपासून हाती घेण्यात आले आहे. त्या अंतर्गत सर्वप्रथम बंडगार्डन पुलाचे मजबुतीकरण करण्यात आले. वाहतुकीसाठी धोकादायक बनलेल्या डेंगळे पुलाचे कामही तातडीने सुरू करण्यात आले आहे. त्यानंतर, शहरातील इतर पुलांचे कामही केले जाणार आहे.

सात पुलांचे काम करणार

सुरुवातीच्या टप्प्यात शहरातील सात महत्त्वाच्या पुलांचे मजबुतीकरण करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. यामध्ये, डेंगळे पुलासह वेलस्ली पूल, शिवाजी पूल, शिंदे पूल, संभाजी पूल, म्हात्रे पूल आणि राजाराम पूल या सात पुलांची तपासणी केली जाणार आहे. पावसाळा संपल्यानंतर ही कामे करण्यात येणार असून, वेलस्ली पूल, शिवाजी पूल आणि संभाजी पूल या ती पुलांना हेरिटेज दर्जा असल्याने त्यांचे काम करण्यास अधिक कालावधी लागण्याची शक्यता आहे.

रायगडमधील दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर शहरातील ब्रिटिश काळात बांधण्यात आलेल्या पुलांची माहिती घेऊन त्यांचे तातडीने स्ट्रक्चरल ऑडिट करण्याची सूचना सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अधिकाऱ्यांना करण्यात आली आहे. हे पूल सुस्थितीत नसतील तर त्यावरील वाहतूक अन्य मार्गाने वळविण्याचा विचार करण्यात येईल.

सौरभ राव, जिल्हाधिकारी

पुलाचे नाव अंदाजे उभारणी वर्ष फ्रिट्ज गेराल्ड पूल (बंडगार्डन पूल) १८६७ शिवाजी पूल (नवा पूल) १९२० पहिला लकडी पूल (संभाजी पूल) १७६१ दुसरा लकडी पूल (ब्रिटिश काळात) तिसरा लकडी पूल १९६१ वेलस्ली पूल (संगम पूल) १८२०

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

एलबीटी होणार रद्द?

$
0
0

पुढील वर्षापासून अंमलबजावणी

म. टा. प्रतिनिधी, पुणे

वस्तू आणि सेवा कराला (जीएसटी) बुधवारी अखेर राज्यसभेने मंजुरी दिल्याने महापालिकेचा प्रमुख उत्पन्न स्रोत असलेला स्थानिक संस्था कर (एलबीटी) भविष्यात पूर्णपणे रद्द होण्याची शक्यता आहे. पुढील वर्षी एक एप्रिलपासून जीएसटी लागू झाला, तर त्याबरोबर स्थानिक स्तरावरील एलबीटी, जकात यासारखे सर्वच कर रद्द होणार असून, महापालिकांचे सरकारवरील अवलंबित्व वाढण्याची भीती आहे.
केंद्र-राज्य सरकार आणि स्थानिक स्वराज्य संस्थांकडून घेतल्या जाणाऱ्या सर्व वेगवेगळ्या करांचा एकत्रित समावेश जीएसटीमध्ये असेल. त्यामुळे, विक्रीकर, सेवा कर, व्हॅट या करांप्रमाणेच महापालिकांकडून आकारण्यात येणारे कर जीएसटीमध्येच अंतर्भूत होणार आहेत. संपूर्ण देशभरात एकच करप्रणाली लागू केली जाणार असल्याने विविध स्वरूपात आकारले जाणारे सर्व कर रद्द होणार आहेत. एक एप्रिलापासून जीएसटीची अंमलबजावणी झाल्यास, नव्या वर्षापासून हे सर्व कर इतिहासजमा होतील.
जकात किंवा एलबीटीसारख्या प्रवेश करातून (एन्ट्री टॅक्स) महापालिकांना सर्वाधिक उत्पन्न मिळते. याद्वारे मिळणारे उत्पन्न हेच मुंबई, पुणे, नागपूर, नाशिक, औरंगाबाद यासारख्या राज्यातील मोठ्या महापालिकांचा मुख्य आर्थिक स्रोत आहे. हा कर रद्द झाल्यास, त्याची भरपाई कशी केली जाणार, महापालिकांना राज्याकडून अनुदान मिळणार का, ते किती मिळणार, या बाबी अद्याप स्पष्ट झालेल्या नाहीत. जीएसटीला मंजुरी मिळाल्यानंतर आगामी काळात त्या संदर्भातील भूमिका केंद्र-राज्य सरकारतर्फे जाहीर केली जाण्याची शक्यता आहे.
राज्य सरकारने मुंबई वगळता उर्वरित सर्व महापालिकांमध्ये एक एप्रिल २०१३ पासून एलबीटी लागू केला. व्यापाऱ्यांचा या कराला तीव्र विरोध होता. तरीही, तत्कालीन आघाडी सरकारने एलबीटी रद्द करण्याचे टाळले. दोन वर्षांपूर्वी झालेल्या सत्तांतरानंतर भाजप-शिवसेनेच्या युती सरकारने गेल्या वर्षी एक ऑगस्टपासून एलबीटी अंशतः रद्द केला. त्यामुळे, महापालिकांचे होणारे आर्थिक नुकसान टाळण्यासाठी सरकारवर महापालिकांना अनुदान देण्याची वेळ आली आहे.
..............
वस्तू आणि सेवा करामध्ये सर्व प्रकारच्या करांचा समावेश केला आहे. त्यामुळे, त्याची अंमलबजावणी सुरू झाल्यानंतर एलबीटी रद्द होईल. त्या बदल्यात पालिकांना त्यांचा हिस्सा कशा स्वरूपात मिळेल, हे आगामी काळात निश्चित होईल.
ज्ञानेश्वर मोळक
एलबीटीप्रमुख, पुणे महापालिका

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images